संत रामदासांचे सार्थ अभंग

संत रामदासांचे सार्थ अभंग 1 ते 100

संत रामदासांचे सार्थ अभंग 1 ते 100


अभंग १

समुदाय काय सांगों श्रीरामाचा ।
‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।‌
सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌।
धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ ।
श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने ।
धन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण ।
सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर‌‌ धन्य ते अवतार ।
विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण‌‌ ‍‌‌अनन्य शरण रामदास ।

भावार्थ –  या अभंगात संत रामदास श्रीरामांच्या निकटवर्तीय समुदाया विषयी बोलत आहेत.राम जेष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार नाकारला जातो हा मोठा अन्याय आहे असे भरताला वाटते.व तो राज्य पदाचा त्याग करतो. असा निष्काम भरत, राजवाड्यातील सर्व सुखांचा ,पत्नीचा त्याग करुन रामांबरोबर वनवासात जाणारा व १४वर्षे अन्नत्याग करून उपोषण करणारा लक्ष्मण,सेवेसाठी सदैव तत्पर असणारा व जन्म सार्थकी लावणारा मारुती, भविष्याचा वेध घेऊन रामचरित्र रचणारे प्रतिभाशाली कवी वाल्मिकी ,भविष्यावर श्रध्दा ठेवून राघवाला शरण जाणारा रावणबंधू बिभिषण,सर्वभावे रामाला शरण जाणारी वानरसेना,ह्या सर्व ईश्र्वराच्या विभुती असून मी त्यांना अनन्य भावे शरण जातो असे संत रामदास म्हणतात.


अभंग २ .

काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी ।
जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन।
परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ।
परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे।
आता सावधान होणें।

भावार्थ – काळ प्रत्येक क्षणी पुढे जात आ मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही.जोवर काळ दूर आहे तोवरच प्रयत्न केले पाहिजेत.संसाराचे मायाजाल हेच दुःखाचे कारण आहे.संसार सत्य वाटत असला तरी तो क्षणभंगूर आहे.रामदास संसाराच्या अनित्यते बद्दल साधकालासावधानतेचा इशारा देत आहेत .व संसाराच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी धावाधाव करण्यास सांगत आहेत.


अभंग ३

ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं ।
देवा तुझी भेटी केंवि घडे भिन्न उपासना भिन्न संप्रदाव ।
एकमेकां सर्व निंदिताती पंडितां पंडितां विवाद लागला ।
पुराणिकां जाला कलह थोर वैदिकां वैदिक भांडती निकुरें ।
योगी परस्परें भांडताती स्वजाति विजाति भांडण लागलें ।
दास म्हणे केलें अभिमानें

भावार्थ – या अभंगात समर्थ रामदास संप्रदायातील मत भिन्नतेबद्दल भाष्य करीत आहेत.येथे भिन्न भिन्न उपासना.भिन्न भिन्न संप्रदाय आहेत.मत्सरापोटी ते एकमेकांची निंदा करतात.पंडितां पंडितां मध्ये पराकोटीचे वादविवाद लागतात.पुराणिकांमध्ये घोर कलह (भांडण ) माजतात.वेद जाणणाय्रा वैदिकांमध्दे निकराचे मतभेद माजतात.योगी परस्परविरोधी बनून वाद घालतात. हे पाहून समर्थ रामदासांना अत्यंत खेद होतो कारण हे सर्व केवळ अभिमानाने घडून येते पण त्याचा परिणाम असा होतो की, भक्त देवाच्या भेटीस पारखा होतो. आपणास देवाची भेटी केंव्ह घडेल असे वाटून तो काकुळतीस येतो.


अभंग ४

देह हे असार क्रुमींचें कोठार ।
परी येणे सार पाविजे तें देहसंगे घडे संसारयातना ।
परी हा भजना मूळ देही देहाचेनि संगे हिंपुटी होईजे ।
विचारें पाविजे मोक्षपद देहसंगें भोग देहसंगे रोग ।
देहसंगे योग साधनांचा देहसंगे गती रामदासीं जाली ।
संगति जोडली राघवाची

भावार्थ –  या अभंगात समर्थ रामदास अध्यात्मिक द्रुष्टीकोनातून मानवी देहाचे महत्त्व पटवून देत आहेत. देह हा असार (विनाशी ) असून अनेक प्रकारच्या रोगजंतुंचे भांडार आहे.।परंतू या असार देहाचा उपयीग करूनच आपण अविनाशी म्हणजे आत्म तत्वापर्यंत पोहचू शकतो.या देहामुळे संसारात अनेक यातना.शारिरीक व मानसिक दु:खे भोगावी लागतात तरिही देवाचे भजन याच देहामुळे शक्य होते. देहाच्या नश्वरतेमुळे निराश होण्यपेक्षा सारासार विचार करून मोक्षपदाला आपण पोहचू शकतो अशी ग्वाही समर्थ रामदास देत आहेत. देहासंगामुळे अनेक रोग जडतात अनेक भोग भोगावे लागतात, पण या देहामुळेच साधनेचा योग घडतो.या देहामुळेच समर्थांना रामदास म्हणवून घेण्याचे भाग्य प्राप्त झाले.त्यांना राघवाच्या संगतीचा लाभ झाला.असे श्री समर्थ म्हणतात.


अभंग ५

अनित्याचा भ्रम गेला ।
शुध्द नित्यनेम केला नित्यानित्य हा विचार ।
केला स्वधर्म आचार देहबुध्दी अनर्गळ ।
बोधे फिटला विटाळ रामदासी ज्ञान झाले आणि स्वधर्मा रक्षिलें

भावार्थ – या अभंगात संत रामदास नित्य व अनित्य गोष्टींचा विचार करण्यास सांगत आहेत.अनित्य (क्षणभंगुर) गोष्टींचा निरास करुन मनतील भ्रम दूर करावा असे ते सांगतात.त्यामुळे आपण नित्यानित्य विचार करुन देहबुध्दीचा त्याग करु शकतो.स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शुध्द नित्यनेमाने आत्मबोध होतो. या आत्मबोधामुळे सोवळे,ओवळे ,विटाळ या भ्रामक कल्पना गळून पडतात .संत रामदास म्हणतात की, आपणास असे ज्ञान झाल्या मुळेच आपण स्वधर्माचे रक्षण करु शकलो.


अभंग ६

घात करुनी आपला ।
काय रडशील पुढिलां बहुत मोलाचें आयुष्य ।
विषयलोभें केला नाश नाही ओळखिलें सत्या ।
तेणें केली ब्रह्महत्या रामीरामदास म्हणे ।
भुलों नको मूर्खपणे

भावार्थ – केवळ विषय,वासनांच्या लोभामुळे आपण आपले सर्व आयुष्य वाया घालवतो. विषयलोभामुळे आयुष्याचा नाश झाल्यावर पुढे कितीही दु:ख केले ,कितीहि रडलो तरी त्याचा काही उपयोग होत नसतो असे सांगून संत रामदास आपणच आपला घात करू नये असा उपदेश करीत आहेत.जो सत्य ओळखू शकत नाहीं तो एकप्रकारे ब्रह्महत्या च करत असतो .मूर्खपणाने सत्य असत्य ओळखण्यात चुक करु नये असा सावधगिरीचा सल्ला ते आपल्याला देत आहेत.


अभंग ७

धातुवरी आला मळ ।
तेणें लोपलें निर्मळ शेतीं न जाता आउत ।
तेणें आच्छादिले शेत मुखे न होतां उच्चार ।
तेणे बुडें पाठांतर नाहीं दिवसाचा विचार ।
दास म्हणे अंधकार

भावार्थ – कोणत्याही धातूचा काही दिवस वापर न केल्यास त्यावर गंज चढतो. गंजामुळे धातूची निर्मलता लोप पावते. शेतात बरेच दिवस आउत घातले नाही ,शेताची मशागत केली नाही तर तण वाढून सर्व शेत आच्छादून टाकते. पाठ केलेल्या पाठांतराची रोज उजळणी न केल्यास आपण ते विसरून जातो. दिवस उजाडला आहे असा विचार न करता झोपून राहिलो तर संत रामदास म्हणतात की,सगळीकडे अंधारच दिसेतो.


अभंग ८

ऐसा कैसा रे परमार्थ ।
जळो जळो जिणें व्यर्थ युक्ताहार करवेना ।
निद्रा आली धरवेना मन चंचळ आवरेना ।
नीच उत्तर साहवेना रामदास म्हणे भावे ।
स्थूल क्रियेस नब जावे

भावार्थ – शरिराला पोषक असलेला योग्य आहार जो घेत नाही ,झोप आली असता जो आवरू शकत नाही ,आपल्या चंचल मनावर जो संयम ठेवू शकत नाही तसेच इतरांनी केलेली निंदानालस्ती, अपशब्द जो सहन करू शकत नाही .अशा अत्यंत स्थूल गोष्टींवर जो मात करु शकत नाही तो परमार्थ साध्य करु शकणार नाही अशा माणसाचे जिणें व्यर्थ आहे असे संत रामदास मनापासून सांगत आहेत.


अभंग ९

वैद्य भेटला सुखदाता ।
रोगपालट जाला आतां रस ओतीला कानांत ।
येउनि झोंबला नयनांत रस भरला सांदोसांदीं ।
देही पालट जाली बुध्दि दिव्य देही ओतिला रस ।
गुरु न्याहाळी रामदास

भावार्थ – या अभंगात वैद्य रुपात सद्गुरू भेटल्यावर दे हात आणि मनात कसे परिवर्तन घडून येते याचे अत्यंत सुरेख वर्णन समर्थ रामदास करीत आहेत.एखादा निष्णात वैद्य भेटताच रोगपालट होतो .हा सुखदाता वैद्य म्हणजे सद्गुरु जो देहबुध्दीतच आमुलाग्र बदल घडवून आणतो.भक्तीचा प्रेमरस कानात ओतल्यावर तो डोळ्यात येऊन उतरतो आणि जगाचे स्वरूपच बदलून जाते. देहबुध्दि लुप्त होऊन सर्वत्र आत्मस्वरुप भरून राहते.हा दिव्यरस देहाच्या कणाकणात झिरपून भवरोग समूळ नाहिसा करतो, मन सुखावते.आपल्या या सद्गुरुला संत रामदास डोळे भरुन पाहतात.


अभंग १०

प्रव्रुत्ति सासुर निव्रूत्ति माहेर ।
तेथे निरंतर मन माझे माझे मनी सदा माहेर तुटेना ।
सासुर सुटेना काय करुं काय करूं मज लागला लौकिक ।
तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मज चि देखतां ।
यत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं यत्न संतसंगेविण ।
रामदास खुण सांगतसे

भावार्थ – संत रामदास या अभ़ंगात म्हणतात की, निव्रुती हे माझे माहेर असून तेथे माझे मन ओढले जाते.मनातून माहेरची आठवण जात नाही .परंतु प्रव्रूत्ति हे सासर असून त्या पासून सुटका करून घेता येत नाही .लौकिकाला टाळता येत नाही. त्यामुळे मनात निव्रूत्तिचा विवेक टिकवून धरता येत नाही.प्रयत्न करुनही मन या निव्रूत्ति च्या मार्गाने पुढे जात नाही. माझ्या डोळ्यांदेखत माझे हित दूर जात आहे.मनाच्या या द्विधा अवस्थेत असताना सुध्दा संत रामदासांचे विचारी मन अवस्थेतून सुटण्यासाठी प्रयत्न करते आणि संतसंगति शिवाय कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत अशी ग्वाही देते.संतसंगति हीच निव्रुती मार्गाची खूण आहे असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.


अभंग ११

ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं ।
माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव ।
घालिना कीं देव कारागृहीं कारागृह देवादिकांचे चुकेना ।
तेथे काय जनां चुकईल चुकईल भोग हें कईं घडावें ।
लागेल भोगावें केलें कर्म केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे ।
दास म्हणे भेटे संतजन।

भावार्थ – या अभंगात संत रामदास कर्मभोग आणि त्याचे परिणाम या विषयाची चर्चा करीत आहेत. त्या साठी ते इंद्राचे उदाहरण देतात. आपले राज्य कोणी तरी बळकावून बसेल असे वाटत असल्याने त्याच्या मनात नेहमीच उद्विग्नता असतं.एखादा बलवान दानव सर्व देवांना काराग्रुहात डांबून इंद्रपद मिळवून बसेल अशी भिती त्याला वाटते.संत रामदास म्हणतात की,देवादिकांना सुध्दा तुरंगवास चुकला नाही तर तो माणसाला कसा चुकणार?सुखदु:खाचे भोग माणसला कदापीही चुकवता येणार नाहीत. आपण जसे कर्म करू तसे भोग आपल्याला भोगावे लागणार असा कर्मसिध्दांत आहे. केलेल्या कर्माचे भोग भोगून संपवल्या नंतरच मनाची भ्रांती फिटते असे स्पष्ट मत येथे संत रामदासांनी व्यक्त केले आहे.ते पुढे असेही म्हणतात की,संतजन भेटल्यावरच ही प्रक्रिया घडून येते.


अभंग १२

तेचि जाणावे सज्जन ।
जयां शुध्द ब्रह्मज्ञान कर्म करिंती आवडी ।
फळाशेची नाही गोडी शांति क्षमा आणि दया ।
सर्व सख्य माने जया हरिकथा निरुपण ।
सदा श्रवण मनन बोलासारिखें चालणें ।
हींचि संतांचीं लक्षणें एकनिष्ठ उपासना ।
अतितत्पर भजना स्वार्थ सांडूनियां देणें ।
नित्य तेंचि संपादणें म्हणे रामीरामदास ।
जया नाहीं आशापाश।

भावार्थ –  अभंगात संत रामदास सज्जनांची लक्षणे सांगत आहेत.त्यांना शुध्द ब्रह्मज्ञान असते.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करण्याची आवड असते.शांती,क्षमा व दया या विषेश गुणांविषयी त्यांना अत्यंत आस्था असते , हरिकथेचे निरूपण ,सतत,श्रवण व मनन करणे ह्यांची आवड असते.संत नेहमीच जसे बोलतात तसेच वागतात.एकनिष्ठपणे उपासना करणे,देवाचे भजनात तत्परता असणे,अत्यंतिक नि:स्वार्थीपणा कोणताही आशपाश नसणे.सतत नित्य वस्तु म्हणजे परमेश्वराची उपासना करणे ही संत सज्जनांची लक्षणें आहेत हे संत रामदास सांगतात.


अभंग १३

जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ।
नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना ।
सर्वकाळ ध्यानारूढ मन पदार्थांची हानी होतां नये काही ।
जयाची करणी बोलाऐसी दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य ।
जयाचा अनन्य समुदाव ।

भावार्थ – संत रामदास या अभंगात म्हणतात की,जो मनाने पूर्ण समाधानी असून नि:संदेह असतो तो खरा ज्ञानी असतो.तो आवडीने कर्म उपासनेत रमतो ,तोए सर्वकाळ इश्वर चिंतनात मग्न असतो. ज्ञानी संतांकडुन केव्हाही कोणत्याही पदार्थाची हानी होत नाही.ते नहमीच जसे बोलतात तसेच वागतात.ज्यांचा जनसमुदाय खूप मोठा असतो.असे संत सज्ज्न खरोखर धन्य होत.


अभंग १४

जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू ।
भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो ।
सदा नि:संदेह देहातीत जया नाही क्रोध जया नाही खेद ।
जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूची लक्षणें ।
अति सुलक्षणें अभ्यासावी।

भावार्थ – ज्याला नित्य वस्तूचा पूर्ण बोध झाला आहे तो खरा साधु असे समजावे.अशा साधुच्या मनात कोणत्याही प्राणिमात्रांच्या विषयी आकस नसतो.असे साधु केवळ आत्मरूप असतात.ते नेहमी नि:संदेह असून देहातीत असतात.ते राग,लोभ,दु:ख यांच्या पलिकडे असतात.त्यांना धन,कांचनाचा अजिबात मोह नसतो. संत रामदास म्हणतात ही खऱ्या साधुची लक्षणे असून ती मनापासून अभ्यासावी.


अभंग १५

बोलण्यासारिखे चाले जो सज्जन ।
तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान ।
तेथे माझे मन विगुंतले व्रुत्ति उदासीन स्वधर्मरक्षण ।
तेथे माझे मन विगुंतलें पूर्ण समाधान सगुण भजन ।
तेथे माझे मन विगुंतलें दास म्हणे जन भावार्थ – संपन्न।तेथे माझे मन विगुंतलें ।

भावार्थ – जो सज्जन बोलण्या प्रमाणे वागतो तशी क्रुती करतो,शुध्द ब्रह्मज्ञानी असूनही ज्या सज्जनांना अभिमानाची बाधा नसते, नेहमी उदासिन व्रुत्तिने राहून जे धर्म रक्षणासाठी सतत प्रयत्न करतात, पूर्ण समाधानी असून जे आनंदाने सगुणाची उपासना करतात,अशा संताच्या ठिकाणी आपले मन गूंतून राहिले आहे असे संत रामदास या अभंगात सांगतात.शेवटच्या ओळीत तर ते असे म्हणतात की,जे सामान्य जन भावार्थ – संपन्न असून भक्तीपुर्ण अंतकरणाने देवाला आळवतात तेथेही आपले मन गुंतून पडते.


अभंग १६

धन्य ते भाविक वंदिती हरिदास ।
तयां ह्रषीकेश वंदितसे धन्य तें निंदक निंदिती सज्जन ।
येणें भावें घडे ध्यान त्यांचें धन्य दास दासी सज्जन सेवेसी ।
ते सुरवरांसी वंद्य होती।

भावार्थ – रामदास म्हणे तरीच धन्य होणें। जरी संग लाधणे सज्जनाचाभावार्थ – संत रामदास म्हणतात की, ते भाविक धन्य होत की जे हरिदासांना वंदन करतात . पुढे ते असेही म्हणतात की,जे सज्जनांची निंदा करतात ते निंदक सुध्दा धन्य होत कारण निंदा करण्यासाठी का होईना पण त्यांना सज्जनांचे ध्यान घडते.जे दासदासी सज्जनांची सेवा करतात ते धन्य होत कारण सुरवरच नव्हे तर प्रत्यक्ष ह्रषीकेशी त्यांना वंदन करतात. संत रामदास स्पष्टपणे सांगतात की, सज्जनांची संगति सहवास मिळणे यांतच जिवनाची खरी धन्यता आहे.


अभंग १७

जाणावा तो नर देवचि साचार ।
वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व ।
तयालागी सर्व सारखेचि निंदकां वंदकां संकटी सांभाळी ।
मन सर्वकाळी पालटेना पालटेना मन परस्त्रीकांचनी ।
निववी वचनी पुढिलांसीं पुढिलांसी नाना सुखें देत आहे ।
उपकारीं देह लावितसे लावितसे देह राम भजनासी ।
रामीरामदासीं रामभक्त।

भावार्थ – जो वाचेने सतत रामनामाचा जप करीत असतो तो पुरूष देवाचे रुप आहे असे समजावे असे स्षट करुन संत रामदास म्हणतात की,त्यांना सगुण भक्ती आवडते.त्यांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. ते सर्वांना सारखेच मानतात.ते पूर्ण ज्ञानी असतात पण त्यांना त्याचा गर्व नसतो.ते मनाने स्थिर असून आपली निंदा किंवा वंदना करणाऱ्या सर्वांना ते संकटात सांभाळतात. ते स्थिरबुध्दी असून स्त्री आणि कांचन यांचा मोह त्यांना पडत नाही.ते केवळ शब्दांनी समोरच्याचे मन शांत करतात,त्यांना नाना सुखें देतात आणि आपला देह परोपकारा करिता खर्च करतात.ते आपला देह रामभजनात झिजवतात.संत रामदास म्हणतात की, रामाचे दास असलेले ते खरे रामभक्त असतात.


अभंग १८

देव अभक्तां चोरला ।
आम्हां भक्तां सांपडला भेटीं जाली सावकाश ।
भक्ता न लागती सायास पुढे विवेक वेत्रपाणी ।
वारी द्रुश्याची दाटणी रामदासाचे अंतर ।
देवापाशी निरंतर।

भावार्थ – जे देवापासून विभक्त आहेत अशा अभक्तानीं देव चोरून नेला आहे.परंतू तो आम्हा भक्तांना सापडला आहे कारण प्रेमळ भक्तांना देव शोधून काढण्यासाठी काहीच सायास करावे लागत नाहीत, ते अनायासे देवाची सावकाश भेट घेऊ शकतात.संत रामदास सांगतात की,रामदासांचे मन निरंतर, सदासर्वकाळ रामापाशी गुंतलेले असते.


अभंग १९

ऐसा कोण संत जो दावी अनंत ।
संदेहाचा घात करुं जाणे आढळेना जया आपुले पारिखें ।
ऐक्यरूप सुखें सुखावला धन्य तेचि जनीं जें गुणें बोधिले ।
दास म्हणे जाले पुरुष ते

भावार्थ – संत रामदास म्हणतात , असा कोण संत आहे की , जो मनातील सर्व शंकांचे निरसन करुन प्रत्यक्ष अनंताचे दर्शन घडवू शकतो.तो असा संत असतो की, ज्याला आपल्या वेगळे असे कोणी दिसतच नाही . तो ऐक्यभावाने जगातील सर्वाशी पूर्णपणे एकरुप झालेला असतो त्यामुळें तो पूर्ण सुखात असतो.सगुण भक्तीने जे अशा प्रकारे सामान्य जनांशी बांधले गेले आहेत ते भाग्याचे पुरुष होत.


अभंग २०

जंव तुज आहे देहाचा संबंध ।
तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा।
देह कळवळा तेथें नाही नांदतसे सदा जवळी कळेना ।
कदा आकळेना साधुविण कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण ।
रामदास खूण सांगतसे।

भावार्थ – या अभंगात संत रामदास स्पष्टपणे सांगत आहेत की, जो पर्यंत देहसंग असतो तो पर्यंत राघवाचा बोध होत नाही कारण राघवाचा बोध देहातीत असतो.देहाविषयी मोह ,ममत्व असेल तो पर्यंत राघवाचा लाभ होणार नाही.तो सतत आपल्या निकट असूनही त्याचे स्वरुप आपल्याला सत्संगाशिवाय समजू शकत नाही. राघवाचे स्वरूप समजण्यासाठी संतांना शरण जाणे हाच केवळ एकमेव मार्ग आहे .ही खूण संत रामदास सांगत आहेत.


अभंग २१

पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे ।
तेथें रुप आहे राघवाचें निराकार राम देखतां विश्राम ।
दुरी ठाके श्रम संसारींचा सर्वकाळ रामदर्शन होतसे ।
निर्गुणीं विश्वासें मन माझें संतसंगें घडे नि:संगाचा संग।
राघवाचा योग रामदासीं।

भावार्थ –

साध्या चर्मचक्षुंनी जे दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास तेथेच राघवाचै रुप आहे.अशा निराकार रामाला पाहताच मनाला विश्राम मिळतो.संसारातील सर्व श्रम दूर निघून जातात.सर्व ठिकाणी सर्वकाळी केवळ रामच भरून राहिला आहे याची ष्रचिती येते व अशा रितीने रामदासांना रामाचा योग जुळून येतो


अभंग २२

देव जवळी अंतरीं ।
भेटिं नाहीं जन्मवरी भाग्यें आलें संतजन ।
जालें देवाचे दर्शन मूर्ति त्रैलोक्यीं संचली ।
द़ष्टि विश्वाची चुकली रामदासीं योग जाला ।
देहीं देव प्रगटला

भावार्थ –

देव अगदी आपल्या जवळ असतो,आपल्या अंतरी असतो पण जन्मभर त्याची भेट घडत नाही. एकदा भाग्य फळाला आले आणि संतांची भेट घडली,त्यांच्या मुळे देवाचे दर्शन झाले. देव स्वर्ग ,प़ुथ्वी,पाताळ असा त्रैलोकी भरुन राहिला आहे पण जगाच्या नजर चुकीमुळे देवाचे दर्शन घडत नाही असे। सांगून संत रामदास म्हणतात की,रामाचा दास बनण्याचा योग आला आणि रामदासांच्या देहात देव प्रगट झाला.


अभंग २३

आम्ही अपराधी अपराधी ।
आम्हां नाही द्ढ बुध्दि माझे अन्याय अगणित ।
कोण करील गणित मज सर्वस्वे पाळिलें ।
प्रचितीने संभाळिलें माझी वाईट करणी ।
रामदास लोटांगणीं ।

भावार्थ –

या अभंगात संत रामदासांची अपराधीपणाची भावना व्यक्त झाली आहे.आपल्याला निश्चयी बुध्दी नाही,ज्यांचे मोजमाप करता येणार नाही असे अगणित अन्याय घडले आहेत.वाईट करणी असूनही राघवाने सर्वस्वाने पालन केले आहे,अनेक वेळा सांभाळले आहे.अशी प्रचिती आली आहे.असे प्रांजलपणे सांगून, संत रामदास राम चरणीं लोटांगण घालून ,आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागत आहेत.


अभंग २४

पतितपावना जानकीजीवना ।
वेगी माझ्या मना पालटावें भक्तीची आवडी नाहीं निरंतर ।
कोरडे अंतर भावेविण माझें मीतूपण गेलें नाहीं देवा ।
काय करु ठेवा संचिताचा रामदास म्हणे पतिताचे उणे ।
पतितपावनें सांभाळावें।

भावार्थ –  या अभंगात संत रामदास आपल्या मनात प्रभु रामचंद्राने वेगानं बदल घडवून आणावा अशी प्रार्थना करीत आहेत.आपले अंत:करण भक्तीभावाशिवाय अगदी कोरडे असून मनामध्ये निरंतर भक्तिची आवड निर्माण होत नाहीं.अहंकार, मीतूपणा यांनी मन ग्रासलेले आहे कारण पूर्व संचिताचा ठेवा भक्तिच्या आड येतो.संत रामदास म्हणतात की, पतितांच्या उणिवा लक्ष्यात घेवून पतितपावन श्री रामाने पतितांना पावन करावे, सांभाळावे.


अभंग २५

पतितपावना जानकीजीवना ।
वेगीमाझ्या मना पालटावें वैराग्याचा लेश नाहीं माझें अंगी ।
बोलतसें जगीं शब्दज्ञान देह हें कारणीं लावावें नावडे ।
आळस आवडे सर्वकाळ रामदास म्हणे लाज तुझी तुज ।
कोण पुसे मज अनाथासी।

भावार्थ –

संत रामदास श्री रामाला प्रार्थना करतात की,त्यांनी आपले मन पालटून टाकावे.जगामध्ये कितीही शब्दज्ञान सांगत असलो तरी वैराग्याचा लवलेशही आपल्या अंगी नाही. देह सत्कारणी लावावा असे वाटत नाही. सदासर्वकाळ आळसच आवडतो.आपल्यातील हे सर्व दोष मान्य करून संत रामदास म्हणतात ,भक्तांचे हे सर्व दोष स्वामिंच्या स्वामीपणाला कमीपणा आणणारे आहेत कारण आम्हा अनाथांना या साठी कोणी विचारणार नाही.


अभंग २६

पतितपावना जानकीजीवना ।
वेगीं माझ्या मना पालटावें मन हे चंचळ न राहे निश्चळ ।
निरुपणीं पळ स्थिरावेना सांडुनियां ध्यान विषयचिंतन ।
करितसे मन आवरेना रामदास म्हणे कथा निरुपणे ।
मनाची लक्षणे जैसीं तैसीं

भावार्थ –

आपले मन हे अतिशय चंचल असून एक क्षणभरही शांत राहत नाही.धर्मग्रंथाच्या निरुपणात स्थिरावत नाही.ध्यान सोडून देऊन विषयांचे चिंतन करणाय्रा या मनाला कसे आवरावे हे समजत नाही.संत रामदास म्हणतात, कितीही कथा व निरूपणे ऐकली तरी मनाची लक्षणे बदलत नाही,जशीच्या तशीच राहतात.श्री रामाला शरण जावून ,या चंचल मनाला पुर्णपणे बदलवून टाकण्याची ते विनंति करतात.


अभंग २७

पतितपावना जानकीजीवना ।
वेगी माझ्या मना पालटावें मुखें बोले ज्ञान पोटीं अभिमान ।
पाहे परन्यून सर्वकाळ द्रुढ देहबुध्दी तेणें नाहीं शुध्दि ।
जाहलों मी क्रोधी अनावर रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान ।
सर्व ब्रह्मज्ञान बोलोनियां

भावार्थ –

मुखाने ज्ञानाच्या कितिही गोष्टी बोलत असलो तरी मन मात्र अहंकाराने भरलेले आहे. हे मन सतत इतरांचे न्यून शोधत असते.देहबुध्दी इतकी घट्ट आहे की,अंतःकरणाची शुध्दि होत नाही.क्रोध अनावर होतो. संत रामदास म्हणतात सर्व ब्रह्मज्ञान बोलुनही अहंकार व क्रोध यांना जिंकू शकत नाही. श्री रामाने त्वरित अज्ञानी मनाला पालटून टाकावे अशी कळकळीची विनंति करतात.


अभंग २८

पतितपावना जानकीजीवना ।
वेगीं माझ्या मना पालटावें मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलों।
संदेहीं पडलों मीपणाचें सदा खळखळ निर्गुणाची घडे ।
सगुण नावडे ज्ञानगर्वे रामदास म्हणे ऐसा मी पतित ।
मीपणें अनंत पाहों जातां

भावार्थ –

या अभंगात संत रामदास पतितपावन रघूनायकला आपले मन परिवर्तन घडवून आणावे अशी विनंति करीत आहेत.ते म्हणतात की, खोट्या शब्दज्ञानाच्या भोवर्यात सापडून मन साशंक बनले आहे.निर्गुण भक्तीची ओढ वाटु लागली आहे.ज्ञानाचा गर्व वाटु लागल्याने सगुण भक्ती आवडेनाशी झाली आहे.ज्ञानाच्या फसव्या अहंकाराने रामभक्तीला परखा झालो आहे,पतित बनलो आहे.


अभंग २९

बिभिषण भावें शरण आला परी ।
तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी।
तैसें हें आम्हासीं कैचे रामा धारिष्ट आमुचें पाहे सर्वोत्तमा ।
कलियुगींचे रामा दास तुझे दर्शन सुग्रीवा आधीं सौख्य दिले।
मग तेणे केले दास्य तुझे तुजलागीं प्राण वेंचिलें वानरीं ।
परि तूं धनुर्धारी पाठीराखा तुझे रुप द्रुष्टीं नसोनियां ठावें ।
नामीं सर्वभावें विश्वासलों सकळांहूनि साना रामदास जालों ।
परिवारेंसि आलो शरण तुज।

भावार्थ –

श्री राम लंकेच्या समुद्र किनाऱ्यावर येवून पोहचले आहेत ही बातमी रावण बंधू बिभिषण याला समजताच तो अत्यंत भक्तिभावाने त्यांना शरण गेला आणि प्रभू रामचंद्रांनी तात्काळ त्याला आश्वासन दिले परंतू हे भाग्य आपल्या वाट्याला कसे येणार असे विचारुन संत रामदास म्हणातात की,ते कलियुगातील रामदास आहेत.श्री रामाने वानरपती सुग्रीवाला आधी दर्शन सौख्य दिले आणि नंतर त्याने प्रभुरामाचे दास्य पत्करले.वानरसेनेने रामांसाठी स्वता:चे प्राण खर्ची घातले पण त्यांना हे माहिती होते की प्रभू रामा सारखा धनुर्धारी त्यांच्या पाठिशी आहे.संत रामदास म्हणतात श्री रामांचे रूप नजरेला पडले नसतांना सुध्दां केवळ त्यांच्या नामावर विश्वास ठेऊन आपण सर्वभावे श्री रामांना शरण गेलो .बिभीषण, सुग्रीव व वानरसेना यांच्या पेक्षा लीन होऊन रामदास झालो आणि सर्व परिवारासह रामांना शरण गेलो.


अभंग ३०

रामा तुझ्या स्वामीपणे ।
मानी ब्रह्मांड ठेंगणें तुजविण कोण जाणे ।
अंतर आमुचें तुजविण मज माया।
नाहीं नाहीं रामराया आम्हां अनाथां कासयां ।
उपेक्षिसी तुज समुदाय दासांचा ।
परि आम्हां स्वामी कैंचा तुजसाठीं जिवलगाचा ।
संग सोडिला सगुण रघुनाथ मुद्दल ।
माझें हेंचि भांडवल ।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास रामाची आळवणी करीत आहेत.रामाशिवाय दुसरे कुणी अंतरंगातील भावना जाणू शकत नाही.स्वामी रघुनाथा शिवाय मनापासून कुणावर माया कराविशी वाटत नाही. रामा सारखा स्वामी लाभल्यामुळे ब्रह्मांड मिळाल्या सारखे वाटते. असे असतांना श्री रामांनी आपल्या या एकनिष्ठ भक्तांची उपेक्षा करु नये अशी विनंति ते प्रभू रामचंद्रांना करतात.रामासाठी आपण अत्यंत जिवलग व्यक्तिंचा त्याग केला आहं.रामाची सगुण भक्ती हेच आपले एकमेव भांडवल आहे .रामांच्या सभोवताली दासांचा मोठा समुदाय आहे पण आम्हा भक्तांना श्री राम हे एकटेच स्वामी आहेत.रामांनी क्रुपा करुन या दासाला भव सागराच्या पार करावे अशी ईच्छा ते रामचरणी करीत आहेत.


अभंग ३१

माझा देह तुज देखतां पडावा ।
आवडी हें जीवा फार होती फार होती परी पुरली पाहतां ।
चारी देह आतां हारपले सिध्द जालें माझें मनीचें कल्पिले ।
दास म्हणे आलें प्रत्ययासी।

भावार्थ –

संत रामदास म्हणतात की, रामासमक्ष आपला देह पडावा अशी मनापासून आपली अपेक्षा होती आणि ती पुरवली गेली हे पाहतांना त्यांचे स्थूल ,सूक्ष्म ,कारण व महाकारण असे चारी देह हारपले . रामदास म्हणतात आपल्या असे अनुभवास आले आहे की, आपण मनापासून जे कल्पिले होते ते सिध्दीस आले आहे.


अभंग ३२

काळ जातो क्षणक्षणा ।
मूळ येईल मरणा काहीं धांवाधांव करी ।
जंव तो आहे काळ दुरी मायाजाळीं गुंतलें मन ।
परि हें दु:खासि कारण सत्य वाटतें सकळ ।
परि हें जातां नाहीं वेळ रामींरामदास म्हणें ।
आतां सावधान होणें।

भावार्थ – काळ क्षणाक्षणाला पुढे जात आहे,मरणाचे मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही. संसाराच्या माया जाळ्यात मन गुंतले आहे पण संसार हेंच दु:खाचे कारण आहे.नाशवंत संसार सत्य वाटतो परंतू त्याचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही,जो पर्यंत मरण काळ दूर आहे तो वरच सावधान होऊन मुक्ती साठी प्रयत्न केले पाहिजेत असा उपदेश संत रामदास करीत आहेत.


अभंग ३३

नदी मर्यादा सांडती ।
उष्णकाळीं वोसावती तैसा तारूण्याचा भर ।
सवें होतसे उतार भाग्य चढे लागवेगैं ।
सवेंचि प्राणी भीक मागे रामदास म्हणे काळ ।
दोनी दिवस पर्वकाळ

भावार्थ – पावसाळ्यात नद्या पुराच्या पाण्यामुळे फोफावतात व किनारा सोडून वाहू लागतात,तर उन्हाळ्यात कोरड्या पडतात.संत रामदास म्हणतात तारुण्याचा भर नदीच्या पाण्यासारखा असतो,त्याला लवकरच उतार पडतो.माणसाचे भाग्य तसेच आहे.एकाएकी भाग्य उजळते आणि अचानक मावळते,माणसावर भीक मागण्याची वेळ येते.संत रामदास म्हणतात सतत बदलणाय्रा संसारात लाभहानी दोन्हीही पर्वकाळच समजावेत.


अभंग ३४

पुरें पट्टणें वसती ।
एक वेळ ओस होती तैसे वैभव हें सकळ ।
येतां जातां नाहीं वेळ बहुत स्रुष्टीची रचना ।
होय जाय क्षणक्षणा दास म्हणे सांगों किती ।
आले गेले चक्रवर्ती 

भावार्थ – अनेक शहरे ,राजधान्या वसवल्या जातात पण एक वेळ अशी येते कीं,त्या ओस पडतात.तसेच सगळे वैभव येते आणि लयाला जाते त्याला वेळ लागत नाही.सर्व स्रुष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि बदलते.संत रामदास म्हणतात कितीतरी चक्रवर्ती राजे आले आणि काळाच्या पडद्याआड नाहिसे झाले.


अभंग ३५

सांजे ओसरतां सांत ।
वांया करावा आकांत तैसीं सखीं जिवलगें ।
जाती एकमेकांमागें चारी दिवस यात्रा भरे ।
सवेंचि मागुति ओसरे पूर्ण होतां महोत्साव ।
फुटे अवघा समुदाव बहू वह्राडी मिळाले ।
जैसे आले तैसै गेले एक येती एक जाती ।
नाना कौतुक पाहती रामीरामदास म्हणे ।
संसारासी येणे जाणे।

भावार्थ – संध्याकाळ होताच सूर्य अस्ताला जातो त्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे तसेच आपले सगे,सोयरे ,,जिवलग एका पाठोपाठ आपल्याला सोडून निघून जातात.चार दिवस यात्रा भरते आणि हळूहळू ओसरते.एखादा मोठा उत्सव पूर्ण होतो आणि उत्सवाला आलेले सर्व लोक पांगतात.लग्न समारंभा साठी पुष्कळ वह्राडी जमतात ,आले तसे निघून जातात.काही येणाय्रा जाणाय्रांचे कौतुक पाहत असतात.संत रामदास म्हणतात या प्रमाणे संसारी येणे जाणे अटळ आहे.


अभंग ३६

एकीकडे आहे जन ।
एकीकडे ते सज्जन पुढें विवेकें वर्तावे ।
मागे मूळ सांभाळावें उदंड झाला समुदाय ।
तरि आदि सांडू नये रामीरामदास म्हणे ।
जनीं मान्य हें बोलणें।

भावार्थ – संत रामदास म्हणतात ,सामान्य जन व सज्जन असे दोन प्रकारचे लोक पहावयास मिळतात. समाजात माणसाने विवेकाने वागावे,आपली मूळ परंपरा सोडू नये .आपल्याला जनमान्यता मिळून मोठा समुदाय सभोवती जमा झाला तरीही आपण ज्या गुरु परंपरेतून आलो आहे तिचा आदर राखून त्या प्रमाणेच वागावे,त्याला बाधा आणू नये असे मत संत रामदास या अभंगात व्यक्त करतात.


अभंग ३७

प्रपंच सांडुनिया बुध्दी ।
जडली परमार्थ उपाधि मना होईं सावचित्त ।
त्याग करणें उचित संप्रदाय समुदाव ।
तेणें जडे अहंभाव रामदास म्हणे नेमें ।
भिक्षा मागणें उत्तम।

भावार्थ – प्रपंच सोडण्याची बुध्दी झाली, परमार्थाची उपाधि जडली परंतू समुदाय गोळा झाला आणि संप्रदाय निर्माण झाला की अहंभाव जडतो.संत रामदास सांगतात की, अहंकार निर्मूलन होण्यासाठी भिक्षा मागणे हा मार्ग आहे.यासाठी सावध राहून अहंकाराचा त्याग करणे उचित आहे.


अभंग ३८

नको ओळखीच जन ।
आंगी जडे अभिमान आतां तेथें जावें मना ।
जेथे कोणी ओळखेना लोक म्हणती कोण आहे ।
पुसों जाता सागों नये रामदास म्हणे पाहीं ।
तेथे कांहीं चिंता नाही।

भावार्थ – ओळखीच्या लोकांमध्यै सतत राहिल्याने मनाला अभिमानाचा रोग जडतो. अशा वेळी अशा ठिकाणि निघून जावें की जेथें ओळखिचे लोक फारसे भेटणार नाहीत. जेंव्हा लोक आपण कोण असे विचारतील तेंव्हा ओळख सांगू नये. संत रामदास म्हणतात कीं, असे वागल्यास तेथे काहीं चिंता राहत नाही.


अभंग ३९

आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत ।
भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन ।
आम्ही स्वानंदसंपन्न समाधान तें सभाग्य ।
असमाधान तें अभाग्य रामीरामदासीं देव ।
सख्यासहित स्वानुभव।

भावार्थ – या अभंगात संत रामदास आपण भाग्यवंत आहोत कारण मोक्षलक्ष्मी आपल्याला प्रसन्न आहे ,त्यामुळे संसारातील दारिद्रय आमच्याकडे नाही. आपण स्वानंद संपन्न् आहोत असे मोठ्या अभिमानाने सांगतात.समाधान हे सौभाग्य आणि असमाधान हेंच दारिद्र्य होय असे त्यांचे मत आहे.श्री राम हे रामदासांचे दैवत असून श्रीराम सौख्याचा त्यांना स्वानुभव आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


अभंग४०

स्नान संध्या टिळेमाळा ।
पोटीं क्रोधाचा उमाळा एसें कैंसें रे सोंवळे।
शिवतां होतसे ओंवळें नित्य दंडितां हा देहो ।
परि फिटेना संदेहो बाह्य केली झळफळ ।
देहबुध्दीचा विटाळ नित्यनेम खटाटोप ।
मनीं विषयाचा जप रामदासीं द़ुढभाव ।
तेणेंविण सर्व वाव।

भावार्थ –   मनामध्ये खरा भक्तीभाव नसतांना केवळ बाहय उपचारांचे अवडंबर माजवणाय्रा दांभिक भक्तांवर टीका केली आहे. संत रामदास म्हणतात ,नेहमी नियमितपणे स्नान संध्या करणारे, कपाळावर टिळे व गळ्यात माळा घालणाय्रांच्या मनात जर राग धुमसत असेल तर किंवा उपास तापास देहदंडना करुनही मनातील संशय फिटला नसेल ,बाहेरुन खूप खटाटोप करनही देहबुध्दी कायम असेल ,केवळ बाह्यतः उपासनेचा देखावा करीत मनात विषयाचा विचार करीत असेल ,सोवळ्या ओवळ्याच्या संकुचित कल्पनांवर विश्वास असेल ,तर हे सर्व बाह्य उपचार निर्मळ भक्ती भावाशिवाय व्यर्थ होत असे स्पष्ट मत संत रामदास या अभंगात मांडत आहेत .


अभंग ४१

ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड ।
करिती पवाड विघ्नरुपें यालागीं सगुणभावें उपासना ।
करिजे निर्गुणा पावावया रामीरामदास विश्वासी सगुण ।
सगुणीं निर्गुण कळों आलें।

भावार्थ – ब्रह्मा,विष्णू, महेश हे देव ब्रह्मज्ञानाआड विघ्न रूपाने अडथळे आणतात.संत रामदास म्हणतात, यासाठी निर्गुणाची उपासना करण्यापूर्वी आधी सगुणाची उपासना करावी. श्री रामाच्या सगुण रूपावर उदंड विश्वास असल्याने आपणास सगुण निर्गुण दोन्हीही कळून आले असे ते आवर्जून सांगतात.


अभंग४२

बाळक जाणेना मातेसी ।
तिचे मन तयापखशीं तैसा देव हा दयाळ ।
करी भक्तांचा सांभाळ धेनु वत्साचेनि लागें।
धांवें त्यांचे मागें मागें पक्षी वेंधतसे गगन ।
पिलांपाशी त्याचें मन मत्स्यआठवितां पाळी ।
कूर्म द्रुष्टीनें सांभाळी रामीरामदास म्हणे ।
मायाजाळाचीं लक्षणें।

भावार्थ – लहान मूल आईला ओळखत नाही पण ती मात्र सतत त्याचाच विचार करीत असते देव हा माते सारखाच दयाळू असून तो भक्तांचा सांभाळ करतो. गाय वासरासाठी मागे धावते पक्षी आकाशात उडतो पण त्याचे मन सतत घरट्यातील पिलापाशी असते मासे सतत स्मरण करून आपल्या पिलांचे पालन पोषण करतात तर कासव आपल्याi दृष्टीने पिलांचा सांभाळ करत असते संत रामदास म्हणतात की ही सगळी मायेची लक्षणे आहेत.


अभंग४३

गजेंद्र सावजे धरिला पानेडीं।
रामे तेथे उडी टाकली प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी ।
रामे तेथे उडी टाकीयेली तेहेतीस कोटी देव पडिले बांदोडी ।
रामे तेथे उडी टाकियेली दासा पायी पडली देहबुध्दीबेडी।
रामे तेथे उडी टाकियेली रामदास म्हणे कां करिसी वणवण।
रामें भक्त कोण उपेक्षिले।

भावार्थ – श्री राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही ,हे पटवून देण्यासाठी संत रामदास अनेक उदाहरणे देत आहेत. गजेंद्राचा पाय मगरीने पकडल्या मुळे तो मोठया संकटात सापडला. श्री रामाने तेथे धाव घेऊन त्याची सुटका केली .भक्त प्रल्हादाला छळत असलेल्या त्याच्या पित्यापासून सुटका करण्यासाठी विष्णु नरसिंह बनून आले. तेहतीस कोटी देवांची सुटका करण्यासाठी श्री रामांनी रावणाचा वध केला .रामदास म्हणतात, दासांच्या पायात जेव्हा देहबुध्दीची बेडी पडते ती सोडवण्यासाठी श्री राम तत्परतेने धाव घेतात, ते भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाहीत तेंव्हा भक्तांनी चिंताग्रस्त होऊन वणवण करू नये .


अभंग ४४

ध्यान करु जातां मन हरपलें।
सगुणी जाहलें गुणातीत जेथें पाहें तेथें राघवाचें ठाण।
करीं चाप बाण शोभतसे रामरुपीं दृष्टि जाऊनी बैसली।
सुखें सुखावली न्याहाळितां रामदास म्हणे लांचावलें मन।
जेथें तेथें ध्यान दिसतसे।

भावार्थ –  या अभंगात संत रामदास रामाचे ध्यान करीत असताना आलेल्या अनुभवाचे वर्णन करीत आहेत ते म्हणतात, ध्यान करीत असताना मनच हरपून गेले मनाचे मनपणच नाहिसे झाले ,सत्व, रज, तम या गुणांच्या अतीत झाले .सर्वत्र चापबाणधारी रामरुपच भरुन राहिले आहे अशी जाणिव झाली.हे रामरुप बघताना मन सुखावले. या सुखासाठी मन लालचावले.जेथे तेथे हेच रामरुप, त्या शिवाय दुसरे काही दिसेनासे झाले.


अभंग४५

सोयरे जिवलग मुरडती जेथूनी।
राम तये स्थानीं जिवलग जीवातील जीव स्वजन राघव।
माझा अंतर्भाव सर्व जाणे अनन्यशरण जावें तया एका।
रामदास रंकाचिया स्वामी।

भावार्थ –  आपले सगेसोयरे ज्या प्रसंगी आपली उपेक्षा करुन आपल्याला सोडून निघून जातात त्यावेळी केवळ राम हाच आपला जिवलग सखा असतो. आपल्या मनातील सर्व भावभावना जाणणारा,आपल्या जीवनाचा आधार, आपला स्वामी केवळ राम च आहे. संत रामदास म्हणतात की, राम रंकाचा स्वामी असून त्यांना अनन्य शरण जावे.


अभंग४६

शिरीं आहे रामराज।
औषधाचे कोण काज जो जो प्रयत्न रामाविण।
तो तो दु:खासी कारण शंकराचे हळाहळ ।
जेणें केलें सुशीतळ आम्हा तोचि तो रक्षिता।
रामदासीं नाहीं चिंता।

भावार्थ – या अभंगात संत रामदास रामावरील अढळ विश्वास व्यत्त करतात. ते म्हणतात,रामराजा सारखा स्वामी असतांना अन्य उपायांची ,औषधाची गरज नाही,कारण रामाच्या क्रुपे शिवाय केलेले सर्व प्रयत्न दु:खाचे कारण आहे. भगवान शंकराचे हळाहळ राम क्रुपेने शीतल बनले.आमचा रक्षणकर्ता रामा सारखा स्वामी असतांना रामदासांना कसलीच चिंता नाही.


अभंग४७

ठकाराचें ठाण करीं चापबाण।
माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे. रामरुपीं देहो जाला नि:संदेहो ।
माझें मनीं राहो सर्वकाळ मुखीं रामनाम चित्ती घनश्याम।
होतसे विश्राम आठवितां रामदास म्हणे रामरुपावरीं ।
भावें मुक्ति चारी ओवाळीन।

भावार्थ – हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले श्री रामाचे रुप पाहातांच मन नि:संदेह बनते . हे रामरुप मनांत, रामाचे नाम मुखात, तोच घनश्याम अंतःकरणात आठवावा कीं ज्या मुळे मनाला पूर्ण विश्वाम, पूर्ण शांती मिळते.संत रामदास म्हणतात, रामरुपा वरुन आपण चारी मुक्ती ओवाळून टाकतो.


अभंग४८

कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत।
तेथें मी निवांत बैसेईन बैसेईन सुखरुप क्षणैक।
पाहिन विवेक राघवाचा स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ।
जेथें नाही मळ, माईकांचा माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।
रामदरुशणीं रामदास।

भावार्थ –   संत रामदास म्हणतात, अगदी एकांतात, निवांतपणे कल्पनेच्या मनोराज्यात क्षणभर का होईना सुखेनैव बसून राघवाच्या विवेक विचारावर मन एकाग्र करावेसे वाटते. रामाचे स्वरुप अत्यंत कोमल, निर्मल आहे. तेथे खोट्या मायेचा मळ नाही. रामाचे दर्शन होताच मायेचा मळ निघून जातो आणि चित्त शुध्द होते.


अभंग४९

भगवंताचे भक्तीसाठी।
थोर करावी आटाटी स्वेदबिंदु आले जाण ।
तेंचि भागीरथीचे स्नान सकळ लोकांचे भाषण।
देवासाठीं संभाषण जें जें हरपलें सांडले ।
देवाविण कोठें गेलें जठराग्नीस अवदान।
लोक म्हणती भोजन एकवीस सहस्त्र जप।
होतो न करितां साक्षेप दास म्हणे मोठें चोज।
देव सहजीं सहज।

भावार्थ –  देवाच्या भक्तीसाठी खूपच प्रयत्न करावे लागतात .भक्ती भावामध्ये शरीरावर आलेले स्वेदबिंदू हे जणू गंगेचे स्नान होय .आपल्या जवळच्या लोकांशी झालेले बोलणे हेच देवाशी केलेले संभाषण .आपल्याकडून जे हरवते ,जे सांडते ते देवाकडेच जाते कारण देव सगळीकडे आहे सर्व माणसांमध्ये भरून राहिला आहे. पोटात भडकलेल्या भुकेच्या अग्निला घातलेले अन्नाचे इंधन म्हणजेच भोजन . आपण दिवसात जे २१००० श्वास घेतो तोच देवासाठी केलेला अजपा जप होय . संत रामदास म्हणतात हेच एक मोठे कौतुक आहे की, देव इतका सहजासहजी प्राप्त होतो.


अभंग५०

वेधें भेदावें अंतर ।
भक्ति घडे तदनंतर मनासारखें चालावें ।
हेत जाणोनि बोलावें जनी आवडीचे जन ।
त्यांचे होताती सज्जन दास म्हणे निवडावें ।
लोक जाणोनियां घ्यावे।

भावार्थ – संत रामदास म्हणतात ,देव भक्ता मधील अंतर कमी होते तेंव्हाच भक्ति निर्माण होते.आपल्या मना प्रमाणे वागावें आणि आपल्या व इतरांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे . सामान्य लोकांमध्ये जे लोकप्रिय होतात ते सज्जन मानले जातात. म्हणून लोकांची मने जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.


अभंग ५१

रामभक्तीविण अणु नाही सार।
साराचेंहि सार रामनाम कल्पनाविस्तार होतसे संहारु ।
आम्हा कल्पतरु चाड नाहीं कामनेलागुनी विटलासे मनु ।
तेथें कामधेनु कोण काज चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं।
तेथें चिंतामणी कोण पुसे रामदास म्हणे रामभक्तीविणें।
जाणावें हें उणें सर्वकांही।

भावार्थ –

रामनाम हे सर्व अविनाशी वस्तुंचे सार आहे.रामनामाशिवाय सर्व असार आहे.असे सांगून संत रामदास म्हणतात कल्पतरु(इच्छिले फळ देणारे झाड )हा कल्पना विस्तार आहे,तेंव्हा त्याची ईच्छा नाही.रामनाशिवाय मनांत कोणतिही कामना नाही त्या मुळे कामधेनुची अभिलाषा नाही.श्री रामाचे गुण गातांना मनाला कसलिही चिंता नाही तर चिंतामणिची पण अपेक्षा नाही.संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात की,कल्पतरु,कामधेनु,चिंतामणी हे सर्व रामभक्तीच्या तुलनेने अगदी गौण आहेत.


अभंग५२

ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी।
पाहेना तयासी काय करुं सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां।
वैराग्य पाहतां तेथें नाहीं दारिद्रयाचें दु:ख केलें देशधडी।
रामराज्य गुढी उभविली उभविली गुढी भक्तिपंथें जावें।
शीघ्रचि पावावें समाधान समाधान रामीं रामदासां जालें।
सार्थकानें केलें सार्थकचि।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास जीवनाची सार्थकता कशात आहे हे स्पष्ट करून सांगत आहेत .आजवरचे सर्व आयुष्य दारिद्र्य भोगताना गेले पण तरीही जीवनात वैराग्य आले नाही हे दुःख बाजूस सारून रामराज्याची गुढी उभारून भक्तिमार्गाने जाण्याचे ठरवले. राम भक्तीमुळे संत रामदासांना पूर्ण समाधान प्राप्त झाले .जीवनाचे सार्थक करणाऱ्या श्री रामांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे संत रामदास अगदी निसंशयपणे सांगतात हे आत्मज्ञान जगाला उद्धरून उजळून टाकत.पण त्या कडे कोणी लक्ष्य देत नाही अशी खंत संत रामदास व्यत्त करतात.


अभंग५३

कौल जाला रघुनाथाचा ।
मेळा मिळाला संतांचा अहंभाव वरपेकरी ।
बळे घातला बाहेरी क्षेत्रीं मंत्री विवेक जाला।
क्रोध देशोधडी केला काम देहींच कोंडिला।
लोभ दंभ नागविला फितवेकर होता भेद ।
त्याचा केला शिरच्छेद तिरस्कार दावेदार ।
त्यास बोधे केला मार मन चोरटे धरिलें ।
नित्यनेमे जंजरिले आळस साक्षेपें घेतला।
पायीं धरुनि आपटिला द्वेष बांधोनि पाडिला।
खेद खाणोनि ताडिला गर्व ताठा विटंबिला।
वाद विवेके झोडिला करुनि अभावाचा नाश ।
राहे रामीं रामदास

भावार्थ –

रघुनाथाचा कौल मिळतांच संतांचा मेळा जमला संतांनी अहंभावाला, मीपणाला जबरदस्तीने बाहेर घालविला. देहरूपी क्षेत्राचा विवेक हा मंत्री झाला. क्रोधाला हद्दपार केला. कामवासनेला देहाच्या तुरुंगात कोंडला लोभ आणि दांभिकता यांचे पूर्ण उच्चाटन केले.फितुरी करणाऱ्या भेदाचा शिरच्छेद केला .तिरस्कार हा दावेदार सारखा होता त्याच्यावर उपदेशाचा मारा केला. त्या चोरट्या चंचल मनाला धरुन ठेवले.नित्यनेमाने आळसाला पायाला धरून आपटला व त्याचा समाचार घेतला.मत्सराला बांधून कैद केले. .खेदाचे मूळ खणून काढले .गर्वाची विटंबना केली. विवेकाचने वाद झोडून काढला .अशाप्रकारे सर्व अभावांचा नाश करून रामदास रामचरण स्थिर झाले.


अभंग५४

असोनि ईंद्रियें सकळ।
काय करावीं निष्फळ नाहीं कथा निरुपण।
तेंचि बधिर श्रवण नाहीं देवाचें वर्णन ।
तें गे तेंचि मुकेपण नाहीं पाहिलें देवासी ।
अंध म्हणावें तयासी नाहीं उपकारा लाविले।
तें गे तेचि हात लुले केले नाही तीर्थाटण।
व्यर्थ गेले करचरण काया नाहीं झिजविली।
प्रेतरुपचि उरली दास म्हणे भक्तिविण ।
अवघे देह कुलक्षण।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास नवविधा भक्तीचा महिमा वर्णन करून सांगत आहेत .कथा निरूपण न करणारे ,कान असूनही बहिरे .,देवाचे गुणवर्णन न करणारे,जीभ असूनही मुके ,देवाचे रूप न पहाणारे ,डोळे असूनही आंधळे ..,परोपकार न करणारे हात असूनही लुळे. पाय असूनही तीर्थयात्रा न करणारे पांगळे आहेत असे सांगून संत रामदास शेवटी म्हणतात ,अशा रीतीने देवाच्या भक्तीत काया झिजवली नाही तर ती केवळ प्रेतच होय .सर्व इंद्रिये असूनही ती जर देवाची भक्ती करण्यात वापरली नाही तर तो देह कुलक्षणी ,निष्फळ समजावा.


अभंग५५

वाणी शुध्द करीं नामें।
चित्त शुध्द करीं प्रेमें नित्य शुध्द होय नामीं ।
वसतांही कामीं धामीं कान शुध्द करी कीर्तन।
प्राण शुध्द करी सुमन कर शुध्द राम पूजितां।
पाद शुध्द देउळीं जातां त्वचा शुध्द करी रज।
मस्तक नमितां पादांबुज रामापायीं राहतां बुध्दि रामदासा सकळ शुध्दि।

भावार्थ –

नवविधा भक्तिचा महिमा सांगणाऱ्या या अभंगात संत रामदास आपल्या सर्व इंद्रियांची शुद्धी कशामुळे होते याविषयी सांगत आहेत .देवाच्या नावाचा जप केल्याने वाणी शुद्ध होते .देवा वरचे प्रेम मन शुद्ध करत .देवाचे किर्तन ऐकल्याने कान शुद्ध होतात .तर भावपूर्ण मन प्राण शुद्ध करते .रामाचे पूजन हात शुद्ध करतात .देवळात देवदर्शनास गेल्याने पाय शुद्ध होतात .त्वचा धुळीचे कण शुद्ध करतात. आणि देवाला नमन करताना मस्तक शुद्ध होते .श्रीरामाच्या चरणकमलांना चरण स्पर्श केला असता बुद्धी शुद्ध होते. अशा रीतीने संपूर्ण देहाची शुद्धी होते .असे संत रामदास म्हणतात.


अभंग५६

काम क्रोध मद मत्सर।
जरी हे जाले अनावर यास करावें साधन ।
सदा श्रवण मनन बोलाऐसें चालवेना।
जीव भ्रांति हालवेना दृढ लौकिक सांडेना।
ज्ञानविवेक मांडेना पोटीं विकल्प सुटेना ।
नष्ट संदेह तुटेना दास म्हणे निर्बुजले ।
मन संसारीं बुडालें ।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास राम कथेचे श्रवण व मननाचे काय फायदे होतात हे सांगत आहेत .जेव्हा वासना राग द्वेष हे मनाचे शत्रू अनावर होतात, जेव्हा आपल्याला बोलण्या प्रमाणे वागता येत नाही , लौकिकाचा हव्यास सुटत नाही, विवेक सुचत नाही, मनामध्ये निर्माण झालेल्या विपरीत कल्पनां पासून सुटका होत नाही, बुद्धी नष्ट करणारा संशय नाहीसा होत नाही, गोंधळलेले मन संसार सागरात बुडून जाते .संत रामदास म्हणतात या परिस्थितीतून सुटण्याचे एकच साधन आहे .राम कथा श्रवण करणे आणि श्री रामाच्या विवेक व कृती यावर मनन करणे हे होय.


अभंग५७

रामनामकथा श्रवणीं पडतां ।
होय सार्थकता श्रवणाची मुखें नाम घेतां रुप आठवलें।
प्रेम दुणावलें पहावया राम माझे मनीं शोभे सिंहासनीं।
एकाएकीं ध्यानीं सांपडला रामदास म्हणे विश्रांति मागेन।
जीवींचें सांगेन राघवासी

भावार्थ –

राम कथा कानावर पडताच श्रवण केल्याचे सार्थक होते. रामनामाचा जप सुरू होताच रामाचे रूप आठवते आणि ते पहाण्यासाठी मन आतुर होते .सिंहासनावर विराजमान झालेला राम मनात आहे तोच एकाएकी ध्यानात सापडतो. संत रामदास म्हणतात या राघवाला मनातील गोष्टी सांगाव्यात त्याच्याकडे मनासाठी पूर्ण विश्रांती मागावी असे वाटते.


अभंग५८

निरुपणाऐसें नाहीं समाधान ।
आणिक साधन आढळेना भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे।
भावार्थ – सांपडे निरुपणें शांति क्षमा दया नैराश्यता मनीं।
अवस्था उन्मनी निरुपणें भ्रांतीचा संदेह तुटे एकसरा।
दास म्हणे करा निरुपण।

भावार्थ –

संत रामदास या अभंगात म्हणतात की, राम कथा निरूपणा सारखे समाधान कशातच नाही .यासारखे दुसरे साधन नाही .राम कथा निरुपणातून भक्ती व ज्ञान या दोन्ही गोष्टींचा लाभ होतो आणि वैराग्य आवडू लागते .कथा निरुपणातून भावार्थ – समजतो .दया क्षमा शांती या सद्गुणांचा लाभ होतो .मनाचे नैराश्य नाहीसे होऊन निरूपणा मुळे मनाचे उन्मन होते .संदेह मुळापासून नाहीसा होतो. संत रामदास परत परत निरूपण करण्यास सांगत आहेत.


अभंग५९

एकदां जेवितां नव्हे समाधान ।
प्रतिदिनीं अन्न खाणें लागें तैसें निरुपण केलेंचि करावें ।
परी न धरावें उदासीन प्रत्यहीं हा देहो पाहावा लागतो।
शुध्द करावा तो रात्रंदिस प्रत्यहीं देहानें भोगलें भोगावें।
त्यागिलें त्यागावें दास म्हणे।

भावार्थ –

एकदाच जेवण घेतल्याने कायमचे समाधान मिळत नाही. रोजच अन्न खावे लागते .त्याप्रमाणे एकदा केलेले निरूपण परत परत करावे त्या बाबतीत उदासीन राहू नये. आपल्याला आपला देह परत परत स्वच्छ करावा लागतो. भोगलेले परत परत भोगावे लागते .ज्यांचा त्याग केला त्याचा परत परत त्याग करावा लागतो .रात्रंदिवस असे केल्याने देह व मन शुद्ध होते असे संत रामदास सांगतात.


अभंग६०

कथानिरुपणें समाधि लागली।
वासना त्यागिली अंतरीची नाहींआपपर कीर्तनीं तत्पर ।
मनीं सारासार विचारणा अर्थारुढ मन श्रवण मनन ।
होय समाधान निजध्यास रामीरामदासीं कथेची आवडी ।
लागलीसे गोडी नीच नवी।

भावार्थ –  ज्याच्या मनामध्ये आपला व परका असा दुजाभाव नाही, मनात नेहमीच सार व असार काय याचा विचार करत असतो, नेहमी श्रवण व मनन करतांना अर्थाचा मागोवा घेत असतो, देवाच्या कीर्तनात अतिशय तत्पर असतो, कीर्तन रंगी रंगून जाणे हा ज्याचा निजध्यास आहे व त्यात त्याला समाधान मिळते. संत रामदास म्हणतात अशा भक्तांना रामकथेची अविट गोडी निर्माण होते व ही गोडी नेहमी वाढतच जाते.


अभंग६१

राघवाची कथा पतितपावन।
गाती भक्तजन आवडीनें राघवाच्या गुणा न दिसे तुळणा।
कैलासींचा राणा लांचावला देवांचें मंडण भक्तांचे भूषण।
धर्मसंरक्षण राम एक रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणें कथानिरुपणे जन्म गेला।

भावार्थ –  राघवाची कथा पतितांना पावन करणारी असल्याने भक्त ती आवडीने गातात .श्रीराम सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून भक्तांचे भुषण आहेत .धर्म रक्षणाचे काम करणारे श्रीराम केवळ एकमेव अद्वितीय आहेत .रामाचे गुण अतुलनीय आहेत .रामदास म्हणतात अशा गुणसंपन्न रामाच्या कथांचे निरूपण करणारे भक्त धन्य होत. त्यांचे जीवन सफल झाले आह.


अभंग६२

त्याचे पाय हो नमावें।
त्याचें किर्तन ऐकावें दुजियासी सांगे कथा।
आपण वर्ते त्याचि पंथा कीर्तनाचें न करी मोल।
जैसे अमृताचे बोल सन्मानिता नाहीं सुख।
अपमानितां नाहीं दु:ख ऐसा तोचि हरिदास ।
लटकें न वदे रामदास।

भावार्थ –

हरिदास आपल्या कीर्तनातून हरिकथा भक्तांना ऐकवतात एवढच नव्हे तर कथेतील आदर्शांचे स्वतः पालन करतात. अशा हरिदासांना सन्मानाचे सुख नसते व अपमानाचे दुःख नसते .त्यांचे कीर्तन म्हणजे केवळ अमृताचे बोल असतात. अनमोल असतात .संत रामदास म्हणतात, अशा हरिदासांचे किर्तन ऐकावे व आदराने त्यांना नमन करावे. .हे भक्तच केवळ हरिदास म्हणवून घेण्यास योग्य असतात. हे लटके नसून निसंशय खरे आहे.


अभंग६३

मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू ।
तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव ।
बापुडे मानव देहधारी रामनाम वाचें रुप अभ्यंतरीं ।
धन्य तो संसारीं दास म्हणे।

भावार्थ –

मुक्तपणे नामाचा अव्हेर करणारा अडाणि कधीही मुक्त होऊ शकणार नाही .शंकराच्या नामाचा जप करणारे कितीतरी मानव देहधारी बापुडवाणे जीवन जगतात .संत रामदास म्हणतात ,अंतकरणात रामाचे रूप व मुखात सतत रामाचे नाव असणारे भक्त संसारी असूनही धन्य होत.


अभंग६४

आत्मज्ञानी आहे भला।
आणि संशय उठिला त्यास नामचि कारण।
नामें शोकनिवारण नाना दोष केले जनीं।
अनुताप आला मनी रामी रामदास म्हणे।
जया स्वहित करणें।

भावार्थ –

आत्मज्ञानी असूनही जर त्याच्या मनात संशय निर्माण झाला तर संशयाचे निराकरण करण्यासाठी नामाचे साधन केले पाहिजे .कारण नामामुळेच सर्व संशयाचे ,दुःखाचे निवारण होते.संसारात असतांना आपल्यात अनेक दोष निर्माण होतात पण त्याबद्दल पश्चाताप झाल्यास त्या दोषांचे निराकरण होऊन अंती कल्याण होते असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.


अभंग६५

रात्रंदिन मन राघवीं असावें ।
चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन ।
जन्मासी कारण हेंचि दोन्ही दोन्ही नको धरुं नको निंदा करुं।
तेणें हा संसारू तरशील तरशील भवसागरीं न बुडतां।
सत्य त्या अनंताचेनि नामें नामरुपातीत जाणावा अनंत।
दास म्हणे संतसंग धरा।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास सांगतात की, रात्रंदिवस आपले मन राघवाच्या चिंतनात असावे, पैशाचे चिंतन नसावे. धन व परस्त्री चिंतन यामुळेच परत परत जन्मास यावे लागते. त्याच प्रमाणे कुणाची निंदा करू नये. त्यामुळे भवसागरात न बुडता हा संसार तरून जाता येईल. ईश्वर हा अनंत नामा रूपाने नटला आहे .त्या सत्यरूपी अनंताला संत संगती धरल्यास जाणतां येत.


अभंग६६

लोभा नवसांचा तो देव बध्दांचा।
आणि मुमुक्षांचा गुरू देव गुरु देव जाण तया मुमुक्षांचा।
देव साधकांचा निरंजन निरंजन देव साधकांचे मनीं ।
सिध्द समाधानी देवरुप देवरुप झाला संदेह तुटला।
तोचि एक भला भूमंडळीं भूमंडळीं रामदास्य धन्य आहे।
अन्यनता पाहें शोधूनियां।

भावार्थ –  ज्यांच्या मनात लोभ असल्याने ते संसारात बद्ध असतात ,असे लोक हव्यासापोटी देवाला नवस करतात. त्यांचा देव नवसाचा असतो . मोहापासून सुटलेले लोक मोक्षाची इच्छा करणारे असतात. ते आपल्या गुरुला देव मानतात .इच्छा धरून मोक्षाची जे साधना करतात ते साधक होत ,ते निरंजनाला मनात ठेवून त्याची उपासना करतात .तर सिद्ध साधनेमुळे पूर्ण समाधानी बनतात, त्यांच्या मनात कोणताही संदेह नसतो .असे सिद्ध पुरुष भुमंडळावर धन्य होत. असे रामदास शोधूनही इतरत्र सापडणार नाहीत, असे संत रामदास सुचवतात.


अभंग६७

राम कैसा आहे हें आधीं पाहावें।
मग सुखेनावें दास्य करुं दास्य करुं जन देव ओळखोन ।
जालें ब्रह्मज्ञान दास्य कैचें दास्य कैचें घडी देवासी नेणतां ।
वाउगें शिणतां श्रम उरे समाधान देव पाहतां घडेल ।
येर बिघडेल दास म्हणे

भावार्थ –

रामाचे रूप ,गुण, चरित्र कथा हे आधी जाणून मगच सुखाने रामाचे दास बनावे .देवाला ओळखून दास्यत्व पत्करले असता हळूहळू ब्रह्मज्ञान होते .मग दास्यत्वाची भावनाच उरत नाही देवाला न ओळखता दास्य घडू शकत नाही ते केवळ निरर्थक श्रम होतात .देवाला जाणल्यानेच मनाचे समाधान होईल ,नाहीतर सारे बिघडेल असे सांगून संत रामदास भक्तांना सावधपणाचा इशारा देत आहेत.


अभंग६८

जो जो भजनासी लागला ।
तो तो रामदास जाला दासपण रामीं वाव ।
रामपणा कैंचा ठाव रामीं राम तोहि दास ।
भेद नाहीं त्या आम्हांस रामदास्य करुनि पाहे।
सर्व स्रुष्टी चालताहे प्राणिमात्र रामदास ।
रामदासीं हा विश्वास ।

भावार्थ –  संत रामदास म्हणतात जो भजनात रममाण झाला तो रामाचा दास झाला. दास्यत्व स्वीकारल्या शिवाय राम चरणी ठाव मिळत नाही.रामातील राम तोच दास होय.राम व रामाचा दास यांच्यात भेद नाही सर्व प्राणीमात्र रामा मुळेच अस्तित्वात आह. राम त्यांच्यातील प्राण आहे असा संत रामदासांचा विश्वास आहे.


अभंग६९

दिनानाथाचे सेवक ।
आम्ही स्वामींहुनि अधिक शरणागत राघवाचे ।
परि शरण दारिद्रयाचे जें जें देवासी दु:सह ।
तें तें आम्हां सुखावह रामीरामदास म्हणे ।
रामकृपेचेनि गुणें।

भावार्थ –

रामदास राघवाचे शरणागत असूनही त्यांना दारिद्र्याच्या झळा सहन कराव्या लागतात. देव सुद्धा जे सहन करू शकत नाही ते रामदास राम कृपेमुळे सहज सहन करू शकतात.सीतापती राम हें दासांची विद्या वैभव व सुवर्ण संपत्ती आहे .श्रीराम हा रामदासांचा एकमेव सोबती आहे. श्रीराम दासांची माता, पिता बंधू आहे. केवळ रामच स्वजन, सोयरा आहे. ध्यानी मनी वसलेला राम ज्ञानाचे भांडार आहे. राम हा रामदासाचे पूर्ण समाधान आहे असे संत रामदास या अभंगात म्हणतात.


अभंग७०

राघवाचे दास सर्वस्वे उदास ।
तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी ।
नाना परी रक्षी सेवकांसी सेवकासी कांहीं न लगे साधन ।
करीतो पावन ब्रीदासाठीं ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार ।
आतां वारंवार किती सांगों किती सांगों देव पतितपावन ।
करावें भजन दास म्हणे।

भावार्थ –

सेवकांच्या भाग्याने त्याच्यावर देवाची कृपा झाली तर देवरा णा त्याचे सर्व प्रकारे रक्षण करतो. सर्व आशा समूळ नाहीशा करून आशा पाशातून मुक्तता करतो. त्यामुळे राघवाचे दास पूर्णपणे उदासीन होतात. त्यासाठी सेवकांना काही साधना करावी लागत नाही. आपले ब्रीद पाळण्यासाठी राघव सेवकांना पावन करतात. आपल्या ब्रीदासाठी राघवाने अनेकांना पतितपावन केले आहे हे संत रामदासांनी अनेकदां सांगितले आहे. त्यासाठी फक्त देवाचे भजन करावे असे संत रामदास सांगत आहे.


अभंग७१

कायावाचामनें यथार्थ रामीं मिळणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य कामक्रोध खंडणें मदमत्सर दंडणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य जैसे मुखें बोलणें तैसी क्रिया चालणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य रामदास म्हणे निर्गुण लाधणें।
तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य।

भावार्थ –

काया वाचा मनाने पूर्णपणे एकरूप होऊन दास्य करणे हेच खरे रामदास्य ,काम क्रोधाचे खंडन करून ,मद मत्सराला दंड देऊन केलेले दास्य, परस्त्री बद्दलची वासना नष्ट होणे, परद्रव्य अग्नीसारखे दाहक वाटणे ,बोलण्या प्रमाणे कृती करणे हीच खरी राम सेवा . संत रामदास म्हणतात सत्व रज तम या गुणांच्या अतीत होऊन निर्गुण सुख लाभणे हेच खरे रामदास्य. असे रामदास्य स्तुती करण्यायोग्य असते.


अभंग७२

आमुचे वंशीं आत्माराम ।
एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां।
अवघा वंश धन्य आतां बापें केली उपार्जना ।
आम्ही लाधलों त्या धना बंधु अभिलाषा टेकला ।
वांटा घेउनि भिन्न जाला रामीरामदासीं स्थिति ।
पाहिली वडिलांची रीति।

भावार्थ –

संत रामदास या अभंगात म्हणतात ,आपण रामाचे वंशज आहोत त्यामुळे हा पिंडच निष्काम आहे.रामाचे सेवक असल्याने सर्व वंश धन्य झाला.वडिलांच्या पुण्याइने राम सेवारुपी धन प्राप्त झाले. अभिलाषा नावाच्या बंधू आपला वाटा घेऊन वेगळा झाला. रामदासांना मात्र वडिलांच्या पुण्याईचा लाभ मिळाला.


अभंग ७३

मनुष्याची आशा तेचि निराशा ।
एका जगदीशावांचुनिया वांचुनियां राम सर्वहि विराम ।
नव्हे पूर्ण काम रामेविण संकटींचा सखा निजांचा सांगाती ।
राम आदि अंतीं रामदासीं।

भावार्थ –

जगदीशाची कृपा नसेल तर आशेचे निराशेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. रामाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. श्रीराम हा संकटात धावून येणारा सखा, जिवाचा सांगाती आहे. संत रामदास म्हणतात,रामदासांना आजीवन सांभाळणारा केवळ रामच आहे.रमदासांचा राम जीवनाच्या आदि व अंती आहे.


अभंग७४

आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा।
एका रघुनायकावांचोनिया विद्या वैभव धन मज क्रुपणाचें।
जीवन जीवांचे आत्मारामु आकाश अवचितें जरि कोसळेल।
मज तेथें राखील आत्मारामु आपिंगिलें मज श्रीरामसमर्थे ।
ब्रह्मांड पालथें घालूं शके वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट।
काळाचेंहि पोट फाडू शके रामदास म्हणे मी शरणागत त्याचा।
आधार सकळांचा मुक्त केला।

भावार्थ –

रामदासांना या संसारात रघुनायका शिवाय कोणी सखा नाही. एकाएकी आकाश कोसळले तरी आत्माराम रामदासांचे रक्षण करील, कोणी वाकड्या नजरेने बघितले तर श्रीराम त्यांच्या नरडीचा घोट घेण्याइतका किंवा प्रत्यक्ष काळाचे पोट फोडू शकेल इतका समर्थ आहे असा विश्वास संत रामदास या अभंगात व्यक्त करतात. ते म्हणतात श्रीरामाने अंगीकार केल्यास आपण ब्रम्हांड देखील पालथे घालू शकतो कारण श्रीराम सर्वांचा एकमेव आधार आहे.


अभंग७५

जठरीं लागो क्षुधा।
 होत नाना आपदा भक्तिप्रेम सदा ।
न सोडीं सत्य शब्द न फुटे जरी।
चिंतीन अंतरीं भक्तिप्रम परी ।
न सोडी सत्य आतांचि हा देहो ।
राहो अथवा जावो रामीं प्रेमभावो ।
न सोडी सत्य म्हणे रामदास ।
वरी पडो आकाश राघवाची कास ।
न सोडी सत्य।

भावार्थ –  या अभंगात संत रामदास आपण रामा वरची प्रेमभक्ति कधीच सोडणार नाही हे सत्य सांगत आहेत. पोटात भुकेने कितीही यातना झाल्या ,शब्द उच्चारण करण्याची शक्ती नाहीशी झाली तरी अंतकरणात रामाचेच चिंतन करीन.देह राहील अथवा जाईल याचा विचार न करता रामा विषयीचा प्रेमभाव कधीच सोडणार नाही. संत रामदास म्हणतात कीआकाश कोसळून पडले तरी राघवाची साथ कधीच सोडणार नाही.


अभंग७६

रुप रामाचेंपाहतां।
मग कैंची रे भिन्नता दृश्य अदृश्यावेगळा ।
राम जीवींचा जिव्हाळा वेगळीक पाहतां कांहीं।
पाहतां मुळींच रे नाहीं रामदासीं राम होणें ।
तेथें कैचें रे देखणें

भावार्थ –  संत रामदास म्हणतात रामाचे rरुप सदा सर्वकाळ डोळ्यात भरलेले असूनही दर्शनास गेले तर आकलन होत नाही. सदा सर्वकाळ मन राम चिंतनात दंग असल्याने ताटातूट होण्याचा संभवच नाही. घेऊ म्हटले असता घेता येत नाही व टाकू म्हटले तर सोडता येत नाही. त्यामुळे रामदासांना रामरूप धनाची लूट करणे शक्य होते.


अभंग७७

माझा स्वामी आहे संकल्पापरता।
शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी ।
मीतूंपणा उरी उरों नेदी उरों नेदी उरी स्वमी सेवकपण ।
एकाकीं आपणाऐसें केलें केले संघटण कापुरे अग्नीसी।
तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं उरी नाही कदा रामीरामदासा।
स्वये होय ऐसा तोचि धन्य।

भावार्थ –

संत रामदास या अभंगात देव भक्तांमधील अद्वैत भावनेची उकल करून सांगत आहेत की त्यांचा स्वामी श्रीराम मनाच्या संकल्प विकल्पाच्या पलीकडे आहे.राम कथा ऐकून श्रीरामाच्या गुणांची स्तुती करावीशी वाटते पण शब्दांशिवाय स्तुती करता येत नाही त्यात द्वैत निर्माण होते.दर्शन होताच मन राम रूपात विरून जाते तेथे मी तूं पणा, स्वामी सेवक पणा उरतच नाही.द्वैत संपून जाते जसे कापूर व अग्नि क्षणात समरस होतात. कापराचे भिन्नत्व पूर्णपणे विलयास जाते तसेच रामदास स्वतः रामरूप बनून जातात ते धन्य होत असे संत रामदास म्हणतात.


अभंग७८

कांहीं दिसे अकस्मात।
तेथें आलें वाटे भूत वायां पडावें संदेहीं।
मुळीं तेथें कांहीं नाहीं पुढे देखतां अंधार।
तेथें आला वाटें भार झाडझुडूप देखिलें ।
तेथें वाटे कोणी आलें रामदास सांगे खूण।
भितों आपणा आपण।

भावार्थ –

या अभंगात माणसाला भ्रम कशामुळे होतो व त्याचे निरसन कसे करावे याविषयी संत रामदास सांगत आहेत. काही वेळा अकस्मात एखादी अस्पष्ट आकृती दिसते ते भूतच आहे असा भ्रम होतो .वाटेवर अंधारातून जात असताना समोरून कोणीतरी येत आहे असे वाटते. जंगलातील झाडे सजीव प्राण्यासारखी भीतीदायक वाटतात संत रामदास म्हणतात जेथे काहीही नसताना काहीतरी असल्यासारखे वाटणे हे सारे कल्पनेचे खेळ आहेत. आपण आपल्याच सावलीला घाबरावे त्यातलाच हा प्रकार आहे.


अभंग७९

वाजे पाऊल आपुलें।
म्हणे मागें कोण आलें कोण धांवतसें आड।
पाहों जातां जालें झाड भावितसे अभ्यंतरीं।
कोण चाले बरोबरी शब्दपडसाद ऊठिला।
म्हणे कोण रे बोलिला रामीरामदास म्हणे।
ऐसीं शंकेचीं लक्षणे।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास मनात येणाऱ्या शंकाकुशंकांची लक्षणे सांगत आहेत चालताना आपल्याच पावलांचा आवाज ऐकून आपल्या मागे कुणीतरी येत आहे अशी शंका येते. चालताना कुणीतरी आपल्या बरोबर चालत असल्याचा भास होतो. विचारांती ते झाड आहे हे समजतें शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू येतो व कुणीतरी बोलतो असे वाटते की सर्व शंकेची लक्षणे आहेत.


अभंग८०

शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी।
आळशी लोकीं महापापी आपुलाचि घात करी ।
सदा कठोर वैखरी माणुस राजी राखों नेणें ।
त्यास न मानीती शहाणे गुणें माणूस भोंवतें।
अवगुणानें थितें जातें दास म्हणे भला भला।
जेथें तेथें पवाडला।

भावार्थ –

प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे काम करावे उद्योगी पुरुष पुण्यवान तर अशी आळशी महापापी होय.ज्याचे बोलणे कठोर असते तो आपणच आपला घात करत असतो .ज्याला माणसाचे मन जिंकता येत नाही तो शहाणा समंजस असत नाही. गुणांनी माणूस आवडते अवगुणांनी त्याला कमीपणा येतो. संत रामदास म्हणतात त्याचे सर्वत्र पोवाडे गायले जातात स्तुती केली जाते तो माणूस भला समजावा.


अभंग८१

मनोगत जाणे सूत्र ।
जेथ तेथें जगमित्र न सांगतां काम करी।
ज्ञानें उदंड विवरी स्तुती कोणाची न करी।
प्राणिमात्र लोभ करी कदा विश्वास मोडीना ।
कोणी माणूस तोडीना जनीं बहुतचि साहतो।
कीर्तिरुपेचि राहतो दास म्हणे नव्हे दु:खी।
आपण सुखी लोक सुखी।

भावार्थ –

इतरांचे मनोगत जाणण्याचे कौशल्य ज्याच्याकडे आहे तो जगत मित्र बनतो. तो नेहमी उद्योगात व ज्ञान उपासनेत दंग असतो.तो कुणाचीच स्तुती करीत नाही पण सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करतो.तो स्वतःवरील विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही.माणसांना कधीही तोडून टाकीत नाही. लोकांचे अनेक अपराध सहन करतो पण मनात दुःखाचा लवलेशही नसतो. तो स्वतः सुखी असतो व लोकांना सुखी करतो असे संत किर्तीरुपाने उरतात असे संत रामदास म्हणतात.


अभंग८२

संतांची आकृति आणवेल युक्ती।
कामक्रोधा शांति नये नये भागवतींचा भाव आणवेल आव।
करणीचा स्वभाव नये नये रामदास म्हणे रामकृपेवांचोनी।
बोलाऐसी करणी नये नये।

भावार्थ –

सामान्य माणूस युक्ती प्रयुक्तिने संतांची नक्कल करू शकेल पण त्यामुळे काम व क्रोध जिंकण्याचे कौशल्य मिळवता येणार नाही .एखादी स्त्री देवीचे सोंग घेऊ शकेल पण भगवती सारखी करणी करणे शक्य नाही.संत रामदास म्हणतात,रामकृपेशिवाय माणुस देवत्वाला पोचू शकत नाही.


अभंग८३

कर्ता एक देव तेणें केलें सर्व।
तयापाशीं गर्व कामा नये देह हें देवाचें वित्त कुबेराचें ।
तेथें या जीवाचें काय आहे निमित्ताचा धणी केला असे प्राणी ।
पहातां निर्वाणीं जीव कैचा दास म्हणे मना सावध असावें ।
दुश्चित्त नसावें सर्वकाळ

भावार्थ –  सर्व सजीव सृष्टी ही देवाची निर्मिती असून सर्व धन कुबेराचे आहे.येथे जिव केवळ निमित्तमात्र आहे असा संत रामदासांच्या विश्वास आहे.देवापाशी अहंकारानें वागू नये.चित्त निर्मल ठेवण्यासाठी मनाने सतत सावध असावे असा उपदेश संत रामदास करीत आहेत.


अभंग८४

दृढ धरी मना जानकीजीवना।
तेणें समाधाना पावशील पावशील निज स्वरुप आपुलें।
जरी तें घडलें रामदास्य रामदास्य घडे बहुतां सुक्रुतें ।
कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें ।

भावार्थ –

जानकी जीवन श्रीरामाची मनामध्ये अढळ भक्ती निर्माण होईल तेव्हाच आपले जे निजरूप आत्माराम ते आपल्याला प्राप्त होईल.त्यातूनच अतीव समाधान मिळेल रामाचे दास्यत्व पूर्वसुकृतामुळे व पूर्वजांच्या पुण्याईने मिळते असे संत रामदास निष्ठापूर्वक सांगतात.


अभंग ८५

शरण जावें रामराया ।
पुढती न पाविजे हे काया जीव जीवांचा आहार ।
विश्व होतसे काहार एक शोकें आक्रंदती ।
तेणें दुजे सुखी होती दास म्हणे सर्व दु:ख ।
रामाविण कैसे सुख।

भावार्थ –

हे विश्व म्हणजे एक मोठा शिकारखाना आहे.येथे दुर्बळ जीव सबळ प्राण्यांचा आहार आहे.काही दुःखाने आक्रंदत असतात तेव्हां काही सुखाने जगतात. जन्म मरणाचा खेळ अव्याहत सुरू आहे.संत रामदास म्हणतात जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी रामरायाला शरण जावे. रामाशिवाय यातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही.


अभंग८६

वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी।
वाजे हुडहुडी ममतेची वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला।
संचित खायाला पुण्य नाही भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।
मज ओसंडिलें संतजनीं रामदास म्हणे ऐसियाचें जिणें।
सदा दैन्यवाणें रामेविण।

भावार्थ –

आत्म बुद्धीचा सरळ मार्ग सोडून देहबुद्धीच्या वाकड्या मार्गाने जात असताना वैराग्याचा अग्नी विझून गेला आहे माया ममतेच्या थंडगार स्पर्शाने हुडहुडी भरलीआहे.पायात वासनेची बेडी पडली आहे. भक्तीचे उबदार वस्त्र हरवून गेले आहे.पूर्वसंचिताचा पुण्यरुपी ठेवा गाठीशी राहिला नाही. संतजनांच्या संगतीला पारखा झालो आहे.।संत रामदास म्हणतात अशा लोकांचे जीवन रामाशिवाय दैन्यवाणे आहे.


अभंग ८७

परिचयें जेथें अत्यंत संबंध ।
तेथें उठे खेद विक्ल्पाचा म्हणोनियां मना निस्प्रुह असावें।
सर्वथा नसावें एके ठायीं सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां ।
कोणे वेळे आतां समाधान अभ्यंतर पोळे राम विसंभतां।
दास म्हणे आतां समाधान।

भावार्थ –

अतिपरिचयाने घनिष्ठ संबंधजुळतो तेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतात ,उद्वेग वाटतो ,समाधान नाहीसे होते यासाठी माणसाने एका ठिकाणी फार काळ राहू नये व निरपेक्षपणे राहावे असे संत रामदास सुचवतात. श्रीरामाच्या विसर पडल्यामुळे पश्चात्तापाने अंतरंग पोळून निघतेंआणि मग चित्त शुध्द होऊन समाधान मिळतें.


अभंग८८ 

देव पाषाण भाविला।
तोचि अंतरीं दाविला जैसा भाव असे जेथें ।
तैसा देव वसे तेथे दृश्य बांधोनिया गळां ।
देव जाहला निराळा दास म्हणे भावातीत।
होतां प्रगटे अनंत।

भावार्थ –

दगडाचा देव करून त्याची भक्तिभावाने पूजा केली तोच देव अंतकरणात प्रकटला कारण जसा भाव तसा देव असे म्हणतात. संसाराचा दृश्य पसाऱ्यात माणसाला गुंतवून देव अदृश्य झाला.संत रामदास म्हणतात भाव भावनांच्या पलीकडे गेल्यास अनंत प्रकट होते.


अभंग८९

एक लाभ सीतापती।
दुजी संताची संगती लाभ नाहीं यावेगळा।
थोर भक्तीचा सोहळा हरिकथा निरुपण ।
सदा श्रवण मनन दानधर्म आहे सार।
दास म्हणे परोपकार

भावार्थ –

सीतापती श्रीरामांचा लाभ व संतांची संगती याशिवाय दुसरा अपूर्व लाभ नाही.हा भक्तीचा सोहळा आहे.संत रामदास म्हणतात ,हरिकथेचे सतत श्रवण मनन व निरुपण तसेच दानधर्म व परोपकार हे भक्तीचे सार आहे.


अभंग९०

जो कां भगवंताचा दास ।
त्याने असावें उदास सदा श्रवण मनन।
आणि इंद्रियदमन नानापरी बोधुनि जीवा।
आपुला परमार्थ करावा आशा कोणाची न करावी।
बुध्दि भगवंतीं लावावी रामदासीं पूर्णकाम।
बुध्दि दिली हे श्रीरामे।

भावार्थ –  या अभंगात संत रामदास भगवंताचा दास कसा असावा याचे विवेचन करीत आहेत.आशाअपेक्षा ,हवेसे नकोसे ,याबाबतीत उदासीन असावा. सतत हरि कथा श्रवण मनन करून इंद्रियांचे दमन करावे. कोणाकडूनही कसलीही आशा ,अभिलाषा नसावी.आपल्या साऱ्या वृत्ती भगवंताकडे लावाव्यात.दिलेल्या बुध्दीचा उपयोग करून पूर्णकाम ,समाधानी बनावे.


अभंग९१

पतित हे जन करावे पावन।
तेथे अनुमान करूं नये करुं नये गुणदोष उठाठेवी।
विवेकें लावावी बुध्दि जना बुध्दि लावी जना त्या नाव सज्ञान ।
पतितपावन दास म्हणे।

भावार्थ –

जे लोक पतित आहेत त्यांना पावन करून घ्यावे ,त्यात अनुमान करू नये त्यांच्या गुणदोषांची चर्चा करू नये. विवेकाने पतीतांची बुद्धी बदलण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ अज्ञानी लोकांना सज्ञानी बनवावे,असे संत रामदास म्हणतात.


अभंग९२

पोट भरावया मांडिले उपास।
जाला कासाविस लाभेंविण ब्रम्ह साधावया कर्ममार्गे गेला।
तंव कर्मे केला कासाविस सुटका व्हावया बंधनचि केलें।
तेणें तें सुटलें केंवि घडे एक व्यथा एक औषध घेतलें।
दास म्हणे जालें तयापरी।

भावार्थ –

या अभंगात रामदास आपल्या व्यथा व त्यावरील उपाय याबद्दल बोलत आहेत. आपल्याला भूक लागली तर जेवण करण्याचे सोडून उपास केला तर काहीच लाभ होणार नाही. जीव मात्र कासावीस होईल कारण तप स्वाध्याय आणि ईश्वरभक्ती ही आत्मशुद्धीची साधने सांगितली आहेत. उपवासाची गणना तपात होते व ते शरीर शुद्धी चे साधन आहे.भूक लागली असता हा उपाय करणे व्यर्थ आहे. ब्रम्हज्ञान मिळवण्यासाठी कर्मयोगाने काहीच लाभ होणार नाही.व्याधी पासून सुटका मिळावी म्हणून जर संसाराचा त्याग केला तर त्यापासून सुटका होईल हें घडणार नाही.व्याधी समजून घेऊनच औषध केले पाहिजे. संसारिक दुःखावर रामभक्ती हाच एक उपाय आहे.


अभंग९३

अर्थेविण पाठ कासया करावें।
व्यर्थ का मरावें घोकुनीयां घोकुनिया काय वेगीं अर्थ पाहे।
अर्थरुप राहे होउनियां होउनिया अर्थ सार्थक करावें।
रामदास भावें सांगतसे।

भावार्थ –

अर्थ समजल्याशिवाय केवळ शब्दांचे पाठांतर करून उपयोग नाही घोकून पाठ करण्याचे व्यर्थ श्रम करू नयेत. त्यातील अर्थाशी एकरूप होऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास या अभंगात सांगतात.


अभंग९४ 

ज्ञानाचें लक्षण क्रियासंरक्षण।
वरी विशेषेण रामनाम अंतरीचा त्याग विवेके करावा।
बाहेर धरावा अनुताप ब्रह्मादिका लाभ ज्ञानाचा दुर्लभ।
तो होय सुलभ साधुसंगें साधुसंगें साधु होइजे आपण।
सांगतसे खुण रामदास।

भावार्थ –

आपणास अवगत झालेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. अंतःकरणातील लोभ,, मोह ,क्रोध या भावनांचा विवेकाने त्याग करावा. ब्रम्हदेवा सारख्या देवांना सुध्दा ज्ञानाचा लाभ होणे कठीण आहे .ज्ञानाचा लाभ साधुसंतांच्या संगतीत सुलभपणे होऊ शकतो. साधूंच्या संगतीत राहून साधूसारखे विरक्त होणे हीच ज्ञानाची खूण आहे असे संत रामदास म्हणतात.


अभंग९५

माजी बांधावा भोपळा ।
तैसी बांधो नये शिळा घेऊ येते तेचि घ्यावें।
येर अवघेचि सांडावें विषवल्ली अमरवल्ली।
अवघी देवेचि निर्मिली दास म्हणें हरिजन ।
धन्य जाण ते सज्जन।

भावार्थ –

पाण्यामध्ये पोहण्यासाठी भोपळा बांधावा दगड बांधू नये. विष वेली व अमवेली या दोन्ही देवानेच निर्माण केल्या आहेत पण आपल्याला योग्य असेल तेच स्वीकाराव. बाकी सर्व सोडून द्यावे. असे सांगून संत रामदास म्हणतात हरिभक्त हे संतजन असून त्यांच्या संगतीचा लाभ घ्यावा.


अभंग९६

भाग्यवंत नर यत्नासी तत्पर।
अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा।
अखंड शाहाणा तोचि एक प्रव्रुत्ति निव्रुत्ति चाळणा पहिजे।
दास म्हणे कीजे विचारणा।

भावार्थ –

जे सतत प्रयत्नशील असतात ते पुरुष भाग्यवंत असतात.तें सतत सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून योग्य व अयोग्य गोष्टींची निवड करीत असतात.केलेल्या प्रयत्नांचे यश अपयश याबद्दल अत्यंत सुज्ञपणे सावध असतात.संत रामदास म्हणतात प्रवृत्ती वझ निवृत्ती यांची निवड करू शकणारा या जगात शाहाणा ठरतो.त्याचा विचार करावा.


अभंग९७

नमू रामक्रुष्णा आदिनारायणा।
तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें दाखवावे निजस्वरुप आपुँलें।
दिसेनासे जालें काय करू पांडुरंगा देवा अगा महादेवा।
तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मीं ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावें ।
रामदास भावें प्रार्थितसे ।

भावार्थ –

संत रामदास रामकृष्णांना वंदन करून त्या देवतांना प्रार्थना करतात की त्यांनी त्यांचे निर्गुण निजस्वरूप प्रकट करून दाखवावे कारण सगुणाच्या भक्तीमुळे निर्गुणाचे स्वरूप दिसेनासे झाले आहे.पांडुरंगाला अत्यंत भाविकपणे प्रार्थना करतात की त्यांनी आपल्याला ब्रह्मरूप बनवून ब्रम्ह रुपात विलीन करावें.


अभंग९८

सूर्यनारायणा देवा नमस्कार।
तुवां निराकार दाखवावें दाखवुनी द्यावें मज निववावें ।
चंद्रा तुज भावें प्राथितसें प्राथितसें मही आणि अंतरिक्षा।
तुम्ही त्या अलक्षा दाखवावें दाख़वावें मज आपोनारायणें।
ब्रह्मप्राप्ति जेणें तें करावें करावे सनाथ अग्निप्रभंजने।
नक्षत्रे वरुणें दास म्हणे।

भावार्थ –

या अभंगात रामदास सूर्यनारायणाला नमस्कार करून त्यांनी आपल्याला निराकार रूप साकार करून दाखवावे अशी विनंती करतात.चंद्राने शितल रूप दाखवून आपणास शांत करावे अशी भावपूर्ण प्रार्थना करतात। पृथ्वी आकाश आप तेज वायू अग्नी या पंचमहाभूतांनी आपल्या अलक्ष रूपाचे प्रकटीकरण करून ब्रह्म प्राप्तीचा मार्ग दाखवावा अशी विनंती करीत आहेत.


अभंग९९

तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें।
मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें।
मज या वैभवें चाड नाहीं चाड नाही एका निर्गुणावांचोनी।
माझे ध्यानीं मनीं निरंजन निरंजन माझा मज भेटवावा।
तेणें होय जीवा समाधान समाधान माझें करा गा सर्वहो।
तुम्हांसी देव हो विसरेना विसरेना देह चालतो तोंवरी।
बाह्य अभ्यंतरी दास म्हणे।

भावार्थ –

सर्व देवांनी तसेच संत महानुभावांनी कृपा करून आपल्याला परब्रह्मस्वरूपी न्यावे अशी प्रार्थना संत रामदासांनी या अभंगात केली आहे.आपल्याला एका निर्गुण निराकार परब्रम्हा शिवाय कोणत्याही वैभवाची अपेक्षा नाही. आपल्या ध्यानीमनी केवळ निरंजन परमेश्वर वसत असून तेच निरंजन स्वरुप डोळ्यांनी पाहावे हेच आपल्या मनाचे समाधान आहे.सर्व देवांनी हे समाधान मिळवून दिल्यास देहात चलनवलन असे पर्यंत हा उपकार आपण विसरणार नाही व बाह्य व अंतर्यामी सतत चिंतन करीत राहिल असे संत रामदास प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत.


अभंग१००

मन हे विवेके विशाळ रावें।
मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनीं तरीच निवळे।
जरी बोधें गळे अहंकार अहंकार गळे संतांचे संगतीं।
मग आदि अंतीं समाधान समाधान घडे स्वरुपीं।
राहतां विवेक पाहतां नि:संगाचा नि:संगाचा संग।
सदृढ धरावा।संसार तरावा दास म्हणे।

भावार्थ –

या अभंगात संत रामदास संसार सागर कसा तरून जावा याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. विवेकाने मन विशाल करावे आणि मग परब्रह्माचे स्वरूप आठवावे. जेव्हा पूर्ण बोध होऊन अहंकार गळून जाईल तेव्हाच परब्रम्हाचे दर्शन मनामध्ये प्रतिबिंबित होईल .अहंकार गळण्यासाठी संतांची संगती धरावी त्यामुळे जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत समाधान टिकून राहते.स्वतःच्या आत्मस्वरूपात मन स्थिर झाल्यानंतरच समाधानाची प्राप्ती होते.देहबुद्धी व त्यामुळे घडणाऱ्या विषयाचा संग यापासून दूर राहणाऱ्या संतांची संगत दृढपणे धरावी. तरच त्यांचे विवेक व वैराग्य कळून येते,त्यामुळे संसारसागर सहज तरुन जाता येतो असे संत रामदास सांगत आहेत.


संत रामदासांचे सार्थ अभंग 1 ते 100

ref: wikibooks

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *