सद्गुरू गुरूबाबा औसेकर महाराज

सद्गुरू गुरूबाबा महाराज औसेकर

सद्गुरू गुरूबाबा महाराज औसेकर

श्रीविठ्ठलाच्या चक्रीभजनाची सेवा करणारे सद्गुरू गुरूबाबा महाराज…एक तपस्वी

“नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग! नाचत नाचत देवाचा गळला पितांबर !!” भक्ताने भजन आळवण्यास सुरुवात केली की श्री विठ्ठलास आपल्या वस्त्राचेही भाण राहू नये इतका तो त्या भजनात तल्लीन होऊन जातो. विठ्ठलास खा मायबाप म्हणून साद घालणाऱ्या जनाईच्या भजनाने तर तो तिचा जिवलग सखा होऊन तिच्या संगे शेण्या वेचु लागतो. तर कधी तिला न्हाऊ माखू घालतो. विठ्ठल नामात विठ्ठल भक्ती लीन झालेल्या कान्होपात्रेस तर त्याने स्वतःमध्ये विलीन करून घेतले. चोखोबांच्या विठ्ठल भक्ती पुढे तर तो चोखोबांच्या पत्नीचे बाळंतपण करण्यासाठी प्रगट झाला.

एकनाथांच्या घरी श्रीखंड्या रूपात सेवक म्हणून राबला. संत महात्म्यांनी आर्तपणे श्री विठ्ठलास साद घातली आणि तो संतांच्या वाणीतून अभंग रूपात प्रगट झाला. असा हा विठ्ठल नामाचा भजनाचा महिमा युगानु युगे मानवी मनाला साद घालतो आहे. त्याची अविट गोडी प्रत्येक युगात टिकून आहे. शतकानू शतके विठ्ठल नामगात वारकरी पंढरीची वारी करतो आहे. “देवे दिला देह भजना लागी गोमटा” “सेवितो हा ब्रम्ह रस वाटीतो आणिका” या भावनेतून आपले जीवन विठ्ठल भक्तीसाठी समर्पित करणारे अनेक संत महात्मे महाराष्ट्र भूमीत जन्मास आले. त्यांची ही भक्ती परंपरा त्यांच्या वंशजांनी अव्याहातपणे सुरू ठेवली.

अशाच थोर परंपरेत जन्म घेतलेले श्री जितेंद्र ज्ञानेश्वर महाराज अवसेकर म्हणजेच सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज. सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज भारतातील आणि भारताबाहेरील(अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड) विठ्ठल भक्तांना परिचित आहेत ते चक्रीभजनावर विठ्ठल नामावर अलोट श्रद्धा असणारे नाथ संस्थानचे पाचवे पीठाधीश म्हणून. आपल्या सद्गुरूंनी दिलेली चक्रीभजनाची सेवा करण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे सद्गुरु गुरुबाबा महाराज व त्यांच्या या सेवेत साथ देणाऱ्या पु.सौ. शर्मिलाबाई साहेब त्यांच्या अर्धांगिनी हे दोघे म्हणजे विठ्ठल भक्ती साठी जन्मास आलेले शंभूमहादेव आणि पार्वती माताच म्हणावेत असे. 8 जुलै 1964 रोजी सद्गुरु गुरुबाबा महाराज यांचा जन्म सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज व पुज्य लीलाबाई साहेबांच्या पोटी झाला. बालपण ते महाविद्यालय जीवन असा बराच मोठा काळ हैदराबाद शहरात राहण्याचा योग त्यांना आला.

हैदराबाद सारख्या आधुनिक जनजीवन असलेल्या मोठ्या शहरात वास्तव्य केलेले गुरुबाबा यांची राहणी अत्यंत साधी आहे. मानवी मनाला भुरळ पडावी अशा विषयांमध्ये ते कधी रमलेच नाहीत. आई-वडिलांकडून मिळालेली विठ्ठल भक्ती व पूर्वजांच्या कृपाप्रसादीक चक्रीभजनाचा वारसा यात त्यांचं मन एकरूप झालेलं. विठुरायाच्या पंढरीत चंद्रभागातीरी वाळवंटात माघवारी मध्ये सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरुबाबा महाराजांना अनुग्रह दिला. इ.स.1986 मध्ये सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संस्थानची सेवा श्री गुरुबाबा महाराजांकडे सोपवली. आजवर जितेंद्रनाथ महाराज म्हणून परिचित असलेले गुरुबाबा नाथ संस्थानचे पाचवे पीठाधीश झाल्यापासून ते सर्वांना “श्री गुरुबाबा महाराज” या नावाने परिचित झाले. संस्थांचे सर्व उत्सव,औसा ते पंढरपूर पायी माघवारी, चक्रीभजनाची सेवा, नाथ संस्थानचे पीठाधीश म्हणून श्री गुरुबाबा महाराजांकडे आली. फिरता नाथषष्ठी महोत्सव हे नाथ संस्थान औसाचे एक वैशिष्ट्य. श्री विठ्ठला कडून प्राप्त झालेला तो प्रसाद. वीरनाथ महाराजांपासून सुरू असलेली ही परंपरा सद्गुरु गुरुबाबा महाराजांकडे आली. सद्गुरु गुरुबाबा महाराजांनी महाराष्ट्र ,कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांमधील अतिदुर्ग अत्यंत छोट्या अशा खेडेगावांमध्ये बऱ्याच वेळा नाथषष्ठीचा हा उत्सव साजरा केला .

या छोट्या खेडेगावांमध्ये उत्सव साजरा करत असताना तेथील ग्रामीण जनतेला सोबत घेऊन उत्सव साजरा करून विठ्ठल भक्तीची गोडी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा यामागचा त्यांचा उद्देश. तसेच या सर्व जनतेला तीर्थयात्रा घडावी यासाठी काही वेळेला सद्गुरु गुरुबाबा महाराजांनी हा फिरता नाथषष्ठी उत्सव काशी, रामेश्वर, द्वारका, गाणगापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी साजरा केला. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज व पूज्य लीलाआईसाहेब यांचा कृपाशीर्वाद आणि सद्गुरु गहिनीनाथ महाराज व गोरखनाथ महाराज या दोघा वडील बंधूंच्या सहकार्यातून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भव्य दिव्य असे नाथषष्ठीचे उत्सव सद्गुरु गुरुबाबा महाराजांनी साजरे केले. प्रवचन कीर्तन यांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा प्रसार करत असतानाच प्रबोधनाचे कार्य सुद्धा महाराजांनी सुरू ठेवले. व्यसन करू नका , स्त्रीला सन्मानपूर्वक वागणूक द्या, नीती धर्माचे आचरण करा, उत्तम शिक्षण घ्या, सुशिक्षित व्हा वृक्षारोपण करा, जलसंवर्धन करा यासारखे अनेक विषय त्यांनी या प्रबोधनाच्या कार्यातून जनतेसमोर मांडले आहेत. नाथ संस्थानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चक्रीभजन. सद्गुरु गुरुगुंडा महाराज देगलूरकरांकडून प्राप्त झालेला हा कृपाप्रसाद आहे.

सद्गुरु वीरनाथांपासून तर सद्गुरु गुरुबाबा महाराजांपर्यंत चक्रीभजनाची सेवा नाथ संस्थाने विठ्ठल चरणी रुजू केली आहे. सद्गुरु गुरुबाबा महाराजांचे तर सारे जीवनच या चक्रीभजनाच्या प्रसारासाठी समर्पित आहे. डोक्यास हिरवा रुमाल, त्यावर लाल धाटा, फुलांचा शिरपेच, कमरेला हिरवी शाल, गळ्यात नारदीय विणा, हातात चिपळ्या, पायात घुंगरू असा वेश परिधान करून चक्रीभजनास गुरुबाबा उभे राहिले की पाहणाऱ्याला आपण साक्षात परब्रम्ह पाहतोय असे समाधान प्राप्त होते. मृदुंग, टाळ, डिमडीच्या निनादामध्ये 14 अभंगांच्या माध्यमातून श्री विठ्ठलास आळवीत चक्रीभजन म्हटले जाते.मालोपंत, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गुरुगुंडा महाराज ,वीरनाथ महाराज, रामकृष्ण महाराज यांच्या अभंगांचा यामध्ये समावेश आहे. संतांच्या वाणीतून आर्त भावनेने प्रगट झालेले हे अभंग तितक्याच तन्मयतेने आणि आर्तपणे गुरुबाबा महाराज श्री विठ्ठला साठी म्हणतात. श्री विठ्ठल,माता रुक्मिणी , रामकृष्ण, मातासीता ,कृष्णप्रिया राधा यांच्या नामाचा गजर करून विविध प्रकारे पावलांचा फेर धरून देहभान हरपून सद्गुरु गुरूबाबा महाराज व त्यांना साथ देणारी शिष्य मंडळी भजन गात आपली सेवा रुजू करतात. नाथ संस्थानची सेवा सांभाळत असतानाच सद्गुरु गुरुबाबा महाराजांचा विवाह पुज्य शर्मिलाबाई साहेब यांच्यासोबत इ. स. 1990 मध्ये झाला. सौ शर्मिला आईसाहेबांचे माहेर पुणे येथील. प्रसिद्ध काका हलवाईंच्या कुटुंबातील त्या एक सदस्य. 14 एप्रिल 1968 रोजी पुसद येथे त्यांच्या आजोळी त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा शिवाजीराव सखाराम मखरे हे पुसद येथील जहागीरदार होते. अजोळी व माहेरी आर्थिक सुबत्ता व एकत्र कुटुंब पद्धतीची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली. शिस्त व संस्कारांमध्ये त्यांची जडणघडण झाली. पुण्यात एसएनडीटी महाविद्यालयातून त्यांनी होमसायन्स ची पदवी प्राप्त केली.

पुणे जसे विद्येचे माहेरघर तसेच ज्ञानोबा तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी. आधुनिक काळाप्रमाणे राहणाऱ्या आईसाहेब सद्गुरु गुरुबाबांच्या अर्धांगिनी झाल्या आणि त्यांचे सारे जीवनच अमुलाग्र बदलून गेले. सद्गुरूंनी आपले जीवन परंपरेला नाथ संस्थानला समर्पित केलेले. यामुळे मुलांच्या संगोपनाची शिक्षणाची त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी सौ आईसाहेबांनाच सांभाळावी लागली .सद्गुरु गुरूबाबांच्या कार्याला सर्वस्वी साथ देत त्यांनी नाथ संस्थान बाबतचे आपले कर्तव्य सुरू ठेवले आहे. पुणे हे एक आधुनिक शहर तर औसा हे एक छोटेसे तालुक्याचे ठिकाण दोन्ही ठिकाणचे राहणीमान चालीरीतीत सर्व काही निरनिराळे परंतु या सर्वांत आईसाहेब समरस झाल्या. सद्गुरु गुरुबाबा महाराज यांच्या इतकीच श्रद्धा निष्ठा नाथा संस्थांनसाठी त्यांच्याही मनी आहे .प्रति वर्षी होणाऱ्या नाथषष्ठी उत्सवामध्ये त्यांची सेवेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एवढा मोठा उत्सव संपन्न होत असताना या उत्सवाच्या साठी लागणारी ऊर्जा म्हणजेच आईसाहेब .सद्गुरु गुरुबाबा महाराजांनी आणि आईसाहेबांनी कुटुंबीयांच्या आणि शिष्य समुदायांच्या सहभागातून सव्वा लाख अथर्वशीर्ष पठण आणि सव्वा लाख श्री सूक्त पठण व यज्ञ सोहळा औसा येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला. तसेच श्रीक्षेत्र काशी येथे काशी विश्वेश्वराच्या साक्षीने सवालक्ष रुद्र पठणाचा सोहळा सद्गुरु गुरुबाबा महाराज आणि आईसाहेब यांनी संपन्न केला. आदित्यहृदय स्तोत्र आणि विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र यांचेही प्रत्येकी सव्वा लाख पठण करण्याचा मानस त्या दोघांचाही आहे .तसेच 2025 मध्ये नाथ षष्ठी उत्सव अयोध्या क्षेत्री रामरायाच्या साक्षीने संपन्न करण्याचा निश्चय सद्गुरु गुरूबाबा महाराजांनी केला आहे. अयोध्या येथे नाथषष्ठी उत्सव संपन्न होत असताना आदित्यहृदय स्तोत्राचे सव्वा लाख पठण करून यज्ञ याग संपन्न करण्याचा मानस सद्गुरु गुरूबाबांच्या मनी आहे. या सर्व कार्यासाठी अहोरात्र विविध ठिकाणी दौरे आणि घरापासून दूर राहून प्रापंचिक सुखी जीवनाचा त्याग करून सदगुरू गुरूबाबा महाराजांनी सुरू ठेवलेली ही सेवा आणि त्यात आईसाहेबांनी दिलेली साथ या सर्वांचे फळच म्हणावे असे श्री विठ्ठलाचे कृपादान त्यांना प्राप्त झाले आहे. श्री विठ्ठलाची ही कृपा त्यांचे पुत्र श्री ज्ञानराज महाराज यांच्या रूपाने त्यांच्या पोटी जन्मास आली आहे.

आपल्या मातापित्याप्रमाणे श्री ज्ञानराज महाराज विठ्ठल सेवा करू लागले आहेत. विधी शाखेची पदवी घेतलेले ज्ञानराज महाराज हिरवा रुमाल बांधून गळ्यात विणा घेऊन पंढरीची पायी वारी करतात. सद्गुरु गुरुबाबांच्या आज्ञेनुसार चक्रीभजन, कीर्तन प्रवचनाची सेवा करतात. तेव्हा असं वाटतं की सद्गुरु गुरुबाबा व आई साहेबांच्या पोटी भक्ती सुखाचा अनुभव घेण्यासाठी श्री विठ्ठलच जन्मास आला आहे. सद्गुरु गुरुबाबा महाराजांच्या चक्रीभजन सेवेची दखल घेत भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने त्यांना चक्रीभजनासाठी सादर निमंत्रित केले. विविध सेवाभावी संस्थांकडून आपली संस्कृती आपला सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी जे भव्य दिव्य मोठ्या स्वरूपामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशा सोहळ्यांमध्ये सद्गुरु गुरुबाबा महाराजांना चक्रीभजनाच्या या सेवेसाठी वेळोवेळी आमंत्रित केले गेले आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव शासनाने व संत महात्म्यांनी सुद्धा वेळोवेळी केला आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी यासाठी सन्मानित केले गेले .धर्म सुधारक, स्वामीचरण प्रसाद, श्री संत तुकाराम महाराज सेवाभूषण, वारकरी विठ्ठल पुरस्कार, चक्रीभजन चक्रवर्ती पुरस्कार, देव देवेश्वर धार्मिक अध्यात्मिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सद्गुरु गुरूबाबा महाराजांना प्रदान करण्यात आले आहेत. “महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार” महाराष्ट्र शासनाने गुरुबाबा महाराजांना प्रदान करून त्यांच्या या निस्वार्थ सेवेचा गौरव केला आहे. भजनाच्या या सेवेच्या माध्यमातून कर्नाटक ,आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्रातील ग्रामीण समाज जसा त्यांनी विठ्ठल भक्तीशी जोडला तसेच त्यांनी मुस्लिम समुदायालाही विठ्ठल भक्तीशी जोडून ठेवले आहे .

श्रीक्षेत्र अलगुड या गावातील संपूर्ण मुस्लिम समाज हा नाथ संस्थान व विठ्ठल भक्तीशी जोडला गेला आहे. सद्गुरु गुरुबाबा महाराजांच्या या सेवेला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. वयाची साठ वर्षे पूर्ण करत असताना त्यांची ही सेवा अधिकाधिक समर्पित व तेजपुंज होताना दिसते आहे. गुरुबाबा महाराज व पूज्य सौ. आईसाहेब यांच्या कृपा छत्रखाली अनेकांना श्री विठ्ठल सेवेचा आनंद व समाधान प्राप्त होवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *