संत निर्मळा

संत निर्मळा माहिती

बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा येथे निर्मळा यांचा जन्म झाला. मेहुणाराजा येथे निर्मळा नावाची नदी आहे. त्यावरूनच निर्मळा हे नाव देण्यात आले. संत निर्मळा या संत चोखा मेळा यांची लहान बहीण, तर सोयराबाई यांच्या नणंद होत्या. त्याचबरोबर सोयराबाईचे बंधू बंका यांच्या पत्नी होत्या. हे सर्व कुटुंब भाविक होते. पंढरीची नित्य वारी करणारे होते. मेहुणाराजा येथून वारी करणे अवघड होऊ लागल्यानंतर हे कुटुंब बराच काळ पंढरपूर येथे राहिले. परंतु चोखा मेळा यांच्या अपघाती निधनानंतर निर्मळा आणि त्यांचे पती बंका पुन्हा मेहुणाराजा येथे आले. आजही निर्मळा नदीतीरावर त्यांच्या समाधी आहेत.

ज्या काळात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या तटबंदीमध्ये गावकुसाबाहेरील समाजाची मोठी घुसमट होत होती, ती कोंडी फोडण्यासाठी ज्या धडका वेगवेगळ्या महामानवांनी दिल्या, त्यात चोखोबांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा होता. वर्णव्यवस्थेला धडका देत असतानाच कर्मकांडांमुळे गलितगात्र झालेल्या समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला, त्यात महिला संत निर्मळा यांचा वाटा मोठा दिसतो.

समाजातील जो वर्ग जास्त शोषित आहे, तोच कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेल्याचे दिसते. इथे मात्र निर्मळा या आपली वेगळी वाट निवडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

तेराव्या शतकात समाजातील मोठ्या वर्गाची परकियांच्या आक्रमणामुळे आणि स्थानिक उच्चवर्णियांच्या वर्चस्ववादी व्यवस्थेमुळे घुसमट होत होती. तेव्हा संत नामदेवांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्व समाजघटकांतील स्री-पुरुष संतांना एकत्र केले. कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिला. या पर्यायाच्या आघाडीच्या प्रचारक म्हणून निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते. त्या स्पष्ट शब्दांत नामसाधनेचा पर्याय अधोरेखित करताना म्हणतात-

संसाराचे कोण कोड । नाही मज त्याची चाड ॥
एका नामेंचि विश्वास । दृढ घालोनिया कांस ॥
जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ॥
शास्त्रे-पुराणे वदती । नाम तारक म्हणती ॥

या अभंगातून इतर कर्मकांडांत अडकण्यापेक्षा देवाच्या नावावर विश्वास ठेवा. त्या विठ्ठलाचे नाव घेतले की, काळाचीही सत्ता तेथे चालत नाही, असे ठामपणे सांगत असताना त्यासाठी निर्मळा शास्त्रे आणि पुराणांची साक्ष काढतात. कारण आपल्यासारख्या गावकुसाबाहेर राहणार्‍याचे कोण ऐकणार? यासाठी शास्त्र आणि पुराणांवर हवाला ठेवतात. कारण ज्या व्यवस्था कर्मकांडांमध्ये समाजाला जखडून ठेवण्यासाठी शास्त्र आणि पुराणांचे दाखले देत होते, त्याचेच दाखले देऊन समाजाला कर्मकांडांतून मुक्ती देण्याची व्यूहरचना वारकरी संतांनी केल्याचे दिसते.

प्रबोधनाच्या या चळवळीत निर्मळा या आपले मोठे भाऊ चोखा मेळा यांनाच गुरुस्थानी मानताना दिसतात; किंबहुना नामसाधनेचा सोप्पा मार्ग आपल्याला चोखा मेळा यांच्यापासूनच मिळाला असल्याचे सांगताना त्या म्हणतात-

चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ॥
तेणे संसार सुखाचा । इह परलोकी साचा ॥
साधन हेचि थोर असे । शांती क्षमा दया वसे ॥

इतर कर्मठ आणि कठीण साधनाकडे वळण्याऐवजी लोकांना नामसाधनेकडे आकर्षित करण्यासाठी हे साधन किती श्रेष्ठ आणि केवळ आपले संचित भक्कम असेल तरच कसे साध्य होते, हे सांगताना निर्मळा म्हणतात-

अनंत जन्माचे सुकृत पदरी । तोची उच्चारी ओठी हरिनाम ॥
अनंत जन्माचे पुण्य जया गाठी । तोची उच्चारी ओठी हरिनाम ॥
म्हणजे ज्याच्याकडे पुण्यसंचय आहे, तोच हरिनाम घेऊ शकतो,
असा विश्वास देत असतानाच अनंत जन्माचे पाप घालवायचे असेल तर

त्यासाठी सुद्धा भगवंताचे नाम हाच उपाय असल्याचा विश्वास देताना त्या सांगतात-

संत निर्मळा म्हणे अनंता जन्माचे । उच्चारिता वाचे पाप जाय ॥

पुण्य मिळविण्यासाठी आणि पाप घालविण्यासाठी ज्या नाना खटपटी कराव्या लागतात, असे पूर्वी सांगितले जात होते;

किंबहुना पापाची भीती आणि पुण्याची लालूच दाखवून समाजातील भोळ्या-भाबड्या लोकांचे शोषण केले जात होते.

त्या शोषणातून मुक्ती द्यायची असेल, तर भक्तीची सोपी पायवाट निर्माण करावी लागेल, हे गमक वारकरी संतांनी ओळखले होते.

म्हणूनच यज्ञ-याग, जप-तप, तीर्थयात्रा या परंपरागत पुण्य मिळविण्याची आणि पाप घालविण्याची साधने बाजूला सारून

मोफत आणि आपले नित्य कर्म पार पाडीत भगवंताचे नाम घेण्याचा सोपा पर्याय दिला.

त्या सोप्प्या भक्तिपंथाच्या एकनिष्ठ प्रचारक म्हणून संत निर्मळा यांच्याकडे पाहिले जाते.

आजही या विचारांचा जागर होण्याची गरज आहे.


हे पण वाचा: संत बंका यांची संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: anisvarta

Leave a Comment

Your email address will not be published.