संत निर्मळा

संत निर्मळा अभंग

संत निर्मळा अभंग गाथा – एकूण २४ अभंग

संत निर्मळा अभंग – १

अनाथांचा नाथ कृपावंत देवा ।
घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥
अठ्ठाविस युगें विटेवरी उभा ।
वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥
पतित पावन गाजे ब्रीदावळी ।
पुरवावी आळी हीच माझी ॥३॥
उभा विटेवरी ठेवोनी चरण ।
म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥


संत निर्मळा अभंग – २

अनंता जन्मांचे सुकृत पदरीं ।
तोचि उच्चारी होठी हरिनाम ॥१॥
अनंता जन्माचें पुण्य जयागांठी ।
तोचि उच्चारी होठी हरिनामा ॥२॥
अनंता जन्मांचे तपादि साधन ।
तोचि नारायण जपे नाम ॥३॥
अनंता जन्मांची सोडियेली जोडी ।
तरीच लागे गोडी हरिनामीं ॥४॥
निर्मळा म्हणे अनंता जन्माचें ।
उच्चारतां वाचे पाप जाय ॥५॥


संत निर्मळा अभंग – ३

आजिवरी तुम्हीं तयासीं पाळिलें ।
अपराध साहिले चोखियाचे ॥१॥
तयाचिया पाठी आमुचा कंटाळा ।
आला कां दयाळा सांगा मज ॥२॥
हीन दीन मी पातकांची राशी ।
शरण पायांसी जीवें भावें ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो दयाळ ।
म्हणोनी सांभाळ करा माझा ॥४॥


संत निर्मळा अभंग – ४

आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा ।
उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥
संसाराचा छंद नकोसा हा झाला ।
परमार्थ भला संतांसंगें ॥२॥
जें आहे कडु तें तें लागे गोडू ।
गोडाचे जें गोडू तें लागे कडु ॥३॥
निर्मळा म्हणे सुख तुमचे पायीं ।
आणिक मी कांही नेणें दुजें ॥४॥


संत निर्मळा अभंग – ५

आनंदें वोविया तुम्हासी गाईन ।
जीवें भावें वोवाळीन पायांवरी ॥१॥
सुकुमार साजिरीं पाउलें गोजिरीं ।
ते हे मिरवली विटेवरी ॥२॥
कटावरी कर धरोनी श्रीहरी ।
उभा भीमातीरी पंढरीये ॥३॥
महाद्वारीं चोखा तयाची बहिण ।
घाली लोटांगण उभयतां ॥४॥


ऐकोनिया मात चोखा सांगे तिसी ।
पूर्ण नव मासांसी भरियेलें ॥१॥
साहित्य सामुग्री नाहीं कांही घरीं ।
म्हणोनी निर्धारी बोलियेली ॥२॥
ऐसा हा घोर कोणें वागवावा ।
म्हणोनी तुझे गांवा वेगें आलों ॥३॥
निर्मळा म्हणे अनुचित केलें ।
तुम्हां काय वहिलें म्हणो आतां ॥४॥


ऐसे आनंदाने एक मास राहिला ।
परी हेत गुंतला पांडुरंगी ॥१॥
रात्रंदिवस छंद विठ्ठल नामाचा ।
नाहीं संसाराचा हेत मनीं ॥२॥
भोजन सारूनी बैसले एकांती ।
निर्मळा बोलती चोखियासी ॥३॥
बहु दिस झाले खंती वाटे मना ।
पंढरीचा राणा आठवत ॥४॥
गोडधड जिवासी ते कांहीं ।
कई हो डोई पायीं ठेवीन मी ॥५॥
निर्मळा म्हणे अहो देवराया ।
भेटी लवलाह्या देई मज ॥६॥


कृपेच्या सागरा परिसा विनवणी ।
मस्तक चरणीं असो माझा ॥१॥
बहुत प्रकार मज तें कळेना ।
घातली चरणा मिठी बळें ॥२॥
देह मन चित्त करी तळमळ ।
न चालेचि बळ काय करूं ॥३॥
न सुटे संसार पडतसे मिठी ।
तेणें पडे तुटी तुम्हां सवें ॥४॥
निर्मळा म्हणे काय करूं आतां ।
तुम्ही तो परतें मोकलिलें ॥५॥


९ ​

कां बा पंढरीराया मोकलिलें मज ।
नाठवेचि मज दुजें कांहीं ॥१॥
मज तंव असे पायांसवें चाड ।
आणिक कैवड कांही नेणें ॥२॥
चोखियासी सुख विश्रांति दिधली ।
माझी सांड केली दिसतसे ॥३॥
निर्मळा म्हणे तुम्ही तो सुंजाण ।
माझा भाग शीण कोण वारी ॥४॥


१०

कां हो पांडुरंगा मज मोकलिलें ।
पराधीन केलें जिणें माझें ॥१॥
किती हे जाचणी संसार घसणी ।
करिती दाटणी काम क्रोध ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ ।
लाविलासे चाळा येणे मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना ।
येऊं द्या करुणा देवराया ॥४॥


११

चहूंकडे देवा दाटला वणवा ।
कां न ये कनवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे अंगी ।
सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ ।
लाविलासे चाळा येणें मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना ।
येऊं द्या करूणा देवराया ॥४॥


१२

चोखा म्हणे निर्मळेसी ।
नाम गाये अहर्निशी ॥१॥
तेणें संसार सुखाचा ।
इह परलोक साचा ॥२॥
साधन हेंचि थोर असे ।
शांति क्षमा दया वसे ॥३॥
ऐकातांचि आनंदली ।
निर्मळा मिठी चरणीं घाली ॥४॥


१३

जीवीचें सांकडें वारी देवराया ।
अहो पंढरीराया धांवा वेगीं ॥१॥
कां बा मोकलितां शरण आलिया ।
कां बा न ये दया तुम्हांलागीं ॥२॥
अनाथ परदेशी तुम्हांविण कोण ।
सुखें समाधान करा माझें ॥३॥
तुमचिया पोटीं बहु वाव आहे ।
अधीर हा होय जीव माझा ॥४॥
निर्मळा म्हणे बोलण्याची मात ।
माझा तो वृत्तांत निवेदिला ॥५॥


१४

तिहीं त्रिभुवनीं विस्तारिली कीर्ती ।
तो हा श्रीपती उभा विटे ॥१॥
अनाथाचा नाथ पतित पावन ।
हें आम्हां वचन सांपडलें ॥२॥
नाम धारकाच्या लागेन चरणीं ।
घेईन पायवणी पोटभरी ॥३॥
आनंदे निर्भर नाचेन महाद्वारीं ।
संत अधिकारी तेथीचे जे ॥४॥
निर्मळा करी प्रेमाची आर्ती ।
करोनी श्रीपति वोवाळित ॥५॥


१५

तुमचा भरंवसा धरोनी मानसीं ।
दृढ पायांसी शरण आलें ॥१॥
आतां कळेल तो करावा विचार ।
मी आपुला भार उतरिला ॥२॥
मांडीवरी मान ठेविली संपूर्ण ।
पुढील कारण जाणोनियां ॥३॥
निर्मळा म्हणे तारा अथवा मारा ।
तुमचें तुम्ही सारा वोझें आतां ॥४॥


१६

न होई पांगिला संसाराचे ठायीं ।
आणिक प्रवाहीं पाडूं नको ॥१॥
चित्त शुद्ध करि मन शुद्ध करी ।
वाचे हरि हरि जप सदा ॥२॥
या परतें साधन आन नाहीं दुजें ।
हेंचि केशवराजे सांगितलें ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुंजाणा ।
अनुभवीं खुणा मना तूंचि ॥४॥


१७

नाहीं मज आशा आणिक कोणाची ।
स्तुति मानवाची करूनी काय ॥१॥
काय हे देतील नाशिवंत सारे ।
यांचे या विचारें यांसी न पुरे ॥२॥
ऐंसें ज्याचें देणें कल्पांती न सरे ।
तेंचि एक बरें आम्हांलागीं ॥३॥
जो भक्तांचा विसावा वैकुंठनिवासी ।
तो पंढरीसी उभा विटें ॥४॥
निर्मळा म्हणे सुखाचा सागर ।
लावण्य आगर रूप ज्याचें ॥५॥


१८

परमार्थ साधावा बोलती या गोष्टी ।
पुरी न ये हातवटी कांही त्यांची ॥१॥
शुद्ध भक्तिभाव नामाचें चिंतन ।
हेंचि मुख्य कारण परमार्था ॥२॥
निंदा दोष सुति मान अपमान ।
वमनासमान लेखा आधीं ॥३॥
परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ ।
मानावा अढळ परमार्थीं ॥४॥
निर्मळा म्हणे हाचि परमार्थ ।
संतांचा सांगात दिननिशीं ॥५॥


१९

मज नामाची आवडी ।
संसार केला देशघडी ॥१॥
सांपडलें वर्म सोपें ।
विठ्ठल नाम मंत्र जपे ॥२॥
नाहीं आणिक साधन ।
सदां गाय नारायण ॥३॥
निर्मळा म्हणे देवा ।
छंद येवढा पुरवावा ॥४॥


२०

रात्रंदिवस मन करी तळमळ ।
बहु हळ हळ वाटे जीवा ॥१॥
काय करूं आतां पाउलें न दिसती ।
पडिलीसे गुंती न सुटे गळे ॥२॥
बहु हा उबग आला संसाराचा ।
तोडा फांसा याचा मायबापा ॥३॥
निर्मळा म्हणे आतां दुजेपण ।
चोखियाची आण तुम्हां असे ॥४॥


२१

वडील तूं बंधु असोनी अविचार ।
केला कां निर्धार सांग मज ॥१॥
न पुसतां कां बा आलासि धांवत ।
वहिनी आकांत करतील कीं ॥२॥
येरू मह्णे विठु पुरविल सामोग्री ।
भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी ।
विठोबासी कष्टी करणें काज ॥४॥


२२

संसाराचे भय घेवोनी मानसीं ।
चोखा मेहुणपुरीसी जाता झाला ॥१॥
देखोनी निर्मळा आनंदली मनीं ।
धांवोनी चरणीं मिठी घाली ॥२॥
बैसोनी शेजारी पुसे सुखमात ।
वहिनीं क्षेमवंत आहेत कीं ॥३॥
निर्मळा म्हणे पुढील विचार ।
कैसा तो साचार सांगे मज ॥४॥


२३

संसाराचे कोण कोड ।
नाहीं मज त्याची चाड ॥१॥
एका नामेंचि विश्वास ।
दृढ घालोनियां कांस ॥२॥
जेथें न चले काळसत्ता ।
विठोबाचें नाम गातां ॥३॥
शास्त्रें पुराणें वदती ।
नाम तारक म्हणती ॥४॥
विर्मळा म्हणे नामसार ।
वेदशास्त्रांचा निर्धार ॥५॥


२४

सुख अणुमात्र नाहीं संसारी ।
सदां हावभारी रात्रंदिवस ॥१॥
न घडे न घडे नामाचें चिंतन ।
संताचेम पूजन न घडेचि ॥२॥
न बैसे मन एके ठायीं निश्चळ ।
सदा तळमळ अहोरात्र ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुजाणा ।
पंढरीचा राणा जीवीं घरी ॥४॥


हे पण वाचा: संत बंका यांची संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *