संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३८

संत ज्ञानेश्वर गाथा ५९८ ते ९०३

संत ज्ञानेश्वर गाथा ५९८ ते ९०३  विडिओ सहित  श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


ज्ञानपर – अभंग ५९८ ते ७०३

५९८
एकत्त्व बाही उतरला भक्त ।
द्वैताद्वेषा विरक्त पाहोनि ठेली ॥१॥
द्वैताची काजळी क्रोधु दशा पाजळी ।
नाहीं ते उजळी तमदृष्टी ॥२॥
जंववरी कामना आसक्ती मोहो ।
तंववरी ग्रहो कल्पनेचा ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं आनंदमय हरी ।
द्वैताची कामारी नाईके कानीं ॥४॥
अर्थ:-
विरक्तभक्त ब्रह्मात्मैक्यज्ञानाने संसार सागर तरुन गेला. त्या स्थितीत द्वैत म्हणजे प्रपंच सत्यत्वाने नाहीसाच झाला. तें एकतत्त्व ज्ञान द्वैताची काजळी जो क्रोध व त्याचे मूळ कारण जे अज्ञान यांचा नाश करुन त्यांना बिंबरुपाचा म्हणजे आत्म्याचा उजाळा मिळतो. जो पावेतो जीव स्वरुप अज्ञानात गुंतलेला असतो. तोपर्यंत प्रपंचात कल्पनांची गर्दी असते. माझ्या चित्तांत आनंदरुप श्रीहरि असल्यामुळे द्वैतरुपी दासीची वार्ता देखील कानांवर येत नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५९९
आत्मरुपीं रुप रंगलें सहज ।
रिगोनि निजगुज सतेजीलें ॥१॥
तेज बीज बिवडा पेरिलेंनि वाडें ।
उगवलें चोखडें ब्रह्मरुप ॥२॥
शांतिची गोफ़ण उडविला प्रपंच ।
धारणा आहाच स्थिर केली ॥३॥
वेटाळिलें धान्य खळे दान दिठी ।
दिधलें शेवटीं भोक्तियासी ॥४॥
देते घेते जीवें नुरेचि शेखीं ।
शिवमेव खोपी समरसीं ॥५॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति उदारा ।
ऐसा एकसरा तुष्टलासी ॥६॥
अर्थ:-
अत्यंत गुहा श्रुति प्रतिपादित शुद्ध आत्म स्वरूपांच्या ठिकाणी माझे मन रंगन गेल्यामुळे मी तेजस्वी झाला आहे. ज्याप्रमाणे जमिनीमध्ये उत्तम पिक येण्या करिता उन्हाने तापलेली जमीन, चांगले बी, चांगला बिवड (पीक बदलून घेण्याची प्रक्रिया)अशी सामुग्री लागते. त्याप्रमाणे मनुष्य शरीर, तीव्र मुमुक्षुता आणि ब्रह्मानुभवी उपदेष्टा इतकी सामग्री मिळाली असता ब्रह्मस्वरुपाची प्राप्ती होण्यास काय उशीर. पीक जरी उत्तम आले तरी त्या पिकावर बसून दाणे खाणारी पाखरे उडवावी लागतात. त्याप्रमाणे शांतीची गोफण घेऊन प्रपंचाविषयी असलेला सत्यत्वनिश्चय उडवून देऊन चित्तवृत्ति स्थीर केली पाहिजे. नंतर सगळे धान्य खळ्यावर आणून त्यातील बारा बलुत्यांचे भाग त्यास द्यावे लागतात व मग शिल्लक राहिल ते यजमानास मिळावयाचे. त्याप्रमाणे या जीवरूपी शेतकऱ्याला देता देता शेवटी परमात्म स्वरूपाशिवाय काहीच उरत नाही. हे उदारा, निवृत्तीराया मला ब्रह्मानुभवस्थितीला पोहोचवून जे आपण संतुष्ट झाले आहात त्या तुमच्या ऐश्वर्याचे काय वर्णन करावे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६००
आदि मध्य आंत टाकोनि अवसान ।
करुं हरिध्यान सोहंभावें ॥१॥
दिवसा कामान रात्रीचा बडिवारु ।
हरिसपरिवारु हरि आम्हां ॥२॥
जातीची विजाती नाहीं पैं कुळधर्म ।
कुळींचा कुळधर्म हरी आम्हां ॥३॥
ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर ।
सांगतसे विचार आम्हां तुम्हां ॥४॥
अर्थ:-
जगताची उत्पत्ति, स्थिती, अंत तसेच वासना या सर्वाचा विचार टाकून देऊन श्रीहरिचे सोहं रुपाने आपण ध्यान करु.आता या श्रीहरिच्या ध्यानाशिवाय दिवसा व रात्री कांही एक काम उरलेले नाही. कारण आमच्या प्रपंचात सगळा परिवार हरिच झाला आहे.आम्हाला कुळधर्म, जातीचा आगर विजातीचा कांही एक संबंध उरला नाही. अशी स्थिती झाल्यामुळे आमच्या कुळातला कुळधर्म एक हरिच बनला आहे. थोर अशा वेद शास्त्रांनी हाच विचार तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६०१
अवघ्या बाहीं म्यां व्योम कवळिलें ।
अवघां ह्रदयीं अरुप धरिलें ॥१॥
अवघेपणें मी त्याचीच जालें ।
तेंचि पावलें तदाकारें ॥२॥
कांहीं नहोनियां कांहीं एक जाले ।
अवघाचि शोशिला ब्रह्मरसु ॥३॥
रखुमादेविवरु अवघाचि धरिला ।
अवघाचि गिळिला अवघेपणें ॥४॥
अर्थ:-
माझ्या बाहुनी ते निराकार आकाशरुपी ब्रह्म मी कवळिले. आणि तेच रुप हृदयात धरुन ठेवले. सर्व प्रकाराने मी त्याचीच झाले. ब्रह्मरुप झाले.कांही एक न होता मी तद्रूप होऊन ब्रह्मरस सेवन केला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्यांना मी पूर्ण स्वाधीन केल्यामुळे वेगळा ठेवला नाही. असे माऊली सांगतात.


६०२
तनु चोरिली कोठें मी पाहों ।
भूक लागली काय मी खावों ॥१॥
पाहणें नाहीं काय पाहों ।
ध्यान नाहीं काय ध्यावों ॥२॥
भिंत नाहीं काय चित्र लिहों ।
चित्र सरलिया तया नाहीं
ठावो जी देवा ॥३॥
निवृत्तिदास म्हणे कैसें हो काई ।
रखुमादेविवरा विठ्ठला ध्यायीं ॥४॥
अर्थ:-
मी ब्रह्मरुप झाल्यामुळे माझा देहभाव नष्ट झाला. नंतर त्याला पहावयास गेलो असता आता तो कोठे आहे ? भूक लागली तर खाण्याला पदार्थ आहेत कोठे? या स्वरुपाच्या ठिकाणी पाहाणेपणाच नाही तेथे काय पाहावे? व जेथे ध्येयत्व नाही. तेथे काय ध्यावे? भिंत नाही तेथे चित्र कसे काढावे? चित्र जर नष्ट झाले तर त्याला ठिकाण कोठे आहे? त्याप्रमाणे जगतरुपी चित्र काढण्याला मायारुपी भिंत पाहिजे. पण ती मायाच ज्ञानाने निवृत्त झाल्यामुळे तिच्यावर काढले जाणारे चित्र म्हणजे जगत याची प्रतिती येईल कशी? निवृत्तीनाथ म्हणतात मला जर कोणी विचारेल की, ही स्थिती प्राप्त होण्याला काय केले पाहिजे? तर मी त्याना असे सांगेन की तुम्ही रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ध्यान करा. असे माऊली सांगतात


६०३
तुडतालेवांचूनि अवस्था काईसी ।
दुजे तरी बोलों कवणासिगे माये ॥१॥
अनुमानालागीं नुरिजे उरी ।
सांगतां लोकाचारी लाजिजे ॥२॥
अबोलणेंसी बोलणें विनोदें ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला गुणनिधी ॥३॥
अर्थ:-
तुडतालेवांचूनी म्हणजे प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय परमात्मप्राप्ती कशी होणार तसेच परमात्मज्ञानाविषयी अनधिकारी मनुष्याजवळ बोलून उपयोग तरी काय? अनुमानाने त्या परमात्म्याची गोष्ट चार लोकांतही सांगण्या जोगे नाही. कारण सर्व सामान्य लोक त्याचे आधिकारी नाही. म्हणुन त्यांच्याजवळ परमात्म्याविषयी काही बोलायचे तर लाज वाटते. बोलायचे झाले तर माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याशीच बोलावे हेच बरे. असे माऊली सांगतात.


६०४
मन सुमन घालूनि माळा ।
करुनि सकळा कळा गळां
पुर्ण वो माये ॥१॥
आउट पिठींची दुरुगिळी घातली ।
तेथें दोघें पुजे बैसविले
पुजे वो माये ॥२॥
तेथें अद्वैत अंगारु परोपरी वासु ।
करुनियां सायासु वैराग्य
ज्ञाने वो माये ॥३॥
ऐसा ह्रदयमंदिरीं दुर्गादेवीअंतरीं ।
रखुमादेविवरु निर्धारी
वो माये ॥४॥
अर्थ:-
चांगले मन हेच कोणी फुले त्या फुलांची गळ्यांत पुरेल अशी सुंदर माळ करुन घातली म्हणजे सर्व प्रकाराने मन स्वाधीन करुन ठेवले. नंतर साडेतिन मात्रेच्या ॐ काराचे अधिष्ठान जे परमात्मस्वरुप त्याला जेव्हां नमस्कार केला त्यावेळी दुर्गुळी म्हणजे धूरी घातली तेव्हा बोध व भक्ति जवळ होती. जण ती दोघे परमात्म्याची पूजाच करीत होती. तेथे अनेक प्रकारचे सुवास ज्यांत आहेत. असा अद्वैताचा अंगारा लावला. पण ही वैराग्याची व ज्ञान प्राप्तीची स्थिती प्राप्त करावयास फार सायास करावे लागले. मी अंतर्मुख दृष्टि करुन जेव्हां पाहू लागतो. तेव्हा माझ्या हृदयांत रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हीच कोणी दुर्गादेवी माझ्या हृदयांत प्रगट झाली आहे. असे मला दिसते. असे माऊली सांगतात.


६०५
दुधावरिली साय निवडुनि दिधली ।
तैसी परी जाली आम्हां तुम्हां ॥१॥
धालों मी ब्रह्में उदार सब्रह्में ।
अनुदिनीं प्रेमें डुल्लतसे ॥२॥
नाठवे आशा देहावरी उदास ।
मीतूंपण भाष चोजवेना ॥३॥
रखुमादेविवर विठ्ठलीं मुरोनि राहिला ।
तो आनंदु देखिला संतजनीं ॥४॥
अर्थ:-
दुधांमध्ये सारभूत जसी साय असते. व ती काढून जसी हातावर द्यावी त्या प्रमाणे सर्व संसारात सारभूत जो परमात्मा त्याची प्राप्ती आज आपल्याला झाली आहे. परमात्मस्वरुपाने तृप्त होऊन कृत्यकृत्यतेचे उदगार तोडांतून निघतात. आम्ही रात्रंदिवस त्या प्रेमांत डोलत आहोत.अशा स्थितीत आशेचा आठवच नाही. देहावर उदासीनता येते. आणि मी, तूं पणाचा द्वैतभाव जाणवत नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या आनंदात आम्ही कसे डोलत आहोत हे एक, साधुसंतानाच माहित आहे. असे माऊली सांगतात.


६०६
जगासि गौसणी ब्रह्मरुपें देखिली ।
ते मी अंतरीं पांगुरली अंतरामाजि ॥१॥
अंतरींचे सुख अंतरीं निमालें ।
अंतर बैसविलें ब्रह्मपदीं ॥२॥
बापरखुमादेविवर ब्रह्मपदीं देखिला ।
मजमाजी सामावला अद्वैतपणें ॥३॥
अर्थ:-
जगाला ब्रह्माची गवसणी आहे. असे मी पाहिले आणि त्याच ब्रह्मरूपाची गवसणी अंतःकरणांत पांघरली म्हणजे अंतःकरणांत प्रतिबिंबित झालेला आत्मा तो ब्रह्मरुप झाला. त्या ऐक्य स्थितीचे प्रथम झालेले सुख अंतरीच लय पावले. आणि अंतःकरण ब्रह्मपदाच्या ठिकाणी स्थापन केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, तेच ब्रह्मपद आहेत. व तेच अद्वैतरुपाने माझ्यामध्ये सामावले असे मी पाहिले असे माऊली सांगतात.


६०७
आधींच तू ज्ञान वरी जालें ।
उन्मन हरि हें जीवन ह्रदयीं आलें ॥१॥
स्थिरावलें ध्यान ज्ञानाचीये वृत्ति ।
विज्ञानसंपत्ति साधलिया ॥२॥
अंधकारपट नासला समतेज ।
रामरुपी पैज दीपज्ञान ॥३॥
संत शांतशांति उलथिचा ठसा ।
कृष्णरुपीं दिशा तेजो तेज ॥४॥
अलक्ष लक्षिते अगोचर पर ।
तेथेंही गव्हर संचलें ॥५॥
ज्ञानदेव सुखी जालीसे विश्रांति ।
परमानंद चित्तीं निरंतर ॥६॥
अर्थ:-
निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा तूं मूळचा ज्ञानरूप असून तुझ्या मनाची स्थिती उन्मन होऊन गेली आहे. कारण सर्व जीवांचे जीवन जो श्रीहरी तो तुझ्या हृदयांत प्रगट आहे.ही ज्ञानसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे ज्ञान ध्यानाच्या वृत्ति आपोआपच स्थिर झाल्या. रामकृष्णरूपी परमात्म्याचे ठिकाणी ज्ञानदीप प्रदीप्त झाल्यामुळे प्रपंचरूप अंधकाराचा सर्व पट नष्ट झाला.त्याचप्रमाणे शांत्यादिकाची स्थिती झाली.कारण कृष्णरूपाचे तेजाने सर्वदिशा प्रकाशित झाल्या.वस्तुतः अगोचर अलक्ष असे जे परमात्मतत्त्व त्याचठिकाणी हे रामकृष्ण रूपही गुप्तरूपाने राहिले आहे. मला परमानंद प्राप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला विश्रांती मिळाली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६०८
करीं वो अद्वैत माला केले
इसन्यो सहिंवर ।
सिध्दपुरासि गयो ।
वोलु नाहीं तया दादुला
भवसागरीं न सरत कीयो ॥१॥
माह्या वर्‍हाडिणी नवजणी
सांगातिणी सवें बारा सोळा ।
अनुहात तुरे वाजोनि गगनीं
जगीं जया सोहळा ।
मान्हा पतीपर्यंत त्याले
देखि वो जग जाया आंथला ॥२॥
बाप दिन्हो ज्या घरीं
त्या लेवो नाहीं ।
जाति ना कुळ त्यान्हा
पालऊ धरि गयो तंव
तो सूक्ष्म ना स्थूळ ॥३॥
बिहति बिहति मी गये तंव
त्यान्हे माले धरे वो हाती ।
पाठिमोरा वरु वोलख्या
त्याने मी बैसे पाठी ॥४॥
निरंजनीं मंडप ध्याल्यावो ।
लज्ञविण जाया पाणिग्रहण ब्रह्मक्षरीं ।
बोलीनें तंव त्यान्हे नेत्रीं
दिन्हीं वो खुण ॥५॥
पांचजणी सावधान म्हणीयावो ।
आशा सवती अडधरी ।
जननिककरंडिये देहे समाविन
त्यान्हे माल दिन्हे चिर ॥६॥
त्याचि सखिया मान्हीया
येरि वों चौघीजन्हे ।
मिले सुमले येकी करोलीले ।
जासो यापरी चालविजे सुघरवासु ॥७॥
जान्हे सेजे मी पहुडणे तंव
तो नपुंसकू वो ।
जया इंद्रियांविण जान्हा विस्तारु तो
पुरुष जगी कैसा वो जाया ॥८॥
सोहं वो घरदारीं नांदतां बोला
धन्यो येक पुत नाराज तोही योगिया
चालवा व्याईसने मिवो जाया वांझ ॥९॥
पांच तान्ही वो पांच पारिठि
पांच वो सत्य मान्हा पोटीं ।
अझुणी मी करणकुमारी वो
परपुरुवेंसी नाहीं जाया भेटी ॥१०॥
मज चौघे दीर भावे राखती
चौघी नणंदा आटिती ।
तेणें लागलें मज पिसें ।
बाईये वो तत्त्वमसी
डोळां लेती ॥११॥
ज्यानें माझें मन सुखी
जाया निरालंबीं निरंतरी ।
राणे रखुमाई भ्रतार श्रीकृष्ण तो
म्या दिठी ठो अंतरीं ॥१२॥
दशदिशा दाही जाण दस
वो अकरावें मन ।
बारा सोळा मान्हा सखिया
वेचिवोनी निजसजन ॥१३॥
करिं वो कांकण शिरीं बासिंग
दाखडाव्या पंढरपुरासि गयो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु
त्यांणें चरणीं समरस गयो ॥१४॥
अर्थ:-
एक विरहिणी परमात्म्याबद्दल आपल्या सखीजवळ बागलाणी भाषेत अनुवाद करीत आहे. हे सखे, मी हातात अद्वैताची माला घेऊन या परमात्म्याशी मी स्वयंवर केले. आणि सिद्ध माझे आत्मस्वरुप त्याचे ठिकाणी गेले. त्या नवऱ्याजवळ मी बोलले नाही. त्याला फक्त पाहिते मात्र तो त्यानी मला भवसागरापासून दूर केले. माझ्याबरोबर नवविधा भक्तिरूपी वहाडिणी होत्या त्याच्याबरोबर बारा सोळा वहाडिणी होत्या त्यानी अनुहताचे वाद्य वाजवून जगांत माझ्या पतीचा म्हणजे परमात्म स्वरुपाचा मोठा सोहळा केला. तो मला दाखविला. आणि जग दिसेनासे झाले.बापाने ज्या घरी मला दिले. त्याला पहावयास जावे तर त्याला जात, कुळ वगैरे काही नाही. अशाचा मी पदर धरिला. तर तो स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही, भीत भीत त्याच्याकडे गेले, तो त्यानी मला हाती धरले. नंतर मी त्याला ओळखल्यावर मी त्याचे जवळ जाऊन बसले. माझे लग्नाचा मण्डप निरंजन जो परमात्मा त्याच्या स्वरुपामध्ये घातला होता. आणि लग्ना शिवाय माझे पाणी ग्रहण आणि ब्रह्मस्वरुपाचे वर्णन केले. तोच त्याने नेत्राने मला खूण केली. माझ्या आणि परमात्मस्वरुपां मध्ये अडचण करणाऱ्या म्हणजे अंतरपाट धरणाऱ्या आशा तृष्णादि सवती त्या मला सावधान म्हणण्याकरिता आल्या. त्यांनी मला करंडीमध्ये अटकविल्याप्रमाणे मला देहाभिमान धरवून मला नेसावयास वस्त्र दिले. नवऱ्या मुलाकडील त्याच्या चार सख्या एकत्र मिळाल्या त्यापैकी एका करवलीने मला त्या नवऱ्याचे घरी चालवले. त्या नवऱ्याचे घरी मी जाऊन त्याचे शेजारी निजले. तो नपूसंक आहे असे मला समजले. इंद्रियावाचून ज्याचा विस्तार आहे, असा पुरुष स्त्रीचा भ्रतार कसा होईल. ज्या घरांत सर्वत्र सोहंचा नाद त्या घरांत मी नाखुषीने नादंत असता एक बोधरुपी पुत्र झाला. तोही योगाच्या मागनि पतीरुपच झाल्यामुळे मी पुन्हा वांझ आहे ती आहेच. पुन्हा माझे पोटी तान्ही, पारठी, अपंचीकृत. पंचीकृत अशी मुले झाली.तरी मी पण अजून करणकुमारीच आहे. म्हणजे अजूनही मी लहान मुलगीच आहे. कारण मला अजून परपुरुषासी म्हणजे परमात्मस्वरुपाशी भेट झाली नाही. माझे दीर म्हणजे चार वेद रक्षण करणारे आहेत. चार नंणदा म्हणजे चारी वाणी आटून जातात. असे झाल्यामुळे मी अगदी वेडी होऊन गेले. तत्त्वमसि हे अंजन डोळ्यांत घातल्यामुळे माझे मन परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी निरंतर सुखी झाले. माझे पिता व रखुमादेवीचा भ्रतार राजराजेश्वर जो श्रीकृष्ण तो मी आपल्या अंतःकरणांत पाहिला. तो दशदिशा म्हणजे सर्वव्यापी असणारा असा, माझी दहा इंद्रिय व अकरावे मन त्याचप्रमाणे चंद्र सूर्याच्या बारा सोळा जोड्या त्याच माझ्या सज्जन सख्या, हातात कंकणे घालुन व डोक्याला मुंडावळ म्हणजे बासिंग बांधून त्या मला पंढरपूरास घेऊन गेल्या. त्यांनी मला मााझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल,तो दाखविला आणि त्याचे चरणाचे ठिकाणी मी समरस होऊन गेले.असे माऊली सांगतात.


६०९
मी माझें मोहित राहिलें निवांत ।
एकरुप तत्त्व देखिलेंगे माय ॥१॥
द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं
विश्वरुपें मिठि देतु हरी ॥२॥
छाया माया काया हरिरुपीं ठाया ।
चिंतीता विलया एक तेजीं ॥३॥
ज्ञानदेवा पाहा ओहंसोहंभावा ।
हरिरुपीं दुहा सर्वकाळ ॥४॥
अर्थ:-
हे सखे, माझी स्थिती काय सांगू. एकरूप म्हणजे जीवब्रह्मैक्य तत्त्व पाहिल्यामुळे मी माझ्या स्वरूपाला म्हणजे परमात्मस्वरूपाला मोहित होऊन निवांत झाले. द्वैताच्या सर्व गोष्टी नाहीशा होऊन शेवटी विश्वरुपालाही मिठी देऊन म्हणजे विश्वरुप नाहीसे होऊन हरिरुपच शिल्लक राहिले. आभास, माया व शरीर यांचे स्वरुप पाहू गेले असतां ती सर्व एकरूप श्रीहरिचे ठिकाणी लय पावली. अहं सोहं भावरुपी जो श्रीहरि, त्याच्या ठिकाणी सर्व काळ आनंदानुभव आहे हे प्रत्यक्ष पाहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६१०
आत्मतेजें तेज रवि तेज बिंबे ।
जीवशिवी बिंबे ज्ञान तेजें ॥१॥
तैसें तुज ज्ञान जालेंरे हें काज ॥
केशवीं विराज चित्त झालें ॥२॥
समाधिचें रुप रुपासि आलें काह्या ।
पसरुनी बाह्या देता क्षेम ॥३॥
प्रवृत्ति निवृत्ति दोहींची तटाक ।
उतरालासि एक सिंधोदक ॥४॥
क्षीर नीर हरि जाला असे स्वादु ।
अवघाचि गोविंद नाना देहीं ॥५॥
निवृत्तिसंपत्ति आलिया पैं हाता ।
तत्त्वीं तत्त्व निमथा उलथा तूं ॥६॥
अर्थ:-
सूर्यामध्ये जे तेज दिसते ते आत्मतेजाचे प्रतिबिंब आहे. त्याचप्रमाणे जीवशिवामध्ये जे ज्ञान दिसते. तेही आत्मज्ञानाचेच प्रतिबिंब आहे. त्या आत्मतेजानेच केशव जो परमात्मा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझी चित्तवृत्ति जडून विराजमान झाली आहे. मला असे वाटते की समाधीचे रूप बाह्या पसरून जणू काय तूझ्या स्वरूपाला भेट देण्याकरीताच आले आहे. प्रपंचाची प्रवृत्ति निवृत्ति ही दोन तटाके सोडून तूं एक परमात्मरूप सिंधुच बनला आहे. अशा स्थितीत क्षीरनीराचा स्वाद सर्व परमात्माच झाला आहे. आणि तो माझ्याच ठिकाणीच झाला आहे असे नाही.तर अनंत देहाच्या ठिकाणी तो सर्व गोविंदरूप परमात्माच आहे. अशी तुझी स्थिती झाल्यामुळे निवृत्ती मार्गातली जी विवेक वैराग्यादि ज्ञानसंपत्ती ती तुला आज लाभली आहे. त्यामुळे तुझ्या ठिकाणचा संसार उलथा म्हणजे परमार्थ होऊन गेला आहे. असे माऊली सांगतात


६११
प्रथम नमूं तो गुरुदेवो ।
जेथें निमाले भावाभावो ।
अनादि स्वरुप स्वयमेवो ।
तो आदि देवो नमियेला ॥१॥
जे हें मनाचें पैं मूळ ।
जेथे द्वैताचा दुष्काळ ।
स्वरुपीं स्वरुप केवळ ।
तो अढळ नमियेला ॥२॥
हें जग जेणेंसि संचलें ।
परी कोठें नाहीं नाडलें ।
जेविं हालिया अंतराळें ।
तैसा सर्व मेळे असतांही ॥३॥
ऐसा सर्वांअतीत ।
परी ऐसा हा जगभरी होत ।
कनक कांकणीं रहात ।
तैसा अविकृती निरंतर ॥४॥
जो मनबुध्दि अगोचर ।
तोचि झाला चराचर ।
हा आत्मसुखाचा विचार ।
आपविस्तार केला जेणें ॥५॥
तो जाणावा ज्ञप्तिरुप ।
निवृत्तिनाथाचें स्वरुप ।
एकदंत नामें ज्ञानदीप ।
बोध स्वरुप ज्ञान देवा ॥६॥
अर्थ:-
ब्रह्मस्वरुप असलेल्या श्रीगुरुंच्या ठिकाणी भावाभाव मुळीच नाहीत. कारण भाव व अभाव सापेक्षिक धर्म आहेत. श्रीगुरुंच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे भाव भाव दोन्ही नाहीत. जो श्रीगुरु अनादि असून स्वतः सिद्ध जगत कारण अशा या आदिदेवास नमस्कार असो. व जो मनाचे मूळ आहे. ज्याचे ठिकाणी व्दैताचा दुष्काळ असून आपले स्वरुपाच्या ठिकाणी केवळ आपल्याच रूपानी असणारा त्यास नमस्कार असो. ज्याच्या स्वरूपांत हे सर्व जग संचले आहे. तरी त्याच्या स्वरुपात कोठेही धक्का नाही. ज्याप्रमाणे आकाशांत पुष्कळ शस्त्रे मारली तरी आकाशाचे स्वरुपात बदल होत नाही. तसा श्रीगुरुरुप परमात्मा सर्व अनात्म पदार्थात असला तरी तो सर्वाहून अतीत असून सुवर्णाच्या कंकणांत कनक राहते त्या प्रमाणे तो सर्व जगांत व्यापून असला तरी निरंतर अविकृत आहे. वस्तुतः जो मनबुद्धयादिकांना अगोचर असला तरी चराचर तोच बनला आहे. असा आत्मसुखाचा विचार ज्यानी केला आहे तोच ब्रह्मवेत्ता समजावा तो माझा निवत्तिनाथ असून प्रथमारंभी गणपतीचे वर्णन करणे आवश्य असल्यामळे मला ज्ञान देणारा बोधरूप गणपती श्रीगुरु निवृत्तिरायच आहेत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६१२
मी तूं प्रवृत्तिसी आलें ।
समग्र गिळिलें वासनेसी ॥१॥
नाहीं त्यासि मेरु कैसा विवेकु ।
जनवन लोकु ब्रह्म दिसे ॥२॥
उजडली शांति मावळली निशी ।
अवघा ब्रह्मरसीं पाजळलें ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं क्षमाचि उपजली ।
प्रवृत्ति सामावली निवृत्ति रया ॥४॥
अर्थ:-
श्रीगुरु निवृत्तीरायांच्या कृपेने ब्रह्मात्म बोध उजाळला. म्हणून त्या बोधाने मी तुं हे द्वैत व त्या द्वैताच्या आश्रयावर असणाऱ्या वासना या सर्वांचा नाश होऊन गेला. तो बोध सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे त्याच्यापुढे जन, वन, पर्वत इत्यादिकांचा विचारही शिल्लक राहात नाही. सर्वत्र ब्रह्मरुपच दिसते. अज्ञान नष्ट होऊन, शांती उदयाला आल्यामुळे सर्व संसार ब्रह्मरसाने प्रकाशित झाला. माझ्या चित्तांत क्षमा उदय पावून त्यांत सर्व प्रवृत्ति मावळून गेली. ही सर्व श्री गुरु निवृत्तिरायांची कृपा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६१३
दुरि ना जवळी त्रिभुवनमंडळी ।
ते मनाचा मुळीं बैसलेंसे ॥१॥
पाहतां न दिसे भानुप्रकाशें ।
येर्‍हवी तें असे मशकिं रया ॥२॥
बोलों जातां येणें जिव्हाचि खादली ।
पाहातां पाहातां नेली चर्मदृष्टी ॥३॥
दांतेविण जेणें स्थूळदेह खादले ।
शस्त्रेविण छेदिले लिंगदेह ॥४॥
त्त्वंपदिं सिध्द निवृत्ति लाधलें ।
गुरुलक्षीं लक्ष हारपलें ॥५॥
निवृत्तिदासा तुम्ही बहुत न बोला ।
रखुमादेविवरा ध्याइजेसु उगला ॥६॥


६१४
अधीक देखणें तरी निरंजन पाहाणें ।
योगराज विनवणें मना आलें वो माये ॥१॥
देहबळी देउनि साधिलें म्यां साधनीं ।
यानें समाधान मज जोडलें वो माये ॥२॥
अनंगपण फ़िटलें मायाछंदा सांठवलें ।
सकळ देखिलें आत्मस्वरुप वो माये ॥३॥
चंदन जे जेविं भरला अश्वत्थ फ़ुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥
पुरे पुरे आतां प्रपंचा पाहाणें ।
निजानंदीं राहणें स्वरुपीं वो माये ॥५॥
ऐसा सागरु ।
रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु ।
म्यां देखिला वो माये ॥६॥
अर्थ:-
व्यवहारोपयोगी ज्ञान कमी अधिक प्रमाणाने सर्व जीवांना आहेच पण त्या सर्वा पेक्षा अधिक महत्वाचे ज्ञान असेल तर ते निरंजन म्हणजे परमात्म्याचे ज्ञान होय.नामाकरिता योगीराज जे श्रीगुरू त्याची विनवणी म्हणजे सेवा करून देह त्यांना देऊन ते ज्ञान मी प्राप्त करून घेतले. आणि मला समाधान झाले. मायेच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देहतादात्म्यबुद्धि नाहीशी होऊन परिपर्ण आत्मस्वरूप ज्ञान झाले. पिंपळाला सुवास नाही. पण तो चंदनाच्या वासाने भरुन जावा त्याप्रमाणे त्या आकारवान जगतात.मी निराकार परमात्मा पाहिला. यानंतर प्रापंचिक ज्ञान पाहाणे पुरे स्वकीय आत्मानंदात राहाणे बरे. रखमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ज्ञानाचा समुद्रच आहेत. असा निश्चय करून मी त्यांना पाहिले. असे माऊली सांगतात.


६१५
पंधरयाची खाणी अनर्घ्यरत्नाचें पाणी ।
तें निरंजनीं वनीं शोभतसे वो माय ॥१॥
गुणांची लावणी लाविली गगनीं ।
निरंजनीं निर्गुणीं आथिले वो माय ॥२॥
पूर्णानंद सच्चिदानंदकंदु तो निरंजनीं
स्वादु आळवीतो माय ॥३॥
लक्ष कोटी एकला अनंतगुणी जाहाला ।
तो अंगें अंगवला निजस्वरुपीं वो माय ॥४॥
ब्रह्मरसें भरला दाहीं दिशा व्यापिला ।
आनंदु सच्चिदानंदी वोसंडला वो माय ॥५॥
ऐसा सुखसंवादु सागर भरला ।
रखुमादेविवरा विठ्ठला वो माय ॥६॥
अर्थ:-
जसे सोन्याच्या कोंदणात पाणीदार रत्न शोभते त्याप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप, जो निर्गुण परमात्मा तो आज या वृंदावनांत शोभत आहे. ज्याप्रमाणे एखांदे वेळी आकाशांत चित्रविचित्र रंगाची शोभा दिसते.त्याप्रमाणे अनेक प्रकारचे गुण, स्वरूपाने निर्गण असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी दिसतात. तो सच्चिदानंदाचा कंदच आहे. म्हणूनच स्वतःच्या रूपाने परिपूर्ण आनंद आहे. असा तो ह्या वृंदावनामध्ये आपल्या भक्तांशी क्रीडा करीत आहे. तो एकरूप असनही कोट्यवधी रूपांनी नटला असून तो सर्व रूपे आपल्यांत पुन्हा साठवित आहे. तो सच्चिदानंद परमात्मा सर्व दिशात व्यापून त्याचा आनंद दशदिशेच्या बाहेर ओसंडत आहे. तात्पर्य असा जो जगत् व्यापून राहिलेला सुखसागर परमात्मा तेच रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल असे माऊली सांगतात.


६१६
पुरे पुरे वो आतां जिणे निमालें ।
मज निरंजनी आफ़ाविले गोंवळें वो माय ॥१॥
आणिकाची चाड न लावावो मातें ।
एकल्या अनंतें मज बरवें केलें वो माय ॥२॥
तें परदीपीं उसळलें अंधारें फ़ेडिलें ।
कोडे कवतिकें जोडलें स्वरुप वो माय ॥३॥
आतां मी वेगळावलें पांचाहुनी जाहालें ।
परब्रह्म जोडलें किरु वो माय ॥४॥
ऐसा जगजीवनु जोगावला जगमूर्ति देखिला ।
तो जगदेश्वरु फ़ळला निरंजनी वो माय ॥५॥
भुक्तीभरीं निडारला निजानंदु घनावला ।
रखुमादेविवरु स्थिरावला ह्रदयीं वो माय ॥६॥


६१७
ठसावलीं देहीं परब्रह्म मूर्ति ।
सोहं शब्दीं गती प्राप्त जालीवो माय ॥१॥
सहजीं सहज स्थिति ।
जाली वो माये ॥२॥
विरालीं अष्टांगे देखोनि गोमटें ।
पाहातां प्रेम फ़ुटें पातीं
श्रमती वो माय ॥३॥
अष्टभुजांचिया रिघालिये खेवा ।
तंव विश्वाचा बाहुवा
देखिला वो माय ॥४॥
नसमाय लेववितां लेविविजे कैसेनि ।
निरंजन अंजनीं लेईजे वो माय ॥५॥
हे भुली सांडूनि भुलवी परमबोध बोधवी ।
तोहा रखुमादेविवरु विठ्ठल वो माय ॥६॥
अर्थ:-
परब्रह्ममूर्ति म्हणजे निराकार सच्चिदानंद ब्रह्म आणि साकार श्रीकृष्ण मूर्ति अंतःकरणांत ठसावली. सोहं शब्दाने जी स्थिती प्राप्त व्हावयाची ती झाली.त्या सहज स्वरूपस्थितिला, त्या श्रीकृष्णमूर्ति पाहिल्याबरोबरच प्राप्त झाले. ते शामसुंदर स्वरूप पाहून अष्टांगयोगाची खटपट विसरून गेली, कृष्णमूर्तिला पाहिल्याबरोबर अंतःकरणात प्रेमाचे पाझर फुटून डोळ्यातुन प्रेमाचे अश्रु वाहु लागले. त्या अष्टभुंजाच्या चतुर्भुज मूर्तिला आलिंगन द्यावयास गेले.तो चार भुजा कसल्या घेऊन बसलात’ तर तो विश्वबाहू असलेला मी पाहीला. त्याला डोळ्यांत भरून घ्यावा म्हंटले तर तो डोळ्यांत मावणार कसा? म्हणून निर्विकार परमात्मस्वरूपाचे अंजन डोळ्यात घातले. तो श्रीकृष्ण आलिंगनादि व्यवहाराची भूल नाहीसी करून स्वकिय सच्चिदानंद स्वरूपाचा बोध करून देतो. असा तो ऱखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल आहे असे माऊली सांगतात.


६१८
अमित सूर्य प्रकाशले तेज उदयो जाहाले ।
ज्ञानज्योति फ़ांकले दुणावोनि वो माय ॥१॥
दामोदर नामें मना बांधिलें दावें ।
निरंजन म्हणावे आपणा वो माय ॥२॥
गुणचि नाहीं त्यासी काय लाऊं गुण ।
अतीत निरंजन देखिला वो माय ॥३॥
डोळा जरी पाहीं तरि पारु
न कळे खेवोवो माय ॥४॥
आतां असे हव्यासु लागला निजध्यासु ।
निरंजनीं सौरसु करीतसे वो माय ॥५॥
आतां आहे तैसा असो
माझ्या ह्रदयींच वसो ।
हा रखुमादेविवरु विठ्ठलु वो माय ॥६॥
अर्थ:-
अपरिमित सूर्य एकत्र केले असता जे तेज दिसेल त्या तेजापेक्षाही अधिक पंज ज्ञानस्वरूप परमात्मा आहे. तोच अंतःकरणामध्ये दुप्पट रूपाने प्रगट झाला. त्याच्या सगुण स्वरूपाचे नांव दामोदर असे आहे. त्या नांवाचे माझ्या मनाला जसे काही दावेच बांधले आहे. म्हणून त्या दामोदरालाच निरंजन म्हणावे. वस्तुतः त्याला गुणच नाहीत. म्हणजे तो निर्गुण आहे. मग त्याला गुण लावावेत कसे? म्हणून तो निरंजन परमात्मा मी पाहिला आहे त्याला डोळ्यांनी पहावे म्हटले तर तो निरवयव असल्यामुळे पाहता येत नाही. त्याला हातात घ्यावे असे म्हटले तर तो अपार आहे. तेव्हां अशाला आलिंगन कसे द्यावे. ते कसेही असो.पण मनाला त्याचा वेध लागला आहे खरा. त्याचा भोग अद्वितीय स्वरूपानेच घेता येईल. रखुमादेवींचे पती श्री विठ्ठल कसा आहे याचा विचार करण्यापेक्षा तो जसा असेल तसा माझ्या हृदयांमध्ये राहो म्हणजे झाले. असे माऊली सांगतात.


६१९
थोकलें याच्या गुणीं तनुमनासहित ।
त्या निजतत्त्वीं प्रीत निमालें वो माय ॥१॥
साहीं संवादले चौघे अनुवादले ।
पुरोनि उरलें म्या देखिले वो माय ॥२॥
कापुराची भांडुली परिमळें भरली ।
दीपीं उजळी रुप नासले वो माय ॥३॥
तेथें नाहीं ल्याया रुप ना छाया ।
ऐसी ज्योती कर्पूराची
उजळल्या वो माय ॥४॥
तेथें नाहीं उरवणी एकला एकपणीं ।
देखतांचि नयनी उमळला वो माय ॥५॥
ऐसी जाली प्राप्ती खुंटली मागिल गती ।
रखूमादेवीपती जोडला वो माय ॥६॥
अर्थ:-
मी शरीराने, वाणीने व मनाने श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणाकडे पाहून अगदी थक्क होऊन गेले. माझे सर्व प्रेम माझ्या परमात्मस्वरूपांत लय पावले.कारण जीवपद शुद्ध लक्ष्य आणि परमात्मा एकच आहे. असे चार वेद आणि सहाशास्त्र यानी त्याचे प्रतिपादन केले आहे तो त्यांच्याहून पलीकडे आहे तो परमात्मा मी आत्मत्वाने पाहिला. कापूराचे अनंत दागिने सुंगधाने भरल असले तरी त्याला जर अग्नीचा संबंध झाला तर त्याचे स्थूल रूप नष्ट होत. मग दागिना अंगावर घालण्यास त्याचे रूप राहातच नाही. त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म संघातात मूळचाच परमात्मा भरलेला आहे. पण ज्यावेळी श्रुति व श्रीगुरूरायांच्या प्रसादाने त्याचे ज्ञान प्रगट होते त्या वेळी आरोरित नामरुप नष्ट होते. फक्त परमात्म्याचा स्पष्ट भाव प्रतयास येतो. व त्या मुळे प्रपंचाची गती खुंटित होऊन जाते. ज्याच्या प्राप्तीमुळे संसाराची वाट मोडली गेली तो रखुमादेवीचा पती श्री विठ्ठल मला लाभला आहे असे माऊली सांगतात.


६२०
ठकपरी धरिला मनोवेगें बांधला ।
तो ठेंगणाचि जाहाला अनिवाड वो माय ॥१॥
समाधि ध्यान निजध्यासिं आरुढलें ।
तंव अवघेंचि पारुषलें अभाव वो माय ॥२॥
हा असो जैसा तैसा ह्रदयमंदिरीं ऐसा ।
परपुरुषीं अपैसा अनुसरलें वो माय ॥३॥
बरवा देखोनि न्याहाळीं दिव्य
कांति झळाळी ।
परब्रह्मीं दिवाळी चहुदिशांची
वो माय ॥४॥
त्यानें निवाला मनु भेटला जगजिवनु ।
तो आनंद सुख गहनु
उचंबळे वो माय ॥५॥
हा निरालंब वोळवा भक्ति
भावें मिळाला ।
रखुमादेवी दादुला विठ्ठल
राणा वो माय ॥६॥
अर्थ:-
हा परमात्मा मोठा ठक आहे. कारण तो सहज रितीने मन, बुद्धि, इंद्रिये या कोणासच सांपडत नाही. असा जरी तो असला तरी मी त्याला शुद्ध मनाने बांधून टाकला आहे. हो तो जरी अपरंपार असला तरी तो कोंडून धरला तर मनांतही राहाण्यासारखा लहान होतो. परमात्मस्वरूप प्राप्तीच्या ध्यासाने, समाधी ध्यानाचे मार्गास लागलो. तो त्या सर्व साधनांचा अभाव होऊन गेला. परमात्म्याला शब्दाने असा तसा सांगता येत नसल्यामुळे आता अनुभवाने असे म्हणण्याचे पाळी येते की हा परमपुरूष हृदयांत ज्या रूपाने गुरूकृपेने प्रगट झाला आहे. त्यालाच मी सर्व भावाने अनुसरले. त्या श्रीकृष्णाची सुंदर प्रकाशित असलेली दिव्य कांति, ती चारी दिशांना आनंदाची दिवाळीच म्हणून समजावी. तो जगजीवन परमात्मा मला भेटून गहन, आनंद, मनांत उचबळून आल्यामुळे मन शांत झाले. हा मला प्राप्त झाला म्हणाल तर तो केवळ भक्तिभावानेच प्राप्त झाला असा दादला म्हणजे विश्वाधिपति कोण म्हणून विचाराल तर हा रखुमादेवीचा पती जो श्रीविठ्ठल राजा तोच होय. असे माऊली सांगतात.


६२१
पाहातां सप्त पाताळें एकविसांवेगळें ।
तें निरंजन आगळें खुतलें डोळांगे माय ॥१॥
पांवा वाहे तळालोरी नादु उमटे अंबरीं ।
तया सुखसागरीं बुडालें वो माय ॥२॥
सुखसंवादु लागला जिवनी
जिवनु भेटला ।
भेटीं देऊनि गुंतला
मनोमंदिरीं वो माय ॥३॥
आतां न सोडी न राहे
आणिकु न पाहे ।
तंव हाचि लवलाहे मिळाला वो माय ॥४॥
आवडी रिघालें घर आपुलें ।
सहजीं सामावलें स्वरुपीं वो माय ॥५॥
वैराग्य-भक्तिज्ञानाची माउली ।
ते रखुमादेविवरविठ्ठली भेटलीं वो माय ॥६॥
अर्थ:-
ह्या श्रीकृष्णाचे स्वरूप पाहू गेले तर हे सप्त पाताळ (अतल, वितल, सुतल, रसातल,तलातल, महातल, पाताळ) किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार व स्थूल देह आणि स्थूल सूक्ष्म यांचा संघात या एकवीस तत्त्वाहि पलीककडे म्हणजे ह्या एकत्व समुदायाच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णाचे स्वरूप निराळे असून ते माझ्या डोळ्यांत खुतले म्हणजे गच्च भरून गेले हो. त्याचे स्वरूप काय सांगावे.? खांद्यावर तलालोरी म्हणजे तालात वाजणारा पावा असून त्या पाव्याचा नांद आकाशांत दुमदुमून भरला आहे. अशा श्रीकृष्ण सुखाच्या समुद्रात मी बुडून गेले. त्याचे बरोबर मला आनंदाचा संवाद प्राप्त झाला. तो संवाद माझ्या जीवाचे जीवनच होऊन बसला आहे. त्यानी मला भेट देऊन माझ्या मनांत गुंतून बसला आहे.आतां ज्याला सोडून मन मुळीच राहणार नाही व ज्याचे वांचून दुसरे पाहणार नाही. तोंच माझ्या स्वरूपांशी ऐक्य होऊन गेला आहे. आवडीने मी त्याच्या घरांत गेले. तो सहजच माझ्या स्वरूपात येऊन साठवला. अशी भगवत्प्राप्ती होण्याचे मुख्य साधन काय म्हणून विचाराल तर वैराग्ययुक्त भक्ति हे ते साधन आहे. ज्ञानरूप माऊली असा जे रखुमादेवी चे पती श्रीविठ्ठल, त्यांची भेट मला झाली. असे माऊली सांगतात.


६२२
जनीं वनी हरी आहे निरंतरी ।
बोलिलीं वैखरीं व्यासमुखें ॥१॥
जगजीवईंश्वर क्षरला चराचर ।
लक्षालक्ष पार अलिप्तपणें ॥२॥
चहूं देहां ग्रासी व्याला
तत्त्वें तत्त्वेसी ।
हरि वैराटेसी एक वृक्ष ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे वृक्षही वृक्ष न होणें ।
असोनि नसणें सुमनीं जैसें ॥४॥
अर्थ:-
भगवान व्यासांनी श्रीहरि सर्वत्र जनी वनी भरला आहे. अशी त्याची व्याप्ती सांगितली आहे. तो श्रीहरिच जीव व चराचरात्मक जगत बनला आहे. इतके असनही तो सर्वाहून अलिप्त आहे. म्हणून लक्षणेनेही त्याचे ज्ञान होत नाही. कारण जो कोणत्याही लक्षणेचे लक्ष होत नाही. जगताचे प्रतिपादन करणारे चारी वेद त्याचे ठिकाणी लय पावतात. असा जो तोच ही सर्व जगताची विराट रुपे व्याला असा वेकुंठातील परमात्मा एक वृक्ष आहे असे समजावे.पण तो खऱ्या दृष्टीने वृक्ष झाला नाही. सुमनी म्हणजे विचारयुक्त मनाने विचार केला तर तो वृक्ष वस्तुतः सत्यरूपाने नसून इंद्रिय किंवा अंतःकरण यास विषय होत नाही. म्हणून तो नाही असे मात्र म्हणता येणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६२३
संसारसातें आलों मी पाहुणा ।
दिसे दोन्ही आनंदा पाहवयासी ॥१॥
तव त्याचे तेजें झडपिलें मज ।
मजमाजि काज होऊनि ठेलें ॥२॥
चित्त जव निवडी तव आपणहि पळे ।
अवचितें जवळ येतु असे ॥३॥
जाऊं पाहे परता तव नेतु असे पंथा ।
वैकुंठीच्या कथा आपण सांगे ॥४॥
एकरुप दिसे तव सभोंवता आपण ।
अवघा नारायण अवघा नारायण ज्ञानदेवा ॥५॥
अर्थ:-
“ज्ञानदेवा घर चिदानंदी” या उक्तीप्रमाणे जीवाचे स्वस्वरूप हेच स्वतःचे घर आहे. त्याने संसारात यावयाचे दुसऱ्याचे घरी पाहुणा जाण्यासारखेआहे. मी या संसाररूपी बाजारांत पाहुणा म्हणून आलो आहे. येथे येण्याचे कारण ब्रह्मानंद व संसारांत भासणारा आनंद यामधील फरक पाहण्याकरताच मी येथे आलो आहे. पण अविद्येचा असा विलक्षण प्रभाव आहे. की त्या क्षणिक संसारानंदाने मला झडपून टाकले त्या मोहाने आपले ठिकाणी कार्य केले.या दोन आनंदाचा ज्यावेळी चित्त निवाडा करू लागले. त्यावेळी ते अज्ञान आपोआप पळून गेले व आत्मस्वरूप जवळ येते म्हणजे प्रगट होते.पुन्हां संसाराकडे पाहू गेले तर ते ज्ञान परमात्मस्वरूपाच्या कथा सांगून योग्य मार्गास लावते. वैकुंठ जो परमात्मा त्याच्या कथा मला ऐकावयास मिळाल्या.संसारांत आलेल्या पुरूषाला सत्संगतीने आत्मज्ञान होऊन सर्वव्यापक परमात्म्याची प्रतीती येते असे ज्ञानदेव सांगतात.


६२४
आदिमध्यअंत तुजमाजि बिंबे ।
ब्रह्मीं ब्रह्म थांबे लवण जळीं ॥१॥
तैसें झालें ज्ञाना उन्मनी उलथा ।
प्रपंच चळथा उडालिया ॥२॥
रिगु निगु काज जालें तुझे घर ।
अवघाचि संसार कळला आम्हां ॥३॥
गोप्य गुजराज उमजलासे हरि ।
दिसे अभ्यंतरीं आत्माराम ॥४॥
न दिससि ज्ञाना देहीं तुझ्या राम ।
घेतला विश्राम ऐसे दिसे ॥५॥
निवृत्ति निवांत समरसें पाहात ।
अवघाचि दीसत देहीं विदेही ॥६॥
अर्थ:-
निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानोबा, जगताचा आदि, मध्य व अंत हे तुझ्या भास्वरूपाच्या ठिकाणीच भासत आहेत. मीठ ज्याप्रमाणे जलामध्ये एकरूप होते. त्याप्रमाणे ब्रह्मरूप होऊन ब्रह्माच्याच ठिकाणी त्याचा लय होतो. हे ज्ञानोबा, तुला उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यामुळे प्रपंचाच्या चिळकांड्या उडुन गेल्या त्याच्या उत्पत्ती नाशाचे घर तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणीच आहे. अशारितीने तुझ्या ठिकाणी संसाराची स्थिती असल्याचे आम्हाला दिसून येते. तुझ्या जीवाला हे गोप्याचे गोप्य जो श्रीहरी तो उमजून आहे. आणि तोच तुझ्या अंतर्बाहा स्वरूपांत आहे असे दिसते. हे ज्ञानोबाराया, तुझ्या हृदयामध्ये असलेली श्रीरामाची प्रगटता लोकांना दिसत नाही. पण तूं मात्र त्या रामाच्या ठिकाणी विश्राम पावलास असे दिसते. अशा तहेची ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका निवृत्तीनाथांना कळून आली. असे माऊली सांगतात.


६२५
सुखीं सुख मुरे तेथें कोण झूरे ।
जळी लवण विरें तैंसे जालें ॥१॥
ज्ञान ते विज्ञान प्रंपचेंसि भान ।
तेजोरुप गगन बिंबलें दिसे ॥२॥
आत्मा आत्मरुप परमात्मा समीप ।
कोटि कोटिरुप एकलेंचि दिसें ॥३॥
नाना तेजी भासे प्रपंचप्रकाशे ।
विरुळा समरमें ध्याये त्यासी ॥४॥
ऐसे जालें तुज प्रगटलें निज ।
कासवीचें बीज अंकुरलें ॥५॥
निवृत्ति निजबोध आनंदादि कंद ।
शाखाद्वमभेद हरि जाला ॥६॥
अर्थ:-
वैषयीकसुख परमात्मसुखामध्ये मुरले असता, पाण्यात जसे मीठ विरून जाते. त्याप्रमाणे विषयसुखही बह्मरूपच होते. आत्मस्वरूप ज्ञान अंतःकरणांत प्रतिबिंबित झाले असता त्याला विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असे म्हणतात. आणि विशेष ज्ञानाने जसे प्रपंचाचे भान होते. अत्यंत समीप असणारा जो जीवात्मा तो कोट्यवधी रूपाने एकटाच बनलेला परमात्मा आहे.असे दिसते.अरे ज्ञानदेवा, प्रपंच्यांत अनेक रूपाने भासणारा हा परमात्मा एकरूपच आहे असे समजून त्याचे ध्यान करणारा अत्यंत विरळा. पण काय सांगावे तुझ्या परमभाग्याने आज तुला कासवी जसी आपल्या मुलाकडे कृपादृष्टीने पाहून आपले पोर वाढविते. त्याप्रमाणे मी जो तुला आनंदाचा आत्मबोध आणि आनंदाचा कंद दिला. त्यायोगाने तुझ्या ठिकाणी त्या आनंदरूप वृक्षाला शाखा फुटून हरिरूप झाला आहेस. असे माऊलींना निवृत्तीनाथ सांगतात


६२६
सुवेळेची शेज आवेळे घातली ।
निवृत्ति मोहिली निसंदेह ॥१॥
मोह न खुंटले ममते तुटलें ।
एकरसी भरलें तत्त्वीं तत्त्व ॥२॥
प्रपंचाचे घरीं दिसतें कारण ।
अवघे निराकारण तत्त्वीं तत्त्वमय ॥३॥
बापरखुमादेविवर त्रिपुटीं न दिसें ।
रसीं सर भासे ह्रदय दीपीं ॥४॥
अर्थ:-
आत्मज्ञानप्राप्ती करिता खर्च झालेला वेळ म्हणजे सुवेळ होय. पण तोच काल संसारसुखांत घालविला तर अवेळ ठरतो. अशा प्रपंचाच्या खटपटीत गुंतल्याने मनःप्रवृत्ति निःसंशयपणे प्रपंचातच लुब्ध होईल. प्रपंचाच्या मोहांत गुंतून न पडता माझेपणापासून दूर राहिल्यास सर्व जगत ब्रह्मरूपच आहे असे वाटेल. प्रपंच करीत असताच ज्या अधिष्ठानांवर प्रपंच मिथ्या भासतो तो प्रपंच अधिष्ठानांतच लय पावल्यावर एकरसी ब्रह्मतत्त्वच सर्वत्र भरले आहे. असा अंतःकरणात अनुभव येईल. माझे पिता व रखुमादेवीचे पति श्रीविठ्ठल सत्त्व,रज, तम याचे पलिकडचे असून हृदयातील प्रकाशदीपात तर रसत्वाने भासतात असे माऊली सांगतात.


६२७
जुगादीचें जुग युगादिचें युग ।
लक्षा आदिलक्ष मावळलें गे माये ॥१॥
मावळल्यावीण भ्रांति जाल्या कोण्ही ।
निजब्रह्माची खाणीं ठायीं
न पडेगे माये ॥२॥
रखुमादेवीवर निघोनि घेतला ।
निर्गुणचि जाला
तयासहितगे माये ॥३॥
अर्थ:-
जिच्यामुळे जुग म्हणजे द्वैत उत्पन्न झाले. व ज्यापासून युग म्हणजे काल सुरु झाला. अशी जी माया ती लक्ष जी आत्मवस्तु तिच्या प्राप्तीच्या अगोदर अप्राप्ताची प्राप्ती नाही म्हणून मिथ्या ठरवून मावळल्यामुळे लक्ष्य म्हणजे आत्माकारवृत्तिही मावळली. ही भ्रमरूप माया लय पावल्यावांचून स्वस्वरूपाच्या आत्मवस्तुची खाण सापडत नाही. आम्ही, माझे पिता व रखुमादेवीवर बाप जे श्रीविठ्ठल, त्यांना अनात्मपदार्थातून निवडून काढून त्यांना आपलेसे करून तद्रूप म्हणजे निर्गुणच बनवलेे. असे माऊली सांगतात.


६२८
आत्मा आंगे प्रसिध्द देखिला ।
अंतर्बाह्य अलिप्त व्यापला ॥१॥
देखिजेसें नाहीं देखिला
म्हणती काई ।
देखणें तें देहीं देखतुसे ॥२॥
रुपरेखा नाहीं लक्षावा कवणें ठायीं ।
लक्षीं लक्षितांही परतल्या दृष्टी ॥३॥
ज्ञानदेव म्हणें आनंद होईल पूर्ण ।
अनुभवें तेचि खुण देखतसे ॥४॥
अर्थ:-
आत्म्याचे अपरोक्षज्ञान झाल्यावर तो सर्व दृश्य वस्तुच्या आंत बाहेर व्यापलेला असूनही अलिप्त आहे. हे अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही काय दिसले असे विचारल्यास त्या आत्मस्वरूप ज्ञानाचे वर्णन करता येत नसल्यामुळे काही नाही असेच म्हणण्याचे पाळी येते. पण आत्मानुभव मात्र असतोच. ज्याला रूप नाही, आकार नाही. अशी वस्तु पाहावी तरी कोठे? बरें जर दृष्टीने काही पाहण्याचा प्रयत्न करावा तर त्या दृष्टीने आत्मस्वरूपाचे आकलन न होता ती परतते. आत्मज्ञानाने ब्रह्मानंद प्राप्त होतो हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६२९
गगन डोळां भासलें तें
वाहाटुळीनें कवळिलें ।
तेथें काहीं एक उगवलें रुप
अरुप वो माये ॥१॥
पूर्ण पीठिका टाकुनी मायास्तंभ
उभउनी ।
निजानंदी माळ घालुनी तंव
तो वरिला वो माये ॥२॥
हा कामीं कामरंजनु गुणहि निर्गुण ।
पाहातां परिपूर्ण तरी तो सहज वो माये ॥३॥
हा पुरोनि उरला नयनीं वोसंडला ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला तरि
तो वरिला वो माये ॥४॥
अर्थ:-
डोळ्यांतल्या बाहुलीला गगन भासले. ती भासली म्हणून मिथ्या आहे. म्हणून वस्तुतः सृष्टि नाहीच, असे ठरल्यानंतर आता फक्त तिचे सत्य अधिष्ठान म्हणजे सच्चिदानंद आत्माच राहिला आत्मा रूपरहित आहे.अशा ज्ञानाचा उदय होण्यापूर्वी जगत सत्य मानून जे काही कर्म उपासना वगैरे पीठिका म्हणजे सांप्रदाय व त्या सृष्टीचे मूळ कारण जी माया. तिचे आधारावर सर्व जगत् व्यवहार चालत असतात त्या मूळ माया स्तंभाचे म्हणजे मूळ कारणाचे उल्लंघन करून जो स्वकियानंद परमात्मा शिल्लक राहिला.त्याला माळ घालून त्यास वरले म्हणजे त्याचे स्वरूपाशी ऐक्य पावले.त्याला माळ घातल्याबरोबर त्याच्यावर लोकदृष्टीने स्त्रियांना कामातूर करणारा म्हणून तो कामी असा आरोप व मजवर कामिनी असा आरोप आला. त्या प्रमाणे तो निर्गुण असतांना त्याच्यावर गुणाचाही आरोप आला. पण वास्तविक पाहिले असता तो व मी असा औपाधिक भेद जाऊन त्याचे माझे, सहज असलेले पूर्ण ऐक्यच झाले आहे.ते माझे पिता रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, सर्व जगांत भरून पूर्णत्वाने शिल्लक उरला आहे. तोच माझ्या डोळ्यात राहिल्याने मी त्यास वरले म्हणजे त्याच्याशी आपले एकत्वाने ज्ञान करून घेतले असे माऊली सांगतात.


६३०
चहूंदारवंटा वोलांडुनि वोजा ।
अंतरीं आत्मकाजा बोधिलें वो माय ॥१॥
आनंदाचे चक्षु उघडी पातीं ।
शब्दा नि:शब्दां अतीति
मी जाहालिये वो माये ॥२॥
पांगुळें इंद्रियेग्रामु संवादे आत्मरामु ।
तो ईश्वरु पूर्णकामु मज
भेटवा वो माय ॥३॥
तेथें गोरस जालालें ज्ञाना
अंतरी वोजावलें ।
सदेवपण आलें मज वो माय ॥४॥
पाहतां ठेंगणे डोळे
न्याहाळितां आगळें ।
ते पदप्राप्तीवेगळें
सगुणनिर्गुण वो माय ॥५॥
ऐसा हा दिपीं दीपपरनायकू ।
रखुमादेववरु एकु जोडला
वो माय ॥६॥
अर्थ:-
जागृति, स्वप्न सुषुप्ति व तुर्या या चारी अवस्था मागे टाकून त्या पलीकडे अधिष्ठान रूपाने असणारे जे आत्मचैतन्य त्याचे ज्ञान मला झाले. प्रवृत्ती व निवृत्ति हे दोन आनंदाचे डोळे त्यांची पाती उडाल्यामुळे म्हणजे प्रवृत्ति व निवृत्ती ह्या दोन दूर झाल्यामुळे शब्द व निःशब्द या दोन्ही धर्माहून वेगळे जे आत्मतत्व ते मीच झाले. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी इंद्रिय समुदाय पांगळा व्यवहारशुन्य झाल्यामुळे सर्व जीवांचा नित्य, पूर्ण काम जो ईश्वर तो मला भेटला.त्या ज्ञानरूप परमात्म स्वरूपाचे अंतरी घरांत सदैवरस आनंदरूपता प्राप्त झाली. ते ज्ञानाचे डोळे पाहू लागले तो त्या दृष्टीला ब्रह्मांड ठेंगणे झाले. त्या ब्रह्मपदीं वास्तविक सगुण किंवा निर्गुण हे भावच राहात नाहीत. कारण ते ब्रह्म गुणातीत आहे.या रितीने ‘दीपी दीप’ म्हणजे यश्चावत ज्ञानाचे ज्ञान जे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, ते मला प्राप्त झाले आहेत. असे माऊली सांगतात.


६३१
गगन डोळां भासलें ।
तें बाहुलिनें कवळिलें ।
कांही एक उरलें रुप
अरुपीं वो माय ॥१॥
पूर्वपिठिका सांडूनि मायास्तंभ
उलंघुनी ।
निजानंदी माळ घालूनि
म्यां वरिलें वो माये ॥२॥
तो कामिक निरंजन
निर्गुण निर्गुणी ।
पाहातां पूर्णापूर्ण सहज
वो माय ॥३॥
हा भरोनियां पुरला
नयनीं वोसंडला ।
रखुमादेवीवरु विठ्ठला
मिळाली वो माये ॥४॥


६३२
नव्हे त्याची दुराश म्यां
सांडिली वो आस ।
ज्ञानवैराग्यभक्तिसार वोळला वो माय ॥१॥
संभोगवोवरीं होतिये निदसुरी ।
योगिणी खेचरी मज
जागविलें वो माय ॥२॥
ऐसा हा योगुराजु
तो विठ्ठल मज उजू ।
बापरखुमादेविवर देऊं ठेलें
वो माय ॥३॥
अर्थ:-
वस्तुतः सत्य नसलेल्या स्त्री धन पुत्रादि पदार्थाची मी आजपर्यंत आशा करात होतो. परंतु माझी दूराशाच झाली. ती मी नित्यानित्य विचाराने टाकून दिली आणि नित्य वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञान आणि वैराग्य आणि श्रीहरिच्या भक्तीरसाकडे वळलो. किंवा मी दुराशा टाकून दिल्यावर ज्ञान वैराग्य आणि भक्ति ही माझ्याकडे धावून आली. आणि त्याच्या माग सच्चिदानंद घन जो श्रीविठ्ठल तोही धावून माझ्यावर अनुग्रह करण्याकरता आला. त्यामुळे मला त्याची प्राप्ती झाली. व त्या परमात्मनंदाच्या अंतपुरांत मी स्वस्त निजलो असता जीवन्मुक्तीच्या विशेष भोगार्थ योगसाधनादि खेचरी मुद्रा तिने मला जागे केले. असे हे माझे पिता व रखुमाईचे पती योगेश्वर श्रीविठ्ठल, त्यानी हे सोपे पारमार्थिक धन मला दिले असे माऊली सांगतात


६३३
दृष्टीचें गुज संच्चिदानंद सहज ।
तें चक्षूच्या अंतर निज निरोपिलें
वो माये ॥१॥
अनुवादु खुंटला एकपणें एकला ।
संबंधु तुटला मागिलाचा
वो माय ॥२॥
पुरती दृष्टी पूर्ण ब्रह्मींच भासली ।
त्या सुखा दोंदुलीं वाढलीवो माय ॥३॥
अवलोकितां न अवलोकवे बोलिजे
तैसा नव्हे ।
हा रखुमादेविवरु भावें
माथिला वो माय ॥४॥
अर्थ:-
ज्ञानाचे गुह्य जर काही असेल तर ते सच्चिदानंद रूप परमात्मा हेच आहे. तो परमात्मा चक्षुच्या आंत आहे. याचा अर्थ त्याच्या सहाय्याने डोळे रूपाला पाहतात. तो अद्वितीय असल्यामुळे शब्दाने त्याचे वर्णन करून सांगता येत नाही. कारण परमात्म व्यतिरिक्त जगत नावांचा दुसरा पदार्थच नाही. देहादि सृष्टीत द्वैत काय कमी आहे? मग अनुवाद करण्यात अडचण काय असे कोणी म्हणेल तर महाराज सांगतात. आता मागील अनात्मपदार्थाचा संबंध तुटला आहे. अंतःकरण वृत्तिच्या सहाय्याने तयार झालेले सच्चिदानंदात्मक ज्ञानही इतर अध्यस्त पदार्था प्रमाणे मिथ्याच आहे. म्हणून तेही ज्ञान निःशब्द परिपूर्ण ब्रह्मस्वरूपाचेच ठिकाणी असते.ती ज्ञानरूप वृत्ति भासली. त्या सुखाचे योगाने माझे दोंद वाढले आहे. म्हणजे मी अतिशय आनंदी आहे. त्या परमात्म्याला दृश्य करून पहाता येत नाही. व ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही. मी ब्रह्मज्ञान करून घेणारा, व ब्रह्मज्ञानाचे श्रवण करणारा हे द्वैतभाव रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, त्यानी नाहीसे करून टाकले.असे माऊली सांगतात.


६३४
ब्रह्मपदाची प्राप्ति उमगेल दृष्टी ।
परम चैतन्यांचे पोटीं विश्वंभरु वो माय ॥१॥
अवघाचि देखिला अवघा मालवला ।
देखोनि निवाला जीवगे माय ॥२॥
कापुराची पुतळी कर्पुरदीपु पाजळी ।
तैसी मी त्याच्या मेळीं
जाहाले वो माय ॥३॥
तेथें रुप ना छाया त्रिगुण ना माया ।
रखुमादेविवराचिया उपाये वो माय ।
अर्थ:-
सदगुरूकृपेने ज्याची दृष्टी उगवेल त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. नंतर त्या ब्रह्माचे अंतर्भूत विश्वाचे भरण पोषण वगैरे कर्ता ईश्वर आहे.असाही निश्चय होईल. सर्व त्रैलोक्य परमात्मस्वरूपाने दिसू लागले म्हणजे सर्व विश्वाकार आपोआपच मावळून जाणार यात नवल काय? मला परमात्मदर्शन झाल्यामुळे माझा जीव शांत झाला. कापुराची एक पुतळी केली आणि ती कापुराच्या दीपाने पाजळली तर ती दोन्ही एकरूप होऊन जातात.त्या प्रमाणे त्या परमात्मस्वरूपाचे ऐक्यात माझी स्थिती झाली. त्या परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही. मायेत वा बुद्धीत त्याची छाया नाही.कारण मूळ मायाच नाही असे समजणे हा रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल प्राप्तीचा उपाय आहे. असे माऊली सांगतात.


६३५
अंजनी अंजन साधिलें निधान ।
द्वैताद्वैतघन विज्ञानेसी ॥१॥
सारिलेसें द्वैत अद्वैत सफ़ळ ।
निर्गुण निर्मळ निवळलें ॥२॥
साध्य साधक वस्तु
आलिया पैं हातां ।
मुरडोनि पाहतां वस्तुमय ॥३॥
ज्ञानदेवीं साध्य अज वस्तुचें ।
देहीं देह साचें नुरे तरी ॥४॥
अर्थ:-
बुद्धीरूप नेत्रामध्ये द्वैताद्वैतात एकरूपाने असलेले जे ब्रह्म त्याच्या निःसंदेह ज्ञानाचे डोळ्यांत अंजन घालून मोक्षरूपी निधान म्हणजे ठेवा मी स्वाधीन करून घेतला. व त्यामुळे द्वैत व अद्वैत यांचा सर्वतोपरी निरास होऊन (अहं ब्रह्मास्मि वृत्तिचाही लय होऊन) निर्गुण अशी वस्तु माझ्या अनुभवास निःसंदेहपणे आली. मुमुक्षुच्या हातांत साध्य जी परमात्म वस्तू ती आत्मत्त्वाने आली असता तो मुमुक्षु आपल्या दृष्टीचे बर्हिमुखत्त्व टाकून अंतर्दृष्टीने पाहू गेले असता त्यास सर्व परमात्म रूपच दिसते. अज म्हणजे परमात्म वस्तू ती याच देहात साध्य झाली आहे. म्हणून देहाला सत्यत्व तरी कोठून राहणार? असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६३६
न चुकतां चुकलें ।
संसार वाटे भांबाविलें ।
अवचितें पडले ज्ञानपेठे
वो माय ॥१॥
माझा निवृत्ति तूं सारा
लाधला विकरा ।
गिर्‍हाइक पुरा विठ्ठल गे माय ॥२॥
कांहीं नाहीं उरले प्रेम वो माय ॥३॥
हा पुरोनिया उरला निजानंदु सांवळा ।
रखुमादेविवरु जोडला
कष्टीं वो माय ॥४॥
अर्थ:-
प्रतिबिंब हे बिंबानुरूपच असते या नियमाने बिंब जर शुद्ध ब्रह्म आहे. तर बुद्धीत त्याचा आभास शुद्ध सच्चिदानंदरूपच असणार न चुकता. असे असता चुकले म्हणजे त्या आभासाचे बुद्धिसी तादात्म्य झाल्यामुळे तो आभास आपणास सुखी, दुःखी पुण्यवान, संसारी असे समजतो.हेच त्याचे न चुकता चुकणे आहे व संसार वाटे भांबावणे आहे. असे असताही प्रत्येक जीवास मी सतत सुखी असावे असे वाटत असते. सततसुखी होण्यास जीवाने आपल्या मुख्य स्वरूपास ओळखणे हेच साधन आहे.पण आत्मस्वरूप ओळखण्याची इच्छा उत्पन्न होणे हे अनेक जन्मामध्ये ईश्वर सेवा केल्यावाचून शक्य नाही. अशी ज्याची ईश्वरसेवा झाली असेल तो सहजच या अध्यात्म विचारामध्ये प्रवेश करतो. अशा संसाराच्या अडचणीत मी असता दैवयोगाने सहज किंवा एकाएकी ह्या आत्मज्ञानाच्या बाजारपेठेत आलो. मुमुक्षु रूपी गिऱ्हाईकास परमात्मज्ञानाची विक्री करणारा म्हणजे ज्ञान देणारा दुकानदार माझा सखा श्रीगुरू निवृत्तिराय प्राप्त झाला. जरूरीचा माल ज्या पेठेत असतो त्या पेठेत ते गिऱ्हाईक नेमके जात असते. या ज्ञानाच्या विक्रीचे निवृत्तिरायांचे दुकान कोठे आहे म्हणून विचाराल तर ते पंढरीस आहे. म्हणूनच तेथे मोक्षार्थी भाग्यवान गिऱ्हाईक जमते. आता त्या दुकानात ज्ञानाची विक्री झाल्यानंतर म्हणजे मुमुक्षुस ज्ञानप्राप्ती झाल्यावर भक्तिप्रेमा शिवाय दुसरे काही खरेदी करावयाचे रहात नाही. आता त्या भक्तिला देव कोणता पाहिजे असे म्हणाल तर तो जगांत व्यापून आनंदरूप शामसंदर वर्णाचा रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल तो विटेवर पाय व कटेवर कर ठेऊन उभा आहे परंतु त्याच्या प्राप्तीला फार कष्ट करावे लागतात. व त्या कष्टाने तो मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.


६३७
न गणवे परिमाणें
न बोलवे अनुमानें ।
तो सहज निर्वाणी ज्ञानें
फ़ळला वो माय ॥१॥
मुक्ताची साउली मजवरी पडली ।
ढेसी ढेसी वोल्हावली
अमूर्तधारी वो माय ॥२॥
तेथें एक नवल
वर्तलें वो साजणी ।
सांगतां मिठी मौनी
पडली वो माय ॥३॥
ऐसा परोपरी फ़ळला
दिव्यरुपें फ़ावला ।
तो रखुमादेविवरु जोडला
वो माय ॥४॥
अर्थ:-
ज्या परमात्म्याचे कोणत्या परिमाणाने मोजमाप करता येत नाही किंवा अनुमान प्रमाणानेही त्याचे वर्णन करता येत नाही. अशा परमात्म्यावर बुद्धि संबंधाने जीवभाव आला आहे. तो जीव मूळचा परमात्मरूप आहेच तो श्रीगुरूच्या उपदेशाने माझ्या रूपानेच मला प्राप्त झाला. तो परमात्मा आत्मत्वाने प्राप्त झाला याचा अर्थ मुक्त अवस्थेची छाया मजवर पडली ‘ढेसी ढेसी’ म्हणजे हळू हळू त्या अमूर्त परमात्म्याचे अमृत धारा मजवर पडल्यामुळे अंतःकरण वोल्हावले म्हणजे आनंदरूप झाले. ह्या स्थितीत अशी एक मौज होते की याचा अनुभव सांगू म्हटले तर मौनाची मिठी पडते. म्हणजे वाणी पांगुळ होते.अशा तऱ्हेचा दिव्य स्वरूप रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल तो आम्हाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.


६३८
ज्ञानाचें गरोदर वाढलें परपुरुषें
व्यभिचारिणीं ऐसें म्हणती
लोक वो माय ॥१॥
नव्हे व्यभिचारिणी नाहीं मज कोणी ।
पाहतां निर्वाणी सहज
जोडलें वो माय ॥२॥
निवृत्ति पुराडला देहेभाव चोखाळला ।
अंगेंसि मर्दिला ब्रह्मरसु
वो माय ॥३॥
आतां उजरणी येई भ्रांती
नलगे माझ्या चित्तीं ।
उजरणी सहजगती
जाली वो माय ॥४॥
आतां असो हें बोलणें
दुर्जना हें सांगणें ।
चिदानंदघन तेणें वाढ्लें
वो माय ॥५॥
ऐसा देखणिया देखिला
निजगुप्त प्रकाशला ।
तो रखुमादेविवरु मज
फ़ावला वो माय ॥६॥


६३९
आपला गुणग्राम सांडूनियां गेलिये ।
निवांत राहिलिये निर्गुणी वो माय ॥१॥
परोपरी पहातां सर्वरुपीं गोपाळ ।
तो मजपासीं परी खेळ
न लगतां वो माय ॥२॥
अनुवाद खुंटला सर्वांगे भेटला ।
गुणग्राम तुटला सहज वो माय ॥३॥
ऐसें म्यां रुप आपुलें
आपणचि केलें ।
रखुमादेवीवरे विठ्ठलें वो माय ॥४॥
अर्थ:-
गुणमयी मायेचे कार्य जे शरीर, ते सोडून निर्गुण परमात्म स्वरूपाचे ठिकाणी मी स्वरूप होऊन राहिले आहे. जगतात अनंत आकार दिसले तरी त्या सर्व ठिकाणी श्रीकृष्ण भगवान आहे. असे दि़ले वेळ न लागताच तो मलाहि प्राप्त होतो. त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा यथार्थ अविर्भाव झाल्यामुळे आता अनुवाद करण्यास तरी शिल्लक कोण राहिले आहे कारण, गुणग्राम म्हणजे गुण समुदाय निवृत्त होऊन गेला. मी त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप झालो. हे होण्याला रखुमादेवीचे पती जो श्रीविठ्ठल त्याचीच कृपा आहे असे माऊली सांगतात.


६४०
पुरे जरी म्हणों तरी अमित पुरला ।
पुरोनिया उरला तेज:पुंज वो माय ॥१॥
ज्ञानाचे खाणीं माणिके निर्वाणी
लाधले मी निर्गुणी निरालंब वो माय ॥२॥
आत्मवाचिया परी खेवणिलीं भूषणें ।
तें मी आवडीचें लेणें
लेईलें वो माय ॥३॥
हा सुजडु जडला विटेसि लाधला ।
त्या रखुमादेविवरा विठ्ठला मी
न्याहाळी वो माय ॥४॥
अर्थ:-
परमात्म्याच्या एका अंशावर जगत आहे. हे गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे. यावरुन परमात्मा जगताचे बाहेर अनंत अंशाने उरलाच आहे. जगतांत परमात्मा पूर्ण भरला आहे असे म्हटले तरी त्याहीपेक्षा तो अमित्य’ म्हणजे अपरिमित ‘स्वप्रकाश’ म्हणजे पूर्ण ज्ञान स्वरुपाने आहेच.त्याच्या स्वप्रकाश ज्ञानाच्या खाणीत मोक्षासारखी माणिकं मला मिळाली. आणि आपल्या स्वताच्या आश्रयावर असणाऱ्या सच्चिदानंद परमात्मा स्वरुपास मी मिळालो. आतां मी आपल्या स्वरुपावर आकाशादि प्रपंचाची भूषणे. आनंदाने धारण केली आहेत. त्यामुळे माझ्या स्वरुपाला प्रपंचापासून कांही एक धक्का लागणार नाही.ज्यांच्या स्वरुपाशी मी एकरुप झालो. ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, यांना मी आनंदाने पाहात आहे असे माऊली सांगतात.


६४१
जाणोनि नेणपण अंगी बाणले ।
नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माय ॥१॥
आत्मज्ञानाची गति जाली वो निवांत ।
प्रबोधतत्त्व मी पावलें वो माय ॥२॥
पाचारिलें अवस्था स्वभावें जाहल्या ।
म्हणोनि विसरल्या देहभाव माय ॥३॥
गुरुमुखें जै जोडे तें फ़िटे सांकडे ।
रखुमादेविवर कोडें
कवतिके वो माय ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्या बरोबर अज्ञान नाहीसे होऊन जाते. कारण ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध आहे. पण ज्या अज्ञानाच्या नाशा करिता त्याचा उदय झाला, ते कार्य संपल्या नंतर म्हणजे काष्टाचा दाह केल्यानंतर तो विशेष अग्नी आपल्या मूळच्या स्वरुपात लय पावतो त्याप्रमाणे आचार्यद्वारा महावाक्या पासून उत्पन्न झालेले अहं ब्रह्मास्मि’ असे ज्ञान ब्रह्मस्वरुपांत लय पावते. मग त्या ज्ञानी पुरुषाची जाणणे व नेणणे. या दोन्ही भावातिरिक्त कांही जाणावयाचे नाही. अशा स्वरुपाच्या नेणतेपणाची स्थिती शिल्लक राहते. अशी आत्मज्ञानाची गति निवांत असते या ज्ञान रुपत्वाचा मला अनुभव आला. अशा सहज शांत स्थितीत पूर्वीच्या जागृतादि अवस्थाना हाक सारुन पाहू लागले तर ज्या देहांत ब्रह्मज्ञानाने अशी शांति प्राप्त झाली आहे. त्या देहाला त्या अवस्था विसरुन जातात. श्री गुरुकृपेने जर आत्मज्ञान झाले. तर जन्ममरणाचे संकट दूर होते. रखुमादेवी पती श्रीविठ्ठल, त्याने आम्हाला सद्गुरुची भेट करुन देऊन सहज लीलेने भवसागरांतून तारुन नेले. असे माऊली सांगतात.


६४२
अंजनी संपूर्ण ठेऊनियां जन ।
ज्ञानी ज्ञानघन निरालंबीं ॥१॥
आदि मध्य आंतु दिसोनियां दिसे ।
पाठीं पोटीं दिसे निघोट रया ॥२॥
श्रवणनयन जातिगोतपूर्ण ।
जीवशिवा खुण आसपणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें वाच्य वाचक योगें ।
हरिविण वाउगें नाहीं रया ॥४॥
अर्थ:-
निरालंब म्हणजे ज्याला स्वरुपाशिवाय दुसरा आधार नाही. अशा ज्ञानघन परमात्मरुप अंजनाचे ठिकाणी संपूर्ण मन ठेवून ज्ञानोदय झाला असता, नसून दिसणाऱ्या सर्व त्रैलोक्याच्या आदि मध्ये अंताला व पाठी पोटीही निघोट म्हणजे निष्प्रतिबंध ज्याची व्याप्ति दिसत आहे. ती केवळ परमात्म्याचीच आहे. जातीगोताची अडचण मनांत न आणता, वाच्य वाचकाचे रितीने जीव शीवाचे आत्मरुपाने ‘ऐक्य समजून ‘ श्रवण नयन’ म्हणजे कानानी ऐकणे किंवा डोळ्यांनी पाहाणे हे एक परमात्मविषयाला करावे. वाच्य वाचक हे सर्व हरिच आहे. त्याच्यावाचून सर्व मिथ्या आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६४३
ज्ञानध्यानपटीं तंतु पै मनाचा ।
हरिरुप वाचा सारीपाट ॥१॥
स्वरुपकामारी वागपुष्पें चारी ।
विरळा मापारि जाणें खुण ॥२॥
त्रिगुण सवडी घालुनि उलथी ।
एकरुपपंक्तिजेवि नरु ॥३॥
ज्ञानदेवा घर तत्त्वता निर्गुण ।
परेचें संपूर्ण घर केलें ॥४॥
अर्थ:-
ज्ञानाचा किंवा ध्यानाचा व्यवहार हाच कोणी पट आहे. अशी कल्पना केली तर त्याला तंतू जर कोणी असेल तर तो मनाचाच आहे. आणि त्या पटावर हरिनाम वाणीचा सोंगट्याचा खेळ आहे. स्वरुपप्राप्तीची इच्छा जर असेल तर भगवन्नामाच्या उच्चाराची चार पुष्पे मांडावी.असी खूण जाणणारा नाममंत्राचे माप टाकणारा फार विरळा.असा मापारी त्रिगुणाचे सवडीत न लपता तिला उलथी करुन एकरुपाने श्रीहरिच्या पंक्तिस भोजन करतो. मी तत्त्वतः ज्ञानरुप वाणीचे जे मुख्य घर निर्गुण परमात्माच केले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६४४
मृत्युचेनि मापें जे जे प्राणी ।
तयाची शिराणी यम करी ॥१॥
यम नेम धर्म आम्हां नाहीं कर्म ।
अवघेंचि ब्रह्म होउनि ठेलों ॥२॥
द्वैतभाव ठेला अविनाश संपन्न
आपेंआप जनार्दन येईल घरा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे काज सरलें संसारी ।
चारीही मापारी गिळुनि ठेलों ॥४॥
अर्थ:-
जे जे प्राणी मेलें त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे यम त्यांचा बरावाईट शेवट करतो. त्या कर्मधर्माचे किंवा यमाचे भय आम्हास नाही. कारण आम्ही ब्रह्मरुप होऊन राहिलो. त्या अविनाश ब्रह्मरुपाने जो राहिला त्याचा द्वैतभाव जाऊन परमात्मा जनार्दन त्याचे घराला येईल.अशा स्थितीत आमचे संसाराचे सर्व काम आहे. इतकेच नाही तर संसारिक काम संपविण्याला मदत करणारे जे चारी वेद त्यांनाही आम्ही गिळून बसलो आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६४५
स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां ।
अरुप अनंता गुणी नाहीं ॥१॥
कैसेनि स्वरुप प्रकाश पैं दीप ।
एकीं एका सोप आकळे कैसें ॥२॥
नाहीं या आधार आधारासि निर्धार ।
परेसि परे पार परमतत्त्व ॥३॥
ज्ञानदेवघरीं पश्यंती वोवरी ।
वेदश्रुती घरीं दीप केले ॥४॥


६४६
लवण पवन जळापासाव धीर ।
पावन समीर रवी तया ॥१॥
तेज दीप्तीं आत्मा इंद्रिया प्रकाशी ।
अमरसुनी ग्रासी दिव्य तेज ॥२॥
पंचक दशकत्त्वता वि़चारी ।
एकरुपें सरी ग्रास त्याचा ॥३॥
ज्ञानदेवा जप हरि आत्मा माझा ।
चिंततां नलजाये तूं वेगीं ॥४॥
अर्थ:-
पहिल्या चरणांत पंचमहाभूतांचे वर्णन असून पंचमहाभूते आणि त्यांच्या सत्त्व रज तम गुणांपासून उत्पन्न झालेली दहा इंद्रिये यांच्यात व्याप्त होऊन आभासरुप आत्मा आपल्या प्रकाशाने इंद्रियादिकांना प्रकाशीत करतो. आणि आभास अधिष्ठान जो कूटस्थरुप आत्मा त्या पांचभूतांना दहा इंद्रियांना आत्मैक्य करुन ग्रासून टाकतो. परमात्मरुप श्रीहरि माझा आत्मा आहे त्या परमात्म्याचे चिंतन करण्यांत तुम्ही लाजू नका. माझ्याप्रमाणे तुम्ही चिंतन केले तर तो तुम्हांला लवकरच येऊन भेटेल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६४७
सायुज्य सदन श्यामाचिये घरीं ।
ह्रदयकल्हारीं श्यामतनु ॥१॥
सचेत अचेत नित्यता विरक्त ।
असोनि अलिप्त जन्ममरणा ॥२॥
नारायण साध्य साधक साधिता ।
विग्रह पूर्णता आंगी लागे ॥३॥
ज्ञानदेवी मौनीं गुणग्रास धाम ।
सर्वत्र आराम हरी माझा ॥४॥
अर्थ:-
शामसुंदर श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणीच सायुज्य मुक्तिचे घर आहे. तोच माझ्या हृदय कमळांतही आहे. जड चेतन पदार्थ त्याचे ठिकाणी भासणारी नित्यता आणि त्या विषयासंबंधी उत्पन्न होणारे वैराग्य हे सर्व त्याचे ठिकाणी असून पुन्हा तो जन्ममरणदि धर्मापासून अलिप्त आहे. साधक नारायणाला ध्यान करुन घेत असता तो नारायणच त्याला ध्यानाकरता मूर्तरुप धारण करतो. ज्याच्या स्वरुपाचे वर्णन करता येत नाही. म्हणजे ज्याच्याबद्दल मौन धरावे लागते असा तो सर्वगुणनिधान माझा श्रीहरि परमात्मा सर्वत्र भरला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६४८
मोहाचें मोहाळ सांगितले एकीं ।
पाहतां परिपाकीं मोहाळ नाहीं ॥१॥
मोहिलेची दिसे मोहामाजी रसें ।
नसोनियां भासे तदात्मक ॥२॥
बिजीं बिज हरि दिसोनि अविट ।
विटोनीयां नीट कळिका फ़ाकें ॥३॥
बापरखुमादेविवरा आबोला सवळे ।
अवघेचि निवळे गुरुकृपा ॥४॥
अर्थ:-
एकी म्हणजे एक परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी अध्यस्त असलेला जो संसार त्यामध्ये जिकडे तिकडे मोहच असतो. परंतु विचार करुन पाहिले असता. आत्मज्ञानाचा जर परिपाक झाला. तर ते मोहाचे मोहळ समूळ नाहीसे होऊन जाते. जगतामध्ये एकरुपाने परमात्मतत्त्वच दिसते वस्तुतः जगत नाही? पण ज्याचे दृष्टीने जगत् घेतले आहे त्याच्याकरता जगदाकाराने परमात्मा आहे असे म्हणावे लागते. बीजरुप अविट जो श्रीहरि तो जर दिसला तर सर्व संसाराचा वीट येऊन आत्मज्ञानरुपी कमळ उमलले जाते. माझे पिता व रखुमादेवीचे पति श्रीविठ्ठल, त्यांच्या विषयी निश्चित असे जऱ्ही बोलता येत नाही. पण गुरुकृपा झाली तर मात्र सर्व मोह जाऊन श्रीहरिची ओळख होते असे माऊली सांगतात.


६४९
एकि म्हणे ग्रह दुजी म्हणे मोहे ।
एकीनें सोहं सांगीतलें ॥१॥
कोहं वाचे वारी सोहं ममतें सारी ।
वैकुंठीची दरी उघडली ॥२॥
ककार भेदीला मकार शोधीला ।
ओंकार निमाला तये स्थानीं ॥३॥
ज्ञानदेवीं ओहं सोहं गिळिलें पैं कोहं ।
नाहीं आम्हां मोह कल्पनेचा ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्ण परमात्म्याविषयी गौळणी अनंत विकल्प करितात. एकीचा ग्रह असा की कृष्ण हा नंदाचा पोरं आहे. दुसरी म्हणते सर्व जीवांना मोहून टाकणारा हा मोह आहे. एकीने सांगितले तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याचे सोहं म्हणजे आत्मत्वाचे चितन करुन कोहं भाव व त्याच बरोबर सोहं हेही टाकून द्यावे. कारण भोळ्या भाविक जीवांना उपासने करिता हा दिसणारा कृष्ण नव्हे तर ही वैकुंठीची दरीच उघडी केली आहे. ककाराचा भेद केला मकार शोधला. अशा स्थानीं ॐ’ कार हेच श्रीकृष्णाचे प्रतिक आहे. वस्तुतः शुद्ध परमात्मा त्याच्याठिकाणी अहं सोहं कोहं’ वगैरे काही एक नाही. ते भाव असण्याचे आम्हाला कल्पनाही नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६५०
दुजेपणीचा भावो आम्हां नाहीं ठावो ।
सर्वी सर्व देवो आकारला ॥१॥
कैसें याचें करणें सांग
आम्हां माय ।
कामधेनु होय कल्पनेची ॥२॥
नित्यसुखवेधें वेधली कामना ।
कृष्णीं कृष्णनयना एक तेजें ॥३॥
निवृत्ति साचार ज्ञानदेवीं आचार ।
कृष्णचि परिवार क्षरलासे ॥४॥
अर्थ:-
आता आम्हाला द्वैत म्हणून माहित नाही. सर्वत्र दिसणारे नामरुपादि आकार हा देवच बनला आहे काय त्या परमात्म्याची लीला आहे. ते आम्हाला सांग. मला तर असे वाटते की. भक्त लोकांच्या कल्पनेची पूर्तता करणारा हा परमात्मा कामधेनूच आहे. असे त्याचे आश्चर्य पाहून त्या सुखरुप परमात्म्याचे ठिकाणी वासनेला वेध लावून गेला आहे. तो स्वयंप्रकाश कृष्णरुप परमात्माच डोळा झाल्यामुळे सर्व कृष्णरुपच दिसते. माझे ठिकाणी निवृत्तिरायांनी असा बोध । केल्यामुळे आमचा सर्व आचार विचार आणि परिवार कृष्णच बनला आहे. असा अनुभव आला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६५१
अवघेनि मनें दोहीलिया धेनु ।
प्राणापानीं प्राणु जीवविला ॥१॥
तें रुप परब्रह्म प्राणे प्राण सम ।
करुनियां नेम जपों आम्ही ॥२॥
नेणो धूर्ति मूर्ति कैची हे प्रवृत्ति ।
कृष्णेंचि समाप्ति सर्व करुं ॥३॥
निवृत्तिचें तारुं कृष्णीं कृष्णसुख ।
ज्ञानदेवा चोख दिधलें नाम ॥४॥
अर्थ:-
आम्ही संसारिक वासना टाकून देऊन शुद्ध मनाने परमात्मरूप धेनूचे दोहन केले. आणि जीवाला धारण करणारे प्राणापानादिक हे सर्व परमात्मरूप करून जीवाला नित्य शांत केले. ते कृष्णरूप परब्रह्म यथार्थ जाणून व त्याच्याबरोबर प्राणापानाचे ऐक्य करून त्याचे नामजपाचा आम्ही निर्धार केला. हे आता त्या जपाशिवाय इतर सर्व साधनांची प्रवृत्ति श्रीकृष्ण परमात्मस्वरुपाचेच ठिकाणी समर्पण करू. श्रीगूरू निवृत्तिरायांनी परमात्मा श्रीकृष्णाचे ठिकाणी असणारे जें कृष्णरूप सुख तद्रूप नाम हेंच कोणी एक तारूं माझे हाती दिले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६५२
निर्गुणाची छाया सगुणीं बिंबली ।
तत्त्वीं तत्त्वे गेली अनुठाया ॥१॥
निश्चळीं निश्चळ नलगे आळुमाळ ।
तत्त्वता अढळ तें वेगळेची ॥२॥
नातळतां पंथी शब्दाचा सुहावा ।
परेसहित दोहावा भरला दिसे ॥३॥
ज्ञानदेवी रम्य दिसोनि न दिसे ।
निराकारी भासे तदाकारें ॥४॥
अर्थ:-
निर्गुण स्वरूपाचे प्रतिबिंब सगुणांत आहे. ते सगुणातील प्रतिबिंब श्रीगुरूकृपेने निर्गुण तत्त्वांत एकरूप होते. त्यावेळी तें निश्चल तत्त्वांत निश्चळ असलेले दिसले तरी त्याला अळुमाळ यत्किचीतही संबंध लागत नाही. चल किंवा निश्चल याहून तो परमात्मा तत्त्वतः वेगळा असून अढळ आहे. शब्दाच्या सहाय्याने जे वेदवाक्याच्या सहाय्याने त्याचा पत्ता लागत नाही. परावाणीसहित तो जात व्याप्त आहे. माझे ठिकाणी तें अपरोक्षत्वाने असून दृश्यत्वाने दिसत नाही. परंतु निराकाररूपाने त्याचे अंतःकरणांत सहजच भान होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६५३
दिपाचेनि तेजें पैस घेती माया ।
जाय सांगावया द्वैतभावो ॥१॥
द्वैत नाहीं अद्वैत नाहीं ।
ठाईंचा ठायीं एकतत्त्व ॥२॥
तैसे रसमय तेज स्नेहार्णव बीज ।
छाया मोहबीज अकळ दिसे ॥३॥
बापरखुमादेविवरु वोतली पैं कळा ।
न दिसोनि सोंविळा दिस दिसो ॥४॥
अर्थ:-
परमात्मस्वरूप दीपाचे प्रकाशाने सर्वत्र व्याप्ति केली आहे. हे सांगावयाला द्वैत पत्करावे लागते. वस्तुतः त्याचे ठिकाणी द्वैत किंवा अद्वैत भाव काहीच नाही. तो आपलेच ठिकाणी स्वगतादिभेद शून्य एकरूप आहे. ते आनंदस्वरूप आनंदाचे तेजोमय परमात्मजीवन व आभासरूप मोहाचे बीज आहे. परंतु ते कोणाला आकलन होत नाही. असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, तोच परमात्मा सर्व पदार्थामध्ये व्यापून कोणाला न दिसतां असंगरूपाने सोवळा आहे.असे माऊली सांगतात.


६५४
सगुणीच्या रातीं निर्गुण दिवटा ।
सांगती चोहटा वागपंथे ॥१॥
वागेश्वर हरि वाचेचा वाचक ।
आधीचाही अर्क दीपतेजें ॥२॥
साकारीं निराकार बिंबी बिंबाकार ।
अवघे माजघर बिंबलेंसे ॥३॥
बापरखुमादेवीवरु ॐतत्सदाकार ।
निवृत्ति निर्धार माजीवटा ॥४॥
अर्थ:-
सर्व मायाकार्याच्या पलिकडचा असून तो परमात्मा शुद्ध ज्ञानाचे घर आहे. तसेच तो सर्व जीवांच्या हृदयांत व्यापून आहे. असे चारी वेदातील वाक्ये सांगतात. पण वागेश्वर श्रुतिमाऊली तिला बोलविणारा श्रीहरिच आहे. कारण सर्वांच्या आधी सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे.उपाधी घेऊन तुम्ही साकार म्हणा की उपाधि टाकून निराकार म्हणा पण त्या सर्वांत श्रीहरिच प्रकाशमान झालेला आहे. माझे पिता व रखमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते ॐ तत् सत् अशा । आकाराचे आहेत. त्यांच्या स्वरूपाचा निर्धार श्रीगरू निवृत्तिरायांनी मला करून दिला. असे माऊली सांगतात.


६५५
सामता वसोनी मायेसी पर ।
विज्ञान हें घर जीवी वसे ॥१॥
ज्ञानीं वसोनि ज्ञानी न दिसे ।
बिंबी बिंब रसें समता शांति ॥२॥
आपी आपरस जनवनदारा ।
विज्ञान उभारा भावी दीसे ॥३॥
बापरखुमादेवीवरु उभारण हरि ।
दिपु माजघरीं ठेविला असे ॥४॥


६५६
वृत्तीचा उच्छेद मना निग्रह ।
धारण विग्रह तेजतत्त्वीं ॥१॥
बिंबामाजि बिंब हरपलें स्वयंभ ।
मायेचा पैं लोभ अरता जाला ॥२॥
नाहीं तेथें छाया मायेचा विलास ।
घरभरीं पैस दीपीं रया ॥३॥
बापरखुमादेविवर ज्ञानदेवा धन ।
वस्तूची विवरण तेजाकारें ॥४॥
अर्थ:-
अनात्मवृत्तीचा उच्छेद म्हणजे नाश आणि मनाचा विषयापासून निग्रह म्हणजे धारणा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर. असे केलें म्हणजे परमात्मरूप बिंबात जीवरुप बिंब लय पावून तूं स्वतःच परमात्मरुप होशील. मग आपोआप मायेचा लोप अरता’ म्हणजे निकृष्ट झालाच असे समज. त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी छायारुप जीव किंवा मायेचा विलास हे काही एक नसुन स्वयंज्योतीरुप जे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविेठ्ठल असा जो परमात्मा त्याचा सर्व त्रैलोक्य रुपी घरात विस्तार होईल. तसेच घनदाट जो तेजाकार परमात्मा त्या परमात्म वस्तुचा माझे ठिकाणी विस्तार झाला आहे असे माऊली सांगतात.


६५७
ज्योतिस ज्योती मेळउनी हातीं ।
तव अवचिति झोंबिन्नली ॥१॥
अद्वैत पाहतां न दिसे गुणमेळु ।
गुणा गुणीं अडळु ठाउका नोहे ॥२॥
शून्याहि परता आदि अंतु नाहीं ।
तो असोनियां देहीं धांवो सरे ॥३॥
बापरखुमादेवीवरु विसरता धांव ।
हरिरुपभाव दीपकळा ॥४॥
अर्थ:-
जीवात्मज्योतीचे परमात्म ज्योतीशी सहजच जीवपरमात्म्याचे ऐक्य होते. अशा अद्वैतसृष्टीचा उदय झाला असतां मायेच्या त्रिगुणांत गुणागुणी भाव ठाऊक नसल्यासारखा होतो. शून्याही पलिकडचा आदि अंतरहित तो परमात्मा असून देहामध्येच व्याप्त असल्यासारखा दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते हालचालरहित असे एकरूप आहते. ही ज्ञानाची ज्योत श्रीगुरू निवृत्तिरायानी आम्हाला दाखवली असे माऊली सांगतात.


६५८
कापुराची सोय कापुरीची माये ।
परतोनि घाये नेघे तैसी ॥१॥
असोनि नसणें सर्वत्री दिसणें ।
हरि प्रेम घेणें पुरे आम्हां ॥२॥
सुखरुप जीव असतांची शिव ।
हरपले भाव विज्ञानेंसी ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा ।
तरंगुही नांवाचा परतेचिना ॥४॥
अर्थ:-
कापुराचा सुगंध जसा कापुराच्या ठिकाणीच असतो. त्याप्रमाणे परमानंदरूप झालेली अंतःकरणवृत्ति परमानंदस्वरूपाच्या ठिकाणीच असते. पुन्हां परतून सत्यत्वाने संसाराकडे बघत नाही. आत्मस्वरूप सर्व संसारात असून नसल्यासारखे असले तरी भातिरूपाने सर्वत्र दिसत असतेच असा जो श्रीहरि त्या श्रीहरिचे प्रेम आम्ही घेतले म्हणजे पुरे. वस्तुतः जीवशीवरूप म्हणजे परमात्मरूप आहेच असा बोध झाला म्हणजे देवभाव व त्या देवभावाचे नाशक ज्ञान हे दोन्ही मावळतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सुखाचा सागर आहेत. त्यांच्यावर तरंग म्हणजे देहादिभाव पुन्हां उत्पन्न होत नाही. असे माऊली सांगतात


६५९
आदि मध्य अंत सर्वसम हरि ।
घटमठचारी भरला दिसे ॥१॥
देखिलागे माये अलक्ष लक्षीतां ।
शांति पक्षवाता समबुध्दि ॥२॥
भावबळें धन अलोट अभंग ।
चित्संगें भंग प्रपंचाचा ॥३॥
ज्ञानदेव बोले नित्य नाम प्रेम ।
तेथेंचि विश्राम हरिचा असे ॥४॥
अर्थ:-
जगताची उत्पत्ति, स्थिति व लय हरिस्वरूपात असल्यामुळे घटमठादि सर्व पदार्थामध्ये तो सर्वत्र भरलेला आहे. असे त्या अलक्ष परमात्म्याचे लक्षणाने चिंतन करित असता त्याला मी पाहिला. जसा वायु सर्वत्र व्याप्त असतो. त्याप्रमाणे बुध्दीतील संसाराची बाजु जाऊन शांति प्राप्त झाली. तो अविनाश ज्ञानस्वरूप आत्मा त्याचे ठिकाणी माझा बळकट भाव असल्यामुळे त्याचे संगतीने प्रपंचाचा नाश झाला. नामाविषयी ज्याचे अंतःकरणात नित्य प्रेम आहे. ते अंतःकरणच श्रीहरिच्या विश्रांतीची जागा आहे. त्या अंतःकरणात नित्य श्रीहरि प्रगट असतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६६०
अंतरींचा विस्तारु ब्रह्मीं पाल्हायिला ।
तेथें एक मनु सिध्द साधकु भला ॥१॥
तेणें केलें अनारिसें केलें अनारिसें ।
पाहों गेलें सरिसें सार पावलेंगे माये ॥२॥
तेथें ऋग्यजु:साम भुलले ।
तें माझ्या ठायीं फ़ुलले ब्रह्ममय ॥३॥
रखमादेविवर अंतरब्रह्मीं तरंगु जाला ।
ब्रह्मउदधी सामावला मज घेऊनि माये ॥४॥
अर्थ:-
अंतरीचा परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विस्तार पाहु गेले असता तेथें तो परमात्माच मनाच्या उपाधि भेदाने सिद्ध साधक नटलेला आहे. अशा सिद्ध स्थितित पावलेल्या मनाने मला देहादि अनात्म धर्मापासून वेगळे केले. नंतर मी पाहू लागले तो माझे मीपणच हरपलें म्हणजे मला परमात्मस्वरूप प्राप्त झाले. त्या परमात्मस्वरूपाचा विचार करण्यांत ऋग्यजुःसाम हे वेद भुलुन गेले.ज्या परमात्मस्वरूपाविषयी ते भुलून गेले ते परमात्मस्वरूपच माझ्याच ठिकाणी सर्व ब्रम्हमय आहे. ऱखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे ब्रह्मरूपी समुद्रावर एक तरंग असल्यामुळे त्या समुद्रात ऐक्य पावला. असे माऊली सांगतात.


६६१
निर्गुणीचे हातीं व्यवहारु पडिला ।
दाइजपणें मुकला साभिलाषे ॥१॥
निरंजनवनीं धरीन मुरारी ।
भाग अभ्यंतरीं घेईन देखा ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सोविळा ।
भाग मज आला हरिहरु ॥३॥
अर्थ:-
निर्गुण परमात्मस्वरूपाच्या हाती सर्व जगत व्यवहार अध्यस्त असल्यामुळे जीवाचे आणि त्याचे एकपणाचे नाते मूळचेच आहे. परंत देहादिकांशी तादात्म्य पावल्यामुळे दीनपणा आला आहे. वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो त्याचा दाईज म्हणजे त्यापैकीच आहे. त्या परमात्मस्वरूपाचा अभिलाष धरल्यामुळे त्याच्या प्राप्तीने आप्तेष्टपणाचा तो पृथक संबंध गेला.असा निरंजन वनांत सगुणरूपाने वास करणारा जो मुरारी त्याला धरून त्याचा भाग मनांत आणील. माझे पिता व रखुमादेवीचे पती, जो हरिहरात्मक सोवळा श्रीविठ्ठल तो माझ्या भागाला आला असे माऊली सांगतात.


६६२
एकभान गिळुं दुजें द्वैत उगळूं ।
कासेवी चामे गिळूं सगळा ॥१॥
पोटभरु येणें वैकुंठीचें पेणें ।
सेवासुख जाणे कृष्णसुखीं ॥२॥
डोंगर सकळे मायेचे मोकळे ।
प्रपंचा नाकळे या हेतु ॥३॥
ज्ञानदेवा साध्य ज्ञानाचे उपाध्य ।
येर तत्त्व बोध्य मुक्त कैचें ॥४॥
अर्थ:-
एक भानू म्हणजे परमात्मवस्तु तिचे ज्ञान गिळू म्हणजे अंतःकरणांत साठवू आणि प्रपंचाचे द्वैत उघड़ म्हणजे टाकून देऊ. प्रपंचातील विषयसुख हे कासवीचे दूध गिळण्यासारखे मिथ्या आहेत म्हणून त्याचा त्याग करू. ज्याने ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने श्रीकृष्णाचे सेवासुख जाणले आहे तोच खरा सुखी असून त्यास वैकुंठ प्राप्ती आहे. कारण प्रपंचाचे वैषयीक सुख कितीही मोठे असले तरी मिथ्या आहे. असे जीवब्रह्मैक्य अंतःकरणाच्या उपाधिने मला साध्य असल्यामुळे मी मुक्त आहे. परमात्म्याची प्राप्ती मला ज्ञानाने साध्य असल्यामुळे मी मुक्त आहे. संसाराच्या ज्ञानाने कोण व कसा मुक्त होणार मुळीच होणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६६३
ध्यानधारणामंत्र साधन ।
त्रिकाळीं जपन अजपासिध्दी ॥१॥
नटकेचि अटकु ठाईंचेंचि निर्गुण ।
मज कवणें ठाईं घेऊनि गेले ॥२॥
देश वाढले देश आटले ।
चहूंद्वारी कोंदलें ब्रह्मतेज ॥३॥
रखुमादेविवरु अठांगी आगळा ।
सप्तधातूं वेगळा ब्रह्मउदधि ॥४॥
अर्थ:-
ध्यान व धारणा ही समाधीचे अंगे आहेत, नाममंत्र ही साधने आहेत. अजपा सिद्धीचे जपन म्हणजे अजपा जप त्रिकाळ चालू आहे. अशी साधने केली तरच तो परमात्मा प्राप्त होईल. अशी आडकाठी नाही. तो सहज निर्गुण आहे. तो घेऊन मला कुणीकडे गेला हे समजत नाही. म्हणजे त्याने मला परमात्मरूप करून ठेवले.तो देश कालापेक्षाही मोठा आहे. सर्वत्र ठिकाणी तें ब्रह्मतेज कोंदलेले आहे. म्हणून अपार ब्रह्म समुद्र जो रखुमादेवीचे पती, तो अष्टांगरूप समाधीहून व सप्तधातुरूपी शरीराहून वेगळा आहे. असे माऊली सांगतात.


६६४
विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशलें ।
अवघेचि जालें देहब्रह्म ॥१॥
आवडीचें वालभ माझेनी कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकारगें माये ॥२॥
बापरखुमादेविवरु सहज निटु जाला ॥
ह्रदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३॥
अर्थ:-
सर्व विश्व रात्रंदिवस ज्या ब्रह्मप्राप्तीची इच्छा करीत आहे. तें ब्रह्म माझ्या मनांत प्रगट झाल्यामुळे माझा सर्व देह ब्रह्मरूप झाला. तें माझे आवडीचे प्रेम माझ्या रूपात कोंदून गेले. तें आकाशस्वरूपी परमात्मचैतन्य मी पाहिले.याचे मोठे नवल वाटते.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते लोकांना भेटण्याला फार कठीण आहेत परंतु मला सहज प्राप्त झाले आणि हृदयांत उत्तम प्रकारे ब्रह्माकार होऊन राहिले आहेत. असे माऊली सांगतात


६६५
अनुभव जाला प्रंपच बुडाला ।
आपुला आपण देखिला सोहळावो माये ॥१॥
आपण जाणतां आपण मी जालिये ।
आपणापैं विसरलिये नेहटीं वो माये ॥२॥
आपुला म्हणोनि अवघा आलिंगिला ।
अवघा देखिला अवघेपणें वो माये ॥३॥
ऐसे जाणोनि ठकलें ठकोनियां ठेलें ।
रखुमादेविवरेविठ्ठलें वो माये ॥४॥
अर्थ:-
यथार्थ अनुभव आल्यानंतर सर्व प्रपंच मुळीच नाही असा निश्चय होतो. वास्तविक ते ज्ञान आपला असलेल्या आपल्या कूटस्थरुप आत्म्याच्या सुखाचा सोहळा आपण म्हणजे अंतःकरणातील आभासाने पाहिला असे होईल.आपण जाणता आपण, या दोन आपण शब्दापैकी पहिल्या आपण या पदाचा अर्थ मी आपल्याला म्हणजे जो कूटस्थरुप परमात्मा त्यास जाणल्यामुळे आनंदाचा. सोहळा होतो. दुसऱ्या आपण शब्दाचा अर्थ जीव आहे.आता जीवाभासाचा विसर आपोआपच पडतो.अशा रितीने जीवभाव जाऊन परमात्मभाव प्रगट झाला. आणि त्या परमात्मवृत्तिने जगाकडे पाहू लागला तर तो त्या जगांत अनंतरुपाने भरलेला दिसेल. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलास मी परमात्मरुपाने जाणल्यामुळे मी जीवस्वरुपाला मुकलो व स्वतःसिद्ध परमात्मरुप होऊन राहिलो असे माऊली सांगतात.


६६६
दुजेपणींचा भावो ।
माझिये ठाउनि जावो ।
येर सकळिक वावो ।
म्यां त्याजियेला ॥१॥
माझें मी जाणें ।
अनु कांही नेणें ।
अनुभविये खुणें संतोषले ॥२॥
माझा मीचि श्रोता ।
माझा मीचि वक्ता ।
मीचि एकु दाता ।
त्रिभुवनीं ॥३॥
एकल्यानें एकला ।
अनंतरुपें देखिला ।
दुजेपणा मुकला ।
ज्ञानदेवो ॥४॥
अर्थ:-
मी मीपणावांचून सर्व अनात्मपदार्थाचा त्याग केला आहे. खरा परंतु, परमात्न्याहुन मी भिन्न आहे असा जो दुसरेपणाचा भाव तो निघून जावा. इतर सर्व लौकिक गोष्टीचा मी त्याग या पूर्वीच केला आहे.आतां माझे स्वरुप मीच जाणून घ्यावे मला त्याच्या अनुभवाचा संतोष प्राप्त झाल्यामुळे इतर कांहीच नको. या अशा अनुभवाच्या खुणेने आतां माझा असा अनुभव झाला आहे की, माझा श्रोता मीच, माझा वक्ता मीच, सर्व त्रैलोक्यांत अद्वैतात्मज्ञानाचे दान करणारा दाता एकटा मीच, सर्व जगद्रूपाने नटलेला आहे.मी एकट्यानेच अंतःकरण वृत्तीद्वारा अनंतरुपाने आपल्याला पाहिले. याला कारण माझे ठिकाणचा दुसरेपणा नष्ट झाला आहे. असा माझा अनुभव आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६६७
योगिया दुर्लभ तो म्यां
देखिला साजणी ।
पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥
देखिला देखिला माये देवाचा देवो ।
फ़िटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी ।
रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥
अर्थ:-
योगिजनांना दुर्मिळ असे पांडुरंगाचे दर्शन मला झाले आणि ते किती पाहिले तरीही मनाची तृप्तता होत नाही. हा देवांचा देव विठ्ठल मी पाहिला आणि मनातील सर्व संदेह संपले व मी माझे मन इतके त्याच्या ठिकाणी तद्रूप झाले की काही द्वैत उरलें नाही. पांडुरंगाची अनंत वेषातील अनंत रुपें मी पाहिली आणि तल्लीनतेने मनोमन एकात्म रुपाची खुणगाठ पटली.


६६८
नादबिंदकळाज्योति स्वरुपीं
विलया जाती ।
श्रुति नेति नेति म्हणती जेथें ॥१॥
नाहीं मज चाड सकळ उपाधी ।
एका मंगळनिधि वांचूनियां ॥२॥
श्रीरामीं रमतां मनु निवडितां
नये तनु ।
सुखश्री सांगतां सिणु हारतु असे ॥३॥
पदापिंडा दाटणी रुपानिरुपा निरंजनी ।
विठ्ठला चरणीं ज्ञानदेवो ॥४॥
अर्थ:-
नाद, विद्, कळा ज्योति ही सर्व परब्रह्माच्या ठिकाणी लय पावतात. आणि आठिकाणी श्रुतिसुद्धा नेति नेति म्हणून माघारी फिरतात. असा परममंगळ निधी श्रीविठ्ठलच आहे. त्याच्यावाचून मला कोणत्याही उपाधिची आवड नाही. श्रीरामाच्या ठिकाणी रमलो असतां शरीर किंवा मन याची निवड करता येत नाही. जे दोन्ही एकरुपच होतात. त्या श्रीरामाच्या सुखाचा अनुवाद करीत असता सर्व साराच्या दुःखाचा शीणभाग नाहीसा होऊन जातो. निरुप जे निरंजन पद त्याच्या ठिकाणी शरीराची किवा नामरुपाची आटणी होऊन श्रीविठ्ठलाचे चरणी मी रममाण झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६६९
अद्वैताची झडपणी ब्रह्मीं निमाली ।
तन्मय तत्त्वतां ब्रह्मचि मुरालीं ॥१॥
परतोनि पाहणें परतोनि पहाणें ।
नाहीं त्या ठाया जाणें रुपेंवीण ॥२॥
बापरखुमादेविवरु रुपेंविण देखिला ।
आटकु टाकला द्वैताकारे रया ॥३॥
अर्थ:-
ज्या पुरुषाला अद्वैत आत्मबोधाने झडपले आहे. तो बोध आणि तन्मयत्व ही ब्रह्माच्या ठिकाणीच मुरतात.ज्या ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी वृत्ति पोहोचली असतां पुन्हा मागे परतून पहाण्यास शिल्लक राहात नाही. त्याठिकाणी जाणे म्हणजे आपले स्वतःच्या नामरुपाचा परित्यागच करणे होय. असे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल परमात्मा नामरुपावांचून मी पहिला म्हणून द्वैताकार जगत् प्रतितीचा प्रतिबंध निवृत्त झाला. असे माऊली सांगतात.


६७०
पाहातां वटाचा विस्तारु कैसा ।
शाखा फ़ुटलिया कळिया तैसा ॥१॥
सांगा लपणें तें काय जालें ।
वटीं विस्तार दोही हारपले ॥२॥
विशुध्दचक्रीं मेरु हा नेडे ।
तेथें परदीपीं साहित्त्य जोडे ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
मनोमानसी तयां सामावला ॥४॥
अर्थ:-
वडाच्या झाडाचा विस्तार पाहूं गेले तर त्याच्या शाखा, फांद्या, डाहाळ्या कळ्या वगैरे मोठ्या असतात. परंतु एवढा विस्तार अत्यंत सूक्ष्मबीजाचा होता. तेव्हां हा विस्तार काय झाला ते सांगा पाहू. विचार करु गेलें असता. वड आणि त्याचा विस्तार हे दोन्ही बीजांत नाहीसे होऊन जातात.त्याप्रमाणे अत्यंत शद्ध जो परमात्मा त्याचे ठिकाणी ‘हा मेरु’ म्हणजे संसार ‘नडे’ म्हणजे गुप्त रुपाने राहतो. त्याचा पुन्हा विस्तार होण्याला परमात्मस्वरुपाच्या प्रकाशाची सहाय्यता होते. हा सर्व संसार माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे मनांत सामावून गेला आहे, असे माऊली सांगतात.


६७१
जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें ।
पाहो गेलिये तंव तेंचि जालेंगे माये ।
इंद्रियांसहित चित्त ठकलेंचि ठेलें ।
मी माझें विसरलें स्वयें भाव ॥१॥
ऐकोनि देखोनि मन होय आंधळे ।
परतोनि मावळे नाहीं तेथें ॥२॥
अविद्या निरसली माया तुटली ।
त्रिगुण साउली तेथें रुप कैचें ।
चांग विचारीलें विवेकें उगवलें ।
ज्ञान हारपलें तयामाजी ॥३॥
मुकियाचे परी आनंदु भीतरी ।
अमृत जिव्हारीं गोड लागे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु जाणे ।
संत ये खुणें संतोषलें ॥४॥
अर्थ:-
मी परब्रह्माला जाणून घेण्याकरिता गेलें तो माझे ठिकाणचा जाणणेपणाच नाहीसा झाला. याचा अर्थ अज्ञानाची निवृत्ति झाल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञानही उरले नाही. मी परमात्मरुप झाले. इंद्रियांसह वर्तमान चित्त नाहीसे होऊन मी माझा असा देहभावच विसरुन गेले. आतां माझी स्थिती कशी झाली म्हणाल तर कानांनी ऐकणे, डोळ्यानी पाहाणे. वगैरे इंद्रियाच्या क्रिया करण्यांविषयी मन आंधळे झाले. पुन्हा विचार करुन पाहावे तो ही सर्व तेथें नाहीसीच होतात. कारण मूळ अविद्या नाहीसी झाली म्हणजे मोह नाहीसा होतो. अविद्याच नाही मग त्याठिकाणी रुप कशाचे? हे परमात्म स्वरुप चांगला विचार करुन पाहिले. तेव्हां तें आपोआप अंतःकरणांत उत्पन्न झाले. आणि माझ्या ठिकाणी ज्ञान आहे. असे मी समजत होते. ते ज्ञानही परमात्मरुप झाले. मुक्याचा आनंद ज्याप्रमाणे त्याला बोलता येत नाही. त्याप्रमाणे. आत्मानंदाचे अमृत अंतःकरणांतच गोड वाटते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या हृदयातील ही सर्व स्थिती जाणतात व ह्याच खुणेने संत संतुष्ट होतात. असे माऊली सांगतात.


६७२
माझें स्वरुप म्यांचि श्रृंगारिलें ।
निर्वाणी म्या केलें लयाकार ॥१॥
आपुली सोसे वाढवावया गेलें ।
तव आपणाचि ठेलें आपण्याठायीं ॥२॥
सहजगुणाचे निर्गुण वो केलें ।
माझें म्या पाहिलें मन
मावळुनिगे माये ॥३॥
तीन चारी मिळोनि येके
ठायीं घातलीं ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलीं फ़ावलीं ॥४॥
अर्थ:-
माझे स्वरुप मीच शृंगारले म्हणजे विचार करुन निर्वाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी लय केला.मी आपल्या स्वरुपाची वाढ करण्याकरिता परमात्म्याचा विचार करु गेले, तो परमात्मा दुसरीकडे कोठे नसून तो माझेच स्वरुप आहे. असे जाणून मी तद्रूप झाले. अविद्येमुळे जीव गुणयुक्त झाला आहे. विचार करुन पाहिले असतां जीवाचे सहज निर्गुण स्वरुप प्रतीतीला आले. आणि त्या स्वरुपांत मन हे मावळून गेले.त्रिगुणांने युक्त में अंतःकरणचतुष्टय तें एका आत्मस्वरुपाच्या ठिकाणीच घातले. तेव्हांच मला माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांची प्राप्ती झाली. असे माऊली सांगतात.


६७३
येकी सांगे मातु येकी सांगे रेतु ।
तो कोण दृष्टांतु सखिये सांगे ॥१॥
बाई येक सरें नाहीं पैं दुसरें ।
निवृत्ति दातारें सांगीतलें ॥२॥
पांचांची मिळणी साही चक्रपाणी ।
दशमाची कहाणी येकादश ॥३॥
ज्ञानदेवी सार चौवेदीं पार ।
येकत्त्वीं विचार विज्ञानेसी ॥४॥
अर्थ:-
तूं ज्या श्रीकृष्णाला पाहिले आहेस त्याची एखादी तरी गोष्ट मला सांग. त्या परमात्म्याच्या ठिकाणी दुसरेपणाचा मुळीच संबंध नाही. अशी खूण त्याच्या स्वरुपाविषयी निवृत्तिरांयानी सांगितली आहे. पंचकोशाहून वेगळा सहावा, दहा इंद्रियाहून वेगळा अकरावा, चारी वेदाहून पलीकडचा अशा परमात्म्याच्या एकत्वाविषयी विचार केला. तर तो विचारच विज्ञानासह परमात्म्याच्या ठिकाणी एकरुप झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६७४
सुखादिसुख तें जाले अनमीष ।
पाहाणें तेंचि एक पारुषलें ॥१॥
काय सांगु मातु वेगळीच धातु ।
जिवा हा जिवांतु व्यापुनि ठेला ॥२॥
नचले नचले कांही कौटाल कामान ।
देहींच विंदान रचलेंगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें निटें ।
वायांविण विटे मिस केलें ॥४॥
अर्थ:-
सर्व सुखाचे आदि जे परमात्मसौख्य ते प्राप्त होण्यास एकही क्षण वेळ लागला नाही. ज्या ज्ञानांनी त्याला पहावयास गेले ते ज्ञानही तद्रूप झाले. परमात्म दर्शनाची गोष्ट काही वेगळीच आहे. ते शब्दाने सांगता येणे शक्य नाही.तो परमात्मा सर्व जगांत व्याप्त आहे.ते परमात्म स्वरुप प्राप्त होण्याकरितां कांही मोठ्या गुढविद्या संपादन करण्याची जरुरी नाही. तो देहामध्येच मोठ्या गंमतीने भरला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना स्वतःला कांही जरुरी नसता त्यानी सर्व लोकांना दर्शन देण्याकरिता विटेवर उभा राहाण्याचे एक निमित्त केले आहे असे माऊली सांगतात.


६७५
आस्वादु स्वादु ये दोन्ही नाहीं ।
तेरावें पाही साहवा ठायीं ॥१॥
तेथें सातवें पंचाक्षरीं जपणें ।
संहार होंणें तमोरुपें ॥२॥
रखुमादेविवरु शुध्दसत्त्वेंविण ।
शुध्दबुध्दे मी जाण जालेंगे माये ॥३॥
अर्थ:-
त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्वाद, आस्वाद म्हणजे ज्ञान अज्ञान दोन्ही नाहीत. दहा इंद्रिये, चित्त व अहंकार या बाराजणांच्या पलीकडे असणारे जे तेरावे मन तेंही तेथे राहात नाही. असे सहा शास्त्रांत निर्णीत केले आहे.तेथे सातवें म्हणजे बुद्धीतत्त्वाने तमोगुणप्रधान होऊन सर्व जगाचा संहार करणारा जो शंकर त्याचा नमःशिवाय, या पंचाक्षराने जप करावा. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हे शुद्ध सत्त्वावाचून असणारे, शुद्ध बुद्ध परमात्मा मी स्वतःच झालो. असे माऊली सांगतात.


६७६
बारावें वरतें तेरावें हारपलें ।
चौदावें देखिलें चौपाळां ॥१॥
चौघांची भाज मी नहोनियां गेलें ॥
तंव अनारिसें महाकारण देखिलें ॥२॥
रखुमादेविवरु भूतजाता वेगळें ।
पराहूनि परतें पर पांगुळलें ॥३॥
अर्थ:-
दहा इंद्रियें, चित्त आणि अहंकार हे बारा व त्याच्यावर असणारी बुद्धि तिही लय पावली. तेव्हां चार वेदांच्या सहाय्याने चौदावे आत्मतत्त्व पाहिले. पण चारी वेदाची मी दासी न होता त्यांना सोडून गेले.तो विलक्षण महाकारण परमात्मतत्त्व पाहिले. माझे पिता व रखुमाईचे पती तें परमात्मतत्त्व यश्चावत् भूतमात्राहून वेगळे, प्रकृतिहून पलिकडे असलेले व अत्यंत श्रेष्ठ त्याच्या ठिकाणी मी लय पावलो असे माऊली सांगतात.


६७७
कापुराचें भांडे म्यां ब्रह्मरसें भरिलें ।
प्राणीं निमालें परिमळासहित ॥१॥
तेथें परिमळु नाहीं स्वादु पैं नाहीं ।
सुखदु:ख नाहीं कांहीचि नाहीं ॥२॥
रखुमादेविवरेंसि ठक पडिलें
कांहीच नाहीं ।
चौघे स्वभावीं बोलताती ॥३॥
अर्थ:-
कापुरासारखे शुद्ध अंतःकरणरुपी भांडे मी ब्रह्मरसाने भरले.त्यामुळे सुंगधासह वर्तमान घ्राण त्याठिकाणी लय पावले.आतां त्याठिकाणी सुगंध, स्वाद, सुखदुःख वगैरे काही एक नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्याचे ठिकाणी माझे चित्त गुंतल्यामुळे त्यांच्यावांचून दुसरे कांही एक उरत नाही. असे चारी वेद सहजरितीने प्रतिपादन करतात. असे माऊली सांगतात.


६७८
पांचांची वाट पांचांसवे गेली ।
येरासि जाहली देशधडी ॥१॥
अकरावें होतें धरुनियां नेलें ।
बारा तेरा गिळिलें धन माझें ॥२॥
रखुमादेविवरु चोळु पैं घोटिला ।
निधन जाहाला शुध्दपणें ॥३॥
अर्थ:-
पंचमहाभूताचे बनलेले शरीर पंचत्वाला गेल्यावर बाकीच्यांची म्हणजे अन्य विकारांची देशोधडी झाली. दहा इंद्रियांचे चालक जे अकारावे मन होते ते धरुन नेले. बारावे चित्त आणि तेरावी बुद्धि हेच माझे मुख्य धन होते. तेच सर्व गिळून टाकले. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांनी माझ्या जीवीचा घोट घेतला. त्यामुळे ह्या जीवाचे बुद्ध्यादिकासंह वर्तमान सर्व अविद्यक ऐश्वर्य नाहीसे होऊन शुद्ध परमात्मरुप झालो. असे माऊली सांगतात.


६७९
आस पुरऊनि आस पुरवावी ।
ऐसी भूक मज लागों द्यावी ॥१॥
तें अनुपम्य कैसेनी सांगावे ।
जीवा चोरुनि भोगिजें तें जीवें ॥२॥
दृष्टि कीर होय जरि निकें ।
द्रष्टा हो वेडावे जयाचेनि सुखें ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे करुनियां निकें ।
विठ्ठल परमात्मा भेटेल या फ़ावेतें ॥४॥
अर्थ:-
आपण स्वतः परमात्म्याचे दर्शन घेऊन दुसऱ्याच्याही दर्शनाची आशा पूर्ण करावी. अशा रितीची भूक मला लागावी. जे अनुपमेय परमात्मतत्त्व ते कोणत्या शब्दाने सांगिवे? तें परमात्मसौख्य जीवाला चोरुन त्याचा जीवाने उपभोग घ्यावा. असे तें परमात्मतत्त्व आहे. अशा तहेची आत्मस्वरुपा विषयी स्वच्छदृष्टि झाली असतां आत्मस्वरुपाला पाहाणारा परमात्मसौख्याने वेडा होऊन जातो. आत्मस्वरुपाविषयी चांगला विचार केला असतांन श्रीविठ्ठल जो परमात्मा तो भेटून त्याचे स्वरुप प्राप्त होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६८०
मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती ।
ते अवघीच प्राप्ति ज्योतिरुपें ॥१॥
तेथें ब्रह्मगर्भा आलें ब्रह्मगर्भा आलें ।
लयलक्ष उरलें बाईयावो ॥२॥
रखुमादेविवरु अप्रमेय देखिला ।
तोही इच्छितां हारपला माझ्या ठायीं ॥३॥
अर्थ:-
मनाची वात करून ज्योत लावायला गेले. म्हणजे परमात्मस्वरूपाचा विचार करावयाला गेले. तो ज्ञानरूप जो परमात्मा त्याचीच प्राप्ती झाली. त्या मनाच्या गर्भात ब्रह्म प्रादुर्भूत झाले. यामुळे लयाचे लक्ष जे ब्रह्म तेवढेच उरले. अप्रमेय म्हणजे अविषय जे रखुमादेविचे पती श्रीविठ्ठल त्यांना मी पाहिले. शेवटी त्याची इच्छा करायला गेले तो ते ही माझ्या ठिकाणी हरपून गेले. असे माऊली सांगतात.


६८१
अष्टही अंगें नवही व्याकरणें ।
सप्तही त्त्वचा भेदोन गेलेगे माये ॥१॥
तेथें वेदां वाट न फ़ुटे ।
वेदां वाट न फ़ूटे ।
येरासी कैंचे पुरपुढेगे माये ॥२॥
रखुमादेविवरु मज फ़ावला ।
देखोनि वोरसला पर पाहीं ॥३॥
अर्थ:-
शरीराची आठ अंगे, नवद्वारे, सप्तत्वचा या सर्वांचा भेद करून मी ज्याठिकाणी गेलो. त्याठिकाणी जाण्यास वेदालाही वाट सापडत नाही. तेथें बाकीच्या बोलक्या लोकांची पुटपुट काय सरती होणार? पराचाही पर असणारा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मला प्राप्त झाले. त्यांना पाहून मजवर आनंदाचा वर्षाव झाला. असे माऊली सांगतात.


६८२
जतनेलागीं जीवन ठेविलें ।
विश्वरुप हारपलें ज्ञानपंथी ॥१॥
माझी दोन्ही सामावली दोन्ही सामावली ।
निजब्रह्मीं गुंडाळिली मनेंरहित ॥२॥
अवघा कोल्हाळ एकनिष्ठ जाला ।
ब्रह्मरसीं बुडाला निवडेचिना ॥३॥
रखुमादेविवर जगाचें जीवन ।
त्याचेंही मीपण गेलें विठ्ठलनामें ॥४॥


६८३
स्मरों कैसेनि विस्मरों कैसेनि ।
दोहिपरि मज अटी रया ॥१॥
पाडु पडिला विषमें ठायीं ।
देतां घेतां नुरेचि कांही ॥२॥
रखुमादेविवरु विठ्ठ्लु नेणिजेसी ।
तवं तोचि तयासि आठवी रया ॥३॥
अर्थ:-
मी आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण किंवा विस्मरण कसे करावे? ते माझ्याकडून होणे शक्य नाही. ब्राह्मण व्यक्तिला ब्राह्मणपणाचे स्मरण किंवा विस्मरण होत नाही. याचे कारण त्या व्यक्तिला ब्राह्मणपणाचा निःसंदेह बोध असतो. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी ब्रह्मबोधाचा दृढनिश्चय असल्यामुळे माझ्या ठिकाणी स्मरण किंवा विस्मरण कसे होणार? प्रथम आपल्या स्वरूपाचे विस्मरण होणे आणि नंतर विस्मरणाच्या नाशाकरिता स्मरण करणे या दोन्हीही खटपटीच आहेत. द्वैताविषयी माझ्या ठिकाणी किंमत नसल्यामुळे देण्याघेण्याला तरी उरले काय? काहीच नाही. रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल जोपर्यंत जाणला नाही तोपर्यंत श्रीविठ्ठल त्याला कष्ट देईलच.असे माऊली सांगतात.


६८४
कूटाकूट अंती कूटस्थ पैं जालें ।
अशेष उरलें त्या वेगळे माये ॥१॥
गुणा भ्यालों म्हणौनि
निर्गुण पैं जालें ।
तें निराकार आथिलें माझ्या अंगी ॥२॥
बापरखुमादेविवरु अधऊर्ध्व वेगळे ।
अर्धमातृका सामावलें अशेष परेसहित ॥३॥
अर्थ:-
परमात्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असता मीस्वतःच परमात्मरूप झाले. सगुण परमात्म्याचे गुणाचा विचार करीत असता मीच निर्गुण निराकार आपल्याठिकाणी झाले. तो परमात्मा स्वतःच्या मूळ स्वरूपाने निराकार आहे. ते त्याचे निराकारत्व माझ्याच अंगी बाणलें. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ऊर्ध्व म्हणजे वरचे लोकांत अध म्हणजे पाताळांत आहते. असे मुळीच नाही. जो अकार, उकार, मकार, या सर्वांचा लय ज्या अर्धमात्रेमध्ये परावाणीसह होतो. तोच सर्वत्र ओतप्रोत भरला आहे. आणि तोच माझ्या स्वरूपाने नटला आहे. अशी माझी स्थिती झाली. असे माऊली सांगतात.


६८५
एकांतीचें गुज पुसों गेलिये सये ।
मी माझी नाहीं त्यासि
कीजे वो काये ॥१॥
ऐसी भेटी निवाडे सांगिजे कोणापुढें ।
मनासी सांकडें पडिलें रया ॥२॥
सुलभ सुकुमरु रुपें मनोहरु ।
रखुमादेवीवरु परेही परता ॥३॥
अर्थ:-
त्या परमात्म्याच्या एकांतात मिळणाऱ्या सुखाचा मी अनुवाद कोणापुढे करावा. म्हणून मी मनाशी विचार करू गेले. तो माझ्या ठिकाणचा मीपणाही नाहीसा होऊन गेला. त्याला आता काय करावे. अशा परमात्म्याच्या भेटीविषयी झालेला निवाडा कोणापुढे सांगू. हे गुह्य सांगण्याचे मला मोठे संकट पडले. विचार केला तर भगवत्प्राप्ती फार सुलभ आहे. तो परमात्मा सुकुमार, नाजूक असून मोठा मनोहर आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे परावाणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांचे वर्णन करणे कठीण आहे. असे माऊली सांगतात.


६८६
चातकेंविण अंतरींच ठसलें ।
तेथें एक वोळले ब्रह्ममेघ ॥१॥
तें जीवन अमृत जीवास जालें ।
त्याहुनि एक आगळेंगे माये ॥२॥
रखुमादेविवरु हातेंवीण स्पर्शलें ।
चक्षुविण देखिलें
निज ब्रह्मगे माये ॥३॥
अर्थ:-
चातकपक्षी पाणी मिळण्याकरता मेघाकडे लक्ष देतो. हे सर्वांना माहित आहे. त्याप्रमाणे माझे लक्ष अंतर्यामी आत्मस्वरूपाकडे लागले आहे तेंव्हा तेथे ब्रह्मरूपी मेघ आनंद अमृताचा वर्षाव करणारा असा पाहीला. तेव्हा त्याच्यापासून जीवाचे जीवन जी परमात्मवस्तु ती जीवास प्राप्त झाली. आतां त्याहून श्रेष्ठ दुसरे कोण आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच ब्रह्म त्याला मी हातावांचून स्पर्श केला. व डोळ्यांवाचून पाहिले असे आत्मरूप ब्रह्म पाहिले. असे माऊली सांगतात.


६८७
तें अवघेचि नव्हें नव्हें अवघेचि होय ।
आवघ्याविण सोय आणिक असे ॥१॥
अवघे म्हणिजे तें व्योमाकार दिसे ।
त्याहुनि परतें असेगे माये ॥२॥
रखुमादेविवरु पाहता पाहावया गेले ।
पर तें पराहुनि देखिलें गे माये ॥३॥
अर्थ:-
जगत् ब्रह्म नव्हे, पण सर्व जगत् ब्रह्मरूप आहे. कारण जगत् अध्यस्त आहे. म्हणून सर्व जगताहून परमात्म्याची स्वरूपस्थिती काही निराळीच आहे. आकाशादि जगत् त्याहून ते परब्रह्म निराळे आहे. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पहावयाला गेले, तेंव्हा ते परेच्याही पलीकडे आहे असे दिसले. असे माऊली सांगतात.


६८८
तनुमनुधनें पूजन पैं केलें ।
आत्मलिंग पूंजिलें बाईये वो ॥१॥
तंव निराकार देखिलें निराकार देखिलें ।
मी पूजन लिंग तिन्हीं हारपलें ॥२॥
रखुमादेविवरु निजलिंग विवळलें ।
आवघी आवघे ठायी सामावलें बाईये वो ॥३॥


६८९
सगुणाची शेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्णमूर्ति ॥१॥
मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्णसुख ॥२॥
ह्रदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं ।
आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे ॥३॥
निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्णसुखें ॥४॥
अर्थ:-
निर्गुण स्वरूप हीच कोणी बाज, त्यावर माया विशिष्ट परमात्म्याचा बिछाना घालून, त्यावर शामसुंदररूप मनोहर श्रीकृष्णमूर्ति विराजमान आहे. त्याचे ध्यानांत मन प्रवृत्त झाल्याबरोबर सर्व शरीरांत कृष्णरूपच प्रगट झाले. अर्थात् डोळ्यांनी जे पहावे ते कृष्णरूपच दिसू लागले. मग त्या कृष्णसुखाची नित्य पर्वणी झाली. अंतःकरणांत कृष्णच प्रगट होऊन राहिला असून घरीही त्याचाच प्रकाश आहे. ज्यांत यत्किचितही अडचण नाही. अशा तहेची वाट श्रीगुरू निवृत्तिरायांनी दाखवल्यामुळे वैकुंठातील कृष्णसुखच आम्ही नित्य भोगित आहोत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


६९०
आहे तें पाही नाहीं ते कांही ।
ठायीच्या ठायीं हरपलें ॥१॥
नाहीं आम्हां काज नाहीं
आम्हां चोज ।
आमुचें निज गोविंदराजा ॥२॥
बापरखुमादेवीवरु आनंदसोहळा ।
ब्रह्मानंदकळा भोगीतसे ॥३॥
अर्थ:-
तुम्ही सर्वठिकाणी व्यापक असलेल्या परमात्म्याला पहा वंध्यापुत्राप्रमाणे नसलेल्या प्रपंचाला पाहून काय उपयोग? परमात्म्याला पाहिले तर ठायींच्या ठायी म्हणजे पहाणाऱ्याच्या ठिकाणचा पाहाणेपणा परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी हारपून जातो. आम्ही त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे आम्हाला या जगांत कांही एक कर्तव्य उरले नाही. तसेच जगतांतील मायिकपदार्थाचे आम्हाला कौतुकही वाटत नाही. आमचे अंतःकरण गोविंदरूपच होऊन गेले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आनंदरूप आहेत. व त्या आनंदाचा सोहळा आम्ही भोगीत आहोत, असे माऊली सांगतात.


६९१
निर्गुणाचा पालऊ लागला ।
लय लक्षीं हारपला देह माझा ॥१॥
वायांविण गेलें वायांवीण गेलें ।
अवघी बुडाले ब्रह्मेंसहित ॥२॥
रखुमादेविवरु विठ्ठ्लु मालाथिला ।
निजपद पावला जिऊ शिवीं ॥३॥
अर्थ:-
माझ्या चित्ताला निर्गुणाचा धागा लागल्यामुळे त्या निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला. त्यामुळे माझा देहभाव हरपला. एवढेच काय पण ब्रह्मदेवासहवर्तमान सर्व जग बुडाले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानी माझा अंगीकार केल्यामुळे माझा जीव परमात्मस्वरूपाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.


६९२
कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं ।
संसाराचि उरी कांही नुरेचिगे माये ॥१॥
लक्षाचा लाभ मज घडलागे माय ।
कवणें उपायें चरण जोडले वो ॥२॥
चिंतनीं चिंतिता काय चिंतावें ।
तें अवघेंचि मनीं रुप गिळावेंगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु देहेंवीण आलंगिला ।
तो समर्थ माल्हाथिला बाईये वो ॥४॥
अर्थ:-
प्रस्तुत शरीराला जिवंत राहाण्याला किंवा भोग भोगण्याला प्रारब्ध कर्माची सामुग्री असते. ती कोट्यवधी जन्मातील सामुग्री याच शरीरांत संपून गेल्यामुळेवपुन्हा पुन्हां जन्ममरणरूपी संसाराची स्थिती काही उरत नाही. अशी माझी स्थिती झाली. कारण जीवपदाचा लक्ष्य जो परमात्मा त्याची प्राप्ती झाली. काय पूर्वजन्मी पुण्य केले होते, की त्याचेच फल भगवंत्चरणाची प्राप्ती झाली आहे. आता माझ्याशिवाय दुसरे काही उरले नसल्यामुळे मनांमध्ये कोणत्या रूपाचे कुणी चिंतन करावे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, तो देहभाव ‘माल्हाथिला’ म्हणजे बाधित झाला. व तोच मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.


६९३
मी बोल बोलें तो गेला
कवण्या ठायां ।
हें पुसों आलों लवलह्यां वो ।
कव्हणि न सांगति मागूं धावें काह्या ।
आतां लाजिलें ऐशा स्त्रेहागे माये ॥१॥
चला कांवो मज आडोनी ।
रुप पाहोंद्या कां माझें मजलागुनी ।
वेडावलें मज देखुनी ।
शेखीं मी माझें गेलें हारपोनिगे माये ॥२॥
मी बोला आंतु कीं बोल मज आंतु
सुखें मुरालें रुप रुपांतुवो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलासि येकांतु ।
आतां पुरला अंतु ।
दुजेपणागे माये ॥३॥
अर्थ:-
मी त्या भगवंताचे शब्दाने पुष्कळ वर्णन केले. असे का झाले म्हणून शास्त्राला व संतांला घाईघाईने विचारवयास गेले. तो तेथेही शब्दाचा काही मागमोस लागला नाही. तेंव्हां मला असे कळलें की शब्दाने भगवंताचे वर्णन करणे वेडेपणाचे आहे. अशा शाब्दिक प्रेमाने तो आकलन होणारा नाही. याप्रमाणे माझी मलाच लाज वाटून त्या भगवंताच्या प्रेमाने मी भुलून गेले. त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये आड येणाऱ्याला एका बाजुला सारून मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घेतले.त्याचा परिणाम असा झाला की माझ्या ठिकाणचा मीपणा नाहीसा झाला. तेंव्हा मला असा विचार पडला की माझ्या स्वरूपात शब्द आहे किंवा शब्दांत माझे स्वरूप आहे. किंवा रूपांत रूप आहे हे सर्वभाव स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेले. याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याशी ऐक्य झाल्यामुळे द्वैतदशेचा अंतच होऊन गेला. असे माऊली सांगतात.


६९४
आम्हीं संन्यास घेतला ।
देहादिकांचा त्याग केला ॥१॥
आम्ही संन्यासी संन्यासी ।
सदा राहों एकांतेंसी ॥२॥
चित्तचतुष्टया निरसिलें ।
अज्ञाना तिळोदक दिधलें ॥३॥
ज्ञानाचें विज्ञान आलें हातां ॥
आम्हां नाहीं शरीरममता ॥४॥
ब्रह्माहमस्मि शुध्दज्ञान ।
तेथील सांडिला अभिमान ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठ्लु ह्रदयीं ।
तोचि सबाह्यअभ्यंतर ठाई असे रया ॥६॥
अर्थ:-
मला ब्रह्मसाक्षात्कार झाल्यामुळे देहादिकाचा त्याग करून आम्ही संन्यास घेतला. त्यामुळे आम्ही संन्यासी नित्य परमात्मस्वरूपात राहू. चित्त चतुष्टय म्हणजे मन, बुद्धि,चित्त,अहंकार याचे निरसन करून आत्मस्वरूपांच्या अज्ञानाला तिळोदक दिले. म्हणजे त्याचा नाश केला. ज्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश केला तें ज्ञानच परमात्मतत्त्व हाती आल्याने शरीराच्या ठिकाणी हे माझे शरीर आहे असा मम अभिमान राहिला नाही. त्याप्रमाणे ब्रह्माहमस्मि म्हणजे मी ब्रह्म आहे. या वृत्तिज्ञानाचाही अभिमान नष्ट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, हृदयांत वास करणारा तोच अंतरबाह्य सर्व ठिकाणी आहे असे माऊली सांगतात.


६९५
माझी प्रकृति निष्कृति जालीं ।
ब्रह्मीं सामावली बाईये वो ॥१॥
देहेविण ब्रह्म देखे
देहेविण ब्रह्म देखे ।
तेणें निर्गुण राखे रोखावलें ॥२॥
जाणतां म्हणौनि नेणतां पै गेलें ।
शेखीं आपणातें विसरलें बाईये वो ॥३॥
रखुमादेविवरु नेणोनि जाणीतला ।
जाणपणें निमाला माझ्या ठायी ॥४॥
अर्थ:-
माझी प्रकृति निष्कत्ती म्हणजे क्रियाशून्य होऊन ब्रह्माच्या ठिकाणी सामावली. ते ब्रह्म देहात्मभाव टाकूल पहा, जो असे ब्रह्म पाहील तो निर्गुण रूपाने होऊन जाईल. आम्ही परमात्मस्वरूप जाणले असे जे अभिमानाने म्हणतात.त्यांना परमात्मस्वरूप कळले नाहीच. शेवटी अशा ज्ञानाच्या अभिमानाने आपल्या स्वरूपास मात्र विसरतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ज्ञानाचे विषय नाही असे समजून मी जाणला. त्यामुळे तो ज्ञानरूपानेच माझ्या स्वरूपांच्या ठिकाणी ऐक्य पावला. असे माऊली सांगतात.


६९६
समर्थ सोयरा बोळावा केला ।
परि मार्गु गमला सुखाचा बाईये ॥१॥
भय आमुचें गेलें न
व्हावें तें जालें ।
तो चोरुनि वोळखी
जाला बाई ये ॥२॥
लक्षाचा लाभु जोडला ठावो ।
रखुमादेविवरुविठ्ठ्ल नाहो ॥३॥
अर्थ:-
‘समर्थ’जो भगवान श्रीकृष्ण त्याला आम्ही नातेवाईक करून आमच्या मागच्या जन्ममरणाचे भय नाहीसे होऊन गेले. हे लोकदृष्ट्या जरी वाईट दिसले तरी त्यामुळे आमचा प्रपंच सुखाचा झाला आमचे भय तर गेलेच पण न होणारे ते झाले. म्हणजे परमात्मलाभ होणे अत्यंत दुर्लभ पण तो झाला. सर्व प्रापंचिक लोकांची दृष्टि चोरून त्यांचेमध्ये वास करणारा श्रीहरि त्याचीच आज ओळख झाली. तत्पद लक्ष्य जो परमात्मा त्याचा लाभ झाला व तो कोण आहे असे म्हणून विचारले तर रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आमचे नाहो म्हणजे प्रियकर आहेत. असे माऊली सांगतात.


६९७
काळा लपंडाई काळेरात्री खेळे ।
मी स्वसवें वेधली जाय काळ्याछंदें ॥१॥
काळेंनिळें हें अभ्र भासलें ।
ऐसे रुप देखिलें निर्गुणाचें ॥२॥
ऐसा हा सांवळा माझिये
दृष्टी माल्हाथिला ।
ऊजरुनि गेला हा विठ्ठलुगे माये ॥३॥
ऐसे भुलविलें जाण काळेपणें आपणे ।
रखुमादेविवरु जाणे येर कांही नेणें ॥४॥
अर्थ:-
काळीरात्री म्हणजे अविद्या रात्रीच्या काळोखात हा काळा म्हणजे शुद्ध श्रीकृष्ण लपंडाव खेळत आहे. मला परमात्मप्राप्तीचा वेध लागल्यामुळे मी त्या काळ्या श्रीकृष्णाच्या छंदाने त्याच्याकडे गेले. तिकडे गेल्यावर निर्गुण जो परमात्मा त्याचे काळ्या निळ्या आकाशाप्रमाणे सगुणरूप पाहिलें. असा हा सांवळा श्रीकृष्ण परमात्मा माझ्या दृष्टीत येऊन बसला. आणि माझी दृष्टि निवळ करून हा श्रीविठ्ठल परमात्मा गेला. अशा या काळ्या रूपांनी मला भूलवून टाकले. त्यामुळे रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या शिवाय मी दुसरे कांही जाणत नाही. असे माऊली सांगतात.


६९८
अद्वैत येणें अद्वैतपणें सांडिलें ।
थितें होतें माझें लया पैं गेलें ॥१॥
नाहीं तेंचि पाहावया
वायांविण गेले ।
तव पाहाणेंचि जाळे
बाईये वो ॥२॥
बापरखुमादेविवरु जुनाट जुनघडा ।
तोहि म्यां सांडिला अरुपसंगें ॥३॥
अर्थ:-
येणे म्हणजे या अद्वैत परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी अद्वैतपणाही राहिला नाही त्यामुळे माझी जी देहात्मस्थिती होती ती लयाला गेली. मन, बुद्ध्यादिकांना जें विषय नाही. तें परमात्मतत्त्व सहज पहावयास गेले. तो ज्याला पहावयास गेले तें परमात्मतत्त्वच मी होऊन गेलें. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, अनादि जुन्यातला जुना असा जो परमात्मा त्याचाही मी संबंध टाकून दिला. याचा अर्थ देवाच्या ठिकाणचा देवपणा व जीवांच्या ठिकाणचा जीवपणा हे दोन्हीही भावा टाकून देऊन देवरूप झालें.असे माऊली सांगतात.


६९९
मन वाचा बंदु निर्वाणी घातलें ।
निर्माण होतें माझा
ठायीं माल्हाथिलें ॥१॥
चंचळ मन ब्रह्मीं निश्चळ जालें ।
अवघेंचि निमाले ब्रह्मार्पणीं ॥२॥
रखुमादेविवरुविठ्ठ्लु उघडा ।
व्योम पांघुरे फ़ुडां देखो निघाले ॥३॥
अर्थ:-
माझ्या ठिकाणी असलेले मन व वाणी यांना मी बंधनांत टाकून मोक्षमार्गाला लावले. तेंव्हाच तें चंचळ मन माझे स्वरूपं जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी निश्चळ झाले. त्या ब्रह्मापर्णाच्या योगाने मन मावळून गेले असे नाही तर सर्व जगत मावळले. मग रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल जे आकाशाचेही पांघरूण असलेले, त्यामना मी उघडा स्वच्छ पाहून तृप्त झालो असे माऊली सांगतात.


७००
पंचबाणें माझें ह्रदय भेदलें ।
पांचेंविण पावलें च्यार्‍ही सांडूनिया ॥१॥
सकळै माझें गोत आलें ।
ब्रह्मरसें जाले बाईयेवो ॥२॥
बापरखुमादेविवरु ब्रह्मरसें विवळला ।
मजसहित निमाला
ब्रह्मरुपीगे माये ॥३॥
अर्थ:-
पंचबाणे म्हणजे शब्दादिक पाच विषयाने माझे हृदय भेदून टाकले होते. परंतु मी त्या विषयांचा व विषयासीं व्यवहार करणाऱ्या मन, बुद्धि, चित्त, अहंकार या चौघांचा त्याग करून ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी पावलें. आतां माझे सर्व गोत त्या ब्रह्मस्वरूपांतच आले. आणि ब्रह्मरसाने मी तृप्त झाले. माझे पिता व रखुमादेवीच् पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्मरसाच्या रूपाने उदयाला येऊन माझ्या जीवपणासह वर्तमान ब्रह्मरूपात लय पावले. असे माऊली सांगतात.


७०१
साता व्योमपरतें पाहो गेलें ।
तव पाहणेंचि जालें ब्रह्मउदधी ॥१॥
साट मोट माझी
मोट बांधिली ।
नेऊनि टाकिली निर्गुणीगे माये ॥२॥
बापरखुमादेविवरु पंचविसावा
देखिला ।
तोही खुंटला तये पंथी ॥३॥
अर्थ:-
॥ ज्ञानसाधने पंचज्ञानेंद्रिये मन व बुद्धि मिळून असणारे सात हेच कोणी व्योम म्हणजे आकाश अशी कल्पना करून त्याच्यापलीकडे असणाऱ्या ब्रह्मस्वरूप समुद्राला पाहू गेले. तो मी ब्रह्मसमुद्रच होऊन राहिले. साट मोट म्हणजे सर्व अनात्मपदार्थाचे गाठोडे बांधून त्या निर्गुण ब्रह्मस्वरूपांत नेऊन टाकली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सांख्यांच्या चोवीस तत्त्वांहून निराळे असणारे, जो आत्मा तोही त्या विठ्ठलस्वरूपांत बुडाला. असे माऊली सांगतात.


७०२
चक्राकार चक्ररुप चक्रधरु म्हणवी ।
पाहतां अंतरीं न दिसे कांही ॥१॥
पाहातां पाहातां मी परठाया गेले ।
तेथें एक देखिलें महदभूत ॥२॥
रखुमादेविवरु महदभूता वेगळा ।
त्याहुनि आगळा तो मनीं
मानलागे माये ॥३॥
अर्थ:-
चक्राकार, चक्ररुप, चक्रधरु ही भगवंतांची नावे आहेत अशा नावांचा परमात्मा मी माझ्या अंतःकरणांत पाहू गेले तेव्हा तो दिसला नाही. शेवटी विचार करता करता पलीकडे गेले. तो विचाराच्या पलीकडे महद्भूत पाहिले. त्या महद्भूताहूनही माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल ते वेगळा आहेत. असा त्यांच्याहून पलिकडे अधिक असणारा जो श्रीविठ्ठल तो माझ्या मनाला चांगला पटला. असे माऊली सांगतात.


७०३
कवतुक पाहावया निरंजना गेलीये ।
तंव निराकार जाले बाईये वो ॥१॥
अकरासहित पांच पांची मावळली ।
आदि अंती उदयो जालीं तेजाकारें ॥२॥
रखुमादेविवरु परतोनि देखे ।
तोही पारुषे तिये ठायीगे माये ॥३॥


कूट – अभंग ७०४ ते ७१९
७०४
श्रृंगार करुनि हरिनामतांबूल
गुरुअंजन लेउन डोळा ।
भ्रातारु होता तो नि:शब्दीं खिळिला
परतोनि माघारि ठेलिये ॥१॥
काम निदसुरा कामिनी
जागे कांही के विपरित गमे ।
भोगत्याच्या ठाई निशब्दीं खिळिला
आपआपण्यातें रमे ॥२॥
पति पद्मिणीविणें गर्भ संभवला
सवेचि प्रसूति जाली ।
तत्त्वबोध उपजला तेणें
गुढी उभविली ॥३॥
तया पुत्राचेनि सुखें सर्वहि
विसरलें देहभावा पडला विसरु ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलीं
तेथें आणिकाचा नव्हे
संचारुगे बाईये ॥४॥
अर्थ:-
शमदमादि जी ज्ञानप्राप्तीची साधने त्याचा मी शृंगार केला आहे. व हरिनामाचा तांबूल खाऊन गुरूमंत्राचे अंजन डोळ्यांत घातले आहे. याप्रमाणे थाट करून ती गोपी म्हणते, माझा भ्रतार जो परमात्मा तो शब्दातीत आहे. म्हणून त्याची प्राप्ती न होता ती माघारी फिरली. परंतु त्या कामीनीच्या ठिकाणी त्याच्या प्राप्तीची कामना कायमच होती. अशा वेळेला काय विपरीत प्रकार झाला पहा त्या निःशब्द परमात्म्याचा, ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमून भोग घेऊ लागली. पति पत्नी संबंधावाचून तिचे ठिकाणी गर्भ उत्पन्न होऊन ती प्रसूतही झाली व तत्त्वबोध उत्पन्न झाला. त्यामुळे तिने आनंदाची गुढी उभारली. त्या पुत्र उत्सवाच्या आनंदाने देहभावाचाही विसर पडून गेला. अशा प्रकारचा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी इतर कोठल्याही साधनांचा उपयोग नाही. असे माऊली सांगतात.


७०५
वडाच्या पानीं एक उभविलें देउळ
आधिं कळसु मग पायाहो ।
देव पुजों गेलों तंव देउळ
उडालें पान नाहीं तेथें वडुरे ॥१॥
चेत जाणा तुम्हि चेत जाणा ।
टिपरि वडाच्या साई हो ॥२॥
पाषाणाचा देवो पाषाणाचा भक्ति
पोहती मृगजळ डोहीं हो ।
वांझेचा पुत्र पोहों लागला
तो तारी देवां भक्ता हो ॥३॥
भवाब्धिसागर नुतरवे ते पडिलें
रोहिणी डोहीं हो ।
नसंपडे आत्मा बुडाले संदेहीं
ते गुंतले मायाजळीं हो ॥४॥
विरुळा जाणें पोहते खुणें
केला मायेसि उपावो हो ।
बापरखुमादेविवरुविठ्ठ्ल विसावा
तेणें नेलें पैल थडिये वो ॥५॥
अर्थ:-
समष्टी दृष्टिने ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे आणि व्यष्टि दृष्टिने आत्म्यावर देह अध्यस्त आहे. या अभंगात व्यष्टिदृष्टीने विचार केला तर आत्मा हाच कोणी एक वड असून त्यावर अध्यस्त असलेला देह हेच कोणी एक त्या वडाचे पान असून त्या पानाच्या ठिकाणी म्हणजे देहांमध्ये अंतःकरणरूपी देऊळ उभविले असून ‘आधि कळसु’ म्हणजे गर्भावस्थेत तो परमात्मा मी आहे अशी प्रतीति हाच कोणी कळस असून त्या देवळाचा पाया गर्भातून बाहेर आल्यानंतर कोऽहं ‘तेणे कोऽहं विकल्प मांडे’ अशी प्रतिती येते. हा त्या अंतःकरणरूपी देवळाचा पाया आहे. कारण जोपर्यंत जीवांच्या ठिकाणी कोऽहं असा अभिमान आहे तोपर्यंत अंतःकरणाचा बाध होऊ शकत नाही. पूर्वपुण्याईने आत्म्याची अभिन्नत्वाने पूजा केली असता देऊळ जे सधर्मक अंतःकरण त्याचा आश्रय जो देह हेच कोणी एक पान ते उडाले म्हणजे नाहीसे झाले.इतकेच काय पण आत्मरूपी वडाचे ठिकाणी आत्मपणाची वाच्यताही राहिली नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जागे व्हा, जागे व्हा. म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घ्या. तो आत्मानात्म टिपरी वाजवून, विचार करून आत्मस्वरूप पहा. तात्त्विक सिद्धांताचा विचार केला तर ही वरील कृति वांझेचा जो पुत्र तो मृगजळाच्या डोहात पोहण्याप्रमाणे आहे. कारण तात्त्विक सिद्धांतात प्रपंच झालाच नाही. म्हणून पाषाणाचा देव व पाषाणवत् देहाभिमानी भक्ताचा भज्यभजकभाव मृगजळाच्या डोहाप्रमाणे नाही. देव भक्ताला संसार समुद्रातून तारू लागला. हेही तसेच समजावे. जे भवसागरांतून तरून जात नाही. ते जन्ममरणरूपी मृगजळाचे डोहांत पडले. कारण त्यांना आत्मज्ञान झाले नाही. संशयातच ते बुडाले व मायाजाळांत गुंतले आहेत. पोहण्याच्या म्हणजे विचाराच्या खुणा सद्गुरूकृपा संपन्न असलेला विरळा जाणतो. व एखाद्यालाच मायेतून तरून जाण्याचा उपाय माहित असतो. मला मात्र माझे पिता व रखुमादेवीवर बाप जे श्रीविठ्ठल त्यानी मायानदीतून पैल तीराला काढून ब्रह्मानुभवाचा विसावा दिला. असे माऊली सांगतात.


७०६
चिंचेच्या पानि एक शिवालय
उभविलें आधि कळसु मग पायारे ।
देव पूजों गेलें तंव देउळ उडालें
प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥
संतजना महंतजना तेथील तें
गुज गोडरे ।
अनुभव अनुभवितां कदांचि न
सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥
उपजत नोवरी केळवली केळवला
नोवरा नवरी ।
पितया कंकण करि माता सुंदरी
विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥
विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि
ऐके सगुणा विरुळा ।
बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां
पाविजे तो सुखसोहळा ॥४॥
अर्थ:-
या अभंगामध्ये चिंचेच्या पानी म्हणजे मायारूपी जी चिंच तीचे पाने म्हणजे अनंत देह असून त्या पानाच्या ठिकाणी अंतःकरणरूपी शिवालय निर्माण करून, आधि कळसु म्हणजे गर्भावस्थेमध्ये असलेला सोऽहं प्रत्यय म्हणजे (तो परमात्मा मी आहे असे ज्ञान) मग पाया रे म्हणजे, बाहेर आल्यानंतर कोऽहं हाच पाया आहे. कारण सधर्मक अंतःकरण सिद्धि कोऽहं वरच अवलंबून आहे. परंतु देवपूजेमध्ये प्रसिद्ध असलेले सद्गुरुंनी मला पूजा म्हणजे अभिन्नत्वाने ज्ञान करून दिले. त्या देवाभिन्न पूजेत देऊळ उडालें म्हणजे सधर्मक अंतःकरणाचा बाध झाला.व विशेषण उडाले. परंतु हे गुह्य संत महात्म्यांनाच गोड लागेल आणि अनुभव घेणारा याचीही वाच्यता न राहता त्याच्या मनाचे समाधान होईल. ‘उपजत नोवरी केळवली, म्हणजे सद्गुरूने महावाक्योपदेशजन्य तूं ब्रह्म आहेस असा वाङ्गनिश्चय झालेले नवरा नवरी यांचे लग्न झाले म्हणजे माता सुंदरी म्हणजे वृत्तिची आई असलेले जे अंतःकरण स्थिती तिने पितया म्हणजे आत्म्यास कंकण केली. कारण आत्म्यावर अंतःकरण अध्यस्त असल्यामुळे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठानरूप असतो म्हणून ती आत्मरूप झाली. हे एक विपरीत कोडेच आहे. ही विपरीत कोड्याची काहाणी म्हणजे रीत जाणणारा एक गुरूपुत्र विरळा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनाच जाणले असतांना त्याच्या आनंदाच्या सुखसोहळ्याचा लाभ होईल. असे माऊली सांगतात.


७०७
देहा लाजिलिये शब्दा रुसलिये ।
कांसवीचें दूध देऊनियां बुझविलें माय ॥१॥
काय सांगों तिचा नवलावो ।
महालोभेंविण कैसा येतों पान्हावो ॥२॥
आवसेचे चांदिणे सांगों गेलिये ।
रखुमादेविवराविठ्ठ्लीं वरपडी जालिये ॥३॥
अर्थ:-
जीव हा मूळचा ब्रह्मस्वरूप आहेच त्याच्या ठिकाणी दुःख कालत्रयहि नाही. परंतु भ्रमामुळे तो दुःख भोगत असतो. त्याला सद्गुरूंनी आत्मज्ञान देऊन भ्रमाची निवृत्ति केली व परमानंदाचा लाभ करून दिला. हाच प्रकार माऊली उदाहरण देऊन सांगतात. मुमुक्षुला सद्गुरू माऊलींनी ब्रह्मविद्या दिली. त्यामुळे मुमुक्षुला देहा लाजिलिये, म्हणजे मी देह म्हणण्यास लाज वाटली. (कारण आजपर्यंत मी देहरूप नसताना देखील मी देह आहे असे म्हणत होतो) त्या मुमुक्षुच्या स्वरूपाचे ठिकाणी शब्द रूसला म्हणजे प्रवृत्त होत नाही. ही सद्गुरूची कृति कशी आहे म्हणाल तर कासवी आपल्या पिलास चाक्षुषकृपेने पोसते. त्याप्रमाणे ‘जयाचेनि कृपा सावाये, किंवा ‘कटाक्षकिरणाश्चांन्त, सद्गुरू माऊलीने कृपाकटाक्षाने कृतार्थ केले. त्या माऊलीचे काय आश्चर्य सांगावे? ती निर्मोह असून तिला कसा पान्हा येतो. त्यामुळे मुमुक्षुला अज्ञानांधःकारातील ब्रह्मस्वरूपतारूपी चांदणे स्पष्ट सांगितले. त्यामुळे मुमुक्षु परमात्मरूप झाला. असे रखुमादेवीचे पती जे विठ्ठल वरपडी जालिये या चरणाने असे माऊली सांगतात.


७०८
निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला ।
बिंबचि गिळुनि ठेला बिंबामाजी ॥१॥
रात्रि सूर्य वाहे दिनु चंद्र जायें ।
विपरीतगे माये देखीयेले ॥२॥
उदय ना अस्तु तेथें कैचेंनि त्रिगुण ।
आपणचि दर्पण होऊनि ठेला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोचि जाणे ।
संत ये खुणें संतोषले ॥४॥
अर्थ:-
‘अविद्येचिया निदा, या माऊलीच्या उक्तीप्रमाणे किंवा अविद्यावच्छिन्न जीव व मायोपाधी ईश्वर या मताने अविद्येच्या आवरणामुळे भानु म्हणजे परमात्मा बुद्धित आणि तो जीव जेंव्हा प्रतिबिंबीत झाला. आत्मस्वरूपा विषयी विचार करू लागला. तेंव्हा विचारांती प्रतिबिंब सापेक्ष बिंब हा भाव जाऊन परमात्मरूप झाला. याचे कारण विचारांती बुद्धिरूपी रात्रीत परमात्म रूपी सूर्य प्रकाशमान झाला. त्यामुळे विद्यारूपी दिवसांत आनंदवाप्तीरूपी चंद्र प्रकाशला. हे सर्व जगत दृष्टिने विपरीत आहे. परंतु तात्त्विक दृष्टिने पाहिले तर मूळ स्वरूपाचे ठिकाणी ज्ञान, अज्ञान नाही मग सत्त्व, रज, तम हे गुण कसे असणार? उलट त्रिगुण कार्य जो विश्वाभास त्याला आपणच दर्पण आहे ही गोष्ट जो अनुभवी असेल तोच जाणेल आणि संत त्या खुणाच्या भाषणाने संतोष पावतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७०९
पुरुषेविण नारी संचरली शरीरी ।
आपण्यावरी आळु आला ॥१॥
काय कोण्यासांगे सिणली अनुरागें ।
पडियेले पतिसंगें अवस्थाभूत ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठ्लु जैसा तैसा ।
व्यापूनि आकाशा उरला असे ॥३॥
अर्थ:-
साक्षात् श्रीकृष्ण यांच्या संचारावांचून जिच्या शरीरांत कामाने संचार केला अशी विव्हळ झालेली स्त्री मनांत म्हणत आहे. आपल्यावर हा व्यभिचाराचा आळ आला. कोणावर प्रेम ठेवून त्याच्या संगतीने ही इतकी क्षीण पावत आहे.ती त्या पतिच्या संगामुळे अशी विव्हळ होऊन पडली आहे.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसे आहेत तसाच आहे आणि आकाशाला व्यापून उरला आहे.
दुसरा अर्थ- कूटस्थाचे ठिकाणी पुरूषभाव नसताना बुद्धिरूपी स्त्रीने त्याचे शरीरांत प्रवेश केला. म्हणजे कूटस्थाकार झाली. त्यामुळे तिच्या ठिकाणी व्यभिचाराचा आळ आला. काय सांगावे कोणत्या प्रेमा विषयी क्षीण पावत आहे. म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीला सोडत आहे. ती कूटस्थरूप पतिच्या संगतीत पडल्यामुळे अशी अवस्थारूप झाली म्हणजे कूटस्थरूप झाली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या स्वरूपाने जसा आहेत तसाच ते आकाशाला व्यापून राहिले आहेत. असे माऊली सांगतात.


७१०
अचिंत बाळक सावध जालें ।
निशब्दी बोभाईलें मीचि मीचि ॥१॥
गरोदरेंविण बाळक जालें ।
माया मारुन गेलें निरंजना ॥२॥
तेथें एक नवल पैं जालें ।
पेहें सूदलें निरालंब ॥३॥
छत्तीस अकरा घोंट पैं घेतला ।
उदरेविण भरलें पोट देखा ॥४॥
सहज गुण होतें निर्गुण जालें ।
भलत्या झोंबलें निराकारे ॥५॥
बापरखुमादेविवरु
शून्याशून्याहूनि वेगळे ।
त्या बाळका सामाविलें
आपुल्या व्योमीं ॥६॥
अर्थ:-
अविचारी बाळक हे अज्ञानरूपी माया गरोदर न होता जन्माला आले म्हणजे आपणास जीव (सुखी दुःखी) समजू लागले. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरू माऊली भेंटली व तिने तत्त्वमसि महावाक्योपदेश केला त्यामुळे जागे झाले. म्हणजे ब्रह्माकार वृत्ति निर्माण झाली. व शब्दरहित असलेल्या ब्रह्माविषयी (अहं ब्रह्मास्मि) मी ब्रह्म आहे अशी गर्जना करू लागले.व त्या गर्जनेने अज्ञानरूपी मायेचा निरास करून निर्गुण स्वरूपाकार होऊन ती स्वतः मावळली( ती म्हणजे अहं ब्रह्मास्मि इत्याकारक वृत्ति). त्याठिकाणी या बाळकाला एक आश्चर्य झाले ते असे की हे बाळक ‘पेहें’ म्हणजे पिण्याला योग्य म्हणजे अभेदयोग्य आलंबनरहित निर्विषय अशा स्वरूपाला प्राप्त झाले. त्यामुळे छत्तीस तत्त्वांचे शरीर, दहा इंद्रिये व अकरावे मन यांना गिळून टाकले म्हणून उदरेवीण पोट भरले. म्हणजे शरीरादिकावांचून स्वस्वरूपे करून तृप्त झाले. अज्ञानावस्थेत सहज असणारे गुण नाहीसे होऊन ते सर्व निर्गुण परमात्मस्वरूप झाले. म्हणजे चांगल्या रितीने निर्गुण निराकार परमात्मस्वरूपाशी ऐक्य पावलो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सत्तास्फूर्तिशून्य असलेल्या मायेहून वेगळे असल्याने त्यांनी त्या बाळकाला आपल्या चिदाकाश स्वरूपामध्ये सामावून घेतले.असे माऊली सांगतात.


७११
उजव्या आंगें भ्रतार व्याली ।
डाव्या आंगें कळवळा पाळी ॥१॥
कवण जाणे कवण हे खूण ।
कवण जाणें काय ल्याली भूषण ॥२॥
दोहीं आंगीचें लेणें आपण ल्याली ।
ज्ञानदेव म्हणे विठो
आमुची माउली ॥३॥
अर्थ:-
मायेने एका अंगाने म्हणजे शुद्ध सत्त्व प्रधानतेने ईश्वरास उत्पन्न करून आपण त्याचे आधीन राहिली म्हणून तो ईश्वर मायेचा भ्रतार झाला. व डाव्या अंगे म्हणजे दुसरे बाजूने म्हणजे मलिनसत्त्व प्रधानतेने जीव जगतादि उत्पन्न करून त्याची ‘कळवळ पाळी, म्हणजे रक्षण करतो. मूळ परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ही माया ईश्वरभाव, जीव जगतादि उत्पन्न करून, हे त्याच्या भूषणाचे कारण कोण जाणे? माउली म्हणतात पांडुरंगराय आमची जी माऊली तिने मायेच्या दोन्ही अंगाने निर्माण केलेले अलंकार आपले अंगावर धारण केले. म्हणजे दोघांनाही अधिष्ठान श्रीविठ्ठलच आहेत. आणि तीच आमची खरी माऊली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७१२
देउळा आधीं कळसु वाईला ।
पाहोनि गेलो आपुले दृष्टी ॥१॥
विपरीतगे माये देखियेलें ।
कांसविचें दूध दोहियलें ॥२॥
आधीं पुत्रपाठी वांझ व्याली ।
लेणें लेऊनि ठेले साडेपंधरें ॥३॥
बापरखुमादेविवरु विपरीत
सुपरीत जाणें ।
संत तिये खुणें संतोषतील ॥४॥
अर्थ:-
माऊली पदार्थाभाविनी जी अवस्था आहे. त्या अवस्थेत गेलेल्या पुरुषाच्या भूमिकेचे वर्णन करतात. पदार्थाभाविनी अवस्थेत स्वदृष्टिने पाहिले तर देउळा आधी म्हणजे देहादि देउळाची प्रतीति न येता,परमात्मरूपी कळसाची प्रतीति असते.परंतु हे लोकदृष्टिने विपरीतच झालेले पाहिले. कारण कासवीला दूध नसून दोहन केल्याप्रमाणे या स्थितीत देहादिप्रतीति नसून केवळ चैतन्य प्रतीति असते. कारण सत्त्वांपत्तिमध्ये बोधपुत्र झाला व अधिकार बलाने पदार्थाभाविनीत देहादि अनात्मपदार्थाची प्रतिती येत नाही. ज्या प्रमाणे वांझ प्रसवणे शक्य नाही तद्वत् पदार्थाभाविनीत देहादि अनात्मपदार्थ प्रतिती असते असे कोणी म्हणेल तर ते त्याचे म्हणणे वांझ व्यालीप्रमाणे आहे कारण त्या स्थितीत त्याने (परमात्मरूपी शुद्ध सोन्याचा अलंकार) धारण केलेला आहेत. हे लोकदृष्टिने विपरीत दिसले तरी माझे पिता व रखुमादेवीचे पति जे श्रीविठ्ठल तेच जाणतात आणि संत महात्में या खुणांनी संतोष पावतात. असे माऊली सांगतात.


७१३
मज स्वप्नी लेवविला श्रृंगारु ।
माझें उदरीं जन्मला भ्रतारु ॥१॥
जागि सुति ना मी निदसुरी ।
चोळी सुदली तोडूनि गळसरी ॥२॥
लक्षण म्हणे कीं सुलक्षण म्हणे ।
येके उदरींच आम्हीं दोघें जणें ॥३॥
सोईरिक पडिपाडें समसाटीं ।
मी वो बैसलें तयाचे पाठी ॥४॥
निकट कैसें आहेवपण ।
कैवल्या आधीं तेल कांकण ॥५॥
निवृत्ति दास तेथें नाहीं ।
लग्नमुहूर्त बहुलाठाई ॥६॥
अर्थ:-
माया म्हणते स्वप्नवत् असलेले जगरूपी अलंकार पुढीलप्रमाणे लेवविला. ब्रह्मस्वरूपांचे ठिकाणी शुद्धसत्त्वप्रधान मायेचा स्वीकार करून तिच्यात प्रतिबिंबीत झालेल्याला ईश्वर संज्ञा आली. नंतर ती माया त्याचे आधीन राहिल्यामुळे तो ईश्वर तिचा पती झाला. ती जागी नाही व झोपलेली नाही. म्हणजे तिला स्वस्वरूपाचे ज्ञान व अज्ञानही नाही. अशा अवस्थेमध्ये तिची गळसरी तोडली म्हणजे शुद्धसत्त्वप्रधानता काढून ‘चोळी सुदली’ म्हणजे आवरणात्मक शक्तीचा स्विकार करून, जगतरूपी अलंकार धारण केला.हे चांगले झाले कां वाईट झाले । तात्त्विक आम्ही दोघे मायेश्वर एके उदरी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहोत.आम्ही दोघे पडिपाडे म्हणजे समसत्ताक असल्यामुळे या लग्नाच्या सोयरीकतेने आमची बरोबरी झाली.म्हणून मी त्यांचे पाठीवर बसलें वास्तविक माझे अहेवपण नित्य असतांना लग्न सभारंभात केळवण होण्याच्या पूर्वीच मला सूक्ष्म जगतरूपी तेल लावून हातांत चबांगड्या भरल्या. ‘बहुला ठायी, म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी ईश्वर मायेचे लग्न मुहुर्तावर लागले परंतु मी तेथ नाही म्हणजे लग्न भानगडीत नाही. कारण मूळचाच मी शुद्ध आहे. असे निवृत्तीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.


७१४
पैलमेरुच्या शिखरीं ।
एक योगि निराकारी ।
मुद्रा लावुनि खेंचरी ।
तो ब्रह्मपदीं बैसला ॥१॥
तेणें सांडियेली माया ।
त्यजियेली कंथा काया ।
मन गेलें विलया ।
ब्रह्मानंदा माझारी ॥२॥
अनुहत ध्वनि नाद ।
तो पावला परमपद ।
उन्मनी तुर्याविनोदें ।
छंदें छंदें डोलतुसे ॥३॥
ज्ञानगोदावरीच्या तीरीं ।
स्नान केलें पांचाळेश्वरीं ।
ज्ञानदेवाच्या अंतरीं ।
दत्तात्रेय योगिया ॥४॥
अर्थ:-
माऊली या अभंगातून दत्तात्रेयाचे वर्णन करीत आहेत. ‘पैलमेरूच्या शिखरी, म्हणजे जागृतादिअवस्थेच्या पलीकडे असणारी जी तुर्याअवस्था त्या अवस्थेत कोणी एक अधिकार संपन्न योगीपुरूष परमात्मप्राप्ती करिता खेचरी मुद्रा लावून श्रेष्ठ पदावर प्राणायाम करीत बसला आहे. त्याने मायेचा परित्याग तर केलाच आणखी कंथा व ती घालण्याचे शरीर या दोन्हींचा अभिमान सोडला कारण परमानंदामध्ये मन लीन होऊन गेले.अजपा जपाच्या अनुहत ध्वनीचा नाद ही परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झाला. उन्मनी जी तुर्या तिच्या आनंदात डुलत आहे. ज्ञानगंगेत ज्याने पांचाळेश्वरांत स्नान केले आहे. असा दत्तात्रय योगीराज माझ्या अंतरांत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७१५
सेजे सुता भूमी पालखा
निजलता उसांसया ।
गगन पासोडा मेरु कानवडा
ते सुख वाड पहुडलया ॥१॥
सहज संभोगु भोगु जाणवा ।
विजया होई मग भोगि राणिवा ॥२॥
कमळणी बाळा गुंफ़िती माळा
घालिती गळां देव कन्या ।
तिचिये शेजारीं सतरावी सुंदरी
चंद्रसूर्य दोन्ही चवरी ढाळिती ॥३॥
येकु त्यागी दुसरा भोगी
तिसरा योगी राजाइंद्र ।
चौथे द्वारीं अतीत पै
बैसले गुंफ़े ज्ञानदेवो ॥४॥
अर्थ:-
भूमीरूपी अंतःकरणाची पालखी करून, गगन म्हणजे हृदयाकाशरूपी पासोडी (कापड ) केली. व मेरू म्हणजे अहंकार कानवडा केला म्हणजे उशाला घेऊन निजला असता अतिशय सुखोपभोग होतो. तो सहज स्वरूपानंदाचा भोग समजावा. तरी तूं असा विजयी हो. मग तूं स्वराज्यसिद्धीचे ऐश्वर्य भोगशील. हे बाळा त्याकरितां तूं शुभेच्छादि फुलांची माळा तयार कर. मग तुला देवसंबंधी असलेली ब्रह्मविद्या माळ घालील वा सत्त्वांपत्यादि फुलांची माळ तयार करून तुला घालतील.आणि तिच्या शेजारी म्हणजे संबंधी जी सतरावी जोवनकला हीच एक सुंदरी तुला प्राप्त होईल. चंद्र सूर्य म्हणजे इडा पिंगळा ह्या चवऱ्या ढाळतील.या स्थितीत प्रारब्ध बलाने एक योगी असतो दुसरा त्यागी असतो. तर तिसरा इंद्रासारखा ऐश्वर्य संपत्र असतो. चवथे द्वारी मी तिघांच्याही पलीकडे असलेले जे मोक्षद्वार त्या गुहेमध्ये तपश्चर्या करीत बसलो आहे. म्हणजे ब्रह्मस्थितीत मी आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७१६
पर्वतु गोफ़णिये सोकरी लेकरु ।
ज्याचेनि तृष्णे आटले सप्तहि सागरु ।
ज्याचेनि स्वेदें बुडाला मेरु ।
तया माजी ने तया
मी काय करुं ॥१॥
कैसे नवल चोज जालेंगे माये ।
खांदी गंगा चोरु पळतु आहे ॥२॥
जयाचिया अंगावरी वडाचीं झाडें ।
तो हा मुरुकुटावरि बैसला कोडें ।
विवळादृष्टी पाहे निवाडें ।
घ्या घ्या म्हणोनि ठाकितो पुढें ॥३॥
मनगणिचे तंती वोविली धरणी ।
ते पिसाळ्यानें घेतली खांदा वाहुनि ।
त्यासी वोवाळिति चौघीजणी ।
बापरखुमादेविवराचीं करणी ॥४॥
अर्थ:-
गोफणीत दगड घालून शेतकरी जसा पेरलेल्या शेतांचे रक्षण करतो. त्या प्रमाणे हो माया आपल्या जगतरूपी बालकाचे अनेक त-हेने रक्षण करते त्या मायेचे अनेक चमत्कार आहेत. अगस्ती ऋषि हे त्या मायेचे एक पोर आहे. त्या लेकराने सातही समुद्र गिळून टाकले. ज्या ईश्वराच्या इच्छेने प्रलयकाळाच्या उदकाने मेरू पर्वतही बुडवून टाकला अशा ईश्वर स्वरूपांच्या ठिकाणी माझे प्रारब्ध घेऊन जात आहे. त्याला मी काय करू? मायेचा चमत्कार असा आहे की ती अनेक गोष्टी अघटित कशा घडवून आणते.त्या अशा को भगिरथाने प्रयल करून स्वर्गातील गंगा खांद्यावर वाहून मृत्यूलोकांत आणली. वाल्ह्या कोळ्याच्या अंगावर एवढे मोठे वारूळ वाढले की त्या वारुळावर मोठमोठी वडाची झाडे देखील होती. तो बाल्ह्या कोळी नामस्मरणांच्या योगाने ऋषिपदाला प्राप्त होऊन रामभक्त झाला. आपल्या श्रेष्ठ भक्तांना भगवान मस्तकावर धारण करतो. तयाते माथा मी मुकुट करों, या त्याच्या सांगण्याप्रमाणे वाल्ह्या कोळी रामचंद्र प्रभूच्या मुकुटांवर बसून हे रामतत्व तुम्ही जाणुन घ्या. मन कल्पित पृथ्वी म्हणजे अज्ञान आपल्या खांद्यावर घेऊन जीव वेड्या सारखे हिंडतात. असा जो माया पती ईश्वर त्याची चार वेद ओवाळणी करतात. माझे पिता व रखमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांच्या मायेची करणी आहे असे माऊली सांगतात.


७१७
ऐसा गे माये कैसा योगी ।
जे ठाई जन्मला तो ठाउ भोगी ॥१॥
माय कुमारि बाप ब्रह्मचारी ।
एकविस पुत्र तयेचे उदरी ॥२॥
आचार सांडुनि जालासे भ्रष्ट ।
माउसिसी येणें लाविलासे पाट ॥३॥
पितियाचा वेष धरुनियां वेगीं ।
मातेचें सुख भोगावया लागीं ॥४॥
आणि मी सांगो नवल काई ।
येणें बहिणी भोगिली एकेचि ठाई ॥५॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे ।
अनुभवावांचुनि कोण्हीच नेणें ॥६॥
अर्थ:-
कसा हा सर्वेश्वर? महान योगी ईश्वर आहे. ज्या मायेपासून याचा जन्म झाला त्याच मायेचा हा उपभोग घेत आहे. यांत मौज अशी आहे की ईश्वराची आई जी माया ती स्वतः कुमारी आहे आणि बाप जो परमात्मा म्हणजे (ब्रह्म) ब्रह्मचारी आहे. असे जरी असले तरी अनिर्वचनीय सबंधाने त्या मायेच्या उदरी एकवीस स्वर्ग हेच कोणी एकवीस पुत्र जन्माला आले. आपल्या मातोश्रीचा उपभोग घेणारा हा कसा भ्रष्ट झाला. यांने आपल्या मावशीसी म्हणजे मायेची बहिण जी अविद्या तिच्याशी ‘रूपं रूपं प्रतिरूपं बभूव याप्रमाणे प्रत्येकात जीवरूपाने होऊन अविद्येशी तादात्म्यापन झाला. मातेच्या म्हणजे अविद्याजन्य विषयसुखाचा भोग घेण्याकरिता आपला पिता जो बाप त्याचा द्वेष केला. म्हणजे त्याला ओळखले नाही. याचे काय नवल सांगावे? ज्या आवरण शक्तीने जीव झाला. त्याच अविद्येची विक्षेपशक्तिरूपी बहीण तिचाही भोग घेतला. माझे हे बोलणे यथार्थ ब्रह्मानुभवी पुरूषालाच कळेल इतरांना ते कळणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७१८
सुकलिये गंगे व‍र्‍हाड आलें ।
उतार नाहीं म्हणोन मुरडोनी गेलें ।
मनगुणीचा तंती ओंविली धरणी ।
पिसोळिया ओझें वाईले रया ॥१॥
तुं ते कवण मी ते कवण ।
कवण बांधावे तोरण ।
योगी दिगंबर संन्यासिजे काय ।
वरमाये हातीं कांकण रया ॥२॥
आप तेज पृथ्वी वायो आकाश ।
या भासास उटणें केलें ।
वांझेचिया पुत्रा चोखणी मार्दिलें ।
ऐसें नवल ज्ञान जालें रया ॥३॥
वरबाप वोहबाप जन्मलेचि नाहीं ।
तंव नवरा नवरी कवणची काई ।
बापरखुमादेवीवर चिंतिता ।
तरि तें सुख निवृत्तिपायीं ॥४॥
अर्थ:-
‘शब्दब्रह्मी होशी आगळा । म्हणसी न भीये कळिकाळा । बोधेवीण सुखसोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाचि ॥, या चरणांत वर्णन केलेल्या परोक्षज्ञानी असलेल्याचे वर्णन माऊली या अभंगातून करीत आहे. लग्नाला आलेली जी मंडळी त्यांना वऱ्हाड़ असे म्हणतात.त्याप्रमाणे परमात्म्याशी आपले लग्न लावण्याकरिता (ऐक्यबोधा करीताच) हा मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. असे असून सर्व शास्त्रध्ययन केलेला वऱ्हाडी म्हणजे केवळ शब्दज्ञानसंपन्न असलेला पंडित म्हणाला. ोोमायेतून तरून जाण्याची भीती कशाला बाळगता? कारण तिला पाणी नाही ती सुकून गेली आहे. म्हणजे माया नाहीच. असे तोंडाने सांगू लागला. परंतु प्रत्यक्ष प्रसंग आला त्यावेळी तिला उतार नाही म्हणून मागे परत फिरला. म्हणजे तिच्यातून तो तरून गेला नाही. उलट तोंडाने मात्र म्हणतो. अहो धरणी म्हणजे प्रपंच हा मनकल्पित आहे हे त्याचे म्हणणे यथार्थ अनुभव नसल्याने वेड्याप्रमाणे ओझे वाहिले. योगी दिगंबर संन्यासी जे कोणी असतील त्याना म्हणाला अरे तूं योगी वगैरे काही नाही तर ‘ते, म्हणजे ब्रह्म, तूं आहेस हे मी तुला कां सांगतो तर मी कोण असेल तर ते ब्रह्म आहे. म्हणून मी तुला सांगतो असे जीवब्रह्मैक्याचे तोरण कोणी बांधावे. मला बोध झाला आहे म्हणून वरमाय जी बुद्धि कारण बोध हा बुद्धित होतो.म्हणून ती वरमाय आहे व तिच्या हातांत कंकण बांधले.पंचमहाभूते ही भासास म्हणजे भासमात्र आहे. त्यांचे उटणे केले व ते उटणे बुद्धिला तात्त्विक बोध झाला नव्हता म्हणून ती वांझ अशा तिच्या बोधरूपी पुत्राला ते उटणे चांगले मर्दन केले म्हणजे ते पंचमहाभूते कल्पित आहेत असे सांगू लागला. हे त्याचे ज्ञान आश्चर्यकारक आहे. तात्त्विक वरबाप म्हणजे ब्रह्म जन्मले नाही म्हणजे ब्रह्मरूप झाला नाही. वोहबाप म्हणजे ज्ञान जन्मले नाही म्हणजे झाले नाही. मग मुक्तिरूपी नोवरी व तिचा नवरा हे शब्दज्ञानामुळे काही एक नाही. यथार्थ बोधाकरिता श्रीगुरूनिवृत्तीरायांचे चरणीलागून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे चिंतन केले तरच तो बोध प्राप्त होऊन ब्रह्मसुख प्राप्त होईल.असे माऊली सांगतात.


७१९
माते आधि कन्या जन्म पावली तिच्या
वर्‍हाडा आईति केली ।
पाहों गेलों तये चरण ना तुम्ही
नेत्र संपुर्ण लक्षणें वोळखिलीं ।
नवरा गर्भवासि पहिले नामरसी
घटित आहे दोघांसीं ।
अर्थ याचा सांगा श्रोते हो
लग्नेविण आणिली घरासिरेरे ॥१॥
कवण कवणाचा विचारु करा उपजत
पुत्र म्हातारा युगें गेली तया
जाहलिया जन्म ऐसें एक अवधारा ॥२॥
पुत्रें मातेसि पय पाजिलें कीं
पितयासी कडे वाहिलें ।
तुम्ही म्हणाल शास्त्रें काय देखिलें
तरी उजुचि आहे बोलिलें ।
शास्त्र गूढ अध्यात्म गूढ वज्र
गूढी पाहे म्हणितलेरेरे ॥३॥
साहिशास्त्रें शिणलीं भारी
परि अर्थ नकळे कवण्यापरी ।
सुजाण श्रोते कविजन अपार
कवित्त्व करिती लक्षवरी ।
एक एक कवित्त्वीं हें काय
नवल ज्ञानदेवीं पाहिलें निरुतेरेरे ॥४॥
अर्थ:-
शास्त्रीय दृष्टीने विचार केला असता माते आधि कन्या जन्म पावली या म्हणण्यांत कारणाच्या पूर्वी कार्याची सिद्धी असते. असे म्हणण्यासारखे झाले. परंतु तात्त्विक विचार केला तर कारण अगोदर असते व नंतर कार्य होत असते. या सिद्धांताच्या विरुद्ध माऊलीचे कथन आहे. परंतु विचार केला तर माऊलीचे म्हणणे कसे योग्य आहे. याचा विचार करणे अवश्य आहे तो असा की, माते आधि, म्हणजे विदेहमुक्तिच्या अगोदर कन्या जन्म पावली म्हणजे जीवन्मुक्ति प्राप्त झाली. तिच्या वऱ्हाडा म्हणजे तिच्या लग्नाला म्हणजे जीवन्मुक्तिला ती विदेहमुक्ति कारण झाली. तिला पाहू गेले तर तिला हात पाय कान डोळे नाही हे मी पूर्णपणे ओळखले. तिचे लग्न लागण्यापूर्वीच म्हणजे जीवन्मुक्ति होण्याच्या पूर्वीच हिचा परमात्मरूपी नवरा तिच्या गर्भात होताच. म्हणून या दोघींची म्हणजे विदेहमुक्ती व जीवन्मुक्तिची नावरास चांगली जमली. हे दोघे लग्नांवाचून परमात्मरुपी घरांस आणिले. कोणी कोणाचा विचार करावा कारण जीवन्मुक्तित उपजत पुत्र म्हणजे प्रकाशीत झालेला परमात्मा उपजल्यापासून म्हणजे प्रकाशीत झाल्यापासून कहीक युगांचा म्हातारा म्हणजे अनादि अनंत अशा मुलाचा तिच्या ठिकाणी जन्म झाला.त्या मुलाने जीवन्मुक्ति मातेला दूध पाजविले म्हणजे जीवन्मुक्तिच्या विलक्षण सुखाचा भोग दिला. तिने बापाला म्हणजे परमात्म्याला पोरं कडेवर वागविले म्हणजे सांभाळिले. तुम्ही म्हणाल हे कोडे आम्हास तर कांही समजत नाही म्हणून शास्त्रे काय सांगतात.हे पाहू गेलो तेंव्हा त्यांनी असे काही वर्णन केले नाही. असे म्हणू नका. त्यांनी तें यथार्थ प्रतिपादन केले आहे. ती सहा शास्त्रे अठरा पुराणे आम्ही म्हणतो तसे स्पष्ट सांगितले नाही तरी अध्यात्मशास्त्र वज्राप्रमाणे फार गूढ आहे.आम्ही वर सांगितलेल्या कोड्याचा अर्थ समजण्याकरता शास्त्रांना फार कष्ट झाले. परंतु त्यांना कोणत्याही रितीने याचा अर्थ समजला नाही. सूज्ञ श्रोते मोठमोठे कवि आपआपल्या बुद्धिमत्तेने अपार कवित्व म्हणजे लक्षावधी कविता करतात.पण त्यांना याचा अर्थ कळत नाही परंतु सूज्ञ विचारवान श्रोते यातील एक एक अक्षराचा विचारपूर्वक अर्थ जाणतात. कवित्वालाही हे कवित्व आहे.यांत आश्चर्य काय? या सर्वांचा यथायोग्य अर्थ पाहुन माऊली ज्ञानदेवांनी सांगितले.


संसारताप – अभंग ७२० ते ७२३
७२०
पति जन्मला माझे उदरीं ।
मी जालें तयाचि नोवरी ॥१॥
पतिव्रता धर्म पाहाहो माझा ।
सर्वापरि पति भोंगिजे वोजा ॥२॥
निर्गुण पति आवडे मज आधीं माय ।
पाठीं झालीये भाज ॥३॥
मी मायराणी पतिव्रताशिरोमणि ।
ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करी ॥४॥
अर्थ:-
मायेची भूमिका घेतलेली गवळण म्हणते. पति जो ईश्वर तो माझ्या पोटी जन्माला आला म्हणजे माझ्यामुळे त्याला ईश्वरत्व आले. असे जरी असले तरी मी त्याच्या आज्ञेत वागते. म्हणजे मला त्यांच्याहून स्वतंत्र सत्ता नाही. अर्थात् मी त्याचे नोवरी झाले. आतां माझा पतिव्रता धर्म पाहा की मी सर्व प्रकारांनी व्यवस्थित पतिचा उपभोग घेते. मला निर्गुण पति फार आवडतो. मी अगोदर त्याची आई होऊन पाठीमागून त्याचीच बायको झाले. मीच त्याची पट्टराणी असे असून सुद्धा पतिव्रतेतील अग्रपूजेचा मान मलाच आहे.माऊली ज्ञानदेवानी हे सर्व पाहून या स्वरूपाच्या ठिकाणी जनसंपर्क नाही अशा अद्वैतस्थितीत क्रीडा केली.


७२१
तापत्रयीं तापलीं गुरुतें गिवासिती
भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी ।
तंव ते नेणोनि उपदेशाची रीति
आना न उपदेशिती ।
ठकलें निश्चिती तैसें जालें ॥१॥
संत ते कोण संत ते कोण ।
हे जाणवि खुण केशवराजा ॥२॥
कोण्हीं एक प्राणी क्षुधेंने पिडिले ।
म्हणोनि दोडे तोडूं गेले ।
खावों बैसे तों नुसधि रुयी उडे ।
ठकले बापुडें तैसे झालें ॥३॥
कोण्ही एक प्राणी प्रवासें पीडिला ।
स्नेहाळु देखिला बिबवा तो ।
तयाचें स्नेह लावितां अंगी ।
सुजला सर्वांगी तैसें जालें ॥४॥
कोण्ही एक प्राणी पीडिला झडीं ।
म्हणोनि गेला पैल तो झाडी ।
खा खात अस्वली उठली लवडसवडीं ।
नाक कान तोडी तैसें जालें ॥५॥
ऐशा सकळ कळा जाणसी ।
नंदरायाचा कुमर म्हणविसी ।
बापरखुमादेवीवर विठ्ठ्लीं भेटी ।
पडलि ते न सुटे जिवेंसी ॥६॥
अर्थ:-
त्रिविध तापाने तापलेले भगवे वस्त्र घातलेल्याला गुरु म्हणतात व तारस्वरात मला तारा म्हणतात. पण त्या केलेल्या गुरुलाच ज्ञान नसल्याने ते भलताच उपदेश करतात. व त्यांची फसवणुक होते. हे केशीराजा हे संत कोण आहेत त्यांची खुण कोणती? कोणी एक माणसाने भुक लागली म्हणुन कापसाची बोंड आणली व ती फोडली तशी ती रुई उडुन जाऊ लागली. व त्या बापड्याची फसवणुक झाली. कोण्या प्रवाश्याने थकला म्हणुन सर्वांगास बिंब्याचे तेल लावले ते त्याच्या अंगावर उतले व त्याच्या सर्वांगाला सुज आली.कोणी एक पाऊसाच्या झडी पासुन वाचण्यासाठी झाडीत शिरला तिथे असलेल्या अस्वलाने त्याचे नाक,कान व तोड तोडुन ताबडतोब खाल्ले. अशा सर्व कळा तु नंदरायाचा कुमार होऊन जाणतोस. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भेट झाली की ती जीवापासुन सुटत नाही असे माऊली सांगतात.


७२२
धर्म अर्थकाम मोक्ष दान मागे श्रीगुरु ।
हस्त पाद शरीर व्यथा पंगु
जालों मी पुढारु ।
तिमिर आलें पुढें मायामोहो उदारु ।
तेणें मी जात होतों ।
मग सहज भेटला सदगुरु धर्म
जागो सदगुरु महिमा जेणें तुटें भवव्यथा ॥१॥
हाचि धर्म अर्थ काम येर तें
मी नेघे वृथा ॥२॥
एकनाम राम कृष्ण याचें दान
देई सदगुरु ।
वेदशास्त्र मंथनकेले परि
नव्हेचि पुढारु
शरण आलों निवृत्तिराया तोडी
माया संसारु ।
पाहतां इये त्रिभुवनी तुजहुनि
नाहीं उदारु ॥३॥
ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी
माझें पागुळ ।
शंख चक्र पद्म गदा तुष्टे
ऐंसा तूं दयाळ ।
बापरखमादोविवरें ।
दान देउनि केले अढळ ॥४॥
अर्थ:-
धर्म अर्थ काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ श्रीगुरूंना दान म्हणून मागावेत हात पाय शरीर इत्यादिकांच्या मागे संसारदुःखाच्या व्यथा असल्यामुळे मला पंगुत्व आले.म्हणजे काही एक हालचाल करता येईनासी झाली. तसेच अज्ञानाचे पडळ दृष्टिवर आल्यामुळे मी मायामोहामध्ये सापडलो अशा मायामोहांत कित्येक जन्मच्याजन्म मी चालत होतो. असा मी चालत असता माझ्या पूर्व पुण्याईमुळे वाटेत उदार असे सद्गुरू मला भेटले. त्या उदार सद्गुरूंचा ज्ञानरूपी धर्म त्याची जागृति सतत राहून, संसार व्यथा नष्ट करणाऱ्या सद्गुरूंच्या, महात्म्यांचा जयजयकार असो.सद्गुरूंनी दिलेला तो ज्ञान धर्म, त्या मोक्ष धर्माव्यतिरिक्त धर्म, अर्थ काम हे पुरूषार्थ जर कोणी मला फुकट दिले तरी ते मी घेणार नाही. कारण ते तुच्छ आहे. वेदांतशास्त्रांनी विचारांनी मंथन करून ज्या भगवान श्रीकृष्णाच्या नावांचा महिमा गायलेला आहे त्या श्रीकृष्णाच्या नामाचेच मला दान करा म्हणजे झाले. एवढे दान मी श्रीगुरूनिवृत्तीरायांना शरण जाऊन मागत आहे. त्या नामाच्या दानाने मायेचा संबंध तोडून टाका. एवढी भीक देण्यास सर्व त्रैलोक्यांत तुमच्या इतका उदार कोणी नाही. आपल्या ज्ञानाने वृत्तीत उत्पन्न होणारें जें परमात्मज्ञान तें आणि प्रपंचज्ञान ही दोन्ही माझ्या पांगळ्याची नाहीशी करून माझी वृत्ति शंख चक्र व गदा धारण करणारा जो श्रीगोपालकृष्ण याचे ठिकाणी जडून तो संतुष्ट होईल. अशी कृपा करणारे आपण दयाळू आहात. कारण त्या श्रीगुरू निवृत्तीरायांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे मला दान देऊन अढळ अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून दिली. असे माऊली सांगतात.


७२३
देवा तुज चुकलों गा ।
तेणें दृष्टि आलें
पडळ विषयग्रंथीं गुंतलोसे ।
तेणें होतसे विव्हळ ।
अंध मंद दृष्टि झाली ।
गिळूं पाहे हा काळ ।
अवचितें दैवयोगें ।
निवृत्ति भेटला कृपाळ ॥१॥
धर्म जागो निवृत्तिचा ।
तेणें फ़ेडिलें पडळ ।
ज्ञानाचा निजबोधु ।
विज्ञानरुप सकळ ॥२॥
तिहीं लोकीं विश्वरुप ।
दिव्य दृष्टी दिधली ।
द्वैत हें हरपलें
अद्वैतपणें माउली ।
उपदेशु निजब्रह्म ।
ज्ञानांजन साउली ।
चिद्रूप दीप पाहे ।
तेथें तनुमनु निवाली ॥३॥
दान हेंचि आम्हा गोड ।
देहीं दृष्टी मुराली ।
देह हें हरपलें ।
विदेह वृत्ति स्फ़ुरली ।
विज्ञान हें प्रगटलें ।
ज्ञेय ज्ञाता निमाली ।
दृश्य तें तदाकार ।
ममता तेथें बुडाली ॥४॥
प्रपंचु हा नाहीं जाणा ।
एकाकार वृत्ति जाली ।
मी माझे हारपलें ।
विषयांधया बोली ।
उपरती सदगुरु बोधु ।
तेथें प्रकृति संचली ।
धर्ममार्गे शुध्द पंथ हातीं
काठी दिधली ॥५॥
वेद मार्गे मुनी गेले त्याच
मार्गे चालिलों ।
न कळेचि विषयअंध म्हणोनी
उघड बोलिलों ।
चालतां धनुर्धरा ।
तरंगाकारी हरलों ।
ज्ञानदेवो निवृत्तिचा ।
द्वैत निसरलों ॥६॥
अर्थ:-
हे देवा मी आपल्या यथार्थ आत्मस्वरुपाला चुकलो म्हणून अज्ञानामुळे माझे डोळ्यावर पडळ येऊन विषयाच्या गुंतड्यात अटकून अतिशय दुःख भोगणारा असा होऊन विवळत आहे. दृष्टि आंधळी झाली असल्यामुळे देहच मी आहे अशी समज आहे. त्यामुळे काळ माझा ग्रास करीत आहे. या भयाने भयभीत असता प्रारब्ध योगाने सहज अत्यंत दयाधन श्रीगुरू निवृत्तीराय यांची गाठ पडली. त्यांचा स्वाभाविक धर्म जीवांना आत्मस्वरूपाविषयी जागे करण्याचा असल्यामुळे त्या श्रीगुरू निवृत्तिरायांच्या स्वाभाविक धमनि माझे डोळ्यावरील अज्ञानाचे पडळ फेडून ज्ञानाच्या योगाने आत्मज्ञानाचा बोध त्यांनी दिल्यामुळे सर्व त्रैलोक्य ज्ञानरूप दिसु लागले. त्यांनी आत्मज्ञानाची दिव्य दृष्टि दिल्यामुळे तिन्ही लोक परमात्मरूप होऊन द्वैत नाहीसे झाले. अद्वैत स्वरूप जे सद्गुरू निवृत्तिराय माऊली यांनी निजात्मब्रह्मबोध हेच कोणी एक ज्ञानांजन घालून मला त्या सावलीत शांत केले. त्या चैतन्यरूप दीपाने पाहिले असता त्या बोधाचे ठिकाणी तन आणि मन ही शांत झाली. हे श्रीगुरूंनी केलेले दान आम्हाला फार गोड होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझी दृष्टि मुराली. त्यामुळे देहदृष्टि नष्ट होऊन विदेहदृष्टि स्फुरण पावली. आत्मबोध प्रत्यक्ष होऊन ज्ञेय ज्ञानादि द्वैत नष्ट होऊन गेले. सर्व दृश्य परमात्मरूप होऊन तत्संबंधी माया नाहीशी झाली. आतां माझा निश्चय असा झाला आहे की प्रपंच हा मुळीच न झाल्यामुळे एक परमात्मरूपच वृत्ति झाली. विषयांधदशेत मी आणि माझे असा जो व्यवहार होत होता तो सर्व नष्ट होऊन गेला. विषयाविषयी निवृत्ति झाल्यामुळे सद्गुरूंनी जो बोध केला. त्याच ठिकाणी प्रकृति किंवा प्रकृतीकार्य प्रपंच लय पावले. धर्माच्या मार्गाने शुद्ध पंथ चालवण्याकरिता हातात भक्तिची काठी दिली. कारण वेदांनी प्रतिपादन केलेल्या मार्गाने ऋषीमुनी वगैरे गेले त्याच मार्गान मी चाललो आहे. विषयांधाना हे कळत नाही. म्हणून मी आपला अनुभव स्पष्ट सांगितला. याकरता प्रपंच मार्गात चालला असता धर्माचा आश्रय करा. तसा आश्रय मी केला म्हणून विषयरूपी तरंगाकडून मी सुटलो. श्रीगुरूनिवृत्तीरायांचा शिष्य जो मी त्यांच्या कृपेने सर्व द्वैताचा निरास झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


वासुदेव – अभंग ७२४ ते ७२५
७२४
बाबा ममतानिशि अहंकार दाट ।
रामनामें वासुदेवीं वाट ।
गुरु कृपा वोळलें वैकुंठ ।
तेणें वासुदेवो दिसे प्रगटगा ॥१॥
वासुदेवा हरि वासुदेवा हरि ।
रामकृष्ण हरि वासुदेवा ॥२॥
आला पुंडलिक भक्तराज ।
तेणें केशव वोळला सहज ।
दिधलें विठ्ठलमंत्र बीज ।
तेणें जालें सर्व काजगा ॥३॥
रामकृष्णवासुदेवें ।
वासुदेवीं मन सामावेगा ॥४॥
शांतिक्षमादयापुरीं ।
वासुदेवो घरोघरीं ।
आनंदे वोसंडे अंबरी प्रेमे
डुलें त्रिपुरारिगा ॥५॥
वासुदेवीं वाहूनि टाळी ।
पातकें गेलीं अंतराळीं ।
वासुदेवो वनमाळी ।
कीर्तन करुं ब्रह्ममेळींगा ॥७॥
ज्ञानदेवा वासुदेवीं ।
प्रीति पान्हा उजळी दिवी ।
टाळ चिपळी धरुनि जिवीं ।
ध्यान मुद्रा महादेवींगा ॥८॥
अर्थ:-
व्यवहारात ममता आणि अहंकार होच कोणी एक निविड अंधकाराची रात्र आहे. त्या रात्रीतून पार पडून वासुदेवाला प्राप्त करून घेण्याची वाट रामनामाचे स्मरण आहे. ती वाट दाखविणारे श्रीगुरूच आहेत त्यामुळे वासुदेव. जो भगवान श्रीकृष्ण तो स्पष्टपणे दिसतो. म्हणून तुम्ही वासुदेव हरि रामकृष्ण या नावांचा जयघोष करा या भूतलावर पंढरी क्षेत्रामध्ये प्रथम पुंडलिकराय आले. त्याच्याकरिता भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून येथे आले. त्यांनी आपल्या विठ्ठल नामाचा मंत्र दिला. त्या मंत्राच्या योगाने पुंडलिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. त्याच सांप्रदायाचे अनुकरण करून हातात टाळ वीणा घेऊन प्रेमाने सर्व वैष्णव गातात त्यामुळे त्यांचे मन सहजच वासुदेवात समाविष्ठ होते.शांती क्षमा दया या सर्व वैष्णवांना पूर्ण प्राप्त होऊन घरोघर आनंद ओसंडून येतो. ते प्रेम पाहून त्रिपुरारी भगवान शंकर कैलासांत प्रेमाने डोलू लागतो. भगवत् भक्ताचे ठिकाणी ज्ञेय ज्ञान ध्यान व मन ही सर्व नारायण स्वरूपच झालेली असतात. तसेच एक परिपूर्ण वासुदेवच सर्वत्र विस्तारलेला आहे. अशा तऱ्हेचे ज्या भगवत् भक्ताचे भजन असते. वासुदेव नावाच्या गजरात टाळी वाजविली असता सर्व पातके आकाशांत नाहीसी झाली. वनमाळी जो भगवान वासुदेव त्याचे ब्रह्मानंदात कीर्तन करावे असाच त्यांचा छंद असतो. श्रीगुरू निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराजांची एवढीच प्रार्थना आहे की माझे अंतकरणांत वासुदेवाच्या भजनाविषयी प्रीतीचा पान्हा सर्व दिवस प्रज्वलीत करावा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७२५
घुळघुळा वाजती टाळ ।
झणझाणां नाद रसाळ ।
उदो जाला पाहाली वेळ ।
उठा वाचे वदा गोपाळरे ॥१॥
कैसा वासुदेव बोलतो बोल ।
बाळापोटीं माय रिघेल ।
मेलें माणूस जीत उठविल ।
वेळ काळांतें ग्रासीरे ॥२॥
आतां ऐसेंची अवघे जन ।
तें येतें जातें तयापासून ।
जगीं जग झालें जनार्दन।
उदो प्रगटला बिंबले भानरे ॥३॥
टाळाटाळीं लोपला नाद ।
अंगोअंगींची मुराला छंद ।
भोग भोगितांचि आटला भोग ।
ज्ञान गिळूनि गावा तो गोविंदरे ॥४॥
गांवा आंत बाहेरी हिंडे आळी ।
देवो देविची केली चिपळी ।
चरण नसतां वाजे धुमाळी ।
ज्ञानदेवाची कांति सांवळी ॥५॥
अर्थ:-
हे जग ज्यांच्यापासून होते तो जनार्दनच आतां सर्व जगतांमध्ये प्रगट होऊन त्यांचे भान सर्व लोकांत झाले आहे. ज्या आनंदांत टाळ किंवा टाळ्यांच्या नाद लुप्त होऊन ज्या छंदाने वासुदेवाचे भजन होते,तो छंदहि मुरुन भोग भोगीत असतांहि भोगाची आटणी होऊन झालेल्या वासुदेवाच्या ज्ञानाचाही लय होऊन वैष्णवांचे, गोविंदाचे गाणे चालले आहे. असे भजन करावे आतां असा भजन करणारा पुरुष गावाच्या आळीत हिंडत असताहि तो त्याच्या बाहेर आहे. त्याच्या चिपळ्या म्हणजे प्रकृति पुरुषाच्या आहेत. वस्तुतः त्या भगवत् भक्ताला चरण नसतांहि नाचण्यांचा आवाज घुमत आहे. असे भजन करित असता शामसुंदर वर्णाचा जो भगवान श्रीकृष्ण त्यांचीच कांति माझे अंगावर उमटली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


बाळछंद – अभंग ७२६ ते ७२७
७२६
बाळछंदो प्रेमडोहीं मन ।
जालें मनाचें उन्मन ।
उपरती धरिलें ध्यान ।
झालें ज्ञानपरब्रह्मीं ॥१॥
निमिषा निमिष छंद माझा ।
बाळछंदो हा तुझा ।
वेगि येई गरुडध्वजा ।
पसरुनीया भूजा देई क्षेम ॥२॥
तुटली आशेची सांगडी ।
ध्यानें नेली पैल तडी ।
सुटली संसाराची बेडी ।
क्षणु घडी रिती नाहीं ॥३॥
नाठवें द्वैताची भावना ।
अद्वैती न बैसें ध्याना ।
दिननिशींची रचना ।
काळगणना छंदे गिळीं ॥४॥
जप तप वृत्ति सहित ।
निवृत्ति होईन निश्चिति ।
समाधी बैसेन एकतत्त्व ।
मुखीं मात नामाची ॥५॥
ज्ञानदेवीं छंद ऐसा ।
बाळछंद झाला पिसा ।
दान मागतसे महेशा ।
दिशादिशा न घली मन ॥६॥


७२७
अलक्षलक्षीं मी लक्षीं ।
तेथें दिसती दोहीं पक्षी ।
वेदां शास्त्रां हे़ची साक्षी ।
चंद्रसूर्या सहित ।
मागेन स्वानुभवअंगुले ।
पांचा तत्त्वांचे सानुलें ।
व्यर्थ इंद्रिये भोगीलें ।
नाहीं रंगले संताचरणीं ॥१॥
बाळछंदो बाबा बाळ छंदो ।
रामकृष्ण नित्य उदो ।
ह्रदयकळिके भावभेदो ।
वृत्तिसहित शरीर निंदो ।
नित्य उदो तुझाची ॥२॥
क्षीरसिंधुही दुहिला ।
चतुर्दशरत्नीं भरला ।
नेघे तेथील साउला ।
मज अबोला प्रपंचेंसी ।
दानदेगा उदारश्रेष्ठा ।
परब्रह्म तूं वैकुंठा ।
मुक्ति मार्गीचा चोहटा ।
फ़ुकटा नेघे तया ॥३॥
पृथ्वीतळ राज्यमद ।
मी नेघे नेणें हेंही पद ।
रामकृष्ण वाचे गोविंद ।
हाची छंद तुझ्या पंथे ।
मंत्र तीर्थयज्ञयाग ।
या न करि भागा भाग ।
तूंचि होऊनि सर्वांग ।
सर्वासंग मज देई ॥४॥
वृत्ति सहित मज लपवी ।
माझें मन चरणीं ठेवी ।
निवृत्ति पदोंपदीं गोवीं तुं
गोसावी दीनोध्दारण ॥
सात पांच तीन मेळा ।
या नेघे तत्त्वांचा सोहळा ।
रज तमाचा कंटाळा ।
ह्रदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५॥
श्वेत पीत नेघे वस्त्र ।
ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र ।
स्वर्ग मृत्यु पाताळपात्र ।
नित्य वस्त्र हरी देई ।
चंद्रसूर्य महेन्द्र पदें ।
ध्रुवादिकांची आनंदें ।
तें मी नेघे गा आल्हादें ।
तुझ्या ब्रिदें करीन घोष ॥६॥
करचरणेंसे इंद्रियवृत्ति ।
तुझ्या ठायीं तूंचि होती ।
मी माझी उरो नेदी कीर्ति ।
हें दान श्रीपति मज द्यावें ।
शांती दया क्षमा ऋध्दी ।
हेहि पाहातां मज उपाधी ।
तुझी या नामांची समाधी ।
कृपानिधी मज द्यावी ॥७॥
बापरखुमादेविवरु तुष्टला ।
दान घे घे म्हणोनि वोळला ।
अजानवृक्ष पाल्हाईला ।
मग बोलिला विठ्ठल हरी ।
पुंडलिके केलेरे कोडें ।
तें तुवां मागीतलेरे निवाडें ।
मीं तुज ह्रदयीं सांपडे ।
हे त्त्वां केलें ज्ञानदेवा ॥८॥
अर्थ:-
एकूण लक्षणेचे तीन प्रकार आहेत. जहत्, अजहत्, आणि जहदजहत् म्हणजे भागत्याग लक्षणा या तिन्हीही लक्षणेचा विषय न होणारा म्हणून त्या परमात्म्याला अलक्ष असे म्हणतात. अशा परमात्म्याच्या ठिकाणी मी लक्ष देऊ गेलो असता, त्यापरमात्म्याच्या ठिकाणी माया उपाधीमुळे जीव-ईश्वर हे भाव हेच दोन पक्षी म्हटलेआहे. म्हणून माझ्या म्हणण्याला चंद्रसूर्यादि देवतासहित, वेदशास्त्राची साक्ष आहे. आतां मी त्या पाडुंरगरायाकडे ब्रह्मानुभव हट्ट धरुन मागून घेणार आहे.आतांपर्यंत पंच महाभूतांचे असलेले हे लहानसे अंगरखे माझ्या अंगावर होते. त्यामुळे निष्कारण इंद्रियाच्याद्वारा विषयांचे सेवन केले. आणि त्यांच्या कृपाप्रसादानें. कृतार्थ होणार अशा संतांची मात्र मी संगती केली नाही. पांडुरंगा, बाळकाला हाच छंद लागावा. रामकृष्णाच्या स्वरुपाचा नित्य उदय अंतःकरणांत व्हावा, वृत्तिसहित शरीराच्या ठिकाणी तुच्छ बुद्धि व्हावी आणि नित्य उदय तुझ्या नामाचा असावा.


कापडी – अभंग ७२८ ते ७२९
७२८
आम्हीं कापडीरे आम्ही कापडीरे । पापें बारा ताटा पळती बापडिरे ॥१॥
पंढरपुरीचे कापडिरे । उत्तरपंथीचे कापडिरे ॥२॥
आणि पाहालेरे । संतसंगति सुख जालेरे ॥३॥
समता कावडिरे समता कावडिरे । माजि नामामृत भरिलें आवडिरे ॥४॥
येणें न घडेरे जाणे न घडेरे निजसुख कोंदलें पाहातां चहूंकडेरे ॥५॥
नलगे दंडणेरे नलगे मुंडणेरे । नाम म्हणोनि कर्माकर्मखंडणेरे ॥६॥
दु:ख फिटलेरे । दु:ख फिटलेरे बापरखुमादेविवर विठ्ठलरे ॥७॥
अर्थ:-
आम्ही कापडी म्हणजे यात्रेकरू आहोत. आमच्याकडे बघून पातकें बारा वाटेला पळून जातात.आम्ही पंढरपूरचे यात्रेकरू असून आमचा रस्ता उत्तरपंथाचा म्हणजे ज्ञानाचा आहे. अशी आम्ही यात्रा करित असल्यामुळे आमच्या ठिकाणी ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला. आणि आम्हाला ब्रह्मसुख लाभले. याला कारण संतांची संगती हे होय. सर्वत्र ब्रह्मस्वरूप भरलेले आहे. अशा तऱ्हेच्या कावडी आम्ही खांद्यावर घेतल्या आहेत. त्या कावडीमध्ये प्रेमभरीत नामामृत भरले आहे. त्यामुळे जन्माला येणे अगर मरणे याची आम्हाला आवश्यकता उरली नाही. एक ब्रह्मसुखच भरले आहे. असा आमचा निश्चय झाला. याकरिता आम्हाला दंडण, मुंडण वगैरे काही करावे लागत नाही. एकनिष्ठपणाने आम्ही नामस्मरण करित असल्यामुळे आमच्या ठिकाणी कर्म अकर्म इत्यादिकांचे खंडण होऊन गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या नामस्मरणामुळेआमच्या ठिकाणच्या सर्व दुःखाची निवृत्ति होऊन गेली. असे माऊली सांगतात.


७२९
ॐ नमो शिवा आदि । कावडि घेतली खांदी मिळाली संतमांदी । त्याचे रज रेणु वंदी ॥ध्रु०॥
शिवनाम शीतळ मुखीं । सेविं पां कापडियारे दडदडदडदड दुडुदुडुदुडुदुडु । पळ सुटला कळिकाळा बापुडीयारे ॥१॥
गुरुलिंग जंगम । त्यानें दाविला आगम । अधिव्याधि झाली सम । तेणें पावलों विश्रामरे ॥२॥
जवळीं असतां जगजीवन । कां धांडोळिसी वन । एकाग्र करी मन । तेणें होईल समाधानरे ॥३॥
देहभाव जेथं विरे । ते साधन दिधलें पुरे । बापरखुमादेविवरे विठठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे ॥४॥
अर्थ:-
ॐकार स्वरूप आदिशंकराला नमस्कार असो ज्यांनी समतारूपी कावड खांद्यावर घेतली आहे असे जे संत समुदाय त्यांच्या चरणधुलीस मी वंदन करतो श्रीशंकराचे शांती देणारे नाम तोंडी ठेवून या संतांची सेवा करा. अशी सेवा केली म्हणजे बिचाऱ्या यमाला दुडु दुडु करीत (त्वरेने) पळच काढावा लागेल. ब्रह्मज्ञानसंपन्न अशा जंगम गुरूंनी वेदांतील महावाक्याचा उपदेश केल्यामुळे माझी शारीरिक व मानसीक दुःखें नाहीसी झाली. त्यामुळे मला यथार्थ समाधान झाले. असा जगजीवन परमात्मा जवळ हृदयांतच असतां तुम्ही रानोमाळ कां फिरता? तुम्ही आपले चित्त स्थिर करा म्हणजे सहजच समाधान लाभेल. देहभाव नाहीसा होऊन समाधान प्राप्त होते. असे हे मन एकाग्र करण्याचे साधन माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी आम्हाला दिले. असे माऊली सांगतात.


मदालसा – अभंग ७३० ते ७३६
७३०
उपदेश उपरति ज्ञान ध्यानएकनिष्ठ । विज्ञान तें आटलेंरे दृश्यादृश्य तेथे दृष्ट । आदिअंत हरपला सर्व ब्रम्ह एक वाट । नित्य नेम चालतारे होय वैकुंठ ॥१॥
जे जो जे जो निजानंदे आत्माराम प्रसिध्द । उपदेश ऐसें बाळा मदालसा प्रबोध । उपजोनि संसारीरे एकतत्त्व तेंचि सिध्द ॥
द्वैताअद्वैत खोडी नि:शेष आटली आस । कल्पना हो बुडालीरे सर्वदिसे ह्रषिकेश । ममता हे समूळ माया हेही न दिसे उध्दस । हरपली स्वयंज्योति ऐसा होईरे उदास ॥२॥
विकृतिभान गाढें तेथें न दिसे बिरडें । इंद्रिय रसना दृढ याचें निरसलें कोडें । मिथ्या हे मोहपाश तोडी व्यसन सांकडे । मानस परिकर हेही शोधी निवाडे ॥३॥
प्रपंच झोंबो नेदी यांचे उठवी धरणें । शरीरजन्म मरण याचें करी कारे पारणें । निवटूनि सांडी बापा सर्वभरी नारायण ॥४॥
मी माझें दुजेपण तेथें वायां घेसी लाहो । निरशी ममता बापा करि हरिनामें टाहो । शून्य हें भेदि कारे जन्ममरण निर्वाहो ॥५॥
धारणा धीट करी ध्येय पणरे हें सांडी । अखंडता निजसुख कामधामरे मांडी । स्मरता नामावळी विषय हे शरीर सांडी । क्रुररे नव्हे बापा सदां आत्मा ने ब्रम्हांडीं ॥६॥
त्रिकाळज्ञान गुज अखंड आत्मारे चेतवी । नित्यता हरिकथा विष्णु कृष्ण मनरंजवी । सकळ परिपूर्ण होशी जीव शिवरे भावी । मन ध्यान एकरुप सर्वदा हरि हा गोसावी ॥७॥
शांति निवृत्ति क्षमा दया सर्वभूती भजन । आचरण एकपक्षें सर्वरुपी जनार्दन । अलक्षसंकल्प भावी सर्व होई नारायण । विसरे कामनारे सेवी ब्रम्हसनातन ॥८॥
एकट मन करी निवृत्ति धरी निर्वाहो । चेतवितां इन्द्रियांसी आत्मारामें नित्य टाहो । सेवा सुख करी बापा प्रसन्न लक्ष्मीचा नाहो ॥९॥
सुति मांडी नाममात्रे सेवी तत्पर रसना । उपरति तितिक्षारे लय लक्षि ध्यासि ध्याना । हारपेल मी माझें होशील ब्रह्मांडयेसणा । जिव्हा हें मन चक्षु करि श्रीगुर निरोपण ॥१०॥
तुझा तूचि विदेहि पां आत्मनाथ एकतत्त्वीं । हरपति इंद्रियेरे जिवशिव एकेपंक्ती । नाहीं नाहीं अन्य रुप स्वयें परात्माज्योती । सुटेल जन्ममरण उपजेल प्रत्यक्ष दीप्ती ॥११॥
आकाश तुज माजी हरपसि परब्रह्मीं । न भजतां इंद्रियांसी हरपति यया उर्मी । बीज तें निरुपिलें सहज राहेंरे तूं समी । दमशम रिगु निगु याचा दाहारे संगमीं ॥१२॥
तटाक देहभूमीरेचक कुंभक आगमी । चंद्रसूर्य ऐसे जाणा पूर्ण परिपूर्णरे रमी । लोलुंगता रिध्दिसिध्दि धारणाते मनोरमी । होसील तूंचि सिध्द गुरुशिष्य सर्वसमी ॥१३॥
राहो नेदी विषयसुख वायां उद्वेग विस्तार । प्रेमामृत हरिनाम हेंचि सेविरे तूं सार । भजतां नित्यकाळ तुटे विषयाचार ॥१४॥
उध्दट सुख साधी जेणें दिसे आत्मनाथ । बिंबामाजी बिंब पाहे सर्व होतुं सनाथ । निश्चित निराळारे निगम साधी परमार्थ । धिटिव ऐशी आहे सर्व पुरति मनोरथ ॥१५॥
उष्णाते घोटी बापासम चांदिणें धरी । तेथील अमृतमय होई झडकरी । लक्ष हें परब्रम्हीं सदा पूर्णिमा ते सारी । निवतील अष्टही अंगें वोल्हावति शरीरीं ॥१६॥
त्रिकाळज्ञानकळा येणें साधलेंरे निज । तितिक्षा मनोवेगें नित्य प्रत्यक्ष ब्रह्मबीज । साकार निजघटीं तो प्रगटे अधोक्षज । पर्वकाळ ऐसा आहे गुरुमुखेरे चोज ॥१७॥
हें ऐकोनिया पुत्र मातें विनविता पैं जाला । उपदेश ब्रह्म लक्षी सर्वत्र केला वो काला । सांडिल्ते संप्रधार आत्मा एकत्र वो केला । कैसे हें उपदेशणें वेदांसि अबोला ॥१८॥
ऐके तूं मदलसे मज आत्मरामीं । ऐकतां वो उपदेश बहुत संताषलो उर्मी । प्रेमामृतजीवनकळा वोल्हावतु असे धर्मी । नि:शेष विषये वोते समर्पीलें परब्रह्मीं ॥१९॥
विपरीत माते आप आपमाजि थोर । चैतन्य हें क्षरलेंसे हाचि धरिला वो विचार ॥२०॥
माझा मी गुरु केला मातेचा उपदेश । न दिसे जनवन सर्वरुप महेश । निराकारि एक वस्तु अवघा दिसे जगदीश । हारपले चंद्रसूर्यो त्याच्यामाजि रहिवास ॥२१॥
अनंत नाम ज्याचें त्याचा बोध प्रगट । गुरुखुण ऐसी आहे नित्य सेवी वैकुंठ । नेणें हें शरीर माया रामकृष्ण नीट वाट । उच्चारु वो एकतत्त्व सेवा सुख वो धीट ॥२२॥
हें ऐकोनि मदलसा म्हणे भला भला भला पुत्रराया । उपजोनि संसारी रे तोडि तोडि विषया । मुक्त तूं अससी सहज शरण जाय सदगुरु पाया । आदिनाथ गुरु माझा त्या निवृत्तिसी भेटावया ॥२३॥
तेथूनि ब्रह्मज्ञान उपदेश अपार । समरसें जनींवनीं राज्य टाकी असार । यामाजि हिंसा तुज द्वेषितारे चराचर । चैतन्य ब्रह्म साचे एकरुपें श्रीधर ॥२४॥
ज्ञानदेव निवृत्तीसी शरण गेला लवलाही । हरपली निज काया मन गेले ब्रह्मा डोहीं । निरसली माया मोहो द्वैत न दिसे कांही । अद्वैत बिंबलेसें जनवन ब्रह्म पाही ॥२५॥
अर्थ:-
चरित्रांत केल्याप्रमाणे मदालसा आपल्या मुलांना उपदेश करीत आहे हे पुत्रा परमात्म्याच्या ज्ञानाकरिता श्रीगुरूमुखांने उपदेश ग्रहण करून एकनिष्ठपणाने वैराग्य, ध्यान व ज्ञान संपादन केले असता प्रपंच ज्ञान बाधित होऊन दृष्ट अदृष्ट पदार्थाचा आत्मदृष्टीने लोप होऊन जातो. जगतच नाही असा अजातवांदाचा सिद्धांत पटल्या नंतर जगताची उत्पत्ति स्थिति व अंत हे भाषाच उरत नाही. एक सच्चिदानंदस्वरूप ब्रह्मच आहे व ते माझे स्वरूप आहे असा निश्चय होतो. पण अशा भूमिकेला प्राप्त होण्याला अनेक जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण घडले पाहिजे. तरच परमात्मा प्रगट होतो. हे बाळा, तूं आत्मानंदा विषयी सावध रहा हा उघड उपदेश मी तुला करीत आहे. कारण जन्माला येऊन जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करणे हेच एक मनुष्य जन्माचे साध्य आहे दैत तत्सापेक्ष अद्वैत यांचा समूळ निरास करून टाक व अशा कल्पना ह्या टांकून देऊन तूं सर्वत्र ऋषिकेशी परमात्मा भरला आहे. असे पाहा. म्हणजे माया ममता या ओसाड होऊन जातील. जेणे करून स्वयंप्रकाश परमात्म्याच्या ठिकाणी त्या नाहीशा होऊन जातील. असा तूं देहादि पदार्थाविषयी उदास होऊन जा. जगतांचे भान दुःखदायक असून त्यातून सुटण्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. जिव्हादि इंद्रिये बलवान आहेत. यातून कसे सुटावे? इत्यादी कोडी आपोआप सुटतात. मिथ्या दुःख देणारा मोहपाश तोडून टांक व्यसनाने संकट, तसेच कष्ट देणाऱ्या मनास प्रपंचाचा विचार कर व त्यांत सत्य काय आहे ते पाहा. दुःख देणारा प्रपंच,शरीर, जन्ममरण ही सर्व अज्ञान कार्ये आहेत. याचे जे अज्ञान त्याचा नाश करून सर्व नारायण स्वरूप आहे असा निश्चय कर.ज्या व्यवहारांत हा मी आहे. हे माझे आहे व हे दुसऱ्याचे आहे. याशिवाय दुसरी गोष्ट नाही. याला कारण असणाऱ्या अहं मम बुद्धीचा नाश कर. व ज्या अज्ञानामुळे जन्ममरण दिसतात त्याचाही नाश करून भगवन्नामाचा टाहो फोड. काम क्रोध सोडून धैयनि सतत ध्यान कर पण ध्येयाला भिन्न पाडु नको. असे नामस्मरण केले तर हे दुष्ट विषय शरीरातून जातील.आत्मा नित्य ब्रह्मरूप आहे. असा निश्चय कर.हरिकीर्तनांत, नामस्मरणांत मनाची करमणूक करून घे. व मनालाही नित्य एकरूपाने व सर्वास अधिष्ठान असणाऱ्या हरिचे ध्याने लाव तसेच ज्ञानस्वरूप सर्वांतरयामी अखंड अशा आत्म्याचे ज्ञानाचा प्रयल कर. शांती, विषयापासून मनाची निवृत्ति,क्षमा, दया, आणि सर्व प्राण्याविषयी आत्मत्व बुद्धि असू दे. तसेच सर्वाभूती भगवत्भाव ठेऊन कल्पनेतील व कल्पनेच्या पलीकडील पुढे होणारे सर्व परमात्मरूप आहे. असे समजून, वैषयीक इच्छा सोडून सनातन ब्रह्माचे ध्यान कर. मन एकाग्र करून विषयापासून निवृत्त होण्याचा प्रयल कर जर विषयांनी इंद्रियांना जागृत केले तर मोठ्याने आत्मारामाविषयी नामस्मरण कर. आनंद देणारा लक्ष्मीचा पति जो नारायण त्याचे चिंतन कर. सोडणे किंवा तोडणे हे ज्या जिव्हेमुळे होते. ती जिव्हा नामस्मरणांत तत्पर ठेव वैराग्य,कष्टावाचून दुःख सहन करणे व परमात्म्याच्या ठिकाणी मनाचा लय करणे असे केले तर अहं मम’ अध्यास जाऊन ब्रह्माएवढा व्याप्त होशील अरे तुझी वाणी, मन, डोळे, इत्यादि इंद्रिये श्रीगुरूंच्या किर्तनांत तत्पर ठेव.इंद्रियांचे तडाख्यात न जाता तूं आपल्या आपल्याशी च विचार करशील तर मला देहसंबंध नसून एकरूप परमात्म्यातच मी आहे. असे ज्ञान प्रगट होऊन जन्ममरणांतून सुटशील. इंद्रियांना विषय न दिलेस तर त्यांची कसमस मोडून आकाशादिप्रपंचासह तुझा परमात्म्यांत लय होईल हे वर्म तुला सांगितले.आतां ब्रह्मत्वाचा निश्चय कर जीवब्रम्हैक्यज्ञानानंतर शम, दम,इंद्रिये विषय संबंध या सर्वांना मिथ्याच ठरते. देहरूपी किनाऱ्यावर रेचक, कुंभकरूपी उगवणारे चंद्र सूर्य आहेत. असे जाण त्या ध्यानैक तत्पर होऊन मन रममाण झाले तर तुला रिद्धिसिद्धी प्राप्त होतील. व गुरू शिष्यांच्या ठिकाणी एकरूपाने असणारे परमतत्त्व तूंच होशील प्रेमामृतरूपी व सर्वांचे सार ते घेतले असता संसारच निवृत्त होतो. असेच नेहमी नामस्मरण करशील तर विषय सुटून वृत्ति एकाकार होईल.आत्मज्ञानाने परमसुख प्राप्त करून घे. सर्व जीवांमध्ये एक परमतत्त्व बघ व तूही परमात्मरूप हो ज्या योगाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.त्या वेदांने सांगितलेल्या निश्चित मर्गानी परमार्थ साध. ताप नाहीसा करून शीतलत्व देईल अशा चांदण्यातील परमात्मरूप पौर्णिमा पहा. व चंद्राचे ठिकाणी तूं चकोर पक्षी होऊन अमृतमय हो. त्यायोगाने शरीर शांत होऊन अष्टसात्त्विक भाव उमटतील.अशा त-हेच्या साधन चतुष्टय संपत्तीने स्वतःचे ज्ञानस्वरूपत्व प्राप्त होईल. तितिक्षेसह तीव्र इच्छेने प्रयल केला तर या शरीरांतच ब्रह्मभाव प्रगट होईल. असे हे गुरूमुखांने श्रवण करणे ही मोठी पर्वणीच आहे. हा उपदेश ऐकून मुलगा म्हणतो.ज्या परमात्मवस्तुबद्दल वेदही गप्प बसतो. अशा लक्ष्यब्रह्माच्या उपदेशाने सर्व अनात्मवस्तुंना मिथ्यात्व ठरून एकच आत्मा सर्वत्र व्याप्त कसा आहे. हे समजल.आई हा आत्मबोध ऐकून मला अतिहर्ष झाला. या उपदेशरूपी प्रेमामृत जीवनंकलेने अष्टसात्त्विक भाव उत्पन्न होऊन सर्व विषयही ब्रह्मरूप झाले. माझी काय विलक्षण स्थिति झाली आहे ही पहा. मी माझ्यामध्ये मावेनासा झालो. मला तर असे वाटते की परमात्मा जगतरूपाने नटला आहे. आई तुझ्या या उपदेशाने आता मी, माझा गुरूने हे सर्व जगत भिनत्वाने प्रतितीला येत नसून चंद्र सूर्यादि सर्व निराकार परमात्मरूपच दिसते. या जगदीशाने सर्व व्यापले आहे व त्यामध्येच माझा रहिवास आहे.असा बोध असून शरीरासह मायाकार्य जगताचे भान नष्ट होऊन नामस्मरणांत दंग असणे ही अनंताचे ज्ञानाची व नित्यमुक्ततेची गुरुखूण आहे. म्हणून निर्भय व अद्वैत आनंदरूप व्हावे. असे मुलांचे बोलणे ऐकून मदालसा म्हणते. बाळा धन्य आहे तुझी, विषयाचे पाश तोडणे हे मुख्य आहे. तूं मूळचा मुक्त आहेस म्हणून अदिनाथांच्या परंपरेतील सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ त्यांना शरण जा. सर्व ठिकाणी समब्रह्मच आहे. या दृष्टीने असार म्हणून प्रपंच टाकलास तर ठिक, नाहीतर त्यांचा व्देषाने त्याग केला तर ती हिंसा होईल. ब्रह्मचैतन्य एकरूपाने सर्वत्र व्याप्त आहे.मी गुरूनिवृत्तीनाथांना शरण झाल्याबरोबर अज्ञान व अज्ञानकार्य जगत नाहीसे होऊन मनासह स्वतःचे शरीर ब्रह्मरूप झाले. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे हे जाणून जनवन सर्वत्र अद्वैत ब्रह्मदृष्टी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७३१
उपदेश अगोचर उपदेशी अगोचर मदलसा पुत्रालागीं रहीवासु ।
ध्यानरुप येक करी सर्वाघटीं महेशु ।
जातिधर्म लोपि बा न करी तूं आळसू ।
उठि जाय योगपंथें जेथें वैकुंठ निवासु ॥१॥
जे जो जे जो नित्य हरि जनीं वनीं जो अहे ।
त्याचें तूं ध्यान करी नित्य तेथेंची राहें ।
परतोनी येवों नको प्रपंच न पाहे ।
जठराग्नीं पचों नको वेगीं तूं योगिया होय ॥२॥
जपतप वाचे एक अखंड श्रीराम उच्चार ।
नित्य धर्म संताचारे हाचि करीरे विचार ।
संगदोष बोधिती तुज म्हणोनि होई खेचर ।
अतळों नको द्वैतबुध्दि सदा अद्वैत निरंतर ॥३॥
एक लक्ष एक पक्ष एक तत्त्व ह्रदयीं ।
एक ध्यान एक मन याचे लागे तू सोयी ।
एक हरि हाचि खरा एक नेम तूं राही ।
अणिक जपों नको देवोदेवीं काहीबाहीं ॥४॥
देव तो वैकुंठींचा निरालंबीरे आहे ।
निराळा सर्व जीवां म्हणोनी ध्यातु आहे ।
जीव हा शिव करी ऐसे करुनियां राहे ।
रामनाम मंत्र ध्वनि कळिकाळ वास न पाहे ॥५॥
कोहं हे उपजतां टाकिलें तुवां सोहं ।
गर्भी होतासि सावध आतां म्हणतासि हूंहूं ।
अहंकार जपों नको मन मुंडि संमोहे ।
एकट मन करि रामनामीं धरी भाव ॥६॥
शांति करी जीवशिवी सर्व क्षरलासे हरि ।
क्षमा दया बहिणीं तुझ्या माया सांडी भीतरीं ।
बंधु पिता सखि जेंणें टाकि तूं दुरिच्या दुरी ।
मत्सर हा घेवों नको मद टाकी तूं दुरिच्या दुरी ।
मत्सर हा घेवों नकों मद टाकी हा बाहेरी ॥७॥
हरिरुप निखळ आहे योगी जाणती यासि ।
अंतर तें दुरांतर हें तूं जप मानसीं ।
कर्म हें ब्रह्म जाण ऐसा होई समरसीं ।
तत्काळ होशी योगी संदेह नाहीं त्यासी ॥८॥
सत्त्व रज तमीं गुंफ़ो नको एकतत्त्वीं आहे भाव ।
नानातत्त्वीं धरिसी व्यर्थ मग तुज न पवे देव ।
मी माझे वाहों नको व्यर्थ करिशी उपाव ।
शिणलासि येतां जातां हा तुज नाहीं आठव ॥९॥
शरीर हें नव्हें तुझें तरुण बाळरे वृध्द ।
जंववरी सावध आहे तंववरी करी प्रबोध ।
एकनामीं विष्णुचेरे जाणती तेचि सिध्द ॥१०॥
नि:शंक मार्ग चाली आडकाठी नाहीं तेथें ।
विहंगमी चाड धरी पिपीलिका नेघे हीत ।
अजप तेथें जपे सदापूर्ण अनंत ।
न धरी विकल्प कांही उध्दरसि त्त्वरित ॥११॥
कामना चित्तवृत्ति अनुग्रह हे उपदेश ।
ग्रहभूतपिशाचरे याचा नव्हे तुज त्रास ।
कळिकाळ पडेल तेथे पावसि परमपरेश ।
झणें हे पावसी शरीर न करी न करी आळस ॥१२॥
अंतीं अंत ऊर्ध्व अध दश दिशां नांदे एक ।
हरिविण न दिसे कांहीं संत जाणती विवेक ।
निरलसी त्यांची माया हरि भरला दिसे एक ।
नयनीं दृष्टि चोख जैसा अमृता चा मयंक ॥१३॥
योगिया तूंचि जाण योगयाग तयें हरि ।
न भजे हरिविण उगा नसे क्षणभरी ।
रामकृष्ण वाचे सदां नित्य जपे निरंतरी ।
हरि ध्यान ऐसें आहे पुत्रा हेंचि तूं स्वीकारी ॥१४॥
लोपतील मन संग संग भंग सांगडी ।
अवचिती पडेल कव जन्ममरणाची उडी न गिळे आयुष्य तुज
मनुष्य जन्मअर्ध घडी उठिचि उठोनिया जाय तूं तांतडी ॥१५॥
विवेक करि बाळा पुराणप्रसिध्द पाहे ।
वेदशास्त्रें बोलिले हरि हें पाहोनि उगा राहे ।
योगिये विसावले तेथें दिव्यचक्षू करुनि पाहे ।
सत्रावी हे संजीवनी उलट करी लवलाहे ॥१६॥
मातृका भेदुनियां षटचक्रे टाकी वेगी ।
तेथें तूं गुंफ़ो नको चाल विहंगममार्गी ।
अनंत सिध्द गेले ऋषीमुनीच्या संगीं ।
नारदादि अवधुत ते प्रपंची नि:संगीं ॥१७॥
हनुमंत कपिराज भीष्मादिक उत्तम ।
परिक्षित प्रल्हाद ते पैं जाले आत्मराम ।
ध्रुव आणि अंबऋषी पावले वैकुंठ धाम ।
यांचा तूं संग करी होईकारे नि:काम ॥१८॥
मदलसा म्हणे पुत्रा ऐसा आहे उपदेश ।
भाव गर्भीचारे तुज विचरे पृथ्वी नि:शेष ।
सरता होई संतामाजी चित्तीं ध्याई ह्रषीकेश ।
परब्रह्म तूंचि होसी ऐसें बोलियेले व्यास ॥१९॥
शुक्रादिक पुत्र ज्याचे तो साक्षात नारायण ।
अवतरले मनुष्यवेषें तारियेले अवघे जन ।
ऐसाचि होई तूरे विसरे मीतूं पण ।
उठी जाये उर्ध्व पंथे करिल कृपा हरि आपण ॥२०॥
नाम हें अमृतसिंधु ह्रदयीं जपे सदाकाळ ।
नाहीं तुज रोगराई तुज देखोनी पळेल काळ ।
हरिसि जो विनटला तयां नाहीं काळ वेळ ।
नामधारकाचें तीर्थ वंदी तीर्थकल्लोळ ॥२१॥
पुत्र म्हणो अवो माते गुरु तूंची जालीसी ।
नसवे क्षणभरी जपतप मानसीं ।
हरि हा श्रेष्ठ राणा तूंची तारक जीवासी ।
भवार्णवीं तारियेले म्यां दृढ धरिलें मानसीं ॥२२॥
खेचर बुध्दि केली खेळिनलों चौर्‍याशीं ।
खुंटल्या जन्मयोनी पावलों मोक्षसुखासी ।
खेचराखेचर माये मी तुझा वो उपदेशी ।
गुरुगम्यउपदेशिलें शिष्य निवाला मानसीं ॥२३॥
अर्थ:-
मदालसा आपल्या मुलाला निर्गुण अशा परमात्म्याचा उपदेश करते की बाह्य जाति धर्मादि उपाधिचा त्याग करून सर्वत्र एकच वास्तव्य करणारा परमात्मा आहे. असे ध्यान करण्यात आळस करू नको. परमात्म दर्शनाकरिता योगमार्गाचा आश्रय कर सर्वत्र व्याप्त नित्य अशा श्रीहरीचे ध्यान कर व तूंही तेथे वैकुंठ विश्रांती घे. जो नित्य श्रीहरि जनावनांमध्ये आहे त्याचे तूं ध्यान कर. गर्भवासांत ढकलणाऱ्या प्रपंचांत पुन्हां येऊ नको. व योगी हो. ज्यांनी अखंड श्रीरामाचे उच्चारण करणे होय व हाच संतांचा नित्यधर्म आहे. व तेच तूं कर, संबंधात किती दुःख आहे. हे जाणून एकांतांत बसून द्वैतबुद्धीवर न येता नेहमी अद्वैत स्थितीत राहा. ब्रह्म लक्ष्य आहे. अद्वैत हा एक पक्ष आहे व परमात्मा हे एकच तत्त्व आहे. व त्याचे हृदयांत ध्यान कर तेथेच मन ठेव हरि हाच सत्य असून हाच नियम कर. याशिवाय दुसऱ्या देव देवतेची कांही जप पुजा करू नको. देव वैकुंठात दूर असून माझ्याहून भिन्न आहे. असे भ्रमाने वाटते. म्हणून ध्यान करतो. पण जीव शीव म्हणजे ब्रह्मरूप आहे असे ज्ञान करून घेण्याकरिता रामनाम मंत्राचा ध्वनी कर व त्यायोगाने काळाच्या तडाख्यात तूं सापडणार नाहीस. गर्भात असतांना तुला तो परमात्मा मी आहे. असे ज्ञान होते पण जन्मल्याबरोबर ते ज्ञान टाकून मी कोण आहे. असा भ्रम झाला. म्हणून आता रडत आहेस. म्हणून मोह टाकून अहंकार व मन यांचा नाश कर व मन एकाग्र करून रामनामाच्या ठिकाणी भाव धर. भाऊ बाप यांच्याबद्दल ममत्व वाटण्याला कारण असणारी माया अंतःकरणांतून टाकून दे. क्षमा, दया या बहिणी आहेत. त्यांचा सांभाळ कर मद, मत्सर, दूर टाक. व ज्या परमात्म्यापासून जीव शीवादि हे सर्व जगत झाले. तनिष्ठ हो. अंतःकरणच द्वैत उत्पन्न करते.हे लक्षात ठेव. योगी हे सर्व शुद्ध आहे. असे जाणतात.कर्मसुद्धा ब्रह्मरूप आहे. असे समत्व आल्यावर तूं ताबडतोब योगी होशील. यांत शंका नाही. सत्त्वादिक गुणांत न पडता एक परमात्म तत्त्वातच राहा निरनिराळ्या ठिकाणी भक्ति ठेवलीस तर परमात्मप्राप्ती न होता फुकट श्रम मात्र होतील. तसेच हा मी व हे माझे असा अभिमान धरू नकोस.अरे इतर उपाय सापडलास याची तुला आठवण नाही. तारूण्य वृद्धावस्थेत जाणार म्हणून शरीराचा भरवंसा न धरता इंद्रिय कार्यक्षम आहेत. तोपर्यंतच ज्ञानमार्ग धर अरे जे विष्णु या नावांचा नामि परमात्मा एकच आहे. असे जे जाणतात. ते मुक्त होतात.ह्या मार्गाचे खुशाल अनुकरण कर. यांत आडकाठी नाही. मात्र त्यामध्ये ध्येय निश्चित कर.उगीच देहाच्या नश्वरतेमुळे पिपीलिकेचे जसे निश्चित हित होत नाही. त्याप्रमाणे निश्चित होण्याची शाश्वती नसल्यामुळे तूं विहंगममार्गाची इच्छा धारण करून, वाणीला विषय न होणारा व सर्वत्र व्याप्त अशा परमात्म्याचे विकल्परहित बुद्धिने चिंतन कर म्हणजे तुझा उद्धार होईल. हा उपदेश तुझ्या ठसला तर कल्पनाग्रह भूतपिशाच्च यांचा त्रास न होता कळिकाळ लांब पळून जाईल. व परमेश्वराला प्राप्त होशील. त्यामुळे शरीर प्राप्त होणार नाही. म्हणून तूं नामस्मरणाविषयी आळस करू नको. संतांनी मायेचा निरास केल्याने आतबाहेर वर खाली दाहिदिशेत एकच परमात्मा भरला आहे. असा संतांचा विवेक असतो. अमृताच्या समुद्राप्रमाणे त्यांची दृष्टि शुद्ध ब्रह्मरूप झालेली असते. वाचेने नामस्मरण अंतःकरणांत सर्वत्र सर्वकाळ त्याचाच जप योग, याग, तप सर्व हरिरूप असून परमात्मचिंतनाशिवाय ज्याचा एक क्षणही जात नाही. तोच योगी आहे अस समज. व तसेच आचरण कर. वृद्धपणांत इंद्रिय दुर्बल, नालायक होऊन बुद्धिभ्रंश होतो. मरणाची वेळ आली म्हणजे मिळविलेले ऐश्वर्य ही उपयोगी पडत नाही. आणि मागितले तरी अर्धी घटकाही आयुष्य जास्त मिळणार नाही. म्हणून ताबडतोब उठ, व श्रीगुरूला शरण जा. पुराणांत प्रसिद्ध असलेला, वेदशास्त्रांनी सांगितलेला आत्मानात्म विवेक कर. व ज्या ठिकाणी योगी विश्रांती घेतात ते ठिकाण समाधीच्या योगांने वृत्ति अंतर्मुख करून आणि सत्रावी जीवनकला हेच कोणी एक अमृताचे सरोवर आहे. ते उलट करून स्वाधीन करून घे व परमात्मरूप होऊन त्याचठिकाणी राहा. मातृकासह षट्चक्राचे पलीकडे जा, ध्येयाकडे नजर ठेव. त्यांत त्याचठिकाणी आनंद मानू नको. आणि विहंगम मार्गानी चाल. संसार सोडून नारदादि अवधूतज्ञानी ऋषिच्या सहाय्याने परमपदाला प्राप्त झाले प्रपंच टाकून कपिराज मारूति, ज्ञानसंपन्न भीष्म, परिक्षिती, प्रल्हाद, ध्रुव अंबऋषी वगैरे जे ज्ञानसंपन्न होऊन मोक्षाला गेले अशा सारख्यांची संगती कर आणि निष्काम ब्रह्मरूप हो. मदालसा म्हणते, पुत्रा ! गर्भात जे तुला ज्ञान होते तोच तूं आहेस. भगवंताचे अंतःकरणांत ध्यान करून पृथ्वीवर सर्व तीर्थे क्षेत्रे पहा व संतांमध्ये सरता हो. हाच उपदेश भगवान व्यासही सांगतात. त्यांचे चिरंजीव शुकाचार्य हे भगवत् अवतार असून मनुष्यदेह धारण करून त्यांनी लोकोद्धार केला. तेंव्हा तूंही मीतूंपणाची द्वैतबुद्धि टाकून ज्ञानमार्गाने जा. मग हरि स्वतः तुझ्यावर कृपा करील. हरिनामाचा जप सर्वकाळ कर नामस्मरण हा अमृताचा समुद्र आहे. म्हणून त्याचा हृदयांमध्ये जप कर त्या योगाने तुला रोगराई न होता, मृत्यूही लांब पळून जाईल. अरे हरिरूप जो झाला त्याला मृत्यु कोठला? या नामस्मरण करणाऱ्याच्या पादरजकणांनी तीर्थे पवित्र होतात. मुलगा म्हणतो माझे श्रीगुरू दुसरे कोण? तूंच आहेस. मी क्षणभरसुद्धा नामस्मरणावांचून राहात नाही. हरि हा श्रेष्ठ तर खरा. पण अज्ञानी जीवांचा उद्धार करणारी तूंच आहेस. संसार सागरांतून मला वर काढणारी तूंच आहेस.असे मी निश्चित मनामध्ये धारण केले आहे. चौयांशी लक्षयोनि हिंडता हिंडता आज तुझ्या उपदेशाने परमात्मबुद्धि होऊन जन्ममरणांतीत झालो. आणि मोक्षसुखाला प्राप्त झालो. गुरूने शिष्यास करावयाच्या या तुझ्या उपदेशाने मी क्षराक्षरातीत होऊन समाधान पावलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७३२
उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज ।
सांडि सांडि मायामोहो मुक्त विचरेरे सहज ।
आशा मनसा गुंफ़ो नको सोहं धरिकारे नीज ।
अखंड गुरुचरणी मोन्य धरिकारे काज ॥१॥
उपदेशी मदलसा निजकारे आधीं ।
पूर्णबोधें उमजेरे हेंचि साधी समाधी ।
लटिका हा मायामोह लक्ष लावा गोविंदीं ।
सांडि मांडि कोहंवेगीं लीन होई परमानंदीं ।
जे जो जे जो जे जो बाळा ॥२॥
चौर्‍यांशीलक्ष जीव जंतु शिणले योनी येतां जातां ।
विरळा देखों परतला जो पारुषला संपूर्णता ।
मनबुध्दि एकचित्तें दृढधरी अनंता ।
उपरति चित्तें करी सावध होई त्त्वरिता ॥३॥
जन्म हें दुर्लभ जाणा मनुष्यजन्म अगाध ।
ज्ञानध्यान बुझिजे आधीं वरी गुरुचा प्रबोध ।
तरीच साधेल तुज नाहीं तरी होसी मूढ अंध ।
नेमिलें आयुष्य वेचे कोण कोण तोडी भवबंधकंद ॥४॥
नवमास होतासि गर्भी अधोवदनें दु:खित ।
तैं होता उमजुतुज कारें येथें निश्वित ।
परतोनि पाहे वेगीं मनीं धरी अच्युत ।
तुटेल योनिपंथू मग तूं सर्वातीत ॥५॥
जंववरी माझें माझें मन न संडी तुझें ।
तंववरी मोहोपाश व्यर्थ धरणिये ओझें ।
विष्ठामूत्र जंतगर्भी म्यां वाहिलें तुझें ओझें ॥६॥
उठीं पुत्रा सावध होई मी माझे सांडि धरी ।
कोशकिटके जन्मलासि तैसें तूं बा न करी ।
आपण्या आपण होसी तुझा तूंचिरे वैरी ।
जंव नाहीं आलें काळचक्र वेगी स्मरे मुरारी ॥७॥
इंद्रियें सावध अहाति तव करी धांवा धांवी ।
मग विस्मृति पडेल बुध्दि मगन साधे हरि गोसांवी ।
सर्वघटी हरि ध्याय मनचक्षु एकभावी नारायणनामपाठ वेदशास्त्र अनुभवी ॥८॥
दिननिशीं शरीर तुझें
बाळतरुणवृध्द होय । काया हे नव्हे तुझी
सांडी सांडी ममता माया । निर्गुणरुप हरिहरु त्यासि
तूं शरण जाय । सगुणीं झोंबों नको
हरिरुपीं तल्लीन राहे ॥९॥
मृगजळ मायपूर व्यर्थ इंद्रियांचि झोंबी ।
कामना लपवी आधीं लय लावी हरिच्या बिंबी ।
चक्षें पक्षें मन गोवी बिरडें घाली निरालंबी ।
शुध्दबुध्द तत्त्व हरि एकतत्त्व नितंबी ॥
गुरुगम्य आगमाचे हेंचि तत्त्व उत्तम ।
सत्त्व रज तमीं गुंफ़ो नको मा मार्ग धरी उत्तम ।
प्राण लपवी प्राणामाजी वासनाकारी नि:ष्काम ॥१०॥
हेंची साधन योगियांचें शिवाचें मनोगत ।
उठोनियां प्रातकाळीं तनुमनध्यान नित्य ।
जागरणिं हरिकीर्तनी उध्दरसी त्त्वरित ।
नाशिवंत शरीर जाण मग तुज न घडे हित ॥११॥
क्षणां एका शरीर नासे हें तुझें तुज न कळे ।
अवचिता येईल काळ झांकतील देखणे डोळे ।
मग हें नाठवे तुज करि गुरुमेळीं निर्मळ ।
सांडी मांडी करुं नको टाकिं टाकी मनीचे सकळ ॥१२॥
व्यर्थरे राहासी येथें पडशील मोहोफ़ांसा ।
दशदिशा हरि आहे ऊर्ध्व अध महेशा ।
मही हे अंथरुण आकाश करी अवकाश ।
या परि विचिरें रे राहवें प्रमाण सरिसा ॥१३॥
तत्त्व हें एकरुप हरिविण नाहीं कोठें ।
द्वैतभाव न धरी मनीं नीटजाय वैकुंठ ॥
हा मार्ग योगियांचा संत गेले नीट वाटे ॥१४॥
सनकादिकां पंथ हाचि सेविला उपजंता ।
नारदें विचार केला मग न राहे तो निवांता ।
गोरक्ष बुझला वेगी दृढ कास हनुमंता ।
अवधूत याचि परि दत्तामाजी पूर्णता ॥१५॥
उन्मनि साधी बाळा रुप न्याहाळी नयनीं ।
नासिकीं ठेऊनि दृष्टि खेंचरी मुद्रा निर्वाणी ।
शरीर हें असों जावों याची न करी तूं करणी ।
रामकृष्ण वाचा पाठ हेंचि धरी निर्वाणी ॥१६॥
अष्टदळ ह्रदयी आहे तोचि आत्मा ये करी ।
मन बुध्दि वित्त चित्त दिसों नेदी वोहरी ।
मातापिता प्राण तुझे तो दाखविल शरीरीं ।
स्त्रीपुत्र इंद्रियद्वारा सांडी परति माघारी मन हें
कोंडी पिंडीं तंतू तुटो नेदी याचा ।
मार्ग हे जिव्हे पारुषरे हरिरामकृष्ण वाचा ।
रिकामा क्षणभरी पंथ धरी प्रेमाचा ।
आदि मध्य हरि एक तोचि ध्यायीं ह्रदयींचा ॥१७॥
श्रवण स्मरण करि काळघाली आंकणा ।
भीष्में साधिलें हरि तो पावला नारायणा ।
लक्ष्मणें धरिली वृध्दि वोळगिला रामराणा ।
निमिष्य एक न भरतां शरीर सांडिले प्राणा ॥१८॥
हित तेंचि करी बाळा हरि प्रेमें मन करी ।
सावधान चित्त आहें तंव सर्व हे दृष्ट निवारी ।
भुली पडेल अंती तुज मग नाहीं कैवारी ।
ममतेचें बिरडें फ़ेडी उठे चाले योगरीतीं ॥१९॥
म्हणे माते परियेसी कैसे उपदेशिलें ज्ञान ।
गुरु हा कोण करुं अवघे दिसें विज्ञान ।
मज याचें स्मरण झालें सोहं होतें मज ध्यान ।
कोहं हें विसरलों जालें संसारमौन्य ॥२०॥
परतले प्रेमभाव उब्दोध आला धांवया ।
कळिकाळ न दिसे दृष्टि पापपुण्य राहावया ।
सभराभरित हरि दिसेमाझें कैचें उरावया ।
तूं तव विदेही माया मदलासा मज राखावया ॥२१॥
मदलसा म्हणे पुत्रा जो उपदेश करुणा ।
ब्रह्म हे जीवी शिवीं भोगि योनी नारायणा ।
शांति क्षमा बाणली तुज कैचें उमटलें गुज ॥२२॥
हे स्थिति बाणली ज्यासी तो मी परिपूर्ण योगी ।
दया मुक्ति जाली दासी नित्य उन्मनी भोग भोगी ।
त्याचिया दर्शनें जीव तरतील वेगीं ।
उठि पुत्रा जाय पंथे जेथें जेथें सत्रावी उगी ॥२३॥
मुक्तामुक्ता अभयदान मुक्त जाला अनुभवी ।
राहिली निरलंबी रातलासे सतरावी ।
मुक्ताई मुक्त ज्ञाने मदलसा नांवानांवी ।
मुक्तलग उपदेश चांगयास दिधला पाही ॥२४॥
अर्थ:-
बाळा, ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचे वर्म ऐक मायामोह यांचा त्याग करुन तो परमात्मा मी आहे या ज्ञानाने मुक्त होऊन, सहज वृत्तिने च राहा. आशा तृष्णादिक सोडून संसारा विषयी मौन धरुन नेहमी गुरुचरणी राहा. मदालसा उपदेश करते बाळा स्वतःचे ब्रह्मरुपाने ज्ञान करुन घेणे हाच समाधी सिद्ध कर हा मायामोह खोटा आहे. म्हणून मोह टांकून गोविंदाच्या ठिकाणी लक्ष्य लावून व कोऽहंचा त्याग करुन परमानंदरुप होऊन तेथेच विश्रांती घे. जन्ममरणाच्या फेऱ्यांत सापडून दुःख भोगणारे पुष्कळ आहेत. पण त्यातून पूर्णतेने सुटलेला क्वचितच विरळा म्हणून वैराग्याने व एकाग्र चित्ताने ताबडतोब परमात्म चिंतनाला लाग. एकंदर जन्मामध्ये मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ, ज्ञान काय ? ध्यान कोणाचे करावे? हे जाणून गुरुचा अनुग्रह होईल तर ठिक नाही तर मूर्ख ज्ञानशून्य अशा स्थितीत आयुष्य निघून गेले तर हे अज्ञान कोण निवृत्त करणार? तूं नऊ महिनेपर्यंत गर्भात खाली तोंड करुन दुःखांत होतास त्यावेळी तुला ज्ञान होते. मग येथे स्वस्थ का बसलास? संसाराकडे पाठ करुन भगवंताचे स्मरण कर म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटून परमात्मरुप होशील. जोपर्यंत हे माझे, ते माझे, असा व्यवहार मनापासून सुटत नाही. तोपर्यंत मोहपाश आहेच व तुझे अस्तित्व हा भूमिला फुकट भार असून विष्ठा, मूत्र, जंताने युक्त असलेल्या गर्भामध्ये मीही नऊ महिने तुझे फुकट ओझे वाहिले. असे मला दुःख होईल म्हणून सावध हो. व मी माझे टाकून दे. किडे, जंतू जसे फुकट जन्मून मरतात. तसे तूं करु नको. हा उपदेश न ऐकशील तर तुझा तूंच शत्रू होशील. म्हणून तुझ्यावर यमाचा फेरा आला नाही तोच मुरारीचे स्मरण कर. इंद्रियें कार्यक्षम आहेत. तोच परमार्थ साधून घे. नाही तर वृद्धपणी बुद्धीला भ्रम होईल. मग परमात्मप्राप्ती होणार नाही. मनाला डोळ्याला हरि हाच विषय ठेवून सर्वत्र हरिच आहे, असा नारायणनाम पाठ हा वेदशास्त्राचा अनुभव घे. दिवसेंदिवस तूझे शरीर पुढचे अवस्थेत जात आहे. इतर पदार्थ तर राहू द्या. पण हे शरीरही तुझे नाही तेव्हां याबद्दल ममत्व बुद्धि टांक. सगुणांच्या ठिकाणी खटपट न करता निर्गुण जे हरिचे स्वरुप त्यांत तूं तल्लीन हो. मृगजळाप्रमाणे असणाऱ्या संसारांत ज्यामुळे इंद्रियांच्या खटपटी चालल्या आहेत ती इच्छाच हरि स्वरुपांकडे लाव. चक्षुरादि सर्व इंद्रियांना कोठून नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा एका परमात्म्याचाच आश्रय कर. सत्त्व, रज, तम गुणांत न राहता प्राणायामाचे योगाने वासनाक्षय करुन सांगितलेल्या मार्गाचा आश्रय करावा. हेच गुरूंच्या उपदेशाचे व वेदाचे उत्तम सार आहे. शरीर नाशिवंत असल्यामुळे प्रातःकाळी उठल्याबरोबर परमात्म्याचे ध्यान करावे. हेच योगाचे साधन असून शीवसूत्रात हेच सांगितले आहे. तसे केले नाहीतर तुझे कल्याण होणार नाही. शरीराचा नाश केंव्हा होईल. ते तुझे तुलाही कळत नाही. मृत्यु केव्हां येऊन झडप घालील व हे तुझे उत्तम डोळे केव्हां मिटतील याचा भरवंसा नसल्यामुळे आज करु. उद्या करु असे न म्हणता अगोदर अंतःकरण शुद्ध करुन गुरुमुखाने स्पष्ट ज्ञान करुन संसारांत राहिलास तर फुकट मोहपाशांत पडशील, पृथ्वी हेच अंथरुण, परमात्मा हे राहावयांचे ठिकाण यारितीने वेदाज्ञेप्रमाणे दाहिदिशेत हरिच व्याप्त आहे असे समज.द्वैतभावरहित एकच परमतत्त्व आहे त्यांचे ज्ञान संपादन करुन सरळ मोक्षाचा मार्ग आक्रमण कर याचमार्गाने योगी संत गेले आहेत. याचे अवलंबन न करणारे संसारांत अडकून भलत्याच वाटेला लागले. सनकादिक ऋषिनी जन्मताक्षणी हाच मार्ग स्वीकारला. नारदादिही विचार करुन याच खटपटीला लागले. यांचज्ञानाने गोरक्षनाथ समाधान पावले. मारुतीनेही रामसेवेकरिता कांस बांधली. अवधूतही या ज्ञानाने पूर्ण दत्तरुप झाला. म्हणून शरीराची काळजी न करता नित्यनामस्मरण ठेऊन, आसनावर बसून नाकांच्या शेंड्यावर दृष्टि ठेवून, खेचरी मुद्रा करुन, व परमात्मस्वरुपाचा साक्षात्कार करुन ज्ञानावस्था प्राप्त करुन घे. स्त्री, पुत्र, विषय यांचा संग टांक आई बाप हे तुझे जिवलग खरे. पण ते पुन्हा शरीरांतच घालतील. म्हणून मन, बुद्धि, चित्त यांना बाहेरचे विषय न दावितां हृदयांत अष्टदल कमलाचे ठिकाणी, आत्मा आहे. तो स्वाधीन करुन घे. जिभेचे दुसरे सर्व विषय सोडून क्षणही फुकट जाऊ न देता प्रेमाने नामस्मरण कर व मनाने परमात्मचिंतनाचा धागा तुटू न देता त्याला शरीरांचे आंत कोंडुन ठेव सर्वत्र व हृदयांत असणाऱ्या हरीचे ध्यान कर. एका क्षणांत प्राण शरीरांतून निघून जाईल. म्हणून प्रत्येक क्षणी वेदांत श्रवण किंवा नामस्मरण कर. कारण मृत्यु केव्हां घाला घालील यांचा नेम नाही. असे भीष्माने केले. व तो नारायणस्वरुप झाला. लक्ष्मणालाही याच ज्ञानांने रामराजे प्राप्त झाले. जोपर्यंत तुझी बुद्धी चांगली आहे तोच या दिसणाऱ्या संसाराचे निर्मूलन कर. नाही तर मरणकाली बुद्धि भ्रष्ट झाल्यांवर यातूंन कोणीही सोडविणार नाही.याकरिता ममत्वरूप बिरडे सोडून योगमार्गाला लाग. मुलगा म्हणतो आई ! धन्य आहे तुझ्या उपदेशरुप ज्ञानाची, मी ‘कोऽहं’ हे विसरलो. संसार कुठे गेला याचा पत्ताच नाही. आतां गुरू कोणाला करु? बोध झाल्याने अनात्मवासना निवृत्त झाली. सर्वत्र हरिच असल्याने मृत्यु दिसत नाही. पापपुण्य यांना राहावयास ठिकाणच नाही. तूही परमात्मरुप झालीस. मदालसा तूं तर मायिक असल्याने मला राहावयास ठिकाणच नाही. मदालसा म्हणते बाळा हा गुह्य उपदेश तुझ्याठिकाणी कसा उमटला शांति, क्षमा या मूर्तिमंत तुझ्या ठिकाणी दिसतात.अरे ! एकच ब्रह्म पण जन्ममरण भोगिल तर जीव, व नारायणरुप होईल तर शीव म्हणतात. स्वरुपस्थिती भोगणारा जो मी, परिपूर्ण योगी त्या माझ्या ठिकाणी दया मुक्ति त्या दासी झाल्या. आत्मस्थिती पूर्ण बाणते. त्या मार्गाने जा. त्याच्या दर्शनांने जीव मुक्त होतात. यामार्गाचा अनुभव घेणारा बद्धमुक्त याच्यापलीकडे असणाऱ्या मुक्ताअवस्था कोणाच्याही आश्रया वर असलेल्या आत्मस्वरुपात पाहातो. मदालसा या नावाने मुक्ति करिता जो उपदेश केला. तोच उपदेश मुक्ताबाईने मुक्तिकरिता चांगदेवास केला. असे माऊली सांगतात


७३३
उपदेश मदलसा देहो निर्मिला कैसा आलासी कवण्या
वाटां मातेचिया गर्भवासा ।
जो पंथ वोखटारे पचलासि कर्मकोठा ।
अविचार बुध्दि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥
पर्ये दे मदलसा सोहं जोजोरे बाळा ।
निजध्यानीं निजपारे लक्ष लागों दें डोळा ।
निज तें तूं विसरलासि होसि वरपडा काळा ॥२॥
नवामास कष्टलासी दहाव्याने प्रसूत जाली ।
येतांचि कर्मजाड तुझीं मान अडकली ।
आकांतु ते जननी दु:खें धाय मोकली ।
स्मरे त्या हरिहराध्यायीं कृष्णमाउली ॥३॥]
उपजोनि दुर्लभुरे मायबापा जालासी ।
वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझें माझें म्हणोनियां झणीवायां भुलसी ।
होणार जाणार रे जाण नको गुंफ़ों भव पाशीं ॥४॥
हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा ।
वरि चर्म घातलेरे कर्मकीटकाचा सांदा ।
रवरव दुर्गधारे अमंगळ तिचा बांधा ।
स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥
या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऐसा ।
माझें माझें म्हणौनियां बहु दु:खाचा वळसा ।
बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा ।
तृष्णा सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥
या पोटाकरणेरे काय न करिजे एक ।
यालागि सोय धरीरे तिहीं भुलविलें लोक ।
ठाईचें नेमियलें त्याचें आयुष्य भविष्य ।
लल्लाटीं ब्रह्मरेखा नेणती ते ब्रह्मादिक ॥७॥
जळींचीं जळचरेंरे जळींचियारे रमती ।
भुललीं तीं बापुडीरे ते कांही नेणती ।
जंव नाहीं पुरलीरे त्याचि आयुष्यप्राप्ति ।
वरि घालुनि भोंवरजाळ बापा तयातें गिवसिती ॥८॥
पक्षणी पक्षीयारे निरंजनीं ये वनीं ।
पिलिया कारणेरे गेलिचारया दोन्ही ।
अवचिती सांपडली पारधिया लागुनी ।
गुंतोनि मोहोपाशीं प्राण त्यजिती दोन्ही ॥९॥
मृग हा चारियारे अतिमाने सोकला ।
अविचार बुध्दि त्याची परतोनि मागुता आला ।
तंव त्या पारधियानें गुणीं बाणु लाविला ।
आशारे त्यजूनियां थिता प्राण मुकला ॥१०॥
अठराभार वनस्पती फ़ुलीं फ़ळीं वोळती ।
बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती ।
ज्या घरीं कुलस्त्रीयाराज्य राणीव संपत्ती ।
हें सुख सांडूनिया कासया योग सेविती ॥११॥
हें सुख सांडूनिया कोण फ़ळ तयासी ।
कपाट लंघूनियां योगी ध्याती कवणासी ।
योग तो सांग मज कवण ध्यान मानसीं ।
सर्वत्र गोविंदुरे ह्रदयीं ध्याई ह्रषिकेशी ॥१२॥
इतुकिया उपरि रे पुत्रा घेई उपदेशु ।
नको भुलों येणे भ्रमें जिवित्त्वाचा होईल नाशु ।
क्षीरा निरा पारखीरे परमात्मा राजहंसु ।
निर्गुण निर्विकार पुत्र सेवी ब्रह्मरसु ॥१३॥
इतुकिया उपरीरे मातें विनवितां जाला ।
संसार सोहळा हा थोरा कष्टीं जोडला ।
पंच भूतें निवती येथें म्हणौनि विश्रामु केला ।
वोखटा गर्भवासु कवणा कार्या रचिला ॥१४॥
गर्भाची यातनारे पुत्रा ऐके आपल्या कानी ।
येतां जातां येणें पंथे सांगाति नाहिरे कोण्ही ।
अहंभावो प्रपंचु पुत्र सांडीरे दोन्ही ।
चौर्‍यांशी जीवयोनी पर्तले मुनिजन तत्क्षणीं ॥१५॥
वाहतां महापुरी रे पुत्रा काढिलें तुज ।
रक्षिलासी प्रसिध्द सांपडले ब्रह्मबीज ।
मग तुज वोळखी नाहीं कारें नेणसि निज ।
आपेआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥
उपजत रंगणारे पुत्रा तुवा जावें वना बैसोनि आसनीरे
पाहे निर्वाणीच्या खुणा ।
प्राणासी भय नाहीं तापत्रये चारणा ।
मग तुज सौरसु पाहारे परब्रह्मींच्या खुणा ॥१७॥
बैसोनि आसनीरे पुत्रा दृढ होई मनीं ।
चेतवी तूं आपणापे चेतविते कुंडलिनी ।
चालतां पश्चिमपंथें जाई चक्रें भेदुनी ।
सतरावी जिवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥
मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग पाताळ ।
नको भुलों येणें सांडीं विषय पाल्हाळ ।
आपणापे देखपारे स्वरुप नाहीं वेगळें ।
परमात्मा व्यापकुरे पाहा परब्रह्म सांवळें ॥१९॥
इतुकिया उपरीरे पुत्रा विनवीतें जननी परियेसि माउलिये संतोषलों ततक्षणीं ।
इंद्रायणी महातटीं विलासलों श्रीगुरुचरणीं ।
बोलियेले ज्ञानदेवो संतोषलों वो मनीं ॥२०॥
अर्थ:-
मदालसा आपल्या मुलाला उपदेश करते की हे पुत्रा तुझा देह कसा उत्पन्न केला. तूं कोणत्या वाटेने मातेच्या गर्भावासांत आला. हे पराक्रमी राजाच्या मुला तूं विचारशून्य बुद्धीने ज्या कर्म मार्गाचा अवलंब केलास तो वाईट मार्ग आहे. बाळा तुझी आई मदालसा तुला झोकेरूपी उपदेश देत आहे की तूं आपल्या स्वात्मस्वरूपाला विसरलास. म्हणून मृत्यूच्या जबड्यांत पडलास. म्हणून तुझे लक्ष आत्मस्वरूपांकडे असू दे.व अनात्मवस्तुबद्दल झोप घे. नऊ महिने गर्भवासाचे कष्ट सोसून दहाव्या महिन्यांत प्रसुतीच्या वेळी तुझे दुःख देणारे प्रारब्धकर्म असल्यामुळे योनीचे संकुचित भागांत तुझी मान अडकली. त्यामुळे तुझ्या आईला त्रास होऊन ती आक्रोश करू लागली. असे दुःखप्रसंग येऊ नये म्हणून त्या हरिहरांचे स्मरण कर व कृष्णमाऊलीचे ध्यान कर. जन्मल्यानंतर आईबापांनी मोठ्या कष्टाने व पुढील आशेने तुझे पालनपोषण केले. व हा आपल्याला लाभतो की नाही अशा चिंतेत असताना तूही त्यांचे ठिकाणी ही माझी आहेत असे कदाचित म्हणशिल पण लक्षात ठेव ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा ठेवलेलाच आहे. म्हणून या संसारपाशांत तूं अटकू नको. देहाची स्थिति पहा हा नाशिवंत असून या दुर्गधियुक्त मलमूत्र असून वर चामडे घातलेला अपवित्र वस्तुंचा बनलेला आहे. अशा कुत्सित शरीरास पुन्हा यावयाचे नसेल तर हरिहराचे स्मरण करून गोविंदाला शरण जा. हा देह माझा आहे. असा विश्वास धरू नये. कारण या देहांत जे माझे माझे म्हणतात त्यांना जन्ममरणदुःखाचे वळसे भोगावे लागतात. या आशारूपी मृगजळाच्या मागे लागून पुष्कळ लोक फसले. म्हणूनच योग्यांनी आशेचा त्याग करून वनवास पत्करला.आपला योगक्षेम पुढे नीट चालावा म्हणून मुलाची आशा धरतात. परंतु शेवटी तेही फसतात. कारण प्रत्येक जीवास मिळणारे सुखदुःखाचे भोग व आयुष्य हे सर्व ठरलेले असते. पण ती लल्लाट रेषा सहसा ब्रह्मादिकालाही कळत नाही. याला दृष्टांत पाण्यांमध्ये राहणारे मांसे आपल्या सख्या सोयऱ्याबरोबर रमतात. पण त्या बिचाऱ्यांना कोळी येऊन त्यांने जाळे टाकले आहे व आपण त्यांत सापडलो आहो. असे कळत नाही. किवा पक्षिणी व पक्षी आपल्या पिलावरील प्रेमाने चारा आणण्यांकरीता घोर आरण्यांत जातात व तेथे पारध्यांच्या फाशांत सांपडून प्राणास मुकतात. किंवा आपले जीवन चालावे म्हणून एका ठिकाणी पुष्कळ चारा पाहून मृग तेथे गेला पण पुन्हा जर आपण तेथे येऊं तर पारधी मला मारील अशा तहेची विचार बुद्धी त्याजजवळ नसल्याने मृग पुन्हा तेथे गेला. इतक्यांत पारध्याने धनुष्याला बाण लावला, बिचाऱ्या मृगाला जिवंत राहाण्यांची आशा सोडून प्राणास मुकावे लागले. पुत्र विचारतो, आपल्याघरी सर्व तऱ्हेची फुले, फळे, वनस्पती, विहीरी, तलाव, नद्या असून तसेच घरांत कुल स्त्रिया सर्व संपत्तियुक्त असे राज्य असून हे सर्व विषयसुख टांकून देऊन काही लोक योग का करतात? हे सुख सोडण्यांत त्यांना फल काय आहे.? योग म्हणजे काय? व ते मनांत कोणाचे ध्यान करतात? मदालसा म्हणाली सर्व ठिकाणी जो गोविंद त्यांत हृषिकेशाचे तू त्याचे यांमध्ये ध्यान कर. विषयसुखाला भुलू नको. भूललास तर तुझ्या जीवात्म्याचा नाश होईल.म्हणजे जन्ममरण भोगांवे लागेल. ज्याप्रमाणे राजहंस दूध व पाणी भिन्न करून दधाचे सेवन करतो. त्याप्रमाणे सत्य काय व असत्य काय याचा विचार करून. ब्रह्मरसरूपी निर्गुण निर्विकार जो परमात्मा तोच सत्य आहे. म्हणून त्याचेच सेवन कर. यावर पुत्र विचारतो. पंचमहाभूतापासून उत्पन्न होणारा संसार थोरांना ही दुःख देणारा तसेच अत्यंत कष्ट देणारा गर्भवास कशा करिता उत्पन्न केला. गर्भवासाचे कष्ट आपल्या कानांनी नीट ऐक. या गर्भवासात येताना किंवा मेल्यानंतर बरोबर काहीही येत नाही. या संसारातील चौयांशी लक्षयोनी पाहून विचारवंत पुरूष ताबडतोब संसार विमुख झाले म्हणून शरीराच्या टिकाणी अहंभाव व इतर पदार्थाच्या ठिकाणी ममभाव या दोन प्रकारचा प्रपंच सोड.. मायानदीच्या महापुरातून तुला काढून जगत कारण श्रुतीसिद्ध ब्रह्म दाखविले पण ते आत्मत्वाने जाणण्याकरिता सद्गुरु कृपा संपादन कर.म्हणजे तें तुला आत्मत्वाने सहजच समजेल. एवढ्याकरिता तूं वनांत जाऊन पवित्र ठिकाणी आसनांवर बसून मोक्षसुखाचा अनुभव घे. तुझ्याठिकाणी पुष्कळ तापत्रय असले तरी त्याठिकाणी तुझ्या प्राणास भिती नाही. अशा रितीने ब्रह्मसुखाची गोडी पहा. मन अत्यंत दृढ करून आसनावर बस व आपल्या ठिकाणी असणारी कुंडलीनी जागृत करून पश्चिम मागनि षड्चक्रे भेदून सतरावी जीवनकलाच आत्मा आहे. असा अनुभव घे. परमात्मा व्यापक असल्याने तुझ्या स्वरूपांतच तुला स्वर्ग, मृत्यु पाताळ सर्व त्रिभुवन दिसेल. आभास मात्र सुख देणारे विषयांना तूं न भुलता त्यांचा त्याग करव सुखरूप ब्रह्माचे ध्यान करून घे. यावर पुत्र म्हणाला माते तुझ्या उपदेशाने मी कृतार्थ झालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मीही इंद्रायणी तटी राहणारे श्रीगुरू निवृत्तिनाथ त्यांचे उपदेशाने कृतार्थ झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७३४
श्रीगुरु देवराया प्रणिजातु जो माझा ।
मनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा ।
समाधि घेइ पुत्रा स्वानंदाचिया भोजा ।
पालखी पौढलिया नाशिवंतरे माया ॥१॥
जागरे पुत्रराया जाई श्रीगुरुशरण ।
देह तूं व्यापिलासि चुकवी जन्ममरण ।
गर्भवासु वोखटारे तेथें दु:ख दारुण ।
सावध होईकारे गुरुपुत्र तूं सुजाण ॥२॥
मदलसा म्हणे पुत्रा ऐक बोलणें माझें ।
चौर्‍यांशी घरामाजी मन व्याकुळ तुझें ।
बहुत सिणतोसी पाहातां या विषयासी ।
जाण हें स्वप्नरुप येथें नाहीं बा दुजें ॥३॥
सांडिरे सांडि बाळा सांडि संसारछंदु ।
माशिया मोहळरे रचियेलारे कंदु ।
झाडूनि आणिकी नेला तया फ़ुकटचि वेधु ।
तैसी परी होईल तुज उपदेशे आनंदु ॥४॥
सत्त्व हें रज तम लाविती चाळा ।
काम क्रोध मद मत्सर तुज गोंविती खेळा ।
यासवें झणें जासी सुकुमारारे बाळा ।
अपभ्रंशी घालतील मुकसिल सर्वस्वाला ॥५॥
कोसलियानें घर सुदृढ पैं केलें ।
निर्गुण न विचारितां तेणें सुख मानियेलें ।
जालेरे तुज तैसें यातायाति भोगविले ।
मोक्षद्वारा चुकलासि दृढ कर्म जोडलें ॥६॥
सर्पे पै दर्दुर धरियेलारे मुखी ।
तेणेंहिरे माशी धरियेली पक्षी ।
तैसा नव्हे ज्ञानयोगु आपाआपणातें भक्षी ।
इंद्रियां घाली पाणी संसारी होईरे सुखी ॥७॥
पक्षिया पक्षिणीरे निरंजनीं ये वनीं ।
पिलिया कारणेंरे गेली चारया दोन्ही ।
मोहोजाळे गुंतलीरे प्राण दिधले टाकुनी ।
संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥
जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला ।
तैसा नव्हें ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला ।
अनुभवीं गुरुपुत्र तोचि स्वयं बुझाला ।
ऐके त्या उध्दरणा गायक सहज उध्दरला ॥९॥
अर्थ:-
जगांत व्याप्त असून मनादि साही इंद्रियांना व जगताला मूळ असणाऱ्या श्रीगुरूला अनन्यशरण हो. पुत्रा आत्मानंदाचा अनुभव घेण्याकरिता समाधीरूपी पालखीत बस. म्हणजे तुला माया व तिचे कार्य बाधयोग्य आहे असे समजेल. हे पुत्रराया आज तुझ्या देहाचे ठिकाणी अहंभाव आहे. त्यांने अत्यंत किळसवाणा व दुःख देणारा गर्भवास प्राप्त होईल. म्हणून सावध हो व श्रीगुरूंना शरण जा म्हणजे ते तुझे जन्ममरण चुकवितील. बुद्धिमान सत् शिष्य हो. मदालसा म्हणते पुत्रा, या चौऱ्यांशी लक्ष योनीतून हिंडताना विषयांत कष्ट होतात व मन व्याकुळ होते. एवढ्या करता संसार स्वप्नाप्रमाणे मिथ्या असून परमात्मव्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही, असा निश्चय कर. ज्याप्रमाणे मधमाशा पोळे बांधतात व कोणी तरी दुसरा ते मोहोळ काढून नेतो. त्यामुळे त्यांचे श्रम व्यर्थ होतात. त्याप्रमाणे तुझी स्थिती होईल. एवढ्याकरता संसाराचा नाद सोड व या उपदेशाने सुखी हो. हे बाळा तुला सत्त्व, रज, तम हे चाळा लावतात. तसेच काम क्रोध मद मत्सर संसाररूपी खेळाचा नाद लावून बळेच त्यांत ओढतील, तेंव्हा त्यांच्या नादी लागशील तर हे तुला दुःखांत लोटतील व तुझा सर्वस्वी घात करतील. ज्याप्रमाणे कोशकिडा आपल्याभोवती आपणच बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यांत सुख मानतो. त्याप्रमाणे तूही आपल्याभोवती प्रारब्ध कर्मरूपी घर केलेस.व ते प्रारब्ध कर्म तुला जन्ममरण भोगवित आहे. म्हणून मोक्षरूपी दार तुला सापडत नाही.सर्प बेडुकाला खातो. बेडुक पक्षाने धरलेले माशी हिरावून घेतो. अशा व्यवहारांत एकाने दुसऱ्याला खाण्याचा परिपाठ आहे. परंतु ज्ञानमार्गात ज्ञानदानाचाच म्हणजे परमात्मस्वरूपाचे ज्ञान, प्रपंचज्ञानाचा नाश व इंद्रियांचा बाध करते. असे करून तूं संसारात सुखी हो. आपल्या पिलाला चारा आणण्याकरिता पक्षी व पक्षीणी घोर अरण्यांत गेली व खाद्याच्या मोहाने जाळ्यात गुंतून त्यांना प्राणत्याग करावा लागला. अंतर्मुख दृष्टीने पाहिले तर संसार दुर्धट आहे असे समजेल.श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जो वरील ज्ञानमार्गाचा अनुवाद केला. तो ज्ञानरूप प्रकाश शहाण्याला उपदेश व अज्ञानाला मोह उत्पन्न करील असा नाही. सत् शिष्य असेल तो याचा अनुभव घेऊन समाधान पावेल. एवढेच काय? पण हा उपदेश ऐकणारा उद्धरेल व म्हणणारा तर सहज उद्धरेल.असे माऊली सांगतात.


७३५
मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी ।
संसारमायामोहें कारे बध्द जालासी ।
सिध्द तें विचारी पां जेणें सुखिया होसी ॥१॥
चेईतूरे तानुलिया जाई श्रीगुरु शरण ।
देहभावीं व्यापिलासी मग तुज शिकविल कवण ।
अज्ञानपण सांडूनियां तूं चुकवी जन्ममरण ।
गर्भवास वोखटारे गर्भी दु:ख दारुण ॥२॥
जागृति आणि निद्रा तुज स्वप्नीं भरु ।
सुषुप्ति वेळोवेळां तुज पडिला विसरु ।
तें जव नेणसिरे तव तुज नाहीं निर्धारु ॥३॥
देह तव नाशिवंत तूं कारे भुललासी ।
अखंड तें विचारी पां जेणें सुखिया होसी ।
दु:ख तें आठवीरे गर्भी काय भोगिसी ।
कोसलियानें घररे सदृढ पैं केलें ।
रिगुनिगु न विचारीतां तेणें सुख मानिलें ।
जाहालें बाळा तुज तैसें यातायाति भोगविलें ।
मोक्षद्वार चुकलासी सकळही कर्मे संचिलें ॥५॥
सर्पे दुर्दर धरियेलारे मुखीं तंव तेणें माशी तोंडीं धरियेली शेखीं ।
तैसा हा मायामोहो तुज कारे नुपेक्षी ।
इंद्रियें व्यापुनियां संसारी सुखि दु:खी ॥६॥
मृगरे जळ जैसें हेलावत पैं दिसे ।
तैसें हे भ्रांति माया ।
तुज नाथिली आभासें ।
उत्पत्ति प्रळय दोन्ही ये तरी तुज सरिसे ।
स्थिर होऊनि विचारी पां आणिक नाहीं बा तैसें ॥७॥
मृग पक्षी कीटकु पतंग होसी ।
आक्षेपी संचरेरे नाना योनी पावसी ।
पूर्ण ज्ञानसुख जेणें तें तूं कारे नेणसी ।
अविनाश तेंचि तूरें वायां सबळ कां करिसी ॥८॥
परब्रह्म बाप तुझा इच्छा माया हे तुझी ।
अंशरे तूं तयाचा सबळ कारे बुध्दि तुझी ।
अज्ञान तुज व्याली ते नव्हे कारे वांझी बा नव्हेचि कां वांझी ।
तेणें तूं भुललासी ऐक शिकवण माझीं ॥९॥
परतत्त्वा आणि तुज बाळा नाहीरे भिन्न ।
अनादि तूं आहेसिरे परि हें न देखें मन ।
अकर्म कर्म केलें तेणें जालें अज्ञान ।
निष्कर्म होय जेणे तें तूं करी कांरे ज्ञान ॥१०॥
पुत्र म्हणे वो माते मी अनादि कैसा ।
मी माझें जाणता वो मी अज्ञान कैसा ।
उकलु केवि होय तुज कैसा भरंवसा ।
जीवनन्मुक्त होय दृष्टि दाखवी तैसा ॥११॥
पापपुण्य दोन्ही मजसवेंचि असती ।
करणी माते थोर त्याची ते आहे चालती ।
उकलु केंवि होये होय तें सांग मजप्रती ।
बुझावि वो माझे माते ऐसी करी विनंती ॥१२॥
केली कर्मे जरि तुवां न संडिवो पाठी ।
कवणतें प्रकासील हे विपरीत गोष्टी ।
उकलु केवि होय ते सांग मजप्रती ।
जेणें मी दृढ होय ते बुध्दि देई वो लाठी ॥१३॥
अनंत कर्मे मातें घडलीं वो मज ।
तीं तंव न संडिती ऐसें ज्ञान पैं तुज ।
तरी म्या काय कीजे केविं पावणें सहज ।
दुर्घट वाट आहे कैशानि निफजेल काज ॥१४॥
उठी पुत्रा जाई बाळा तीर्थरे हिंड ।
साधु आणि संत जेथें असती बा उदंड ।
तयामाजी आत्मज्ञानी जो कां न बोले वितंड ।
तो तूं गुरु करि तो तुज बुझवील प्रंचड ॥१५॥
ज्ञानविज्ञानरे गुरु मुखे बुझसी ।
विचारुनि अनुभउ आपेंआप जाणसी ।
जेणें जालें अनंत सिध्द तें तूं कारे नेणसी ।
हरिहर ब्रह्मादिक तेहि ध्याती तयासी ॥१६॥
नव्हतां बाळा नादबिंद तैं तूंरे सहज ।
तेंथेचि तूं होतासि ऐसें ज्ञान पैं तुज ।
तेथे तूं लीन होई करी आपुलें काज ।
संसार साभिमानें घेई तेथीचें व्याज ॥१७॥
उपजतां गर्भ अंधु जया नाहीं प्रकाशु ।
पूर्वी तो योगभ्रष्ट चुकवि गर्भवासु ।
गुरुवचनी भजे पुत्रा परब्रह्मी करि वासु ।
अमृत सेवि पारे झणी होसी उदासु ॥१८॥
तुज ऐसें रत्नबाळा कवणेरे केलें ।
आणिक अनंत जीव चराचर भुतले ।
तेणेरे इच्छामात्रें क्षणामाजी रचीलें ।
तें तूंरे नेणसीच येवढें कैसे चुकविलें ॥१९॥
सांडि बाळा काम क्रोधु हा दुजेन विचारु ।
जिहीं तुज अंतरविलें त्याचा करि हा संहारु ।
गुरुचरणीं भजे पुत्रा तो तुज देईल विचारु ।
अविनाशपद पावशी मग तुज होईल निर्धारु ॥२०॥
सहज यम नेम गुरुकृपारे करी ।
आसनें प्राणायाम प्रत्यहार उदरी ।
धारणा होईल तुज मग ध्यान विचारीं ।
समाधी होई पुत्रा तूं जाण निरंतरी ॥२१॥
षडचक्रा वेगळेरे तें जाणिजे कैसे ।
अनुभवें जाणसीरे तुज सहजे प्रकाशें ।
तैसा हा ज्ञानयोगु गुरुकृपारे दिसे ।
अज्ञान निरसूनियां ज्ञान पैं समरसें ॥२२॥
अव्यक्त तिहीं लोकीचें तुजमाजिरे असे ।
त्रैलोक्य जयामाजि तैं तुज पैं दिसे ।
अविनाशपद होंसी मग अज्ञान नासे ।
तुजमाजि अमूर्तरे आपेंआप प्रकाशे ॥२३॥
अव्यक्त अगोचर मज होईल निरंतर ।
इंद्रियें स्थिर होती हे तुझे अंकुर ।
अविनाशपद होसी मग नहीं येरझार ।
अष्टमहासिध्दि जया वोळगती तुझें द्वार ॥२४॥
ऋध्दिसिध्दि मायासिध्दि यासि दिधली ।
तुर्याचिया उपरिरे ज्ञान उन्मनी देखिली ।
आशापाश सबळ माया जीवबुध्दि निमाली ।
गर्भवास चुकलारे कैसी बुध्दि स्फुरली ॥२५॥
संतोषोनि कृपादृष्टी ज्ञान पैं लाधविला ।
आत्मतत्त्व बोधु तुज प्रकाशुरे जाला ।
समरसिं सोहंसिध्दि प्रबोधु निमाला ।
निवृत्ति प्रसारेरे ज्ञानदेवो बोलिला ॥२६॥
अर्थ:-
मदालसा म्हणते हे पुत्रा तूं मूळचा ब्रह्मरूप आहेस पण या अनिर्वचनीय संसारमोहाने तुला बद्धतेची भ्रांती झाली आहे. म्हणून नित्यशुद्ध असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करशील तर दुःखसंबंधरहित आनंदरूप होशील. गर्भात फार दुःख आहे. गर्भवास वाईट आहे.म्हणून श्रीगुरूला शरण हो व अज्ञानाचा नाश करून जन्ममरण चुकव. जर देहच मी आहे. असा तुझा दृढ निश्चय झाला तर तुला उपदेश कोण करील. जागृति स्वप्न व सुषुप्ती यांतच तुझा सर्वकाळ जात असल्याने तुला आत्मस्वरूपाचा विसर पडला व जोपर्यंत ते आत्मस्वरूप तूं जाणत नाही. तोपर्यंत तुझा निश्चय होणार नाही. ज्या देहाला तूं एवढा भुलला आहेस तो तर नाशवंत आहे. गर्भवासांत किती दुःख भोगलेस त्याची आठवण कर व अखंड म्हणजे सजातीय विजातीय स्वगतभेदशून्य जे ब्रह्म त्याचा निश्चय कर म्हणजे सुखी होशील. नाही तर मलमूत्र जंतूचा ज्यांत साठा आहे अशा गर्भवासात वारंवार जावे लागेल. ज्याप्रमाणे कोशकिडा आपल्या अंगाभोवती आपणास बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यांत सुख मानतो. तसेच तुला ही संचित कर्माचे योगाने मोक्षद्वार चुकवून जन्ममरण भोगविले. बेडूकांला सर्पाने तोंडात धरले असता सुद्धा शेवटपर्यंत तो बेडूक माशी गिळतो व शेवटी सर्पाच्या तोंडांत जातो. तसे संसारांत इंद्रियांनी विषय संपादून सुखदुःख भोगित असता हा मायारूपी मोह तुला ग्रासून टाकील. वस्तुतः नसलेल्या मृगजळांतील पाणी हलल्यासारखे दिसते. तसेच भ्रमाने नसलेली माया तुला दिसते. अंतर्मुखाने विचार केला तर उत्पत्ति प्रलय ही आत्मरूप असून, आत्म्या प्रमाणे परमार्थ सत्य दुसरी वस्तु नाही. मृग,पक्षी, कीटक, पतंग इत्यादी नानायोनीत या योनीतून त्या योनीत हिंडण्यापेक्षा ज्याच्या योगाने संपूर्ण सुख मिळते असे ज्ञान तूं कां प्राप्त करून घेत नाहीस. असले अविनाश ज्ञानस्वरूप ब्रह्म तूंच आहेस उगीच हेकडपणा का करतोस. परब्रह्म हे तुझे अधिष्ठान असून कल्पनारूपी आईपासून तुझी उत्पत्ती म्हणून तूं परमात्म्याचा अंश आहेस नसता जीवपणाचा छंद का घेतोस? ज्या अज्ञानरूपी कल्पनेपासून तुझी उत्पत्ती झाली व जिच्या योगाने तूं एवढा मोहून गेला आहेस तो वास्तव विचार केला तर वांझ आहे. हा उपदेश विसरू नको. परमात्म्याहून तूं मुळीच भिन्न नाही. पण अकर्म असा जो तूं त्याने अज्ञानामुळे कर्म केले असा जो निक्षय होतो. त्यामुळे मी अनादि बह्मरूप आहे असे पटत नाही. पुत्र म्हणतो माते मदालसे, मी अनादि बह्मरूप कसा? मी कोण आहे ? माझे काय आहे? अज्ञानरूपी कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी? जीवन्मुक्त कसा असतो हे मला स्पष्ट, ज्या तऱ्हेने समजेल, असे तुला वाटते, त्या तऱ्हेने मला सांग. तसेच पापपुण्यही मला आहेत व त्यापासून मिळणारा सुखदुःखाचा भोग मला होतो काय? याचा उलगडा कसा होईल ते मला कृपा करून सांग. अशी आईला विनंती करतो. काही लोक असे म्हणतात की कर्म स्वतः आपले फल देते म्हणून ईश्वराची आवश्यकता नाही परंतु कर्म जड आहे, म्हणून ते स्वतः फल देणे शक्य नाही. हे विपरीत वाटते तेव्हा यावरील शंकेचे पूर्ण समाधान होऊन मी निःशंक होईन अशा तऱ्हेची निक्षयात्मक बुद्धी मला दे.तसेच आई माझे हातून अनंत जन्मांत अनंत कमें झालेली असून जोपर्यंत शरीर संबंध आहे. तोपर्यंत अनंत कमें ही होणारच. म्हणून निष्कर्म होण्याचा मार्ग अत्यंत अवघड झाला आहे. तेव्हा मी काय करावे व माझे हे कार्य सहज कसे होईल याचे ज्ञान तुला आहे. ते मला सांग. मदालसा म्हणाली बाळा, ज्या ठिकाणी साधुसंत राहतात. अशा तीर्थयात्रा कराव्या व त्या संतांत उगीच शब्दपांडित्य न करता जो खरा आत्मनिष्ठ असेल अशा श्रीगुरूला शरण हो. तो तुझ्या सर्व शंकेचे समाधान करील. मग शब्दज्ञान काय किंवा अनुभवाचे ज्ञान काय हे तुला गुरूकडून यथार्थ समजेल तूं विचाराने त्याचा अनुभव घेतलास तर स्वतःलाच ब्रह्मरूपाने जाणशील हरिहर बह्मदेवादि ज्या ज्ञानाची स्तुति करितात, व ज्या ज्ञानाने पुष्कळ लोक उद्धरून गेले ते तुला समजणार नाही काय? ज्यावेळी आकाशादि प्रपंच नव्हता त्यावेळी तूं म्हणजे ब्रह्म आपल्या महिम्यामध्ये होतेच. संसाराचा अभिमान धरशील तर तूं अशा परमात्म्याला शरण होऊन आपले कार्य करण्याकरिता धर. पूर्वजन्मांत योगभ्रष्ट असल्याने जन्मल्याबरोबर त्याला परमात्म्याचे ज्ञान नसते. एवढ्याकरिता बाळा गुरूवचनावर विश्वास ठेऊन हे ज्ञानामृत पान करून ब्रह्मरूप हो.यांत आळस करू नको. तुझ्यासारखा बुद्धिमान मुलगा अनंत चेतन जीव, अचेतन सृष्टि ज्या परमात्म्याने एका क्षणांत केवळ इच्छेने उत्पन्न केली त्या परमात्म्याला जाणणे एवढी महत्वाची गोष्ट कशी चुकली. ज्यांनी तुला आत्मस्वरूप ज्ञानापासून दूर केले त्या कामक्रोधरूपी दुर्जनांचा विचार सोडून त्यांना ठार कर आणि गुरूचरणसेवेने नाशरहित ब्रह्मपदाची प्राप्ती करून घे. म्हणजे तुझा आत्मस्वरूपाविषयी निश्चय होईल. गुरूकृपा झाल्यावर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा ही सहज साधून निरंतर समाधी होईल. षट्चक्रावेगळे असणारे परमतत्त्व कसे जाणावे असे वाटेल पण जर तूं अनुभव घेण्याचा प्रयत्न केलास तर ते तुला सहज कळेल त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानस्वरूप होणाचा ज्ञानमार्ग गुरूकृपेनेच समजेल.तिन्ही लोकांत व्याप्त असणारे, परमतत्त्व तुझ्यात आहे, त्या परमतत्त्वांत त्रैलोक्य आहे असे जाणलेस तर त्या अविनाश पदाचे ज्ञान तुला होईल व मग अज्ञानाचा नाश होऊन तुला अधिष्ठान असणारे अमूर्त परमतत्त्व स्वप्रकाशाने प्रकाशीत होईल. ही तुझी इंद्रिये परमतत्त्वाचे अंकूर होतील म्हणजे त्याची प्रवृत्ति विषयांत राहणार नाही. मग तूं नित्यमुक्त हो अष्टमहासिद्धी तुझी सेवा करण्यास तत्पर राहून अविनाश पदाला प्राप्त होशील व जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटशील. तूर्यावस्थेच्या पलीकडे असणारी उन्मनी म्हणजे ज्ञानस्वरूप तूं झाल्यावर रिद्धिसिद्धि व माया ही सर्व तुझ्या ताब्यांत राहतील व ज्या मायेच्या योगाने आशारूपी पाश बळकट होतो. ती जीवबुद्धी नाहीसी झाली काय? माझी बुद्धी चांगली आहे आतां पुन्हा गर्भवासाचे नांव नाही. श्रीनिवृत्तीनाथांच्या प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज संतोषाने म्हणतात गुरूकृपा दृष्टीने आत्मतत्त्व बोध स्पष्ट झाला व मी ज्ञानरूप झालो. एवढेच नव्हे तर त्या ब्रह्मरसात मी ब्रह्मरूप आहे. असे ज्ञान ही मावळले.असे माऊली सांगतात.


७३६
ॐ कार अक्षरबीजरे ।
अमित्य भुवनीं प्रकाशुनि गेलेंरे ।
तें मकराचे पोटीं आहेरे ॥१॥
उकाराचा शेंडा पाहीरे ।
एकविसा मंदराचळा भेदुनि गेलेरे ।
मा वेद बीज वेगळें परात्पर पाहेंरे ॥२॥
मागें बोलिलों तें ज्ञानरे ।
चोविसा अक्षरी संध्याकाळी सोंगरे ।
परी त्या अक्षराचें अमित्य आहेरे ॥३॥
चारि म्हणों तरी नव्हेरे ।
साही म्हणों तरी भूललीं बापुडी ।
मा अठरांची दशा ते काईरे ॥४॥
दाहा श्रुती शिऊ बोलरे ।
आठरा श्रुति विष्णुचें वचन परि कल्पांती अक्षर न सरेरे ॥५॥
पूर्णापूर्ण ऐसें ब्रह्म बोलतीरे ।
तेथें पूर्ण अपूर्ण दोन्ही नाहीं ।
मातें कांही बाहीं अक्षररे ।
तया रुप ना रेखा आहेरे ॥६॥
तेथें त्रिकाळ जतिगति नाहींरे ।
नाहीं इंद्र चंद्र नाहीं आकाश भूमीरे ।
नाहीं आप तेज वायो तेथेरे ॥७॥
तरी वेद अक्षर गिवसावें कैसेरे नगणित गुण गेलेरे ॥
सिध्दि ना साधक मंत्र ना तंत्र ।
मा तेथें जटा क्रम पद कैचेरे ॥८॥
स्थूळ न सूक्ष्म नव्हेरे धातु नव्हे मातु नव्हेरे ।
मा कांही नव्हे तें अक्षर होयेरे ॥९॥
पर नव्हें परतर नव्हेरे ।
जाति नव्हें अजाति नव्हे ।
मा कांही नहोनियां एक होयरे ॥१०॥
बुध्दि नव्हे शुध्दि नव्हेरे ।
वाट नव्हे घाट नव्हे मा घटाटीत नव्हें ।
मवाळा मवाळ नव्हे नव्हेरे ॥११॥
साच ना दृश्य नव्हेरे ।
दृश्य नव्हे मा अदृश्य नव्हेरे ।
वेदीं बोलिलें तें होयरे ॥१२॥
सप्तपाताळा तळ नव्हेरे ।
एकवीस स्वर्गाहुनी आगळेंचि आहेरे ।
बाविसांहुनी परतें पाहीरे ॥१३॥
तेथें नादु बिंदु नाहीरे ।
चक्षु पाद नाहीं कर देहरे ।
दिहादिक चतुर नाहीरे ॥१४॥
भ्रमु नाहीं भुली नाहीरे ।
ते सतराव्याचे कळे प्रकाशलेरे ।
परि तेथें मन होये ठायीरे ॥१५॥
आतां सातवें पांचवें बोलें ज्ञानरे ।
तेथें पांचही नाहीं मा सातही नाहीं ।
मा तें अक्षर शतसहस्त्रां वेगळे आहेरे ॥१६॥
मागें चौदा बोलियलीं साचरे ।
ज्ञानासि विज्ञान जाहालें मा शेखीं बुडाला तो वायारे ॥१७॥
मागें अक्षरें बोलिलीं बहुतेरे ।
पिंड ब्रह्मांड जयापासून जाहालें ।
परगुणीं व्यापिलें ज्ञान सुखरे ॥१८॥
सुखादि सुख तें म्हणोरे ।
तरि अमित्य वेदाची वाणी खुंटली ।
मा परीलक्षालक्ष नये परिमाणारे ॥१९॥
त्रिदशा त्रिदश पंचदशा पंचदश नेणतेरे तें
शतसहस्त्रांचे शेवटीं आहे नाहीं ऐसे दिसेरे ॥२०॥
आत्मा परमात्मा दोन्ही सखेरे ।
ऐसें चतुरी बोलतां लोक भुलविलेरे ।
परि अनुमाना नये वेगळा आहेरे ॥२१॥
पासष्टि पुढें अद्वैत नेमूरे ।
द्वैत ना अद्वैत भेद ना अभेद अक्षरझेंपकु तोचि भला रे ॥२२॥
बुझों गेला पाहों गेलारे ।
तेथें दुसनावना तयासि जाहालें ।
त्या ठकाठक मौन्या मौन्य पडिलेरे ॥२३॥
तेथें जाणोनी नेणे पै जाहालेरे ।
मन इद्रियां लयो जाहाला ।
अमित्य तेज ध्वनी उमटलेरे ॥२४॥
गगना परतें अक्षर दिसेरे ।
दिसोन न दिसे तें वेदांचें देखणें ।
तेथें साहांसी शुध्दबुध्द परतेरे ॥२५॥
नव्या नऊव्यासि शून्यरे ।
ऐसें राधा जंत्र भेदावें कवणें ।
तें कृष्णावतारी भेदियेलें पुरुषोत्तमेरे ॥२६॥
आता नव्या नउ भाग करीरे ।
ते अर्जुनामुखीं घालता भागला ।
तें अक्षर निराक्षर ।
आकार उकार मकार माते वळलेरे ॥२७॥
सात बेचाळीस घालीरे ।
पांच विसा तेथें गुणाकारी आटलें निरालंब ना पावलें घटाघटीरे ॥२८॥
तें व्योमाकार रुप नव्हेरे ।
तेज नव्हे त्रिकुट नव्हेरे ।
मा गोल्हाट नव्हे ।
मंडळा मंडळी मंडळा परतेरे ॥२९॥
अमित भुवनें चाकें त्यासिरे ।
निरालंब आंख घालूनिया बैसे ।
ते तुरंगेविण अक्षर कैसें चालेरे ॥३०॥
तें नित्य नव्हें अनित्य नव्हेरे ।
आकारा खूण गुढारु गुढारीलें ।
परि त्या विवरीं न दिसे अक्षररे ॥३१॥
बारावें भेदुनिया जायेरे ।
तेराव्याचें अग्राअग्रीं दिसे ।
तें परेहूनि परतें आहेरे ॥३२॥
आठ कोटी लक्षी पाहेरे ।
तें मुक्त नव्हेरे अमुक्त नव्हे मा अक्षरही नव्हे सिध्द आहेरे ॥३३॥
पिवळे नव्हे पांढरे नव्हे काळे नव्हेरे ।
रंग रंगाकार नव्हे अनंतध्वनि नव्हे ।
अक्षर नि:शब्द निरंजन नव्हेरे ॥३४॥
षष्ठ नव्हे सप्त नव्हेरे ।
मन नव्हे पर नव्हेरे ।
तें बुडालें बुडोनी नव्हेरे ॥३५॥
सत्ताविसें एकतिसें दाटूनि पाहेरे ।
छत्तिसांचा चौभागीं भागों तरी अप्रमिता ।
अप्रमीत जाहालारे ॥३६॥
सहस्त्र शून्य सहस्त्रां ठायीरे ।
बावन अक्षरीं गुण निवडति ।
ते कूटस्थ कुटाकुटीं नाहींरे ॥३७॥
मागें बोलिलासि भु:भुकारुरे ।
स्वर ना भेद सत्य वेद रुप बोलियेले तूं आपणयाते नेणतां ।
नेणोनि म्हणविसी ब्रह्मरे ॥३८॥
विकासलें व्योमाकारे ।
तिन्ही देव तिन्ही वेद जाहाले ।
मा तरी खुण चुकोनियां माघारे मागुति मुरडलेरे ॥३९॥
हा अनुवाद नको बोलोरे ।
नष्टा हातीं निजपद दिधले ।
ब्रह्मअन्वयें सोडून नको बोलोरे ॥४०॥
वाडा परिस वाड आहेरे ।
एकुणासवे अक्षरी मंत्रा साधु गेलासी परि तें काहीं ।
नाहीं ऐसे जालेरे ॥४१॥
रकारीं बोध बोलसीरे ।
तेथे घटीतेविघटीतें के न पडेची ।
त्या मंडळांमंडळीं गुंतलासीरे ॥४२॥
नकारु रुप शून्यरे ।
सहस्त्रचिये वाटे एक फांळले ।
माते अक्षरासि भेदु नाहीरे ॥४३॥
यम नेम काय करिसीरे ।
गुरुमुखें सांगतां वाया भ्रमलें ।
आपणपा नाहीं शुध्दिरे ॥४४॥
भांबाविले मन बुडविलेरे ।
मार्गू ठावा न पडता उगलें ।
मध्येंचि बुडोनि आलेरे ॥४५॥
गति मति वेदु बोलेरे ।
सातवी मातृका सहस्त्रीं वाटियेली ।
तेथें गुणलयो जाहालारे ॥४६॥
दिधलें मन पांचा ठायीरे पांचे पांच भागु विभागु जाहाला ।
तेथें ब्रह्मरसु रसीं मुरालारे ॥४७॥
वासुकीमणी मंथन केलेरे ।
तिहीं देव तेथें संध्यावळी ठायीं बुडाले ।
मातरि सहस्त्रमुखीं लेखा कायसारे ॥४८॥
साहाव्याचि गोठी वळून पाहेरे ।
अगाध ब्रह्माच्या गोष्ठी ।
करिती सत्य ब्रह्म त्याच्या पोटीरे ॥४९॥
ध्याना कल्पितां न पाविजेरे ।
आपुला आत्मा शुध्द चैतन्य देखिल्या तेंचि तें ।
ब्रह्म ब्रह्माकार होयरे ॥५०॥
मधुर मधुर अनुभव रसुरे ।
येथें संवादु ना गोडि तिखट ना पैत्यतें अंबर अंबराकाररे ॥५१॥
हरि म्हणिजे ठकार शून्यरे ।
पांचवे पूढें बिंदुलें दिधलें ।
तें नववें पुसूनि जायरे ॥५२॥
विधि म्हणसि ध्याना अगोचररे ।
जयाचा एक्याण्णउ मातृका भेदिल्या तें त्रिपुटी फुटोनी जायरे ॥५३॥
योगि मंत्र येकु साधूरे ।
आटि जनीं तेथें उभें राहूनियां ।
अकराव्याचें तोंड मारीरे ॥५४॥
येणें जाणें परि नाहीरे ।
सिध्द साकार भाविसी काय ।
मा अयोगायोगु तें नव्हेरे ॥५५॥
नाटटा भाविसि कायरे ।
नकारशब्दें नामात्मक नाहीं ।
तें नहोनि जायरे ॥५६॥
पराहूनि परता आहेरे ।
अमित व्योममंडळें भेदूनि तें मातृकेचें नांव कायरे ॥५७॥
चेउ आलिया निजसुदा नव्हेरे ।
निज चेतविलें जागें निजविलें ।
दगदगी फुटीं घालीरे ॥५८॥
तेथें बावन्न त्रेपन्न सक म्हणतीलरे ।
त्यासि लावावया मा आणिक बंधु नाही रे ॥५९॥
यासीं उपावो नाहीं अपावों नाहीं रे ।
नाहीं नाहीं तेथें कांहीं तें घेऊनि राहीरे ॥६०॥
तत्त्वातत्त्वा भेदु नाहीरे ।
महातत्त्वाचे सामर्थे जाशील तेथे आपण नाहीं कांही रे ॥६१॥
एका शेंडा येका डिरिरे ।
एकतत्त्वें महत्तत्त्व ते तळातळ भेदियेले ।
वोंकारें भेदियेले परात्पररे ॥६२॥
सत्य व्योमा शून्य देई रे ।
चौदावें बुडवूनि घालूनि पाहे ।
मा पुढें वेद बीज सांगेनरे ॥६३॥
जटि ब्रह्मऋषि बोलतिरे ।
पदपदार्थ कर्म खंडी विखंड ।
मा त्यासि नकळे त्या अक्षराचे पारुरे ॥६४॥
कर्मकांडी एक बीज आहेरे ।
संकल्पीं विकल्पीं एको विष्णु बोले ।
परि ब्रह्मार्पण नाहीं ठायी रे ॥६५॥
एकुपदार्थ बोलेरे ।
तें चोविसाक्षरी संध्यावळी बीज मिरवलें ।
एकु ध्रुव ध्रुव म्हणति यजुरिरे ।
यजन याजन अध्ययन अध्यापन ।
दान प्रतिग्रहो नाहीरे ॥६७॥
रुकारु म्हणती मूळरे ।
आब्रह्म म्हणती परतल्या दृष्टि मा साम मागति फळरे ॥६८॥
सत्यलोकीं विरिंचि विदरेरे ।
शंकरें विश्वाचि प्राहुति केली ।
हरि करि ठेवा ठेवीरे ॥६९॥
बोध्य म्हणती निज रुप जाणेरे ।
गण म्हणति सिध्धु पातलियां ।
शक्तु म्हणे शक्ति पोटीरे ॥७०॥
कमळें घेऊनि उभेरे ।
उदयो अस्तु नमस्कारु करिती ।
मातें असक्यासी न पडे अक्षर ठावेरे ॥७१॥
एक शैव म्हणति शिवज्योतिर्लींग पाहोरे ।
भगता भागवता न पडेचि ठायीं ।
माते पावलें निवृत्तिचे पाय प्रसादीरे ॥७२॥
निवृत्ति म्हणे सोपाना भलारे ।
अक्षराचें वर्म अवघे पूर्णपक्ष जाहाले ।
तें अक्षर तुम्हांसि भेदलेरे ॥७३॥
मूळ सांडि शेंडा सांडि रे ।
न घडतां घटण घटाघटीं केली ।
तरी ब्रह्मब्रह्मीं चोखाळलेरे ॥७४॥
अचिंतन चिंतन प्यालीरे ।
ज्ञान सोपानाचा निवृत्ति चोढळी ।
तें अक्षर त्रिपन्नी तिन्ही मोडलीरे ॥७५॥
ब्रह्मसमुद्र घोंटिलारे ।
तृषेक्षुधेवीण पंचप्राण पै खादलेरे ।
तिसाव्यासि मारिलें तुम्हीरे ॥७६॥
धगधगीत ब्रह्मशास्त्र आहेरे ।
अमित ब्रह्माचे तेज प्रकाशित ।
तेज तेजाठायीं विरेरे ॥७७॥
एक रोप कूपीं उगवलारे ।
त्याचे अनंत गुण मा अनंत पार मा ।
तो विष्णु भला भलाभलारे ॥७८॥
ते दोघे कर्मधर्म साधक भलेरे ।
ते अमित्य भुवनें धांडोळितां भागले ।
परी ते निर्गुण अक्षराचि नलगे सोयरे ॥७९॥
आदिदेवी माया जालीरे ।
एक वैष्णवी म्हणती अध्दती ।
म्हणती चौथी तिघांसि खायरे ॥८०॥
निरंजनीं एकी उभीरे ।
सिध्द साधक मा वेदांत बोलिजे ।
ते रंजना संध्यावळी मायारे ॥८१॥
अठरावर्ण अठरा न्यातिरे ।
चहूंची वेदीं सांगितली संमति ।
ते निरालंबी नाहीं स्थितिरे ॥८२॥
सुयीच्या अग्रीं दाभण ठेवावेंरे ।
अमित्य ब्रह्मांडे तयावरी जालीं ।
ऐसी निज ब्रह्माक्षरीची नकळे मायारे ॥८३॥
मायाकोश आड जालेरे ते तेजी तेज फोडुनी गेले ।
साते संस्वरुप अक्षर कवणे ठायीरे ॥८४॥
चौदा चारि चौदा घालीरे चौदा चौके चौदा वांटूनि गेले ।
माते ब्रह्मांडाची वाट कोणरे ॥८५॥
अक्षरा मागें अक्षरसहस्त्र जालेरे ।
लक्षलक्षाची क्रोडी क्रोडीची अनंत वाटाघाटी ।
निघंटीं पाहिल्यारे ॥८६॥
चतुर बुध्दि सांगवलेरे ।
चतुरानन चौमुखीं खांचावला ।
पंचमुख सहस्त्र मुख खुंटावलेरे ॥८७॥
तळवा घोंटी जानु नाभि वक्षस्थळी कंठ शेंडे गेलेरे ।
शेंडिच्या आग्रीं चौदा भुवनें मावळलीं ।
ते विराट लया लक्ष गेलारे ॥८८॥
अटत घाटत घटिलीरे ।
तेथे नादु नाहीं स्पर्श नाहीं ।
कांही नाहीं ते अवघी लया पाहिरे ॥८९॥
ऐसा उत्पत्ति गोळकु ।
पिंड ब्रह्मांड गोळकु सांगितलारे ।
ठाऊकें नव्हे म्हणोनि बुडालें ।
त्या अवताराचा काय ठावोरे ॥९०॥
देवऋषि मुनि शुकादिकारे ।
साही अंगें बोलोनि गेले ।
मा त्या चहूंचा गड संदेह पडालारे ॥९१॥
तेथें सत्तावन्ने सहस्त्र धातूरे ।
एक ज्यापासूनि मोवितां भागले ।
अमिता मुखीं वर्णितां गेलेरे ॥९२॥
शून्य वोढिलें निरशून्य भेदिलें पाहारे ।
देवादेवो दैवतें बोलती ।
तें ब्रह्मज्ञान सोपाना कर्णपुटीं पेरियेलें ब्रह्मरे ॥९३॥
श्रवणेंविण ऐकिलेरे ।
मनेंविण मन बुडालेरे ।
मागे गिवसितां गिवसितां स्वस्वरुपीं आहेरे ॥९४॥
निवृत्ति म्हणे ज्ञानसोपाना दोन्ही भागीं राहें ।
संध्यावळी अजपा मंत्रु साधन ।
त्याणें उपदेशें तें तें ब्रह्म पाहेरे ॥९५॥
म्हणती मनासी नयन आहेरे ।
ते मनचि नाहीं मा अवघे ब्रह्मचि पाहीं ।
मा माझा हस्तातळीं उभें राहारे ॥९६॥
अचिंतन चिंतूं नये ।
संध्या रागु मंत्र पंचकरणें मथिला ।
त्या अक्षरासि नाहीं भेदुरे ॥९७॥
तें ब्रह्माब्रह्म साररे ।
त्रिकुटा वेगळें गोल्हाटा वेगळें ।
न चुकत चुकलें पाहिरे ॥९८॥
रविसोममाथीं माथा बैसले ते आधारेवीण
उदरेवीण सामावले आहेरे ॥९९॥
चिदप्रचिद तेजा तेज नव्हेरे ।
अमित भुवनें जयाचेनि आहारळलीं ।
तेथुनि नि:शब्दापासुनी वेद जाहालारे ॥१००॥
ब्रह्मवृक्षव्योमीं फुललारे ।
त्यासि शाखा ना मूळ ना बीज ना अंकूर ।
तें अक्षर फळलें बीण फळ देखारे ॥१०१॥
सहस्त्र खांदियांचें एक झाडरें ।
जयाचीं विश्वपत्रें विश्वशाखा ।
मा त्याचें अंगकूपीं एक ब्रह्म फळरे ॥१०२॥
यजुरि ऐशा ऐशा शाखा जाहाल्यारे ।
ऋगीं सप्त शाखा जाण बोलियेले ।
ते अथर्वण राहें श्याम फळरे ॥१०३॥
परि त्या अक्षरासि नलगे फूल फळ ज्याचि
ते निष्कामीं निष्कर्मी फळेंविण कैसें फळेंरे ॥१०४॥
आणिक एक सांगेन गूढरे ।
त्यासि सोळा ना बारा ।
नवासि शून्य देतां दहा अकराही शून्य मिळेरे ॥१०५॥
ऐसें छत्तिसा गुणांचे बत्तिसावें वाटारे ।
मिळाले पंचीकरणीं मिळाले संध्यावळी
परि त्या नकळे अक्षराचा भेदुरे ॥१०६॥
एकावन्नें बावन्ने मिळालें सत्तावन्नेरे ।
परि तें अक्षर निरंजन निराकार निर्गुण ।
ऐसे गुणिती पैं ते शाहाणेरे ॥१०७॥
अडतीस पंचविशी पांच मारीरे ।
निरशून्याकारे भृंगा भेदून गेले ।
मा परि नि:शब्दीं परा वाट पाहेरे ॥१०८॥
धगधगित एक सुरि होतीरे ।
ते व्योमाचे पोटीं फोडूनि भेदली ।
ते अक्षरासि वाहे वाटरे ॥१०९॥
एक आप एक पररे ।
पिंडब्रह्मांडाचे अक्षरीं निवडलें ।
सातवें गोल्हाट भेदिलेंरे ॥११०॥
तेथें विजया एक राणीरे ।
काळातें खाउनी महाकाळ गिळिला ।
ब्रह्मवोवरीं तिचें नांवरे ॥१११॥
तेथें एक होता अक्षर सिध्दावळीरे ।
अंत काळ तप्त मुख जाला ।
शब्द ने देखे फिरोनी आलारे ॥११२॥
आतां एक सांगेन अमित व्योमावरि फुललेरे ।
त्या अक्षरा बांधूनि वदेंविण धरिलेरे ।
ज्ञान सोपानासि म्यां दिधलेरे ॥११३॥
ज्ञानज्ञानें भला म्हणवीरे ।
सोपान सिध्दि निधि ब्रह्म पावलारे ।
तेणे ज्ञाना ब्रह्मबोध जालारे ॥११४॥
अद्वैत पंथ कैसारे ।
ऐक्यवादु वेद बोल बोलतीं वचनें ।
ते मिळणी ब्रह्मीचे सांगेन त्रिसंध्याकाळीरे ॥११५॥
ते वर्ण कवणा नेघेपवेरे ।
अनुभविया अटक कुठले ।
मग ते ज्ञानी म्हणती वांयारे ॥११६॥
जेथें मौन्यामौन्य साध्य नव्हेरे ।
पांच माळनि सस्वरुप होतें ।
मा तेचि ते अनुभवची खुणरे ॥११७॥
मनीं शंका धरुं नको कांहीरे ।
चतुर्देहांसहित मन मावळी ।
मा तरि ब्रह्मबीज तूंचि होशीरे ॥११८॥
सा सा सा चौदावरि ठेवीरे ।
हां भेद कोणी जाणितला म्हणती ।
तरी त्यासी मानु मी देईन म्हणति निवृत्तीरे ॥११९॥
आतां एक गुह्य परम गुह्यरे ।
तें अक्षरां शेवटीं दाही दिशे नाहीं ।
तें सहस्त्र लक्षीं गुणी ते आहेरे ॥१२०॥
हें गुणीता शास्त्र जालें ज्योतिषीरे ।
ते वेदाच्या पोटीं धांडोळित अहाती ।
त्या अक्षराचा न कळे अंतीं अंतूरे ॥१२१॥
भडस्त्रिंग भडभिंग भयानक जालेरे ।
परि त्यासि सहस्त्रसिध्दि सहस्त्रमुखीं बुध्दि ।
मा बावन्नअक्षरा वेगळे तें वाटेरे ॥१२२॥
ऐसे अमित्य भुवनाचे साटे मावळलेरे ।
चंडाहुनि प्रचंड थोटावलें ।
तें अक्षराचे नकळे पारुरे ॥१२३॥
जै नि:शब्द अंकुर फुटेरे ।
वायुसी मोवणी आपासि भिजवणी ।
व्योमाचि ठेवणी कवण ठेवीरे ॥१२४॥
मनासि नाहीं मारणीरे ।
तेजासि नाहीं धरणी ।
धरुं गेला तो वांयाविण श्रमलारे ॥१२५॥
परि एक निर्वाण सांगेनरे ।
आम्ही तिघी मा जेथुनी तुषाकारलो ।
ते जीवनीं जीवन जैसें मिळोनि गेलें ।
मा तैसी परि जाली आम्हा तुम्हारे ॥१२६॥


हरिपाठ – अभंग ७३७ ते ७६३
७३७
देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरिमुखें म्हणा ॥२॥
पुण्याची गणना कोण करि ॥३॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदां ॥४॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणें ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥५॥
अर्थ:-
देवाच्या प्राप्तीचे दार म्हणजे हरिनाम ते क्षणभर घेतले तर आत्मसाक्षात्कार दाखवणाऱ्या चारी मुक्ती साध्य होतात. त्या हरिनामाचे सतत स्मरण करणाऱ्याचे येवढे पुण्य होते की त्या पुण्याची गणती होत नाही. संसारात सर्वात घात करणारी जीभ आहे पण तिला हरिनामाचे वळण लावले तर सुख प्राप्त होते असे वेद हातवर करुन सांगतात. हरिनामाने देव कसा अंकित होऊन भक्ताचे सर्व कार्य त्याच्या घरी येऊन करतो ह्याची साक्ष व्यासानी दिली आहे असे माऊली सांगतात.


७३८
चंहूं वेदीं जाण साहिशास्त्री कारण
अठराहीं पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनि नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिवसमा ।
वायां तूं दुर्गमा न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
अर्थ:-
चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे हे हरिनामाची महती गात आहेत. दह्याचे घुसळण करुन जसे लोणी काढतात तसे ह्यातील हरीनामाचे लोणी काढुन बाकीचा असार कथा भाग सोडुन द्यावा. जीव व शिवाचे एकच आधिष्ठान हरिनाम आहे. जींवाने उगाच दुर्गम गोष्टीत का मन घालावे. वैकुंठात असलेल्या हरिचा पाठ मी करतो जो सर्वत्र घनदाटपणे वसला आहे असे माऊली सांगतात.


७३९
त्रिगुण असार निर्गुण हें सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचें अगुण ।
हरिवीण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं त्या आकार ।
जेथोनि चराचर हरिसी भजे ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मोनि पुण्य होय ॥४॥
अर्थ:-
त्रिगुणातील हा संसार असार आहे तो निर्गुण परमात्मा हाच साररुप आहे. विचार व विवेक हाच हरिनामाने प्राप्त होतो. सगुण निर्गुण ह्यात न अडकता त्या आत्मारामाला कोणतेच गुण अडकवु शकत नाहीत.त्यामुळे हरिनामाशिवाय असलेले मन व्यर्थ आहे. तो व्यक्त आहे की अव्यक्त आहे हे माहित नाही त्याला एका आकारात पाहता येत नाही. तो सर्व चराचरात व्यापला असला तरी ते चराचरा त्याचे नाम जपत आहे. सतत रामकृष्ण मनात व ध्यानात असणाऱ्याला जन्मोजन्मीचा पुण्यलाभ ह्याच जन्मात होतो असे माऊली सांगतात.


७४०
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्त्वरित ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥
सायास करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरीसी न भजती कोण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
अर्थ:-
बळाविण शक्तीची बतावणी करु नये तसेच भावाविण भक्ती नाही. व भक्तीवीण मुक्ती नाही. हरिनाम भक्ती केली नाही तर तो देव कसा बरे प्रसन्न होईल? तेंव्हा जीवा नामपाठ करत निवांत रहा. रोज करत असलेला प्रपंच प्रचंड सायास करुन करत असतोस पण हरिभजनाला का विन्मुख होतोस? ह्या प्रपंचाचे धरणे उठवायचे असेल तर फक्त हरिनामपाठ कर असे माऊली सांगतात.


७४१
योग याग विधी येणें नव्हे सिध्दि ।
वायाचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंवीण देव नकळे नि:संदेह ।
गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेविण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हीत कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधुंचे संगती तरुणोपाय ॥४॥
अर्थ:-
योग, यज्ञ, विधीविधान ह्या मार्गाने त्याची प्राप्ती होणार नाही. ह्या उपाध्या उगाच लाऊन घेऊन दंभ का माजवतोस? भावाविणे देव दुर्लभ आहे व अनुभव समजण्यास गुरुकृपा हवी. गतआयुष्यातील पुण्यामुळे भक्तीची संधी मिळाली आहे तेंव्हा त्याचे तप केले नाहिस तर देव कसा प्राप्त होईल? तसेच गुरुकृपेचे गुज गुरुनी सांगितल्या शिवाय हित कसे ते कोण सांगणार? साधुसंगतीने हित होते त्यामुळे साधु़संगतीशिवाय तरणोपाय नाही असे दृष्टांत आहेत असे माऊली सांगतात.


७४२
साधु बोध झाला तो निरोनिया ठेला ।
ठायींच मुराला अनुभव ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति ।
ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥
मोक्ष रेखें आला भाग्यें विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥
अर्थ:-
साधुचा बोध झाला की मग न संपणारा ठेवा मिळतो. पण तो ठेवा म्हणजे हरिनामच आहे. व तो अंगोपंगात मुरवुन ठेवावा लागतो व तो अनुभव मोठा असतो. कापुराची वात पेटवली की तिची समाप्ती त्या ज्योतीत होते तसेच त्या हरिनामाची समाप्ती शरिराबरोबर व्हायला हवी. अशा साधुबोधाने नटलेला भक्त मोक्षाला पोहचतो व भाग्याचा ठरतो. साधुसंगतीची गोडी घेतली की तो जनात वनात हरिरुपाने आहे हा बोध होतो असे माऊली सांगतात.


७४३
पर्वताप्रमाणे पातक करणें ।
वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
अर्थ:-
जो हरिनामाला सन्मुख होता नाही त्याला पर्वतायेवढी पापे वज्रलेपाप्रमाणे (न वेगळी होंणारी) चिकटतात. ज्याला जन्माला येऊन भक्ती करता येत नाही तो पतित अभक्त ठरतो. हरिनाम न घेता फक्त संसाराचा अनंत गप्पा रंगवतो त्याला तो कसा प्राप्त होईल? तो सर्वघटामध्ये असणारा परमात्मा ह्या जगताचे प्रमाण आत्माराम आहे असे माऊली सांगतात.


७४४
संताचे संगती मनोमार्गगती ।
आकळावा श्रीपती येणें पंथे ॥१॥
राकृष्ण वाचा भाव हा जिवाचा ।
आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥
एकतत्त्वनाम साधिती साधन ।
द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।
योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्त्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।
उध्दवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
अर्थ:-
मनाचा मार्ग सोडुन साधुमार्गाने गेले की तो श्रीपती आकळतो कळतो. वाचेत सतत रामकृष्ण जप व आत्मारामात शिवाचा जप हा जीवांचा भाव असावा. द्वैताचे बंधन टाकुन एकतत्वाने हरिनाम साधन व तेच साध्य साधता येते. एकदा नामामृताची गोडी वैष्णवांना लाभली की त्यांना जीवनकळाच प्राप्त होते. ह्याचा नाममृतामुळे प्रल्हाद भक्त झाला व उध्दवाला कृष्णकृपा झाली.नामपाठ करणे हे सर्वात सुलभ आहे पण हे जाणारे फार दुर्लभ आहेत. असे माऊली सांगतात.


७४५
विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैचें कीर्तन घडेल नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपचाचें ॥४॥
अर्थ:-
ज्याच्या मनात रामकृष्ण जप नाही ते मन नाही व ज्याला विष्णु स्मरण होत नाही त्याला ज्ञान नाही. हरिपाठ न करणारा जन्माला आलेला करंटा ठरतो त्याच्या तोंडात रामकृष्ण जप कसा करता येईल. द्वैताला झाडायला गुरुकृपा लागते. व द्वैत संपल्या शिवाय हरिकीर्तन घडत नाही. सगुण रुपाचे सतत ध्यान केले व नामपाठ केला तर त्या मौनात प्रपंच विरुन जातो.


७४६
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाहीं नामीं तरि तें व्यर्थ ॥१॥
नामासि विन्मुख तो नर पापीया ।
हरिविण धावया नपवे कोणी ॥२॥
पुराणप्रसिध्दि बोलिले वाल्मीक ।
नामें तिन्ही लोक उध्दरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें ।
परंपरा त्याचें कुळ शुध्द ॥४॥
अर्थ:-
तिन नद्यांचा संगम असलेले क्षेत्र तीर्थ असते अशा तीर्थांचे भ्रमण केले की देव जोडता येतो असे मानतात पण हे करताना चित्तात नाम नसेल तर भ्रमण व्यर्थ ठरते. जो नामाला विन्मुख आहे तो पापी आहे व त्याला सोडवायला धावणारा फक्त देव असतो. पुराण मुळे प्रसिध्द असलेले वाल्मिक सुध्दा सांगतात की नामामुळे तिन्ही लोकातुन उध्दार करता येतो. जो नाम जपेल तो नाही त्याच्या सकट त्याचे संपुर्ण कुळ पावन होते असे माऊली सांगतात.


७४७
हरि उच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें ।
तैसे नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाधा भेणें तेथें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
अर्थ:-
हरिनामाचा उच्चार केलामात्र त्या जीवाच्या अनंत पापराशी भस्मसाथ होतात. जसे अग्नी शेजारी वाळलेले गवत पेटते तसे नाम जप झाल्यावर पापाचे होते. हरिनाम हा अगाध मंत्र जपल्यावर पिश्चाच बाधा ही हटते. ज्याचे वर्णन करायला उपनिषद ही असमर्थ आहेत तो माझा हरि समर्थ आहे असे माऊली सांगतात.


७४८
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिध्दि ।
वायांचि उपाधी करिसी जना ॥१॥
भावबळे आकळे येर्‍हवीं नाकळे ।
करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधलें संपूर्ण माझ्यां हातीं ॥४॥
अर्थ:-
तीर्थभ्रमण, व्रत, नेमाची पूजा हे उपाचार भक्तीभावाने केले नाहीत तर वाया जातात त्याने फक्त वाऊगी उपाधी मिळते. तो हरि भावबळाने आकळता होतो. भाव नसेल तर तो कळत नसेल तर भक्तीभाव असेल तर तो तळहातावर घेतल्येला आवळ्या येवढा जवळ असतो. पाऱ्याचे खाली पडलेले थेंब उचलायला प्रचंड यत्न करावे लागतात तसे नामसाधन सोडता इतर साधनानी त्याला प्राप्त करायला सायास पडतात. निवृत्तीनाथांनी मला अभेद निर्गुण रुपाचे दर्शन घडवले असे माऊली सांगतात.


७४९
समाधी हरीची समसुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुध्दी ॥१॥
बुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें ।
एक्या केशीराजें सकळ सिध्दि ॥२॥
ऋध्दि सिध्दि निधी अवघीच उपाधी ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान ।
हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
अर्थ:-
बुध्दीतील द्वैत गेले की समाधीचे सम व शाश्वत सुख भोगता येते.त्यामुळे जीवाला बुध्दी हे सर्वात मोठे वरदान लाभले आहे व त्या बुध्दीद्वारे तो केशीराज आपलासा करता येतो. ऋध्दी सिध्दी मिळवणे म्हणजे उपाधी मिळवण्यासारखे आहे जो पर्यंत त्या परमानंदात मन रमत नाही तो पर्यंत त्याही काही कामाचा उरत नाहीत. त्या हरिचे चिंतन मी सतत करत असल्याने मला रम्य समाधान लाभले असे माऊली सांगतात.


७५०
नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टि ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप ।
पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा ।
म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पावीजे उत्तम निजस्थान ॥४॥
अर्थ:-
जो सतत व नित्यनेमाने हरिपाठ करतो त्याच्यावर कळीकाळाची दृष्टी पडत नाही. ह्या रामकृष्णनामाचे कळपासारखे घनदाट उच्चार झाले की तुमचे पाप त्याच्या पुढे पळत सुटते. हरि हा मंत्र जो शिवा प्रमाणे जपत असतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.ह्या नारायण नामाचा पाठ केला त्याला उत्तम निजस्थान प्राप्त होते असे माऊली सांगतात.


७५१
एक नाम हरी द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरीं विरळा जाणे ॥१॥
समबुध्दि घेता समान श्रीहरि ।
शम दमा वैरी हरि झाला ॥२॥
सर्वाघटीं राम देहादेहीं एक ।
सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मीं ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥
अर्थ:-
त्या एकतत्व नामाची कास धरली की द्वैत राहात नाही व परमात्म्याचे अद्वैतरुप प्राप्त होते.जर समबुध्दीने हे हरिनाम घेतले तर तो शम दम मनोनिग्रह तितिक्षा ह्या गुणाना प्राप्त होतो.ज्या प्रमाणे पाण्याने भरलेले अनेक माठ ठेवले तर त्यात सुर्यबिंब प्रत्येक माठात दिसते त्या प्रमाणे तो सर्व जींवामध्ये दिसतो. नित्यनेमाने हरिनामपाठ केला तर मागिल जन्माचा पापपुण्यापासुन मुक्त होतो असे माऊली म्हणतात.


७५२
हरि बुध्दि जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसि सुलभ रामकृष्ण ॥१॥
रामकृष्ण नामीं उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिध्दि ॥२॥
सिध्दि बुध्दि धर्म हरिपाठीं आले ।
प्रपंची निवाले सांधुसंगें ॥३॥
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
येणें दशदिशा आत्माराम ॥४॥
अर्थ:-
वाचेला सुलभ असलेले रामकृष्णनाम जपले तर ती बुध्दी असलेला जीव सर्व जींवात दुर्लभ असतो. ज्याने रामकृष्ण नामाने उन्मनी अवस्था प्राप्त केली त्याच्या पुढे सर्व सिध्दी हात जोडुन उभ्या राहतात. सर्व प्रकारच्या सिध्दी ह्या हरिनामात असल्याने ते जपणारा प्रपंचातुन ही तरुन जातो. ज्याच्यावर हा रामऋष्णनामाचा ठसा पडला त्याच्या साठी दाहीदिशात तो आत्माराम असतो असे माऊली सांगतात.


७५३
हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥२॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥
अर्थ:-
जर सतत हरिनाम मुखाने घेतले तर त्याचे शरिर गाईप्रमाणे पवित्र होते. ज्याने असे हरिनाम घेतले तो कल्पांता पर्यंत वैकुठात वास करतो. येवढेच नाही तर त्याने घेतलेल्या नामामुळे त्याचे माता पिता भाऊबंध त्याच्यासकट चतुर्भुज विष्णुरुपाला प्राप्त होतात. निवृतिनाथांच्या असिम कृपेने हे गुढगम्य ज्ञान मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात.


७५४
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिवीण सौजन्य नेणें कांही ॥१॥
तया नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।
सकळही घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गे गेला तो तेथें मुकला ।
हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णीं आवडी सर्व काळ ॥४॥
अर्थ:-
हरिचे गुणवर्णन असलेले हरिवंश पुराण अभ्यासुन जो कीर्तन करतो त्याला हरि वाचुन काहीच आवडत नाही. तसे केल्याने त्या नराचे सर्व तीर्थभ्रमण होऊन तो वैकुंठ प्राप्त करतो. पण मन प्रमाणे वागणारा ह्या लाभाला मुकतो. जो हरिनामात रमला तो मुक्त होतो.हरिनामाची जोडी करत राहणाऱ्याला त्याची गोडी लागतो व त्याला रामकृष्णनाम सतत प्राणप्रिय होते असे माऊली सांगतात.


७५५
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म ।
वाऊगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठें गेलें ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन-कळिके ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळ गोत्र वर्जियेलें ॥४॥
अर्थ:-
एक हरिनामच साररुप आहे हेच वेद शास्त्रांचे प्रमाण व श्रुतीचे वचन आहे. जप तप हे कर्ममार्ग आहेत त्यामुळे वाऊगा श्रम होतो व शेवटी सगळे व्यर्थ ठरते एक हरिनामच खरा धर्म आहे. भ्रमर जसा फुला मध्ये निवांत बसुन असतो तसे हरिनाम करणारे निवांत राहतात. हरिनामाचा मंत्र म्हणुन तेच शस्त्र केले तर यम त्याच्या कुळाकडे फिरकत नाही असे माऊली सांगतात.


७५६
नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापें अनंत कोडी गेलीं त्याचीं ॥१॥
अनंत जन्माचें तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठें ॥३॥
ज्ञानदेवीं यज्ञ याग क्रिया धर्म ।
हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
अर्थ:-
ज्या वैष्णवाने हरिनामाची जोड धरली त्याची सर्व अनंत कोटी पापे नष्ट होतात. एकदा उच्चारलेले हरिनाम हे अनंत जन्माच्या तपा समान आहे. त्या हरिनामामुळे सर्व मार्ग सुगम होतात. त्याच हरिनामामुळे योग, याग, क्रिया धर्माधर्म ह्यांचा विलय त्या हरिपाठात होतो. माझ्या साठी फक्त हरिनाम हेच यज्ञ याग आहेत व ते सोडुन मला दुसरा नित्यनेम नाही असे माऊली सांगतात.


७५७
काळ केळ नाम उच्चारितां नाहीं ।
दोन्ही पक्ष पाही उध्दरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जड जीवां तारण हरि एक ॥२॥
हरि नाम सार जिव्हा या नामची ।
उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला नामपाठ ।
पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥
अर्थ:-
हरिनाम घेण्यास काळवेळ पाहण्याची गरज नाही त्याच्यामुळे इह व परलोक ह्या दोन्हीत जीव उध्दरतो. रामकृष्णनामामुळे सर्व दोषांचे हरण होते. जडजीवाना तारण हे हरिनाम असते. हरिनाम हे सर्व साधनांचे सार असुन ते घेणाऱ्याच्या दैवाला पार नाही. जर हा हरिपाठ करत राहिले तर पुर्वजांना ही वैकुंठ प्राप्त होते असे माऊली सांगतात.


७५८
नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥
नारायणहरि नारायणहरि ।
भक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिवीण जन्म नरकचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥
अर्थ:-
ज्याच्या जवळ नित्यनेम आहे तो नर दुर्लभ आहे. त्याच्या जवळ लक्ष्मी व तिचा नाथ दोघे ही राहतात. नारायण हरि हा मंत्र जपणाऱ्याच्या घरी भुक्ती मुक्ती दोन्ही हात जोडुन कामारी होतात. हरिनामावीण असणाऱ्याचे जीवन नरकच असते. व तो प्राणी सहज यमाचा पाहुणा होतो. मी श्री गुरु निवृतिनाथाना विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले की गगना पेक्षा हरिनाम मोठे आहे असे माऊली सांगतात.


७५९
सात पांच तीन दशकांचा मेळा ।
एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥१॥
तैसें नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ ।
तेथें कांहीं कष्ट नलगती ॥२॥
अजपाजपणें उलट प्राणाचा ।
तेथे ही मनाचा निर्धारु असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥४॥
अर्थ:-
सात तत्व वैषाशिक गुण कर्म सामान्य विशेष समवाय व अभाव, त्रिगुण, पंचमहाभुते व इंद्रिय दशक म्हणजे शरिराचा मेळा बनतो पण चैतन्य स्वरुपात तो आपली कळा त्यात दाखवतो. हे सर्व तत्वार्थाने क्लिष्ट आहे त्या मानाने हरिनाम सहज सोपे आहे. आपले श्वासोश्वास प्रबंध बनवुन हरिनाम जपायला मनोनिग्रह लागतो. हरिनामाविण जगणे हे जगणे नाही म्हणुन रामकृष्णनामाचा पंथ स्विकारावा असे माऊली सांगतात.


७६०
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटीं राम भावशुध्द ॥१॥
न सोडी रे भावो टाकीरे संदेहो ।
रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥२॥
जाती वित्त गोत कुळ शीळ मात ।
भजे कां त्त्वरित भावना युक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥


७६१
जाणीव नेणीव भगवंती नाहीं ।
हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायणहरी उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
तें जीव जंतूंसी केंवि कळे ।
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥३॥
अर्थ:-
हा हुशार हा अनाडी हे भगवंत जाणत नाही.तो फक्त कोण सतत नामजप करते तेच पाहतो.व त्याला मोक्ष देतो.ज्याने नारायण हरि ही नामे जपली त्याला कळीकाळाची फिकिर करण्याचे कारण नाही. जो सतत नाम घेतो तो प्रमाणभूत होतो. ज्या हरिचे वर्णन वेदांना करता आले नाही ते जीवजंतुना कसे समजणार? सतत नारायण नामाचा पाठ केला तर सर्वत्र वैकुंठ निर्माण झाले आहे असे दिसते. असे माऊली सांगतात.


७६२
एकतत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसि करुणा येइल तुझी ॥१॥
तें नाम सोपेरे रामकृष्णगोविंद ।
वाचेशी सदद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीरे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥


७६३
सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाइल पाप ।
कृष्णनामी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडीं ।
इंद्रिया सवडी लपु नको ॥४॥
तीर्थव्रतीं भाव धरी ते करुणा ।
दया शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ।
समधि संजीवन हरिपाठ ॥६॥
अर्थ:-
जर सुख हवे असेल तर सर्व शास्त्रांनी निवडलेले नाम निवडुन जपत राहिले पाहिजे त्या शिवाय रिकामा राहु नकोस. हा संसाराचा व्यवहार लटिका आहे उगाच यात येरझारा घालु नकोस. एका नाममंत्राने कोटी पापे जातात त्यामुळे कृष्णनामाचा संकल्प धारण कर. हे करताना स्वतःची वृत्ती काढुन टाकुन द्यावी व इंद्रियांच्या आड दडु नये. तीर्थव्रतांमध्ये शुध्द नामभाव धरावा.मनी करुणा असावी. शांती दया ह्यांचा पाहुणा हरि होतो त्यामुळे त्यांचा अंगिकार कर. असा हा संजिवन समाधीचा ज्ञानमार्ग असणारा हरिपाठ श्रीगुरु निवृत्तिनाथानी सांगितल्यामुळे प्रमाण मानला असे माऊली सांगतात.


अप्रसिद्ध अभंग – अभंग ७८१ ते ९०३
७८१
संसार वो ग्रामीं गेला सांडुनी ।
माझे अंत:करणीं माहियेर ॥१॥
सासुरवासिनी मी वो परदेशिनी ।
कां नये अझुनी मूळ मज ॥२॥
आणिक एक अवधारा ।
मज दिधलें हीनवरा ।
माझें कांहीं सर्वेश्वरा न विचारिशी ॥३॥
व्याली वेदना जाणे वांझ कांही नेणें ।
बालक काय जाणे तहान भूक ॥४॥
तैसी ते नव्हे लेकुराची माये ।
कृष्ण माझी धाये मोकलिते ॥५॥
आशा मनशा तृष्णा कल्पना चौघी नणंदा ।
पापीण रे चिंता सासू माझी ॥६॥
सासुरा हा स्वार्थ कांही न विचारी परमार्थ ।
आतां करीन घात तयावरी ॥७॥
दुरळ हा प्रपंच दुष्ट भावे आणि दीर ।
इहीं मज थोर कष्टविले ॥८॥
काम क्रोध थोर बोलती बडिवार ।
मज म्हणती पोर निर्देवाचे ॥९॥
नैश्वर गहिवरु दाटतसे गळा ।
आसुवें ढळढळा गळताती ॥१०॥
सासुरयाचे घरीं करित होते काम ।
अवचित विंदान मांडियेलें ॥११॥
घरा सोळा सांधी बहात्तर कोठे ।
नवही दारवंटे झाडीत होते ॥१२॥
चोळी व साउले हिरोनि घेतलें ।
उघडे पाठविलें माहेराशी ॥१३॥
समर्थाची लेकी परि मी संताची पोसणी ।
विमानीं बैसोनि जाते देखा ॥१४॥
बाप चक्रधरा रुक्मादेवीवरा ।
उबगला संसारा येऊं नेदी ॥१५॥
अर्थ:-
भगवंताचा वियोग झालेली विरहिणी( स्त्री) आपल्या मैत्रिणीजवळ म्हणते. माझा परमात्मरुपी पति मला या संसाराच्या गावी सोडून गेला.असल्यामुळे माझ्या अंतःकरणांत माहेराची ओढ आहे. मी सासुरवासिनी असून परदेशी झाले. मला अजून माहेरचे मूळ कां येत नाही ? आणकी एक गोष्ट सांगते ती तुम्ही नीट ऐका. मला गरीब नवऱ्याला पाहून दिले. याबद्दल तुम्ही त्या सर्वेश्वराला कांहीच का नाही विचारीत? बरोबरच आहे.जन्म देणाऱ्या आईलाच बाळांतपणाच्या वेदना समजतात. वांझेला त्या कशा समजणार? बालकाची तहान भूक तिला कशी कळणार. माझी श्रीकृष्णमाय मात्र तशी नाही. ती धाय मोकलीत माझ्यासाठी धावून येईल. आशा, तृष्णा, इच्छा, कल्पना ह्या माझ्या नंणदा असून संसार चिंता ही पापिणी सासू आहे. व्यवहारातील स्वार्थ हा माझा सासरा असून. तो परमार्थाचा कसलाही कधी विचार करीत नाही. म्हणून मी आतां त्याचा घातच करीन.या खडतर प्रपंचात दुष्ट भावना असलेले दीर, यानीही मला भारी कष्ट दिले.हे काम क्रोध दीर मोठ्या ऐटीने बोलतात की ही कारटी फार मोठ्या दुर्देवाची आहे. या निराशेमुळे कंठ दाटून येतो. व घळघळा डोळ्यांतून धारा वाहू लागतात. मी थोरा मोठ्याची( वस्तुतः ब्रह्मस्वरुप असलेली) मुलगी असून सासऱ्याच्या घरी मोलकरीणी प्रमाणे झाडलोट सारवण्याची कामे करीत होते. घर तरी लहान कोठे आहे. पंधरा सोळा वाकड्या तिकड्या जागा आहेत. (पंच ज्ञानेद्रिय, पंच कर्मेंद्रिय पंच प्राण व एक मन मिळून सोळा) तसेच बहत्तर कोठे आहेत. चार वेद, चार उपवेद, चौसष्ट कला मिळून बहात्तर दारेही काही थोड़े नाहीत.ती नऊ आहेत. एवढे मोठे घर मी झाडीत असता.माझे लुगडे चोळी हिसकावून( स्थूल सूक्ष्म शरीराचा अभिमान काढून घेऊन) मला अगदी उघडे करुन माझ्या माहेरी म्हणजे परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी पाठविले.मी मूळची समर्थाचीच मुलगी म्हणजे मूळची परमात्मस्वरुपच असलेली पण उपाधिमुळे संसाराच्या त्रासांत पडलेली अशी मी संतांची पोसणी म्हणजे अनुग्रह झालेली असल्यामुळे आतां विमानांत बसून माझ्या माहेराला म्हणजे परमात्मस्वरुपाला निघाले आहे. माझा बाप सुदर्शनचक्र धारण करणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझे संसारांतले कष्ट पाहून परत संसाराला येऊ देत नाहीत असे माऊली सांगतात.


७८२
पृथ:कारे कर्म आचरितां ।
विधि जिज्ञाशीं काय सत्ता ।
अष्टादश पुराणें नानामतें आचरतां ।
परि तयासी विधि विवेक न कळे तत्त्वता ।
कर्म कळा जयाची वाचा उच्चारिता ।
ऐशी नाना द्वंद्वें उपाधिकें जल्पती
परि एकही नेणे तेथींची वार्ता रया ॥१॥
ऐशी भ्रांती साम्य बोलती सकळे ।
परि नकळे नकळे पूर्ण सत्ता रया ॥२॥
निजब्रह्म बुध्दि नेणसी ।
गव्हारा वाउगा का शिणशी ।
या साठीं भ्रमुनिया बरळशी ।
पहिलें नव्हे तुजसंकल्पें करिशी ।
नाना गोष्ठी रया ॥३॥
आतां अथातो धर्मजिज्ञासा ब्रह्म जिज्ञासिक वचन ।
हें तंव वेदीचें प्रमाण ।
तरी वेदे जें वदवितें नकळे वेद कळा लय लक्ष धारण ।
पूजा समाधीचेनि यज्ञ यागादिके कर्मे ।
जपतप अनुष्ठान नाना उपासना मंत्रयंत्रादि साधनें ।
धांडोळितां परि ते एकही न घडे ब्रह्म जिज्ञासिक वचन ।
येणें सुखासाठीं बापा होशी पै हिंपुष्टी
स्वानंद जीवन सुख आहे अन रया ॥४॥
नाना अर्थवाद उपाधि शब्दज्ञानें तेणें ।
केविं शुध्द होती याचीं मनें ।
नाना मुद्रा संकल्पाचिया वाढविंता तेणें ।
केंवि पाविजे ब्रह्मस्त्रानें ।
मी ब्रह्म ऐसें शब्दें वाखाणु जाशी तरी तेणे ।
ब्रह्म ऐसें केंवि होणें ।
ब्रह्माहमस्मि बोध वाचे उच्चारितां हेहीं अहंकाराचें लेणें ।
आतां परतें सकळही वाव जाणोनिया कांही आपलें स्वहित करणे ।
बापरखुमादेवीवर विठ्ठल चिंतिता निजसुखाशीं येऊं नेदी उणें ॥५॥
अर्थ:-
विधिनिषेध जाणुन निरनिराळ्या तऱ्हेचे कर्म का आचरण करता. १८ पुराणे निरनिराळ्या शास्त्रकारांची मते यांनी सांगितल्याप्रमाणे वागत असता तुम्हाला विधि निषेध खरोखर कळतच नाहीत, ज्याचे कर्म कौशल्य वाणीने उच्चारित असतात व ज्याच्या ठिकाणी उपाधिने अनेक प्रकारे द्वैतभान झाल्याची बडबड करतात. पण त्या ब्रह्मस्वरूपाची वार्ताही त्यांना ठाऊक नसते. ही भ्रांती आहे. साम्यतेने सर्वजण बोलतात. पण त्या ब्रह्माची पूर्ण सत्ता त्यांना कळत नाही.मी ब्रह्मच आहे, ही गोष्ट तुला कळत नाही, मग वेड्या विनाकारण कर्माचा शीण कशाला करतोस. म्हणून सांगतो तुझ्या मूळ स्वरूपाला कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही. भ्रमाने बरळून तूं आपल्या इच्छेनेच नाना कमें करितोस.आत “अथातो धर्मजिज्ञासा” व “अथातो ब्रह्मजिज्ञासा” ही वचने वेदाला प्रमाण आहेत.तरी पण वेदांत लय,लक्षण, धारण, पूजा, समाधि, यज्ञ, याग, जप, तप, उपासना मंत्र, तंत्र वगैरे सुखाकरिता अनेक साधनें धांडोळिली तरी त्यातील एकही ब्रह्म जाणावे अशी सांगणारी नव्हेत ज्या सुखाकरता तूं कष्टी होतोस ते सुख याहून भिन्न आहे. कर्माची स्तुती करणारी अर्थवाद वाक्ये अनेक आहेत.त्या वाक्यांच्या योगाने जीवांची मने शुद्ध कशी होतील? निरनिराळ्या शब्दांच्या संकल्पांनी अगर खुणांनी ते ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल? मी ब्रह्म आहे. असे नुसते बोलण्याने तू ब्रह्म कसा होशील? मी ब्रह्म आहे असे वाचेने उच्चारणे ही गोष्ट देखील अहंकाराची ठरेल. आता या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून सोडून दे जर तुला सुखाची इच्छा असल तर तूं माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचे चिंतन करीत जा. म्हणजे ते तुझ्या सुखांत कमीपणा येऊ देणार नाही. असे माऊली सांगतात.


७८३
आठवितों तूंचि जवळिके ।
नाठवशी तरी निजसुखें ।
आठऊं ना विसरु पाहे ।
तंव सगुणचि ह्रदयी एक रया ॥१॥
तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा आठऊ ।
ध्यानांचा आठऊ ।
असे मना रया ॥२॥
विसर पडावा संसाराचा ।
आठऊ हो तुझिया रुपाचा ।
येथें नाम रुप ठसा ह्रदयीं राहो ।
जिवाचिया जिवलगा ।
माझिया श्रीरंगा ।
गोडी घेऊनियां ।
द्वैत नाहीं पाहो रया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
सगुणी सुमन गुंफिली प्रीति ।
आवडे तो कोंदाटले सुमन हें विरालें ।
जाली नामरुपीं ऐक्य भेटी ।
नाम रुप सार जाणोनि जीवन ।
संसारा जालिसे तुटी रया ॥४॥


७८४
परमानंद आजि मानसिरे ।
भेंटि जाली संतासिरे ॥१॥
पूर्वजन्मीं सुकृते केलीं ।
तीं मज आजि फळासी आलीरे ॥२॥
मायबाप सकळ सोयरे यातें ।
भेटावया मन न धरेरे ॥३॥
एक तीर्थहूनि आगळे ।
त्यामाजि परब्रह्म सांवळेरे ॥४॥
निर्धनासी धनलाभ जालारे ।
जैसा अचेतनीं प्रगटलारे ॥५॥
वत्स विघडलिया धेनु भेटलीरे ।
जैसी कुरंगिणी पाडसा मिनलीरे ॥६॥
पियूशापरतें गोड वाटतेरे ।
पंढरीरायाचे भक्त भेटतारे ॥७॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलेरे ।
संत भेटता भवदु:ख तुटलेरे ॥८॥


७८५
आतां आपणया आपण विचरी ।
सेखी प्रकृती ना पुरुष निर्धारी रया ॥१॥
आता प्रेतांचे अलंकार सोहोळले ।
कीं शब्दज्ञानें जे डौरले ।
दीप न देखतीं कांही केले ।
ऐसें जाणोनियां सिण न मानिती प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतांचि जे बोधले ।
तेणें सुखें होउनि सर्वात्मक जे असतांचि देहीं विस्तारलें ।
येणें निवृत्तीरायें खुणा दाउनि सकळ बोलतां सिण झणें होईल रया ॥३॥
अर्थ:-
आतां आपण आपल्या स्वरूपांचा विचार केला तर असे दिसून येईल की आपण शेवटी पुरूषही नाही की प्रकृतिही नाही. शब्दज्ञानी लोकांचे बोलणे प्रेतावरील अलंकारांनी शृंगारल्याप्रमाणे आहे. ते उगीच आपल्या शब्दज्ञानाची प्रौढी मिरवितात. काही केल्याने परमात्मस्वरूप दीप पाहात नाहीत. उलट शब्दज्ञानांचाही ते शीण मानीत नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यास पाहातांच ज्यांना बोध होतो. त्यांनाच सर्वात्मकाची प्राप्ती होऊन परमात्मा देहांत भरून राहिला आहे अशी खात्री होऊन इतर संभाषणाचा खरोखर वीट येतो. अशी खूण मला निवृत्तीरायांनी दाखविली. असे माऊली सांगतात.


७८६
अकराव्या खणावरी मंदीर धुपविलें ।
तेथें एक देखिले रुपेंविण ॥१॥
न बोले यासि बोलावया गेलें ।
मीहि न बोलती झालें गे माये ॥२॥
बापरखुमादेविवरेंसि ठक पडिलें ।
मी चित्त ठसावलें ब्रह्माकारें ॥३॥
अर्थ:-
दहा इंद्रिये व मन अशा अकरा तत्त्वांच्या खाणीवर देहरूपी मंदीर उभे केले आहे त्या मंदीरामध्ये रूपरहित आत्मा हा देव आहे. त्याला पाहिले.त्या न बोलणाऱ्या देवासी बोलण्याचा मी प्रयत्न करू लागले. पण तो आत्मा माझेच स्वरूप असल्या मुळे मीही मुकी झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या कृपेने मीच ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला व तोच माझ्या ठिकाणी बाणला.असे माऊली सांगतात.


७८७
पदत्रयादि विलक्षण नातळे वर्णावर्ण ।
पंचभूतिकपण नातळे ज्यासि ॥१॥
ते स्वयंभ प्रमाणें घनावलेन पणें ।
द्वैताद्वैत नेणें तैसें आहे ॥२॥
नामरुपाचा भेद तुटलासें संबंध ।
स्वयें निजानंद भोगी बापा ॥३॥
सारुनि लक्ष लक्षणा शास्त्राचा उगाणा ।
तेथ वेदांदि षडदर्शना नुमगे पाही ॥४॥
तयामाजि तें असतसे निरुतें ।
न चोजवें पंथें नवल ज्याचें ॥५॥
म्हणौनिया परिसा चौंचीचि उजरीं ।
तेंचि निर्विकारी प्रकाशले ॥६॥
निवृत्तिदास म्हणे हा निजभाव ।
बोलो नये ठाव तैसे जाले ॥७॥
अर्थ:-
त्या परमात्म्याचे स्वरूप सच्चिदानंदपदांनी बोधन करता येत नाही. त्याला वर्णावर्ण भेद स्पर्श करू शकत नाही. ते पाचमहाभूतापलीकडे आहे. ते स्वयंसिद्ध द्वैताद्वैताच्या पलीकडे आहे. त्याच्याठिकाणी नाम व रूप नसून ते केवळ सत्, चित्त, आनंदरूप आहे. हेच तुझे स्वरूप असल्यामुळे त्याचा आनंद भोगीत राहा. लक्ष, लक्षण, वगैरे विनाकारण शास्त्रांच्या खटपटी सोडून दे अशा कसोटीने ते स्वरूप चार वेद व सहाशास्त्रानांही उमगले नाही.खरोखर ते या सर्वांमध्ये आहे. परंतु यांनी ज्या मार्गानी शोध चालविला त्या मार्गानी ते सापडत नाही. हे आश्चर्य आहे. असे असूनही खरोखर चारी वेदांचा असा थोरपणा आहे की त्यांनी ते स्वरूप असे आहे असे जरी सांगितले नसले तरी ते निर्विकार आहे असे सांगितले. ते स्वरूपच आपण आहो.हे बोलून दाखविता येण्यासारखें नाहीच. परंतु याबद्दल बोलावयाचा झाले तर असे बोलावे लागते असे निवृत्तीदास माऊली सांगतात.


७८८
साखरेचा ऊंस जरी होय पुढती ।
मथितां घृतीं काय क्षीर निवडे ॥१॥
माघारे जीवन जरी वाहे सरिता ।
तरिच जन्मां येती हरिचे दास ॥२॥
विविधा मति भक्ति जे करिती ।
ते अंती नव्हती संसार बापा ॥३॥
कापुराचे मसि जरी लिहिजे लिखित ।
जरि छाये पडे हात प्रकृतीचे ॥४॥
पवना पाठीं पांगुळें लागती ।
तैं जन्मा येति हरिचे दास ॥५॥
संत वैष्णव हरिदासा जे नर निंदिती ।
आणि नमनिती ते वरपडे होती प्रेम किंकर ॥६॥
निवृत्तिदास म्हणे विव्हळी जे भजती ।
ते जन्मा न येती भाक माझी ॥७॥
अर्थ:-
साखरेपासून पुन्हां उस कधी निर्माण होईल काय? तूप घुसळून त्याच्यापासून लोणीपरत निघेल कां? नदीचा ओघ परत डोंगरातील उगमांकडे वळेल का? या गोष्टी जशा अशक्य आहेत.तसे हरिदासांना पुन्हा जन्मास येणे अशक्य आहे. विविध प्रकारची जे श्रीहरिचे भक्ति करतात ते पुन्हा संसारपाशांत अडकणार नाही.कापुराच्या शाईने कधी कुणास लिहीता येईल का? सूर्योदयाबरोबर आपल्या छायेवर आपला हात पडेल का? वाऱ्यांच्या पाठीमागे पांगळे धांवतील का? या गोष्टी जशा अशक्य तसेच हरिचे दास पुन्हा जन्मास येणे अशक्य.संत वैष्णव हरिचे दास जे संत, त्यांची निंदा करणारे ते वैषयीक लौकिक प्रेमाचे दास असतात. जे श्रीहरिला आर्ततेने भजतात ते पुन्हा जन्मास येत नाहीत. अशी माझी श्रीनिवृत्तीच्यादास माऊलींची शपथपूर्वक वाणी आहे.


७८९
अमृताची कुंडी निद्रिस्तां मरण ।
झणे त्या दुषण बोलसी रया ॥१॥
वासना संग धीट प्रकृति कनिष्ठ ।
भोगुनि वैकुंठ जन्म घेती ॥२॥
तैसें नव्हे सारासार तत्त्व निवृत्ती ।
बुडउनि प्रवृत्ति आपण नांदे ॥३॥
ज्ञानदेव बोले अमृत सरिता सर्वाघटीं पुरता हरि नांदे ॥४॥
अर्थ:-
ज्ञानप्राप्त करून घेण्याची सोय ही नरदेह अमृताची कुंडी मनुष्याला लाभली असून तो त्याकडे दुर्लक्ष करून मृत्यू पावतो. या करिता तूं दूषण देशील. परंतु कनिष्ठ स्वभावाचे विषयी पुरूष स्वर्गादि भोगांची वासना धरून त्याप्रमाणे कर्मे करून वैकुंठातील भोग भोगतात. व पुण्य संपल्यानंतर पुन्हा जन्माला येतात. मुमुक्षुची तशी स्थिती नाही.ते विषयप्रवृत्तीस आपल्या ताब्यात ठेऊन निवृत्ति मार्गाने कालक्रमण करितात. श्रीहरीच्या रूपाने ज्ञानरूपी अमृत गंगा सर्वत्र सर्वांच्या हृदयांमध्ये परिपूर्ण भरलेली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९०
सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण ।
नाहीं रुप वर्ण गुण जेथे ॥१॥
तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी ।
पाहते पाहणें दुरी सारोनिया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतिची निजज्योती ।
ते हे उभी मूर्ती विटेवरी ॥३॥
अर्थ
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण्य ! नाही रुप वर्ण गुण तेथे !! करुणावरुणालय श्रीपंढरीशपांडुरंगाचे हरि ज्ञान अनंत आहे.पंचतत्त्वे व्यापक असूनही ते रुपातीत,गुणातीत,वर्णातीत आहे. बाबारे ! हे सत्य आहे कि पंढरपूर निवासीनी वैकुंठवासीनी विठाबाई हिच्या रूपाचे वर्णन गगना पेक्षाही जास्त श्रेष्ठ आहे. विठेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शुरदाता!!… सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर कटावरी ठेऊनिया …..असा हा भक्तीचा महामेरू विठ्ठल आहे! विठ्ठल आवडी प्रेम भाव! तुझ्या नामाचा हो टाहो!!… समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो….. किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे ! देवाची करणी नारळात पाणी असे म्हंटले जाते ! तसे आमच्या भगवंताचे ज्ञान गगनाहूनी वाड आहे. म्हणून तर संत मंडळी कशाचीही अपेक्षा न करता विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊनीया नाचतात. खेळ मांडीयेला वाळवंटी नाचती वैष्णव भाई रे!!…. असा कसा देवाचा देव सर्वांना भक्तीचे वेढ लावियला लळा !!
म्हणून अभंगाचे दुसर्‍या चरणात माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात , तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी ! पाहता पाहणेश्वरी सारोनिया!! विठू तुझे माझे राज्य नाही दुसर्‍याचे काज !!….पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीयेला डोळा बाई ये हो….. वेधले हो मन त्याची ये गोडी!!….. आपले या जगात परब्रह्म शिवाय कोणी नाही. म्हणून माऊलीने सांगितले , योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा!!…. ज्ञानीयाचा राजा गुरू महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे …..योग्याची माऊली वैष्णवाचे अग्रगण्य असलेल्या माऊलीला सुध्दा विठ्ठल भक्ती आवडली! म्हणून तर माऊली म्हणतात, आजी संसार सुफल झाला गे माये देखियेले पाय विठोबाचे!!… तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा …… पांडूरंग अनंत रूपे अनंत वेषे देखीले म्या त्याशी बापरखुमादेवीवरू खुण बांधली कैशी !!…असा हा गुणात्मक विठ्ठल त्यांची भक्तीची गुढी पंढरपूरला नाचत जाऊ !! त्याच्या गावा खेळीया सुख देईल विसावा रे….. तो सगळे सुख समाधान प्राप्त करून देणारा , आपल्यावरील सर्व संकटे दूर करणारा तुच भगवंत श्रीरंग आहेस!! तुला काय सांगण्यची गरज नाही . सर्व तीर्थाचे माहेर घर पंढरी मध्ये विराजमान आहे. वैकुंठ नायकाची सेवा करत राहिले पाहिजे. कारण हेच सर्व सुखाची गोडी चाखणयाचा मार्ग आहे. नरदेहा येऊन करावे भजन कीर्तन !!
म्हणून अभंगाचे शेवटच्या चरणात माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात , ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ! ति ही मुर्ती उभी विठेवरी!! जसा दिपक ज्योत उजेड देतो तसाच आमचा कैवारी प्राणविसावा मेघशामा श्रीहरी त्याचे नामस्मरण सर्व श्रेष्ठ मानले ! अखंड जया तुझी प्रिती! मज दे तयाची संगती!! मग मी!! कमलापती !तुज बा नाणी कंटाळा!!….. पडोनि राहिन तये ठायी! उगाची संताचिये पायी! न मागे न करी काही!!…… तुझी आण गा विठोबा…… तुम्ही आम्ही पीडो जेणे दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे…… हाका देत दाराशी……. तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला ….. .न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर ……अशी ही महान विभुति पुण्य पावन तीर्थक्षेत्र पंढरी मध्ये विराजमान असलेल्या योगीराज योगेश्वरी सह वैष्णव धर्माची पताका घेऊन लाखो वैष्णवाचा मेला जमा झाले आहे . जगाच्या पाठीवर कुठेही असा कमरेवर हात ठेवून निरंतर आम्हा लेकरांना दर्शन देत उभा राहिला आहे ! अशी हि ज्योतीची निज ज्योती जगजेठी श्रीपंढरीश पांडूरंग श्रीरंग विठ्ठल त्यांची भक्तीची ओढ मनाला लागली कि तो भक्ताचे संकटसमई धाऊन येतो म्हणून माऊली सांगतात!!


७९१
निर्गुणाचे रंगीं रंगले हें मन ।
सांवळे सगुण ब्रह्म तेंची ॥१॥
मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती ।
वचनीं निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती ॥२॥
असिपदीं जैसें तत्पद तें नाहीं ।
सांवळे ब्रह्म तेंचि खरें ।
सांवळें निर्धारे जाण रया ॥४॥
अर्थ:-
जरी माझे मन निर्गुण स्वरूपांत रंगून गेले तरी शामवर्ण सगुण श्रीकृष्णमूर्ति हीच ब्रह्म आहे. सगुण अगर निर्गुण यापैकी एकाचाच अभिमान धरणारे लोक, हे मानणार नाहित खरोखरी सगुण निर्गुण यांची भिन्नता केवळ शब्दमात्र आहे.जसे ‘तत्त्वमसि’ या महावाक्यांत ‘असि’ पदाहून ‘तत्’ हे पद वेगळे आहे. तरी असि’ पदाने तत् पदाचे एकत्वच सांगितले आहे. त्याप्रमाणे सांवळे परब्रह्म श्रीकृष्ण व निर्गुण परब्रह्म हे दोन्ही एकच आहे. निवृत्तिनाथ माऊली ज्ञानदेवांना सांगतात “हे चांगदेवा सगुण व सांवळा श्रीकृष्ण हा खरोखर परब्रह्मच आहे असे तुं समज”


७९२
डोळांची पाहा डोळां शून्याची शेवट ।
निळबिंदु नीट लखलखीत ॥१॥
विसावों आलें पातलें चैतन्य तेथें ।
पाहे पा निरुतें अनुभवे ॥२॥
पार्वतिलागीं आदीनाथें दाविलें ।
ज्ञानदेवा फावलें निवृत्तिकृपा ॥३॥
अर्थ:-
शून्याचा शेवट असलेले डोळ्यांचा डोळा असलेले असे जे निर्गुण स्वरूप त्यांचे योगाभ्यासाने योगी अवलोकन करीत असतांना योग्यांना एक तेजस्वी निळा बिंदु दिसतो.१ त्यांत हे चैतन्य ठसावलेले आहे हे अनुभवाने नीट पाहता येते. हेच स्वरूप शकराने पार्वतीला सांगितले. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने मी ही पाहिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९३
शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।
निळबिंदु सावळा प्रकाशला ॥१॥
ब्रह्म ज्योतिरुप विसावले जेथ ।
अनुभव साद्यंत पहा तुम्ही ॥२॥
ऐसे कैलासनाथें सांगितलें पार्वती ।
ज्ञानदेवा निवृत्ति तेंचि सांगे ॥३॥
अर्थ:-
शुन्यरूप जो नीलबिद् त्याचा योगाभ्यासाने अनुभव घ्या.तो तेजोमय आहे त्या ठिकाणी चैतन्यरूप ब्रह्म जणू काय विसावा घेण्याकरिता आले आहे. त्याचा अनुभव घ्या. हेच स्वरूप शंकरानी पार्वतीला सांगितले व निवृत्तिरायांनी कृपा करून मला सांगितले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९४
चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं ।
ब्रह्मरंध्री निसंदेहीं निजवस्तु ॥१॥
साकळें सकुमार बिंदूचे अंतरीं ।
अर्धमात्रेवरी विस्तारलें ॥२॥
त्रिकूट श्रीहाट गोल्हाट तिसरें ।
औठपिठादी सारे ब्रह्मांडासी ॥३॥
स्थूळ सूक्ष्म कारणी माया ।
महाकारणाच्या ठायां रिघ करा ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल ।
आकाश बुबुळीं पाहा असे ॥५॥
अर्थ:-
शुन्य म्हणजे सत्यत्वाने नसलेल्या, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, व तुरीय अवस्थांच्या अलिकडे ते ब्रह्म आहे. तसेच महाशून्यावस्था जो उन्मनी पलीकडेहि ते आहे. म्हणून त्यास सर्वद्रष्टा म्हणतात. दिसणारे दृश्य ते शुन्य मिथ्या आहे. आणि आत्म्यावर आलेला पाहातेपणा हाही खोटा असे समजावे देहांत राहाणारा आत्मा या देहाहून निराळा आहे. शून्यसहित व शून्यरहित हे दोन्हीही धर्म आत्म्याच्या ठिकाणी नाहीत, असा निजात्मा पहा. त्या आत्म्याच्या ठिकाणी ध्याता ध्येय व ध्यान ही त्रिपुटी नाहीशी होऊन मूळचे जे शुद्धस्वरूप तेथे मी लीन झालो. माऊली ज्ञानदेव सांगतात मला अनुभवाची खूण गुरूमुखाने मला कळली.


७९५
आकाश जें दिसे दृष्टिचिया पोटीं
शून्यत्त्वासी घोटी चैतन्यांत ॥१॥
अर्थ पाहतां सांकडें ऐकतां ।
कैसें करुं आतां निवृत्ति सांगे ॥२॥
सांगतांची गुज देखिलें नयनीं ।
हिंडताती मौनी याची लागी ॥३॥
ज्ञानदेवाचा अर्थ कूटस्थ परिपूर्ण ।
पूर्णही अपूर्ण होय जेथें ॥४॥
अर्थ:-
आकाश जरी सर्वव्यापी दिसत असले तरी चैतन्याच्या दृष्टीने ते अल्पच वाटते. या तत्वाचा विचार करु लागलो. तर मोठी अडचण वाटते.म्हणुन निवृत्तिरायांनी सांगितल्या प्रमाणे ते गुह्य मी पाहिले याच करिता मौनी योगी लोक हिंडत असतात. हा सर्व अर्थ कुट स्वरुपाचा आहे.परंतु त्या कुटाच्या जागी अपुर्ण अर्थ पुर्ण होतो.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९६
सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचें घर ।
सत्रावी निरंतर वसे जेथें ॥१॥
रक्त शुभ्रवर्ण निळा पीत दिसे ।
दृष्टी शुध्द असे त्यामध्यें ॥२॥
फार किती सांगों सज्ञान तुम्ही जन ।
अर्थ हा समजोन मौन्य धरा ॥३॥
गुह्याचें ही गुह्य निवृत्तिनें दाविलें ।
मीच याचाहो बोलें बोलतसे ॥४॥
अर्थ:-
नीळ बिंदुरुप ब्रह्माचे स्थान सहस्त्रदळातील ब्रह्मरंध्र होय, त्या ठिकाणी सतरावी जी अमृत जीवनकळा असते. त्या ज्योतीचा रंग बाहेरून पाहात असता तांबडा, पांढरा, निळा, पिवळा असा दिसत असला तरी आंत मात्र शुद्ध स्वरूपच आहे. तुम्ही सर्व सज्ञानच आहात तुम्हाला फार सांगावयाचे कारण नाही. वर वर्णन केलेल्या खुणांचे तात्पर्य लक्षात घेऊन मौन धारण करा. आशा तहेचे च गुह्यातील गुह्य जी ज्योत ती निवृत्तिरायांनी मला दाखविली व मी ती शब्दांनी वर्णन करून सांगितली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९७
आकाशाचा शेंडा कमळ निराळें ।
त्यासी चार दळें शोभताती ॥१॥
औट हात एक अंगुष्ठ दुसरें ।
पर्वार्ध मसुरे प्रमाण हें ॥२॥
रक्त श्वेत शाम निळवर्ण आहे ।
पीत केशर हे माजी तेथें ॥३॥
तयाचा मकरंद स्वरुप तें शुध्द ।
ब्रह्मादिका बोध हाची जाहला ॥४॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीप्रसादें ।
निजरुप गोविंदें जनीं पाहतां ॥५॥
अर्थ:-
आकाशातील सृष्टीच्या अगदी शेवटचे जीवरुप शेड्याचे कमळ आहे. त्या जीवरुप कमळाच्या स्जुल, सुक्ष्म, कारण व महाकारण या चार देहरुपी पाकळ्या आहेत. यातील एक पाकळी ही साडेतीन हात आहे. दुसरी पाकळी अंगठ्या येवढी आहे तर तिसरी पाकळी अर्ध्या पेरायेवढी असुन चौथा महाकारण देह मसुरा यैवढा आहे. पाकळ्यांचा रंग तांबडा, पांढरा,काळा, व निळा आहे.त्यात पिवळ केशर आहेत. आनंद हा त्याचा सुगंध आहे व ब्रह्मरस हा मध आहे. असा बोध ब्रह्मादिकाना केला आहे. निवृत्तिनाथांच्या कृपेने त्या निजरुपाचा अनुभव येतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९८
ब्रह्मांडाचे भुवनीं कमळ तें सुंदर ।
पाकोळ्या साचार चार तेथें ॥१॥
औट हात स्थूळ अंगुष्ठ ।
सूक्ष्म पर्वार्ध कारण जाण रया ॥२॥
महाकारण मसुरामात्र सदोदित ।
ब्रह्मरंध्र साद्यंत वसतसे ॥३॥
चहूं शून्यवर्ण देह चार पहा ।
कृष्ण निळ शोभा विकासली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे आतां फार म्हणो काय ।
सहस्त्रदळीं निश्चय आत्मा असे ॥५॥
अर्थ:-
चिदाकाशात ब्रह्मस्वरुप एक सुंदर कमळ आहे. त्याला चार देहरुपी पाकळ्या असुन त्याचे वर्णन कालच्या अभंगात आले आहे. ते महाकारण मसुरा येवढे आहे. आशा रितीने त्या कमळात काळसर निळ्या रंगाची छटा दिसायला लागली म्हणजे चारी देहांचा विसर पडतो मी जास्त काय सांगु त्या कमळात सहस्त्रदळी आत्मा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


७९९
त्रिगुणाचें मूळ सत्रावीचें सार ।
उन्मनीचें बीज जाण रया ॥१॥
शून्य ब्रह्म पूर्ण चक्षूचे अंतरीं ।
निर्विकार निरंजन तोची तें गा ॥२॥
सूर्य चंद्र दोनी प्रकाशले साजिरे ।
त्रिकूट संचरे आत्मठसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें ।
राहा रे निजबोधें निरंतर ॥४॥
अर्थ:-
सहस्त्रदळातील ब्रह्मरंध्रात योगी आत्मप्राप्ती करुन घेतात तेच त्रिगुणांचे मुळ व सतरावीचे सार आहे. उन्मनीचे बीज आहे. हेच बीज डोळ्यात व हृदयात प्रगटते. तेच निर्लेप व निर्विकार ब्रह्म आहे. ज्याच्यामुळे चंद्र व सुर्य प्रकाशमान होतात. ज्याच्यामुळे त्र्यैलोकाचे व्यवहार होतात अशा परमात्म्याचा निवृत्तिनाथांच्या कृपेने बोध करुन आनंदात रहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८००
मन मुरुऊनी करी राज रया ।
प्रणवासी सखया साक्ष होई ॥१॥
देहीं स्थानमान विवरण करीं आधीं ।
पिंडींची ही शुध्दि प्रथम करी ॥२॥
औट हात हा देह ब्रह्मांड सगळें यांत ।
तयाचा निश्चित शोध करा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे ।
निवृत्तिच्या संगे साधिलें हेचि ॥४॥
अर्थ:-
मनाला मुरवुन त्याला तयार कर.मग ओंकाररूप प्रणव ध्यानाचला साक्ष बनवून. तुझ्या शरीरातील सर्व स्थानांची अगोदर शुद्धी कर. या देहाची या साडेतीन हात असलेल्या शरीरामध्ये जे अंतःकरण आहे. त्यात सर्व ब्रह्मांड उत्पन्न झालेले आहे. म्हणून अगोदर तु त्याचा शोध कर. अगोदर देहात असलेल्या आत्म्याचा शोध करावा. हे निवृतीरायांच्या संगतीमुळे शिकलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०१
चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें ।
सर्वांसी पहातें तेंची तें गा ॥१॥
दिसे तेंही शून्य पहा तेही
शून्य देहामजी निरंतर भिन्न रुप ॥२॥
शून्य निरशून्य दोन्ही हारपलीं ।
तेथूनी पाहिली निजवस्तु ॥३॥
ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही ।
झालों निरंजनी अति लीन ॥४॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणें ।
गुरुमुखें खुण सांगितली ॥५॥


८०२
शून्य शोधिलें नाहीं जेणें ।
काय विवरण केले तेणें ।
अज्ञानपणें फुगणें ।
गाढव जीणें पशूचें ॥१॥
वर्णाकृति शून्याचार ।
हा नाहीं ज्या विचार ।
न घडे न घडे साक्षात्कार ।
जाण सर्वथा तया नरा ॥२॥
आधीं शून्याची शोधणी केली ।
मग सदवस्तू प्राप्ति झाली ।
अमृत वेळाची बोली ।
बोलतां नये ॥३॥
आधीं शून्य तें शुभ्रवर्ण ।
मध्यें श्वेत रचिलें जाण ।
अर्ध्य शून्य तें ताम्रवर्ण प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥४॥
महाशून्याचा वर्ण निळा ।
अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा ।
ग्रासूनी ठेला भूगोळा ।
योगी डोळा पाहती ॥५॥
ऐसें शून्याचें नाहीं ज्ञान ।
तंववरी अवघेंच अज्ञान जनीं अवघा जनार्दन ।
अज्ञान सज्ञान काय बोलूं ॥६॥
निवृत्तिराजें बोलाविली बोली ।
तेंची बोलीं बोलिलों ॥७॥
अर्थ:-
योग्याभ्यासीला दिसणारा ‘निल’ तेजोमय बिंदु हेच कोणी शून्य ज्याने पाहिले नाही. त्याने कशाचा विचार केला? व न कळण्याने ज्याचा अहंकार वाढला अशा मनुष्याचे जगणे गाढवा सारखे व्यर्थ होय. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी याचा साक्षात्कार, वर्णभेद नाही. लहान मोठे स्थूळ कृश हा आकारभेद नाही. अशा साक्षात्कार योग्यावाचून इतरांना होणार नाही. अगोदर ते नीलबिदुरूप शून्य पाहिले. व मग आम्हाला आत्मवस्तुची प्राप्ती झाली, त्या अमृतमय वेळेचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. तो बिंदु बाहेरून पांढरा त्याच्या आत शुभ्रवर्ण व आतील भाग तांबूस दिसतो.शून्याची आतिल बाजू जिला महाशून्य असे म्हणतात. ती निळ्या रंगाची असते. ती इतकी तेजस्वी असते की जणू काय तिच्यामध्ये ब्रह्मतेजच भरले आहे असे वाटते. जगाचा निरास करून योगी लोक हे शून्य पाहातात. का तहेच्या शून्याचे ज्ञान झाले नाही, तोपर्यंत सर्व अज्ञानच आहे असे समजावें ते पाहिले तर आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे कोणाला ज्ञानी म्हणावे, कोणाला अज्ञानी म्हणावे व कोणाला संज्ञानी म्हणावे? कारण दोन्ही ब्रह्मरूपच आहेत. श्री गुरु निवृत्तीनाथांमुळे ब्रह्मज्ञानांची गुरूकिल्लीमला मिळाली.व त्यांनी ती माझ्याकडून बोलवली तशी मी बोलून दाखविली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०३
अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचलें ।
लक्षा सरीसें झालें लक्षासी पैं ॥१॥
अव्यक्त रेखणें देखण्या आलें व्यक्त ।
पहातां व्यक्तअव्यक्त दोनी नाहीं ॥२॥
जागृतीच्या ठायी निजतो सहस्त्रदळीं
बिंदुच्या समेळीं उच्चार होतो ॥३॥
ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा ।
समजुनी खुणा तटस्थ झालें ॥४॥
अर्थ:-
आत्मा अव्यक्त आहे. पण योगी लोक अभ्यासाकरिता त्याला अगोदर मसुरेएवढा मानतात व पुढे चित्त स्थिर झाले म्हणजे त्या मसुरेएवढ्या आकाराचाही निश्चय करून, आपण द्रष्टा आहोत असा निश्चय करतात. व्यक्तरूप पहावयाचे असा शब्दप्रयोग करण्यामुळेच त्याला व्यक्तपणा आला. वास्तविक तो व्यक्ताव्यक्त दोन्ही नाही. योगी जागृतीतच सहस्त्रदळ असलेल्या कमलाच्या आतील नीलबिंदुच्या ठिकाणी आपल्या वृत्तीची स्थिरता करतो. व त्या स्थिरतेतही ओंकार उच्चारतो. श्री निवृत्तिनाथांच्या कृपेने योगमार्गातील या सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन मी ‘स्थिर झालो आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०४
सत्रावीचा खेळ लक्षवेना कवणा ।
ब्रह्मादिकां जाणा अगम्य तें ॥१॥
रात्रंदिवस मन चपळत्त्वें धांवतें ।
तेंही सत्रावीतें नपवेची ॥२॥
सत्रावी अगम्य विधि हरिहरां ।
लक्षूं पहातां वरा गोविंदु गे ॥३॥
ज्ञानदेव दर्शन सत्रावीचें घेतां ।
उन्मनी ठसवी निवृत्तिराज ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यासाने योगी लोक आपल्या हृदयातील कुंडलिनी शक्ती जागृत करून तिचा धक्का ब्रह्मस्थानांत असलेल्या अमृतसरोवरात देतात. त्यामुळे अमृत थोडे थोडे गळू लागते. त्या अमृतालाच सत्रावीचे ‘पय’ असे म्हणत प्रमाणे ती कुंडलिनी जागृत करून अमृतपान करणे हे योगी लोकांना मोठे त्रासाचे असते. त्या सत्रावीचा खेळ मोठा विचित्र आहे. तो ब्रह्मदेवाला, नेहेमी भटकणाऱ्या मनाला, विष्णु व शंकर यानांही कळण्यास कठीण आहे. या खटपटीत पडण्यापेक्षा गोविंद नामोच्चार करणे सोपे आहे. निवृत्तीराया कृपेने सत्रावीयेच्या अमृत कलेची प्राप्ती झाली तर उन्मनी दशा सहज ठसावते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०५
आकाशासी गुंफा अंत नाहीं जिचा ।
शोध करा तिचा सर्वभावें ॥१॥
अनंत ब्रह्मांडाचा खेळ जिच्या योगें चाले ।
चांग्यासी मिनलें तयां ठायीं ॥२॥
गुंफेच्या आधारें चंद्र सूर्य चालती ।
विश्रांतिसी येती तये जवळी ॥३॥
ज्ञानदेव नयन धरितां समभावें ।
सोहं स्वरुप भावें लाधलेंसें ॥४॥
अर्थ:-
जिला आकाशांची गुंफा म्हणतात. तसेच जिचा आत्मज्ञाना शिवाय अंत कळत नाही, अशी जी माया तिचा सर्वदृष्टीने शोध करा.जिच्या अधिष्ठानांवर सर्व अनंत ब्रह्माडांचा खेळ चालतो. त्या पदाला चांगले विचारवान पोहोचले. त्या मायेचा आधार जो परमात्मा त्याच्या योगांने चंद्र सुर्य चालतात व तेथेच शेवटी विश्रांती घेतात. सर्वत्र मायेचे अधिष्ठान परमात्माच भरला आहे. अशा तऱ्हेची समदृष्टी मला प्राप्त झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०६
षटचक्रें बंद निघूनियां गेली ।
पाहों जो लागलीं तयां गांवा ॥१॥
निरंजन सभराभरीत वस्तू कोंदली ।
साक्षत्वासी आली आत्मदशा ॥२॥
वृत्ति झेंपावली आनंद झाला सैरा ।
सत्रावी येरझारा करी जेथं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे लक्ष लावीं आकाशीं ।
ब्रह्म पावसि लौकरी तूं ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यासाच्या सिद्धिने आत्मदर्शन झाले असता पूर्वीची ती षट्चक्रे तो मुळबंद वगैरे पाहू गेले तर ते सर्व नाहीसे झालेले असतात.आणि सर्वीकडे शुद्ध आत्मवस्तुच व्याप्त आहे असा अनुभव येतो. अशा रितीने आनंदाची वृत्ति फोफावली असता सत्रावीची येरझार म्हणजे थेंब थेंब अमृत गळण्याची स्थिती सुरुच राहते. तुम्हीही या रितीने योगाभ्यास केला तर तुम्हालाही ब्रह्मस्थिती ताबडतोब प्राप्त होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०७
नयनाचे शेजारीं दशवें द्बार बापा ।
एक मार्ग सोपा बोलतसें ॥१॥
आधारीं पवन अपान विराजे ।
आंगुळें चार साजे तयां ठायीं ॥२॥
मणीपुर चक्र नाभिस्थान कमळ ।
सहा अंगुळांचा खेळ असे तेथें ॥३॥
वायुचक्र अनुहात ह्रदय असे एक ।
प्राणासी नि:शंक जेथे नेई ॥४॥
अग्नीचक्र भ्रुवांग शोभतें प्रकाशत्त्व ।
प्राणासी उलथावें तयावरी ॥५॥
सहस्त्रदळीं ब्रह्मरंध्र शोभतसे निळें ।
प्रकाशाचे उमाळे जेथें असती ॥६॥
ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम ।
या अभंगीं नि:सीम अर्थ झाला ॥७॥
अर्थ:-
दोन्ही डोळ्यांच्या वरच्या बाजूस सहस्त्रदळ कमळामध्ये शरीराच्या नव द्वाराहून भिन्न दाहावेचे द्वार आहे. त्या ठिकाणी प्राणाची स्थिती कशी असावी. याचा सोपा मार्ग सांगतात. आधार चक्राचे ठिकाणी अपान वायु आहे. त्याच्या चार बोटांवर नाभिस्थानाचे ठिकाणी मणीपूर चक्र आहे. तेथे वायु कोंडावा पुढेच सहा अंगुळावर वायुचक्र आहे. त्याठिकाणी अनुहात ध्वनी होतो. तेथपर्यंत प्राणवायु न्यावा.पुढे सहस्त्रदळाचे कमळात एक निळे ब्रह्मरंध्र आहे. तेथे प्रकाशाचे उमाळे दिसतात असे ते तेजोमय अग्नीचक्र आहे. तेथे प्राणवायु न्यावा. अशी ही प्राणायामाची प्रक्रिया माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०८
औटपीठ डोंगरी गाय एक वसे ।
क्षीर सेवितसे निजयोगी ॥१॥
धाले पूर्णपदीं समान लक्षिती ।
क्षुधा चाड चित्तीं नाहीं नाहीं ॥२॥
भ्रुवांतरीं लक्ष लाऊनी बैसा ध्यानीं ।
ऐक्यासी उन्मनी होऊनी रहा ॥३॥
ज्ञानदेव नमितो आदी देवी प्रति ।
नेत्रीं पाहे ज्योती शुध्दरुप ॥४॥
अर्थ:-
योग्याभ्यासातील अग्नीचक्ररूप डोंगर त्यावर चित्तरूप गाय बसते. व गायीचे स्थिरतारूप दूध योगी सेवन करतो. त्या दूधाने तृप्त झाल्यामुळे भुक लागत नाही. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या अग्नीचक्राचे ठिकाणी चित्त ठेऊन ध्येयरूप झाल्यामुळे सहजच उन्मनी दशा प्राप्त होते.आदि देवता जे ब्रह्म स्वरूप त्यास मी वंदन करतो व तीच शुध्द ज्योती डोळ्यात दिसते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८०९
सोहंकारीं माया लक्ष आणीं देहीं ।
निरंजनीं पाहीं मायाकार ॥१॥
निर्गुण सगुण माया तेची खरी ।
प्रसऊनी निर्धारी वांझ असे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळु झाली ।
तिणें उजळली माझी काया ॥३॥
अर्थ:-
परमात्म्याच्या ठिकाणी जगत आणि जीवाच्या ठिकाणी देहादि ही सर्व मायाच आकारली आहे. सर्व नाम रूपात्मक सगुण जगत व त्याचे कारण अव्यक्त रूप ही दोन्ही रूपे मायाच प्रसवली आहे. वस्तुतः ती मिथ्याच आहे.अजातवादाच्या दृष्टीने वंध्यापुत्राप्रमाणे ती अत्यंत असत् आहे हे खरे पण ज्या मायेने या पसाऱ्यात मी सापडलो होतो. त्याच मायेने सत्त्वगुण प्रधान होऊन मजवर कृपा करून तिने माझी काया उजळली म्हणजे देहभाव नष्ट केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१०
आकाशीं मळा लाविला बा एक ।
वांझेचे बाळक शिंपीतसे ॥१॥
अग्नीकुंड मनें बाळकें निर्मिले ।
प्रत्ययासी देखिलें मीया लागीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे उफराटें पाहातां ।
सर्व सौख्यदाता निवृत्ति एक ॥३॥
अर्थ:-
वांझेच्या मुलाने आकाशात मळा लावुन त्याला मृगजळाच्या पाण्याने शिंपुन टाकले आहे. मनरूपी बाळकाने अग्निकुंड कल्पुन त्याला मनानेच पाहात आहे. अंतरदृष्टीने पाहिले तर सौख्यप्राप्ती करुन देणारा सौख्यदाता एक श्रीगुरू निवृत्तिनाथच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८११
पहा त्रिभुवनीं न दिसे बाइये ।
नयनांजनीं पाहें आत्मरुप ॥१॥
मन बुध्दि चित्त अंत:करण जाण ।
या वेगळें निर्वाण ब्रह्म तेंचि ॥२॥
ज्ञानदेवा ब्रह्म लाधलें अवचटें ।
उन्मनीचा घांट चढतांची ॥३॥
अर्थ:-
परमात्मा त्रैलोक्यात भरला असून ही स्थूल दृष्टीने पाहाणाऱ्याला तो दिसत नाही पण त्याच डोळ्यांत जर ज्ञानरूपी अंजन घातले तर तो आत्मरूपाने दिसतो. मन बुद्धी, चित्त, अंतःकरण याहून वेगळा मोक्षरूप असा तो परमात्माच आहे. योगाभ्यास करून उन्मनी अवस्थेचा घाट ओलांडल्यानंतर मला ते ब्रह्म सहज लाभले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१२
आत्मज्ञान जया न देखा निजदृष्टी ।
तया नरा गोष्टी करुं नये ॥१॥
तूर्यारुपें जाण प्रभा हे नि:सिम ।
तया परत राम असे बापा ॥२॥
ज्ञानदेवा गुज दाविलें गुरुनें ।
मनें अनन्यें कल्पीतांची ॥३॥
अर्थ:-
ज्या पुरूषाला आत्मज्ञान झाले नाही त्याच्याशी भाषण करणे टाळावे. ओंकाराचे ध्यान करीत असता इतर पदार्थाचा विसर पडून जी अवस्था लाभते. तिला तूयवस्था असे म्हणतात. त्यात देखील द्वैत(ध्येयरूप) असल्यामुळे तिच्याही पलीकडे आत्मा आहे. असे गुह्यज्ञान श्रीगुरू निवृत्तिनाथांना मी अनन्यभावाने शरण गेल्यामुळे त्यानी मला दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१३
आत्मा एक बाई स्थिरचरव्यापक ।
सृष्टी तैसी देख एकलीच ॥१॥
पचंमहाभूतें व्यापूनी निराळा ।
सौंदर्य पुतळा काळाबाई ॥२॥
ज्ञानदेव ध्यान धरिले पुढती ।
त्रैलोक्याची वस्ती असे जेथें ॥३॥
अर्थ:-
चराचर जगतांमध्ये एक आत्माच व्यापक आहे. त्याच्यापासून हे जगत झाले आहे. पंचमहाभूतात तो व्यापून असून निराळा आहे. ज्याच्या सत्तेवर हे त्रैलोक्य भासते. त्या शामसुंदर परमात्म्याचे ध्यान आम्ही मनांत धरले आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१४
अकारी अर्धामात्रा कवण रीति दिसे ।
उकारीही घसे कवणे परी ॥१॥
मकारी संयुक्त झाली कैशापरी ।
अर्धमात्रेवरी अर्धमात्रा ॥२॥
अर्धमात्रेचा अर्थ अवचटची दिसे ।
गुरुगम्य सोय जाणती पैं ॥३॥
ज्ञानदेवें अर्थ शोधुनी घेतला ।
महाशून्यीं संचला निवृत्तीराज ॥४॥
अर्थ:-
अकारी म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी अर्धमात्रारूप असलेले जे परमतत्त्व ते कोण्यारितीने पाहिले जाईल. उकारांतही ते कोण्यारूपाने आहे. मकारांत ते तत्त्व कसे संयुक्त झाले आहे. अर्धमात्रास्वरूप असलेल्या तत्त्वाच्या ठिकाणी अर्धमात्रा म्हणणेपणा जो आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर एकचक्री अर्धमात्रेचा अर्थ म्हणजे विषय, गुरूकृपा होईल तर सहजच दिसेल. महाशून्याच्या स्थानी परमात्मा आहे. हे श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने मी शोधून पाहिले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१५
शून्य हे चार महा शून्य दिसतसें ।
निजरंग वसे सर्व त्यांत ॥१॥
ऐसा रंग जया लाधतांचि पाही ।
मनाची ही सोइ हारपली ॥२॥
ज्ञानदेवाचा बोल बोलण्याचें रुप ।
निवृत्तिस्वरुप सर्वत्र हें ॥३॥
अर्थ:-
योगाभ्यासी पुरूष ज्या तेजोमय नील बिंदुकडे पाहतात ते शून्य चार भागांत विभागलेले असून त्यातील सर्वांच्या आतील भाग तो महाशून्यच होय. व त्यातच ब्रह्मतत्त्व साठवलेले आहे. अशी ज्याची दष्टी झाली. त्याच्या मनाचा मनपणा नाहिसा होतो. आमचे बोलणे शब्दरुप जरी दिसले तरी ते सर्व निवृत्तीस्वरुपच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१६
शून्याचें जें बीज योगीयांचें गुज ।
स्वानंदाचें निज ब्रह्म रया ॥१॥
त्रिगुण त्रिविध तो सच्चिदानंद ।
शब्दाचा अनुवाद नसे जेथें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सदगुरु जाणती ।
इतरांची वृत्ति चालेचीना ॥३॥
अर्थ:
अष्टांग योग साध्य जे निलबिंदुरूप शून्य, त्याचेही बीज, योग्यांचे गुप्तधन नच केवळ माहेरघर. त्रिगुण, त्रिविध, सच्चिदानंद वगैरे कोणत्याच शब्दांनी ज्याला संबोदन करता येत नाही. असे जे ब्रह्म त्याचे ज्ञान सद्गुरूनांच झालेले असते. इतर सामान्य लोकांच्या वृत्तीला त्याचे आकलन होत नाही, असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१७
ऐसा योगीराज देखिता अवचट ।
उन्मनी लंपट रात्रंदिवस ॥१॥
सत्रावीची शिव टाकुनी राहिला ।
पहाण्यातील झाला सर्वाठायीं ॥२॥
असिपदीं आनंद प्रियरुप जाण ।
ध्यानाचें कारण जेथें नाहीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐसा योगीराणा ।
तयाचीया चरणा प्रणिपात ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यासाच्या योगाने स्वरूप स्थिती ज्याला प्राप्त झाली आहे. असा पुरूष अवचित नजरेस पडला तर उन्मनी दशा लंपटच होऊन रात्रंदिवस त्याला सोडीत नाही. अशा पुरूषांना पुन्हा सत्रावीचे अमृतपान करावे लागत नाही. कारण अदृश्य जे ब्रह्मतत्त्व त्यांत तो तद्रूप झालेला असतो. ‘तत्त्वमसि’ यातील असि पदाच्या बोधाने त्याला अस्ति, भाति, प्रियरूपत्व म्हणून पुन्हा ध्यानाची जरूरी नसते.अशा सिद्ध योग्याला माझे दंडवत असो.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८१८
एका एक गुज बोलतों निर्वाण ।
निवृत्ति चरण आठऊनी ॥१॥
अर्धमात्राक्षरीं अक्षरें पाहाती ।
अनाक्षरा परती बाईयानो ॥२॥
रज तम सत्त्व याहुनी निराळी ।
लक्षाही वेगळी निवृत्ति जाणे ॥३॥
ध्येय ध्याता ध्यान परता जिचा खेळ ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान याची साक्ष ॥४॥
सतचितआनंद ब्रह्मा हरी हर ।
तेही जिचा पार नेणविती ॥५॥
सलोकता मुक्ती आदी तिन्ही वर ।
वसतें जें घर योगीयांचें ॥६॥
त्त्वंपद तत्पद असिपदाचा रंग ।
त्याचा अंतरंग देखा बाईयानो ॥७॥
निवृत्ति सोपान मुक्ताबाईची खुण ।
ज्ञानदेव साधन बोलीले हे ॥८॥
अर्थ:-
माऊली म्हणतात मी श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या चरणाचे स्मरण करून सर्वांना मोक्षप्राप्तीचे गुह्य ज्ञान सांगतो. अर्धमात्रा असे जिला म्हणतात तेच मोक्षरूप ब्रह्माचे स्वरूप होय ते शब्दाने वाच्य होण्यासारखे नसल्यामुळे तेचे अक्षरांचा लाग नाही. पण अनाक्षराच्या ही पलीकडे ते आहे. ते ब्रह्म सत्त्व रज तमरूप जी माया तिच्या पलीकडचे आहे ते कोणालाही विषय होत नाही. त्याचे ठिकाणी ध्याता ध्येय व ध्यान तसेच ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान इत्यादि त्रिपुटोची लाग लागत नाही. त्याचा केवळ साक्षी आहे हे शब्दातीत ब्रह्मस्वरूप,ब्रह्मदेव शंकर विष्णु यांनाही कळले नाही याचा अर्थ ब्रह्मा, विष्णु, महेश अज्ञानी होते असा नसून म्हणजे ब्रह्म हे त्याचे स्वरूपच असल्यामुळे निराळे विषयरूपाने त्यांना कळते नाही.सलोकता, समीपता व स्वरूपता इत्यादि तिन्ही मुक्तिच्याही वर जे योग्यांचे केवळ घरच आहे.जे तत् त्वम् व असि या पदांच्या लक्ष्याने कळते. तेच निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई यांना कळले व त्यांच्याच कृपेने मी त्याच्या अनुवाद केला असे माऊली सांगतात.


८१९
उन्मनी संयोगें गोसावी विराजे ।
चहूं देहाचें ओझें निवारोनी ॥१॥
सोहमस्मीचे छंदे परिपूर्ण ।
विज्ञान हे खुण जेथें नाहीं ॥२॥
चंद्रसूर्याहुनी तेज तें आगळें ।
अव्यक्तें व्यापिलें अनुभवें ॥३॥
अनुभवाची खुण गुरुगम्य जाणती ।
ज्ञानदेवें विनंति हेचि केली ॥४॥
अर्थ:-
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण याचारी देहांचा निरास करून योगी मनपणालाही विसरून, तो योगी उन्मनीच्या अवस्थेत विराजमान होतो. व सच्चिद ब्रह्म मी आहे अशा अपरोक्ष ज्ञानाचा लाभ घेता. ते ब्रह्म चंद्र व सुर्याहुन तेजस्वी आहे. त्या अव्यक्त परमात्म्याने सर्व व्यक्त विश्व अनुभवाने जाणल्या सारखे आहे. ही अनुभवाची खूण गुरूगम्य होतो असे माऊली सांगतात.


८२०
नयनाचें अंजन मनाचें रंजन ।
ठसा हा साधन बाईयानो ॥१॥
ॐकार अक्षर अक्षरीं हारपे ।
अनुभवाच्या मापें मोजूं बापा ॥२॥
बिंदूचें जें मूळ प्रणवाचें फळ ।
योगियाचें खेळ तेच ठायीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें ।
स्वरुपाच्या विनोदें बोलिलें हें ॥४॥
अर्थ:-
ओकांराचे ध्यान हे मनोरंजन अशी दिव्य दृष्टी देणारे अंजन आहे त्यामुळे ब्रह्मस्वरूप ज्ञानाचा अंतःकरणात ठसा उमटतो. व त्यामुळे जगातील सर्व वस्तुंचा विसर पडतो.ध्यानाची ध्यान हे मनोरंजक अशी दिव्य दृष्टी देणारे अंजन आहे. त्यामुळे प जानाचा अंतःकरणात ठसा उमटतो. व त्यामुळे जगातील सर्व वस्तूचा पडतो. ध्यानाची परिपक्व अवस्था झाली की ध्येय, ध्याता व ध्यान ही त्रिपुटी त्यात नाहीसी होऊन जाते. याचा अनुभव ज्याचा त्यांनी पाहून घ्यावा.या योगाने ब्रह्मप्राप्ती होणे हेच योगी लोकांच्या कष्टाचे फल होय. निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने मी ह्या ब्रह्मस्वरूप अवस्थेच्या गोष्टी सहज विनोदाने वर्णन करून गेलो. असे माऊली सांगतात.


८२१
गगनमंडळीं नारी सुकुमार दिसे ।
तिन्ही लोक वसे तिचे उदरीं ॥१॥
परादी वाचा तन्मय ते झाली ।
साक्षीत्त्वासी आली ब्रह्मरंध्री ॥२॥
ज्ञानदेव म्हणे नयनांतील ज्योती ।
पाहातां वृत्ति हरे विषयांचीं ॥३॥
अर्थ:-
ब्रह्मरंधातील चिदाकाशामध्ये सुकुमार असणारी जी तुर्यावस्थारूप नारी तिच्या उदरांत तिन्ही लोक सामावलेले आहेत. परा, पश्यति, मध्यमा व वैखरी या चारी वाणी तद्रूप झाल्यामुळे काही वर्णन करू शकत नाहीत पण ब्रह्मरंधात ती साक्षी म्हणून असते. अशा त हेची ब्रह्मस्वरूप ज्योत अनुभवाला आली. म्हणजे विषया कडील धांव आपोआपच थांबते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८२२
वर मुळें शेंडा खालीं दिसे बानो ।
प्रपंची रानोरान वृक्ष बारे ॥१॥
त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत ।
नाना याती येत पत्रें ज्यास ॥२॥
पक्व फळ अहं सोहं गोडी त्याची ।
सेवितां जीवाची आस पूरे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला ।
बीज रुढला जाणीवेचा ॥४॥
अर्थ:-
ज्या वृक्षाचे मूळ म्हणजे माया त्या ब्रह्माच्या ठिकाणी आहे. त्याला उर्ध्वमूळ म्हणतात. याचा शेंडा खाली व्यक्त सृष्टीत आहे. असे वृक्ष चहूकडे आहेत. या वृक्षांना सत्त्व, रज, तम गुणांनी युक्त अशा पुष्कळ फांद्या आहेत निरनिराळ्या जातीची त्याला पाने येतात.अहंकार हे त्याचे फळ परिपक्व झाले असता मी ब्रह्म आहे. हे ज्ञान त्या फळातील गोडी होय ही गोडी चाखली म्हणजे जीवाच्या सर्व इच्छा तृप्त होतात. हा संसार वृक्ष परिपूर्ण वाढून त्याला ज्ञानरूप बीज आले. माऊली ज्ञानदेव सांगतात.


८२३
धांवत धांवत आलों नयनांजनीं ।
प्रकाश दिनमणी उणा वाटे ॥१॥
निशी दिवस दोन्हीं नाहीं जेथ बारे ।
अर्धमात्रेवरी लक्ष ठेवीं ॥२॥
अक्षय अक्षर क्षरविरंहीत साजे ।
ज्ञानाचे जें ओझें चालेचीना ॥३॥
ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी ।
यापरती बरोबरी नाहीं बापा ॥४॥


८२४
अंजनाचें अंजन सदोदीत पाहिलें ।
पाहाणें होऊनी ठेलें सर्वाठायीं ॥१॥
आतां बोलाबोली नको बा आणिक ।
बिंदु तो नि:शंक ब्रह्म रया ॥२॥
अनुहात उन्मनी म्हणोनी व्यर्थ काय ।
मुखीं धरी सोय ब्रह्मरंध्री ॥३॥
ज्ञानदेव म्हणे न बोले आणिक ।
डोळीयांची वाल पाहतांची ॥४॥
अर्थ:-
दिव्यदृष्टी ज्याने प्राप्त होते असे जे ज्ञानांजन म्हणजे ज्ञानाचे ज्ञान असे जे ब्रह्म पाहिले. व त्याचे रुप मी बनलो. त्याच्याविषयी शब्दाच्या वाटाघाटी करण्याची गरज नाही. ब्रह्मरंध्राचे ठिकाणी दिसणारा जो बिंदु हेच त्याचे रुप आहे. अनुहत उन्मनी अशा योगाभ्यासातील शब्दांचा नुसता उच्चार करुन काय उपयोग. त्या ऐवजी योगाभ्यास करून ब्रह्मरंधातील बिंदु पाहाण्याचा प्रयत्न कर. योगी पुरुषाची परीक्षा त्याच्या डोळ्यांतील तेजावरून आम्हाला करता येते. यापेक्षा अधिक काय सांगावे? असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८२५
अकार उकार मकार ओंकार ।
प्रणव हा साकार सुरेख रे ॥१॥
सुरामात्र मसार योगी ध्याती देहीं ।
निरंजन पाहीं ब्रह्म तेची ॥२॥
ज्ञानदेव म्हणे देह झालें देव ।
प्रणवची शिव अनुभवें ॥३॥
अर्थ:-
अकार, उकार, मकार व अर्धमात्रा मिळून प्रणवरूप ओंकार, साकार व सुंदर बनला आहे. याच ओंकाराचा आकार मसुराच्या डाळी एवढा मानून आपल्या देहातच योगी लोक परब्रह्म रूपाचे ध्यान करतात. हा ओंकारच ब्रह्म आहे. त्या ओंकाराच्या अनुभवाने देह, देव व ओंकार हे तिन्ही ब्रह्मरूप आहेत असे माझ्या अनुभवाला आले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८२६
पाणियाचें मोतीं ज्योती वसे जेथ ।
महाकारण साद्यंत पाहा तुह्मीं ॥१॥
जागृति स्वप्न सुषुप्ति जेथें उध्दव तीचा ।
योगी राम ज्याचा अधिकारी ॥२॥
गोल्हाटाचे मुळीं ज्ञानदेव बैसला ।
सहस्त्रदळीं शोभला काळा बाई ॥३॥
अर्थ:-
ज्या महाकारण देहामध्ये पाणीदार मोत्याप्रमाणे तेजस्वी ज्योत आहे. तिचा तुम्ही अनुभव घ्या. जागृती, स्वप्न, सुषुप्ती जेथे आहे त्या या देहातच तिचा उद्भव होतो. त्या ज्योतीचा अनुभव घेण्यास योगाभ्यासी पुरूषच अधिकारी आहे. माऊली म्हणतात मी त्या महाकारणाच्या गोल्हाट स्थळावर बसलो व त्या स्थळावरुन पाहात असता ब्रह्मरंधातील सहस्त्रदळ कमळांत ती ज्योत मला दिसली. असा अनुभव माऊली ज्ञानदेव सांगतात.


८२७
सकार हकारीं नाडी दिसती कैशा ।
उलटल्या दशदिशा अमुपचि ॥१॥
सूक्ष मूळ सर्व बीजाचा उध्दव ।
हाची अनुभव देहामध्यें ॥२॥
समान जैसा अर्क स्थिरचर एकला ।
आत्मा हा संचला तैशा परि ॥३॥
ज्ञानदेव म्हणे याहुनी आणिक ।
बोलाचें कवतुक जेथ नाहीं ॥४॥
अर्थ:-
सोऽहं या जपामध्ये ‘स’ आरंभाला असल्यामुळे त्याला सकार नाडी म्हंटले आहे आणि ‘हं’ आरंभाला आहे म्हणून त्याला हकार नाडी असे म्हटले आहे. सकार म्हणजे ब्रह्म व हकार म्हणजे जीव याचा लक्षणेने अर्थ असा की ब्रह्म व आत्मा यांचे ‘अस्मि’ या शब्दाने एकत्व दाखविले आहे. असे ऐक्य झाल्यामुळे सर्वत्र एक ब्रह्मच आहे असे दिसू लागले. व तसाच देहातही अनुभव आला त्या आत्मवस्तुशिवाय दुसरे काही भासेनासे झाले. जसा एकच सूर्य जिकडे तिकडे प्रकाशमान दिसतो. त्याप्रमाणे आत्म्याची व्याप्ति सर्वत्र दिसू लागली. यापेक्षा ब्रह्मस्वरूपा विषयी अधिक काही बोलता येणे शक्य नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८२८
दिव्यरुप चक्षु कैशापरि झाला ।
ठसा हा उमटला कवण्यापरी ॥१॥
चहुं देहांचा वर्ण अवर्ण देखिलें ।
विश्व म्यां पाहिलें तयामध्यें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्वाचे जें मूळ ।
सत्रावी केवळ शुध्दरुप ॥३॥
अर्थ:-
परमात्मतत्त्व प्रतितिला येण्याकरिता मला दिव्यदृष्टी कशी प्राप्त झाली त्या दृष्टीने माझ्या अंतःकरणावर स्वानुभवाचा ठसा कसा उमटला. तसेच त्या दिव्य दृष्टीने मला चारी देहापलीकडचे तत्त्व कसे दिसले व त्या तत्त्वांत मा विश्व कसे पाहिले. माऊली ज्ञानदेव या प्रश्नाचे उत्तर देतात की सर्व विश्वाभासाचे मूळ शुद्ध स्वरूपच आहे व तेच अधिष्ठान आहे.


८२९
काळा पुरुष तो हा गगनांत जो नांदे ।
अनुभवाच्या भेदें भेदला जो ॥१॥
भेदून अभेद अभेदूनी भेद ।
सच्चिदानंद जेथ नाहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तेथें अक्षय राहिला ।
आत्मा म्यां पाहिला या दृष्टिसी ॥३॥
अर्थ:-
जो गगनांत भरून उरला आहे. तो हा काळा पुरूष म्हणजे ब्रह्म होय. याच बद्दलचा अनुभव निरनिराळ्या व्यक्तिचा निरनिराळा असल्यामुळे याच्या ठिकाणी भेद वाटतो. याच्या ठिकाणी भेद दिसत असला तरी अधिष्ठान रूपाने अभेद आहे. व अभेद असला तरी उपाधियोगाने पूर्ण भेद दिसतो. याला सच्चिदानंद म्हणणे देखील संभवत नाही. माझ्या ठिकाणी अक्षय असणारा आत्मा मी माझ्या दृष्टीने पाहिला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३०
विश्व ब्रह्म भासे ऐक्य येतां देहीं ।
अनुहातीं पाहीं अपार नाद ॥१॥
देखिला परी संयोगें व्यापला ।
विश्व तरीच झाला बाईयानो ॥२॥
पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला ।
माझा मीच झाला कोणकरी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे या अर्थाची सोय ।
धरी माझी माय मुक्ताबाई ॥४॥
अर्थ:-
प्रथम मी ब्रह्म आहे असा निश्चय झाला की सर्व जगत ब्रह्मरूपच आहे असे वाटते. ही दृष्टी योगाभ्यासी पुरूषांना जो अनुहत ध्वनी ऐकु येतो. त्याने प्राप्त होते. परंतु ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या मायेच्या संबंधामुळे तोच विश्वरूप बनला आहे.व्यष्टि किंवा समष्टि हा सर्व माझाच विस्तार आहे दुसरे कोण आहे.आपणच जगतरूपाने कसे दिसतो ही गोष्ट आमच्या मुक्ताबाईला कळली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३१
गुजगुजीत रुप सावळे सगुण ।
अनुभवितां मन वेडें होय ॥१॥
भ्रमर गुंफा ब्रह्मरंध्र तें सुरेख ।
पाहतां कवतुक त्रैलोकीं ॥२॥
आनंद स्वरुप प्रसिध्द देखिलें ।
निजरुप संचलें सर्वा ठायीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे या सुखाची गोडी ।
अनुभवाची आवडी सेवीं रया ॥४॥
अर्थ:-
भगवान श्रीकृष्णाचे शामसुंदर सुकुमार रूप पाहून मन वडे होऊन जाते हे रूप योग्यांना ब्रह्मरंध्रातील भ्रमर गुंफेत दिसते.ते पाहून त्यांना झालेला आनंद त्रैलोक्यात मावत नाही असे हे प्रसिद्ध आनंदमय दिसणार रूप आपली स्वरूपाहन भिन्न नाही. आत्मस्वरूप सर्वत्र भरले आहे. या सुखाची गोडी अनुभवानेच सेवन केली पाहिजे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३२
सहस्त्र दळ बिंदु त्यांत तेज दिसे ।
तें हो काय ऐसें सांगा मज ॥१॥
जेथ नाम रुप वर्ण नाहीं बारे ।
तें हें रुप बारे चैतन्य बा ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवाची खूण ।
जाणे तो सुजाण अनुभविया ॥३॥
अर्थ:-
सहस्रदळ बिंदुत योगी लोकांना जे तेज दिसते ते श्रीगुरूना शरण जाऊन मला त्या तेजाचा अनुभव सांगा अशी विनंती करून त्यांचेकडून समजून घ्यावे. ज्याला नाम, रूप, वर्ण हे काही नाही असे ते ब्रह्मस्वरूप चैतन्यच होय. या प्रमाणे त्या तेजांला जो यथार्थ अनुभवाने जाणेल तोच अनुभव घेतलेल्या योगी लोकांमध्ये शहाणा म्हणून मानला जाईल.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३३
कोणाचे हें रुप देह हा कोणाचा ।
आत्माराम साचा सर्व जाणे ॥१॥
मीतूं हा विचार विवेकें शोधावा ।
गोविंद हा ध्यावा याच देहीं ॥२॥
ध्येये ध्याता ध्यान त्रिपुटीं वेगळां ।
सहस्त्रदळीं उगवला सूर्य जैसा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नयनातींल रुप ।
या नांव चितपद तुम्ही जाणा ॥४॥
अर्थ:-
माझ्या ठिकाणी दिसणारे रूप कोणाचे. देह कोणाचा हे सर्व त्या आत्मारामाला कळते. या देहांतच राहून मी कोण, तु कोण याचा विचार करून या देहात गोविंद आहे. त्याचा शोध करू न याच देहामध्ये त्याची प्राप्ती करून घ्यावी. तो परमात्मा ध्येय, ध्याता, व ध्यान या त्रिपुटीहन वेगळा असुन जणू काही सहस्रदळा किरणांनी सुर्यच प्रकाशित झाला आहे. नेत्रात दिसणारे रुप ते चित्सस्वरुपच आहे असे तुम्ही जाणुन घ्या. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३४
डोळियांत डोळा काळियांत काळा ।
देखण्या निराळा निळारुप ॥१॥
ब्रह्म तत्त्व जाणे ज्योतिरुपें सगळा ।
ज्योतीही वेगळा ज्योती वसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे देवा ऐसी ज्योती ।
अर्थमात्रा उत्पत्ति सर्वाजीवां ॥३॥
अर्थ:-
प्रत्येक पाहणारे ब्रह्मतत्त्वाला वेगवेगळ्या प्रकाराने पहातात. कोणी याला डोळ्याचा डोळा, कोणी काळ्या रंगाचा, कोणी नीळवर्ण बिंदुरूपाने ओळखतात. कोणी तेजोमय ब्रह्म असे समजतात. कोणी तेजोमय ज्योती समजतात, कोणी ज्योतिहून भिन्न, पण सर्व तेजोमय वस्तुना तेज देणारा असे समजतात. ही अर्धमात्रा ज्योती असून सर्व जीवांची उत्पत्ति हिच्यापासून झाली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३५
सदगुरु निवृत्ति दिसतो घनदाट ।
सुषुप्तीचा घांट वेधतांची ॥१॥
आत्मामाया शिव शक्तीचे हें रुप ।
दिसतें चिद्रुप अविनाश ॥२॥
ज्ञानदेव चढे ऐसी वाट देख ।
आकाशीं असे मुख तिचें कैसें ॥३॥
अर्थ:-
ज्ञानघन श्रीगुरू निवृत्तिरायांचे दर्शन सुषुप्तीचा घांट ओलांडल्या नंतर होते. निवृत्तीराय म्हणजेच ब्रह्म आहे. ते अविनाशी, चिद्रूप, आत्मा, माया, शिवशक्ती यांचे ही रूप तेच आहे. आम्ही या वाटेने गेलो त्या आश्चर्याची गोष्ट ही की तिचे तोंड आकाशाकडे आहे. याचा अर्थ ही वाट कठीण आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३६
परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली ।
समरसें विराली मज माजी ॥१॥
आत्मदशे योगी लक्ष लाविती देहीं ।
ब्रह्मरंध्रु पाहीं सतपद तें ॥२॥
अणुरेणु शून्य गगना तेजें दिसे ।
निरंतर वसे निरंतर ॥३॥
ज्ञानदेव म्हणे वृत्ति सहस्त्रदळीं लावा ।
मसुरा मात्रा बरवा ध्यायी जाई ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यास करीत असतां परावाणीच्या शिखरावर बसलो व मी त्या ब्रह्मस्वरूपासी समरस झाल्यामुळे ती परावाणीही माझ्यामध्ये विरुन गेली. आत्मदशा प्राप्त व्हावी म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असलेल्या ‘सत्’ स्वरुपाकडे लक्ष लाऊन योगी लोक ध्यान करतात. त्यांना या ध्यानामुळे अणुपेक्षाही अणु व आकाशाहूनही मोठी अशी तेजस्वी वस्तु दिसते. व तदाकार वृत्ति सतत असते. ब्रह्मरंधात असणाऱ्या सहस्रदव्यतील ‘सार’ सत्पदाकडे आपली वृत्ति लावून मसुराकार असलेल्या ध्येयाचे ध्यान करा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३७
नासिकाचा प्राण कोणीं मार्गी येत ।
नाद दुमदुमित अनुहातीं ॥१॥
इडे पिंगळेचा ओघ सैरां दिसतसे ।
त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगीया ।
साधितो उपाया याची मार्गे ॥३॥
अर्थ:-
प्राणवायु नाकावाटें आंत येतो. त्यामुळे आंत प्राणापानाची घडामोड होऊन अनुहत ध्वनी ऐकू येतो.इडा व पिंगळा या नाड्या आतल्या आंत संचार करीत असतात. तेथे त्यांना आत्मतेजाचे सहाय्य मिळते. ह्या गोष्टी योगाभ्यास करणाऱ्यालाच कळतात. अष्टांग योगाचा अभ्यास करणारे योगी याच मार्ग जाऊन परमात्मप्राप्ती करून घेतात असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३८
प्रणवाचे भेद उकलावें देहांत ।
चंद्राची मी मात सांगतसें ॥१॥
सहस्त्र दळावरी तेज शुध्द असे ।
त्या तेजे प्रकाशे चंद्र बापा ॥२॥
उन्मनीचे ध्यासें सहस्त्रदळ गाजे ।
पश्चिम मार्गी बीजें दोन असती ॥३॥
लक्ष लावी ज्ञानदेव एकलाची ।
शुध्द ज्योती तोचि जाणे एक ॥४॥
अर्थ:-
तेजोमय ज्योतीच्या चंद्राची म्हणजे प्रकाशाची रीत सांगतो प्रथम प्रणवाच्या ध्यानाला उपयोगी पडणारा शरीरातील निरनिराळ्या चक्रांचा भेद मनात आणावा. सहस्र पाकळ्यांचे जे कमळ आहे. त्यांत जी तेजोमय ज्योत आहे तिच्या तेजाने चंद्र प्रकाशीत होतो उन्मनी स्थितीत या सहस्रदळ कमळा वरून दोन मार्ग फुटतात. त्यापैकी पश्चिमेच्या मार्गाने ब्रह्मलिंग आहे. आत्म ज्योतीच्या ठिकाणी लक्ष लावून शुद्ध स्वरूपांची ओळख करून घेतली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८३९
मन हें लावा हें सालयीं निरुतें ।
सहस्त्रदळा वरुतें परे जवळी ॥१॥
अनुहात नाद ब्रह्मस्थानीं असे ।
तेथें रुप कैसें सांगा मज ॥२॥
ज्ञानदेव म्हणे स्वरुप जो जाणे ।
त्यासी शरण होणें अनन्य भावें ॥३॥
अर्थ:-
तुम्ही आपले मन परावाणीच्या जवळ असलेल्या सहस्रदळ कमळातील नीलबिंदुच्या ठिकाणी निश्चयाने लावा.ज्या ब्रह्मस्थानी अनुहत ध्वनी योग्याला ऐकु येतो. तेथील रूप कसे आहे ते मला सांगा. ते स्वरूप जाणणाऱ्या पुरुषाला अनन्यभावाने शरण जा. असे माऊली ज्ञानदेव म्हणतात.


८४०
महावाक्यार्थ तें शून्य कैसें बापा ।
सत्त्वर नयनीं पहा आत्मप्रभा ॥१॥
प्रभा शीत उष्ण दोहीचेही सार ।
प्रणव हा सारासार आरुता रया ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सोपानातें ऐसें ।
निराकार असे अकारेसी ॥३॥
अर्थ:-
तत्त्वमसि महावाक्याचा अर्थ ते ब्रह्म तूं आहेस असा आहे. तो अर्थ शून्यरूप नाही. तो ज्ञानरूप बिंदू लवकर ओळखून घ्यावा. या बिंदूच्या ठिकाणी शीत उष्ण वगैरे काही एक धर्म नसून ते सर्वांचे सार आहे. त्याच्या ठिकाणी प्रणव म्हणजे’ॐ म्हणणे देखील नाही.’ॐ’ हा शब्ददेखील अलिकडचा आहे. हे सोपानदेवा आकाराच्या रूपाने ती निराकार वस्तु भासत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४१
दशमद्वार अग्रशून्य सूक्ष्म गगनीं ।
जेथ आसे उन्मनी निखिल रुपे ॥१॥
द्विविध भाग पिंडी द्विविध ब्रह्मांडी ।
या तीं पडीपाडीं ब्रह्मरंध्रीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शून्यांतील रुप ।
अनंत ब्रह्मांणे जेथ आहाती ॥३॥
अर्थ:-
दशम द्वार असे जे ब्रह्मरंध्र त्याच्या अग्रभागी एक तेजोमय बिंदु आहे त्या ठिकाणी मनाचा मनपणा विरून गेल्यामुळे उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असते. त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी एक तेजोमय बिंदु आहे. त्याचा अर्धभाग पिंडाचा व अर्धा ब्रह्मांडाचा असतो. हे दोन्ही ब्रह्मरंधात सारखेच असतात. त्या तेजोमय पिंडीत सर्व ब्रह्मांड साठवलेले असते असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४२
जडांतील शुध्दांश कौतुकें रिघाला ।
निवृत्तीने दाविला कृपा करुनी ॥१॥
अनुहात भेद दाविला कृपनें ।
सर्व हें चैतन्य गमलें तेव्हां ॥२॥
ज्ञानदेव नमनीं निवृत्तीचे पदीं ।
आनंद ब्रह्मपदीं एक झाला ॥३॥
अर्थ:-
जड वस्तुतही शुद्धांश ब्रह्मरूप आहे. हे निवृत्तीनाथानी दाखविल्यामळे या जड वस्तुतील शुद्धांशाच्या ठिकाणी मला आनंद वाटला.श्रीगुरूनी योगाभ्यासा तील अनुहत ध्वनीचा जेंव्हा परिचय करून दिला.तेंव्हा हे जड पदार्थ चैतन्यरूप आहेत अशी माझी खात्री पटली. माझ्या डोळ्यातील श्री गुरूचरणातील व ब्रह्मपदांत असलेला आनंद एकच म्हणजे ब्रह्मानंद ठरला.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४३
नवा आंत ओवरी औठपिठा जवळी ।
शून्यातीत काळी सुकुमार ॥१॥
अंगुष्ट पर्वार्ध मसुरा मात्र दीर्घ ।
उन्मनीचा मार्ग तेच ठायीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे पर्वार्धातील नीर ।
सर्व हें साचार विश्व दिसे ॥३॥
अर्थ:-
भुवयीच्या आतील बाजुस पश्चिम भागाकडे असलेल्या भागात दोन दल असलेल्या भागास योगीलोक अविनाशी ओवरी म्हणतात. त्या ठिकाणी शरीरामध्ये औटपीठा जवळ एक शून्याच्याही पलीकडे असे सूक्ष्म स्थळ आहे. त्याचा आकार मसुरीएवढा आहे. त्याठिकाणी प्राण स्थीर केला म्हणजे पुढे उन्मनी अवस्था प्राप्त होते. अशी वृत्तीची स्थिरता केल्यानंतर सर्व जगाचा लय होऊन एक बिंदुमात्र दिसतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४४
भ्रुवामध्यें तेज चंद्रसूर्यविरहित ।
आदी मध्य अंत संचलेंसे ॥१॥
तुर्यारुपें ते सुषुम्ना प्रकाशली ।
नवविध अमृतजळीं तया तेजा ॥२॥
ज्ञानदेव वदे अष्टांग योग साध ।
पावाल ब्रह्मपद याचा भेद ॥३॥
अर्थ:-
दोन भुवयांमध्ये अग्नीचक्राच्या ठिकाणी चंद्रसूर्याखेरीज जे तेज आहे. ते आदीमध्यांत पसरले आहे तेथे नऊ प्रकारच्या अमृतमय जलामध्ये तुर्यारूपाने सुषुम्ना नाडी प्रकाश करते. तुम्ही योगाभ्यास करा म्हणजे ब्रहारूप व्हाल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४५
पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं ।
अविनाश ओवरी योगीयांची ॥१॥
त्रिकूट श्रीहाट चंद्रसूर्य जाणा ।
पश्चिम मार्गी खूण याची की रे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे बीजे दोन बापा ।
पाहें आत्मरुपा तेथे बा रे ॥३॥
अर्थ:-
भुवयांच्यामध्ये आतील बाजूस दोन बीजे असलेले अग्नीचक्र आहे. त्याला योगीयांची अविनाश वोवरी म्हणतात. तिची त्रिकुट, श्रीहाट ही स्थाने असन तेथे चंद्रसुर्याच्या तेजाप्रमाणे तेज आहे. याचीच खूण पश्चिम मार्गी आहे. या दोन बीजात्मक अग्नीचक्रांत तुला आत्मरूप दिसेल रे बाबा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४६
इडा वाम दक्षिणे पिंगला ।
दोहींत या कळा ब्रह्मस्थानीं ॥१॥
प्रणव सैरा बापा धांवे अवघड वाटे ।
रीघा नवपाटे जीव जीवना ॥२॥
ज्ञानदेव म्हणे स्वरुप जो जाणे ।
त्यासी शरण होणें अनन्य भावें ॥३॥
अर्थ:-
उजव्या नाकपुटीत इडा व डावीमध्ये पिंगला असून या दोन्ही नाड्यांत ब्रह्मस्थानाचे तेज आहे. यातूनच प्राणवायु सैरावैरा होऊन अवघड मागनि धांवतो. व प्रणवरुप ओंकाराचे ध्येय गाठतो. या प्रणवाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणे ही फार अवघड गोष्ट आहे. हे योगाभ्यासी पुरुषाच्या अनुभवाला येते. यापरता दुसरा अनुभव नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४७
प्रणवासी रुप नाहीं कांही छाया ।
दशवे द्वारीं मूळमाया असे कीं रे ॥१॥
सहस्त्रद्ळीं वृत्ति लावितां नि:शंक ।
मनासीं भवासी ऐक्यता तेथें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे या परतें नाहीं ।
बोलण्याची सोयी अनुभव जाणे ॥३॥
अर्थ:-
प्रणवाला रुप अगर छाया हे काही नाही. ब्रह्मरंध हे दहावे द्वार आहे. व तेच मायेचे स्थान आहे सहस्रदळकमळाच्या रुपाने असलेल्या परमात्म्यावर दृष्टी स्थिर केली असता संसारासह मनाचे ऐक्य होते. यापेक्षा अधिक काही वर्णन करता येणे शक्य नारी हे एक अनुभवी लोकच जाणतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४८
प्रणवच देह देह हा प्रणव ।
कल्पनेचा भाव कल्पूं नये ॥१॥
अंजनाचें सार तेंच देह बा रे ।
आत्मा परिपूर्ण सारे पाहती ज्ञानी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता ।
अक्षर तेच माता याच भेदें ॥३॥
अर्थ:-
ओंकाररुप प्रणव हाच देह व देह हाच प्रणव आहे. त्याच्या ठिकाणी भेदाची भावना करुच नये. ज्ञानी ज्ञानाच्या अंजनाने आत्मा सर्वत्र भरला आहे. असे पाहातात. तर मग देह तरी ज्ञानांजनाचे साररुप आत्म्याहून वेगळा कसा असणार. जो प्रणव तोच माझा पिता आहेत व तेच अक्षर माझी माता ही आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८४९
पश्चिममार्ग बापा प्रणव कीं दे सांग ।
जेथें असे महालिंग तेजोमय ॥१॥
चंद्रांतील जल ते सत्रावी केवळ ।
नादबिंदा कल्होळ गर्भी झाला ॥२॥
ज्ञानदेव म्हणे देह हा दुर्लभ ।
त्रैलोकीं सुलभ भजनाचा ही ॥३॥
अर्थ:-
पश्चिम मागनि प्रणवाचे ध्यान करुन योगी पुरुष महालिंगरुप ज्योतीचे दर्शन घेतो.यालाच सत्रावीच्या सरोवरातील चंद्रामृताचे पान घडून अनुहत ध्वनीचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे दुर्लभ अशा मनुष्य देहामध्ये भगवत्प्राप्ती करुन घेण्याचा भजन हा सुलभ मार्ग आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५०
प्रणवाचें आकाश असे सर्वावरी ।
आकाशीं भरोवरी प्रणवाची ॥१॥
प्रणव जें गुह्य ऋषि योगीयांचे ।
सर्वावरिष्टा साचें वेद आज्ञा ॥२॥
एक वेदांत सिध्दांती प्रणव तो तत्त्वता ।
ज्ञानदेव वक्ता सांगतसे ॥३॥
अर्थ:-
प्रणवाचे आकाश देहातील सर्व चक्रांच्या वर आहे. त्या आकाशांत सर्वत्र प्रणवच आहे. प्रणव हे ऋषी, मुनी, योगी यांचे गुह्यज्ञान आहे. प्रणव हा सर्वात श्रेष्ठ आहे. असे वेदही प्रतिपादन करतात. वेदाचा सिद्धांत एक प्रणवच आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५१
प्रणवाचें रुप कोणें देहें देखिलें ।
निवृत्तिनें दाविले याच देहीं ॥१॥
सकार हकार तुर्या उन्मनी भेद ।
अभेदुनी भेद केले मज ॥२॥
ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली ।
अक्षरीची बोली देह सार ॥३॥
अर्थ:-
प्रणवाचे स्वरुप देहधाऱ्याने आपल्या देहांत पाहिले असा कोण आहे? मला मात्र याच देहांत निवृत्तीनाथांनी त्याचे दर्शन घडविले. सोहं शब्दातील सकार, हकार, तूर्या व उन्मनी वगैरे भेदांचा निराळेपणा न मोडता मला त्या सर्वस्थिती अभेदाने अनुभविता आल्या. प्रणवाची सूक्ष्म वर्णन करणारी अक्षरे व ज्याच्या सहाय्याने योगाभ्यास करावयाचा असे शरीर ही सारभूत आहेत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५२
अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनीं ।
पाहाती त्रिभुवनीं नवल झालें ॥१॥
नाद विंदा भेटी झाली कवण्या रीती ।
शुध्द ब्रह्म ज्योती संचलीसे ॥२॥
प्रकृति पुरुष शिव शक्ती भेद ।
त्याचे शरीरीं द्वंद देह जाणा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा ।
ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा ॥४॥
अर्थ:-
सर्व ब्रह्मांडात अमृताच्याक्षीराच्या रुपाने ब्रह्म भरलेले आहे. हे पाहून त्रिभुवनातील सर्व व्यक्तींना नवल वाटते.जीवब्रह्माचे ऐक्य कसे झाले असेल व शुद्ध ब्रह्म सर्व व्यापी आहे. असा अनुभव कसा आला असेल. ज्याच्या अंतःकरणात प्रकृति पुरुष, शिव शक्ती, वगैरे द्वैत आहे. त्याला हे कळणार नाही. म्हणून प्रथम आपण आत्मरुप आहो तसेच जगत ब्रह्मरुप आहे. हा अनुभव सहजच येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५३
प्रणवाची शक्ती शिव प्रणवची ।
क्षर अक्षर साची प्रणव ते ॥१॥
त्रिकूट श्रीहाट गोल्हाट ब्रह्मरंध्र ।
प्रणव निरंतर ऐक्य झाला ॥२॥
ज्ञानदेव आपण प्रणव झाला आधीं ।
ध्याता ब्रह्मपदीं प्रणवची ॥३॥
अर्थ:-
प्रणव ओंकार आहे व ओंकार ब्रह्माचे प्रतीक आहे म्हणून प्रणव ब्रह्मच आहे. सर्व चराचर सृष्टि प्रणवस्वरुप आहे. एकदा का प्रणव ब्रह्मरुप आहे असे मानले की शंकर, पार्वती या देवता सर्व स्थीर चल पदार्थ, त्रिकुट, गोल्हाट, ब्रह्मरंधकार महायोगस्थाने ही सर्व प्रणवरुपच आहेत. यावरुन त्या ब्रह्माचे ध्यान करणारा मी ही ब्रह्मरुपच झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५४
स्थावर जंगम प्रणव प्रसवला ।
आत्मा स्वय संचला प्रणवा ठायीं ॥१॥
अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता ।
अर्धमातृके परता प्रणवची ॥२॥
ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठायीं ।
प्रणवीं प्रणव पाहीं निराळा तो ॥३॥
अर्थ:-
प्रणवरुप ब्रह्मापासूनच सर्व स्थावर, जंगम जगत उत्पन्न झाले व आत्माहि प्रणवरुपच आहे. होणाऱ्या भुक्ती मुक्ति या अवस्थाही प्रणवच आहेत. तो प्रणव अर्धमातृकेच्याही पलिकडचा आहे. ते ब्रह्म प्रणवाच्या ठिकाणी साकार स्वरुपांत आहे. आणि निराकार रुपानें प्रणवाहून निराळे आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५५
शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष ।
याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥
जागृति स्थूळ तुर्या महाकारण ।
हेचि कीर खुण तेझे ठायीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे कैसे हें जाणिजे ।
देही नाद गाजे परेवरी ॥३॥
अर्थ:-
ब्रह्म व माया यांचा भेद अर्धनारीनटेश्वरा प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एका शंकराच्या काही भागात पार्वतीचे रूप दिसते, वास्तविक पार्वतीला वेगळे रूप नाही. खरे रुप शंकराचेच असते. त्या प्रमाणे मायेचे वेगळे स्वरुप नाही. ती ब्रह्माच्या काही भागावर भासते. या गोष्टीचे वर्म लक्ष्यात घ्या.ज्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्था व स्थूल, सूक्ष्म, कारण वगैरे देह भासतात.त्या प्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी माया भासते. योगाभ्यासाने परावाणीमध्ये जो अनुहत ध्वनी होतो तो ऐकू येऊ लागला म्हणजे मायेचे मिथ्यात्व कळून ब्रह्मप्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५६
निळावर्ण ब्रह्मरंध्र येकनिकें ।
पहा माझे सखे भाविक हो ॥१॥
उन्मनि सदैव वसे अक्षय पंथें ।
लाउनियां चित्त तया ठायीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे यापरती खूण ।
नाहीं ऐसी आण वाहातसें ॥३॥
अर्थ:-
ब्रह्मरंधातील नील बिंदूकडे लक्ष ठेवा. ही जोड उन्मनी अवस्थेत होईल. अक्षयपणे चित्त त्याच्याकडे लावा या पलिकडे या मार्गाची खूण दूसरी नाही असे शपथ घेऊन माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५७
आकाश हें असें माझें शिर बापा ।
कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥
आधारापासूनी सहस्त्रदळावरी ।
नि:शब्द निरंतरी नारी एक ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथें ।
तोचि जीवन्मुक्त संत योगी ॥३॥
अर्थ:-
ज्या योग्याला असे वाटते की आकाश हे माझे मस्तक आहे. दिशा माझे कान आहे. त्या दिशारुप आकाशांत ज्ञानाचा आवाज उठतो. आधार चक्रापासून सहस्रदळापर्यंत अशी एक कुंडलिनी नाडी आहे. असा ज्याला अनुभव आहे. तोच जीवन्मक्त, संत योगी आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५८
अग्नीचे पोटीं पुरुष उध्दवला अवचट ।
सत्रावी लंपट निशिदिनीं ॥१॥
आधार नाहीं जेथ निराधार वर्तती ।
निराधार न म्हणती आपणा लागीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविलें ।
या नयनीं पाहिलें अविनाश ॥३॥
अर्थ:-
योग शास्त्रांत शरीरगत अग्नीपासून एक प्रकारची शक्ती उत्पन्न होऊन तिल कुंडलीनी नाडी जागृत होते. तिच्या योगाने मनुष्याचे मस्तकांत असलेल्या अमृताचा कुंभाला धक्का लागून त्यातून अमृतस्राव होऊ लागतो यालाच सत्रावीचे ‘पय ‘असे म्हणतात परंतु तेथेच तो पुरुष लुब्ध होऊन जातो. योग साध्य झालेल्या पुरुषाला जमीनीपासून अधांत्री राहाता येते. पण ते योगी स्वतःला निराधार असे समजत नाहीत. श्रीगुरु निवृत्तीरायांच्या कृपेने मला अविनाशी आत्म्याचे डोळयाने प्रत्यक्ष दर्शन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८५९
सत्रावीचे गांवी शून्याचा विस्तार ।
प्रणव निराकार सदैव असे ॥१॥
पश्चिम पूर्व असे शुक्ल कृष्ण नारी ।
दैवी आणि आसुरी वेगें शोधा ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अर्धमात्र कोणती ।
मसुरा मात्रा आहे ती दोन्ही भाव ॥३॥
अर्थ:-
सतराव्या जीवन कलेच्या स्थानीच शून्याचा विस्तार दिसतो. तोच प्रणवाचे निराकार असे रुप आहे. या स्थानावरुन पश्चिमेस व पूर्वेस असे दोन मार्ग दैवी आसुरी संपत्तीचे फुटतात, यांना शुक्ल व कृष्ण असेही म्हणतात. मसुरी प्रमाणे असणारी अर्धमात्राच ब्रह्मरुप आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६०
सहस्त्रदळ साजिरें नयनाचे शेजारी ।
अर्ध मातृका अंतरी चिन्मय वस्तू ॥१॥
ॐकार नादीं कीं नाद ॐकारीं ।
दैवीं निरंतर प्रणवीं पहा ॥२॥
मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय ।
आत्मा एक असे स्वयें रया ॥३॥
ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता ।
कोण पत्री हे कविता नाहीं ऐसी ॥४॥
अर्थ:-
प्रत्येक जीवाच्या डोळ्याच्या वरच्या बाजूत म्हणजे मस्ताकांत सुंदर असे सहस्रदळ कमळ आहे. त्यातील अर्धमात्रिकेच्या आंत ती तेजोमय ब्रह्मवस्तु आहे. शमदमादि दैवी संपत्तीचा आश्रय करुन नेहेमी प्रणवाचे ध्यान करा. म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी नाद धर्म आहे. की नादाच्या ठिकाणी ओंकार आहे हे कळेल. ओंकारातील अकार, उकार, मकार, अर्धमात्रा व अनुस्वार ही सर्वच आत्मरुप आहेत. हा नाद बिंदु मोक्ष देणारा आहे असे कोणत्या वेदांत ग्रंथात नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६१
स्थूलदेह सूक्ष कारण तिसरा देह ।
चौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥
औट पीठाचे दरीं कर्पूर वर्णावरी ।
शामाचे अंतरी महाकारण ॥२॥
महाकारणीं आतुला लक्षाचा पुतळा ।
उन्मनी हे कळा दैवी वरी ॥३॥
सहस्त्रदळ तेंच कीं आन नाहीं ऐसें ।
महा तेज वसे ज्याचे आंत ॥४॥
पश्चिम मार्ग तेथुनी ऊर्ध्व उंच गगनी ।
जेथें एक कामिनी एकलीच ॥५॥
मार्ग नहीं तेथ कोणे रीती जावें ।
सुषम्नेवरी वळघावें सामर्थेसी ॥६॥
तेथूनी ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य ।
त्यांतून उडणें भले चपलत्त्वेंसी ॥७॥
जडतां वळंघितां बरी नारी आपण एक ।
रनानारी नपुंसक एक रुप ॥८॥
ज्ञानदेव म्हणे जो उडनी जाय तेथ ।
परब्रह्मीचि मात तोचि जाणे ॥९॥
अर्थ:-
तुला स्थूल, सूक्ष्म, कारण हे देह माहित आहेत आता महाकारण देहाची चार स्थाने आहेत. त्यापैकी औटपीठ हे एक होय. आता महाकारण देह सांगतो ऐक. बाहेरुन पांढरा सूक्ष्म देह, त्याच्या आतून काळा कारण देह व त्याच्या आंत महाकारण देह आहे.या महाकारण देहांत योग्याचे लक्षरुप एक तेजस्वी ज्योत आहे. ही दैवी उन्मनी अवस्थेतच दिसते. तेच सहस्रदळ कमळ व त्यातच ती तेजोमय ज्योत असत. तेथून पश्चिम मार्गान म्हणजे विहंगम मार्गाने उंच गेल्यावर एक कामिनी सुषुम्ना नावाची नाडी आहे. तिच्याकडे जाण्याला लवकर रस्ता सापडला नाही.पुढे सामर्थ्यकरुन त्या सुषुम्ना नाडीवर जावे. तेथन पढे मुंगीच्या डोळ्यापेक्षा सूक्ष्म छिद्र आहे. त्यातुन मोठ्या चपळाईने बाहेर पडावे. तेथे पुरुष, स्त्री तान्ही रुपे ज्याला आहेत. असे परमतत्त्व आहे. त्या ठिकाणी ज्याला योगाभ्यासाने उडी मारुन जाता येते. तोच परमतत्वाची खूण समजेल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६२
सहस्त्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे ।
देखणा पारुखे ते ठायीं बा ॥१॥
नादीं नाद भेद भेदुनी अभेद ।
पश्चिम मार्गी आनंद देखुनी राहें ॥२॥
मन पवन निगम आगम सुरेख ।
आधार सहस्त्रदळ देख देहीं नयनीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे डोळां हा प्रणव ।
निवृत्तीनें अनुभव मज दिधला ॥४॥
अर्थ:-
योगी पुरुषाने सहस्रदळ कमळातील ब्रह्मरध्रातंर्गत नीळी ज्योती पाहिली की त्याचा पाहिलेपणा निघुन जातो. नादाच्या ठिकाणी असणारा नादधर्म जगात द्वैत भासत असणारा भेद, अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने नाहीसा करुन तो दैवीसंपत्तीरुप पश्चिम मागनि मन प्राण वेद, शास्त्र अशा तऱ्हेचे भासणारे निरनिराळे पदार्थ या सहस्र दळातील ज्योतीच्या ज्ञानाने ब्रह्मरुप आहेत असे प्रतीतिला येईल. योगाभ्यासातील प्रणवरुप ध्यानाच्या डोळ्यांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला आत्मसुखाचा अनुभव करून दिला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६३
सगुण देह बापा निर्गुण माझें शीर ।
हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥
दैवी आसुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे ।
शून्यांतील सारे चराचर हें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा ।
नयनीं अर्धमात्रा सर्व जन ॥३॥
अर्थ:-
जसे एका देहाच्या ठिकाणी धड व शीर असे दोन भाग असतात. त्याप्रमाणे आत्म्याचे सगुणरुप हा देह व निर्गुणरुप शीर आहे. तसे पाहिले तर दोन्ही एकच आहेत. दैवी संपत्ती किंवा आसुरी संपत्तीचे पुरुष हे दोन्ही माया कार्यच आहेत. हे गुरुपुत्रा सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये अर्धमात्रारुप एक ब्रह्मच आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६४
अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ ।
तेजाचे उमाळे अनंत तेथें ॥१॥
ब्रह्मशिखरीं निराळ्या मार्गावरी ।
अविनाश कर्णकुमारी एकलीच ॥२॥
तेथुनी महाद्वार उन्मनीचें वर्ता ।
त्यावरी चढता रीग नसें ॥३॥
अणुचें जै अग्र ऐसा तेथ मार्ग ।
औटपीठीं सवेग जावें वरी ॥४॥
पंचदेव तेथें एकरुपां देखती ।
औटपीठीं वसती आरुते तेही ।
तयाचेही वर रश्मिअग्रामधुनी ।
शुध्द ब्रह्म निर्वाण असे तेथ ॥६॥
ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडींचा अंत ।
नाही ऐसी मात बोलतसे ॥७॥
अर्थ:-
योगाभ्यासामध्ये योग्याला आतील बाजूस एक प्रकारचा आवाज ऐकू येतो. याला अनुहत ध्वनी म्हणतात. तसेच चंद्राप्रमाणे शीतल तेजाचे उमाळे दिसतात. तेथुन उन्मनीच्या महाद्वाराच्या रस्त्याची कल्पना येते. सुषुम्ना नाडी ब्रह्मशिरापर्यंत एकटीच असते. तेथे उन्मनीच्या द्वाराची कल्पना येऊन तेथे जाण्याचा मार्ग तिला फारच सूक्ष्म म्हणून बिकट वाटतो. त्याच्यापुढे अणुच्या अग्रावर जाण्यासारखे हे कठीण आहे. त्याच्यापुढे ओटपीठ नावाचे स्थान आहे. त्या औटपीठावर वेगाने जाऊन पोहचावे. या औटपीठावर पंचदेवाची वस्ती एकरुपाने असते. त्याच्याही पलीकडे म्हणजे औटपीठापलीकडे शुद्ध ब्रह्माची वस्ती आहे.या सर्व सूक्ष्म गोष्टीचा विचार करुन ह्या ब्रह्माडांला अंतच नाही असे मला वाटते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात


८६५
आत्माराम देखे सहस्त्रदळावरी ।
उन्मनी हे पाहीं आरुते तेहीं ॥१॥
चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण ।
हेचि कीरे खुण तुझें ठायीं ॥२॥
मी ब्रह्म सोई ज्ञानपद तें साजिरें ।
ते ठायीं निर्धारें तुझा तूंचि ॥३॥
बाप रखुमादेवीवरा तुझा तूं आपण ।
सर्व हें चैतन्य तुझे ठायीं ॥४॥
अर्थ:-
आत्मस्वरुपाला सहस्रदळकमळावर पाहणे यादृष्टीने उन्मनी अवस्था ही निकृष्टच आहे. ज्ञानरुप जो आत्मा तोच सर्वांचा प्रकाशक आहे. हीच एक खूण तूं आपल्या ठिकाणी पाहा. मी ब्रह्म आहे. असे प्रतिपादन करणारे. जे ‘सोहं’ पद ते नाचत तुझ्या ठिकाणी येईल. सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य तूं म्हणजे माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल स्वतःच आहे. हे तु विचार करुन पाहिल्यास कळून येईल.


८६६
शून्याचें भुवनी स्वरुप अविनाश ।
प्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥
निळा रंग देखें सर्वाचे देखणीं ।
चैतन्य भुवनीं समरस ॥२॥
ज्ञानदेवा ध्यान सच्चिदानंदाचें ।
सर्व ब्रह्म साचे येणें येथें ॥३॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे प्रणव ब्रह्मरूप आहे. त्या प्रमाणे अष्टांग योग साध्य असलेला शून्यरूप नील बिंदु तोही अविनाशी असून ब्रह्मरूपच आहे.सर्वांच्या दृष्टीला निळ्या रंगाचा बिंदु असला तरी त्याचा चैतन्य प्रकाश सर्व जगामध्यें पसरलेला असतो. ध्यानाचा अभ्यास केल्याने तो सच्चिदान ब्रह्मरूप आहे असे कळून येईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६८
सत्त्व रज तम शुध्द सत्त्व चौथा ।
निर्गुणी गुणापरता बाईयानो ॥१॥
स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी ।
महाकारण सरी चौथा देह ॥२॥
कैवल्य देह तो ज्ञानदेवें पाहिला ।
पहाणें होऊनी ठेला चराचरी ॥३॥
अर्थ:-
सत्त्व, रज, तम व चौथा शुद्ध सत्त्व या चार गुणापलिकडचा तसेच स्थूल सूक्ष्मकारण व महाकारण या चारही देहापलीकडचा जो मोक्षरूप देह तो आम्ही पाहिला. व तोच चराचरांच्या रुपाने नटला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८६९
आत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं ।
लक्षासी उन्मनी आणा बारे ॥१॥
नरदेहाचें सार्थक सदगुरुचरणीं ।
महाकारणासरी चौथा देह ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सदगुरुकृपेचें ।
नित्यानित्य क्रृपें शोध करा ॥३॥
अर्थ:-
आत्मा सर्वव्यापक असून तोच माझे स्वरूप आहे असे चिंतन करून मनाचा नाहीसा करा. हीच ‘तुर्या’ अवस्था होय. हिलाच महाकारण चौथा देह म्हणतात सद्गुरू कृपेने विचार करून देहाचे सार्थक करून घ्यावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७०
स्वरुपाचें ध्यानीं निरंजन पाहिलें ।
डोळ्यानें दाविलें चराचर ॥१॥
आतां माझें नयन नयनीं रिघों पाहे ।
नयना नयनीं राहे नयनची ॥२॥
ज्ञानदेवा नयन निवृत्तिने दाविला ।
सर्वा ठायीं झाला डोळा एक ॥३॥
अर्थ:-
आत्मस्वरूपाचे ध्यान करून शुद्ध ब्रह्मस्वरूप मी पाहिले त्यामुळे सर्व चराचर मला ब्रह्ममय दिसू लागले. आतां मी ब्रह्मरूप आहे ही वृत्तीही मावळून गेली. त्यामुळे मी, परमात्मा व त्याचे ज्ञान ही त्रिपुटी नाहीसी होऊन गेली. निवृत्तीरायांच्या कृपेने मला दिव्य दृष्टि प्राप्त झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७१
नयनांतील रुप जो हें देखे पुरुष ।
त्याचे चरणीं वास असे माझा ॥१॥
नयनांतील ज्योती देखे गुह्यभावें ।
त्याचें स्वरुप भावें वंदावें गा ॥२॥
ज्ञानदेव म्हणे नयनांतील शून्य ।
देखे तोची धन्य भाग्यवंत ॥३॥
अर्थ:-
जो पुरूष ध्यान योगाने डोळ्यातील हे तेज पाहातो.त्याच्या चरणावर माझा वास असो. डोळ्यातील दिव्य ज्योतीचे दर्शन जो या गह्य मार्गाने घेतो. त्यालाच वंदन करावे. ज्या पुरूषाला डोळ्या तील हे तेज प्राप्त झाले तो धन्य व भाग्यवान म्हणावा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७२
डोळा माझा बाप त्रिभुवना परता ।
जो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥
जीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्यें ।
वास्तव्य गोविंदे केलें पाहा ॥२॥
ज्ञानदेवाचें बोल उघड निर्मळ ।
जान्हवीचें जळ स्थिर वाहे ॥३॥
अर्थ:-
त्रिभुवनाहूनही पलिकडे असणारा डोळा म्हणजे परमात्मा तो माझा बाप आहे. त्याला जो पाहतो त्याला पाहण्या बरोबर मोक्ष प्राप्त होतो. जन्तु कृमी वगैरे सर्व जीवांच्या डोळ्यामध्ये गोविंदानेच वास्तव्य केले आहे. माझे बोलणे उघड असून गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व स्थिर वाहात आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७३
नयनाचे आंगणीं तुर्येचा प्रकाश ।
उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥
श्वेत शाम कळा प्रकाश आगळा ।
स्वयंज्योति बाळा लक्ष लांवी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन ।
चैतन्याची शून्य आन नाहीं ॥३॥
अर्थ:-
योगी लोकांना ‘तुर्या’ नामक चौथी अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचे तेज येते व पुढील उन्मनी अवस्थेत मन उल्हासीत होते अशा स्थितीत जिच्या ठिकाणी काळा, पांढरा वगैरे रंग आहेत अशी आत्मज्योती दिसते. तिकडे लक्ष ठेवावे. हे च डोळ्यांतील तेज चैतन्याचे असून दुसरे कांही एक नाही हीच त्याची खूण आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात


८७४
रक्तवर्ण स्थूळ श्वेत हें सूक्ष्म ।
कारण तें श्याम ऐसें देखा ॥१॥
निळावर्ण देह महाकारण साजिरा ।
ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्व हें चैतन्य ।
मन हेंची धन्य धन्याचेनी ॥३॥
अर्थ:-
स्थुल देह ही तांबडी पाकळी, सूक्ष्म देह पांढरी पाकळी, कारण देह काळी पाकळी. व महाकारण देहरूप पाकळीचा रंग निळा असतो.त्यामध्ये बह्मज्योतीरूप लक्ष्मी असते. हे दृश्य पदार्थ चैतन्यरूप आहे. सदगुरू धन्याच्या कृपेने ज्याच्या मनाला हे चैतन्य दिसते तो पुरूष धन्य धन्य होय असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७५
औट पिठावरी निरंतर देश ।
तेथ मी जगदीश असे बाई ॥१॥
त्रिकुटाचा फेरा टाकीला माघारा ।
अर्धमात्रेवरा वरी गेलों ॥२॥
अर्धनारी पुरुष एकरुप दीसे ।
तेची ब्रह्म ऐसें जाण बाई ॥३॥
ज्ञानदेवी शून्य नयनी देखिलें ।
सर्वत्रीं संचलें शून्य एक ॥४॥
अर्थ:-
योगी पुरूष ज्याला औटपीठ म्हणतात त्याच्याहि वर परमात्म्याचे स्थान आहे. त्रिगुणात्मक मायेचा निरास करून शुद्ध ब्रह्माची अर्धमात्रा ते माझे स्वरूप आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकृति पुरूष हे अर्धनारीनटेश्वराच्या दृष्टांताप्रमाणे ब्रह्मरूपच आहेत असे समज. त्यालाच कोणी शून्य असे म्हणतात. तेच एक सर्वत्र व्यापक असलेले शून्य मी डोळ्यांनी पाहिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७६
ब्रह्मज्ञानी पुरुष तोचि ओळखावा ।
नयनांजनीं पाहावा ब्रह्मठसा ॥१॥
देखतसे देहीं द्वैत भेदातीत ।
तोची धन्य संत माझे मनीं ॥२॥
त्याचे चरणोदकीं जान्हवी पवित्र ।
सहस्त्रदळावर लक्ष ज्याचें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐशा योगीयाला ।
देखतां तयाला नमन माझें ॥४॥
अर्थ:-
ज्याच्या डोळ्यातील तेजांत ब्रह्मप्राप्तीची खूण दिसते त्यालाच ब्रह्मज्ञानी समजावे जो देही असूनही ज्याला द्वैत भेदाच्या पलीकडील परमात्म्याचे दर्शन झालेले असते तोच खरा संत असे माझ्या मनात येते. ज्या पुरुषाचे लक्ष ब्रह्मरंध्रातील सहस्रदळा वर म्हणजे परमात्म्यावर आहे. अशा पुरूषाच्या पायातील तीर्थ जान्हवी आहे असे समजा. अशा पुरुषाला पाहिल्याबरोबर त्याला माझे दंडवत असो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७७
निशी दिवस दोघे लोपलें तें ठायीं ।
निरंजन ते ठायीं लक्षुनी पाहा ॥१॥
रवी शशी ज्याचें तेजें प्रकाशले ।
नवल म्यां देखिलें एक तेथें ॥२॥
नारी पुरुष दोघे एक रुपें दिसती ।
देखणें पारुखे तया ठायी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे शि तेचि शक्ती ।
पाहातां व्यक्तीं व्यक्त नाहीं ॥४॥
अर्थ:-
रात्र व दिवस असा भेद ज्याच्या ठिकाणी नाही. कारण ते स्वरूप तेजरूप म्हणजे ज्ञानरूप आहे. ते ब्रह्म तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. ज्याच्या प्रकाशाने चंद्र सूर्यादिकाना प्रकाश मिळतो. अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्त्री पुरूष असा भेद नाही व पाहाणाराही त्यामध्ये लोपून जातो.याचे मला मोठे आश्चर्य वाटते. शिवशक्ती एकरूप असल्यामुळे त्यांचामध्ये व्यक्त अव्यक्त असा भेद नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७८
चैतन्य तें दिसें उघडेया डोळां ।
नयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥
मसुरांतील सूक्ष्म अनुभवें दिसे ।
तेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथे तेज ।
असे गुजगुजीत निर्मळ तें ॥३॥
अर्थ:-
चैतन्य वस्तु ज्ञानरूपी डोळ्यांनी दिसते, व तो सुखसोहळा निवृत्तीनाथांनी अनुभविला.ब्रम्हारंधातील मसुराएवढ्या बिंदुचे तेज अत्यंत सूक्ष्म असले तरी योगी लोकांना त्याचा अनुभव घेता येतो. ते तेज मोहक व निर्मळ असले तरी ज्या डोळ्याला तेज दिसते त्या डोळ्याचाही डोळा जो परमात्मा तो एक निवृत्तीनाथांनाच माहीत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८७९
आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा ।
सूक्ष्माचा फेरा सर्वा ठायीं ॥१॥
बिंदुस्थान तेथें ब्रह्मरंध्र ज्योती ।
तेथे योगी वसती दिवस रात्र ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्वची हें शून्य ।
वस्तु परी पूर्णं सर्वाठायीं ॥३॥
अर्थ:-
आकाशात चंद्र सुर्य घिरट्या घालीत असतात परंतु आकाश मात्र सर्वत्र आहे तसेच आहे. योगाभ्यासी पुरूष ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणाऱ्या ज्योतीवर लक्ष ठेऊन दिवसरात्र तेथेच वस्ती करतात. ब्रह्मदृष्टीने सर्व वस्तु एकदेशी आहेत ते ब्रह्म मात्र सर्व व्यापी आहे. असे माऊली ज्ञानदेव म्हणतात.


८८०
अखंड तमासा डोळा देख निका ।
काळा निळा परिवा बाईयानो ॥१॥
सदोदीत नयनीं नयन हारपे ।
निळ्याचे स्वरुपें मनीं वसो ॥२॥
अकरा वेगळें नाहीं बा आणिक ।
माझे नेत्रीं देख शुध्द ज्योती ॥३॥
ज्ञानोबाची वाणी पूर्ण रुपी घ्यावी ।
देहींच पाहावी आत्मज्योती ॥४॥
अर्थ:-
तुम्ही आपल्या डोळ्यांनी काळ्या निळ्या पारव्या रंगरूपानी नटलेल्या जगताचा देखावा पहा. त्या परमात्म्या कडे सतत डोळे लावले असतां डोळ्याचा डोळेपणा विसरून नीलवर्णरूप असलेला जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन वसुन राहाते. व तसे झाले म्हणजे दहा इंद्रियापलीकडील जे अकरावे मन तें परमात्मरूप होते. तद्व्यतिरिक्त कांहीही स्फुरत नसते व अशी स्थिती झाली असता माझ्या डोळ्यातील शुद्ध तेजाची ज्योत प्रतीतीला येते. माझ्या सांगण्याचा पूर्ण विचार करून या देहांत ती आत्मज्योत पहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८१
शून्याचा उदभव सांगतों या बोला ।
औटापिठीं वहिला सूक्ष्म मार्ग ॥१॥
मनपुराचे वरी द्वादश आंगुळें ।
तयावरी गेले अव्हाटेने ॥२॥
आतां तया सदनीं उफराटें मार्गे ।
वळंघिता सवेग पश्चिम पंथीं ॥३॥
पश्चिमपंथीं नाडी घोष वाहे जीचा ।
तेथुन ध्वनीचा विस्तार गा ॥४॥
ध्वनीचेंही वरी शुध्द तेज असे ।
चंद्रमा प्रकाशे तेच ठायीं ॥५॥
चंद्राचे वरी एक निराळाच मध्य ।
स्त्रियेचें निजबोधें निजरुप ॥६॥
निखिल जें तेज ज्याचेनी अमृत ।
जीववी देहींत देह दैव ॥७॥
औटापिठातळीं सर्व तें दीसे ।
सूर्य हा प्रकाशे तेच ठायीं ॥८॥
ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी ।
धरितां आवडी ब्रह्म लाभे ॥९॥
अर्थ:-
योग्यांना ध्यान करित असता जो निलबिंदु दिसतो त्याला शुन्य म्हणतात. त्या शून्याची उत्पत्ति कशी होईल. याचा मार्ग दाखवितात. महाकारण स्थानात औटपीठ म्हणुन एक स्थान आहे. तेथे चित्ताची स्थिरता झाली म्हणजे हे शुन्य दिसेल असे असल्यामुळे त्याला औटपीठीचा मार्ग सांगतात. औटपीठा कडे जाण्याला, चांगला सूक्ष्म मार्ग आहे. तो असा, प्रत्येक जीवाच्या देहांत मन हेच कोणी एक शहर त्याच्यापुढे बारा बोटापर्यंत चांगला मार्ग आहे. त्याच्यापुढे थोडे आड रस्त्याने जावे लागते. पुढे त्या ठिकाणाहून उलट मार्गाने येऊन वळण घेऊन पश्चिमेच्या मार्गाने जावे. तेथे एक प्रकारचा आवाज ऐकू येतो व तेथून ध्वनीला सुरवात होते. या ध्वनी स्थानाच्याही वर शुद्ध तेज आहे.तेथे चंद्रप्रकाश दिसतो. त्या चंद्राच्याही वर तेजोमय आत्मरूप दिसते. त्याठिकाणच्या अमृत स्थानाने देहधारी जीवंत राहतात. या औटपीठा तच तो नीलबिंदु दिसतो.सूर्योदयानंतर जसा प्रकाश पडतो तसा तो प्रकाशमय आहे. महाकारणाचे जे दुसरे स्थान त्रिकूट त्याची मला आवड आहे. त्या आवडीच्या योगाने पुढे ब्रह्मप्राप्ती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८२
आतां औटपिठींचा मार्ग एक बाई ।
निशिदिनीं पाहीं शोध करा ॥१॥
औटहात प्रमाण सत्य कीं हे जाण ।
त्यांतील जें स्थान ऐकें एक ॥२॥
महालिंग स्थान टाळू एके संधीं ।
तेथें एक सिध्दि तेजोमय ॥३॥
मार्ग तेथ परतले दोहीं भागीं ।
पश्चिमीं महालिंगी मार्ग ऐसा ॥४॥
सत्रावीचे शिखरीं मार्ग एक गेला ।
तो म्यां देखियेला याच देहीं ॥५॥
महालिंगीं मार्ग अंत नाहीं ज्याचा ।
शोध करितां वाचा कुंठीतची ॥६॥
ज्ञानदेव म्हणे हा विचार पाहा ।
जाणता दाविता विरळा एक ॥७॥
अर्थ:-
महाकारण स्थानापैकी औटपीठ हे एक स्थान आहे. त्याच्याकडे जाणाऱ्या मार्गाचा रात्रंदिवस शोध करा. साडेतीन हाताचा हा स्थूल देह आहे. त्यांत महालिंग स्थान असून ते मस्तकातील टाळूजवळ आहे. त्यामध्ये तेजोमय एक सिद्धी आहे. या ठिकाणाहून दोन रस्ते फुटतात त्यापैकी पश्चिमेकडचा म्हणजे दैवी संपत्तिचा ब्रह्मरूप महालिंगाकडे म्हणजे सत्रावी नावाचे अमृताचे तळ्याकडे जातो. हा रस्ता योगाभ्यास करून याच देहात मी पाहिला. या महालिंगाचा मार्ग ज्या ठिकाणी जातो. त्या परमात्मस्वरूपाचा अंतपार नाही व तेथे शब्द कुंठित होतो. एखाद्या ज्ञानवान पुरुषाला शरण जावून त्याच्याकडून हे ज्ञान प्राप्त करून घ्या पण असा ज्ञानवान पुरूष विरळाच असतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८३
आकाशाचें अंतीं प्रणवाचें गुज ।
निरंजन बीज साधूं पाहाती ॥१॥
सद्रूप चिद्रूप अद्वय एक कळा ।
संसारीं वाहिला निर्विकार ॥२॥
प्रणवीं बीज अणुरेणु आंत ।
दशमद्वाराची मात अपूर्व बा रे ॥३॥
बापरखुमादेवी प्रणवे निखिळ ।
शब्दाचें पाल्हाळ प्रणवीं रीघे ॥४॥
अर्थ:-
योगाभ्यासी पुरूष सहस्रदळ कमळातील अर्धमात्रारूप आकाशात एक तेजोमय बिंदु पाहातात. ते ओंकाराचे बीज आहे. या बिंदूवर लक्ष्य ठेवन निरंजन बीज म्हणजे जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. सत्, चित्, अद्वय निर्विकार अशा ब्रह्माचा संसारात राहून लाभ करून घेतात. प्रणव बीज जे ब्रह्म ते अणूरेणुत भरलेले आहे. ही गोष्ट दशमद्वार जे ब्रह्मरंध त्या ठिकाणी चित्त ठेवल्याने योग्याला कळते हा त्या दशमद्वाराचा चमत्कार आहे. माझे पिता व रखुमाईपती श्री विठ्ठल हेच सर्वत्र एक प्रणवरूप ब्रह्मच असल्यामुळे वेदातील शब्द पाल्हाळही ब्रह्मस्वरूपच आहे. असे माऊली सांगतात.


८८४
आत्माराम नयनीं निरखुनी देखिला ।
निळा रंग ओतीला आदी अंती ॥१॥
गोल्हाट त्रिकूट ब्रह्मरंध्रीं वस्तु ।
तुर्येची ऐसी मातु याच ज्ञानें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्वा अंतरीं तुर्या ।
निवृत्ती योगी वेगीं गुज बोले ॥३॥
अर्थ:-
डोळ्यात चांगले निरखुन पाहिले. म्हणजे ते निळ्या रंगाचे आत्मस्वरूप आरंभापासून शेवटपर्यंत सर्वत्र भरलेले आहे. असे डोळ्याने दिसते. त्या आत्मज्ञानाने त्रिकुट गोल्हाट वगैरे चारही महाकारण स्थाने याच ज्ञानाने जाणली जातात. मला योगीराज श्रीगुरू निवृत्तिरायांनी हे तुर्या अवस्थचे गुह्य ज्ञान सांगितले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८५
तुर्येमध्यें माझा अखंड रहीवास ।
निवृत्ति म्हणे अविनाश तूर्या करी ॥१॥
स्थुळदेह निमतां सूक्ष्म उरतां ।
कारणीं हारपतां कैसें झाले ॥२॥
ज्ञानदेव म्हणे महाकारणीं नांदे ।
निवृत्तीने आनंदे दाखविलें तें ॥३॥
अर्थ:-
माझा अखंड रहिवास तुर्येच्या अवस्थेत असतो. निवृत्तीनाथही म्हणतात की या तूर्येत मनुष्य अविनाशरूप होतो. याकरिता लय चिंतनाने स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन्ही देहांचा महाकारण देहात लय पावतो. ही जी चौथी अवस्था तिला तुर्या अवस्था म्हणतात. या अवस्थेनंतर मनुष्य अविनाश पदाला प्राप्त होतो. व त्या अविनाश पदाचे ज्ञान निवृत्तीनाथांनी आनंदाने मला करून दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८६
शास्त्रार्थाची वाणी निरंजणी दीसे ।
औटपिठीं वसे निर्विकार ॥१॥
अहं सोहं मग ॐकाराचे देठीं ।
अहंतेचे शेवटीं सोहं वस्तू ॥२॥
सोहं वस्तु निळी अहं गेलीया ।
आनंद झालीया महाकरणीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण ।
या वेगळी खूण आणिक नाहीं ॥४॥
अर्थ:-
शास्त्रार्थानी वर्णन केलेले ब्रह्म ते औठपीठात निर्विकार स्वरूपांत दिसते. अहं सोहं असा जप ओंकाराच्या स्वरूपांत ध्याता,ध्यान व ध्येय अशा भेदाने दिसतो. पण उपाधिचा निरास केला म्हणजे शुद्ध ब्रह्मच प्रतितीला येते. अहंकाराचा विसर पडला म्हणजे याच देहात आनंदरूप तेजोमय नीलबिंद दिसतो. मी निवृत्तीनाथांची शपथ घेऊन सांगतो की या नीलबिंद शिवाय दुसरी ज्ञानप्राप्तीची खूण नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८७
मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा ।
माझा मी वेगळा तयामध्यें ॥१॥
उफराटी दृष्टी लावितां नयनीं ।
ते दृष्टीची वाणी किंचित ऐका ॥२॥
उफराटी दृष्टि देखे उन्मनीवरी ।
तेव्हां निर्विकारी मीच मग ॥३॥
ज्ञानदेव म्हणे देहा डोळां दिठी ।
पाहातां सर्व सृष्टि निवृत्ती एका ॥४॥
अर्थ:-
मी माझा आत्मरूप डोळा असून नीलवर्ण ज्योतीत दिसणारे शून्यही मीच होय सर्वत्र असलो तरी मी वेगळा आहे. या वस्तुचा माझा बिलकुल संबंध नाही एवढेच नव्हे तर त्या वस्तु मजवर आहेत की नाही याची मला शुद्धीही नाही.बाह्य विषयाकडे धावणारी तुमची दृष्टी जर उफराटी वळवून अंतर्मुख केली तर काय होईल गोष्ट जरा ऐका. या अंतर्मुख दृष्टीने उन्मनी अवस्था प्राप्त होऊन मीच सर्वत्र आहे असे दिसेल. अशा अंतर्मुख देह डोळा दृष्टीने देह डोळा दृष्टी वगैरेकडे पाहाल तर सर्व सृष्टीची निवृत्ती म्हणजे मिथ्यात्व निश्चय होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८८
सत्त्व रज तम त्रिगुण तें ब्रह्म ।
अर्धमात्रा नि:सीम ॐकार हा ॥१॥
सहज हा प्रणव सर्वातीत साजे ।
मीपणास तेथ ठाव नाहीं ॥२॥
अक्षर कूटस्थ सर्वातीत असे ।
अक्षर अविनाश ऐसें जाणा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सर्वाचे शेवटीं ।
अविनाश दृष्टी असे कीं रे ॥४॥
अर्थ:-
ते ब्रह्मच सत्त्व, रज, तम असे त्रिगुणात्मक जगत बनते. अर्धमात्रा ॐकार स्वरूपच आहे. तेथे अहंकार जाऊ शकत नाही. असा प्रणवरूप ॐकार सहजच सर्व वस्तुहून पलीकडचा ठरतो. या ॐ कारालाच नाश नसल्यामुळे अक्षर असे म्हणतात. निर्विकार असल्यामुळे त्यालाच कूटस्थ व सर्वातीत असे म्हणतात. ते अक्षरच अविनाश आहे असे समजा. सर्वांचे शेवटी आत्म स्वरूप पाहावयाचे ती दृष्टीही अविनाश आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८८९
तूर्या तें महाकारण नाहीं नाहीं जेथें ।
दर्शनाचे मतें माझा मीच ॥१॥
गोल्हाट त्रिकूट श्रीहाटातीत ।
महाकारणाची मात जेथ नाहीं ॥२॥
क्षर अक्षर अनाक्षर नाहीं ।
कूटस्थ सर्वही प्रसवला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐसें हें पाहातां ।
निवृत्तीनें तत्त्वता कथनी केली ॥४॥
अर्थ:-
ज्या अवस्थेमध्ये तुर्या अवस्था महाकारण देह हे सर्व नाहीसे होऊन एक आत्मवस्तुच राहाते. गोल्हाट, त्रिकुट, श्रीहाट व महाकारणदेह यांची गोष्ट त्याठिकाणी नाही. त्या स्थितीत क्षर, अक्षर व अनाक्षर भाव उरत नाही सर्वांची मिथ्या प्रतीती कूटस्थावरच येते. वरिल सर्व गोष्टी निवृत्तीनाथांनी आम्हाला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९०
सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें ।
विश्वरुप चैतन्य महाकारणीं ॥१॥
ब्रह्मज्योतीचिये प्रकाशें करुनी ।
देखे त्रिभुवनीं एक वस्तु ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ज्यीतीची जे ज्योती ।
ब्रह्मरंध्री वस्ती परमात्मयाची ॥३॥
अर्थ:-
ब्रह्मरंधातील नीलवर्ण बिंदुरूप बह्म सत्रावी नावाच्या अमृतसरोवराजवळ महाकारण देहात प्राप्त होते. त्या चैतन्याच्या प्रकाशाने सर्व जगत एक वस्तु आहे. असे ज्ञान करून घे. जगातील प्रकाशमान पदार्थांना प्रकाश देणारा जो परमात्मा तो ब्रह्मरंधात प्रगट होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९१
महा तेजा आंत बिंदू कोणे परी ।
उष्ण तेजा माझारीं साक्ष पाहा ॥१॥
कुंडलनी उर्ध्वमुखें अग्नी सोडी ।
तयाची हे जोडी संत जना ॥२॥
ज्ञानेश्वर म्हणे आत्मयातें जाणे ।
सुनिळ अनुभवणें निवृत्ती पाहा ॥३॥
अर्थ:-
ब्रह्मरंधातील तेजोमय नीलवर्ण ज्योतीतील तेजाचा कोणत्याही रीतीने अनुभव घ्या. प्राणायामाच्या योगाने योगाभ्यासी पुरूषांची कुंडलिनी नाडी जागृत होऊन ती वर तोंड करून अग्नी सोडते. व त्यामुळे संत लोकांना वरील तेजोमय ज्योतीचा अनुभव येतो. या तेजाला मी आत्मा समजतो. या ज्योतीचा अनुभव घ्यावयाचा असेल तर निवृत्तीनाथांना शरण जा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात


८९२
ऐका हा शेवट अभंगमाळा झाली ।
तूर्या हेच आली प्रत्यया गा ॥१॥
तूर्या तेचि उन्मनी क्षर तें अक्षर ।
निर्गुण साकार ऐसें देखा ॥२॥
देह तें विदेह महाकारण ब्रह्म ।
हें निश्चयाचें वर्म ऐसें जाणा ॥३॥
कनक तेंची नग समुद्र तरंगीं ।
देह हा सर्वागीं ब्रह्म जाणा ॥४॥
अभंगा शेवट जाणे निवृत्ति एक ।
त्यानें मज देख कृपा केली ॥५॥
मूर्खासी हा बोध सांगों नये बापा ।
अभंग कृत्याचा लेश नसो हातीं ॥६॥
ज्ञानदेव म्हणे हें कृत्य हातां नये ।
माय देऊं नये कोणासही ॥७॥
अर्थ:-
योग प्रकरणातील हा शेवटचा अभंग आहे. या अभंगमालेमुळे चवथी जी अधिवस्था तिचा अनुभव आला. त्या अवस्थेत मनाचा मनपणा राहात नाही. म्हणुन हिला उन्मनी अवस्था असे म्हणतात. क्षर म्हणजे नाशवंत व अक्षर म्हणजे परमात्मा त्या क्षर पदार्थाला अक्षररूप परमात्मा अधिष्ठान आहे असे कळले म्हणजे क्षर हे अक्षर स्वरूपच ठरते. यावरून निर्गुणच सगुण बनते. या देहातच ज्ञानप्राप्त होऊन विदेही अवस्था प्राप्त होते. महाकारण देहांतच ब्रह्म साक्षात्कार होत असल्यामुळे त्या देहाला ब्रह्म म्हणण्याची पद्धत आहे. हे निश्चयाचे वर्म आहे असे जाणा. हे योगाभ्यास वर्णनाचे अवघड अभंग निवृत्तीनाथांच्या कृपेनेच शेवटास गेले, ज्याला या अभंगाच्या ज्ञानाचा अनुभव नाही त्याला हा बोध सांगु नये. जसी आपली आई कोणत्याही दुष्टाचे स्वाधीन करीत नाही. त्याप्रमाण मुर्खांना हा बोध करू नये. अनधिकारी मनष्यांना या ज्ञानाचा स्पर्शदेखील होऊ देऊ नये असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९३
होय सौरी आतां उघडा घाली माथा ।
परपुरुषीं रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥
कर्मेवीण सौरी झाले आले संतापाशी ।
ज्ञान डौर घेऊनि करीं लिंग देह नाशी ॥२॥
रांडव राहूं नका बाई पाहुनि करा वर ।
तेचि तुम्ही सुखी व्हाल आह्यव मरण बर ॥३॥
रांडवा ज्या ज्या मरती बाई त्यासी नाना योनी ।
स्वामी करुनि सूखी होई खुंटती येणीं जाणीं ॥४॥
निवृत्तीप्रसादें ज्ञानदेव बोले ।
स्वामी करुनी सुखी होई निजानंदीं डोले ॥५॥
अर्थ:-
सौरी म्हणजे स्वैर वागणारी स्त्री म्हणते. तूं माझ्या सारखी डोक्यावरचा पदर टांकून माथा उघडा कर. भगवंताची माथा उघडा करुन माझ्या प्रमाणे या परमश्रेष्ट पुरुषाशी ज्या रमल्या त्याच श्रेष्ट पतिव्रता होत.मी सकाम कर्माचा त्याग करून सौरी बनले. आणि संतांच्या जवळ जाऊन, हातांत ज्ञान डौर घेऊन, लिंग देहाचा नाश केला. तुम्ही सुद्धा अशा स्वरुपाच्या नवऱ्याशिवाय राहू नका, असाच पति नीट पाहून तुम्ही करा, त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल. कारण सौभाग्य असतानाच मरण येणे चांगले. ज्या बायका विधवा होऊन मरतील म्हणजे परमात्मप्राप्ती वांचून मरतील त्यांना नानायोनीतून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून तुम्ही त्या परमात्म्याला वरुन सुखी व्हा त्यामुळे तुमची जन्ममरणाची येरझार नाहीसी होऊन जाईल. श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेने मी असे सांगत आहे की या श्रीहरिस तुम्ही स्वामी करा व मग सहजानंदांत नित्य डुलत राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९४
कैसे बोटानें दाखवूं तुला ।
पाहे अनुभव गुरुच्या मुला ।
नको सोडूं देठीच्यां मुळा ।
सोडी अंजुळी आपुल्या कुलारे ॥१॥
ज्या ठायीं चळना ढळ ।
विश्व जयाचें सत्तेनें खेळ ।
अणुरेणु व्यापक सकळ ।
तेथें चळ ना अचळरे ॥२॥
जेथें डोळिया दृष्टि पुरेना ।
तेथें वृत्तीचें कांही चालेना ।
तेथें बुध्दीचा रीघ होईना ।
तेथें मनाची धांव पुरेना गा ॥३॥
काय पहाशी तूं भोंवतें ।
येतां जातां जवळी असते ॥
तुझ्या पायाखालीं तुडवतें ।
तुझ्या डोळ्यामध्यें दिसतें गा ॥४॥
ही खुण त्त्वां ओळखुनी घ्यावी ।
गुरुपुत्रा जाउनी पुसावी ।
तो नेऊनी तुला दाखवी ।
सोय सांगितली ज्ञानदेवी गा ॥५॥
अर्थ:-
तुला परमात्मा बोटांने कसा दाखवावा तो अनुभवानेच कळणारा आहे. तुझे जे मूळचे स्वरूप त्याचे विस्मरण होऊ देऊ नकोस आणि देहात्मबुद्धिने मानलेले कुल नाम रूपादिक त्याना तिलांजली देऊन टाक. या परमात्म्याला चळ ना ढळ म्हणजे क्रियारहित सर्व विश्व त्याच्या सत्तेने खेळते हे अणूरेणू पेक्षाही सूक्ष्म व व्यापक असून ते अक्रिय आहे. जे पाहतांना डोळ्याची दृष्टि पोहचत नाही. मनोवृत्तीचे काही चालत नाही, बुद्धिचा तेथे प्रवेश होत नाही. मनाची धांव तेथे पुरत नाही. तूं आतां भोवती काय पाहतोस येता जाता तें तुझ्या जवळच असते. तुझ्या पायाखाली तुडवले जाते. तुझ्या डोळ्यामध्येही तेच आहे. हे वर्म श्रीगुरूंना शरण जाऊन वोळखून घे. तो श्रीगुरू तुला यथार्थ बोध करून देईल.असा हा मार्ग मी तुला दाखवून दिला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९५
जोहार माय बाप जोहार ।
मी कृष्णाजी घरंचा पाडेवार ।
त्याचे घरांतला सर्व कारभार ।
माझे शिरावर की जी माय बाप ॥१॥
कामाजी बाजी हुद्देदार ।
तेणें रयतेचा केला मार ।
रयत फार नागविली की जी माय बाप ॥२॥
क्रोधाजी बाबा शेखदार झाले ।
त्याजकडे हुजूरचें काम आलें ।
तेणें कामाजीचें छळण केलें की जी माय बाप ॥३॥
मनाजी बखेडा झाला ।
गांव सगळा नाशिला की जी मायबाप ॥४॥
बुधाजी पाटील कायापूरचे ।
ममताईचे हाताखालचे ।
त्यांत जीवाजी भुलले की जी माय बाप ॥५॥
या उभयतांचा विचार वागला ।
त्यामुळें आम्हांस राग आला ।
बुधाजी आवरी आपल्या पोराला की जी माय बाप ॥६॥
सदगुरुचा मी पाडेवार ।
निवृत्तीशीं असे माझा जोहार ।
ज्ञानदेवा सफळ संसार झाला की जी माय बाप ॥७॥
अर्थ:-
मी भगवान श्रीकृष्णाच्या घरचा नोकर आहे. त्या श्रीकृष्णाच्या घरांतील कामाची जबाबदारी माझ्या शिरावर असते. काम नावांचा देहराज्यातील एक मुख्य अधिकारी आहे.त्यांने सर्व जनतेला मार देऊन लुबाडले आहे.क्रोध नावांचे दुसरे अधिकारी नेमले आहे. त्याच्याकडे हुजूरचे काम आले. व त्याने कामावर तान मारून मनाजी बाबाला फितुर केले. आणि मोठा बखेडा माजवून सगळ्या गावाचा नाश करून टाकला आहे. या कायापूरचे पाटील बुद्धि असून ममतेच्या ताब्यांत सर्व जीव गेल्यामुळे भुलून गेले. हे दोघे एक विचाराने वागू लागल्यामुळे आम्हाला राग आला म्हणून बुधाजी पाटलाचे मुलास म्हणजे बुद्धिच्या वासनेस आवरून धरण्यास सांगितले. मी सद्गुरू निवृत्तिरायांचा सेवक असून माझा नमस्कार त्या निवृत्तिरायांनाच असो. त्यांच्याच कृपेने माझा संसार सफळ झाला.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९६
काय सांगू तूतें बाई ।
काय सांगू तूतें ॥ध्रु०॥
जात होते यमुने पाणिया वातत भेतला सावला ।
दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावरी कांबला ॥१॥
तेणें माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली ।
पलतां पलतां घसलून पलली ।
दोईची घागल फुतली ॥२॥
माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले ।
तिकुन आले शालंगपानी मला पोताशीं धलिलें ॥३॥
मला पोताशीं धलिलें माझें समाधान केलें ।
निवृत्तीचे कृपें सुख हें ज्ञानदेवा लाधले ॥४॥
अर्थ:-
एक लहान बोबडी गौळण म्हणते. बाई, तुला मी सांगू. मी यमुनेच्या पाण्यासाठी जात असतांना मला वाटेत सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण भेटला. त्याच्या डोक्यांवर मोर पिसाची टोपी असून, खांद्यावर कांबळी होती. त्याने माझी थट्टा केल्यावर मी तेथून पळाली, पळत असतांना मी अडखळून पडल्यामुळे माझ्या डोक्यावरची घागरही फुटून गेली. माझे गुडघे फुटले. म्हणून मी तिथेच रडत बसली. मग कुठून तरी श्रीकृष्ण आले. व त्यानी मला पोटाशी धरले. श्रीकृष्णाने त्या लहान गौळणीस पोटाशी धरुन तिचे समाधान केले. त्याप्रमाणे मला सुद्धा श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपेने हे सुख लाभले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९७
मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें ।
अंतरबाह्य रंगुनि गेलें विठ्ठलची ॥१॥
विठ्ठल म्हणतां हरलें पाप पदरीं आलें पुण्य माप ।
धाला दिनाचा मायबाप विठ्ठलची ॥२॥
विठ्ठल जळीं स्थळीं भरला ठाव कोठें नाहीं उरला ।
आज म्या दृष्टीनें पाहिला विठ्ठलची ॥३॥
ऐसा भाव धरुनी मनीं विठ्ठल आणिला निजध्यानीं ।
अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ॥४॥
तो हा चंद्रभागे तीरा पुंडलिकें दिधला थारा ।
बापरखुमादेवीवरा जडले पायीं विठ्ठलची ॥५॥
अर्थ:-
त्या भगवन्नामस्मरणामध्ये माझे मन तृप्त झाले याचा अर्थ तें विठ्ठल स्वरूपच होऊन गेले. त्या नामस्मरणांत मी अंतर्बाह्य रंगून गेले. विठ्ठल नामस्मरणाने पापाची निवृत्ति होऊन पुण्य पदरी पडलें त्या नामस्मरणाने दीनांचा मायबाप जो श्रीविठ्ठल तो संतुष्ट झाला. त्या विठ्ठलाशिवाय दुसरे काही नाही. तो जळी स्थळी सर्वत्र एकरूपाने भरला आहे. अशा त्या श्रीविठ्ठलाला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. श्रद्धेने त्या श्रीविठ्ठलाला ध्यान करून मनामध्ये आणले, मलाअसे वाटते की माझी वाणी त्या श्रीविठ्ठलनामाचा सतत उच्चार करो. असा हा श्रीविठ्ठल चंद्रभागेच्या तीरी पुंडलिकरायांनी थारा दिल्यामुळे विटेवर उभा राहीला आहे. त्या माझे पिता व रखुमाईचे पती श्री पंढरीरायांच्या ठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले आहे. असे माऊली सांगतात


८९८
हरिभक्त संत झाले हो अनेक ।
त्यामाजी निष्टंक कांही ऐक ॥१॥
शुक वामदेव शौनक नारद ।
अजामेळ प्रल्हाद बिभीषण ॥२॥
ध्रुव पराशर व्यास पुंडलिक ।
अर्जुन वाल्मिक अंबरीष ॥३॥
रुक्मांगद भीष्म बगदालभ्यसूत ।
सिभ्री हनुमंत परिक्षिती ॥४॥
कश्यपादि अत्री गौतम वशिष्ठ ।
भारव्दाज श्रेष्ठ मार्कंडेयो ॥५॥
बळी कृपाचार्य इंद्र सूर्य चंद्र ।
ब्रह्माआदि रुद्र पूर्ण भक्त ॥६॥
सर्वांचा एक आहे मी किंकर ।
म्हणे ज्ञानेश्वर वैष्णवांसी ॥७॥
अर्थ:-
या भारतभूमिमध्ये अनेक भगवत् भक्त झाले. त्यामध्ये प्रमुख भक्तांची नावे अशी.शुक, वामदेव, शौनक, नारद, अजामेळ, प्रल्हाद, बिभिषण, ध्रुव पराशर, व्यास, पुंडलीक, अर्जुन, वाल्मिकी, अंबरीष,रूक्मांगद, भीष्म, बकदालभ्यसूत, शबरी, हनुमंत, परिक्षिती, कश्यप, अत्रि, गौतम, वशिष्ट, भारद्वाज, मार्कंडेय, बळी, कृपाचार्य, इंद्र, सूर्य, चंद्र,ब्रह्मदेव, हे श्रेष्ट भगवद्भक्त होते. मी या सगळ्या वैष्णवांचा दास आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


८९९
तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।
माझें मन लागो तुझ्या पायीं हो करी कृपा ।
तूं सावळे सुंदरी हो करी कृपा ।
लावण्य मनोहरी हो करी कृपा ।
निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥
पंढरपुरीं राहिली ।
डोळा पाहिली ।
संतें देखिली ।
वरुनी विठाई वरुनी विठाई ।
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा ।
उजळकुळ दीपा ।
बोध करी सोपा ।
येउनी लवलाही येउनी लवलाही ॥ध्रु०॥
तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा ।
चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा ।
प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा ।
ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा ।
काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार ।
त्याचे बळ फार ।
सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥
शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा ।
नाचताती प्रेम कल्लोळीहो करी कृपा ।
उदे उदे शब्द आरोळी हो करी कृपा ।
पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा ।
त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा ।
आई दाविली मूळपीठा हो करी कृपा ।
बापरखुमादेवीवरु ।
सुख सागरु ।
त्याला नमस्कारु ।
सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥
अर्थ:-
हे विटेवर उभी असलेल्या सखे, विठाबाई मजवर कृपा कर माझे मन तुझ्या चरणाच्या ठिकाणी असू दे. मेघकांतीप्रमाणे शामवर्ण सुंदर, तेजस्वी, मनाला आल्हाद देणारे असे तुझे रूप आहे. हे देवी जो मी तुझा भक्त त्या मजवर तूं कृपा कर.तूं पंढरपूरास राहिलेली आहेस तुला तेथें संतांनी व मीही पाहिले. तेंव्हा कुलोद्धार करणाऱ्या सच्चिदानंद अंबाबाई तूं लवकर येऊन मला सोप्या रितीने बोध कर. देव्हारा मांडून व त्यावर चौकोनी आसन घालून त्यावर कलश ठेविला आहे व वरच्या बाजूस प्रेमाचा चांदवा दिला आहे. तुला बसण्यांकरितां ज्ञानरूपी गादी घातली आहे व त्यावर आदिशक्ति तुला बसविले आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार वगैरे फार बलवान झाले आहेत. तरी त्यांचा नाश करून मला सुखी कर. शुक सनक, सनंदन, सनत्कुमार, नारद वगैरे तुझ्या नामाचा गजर करणारे गोंधळी होऊन उदो उदो शब्दाचे आरोळी देऊन तुझ्यापुढे आनंदाने नाचतात. त्यांनी तुझी थोरवी गायिली पुंडलिकाने ज्ञानदिवटी हाती घेऊन देवीचे मूळपीठ जे पंढरपूर ते दाखवून सोपा असा भक्तिमार्ग प्रगट केला. म्हणून सर्वसुख देणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच केवळ सुखाचा सागर असून त्यांना मी नमस्कार करून सर्वसुख मला प्राप्त करून दे असे माऊली सांगतात.


९००
भगवदीता हेचि थोर ।
येणें चुके जन्म वेरझार ।
वैकुंठवासी निरंतर ।
भवसागर उतरेल ॥१॥
राम नाम सार धरी ।
तूंचि तारक सृष्टीवरी ।
त्याचेनि संगें निरंतर ।
भवसागर तरसील ॥२॥
व्यर्थ प्रंपच टवाळ ।
येणें साधिली काळवेळ ।
नाम तुझें जन्म मूळ ।
हें केवळ परिसावें ॥३॥
विक्राळ साधिलें नाम ।
दूर होतील विघ्न कर्म ।
साधितील धर्म नेम ।
हे पुरुषोत्तम बोलियले ॥४॥
तंव अनुष्ठान सुगम ।
साधिले सर्व सिध्दि नेम ।
क्षेम असेल सर्व धर्म ।
सर्वकाळ फळले ॥५॥
ज्ञानदेव कर्म अकर्ता ।
पावन झाला श्रीअनंता ।
सुखदु:खाचा हरी भोक्ता ।
सर्वकाळ आम्हा आला ॥६॥
अर्थ:-
भगवदीता हे ‘आत्मा अवतरविते मंत्र’ असे असल्यामुळे तिचे महत्व मोठे आहे. त्या ज्ञानाने जीवाच्या मागे लागलेली जन्ममृत्यूची येरझार नाहीसी होऊन निरंतर वैकुंठवासी म्हणजे परमात्मस्वरूपाशी ऐक्य होऊन त्याच्या ठिकाणी संसाररूपी असलेल्या समुद्रातून तरून जातो. याचा अर्थ भगवदीतेच्या श्रवणाने जीवाला सकल दुःखनिवृत्ती व परमानंदप्राप्ती होते ही स्थिती प्राप्त होण्याकरिता प्रथम साधन कोणते असेल तर ते रामनामाचे स्मरण हे होय ते जर नित्य केले तर जीवांना संसार समुद्रातून सहज तरून जाता येईल. संसार हा व्यर्थ व असार आहे. तो तुझ्या नाशाला कारण आहे. परंतु नामस्मरण केलेस तर तो प्रपंच तुला काही एक करू शकणार नाही. ही गोष्ट चांगली लक्षात असू दे. उत्कंठेने नामस्मरण केले तर तुझी सर्व विघ्ने नाहीशी होतील. तसेच नामस्मरणाने तुझे नेम धर्म सिद्धिस जाईल असे भगवंताचे भगवद्गीतेत स्पष्ट वचन आहे. नामस्मरणाचे अनुष्ठान करण का सुलभ आहे. या नामस्मरणाने सर्व नियमधर्म सिद्धिस जातात. व यानेच सर्व धर्माचे रक्षण होऊन ते धर्म सर्व काळ फळले. मी ब्रह्मरुप असल्यामुळे कर्म करूनही अकर्ता आहे. इतर अज्ञानी जीवाप्रमाणे या ठिकाणी अहंकार नसल्यामुळे मो अकर्ता आहे. अकर्ता असल्या मुळे सुखदुःखाचा भोक्ता मी नसून च एक हरिच आहे. असा माझा सर्वकाळ अनुभव आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९०१
व्यर्थ प्रपंच टवाळ ।
सार एक निर्मळ कृपा करी हरि कृपाळ ।
दीन दयाळ हरी माझा ॥१॥
क्षमा शांति दया रुपी ।
तोचि तरेल स्वरुपीं ।
नामें तरलें महापापी ।
ऐसा ब्रह्मा बोलिला ॥२॥
गीतेमाजी अर्जुनाशीं हरी सांगे साक्षी जैशी ।
जो रत होतसे हरिभक्ताशी ।
तो नेमेशी तरेल ॥३॥
ज्ञानदेव भाष्यें केले ।
गीता ज्ञान विस्तारलें ।
भक्ति भाग्यवंती घेतलें ।
भाष्येंकरुनी गीतेच्या ॥४॥
अर्थ:-
सर्व संसार निष्फळ व मिथ्या आहे. परंतु भगवंताचे नाम हे सर्वांचे सार असून पवित्र आहे. ते नामस्मरण करणाऱ्या नामधारकावर कृपाळु श्रीहरि कृपा करतो. ज्याच्या ठिकाणी शांती क्षमा दया आहेत अशा उत्तम मुमुक्षुला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. परंतु नामस्मरणाने मात्र अजामेळा सारखा महापापी जरी असला तरी तो उद्धरून जातो. असे ब्रह्मदेवांनी सांगीतले आहे. तसेच भगवंताने भगवद्गीतेमध्येही अर्जुनाला म्हंटले आहे. जो मज होय अनन्य शरण । तयाचे निवारी मी जन्ममरण, अशी साक्ष दिल्याप्रमाणे आहे. जो मला अनन्यभावाने शरण येतो तो कितीही महापापी असला तरी मी त्याचा नामस्मरणामुळे उद्धार करतो. मी गीतेवर मराठीत भाष्य केले म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’लिहीली अर्थात ‘भावार्थ दीपीका’ लिहीली त्यामुळे या ज्ञानाचा विस्तार झाला या ज्ञानाचा लाभ जे भाग्यवान भक्त आहेत त्यांनी घेतला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९०२
गुरु हा संतकुळीचा राजा ।
गुरु हा प्राणविसांवा माझा ।
गुरुवीण देव दुजा ।
पाहातां नाहीं त्रिलोकीं ॥१॥
गुरु हा सुखाचा सागर ।
गुरु हा प्रेमाचा आगर ।
गुरु हा धैर्याचा डोंगर ।
कदाकाळी डळमळीना ॥२॥
गुरु वैराग्याचें मूळ ।
गुरु हा परब्रह्म केवळ ।
गुरु सोडवी तात्त्काळ ।
गांठ लिंगदेहाची ॥३॥
गुरु हा साधकाशीं साह्य ।
गुरु हा भक्तालागी माय ।
गुरु हा कामधेनु गाय ।
भक्ताघरीं दुभतसे ॥४॥
गुरु घाली ज्ञानाजंन ।
गुरु दाखवी निज धन ।
गुरु सौभाग्य देउन ।
साधुबोध नांदवी ॥५॥
गुरु मुक्तीचें मंडन ।
गुरु दुष्टाचें दंडन ।
गुरु पापाचे खंडन ।
नानापरी वारितसे ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी ।
तारक मंत्र दिला आम्हाशीं ।
बापरखुमादेवीवराशी ।
ध्यान मानसी लागलें ॥७॥
अर्थ:-
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ तसेच दयाळु श्रीगुरू आपल्या शिष्याविषयी काय करतात याचे वर्णन या अभंगात केलेले आहे. गुरू हा संत कुळांतील राजा आहे. गुरू हा माझ्या जीवाचे विश्रांति स्थान आहे. गुरूवांचून त्रैलोक्यांमध्ये देव नाही. गुरू हा सुखाचा समुद्र आहे. प्रेमाचा आगर आहे. तसेच तो धैर्याचे डोंगर असून कसल्याही अवस्थेमध्ये डगमगणारा नाही. गुरू हा वैराग्याचे मूळ कारण आहे. तो शुद्ध परब्रहा आहे. गुरू हा लिंग देहातील सत्य आत्मा व मिथ्या साभास अंतःकरण ही दोन्ही एकच समजणे व त्यामुळे अंतःकरणाश्रित असलेले पाप पुण्य, सुखदुःख वगैरे धर्म सत्य जीवात्म्यावरही मानले जातात. शुद्धात्मा व साभास अंतःकरण याचे ऐक्य मानणे यालाच शास्त्रीय भाषेत ग्रंथी असे मानतात. व माऊलीने तिला गांठ असे म्हटलेले आहे. या गांठी मुळेच शुद्ध जीवात्म्याच्या ठिकाणी अनेक प्रपंच दुःखे प्रतीत होतात. ही आत्मस्वरूपांच्या ठिकाणी भासणारी दुःखे नष्ट करावयाची असेल तर शुद्ध जीवात्मा आणि मिथ्या साभास अंतःकरण ही अत्यंत भिन्न आहेत असा निश्चय करून देणे म्हणजे ग्रंथिभेद होय. ती लिंग देहात असलेली आत्मा व अनात्मा यांची गांठ श्रीगुरु तात्काळ सोडतात. गुरु हा साधकाला आत्मज्ञान प्राप्त करून देण्याला सहाय्य आहे. गुरू हा साधक भक्तांची आई आहे. गुरु हा भक्तांची इच्छा पूर्ण करणारी कामधेनु आहे. आणि ती भक्ताघरी त्याला ज्ञान देते. ज्ञानांजन असून साधकाला मोक्ष निधान दाखवितो. गुरू हा मुमुक्षुला आत्मज्ञान प्राप्तीचे सौभाग्य देऊन सांधुच्या ठिकाणी असलेला आत्मबोध त्याला प्राप्त करून देतो. गुरू म्हणजे मोक्षाची शोभा असून दुष्टांचे दंडन करणारा आहे तसेच मुमुक्षुच्या अनेक पातकांची अनेक प्रकाराने निवृत्ति करतो. श्रीगुरू हे तुझा देहही प्रत्यक्ष काशीच आहे. असा उपदेश करून तारक मंत्र देतो. तो तारक मंत्र आम्हाला श्रीगुरूनी दिल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती, श्रीविठ्ठल यांचे ध्यान आमच्या मनाला लागले. असे माऊली सांगतात.


९०३
कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥
स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे ।
षडगुण गोंडे रत्नजडित तुज श्याम सुंदरा शोभलीरे ॥१॥
काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणलीरे ।
रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरलीरे ॥२॥
षडविकार षडवैरी मिळोनि तापत्रयानें विणलीरे ।
नवाठायीं फाटुनी गेली ती त्त्वां आम्हांसि दिधलीरे ॥३॥
ऋषि मुनि ध्यातां मुखि नाम गातां संदेह वृत्ती विरलीरे ।
बापरखुमादेविवर विठ्ठले त्त्वत्पादी वृत्ति मुरलीरे ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्णा तुझी धोगडी म्हणजे उपाधि शुद्धसत्त्वप्रधान आहे. मग आम्हाला तमोगुणप्रधान अशी वाईट उपाधि का बरे दिलीस? सच्चिदानंदासी मिळून शुद्धसत्त्वप्रधान मायेच्या योगाने ही तुझी धोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा सहा गुणांचे गोंडे लावले आहेत.व ती रत्नजडित आहे म्हणून हे शामसुंदरा, श्रीकृष्णा तुला ती चांगली शोभते. आतां आमच्या म्हणजे जीवाच्या घोगडीला पाहिले तर प्रारब्धकर्मे, मलीन सत्त्वप्रधान अविद्या व पंचमहाभूते यानी ही विणलेली आहे.


श्रीज्ञानेश्वरांची गाथा समाप्त
॥ पुंडलीक वरदे हरिविठ्ठल ॥

संत ज्ञानेश्वर गाथा ५९८ ते ९०३ अर्थासहित समाप्तशेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *