संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

क्षीर सागरीचें निजरुपडें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७

क्षीर सागरीचें निजरुपडें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७


क्षीर सागरीचें निजरुपडें ।
पाहतां पारखिया त्रिभुवनीं न संपडे ।
तें उभें आहे वाडें कोडें ।
पुंडलिकाचे आवडी ॥१॥
मेघश्याम घेउनियां बुंथी ।
जयातें श्रुती पैं वानिती ।
कीं तें पुराणांसी वाडे ।
तें पंढरिये उभें असें कानडे गे माये ॥२॥
आवडीच्या वालभें गोजवलें गोजिरें ।
पाहातां साजिरें त्रिभुवनाएक गे माये ॥३॥
तें सकळ मंगळदायकाचें प्रेम आथिलें ।
कीं ब्रह्मरसाचें वोतिलें घोसुलें ।
ब्रह्मविद्येचें सार मथिलें ।
देखा सकळ आगमींचें संचलें ।
की बापरखुमादेविवर विठ्ठल नामें मढिलें ।
श्रीगुरु निवृत्तीनें दिधलें ।
प्रेमखुण रया ॥४॥

अर्थ:-
ते क्षीरसागरावर असलेले श्रीविठ्ठलाचे रूप, सर्व व्यापक असूनही बहिर्मुख पुरूषांना ते त्रैलोक्यातही सापडणार नाही. पण आश्चर्य हे आहे की मोठ्या कौतुकाने पंढरीमध्ये ते विटेवर उभे राहिले आहे. याचे कारण एकच आहे की प्रेमळ भक्त जे पुंडलिकराय त्याच्या आवडीकरिता शामसुंदररूप धारण करून ते विटेवर उभे आहे. त्याच्या स्वरूपाचे वर्णन श्रुती शास्त्रांनी व पुराणांनी केले आहे. अशा तऱ्हेने भेटण्याला जे अवघड भगवत्स्वरूप ते पंढरीत उभे आहे. त्यांनी ते सुंदर रूप आपल्या प्रेमळ भक्ताकरिता धारण केले आहे. या त्रिभुवनांत तेच एक रूप सुंदर आहे. त्याचेच नाम जगात मंगलदायक आहे. त्याचे रूप प्रेमाचे ओतलेले आहे. ज्याच्या रूपाला ब्रह्मरसाचे घोस आले आहेत.ज्याचे रूप म्हणजे ब्रह्मविद्यचे सार काढून बनविलेले आहे. ज्याचे वर्णन करण्यामध्ये सर्व शास्त्रे मग्न झाली आहेत ते माझे पिता व रखुमाईचे पती श्रीहरि श्रीविठ्ठल हे नांव धारण करून विटेवर उभे आहेत. त्या पांडुरंगाची प्रेमाची खूण श्रीगुरुनिवृत्तिरायांनी मला दिली असे माऊली सांगतात.


क्षीर सागरीचें निजरुपडें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *