संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३८

संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ ते ५९७

संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ते५९७ विडिओ सहित
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ ते ५९७

४०५
एक मूर्ख नेणती । नाम हरिचें न घेती ।
मुखें भलतेंचि जल्पती । तें पावती अध:पंथा ॥१॥
नामेंविण सुटका नाहीं । ऐसी वेदशस्त्रीं ग्वाही ।
जो वेद मस्तकीं पाहीं । ब्रह्मयानें वंदिला ॥२॥
नित्य नामाची माळा । जिव्हे घे तूं गळाळा ।
तो नर कर्मा वेगळा । ऐसें बोलती पुराणें ॥३॥
नयनीं श्रवणीं हरी । आणिक काम न करी ।
तो साधु भक्त निर्धारीं । हरिचा आवडता ॥४॥
ज्ञानदेवीं पाहिलें ।हरिनाम साधुनी घेतलें ।’
तें समाधिस केलें । पुष्पशयनीं आसन ॥५॥

अर्थ:-

नामाचा महिमा न जाणल्याने मुर्ख नाम घेत नाहीत. जे तोंडाने भलतेच बोलतात त्यांचे अधःपतन निश्चित आहे. ह्या नामाविण सुटका नाही ह्याची वेदशास्त्र ग्वाही देतात.ब्रह्मदेवाने त्यामुळे वेदांचे महत्व ओळखुन मस्तकी धरले. हे जिव्हे तु नित्य नामाची गुळणी घे. असे करणारा तो नर कर्मावेगळा ठरतो असे पुराण सांगतात.ज्या डोळ्यासमोर व मुखात सतत हरि असतो दुसऱ्या कामात मन नसते तो साधु भक्त निर्धाराने हरिचा आवडता होतो.मी हरिनाम साधल्याने पुष्पासनाचे आसन घालुन मला समाधीस्त केले असे माऊली सांगतात.


४०६
नाममाळा घे पवित्र ।
अंतीं हेंचि शस्त्र ।
राम हा महामंत्र ।
सर्व बाधा निवारी ॥१॥
भवकर्मविख ।
रामनामी होय चोख ।
भवव्यथादु:ख ।
पुढें सुख उपजेल ॥२॥
माळा घाली हेचि गळां घे
अमृताचा गळाळा ।
होईल वैकुंठीं सोहळा रामकृष्ण
उच्चारणी ॥३॥
ज्ञानदेवीं माळा केली ।
सुखाची समाधि साधिली ।
जिव्हा उच्चारणी केली ।
अखंड हरिनाम ॥४॥

अर्थ:-

नाम जपण्याची माला पवित्र असुन रामनाम हा महामंत्र आहे अंतकाळी हेच तुमचे शस्त्र आहे. सर्व बाधांचे निराकरण हे करते.भव कर्मांचे विष नाममंत्राने चोख( कर्म शुध्द होतात )बनते हेच नाम भव दुःख व व्यथा हरण करुन सुख देते. गळ्यात नाम मंत्र मंडित माळा व मुखात सतत रामकृष्णनामाची गुळणी घेत राहिले तर त्याच्यासाठी वैकुंठात सोहळा होईल. मी रामनामाची माळ केली ते नाम अखंड मुखात उच्चारत होतो त्यामुळे सुखाची संजिवन समाधी देवाला द्यावी लागली असे माऊली सांगतात.


४०७
समाधीचें साधन तें रामनाम चिंतन ।
चित्ता सुखसंपन्न ।
हर्ष जीवनीं केला ॥१॥
कोटी तपाचिया राशीं ।
जोडती रामनामापाशीं ।
नाम जपतां अहर्निशीं ।
वैकुंठपद पाविजे ॥२॥
हेंचि ध्रुवासी आठवलें ।
उपमन्यें हेंचि घोकिलें ।
अंबऋषीनें साधिलें ।
रामकृष्णउच्चारणीं ॥३॥
पांडवांसि सदा काळीं ।
कृष्ण राहिला जवळी ।
ज्ञानदेवह्रदयकमळीं ।
तैसाचि स्थिरावला ॥४॥

अर्थ:-

रामनाम चिंतन हे समाधीचे साधन आहे. त्यामुळे चित्ताला सुख व जीवाला हर्ष झाला.रामनामाच्या जपाने कोटी तपाच्या राशी जोडता येतात. व हे नाम अहर्निश घेतले तर वैकुंठ प्राप्त होते.हे रामकृष्णनाम हे ध्रुव व उपमन्यु ह्यांनी घेतले. ह्याच कृष्णनामाने तो पांडवापाशी राहिला व तसाच तो माझ्या हृदयकमळात तो स्थिरावला आहे असे माऊली सांगतात.


४०८
निरंतर ध्यातां हरि ।
सर्व कर्माची बोहरी ।
दोष जाती दिगंतरीं ।
रामकृष्णउच्चारणीं ॥१॥
जप तीर्थ हेंचि नाम ।
जपव्रता हेंचि नेम ।
ऐसें धरोनियां प्रेम ।
तोचि भक्त तरेल ॥२॥
जीव शिव एक करी ।
शांति क्षमा जरी धरी ।
त्यापाशीं नित्य श्रीहरी ।
प्रत्यक्ष आपण उभा असे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नित्य ।
त्याचें वचन तेंचि सत्य ।
त्यांचे वचन सर्व कृत्य ।
सिध्दि पावेल सर्वथा ॥४॥

अर्थ:-

रामकृष्णनामाचे निरंतर ध्यान केले तर सर्व कर्मांचा नाश होतो व दोष दिंगतरी जातात. जप हेच तीर्थ व जप हेच व्रत हे प्रेमाने मानले तर तो भक्त तरुन जातो. जीवसेवा हे हीच शिवपूजा आहे मानतो, शांती व क्षमा ह्यांचा अंगिकार करतो, त्याच्या जवळ प्रत्यक्ष श्रीहरि उभा राहतो. जो ह्या मार्गाचा नित्य अवलंब करेल त्याचे वचन हे सत्य होते व त्याचे वचन हे पूर्ण होते त्याला सर्वसिध्दी प्राप्त होतात असे माऊली सांगतात.


४०९
जन्म जरा दु:ख बाधा ।
स्मरता नाहीं गोविंदा ।
ऐसा जयासी नित्य धंदा ।
तोचि सदा सुखरुप ॥१॥
धन्य कुळ धन्य याती ।
धन्य जन्म पुढती पुढती ।
भक्तीवीण नाहीं गती ।
मुखीं हरिनामउच्चार ॥२॥
विश्वीं विश्व जो व्यापकु ।
तोचि माझा हरि एकु ।
त्यासी भक्तिविण साधकु ।
नोळखे पै दुर्बुध्दि ॥३॥
ज्ञानरंजनीं रंजला ।
ज्ञानबोधें उपजला ।
ज्ञानदेवीं हरि सेविला ।
निरंतर सर्वकाळ ॥४॥

अर्थ:-

गोविंदाचे स्मरण करताच जन्म, जरा व दुःख निघुन जाते. हा नामछंदाचा धंदा नित्य करणारा सदोदित सुख भोगतो. ज्याच्या मुखी हरिनाम आहे त्याचे कुळ त्याची याती येवढेच नव्हे तर पुढचा जन्म ही धन्य होतो त्यामुळे भक्तिविन गती नाही. विश्वाचे विश्व असणाऱ्या त्या हरिला प्राप्त करण्यासाठी साधकाला नामभक्तिशिवाय उपाय नाही.मात्र हे दुर्बुध्दी असलेल्याला कसे कळेल? ज्ञान रंगी रंगलेला व ज्ञानबोधाने जो उपजलेला त्या श्रीहरिची सेवा मी निरंतर केली असे माऊली सांगतात.


४१०
संपत्तिविपत्तिदु:ख ।
हरेल अवघा शोक ।
वेगीं करुनिया विवेक ।
हरिस्मरण करी ॥१॥
मंत्र यंत्रसूत्रधारी ।
सिध्द साध्य तोचि हरि ।
नित्य जपोनि वैखरी ।
आप्तता करी हरीसी ॥२॥
ध्यान मन एक चित्त ।
अलक्ष लक्षी अच्युत ।
न सांगे हिताची मात ।
अखंड जपे हरिनाम ॥३॥
ज्ञानदेवें जप केला ।
मग समाधीस बैसला ।
नाम घेतां बोध जाला ।
देव आला ह्रदयासी ॥४॥

अर्थ:-

विवेकाने हरिस्मरण करणाऱ्याला संपत्तीचा वियोग होत नाही त्याचे दुःख व शोक याचे हरण होते. मंत्र व तंत्र सिध्द होण्यासाठी तोच सुत्रधार असणारा हरि आहे व अशा हरिला वैखरीने हरिनाम घेऊन आप्त करुन घे. त्याचे ध्यान व मनन चित्तात करुन आपले लक्ष हे अच्युत प्राप्ती करावे व ते फक्त हरिनामे साध्य होते ही हिताची गोष्ट सांगतो. मी समाधीला बसताना त्याचे स्मरण केले त्याच्या नामाचा बोध घेतला व त्यामुळे स्थापित झाला असे माऊली सांगतात.


४११
देवाविण शून्य मुख ।
नाम न घेतां नाहीं सुख ।
अंतीं होईल रे दु:ख ।
नाम नसतां मुखीं ॥१॥
राम कृष्ण गोविंद ।
हरि माधव परमानंद ।
नित्य ऐसा जयासि छंद ।
तोचि सुलभ गर्भवासीं ॥२॥
अनंत नाम निरसून ।
एक मार्ग तोचि मान्य
तेणें जोडे नित्य सौजन्य ।
तोचि रामकृष्ण उच्चारी ॥३॥
ज्ञानदेवें अनुमानलें ।
मग भक्तिसुख साधलें ।
रामकृष्ण उच्चारिलें ।
जें तारक तिहीं लोकीं ॥४॥

अर्थ:-

हरिनामा शिवाय असलेले मुख म्हणजे शुन्य आहे. नाम मुखात नसेल तर कसले सुख होईल. जर मुखात नाम नसेल तर खात्रीने दुःख प्राप्त होते.राम कृष्ण गोविंद हरि माधव ही नामे परमानंद स्वरुप आहेत त्या नामाचा छंद घेतला तर त्याला गर्भवासाचे दुःख होत नाही. इतर अनंत नामे बाजुला सारुन रामकृष्णनामाचा उच्चार हाच राजमार्ग आहे व त्यामुळे नित्य सौजन्य प्राप्त होते. मी त्या रामकृष्णनामचे अनुमान केले त्याचा उच्चार केला ते तिन्ही लोकांत तारक नाम मी घेतले त्यामुळे भक्तीसुख साधले असे माऊली सांगतात.


४१२
सदा परिपूर्ण ।
तो हा जनार्दन ।
नित्य जपता नारायण ।
कोटि याग घडतील ॥१॥
एवढा महिमा नामाचा ।
काय मंत्र जपसील वाचा ।
जो विठ्ठल म्हणे तो दैवाचा ।
ऐसा ब्रह्मा बोलें पूर्वीं ॥२॥
तो नित्यकाळ पंढरी ।
आणि देव तेहतीस कोटी ।
वृक्ष जाले निरंतरी ।
उध्दार करावया कुळाचा ॥३॥
एवढें क्षेत्र पांडुरंग ।
तेथें उध्दरिलें हें त्रिजग ।
आनंदत ब्राह्मण याग ।
कोटिकुळें उध्दरती ॥४॥
कीर्तन केलीया वाळवंटी ।
घेतां वैष्णवांची भेटी ।
होईल संसाराची तुटी ।
चरणरज वंदितां ॥५॥
तुळशीच्या माळा ।
घालितां हरिदासाच्या गळां ।
तो न भिये कळिकाळा ।
त्यासी जिव्हाळा हरिविठ्ठल ॥६॥
पंढरीसी जाऊं म्हणती ।
तयांकडे यम न पाहती ।
तयांचे पूर्वज उध्दरती ।
म्हणती वैकुंठा जाऊं आतां ॥७॥
देव जाणे ऐसा ।
तोचि हरिदासा भरंवसा ।
ज्ञानदेव म्हणे परियेसा ।
थोर पुण्य तयाचे ॥८॥

अर्थ:-

तो परिपूर्ण जनार्दन असुन त्या नारायणाला नित्य जपले तर कोटी याग घडतील. तो विठ्ठल दैवाचा असुन त्याचे नामाचा येवढा महिमा असुन तोच मंत्र वाचेने जप.ते ३३ कोटी देव वृक्ष होऊन आपल्या कुळाचा उध्दार करण्यासाठी पंढरीत राहिले आहेत. हे सर्व क्षेत्र पांडुरंग असुन हे त्रिजग त्यामुळे उध्दरते ब्राह्मण आनंदात आहेत व कोटी कुळे तरतात. वाळवंटात कीर्तन केल्याने संतभेट होते व त्यांच्या चरणभेटीने संसाराची तुटी होईल.तुळशीच्या माळा हरिदास गळ्यात घालत्याने ते कळीकाळाला घाबरत नाही.त्याला विठ्ठलाचा जिव्हाळा आहे. जे फक्त पंढरीला जातो म्हणतात.त्यांच्याकडे यम ही पहात नाही व ते थेट वैकुंठाला जातात. हे सर्व करणारा तोच देव आहे हरिदांसाचा भरवसा आहे. व जो त्याचे स्मरण करेल त्याचे थोर पुण आहे असे माऊली सांगतात.


४१३
प्रेम जयाचें कथेवरी ।
तोचि धन्य ये चराचरी ।
रामकृष्ण निरंतरी ।
मुखीं आवडी जपतसे ॥१॥
धन्य धन्य तोची वंशी ।
धन्य धन्य माता कुशी ।
धन्य धन्य काळ तयासी ।
कृष्णराम ह्मणतांची ॥२॥
ऐसें धन्य जन्म तयाचे ।
धन्य धन्य पुण्य साचे ।
त्यासीं भय कळिकाळाचें ।
नाहीं जन्म घेतलिया ॥३॥
एवढा महिमा नामाचा ।
धन्य तो राम उच्चारी वाचा ।
धन्य जन्म तयाचा ।
ज्ञानदेव म्हणे ॥४॥

अर्थ:-

ज्याचे हरिकथेवर प्रेम आहे जो रामकृष्णनामचा सतत उच्चार आवडीने करतो तो ह्या चराचरात धन्य आहे. रामकृष्णनामाचा उच्चार केला तर त्या वंश धन्य होतो, त्याची माता धन्य होते, त्याचा जीवनकाळ सुखमय होतो. त्याचा जन्म धन्य होतो, त्याला पुण्यप्राप्ती होते त्याला कळीकाळाचे भय उरत नाही व परत जन्म ही घ्यावा लागत नाही. येवढा महिमा एक नामचा असुन त्याचा जन्म रामनाम उच्चाराने धन्य होतो असे माऊली सांगतात.


४१४
सकळमंगळनिधी ।
श्रीविठ्ठलाचें नाम आधी ॥१॥
म्हण कारे म्हण कारे जना ।
श्रीविठ्ठलांचे नाम वाचे ॥२॥
पतितपावन साचे ।
श्रीविठ्ठलांचे नाम वाचे ॥३॥
बापरखुमादेविवरु साचे ।
श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥४॥

अर्थ:-

श्री विठ्ठलाचे नाम हेच सर्वात मोठे मंगल आहे मंगलाचे मंगल आहे. हे जन हो तुम्ही सतत श्री विठ्ठलाचे नाम वाचेने म्हणत रहा.श्री विठ्ठलाचे नाम हेच सत्य आहे व त्यामुळे पतित पावन होतात. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे नाम हेच सर्वोत्तम सत्य आहे असे माऊली म्हणतात.


४१५
गोपाळारे तुझें ध्यान लागो मना ।
आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥१॥
सोनयाचा दिवस आजि अमृतें पाहीला ।
नाम आठवितां रुपीं प्रगट पैं झाला ॥२॥
तनु मनु शरण विनटलों तुझ्या पाई ।
रखुमादेविवरा वांचूनि आनु नेणें कांहीं ॥३॥


४१६
आरंभी आवडी आदरें आलें नाम ।
तेणें सकळ सिध्दि जगीं जालें पूर्ण काम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा ।
तूं माय माउली जिवीं जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामें सकळ संदेहो फ़िटला ।
बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥

अर्थ:-

सुरवाती पासुनच आदराने व आवडीने नामस्मरण केल्याने मला सकळ सिध्दी प्राप्त झाल्या व माझी सर्व कामे पुर्णत्वाला गेली. ज्याला रामकृष्ण गोविंद गोपाळ म्हंटले जातो तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस नव्हे नव्हे तोच माझी आई आहे. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाच्या नामाने माझे सगळे संदेह फिटुन गेले असे माऊली सांगतात.


४१७
अष्टांगयोगें न सिणिजे ।
यम नेम निरोध न किजे रया ॥१॥
वाचा गीत गाईजे ।
गातां वातां श्रवणीं ऐकिजे रया ॥२॥
गीती छंदे अंग डोलिजे ।
लीला विनोदे संसार तरिजे रया ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु नामें ।
जोडे हा ऊपावो किजे रया ॥४॥

अर्थ:-

अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, स्नान, तितिक्षा ह्यामध्ये उगाच श्रमण्यात काही अर्थ नाही. ज्या पेक्षा त्या परमात्म्याचे गुण गायन करा व कोणी दुसरा करत असेल श्रवण करा. त्या गुणगीतांमुळे अंग डोलायला लागते. व त्याच्या लिला श्रवणाने संसारातुन तरुन जाता येते. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांच्या नामस्मरणाचा उपाय हा तारक आहे असे माऊली सांगतात.


४१८
अंडज जारज स्वेदज उद्विज आटे ।
हरिनाम नाटे तें बरवें ॥१॥
जें नाटें तें नाम चित्तीं ।
रखुमादेवीपति श्रीविठ्ठलाचें ॥२॥
शरीर आटे संपत्ति आटे ।
हरिनाम नाटे तें बरवें ॥३॥
बापरखुमादेविवराचें नाम नाटे युगे ।
गेलीं परि उभा विटें ॥४॥

अर्थ:-

अंडज,जारज,स्वेदज,उव्दिज या चार खाणीतील सृष्टी नष्ट होते पण परमात्म्याचे नाव नष्ट होत नाही. रखमादेवीचा पती श्री विठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही म्हणून चित्तात धरावे. शरीर व संपत्ती ही संपणारी आहे पण विठ्ठलाचे नाम उत्तम असून नष्ट होत नाही.रखुमा देवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही याचा पुरावा म्हणजे युगानुयुगे विटेवर उभा असणारा श्रीविठ्ठल आहे असे माऊली सांगतात.


४१९
यमधर्म सांगे दूता ।
परिसावी निजकथा ।
जेथें रामनाम वार्ता ।
तया देशा नवजावे ॥१॥
नाम महादोषां हरण ।
नाम पतीतपावन ।
नाम कलिमळदहन ।
भवबंधनमोचक ॥२॥
जये देशीं नाम वसे ।
नाम श्रवणीं विश्वासे ।
गाती नाचती उल्हासें ।
झणी पाहाल तयाकडे ॥३॥
जये ग्रामीं हरिपूजन ।
जये नगरीं हरिकीर्तन ।
तेथें गेलिया बंधन ।
तुह्मी पावाल त्रिशुध्दि ॥४॥
जये देशी गरुडटका ।
कुंचे ध्वज आणि पताका ।
जेथें संतजन आइका ।
तया देशा नव जावे ॥५॥
आणिक एक ऐकारे विचारु ।
जेथें रामनामाचा गजरु ।
तेथें बापरखुमादेविवरु ।
तयाबळें नागविती ॥६॥

अर्थ:-

ज्या गावांत हरिकथा सुरु आहे जेथे रामनाम सुरु आहे तेथे तुम्ही जाऊ नका असे यम आपल्या यमदुतांना सांगत आहे. नाम हे महादोषांचे हरण करते, नाम पतिताला पावन करते, नाम कलिमलाचे दहन करते भवबंधन मोचक असे नाम आहे. ज्या देशात नाम वसते. जेथे नाम ऐकले जाते. नाच गात जेथे नाम घेतले जाते तिकडे तुम्ही यमदुत पाहु ही नका. ज्या गावी हरिपूजन होते ज्या गांवी हरिकीर्तन होते तेथे तुम्ही गेलात तर तुम्हीच बंदीवान व्हाल. ज्या देशात गरुडटके, कुंचे, ध्वज व पताका घेऊन संतजन भजनात रंगले आहेत त्या गांवाला जाऊ ही नका. आणिक एक विचार सांगतो जेथे रामनामाचा गजर होतो तिथे माझे पिता व रखुमाईचे पती स्वतः असतात तिथे तुम्ही यमदुत म्हणुन गेलात तर तुमची नागवण होईल असे माऊली अभंगात सांगतात.


४२०
रामनामा वाटा हेचि पै वैकुंठ ।
ऐसी भगवदीता बोलतसे ॥१॥
अठारा साक्षी साहीवेवादत ।
चौघाचेनि मतें घेईन भागु ॥२॥
शेवटलिये दिवसीं धरणें घेईन
बापरखुमादेविवरा बळेंचि साधीन ॥३॥

अर्थ:-

श्रीमत् भगवतगीता स्पष्ट सांगते की श्रीरामाचे नाम हीच वैकुंठाची वाट आहे अठरा पुराणे साही शास्त्र व चार वेद यांचेही तेच मत आहे म्हणून मी सतत रामनाम घेईन.रखमाईचे पती व माझे पिता यांचे नाम माझ्या अंतःकाळापर्यत अट्टाहासाने घेईन व त्या बळावर त्या परमात्म्याला आपलासा करुन घेईन असे माऊली सांगतात.


४२१
नाम पवित्र आणि परिकरु ।
कल्पतरुहुनी उदारु ।
ते तूं धरी कारे सधरु ।
तेणें तरसी भव दुस्तरु ॥१॥
नरहरिनाम उच्चारी ।
तेणें तरसिल भवसागरीं ॥२॥
जपें न लाहसी तपें न लाहसी ।
क्रिये षटकर्मे न पवसी ।
नामें ऐकरे पावसी ।
स्वर्गी अमृतपान ॥३॥
क्षीर गोड ऐसें म्हणसी परि
तेथेंही वीट असे ।
नाम उच्चारितां वाचें कोटि जन्माचें
पातक नासे ॥४॥
मन मारुनियां सायासी परि
तेथेंही अवगुण असे ।
नाम उच्चारितां वाचें
सकळिक ध्यान डोळा दिसे ॥५॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे
विपायें नाम आलें वाचें ।
जळती डोंगर कल्मषाचें भय
नाहीं कळिकाळाचें ॥६॥

अर्थ:-

पवित्र व परिकर नाम हे कल्पतरु पेक्षा उदार असुन तु त्याला धैर्याने धारण केलेस तर दुस्तर भवसागरातुन तरशील. नरहरिनामाच्या उच्चारणाने भवसागरातुन सहज बाहेर पडशील. त्या भगवंतला प्राप्त करण्यासाठी जप तप करावे लागणार नाही षटकर्म करावी लागणार नाहीत फक्त नाम उच्चाराने स्वर्गात अमृतपान करशील. दुध गोड म्हणावे तरी त्याचा वीट येतो. पण नामाचा वीट येत नाही व त्यामुळे कोटी जन्माच्या पापाचा नाश होतो. सायासाने मन मारुन राहिले तरी त्यात अवगुण आहे. नामाच्या उच्चाराने तु स्वरुपाला प्राप्त होशील. चुकुन जरी माझे पिता व रखुमादेवीचेे पती श्री विठ्ठलनाम मुखाशी आले तरी पापकर्माचे डोंगर जळतात व कळिकाळाचे भय राहात नाही असे माऊली म्हणतात.


४२२
नाम प्रल्हाद उच्चारी ।
तया सोडवी नरहरी ।
उचलुनि घेतला कडियेवरी ।
भक्तसुखें निवाला ॥१॥
नाम बरवया बरवंट
नाम पवित्र चोखट ।
नाम स्मरे नीळकंठ
निजसुखें निवाला ॥२॥
जें ध्रुवासी आठवले ।
तेचि उपमन्यें घोकिलें ।
तेंचि गजेंद्रा लाधलें ।
हित जालें तयांचे ॥३॥
नाम स्मरे अजामेळ ।
महापातकी चांडाळ ।
नामें जाला सोज्वळ ।
आपण्यासहित निवाला ॥४॥
वाटपाडा कोळिकु ।
नाम स्मरे वाल्मिकु ।
नामें उध्दरिलें तिन्ही लोकु ।
आपणासहित निवाला ॥५॥
ऐसें अनंत अपार ।
नामें तरले चराचर ।
नाम पवित्र आणि परिकर ।
रखुमादेविवराचें ॥६॥

अर्थ:-

नाम प्रल्हादाने घेतले त्यामुळे त्याला नरहरिने सोडवले उचलुन कडेवर घेतला व तो भक्तीसुखाने निवाला. हे नाम उत्तमातील उत्तम असुन ते पवित्र व चोख आहे स्वतः शिवशंभुने त्याचा अंगिकार केल्याने त्यांना निजसुख प्राप्त झाले.त्याचा नामाचा आठव ध्रुवाने केला तेच नाम उपमन्युने घेतले त्याचा लाभ गजेंद्राने घेतला त्यामुळे त्यांचे हित झाले. तेच नाम त्या महापातकी चांडाळ अजामेळ्याने घेतले व त्याला सोज्वळता मिळाली व त्याला ही निजसुखात निववले. वाटमारी करणारा वाल्मिकाने नाम घेतले तो तिन्ही लोकामधुन उध्दारला गेला व त्यालाही निजसुखात निववले. ते रखुमाईचा पती असलेल्याचे नाम अत्यंत पवित्र व परिकर असुन त्यामुळे कित्येकांचा उध्दार झाला हे चराचर त्या नामानेच तरले आहे असे माऊली सांगतात.


४२३
जें शंभूनें धरिलें मानसीं ।
तेंचि उपदेशिलों गिरिजेसी ॥१॥
नाम बरवें बरवें ।
निज मानसीं धरावें ॥२॥
गंगोदकाहुनी निकें ।
गोडी अमृत जालें फ़िकें ॥३॥
सीतळ चंदनाहुनी वरतें ।
सुंदर सोनियाहुनि परतें ॥४॥
बापरखुमादेविवरें ।
सुलभ नाम दिधलें सोपारें ॥६॥

अर्थ:-

त्या चांगल्या नामाला शिवशंभुने मनात धरले त्याच नामाचा उपदेश त्यांनी गिरिजेस केला तेच नाम निजमानसात दृढ धरावे. ते नाम गंगोदकापेक्षा पवित्र व अमृतापेक्षा गोड आहे. तेच चंद्राहुन शितळ व सोन्यापेक्षा सुंदर व तेजस्वी आहे. ते नाम भक्ती व मुक्ती दायक अ़सुन ते भवबंधनापासुन सोडवते. माझे पिता व रखुमाईचे पती त्यांनी हा सुलभ व सोपा नाममंत्र दिला असे माऊली सांगतात.


४२४
कर्म आणि धर्म आचरति जया लागी ।
साधक सिणले साधन साधितां अभागि ॥१॥
गोड तुझें नाम आवडते मज ।
दुजें विठोबा मना उच्चारिता वाटतसे लाज ॥२॥
भुक्ति आणि मुक्ती नामापासीं प्रत्यक्ष ।
चार्‍ही वेद साही शास्त्रें देताती साक्ष ॥३॥
काया वाचा चित्त चरणी ठेविले गहाण ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलाची आण ॥४॥

अर्थ:-

परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अभागी साधक कर्म व धर्म आचरताना शिणून गेले.हे विठ्ठला तुझे गोड नाम मला खूप आवडते व दुसऱ्या साधनाचा विचार करण्याची मला लाज वाटते. चारी वेद व सहा शास्त्र साक्ष देतात की भक्ती आणि मुक्ती या नामापाशीच आहेत.रखमादेवीचे पती व माझे पिता विठ्ठल याच्या चरणी काया वाचा व चित्त गहाण ठेवले आहे असे माऊली शपथ पूर्वक सांगतात.


४२५
भक्तीचें तें ज्ञान वाचे नारायण ।
दया ते संपूर्ण सर्वांभूतीं ॥१॥
ज्ञान नारायण ध्यान नारायण ।
वाचे नारायण सर्वकाळ ॥२॥
संसारग्रामीं नाम हेंचि साठा ।
पावाल वैकुंठा नामें एकें ॥३॥
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ ।
पद पावाल अढळ अच्युताचें ॥४॥
नामेंचि तरले शुकादिक दादुले ।
जडजीव उध्दरले । कलियुगी ॥५॥
स्मरण करीता वाल्मीक वैखरी ।
वारुळा भीतरीं रामराम ॥६॥
सर्वांमाजी श्रेष्ठ पुण्यभूमि वैकुंठ ।
विठ्ठल मूळपीठ जगदोध्दार ॥७॥
निवृत्ति निरोपण ज्ञानदेवा ध्यान ।
सर्वत्र नारायण एकरुप ॥८॥

अर्थ:-

सर्वाभूती दया ठेऊन नारायण नाम वाचेने उच्चारले तर भक्तीचे ज्ञान होते. जो सतत नारायणनाम मुखाने उच्चारतो त्याचे ज्ञान व ध्यान नारायण होते. संसाराच्या गांवात नाम हाच ठेवा असुन त्यामुळे वैकुंठ प्राप्त होते. गोविंद गोपाळ ही नामे वाचेला सुलभ असुन त्यामुळे अच्युताच्या अढळ स्थानापर्यंत पोहचता येते. ह्याच नामामुळे शुकादिकांसारखे महात्मे तरले त्यामुळे अनेक जडजींवांचा कलीयुगात उध्दार झाला. त्याच नामाचे स्मरण करता करता वाल्मिकी भोवती वारुळ तयार झाले तरी आतुन तो रामनामाचे उच्चारण करत राहिला. तेच नाम सर्वामाजी श्रेष्ट असलेले भु वैकुंठ म्हणजे पंढरीत विठ्ठल मुळपीठ स्वरुपात जगदोध्दारासाठी उभे आहे. असे सर्वत्र एकरुप असलेल्या नारायणनामाचे निरुपण श्रीगुरु निवृत्तीनी केले असे माऊली सांगतात.


४२६
अशौचीया जपो नये आणिकातें ऐको नये ।
ऐसिया मंत्राते जग बिहे त्याचें
फ़ळ थोडें परि क्षोभणें बहु ।
ऐसा मंत्रराज नव्हेरे रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम ।
नारायण नाम म्हणकारे रे ॥२॥
बाह्य उभारावी त्या वरी काहाळ लावावी ।
गातिया ऐकतिया उणीव येवों नेदावी ।
उत्तमापासुनि अंत्यजवरी ।
मुक्तीची सेल मागावीरेरे ॥३॥
काय कराल यागें न सिणावें
योगें हें तों व्यसनचि वाउगें ।
नरहरि नरहरि उदंडा वाचा
म्हणाल तरि कळिकाळ राहेल उगेरेरे ॥४॥
चरणीं गंगा जन्मली अहिल्या उध्दरली
नामें प्रतिष्ठा पावली गिरिजा ।
सकळिकां साधना वरिष्ठ हें नाम
मा मनीं भाव न धरी दुजारेरे ॥५॥
तीर्थी भजिजाल अमरीं पूजींजाल तुमचिया
भावासारिखा देवो होईल ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुमचा
ऋणवई म्हणतां नलजेरेरे ॥६॥

अर्थ:-

अशौचिया हा शब्द जपणाऱ्याचे विशेषण नाही. व ते वेद मंत्रांचे ही नाही व त्यांचे विशेषणही नाही. जे जारणमारणादी मंत्र जे स्वार्थासाठी वापरले जातात ते मंत्र अशौच मंत्र म्हंटले गेले आहेत असे मंत्र लोकांनी सांगितले तरी ऐकु नयेत त्या मंत्रांना जग भिते. त्यांचे फळ थोडे व त्या मंत्रांचा क्षोभ जपणाऱ्याला जास्त होतो. पण नाममंत्र हा तसा जप नाही. असे नारायण नाम तु सतत जप. बाह्या उंच करुन हे भजन करावे. त्या भजनात ऐकाणाऱ्याने व गाणाऱ्याने उणिव येऊ देऊ नये. उत्तम ज्ञानी ते अंत्यज ह्यांनी ही मुक्तीची मागणी करावी.त्या योग व यागामुळे वायाच थकशील ते वाऊगे व्यसन ठरते. नरहरिनाम जपलेस तर तो कळिकाळ गप्प उभा राहिल. त्या नामाच्या पायी गंगा जन्मली अहिल्येचा उध्दार झाला. त्यामुळेच गिरिजेला प्रतिष्ठा लाभली. त्यामुळे हा नाममंत्र साधना हे सर्वात वरिष्ठ आहे त्याच्या शिवाय अन्य कोणता भाव मनात धरु नकोस. माझे पिता व रखुमाईचा पती यांचे नाम जपले तर तीर्थे तुमचा आदर करतिल व ते स्वतः तुमचे ऋण व्यक्त करत तुमचे सेवाऋणी होतील तुझ्या कोणत्याही कामासाठी नाही म्हणणार नाहीत असे माऊली सांगतात.


४२७
प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशीं आलें ।
सार्थक पैं जालें संसाराचें ॥१॥
केशव नाम सार विठ्ठल उच्चार ।
राम निरंतर ह्रदयीं वसे ॥२॥
पाहतां हा भाव लीळाविग्रह ।
तेथींचा अनुभव विरळा जाणे ॥३॥
बपुरखुमादेविवरु पाहतां विस्तारु ।
नामाचा बडिवारु न बोलवे ॥४॥

अर्थ:-

ह्रद्यात प्रेम व जिव्हाळा असल्यामुळे माझ्या मुखात नाम आले व त्यामुळे माझ्या संसाराचे सार्थक झाले. केशव व विठ्ठल हे नाम साररुप असल्याने तो श्रीराम माझ्या ह्रदयी निरंतर वास करतो. सगुण रुपाने भक्तासाठी लीला करणारा परमात्मा पाहणारे व अनुभवणारे विरळच आहेत. रखमादेवीचे पती व माझे पिता यांचा विस्तार व त्याच्या नामाचा मोठेपणा वर्णन करता येत नाही असे माऊली सांगतात.


४२८
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी ।
ह्रदयमंदिरीं स्मरे कारे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा ।
ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया ॥३॥

अर्थ:-

रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल.हृदय मंदिरी श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात.


४२९
कर्माचिया रेखा नुलंघिती अशेषा ।
म्हणोनि विशेषा केशवसेवा ।
रामकृष्णमाळा घाला पा रें गळा ॥
अखंड जीवनकळा राम जपा ॥१॥
करावा विचार धरावा आचार ।
करावा परिकर रामनामीं ॥२॥
सकळांचा सकळी त्यांतें तूं आकळी ।
जिव्हा हे वाचाळी रामरती ॥३॥
रिघेरे शरण तुज नाहीं मरण ।
ठाकिसी चरण श्रीविठ्ठलाचे ॥४॥
निवृत्तिप्रसादें जोडे
विठ्ठलनामें घडें ।
ज्ञानदेव बागडे पंढरिये ॥५॥

अर्थ:-

कर्माची विहित रेखा न ओलांडता त्या कर्माचा नाश करण्यासाठी विशेष सेवा केशवाची करावी. रामकृष्णनामाची माला घेऊन अखंड जीवनभर त्या रामनामाचा जप करावा. त्याच रामनामाला आपला विचार व आचार करावा. इतर बडबड न करता सतत रामनामात रत राहुन त्याचे आकलन करुन घ्यावे. त्या श्री विठ्ठलाचे चरण शरण जाऊन पकडले की मरणाचे भय उरत नाही. मी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ते विठ्ठल नामाचा प्रसाद मिळाला त्यामुळे मी पंढरीत बागडलो असे माऊली सांगतात.


४३०
आठवितां विसरले आपुलिया गोता ।
हरिनामें त्त्वरिता मोक्ष जाला ॥१॥
त्याचें नामचि त्त्वरित प्रल्हादें
केलें प्रसन्न ।
तेणें संजिवन जाले त्याचे देह ॥२॥
बापरखुमादेविवरु नृसिंहरुपें देखे ।
दैत्य हरिखें धरी जानु ॥३॥

अर्थ:-

त्या परमात्म्याचे नुसते स्मरण झाले तरी कुळ गोत सर्व काही विसरायला होते. त्या हरिनामाने त्वरित मोक्ष ही प्राप्त झाला. प्रल्हादाने ते हरिनाम घेऊन परमात्म्याला प्रसन्न करुन घेतले त्यामुळे त्याचा देह संजिवन अवस्थेला गेला.माझे पिता व रखुमाईचे पती ह्यांनी घेतलेले नृसिंहरुप घेऊन हिरण्यकश्यपु दैताला मांडीवर घेऊन मारलेले पाहिले


४३१
तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश ।
नामाचा अर्धांश नाहीं तेथें ।
ह्मणोनि नामसंकीर्तन करिता
जवळी जोडलासि आतां ।
क्षणु न विसंबे जिवाचिया
जीवना रया ॥१॥
नाम निजधीर गर्जती
वैष्णव वीर ।
कळिकाळ यमाचे भार पळाले तेथें ॥२॥
म्हणौनि नाम वज्रकवच
तोचि निर्गुणाचा अभ्यास ।
पाहेपां स्वप्रकाश विचारुनी ।
ऐसें सुंदर रुपडें ह्रदयीं धरिलें आतां ।
पाहातां केवि होये पुनर्योनि रया ॥३॥
ऐसा सकळां अकळ कळला ।
ह्रदयीं धरिला समता बुध्दी ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतिता ।
तुटली जन्माची
आधी व्याधी रया ॥४॥

अर्थ:-

तत्वमसी ह्या महावाक्याचे फल ही नामफलाच्यापेक्षा अर्धेच असते.म्हणुन हे जीवीच्या जीवना आता क्षणभर ही न विसंबता नामसंकिर्तनाला जवळ जोडत आहे. मोठे धैर्यवान वैष्णववीर नामघोषाची गर्जना करत असतात.त्यामुळे घाबरुन कळीकाळ असलेले यमदुत ही तेथुन पळत सुटतात. त्या नामाच्या वज्रकवचाच्या सुरक्षेमुळे निर्गुणाचा अभ्यास व स्वप्रकाशरुप आत्मज्ञान ही तपासता येते. असे ते सुंदर रुप मनात धरले तर परत जन्म कसा येईल? असे ते माझे पिता व रखुमाईचे पती जे इतर कोणत्याही साधनाने कळत नाहीत.त्यांना समताबुध्दीने हृदयी धरल्यामुळे माझी जन्ममरणाची आधीव्याधी समुळ तुटुन गेली असे माऊली सांगतात.


४३२
जिव्हेच्या निडळी नामाक्षराचि वोळी ।
कान्हो वनमाळी या वोजा ॥१॥
लेहोन घाली पान पुसती जैसी ।
भलतिये रसीं बुडी दे कां ॥२॥
माझे डोळा समजी सुनिळ सहजी ।
होय तूं बिजीं बाहुलिये ॥३॥
ऐसि वाचा दिठी नाम रुपें आथिली ।
वासने वरी वहिली उठो दे कां ॥४॥
तुझें उठिलेंपण आह्मां होवावें निकें ॥
तरी गोसावीया पाइकेंसि यावें किजी ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु आंतु
बाहेरी सुखें ।
तरी तुजसी म्यां
एके नांदावें किजी ॥६॥

अर्थ:-

जिभेच्या टोकावर कान्हो वनमाळी ह्या नामअक्षरांची आशी ओळ लिहावी की ती कधी पुसली जाऊ नये. अशी लिहा की ती दुसऱ्या कोणत्याही रसामध्ये मिटली जाणार नाही. माझ्या डोळ्यामध्ये हे सुनिळा तु डोळ्यातील गोल असणारी बाहुली बनुन रहा म्हणजे तुच मला दिसशील. असे वाचेत नाम व डोळ्यात तुझे रुप असेल तर मनातील वासने पेक्षा वेगळे उठुन निघता येईल. असे तुझे ध्यान मला लागु दे म्हणजे तुझा गोसावी होऊन मला सेवक होवुन सेवा करता येईल. माझे पिता व रखुमाईचे पती तुम्ही माझ्यात अंतरबाह्य भरुन राहिला तर मला ऐक्यत्वाने तुमच्या सोबत नांदता येईल.


४३३
रसने वोरसु मातृके वो माये ॥१॥
रमणिये माये रमणिये ।
रामनामामृत रस पिब जिव्हे ॥२॥
निवृत्तिदासाप्रिय ।
माय रमणिये माय रमणिये ॥३॥

अर्थ:-

हे जिव्हे तु सर्व रसांची मातृका देवता आहेस. तुझ्या अंगभूत रमणियात्वाने तु रमवणारी आहेस. त्यामुळे तो रामनामरस पिऊन घे. व त्यामुळे तु रमणिय झाली असल्यामुळे तु निवृत्तिनाथांना प्रिय आहेस.असे माऊली सांगतात


४३४
विठ्ठल नाम नुच्चारिसी ।
तरी रवरव कुंडी पडसी ॥१॥
विठ्ठल नाम उच्चारी ।
आळसु न करी क्षणभरी ॥२॥
विठ्ठल नाम तीन अक्षरें ।
अमृतपान केलें शंकरें ॥३॥
रखुमादेविवरा विठ्ठलें ।
महापातकी उध्दरिले ॥४॥

अर्थ:-

श्री विठ्ठल नाम मुखी घेतले नाहीस तर रवरव नरक कुंडात पडशील.विठ्ठल नामाचा सतत जप कर आळस करु नकोस. तीन अक्षरी विठ्ठल नाम अमृत असून त्याचे प्राशन श्रीविठ्ठलानी केले आहे.रखुमादेवीचा वर असणा-या विठ्ठलाने नाम साधना करणा-या साधकांना ह्रदयी धरले आहे असे माऊली सांगतात.


४३५
भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल
म्हणे कारे वाचा ॥१॥
पडोन जाईल हें कलेवर ।
विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥
रखुमादेविवरु अभयकारु ।
मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥३॥

अर्थ:-

उगाच मी म्हणजे देह हा भ्रम धरतोस.पण विठ्ठलनाम घेत नाहीस. हा देह कधी ही पडुन जाईल तेंव्हा साररुप विठ्ठल नाम उच्चार. असे नाम घेणाऱ्याच्या डोक्यावर रखुमाईचा पती आपला अभयकर ठेवतो.


४३६
विठ्ठल विठ्ठल न ह्मणसी ।
पुनरपि पडसी गर्भवासीं ॥१॥
अंतकाळी स्मरे ।
स्मरे विठ्ठल राणा ॥२॥
रखुमादेविवरु निर्धारी ।
पडों नेदी चराचरी ॥३॥

अर्थ:-

विठ्ठल नामाचा जप केला नाहीस तर पुनरुपी गर्भवासाला जावे लागेल. त्या मुळे त्या राजा विठ्ठलाचे नाम अंतकाळापर्यंत सतत घे. रखुमाईचा पती त्याला परत चराचरात येऊ देत नाही.


४३७
सकळ धर्मांचे कारण ।
नामस्मरण हरिकीर्तन ।
दया क्षमा समाधान ।
संतजन साधिती ॥१॥
निजधर्म हा चोखडा ।
नाम उच्चरु घडघडा ।
भुक्तिमुक्तीचा संवंगडा ।
हा भवसिंधुतारक ॥२॥
लावण्यमान्यताविद्यावंत ।
सखे स्वजन पुत्रकलत्र ।
विषयें भोग वयसा व्यर्थ ।
देहासहित मरणावर्ती ॥३॥
जें जें देखणें सकळ ।
तें स्वप्नीचें मृगजळ ॥
म्हणौनि चिंती चरणकमळ ।
रखुमादेविवरा विठ्ठलाचे ॥४॥

अर्थ:-

धर्माच्या सर्व कारणांच्या पुर्ततेसाठी हरिकीर्तन दया क्षमा व समाधान आवश्यक असते व तेच संतजन साधत असतात. भवसिंधु तारक, भुक्ती व मुक्तीचा संवगडी असलेला निजधर्म हा घडघडा नाम उच्चारामुळे साध्य होतो. विद्वानातील अहंकार, शरिर सौंदर्य, सखे, स्वजन, मुले पत्नी हे विषयभोगची प्रतिके आहेत.व ते देहासहित मरणाच्या भोवऱ्यात टाकणारे आहे. जे जे जड सुंदर दिसते ते एक मृगजळासारखे भासमान आहे म्हणुन माझे पिता व रखुमाईचे पती यांचे चरणकमळांचे चिंतन कर असे माऊली सांगतात.


४३८
माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों ।
ह्रदयीं धरोनि तुम्ही खेळावया न्यावो ॥१॥
भक्तांकारणें येणें घेतलीसे आळी ।
दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥
कल्पनेविरहित भलतया मागें ।
अभिमान सांडूनी दीनापाठीं लागे ॥३॥
शोखिली पुतना येणें तनू मोहियेले तरु ।
आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥

अर्थ:-

माझ्या कान्हाचे नांव तुम्ही प्रेमाने घ्या व हृदयाशी कवटाळुन तुम्ही ह्याला खेळावयास घेऊन जा. हा भक्तासाठी मोहित होतो व त्याच्या साठी दहा गर्भवासाचे दुःख ही निमुट भोगतो. त्याला ह्याची आजिबात कल्पना नाही व तो कोणत्याही भक्तासाठी हेच करतो. स्वतःला आभिमान येऊ न देता कोणत्याही दीन भक्तामागे धावतो. त्या पुतनेने मायेने त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला तर ह्यांने तिलाच शोषुन घेतले. असे माझे पिता व रखुमाईचे पती भक्तांचा छंद मात्र टाकुन देत नाही. असे माऊली सांगतात


४३९
सार सार सार विठोबा नाम तुझें सार ।
म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार ॥१॥
आदि मध्य अंती निजबीज ओंकार ।
ध्रुव प्रल्हाद अंबऋषी मानिला निर्धार ॥२॥
भुक्तिमुक्तिसुखदायक साचार ।
पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥३॥
दिवसें दिवस व्यर्थ जात संसार ।
बापरखुमादेविर विठ्ठलाचा आधार ॥४॥

अर्थ:-

सर्व शास्त्रांचे सार हे विठोबाचे नाम आहे.म्हणुन साक्षात महादेव त्याचा सतत जप करत असतात. हे नामच ॐकार स्वरुप असुन तेच आदि, मध्य व अंत असणारे निजबीज आहे त्याचाच जप ध्रुव, प्रल्हाद व अंबऋषीनी केला.ते नाम भक्ती,मुक्ती व सुख दायक असुन त्यामुळे अनेक पतित अज्ञानी जीव तरुन गेले. संसारामुळे तुमचा एक एक दिवस वाया जात असुन माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या नामाचा आधार सोडु नका असे माऊली सांगतात.


४४०
हरि आला रे हरि आलारे ।
संतसंगें ब्रह्मांनंदु जालारे ॥ध्रु०॥
हरि येथेंरे हरि तेथेंरे ।
हरिवांचूनि न दिसे रितेरे ॥१॥
हरि पाहीरे हरि ध्याईरे ।
हरिवांचूनि दुजें नाहीरे ॥२॥
हरि वाचेरे हरि नाचेरे ।
हरि पाहातां आनंदु साचेरें ॥३॥
हरि आदीरें हरि अंतीरे ।
हरी व्यापकु सर्वांभूतीरे ॥४॥
हरि जाणारे हरि वानारे ।
बापरखुमादेविवरु राणारे ॥५॥

अर्थ:-

तो हरि अंतरबाह्य स्वरुपात आमच्यात आला. त्यामुळे संतसंग मिळाला व ब्रह्मानंद झाला. हा हरि सर्वत्र आहे जिकडे तिकडे तोच आहे त्याच्याहुन रिते काही नाही. त्या हरिला तुम्ही पहा व त्याचे ध्यान करा त्यावाचुन दुसरे जगतात काही नाही. हरिनाम वाचेने घ्या नाचत घ्या जो आनंद होईल तोच हरि आहे. तोच हरि आदि आहे व अंती ही आहे तोच सर्वत्र सर्वाभूती व्यापक आहे. त्याच हरिला जाणा त्याचेच वर्णन करा तो हरि जे माझे पिता व रखुमाईचे पती आहेत तेच ह्या जगताचे राजे आहेत असे माऊली सांगतात.


४४१
रामकृष्ण गोविंदाचें नामस्मरण वाचे ।
घडिये घडिये साचें ध्यान श्रीविठ्ठलाचें ॥१॥
एकनाम आठवितां दुतां पडियेली चिंता ।
नाम आनंदें गातां पाविजे सायुज्यता ॥२॥
तिहीं लोकीं नाम थोर वेदशास्त्रांचे सार ।
सगुण निर्गुणाकार निज ब्रह्मासी ॥३॥
बापरखुमादेविवर कृपाळु उदारु ।
नामस्मरणें पारु उतरा हा निर्धारु ॥४॥

अर्थ:-

रामकृष्ण या नामाचे स्मरण वाचेने करावे व सतत विठ्ठलाचे ध्यान करावे. एक नाम वाचेने घेतल्याने त्या अजामेळाला यमदूतांना सोडावे लागले होते. अशा नामस्मरणाने आपले कसे होणार याची चिंता यमाला लागून राहिले आहे. नाम आनंदाने गायले तर सायुज्जता मिळते.सगुण, निर्गुण,निजब्रह्म असलेले नाम हे थोर असून वेदशास्त्राचे सार आहे. माझे पिता आणि रखुमाईचे पती विठ्ठल कृपाळू व उदार असून ते त्यांच्या नामस्मरणाने भवसागर पार होतो अशी खूणगाठ बांध असे माऊली सांगतात.


४४२
आपुलेंनि रंगे येति होति साजणी ।
तंव वनवासीं एके आळंगिलेगे माये ॥१॥
बोलेंना बोलों देईना ।
तेथें पाहणें तें पारुषलेंगे माये ॥२॥
आपुलें केलें कांहींच नचले वो आतां ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतां ॥३॥

अर्थ:-

हे सखी मी माझ्या नादात वनातुन येत असताना एका वनवासीने मला येऊन आलिंगन दिले. तो स्वतः ही काही बोलत नव्हता व मला ही बोलु देत नव्हता. त्याच्याकडे पाहणे ही मला जमले नाही. अशा त्या माझ्या पित्याला रखुमाईच्या पती विठ्ठलाला पाहिले की आपले काही चालत नाही असा माझा अनुभव आहे असे माऊली सांगतात.


४४३
पन्नासअक्षरीं करिसी भरोवरी ।
शेखीं तुझें तोंड वैरी रया ॥१॥
यापरी नामाची वोळ मांडुनी ।
संसार दवडुनि घाली परता ॥२॥
रकारा पुढें एक मकार मांडी कां ।
उतरसी समतुका शंभूचीया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलु ह्रदयीं ।
आपुली आण वाही त्रिभुवनी रया ॥४॥

अर्थ:-

वर्णाक्षरातील र व म ही अक्षरे सोडली तर इतर अक्षरांना वापरुन केलेले कोणते ही शब्द त्या दोन अक्षरांची बरोबरी करु शकत नाहीत व त्या इतर शब्दामुळे तुझे तोंड तुझे वैरी बनेल. म्हणुन तु रामनामाचा जप करुन संसार सोडुन दे. त्या रामनामाच्या जपामुळे तु प्रत्यक्ष शिवशंकरांची बरोबरी करशील. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलनामाला हृदस्थ करुन त्या शिवाय दुसरे काही करणार नाही अशी शपथ घे असे माऊली सांगतात.


४४४
सकळ नेणोनिया आना ।
एकला विठ्ठलुचि जाण ॥१॥
पुढति पुढति मना ।
एकला विठ्ठलुचि जाणा ॥२॥
हेचि गुरुगम्याची खूण ।
एक विठ्ठलुचि जाण ॥३॥
बुझसि तरि तूंचि निर्वाण ।
एकला विठ्ठलुचि जाण ॥४॥
हेंचि भक्ति हेंचि ज्ञान ।
एकला विठ्ठलुचि जाण ॥५॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ।
एकला विठ्ठलुचि जाण ॥६॥

अर्थ:-

इतर काही जाणण्या पेक्षा त्या एका विठ्ठलाला जाण. हे मना पुन्हा पुन्हा सांगतो त्या विठ्ठलाला जाण. गुरुकडुन जाणणे म्हणजे त्या विठ्ठलाला जाणणे आहे. निर्वाण जाणायचे असेल तरी तु विठ्ठलाला जाण. भक्ती व ज्ञानासाठी ही विठ्ठलालाच जाण.माझे पती व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो फक्त त्या विठ्ठलालाच जाण असे माऊली सांगतात.


४४५
गाते श्रोते आणि पाहाते ।
चतुर विनोदि दुश्चिते ।
सोहंभावी पूर्णज्ञाते या सकळांतें विनवणी ॥१॥
करा विठ्ठलस्मरण ।
नामरुपीं अनुसंधान ।
जाणोनि भक्तां भवलक्षण ।
जघनप्राण दावितो ॥२॥
पुंडलीकाच्या भावार्था ।
गोकुळींहुनी जाला येता ।
निजप्रेमभक्ति भक्तां ।
घ्या घ्या आतां ।
म्हणतसे ॥३॥
मी माझे आणि तुझें ।
न धरी टाकी परतें ओझें ।
भावबळें फ़ळती बिजे ।
बापरखुमादेविवर विठ्ठलीं ॥४॥

अर्थ:-

गाणारे, श्रोते, आणि पाहणारे चतुर, विनोदी व सोहंभावामुळे झालेली ज्ञानी या सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही सर्व विठ्ठल स्मरण करा. आपले अनुसंधान त्या नामाशी जोडा. हे भक्तांनो हा भवसागर त्या श्री विठ्ठलाच्या कमरे येवढा आहे हे तो कमरेवर हात ठेऊन दाखवतो.तो पुंडलिकाच्या भावाने गोकुळीहुन आला आहे व ते निजप्रेम सर्व भक्तांना घ्या घ्या म्हणतो. मी, माझे व तुझे हे ओझे टाकुन द्या माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल ह्यांचा चरणी तो भाव ठेवा असे माऊली सांगतात.


४४६
निजानंद हें पै ब्रह्म ।
ऐसे जाणती योगी वर्म ॥१॥
विठ्ठल विठ्ठल स्मरेना ।
चुके संसारदर्शना ॥२॥
रखुमादेविवरावांचुनि ।
कवण पुरविल
जिवीची खुण ॥३॥

अर्थ:-

श्री विठ्ठल हेच ब्रह्म व त्यांच्याकडेच निजानंद मिळतो हे योगी जाणतात. नुसता विठ्ठलनामाचे स्मरण केले तर संसार दुःखाचे दर्शन होत नाही. माझ्या जीवीचे लाड रखुमाईच्या पती शिवाय कोण पुरवणार? असे माऊली सांगतात.


४४७
शिवभवानिये उपदेशी प्राणप्रिये ।
निजमानसीं ध्यायें परमानंदु पाहे ॥१॥
राम सखा राम सखा ।
रामु सखा हरि रामु सखा ॥२॥
सहस्त्र नामावरी कळसु साजे ।
तोचि तो अंतरी बाहिजु भीतरीं ॥३॥
हेंचि निजधर्म हेचि निजकर्म ।
हेंचि परब्रह्म वर्म हेचि एकु ॥४॥
जिवाचें जिवन मनाचें मोहन ।
सुखाचें साधन भक्तिज्ञानाचें अंजन ॥५॥
बापरखुमादेविवरु सुलभु साकारु ।
अर्धमातृका अक्षरु चिदानंदसुख थोरु ॥६॥

अर्थ:-

महादेव प्राणप्रिय भवानीला उपदेश करतात की त्याचे निजमानसात ध्यान कर त्यात परमानंद आहे. तोच राम व हरि हे सखा आहे हे द्विरुक्तिने सांगतात.हेच रामनाम अनेक सहस्त्र नामांचे हे कळस आहे.तोच राम अंतर बाह्य आहे त्याचे सतत स्मरण कर. हेच तुझे निजकर्म व निजधर्म आहेत.तेच त्या परब्रह्माचे वर्म आहे.तेच नाम जीवाचे साधन मनाचे मोहन असुन हेच सुखाचे साधन व भक्तीज्ञानाचे अंजन आहे. ॐ ह्या अक्षराची अर्धमात्रा अर्थात परमेश्वर आहे म्हणुन ते अक्षर चिंदानंद स्वरुप आहे असे तसैच माझे पिता व रखुमाईचे पती सुलभ आहेत असे माऊली सांगतात.


४४८
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
वोडियाणा बंदु घालुनिया देहुडा लागसील पावो ।
वोतप्रोत सांडूनि मना धरिसि अहंभावो ।
ओंकारबिंदुचा न पवसि ठावो ।
वोळगे वोळगे कृष्णद्वारावतिये रावो ॥१॥
ओं नमो भगवते वासुदेवाय ।
द्वादशक्षरि मंत्रु न जपसि काह्या ॥ध्रु०॥
नागिणि उत्साहो नवहिद्वारें निरोधुन ।
नाडित्रयामाजि सुषुम्नासंचरण ।
न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन ।
नरहरि चिंतने अहर्निशि मुक्तिस्थान ॥२॥
मोडिसि करचरण तेणें पावसि अंत समो ।
मोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवि गमो ।
मोठा हा अन्यावो जे हरिचरणीं
नाहीं नामो ।
मोक्षाची चाड तरी मुकुंदीं मन रमो ॥३॥
भांबावसी झणे हें शरीर कर्दळीस्तंभ ।
भस्म कृमि विष्ठा उभे आहे तों सुशोभ ।
भाविता किटकी जाली भृंगी
तिया क्रमिले नभ ।
भावें भक्ति सुलभ वोळगा गा पद्मनाभ ॥४॥
गति मती इंद्रियें जव आहेती समयोग ।
गणित आयुष्य न पुरें जंव हे
न नचे भंग ।
गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग ॥
गरुडध्वज प्रसादें निस्तरिजे भवतरंग ॥५॥
वनिं सिंह वसतां गजीं
मदु केवीं धरावा ।
वन्हिदग्धबीज त्यासि अंकुर
केवि फुटावा ।
वज्रपाणी कोपलिया गिरि उदधी
केवि लंघावा ।
वदनीं हरि न उच्चारी तेणें
संसार केंवि भुंजावा ॥६॥
तेज नयनींचा भानु जेणें
तेजे मीनले ते ।
त्याचे मानसिचा चंद्रमा
तो सिंपोते अमृतें ।
त्याचे नाभिकमळीं ब्रह्मा
तेणें सृजिलीं सकळहीं भूतें ।
तें विराटस्वरुप वोळखावें विष्णुभक्तें ॥७॥
वाताघातें फुटे गगनीं मेघाचा मेळावा ।
वारिबिंदु पद्यिणिपत्रीं केवी हो ठेवावा ।
वानराच्या हातीं चिंतामणी केवि द्यावा ।
वासुदेव चिंतनें तोचि कल्मशा उठावा ॥८॥
सूक्ष्म स्थूळ भूतें चाळिताहे परमहंसु ।
शूळपाणी देवोदेवि जयाचारे अंशु ।
शुभाशुभीं कर्मी न करि नामाचा आळसु ।
सुखें निरंतरी ध्याई ध्याई ह्रषिकेशु ॥९॥
देव होऊनि उदार भक्तां देतो अमरपदें ।
देतां न ह्मणे सानाथोर वैरियासि तेचि दे ।
देहे सार्थक अंति वासुदेव द्वय छंदे ।
देखा आजामेळ उध्दरिला
नामें येणें मुकुंदें ॥१०॥
वाडा सायासि मनुष्यजन्म पावावा ।
वियाला पुरुषार्थ तो कां
वाया दवडावा ।
वाचामनें करुनि मुरारी वोळगावा ।
व्रतें एकादशी करुनि परलोक ठाकावा ॥११॥
या धनाचा न धरी विश्वास ।
जैशी तरुवर छाया ।
यातायाती न चुकें तरी
हे भोगसिल काह्या ।
या हरिभजनेविण तुझें जन्म
जातें वायां ।
यालागी वैकुंठनाथाच्या तूं चिंती
पा रे पायां ॥१२॥
इहींच द्वादशाक्षरीं ध्रुव अढळ पद पावला ।
प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासुनि जळा ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुह्मी
ध्यारे वेळोवेळां ।
तो कळिकाळापासुनी सोडविल अवलीळा ॥१३॥

अर्थ:-

ॐनमो भगवते वासुदेवाय नमस्कारुन त्याच्या प्राप्तीसाठी गुद् व शिश्न यांच्यामध्ये असलेल्या ओडीयान बंधाला पाय लावून असे श्रम करुन आत ओतप्रत भरलेल्या त्याला सोडून मनात अहंमभाव सोडून ओमकार बिंदूचा ठाव न कळता त्या कृष्ण नावाला शरण जा.ओम भगवते वासुदेवाय हा व्दाक्षरी मंत्र तू का जपत नाहीस. नवव्दारांचा निरोध करुन नाडीव्दारे सुश्सुम्नेत संचरणारी कुंडलीनी हा मार्ग सोपा नाही असे मुनी मानतात मात्र नरहरी नामाच्या सतत चिंतनाने मुक्तीस्थान मिळेल अंत समयी योगामुळे हात पाय मोडून घेणे हिताचे नाही. मोह व तृष्णा न तुटल्याने ब्रह्मविद्या कशी येईल हरी चरणाशी नम्र होत नाही हा मोठा अन्याय आहे. मोक्ष हवा असेल तर मुकुंद चरणी मन रमव कर्दळी प्रमाणे दिसणारे गोमटे शरीर पाहून भांबावू नकोस ते कृमी व विष्ठेने भरलेले आहे. उभे आहे तोपर्यत शोभा देते. जाळले तप भस्म होईल व तसेच ठेवले तर कोल्हे कुत्रे खातील त्यामुळे भक्तीने त्या पद् नाभाला ओळख जोपर्यत बुध्दी व इंद्रिय चांगली आहेत तो पर्यंत त्याला शरण जावून त्या योगाने हा भवसागर तरुन जा वनात सिंह असताना हत्तीने माज का करावा भाजलेल्या बीजापोटी अंकुर कसा फुटावा इंद्र कोपला तर पर्वताने समुद्र कसा ओलांडावा.तसेच तोंडाने हरी उच्चारण करणाऱ्याला संसार कसा बाधावा?त्याच्याच डोळ्यातील तेजामुळे सूर्य तेजस्वी होतो त्याच्या मनातील चंद्रमा अमृत वर्षाव करतो. त्याच्या नाभीत जन्मलेल्या ब्रह्माने ही सृष्टी निर्मिलेली आहे हे विष्णूभक्ता त्याचे विराट स्वरुप तू ओळख. वादळामुळे आकाशातील ढग विस्कळीत होतात कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब कसा राहील. माकडाच्या हाती चिंतामणी कसा दयावा?वासुदेव चिंतनामुळे जीवाच्या ठिकाणी दोष कसे राहतील?सर्वस्थूल व सूक्ष्म जीवाचे चालक महादेव आहेत ते व इतर देवता त्याचेच अंश आहेत. चांगली वाईट कर्मे करताना नामाचा आळस का करतोस.निरंतर सुख हवे असेल तर त्या ऋषीकेशाला स्मर.तो उदार झाला की लहान थोरपणा न पाहता भक्तासकट वैऱ्यालाही अमरपद देतो.वासुदेव नाम छंदाने देह सार्थक होतो. पहा तो पापी अजामेळा कृष्ण नामाने उध्दार पावला.मोठ्या सायासाने मिळालेल्या मनु्ष्य जन्मातील पुरुषार्थ का वाया घालवतोस.वाचा व मनाने त्या मुरारीला ओळख एकादशी व्रत करुन परलोक प्राप्त करून घे.झाडाच्या छायेप्रमाणे असलेल्या धनसंपत्तीवर विश्वास ठेऊ नकोस ते तुझ्या जन्म मृत्युची यातायाती चुकवणार नाहीत. हरीजन्मावीण तुझा जन्म वाया जात आहे त्यामुळे त्या वैकुंठ नाथाच्या पायाचे चिंतन कर. याच बारा अक्षरी मंत्राने ध्रुव अढळ पदाला गेला. अग्नी जळ व शस्त्रा पासुन प्रल्हाद रक्षिला ते माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठठल नाम वेळोवेळी घ्या तेच तुम्हाला कळीकाळापासून अलगद सोडवेल असे माऊली सांगतात.


४४९
विठ्ठलु नाहीं जये शरीरीं ।
वाया कांगा जन्मले संसारी ।
विठ्ठलु नाहीं जये नगरीं
तें अरण्य जाणावें ॥१॥
विठ्ठलु नाहीं जये देशीं ।
स्मशान भूमि ते परियेसी ।
रविशशिवीण दिशा जैसी ।
रसना तैसी विठ्ठलेंविण ॥२॥
विठ्ठला वेगळें जितुकें कर्म ।
विठ्ठला वेगळा जितुका धर्म ।
विठ्ठला वेगळें बोलती ब्रह्म ।
तितुकाही श्रम जाणावा ॥३॥
सच्चिदानंदघन । पंढरिये परिपूर्ण ।
कर ठेवोनियां जघन
वाट पाहे भक्ताची ॥४॥
विठ्ठलेंविण देवो ह्मणती ।
ते संसार पुढती ।
विठ्ठलाविण तृप्ती ।
नाहीं प्रतीतिविठ्ठलेंविण ॥५॥
श्रीगुरुनिवृत्तीनें दिधलें ।
तें प्रेम कोणे भाग्यें लाधलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
ऐसें केलें ज्ञानदेवा ॥६॥

अर्थ:-

ज्या शरिरी विठ्ठल नाही ते उगाच जन्मले व ज्या नगरात विठ्ठल नाही ते अरण्य समजावे. विठ्ठल नसलेला देश स्मशान आहे तर ज्या जिभेवर विठ्ठल नाही ते चंद्र सुर्याशिवाय दिशा असण्यासारखे आहे.विठ्ठला वेगळे कर्म, धर्म व ब्रह्म म्हणजे वाउगा श्रमच आहे. ते परिपुर्ण सच्चितानंद धन कमरेवर हात ठेऊन भक्तांचे वाट पाहात आहे. जे विठ्ठल सोडुन इतर दैवते मानतात ते परत संसाराला येतात त्या विठ्ठलावीण प्रिती व तृप्ती ही नाही. हे प्रेम निवृत्तिनाथांकडुन मिळाले व माझे पिता व रखुमाईचे पती असलेल्या विठ्ठलामुळे मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात.


करुणापर – अभंग ४५० ते ४५३

४५०
मी माझें करुनि देह चालविसी वायां ।
आतां जेथींचा तेथें निमोनि जाय
ऐसें कीजे देवराया ॥१॥
जंव जंव गोड तंव तंव जाड ।
जाड गोड दोन्ही नको रया ॥२॥
त्रिगुणवोझें जडपण रचूनि लोटुनि देसी महापुरीं ।
आवर्त वळसा पडिलिया मग
तेथें कैची असे उरी रया ॥३॥
ऐसे लटिकेंचि गार्‍हाणें देवों मी किती ।
तुज नये काकुलती ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला म्या
तुजमाजी घेतली सुति रया ॥४॥

अर्थ:-

देहाच्या ठिकाणी मी आणि देहसंबंधी पुत्रमित्रांच्या ठिकाणी माझे असा व्यवहार वाढवून देह व्यर्थ चालवितोस. त्यापेक्षा मूळ स्वरूपापासून देहादिकांची उत्पत्ति झाली.त्याच ठिकाणी आपले ऐक्य करून द्यावे. जो जो हे विषय सुख तुला गोड वाटते तों तों ते परिणामी जड दुःखप्रद असते. म्हणून त्या वैषयिक सुखदुःखाच्या नादी लागू नकोस. त्रिगुणाचे म्हणजे सत्त्व, रज, तमाचे हे शरीर रचून ते दुःखप्रद शरीर जीवाच्या गळ्यांत अटकवून संसाराच्या मोहपूरांत लोटून देतोस त्यामुळे त्या संसार समुद्राच्या भोवऱ्यात एकदा जीव पडला की मग त्याला तेथून सुटका कशी होणार.परमात्मव्यतरिक्त हा संसार लटका आहे. तोपर्यंत तुला जीवाविषयी दया उत्पन्न होत नाही. तो पर्यंत मी तुला त्या संसाराचे गाऱ्हाणे किती वर्णन करावे. पण गाऱ्हाणे वर्णन करण्याशिवाय दुसरा उपायच काय, रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल ह्यांच्यांशी ऐक्य होण्याकरिता मला तुझा छंद लागला आहे. असे माऊली सांगतात.


४५१
परिमळाची धांव भ्रमर वोढी ।
तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥
अविट गे माय विटेना ।
जवळी आहे परि भेटेना ॥२॥
तृषा लागलीया जीवनातें वोढी ।
तुझी गोडी लागलिया जिवा ॥३॥
बापरखुमादेविवराविठ्ठलीं आवडी ।
गोडियेसि गोडी मिळोन गेली ॥४॥

अर्थ:-

भुंग्याला जशी सुंगंधाची ओढ असते त्या प्रमाणे तुझी आवड मला लागो. भगवंता तुझे स्वरुप अवीट असून अगदी जवळ आहे पण त्याची भेट होत नाही. तहान लागल्यामुळे जी पाण्याची तहान लागते. त्या प्रमाणे तुझी गोडी माझ्या जीवाला लागो. रखुमाईचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल ह्यांची आवड मला लागल्यामुळे मी त्याच्या स्वरूपाशी एकरुप होऊन गेलो असे माऊली सांगतात.


४५२
रंगा येईवो ये रंगा येईवो ये ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी ।
तुझा वेधु ये मनीं वो ॥२॥
कटीं कर विराजित ।
मुगुटरत्नजडित ।
पीतांबरु कासिया ।
तैसा येई कां धावत ॥३॥
विश्वरुपविश्वंभरे ।
कमळनयनें कमळाकरे वो ।
तुझे ध्यान लागो
बापरखुमादेविवरे वो ॥४॥

अर्थ:-

माझ्या प्रेमरूपी भजनरंगांत हे विठाबाई देवी तू लवकर ये. तुला किती, नांवे आहेत म्हणून सांगावे ? तुला किठाई म्हणतात. तुला विठाई, कृष्णाई व कान्हाई म्हणतात.वैकुंठात राहाणारी असून जगत्रयाला उत्पन्न करणारी आहे. त्यामुळे तुझा छंद माझ्या मनाला लागला आहे. तूं कटेवर कर ठेवलेली अशी शोभत असून तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे. कमरेला पितांबर आहे. अशा त-हेच्या देविरूप विठ्ठला तू माझे भजन रंगात धांवत ये. हे विश्वरूप, विश्वेश्वरै कमलनयने, कमलाकरे अशा स्वरूपाने असणारे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे ध्यान माझ्या मनांस नित्य लागो असे माऊली सांगतात


४५३
पडलें दूर देशीं मज आठवें मानसीं ।
नको नको हा वियोग
कष्ट होताती जिवासीं ॥१॥
दिनु तैसी रजनीं जालिगे माये ।
अवस्था लावूनी गेला
अझुनी कां नये ॥२॥
गरुडवाहनागंभिरा येईगा दातारा ।
बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥

अर्थ:-

अज्ञानामुळे दूर देशांत येऊन पडले त्यामुळे रात्रंदिवस मला तुझी आठवण येते. हा तुझा वियोग मला अगदी असाह्य झाला आहे. त्यामुळे माझ्या जीवाला फार कष्ट होत आहेत. पण तुझी भेट अजून का होत नाही. हे कळत नाही. हे गंभिरा गरुडवाहना दयानिधी श्रीकृष्णा हे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला तुम्ही लवकर धावत येऊन मला भेट द्या. असे माऊली सांगतात.


४५४
राज्यपद गाढा पदपाद नसतां ।
हरिनामीं बसतां सर्वपद ॥१॥
पदाभिमानु कांहीं तोही देहीं नाहीं ।
आला गेला ठायीं न संपडे दृष्टी ॥२॥
ब्रह्मानंद आशापाश तोडी ।
दाऊनी उघडी मूर्ती आम्हां ॥३॥
ज्ञानदेवीं सोहं मंत्राचे आवर्तन ।
मदमत्सरभान विरालें देहीं ॥४॥

अर्थ:-

श्रीहरिच्या पाऊलाची सोय हाती नसता राज्य प्राप्त झाले असले तरी त्या पासुन मोठा अभिमान उत्पन्न होतो. आणि हरिनामाचे ठिकाणी बुद्धिची वस्ती झाली असता सर्व पदांची प्राप्ती होते. हरिनामाने कोणत्याही पदाची प्राप्ती किंवा निवृत्ति झाली असता त्याचा अभिमान देहांत राहात नाही म्हणजे प्रतिष्ठा रहात नाही. हे ईश्वरा, ब्रह्मानंदाच्या आशेच्या पाशाची बेडी तोडून तू आपली सगुण सुंदर मूर्ति आम्हाला दाखव. सोहं’ मंत्राचे सतत आवर्तन केल्यामुळे आमच्या ठिकाणचे मदमत्सराचे भान सहजच निघून गेले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


४५५
होरे तूं विठ्ठला होरे तूं विठ्ठला होरे
तूं विठ्ठला होरे तूं गोपाळा ।
क्षेम देई रे वेल्हाळा ॥१॥
तुज पाहतां भुललीये चित्ता ।
काय करुं मी आतां येई पंढरीनाथा ॥२॥
पिसुणें परावीं मज काय करावीं ।
तुजची आठवी श्रीचरण दाखवी ॥३॥
तुजविण वेल्हाळा कें सुखसोहळा ।
रखुमादेविवरा विठ्ठला
शेजे नलगे डोळां ॥४॥

अर्थ:-

हे विठ्ठला वेल्हाळा, मला अलिंगन देणारा हो. पुन्हा पुन्हा मी तुला विनवित आहे. तुला पाहून मला भूल पडली आहे. याला माझा इलाज नाही. हे पांडुरंगा, लवकर ये. कुत्र्यासारखे इतर पाहुणे घेऊन मला काय करावयाचे आहेत ? त्यांची मला जरूरी नाही. मी रात्रंदिवस तुझेच चिंतन करते. मला तुझे चरण दाखव. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठला, तुझ्यावांचून मला कशातही सुख नाही. फार काय सांगू मला रात्री अंथरूणावर झोप देखील येत नाही.असे माऊली सांगतात.


४५६
परतोन पाहासी न बोलसी आम्हासी ।
तुझीया रुपासी नांव नाहीं ॥१॥
सांगता नवल पाहतां बरवे
मायामृगजळ देखियलें ॥२॥
ज्ञानदेवो म्हणे उफ़राटिये दृष्टी ।
परतोनिया भेटी देई क्षेम ॥३॥

अर्थ:-

देहादि अनात्म पदार्थावरील दृष्टी फिरवून जर तूं यथार्थ आत्मस्वरूप पाहशील तर तू आमच्याशी बोलणारच नाहीस. याचा अर्थ बोलण्याला तू वेगळा उरणार नाहीस. म्हणून तुला नामरूप नाही त्या तुझ्या विषयी बोलण्याचा व पाहण्याचे प्रयत्न करणे वेडेपणाचे आहे. कारण बोलणे चालणे हे द्वैतात असते. व ते द्वैत मायाकार्य असून मृगजळाप्रमाणे आहे. विचाराने दृष्टी अंतर्मुख करून जर परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो परमात्मा भेट देईल.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


४५७
माझिये ह्रदयीं बुंथी ते डोळ्यां
सगुणप्रीति वाचे नाम संपत्ति
ऐसेंचि असो ।
म्हणौनि तुझें नाम आवडे हेंचि
प्रेम न विसंबे वर्म निजध्यास रया ॥१॥
श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोडी ।
हीच आवडी देई मना ॥२॥
तुझिये सगुण बुंथीचा वासु व्हावा
माझ्या ह्रदयीं ऐसा निज
सुखाचिया निजध्यासा ।
तुझिये आवडी अनुसंधान तुझिया
स्वरुपीं मन डोळा बैसो
कां ध्यान हेंचि रुप ।
हेंचि निज आवडी देईकां दातारा
चुकवी येरझारा गर्भवास ॥३॥
म्हणौनि रखुमादेविवरा विठ्ठला
उदारा भावें जोडलासि आम्हा ।
श्रुतिपुराणे वर्णिती नेति नेंति
तुझा महिमा ।
तुझें नाम रुप सुंदर हेंचि
निरंतर देई आम्हा सर्वोत्तमा रया ॥४॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा तुझी सगुण मूर्ति नित्य माझ्या अंतःकरणात असावी.त्याच सगुण मूर्तिविषयी डोळ्यांत प्रेम असावे. वाणीमध्ये नामोच्चाराची संपत्ती असावी अशी फार इच्छा असल्यामुळे मला तुझे नाम फार आवडते. याच नामाच्या प्रेमाने मनाला निदिध्यास लागून तुझा कधीही विसर होऊ नये कानांनी नेहमी तुझ्या नामाचे श्रवण करण्याची गोडी धरावी, अशी आवडी माझ्या मनामध्ये उत्पन्न कर. स्वकीय आत्मस्वरूपाच्या निजध्यासाने तुझ्या सगुण मूर्तिचा वास हृदयात नित्य असावा. तुझ्या आवडीचे अनुसंधान तुझ्या स्वरूपांच्या ठिकाणी मनात डोळ्यांत ह्याच रुपाचे सगुण मूर्तिचे दर्शन नित्य असावे, अशी आवडी मला होऊ दे. हे श्रीकृष्ण दातारा वारंवार गर्भवास घेऊन जन्ममरणाराच्या येरझारा कराव्या लागणाऱ्या त्यातून तू मला सोडव. अशी मला बुद्धि उत्पन्न झाली. म्हणून रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला, ह्या भावांने आम्हाला तुझी जोड झाली. ज्याचे अंतःकरणांत तुझ्या विषयी भाव नाही. त्यास तुझी प्राप्ती किती कठीण आहे म्हणून सांगू? अठरा पुराणे सहा शास्त्रे साक्षात् श्रुतिसुद्धा नेति नेति म्हणून तुझा महिमा वर्णन करून गप्प बसतात. परंत भावबळाने तु आम्हाला प्राप्त झालास. एवढ्याकरिता हे सर्वोत्तमा नारायणा तुझ्या सुंदर नामरूपाचा लाभ आम्हाला सतत दे असे माऊली सांगतात.


ढोंगी परमार्थ्यास उपदेश – अभंग ४५८ ते ४६१

४५८
शरीर वरिवरि कां दंडिसि जंव
वारिलें न करी तुझें मन ।
जळीं नेत्र लाउनि टोकती अविंशा
लागोनि तैसें नको नको बकध्यान करुं ॥१॥
चित्त सुचित्त करी मन
सुचित्त करी ।
न धरी तूं विषयाची सोय ।
वनीं असोनी वनिता चिंतिसि तरि
तपचि वाउगें जाय रया ॥२॥
त्रिकाळ स्नान करिसी तीर्थजळीं
परि नवजाती मनींचे मळ ।
तुझियानि दोषें तीर्थ कुश्चित्त
जाले जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥
आतां करिसी तरी चोखटची करी त्यासी
साक्ष तुझें तुज मन ।
लटिकेंन झकवसी तर्‍ही देव दूर्‍हा होसी
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥

अर्थ:-

मनातील इच्छा संपल्या नाहीत मग वरवर देहाला दंडण देऊन काय उपयोग.माश्याच्या मिशाने जसे बगळा पाण्यात ध्यानस्थ उभा दिसतो तसे तु ध्यान लावु नकोस. विषयांची सोय न पाहता स्वतःचे चित्त व मन शुध्द कर.वनात राहुन वनितेचा विचार केल्यास तुझे तसे केलेले तप वाया जाईल. तिनवेळा स्नान व अनेक तीर्थस्नाने करुन तुझ्या मनाचा मळ गेला नाही.उलट तुझ्या स्नानाने तीर्थ ही अपवित्र होतील जसा त्या तीर्थात असलेला धोब्याचा दगड अपवित्र असतो. आता जे करशील ते चांगले कर व तुझ्या मनाला त्याचा साक्षीदार कर. जर लबाडी करशिल तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ आहे ते अशाने प्राप्त होणार नाहीत असे माऊली सांगतात.


४५९
मतमांतांतरें रचूनियां ग्रंथु ज्ञानव्युत्पत्ति
जंव जाली नाहीं आत्मप्रतिती ।
ये सकळ विज्ञानें विषयासक्तीचेनि अनुमानें
तेणें केंवि तुटे संसृती ।
अंतरींचा स्फुलिंग जाज्वल्य जाणतां
कामक्रोधाचिया उपपत्ती ।
बाह्य दीक्षा उदंडी आणुनिया तेणें
केविं होय ब्रह्मप्राप्ती रया ॥१॥
सुटलेपणें करिसी विषय त्याग
तेणें अंतरीं होय अनुराग ।
परतोनि तरीच पावशी ब्रह्म भाग रया ॥२॥
आपुलेनि रुढपणें ग्रंथाचे विज्ञानें
संपदा मिरविती ज्ञातेपणें ।
अंतरी आशापाश विखार भरणें
जगीं संतता मिरवणें ।
येणें द्वारें म्हणसी मी वंद्य जगीं कीं
उपासनाद्वारें मुक्त होणें ।
पालट केलिया साठीं सिणो नको
बापा जेविं गधर्व नगरीं वस्ती करणें रया ॥३॥
यालागी दंभ दर्प सकळ प्रतिष्ठादि
भ्रांति धनदाराविषयासक्ती ।
ऐसा अहंममते ज्ञातेपणाचेनि अहंकारें
तेणें केविं होय आत्मप्राप्ती ।
जंव येणें देहें विनीतता शरण
गेला नाहीं संताप्रती ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां ।
सर्व सुखाची होय निजप्राप्ती रया ॥४॥

अर्थ:-

मतमतांतर मांडुन अनेक ग्रंथ केले पण आत्मप्रतिती आली नाही त्यामुळे ही सर्व ज्ञाने विषयासक्त ज्ञान आहे त्या अनुमानाने संसारज्ञान कसे सुटेल. अंतरात काम क्रोध असताना बाहेरुन उदंड दिक्षा घेतल्या तरी ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल. जर हे विषय अंतरातुन त्यागलेस तरच तुझ्या अंतरात अनुराग येईल. व तुला आत्मब्रह्म लाभेल.आपण रचलेल्या ग्रंथांच्या मुळे मी ज्ञानी हा डांगोरा जर पिटशील तर अंतरात आशापाशांचे निखारे भरशील. मी संत आहे अशी संतता मिरवणे मी ज्ञानी असुन मला वंदन करा हे सांगणे व उपासनेने मी मुक्त होईन हे सांगणे म्हणजे वायाच शिणणे आहे. त्यामुळे गंधर्वनगरीत वस्ती करावी लागेल. सर्व विषय, दंभ, दर्प, प्रतिष्ठा, भ्रांती, धनदारा, विषयासक्ती, ह्या अहंतेमुळे व ज्ञातेपणाच्या सोगांमुळे तुला आत्मप्राप्ती कशी होईल. त्यासाठी विनीत होऊन तुला संतांना शरण जावे लागेल. व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सर्व सुखाची निजप्राप्ती होते असे माऊली सांगतात..


४६०
तोंडे जाले संन्यासु ।
भोगावरी धावें हव्यासु ॥१॥
ते नेणती ब्रह्मरसु ।
वायां होति कासाविसु ॥२॥
ब्रह्मकर्मानें साधु जाती ।
वायां चुकली तुझी भक्ति ॥३॥
सर्वत्र आपणचि म्हणती ।
अभक्ष्य भक्षण करिती ॥४॥
तोडी दंभ माया धंदा ।
शरण रिघे रे गोविंदा ॥५॥
चुकले विठ्ठला उदारा ।
बापरखुमादेविवरा ॥६॥

अर्थ:-

मी संन्यासी आहे असे तोंडाने लोकांना सांगता आणि मन भोगप्राप्तीच्या हव्यासामुळे भोगाकडे धावतो.अशा संन्याशांना यथार्थ ब्रह्मरस न कळल्यामुळे कासाविसी होते. ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाने धार्मिक लोक जातात खरे, पण त्या प्राप्तीचे मुख्य साधन ते जे तुझी भक्ति त्या साधनाला ते चुकून सर्वत्र आत्मा व्याप्त आहे असे तोंडाने पोकळ गप्पा मारून अभक्ष भक्षण करतात. तोंडाने दंभाचा बाजार माजवून मायिक धंदा करण्यापेक्षा गोविंदाला शरण आ. रखुमादेवीवर माझा बाप उदार श्रीविठ्ठल त्याला चुकून असल्या धंद्यात पडू नका. असे माऊली सांगतात.


४६१
विटंबुनि काया दंड धरी करीं ।
हिंडे घराचारी नवल पाहे ।
असमाधानी विषयीं विव्हळ ।
तरी दंडु केवळ काजा काई ॥१॥
सिध्दचि असतां कां गा विटंबिसी ।
संन्यासी तूं जाण कैसा ॥२॥
निजाश्रमींच वास संकल्पासी त्यागी ।
सर्वस्वें वैरागी ।
तोचि तो संन्यासी ।
संगीं असंगता तोचि जाण संन्यासी ।
स्वरुप तयापाशीं जवळी आहे ॥३॥
बापरखुमादेविवरु उघडचि संन्यासी ।
तोचि पूर्ण भासीं भरला असे ।
निवृत्तिरायें खुणा दाखविला निरुता ।
तो जाणण्या परता सदोदितु ॥४॥

अर्थ:-

संन्यासी होणे म्हणजे देहाला दंडित करुन हातात दंड घेऊन चार घरी भिक्षा मागणे नव्हे. विषय वासनांचा त्याग करणे म्हणजे संन्यास होय. त्यासाठी दंड, कमंडलु वगैरे कामाचे नाहीत. तु स्वतः स्वरुप सिध्द असल्याने देहाची विटंबना करुन संन्यास का घेतोस? ज्यांने विहित आश्रमापणे वागले व संकल्पाचा त्याग केला की ते वैराग्यच होते वेगळे संन्यासी होण्याची गरज नाही. ज्याने विषयसंगाशी असंग केला तोच खरा स्वरुपाने संन्यासी झाला हे जाण. संसारात राहुन विषयांपासुन विरक्त झाला तोच खरा संन्यासी आहे हे जाण. माझे पिता व रखुमाईचे पती यांनी तो खरा संन्यास सांगितला व निवृत्तिनाथांनी त्याची खुण दाखवली व त्यामुळे ती अवस्था सदोदित प्राप्त झाली असे माऊली सांगतात.


गृहादि त्याग्यास उपदेश – अभंग ४६२ ते ४६६

४६२
घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी
शरीरा येवढें जाड ।
मायबाप वोखटी त्यजूं म्हणसी तरी
अहंकार अविद्येचें कोड ॥
बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी
काम क्रोध मद मत्सर अवघड ।
बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशा
तृष्णा माया अवघड रया ॥१॥
त्यजिलें तें काय कासया म्हणिजे
सांग पा मजपांशीं ऐसें ।
जया भेणें तूं जासी वनांतरा
तें तंव तुजचि सरिसें रया ॥२॥
स्त्रीं वोखटी त्यजूं म्हणसी तरी
कल्पने येवढी भोगती ।
पुत्र अपत्य त्यजूं म्हणसी
तरी इंद्रियांसि नाहीं निवृत्ति ।
सकळ गणगोत त्यजूं म्हणसी
तरी हे अष्टधा प्रकृति ।
आवघेंचि त्यजूं पाहे म्हणसी तरी
मना नाहीं निज शांति रया ॥३॥
अवघींचि तुज जवळी दुमदुमित असतां
वरीवरी मुंडिसी कां करिसी विटंबना ।
सहज संतोषें असोनि तैसा जैसा
परि तो सदगुरु पाविजे खुणा ।
आपुले आश्रमीं स्वधर्मीं असतां
सर्वत्र एकुचि जाणा ।
बापरखुमादेविवरुविठ्ठलु इतुकिया
साठीं नेईल वैकुंठभुवना ॥४॥

अर्थ:-

घरदाराचा त्याग करुन जर वनात जायचे झाले तरी शरिराचे जड ओझे तुला वाहावे लागेल. मायबाप वाईट म्हणुन टाकु गेलास तरी अहंकार व अविद्येचे कोड तुला आहे. बहिंण भाऊ त्यागले तरी काम क्रोध मद मत्सर टाकणे अवघड आहे. पाठची बहिण सोडायची म्हंटली तर आशा तृष्णा व माया बंंड करतात. येवढा सारा पकिवार टाकलास तो काय हे मला सांग. व ज्याला भिऊन तु वनात जात आहेस ते तर तुझ्या सतत सोबत आहेत. बायको टाकलीस तरी कल्पनारुपी बायको तुझ्या सतत जवळ आहे. पुत्र, अपत्य टाकु गेलास तर ती इंद्रिय पासुन तुला निवृत्ती नाही. सगळे गणगोत टाकलेस तरी अष्टमा प्रकृती सोबत आहेत.व सर्वच सोडु पाहिलेस तर मनांत शांती नाही.मग येवढे सगळे बरोबर असताना वरवर दंडण मुंडण का करतोस? तु जसा आहेस तसा रहा ही सद् गुरुनी सांगितलेली खुण आहे. तु ज्या वर्णाश्रमात आहेस, जो तुझा स्वधर्म आहे त्या प्रमाणे त्यांच्याशी एकरुप होऊन रहा. तु फक्त येवढेच केसेस तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तुला वैकुंठात नेतील असे माऊली सांगतात.

४६३
प्रपंचाचें जगडवाळ दुस्तर जरी मानिसी ।
त्याग करुनि केउता जासी ।
जें जें त्यागिलें तें तें तुज माजी ।
त्यागिलें तें काय सांग आम्हांसी ।
तुझें तुजचि माजि प्रपंचेंसि तूं सर्वामाजी वर्तसी ।
ऐसें जाणोनिया कां विटंबिसी बापा ।
टाकूनि केउता जासी रया ॥१॥
मनेंसि विचारी निर्धारुनी योग करी ।
तुझें तुजमाजि अरे आतां विचारी बापा ।
अरिमित्रसम होऊनि मनें हें शुध्द होय ।
तेंचि तूं होऊनि राहे जाण बापा ॥२॥
बाह्य त्यागिसि तरी तो त्यागुचि नव्हे
पालटिसी तरी ते विटंबना ।
धरिसी तरीचि तो बंधु मोक्ष
मागता हे जडपणा ।
तरि गेलिया जड तो मोक्षचि नव्हे
साचा चुकलासि उगाणा ।
वृत्तिशून्याकारें अवलोकितां तंव
तेणें नव्हें तुज वस्तुज्ञान ।
ऐसें जाणोनी कां सिणसीरे बापा ।
हेचि धरुनि राहे निज खुण रया ॥३॥
म्हणौनि आतां इतुकें करी ।
साच तें हे धरी तुझें मन होय
तुज अधिकारी ।
तैं सर्वही त्याग तुज
फ़ळती बापा ।
जैं एकचि होऊनि निर्धारी नलगे
सिणणें दंडणे येणेंचि आश्रमभावें
ऐसेंचि मनें निर्धारी ।
बाप रखुमादेविवरुविठ्ठलु
चिंतितां सर्व प्रपंचाची
जाली बोहरी ।
निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळा ।
निजीं निजाचे निज निर्धारी रया ॥४॥

अर्थ:-

प्रपंचाचे अवडंबर करुन त्यातुन तरणे दुस्तर आहे. ते त्यागुन तु कोठे जाणार? जे जे टाकायला जाशिल ते तुझ्या मनात सोबत आहे. मग तु कसला त्याग करणार ते आम्हाला सांग? जे तुला टाकायचे आहे त्यात तु वासनारुपाने आहेस. असे जाणुन ही तु स्वतःची विटंबना का करतोस? हे टाकुन तु कोठे जाणार? आपल्याला काय साध्य करायचे ह्याचा योग्य विचार मनात करअरिमित्रा(विजिगीषु) प्रमाणे मन शुध्द करुन घे. हे तु जाण. बाह्य त्याग हा त्याग नसुन ती विटंबना आहे. पण वासनारुप बंध मनात असताना मोक्ष कसा कसा मागता येईल? तरी तो मोक्ष मागायला गेलास तर तो संन्यास किंवा मोक्ष नसुन रिकामा शीण होईल. वृत्तीशुन्य करुन परमात्मवस्तुचे ज्ञान मिळवले हे प्रयत्नपुर्वक कर हीच तुझी निजखुण समज. मग आता इतकेच कर जे सत्य आहे तेच मनात धर त्यामुळे तु आधिकार प्राप्त होशिल. त्यामुळे हे सर्व त्याग तुला फळ देतील उगाच दंडण मुंडण करुन शिणण्याचा उपयोग नाही. हाच आश्रमभाव हे जाण.माझे पिता व ऱखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन करता प्रपंचाची बोहरी होते. हीच खुण निजाचे निजतत्व निजरुपी दाखवुन निवृत्तीनाथांनी दाखवली असे माऊली सांगतात.


४६४
आलियाचा संतोष गेलियाची हानी ।
त्याचा अतिसो वेंचे तयाची काहणी ॥
ऐसे संकल्प नाहीं विकल्प देहीं
वरि वरि मुंडिलिया होय कांही ।
तरि बहुरुप्याच्या ठाई काईं काई
नटु नसे रया ॥१॥
आधीं भीतरी दंडावा पाठी
बाहिजु मुंडावा ।
नाहीं तरी योगभांडिवा कां
करिसी रया ॥ध्रु०॥
मागितलीया भीक जरि होय निर्दोष ।
तरि सणिये रजक काय न मागती ॥
देवपणें फ़ुग धरिसील गाढा ।
तरी वायाविण मूढा सिंतरलासी ॥२॥
थिगळी घालोनि गळां म्हणसी
न भियें कळिकाळा ।
तरि काय कर्मा वेगळा कै
हो पाहासी ॥
योगिया म्हणिजे कैसा भीतरी
काश्मिरी जैसा ।
मीनालिया पदार्थासरिसा
होउनी मिळे ॥३॥
ह्रदयीं नाहीं जालेपण क्रोधें
भवंडिसी लोचन ।
अंगीं भस्मउधळण राख राखेल काई ॥
खर लोळे उकरडां काय परत्रचिया चाडा ।
तैसा मठीं बांधोनि मूढा वर्म चुकलासी ॥४॥
तीर्थव्रत-जपस्नान वाउगें करिसी ध्यान ।
ऐसें करितां आने आन मार्ग चुकलासी ॥
शुध्द करुनियां मन सेवी निवृत्तीचे चरण ।
विठ्ठलविठ्ठल म्हण नाहीं
तरी नाडलासी ॥५॥

अर्थ:-

मिळाले तर संतोष व गेले तर हानी वाटते. नाही त्याची हाव व खर्च केल्याच्या कहाण्या ऐकवुन असे संकल्प विकल्प मनात बाळगुन वरवर मुंडण केले तर ते नट व बहुरुप्याने काढलेल्या सोंगा सारखे आहे. पहिले अंतरातील वासना दंडाव्या व मग बाहेर मुंडण करावे तसे केले नाही तर संन्यासाश्रमाची विटंबना होईल. भिक मागुन निर्दोष होता येते तर सणादिवशी भिक मागणारे परिट निर्दोष झाले नसते का? संन्यास वस्त्रामुळे लोकांनी केलेल्या पूजेमुळे जर फुगुन गेलास तर उगाच फसशील. गळ्यात कफनी घालुन म्हणशील मी कळिकाळाला भित नाही. तरी मागिल संचित कर्मे कुठे जाळशील. तो योगी स्पटिका सारखाआतबाहेर स्वच्छ असतो. व ज्या पदार्थात मिळेल त्याच्या सारखा दिसतो. त्या स्पटिका सारखा आत मध्ये न होता जर डोळे वटारशील. तेंव्हा ती अंगावर लावलेली राख तुझे रक्षण करिल काय? गाढव उकिरड्यावर काय दुसऱ्याच्या इच्छेने लोळते का? मठ बांधुन त्या मठात अडकल्याने वर्म चुकलास. वाऊगेपणे तीर्थ, व्रत व तप केलेस तर नक्कीच मार्ग चुकशील. श्री गुरु निवृत्तिनाथ चरणांचा आश्रय करुन सतत विठ्ठल नामात रत राहिला नाही तर संसाराकडुन नाडला जाशील असे माऊली सांगतात.


४६५
येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे ।
वर्णाश्रमधर्म त्यागून कोठें जासी ।
म्हणोनि येकचि विदारी बापा ।
जेणें सार्थक होय संसारासी ।
विकल्प नको धरुं ।
अंतर धरुनि राहे या सगुणासी रया ॥१॥
आवडी धरुनी गोडी घेई का ध्यानीं ।
परतोन मग योनि नाहीं तूज ॥२॥
सांडी सांडी त्याग नास्तिकाचे
मस्त नलगे करणें अटणें ।
नानाविधि वाउगे जड
कां सिणवणें ।
केंविं मन होय शुध्दी ।
एकलेंचि मन करुनि स्वाधीन ।
सगुणींचि काय सिध्दि नलभे रया ॥३॥
म्हणोनि येकाकारवृत्ति सगुणीं बैसली ।
प्रीतिचि निर्गुणीचि आर्ति जाण संपदा ।
याची सांडि मांडी न करी ।
निरुतें चित्तीं धरी ।
स्वस्वरुपीं असे सदा
बापरखुमदेविवरुविठ्ठलु चिंतितां सुख
सगुणींची जोडे आनंदु रया ॥४॥

अर्थ:-

तु संन्यासाच्या भानगडीत न पडता वर्णाश्रमामुळे जी नित्यनैमितिक कर्मे आहेत ती करत राहिलास तर संसारातील सार्थकता मिळेल. वर्णाश्रम कर्मे टाकुन तु कोठे जाशिल. असा विकल्प मनात न आणता शुध्द अंतकरणाने त्या सगुणरुपाशी रत हो. हीच मनात आवडी धरुन तसे केलेस तर पुन्हा जन्मयोनीला येणार नाहीस.नुसता बाह्य त्याग यात संसाराची कतार्थता आहे हे नास्तिकाचे मत आहे. ते टाकुन दे. हरिप्राप्ती साठी कोठे ही न जाता, नानाविधीत शिणुन न जाता. त्या सगुणाशी प्रेम ठेवलेस तर सिध्दी काय मिळणार नाहीत का? सगुणाच्या ठिकाणी एकाकार वृत्ती ठेवल्याने निर्गुणाचीच संपदा प्राप्त होते. ह्या साठी कोणती ही सांडमांड न करता, वेगळे काही न करता शुध्द चित्ताने स्वस्वरुपाशी प्रेम धरुन रहा. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सगुणातच सुख मिळुन आनंद उपभोगता येईल असे माऊली सांगतात.


४६६
कां सांडिसी गृहाश्रम ।
कां सांडिसी क्रियाकर्म ।
कासया सांडिसीं कुळींचें धर्म ।
आहे तें वर्म वेगळेंची ॥१॥
भस्मउधळण जटाभारु ।
अथवा उदास दिगंबरु ।
न धरि लोकांचा आधारु ।
आहे तो विचारु वेगळाचि ॥२॥
जप तप अनुष्ठान ।
क्रियाकर्म यज्ञ दान ।
कासया इंद्रियां बंधन ।
आहें तें निधान वेगळेंचि ॥३॥
वेदशास्त्र जाणीतलें ।
आगमीं पूर्ण ज्ञान झालें ।
पुराण मात्र धांडोळिलें ।
आहे तें राहिलें वेगळेंचि ॥४॥
शब्दब्रह्में होसि आगळा ।
म्हणसि न भियें कळिकाळा ।
बोधेंविण सुख सोहळा ।
आहे तो जिव्हाळा वेगळाचि ॥५॥
याकारणें श्रीगुरुनाथु ।
जंव मस्तकीं न ठेवि हातु ।
निवृत्तिदास असे विनवितु ।
तंव निवांतु केवि होय ॥६॥

अर्थ:-

अरे गृहस्थाश्रम, व त्याची नित्यनैमित्यिक कुळकर्मे का सोडतोस. पण समाधान मिळवण्याचे वर्म वेगळेच आहे. भस्माची उधळण जटाभार व नग्न राहून लोकांचा आधार न घेता हिंडतोस पण तो परमार्थिक विचार नाही हरीप्राप्तीचा हेतू न ठेवता जप, तप, अनुष्ठान, क्रियाकर्म, दान, यज्ञ,व इंद्रिय दमन याचा काय उपयोग.वेदशास्त्र जाणले पुराणे अभ्यासिली व त्यात व्यवहारी हेतू ठेवला तर वाया जातो. शब्दब्रह्म जाणले त्यामुळे मला कळीकाळाचे भय नाही असे म्हणशील तर ब्रह्म सुखाचा सोहळा लाभणे शक्य नाही. या कारणाने श्रीगुरु मस्तकावर हात ठेऊन कृपा करत नाहीत तो पर्यत निवांत कसा होशील असे निवृत्तीदास माऊली असे म्हणतात.


मनास उपदेश – अभंग ४६७ ते ४७२

४६७
अरे मना तूं वांजटा ।
सदा हिंडसी कर्मठा ।
वाया शिणशीलरे फ़ुकटा ।
विठ्ठल विनटा होई वेगीं ॥१॥
तुझेन संगें नाडले बहु
जन्म भोगिताती नित्य कोहूं ।
पूर्व विसरलें ॐ हूं सोहूं ।
येणें जन्म बहूतांसी जाले ॥२॥
सांडि सांडि हा खोटा चाळा ।
नित्य स्मरेरे गोपाळा ।
अढळ राहे तूं जवळा ।
मेघश्यामा सांवळा तुष्टेल ॥३॥
न्याहाळितां परस्त्रीं ।
अधिक पडसीं असिपत्रीं ।
पाप वाढिन्नलें हो शास्री ।
जप वक्त्री रामकृष्ण ॥४॥
बापरखुमादेविवर ।
चिंती पा तुटे येरझार ।
स्थिर करीं वेगीं बिढार ।
चरणीं थार विठ्ठलाचे ॥५॥

अर्थ:-

हे पापी मना नष्टासारखा किती हिंडतोस व फुकट का शिणतोस त्यापेक्षा विठ्ठल चरणी स्थिर हो त्यामुळे तू पैलतीराला पोचशील. हे न आवरणाऱ्या मना तुझ्या संगाने ऋषी नाडले तू त्यांना भ्रमीत केलेस म्हणून ते गुरुला शरण गेले. या हरीचरणामुळे तुला जन्ममरण नाही.या नारायण नामाच्या अवीट सेवेने मीतू पणा सोडून एकरुप होशील.मी हरिला शरण जाऊन त्याची नित्य ह्रदयात स्थापना केली. व श्रीगुरू चरण जोडल्यामुळे चराचरात फिरणारे मन आवरले असे माऊली सांगतात.


४६८
अरे मना तूं पापिष्टा ।
किती हिंडसी रे तूं नष्टा ॥
सैरा सिणसी रे फ़ुकटा ।
विठ्ठलविनटा स्थिर होई ॥१॥
येणें पैलपार पावसील ॥२॥
तूं अनिवार नावरसी ।
तुझेनि संगें नाडले ऋषी ।
तूं तंव अपभ्रंशीं पाडिशी ।
म्हणोनि गेले गुरुसी शरण ॥३॥
न सोडी हरिचरण ।
नाहीं नाहीं जन्ममरण ।
अविट सेवी नारायण ।
तेणें मी तूं पण एक सिध्द ॥४॥
ज्ञानदेव शरण हरी ।
मन हिंडे चराचरी ।
न सोडी चरण अभ्यंतरी ।
नित्य श्रीहरी ह्रदयीं वसो ॥५॥

अर्थ:-

हे पापी मना नष्टासारखा किती हिंडतोस व फुकट का शिणतोस त्यापेक्षा विठ्ठल चरणी स्थिर हो त्यामुळे तू पैलतीराला पोचशील. हे न आवरणाऱ्या मना तुझ्या संगाने ऋषी नाडले तू त्यांना भ्रमीत केलेस म्हणून ते गुरुला शरण गेले. या हरीचरणामुळे तुला जन्ममरण नाही.या नारायण नामाच्या अवीट सेवेने मीतू पणा सोडून एकरुप होशील.मी हरिला शरण जाऊन त्याची नित्य ह्रदयात स्थापना केली. व श्रीगुरू चरण जोडल्यामुळे चराचरात फिरणारे मन आवरले असे माऊली सांगतात.


४६९
आजि लाधलें तुमच्या पायीं
स्तुति करु काई ।
हेचिं तुम्हा पाहीं विनवीतसे ॥१॥
निवृत्त बाप निवृत्त माये ।
निवृत्त पाहें विवळलिये ॥२॥
देखणें देखिलें तेचि होई पा रे मना ।
निवृत्तिचरणीं स्थिर राही पा रे जाणा ॥३॥

अर्थ:-

आज तुमच्या पायाची प्राप्ती झाल्यामुळे त्या भिडेमुळे आता स्तुती काय करावी निवृत्तिनाथ माझे मायबाप आहेत अशा रितीने निवृत्तिनाथ माझ्या हृदयी स्थापित आहेत. हे मना जाणोन घेण्याला अवश्य असे ते श्री गुरु आहेत.अरे ज्ञाना, तुं निवृत्तिच्या चरणी स्थीर हो असे माऊली सांगतात.


४७०
श्रवण घ्राण रसना त्त्वचा आणि लोचन
हें तों दैन्याची द्वारें वोळगसी ।
यांचें यांसीचि न पुरे तुज पुरविती काये ।
यालागीं धरिजेसु आपुली सोयरे बापा ॥१॥
अरे मनारे अरे मनारे ।
न संडीं न संडीं हरिचरण कमळारे ॥२॥
स्वप्नींचें धन तें धनचि नव्हे ।
मृगजळींचें जळ तें जळचि नव्हे ।
अभ्रींची छाया ते साउली नव्हे ।
ऐसें जाणोनिया वेगीं धरिजेसु
आपुली सोयरे रया ॥३॥
तूं जयाचा तेथोनि जिवें जितासी ।
त्या श्रीहरीतें रे नोळखसी ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला चिंतीसी ।
तेणें पावसी तूं सुखाचिया राशी रया ॥४॥

अर्थ:-

विषयरुपी दैन्याची व्दारे ही कान, नाक, त्वचा, जीभ व डोळे उघडतात.हेच त्यामुळे तृप्त होत नाहीत तर तुला काय तृप्त करणार. तेव्हा स्व तृप्तीसाठी त्या सोयऱ्या हरीला धर. अरे मना तू हरीचरण कमल सोडू नकोस स्वप्नातील धन धन नाही. मृगजळातील जळ जल नाही. अभाळाची छाया सावली नाही. असे जाणून तू आपली सोय पहा. तू ज्याच्यामुळे जीवन जगतोस त्या श्रीहरीला तू ओळखत नाहीस माझे पिता व रखुमा देवीचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केलेस तर तुला सुखाच्या राशी मिळतील असे माऊली सांगतात.


४७१
ध्येय ध्याताहे दोन्हीं नाहीं ।
तेथें ज्ञेय ज्ञाता उरे काई ॥१॥
अरे मना परापर परतें पाहीं ।
तें तूं स्वयें आपण पाहें रे मना ॥२॥
रखुमादेवीवरा विठ्ठलाची आण ।
जरी बुझसी तरी
तूंचि निर्वाण ॥३॥

अर्थ:-

श्री गुरुकृपेने ध्येय ध्याता हे नाहीसे झाले. त्याच बरोबर ज्ञेय ज्ञाता हेही उरले नाही. अरे मना पर श्रेष्ठ व कनिष्ठ जो जीवभाव याच्याही पलीकडे असणारे जे परमतत्व ते आपण स्वतःच आहोत असे मनाला सांग. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो. परमात्मस्वरूपांची ऐक्य समजले तरच मोक्ष मिळतो असे माऊली सांगतात.


४७२
सुख आपलें आपण तो पाहे ।
स्वरुप आपुलें आपण ध्यायरे मना ॥१॥
लक्ष निवृत्ति चरणी धीरु राहे ।
भेदभ्रम सांडी सावध होय ॥२॥
बापरखुमादेविवरु एकचि पुरे ।
जाणतिल या सर्व सुख मोहरे ॥३॥

अर्थ:-

अरे मना आपले आत्मसुख व आत्मरुप पाहा. ह्या मध्येच तुला सर्व सुख मिळेल.श्रीगुरू निवृत्तीच्या चरणाच्या ठिकाणी धीर धरून राहा. भेदभ्रम टाकून दे आणि सावध हो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचचे चिंतन कर त्यास जाणले असता तोच सर्व सुखाचे माहेर घर आहे असे माऊली सांगतात.


जनांस उपदेश – अभंग ४७३ ते ५३५

४७३
तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा ।
वेगीं त्या निराशा फ़ळेवीण ॥१॥
तैसें हें टवाळ हरिविण पाल्हाळ ।
कैसेनि मायाजाळ निरसे रया ॥२॥
त्रिपुटीचे पेठे वानवसा दिठा ।
वैकुंठ चोहटा पिकला रया ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलु साजीरा ।
मार्गी मार्ग एकसरा नामें तारी ॥४॥

अर्थ:-

सत्व, रज, तम व आशा यांचा मळ धुतल्याशिवाय परमात्मरूपी फळाचा आशा करणे फुकट आहे.तसेच ह्रीची प्राप्ती झाल्याशिवाय बाकीची इतर साधने करणे फुकट पाल्हाळ आहे. हरिचितनाशिवाय मायेचा निरास कसा होईल. सत्व, रज, तमाच्या पेठेत पंढरीत तो प्रगटला आहे.होऊन सर्वांना सोपा झाला आहे.रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल हे सुंदर असून त्यांच्या नाममार्गाचा एकटा मार्ग तारक आहे असे माऊली सांगतात.


४७४
स्वप्नींचिनि सुखें मानितासि सुख
घेतलिया विख जाईल देह ॥१॥
मोलाचें आयुष्य दवडितोसि वायां ।
माध्यान्हींची छाया जाय वेगीं ॥२॥
वेग करी भजनां काळ यम श्रेष्ठ ।
कैसेंन वैकुंठ पावसील झणें ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठल उभा ।
सर्वत्र घटीं प्रभा त्याची आहे ॥४॥

अर्थ:-

स्वप्नातील सुखीला सुख मानणे मिथ्या आहे ते सुख नसुन विष आहे ते घेतले तर देह जाईल मोलाचे आयुष्य का वाया दवडत आहेस. ज्याप्रमाणे माध्यानकाळची छाया आपलीचअसते. पण ती एका क्षणात जाते. म्हणून तू हरीभजनाचा वेग कर कारण काळ मागे लागला आहे मग वैकुंठ कसे प्राप्त करशिल. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठोबाराय भक्ताकरिता विटेवर उभे आहेत व त्याचेच ज्ञान सर्व जीवांच्या बुद्धीत आहे असे माऊली सांगतात.


४७५
बुध्दिमात चित्त धन वित्त गोत ।
निजानंदें तृप्त करी रया ॥१॥
नैश्वर्य ओझें ऐसें तूं बुझें ।
वायां मी माझें म्हणसी झणी ॥२॥
सांडी सांडी मात उभया दुरित ।
हरिविण हित घेवों नको ॥३॥
ज्ञानदेवा गांग जाले असे सांग ।
वेगीं श्रीरंग पावले तुज ॥४॥

अर्थ:-

उत्तम बुद्धी, एकाग्र चित्त, भरपूर ऐश्वर्य, पुत्र पत्नीदि सर्व कांही अनुकूल असले तरी त्यांच्या मोहात न गुंतता निजानंद तृप्ती मिळव हे सर्व अनात्म ऐश्वर्य क्षणांत नष्ट होणारे आहे असे तू समज ह्याना वायाच आपले मानु नकोस.संसार अनुकूल असणे किंवा प्रतिकूल असणे ही दोन्ही पातके आहेत असे समज. एका परमात्मप्राप्ती शिवाय दुसरे कशांत आपले कल्याण आहे असे समजू नकोस. भगवंताचे गुण गायीले तर श्रीरंगाची प्राप्त निश्चित होईल असे माऊली सांगतात.


४७६
कर्पुर अग्नीसी स्वदेहा नाशी ।
चंदनीं मासी न थरे देखा ॥१॥
घ्राणाची कळिका भ्रमर रुंजीका ।
तेथील झुळुका रुंजी करी ॥२॥
मोतियाचा चारा राजहंसा सैरा ।
दुजिया पाखिरा काम नये ॥३॥
ज्ञानदेव म्हणे घेती ते शहाणे ।
येर ते पाहुणे यमाचे रया ॥४॥

अर्थ:-

कापूर सुगंधी असतो पण त्याचा अग्निसी संबंध पावला तर नाश होतो. अग्नीत पडलेल्या सुगंधी चंदना वर तर त् माशी बसत नाही. कमळच्या फुला भोवती भुंगे रुंजी घालतात.पण ते कमळ फुलाच्या नाही तर त्याच्या सुवासा मुळे येतात. मोत्यांच्या चाऱ्यांची गोडी एका राजहंसालाच कळते दुसर्याला ती चव कळणार नाही. स्वतःत असणारे ब्रह्मस्वरुप ओळखणारे शहाणे असतात जे तसे ओळखत नाहीत ते सहज यमाचे पाहुणे होतात असे माऊली सांगतात


४७७
शाहाणे सिंतरे व्याहाणे मोहरे ।
भणंग धुरें आतुडे कैसें ॥१॥
या अवचित्या गोष्टी भाग्यें होय भेटी ।
प्रालब्ध सृष्टीं भोग देत ॥२॥
येत जात वाटा शरीरीं भरे फ़ांटा ।
मदमत्सरताठा भ्रमकुळीं ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे या खुणे मी नेणें ।
पंढरिचे राणे उगविती ॥४॥

अर्थ:-

शहाण्या मनुष्याने संकटात पडणे, मूर्ाखनि श्रेष्ठत्वास पावणे, दरिद्री ऐश्वर्य संपन्न होणे या गोष्टी सहसा संभवत नसल्या तरी प्रारब्धाने एखादे वेळी घडून येतील.प्रारब्धामुळे सृष्टीतील भोग भोगावे लागत असल्यामुळे, या गोष्टी अवचितपणे होतीलही. आत्मस्वरूपांच्या वाटेस लागता शरीराच्या आडफाट्यांवर म्हणजे शरीरावर आत्मबुद्धी होते तसे झाले की मदमत्सरांचा ताठा भरलाच म्हणून समजावे. ती अविद्या होय. पंढरीचे राणे अवतरले की अविद्या नाशाची खुण आत्मस्थिती सापडते असे माऊली सांगतात.


४७८
दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु ।
राहिला निर्ध्दारु नाना मत्ता ॥१॥
जें जेथें होतें तें तेथें नाहीं ।
परतोनि काई पाहातोसि ॥२॥
मौनचिये मिठी सगळेंचि नाहीं ।
तैसा इंद्रियां दाही चोजवेना ॥३॥
ज्ञानदेवो बोले सामावलें मन ।
मन नायकती कान तेथील कथा ॥४॥

अर्थ:-

परमात्म्याचे प्रतिपादन करणारी अनेक मते आहेत. पण ज्योतीत ज्योत मिळावी त्या प्रमाणे गुरूकृपेने आल्याचे ब्रह्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर बाकीचे मते जागच्या जागी निवांत राहिली. जे जेथे होते ते तेथे नाही परतुन काय पाहतोस. तशी आत्मस्थिती स्थिती पडली मौनाची मिठी पडली की तो विषयांना इंद्रिय विषय नाही. शब्दासह मन परमात्म स्वरूपात लीन झाल्यानंतर प्रपंचाची कथा कान ऐकणार नाहीत असे माऊली सांगतात.


४७९
एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी ।
दया गेले ठाया मज आला रहावया ।
मत्सर गिळावया कुळासहित ॥१॥
क्षमा गेली परती अहंकार सांगती ।
तें वोढूंनियां नेती अघोराशी ॥२॥
गति म्हणे मी थोर प्रवृत्ति निघाला घोर ।
राहों न शके घरी निवृत्ति तेथें ॥३॥
ज्ञानदेवो सांगे असे मज पांडुरंगें ।
लक्ष्मीये रिघे शरण आडवा ॥४॥

अर्थ:-

आसुरी संपत्तीने युक्त होऊन केल्या जाणार्या पांडुरंगाच्या नुसत्या भक्तिने म्हणजे दैवी संपत्तीने रहित असलेल्या भक्तिने मोक्ष प्राप्त होणार नाही. उलट कुलनाशक मद मत्सर येऊन राहतात.मनातील क्षमा जाऊन त्या ठिकाणी अहंकार आला तर जीवाला अघोरी नरक प्राप्त होतो. जेथे वैराग्य निवृत्ती नाही तेथे तेथे प्रवृत्तीला अघोराची गती मिळते. तसे असेल तर लक्ष्मी दैवी संपत्तीसह पांडुरंगाला तुमच्या साठी आडवुन ठेवते असे माऊली सांगतात.


४८०
विष्णुवीण मार्ग घेसील अव्यंग ।
तरी वायांचि सोंग करणी तुझी ॥१॥
येऊनि संसारा वायांचि उजिगरा ।
कैसेनि ईश्वरा पावशी हरी ॥२॥
नरदेह कैचेम तुज होय साचें ।
नव्हेरे हिताचें सुख तुज ॥३॥
ज्ञानदेव म्हणे शरण रिघणें ।
वैकुंठींचें पेणें अंती तुज ॥४॥

अर्थ:-
एका श्रीहरिला सोडून इतर मार्ग कांही व्यंग न देता आचरलेस तरी तो तुझा खटाटोप फुकट सोंग होईल. जन्माला येऊन असे फुकट परिश्रम केलेस तर श्रीहरिला कसा प्राप्त होशिल. हा मनुष्य जन्म कायम टिकणारा आहे काय ? तसेच देहात होणारे विषयाचे सुख कसे हित करेल? म्हणून श्रीहरिला अनन्य भक्तीभावाने शरण जाऊन वैकुंठपद प्राप्त करून घे. असे माऊली सांगतात.


४८१
कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे ।
न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥
भोंवया पाहातां न दिसें जाणा ।
आयुष्याची गणना सात दिवस ॥२॥
डोळां घालोनियां बोट चक्र जें पाहावें ।
न दिसतां जाणावें पांच दिवस ॥३॥
नासाग्राचें अग्र न दिसे नयनीं ।
तरी तेंची दिनीं म्हणा रामकृष्ण ॥४॥
ज्ञानदेव म्हणे हें साधूचें लक्षण ।
अंतकाळी आपण पहा वेगीं ॥५॥

अर्थ:-

कानात बोटे घालून नाद ऐकू आला नाही की, आपल्या आयुष्य नऊ दिवस उरले आहे असे समजावे.भुवयांकडे नजर टाकून त्या दिसल्या नाहीत म्हणजे आपले आयुष्य सात दिवस उरले आहे असे समजावे.डोळ्यात बोटे घालून चक्र न दिसल्यास आपले आयुष्य पाच दिवस उरले आहे असे समजावे. नाकाचा शेंडा न दिसल्यास त्याच दिवसी मृत्यु आहे असे समजुन रामकृष्ण नामाचा जप करावा.ही साधूनी सांगून ठेवलेली लक्षणे आहेत याचा अनुभव अतंकाळी ज्याचा त्यांना घ्यावा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


४८२
जंववरिरे तंववरी जंबुक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥
जंववरिरे तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी देखिलीं नाहीं बाप ॥ध्रु०॥
जंववरिरे तंववरिरे मैत्रत्त्व संवाद ।
जंववरी अर्थेसि संबध पाडिला नाहीं बाप ॥२॥
जंववरिरे तंववरी युध्दाचीं मात ।
जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥३॥
जंववरिरे तंववरी समुद्र करी गर्जना ।
जंव अगस्ती ब्राम्हणा देखिलें नाहीं बाप ॥४॥
जंववरिरे तंववरी बांधी हा संसार ।
जंव रखुमादेविवर देखिला नाहीं बाप ॥५॥


४८३
चोराचियासंगे क्रमितां पैं पंथ ।
ठकूनियां घात करितील ॥१॥
काम क्रोध लोभ घेऊनियां संगें ।
परमार्थासि रिघे तोची मूर्ख ॥२॥
बांधोनियां शिळा पोहूं जातां सिंधू ।
पावें मतिमंदु मृत्यु शीघ्र ॥३॥
देहगेहभ्रांती सोडुनीया द्यावें ।
साधन करावें शुध्द मार्गे ॥४॥
ज्ञानदेव ह्मणे तरीच साधेल ।
नाहीं तरी चळेल मध्यभागीं ॥५॥

अर्थ:-

चोराबरोबर केलेल्या यात्रेत फसवणुकीचा संभव असतो. काम क्रोध व लोभ हे सोबती बरोबर घेऊन परमार्थ करण्याला निघालेला मनुष्य महामुर्ख आहे असे समजावे.धोंडा गळ्यात बांधून समुद्रात पोहून जाण्याची इच्छा करणारा मुर्ख मनुष्य लवकर मृत्यूला प्राप्त होतो. याप्रमाणे वरील चोराची संगती करणारा मनुष्य नाश पावतो. याकरिता घरदार व देह या सर्वांची भ्रांती टाकून शुद्ध परमार्थ मार्गाचे साधन करावे. नाही तर मधेच भलत्या मार्गाला जाईल, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.


४८४
वेदवाणी चांग स्मरतां स्मरण नित्य
नारायण ह्रदयीं वसे ॥१॥
तेथिल गव्हर जाणता विरुळा ।
ब्रह्मीं ब्रह्मकळा साधुमुखें ॥२॥
जाप्य जप होम बुध्दि विधान हरि ।
ह्रदयीं श्रीहरि न कळे मूढा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे श्रीहरि ह्रदयस्थ ।
ऐसी आहे भाष्य वेदशास्त्रीं ॥४॥

अर्थ:-

वेदानी नारायणाचे स्मरण करायवा सांगितले तर तो तसे करणाऱ्याच्या हृदयात कायमचा स्थापित होतो.असे जाणणारे विरळच आहेत की जे साधुमुखातुन ब्रह्माची ही ब्रह्मकळा ऐकावी लागते. जपजाप्य, होम, विधी, विधान केल्यांने तो हरि हृदयाला कळतो हे मुढाना कळत नाही. तसे केल्याने तो हरि हृदयस्थ होतो आशी भाषा वेद वापरतात असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


४८५
कामारिकरुणा करुर्णावव झोंबे ।
करुनिया बिंबे अलिप्तपणें ॥१॥
कामधाम हरि ब्रह्मार्पणव करी ।
आपणाचि कामारी होये हरी ॥२॥
चक्षुपक्षपादयुगळ अधिष्ठान ।
हरिविण करुं नको ॥३॥
ज्ञानदेव सोहं मंत्र तंत्र ध्यान ।
मनाचे उन्मन हरिपायीं ॥४॥

अर्थ:-

करुणेचा समुद्र असलेला श्रीहरि. आपल्या भक्तावर दया करुन अलिप्तपणाने त्यांच्या हृदयांत बिंबतो. भक्तांनी आपले कामधाम भगवंताला अर्पण केले असल्यामुळे श्रीहरिच भक्ताचा नोकर होऊन त्यांची सर्व कामे करत असतो.असा तो भगवान उदार व ऐश्वर्यवान आहे. म्हणून आपल्या चक्षुरादि इंद्रियांना अधिष्ठान एक श्रीहरिच करा.सर्व इंद्रियांना त्याच्याकडेच लावा. त्याशिवाय तुम्ही काही बोलूच नका. माझे मंत्र, तंत्र, जप, ध्यान वगैरे सर्व कांही परमात्माच आहे. त्यामुळे माझ्या मनाचे उन्मन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


४८६
नाद भेद सिध्द अवघेचि विरुध्द ।
जेणें तुटे भेद तेंची जपे ॥१॥
सुताचिये गुंजे सुतचि पैं माजे ।
हरिचरणांबुजें निवडिती ॥२॥
रुक्मिणीचा नाहो हाचि पैं उगवो ।
प्रपंच ते वावो जावो परतां ॥३॥
ज्ञानदेवा चित्त हरि गोत वित्त ।
विज्ञान उचित ज्ञानघनें ॥४॥

अर्थ:-

भगवत्प्राप्तीला योग शास्त्रांत नाद, भेद, सिद्धी, वगैरे साधने सांगितली असली तरी ती भोळ्या भाविकांना अनुकुल नसून उलट प्रतिकूल आहेत.बाबानो ज्या श्रीहरिच्या नामाने संसार बंध तुटतो त्या श्रीहरिच्या नावाचा जप करा.सुताच्या गुंडीत आत बाहेर सुताशिवाय दुसरे कांही नसते. त्याप्रमाणे संसाराचा विचार केला असतां सर्वातील सार श्रीहरिचे चरण कमलच आहे.असा श्री हरि लक्ष्मीचा पति हेच ज्याने आपल्या मनाचे स्थान केले आहे. तो मनात असे म्हणतो की, हा असार प्रपंच नष्ट होत असला तर होवो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझ्या चित्ताचे गणगोत ज्ञानघन जो श्रीहरि तोच असणे उचित आहे.


४८७
चिंतिलें अपैसें पाविजे सायासें ।
तरी कामा नसे सायास या ॥१॥
देखणें स्वप्नींचे भुररें मायेचें ।
भ्रमित देहाचे हरिविण ॥२॥
आयुष्याची पेंठ संसाराचे तट ।
गुरुविण वाट कैची रया ॥३॥
त्रिपुटिसी वर्ते वैकुंठ सरतें ।
प्रेमेंविण भरितें कैसें येत ॥४॥
ज्ञानदेवि घर केलें पै सपुर ।
संसार येरझार हरिचरणीं ॥५॥

अर्थ:-

मायाकार्य अनात्म पदार्थाचे चितंन केले असतां म्हणजे त्याची उपेक्षा केला असता ते जर सहजासहजी प्राप्त होत असतील तर त्याकरिता मोठे कष्ट करण्याचा गरज नाही. असे असले तरी ते अनात्म पदार्थ स्वप्नातील पदार्थाप्रमाणे आहेत. परंतु मायायोगाने भुरळ पडल्यामुळे देहाच्या ठिकाणी सत्यत्वाने ते भासत असतात. म्हणजे देहाला सुखोपभोगी वाटत असतात. त्यातून सुटण्याची वाट सद्गुरु वाचून कोण दाखविणार. संसाराच्या तटात आयुष्यभर साह्य करणारा दुसरा कोण आहे. तो श्रीहरि जागृती स्वप्न व सुषुप्ती या त्रिपुटीत नित्य आहे. पण त्याच्या ठिकाणी प्रेम असल्या शिवाय अंतःकरणात प्राप्ती कशी होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी माझ्या शरिरात श्री हरिचे मोठे स्थान करुन जन्ममृत्युरुप संसाराची येरझार हरिचरणी संपवली.


४८८
दीव दीपिका शशी तारा
होतुका कोटिवरीरे ।
परि नसरे निशि नुगवे दिवसु
दिनकरनाथें जियापरीरे ॥१॥
नुध्दरिजे नुध्दरिजे नुध्दरिजे
गोपाळेंविण नुध्दरिजे ॥ध्रु०॥
नगर भ्रमतां जन्म जावो
परि प्रवेशु एक्या द्वारेरे ।
तैसा यजिजो भजिजो पूजिजो
परि उकलु नंदाकुमरुरे ॥२॥
सर्वावयवीं शरीर सांग परि विरहित
एका जिवेरे ।
तैसा धिक तो श्रोता धिक तो वक्ता
जो वाळिला विठ्ठलदेवेरे ॥३॥
गळित शिर हें कलेवररे
उदकेंविण सरिता भयंकररे ।
रविशशीविण अंबर तैसें हरिविण
जिणें असाररे ॥४॥
अंत:करणीं रुक्मिणीरमणु परि
त्या श्वपचाहि स्वरुपा बंधन
नघडें नघडेरे ।
येरु यति होकां भलतैसा परि तो
भव अगाडीहुनि न सुटे न सुटेरे ॥५॥
शिखिपक्षींपत्रींडोळे जेंवि अकाळ
जळद पडळेरे ।
तैसीं गोकुळपाळकबाळेंविण
कर्मे सकळेंविफ़ळेरे ॥६॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे
सकळ उपाय परि अपायरे ।
जंव तमाळनीळ सांवळा ह्रदयीं
ठाण मांडूनि न र्‍हायेरे ॥७॥
मी उत्तम पैल हीनु भूतीं
द्वेषाद्वेष ठेलेरे ।
केलोंनि कर्मे उफ़कां निफ़जे सुख
तें दुरी ठेलेरे ॥८॥
आतां असोत हे भेदाभेद
आम्ही असों एक्या बोधे रे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल
निवृत्तिमुनिरायप्रसादेरे ॥९॥

अर्थ:-

लहान मोठे दिवे, चांदण्या, चंद्र असे कोट्यवधी जरी आकांशात उदयाला आले तरी त्या योगाने रात्रीचा नाश होत नाही व दिवसही उगवत नाही. पण तोच जर एक सूर्य उदयाला आला तर मात्र रात्र नाहीशी होऊन दिवस येतो. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेशिवाय इतर देवतेचा कांही एक उपयोग नाही. कारण त्या गोपाळाच्या कृपेशिवाय जीवाचा उद्धार केंव्हाही होणार नाही. एखांद्या शहराला चहुकडून तट असून आंत जाण्यास एकच दार आहे. ते दार सोडून इतर सर्व शहर फिरत राहिला तर त्याला त्या शहरातून बाहेर पडता येणार नाही. त्याच प्रमाणे एक श्रीकृष्ण परमात्मा सोडून इतर देव देवतांचे भजन पुजन जरी केले तरी त्यांपासून संसारदुःख निवृत्ती होणार नाही. एखाद्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे. पण त्यांत जर जीव नसल तर ते सर्व व्यर्थ आहे. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलाचे स्मरण सोडून श्रवण करणारा श्रोता व तसेच करणारा वक्ता हे ही व्यर्थच होत. डोके नसलेले कलेवर, पाण्यावीण कोरडी नदी हे भयंकर आहेत. चंद्रसुर्याविण जसे आकाश तसेच त्या हरिविण जिवन आहे. अंतःकरणात रक्मिणीचा पती असेल तर कसलेच बंधन पडत नाही. व जरी उच्च यातीत जन्मला व मुखी हरिनाम नसेल तर तो ह्या संसाराच्या भानगडीतुन बाहेर पडत नाही. मोरपिसाऱ्यावर बरेच डोळे असतात पण त्यानी पाहता येत नाही. जसे अवकाळीचे मेघपटल काही कामाचे नाहीत.तसेच केलेल्या कर्माला त्या गोपाळ नामाचे वलय नसेल तर ते फोल ठरते. यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सगळे त्याच्या प्राप्तीचे उपाय अपाय ठरतात.जेंव्हा तो घननिळ कृष्ण त्या हृदयात स्थापित नसतो. मी उत्तम व बाकी हीन ही भावना मनात ठेऊन भूतमात्रांचा द्वेष करुन केलेली कर्मे निर्फळ होतात. व सुख दुर जाते. निवृत्तीनाथांच्या प्रसादाने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचा बोध घेतला तर सर्व भेदाभेद गळुन पडतात असे माऊली सांगतात.


४८९
दुर्लभरे दुर्लभरे दुर्लभु संसारु कां नेणा ।
आहारनिद्रेसाठीं दवडितां माणुसपणा ॥१॥
आड न विहिरी बावि न पोखरणी ।
सरिता ना सागर कल्पतरु रानोरानीं ॥२॥
बा याची खुण ज्ञानदेवो जाणे ।
तयाचें करणें तै अधिकचि होणें ॥३॥

अर्थ:-

मनुष्य जन्म दुर्लभ आहे.तो नरदेह आहार निद्रेसाठी वाया का दवडत? आड, विहिर, पाय-या असलेली विहिर तळी, नदी समुद्र वगैरे पाण्याचा उपयोग न करता वाढणारे कल्पवृक्ष काय रानोमाळ येत असतात बीनकामाची झाडे वाटेल तसल्या वाईट जमीनीत देखील पावसांच्या पाण्याने वाढतात. अशी ही न्यायी ईश्वराचीच हे वर्म मला कळले. असे माऊली सांगतात.


४९०
धरसील तरी हाति लागे बापा ।
सोडसील तरी जाईल दिगंतरा ॥१॥
जतन करिरे जिवाचिया जिवा ।
सांगतसे ठेवा जुगादीचा ॥२॥
निवृत्तिनिरोप बुझे आपें आप ।
आधि पुत्र मागें
बाप जन्में रया ॥३॥

अर्थ:-

ज्ञानाच्या साह्याने परमात्म्याला धरावयास गेला तर तो परमात्मा तुझ्या हाती लागेल व धरण्याचा प्रयत्न सोडून दिला तर तो दूर जाऊन तुला सापडणार नाही. हे मी तुला माझ्या ठिकाणचे गुह्य ज्ञान सांगतच आहे म्हणून तो ठेवा जीवापेक्षाही आवडीने जतन कर. माझ्या श्रीगुरु निवृत्तीरायाचा हा निरोप तुझ्याठिकाणी ठसला तर अगोदर पुत्र नतर बाप म्हणजे प्रथम ब्रह्मात्मबोध व नंतर ब्रह्मप्राप्ती होईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.


४९१
हे पृथ्वी तुझे लंकेसि आधारुरे रावणा
तें त्त्वां अपराधें बाधकेविण आणिली ।
नेणो किती वानर पद्यें देखतांचि
रविशशी गिळिलेरया ॥१॥
विरोध न कीजे विरोध न कीजे पाडू
न पाहातां मागें करिसि तें नव्हेरे रावणा ।
प्राणुचि पारखा जालासे गव्हारा जिणें
केंवि सिध्दि जाईलरे रया ॥२॥
दों भूतांचि दशा जाणोनिरे रावणा
तयाचा आगम सागरि रिघाला ।
तयाच्या गडे गड मेळउनी सापें
डाव शिळीं बाधला ॥३॥
हनुमंत वायूचेनि मिसें तो
आधींची पाईकी करी ।
तयाचेनि रोखें हीं रतलीं पंचभूतें
उभा राहासि कास्यावरिरे रावणा ॥४॥
आकाश तेंचि अवकाश भीतरि
आत्माराम आवेशला तुजवरी ।
तया म्हणोनि बाणजाळ घातलें
वरी येरी येरें कवळी
वरच्या वरीरे रावणा ॥५॥
आतां तुज देहो कैचारे रावणा
आत्मा तोचि राम जालारे ।
बापरखुमादेविवर विठ्ठले
चरेना जुंजतां तें काये केलेंरे रया ॥६॥

अर्थ:-

अरे, रावणा जी पृथ्वी म्हणजे सीतादेवी तुझ्या लंकेला आधार आहे, तिला तं अपराधावाचून का आणलीस ! तुला कल्पना नाही. इतकी वानर पद्म आली आहेत पाहा. त्या वानरपद्यातील मारूती नावाच्या एका वानराने जन्माला आल्याबरोबर सूर्य पाहिला की लागलीच त्याला गिळून टाकले.मग चंद्राची काय कथा. याकरिता रामाशी विरोध करू नकोस तू आपली योग्यता न पाहता रामाच्या पश्चात तिला चोरून आणलीस हे बरे नव्हे रे रावणा ! मुर्खा, तुझा प्राणच तुला पारखा होऊन जाईल. मग तुझे जीवित कसे टिकेल याची शंका आहे रे रावणा.अरे रावणा, पुढे सांगितलेल्या दोन भूतांची काय दशा झाली ती पाहा. अरे त्या रामचंद्राचे सैन्याचे आगमन सागराजवळ झाल्याबरोबर त्यांनी दगड जमा करून तत्काळ त्या दगडाचा पूल बांधला रे. याप्रमाणे एक जलतत्त्वाची व्यवस्था झाल्यावर, वायु तत्त्वाची देवता मारूती हा आधीच रामाचा सेवक बनला आहे. त्या वायूच्या आधीन बाकीच्या भूतांना त्याच्या समोर उभे तरी राहता येईल का?अवकाश व्यापून राहिलेल्या आत्मारामाच्या अवेशापुढे तू मारलेले बाण त्याला कसे लागतील ते वरच्यावर नष्ट होतील. हे रावणा तुझ्या देहातील चैतन्य स्वरुप आत्मा रामच आहे. तेव्हा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यानी तुझी काय अवस्था केलीत ते तू बघ. असे माऊली सांगतात.


४९२
मी माझे म्हणतां संसारीं गुंतलें ।
तंव परत्र परतेंचि राहिलें ।
हे ना म्हणउनि तया
झोंबिन्नले तंव सिध्दासिध्द हातींचें गेलें ॥१॥
पुढीला चुकला मागिला मुकला
तैसे परी जाली मातें ।
आपआपणातें गोंवीत बुध्दीं दोष
ठेवी कवणातें रया ॥२॥
आतां एक बुध्दि आठवली
गेलें तें परतेना मागुतें ।
बाप रखुमादेवीवराविठ्ठ्लु
ध्याईजे तरी सकळिक
होईल अपैतें ॥३॥

अर्थ:-

मी माझे म्हणत जीव संसारात गुंततो, तर परमात्म वस्तु दूरच राहिली. हे ना म्हणून म्हणजे देह आत्मा म्हणून त्या देहासी तादात्म्य केले तर नित्य, सिद्ध, सुखरुप परमात्मा हातचा गेला. म्हणून पुढच्या परमात्मवस्तुला चुकला व मागिलाला मुकला, म्हणजे देहाचा नाश झाल्यामुळे देहरुपी आत्म्यालाही मुकला, अशी माझी स्थिती झाली आहे. कारण आपल्याच बुद्धीच्या वेडेपणामुळे आपणच आपले गुंतवून घेतले आहेत. त्याचा दोष दुसरे कोणाला द्यावा. आता मनांत असा विचार आला आहे तो असा की, झालेली गोष्ट होऊन गेली, ती आता परत येणार नाही. तेव्हा पुन्हा प्राप्त झालेल्या देहांत माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने त्याचे ध्यान करत राहावे. मग सर्व प्राप्त होईल असे माऊली सांगतात.


४९३
मृगजळाचा जळीं चाळिसि जळचरें ।
कैचें जळ तेथें कोठें मत्स्यरे ॥१॥
नाथिलिच खटपट करील किती ।
गगनींचीं सुमनें तुरंबिसि मस्तकीं ॥२॥
वांझेचिया सुता रचसिल मारे ।
कैचा पुत्र तेथें कायि संव्हारे ॥३॥
कोल्हैरीचे वारु आणिसिल सावया ।
कैचा राऊत कोणा जिंकिसील रया ॥४॥
ऐसीं नाथिलींचि नाटकें आचरसी किती ।
ज्ञानदेव म्हणे सहजें निवृत्ति ॥५॥

अर्थ:-

मृगजळात जळचर चाळुन घेण्यास जातात पण त्या पाण्यात काय मासे असतात का? आकाशाच्या फुलांना वास कुठे किंवा ती डोक्यात कशी घालावी? ही वाऊगी खटपट नाही का? वांझेच्या मुलास मारण्यास मारेकरी आणले पण तो मुलगाच नाही मग ते कोणाला मारतील. सैनिकाला बसण्यास कुंभाराने बनवलेला घोडा आणला तर तो युध्द कसे लढेल? ही अशी किती खटपट करशील नाटके करशील त्याने काही मिळणार नाही त्या पेक्षा श्री गुरु निवृत्तीनाथांना शरण जा असे माऊली सांगतात.


४९४
मृगजळाचे डोहीं मारिसील जळचरें ।
कैचें तेथें मत्स्यरे ॥१॥
लटकीच खटपट लटकीच खटपट ।
लट्कीचि खटपटरे साळोबा ॥२॥
वांझेचिया पुता घालसिल मारे ।
तेथें कैचा पुत्र मृत्यु कोणा संहारे ॥३॥
रोहिणीचे वारु आणिसी सावया ।
कैचे वारु काय जुंझसी रया ॥४॥
स्वप्नींचिया धना बांधिसी कळांतरा ।
कैंचें धन काय होसी व्यवहारा ॥५॥
निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव म्हणे ।
स्वप्नींचें सुख तें साळया जाणे ॥६॥

अर्थ:-

बावळटपणाने मृगजळाचे डोहांत मांसे मारू लागला तर तेथे पाणीच नाही मग मांसे कोठले. ही सगळी खटपट फुकट आहे.वांझेला मुलगाच नाही त्याला कोण मारणार.मृगजलाचे घोडेच नाहीत तर त्या घोड्यावर बसून कोणाबरोबर युद्ध करणार. स्वप्नांतले धन ते धनच नाही. तर त्या धनांवर व्यवसाय काय करणार. स्वप्नातले सुख ते सुखच आहे असे बावळट मनुष्य समजतो असे निवृत्तिरायाच्या कृपेने माऊली सांगतात.


४९५
वोजावलिया वोढी ।
वोढी पाडीजे ते नाहीं ।
ऐसें विचारुनि पाही आपुला मनीं ।
मग राहिजे सुतत्त्व निर्वाणीं ॥१॥
दुर्लभ दुर्लभ संसार त्यात
दुर्लभ माणुसपणा ।
ये जन्मीं नोळखसी ।
पशु होउनी जन्मसी ।
मग तुज सांगेल कवण रया ॥२॥
जंव देहीं आहे देवो तव
या वेदे त्याच्या लाह्या ।
मग तुज रात्री जाईल जडभारी ।
बापरखुमादेविवरु विठोजी
पंढरपुरीं ।
तो वोळगे वोळगे जन्मवरी ॥३॥

अर्थ:-

परमात्म स्वरुपाचे प्राप्ती करिता ओढ घेतली तर संसारातल्या वोढीप्रमाणे ती दुःखात पाडीत नाही. असे मनाला सांग मोक्षरुप तत्वाच्या ठिकाणी आनंदाने राहा. या संसारात मनुष्य देह प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. त्यातही मनुष्यपणा फार दुर्लभ आहे. अशा मनुष्य जन्मांत परत्म्याला ओळखून घेतले नाहीस तर पुढच्या जन्मी पशुच्या योनीला तुल जावे लागेल. त्याठिकाणी तुला आत्मज्ञानाचा उपदेश कोण करणार. अरे, बाबा जोपर्यंत तूं या मनुष्य देहांत आहेस. तोपर्यंतच मनाला परमात्म चिंतनाची गोडी लावून त्याची प्राप्ती करुन घे. नाही तर मनुष्य देह गेल्यावर तुलाही अज्ञान रात्र उलंघन करणे फार जड जाईल. येवढयाकरिता माझे पिताव रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल त्यांचा जन्मभर अनन्य भावाने उपासना कर असे माऊली सांगतात.


४९६
आनंदुरे आजि आनंदुरे बाह्य
अभ्यंतरी अवघा परमानंदुरे ॥१॥
एक आणि दोन तीन
चारी पांच सहा ।
इतुकें विचारुनि मग परमानंदीं रहा ॥२॥
सातवा अवतार आठवा वेळोवेळां ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल जवळा ॥३॥

अर्थ:-

मी अंतरबाह्य आनंदमय झालो आहे व सर्वत्र आनंदी आनंदच आहे. आम्ही परमानंदी राहण्यासाठी जी साधने वापरली ती म्हणजे एक परमात्मा,दोन जीव, तिसरे शरीर, चौथा धर्म, अर्थ, काम, मोक्ष पाचवे पाच कोष, सहावे सहा शास्त्रे होत. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या जवळ जाण्यासाठी त्यांचा सातवा राम व आठवा कृष्ण या अवतारांचे सतत चिंतन करा असे माऊली सांगतात.


४९७
निर्जिवां दगडांची काय करिसिल सेवा
तो तुज निर्देवा देईल काय ॥१॥
कवणे गुणें भुली पडली गव्हारा ।
तीर्थाच्या माहेरा नोळखिसी ॥२॥
अष्टोत्तरशें तीर्थे जयाच्या चरणीं ।
तो तुझ्या ह्र्दयीं आत्मरामु ॥३॥
देह देवळीं असतां जासी
आना तीर्था ।
मुकलासि आतां म्हणे ज्ञानदेवो ॥४॥

अर्थ:-

अरे वेड्या हृदयरुपी मंदिरात परमात्मा वास करीत असताना त्याला विसरुन हा दगडच देव आहे. अशा निश्चयाने त्याची सेवा काय करीत बसला आहेस.परमात्म ज्ञानाचा विचार न करता तू जर देहच मी आहे असे मानू लागला तर निर्दैवी असलेल्या तुला दगड काय देणार. तुला काय भूल पडली हे काही कळत नाही. मुख तीर्थाचि माहेर असलेला जो परमात्मा त्याला तुं का ओळखत नाहीस. एकशे आठ तीर्थ ज्याच्या चरणा जवळ आहेत असा परमात्मा तुझ्या हृदयातच आहे. असा जवळच परमात्मा असताना तु उगाच तीर्थभ्रमण करत राहिलास तर तु त्याला मुकशील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


४९८
या पिकलिया अमृताची गोडी ।
केंवि जाणती इतर जन ।
वाचा बोलिजे सेवितां निवे
प्राणुगे माये ॥१॥
सुखाचा साचा केंवी बोलिजे ।
जिवातें केंवि सुईजे ॥२॥
अमृतकराचे रश्मी चकोर सेविती ।
तें सुख कोण कैसें बोलिजे रया ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु भेटलिया ।
तें सुख कोण कैसें सांगिजे रया ॥४॥

अर्थ:-

ह्या परमार्थ अमृतची पिकलेला रसाची गोडी काय वर्णवी. ते इतर लोक कशी जाणतील? पण आधिकारी मुखीतुन ऐकली प्राणची यातायात निवते. हा सुखाचा विचार अनाधिकाऱ्याला कोण सांगेल. चंद्रकिरणातुन पाझरणारे अमृत चकोर पितात ते त्यांचा अनुभव कसा काय सांगु शकतील. तसेच ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाच्या दर्शनामृताचे आहे. ते सुख मी कसे सांगु शकेन असे माऊली सांगतात.


४९९
चुकलीया चुके ।
आपादिलिया भलें होय ।
तरी दु:ख दारिद्र भोगी कवण ।
तरि अवघेंचि विश्व कां
सुखी नव्हे रया ॥१॥
म्हणोनियां भ्रम सांडी नाथिला ।
जें जें कांहीं करीन
म्हणसी होणार तें होईल ।
न होणार तें नव्हेल ।
तूं फ़ुकाचि नाडसी रया ॥२॥
होणें न होणें निढळींच्या अक्षरीं ।
वोरबार करसील काह्या ।
पाईक वोळगे अठैप्रहर सेखीं
दैव तंव आणील ठायां रया ॥३॥
देखणें डोळा ऐकणें कानीं ।
जिव्हे कडु रस मधुर वाणी
श्वासोश्वास हे जयाची करणी ।
अनुभवी जाणती ज्ञानी ॥४॥
नाथिलाचि धिंवसा करुं पाहासी ।
दुराशा जवळि असतां ।
आकाश झोंबतोसी ।
आतांचे चिंतिलें आतांचि
न पाविजे ।
पुंढें कोण जाणे
काय पावसी रया ॥५॥
उपजत देहे मृत्युमुखीं पडलें ।
मी माझें करिसी किती ।
उठी उठी जागे आपुलिया हिता ।
बापरखुमादेविवराविठ्ठलाची
करी भक्ति रया ॥६॥

अर्थ:-

पूर्व जन्मांत सत्कर्म करण्यास जे चुकले त्यांना सुख प्राप्त होत नाही. आणि ज्यांनी पूर्व जन्मांत सत्कर्म संपादन केले असेल त्यांचे चांगले होते. असे जर मानले तर ईश्वर काही लोकांना दुःख दारिद्रयादि भोग का देतो. सर्वच विश्व सुखी का ठेवीत नाही. या प्रश्नाला कांही उत्तरच नाही असे होईल शिवाय ज्या ईश्वराला आपण दयाघन असे म्हणतो. त्याच्याच ठिकाणी विषमत्व व निष्ठुरत्व असा दोष दिल्यासारखा होईल. परंतु याचे समाधान असे आहे की तो न्यायी आहे. म्हणून तो जीवाच्या कर्मानुसार त्याला सुख दुःख देतो. म्हणुन तू भ्रम टाकून मी हे हे करीन ते होईल किंवा नाही होणार ही त्याची इच्छा असेल. परंतु तू त्याचा अभिमान का बाळगतोस होणे किंवा न होणे हे प्रारब्धानुसार असून त्यासाठी खटाटोप का करतोस. जसे अष्टोप्रहर काम करणाऱ्या नोकरास ठरलेला पगारच मिळतो. डोळ्यांनी पहाणे,कानानी ऐकणे, जिव्हेने गोड कडू रस चाखणे, वाणीने बोलणे एवढेच नाही तर आपले श्वासोश्वास ईश्वरच्छेने होत असतात हे ज्ञानी लोक जाणतात. दुराशा बाळगून केलेला व्यवहार म्हणजे आकाशाशी झोंबणे आहे. म्हणून तू जे इच्छशील ते तुला मिळेल पण ते काय मिळेल ते सांगता येत नाही. उपजणारा देह मृत्युमुखी जाणार तरी माझे माझे का करतोस हे टाकून आपल्या हितासाठी जागा हो व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भक्ती कर असे माऊली सांगतात.


५००
सुंदरु राजसु सकुमारु बिंदुलें
न साहे ज्यासी ।
स्वबुध्दि अळकारला परा ग्रासूनि
ठेला मौन्य पडलें या शब्दांसी ।
पाहों जाय तंव पाहाणेंचि
ग्रासी नवलावो काय या सुखासी ।
न अवलोकवे मना अवधारुनि
ध्यानी आतां न विसंबे
तुझिया पायासीं ॥१॥
हेम अळंकारु भेदु हा काय
सगुणीं निर्गुणीं आहे तैसे गुण ।
गुळाचिनि अंगें गोडीपणें पाहातां न
निवडे आतां मी काय करुं ॥२॥
म्हणौनि मन समावेश करणें
तुझें तुजमाजीं घालणें येणें तुज
अळंकारणें मध्यमणी मन चतुष्ट पदीं
पदक तेंचि बैसका चोखट
मन मनीं रुतलें ठेलें ।
आवडीचेनि अभ्यासें कोंदलिया
दाही दिशा म्हणोनि प्रीति
धरी सगुणीं रया ॥३॥
उभारलेनि सिडें जेथें स्वराज्य तारुं
न बुडे ऐसें घडें वाडें
कोडें तेचि कीजे ।
जेथें मनासीं कवण स्वप्नीं
राज्य रक्षी जाण ।
आपुलें पारिखें नेणिजे
म्हणोनियां आतां ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठला
शरण जाईजे रया ॥४॥

अर्थ:-

संदर, राजस, सुकुमार बिंदुले म्हणजे सगुण इत्यादि भाव ज्याच्या ठिकाणी सहन होत नाहीत. तो परमात्मा स्वरुप ज्ञानाने अलंकृत असता परावाणीलाही ग्रासुन टाकतो त्याचे वर्णन श्रुति करू गेली असता तिला मौन धरावे लागते. त्याला पाहण्यास जो जातो तो त्याच्याहून वेगळा राहात नाही. त्या परमात्म स्वरुपाचा काय प्रकार सांगावा. त्याला डोळ्यानी पाहाता येत नाही. मात्र तो निर्विकार परमात्मा भक्तावर अनुग्रह करण्याकरिता सगुण साकार झाला आहे. त्याला मी केव्हांही विसंबणार नाही. सोने व त्याचे अलंकार यांच्यात शब्दमात्र भेद आहे. वास्तविक ते दोन्ही एकच आहेत. त्याप्रमाणे सगुण व निर्गुण हा असा शब्दमात्र भेद आहे, वास्तविक दोन्ही एक परमात्माच आहे. गुळ व त्याची गोडी यांच्यात जसा भेद करता येत नाही. त्याप्रमाणे सगुण निर्गुणात भेद नाही. आता याला मी काय करू अशा तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी मन लावून एक होणेच चांगले, यामुळे तुला एक प्रकारचा अलंकार घातल्यासारखे होईल. हृदय हा मध्यमणी व अंतःकरण चतुष्ट्य ही पाय ठेवण्याची व बसण्याची जागा त्याठिकाणी स्वच्छ असा मनरुपी मणी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी गुंतून राहिला आहे. आवडीने अभ्यास केल्यामुळे ते परमात्म तेज दाही दिशेला कोंदून गेले म्हणून अरे बाबा तू सगुण स्वरुपांच्या ठिकाणी प्रेम धर. अशा रितीने सगुण भक्तीचे निशाण ज्याच्यावर लावलेले आहे असे ब्रह्म स्वराज्यरुप तारु कधीही बुडणार नाही. म्हणून कौतुकाने व प्रेमाने सगुण भक्ती कर. मनाने त्या संसार स्वप्नाचे रक्षण करु नकोस. आपले कोण हे नीट पारखुन घे तेंव्हा तुला कळेल माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाशिवाय शरण जाण्यास जागा नाही असे माऊली सांगतात.


५०१
उपजलें देह बाळपणें गेलें तुझें
तुजचि देखतां तारुण्यपण मत्सरें
आटलें आतां वृध्दपणीं
कायिसि अवगणी रया ॥१॥
कवण्यागुणें चुकी साठीं पडली
कासया श्रमलेंसि गव्हारा ।
सिध्दिचि सांडूनी आनेआन जल्पसी
तरी न चुकती तुझ्या येरझारा रया ॥२॥
अजागळाचे अजस्तन ।
तेथें कैचें अमृतपान ।
तैसें काय करिसी वाउगें
चिंतन परपीडा जागृती कारण ।
तरी तयाचिये चरणीं स्थिर
ठेवीं मन रया ॥३॥
जीवनजळीं ब्रह्मकमळ विकाशलें ।
आतां पाहे पां तयाचा मेळुरे ।
ऐसी जीवीं चिंता ।
तुजवांचूनिया कवण करील
आमुचा सांभाळु रया ॥४॥
जीवनजळीं ब्रह्म कमळ विवळे
तैसे वाट पाहतां
सिणले माझे डोळें ।
नको नागवे हा संसार नको
तूं तंव निवांत निराळा रया ॥५॥
ऐसा जगाचा जीवनु अमूर्त
मूर्ति लेईलों डोळां ।
बापरखुमादेविवराविठ्ठला
वांचूनि कोण पुरविल
सोहळा रया ॥६॥

अर्थ:-

जेंव्हा जन्मलास ते बाळपण होते.मत्सराबरोबर तरुणपण आले. पण आता वृध्दापणात कसला माज दाखवत आहेस. कोणत्या गुणाच्या चुकी मुळे हे गांवढळा असा भ्रमित झालास. तु आत्मरुप असुन त्याला ओळखत नाहीस व इतर जप करतोस तेंव्हा तुझ्या जन्ममरणाच्या खेपा चुकायच्या नाहीत. शेळीच्या गळास्थनात कोठले दुध असणार? त्यामुळे वाऊगे चिंतन न करता आत्मरुपाच्या चरणी स्थिर हो. ह्या जीवनरुपी पाण्यात ते आत्मब्रह्म कमळ उगवले आहे. त्याचा सांभाळ कोण करील हा विचार हे जीवा कर. जीवनरुपी पाण्यात आत्मब्रह्मरुप कमळ विकसन पावेल ह्याची वाट पाहत माझे डोळे शिणले. ह्या उघड्या नागड्या संसारापासुन तु निवांत निराळा रहा. असा जगाचे जीवन असणारा निर्गुण असणारा हा परमात्मा डोळ्यानी सगुण रुपात पाहिला. हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती विठ्ठलाशिवाय हा सोहळा कोण पुरवणार असे माऊली सांगतात.


५०२
चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं ।
नरदेहा ऐसें भांडवल पावलासी ।
जतन करीरे गव्हारा ।
भजे न भजे या संसारा ।
बीज सांडूनि असारा वायां झोंबतोसी ॥१॥
हातींचिया लागीं भूमि चाळितासी ।
आप नेणतां तूं पर काय
चिंतिसी मन एक स्वाधीन
तरी खुंटलें साधन ।
सर्व सुखाचें निधानहरि पावसी रया ॥२॥
तृणें पशु झकविले ते क्षीरातें ।
तैसा विषय पाल्हाळें निज चुकलासी ।
कोटि युगें जन्मवरी ।
येतां जातां येरझारीं ।
दु:ख भोगिसी दुर्धर रया ॥३॥
पुत्रकलत्र भवविभव विचित्र ।
होय जाय सूत्र तूं
आप न म्हण ।
तुझा तूंचि नाहीं ऐसें
विचारुनि पाहीं ।
चेतवी चोरलासी वेगीं
सावध होई रया ॥४॥
तुज नाथिलाचि धिवसा ।
आस्तिकपणाच्या आशा ।
असते सांडूनि आकाशा ।
वायां झोंबतोसी ।
दिवस आहे तो धांवावे ।
नाहीं तरी फ़ुटोनि मरावे ।
मृगजळ हें अघवे पाहे रया ॥५॥
स्वप्नीं साचचि जोडे ।
थोडें ना बहुत हातां सांपडे ।
तुटले प्रीतीचे कुवाडे ।
ऐसें जाणोनिया शरण जाई निवृत्ति ।
तो सोडविल संसृति ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे
भक्ति रया ॥६॥

अर्थ:-

चौयांशी लक्ष योनि फिरत फिरत मोठ्या सायासाने या नरदेहाला आलास. परमात्म प्राप्तीला नरदेह भांडवल आहे. त्याकरता ते जतन कर. संसारात आयुष्य घालवू नको, परमात्मप्राप्ती साधनाचे बीज टाकुन या,असार संसारात झोंबणे हा वेडेपणा आहे. ठेवा आपल्या हातामध्ये असता तो मिळविण्यासाठी जमीन उकरीत बसणे हा जसा वेडेपणा आहे. त्याच प्रमाणे आत्मस्वरूप न जाणता देहादी अनात्म पदार्थाचे चिंतन करणे, हा वेडेपणा आहे एकदा मन तुझ्या स्वाधीन झाले तर बाकीच्या साधनांची जरूरीच नाही. त्या साधनाने सर्व सुखाचा ठेवा जो परमात्मा श्रीहरि तो प्राप्त होईल. गवताच्या नादी लागलेले वासरू जसे आईचे दूध पिण्यास विसरते. त्याप्रमाणे तू आभासमात्र विषयसुखाच्या पसाऱ्यात आत्मसुखाला चुकतोस. यामुळे कोट्यवधी युगे जन्ममरणाच्या येरझारीत दुःख भोगीत राहातो. या करिता संसारातील बायको पुत्र मित्रादि विचित्र ऐश्वर्य उत्पन्न होऊन क्षणमात्रात नष्ट होते. यांच्याशी संबंध ठेऊन हे माझे आहेत असे म्हणू नकोस. विचार करून पाहिले तर स्वतःचे शरीरसुद्धा तू नाहीस त्या जड शरीराला चेतना देणारा जो तू त्या तुझी तुच चोरी केलेलाआहेस म्हणून लवकर सावध हो.नाही त्या आस्तीकपणाच्या भरवशावर त्याच्या प्राप्तीची आशा धरणे वेडेपणा आहे. नित्यप्राप्त आत्मस्वरुप सोडुन आकाशा सारख्या पोकळाला का कवटाळतो आहेस. मृगजळामागे छाती फोडुन धावणारे हरिण मरते पण पाणी मिळत नाही. तसे ह्या संसारसुखाचे मृगजळ आहे. स्वप्नात पाहिलेले जागृतीत प्राप्त होते का?असा विचार करुन संसाराची प्रिती सोडुन जे श्री गुरु निवृतिच्या चरणी लागले त्यांना माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी भक्ती दिली व संसारतापातुन सोडवले असे माऊली सांगतात.


५०३
सुढाळ ढाळाचें मोतीं ।
अष्टै अंगे लवे ज्योती ।
जया होय प्राप्ति ।
तोचि लाभे ॥१॥
हातींचें निधान जाय ।
मग तूं करिसी काय ।
पोळलियावरी हाय ।
निवऊं पाहे ॥२॥
अमृतें भोजन घडे ।
कांजियानें चूळ जोडे ।
मग तये चरफ़डे ।
निती नाहीं ॥३॥
अंगा आला नाहीं घावो ।
तंव ठाकी येंक ठावो ।
बापरखुमादेविवरा-विठ्ठलु नाहीं ॥४॥

अर्थ:-

पाणिदार सुढळ मोती जसे असावे त्याप्रमाणे हे मनुष्य शरीर जीवास प्राप्त झालेले आहे. मनुष्य शरीरच भगवत् प्राप्तीचे साधन आहे. ते जर केले नाही तर हा मनुष्य शरीररुपी ठेवा हातातून एकदा का गेला तर तू काय करणार? पोळल्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग.दुसरे असे की वेळ अमृताचे भोजन मिळण्याचा योग आला व गेला आणि नंतर चूळभर भाताची पेज पिण्याचा जर प्रसंग आला तर नुसते मनातल्या मनांत चरफडत बसावे लागेल याशिवाय दुसरा उपाय काय आहे. याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही तोपर्यतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीचा पति व माझे पिता श्रीविठ्ठल त्याची प्राप्ती करुन घे असे माऊली सांगतात.


५०४
सकुमार साकत कापुरें घोळिली ।
गोडी परिमळु दोन्ही उरली ॥१॥
मित्रत्त्व करा जीवनाहुनि वेगळें ।
पढियंते आगळें प्रेम जाण ॥२॥
तरुमाजी जैसा एक चंदनु ।
राहिला वेधूनु वनस्पती ॥३॥
बापरखुमादेविवरु जीवींचा जिव्हाळा ।
कांहीं केलिया वेगळा
नव्हेगे माये ॥४॥

अर्थ:-

साखर व कापुरात घोळली तर गोडी बरोबर सुगंध ही प्राप्त होतो.तसेच जीवाची जोडी करण्या पेक्षा शिवाची जोडी केली की प्रेमभाव कळतो. जंगलात एकच चंदनाचे झाड शेजारील सर्व झाडांना सुंगंधीत करते. त्या प्रमाणे मी माझे पिता व रखुमाईचे पती यांचा संग धरला तर ते माझ्या जीवापासुन वेगळेच झाले नाहीत असे माऊली सांगतात.


५०५
असे तें न दिसें ।
दिसे तें नाहीं होत ।
यापरि दिसें जुगें जाती परंपार ।
ऐसें जाणत जाणत तुझें
चित्त कां भ्रमित ।
अझुनि न राहासी निवांत
तरि भलें नव्हे ॥१॥
सांडीं माया मोह द्वंद्व दुराशा ।
ज्यालागी शिणसीतें
तुजसी उदासा ॥२॥
स्वप्नींचे धन तें धनचि नव्हे ।
मृग जळींचे जळ तें जळचि नव्हे ।
अभ्रींची छाया तें छायाचि नव्हे ।
तैसें विषय सुख नव्हे नव्हे रया ॥३॥
स्पर्शे मातंग दीप्तीं पतंग नादें
मृग घ्राणें भृंग रसनें मीन या
पांचाही विषयीं पांचही मारिलें सेखीं
निर्धारुनि पाहातां पांचही तुज पाशीं
तुज केवीं निकें होईल रया ॥४॥
कापुराचिये मसी माखीन म्हणसी
कापुर कां वायां जाळितोसी ।
क्षण एका तेथें कापुर नामसी
उफ़का सिण कोठे पाहसी रया ॥५॥
उपजतांचि देह मृत्युच्या तोंडी मी
माझें म्हणतां न लाजसी ।
शरण जाई त्या निवृत्ति ।
तो तारील संसृति
बापरखुमादेविवराविठ्ठलाचिये रया ॥६॥


५०६
उपजोनि संसारी आपुला आपण वैरी ।
मी माझे शरीरीं घेऊनि ठेला ।
या देहातें म्हणे मी
पुत्र दारा धन माझें ।
परि काळाचें हें खाजें
ऐसें नेणतु गेला ॥१॥
कामक्रोधमदमत्सराचेनि गुणें ।
बांधला आपण नेणे भ्रमितु जैसा ।
मिथ्या मोह फ़ांसा शुक नळिके जैसा ।
मुक्त परि अपैसा पळों नेणें ॥२॥
जळचर आमिष गिळी ।
जैसा का लागलासे गळीं ।
आपआपणापें तळमळीं ।
सुटिका नाहीं ॥
तैसें आरंभी विषयसुख गोड
वाटे इंद्रियां फ़ळपाकीं
पापिया दु:ख भोगी ॥३॥
राखोंडी फ़ुंकिता दीप न
लगे जयापरी ।
तैसा शब्द ब्रह्मकुसरी
ज्ञान न पवे ।
व्रत तप दान वेचिलें पोटा
दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥४॥
मृगजळाची नदी दुरुनि देखोनि ।
धांवे परी गंगोदक न पवे
तान्हेला जैसा तैसें
विषयसुख नव्हेचि हित ।
दु:ख भोगितो बहुत ।
परि सावधान नव्हे ॥५॥
परतोनि न पाहे धांवतो सैरा ।
करितो येरझारा संसारींच्या ।
ज्ञानदेव म्हणे बहुतां
जन्मांचा अभ्यासु ।
तरीच होय सौरसु परब्रह्मीं ॥६॥

अर्थ:-

ह्या संसारात जन्म घेऊन तुच तुझा वैरी झालास. मी म्हणजे हा देह हे मानु लागलास,देहाचे असणारे पुत्र, दारा व धन स्वतःचे मानु लागलास हे सर्व देहासकट काळाचा खाऊ आहे. हे मात्र विसरलास, काम क्रोध मत्सराने बांधला गेलास व मी वेगळा आहे हा भ्रम पाळत बसलास. नळीवरचा पोपट स्वतःच बध्द असतो व बांधलेला समजतो तसे तुझे झाले आहे. तु मुक्त आहेस पण बध्द समजतोस. गळाला लागणारा मासा आमिषाला भुलतो व गळ गिळतो व तिकडे अडकतो. तसेच विषयांचे आहे. ते इंद्रियाना आमिष दाखवतात. व मग सुटका होत नाही फक्त तळमळ व दुःख मिळते. राखोंडी फुंकुन अग्नी लागणार नाही तदवत शब्द ज्ञानाने ब्रह्म कळणार नाही पोटासाठी व्रत तप दान भजन व तीर्थयात्रा केल्या हा नुसता दंभ वाढवणारा शिण झाला.मृगजळ पाहुन धाव घेणाऱ्याला गंगोदक मिळत नाही तसे विषयसुख भोगणाऱ्याचे आहे. ती ही नुसती खटाटोपच आहे. व दुःखमय आहे तरी सावध होत नाहीस. नुसता संसारासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यात येरझरा करत आहेस. अरे अनेक जन्म ज्याने ब्रह्माभ्यास केला त्यालाच ह्या जन्म ब्रह्मप्राप्तीची गोडी लागते असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५०७
दुजेपणाचा भावो वायां वाढविसी गव्हारा ।
उतराई या देहा कैसा होसील ।
दुजेपणें पाहसी तरि देहीं देवो पाही ।
सेखीं दुजेपणे नाहीं तूंची येकला रया ॥१॥
भ्रांति पडलिया मना नेणसी
सुख ब्रह्म चुकलासि वर्म अरे मुढा ॥२॥
ते कल्पिलिया नकळे गुरुकृपे वेगळें ।
वायांविण उगलें कां धांवतोसि सैरा ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलु जन्मोजन्मीं
वोळगिला अससी तरि ते
खुण पावसी निभ्रांतरया ॥४॥

अर्थ:-

गावंढळा एकात्म पदार्थाचा द्वैतभाव उगीच कां वाढवितोस असे द्वैत वाढविला तर यादेहापासून उतराई कसा होशील.द्वैतात परमात्म स्वरुप नाही. ते तुझ्या देहातच आहे ते पहा तरी दुसरेपणा नाहीसा होऊन तू एका आत्मरुपानेच राहशील.भ्रांती पडलेल्या मनाला ब्रह्मसुख प्राप्त होत नाही. परमात्मस्वरुप श्रीगुरु कृपेशिवाय नुसत्या कल्पनेने कळत नाही. श्री गुरुकृपाप्राप्त न करुन घेता विनाकारण सैरा का धावतोस. माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याची अनंत जन्म उपासना केली असली तरच खात्रीने परमात्म सौख्य तुला प्राप्त होईल.असे माऊली सांगतात.


५०८
आउट हात आपुले आपण होतासी ।
येर तें सांडितासी कवणावरी ।
ऐसेंनि सांडिसी तरी
थोडें तें सांडी ।
कां सकळैक मांडी तेणें
सुखिया होसी रया ॥१॥
कळिकाळ ते आपण ।
प्रभा अनु कोण ।
करितां दीपें लाजिजे ।
घरामाजी घरकुल करुं पाहासी
तें दैन्यचि वाउगें येर
सकळैक तूं आहासी रया ॥२॥
पृथ्वी येवढा घडु लाघे यावा ।
मा गगन भरुं जावें अनाठायां ।
अस्ति नास्ति दोन्ही येकेचि पदीं ।
आकाशाची भरोवरी घटे
केविं कीजे रया ॥३॥
धावतां धावतां वेगें ।
तुजचि तूं आड रिगे पाय
खोंवितु खोंवितु मार्ग ठाके
काई जासलट ज्या वाही
त्याचि सवा पाहीं ।
वायां तूं हावे जासी रया ॥४॥
जागणेंन काय जन्मलासी निजेलेनि
निमालासी ।
स्वप्नें कय केलासि तडातोडी ।
ऐसा जाणत नेणत तेथींचा तेथें
आभासत असे तूंचि तूं भल तेथें रया ॥५॥
आपला आरोहणीं लाऊ पाहातोसि निशाणी ।
तरी सांगेन ते वाणी लाविजेसु ।
श्रीगुरुनिवृत्तिनाथा चरणकमळीं ।
पाखोवीण होय अलिया
म्हणे ज्ञानदेव ॥६॥

अर्थ:-

पाखेवीण होय आळिय म्हणे ज्ञानदेव ॥ आपल्या हाताने आपले शरीर मोजले तर ते साडेतीन हात भरते. व शरीरावरच अभिमान ठेवला तर सर्व जगतावर अभिमान ठेवीत नाहीस. हे साडेतीन हात असलेले शरीर टाकून दे म्हणजे मी शरीराहून वेगळा आहे.असा निश्चय कर.म्हणजे नित्य आनंदरूप जो परमात्मा तद्रुप तू होशील. कालादिक सर्व अनात्म पदार्थाचा प्रकाशक परमात्माच आहे व तो परमात्मा हेच माझे स्वरूप आहे. म्हणजे सर्वाचा प्रकाशक मीच आहे. असा निश्चय कर त्या आपल्या स्वरूपांला विसरून जाऊन परिछित्र देहादिकांचे ठिकाणी आत्मत्व निश्चय करणे, म्हणजे आपल्या घरांत आणिक एक घर करून दुःख भोगण्यासारखे आहे. तुझ्या स्वरूपाहून बाकीचे सर्व भासमान असणारे जगत तुझ्या स्वरूपांच्या ठिकाणी अध्यस्त आहे. म्हणून ते तू आहेस कारण ज्याच्यावर जे कल्पित असते ते तद्रुप असते. पृथ्वी येवढे घर केले तरी त्यात भरण्याला आकाश आणावयास दुसरीकडे जावे लागते काय? ते त्या घरात आपोआपच येते. राना वनात चालणाऱ्याला तेथे राजरस्ता कसा मिळेल. व विहित रस्ता सोडुन दुसऱ्या रस्त्याची हाव धरलीस तर संकट येईल. व जेथे जायचे तेथे पोहचणार नाहीस. तु जगात आलास म्हणजे तु जन्मलास किंवा देह संपला म्हणजे तुला मरण आले का? स्वप्नातील देह व जागृतीतील देह यांची कशी ताटातुट होईल. आत्मा व्यापक स्वरुपात आहे त्याला जन्ममरण नाही हे तुला समजत नाही. हे तुला समजायचे असेल तर बिन पंखाच्या आळी प्रमाणे तु श्री गुरु निवृत्ति चरणी स्थिर हो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५०९
ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु ।
नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥
कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत ।
मृगजळवत जाईल रया ॥२॥
विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली ।
अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥
ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें ।
स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥

अर्थ:-

मनुष्य जन्मात आल्यानंतर जीवाने शारंगधराच्या भक्तीकडे वळावे तो जर संसाराच्या नादी लागला तर मनुष्य देह वाया जाईल. संसारातील मायबाप, गणगोत हे जरी आपले वाटले तरी मृगजळाप्रमाणे विरुन जातात. बेगडाच्या बाहुलीचा रंग, आकाशातील ढगांची सावली क्षणभर असते तसे विषयातील सुख आहे. स्वप्नातील सुख जागृतीत नष्ट होते त्याप्रमाणे पाहण्याचे पहाणे जाईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५१०
स्वप्नींचा घाई विवळें साचें ।
चेईलिया वरी म्हणे मी न वाचें ॥१॥
जन कैसें माया भुलले ।
आपलें हित चुकले ॥२॥
आपींआप देखिलें ।
परतोन पाहे तों येकलें ॥३॥
आपींआप असे ।
मी काय जालोंसे लोकां पुसे ॥४॥
सकळहि शास्त्र पढिनले ।
नुगवेचि प्रपंची गुंतले
बापरखुमादेवीवरा विठठलें ।
कैसें गुरुमुखें खूणा उगविलें ॥५॥

अर्थ:-

स्वप्नामध्ये आपणास शस्त्रधात झाला आहे,असे पाहून तो विवळत असतो. परंतु जागे केल्यानंतर त्यास विचारले असता तो वाणीने मी विवळत नव्हतो असे म्हणतो.अशाच रितीने जीव अज्ञानाने भुलले असुन आपल्या हिताला चुकले आहेत. त्या जगतातील जीवांनी आपल्या आत्मस्वरूपास यथार्थ पाहून पुन्हा परतून संसाराकडे पाहावे तो आत्मस्वरूपाशिवाय दुसरी कसलीही प्रतीति त्यास येत नाही. आत्मस्वरूप आपल्या ठिकाणी नित्य प्राप्त असता मायेच्या योगाने आत्मस्वरूपाची विस्मृती होऊन माझे आत्मस्वरूप कोठे आहे कसे आहे असे लोकांनाच विचारू लागतो.ही गोष्ट सामान्य अज्ञानी जीवाचीच नाही सर्व शास्त्र अध्ययन केलेल्या जीवानांही गुंतलेल्या प्रपंचातून निघणे अशक्य असते.याकरीता माझे पिता व रखुमादेवीचा वर जो श्रीविठ्ठल त्याच्या कृपेने सद्गुरूमुखाने प्रपंचातून सुटण्याच्या खुणा माझ्या चित्तांत प्रगट झाल्या असे माऊली सांगतात.


५११
वहिलिया येईरे सौरभ्य घेऊनि जाईरे ।
तिया इया जिवित्वाच्या लाह्यारे भ्रमरा ॥१॥
सुमनाचे जीवन विरुळेविपाये ।
वियोगु जालिया केहीं न साहेरे भ्रमरा ॥२॥
येर सकळिक पाल्हाळरे ।
बापरखुमादेविवरु सुखाचें निधान
रे भ्रमरा ॥३॥

अर्थ:-

हे जीवरूप भ्रमरा तू आपल्या ठिकाणचा मीतुपणाचा भ्रम टाकून परमात्म्याच्या चरण कमलाचा आनंद घे.असे झाले म्हणजे तुझ्या जीवत्वाचा नाश होऊन जाईल. हे भ्रमरा तुझे जीवन क्षणाक्षणाला नष्ट होत आहे त्यामुळे श्रीकृष्णरूपी फुलाचा वियोग भोगावे लागेल. त्या श्रीकृष्णरूप फुलाच्या सुगंधाशिवाय इतर सर्व सुख नसुन दुःखच आहे म्हणून हे जीवरुप भ्रमरा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच कोणी फुल असून त्याच्या सुखाचा तू अनुभव घे, असे माऊली सांगतात.


५१२
सुखाचिया गोठी आतां किती हो
करणें सुखें सुख अनुभवणें ऐसें करी ॥१॥
पढियंते बाईये गुणेविण हातां नये ।
साचेविण सये तेथें आवडी कैची ॥२॥
कैसेनि कीजे मनासी रक्षण ।
भावासी बंधन केवीं घडे ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलुचि पुरे ।
सुखीं सुख मुरें ऐसें करी वो बाईये ॥४॥

अर्थ:-

आतां नुसत्या सुखाच्या पोकळ गोष्टी किती कराव्या? त्यापेक्षा सुखाने सुखाचाच अनुभव घेता येईल असा प्रयत्न कर. परमात्म्या विषयी खरे प्रेम उत्पन्न झाल्यावाचून तो हाती सापडणार नाही ग बाई आणि खऱ्या अनुभवा शिवाय परमात्म्याविषयी आवड उत्पन्न होणार नाही. मनाला मनाप्रमाणे वागू देऊन भावाचे बंधन घालता येणार नाही. माझे पिता हे सखी रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच पुरेत. त्याच्या चरणावर सुख नुरेल असे कर.असे माऊली सांगतात.


५१३
त्रिभुवना परतें दाविसी दुरी ।
आधीं तूं आपुली शुध्दी करी ।
उदयो अस्तु कवणिये घरीं ।
पिंडा माझारीं सांग बापा ॥१॥
जाग्रतीमध्यें कवण जागत ।
सुषुप्ती मध्यें कवण निद्रिस्त ।
दोघे भ्रमलिया स्वप्न देखत ।
जीव कीं मन सांग पा रे ॥२॥
जाग्रति वरुन काढीं चेतना ।
सुषुप्ति मध्यें रिघता ज्ञाना ।
दोन्ही चेईलिया स्वप्ना ।
मग अनुवादती कवण ॥३॥
इंद्रीयें सूत्रें दारें दाटली ।
जागत होती तें काय झालीं ।
सांग पा कवणें ठाई लपालीं ।
मग मिळाली कवणे ठाई ॥४॥
शब्दातें नाइकती श्रवण ।
पहात पहात डोळे जाले हीन ।
नासाग्रीं ठेवूनियां सुमन ।
परि नेणिजे परिमळ ॥५॥
पाहेंपां येथें अनुवादु काईचा ।
मी माजी हरपली खुंट्ली वाचा ।
ज्ञानदेव ह्मणे सदगुरु साचा ।
अढळपदीं बैसविले ॥६॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपाचा शोध करतांना तो त्रिभुवनाच्या पलीकडे आहे. असेमागील तर तू आपल्या आत्मस्वरूपाची शुद्धी आपल्या शरीरातवरून पहा. अरे तुझ्या शरीरात ज्ञानाचा उदयास्त होतो. तो कोठे होतो. जागृतीत जागा कोण असतो. सुषुप्तीत निजतो कोण. या दोन्ही अवस्थेचा लोप झाला असता स्वप्न पाहाणारे मन का जीव सांग बरे. तसेच जागृती व झोप या दोन्ही अवस्था गेल्या असता स्वप्नांत जो अनुभव येतो त्याचा अनुवाद जागृतीत कोण करतो ते सांग.इंद्रिये ही जागृतीतील आपआपल्या विषया मध्ये नेमलेली कामे करीत होती.ती सुषुप्तीत कोठे लपली. पुन्हा जागृतीत कोठून आली सुषुष्प्ती अवस्थेत त्या इंद्रियांची काय स्थिती होते पहा. कान शब्द ऐकत नाहीत. डोळे रूप पाहात पाहात लीन होतात. नाकावर फुले ठेवली तरी ते वास घेत नाही. सुषुप्तित जर मी, माझा हा भाव खुटल्यामुळे वाचा बंद झाली होते. तर अनुवाद कसा होणार पण ही सर्व ज्याच्या सत्तेवर व्यवहार करतात तो परमात्मा मात्र होता. अशा त्या अढळरूप परमात्म स्वरूपांवर माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी मला बसविले म्हणजे मला यथार्थ आत्मज्ञान दिले असे माऊली सांगतात.


५१४
परियेसी गव्हारा सादर ।
कर्मे निर्वश झाले सगर ।
भिल्लें विंधिले शारंगधर ।
झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥१॥
कर्मे मन्मथ झालासे राख ।
कर्मे चंद्रासि घडला दोष ।
कर्मे भार वाहती कुर्मशेष ।
कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥२॥
कर्मे वासुकी लंके दिवटा ।
कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा ।
कर्मे शुकदेव गर्भी कष्टा ।
पाताळवाटा बळी गेला ॥३॥
कर्मे दशरथ वियोगें मेला ।
कर्मे श्रीराम वनवासा गेला ।
कर्मे रावण क्षयो पावला ।
वियोग घडला सीतादेवी ॥४॥
कर्मे दुर्योधनादि रणीं नासले ।
कर्मे पांडव महापंथें गेले ।
कर्मे सिंधुजळ शोषिलें ।
नहुष जाला सर्प देखा ॥५॥
कर्मातें शंभु मानी आपण ।
किती पळसि कर्माभेण ।
बापरखुमादेविवरविठ्ठला शरण ।
केलीं कर्मे निवारी नारायण ॥६॥

अर्थ:-

हे मुढजीवा कर्माचा बोध घे. प्रारब्ध गती कशी असते ते कळेल. कर्मामुळे सगरराजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला. कर्मामुळेच भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारिला. कर्मामुळे इंद्रला गुरुपत्नीगमनाचा दोष घडला व अंगाला भगे पडले. कर्मामुळे शंकराने मदनाला जाळला, चंद्राला शाप मिळाला व शेष व कुर्माना पृथ्वीचा भार वाहवा लागला तसेच ब्रह्म्याला गाढवाचे मुख प्राप्त झाले. कर्मामुळे वासुकीला रावणाकडे दिवटा व्हावे लागले, मारुतीला ब्रह्मचर्याची कासोटी नेसावी लागली, शुकदेवाला गर्भवास सहन करावा लागला व बळीला पाताळात जाऊन पडावे लागले. कर्मामुळे दशरथाला पुत्रवियोग भोगावा लागला, रामाला वनवासात जावे लागले, रावणाला राज्याचा त्याग करावा लागला व सितेला रामाचा वियोग प्राप्त झाला. दुर्योधनप्रभुतीना रणात मरावे लागले, पांडवांना महापंथ चालावा लागला, अगस्तीला समुद्र प्यावा लागला व इंद्रपदावर पोहचलेल्या नहुशराजाला सर्प योनीत जावे लागले. त्या कर्माला महादेव भितात, अशा त्या कर्मापासुन तु कुठे पळुन जाऊ शकतोस? या वर उपाय म्हणजे, माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना शरण गेले तर नारायण कर्म व कर्मफलांचे निवारण करतो असे माऊली सांगतात.


५१५
वृंदावनीं वनमाळी ।
खेळे गोपींसी धुमाळी ।
मदनमेचुची नवाळी ।
रसाकाळीं मनोहर ॥१॥
तयाचे करी पा स्मरण ।
आळसु न करी अंत:करण ।
भीतरलीया सुमनपण ।
निहारण होईल ॥२॥
बरवेपणाचेनि मिसें देवातें
वाणि या सौरसे ।
जडत्त्व फ़िटेल तया सरिसें ।
रसनें ऐसें चुकों नको ॥३॥
तरी हा देवो तूं न्याहाळीपां ।
पिसाटपण फ़िटेल बापा ।
पावन होसी परमस्वरुपा ।
नेत्री ऐसा चुकों नको ॥४॥
वेगीं क्षेम देऊनिया निविजे ।
ऐसें दैव कैं लाहिजे ।
जरी तो ह्र्दयीं ध्याईजे ।
तै पाविजे अंगसुखा ॥५॥
मन भ्रमर येकी हेळा ।
झेपावे पदकमळा ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
होईल जवळा सौरसु ॥६॥

अर्थ:-

वृन्दावनामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपी बरोबर खेळ खेळत असता, मदनाची पर्वा न करता, शृंगार रसांत फार मनोहर दिसत होते. त्या भगवान श्रीकृष्णचे आळस न करता अंतःकरण पूर्वक स्मरण करावे. त्याचे स्मरण केले तर अंत:करणातील सर्व दोष जाऊन त्याला फुलपण प्राप्त होईल. त्याच्या ह्या चांगुलपणाने आनंदाने त्या देवाचे नांव घेतलेस तर लागलीच तुझे जडत्व नष्ट होई. म्हणून हे जिव्हे त्याचे नामस्मरण करण्यास चुकू नका. त्या देवाचे रूप पाहिले तर प्रपंचाच्या ठिकाणी असलेले सत्यपणाचे वेड फिटून पावनरुप होशील म्हणून हे डोळ्यानों त्याचे रुप पाहण्यात चुकु नका.जर हृदयांत त्याचे ध्यान केले तर सगुण सुखास प्राप्त होशील. अरे असे भाग्य तुला केंव्हा प्राप्त होणार. ज्याप्रमाणे भ्रमराला दैवाने कमळाची प्राप्ती होते त्याप्रमाणे मनाला जर श्रीहरिच्या पदकमलाची प्राप्ती झाली. तर ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तुझ्या हृदयांत आनंदाने प्रगट होतील. असे माऊली सांगतात.


५१६
रुणुझुणु रुणुझुणुरे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणुरे भ्रमरा ॥१॥
चरणकमळदळरे भ्रमरा ।
भोगी तूं निश्चळरे भ्रमरा ॥२॥
सुमनसुगंधुरे भ्रमरा ।
परिमळ विद्वदुरें भ्रमरा ॥३॥
सौभाग्य सुंदरुरे भ्रमरा ।
बापरखुमादेविवरुरे भ्रमरा ॥४॥

अर्थ:-

मी व माझे या शब्दाने गुंजारव करण्याच्या जीवरुपी भ्रमरा तु त्याला सोडुन दे कारण ते अवगुण आहेत आणि भगवंताच्या चरणकमालाच्या ठिकाणी असलेला जो सुगंध रुपी आनंद तो तू निश्चळ होऊन भोग. मनाच्या मागे फिरणाऱ्या जीवरुपो भ्रमरा तू आपले शुद्ध अंतःकरण करुन, परमात्म्याच्या ठिकाणी असलेला जो सुगंधरुपी आनंद आहे तो तू स्थिर होऊन भोग माझे पिता रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल याचे चरणकमलाच्या ठिकाणचा आनंदरुपी सुगंध तू सेवन कर म्हणजे आनंद प्राप्त होईल असे माऊली सांगतात.


५१७
परदींपींहुनि सूक्ष्म मार्गे ।
आलासी पवन वेगें ।
विंदुनिया ।
नवमासवरि पेणें केलें मातापुरीं ।
सोहं सोहं परी ।
परतेसिना ॥१॥
निर्लज्जारे तुज शिकवूं किती ।
न गमे दिनराती बळिया देवो ॥२॥
त्या येउनियां वाटा तुज ऐसें गमलें ।
कोहं कोहं ठेले प्रकाशत ।
पुसुनीयां तळ वरी सूदलासी मळ घोरीं ।
क्षुधा आड उरीं आदळली ॥३॥
ऐशीं बाळपणीं सांकडीं ।
बहु ठेली झडाडी ।
सडाडां वोसंडी ।
शांति सैरा ।
तरुण्याचेंनि भरें वित्तविषयचोरें ।
बांधिलासि संसारें ।
हालों नेदिती ॥४॥
ऐसा वोस मार्ग पुढें अवघा वेळु पाहला ।
वारितां वारिता निघाला मारिजसी ।
पुढें पडलिसे वाट ।
ते ऐकरे बोभाट ।
परतले घायवट अर्धजीवें ॥५॥
ऐसे पायळ पुढें गेले
पांगूळ मागें ठेले पैल तीर
पावले परम तत्त्वेंसी ।
बापरखुमादेविवरु ।
विठ्ठ्लु सैरारे सावधु ।
ज्ञानिया प्रसिध्दु उपदेशितु ॥६॥

अर्थ:-

सोडून,सूक्ष्म मागनि बिंदुरूपाने नवमास गर्भावस्थेत पवनवेगांने आलास. ‘सोऽहं सोऽहं’ याचा उच्चार करीत असतो, पण जन्म झाल्यावर मात्र ते सर्वविसरून जातोस.हे निर्लज्जा जीवा तुला शिकवावयाचे किती संसाराच्या धांदलीत रात्रंदिवस चैन पडत नाही.आणि त्या वाटेने येऊन ‘कोऽहं कोऽहंअसे म्हणात त्या अवस्थेत मलमूत्रामध्ये लोळत पडून, भुकेने व्याकुळ होऊन आलास अशा रितीने बाळपण गेले तारूण्याच्या भरात वित्तादि विषय यांनी संसारात तुला बांधून टाकल्यामुळे तु हालचाल ही करु शकला नाहीस व शांती ही गमवलीस.अशा कष्टमय मार्गात बहुत काळ घालवात असतांनाच पुढे मरून जातो. असा हा दुःखमय संसार करण्यापेक्षा संतांनी उपदेश केलेल्या परमार्थाच्या वाटेला लागअशा रितीने धैर्य धरून कांही परमार्थाकडे पाऊल टाकलेते परमतत्त्वाला गेले. आणि त्यामार्गाविषयी धैर्य न धरणारे पांगळे ते मागे पुन्हा संसारात राहिले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आशा जींवाना सैराट न होता सावध व्हा असा उपदेश करतात असे माऊली सांगतात.


५१८
वायुनें वळावें धूमें मिळावें अभ्रें
पाणिये गळावें ।
आकाश पोकळ म्हणौनि क्षोभा
जाऊं नये ।
निज चेईलया केउतें पळावे रया ॥१॥
निराळ निराळ सहज तें निराळ ।
तें क्षीरचातका दुभे ॥
एक धरुनियेरे सकळिक वावो ।
मा काय काय तेथें नलभे रया ॥२॥
स्तन ना वाहे जयाचिये माये ।
तें बाळक केहीं न धायेरेरे ।
दृष्टी वोळलें तेंचि क्षीर जालें ।
कासाविचें गोत्र पाहेरेरे ॥३॥
केळि पोकळ ह्मणोनि सांडिसील झणें ।
तरी फ़ळवरी निवांत राहेरेरे ।
नाहीं नाहीं म्हणोनि थरारिसि
झणें नाहीं तें तेथेंचि पाहीरेरे ॥४॥
रत्नाचिया आशा घात जाला
तया राजहंसा ॥
झणें भुलों नको ते सारेरे ॥
द्रोणाचेनि नावें मातिये सळ चढे ।
होई त्या कोळिया ऐसारेरे ॥५॥
बापरखुमादेविवरु ह्रदयींचा जागता ।
सांडुनि अनु सुखाची कायसी चाड ।
सिध्दचि सांडुनी अनेआन जल्पसी
तरि सहजचि पडिलेंसी द्वार रया ॥६॥

अर्थ:-

वायुचा धुमाशी संयोग झाला की आभाळातुन पर्जन्य वर्षाव होतो.पण हे सर्व आकाशातच घडते पण सामान्य नजरेत आकाश तर पोकळ आहे.म्हणुन आकाश शब्दाची रचना ग्रंथांनी परमात्म्यासाठी केली आशा आकाशाच्या व्यापकपणा पासुन कोण पळुन जाऊ शकतो? असे ते व्यापक ब्रह्म निराळे आहे व तेच चकोराचे ही अमृत होते थेंबुटे होऊन. असा विचार करुन पाहिले त्या परमात्म्यापासुन काय प्राप्त होणार नाही. स्तन नसणाऱ्या कासवीने तिच्या पोरांना कसे बरे तृप्त करावे. तीने त्यांना पाहिले तरी ते त्यांच्यासाठी अमृतच आहे. केळीचे झाड पोकळ म्हणुन सोडलेस तर त्याची फळे कशी बरे खाता येतील. म्हणुन तो परमात्मा दिसत नसला तरी तरी त्याचे चिंतन केलेस तर तुला ज्ञानदृष्टी लाभेल.पाण्यात पडलेल्या ताऱ्यांच्या प्रतिबिंबावर चोच मारणाऱ्या राजहंसाला काय रत्नाचा चारा मिळेल तेथे त्याचा घातच होईल. एकलव्याने मातीच्या पुतळाचे द्रोणाचार्य बनवुन त्यांना गुरु मानले तर तो श्रेष्ट धनुर्धर झाला. तसाच गुरुवाक्यावर भरवसां ठेव. माझे पिता व रखुमाईचे पती ते सर्वांच्या हृदयात स्थानापन्न आहेत.त्यांना सोडुन तुला इतर सांसारिक सुखाची आठवण व्हावी हा द्वाडपणा सोडुन दे नाहितर मोठ्या दुःखात तु पडशील असे माऊली सांगतात.


५१९
शब्द निर्गुणें भावावें ।
थितिया सगुणासि मुकावें ।
वेदद्रोही व्हावें ।
कां ऐसें किजे ।
कर्म उच्छेदु करुन ।
अहंब्रह्म म्हणतां तिथिया
सुखासी आंचविजे ।
कर्मचि ब्रह्म ऐसें जाणोनि दातारा ।
ह्रदयीं सगुण धरुनि राहिजे रया ॥१॥
जवळी असतां सांडी मांडी करिसि ।
वायां सिणसी तुझा तूंचि रया ॥२॥
मुळी विचारितां मन देह तंव ।
कर्माधीन तेथिचें संचित क्रियमाण
प्रारब्ध पाहीं ।
तें ठेऊनि जडाचिया माथां ।
कीं वेगळें होऊनि पाहातां
हें तव तुज नातळे कांहीं ।
ऐसें निरखूनी पाहातां
सगुण धरुनि आतां ।
मग तुज विचारितां भय नाहीं ॥३॥
हा तंव कल्पनेचा उभारा ।
मनाचा संशय दुसरा ।
जेणें घडे येरझारा जन्मांतर ।
म्हणोनि ऐसें कां सोसावें ।
एकचि धरुनि राहावें ।
जेणें चुकती येरझारा ।
तेचि प्रीति जागृति
स्वप्न आणि सुषूप्ति ।
ऐसाचि हो कां थारा ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु
चिंतितां ।
सुख अंतरीं जोडेल सोयरा ॥४॥

अर्थ:-

ज्या पुरूषाने भगवद उपासना केली नाही व सगुण सेवाही केली नाही. त्याला वेदप्रतिपाद्य असलेल्या निर्गुण स्वरूपाची फक्त भावनाच करावी लागेल आणि सगुणांच्या भक्तीला का मुकावे? नित्यनैमित्तिक कर्माच आचरण करावे अशी वेदाची आज्ञा आहे. त्या वेदाज्ञेच्या विरुद्ध वागू नये. ती वेदाज्ञा मोडणे म्हणजे वेदांसी शत्रूत्व करणे होय. कर्म उपासनेचा उच्छेद करून नुसते ‘अहं ब्रह्म’ असे म्हणण्याने उपासनेचा आनंद मिळणार नाही. त्यापेक्षा कर्म उपासना ब्रह्मरूप आहे. असे समजून अंतःकरणात सगुण मूर्तीचे ध्यान करणे फार चांगले आहे.अरे सगुण स्वरूपाची प्राप्ती आपणाला सुलभ असता तू फुकट का सीण करून घेतोस. मुळापासून विचार कर, मन, इंद्रिय व स्थूल देह यांचे सर्व व्यवहार पूर्वकर्माधीन आहे. त्याकर्मात प्रारब्ध, संचित व क्रियमाण असा भेद आहे. त्यांचा संबंध स्थूल सूक्ष्म शरीरासी आहे. येवढ्याकरिता भोगाचा संबंध जडशरीरासी आहे. मी आत्मस्वरूप असल्यामुळे माझा त्या व्यवहारासी कांही एक संबंध नाही. असा नीट विचार करून पाहा. आणि सगुण मूर्तिची उपासना कर. मग तुला खरोखर विचार केला तर भय नाही. स्थूल, सूक्ष्म प्रपंच हा मनाच्या कल्पनेवर उभारलेला आहे. त्यामुळेच जन्ममरणाच्या येरझारा कराव्या लागतात. असे हे जन्ममरणाचे दुःख का सहन करावे? त्यापेक्षा सगुण मूर्तिचे जर चिंतन केलेस तर जन्ममरणाच्या येरझार चुकतील. जागृती स्वप्न व सुषुप्ति या तीन्ही अवस्थेत सगुण स्वरूपाविषयी प्रेम धारण कर म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चिंतनाने सुख तुझे सोयरे होऊन तुला चिकटेल असे माऊली सांगतात.


५२०
बरवें पाउलें पाउलें ।
सुंदर सकुमार पाउलें ॥१॥
शीतळ हरिचीं पाउलें ।
गोमटें हरिचीं पाउलें ॥२॥
ध्रुवासि उपदेशिले ।
तेंचि प्रल्हादें स्मरिलें ॥३॥
उपमन्या प्रसन्न जालें ।
तेंचि गजेंन्द्रें चिंतिलें ॥४॥
अहल्येसि उध्दरिलें ।
तेंचि द्रौपदिये धांविन्नलें ॥५॥
यशोदेनें वोवाळिलें ।
तेंचि गोवर्धनी रंगलें ॥६॥
शकटा अंगीं जें उमटलें ।
तेंचि बळिपृष्ठीं शोभलें ॥७॥
शिवें शक्तिप्रती कथिलें ।
धर्मराजें तें पुजिलें ॥८॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलें ।
ते विटेवरी दाविलें ॥९॥


५२१
बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळा ।
हांसती लोक परी न संडी चाळा ॥१॥
एकाचें खाये एकासि गाये ।
लाज नाहीं तिसी सांगावे काये ॥२॥
वर्‍हाडियांच्या भुलली सुखा ।
सुख भोगितां पावली दु:खा ॥३॥
नाथिलें पुसे भलत्यासि रुसे ।
जयाचें लेणें लेऊनि थोर संतोषें ॥४॥
क्षणाचा सोहळा मानिलें हित ।
आपस्तुति परनिंदेचें गीत ॥५॥
कवणाचें वर्‍हाड भुललीस वायां ।
शरण रिघें रखुमादेविवरा नाह्या ॥६॥

अर्थ:-

हे मुली, तू अनेक वेळा जन्ममरणरूपी लग्नाला विषयरूपी वऱ्हाडबरोबर घेऊन आलीस तुझ्याकडे बघून साधुसंत हंसतात. पण तू मात्र जन्ममरणाचा चाळाटाकीत नाहीस. परमात्म्याच्या सत्तेवर तुझे जगणे आहे. पण तू कौतूक मात्र शरिराचे करीतेस. याची तुला मुळीच लाज वाटत नाही. अशा तिला काय म्हणावे.विषयातल्या सुखाला भूलून ते सुख भोगीत असता तुला दुःखच होते.मला नित्य सुख असावे असे खोटेच विचारून परमतत्त्वालाच विसरून जातेस. परमात्म्याच्या सुखाचा अलंकार घालून तुला आनंद होतो व पहावे तर परमात्म्यालाच विसरून जाते. क्षणिक विषयसुखात आनंद मानून स्वतःची अशी स्तुती व दुस-याची निंदा हेच गीत नेहमी गात बसतेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विषयरूपी वहाड कोणाचे त्यांचा तुझा कांही एक संबंध नसता फुकट भुलून गेली आहेस. म्हणजे त्या विषयात निमग्न झाली आहेस. परंतु तू विषयरूपी वहाडाचा त्याग करून रखुमादेवीवर बाप जो श्रीविठ्ठलत्याला शरण जा.


५२२
लक्ष लावुनि त्रिपुटी ठाण त्रिभंगी चोखडें ।
सगुण सांवळें म्हणोनि प्रीति मना ॥
तें देखतांचि पडे मिठी दृश्यातें निवटी ।
मना गांठी विरोनि ठेली ॥१॥
जवळिल निधान सांडूनि
सिणसील बापा ।
तरि जन्मांतर न चुकेविजें रया ॥२॥
कल्पना काळीमा वेगळी त्यागी ।
अहंभावाचा मोडी थारा ॥
आशा दासी करुन नातळे कोठें ।
नावेक मनकरी स्थिर ॥
सगुणीं धरुनि प्रीती ।
मना हेचि अवस्था ।
तरि उणीव नये संसारी रया ॥३॥
मन हे मूर्तिमंत कीं
निर्गुण भासत ।
पाहतां नाहीं भेदर्थ इंद्रियासी ॥
आपलें म्हणोनि एके वृत्ति भजतां ।
बापरखुमादेविवरुविठ्ठलु ध्यातां
ह्रदयीं सुखें रया ॥४॥

अर्थ:-

निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत ध्यान, ध्याता, व ध्येय या त्रिपुटीचा त्याग करावा लागतो. परंतु आम्हाला तीन ठिकाणी वाकडे अंग जे राहिलेल्या श्रीकृष्णाचे ठिकाणी ध्याता ध्यान व ध्येय त्या सावळ्या श्रीकृष्ण स्वरूपांच्या ठिकाणी लक्ष लाऊन राहिले असता मन अगदी तदाकार होऊन जाते. अर्थात मनातील अनंत वासना या सर्व विरुन जातात.अरे असे आपल्या डोळ्याजवळ असलेले, डोळ्यांस दिसणारे सगुण रुप हेच आहे. ते जर न केलेस तर तुझे जन्मांतर चे दुःख नाहीस होईल. सगुण भक्ति व्यतिरिक्त मनांत इतर काही कल्पना उत्पन्न झाल्या तर कल्पना ह्या काळीमा लावतील. अहंभावाला मोडावे लागेल. आशेला दासी करून तिच्या तडाख्यात सापडू नकोस. क्षणभर मन स्थीर करून, या सगुण श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी प्रीति असावी, असी मनात आस्था धर. म्हणजे तुला संसारात उणे पडणार नाही. मूर्तिमंत सगुण परमात्मा आहे किंवा निर्गुण आहे. असा विचार करत असता मन व इंद्रिय ही भिन्नत्वाने उरत नाही. या करिता एकनिष्ठेने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे हृदयांत ध्यान धरले असता सुखी होशील. असे माऊली सांगतात.


५२३
षडचक्रीं कुंभार घडीतसे मातीं ।
तैसें मज कीती चाळविसी ॥१॥
रातीचा दिवसु कीं दिवसाची राती ।
वावधणी वाती लावितोसी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अवघेंचि मृगजळ ।
सांडूनि पाल्हाळ नित्य ध्याई ॥३॥

अर्थ:-

कुंभार ज्याप्रमाणे घट करण्याच्या उद्देशाने चाक फिरवितो त्याप्रमाणे तूं आम्हाला किती फिरवतोस.दिवस संपला की रात्र व रात्र संपली की दिवस अशा ह्या संसार चक्रांत तुझ्या प्राप्तीची इच्छा करणे म्हणजे वावटळीत दिवा लावण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. हा सर्व संसार मृगजळासारखा असुन ते पाल्हाळ टाकुन नित्य त्या परमात्म्याचे ध्यान कर असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.


५२४
मलयानिळ शीतळु पालवी नये गाळूं ।
सुमनाचा परिमळु गुंफ़िता नये ॥१॥
तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणों
नये सान थोरु ।
याच्या स्वरुपाचा निर्धारु
कवण जाणें ॥२॥
मोतियाचें पाणी भरुं
नये वो रांजणीं ।
गगनासी गवसणी घालितां नये ॥३॥
कापुराचें कांडण काढितां
नये आड कण ।
साखरेचे गोडपण पाखडतां नये ॥४॥
डोळियांतील बाहुली करुं नये वेगळी ।
धांवोनि अचळीं धरितां नये ॥५॥
विठ्ठलरखुमाईचे भांडणीं
कोण करी बुझावणी ।
तया विठ्ठल चरणीं
शरण ज्ञानदेवो ॥६॥

अर्थ:-

मलयगिरी पर्वतावरिल शितळ वारा जसा गाळुन घेता येत नाही. तसा फुलाचा सुगंध हा गुंफता येत नाही. तसे कोणालाही सर्वेश्वर म्हणु शकत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही. गगनाला गवसणी घालता येत नाही. डोळ्यातील बुबळ वेगळे करता येत नाही. व मैत्रीण जरी असली तरी तिची अंचुली मागता येत नाही. कापराचे कांडण करुन कण काढता येत नाही. साखरेची गोडी पाखडता येत नाही. त्या प्रमाणे विठ्ठल रखुमाईतील भांडण कोण सोडवणार. म्हणुन मी माझे श्री गुरु निवृत्तिनाथांच्या चरणी शरण जातो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५२५
चातकाचे जिवन घनु तरि तो
सये एका धिनु ।
आला वेळु भुलावणु जैसा
नळुनि सिना नाहीं भानु ॥१॥
चंद्रासवें चकोर मिळोनियां
पूर्णिमेसि विरोधु मांडिला ।
तो योगु निमिळे म्हणोनि तो
प्रसंग विपाईला वेगळा रया ॥२॥
तैसें माणुसपण सहज तनुवरी
देवाचा वारा ।
स्वाधिनु तैसा
बापरखुमादेविवरु विठ्ठलु न
विसंबावा एकक्षणु ॥३॥

अर्थ:-

चातकाला पाणी म्हणजे फक्त मेघांतून पडेल तेच असते.पण तो योग विरळच असतो. तसेच सूर्यविकासिनी कमलिनीला सूर्याचा योग क्वचित येतो. चकोरांना पौर्णिमेच्या चंद्राचा योग क्वचित येतो. तसा मनुष्य जन्म मिळाण्याचा योग क्वचितच येतो. असा हा दुर्लभ मनुष्य जन्म तुला प्राप्त झाला आहे. अशा वेळ माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे चिंतन करण्यात एका क्षणाचा देखील विलंब करू नको.


५२६
संसारा येऊनी लागले फ़ांसे ।
गुंतला आशा मायामोहें ॥१॥
न खंडे न तुटे कर्माची बेडी ।
अनुभवेंविण तोडी तो योगिया ॥२॥
कर्माची सांखळी पडली असे पायीं ।
गुरुमुखें खुणें उगउ पाहीं ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे तुझे कृपेवीण
न तुटे फ़ांसा ।
निवृत्तीनें कैसा उगविला ॥४॥

अर्थ:-

संसारांच्या फासात अडकलेल्या मनुष्याला आशा व मायामोह अजुन बध्द करतो. त्या संसाररुपी कर्माची बेडी तुझ्या पायात पडली आहे. व ती तोडण्याठी योग्यांना अनुभवाची गरज नाही पण आपण अनुभवसंपन्न श्रीगुरुना शरण जाऊन त्यांच्या मुखातून आत्मज्ञानाच्या उपदेशाची खूण ऐकून ती बेडी काढून टाकली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे श्रीगुरु निवृत्तीराया आपले कृपेशिवाय हा संसाराचा फांसा तुटणार कसा? पण आपल्या कृपेने आपण मला पार पाडलेत. असे माऊली सांगतात.


५२७
द्वीपोद्वीपींचे पक्षी मेरुतळवटीं उतरले ।
रत्न म्हणोनी त्या स्फ़टिका झेपावले ॥१॥
राजहंस ते भ्रमलें हो पाषाण चुंबिती ।
आडकलिया चाचू
मग मागिल आठविती ॥२॥
एक श्रीकृष्ण तें विसरलें ऐसें
ज्ञानदेव बोलें ।
मूर्खेसी संगती करितां
शाहणे सिंतरलें ॥३॥

अर्थ:-

अशी कल्पना करा की. देशोदेशीचे पक्षी मेरु पर्वताच्या तळी येऊन बसले त्याठिकाणी पांढरा स्वच्छ स्फटिकाचा खडक होता. त्या स्फटिकामध्ये नक्षत्रांचे प्रतिबिंब पडले होते. राजहंस पक्षी. रत्ने खात असल्यामुळे उतरलेल्या पक्ष्यामध्ये राजहंसही होता. त्या राजहंसाने रत्नाप्रमाणे नक्षत्राच्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी रत्न समजुन ते खाण्याकरिता चोच मारली. पण ती त्या स्फटिकांच्यात अडकुन पडली तेंव्हा त्याला आपला मुर्खपणा कळला. त्या राजहंसा प्रमाणे निरक्षिर करु शकणारे पंडित ही मुख्य श्रीकृष्णाला विसरुन संसारातील सुखदुःखात अडकले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५२८
संसारयात्रा भरली थोर ।
अहंभावे चळे हाट बाजार ।
कामक्रोध विवेक मद मत्सर ।
धर्म लोपे अधर्मे वेव्हार ॥१॥
यात्रा भरली जरिं देविं विन्मुख प्राणी ।
विषयाची भ्रांतिं आडरे ॥२॥
एकीं मीपणाच्या मांडिल्या मोटा ।
अहंभावाच्या गोणिया सांडिल्या चोहाटा ।
एकीं गाढवावरी भरली प्रतिष्ठा ।
तर्‍हि तृप्ती नव्हे दुर्भरा पोटा ॥३॥
एक पंडितपण मिरविती श्रेष्ठ ।
एक ज्ञान विकुनि भरिती पोट ।
हिंसेलागी वेद करिताती पाठ ।
चौर्‍यांशीं जिवांभोंवतसे आट ॥४॥
अज्ञानभ्रांतीचीं भरलीं पोतीं ।
सुवस्तु सांडूनि कुवस्तु घेती ।
सुखाचेनि चाडे सुखाचि प्रीती ।
अमृत सांडुनि विष सेविती ॥५॥
शांति क्षमा दया न धरवे चित्तीं ।
विषयावरी थोर वाढविली भक्ति ।
जवळी देवो आणि दाही दिशा धावती ।
स्वधर्म सांडुनि परधर्मी रति ॥६॥
ऐसें जन विगुंतले ठायीं
आत्महिताचि शुध्दिचि नाहीं ।
नाशिवंत देह मानिला जिंहीं ।
तया तृप्ति जालि
मृगजळडोहीं रया ।
श्रीगुरु निवृत्तीनें नवल केलें ।
देखणेंचि अदेखणें करुनि दाविलें ।
मी माजी देवो यानें
विश्व व्यापिलें ।
बापरखुमादेविवरें विठ्ठले रया ॥७॥

अर्थ:-

संसार यात्रेमध्ये अहंम भावाचा बाजार भरला आहे. तेथे काम,क्रोध मद मत्सर विकला जातो व धर्म लोप पावून अधर्माचा व्यवहार होतो. यात्रेमधील विषयाच्या भांरच्या आड जीव आत्मरुपाला विन्मुख झाला. त्या यात्रेत काहीनी मी पणाच्या मोटा मांडल्या व अंहभांवाच्या गोण्या सोडल्या. एकाने गाढवावर प्रतिष्ठा भरली तरी पोटाला तृप्ती झाली नाही. तिथे एकानी श्रेष्ठ पंडीतपण मिरवले तर एकाने ज्ञान विकुन पोट भरल. काहीनी हिंसेकरता वेदपाठ केले ते चौऱ्यांशी लक्ष योनीत अडकले. काहींनी अज्ञान व भ्रांतीतर ची पोटे भरली तर काहींनी चांगली वस्तू सोडून वाईट वस्तू घेतली. काहीनी सुखा साठी सुखरुप नामामृत सोडले व विषयातील विष घेतले. काहीना शांती क्षमा दया ही चित्तात धरता आली नाही. व त्यांनी विषयावर भक्ती वाढवली. स्वतःत असणारा आत्मरुप परामात्मा सोडुन काही दहादिशांना शोधायला गेले तर काहीनी स्वर्म सोडुन परधर्म पत्करला. असे हे जन ठायीच गुंतले व त्यांना आत्महिताची शुध्दी राहिली नाही. ज्यांनी नाशिवंत देहाला मानले त्यांना मृगजळ पिऊन तृप्ती झाली. माझे श्रीगुरु निवृत्तिनी नवल केले त्यांनी दृष्य अदृष्य करुन टाकले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी माझे आत्मरुप दाखवुन त्या परमात्म्याने विश्व व्यापले आहे असे माऊली सांगतात.


५२९
सुख श्रृंगार सुहावा ।
मिरवितो हरि समाधान बोधुरे ॥१॥
हारिचे सुख गिति गातां ।
समाधान बोधुरे ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे ।
आठवितां समाधान बोधुरे ॥३॥

अर्थ:-

हरिची प्राप्ती व त्याचे समाधान हाच अलंकार माझ्या अंगावर शोभत आहे. व हरीप्राप्तिपासून झालेले सुखसमाधान गात रहावे असे मला वाटते. ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाचे स्मरण करण्यातच सुखसमाधान आहे असे माऊली सांगतात.


५३०
सकुमार साकार परिमळें आगळें ।
कर्पुर परिमळें घोळीयेला ॥१॥
मित्रपणें करा मधुर आळुमाळा ।
मधुकर गोपाळा ह्रदयीं धरा ॥२॥
भवतरु भवमूळीं भवमूळ छेदन ।
तेंचि अंगीं चंदन लाविजेसु ॥३॥
बापरखुमादेविवरु सुकुमारु आगळा ।
वेदश्रुती बाळा वेधिलिया ॥४॥

अर्थ:-

सुकुमार साकार कापुर जणुकाही कापराच्या सुगंधात घोळला आहे. अशा मधुकर गोपाळाशी मधुर बोलुन त्याच्याशी मित्रपण प्रस्थापित करा. भवतरु भवमुळ यांचे छेदन करणारा श्रीकृष्ण चंदनाप्रमाणे सर्वांगास लावावे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी वेदश्रुतींना तरुण मुलींना भुरळ पाडावी तसे वेधले आहे असे माऊली सांगतात.


५३१
सुकुमार सुरस परिमळें अगाध ।
तयाचा सुखबोध सेवी आधीं ॥१॥
मन मारी सुबुध्दि तल्लीन मकरंदीं ।
विषय उपाधी टाकी रया ॥२॥
रखुमादेविवरु गुणाचा सुरवाडु ।
मन बुध्दि निवाडु राजहंसु ॥३॥

अर्थ:-

सुकुमार,सुरस असा परिमळ अगाध आहे. तेंव्हा त्याचा सुखोपभोग आधी घेऊ. मनाला मारुन मिळालेला सुबुध्दीरुप मकरंदाचा स्वाद घेताना विषय व उपाधी टाकुन देऊ. रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे गुणांची खाणी असुन ते मन व बुध्दी निवडुन घेणारे जणुकाही राजहंस आहेत असे माऊली सांगतात.


५३२
बोलतां बोलु मावळला तो मावळोनि उरला ।
तरि हा भावों केंवि गमलारे बापा ॥
कीं इंद्रियांचा भोगु खुंटला कीं
समंधि याचा ठावो निमाला ।
कीं वर्णावर्णु भला विचारु नाहीं ।
तैसे आपुलेंचि करणें
आपुलेंचि नवल ।
खेळ्या होउनि दावी रया ॥१॥
तपें अनेक विधी करावीं
हे मनाची आधी ।
करितां करणें सिध्दि नव्हे नाहीं ।
म्हणोनि वाउगाचि वळसा पडे
या धाडिवसा ।
तैसा कल्पनेचा फ़ांसा मायाबंधु ॥२॥
ऐसी याचा पाठी कां होसी हिंपुटी ।
नलगे तुज सुखाचा स्वादु
या गोष्टी येणें ऐसेंचि विचारी ॥
एकुचि धीर धरी न लगे
या द्वैतासाठी रया ॥३॥
म्हणोनि डोळियांचे देखणें
लाघव तो देखणा जाणे ।
तेथें आपपर पिसुणें
न देखे कांहीं ॥
तें शद्वेविणे बोलतां
निशुद्वे ये हातां ।
ऐसा उपावो करी कांहीं ।
जोडिलिया धना वाढी बहु असें ।
तेथें वेचलें न दिसे कांहीं ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां
सुखाचेनि सुखें राही ।
निवृत्तिरायें खुणा दाउनियां
सकळ पुनरपि येणें नाहीं ॥४॥


५३३
जंववरी जाड नव्हे उजाड नाहीं
काढावया प्राण ।
मग मूढा पडसी संसार सांकडा ।
कांहीं कटी आपुला उवेडा रया ॥१॥
जाडरे जाडरे सेवटीचा धंदा ।
पडियेलेंसि भवकुंडा ।
एकीकडे जन्म एकीकडे मरण
न निमेचि धंदा कुवाडा रया ॥२॥
थिल्लरीचें जळ मपितरे मिना
जंव न तपे आतपु हा परिमळु ।
जंव हा आयुष्य वोघू
न सरे तंव ठाकी अगाधु ।
पुढें आहे हाल कल्लोळु रया ॥३॥
भाड्याचे घर किती वाढविसी रे गव्हारा ।
दिनु गेलिया काय पंथु आहे ।
ऐसें जाणोनियां वेगी ठाकी लवलाहे ।
बापरखुमादेविवरा
विठ्ठलाचे पाय रया ॥४॥

अर्थ:-

जो पर्यंत शरीरातून प्राण निघून जाऊन शरीर पडले नाही म्हणजे मृत झाले नाही, तो पर्यंतच आपला आत्मलाभाचा प्रयल नाही केला तर संसाराच्या संकटात पडशील.या शरीराच्या धंद्यात म्हणजे भवबंधात पडला आहेस कसा ते पहा.एकीकडे जन्म एकीकडे मरण हा जन्म मरणाचा कठीण धंदा कधीही संपत नाही. डबक्यातल्या पाण्यावर भरवसा ठेवून राहणाया माशांचे जीवित सूर्याने तप्त होऊन पाणी आटवून टाकले नाही तोपर्यंतच असते.म्हणून जोपर्यत आयुष्याचा ओघ आहे तोपर्यंत त्या ओघामध्ये पडून परमात्म समुद्राला जाऊन मिळ.असे केले नाही तर पुढे जन्ममरणाचा फार मोठा हलकल्लोळ आहे.हे शरीर काळाचे असून भाडोत्र्याच्या घराप्रमाणे आपण या शरीरात आहोत. म्हणून त्याच्या करिता किती व्यवहार वाढविणार. दिवस संपल्याल्यावर जसा रस्ता दिसत नाही त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर तुझ्याकडून काही एक होणार नाही. हे सर्व लक्षात घेऊन सर्व व्यवहार बाजूला ठेवून दे. व रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्याचे पाय धर असे माऊली सांगतात.


५३४
जव या वायूचा प्रकाश तंव
या भंडियाचा विश्वासु ।
वायो निघोनियां गेला
ठाईहुनि जाला उदासु रया ॥१॥
काळाचें भतुकें श्रृंगारिलें कौतुकें ।
जातसे तें देखे परी न चले कांहीं ॥२॥
ठाईचेचि जाणार कीं नव्हे राहणार यासी
जतन ते काई ।
जेथील तेथें निमोनियां गेलें उपचार
नचलेचि कांहीं ॥३॥
हें काळाचें भांडें कीं अवघेंचि लटिकें
जैसें आहे तैसें सांगेन पुढती ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि
सकळ जीवांचा सांगाती रया ॥४॥

अर्थ:-

जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायुचा प्रकाश म्हणजे संचार आहे. तोपर्यंत शरीररुप भांड्याचा विश्वास आहे. एकदा काय शरीरातून प्राण निघून घेला की जागच्या जागी विद्रूप होऊन जाते.शरीर काळाचे खाद्य आहे. त्याला कोडकौतुक करुन श्रुंगारले तरी मृत्यू घेवून जात असता ते त्याच्या तावडीतून सुटण्याला काही एक उपाय चालत नाही. मूळातच हे शरीर जाणारे आहे ते राहणार नाही. त्याचे रक्षण तरी काय करणार. नष्ट होते वेळी त्याला टिकविण्याकरिता कितीतरी प्रयत्न केले तरी त्याचा कांही एक उपयोग होणार नाही.शरीर काळाचे भांडे तसेच हे मिथ्या आहे. याच्या विषयी जो खरा विचार आहे तो विचार एवढाच की, रखुमादेवीवर बाप जो श्री विठ्ठल तोच एक व्यापक असून जीवाला सर्व दुःखातून सोडविणारा तोच खरा सोबती आहे असे माऊली सांगतात.


५३५
स्वप्नींचेनी धनें भरोनियां लाहे ।
भला वेव्हार करुं पाहासी ।
मुद्दलाची नाहीं तेथें कळांतर कैचें
धरणें अधरणें घेतासी ।
लटिकिया साठीं संसार दवडोनी ।
ठकूनी ठकलासी रया ॥१॥
कवण नागवितो कां न गवसी ।
वेडावलेपणें ठकसील तूंची ।
चोरोनी तुझें त्त्वांची नेलें ।
आतां गार्‍हाणें कवणा देसी रया ॥२॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश ।
हे सहज परम गुण अंशांशा आले ।
येणेंची कष्टें व्यवहार करितां कोठें
काय सांठविले ।
विचारुनि पाहें तुझें त्वांचि नेलें
आतां तुजमाजी
हारपले रया ॥३॥
पुत्र कळत्र संपत्ती देखोनी संतोष मानिसी ।
घडि येकामाजी नासोनी जाईल जैसे
कां अभ्र आकाशीं ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलुची
ह्रदयीं असतां
का नाडलासी रया ॥४॥

अर्थ:-

स्वप्नातील धनाने ऐश्वर्य संपन्न होऊन सावकारीचा व्यवहार करू पाहतोस. पण मूळ स्वप्नातील धनच खरे नाही. तिथे व्याज कसले. आपले पैसे प्राप्त होण्याकरिता एखाद्यांच्या ठिकाणी धरणे घेणे किंवा न घेणे. मूळात खोटा असलेल्या व्यवहाराकरिता आयुष्य का नासवतोस.आणि त्या व्यवहाराचे ठिकाणी सत्यत्व मानून फसवीत आहेस. तू दुस-या कोणाला नागवितो आहेस की स्वतःच नागवला जात आहेस. याचा काही विचार न करता मूर्खपणाने तूच फसतो आहेस. आत्मस्वरुपाला चोरून म्हणजे विसरुन आपले ऐश्वर्य तूंच नष्ट केलेस. आता हे गाऱ्हाणे कोणांस सांगतोस. पंचमहाभूताच्या परस्पर ऐक्याने हा झालेला स्थूल देह त्याच्या ठिकाणी मीपणाचा अभिमान धारण करून आजपर्यंत कष्ट करून काय साठा केलास याचा विचार तर करून पाहा. तुझे आत्मस्वरुप अविवेकाने तुंच नाहीसे केलेस. आता हे हारपलेले आत्मस्वरुप तू आपले ठिकाणीच पाहा.त्या आत्मस्वरुपाला पाहाता म्हणजे त्याचा विचार न करता बायको, मुलगा किंवा ऐश्वर्य हे पाहून तुला संतोष वाटतो खरा परंतु आकाशातील अभ्र क्षणभर राहात नाही. ते क्षणात नष्ट होणार आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हृदयात असता कसा नाडला जाशिल असे माऊली सांगतात.


मुमुक्षूंस उपदेश – अभंग ५३६ ते ५९७

५३६
सुख सोज्वळ मोतियाचें लेणें ।
दिधलें जाई जेणें बाईये वो ॥१॥
देशीं नाहीं देशा उरी नाहीं ।
हाटणी नाहीं तें पाटणी नाहीं ॥२॥
लक्षाचेनि लाभें जोडलें निधान ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलु जाण ॥३॥

अर्थ:-

संसाराची दुःखे भोगीत असता कष्टी झालेली जी मी, त्या मला श्रीकृष्णाने मुक्तिरूप सोज्वळ अलंकार दिला अशाश्वत संसार कोठे आहे. म्हणून पाहू गेले तर तो बाजारात किंवा नगरांत नाही. तसेच रानावनांत नाही. देशात नाही. तत् पद लक्ष्याचा लाभ म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा लाभ हेच मला निधान म्हणजे मोठा ठेवा प्राप्त झाला आहे. तो ठेवा कोणता म्हणाल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हेच होय. असे माऊली सांगतात.


५३७
अनुभव रहणीविण कायसें श्रवण ।
गर्भ अंधु नेंणें रत्नाकिरण ॥१॥
गेले मेले काय सांगाल गोष्टीं ।
स्वयें आत्मज्ञानी घाली परमात्मीं मिठी ॥२॥
जीवा जीवन अंतरी बाहेजु निर्धारी ।
सर्व निरंतरी पूर्ण भरित ॥३॥
बाह्यजु प्रवृत्ति अंतरी निवृत्ति ।
उभयतां गति एक आहे ॥४॥
प्रसूतिकाळीं व्याली वांझ आपत्यजवळी ।
वांझ क्रीडा विनोदें रळि खेळतसे ॥५॥
अनुभव रहणीविण जाला भगवा दिगांबरु ।
जैसा नग्नवरु हिंडे हाटाबिदीं ॥६॥
तीर्थक्षेत्र व्रत दान यागादिक साधन ।
सगुण निर्गुण पाहीं या दोहोमाजि
होऊनि राही ।
तरी निवसि ठाईच ठायीं अरे जना ॥८॥
सगुण निर्गुण पाहीं जया पासोनि ।
ते राहे अनुभउनि येर वाउगेचि रया ॥९॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलेंसि एकांतु ।
द्वैताद्वैताची मातु उरेचिना ॥१०॥

अर्थ:-

अनुभवावांचून श्रवणाचा काय उपयोग,गर्भातील बालकाला रत्न दिसणार नाही. तसेच बहिर्मुख श्रोत्याला श्रवणाचे रहस्य कळणार नाही. गेलेल्यांच्या पुराणातल्या गोष्टी कशाला सांगत बसता. आत्मज्ञान संपादन करुन परमात्म्याला मिठी मारा. सर्व जीवांचे जीवन निरंतर परिपूर्ण अंतर्बाहा व्यापुन असा एक परमात्माच आहे. स्थूल दृष्टीने प्रवृत्ति व अंतरदृष्टीने निवृत्ति ही परमात्मस्वरूपी एकरूप होऊन जातात. मायिक पदार्थाच्या सर्व कथा व्यर्थ आहेत माया ही वांझ आहे, मिथ्या जगत हे तिचे पोर आहे. ते तिच्या जवळच माया त्या जगतरूपीपोराबरोबर क्रिडा करित आहे अशी ती माया तिचे मिथ्या जगतरुपी पोराना त्यांना मिथ्यात्वाने ओळखल्याशिवाय नुसती अंगावर भगवी वस्त्रे घेणे व दिगंबर म्हणून नग्न होऊन नवऱ्यामुलाप्रमाणे बाजारातून अथवा ओढ्यानाल्याकाठी हिंडणे व्यर्थ आहे. तसेच तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान, यज्ञादिक साधने कितीही जरी केली. तरी अनुभवाची खुण कळल्यावाचून सर्व व्यर्थ आहे. त्या साधनाचा धिक्कार असो. सगुण किंवा निर्गुण ह्या दोन परमात्मस्वरूपापैकी एका जरी स्वरूपाचा विचार केलास तरी भगवत् स्वरूप होऊन समाधानाला प्राप्त होशील. सगुण निर्गुण हे भेद ज्याच्या आश्रयाला राहातात त्याचा अनुभव घ्या इतर कांही करणे सर्व फुकट आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल यांच्याशी एकरूप झालास तर द्वैताद्वैताची गोष्टच उरणार नाही असे माऊली सांगतात.


५३८
स्वरुपावबोधु बोधु कां फ़ावला ।
इंद्रियीं डवरिला प्रेमभावो ॥१॥
जाणते निवाले नेणते गुंतले ।
भजनेंचि गोविले विसरे जावो ॥२॥
शांतता समता निवृत्ति उदारु ।
वर्षो न उध्दारु देतु असे ॥३॥
ज्ञानदेवा धीर घटमठीं सामा ।
अधउर्ध्व व्योमा हरि दिसे ॥४॥

अर्थ:-

आपल्याला ब्रह्मबोध झाला आहे असे समजणाऱ्या पुरूषाला माऊली विचारतात की तुला ब्रह्मबोध झाला आहे काय? झाला आहे असे म्हणेल तर तुझ्या सर्वेद्रियांच्या ठिकाणी भगवंताच्या विषयी प्रेमभाव भरला आहे काय? असे न जाणणारे अज्ञानी जीव संसारात गुंतून राहिले आहे. व ज्यांनी हे जाणले आहे. असे ज्ञानीपुरूष समाधानाला प्राप्त झाले आहे. व त्यामुळे ते प्रपंचालाही विसरून गेले आहे. अशा अधिकारी जीवांना कृपेचा वर्षाव करून शांतता व समाधान देणारे एक श्रीगुरू निवृत्तिनाथच आहे. त्यांच्या कृपेमुळेच मला दाही दिशेला एक श्रीहरिच दिसत आहे असे माऊली सांगतात.


५३९
सायुज्यसदनीं ज्ञानाचा उद्वार ।
विज्ञानें अमर पावताहे ॥१॥
साधनबाधन धन गोत वित्त ।
हरिविण वित्त मनीं नाहीं ॥२॥
मार्गींचा कापडी धरुनिया वोढी ।
ईश्वरीं उघडी उडी घाली ॥३॥
ज्ञानदेवा सिध्दी साधन सपूर ।
कलेवर कापूर मुरालासे ॥४॥

अर्थ:-

ब्रह ज्ञानाचा परिपाक म्हणजे सायुज्यमुक्ति व विज्ञानाचा परिपाक म्हणजे अमरपणा त्यामुळे पुनर्जन्म निवृत्ति ज्ञानप्राप्तीला केवळ हरिनाम हे कारण आहे.धन, साधन, गोतावळा याबद्दल लोभ असणे हे बाधक आहे. कारण हरिप्राप्तिवाचून त्याच्या मनात दुसरा विषय नाही.हरिप्राप्तीच्या मार्गातील वारकरी अंतरंग साधनाच्या ओढीमुळे हरिप्राप्तीकरिता वाटेल ते साधन करण्यास उडी घालतो.अशी ही भगवत् प्राप्तीची भरपूर साधने केल्यावर शरीररूपी कापुर हरिस्वरूपांत मिळून जाईल असे माऊली सांगतात.


५४०
काळें ना सावळें ।
श्वेत ना पिंवळें ।
नादबिंदाहुन वेगळें ।
तें कवणरे चांगया ॥१॥
ज्ञानदेव म्हणे जाण कां
माझे उमाणे ॥२॥
गोडापरिस गोड गगनाहुनि वाड ।
चौदाभुवना ज्याची चाड ।
तें कवणरे चांगया ॥३॥
ज्ञानदेवो मानवलें ।
माझें मज सांगितलें ।
दोहीचे मिळोनि एक जालें ।
भलें केलें चांगया ॥४॥

अर्थ:-

चांगदेवा जे काळे नाही, सांवळे नाही पांढरे नाही, पिवळे नाही नादबिंदु ही नाही त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे. हे माझे उखाणे तू जाण.जे गोडापेक्षाही गोड, गगनापेक्षा वाड, चौदाही भुवनातल्या जीवाला ज्याची चाड ते काय आहे. तें परमात्मरूप असे चांगदेवाने उत्तर दिले ते माऊलीनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तेसे सांगितले. यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्याठिकाणी ऐक्य झाले आहे. चांगदेवा हे फार चांगले केलेस.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५४१
आवो कमळनयनीं चांदिणें भासिलें ।
तयामाजी एक निराकार देखिलें ॥१॥
हेंही नव्हे तेंहि नव्हे
कांही नव्हे तोचि पैं होय ॥२॥
बापरखुमादेविवरु नव्हताचि पैं जाला ।
होऊनियां फ़ावला फ़ावो सरला ॥३॥

अर्थ:-

डोळ्यामध्ये सुंदर सगुण परमात्मरूपी चांदणे दिसले. त्यामध्ये निराकार अशी वस्तु पाहिली म्हणजे त्याचे ज्ञान झाले. ती निराकार असल्यामुळे अशी नाही व तशी नाही असे काहीच बोलता येत नाही. सर्व अविद्या कार्याचा लय जेथे होतो. तीच ही निराकार परमात्म वस्तु होय. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मूळचे निर्गुण असून, सगुण झाले. म्हणून भक्तांना त्याला प्राप्त करून घेणे सोपे झाले असे माऊली सांगतात.


५४२
मेरुपरतें एक व्योम आहे ।
तेथें एकु पाहे तेज:पुंजु ॥१॥
तेज नव्हे तेज:पुंजू नव्हे ॥२॥
शितळ नव्हे शांतही नव्हे ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलही नव्हे ।
नव्हे तो होये चतुर्देहेंविण ॥४॥

अर्थ:-

स्वर्ग, मृत्यू, पातळ हे मेरू पर्वताच्या आधारावर आहेत त्याच्याही पलीकडे एक व्योम म्हणजे चिदाकाश आहे. त्या चिदाकाशात तेजःपुज असा कोणी एक आहे. खरा विचार केला तर ते तेजही नाही व तेजःपुंज ही नाही. शितळ ही नाही व शांतही नाही कारण तो परमात्मा सर्व धर्म विवर्जित आहे.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते स्थूल सूक्ष्मादि चारी देहांहून विलक्षण असे आहेत. असे माऊली सांगतात.


५४३
पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें ।
तें कैसें आकळे म्हणतोसि ॥१॥
आहे तें पाहीं नाहीं तें होई ।
ठायींच्या ठायीं तुंची होसी ॥२॥
स्वरुपीं समता ह्रदयस्था आप ।
तयाचें स्वरुप आदि मध्यें ॥३॥
बापरखुमादेविवरु सगुणी समाये ।
निर्गुण दिसताहे जनीं रया ॥४॥

अर्थ:-

दृश्य द्रष्टा व दर्शन या त्रिपुटीहून ब्रह्म निराळे आहे. ते या त्रिपुटीस कसे आकलन होईल. त्या परमात्म्याला तु पहा. त्याच्या ठिकाणी काही नाही. त्या गगनाच्या पायी म्हणजे परमात्म स्वरूपी तद्रुप होशील. परमात्म्याच्या ठिकाणी तू एकरूप झालास म्हणजे जगाच्या उत्पत्ति स्थिती व लय यांना तूच अधिष्ठान होशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते सगुणच नसून जनावनामध्ये निर्गुणरूपानेही मला तोच दिसत आहे. असे माऊली सांगतात.


५४४
त्रिपुटी उलटु निर्गुणि अरुता ।
पाहातां दृष्टांता भेदु नाहीं ॥१॥
भेदु अभेदु अवघाचि गोविंदु ।
बिंबे बिंब छंदु हरि लीळा ॥२॥
नाहीं आला गेला शब्द पैं दृष्टांतें ।
दृश्यादृश्य भूतें एकतत्त्वीं ॥३॥
बापरखुमादेविवरु अर्ध उर्ध्व शेज ।
वेंगीं तूं उमज अरे रया ॥४॥

अर्थ:-

निर्गुणाच्या अलिकडे असलेली जी त्रिपुटी तिचा विचाराने निरास करून निर्गुणाचे स्वरूप जाणले असता त्याठिकाणी भेदच राहात नाही.मग त्याला प्रमाण काय देणार.परंतु श्रीहरिची कांही अशी विचित्र लीला आहे की तो देव व भक्त या रुपाने आपणच सर्व बनला आहे. तो परमात्मा भक्त झाला तरी केव्हाही जीवरूपाला आला नाही.व गेला नाही. त्याच्या संबंधी वेदवाक्यहाची तसेच आहे. त्याला दृष्टांतही देता येत नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलावाचून दुसरे काहीच नाही तसे त्यांना समजून घे. असे माऊली सांगतात.


५४५
व्यक्ताचे अव्यक्ती पाहतां पैं
न दिसे आपीआप रसे व्यक्त हरि ॥१॥
बाहेजु भीतरी आदिमध्यउर्ध्व ।
ह्रदयीं सन्नद्व बिंबलासे ॥२॥
ऐसीये दशे ते अव्यक्त भुंजसी ।
मी माझे मोहासी सांडी रया ॥३॥
बापरखुमादेविवर अव्यक्त व्यक्ती अव्यक्त ।
अवघे संचित हरि आहे ॥४॥

अर्थ:-

विचार दृष्टीने पाहिले असता अव्यक्त परमात्म्याच्या ठिकाणी नामरुपात व्यक्त जगत दिसत नाही. तसे पाहिले तर जगत, अधिष्ठान दृष्टीने परमात्मा आहे. तो हरि आत बाहेर, आदि, मध्य आणि हृदयांत व्यापक रूपाने आहे. व आभास रूपाने हरिच आहे. अशा अव्यक्त हरिला प्राप्त हो. आणि मी व माझे अशा मोहाचा त्याग कर. व्यक्त,अव्यक्त, व्यक्ति, संचित हे सर्व माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल तद्रुपच आहे. असे माऊली सांगतात.


५४६
नित्यता समाधी असोनि पै साधी ।
मायेची शुध्दि पुसे रया ॥१॥
साधन विधान पुजा अनुष्ठान ।
नित्यता कीर्तन सोहंभावे ॥२॥
स्मरण विलास तत्त्वीं तत्त्व हाला ।
उपदेशु बोला बोलों नये ॥३॥
ज्ञानदेवा सिध्दि नित्यता समृध्दि ।
जीवशिवबुध्दि समाधि त्याची ॥४॥

अर्थ:-

सहजस्वरूपसमाधी असून तिच्यामध्ये मायेने प्रतिबंध आणला आहे. त्या मायेच्या शुद्धिचा विचार गुरूना विचारून घे. त्या मायेच्या निरासाचे साधन म्हणजे भगवत् पूजा व नामाअनुष्ठान असा सोहंभावाचा जपही आहे. या साधनांनी परमात्मा साध्य होईल असे समज. अशा उपदेशाशिवाय दुस-या गोष्टींना उपदेश असे समजू नये.जीवशिवाचे ऐक्य समजणे हीच नित्य समाधी आहे.असे माऊली सांगतात.


५४७
पाहोनिया दिठी नवजाय भूली ।
मायेची घरकुली खेळतुसे ॥१॥
माया मन पाही मायेसीही पर ।
परते सत्त्वर निमिष्य नाहीं ॥२॥
खेळतां बाहुली स्वप्नचि वर्तवी ।
रावोरंक दावी भेदबुध्दी ॥३॥
बापरखुमादेविवर अभेदुनि अभिन्न ।
हरिरुपीं लीन जिवशिवीं ॥४॥

अर्थ:-

इतर विषयाला न भुलता आत्मस्वरुपाला पहा. तो परमात्मा शरीररूपी मायेच्या घरात खेळत आहे. मायारुपी मनाने मायेकडे पाहिलेस तर त्या परमात्म्याला पहाण्यास क्षणभर वेळ लागणार नाही. त्याचा हा विलास खरा नसून स्वप्नाप्रमाणे भासतो व तेथे राजा व रंक असा भेद राहात नाही.माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांच्या ठिकाणी जीव शिवादी भेद मावळतात व ते अभेद स्वरुप आहेत असे माऊली सांगतात.


५४८
अहंते न पाहे नाहीं तेची पाहे ।
भुलिसवें जाय काय करुं ॥१॥
सोहंभावें सोकरी कोहं
भावें हो जरी ।
पाहे दुरीच्या दुरी एकतत्त्वीं ॥२॥
आदि हें माजिठें रुपीं रुप पैठें ।
असोनियां द्रष्टे न पाहे भुली ॥३॥
बापरखुमादेविवर भुलिभुररेंहरि ।
माजिठा श्रीहरि आपरुपें ॥४॥

अर्थ:-

अहंकाराने आत्मत्वाने परमात्म्याला पाहू नकोस मायेच्या भुलीने जीव उगीच वाहात जातो. देहादिक मीच आहे. असे समजता याला काय करावे.कोहंभावे’ म्हणजे मी कोणआहे. अशी चिंता करतोस. त्यापेक्षा मी परमात्माच आहे. अशा सोहंभावाने आत्मस्वरूपात संग्रह कर. तो आत्मा देहादिक अनात्म पदार्थाहून फार दुर आहे. म्हणुन त्या एकतत्त्वरूप आत्म्याला पाहा. अगोदर रूपवान माया हे एक सुंदर वस्त्र आहे. त्या वस्त्राला न भुलता आपण हरिरूपच आहो असा निश्चय कर असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल ह्यांना विसरु नकोस असे माऊली सांगतात.


५४९
जनवन हरि न पाहतां भासे ।
घटमठीं दिसे तदाकारु ॥१॥
फ़िटती भुररे धुम उठी तेजा ।
अक्षरीं उमजा गुरुकृपें ॥२॥
खुंटलिया मुक्ति राहिले अव्यक्तीं ।
एकरुप ज्योती तदाकार ॥३॥
ज्ञानदेव क्षर अक्षर उमजे ।
बापरखुमादेवीवर ह्रदयीं विराजे ॥४॥

अर्थ:-

जरी पहावयाच नाही म्हटले तरी सर्वत्र जनी वनी श्रीहरीच भासतो. घट मठ इत्यादी पदार्थ तदाकारच दिसतात.असा बोध झाला म्हणजे सर्व युक्त्या कुंठीत होऊन जातात. आणि एक परमात्मस्वरूपच शिल्लक राहाते. नाहीसा झाला म्हणजे अग्नी प्रगट होता. त्याप्रमाण मायेचा निरास करून परमत्म्याचे ज्ञान करून घ्यावे. क्षर अक्षराचे स्वरूपहुन निराळा जो रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्यांना ओळखले त्यामुळे ते माझ्या हृदयांत कायमचा विराजमान झाले आहेत. असे माऊली सांगतात.


५५०
दिव्य औषधीची वार्ता ऐकोनियां
कानीं व्याधी टाकी तनु ।
धालियाचे सुख भूकेला जेवि जाणे
कैसे निवे त्याचे मनु रया ॥१॥
सुखाचा अनुभव कैसेनि जाणावा ।
भेटिचें आर्त सकळांसही
सारिखें होईजे देखा ॥२॥
आपण झालिया जागा
नलगे सांगावें ।
बापरखुमादेविवरविठ्ठल भेटलिया ।
तरि तुझीं तुटतील सकळिक
विंदाने रया ॥३॥

अर्थ:-

एखाद्या दिव्य औषधाची नुसती वार्ता ऐकल्याने देहाचा रोग नाहीसा होतनाही. जेऊन तृप्त झालेल्या मनुष्याचा आनंद भुक लागलेल्या मनुष्याला कळणार नाही. एकाच्या सुखाचा अनुभव दुस-याला कसा येईल. या करता जिवशिवाचे ऐक्य करून तो अनुभव पहावा म्हणून सुखाचा अनुभव ज्याचा त्यालाच झाला पाहिजे. व तो जीव शिवाच्या ऐक्याने होणारा आनंद सर्व मुमुक्षुस होईल. कारण आपण जागे झालो हे सांगयला लागत नाही. कारण त्याचा अनुभव त्यालाच असतो. रखुमादेवीचे पती व माझे पिता जे श्रीविठ्ठल त्याची भेट झाली तर तुझी सर्व संसारिक दुःख नष्ट होतील. असे माऊली सांगतात.


५५१
सर्वांग देखणा हाचि भावो जाण ।
येर निराकारणें वाया वोझें ॥१॥
शक्तीचा पडिभरु वाहासिल माथा ।
श्रीगुरुपायां शरण जाई ॥२॥
नसंडी वेदसिंधु सांडी मांडी कर्म ।
उपाधीचा धर्म करुं नको ॥३॥
बापरखुमादेविवरदेखणा सर्व दृष्टी ।
तेथें प्रपंच गोष्टी मुरलिया ॥४॥

अर्थ:-

श्रीहरि ज्ञानस्वरूप आहे. असा विश्वास धरून त्याचे चिंतन कर इतर शास्त्राध्ययनाचे ओझे टाकून दे. बुद्धिच्या सामर्थ्याची घमेंड धरशील तर फुकट जाशील. म्हणून मुकाट्याने श्रीगुरूला शरण जा.तसेच जो वेद त्याच्या उपदेशाप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करू नकोस. मात्र त्या नित्य नैमित्तक कर्माविषयी कर्तृत्वाचा अभिमान धरू नकोस.माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल, ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याच्याठिकाणी प्रपंचाच्या सर्व गोष्टी नाहीशा होतात. असे माऊली सांगतात.


५५२
संसारकथा प्रपंच चळथा ।
मनाचा उलथा विरुळा जाणे ॥१॥
होतें तें पाहीं नव्हे तें घेई ।
द्वैतबुध्दि ठायीं गुंफ़ों नको ॥२॥
चित्तवृत्ति ध्यानीं मनाची निशाणी ।
भ्रमभेद कानीं ऐकों नको ॥३॥
ज्ञानदेव गंगा नि:संगाच्या संगा ।
वेगीं श्रीरंगा शरण जाई ॥४॥

अर्थ:-

संसाराच्या गोष्टी म्हणजे केवळ बाष्कळ गोष्टी आहेत. आत्मस्वरूपाचा विचार करणारा जगांत फार विरळा आहे. जे होते ते पहा आणि या अनात्म द्वैतबुद्धीत गुंतु नको. चित्ताला परमात्मस्वरूपाचे नित्य ध्यान करीत जा. भेदभ्रमाची गोष्ट कानांनी ऐकू सुद्धा नको.ज्ञानेश्वर महाराज सांगतात. माझी बुद्धीरूपी गंगा संग रहित परमात्म्याच्या संगतिला लावली आहे. तसे तुही कर म्हणजे तू अविनाशी भेदरहित स्वरूपच होशील.


५५३
ऐके तूं ज्ञान सुख विश्रांति रुपा ।
हरिरुप दीपा पाहे ऐसा ॥१॥
चित्तवृत्तिचिया आदिमध्य अंतीं ।
रुपींरुप आनंदीं समरसें ॥२॥
निवृत्ति सांगे ज्ञाना योगाचि धारणा ।
जीवशिव करणा चक्षु दृष करी ॥३॥

अर्थ:-

हे सुखाच्या विश्रांति रूपा ज्ञानदेवा, सर्व ठिकाणी ज्ञानरूपाने परमात्मा भरला आहे असे तू पहा. चित्तवृत्तीच्या आरंभी व शेवटी एकरूपाने असणारा आनंदरूप हरीच आहे. त्याच्याशी तूं समरस हो. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात हे ज्ञानदेवा योगाने साध्य होणारे जे जीवेश्वराचे एकत्व त्याचे साधन जे ज्ञान ते तूं आपल्या चित्तामध्ये दृढ संपादन कर. असे माऊली सांगतात.


५५४
येथें तेथें दुरि तो नांदी मंदिरीं ।
आत्मा चराचरीं एकपणें ॥१॥
ऐसा पाहे दृष्टि चैतन्याची सृष्टि ।
तरि सुदर्शन घरटीं आपेआप ॥२॥
जातजात येणें प्रपंच साधणे ।
गाळूनियां गगन हंस घेई ॥३॥
ज्ञानदेव संधी साधूनिया सिध्दि ।
छपनाची संधी टाकुनि गेला ॥४॥

अर्थ:-

तो परमात्मा आत्मस्वरुपाने आजुबाजुस व घरदारात सर्वत्र एकपणाने व्यापुन आहे. ज्याच्याकडे आशी समदृष्टी आहे अशा जीवाच्या रक्षणासाठी त्याचे सुदर्शन चक्र त्यावर आपोआप घिरट्या घालत राहते.जसे निरक्षिररुपाने तो राजहंस सर्व घेत असतो तसाच हा प्रपंच पारखुन घे.मी ही सर्व पाहुन घेतले व शास्त्राच्या कटकटी टाकुन त्या स्वरुपाचा बोध घेतला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५५५
सार सप्तमीसि हारपली निशी ।
दशवे द्वारेसीं उभा राहे ॥१॥
तेथें तूं सावध अवघाचि गोविंद ।
देहीं देहाभेद करुं नको ॥२॥
इंद्रियांच्या वृत्ति दशवे द्वारीं गति ।
देहागेहउपरति होईल तुज ॥३॥
विस्तारी विस्तार गुण गुह्य सार ।
एकाएकीं पार सार साधी ॥४॥
विकृति विवर प्रकृति साचार ।
तत्त्वाचा निर्धार समरसीं ॥५॥
निवृत्ति सांगे ज्ञाना एक तूं करी ।
तरी तुतें कामारी होईल चित्तें ॥६॥

अर्थ:-

पंचज्ञानेंद्रिये मन व बुद्धी या सातापैकी सार जी बुद्धी ती ज्यावेळी ब्रह्मरंधरूप दहाव्या दारांत उभी राहिली. तेव्हा अज्ञान त्यासह वर्तमान बुद्धी लीन होऊन गेली. त्या ठिकाणी तूं सावध चित्ताने राहिलास म्हणजे सर्व गोविदरूपच होशील. देही म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह वेगळा मान् नको. त्याच प्रमाणे त्या दहाव्या घरामध्ये तुझ्या देहाच्या घराची इंद्रियाच्या वृत्तीची उपरती होईल.जगताच्या विस्तारामध्ये त्याचप्रमाणे सत्त्व रज तम गुणामध्ये अन्वय ज्ञानाने तोच पूर्ण भरलेला आहे. व्यतिरेक ज्ञानाने तो सर्वाच्या पलीकडे असून मुख्य सार आहे. तो तूं बळकट धर.मूळ प्रकृतिची म्हणजे मायेची जगरूपी विकृति हे विवर असून खऱ्या तत्त्वाचा निर्धार एकरूप आहे. निवृत्तीनाथ म्हणतात हे ज्ञानोबा तूं एक कर की त्या परमात्म्याचे ज्ञान करून घे. त्यामुळे माया ही तुझी मनोभावाने दासी होईल.असे माऊली सांगतात.


५५६
शांतिक्षमादया निवती निर्विग ।
होउनी सर्वांग आत्मभोगी ॥१॥
नाहीं अंतरुप सर्वही चैतन्य ।
चिदानंदघन बिंबलेंसे ॥२॥
मायीकवृत्तीचा झणी धरिसी संग ।
इंद्रियाचा पांग सांडी रया ॥३॥
ज्ञानदेव म्हणे कल्पना काजळी ।
दिपीं दीपमेळीं पाजळी वो जगीं ॥४॥

अर्थ:-

परमात्मप्राप्तीला साधनभूत असणा-या शांती क्षमा दयादि अंतःकरणवृत्ति यत्किंचित न्यून न राहाता शांत होऊन सर्वांगाने आत्मसुखाचा आनंद भोगितात. ज्याला अंत नाही व रूप नाही, असे चिदानंदघन चैतन्य सर्वत्र प्रतिबिंबित झालेले आहे. त्यात मायिक वृत्तीचा संग धरून इंद्रियांची हौस फेडण्याचा कदाचित मनात संकल्प कराल. तर तो सोडून द्या रे गड्यांनो माऊली ज्ञानदेव सांगतात आत्मस्वरूप दिव्याच्या ठिकाणची कल्पनारूपी काजळी झांडून आत्मरूपी दिवा पाजळणे येवढेच मनुष्याचे जगांत कर्तव्य आहे.


५५७
असार घेईजे सार परखुनियां विचार ।
जेणें तुटे येरझार मरणजन्मीं ॥१॥
तें रुपस रुपडे पहा न संपडे ।
ह्रदयीं सांपडे ज्ञान गोष्टी ॥२॥
सांगता अनुमान अद्वैत सार पूर्ण ।
ज्ञानाज्ञानीं सज्ञान विरुळा जाणे ॥३॥
ज्ञानदेव सोपान सांगितलिया संपन्न ।
हरितत्त्व अनुप्रमाण लाधे पूर्वपुण्यें ॥४॥

अर्थ:-

असार असा जो संसार त्यांत सत्य मिथ्या काय आहे. हे पारखून म्हणजे शास्त्रदृष्टीने विचार करून त्यातील सार जे परमतत्त्व त्याचे गृहण केले तर जन्ममरणाची येरझार तुटून जाईल. ते परमात्मस्वरूप पाहु गेले तर डोळ्याला सापडणार नाही. संताच्याकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यानंतर ते परमात्मतत्त्व तुझ्या हदयातच सापडेल. तात्पर्य आत्माच ब्रह्म आहे. अनुमान म्हणजे युक्तीने विचार केला तर अद्वैत हेच सर्वसार आहे. हे सार ज्ञानाने म्हणजे ज्या ज्ञानाने हा साधक परमात्मतत्त्व जाणणार त्या ज्ञानातच शुद्ध ज्ञानस्वरूपभूत ज्ञानतत्त्व आहे. असे जाणणारे फार विरळे आहेत. माऊली ज्ञानदेव सांगतात ज्याचे पूर्वपुण्य उत्तम आहे तो सांगितलेल्या मागनि जाईल तर अत्यंत सूक्ष्माहून सूक्ष्म जे हरितत्त्व ते त्यास प्राप्त होईल.


५५८
निर्मिला म्हणसी परेचा विस्तार ।
तेथें हा विचार वांयावीण ॥१॥
पर नाहीं तेथें अरुतें कैंचे ।
आदिमध्य साचें कळिका हरि ॥२॥
नाहीं त्या सन्मान विकृति उपरमु ।
दिपीं दीप समु शेजबाजे ॥३॥
बापरखुमादेविवरु परेसि परता ।
हा विचारु अरुता
दिसे भान ॥४॥

अर्थ:-

शास्त्रवचनाचा आधार घेऊन परमात्म्यापासून हा त्रैलोक्याचा विस्तार झाला आहे असे म्हणतोस परंतु हा विचार अयोग्य आहे.त्या परमात्मवस्तुचे ठिकाणी अलीकडे, पलीकडे, आदि, मध्य, अन्त वगैरे कांही नसून सत्यत्वाने ज्ञानस्वरूप हरिच आहे. त्याला मोठेपणा नाही, विकार नाही, अर्थात उपरमही नाही. रखुमाईचे पती व माझे पिता हे स्वयंप्रकाशी आहेत. तसाच तो सर्वत्र समान आहे. त्यांच्या ठिकाणी ते परेहुनही पर आहते. असे म्हणणे देखील निकृष्ट आहे. असे माऊली सांगतात.


५५९
सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां ।
अज्ञानीं अमृता सदगुरु जाणे ॥१॥
गुरुगम्य सत्ता शिष्य होय सरता ।
पूर्णी पूर्ण हातां ब्रह्म येत ॥२॥
आदि मध्य घर हरीचा शेजार ।
हरिविण थार नाहीं कोठें ॥३॥
ज्ञानदेवीं चित्त गुरु धर्म वित्त ।
अवघें जीवित हरि केला ॥४॥

अर्थ:-

ज्ञानी पुरूषाला इतर लोक अज्ञानी दिसतात पण तेच लोक जर सदगुरुला शरण गेले तर ते परमात्म्याला जाणून ब्रह्मस्वरुप जाणतात. श्रीगुरूच्या ठिकाणी असणाया अगम्य सत्तेला जो शिष्य शरण जाऊन सरता होईल. त्याला परिपूर्ण असलेले ब्रह्मस्वरुप त्याच्या हाती लागेल. आणि त्यामुळे ज्याला उत्पत्ति स्थिती, नाश नाही अशा श्रीहरिचा शेजार त्याला मिळून हरि व्यतिरिक्त कांही नाही. असा त्याचा निश्चय होतो. श्री गुरुंमुळे माझे चित्त, वित्त, धर्म इत्यादी सर्व हरिरूपच झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५६०
मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी ।
अळंकारलें उठी गंधर्वनगर ।
तेथेंचिये राणिवेसाठीं कां
भ्रमु धरितासि पोटीं ।
जेथें जेथें पाहातां पाहणें
नुठी तोचि होई ।
म्हणोनि देखणीया जवळीके कीं
दृष्टिविण सुके तैसें स्वानुभवें
स्वानुभव मावळे ज्याच्या ठायीं ।
ते अवस्थेविण दृष्टि गोचर होई
वेगीं तें देखणेंचि दृष्टि विठ्ठल रया ॥१॥
तुझें तूंचि विंदान जाणोनि पाहीं ।
आपेंआपवीण विचारु नाहीं ॥२॥
म्हणौनि एकमेका मज आठवे
आठवेचि विसरोनि फ़ावे ।
पैं देहद्वयभाव विरोनि जाय
तेथें पदत्रयाची मांडणी कीं
तत्त्वत्रयाची वाणि या
पांचांते जेथ न फ़ावे ।
कर्मेद्रिया ज्ञानेंसी ज्ञानेंद्रियें जो
नेमेसी तंव ते विस्मो करुनि
पाहे सुखस्वानुभवादु:ख प्रकाशले
ते सुख केवि फ़ावे ।
याचिया गुणागुण न गुंजिजे ह्र्दयीं
सुखावोनि तेंचि तूं राहे रया ॥३॥
मग आंग शेजबाज कीं हे बाह्येंद्रियांचे
उपभोग मानिसीं साच ।
जरी सोंग स्वप्नींचें असे ऐसें
जाणतां निदसुरा होसी दातारा
या स्वप्नींच्या वोरबारा
बापा वोथरसि कांपा ।
म्हणोनि बापरखुमादेविवरुविठ्ठलु
उघडे डोळांचि निधान देखिजे
तवं मार्ग सोपा ।
म्हणोनि तेथींच्या तेथें पाहतां
याविण नाहीं दुजें ।
वाया खटपट करिसी बापा रया ॥४॥

अर्थ:-

स्वप्न आणि गंधर्वनगर हे मनकल्पित खोटे असते. त्याप्रमाणे जागृत व्यवहाराचे ऐश्वर्यही खोटे आहे. त्याच्या प्राप्तीकरिता भ्रमित होवु नकोस ज्ञाता व ज्ञान ज्या ठिकाणी उठत नाही अशा परमात्मप्राप्तिकरिता खटपट कर, विचाराचे दृष्टीने व्यवहारिक दृष्टी नष्ट होऊन स्वानुभव ज्याचे ठिकाणी मावळतो ते स्वरूप स्वानुभवाचे आपले ठिकाणी तूंच हो. ती दृष्टी म्हणजे अवस्था दृश्यावाचून परमात्मा श्रीविठूरूपच आहे. तू आपल्या आत्मस्वरूपाच्या छंदानी आत्मविचाराशिवाय दुसरा विचारच नाही. असे जाणून आत्मस्वरूपाकडे पाहा. असे पाहू लागलास म्हणजे पाहण्याचा विषय परमात्मा आणि त्यास पाहणारा मी एक अशी प्रथम काही वेळ निदिध्यासनाची स्थिती असते. पाठीमागून तो आठवही विसरून आपोआप परमात्मरूप प्राप्त होते. पण त्याठिकाणी स्थूल, सूक्ष्म देहद्वय विरून जाऊन तेथे तत्त्वमसि या तीन पदाची एकता किंवा जीव, ईश, आणि परमात्मा हे तीन व पूर्वीचे देहद्वय मिळून पांच संख्या होते व त्या पाच संख्येचा परमात्मस्वरूपाचे ठिकाणी नियमीत असलेली ज्ञानकर्मेद्रिये यांचा संभवही नसतो. असा स्वानुभवाचा मोठा विस्मय आहे. सुखरूप परमात्माच स्वानुभवाने प्राप्त झाल्यानंतर दुःखच सुख कसे होते या विवंचनेत तू न पडता त्या सुखात राहा. एक बाज त्याजवर बिछाना व त्याच्यावर आपले अंग अशा तहेचे बाह्यंद्रियांचे उत्तम भोग जर सत्य मानशील तर आत्मस्वरूप ज्ञानशून्य असा झोपी गेल्यासारखा होशील. स्वप्नातल्या व्यवहारावर विश्वासून का राहतोस. तो भ्रम टाकून देऊन आत्मस्वरूप डोळे उघडून अनंत सुखाचा ठेवा, माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल त्यांना डोळे भरून पाहा.म्हणजे तुला आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा होईल. याकरिता जागच्या जागीच म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी परमात्मस्वरूप पाहवे. हेच मुख्य कर्तव्य आहे. याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून दुस-या फुकट खटपटी कां करतोस?असे माऊली सांगतात.


५६१
शून्याशून्य धार शून्यशेजे हरी ।
शून्यामाजि घरीं बिंबलासे ॥१॥
आधीं आप पाही शून्या शून्य देहीं ।
मज उमजोनी ठायीं घेईजे सुख ॥२॥
शून्य ते कांई शून्याशून्य पुशिलें ।
ह्रदयस्था जालें कोण्या गुणें ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल अवघा ।
शून्याशून्य वेगा ज्ञानघन ॥४॥

अर्थ:-

जगाची अव्यक्त अवस्था म्हणजे शून्य. त्या शून्याचा आधार जी मिथ्या माया तीही शून्यच म्हणजे सत्तास्फुर्ति विरहित, शून्याचा आधार जी माया तिची सेज म्हणजे,आश्रयस्थान जो श्रीहरी परमात्मा तो शून्यरूप मायेमध्ये प्रतिबिंबित झाला आहे. असे अगोदर स्वतः पहा. शून्याशून्य म्हणजे स्थूल, सूक्ष्म रूपी देहांत याचा विचार करून स्वतःचेच ठिकाणी त्या परमात्म्याचे सुख घे. शून्याचा म्हणजे, मायेचा विचार केला असता शून्याशून्य रूप जो स्थूल सूक्ष्म रुप ते पुसून जाते मग कोणत्या गुणांनी हृदयस्थ परमात्मा शून्याशून्यरूप जे ते कसा बनणार.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच सर्व काही आहेत. असे माऊली सांगतात.


५६२
शांति दिसे ओहं पर दिसे सोहं ।
क्षमा हे कोहं कारुण्य सदां ॥१॥
स्नेहाची दिवाळी फ़ेडूनी काजळी ।
या दीपें वोंवाळी जीवशिवीं ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान दृश्याद्रष्टा दीप्ती ।
रुपीं रुपस्थिति अंकुरलासे ॥३॥
बापरखुमादेवीवर विठ्ठल साच ।
मी माझें आहाच वांयावीण ॥४॥

अर्थ:-

सर्व सामान्य जीवांना ‘कोहं’ म्हणजे मी कोण आहे. हे कळत नसते. अशा जीवांच्या अपराधाची क्षमा करून कारूण्याने सदैव असणाऱ्या श्रीगुरूनी पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारा जो परमात्मा तोच तू आहेस असा उपदेश केला असता जीवाच्या ठिकाणी मीच परमात्मा आहे. असा बोध उत्पन्न होऊन सर्वत्र शांति दिसु लागते. प्रपंचाची काजळी फेडून स्नेहाची म्हणजे आनंदाची दिवाळी होते. अशा बोधरूपी दिव्याने जीवशिवांची आरती करावी. त्या स्वरूपांच्या ठिकाणी ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, दृश्य, द्रष्टा, दर्शन ह्या त्रिपुटी त्या परमात्मस्वरूपांवरच आहेत.माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच एक सत्य आहे. या शिवाय मी माझे इत्यादी दिसणारा प्रपंच मिथ्या आहे. असे माऊली सांगतात


५६३
साउमा जंव जाये तंव ह्रदयींचा आहे ।
चित्त विकासु पाहे चित्तामाजी ॥१॥
तंव चतुर्भुज हरि ह्रदयमंदिरीं ।
तया नमन करी विज्ञानेसी ॥२॥
शांति धरुनि बाही आपेंआप पाही ।
मननीं निर्वाही न्याहाळिला ॥३॥
ज्ञानदेवा रुप बिंबोनी ।
समीप प्रपंचदु:ख सुख जालें ॥४॥

अर्थ:-

परमात्म्याचा कानोसा घेऊन तो कोठे आहे असे पहावयास गेले तर तो माझ्या हुदयातच आहे. असे कळले. चित्त शुद्ध करून त्याला पहा, म्हणजे तो चित्तामध्ये आपोआप प्रगट होईल म्हणजे तो तुझ्या इदयातच दिसेल त्या मूर्तीला हे माझेच स्वरूप आहे असे जाणून नमन कर. चित्ताचे धैर्य धरून त्या मूर्तिला आपल्याच ठिकाणी पहा आणि तो परमात्मा मी पाहीला म्हणजे ज्ञानाचा विषय केला असे मात्र म्हणू नकोस. ते रूप आमच्या अंतःकरणात आम्हाला पहावयास मिळून दुःखरूप प्रपंच सुखरूप दिसु लागला. असे माऊली ज्ञानदेव सांगातात.


५६४
औट हात चर्म देह बांदवडी ।
त्रिगुणाची घडी नुगवे रया ॥१॥
सोकरितां धाया काय करिल माया ।
श्रीगुरुच्या थायां विरुळा जाणे ॥२॥
सोहंकारा सोहंकारा हरी पोकारा ।
वायांच मायेचा वारा भरुं नका ॥३॥
सप्तद्वीप पृथ्वी नव खंडें देव ।
स्वर्गभोगभाव राणिव व्यर्थ ॥४॥
ज्ञानदेवीं सार हरिपंथ पार ।
एकतत्त्व उच्चार तिहीं लोकीं ॥५॥

अर्थ:-

ज्ञानदेवी सार हरिपंथ पार । एकतत्त्व उच्चार तिहीं लोकीं ॥५॥ सत्व, रज तमात्मक जो साडेतीन हाताचा, चामड्याचा देह म्हणजे स्थूल देह त्याच्या तडाख्यात सापडलेल्या जीवास त्यातून बाहेर निघणे होत नाही. पुष्कळ खटपट केल्यातरी ती माया तुला कशी बाहेर जाऊ देईल बाहेर पडण्याचे मुख्य वर्म श्रीगुरूचरणसेवा हे आहे. पण हे वर्म जाणणारा क्वचित असतो.‘सोहं’ म्हणजे तो परमात्मा मी आहे. असा हरिनामाचा गजर करा. निष्कारण माया मोहात पडू नका. सप्तद्वीप, नवखंड पृथ्वी इंद्रादिक देव व त्यांचे स्वर्गादिकातले ऐश्वर्य हे सर्व भोग फुकट आहेत. या असार संसारांत ऐक्यभावाने हरिभजनाचा पंथ हे त्रैलोक्यांत मुख्य साधन असून त्या परमात्म्याच्या भजनानेच संसारातून पार पडणे शक्य आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५६५
दीपकेमाजि दीपक दीप्तीसि सतेज ।
बिंबोनिसहज बिंबीं मिळे ॥१॥
बिंब नाहीं पाहासील काई ।
ठायींच्या ठायीं होऊनि राही ॥२॥
सर्वा सर्वरस समरसोनी आहे ।
उभारुनि बाहे वेद सांगे ॥३॥
ज्ञानदेव निजीं निजोनि सहज ।
देहींचा निर्लज्ज रुसला सये ॥४॥

अर्थ:-

जीवाच्या ठिकाणी जो ज्ञानरुपी दिवा आहे. त्या दिव्याचे तेज परमात्मा आहे. त्या परमात्म्याचे तेजाचे प्रतिबिंब जीवांचे ठिकाणी आहे. बिंब व प्रतिबिंब एकच असते. त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी सहज एकत्व आहे.बिंबरूप परमात्मा नसता तर प्रतिबिंबरूपी जीव तरी कसा दिसला असता ?म्हणून प्रतिबिंबरूप जो तूं, बिंबरूप परमात्म्याशी एकरूप आहे. परमात्मा सर्व ठिकाणी एकरूपाने आहे. असे वेद हात वर करून सांगत आहेत. मी माझ्या स्वरूपांच्या ठिकाणी सहजस्थित असल्याने माझ्या ठिकाणचा निर्लज्ज देहअहंकार निघून गेला आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५६६
जिणें देउनि देहीं नि:शंक होईजे ।
मां मरणें तयासि म्हणिजे ॥१॥
जिणें तें काई मरणें तें काई ।
जिणें मरणें दोन्ही चोजवेना ॥२॥
सिंधु बुडबुडा क्षणामाजि आटे ।
सिंधु बुडबुडा कांहीं ते नाटे ॥३॥
बापरखुमादेविवराच्या पायीं ।
ज्ञानदेवो पाही मरण जाणें ॥४॥

अर्थ:-

देह असतांनाच देहाच्या ठिकाणचा जीवभाव टाकून देऊन आपण परमात्मरूपच आहोत. असा निःसंदेह बोध होणे यालाच परमार्थ दृष्टीने मरण म्हणतात. परमार्थ दृष्टीने जन्म किंवा मरण हे मुळीच नाहीत. समुद्रावर भासणारा बुडबुडा एका क्षणामध्ये समुद्ररूप होतो. मग तो समुद्ररूप झालेला बुडबुडा केंव्हाही नाहीसा होत नाही. तद्वत जीव ब्रह्मरूप झाल्यानंतर तो अजरामर होतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्या चरणाच्या ठिकाणी बुडबुड्याप्रमाणे लय पावणे याचे नाव मरण आहे. असे माऊली सांगतात.


५६७
सायखडियाचें बिक ।
अचेत परि करी पाक ।
जनदृष्टीचें कवतुक ।
स्फ़ुरे वेगीं ॥१॥
तैसें हें देहरुप जालें ।
न होतेंचि होणें आलें ।
तंव सदगुरु जाणितलें ।
येथींचें रया ॥२॥
सतधनि म्हणे गुरु ।
जत सांभाळी विवरु ।
ऐसेंनि तुज वोगरु ।
वाढिला ब्रह्मीं ॥३॥
निराकार अलिप्त वसे ।
शरीरीं असोनि तूं नसे ।
एकत्त्व मनोद्देशें ह्रदयीं ध्यायें ॥४॥
सोडी रसाची रससोये नको
भुलों माया मोहें ।
सत्रावी दोहतु जाये ।
जीवन भातें ॥५॥
ज्ञानदेव म्हणे श्रीगुरु ।
ऐसा सांगति विचारु ।
मग ब्रह्मीं चित्तानुसारु ।
निरोपिला सर्व ॥६॥

अर्थ:-

ज्याप्रमाणे खेळियाच्या बलाने निर्जीव बाहुल्या नाचू लागल्या बरोबर लोकांच्या दृष्टीच्या ठिकाणी कौतुक उत्पन्न होते. त्याप्रमाणे नसलेला देह मायेने उत्पन्न झाला आहे. हे वर्म श्रीगुरुनी जाणले आहे. परमात्म्याचा मालक जो श्रीगुरु तो असे विवरण करुन परमात्मस्वरुप ज्ञानाचे पक्वान्न करुन तुला वाढीत आहे. ते चांगले जतन कर. परमात्मा निराकार अलिप्त असून शरीरांत असताही दिसत नाही. अशा परमात्म्याशी जीवाचे एकत्व आहे. याचे तू मनाने नेहमी चिंतन करीत जा. आणि विषयरसांची गोडी टाकून दे. या मायामोहाला भुलू नको. योगाभ्यास करुन सत्रावी जी जीवन कला तिच्यातील अमृताचा रस चाखीत जा. अशा तहेचा विचार श्रीगुरु सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्म चिंतनाची सवय चित्ताला लागली की. सर्व गोष्टी आपोआप ब्रह्मरुपच भासू लागतात. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५६८
आप आपीं माये तेजी तेज समाये ।
पवनगे माये पृथ्वी जाये ॥१॥
हंस कोठें गेला तूं
पाहो विसरला ।
भ्रमेंचि भुलला कोई शब्दें ॥२॥
सांडी तू रे जाती होई रे विजाती ।
येणें रुपें समाप्ती प्रपंचाची ॥३॥
ज्ञानदेवा घर विठ्ठल आचार ।
वेगीं परंपार हंसपावे ॥४॥

अर्थ:-

पाणी पाण्यात, तेज तेजात, वायु वायुत व पृथ्वी पृथ्वीत लय पावली. हंस कोठे गेला? किंवा देह वियोग झाला असता त्यातील परमात्मा कोठे गेला याचा विचार करायचे सोडुन मी कोण आहे. या विचाराच्या भ्रमात पडला आहेस.या करिता मी मनुष्य आहे. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. अशा तऱ्हेचा जातीचा अभिमान जातिरहित जो परमात्मा त्याचे स्वरुप हो म्हणजे तुझ्या प्रपंचाची समाप्ती सहज होईल. अशा रितीने आत्मानात्मविचार करुन माया कार्य पदार्थाचा निरास करुन आपले स्वस्वरुप जाणणारे जे मुमुक्षुरुपी राजहंस आपले मूळच्या स्वरुपचा आधार म्हणजे, श्रवण मननादिक करुन संसाराच्या पैलतीराला पोहोचले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५६९
अनंतीं अनंत तत्त्वता तंव एक ।
विरुळा जाणे एक बिंबताहे ॥१॥
एका तेजी बहु बहुतेज घृष्टी ।
एकतत्त्व सृष्टी मेळु शिवीं ॥२॥
तर्काचाही तर्क विवेक सकळ ।
तेणेंविण गोपाळ आकळेना ॥३॥
ज्ञानदेव म्हणे जाणे प्रसाद निवृत्ति ।
मौनाची मुक्ति वाट आहे ॥४॥

अर्थ:-

परमात्मा अनंतस्वरुप आहे. त्याच्या ठिकाणी अनंत दृश्ये जरी भासली तरी खऱ्या अर्थाने एकच अनंत आहे. तो अनंतच सर्व जीवमात्रात प्रतिबिंबित झाला आहे पण असे जाणणारा पुरुष जगात विरळ आहेत. अपार तेजोराशी जो परमात्मा तोच तेजोरुप सृष्टि बनला आहे. सर्व वेदवाक्यपूर्वक किंवा त्याला अनुकूल तर्क या साधनाशिवाय त्या परमात्म्याचे आकलन बुद्धिस होत ना. ही मौनरुप मुक्तिची वाट श्रीनिवृत्तीरायाच्या प्रसादाने मी जाणतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५७०
स्वभावें विचरतां महीं ।
सम ब्रह्म दिशा दाही ।
एकु एकला आस पाही ।
सर्वाघटीं बाईये वो ॥१॥
दुजें द्वैत हेतु सांडी ।
एकतत्त्वसार मांडी ।
हरिविण इये पिंडी नाहीं
वो माये ॥२॥
काय सांगो याच्या गोष्टी ।
अवघा दिसे हाचि सृष्टि ।
विश्वरुप किरीटी ।
अर्जुना दिठीं दावियलें ॥३॥
ज्ञानदेव दीप उघड ।
उजळुनी केलासे वाड ।
माय देवीं आम्हां नाही चाड ।
अवघा गोड हरि आमुचा ॥४॥

अर्थ:-

मी सहज पृथ्वीवर फिरत असता दाही दिशांत व सर्व जीवमात्रात एकच असणारे परब्रह्म भरुन राहिले आहे. असे पाहिले. याकरता अनेकत्वाच्या भावाला कारण जे द्वैत ते सोडून मुख्य सार जो परमात्मा श्रीहरि याच्याशिवाय शरीररुपी पिंडात कोणाचीही वस्ती नाही. अशी मनाची समज राहु द्या. अशा श्रीहरिच्या गोष्टी काय सांगाव्यात? सर्व सृष्टीत हाच व्यापून राहिला आहे. आणि एवढ्या करताच याने अर्जुनास विश्वरुप दाखविले. हा ज्ञानाचा दीप उजळून मी मोठा केला. म्हणून आम्हाला श्रीहरिच गोड आहे. दुसरी कशाचीही चाड नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५७१
बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी ।
ऊरी ऊरैल साचारी जेणें निवविजे ॥
तेथचिया सारा मुसें मुसल्या आकारा ।
सोय सांडु नको येरझारा चुकतील ॥१॥
सहज भक्तिसुख पावसील ।
जाणु असतां काम नेणु होतासी ।
मागिली ये तुटी साठीं ।
लाभु ये खेपेचा मनुष्यपणाचेनि
मापें घेइजेसु रया ॥२॥
येकवटु वटवटाच्या पोटीं ।
बिजीं बिजा आंतवटु आपण पैं ।
तिहीं रजीं रजु सरे
सरोनियां जें उरे ।
तैसें एकसरां धुरें तूं अनुसरे पां ॥३॥
रविरश्मीचिया तेजा कवण
बैसविलिया वोजा ।
कैशा सांगताति गुजा सामवलेपणें ॥
जळीं तरंगु तैसा परमात्मा परमानंदु ।
ऐसा सांडूनि गोविंदु झणें
विलया जासी ॥४॥
जळें जळ पियींजे तेथें
काय उरे दुजें ।
ओघें ओघुचि गिळिजे बाप
सागरा पोटीं ॥
सिंधु नेणे अव्हांटा नदीचिया वाटा
तैसा करीलरे हरि सांठा
तुज आपणामाजी ॥५॥
तेथे जगचि परतलें जग
जगपणा मुकलें ।
मोहो अभावीं उरलें उरतां ठायीं ॥
तेथें सिंधुचि अवघा
अवघेपणें नये मागा ।
यापरी लागवेगी हरि पावसी रया ॥६॥
ऐसे सुखाचे सोहळे माजी
सुख प्रेमवोळे ।
कवण सुख बोले सुख
सुकाळे मातलें तें ॥
तेथें मीतूं सरे सेखीं
भक्त तोही नुरे ।
शिवीं शिव विरे मोहरे
जालया रया ॥७॥
अमृतीं अमृता गोडी बोल
बोलतां बोबडी ।
पुण्य मनोधर्मी गुढी
उभारिली जेणें ॥
अमरवोघाचेनि वोघे
आफ़ाविजे जिवलगें ।
बापरखुमादेविवरा
विठ्ठलांसंगें सांपडलें ॥८॥

अर्थ:-

परमात्मा सर्व पदार्थाच्या आत बाहेर भरुन उरला आहे. सर्व द्वैताचा त्याग होऊन त्याला ते अद्वैतच सत्यत्वाने उरी उरेल आहे. त्या परमात्म ज्ञानानेच सर्व दुःखे निवृत्त होऊन मन शांत होईल त्या ब्रह्मतत्त्वांतून मन काढू नको. परमात्म्याच्या ठिकाणी जर मन ठेवले तर मुशीत ओतलेला रस जसा मुशीच्या आकारांचा होतो. त्याप्रमाणे ब्रह्म चिंतन करणारे मन ब्रह्मरुप होईल. मन जर ब्रह्मरुप झाले तर आपोआपच जन्ममरणांच्या येरझारा चुकतील. अशा सहज ब्रह्मरुप अवस्थाने भक्तिने. तुला परमानंद प्राप्त होईल, असे तुला ठाऊक असता तू नेणता का होतोस? मागील अनंत जन्मांत या विचाराचा लाभ तुला झाला नाही. तो लाभ या खेपेच्या मनुष्यपणाच्या मापाने पदरात पाडून घे. एकरस वटवृक्षाच्या पोटात जसे वटबीज आणि वटबीजाच्या आंत जसा वटवृक्ष असतो. त्याप्रमाणे वाढलेल्या एवढ्या जगरुपी विस्तारांत तू आपणाला साठव म्हणजे आत्मत्त्वाने पहा. सत्व, रज, तम हे गुण विचाराने लय पावले असता त्यांचे अधिष्ठान जे परमतत्त्व हे उरते. त्या परमतत्त्वासच मुख्य साध्य करुन त्यालाच अनुसर. सूर्याचे किरणामध्ये व्यवस्थित रितीने तेज कोणी बसविले आहे. वगैरे तत्त्वज्ञानविषयक युक्ती आहेत.त्या परमात्म तत्त्वाच्या व्याप्ती विषयी श्रीगुरु सांगतात. जळावरील तरंगाचा भेद ज्याप्रमाण वस्तुतः नसून दिसतो. त्याप्रमाणे परमानंद जो परमात्मा त्याच्याठिकाणी मिथ्या भेद नसताही दिसतो. तो निश्चयाने टाकून दे. म्हणजे परमानंद स्वरुप होईल. परमानंदस्वरुपस्थिती झाल्यावर जरी हा भास दिसला तरी त्यांत परमात्म स्वरुपाशिवाय दुसरे काही नाही. जळाने जल प्याले असता, वोघाने वोघ गिळला असता, सागराच्या पोटात नदी शिरत असता समद्र त्याला आड वाट करीत नाही. त्याप्रमाणे परमात्मा श्रीहरि तुला आपल्या पोटांत साठवून घेईल. त्यास्वरुपाच्या ठिकाणी जग परतून लयाला जाईल. त्याप्रमाणे मोहादिकही उरणार नाही. त्याठिकाणी तो परमात्मसिंधुच सर्व प्रकाराने असतो. या प्रमाणे तू परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी ऐक्य होण्याच्या उपायाची गर्दी केलीस तर तू हरिरुपासी ऐक्य पावशील. अशा सुखाच्या सोहळ्यांत तुझ्या ठिकाणीही प्रेमसुख वाढेल. त्या सर्व व्याप्त असलेल्या सुखाच्या सुखांत त्या सुख म्हणण्याला मीतूपण उरले आहे कोठे, भक्तभावही नाहीसा झाला. शिव जो सर्वत्र व्याप्त ईश्वर त्याच्याकडे मोहरे’ म्हणजे विचाराची दृष्टी गेली असता, तो ईश्वरही ‘ शिवी’ म्हणजे परमात्मस्वरुपात विरुन जातो. अमृताच्या ठिकाणची गोडी वर्णन करु लागले असता, ते बोलच बोबडे होतात. अशा प्रकारचे अनंत जन्मांच्या ठिकाणचे संपादन केलेले मनांत असलेले. पुण्य संस्काराने त्या पुण्याची गुढी ज्याने उभारली त्याला ते अमर स्वरुपाच्या ओघामध्ये ऐक्य करुन देण्याचे ऐश्वर्य जिवलग, जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांची अनन्य भावाने भक्ति केली असता सापडेल असे माऊली सांगतात.


५७२
दृष्टीचें सुख अंतरी देख ।
ओंकार अरुष बोलताती ॥१॥
नादुले ऐकसी बिंदुले ते देखसी
कोंदलें चौपासी सांवरेना ॥२॥
तें आतु न बाहेरी
आणि अभ्यंतरी ।
एकलेंचि निर्धारी वर्ततसे ॥३॥
उफ़राटिये दृष्टी निवृत्तीच्या
शेवटीं ज्ञानदेवा भेटी
होऊनि ठेली ॥४॥

अर्थ:-

आत्मज्ञानाचे सुख अंतःकरणातच पहा.नुसत्या ओंकाराच्या गोष्टी बोलणे फुकट आहे. तु नाभिस्थानाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा नाद ऐकतोस परंतु बिंदु या पदाने बोध करुन देणारे परमतत्त्व पाहत नाहीस. ते परमतत्त्व एवढे कोंदाटले आहे की त्याची व्याप्ती अगाध असून ते आंतबाहेर सर्वत्र आहे. अंतर्मुख दृष्टीनी निवृत्तीच्याही शेवटी असलेल्या परमात्मतत्त्वाची भेट मला झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५७३
सांगेन तें ऐक दाविन तें पाहे ।
या मनाचि मूळ सोय आठवी पां ॥१॥
आठवितां तूं तया ठकसिल कैसा ।
सांजवेळें लाहासि उदो कां जैसा ॥२॥
बुडोनिया राही आनंदसागरीं ।
आठवितां असें जन्मवरी रया ॥३॥
पडतासि दृष्टी निवृत्तीच्या चरणीं ।
ज्ञानदेवो मनीं धरुनि ठेला ॥४॥

अर्थ:-

मनाचे मूळ जी परमात्मवस्तु त्याविषयी मी जे सांगेन ते ऐक, दाखवीन ते पहा. त्याचा जर तुला आठव झाला तर तला चमत्कार वाटेल चमत्कार म्हणजे हाच की, या अविद्या रुप रात्री मध्ये आत्म ज्ञानरुपी सूर्याचा उदय झाला कसा. हा प्रकार संध्याकाळी सूर्य उगवल्या सारखा वाटेल. अशा ह्या आत्मबोधाच्या आनंदरुपी समुद्रांत तूं जन्मभर बुडून राहा. तो परमात्मा माझ्या दृष्टीस पडताच त्याला मी मनांत धरुन श्रीगुरु निवृत्तीरायांच्या चरणी राहिलो ! असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५७४
जिता जिणें लागे गोड
परत्रि तें अवघड ।
आवघियाहुनि तनु
वाड मरण भलें ॥१॥
जिता मरिजे मरोनिया उरिजे ।
इतुजे जाणिजे तरि
जपणेचि नलगे ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाच्या
पायीं ।
ज्ञानदेव पाहीं मरण सांगे ॥३॥

अर्थ:-

जिवंत असतांना परमार्थ न करती स्वैराचार केला परंतु ते परलोकी मात्र ते वाईट आहे.या देहात येऊन मरण साध्य करुन पुन्हा जन्माला येण्याचे बंद केले पाहिजे.येरव्हीं मनुष्ये मरतात. ते त्याचे मरण नसून या देहातुन ते दुसऱ्या देहांत जातांत.ज्याला आत्मज्ञान होते त्याचे अज्ञान निवृत्त झाल्यामुळे पुन्हा जन्माला येण्याचे कारण राहात नाही. अशा तऱ्हेचे मरण जिंवतपणीच साधले पाहिजे. हे मरण साधून आपण ब्रह्मरुप आहोत असे जाणून राहिले पाहिजे. ज्ञानवानाचा देह प्रारब्धाप्रमाणे असतो. म्हणुन तो जपण्याचे कारण नाही. वरील प्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल यांच्या चरणावर मरण साधावे.असे माऊली सांगतात.


५७५
देखणें देखाल तरी हरे मन ।
सामावलें जीवनमुक्तरत्न रया ॥१॥
भला भला तूं भलारे ज्ञाना ।
निवृत्ति आपणा दावियेलें ॥२॥
गुरुमुखें ज्ञान पाविजे निर्वाण ।
तें निवृत्ति म्हणे ज्ञाना पावसील ॥३॥

अर्थ:-

श्रीनिवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात की “परमात्म्याचे ज्ञान करुन घेशील तर तुझे मन त्या परमात्म्याचे ठिकाणी लयाला जाईल.अशी मनाची स्थिती झाली म्हणजे जीवन मुक्ति हेच रत्न तुझ्या अंतःकरणांत साठविले जाईल. म्हणून हे ज्ञानदेवा तू फार धन्य धन्य आहेस.” अशा तऱ्हेची माझ्या निवृत्तीरायांनी मजवर कृपा करुन माझे आत्मस्वरुप मला दाविले. दुसरे असे सांगितले की, “हे ज्ञानदेवा तू सद्गुरु मुखाने श्रवण केले असल्यामुळे तुला ज्ञान होऊन मोक्ष प्राप्त होईल” असे माऊली सांगतात. – सौ अंजली भास्कर ओक,बदलापूर.


५७६
सकळहि कळा बिंबोनि निराळें ।
तें तूं घेउनि उगले
राहे रया ॥१॥
तें तत्त्वता तत्त्व घेईका एकत्त्व ।
या मना महत्त्व देउनीया ॥२॥
निराळ निराकार पाहे
तें आपरंपार ।
तें तूं परात्पर होउनि राहें ॥३॥
बापरखुमादेविवरु विठठलु
सकळहि कळा प्रकाशकु ।
तोचि सर्व व्यापकु
जाणौनि राही ॥४॥

अर्थ:-

ज्याच्याठिकाणी सर्व कला आहेत पण स्वरुपदृष्टिने ते वेगळे आहे. असे ते परमतत्त्व जाणून स्वस्थ राहा. पण याला मनाची अनुकुलता पाहिजे याकरिता त्या मनाला मोठेपणा देऊन परमात्मतत्व जाणून घे. निर्विषय निराकार, अमर्याद असे जे परमतत्त्व ते तू होऊन राहा. सर्व कलांचा प्रकाशक माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वव्यापक आहेत. त्याचे ज्ञान करुन घे. असे माऊली सांगतात.


५७७
जगत्र धांवताहे सैरा
म्हणौनि धांवसी ।
थोर कष्टलासी वायाविण ॥
धांवोनि जावोनि काय करिसी ।
सहज अहिर्निशी भेटी नाहीं ॥१॥
जीव जाणवेना जीव जाणवेना ।
जिवाचें वर्म तें चोजवेना ॥२॥
जिवाशिवा दोन्हि भिन्न भेदु नाहीं ।
विचारुनि पाहि ह्रदयामाजी ॥
जिउ सर्वाठायीं असे
योगिया न दिसे ।
कुडी सांडूनि वसे
कवणे ठायीं ॥३॥
जिउ जैसाचि आला तैसाचि गेला ।
तो कोठें सामावला जाणतेनो ॥
ज्ञानदेवो म्हणे जिउ कोठें गेला ।
जिवा जन्म जाला कवणे ठाई ॥४॥

अर्थ:-

जगातील अविवेकी पुरुष देवप्राप्तीचे खरे साधन काय आहे कळल्यामुळे तीर्थयात्रा वगैरे साधने करण्याकडे सैरावैरा धावत असतात लोकांच्या मागे लागून फुकट भटकून तू फार कष्टी झाला आहेस आशी धावाधाव करुन काय उपयोग? ज्या परमात्म्याच्या प्राप्ती करता ते धावत आहेत तो परमात्मा रात्रंदिवस तुझ्या जवळ आहे. पण त्याची भेट मात्र तुला होत नाही. सर्व जीवांचा जीव जो परमात्मा आहे. तो तुला कळत नाही. जीव व परमात्म्यात भेद नाही. याचे ज्ञान तू आपल्या हृदयामध्ये करुन घे. खरे पाहिले तर परमात्मा जसा व्यापक आहे तसा जीवही व्यापक आहे. हे ज्ञान योगी लोकांना असते सामान्य लोकांना नसते. जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे. असे म्हणशील तर शरीर त्यागानंतर जीव कोठे राहतो ते सांग पाहू ?. साभास बुद्धी. शरीरात जशी आली तशी ती प्रारब्ध संपल्यावर कोठे गेली व जाऊन कोठे सामावली. हे तुम्ही शहाणे म्हणवता तर सांगा पाहु. तसेच जन्माला कोठून आला व तो कोठे गेला याचे उत्तर द्या. तुम्हाला जर ते माहित नसेल तर संतांना शरण जाऊन विचारा असे माऊली ज्ञानदेव सांगतात


५७८
भलें बोलोनि दाविलें मज ।
आत्मज्ञान सांगेन तुज ॥१॥
मनाचा प्रकाशु थोरु ।
मनेंचि ब्रह्म उजियेडु ॥२॥
निवृत्ति सेवियेला सुघडु ।
तेणें मज जाहला
ब्रह्माचा पाडू ॥३॥

अर्थ:-

तुला जीवब्रह्मैक्यज्ञान सांगेन असे श्रीगुरुनी अभयदान दिले. त्या प्रमाणे उपदेश केल्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार झाला. विषयाचा प्रकाश करण्यामध्ये मनासारखे साधन नाही आणि याच कारणामुळे मनात ब्रह्म सहज स्वभावाने प्रकाशित झाले माझी योग्यता नसताना ही श्रीगुरु निवृत्तीरायांनी मजवर अनुग्रह केल्यामुळे मी ब्रह्मस्वरुप झालो. असे माऊली सांगतात.


५७९
आपणासि आपण उपदेशु कीजे ।
गुरुमुखें बुझिजे तेंचि तूं ॥१॥
मी तें कवण हें तूं जाण ।
बुझें निर्वाण तेंचि तूं ॥२॥
सिध्दचि सांडूनि निघसी अनानीं ठाई ।
तूं रिघेपां सोई संताचिये ॥३॥
जें तपाव्रतांचे ठायीं ते
येथेंचि पाही ।
परि ते ठाईच्या ठाई
म्हणे ज्ञानदेवो ॥४॥

अर्थ:-

गुरुमुखाने ते ब्रह्म तुं आहेस असे समज असा उपदेश केल्यानंतर आपणच आपणाला उपदेश करावा.तो दृढ निश्चय होण्याकरिता अगोदर तत् त्वम् ‘ पदार्थाचा शोध घ्यावा मी व परमात्मा शोधावा. हा विचार करावयाचे सोडून मायिक पदार्थाच्या ठिकाणी कशाला हिंडत बसावे ? त्यापेक्षा संताना शरण जाऊन त तपामध्ये व्यापक असलेले ब्रह्मस्वरुप आपल्या ठिकाणी जागचे जागी जसे आहे तसे पाहावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. अभंग उबलब्ध नाही.


५८०
पिंड निर्माण जीवकळा सरिसी ।
गति प्रवेशीं कैसी जाली ॥१॥
तेथीची रचना न कळे हो देवा ।
अनुभवाचा ठेवा काढुनी पाहे ॥२॥
वारपंगाचें लेणें लेवविसी
जाई जेणें ।
परी घरांतील ठेवणें नुमगसी ॥३॥
अणुचें प्रमाण न साहे डोळां ।
कैसा मुक्तीचा सोहळा
घेवो पाहसी ॥४॥
जळीं नांदला तो तरंगीं उमटला ।
मिळोनियां गेला सागरासी ॥५॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला उदारा ।
ज्ञानाचा वेव्हारा होई बापा ॥६॥

अर्थ:-

शरिराबरोबरच जीवकला त्यात उत्पन्न झालेली दिसते. ती जीवकला शरिरात कशी प्रविष्ट झाली. त्याची रचना कशी आहे हे कोणालाही कळत नाही. येवढेया करिता स्थूल दृष्टी टाकुन सुक्ष्म दृष्टीने मुख्य सिध्दांताचा विचार कर.शरिरावरचे लेणे कालाच्या योगे नाश पावणारे अंगावर घालतोस पण आपल्या घरातील मुख्य परमात्म ठेवा तु समजत नाहीस. अणुयेवढा अत्यंत सुक्ष्म कण असतांनासुद्धा तो डोळ्यास देहतादात्म्यामुळे सहन होत नाही मग तू असा परमात्मरुप मुक्तीचा सोहळा कसा पाहाणार. पाण्यामध्ये पाणीपणा तो तंरगांमध्ये दिसतो. पुन्हा तरंग नष्ट झाल्यानंतर तो पाणीपणा पाण्यातच विरुन होऊन जातो. त्याप्रमाणे अस्ति, भाति, प्रिय हे परमात्म्याचे स्वरुप आहे. ते या ठिकाणी प्रतितिला येते. जगत प्रतिती नष्ट झाल्यानंतर अस्ति, भाति, प्रिय त्याचे भाव परमात्म्याचे ठिकाणी म्हणजे परमात्मरुपच असतात. हे रखुमादेवीचे पती व माझे पिता वरीलप्रमाणे जीवांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा व्यवहार होण्याविषयी तू त्यांना साहाय्य कर. असे माऊली सांगतात.


५८१
पहाणें पाहाते सांडुनि निरुते ।
पाहिलिया त्यातें तूंचि होसी ॥१॥
तेंचि तें आपण तत्त्व तें तूं जाण ।
नलगे साधन आन कांहीं ॥२॥
भानुबिंबेवीण भासलें तम ।
ज्ञानदेव वर्म अनुवादला ॥३॥

अर्थ:-

पाहणे म्हणजे ज्ञान, पाहाते म्हणजे ज्ञाता. दृश्य द्रष्टादि भाव एका बाजुला सारुन परमात्म्याला पाहू गेलास तर तो परमात्मा तूच होशील. परमात्मा आपल्या स्वरुपांच्या ठिकाणी आहे असे जाण त्याच्या शिवाय साधन नाही. सूर्यप्रकाश अंधाराच्या विरोधी आहे पण आत्मप्रकाश मात्र सूर्याचे व अंधाराचे तम’ म्हणजे अज्ञान प्रकाशीत करतो. ह्या आत्मज्ञानाच्या वर्माचा श्रीगुरु कृपेने मी अनुवाद केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५८२
तूं तो माझें मी तो तुझें ।
ऐक्य जालें तेथें कैचें दुजें ॥१॥
तूं तो मी गा मी तो तूं गा ।
अज्ञानें बापुडीं नेणती पैं गा ॥२॥
निर्गुण होतें तें गुणासि आलें ।
अज्ञान निरसूनि एकचि जालें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे परतूनि पाही ।
जीवाचा जीवनु कवणें ठायीं ॥४॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा तु माझा व मी तुझा ज़ालो या दृष्टिने तुझ्या माझ्या स्वरुपांत ऐक्य झाले तर आता तेथे द्वैत कोठून राहणार. तू तोच मी आणि मी तो तू असा उभयतांचे स्वरुपांत ओतप्रोत भाव आहे. पण जीवांना अज्ञानामुळे भेद वाटतो. निर्गुण स्वरुप परमात्माच मायायोगाने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता सगुणरुप धारण करतो. आणि अज्ञान नाहीसे झाले की निर्गुण व सगुण एकच आहे असे कळते. जीवाचे जीवन जो परमात्मा तो कोणाच्या ठिकाणी आहे हे सहज कळेल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५८३
अमोलिक रत्नें जोडलेंरे तुज ।
कारे ब्रह्मबीज नोळखसी ॥१॥
न बुडे न कळे न भीये चोरा ।
ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥२॥
ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडलें ।
आणुनि ठेविलें गुरुमुखीं ॥३॥

अर्थ:-

अरे, जीवा मनुष्य देहासारखे अमोलिक रत्न तुला प्राप्त झाले असताना.तु ब्रह्माला का ओळखत नाहीस. ते ब्रह्मस्वरुप पाण्यामध्ये बुडत नाहीं अज्ञानी लोकांना कळत नाही. जे लाभले असता चोरांची भिती नाही. अशी बह्मवस्तु हे शाहण्या तू त्या वस्तुचे सेवन कर.गुरुमुखातुन ब्रह्मद्ञान श्रवण केल्यामुळे ती अविनाशी वस्तु मला मिळाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५८४
पढियंते कीं सिंह दुरी जाणसी
तरि तो ठावो दृष्टीसी दुरी ।
मोकारेविण प्रतिबिंबासी चेतना
लाहे ऐसें कीजे रया ॥१॥
आवडी वेचुनियां डोळिया
पुढें रितां कां रिगतासी ।
तूंचि सर्वाभूति ऐसें जरि
जाणसी तरि साचे भेटी
केउता जासी रया ॥२॥
अरे हा दुजेविण खेळु मांडिला
हरि जैत अनुठायीं नाहीं ।
बापरखुमादेविवराविठ्ठला
तूं जाणतयासि काय
जाणणें रया ॥३॥

अर्थ:-

हे पांडुरंगा तुला प्रेमळ भक्त. सगुण रुपाने जाणतात तथापि वास्तविक जाणावयाचे तुझे निर्गुण रुप ते त्यांच्या दृष्टीला दूरच असते. सिंह मोकळा नसून विहीरीजवळ बांधलेला असेल तर आपले प्रतिबिंब विहीरीत पाहून त्याच्याशी ऐक्य करण्याची जशी त्या सिंहाला चेतना उत्पन्न होते. त्याप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुझे यथार्थ स्वरुप पाहाण्याची चेतना त्या प्रेमळ भक्तांना उत्पन्न व्हावी असे कर. त्याचे निर्मळ प्रेम पाहून त्याच्या डोळ्यापुढे सगुण रूपाने का प्रगट होतोस ? जर तुला ठाऊक आहे की, या सर्व भूतमात्रामध्ये आपणच व्याप्त तरी मग त्यांना निर्गुण रुपाने भेट देण्याचे सोडून सगुणरुपाने भेट देण्याच्या आवडीने का जातोस. अरे दुसरेपणावाचून हा द्वैताचा खेळ तू मानला असून त्यांत निर्गुण रुपाने तुला पहाणायाचा जय किंवा सगुणरुपाने पाहणारयाचा पराजय पण हे दोन्हीही जय, पराजय तुझ्या स्वरुपावाचून दुसरीकडे नाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठला तुम्ही असा विचार कर की त्या भक्तांना तुझे निर्गुणरुप जाणण्याशिवाय दुसरा काय विषय आहे. असे माऊली सांगतात.


५८५
मन मुरे मग जें उरे ।
तं तूं कारे सेवीसिना ॥१॥
दिसतें परि न धरवें हातें ।
तें संतातें पुसावें ॥२॥
तेथींची खुण विरळा जाणे ।
निवृत्ति प्रसादें ज्ञानदेवो म्हणे ॥३॥

अर्थ:-

मनांतील संकल्प विकल्प नाहीसे झाल्यावर ते मन मनपणाने शिल्लक राहात नाही त्याठिकाणी परमात्माच एक शिल्लक राहतो. त्याचे ज्ञान तूं का करुन घेत नाहीस. तो परमात्मा ज्ञानाने दिसतो.. तरी पण तो निराकार असल्यामुळे त्याला हाताने धरता येत नाही. अशा त-हेचा जो परमात्मा त्याचे ज्ञान होण्याकरिता संतांना नम्र होऊन मला त्या परमात्म्याचे ज्ञान करुन द्या अशी विनंती करावी लागते. व हे वर्म क्वचित लोकांनाच कळते. संतांचे कृपेने ज्ञान होते हे मला श्रीनिवृत्तीरायांच्या प्रसादाने कळले असे माऊली सांगतात


५८६
व्रतें तपें तीर्थे तवचि वरी गर्जती ।
जंव देखिलें नाहीं तुवा तूंतें ॥
जेथें वेदा मौन पडे श्रुति
नेति नेति म्हणोनि बहुडे ।
तें सुख वाडेकोडें भोगिजेसु ॥१॥
नाहीं आपण पै सौरसु कां
करिसी हव्यासु ।
लटिकाचि मायाभासु मिथ्या भ्रमु ॥
सिध्दचि असतां करिसी साधनाची चाड ।
सुख सांडुनी दु:ख वाड भोगितासी रया ॥२॥
या विश्वायेवढा जगडंबरु पसारा ।
देखोनियां सैरा मन धांवें तुझें ॥
मृगजळ देखोनि मृगें आलीं टाकोनि ।
जीवन म्हणौनि तान्हा फ़ुटोनि मेलीं ॥३॥
आतां तुज नलगे कष्टावें जें असेल स्वभावें ।
नेमिलें देवें तें न चुकें ब्रह्मादिकां ॥
उमप सांडूनि करिसी दैन्याचे डोहळे ।
निधान देखोनि डोळे
वायां झांकूं नको ॥४॥
थोडें हें सांडी परौते बहुत
तें घेई अरौतें ।
जें चाळितें तूंतें आणि
विश्वातें मागें ॥
जें केलें तें अवघे यांतुनि निमाले ।
आतां पाहतां तुझियेनि
बोलें बंधमुक्त रया ॥५॥
पुत्र कळत्र वित्त हा तो
मिथ्या मोहो ।
तो आपुलासाचि चावो
मानेल तुज ॥
नखापासूनि शिखा व्यापूनिया आहे ।
बापरखुमादेविवरुविठ्ठलु ह्रदयींचा
ध्यायि सुखें रया ॥६॥

अर्थ:-

तीर्थयात्रा यांचे महत्व तोपर्यतच आहे जोपर्यंत आत्मज्ञान झाले आत्मस्वरूपाविषयी वेद मान धारण करतो श्रुति न इति नइते असे इन फिरते, अशा स्वरुपाची असलेला अमानंद भागोत अवरुपाविषयी आस्था न बाळगता मिथ्या मायेचा भूमात पडून उगाच साधनाचा हव्यास करतोस् आत्मा हे तुझे स्वरुप आहे. असे असता त्याचे करता अन्यसाधनाची खटपट केलोस तर स्वरुपभूत सुखाला आंदवून महान विनाकारण तू भोगत आहेस हे जगताचे अवडंबर बघून ते सत्य किंवा सध्या हा विचार न करता तू स्वैर धावतो आहेस जसे तहान भागविण्याकरिता पाणी समजून मृगजळाकडे धावत जाणारी हरिण फुकट मरते तसे हे तुझे मन धावत आहे. वास्तविक तुला अन्यसाधनामध्ये कष्ट करण्याचे कारण नाही ते असे म्हणशील की शरीर निर्वाहाकरीता कष्ट केले पाहिजे परंतु ते तुझे म्हणणे चुकीचे आहे कारण प्रारब्धबलाने ज्याचे अन्नोदक जेथे असेल ते ब्रह्मदेवालाही चुका नाहीत अमर्याद परमात्मसुख सोडून विषय सुखाची इच्छा होणे म्हणजे तुला दरिद्रीपणाचे डोहळेच होत आहेत. अरे, प्रत्यक्ष ठेवा समोर असता डोळे झाकण्याची हो दुर्बुद्धी तुला कां होते म्हणून क्षुल्लक असलेले हे विषयसुख टाकून अमर्यादि असे आत्मसुख त्याचा उपभोग घे, ज्याच्या सत्तेवर तू व जगत चाललेले आहे त्या आत्म्याच्या ठिकाणी मागील सर्व संचित कर्म लय पावते. तुझ्या दृष्टिने बंधमोक्ष असले तरी त्या दोन्हीही अवस्था तुझ्या आत्मस्वरुपाच्या ठिकाणी नाही. परंतु तुला बायको, मुलगा पैसा यांच्याविषयी निष्कारण मोह आहे परंतु तू जर आत्मचिंतन केलेस तर हा मोह मिथ्था आहे असे तुला समजून येईल तुझ्या शरीरांत नखशिखांत व्यापून राहिलेला रखुमादेवीचे पती व माझे पिताश्री विठ्ठल ते तुझ्या ह्रदयांत अखंड वास करीत आहेत त्याचे ध्यान सतत करीत जा.असे माऊली सांगतात.


५८७
नाहीं तें तूं काय गिळिसि ।
आत्मा वोळखोनि होय तत्त्वमसि ॥१॥
सांडी सांडी सगुणाची भ्रांति ।
तूंचि निर्गुण आहासि तत्त्वमसि ॥२॥
रखुमादेविवरु विठ्ठलु पंढरियेसी ।
कांहीं न व्हावा आवघा होसी ॥३॥

अर्थ:-

तू पंचाग्नी साधन करुन धूराचे घोट का घेत बसला आहेस त्याचा एक उपयोग नाही उलट तत्त्वमसि महावाक्योपदेशाने आत्म्यास ओळखुन घे. याप्रमाणे ब्रह्मज्ञान करुन घेऊन परमात्म्याचे सगुण स्वरुपराविषयीची भ्रांती टाकून दे. अरे तत्त्वमसि महावाक्यांनी सांगितलेले निर्गुण ब्रह्म स्वतः तुच आहेस.याचा अर्थ रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मीच आहे असा तुझा निश्चय होईल म्हणजे तुझ्यामध्ये व परमात्म्यामध्ये भेद राहाणार नाही असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.


५८८
पाहाणेंचि पाहासी काय पाहणें
तेथें नाहीं ।
पाहाणेंचि पाही पाहाणें रया ॥१॥
खुंटलें बोलणें बोलीं बोला
बोलुचि मौन्य ठेला मौन्यामाजि ॥२॥
बापरखुमादेविवराविठ्ठलाचिये खुणें ।
अनुभविया बोलणें पारुषलें ॥३॥

अर्थ:-

घटपटादि अनात्म दृश्य पदार्थ काय पाहत बसला आहेस. पदार्थात पाहणे म्हणजे आत्मा नाही. याकरिता दृश्य पदार्थ पाहाण्याचे टाकून दे पाहण्यास योग्य असा आत्माच पहा. आत्मा च पाहिलास म्हणजे आत्मज्ञान झाले, तर त्या ठिकाणी बोलणे खुंटते. म्हणजे शब्द मावळतो. त्या बोलण्याचे मौन निःशब्द आत्म्याच्या ठिकाणी होते. रखुमादेवीचे पती माझे पिता श्री विठ्ठल, त्याला पाहण्याची म्हणजे अनुभवण्याची खूण श्रीगुरुकृपेने प्राप्त होऊन बोलणेच खुंटुन जाते, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.


५८९
कापुरा अग्नि स्नेह जाला ।
मी नाहीं तेथें काय उरला ॥१॥
मी नाहीं तेथें कवणिये ठायीं ।
देखत देखन पाहीं भुललासी ॥२॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलीं खुण ।
जणते जाणती ते अनुभविये ॥३॥

अर्थ:-

कापूर व अग्नि याचा सबंध झाला असता दोघांचाही नाश होऊन जातो त्याप्रमाणे परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी अहंकाराचे ऐक्य भाव झाला असता तेथे अहंभाव किंवा परमात्मभावही उरत नाही त्या परमात्म स्वरुपाच्या ठिकाणी अहंकाराचा कालत्रयी सबंध नाही. असे स्पष्ट असतांना देहाचा अभिमान घेऊन कां भुललास. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांची खुण ब्रह्मानुभवी पुरुषच जाणतात असे माऊली सांगतात.


५९०
स्वप्नींचेनि भ्रमें धरिसी स्थुलाकृति ।
परि सिध्द नव्हे सत्य त्याच्या पायीं ॥
कारण महाकारण लिंग आणि चतुष्टय ।
हे शाब्दिक उपाय बोलों ठाती ॥१॥
येक नाहीं तेथें दुजें कायिसें ।
देहद्वय पाहातां दुजें न दिसें ॥२॥
तेचि ते संकल्प स्थूळ नैश्वर्याचें भान ।
त्या म्हणती कारण नवल पाहीं ॥
महाकारण लिंगदेह शाब्दिकीं धरिला ।
तो शास्त्रज्ञीं पाहिलां अर्थी साही ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि देहीं ।
अवस्थातीत पाही तोचि एक ॥
निवृत्तिरायें अंजन लेऊनि ।
पायाळ निजसदन तें विश्व जालें ॥४॥

अर्थ:-

स्वप्नवत् असलेल्या या स्थूल शरीराचा मी म्हणून तु अभिमान का धरीत आहेस? या तुझ्या देहाभिमानामुळे तुला मोक्षसिद्धी प्राप्त होणार नाही सूक्ष्म,स्थुल कारण व महाकारण या चार शरीरांचे शाब्दिक वर्णन पुष्कळ लोक करतात.पण त्या शब्दावडंबराचा कांही एक उपयोग होणार नाही. परमात्मा एक आहे असे म्हणावे तर त्याच्याशिवाय दुसरा पदार्थ आहे कोठे. काही एक नाही ज्याच्या ठिकाणी एक म्हणणे ही सहन होत नाही त्याठिकाणी द्वितीयत्व कोठुन आणणार.याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म देहाचा विचार केला असता, या दोघांचे भान जेथे होत नाही. त्या स्वरुपाच्या ठिकाणी स्थूल नेश्वर्याच्या संकल्पाचे भान होते. ते प्रथम भान होते. त्यालाच कारण असे म्हणतात. हा मोठा चमत्कार आहे. चवथा महाकारणदेह आहे. असे म्हणणे हे केवळ शब्दमात्र आहे अशा त-हेचा सिद्धांत सहाशास्त्रांचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांनी करुन ठेवला आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल, ते या चारी देहाहून वेगळा अवस्थातीत आहेत. अशा तहेच्या बोधांचे अंजन श्रीगुरु निवृत्तीरायांनी पायाळू असे जे मुमुक्षु त्यांच्या डोळ्यांत घालुन आपल्या नीजस्वरुपाचे घर त्याना दाखविले. असे माऊली सांगतात.


५९१
बोधलिया अंजनासी पायाळू हा काय ।
निधान जरी आहे परि शब्द नेणें ॥
परादिकां वाचां मौन पडिलें जाण ।
तेथें पायाळाची खुण कोण लेखी ॥१॥
सुखाचा संवाद आपण्यामाजी पाही ।
देहींचा देही विदेह होऊनि ठेला ॥२॥
अविकल्पवृत्ति भानु संकल्पें हा नातळे ।
कर्म तया न मिळे करिजे कोणे ॥
बापरखुमादेविवरु कर्ता
कर्म न पडे कांहीं दृष्टि ।
वायांचि भ्रमें बांधलासी
दृष्टि रया ॥३॥

अर्थ:-

माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे भूमिगत ठेवा दिसण्यास पायाळू माणसाच्या डोळ्यांत अंजन घालावे लागते. तद्वत श्रीगुरूंनी बोधरूपी अंजन घालून हा काय तुझ्या जवळच असलेला तुझा ठेवा आहे. असा बोध केल्यानंतर त्याला आत्म्याचे दृढअपरोक्ष ज्ञान होते. परंतु तो बोधरूप आत्मा त्या शब्दाचा विषय नाही. या परा, पश्यन्ति मध्यमा व वैखरी या चारीही वाणी आत्मस्वरूपाचे विषयी मौन धारण करतात. मग पायाळाची काय कथा.परमात्मसुखाचा संवाद करून जर आपले स्वरूप जाणले तर तो याच देहात विदेही होऊन जाईल. परमात्मा निर्विकल्प असल्यामुळे तो कोणत्याही संकल्पाचा विषय होत नाही. म्हणून कर्तेपणाने उरतच नाही. त्याच्या दृष्टीपुढे कर्ता, कर्म व कर्मफल हे कांहीच राहात नसून नैष्कर्म्य स्थिती उरते या जीवावर श्रीगुरूकृपा नसल्यामुळे भ्रमाने ते या जगतरूपी बंधात निष्कारण पडले आहेत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्यांचे ज्ञान नाही हेच एक त्याचे कारण आहे. असे माऊली सांगतात.


५९२
पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें ।
तें कैसें आकळे ब्रह्मतेसी ॥१॥
पाहातेंचि पाही नाहीं
तेंचि काई ।
गयनिच्या पायीं तूंचि होसी ॥२॥
स्वरुपीं रमतां ह्रदयस्थ आपण ।
तयाचें स्वरुप आदिमध्य ॥३॥
बापरखुमादेविवर सगुणीं न माय ।
निर्गुणीं दिसताहे जनीं रया ॥४॥


५९३
श्रुतीं सांगितलें उपनिषदीं अनुवादलें ।
आम्हा लाधलें निरुतें वर्म ।
अनुभवे गोविंदु करितां अनुवादु ।
परब्रह्म अनुवादु तरि तें नव्हे ॥१॥
बोलिजे तें नव्हे दाविजे तें नव्हे ।
गुरुमुखी पाहावें परमानंदीं ॥२॥
अरुप परि बरवे दिसें ।
भीतरी कैसें निववीतुसे ।
अनुभविया प्रति
बोलिजे लक्षण ।
ज्ञानदेवें खुण सांगितली ॥३॥

अर्थ:-

श्रुतीने सांगितले असून उपनिषदाने अनुवाद केलेले ब्रह्मप्राप्तीचे वर्म आम्हाला चांगल्या रितीने प्राप्त झाले. सगुण गोविंदाचा अनुभव घेऊन अनुवाद करतो परंतु शुद्धब्रह्माचा अनुवाद करता येत नाही? व त्यास दाखविताही येत नाही. असे जरी आहे तरी रूप ब्रह्म गुरूमुखानेच समजून घ्यावे ते स्वरूपतः अरूप असले तरी सगुणरुपात फार चांगले दिसते. अशी त्याच्या स्वरूपाची अंतखूण आहे. या खुणेचा अनुवाद अनुभवी लोकांना विनंती करून मी सांगत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५९४
निर्गुणाची वार्ता सगुणीं मांडीली ।
सगुण निर्गुण दोन्ही एकरुपा आली ॥१॥
सगुण नव्हे तें निर्गुण नव्हे ।
गुरुमुखें चोजवे जाणितलें बापा ॥२॥
रखुमादेविवरु साकारु निराकारु नव्हे ।
कांही नहोनि होये तो
बाईये वो ॥३॥

अर्थ:-

निर्गुणाचा विचार सगुणाच्या ठिकाणी करू लागले असता समानाधी करणाने सगुण निर्गुण हे दोन्ही एकच ठरतात. वास्तविक विचार केला असता ते सगुण ही नव्हे व निर्गुणही नव्हे. ते दोन्ही धर्म उपाधीच्या भावाभावामुळे आलेले आहेत. गुरूमुखाने श्रवण करुन जर उपाधिचा निरास केला तर रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते सगुण निर्गुण या दोन्ही धर्मविरहित शुद्ध व सच्चिदानंद रूप आहे. असा निश्चय होईल.असे माऊली सांगतात.


५९५
प्रकाशें देखिलें त्याहूनि वेगळें ।
नाहीं तें धरिलें सोहं मार्ग ॥१॥
या मार्गापंथीं तूं तुझें नाहीं ।
बिंब हारपलें तें तत्त्व पाहीं ॥२॥
बीजाचा प्रकाश तुझा तूं नेणसी ।
हारपलें मन हें दाही दिशी रया ॥३॥
पुराणप्रसिध्द निवृत्ति लाधलें ।
गुरुमुखें लक्षीं चोजवलें रया ॥४॥

अर्थ:-

योगी लोक समाधीला बसले असता त्यांना काही प्रकाश दिसतो पण तो प्रकाश परमात्मतत्त्व नाही. जो त्यांनी भाव धरिला तेही परमतत्त्व नाही. अशा या सोहं मंत्राचा जप करण्याच्या मार्गात तू तुझ्या स्वतःच्या रुपाने नाहीस. बिंब म्हणजे ईश्वर तत्व हे ज्याठिकाणी लय पावते ते तत्त्व तू पहा बीजाच्या म्हणजे मूळस्वरुपाच्या ठिकाणी असलेला सहज प्रकाश म्हणजे ज्ञान आहे हे तुझे तुलाच माहीत नाही. कारण तो ज्ञानस्वरूप आहे त्या ठिकाणी द्वैत नाही दाहीदिशेला हिंडणारे मन त्या स्वरूपाच्या ठिकाणी लय पावते. याचेच नांव भगवत् दर्शन झाले. अशा तऱ्हेचा पुराणप्रसिद्ध, अनादिसिद्ध तत्त्वमसी महावाक्याचे लक्ष परमात्मा तो श्रीगुरू निवृत्तिरायाच्या उपदेशाने मला प्राप्त झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५९६
आलाडु आडु पालाडु आडु
मध्यें वाहे पाणी ।
तिही संधी खेळु मांडिला
सितादेवि राणी ॥१॥
सुखाति चांदिणें राती ।
बहुतें खेळती येकु देखे ॥२॥
खेळतां खेळतां नवल पाहे
देखणा खीर खाये ।
सांपडे ते कोण्हा न संगे
भोग्या शिवोन राहे ॥३॥
भोगिया सिवोन उतरला डायीं ।
ज्ञानदेव सांगे निवृत्तीच्या पायीं ॥४॥

अर्थ:-

अलिकडची कड व पलीकडची कड या दोन्हीच्या मध्ये नदीच्या पाण्याचा ओघ असतो. त्या ओघांत रात्री खेळ मांडला. सीतादेवी प्रमाणे स्वच्छ जी चांदणी रात्र तिच्यामध्ये अतिशय आनंद असून ब्रह्मदृष्टीने सर्व गोपाळ खेळ खेळत आहेत. त्यामध्ये असा चमत्कार आहे की तो खेळ खेळत असता त्यातील आनंद ज्ञानवान भक्तच भोगतो. त्या आनंदाचा लाभ कोणालाही वर्णन करता येत नाही. आपण भोक्ते व तो आनंद भोग्य आहे. अशा द्वैत भावाला भिऊन तो ज्ञानवान गडी त्या डावातून पार पडला. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने ह्या आनंदाचा मी अनुवाद केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


५९७
एक पाहातां दुजें गेलें ।
शेखीं पाहातां सर्व शून्य जालें ॥१॥
पाहातां तयाचा विचारु ।
निवृत्ति जाणे तो श्रीगुरु ॥२॥
एक मूळ एक आदि ।
शून्य मांडिली उपाधी ॥३॥
निवृत्ति दासाचें बोलणें ।
जाणे मीपणा उमाणें ॥४॥

अर्थ:-

ब्रह्माविषयी पाहु गेले असता. तेथे द्वैत व अद्वैत किंवा एकत्व अनेकत्व ही भाषा संपते. त्या श्रुती वाक्याप्रमाणे सर्वाचे अधिष्ठान ब्रह्मच ठरते. ह्या संबंधीचा विचार श्रीगुरु निवृतीरायांच्या कृपेने केला आहे. शुन्य उपाधीने हा परमात्मा या जगाचे आदीमुळ आहे. माझे हे बोलणे मीपणा टाकुन समजुन घ्यावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


संत ज्ञानेश्वर गाथा ४०५ ते ५९७ अर्थासहित समाप्त.शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *