संत माणकोजी बोधले

संत माणकोजी बोधले अभंग

संत माणकोजी बोधले अभंग गाथा – एकूण ११० अभंग

संत माणकोजी बोधले अभंग – १

आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर ।
पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥
तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती ।
रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥
तुच आमचे वित्त तूच आमचे गोत।
तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥
बोधला म्हणे तुजवीण अनु नेणे काही।
प्रीती तुझी पायी बसो माझी ॥४॥


संत माणकोजी बोधले अभंग – २

अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा ।
काय मी वर्णू तुझ्या रुपाची शोभा ॥१॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वां ठायी ।
भावे भक्ती करोनी शरण आलो पायी ॥ २॥
आकळे तुझा महिमा न ब्रह्मादिका ।
साधु आणि संता नामे सापडसी एका ॥३॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी ।
अनंत तीर्थे घडली राया तुझे ठायी ॥४॥
बोधला म्हणे चित्त राहो तुझे पायी ।
तुजविण सखा मज आणिक नाही ॥५॥


संत माणकोजी बोधले अभंग – ३

आजि वो हरि गावांसि आले।
गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥ १॥ धृ ॥
एकीकडे कौरव येकीकडे पांडव ।
मधे उभे यादवराव ॥ २॥
दोही भागी गोपिका । करी घेऊनी टाळ।
मध्ये उभे यादवराव । नृत्य करिती ॥ ३॥
बोधला म्हणे मी नयनी देखिले ।
देखोनी आळंगिले हृदयामाजी ॥४॥


संत माणकोजी बोधले अभंग – ४

आज मी राहिलो डोंगरी।
आनंद होतो ब्रह्मगिरी ॥१॥
पांचा तत्वाची दिवटी ।
निवद भरियेला ताटी ॥२॥
आनंदे घातला गोंधळ ।
होतो प्रेमाचा कल्लोळ ॥ ३॥
उदो बोला हा आनंद ।
काळ हरियेल छंद ॥४॥
बोधला म्हणे आनंद झाला ।
कळिकाळ हा जिंकीला ॥५॥


संत माणकोजी बोधले अभंग – ५

आजि सुचिन्हे दिसती स्फुरति बाहे वो ।
आजी भेटिला येईल कृष्ण माये वो ॥१॥
यालागि हारुष वाटतो माझे मनि वो ।
आजि भेटिला येईल आमचा धणि वो ॥ २॥
बैसोनि सांगन गुज गोष्टी वो।
उठोन आवडिने गळा घालिन मिठी वो ॥३॥
प्रीती लोळणी घालिन पाया वरी वो।
लोक म्हणती निलाज जाली पोरे वो ॥४॥
या लागि वर्ते मी लोकाचारी वो ।
तुजी पाउले धरिन अंतरी वो ॥५॥
बोधला म्हणे धन्य आम्ही सुखि जालो वो ।
विठ्ठल चरणी येवुनी विनटले वो ॥६॥


संत माणकोजी बोधले अभंग – ६

आता पूर्वीची भाक सांभाळी ।
आम्ही पोरे बहु आनुवळी ।
तुजसी खेळो बारळी ।
बहुत तुजसी खेळलों ढवाळी रे कान्होबा ॥छ।
तुम्हा आम्हासी पडिला गडी ।
तोडी वासना कल्पना झोडी ।
आता पाये तुझे मी न सोडी ॥१॥
पैल भीवरे तिरी चारूं गाई आमची सिदोरी अवघीच खाई ।
आम्हा वाकुल्या दावितो पाहीरे ॥ २॥
पैल यमुनेतिरी केला काला ।
आपण खाये चालवि आम्हाला।
ऐसा संगतीचा ठक कैसा भला रे ॥३॥
पैल कळंबा डाळी खेळो सुर।
डाई खाले काढिला बुर ।
सुर भीरकविसी दुरिच्या दूर ।
असा बहुत खेळलाखेळ ब्रह्मादिकासी न कळे कळ।
गाई राखे न जाला गोपाळ रे ॥४॥
आपण बैसोन घरिच्या घरीं।
आम्हासि करितो चोरी।
लोणी खासिल वरिच्या वरि ॥६॥
बोधला म्हणे जागलों।
जिवे प्राणेसि हा बांधला।
आतां सोडिता नव्हेसि भला।
रे कान्होबा पूर्वीची भाक संभाळी ॥७॥


संत माणकोजी बोधले अभंग – ७

अनंत कोटी आमचे अपराध साहिले ।
तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥
तुज परत जिवलग नाही त्रिभुवनी ।
तु आमची जननी पांडुरंगा ॥२॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या रासी ।
बापा हृषीकेसी पांडुरंगा ॥३॥
बोधला म्हणे तुज काये होऊ उतराई।
तू आमचा मायबाप तू पांडुरंगा ॥४॥


संत माणकोजी बोधले अभंग – ८

अनंत जन्म घेतले याच देही ।
माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥१॥
वेगी पावे पावे कृपानिधी ।
भवकर्म छेदी बा माझी आता ॥ २ ॥
संसारकर्मे बहुत भुललो ।
तुझे भजनी सावध नाही जालो ॥३॥
माया संसाराचा करिता भरोभरी ।
तुझा आठव नाही क्षणभरी ॥४॥
बोधला म्हणे तुज विनवितो देवा ।
काही घडो दे देही संतसेवा ॥५॥


संत माणकोजी बोधले अभंग – ९

अनंत जन्माचे फेडिले सांकडे ।
चुकविले कोडे चौऱ्यांशिचे ॥१॥
चौऱ्यांशिचा फेरा सोशी येरझारा ।
चुकवी दातारा पांडुरंगा ॥२॥
बोधला म्हणे एक बरे केले ।
खत हे फाडिले जन्मांतरीचे ॥३॥


संत माणकोजी बोधले अभंग – १०

अबदुलखानाची भोवली ताहार।
महापाषाण फोडिले खेचर ।
भक्त डळमळिल थोर थोर।
रामकृष्ण बाहारी।
तुझी वासना तुजचि वरी ।
अभक्तासी कष्टि करी ।
भक्त रक्षुनी नानापरी गा ॥१॥॥छ॥
भक्तीभाव जयाचा निर्धार ।
जिवे प्राणासी जे उदार।
तेच उरती पैल पार गा ॥ २ ॥
सुद्ध भाव जयाचा मनी ।
त्यासी मारिता नाही बा कोन्ही ।
बळकट आहे तयाचा धणी गा ॥३॥
लोक म्हणती अबदुलखान ।
परि करिता नारायेण ।
कोण्हा न कळे तयाची खुण ॥४॥
ऐसे बहुत भेडसाविती नेणो पळाले हे किती ।
परि लिहिले न चुके अंती गा ॥५॥
असं भैतृत्र? (भैतृत्व) बहुत बोले जन ।
बोधल्याचे दृढ मन त्यांने उंची लाविले निशान गा ॥६॥


संत माणकोजी बोधले अभंग – ११

आमच्या संसाराचा घेतला असे भार।
स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥१॥
तुझिया उपकाराच्या जाल्या बहुत रासी ।
त्या तुझ्या तू जाणसी कोणा सांगो ॥२॥
त्रिभुवनी एक दाता तूचि गा समर्था ।
निवरिली व्यथा संसाराची ॥३॥
ऐसा आम्हा दिना का केला अंगिकार ।
तू आमचे माहेर पांडुरंगा ॥४॥
तू आमचा माता पिता सोयरा इष्ट बंधू ।
तुजसि समंधू आमचा देवा ॥५॥
बोधला म्हणे तुज वाचुनी नेणे काही ।
चित्त तुझे पायीही बैसलेसे ॥६॥


संत माणकोजी बोधले अभंग – १२

आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे ।
तुजवांचुनी दुजे नाही कोण्ही ॥१॥
ऐसा करुणानिधी आणिक नाही कोण्ही ।
तु जनक जननी मायेबाप ॥ २ ॥
कृपेचा कोवळा दीन दयानिधी ।
मज येऊनिया आधी सांभाळावे ॥३॥
रात्री दिवस आस लागली मनास ।
भेटी सावकाश द्यावी मज ॥४॥
तुझिया वचनास मज थोर आधार ।
हा शब्द निर्धार सत्य माझा ॥५॥
बोधला म्हणे मना लागलीसे आस ।
पाउले सावकाश पाहिन नयनी ॥६॥


संत माणकोजी बोधले अभंग – १३

आमचा विठोबा विश्वाचा गोसावी ।
कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥
लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा ।
जातिल दाही दिशा सोडुनिया ॥२॥
माता आणि पिता बंधु या बहिणी ।
अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥३॥
लटकिया मायेसी धरला जीवेसी ।
जातील परदेशी टाकोनिया ॥४॥
बोधला म्हणे तुम्ही साच जीवी धरा ।
निर्वाणीचा खरा पांडुरंग ॥५॥


संत माणकोजी बोधले अभंग – १४

आलासि कोठोनि जासिल कोठे।
होतात कवणे ठायी रे ॥१॥
मातापिता बंधू सखी म्हणसी सेवटी नव्हे ती काही रे ।
ऐसिया प्रकारे भुलले जन । पावन करित काही रे ॥ २ ॥
सद्गुरुसारिखा मातापिता बंधू ।
भावे शरण त्यासी जाई रे ॥३॥
आशा मनसा तृष्णा कल्पना सर्वही ।
घातल्या पाई रे ॥४॥
ऐसा जाणि जे तो साधी भूत विश्वम्भरा।
मनुषे देह तेथे नाही रे ॥५॥
बोधला म्हणे ऐसा शरण जाई ।
मग तरसिल संदेह नाही रे ॥६॥


संत माणकोजी बोधले अभंग – १५

आवडीचे निजमुख नाम मी गाईन ।
अंतरी पाहिन निजरुप ॥१॥
नोहेसी वेगळा या प्राणा सर्वथा ।
नकळे पंढरीनाथ लीला तुझी ॥ २॥
काय उतराई तुझिया उपकारा ।
माझ्या विश्वंभरा पांडुरंगा ॥३॥
बोधला म्हणे देई प्रेमाची उकळी ।
गाईन वनमाळी द्वारकेचा ॥४॥


संत माणकोजी बोधले अभंग – १६

अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी ।
मज दिनावर कृपा करा । आपला म्हणोनी ॥१॥
कृपादृष्टी धरावे हाता । मज द्यावी ज्ञानमती ।
तुमचे नाम महिमान वर्णावया ॥ २॥
लक्ष चौऱ्यांसी जीव जनी । भोगिता कष्ट जाले यौवनी ।
काही पुण्याची सामुग्री घेऊनी । मनुष्ये देही आलो ॥३॥
आता येवूनिया मनुष्य देहासी । शरण जावे भगवंताशी ।
चुकवावया चौऱ्यांशी । काही प्रयत्न करावा ॥४॥
आता येवूनिया नरदेहासी । शरण जावे सदगुरुसी ।
सांगेल वचन जपा मानसी । सदा अहर्णिसी विसरु पडो ने देवा ॥५॥
सदगुरु सांग जे जे वचन । ते दृढ धरा विश्वास जाणा ।
मग तेचि पावाल खुण । परब्रह्माचि ॥६॥
सदगुरुचरणी धरुनिया आवडी । पाप करावी देस धडी ।
मग तेचि पावाल गोडी । परब्रम्हाचि ॥७॥
इतके जाणावयालागुनी । आपणा जवळच आहे. जाण ।
जव मळिन आहे मन । तव जवळी असता धन। न सापडे तयासी ॥८॥
सदगुरु वचनाचे घालुनी अंजन । मग दृष्टी पडेल ते कांचन ।
मग होईल समाधान कासयासी ॥९॥
मी मी म्हणती सत्य काये । ज्ञानदृष्टी परतोनी पाहे ।
हा तो मृत्तिकेचा देह । मुसी ओतिलास ॥१०॥
सकळ मृत्तिका सोंगे घेतली आणिक। जैसे पाहे रे कनक ।
नामे भिन्न अळंकाराचि ॥ ११॥
तैसे पाहे ऐक जीवन सरिता । आणिक होय जाणा ।
तैसे रामी रातली आहे मन । पाप केवी राहो सके ॥ १२॥
बोधला म्हणे हरि हे विवेकसिंधुची लहरी । परि कर्ता असे हरि तोचि देव ॥१३॥


संत माणकोजी बोधले अभंग – १७

उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा ।
फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥ १॥
होतो वाद्याचा गजर तुरे वाजती कहाळा ।
करी घेऊनिया आरत्या उभ्या गोपिका बाळा ॥ २॥
द्वारा उभे भक्तजन दोनी जोडुनी हात ।
तयास द्यावे दर्शन आम्हा करी सनाथ ॥३॥
नारद तुंबर उभे हरिगुण गात ।
छपन्न कोटी यादव ते ही मिळाले समस्त ॥४॥
बोधला म्हणे देवा मस्तकी ठेवा हात ।
जन्मोजन्मी द्वारी उभा हरिगुण गात ॥५॥


संत माणकोजी बोधले अभंग – १८

उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर ।
जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥१॥
झडकरी उठोनिया कृपादृष्टी त्वा पाहावे ।
आपुले प्रेमसुख आम्हा भक्तासी द्यावे ॥ २॥
तोडुनी भ्रांतीचे पडळ शुध्दबुध्द करावे ।
कायाकाशी पूर्णवासी स्नान धाडावे ॥३॥
प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान’ ।
सावध होऊनी करी गा हरिभजन ॥४॥
विश्वाचा त्रिकुट शिखरी राहे ।
तयाचे दर्शने जन्म पुनित होये ॥५॥
बोधला म्हणे देवा सकळ तीर्थी मी न्हालो ।
स्वामीच्या दर्शने जन्म पुनित जाहलो ॥६॥


संत माणकोजी बोधले अभंग – १९

उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला ।
सांभाळा आपुली बाळे तु बापा विठ्ठला ॥ १॥
दिन उगवला बाळे भुकेली जाहली ।
दयाळू माऊली सकळा भोजन घाली ॥ २॥
सकळांसी सांभाळूनी घ्यावे त्वा अन्न ।
दयाळू होऊनी लावी आपूले ध्यान ॥३॥
बोधला म्हणे देवा मी तो बाळ अज्ञान अखंड ।
मग देई तुझे नाम स्मरण ॥४॥


संत माणकोजी बोधले अभंग – २०

एक एक म्हणती अवघे लोक ।
एकचित्ते टेक नेणवेची ॥१॥
एक दावुनिया ठाकिती आणिका ।
पदरासी ढका लागो नेदी ॥ २ ॥
बोधला म्हणे ऐशा केवी होये गती ।
कुळासहित बुडती नर्कपाशा ॥३॥


२१

एक दिन तु एक दयाळू ।
दयाळू करितसे सांभाळ रात्रंदिवस ॥१॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या राशी ।
कोणापाशी तुजविण ॥ २ ॥
मी अंतरीची खूण तूचि एक जाणना ।
सांगो या अनंता कोणापाशी ॥३॥
एक मशक पडिलो तुझे द्वारी ।
लाज सर्वापरी आहे तुज ॥४॥
बोधला म्हणे देवा मी तुझा आखिला ।
दासाचा विकिला जन्मोजन्मी ॥५॥


२२

एव्हडिये दुरुनी आलो तुज कारणे ।
भेटी दे निधाने पांडुरंगे ॥१॥
भेटी मज देसि आहे तुझी दासी ।
म्हणोनी आलो चरणापाशी ॥ २ ॥
तरी बापा तारिशिल मज ।
शरण आलो तुज ॥ २॥
राख माजी लाज | येहि काळी ॥३॥
राखसिल लाज शरण आलो तुज ।
येइ चरणिचे रज बोधला म्हणे ॥४॥


२३

ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण ।
होईल दोषांचे दहन। गुरुचे स्मरण केलिया ॥ १॥
गुरुसेवा घडे ज्यासी । कळिकाळ न बाघे त्यासी ।
त्यांनी साधिले मोक्षासी । गुरुचे स्मरण केलिया ॥ २॥
गुरु ज्ञानाचा आगरु । गुरु धैर्याचा मेरु ।
नौका नेईल पारु। गुरुचे स्मरण केलिया ॥३॥
गुरु मायेचे मूळ जीव । गुरु मोक्षपदाचा ठाव ।
साध्य होती सर्व देव । गुरुचे स्मरण केलिया ॥४॥
जय जय गुरु मायबापा । चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा ।
बोधला ध्यातो निज स्वरुपा । पर ठायी लय लावुनी ॥५॥


२४

ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा ।
भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥ १ ॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी, देवा सर्वा ठायी ।
सर्वाहुन वेगळा आम्हा जवळच पाही ॥ २॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी ।
ही खुण दाविली आम्हा जवळच पाही ॥३॥
संत साधुजन अवघे विश्वरुप देवा विश्वरुप ।
पाहु गेलो महिमा महिमा तुझे न कळे स्वरुप ॥४॥
पंच प्राणांची उजळोनी आरती देवा उजळोनी आरती ।
भावे ओवाळिता राही रुक्मिणीचा पती ॥५॥
सत्याची आरती सत्य भावे ओवाळू देवा सत्यभावे ओवाळू ।
बोधला उभा दास तुझा उभा, आपल्या चरणाजवळी ॥६॥


२५

करिती दुःख न धरा चित्ती । सुख मानी ॥१॥
आपलाली कर्मे आपण भोगिती ।
केल्यावीण देती झाडा जणी ॥ २ ॥
तेथे आनंदाचे ।
प्रगट विकार केवि उठे हृदयी प्रगट रामरुप ॥ ३॥
येथे माझा स्वामी कृपाळू पाही ।
पाप दृष्टी काही न राहे तेथे ॥४॥
जळी बुडलीया तृण आज्ञा केली लागे जाण ।
रामी रतलिया मन पाप केवी राहे ॥५॥
बोधला म्हणे मन रामी विनटले ।
दहन झाले संसाराचे ॥६॥


२६

काय मी करितो कशाने तरतो ।
नाम तुझे घेतो एक भावे ॥१॥
नाम तुझे वाणी बोबडिया बोला ।
न ये मज चाली करु काय ॥ २ ॥
न ये मज गाणे न ये मज नाचणे ।
भावे आलो शरण तुझे पायी ॥३॥
बोधला म्हणे देवा तु मज बोधिले ।
आवडीने ठेविले नाम माझे ॥४॥


२७

कुरंगिणी आपुली बालके सांभाळी ।
तैसा वनमाळी आत्मालागी ॥१॥
बहुत माझे लळे पुरविले सकळ ।
माउली कृपाळ अनाथांची ॥ २ ॥
उपकार सांगता नलगे आत पाहाता ।
सकल माझी चिंता दूर केली ॥३॥
काये गा मी सांगो सांगता गा नये ।
सकाळ बाप माये पांडुरंग ॥४॥
सर्वा परि माझी पुरविली आस ।
चुकविला गर्भवास बोधला म्हणे ॥५॥


२८

कृष्ण सकळा जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव ।
इतरां लोकां संदेहो न कळे । महिमान तयाचा ॥१॥
आपण तो बाळ ब्रह्मचारी सकळ ।
जन्मले तयाचे उदरी ब्रह्ममाया न कळत ।
याची थोरवी येर लोक काये जाणती ॥ २॥
हा तो सर्वांचा साक्षभूत ।
कोणा न कळे याचा अंत आता सांगेन तयाचा वृतांत ।
सावधान श्रोते हो ॥३॥
कृपा आपणाची नारी आपण वर्त देह परी ।
दोनी दावी जनाचारी आपण यकटचि एक ॥४॥
आपण एकलाची एक सर्व । सोळा सहस्त्र गोपाळ ।
गोपिकांसहित खेळे । तरी न कळे चरित्र ॥५॥
आता सांग न कृष्णाची मूळ कथा ।
आपणचि माता आपणचि पिता ।
आपण जाला चरित्र करिता । कंसारि कान्हया ॥६॥
आपण चौवर्णाचे मूळ । आपण ब्रह्म ते केवळ ।
विश्वी विस्तारला रे सकळ । चहू वेदांची कळ तयापासी ॥७॥
साही शास्त्रे झगडती । आठरा पुराणांची वित्पत्ती ।
परि न कळे तयाची गती । आपण श्रीपती खेळतसे ॥८॥
आपण तो पांडवांचा सोईरा । धावे ब्रह्मी द्रुपदिच्या कैवारा ।
दुष्ट दुर्योधन विरा । साहे नव्हे सर्वथा ॥९॥
पांडवालागी आपण । कृष्ण साहये होये सावधान ।
सत्य तयाचे देखोन । उणे येऊ नेदी सर्वथा ॥ १०॥
पाचही पांडव समूळ । आता सांगेन तयाचे मूळ ।
हे तो पंडू चे पुत्र केवळ । कृष्ण साहये होये तयासी ॥ ११॥
जो च आपला स्वधर्म तोच धर्म रे जाण ।
मग अनुभवाची खुण सांगतो ऐका ॥ १२॥
भीम तोची भावबळी ।
या अगाध पाहाहो योगियाचा रावो । तोची एकु ॥ १३॥
आर्त तोचि अर्जुन सबुध ते सुभद्रा जाण गुरुपुत्र जाणती हे खुण ।
इतरा न कळे जाण सर्वथा ॥ १४॥
अवलोकी तोचि न कुळ । सादृष्ट तो सहदेव ।
पाचाची प्रीत द्रुपदी पहावो । अवलोकिता ठावो सन्निधचि असे ॥१५॥
सत्य तेचि सीता स्वये । आत्माराम लक्ष्मण बंधु सवे ॥ १६॥
राम तोचि रावण दुर्बुध्दी दुर्योधन । असता जवळी जाण म्हणता दुरी ।
बोधला म्हणे जेथिले तेथेच आहे । ज्ञानदृष्टी पाहे परतोनिया ॥१७॥


२९

कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक ।
आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥१॥
भाविका दावितो कवतुक । बाळ्या भोळ्या भोगवि सुख ।
हारितो त्यांचे जन्म दुःख । सुखसमाधी बैसवी ॥ २॥
गोपाळामाजी क्रीडा करी । सवे गोपिका सुंदरी ।
हात टाकुनी खांद्यावरी । कैसा रळिया करितसे ॥ २॥
कोणा न कळे याचा पार । भुलवितो नरनारी ।
बळे चुकवी जन्मफेरा । आढळपदी बैसवी ॥४॥
बोधला म्हणे भुलविले कैसे । बळच लाविले आपले पिसे ।
पूर्वपुण्ये ओढे कैसे । थोर भाग्य आमचे ॥५॥


३०

गुज गोप्ये गोष्टी।
हो त्या तुझे पोटी ।
त्या त्वा जगजेठी सांगितल्या ॥१॥
ऐसा तु आम्हासि कृपाळु जालासि ।
जैसा पांडवांसि वेळा आतु ॥२॥
बोधला म्हणे देवा तू दीनांचा दयाळू ।
कोवळा कैवल्ये केले बापा ॥३॥


३१

घ्यावो सुखाचे फुकाचे ।
नाम माझ्या विठोबाचे ॥१॥
घेता बहुत आहे सोपे ।
भरा आपुलाली मापे ॥ २॥
येथे दुजा नाही कोणी ।
घेता बहुत आहे धनी ॥३॥
न लगे हे जकाती ।
छाया आपुलाले हाती ॥४॥
बोधला म्हणे वर्णन केली ।
जनी ठेवी धरा आली ॥५॥


३२

चरणी घागऱ्या घुळ घुळर ।
त्यापरि वाकि वाजति मंजुळ रे ॥१॥
कैश्या गोपिका शोभति दोहि भागि रे ।
आपण कृष्ण खेळता कैसा रंगि रे ॥ २॥
कैसा गोपाळास देतो शोभा रे।
बोधला म्हणे हा उभा भीमातिरी ।
कैसा सवंगड्या वाटितो सिदोरी रे ॥४॥


३३

चलो रे प्राणि मन राम सुलावू ।
राम रे ऐक राम विना कुछ पाऊ ॥१॥
किनका बेटा किनकी बेटी ।
ऐक राम बिन फजिती झुटी ॥ २ ॥
किनका बित किनका गात ।
ऐक राम बिना कछु पाना गत ॥३॥
किनक्या गाया किनक्या म्हैसी ।
एक राम बिना हे महिर सोपरदिसे ॥४॥
किनकी छेत्री किनकी घोर ।
ऐक राम बिना सब झुटा पसार ॥५॥
कहे बोधला ये राम है सखा ।
राम बिना सब जग परिखा ॥६॥


३४

चालता पंढरीची वाट ।
पाप पळती हातोहात ॥१॥
मिळाला वैष्णवाचा भार ।
आनंदे करिती जयजयकार ॥२॥
लोळणि घालुनिया पायावरि ।
फुका मोक्ष देतो हरि ॥३॥
बोधला म्हणे सत्य जाणा ।
बाप पंढरीचा राणा ॥४


३५

चालता पंढरीची वाट ।
पुण्ये जोडली अनंत कोटी ॥१॥
मग पावलिया पंढरीसी ।
अनंत कोटे पुण्यरासी ॥२॥
देता हरिनामाची हाक ।
महा पातके घेती धाक ॥ ३ ॥
हाती वाजलिया टाळी ।
रंगी नाचतो वनमाळी ॥४॥
बोधला म्हणे आनंद जाला ।
विठोबा आपोआप आला ॥५॥


३६

चंद्र चकोरांचा । पाळिता तयाचा ।
तैसा देव आमचा पांडुरंग ॥१॥
माऊली बालका घडिघडी पाहे देखा ।
तैसा आमचा सखा पांडुरंग ॥ २॥
सकळ आमचा भार चालवितो दातार ।
काये उपकार सांगो आता ॥ ३॥
बोधला म्हणे देवा तुज मग नायक आहे ।
जन्मोजन्मी पाय दावी मज ॥४॥


३७

जगा सुख भोगणे आहे ।
सेवा विठोबाचे पाय ॥१॥
शुध्द करा तुमचे मन ।
लावा विठोबासी ध्यान ॥ २॥
दुष्टबुध्दी दुर करा ।
तोडा अविद्येचा थारा ॥३॥
निवळ करा अंतःकरण ।
तुम्हा जवळी नारायण ॥४॥
बोधला म्हणे भाव धरा ।
तारु निर्वाणीचा खरा ॥५॥


३८

जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा ।
पतीत केशवा जन्मा आलो ॥१॥
सदाचा अवगुणी नावडे जनासी ।
तरी तुवा हृषीकेशी आंगीकारिले ॥ २॥
अनंतकोटी आमच्या पातकांसी रासी ।
त्या घातलिया पोटासी पांडुरंगा ॥३॥
माता पितियाची उपमा तुझे देता ।
लाज माझीया चित्ता वाटताहे ॥४॥
पीतीयाचा पुत्र अपराध करिता ।
गणती नको दाऊ आमुख आम्हा ॥५॥
ऐसीयाची उपमा तुजलागी न सहे ।
तुजवाचुनी कोण आहे थोर देवा ॥६॥
बोधला म्हणे देवा तुवा जगी उध्दारीले ।
पतीत पावन जैसे केले नाम साचे ॥७॥


३९

जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी ।
त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥
गजेंद्र जडजीव स्मरला तुझे नाव ।
ऐकोनिया धाव घेतली कैसी ॥२॥
भक्ताचा भाव देखोनि पंढरिरावो ।
करितसे उपाव नाना परि ॥३॥
बोधला म्हणे देव भावाचा भोक्ता ।
येन्हवी सर्वथा नावडे काही ॥४॥


४०

जन्मोजन्मी आमचा केला प्रतिपाळ ।
करितसे सांभाळ रात्री दिवस ॥१॥
तरि तू आमचा मातापिता ।
सोयरा सर्वथा निवारिली वेथा जन्मांतरिची ॥२॥
फेडियेले रिण तोडियेले हिण ।
कैसी मोहियेले मन पांडुरंगा ॥३॥
अनंत कोटी आमच्या पातकाच्या रासि ।
त्या तु हृषीकेशी दुर केल्या ॥४॥
नाही विचारिले दोष आमचे काही ।
बांधलेस पायी बोधला म्हणे ॥५॥


४१

जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा ।
तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥१॥
विश्व व्यापक तो हा विश्वाचे ठायी । प्रकृतीवेगळा अससी विदेही ।
देहीचा चालक तू खेळविता पाही । तुजवाचुनी आणिक कोणीही नाही ॥२॥
नावरुप तुज याती नाकुळ । ब्रह्मांडनायक तू व्यापक सकळ ।
कीडा कीटक मुंगी सर्वांचे मूळ । अभक्तासी काय भक्त गोपाळ ॥३॥
साधु संत जन ज ध्याती सकळ । जया जैसा भाव त्या तैसा गोपाळ ।
जाणिव कृपाळू संचिताचे मूळ । संचितावेगळे कैचे ते फळ ॥४॥
माता पिता बंधु तूची सकळ । कन्यापुत्र अखंड तूची केवळ ।
भक्त भाविक जन तुज ध्यानी सकळ । इतरांसी न कळे बा भ्रांतीचे मुळ ॥५॥
बोधला म्हणे शरण मी आता । अखंड निजाध्यास हरिगुण गाता।
हृदयी प्रकाश तुझा समयी । तुज वाचोनी आण नेणे सर्वथा ॥६॥


४२

जवळी असता राम अंतरला दुरी ।
माया मोहो जाळे कैसा वाहोली दुरी ॥१॥
देहेक सृजा भोगुनी जोडियेली जोडी ।
अंतकाळे जाता नये फुटकी कवडी ॥ २॥
जंवरि देह बळ तंववरी जिंकावा हा काळ ।
आठवा रघुवीरा हेची सोडवण करा ॥३॥
बोधला म्हणे का रे भुललेसी ।
सोडुनीया भ्रांती शरणे जावे विठ्ठलासी ॥४॥


४३

जागा जागारे आपले मनी । भाव ठेउनी गुरुचरणी ॥
मन राखेल जनी वनी गा रामा । कृष्णा बा हरि ॥धृ॥
भले भले रे पूर्वदत्ता । केले फळ ते आले हाता ।
मग भेटी जाली भगवंता ॥ १॥
वासनेचा वास हा मोडी । आशा मनसा घाली दवडि ।
कुबुध्दीची कुलपे मोडी । काही करावे आपुले हित ।
दया धर्मी द्या बा चित्त । नामी न करा दुश्चित ।
गा बोधला म्हणे बोधली मी पणासी आचवला ।
हरिचरणी जाउनी विनटलो ॥


४४

जै तुज मज झाली भेटी ।
तुझे पायी पडली माझी मिठी ।
पंढरीराया आता तु कैसा जासी ।
तुज ओढुनी बांधेन गळियासी ॥धृ॥
जये देखियेले तुझे मुख ।
गेली गेली माझी तान भुक। पंढरीराया ॥१॥
कानी देखियेली कुंडले ।
देखोनि मन माझे निवाले। पंढरीनाथा ॥ २॥
गळा देखिली वैजयंती माळा ।
माझ्या डोळियासी सुकाळ जाला ॥३॥
कंठी देखियेले कौस्तुभ ।
देखोनि सुख जाले अमाप ॥४॥
कटि देखियेले दोन्ही कर।
देखोनी हारुषे जालो निर्भर ॥५॥
इटे देखियेले दोन्ही पाये ।
देखोनी मन स्थिर राहे ॥६॥
आम्हा पडता जडजुड ।
आपण उगवितो आमचे कोडे ॥ ७॥
आम्ही हिंडता रानीवनी ।
सवे विठ्ठल आमुचा धनी ॥८॥
आम्ही हिंडतो जिकडे तिकडे ।
आपण झाडितो काटे खडे ॥९॥
जेवु बैसवितो आपणा सांगती ।
ग्रास घालितो आपुल्या हाते ॥१०॥
दोघा निजता सुख शेजार ।
काये सांगो त्या सुखाची थोरी ॥ ११॥
लोक हसोन करिती काये ।
आम्हा जोडले जोडले तुज पाये ॥ १२॥
बोधला म्हणे बोध जाला ।
तै हा देहेच तुज वाहिला ॥१३॥


४५

झाली आत्मपूजा देव शेजे पहुडला ।
म्हणोनिया थोर थोर आनंद झाला ॥१॥
वैकुंठीचा देव कैसा पंढरिसा आला ।
पुंडलिकाचा भाव देखोनि तन्मय झाला ॥ २॥
धामणगावी भक्त एक थोर ऐकीला ।
गरुडावर बैसोनी कैसा धावत आला ॥३॥
बोधला म्हणे थोर आनंदु झाला ।
हृदयी प्रगटे बोधला निज निजेला ॥४॥


४६

तरुणपण भर देही । पुढे नाठवे काही ।
भ्रांती हे येत डोळा । तेणे पडिलो वाही।
माझे माझे म्हणता रे अंती न चले काही ।
गुरुवचन भावबळे । विश्वासे राही ॥१॥
रामकृष्ण वासुदेवा। घरी संतसंग सेवा ।
त्याणेची हीत होईल । मग पावसील देवा ।
वाया तु नवजासी करी गुरुची सेवा ।
आता तरी सावध होई का भुललासी मुढा ।
व्यर्थ तु पडु नको पाहे मायेच्या खोडा ॥२॥
प्रपंच महाझट त्याने लागिले वेढा ।
स्वहित नव्हेची काही घट मुष्टीच्या हुंडा ॥३॥
सहज विचारीता हीत आपणासी ।
सदगुरु शरण जावे तनमन धनेसी ।
जैसे तु जाणोनिया का मुढ बा होसी ।
न परतोनी पाहे बापा मग सुख पावसी ॥४॥
पैल तो जीव पाहे कैसी उडते मासी ।
मोहळ रचियले बहुता सायासी ।
आणिके झाडीपले काही नव्हे बा तिसी ।
तैसा तु गुंतु नको व्यर्थ या मायसी ॥ ५॥
माझी मज होईल म्हणोनी केली खटपट ।
वृध्दपण पातलिया अवघ्या येईल वीट ।
म्हणऊन दृढ धरी गुरुचरण निकट ॥६॥
माया हेलाव पाही कैसी लागली पाठी ।
म्हणऊनी शरण आलो पायी घातली मिठी ।
कृपाळु हरि माझी केली वासनेची तुटी ।
बोधला म्हणे आता कृपाळु जगजेठी ॥७॥


४७

त्रिभुवनामाजी पंढरी थोर ।
तेथील सेठ्या पुंडलिक भला रे ॥१॥
पतित पावन जडमूढ भारी ।
तयास कौल दिल्हा रे ॥२॥
निंदक दुर्जन कंटक भारी ।
कौल नाही तयाला रे ॥३॥
अनंत कोटी पुण्य जयांचे ।
तोचिये पेठेसी आले रे ॥४॥
नामाचे भरित भरितो भला ।
अभागी चुकला करंटा रे ॥५॥
बोधला म्हणे कैवल्य आले ।
दुकान तेथे बोधला रे ॥६॥


४८

तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले ।
सांग विठ्ठल माये माझे ॥१॥
साच की लटके विचारी मनासी ।
हा बोला कोणासी ठेवसील ॥ २॥
हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले ।
वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥३॥
सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा ।
तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥४॥
सकळ मंडण चालविता तुझी करणी गा अनंता ।
दुजा हा सर्वथा नाही कोणी ॥५॥
बोधला म्हणे हे वचन निर्धारी ।
अवघा तूची सुत्रधारी तु आमचा कैवारी पांडुरंगा ॥६॥


४९

तुझीया भेटीला जीव माझा तळमळी ।
केधवा वनमाळी येईल घरा ॥१॥
येई गा बा हरि माझ्या प्राणनाथा ।
जीव जाईल आता करु काय ॥ २ ॥
माझिया देहीचा बैसकार केला ।
का रे नाही आला विठोबा माझा ॥३॥
येई गा कृपानिधी बैस माझ्या घरि ।
तुज आता नाही उरी संसाराची ॥४॥
हळुच तुज बुध्दी बैसविन घरि ।
तुज म्हणे अवतारी जाऊ नेदी ॥५॥
बोधला म्हणे देवा कोण माझा केवा ।
आता येऊन द्यावा प्रेमपान्हा ॥६॥


५०

तुझिये चरणी जाण स्थिरावले मन ।
आणिक मज ज्ञान न लगे काही ॥१॥
मुक्तिदासी आहेता तुजपासी ।
त्या नलगता आम्हासी पांडुरंगा ॥२॥
वैकुंठ कैलास न लगती आम्हास ।
आवडी बोधल्यास तुझे पायी ॥३॥


५१

तुमचे तुम्हा जवळी असता ।
वाया सिणालका सर्वथ ॥१॥
हरि करुणानिधी मोठा ।
व्यापार टाका तुम्ही खोटा ॥२॥
सांडा प्रकृती स्वभाव ।
तुम्हासारिखाची देव ॥३॥
हरिस नाही बोल काही ।
वाया पडाल प्रवाही ॥४॥
जैसे प्रकृतीस्वभाव ।
त्यासी तैसाची देव ॥५॥
बोधला म्हणे पहा मनी ।
आणिक संतां विचारुनी ॥६॥


५२

थोर प्रभात हे झाली । उठ गे कृष्णे तू माऊली ।
आम्हा प्रेमपान्हा घाली । अगा तू कृष्णा जननीये ॥१॥
तू तर माऊली आमची। थोर सावली संतांची ।
विश्रांती तुझिया नामाची । अगा तू कृष्ण जननीये ॥ २॥
आजची पूर्वकाळ थोर । गाई वत्सी करी एकधार ।
आम्हा दिना करि गा उध्दार । अगा तू कृष्ण जननीये ॥३॥
बोधला म्हणे आवड देई । आणिक न मागे तुज काही ।
आवड तुझे पायी । अगा तू कृष्ण जननीये ॥४॥


५३

दिनांचा दयाळू पतितांचा पावन ।
सर्वसुखनिधान पांडुरंग ॥१॥
घडी घडी आठव करावा तयांचा ।
धोका कळीकाळाचा नाही त्यासी ॥२॥
पांडव जयाने रक्षीले जो हरि ।
ते नेले विवरी काढूनिया ॥३॥
प्रल्हादाचा पिता चिंतीत वोखटे ।
करितसे गोमटे वेगळाची ॥४॥
बांधोनी पाषाण सागरी लोटिला ।
तो पहा तारिला वरचेवरी ॥५॥
जैसे आणिक पतित बहु उध्दरिले ।
आठवा रे पाऊले त्यांची वेगी ॥६॥
बोधला म्हणे ऐशा देवा शरण जावे ।
भवसागर तरावे हेळामात्रे ॥७॥


५४

दिंडी आणि पताका गरुड टकियाचे भार ।
आनंद गर्जती नाम यादव वीर ॥१॥ ॥ध्रु॥
चलावे विंठोबा राजमंदिरी ।
करी घेऊनि चामर ढाळिती गा सुंदरा ।
वेडे आणि वाकुडे गर्जती हरिचे पवाडे ।
भक्तीचा आळुका उभा भाग आणि पुढा ॥ २॥
घातला मंचक कळि सुमने बरुवार ।
आनंद पहुडले वरि यादव वीर ॥३॥
सकळिका मिळोनि वरि जाणविती वारा ।
ऐका परिसा येक त्या दिसती सुंदरा ॥४॥
सुवर्णाचे ताटी आर या गोपिका येती ।
बोधला म्हणे मी तेथे चरण तळाची ॥५॥


५५

देवकी म्हणे बाळा धन्ये भाग्य जाले ।
धन्ये उदरा आले परब्रह्म ॥१॥
धन्य माझे आता निवती दृष्टी डोळे ।
धन्ये कडिये खेळे कृष्णु बाळ ॥२॥
जन लोक बोलती देवकीचा बाळ ।
धन्ये उभयता कुळ उद्धरिले ॥३॥
धन्ये हे भूमीस्थळ धन्ये हे गोकुळ ।
धन्ये ते गोपाळ सदा सांग ॥४॥
धन्ये पावा मोहरी वाहुनिया खाद्यांवरी ।
धन्ये भिमातिरीं क्रीडा करी ॥५॥
बोधला म्हणे हरी देखिले दृष्टी ।
धावोनिया मिठी घाली पायीं ॥६॥


५६

देवा देवा तुझे चरणाची आवडी ।
हे कल्प कोडी जोड माजी ।
नामाची हे मात देई अखंडित ।
तेथ माझे चित्त बैसलेसे ॥१॥
नामा वाचोनिया हीत काही दासा ।
मन हे बैस आन के ठाई ।
बोधला म्हणे देवा नाम तुला सोप ।
दिधले माये बाप कृपा करुनी ॥२॥


५७

देह हे पंढरी आत्मा पांडुरंग ।
नित्य करी संग अहर्निशी ॥१॥
चहु देहाची करुनिया वीट ।
त्यावरी उभा नीट पांडुरंग ॥२॥
मन पुंडलिक आवरोनी धरा ।
होईल सोयरा पांडुरंग ॥३॥
बोधला म्हणे माझ्या संचिताचा रेखा ।
जोडियला सखा पांडुरंग ॥४॥


५८

देह जालिया जर्जर ।
सकळा होईल वार ॥१॥
कोण्ही नव्हे कोणाचे ।
जन लटिके जे पायेचे ॥ २ ॥
माझ्या रामासी शरण जाता ।
भय नाही सर्वथा ॥३॥
बोधला म्हणे हरि शरण ।
चुकविती जन्ममरण ॥४॥


५९

धन्ये ते पंढरी पुन्ये पावन ।
जेणे तारियेले विश्वलोक ॥१॥
धन्ये तेणे पावन केले ।
आम्हासी दाखविले निज सुख रे ॥ २॥
धन्ये ते भीमा चंद्रभागा ।
धन्ये ते भूमी वैकुंठ रे ॥३॥
धन्ये पांडुरंग धन्य पुंडलिक ।
पुण्ये जाली उत्कृष्ट रे ॥४॥
धन्ये नामदेव नाम च भरला ।
हाता आले नवनित रे ॥५॥
संत साधुजन जेवविले जेणे ।
आवघे केले संतृप्त रे ॥६॥
तेथे वडिलाचे धान्य वाटत आहे ।
म्हणोनि कानी आइकिली मातु रे ॥७॥
ते देती न देत म्हणोनी ।
भित भित गेलो तेथ धणि भेटला अवचिते रे ॥८॥
त्याणे भेउ नको म्हणोनि नाभिकार दिल्हा ।
मस्तकी ठेविला हात रे ॥९॥
आमचे आम्हासि देवूनी ।
त्याणी सुखी केले सावचित रे ॥ १० ॥
बोधला म्हणे घ्या रे घ्यारे तुम्ही ।
नका राहु दुचित रे ॥११॥


६०

धन्या असोन घरी वाया फिरसिल फेरी ।
मुळिचा धन्या नोळखेसी । हेचि गुन्हो सिरी ॥१॥
चाल निरंजना सुख होईल मना ।
फिरोन पाहे नवे ग उमा ।
सबाळी आपल्या स्थाना ॥ २॥
सोडि लाज जाता उघडा घाली माथा ।
सदगुरुसौ शरण जाई। कृपा करिल आता ॥ ३॥
नव्हे नर नव्हे नार नाही तेथे योनी ।
हुरकोन गेले साबले मग हारपळली दोन्ही ॥४॥
बोधला म्हणे सांडी वाद वाचा करिसी सीण ।
आम्हा तुम्हा एकपणा कैचे भिनाभिन ॥५॥


६१

धन्य माझे भाग्य पूर्व पूण्ये फळासी आले।
तरिच आवडले तुमचे सुख ॥१॥
ऐसे बोल वो रुखमिणी ।
बहुत दिस होत माझे मनी ॥ २॥
जे चिंतित होतो आंतकरणी ।
ते फळासी आले ॥३॥
की तुम्हासारिखा ना हो मजलागी ।
सोहोळा हा घ्यावा निज गुह्याचा ॥४॥
काय सांगो आता सुखाची आवडी ।
देखोनी मन माझे ओढी तुमच्या पायी ॥५॥
न करिता क्लेश पावले अवचिता ।
हे कृपा भगवंता केली मज ॥ ६॥
बोधला म्हणे पूर्व भाग्ये पडिली मिठी ।
आता सांगसिल गोष्टी आंतरीच्या ॥७॥


६२

नलगे जपतप करावे साधन ।
नाम हे निधान जीवि धरा ॥१॥
नामे ची तरले कोट्यांनीकोटी ।
नामेच वैकुंठी सरते केले ॥२॥
नामाची आवडी जयाच्या चित्तासी ।
धन्ये पुण्य राशी तोचि नर ॥३॥
बोधला म्हणे नाम उच्चारा हरिचे ।
भये कळिकाळाचे नाही तुम्हा ॥४॥


६३

पतित पावना जानकीजीवना ।
सर्व सुखाच्या हरि बापा निधाना ॥१॥
ऐसे पतित तो किती उद्धरिले ।
शरण आलिया कोण गेले ॥ २॥
आसे पतित तो उद्धरिले किती ।
बापस्वामी या लक्ष्मी पति ॥३॥
दुष्ट कौरवी कपट रचिले ।
करुनिया विवर कैसे पांडवा नेले ॥४॥
दुष्ट कौरवी द्रुपदी पांचालि ।
ऐकोनि वचन कैसी धावणी केली ॥५॥
जैसे पवाडे तुझे जगी गर्जती ।
महा महा पतित तो वो उध्दरिले किती ॥६॥
जैसे ब्रीदे रे तुझी किती वाखाणु ।
बोधला म्हणे हे सुखाचे निधान ॥७॥


६४

पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी ।
ते आह्यालागुनी कळो आले ॥१॥
मी आरुस साबड माझे बोलणे बोबडे ।
परि तुज आवडले पांडुरंगा ॥ २॥
कळा गा कुसरी नये मज गाता ।
परि वो पंढरीनाथा आंगिकारले ॥३॥
बोधला म्हणे देवा वानले तुझ्या भावा ।
कळो आल्या केशवा मायबापा ॥४॥


६५

पंढरीवाचुनी सुख कोठे नाही ।
ते आहे गा पाई विठोबाचे ॥१॥
भाग्यवंत येती हे सुखे घेती ।
मागुते न येती परतोनिया ॥२॥
बोधला म्हणे धन्ये भाग्य ज्यांचे होये ।
तरीच त्या सोय सांपडली ॥३॥


६६

पांडवा कैवारी । जालासि श्रीहरि ।
तैसी आम्हावरी केली कृपा ॥१॥
संसार परंजनी । पडलो होतो महावनी ।
आलासे धावोनि पांडुरंग माझा ॥ २॥
बोधला म्हणे आता धन्ये पंढरीनाथा ।
सकळ माझी चिंता दूर केली बापा ॥३॥


६७

प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही ।
काढिले लवलाही पांडुरंगे ॥१॥
बहुत जाल्या तुझ्या उपकाराच्या रासी ।
सांगा संतापासी घडी घडी ॥ २॥
ऐसे मागे बहुत ऐकत होतो कानी ।
ते तो मजलागुनी केले बापा ॥३॥
बोधला म्हणे तुझी वाखाणिता कीर्ती ।
सांगो संता प्रती तुझे गुण ॥४॥


६८

पूर आला आनंदाचा ।
लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधु नामाची सांगडी ।
पोहुन जाऊ पैलथडी ॥२॥
अवघे भाविक जन भक्त ।
घाला उड्या चंद्रभागेत ॥३॥
बोधला म्हणे थोर पुण्ये ।
वोघा आली पंथे येणे ॥४॥


६९

पैल यमुने पाबली । कृष्ण खेळे चेंडू फळी ।
खेळ खेळोनी वनमाळी । कवणा नातुडे ॥१॥
हा तव नाटक निराळा । कवणा न कळे याची लिळा ।
हा तव जाईन गोकुळा । कंसास करि रीस ॥ २॥
जाऊनी गोकुळा भितरी भुलवितो नरनारी ।
खुणा दावी नाना परी या गोपिकालागी ॥३॥
हा तव असोनि घरोघरी । बाळ लीला क्रीडा करी ।
दहीदूध करुनी चोरी। नवनीत भक्षीतसे ॥४॥
बोधला म्हणे कवतुक केले नव्हेत सुख दाविले ।
माझे मन तल्लिन जाले। कृष्णापायी पहावो ॥५॥


७०

बहु दिवस बहु कष्ट सोसीले ।
वाट म्या पाहिली विठो तुझी ॥ १ ॥
कृपाळु होउनी केधवा बा येसी ।
मज भेटी देसी चहु बाही ॥२॥
पोटासी धरुनि देसी आलिंगन ।
कुरवाळी वदन आपुले करे ॥३॥
बोधला म्हणे मी तुज लडिवाळ ।
घडी सांभाळ करी भाना ॥४॥


७१

भक्ताच्या धावया धावसि तु वेगी ।
विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥१॥
यादवांसहित कैसा तू धावसी ।
स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥ २॥
बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी ।
भक्त भाव मुरारी साज तुज ॥३॥


७२

भक्ति आनंद । मज करी गा नारायणा ।
हेचि माझ्या मना आवडी मोठी ॥१॥
देवा आवडी मनाची । तुझिये भेटीची ।
आणिक कोणाची । नाही चाड ॥२॥
जनक जननी । तु आमचा धणी ।
ठाव मज चरणी । देई बापा ॥३॥
बोधला म्हणे मज । आणिक नाही काज ।
तुझीया चरणीचा रज । होईन बापा ॥४॥


७३

भक्ती भावा ठाव नाही ।
कवित्व करी उभे घाई ॥ १॥
लोकाप्रती वाचितो पोथी पुराण ।
आपण भरले आडराने ॥ २॥
देखत देखत ठाकिती लोका ।
आपण घेती लोकांचा थुका ॥३॥
हाती घेऊनी फिरवितो माळा ।
पन्नास घालुनी कापी गळा ॥४॥
त्या चांडाळा मोक्ष नाही ।
ते पडती नर्कवाही ॥५॥
अंतरी भेदाचे परी ।
जीव मारुनी पैसे वरी ॥६॥


७४

भावाचा भुकेला प्रीतीचा येलाइतू ।
हेचि तुझी भक्ती आणिक न लगे काही ॥१॥
ऐसा तु कृपाळू पाहे दीनालागी ।
भक्ती ज्याचे आंगी ते कृपा तुझी ॥ २ ॥
आता तु उदार दीन उध्दरावया ।
धने पंढरीराया कृपाळू वा ॥३॥
बोधला म्हणे देवा धन्य तुझा महिमा ।
स्वामी पुरुषोत्तमा पांडुरंगा ॥४॥


७५

भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार ।
आरे तु काज कैवारी अनाथाचा ॥१॥
दिनाच्या धावया कैसा तु धावसी ।
काहि न पाहसी दोष आमचे ॥२॥
आम्ही तव अपराधी । आहा अनंत कोटी ।
परि तु धुरजेठी आंगिकारिल ॥३॥
बोधला म्हणे जन्मोजन्मी तुझा आखिला ।
हा देहे ठेविला तुझे पायी ॥४॥


७६

महा दोष होत अगणित ।
नामे पावत वैकुंठ ॥१॥
चला हात धरुनी जाऊ ।
माझ्या विठोबाला पाहु ॥ २ ॥
भिमा भरली दोनी थड्या ।
चला टाकु आत उड्या ॥३॥
बांधु नामाची सांगडी ।
तेणे उतर पैल थडी ॥४॥
विठोबाची झाली भेटी ।
दोष निघाले कपाटी ॥५॥
बोधला म्हणे करा निर्धार ।
हा तो उतरिल पैल पार ॥६॥


७७

मागिल्या जन्माचा सांगितला विचार ।
दाविली साचार साक्ष मज ॥१॥
तेंव्हा माझे मन जाले समाधान ।
एरवी अनुमान होता मज ॥२॥
साक्षतेची पहावा साक्षतेची घ्यावा ।
मग समाधान जीवा वाटे थोर ॥३॥
बोधला म्हणे नव्हे हे बोधाची कहाणी ।
आपले नयनी देखियले ॥४॥


७८

मी कर्ता म्हणती तया पडली भ्रांती ।
व्यापक श्रीपती नेणवेचि ॥१॥
बालक उपजोनि लावियेले स्तनी ।
सिकविले कोण्ही तयालागी ॥ २॥
सिकविता ऐक पंढरीनायेक ।
त्यावेगळा आणिक नाही कोण्ही ॥३॥
बोधला म्हणे देव तया जैसा भाव ।
त्या तैसा उपाव करितसे ॥४॥


७९

मेरु तळवटी पाच पिंपळ ।
खाले वरोडा सेंडा वरी मूळ रे ॥१॥
पाचाहि पिंपळा एकचि फळ ।
त्याणे पक्षि गिळिला समुळ रे ॥२॥
ऐक मी सांगेन पक्षियाची सोये ।
बाप नाही त्यासा भाये रे ॥३॥
हात नाही त्यासी पाय रे ।
तो पक्षीविण उडोनिया ये रे ॥४॥
त्याने त्रिभुवन गिळिले पाहे रे ।
तो विश्वची खेळत आहे रे ।
बोधला धरी त्याचे पाय रे ॥५॥


८०

ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा ।
तोडुनिया थारा अविद्येचा ॥ १ ॥
कुवासना कुबुध्दी मुळी हीन छेदी ।
अहंकारासी बंदी घालुनिया ॥२॥
घालुनी सिंहासन वरी बैसे आपण ।
स्वामी हे गुणरत्न पंढरीचे ॥३॥
बोधला म्हणे हरि किंकर तुझे द्वारी ।
नामक्रीडा करी अखंडित ॥४॥


८१

येई गा बापा हरि तू बा कृपानिधी ।
दिनालागी आधी सांभाळावे ॥१॥
आले म्हणुनी कृपादृष्टी पाही ।
उचलूनि घेई ये कडी बापा ॥२॥
तूंचि आमची माता तूंचि आमचा पिता ।
तुजविण सर्वथा नेणे काही ॥३॥
बोधला म्हणे देवा मी तुझा दिन ।
माझा अभिमान आहे तुज ॥४॥


८२

राम माझा बाप । राम माझी माये ।
राम निजसोय दाखविली ॥१॥
राम माझ भाव। राम माझी बहिण ।
राम अंत:करणी । सदा वाये ॥ २ ॥
माये आणी बाप । भाऊ या बहिणी ।
गोवियेले यांनी मायाजाळी ॥३॥
कोण्ही न विचारी । माझे काही हित ।
भुलविले चित्त नानापरी ॥४॥
बापे पांडुरंगे कैसी कृपा केली ।
त्याणे माझी केली काढाकाढी ॥५॥
बोधला म्हणे देवा । मी तुझे अनाथ ।
उध्दरी पतित पडिलो द्वारी ॥६॥


८३

राम हृदयी आठवावा ।
आवडी प्रीतीने गावा ॥१॥
तोडी अविद्या समुळ ।
सुख होईल प्रबळ ॥ २॥
पाहता संसार हाचि सार ।
याणे उतरु पैलपार ॥३॥
नलगे करणे सायास ।
हाचि सोपा उपदेश ॥४॥
बोधला म्हणे दृढ धरा ।
तारु निर्वाणीचा खरा ॥५॥


८४

रामकृष्णहरि मुकुंद मुरारी ।
नाम हे गोजिरी साज तुज ॥१॥
भव मूळ छेदक पंढरीनायेक ।
देतो प्रेमसुख भक्तालागी ॥२॥
जिवीचि जीवनकळा आठवी वेळोवेळा ।
केधवा देखेन डोळा आत्माराम ॥३॥
बोधला म्हणे देवा कळली तुझी लीळा ।
व्यापक गोपाळा खेळसील ॥४॥


८५

राम नांदतो सर्वांच्या अंतरी ।
बाहेर मी तरी तोचि एक ॥१॥
प्रकृतीच्या मुळे झाकुळला पाही ।
तेणे तुम्हा काई न दिसे ॥ २॥
दर्पणीचा मळ काढोनि टाकिले ।
तेणे दाखविले रुप तुझे ॥३॥
देहीचा मळ काढोनि सांडी ।
राम तेथे मांडी जगदरुप ॥४॥
मग जे इच्छीसी ते तु फळ पावशी ।
कल्पतरु तुजपाशी जवळी आहे ॥५॥
कल्पियले फळ नित्य देत आहे ।
सत्य आपुले पाहे जतन करी ॥६॥
सत्यासी साहाय भगवंत आहे ।
कामधेनु पाहे दुधे तेथे ॥७॥
बोधला म्हणे सत्य सांगतो वचन ।
वाहतसे आण विठोबाची ॥८॥


८६

वरिले उपरि उभे राहुन हरि ।
वेणु वाजवी नाना परि रे कान्हया ॥१॥
पवयाचा नाद गोपिंकाचे कानी ।
तयामाजी धन्य रखमाई रे कान्हया ॥ २॥
प्रती आगळी तरीच जवळी ।
करी धरिली गोपाळी रे कान्हया ॥३॥
भावार्थ मोठा तरीच वाटा ।
अर्धांगी शोभे रखमाई रे कान्हया ॥४॥
सकळा मिळोनि प्रीतिया लाविती ।
रखुमाईचा पती रे कान्हया ॥५॥
अवघी मिळेनी बेदाद झाला ।
रखुमाईने अंती नेला रे कान्हया ॥६॥
साही आती अठरा चारी ह्या भांडती ।
न कळे तयाची कोण गती रे कान्हा ॥७॥
बोधला म्हणे रखुमाई ।
कृपाळु जाली आम्हा पाही रे कान्हया ॥८॥


८७

वरिले माळी एक बहुधा व्याली ।
फळलिया विण पाच पिळती सजाकी ॥१॥
ते मुखविण दुध प्याली रे ।
पायाविण वापरली रे ।
ते दावियाविण बांधली रे ॥ २॥
बोधला म्हणे गुरुखुणे ओळखिली ।
ते संतांचे वाडी कोंडिली रे ॥३॥


८८

वर्षाचा दिन आनंद झाला ।
आनंदाचे सुख संतमेळा मिळाला ॥१॥
वर्षाचा सण आम्हा नित्य दिवाळी ।
भावे भक्त ओवाळी साधुसंत ॥२॥
सेवा मुख आम्हा नित्य ते भोजनी ।
आम्ही तुष्ट मनी जेविता सदा ॥३॥
बोधला म्हणे आम्हा जाहला निरोप ।
पंढरपूरी आहे आमुचा मायबाप ॥४॥


८९

वासना बड़ी छिनाल । फिरती चारोराज ।
मेरी बात सुनती नहि । बहुत किये हैरान ॥१॥
एक दिन मै पडि हात। दीओ पेडु परळात ।
शरण आयी पेट मे । निकली दाढी पकडी हात ॥ २॥
बिगिटिगिना खेलुंगी सुनोतु मारी बात ।
धती हमारा खुसी हुआ बडी किये शामत ॥ ३॥
कहे बोधला रजात लब दिये हमार हात ॥४॥


९०

व्यापक हा हृषिकेशी । आहे तुम्हा पाशी ।
विश्वास मानसी धरा थोर ॥१॥
चालविता बोलविता । सकळ त्याची सत्ता ।
त्या वाचुनी कर्ता नाही कोण्ही ॥ २॥
खास सुत्रधारी । खेळविता दोरी ।
नाचवी नानापरि । बाहुलिया ॥३॥
बोधला म्हणे मीपण सांडा जाण ।
कर्ता नारायण पांडुरंग ॥४॥


९१

विठ्ठल पाहुणा आला आमुच्या घरी ।
लिंब लोण करी सावळिया ॥१॥
दुरल्या देशीचा माझ्या आवडीचा ।
भिवराथडीचा नारायण ॥ २॥
षड्रस पक्वान्न वाढियेले ताट ।
जेऊ एकवटी बोधला म्हणे ॥३॥


९२

विठोबाचे नाम जीवाचा विश्राम ।
तोडियेला प्रेम संसाराचा ॥१॥
नामाचा महिमा कळला नारायणा ।
लक्ष चौऱ्यांशी भ्रमणा चुकविल्या ॥२॥
बोधला म्हणे साक्ष आली माझे माना ।
सांगतो सज्जना एकभावे ॥३॥


९३

विठोबा सुखाचा विसावा ।
चला विठोबाच्या गांवा ॥१॥
सीण अवघा सांगावा ।
आपल्या जलमत्रीचा ठेवा ॥ २॥
मग तो का रे कुरवाळीला ।
कुभाविला ॥३॥
बोधला म्हणे सत्य सत्य ।
जाणाबाप पंढरीचा राणा ॥४॥


९४

विठो सर्वांचा भार ।
हृदयी घ्या रे निरंतर ॥१॥
विठोबा हा काळाचा काळ ।
महा भलासि कृपाळ ॥२॥
सत्य वचन निर्धार ।
शरण जावे रघुवरा ॥३॥
बोधला म्हणे हे सती ।
साक्षे रखुमाईचा पती ॥४॥


९५

विषये पाहे विख । याचे मानाल सुख ।
आवडी खाऊ जाता पुढे ।
भोगसिल दुःख । तुझे तु भोगसिल ।
जन पाहती कौतुक ॥१॥
विषये पाही विख । जे जे सेवित गेले ।
बळेच उडी टाकुनी । आपण बुडाले ।
आपला गळा कापुनि । आत्महत्यारी जाले ।
तेंव्हा कोण सोडवील । येम जाचिते जाळी ॥ २॥
विषये पाही विख । नाही हाणित लाता ।
कृपाळु भगवंत त्यासी वाहिला माथा ।
कळिकाळा भय नाही ते नमिती सर्वथा ॥३॥
बोधला म्हणे विषयासि विटलो । कृपाळु त्यासी भेटलो |
विषय जिंकोनिया पाहे । सुर पै जालो ॥४॥


९६

विश्वास धरावा मनी । मग पुरवीत आहे धनी ।
उपमन्यालागोनि । कैसे केले ॥१॥
अज्ञान लेकरु । परि केलासे निर्धारु ।
दिधला क्षीरसागरु । तयालागी ॥२॥
ऐसा कृपासिंधु । अनाथाचा बंधु ।
बहुतांसि आनंदु । केला त्याने ॥३॥
जे जे ऐकत होतो कानी । ते पाहिले नयनी ।
बोधला चरणी विनटला ॥४॥


९७

सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा ।
नाम उच्चारिता तुटे पातक थारा ॥१॥
हरिचे जे नाम ज्याच्या येईल वाचे ।
ते नर सदैव भाग्याचे । ते ऐक जीव दैवाचे ॥ २॥
हरिचे जे नाम जे जे उच्चारित गेले ।
हरिरुप होऊन ते नर वैकुंठी ठे ॥३॥
बोधला म्हणे देवा नाम उच्चारित गेलो ।
नाम उच्चारिता विठ्ठल पायी विनटलो ॥४॥


९८

संसार महाझट । तेथे भव खटपट ।
उणे पुरे बोलता रे । कहि न भरे पोट ।
संसार हा महाझट ॥ १ ॥
धन वित्त पुत्र नारी । आवघी मिळोनी धरा ।
दया धर्म न धर त्याने केला मातेरा ॥ २॥
सदा हाल हाल मोठी दयाधर्म नाही पोटी ।
प्रपंची वेढिले रे पाहिले माया जाळ मिठी ॥३॥
आता तरी हित करी । स्वहित विचारी॥४॥


९९

सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ ।
न कळे त्याचि कळ ब्रह्मादिका ॥१॥
जया जैसा भाव त्यासि तैसा देव योगिया ।
अनुभव घेऊनि राही ॥२॥
उदक पाहे जीवन तेथे ।
वसवी लवण दोहीस भिन्नपण कैचे तेथे ॥३॥
जैसे पाहे कनक अळंकार अनेक ।
तैसा राम मी व्यापक मूर्ख नेणे ॥४॥
देहे पाहे चाळविता बुधि पाहे खेळविता ।
ज्याचा जैसे चिता उपावो करि ॥५॥
ऐसाच भ्रमणी फिरतसे जनिवनी ।
परि बरे वाईट दोन्ही ऐक राम ॥६॥
बोधला म्हणे कळे नकळे त्याचे खेळ ।
कैसा नाटक गोपाळ खेळ खेळ ॥७॥


१००

सकळ सखियास करितसे विनंती ।
समजावुनि द्या मज ॥ १ ॥
रामाचे भेटीला मन हे उदासीन ।
नव्हे समाधान काही केल्या ॥२॥
व्यर्थ माझा देहे। जात असे वाया ।
भेटावया देवराया जिवलगा ॥३॥
मग सकळिका मिळोनी एकरुप जाल्या ।
घेउनी राम आल्या घरा माझ्या ॥४॥
बोधला म्हणे आनंद जाला ।
सेजे पडला राम माझा ॥५॥


१०१

संत साधु जन जाणती या खुणा ।
एरवी पीसुणा काये सांगो ॥१॥
ऐसीया उपकाराच्या रासी । तुझ्या तू जाणसी ।
एन्हवी जनासी काये ठावे ॥ २॥
बोधला म्हणे या खुणा ठाउक्या भगतासी ।
धन्ये घेती त्यासी पांडुरंगु ॥३॥


१०२

संता वाचुनिया सुख कोठे नाही ।
अमृत ज्याचे पायी नित्य वसे ॥१॥
संताचे संगती होय मोक्ष गती ।
नको बा संगती दुर्जनांची ॥ २॥
दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय ।
तेथे कैची सोय तारावया ॥३॥
बोधला म्हणे सत्य हे त्रिवाचा ।
नको अभक्तांचा संग देवा ॥४॥


१०३

संसार दुःखमूळ हे तव भव सबळ ।
यालागी भुलो नको । चित्ती धरा गोपाळ ॥१॥
आरे सावध होई आता । तोडी भवमूळ व्यथा ।
सद्गुरूसी शरण जाई । कृपा करील रे आता ॥२॥
आरे माया कठिन भारी। घाली दुःखाचे घरी ।
दुःख हे सोसवेना । चढे विखाची लहरी ॥३॥
अरे सुख जरी भोगिसील तरी ।
जवळिच आहे विश्वास न धरिसी वरि सांगोन काये ॥४॥
सार्थक करिसील सांगतो वचन ।
दृढ चित्ती धरी तुज विठोबाची जाण ॥ ५॥
बोधला म्हणे जना का रे हित विचाराना ।
विठाई माऊली देते प्रेमाचा पान्हा ॥६॥


१०४

संसार सागरी बुडलो श्रीहरि ।
तुजविण कोण तारी देवराया ॥१॥
पंढरीचे पारी भवकर्म निवारी ।
शरण जावे हरि पांडुरंगा ॥२॥
तो सकळांचा पाळिता आमचा माता पिता ।
म्हणोनि पंढरीनाथा शरण रिघा ॥३॥
बोधला म्हणे हरिस शरण जाता भये ।
नाही सर्वथा कळिकाळाचे ॥४॥


१०५

सासुची सुन एक पाणिया गेली ।
पाणी फोडुनी तिने घागर आणली ॥१॥
भ्रतार मारुन भावासव गेली ।
बापाची बाइल पुत्रे नेली ॥ २॥
ऐक रे खेळिया नवल जाले ।
नाही ते डोळा देखिले रे ॥३॥
बोधला म्हणे गुरुखुण ओळखिले ।
देखोनि जवळ जाले रे खेळिया ॥४॥


१०६

सांडुनी संगत चाललीस पुढे ।
नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
सांडुनी प्रपंच झालीस निराळी ।
आवडे वनमाळी द्वारकेचा ॥ २॥
साधु आणि संतांची घडलीसी सेवा ।
आवडती देवा वैकुंठीचा ॥३॥
बोधला म्हणे भक्ती हरिची करिसी ।
तेणेच पावशी मोक्षपद ॥४॥


१०७

संसारासाठी निघाली हा हा ।
तमाशा पाहिला मोठा रे ॥ १॥
होता संचिताचा विक्रा केला ।
सर्वही आटला पोटा रे ॥ २ ॥
असत्याचे माप टाकुनी देई ।
सांडी हरी विक्राई खोटी रे ॥३॥
सत्याची तागडी धरून हाती ।
बसी मुक्ती चौहाटा हे ॥४॥
नामाचे केणे भरी तोचि भला ।
अभागी चुकला करंटा रे ॥५॥
विठोबा पाहुणा जोड झाली बरी ।
मोकळ्या चारी वाटा रे ॥६॥
बोधला म्हणे आम्हा थोर लाभ झाला ।
हाकारिल्या चारी पेठा रे ॥७॥


१०८

सांगड बांधारे भक्तीची ।
रघुनाथ नामाची ॥१॥
लाटा उसळती विषयाच्या ।
भवत्या प्रपंचाच्या ॥ २॥
माणकोजी बोधला बोधला ।
हरिनामी रंगला ॥३॥


१०९

हरिभक्त समुदाव आनंदे क्रीडा करी ।
निघाले पंढरी पहावया ॥१॥
दिंडीया पताका टाळांचे गजर ।
वैष्णवांचा भारू क्रीडा करी ॥ २॥
धन्ये भीमातिर गर्जते अंबर।
आम्हा हरिभक्ता माहेर जोडी जाली ॥४॥
धन्य ते पंढरी अवघ्या नरनारी ।
उभा विटेवरी पांडुरंग ॥३॥
धन्य ते पंढरी मोक्षाची नगरी ।
बोधला सुखभरी आनंदरूप ॥५॥


११०

ही तव निर्लज्ज निष्ठुर ।
यासी नाही आरपार ॥१॥
याची संगती धरुन काये ।
आपण जैसे करीत आहे ॥ २ ॥
जैसा संगीताचा गुण ।
याने व्यापिले त्रिभुवन ॥३॥
बोधला म्हणे न साहे दुजियाचा वारा ।
धरी संतांचा आसरा ॥४


हे पण वाचा: संत माणकोजी बोधले यां-ची संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *