संत जळोजी मळोजी चरित्र

संत जळोजी मळोजी चरित्र

जळोजी मळोजी यांचा संतसाहित्यात उल्लेख नसल्याने त्यांच्याविषयी माहिती मिळणे अवघड आहे. शिरवळकर फडाडून मिळालेल्या माहितीप्रमाणे संत जळोजी मळोजी चरित्र पुढीलप्रमाणे –

जळोजी मळोजी हे वारकरी सुतार बंधू लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावचे. एकवर्षी पंढरीची वारी जवळ आली असतानाच त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले. पण सुतक असतानाही ते वारीला गेले. त्यामुळे भावकी व गावातील इतर लोक नाराज झाले व त्यांना वाळीत टाकले.

पुढे त्यांना एका घराचे काम मिळाले पण घरमालकाने वारीच्या काळातच काम काढून यांना पंढरीला वारीला गेल्यास सर्व पैसे बुडतील अशी धमकी दिली. पण तरीही जळोजी मळोजी बंधू वारीस आले व पंढरपूरातच राहू लागले. इकडे देवाने त्यांचे रूप घेऊन सुतार काम केले. पुढे पुन्हा गावात आल्यावर या बंधूंना हा प्रकार समजला.

त्यानंतर दोघे बंधू आपला परिवार घेऊन पंढरपुरात येऊन राहिले. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य गंगूकाका शिरवळकर यांच्या वाड्या मध्ये होते. पुढे मुले कर्ती झाल्यावर दोघे बंधू पूर्ण वेळ परमार्थास देवू लागले. याकाळात देवळात सेवा करणे सोयीचे व्हावे म्हणून ते देवळात राहायला गेले. देवळात प्रवेश केल्यावर ज्या ओवऱ्या लागतात, त्यातील उजव्या बाजूच्या एका ओवरीत या बंधूंचे वास्तव्य होते.

येथे पौष वद्य पंचमीला जळोजींचे निधन झाले. ही वार्ता ऐकून मळोजी यांनीही देह ठेवला . हा दिवस पौष वद्य पंचमीचा होता. त्यांचे अंत्यविधी शिरवळकर फडाने केले. अंत्यविधी पुंडलिक मंदिरासमोर जेथे झाले तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली. याशिवाय शेजारीच त्यांचे शिष्य – रामानुज माळी यांची समाधी आहे.

पुंडलिक मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीच्या काळात जळोजी मळोजी हे बंधू पुंडलिक मंदिरापाशी राहत . काही काळ तर शेवाळ खाऊन दिवस काढावे लागले. पुढे देवाने बडवे उत्पातांना दृष्टांत देऊन त्यांना प्रसाद पाठवला. पुढे दोघे बंधू मंदिरात रहात असताना त्यांनी मंदिरातील लाकडी बांधकामात सुद्धा योगदान दिले. काहींच्या मते देवाचा लाकडी सभामंडप यांनी बांधला. पण नेमके कोणते बांधकाम केले याला काही संदर्भ उपलब्ध नाही.


संत जळोजी मळोजी चरित्र

1 thought on “संत जळोजी मळोजी चरित्र”

  1. सुनिल वपॅ वारकरी सांप्रदायिक कनोली संगमनेर जि अहमदनगर

    खुप महत्वपूर्ण माहीत दिली राम कृष्ण हरी

Leave a Comment

Your email address will not be published.