दासबोध दशक विसावा

दासबोध दशक आठवा

दासबोध दशक आठवा विडिओ सहित॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक आठवा : मायोद्धव अथवा ज्ञानदशक

समास पहिला : देवदर्शन
॥ श्रीराम ॥

श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध ।
गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की गुरुशिष्यसंवादाच्या रूपाने विमल ज्ञान अगदी मुलांनाही समजेल, असे अगदी सोपे करून सांगितले जात आहे, तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे. (१)

नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा ।
अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥
नाना शास्त्रांचा शोध घेऊ लागले, तर खरोखर आयुष्य पुरे पडत नाही. मात्र त्याने समाधान प्रास न होता अंतरात संशयच वाढू लागतात. (२)

नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें अपारें ।
सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥
वृष्टीमध्ये नाना तीर्थे आहेत. एकापेक्षा एक वरचढ अशी असंख्य पुण्यदायक तीर्थे आहेत. काही सुगम आहेत, काही दुर्गम आहेत, काही दुष्कर आहेत. (३)

ऐसीं तीर्थें सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारी ।
फिरों जातां जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥ ४ ॥
अशा या सर्व तीर्थांचे दर्शन घेऊ शकेल, असा या जगात कुणी एक तरी असेल का रे ? एखादा जन्मभर फिरत सहिला, तरी फिरताना आयुष्य कमी पडेल ! (४)

नाना तपें नाना दानें । नाना योग नाना साधनें ।
हें सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५ ॥
लोक देवाच्या प्रासीकरिता नाना प्रकारचे तप करतात, नाना दाने देतात, नाना प्रकारचे योग व नाना प्रकारची साधने करीत असतात. (५)

पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा ।
तेणें देव ठाईं पाडावा । हें सर्वमत ॥ ६ ॥
सर्वांना असे वाटत असते की, देवाधिदेवाच्या प्रासीसाठी असे नाना प्रकारचे परिश्रम केले की, आपल्याला येथेच देवाची प्राप्ती होईल. (६)

पावावया भगवंतातें । नाना पंथ नाना मतें ।
तया देवाचें स्वरूप तें । कैसे आहें ॥ ७ ॥
भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून नाना पंथ (संप्रदाय) निर्माण झाले. नाना मते प्रस्थापित केली गेली. त्या देवाचे रूप तरी कसे आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. (७)

बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गनना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठाईं पडेना ॥ ८ ॥
या वृष्टीमध्ये अनेक देव आहेत. त्यांची गणना कोण करू शकणार आहे ? पण त्यांतील एकाही देवाची प्राप्ती होत नाही. (८)

बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना ।
तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करूनि ॥ ९ ॥
अनेक प्रकारच्या उपासना आहेत. ज्याच्या मनातील कामना च्या उपासनेने पूर्ण होतात, त्याच्या मनात त्या देवतेविषयीच दृढ श्रद्धाभाव उत्पन्न होतो. (९)

बहु देव बहु भक्त । इच्ह्या जाले आसक्त ।
बहु ऋषी बहु मत । वेगळालें ॥ १० ॥
अनेक देव आहेत, त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत. तसेच अनेक ऋषी होऊन गेले. त्यांची अनेक मतेही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. (१०)

बहु निवडितां निवडेना । येक निश्चय घडेना ।
शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठाईं ॥ ११ ॥
अनेक मतमतांतरे असल्याने त्यातील कुठले ग्राह्य आहे याचा निश्चय करता येत नाहीसा झाला अहि. शास्त्राशास्त्रांतसुद्धा मतभेद असल्याने निश्चय करता येत नाही, अशी स्थिती झालेली आहे. (११)

बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध ।
ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥ १२ ॥
अनेक शास्त्रे आहेत, त्यांत अनेक भेद आहेत. मतामतांत विरोध आहे. अशाप्रकारे वादविवाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले. (१२)

सहस्त्रामधें कोणी येक । पाहे देवाचा विवेक ।
परी त्या देवाचें कौतुक । ठाईं न पडे ॥ १३ ॥
हजारो मनुष्यांत एखादाच खरा देव कुठला, यासंबंधी विचार करू लागतो ते जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागतो पण त्या खऱ्या देवाचे रहस्य त्याला कळून येत नाही. (१३)

ठाईं न पडे कैसें म्हणतां । तेथें लागली अहंता ।
देव राहिला परता । अहंतागुणें ॥ १४ ॥
खाई न पडे असे कसे म्हणता हो ? असे तो अहंकारामुळे म्हणू लागतो. या अहंकारामुळे देव बाजूलाच राहातो. (१४)

आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें ।
तो देव कोण्या गुणें । ठाईं पडे ॥ १५ ॥
असो. आता हे बोलणे राहू दे. ज्याच्या प्रासीसाठी नाना योगांचा अभ्यास केला जातो. तो देव कुठल्या उपायाने प्रास होतो, हे प्रथम पाहिले पाहिजे. (१५)

देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें ।
तेंचि बोलणें स्वभावें । बोलिजेल ॥ १६ ॥
म्हणून देव कुणाला म्हणावे, त्याला कसे जाणावे, तेच आता सहजरीत्या सांगितले जाईल. (१६)

जेणें केले चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार ।
सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥ १७ ॥
ज्याने ही चराचर वृष्टी उत्पन्न केली, ज्याच्या सत्तेने सर्व कार्य चालते व ज्याचे सर्वकर्ता हे नाम निरंतर घेतले जाते, (१७)

तेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृतकळा ।
तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥
ज्याने मेघमाला केल्या, ज्याने चंद्रबिंबाच्या ठिकाणी अमृतमय शीतल चांदणे निर्मिले व ज्याने सूर्यमंडळास तेज दिले तोच देव होय. (१८)

ज्याची मर्यादा सागरा । जेणें स्थापिलें फणिवरा ।
जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥
ज्याच्या सत्तेने सागर मर्यादा पाळतो, ज्याने शेषाची स्थापना केली व ज्याच्या सत्तेने अंतरिक्षांत तारका निर्माण झाल्या, (१९)

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयासि लक्ष जीवयोनी ।
जेणें निर्मिले लोक तिनी । तया नाव देव ॥ २० ॥
चारी खाणी, चारी वाणी, चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी व तिन्ही लोक ज्याने निर्मिले, तोच देव जाणावा. (२०)

ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार ।
तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसीं ॥ २१ ॥
ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव आहे हा निर्धार करावा. (२१)

देव्हाराचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव ।
तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥ २२ ॥
देव्हाऱ्यातील देवाची मूर्ती, सर्व जीवांची उत्पत्ती, तसेच ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही. (२२)

ठाईं ठाईं देव असती । तेहिं केली नाहीं क्षिती ।
चंद्र सूर्य तारा जीमूती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥
जागोजागी देव असतात. पण पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारा, मेघ इत्यादींची उत्पत्ती त्यांच्यापासून होत नाही. (२३)

सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव ।
ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥ २४ ॥
म्हणून या सर्वांना जो निर्माण करतो, तोच खरा देव आहे. पण त्याला पाहून जावे तर तो निरवयव, निराकार असल्याने दिसत नाही. ब्रह्मादिक देवही त्याची कला, लीला व कौशल्य जाणू शकत नाहीत. (२४)

येथें आशंका उठिली । ते पुढिलीये समासीं फीटली ।
आतां वृत्ती सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥
येथे एक शंका उत्पन्न झाली, तिचे निरसन पुढील समासात केले जाईल, आत्ता जे सांगतो आहे, ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावधान व्हावे. (२५)

पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं जें भकास ।
तये निर्मळीं वायोस । जन्म जाला ॥ २६ ॥
पोकळ अवकाश आकाशजेथेकाहीचनाही असे भकास होते. त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला. (२६)

वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥
वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले. त्या देवाची करणी ही अशी अघटित घडली. (२७)

उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली ।
ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव ॥ २८ ॥
उदकापासून पृथ्वी झाली, वृष्टी झाली, खांबाशिवाय आधाराशिवाय तिला उभारली. अशी विचित्र ज्याची कला आहे, त्यालाच देव म्हणतात. (२८)

देवें निर्मिली हे क्षिती । तीचे पोटीं पाषाण होती ।
तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥
देवाने ही पृथ्वी निर्माण केली. तिच्या पोटीच दगड होतात आणि विवेकहीन माणसे त्यालाच देव म्हणतात. (२९)

जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपुर्वीं होता ।
मग हे तयाची सत्ता । निर्माण जाली ॥ ३० ॥
या वृष्टीचा निर्माता जो होता, तो या वृष्टीपूर्वीही होता. त्याच्या सत्तेने नंतर ही वृष्टी निर्माण झाली. (३०)

कुल्लाळ पात्रापुर्वीं आहे । पात्रें कांहीं कुल्लाळ नव्हे ।
तैसा देव पूर्वींच आहे । पाषाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥
मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वीही कुंभार असतोच. ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नव्हे. तसा देव हा पूर्वीपासूनच आहे. पाषाण नंतर झाले. म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हेच. (३१)

मृत्तिकेचें शैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले ।
कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥
मातीचे सैन्य केले ज्यांनी ते केलेते कर्ते त्या सैन्यापेक्षा वेगळेच राहिले. कार्य म्हणजे मातीचे सैन्य व कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनविणारे कारागीर त्यांना नंतर एक करू म्हटले तरी ते होऊ शकत नाही. (३२)

तथापि होईल पंचभूतिक । निर्गुण नव्हे कांहीं येक ।
कार्याकारणाचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥
तथापि येथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पांचभौतिक असल्याने तत्त्वतः एकच आहेत असे म्हणता येईल. कार्यकारणसंबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो, म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही. (३३)

अवघी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टीहूनि पर्ता ।
तेथें संशयाची वार्ता । काढूंचि नये ॥ ३४ ॥
म्हणून अवघ्या वृष्टीचा कर्ता हा त्या वृष्टीहून वेगळा आहे हे निश्चित आहे. म्हणून येथे संशयाचे नावही काढू नये. (३४)

खांसूत्रींची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली ।
तोचि बाहुली हे बोली । घडे केवी ॥ ३५ ॥
खांबसूत्राच्या बाहुल्यांना जो पुरुष नाचवतो, तो तीच बाहुली आहे असे कसे म्हणता येईल ? (३५)

छायामंडपीची सेना । सृष्टिसारिखीच रचना ।
सूत्रें चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६ ॥
अंधाऱ्या जणी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पाडून त्यांची हालचाल दाखविली जाते. तसेच सेना दाखवली तर त्या सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि ती हालचाल करून दाखविणारा सूत्री (सूत्रधार) एक नव्हेत. सूष्टिरचनेसारखीच ती रचना असते. (३६)

तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव ।
जेणें केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥
म्हणून सूष्टिकर्ता देव हा त्या सृष्टीतील नसतो. ज्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल ? (३७)

जें जें जया करणें पडे । तें तें तो हें कैसें घडे ।
म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥
जो कोणी जे जे करतो, ते कार्य म्हणजेच तो असे कसे घडू शकेल ? कर्ता हा कार्याहून भिन्नच असणार लोक बापडे कारण नसता उगीचच संशयात पडतात. (३८)

सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें ।
परी तो गोपुर कर्ता नव्हे । निश्चयेसीं ॥ ३९ ॥
एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे, देवालयाच्या द्वारावर उंच गोपुर निर्माण केले. त्यातील देखावे, व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्यसुष्टीत दिसतात तशाच केल्या पण गोपुर आणि त्याचा कर्ता नक्कीच एक नव्हेत. (३९)

तैसें जग निर्मिलें जेणें । तो वेगळा पूर्णपणें ।
येक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥
त्याप्रमाणेच हे जग ज्याने निर्माण केले, तो त्या जगाल पूर्णपणे वेगळाच आहे. काही लोक मूर्खपणाने जग तोच जगदीश असे म्हणतात. (४०)

एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा ।
तो सर्वांमधें परी निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥
थोडक्यात म्हणजे जगाल जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केली आहे. तो सदा सर्वत्र सर्वांमध्ये असूनही सर्वांहून निराळा आहे. (४१)

म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासी अलिप्त आत्मारामु ।
अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥४२ ॥
म्हणून पंचमहाभूतांच्या समुदायाहून, मिश्रणाहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेला श्रम सत्यच वाटतो. (४२)

मायोपाधी जगडंबर । आहे सर्वहि साचार ।
ऐसा हा विपरीत विचार । कोठेंचि नाहीं ॥ ४३ ॥
मायेने निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्यच आहे, असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कोठेच आढळून येत नाही. (४३)

म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वांपर जो परमात्मा ।
अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥
म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वाच्याही पलीकडचा आहे व त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. (अ)

तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव ।
ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥
त्यालाच देव म्हणावे. इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहे. असा वेदान्ताचा अंतरीचा भाव आहे. (४५)

पदार्थवस्तु नासिवंत । हें तों अनुभवास येत ।
याकारणें भगवंत । पदार्थावेगळा ॥ ४६ ॥
दृश्यसुष्टी आणि तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत असतो म्हणून अविनाशी भगवंत हा पदार्थाहून वेगळा आहे. (४६)

देव विमळ आणी अचळ । शास्त्रें बोलती सकळ ।
तया निश्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥
सर्व शास्त्रे सांगतात की, देव निर्मल आहे, निश्चल आहे. म्हणून त्या निश्चल परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये. (४७)

देव आला देव गेला । देव उपजला देव मेला ।
ऐसें बोलतां दुरिताला । काय उणें ॥ ४८ ॥
देव आला, देव गेला, देव उपजला आणि देव मेला असे कधी म्हणू नये. तसे म्हणण्याने पाप मात्र पदरात पडते. (४८)

जन्म मरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा ।
देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥
आत्मारामाला कधीही जन्ममरण नसते. ज्याच्या सत्तेने इंद्रादी देव अमरझाले आहेत, त्याला मृत्यू कसा येईल २४९)

उपजणें आणी मरणें । येणें जाणें दुःख भोगणें ।
हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
जन्मणे, मरणे, येणे आणि जाणे, अथवा दुःख भोगणे हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालते. तोच सर्वांचे कारण आहे. म्हणून तो या सर्व कार्यांहून वेगळाच आहे. (५०)

अंतःकरण पंचप्राण । बहुतत्वीं पिंडज्ञान ।
यां सर्वांस आहे चळण । म्हणोनि देव नव्हेती ॥ ५१ ॥
अंतःकरण, पंचप्राण, अनेक तत्त्वांसहित पिंडज्ञान या सर्वांत बदल होत असतो, (त्यांचा नाशही होतो), म्हणून ते देव नव्हेत. (५१)

येवं कल्पनेरहित । तया नाव भगवंत ।
देवपणाची मात । तेथें नाहीं ॥ ५२ ॥
इंद्रादी देवांचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची मातब्बरी कल्पनेरहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे चालत नाही. (५२)

तव शिष्यें आक्षेपिलें । तरी कैसें ब्रह्मांड केलें ।
कर्तेपण कारण पडिलें । कार्यामधें ॥ ५३ ॥
हे ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की, कार्य करताना कर्ता हा कार्यमय झालेला असतो. तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तर मग निर्गुण ब्रह्मच सगुण झाले असे म्हणावे लागेल तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे केले ते सांगावे. (५३)

द्रष्टेपणें द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायांसीं ।
कर्तेपणे निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
द्रष्टा हा द्रष्टेपणाने दृश्य पाहात असता नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो. तसे ब्रह्मांडाचा कर्ता निर्गुण म्हटले तर मग त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कोठून आले ? (५४)

ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण ।
देव सगुण किं निर्गुण । मह निरोपावा ॥ ५५ ॥
म्हणून ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे ? त्याची ओळख कशी पटवून घ्यावी ? देव सगुण आहे की निर्गुण ? हे सर्व आपण मला समजावून सांगा. (५५)

येक म्हणती त्या ब्रह्मातें । इच्ह्यामात्रें सृष्टिकर्ते ।
सृष्टिकर्ते त्यापर्तें । कोण आहे ॥ ५६ ॥
कुणी एखादा म्हणतो की ते ब्रह्म इच्छामात्रेकरून वृष्टी उत्पन्न करते. त्याच्याखेरीज वृष्टीचा कर्ता दुसरा कोण असणार ? (५६)

आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठून जाली ।
ते हे आतां निरोपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥
असो. आता हे अधिक बोलणे राहू दे. हे स्वामी, ही सर्व माया कोठून आली हे आता आपण मला समजावून सांगितले पाहिजे. (५७)

ऐसें ऐकोनि वचन । वक्ता म्हणे सावधान ।
पुढिले समासीं निरूपण । सांगिजेल ॥ ५८ ॥
शिष्याचे हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की, पुढील समासात याचे निरूपण केले जाईल. ते सावधान होऊन ऐक. (५८)

ब्रह्मीं माया कैसी जाली । पुढें असे निरोपिली ।
श्रोतीं वृत्ति सावध केली । पाहिजे आतां ॥५९ ॥
ब्रह्मापासून माया कशी झाली, ह्याचे वर्णन पुढे केले आहे, तेव्हा श्रोत्यांनी वृत्ती सावध करून ते ऐकावे. (५९)

पुढें हेंचि निरूपण । विशद केलें श्रवण ।
जेणें होय समाधान । साधकांचें ॥ ६० ॥
पुढे हेच निरूपण केलेले आहे. ते मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल. (६०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देवदर्शननाम समास पहिला ॥ १ ॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘देवदर्शननाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥

मागां श्रोतीं आक्षेपिलें । तें पाहिजे निरोपिलें ।
निरावेवीं कैसें जालें । चराचर ॥ १ ॥
मागील समासात श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की ब्रह्म निरवयव असताना त्याच्यापासून चराचर वृष्टी कशी उत्पन्न झाली ? त्याच्या समाधानासाठी निरूपण केले पाहिजे. (१)

याचें ऐसें प्रतिवचन । ब्रह्म जें कां सनातन ।
तेथें माया मिथ्याभान । विवर्तरूप भावे ॥ २ ॥
याचे समाधान असे आहे की, जे सनातन ब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी माया ही विवर्तरूप, दोरीवर साप दिसावा, तशी नसूनही दिसणारी कल्पनामय भासत असते. (२)

आदि येक परब्रह्म । नित्यमुक्त अक्रिय परम ।
तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाली मूळमाया ॥ ३ ॥
सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त, सर्व श्रेष्ठ, अक्रिय असे परब्रह्म तेवढे होते. तेथे अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळमाया उत्पन्न झाली. (३)

॥ श्लोक ॥ आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् ।
तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम् ॥
श्लोक अर्थ- सर्व प्रथम एक परब्रह्म असते. ते नित्यमुक्त असते. त्याच्या ठिकाणी कुठलाही बदल नसतो. त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते. तिच्यांत बीजरूपाने जीव वास करतो.

आशंका ॥ येक ब्रह्मा निराकार । मुक्त अक्रिये निर्विकार ।
तेथें माया वोडंबर । कोठून आली ॥ ४ ॥
आशंका- श्रोता येथे शंका विचारतो की, एकले एक मुक्त, अक्रिय व निराकार ब्रह्म असताना तेथे जादूप्रमाणे माया कोठून आली ? (४)

ब्रह्म अखंड निर्गुण । तेथें इच्हा धरी कोण ।
निर्गुणीं सगुणेंविण । इच्हा नाहीं ॥ ॥ ५ ॥
ब्रह्म तर अखंड असून निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कशी असणार ? निर्गुण सगुण झाल्याखेरीज तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. (५)

मुळीं असेचिना सगुण । म्हणौनि नामें निर्गुण ।
तेथें जालें सगुण । कोणेपरी ॥ ६ ॥
मुळात गुणरहित असल्याने तर निर्गुण नाम ब्रह्माला पडले आहे. मग तेथे ते सगुण कशा प्रकारे झाले ? (६)

निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें ।
लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥
निर्गुणच सगुण झाले असे म्हणावे तर या बोलण्याने अंगी मूर्खपणाच येतो. (७)

येक म्हणती निरावेव । करून अकर्ता तो देव ।
त्याची लीळा बापुडे जीव । काये जाणती ॥ ८ ॥
कोणी एक म्हणतात की, देव निरवयव असून तो वृष्टी करूनही अकर्ता आहे. बिचाऱ्या (अज्ञानी) जीवांना त्याची लीला कशी कळणार ? (८)

येक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ९ ॥
एक म्हणतात की, तो तर परमात्मा आणि बिचारा जीवात्मा अल्पज्ञ आहे. तो त्या परमात्म्याचा महिमा काय जाणार ? (९)

उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघा लोपिती ।
बळेंचि निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥
उगाच महिमा वर्णन करणारे काही लोक म्हणतात की, देव हा सर्व करूनही अकर्ता आहे. निर्गुणासबधी बळेच असे विधान करण्याने शास्त्रार्थाला बाधा येत आहे, हे त्यांना कळत नाही. (१०)

मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करून अकर्ता ।
कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥
निर्गुणाच्या ठिकाणी मुळात क्रियाच नाही तर ते करून अकर्ता कसे असेल ? तेथे कर्ता- अकर्ता ही गोष्टच समूळ मिथ्या आहे. (११)

जें ठाईंचें निर्गुण । तेथें कैचें कर्तेपण ।
तरी हे इच्हा धरी कोण । सृष्टिरचाव्याची ॥ १२ ॥
जे मुळचे निर्गुण आहे, तेथे कर्तेपणा कसा असेल ? मग वृष्टी रचण्याची इच्छा कोण धरतो, असा प्रश्न उत्पन्न होतो. (१२)

इच्छा परमेश्वराची । ऐसी युक्ती बहुतेकांची ।
परी त्या निर्गुणास इच्हा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥
बरेच लोक म्हणतात की, इच्छा परमेश्वराची असते. पण युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या हे लक्षातच येत नाही, की निर्गुणाला इच्छा कशी असेल ? (१३)

तरी हे इतुकें कोणें केलें । किंवा आपणचि जालें ।
देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥
मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, इतक्या विशाल वृष्टीची रचना कोणी केली का आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले आहे ? देवाशिवाय हे कोणी उभारले ? (१४)

देवेंविण जालें सर्व । मग देवास कैंचा ठाव ।
येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥
देवाशिवायच हे सर्व आपोआप झाले म्हणावे, तर मग देवाला स्थानच उरत नाही. म्हणजे देवच नाही असे ठरेल. (१५)

देव म्हणे सृष्टिकर्ता । तरी येवं पाहे सगुणता ।
निर्गुणपणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥
देवच सूष्टिकर्ता असे म्हणावे तर कर्तृत्व सगुणाच्या ठायीच संभवते. मग देव निर्गुण आहे, या बोलण्याला काही अर्थच उरत नाही. (१६)

देव ठाईंचा निर्गुण । तरी सृष्टिकर्ता कोण ।
कर्तेपणाचें सगुण । नासिवंत ॥ १७ ॥
असा प्रश्न पडतो की, देव जर मुळी निर्गुणच आहे, तर मग सूष्टिकर्ता कोण आहे ? सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण तर नाशिवंत असते. (१७)

येथें पडिले विचार । कैसें जालें सचराचर ।
माया म्हणों स्वतंतर तरी हेंहि विपरीत दिसे ॥ १८ ॥
परत हे सर्व चराचर कसे झाले, हा प्रश्न तसाच अनुत्तरित सहतो. माया स्वतंत्र आहे. तिने हे केले म्हणावे, तरी तेही विपरीत दिसते. (१८)

माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली ।
ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥ १९ ॥
मायेला कुणी केलेली नाही, ती स्वतःच उत्पन्न झाली आणि विस्तार पावली, असे म्हटले तर मग देवाला स्थानच राहात नाही. (१९)

देव निर्गुण स्वतसिद्ध । त्यासी मायेसि काये समंध ।
ऐसें बोलतां विरुद्ध । दिसोन आलें ॥ २०
देव स्वतःसिद्ध असून निर्गुण आहे. त्याचा आणि मायेचा संबंधच काय, असे म्हणावे तरी ते अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरते. (२०)

सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्याचि माथां
तरी भक्तांस उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥
सर्व कर्तृत्व जर त्या मायेचे आहे असे म्हटले, तर मग असा प्रश्न निर्माण होतो की, भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही ? (२१)

देवेंविण नुस्ती माया । कोण नेईल विलया ।
आम्हां भक्तां सांभाळाया । कोणीच नाहीं ॥ २२ ॥
देवाशिवाय या मायेचा नाश कोण करील ? माया स्वतंत्र असेल आणि देवच कुणी नसेल, तर आम्हां भक्तांचा सांभाळ करायला कोणीच नाही, असे होईल. (२२)

म्हणोनि माया स्वतंतर । ऐसा न घडे कीं विचार ।
मायेस निर्मिता सर्वेश्वर । तो येकचि आहे ॥ २३ ॥
म्हणून माया स्वतंत्र हा विचार टिकू शकत नाही. मायेला निर्माण करणारा एक सर्वे श्वरच आहे. (२३)

तरी तो कैसा आहे ईश्वर । मायेचा कैसा विचार ।
तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥
तरी आता तो ईश्वर कसा आहे, माया कशी आहे, इत्यादी सर्वांच्या विषयी सविस्तर बोलणे आवश्यक आहे. (२४)

श्रोतां व्हावें सावधान । येकाग्र करूनियां मन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ २५ ॥
म्हणून श्रोत्यांनी आता सावध व्हावे व मन एकाग्र करून कथानुसंधान श्रवण करावे. (२५)

येके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अनुभव ।
तेहि बोलिजेती सर्व । येथानुक्रमें ॥ २६ ॥
येथे जी शंका निर्माण झाली आहे, त्यासंबंधी लोकांचे अनुभव भिन्न आहेत व म्हणून मतेही भिन्न आहेत. म्हणून प्रथम त्यासंबंधी यथानुक्रमे सांगितले जाईल. (२६)

येक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली ।
देवास इच्ह्या नस्ती जाली । तरी हे माया कैंची ॥ २७ ॥
कुणी एक म्हणतात की, देवानेच माया उत्पन्न केली, म्हणून तिचा इतका विस्तार झाला आहे. देवाला जर इच्छाच झाली नसती, तर ही माया कोठून आली असती ? (२७)

येक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्हा करी कोण ।
माया मिथ्या हे आपण । जालीच नाही ॥ २८ ॥
कुणी म्हणतात की, देव तर निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कोण करणार ? माया ही मिथ्याच आहे (म्हणजे केवळ भासरूप आहे.) वास्तविकती उत्पन्न झालेलीच नाही. (२८)

येक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसी नाहीं म्हणतां कैसें ।
माया हे अनादि असे । शक्ती ईश्वराची ॥ २९ ॥
कुणी म्हणतात की, ही प्रत्यक्ष दिसत असून ती नाहीच असे तुम्ही कसे म्हणता ? माया ही अनादी असून ती ईश्वराची शक्ती आहे. (२९)

येक म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे ।
साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥
कुणी म्हणतात की, ही खरी म्हणावी, तर स्वरूपज्ञान होताच ती नष्ट होते. म्हणून ती खऱ्यासारखी दिसत असली, तरी ती मिथ्याच आहे. (३०)

येक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें ।
भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥
कुणी एक म्हणतात की, ती मिथ्याच आहे तर साधन करण्याची आवश्यकता काय आहे ? भगवंतांनी गीतेत मायेचा त्याग करता यावा, म्हणून भक्तिसाधना सांगितली आहे. (३१)

येक म्हणती मिथ्या दिसतें । भयें अज्ञानसन्येपातें ।
साधन औषधही घेईजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥ ३२ ॥
कुणी म्हणतात की, अज्ञानरूपी सन्निपातज्यसमुळे ती मिथ्या असून तिचे भय वाटते, म्हणून साधनरूप औषध घेतले पाहिजे. पण तरी ती दिसत असली तरी मिथ्याच आहे. (३२)

अनंत साधनें बोलिलीं । नाना मतें भांबावलीं ।
तरी माया न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥ ३३ ॥
असंख्य साधने सांगितली गेली आहेत. मायेविषयी नाना मते व्यक्त झाली आहेत. त्यामुळे खरे तर मन भांबावून जाते. पण तरी तिचा काही केल्या निरास करता येत नाही. मग तिला मिथ्या कशी म्हणावी ? (३३)

मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं ।
मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥ ३४ ॥
योगीजन माया मिथ्या असे म्हणतात; वेद, शाखे, पुतणेही माया मिथ्या असेच म्हणतात व ज्ञानी लोकही अध्यात्म निरूपणांत अनेक प्रकारे माया मिथ्या असेच प्रतिपादन करतात. (३४)

माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली ।
मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥
याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरविले असले तरी ती क्योच नाहीशी झाली, असे तर कुठे ऐकू येत नाही. उलट मिथ्या म्हणताच ती येऊन चिकटते असेच दिसून येते. (३५)

जयाचे अंतरीं ज्ञान । नाहीं वोळखिले सज्जन ।
तयास मिथ्याभिमान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥
ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि ज्याने सज्जन ओळखलेले नाहीत त्याला मायेचे मिथ्या अस्तित्व खरेच वाटते. (३६)

जेणें जैसा निश्चये केला । तयासी तैसाचि फळला ।
पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥
ज्याच्या मनांत मायेविषयी जसा निश्चय झाला असेल त्याला तसेच फळ मिळते. जो आरशात पाहात असतो त्याला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. म्हणजे तो जसा असतो, तसेच हुबेहूब प्रतिबिंब दिसते. माया ही तशीच आहे. (३७)

येक म्हणती माया कैंची । आहे ते सर्व ब्रह्मचि ।
थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥
कुणी एक म्हणतात की, माया कुठली ? ती नाहीच मुळी. जे सर्व आहे ते ब्रह्मच आहे. तूप हे थिजलेले असो वा पातळ असो, त्याची एकरूपता मोडत नाही. (३८)

थिजलें आणी विघुरलें । हें स्वरूपीं नाहीं बोलिलें ।
साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती येक ॥ ३९ ॥
दुसरे कुणी म्हणतात की, हा दृष्टान्त योग्य नाही या दृष्टान्ताने बोलण्यात संगती वहात नाही. म्हणून हा अयोग्य आहे. कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट अथवा पातळ हे काहीही नाही. (३९)

येक म्हणती सर्व ब्रह्म । हें न कळे जयास वर्म ।
तयाचें अंतरींचा भ्रम । गेलाच नाहीं ॥ ४० ॥
कुणी म्हणतात की, सर्व ब्रह्म आहे, यातील वर्म ज्याला कळत नाही त्याच्या अंतरीचा श्रम गेलेला नाही असे जाणावे. (४०)

येक म्हणती येकचि देव । तेथें कैंचें आणिलें सर्व ।
सर्व ब्रह्म हें अपूर्व । आश्चिर्य वाटे ॥ ४१ ॥
कुणी म्हणतात, देव एकला एक आहे, (दुसरी वस्तूच नाही.) तेथे हे ‘ सर्व ‘ कुठले आणले ? सर्व ब्रह्म म्हणणे हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटते. (४१)

येक म्हणती येकचि खरें । आनुहि नाहीं दुसरें ।
सर्व ब्रह्म येणें प्रकारें । सहजचि जालें ॥ ४२ ॥
कुणी म्हणतात की, एक ब्रह्म तेवढे खरे तेथे दुसरे अपमात्रही नाही. म्हणून याप्रकारे स्वाभाविकच सर्व ब्रह्म हेच सिद्ध झाले. (४२)

सर्व मिथ्या येकसरें । उरलें तेंचि ब्रह्म खरें ।
ऐसीं वाक्यें शास्त्राधारें । बोलती येक ॥ ४३ ॥
कुणी असे म्हणतात की, एकंदर सर्व मिथ्या जाऊन जे उरते ते खरे ब्रह्म होय आणि या म्हणण्याला शास्त्राधारही देतात. (४३)

आळंकार आणी सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण ।
आटाआटी वेर्थ सीण । म्हणती येक ॥ ४४ ॥
कुणी म्हणतात की, सुवर्ण आणि त्याचे अलंकार यांत भिन्नपणा नाही, तसेच ब्रह्म आणि दृश्य वृष्टीत भिन्नपणा नसतो. म्हणून एक सत्य, एक मिथ्या असा काथ्याकूट करणे म्हणजे व्यर्थ शीण होय. (४४)

हीन उपमा येकदेसी । कैसी साहेल वस्तूसी ।
वर्णवेक्ती अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥
आत्मवस्तूला अपूर्ण, एकदेशी उपमा कशी देता येईल ? ज्याला रंग आहे, आकार आहे, त्याच्याशी अव्यक्त ब्रह्माची तुलना कशी करता येईल ? (४५)

सुवर्णीं दृष्टी घालितां । मुळीच आहे वेक्तता ।
आळंकार सोनें पाहतां सोनेंचि असे ॥ ४६ ॥
सुवर्ण हे व्यक्त असून आपल्या दृष्टीस ते दिसू शकते. अलंकार सुवर्णाचे असल्याने तेही सोनेच होय. (४६)

मुळीं सोनेंचि हें वेक्त । जड येकदेसी पीत ।
पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवीं घडे ॥ ४७ ॥
मुळात सोने हेजड एकदेशी, पीत वर्णाचे आणि व्यक्त आहे. या अपूर्णाचा दृष्टान्त परिपूर्ण अव्यक्त परब्रह्मास कसा देता येईल ? (४७)

दृष्टांत तितुका येकदेसी । देणें घडे कळायासी ।
सिंधु आणी लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥
दृष्टान्त हा नेहमी एकदेशीच असतो पण परब्रह्माची काही कल्पना यावी म्हणून, तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्या लाय यांत भिन्नत्व कसे असेल ? (४८)

उत्तम मधेम कनिष्ठ । येका दृष्टांतें कळे पष्ट ।
येका दृष्टांतें नष्ट । संदेह वाढे ॥ ४९ ॥
दृष्टान्तांत उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे प्रकार असतात. उत्तम दृश्चन असेलतरविचारस्पष्टपणे कळतो. याउलट एखाद्या दृष्टान्ताने झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र वाढतो. (४९)

कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चळाची सरी ।
साचा ऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥
कसला समुद्र आणि कसली लाट ? अचळ अशा परब्रह्मास चलाची उपमा कशी शोभून दिसेल ? जादू म्हणजेच मिथ्या भास हा कधीही सत्य मारच नये. (५०)

वोडंबरी हे कल्पना । नाना भास दाखवी जना ।
येरवी हे जाणा । ब्रह्मचि असे ॥ ५१ ॥
मायाहीक्येळकल्पनाच असते. तिच्यामुळेलोकांना नाना भास दिसतात. नाहीतरब्रह्मच सत्य आहे, हेजाणून घ्यावे. (५१)

ऐसा वाद येकमेकां । लागतां राहिली आशंका ।
तेचि आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥ ५२ ॥
याप्रकारे एकमेकांत वाद होत राहतात आणि शंका तशीच शिल्लक राहते. त्या शंकेचे निरसन पुढे केले जाईल. ते आता सावध होऊन ऐकावे. (५२)

माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रह्मीं कैसी जाली ।
म्हणावी ते निर्गुणें केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥
माया मिथ्या हे आता कळले पण ती परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली कशी ? निर्गुणाने उत्पन्न केली असेही म्हणता येत नाही. कारण ती मुळातच मिथ्या आहे. (भासरूप आहे.) (५३)

मिथ्या शब्दीं कांहींच नाहीं । तेथें केलें कोणें काई ।
करणें निर्गुणाचा ठाईं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥
मिथ्या म्हणजे काहीच नाही. या शब्दाने ती नाहीच असे कळते. मग तेथे तिला कुणी केले, हा प्रश्नच उरत नाही. शिवाय निर्गुणाचे ठायी कर्तृत्व लादणे हेही अघटितच म्हणावे लागेल. (५४)

कर्ता ठांईचा अरूप । केलें तेंहि मिथ्यारूप ।
तथापी फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥
कर्ता हाच मुळात अरूप आणि जे केले तेही मिथ्यारूप हे सर्वच विलक्षण आहे. पण तरी श्रोत्यांचा जो आक्षेप आहे, तो फेडणे आवश्यक असल्याने त्याचे निरसन करूया असे समर्थ म्हणतात. (५५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मआशंकानिरूपण समास दुसरा ॥ २ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सूक्ष्मआशंकानिरूपण’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥

अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई ।
तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, अरे, जे झालेच नाही त्या विश्वाबद्दल तू प्रश्न करीत आहेस तर काय सांगावे ? तथापि तुझ्या मनातीलसशय नष्टव्हावा, म्हणून निरूपण करतो. (१)

दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग ।
मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥
दोरी असते म्हणून भुजंग भासतो, जळ असते म्हणून तरंगाचा भास होतो, सूर्य आहे म्हणून मृगजळ प्रत्यक्ष वाहताना दिसते. (२)

कल्पेनिकरितां स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे ।
जळाकरितां गार वसे । निमिष्य येक ॥ ३ ॥
मनातील कल्पनेमुळे स्वप्न दिसते, शिंपला असतो, म्हणून रुपे भासते, जल असते म्हणून क्षणभर त्यात बर्फ अथवा गारा दिसून येतात. (३)

मातीकरितां भिंती जाली । सिन्धुकरितां लहरी आली ।
तिळाकरितां पुतळी । दिसों लागे ॥ ४ ॥
मातीमुळे भिंत भासते, समुद्रामुळे लहरींचा भास होतो, डोळ्यांतील बाहुल्यांमुळे दृश्य दिसू लागते. (४)

सोन्याकरितां अळंकार । तंतुकरितां जालें चीर ।
कासवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥
तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जालें ।
बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥
सोन्यामुळे अलंकार भासतात, तंतूंच्यामुळे वस्त्राचा भास होतो आणि कासवामुळेत्याचे हातपाय हेनवीन निर्माण झाल्यासारखे भासतात. तूप असते तेच घट्टझाल्यासारखे दिसते, खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे मीठ झाल्यासारखे भासते आणि बिंबामुळे प्रतिबिंब बिंबून द्वैत भासते. (५- ६)

पृथ्वीकरितां जालें झाड । झाडाकरितां च्ह्याया वाड ।
धातुकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ॥ ७ ॥
पृथ्वीतूनच झाड होते, झाडामुळेच छायेचा भास होतो, धातू- धातू एकरूपच असतात पण त्यांच्या विविध रंगांमुळे त्यांना कमी- अधिक महत्त्व दिले जाते. (७)

आतां असो हा दृष्टांत । अद्वैतास कैंचें द्वैत ।
द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥
असो. आता हे दृष्टान्त देणे पुरे झाले. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कसे असणार ? पण द्वैताचा आश्रय घेतल्यावाचून अद्वैतासंबंधी बोलताच येत नाही. (८)

भासाकरितां भास भासे । दृश्याकरितां अदृश्य दिसे ।
अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरोपम ॥ ९ ॥
आपल्याला जे हे विविध भास होत असतात, त्यांच्यामुळे दृश्य विश्व हा भास कसा आहे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. या दृश्य वृष्टीचा शोध घेऊ लग्नाले की अदृश्य अशा आत्मवस्तूची प्राप्ती होते. खरे तर जे अदृश्य आहे त्याला दृश्य वस्तूची उपमाच देता येत नाही म्हणून ते खरेतर निरुपमच आहे. (९)

कल्पेनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत ।
द्वैतावेगळें द्वैत । कैसें जालें ॥ १० ॥
कल्पनेशिवाय विचार करता येत नाही. दृश्यच नसेल तर त्याबद्दलचा दृष्टान्त देता येत नाही आणि मुळात द्वैत नसताना हे द्वैत आले कोठून ? (१०)

विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी ।
तेणें केली उभवणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥
(खरोखर याचे उत्तर देणे अवघड आहे.) भगवंताची करणी फार विचित्र आहे. तिचे वर्णन म्हणजे सहस्त्र मुखे असलेला शेषही करू शकत नाही. त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडांची निर्मिती केली आहे. (११)

परमात्मा परमेश्वरु । सर्वकर्ता जो ईश्वरू ।
तयापासूनि विस्तारु । सकळ जाला ॥ १२ ॥
परमात्मा परमेश्वर जो या सर्व सुष्टीचा कर्ता असून ईश्वर म्हणून ज्यास म्हणतात, त्याच्यापासून हा अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झाला आहे. (१२)

ऐसीं अनंत नामें धरी । अनंत शक्ती निर्माण करी ।
तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥
ज्याची अनंत नामे आहेत, जो अनंत शक्तींना निर्माण करतो तोच मूळपुरूष म्हणजेच मूळमाया अथवा मायाविशिष्ट ईश्वर होय असे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे. (१३)

त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाचि आपण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥
मूळमाया म्हणजेच हा मूळपुरूष असून सर्व कर्तृत्व त्याच्या ठायीच निर्माण झाले आहे. (१४)

॥ श्लोक ॥ कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ॥
श्लोकार्थ – कार्य, कारण आणि कर्तृत्व यांचा हेतू मूळ प्रकृतीच आहे.

हे उघड बोलतां न ये । मोडों पाहातो उपाये ।
येरवीं हें पाहतां काय । साच आहे ॥ १५ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, खरे पाहिले तर हे सर्व काही सत्य आहे का ? परंतु हे उघड बोलता येत नाही. कारण असे बोलामुळे सर्व साधनांचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल. (१५)

देवापासून सकळ जालें । हें सर्वांस मानलें ।
परी त्या देवास वोळखिलें । पाहिजे कीं ॥ १६ ॥
देवापासून हे सर्व झाले, हे मत सर्वांना मान्य आहे. पण तरी तो देव कोणता, हे ओळखता तरी यायलाच पाहिजे की ! (१६)

सिद्धांचे जें निरूपण । जें साधकांस न मने जाण ।
पक्व नाहीं अंतःकर्ण । म्हणोनियां ॥ १७ ॥
सिद्धांचे स्वानुभवाने केलेले ब्रह्मनिरूपण साधकांचे अंतःकरण पक्व नसल्याने त्यांना मानवत नाही. (१७)

अविद्यागुणें बोलिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव ।
मूळमाया गुणें देव । बोलिजेतो ॥ १८ ॥
अविद्या उपाधियुक्त जो असतो, त्याला जीव असे म्हणतात. मायेच्या उपाधीने युक्त असतो, तो शिव म्हणून ओळखला जातो आणि मूळ प्रकृतीने युक्त जो असतो, त्यालाच परमात्मा म्हटले जाते. (१८)

म्हणौनि कारण मूळमाया । अनंत शक्ती धरावया ।
तेथीचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥
म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तींची धारणा मूळमायेमुळेच होत असते. पण यातील अर्थ फक्त अनुभवी पुरुषच जाणू शकतो. (१९)

मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश ।
अनंतनामी जगदीश । तयासीचि बोलिजे ॥ २० ॥
स्कृरणरूप मूळमाया तिलाच मूळपुरुष, ईश्वर सर्वेश, जगदीश इत्यादी अनंत नामे दिली जातात. (२०)

अवघी माया विस्तारली । परी हे निशेष नाथिली ।
ऐसिया वचनाची खोली । विरुळा जाणे ॥ २१ ॥
याप्रमाणे हा सर्व मायेचाच विस्तार आहे, पण ही पूर्णपणे मिथ्याच आहे. हे जे विधान केले आहे यातील सखोल अर्थ एखादाच जाणतो. (२१)

ऐसें अनुर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे ।
संतसंगेविण नुमजे । कांही केल्यां ॥ २२ ॥
हे शब्दांत न सांगता येण्यासारखे सांगितले जात आहे खरे; पण हे स्वानुभवाने जाणता येते. पण संतसमागमाशिवाय हे काही केल्या उमजत नाही. (२२)

माया तोचि मूळपुरुष । साधकां न मने हें निशेष ।
परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥
मूळ माया तोच मूळपुरूष असे सांगितले, तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला असे वाटते की, मग अनंत नामे असलेला जगदीश कोणाला म्हणायचे ? (२३)

नामरूप माये लागलें । तरी हें बोलणें नीटचि जालें ।
येथें श्रोतीं अनुमानिलें । कासयासी ॥ २४ ॥
परब्रह्म हे नामरूपातीत असते. नामरूपे ही सर्व मायेमुळेच उत्पन्न झाली आहेत. म्हणून अनंतनामे असलेला जगदीश म्हणजेच माया हे म्हणणे योग्यच झाले. येथे श्रोत्यांनी शंका घेण्यास खरे तर वावच नाही. (२४)

आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली ।
निराकारीं कैसी जाली । मूळमाया ॥ २५ ॥
असो. आता हे सर्व बोलणे राहू दे मागील शंका ‘ निराकारी मूळ माया कशी झाली ?’ ही तशीच राहिली आहे. (२५)

दृष्टीबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा जाला खेळ ।
हेंचि आतां अवघें निवळ । करून दाऊं ॥ २६ ॥
त्या शंकेचे आता निरसन करतात की, नजरबंदीचा खेळ करतात, त्यावेळी ज्या वस्तू निर्माण करतात त्या सर्व मिथ्याच असतात. तसेच हे दृश्य जग म्हणजे नजरबंदीचा खेळच असून तो कसा खेळ्या जातो हेच आता स्पष्ट करून दाखवू या. (२६)

आकाश असतां निश्चळ । मधें वायो जाला चंचळ ।
तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥
आकाश निश्चल असताना तेथे एकाएकी चंचल वायू उत्पन्न होतो. तशी निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात स्कृरणरूप मूळमाया उत्पन्न झाली असे जाणावे. (२७)

रूप वायोचें जालें । तेणें आकाश भंगलें ।
ऐसें हें सत्य मानलें । नवचे किं कदा ॥ २८ ॥
वायू निर्माण झाला म्हणून आकाश भंगले गेले. हे कधीही सत्य मानता येत नाही. (२८)

तैसी मूळमाया जाली । आणी निर्गुणता संचली ।
येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥
त्याप्रमाणे मूळ माया झाली आणि तरी निर्गुणता तशीच राहिली हे कसे झाले हे वरील दृष्टान्ताने कळले. त्यामुळे मागील शंका फिटली. (२९)

वायु नव्हता पुरातन । तैसी मूळमाया जाण ।
साच म्हणतां पुन्हा लीन । होतसे ॥ ३० ॥
वायू ज्याप्रमाणे पूर्वी आकाशांत नव्हता, त्याचप्रमाणे मूळ माया आहे असे जाणावे. तिला सत्यही म्हणता येत नाही. कारण ती पुन्हा परब्रह्मात लीन होते. (३०)

वायो रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहें ।
भासे परी तें न लाहे । रूप तयेचें ॥ ३१ ॥
वायूचे रूप जसे आहे तशीच मूळमाया आहे असे जाणावे. ती भासते तर खरी; पण प्रत्यक्ष तिचे रूप दाखविता येत नाही. (३१)

वायो सत्य म्हणो जातां । परी तो न ये दाखवितां ।
तयाकडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥
वायूला सत्य म्हणायला जावे तर तो दाखवता येत नाही. त्याला पाहायचा प्रयत्न करू लागले तर धूळच दिसते. (३२)

तैसी मूळमाया भासे । भासी परी ते न दिसे ।
पुढें विस्तारली असे । माया अविद्या ॥ ३३ ॥
त्याप्रमाणेच मूळमाया भासते, जाणवते पण दिसत नाही. तिच्यातूनच पुढे अविद्या माया विस्तार पावते. (३३)

जैसें वायोचेनि योगें । दृश्य उडे गगनमार्गें ।
मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४ ॥
वायूच्या योगे ज्याप्रमाणे ढग (धूळ) वगैरे आकाशमार्गाने उडू लागतात असे दिसून येते, तसेच मूळमायेच्या योगाने ही दृश्य वृष्टी दिसू लागते. (३४)

गगनीं आभाळ नाथिलें । अकस्मात उद्भवलें ।
मायेचेनि गुणें जालें । तैसें जग ॥ ३५ ॥
पूर्वी आकाशात आभाळ नव्हते. नंतर अकस्मात उद्भवले, तसे मायेच्यामुळे निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जग भासू लागले. (३५)

नाथिलेंचि गगन नव्हतें । अकस्मात आलें तेथें ।
तैसें दृश्य जालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥
गगनात पूर्वीपासून आभाळ नव्हते व नंतरही राहणार नाही म्हणजेच तेनित्य नसल्यानेमिथ्या होय. तसेचपरब्रह्माच्या ठिकाणी हे दृश्य जग दिसते असे जाणावे. (३६)

परी त्या आभाळाकरितां । गगनाची गेली निश्चळता ।
वाटे परी ते तत्वता । तैसीच आहे ॥ ३७ ॥
त्या ढगांच्या येण्याजाण्यामुळे आकाशाची गानाची निश्चलता गेली असे वाटते, परंतु तत्त्वतः ती तशीच असते. (३७)

तैसें मायेकरितां निर्गुण । वाटे जालें सगुण ।
परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८ ॥
त्याप्रमाणेमायेच्या योगानेनिर्गुण सगुणझाले असे वाटते पण वास्तविक पाहता ते संपूर्ण जसेच्या तसेच असते. (३८)

आभाळ आले आणि गेलें । तरी गगन तें संचलें ।
तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥
ढग आले आणि गेले तरी आकाश जसे पूर्वी होते तसेच असते, तसेच निर्गुण ब्रह्म कधी सगुण होत नाही. ते जसेच्या तसेच संपूर्ण असते. (३९)

नभ माथा लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे ।
तैसें जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥
दुरून पाहिले की आकाश अगदी डोंगरमाथ्याला भिडले आहे असे दिसते, पण वास्तविक ते जसेच्या तसेच असते, त्याप्रमाणेच निर्गुण ब्रह्म जसेच्या तसेच असते हे जाणून घ्यावे. (४०)

ऊर्ध पाहातां आकाश । निळिमा दिसे सावकास ।
परि तो जाणिजे मिथ्याभास । भासलासे ॥ ४१ ॥
वर आकाशाकडे पाहिले की आकाश निळे आहे असे दिसते परंतु तो वास्तविकमिथ्याभासच भासत असतो. (४१)

आकाश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें ।
वाटे विश्वास कोंडिले । परी तें मोकळेचि असे ॥ ४२ ॥
आकाशाकडे पाहिले की असे वाटते की त्यांनी चारी बाजूंनी जणू जगाला आवळून धरले आहे, विश्वाला कोंडले असून त्यावर पालथे घातलेल्या आच्छादनासारखे ते भासते; पण वास्तविक तो भासच असतो. ते जसेच्या तसे मोकळेच असते. (४२)

पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला नसे ।
अलिप्त जाणावे तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥
दुरून पर्वतांकडे पाहिले की, ते निळ्या रंगाचे दिसतात पण जवळ गेले की तसे दिसत नाहीत. निळा रंग त्यांना लागलेलाच नसतो. तसेच निर्गुण ब्रह्म मायेपासून अलिप्तच असते, हे जाणून घ्यावे. (४३)

रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ ।
तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४ ॥
रथ धावत असता त्यात बसणाऱ्या माणसाला पृथ्वीच धावते आहे, ती चंचल आहे असे वाटते परंतु ती निश्चलच असते. तसे निर्गुण परब्रह्म हेनिश्चल असते, हेजाणावे. (४४)

आभाळाकरितां मयंक । वाटे धावतो निशंक ।
परी तें अवघें माईक । आभाळ चळे ॥ ४५ ॥
आकाशात चंद्र उगवलेला असताना ढग आले तर त्या ढगांच्यामुळे निःशंकपणे असे वाटते की चंद्रच धावतो आहे पण ते दृश्य मायिक असते म्हणजे तो केवळ भास असतो. (४५)

झळे अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंत्राळ ।
वाटे परी तें निश्चळ । जैसें तैसें ॥ ४६ ॥
अग्नीच्या झळीने अथवा अग्नीच्या च्चाळेमुळे अग्नीच्या वरील वातावरण कंपित झाल्यासारखे दिसते. पण वास्तविक ते जसेच्या तसे निश्चलच असते. (४६)

तैसें स्वरूप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें ।
ऐसें कल्पनेसि गमलें । परी ते मिथ्या ॥ ४७ ॥
तसेच ब्रह्मस्वरूप हे सर्वत्र कोंदटलेले असताना निश्चल असताना ते सगुण झाले आहे, असे कल्पनेला वाटते. पण ते वाटणे मिथ्या होय. (४७)

दृष्टिबंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ ।
वस्तु शाश्वत निश्चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥
नजरबंदीच्या खेळाप्रमाणे माया ही चंचल आहे. नजरबंदीच्या खेळात जसे क्षणोक्षणी बदल होताना दिसतात पण तो भास असतो तशी वस्तू म्हणजे परब्रह्म हे शाश्वत व निश्चल असून, जसेच्या तसेच असते. त्यात कधी बदल, परिवर्तन होत नाही. (४८)

ऐसी वस्तु निरावेव । माया दाखवी अवेव ।
ईचा ऐसा स्वभाव । नाथिलीच हे ॥ ४९ ॥
तसेच परब्रह्म निरवयव असून मायेमुळे सावयव भासते. ‘ जे नाही ते दाखवणे ‘ हा तर मायेचा स्वभावच आहे. म्हणूनच ती मिथ्या आहे. (४९)

माया पाहातां मुळीं नसे । परी हे साचा ऐसी भासे ।
उद्भवे आणि निरसे । आभाळ जैसें ॥ ५० ॥
वास्तविक मायेला अस्तित्वच नाही तरी ती खऱ्यासारखी भासते. आकाशात ढग येतात व जातात त्याप्रमाणे ती उत्पन्न होते आणि नाश पावते. (५०)

ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली ।
अहं ऐसी स्फुर्ति जाली । तेचि माया ॥ ५१ ॥
याप्रमाणे माया उत्पन्न झाली. परब्रह्म वस्तू जशीच्या तशी निर्गुणच संचलेली आहे. बहु स्माम् असे जे स्कृरण तीच माया होय. (५१)

गुणमायेचे पवाडे । निर्गुणीं हें कांहींच न घडे ।
परी हें घडे आणी मोडे । सस्वरूपीं ॥ ५२ ॥
सर्व दृश्य विश्व हे गुणमय मायेचे लाघव असते. निर्गुणाच्या ठिकाणी काहीच घडत नाही, पण ब्रह्माच्या स्वस्वरूपाच्या आधारावर ही उद्‌भव व लयरूपी घडामोड होत असते. (५२)

जैसी दृष्टी तरळली । तेणें सेनाच भासली ।
पाहातां आकाशींच जाली । परी ते मिथ्या ॥ ५३ ॥
दृष्टी भांबावली म्हणजे आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार सेना वगैरे भासू लागतात, पण ते मिथ्याच असतात. (५३)

मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ ।
नानातत्वांचा पाल्हाळ । सांडूनियां ॥ ५४ ॥
पाल्हाळलावून तत्त्वांचे वर्णन न करताच मिथ्या मायेच्या उद्‌भवाचा खेळ कसा चालतो ते सर्व सांगितले आहे. (५४)

तत्वें मुळींच आहेती । वोंकार वायोची गती ।
तेथीचा अर्थ जाणती । दक्ष ज्ञानी ॥ ५५ ॥
मूळ मायेतच तत्त्वें आहेत. प्रथमचे चंचलत्व हाच ओंकार आहे. यातील अर्थ अथवा अभिप्राय चतुर सावध, ज्ञानी लोकच जाणतात. (५५)

मूळमायेचे चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
सूक्ष्म तत्वें तेंचि जाण । जडत्वा पावलीं ॥ ५६ ॥
मूळ मायेची जी हालचाल तेच वायूचे लक्षण होय. प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपात असलेली तत्त्वेंच जडत्व पावतात, म्हणजे स्थूल रूपात प्रगट होतात. (५६)

ऐसीं पंचमाहांभूतें । पूर्वीं होती अवेक्तें ।
पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥
अशी ही पंचमहाभूते प्रथम अव्यक्त दशेत असतात. वृष्टीची रचना होते, त्यावेळी ती व्यक्त होतात. (५७)

मूळमायेचें लक्षण । तेंचि पंचभूतिक जाण ।
त्याची पाहें वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५८ ॥
पांचभौतिक दृश्यसुष्टी हे मूळमायेचे लक्षण आहे. सूक्ष्म दृष्टीने त्याची ओळख करून घ्यावी. (५८)

आकाश वायोविण । इच्ह्याशब्द करी कोण ।
इच्हाशक्ती तेचि जाण । तेजस्वरूप ॥ ५९ ॥
आकाशात जसा वायूच्या हालचालीशिवाय आवाज होत नाही. त्याचप्रमाणे निश्चल स्वरूपात या चचक्याशिवाय इच्छा-स्कृर्ती होणे शक्य नाही. ती इच्छाशक्ती म्हणजेच तेज हे तत्त्व होय. (५९)

मृदपण तेचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ ।
ऐसी मूळमाया सकळ । पंचभूतिक जाणावी ॥ ६० ॥
मृदुपण हेच जलतत्त्व असून जडत्व हे पृथ्वीतत्त्व आहे. याप्रमाणे सर्व पंचमहाभूते ही मूळमाया जाणावी अथवा याप्रमाणे मूळमाया ही पांचभौतिक आहे. (६०)

येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी ।
सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पाहातां ॥ ६१ ॥
एका एकापंचमहाभूताच्यापोठतपंचमहाभूतांचे अस्तित्व असते. सूक्ष्म दृष्टीने विचार केला, की हे सर्व कळते. (६१)

पुढें जडत्वास आलीं । तरी असतीं कालवलीं ।
ऐसी माया विस्तारली । पंचभूतिक ॥ ६२ ॥
पुढेती व्यक्त झाली, स्थूलरूपात प्रगटली तरी एकमेकांत काल्पलेली असतात. (त्यांचे मिश्रण झाले असते.) याप्रकारे पंचमहाभूतांच्या रूपाने माया विस्तार पावली. (६२)

मूळमाया पाहातां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं ।
स्वर्ग्य मृत्य पाताळीं । पांचचि भूतें ॥ ६३ ॥
मूळ मायेची सर्व प्रथमची अव्यक्तस्थिती असो किंवा सर्व भूमंडळात विस्तार पावलेली अविद्या असो किंवा स्वर्ग, मृत्यू पाताळ हे तीनही लोक असोत, सर्वत्र या पंचमहाभूतांचाच विस्तार आहे हे दिसून येते. (६३)

॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित्सचराचरं ।
सर्वपंचभूतकं राम षष्ठें किंचिन्न दृश्यते ॥
श्लोक अर्थ – हे सुमा ! स्वर्ग, मृत्यू पाताळ किंवा जे थोडे सचसचर आहे ते सर्व पांचमहाभूतांनी भरलेले आहे. याशिवाय सहावे असे काहीही नाही.

सत्य स्वरूप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती ।
पंचभूतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥
आदी- अंती परब्रह्म स्वरूप हेच सत्य आहे. मध्ये पंचमहाभूते कार्यान्वित होतात. मूव्याया ही पांचभौतिकच आहे हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. (६४)

येथें उठिली आशंका । सावध होऊन ऐका ।
पंचभूतें जालीं येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥
येथे शंका उत्पन्न झाली ती सावध होऊन ऐका. एका तमोगुणापासून पंचमहाभूते झाली असे म्हणतात. (६५)

मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचि होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली असे ॥ ६६ ॥
मूळमाया तर गुणावेगळी, गुणातीत आहे मग तेथे पंचमहाभूते कशी होतील ? अशी शंका मागून श्रोत्यांनी घेतली. (६६)

ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । संशयास उभें केलें ।
याचें उत्तर दिधलें । पुढिले समासीं ॥ ६७ ॥
असा आक्षेप घेऊन श्रोत्यांनी संशय व्यक्त केला आहे त्याचे उत्तर पुढील समासांत दिले जाईल. (६७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मआशंकानाम समास तिसरा ॥ ३ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सूक्ष्मआशंकानाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरूपण
॥ श्रीराम ॥

मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ ।
वृत्ति करावी निवळ । निमिष्य येक ॥ १ ॥
मागील समासात जी शंका श्रोत्यांनी विचारली होती, ती आता समूळ नष्ट होईल, अशा प्रकारे स्पष्टीकरण केले जाईल. तरी श्रोत्यांनी क्षणभर वृत्ती निर्मळ करून ऐकावे. (१)

ब्रह्मीं मूळमाया जाली । तिच्या पोटा माया आली ।
मग ते गुणा प्रसवली । म्हणौनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥
परब्रह्माच्या ठिकाणी सर्वप्रथम स्कृरणरूपाने अव्यक्त सूक्ष्म अशी मूळमाया उत्पन्न झाली. नंतर तिच्याच पोटी जी माया झाली, तिच्यापासून गुण झाले, म्हणून तिला गुणक्षोभिणी माया असे म्हणतात. (२)

पुढें तिजपासाव कोण । सत्वरजतमोगुण ।
तमोगुणापासून निर्माण । जाली पंचभूतें ॥ ३ ॥
तिच्यापासून कोणते गुण झाले, म्हणून म्हणाल तर सत्त्वरजतमोगुण उत्पन्न झाले व तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. (३)

ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्वें विस्तारलीं ।
एवं तमोगुणापासून जालीं । पंचमाहांभूतें ॥ ४ ॥
याप्रमाणे प्रथम ती सूक्ष्मत्वाने उत्पन्न होऊन नंतर सुष्टिरूपाने विस्तारून दृश्य झाली. याप्रमाणे तमोगुणापासूनच पंचमहाभूते झाली. (४)

मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली मागां ॥ ५ ॥
पूर्वी श्रोत्यांनी शंका विचारली होती की, मूळमाया तर गुणापलीकडली आहे, मग तेथे पंचमहाभूते कशी झाली ? (५)

आणिक येक येके भूतीं । पंचभूतें असती ।
ते हि आतां कैसी स्थिती । प्रांजळ करूं ॥ ६ ॥
एकेका भूताच्या ठिकाणीही पंचमहाभूते आहेतच. ती स्थिती कशी आहे, हेही आता स्पष्ट करू. (६)

सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पंचभूतिक ।
श्रोतीं विमळ विवेक । केला पाहिजे ॥ ७ ॥
सूक्ष्मरूपाने मूळ मायेत अव्यक्त स्वरूपात पंचभूते असतात, हे कळून येईल. मात्र श्रोत्यांनी नीट विवेक केला पाहिजे. (७)

आधीं भूतें तीं जाणावीं । रूपें कैसीं वोळखावी ।
मग तें शोधून पाहावीं । सूक्ष्मदृष्टीं ॥ ८ ॥
त्यांनी प्रथम पंचभूतांना जाणून घ्यावे, त्यांचे रूप ओळखावे आणि मग सूक्ष्मदृष्टीने त्यांचा शोध घ्यावा. (८)

वोळखी नाही अंतरी । ते वोळखावी कोणेपरी ।
म्हणोनि भूतांची वोळखी चतुरीं । नावेक परिसावी ॥ ९ ॥
कशी ओळखायची याचे ज्ञान नाही, तरी ती ओळखावी तरी कशी ? म्हणून प्रथम चतुर श्रोत्यांनी त्या भूतांना कसे ओळखावे हे क्षणभर ऐकून घ्यावे. (९)

जें जें जड आणी कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण ।
मृद आणी वोलेपण । तितुकें आप ॥ १० ॥
जे जे जड आणि कठीण असते ते पृथ्वीतत्त्वाचे लक्षण असते आणि मृदू आणि ओलेपणा जेथे असतो, ते जलाचे लक्षण होय. (१०)

जें जें उष्ण आणी सतेज । तें तें जाणावें पैं तेज ।
आतां वायोहि सहज । निरोपिजेल ॥ ११ ॥
जे जे उष्ण आणि सतेज असते ते ते तेजाचे लक्षण होय. आता स्वाभाविकच वायूचे लक्षण सांगितले जाईल. (११)

चैतन्य आणी चंचळ । तो हा वायोचि केवळ ।
सून्य आकाश निश्चळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥
चैतन्य आणि चंचलत्व हे वायूचे लक्षण असून शून्य आणि निश्चल पोकळी हे आकाशाचे लक्षण जाणावे. (१२)

ऐसीं पंचमाहांभूतें । वोळखी धरावी संकेतें ।
आतां येकीं पांच भूतें । सावध ऐका ॥ १३ ॥
याप्रमाणे येथे पंचमहाभूतांची लक्षणे सांगितली. त्या संकेतावरून त्यांना ओळखावे. आता प्रत्येक भूतात पाचही भूते कशी आहेत, हे सावध होऊन ऐकावे. (१३)

जें त्रिगुणाहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार ।
यालागीं अति तत्पर । होऊन ऐका ॥ १४ ॥
जे त्रिगुणांच्याही पलीकडले आहे, त्याचा विचार अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून अतितत्यर होऊन ऐका. (१४)

सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी । तेचि आधीं निरोपावी ।
येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥
सूक्ष्म आकाशतत्त्वात मृड्यीतत्त्व कसे आहे, तेच आधी स्पष्ट करून सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी मन एकाग्र करून ऐकावे. (१५)

आकाश म्हणजे अवकाश सून्य । सून्य म्हणिजे तें अज्ञान ।
अज्ञान म्हणिजे जडत्व जाण । तेचि पृथ्वी ॥ १६ ॥
आकाश म्हणजे शून्य पोकळी आणि शून्य म्हणजे अज्ञान होय. अज्ञान म्हणजेच जडत्व होय आणि तेच मृष्यीतत्त्व आहे. (१६)

आकाश स्वयें आहे मृद । तेंचि आप स्वतसिद्ध ।
आतां तेज तेंहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥
आकाश स्वतः मृदू आहे आणि मृदुता हा पाण्याचा गुण आहे म्हणून याप्रमाणे तेथे आप हे तत्त्व आहे. आता तेजतत्त्व आकाशात कसे आहे, तेही स्पष्ट करू या. (१७)

अज्ञानें भासला भास । तोचि तेजाचा प्रकाश ।
आतां वायो सावकाश । साकल्य सांगों ॥ १८ ॥
अज्ञानामुळे जो प्रकाश जाणवतो, ते तेजतत्त्व होय. तेथे आता वायुतत्त्व कसे आहे, ते नीट सांगतो. (१८)

वायु आकाश नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध ।
तथापी आकाशीं जो निरोध । तोचि वायो ॥ १९ ॥
वायू आणि आकाश यांत भेद नाही. आकाशाइतकाच तो स्तब्ध असतो. तथापि आकाशाच्या ठिकाणी जो प्रतिबंध असतो, तो वायू जाणावा. (१९)

आकाशीं आकाश मिसळलें । हें तों नलगे किं बोलिलें ।
येणें प्रकारें निरोपिलें । आकाश् पंचभूत ॥ २० ॥
आकाशात आकाशतत्त्व मिसळलेलेच आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. या प्रकारे आकाश या महाभूतात सर्व पंचमहाभूते कशी आहेत, हे स्पष्ट करून सांगितले आहे. (२०)

वायोमध्यें पंचभूतें । तेंहि ऐका येकचित्तें ।
बोलिजेती ते समस्तें । येथान्वयें ॥ २१ ॥
आता वायूमध्ये पंचमहाभूते कशी आहेत तेही ऐकावे ती अनुक्रमाने सांगितली जातील, ती एकचित्ताने ऐका. (२१)

हळु फूल तरी जड । हळु वारा तरी निबिड ।
वायो लागतां कडाड । मोडती झाडें ॥ २२ ॥
फूल हलके असले, तरी त्याला थोडेतरी वजन असते. वास हख्यारवाहात असला तरी वायु-तत्त्व घनदाटच असते. वल्यानेकडाडूअसा आवाज होऊन झाडे मोडून पडतात. (२२)

तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कहिंच न घडे ।
तोल तोचि तये जडे । पृथ्वीचा अंश ॥ २३ ॥
वजनाशिवाय झाड मोडले, असे कधीच घडत नाही. म्हणजे वायूला वजन आहे. वजन तोल हाच वायूच्या ठिकाणी असलेला पृथ्वी तत्त्वाचा अंश होय. (२३)

येथें श्रोते आशंका घेती । तेथें कैचीं झाडें होतीं ।
झाडें नव्हतीं तरी शक्ती । कठिणरूप आहे ॥ २४ ॥
येथे श्रोत्यांनी शंका घेतली की येथे सूक्ष्म पंचमहाभूतांचे वर्णन चालले असता तेथे झाडे कोठून आली ? (ती तर दृश्य वृष्टी व्यक्त झाल्यावर उत्पन्न झाली.) यावर वक्ता म्हणतो झाडे नव्हती तरी वायूच्या ठिकाणी शक्ती तर होतीच ना ? म्हणून वायूची शक्ती हेच त्यातील कठीणपण आहे आणि कठीणपणा हे पृथ्वीतत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे तेथे पृथ्वीचा अंश आहेच. (२४)

वन्हीस्फुलींग लाहान । कांहीं तर्ह्ही असे उष्ण ।
तैसें सुक्ष्मीं जडपण । सूक्ष्मरूपें ॥ २५ ॥
अग्नीची अगदी लहान ठिणगी लिंगा) असली तरी तेथे अगदी किंचित का होईना उष्णता असतेच. तसे सूक्ष्म वायूमध्ये सूक्ष्मरूपाने जडपणा असतो. (२५)

मृदपण तेंचि आप । भास तेजाचें स्वरूप ।
वायो तेथें चंचळरूप । सहजचि आहे ॥ २६ ॥
वायूमध्ये जो हळुवारपणा असतो ते आपतत्त्व होय आणि त्यातील प्रकाश हा तेजाचा गुण आहे. शिवाय जेथे वायू तेथे चंचलपणा सहजच असतो. (२६)

सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे अवकाश ।
पंचभूतांचे अंश । वायोमधें निरोपिले ॥ २७ ॥
सकल भूतांमध्ये आकाश हे अवकाशरूपाने सहजच असते. याप्रमाणे वायूमध्ये पंचमहाभूतांचे अंश कसे आहेत ते स्पष्ट केले. (२७)

आतां तेजाचें लक्षण । भासलेंपण तें कठीण ।
तेजीं ऐसी वोळखण । पृथ्वीयेची ॥ २८ ॥
आता तेजामध्ये ते कसे आहेत ते सांगतात. प्रकाश हे तेजाचे जे लक्षण आहे, त्यांत जडत्व आहेच तेच मृथ्यी-तत्त्व होय. (२८)

भासला भास वाटे मृद । तेजीं आप तेचि प्रसिद्ध ।
तेजीं तेज स्वतसिद्ध । सांगणेंचि नलगे ॥ २९ ॥
जो प्रकाश दिसला तो मृदू वाटतो. ते आपतत्त्व तेजाच्या ठिकाणचे समजावे, तेजांत तेज असते, हे तर प्रसिद्धच आहे. ते सांगण्याची आवश्यकता नाही. (२९)

तेजीं वायो तो चंचळ । तेजीं आकाश निश्चळ ।
तेजीं पंचभूतें सकळ । निरोपिलीं ॥ ३० ॥
तेजातील चंचलपणा हे वायुतत्त्व आहे तर निश्चलपणा हे आकाशतत्त्व आहे. याप्रमाणे तेजात पंचमहाभूते कशी आहेत, हे स्पष्ट केले आहे. (३०)

आतां आपाचें लक्षण । आप तेंचि जें मृदपण ।
मृदपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥
आपीं आप सहजचि असे । तेज मृदपणें भासे ।
वायो स्तब्धपणें दिसे । मृदत्वाआंगी ॥ ३२ ॥
आकाश न लगे सांगावें । तें व्यापकचि स्वभावें ।
आपीं पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरोपिलीं ॥ ३३ ॥
आप म्हणजे पाणी. आपतत्त्व तेच मृदुपण होय. हलके पाणी आणि जड पाणी असे आपण म्हणतो. जड पाण्यातील जडत्व हेच पृथ्वीतत्त्व आहे. आपांत आपतत्त्व सहजच असते. तेज हे मृदुपणाने भासते. वायू हा मृदुत्याच्या अंगी स्तब्धपणे दिसतो आणि आकाश-तत्त्व त्याच्या व्यापक स्वभावामुळे मुद्दाम वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही. याप्रमाणे आपाच्या ठिकाणी महाभूते कशी आहेत हे स्पष्ट करून सांगितले. (३१ – ३३)

आतां पृथ्वीचें लक्षण । कठीण पृथ्वी आपण ।
कठिणत्वीं मृदपण । तेंचि आप ॥ ३४ ॥
कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश ।
कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायो ॥ ३५ ॥
आता मृथ्वीतत्त्वात ती कशी आहेत ते पाहू कठीणपणा हा तर मृथ्यीतत्त्वाचा गुण आहे. त्या कठीणपणात मृदुता हे आप-तत्त्व होय. कठीणपणाचा जो भास, तो तेजाचा प्रकाश म्हणजे गुण होय. कठीणपणाच्या ठिकाणी जो प्रतिबंध तो वायू होय. (३४- ३५)

आकश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक ।
आकाशींच कांहीं येक । भास भासे ॥ ३६ ॥
आकाशतत्त्व तर सगळ्यांत व्यापून आहे, हा विचार तर प्रगटच आहे. आकाशाच्या ठिकाणी कुठलाही भास भासत असतो. (३६)

आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना ।
आकाश परतें होयेना । तिळमात्र ॥ ३७ ॥
आकाशाला तोडावे म्हटले तर तुटत नाही, फोडावे म्हटले तर ते फुटत नाही. त्याला बाजूला सासवे म्हटले तर ते तिळमात्र सरकत नाही. (३७)

असो आतां पृथ्वीअंत । दाविला भूतांचा संकेत ।
येक भूतीं पंचभूत । तेंहि निरोपिलें ॥ ३८ ॥
असो. याप्रमाणे पृथ्वीपर्यंत सर्व भूतांचे संकेताने वर्णन केले. तसेच एकेका भूतात पंचमहाभूते कशी आहेत, याचेही निरूपण केले. (३८)

परी हें आहाच पाहातां नातुडे । बळेंचि पोटीं संदेह पडे ।
भ्रांतिरूपें अहंता चढे । अकस्मात ॥ ३९ ॥
पण वरवर पाहिले असता हे कळत नाही आणि त्यामुळे बळेच मनात संशय उत्पन्न होतो आणि त्यामुळे भ्रांती उत्पन्न होऊन अहंकार एकाएकी वाढतो. (३९)

सूक्ष्मदृष्टीनें पाहातां । वायोचि वाटे तत्वता ।
सूक्ष्म वायो शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥
सूक्ष्म दृष्टीने विचार केला की सर्व सूक्ष्म वायूचा खेळ आहे असे वाटते. पण सूक्ष्म वायूचा शोध घेऊ लागले की, पंचमहाभूते दिसून येतात. (४०)

एवं पंचभूतिक पवन । तेचि मूळमाया जाण ।
माया आणी सूक्ष्म त्रिगुण । तेहि पंचभूतिक ॥ ४१ ॥
थोडक्यात पंचमहाभूतांसह वायू म्हणजेच मूळमाया होय. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेहीपंचभौतिकच आहेत. (४१)

भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।
पंचभूतिक जाणिजे । अष्टधा प्रकृति ॥ ४२ ॥
पंचमहाभूतांत त्रिगुण मिळविले म्हणजे त्यांना अष्टधा म्हणतात. म्हणून अष्टधा प्रकृती ही पांचभौतिकच आहे. (४२)

शोधून पाहिल्यावीण । संदेह धरणें मूर्खपण ।
याची पाहावी वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥
कुठल्याही गोष्टीचा शोध न घेता संदेह धरणे हा मूर्खपणा आहे. सूक्ष्म दृष्टीने विचार करून सर्वांची माहिती करून घ्यावी. (४३)

गुणापासूनि भूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
जडत्वा येऊन समस्तें । तत्वें जालीं ॥ ४४ ॥
मूळमायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपात असलेली पंचमहाभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात. जडत्वास येऊन समस्त तत्त्वें प्रगट होतात. (४४)

पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्वरचना ।
बोलिली असे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥
यानंतर जी तत्त्वविवंचना, पिंड ब्रह्मांडातील तत्त्वरचना वगैरे सांगितली जाते, ती लोकांना माहीतच आहे. (४५)

हा भूतकर्दम बोलिला । सूक्ष्म संकेतें दाविला ।
ब्रह्मगोळ उभारला । तत्पूर्वीं ॥ ४६ ॥
याप्रमाणे पंचमहाभूतांचे मिश्रण कसे झाले हे बुद्धिगम्य तर्काने दाखविले आहे. हे सर्व वर्णन ब्रह्मांडाची रचना होण्यापूर्वीचे आहे. (४६)

या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी । जैं जाली नव्हती सृष्टी ।
मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥
या सर्व गोष्टी, ब्रह्मांडाच्या रचनेच्या पूर्वी जेव्हा दृश्य वृष्टी झाली नव्हती, तेव्हाच्या आहेत. सूक्ष्म दृष्टीने विचार करून मूळ्यायेचे स्वरूप जाणून घ्यावे. (४७)

सप्तकंचुक प्रचंड । जालें नव्हतें ब्रह्मांड ।
मायेअविद्येचें बंड । ऐलिकडे ॥ ४८ ॥
पंचमहाभूते, अहंकार आणि महत्- तत्त्व ही ब्रह्मांडाची आवरणे आहेत असे मानतात. या स आवरणांसह असलेल्या प्रचंड ब्रह्मांडाची रचना, तसेच माया व अविद्या माया यांचे कार्य या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. (४८)

ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलिकडिल विचार ।
पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलिकडे ॥ ४९ ॥
ब्रह्मा, विष्णू महेश्वरतसेच पृथ्वी, मेरुपर्वत, सागर यांची रचना वगैरे सर्व अलीकडील गोष्टी आहेत. (४९)

नाना लोक नाना स्थानें । चन्द्र सूर्य तारांगणें ।
सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥ ५० ॥
अनेक लोक, अनेक स्थाने, चंद्र, सूर्य, तारांगणे, सात द्वीपे, चौदा भुवने या सर्वांची उत्पत्ती अलीकडील आहे. (५०)

शेष कूर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गें अष्ट दिग्पाळ ।
तेतिस कोटि देव सकळ । ऐलिकडे ॥ ५१ ॥
शेष, कूर्म, स पाताळ एकवीस स्वर्ग, अष्टदिग्पाल तेहतीस कोटी देव हे सर्व अलीकडील आहे. (५१)

बारा आदित्य । अक्रा रुद्र । नव नाग सप्त ऋषेश्वर ।
नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥ ५२ ॥
बास आदित्य, अकरा रुद्र, नवनाग, ससर्षी, नाना देवांचे अवतार या सर्व गोष्टी अलीकडील आहेत. (५२)

मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पति ।
आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥ ५३ ॥
मेघ, मनू चक्रवर्ती राजे, व इतर नाना जीवांची उत्पत्ती असा हा विस्तार किती म्हणून सांगावा ? म्हणून आता हे सांगणे पुरे (५३)

सकळ विस्ताराचें मूळ । ते मूळ मायाच केवळ ।
मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४ ॥
या सर्व विस्ताराचे मूळ केवळ मूळमायाच आहे. ती मूळमाया पंचभौतिक कशी आहे, याचे सविस्तर वर्णन मागे केले आहे. (५४)

सूक्ष्मभूतें जे बोलिलीं । तेचि पुढें जडत्वा आलीं ।
ते सकळहि बोलिलीं । पुढिले समासीं ॥ ५५ ॥
प्रथम ज्या सूक्ष्म पंच भूतांचे वर्णन केले आहे, तीच पुढे जडत्वास कशी आली, ते सर्व वर्णन पुढील समासात सांगितले जाईल. (५५)

पंचभूतें पृथकाकारें । पुढें निरोपिलीं विस्तारें ।
वोळखीकारणें अत्यादरें । श्रोतीं श्रवण करावीं ॥ ५६ ॥
पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचे स्वतंत्र, सविस्तर वर्णन पुढे केले आहे. त्याची ओळख पटवी, म्हणून श्रोत्यांनी अत्यंत आदराने ते श्रवण करावे. (५६)

पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणें कळे हा प्रांजळ ।
दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७ ॥
हा ब्रह्मांडगोल पंचभौतिक कसा आहे हे स्पष्टपणे कळले म्हणजे दृश्य वृष्टीची आसक्ती सुटून आत्मवस्तूची प्राप्ती होईल. (५७)

माहाद्वार वोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें ।
तैसें दृश्य हे। सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥
प्रथम महाद्वार ओलांडावे तेव्हा देवदर्शन होते. त्याप्रमाणे ह्या दृश्य वृष्टीचे रूप जाणून घेऊन तिचा त्याग करावा. (५८)

म्हणोनि दृश्याचा पोटीं । आहे पंचभूतांची दाटी ।
येकपणें पडिली मिठी । दृश्य पंचभूतां ॥ ५९ ॥
या दृश्य वृष्टीच्या पोटी पंचमहाभूतांचीच गर्दी झालेली आहे. दृश्य आणि पंचमहाभूते यांची एकपणे मिठी पडली आहे म्हणजे दोन्ही एकरूपच आहेत. सर्व दृश्य हे पंचभौतिकच आहे. (५९)

एवं पंचभूतांचेंचि दृश्य । सृष्टी रचली सावकास ।
श्रोतीं करून अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥
थोडक्यात म्हणजे पंचमहाभूतांपासून यथावकाश सर्व दृश्य वृष्टीची रचना झाली आहे. श्रोत्यांनी सावकाशपणे श्रवण करावे. (६०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मपंचभूतेंनिरूपणनाम समास चवथा ॥ ४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सूक्ष्मपंचभूतेनिरूपणनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम
॥ श्रीराम ॥

केवळ मूर्ख तें नेणे । म्हणौन घडलें सांगणे ।
पंचभूतांचीं लक्षणें । विशद करूनि ॥ १ ॥
मूर्ख असतात ते पंचमहाभूतांची लक्षणे जाणत नाहीत म्हणून स्पष्ट करून सांगणे भाग पडले. (१)

पंचभूतांचा कर्दम जाला । आतां न वचे वेगळा केला ।
परंतु कांहीं येक वेगळाला । करून दाऊं ॥ २ ॥
पंचमहाभूतांचे मिश्रण झालेले आहे. आता त्यांना वेगळे करता येत नाही. परंतु काही एक वेगळे करून दाखवू (२)

पर्वत पाषाण शिळा शिखरें । नाना वर्णें लहान थोरें ।
खडे गुंडे बहुत प्रकारें । जाणिजे पृथ्वी ॥ ३ ॥
पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नाना रंगांचे लहान मोठे खडे गुंडे इत्यादी ही पृथ्वी जाणावी. (३)

नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां ।
वाळुकें वाळु अनेका । मिळोन पृथ्वी ॥ ४ ॥
नाना रंगांची माती, नाना ठिकाणची वाळवंटे अनेक प्रकारची वाळू सर्व मिळून पृथ्वीच आहे. (४)

पुरें पट्टणें मनोहरें । नाना मंदिरें दामोदरें ।
नाना देवाळयें शिखरें । मिळोन पृथ्वी ॥ ५ ॥
नाना नगरे, मनोहर पणे, नाना मंदिरे व रब्रखचित मंदिरे म्हणजे दामोदरे, नाना देवालये व त्यांची शिखरे सर्व मिळून पृथ्वीच आहे. (५)

सप्त द्वीपावती पृथ्वी । काये म्हणोनि सांगावी ।
नव खंडे मिळोन जाणावी । वसुंधरा ॥ ६ ॥
सक्षद्वीपे असलेली नऊ खडे मिळून सर्व वसुंधरा म्हणजे ही पृथ्वीच आहे. (६)

नाना देव नाना नृपती । नाना भाषा नाना रिती ।
लक्ष चौयासी उत्पत्ती । मिळोन पृथ्वी ॥ ७ ॥
नाना देव, नाना राजे, नाना भाषा, नाना रीती, चौऱ्यांशी लक्ष योनी सर्व मिळून पृथ्वीच आहे. (७)

नाना उद्वसें जें वनें । नाना तरुवरांचीं बनें ।
गिरीकंदरें नाना स्थानें । मिळोन पृथ्वी ॥ ८ ॥
उद्द्धस्त झालेली अनेक वने, तसेच व्यवस्थितपणे लावलेल्या अनेक बागा, गिरिकंदरे इत्यादी नाना स्थाने मिळून पृथ्वीच आहे. (८)

नाना रचना केली देवीं । जे जे निर्मिली मानवी ।
सकळ मिळोन पृथ्वी । जाणिजें श्रोतीं ॥ ९ ॥
देवांनी केलेली सर्व बहुविध रचना व मानवाने जी विविध निर्मिती केली आहे ती सर्व पृथ्वीच आहे. (९)

नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्नें जे अनेक ।
नाना काष्ठवृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥
सुवर्णादी अनेक धातू अनेक प्रकारची रखे व अनेक काष्ठ- वृक्षादी सर्व मिळून पृथ्वीच आहे. (१०)

आतां असो हें बहुवस । जडांश आणी कठिणांश ।
सकळ पृथ्वी हा विश्वास । मानिला पाहिजे ॥ ११ ॥
आता हे किती म्हणून सांगावे ? ज्या ज्या वस्तूमध्ये जडांश आणि कठिणांश आहे ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. (११)

बोलिलें पृथ्वीचे रूप । आतां सांगिजेल आप ।
श्रोतीं वोळखावें रूप । सावध होऊनी ॥ १२ ॥
प्रथम पृथ्वीचे रूपाबद्दल सांगितले. आता आपाचे रूपाबद्दल सांगतो, ते श्रोत्यांनी सावध होऊन जाणून घ्यावे व ओळखावे. (१२)

वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जें नीर ।
मेघ आणी सप्त सागर । मिळोन आप ॥ १३ ॥
विहिरी, आड सरोवरे, अनेक नद्यांचे पाणी, मेघ आणि सागर हे सर्व मिळून आप होय. (१३)

॥ श्लोकार्ध – क्षारक्षीरसुरासर्पिर्दधि इक्षुर्जलं तथा ॥
अर्थ-खारट पाणी, दूध, मध, तूप, दही, उसाचा रस व गोड पाणी असे सात समुद्र आहेत.

क्षारसमुद्र दिसताहे । सकळ जन दृष्टीस पाहे ।
जेथें लवण होताहे । तोचि क्षारसिंधु ॥ १४ ॥
खास समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे. ज्यातून मीठ निर्माण होते तो क्षारसिंधू होय. (१४)

येक दुधाचा सागर । त्या नाव क्षीरसागर ।
देवें दिधला निरंतर । उपमन्यासी ॥ १५ ॥
एक दुधाचा सागर आहे. त्याचे नाव क्षीरसागर आहे. तो देवाने उपमजूला निरंतर देऊन टाकला आहे. (१५)

येक समुद्र मद्याचा । येक जाणावा घृताचा ।
येक निखळ दह्याचा । समुद्र असे ॥ १६ ॥
एक मद्याचा समुद्र आहे. एक तुपाचा समुद्र आहे. तर केवळ दह्याचा एक समुद्र आहे. (१६)

येक उसाच्या रसाचा । येक तो शुद्ध जळाचा ।
ऐसा सातां समुद्राचा । वेढा पृथ्वीयेसी ॥ १७ ॥
एक उसाच्या रसाचा समुद्र आहे तर एक केवळ शुद्ध पाण्याचा आहे. अशा सात समुद्रांचा पृथ्वीला वेढा आहे. (१७)

एवं भूमंडळीचें जळ । नाना स्थळींचें सकळ ।
मिळोन अवघें केवळ । आप जाणावें ॥ १८ ॥
याप्रमाणे सर्व भूमंडळातील जळ एवढेच नव्हे तर इतर अनेकठिकाणांचे सर्व जल ते सर्व मिळून आप जाणावे. (१८)

पृथ्वीगर्भीं कितीयेक । पृथ्वीतळीं आवर्णोदक ।
तिहीं लोकींचें उदक । मिळोन आप ॥ १९ ॥
पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील सर्व जलांश एवढेच नव्हे, तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून आप जाणावे. (१९)

नाना वल्ली बहुवस । नाना तरुवरांचे रस ।
मधु पारा अमृत विष । मिळोन आप ॥ २० ॥
नाना प्रकारच्या वेली, नाना तरुवरांचे रस, मध, पारा, अमृत, विष सर्व मिळून आपच आहे. (२०)

नाना रस स्नेहादिक । याहि वेगळे अनेक ।
जगावेगळे अवश्यक । आप बोलिजे ॥ २१ ॥
नाना रस, तेलादी, याखेरीज अनेक वेगळे रस, जल व त्याशिवायही जे मृदु शीतल, ओले आहे ते ते सर्व आप समजावे. (२१)

सारद्र आणी सीतळ । जळासारिखें पातळ ।
शुक्लीत शोणीत मूत्र लाळ । आप बोलिजे ॥ २२ ॥
ओले आणि शीतल, तसेच जळासारखे पातळ असे जे रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी तेही आपच समजावे. (२२)

आप संकेतें जाणावें । पातळ बोलें वोळखावें ।
मृद सीतळ स्वभावें । आप बोलिजे ॥ २३ ॥
जे जे पातळ, ओले, मृदू आणि शीतल स्वभावाचे असेल, ते आपण संकेताने आप म्हणून ओळखावे. (२३)

जाला आपाचा संकेत । पातळ मृद गुळगुळित ।
स्वेद श्लेष्मा अश्रु समस्त । आप जाणावें ॥ २४ ॥
पातळ, मृदू आणि गुळगुळीत ही जलाची खूण आहे. म्हणून घाम, कफ, पडसे व असू आदी सर्व आप समजावे. (२४)

तेज ऐका सावधपणें । चंद्र सूर्य तारांगणें ।
दिव्य देह सतेजपणें । तेज बोलिजे ॥ २५ ॥
आता तेजाविषयी सावधपणे ऐका. चंद्र, सूर्य, तारांगणे, तसेच तेजोमय दिव्यदेह हे तेज जाणावे. (२५)

वन्ही मेघीं विद्युल्यता । वन्ही सृष्टी संव्हारिता ।
वन्ही सागरा जाळिता । वडवानळु ॥ २६ ॥
अग्नी, मेघात जी विद्युल्लता चमकते ते तेजतत्त्व होय. तसेच सर्व वृष्टीचा संहार करणारा प्रलयाग्नी आणि सागराला जाळणास वडवानल, (२६)

वन्ही शंकराचे नेत्रींचा । वन्ही काळाचे क्षुधेचा ।
वन्ही परीघ भूगोळाचा । तेज बोलिजे ॥ २७ ॥
तसेच शंकराच्या नेत्रांतील अग्नी, सर्वांना भक्षण करणारा जो काळ त्याची भूक असणारा अग्नी आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील अग्नी हे सर्व तेजतत्त्व होय. (२७)

जें जें प्रकाश रूप । तें तें तेजाचें स्वरूप ।
शोषक उष्णादि आरोप । तेज जाणावे ॥ २८ ॥
जे जे प्रकाशरूप असेल, ते ते तेजाचेच स्वरूप होय. तसेच शोषकता, उष्णता यांचे आरोपही तेज- तत्त्वामुळेच होतात. (२८)

वायो जाणावा चंचळ । चैतन्य चेतवी केवळ ।
बोलणें चालणें सकळ । वायुमुळें ॥ २९ ॥
आता वायूसंबंधी ऐका. वायू हा चंचल समजावा. चैतन्य वायूमुळे जाणवते. सर्व शरीराच्या हालचाली, बोलणे, चालणे इत्यादी वायूमुळे होतात. (२९)

हाले डोले तितुका पवन । कांहीं न चले पवनेंविण ।
सृष्टी चाळाया कारण । मूळ तो वायो ॥ ३० ॥
हलणे, डोलणे वगैरे क्रिया वायूमुळेच होतात. वायूशिवाय चलनवलन काही होऊच शकत नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी, क्रिया यांना मूळ वायूच कारणीभूत आहे. (३०)

चळण वळण आणी प्रासारण । निरोध आणी अकोचन ।
सकळ जाणावा पवन , चंचळरूपी ॥ ३१ ॥
चलनवलन, प्रसरण आणि आकुंचन व निरोध यामागे चंचल असे वायुतत्त्वच असते हे जाणून घ्यावे. (३१)

प्राण अपान आणी व्यान । चौथा उदान आणी समान ।
नाग कुर्म कर्कश जाण । देवदत्त धनंजये ॥ ३२ ॥
आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण व नाग, कूर्म, कृकल देवदत्त व धनंजय हे पाच उपप्राण हे वायुतत्त्व होय. (३२)

जितुकें कांहीं होतें चळण । तितुकें वायोचें लक्षण ।
च्ंद्र सूर्य तारांगण । वायोचि धर्ता ॥ ३३ ॥
जितके काही चलन म्हणजे हालचाल होते ती वायुतत्त्वामुळेच होते. चंद्र, सूर्य, तारांगण यांना वायूच धारण करतो. (३३)

आकाश जाणावें पोकळ । निर्मळ आणी निश्चळ ।
अवकाशरूप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥
यानंतर आकाशाचे वर्णन करीत आहेत. आकाश हे पोकळ निर्मळ आणि निश्चल असून सर्व अवकाश हे आकाशच आहे, हे जाणून घ्यावे. (३४)

आकाश सकळांस व्यापक । आकाश अनेकीं येक ।
आकाशामध्यें कौतुक । चहूं भूतांचे ॥ ३५ ॥
सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापले आहे. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे आणि पृथ्वी, आप, तेज व वायू या इतर चार भूतांचे कार्य आकाशात चालते. (३५)

आकाशा ऐसें नाहीं सार । आकाश सकळांहून थोर ।
पाहातां आकाशाचा विचार । स्वरूपासारिखा ॥ ३६ ॥
आकाशासारखे सार नाही. सर्वांहून आकाश श्रेष्ठ आहे. आकाशाचा विचार करू लागले की, स्वरूपाशी त्याचे साध्य आहे असे वाटू लागते. (३६)

तव शिष्यें केला आक्षेप । दोहीचें सारखेंचि रूप ।
तरी आकाशचि स्वरूप । कां म्हणो नये ॥ ३७ ॥
असे म्हणताच शिष्याने आक्षेप घेतला की, आकाशाचे आणि स्वरूपाचे रूप जर सारखेच आहे, तर आकाशच स्वरूप आहे असे का म्हणू नये ? (३७)

आकाश स्वरुपा कोण भेद । पाहातां दिसेती अभेद ।
आकाश वस्तुच स्वतसिद्ध । कां न म्हणावी ॥ ३८ ॥
आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे ? वर-वरपाहता दोन्हीत भेद नाही, असेच वाटते. मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तु म्हणजेच परब्रह्म असे का म्हणू नये ? (३८)

वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निश्चळ ।
तैसेंचि आकाश केवळ । वस्तुसारिखें ॥ ३९ ॥
आत्मवस्तु अचळ अढळ निर्मळ व निश्चल असते. आकाशही केवळ वस्तूसारखेच आहे. (३९)

ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण पुरातन ।
आकाशाआंगी सप्त गुण । शास्त्रीं निरोपिलें ॥ ४० ॥
हे ऐकून वक्ता बोलू लागला की, वस्तू ही पुरातन असून, निर्गुण आहे. तर आकाशाच्या अंगी सात गुण आहेत, असे शास्त्रात सांगितले आहे. (४०)

काम क्रोध शोक मोहो । भय अज्ञान सुन्यत्व पाहो ।
ऐसा सप्तविध स्वभाव । आकाशाचा ॥ ४१ ॥
काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व असा आकाशाचा सात गुणांनी युक्त असा स्वभाव आहे. (४१)

ऐसें शात्राकारें बोलिलें । म्हणोनि आकाश भूत जालें ।
स्वरूप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥
शास्त्रात असे म्हटले आहे म्हणून आकाशाला भूत असे म्हटले जाते. स्वरूप हे निर्विकार असून निरुपम व सर्वत्र व्यापून महिले आहे. (४२)

काचबंदि आणी जळ । सारिखेंच वाटे सकळ ।
परी येक काच येक जळ । शाहाणे जाणती ॥ ४३ ॥
काचेची जमीन आणि पाणी ही दोन्ही डोळ्यांना सारखीच दिसतात पण शहाणे लोक काच कुठली आणि जळ कोठले, हे अचूक ओळखतात. (४३)

रुवामधें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला ।
तेणें कपाळमोक्ष जाला । कापुस न करी ॥ ४४ ॥
कापसामध्ये स्फटिक पडला तर लोकांना तो त्याच्यासारखा दिसतो. पण स्फटिक कठीण असल्याने कपाळमोक्ष करू शकतो, कापूस करत नाही. (स्त)

तदुलामधें श्वेत खडे । तंदुलासारिखें वांकुडे ।
चाऊं जाता दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥
तांदळात पांढरे खडे असतात. ते तांदळाच्या आकारासारखेच वाकडे असतात. म्हणून प्रथमदर्शनी ओळखू येत नाहीत; पण चावायला गेले तर दात पडतो, तेव्हा ते खडे आहेत हे कळते. (४५)

त्रिभागामधें खडा असे । त्रिभागासारिखाच भासे ।
शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥
चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणांत खडा पडला तर तो त्या मिश्रणासारखाच भासतो. पण शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे हे कळून येते. (४६)

गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड ।
नागकांडी आणी वेखंड । येक म्हणो नये ॥ ४७ ॥
गूळदगड हा गुळासारखा दिसतो पण तो पूर्णपणे कठीण असतो. नागकांडी आणि वेखंड सारखी दिसतात, पण म्हणून त्यांना एक म्हणू नये. (४७)

सोनें आणी सोनपितळ । येकचि वाटती केवळ ।
परी पितळेंसी मिळतां ज्वाळ । काळिमा चढे ॥ ४८ ॥
सोने आणि सोनपितळ अगदी एकसारखीच दिसतात. पण पितळ जर अग्नीत टकले तर काळे पडते. (४८)

असो हे हीन दृष्टांत । आकाश म्हणिजे केवळ भूत ।
तें भूत आणी अनंत । येक कैसे ॥ ४९ ॥
आता हे हीन दृष्टान्त देणे पुरे झाले. आकाश हे एक भूत आहे. ते भूत आणि अनंत असा परमात्मा एक कसे असू शकतील ? (४९)

वस्तुसी वर्णचि नसे । आकाश शामवर्ण असे ।
दोहींस साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥
आत्मवस्तूला रंगच नाही. आकाश शामवर्णी निळ्या रंगाचे आहे. मग विचारवंत त्या दोन्हींत साम्य आहे, असे कसे म्हणतील ? (५०)

श्रोते म्हणती कैंचें रूप । आकाश ठांईचे अरूप ।
आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥
श्रोते म्हणू लागले की, आकाशाला कसले आले आहे रूप ? ते ठायीच अरूपच आहे, म्हणून वस्तू आणि आकाश यांत भेद नाही. (५१)

चहूं भूतांस नाश आहे । आकाश कैसें नासताहे ।
आकाशास न साहे । वर्ण वेक्ती विकार ॥ ५२ ॥
इतर चार भूते नाश पावतात, पण आकाश कुठे नाश पावते ? शिवाय त्याच्या ठिकाणी रंग व दृश्यच हे विकारही नाहीत. (५२)

आकाश अचळ दिसतें । त्याचें काये नासों पाहातें ।
पाहातां आमुचेनि मतें । आकाश शाश्वत ॥ ५३ ॥
आकाश अचळ आहे. शिवाय ते नाश पावते, असे आपण म्हणता. पण त्याचे काय नाश पावते, हे आम्हांला कळत नाही. आमच्या मते तर आकाश शाश्वत आहे. (५३)

ऐसे ऐकोन वचन । वक्ता बोले प्रतिवचन ।
ऐक आतां लक्षण । आकाशाचें ॥ ५४ ॥
हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की, आता याचे उत्तर ऐका. मी तुला आकाशाचे लक्षण सांगतो. (५४)

आकाश तमापासून जालें । म्हणोन काम क्रोधें वेष्टिलें ।
अज्ञान सुन्यत्व बोलिलें । नाम तयाचें ॥ ५५ ॥
आकाश हे तमोगुणापासून झाले. (कारणाचे गुण कार्यात येतात) म्हणून ते कामक्रोधादींनी वेढलेले आहे. शून्यत्वरूपी अज्ञान असे त्याला म्हणतात. (५५)

अज्ञानें कामक्रोधादिक । मोहो भये आणी शोक ।
हा अज्ञानाचा विवेक । आकाशागुणें ॥ ५६ ॥
अज्ञानामुळेच काम, क्रोध, शोक, मोह, भय इत्यादी त्याच्या ठिकाणी असतात. शून्यत्व म्हणजे अज्ञान ते आकाशाच्या ठिकाणी आहे. म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व असते. (५६)

नास्तिक नकारवचन । तें सुन्याचें लक्षण ।
तयास म्हणती ह्रुदयसुन्य । अज्ञान प्राणी ॥ ५७ ॥
नास्तिकता व नकार वचन म्हणजेच ‘ काही नाही ‘ हेच शून्यत्व. हे शून्याचे लक्षण आहे म्हणूनच ज्याच्या ठिकाणी दया-माया नसते, त्या प्राण्याला हृदयशून्य म्हटले जाते. तसेच ज्याच्या हृदयात शून्य म्हणजेच अज्ञान आहे, तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो. (५७)

आकाश स्तब्धपणें सुन्य । सुन्य म्हणिजे तें अज्ञान ।
अज्ञान म्हणिजे कठिण । रूप तयाचें ॥ ५८ ॥
आकाशाची स्तब्धता हीच त्याची शून्यता. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे काठिण्य हे आकाशाचे रूप आहे. (५८)

कठिण सुन्य विकारवंत । तयास कैसें म्हणावें संत ।
मनास वाटे हें तद्वत । आहाच दृष्टीं ॥ ५९ ॥
कठीण, शून्य आणि विकारवंत आकाशाला सतूस्वरूप कसे म्हणावे ? वरवर पाहिले असता ते स्वस्वरूपासारखे मनास वाटते. (५९)

अज्ञान कालवलें आकाशीं । तया कर्दमा ज्ञान नासी ।
म्हणोनिया आकाशासी । नाश आहे ॥ ६० ॥
आकाशात अज्ञान मिसळलेले असते. त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते म्हणून आकाशाला नाश आहे. (६०)

तैसें आकाश आणी स्वरूप । पाहातां वाटती येकरूप ।
परी दोहींमधें विक्षेप । सुन्यत्वाचा ॥ ६१ ॥
म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एकरूप वाटतात, पण दोहोंमधील शून्यत्वात फरक आहे. (६१)

आहाच पाहातां कल्पेनिसी । सारिखेंच वाटे निश्चयेंसीं ।
परी आकाश स्वरूपासी । भेद नाही ॥ ६२ ॥
वरवर पाहाता कल्पनेला दोन्ही सारखेच वाटते, पण (विचार केला असता कल्ले की) आकाशात आणि स्वरूपात निश्चितच भेद आहे. (६२)

उन्मनी आणी सुषुप्ति अवस्ता । सारिखेच वाटे तत्वता ।
परी विवंचून पाहों जातां । भेद आहे ॥ ६३ ॥
ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुमुखी अवस्था वरवर पाहिले असता सारख्या वाटतात, पण विश्लेषण करून सखोल विचार केला असता कळून येते की, त्या दोन्ही अवस्थांमध्ये भेद आहे. (सुपुप्तीमध्ये अज्ञान बीजरूपाने शिल्लक असते. उन्मनीत अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन स्वस्वरूपाशी पूर्ण तादात्म्य झालेले असते. हा फार मोठा फरक आहे.) (६३)

खोटें खयासारिखें भाविती । परी परीक्षवंत निवडिती ।
कां कुरंगें देखोन भुलती । मृगजळासी ॥ ६४ ॥
सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात पण पारखी असतात त्यांना ख्याखोट्याची पारख असल्याने ते खरेच निवडून घेतात. मृगजळाला पाहून हरणे जशी मुक्यात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते. (६४)

आतां असो हा दृष्टांत । बोलिला कळाया संकेत ।
म्हणौनि भूत आणी अनंत । येक नव्हेती ॥ ६५ ॥
आता हे सर्व गहू दे. संकेत कळावा म्हणून हा दृष्टान्त दिला आहे. म्हणून आकाश हे भूत आणि अनंत अशी परब्रह्म वस्तू एक नव्हेत. (६५)

आकाश वेगळेपणें पाहावें । स्वरूपीं स्वरूपचि व्हावें ।
वस्तुचें पाहाणें स्वभावें । ऐसे असे ॥ ६६ ॥
आकाश हे वेगळेपणाने पाहाता येते ! वस्तूला पाहणे म्हणजे स्वरूपी स्वरूपच होणे अशा प्रकारचे असते. तेथे वस्तू आणि ती पाहणारा असे द्वैत उरतच नाही. (६६)

येथें आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली ।
भिन्नपणें नवचे अनुभवली । स्वरूपस्थिती ॥ ६७ ॥
येथे आता शंका नाहीशी झाली व त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. स्वरूपस्थिती ही कधीही भिन्नपणे अनुभवता येत नाही. (६७)

आकाश अनुभवा येतें । स्वरूप अनुभवापरतें ।
म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥ ६८ ॥
आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो पण स्वरूप हे अनुभवणाऱ्याच्या पलीकडले आहे. म्हणून स्वरूप आणि आकाश यांत साम्य असू शकत नाही. (६८)

दुग्धासारिखा जळांश । निवडुं जाणती राजहंस ।
तैसें स्वरूप आणी आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥
मिसळले दूध आणि पाणी हे दोन्ही एकरूप वाटले तरी राजहंस वेगळे करू शकतात, त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यांतील भेद संतच जाणतात. (६९)

सकळ माया गथागोवी । संतसंगें हें उगवावी ।
पाविजे मोक्षाची पदवी । सत्समागमें ॥ ७० ॥
ही सर्व मायेची गुंतागुंत आहे. संतसमागम केला असता हे सर्व कोडे उलगडते. म्हणून संतसमागम करून मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यावी. (७०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम समास पांचवा ॥ ५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्थूळपंचमहाभूतें स्वरूपाकाशभेदोनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : दुश्चीतनिरूपण
॥ श्रीराम ॥

श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी ।
मोक्ष लाभे कितां दिवसीं । हें मज निरोपावें ॥ १ ॥
श्रोता वक्याला विनंती करीत आहे की, आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा. किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो, हेही मला समजावून सांगा. (१)

धरितां साधूची संगती । कितां दिवसां होते मुक्ती ।
हा निश्चय कृपामुर्ती । मज दिनास करावा ॥ २ ॥
हे कृपामूर्ती सास्ती संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्रास होते त्यासंबंधी निश्चित मत मज-दीनाला सांगा. (२)

मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्वासतां निरूपणीं ।
दुश्चितपणीं हानी । होतसे ॥ ३ ॥
यावरवक्यानेउत्तरदिलेकी, दृढविश्वास असेलतरनिरूपण श्रवण करताक्षणीच तात्काळ मुक्ती लाभते, पण दुश्चितपणे, भांबावलेपणाने श्रवण केले, तर मात्र हानी होते. (३)

सुचितपणें दुश्चीत । मन होतें अकस्मात ।
त्यास करावें निवांत । कोणे परीं ॥ ४ ॥
यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की, सुचितपणे म्हणजे एकाग्रमनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दुश्चित होते. म्हणजे भांबावून जाते. तरी परत त्याला शांत कसे करावे, हे सांगा. (४)

मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडीं ।
सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥
यावर वक्ता उत्तर देत आहे की, मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढतोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे व काळ सार्थकी लावावा. (५)

अर्थ प्रमेय ग्रंथांतरीं । शोधून घ्यावें अभ्यांतरीं ।
दुश्चीतपण आलें तरी । पुन्हां श्रवण करावें ॥ ६ ॥
अर्थ व सारभूत सिद्धान्त नीट समजून ध्यावे व ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे. मध्येच मन अस्वस्थ झाले, तरी श्रवण सोडू नये. पुन्हापुन्हा श्रवण करीत असावे. (६)

अर्थांतर पाहिल्यावीण । उगेंचि करी जो श्रवण ।
तो श्रोता नव्हे पाषण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥
अर्थ नीट समजून न घेता, जो उगीचच श्रवण करतो, तो श्रोता नसून मनुष्यवेषातील पाषाणच होय. (७)

येथें श्रोते मानितील सीण । आम्हांस केलें पाषाण ।
तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥ ८ ॥
आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की, आपल्याला पाषाण ठरवले, तर आता पाषाणाचे लक्षण ऐका. (८)

वांकुडा तिकडा फोडिला । पाषाण घडून नीट केला ।
दुसरे वेळेसी पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥
वाकडातिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला, तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की, च्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो, त्याच स्थितीत तो जसाच्या तसाच असतो. (९)

टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली ।
मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुन्हा लागे ॥ १० ॥
दगडाची खपली यकीने तोडली की, ती परत दगडाला चिकटत नाही. पण मनुष्याचे तसे नाही. त्याची कुबुद्धी झाडली, तरी ती पुन्हा येऊन त्याला चिकटते. (१०)

सांगतां अवगुण गेला । पुन्हा मागुतां जडला ।
याकरणें माहांभला । पाषाणगोटा ॥ ११ ॥
मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणांचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतात. म्हणून त्याच्यापेक्षा पाषाणगोय खूपच चांगला असे म्हणावे लागते. (११)

ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहून उणा ।
पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥
च्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही, तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल. त्याच्यापेक्षा पाषाण कोटीगुणांनी बस असे म्हणावे लागेल. (१२)

कोटिगुणें कैसा पाषाण । त्याचेंहि ऐका लक्षण ।
श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥
पाषाणाला कोटीगुणांनी बरा असे का म्हटले, त्याचेही कारण सांगतो. ते श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करावे. (१३)

माणीक मोतीं प्रवाळ । पाचि वैडुर्य वज्रनीळ ।
गोमेदमणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥
माणिक, मोती, पोवळे, पाचू वैडूर्य, वजनीळ तसेच गोमेदमणी व परिस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात. (१४)

याहि वेगळे बहुत । सूर्यकांत सोमकांत ।
नाना मोहरे सप्रचित । औषधाकारणें ॥ १५ ॥
याखेरीज इतरही अनेकसूर्यकांत, सोमकांत (चंद्रकांत), नाना औषधी मणी, जे औषधाकरितां अनुभवसिद्ध आहेत ते, याप्रमाणे हे सर्वही पाषाणच आहेत. (१५)

याहि वेगळे पाषाण भले । नाना तिर्थीं जे लागले ।
वापी कूप सेखीं जाले । हरिहरमुर्ती ॥ १६ ॥
याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना ती र्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, घाट मदिरे दीपमाळा वगैरेंसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तीसाठी वापरले जातात. (१६)

याचा पाहातं विचार । पाषाणा ऐसें नाहीं सार ।
मनुष्य तें काये पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥
त्या सर्वांचा विचार केला की, पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही. त्याच्यापुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचा काय पाड ? (१७)

तरी तो ऐसा नव्हे तो पाषाण। जो अपवित्र निःकारण ।
तयासातिखा देह जाण । दुश्चीत अभक्तांचा ॥ १८ ॥
पण जो पाषाण वरीलप्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो; त्याच्यासारखाच दुश्चित व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. (१८)

आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चीतपणें ।
दुश्चीतपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥
आता हेबोलणे पुरेझाले थोडक्यात म्हणजे दुश्चितपणाने आपला घात होतो. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच, धड ना परमार्थ अशी स्थिती होते. (१९)

दुश्चीतपणें कार्य नासे । दुश्चीतपणें चिंता वसे ।
दुश्चीतपणें स्मरण नसे । क्षण येक पाहातां ॥ २० ॥
दुश्चितपणाने कार्य बिघडते, मनात चिंता उत्पन्न होते, पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. (२०)

दुश्चीतपणें शत्रुजिणें । दुश्चीतपणें जन्ममरणें ।
दुश्चीतपणाचेनि गुणें । हानी होय ॥ २१ ॥
त्या अवगुणांमुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो, जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होत नाही, सर्व प्रकारे अत्यंत नुकसान होत असते. (२१)

दुश्चीतपणें नव्हे साधन । दुश्चीतपणें न घडे भजन ।
दुश्चीतपणें नव्हे ज्ञान । साधकांसी ॥ २२ ॥
दुश्चित्तपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही, की भगवंताचे भजन होत नाही अथवा ज्ञानही प्रास होऊ शकत नाही. (२२)

दुश्चीतपणें नये निश्चयो । दुश्चीतपणें न घडे जयो ।
दुश्चीतपणें होये क्षयो । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥
दुश्चित्तपणामुळेकुठल्याही गोष्टीसंबंधी निश्चय होत नाही, कुठल्याही गोष्टीत जय, यश मिळत नाही, आपल्या हिताची सर्वप्रकारे हानी होते. (२३)

दुश्चीतपणें न घडे श्रवण । दुश्चीतपणें न घडे विवरण ।
दुश्चीतपणें निरूपण । हातींचे जाये ॥ २४ ॥
दुश्चित्तपणामुळे नीट श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही, त्यामुळे अध्यात्म-निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो, तो हातचा जातो. (२४)

दुश्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे ।
चंचळ चक्रीं पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥
चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरे तर असून नसल्यासारखाच असतो. कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करीत असते. (२५)

वेडें पिशाच्य निरंतर । अंध मुके आणी बधिर ।
तैसा जाणावा संसार । दुश्चीत प्राणियांचा ॥ २६ ॥
एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतरपिशाच्च लागलेल्या माणसाचा किंवा अंध, मूकबधिर माणसाचा संसार जसा असतो, तसाच दुश्चित्त प्राण्याचाही संसार धड नसतो. (२६)

सावध असोन उमजेना । श्रवण असोन ऐकेना ।
ज्ञान असोन कळेना । सारासारविचार ॥ २७ ॥
तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही, कान असून त्याला जणू ऐकू येत नाही आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. (२७)

ऐसा जो दुश्चीत आळसी । परलोक कैंचा त्यासी ।
जयाचे जिवीं अहर्निशीं । आळस वसे ॥ २८ ॥
याप्रकारे जो दुश्चित आणि आळशी असतो आणि ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो, त्याला परलोक कसा प्रास होणार ? (२८)

दुश्चीतपणापासुनि सुटला । तरी तो सवेंच आळस आला ।
आळसाहातीं प्राणीयांला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥
जर एखादा माणूस दुश्चितपणातून सुटला, तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला, की त्याला उसंतच मिळत नाही. (२९)

आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार ।
आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्यां ॥ ३० ॥
आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतरही होऊ शकत नाही. (३०)

आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हें निरूपण ।
आळसें परमार्थाची खूण । मळिण जाली ॥ ३१ ॥
आळसामुळे श्रवण, निरूपण इत्यादी काहीच घडत नाही. त्यामुळे परमार्थही होत नाही. (३१)

आळसें नित्यनेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥
आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो, अभ्यास बंदच पडतो आणि आळसाने आळस अमर्याद वाढतो. (३२)

आळसें गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ ॥
आळसाने निश्चय टिकून राहात नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते, एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. (३३)

आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली ।
आळसें सुन्याकार जाली । सद्बुंद्धि निश्चयाची ॥ ३४ ॥
आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली आणि आळसाने सद्‌बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. (३४)

दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास ।
निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ ॥
दुश्चित्तपणाने प्रथम आळस वाढतो, आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. (३५)

निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण ।
येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ ॥
निद्रा, आळस आणि दुश्चित्तपणा ही मूर्खाची लक्षणे. या तीन अवगुणांमुळे अध्यात्मनिरूपण उमजतच नाही. (३६)

हें तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैंचा असेल तेथें ।
अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥
ही तीनही लक्षणे जेथे असतात, तेथे विवेक कसा उत्पन्न होणार ? अज्ञानी माणसाला आळस व निद्रा यांतच सुख वाटते. याहून अधिक सुख कशात असेल, असे त्याला वाटतच नाही. (३७)

क्षुधां लागतांच जेविला । जेऊन उठतां आळस आला ।
आळस येतां निजेला । सावकास ॥ ३८ ॥
भूक लागल्याबरोबर जेवावे. जेवून उठताच आळस येतो. आळस आला की आरामात झोपून जावे, हेच त्याला बरे वाटते. (३८)

निजोन उठतांच दुश्चीत । कदा नाहीं सावचित ।
तेथें कैचें आत्महित । निरूपणीं ॥ ३९ ॥
निजून उठल्यावरही तो कधी सावचित्त नसतोच. दुश्चित्तपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार ? (३९)

मर्कटापासीं दिल्हें रत्न । पिशाच्याहातीं निधान ।
दुश्चीतापुढें निरूपण । तयापरी होये ॥ ४० ॥
माकडाच्या हाती रत द्यावे किंवा पिशाच्चाच्या हाती खजिना सोपवावा, त्याप्रमाणे दुश्चित्त असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म-निरूपण करणे होय. (४०)

आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती ।
कितां दिवसाइं होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥ ४१ ॥
असो. आता हा ऊहापोह पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनांच्या संगतीने किती दिवसांत मुक्ती होते, ही मूळ शंका आहे. (४१)

ऐका याचें प्रत्योत्तर । कथेंसि व्हावें निरोत्तर ।
संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥
या शंकेचे उत्तर आता ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. संतसंगाचा विचार असा आहे. (४२)

लोहो परियेसी लागला । थेंबुटा सागरीं मिळाला ।
गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥ ४३ ॥
लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंडाचे सोने होते, थेबुटा सागरात मिळाला की कव्हणी एकरूप होतो किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की कव्हणी ती गंगाच बनते. (४३)

सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष ।
इतरांस तें अलक्ष । लक्षिलें नवचे ॥ ४४ ॥
त्याप्रमाणे जो सावध निग्रही व जागरूक असतो, त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष्म अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. (४४)

येथें शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां नलगे वेळे ।
अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥
येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात, त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो. (४५)

प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण ।
अनन्य भावार्थेंविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥
जे प्रज्ञावंत आणि अनन्यही असतात, त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही. ती निरुपयोगी ठरते. (४६)

प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु ना कळे ।
प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥
प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही आणि विश्वास नसेल तर सद्‌वस्तु कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. (४७)

देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती ।
सत्संगें सद्गती । विलंबचि नाही ॥ ४८ ॥
देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते. सत्संगाने तत्काळ सद्‌गती मिळते. विलंब लागत नाही. (४८)

सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास ।
तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥
जो शिष्य सावध, निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो, त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. (४९)

इतर भाविक साबडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे ।
साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥
इतर भोळेभाबडे भाविक लोक असतात, त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीमुळे विवेकदृष्टी तत्काळ जागत होते. (५०)

परी तें साधन मोडुं नये । निरूपणाचा उपाये ।
निरूपणें लागे सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥
पण निरूपणाचा उपाय करीत असताही साधन कधी सोडू नये. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो. (५१)

आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरूपाची दशा ।
त्याचे प्राप्तीचा भर्वसा । सत्संगें केवी ॥ ५२ ॥
आता मोक्ष कसा आहे, स्वरूपदशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते, (५२)

ऐसें निरूपण प्रांजळ । पुढें बोलिलें असे सकळ ।
श्रोतीं होऊनियां निश्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥
याचे स्पष्ट व स्वच्छ निरूपण पुढे सर्व सागितलेजाईल तरी श्रोत्यांनी निश्चलहोऊन शांतचित्ताने अवधान द्यावे. (५३)

अवगुण त्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें ।
श्रोतीं कोप न धरणें । ऐसिया वचनाचा ॥ ५४ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून न्यायनिहुरपणे बोलावे लागते. तरी अशा बोलण्याचा गग श्रोत्यांनी धरू नये. (५४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दुश्चीतनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘दुश्चीतनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : मोक्षलक्षण
॥ श्रीराम ॥

मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष ।
तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता, की मोक्ष किती दिवसांत मिळतो ? त्याचे उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष होऊन ऐकावे. (१)

मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें ।
संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥
मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्रास करावा, हे सर्व आता ऐका. (२)

तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा जाला ।
तो संतसंगें कैसा लाधला । तेंचि ऐका ॥ ३ ॥
तसेच बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. तो मोक्ष संतसंगाने कसा मिळतो, तेही ऐका. (३)

प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला ।
तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥
प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो. त्याला साधुलोक विवेकाने मुक्त करतात. (४)

मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प ।
तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥
मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली आहेत. त्यामुळे प्राणी अल्पज्ञ, देहबुद्धीचा झाला. (५)

मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण ।
केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥
मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्ममरण आहे. पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन. (६)

पापाचें फळ तें दुःख । आणी पुण्याचें फळ तें सुख ।
पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥
पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख असते. आपापल्या प्रारव्यानुसार पाप व पुण्य हे भोगावेच लागते. (७)

पापपुण्य भोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना ।
ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८ ॥
पापपुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भ- वासातूनही सुटका नाही, अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते, (८)

तया नाव बांधला। जीवपणें बद्ध जाला ।
जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्यु पावे ॥ ९ ॥
तो जीवपणाने बांधलेला जाणावा. रेशमाचा किडा जसा स्वतःच स्वतःस बांधून घेऊन कोषात गुरफटून घेऊन मरून जातो, (९)

तैसा प्राणी तो अज्ञान । नेणें भगवंताचें ज्ञान ।
म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १० ॥
त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव, भगवंताचे ज्ञान नसल्याने, आपले जन्ममरण काही सुटत नाही, असे म्हणत राहतो. (१०)

आतां कांहीं दान करूं । पुढिलया जन्मास आधारु ।
तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥
तो मनात म्हणतो की, आता या जन्मात काही दानधर्म करीन म्हणजे तेवढाच पुढील जन्माला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. (११)

पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें ।
आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥
पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही, म्हणून या जन्मात दारिद्र्य प्रास झाले. निदान आता या जन्मात तरी काही केलेच पाहिजे की ! (१२)

म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी येक तांब्र नाणें ।
म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥
म्हणून त्याने एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचे नाणे दान दिले आणि म्हणू लागला की पुढील जन्मात याच्या कोटीगुणाने मला प्राप्ती होईल. (१३)

कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी ।
आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४ ॥
कुशावर्त, कुरुक्षेत्रादि तीर्थक्षेत्राऐचा महिमा शेकून. आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेळ या आशेने कांही दान पुण्य करतो. (१४)

रुका आडका दान केला । अतितास टुक्डा घातला ।
म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५ ॥
एखादा पैसा, दमडीदान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतो आहे की, यामुळे आता पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल (१५)

तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पीं अंतर्यामीं ।
वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६ ॥
तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लग्नाला. याप्रमाणे प्राण्यांची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. (१६)

आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन ।
ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥
आता मी जे जे देईन ते ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी व बद्ध जाणावा. (१७)

बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती ।
येथें न होतां ज्ञानें सद्गेती । गर्भवस चुकेना ॥ १८ ॥
अनेक जन्मांच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. येथे जर ज्ञान मिळवून सद्‌गती प्रास करून घेतली नाही, तर गर्भवास चुकत नाही. (१८)

गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे ।
अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥
बरे परत गर्भवास प्रास झाला तरी नरदेहच प्रास होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. (१९)

ऐसा निश्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं ।
नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २० ॥
अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की, या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. (२०)

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।
येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥
श्रीमतू भागवत पुराणात महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले आहे की, ज्यावेळी प्राण्याचे पाप व पुण्य समसमान होते, तेव्हाच नरदेह प्रास होतो. एरवी नरदेह प्रास होत नाही. (२१)

॥ श्लोक ॥ नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं । प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं ।
मायानुकुलेन नभस्वतेरितं । पुमान्भबाब्धिं न तरेत्स आत्महा ॥
श्लोक अर्थ – सर्वप्रथम नरदेह अत्यंत दुर्लभ असूनही भगवस्कूपेने सहज मिळाला आहे. तो सुदृढ होडीसारखा असून गुरुदेव हे त्याचे कर्णधार आहेत, मज भगवंताची कृपा हा अनुकूल वाहणारा वारा आहे. हे सर्व मिळूनही जो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही, तो आत्मघातकी जाणावा.

नरदेह दुल्लभ । अल्प संकल्पाचा लाभ ।
गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥
नरदेह दुर्लभ आहे खरा; पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरू हे कर्णधार असून स्वतःसिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. (२२)

दैव अनुकुळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया ।
भवब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥
ज्याला देवाची कृपा लाभत नाही, तो प्राणी स्वत: अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही. त्याला .आत्मघातकी असे म्हणतात. (२३)

ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौयासी ।
तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोन आत्महत्यारा ॥ २४ ॥
नरदेहात ज्ञान प्रास करून घेतले नाही तर चौऱ्यांशी लक्ष योनींत जन्म-मरण भोगावे लागते, म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात, म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हटले आहे. (२४)

नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण ।
भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥
नरदेह प्रास झाला असता ज्ञान प्रास करून घेतले नाही तर जन्ममरणपरंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. (२५)

रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ म्हैसा खर ।
काक कुर्कूट जंबुक मार्जर । सरड बेडुक मक्षिका ॥ २६ ॥
अस्वल, माकड कुत्रा, डुक्कर. घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर सरडा, बेडूक, माशी, (२६)

इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं ।
आशा धरी मुर्ख प्राणी ॥ पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥
इत्यादी नीच योनी ज्ञान न झाल्याने लोकांना भोगाव्या लागतात. मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा धरीत असतो. (२७)

हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां ।
ऐसा विश्वास धरिजां । लाज नाहीं ॥ २८ ॥
हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच मिळेल, असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. (२८)

कोण पुण्याच संग्रहू । जे पुन्हा पाविजे नरदेहो ।
दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥
त्यांनी काय असा मोठा पुण्यसंग्रह केलेला असतो की परत नरदेहच लाभावा ? पण तरी मनात पुढल्या मनुष्यजन्माची दुराशा बाळगतात. (२९)

ऐसा मुर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन ।
शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३० ॥
असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात, ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपण आपलेच शत्रू होऊन राहतात. (३०)

॥ श्लोक ॥ अत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ।
अर्थ- आपणच आपले बंधू व आपणच आपले शत्रू असतो

ऐसे संकल्पाचें बंधन । संतसंगे तुटे जाण ।
ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥
असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संतसंगाने तुटते, हे जाणून घ्यावे. आता त्याचे लक्षण सांगतो तेही ऐकावे. (३१)

पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर ।
प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों लागे ॥ ३२ ॥
आपले शरीर तसेच सर्व चराचर हे पंचमहाभूतांपासून झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चालले असते. (३२)

देह अवस्ता अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण ।
शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचें ॥ ३३ ॥
देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण व शक्ती अशी आठ तत्त्वे एका देहाची व याच्या चौपट म्हणजे बत्तीस तत्त्वे चारी देहांची होतात. (३३)

ऐसी पिंडब्रह्मांड रचना । विस्तारें वाढली कल्पना ।
निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥
अशी ही पिंडाची, ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्त्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतामतांचा गोंधळ झाला आहे. (३४)

नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद ।
परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥
नाना मते, नाना भेद यांमुळे वादविवाद उत्पन्न झाले आहेत. पण त्या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू जाणतात. (३५)

तया संवादाचे लक्षण । पंचभूतिक देह जाण ।
त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥
त्या संवादाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह पांचभौतिक आहे. त्यांत आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. (३६)

देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये ।
नाना तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७ ॥
देह शेवटी नष्ट होतो, म्हणून त्याला आत्मा असे कधीही म्हणू नये. या देहाध्ये नाना तत्त्वे एकत्र आलेली आहेत. (३७)

अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक ।
हा सूक्ष्माच विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥
अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणपंचक; प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे प्राणपंचक; शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषयपंचक; पाच कर्मेद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये मिळून २५ तत्त्वांच्या सूक्ष्म देहांचा विचार शास्त्रात केला आहे. (३८)

घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी ।
नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥
सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागले की, अंतःकरण, मन, बुद्धी व इतरही नाना तत्त्वांच्या उपाधीहून आत्या वेगळा आहे हे कल्ले. (३९)

स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य ।
अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४० ॥
स्थल. सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे चार व विशद हिरण्य, अव्याकृत व मूळप्रकृती हे ब्रह्मांडाचे चार मिळून आठ देह आहेत ते जाणून घ्यावे. (४०)

च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी ।
प्रकृती पुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१ ॥
चार पिंडाचे व चार ब्रह्मांडाचे असे आठ देह होतात, याशिवाय प्रकृती व पुरुष धरून दहा देही सांगितले जातात. (४१)

ऐसें तत्वांचे लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण ।
कार्य कर्ता कारण । दृश्या तयाचें ॥ ४२ ॥
याप्रमाणे तत्त्वांचे लक्षण सांगितले आहे; पण आत्या याहूनही विलक्षण म्हणजे लक्षणहीन असून तो या सर्व तत्त्वांचा व कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे ईश्वर व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. वरील सर्व आल्याहून निराळी असल्याने त्याची दृश्ये आहेत. (४२)

जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड ।
हें सांगता असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३ ॥
जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड, विद्यामाया, अविद्या- माया यांच्याविषयी खूपच सांगता येईल; पण आत्मा या सर्वांहून वेगळाच आहे. (४३)

पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारीं ।
हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥
तसे पाहू गेले तरी चार आत्ये आहेत असे सांगितले जाते. त्यांची लक्षणे ऐकून ती अंतरात सुदृढ धरावीत. (४४)

एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा ।
चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥
एकजीवाला, दुसस शिवाला, तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असेही म्हणतात व चौथा निर्मळत्या असे चार आत्मे सांगितले जातात. (४५)

भेद उंच नीच भासती । परी च्यारी एकचि असती ।
येविषीं दृष्टांत संमती। सावध ऐका ॥ ४६ ॥
त्यांत उच्च, नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते चारी एकच आहेत. हे कळावे म्हणून दृष्टान्त सांगितला जात आहे, तो सावधपणे ऐकावा. (४६)

घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश ।
अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥
घयकाश, मठाकाश, महदाकाश व चिदाकाश अशी चार आकाशे सांगितली जात असली, तरी खरे पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे. (४७)

तैसा जीवात्मा आणि शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळाता ।
अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥
त्याप्रमाणेच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळत्या सर्व मिळून एकच आत्या आहे. (४८)

घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश ।
पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥
घटला व्यापून जे आकाश असते त्याचे नाव घयकाश तसा पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश असतो, त्याला जीवात्मा म्हणतात. (४९)

मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश ।
तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥
मठाला जे आकाश व्यापून असते. त्याला मठाकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो, त्याला शिवाला म्हणतात. (५०)

मठाबाहेरील आकाश । तयाअ नांव महदाकाश ।
ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥
मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महदाकाश असे नाव आहे. त्याप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश त्याला परमात्मा म्हणतात. (५१)

उपधीवेगळें आकाश । तया नाव चिदाकाश ।
तैसा निर्मळात्मा परेश । तो उपधिवेगळा ॥ ५२ ॥
उपाधीवेगळे जे आकाश त्याला चिदाकाश असे नाव आहे तसेच उपाधिवेगळा जो ब्रह्मांश तोच निर्मळाला परेश जाणावा. (५२)

उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न ।
तैसा अत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥
उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते पण वास्तविक ते अभिन्नच असते त्याप्रमाणे स्वानदघन असा एकच आत्मा आहे. (५३)

दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं ।
त्याचि वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥
दृश्याला आतून-बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेषसुद्धा समर्थ नाही. (५४)

ऐसे आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण ।
उपाधी शोधतां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥
हे आत्य्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीवपण उरतच नाही. चारी भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या ठरते, म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्यांची कल्पना केली जाते. मुळात आत्या एकच एक आहे. (५५)

जीवपणें येकदेसी । अहंकारें जन्म सोसी ।
विवेक पाहतां प्राणीयांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥
देहाच्या उपाधीमुळेतो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत सहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही, हे कळून येते. (५६)

जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला ।
तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७ ॥
जन्ममृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्त्वांचा शोध घेऊ लागले असता, त्या तत्त्वांपासून आपण भिन्न आहोत, हे कळून येते व अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही, तर तो तत्त्वतः वस्तूच होतो. (५७)

तेचि वस्तु ते आपण । हें माहावाक्याचें लक्षण ।
साधु करीती निरूपण । आपुलेन मुखें ॥ ५८ ॥
आपण म्हणजे ती वस्तूच आहे. ‘ तत्त्वमसि ‘ हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. (५८)

जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला ।
बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥
ज्या क्षणाला गुरू असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आत्य्याला बंधन आहे असे बोलूसुद्धा नये. (५९)

आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली ।
संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥
आता शंकेचे निरसन होऊन संदेहवृत्ती नाहीशी झाली आणि सताच्या संगतीने तात्काळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. (६०)

स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला ।
ज्ञानविवेकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥
स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत त्याला जागृती आली असता कळून येते की, आपण तर मोकळेच आहोत. (६१)

अज्ञाननिसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती ।
तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥
अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्यायोगे तात्काळ मोक्षाची प्राप्ती होते. (६२)

तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन ।
तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥
स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधन करावयाची जरुरी नसते. जागृतीशिवाय इतर प्रयतांचा विचारही करू नये. (६३)

तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणिक नाही उपाव ।
विवेक पाहतां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥
त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो. त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की, नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. (६४)

विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण ।
विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥
विवेक न करता दुसरी जी जी साधने करावीत त्याने सर्व शीणच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. (६५)

आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं ।
जन्ममृत्य हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६ ॥
आत्म्याच्या ठिकाणी बंध, मोक्ष दोन्हीही नाहीत. जन्ममृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाहीत. (६६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मोक्षलक्षणनाम समास सातवा ॥ ७ ॥
इति श्रीदासबोथे गुरूशिष्यसंवादे ‘मोक्षलक्षणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : आत्मदर्शन
॥ श्रीराम ॥

मागां जाले निरूपण । परमात्मा तो तूंचि जाण ।
तया परमात्मयाचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १ ॥
मागील समासात परमात्मा तो तूचि जाण असे निरूपण केले गेले. आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहे. (१)

जन्म नाही मृत्यु नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं ।
बद्ध मोक्ष दोनी नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥
परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध आणि मोक्ष दोन्हीही नाही. (२)

परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार ।
पर्मात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥
परमात्मा निर्गुण, निराकार अनंत, अपार, नित्य व निरंतर असा आहे, ज्यात बदल होत नाही, जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा होय. (३)

परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं येक ।
परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥
परमात्मा हा सर्वव्यापक असून अनेकांना तो एकटच व्यापून असतो. परमात्म्यासंबंधीचा विवेक हा अतर्क्य आहे. (४)

ऐसी परमात्मयाची स्थिती । बोलताती वेद श्रुती ।
परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाही ॥ ५ ॥
वेद व धुती याप्रकारे परमात्मस्वरूपाचे वर्णन करतात; पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते यात जराही संशय नाही. (५)

तये भक्तीचें लक्षण । भक्ती नवविधा भजन ।
नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाले ॥ ६ ॥
ती भक्ती म्हणजेच भजन नऊ प्रकारचे आहे. या नवविधाभक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले. (६)

तया नवविधामध्यें सार । आत्मनिवेदन थोर ।
तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥
त्या नवविधाभक्तीत आत्मानिवेदन सर्वांत श्रेष्ठ असून सर्वांचे जणू सार आहे. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. (७)

आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें ।
आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥
आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले आहे की नाही, ते जाणून घ्यावे. (८)

महत्पूजेचा अंतीं । देवास मस्तक वाहाती ।
तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची ॥ ९ ॥
महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारासारखी अत्यंत निकटची भक्ती आहे. (९)

आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती ।
तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ॥ १० ॥
याप्रमाणे स्वतःस समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात. त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. (१०)

आपणांस कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें ।
किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥
त्यावर श्रोत्याने विचारले की, आपण स्वतःस कसे निवेदावे ? कोठेजाऊन पडावे अथवा देवापुढे आपलेमस्तक तोडून घ्यावे ? काय करावे ते काहीच कळत नाही. (११)

ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें ।
श्रोतां सावधान होणें । येकाग्र चित्तें ॥ १२ ॥
हे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता म्हणाला की, आता श्रोत्यांनी सावध होऊन चित्त एकाग्र करावे. (१२)

आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण ।
मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥
आत्मनिवेदन कशास म्हणावे त्याचे लक्षण सांगतात. आधी मी कोण याचा शोध घ्यावा व नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे. (१३)

देवभक्ताचें शोधन । करितां होतें आत्मनिवेदन ।
देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥
याप्रमाणे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते. देव शाश्वत आहे हे भक्तास कळून येते. (१४)

देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता ।
देवभक्तविभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥
देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप तक्ता येते. मग देव- भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहात नाही. (१५)

विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त ।
अयुक्त नाहीं बोलणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥
विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात. बंधन नाही म्हणूनच मुक्त म्हणतात, हे बोलणे अयुक्त नाही. कारण याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे. (१६)

देवाभक्ताचें पाहातां मूळ । होये भेदाचें निर्मूळ ।
येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥
देव व भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्यावर भेद समूळ नाहीसा होतो. सर्व दृश्याच्या पलीकडे एक परमात्माच आहे हे कळून येते. (१७)

तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं ।
देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥ १८ ॥
त्याच्याशी ऐक्य झाले की दुजेपणा म्हणजेच द्वैत उरतच नाही. देव- भक्त असा अडसर वहातच नाही. (१८)

आत्मनिवेदनाचे अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती ।
तये नाव सायोज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥
याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्तांचे ऐक्य होऊन जी अभेदभक्ती घडते, तिचेच नाव सायुज्यमुक्ती होय हे सत्य जाणून घ्यावे. (१९)

जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरूपणें बोधला ।
मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥
जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्रास झालेला असतो. त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो वेगळा होऊच शकत नाही. (२०)

नदीं मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी ।
लोहो सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥
नदी एकदा सागराला मिळाली, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करतां येईल ? लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने एकदा सोने झाले की त्याचा काळसरपणा परतून येत नाही. (२१)

तैसा भगवंतीं मिळाला । तो नवचे वेगळा केला ।
देव भक्त आपण जाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥
त्याप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भक्त देवच होतो, तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही. (२२)

देव भक्त दोनी येक । ज्यासी कळला विवेक ।
साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥
देव भक्तदोन्हीएकच आहेत, हाविवेकच्यात्य कळतो तो साधुजनांनाही मोक्षदायक ठरतो, हे जाणून घ्यावे. (२३)

आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें ।
तेणें त्यांचें ऐश्वर्य बाणे । तत्काळ आंगीं ॥ २४ ॥
आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहवे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तात्काळ बाणते. (२४)

देहचि होऊन राहिजे । तेणें देहदुःख साहिजे ।
देहातीत होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥
‘ मी देह ‘ असे मानून देहच होऊन राहिले की, देहदुःख भोगावे लागतेच. देहातीत झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. (२५)

देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें ।
ऐश्वर्याची लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥
यावर श्रोता विचारतो आहे की, देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती, हे सर्व आपण सांगावे. (२६)

ऐसें श्रोतां आक्षेपिलें । याचे उत्तर काये बोलिलें ।
तेंचि आतां निरोपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥
श्रोत्यांनी असे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर काय दिले गेले, तेच आता वर्णन करून सांगितले जाईल. तरी सावध होऊन ऐका. (२७)

देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रह्म पाहें ।
देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥
देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. (२८)

ज्याची बुद्धी होये ऐसी । वेद वर्णिती तयासी ।
शोधितां नाना शास्त्रांसी । न पडे ठांई ॥ २९ ॥
ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्रास होत नाही. (२९)

ऐश्वर्य ऐसें तत्वता । बाणें देहबुद्धि सोडितां
देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥
देहबुद्धी सोडली की, अशा प्रकारचे ऐश्वर्य प्रास होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. (३०)

याकारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण ।
मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥
म्हणून साधूंचे वचन कधी खोटे मानू नये. त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. (३१)

साधुवचन तें कैसें । काये धरावें विश्वासें ।
येक वेळ स्वामी ऐसें । मज निरोपावें ॥ ३२ ॥
यावर श्रोता विचारतो की, साधु-वचन ते कोठले ? त्यावर विश्वास का ठेवाव ? स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजावून द्यावे. (३२)

सोहं आत्मा स्वानंदघन । अजन्मा तो तूंचि जाण ।
हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥
सोऽह म्हणजेच स्वानदघन आत्मा तोच मी आहे. तो अजन्मा असून तो तूच आहेस, हे जाणावे. हेच साधूचे वचन अंतरात सुदृढ धरावे. (३३)

महावाक्याचें अंतर । तुंचि ब्रह्म निरंतर ।
ऐसिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥
महावाक्याचे मर्म जे ‘ तूच निरंतर ब्रह्म आहेस ‘ या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. (३४)

देहासि होईल अंत । मग मी पावेन अनंत ।
ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥
देहाचा अंत होईल आणि मग मला अनंताची प्राप्ती होईल असे हे भ्रमिष्टपणाचे बोलणे कधी मानूच नये. (३५)

येक मुर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥
काही मूर्ख लोक असे म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हांला ब्रह्मप्रासी होईल तोपर्यंत होणार नाही. (३६)

मायेसी होईल कल्पांत । अथवा देहासी येईल अंत ।
तेव्हां पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥
कल्पांताच्यावेळी माया नाहीशी होईल तेव्हा अथवा या देहाचा अंत होईल, तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्रास होईल. (३७)

हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान ।
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥
हे बोलणे बिनबुडाचे आहे. याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काही वेगळेच असते. (३८)

शैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥
सैन्य सर्वच्या सर्व मरून जावे व मग आपल्याला ‘० मिळावे अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच ट करावे, हे अधिक बरे पण हे कळत नाही. (३९)

माया असोनिच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान कांहीं । वोळखावें ॥ ४० ॥
त्याप्रमाणेच माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे यात जे समाधान आहे, ते जाणून घेतले पाहिजे. (४०)

राज्यपद हातासी आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवारा देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥
एकदा सज्यपद हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे ? परिवारामुळे राज्य गेले असे तर घडूच शकत नाही. (४१)

प्राप्त जालियां आत्मज्ञान । तैसें दृश्य देहभान ।
दृष्टीं पडतां समाधान । जाणार नाही ॥ ४२ ॥
एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगत्. दृष्टीस दिसत असले, देहाचे भानही राहात असले, तरी प्रास झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. (४२)

मार्गीं मूळी सर्पाकार । देखतां भये आलें थोर ।
कळतां तेथील विचार । मग मारणें काये ॥ ४३ ॥
मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली त्यामुळे सर्प आहे, असे वाटून खूप भीतीही वाटली, पण मग कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मारायचे कुणाला आणि कशासाठी ? (४३)

तैसी माया भयानक । विचार पाहातां माईक ।
मग तयेचा धाक । कायसा धरावा ॥ ४४ ॥
त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती; पण विचार केल्यावर ती मायिक आहे, मिथ्या आहे हे कळून आले. मग आता तिचा धाक कशाला धरायचा ? (४४)

देखतां मृगजळाचे पूर । म्हणे कैसा पावों पैलपार ।
कळतां तेथीचा विचार । सांकडें कैंचें ॥ ४५ ॥
मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की, याच्या पैल्लीरास आपण कसे जाऊ शकू, पण ज्यावेळी कळ्ये की तेथे जल नाहीच मग संकट कसले ?(४५)

देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक ।
जागृती आलीयां साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥
भयानक स्वप्न दिसले आणि स्वप्नात खूप भीती वाटली. नंतरजागृती आल्यावरसाशंककशाला व्हावे ?(४६)

तथापी माया कल्पनेसी दिसे । आपण कल्पनेतीत असे ।
तेथें उद्वेग काईसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥
त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय ? (४७)

अंतीं मतीं तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती ।
तुझा अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि जाली ॥ ४८ ॥
सर्व सांगतात की ‘ अंती मती तेचि गती ‘ मग तुझा अंत होईल तेव्हा म्हणजे तुझ्या ‘ मी ‘ पणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. (४८)

चौंदेहाचा अंत । आणी जन्म मुळाचा प्रांत ।
अंतांप्रांतासी अलिप्त । तो तुं आत्मा ॥ ४९ ॥
चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय व उत्पत्ती जेथे होतात, तो मूळ्यायेचा प्रांत अथवा या सर्व दृश्य पदार्थांची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होतात त्या मूळ्यायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो, ते आत्मस्वरूप तूच असल्याने, मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस (४९)

जयासी ऐसी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती ।
गती आणी अवगती । वेगळाचि तो ॥ ५० ॥
ज्याची बुद्धी याप्रकारे दृढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्यगती प्रास होते. म्हणजे तो आत्य्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्‌गती व अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोहोचतो (५०)

मति खुंटली वेदांची । तेथें गती आणी अवगती कैंची ।
आत्मशास्त्रगुरुप्रचिती । ऐक्यता आली ॥ ५१ ॥
च्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मतीही कुंठित होते तेथे गती अथवा अवगती कशी असू शकेल ? अशा साधकाला आत्मप्रचीती, शास्त्रप्रचीती व गुरुप्रचीती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. (५१)

जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्मप्रचिती ।
प्राणी पावला उत्तमगती । सद्गुफरुबोधें ॥ ५२ ॥
मी जीव आहे ‘ ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्मवस्तूची आत्मप्रचीती त्याला प्राप्त होते. अशा रीतीने सद्‌गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्रास होते. (५२)

सद्गुीरुबोध जेव्हां जाला । चौंदेहांस अंत आला ।
तेणें निजध्यास लागला । सस्वरूपीं ॥ ५३ ॥
सद्‌गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहांचा नाश होतो. म्हणजे या चारी देहांपैकी एकही मी नाही हे ज्ञान होते व स्वस्वरूपाचा निदिध्यास लागतो. (५३)

तेणें निजध्यासें प्राणी । धेयंचि जाला निर्वाणीं ।
सायोज्यमुक्तीचा धनी । होऊन बैसला ॥ ५४ ॥
त्या निदिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूपच होतो आणि सायुज्यमुक्तीचा धनी होऊन बसतो. (५४)

दृश्य पदार्थ वोसरतां । आवघा आत्माचि तत्वता ।
नेहटून विचारें पहातां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥
दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्याच खरोखर व्यास आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्य मुळी नाहीच हे कळून येते. (५५)

मिथ्या मिथ्यत्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें ।
श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या नाव मोक्ष ॥ ५६ ॥
मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळ्ये असेही नाही. तर तसा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली. श्रोत्यांनी हे जाणले पाहिजे की, यालाच मोक्ष असे म्हणतात. (५६)

सद्गुारुवचन हृदईं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी ।
श्रवण मनन केलेंचि करी । अत्यादरें ॥ ५७ ॥
जो सद्‌गुरूचे वचन हृदयात दृढ धारण करतो, तोच मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्‌गुरूंच्या वचनाचे श्रवण-मनन करीतच राहतो. (५७)

जेथें आटती दोन्ही पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष ।
या नाव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥
जेथे अज्ञान हा पूर्वपक्ष व ज्ञान उत्तरपक्ष हे दोन्ही नाहीसे होतात, जेथे लक्ष्य अथवा अल्यही काही उरलेले नसते, असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे, हाच मोक्ष म्हणून जाणावा. (५८)

जेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे ।
केवळ ज्ञेप्तिमात्र उरे । सूक्ष्म ब्रह्म ॥ ५९ ॥
जेथे ध्यान, धारणा आदी निपुस नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढे ज्ञक्षिरूपाने म्हणजे जाणीवरूपाने उरते, त्यास मोक्ष म्हणावे. (५९)

भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन सुटलें ।
अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासुनी ॥ ६० ॥
मग संसाररूपी मृगजळ आटून जाते, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते. जो वास्तविक अजन्माच आहे, तो मिथ्या जन्मदुखापासून मुक्त होतो. (६०)

निःसंगाची संगव्याधी । विदेहाची देहबुद्धी ।
विवेकें तोडिली उपाधी । निःप्रपंचाची ॥ ६१ ॥
जो निःसंगच आहे त्याला श्रांतीने संगरूपी रोग जडला होता, तो रोग नष्टहोतो. जो विदेही असून स्वतःस देही मानत होता त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे, त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीशी होते. (६१)

अद्वैताचें तोडिलें द्वैत । येकांतास दिला एकांत ।
अनंतास दिला अंत । अनंताचा ॥ ६२ ॥
जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले, जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनन्तपणाचाही अंत झाला. ‘ मी अनंत ‘ ही जाणीवही उरली नाही. (६२)

जागृतीस चेवविलें । चेईयास सावध केलें ।
निजबोधास प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥
जागृतीलाच जागे केले जागृत असलेल्याला सावध केले, निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. (६३)

अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्तीचें घर ।
संयोगास निरंतर । योग केला । ६४ ॥
जो कधी मरू शकतच नाही, त्याला अमर केले. मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा कधी वियोग होऊ शकतच नाही, त्याचा निरंतर योग घडवून आणला. (६४)

निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक जालें ।
बहुतां दिवसां भेटलें । आपणासि आपण ॥ ६५ ॥
‘ मी निर्गुण ‘ अशी जाणीवही राहिली नाही; म्हणजे निर्गुणालही गुपरहित केले आत्मज्ञान झाले तरच मनुष्यजन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. (६५)

तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा ।
भूतपंचकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६६ ॥
द्वैताचा पडदा तुटून गेला, अद्वैताने भेदास नाहीसे केले, पंचमहाभूतांनी झडपलेहोते, ती भूतबाधानाहीशीझाली. (६६)

जालें साधनाचें फळ । निश्चळास केलें निश्चळ ।
निर्मळाचा गेला मळ । विवबळें ॥ ६७ ॥
विवेकामुळे साधन सफल झाले, निश्चळ परब्रह्मास निश्चल केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ निघून गेला. (६७)

होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त जालें ।
आपण देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥
जवळ असूनही ज्याची चुकामूक झाली होती, ते ज्याचे त्यास प्रास झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्मदुःख नाहीसे झाले. (६८)

दुष्टस्वप्नें जाजावला । ब्रह्मण नीच याती पावला ।
आपणांसी आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥
एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की, आपण नीच जातीत जन्मलो आहोत. त्यामुळेतो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळ्ये की, ते स्वप्न होते. आपण जसे होतो तसेच आहोत म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. (६९)

ऐसें जयास जालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण ।
पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥
या प्रकारेज्याला आत्मज्ञान झालेले आहे, त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे ते ऐकावे. (७०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मदर्शननाम समास आठवा ॥ ८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मदर्शननाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : सिद्धलक्षण
॥ श्रीराम ॥

अंतरी गेलीयां अमृत । बाह्या काया लखलखित ।
अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसीं ॥ १ ॥
श्रोता वकास प्रश्न करीत आहे. एखाद्याने अमृत प्राशन केले की ते पोयत गेल्यावर त्याची बाह्य कांतीसुद्धा लखलखीत दिसते, त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूपानुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे. (१)

जालें आत्मज्ञान बरवें । हे कैसेनि पां जाणावें ।
म्हणौनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥
एखाद्याला आत्मज्ञान निसदेहपणे झालेले आहे, हे कसे जाणावे ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधुलक्षणे सांगतो. (२)

ऐक सिद्धांचे लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण ।
तेथें पाहातां वेगळेपण । मुळीच नाहीं ॥ ३ ॥
आता सिद्धांचे लक्षण ऐक. सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते. (३)

स्वरूप होऊन राहिजे । तया नाव सिद्ध बोलिजे ।
सिद्धस्वरूपींच साजे । सिद्धपण ॥ ४ ॥
स्वरूप होऊन शहाणे, यालाच सिद्ध हे नाव आहे. जो स्वरूपाकार होऊन सहतो त्यालाच सिद्ध असे म्हणतात. कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते. (४)

वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । सस्वरूप स्वतसिद्ध ।
तयासिच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥
स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे, हे वेदात, शास्त्रांतही प्रसिद्ध आहे. हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वतः झाला त्यालाच सिद्ध म्हणावे. अन्यत्र ‘ सिद्ध ‘ या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही. (५)

तथापी बोलों काहीं येक । साधकास कळाया विवेक ।
सिद्धलक्षणाचें कौतुक । तें हें ऐसें असे ॥ ६ ॥
तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत, म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करीत आहे. ते असे (६)

अंतरस्थित स्वरूप जाली । पुढें काया कैसी वर्तली ।
जैसी स्वप्नीची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥
स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते, ऐकू येते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो. (७)

तथापि सिद्धांचें लक्षण । कांहीं करूं निरूपण ।
जेणें बाणे अंतर्खूण । परमार्थाची ॥ ८ ॥
तरीही परमार्थाची अतर्खूण बाणावी, म्हणून येथे काही सिद्ध- लक्षणांचे निरूपण केले जात आहे (८)

सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण ।
जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥
निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे. तो लोकांत लोकांसारखाच वागत असतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी लोकांवेगळी असते. (९)

स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता ।
पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥
स्वस्वरूपानुभव आल्यानेत्यात्यप्रपंचाची चिंताच राहत नाही, तर अध्यात्मनिरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते. (१०)

हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाआंगीं असे जाण ।
सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥
खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते. कारण साधकच साधन करून पुढे सिद्ध झालेला असतो. त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धाच्याही ठिकाणी आढव्यात. (११)

बाह्य साधकाचें परी । आणी स्वरूपाकार अंतरीं ।
सिद्धलक्षण चतुरीं । जाणिजे ऐसें ॥ १२ ॥
बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते, पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो, हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे. (१२)

संदेहरहीत साधन । तेचि सिद्धांचे लक्षण ।
अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसें ॥ १३ ॥
सिद्ध बाहेरून साधन करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो. त्याचे साधन निःसंदेहपणे चालते. बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जगही ढळत नाही. (१३)

अचळ जाली अंतरस्थिती । तेथें चळणास कैची गती ।
स्वरूपीं लागतां वृत्ती । स्वरूपचि जाली ॥ १४ ॥
सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते. तेथे चलन होईलच कसे ? स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते. स्वरूपाशी तिचे ऐक्य होते (१४)

मग तो चळतांच अचळ । चंचळपणें निश्चळ ।
निश्चळ असोन चंचळ । देह त्याचा ॥ १५ ॥
अशी स्थिती एकदा प्रास झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो. चंचल दिसत असला तरी अंतर्यामी निश्चल असतो आणि याप्रमाणे अंतर्यामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते. (१५)

स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला ।
अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥
स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन सहतो, तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उडून धावत सुटला, तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही. (१६)

येथें कारण अंतरस्थिती । अंतरींच पाहिजे निवृत्ती ।
अंतर लागलें भगवंतीं । तोचि साधु ॥ १७ ॥
येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्त्वाची आहे. अंतरी वृत्तीच नाही, अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे. ज्याचे अंतःकरण भगवंताकडे लागलेले असते, तोच साधू होय. (१७)

बाह्य भलतैसें असावे । परी अंतर स्वरूपीं लागावें ।
लक्षणे दिसती स्वभावें । साधुआंगीं ॥ १८ ॥
बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे. त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरीत्याच दिसून येतात. (१८)

राजीं बैसतां अवलिळा । आंगीं बाणे राजकळा ।
स्वरूपीं लागतां जिव्हाळा । लक्षणे बाणती ॥ १९ ॥
एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की, त्याच्या अंगी वजकळ आपोआप बाणते. त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले, प्रेम उत्पन्न झालेकी काही लक्षणे आपोआप अंगी बाणतात. (१९)

येरव्ही अभ्यास करितां । हाता न चढती सर्वथा ।
स्वरूपीं राहावें तत्त्वतां । स्वरूप हौनी ॥ २० ॥
ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्रास होऊ शकत नाहीत, स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते. तरच ती लक्षणे अंगी बाणतात. (२०)

अभ्यासाचा मुगुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणीं ।
संतसंगें निरूपणीं । स्थिती बाणे ॥ २१ ॥
वृत्ती सतत निर्गुणी सहाणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे. संतसंगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बाणते. (२१)

ऐसीं लक्षणें बरवीं । स्वरूपाकारें अभ्यासावीं ।
स्वरूप सोडितां गोसावी । भांबावती ॥ २२ ॥
स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम व्यणांचाही अभ्यास करावा. स्वरूपानुसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात. (२२)

आतां असो हें बोलणें । ऐका साधूची लक्षणें ।
जेणें समाधान बाणे । साधकाअंगीं ॥ २३ ॥
असो. आता हेबोलणे पुरेझाले आता ज्यायोगे साधकाच्या अंगी समाधान बाणते, ती सास्ती लक्षणे ऐका. (२३)

स्वरूपीं भरतां कल्पना । तेथें कैंची उरेल कामना ।
म्हणौनियां सधुजना । कामचि नाहीं ॥ २४ ॥
स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते, तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल ? म्हणून साधू निष्काम असतात. (२४)

कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणें गुणें क्रोध यावा ।
साधुजनाचा अक्षै ठेवा । जाणार नाहीं ॥ २५ ॥
आपण एखादी वस्तू वा भोग प्रास व्हावा, म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो, पण साधूचा ठेवा अक्षय असतो. स्वस्वरूपरूप ठेवा कधी नाहीसा होतच नाही. (२५)

म्हणोनि ते क्रोधरहित । जाणती स्वरूप संत ।
नासिवंत हे पदार्थ । सांडुनिया ॥ २६ ॥
म्हणून साधू हे क्रोधरहित असतात. सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे, नित्य आहे हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो. (२६)

जेथें नाहीं दुसरी परी । क्रोध यावा कोणावरी ।
क्रोधरहित चराचरीं । साधुजन वर्तती ॥ २७ ॥
जेथे दुसरे कोणी नाहीच, तेथे क्रोध तरी कुणावर करणार ? म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोधरहित असतात. (२७)

आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद ।
याकारणें वादवेवाद । तुटोन गेला ॥ २८ ॥
आपणच स्वानंदरूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कुणावर करणार त्यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही. (२८)

साधु स्वरूप निर्विकार । तेथें कैंचा तिरस्कार ।
आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ॥ २९ ॥
साधू स्वरूपाकारझाच्छै असतात आणि स्वरूप तरनिर्विकार आहे, मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा ? सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करणार (२९)

साधु वस्तु अनायासें । याकारणें मत्सर नसे ।
मदमत्सराचें पिसें । साधुसी नाहीं ॥ ३० ॥
साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेले असतात. त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मद-मत्ससचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते. (३०)

साधु स्वरूप स्वयंभ । तेथें कैंचा असेल दंभ ।
जेथे द्वैताचा आरंभ जालाच नाही ॥ ३१ ॥
साधू हे स्वतःसिद्ध स्वरूपाकार झालेले असतात. तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही, मग तेथे दंभ असेलच कसा ? (३१)

जेणें दृष्य केलें विसंच । तयास कैंचा हो प्रपंच ।
याकारणें निःप्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥
ज्याने सर्व दृश्य वृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो, त्याला प्रपंच कसा असेल ? म्हणून साधू हा निःप्रपंच असतो हे जाणून घ्यावे. (३२)

अवघें ब्रह्मांड त्याचे घर । पंचभूतिक हा जोजार ।
मिथ्या जाणोन सत्वर । त्याग केला ॥ ३३ ॥
ज्याने हा पांचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो व अवघे ब्रह्मांड हेच ज्याचे घर झालेले असते, तो साधू होय. (३३)

याकारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे ।
जयाची वासना समरसे । शुद्धस्वरूपीं ॥ ३४ ॥
पांचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. शुद्ध स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते, म्हणून साधू सदा निर्लोभ असतो (३४)

आपुला आपण आघवा । स्वार्थ कोणाचा करावा ।
म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥
आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्यास आहोत, असे तो जाणतो. मग स्वार्थ कोणाचा साधावा ? साधू स्वार्थरहित होतो. त्यामुळेच तो शोकरहितही होतो. (३५)

दृष्य सांडुन नासिवंत । स्वरूप सेविलें शाश्वत ।
याकारणें शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६ ॥
नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्याने साधू शोकरहित झालेला असतो, हे जाणावे. (३६)

शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते जाहली निवृत्ती ।
म्हणोनि साधु आदिअंतीं । शोकरहीत ॥ ३७ ॥
शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्तिरहित झालेला असतो. म्हणून तो आदि व अंती शोकरहित असतो. (३७)

मोहें झळंबावें मन । तरी तें जाहालें उन्मन ।
याकारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥
मन मोहाने पछाडलेजाते, पण साधू उन्मनी अवस्था प्रास झालेली असल्याने तो मोहातीत असतो. (३८)

साधु वस्तु अद्वये । तेथें वाटेल भये ।
परब्रह्म तें निर्भये । तोचि साधु ॥ ३९ ॥
आत्मवस्तु एकच आहे. तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार ? परब्रह्म जसे निर्भय असते, तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भय असतो. (३९)

याकारणें भयातीत । साधु निर्भय निवांत ।
सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥
साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. सर्व दृश्य सूष्टीचाप्रल्यकाळी अंत ओढवला तरी साधू अनंतरूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो ! ४०)

सत्यस्वरूपें अमर जाला । भये कैंचें वाटेल त्याला ।
याकारणें साधुजनाला । भयेचि नाहीं ॥ ४१ ॥
सत्यस्वरूपी ऐक्य पावून तो अमर झालेला असतो. मगत्याला भय कसे वाटेल ? म्हणून साधूंना भयचनसते(४१)

जेथें नाहीं द्वंद्वभेद । आपला आपण अभेद ।
तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ ॥
जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही, तेथे खेद कसा उत्पन्न होणार ? देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो. साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही. (४२)

बुद्धिनें नेमिलें निर्गुणा । त्यास कोणीच नेईना ।
याकारणें साधुजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥
त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही. त्यामुळे साधूंना खेदच नसतो (४३)

आपण एकला ठाईचा । स्वार्थ करावा कोणाचा ।
दृष्य नसतां स्वार्थाचा । ठावचि नाहीं ॥ ४४ ॥
आपण तो एकला एक असतो, तर स्वार्थ कुणाचा करणार ? दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. (४४)

साधु आपणचि येक । तेथें कैंचा दुःखशोक ।
दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥ ४५ ॥
साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निःशेष झालेले असते. दुसत कोणी नाहीच, तर अविवेकतरीई कसा असणार ? आणि मग दुःख-शोक तरी कसे असणार ? (४५)

आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची ।
म्हणोनि नैराशता साधूची । वोळखण ॥ ४६ ॥
परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून निःस्मृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे. (४६)

मृदपणें जैसे गगन । तैसें साधुचें लक्षण ।
याकरणें साधुवचन । कठीण नाहीं ॥ ४७ ॥
गगन जसे मृदू असते तसा स्वरूपाकार झालेला सास्ती मृदू असतो. म्हणून तो कधी कठोर वचन बोलच नाही. (४७)

स्वरूपाचा संयोगीं । स्वरूपचि जाला योगी ।
याकरणें वीतरागी । निरंतर ॥ ४८ ॥
स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो. म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. (४८)

स्थिती बाणतां स्वरूपाची । चिंता सोडीली देहाची ।
याकरणें होणाराची । चिंता नसे ॥ ४९ ॥
स्वरूपस्थिती बाणल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची ? म्हणून त्याने पुढे काय होईल, कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. (४९)

स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी ।
याकारणें निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥
बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात. म्हणून साधूलोक निरुपाधिक असतात. (५०)

साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साहे ।
म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥
साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निःसंग असते, त्यामुळे सास्ती निःसंग होतो. म्हणून तो मानापमानाचा विचारच करीत नाही. (५१)

अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परम दक्ष ।
वोढूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५२ ॥
साधू अक्स अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो, म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. (५२)

स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ ।
साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥ ५३ ॥
स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो म्हणून सास्ती निर्मळ असतात. कारण ते स्वरूपच झालेले असतात. (५३)

सकळ धर्मामधें धर्म । स्वरूपीं राहाणें हा स्वधर्म ।
हेंचि जाणें मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५४ ॥
सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहाणे हाच स्वधर्म होय. साधू निरंतर स्वरूपी राहत असतात, हेच साधुलक्षणाचे मुख्य वर्म आहे. (५४)

धरीतां साधूची संगती । आपषाच लागे स्वरूपस्थिती ।
स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें आंगीं ॥ ५५ ॥
सास्ती संगत धरली म्हणजे आपोआप स्वरूपस्थिती प्रास होते आणि स्वरूपस्थितीमुळे सास्ती लक्षणे अंगी बाणतात. (५५)

ऐसीं साधूचीं लक्षणें । आंगीं बाणती निरूपणें ।
परंतु स्वरूपीं राहाणें । निरंतर ॥ ५६ ॥
अध्यात्मनिरूपणाने, त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बाणतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. (५६)

निरंतर स्वरूपीं साहातां । स्वरूपचि होईजे तत्त्वतां ।
मग लक्षणें आंगीं बाणतां । वेळ नाहीं ॥ ५७ ॥
निरंतर स्वरूपी वहिले की तत्त्वतः साधक स्वस्वरूपच होतो. मग सास्ती लक्षणे अंगी बाणण्यास वेळ लागत नाही. (५७)

स्वरूपीं राहिल्यां मती । अवगुण अवघेचि साडती ।
परंतु यासी सत्संगती । निरूपण पाहिजे ॥ ५८ ॥
बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर वहिली की, सर्व अवगुण नष्टहोतात, पण हेसर्व होण्यासाठी सत्संगती आणि संतमुखाने अध्यात्मनिरूपण ऐकणे हे व्हावयालाच हवे. (५८)

सकळ सृष्टीचा ठाईं । अनुभव येकचि नाहीं ।
तो बोलिजेल सर्वहि । पुढिले समासीं ॥ ५९ ॥
सर्व वृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो. त्यासंबंधी पुढील समासात सांगितले जाईल (५९)

कोणें स्थितीनें राहाती । कैसा अनुभव पाहाती ।
रामदास म्हणे श्रोतीं । अवधान देणें ॥ ६० ॥
कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात, ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावे, असे रामदास सांगतात. (६०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सिद्धलक्षणनाम समास नववा ॥
इति श्रीवासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘सिद्धलक्षणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : शून्यत्वनिरसन
॥ श्रीराम ॥

जनाचे अनुभव पुसतां । कळहो उठिल अवचिता ।
हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥
श्री समर्थ म्हणतात की, लोकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताच एकच गदाशेळ स्त्य. प्रत्येकजण आपले मत, अनुभव सांगू लागला. त्यामुळे जो काही कल्लोळ उडाला, तो श्रोत्यांनी कौतुकाने ऐकावा. (१)

येक म्हणती हा संसारु । करितां पाविजे पैलपारु ।
आपला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥
एक म्हणतो की, हा संसार करता करताच आपण पैक्सीसला पोहोचू हा व्याप आपला थोडाच आहे ? सर्व जीव देवाचे आहेत. (२)

येक म्हणती हें न घडे । लोभ येऊन आंगीं जडे ।
पोटस्तें करणें घडे । सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥
दुसरा कुणी म्हणतो की, असे काही घडणार नाही. संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो. पोयसाठी कुटुंबाची सेवा करणे भाग पडते. (३)

येक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखें नावें ।
कांहीं दान पुण्य करावें । सद्ग तीकारणें ॥ ४ ॥
कुणी म्हणतात की सुखेनैव संसार करावा मात्र सद्‌गती प्रास व्हावी म्हणून काही दान, पुण्य आदीही करावे. (४)

येक म्हणती संसार खोटा । वैराग्यें घ्यावा देशवटा ।
येणें स्वर्ग्यलोकींच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥
कुणी म्हणतात की संसार खोय आहे. म्हणून वैराग्य धारण करून देशत्याग करावा म्हणजे स्वर्गप्रासीचे अनेक मार्ग मोकळे होतात. (५)

येक म्हणती कोठें जावें । वेर्थचि कासया हिंडावें ।
आपुलें आश्रमी असावें । आश्रमधर्म करूनी ॥ ६ ॥
कुणी म्हणतात की उगीच कोठेजायचे ? व्यर्थ कशाला इकडे-तिकडेहिंडायचे ! त्यापेक्षा आपला जो आश्रम असेल त्याचे आचरण त्या आश्रमात राहूनच करावे (६)

येक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म ।
ये संसारीं नाना कर्म । करणें लागे ॥ ७ ॥
कुणी म्हणतात की, कुठला आला आहे धर्म ? सर्व अधर्मच घडत असतो. या संसारात नाना प्रकारची कर्मे करावी लागतात (७)

येक म्हणती बहुतांपरी । वासना असावी वरी ।
येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥
कुणी म्हणतात की, या सर्वापेक्षा आपली वासना बरी असावी म्हणजे अनायासे हा संसार तरून जाता येतो. (८)

येक म्हणती कारण भाव । भावेंचि पाविजे देव ।
येर हें अवघेंचि वाव । गथागोवी ॥ ९ ॥
एक म्हणतात की, आपला भावच सर्व गोष्टीस कारण असतो. भाव चांगला असेल तर त्यामुळे देवाचीही प्राप्ती होते. भावाशिवाय सर्व व्यर्थ आहे. गोंधळ आहे. (९)

येक म्हणती वडिलें जीवीं । अवघीं देवचि मानावीं ।
मायेबापें पूजीत जावीं । येकाभावें ॥ १० ॥
आपल्या आईवडिलांना जीवाभावाने देवच मानीत जावे व एकनिष्ठपणाने आई-वडिलांची पूजा करावी. (१०)

येक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें करावें पूजन ।
मायेबाप नारायेण । विश्वजनाचा ॥ ११ ॥
कुणी म्हणतात की, देवाब्राह्मणांचे पूजन करावे. त्यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतात. (११)

येक म्हणती शास्त्र पाहावें । तेथें निरोपिलें देवें ।
तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी ॥ १२ ॥
कुणी म्हणतात की, शास्त्रात काय सांगितले आहे त्याप्रमाणे वागावे, असे भगवान म्हणतात. त्याप्रमाणे वागले असता परलोक प्रास होतो. (१२)

येक म्हणती अहो जना । शास्त्र पाहातां पुरवेना ।
याकारणें साधुजना । शरण जावें ॥ १३ ॥
एक म्हणतात की, अहो, शास्त्रे इतकी आहेत की त्यांचा अभ्यास करायला आयुष्य पुरे पडणार नाही. म्हणून त्यापेक्षा साधू-संतांना शरण जावे, हे बरे (१३)

येक म्हणती सांडा गोठी । वायांचि करिता चाउटी ।
सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥
कुणी म्हणतात की, उगीच वटवट करणे बंद कस. ती गोष्ट राहू दे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोयत भूतदया असावी. (१४)

येक म्हणती येकचि बरवें । आपुल्या आचारें असावें ।
अंतकाळीं नाम घ्यावें । सर्वोत्तमाचें ॥ १५ ॥
एक म्हणतात की, आपापल्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे आचारकसवा हेसर्वांत चांगले. आणि अंतकाळी सर्वोत्तमाचे नाव घ्यावे. (१५)

येक म्हणती पुण्य असेल । तरीच नाम येईल ।
नाहीं तरी भुली पडेल । अंतकाळीं ॥ १६ ॥
दुसस कुणी म्हणतो की, जर गाठी पुण्य असेल तरच अंतकाळी मुखात नाम येईल, नाहीतर विसर पडेल, भ्रांती उत्पन्न होईल. (१६)

येक म्हणती जीत असावे । तंवचि सार्थक करावें ।
येक म्हणती फिरावें । तिर्थाटण ॥ १७ ॥
एक म्हणतात की, जिवंतपणी आयुष्याचे सार्थक करावे. तर दुसरा कुणी म्हणतो की, तीर्थयात्रा करीत फिरावे हे चांगले. (१७)

येक म्हणती हे अटाटी । पाणीपाषाणाची भेटी ।
चुबकळ्या मारितां हिंपुटी । कासाविस व्हावें ॥ १८ ॥
कुणी एकम्हणतो की, व्यर्थ खययेप कशाला करावा ? तीर्थक्षेत्रात जिकडे-तिकडेपाणी आणि पाषाणाशिवाय काय आहे ? तीर्थात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कासावीस होतो. (१८)

येक म्हणती सांडी वाचाळी । अगाध महिमा भूमंडळीं ।
दर्शनमात्रें होय होळी । माहापातकाची ॥ १९ ॥
त्यावर दुसग कुणी म्हणतो की, वाचाळपणा बंद कर या पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे. केवळ त्यांच्या दर्शनाने मोठमोठी पातके भस्म होऊन जातात. (१९)

येक म्हणती तीर्थ स्वभावें । कारण मन अवरावें ।
येक म्हणती कीर्तन करावें । सावकास ॥ २० ॥
कुणी एक म्हणतो की, मनच बंधमोक्षाला कारण असल्याने संयमाने त्यासच आवरावे म्हणजे तेच तीर्थस्वरूप बनते, तर दुसग कुणी म्हणतो की, वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करीत जावे. (२०)

येक म्हणती योग बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा ।
देहो अमरचि करावा । अकस्मात ॥ २१ ॥
कुणी म्हणतो योग हेच उत्तम साधन आहे. म्हणून तोच मुख्य साधावा आणि एकाएकी आपला देहच अमर करावा. (२१)

येक म्हणती ऐसें काये । काळवंचना करूं नये ।
येक म्हणती धरावी सोये । भक्तिमार्गाची ॥ २२ ॥
त्यावर दुसरा कुणी म्हणतो की, हे बरे नाही. माणसाने काळाची फसवणूक करू नये. तर तिसराच कुणी म्हणतो की, आपण आपले भक्तिमार्गास लागावे हे बरे (२२)

येक म्हणती ज्ञान बरवें । येक म्हणती साधन करावें ।
येक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥
कुणी म्हणतात की, ज्ञान उत्तम. कुणी म्हणतात की, साधन करावे. तर आणखी कुणी म्हणतात की, निरंतर मुक्तच असावे. (२३)

येक म्हणती अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा ।
येक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा ॥ २४ ॥
त्यावर कुणी एखादा म्हणतो की, अरे उचंखल माणसा, जरा तरी पापाचा कंयळा धर ! त्यावर कुणी उत्तर देतो की, अरे आमचा मार्गच मुळी मोकळेपणाने वागण्याचा आहे. (२४)

येक म्हणती हें विशेष । करूं नये निंदा द्वेष ।
येक म्हणती सावकास । दुष्टसंग त्यागावा ॥ २५ ॥
कुणी म्हणतो की, कुणाचीही निंदा अथवा द्वेष करू नये हे महत्त्वाचे आहे. तर दुसरा म्हणतो की, हळूहळू दुष्टांची संगत सोडावी. (२५)

येक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखचि मरावें ।
तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥
कुणी म्हणतात की, ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्यासमोर मरावे म्हणजे तत्काळ मोक्षपद प्रास होते. (२६)

येक म्हणती सांडा गोठी । आधीं पाहिजे ते रोटी ।
मग करावी चाउटी । सावकास ॥ २७ ॥
कुणी म्हणतात की, या सर्व गोष्टी राहू दे. आधी पोयला अन्न कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. इतर वटवट नंतर सावकाश करीत बसावे. (२७)

येक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा ।
कारण दुष्काळ न पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥
कुणी म्हणतात की, प्रथम चांगला पाऊस पडावा म्हणजे मग इतर गोष्टी सुरळीत चालतात. दुष्काळ पडला नाही म्हणजे बरे (२८)

येक म्हणती तपोनिधी । होतां वोळती सकळ सिद्धी ।
येक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥ २९ ॥
कुणी म्हणतात की, खूप तप केले पाहिजे म्हणजे मग सिद्धी प्राप्त होतात. दुसरा कुणी म्हणतो की, आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्यावी. (२९)

येक म्हणती आगम पाहावा । वेताळ प्रसन्न करून घ्यावा ।
तेणें पाविजे देवा । स्वर्गलोकीं ॥ ३० ॥
कुणी म्हणतात की, तंत्रशास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला प्रसन्न करून घ्यावे. त्यायोगे स्वर्गलोक प्रास होऊन देव भेटतो (३०)

येक म्हणती अघोरमंत्र । तेणें होईजे स्वतंत्र ।
श्रीहरी जयेचा कळत्र । तेचि वोळे ॥ ३१ ॥
कुणी म्हणतात की, अघोर मंत्राचे अनुष्ठान करावे म्हणजे स्वतंत्र होता येते व जिचा आधार श्रीहरी आहे ती ल्यी प्रसन्न होते. (३१)

ती लागले सर्व धर्म । तेथें कैंचें क्रियाकर्म ।
येक म्हणती कुकर्म । तिच्या मदे ॥ ३२ ॥
त्या लक्ष्मीच्या योगेच सर्व धर्म घडतात. मग तेथे क्रियाकर्माची आवश्यकता उरत नाही. तर दुसरा कुणी म्हणतो की, क्लीच्या मदानेच कुकर्म घडते. (३२)

येक म्हणती येक साक्षप । करावा मृत्यंजयाचा जप ।
तेणें गुणें सर्व संकल्प । सिद्धीतें पावती ॥ ३३ ॥
कुणी म्हणतात की, एक प्रयत्न जरूर करून पहावा. मृत्युंजयाचा जप केला की, त्यायोगे सर्व संकल्प सिद्धीस जातात (३३)

येक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव ।
येक म्हणती झोटिंग सर्व । पुर्वितसे ॥ ३४ ॥
कुणी म्हणतो की, बहुक भैरवाची उपासना केली की, वैभव प्रास होते. दुसरा कुणी म्हणतो की, झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. (३४)

येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भद्रकाळी ।
येक म्हणती उचिष्ट चांडाळी । साहें करावी ॥ ३५ ॥
कुणी म्हणतात, काळी कंकाळी, तर दुसरे कुणी म्हणतात, भद्रकाळी तर आणखी कुणी म्हणतात की, उच्छिष्ट चांडाळी साह्य करून घ्यावी. (३५)

येक म्हणती विघ्नहर । येक म्हणती भोळा शंकर ।
येक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥ ३६ ॥
कुणी म्हणतात विध्यहर लवकर पावतो, तर दुसरे कुणी म्हणतात की भोळा शंकर लवकर पावतो, तर कुणी म्हणतात की भगवती सत्वर पावते. (३६)

येक म्हणती मल्लारी । सत्वरचि सभाग्य करी ।
येक म्हणती माहा बरी । भक्ति वेंकटेशाची ॥ ३७ ॥
कुणी एक म्हणतो की, मल्हारीच्या कृपेने लवकर भाग्योदय होतो, तर दुसरा कुणी म्हणतो, व्यंकटेशाची भक्ती करावी हे फार उत्तम. (३७)

येक म्हणती पूर्व ठेवा । येक म्हणती प्रेत्न करावा ।
येक म्हणती भार घालावा । देवाच वरी ॥ ३८ ॥
कुणी म्हणतात पूर्वप्रारव्य असेल तसे होईल, तर दुसरे कुणी म्हणतात की, प्रयत्न करावा तर आणखी कुणी म्हणतात की, सर्व भार देवावरच घालावा. (३८)

येक म्हणती देव कैंचा । अंतचि पाहातो भल्यांचा ।
येक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥ ३९ ॥
कुणी म्हणतो की, कसला आलाय देव ! तो भल्याभल्यांचा अंत पाहतो ! तर दुसरा कुणी म्हणतो की, हा युगाचा युगधर्मच आहे. (३९)

येक आश्चीर्य मानिती । येक विस्मयो करिती ।
येक कंटाळोन म्हणती । काये होईल तें पाहावें ॥ ४० ॥
ही बोलणी ऐकून कुणी आश्चर्य करतात, तर कुणी चकित होतात. तर कुणी कटळून म्हणतात की, जे जे होईल ते पाहावे ! (४०)

ऐसे प्रपंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ।
परंतु कांहीं येक चिन्ह । अल्पमात्र बोलिलों ॥ ४१ ॥
याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मते सांगतात. ती अपार आहेत, परंतु थोडी कल्पना यावी, म्हणून त्यातली काही येथे सांगितली आहेत. (४१)

आतां असो हा स्वभाव । ज्ञात्यांचा कैसा अनुभव ।
तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥
असो. आता प्रापंचिकांचा स्वभाव सांगणे पुरे झाले. ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सर्व आता सांगतो. सावधपणे ऐका. (४२)

येक म्हणती करावी भक्ती । श्रीहरी देईल सद्गती ।
येक म्हणती ब्रह्मप्राप्ती । कर्मेंचि होये ॥ ४३ ॥
कुणी म्हणतात की, भगवंताची भक्ती करावी म्हणजे श्रीहरी सद्‌गती देईल. तर दुसरे कुणी म्हणतात की, कर्मानेच ब्रह्मप्रासी होते. (४३)

येक म्हणती भोग सुटेना । ज्न्ममरण हें तुटेना ।
येक म्हणती उर्मी नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥
कुणी म्हणतात की, प्रारब्ध भोग टक्या येत नाहीत आणि त्यामुळे जन्ममरणातूनही सुटका होत नाही. कुणी म्हणतात की, या अज्ञानाच्याच अनेक ऊर्मी आहेत. (४४)

येक म्हणती सर्व ब्रह्म । तेथें कैंचें क्रियाकर्म ।
येक म्हणती हा अधर्म । बोलोंचि नये ॥ ४५ ॥
एखादा म्हणतो की, सर्व ब्रह्मच आहे, मग तेथे क्रिया तरी कुठली आणि कर्म तरी कुठले ? तर दुसरा कुणी म्हणतो की, असे मानणे हा अधर्म आहे. खरे तर असे बोलूसुद्धा नये. (४५)

येक म्हणती सर्व नासें । उरलें तेंचि ब्रह्म असे ।
येक म्हणती ऐसें नसे । समाधान ॥ ४६ ॥
कुणी म्हणतात की, प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते ब्रह्म. तर कुणी म्हणतात की, समाधान अशा प्रकारचे नसते. (४६)

सर्वब्रह्म केवळ ब्रह्म । दोनी पूर्वपक्षाचे भ्रम ।
अनुभवाचें वेगळें वर्म । म्हणती येक ॥ ४७ ॥
कुणी म्हणतात की, सर्व ब्रह्म असे म्हणणे व सर्व जाऊन उरते ते ब्रह्म म्हणणे हे दोन्ही पूर्वपक्षाचे श्रम आहेत. अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. (४७)

येक म्हणती हें न घडे । अनुर्वाच्य वस्तु घडे ।
जें बोलतां मोन्य पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥
एक म्हणतात की, जी अनिर्वाच्य वस्तू आहे तिचे वर्णन होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्रे यांनाही त्याचे वर्णन करताना मौन धरावे लागते. (४८)

तव श्रोता अनुवादला । म्हणे निश्चये कोण केला ।
सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥
येथे श्रोत्यांनी शंका घेतली की, ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला ? सिद्धांत असा आहे की, तेथे अनुभवाला वावच नाही. म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा सिद्धांत आहे. (४९)

अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें ।
आतां कांहीं येक केलें । नवचे कीं ॥ ५० ॥
प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वीच सांगितले आहे. आता काही केले तरी ते एक होऊ शकत नाहीत. (५०)

येक साक्षत्वें वर्तती । साक्षी वेगळाचि म्हणती ।
आपण दृष्टा ऐसी स्थिती । स्वानुभवाची ॥ ५१ ॥
एखादा साक्षित्वाने वागतो, साक्षी वेगळाच आहे असेही म्हणतो. आपण द्रष्टा, साक्षी ही स्वानुभवाची स्थिती आहे. (५१)

दृश्यापासून द्रष्टा वेगळा । ऐसी अलिप्तपणाची कळा ।
आपण साक्षत्वें निराळा । स्वानुभवे ॥ ५२ ॥
दृश्यापासून द्रष्ट नेहमी वेगळाच असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे सहावे ही कला अवगत होते आणि मग त्याला तसा आपण साक्षित्वाने निराळे असल्याचा अनुभवही येतो. (५२)

सकळ पदार्थ जाणतां । तो पदार्थाहून पर्ता ।
देहीं असोनी अलिप्तता । सहजचि जाली ॥ ५३ ॥
जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थांहून वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. (५३)

येक ऐसें स्वानुभवें । म्हणती साक्षत्वें वर्तावें ।
दृश्य असोनि वेगळें व्हावें । द्रष्टेपणें ॥ ५४ ॥
एक स्वानुभवाने असे म्हणतात की, आपण साक्षित्वाने वेगळे आहोत. म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे व्हावे. (५४)

येक म्हणती नाहीं भेद । वस्तु ठाईंची अभेद ।
तेथें कैंचा मतिमंद द्रष्टा आणिला ॥ ५५ ॥
कुणी दुसरे असे म्हणतात की, आत्मवस्तु एक आहे. तेथे भेदच नसताना यात हा मतिमंद द्रष्टा कसा आणला ? (५५)

अवघी साकरचि स्वभावें । तेथें कडु काय निवडावें ।
द्रष्टा कैंचा स्वानुभवें । अवघेंचि ब्रह्म ॥ ५६ ॥
सर्वच जर साखर आहे तर त्यातून कडू कसे काय निवडावे ? त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही, हा स्वानुभव असताना तेथे द्रष्टा कोल आणला ? (५६)

प्रपंच परब्रह्म अभेद । भेदवादी मानिती भेद ।
परी हा आत्मा स्वानंद । आकारला ॥ ५७ ॥
प्रपंच, परब्रह्म यात भेदच नाही. हे एकरूप आहेत. पण भेदवादी लोक त्यात भेद मानतात. खरे तर स्वानंदरूप आत्माच दृश्यरूपाने आकाराला आला आहे. (५७)

विघुरलें तुप थिजलें । तैसें निर्गुणचि गुणा आलें ।
तेथें काय वेगळें केलें । द्रष्टेपणें ॥ ५८ ॥
पातळतूप असते तेच थिजून घट्टहोते, त्याप्रमाणेनिर्गुण ब्रह्मच सगुण होते. तेथे द्रष्टेपणाने काय वेगळे केले ?(५८)

म्हणौनि द्रष्टा आणी दृश्य । अवघा येकचि जगदीश ।
द्रष्टेपणाचे सायास । कासयासी ॥ ५९ ॥
म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून सर्व एकच एक जगदीशच जर आहे, द्रष्टेपणाचे सायास कशाला ?(५९)

ब्रह्मचि आकारलें सर्व । ऐसा येकांचा अनुभव ।
ऐसे हे दोनी स्वभाव । निरोपिले ॥ ६० ॥
सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्मच साकार झालेले आहे, असा एखाद्याचा अनुभव असतो. याप्रमाणे हे दोन्ही स्वभाव वर्णन केले आहेत. (६०)

अवघा आत्मा आकाराअ । आपण भिन्न कैंचा उरला ।
दुसरा अनुभव बोलिला । ऐसियापरी ॥ ६१ ॥
एक आत्याचएकलाएक आकारास आला आहे. त्याहून दुसरी वस्तूच नाही. तेथे आपण भिन्न उरतोच कोठे ? असा हा दुसऱ्या काही लोकांचा अनुभव येथे सांगितला आहे. (६१)

ऐक तिसरा अनुभव । प्रपंच सारूनियां सर्व ।
कांहीं नाहीं तोचि देव । ऐसें म्हणती ॥ ६२ ॥
आता तिसरा अनुभव सांगतो तो ऐक. सर्व दृश्य वृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असे जे वाटते, तोच देव, असे काही लोक म्हणतात. (६२)

दृश्य अवघें वेगळें केलें । केवळ अदृश्यचि उरलें ।
तेंचि ब्रह्म अनुभविलें । म्हणती येक ॥ ६३ ॥
सर्व दृश्य वेगळे केल्यावर केवळ अदृश्य जे उरले तेच ब्रह्म असा अनुभव काही लोक सांगतात. (६३)

परी तें ब्रह्म म्हणों नये । उपायासारिखा अपाये ।
सुन्यत्वास ब्रह्म काये । म्हणों येईल ॥ ६४ ॥
पण त्याला ब्रह्म म्हणू नये. कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का ? (६४)

दृश्य अवघें वोलांडिलें । अदृश्य सुन्यत्वीं पडिलें ।
ब्रह्म म्हणौनि मुरडलें । तेथुनिच मागे ॥ ६५ ॥
दृश्य सर्व ओलांडले की अदृश्यच शिल्लक राहते. ते शून्यरूप असते. साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. (६५)

इकडे दृश्य तिकडे देव । मध्यें सुन्यत्वाचा ठाव ।
तयास मंदबुद्धिस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ॥ ६६ ॥
एकीकडे दृश्य असते, दुसरीकडे देव असतो. मध्ये शून्यत्व असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतो. (६६)

रायास नाहीं वोळखिलें । सेवकास रावसें कल्पिलें ।
परी तें अवघें वेर्थ गेलें । राजा देखतां ॥ ६७ ॥
एखाद्याने रुजाला ओळखत नसल्याने सेवकालाच सजा मानले, पण प्रत्यक्ष गजाची भेट झाल्यावर ते सर्व व्यर्थ ठरले. (६७)

तैसें सुन्यत्व कल्पिलें ब्रह्म । पुढें देखतां परब्रह्म ।
सुन्यत्वचा अवघा भ्रम । तुटोन गेला ॥ ६८ ॥
तसे शून्यत्व हेच ब्रह्म अशी कल्पना केली, पण पुढे परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर शून्यत्व हेच ब्रह्म हा सर्व श्रम नष्ट झाला. (६८)

परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेकें वेगळा ।
जैसें दुग्ध घेऊन जळा । राजहंस सांडी ॥ ६९ ॥
म्हणून हा सूक्ष्म अडथळा, राजहंस ज्याप्रमाणे पाण्याचा त्याग करून दूध तेवढे घेतो त्याप्रमाणे साससारविवेकाने दूर सासवा. (६९)

आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें ।
मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ ७० ॥
आधी दृश्य पांचभौतिक वृष्टीचा त्याग करावा, मग शून्यत्व ओलांडावे आणि मूळमायेच्या पलीकडे असलेले परब्रह्म पाहावे. (७०)

वेगळेपणें पाहाणें घडे । तेणें वृत्ति सुन्यत्वीं पडे ।
पोटीं संदेह पवाडे । सुन्यत्वाचा ॥ ७१ ॥
पाहावे असे म्हटले की, जी वस्तू पाहावयाची ती व पाहणारा असा वेगळेपणा येतो, त्यामुळे वृत्ती शून्यत्वात पडते आणि मग शून्यत्व हेच ब्रह्म असा मनात संदेह उत्पन्न होतो. (७१)

भिन्नपणें अनुभविलें । तयास सुन्य ऐसें बोलिलें ।
वस्तु लक्षितां अभिन्न जालें । पाहिजे आधीं ॥ ७२ ॥
भिन्नपणे जे अनुभवले ते ‘ काही नाही ‘ म्हणून त्याला शून्य असे नाव दिले. पण आत्मवस्तूचे अनुसंधान करू लागले की त्याच्याशी एकरूपता व्हावयास हवी. (७२)

वस्तु आपणचि होणें । ऐसें वस्तुचें पाहाणें ।
निश्चयेंसीं भिन्नपणें । सुन्यत्व लाभे ॥ ७३ ॥
आत्मवस्तूला पाहणे म्हणजे ती वस्तू स्वतः आपणच होणे या प्रकारचे असते. भिन्नपणामुळे निश्चितच शून्यत्याची प्राप्ती होते. (७३)

याकारणें सुन्य कांहीं । परब्रह्म होणार नाहीं ।
वस्तुरूप होऊन पाहीं । स्वानुभवें ॥ ७४ ॥
म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. स्वतः अनुभव घ्यावा व ब्रह्मस्वरूपच होऊन सहावे. (७४)

आपण वस्तु सिद्धचि आहे । मन मी ऐसें कल्पूं नये ।
साधु सांगती उपाये । तूंचि आत्मा ॥ ७५ ॥
आपण स्वयंसिद्ध आत्मावरच आहोत. म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करूनये. यावरसाधूउपाय सांगतात की, तूच आत्या आहेस असे अनुसंधान करावे. (७५)

मन मी ऐसें नाथिलें । संतीं नाहीं निरोपिलें ।
मानावें कोणाच्या बोलें । मन मी ऐसें ॥ ७६ ॥
मी मुळात मन नाहीच. शिवाय संतांनीही तसे सांगितलेले नाही. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ‘ मी ‘ मन असे मानावे ? (७६)

संतवचनीं ठेवितां भावे । तोचि शुद्ध स्वानुभव ।
मनाचा तैसाच स्वभाव । आपण वस्तु ॥ ७७ ॥
संतवचनावर दृढ निष्ठा ठेवावी. कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसे वळण लावावे तसे ते लागते हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसविण्याचा प्रयत्न करावा. (७७)

जयाचा घ्यावा अनुभव । तोचि आपण निरावेव ।
आपुला घेती अनुभव । विश्वजन ॥ ७८ ॥
ज्याचा आपण अनुभव घ्यावयास जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो हा अनुभव आपण घ्यावा. या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. (७८)

लोभी धन साधूं गेले । तंव ते लोभी धनचि जाले ।
मग भाग्यपुरुषीं भोगिलें । सावकास ॥ ७९ ॥
लोभी माणूस हा धनाचा शोध घेऊ लागतो व अखेर तो धनच होतो. त्याची वृत्ती केवळ धनरूप बनते. तो स्वतः त्या धनाचा उपभोगही घेत नाही आणि मग दुसराच कुणी भाग्यवान पुरुष त्या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. (७९)

तैसें देहबुद्धी सोडितां । साधकास जालें तत्वता ।
अनुभवाची मुख्य वार्ता । ते हे ऐसी ॥ ८० ॥
त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की, तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य गोम म्हणजे रहस्य आहे. (८०)

आपण वस्तु मुळीं येक । ऐसा ज्ञानाचा विवेक ।
येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ ८१ ॥
आपण आणि आत्मवस्तु म्हणा अगर परब्रह्मवस्तू म्हणा, मुळात एकच आहोत हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. याप्रमाणे येथे हा ज्ञानदशक संपूर्ण झाला आहे. (८१)

आत्मज्ञान निरोपिलें । येथामतीनें बोलिलें ।
न्यूनपर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ८२ ॥
मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केले आहे. त्यात अधिक-उणे जे असेल त्यासाठी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे, असे श्री समर्थ म्हणतात (८२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शून्यत्वनिर्शननाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे ‘सुन्यत्वनिर्शननाम’ समास दहावा समाप्त. दशक आठवा समाप्त

॥ दशक आठवा समाप्त ॥


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *