संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३८

संत ज्ञानेश्वर गाथा १ते२००

संत ज्ञानेश्वर गाथा १ते२०० विडिओ सहित  श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


श्रीहरीचे वर्णन – अभंग १ ते ५२

१.
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥

अर्थ:-

ज्ञानेश्वर माऊली हे मनरुपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रुप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले. तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते. माझा गतजन्माच्या सकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला. असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात


२.
चिदानंद रुप चेतवितें एक । एकपणें गुणागुणीं दावी अनेक ॥१॥
आदि अंतीं गुण सर्वत्र निर्गुण । गुणासी अगुण भासतीना ॥ध्रु०॥
कैसें जालें अरुपीं गुणीं गुणवृत्ती । सगुण पाहतां अंतरलें गती ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु नंदनंदनु । आदिअंतु एकु पूर्ण सनातनु गे माये ॥३॥

अर्थ:-

चिंदानंद स्वरुपाचा तो गुणांच्या मुळे अनेक रुपांनी दिसत आहे. आदि अंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रुपात आहे. व त्यामुळे गुणच अगुण झालेले दिसतात. त्या निर्गुणाच्या ठायी हे गुण कसे दिसतात हे कळत नाही. व सगुणरुप पाहता द्विमुढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळत नाही. तो नंदाचा नंदन नसुन तो पुर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माऊली सांगतात.


३.
मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥
बरवें रुप काळें अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥
रखुमादेविवरु अगाध काळें । म्हणोनि सर्वत्र अर्पियलें ॥२॥

अर्थ:-

त्याचे काळेपण मिरवत असलेले रुप मी पाहिले तेंव्हा मन मारुन मी डोळ्यात साठवले. तेच काळेपण अनमोल असुन तेच मी शुध्द भावाने वर्णित आहे. ज्याने सर्व आकाश व्यापले तो रखुमाईचा पती अगाध (ठाईचा ) काळा आहे असे माऊली सांगतात.


४.
हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥१॥
काय करुं माय सांवळा श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ध्रु०॥
बापरखुमादेविवरु सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्ण सुखें ॥२॥

अर्थ:-

त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मुरोन गेली व माझी माझ्यावरची सत्ता लोप पावली. निवृत्तिनाथांनी त्याच्या बद्दल सांगितल्या पासुन मला काय झाले ते कळत नाही त्यांने मला व्यापुन टाकले आहे. माझे पिता व रखुमाईचा पती असलेल्या त्या सावळ्यारुपाने मला येवढे मोहित केले आहे की सेजे बाजे वर पहुडलो तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात.


५.
नवल देखिलें कृष्णरुपीं बिंब । सांवळी स्वयंभ मूर्ति हरिची ॥१॥
मन निवालें बिंबलें समाधान जालें । कृष्णरुपें बोधलें मन माझें ॥ध्रु०॥
बापरखुमादेविवरु सांवळा सर्व घटीं । चित्तें चैतन्या मिठी घालिताखेवों ॥२॥

अर्थ:-

त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभु मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले. त्या कृष्णरुपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले. तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्यरुपाने असुन त्याला मी मिठीत कवळुन घेत आहे. असे माऊली सांगतात.


६.
सुंदर सुरेख वोतिलें । परब्रह्म तेज फ़ांकलें । तें व्योमीं व्योम सामावलें । नयनीं वो माय ॥१॥
कमळनयन सुमन फ़ांकलें । त्या परिमळा आथिलें । मकरंदीं वो माय ॥ध्रु०॥
संकोचला संसार । पारुषला व्यवहार । ब्रह्मानंद अपार । जहाला वो माय ॥२॥
मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणीं । तें ठकावलें निर्वाणीं । नेति मुखें वो माय ॥३॥
यापरतें बोलणें । न बोलणें होणें । तें म्यां आपुल्या अंगवणें । केलें वो माय ॥४॥
ऐसियाते वोटी । लागलें तयाचे पाठी । रखुमादेविवरा भेटी । विठ्ठलीं वो माय ॥५॥

अर्थ:-

नितांत सुंदर अश्या त्याचे तेज परब्रह्म स्वरुपानी पसरले आहे.ते व्योम म्हणजे आकाशा येवढे आकाशभर व्यापले आहे. कमळा सारखे नेत्र व फुला सारखा सुगंध त्याला आहे. त्याचा तो परिमळ व मध ह्यांचा तो एकत्रीत अविष्कार आहे.त्याच्या ठायी संसार संकोचतो, व्यवहार दुर जातो व त्याच्या जवळ फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो. मधुर वेदवाणी त्याच्या गुणांचे आकलन करु शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते. या बाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते कारण तो ब्रह्मस्वरुपपणे मीच आहे. हे दोन्ही ओठ त्याचे स्मरण करत त्याच्या जणु काही पाठी लागले आहे. तो रखुमाईचा वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात.


७.
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥
निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥
नकळे याची गती नकळे याची लीळा । आपिआप सोहळा भोगीतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी । आपण चराचरीं नांदतसे ॥३॥

अर्थ:-

ज्याला मूळ नाही फांद्या व पान नाहीत असा वृक्षस्वरुप देव आमच्या घरी आहे. तो निर्गुणपणात उभा राहुन सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे. त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत तरी तो सगळे सोहळे भोगतो आहे. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे.


८.
निळिये मंडळीं । निळवर्ण सांवळी । तेथें वेधलिसे बाळी । ध्यानरुपा ॥१॥
वेधु वेधला निळा । पाहे घननीळा । विरहणीं केवळा । रंग रसनें ॥ध्रु०॥
नीळवर्ण अंभ । नीळवर्ण स्वयंभ । वेधें वेधु न लभे । वैकुंठींचा ॥२॥
ज्ञानदेव निळी । ह्रदयीं सांवळी । प्रेमरसें कल्लोळीं । बुडी देत ॥३॥

अर्थ:-

निलवर्ण आकाशा सारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बाल्यावस्तेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेध लागले. त्या आकाशीच्या निळेपणाला पाहुन त्या घननिळाचे वेध लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करु लागली. तो घननिळा व त्या निळ्यारंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेध लागले आहेत. त्या निलवर्ण असलेल्याला माझ्या हृदयात त्याच निळ्यारंगाने रंगुन त्यात प्रेमरस कल्लोळ करुन बुडी दिली असे माऊली सांगतात.


९.
नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे । निळिमा सहजे । आकारली ॥१॥
नीळ प्रभा दिसे । नीळपणें वसे । निळिये आकाश । हरपलें ॥ध्रु०॥
निळेपण ठेलें । निळिये गोंविलें । निळपण सोंविळें । आम्हां जालें ॥२॥
ज्ञानदेवी निळा । परब्रह्मीं गोविला । कृष्णमूर्तिं सांवळा । ह्रदयीं वसे ॥३॥

अर्थ:-

त्या घननिळ्याच्या पायीच्या धुळी मनालाही निळेपण लाभले आहे.व ती सहज मनात आकारली. त्याचा निळा रंग असल्याने त्याची निलप्रभा पसरली आहे.व त्यात आकाश हारपले आहे. त्या देवाच्या निलवर्णामुळे भक्त ही निळेपणात न्हाले व त्यामुळे ते पवित्र झाले. मी त्याला परब्रह्मात ही निळेपणे पाहिला व ती कृष्णमूर्ती सावळेपणेच हृदयात वसली असे माऊली सांगतात.


१०.
निळिये पेरणी । निळिये वाहाणी । गुणाचीं लेणीं । कृष्णवर्ण ॥१॥
नवलाव गे माय । नवलाव चोज । निळीं निळिमा काज । आकारलें ॥ध्रु०॥
नीळवर्ण तनु । नीळवर्ण गुणू । निळिमा पूर्णू । ह्रदयीं नांदे ॥२॥
ज्ञानदेवीं लीला । मननीं निवाला । निळिये अवलीळा । हरपला ॥३॥

अर्थ:-

त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरुपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली. त्या निलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहेत. आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे. व सर्व जगच निळे दिसत आहे. त्याचे शरिर निळे त्याचे गुण निळे संपुर्ण हृदयी निळेपणे आले आहे. त्याच्या निळवर्ण लीलेने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो. असे माऊली सांगतात.


११.
जरासंदुमल्लमर्दनु तो । गजपित्राहटणु तो गे बाई ॥१॥
कुब्जकपान तो । सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । कंसचाणूरमर्दन तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

हे जीवरुपी सखी जरासंधाला मल्ल युध्दातुन मारणारा व हत्तीला नक्रापासुन वाचवणारा तोच आहे. कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याची मदत करणारा तोच आहे. कंस व चाणुर यांचे मंर्दन करणारा तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


१२.
ब्रह्मादिका आठकु तो । शिवध्यान ध्यानकु तो गे बाई ॥१॥
गौरीजाप्यसहस्त्रनामीं तो । पुण्यपावन त्रैलोक्य तो गे बाई ॥२॥
रखुमादेविवरु तो । सहजपूर्ण तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

हे जीवरुपी सखे तो परमात्मा शिवाच्या ध्यानाचा विषय आहे.व तो ब्रह्मादिकांना गोचर नाही. पुण्य पावन त्रैलोक्यच तो असुन त्याला पार्वती सहस्त्र नामानी जपत असते. सहज व पूर्ण बोध असलेला तो रखुमाईचा पती आहे हे माऊली सांगतात


१३.
सर्वादि सर्वसाक्षी तो । विश्वंभर खल्विद तो गे बाई ॥१॥
आनंदा आनंद तो । प्रबोधा प्रबोध तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमदेविवरु तो । विटेवरी उभा तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदि आहे व तोच सर्वाला साक्षही आहे. तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे. व तोच वीटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


१४.
श्रुतिस्मृतिवचन तो । गुह्यागुह्य तो गे बाई ॥१॥
जागता निजता तो । निज चेवविता तो तो गे बाई ॥ध्रु०॥
परात्पर तो । रखुमादेविवरु तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

श्रुती व स्मृतीनी सांगितलेली वचने तोच असुन तोच गौप्याचे गौप्य आहे म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असुन तो जीवाला चेतवणारा (चैतन्य रुप)ही तोच आहे. मायेच्या पलिकडील तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


१५.
निजगुजा गूज तो । मोहना मोहन तो गे बाई ॥१॥
बोधा बोध बोधविता तो । द्वैता-द्वैत अद्वैत तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । सर्वादि सर्वेश्वरु तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे.सर्वामधिल तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


१६.
कांही नव्हे तो । अमूर्ता मूर्ति तो गे बाई ॥१॥
सहजा सहज तो । सहज सुखनिधान तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । पुंडलिकवरद तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

हे जीवरुपी सखी, तो काही नसणारा, पण मूर्त अमूर्त असणारा, तोच आहे. सुखनिधान आहे,सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे. तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


१७.
निज ब्रह्मा ब्रह्म तो । ब्रह्मादिकां वंद्य तो गे बाई ॥१॥
अचिंतचिंतन तो । सारासार गुह्य तो गे बाई ॥ध्रु०॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु तो । जनीं वनीं कृपाळु तो गे बाई ॥२॥
अर्थ:-

हे जीवरुप सखी, तो त्या भगवान ब्रह्म्याचा ब्रह्म आहे. व ब्रह्मादिकांना तोच वंदनिय आहे. तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे. तो सारासार विचार करुन निघालेले गौप्य ( गीतेत गौप्याचे गुप्तधन गीतेला म्हंटले आहे ) आहे. तो सर्व चराचरावर कृपा करणारे रखुमाईचा पती व माझे पिता आहेत. असे माऊली सांगतात.


१८.
सारंगधरु तो । चक्रा आधारु हरि तो गे बाई ॥१॥
सुलभा सुलभ तो । आटकु नटके तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । द्वैताद्वैतातीत तो गे बाई ॥२॥

अर्थ:-
हातात सुदर्शन चक्र धरणारा व सारंग नावाचे धनुष्य घेणारा, माझे जीवरुपी सखी तोच आहे. तो स्वरुपप्राप्तीला प्रतिबंध न करणारा सहज प्राप्त होणारा आहे. तो द्वैताद्वैता पलिकडील असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


१९.
विश्व भुलवी योगमाया तो । गोकुळीं रहिवासु तो गे बाई ॥१॥
वसुदेवकुमरु तो । देवकीनंदनु तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । शुकादिकां चिंतन तो गे बाई ॥२॥

अर्थ:-

हे जीवरुप सखी आपल्या योगमायेच्या साहाय्याने विश्व भुलवणारा तो गोकुळचा रहिवासी आहे.वसुदेव व देवकीचा तो मुलगा आहे.शुका सारखे ऋषी ज्याचे चिंतन करतात तो रखुमाईचा पती आहे.


२०.
पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥१॥
सहजबोधीं अनुभव तो । परमतत्त्वीं अनुराग तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो । ब्रह्म विटेवरी तो गे बाई ॥२॥

अर्थ:-
हे जीवरुप सखी सहा चक्रापलिकडील असलेले गोल्हाट तोच आहे. त्रिकुट चक्राहुन वेगळा असणारा तोच आहे. सहजपणे होणारा अनुभवरुपी बोध तोच आहे तर परमतत्वी अनुराग ही तोच आहे. तेच परब्रह्म विटेवर उभे आहे तेच रखुमाईचा पती आहे असे माऊली म्हणतात


२१.
विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट । ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें ॥१॥
मी तूं हे मात हरपले दृष्टांत । ह्रदयीं ह्रदयस्थ निजतेजें ॥ध्रु०॥
साकार निराकार शून्याशून्य दिठा । रुपीं रुपवाटा हरि माझा ॥२॥
बापरखुमादेविवरु ह्रदयस्थ घटीं । बिंबोनि उफ़राटी कळा दिसे ॥३॥

अर्थ:-

प्रपंचाचे ज्ञान हे अज्ञानच असुन परमार्थ ज्ञानाने त्याला वाटेला लावले. त्यामुळे मनातील मी तु पण नष्ट होऊन हृदयात तो निजतेजाने स्थापित होतो. साकार निराकार शुन्याचे शून्य हे सर्व रुप घेऊन तो प्रगट झालेला माझा हरि आहे. असा जो रखुमाईचा पती हृदय घटात अवतरला तरी मूर्खाना तो वेगळा भासतो. असे माऊली बोलतात.


२२.
ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं । बाह्यजु अभ्यंतरी जाला देव ॥१॥
काय सांगूं माय । त्रिभुवन धाय । पाहातां न समाय । नाना रुपीं ॥ध्रु०॥
चढत्या वाढत्या गोष्टी । प्रगट दिसे घटीं । नामरुपें वैकुंठीं । नेऊनि घाली रया ॥२॥
ज्ञानदेवा गोडी । हरिपदीं आवडी । प्रवृत्तीची थडी । उलंडिली ॥३॥

अर्थ:-

परमार्थ ज्ञान व संसाराचे विज्ञान होऊन आमच्या घरी नांदत आहे. असा तो देव बाहेर व भितरी एकच झाला. काय सांगु त्याची मात त्याला त्रिभुवन ध्याते व नाना रुपात ही तो समावत नाही भरुन उरतो. अत्यंत सुक्ष्म व अत्यंत प्रचंड वस्तुत तो भरलेला दिसतो असा अनेक रुपात व्यापलेला तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याच्या वरील प्रेमामुळे मी संसारातील प्रवृतीची नदी ओलांडुन मी हरिप्रेमा काठावर पार झालो.


२३.
सारसार दोन्ही । न दिसती नयनीं । अवचिता गगनीं । बिंबलासे ॥१॥
लोपले रविशशि । तेज न माये आकाशीं । मेघ:श्याम मेघाशीं । लपविलें ॥ध्रु०॥
दिव्यरुप तेज । तीव्र ना तेजबीज । कुंडलि विराजे । लोपलें सूर्यो ॥२॥
ज्ञानदेवा ध्यान । मनाचेंही मन । हरिचरण स्थान । दृढ केलें ॥३॥

अर्थ:-

सार असारचे रुप असलेले ते स्वरुप डोळ्याना दिसत नाही पण अवचित गगनात बिंबते. त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सुर्य हे त्या तेजात लोपले आहेत.ते तेज त्या आकाशात मावत नाही.जणुकाही त्या मेघःशामाने मेघालाही झाकुन टाकले. कुंडलिनी जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या रुपावर निर्माण होते. ते तेज तिव्र नाही व त्यात सुर्य लोपला आहे. आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


२४.
स्वरुपीं पाहतां बिंबीं बिंब उमटे । तें मेघ:श्याम दाटे बुंथि मनीं ॥१॥
चित्त वित्त हरि जाला वो साजणी । अवचिता आंगणीं म्यां देखियला ॥ध्रु०॥
सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें । दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥
ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही । एका रुपें बाही तरशील ॥३॥

अर्थ:-

मेघशामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे. त्या सगुण रुपाला अंगणात मी अवचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो.त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यानी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले. त्या रुपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरुन जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


२५.
सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥
निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥
आदिमध्यंअत राहिला अनंत । न दिसे द्वैताद्वैत आम्हां रया ॥२॥
ज्ञानदेवीं सोय अवघाचि सामाय । सुखदु:ख माय आम्हां नाहीं ॥३॥

अर्थ:-

सावळ्या रुपाचे सावळे तेज सर्वत्र बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी ह्रदयाच्या घटात घातले आहे. तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे. अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले. आदि मध्य, अंत, व्दैत, अव्दैत यापासून वेगळे असणारे ते अनंतरूप आहे. असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुखदुःख उरली नाहीत असे माऊली सांगतात.


२६.
एकांति बाळा । कीं सोहंसुखशयन वेळा । पाहे चरणकमळा । सुंदराचे ॥
तेथें अरुण उदेला । कीं सुमन प्रगटला । कमळणी जाला । अंतरीं विकासु ॥
तें चरण कमळकेवळ । भक्त आळिउळ । सेविती सकळ । योगिजन । तेणें तृप्त जालें ।
कीं ह्रदय वोसंडले । म्हणोनि वाहावलें । ज्ञानडोहीं । तेचि ते परमानंद गे माय ॥१॥
न संगवे माय । परा पारुषली । दोंदिल दृष्टी जाली देखणेंपणें ॥
मनाचा अंकुर उगीच मुराला । तो कृष्णचि होऊन ठेला । अनुभविया ॥ध्रु०॥
तये पदांघ्रीचे रज । तेणें तृप्ति वो सहज । वरि त्रिवेणी ऊर्ध्व व्रज । मज पाहतां ॥
ते तंव रेखा । वरि सखोल देखा । त्यावरी वोळले पीयूषपाणी ॥
तयेचेनि मागें । उध्दरणें जगें । म्हणोनि संतसंगें । तया सोई ॥
ते दोहीं भागीं । विस्तारलें जगीं । म्हणोनि तया भागीं । चरणांगुष्ठ ॥
दृष्टीचा डोळा । न निवडेच बाळा । तेथें जाला एकवेळा । मुनिजनां गे माये ॥२॥
तेथें बिंबलीं नखें । कीं विवळणी विशेखें । काळेपणाचेनि द्वेषें । वाहावलीं पुढां ॥
उगमींच संचले । कीं वियोगें वाहावले । पुनरपि जडले । कृष्णपदीं ॥
गंगा अंगुष्ठधार । कीं वांकिचा बडिवार । तेथें सप्तही स्वर । उमटताती ॥
स्वरुपीं रमली । म्हणोनि अधोमुख जाली । शोभती घाघुरली । पायीं प्रभावळी गे माये ॥३॥
तंव ते निजानंद भरितें । नेणती आणिकांतें । विसरली आपणातें । हास्यवदनें ॥
म्हणती नेति नेति गर्जना । कीं माणिका खेवणा । घोट्या अनुमाना । बाळसूर्यो ।
पोटरिया निवाळा । कीं उभलिया सरळा । जानुद्वय सोज्वळा । उच्चस्तंभ ॥
उंच युगुळ कटीं । माज सामावे मुष्टीं । सोहं समदृष्टी । दोहीं भांगीं गे माये ॥४॥
वरि वेढिला पिंवळा । कीं मिरवे सोनसळा । कीं कल्पतरु फ़ुलेला । नाभिस्थानीं ॥
तेथें वेधु गोपिबाळा । कीं अंतरीं सांवळा । पालवी मेखळा । अभिळाखिया ॥
तेथें मदनु गूढपणें । रतिशये रमणे । दुजे अनुभउ अनुभवणें । न निवडे केंही ॥
सखोल नभमंडळ । तै ब्रह्मस्थान केवळ । कैसे पाहाले विवळ । तेथें जगामागी गे माये ॥५॥
रोमराजवेळा । कीं वेणी एकवळा । दावि निराळा । उदरामध्यें ॥ ह्रदय निर्मळ ।
तेथें ध्येय ध्यान केवळ । वरि चरणकमळ । द्विजोत्तम ॥ वैजयंति माळा । शोभतसे गळां ।
उभलेनि वक्षस्थळा । उभारली ॥ सरळ बाहुदंड । न कळे कानवड ।
अंगोळिया धडफ़ुड । खुणा दावितो गे माये ॥६॥
ऐसा खुणा दावितसे एका । तंव दावी अनेका । अंगोळिया देखा । दशावतावरी ॥
नखाची मंडणी । तेथें तेज तारांगणी । होत असे प्रवणी ॥ त्रिमिर द्वैत ॥
शुक्लपक्ष । कीं अंतरीं लक्ष । सारुनियां साक्ष । दृशदिसर्वी ॥
एकाएकीं संचरे कीं माजिघरीं दुसरे । स्वयें एकसरे । नवल चोज गे माये ॥७॥
तेथ सानुसान स्वर । दोहिलें अंबर । हास्यवदन सुंदर । पावया छंदें ॥
निमासुरा नेटका । न कळे ब्रह्मादिका । वेधुनि गोपिका । मोहियलें जग ॥
समदृष्टी नासापुटीं । नेत्रद्वय निघाले भेटी । रविशशि कोटी । लोपले तेथें ॥
मना मारुनि मेळा । कीं कुंडलें शोभे किळा । तेथें जाला एकवळा । योगिजना गे माये ॥८॥
व्योमींचा मणीं । तया तळीं सहस्त्रफ़णी । तो लाधला निर्वाणी । आराधितां ॥
शेष वर्णिता श्रमला । ह्मणोनि शरण आला । शयन होऊनि ठेला । तया तळीं ॥
ऐसी सुमन सेजा । कीं मवाळपण बरविया वोजा । तेथें रातली रमा भाजा । न निवडे केंही ॥
ऐसा झाला एकवळा । शेष म्हणे दैव आलें फ़ळा । आतां पाहेल सुनीळा । कायें सेज माजी ॥९॥
ऐसयाचें ध्यान । जरि हें न करी मन । तरीच पतन । जन्ममरण ॥
चिंता साठीं फ़ेडी । कीं उभारुनियां गुढी । स्वयें सुखाचिया आवडी । कां सांडितासी ॥
आतां करुं पाहे ध्यान । तरि सहजेंचि उन्मन । म्हणोनि समाधान । होय जीवा ॥
तीर्थ व्रत तप दान । जरी न करी हें मन । तरि सहजचि साधन । गोपिनाथु ॥१०॥
तीर्था जातां सायासी । तूं काय एक देसि । म्हणोनि स्तविलासी । बहुतांपरी ॥
तंव परापश्यंती मध्यमावैखरी । या युक्तिनो बोलवेसी ॥
निवृत्ति म्हणे लीळा । विश्वव्यापक निराळा । पाहे उघडा डोळां परब्रह्म ॥
ज्ञानदेवा मीपणीं । निवृत्ति ऐक्य चरणीं । सरो दुजेपणीं । हांव जीवा ॥११॥

अर्थ:-

जीनरुपीबाळा एकांतात सोहंसुखशयनात असताना त्या सुंदर परमात्म्याचे चरणकमळ पाहयचे असतात.तेथे सुर्य उगवला की फुल फुलले किंवा कमळदळ विकासले तसा अंतरीचा विकास करायचा. ते चरणकमळ भक्त व योगी सतत सेवीत असतात. त्यातुन मिळणाऱ्या ज्ञान मकरंदामुळे ते तृप्त होतात त्यांचे हृदय आनंदाने वोसांडते व ज्ञानडोहात ते वाहात जातात तेथे तो परमानंद त्यांना मिळतो. त्याचे वर्णन करताना पराही खुंटली त्याला पाहुन दृष्टीला ही समाधान झाले. मनाचा अंकुर मनातच मुराला व तो अनुभव कृष्ण होऊनच ठाकला.त्याच्या पायधुळीने सहज तृप्ती होते. चरण, पायधुळ,व भक्त ह्या त्रिवेणीमुळे मला उर्ध्व पाहता येत आहे. ती उर्ध्वरेखा जर सखोलपणे पाहिली तर ती अमृतरेखाच वाटते.म्हणुनच त्या योगाने व संतसंगामुळे जग उध्दरते. ते दोन भाग जरी विस्तारले तरी ते चरणागुष्टापाशीच पोहचतात.पण ते दृष्टीला येणे कठिण आहे तरी मुनीजनांच्या योगे तेथे एकत्व येते.त्या चरणांची नखे ही विशेष आहेत पण त्या काळेपणाच्या वाहणीत ती पुढे निघाल्यासारखी वाटतात. उगमालाच एकत्र झाले की वियोगात वाहले पण ते तर कृष्णरुपातच जडले आहे.ही गंगेची धार की त्याला त्या अंगुष्टामुळे मिळालेले अलंकाररुप की सप्त स्वरच तेथे उमटतात. त्या स्वरुपात ती मनोवृती रमली व त्यामुळे अधोमुख झाली व ती ही त्या पायात घोळली व पायाची प्रभावळ झाली. तेंव्हा ती निजानंदाने भारली स्वतःलाच हसत हसत विसरली दुसऱ्याचा काय पाड.नेती नेती गर्जना करत त्याला माणिकाच्या कोंदणात ठेवले त्याचे घोटे म्हणजे जणु बाळसुर्यच.त्याच्या पोटऱ्या व गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ हे सरळ व ते जानुद्वय उंचस्तंभासारखे आहेत.उंच आशा कटीवर दोन्ही मुष्टी आवळुन तो सर्वाठायी समदृष्टी दोन्हीागात समच आहे.त्यावर वेढलेला पिवळा पिंतांबर व सोनसळा मिरवत आहे.जणुकाही नाभीपर्यंत फुललेला कल्पवृक्षच आहे.त्याचा वेध लागलेल्या त्या गोपी तो सावळा असला तरी त्या जणुकाही मेखळाच झाल्या आहेत.त्यारुपात गुढपणे तो मदन आला आहे. त्यामुळे त्या गोपीना रतीसुखाची इच्छा होत आहे. तिकडे दुसरे अनुभव येतच नाहीत. त्याचे सखोल नाभी त्या ब्रह्माची जागा आहे. असे विवळ होऊन जगात पाहणे सुरु आहे. त्याच्या पोटावरील केस वेणी सारखे दिसत आहेत.त्याचे हृदय निर्मळ आहे तेथे ध्येय व ध्यान एकच झाले आहे.व दोन चरणकमळे सर्वोत्तम आहेत. त्याच्या छातीवर ती वैजयंतीमाला उन्नत होऊन रुळत आहे.


२७.
मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें । अवघेंचि येणें मनें काळापिवन केलें ॥१॥
लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे । सूक्ष्म ह्मणो तरि अगाधही नव्हे ॥
या काळियाची जाली गे माये ॥ध्रु॥
बाप रखुमादेविवरु सुनीळ नीळकाळा । अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये ॥२॥

अर्थ:-

हरिध्याना मुळे माझ्या मनाचा भाव हरिरुपच झाला म्हणजे इतर गोष्टीसाठी खुंटला व त्या रुपाने काळाला ही पिऊन टाकले मी कालातीत झालो. ते रुप लघु म्हणावे तर सुक्ष्म नाही सुक्ष्म म्हणावे तर अगाध नाही. त्या काळियाने मला त्याची करुन टाकले. मी त्या रुपात बुडी दिली तो रखुमाईचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात.


२८.
नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें । सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया ।
भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची धांव । लावण्यसिंधु सिंव सांडूनि जातो गे माये ॥१॥
सुलभ परमात्मा गे माये । मन मुरोनि देखणेपणा उरी ।
याचि कारणें उभा भिवरेतीरीं । अनुपम्य जयाची थोरी गे माये ॥ध्रु०॥
काळिंदीजळाचा भोंवरा । कीं माजी वेढूनि इंदीवरा । माळ बांधोनियां मधुकरा । रोमांमाजी ॥२॥
सकल सिध्दिंचा मेळां । तेंवि विभूति शोभे भाळा । मुगुटीं रत्नकिळा । लिंग अनुपम्य गे माये ॥३॥
क्षीरसागरींचें । निवांत सुख । असो हें निमासुरें मुख । श्रीयेचें मनोहर देख । टवकारलें दोंभागीं ॥
पहावया ऊरंचीं शोभा । सकळ देवाची प्रभा । तेथें तारांगणें कैंचीं नभा । लेइला गे माये ॥४॥
कटावरी ठेवूनि हात । जनां दावी संकेत । भवजलाब्धीचा अंत । इतुलाची ॥
सम चरणींच्या खुणा । उभा पंढरीचा राणा । तो आवडे जनांमना । दुर्लभ गे माये ॥५॥
कैवल्याचा गाभा । कीं ब्रह्मविद्येचा वालभा । निकटपणाचिया लोभा । कैसा उभा असे ॥
देवा पायींची वीट । तेचि माये नीट । वरि येऊनि भीमातटी । वोळग दावी गे माये ॥६॥
नेति नेतिचेनि बिरारें । उभऊनि श्रीकरारें । श्रुंगाराचेनि पडिभरें । चराचरें वोळगती ॥
हा मेखळेचा मध्यमणी । उदो केला ग्रहगणीं । मध्य नायकु तरणी किरणीं । विरजितु गे माये ॥७॥
आमुची ह्रदयींची श्रीमूर्ति । घेऊनि विठ्ठलवेषाची बुंथी । आतां चाळविसी किती । बापा पालटु नेघे ॥
बाप रखुमादेविवरा विठ्ठला । त्वां मजशीं अबोला कां धरिला । जीवीं जीव आहे उरला । तो निघों पाहे ॥८॥

अर्थ:-

नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा त्याला बघायला जगाचे डोळे आतुर आहेत.मनही तेथे धाव घेते. भलती हाव मनाला पडते तरी त्या लावण्यसिंधुचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते. असा तो सुलभ परत्मामा भीमेतटी उभा असून त्याचे देखणेपण मनात भरून उरते अशी त्याची अनुपम्य थोरवी आहे. यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते. व त्याच्या गळ्यातील पुष्पाच्या माळांवर भक्त मधुकरासारखे गुंजारव करतात.तो म्हणजे सर्व सिध्दींचा मेळा आहे. त्याने कपाळावर विभूती रेखिली आहे मुकुटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे. क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मुख दोन्ही बाजूस राही रखमाबाई बघत आहेत.सर्व देवांची व तारांगणाची प्रभा छातीवर घेतली आहे. संसार माझ्या कमरेइतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खूण जगाला दाखवत आहे. समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा जनमानसाला आवडतो पण भक्तीशिवाय तो दुर्लभ आहे. हा क्षोमाचा गाभा व ब्रह्मविद्येचा प्रियकर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे. तो भक्ताऐक्यासाठी भीमातटी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो.हा नाही हा नाही असे सांगणाऱ्या श्रुतीवाचून दमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो.चंद्र सूर्याचे व ग्रहगणांचे त्याच्या गळ्यातील मेखळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो. कितीही वेष पालटून तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठलमूर्ती आमच्या ह्रद्यात आहे. हे विठ्ठला तू माझ्याशी का अबोला धरला आहेस म्हणून माझा जीव जाऊ पहात आहे असे माऊली सांगतात.


२९.
वेद प्रमाण करावया गोकुळासि आला । कीं नाटळिचा कुवांसा जाला ।
ब्रह्म आणि गोवळा । ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमु । पैं लाजविला ॥
गणिका स्वीकारि राहो मांडला । कीं दशरथ पतनीं चुकविला । एका तें म्हणे जागा ।
एका तें म्हणेरे निजा । तैं मुचूकुंदापें काळयवनु आणिला रया ॥१॥
विरोचनसुत । बळी बांधोनि जेणें । निगड निबध्द गजा सोडविलें ।
एकाचीं बालकें काळापासूनियां हिरे । एका बाळाचे बाप विदारिले ।
शिशुपाळा जैत देऊनियां शेखिं पाहेपां आपणचि जिंकीलें रया ॥ध्रु०॥
गुरुदुर्वास याचिये भक्ति आणि त्याचियेची रथीं देविरुक्मिणीसहित खांदु चालविला ।
तो तेणें मानें फ़ुंदो पाहे तंव कोलतिया भेणें त्रैलोक्य हिंडविला ।
पैजा सारुनि हातीं सुदर्शन वसविलें कीं भीष्मपण । साचू केला ।
जितुकाचि कौरवा तितुकाचि पांडवां अचोज हा अमुलारया ॥२॥
जमदग्नी जनकाचा वोल भूमीं न पडावा । हाठावो वरि पितृभक्तीची आवडी ।
जेणें साचपणा कारणें माता वधिली । कीं पुराणें खोचिलीं तोंडीं ॥
असुरदैत्य संहारितां बापु तयांची पातकें दवडी ।
प्रजासि रायाची आण रायासी कवण नेमु हे तों संततपणाची प्रौढी रया ॥३॥
या परि चराचरींचे दानव गिंवसूनि पुसिले परोपरी ।
तंव यादवांसि अंबुलेपणची आस जाली थोरी ।
प्रभास क्षेत्रीं अवघियातें केली एकसरी ।
देवकी पुतना नोळखिजे । वैर भक्तीसी एकिची वोवरी ।
पवनु काय हा पंथु शोधूनियां चाले समर्थु करिल तें उजरि रया ॥४॥
या गोविंदाची माव । हे तों ब्रह्मदिकांसी कुवाडें । तो हा मायेचेनि साचपणें न घेपवे ।
प्रकृतीचे गुण ते याचिये गांवीचे । तो करील तें अनुचित बरवें ॥
लाघावियाचे भ्रमु लाघवीच जाणे यांसि कांही नवल नव्हे ।
बाप रखुमादेविवरु जाणीतला तरि उकलेल आघवें रया ॥५॥

अर्थ:-

या श्रीकृष्ण परमात्म्याने वेदप्रमाण करण्याकरिता गोकुळात अवतार घेतला, तो ब्रह्मादिकांना वंद्य असला तरी सर्वप्रकारे खोड्या करणारा म्हणून नाठाळपणाचे घरच होऊन बसला; परब्रह्म श्रीकृष्ण येथे गोकुळात गुरे राखू लागल्यामुळे शास्रांच्या प्रतिपादनाला लाज आली.अशा त्या श्रीकृष्णाने काय काय वाईट गोष्टी केल्या त्या पाहा.गणिका वेश्याचा स्वीकार केला; मग सहजच बाकीच्या लग्नाच्या बायकांशी द्वेष वाढला.यानेच राम अवतारामध्ये आपला बाप दशरथ त्याला नेमका पतनात घातला.एकाला पळ म्हणायचे, एकाला पाठीस लाग म्हणायचे; मुचुकुंदाला मारण्याकरिता काळयवनाला आणले ॥१॥ प्रल्हादाचा नातु म्हणजे विरोचनाचा मुलगा जो मोठा भक्त बळी, त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्यास पाताळात घातले; आणि यःकश्चित पशु जो गजेंद्र त्याला नक्रापासून सोडविले; आपल्या सांदिपन गुरूचा मेलेला मुलगा काळापासून हिरावून आणला; आणि प्रल्हादाचा बाप जो हिरण्यकश्यपु त्याला पोट फाडून मारला; शिशुपाळ हा चेदि देशचा राजा असून पांडवांचा मावसभाऊ होता.रुक्मिणी यास द्यावी असा तिचा बाप भीमक ह्याचा बेत होता; पण श्रीकृष्णानेच तिला पळवून नेले.धर्मराजाने राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला, तेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णाची अतिशय निंदा केली.म्हणून श्रीकृष्णाने आपणच त्यास मारले. ॥धृ॥ अतिश्रेष्ठ गुरु जे दुर्वास ऋषी, त्यांची श्रीकृष्णावर फार भक्ती होती,; त्यामुळे त्यास आपल्या रथात बसवून श्रीकृष्णाने रुक्मिणीसहित तो रथ घोड्याप्रमाणे ओढून नेला,त्या योगाने दुर्वासास मोठा अभिमान उत्पन्न झाला.त्या अभिमानाने त्याने महाभागवत भक्त जो अंबरीष राजा त्त्याला तीर्थ घेऊन द्वादशीचे पारणे सोडल्याबद्दल शाप दिला.तेव्हा दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्राचे कोलीत लाऊन त्याला त्र्यैलोक्यात हिंडावयास लाविलें श्रीकृष्णाने भारतीयुध्दात मी आता हातात शस्र धरणार नाही, अशी पैंज मारली होती.ती पैज एका बाजूस सारून हातात सुदर्शन घेतले; आणि भीष्मांचा पण खरा केला.हा जितका पांडवांना प्रिय होता तितकाच दुर्योधनासही प्रिय होता. ॥२॥ परशुरामाचा बाप जो जमदग्नी, त्याची बायको रेणुका हिला एकदा नदीहून येण्यास विलंब झाला; त्यामुळे जमदग्नीने रागावून आपला पुत्र जो परशुराम त्याला आपल्या आईस ठार मारण्यास सांगितले.आपल्या पित्याचा शब्द व्यर्थ न व्हावा अशी पितृभक्ती परशुरामाच्या ठिकाणी असल्यामुळें आपल्या पित्याच्या वाणीला सत्यपणा येण्याकरिता त्याने आपल्या आईस ठार मारले.मातृवध वाईट खरा, तरीही परशुरामाची कीर्ति पुराणाच्या रूपाने वर्णन केली.बाप !बाप!धन्य!धन्य!त्या श्रीकृष्णाची.त्याने जितके दैत्य मारले, त्या सर्वांची पातके नाहींशी करून टाकली.प्रजेच्या व्यवहारात सत्यपणाच्या निर्धाराकरिता राजाची शपथ घालतात, पण राजाच्या वागणुकीला नियम कसला घालावा ? त्याप्रमाणे जीवाला जगदीश्वर श्रीकृष्णाचे भय आहे खरे; परंतु श्रीकृष्णाला कोणाचे भय असणार ?अशी त्याच्या वागणुकीची प्रौढी आहे. ॥३॥ याप्रमाणे चराचरातील दैत्य शोधून,निरनिराळ्या प्रकाराने मारले.त्यामुळे सर्व यादवांना संपन्नतेची मोठी घमेंड झाली.म्हणून त्यांनाही प्रभासक्षेत्री नेऊन त्यांचाही नाश केला.ही आपली आई देवकी किंवा ही विष पाजण्याला आलेली पुतना, अशा द्वैतभाव त्याच्या मनात राहिला नाही.वैर आणि भक्ती ही एकाच किंमतीने त्याच्या ठिकाणी राहतात.वारा हा कधी चांगला किंवा वाईट मार्ग शोधून चालत असतो काय ? त्याला बरे वाईट कोणतेही मार्ग सारखेच.समर्थ भगवान श्रीकृष्ण, जे करील ते सर्व उत्तमच. ॥४॥ या भगवान गोविंदाची माय म्हणजे माया, काय आहे हे ब्रह्मादिकाला कळणेसुध्दा कठिण आहे.असा परमात्मा श्रीकृष्ण मायेच्या स्वाधीन होत नाही.त्या मायेचे म्हणजे प्रकृतीचे सत्वरजादि गुण ते जणूंकाय याच्याच घरचे.त्या गुणाच्या साहाय्याने याने लोकदृष्ट्या एखादे अनुचित कृत्य केले तरी ते चांगलेच.बहुरुप्याने दाखविलेला खोटा व्यवहार बहुरुपीच जाणतो.; यात काही नवल नाही.रखमादेवीवर जो बाप श्रीविठ्ठल त्याला यथार्थ जाणले तर ही सर्व कोडी उकलतील रे बाबा ! ॥५॥ ॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥


३०.
निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥
नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥ध्रु०॥
निळेपणें वर्तो नीळेपणें खातों । निळपण पाहातो निळे पणें ॥२॥
ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा । निळे पण गोंवळा रातलीये ॥३॥

अर्थ:-
त्या परमात्म्यावरिल प्रेमामुळे त्याचे निळेपण घेऊन आकाश आकारले असुन सर्व जग ही निळेपण घेऊन सम झाले आहे. त्या परब्रह्माचा निळावर्ण पाहुन भक्त आपली कर्मे ही नीळस्वरुपातच करत आहेत व त्यामुळे तो आश्रम ही निळा झाला आहे. सर्व अन्न निळेच वाटत आहे. निळेपणेच प्रगट वर्तत आहे व पाहायला गेले तर सर्वत्र निळेपणच दिसत आहे. त्या निळेपणात मी रंगुन गेल्याने त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे असे माऊली सांगतात.


३१.
सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि । शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची ॥१॥
गृहदारा दिनमणि तेज देऊनि मेदिनी । मेरु प्रदक्षणि आप होय ॥ध्रु०॥
ऐसा हा सांवळा सतेज साजणी । म्यां आपुल्या आंगणी देखीयला ॥२॥
ज्ञानदेवा साजण सांवळिये प्रभेचें । मी माझें मोहाचें हरिरुप ॥३॥

अर्थ:-

सावळा श्रीहरि सावळ्या तेजाने तळपत असुन त्यांने ब्रह्मांडाच्या बाज करुन त्यावर शेज केले आहे. घरदार सर्व पृथ्वीच तेजस्वी करुन तो मेरु प्रदक्षिणा करत आहे. हे सखी असा तेजःपुंज सावळा त्याला मी माझ्या अंगणात पाहिला. हे सखी त्या सावळ्या प्रभेला पाहताच मी त्याला मोहाने पाहायला गेले तर मोहच हरिरुप झाला असे माऊली सांगतात.


३२.
पैल सुखाचेनि माये सुकाळु । नवल पाहिजे हो गोपाळु । म्हणोनि योगयाग तप साधन ।
व्रत दान उद्यापन । पंचाग्नि गोरांजन अनुष्ठान । परि पद निर्वाण नकळें हें ॥१॥
तुझ्या नामाचिनि आनंदे । गातांवातां जोडसी विनोदें रया ॥ध्रु०॥
या गोंवळेनि जग । न दिसे जगपण भाग । पाहेपां सकळीं योग । तुझा तूंचि ॥२॥
अर्थुनि पाहे दृष्टि । तंव तुझ्यापायीं पडे मिठी । आवडी नोसंडी गांठी । तुझिया पायाची ॥३॥
आतां जरि निरुतें । तूंचि आत्मा तूंतें । सुखी सुखाचेनि निजप्राप्ति रया ॥४॥
तुझें स्वरुप अदृष्य । तो मुनिमानसींचा प्रकाश । इंदु तूं पूर्णांश । चैतन्यघन ॥५॥
बाप रखुमादेविवरा विठ्ठला पाहतां उघडा डोळा । दाविलें निधान रया ॥६॥

अर्थ:-

विषयसुखाच्या पलिकडचे ब्रह्मसुख त्याच्या जवळ आहे.असा तो गोपाळ मी पाहिला त्याच्या प्राप्तीसाठी लोक योग याग तप ही साधने व्रत दान उद्यापन पंचाग्नी गोरांजनांसारखी अनुष्टाने करतात.तरी त्याना तो दिसत नाही.त्याची अनासायास प्राती करायची तर फक्त त्याचे नाम आनंदाने गात राहणे हा एकच मार्ग आहे.या गोपाळाचे जग हे गोकुळ आहे पण त्यात जगपण नाही.त्यात सर्वत्र तोच तो होऊन व्यापला आहे. तुझा अर्थ करायला गेला तेंव्हा तुझ्या पायी मिठी पडते.व फक्त त्या पायांची आवडच उरते. आता तुच तुझा आत्मा आहेस आशा सुखाची सुखप्राप्ती होते. तु तो असा चैतन्यघन आहेस की तुझे स्वरुप अदृष्य आहे. त्या मुनीजनांचा तु ज्ञानप्रकाश आहेस, तु जणु काही कैवल्याचा पूर्ण चंद्रच आहेस. अशा श्री विठ्ठलाला पाहता त्याने दाखवलेली यथार्थ ज्ञान त्याच्याच स्वरुपात दिसते असे माऊली सांगतात.


३३.
सुनीळ गगना पालटु । तैसा दिसे अंगीं नटु । कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥
यमुनेच्या पाबळीं । तनु घेउनि सांवळि । पावा वनमाळी वाजतु आसे ॥ध्रु०॥
पांवयाचेनि नादें । कृष्णाचेनि वेधें अमृतघनु वोळला । आकाश वोळुनि वर्षाव झाला ब्रह्मरसपूर आलारे ॥२॥
कान्हा अति सुंदर वदनारविंद आळी सेविती अनिवाररे आयो ॥३॥
चंदनादिटिळकुलल्लाटीं जया साजे मोर विसावेटी रेआयो । सुरतरु कुसुमें कबरीं भारुरे कुंडलें झळकति कपोळीं रे आयो ॥४॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे । त्रिभुवनजनमोहन रे आयो ॥५॥

अर्थ:-

जसा आकाशाचा निळा रंग बदलत असतो तसाच कृष्णाचा ही बदलत असतो. तोच कृष्ण पावा वाजवत यमुनेच्या तटावर उभा आहे. त्या पाव्याच्या सुरु मुळे तो अमृतघन अनावर होऊन आकाशातुन वर्षाव करत आहे त्यामुळे ब्रह्मरसाचा पुर आला आहे. त्या सुंदर मुखकमळावर भक्त लुब्ध असुन ते भ्रमर बनुन त्याचा स्वाद चाखत आहेत. त्यांने सुगंधी चंदन टिळा रेखला असुन केसा मध्ये मयुरपुच्छ खोवले आहे. सुंदर सुरतरुंची फुले घातली असुन त्याच्या कानातील कुंडल झळाऴत आहेत. रखुमाईचा पती व माझा पिता असलेला तो विठ्ठल त्यांने जगावर मोहनास्त्र चालवले आहे. असे माऊली सांगतात.


३४.
लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥
अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकविस खणांचे उपरी । बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥
तेथ रात्र दिवस नेणिजे । सोहं प्रकाश सहजे । नाचविसी पंचभूतें वोजे । कवतुक तुझें तूं पाहसी ॥२॥
भानु निसियेचा कुवासा । येक राहिले याचिये आशा ॥
येक ह्मणति अढळ धुरु कैसा । तयाचा भरंवसा त्यासिं नाही ॥३॥
ऐसीं तयाचीं बोलणीं । अंगीं राहिलीं खेळणीं । साही पावटणी करुनि । सातावरि घातु मांडिला ॥४॥
करीं घेऊनि आळवणी । करु नेणें वोवाळणी । बाप रखुमादेविवरा विठ्ठला चरणीं । चौघी जणी निमालिया ॥५॥

अर्थ:-

मनाची दोरी करुन त्याला बांधायला गेले तर तो नीट दिसतच नाही.तो अकळ आहे. असे अवघड अवडंबर तु रचले आहेस.हृदयातील अष्टदळ कमळ व २१ खण म्हणजे पंचप्राण, पंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंच विषय व एक चित्त जरी असले तर त्याची विपरित अशी त्याची कुसरी आहे. त्याच्या ठायी रात्रंदिवस दिसत नाही,सोहं प्रकाश सहज दिसतो, पंचमहाभूतांना तो नाचवत असतो त्याचे कौतुक मी पाहात आहे. सुर्याने निवडलेले राहणे किंवा ध्रुवाने निवडलेले अढळस्थान हे एकच राहिल याचा भरवसा त्यांना ही नाही. असे याचे बोलणे आहे व सहा शास्त्रांची त्याने खेळणी केली आहेत. ती सहा शास्त्रे त्याला वर्णु शकत नाहीत पण त्याच्यात ती सर्व एकत्र लुप्त होतात.जशी एखादी सवाषिण हातात निरांजन घेऊन ओवाळणी करते तशी परा, पश्यंती मध्यमा वैखरी ह्या त्या विठ्ठलाच्या पायी निमाल्या आहेत असे माऊली सांगतात.


३५.
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥
गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥
सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥

अर्थ:-

मांडी, गुडघा व पाऊल या तीन ठिकाणी वाकडा झालेला, पाय दुसऱ्या पावलाजवळ ठेवल्यामुळे जो देहुडा म्हणजे दीड पाय झाला आहे, अशा स्वरूपाची ठेवण मांडून ( मुरलीधराचे स्वरूप धारण करून ) कल्पवृक्षाखाली वेणू वाजवीत उभा आहे. जो अंतर्बाह्य परमानंदरूप आहे, व जो मंगवान श्रीकृष्ण, ज्याला गोविंद, गोपाळ अशीं अनेक नांवें आहेत, तो मी पाहिला गे माय ! असें तें सावळें सगुण रूप सर्व जीवांचें जें जीवन आहे व केवळ आनंदाची मूर्तिच आहे, अशा त्या श्रीकृष्णाला पाहून माझें मनच हरपून गेले. तो आकाशादि स्थावर जंगम सर्व वस्तूंत व्यापलेला असूनहि, मौज अशी की, त्याचे स्वरूप कोणाला कळत नाहीं.


३६.
तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणु घेऊनि करीं । वैजंयति रुळे कैशी वक्षस्थळावरी ॥१॥
गोविंदु वो पैल गोपाळु माये । सुरतरु तळवटीं देखे कैसा उभा राहे ॥ध्रु०॥
आडत्रिपुंड्र शोभत दूमिळ भारेंसि जे जात । नागर केशरिचीं पुष्पें कैसा खोप मिरवत ॥२॥
हिरिया ऐशा दंतपंक्ति अधर पोंवळ वेली । श्रवणीं कुंडलें ब्रह्म रसाचीं वोतलीं ॥३॥
विश्वाचें जीवन तें म्यां सार देखियलें । योगी ध्याती ध्यानीं ब्रह्म तेंचि गोकुळासि आलें ॥४॥
आजि धन्य धन्य जालें राया कृष्णासि देखिलें । निवृत्तिमुनिरायप्रसादें ध्यान तें ह्रदयासि आलें ॥५॥

अर्थ:-

डोक्यावर तुरा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व वेणु व वक्षःस्थळावर वैजयंतीमाला रुळत असलेला भगवान कृष्ण आहे. तोच गोविंद मला कल्पवृक्षातळी उभा राहिलेला दिसत आहे. कपाळावर तिनरेखांकित गंध रेखलेला नागर केशरीची पुष्पे डोक्यावर मिरवत ते कृष्णरुप उभे आहे. त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोवळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत.जे विश्वाचे जीवन आहे ते रुप मी साररुपाने पाहिले ज्या रुपाला योगी ध्यातात तेच रुप गोकुळात अवतरले आहे. आज मी धन्य झालो निवृत्तिनाथांच्या कृपाप्रसादाने ते रुप पहिले माझ्या ध्यान्यात व नंतर हृदयत स्थापित झाले असे माऊली सांगतात.


३७.
बरवा वो हरि बरवा बो । गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सावळा वो हरि सावळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥ध्रु०॥
पाहतां वो हरि पाहतां वो । ध्यान लागलें या चित्ता वो ॥२॥
पढिये वो हरि पढिये वो । बाप रखुमादेविवरु घडिये वो ॥३॥

अर्थ:-

जीवाचे कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा भगवान श्रीहरि म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा अशी हजारो नावे ज्याला आहेत; तोच श्रीहरि सर्वोत्तम आहे हो ! ॥१॥ तो सावळ्या वर्णाचा असून गाई राखतो खरा; परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे. ॥धृ॥ काय सांगावे ! त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लागून गेले आहे हो ! ॥२॥ तोच श्रीहरि मनाला वारंवार आवडतो हो ! असे त्या श्रीहरीचे रूप आहे. ॥३॥ जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥ ।


३८.
आतसिकुसुमकोशशामघनु । तुळशीवृंदावनामाजी मुनीमनोपद्मदळविशाळजिरे आयो ॥ध्रु०॥
जलधीशयन कमलालयाजीवनु । बापरखुमादेविवरु विठ्ठलु घनानंदुमुर्ति ॥१॥

अर्थ:-

तो तुळशीवृंदावनात असलेला अतिषय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे. तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे. त्या क्षीरसागरात शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे हे सखी तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रखमुदेवीचा पती आहे असे माऊली सांगतात.


३९.
चतुरपणें चतुराननु पैं भागला । शिवुपणें शिवरुपु पैं जाहला ॥१॥
हरिपणें हरि अंग रिघाला । या तिहींचा मेळा न दिसे गे माये ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तिहीं गुणां वेगळा । शक्ति नव्हे दादुला गे माये ॥२॥

अर्थ:-

तोच ब्रह्मा रुपाने सृष्टीची चतुर निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरुप झाला.तोच हरिपणाने हरि अंग झाला हे जर एकत्व असले तरी हे जिवरुपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही. असा तो तिन्हीगुणाहुन निराळा असणारा रखुमाईचा पती हा शक्ती नसुन माझा नवरा आहे. असे माऊली सांगतात.


४०.
तुज सगुण म्हणों की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूलसूक्ष्म एक गोविंदुरे ॥२॥
तुज आकार म्हाणों की निराकररे । साकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्यरे । दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥
निवृत्तिप्रसाद ज्ञानदेव बोले । बाप रखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥५॥

अर्थ:-

हे गोविंदा तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे मला तु दोन्ही ही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही श्रुती ही नेती नेती म्हणुन थांबते व तुलाच दाखवते. तुला स्थुळ म्हणायचे की सुक्ष्म म्हणायचे तु मला दोन्ही रुपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचे की निराकार मानायचे तु दोन्ही पध्दतीने मला दिसतोस. तुला दृष्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे तु दृष्य होऊन दिसतोस व अदृश्यरुपी जाणवतोस.निवृत्तिनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणुनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात.


४१.
चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥
जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥
बापरखुमा-देविवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥

अर्थ:-

त्याच्या रुपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते तद्वत सुर्य ही तेजासह लोप पावतो. तोच जगताचे कारण असुन तोच जगाचे जीवन आहे तरी ही त्याची व्याप्ती अणु प्रमाणे सुक्ष्म आहे. हे जीवरुपी सखी तो रखुमाईचा पती सुक्ष्म असुन सगुण व निर्गुण तोच झाला आहे. असे माऊली सांगतात.


४२.
दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥
गाती नारद तुंबर प्रेमें । हरीचें नाम गर्जती ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥२॥

अर्थ:-

सिंहासनावर तो श्री विठ्ठल उभा असुन त्याच्या दोन्ही बाजुला संतसभा भरली आहे. हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद तुंबर गात आहेत. तो रखुमाईचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्र्यैलोकीची शोभा शोभुन दिसते असे माऊली सांगतात.


४३
ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी । भक्तांपरोपरी धरी रुपें ॥१॥
धरुनिया महीत्व झाला नृसिंहरुप । वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु । वर्ण सारड्ग.धरु निजरुप ॥३॥

अर्थ:-

आपल्या भक्तासाठी परोपरीने विविध अवतार घेणारा स्तंभातुन नरसिंह बनुन आला. ज्या नरसिंह रुपाचे वर्णन वेदशास्त्र आधीच करु शकले नाहीत त्याचे महत्व धरुनच ते नरसिंहरुप प्रगटले. मुळ निजरुप असणारा शारंगधरच नरसिंह रुपाने आलेला तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


४४.
स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्र पाळी पिंड देखा । शेषासरिखी बैसका । जो आधार तिही लोकीं ॥१॥
लिंग देखिलें देखिलें । त्रिभुवनीं विस्तारलें ॥२॥
मेघधारीं तपन केलें । तारापुष्पीं वरी पूजिलें । चंद्रफ़ळ ज्या वाहिलें । वोवाळिलें रविदीपें ॥३॥
आत्मनैवेद्य समर्पिलें । ब्रह्मानंद मग वंदिलें । ज्योतिर्लिंग मग ध्याईलें । ज्ञानदेवीं ह्रदयीं ॥४॥

अर्थ:-

ज्याची साळुंखा स्वर्गाला भिडली आहे. व खालच्या पिंडीने समुद्राचा ठाव घेतला आहे. जो शेषासारखी बैठक करुन बसला आहे. तो ह्या तिन्ही लोकांचा आधार आहे. असे परमात्मतत्व लिंग स्वरुपात मी पाहिले व ते त्रिभुवनात विस्तारलेले आहे. त्याचे स्नान मेघधारा घडवतात. त्याची पुजा तारापुष्प अर्पून होते. त्याला चंद्राचा फळ म्हणूुन नैवेद्य दाखवतात व सुर्याला घेऊन त्याचे औक्षण करतात. त्याला आत्मनैवेद्य लागतो. ब्रह्मानंदी मन त्याला अर्पण करावे लागते. असे जोर्तिलिंग माऊली ज्ञानेश्वर आपल्या हृदयात ध्यात आहेत.


४५.
देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥
तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमें आणून वासना रुपें ॥१॥
देखा सर्वगत निराळा अद्वैत । तया मूर्तिमंत ध्याय जनु ॥
तिहीं देवासि आरु जेथुनि विस्तारु । तो ध्वनि ओंकारु त्या आरु ।
आतां तो नाद ना बिंदु काळा ना छंदु । अक्षय परमानंदु सदोदितु ॥२॥
अवतरे तैसाच नव्हे होय तें न संभवे । आहे तें आघवें लाघव रया ॥
तो येकट एकला रचला न वेचला । आदिअंतीं संचला अनंतपणें ॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । हीं सकळही हारपती प्रळयांती ॥
तो निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण । ते दशा पाषाण केंवि पावती ॥३॥
पाहातां या डोळां परि न दिसे कांहीं केल्या । व्यापुनियां ठेला बाहिजु भीतरि ॥
तो पदपिंडा अतीतु भवभावरहितु । बापरखुमादेविवर विठ्ठलु ह्रदयांतु रया ॥४॥


४६.
मन मारुनि डोळां लेईलें । काळेपणें मिरवलें रुप त्यांचें ॥१॥
बरवें हें रुप काळें अमोलिक । म्हणोनि सांग जें शुध्दभावें ॥२॥
रखुमादेविवरु अगाध काळें रुप । म्हणोनि सर्वत्र व्योम व्यापियेलें ॥३॥


४७.
काळेपणाचा आवो अंबरीं बाणला । तो एकु दादुला देखिला डोळां ॥१॥
काळें मनुष्य मानव जालें । अरुप रुपा आलें गोविंदपणें ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु विठ्ठलु सोहंधरु । त्यानें माझा वेव्हारु बहु काळें नेलागे माये ॥२॥

अर्थ:-

संपुर्ण गगनातील सावळेपण अंगावर असलेला तोच एक पती म्हणुन मी डोळ्याने पाहात आहे. असा सावळा वर्ण असलेला मानव बनुन आलेला ते अरुप असलेले गोविंद रुपास आले आहेत. असा जो निर्गुण असलेला सगुण होऊन माझे सर्व व्यवहार खुंटवले तो रखुमाईचा पती व माझा पिता विठ्ठल आहे असे माऊली सांगतात.


४८.
ज्याचें गुणनाम आठवितां मनचि नाहीं होय । अनुभवाचे पाय पुढें चालती ॥१॥
निर्गुणगे माय गुणवंत जाला । प्रतिबिंबीं बिंबतसे चैतन्याचें मुसे ।
प्रति ठसावत तें वृंदावनीं ब्रह्म असेगे माये ॥२॥
बापरखुमादेविवरु डोळसु सावळा । द्वैत अद्वैत सोहळा भोगविगे माये ॥३॥

अर्थ:-

त्याचे गुणनाम घेतले की मनच राहात नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात. त्या प्रतिबिंबात चैतन्याची मुस(साचा) दिसली तो निर्गुण, सगुण होऊन आला.ते सगुण ब्रह्मरुप वृंदावनात मी पाहात आहे. तेच रुप, मला द्वैत अद्वैत रुपाचा सोहळा, माझ्या डोळ्याना दाखवणारा, तो सावळा रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.


४९.
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥
आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥
सुमनाचे शेजे विरहिणी विराजे । शयनीं सुलजे आरळ सेज ॥३॥
माजयानें हटीं मुखकमळ टेंकी । निळिये अवलोकी कृष्णमूर्ति ॥४॥
कमळणी आमोद सुस्वाद मकरंद । चंदनाची अभेद उटी अंगी ॥५॥
कर्पूरपरिमळें दिव्य खाद्य फ़ळें । ठेऊनि सोज्वळें वाट पाहे ॥६॥
मन तो निळिये गोविंदाचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥७॥
ज्ञानदेवी निळिये वाटुले गोविंदीं । कृष्ण निळिये पदीं ठाव जाला ॥८॥
अर्थ:-

मोत्याच्या सारणीतुन निळी रात्र वाहात आहे. अशी निळ्या मोत्यांची खाणच सापडली. तो चिंतामणी होऊन हृदयात अमृताचे शिंपण करतो. ती विरहिणी त्या पुष्प शय्येवर पडुडली आसुन ती तळमळत आहे. त्याने निळे मुखकमळ एकदा दाखवावे असे तिला मनोमन वाटते. ती विरहिणी मधाची चव व कमळाचा सुगंध घेऊन चंदनाची उटी लाऊन बसली आहे. कर्पुर मश्रीत उटी लाऊन ती रसरशित फळे घेऊन त्याची वाट पाहात आहे. तीचे मन त्या गोविंदाच्या सोसाने आतुरले असुन ती विरहिणी विरहात तळमळत आहे. त्या निळ्या गोविंद च्या निळ्या कृष्णपदात निळेपणे मनाला ठाव दिला आहे असे माऊली सांगतात.


५०
राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाइयांनो ॥१॥
केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाइयांनों ॥२॥
बाप रखुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा । विठ्ठलु बरवा बाइयांनो ॥३॥

अर्थ:-

विठ्ठल बरवा बाईयानों ॥ हे जीवरुपी सखी राम व कृष्ण चांगले आहेत व ते अतिषय सुंदर आहेत. केशव, माधव व गोपाळ रुपातही तो सुंदर आहे. त्रिभुवनाचा गौरव असलेला तो विठ्ठल चांगला असुन रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


५१
साती बारी दोन्ही आपणचि होऊनि । सुरतरु माझारी वोळगे ॥
तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान । विजु एकी वेढुन बरवे गर्जतुगे माये ॥१॥
नवलावोगे माये न्याहाळितां कैसे मनाचे नयन उमलताती ॥
तीही एक दृष्टि जिव्हा लाभती तरी । सुलभु देखतां बोलतीगे माये ॥ध्रु०॥
पाहो याचे पाय । शंभूचिया माथां माये । सासिन्नली चंद्रदाहें गंगेतें ॥
तेथ असुराची शिरें । येथे सकळ शरीरें । तोडराचेनि बडिवारें । बरीजतुगे माये ॥२॥
तेज सांवळें । रुप लाधलें परिमळें । अनंगाचेनि सळें । कासीं कासियेला ॥
तो पालउ पांढर गळे । होतुकां जगाचे डोळे । दुरुनियां सुनिळें । रोविलेंगे माये ॥३॥
उपनिषदाचा गाभा । माजी सौंदर्याची शोभा । मांडिला दोखांबा । तैसा दिसे देखा ॥
वेगळालिया कुंभस्थळा । परि हातु सरळा । पालटु बांधला माळा । मेखळा मिसेंगे माये ॥४॥
भलतेउते वाहे न वाहे नदी । जेंवीं स्थिरावे अगाधीं । तैसी पुंजालता हे मंदी । दोही वेदांची ॥
वरिलिया वक्षस्थळा । नुपुरे स्थानीचा डोळा । मागुन निघे कमळा । नव्हे रोमराजी ॥५॥
लावण्य उदधी वेळा । तेंचि पै वैजयंती माळा । वरी शोभतसे सोहळा । साहकारवेचा ॥
म्हणे प्रेम पुष्कळा । थडिये लाभे सकळा । नयनसुखाच्या सुकाळा । जग मेळवितुगे माये ॥६॥
भोंवतीं तारागणें पुंजु । मांजी अचळ सुरिजु । आला वक्षस्थळा उजु । तैसा दिसे देखा ॥
जेवणे न अंगें । उभऊनि श्रीकरायोगें । योगनादातटी रंगे । नभु दुमदुमितवो माये ॥७॥
इंद्रधनुष्य काढिलें । तया तळीं बहुडलें । तेचि कुरुळीं वेढिलें । समाधिसुख देखा ॥
आवारीचा गुणु । श्रुतीगर्भी समवर्णु । दोही स्वरीं गोडी वेणु । जग निववीतुवो माये ॥८॥
या वेधितां कांहींच नुरे । रुपा आले हेंचि खरें । वरी दाविता हे माजिरें । गोपवेशाचें ॥
तमावरी हातियारे । रविकाज काईयेरे । तैसा रखुमादेविवरें । विरें घेतलेंगे माये ॥९॥

अर्थ:-

बाजारात येणारा व जाणारा आपणच होऊन, म्हणजेच देव व भक्त तुच होऊन त्या सुरतरु खाली दिडका होऊन उभा आहेस व मेघाचे पांघरुण करुन वीजे सारखा गर्जत आहेस. हे नवल पाहायला मनाचे कसे डोळे उघडतात हे ही नवलच ती दृष्टी जिव्हेला लागुन ती सुलभ पणे संवाद करत आहे. अंगाचा दाह शमवण्यासाठी चंद्र व गंगा धारण करणाऱ्या महादेवाचे पाय तो धरत आहे. त्याच्या समोर असुर मस्तके झुकली तो पायातील तोडरांच्या आवाजाने गर्जना करतो आहे. माझ्या डोळ्यांना ते सुगंधीत तेजपुंज रुप लाभले आहे. त्याने घातलेला पितांबर मदनाला ही फिका करतो. ते पाहुन जगाचे डोळे पांढरे होतात. ते पाय रोऊन उभे राहिलेले सावळे रुप लांबुन लोभस दिसते.तो उपनिषदांचा गाभा सर्वामध्ये सौदर्याची शोभा होऊन खांबां सारख्या दोन पायांवर उभा आहे.कुंभस्थळ म्हणजे मस्तक व दोन हात सरळ व कमरेला बांधलेला शेला व त्यावर मेखळा त्याला शोभत आहे. समुद्राच्या ठिकाणी अवखळ नदी जशी स्थिर होते तसे त्याचे वर्णन करताना वेद स्थिरावतात.त्याच्या छातीवर नजर स्थिरावत नाही.व अंगावरच्या रोमासारखी लक्ष्मी त्याच्या मागे असते.गळ्यातील वैजंयती माळा लावण्याच्या शोभेचा सोहळा दाखवते. भक्ताच्या प्रेमाकरता तो ऐल थडी आला त्यामुळे नयन सुखाचा सोहळा जगाला मिळत आहे. चांदण्यात चंद्र शोभतो,तशी त्याच्या वक्षस्थळांची शोभा उठून दिसते.उजवा हात वर करून मुरली वाजवित त्या ध्वनीतच कृष्ण रंगून गेला आहे व त्या ध्वनीने आकाश दुमदुमीत झाले आहे. त्याचे कुरळे केस इंद्रधनुष्याने रंगवले असून त्याच्याखाली समाधी सुख आहे. त्याच्या ओठातील ध्वनीच्या मुरलीत श्रुतींच्या गर्भातील समवर्ण आहे व ते गोड स्वर जगाला निमवित आहेत.याच्या रूपाचे वेध लागल्यावर काही उरत नाही.अशा त्या उपवेशाने आलेल्या कृष्णाने मन वेधले आहे. जसे अंधारावर सूर्याचा उपाय तसाच विठ्ठलाने गोप वेष घेतला आहे असे माऊली म्हणतात.


५२.
मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली ।
पाहतां मनाची वृत्ति नुपुरे तेथिची सोय ।
तेथें भरोनि वोसंडिली गे माये ॥१॥
अभिनव रुप कैसें मना अगोचर अरुप रुपासि आलें ।
तें हें कल्पद्रुमातळीं ठाण मांडूनि देहुडें । तेणें आनंदघनें निवविलेंगे माये ॥ध्रु०॥
चिदानंदाची मांदुस किंचिदघन चिदाकाश । तेज: पुंज प्रकाश चरणीं शोभा ॥
निडारलें दृष्टि पाहतां रुपाचा एकवळा । कैसा साकारे सोहळा भोगीतसे गे माये ॥२॥
सकळ तीर्थ अर्तिलीं । तीं ऋषिवृंदें घेऊनि बैसलीं । पावन झालीं । चरणांगुष्ठीं ॥
वाकी तोडरु गजरीं । गर्जतसे नानापरी तो श्रुतिनादु अंबरीं । सांठवलागे माये ॥३॥
उपनिषदाचा गाभा । परी देहुडा पाउलीं उभा ।
जानुजघनींच्या प्रभा । नभ धवळलें ॥
सुरंग सोनसळा । वरी वेढिला पिंवळा ।
त्यावरी गाठियला मेखळा । रत्नखचितगे माये ॥४॥
हा जगडंबरु जगदाभासु । कीं ठसावला आभासु ।
नाभिकमळीं प्रकाशु । चतुरानना ॥
पाहता तेथींची हाव । मना न पुरे तेथींची थाव ।
म्हणउनि सगुण ध्यान । करी तुझेगे माये ॥५॥
ब्रह्मांडाचिया कोडी । रोमरंध्रीं उतरंडी ।
मदन सांडुनिया प्रौढी । उदरा आला ॥
सुघटित वक्षस्थळ । निरोपम केवळ ।
वरी पदयुगुळ । द्विजोत्तमगे माये ॥६॥
चहूं पुरुषार्थांचें साधन । तोचि आयुधें मंडन ।
बाहीं बाहुवटे मंडन । मंडना आलें ॥
वीर कंकण मनगटीं । कांडोवांडीं मुद्रा दाटी ।
कैसा अलोहित नखें बोटीं ।वेणु वाहे वो माये ॥७॥
ब्रह्म ऐसें धेनु आतला । कीं सुधारसु मुराला ।
तोचि नादु सुस्वर आला । पावया छंदें ॥
अधरीचें अमृत । पिकलेंसे ब्रह्मरस । तेणें जाला सौरसु ।
गोपिजनागे माये ॥८॥
नयनींचे तारे । दो पक्षीं प्रेम पुरे ।
द्वैताद्वैत एकसरें । ठकलें ठेलें ॥
कुंडलाचिये दीप्ती । लोपला गभस्ती ।
सुखस्वरुपाची शांति । येणे सुखेंगे माये ॥९॥
आतां पाहतां पाहतया दृष्टी नपुरे । ध्यातां मनचि नुरे ।
आंत बाहेरी पुरे । व्यपूनि ठेला ॥
मावळलिया दृष्टि पाहातां देखणें ठसावलें । निर्गुण गुणासि आलें ।
सदोदित गे माये ॥१०॥
आतां हा केंवि पाहावा । पाहातयेचि दृष्टि ।
मन मनेंचि दिधली मिठी । तेथील ते गोडी रुपासी आली ॥
म्हणती निवृत्ति । ज्ञानदेवा पाहे चित्तीं । आतां जागृतीच्या अंती । सुखशातिं रया ॥११॥
अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण मदनमूर्ति विश्वरूपाने कशी अलंकृत झाली आहे, हे डोळ्यंने पाहता पुरवत नाही ! तेथील शोभा मनाने कितीही वेळ पाहू गेले असता तृप्ति होत नाही; त्या मूर्तीत असलेले सौंदर्य भरून ओसंडते की काय असे वाटते. ॥१॥ काय चमत्कार सांगावा, वास्तविक परमात्मस्वरूप अगोचर म्हणजे मनाला विषय न होणारे, ते कसे सुंदर रूपाला प्राप्त होऊन या कल्पद्रुमाखाली दिडक्या पायांनी उभे आहे; त्या आनंदघन सुंदर परमात्म्याने चित्ताला शांत करून ठेवले आहे. ॥धृ॥ ही श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ति म्हणजे चैतन्यरूप आनंदाची पेटीच किंवा चैतन्यरूप आकाश आहे असे वाटते; चरणाच्या ठिकाणी तेजःपुंज शोभा कशी पूर्ण आहे ते सर्व गुणांनी एकरूप झालेले सुंदर सगुणमूर्तीचे रूप पाहात असता, सुखाचा सोहळाच भोगतो आहे, असे वाटते, ॥२॥ जगातील सर्व तीर्थे ज्यांचा ऋषी आश्रय घेऊन बसले आहेत, ती तीर्थें भगवत् चरणांगुष्टाच्या स्पर्शाने पावन झाली आहेत, हातात वाक्याचा जोड आहे व पायात ( तोरड्या नावाचे भूषण ) जोड असून त्याचा नाना त-हेने ध्वनी होत आहे.तो नाना त-हेने होणारा शब्द आकाशात साठवून गेला आहे. ॥३॥ हा श्रीकृष्ण परमात्मा अत्यंत गुह्य म्हणून उपनिषदांने प्रतिपादन केलेला निराकार असता, आमचे समोर हा आज वाकुड्या पाउलाने उभा आहे पहा ! त्याच्या पोट-याच्या व मांड्याच्या प्रभेने सर्व आकाश प्रकाशित होऊन गेले आहे.उत्तम सुवर्ण रंगाचा पीतांबर वेढलेला आहे, आणि त्यावर रत्नखचित अंगवस्र कंबरेला बांधले आहे. ॥४॥ वास्तविक त्याचे स्वरूप जगाएवढे असता ते लहानशा सगुण मूर्तीत कसे साठवले आहे ! त्याच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या नाभिकमळाची शोभा पाहात असता त्याचे मन तृप्त होत नाही; म्हणूनच हा सगुण ध्यान करतो की काय कोणास ठाऊक ? ॥५॥ ज्याच्या रोमरंध्रात ब्रह्मांडाच्या कोटीच्या कोटी उत्पन्न होतात, व ज्याला पाहून मदन आपला अभिमान परित्याग करितो, आणि त्याच्या स्वरूपात प्रवेश करितो, ज्याचे वक्षस्थळ अत्यंत निरूपम असून ज्याच्यावर ब्राह्मणाच्या पायाचे चिन्ह आहे. ॥६॥ त्याच्या चारी हातातील आयुधे म्हणजे चारी पुरूषार्थाची साधनेच आहेत, सगळ्या जगाचे रक्षण करणारे बळ त्याच्या बाहूत असून वीरांच्या हातात असलेले काकण मनगटात आहे, आणि जागोजागी म्हणजे त्याच्या बोटात आंगठ्या आहेत; आणि रक्तवर्णाची नखें ज्याच्या बोटाला आहेत, त्याने हातात वेणू धारण केली आहे.. ॥७॥ या परमात्मा श्रीकृष्णाची मूर्ति, म्हणजे ज्याच्यात ब्रह्मरस आहे असा मेघ अवतरला की काय, किंवा अमृत मुरून त्याचा हा सगुण आकार बनला की काय असे वाटते.त्या वेणूचा सुस्वर उमटत आहे.यावरून असे वाटते की, भगवंतांच्या अधरात असलेला ब्रह्मरस पिऊनच सर्व गोपीजनाला अतिशय आल्हाद होतो. ॥८॥ त्याच्या दोन्ही डोळ्यातील तेजाचे तारे दोन्ही पक्षात म्हणजे द्वैताद्वैतात एकदम व्याप्त होऊन ठाकले आहेत म्हणजे राहिले आहेत; कानातील कुंडलाच्या प्रकाशाने सूर्यप्रकाश लोपून गेला; सुंदर स्वरूपाची शांती या सगुण सुखानेच प्राप्त होते. ॥९॥ या सगुण स्वरूपाला पाहत असता पाहणाऱ्याची दृष्टि तृप्त होत नाही.ध्यान करू गेले असता, मन शिल्लक राहत नाही.असे अंतरबाह्य त्याचे स्वरूप व्यापून राहिले आहे. ॥१०॥ पहाणेपणाची दृष्टी मावळली असता, पाहाणाराचे पाहणे या मूर्तीत एकरूप होऊन जाते; मूळचा निर्गुण परमात्मा सा सगुण होऊन राहिला आहे ! आता याला पहावा तरी कसा ? पाहणारा दृष्टीने पाहू गेला असता, मनाचे मनातच मिठी बसली तर या स्वरूपाच्या दर्शनाची गोडी प्रकट होते.श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, या श्रीकृष्ण परमात्म्याला चित्तात पाहा, म्हणजे त्या दर्शनाच्या जागृतीने शेवटी सुखशांती होईल. ॥११॥ ॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥


पंढरीमाहात्म्य – अभंग ५३ ते ७८

५३.
आनंदाच्या ताटीं अमृताची वाटी । विवेकतारुं घोटी रसनाबळें ॥१॥
तें हें रुपडें रुपस विठ्ठल । पुंडलिकें बहु साल प्रार्थियलें ॥ध्रु०॥
तारावया जन व्हावया पावन । जड मूढ अज्ञान हरीपाठें ॥२॥
कर्म धर्म करितां शिणली येतां जातां । मग पुंडलिकें अनंता प्रर्थियलें ॥३॥
येउनिया श्रीहरी भीमेच्या तीरीं । सुदर्शनावरी पंढरी उभाविली ॥४॥
अमरतरुवर तीर्थ सरोवर । वेणुनादीं श्रीधर खेळताती ॥५॥
बागडे गाती हरि वाकुल्या कुसरी । तेथें पुंडलिक परोपरी स्तवन करी ॥६॥
धन्य पंढरीनगरी फ़ावली चराचरीं । धन्य जो भूमीवरी दृष्टीभरी हरी देखे ॥७॥
ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशीराज । नव्हे ते नवल चोज प्रत्यक्ष हरी ॥८॥

अर्थ:-

श्रीपंढरीराय हेच एक आनंदाच्या भोजनाचे ताट असून त्यांत पुंडलिक अमृताची वाटी अशी कल्पना करून ह्याच ताटात असलेला ब्रह्मरस सेवन करणारे महानुभव संत ते भक्तीच्या बळाने तो ब्रह्मरस सेवन करीत आहेत.असे हे सुंदर गोजिरवाणे श्रीविठोबाराय यास पुंडलीकाने प्रार्थना करून पंढरीस आणले. त्याचे कारण अज्ञानी, जड, मूढ, जीवांचा हरिस्मरणाने उद्धार करून पवित्र करावे हे होय.कर्माचरणाने जन्ममृत्युच्या फेऱ्यात पडून दमलेल्या जीवाकडे पाहून पुंडलिकरायांनी या भगवंताची प्रार्थना केली. त्याचे प्रार्थनेप्रमाणे श्रीहरिनी येऊन चंद्रभागेच्या तीरांवर खाली सुदर्शन ठेऊन त्यावर पंढरी वसविली. त्या पंढरीचे महात्म्य काय वर्णन करावे? पंढरीतील सर्व वृक्ष कल्पतरू आहेत.तेथील सरोवरे तीर्थे असून त्यावर भगवान श्रीकृष्ण मुरलीच्या नादांत खेळत आहे. अनंत तऱ्हेंने श्रीहरिचे नाम घेत असता त्या बागड्या म्हणजे स्वछंदाने गीत गाणाऱ्या भक्तास जो ना त्या आनंदाच्या भरामध्ये ते भगवतभक्त स्वर्गातील देवांना ‘टुक टुक माकड करून हिणवू लागले. तेव्हा पुंडलीकराय पांडुरंगाला म्हणू लागले की हे या भूमीवर ही पंढरी ज्या जीवांना प्राप्त झाली ते लोक व ही पंढरी धन्य आहे. जो डोळे भरून विठ्ठलाचे दर्शन घेईल त्याचे भाग्य धन्य मला हे श्रीविठ्ठल बीज प्रत्यक्ष लाभले आहे मी माझ्या अनुभवाने हे वर्णन केले आहे. ही कांही नुसती पोकळ स्तुती नाही तर वस्तुस्थिती आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५४.
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥
अर्थ:-

संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात. तो संसार मी सखाचा करीन याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपा वर मिथ्या भासलेला आहे. ते ब्रह्म सुखरूप आहे. आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करून टाकीन इतकेच काय त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरीता त्या पंढरपूरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्रीविठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याईचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले. त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले. म्हणजे तो भक्त परमात्मरूपच होतो. असे माऊली सांगतात.


५६.
न चलति शब्द खुंटले पै वाद । एक तत्त्व भेद नाहीं रुपा ॥१॥
तें रुप पंढरी भरलें चराचरीं । माझा माजी घरीं बिंबलेंसे ॥२॥
रखुमादेविवरु पुंडलीकवरु । निळियेचा आगरु पंढरीये ॥३॥

अर्थ:-

श्रीपंढरीरायाचे स्वरूपाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी शब्दांचे काही चालत नाही सर्व प्रकारचे वाद खुंटून जातात. कारण या एकस्वरूप असलेल्या तत्त्वास खरे म्हणजे नामरूपाचा भेद असु शकत नाही. परंतु हेच रूप विठ्ठलाच्या रूपाने चराचरांच्या रक्षणासाठी पंडरपूरात अवतरले आहे. आणि माझ्याही अंतःकरणात तेच बिंबलेले आहे. माझा हा बाप रखुमाईचा पति श्रीविठ्ठल पुंडलिकाला वर देणारा असून निळसर रंगाचे जणू तो आगरच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५७.
दुजे द्वैत सांडी एक तत्त्व मांडी । अद्वैत ब्रह्मांडीं पै सुकीजे ॥१॥
तें रुप पंढरी पुंडलीका द्वारीं । मुक्ति मार्ग चारी वश्य रया ।
अनंतीं अनंत वोतलें संचीत । वैकुंठ अदभुत उभें असे ॥२॥
ज्ञानदेवीं ध्यान मन मौन चरण । आपणची मग्न तेथें जाले ॥३॥

अर्थ:-

जगांतील द्वैताचा मिथ्यात्व निश्चय करून अद्वैत आत्मतत्त्वाचा विचार कर, त्यामुळे तुला सर्वत्र एक आत्माच आहे असे ज्ञान होईल.तो श्रीपांडुरंग भोळ्या भाविक भक्तांच्या उपासनेकरिता पंढरीस चारी मुक्तिंचा मार्ग हातात घेऊन पुंडलिकाचे द्वारात उभा आहे. अनंत पदार्थात अनंत रूपाने व्यापक राहून ते परब्रह्म विटेवर उभे आहे. मी सर्व प्रपंचाविषयी मौन धारण करून ध्यान केले व त्या ध्यानामुळे माझे मन पंढरीरायाच्या चरणी तल्लीन झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५८
तत्त्वें तत्त्व धरी कोहंभाव होकारी । सोहं सोहं करी कोण सये ॥१॥
सोकरी पुंडलिकु ज्ञान पुण्यश्लोकु । विठ्ठलु त्रैलोकु उध्दरिले ॥२॥
सखी जाय तेथें भाव बळिवंत । प्रपंच देहांत नाहीं तुज ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्ति सौरसें । पुंडलिकें कैसें पुण्य केलें ॥४॥

अर्थ:-

मी कोण आहे असे म्हणणारा आणि तात्त्विक विचाराने तो परमात्मा मी आहे असा विचार करणारा कोण ग?. फार दुर्मिळ, त्या परमात्म्याला स्वाधीन करून घेणारा ज्ञानवान पुण्यपुरूष असा एक पुंडलिकरायच आहे. त्याने त्या पंढरीरायाला स्वाधीन करून त्रैलोक्याचा उद्धार केला.हे सखे, तूं जर दृढ भक्तिभावाने त्या पंढरीरायाचे भजन करशील तर तुला हा दुःखरूप प्रपंच नाहीसा होऊन मी या देहाहून भिन्न असलेला परमात्मस्वरूपच आहे. असा तुझा निक्षय होईल. मी माझ्या श्रीगुरू निवृत्तारायांना विचारले की महाराज’ या पुंडलिकरायांनी असे कोणते पुण्य केले होते? तेव्हा निवृत्तीरायांनी मला असे सांगितले की त्या पुंडलिकरायांनी अनन्य भावभक्तीने पंढरीरायाची भक्ती केली होती. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५९
एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन । तेथींचे वो ज्ञान मज सांगे ॥१॥
एकीनें सांगितलें दुजीनें परिसलें । प्रपंचा पुसलें तेणें रुपें ॥२॥
तें घरटीं कडी सोकरी बागडी । सोहं कथा उघडी पंढरीये ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस मनें । नयनांसी पारणें देखतांची ॥४॥

अर्थ:-

एक सखी,आपल्या मैत्रीणीला म्हणते हे सखे, श्रीहरि विषयीचा भाव मला मौन धारण करू देत नाही. दुसरी सखी म्हणते मला त्या परमात्म्याचे ज्ञान सांग, त्या परमात्म्याचा उपदेश एेकीन सांगितला. व दुसरीने एेकला. त्या उपदेशाचा प्रकार असा आहे की, उपदेश ऐकल्याबरोबर परमात्मभाव प्रगट होऊन संसार आपोआपच नाहीसा होऊन जातो. अशीहि परमात्मस्वरूपाची टेकडी ती बागडी म्हणजे सहज सोकरी म्हणजे स्वाधीन करून घेतली असता, सोहं भाव प्रगट होतो. हा परमात्मभाव अगदी उघड आहे. हा प्रगट होण्याचे ठिकाण एक पंढरपूरच आहे.३ त्या पंढरीस राहणारा श्रीविठ्ठल त्याला पाहताक्षणीच डोळ्याचे व मनाचे पारणे फिटून परमानंद प्राप्त झाला हे सर्व श्रीगुरू निवृत्तीरायांचे कृपेचे फळ आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६०
पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणें संगें ॥१॥
जपतप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म । हें जाणताती वर्म संतजन ॥२॥
भक्तिमार्ग फ़ुकटा आनंदाची पव्हे । लागलीसे सवे पुंडलीका ॥३॥
दिंडी टाळ घोळ गरुडटकियाचे भार । वैष्णवांचे गजर जये नगरीं ॥४॥
तिहीं लोकीं दुर्लभ अमर नेणती । होउनी पुढती सेविती ॥५॥
सनकादिक मुनी ध्यानस्त पै सदा । ब्रह्मादिकां कदा न कळे महिमा ॥६॥
ज्ञानदेव निवृत्ती पुसतसें कोडें । पुंडलिकें केवढें भाग्य केलें ॥७॥

अर्थ:-

क्षेत्र पंढरपूरास निघालेला भाविक मनुष्य नामस्मरण करीत करीत वाटेने चालला असतां त्याच्या चालण्यामध्ये पावलोपावली यज्ञ घडत असता व त्या यज्ञापासून होणारी पुण्याई त्याला मिळते. त्यामुळे वैकुंठप्राप्तीचा मार्ग त्याला सुलभ होतो. जप, तप, अनुष्ठान, क्रिया, कर्म, धर्म हे सर्व पांडुरंग आहे. असे साधु संतच जाणतात. सत्संगती मुळे भक्तिमार्गाची वाट सुलभ रितीने प्राप्त होऊन त्यास ब्रह्मानंद प्राप्तिचा सुकाळ होतो. अशी सवय पुंडलिकरायाला लागली होती. विणा, टाळ मृदंग, गरूडटके घेऊन वैष्णवांचा मेळा पंढरपूर क्षेत्रामध्ये आनंदाने भगवत नामाचा गजर करीत असतो. तो आनंद स्वर्गातील इंद्रादिक देवाना देखील फार दुर्लभ आहे. तो आनंद आपल्याला मिळावा म्हणून देव पंढरीक्षेत्रामध्ये वृक्ष होऊन राहिलेले आहेत. सनकादिक मुनी पंढरीक्षेत्रा मध्ये ध्यान करीत बसलेले आहेत भगवत नामाचा महिमा ब्रह्मदेवादिकांस देखील कळणे कठीण आहे. पुंडलिकरायांनी आज केवढे मोठे भाग्य संपादन केले आहे की आज परमात्मा त्यांना लाभला आहे. असे निवृत्तीरायांना माऊली ज्ञानदेव कौतुकाने विचारत आहेत.


६१
माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥
बापरखुमादेविवर सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥

अर्थ:-

माऊली म्हणतात, माझ्या मनात पंढरपूरास हातात पताका घेऊन वारीला जावे अशी फार आवड आहे. त्याचे कारण माझे मन त्या पंढरीरायाचे गुण वर्णन ऐकून रंगून गेले आहे. त्यामुळे माझ्या मनाला पंढरीरायाच्या भेटीचा ध्यास लागला आहे. ज्याच्या ध्यासामुळे मी जागृतित आहे किंवा स्वप्नात की झोपेत आहे याची आठवण मला राहिली नाही. ज्याच्या रूपाकडे पाहिल्यावर आनंद हृदयांत साठवतो. असा ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल समचरण ठेऊन उभे आहेत. व आपल्या समचरण ठेवण्यामध्ये सगुण व निर्गुण ही दोन्ही ही रुपे एकआहेत. अशी तो आपली खूण दाखवित आहे.असे माऊली सांगतात.


६२
कल्पना वृक्षासी देखिलें । चिंतामणीस चिंतिलें ।
कामधेनुसी आपेक्षिलें । जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये ॥१॥
धन्य कुळ धन्य जन्म । जयासि पंढरीचा नेम ।
चित्तीं अखंड विठ्ठल प्रेम । ते धन्य भक्त भूमंडळी ॥ध्रु०॥
तोचि तीर्थरुप सदा । तया दोष न बाधिती कदां ।
जो रातला परमानंदा । तेथें सर्व सिध्दि वोळंगती ॥२॥
ऐशीं वेदशास्त्रीं पुराणीं । जो रातला नामस्मरणीं ।
धन्य तया तीर्थ पर्वणी । धन्य वाणी तयाची ॥३॥
पंढरीसी कीर्तन करी । पुंडलिकासी नमस्कारी ।
विठ्ठल चरण अंतरी धरी । धन्य जन्म तयाचा ॥४॥
सकळ कुळाचा तारकु । तोचि जाणावा पुण्यश्लोकु ।
पांडुरंगी रंगला निशंकु । धन्य जन्म तयाचा ॥५॥
त्यासी अंतीं वैकुंठप्राप्ती । ऐसें शुकें सांगितलें परीक्षिती ।
जे जे हरिचरणीं भजती । ते ते पावती वैकुंठ ॥६॥
मानें स्फ़ुंदत नाचत रंगणीं । प्रेम विठ्ठल चरणीं । सर्व सुख खाणी ।
बाप रखुमादेवीवर विठ्ठल ॥७॥

अर्थ:-

जसा एखाद्याला कल्पतरु लाभावा. किंवा चिंतिलेले देणारा चिंतामणी मिळावा, अथवा मनातील कामना पूर्ण करणारी, कामधेनु जसी लाभावी. त्याप्रमाणे जीवाला खरा अर्थ प्राप्त करुन देणारा तो श्रीहरि परमात्मा पंढरीक्षेत्रांत असून ज्याचे चित्तात विठ्ठला विषयी अखंड प्रेम असून ज्याचा पंढरीचे वारीचा नेम आहे. त्याचे कुळ धन्य त्याचा जन्म धन्य त्रैलोक्यात तोच एक धन्य समजावा. तोच तीर्थरुप समजावा, निर्दोष पुरुष तोच समजावा, सतत भगवन्नामा मध्ये रंगलेल्या पुरुषाल कसलीही पातके लागू शकत नाही. इतकेच काय सर्व रिद्धीसिद्धी. त्याला लोटांगण घालीत त्याच्याकडे येत असतात.नामस्मरणांत रंगलेल्या पुरुषाचे वर्णन वेदशास्त्रांनी व पुराणांनी केलेले आहे. असा तो भगवद् भक्त वारकरी धन्य होय त्याची वाणी पवित्र समजावी.ज्याच्या मुखाने ती अक्षरे ऐकावयास मिळतील ती तीर्थपर्वणी समजावी. पंढरीला जाऊन वाळवंटात जो कीर्तन करतो व पुंडलिकरायांचे जो दर्शन करतो त्याचा जन्म धन्य होय. तो सर्व कुळांचा तारक असून पुण्यवान आहे तो पांडुरंगाशी पुर्ण रंगलेला आहे म्हणुन त्याचा जन्म धन्य होय. जे त्याच्या चरणांची सेवा करतील त् वैकुंठाला प्राप्त होतील असे शुक्राचार्यानी परिक्षिती राजाला श्रीभागवतात सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भगवत्भक्त कीर्तनात रंगन जाऊन आनंदाने नाचतात. व कंठ दाटून त्यांना आनंदाचे भरते येते असे माज़े पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगरायाचे चरणी प्रेम ठेवून समाधानांत राहातात. असे माऊली सांगतात.


६३
वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तयांसी थोर जाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरिवांचुनी दुजा ठाव नाहीं कोठें ॥ध्रु०॥
तापत्रयाग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥२॥
देखोनि ऐकोनि एक बहिर अंध जाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥३॥
आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही वेडा जाला ॥४॥
व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरिभजन न करितां सगळें घालूं पाहे पोटीं ॥५॥
संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठीं लागलासे काळ दांत खातो करकरां ॥६॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावे न निघतां न चुके जन्ममरण ॥७॥

अर्थ:-

जीवाचे कल्याण व्हावे म्हणून वेदशास्त्रे व पुराणे जीवांना हरिनाम उच्चार करण्या विषयी बोंब ठोकून सांगत आहे. पण कोणीच कानानी ऐकत नाही. म्हणजे वेदशास्त्राच्या म्हणण्या कडे लक्ष देत नाहीत पण त्यांच्या म्हणण्या प्रमाणे जे वाचेने हरीनामाचा उच्चार करीत नाही. त्याची अतिशय हानी निश्चित झाली आहे. महाराज मोठ्या कळकळीने सांगतात अरे उठा उठा! लवकर जागे व्हा ! तुमच्य पाठीमागे मृत्युचे मोठे भय लागले आहे त्या भयातन सुटण्याला पंढरपूरावाचून दुसरे ठिकाण नाही. अध्यात्मिक, आधिभैतिक आधिदैविक अश तीन प्रकारच्या तापरुपी अग्नीचा वणवा तुमच्या शरीराला चहूकडून लागला आता तूही कुणाच्या आड जाणार आणि कोणाचा सावाधावा करणार म्हणजे कळकळीने धाऊन येऊन तुम्हाला साह्य कोण करील. विषयाच्या लंपटपणामुळे शास्त्र पाहून व ऐकूनही जे आंधळे व बहिरे झाले. त्यांना काळाने बांधून यमपूरीस नेले. पहा तुझ्या देखत आजा मेला, पणजा मेला, बापालाहि मसनात नेले. पाहता पाहता नातु पंणतु मेले हे पाहून वेडा झालास. अरे हा भोवतालचा गोतावळा व्याघ्रलासी भुत पाठी लागले तसा आहे. हा काळ, तु हरिभजन केले नाहीस तर सगळ्यांनाच आपल्या पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही. याकरता तुम्ही संत संगती धरा,आणि संताच्या संगतीने हरिभजन करा हा पहा दांत करकरा चाऊन काळ तुमच्या पाठीस लागला आहे. माझे पिता व रखुमादेवीवर जे श्री विठ्ठल त्यांना अनन्यभावाने शरण न गेलात तर तुमचे जन्ममरण चुकणार नाही. असे माऊली सांगतात.


६४
हें नव्हे आजिकालिचें । युगां अठ्ठाविसांचें ।
मज निर्धारितां साचें ।हा मृत्युलोकुचि नव्हे ॥
हाचि मानिरे निर्ध्दारु । येर सांडिरे विचारु ।
जरी तूं पाहासि परात्परु । तरि तूं जारे पंढरिये ॥१॥
बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी ।
भक्त पुंडलिकाचे द्वारीं । कर कटावरी राहिला ॥ध्रु०॥
काशी अयोध्या आवंति कांति । मथुरा माया गोमती ।
ऐशीं तीर्थे इत्यादि आहेति । परि सरी न पवती पांडुरंगी ॥२॥
हाचि मानिपारे विश्वासु । येर सांडिरे हव्यासु ।
जरि तूं पाहासि वैकुंठवासु । तरि तूं जाये पंढरिये ॥३॥
आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा ।
पैल थडीय परमात्मा । मध्य राहिला पुंडलिकु ॥४॥
या तिहींचें दरुशन । प्राण्या नाहीं जन्ममरण ।
पुनरपि आगमन येथें बोलिलेंचि नाहीं ॥५॥
पंढरपुरी ह्मणिजे भूवैकुंठ । ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट ।
या हरिदासासी वाळुवंट । जागरणासी दीधलें ।
म्हणोनि करा करारे क्षीरापति । नटा नटा कीर्तनवृत्ती ।
ते नर मोक्षातें पावती । ऐसें बोलती सुरनर ॥६॥
हें चोविसा मूर्तींचें उध्दरण । शिवसहस्त्रनामासी गहन ।
हेंचि हरिहराचें चिंतन । विश्ववंद्य हे मूर्तितें ।
तो हा देवादि देव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा ।
बापरखुमादेवीवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा ॥७॥

अर्थ:-

पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभे असलेले हे परब्रह्म आज कालचे नसुन अठ्ठावीस युगाचे आहे.भगवंताचा अवतार मृत्युलोकांत पंढरीत झाल्यामुळे विचार करतांना मला असे वाटते की हा मृत्युलोक च नव्हे तर वैकुंठच आहे. व तूंही तसाच निश्चय कर आणि बाकीचा विचार न करता जर तुला परात्पर परमात्मा पहावयाचा असेल तर तूं पंढरीस जा. धन्य धन्य पंढरी क्षेत्र या पृथ्वीवर ते वैकुंठ असून भक्तराज जो पुंडलिक त्याच्या द्वारात कटेवर कर ठेऊन विठोबाराय उभा राहीला आहे. या भूलोकांत काशी, अयोध्या, कांची, अवंती, मथुरा, माया, गोमती वगैरे पुष्कळ तीर्थे आहेत परंतु पंढरीची योग्यता त्यांना नाही. हाच पक्का विश्वास ठेव आणि बाकीच्या क्षेत्रास जाण्याचा हव्यास करू नये तुला जर वैकुंठवासी पाहावयाचा असेल तर तूं पंढरीला जा. तेथे जड जीवाला तारण्या करीता भीमा आडवी वाहात आहे. अलिकडच्या बाजुला जीवात्मा, पलिकडच्या बाजुला परमात्मा, मध्ये पुंडलिक आहे. या तिघांचे ज्याला दर्शन घडेल त्या प्राण्याला जन्ममरण नाही. परमात्मदर्शनानंतर पुन्हा संसारात येण्याची गोष्ट बोलावयासच नको. अहो पंढरी म्हणजे साक्षात् भूवैकुंठ असून तेथे परब्रह्म तर नीट उभे राहिलेले दिसते. हरिदासांना जागरण करण्याकरीता भगवतांनी वाळवंट दिले आहे. म्हणून मी म्हणतो क्षीरापती करा कीर्तनाच्या वृत्तीत नटा असे जे करतील ते प्राणी मोक्षाला पावतील असे देवश्रेष्ट सांगतात. केशव नारायणादि नाम ही त्याचे मूर्त स्वरूप आहे. त्या नामाने सर्वांचा उध्दार होतो शिवसहस्त्रनामा पेक्षाही हे फार मोठेआहे. हे मुळ स्वरूप हरिहरांच्या चिंतनाचे स्थान असूनहि पांडूरंगरायांची मूर्ति जगवंद्य आहे. असा हा देवादिदेव साक्षात कृष्ण पांडुरंग असून सदाशिवाचा निजठेवा आहे.मा झे पिता व रखुमादेवीचे वर जे श्रीविठ्ठल हे सांख्यशास्त्रांनी मानलेल्या चोविस तत्त्वाहून निराळे असून शुद्ध सच्चिदानंदरूप पंचविसावा पुरूष आहेत. असे माऊली सांगतात.


६५
पातेजोनि खेंवासि आणिलें । येणें आपणिया समान मज केलें गे माये ॥१॥
पाहेपां नवल कैसें बितलें । मन उन्मनीं उन्मन ग्रासिलें ॥२॥
पाहेपां येणें रखुमादेविवरा विठ्ठले । पाहेपां राहणें पंढरपुरीं केलें ॥३॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्णाला अलिंगन देण्याकरीता जवळ केले व त्याला आदराने आलिंगन दिल्याबरोबर मला त्याने आपल्या सारखे करून टाकले.पहा, काय चमत्कार झाला. उन्मन जो परमात्मा त्या परमात्मस्वरूपाशी माझ्या मनाचा ग्रास करून ते उन्मन झाले.पहा, या रखुमादेविच्या पती श्रीविठ्ठलाने आपल्या स्वरूपाशी ऐक्य केल्यामुळे माझे राहाणे आपोआप पंढरपूरास झाले, असे माऊली सांगतात.


६६.
जें येथें होतें तें तेथें नाहीं । ठाईंच्या ठाईं हरपलें ॥१॥
घरींच्या घरीं जाली चोरी । आपणावरी आळु आला ॥२॥
पंढरपुरीं प्रसिध्द जाणा । पुरविल्या खूणा ज्ञानदेवा ॥३॥

अर्थ:-

जे म्हणजे अहंकारादि जेथे होते म्हणजे आपल्या ठिकाणी प्रतीतीला येत होते ते अहंकारादि आपल्या स्वरूपाचा विचार केल्यामुळे तेथे नाही. विचाराने ते अहंकारादि आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच हारपून गेले. हे म्हणणे घरच्या घरी चोरी झाल्यासारखे झाले. असा आपल्या वरतीच आळ आला आळ म्हणण्याचे कारण वस्तुतः अहंकारादि अनात्मपदार्थ नाही व ते मूळचेच अध्यस्त असल्यामुळे विचाराने ते आत्मस्वरूपच झाले. व तो परमात्मा पंढरपूरात विटेवर उभा राहिलेला प्रसिद्ध आहे. या खुणा निवृत्तीनाथांनी मला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव म्हणतात.


६७
क्षीर सागरीचें निजरुपडें । पाहतां पारखिया त्रिभुवनीं न संपडे ।
तें उभें आहे वाडें कोडें । पुंडलिकाचे आवडी ॥१॥
मेघश्याम घेउनियां बुंथी । जयातें श्रुती पैं वानिती ।
कीं तें पुराणांसी वाडे । तें पंढरिये उभें असें कानडे गे माये ॥२॥
आवडीच्या वालभें गोजवलें गोजिरें । पाहातां साजिरें त्रिभुवनाएक गे माये ॥३॥
तें सकळ मंगळदायकाचें प्रेम आथिलें । कीं ब्रह्मरसाचें वोतिलें घोसुलें ।
ब्रह्मविद्येचें सार मथिलें । देखा सकळ आगमींचें संचलें ।
की बापरखुमादेविवर विठ्ठल नामें मढिलें । श्रीगुरु निवृत्तीनें दिधलें ।
प्रेमखुण रया ॥४॥

अर्थ:-

ते क्षीरसागरावर असलेले श्रीविठ्ठलाचे रूप, सर्व व्यापक असूनही बहिर्मुख पुरूषांना ते त्रैलोक्यातही सापडणार नाही. पण आश्चर्य हे आहे की मोठ्या कौतुकाने पंढरीमध्ये ते विटेवर उभे राहिले आहे. याचे कारण एकच आहे की प्रेमळ भक्त जे पुंडलिकराय त्याच्या आवडीकरिता शामसुंदररूप धारण करून ते विटेवर उभे आहे. त्याच्या स्वरूपाचे वर्णन श्रुती शास्त्रांनी व पुराणांनी केले आहे. अशा तऱ्हेने भेटण्याला जे अवघड भगवत्स्वरूप ते पंढरीत उभे आहे. त्यांनी ते सुंदर रूप आपल्या प्रेमळ भक्ताकरिता धारण केले आहे. या त्रिभुवनांत तेच एक रूप सुंदर आहे. त्याचेच नाम जगात मंगलदायक आहे. त्याचे रूप प्रेमाचे ओतलेले आहे. ज्याच्या रूपाला ब्रह्मरसाचे घोस आले आहेत.ज्याचे रूप म्हणजे ब्रह्मविद्यचे सार काढून बनविलेले आहे. ज्याचे वर्णन करण्यामध्ये सर्व शास्त्रे मग्न झाली आहेत ते माझे पिता व रखुमाईचे पती श्रीहरि श्रीविठ्ठल हे नांव धारण करून विटेवर उभे आहेत. त्या पांडुरंगाची प्रेमाची खूण श्रीगुरुनिवृत्तिरायांनी मला दिली असे माऊली सांगतात.


६८
जयातें पाहतां परतला आगमु । निर्गमा नाकळे दुर्गमु ।
सिध्दांसाधक निरुतें वर्मु । न पडे ठायीं सर्वथा ॥१॥
तें या पुंडलिका वोळलें । प्रेम प्रीतीनें घोळलें ।
भक्तिमातेनें चाळविलें । आधीन केले आपणया ॥ध्रु०॥
जे माये अविद्ये वेगळें । गुणत्रया नातळे ।
काळें गोरें न सांवळें । निर्धारितां नेणवे ॥२॥
जें द्वैताहूनि परतें । तें सुखातें वाढवितें ।
योगी लक्षीं लक्षित ज्यातें । परि नेणवे सर्वथा ॥३॥
जें अरुपा रुपा वेगळे । सहस्त्रनामांहूंनि आगळें ।
परम कृपेचें कोंवळे । क्रियाकर्मविरहित ॥४॥
जें ब्रह्मरसाचें गोठलें । तें पंढरिये प्रगटलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें । नामें आथिलें चोखडें रया ॥५॥

अर्थ:-

ज्या श्रीविठ्ठलाचा विचार करू गेले असता, तो श्रीविठ्ठल वेदशास्त्रालाही कळणे कठीण आहे. म्हणून ‘नेति नेति’ असे म्हणून वेद परत फिरला. सिद्ध साधकांनाही त्याचे वर्म सापडले नाही.असा तो परमात्मा पुंडलिकरायांच्या भक्तिभावाने सहज प्राप्त झाला. त्या भक्ति मातेने त्याला स्वकीय स्वरूपापासून चाळवून आपले स्वाधीन करून घेतले. ज्या परमात्मतत्त्वाचा विचार करू गेले असता त्याचे स्वरूप माया व अविद्या याहून वेगळे असून गुणत्रयांत सापडत नाही त्याच्यात काळे गोरे किंवा सावळे या वर्णाचा निर्धार करता येत नाही. तो द्वैत व अद्वैत याहूनही पलीकडे आहे. तरीपण त्याचे नाव घेतले असता मनाला सुख वाटते. योगी लोक ज्याचे ध्यान करतात पण त्यांनाही त्याचे स्वरूप कळत नाही. तो रुपवान नाही रुपरहितही नाही असा तो सहस्त्रनामा हुन वेगळा आहे तो श्री विठ्ठल कृपावंत क्रियाकर्माहुन वेगळा आहे. असे ते ब्रम्हरसाचे गोठलेले ते रूप श्रीक्षेत्र पंढरी येथे श्री विठ्ठल नावाने सुंदर, सर्वगुणसंपन्न, शुद्धस्वरूप प्रगट झाले आहे. असे ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात


६९
नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला ।
भक्तें पुडलिकें देखिला । उभा केला विटेवरी ॥१॥
तो हा विठोबा निधान । ज्याचें ब्रह्मादिकां ध्यान ।
पाउलें समान । विटेवरी शोभती ॥२॥
रुप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु ।
महिमा वर्णितां महेशु । जेणें मस्तकीं वंदिला ॥३॥
भक्तिसुखें लांचावला । जाऊं नेदी उभा केला ।
निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मीं न विसंबे ॥४॥

अर्थ:-

माऊली म्हणतात आज चुकून ते परब्रह्म प्रत्यक्ष पंढरपूरास आले असे वाटते. ते परब्रह्माचे रूप पाहून त्याला पुंडलिकरायांनी विटेवर उभे राहाण्यास सांगितले.तो हा विठोबा सर्वसुखाचा ठेवा असून ज्याचे ध्यान ब्रह्मदेवादिक करत असतात. अशी ती समान पाऊले विटेवर शोभत आहे.त्याचे रूप जाणते डोळस पुरूष पाहतात. त्याचे रूप गोपवेष धारण केलेले आहे. ज्याचे माहात्म्य एवढे आहे की, भगवान शंकर ज्याला वंदन करतो. तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तिला लाचावल्यामुळे पंढरपुरास आला. पुंडलिकरायांनीही त्याला दुसरीकडे कोठे न जाऊ देता विटेवर उभा केला. हे श्रीविठ्ठला तुला मी जन्मोजन्मी विसरणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.


७०
त्रिपुटीं भेदूनी मनाच्या मौळी । तें आलें भूमंडळीं पंढरिये ॥१॥
नाम लाधलें नाम लाधलें पुंडलिकें केलें खेवणें देखा ॥२॥
समर्था पाथीं भोजन जालें । पंचामृत घेतलें धणीवरी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेसी तृप्ती । यथार्थ भावितां कळों येईल चित्तीं ॥४॥

अर्थ:-

ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय इत्यादी त्रिपुटीचा भेद करून जो परमात्मा भक्तांकरिता मनाचा मवाळ होऊन भूमंडळी पंढरीत अवतीर्ण झाला. त्याचे नांव आम्हाला प्राप्त झाले, पण हे सगळे नामालंकार देण्यात उपकार त्या पुंडलिकाचे आहेत. त्यामुळे आज समर्थाच्या पंक्तीला भोजन होउन तृप्ती होईपर्यंत पंचामृताचे पान केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याबरोबर आज आम्हाला तृप्ती झाली आहे. हे यथार्थ भाविकपणाने पाहीले तर चित्तात कळून येईल.असे माऊली सांगतात.


७१
आकानिकेलेचिकनामातु । कारले धसिगे मरुळादने ॥१॥
चलुवाने चलुवने पंढरीराया चलुवाने । यल्ले दौनर्कवाने ॥२॥
पुंडलिकने भक्ती बंदा । रखुमादेविवर विठ्ठलुने ॥३॥

अर्थ:-

हा अभंग कानडी भाषेतील आहे. लहान भाऊ बहीणीला म्हणतो हे आक्का तूं माझी एक थोडीशी गोष्ट ऐक मी मुरलीच्या ध्वनीने मोहीत झालो. फार सुंदर फार सुंदर, म्हणजे अत्यंत सुंदर जो पांडुरंग इतर कोठे मिळणार नाही व तो कोठेही येणार नाही. पण रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते पुंडलिकरायांच्या भक्तिसाठी पंढरपूरास आले. असे माऊली सांगतात


७२
जोडुनिया जोडी जेणें हूंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव सभाग्य तोचि हरीरंगी नाचे ॥ध्रु०॥
आपण न करीं यात्रा दुजियासी जावो नेदि । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुध्दी ॥२॥
ऐसें जन्मोनि नर भोगिती अघोर । न करिति तीर्थयात्रा तया नरकीं बिढारे ॥३॥
पुंडलकें भक्तेरे तारिले विश्वजना । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपुरा पाटणा ॥४॥
कायावाचामनें जिवें सर्वस्वें उदार । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥५॥

अर्थ:-

मनुष्य जन्माला येऊन भगवत्प्राप्तीची मुख्य जोडी जोडावयाची ती दूर हुदांडून देऊन संसाराची जोड जोडण्याची भिकेची आवड ज्याला आहे त्यास पंढरी आवडत नाही. करंटे कपाळ त्याचे की ज्याचे मुखावाटे नाम येत नाही. जे हरिच्या कीर्तनांत देहभाव विसरुन नाचतात. तेच खरे नित्य भाग्यवान म्हणून समजावे. तीर्थयात्रादि धर्मकृत्ये आपण तर करीत नाहीच पण दुसऱ्यालाही करु देत नाही असले विषयलंपट दुष्टबुद्धीचे पुरुष दुसऱ्याची दुष्टबुद्धी करून त्यास विपरित विद्येची शिकवण देतात.असे व्यवहार करणारे नर मनुष्य देहाला येऊन अघोर नरक भोगतात. त्यांना नरकवास मिळण्याचे कारण ते तीर्थ यात्रादि करीत नाहित. अशा जीवाची दया येऊन भक्तराज जो पुंडलीक त्याने वैकुंठाची मूर्ति पंढरपूर नगरांत आणून विश्वातील जनांचा उद्धार केला. काया वाचा मन ल जीव यावर सर्व प्रकारे उदार म्हणजे वमाझे पिता व रखमादेवीचे पती श्रीविठ्ठल ज्यांच्या करता सर्वस्व अर्पण करणारा असा जो तोच खरा विठ्ठलाचा वारकरी होय.


७३
शरीर हें स्थळ मळानिर्मळाचें मूळ । पाहोनि चोखाळ आदिपुरुषासी ।
जन्म मरणाचिया उचलुनि पेडी । मग तया बिंबडीं ज्ञान पिके ॥१॥
पंढरिचें पिक नसमाये अंबरीं । तें शेत सोकरी पुंडलिक ॥ध्रु०॥
ऐहिक परत्र दोन्ही शेताचीं आउतें । मुंड मुंड तेथें कुळवाडिये ।
उचलुनि पेंडी कासिया समुळीं । मग पुण्यकाळीं वोलवले ॥२॥
गरुडटके दोन्ही शेताची बुझवणी । दस कुडपणी नामघोष ।
एकवीस स्वर्गाचा घालुनिया माळा । मग तया गोपाळामजीं खेळे ॥३॥
जये शेतीं निवृत्ती भीतरे तये शेतीं साजे पुरे । राउळीं निदसुरे दंडीजती ॥
रात्रंदिवस तुम्हीं हरिचरणीं जागा । तेणें तरालगा भगसागरु ॥४॥
अठाराही बलौतें तें केलें धडौतें । खळें दान देतें सनकादिका ।
ज्ञानदेव म्हणे जगदानीं पिकला । पुरोनि उरला पंढरिये ॥५॥

अर्थ:-

शरीर हे स्थळ म्हणजे क्षेत्र, किंवा मळा म्हणजे जन्मरणादि दुःखरुपी संसाराचे तसेच निर्मळाचे म्हणजे मोक्षाचे अशी दोन्ही पिके करण्याचे मूळ म्हणजे क्षेत्र आहे त्यात शुध्द जो परमात्मा त्यास पाहिल्याने जन्ममरणाच्या मुळ्या, खोडे काढुन टाकून अशी ती जमीन बिवड केली असल्यामुळे त्या जमिनीत ब्रह्माचे पीक आले. असे ते पीक पंढरपूरात आले त्याचा काय नवलाव सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशा सगळ्या शेतांची पिके नवलावा सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशी शेतीची पिके गोळा करणारा पुंडलिक आहे. ऐहिक परत्र ही दोन्ही शेतांची औते आहेत.त्या औतांच्या साधनाने गरीब लोक शेती करणारे शेतकरी आहेत ? शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना ह्याच कोणी त्या मुळा सकट काढुन शरीररुपी क्षेत्र स्वच्छ केल्यावर पुण्य कर्माच्या काळी ते चांगले ओलावले. संताच्या दिंडीत गरुडटके असतात. हीच कोणी त्या शेतांची बुजगावणी केली. संताचा जो नामघोष हीच कोणी दशदिशांची कुडपणी/ कुंपण होय. एकवीस स्वर्गाची माळा घातलेला परमात्मा वैष्णवांत खेळत आहे शरीररुपी शेतांत निवृत्ति अंतर्मुखता आहे. तेथे धान्याची रासरुपी शेतात परिपूर्ण आहे. शेताचे काम न करता स्वस्थ निजणारे जे घरांतआहेत. त्यांना दंड केला जातो. म्हणून तुम्ही रात्रंदिवस हरीचरणाचे ठिकाणी जागे राहा त्याने भवसागर तराल हो ! अशा तुमच्या भक्तीमुळे अठरा पुराणे हेच कोणी बलुतेदार संतोषतील. तसेच तुम्ही भक्ती करा असे दान मागण्यास आलेले सनकादिक हेही संतुष्ट होतील. सर्वाच्या इच्छेप्रमाणे दान देणारा एकच श्री पांडुरंगराय असून तो पंढरीस भक्तासांठी शिल्लक राहिला आहे. असे  निवृत्तीदास माऊली सांगतात.


७४
आनु नेणें कांहीं । विठ्ठलु स्मरें देहभावीं ॥१॥
पुंडलिका हें चिंतन । म्हणोनि विटेवरि हें ब्रह्म ॥२॥
रखुमादेविवरु शहाणे । विठ्ठलु पाहुणे पुंडलीका ॥३॥

अर्थ:-

माझा देहभाव जाण्याकरिता मी त्या विठोबारायाच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीच करीत नाही. पुंडलिकरायांला या श्रीविठ्ठलाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप तेच श्रीविठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले म्हणून शहाण्या पुरूषाने इतर कांही एक न चिंतन करता एका श्रीविठ्ठलाचे चिंतन करावे त्यामुळे पुंडलिकरायाप्रमाणे त्यालाही माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठलांची प्राप्ती होईल असे माऊली म्हणतात.


७५
तळवे तळवटीं असे । विटें फ़ावलें अनयासें ॥१॥
आम्हां न संडवे पंढरी । विठ्ठलराज विटेवरी ॥ध्रु०॥
जानु जघन बरवे दिसे । ते देखोनि मन उल्हासे ॥२॥
पदकमळ जोडिलें । तेथें मुनिजन रंगलें ॥३॥
कासे कसिला पितांबरु । चरणीं ब्रिदाचा तोडरु ॥४॥
नाभीकमळीं जन्म असे । ब्रह्मादिंका अपैसे ॥५॥
हस्तकडगे बाहुवटे । विठोबा शृंगार गोमटें ॥६॥
अंगीं चंदनाची उटी । ते देखोनि मन संतुष्टी ॥७॥
गळा वैजयंती माळा । मणीमंडित वक्षस्थळा ॥८॥
कानीं कुंडलें झळाळा । श्रीमुख दिसतें वेल्हाळा ॥९॥
वदन सकुमार गोजिरें । जैसे पोवळिवेल साजिरे ॥१०॥
दंतपंक्ति झळाळ । जैसी मणिकाची किळ ॥११॥
नाशिक मनोहर दिसे । जैसें वोतिलेंसे मुसें ॥१२॥
लोचन बरवें विशाळ । श्रवणीं कुंडलें झळाळ ॥१३॥
टिळक रेखिला मृगनाभीचा । बाप राजा मन्मथाचा ॥१४॥
माथां मुगुट झळाळित । बाप पुंडलिका न्याहाळित ॥१५॥
निवृत्तिदास शरणांगत । विठ्ठला चरणींचे आरत ॥१६॥

अर्थ:-

या श्रीहरिचे तळवे तळवटी म्हणजे तळपायाचे खाली विट असून त्या विटेवर समचरणाने आम्हांला अनायासाने प्राप्त झाले. म्हणुन आम्हाला पंढरी सोडून जावेसे वाटत नाही. विटेवर पाय असलेल्या विठ्ठलाचे हात, मांड्या शोभून दिसत आहे. व ते पाहिल्याबरोबर मनाला आनंद होतो. ज्याच्या चरणकमळाच्या ठिकाणी ऋषी, मुनी रंगुन गेले.जो पितांबर नेसला असून ज्याच्या पायात तोडरअलंकार घातला आहे. ज्याच्या नाभिकमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ति झाली आहे. ज्याच्या हातातील कडे तसेच इतर अलंकार त्या सुंदर शृंगाराने तो सुशोभित दिसत आहे. ज्याच्या अंगाला लावलेली चंदनाची उटी पाहून मनाला मोठे समाधान होते. ज्याच्या गळ्यांत वैजयंती माळा घातलेली असून छातीवर रत्नमणी शोभत आहे. कानात रत्नजडित कुंडले झळकत असून ज्याचे श्रीमुख सुंदर दिसत आहे.ते मुख पोवळ्याप्रमाणे सुंदर शोभत आहे. माणिकाच्या कांतीप्रमाणे ज्याचे दांत चकचकीत आहे.ज्याचे नाक मनोहर सर्व सौदर्यांनी भरलेले असे दिसत आहे. ज्याचे डोळे सुंदर व विशाल आहेत. ज्याच्या कानांत कुंडले झळकत असून यांच्या कपाळालां मृगनाभिच्या कस्तुरीचा टिळा शोभत आहे. असा तो पंढरीराय मदनाचा पुतळा दिसत आहे.ज्याच्या मस्तकावर झळझळित रत्नमुकुट आहे व तो आपल्या आवडत्या पुंडलिकाला कृपादृष्टीने पाहात आहे. मी माझ्या श्री गुरु निवृतीरायांना अन्यन्य शरण गेल्याने माझे विठ्ठल स्वरुप पाहण्याचे मनोरथ पुर्ण झाले असे माऊली सांगतात.


७६
जन्मोजन्मींच्या सायासीं । विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥
पूर्वी पुण्य केलें वो माये । विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२४॥
रखुमादेविवरु आहे । तया तीर्था केधवां जाती पाय ॥६॥
अर्थ:-

अनेक जन्मीच्या पुण्याईमुळे मोठ्या कष्टाने पुंडलिकरायांना श्रीविठ्ठलाची प्राप्ती झाली. महान पुण्याईमुळे विटेवर श्रीविठ्ठलाचे चरण त्याला दिसले त्या पंढरी क्षेत्रास माझे पाय चालून केव्हा जातील व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल मी केंव्हा पाहिन असे माऊली सांगतात.


७७
विवेक नदीये बैसोनि । सांगड सत्त्वाची बांधोनी ॥१॥
एक पंढरी वैकुंठ । येर वाउगे बोभाट ॥२॥
चारी वेद विवादती । पुराणें साक्ष देती ॥३॥
बोले निवृत्तीचा दास । संत गर्जती पापा नाश ॥४॥

अर्थ:-

मुमुक्षुने सत्त्वगुणाची सांगड कमरेला बांधून, विवेकनदीतून पंढरीरुपी वैकुंठात जाणे हेच श्रेयस्कर आहे. बाकीच्या साधनांचा उगीच बोभाट असल्यान ती फुकट आहेत. या म्हणण्यास चारी वेद व पुराणे साक्ष देतात. तसेच सर्व पाप नाश होण्यास पंढरीशिवाय अन्य स्थान नाही. संत गर्जना करुन म्हणतात असे निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात.


७८
वाराणशी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन ।
त्रिवेणिये स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पाईची वीट । मी कईबा होईन ॥ध्रु०॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचें फळ लाहीन ।
अब्जकतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥२॥
मल्लिकार्जुन यात्रे जाईन । श्रीशैल्यशिखर पाहीन ।
पाताळगंगें स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥३॥
मातापुर यात्रे जाईन । सह्याद्री पर्वत पाहीन ।
गहनगंगेम स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥४॥
कोल्हापुरीं यात्रे जाईन । महालक्ष्मी पाहीन ।
विशाळतीर्थी स्नान करीन । परि मी वीट नव्हेन ॥५॥
एका अंगुष्ठीं तप करीन । पृथ्वीपात्रचि लाहीन ।
देह कर्वतीं देईन । परि मी वीट नव्हेन ॥६॥
बहुता पुण्यांच्या सायासीं । चरण जोडले विटेसी ।
निवृत्ति दासु म्हणे परियेसी ॥
परी मी वीट नव्हेन ॥७॥

अर्थ:-

परमात्मा हीच कोणी वीट अशी भावना करुन माऊली म्हणतात. मी, काशी प्रयाग इत्यादी क्षेत्रात जाऊन त्रिवेणीचे स्नान करीन परंतु त्यामुळे वीट म्हणजे परमात्मरुप होणार नाही. हे पांडुरगा, मी परमात्मस्वरुप केव्हा होईल. तसेच गोदावरी यात्रेला जाईन, बारा वर्षे साधने करुन काही मायिक फळ मिळविन तसेच अब्जक तीर्थात स्नान करीन पण त्यामुळे वीट मात्र होणार नाही मल्लिकार्जुन क्षेत्राला जाऊन श्रीशैल्य पर्वताचे शिखर पाहीन, तसेच पाताळ गंगेचे स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही.मातापूर यात्रेला जाऊन सह्याद्री पर्वत पाहीन आणि त्याठिकाणी असलेल्या गहनगंगेचे स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. कोल्हापूर यात्रेला जाईन, महालक्ष्मीचे दर्शन घेईन, शिंगणापूर विशाल तीर्थात स्नान करीन पण त्यामुळे मी वीट होणार नाही. एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करीन, सर्व पृथ्वी प्राप्त करुन घेईन, देह करवतीने कापन देईल. पण या करण्याने मी वीट मात्र होणार नाही. भगवत्प्राप्तीची उत्सुकता लागलेला भक्त म्हणत आहे. की, अनेक जन्मीच्या महान पुण्याईन मला पांडुरंगरायांचे दर्शन झाले. तरी पण त्याच्या पायाखालची वीट होणार नाही. म्हणजे मला ती वीट होण्याचे भाग्य सहसा लाभणार नाही. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.


बाळक्रीडा – अभंग ७९ ते १०१

७९
भवाब्धिसागरीं मांडिली टिपरी परि अनुहातें वाजे गजरु वो ॥
ताळक छंदें उमटती पदें वरि टिपरें टिपरीं गाजेवो ॥१॥
टिपरिया घाई गोपाळ भाई ॥
घुळुघुळुपाई नादु वाजे वो ॥२॥
ताळकछंदे वेगुआल्हादें टिपरीनादें वाजती वो ॥
सांडुनि अहं धरिलें सोहं तयासि टिपरी साधली वो ॥३॥
औटहात भूमिका नीट तालछंदें टिपरी धरी वो ॥
विरुळा जाणे एथींचे खुणे टिपरे वाजे शिरीं वो ॥४॥
एकटसंगें टिपरें वेगें ध्वनि गगनीं गाजे वो ॥
बाप रखुमादेविवर टिपरीवो गाजती घाई जाली टिपरियाजोगी ॥५॥

अर्थ:-

देहतादात्म्य सोडण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे, म्हणून या नरददेहास भवाब्धिसागर असे म्हटलेले आहे. ह्या मनुष्यरुपी देहांत भगवत् भजनरुपी टिपरीचा खेळ मांडलेला असून, कानांत बोटे घातली असताना आतल्या आंत जो आवाज ऐकू येतो तो रात्रंदिवस सतत चालू असल्यामुळे त्यांना अनुहात ध्वनी असे म्हणतात. त्या अनुहात ध्वनीच्या ठिकाणी ‘सोऽहं’ अशी भावना करुन भगवत् भक्त भगवंताचे ध्यान करीत. तिच्या तालछंदामध्ये टिपरीवर टिपरी वाजवितात. टिपरीच्या आवाजांच्या गर्दीत गोपाळ भगवन्नामाच्या उच्चारांत नाचूं लागले असता त्यांच्या पायांतील घुंगराचा घुळुघुळु असा आवाज ‘निघतो. त्या तालछंदाच्या आनंदात टिपरीचा नाद वाजतो. त्या भजनानंदांत त्याचा ‘अहं’ असा देहाभिमान जाऊन ज्याने ‘सोऽहं’ असा नाद धरला त्यालाच टिपरी खेळणे साधते म्हणतात. साडेतीन हातांच्या शरीरांत वर सांगितल्याप्रमाणे तालांत टिपरी हातात धरा. या पारमार्थिक टिपरीची खूण जाणणारा विरळा.अशा एकमेकाच्या टिपरीच्या आवाजाने चिदाकाशांत ध्वनी घुमून राहिला आहे. टिपरीचा योग्य नांद जाणणाऱ्यात या टिपरीच्या खेळाची घाई झाली आहे. भगवत् भक्त आनंदी असून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्यांना या टिपरीच्या खेळांत घेऊन आनंदाने खेळ खेळत असतात. असे माऊली सांगतात.


८०
जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणीं बाळचंद्र खेळतां दिसे ॥
तें देखोनियां यशोदा माया पसरोनिया बाह्या ॥
तें क्षेम सांगावया वाचा कैंची ॥१॥
वालभते ब्रह्म गोकुळीं आनंदे ॥
गौळियाच्या छंदें खेळतां दिसे ॥ध्रु०॥
थुरथुर चालत भूमि पाय ठेवित । आंतु बाहिर दावित यशोदे माये ॥
तो नित्य पूर्ण ह्यणे कडे घे कांवो आमये ॥
स्तनपान दे कां सये वोसंगागे माये ॥२॥
दोनी चारी कणिका वक्रारविंदी देखा । तें मुखमय कां माहेर होता ॥
तें उचलेनि कपोळीं स्नेहें चुंबिती गौळणी ।
मांजयाची सिरयाणी ध्यानीं मुनिजनागे माये ॥३॥
विश्व प्रतिबिंबाचें बिंब तो कान्हया वो साजणीं ।
त्यासी वोसंगा घेउनी गौळणी स्तनपान देती ॥
सवेंचि कासाविस होती ते पाही ।
मां साच कीं कान्हया नाहीं तेथें यशोदा ते कैची ॥४॥
वेदाशास्त्रा पुराणा आणि यज्ञतप दाना । श्रुति धांडौळितां मना ठावो नुरेचि ।
मां मां म्हणोनि गौळणी अंगोळिया धरिती ।
मां विस्मयो करिती चोज अचोजगे माये ॥५॥
ब्रह्मदिकां लक्षा नये कल्प गेले युगे युगे ।
तो गौळणीया वोसंगा निघालगे माये ॥
तें बाळ भावाचे कीं संतत दैवाचे ।
न वर्णवे वाचे दिपोदिपिवो माये ॥६॥
सांवळा सुजेडु कीं सुधेपरिस गोडु । तो या डोळ्या उजियेडु डोळसु तो ॥
त्यानें एकै घेइजे एके पुजिजे । मां प्रीतिचेनि माजे नेणिजे दुजेगे माये ॥७॥
हारवी कांई आपुलेपण न सांडितां गांवोगांवीचा होत जात ।
तैसा गोकुळीं गोपिनाथु सकळ जना ॥
कृष्ण परब्रह्म पुतळा कीं आनंदाची कळा ।
तो हा भोगविता हे लीळा मदनाची गे माये ॥८॥
एक पावलों म्हणती ते कांहींच नेणती ।
अनुसरलिया हातांतळी पावा पावा म्हणे निवृत्तिदासु हरी ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु करिते निकेगे माये ॥९॥

अर्थ:-

खेळताना धुळीत माखलेले, मोठे पोठ असलेले व सुंदर डोळे असलेला तो बाळकृष्ण अंगणात खेळताना पाहुन यशोदा त्याला मायेने क्षेम देण्या साठी आलिंगन देत आहे त्याचे वर्णन वाचे ने कैसे करावे. आवडीचे परब्रह्म गोकुळात गौळ्यांसोबत आनंदाने खेळताना दिसत आहे. थुयी थुयी चालतल, भुमीवर पाय टाकत आत बाहेर करणाऱ्या कृष्णाला ती यशोदा खाली उतरु देत नाही कायम कडेवर घेऊन असते व तो ही तिला स्तनपानाची मागणी करत आहे. त्याच्या मुखाला लागलेले दोन चार मातीचे कण पाहुन त्या भुंग्यांना, योग्याना व चंद्राला त्यांचे माहेर वाटत आहेत. त्या गौळणी त्याचे मुखचुंबन घेऊन प्रेमाने मत्त होत आहेत. विश्वाचे बिंब प्रतिबिंब असलेल्या त्या कान्हाला त्या गौळणी आलिंगन देऊन स्तनपान देत आहेत. व तो दुर गेला दिसला नाहीतर कासाविस होत आहेत. त्यांना तो कृष्णच दिसला नाही तर यशोदा कोठुन दिसणार.त्याचा ठाव वेद शास्त्र, श्रुती, पुराणे यांना घेता आला नाही यज्ञ, तप व दान करुन तो प्राप्त झाला नाही पण अशा त्या कान्हाला त्या गौवळणी बोटाला धरुन खेळवतात त्याचा विस्मय मनाला होतो. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कोटी कल्प तप करुन तो ब्रह्मादिकांना अकळ राहिला. तो त्या गौळणींच्या मांडीवर खेळतो हे त्याचे भाग्य की संतांचे दैव हे कळत नाही. अशा त्या दिपाच्या दिप्तीचे वर्णन वाचेंने कसे करता येईल.
सावळा तेजःपुंज व अमृताहुन ही गोड असणारा त्याला कोण घेणार नाही? त्याची सर्वच पूजा करतात. व त्या प्रितीच्या मोहरामुळे त्या गौवळणा दुसरे काही जाणित नाहीत. सुर्य जसा आपले एक स्वरुप न सोडता गावोगावींचा होऊन जातो. तसा गोकुळातील कृष्ण आपले कृष्णपण न सोडता सगळ्यांचा होतो. परब्रह्म कृष्णाला आनंदाची मूर्तीच म्हणता येईल.अशा लीला भोगणाऱ्या गवळणी ही मदनाची लीला आहे असे मानतात.परमात्मा आम्हाला कळला असे म्हणणारे काहीच जाणत नाहीत परंतु त्याला अनुसरुन वागले की तो आपलासा होतो असा
तो माझे पिता व रखुमाईचा पती श्री विठ्ठल तो सगळ्यांचेचांगले करेल व त्यांनी मला पावावे असे निवृत्तीदास माऊली सांगतात.


८१
गोकुळीं कमळ विस्तारलें साचें ध्यान श्रीधराचें करावया ॥
यमुनेच्या पाबळीं मूर्ति देखिली सांवळी ।
चिदाकांशींची वोतली प्रेमतनुगे माये ॥१॥
आवडींचें वालभ ब्रह्म पुंजाळलें । गोपवेषें गाई राखे ।
कांबळीची बुंथी घेऊनि कल्प द्रुमातळीं ।
त्रिभंगी ठाण मांडियलेंगे माये ॥ध्रु०॥
योगमायेचनि विलासे उभा देहुडा पाउलीं ।
तेथे दीप्ति जे उदेली तेजाकारें अंगुष्ठीं अगुष्ठीं स्थापियेलें मूळपीठ ।
सुनीळनभाचेनि काळीवटे अंगोळियागे माये ॥२॥
शेष गुढारी विसंचला किं भूमि पावो ठेविला ।
तोचि विन्यस्त उभारला तेज:पुंज ॥
कुंकमपिंजरिचेनि सळे मापर्वती रातेत्पळें ।
तळवांचे रंग बाहळें पाउलीं श्र्लाघेगे माये ॥३॥
चरणकमळीं कमळा कैसी विराजली बाळा । तेथें जाला एकवळा ये कमळीं कमळा ॥
ध्वजवज्र अंकुशरेखा चरणीं वोळली पीयूष ।
नखे सरळीं देखा काळेपणाचेनिगे माये ॥४॥
घोटीं सुनीळ निरावकाशें काश पाहतां भासलासे ।
जानुजघन प्रकाशे नभ ढवळलें ॥
कासे कसिला सोनसळा खवे आला मध्यस्थळा ।
रत्नजडित मेखळा शोभतसेगे माये ॥५॥
द्वितीय कमळीं प्रजापती कीं रोमराजी झळकती ।
तेथें उपनली दीप्ति काळी त्रिवळीची ॥
उदरवक्षस्थळ द्विजपद निर्मळ ।
स्तनचंद्र पोकळी ढिसाळ काळिमा जैसीगे माये ॥६॥
उदधीचेनी प्रेमसळें आपाद वैजयंती माळे ।
वरी शोभताती सोहळे सगुणाचे ॥
दशनदीप्ति झळाळी रत्नकिळा मागों आली ।
दिसे हनुवटी बुजाली प्रभेचेनिगे माये ॥७॥
प्रणवाचा मरिगळा पूजनासि आला भाळा ।
तुर्येसहित त्रिपुंड्र टिळा अर्ध ऊर्ध्व मात्रीं ॥
अभिनव महाकारणी । पवनपंचकाचीं खेवणीं ।
कुंडलें पेरावणी कर्णी ढाळ देतीगे माये ॥८॥
माथां मोर पिसावेठी गंडस्थळीं पडे दीप्ति ।
स्वयें विस्मित श्रीपती तेज:पुंजगे माये ॥
तरुघोंस खोंविले शिरीं वेणु ठेऊनि अधरीं ।
नंदरायाचा खिल्लारी वोज काय सांगोंगे माये ॥९॥
सप्तरंध्रीं सप्तस्वर चाळी अंगोळिया मनोहर ।
मुद्रिका शोभती साकार रत्नजडितगे माये ॥
तिया वेणुचिया किळा । गोपि वेधल्या सकळा ।
अवघिया जाल्या पै काळ्या कृष्णरुपेंगे माये ॥१०॥
ऐसा नटनाट्य वेषधारी सवे संवगडे वारिधारी ।
कैसा त्रिभंग कुसुरी उभा असेगे माये ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सुखाचें निधान तें म्यां
ह्रदयीं संपूर्ण सांठविलेंगे माये ॥११॥

अर्थ:-

गोकुळात ते कृष्णकमळ उगवले.त्यामुळे श्रीधराचे ध्यान लागले.यमुनातिरी ती सावळी मूर्ती पाहिली.तिने चिदाकाश भरुन टाकले ती माझी प्रेमातूनच झाली. माझ्या आवडीची आवड खांद्यावर घोंगडी व बुंथी घेऊन कल्पवृक्षाखाली तिन ठिकाणी वाकडे उभे आहे. तो माये मुळे दिडका झाला नसुन तो स्वतःच तसा उभा आहे. अंगठ्यावर अंगठा ठेऊन त्या पायी त्याने मुळपीठ स्थापले आहे. त्याच्या बोटा प्रमाणे नभाने निळाई पांघरली आहे. एक पाय दुसऱ्यावर ठेवला की एका पायाने विश्व व्यापले.असा तो तेजःपुंज केशर रुपात उभा आहे. त्याच्या चरणकमलांचा पावलांचा कुंकुम रंग सर्वत्र व्यापला आहे. त्या चरणकमळावर ती लक्ष्मी स्थिरावली म्हणुन तिची त्यांच्या बरोबर ऐक्यता झाली. त्याच्या चरणावर ध्वज वज्रादी व रेखा ह्या शुभ खुणा आहेत. त्याची नख सरळ आहेत. व त्याच्या चरणावर अमृत आहे. त्याच्या सुनिळ वर्णासमोर आकाश फिके आहे. पोटऱ्या व मांड्याच्या प्रकाशदिप्ती पसरल्या आहेत. रत्नजडित मेखळे सह मध्ये खोचलेला सोनसळा नेसला आहे व त्यामुळे तो शोभुन दिसत आहे. तो जणु दुसरा कमळात जन्मलेला ब्रह्मदेवच दिसतो. त्याच्या रोमावरील सुंदर काळा केशसंभार आहे. व त्याने आपले डोक्याचे केस तिन बाजुनी मागे वळवले आहेत. त्याच्या उन्नत छातीवर भृगुच्या पावलांचे ठसे आहेत. व ते सावळे वक्षस्थळ शोभुन दिसत आहेत.


८२
भक्तिचिया चाडा गोकुळाशीं आला ।
त्याशी गौळणी म्हणती वाल्हा दुल्हागे माये ॥
आवडीच्या सुरवाडे परब्रह्म सुरवाडे ।
त्याशी गौळणी खेळविती लाडे कोडेंगे माये ॥१॥
गोजरिया कान्हो अपछंद मत्ता पाउली रंगे रंगनाथ ।
दृष्टीचिया डोळां सुख निवडेना मागुतें ते वाचा
वर्णावी केंवि आतां रया ॥ध्रु॥
अठुले लोळिया ढाळ देती कानीं मुक्तें खेवणी हरि श्रवणीं ॥
अंतरिचिया सुखा प्रगट दाविती देखा ।
ललाटीं झळकती रेखा रत्न जडित पत्रें माथांगे माये ॥२॥
युगबंदु दिधला तैसा दोंदिलु मिरवला ।
नाभिकमळीं प्रकाश जाला परमेष्टी ॥
कटितटीं कडदोरा साजे त्या सुंदरा ।
वेगु तरु नेपुरां वेदु मानसीं वसेगे माये ॥३॥
श्रुतिचेनि समागमें पाउलें गोजिरीं ।
घागुरली प्रेम नेपुरें कैसी वोप देती ॥
अंदु वाकी वाळे पाय करी बेंबिले ।
मुनिजनांचे सुखसोहळे पुरवितसे गे माये ॥४॥
ऐसा अपुलिये लीळे आपणासींच खेळे ।
गौळणी भरुनियां डोळे कैशा पाहाताती ॥
अवघें कृष्णरुप भरलेंसे मानसीं ।
बापरखुमादेविवरेंसी मिळोनि गेल्यागे माये ॥५॥

अर्थ:-

भक्तांसाठी तो गोकुळाला आला त्याला गौळणी लाडाकोडाने रक्षकर्ता ‘वाल्हा दुल्हा’ म्हणतात. ते सुखरुप परमात्मतत्व आवडीने कृष्णरुप घेऊन आले त्याला गौळणी लडिवाळपणे खेळवतात. गोजिरा कान्हा म्हणुन त्याला संबोधतात.त्या रंगनाथाच्या पाऊलात रंगुन जातात.असे दृष्टीला त्या पेक्षा जास्त सुख नाही असे त्याचे वर्णन वाचा कशी करेल. अठुळे लोळिया सारखी कर्णभुषणे कांनात घातली आहेत. ते त्यांच्या अंतरीचे सुख प्रगट करुन दाखवतात. कपाळावर गंधरेखा झळकते व माथ्यावर रत्नजडित पिंपळपान डोक्यावर शोभते. कंबरपट्यामुळे कमरेला शोभा आली आहे. तसाच करगोटा ही शोभतो. नाभीकमळात ब्रह्मतेज आहे. अशा कृष्णरुपाचे निंबलोण उतरवावे अशी आस मनाला लागली आहे. पायातील घागुऱ्या व नुपुरांचे आवाज श्रुतीसारखे आहेत. अंदु वाकी सारखे दागिने त्यांने घातले आहेत. वाकडे पाय टाकत चालत आहे. व त्या मुनीजांचे सुखसोहळे तो पुरवीत आहे. अशा लीला करुन तो आपणाशीच खेळताना पाहुन त्या गोपींचे डोळे भरुन आले आहेत. अशा त्या कृष्णरुपाला गौवळणी डोळे भरुन पाहतात. माझे पिता व रखुमाईचे पती यांच्याशी त्या मिळुन गेल्या आहेत असे माऊली सांगतात.


८३
योगिया मुनिजना ध्यानीं । तें सुख आसनीं शयनीं ॥१॥
हरिसुख फ़ावलें रे ॥ध्रु०॥
गोकुळींच्या गौळिया । गोपि गोधना सकळा ॥२॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें । तें सुख संवगडिया दिधलें ॥३॥

अर्थ:-

योगी व मुनीजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी, गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात.


८४
पावया लुब्ध जाल्या पाबळा । गाई परे बळारे कान्हो ॥१॥
विसरल्या चार विसरल्या पार ।
तल्लीन साचार कृष्णमूर्तिं ॥ध्रु०॥
पाणिया निघाल्या गाई चरती कळंबा ठाई ।
हाकितसे लवलाही सवंगडा ॥२॥
ज्ञानदेवी गाई हाकितु पारे सोई । हरिनाम दोही सत्राविये ॥३॥

अर्थ:-

कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गाई मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गाई कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गाईंना सवंगडी हाकारत होते.हरिनामाच्या गाई हाकल्याने त्या सवंगड्यांना सतरावी जीवन कळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात.


८५
गायी चालिल्या वनाप्रती । सवें पेंधा चाले सांगाती ॥१॥
वळि गोवळिया कान्होबा ।
यमुने पाण्या नेई तूं बा ॥ध्रु०॥
पावया छंदे परतल्या गाई ।
विसरल्या चारा तल्लीन ठायीं ॥२॥
ज्ञानदेव सवें सवंगडा लाठा । गाई हांकितो गोठणा तटा ॥३॥

अर्थ:-

गाई वनामघ्ये नेत असताना कृष्णासवे पेंदया चालला तेव्हा पेंदया म्हणाला हे कान्हा यांना तू यमुनेच्या तीरावर पाणी प्यायला ने तेव्हा कृष्णाने पावा वाजवायला सुरवात केली व त्या गाई चारा खायला विसरल्या व तल्लीन झाल्या. मी त्या सर्व संवगड्यांपैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यत नेण्याचे काम करतो असे माऊली सांगतात.


८६
माथें टेंकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥ध्रु०॥
एक म्हणती आम्हीं उचलिला पर्वत ।
बहुत मिळोनि काय नव्हतीरे ॥१॥
बाहे कडाडित मनगटें लचकत ।
म्हणोनि उठिले अवघेरे ॥२॥
तयामाजिं असतां न दिसे बाप ॥
समर्थ थोर तुझी मावरे ॥३॥
काळु आतुडे परि वेळु नातुडे ।
म्हणौनि रक्षिलें सकळारे ॥४॥
बाप रखुमादेविवर विठ्ठल साचा ।
म्हणोनि रक्षिलें आम्हारे ॥५॥

अर्थ:-

गोवर्धन पर्वत आम्ही डोक्याचा व हाताचा आधार देत उचलला असे त्या भगवंताचे सामर्य्थ लक्षात न घेता ते बोलू लागले. आम्ही सर्वांनी तो उचलला असे म्हटले तर काय झाले या गडबडीत काहीचे दंड मोडले मनगट लचकले हे पाहून काहीजण उठलेच नाहीत. तरी तो पर्वत देवाने एका करंगळीवर उचलला हे कोणाच्या लक्षातच आले नाही. काळच आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून सर्वांचे रक्षण झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांनी आमचे रक्षण केले असे माऊली सांगतात.


८७
कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें दिसते सुनीळ तेजगे मज ।
पाहातां वेणु वेदध्वनि नाद उमटताती सहजगे बाई ये ॥१॥
आनंदे गोपाळ गोधनें राखसी तळे यमुनेच्या पाबळीं ।
कर्मकाठी करीं घेउनियां वळत्या देतुसे पांचचा मेळिगे बाइये ॥ध्रु०॥
ऐसा जिकडे तिकडे उभारुनि बाहो ।
हाणतो थोरें निकोपें तयाचिया कर्मा होतिसे निवृत्ति ।
काय पुर्विल येवढें तपगे बाइये ॥२॥
गोवळेपणाचेनि वेषें अमरीं सेविजे बोलताति सवंगडे ।
येरुनि येराचिया उच्छिष्ठा झोंबती नेणो
तया काय जोडेगे बाइये ॥३॥
मुनिजनां स्तवितां संतोष
न पवे तो हुमलि घेतां हांसे ।
ब्रह्मादिकां बोलाचीं अक्षरें कोण
जाणे प्रेम कैसेंगे बाइये ॥४॥
ऐसा साहिदर्शनां वर्णितां पवाडु नाहीं
आणि गोवळेपणें वेष नवल सांगो मी कायी ।
बापरखुमादेविवर विठ्ठल सेविलिया ।
वांचूनि नेणवे केलिया कांहीगे बाइये ॥५॥

अर्थ:-

कल्पवृक्ष तळी तेजःपुंज सुनीळ कृष्णरूप कसे बसले आहे ते पहा. हे जीवरुप सखे त्यानी वाजवलेल्या वेणूतून वेद ध्वनींचे नाद उमटतात असे मला वाटते. युमनातिरी ते गोपाळ आनंदाने ती गोधने राखत आहेत.इंद्रिय रुप गाईना कर्माची काठी लाऊन तो पंचकांच्या ठिकाणी त्यांचा मेळ करतो. बाहे उभी करुन इकडे तिकडे तो कृष्ण जीवरुप गायींना कृतकोपाने कर्मकाठीने मारत अ़सुन त्यांच्या पुर्व कर्मांची निवृती करित आहे तसे व्हायला त्यांचे काय पुर्वजन्मीचे तप पुरणार आहे? स्वर्गीचे अमर गोपवेश घेऊन त्याचे उष्टे खायला मिळावे म्हणुन तिकडे गोकुळात आले आहेत परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही.मुनिजनांनी केलेल स्तवनाने तो संतोष पावत नाही उलट संवगड्यांनी त्याच्याशी केलेली हमरीतुमरी मुळे तो आनंदात हसतो. ब्रह्मादिकांचे बोलांच्या अक्षरात प्रेम आहे असे तो जाणत नाही. असे ज्याचे वर्णन करायला साही शास्त्र धजावत नाहीत. तो गोवळ्या वेशातील कृष्ण त्याचे नवल मी काय सांगु. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे सेवा केल्याशिवाय इतर सांधनानी जाणता येत नाही असे माऊली सांगतात.


८८
नागोठणीं गोपाळ वळतिया देतो कीं
आनंदली गोधनें ऐकोनि वेणुध्वनी तत्त्वता ।
तुझी सांवळी सुंदर बुंथी विसंबे क्षणभरी
तोचि सुखीं सुख पाहतां निजचित्तारया ॥१॥
आनंदल्या मनें पहा तूं निधान ।
जवळिल्या निजध्यानें सांडूं नको ॥ध्रु०॥
म्हणोनि कल्पनेचा उबारा मन
संधीचा संसधु भागु अनुसराया गोठणींचया ।
दुर्लभ शक्ति ते गोपवेषें नटलें चैतन्य मांदूसे
तें परादिकां नव्हे निजशक्तिरया ॥२॥
म्हणोनि रखुमादेविवरु सदसुखाची निजबोल पाहें
मीतूंपणा नातळे तो ऐसीयाचि बुध्दी सखोल ।
निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळ निज चैतन्य पाहे निखळरया ॥३॥

अर्थ:-

यमुनेच्या तीरी बसल्या बसल्या इतर गोपाळांना गाई वळायला सांगतो.तुझी सावळी सुंदर मूर्ती व तू काढलेला मधुर ध्वनी यामुळे माझे चित्त सुखरुप झाले असून ते क्षणभर दुसरीकडे जात नाही. हे आनंद झालेल्या मना त्या सुखनिधानाला तू पाहा व हे निजात्म धन कधीच सोडू नकोस. कल्पनारुपी मन व परमात्म स्वरुप यांची एक होण्याची संधी साधून घे. त्या परमात्म्याची शक्ती दुर्लभ आहे ते चैतन्य गोपवेष धारण करुन आले आहे त्याचे वर्णन चारही वाणींना त्याचे वर्णन करता येत नाही अशी त्याची शक्ती आहे. असा हा निजसुखाची वेल असलेला मी तू पण नसलेला असा त्या रखुमाईचा पती,असा त्याची खूण निवृत्ती रायांनी सर्वांना दाखवली ते निज चैतन्य तुम्ही सर्वांनी पहा असे माऊली सांगतात.


८९
हरि प्रेम सरोवरीं । क्रीडाति ये मदन कुहरीं ।
प्रेम सरोवरींये ॥१॥
चांदिणें निर्मळ । चंदनें धवळतिये ।
पैल वृदांवनीं वासुगा गोविंदु खेळतिये ॥ध्रु०॥
प्रकृति भक्ति परमातुमातुपरमहंसु ।
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिदासु ॥२॥

अर्थ:-

श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटुन त्या त्याच्या जलक्रीडा करत आहेत. त्यावेळी कृष्णप्रेमाचे लख्ख टिपुर चांदणे पडले आहे. व अंगाला प्रेमाचे चंदनी उटणे लावले आहे अशा थाटात तुळशी वृदांवनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका क्रिडा करतात. तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोहचलेल्या निवृतीदास माऊलीनी सांगितला आहे.


९०
गोंवळेपणाची बुंथी घेउनिया भेष ।
रिझविशी मानस यशोदेचें ॥१॥
त्या सुखें ब्रह्मांड थोडेंपा तियेशी ।
दुग्ध पैं मागशी बाळपणें ॥ध्रु०॥
ऐसे मोहिलें पैं जगभक्तअंतरंग ।
भावाचे सुरंग प्रेमबोधें ॥२॥
मज मानसीं सुख तुझ्या रुपीं वोलावा ।
सर्व इंद्रियीं दोहावा तुझ्या नामीं ॥३॥
जन हे विव्हळ तुजविण अविचार ।
गुंफ़ले साचार माया मोहें ॥४॥
आतां ऐसें करी तुज मज सरोवरी ।
प्रपंच केसरी होई रया ॥५॥
बाप रखुमादेविवरु सोपारा पैं निळा ।
निवृत्तींनी कळा सांगीतली ॥६॥

अर्थ:-

गोवळेपणाचा वेश घेऊन तो कृष्ण यशोदेचे मन रिझवीत आहे. त्या सुखाने तिला ब्रम्हांड थोकडे वाटते आहे व त्यात तो तिला दुध पिण्यास मागत आहे.अशा पध्दतीच्या प्रेमभावाने त्यांने भक्तांचे अंतरंग व्यापुन टाकले आहेत. हाच माझ्या ही मनाचा ओलावा आहे मला वाटते माझ्या इंद्रियांनी तुझ्या नामाचे दोहन करावे. अविचाराने वागणारे लोक संसारात गुरफटले आहेत. आता देवा तुझे माझे एकपण होऊ दे व तु सिंह होऊन माझा प्रपंच नष्ट कर. माझे निलवर्ण पिता व रखुमाईचे पती ह्यांना प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग मला निवृत्तीने सांगितला आहे. असे माऊली सांगतात.


९१
लक्ष लागुनि अंतरी । कृष्णा पाहती नरनारी ।
लावण्यसागरु हरि । परमानंदु ॥१॥
छंदें छंदें वेणु वाजे । त्रिभुवनीं घनु गाजे ।
उतावेळ मनें माझें । भेटावया ॥ध्रु०॥
ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखतो गोंवळा ।
श्रुति नेणवे ते लिळा । वेदां सनकादिकां ॥२॥
भूतग्रामीचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु ।
आड धरुनि गोपवेषु । वत्सें राखे ॥३॥
रासक्रीडा वृंदावनीं खेळे । इंदुवदन मेळे ।
उध्दरी यदुकुळें कुळदीपकें ॥४॥
निवृत्ति दासाचा दातारु । बापरखुमादेवीवरु ।
भक्तां देतो अभयकरु । क्षणक्षणांमाजि ॥५॥

अर्थ:-

परमानंद व लावण्याचा सागर असलेल्या कृष्णाकडे नरनारी अंतरातुन लक्ष देऊन पाहतात. त्याच्या सुमधुर वेणुवादनाने संपुर्ण त्रिभुवन कोंदाटुन गेले आहे व त्या मुळे त्याला भैटायला मी उताविळ आहे. जो ब्रह्मविद्येचा पुतळा आहे तो गाई राखत आहे हि लीला वेद व श्रुतीना ही कळत नाही. जो ह्या जगताचा राजा आहे जो सर्व प्रकारचे तापाचे हरण करतो तो गोपवेश करुन गोधन राखत आहे. यदुकुळातील त्या यादवाने आपल्या मुखकमलाने मोहित करुन त्या गोपाना रासक्रीडा करायला लावली व त्यांचा उध्दार केला. माझे पिता व रखुमाईपती व माझे गुरु निवृतीनाथ असे दाता आहेत की क्षणात आपल्या भक्तांना अभय देतात असे माऊली सांगतात.


९२
गुणें सकुमार सावळें दोंदील पहापा
निराळें केवी वोळलेंगे माये ।
सुखें चैतन्याची बुंथी वोतली
ब्रह्मादिकां न कळे ज्याची थोरीव ।
तो हा गोवळियाच्या छंदे क्रीडतु
साजणी नवल विंदान न कळें माव रया ॥१॥
डोळे बैसलें ह्रदयीं स्थिरावलें
मन नुठी तेथून कांही केल्या ॥ध्रु०॥
सच्चिदानंद पदीं पदातें निर्भेदीं
निजसुखाचे आनंदी माये क्रीडतुसे ।
तो हा डोळिया भीतरीं बाहिजु अभ्यंतरी
जोडे हा उपावो किजो रया ॥२॥
गुणाचें पैं निर्गुण गंभीर सदसुखाचे
उध्दार जें प्रकाशक थोर सकळ योगाचें ।
आनंदोनी पाहे पां साचें मनीं
मनचि मुरोनि राहे तैसें
बापरखुमादेविवरा विठ्ठले कीं मुसेमाजि
अळंकार मुराले श्रीगुरुनिवृत्तीनें दाविलें सुखरया ॥३॥


९३
परब्रह्म सांवळे गोपवेशें निरालें ।
ह्रदलकमळीं स्थिरावलें काय सांगो ॥
कायावाचामनें पाहे जों पाहणें ।
तव नवलाव होये निर्गुणरया ॥१॥
नामरुपीं गोडी हेचि आवडी आतां ।
न विसंबे सर्वथा तुजलागी ॥ध्रु०॥
जगडवाळ जाण कारे याचें ॥
तुझीचि बुंथी तुजचि न कळे याचें चोज ।
केंवीं वर्णिसी सहज गुणे रया ॥२॥
म्हणोनि दृष्टि चोरुनि पडे मिठी ।
मन चोरुनिया पुढतापुढती तुजचिमाजि ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला ॥
उदारा येणेचिं नाहीं त्रिशुध्दि ।
येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनिया ।
सकळगुणीं गुणातीत तुटली आधी रया ॥३॥

अर्थ:-

काय सांगु ते गोपवेशातील सावळे परब्रह्म माझ्या हृदयकमळात स्थिरावले आहे. काया वाचा मनाने त्याला पहायला गेले तर नवल झाले ते निर्गुण असल्याचे जाणवले. त्यामुळे फक्त तुझ्या नाम व रुपाची गोडी धरुन फक्त तुझ्यावर, इतर ठिकाणी न जाता विसंबलो आहे. ह्या जगडंबर प्रपंचाचे तुला भान नाही आवड नाही तरी तो तु भोगत असतोस हे समजत नाही. हे सगुणरुप ओढुन घेतलेले रुप तुलाच कळत नाही.त्याचे वर्णन कसे करायचे हे सुचत नाही. त्या करिता सगुणच्या साहय्याने तुझे निर्गुण स्वरुप जाणावयास वाटत आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे उदार आहेत.त्यांच्या पाशी त्रिशुध्दी असुन सर्व गुण असुन गुणातीत ही तेच आहेत अशी खुण निवृत्तीनाथांनी दाखवली माझी चिंता तोडली असे माऊली सांगतात.


९४
मदनमूर्ति तूं डोळ्या आसुमाय जालासी ।
सेखीं कामिनिचेनि पक्षें तीं पुराणें
पिशाच करिती रया ॥१॥
गोजिरिया गुण निधाना ।
बापा गुंतल्यापणाचिया साठी ॥
वेदविदेही विचारितां तेथें ।
आगम काढिती आटिरया ॥ध्रु०॥
सायुज्यता जालीय मग सादृश्यपण तेथें लोपे ।
अवयव अळंकार मुरालिया तेथें
दृष्टि परमार्थ थोपे रया ॥२॥
तत्त्वपणाचेनि समरसें तेथें पुरोनि उरे तें शेष ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलीं गगनीं
नक्षत्र पडे नुरेचि तेथें रेख रया ॥३॥

अर्थ:-

हे श्रीकष्णा तुम्ही प्रत्यक्ष मदनच आहात.ते डोळ्याची तृप्ती न करणारे रुप आहे त्याला उपमा देण्सास सुंदर स्त्रीचे रुपक वेदांनी वापरले तरी ते वेडे ठरले. ह्या गोजिऱ्या रुपावर गोपी मोहित झाल्या व विदेहाला पोहचल्या त्याचा विचार करणे वेदांनाही जमले नाही. अशारितीने गोपी व त्याची सायुज्यता झाली.तेथे दृष्यपण संपले जसे सोने अलंकारात लुप्त झाले.तेथे फक्त परमार्थ राहिला. जसे तत्वपणाचे सामरस्य होते तेथे सगळे जाऊन तो एकटा उरतो. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, हे सर्व नक्षत्र तारांगणात लोप पाऊन एकटे उरतात असे माऊली सांगतात.


९५
सांगाति आमुचियारे । विद्वद पावया छंदेरे ॥१॥
नाचे विनोदें कान्हारे ॥
विद्वद पावया छंदेरें ॥ध्रु०॥
निवृत्तिदासा प्रियोरे ।
विद्वद पावया छंदेरे ॥२॥

अर्थ:-

हा श्रीकृष्ण आमचा सोबती असून त्याच्या मुरलीच्या छंदाने आम्ही आनंदीत होतो.आमच्या भक्तिच्या प्रेमाने हा श्रीहरि आनंदाने नाचत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीदासाला प्रिय असणारा हा श्रीकृष्ण, पावा वाजवून त्याच्या नादांत बेहोष होऊन नाचतो. असे माऊली सांगतात.


९६
वृंदावनीं आनंदुरे । विठ्ठलदेवो आळवितिरे ॥१॥
गोपाळ रतलेरे । विठ्ठलदेवो आळवितिरे ॥२॥
निवृत्ति दासा प्रियोरे ।
विठ्ठल देवो आळवितिरे ॥३॥

अर्थ:-

त्या विठ्ठलदेवाला आळवल्यामुळे वृंदावनाला आनंद झाला. ते गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदांने आळवित आहेत. निवृत्तीदास मी, हे सर्व भक्तांचे त्या विठ्ठलाला आळवणे पाहुन आनंदित झालो आहे असे माऊली सांगतात.


९७
काळिये रात्रींचा चंद्रमा कीं
सांवळी बुंथी आम्हां ।
काळिये वेळीं ते सीमा नवलावो ।
सुनीळ काळिये भरु मेघ: शाम सांवरु ।
तोचि नवलाहो हा धीरुरया ॥१॥
आतां काळिये दिनु मज न स्मरेवो काहीं ।
तुझें तुज पाही गा‍र्‍हाणें रया ॥ध्रु०॥
म्हणोनि यमुना कांलिदीजळ सांवळें ।
योगिया शून्यातीत तटीं मिळे सुखिया ।
सुखाचेनि कल्लोळें देखतसे ॥२॥
दिठि सांबळ भरु खुंतलासे मज ।
नाठवे द्वैत काज रया ॥३॥
येणें सुखें चैतन्य डोळ्या होकां
मिळणी कीं नेत्रीं नेत्रे उन्मळणीं तटस्थपणें ।
हा सर्वांग अंग प्रत्यांगा होउनियां
जेथ विचारती मुनिजनांचीं मनें ।
तो हा रखुमादेविवरु पाहतां दिठीं आतां
पुनरपि नाहें येणें रया ॥४॥

अर्थ:-

काळ्या रात्रीचा चंद्र जणु अंगावर काळी ओढणी घेतल्या सारखा सोंग करुन तो कृष्ण त्याचे शुध्द रुप सिमीत करतो हे नवल आहे. मेघा सारखे काळेपण कसे सावरु ते सुनिळत्व व काऴेपण वेगळे कसे करु हा नवलाव आहे. आता धिटाईने तुला पाहता मला दुसरे काही स्मरत नाही.तेंव्हा तुझे गाऱ्हाणे कसे घालु. तुझ्यामुळे यमुनेचे पाणी ही काळे झाले आहे. योगी तुझ्यामुळे परमसुखाचे सुख शुन्यात जाऊन साधत असतात. व त्या मुळे आनंदुन त्या काळेपणात कल्लोळ करतात.व त्या काळेपणात मी ही द्वैत हरवुन बसले आहे. असे हे चैतन्यसुख माझ्या डोळ्यांच्या दृष्टीला लाभले. व हे नेत्र उन्मनी लागले जगापासुन तटस्थता प्राप्त झाली व तो व मी येवढेच जाणवले. हा सर्वांगाचा प्रत्यय पाहुन मुनींची मने त्याच्या स्वरुपात मिळाली. हा तोच रखुमाईचा पती पाहुन परत येणे जाणे घडणार नाही असे माऊली सांगतात.


९८
भोंवरी सांडुनि पाव ठेविरे गोपाळा ।
नाच चिदानंदा सुख होईल सकळां ॥१॥
रंगु रंगलारे रंगु रंगलारे ।
आदि मध्य अंत त्रिगुणविरहित
विश्वीं प्रकाशलारे ॥ध्रु०॥
रंगु रंगला सुरंग जाला ।
पहिलीये रंगी निवृत्ति भला ॥२॥
सुखीं सुख मुरे प्रेमें चिदानंद उरे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे ॥३॥

अर्थ:-

हे गोपाळा तुला त्रास होणार नाही. अशा रितीने पाऊल टाकुन नाच तसा नाचलास म्हणजे. आम्हा सगळ्यांना चिदानंद सुख होईल.तुझ्या नाचण्यांत रंग आला म्हणजेच आम्हास फार आनंद आहे तुझा आनंद त्रिगुणातीत विश्वव्यापक प्रकाशमान, आदि मध्य रहित असा आहे. तो तुझ्या नाचण्याने आम्हाला मिळेल. विषयसुखापासून वृत्ति परत फिरुन तुझ्या रंगात रंगली म्हणजे तुझा आनंद त्या वृत्तिला मिळतो ती आनंदमय वृत्तिही मुरली म्हणजे. स्वरुपभूत चिदानंद शिल्लक राहतो. तोच रखुमादेवीवर बाप श्रीविठ्ठल आहे. असे माऊली सांगतात.


९९
तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥
कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥
हालकारे कृष्णा डोलकारे ॥
घडिये घडिये गुज बोलकारे ॥ध्रु०॥
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥२॥

अर्थ:-

तुझ्या कपाळी कोटी चंद्राचा प्रकाश आहे. हे कमलनयना तु आम्हाला तुझे हास्य दाखव. हे कृष्णा तु जरा हाल व डोल व घडीभर तरी आमच्या बरोबर हित(आमचे) -गुज( तुझे ज्ञान) कर. माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल उभे राहुन कशा बाह्य हालवतात ते पहा.


१००
कोंवळें ठुसठुसित मोतियांचे घड ।
शृंगारिलें गूढ जया लेणीं ॥१॥
बैसोनियां रथीं सुरनर खेळती देखोनिया
पशुपति वेडावले ॥ध्रु०॥
युक्ति खुंटली वासना निमाली ।
कळां पैं बैसली पद्मासनीं ॥२॥
होय कीं नव्हे ज्ञानदेव पुसती ।
आठवितां निवृत्ति भेटी होये ॥३॥

अर्थ:-

त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय वर्णावे, त्या परमात्म्याचे अंग म्हणजे कोवळ्या ठुसठुसीत म्हणजे पाणिदार व मनाला वेध लावण्यासारखे मोत्यांचा शृंगारा घडविल्या सारखे आहे.असा तो सुरनर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून क्रीडा करीत आहे. ते त्याचे ऐश्वर्य पाहून साक्षात शंकरही वेडावून गेले आहेत. त्याकडे पाहाताच त्याच्या प्राप्तीची युक्ती काय ह कळेनासे होऊन ती प्राप्त करुन घेण्याची वासनाच नाहीसी झाली. सर्व कला पद्मासन घालून त्या कृष्ण स्वरुपांत बसल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीरायांना विचारतात ज्याच्या दर्शनाने भगवान शंकर वेडे झाले तोच हा श्रीकृष्ण परमात्मा ना? निवृत्तीरुप जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट झाली. म्हणजे दर्शन झाले असे माऊली सांगतात.


१०१
पावया छंदे तल्लीन गोविंदें ।
नाचती आनंदे गोपाळ कैसे ॥१॥
यमुनेच्या तीरीं गाई चारी हरी ।
गोपाळ गजरीं आनंदले ॥ध्रु०॥
ठायीं ठायीं मातु पेंधा पैं नाचतु ।
वाकुल्या दावितु हरी छंदें ॥२॥
ठाई ठाती उभ्या विसरल्या माया ।
हाकितु लवलाह्या कृष्णहरी ॥३॥
ज्ञानदेवाजिवीं कृष्णचिरंजिवी ।
गोपाळ रंजवी प्रेमभक्तां ॥४॥

अर्थ:–

पावा वाजवताना कृष्णाला पाहुन ते गोपाळ तल्लीन होऊन आनंदाने नाचायला लागले. स्वतः तो हरि यमुना तीरी गायी चारताना पाहुन ते गोपाळ त्याच्या नामाचा गजर करु लागले. त्या आनंदात ते सर्व गोपाळ नाचत असताना तो पेंद्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. व हे पाहुन चरताना ठिकठिकाणी उभ्या गोमातांना तो हरि घाईने वळु लागला आहे. माझ्यासाठी चिंरजिंव असलेला तो परमात्मा त्या गोपाळांना प्रेम भक्तीने रंजवीत आहे असे माऊली सांगतात.


पाळणा – अभंग १०२ ते १२२

१०२
आकारेंवीण पाळणा पहुडलें ।
निराकार म्हणोनि वोसणाईलें ॥१॥
जो जो जो जो बाळा निराकार पाळणा ।
व्योमीं व्योमाकारीं झोंप घेई ॥ध्रु०॥
चौदा नि:शब्दीं जागृत केलें ।
येकविसी हालवूनि बाळ उठविलें ॥२॥
बाप रखुमादेविवरु निजीं निजविलें ।
कांहीं नव्हे ऐसें कांहीं ना केलें ॥३॥

अर्थ:-

निराकारस्वरूप परमात्मा हाच कोणी एक पाळणा त्यामध्ये जीवरूपी बालक निजविले. त्याला आत्मविस्मृतीची झोप लागली. व ते ‘हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझे हेना ॥ज्ञा. ॥अशा त-हेचे बरळु लागला. अशा वेळी श्रीगुरूरूपी माऊली तेथे येऊन पाळणा हालवून जो जो म्हणजे जागा हो, जागा हो असे म्हणून झोके देऊ लागले.आणि त्या गाण्यांमध्ये चिदाकाशरूपी पाळण्यांत चिदाकाशरूप होऊन झोप घे.त्या एकवीस तत्त्वांत गुरफडून निजलेल्या बालकाला चौदा विद्यारूपी शब्दांनी हालवून आत्मस्वरूपा विषयी जागे केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी आपल्या स्वरूपांच्या ठिकाणी त्याला स्वस्वरूप केले. वास्तविक झोपेमध्ये जसे जीवाला दुसरे काही कळत नाही. त्याप्रमाणे पंढरीरायांनी त्या जीवरूपी बालकाला आपल्या स्वरूपाशिवाय इतर कशाचेही भान राहू दिले नाही. असे माऊली सांगतात.


१०३
पाळण्याची परी सांगेन आतां ।
पाळण्या तान्हुलें बोंभाते देहेविणेम ताता ॥१॥
तेथें जनुक नव्हे जननी नव्हे ।
बाळक नवे होये मासे विण ॥ध्रु०॥
तेथें तेल सारुनि अभ्यंग केलें ।
बाळक पुसिलें अंबरवर्णे ॥२॥
बापरखुमादेविवरु अनुभवित जाले ।
ते निजरुप पावले परब्रह्मीं ॥३॥

अर्थ:-

आतां तुम्हाला पाळण्याचा प्रकार सांगतो त्या परमात्मरूपी पाळण्यांत ‘सान्हुलें’ म्हणजे परिछिनभाव घेतलेला जीव वास्तविक आत्मदृष्टीने त्याच्या ठिकाणी देहादिकांचा संबंध नसतांना उगीच ओरडतो. वास्तविक आत्मस्वरूपाला बाप नाही, आई नाही, व बालकपणाही नाही. अशा आल्याची सिद्धि माझेपणा नसेल तर होते. अशा स्वरूपाच्या बालकाला आत्मरूप प्रतितीचे तेल लाऊन वैराग्याचे स्नान घातले. आणि विचारांच्या सुंदर वस्त्रानी पुसिले. तेंव्हा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचा अनुभव घेते झाले. व त्यामुळे ते बाळ परमात्मरूपाला प्राप्त झाले.असे माऊली सांगतात.


१०४
अठरा दिगांतीहुनि पाळणा आणिला ।
तेथें एक निर्गुण बाळ पहुडला ॥१॥
बाळापें हें नाहीं बाळापें हें नाहीं ।
अंगुष्ठ पेउनि घेई निरालंब ॥ध्रु०॥
निरालंबीं स्वाद आळवी ब्रह्मीं ।
तेथें एकु बाळ बोभाये निरंजनीं ॥२॥
बाप रखुमादेविवरु अनादि अंतीं ।
त्याहुनि परती मज गति केली ॥३॥

अर्थ:-

अठरा दिगंती म्हणजे, अठरा पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला. आणि त्यांत निर्गुण बाळ परमात्मा निजले. बाळाजवळ कोणी एक नाही. ‘अंगुष्टमात्र’ म्हणजे स्वरूपानंद घेऊन निरालंब स्थितित निजले आहे. ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या स्वरूपांशिवाय आरंभी किंवा अंती मला दुसरी गती नाही. असे माऊली सांगतात.


१०५
पांच पाट्या नव खिडकिया पाळणा पहुडया निरंजनीं ॥१॥
एकवीस सहस्त्र श्वास हुंकार घाली ॥
माया ते मारिली ज्ञानरुपी ॥ध्रु०॥
तेथें निरंजन नाहीं काहींचि नाहीं ।
तेथें नि:शब्द उठती पाहीं ॥२॥
बापरखुमादेविवरु बाळका घेऊनि मेला ।
मरोनियां जाला जितपणेंगे माये ॥३॥

अर्थ:-

ज्या स्थूलदेहामध्ये पांच कोश म्हणा किंवा पंचप्राण म्हणा व नऊ खिडक्या नऊ द्वारे, अशा पाळण्यांत परमात्मा आत्मरूपाने निजला आहे. आणखी एकवीस हजार श्वासोश्वास हे हुंकार घालीत आहेत. आणि ज्या आपल्या ज्ञानस्वरूपाने मायेचा नाश केला. त्या ज्ञानस्वरूपांच्या ठिकाणी कोणताच आत्मभाव नाही इतकेच नाही तर निरंजन परमात्मरूपाचाही भाव नाही. त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी निःशब्दरूपी शब्द उत्पन्न होतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते या बालकाला घेऊन म्हणजे अनात्मभावाने मारून आत्मभावाने जिवंत राहिला. असे माऊली सांगतात.


१०६
शून्य नाहीं निरशून्य नाहीं ॥
तेथें पाळणा पाही लावियेला ॥१॥
जातिविण बाळ उपजलें पाही ।
तेथें परिये देते माय तेही नाहीं ॥ध्रु०॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलीं पाळणा नाहीं ॥
तेथें मी बाळ पाही पहुडलों ॥२॥

अर्थ:-

ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया नाही.किंवा निरशून्य म्हणजे मायेचा अभावही नाही. अशा रितीचे जे परमात्मस्वरूप हाच कोणी एक पाळणा परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी आहे. परमात्मस्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यांत निजणारा परमात्मस्वरूपच पाहिजे. म्हणून जातिरहित उत्पन्न झालेले बाळक निजलेले आहे. त्या ठिकाणी त्या पाळण्याला झोके देणारी त्याची मायही कोणी नाही.परमात्मस्वरूपांचा पाळणा हे रूपक असून त्या पाळण्यांत निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षु या रूपकाने आहे.मा झे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी पाळणा नाही. अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बाळक होऊन, म्हणजे मुमुक्षु होऊन पहुडलो असे माऊली सांगतात.


घोंगडी.

१०७
आठवितां नुपुरे मोविता न मोववे ।
सांगतां न सांगवे गुण त्याचे ॥१॥
परतालिया दृष्टि काळा देखिला जगजेठी ।
वेणिभागीं पृष्ठीं कैसा दिसतु असे ॥ध्रु०॥
त्या गुणाच्या संगें कैसें अद्वैत जालें ।
मन म्हणौनि काळेंपण बहु झालें गे माये ॥२॥
पुरेपुरे बुध्दि निमाली वेदवाणी ।
आतां केवीं वर्णू चक्रपाणी बहु काळें गे माये ॥३॥
द्वादश मंडळे वोवाळुनि आलिये ।
तंव तंव काळें देखिलें रुपडें त्याचें ॥४॥
अनुमाना नये अनुमाना ।
परतल्या श्रुति चोजवेना ॥५॥
मनें बुडी दिधली दाही हारपली ।
चोवीस मावळलीं अगाध पंथी ॥६॥
प्रीतीचें पांघरुण काळें घोंगडें ।
रखुमादेविवरें विठ्ठलें मज केलें उघडें ॥७॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपाचे वर्णन काय करावे? चिंतन करता त्या चिंतनांत तो आवरत नाही. त्याचे माप करावयाला गेले तर होत नाही. त्याच्या गुणाचे वर्णन करता येत नाही. त्यामुळे बहिर्मुख असलेली दृष्टि अंतर्मुख करून तो कृष्णवर्णाचा जगजेठी श्रीकृष्ण परमात्मा पाहिला. तो पहा वेणी असलेला, पाठीकडच्या बाजूनी कसा दिसतो तो.त्याच्या गुणांच्या चिंतनानेच कसे अद्वैत प्राप्त होते तें पहा,.त्यामुळे माझे मन आता परमात्मरूप झाले. ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धि आणि वेद लय पावतात अशा चक्रपाणी श्रीकृष्णाचे वर्णन कसे करू? द्वादश मंडले म्हणजे बारासूर्य यांच्या तेजापेक्षा जास्त तेजस्वी असणारे श्रीकृष्णाचे रूपडे मी पाहिले. त्याच्या स्वरूपाची प्राप्ती अनुमानाने होत नाही. कारण साक्षात् श्रुतिनाही तो कळत नाही. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी किती मोठेपणा आहे म्हणून सांगावे. त्याच्या ठिकाणी मनाने बुडी दिली. दहा इंद्रिये हरपली. सांख्याने कल्पना केल्याप्रमाणे चोवीस तत्त्वेही मावळून गेली म्हणजे त्याच्या स्वरूपांत सर्व त्रैलोक्याचा लोप झाला. असा परमात्मा भक्तांच्या संतोषाकरिता काळे वर्णाचे घोंगडे पांघरून घेऊन. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठलानी मला देहभावापासून उघडे केले म्हणजे ब्रह्मरूप केलें.असे माऊली सांगतात.


१०८
रात्री दिवस वाहातसे चिंता ।
केशव धडौता होईन मी ॥१॥
खिरजट घोंगडें फ़ाटकें तें कैसें ।
वेंचिलें तैसें भोगिजगा ॥ध्रु०॥
वित्त नाहीं गाठीं जीवित्वा आटी ।
उघडी पाठी हींव वाजे ॥२॥
घोंगडें देईल तो एक दाता ।
रखुमादेविवरा मागों रे आतां ॥३॥

अर्थ:-

रात्रंदिवस मनांत चिंता वाहतों की सर्वत्र परिपूर्ण जो परमात्मा केशव तोच मी होईन. तसा झालो म्हणजे खिरजट म्हणजे घाणेरडे देहात्मभावाचे फाटके घोंगडे ते कसे राहणार ? त्याचा नाश (बाध) झाला असता त्या केशवरूप धड घोंगड्याचा मी भोग घेईन. उत्तम घोंगडे घेण्यास साधन संपत्ती च नसली तर जीवाला फार कष्ट भोगावे लागतात. कारण चांगले घोंगडे नसल्यामुळे उघडा देहात्मभाव असतो त्यामुळे कष्टरूपी थंडी फार वाजते. याकरता बाह्यप्रवृत्ति टाकून मन मागे फिरले तर ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल मोठे दाता असल्यामुळे ऐक्यभावाचे घोंगडे देईल. असे माऊली सांगतात.


१०९
तुझें घोंगडें येकचि चोख ।
दुजें वोळख अमंगळ ॥१॥
दे धडुत न घोंगडें मोठें ।
खिरपटें जळो देवा ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु उदार जाला ।
धडौता केला ज्ञानदेवो ॥२॥

अर्थ:-

तुझे ऐक्यबोधाचे घोंगडे फार चांगले आहे. त्या ऐक्यबोधाच्या दृष्टिने दुजेपणाचे भान अमंगळ आहे. धडुत म्हणजे ऐक्य बोधाचे हे मोठे घोंगडे आणि माझे देहात्मभावाचे खिरपटे(घाणेरडे)जळून जाऊ दे. अशी विनवणी केल्यामुळे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला धडौता केला म्हणजे परमात्मबोधरूपाने संपन्न केले. असे माऊली सांगतात.


११०
चौर्‍यांशी लक्ष हिंडता हाट ।
पुंजे दाट सांपडलें ॥
हित ये खेपेसी बरवें जालें ।
सुरंग घोंगडें हाताशीं आलें ॥ध्रु०॥
येणें पाडें न माये कोठें ।
घोंगडें मोठें सांपडलें ॥२॥
मनोरथ पुरलेरे आतां ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाशी ध्याता ॥३॥

अर्थ:-

चौऱ्यांशी लक्षयोनी हाच कोणी एक बाजार त्यांत फिरता फिरता म्हणजे जन्म घेता घेता मोठ्या पुण्याईने मला हा मनुष्यदेह प्राप्त झाला. या मनुष्यदेहाच्या खेपेला आलो हे फार चांगले झाले. कारण मनुष्यदेहातच च परमात्मैक्य बोधरूपी सुंदर घोंगडे हाती आले. हे परमात्मरूपी घोंगडे इतके मोठे आहे की ते कोठे मावतच नाही. असे मोठे घोंगडे सांपडले. असा मनुष्यरुपी शरिराला आल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान करता आले व त्यामुळे माझे मनोरथ परिपूर्ण झाले. असे माऊली सांगतात.


१११
माझिया घोंगडियावरी ब्रह्माचा गोंडा ।
बाहिरी सांडा बैसावया ॥१॥
घोंगडें संतचरणी रुळे ।
श्रीरंगा रंगलें व्योमाकार ॥ध्रु०॥
रखुमादेविवरें विठ्ठलें दिधलें ।
अमोलिक जालें मोलेंविण ॥२॥

अर्थ:-

मला दिलेल्या बोधाच्या घोंगडीला ब्रह्माचा गोंडा लावलेला आहे. ही घोंगडी बाहेर नीट बसायला बाहेर घाला. त्यावर श्रीरंगात रंगलेले संतचरण रुळतील,आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या परमात्म्याच्या रंगात ते घोंगडे रंगविलेले आहे. रखुमाईचे पती श्री विठ्ठलांने हे अमोल घोंगडे मोल न घेताच दिले आहे. असे माऊली सांगतात.


११२
घोंगडी घेऊनि हाटासि जाये ।
पंढरिये आहे वस्ती आम्हां ॥१॥
घोंगडियाचें मोल पैं जालें ।
चरणीं राहिलें विठ्ठलाचे ॥ध्रु०॥
घोंगडें येक बैसलें थडी ।
उभयां गोडी विठ्ठलाची ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे ।
शाहाणे ये खुणें संतोषले ॥३॥

अर्थ:-

आम्ही वारकरी पंढरपूरात राहात असून व्यापारी आहोत हे घोंगडे घेऊन संतांच्या बाजारात गेलो’ त्याठिकाणी त्या घोंगडीचे चांगले मोल झाले ते मोल म्हणजे श्रीविठ्ठलाचे ठिकाणी आम्ही एकरूप झालो. चंद्रभागेच्या काठांवर एक घोंगडे(पुंडलिक) बसले आहे. त्याला विटेवर उभे असलेल्या
श्रीविठ्ठलाची जोडी असून त्यांना एकमेकाची गोडी आहे. अनुभवी पुरूषच हे माझे बोलणे समजतील. आणि तेच शहाणे या माझ्या खुणेच्या बोलण्याने संतोष पावतील. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


११३
काळें न सावळें धवळें न पिंवळें ।
घोंगडें निराळें लाधलों मी ॥१॥
मागील रगटें सांडिले आतां ।
पंढरीनाथा चरणाजवळीं ॥ध्रु०॥
नवें नवघड हातां आलें ।
दृष्टि पाहें तंव मन हारपलें ॥२॥
सहस्त्र फ़ुलीवरी गोंडा थोरु ।
धडुतें दानी रखुमाचेविवरु ॥३॥

अर्थ:-

चांगदेवा जे काळे नाही, सांवळे नाही पांढरे नाही, पिवळे नाही नादबिंदु ही नाही त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे. हे माझे उखाणे तू जाण.जे गोडापेक्षाही गोड, गगनापेक्षा वाड, चौदाही भुवनातल्या जीवाला ज्याची चाड ते काय आहे. तें परमात्मरूप असे चांगदेवाने उत्तर दिले ते माऊलीनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तेसे सांगितले. यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्याठिकाणी ऐक्य झाले आहे. चांगदेवा हे फार चांगले केलेस.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


११४
निरालंब घोंगडें अद्वैत पेठे ।
तेथें एक भेटे रुपेवीण ॥१॥
हिरोनि घेतलें हिरोनि घेतलें ।
मज पैं दिधलें दोषेंवीण ॥२॥
रखुमादेविवरें कामाण केलें ।
अपकारेंविण उघडें नागविलें ॥३॥

अर्थ:-

निरालंबाच्या ठिकाणी एक अद्वैत पेठ आहे. तेथे अमोलिक एक रूपरहित घोंगडे असून ते मला पंढरीस मिळाले. माझे सर्वस्व हरण करून घेऊन कोणताही उद्देश न ठेवता ते घोंगडे मला दिले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी हे उत्तम कमविलेले घोंगडे मला दिले खरे पण कांही एक अपकार न करिता माझी अनात्मभावापासून नागवण केली.असे माऊली सांगतात.


११५
अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें ।
अमोलिक घेतलें पंढरिये ॥१॥
चौ हातांची भरणी आली ।
तिये चराचरीं ऐसें नाहीं ॥२॥
रखुमादेविवरु विठ्ठलीं नीट ।
पांघुरविलें वैकुंठ मज देखा ॥३॥

अर्थ:-

अद्वैताच्या बाजारांतून हे परमात्मरूपी अमोलिक आणलेले घोंगडे आम्ही पंढरीस घेतले. हे लांबी रुंदीला परिपूर्ण असून असे दुसरे घोंगडे चराचरांत नाही. या रखुमाईचे पती श्रीविठ्ठलानी मला हे घोगडे नीटपणे पांघरविले आहे. असे माऊली सांगतात.


११६
माझें चवाळें रंगाचें बहुतें ।
श्रीगुरुनिवृत्तिनाथें दिधलेगें माये ॥१॥
चवाळें शुध्द चहुं पालवी ।
व्योमकारें वेद प्रसिध्द पांघुरवी ॥२॥
आताम पराहूनि परमेचूचें ।
बापरखुमाईवरा विठ्ठला अंगीचे ॥३॥

अर्थ:-

अध्यस्त पदार्थाचे ठिकाणी अनंत चित्रविचित्रता असल्यामुळे ती चित्र विचित्रता अधिष्ठानांच्या ठिकाणी प्रतितीला येते. म्हणून अनेक रंगाचे यथार्थ स्वरूपाचे घोंगडे, मला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी दिले आहे. चारी पदरांनी हे घोंगडेे, फार शुद्ध आहे. आणि आकाशाप्रमाणे व्यापक आहे. याचेच वेद प्रामुख्याने वर्णन करून जीवाकडून तेच पांघुरवितो. हे सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या त्या रखुमाईचा वर जो श्रीविठ्ठल त्याचे अंगच आहे. असे माऊली सांगतात.


११७
निरंजना गाई चारुं गेलों ।
तंव चवाळें तेथें एक पावलों ॥१॥
मज निर्गुणें आड वारिलें ।
चवाळें हिरोनि जिणें बुडविलें ॥२॥
बापरखुमादेविवरें इतुकें केलें ॥
माझें चवाळें हिरोनि नेलेंगे माये ॥३॥

अर्थ:-

निरंजन परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियेरूपी गाय चारू गेलो असता तेथे एक निर्गुण घोंगडे प्राप्त झाले. त्याच स्थितीत निर्गुण घोंगडे घेण्यासहि म्हणजे निर्गुणभाव परत करण्यासहि प्रतिबंध होऊन निर्गुणभावाचे घोंगडे हिरून घेतले म्हणजे निर्गुणभावहि काढून टाकला. आणि माझे जीवित्व बुडविले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी माझे घोंगडे हिसकवुन घेतले. एवढे काम केलें. असे माऊली सांगतात.


११८
ब्रह्माचा गोंडा चहूं पालवा ।
मन पांघुरे उमप भवा ॥१॥
चौ हातांहुन आगळें ।
द्विकरांहुनि वगळेंगे माये ॥२॥
बापरखुमादेविवरें सुभटें ।
मज चवालें दिधलें गोमटेंगे माये ॥३॥

अर्थ:-

या घोंगड्याला ब्रह्मज्ञानाचा गोंडा लावला असून तो चवथ्या पुरूषार्थाला कारण झाला. त्यामुळे अमर्यादित भावाने भटकणाऱ्या मनाला पांघरविले आहे. ते चार हाताहून अधिक आहे म्हणजे चतुर्भुज विष्णुहून वेगळे आहे. तसेच दोन हातांच्या मानवाहून ही वेगळे आहे. अशा तऱ्हेचे हे सुंदर घोंगडे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला पांघरण्यास दिले. असे माऊली सांगतात.


११९
चवाळ्याची सांगेन मातु ॥
चवाळें पांघुरे पंढरीनाथु ॥१॥
गोधनें चारितां हरि पांघुरला ।
मज चवाळ्याचा त्यागु पैं दिधला ॥२॥
बाप रखुमादेविवरु श्रीगुरुराणा ।
चवाळें पांघुरवी निरंजनागे माये ॥३॥

अर्थ:-

या परमात्मबोधरूपी घोंगड्याची गोष्ट अशी आहे की, हे घोंगडे एक पांडुरूगरायच पांघरत असतो. भगवंताने हे घोंगडे गाई चारत असता पांघरले होते. मला मात्र प्रथमच त्याने हे चवाळे पांघरण्यास दिले. म्हणजे परमात्मबोध प्रथमच दिला. नंतर ते घोंगडे त्या श्रीकृष्णाने माझ्याकडून काढून घेतले. म्हणजे मला परमात्मबोध झाला आहे. अशा तऱ्हेचा माझ्या ठिकाणचा अभिमानही काढून टाकला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच सद्गुरू असून त्यांने एकांतामध्ये मला हे बोधरूपी घोंगडे पांघरण्यास दिले. असे माऊली सांगतात.


१२०
निर्गुण चवाळें आणिलें ।
बापनिवृत्तीनें मज पांघुरविलें ॥१॥
चौघे चार्‍ही पदर म्हणीतले ।
पांघुरण झालें सारासार ॥२॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें ।
माझें चोरुनि जिणें उघडें केलेंगे माये ॥३॥

अर्थ:-

बाप म्हणजे धन्य धन्य श्रीगुरूनिवृत्तीरायांनी निर्गुण घोंगडे म्हणजे निर्गुण परमात्म्याचे पांघरूण आणिले आणि मला पांघरविले. चौघे चारी पदर म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे ज्याचे पदर आहे. तेच सारासार विचारांने निर्गुण पांघरूण झाले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानीे माझ्या या चार देहांत असलेले जिणे नाहीसे करून उघडे केले. म्हणजे परमात्मरूप केले. असे माऊली सांगतात.


१२१
तूं माझा स्वामी मी तुझा रंक ।
पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥
मी तूं पण जाऊंदे दुरी ।
एकचि घोंगडें पांघरु हरी ॥२॥
रखुमादेविवरा विठ्ठलराया ।
लागेन मीं पाया वेळोवेळां ॥३॥
अर्थ:-

हे विठोबाराया, तूं माझा स्वामी आहेस म्हणजे सेव्य आहेस. आणि मी तुझी सेवा करणारा एक दीन रंक आहे. स्वामीपणा व रंकपणा हा उपाधिदृष्टिने असला तरी जीवब्रह्मैक्यबोधाच्या दृष्टिने पाहिले तर तुझ्या माझ्या स्वरूपांमध्ये भेद मुळीच नाही. याकरिता मीतूपण हे द्वैत पलीकडे सारून ब्रह्मात्मैक्य बोधाचे एकच घोंगडे आपण पांघरू. अशा बोधाने हे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, तुमच्या पायाला मी वेळोवेळा लागेन. असे माऊली सांगतात.


१२२
जायाची घोंगडी नव्हती निज ।
म्हणऊनि तुज विनवीतसे ॥१॥
एक पाहतां दुसरें गेलें ।
तिसरें झालें नेणों काय ॥२॥
चौथें घोंगडें तेंही नाहीं ।
रखुमादेविवरा विठ्ठला पायीं ॥३॥

अर्थ:-

जाणारे नाशिवंत देहादि अनात्मपदार्थ हे निज म्हणजे स्वकीय आत्मस्वरूप नव्हेत.म्हणून स्वकीय आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता तुझी विनवणी करीत आहे. स्थूल देहाचा विचार करीत असता तो तर गेलाच पण त्याचेबरोबर दुसरे लिंगशरीरही गेले. तिसरे जे कारणशरीर म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान ते कुणीकडे गेले. याचा पत्ताही नाही. चौथे महाकारण शरीर तेही नाही. या सर्वांचा लय रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांचे चरणी झाला. असे माऊली सांगतात


पाईक – अभंग १२३ ते १२८

१२३
जालेनि पाईकें गोसाविपण जिंके ।
परि स्वामिया सेवक साचा होय ॥
एकएकेविणें स्वामीसेवकपण ।
मिरविती हे खुण स्वामी जाणे ॥१॥
पाईक काय स्वामी स्वामिया काय पाईक ।
असतां एके एक दोन्ही नव्हती ॥२॥
स्वामीचें काज पाईकपणें वोज ।
करितां होय चोज पैं गा ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलासि वोळगतां ।
पाईका स्वामी असतां निवृत्ति ऐसा ॥३॥

अर्थ:-

पाईक म्हणजे सेवक होऊन स्वामीपणा प्राप्त करून घेतो. तथापि स्वामी आणि सेवक हा भाव कायम राहतोच. स्वामीपणा किंवा सेवकपणा हे सापेक्ष आहेत. म्हणजे स्वामीपणा असला तरच सेवकपणा असणार, आणि सेवकपणा असेल तरच स्वामीचे स्वामीपण, पण ऐक्य भावाचा निश्चय होऊन देव भक्तांमध्ये स्वामीसेवकपणा कसा नांदत आहे याची खूण देवच जाणतो.लौकिकदृष्ट्या विचार केला तर सेवक काय स्वामी होईल? कां स्वामी सेवक होईल? दोघामध्ये ऐक्य निश्चित झाले असतां स्वामी सेवकपणा हा द्वैतभाव राहात नाही. धन्याचे काम सेवकपणा पत्करून चांगले केले असतां त्याचे कौतुकच होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना भजले असता पाईक जपाईकपणाने असला तरी माझे मालक निवृत्तीराय आहेत. असे माऊली सांगतात.


१२४
एकुचि एकला जाला पैं दुसरा ।
एकीमेकी सुंदरा खेळविती ॥१॥
माझिये कडिये कान्हा तुझिये कडिये कान्हा ।
देवकी यशोदा विस्मो करिती मना ॥२॥
बापरखुमादेविवरु आवडे मना ।
जगत्रजिवनु कान्हा बाईयांनो ॥३॥

अर्थ:-

सत् चित् आनंद या रूपाने श्रीकृष्ण परमात्मा एकटा एकच असता आपल्या दोन्ही मातेस आनंद देण्याकरिता आपण दुसरा झाला. त्या दोघींनी दोघा कृष्णास कडेवर घेऊन खेळवू लागल्या. आणि मोठ्या आश्चर्याने एकमेकीस म्हणतात की आज माझ्या कडेवर तान्हा आणि तुझ्या कडेवरही कान्हा काय चमत्कार आहे हा.माझे पिता व रखुमादेवीवर जे त्रैलोक्याचे जीवन आहेत ते श्रीकृष्ण आम्हांस आवडतात अशा त्या दोघी एकमेकीस म्हणत आहेत.असे माऊली सांगतात.


१२५
पाईका मोल नाहीं देसील तें काई ।
पाईक न मागे कांही भोग्य जात ॥१॥
देसील तें काई न देसील तें काई ।
पाईक न मागें कांहीं तुजवांचोनी ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठलाच्या पायीं ।
पाईका मोल नाहीं तैसें जालें ॥३॥

अर्थ:-

तुझ्याशी ऐक्यभावाने असणाऱ्या पाईकपणाचे मोलच नाही.तूं काय देणार? येऊन जाऊन देणार कांही भोग्यपदार्थ.ते तर मी मुळीच मागत नाही. तूं देणार काय आणि न देणार काय? हा तुझा पाईक तुझ्यास्वरूप प्राप्तीशिवाय दुसरे काहीच मागत नाही.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या पायाची आनंदाने सेवा करणारा पाईक. त्याला मोलच नाही असे माऊली सांगतात.


१२६
आणिक पाईक मोलाचे तुझे ।
तैसें नव्हे माझें पाईकपण ॥१॥
न मगे वही मोल जीवन भातें ।
तें द्यावें मातें पाईकपण ॥२॥
बापरखुमादेविवरा गोसांविया ।
पाईकपणें मीयां जोडलेती ॥३॥

अर्थ:-

हे श्रीविठ्ठला मोल घेऊन तुझी सेवा करणारे पुष्कळ सेवक असतील. परंतु मी मात्र तसा सेवक नव्हे. मी तुझ्याजवळ इनाम मागत नाही पगार मागत नाही. किंवा निर्वाहाला सुद्धा काही मागत नाही. फक्त मला सेवकपणा द्यावा एवढेच मागणे आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठली तुमची प्राप्ती अशा पाईकपणानेच मला झाली.असे माऊली सांगतात.


१२७
देह दंडुनि पाईक अनुसरसा जीवें ।
तव स्वामियाचें गूज हातासि आलें ॥१॥
पाईकपण गेलें स्वामि होऊनि ठेले ।
परि नाहीं विसरलें स्वामियातें ॥२॥
पाईकपणें ऐसा आठवुचि नांहीं ।
स्वामीवांचुनि कांही जाणेचिना ॥३॥
बापरखुमादेविवरु विठोजी उदारु ।
पाईक वो साचारु स्वामी केला ॥४॥

अर्थ:-

भगवद्भक्त देहाला कष्ट देऊन जीवाभावाने भगवंताची सेवा करतात. म्हणूनच तो भगवान त्यांच्या हाती येतो. म्हणजे ते भक्त भगवत्स्वरूप होतात. ते भक्त जरी भगवत्स्वरूप झाले तरी देह असेपर्यंत आपण त्या भगवंताचे सेवक आहोत हे ते विसरत नाहीत. ‘मीचि होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ॥’ या प्रमाणे ते सेवा करितच असतात. अशी जरी सेवा करीत असले तरी त्यांच्याठिकाणी आपण सेवक आहोत अशा तऱ्हेचा अभिमान राहात नाही. कारण ते एका भगवंताशिवाय दुसरे काही जाणत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनाच मी खरा स्वामी केला.असे माऊली सांगतात.


१२८
जागतां नीज आलें असें हातां ।
मग पाईक म्हणवितां लाज वाटे ॥
नव्हे कोणाजोगा नाईकें हाणितलें ।
उणेपणें आलें पाईकपणा ॥१॥
पाईक शुध्दमति स्वामिया विवेकी ।
वेंव्हारु लोकिकीं चाळीतु असे ॥२॥
निदसुरा होता तो जागसुदा जाला ।
स्वामिये आणिला आपणापाशीं ॥३॥
पाईकपणें गेलें सन्निधान जालें ।
स्वामी एका बोलें निवांत ठेला ॥४॥
मागावें तितुकें खुंटलें ।
तेथ न मगतां आपणांते जाणीतलें ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला प्रसादें ॥
पाईक परि अभेदें उरला असें ॥५॥

अर्थ:-

आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाविषयी नित्य जागृति ठेवली तर आपले निज म्हणजे यथार्थ परमात्मस्वरूप आपुले हाती आले मग सेवक म्हणवून घेण्यास संकोच वाटतो. परमात्मा अमुकस्वरूपाचा आहे. तमुकस्वरूपाचा आहे. असे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. कारण तो शब्दाचा विषय नाही. अशा परमात्म्याचा मी पाईक आहे.हे म्हणणेच उणेपणाचे आहे. लौकिक भागांत शुद्धबुद्धीचा सेवक आणि विचारवंत धनी यांचा व्यवहार असाच असतो. आत्मस्वरूपांच्या विस्मृतीत जीव निजलेला होता. तो आत्मस्वरूपाच्या जागृतीत आला. म्हणजे स्वामीनी त्याला आपल्या स्वरूपाशी एकरूप केले. अर्थात् स्वामीरूप झाल्यामुळे त्याचा सेवकपणा गेला. तो स्वामी श्रीगुरूरायांनी एका बोलात निवांत करून ठेविला. आतां स्वामीजवळ मागावयाचे म्हणून सर्व खुंटले कारण न मागताच त्याच्याकडून त्याचे परमात्मस्वरूप जाणवले. परमात्मरूप धनी जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या प्रसादानें परमात्म्याशी अभिन्न होऊनहि सेवकपणाने उरला आहे.असे माऊली सांगतात.


हमामा – अभंग १२९ ते १३०

१२९
हमामा पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥ध्रु॥
घुमरिचा नाद कानीं । घुमरी घालूं रानीं ।
रानीं सीतल छाया । मेली तुझी माया ।
मायेचें घर दुरी । तुज मज कैंची उरीरे पोरा ॥१॥
उरी नाहीं तुज । मजसी मांडिले जुंझ ।
जूंझी अहंकार ढळे । कल्पना समूळ गळे ।
गळतां गळतां पाहिली । कान्होबा चरणीं राहिलीं ।
कान्होबा पाहे दिठी । तुज मज पडिली मिठीरे पोरा ॥२॥
मिठी मिठी करी पाहासी । आतां कोठें राहासी राहता ठावो येकु ।
फ़टितो तुझा लेंकु । लेंकु गाइ राखे ।
बाप गोरसु चाखे । चाखतां घेतली गोडी ।
तोचि फ़ांसा तोडीरे पोरा ॥३॥
पोरा एक माझी गोठी । राग न धरी पोटीं ।
रांगे काम नासे। अंहकारे बोंचा वासे ॥
वासिले रावणें डोळे । भेणें द्वैत कंस पळे ।
पळतां पळतां लागला पाठीं ।
तुज मज आतां गोठीरे पोरा ॥४॥
पोरा गोठी करी ऐसी । संतासि मानेल तैसी ।
बापरखुमादेविवरु ध्यासी ।
तरि वरिल्या गांवां जासीरे पोरा ॥५॥

अर्थ:-

( हमामा नावांचा एक प्रकारचा मुलाचा खेळ असून त्यामध्ये घुमरी नावांचे एक प्रकारचे वाद्य वाजवित असतात) आता आपण हमामा म्हणजे मी आणि आम्ही (हम म्हणजे मी आमा म्हणजे आम्ही) असा खेळ खेळत आहोत. त्या खेळांत घुमरी म्हणजे धुंदी तिचा घुमधुमाट काढून आपल्या कानांवर येत आहे. ही घुमरी रानांत म्हणजे परमात्मस्वरुपांच्या ठिकाणी घालू. रानामध्ये फार शीतल छाया आहे. रान म्हणजे परमात्मस्वरुप असून परमात्म स्वरुपांच्या ठिकाणी. गेले असता देहादिक भाव हे कार्यरुपाने मायाच आहेत. ती तुझी माया आतां मेली म्हणून समज. अरे, परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी गेलो म्हणजे मायेचे घर फार दूर राहिले. आणि त्यामुळे तुझ्यांत आणि माझ्यांत भेद कोठे शिल्लक राहिला. तूं मी असा द्वैतभाव नसता तूं माझ्याशी खेळण्याचे झुंज मांडले आहेस. त्यांत अहंकार नष्ट होतो. कल्पना समूळ जाते. कल्पना गळून पाहिले तर चित्तवृत्ति कान्होबाच्या चरणी लीन राहाते. असा तो कान्हा श्रीकृष्ण दृष्टीने पाहा. म्हणजे तूं आणि मी अशा द्वैतभावाला मिठी पडेल. नुसती शब्दाने मिठी म्हणू नकोस तर मिठी म्हणजे ऐक्य करुन पाहू लागलास तर आतां त्या एका परमात्म्याशिवाय कोठे राहाशील. हा विचार सुटला तर तुझ्यापासून उत्पन्न झालेला लेक म्हणजे अहंकार तो गायी म्हणजे इंद्रिये राखू लागला. तर त्या अहंकाराचा बाप जो जीव तो गोरस चाखतो. म्हणजे विषयभोग घेतो त्या विषयभोगामुळे जी गोडी उत्पन्न होते. तीच या. जीवाला फांसा आहे रे तो फांसा तूं सोडून टाक. तुला आणखी एक गोष्ट सांगतो ती ऐक मनांत राग धरु नकोस कारण मनांत राग म्हणजे क्रोध उत्पन्न झाल्याने इच्छित कामाचा नाश होतो. अहंकार वाढतो. त्याने गांड फांटून जाते. पहा ह्या अहंकाराने रावणाचे डोळे फाडले. भयाने कंस पळू लागला. पळता पळता कृष्ण पाठीस लागून कृष्णाने त्यास मारले. मी सांगितलेली ही गोष्ट तिचा विचार कर. पोरा संतांना मानेल अशी गोष्ट बोल. ती गोष्ट म्हणजे एवढीच की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे जर ध्यान करशील तर वर सांगितलेल्या परमात्म्याच्या निर्गुण स्वरुपांच्या गावाला जाशील. असे माऊली सांगतात.


१३०
हमामा घाली बाळा । सांडी खोटा चाळा ।
फ़ोडिन तुझा टाळा । वाकुल्या दाविन काळा ॥१॥
हमामारे पोरा हमामारे ॥२॥
हमामा घाली बारे । अंगी भरलें वारें ।
चाखतीं पिकलीं चारें ॥
जाऊं वरिल्या द्वारेंरे पोरा ॥३॥
हमामा घालीं नेटें । सांडी बोलणें खोटें ॥
आतां जासिल कोठें ।
कान्होबाचे बळ मोठेंरे पोरा ॥४॥
हमामा घाली सोईं ॥
भांभाळी सवा दोहीं ॥
एक नेमें तूं राही । तेथें बहु सुख पाहीरे पोरा ॥५॥
हमामियाचा नादु वाजे ॥
अनुहातें कोपर गाजे ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल राजे ।
रत्नजडित मुगुट साजेरे पोरा ॥६॥

अर्थ:-

हमामा घाल.प्रपंचाचा खोटा चाळा सोडून दे. देहाभिमानाचा तुझा खोटा चाळा आहे. त्यामुळे काळ नाश करतो. परंतु त्या देहाभिमानाचे टाळके फोडून बाध कर म्हणजे तुझा नाश करणाऱ्या काळाला वाकुल्या दाखव. हमामा रे पोरा हमामा हमामारे पोरा हमामा. हमामा घाल हमामा घालू लागले असता अंगांत वारे भरते. त्या वाऱ्याच्या नादांने रानांतील चारा खाते. तो खाण्यांकरिता आपल्या वरल्या दाराने म्हणजे कामी मुखाच्या दाराने वरती जाऊ.चांगल्या रितीने हमामा घाल. खोटे बोलणे टाकून दे. असे केले म्हणजे. हा कान्होबा मोठा बलवान आहे. तो आपल्याशी तुझे ऐक्य करुन घेईल. असे झाले म्हणजे मग कोठे जाशील. हमामा अशा सोयीने घाल की. ज्याच्या दोन्ही बाजू सांभाळल्या जातील. परमात्मस्वरुपांविषयी एक नेम करुन तूं राहिलास तेथे फार सुख आहे हमाम्याचे नादाने पोरे हात नाचवून, तोंडाने कांही आवाज करीत असतात. परंतु या हमाम्यांत अनुहात. ध्वनीची गर्जना होते. तोच नांद वाजत असतो. ज्याच्या मस्तकांवर रत्नजडित मुकुट शोभत आहे. असा जो, माझे पिता व रखुमाईचे पती, श्रीविठ्ठलराय स्वरूपांच्या ठिकाणी हा हमामा घालावयाचा आहे. असे माऊली सांगतात


अंबुला – अभंग १३१ ते १६८

१३१
विचारितां देहीं अविचार अंबुला ।
न साहे वो साहिला काय करुं ॥१॥
सखि सांगें गोष्टी चाल कृष्णभेटी ।
आम्ही तुम्हीं शेवटीं वैकुंठीं नांदों ॥२॥
येरि सांगे भावो जावें वो प्रवृत्ती ।
तव वरि गति येता नये ॥३॥
ज्ञानदेवो प्रवृत्ती निघालीया तत्परा ।
हरि आला सत्वरा तया भेटी ॥४॥

अर्थ:-

वास्तविक विचार करु गेले तर या देहांत अविचारच शिरजोर झाला आहे. मला तो सहन होत नाही. पण काय करु तेही समजत नाही. तिला तिची मैत्रिण सांगत आहे की आपण दोघी त्या श्रीकृष्णाच्या भेटीला जाऊ. त्याची भेट झाली म्हणजे आपण दोघी आनंदात वैकुंठी नांदू. ती उत्तर सांगते तूं त्या श्रीकृष्णाकडे शुद्ध भावाने जा. अनधिकारामुळे मला श्रीकृष्णाच्या भेटीस येवत नाही. त्या श्रीकृष्णाकडे माझी प्रवृत्ति झाल्याबरोबर तो श्रीहरि तात्काळ माझ्या हृदयांत आला. व मी तत्परच होऊन गेलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१३२
न गमे हा संसारु ह्मणोनि केला भ्रतारु ।
लोक अनाचारु म्हणती मज ॥१॥
चंचळ जालिये म्हणतील मज । कवणा सांगूं ।
जिवीचें गूज ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलावांचुनि नेणें ।
सतत राहणें याचे पायीं ॥३॥

अर्थ:-

मला या संसारांत करमेना म्हणून मी पहिला नवरा टाकून दुसरा भ्रतार(परमेश्वरालाच) केला. त्यामुळे हा अनाचार केला म्हणून लोक माझ निंदा करतील.परंतु सर्व संसाराचा वीट येऊन परमात्मस्वरुपाची प्राप्ती व्हावी. ही उत्कट असलेली माझी इच्छा हे माझे मनातील गुह्य कोणास सांगावे. व पटणार तरी कोणास आतां मात्र माझी अशी स्थिती झाली आहे. की परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठला त्यांचा वांचून दुसरे कांही एक न पाहता सतत त्याचे पायी राहणे हेच आपले कर्तव्य आहे असे माऊली सांगतात.


१३३
अद्वैत अंबुला परणिला देखा । दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥
सांडिला पै घराचारु । दुसरा विचारु नाहीं केला ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलेंसी घराचार ।
ठकला व्यवहार बाईयांनो ॥३॥

अर्थ:-

अखंड अद्वैत स्वरुप जो परमात्मा हा नवरा समजून त्याच्या बरोबर विवाह केला. आणि दुसरा प्रापंचिक सर्व विचार टाकून दिला. सांडण्याला योग्य असा घराचार सोडून देऊन परमात्म स्वरुपांशिवाय दुसरा विचार केला नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या बरोबर ऐक्य झाले असता सर्व घराचाराचा व्यवहार टाकला असे माऊली सांगतात.


१३४
अंबुला माहेरीं भोगी धणीवरी ।
मग तया श्रीहरि सांगों गूज ॥१॥
माझें सुख मीच भोगीन ।
क्षेमेंसि निगेन अंगोअंगीं ॥२॥
सांडुनि कुळाचार जालिये निर्लज्ज ।
तुम्ही काय मज शिकवाल ॥३॥
रखुमादेविवरु विठ्ठल मातापिता ।
मी त्याची दुहिता सर्वांगुणीं ॥४॥

अर्थ:-

माझ्या पतिला माहेरी म्हणजे मी आपल्या स्वरुपांच्या ठिकाणीच आनंदाने भोगीत आहेत. अशा भोगाच्या आनंदात श्रीहरिजवळ गुज गोष्टी करीन. मी आपले सुख मीच भोगित आहे. आणि पतिला वरचेवर क्षेम देण्याकरिता अंग उपांगाने निघत आहे. लौकिक कुलाचाराचा परित्याग करुन मी निर्लज्ज झाल्यावर तुम्ही मला लौकिकाच्या गोष्टी काय शिकवणार. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तीच माझी माता व तोच माझा पिता असून सर्वांगाने मीच त्याची मुलगी होय, असे माऊली सांगतात.


१३५
जियेचा अंबुला रुसुनि जाये ।
तयेचें जीवित्व जळोगे माये ॥१॥
आम्हीं रुसों नेणों आम्ही रुसो नेणों ।
अंबुलीया रुसों नेदुगे बाई ॥२॥
ज्याच्यानि अंगें जोडला हा ठावो ।
रखुमादेविवरु नाहो बुझाविला ॥३॥

अर्थ:-

परमात्मरुप पति, जिला टाकून रुसून गेला तिच्या जीवीत्वाला आग लागो. माझी मात्र तशी स्थिती नाही. कारण मी माझ्या परमात्मरुपी पतीला रुसू देत नाही. ज्याच्या कृपेने मी परमात्मस्वरुप अवस्थानाला प्राप्त झाले. ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल माझे पति त्याची मी समजूत केली.असे माऊली सांगतात.


१३६
अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी ।
देह उगाणी केली देखा ॥१॥
अंबुला निघाला अंबुल्या गांवा ।
मी वो तया सवा जातु असें ॥
रखुमादेविवरु लागलासे चोरु ।
मार्ग बुडविला घराचारु ॥३॥

अर्थ:-

अष्टसात्त्विक भावाने भोगित असतांना अंतःकरणाची तृप्ति होत नाही. पुन्हा पुन्हा भोगाची इच्छा होतेच म्हणून मी आपला देह त्याच्यावरुन ओवाळून टाकला. माझा पति आपल्या गांवी म्हणजे स्वरुपाच्या ठिकाणी निर्गुण निघाला असता मीही त्याच्याबरोबर चालले आहे. म्हणजे मीही निर्गुण स्वरुप झाले आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हा एक भक्ताचा संसार चोरणारा असून तो माझ्या पाठीशी लागून माझा सर्व संसार त्यानी बुडवून टाकला असे माऊली सांगतात.


१३७
दुरकु अंबुला केलागे बाई ।
ब्रह्मादिकां तो न पडे ठाई ॥१॥
हालों नये चालों नये ।
सैरावरा कांही बोलों नये ॥२॥
अंबुला केला धावे जरि मन ।
बुडती बेताळीस जाती नाक कान ॥३॥
मागील केलें तें अवघें वावो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल नाहो ॥४॥

अर्थ:-

इंद्रिये, मन, बुद्धि त्यांची कारण पंचमहाभूते, त्यांचे कारण अविद्या इतक्यांहून दूर असलेल्या ब्रह्मादिकांना कळत नाही त्याला मी पति केला. त्या पतिस्वरुपाच्या ठिकाणी चलनवलन वगैरे क्रिया किंवा कोणत्याही तहेचे भाषण खपत नाही. आतां आनंदघन पति करुन जर मन प्रपंचाकडे धांवेल तर बेचाळीस कुळे नरकांत पडून नाक कान जातील. म्हणजे सर्वप्रकारे फजिती होईल. एकदा त्या परमात्म्याला पति केला म्हणजे मागील देहात्मभावादि सर्वच खोटे होऊन जातात. असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझा पति आहेत असे माऊली सांगतात.


१३८
सुची अंबुला ज्ञान घराचारु ।
भक्ति ये साकारु आवडली ॥१॥
काय सांगु माये निर्गुण अंबुला ।
शून्यीं मिळाला नाहीं ठाई ॥२॥
रखुमादेविवरु साकार अंबुला ।
मज पूर्ण बाईयांनो ॥३॥

अर्थ:-

सुची म्हणजे सूक्ष्माहूनही सूक्ष्म असणारा परमात्मा पति झाल्यानंतर माझा व्यवहार ज्ञानरुप झाला. त्याच्या साकार स्वरुपाची भक्ति मला फार आवडली. तो निर्गुण पति शून्य जी अविद्या तिचे कार्य जो प्रपंच त्यांत मिळाला नाही. ते निर्गुण रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते साकार होऊन माझ्याशी लग्न लावण्यास आले. असे माऊली सांगतात.


१३९
अंबुला विकून घेतली वस्तु ।
घराचार समस्तु बुडविला ॥१॥
उठोनि गेलिये अज्ञान म्हणाल ।
म्यां तंव कैवल्य जोडियेलें ॥२॥
अंबुला सांडूनि परावा केला ।
संसार सांडिला काय सांगों ॥३॥
रखुमादेविवरें मज पर्णुनि नेलें ।
सुखचि दिधलें काय सांगों ॥४॥

अर्थ:-

लौकिकांतील चमत्कार काय सांगावा निर्गुण परमात्मा विकून त्याच्या स्वरुपावर मिथ्या भासणारी जगतादि वस्तु ही आपले गळ्यांत बांधून घेतली आणि सर्व व्यवहार दुःखांत बुडवून टाकला. म्हणजे दुःखरुप जो प्रपंच त्याविषयी केला.शेवटी माझे मनांत असा विचार आला की हा संसार तर दुःखरुप आहे. म्हणून मी त्या संसारांतून उठून परमात्मरुप पतिकडे गेले. हे लोकव्यवहारांच्या दृष्टिने वाईट म्हणून मला तुम्ही अज्ञानी म्हणाल परंतु मी तर मोक्षाची प्राप्ती करुन घेतली. व्यवहारांतील नवऱ्याचा परित्याग करुन परमात्मा पति केला. आणि संसार टाकून दिला रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानी माझ्याबरोबर लग्न लावून आपल्या स्वरुपांत नेले आणि सुखरुप केले. असे माऊली सांगतात.


१४०
सगुण अंबुला निर्गुण पैं झाला ।
घराचार समस्त बुडविला ॥१॥
आशा हे सासु असतां बुडविली ।
शांति माऊली भेटों आली ॥२॥
रखुमादेविवर विठ्ठलेंसि चाड ।
अद्वैतेंसि माळ घेऊनि ठेलें ॥३॥

अर्थ:-

जो सगुण श्रीकृष्ण परमात्मा तोच माझा पति निर्गुण झाला. आणि माझा सर्व घराचार म्हणजे व्यवहार बुडवून टांकला. मला रात्रंदिवस जाच करणारी सासू जी आशा ती बुडवून टांकली. आणि शांति माऊली मला भेटण्याला आली. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याचीच फक्त मला चाड असल्यामुळे आतां मी अद्वैताची माळ घेऊन राहिले आहे असे माऊली सांगतात.


१४१
अंबुला होता तो लेंकरु जाला ।
घराचार बुडाला बाईंयांनो ॥१॥
झणी अकुळी म्हणाल उणें ।
तुम्ही जाणते जाणा परमार्थ खुणें ॥२॥
रखुमादेविवरें विठ्ठलें भोगिलिये ।
लंपट जाहालिये सहजानंदीं ॥३॥

अर्थ:-

अंबुला म्हणजे माझा पति होता तोच माझा लेकरु होऊन म्हणजे लेंकरु जसे आईला प्रेमाचे विषय असते त्याप्रमाणे तो प्रेमाचा विषय होऊन मी माझ्या घरादाराचे वाटोळे केले. ही गोष्ट मी वाईट केल्यामुळे मी कुलवान असता मी कुलवान नाही असे तुम्ही मला म्हणाल परंतु जाणते असाल तर ती परमात्म्याची खूण जाणाल. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांनी माझा भोग घेतला आणि त्या आनंदात मी अगदी आनंदी होऊन गेले. असे माऊली सांगतात.


१४२
स्वरुपाचेनि भानें बिंब हें ग्रासिलें ।
परि खुण न बोले काय करुं ॥
रुपाचा दर्पण रुपेंविण पाहिला ॥
द्रष्टाहि निमाला नवल कायी ॥१॥
जिकडे जाय तिकडे दर्शन सांगाती ॥
उदो ना अस्तु हे नाहीं द्वैतस्थिति ॥२॥
पूर्वबिंब शून्य हे शब्दचि निमाले ॥
अनाम्याचे नि भले होतें सुखें ॥
त्यासी रुप नांव ठाव संकल्पे आणिला ।
अरुपाच्या बोला नाम ठेला ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि एक ॥
भोगी समसुख ऐक्यपणें ॥
अदृश्य अंबुला जागताम निविजे ॥
परि सेज स्वभावीं दुजें नाहीं रया ॥४॥

अर्थ:-

आरसा ही उपाधि घेतल्यामुळे आरसारुपी उपाधिमध्ये प्रतितीला येणाऱ्या मुखाला प्रतिबिंब असे म्हणतात. म्हणजे प्रतिबिंबत्व येते) व त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष मूळच्या मुखांच्या ठिकाणी बिंबत्व धर्म येतो. याचा अर्थ मूळच्या मुखांच्या ठिकाणी बाजूला आरशाच्या उपाधिमुळे, बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म येतात. पण आरसारुपी उपाधि केल्यानंतर बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म नाहीसे होऊन मूळचे मुखच एक राहाते. या बिंब प्रतिबिंबवादांच्या रितीप्रमाणे माया उपाधिमुळे मायेत पडलेले जे प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणतात. व त्याच्यासापेक्ष मुळ परमात्म्याला ईश्वर असे म्हणतात. तात्त्विक विचाराने पाहिले ईश्वरांच्या ठिकाणी आलेल्या बिंबधर्म व जीवाचे ठिकाणी प्रतिबिंबं धर्म हे दोन्ही खोटे आहेत. म्हणजे विचाराने नाहीसे होणारे आहेत. असा ज्याचा निश्चय झाला आहे. त्याच्या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज अभंगात करीत आहे. परमात्म स्वरूपाचे ज्याला भान झाले आहे. त्याच्यादृष्टीने परमात्म्यावर आलेला बिबभाव ‘ग्रासला जातो’ म्हणजे बिबभाव नाही असेच ठरून शुद्ध परमात्मस्वरूपच अवशेष राहणार ते कसे आहे असे विचारले तर त्याचे स्वरूप दाखविणारे एकही चिन्ह नाही. याला काय करावे? रूपादि सर्व विषयांना दर्पण म्हणजे प्रकाशक जो परमात्मा त्यास रूपांवाचून मी पाहिला. कारण त्याला रूपादि गुणांचा यत्किंचितही संबंध नाही. असे श्रुति प्रतिपादन करते. व अनुभव तसाच आहे. जसा परमात्मा मी पाहिला असे म्हणण्याने, परमात्म्याचा मी दृष्टा झालो असे ओघानेच म्हणावे लागते पण ज्या परमात्म्याचे दर्शनाचे सामर्थ्य असे आहे की परमार्थ दर्शनात दर्शन घेणाराच मूळ वेगळा उरत नाही. हे परमार्थ दर्शनांत नवल आहे. बाकीच्या कोणत्याही विषय दर्शनात जीव आपल्याहुन भिन्न पदार्थाला दृश्य करून त्याचा पाहणारा आपण द्रष्टारूपाने शिल्लक राहतो. पण परमात्मदर्शनांत जीव स्वरूपे करून परमात्मस्वरूप असल्यामुळे तो परमात्मरूपच होतो. परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नसल्यामुळे लोकदृष्ट्या देशकाळाची अपेक्षा घेऊन बोलावयाचे झाले तर जिकडे पाहावे तिकडे व जेंव्हा पाहावे तेंव्हा सर्वत्र परमात्मदर्शनच आहे. कारण त्या ज्ञानरूप परमात्म्याला उदय अस्त किंवा कोणत्याच प्रकारची द्वैतस्थिती केंव्हाच नाही. पूर्व प्रक्रियेमध्ये ईश्वराला बिंब व मायेला अस्तित्व नसल्यामुळे शून्य इत्यादि शब्दाची योजना केली होती परंतु आतां परमात्मस्वरूपाच्या अद्वैत स्थितिमध्ये हे शब्दच मावळून गेले अशा अनाम, अरूप, परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपावस्थान झालेल्या जीवाला अविनाश सुखाचा लाभ होतो. कारण त्या परमात्मस्वरूपाला नाम, रूप, ठाव, म्हणजे ठिकाणी संकल्पाने आलेला होता. वास्तविक रितीने अरूप परमात्म्याचे ठिकाणी नामाचा प्रवेशच नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे अद्वितीय श्रीविठ्ठल त्यांच्याशी ऐक्य पावलेला ज्ञानी ऐक्यभावाचे समसुख भोगतो. याप्रमाणे अदृश्य जो परमात्मा त्याच्या स्वरूपाची जागृति असता सर्व द्वैतभाव निवविजे’ म्हणजे दिसत असतांना बाधित होते. दिसत असताना असे म्हटले तर परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी पुन्हां द्वैत प्रतिती येईलच अशी कोणी शंका केली तर ते द्वैत दिसले तरी मिथ्या असल्यामुळे स्वभावे करून परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परमार्थतः द्वैत सिद्धि होणे शक्यच नाही. असे माऊली सांगतात.


१४३
सुखाचा निधि सुखसागर जोडला ।
म्हणौनि काळा दादुला मज पाचारिगे माये ॥१॥
प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी ।
काळे वनमाळी आले घरागे माये ॥२॥
बापरखुमादेविवरु पुरोनि उरला ।
सबाह्यजु भरला माझे ह्रदयीगे माये ॥३॥

अर्थ:-

श्रीकृष्ण परमात्मा हा अगाध सुखाचा सागर आहे म्हणूनच याचा वर्ण काळा आहे. असा हा भ्रतार मला बोलावित आहे. या कृष्ण परमात्म्याच्या बोलावण्याने नवीन प्रेमसुखाची आज मला दिवाळी झाली. कारण असा हा शामतनु वनमाळी आज माझे घराला आला.माझे पिता व रखुमाईचे पति जे श्रीविठ्ठल हे माझ्या हृदयांत अंतरबाह्य भरून उरला आहेत. असे माऊली सांगतात.


१४४
वर्‍हाड न होतां होतें खेळेमेळे ।
लग्न लागलें कवणें दृष्ट वेळे ॥
तेथुनि अंबुला चालवितो मातें ।
कैसेनि येथें निस्तरावें ॥१॥
मौनेंचि घरवात करावियाची ।
चाड नाहीं मज या जिवाचीगे माये ॥२॥
आया बायांनो ऐका वो न्यावो ।
येकांतीं सदा वसताहे नाहो ।
अंगभोग नाहीं ऐसा दुरावो ।
गुरुवार होतसे हाचि नवलावो ॥३॥
एखादे वेळे मजचि मरितोसी ।
लाजा मी सांगो कोण्हापासी ॥
राग आलिया आवघेया ग्रासी ।
ऐसी अति प्रीति आम्हां दोघांसी ॥४॥
म्हातारा आमुला काय माये ।
रुप ना वर्ण हात ना पाये ॥
तरुणि आपुलें मी रुप न साहे ।
क्षणभरि या वेगळी न राहे ॥५॥
पिसुणा देखतां बुझाविलें माये ।
बुझवणी माझी शब्द न साहे ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल पाहे ।
पाहाते पाहाणें जालेंगे माये ॥६॥

अर्थ:-

अविद्यारूपी स्त्री म्हणजे वऱ्हाड न होता म्हणजे जगद् उत्पत्तीच्या पूर्वी आम्ही दोघे आनंदात होतो. पण माझे लग्न त्या परमात्म्याशी कोणत्या वेळेस लागले हे कांही कळत नाही. (परमात्म स्वरूपाचे ठिकाणी अविद्या केंव्हापासून आहे हे सांगता येत नाही. कारण परमात्मा जसा अनादि आहे. तसी अविद्या ही अनादि आहे.) ती अविद्या म्हणते माझे लग्न झाल्यापासून या परमात्मरूपी नवयाने माझ्याशी बोलणे सोडून दिले. म्हणून मी माझे आयुष्य कसे घालवावे. याने माझ्याशी जरी मौन धरले असले तरी मी याच्या सत्तेवरच घरातील सर्व कामे करावयाची त्यामुळे आतां मला हा जीवच नकोसा झाला आहे. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या आया बायांनों हा न्याय तरी कसा आहे. पहा. हा माझा नवरा सतत एकांतात असतो. याचा व माझा अंग संग तर (विषम सत्ताक म्हणून) कधीच होत नाही. आणि चमत्कार असा की मी मात्र गरोदर राहिले. तो तियेशी शिवला नाही । वांझ गर्भिण झाली पाही’ हे प्रियत्तमा तूं एखादे वेळी मला मारतोसही मग मी आपली लाज कोणाजवळ सांगावी? तुला फारच राग आला तर तूं सर्वांचाच नाश करून टाकतोस अशा प्रकारची आम्हा उभयतांची प्रीति आहे. म्हातारा म्हणजे अनादि असलेला नवरा याला ना रूप, ना वर्ण, ना हात, ना पाय अशा प्रकारचा नवरा आणि मी तर आपुल्या तारूण्याच्या भरांत असून माझेच रूप मला सहन होत नाही. इतकी मी सुंदर आहे. पण इतके जरी आहे तरी मी मात्र याला सोडून क्षणभरसुद्धा वेगळी राहात नाही. मी अशी दुःखी कष्टी पाहून तो माझी समजूत काढतो. पण त्या समजावणीतील शब्द मात्र सहन होत नाही. असे हे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल त्यांना पाहू गेले असता पाहणाराच पहाणे म्हणजे ज्ञानस्वरूप होतो. असे माऊली सांगतात.


१४५
द्वैताद्वैत विरहित गौळणी ॥
अमृत दुडिया भारोनियां सांजवनींगे माये ॥
अभिन्नव करुनि श्रृंगारु माथाम गोरसाचा भारु ।
अजि निघाल्या विकरा करुं मथुरे हाटा ॥
प्रेम उचंबळलें चित्तीं हांसे चाले हंसगति ।
पुढें सखिया खेळती जिवीं जिवलगा ॥
दृष्टीं फ़िटला संदेहो लागे कांबळीचा सोवो ।
तंव माझरी कृष्णदेवो स्वरुपीं दिसे ॥१॥
नवलावगे नवलावगे देखियेला ॥२॥
दृष्टीं देखिला लोचनीं लाजिलीये विरोनि ।
मागति खुंटलिसे मनीं पांगुळलें ॥
सरलें नेत्रांचे देखणे श्रुतिश्रवण ऐकणें ।
चित्त चोरियलें कान्होनें चैतन्यींवो ॥
निमिषें खुणाविलें सहजें तव घडलें सहज ।
बिंबीं बिंबतसे निज हे जीव हाचि जाला ॥
आतां नाहीं मज जरी हा तंव बाहेरु भीतरी ।
अवघीं अंतरलीं दुरी गेलें मनुष्यपण ॥३॥
याचिये वो भेटी पडीली संसारासी तुटी ।
शब्द मावळला गोष्टी तो मी काय सांगों ॥
ऐसा कैसा हा दानी करुं नेदितां बोहणी ।
सुखासाठीं सांवजणी केलें रुपातीत ॥
आजि करुनी विकरा रिघु नुपुरे जाव्या घरां ।
नुरे कल्पनेसी थारा । सरले लिंग देह ॥
मी तंव वेंधलिये यासी सवेंचि जालिये
तत्वमसि गुज लपवावें मानसीं तुम्ही सखीयांनो ॥४॥
याचिया लागल्या अभ्यासें गेलें मीपणाचें पिसें ।
केलें आपलिया ऐसें इंद्रियासहित ॥
पूर्ण चैतन्य भोगीलें हें तंव दुजें निमालें ।
देहीं अखंडित ठेलें होतें जैसें तैसें ॥
आलिंगुनिया अंतरीं रिगु नुपुरे बाहेरी ।
निर्विकाराच्या शेजारी प्रेम दुणावत ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलेसी भेटी ।
आजि संसारा संसटी घेऊनि गेला ॥५॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने आणि त्याच्या कृपेने ज्या गौळणीच्या ठिकाणचा द्वैताद्वैतभाव नष्ट होऊन.अद्वैत आत्मानंदात निमग्न आहेत, त्यांनी अमृतरुपी परमात्माच संध्याकाळी डेयांत भरुन सकाळचे प्रहरी उत्तम शृंगार करून तो गोरसाचा भार डोक्यावर घेऊन मथुरेच्या बाजारांत विकण्याकरिता निघाल्या त्या कृष्णदर्शनाचे प्रेम चित्तामध्ये उचंबळून आल्यामुळे हंसत हंसगतीने चालल्या असता त्यांच्या जिवलग मैत्रिणी पुढे खेळत होत्या. त्यांच्या दृष्टिचा संशय कांबळे धारण करणाऱ्या श्रीकृष्णाची सवय लागल्यामुळे फिटला होता. अशा त्या आनंदाने चालल्या असता वाटेतच त्यांना कृष्ण दर्शन झाले. पुन्हा कृष्णदर्शन झाल्याचे त्यांना फार नवल वाटले.कृष्णाला डोळ्यांनी पाहिल्याबरोबर लाजून त्या त्याचे स्वरुपात विरुन गेल्या मन लय पावून त्यांची गति खुंटली तसेच डोळ्यांचे पाहाणे व कानांचे ऐकणे बंद झाले. कारण त्यांचे चित्तच कृष्णाने चोरुन घेतले. उगीच त्यांनी खूण केल्या बरोबर जीव परमात्मरूप झाला. गोपी अंतरबाह्य कृष्णरुप झाल्यामुळे त्यांचे गणगोत सर्व दूर झाले. कारण त्यांचा मनुष्यपणाच नाहीसा झाला. श्रीकृष्णांच्या भेटीनी संसार खुंटला शब्द मावळला. मग मी कोणत्या गोष्टी सांगू कारण हा कृपादानी असल्यामुळे काही व्यवहार करु न देता परमात्मसौख्याचे लाभाकरिता त्यांना रुपातीत केले. त्यामुळे घरी जावयाला म्हणजे प्रपंचाकडे पहावयाला त्यांचा लिंग देह उरला नाही, अशी स्थिति प्राप्त झालेली एक दुसरीस सांगते बाई ‘तत्वमसि’ या महावाक्याने होणारी स्थिती माझी तर होऊन गेली. पण मैत्रिणीनो हे गुज तुम्ही मनात लपवून ठेवा. या अभ्यासाला लागल्याने माझे मीपणाचे पिसे नाहीसे होऊन इंद्रियां सह वर्तमान परिपूर्ण चैतन्यानंद मी भोगित आहे. द्वैतभ्रम सर्व नष्ट झाला. आणि अद्वैत परमात्मरुप झाले. निर्विकार परमात्म्याला अलिंगन देऊन त्याच स्वरूपांच्या बिछान्यां वर आनंद दुणावत आहे. असे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल यांची भेटी झाली संसारासकट मला तारुन, आपले स्वरुपाच्या ठिकाणी घेऊन गेला. असे माऊली सांगतात.


१४६
कासयाची चाड मज नाहीं वो साजणी ।
एकल्या निर्गुणीं वेधियेलें वो माये ॥१॥
पवन वेगाचिनि अंतरले तुम्हासी ।
आतां मागुती वो कैसी परतेन वो माये ॥२॥
ध्यान धारणा तनु मनु करणें ।
ठेवियेलें ठेवणें गोपाळ चरणीं वो माये ॥३॥
ऐसे भुलवणीं भुलविलें नयनीं ।
रखुमादेविवरें चिंतनीं वो माये ॥४॥

अर्थ:-

एका निर्गुण परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मनास वेध लागला म्हणजे मग प्रपंचातील कोणत्याही पदार्थाचे कौतुक उरत नाही. त्याचे वेधा ने मी कसे तात्काळ सोडून दिले म्हणशील तर सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे कोणतेही स्थान लवकर त्याग करतो. त्याप्रमाणे मी तुमचा सर्वांचा त्याग केला (वास्तविक प्रपंचाचा त्याग करावा लागतो असे नाही. कारण परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर उत्तर क्षणीच संसाराचा आपोआपच त्याग होत असतो) अशा रितीने ज्याच्या संसाराचा त्याग सहज झाला आहे. तो पुन्हा संसाराकडे कशाला पाहील. त्या परमात्म ज्ञानाकरिता पूर्वी केलेले ध्यान धारणादि उपाय ज्या श्रीगोपालकृष्णाच्या चरणी लागून गेले होते. ते त्याच्याच चरणीं समर्पण केले. अशा प्रकारे त्या श्रीकृष्णाने आपल्या नजरेने मला भुलवून सोडले आहे. म्हणून रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्याच चिंतनात मी सतत राहात आहे.असे माऊली सांगतात.


१४७
अष्टदळ पाहे पद्म नेत्र दाहे ।
सोहं मंत्र कोहं ठाकी दुरी ॥१॥
आडवीं आडव पारुचा बरब ।
सखिये तो राव रामराणा ॥२॥
उपरती साधि प्रपंची अवघी ।
गुणें गुण उद्वोधी शेजे सये ॥३॥
ज्ञानदेवी लपे विज्ञान हारपे ।
कायम मापें न बाधिती ॥४॥

अर्थ:-

नेत्रांदिदशेद्रियांत अष्टदल कमलाप्रमाणे असणारे, हृदयांत अभिव्यक्त होणा-या परमात्म्याचे चिंतन कर तूर्त सोहं कोहं असे जे मंत्र आहेत ते दूर टाकून दे. संसारुपी अरण्यांत सर्वत्र संकटेच असतात. त्या संसाराच्या पलीकडे असणारा परमात्मा सुंदररूपाचा तो राम राजा आहे. असे समज. प्रपंचाला टाकून मनाचे उलट साधन कर आणि सात्त्विक गुणाने अनंत कल्याण गुणधाम श्रीहरि त्याचा उत्तमबोध करून घेऊन त्याच्या स्वरुपाचे ठिकाणी स्वस्थ राहा. परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी नित्य लीन हो. आणि प्रपंचज्ञान टाकून दे म्हणजे कितीही मोठा संसार असला तरीही बाधा करणार नाही व यमही त्याच्याकडे पाहाणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१४८
सम्यक करी शांति बैसे एके पातीं ।
क्षेमेसि निवृत्ति वाड करी ॥१॥
ऐसा हा उपदेश सखी सांगे जीवास ।
झणी कासावीस होसी बाई ॥२॥
सज्ञानी विज्ञान त्रिज्ञानीं नारायण ।
अन्ययीं शोधून पाहे लक्षीं ॥३॥
ज्ञानदेवीं शिवा उन्मनि रिघावा ।
हरीचा विसावा सर्वांघटीं ॥४॥

अर्थ:-

अरे जीवा, चित्ताची तळमळ शांत करुन क्षमे सह वर्तमान निवृत्ति वाढवून परमात्म्याचे एका पंक्तीला बैस. नाही तर प्रपंचदुःखाने उगीच कासावीस होशील असा उपदेश एक सखी आपले जीवांस करते. अन्वय ज्ञानाने ज्ञानांत विज्ञान आणि विज्ञानात परमात्मज्ञान पाहून तेथेच लक्ष ठेव. शिवस्वरुपाच्या ठिकाणी मनांचे उन्मन होऊन प्रवेश झाल्यांमुळे सर्व शरीरांमध्ये असणाऱ्या श्रीहरि स्वरुपाच्या ठिकाणी विसांवा झाला.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१४९
येरी म्हणे भेद सृष्टी दाविती शब्द ।
तत्त्वीं तत्त्व बोध कोठें गेले ॥१॥
सखी म्हणे बाई आकाराची सोय ।
तुज मज काय इयें देहीं ॥२॥
चपळता सांगो उष्णता घोटी ।
घोटुनियां होणें समब्रह्मीं ॥३॥
ज्ञानदेवीं तट भाग्य जैं उत्कट ।
तैं हें वाक्पट पडती दृष्टी ॥४॥

अर्थ:-

एक सखी दुसरीला म्हणते हे सखे, सृष्टीमध्ये जेवढे म्हणून भेद प्रतितीला येतात.ते सर्व वेदरूपी शब्दच दाखवितात. मग तत्त्वविषयक एकत्व प्रतिपादन करणारा तत्त्वबोध कुणीकडे जाईल. म्हणजे तो देखील त्यांत वर्णन केलेला आहे. दुसरी म्हणते या देहामध्ये दिसणाऱ्या आकारांची सोय म्हणजे शेवट तुला मला काय कळणार? म्हणजे या देहाचा शेवट काय कळणार? त्यावेदवाक्यांच्या ठिकाणी चपलता म्हणजे विलक्षणता कां दिसते? हे तुला काय सांगू? म्हणजे वेदवाक्यांतील विरोध निवृत्त होण्याला उष्णता म्हणजे कठीण साधने आहेत. ती घोटोनियां म्हणजे स्वाधीन करून घेऊन गुरुमुखाने त्या विरोधी वाक्यांची एकवाक्यता यथार्थ समजून घेऊन ब्रह्माशी एकरूप हो. हे वाक्याचे तट म्हणजे भेद पूर्वजन्मीचे अत्युत्तम भाग्य जर उदयाला आले तरच गुरुद्वारा या वाक्यांची एकवाक्यता दृष्टिस पडेल. म्हणजे वेदवाक्यांतील परस्पर भासणारा विरोध नष्ट होऊन जाईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१५०
सखी सांगे सार शाति क्षमा दया ।
प्रपंच विलया बरळ पोशी ॥१॥
सखी म्हणे एका दुजी म्हणे अन का ।
अनेक सिंम्यका गुरुगम्य ॥२॥
सावध निबंध आध्याचा उकला ।
रसनेचा पालव रसना तोयें ॥३॥
ज्ञानदेव सांगे रखुमादेवी जप ।
अगम्य संकल्प एक दिसे ॥४॥

अर्थ:-

एक सखी, दुसरीस सांगते हा सर्व प्रपंच असार असून त्यामध्ये सार जर काय असेल तर शांति क्षमा दया ह्या होत. त्या सोडून नाशवंत प्रपंचाचे आपण वेड्यांसारखे फुकट पोषण करतो. जे परमात्मतत्त्व प्राप्त होणार ते तत्त्व एकच आहे. अशी एक सखी म्हणते तर दुसरी म्हणते. अनेक तत्त्व आहेत पहिली म्हणते अग त्या अनेक तत्त्वांमध्ये एकच परमतत्त्व कसे आहे. असे विचारशील तर ते गुरुगम्य आहे. म्हणजे गुरुपासूनच समजून घेतले पाहिजे. समजून घेतेवेळी सावधान चित्त असून त्याला प्रतिबंध कोणताही असू नये. अशा स्थितीत आपण तत्त्वांचा उलगडा करुन घ्यावा. त्याची चव बुद्धिरुपी रसनेनेच घेतली पाहिजे. अगम्य प्राप्तीचा मनांत संकल्प धरुन त्याच्या नामाचा जप केला असता त्याची प्रतिती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१५१
सखी म्हणे बाई समपण तें कैसें ।
येरी म्हणे देश हिंडूं नको ॥१॥
आंधीम शोधी आप मग पाही दीप ।
कोहं सोहं दीप दवडी दुरी ॥२॥
त्रिपुटीं झोंबों नको मायावी सकळ ।
अवघा सरळ हरी आहे ॥३॥
ज्ञानदेव बुझवी बुझे ज्ञानधारणा ॥
तुज मज सौजन्य येणें न्यायें ॥४॥

अर्थ:-

एक सखी, दुसऱ्या सखीला विचारते बाई साम्यावस्था ती काय ग? सखी म्हणते, अग या नादाने उगीच इकडे तिकडे म्हणजे भलत्याच साधनांत तूं गुंतू नकोस. कारण ज्ञाता, ज्ञान ज्ञेयादि सर्व त्रिपुट्या मायाकार्य आहेत. त्यांना तूं झोंबू नकोस कारण यश्चावत् सर्व त्रैलोक्यां श्रीहरिच आहे. याकरिता तूं अगोदर ‘कोऽहं’ म्हणजे मी कोण आहे. याचा विचार कर. व असा विचार केला असता सोऽहं’ म्हणजे तो परमात्मा मी आहे. असा आपला अनुभव घे. व ती वृत्ति सुद्धा टांकून दे. या ज्ञानधारणेला तूं समजून घेतले आणि ती वृत्ति निवृत्त केली असता तुझ्या माझ्यामध्ये एकरूपता होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१५२
ऐक धावे सुनाट एकीनें धरिलें बेट ।
एकीनें शेवट साधीयेला ॥१॥
कोणे तत्त्वीं हरि कैसी याची परी ।
नांदे कोणे घरीं सांगीजेसु ॥२॥
सखी सांगे बाई भावो घरी देहीं ।
एकारुपा सोयी येईल घरा ॥३॥
बापरखुमादेवीवर विठ्ठल अवचितां ।
निवृत्ति जे समता सांगितलें ॥४॥

अर्थ:-

कांही एक विचार न करता फुकट किरकोळ साधनांमध्ये म्हणजे दान व्रतादिकामध्ये धांवत सुटली. एकीने म्हणजे सांख्यादि तत्त्वविषयक विचार करणारी तिने स्थूल सूक्ष्मसंघातरूपी बेटांत शोध सुरू केला, तिसरीने म्हणजे वेदांत विचार करणाऱ्या तिने परमात्मप्राप्ती करून घेतली. वस्तुतः कोणत्या प्रकाराने, कोणत्या तत्त्वरूपी घरांमध्ये हरि नांदत आहे. असे मला सांगा हो. तिला दुसरी उत्तर देते, बाई, देहरूपी घरांत निष्ठावंत भावाने शोध केला तर तोच या नरदेहरूपी घरांत एकरूपाने प्रतितीला येईल.माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तेच विटेवर समचरणाने एकाएकी उभा आहते. असे निवृत्तीरायांनी सांगितले. असे माऊली सांगतात.


१५३
सांवळीये निळी भुलली एकी नारी ॥
परेचा वो घरीं शुध्दि पुसे ॥१॥
सांगेगे बाईये कोणे घरीं नांदे ॥
कैसें या गोविंदे हिंडविलें ॥२॥
चहूं मार्गी गेलें न संपडेची वाट ॥
मग चैतन्याचा घाट वेंधलीये ॥२॥
ज्ञानदेवी समाधि स्थान पैं विठ्ठल ।
अवघा चित्तीं सळ हारपला ॥३॥

अर्थ:-

शामसुंदर श्रीकृष्णाला पाहून भुललेली एक गौळण परावाणीला विचारु लागली की अग तो श्रीकृष्ण परमात्मा कोठे नांदतो आहे हे मला सांग, मी तर त्या गोविंदाचे घराचा शोध करण्यांत धुंडून, धुंडून दमले. चारी वेदांला पुसले तरी त्याचा ठाव सांपडेना व मग स्वकीय ज्ञानांचाच घाट जो श्रीकृष्ण परमात्मा त्यानेच मला वेध लावला. तात्पर्य अंतःकरणवृत्ति आपले अधिष्ठान चैतन्याचा शोध करु गेली तेव्हा तिचे समाधान तेथेच झाले. त्याच विठ्ठलाचे ठिकाणी माझे समाधि स्थान असल्यामुळे माझे चित्तातील संपूर्ण चंचलता नाहीसी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१५४
मीपण माझें हरपलें ।
शेखी ठकचि विशेखीं पपडिलें बाईये ॥१॥
काय सांगो तुम्हां कैचा हा गोंवळु ।
न म्हणे दिन वेळु आम्हा घरीं ॥२॥
नवल पैं केलें बुडविलें सगुण ।
आपणचि निर्गुण होउनि ठेले ॥३॥
बापरखुमादेवीवरु जीवन आमुचें ।
नाहीं पैं साचें कुळकर्म ॥३॥

अर्थ:-

एक गौळण आपल्या मैत्रीणीला सांगते अग सखे, माझा देहभावच नाहीसा होऊन शेवटी मी चकित झाले. हा श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे ग? तो आमच्या घरी येण्यास रात्र किंवा दिवस कांही एक म्हणत नाही. त्याचे कौतुक काय सांगू बाई ? त्या सगुण श्रीकृष्णाचे संगतीने काय नवल सांगावे? आतां त्या सगुणाने आपले सगुणत्व नाहीसे करून निर्गुण होऊन राहिला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आमचे जीवन असून कुलधर्मही तोच आहे.असे माऊली सांगतात


१५५
आजिवरि होते मी मोकाट ।
तंव डोळे फ़ुकट मोडा तुम्ही ॥१॥
समर्थाचे अंगी पडले अवचिति ।
तुम्हां ऐसि किती चाळविली ॥२॥
बापरखुमादेवीवरा विठ्ठलाचि घरवात जाले ।
जन्मवरी एकांत करुनि ठेले ॥३॥

अर्थ:-

आजपर्यंत मी स्वैर असल्यामुळे लोकांना डोळे घालण्याची फुकट खटपट केली. खटपट करीत असता सहजच समर्थाच्या पदरी पडलें. तुमच्या सारखे भासणारे आजपर्यंत मी किती एक चाळविले. आतां तुमच्या पदरांत पडल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांच्या घरादारांत मीच होऊन जन्मभर एकांत करून राहिले. असे माऊली सांगतात.


१५६
त्वचेचिया रानां धाडूं नको मना ॥
तेयें नंदाचा कान्हा डोळा घाली गो आइयो ॥१॥
गाईचा गोंवळा यमुनेचा पावळा ।
धरी माझा अचुळा मग मी पळालिये गो ॥२॥
ताकपिरी गोंवळी केली मजसी रांडोळी ।
भावे नारली मग मी पळालिये गो ॥२॥
गळा गुंजमाळा गांठी । डांगा मोरविसा वेठी ।
सोकरु लागे पाठी । नंदरायाचा गो आई ये ॥३॥
एक्या करें धरी । विजा करें वेटारी ।
चुंबन दे हरी । मग मी पळालिये गो ॥४॥
ऐसी पळत पळत गेलिये ।
कान्होनें मोहिलिये । माझी मीचि जालिये ।
मग मी समोखिलिये गो ॥५॥
तुना चार । लागतेगोर । तुना बोर लागतो गोर ।
तुना बाही माझी चार । माझी आईयो गो गो ॥६॥
पूर्वपुण्य फ़ळलें । देह मुक्त जाले ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
ऐसें केलें गो आईयो ॥७॥

अर्थ:-

एक गौळण भगवंताची सुंदर कांती बघून दुसऱ्या गौळणीला सांगते आहे. हे बघ तूं आपल्या मनाला त्या श्रीकृष्णाच्या शरीराकडे जाऊ देऊ नकोस.तो श्रीकृष्ण स्त्रीयांना फार डोळे मारतो. काय सांगू बाई यमुनेच्या तीरांवर गायी राखणाऱ्या, कृष्णानी माझा पदरच धरला. त्यासरसी मी पळून गेले.त्याच्याबरोबर असणाऱ्या ताक पिणाऱ्या गुराख्यांच्या पोरांनी माझी फजिती केली. म्हणजे भावाने मला घेरुन टाकले. पण त्यांच्यातून निष्टून मी पळून गेले. त्या श्रीकृष्णांच्या गळ्यांमध्ये गाठलेल्या गुंजाच्या माळा असून हातांत काठ्यां आहेत.आणि ज्याच्या मस्तकांवर मोराची पिसे खोवलेली आहेत. असे ते नंदाचे पोर माझ्या पाठीसी लागले. त्याने मला एका हाताने धरुन दुसऱ्या हाताने अलिंगन देऊन त्याकृष्णाने मला चुंबन दिले. मग मी त्याला सोडून पळून जाऊ लागले. पण त्याकृष्णाने मला मोहित करुन टाकले असल्यामुळे पळून जाता आले नाही. त्यामुळे मी जागच्याजागीच आत्मरुप होऊन संतोषित झाले त्यामुळे हे श्रीकृष्णा आतां मला तुझा आचार व बोलणे गोड लागू लागले. त्याच्या प्रमाणेच माझा आचार झाला.माझे पूर्वपुण्य फलद्रुप होऊन मी जीवन्मुक्त झाले. माझे पिता व रखुमाईचे

पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या कृपेने मला असे केले.असे माऊली सांगतात.


१५७
ठाकुनी आलिये तुजपाशीं ।
थिते मुकलिये मनुष्यपणासी ॥१॥
भलें केलें विठ्ठला पिकें भरला साउला ।
घरीचीं कोपतीं सोडी जाऊं दे वहिला ॥ध्रु०॥
संसार साउला माझा पालटुनि देसी ।
तरी मी होईन तुझी कामारी दासी ॥२॥
संसार साउला माझा पालटुनि देसी ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठला गुणरासी ॥३॥
अर्थ:-

एक गवळण म्हणते. हे श्रीकृष्णा मी तुझ्याजवळ आल्याबरोबर मी आपल्या मनुष्यपणाला म्हणजे जीवभावाला मुकून गेले. तुझ्याजवळ आल्याबरोबर तूं माझे अंगावर पिचकारी मारलीस. त्यामुळे माझे वस्त्र सगळे भिजून गेले. तूं हे चांगले केलेस का? अरे हे पाहिल्यावर माझ्या घरची मंडळी माझ्यावर फार रागावतील. म्हणून मला लवकर घरी जाऊ दे. हे माझे संसाराचे वस्त्र जर पालटून देशील म्हणजे ज्या संसारास मी सत्य समजत होते. त्याचा मिथ्यात्व निश्चय करुन टाकशील तर मी तुझी कष्ट करणारी दासी होईन. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी माझे हे संसाररुपी वस्त्र पालटून दिल्यामुळे मी त्याचे गुणराशी म्हणजे निर्गुण स्वरुपाशी एकरुप झाले. असे माऊली सांगतात.


१५८
में दुरर्थि कर जोडु ।
तार्‍हे सेवा न जाणु ॥१॥
मन्हारे कान्हा मन्हारे कान्हा ।
देखी कां नेणारे मन्हा कान्हारे ॥२॥
तार्‍हा मराठा देश । मन्ही बागलाणी भाष ॥३॥
घटि पटि विजार । खंडे भाले तरवार ॥४॥
बापरखुमादेविवरु जाण । ऐसे मन्हा कान्हा ॥५॥

अर्थ:-

नाशिक जिल्हाच्या उत्तरेच्या भागाला बागलाणी भाषा आहे. त्या भाषेत एक गौळण म्हणते. हे श्रीकृष्णा, मी दोन्ही हात जोडून तुला शरण आले आहे. तुझी सेवा कशी करावी हे मला माहित नाही. मला असे वाटते की तुला डोळे भरुन पाहावे. व कांनानी तुझे गुणानुवाद ऐकावे हे श्रीकृष्णा, तूं महाराष्ट्र देशांत राहाणारा व माझी (वेडी) बागलाणी भाषा असल्यामुळे मी तुला कशी आळवू ? हे मला कळत नाही. शास्त्रातील घटा पटाचा विचार मोडून काढण्याला तुझे नामोश्चरण ही एक ढाल तलवारच आहे. हे माझा कान्हा श्रीकृष्णा तूंच माझे पिता व रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल आहेस असे माऊली सांगतात.


१५९
मज तुरंबा कां वो जिये तिये ।
जेणें वेधें हरि सोयरा होये ।
मज लावा कां वो चंदन ऐसिये परीचे ।
जे लाविलियाचि अनादि पुसोनि जाये वो ॥१॥
मज करा कां वो कांहीं एक ।
जेणें करणें ठाके अशेख ।
सरा कांवो मज आडुनि मज पाहों द्या ।
आपुले मुखगे माये ॥२॥
मज श्रृंगारा कां वो तया जोगी ।
पुढती अंग न समाय अंगी ।
या मना पासोनी पढिये तो गोंवळु ।
तोचि तो जिव्हारीं भोगीनगे माये ॥३॥
देह पालटा वो तयासाठीं ।
वरच या देईन अवघी सृष्टी ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठलास योगी ।
तोचि तो त्यागुन भोगीये माये ॥३॥

अर्थ:-

मला अलंकार वगैरे घालून ‘जिये तिये’ म्हणजे जिकडून तिकडून सर्व प्रकाराने अशी नटवा की ‘जेणें वेधे’ म्हणजे ज्या नटवण्याच्या योगाने हरि माझा सोयरा, माझा प्रीति करणारा होईल. माझ्या अंगाला, अशा प्रकारची उटी लावा की ज्या उटीच्या वेधाने श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती होऊन अनादि जो जन्ममरणरूपी संसार पुसोन जाईल. मला अशी काही एक युक्ति करा की ज्या करण्याने हरि प्राप्त होऊन कांही एक करावयाचे राहणार नाही. आणि कर्तव्यभावही राहणार नाही. ज्याच्या योगाने श्रीकृष्ण परमात्मप्राप्ती सुखावह होईल. या दर्शनाच्या आड येणाया अशा ज्या माझ्या स्वरूपांत मावणार नाही. ‘तया जोगी’ म्हणजे अशा प्रकारचे मला अलंकार घाला. या सर्व प्रयत्नांचा हेतु एवढाच की मला मनापासून तो गोवळु म्हणजे श्रीकृष्ण.’पडिये’ म्हणजे अत्यंत प्रियकर वाटतो. अशा उपायाने तो प्राप्त झाला म्हणजे मग त्याचा मी ‘जिव्हारी’ म्हणजे अंतकरणात भोग भोगिन त्याच्या प्राप्ती करता मााझा सर्व देह पालटुन टाका. कोणी असतील त्या बाजूला सारा मध्ये आड येऊ नका. मला आपल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे ‘मुख पाहू द्या. ज्या शृंगाराच्या योगाने माझे अंग म्हणजे माझे स्वरूपच अंतःकरणांत भोग भोगीन. त्याच्या प्राप्तीकरिता माझा सर्व देह पालटून टाका. काय सांगू त्याच्या प्राप्तीपुढे सगळी सृष्टी तुम्हाला बक्षीस देईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्या संयोगांत तो दुखःरूप संसार टाकून आनंदाचा फार भोग भोगीन. असे माऊली सांगतात.


१६०
तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती ।
तव तुवां नवल केलें वेणू घेऊनि हातीं ।
आलिये तेंचि सोय तुझी वोळखिलें गती ॥१॥
नवल हें वालभरे कैसें जोडलें जिवा ।
दुसरें दुरी ठेलें प्रीति केला रिघावा ॥२॥
पारुरे पारुरे कान्हा झणे करिसी अव्हेरु ।
तूं तंव ह्रदयींचा होसी चैतन्य चोरु ।
बापरखुमादेवीवरा विठो करि कां अंगिकारु ॥३॥

अर्थ:-

श्रीकृष्णा तुझ्यावांचून रात्री मला एकटीला करमत नव्हते केव्हा तुझे दर्शन होईल अशी फार उत्कंठा होती. इतक्यांत तूं असा चमत्कार केलास की हातांत वेणू घेऊन तूं वाजवू लागलास. अशा वेळी सर्व घरदार टांकून ज्या तुझ्याकडे यमुना तीरी आल्या त्यांनी तुझ्या प्राप्तीची सोयं ओळखली. तुजवरील असलेल्या प्रेमाचा काय चमत्कार सांगावा? घर, दार, मुले, बाळे सर्व दूर करून अंतःकरणांत ज्यांनी तुझी प्राप्ती करून घेतली म्हणजे परमानंदरूप जो तूं तो तूच अंतःकरणांत प्रवेश केलास. पारु रे पारू म्हणजे त्रिगुणात्मक कार्याच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णा आम्ही त्रिगुणात्मक कार्याशी तद्रुप असल्यामुळे कदाचित तूं आमचा अव्हेर करशील परंतु तूं आमचे चित्ताचा चोरणारा असल्यामुळे(अर्थात् देहतादात्म्य नष्ट करणारा असल्यामुळे) आमचे हृदयांत वास करणारा होऊन माझे पिता व रखुमादेवीचे पती असलेल्या श्रीविठ्ठला तूं आमचा अंगीकार कर. असे माऊली सांगतात


१६१
जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी ।
पुरोनिया उरे महावरीरे गोवळा ॥
तेजें शोकलें काई आणावया गेलें ।
तैसी नवल तुझी कुसरीरे गोवळा ॥१॥
चाळा लाउनि गोवितोसी दाउनियां लपसी ।
लपोनि केउता जासी तैसी माव न करी
आम्हासिरे गोंवळा ॥२॥
वायु काय वोखट चांग विचारुनी वाजे ।
तयाविण कवण ठावो असे ॥
तो आपुलि चाडा करि कोडिवरी येरझारा ।
सेखीं गगनीं सामावला दिसेरे गोंवळा ॥३॥
आकाश तेंचि अवकाश तुजमाजि हें
विश्व कीं तूं विश्वीं अससी ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठला न बोले ।
तुझें वर्म बोलतां निकरा झणे जासीरे गोंवळा ॥४॥

अर्थ:-

श्रीकृष्णपरमात्मा निर्गुण स्वरुपाने सर्व जगांत व्याप्त असून सगुणरुप घेऊन जगतांत कशी क्रीडा करतो हे या अभंगामध्ये वर्णन करतात. सूर्य आपल्या किरणांनी समुद्राचे पाणी शोषण करुन मेघाच्या रुपाने त्याचा पुन्हा वर्षाव करतो. ही स्थिति मनांत घेऊन मेघ त्यापासून जलाचा वर्षाव होतो. त्यांना प्रत्यक्ष किंवा परंपरेने सिंधुजळ ज्याप्रमाणे आश्रय असतो. त्या मेघांला आवश्यक तितके पाणी पुरवून पुन्हा आपण पृथ्वीवर जसा असावा तसा असतोच. सूर्यतेजाने शोषण केलेले पाणी आणण्याकरिता समुद्र जातो काय? त्याच्या ठिकाणी ते आपोआपच येऊन मिळतेच त्याप्रमाणे. तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी कितीही जगत व्यवहार झाला तरी त्याला आश्रय तूंच आणि शेवटी जगत च तुझ्याच स्वरुपांच्या ठिकाणी जाऊन मिळणार. याप्रमाणे तुझे हे कलाकौशल्य कांही विलक्षणच आहे. प्रपंचाचा चांगलेपणा दाखवून त्यांत जीवाला गुंतवून आपण लपतोस. जरी अज्ञानी जीवाला आपले स्वरुप लपविलेस तरी तुझी व्याप्ती सर्व ठिकाणी असल्यामुळे तूं कोठे जाशील परंतु आम्हांला मात्र असा मोह घालू नको. असे पहा की वारा जेव्हां जोराने वाहतो. त्यावेळेला हा भाग चांगला, हा भाग वाईट असा विचार करुन वाहतो का? त्याचे जोराने वाहणे हे विशेषरुप नाहीसे झाले तरी. त्याचा वायुरुपाने सर्वत्र वास आहेच. वायु नाही असे कोणते ठिकाण आहे सांगा? याप्रमाणे त्या वायुचे रुप सर्वत्र व्याप्त असूनही तो आपल्या इच्छेने कोट्यावधी येरझार करतो. येरझार संपल्यावर शेवटी आपले कारण जे आकाश त्यांत लय पावतो. त्या आकाशाला आश्रय देणारा जो तूं त्या तुझ्यामध्ये विश्व आहे. व विश्वांत तूं आहेस असा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला हे काय बोलावे लागते? कारण तुमच्या निर्गुण सगुण स्वरुपाचे मुख्य वर्म हेच आहे.तुझे हे वर्म बोलिलो म्हणजे तूं कदाचित निकरा म्हणजे चिडला जाशील. असे माऊली सांगतात


१६२
लेकुरें नसतील काय घरोघरीं
काय न वीये ते माया ।
परि हे दशा वेगळी न बाईहो ।
हा न ये त्या आधीं जीव निघों पाहे ।
आला तरी उरो नेदि कांही ।
जाय तरी जाय । डोळे तळमळिता ठाये ।
लांचावला जिऊ । राहेगे बाईये ॥१॥
तमाळनिळें चांदिणें वो वारि वोवराल आपुलीयेस बये ।
हें मूळदृष्टी पुढें रिघोनिया झाडा घेत आहे ।
येणें कान्हयें कासाविस केलेंगे माये ॥२॥
नेणो कैसे बाळसें ।
डौरलें डोळां लासे ।
माजि महुरजता हे हांसे । भोळिवेचे ।
देखिलियाचि पुरे । घालुनि दॄष्टीचें भुररें ।
मग तें ह्रदयीं वावरे । इच्छावसेंगे माये ॥३॥
थुरथुर करितु । शक्ति भोळी वाचालतुं ।
मुग्दुलें गुणें बोलतुगे माये ॥
असाबतु सावळिया प्रभा
डोळसु नभाचा गाभा ।
कटीं कर ठेऊनियां उभा ।
हेंचि जाणगे माये ॥४॥
पाहों याची नवलपरी । बरवेपणाची हाउली वरी ।
दृष्टी करवी झोंबवी । यासि कवण वारी ॥
आम्हीच साहातों अळी । परी हे चुबडी भली ।
रिघोनिया आड घाली । अगंकांतीगे माये ॥५॥
पहा वो याचा खेळु आमचे नासे ।
कोपो तरी खदखदां हांसे ।
जी जी बाळा म्हणों तरी रुसे वो ॥
राहो नेदी सुखें । न राहे निमिष एके ।
वारा कां गोडी सेविखें । कान्हो दिठीचें माये ॥६॥
आतां येईल म्हणोनि सांपडऊं द्वारें ।
आडऊं तंव झळाळित दिसताहे उजियेडें ।
भितरींच्या भितरी लांबा धुमाळु चाचरु ।
मांडी कामापा़डीं आवारुगे माय ॥७॥
गार्‍हाण्याचें निमिसें । गौळणी उचंबळता हे ब्रह्मरसें ।
वान वसे चोपसें । कृष्णाचेनि ॥
मालाथुन एक मोहरें । देवपण धाडिलें अनुरे ।
भावो किं देवों बैसवाल धुरें । पुसे निवृत्तिदासु ॥८॥

अर्थ:-

घरोघरी काय लेकरे नाहीत? कोणी माता, आपल्या मुलांना काय प्रसवीत नाहीत? परंतु कृष्णाच्या स्वरुपाची स्थिती काही वेगळीच आहे. एक गौळण म्हणते काय सांगावे बाई हा घरी आला नाही तर त्याच्या वियोगाने प्राण जाण्याची पाळी येते. बरे आला तर घरांत दूध, दही, लोणी, कांही उरु देत नाही. परमार्थदृष्टीने देहभावही उरु देत नाही. जर येथून गेला तर त्याचे दर्शनाकरता डोळे तळमळत राहून जीव सारखा लाचावल्या सारखा होतो ग बाई. हा श्रीकृष्ण म्हणजे नीलवर्णाचे चांदणेच होय. त्याला नेहमी पाहाण्याच्या सवयीने घरांतून बाहेर घालवून दिला तरी पुन्हा वृत्ति त्यालाच वरते. हे श्रीकृष्णमूल आमच्या डोळ्यापुढे येऊन आमच्या सर्ववृत्तीच्या झाडा घेत आहे. किंवा घरांत काय आहे नाही याचा झाडा घेत आहे. काय सांगू? या कान्हाने जीव अगदी कासावीस करुन टाकला. काय सांगावे ! या श्रीकृष्णाचे रुप ! याच्या डोळ्यांतील तेजाने आमचा डोळा चोरला जातो त्याचे भोळेपणातील हंसणे किती मधुर आहे. आमच्या दृष्टीला भूल घालून आपल्या इच्छेने आमच्या मनांत शिरुन व्यवहार करतो. भोळ्याभावाच्या शक्तिने कसा तुरतुर चालतो आहे? कितीतरी त्याचे ठिकाणच्या उत्तम गुणांने बोलतो.याच्या नभाच्या गाभासारखा सांवळ्या कांतीने त्याची स्पष्ट प्रभा दिसत आहे. असा जो श्रीकृष्ण तोच या विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे. याच्या चांगलेपणाचा चमत्कार पाहू गेले असता त्याच्याकडे दृष्टि गेली तर तिचे निवारण कोण करील? त्याच्याकडे पाहाण्याचा आळ आमचेवर आला तर तो आमचा आम्ही सहन करु. पण त्या लौकिकाची पर्वा न करता ती अंगकांतीच लौकिकाचे आड प्रवेश करते. काय याचा खेळ आमच्या सर्व घरांदाराचा नाश करुन टाकतो. त्याच्यावर रागावयाला जावे तर खदखदा हासतो. मृदु भाषेने बाळा, असे करतोस म्हणावे तर रुसतो. सुखाने आम्हाला कधी क्षणभर राहू देत नाही. त्या सुंदरपणाकडे पाहून त्याला घालून देणे विषासारखे वाटते. असे त्याचे दृष्टित कौतुक आहे. आता हा घरांत येईल आपण त्याला घरांतच अडवून धरु असा विचारावा तर तो घराच्या आतच आपले प्रकाशांने दिसतो. आणि तेथेच मनाप्रमाणे धुमाकुळ घालून आम्हालाच आवारांत अडकवल्यासारखे करतो. त्या भान श्रीकृष्ण परमात्म्याची गाऱ्हाणी सांगण्याच्या निमित्ताने त्या गोपीच्या अंतःकरणात ब्रह्मरसाच्या उकळ्या फुटत आहेत.कृष्णांच्या सौदर्याकडे पाहून त्या गोपी एका निस्तेज होऊन जातात. त्यांनी आपला परमात्मभाव वस्तुतः निराळाच ठेवला आहे परंतु अशा श्रीकृष्णाला प्रमुखभावाच्या स्थांनी बसवाल की नाही असे निवृतीदास ज्ञानेश्वर महाराज विचारतात.


१६३
आधाराचक्रीं निवणें मांडिलें कैसां
डेरिया उपचार केला ।
तिन्ही संयोग गोमटें घुसळण
रविबजो मेरु वो ।
तेणें आणलें समयातें तेथें
वरुवचन लाधलें निरुतें वो ॥१॥
विद्यापात्रें गौळणी मंथन करुं ब्रह्मज्ञानी वो ।
चाल निज निज पंथें कैसें
नवनीत आणिलेंसे हाता वो ॥ध्रु०॥
गुरुउपदेशें रवि धरी अधऊर्ध्व मांजरी
पांचै प्राण मंथन केलें निरुतेंवो ।
ईडा पिंगळा कुंडलणीया ब्रह्मसूत्र
दोरु तो आणिया वो ।
उभी राहोनि गगनीं अनुहातें अंबर गर्जे वो ॥२॥
मन एकतत्त्वीं करी वो । चित्त दृढ धरी वो ।
तयामाजि न विसंबे कांहा ।
ऐसा गोरसु चोखटु ।
मोलेंविण येतसे फ़ुकटु । यासि न वचे कांहीं ।
चित्त बैसे समरसें ठाईवो ॥३॥
गौळणी गोमटी हातिं कसवटी क्षीरा नीरा
निवाडा करी वो ।
मेघडंबर न विसंबे तेथें घुसळितां
थेंबु जो नुसळे वो ।
जन पाडलेसे धंदा गोरसा गोडी
नेणती अंधे वो ॥४॥
काया हे नगरी गौळणी गोरसु पुकारी
नवहि दारवंटे सांडुनि वो ।
दशवेद्वारीं पातली कैसी विनटली गोविंदींवो ।
दंभ विकरा जाला अधर्म धर्म लोपला वो ।
अवघी काया झांकुळली बापरखुमादेविवरा विठ्ठलीं वो ॥५॥

अर्थ:-

जगताचा उद्भार होणे हे मूळ कर्म, त्याचा जो सतत आचार ते आचारचक्र, त्याच्या वर ती चुंबळ करुन जगतरुपी डेऱ्याचा उपचार केला. किंवा आचार चक्र ज्यांच्यावर फिरत आहे. तो परमात्मा त्याच्यावर आचारचक्राची चुंबळ व त्याच्यावर जगतरुपी डेरा ह्या तिन्हीचा उत्तम संयोग झाल्यावर त्याला घुसळण्याकरिता मेरु पर्वतास रवि केले. त्या घुसळण्यांच्या व्यवहारांत आत्मविद्या देणारे गुरुवचन सहज प्राप्त झाले. विद्येला उपकारक अशा गुरुशास्त्रादि पात्रांची, प्राप्ती झाली, असता ब्रह्मज्ञानाची इच्छा असणारी मुमुक्षुरुपी गौळणी विचाररुपी मंथन करु लागल्या असता ब्रह्मज्ञानरुप नवनीत त्यांच्या हाती आले. दुसऱ्या पक्षी गुरु उपदेशाची रवि. विचारुपी डेऱ्याच्या मधोमध करुन पाचही प्राणांचे चांगले प्राण निरोध केला. इडा, पिंगळा आणि कुंडलिनी ही त्रिवेणी ब्रह्मसूत्राची दोरी करुन उभ्या राहून घुसळू लागल्या. तो अनुहतध्वनीने चिदाकाश घुम घुम आवाजाने गर्जू लागले. असा ब्रह्मप्राप्तीचा एक उपाय आहे. याकरिता हे मुमुक्षु तूं एक परमात्मतत्त्वांच्या ठिकाणी मन किंवा चित्त दृढ कर. यांत यत्किंचित अंतर पडू देऊ नकोस. असे केलेस तर परमतत्त्वरुपी स्वच्छ गोरस कांही एक खर्च न होता फुकट हाती लागून चित्त सामरस्यांत स्थीर होईल. अशा त-हेचा चांगली मुमुक्षु गवळण हातांत क्षीरनीराची कसवटी घेऊन, प्रपंच परमार्थ यांचा निवाडा करते. त्या चैतन्यरुप आकांशात न विसंबता सारखे घुसळण केले तर त्यातील एक थेंबही बाहेर पडत नाही. पण काय करावे. सर्व जग प्रपंचाच्या धुंदीमुळे आंधळे होऊन या गोरसाची गोडी जाणत नाही. पण मुमुक्षुचे भाग्य असे की या शरीररुपी नगरांतच इंद्रियरुपी नऊ द्वारे बंद करुन ज्ञान प्रगट झाले. त्या. दहाव्या द्वारांत प्राप्त होऊन गोविंदरुप बनून निर्धास्त रितीने ते ब्रह्मरुपी गोरस कोणाला हवा असेल तर घ्या. असा पुकारा करते. काय ऐश्वर्य सांगावे दंभादि विकार हा अधर्म आणि कर्मोपासना व आचारादि धर्म है लोपून जावून सर्व शरीर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल त्यांनी परमात्मरुप झाले. असे माऊली सांगतात.


१६४
ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही
तया जना हातु नाहीं ।
ठेविलें अग्निवरी अग्नि नाहीं भीतरी ।
तापलें पडिभरी साय आली ॥१॥
गौळणी चतुरे झडकरी ।
जाय मथुरे विकरा करी ॥२॥
दहियामहियाविण घातलें विरजण ।
मांडिले घुसळण रवियेवीण ।
करिती मंथन वरी आलें जीवन ।
एकलें आणून काढूं पाहे ॥३॥
आलें गिर्‍हाईक । न विकी तूप ताक ।
नेणती विवेक । गोरसाचा ॥
दहियामहियाच्या करुनी घागरी ।
लटकी उंबरा उबरी । काय करुं ॥४॥
ज्ञान हे घागरी । वाईयेली शिरीं ।
गोरसभीतरीं दाखवितो ।
एके हातें सावरी । झाकी तया वरी ।
चोखटिव करी । गोरसाची ॥५॥
तंव मार्गी जातां । एकी पुसे गौळणी ।
पारि बैसले दानीं किं । नाहीं वो ।
त्यासी नेदीं मी दान । जाईन मी आपण ।
प्रत्यक्षा प्रमाण । काय करुं ॥६॥
ऐसी पाराजवळी गेली । तंव शब्दें वोळखिली ।
जावों दे गा वहिली । उसिरु जाला ॥
या निर्वाणींच्या बोला । सुखिया संतोषला ।
निरोप दिधला । गौळणीसी ॥७॥
ऐसी पावली मथुरा । क्षण न लगे विकरा करा ।
सवेंचि एकसरा । उफ़खा झाला ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु ग्राहिक मानसीं गोरसु ज्ञानेंसि ।
मिळोनि गेला ॥८॥

अर्थ:-

परमात्म्याचे श्रुतिसिद्ध यथार्थ ज्ञान हीच गाय तिच्यापासून दूध निघणार ते ब्रह्मसुखच आतां त्या दूधाचे परिणाम दह्यादिक त्याची विक्री करणारी गौळण त्याची गिहाईक इत्यादि प्रकार ब्रह्मस्वरुपावस्थानस्थितिमध्ये कसे संभवेल? संभवणारच नाही. कसे संभवणार नाही ते पहा. कारण त्या ब्रह्मानंदाशिवाय दुसरे काही ही नाहीच. त्याला हात नाहीत. ते अग्नीवर तापत ठेवले अशी कल्पना केली तर चुलीत अग्नी नाही. आणि अग्नी नसलेले दूध तापवून साय पुष्कळ आली आहे. त्याची विक्री करण्याकरिता एक चतुर गवळण मथुरेत गेली. दही ताकांवाचून त्या दूधांत विरजन घालून रविवाचून घुसळले. व ती मंथन करु लागली मंथन करीत असता एक परमात्माच प्रतितीला आला. तरी ती लोणी समजून काढून पाहू लागली. असल्या गोरसाचा विवेक न जाणणारी गिऱ्हाईक आली. तर ती गौळण तूप, ताकादिकांची विक्री करीत नाही. मूळचेच ताक दही वगैरे सर्वच मिथ्या आहे. तेव्हां याची उभारणी काय करावी. गौळणीने ज्ञानाची घागर डोक्यावर घेतली असली तरी त्यातला गोरस ज्ञानयोग्य अधिकाऱ्याला दाखवून अज्ञानाकरता झाकून टाकते. अशा रितीने गोरसाची अवस्था करते. इतक्यांत मार्गात दुसऱ्या एका गौळणीने तिला विचारले की. ‘बाजारांतील पारावर म्हणजे मुख्य ठिकाणावर तूही विक्री करण्याकरिता बसतेस की नाही. हिने उत्तर केले की, अनधिकाऱ्यांना मी हे देणार नाही. पाहिजे तर मी आपले परत जाईन. असे सांगून ती पाराजवळ गेली. इतक्यांत तिला शब्दांवरुन देवांने ओळखिले. तेव्हा ती देवाला म्हणते. मला घरी लवकर जाऊ दे. फार उशीर झाला. या तिच्या निःसंदेह निर्वाणीच्या भाषणाने देव संतुष्ट झाला. व तिला जाण्यास परवानगी दिली. अशा देवांच्या मधुर भाषणाने तिला फार आनंद झाला. तिला विक्रीची तर जरुरच नव्हती म्हणून ती तशीच आनंदात परत घरी आली तो भगवंताचा वियोग झाला त्यामुळे तिला फार त्रास झाला. या ज्ञानाच्या दुधाचे खरे गिऱ्हाईक म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल, तो श्रीविठ्ठलरुप गोरस ज्यांच्या मनांत ज्ञानाच्या योगाने मिळून गेला आहे. तो धन्य होय. असे माऊली सांगतात.


१६५
चालतां लवडसवडी । बाहुली मुरडली ।
माथां गोरसाची दुरडी । जाय मथुरे हाटा ॥
सवेंची विचारी जिवीं । महियाते सादावीं ।
तंव तो अवचिती पालवी । नंदनंदनु ॥
पाहेपां सुखाचेनि मिसें ।
झणी करी अनारिसे । तेव्हां उरलें तें कैसें ।
माझें मनुष्यपण ॥
विनवी सखीयातें आदरें । तुह्मीं गुह्याचीं भंडारे ।
अघटित घडिलीं या शरीरें । प्रगटीत न करा साजणी वो ॥१॥
काय करणें वो काय करणें वो ।
देखोनी सांवळा तनु । लुब्धला माझा मनु ।
लागलेंसें ध्यानु । द्वैत निवडे ना ।
डोळा भरुनिया बाळा देखे श्रीरंगु सांवळा ।
वेध वेधल्वा सकळां । गोपी गोविंदा सवे ॥
ठेला प्रपंचु माघारा । भावो भिनला दुसरा ।
पडिला मागिल विसरा । कैचें आपुलेंपण ॥
सहज करिता गोष्टी । पाहातां पडिली मिठी ।
जाली जन्में साठी । सखियेसाजणी वो ॥२॥
ऐसें सोसितां सोसणी । सखी झाली विरहिणी ।
आतां मथुरा भुवनीं । मज गमेल कैसें ॥
सरलें सांजणें विकणें । निवांत राहिलें बोलणें ।
पूर्ण गोरसा भरणें । माथा त्यजूनिया ॥
जाली अकुळाचें कुळ । तनु जाते बरळ
फ़िटलें भ्रांतीपडळ ।
दोन्ही एक जालीं ॥
बापरखुमादेविवरीं । अवस्था लाऊनि पुरी ।
भावें भोगूनी श्रीहरी ।
मन मुक्त साजणी वो ॥३॥

अर्थ:-

एक गौळण गोरसाची भांडी दूरडीत घेऊन मथुरेच्या बाजारांत धांदलीने जात असता एकाएकी बाहुली मुरडली तो श्रीकृष्ण केव्हां भेटेल असा विचार करीत असता तो तिच्या मनांतला विचार श्रीकृष्णाने जाणून तिच्यापुढे स्वतः श्रीकृष्ण प्रगट होऊन तिला खूण करुन बजावू लागले. सुखप्राप्तीच्या निमित्त इच्छेने संसाराकडे मन जाऊ देशील? असे बोलल्याबरोबर माझे मनुष्यपण कसे उरेल? ही माझी कृष्णसबंधाने झालेली स्थिति तुम्ही गुप्त ठेवाल अशी माझी खात्री असल्यामुळे माझ्या शरीराची कृष्णमय झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवा. काय करावे वो ! ती कृष्णांची सांवळी तनु बघितल्याबरोबर माझे मन लुब्ध होऊन गेले. काय करावे सखे? त्याचे ध्यान लागून गेले. कृष्णाशिवाय डोळ्यांना द्वैत दिसेनासे झाले. तो बालक सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण बधितल्याबरोबर मीच काय सर्व गोपीनां वेध लागून गेला. प्रपंच आठवेनासा झाला. दुसरा भाव नाहीसा झाला. मागील प्रापंचिक गोष्टीचा विसर पडला. तेथे आपलेपणा ठेवा कोठे. सहज त्या कृष्णाची गोष्ट बोलता बोलता एकदम दर्शन होऊन जन्माचे सार्थक झाले.अशी ती गौळण श्रीकृष्ण परमसौख्याचा उपभोग घेत असतांना भगवान एकाएकी गुप्त झाले. त्यामुळे ती विरहिणी होऊन म्हणते. आज मला मथुरेत करमेल कसे? दही दूध विकणे वगैरे सर्व व्यवहार संपले. बोलणे थांबले. माझ्यावरची पाटी टाकून पूर्ण गोरस जो परमात्मा त्याने मी परिपूर्ण झाले. माझे कुळ नष्ट झाले आतां शरीर व्यवहार अव्यवस्थित झाला. कारण देहाभिमानाची भ्रांती गेली त्या श्रीकृष्णाचे व माझे ऐक्य झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण परमात्मा त्याने माझ्या भावाचा भोग घेऊन व मला परमात्मरुप करुन श्रीहरिने मनाला संसारांतून काढून मुक्त केले. असे माऊली सांगतात


१६६
दुडिवरी दुडि साते निघाली ।
गौळणी गोरसु म्हणों विसरली ॥१॥
गोविंद घ्यावो दामोदर घ्यावो ।
तव तव बोलती मथुरेच्या वो ॥२॥
गोविंद गोरसु एकचि नांवा ।
गोरसु विकूं आलें तुमच्या गांवा ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठलेंसी भेटी ।
आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥

अर्थ:-

भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगलेली एक गौळण गोरस भरलेले डेरे एकावर एक ठेवून मथुरेच्या बाजारांत विकण्यांकरिता गेली असता ती दही घ्या वो दही, दूध घ्यावो दूध, असे म्हणण्याचे विसरुन. गोविंद घ्या हो, दामोदर घ्या हो. असे म्हणू लागली. तेव्हां मथुरेच्या गौळणीनां या तिच्या म्हणण्यांचे आश्चर्य वाटून, ही असे काय म्हणते असे एकमेकीत बोलू लागल्या आणि तिला परमात्म्यांचा वेद लागला आहे. असा त्यांनी निश्चय केला. मथुरेच्या बायांचे ते मनोगत जाणून विकणारी म्हणाली गोविंद काय किंवा गोरस काय या दोहीचा अर्थ परमात्माच आहे. कारण सर्व त्रैलोक्य परमात्मरुप आहे. आणि तोच की, तुमच्या गांवात विकावयाला आणला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची यथार्थ भेट झाली असता, भेट होणाऱ्याला तो आत्मरुप करुन टांकतो. म्हणजे भेट घेणारा परमात्मरुप होतो. अर्थात त्याचे सर्व व्यवहारही परमात्मरुपच असतात. असे माऊली सांगतात.


१६७
रांगतु रंगणीं चोरितु लोणी धांवोनि धरिती गौळणी ।
बांधतिचरणीं देति गार्‍हाणीं यशोचे साजणी ।
दधि घृत भक्षून तमाळनीळें नवल केलें साजणी ॥१॥
कृष्ण आळिवा । परतोनि मातें दावा ॥ध्रु०॥
कृष्णा कान्हा मधूसूदना कामिनी मनमोहना ।
योगि ध्याना हरस्मरणा । गोपी ध्याना ।
मानिती कान्हा । बोलती यमुना ॥२॥
नेणवसी नेणवसी । आकळु तूं नाकळसी ॥ध्रु०॥
इंद्रनिळा श्रुति जनकिरळा । सुरी जघन सांवळा ।
कंठीं माळा कौस्तुभ गळा । प्रीति तुळसी द्ळा ।’
कांसे शेला सोनसळा उभा बळिभद्राजवळा ॥३॥
कृष्ण सांवळा डोळसु । सहजे परमहंसु ॥ध्रु०॥
सदानंदा श्रीमुकुंदा । श्रीहरि परमानंदा ।
आनंदकंदा । अभय प्रल्हादा ।
पावकनादा धेनुलुब्धा । गोविंदा गोपाळा ॥४॥
कृष्ण आमुचा आमुचा । खेळिया गौळियाचा ॥ध्रु०॥
कर्पुरगौरा मन स्थिरा । पुराण गुणगंभिरा ।
विरादिवीरा महाविरापांडवदळ साह्यकारा ।
मथुरा नगरा कंसासुरा । शिक्षा लाविसी चाणुरा ।
अति सुंदरा तूं पेंडारा ॥
बापरखुमादेविवरारे ॥५॥
जाणितलें जाणितलें माझें मज दिधलें ॥ध्रु०॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या घरी अंगणांत रांगत असत. रांगता रांगता चोरून लोणी खात असत एके वेळी एका गवळणीने चोरून लोणी खांत असतांना श्रीकृष्णाला पाहिले व धावत जाऊन त्याच्या पायाला दोरी बांधून यशोदेपुढे कागाळी करून त्या गवळणी म्हणू लागल्या. यशोदे हा तुझा तमालनील श्रीकृष्ण आमच्या घरी येऊन घरांतील दही दूध तूप सर्व खाऊन टांकून आज मोठे नवल केले. तेंव्हा तूं त्याला असे करण्याबद्दल काही तरी समजून सांग यशोदा. त्या कृष्णाला मजकडे आणून मला दाखवाल तर खरे. असे म्हणून त्या गोपी श्रीकृष्णाला आळवू लागल्या. मधुनामक दैत्यांचा नाश करणाऱ्या, शंकराच्या स्मरणांत योग्य असणाऱ्या, यमुनेवर क्रीडा करणाऱ्या असे तुला म्हणतात हे खरे. तथापि त्यापैकी तूं कोणालाच आकलन होत नाहीस.इंद्रनीलाप्रमाणे कांती असणाऱ्या श्रुतिजनांबरोबर क्रीडा करणाऱ्यां, देवांबरोबर क्रीड़ा करणाऱ्या, मेघाप्रमाणे सांवळा वर्ण असणाऱ्या, कौस्तुभाची माळा गळ्यांत असणाऱ्या, माळा असली तरी तुळशीपत्रांवर प्रीति करणाऱ्यां, पिवळ्या रंगाचा पितांबर नेसणाऱ्या, आणि आपला बंधु बळिभद्र त्याजवळ उभा राहून शोभणारा. सांवळा कृष्ण सुंदर डोळ्यांचा, सहज परमहंस असा आहे. सदानंद, मुकुंद, हरि, परमानंद, आनंदाचा कंद, प्रल्हादाला अग्नीपासून अभय देणारा, गायीचा छंद असणारा असा हा गोविंद गोपाळ आहे. गवळ्यांबरोबर खेळणारा, हा कृष्ण आमचा आहे. असे गोपी म्हणतात. शंकराप्रमाणे शोभणारा,मनाने स्थिर असणारा, पुराणांनी गंभीर गुण वर्णन केलेला, सर्ववीरांचा महावीर असणारा, पांडवाना सहाय्य करणारा, मथुरा नगरांत वास करून, कौसासुराला शिक्षा लावणारा, अतिसुंदर, मोत्यांची पेंड गळ्यांत धारण करणारा, माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला. मी तुला योग्य प्रकारांने जाणले. त्यामुळे माझे मजला तू स्वरूप प्राप्त करून दिलेस. असे माऊली सांगतात.


१६८
कान्हया गोवळु वारिलें न करी ।
दसवंती सांगे अवधारी ॥
चौघी माया श्रृंगार करिती ।
तेथें विघ्नेश्वर जाले मुरारी ॥१॥
आनंदें दोंदिलु नाचे गदारोळें ।
पायीं घागूरलि नेंवाळें ॥
चर्मदक्षू पडले वेगळे ।
काढूनियां ज्ञानचक्षु दिधलें डोळेगे बाईये ॥२॥
गौळणी दाहा बारा मिळोनी सोळांची टोळी ।
एकी म्हणती यातें उभाचि कवळु
मा काय करिल ते गौळणीगे बाईये ॥३॥
आणिकी एकी साचा बोले तिचेविण
बहुसाल ते राहिलेसे भानुते धरुनी ॥४॥
तव मुक्ता दोन्ही आलिसे धांवोनि म्हणती
कृष्णा तूं निघ येथुनि ।
तीन नानावि तुझा पाठींच
लागतील औठावे राहे धरुनि ॥५॥
गौळणी म्हणती बाळा कान्हारे ।
वेल्हाळा सांडिरे । या मना आळारे ।
ऐसें ऐकोन बापरखुमादेविवरें विठ्ठलें
पवनु गिळितया वेळारेरे ॥६॥

अर्थ:-

कांही गौळणी वेणी फणी करीत असतां त्याठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेला, व खोड्या करू लागला. तेंव्हा त्या गौळणीपैकी दसवंती नांवाची गौळण नंदाला सांगते हा तुमचा कृष्ण या क्षणास अमुक करू नको म्हटले की नेमके ते करावयास लागतो. आम्ही चार पाच गौळणी आपला नित्याचा शृंगार करीत असता त्यांत विघ्न करण्याकरिता श्रीकृष्ण तेथे गेला. तो दोदिल शरीराचा श्रीकृष्ण पायांत घागऱ्या वाळे घालून मोठ्या मोठ्यांने आरोळ्या ठोकून त्यांच्यापुढे नांचू लागला. तेव्हा त्याने तो नाच बघण्याकरता आमचे चर्मचक्षुचे ज्ञान बंद करून आम्हाला ज्ञानचक्षु दिले. त्यामुळे त्यांना आनंद तर झालाच परंतु त्याही कृष्णाबरोबर बोलू लागल्या दहा, बारा. सोळा जनींनी आपली टोळी करून असे ठरविले की हा नाचताना त्यालाच आपण मिठी मारू मग तो आपले काय करील. त्यानंतर दुसरी आणखी एक म्हणाली की काय सांगू ह्या नागिणीसारख्या बायकां सूर्यतेजाप्रमाणे तेजस्वी आहेत.इतक्यांत मुक्तकेशी असलेल्या दोघी धांवत येऊन कृष्णाला म्हणू लागल्या की तूं येथून निघ आणखी दुसऱ्या तीन गौळणी आहेत. त्या तुला धरतील म्हणून तूं तिन्हींच्या पलीकडे जाऊन राहा. गौळणी सांगतात बाळा कृष्णा सुंदरा असा हा तुझा मनाचा चाळा टाकून दे.असे त्या गोपीचे भाषण ऐकून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, कृष्ण परमात्मा त्याने असे सांगणाऱ्या गोपीचे पवनु गिळिला’ म्हणजे चित्तहरण केले असे माऊली सांगतात.


विरहिणी – अभंग १६९ ते २००

१६९
माझी शंका फ़िटले । लाजा सांडिले ।
आवघे घातलें । मज निरसुनियां ॥१॥
अठरा भार वनस्पती । सुरवर वोळंगती ।
देवोदेवि आदिपती ।कृष्ण काळागे माये ॥२॥
ऐसा कृपानिधि सांवळा ।
कीं बापरखुमादेविवरु गोंवळा ।
त्याचा मज चाळा ।
बहु काळागे माये ॥३॥

अर्थ:-

माझ्या ठिकाणची मी देह आहे की आत्मा आहे अशा तऱ्हेची शंका नाहीशी होऊन गेली. मी देह नसल्यामुळे देहसंबंधी लज्जा राहिली नाही. विचाराने अंतःकरणनिष्ठ काम क्रोधादि सर्व मंडळींचा निरास करून टाकला. सर्व प्रकारच्या वनस्पती, सर्व देवगण ज्याच्या चरणी लागतात तो देवांचा अधिपति भगवान श्रीकृष्ण कृष्णवर्णाचा आहे. असा जो कृपानिधी सांवळ्या रंगाचा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल गायी वळणारे त्याचा मला बहुत काल छंद लागला आहे असे माऊली सांगतात.


१७०
पांचा दामांचा घोंगडा नेसेन ।
उरली मोट ते मी जेविनगे बाईये ॥१॥
कामारि कामारि कामारि होऊन ।
या गोपाळाचें घरीं रिघेन गे बाईये ॥२॥
त्याचा उंबरा उसिसा करीन ।
वरि वेरझारा मी सारीनगे बाईये ॥३॥
निवृत्ति ज्ञानदेवा पुसतिल वर्म ।
त्यासि कामीन पुरेनगे बाईये ॥४॥

अर्थ:-

भगवद्प्राप्तीकरता तळमळ लागलेली विरहिणी म्हणते घोंगडा म्हणजे वस्त्र ज्या वस्त्राला पाच पैशाचीसुद्धा किंमत नाही असे जाडे भरडे नेसेन. आणि त्या परमात्म्याचे जे उच्छिष्ट राहील ते मी जेवण करीन. त्याचे एका दासीच्या दासीची दासी होईन. पण या गोपाळाच्या घरांत त्याच्या प्राप्तीकरता शिरेन. त्याच्या घरांत मला शरीरभोगाची इच्छा नाही. त्याचे दारांत मी पडून राहीन. त्याच्या दाराचा उंबरा मी उशास घेईन. इतके कष्ट मी करीन पण मी माझी जन्ममरणरूपी येरझार मात्र चुकवीन. याचे वर्म निवृत्तीरायांनी ज्ञानदेवास विचारले तर त्यांची दासी होऊन मी सुद्धा उत्तर देण्यास पुरेन. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१७१
जागृती पुसे साजणी ।
कवण बोलिले अंगणी ।
निरखितां वो नयनीं ।
वृंदावनीं देखियला ॥१॥
मनीं वेधु वो तयाचा ।
पंढरीरायाचा ॥२॥
स्वप्न सांगे सुषुप्ती ।
असे ममता हे चित्तीं ।
विठ्ठल होईल प्रतीती ।
मग गर्जती तुर्ये ॥३॥
मग बोलों नये ऐसें केलें ।
मन उन्मनीं बोधलें ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलें ।
थितें नेलें मीं माझें ॥४॥

अर्थ:-

स्वरूप स्थितीला पोहोचलेली एक गौळण म्हणते मी जागृत अवस्थेमध्ये परमात्म्याचे चिंतन करून श्रीकृष्णपरमात्मा कोठे आहे म्हणून माझ्या सखीला विचारू लागले तेवढ्यांत अंगणांत कोणी तरी बोलत आहे असे माझ्या कानांवर आले. ते पाहण्याकरितां ती अंगणांत आली व तिने श्रीकृष्णास पाहिले. मात्र तो वृंदावनात आणि पंढरीस असणारा असे तिने ओळखले. आणि त्या पंढरीच्या राजाचा म्हणजे श्रीपांडुरंगाचा वेध तिच्या मनास लागला.आणि मन पांडुरंगच होऊन गेले, आणि ज्या भक्ताचे अंतःकरणांत खरा खरा पांडुरंगाचा जागृतीत वेध लागला असेल त्याचे स्वप्नांत तरी दुसरे काय येणार? श्रीपांडुरंगच येणार असा ज्याला अनुभव आला आहे. त्यास श्रीतुकोबारांयानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृति स्वप्नी पांडुरंग’ तो या अभंगात सांगितला आहे. त्याचप्रमाणे गौळणीची जी जागृतीत स्थिती तीच स्वप्नांत होऊन ती स्वप्नावस्था सुषुप्ति अवस्थेत सांगते की माझ्या चित्तात त्या शामसुंदर श्रीकृष्णाविषयी फार प्रेम आहे. तेच प्रेम तुझ्यांत लीनरूपाने असणार अशी स्थिति झाली म्हणजे चतुर्थ तुर्या अवस्थेत म्हणजे समाधीअवस्थेत श्रीविठ्ठलाच्या पारमार्थिक स्वरूपाची प्रतीति होईल. याप्रमाणे त्या गौळणीची स्थिती झाली. म्हणून ती गर्जना करून बोलू लागली. कांही बोलू नये ऐसे मला केले.मन आपले चांचल्य सोडून परमात्मरूप झाले, अशी स्थिति मला प्राप्त झाली आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने माझ्या ठिकाणचा वास्तविक नसलेला मी व माझेपणाचा भाव नाहीसा करून टाकला. असे माऊली सांगतात.


१७२
सांवळिये बुंथी सांवळिया रुपें ।
सांवळिया स्वरुपें वेधियेलें ॥१॥
काय करुंगे माये सांवळे न सोडी ।
इंद्रियां इद्रियां जोडी एकतत्त्वें ॥२॥
कैसें याचें तेज सांवळे अरुवार ।
कृष्णी कृष्ण नीर सतेजपणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे ।
सांवळेची होणें यासी ध्यातां ॥४॥

अर्थ:-

शामवर्ण खोळीत शामवर्णरूपाने असलेल्या परमात्म्याने त्या सांवळ्या स्वरूपाचे मला वेडच लावले. काय करावे, हे रूप माझ्या डोळ्यांत भरून गेले. ते मला सोडावेसे वाटत नाही. त्याच्या योगाने इंद्रिय एकरूप झाली. काय या शामसुंदर कृष्णाचे तेज सांगावे. ते नीलवणनि त्याच्याठिकाणीं शोभते. निवृत्तीनाथांच्या उपदेशाने याचे ध्यान करू गेले असता आपणही सांवळे रूप होऊन जावू असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१७३
श्यानाचिया घरा वासना पैं नेती ।
मनें मन गुंती तये रुपीं ॥
बिंबाचे रुपस छाया पै घनदाट ।
दिननिशीं अविट श्यामतेज ॥१॥
तें रुप देखिलें कोण्या भाग्ययोगें ।
निवॄत्तिप्रसंगे आम्हां घरीं ॥२॥
दिठिवेचेनि वोपें सानुलें स्वरुप ।
नुराली वालिप कल्पनेची ॥
सांठवले आकार इद्रियांच्या वॄत्ति ।
श्यामतेजें दिप्तीं धवळलें ॥३॥
निराशा संचली आशा पै सार ।
अनादी अमर तनु जाली ।
बापरखुमादेविवर विठ्ठलीं गळालें ।
ब्रह्मसुख सोहळे आम्हां घरीं ॥४॥

अर्थ:-

काय माझे भाग्य उदयाला आले म्हणून सांगू श्रीगुरूनिवृत्तिरायांच्या संगतीने आमच्या अंतःकरणांत शामसुंदर परमात्म्याचा अविर्भाव झाला. त्यामुळे सर्व वासना शामरूप परमात्म्याच्या घरांकडे जातात मन त्याच्याच ठिकाणी गुंतुन राहाते. बिंबरूप परमात्याची छायाच चहुकडे पसरून गेली आहे. म्हणजे सर्वत्र तोच दिसत आहे. त्याचा केव्हाही वीट येत नाही. असा तो अविट आहे. दृष्टीचा विषय म्हणून लहान स्वरूप धारण करतो. त्याचे ठिकाणी सर्व कल्पना मुरून जाते. अविद्याकार्य नामरूपादि इंद्रियाच्या वृत्ति त्याच्यातच लय पावून त्या शामसुंदर श्रीकृष्णाच्या रूपानेच सर्व विश्व प्रकाशीत झाले.आशा निराशा ह्या सर्व सारस्वरूपात प्रवेश करून अजरामर परमात्म्याच्या ठिकाणी नाहीशा होऊन गेल्या. त्यामुळे आम्ही अमर झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी सर्व वृत्ति लय पावल्यामुळे आमच्या घरांतच ब्रह्मसुखाचा सोहळा भोगावयास मिळाला आहे. असे माऊली सांगतात.


१७४
मनें करुनि कुटिल उकलुनि श्रृंगारें ।
ते लावण्याच्या अपारें पडिलें वो माये ॥१॥
माझें कुटिळपण गेलें कुटिळपण गेलें ।
गोविंदें वोजाविलें निजरुप वो माये ॥२॥
बापरखुमादेविवरु माझें कुटिळ फ़ेडूं आला ।
विटेवरी मालाथिला निजरुपें वो माये ॥३॥

अर्थ:-

मनाच्या कुटीलपणाने म्हणजे मी देह आहे या विपरीत समजुतीने पुष्कळ शृंगार करून शरीर लावण्याच्या अपार अभिमानांत होते. अशा स्थितीत मला श्रीकृष्णाने आत्मस्वरूपाविषयी निजबोध केल्यामुळे मनाचा हा कुटिलपणा नाहीसा झाला. माझ्या मनाचा कुटीलपणा गेला, कारण गोविंदाने माझे निजस्वरूपाचा बोध दिला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल याने माझी विपरीत बुद्धी नाहीसी करून विटेवर असणारा जो श्रीविठ्ठल त्याचे ठिकाणी माझे स्वरूपाचा लय केला.असे माऊली सांगतात.


१७५
येणेंरुपें पाहावसी तरि असुमाय होसी ।
माझ्या मना नाकळसी सांवळ्या ॥१॥
सगुणपणाची तुझी पडिलिसे मिठी ।
केली जीवा साटी सांवळ्या ।
वेधला जिऊ माझा सिकवाल काई ।
सगुणें ठाई वेधियेलें ॥२॥
ये अंगणी अवचिता देखिला बोलता ।
कोण ऐसा निरुता न कळेगे माये ॥
सगुण म्हणौनि धरुं गेलें पालवीं ।
तंव नवलपणाची ठेवी प्रगट केली ॥३॥
आंतु बाहेरी कांही नकळे वो मज ।
आपआपणया चोज वाटोनि ठेलें ॥
बापरखुमादेविवरें माझें मीपण चोरुनि नेलें ।
आपणा ऐसें केलें बाईयांवो ॥४॥

अर्थ:-

सांवळे सकुमार सुंदर अशा रूपाने तुला पहावा तो तूं माझ्या पोटांत मावत नाहीस. आणि मनालाही आकलन होत नाहीस. तरी पण हे सांवळ्या श्रीकृष्णा तुझ्या सगुणपणाची मिठी पडून मी आपल्या जीवाच्या संतोषाकरिता तुला मनांत धरून ठेवले. त्या सगुणरूपाच्या ठिकाणी माझा जीव वेधून गेल्यामुळे मी अशी वेडी झाले. मला तुम्ही किती शिकवाल.या माझ्या अंगणात अवचित बोलताना श्रीकृष्णास पाहिले तर हा कोण आहे असे खरोखर कळत नाही.तो सगुण म्हणून त्यांचा पदर धरू गेले तर त्यांनी आपल्या स्वकीय स्वरूपाची ठेव प्रगट केली.आतां अंतरबाह्य मला काही दिसत नसून माझेच मला कौतुक वाटू लागले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण यानी माझा मीपणा चोरून नेऊन मला आपल्यासारखा म्हणजे परमात्म स्वरूप करून ठेवले. असे माऊली सांगतात.


१७६
कृष्णें वेधली विरहिणी बोले ।
चंद्रमा करितो उबारागे माये ।
न लवा चंदनु न घाला विंजणवारा ।
हरिविणें शून्य शेजारुगे माये ॥१॥
माझे जिवींचे तुम्हीं कां वो नेणा ।
माझा बळिया तो पंढरीपणा वो माये ॥२॥
नंदनंदनु घडी घडी आणा ।
तयाविण न वचति प्राण वो माये ॥
रखुमादेविवरु विठ्ठ्लु गोविंदु ।
अमृतपानगे माये ॥३॥

अर्थ:-

श्रीकृष्णानी छंद लावलेली विरहणी म्हणते. हा चंद्रमा अतिशय थंड खरा पण बाई, मला उबारा करतो ग. या उबाऱ्याच्या निवृत्तीची व्यवहारिक साधने म्हणजे अंगाला चंदन लावणे. किंवा वारा घालणे ही आहेत परंतु ती करू नको. कारण माझ्या अंगाचा दाह होण्याचे कारण आज माझ्या बिछान्यावर श्रीकृष्ण नाही हे आहे. ही माझ्या जीवातली गोष्ट तुला कशी कळत नाही ? माझ्या अंगाचा दाह निवारण करणारा बलवान तो पंढरीचा राजाच एक आहे. याकरिता वारंवार तुम्हाला एवढेच सांगते की तो नंदाचा नंदन श्रीकृष्ण त्यालाच घेऊन या. त्याचेवांचून माझे प्राण वाचत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल गोविद त्याची प्राप्ती होणे हे माझ्या शरीराचा दाह निवृत्त करण्याला अमृतपानच आहे. असे माऊली सांगतात.


१७७
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।
मनें मन राणिवा घर केलें ॥१॥
काय करुं सये सांवळे गोंवित ।
आपेआप लपत मन तेथें ॥२॥
बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा ।
मनें मनीं क्षमा एक जालें ॥३॥

अर्थ:-

अति मोहक, शामसुंदर, परब्रह्म भगवान श्रीकृष्ण तो या जीवाला फार आवडतो. म्हणूनच मने मन म्हणजे आपल्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मसौख्य भोगण्यांस राजमंदिर केले. काय करावे ते सांवळे परब्रह्म माझ्या मनाला आपल्यांत अटकवून टांकते. म्हणजे मन सहजच तेथे लपून जाते म्हणजे एकरूप होते. माझे पिता व रखुमादेवीचा पती सांवळ्या प्रभेचा जो श्रीविठ्ठल त्याचेच ठिकाणी जाण्याचा मनाचा प्रवाह झाला आहे. असे माऊली सांगतात.


१७८
पैल विळाचियें वेळीं ।
आंगणी उभी ठेलिये ।
येतिया जातिया पुसे ।
विठ्ठल केउतागे माये ॥१॥
पायरऊ जाला संचारु नवल ।
वेधें विंदान लाविलें म्हणे विठ्ठल विठ्ठल ॥२॥
नेणें तहान भूक ।
नाहीं लाज अभिमान ।
वेधिलें जनार्दनी ।
देवकीनंदना लानोनीगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु जिवींचा जिवनु ।
माझे मनिंचे मनोरथ पुरवीं कमळ नयनुगे माये ॥४॥

अर्थ:-

एक विरहिणी म्हणते, पुष्कळ वेळ झाला मी अंगणांत उभी राहिली आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारते. माझा पांडुरंग कोठे आहे तुम्ही कोणी पाहिला आहे काय? पण आश्चर्य हे की मला दृष्ट लागल्याप्रमाणे होऊन त्या श्रीकृष्णाचा छंद लागल्यामुळे तोंडाने सारखी श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल नामाचा घोष करते. त्या छंदात तिला तहान भूक, लोकलज्जा किंवा देहाभिमान याची आठवण नाही कारण देवकीचा नंदन भगवान श्रीकृष्ण त्याकरिताच तिला त्याचा छंद लागून राहिला आहे. तिला अशी खात्री आहे की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, सगळ्या जीवांचे जीवन कमलनयन असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो माझ्या मनांतले मनोरथ परिपूर्ण करीलच करील. असे माऊली सांगतात.


१७९
निळिये निकरें कामधेनु मोहरे ।
निळेंपणेसरे निळे नभीं ॥१॥
घुमत घुमत निळेमाजि मातु ।
निळेपणीं देतु क्षेम कृष्णीं ॥२॥
निळिये सागरीं निळे निळेपणें सुंदरी ।
रातलीसे हरि विरहिणी ॥३॥
ज्ञानदेव सांगे निळियेचे बागे ।
निळसंगे वोळलेगे निळीमाजी ॥४॥

अर्थ:-

ज्याप्रमाणे कोवळे हिरवेगार गवत निळसर रंगाचे दिसते. तें गवत पाहून कामधेनुलाही आनंद होतो. व ते खाण्यांच्या नादांत ती घराची वाट विसरून जाते. कारण तिला तो हिरवागार चारा सर्वत्र म्हणजे क्षितीजापर्यंत दिसतो. त्याप्रमाणे गोपी नीलवर्ण परमात्म्याच्या कथेने व नामोच्चाराने आनंदीत होऊन, श्रीकृष्णविरह असून तो भेटला असे समजून त्याला अलिंगन देतात. त्या विरहिणी गोपी निळ्या रूपाच्या श्रीकृष्णसागरांत आपल्या स्वतःच्या निळेपणाने क्रीडा करीत असता शोभू लागल्या. त्या परमात्न दर्शनाने मी तद्रुप होऊन त्याच्या आधिष्ठांनावर विवर्त रुपाने भासणारे जगत त्याचा बाध झाल्यामुळे ते परमात्नरुपच झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१८०
मग मुरडूनि घातलें मनानें ।
थोर मारु तेथें होत असे ॥१॥
पुरे पुरे वो आतां जिणें तें केउतें ।
येणें वो पंढरिनाथें वेधियेलें ॥२॥
नचले नचले कांही करणे कामान ।
याचें पाहाणेंचि विंदान कामानिया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलासी भेटी ।
संसाराची तुटी जालीगे माये ॥४॥

अर्थ:-

मनाला संसारापासून मागे फिरवून परमात्मचिंतनांत ते मन घातले असता तेथें त्या मनाला थोर मार बसतो. म्हणजे मन स्वरूपाने राहातच नाही. अशी जर स्थिति आहे, तर या दुःखरूप संसारात जगून काय करावयाचे आहे. संसार पुरे झाला. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल म्हणजेच पंढरीनाथाने माझ्या मनाला अगदी वेढून टाकले आहे की. ज्याच्या पहाण्याच्या बलवान इच्छेने संसारिक पदार्थाची इच्छा करणे असा मनाचा व्यापार चालतच नाही.असे माऊली सांगतात


१८१
निळियेच्या निशीं विरहिणी पिशी ।
शेजबाजे कैशी आरळ शेजे ॥१॥
कृष्णासंगे वाली विव्हळ जाली निळी ।
चंदन अंगीं पोळी विरहज्वरें ॥२॥
ज्ञानदेव प्रेम निळारुप रुपसें सोहळा ॥
कृष्णवेधें वेधली वो लाभली वसे ॥३॥

अर्थ:-

नीलवर्ण परमात्म्याचा वियोग हीच कोणी रात्र अशा रात्रीच्या विरहाने वेडी झालेली स्त्री आपल्या बिछान्यांवर निजली तरी तिला गाढ झोप लागणे शक्य नाही. श्रीकृष्णाच्या संगतीचा विरह झाल्यामुळे विव्हळ होऊन ती ही निळी बनली. तिच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी श्रीकृष्णाच्या विरहामुळे तिला ती थंड न वाटता उलट उष्णच लागते. या नीलवर्ण परमात्म्याच्या प्रेमाची काय ही मौज आहे श्रीकृष्ण परमात्म्याचा दर्शनाचा वेध लागून गोपी वेड्यां होतात. माऊली ज्ञानदेव सांगतात.


१८२
गुणाचेनि आटोपें आकारलें ब्रह्म ।
भक्तभाग्य सम आलेंसे ॥१॥
चैतन्य परिपाठीं ठासा घडलासे साकार ।
कृष्णचि आकार गोकुळीं रया ॥
त्या रुपें विधिलें काय करुंगे माये ।
नाम रुप सोय नाहीं आम्हां ॥२॥
सबाह्य सभोवतें चतुर्भुज सांवळें ।
सर्वभूतीं विवळे कृष्णरुपें ॥
हारपले आकार कृष्णचि क्षरला ।
वेदांसि अबोला श्रुतीसहित ॥३॥
ऐसें परब्रह्म सांवळें दैवत आमुचे ।
आतां आह्मां कैचें क्रिया कर्म ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु दैवत ।
मनें घर तेथें चरणीं केलें ॥४॥

अर्थ:-

भक्तांच्या परमभाग्याने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता मायेच्या गुणांचा स्वीकार करून कृष्णरूपी मूर्तिच अवतीर्ण झाली आहे. चैतन्याचे कार्यक्रमांत हा सगुण कृष्णाचा आकार गोकुळांत अवतीर्ण झाला. त्याचे मनमोहक रूपाने मला सारखा वेध लावून टाकला. काय करू. त्यामुळे माझे नामरुपच नाहीसे झाले. शामसुंदर चतुर्भुज सांवळ्या श्रीकृष्णाने सभोवार सर्व रूपाला व्यापून टाकले. त्यामुळे असे आकार नष्ट होऊन ज्या रूपाच्या ठिकाणी श्रुतिसह वेद कुंठीत झाला. तेच कृष्णरूप लक्ष्य जे सांवळे परब्रह्म ते आमचे दैवत असल्यामुळे आम्हांला आता बाकीची क्रिया कर्म राहिली नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आमचे दैवत असून त्याचे चरणाचे ठिकाणी माझ्या मनाने घर केले. असे माऊली सांगतात.


१८३
सांवळी प्रतिमा घेऊनि सकुमार ।
खेळत सुंदर गोकुळीं रया ॥१॥
त्या रुपें वेधिलें काय करुं माये ।
अवघें निर्गुणचि होय पाचारितां ॥२॥
मीपणा ठाव नुरेची पैं सर्वथा ।
प्रपंचाची कथा ब्रह्म जाली ॥३॥
बापनिवृत्तिराजे दाविताती खुण ।
नाम नारायणा पाठ कीजे ॥४॥
अर्थ:-

शामसुंदर सुकुमाररूप घेऊन तो भगवान श्रीकृष्ण गोकुळांत खेळत आहे.त्या रूपाला बघून मनाला वेध लागतो. तेथून मन माघारी फिरतच नाही काय करावे. बोलावू गेले तर तर तोच निर्गुण होऊन जातो. अहंकारा मुळेच प्रपंच जीवाचे बोकांडी बसला आहे. परंतु विचार करणाऱ्याच्या अहंभावाचा पत्ताच नाहीसा होऊन प्रपंचाची वार्ताच च ब्रह्मरूप होऊन जाते.ही परमात्मस्वरूपाची खूण दाखविणारा श्रीगुरू निवृत्तीरायच आहे. त्या खुणेप्रमाणे नारायणाचे नामाचे पाठ करणे उपासकाचे कर्तव्य आहे. असे माऊली सांगतात.


१८४
आजि शुभ लवे लोचनु हरिखे
सांगतांहे शकुन स्वप्न देखिलें सुंदरी ।
अळंकार लेववा चंदन चर्चावा जाति जुती
पार्यातिके शेंवरी करा आइती सेजारीं ॥
शेला काढा कां मेचुचा हा दिन दैवाचा ।
सोहळा तो आमुचा मंदिरींगे माये ॥१॥
गुढिया उभवा मखरें श्रुंगारा भेटी
होईल आळंगी ।
स्फ़ुरण आलें बाहीं क्षेमालागीं
पाहीं काचोळी न समाये अंगीगे माये ॥२॥
जिवीं जीव सुंदर त्याचेनि सचार
तो मज भेटवा सुखाचा विसावा ।
सुमनें उकलिलीं नित्य दे माळी
उचित करि तथा भावा ।
आजि वेळु कांवो लाविला नेणें पंथीं
सीणला बुझाऊं जाऊं त्याच्या गांवागे माये ॥३॥
ह्रदयी निर्भर प्रेम वारंवार माझें चित्तीं
राहो ऐक्य मज ।
दुजिये वस्तुलागीं रुत जाय
माधवी मन्मथ करिताहे वोज ।
ऐसा विपरीत लाघवी लपे सवेंचि
दावी वसिपे चौके ।
अभ्यासें अंतर पडलें येणें तरि मी
त्यजीन जिणें म्हणोनि विनवितसें चतुर सुरेखें ।
रात्रीचा ठायीं देख मेघशाम बोलला अंबरीगे माये ॥५॥
ऐसिये निवांत मूर्ति ऐकोनि ठेली श्रुती ।
आकर्षोनी चित्तचैतन्य भरोनि ठेले लोचन ॥
ध्यानीं विसर्जिलें मन परमात्मया रामा
तूं एक लाघवी सावेव पावलें ज्ञान ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला सुमन संयोगीं
आजी सत्य जालें माझें स्वप्नग्वे माये ॥६॥

अर्थ:-

एक विरहिणी म्हणते आज माझा शुभशकुन दाखविणारा डोळा लवत आहे. त्यामुळे मला आनंद होत आहे. मला असे स्वप्न पडले. मी आपल्या मैत्रिणीला म्हणत आहे. माझ्या अंगावर अलंकार घाला. चंदनाची उटी लावा. जाई, जुई, पारिजातक, सेवंती इत्यादि सामुग्रीने शेज़ तयार करा. माझ्या अंगावर घेण्याचा शेला काढा हा दिवस मोठा आवडीचा व भाग्याचा आहे. असा त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीचा सोहळा मंदिरात होणार आहे. याकरितां तुम्ही गुढ्या उभारा, मखर शृंगारून तयार करा, आज त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होईल. आणि मी त्यास अलिंगन देईन पहा. त्याला अलिंगन देण्यासाठी माझे बाहु स्फुरण पावत आहेत. ही पहा अंगातील कांचोळी अंगांत मावेनाशी झाली ज्याप्रमाणे माळी सुंदर फुललेली फुलें नेहमी देतो. त्याप्रमाणे सर्व जीवांचे जीवन व सुंदर असून, सर्व जीवांचा विसावांच असणारा श्रीकृष्ण मला भेटवा. आज त्यांनी येण्याला कां बरे वेळ लावला? वाटेत येता येता थकला कां? काही समजत नाही. चला त्याच्या गावाला त्याची समजूत घालण्याकरिता जाऊ. माझ्या चित्तांत त्याच्याविषयी अत्यंत प्रेम आहे व चित्तांत त्याचे प्राप्तीची खटपट आहे. नेहेमी त्याचे ऐक्य असावे असे चित्तांत वाटते. दुसऱ्या गोष्टीकडे चित्तच जात नाही. जणू काय माझा पाय रूतून जातो. पहा, हा वसंत ऋतु माझ्या अंतःकरणांत काम उत्पन्न करीत आहे. याकरिता मी त्याच्यापर्यंत जाईन आणि मोठी आनंदी होऊन त्या आनंदाच्या जोराने त्याच्यापुढे नाचेन.जगांत आम्ही पुष्कळ पुरूष पाहतो. परंतु या श्रीकृष्णाचे लाघव विचित्र आहे. क्षणांत दिसतो, क्षणांत लपतो, क्षणांत भीती उत्पन्न होऊन अंतःकरण चकित होऊन जाते. अशी त्याचे प्राप्तीकरिता खटपट करूनही त्याच्याशी अंतर पडले म्हणजे भेट झाली नाही तर मी आपला जीव टांकून देईन. याकरिता त्याची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्हा चतुर बायांना विनवित आहे. रात्रीच्या वेळी पहा ते मेघःशाम आकाशवाणी झाल्यासारखा बोलला. तें कानांनी ऐकून मी अगदी निवांत राहिले. माझे चित्त त्याचेकडे आकर्षित होऊन त्याचेकडे डोळे लावून राहिले. व मन ध्यानांत गुंतले हे परमात्मा सखारामा तूं एक जगांत लाघवी आहेस. सर्व प्रकारे तुझे ज्ञान झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी मनाचा संयोग होऊन आज माझे स्वप्न खरे झाले. असे माऊली सांगतात.


१८५
त्रिभुवनिंचे सुख पाहावया नयनीं ।
दिनरात्रीं धणी न पुरे माझी ॥१॥
विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां ।
मन वेळोवेळां आठवितु ॥२॥
सागरीं भरीतें दाटे तैसें मन नटे ।
वाट पाहों कोठें तुझी रया ॥३॥
बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला ।
कुमुदिनी विकासला तैसें जालें ॥४॥

अर्थ:-

त्रिभुवनाचे सुख जो परमात्मा त्याला रात्रंदिवस पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नाही. जो विटेवर असलेला सांवळा विठोबाराय त्याची मन वारंवार आठवण करीतच असते. सागरामध्ये जशी भरती दाटते त्याप्रमाणे मन त्याच्या चिंतनांत रंगून जाते. आतां तुझी कोठे म्हणून वाट पाहुं. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वत्र पूर्ण प्रकाशीत आहेत हे कमळिणीच्या विकासावरून जसे कळून येते त्याप्रमाणे अंतःकरणवृत्तीच्या विकासावरून त्याचे प्रकाशत्व कळून येते. त्या कमळिनीप्रमाणे माझे मनाची स्थिती झाली आहे. असे माऊली सांगतात.


१८६
मायबापें आमचीं विठोबा रखुमाई निजाची ।
त्याचीये गांवींची कोण्ही येतु न्यावया ॥१॥
माझा विसावा माहेर पंढरपूर वो ।
ऐशी वाट पाहातसे जरु ॥२॥
ये सासुरा आमुची बहु बाहरु ।
काम क्रोध मद मत्सरु ।
मज आटिती दीरु ॥३॥
अहंकार खेदिताहे भावा ।
दंभ प्रपंच या जावा ।
येरुन येरा घालिती हेवा ।
आपुल्या सवा ओढीतसे ॥४॥
आवो चिंतेवोही निके वोढाळे ।
तुज मज ठायींचे वेगळें ।
वोढूनि नेसी आपुल्या बळें ।
तुझ्या सळें नांदतसे ॥५॥
आशा लागलीसे सर्पिणी ।
ग्रासूं पाहातसे पापिणी ।
रामनामाचिया ध्वनी ।
आइकों नेदीये श्रवणीं ॥६॥
माझें सत्त्वबळारथीं ।
धीरु धर्म हा सांगाती ।
संती सांगितलें निवृत्ती ।
तरी मी जीवें वांचलिये ॥७॥
ऐसी दगदगल्यें सासुरवासा ।
विठोबारखुमाई माझा कुवासा ।
निवृत्ति दासु तयाचा ।
जन्मोजन्मीं वोळगणा ॥८॥

अर्थ:-

आमचे स्वतःचे आईबाप विठोबा रखुमाई असून त्याचे गांवचे आम्हाला नेण्यास कोणी येईल काय? माझा विसांवा पंढरपूरी आहे. त्या माहेरांकडून बोलावणे यावे अशी माझी फार आशा आहे. कारण या सासरी फार जाच आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे दीर मला फार त्रास देतात. अहंकार हा माझ्या भावभक्तिला फार पीड़ा करतो वाढलेला दंभ ह्या जावा एकमेकी माझ्याशी हेवा करून आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याशी वागतात. ही चिंता फार वोढाळ आहे. तो मला आपले स्वरूपापासून वेगळे करून आपल्याकडे ओढुन नेते पण तिच्या जाचांत मी नांदते. ही पापीणी आशा सर्पिण मला गिळून टाकण्याला बसली. रामनामाचा ध्वनी मला ऐकू देत नाही. माझे सत्त्व हे बळ व धर्म हा धीर बरोबर असल्यामुळे संत जे निवृत्तिराय त्याने सांगितल्याप्रमाणे मी जीव धरून राहिले आहे. अशा सासुरवासाला मी फार दगदगले. विठोबा आणि रखुमाई हे माझे विश्रांतिस्थान आहे. त्यांची जन्मोजन्मी सेवा करणारा, हा निवृत्तीचा दास माऊली ज्ञानदेव आहे.


१८७
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा ।
विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥
वेधलें वो मन तयाचियां गुणीं ।
क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥२॥
पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें ।
तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे ।
चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥

अर्थ:-

भुवैकुंठ जे पंढरपूर तेथे वास करणारा शामसुंदर लावण्याचा पुतळा जो श्रीविठ्ठल तो मी डोळ्यांनी पाहीला. रुक्मीणीचा वर जो श्रीविठ्ठल त्याच्या गुणाच्या ठिकाणी मनाचा वेध लागल्यामुळे त्याला क्षणभर सुद्धा विसरत नाही. पौर्णिमेचे चांदणे ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला कमी होऊन जाते. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलावांचून माझ्या मनाची स्थिति होते म्हणजे मी प्रत्येक क्षणाला झुरणी लागते.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच एक मला पुरे. कारण माझे चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी लय पावते. असे माऊली सांगतात.


१८८
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगतसे ॥१॥
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें
मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो
येईल कायी ॥४॥
आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।
आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥

अर्थ:-

एक विरहिणी, विरहाने दुःखित होऊन बसली असता आपल्या घरांवर पलीकडच्या बाजूला कांवळा कोकू लागला. तो शुभ शकुन सांगतो आहे.असे समजून शुभशकुन सांगणाऱ्या कावळ्याला म्हणते उड रे उड काऊ, तुझे पाय सोन्याने मढविन पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येतील. दहीभाताची उंडी करून तुला खाऊ घालीन पण जीवाला प्रिय असणाऱ्या पंढरीरायांची गोडी केंव्हा प्राप्त होईल. ते लवकर सांग.दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावीन पण तो विठोबाराय माझ्या घरी येईल काय हे खरे सांग.आंब्याच्या डहाळीला आलेली रसाळ फळे ही चाख, पण आजच्या वेळी मला शुभशकुन सांग. अशा त-हेची तळमळ लागली असता पंढरीराजे भेटतील, असा शकुन सांग.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


१८९
सुखाचिये गोठी सुख आलें भेटी ।
तया लाभाचिये साठीं जीव
वेचिलागे माये ॥
तंव अवचितें सगुणरुप भरलेंसें नयनीं ।
बोलतां अंगणीं म्यां वो देखियेलें ॥१॥
जिवाचा जीऊ माझा भेटवा यादवराजा ।
उचलल्या चारी भुजा देईंल क्षेम ॥२॥
न करा उपचार न रंगे हें मन ।
दृष्टिपुढें ध्यान ठसावलें ।
आवडी गिळूनि येणें सुख विहरोनी ठेले ।
चित्त माझे गोविलें गोवळेनी ॥३॥
आतां भरोवरी उरवितां नुरे उरी ।
आनंदें अंतरीं कान्हो संचरला ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल निर्गुण ।
तो सुखाची सांठवण गिळूनि ठेला ॥४॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपाच्या आनंदाच्या गोष्टी बोलत असता साक्षात् तें सुखच भेटीला आले. तसा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून मी आपला जीव खर्ची घातला. एकदा अशा स्थितीत एकाएकी ते सगुणरूप माझ्या डोळ्यांत भरून गेले. आणि अंगणांत माझ्याशी तो बोलत आहे. असे मी पाहिले. माझ्या जीवाचा जीव तो यादवांचा राणा मला भेटवा.तो आपल्या चारी बाह्या उचलून मजला क्षेम देईल. असे करवा. त्याच्या विरहामुळे माझ्या शरीराच्या ठिकाणी जो ताप होत आहे. तो ताप निवृत्त होण्यांकरिता दुसरा काही उपचार करू नका. त्याने माझे मन शांत होणार नाही. माझ्या दृष्टिपुढे सारखे त्याचे ध्यान ठसावले आहे. त्या गोधने राखणाऱ्या श्रीकृष्णाने प्रत्यक्ष भेटीच्या प्रेमाचा प्रसंग नाहीसा करून माझे चित्त विरहांत गोवून ठेवले आहे.आतां खटपटी न करता मनांत इच्छा आहे की आनंदाने माझ्या अंतःकरणांत श्रीकृष्णाने संचार केला आहे. त्याची भेट झाल्याशिवाय दुसऱ्या उपायांचा काही एक उपयोग नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे निर्गुण श्रीविठ्ठल त्यांनी माझी सुखाची साठवण तेच गिळून टाकली.असे माऊली सांगतात.


१९०
घनु वाजे घुणघुणा ।
वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा ।
वेगीं भेटवा कां ॥१॥
चांदवो चांदणें ।
चापेवो चंदनु । देवकी नंदनु ।
विण नावडे वो ॥२॥
चंदनाची चोळी ।
माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी ।
वेगीं भेटवा कां ॥३॥
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें ।
कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥
दर्पणीं पाहातां ।
रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
मज ऐसें केलें ॥६॥

अर्थ:-

मेघाचा घुणु घुणु असा सुंदर आवाज येत आहे. वारा झुळुझुळु आवाज करीत आहे. अशा स्थितित त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली विरहिणी आपल्या मैत्रिणीला सांगते.त्या श्रीकृष्णं परमात्याला लवकर आणून भेटवा. त्या श्रीकृष्ण परमात्म्यावांचून हे सुंदर चंद्र चांदणे व सोनचाफ्याची फुले किंवा चंदनाची उटी यापासून मला काही शांतता मिळत नाही. एकट्या देवकीनंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला काही आवडत नाही. ही पहा चंदनाची चोळी जसी कांही माझे सर्वांगाला पोळत आहे. याकरिता तो कान्हो वनमाळी मला लवकर भेटवा. ही पुष्पशय्या अत्यंत शीतळ आहे खरी पण त्या श्रीकृष्ण परमात्म्यावांचून मला अग्नीसारखी पोळत आहे. ती लवकर विजवा. तुम्ही कोकिळासारखे सुंदर गीत माझ्या पुढे गात आहात, पण ते मला ऐकायला सुद्धा नको. तर मी तुम्हांस विचारलेले ते ऐकून उत्तर द्या. फार काय सांगू? हातांत आरसा घेऊन मी पाहाण्याला गेले तर माझे रूप सुद्धा मला दिसत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने मला असे वेडी करून टाकले आहे.म्हणजे मला त्याच्या प्राप्तिविषयी तळमळ लागलेली आहे. असे माऊली सांगतात.


१९१
जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।
तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥१॥
जीवें अनुसरलिये अझून कां नये ।
वेगीं आणा तो सये प्राण माझा ॥२॥
सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु ।
बापरखुमादेवीवरु श्रीविठ्ठलु ॥३॥

अर्थ:-

श्रीकृष्णा तूं सर्व जीवांचा जीव, प्रेमाचे ही प्रेम असा आहेस. तुझ्यावांचून मला दुसरे काही आवडत नाही. सर्व भावाने मी तुला शरण आले आहे. पण तू अजून का येत नाहीस. त्यामुळे फार दुःख होत आहे. तो श्रीकृष्ण म्हणजे माझा प्राणच आहे. त्याला तुम्ही लवकर घेऊन येऊन माझी भेट करून द्या.त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे काय वर्णन करावे? सर्व सौभाग्य त्याचे ठिकाणी असून लावण्याचा तो साक्षात् सागरच आहे. असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, यांना मी सर्व जीवाभावाने शरण आलो आहे.असे माऊली सांगतात.


१९२
मी माझें म्हणतां ठकचि ठेलिये ।
आपुले जाति कूळ विसरुनि गेलिये ॥१॥
गुणाचा दुकाळ पडिला देशीं ।
निर्गुणासी कैसी रातलिये ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सये ।
सेजारासी नये काय करुं ॥३॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपांचे दर्शन मला झाले. म्हणून आतां मी आणि माझे असे म्हणण्याला शिल्लकच राहिले नाही. त्यामुळे मी अमक्या कुळाची, अमुक जातीची हे सर्व विसरून गेले.ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा दुष्काळ म्हणजे अभाव आहे. अशा त्या निर्गुणरूपाच्या ठिकाणी काय माझे मन रमले आहे. ज्याच्या ठिकाणी माझे मन रमले आहे. ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते माझ्या बिछान्यावर येत नाही काय करू? असे माऊली सांगतात.


१९३
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळु आलागे माये ।
चांचरती चांचरती बाहेरी निघालें ।
ठकचि मी ठेलें काय करुं ॥१॥
मज करा कां उपचारु अधिक ताप भारु ।
सखिये सारंगधरु भेटवा कां ॥ध्रु०॥
तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु ।
लावण्य मनोहरु देखियेला ॥
भरलिया दृष्टि जंव डोळां न्याहाळी ।
तव कोठें वनमाळी गेलागे माये ॥२॥
बोधोनि ठेलें मन तंव जालें अने आन ।
सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा ।
तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥३॥

अर्थ:-

भगवत्प्राप्तीविषयी उच्छुक झालेली विरहिणी म्हणते. मी आपल्या मंदिरांत बसले असता सुगंध शीतळ वायूची सहज झुळुक आली. माझ्या मनाला असे वाटले की हा वारा नाही.तर गोकुळांतला गोपाळच आहे. म्हणून त्याला पाहाण्याच्या इच्छेने चाचपडत चांचपडत म्हणजे हळू हळू बाहेर आले. पण मी ठकल्यासारखीच झाले. काय करू.मला तुम्ही शांत होण्याकरिता उपचार करता पण त्यापासून मला अधिकच ताप होतो. मला तो शारंगधर आणून भेटवा. काय त्याचे वर्णन सांगू तो सांवळ्या वर्णाचा, सुंदर रूपाचा, कंबरेला पितांबर नेसलेला लावण्याचा जणू काय सागरच असलेला त्याला पाहिल्या बरोबर मनाचे हरण करणारा अशा श्रीकृष्ण परमात्म्याला डोळे भरून निरखून पाहते. तोच तो कुणीकडे गेला कुणाला ठाऊक. त्याने मला दर्शन देऊन माझे मन आपल्या स्वरूपाच्याठिकाणी बांधून ठेवल्यामुळे माझ्या शरीरांतील प्राण शोषून गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी माझे शरीर वाणी मनही वेधून टांकले. असे माऊली सांगतात.


१९४
पेंडारा दाऊनियां थोकसी ।
देखिलें पण केविं जाये अंग लपविसी ।
तरी वेधा काय करिसी ।
मा शहाणपण तुझें नव्हेरे गोंवळा ॥१॥
आम्ही येकविध जीवें तुवा केलें अधातुरें
वर्षावो वोसरलिया बोल्हासु जाय
तैसी न होत प्रेमळ उखरें गोंवळा ॥२॥
देखी गुंफ़लिया फ़ुलें डाळलिया आहाच
तंव कांही न दिसेरें ।
परि घ्राणा इंद्रियांच्या अंगसुखा
समर्थ कोणा असेरे गोंवळा ॥३॥
या बोला मानवोंनि बापरखुमादेविवरे
विठ्ठलें दिधलें आप आपणियातें ।
तैंपासुनि तें लपणेंचि पारुषले
उभा पंढरिये येणें वेषेरें गोंवळा ॥४॥

अर्थ:-

पेंडाऱ्या म्हणजे लुटाणाऱ्या श्रीकृष्णा आम्हांला संसार दाखवून आपण मात्र त्यातच लपून राहिला आहेस. तशा जीवांना तुझी प्राप्ती नाही हे खरे पण आम्ही तुला ओळखला आहे.तूं कोठे जाशील? तूं आपले स्वरूप लपवून असतोस परंतु अंतःकरणांत तुझ्या स्वरूपाचा सारखा वेध असल्यामुळे आता तु काय करशील. आता तु लपण्याचा प्रयत्न करणे हे शहाणपणाचे काम नाही.आम्ही एकविध भावाने, जीव तुझ्या ठिकाणी ठेऊन संसार सोडुन तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी आम्ही ‘आधातुरे’ म्हणजे तुझ्या स्वरूपाशिवाय दुसरा आधारच नाही असे आहोत. तुझे ठिकाणी आमचे असलेले निर्मळ प्रेम रेताड जमीनीवर वर्षाव होऊन ओसरून गेल्यावर ओलावाही जसा निघून जातो. तसे आमचे नाही. झाडावर असलेली फूलं काढून त्याचा हार केला तर सुगंधाच्या दृष्टीने डोळ्याला त्याचे महत्व नाही. पण घ्राणेंद्रिय अंगाने सुगंध घेण्यास समर्थ आहेत. तसे आम्ही वरून दिसायला गबाळ असलो तरी निर्मळ भक्तिभावाने त्या फुलाच्या सुगंधावरचे आहोत. या आमच्या खेळण्यांत असलेला आमचा निर्मळ भाव माहित झाल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने आपले आत्मस्वरूप आम्हाला दिले आणि तेव्हा पासून निर्गुणरूपांने लपण्याचे सोडून देऊन भक्तांकरिता पंढरीस कटेवर हात ठेऊन तोच श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे.असे माऊली सांगतात.


१९५
जातिकुळ माझें गेलें हारपोनि
श्रीरंगावांचुनी आनु नेंणें ॥१॥
किती वो शिकवाल मज वेळोवेळां ।
मी तया गोवळा रातलिये ॥२॥
अष्टभोग भोगणें माते नाहीं चाड ।
भक्तिप्रेम गोड लेईलेंगे माये ॥३॥
बापरखुमादेवीवरु जीवींचा जिव्हाळा ।
कांही केलिया वेगळा नव्हेगे माये ॥४॥

अर्थ:-

श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कुळ सर्व हरपून गेले. आतां श्रीकृष्ण परमात्म्यावाचून दुसरे काही जाणत नाही. संभावित स्त्रीयानी परपुरूषाच्या ठिकाणी प्रेम ठेवू नये. ह्या बुद्धिने तुम्ही मला पुष्कळ व वारंवार उपदेश करता परंतु त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेले आहे. स्त्रीपुरूष भोगांमध्ये दर्शन स्पर्शनादि अष्टभोग आहेत.त्याची आतां मला चाड नाही.कारण श्रीकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत प्रेमभक्तीचे गोड़ लेणे मी आपल्या अंगावर धारण केले आहे. त्यामुळे अष्टभोगाची मला काय चाड आहे. माझ्या जीवाचा जिव्हाळा असलेले माझे पिता व रखुमाईचा पति जे श्रीविठ्ठल असे जे माझे बाप ते काही केल्या आतां जीवापासून वेगळा होत नाहीत. असे माऊली सांगतात.


१९६
ज्याचिये आवडी संसार त्यजिला ।
तेणें कां अबोला धरिलागे माये ॥
पायां दिधली मिठी घातली जीवें गांठी ।
साऊमा नये जगजेठी उभा
ठेलागे माये ॥१॥
भेटवा वो त्यासी चरण झाडीन केशी ।
सगुणरुपासि मी वो भाळलिये ॥२॥
क्षेमालागीं जीउ उतावेळ माझा ।
उचलोनि चारी भुजा देईन क्षेम ॥
कोण्या गुणें कावो रुसला गोवळु ।
सुखाचा चाबळू मजसी न करीगे माये ॥३॥
ऐसें अवस्थेचें पिसें लाविलेसें कैसें ।
चित्त नेलें आपणिया सारिसेंगे माये ॥
बापरखुमादेविवरें लावियेलें पिसें ।
करुनि ठेविलें आपणिया ऐसेंगे माये ॥४॥

अर्थ:-

ज्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरितां सर्व संसार टाकून दिला. त्याने माझ्याशी का बरे अबोला धरिला. कुणाला ठाऊक? त्याच्या पायांवर मिठी घालून जीवाची गांठ बांधली. तरी तो परमात्मा श्रीकृष्ण माझे समोर उभा राहून मला प्रत्यक्ष भेट देत नाही. कसेतरी करून माझी त्याची भेट करवा हो ! त्याचे पाय आपले केसांने झाडीन. त्याच्या सगुणरूपाला मी अगदी भाळून त्याला अलिंगने देण्यांकरिता माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजा उचलून त्याला अलिंगन केंव्हा देईन असे झाले आहे. तो गोधने राखणारा श्रीकृष्ण परमात्मा मजवर कां रूसला आहे कोण जाणे? माझ्याशी तो सुखाच्या चार गोष्टी करीत नाही.अशा अवस्थेचे वेड मला कसे विलक्षण लावले आहे. माझे चित्तच आपल्या स्वरूपांच्या ठिकाणी घेऊन गेला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी मला वेड लावून आपल्या सारखे करून ठेवले. असे माऊली सांगतात.


१९७
देऊनियां भेटी मजसी न करी गोठी ।
लांचावला जीउ पाठी न राहेवो ।
निष्ठुर म्हणो तरी अपंगीतो मातें ।
व्यापूनि जीवातें उरी उरवितो ॥१॥
तो दाखवावो माये धरिन त्याचे पाये ।
तयालागीं जीऊ आहे उतावेळु ॥२॥
भेटीचेनि सुखें मनचि होय मुर्के ।
तें रुप देखें परि बोलावेना ॥
सगुण गुणाचा म्हणोनि घातली मिठी ।
तंव तो आपणया समसाठीं करुनि ठेलें ॥३॥
काय नेणों कामाण कैसें वो जालें ।
चित्त चोरुनि नेलें गोवळेनें ।
बापरखुमादेविवरु विठ्ठले अंग लपवूनि ।
चैतन्य चोरुनि नेणों माये ॥४॥

अर्थ:-

भगवान परमात्म्याने मला भेट दिली परंतु माझ्याशाची तो बोलत नाही. त्याविषयी माझा जीव इतका लाचांवला की तो जीवस्वरूपाने निराळा उरतच नाही.आता त्याल निष्ठुर म्हणावे तर माझा स्विकार करुन मला अंतरबाह्य व्यापून टाकून जीव असा उरूच देत नाही. असा जो परमात्मा तो मला दाखवा गे बायांनो. त्याचे केंव्हा पाय धरीन अशारितीने माझा जीव त्याच्या दर्शनाकरिता अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या भेटीच्या सुखाची कल्पना मनांत आली म्हणजे मन अगदी मोकळे होऊन जाते. काय सांगू? ते रूप पाहिले तरी त्याचे वर्णन करता येत नाही. श्रीकृष्ण परमात्मा हा उत्तमगुणाचे निधान आहे. म्हणून त्याचे पायी मिठी घातली. तर तो जीवाला आपल्या प्रमाणे परमात्मरूपच करून ठेवतो. कशी मला त्याच्या दर्शनाची इच्छा झाली कोण जाणे? त्या गोधने वळणाऱ्या श्रीकृष्णाने माझे चित्त चोरून नेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी आपले स्वरूप लपवून माझे जीवचैतन्य चोरून नेले.असे माऊली सांगतात.


१९८
सुख सेजारीं असतां कळि जाली वो पाहंतां ।
देठु फ़ेडूनि सेवतां अरळ केलें ॥१॥
अंगणीं कमळणी जळधरु वोले करी ।
वाफ़ा सिंपल्यावरी वाळून जाये ॥२॥
मोतियाचें पाणी वाहे निळिये सारणी ।
गुणाची लावणी लाऊनि गेला ॥३॥
अंगणीं वोळला मोतें वरुषला ।
धन्य दिवसु जाला सोनियाचा ॥४॥
चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा ।
मोतियांचा चारा राजहंसा ॥५॥
अंगणीं बापया तूं परसरे चांपयां
असुवीं माचया भीनलया ॥६॥
वाट पाहे मीं येकली मज मदन जाकली ।
अवस्था धाकुली म्हणोनिया ॥७॥
आतां येईल ह्मण गेला वेळु कां लाविला ।
सेला जो भिनला मुक्ताफ़ळीं ॥८॥
बावन चंदनु मर्दिला अंगीं वो चर्चिला ।
कोणें सदैवें वरपडा जाला वो माये ॥९॥
बापरखुमादेविवरु माझे मानसींचा होये ।
तयालागी सये मी जागी सुती ॥१०॥

अर्थ:-

श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन सुखाच्या बिछान्यावर आनंदाने देहतादात्म्य सोडून त्याचा भोग घेत असता, दोघामध्ये कलह होऊन ‘अरळ केले’ म्हणजे त्याने भलतेच केले. निघून गेला. शेवंतीचे फूल तोडून घेतले असता ती जशी दीन होते त्याप्रमाणे आतां माझी स्थिति झाली आहे. किंवा अंगणामध्ये कमळाची झाडे लावावीत त्याच्यावर पर्जन्य पडावा म्हणजे ती अत्यंत प्रफुल्लित होतात. इतक्यांत तिच्यावर जर कोणी कडक पाणी शिंपडले तर ती जशी वाळून जाते. त्याप्रमाणे माझी स्थिति झाली आहे. मोती उत्पन्न होण्याचे पाणी जसे स्वातीचे मेघ वाहातात. तशी माझ्याठिकाणी तो आपल्या गुणाची लावणी करून गेला. काय त्याचा आनंद सांगावा? तो नीलवर्णाचा मेघरूपी श्रीकृष्ण त्याने माझ्या अंगणा, जणू काय मोत्यांचाच वर्षाव केला. तो दिवस धन्य सोन्याचा झाला. म्हणून काय सांगू. अशा त्या आनंदाच्या भरांत हे चोरट्या मधुकरा श्रीकृष्णा मी कमळणी असून माझा तूं थारा घेतलास. त्यामुळे जसे राजहंसाला मोत्यांचा चारा घातला असतां त्यास आनंद होतो. तसा मला तुझ्यामुळे आनंद झाला. असे असता चाफेकळी सारखी जी मी त्या माझ्या अंतःकरणातून तूं एकदम निघून गेलास त्यामुळे माझी काय स्थिति आहे म्हणून सांगू माझ्या डोळ्यांत सारखे पाणी भरून येते. अंथरूणावर मी एकटी तुझी सारखी वाट पाहाते. त्या मदनाने मला फार आकळून टाकले आहे. आपल्या प्रियकरांच्या वियोगाने जी अवस्था होते ती काही सामान्य आहे असे म्हणू नये.आतां येतो म्हणून तूं गेलास मग इतका वेळ कां लावलास? अरे माझ्या डोळ्यांतील पाण्याने मोत्याने गुंफलेला शेला भिजून गेला. अत्युत्तम बावनी चंदन उगाळून माझ्या अंगाला थंडावा येण्याकरिता लावला पण त्याचा काही उपयोग नाही. कारण मला विरहदुःखांत ठेवून कोण्या भाग्यवान स्त्रीच्या हाती सापडलास कोणास ठाऊक. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सारखे माझ्या मनांत असावेत, त्यामुळे मी सारखी जागी आहे. असे माऊली सांगतात.


१९९
प्रभा कळिकादीप शून्याकार हें स्वरुप ।
मुनिजनमानसींचे सुख येकलेपणें ॥
बिंब अर्धबिंब अर्धमार्तृका तुर्या नातळे ज्यासी ।
आनु तो दिठी केविं धरावा ।
गुणातीत निर्गुणीं जे सहजीं सहजची
सगुणीं विखुरेरया ॥१॥
आपआपणिया पडे माय विसरु ।
मज आवडे तो नंदाचा कुमारुगे माये ॥२॥
म्हणौनि डोळियचे अंजन
आणि मेघ:शाम बुंथीचें दर्शन ।
निडारलें वृत्ति नयन पाहों जावो ।
तेथें तो अनुमतेम नलगे मतांतरें
भावो देखणे होय देवोरया ॥३॥
डोळ्याचा डोळसु विचरे हा परेशु
तोचि परमात्मा सर्वी असे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु उघडा
पुरविला सौरसुगे माये ।
आम्हां जितांचि मरणें किं
मेलिया कल्पकोटी जिणें ।
निवृत्तीनें दाविला परेशु रया ॥४॥

अर्थ:-

मनन करणाऱ्या मुनी लोकांच्या मनांत ज्या सुखाची उपलब्धि होते ते एकच असून त्यात अनेक प्रकार होतात. कोणास दीपकलिकेच्या प्रभेप्रमाणे, कोणास शून्यरूपाने कोणास साकाररूपाच्या दर्शनाने सुख होते. परंतु ज्या परमात्मवस्तुच्या च ठिकाणों बिंब, अर्धबिब, अर्धमात्रिका किंवा तुर्या इत्यादी धर्माचा संबंध नसतो. त्याची बरोबरी कशी होणार? त्या परमात्मवस्तुला दृष्टिने कसा बघु? गुणातीत जे निर्गुण ब्रह्म ते आपल्या सहज स्वभावाने सगुणामध्ये विस्तारले आहे. ज्याचे दर्शन झाले असता आपल्याला आपलेपणाचा विसर पडावा असा ज्या भगवान श्रीकृष्ण दर्शनाचा महिमा आहे. तो मला फार आवडतो. म्हणून डोळ्याचे अंजन आणि मेघाप्रमाणे शामवर्ण असलेल्या बुंथीचे’ म्हणजे स्वरूपाचे ध्यान चर्मचक्षूने नव्हे तर वृत्तीच्या डोळ्यांने पाहू गेलो असता त्या दर्शनाकरिता इतर शास्त्रकारांच्या मतांच्या अनुमतीची आवश्यकताच रहात नाही. अनन्यभावाने तो देव पाहिला जातो. डोळ्यांचा डोळस म्हणजे डोळ्यालाही प्रकाशीत करणारा तोच परेश परमात्मा सर्व पदार्थामध्ये व्याप्त आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती उघड दिसणारे जे श्रीविठ्ठल त्यांनी आमचा हा प्रेमाचा छंद पुरविला. त्यामुळे आमची अशी स्थिति झाली की लोकदृष्ट्या आम्ही जीवंत असतानाच आमचे मरण प्राप्त झाले आणि विचाराने प्राप्त झालेल्या मरणामुळे आता आम्हाला कोट्यवधी कल्पच काय परंतु सदैव जीवंत असणारा परमात्मा त्याच्याशी श्रीगुरू निवृत्तीरायांनी ऐक्य करून दिले. असे माऊली सांगतात.


२००
भेटिसी गेलीये तंव तीच जालिये ।
भुलली ठेलिये मज न कळे कांहीं ।
परतलिया दृष्टी जंव मागुता न्याहाळी ।
तंव काळी ना सावळी मूर्ति चोजवेना ॥१॥
काय सांगो माये न कळे तयाची सोये ।
येणें मनाचे मोडुनि पाये वेधियेलें ॥२॥
आंतु बाहेरी कैसी भरलेनि रंगें ।
क्षेम देऊं गेलें अंगे तंव तो जडूनि ठेला ॥
वारितां नावरे काय सांगो माय गोटी
करुनि ठेला साठीं जीवित्वेसी ॥३॥
आशेचिये हावे तंव तो परतीचा धावे ।
निराशेसी पावे वेळु न लागतां ।
बापरखुमादीववरु विठ्ठलीं उपावो ।
ज्ञानदेवा भावो निवृत्तिपायीं ॥४॥
गाईच्या रुपकानें हरीचें वर्णन

अर्थ:-

त्या श्रीकृष्णाच्या भेटीला मी गेले पण आश्चर्य असे की त्याची भेटी झाल्याबरोबर मी तद्रूपच होऊन गेले. काय झाले हे माझे मलाच कळेना पुन्हा माघारी दृष्टि येऊन न्याहाळून पहावयाला लागले तो, ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ति काळी की सांवळी हे समजेना. त्या श्रीकृष्णाची काय स्वरूपस्थिती आहे. ते काही कळत नाही. या श्रीकृष्णाने माझ्या मनाचे संकल्प विकल्पाची धांव मोडून मला वेड लावून टाकला. अंतरबाह्य त्याचे रंगात भरून गेले. आलिंगन द्यावयास गेले. तो माझ्या जीवासी तो ऐक्य होऊन गेला. काय चमत्कार सांगावा त्याला पलीकडे करावयाला गेले तो माझ्या जिवांहून निराळा होतच नाही. मनांमध्ये वैषनयीक आशा ठेवून त्याला पाहू जावे तर तो उलटा दूर जातो. आणि ज्याचे चित्त निराश म्हणजे निर्विषय झाले असेल त्याला एका क्षणाचा वेळ न लागता तो प्राप्त होतो,माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे श्रीगुरू निवृत्तीरायांच्या चरणी निस्सीमभाव असावा हेच होय, असे माऊली सांगतात.



शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *