श्रीमद्‌भगवद्‌गीता अध्याय पहिला

श्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय (राजविद्याराजगुह्ययोग)

श्रीमद्‌भगवद्‌गीता : नववा अध्याय (राजविद्याराजगुह्ययोग)


मूळ नवव्या अध्यायाचा प्रारंभ

अथ नवमोऽध्यायः

अर्थ

नववा अध्याय सुरु होतो.


मूळ श्लो

श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ९-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, इदम्‌ = हे, गुह्यतमम्‌ = परम गोपनीय, विज्ञानसहितम्‌ = विज्ञानासहित असे, ज्ञानम्‌ = ज्ञान, तु = की, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, (त्वम्‌) = तू, अशुभात्‌ = दुःखरूप संसारातून, मोक्ष्यसे = मुक्त होऊन जाशील, (तत्‌ ज्ञानम्‌) = ते ज्ञान, ते अनसूयवे = तुज दोष-दृष्टीरहित भक्ताला, (पुनः) प्रवक्ष्यामि = मी चांगल्याप्रकारे (पुन्हा) सांगेन ॥ ९-१ ॥

अर्थ

श्रीभगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. ॥ ९-१ ॥


मूळ श्लोक

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्‌ ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्‌ ॥ ९-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

इदम्‌ = विज्ञानासहित ज्ञान हे, राजविद्या = सर्व विद्यांचा राजा, राजगुह्यम्‌ = सर्व गोपनीय गोष्टींचा राजा, पवित्रम्‌ = अतिपवित्र, उत्तमम्‌ = अतिउत्तम, प्रत्यक्षावगमम्‌ = प्रत्यक्ष फळ असणारे, धर्म्यम्‌ = धर्मयुक्त, (च) = आणि, कर्तुम्‌ सुसुखम्‌ = साधना करताना अतिशय सुगम, (तथा) = तसेच, अव्ययम्‌ = अविनाशी असे आहे ॥ ९-२ ॥

अर्थ

हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे. ॥ ९-२ ॥


मूळ श्लोक

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ९-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

परन्तप = हे परंतपा (
अर्थात शत्रुतापना) अर्जुना, अस्य = या (उपर्युक्त), धर्मस्य = धर्मामध्ये, अश्रद्दधानाः = श्रद्धारहित, पुरुषाः = पुरुष हे, माम्‌ = मला, अप्राप्य = प्राप्त करून न घेता, मृत्युसंसारवर्त्मनि = मृत्युरूप अशा संसारचक्रात, निवर्तन्ते = भ्रमण करीत राहतात ॥ ९-३ ॥

अर्थ


 

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रात फिरत राहतात. ॥ ९-३ ॥

मूळ श्लोक

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ९-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अव्यक्तमूर्तिना मया = निराकार अशा मज परमात्म्याकडून, इदम्‌ = हे, सर्वम्‌ = सर्व, जगत्‌ = जग (पाण्याने व्याप्त असलेल्या बर्फाप्रमाणे), ततम्‌ = परिपूर्ण आहे, च = आणि, सर्वभूतानि = सर्व भूते, मत्स्थानि = माझ्यातील संकल्पाच्या आधारावर स्थित आहेत (परंतु, वास्तविक), तेषु = त्यांच्यामध्ये, अहम्‌ = मी, न अवस्थितः = स्थित नाही ॥ ९-४ ॥

अर्थ

जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. ॥ ९-४ ॥


मूळ श्लोक

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्‌ ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ९-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भूतानि = ती सर्व भूते, मत्स्थानि = माझ्यामध्ये स्थित, न = नाहीत (परंतु), मे = माझी, ऐश्वरम्‌ = ईश्वरीय, योगम्‌ = योगशक्ती, पश्य = पाहा, भूतभृत्‌ = भूतांचे धारण-पोषण करणारा, च = आणि, भूतभावनः च = भूतांना उत्पन्न करणारा असतानाही, मम = माझा, आत्मा = आत्मा (वस्तुतः), भूतस्थः न = त्या भूतांमध्ये स्थित नाही ॥ ९-५ ॥

अर्थ

ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पाहा की, भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण-पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. ॥ ९-५ ॥


मूळ श्लोक

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्‌ ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ९-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यथा = ज्याप्रमाणे (आकाशातून उत्पन्न झालेला), (च) = आणि, सर्वत्रगः = सर्वत्र संचार करणारा, महान्‌ = महान, वायुः = वायू हा, नित्यम्‌ = सदा, आकाशस्थितः = आकाशामध्येच स्थित असतो, तथा = त्याप्रमाणे (माझ्या संकल्पातून उत्पन्न होणारी), सर्वाणि = संपूर्ण, भूतानि = भूते, मत्स्थानि = माझ्यामध्ये स्थित आहेत, इति = असे, उपधारय = जाण ॥ ९-६ ॥

अर्थ

जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहातो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहातात, असे समज. ॥ ९-६ ॥


मूळ श्लोक

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌ ॥ ९-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (
अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), कल्पक्षये = कल्पाच्या अंती, सर्वभूतानि = सर्व भूते, मामिकाम्‌ = माझ्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीप्रत, यान्ति = प्राप्त होतात म्हणजे प्रकृतीमध्ये लीन होतात, (च) = आणि, कल्पादौ = कल्पाच्या आरंभी, तानि = त्यांना, अहम्‌ = मी, पुनः = पुन्हा, विसृजामि = उत्पन्न करतो ॥ ९-७ ॥

अर्थ


 

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. ॥ ९-७ ॥

मूळ श्लोक

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्‌ ॥ ९-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

स्वाम्‌ = स्वतःच्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीचा, अवष्टभ्य = अंगीकार करून, प्रकृतेः वशात्‌ = आपापल्या स्वभावाने, अवशम्‌ = परतंत्र झालेल्या, इमम्‌ कृत्स्नम्‌ = या संपूर्ण, भूतग्रामम्‌ = भूतसमुदायाला, पुनः पुनः = पुन्हा पुन्हा (त्यांच्या कर्मांनुसार), विसृजामि = मी उत्पन्न करतो ॥ ९-८ ॥

अर्थ

आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मांनुसार उत्पन्न करतो. ॥ ९-८ ॥


मूळ श्लोक

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

धनञ्जय = हे धनंजया (
अर्थात अर्जुना), तेषु = त्या, कर्मसु = कर्मांमध्ये, असक्तम्‌ = आसक्तिरहित, च = आणि, उदासीनवत्‌ = उदासीनाप्रमाणे, आसीनम्‌ = स्थित असणाऱ्या, माम्‌ = मज परमात्म्याला, तानि = ती, कर्माणि = कर्मे, न निबध्नन्ति = बंधनात पाडीत नाहीत ॥ ९-९ ॥

अर्थ


 

हे धनंजया (अर्थात अर्जुना), त्या कर्मांत आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधानकारक होत नाहीत. ॥ ९-९ ॥

मूळ श्लोक

मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्‌ ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ ९-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (
अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), मया = मज, अध्यक्षेण = अधिष्ठात्याच्या सान्निध्यामुळे, प्रकृतिः = प्रकृती, सचराचरम्‌ = चराचरासहित सर्व जग, सूयते = उत्पन्न करते, (च) = आणि, अनेन = या, हेतुना = कारणानेच, जगत्‌ = हे संसारचक्र, विपरिवर्तते = फिरत राहाते ॥ ९-१० ॥

अर्थ


 

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे. ॥ ९-१० ॥

मूळ श्लोक

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्‌ ॥ ९-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मम = माझा, परम्‌ = परम, भावम्‌ = भाव, अजानन्तः = न जाणणारे, मूढाः = मूढ लोक हे, मानुषीम्‌ = मनुष्याचे, तनुम्‌ = शरीर, आश्रितम्‌ = धारण करणाऱ्या, माम्‌ = मज, भूतमहेश्वरम्‌ = संपूर्ण भूतांचा महान ईश्वर असणाऱ्याला, अवजानन्ति = तुच्छ समजतात (म्हणजे आपल्या योगमायेने संसाराच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात संचार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य समजतात) ॥ ९-११ ॥

अर्थ

माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला-तुच्छ समजतात.
अर्थ


ात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. ॥ ९-११ ॥

मूळ श्लोक

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ ९-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मोघाशाः = व्यर्थ आशा करणारे, मोघकर्माणः = व्यर्थ कर्म करणारे, मोघज्ञानाः = व्यर्थ ज्ञान असणारे, विचेतसः = चंचल चित्त असणारे अज्ञानी लोक, राक्षसीम्‌ = राक्षसी, आसुरीम्‌ = आसुरी, च = आणि, मोहिनीम्‌ = मोहात पाडणाऱ्या, प्रकृतिम्‌ एव = प्रकृतीचाच, श्रिताः = आश्रय घेऊन राहातात ॥ ९-१२ ॥

अर्थ

ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहातात. ॥ ९-१२ ॥


मूळ श्लोक

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌ ॥ ९-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तु = परंतु, पार्थ = हे पार्था (
अर्थात पृथापुत्र अर्जुना), दैवीम्‌ = दैवी, प्रकृतिम्‌ = प्रकृतीचा, आश्रिताः = आश्रय घेणारे, महात्मानः = महात्मा जन, भूतादिम्‌ = सर्व भूतांचे सनातन कारण, (च) = आणि, अव्ययम्‌ = नाशरहित अक्षरस्वरूप अशा, माम्‌ = मला, ज्ञात्वा = जाणून, अनन्यमनसः = अनन्य मनाने युक्त होऊन, भजन्ति = निरंतर भजतात ॥ ९-१३ ॥

अर्थ


 

परंतु हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. ॥ ९-१३ ॥

मूळ श्लोक

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ ९-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सततम्‌ = निरंतर, कीर्तयन्तः = माझे नाम व गुण यांचे कीर्तन करणारे, च = तसेच, यतन्तः = माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करणारे, च = आणि, माम्‌ = मला (वारंवार), नमस्यन्तः = प्रणाम करणारे असे, दृढव्रताः = दृढ निश्चय असणारे भक्तजन, नित्ययुक्ताः = नेहमी माझ्या ध्यानात युक्त होऊन, भक्त्या = अनन्य प्रेमाने, माम्‌ = माझी, उपासते = उपासना करतात ॥ ९-१४ ॥

अर्थ

ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. ॥ ९-१४ ॥


मूळ श्लोक

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्‌ ॥ ९-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अन्ये = दुसरे ज्ञानयोगी, ज्ञानयज्ञेन = ज्ञानयज्ञाच्या द्वारा, माम्‌ = मज निर्गुण-निराकार ब्रह्माचे, एकत्वेन = अभिन्न भावाने, यजन्तः अपि = पूजन करीत असले तरी सुद्धा (ते माझीच उपासना करतात), च = आणि (दुसरे पुरुष), बहुधा = पुष्कळ प्रकाराने स्थित असणाऱ्या, विश्वतोमुखम्‌ = मज विराट-स्वरूप परमेश्वराची, पृथक्त्वेन = पृथक्‌ भावाने, उपासते = उपासना करतात ॥ ९-१५ ॥

अर्थ

दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट-स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात. ॥ ९-१५ ॥


मूळ श्लोक

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥ ९-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहम्‌ = मी, क्रतुः = क्रतू आहे, अहम्‌ = मी, यज्ञः = यज्ञ आहे, अहम्‌ = मी, स्वधा = स्वधा आहे, अहम्‌ = मी, औषधम्‌ = औषधी आहे, अहम्‌ = मी, मन्त्रः = मंत्र आहे, अहम्‌ = मी, आज्यम्‌ = घृत आहे, अहम्‌ = मी, अग्निः = अग्नी आहे, (च) = तसेच, हुतम्‌ = हवनरूप क्रियासुद्धा, अहम्‌ एव = मीच आहे ॥ ९-१६ ॥

अर्थ

श्रौतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञ मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे. मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे. ॥ ९-१६ ॥


मूळ श्लोक

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ ९-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अस्य = या, जगतः = संपूर्ण जगाचा, धाता = धाता म्हणजे धारण करणारा आणि कर्मांचे फळ देणारा, पिता = पिता, माता = माता, पितामहः = पितामह, वेद्यम्‌ = जाणण्यास योग्य, पवित्रम्‌ = पवित्र, ओङ्कारः = ॐ कार, (तथा) = तसेच, ऋक्‌ = ऋग्वेद, साम = सामवेद, च = आणि, यजुः = यजुर्वेद (सुद्धा), अहम्‌ एव = मीच आहे ॥ ९-१७ ॥

अर्थ

या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा, आई-वडील, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ॐ कार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. ॥ ९-१७ ॥


मूळ श्लोक

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥ ९-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

गतिः = प्राप्त करून घेण्यास योग्य असे परमधाम, भर्ता = सर्वांचे भरण-पोषण करणारा, प्रभुः = सर्वांचा स्वामी, साक्षी = शुभ व अशुभ पाहणारा, निवासः = सर्वांचे निवासस्थान, शरणम्‌ = शरण जाण्यास योग्य, सुहृत्‌ = प्रत्युपकाराची इच्छा न धरता सर्वांचे हित करणारा, प्रभवः प्रलयः = सर्वांची उत्पत्ती व प्रलय यांचा हेतू, स्थानम्‌ = स्थितीचा आधार, निधानम्‌ = निधान, (च) = आणि, अव्ययम्‌ = अविनाशी, बीजम्‌ = कारण (सुद्धा), (अहम्‌ एव) = मीच आहे ॥ ९-१८ ॥

अर्थ

प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे. ॥ ९-१८ ॥


मूळ श्लोक

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ ९-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अहम्‌ = मी, तपामि = सूर्यरूपाने ताप देतो, वर्षम्‌ = पर्जन्याचे, निगृह्णामि = आकर्षण करतो, च = आणि, उत्सृजामि = वर्षाव करतो, अर्जुन = हे अर्जुना, अहम्‌ एव = मीच, अमृतम्‌ = अमृत, च = आणि, मृत्युः = मृत्यू (आहे), च = तसेच, सत्‌ असत्‌ = सत्‌ आणि असत्‌, च = सुद्धा, अहम्‌ = मीच आहे ॥ ९-१९ ॥

अर्थ

मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे, आणि सत्‌ व असत्‌ सुद्धा मीच आहे. ॥ ९-१९ ॥


मूळ श्लोक

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥ ९-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ

त्रैविद्याः = तीन वेदांनी विहित केलेली सकाम कर्मे करणारे, सोमपाः = सोमरस पिणारे असे, पूतपापाः = पापरहित पुरुष, यज्ञैः = यज्ञांच्या द्वारा, माम्‌ = माझी, इष्ट्वा = पूजा करून, स्वर्गतिम्‌ = स्वर्गाच्या प्राप्तीची, प्रार्थयन्ते = इच्छा करतात, पुण्यम्‌ = आपल्या पुण्याचा फलरूप असा, सुरेन्द्रलोकम्‌ = स्वर्गलोक, आसाद्य = प्राप्त करून घेऊन, ते = ते पुरुष, दिवि = स्वर्गामध्ये, दिव्यान्‌ = दिव्य असे, देवभोगान्‌ = देवतांचे भोग, अश्नन्ति = भोगतात ॥ ९-२० ॥

अर्थ

तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात; ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ॥ ९-२० ॥


मूळ श्लोक

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ ९-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तम्‌ = त्या, विशालम्‌ = विशाल अशा, स्वर्गलोकम्‌ = स्वर्गलोकीचे, भुक्त्वा = भोग घेऊन, पुण्ये = पुण्य, क्षीणे = क्षीण झाल्यावर, ते = ते, मर्त्यलोकम्‌ = मृत्युलोकात, विशन्ति = प्राप्त होतात, एवम्‌ = अशाप्रकारे (स्वर्गाचे साधनरूप असणाऱ्या), त्रयीधर्मम्‌ = तीन वेदांत सांगितलेल्या सकाम कर्मांचा, अनुप्रपन्नाः = आश्रय घेणारे, कामकामाः = भोगांची कामना असणारे पुरुष, गतागतम्‌ = पुन्हा पुन्हा गमन-आगमन, लभन्ते = प्राप्त करून घेतात (म्हणजे पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात) ॥ ९-२१ ॥

अर्थ

ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या, तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात.
अर्थ


ात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात. ॥ ९-२१ ॥

मूळ श्लोक

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ ९-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

माम्‌ = मज परमेश्वराचे, चिन्तयन्तः = निरंतर चिंतन करीत, ये = जे, अनन्याः = अनन्य प्रेमी असे, जनाः = भक्तजन, माम्‌ = मज परमेश्वराला, पर्युपासते = निष्काम भावाने भजतात, नित्याभियुक्तानाम्‌ = नित्य निरंतर माझे चिंतन करणाऱ्या, तेषाम्‌ = त्या पुरुषांचा, योगक्षेमम्‌ = योगक्षेम, अहम्‌ = मी स्वतः, वहामि = (त्यांना) प्राप्त करून देतो ॥ ९-२२ ॥

अर्थ

जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥ ९-२२ ॥


मूळ श्लोक

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌ ॥ ९-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (
अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), अपि = जरी, श्रद्धया = श्रद्धेने, अन्विताः = युक्त असे, ये भक्ताः = जे सकाम भक्त, अन्यदेवताः = दुसऱ्या देवतांचे, यजन्ते = पूजन करतात, ते = ते, अपि = सुद्धा, माम्‌ एव = माझीच, यजन्ति = पूजा करतात (परंतु त्यांचे ते पूजन), अविधिपूर्वकम्‌ = अविधिपूर्वक म्हणजे अज्ञानपूर्वक असते ॥ ९-२३ ॥

अर्थ


 

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. ॥ ९-२३ ॥

मूळ श्लोक

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ ९-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, सर्वयज्ञानाम्‌ = संपूर्ण यज्ञांचा, भोक्ता = भोक्ता, च = आणि, प्रभुः च = स्वामीसुद्धा, अहम्‌ एव = मीच आहे, तु = परंतु, माम्‌ = मज परमेश्वराला, ते = ते, तत्त्वेन = तत्त्वतः, न अभिजानन्ति = जाणत नाहीत, अतः = म्हणून, च्यवन्ति = च्युत होतात म्हणजे पुनर्जन्म प्राप्त करून घेतात ॥ ९-२४ ॥

अर्थ

कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणून पुनर्जन्म घेतात. ॥ ९-२४ ॥


मूळ श्लोक

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌ ॥ ९-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

देवव्रताः = देवतांचे पूजन करणारे, देवान्‌ = देवतांप्रत, यान्ति = प्राप्त होतात, पितृव्रताः = पितरांचे पूजन करणारे, पितॄन्‌ = पितरांप्रत, यान्ति = प्राप्त होतात, भूतेज्याः = भूतांची पूजा करणारे, भूतानि = भूतांप्रत, यान्ति = प्राप्त होतात, (च) = आणि, मद्याजिनः = माझे पूजन करणारे भक्त, माम्‌ अपि = मलाच, यान्ति = प्राप्त होतात (म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही) ॥ ९-२५ ॥

अर्थ

देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. ॥ ९-२५ ॥


मूळ श्लोक

पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ ९-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यः = जो कोणी भक्त, मे = मला, भक्त्या = प्रेमाने, पत्रम्‌ = पान, पुष्पम्‌ = फूल, फलम्‌ = फळ, तोयम्‌ = पाणी इत्यादी, प्रयच्छति = अर्पण करतो, (तस्य) = त्या, प्रयतात्मनः = शुद्ध अंतःकरणाच्या निष्काम प्रेमी अशा भक्ताने, भक्त्युपहृतम्‌ = प्रेमपूर्वक अर्पण केलेले, तत्‌ = ते (पान, फूल इत्यादी), अहम्‌ = मी (सगुण रूपाने प्रकट होऊन प्रेमपूर्वक), अश्नामि = खातो ॥ ९-२६ ॥

अर्थ

जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. ॥ ९-२६ ॥


मूळ श्लोक

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ ॥ ९-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कौन्तेया (
अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), यत्‌ = जे (कर्म), करोषि = तू करतोस, यत्‌ = जे, अश्नासि = तू खातोस, यत्‌ = जे, जुहोषि = हवन करतोस, यत्‌ = जे, ददासि = दान देतोस, (च) = आणि, यत्‌ = जे, तपस्यसि = तप तू करतोस, तत्‌ = ते सर्व, मदर्पणम्‌ = मला अर्पण, कुरुष्व = कर ॥ ९-२७ ॥

अर्थ


 

हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. ॥ ९-२७ ॥

मूळ श्लोक

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ ९-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एवम्‌ = अशाप्रकारे, संन्यासयोगयुक्तात्मा = संन्यासयोगाने युक्त म्हणजे भगवदर्पणबुद्धीने फलासक्तीच्या त्यागासह कर्म करणारा तू, शुभाशुभफलैः = शुभाशुभ फळरूप, कर्मबन्धनैः = कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = मुक्त होशील, विमुक्तः = आणि त्यातून मुक्त होऊन, माम्‌ = मलाच, उपैष्यसि = तू प्राप्त करून घेशील ॥ ९-२८ ॥

अर्थ

अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. ॥ ९-२८ ॥


मूळ श्लोक

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्‌ ॥ ९-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्वभूतेषु = सर्व भूतांमध्ये, अहम्‌ = मी, समः = समभावाने व्यापक आहे, मे = मला, द्वेष्यः न = कोणी अप्रिय नाही (आणि), प्रियः न अस्ति = कोणी प्रिय नाही, तु = परंतु, ये = जे, माम्‌ = मला, भक्त्या = प्रेमाने, भजन्ति = भजतात, ते = ते, मयि = माझ्यामध्ये असतात, च = आणि, अहम्‌ अपि = मी सुद्धा, तेषु = त्यांच्यामध्ये (प्रत्यक्ष प्रकट) असतो ॥ ९-२९ ॥

अर्थ

मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. ॥ ९-२९ ॥


मूळ श्लोक

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ९-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

चेत्‌ = जर, सुदुराचारः = अतिशय दुराचारी, अपि = सुद्धा, अनन्यभाक्‌ = अनन्यभावाने माझा भक्त होऊन, माम्‌ = मला, भजते = भजत असेल, (तर्हि) = तर, सः = तो, साधुः एव = साधुच, मन्तव्यः = समजण्यास योग्य आहे, हि = कारण, सः = तो, सम्यक्‌ = यथार्थपणे, व्यवसितः = निश्चय केलेला असा आहे म्हणजे त्याने चांगल्याप्रकारे निश्चय केला आहे की परमेश्वराच्या भजनासमान असे अन्य काही सुद्धा नाही ॥ ९-३० ॥

अर्थ

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो.
अर्थ


ात त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो. ॥ ९-३० ॥

मूळ श्लोक

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ९-३१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(सः) = तो, क्षिप्रम्‌ = लौकरच, धर्मात्मा = धर्मात्मा, भवति = होतो, (च) = आणि, शश्वत्‌ = सदा टिकून राहाणारी, शान्तिम्‌ = परम शांती, निगच्छति = प्राप्त करून घेतो, कौन्तेय = हे कौन्तेया (
अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), प्रति = निश्चयपूर्वक सत्य, जानीहि = तू समज की, मे = माझा, भक्तः = भक्त, न प्रणश्यति = नष्ट होत नाही ॥ ९-३१ ॥

अर्थ


 

तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की, माझा भक्त नाश पावत नाही. ॥ ९-३१ ॥

मूळ श्लोक

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्‌ ॥ ९-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, पार्थ = हे पार्था (
अर्थात पृथापुत्र अर्जुना), स्त्रियः = स्त्रिया, वैश्याः = वैश्य, शूद्राः = शूद्र, तथा = तसेच, पापयोनयः = पापयोनीमध्ये चांडाळ इत्यादी, ये अपि = जे कोणी सुद्धा, स्युः = असतील, ते अपि = ते सुद्धा, माम्‌ = मला, व्यपाश्रित्य = शरण येऊन, पराम्‌ = परम, गतिम्‌ = गतीच, यान्ति = प्राप्त करून घेतात ॥ ९-३२ ॥

अर्थ


 

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी
अर्थात चांडाळादी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात. ॥ ९-३२ ॥


मूळ श्लोक

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥ ९-३३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पुनः = मग, (ये) = जे, पुण्याः = पुण्यशील, ब्राह्मणाः = ब्राह्मण, तथा = तसेच, राजर्षयः = राजर्षी असे, भक्ताः = भक्तजन (मला शरण येऊन परम गती प्राप्त करून घेतात), किम्‌ = हे काय सांगावयास पाहिजे, (अतः) = म्हणून, असुखम्‌ = सुखरहित, (च) = आणि, अनित्यम्‌ = क्षणभंगुर असे, इमम्‌ = हे, लोकम्‌ = मनुष्य शरीर, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, माम्‌ = माझे, भजस्व = तू भजन कर ॥ ९-३३ ॥

अर्थ

मग पुण्यशील, ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. ॥ ९-३३ ॥


मूळ श्लोक

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ९-३४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

मन्मनाः भव = माझ्या ठिकाणी मन ठेव, मद्भक्तः (भव) = माझा भक्त तू हो, मद्याजी (भव) = माझे पूजन करणारा तू हो, माम्‌ = मला, नमस्कुरु = प्रणाम कर, एवम्‌ = अशाप्रकारे, आत्मानम्‌ = आत्म्याला, (मयि) = माझ्या ठिकाणी, युक्त्वा = नियुक्त करून, मत्परायणः = मत्परायण होऊन, माम्‌ एव = मलाच, एष्यसि = तू प्राप्त करून घेशील ॥ ९-३४ ॥

अर्थ

माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ॥ ९-३४ ॥


मूळ नवव्या अध्यायाची समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥

अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्याराजगुह्ययोग नावाचा हा नववा अध्याय समाप्त झाला. ॥ ९ ॥


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *