संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३८

संत ज्ञानेश्वर गाथा २९८ ते ४०४

संत ज्ञानेश्वर गाथा २९८ते४०४ विडिओ सहित
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


पांडुरंग प्रसाद – अभंग २९८ ते ३६८(sant dnyaneshwer)

२९८
बावनाचे संगती द्रुम भावें रातलें ।
सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥
लोहाचे सायास परिसेंसी फ़िटलें ।
तैसें मज केलें गोवळ्यानें ॥२॥
मेघजळ वोळे मिळें सिंधूचिया जळा ।
तैसा नव्हे तो वेगळा एक होऊनि ठेला ॥३॥
बापरखुमादेवीवरविठ्ठल नुरेचि कांहीं ।
उत्तम मध्यम ठाई व्यापुनि असे ॥४॥

अर्थ:-

उत्तम चंदनाला बावन्नीचंदन असे म्हणतात. त्या बावन्नीचंदनाच्या संगतीने इतर वृक्षही सुंगधीत होतात. त्याप्रमाणे एक गौळण म्हणते मी त्या श्रीकृष्णाच्या संगतीमुळे कृष्णमय झाले. त्याचा परिणाम असा झाला की मी आपल्या हीन जातिकुळाला मुकले व परमात्मरूप झाले. लोखंडाचे हीनत्वाचे सायास जसा परीस नाहीसा करतो. त्याप्रमाणे मला या श्रीकृष्ण परमात्म्याने जीवभावापासून काढून परमात्मरूप केले. हे माझे परमात्म्याशी ऐक्य होणे मेघाच्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जसा सावयवत्वाने भेद असतो. तसा माझ्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये स्वगत म्हणजे अवयव भेद नसून आम्ही मूळचेच एकरूप आहोत. परमात्मा माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठलाचे ठिकाणी कोणत्या तऱ्हेचा भेद नसून उपाधि दृष्ट्या मात्र उत्तम, मध्यम भावाच्या ठिकाणी तो व्यापून आहे असे म्हणावे लागते असे माऊली सांगतात.


२९९
जे ब्रम्हीं पाहतां मन न सिरे कोठें ।
ऐसियाचे पेठें मज उभे केलें ॥१॥
नावाडा श्रीरंगु जाहाला हाळुवारु ।
तेणें पावविला पारु ब्रह्मविद्येचा ॥२॥
श्रीगुरुविण सर्व शून्य हेंचि मी जाणें ।
तेथिचिये खुणें निवृत्तिराजु ॥३॥
बापरखुमादेविवरी विठ्ठलीं अनुसंधान ।
रात्रिदिन लीन ब्रह्मस्थिति ॥४॥

अर्थ:-

ज्या परब्रह्माच्या स्वरूपाविषयी विचार केला तर मन अन्यत्र कोठेही जात नाही.अशा परमात्म स्वरूपाच्या पेठेत मला नेऊन उभे केले. त्या पेठेत जाण्याला संसार समुद्र फार मोठा आहे. खरा तथापि भगवान जो श्रीरंग हा नावाडी होऊन त्याने मला हलकेच यत्किंचितही धक्का लागु न देता ब्रह्मविद्येचा पार प्राप्त करून दिला. हे सर्व उपकार श्रीगुरूचे असल्यामुळे त्या श्रीगुरूवांचून मी सर्व शून्य समजतो. कारण तेथील खूण प्राप्त करून देणारे श्रीगुरूनिवृत्तिराजच आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी अनुसंधान ठेऊन रात्रंदिवस ब्रह्मस्थितिमध्ये लीन करून ठेवणाऱ्या श्रीगुरूंचे काय उपकार सांगावे. असे माऊली सांगतात.


३००
नवांची खाणी दहाव्यानें शोकिली ।
अकराव्यानें जाली देशधडी ॥१॥
तें ब्रम्हपंथीं माखलें ।
मरोनि जागृत ते जालें
मन गे माये ॥२॥
अवघे अंबर माझें तिंबलें ।
ब्रह्मरसें पिळिलें वो रंग नव्हे ॥३॥
सार वियोगें माझें कर्म बुडालें ।
निष्कर्म जाले म्हणौनि नातळे ॥४॥
जागृति स्वप्न सुषुप्ति बुडाली ।
रखुमादेविवरें सहित गिळीली ॥५॥

अर्थ:-

श्रोत्र इंद्रियावांचून बाकीची नव इंद्रियांची खाण दहाव्या श्रोत्र इंद्रियाने महावाक्यश्रवण करून शोषण करून टाकले. आणि अकरावें जे मन त्याने तर या देहभावाला देशोधडीला लावले. अशारितीने या ब्रह्मपंथात मारले जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जागे झाले. माझे मनरूपी वस्त्र हे ब्रह्मरसामध्ये पिळले. परंतु कसलाही रंग आला नाही. अज्ञानी जीवांनी साररूप मानलेला जो प्रपंच त्याचा माझा वियोग झाल्यामुळे त्याचे पोषक जे कर्म ते बुडाले. म्हणजे संचित क्रियामाण या सर्व कर्माचा दाह होऊन मी निष्कर्म म्हणजे परमात्मरुप झाले. म्हणून लोकदृष्ट्या कर्माचा भोग असला तरी त्यांत मी गुंतत नाही. आता माझी जागृती, स्वप्न, सुषुप्ति हे सर्व बुडाली. म्हणजे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी देहासहित गिळून टाकले. असे माऊली सांगतात.


३०१
ब्रह्माची पुतळी मीचि पै जालों ।
ब्रह्माचि लेईलो अंजनगे माय ॥१॥
ब्रह्मचि सुख ब्रह्मपदीं पावलों ।
ब्रह्मसुखीं निवालों निजींनिज देखा ॥२॥
बापरखुमादेविवरु ब्रह्मपदीं सामावला ।
मजसहित घेऊनि गेला निजपुटीं ॥३॥

अर्थ:-

पुतळी म्हणजे माझे शरीर ब्रह्मरुपच झाले. डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले आहे. ब्रह्म हेच सुख आहे त्याठिकाणी प्राप्त झालो अंतःकरणाने ब्रह्मसुखाच्या ठिकाणी शांत झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हाच ब्रह्म असून त्याच्या पदाच्या ठिकाणी मी ऐक्य पावलो. व माझेपणा सहवर्तमान तो आपल्या स्वरूपांत मला घेऊन गेला. असे माऊली सांगतात.


३०२
सिध्द सांडूनि निजबोधा गेलें ।
निजबोधु भुललें ब्रह्मभुली ॥१॥
आठवेना माझें पूर्वजन्मग्राम ।
अवघाचि श्रम माझा हिरोनि नेला ॥२॥
बापरखुमादेविवरविठ्ठलें वेडावलें ।
आपणासहित मज ब्रह्मीं बुडविलें ॥३॥

अर्थ:-

माझा सर्व प्रपंच सिद्ध असता यथासांग असता तो टाकून मी निजबोधाकडे गेले. त्या ब्रह्मबोधाच्या भुलीने निजबोधही विसरून गेले. त्यामुळे माझा पूर्वीचा देहतादात्म्यरुपी गांव आठवेनासा झाला आणि संसार संबंधी माझे सर्व श्रम नाहीसे होऊन गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने मला वेड लावून आपणासह वर्तमान मला ब्रह्मस्वरुपांत बुडविले. टाकून मी असे माऊली सांगतात.


३०३
मन हें राम जालें मन हें राम जालें ।
प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥
श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें ।
अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले ।
ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥
बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥

अर्थ:-

श्रीरामाच्या नामस्मरणामुळे माझे मन हे रामरुप झाले याची खूण मनाची सहज प्रवृत्ति नष्ट होऊन ते निवृत्ति रुपाला प्राप्त झाले.याचे साधन श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन त्याचप्रमाणे यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार ध्यान, धारणा, आसन व मुद्रा संपादन करुन कसे आपोआप समाधीला आले.शेवटी बोध्य व बोधकता आणि बोध ही त्रिपुटी नाहीसी झाली.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनीच माझे मीपण नाहीसे केले. असे माऊली सांगतात.


३०४
देखावया लागी जव अनौतें पाहिलें ।
तव तनु मनु त्रिभुवनीं व्यापिलेंगे माये ॥१॥
नवलावो जालें जग हरिच होऊनि ठेलें ।
आठऊं विसरलें काय करुं ॥२॥
बापरखुमादेविवरविठ्ठलें साच केलें ।
लोह परिसेंसि झगटलें तैसें जालेंगे माये ॥३॥

अर्थ:-

हे श्रीकृष्ण अगोदर तुला मी माझ्याहून अनौते म्हणजे भिन्न समजून पहावयाला गेलो. तो शरीरांत मनांत व सर्व त्रिभुवनांत तूंच व्यापिला आहेस असे दिसले.काय चमत्कार झाला. सर्व जग हरिरुपच होऊन गेल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे हरिच आहे असे झाले. आता तुझा आठव करण्याचे विसरण्याचे असे राहिलेच नाही. लोखंडास परीस लागल्या बरोबर जसे ते सोनेच होते. त्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाने माझे खरे स्वरुप मला प्राप्त करून दिले असे माऊली सांगतात


३०५
नेणते ठायीं मन पाहों गेलें ।
तंव मरणचि पावले जागृतीगे माये ॥१॥
जागृती अंतीं स्वप्न देखिलें ।
जागृतीं स्वप्न दोन्ही हारपलें ॥२॥
रखुमादेविवरु मरणधरणा भ्याला ।
तेणें मज दाविला तेजोमय ॥३॥

अर्थ:-

जें परमात्मतत्त्व मनाने जाणले जात नाही. त्याला मन पहावयाला गेले असता तें मनच स्वप्नरुप जागृतीला प्राप्त झाले. व जागे झाल्या नंतर त्याने प्रपंच हा स्वप्नासारखा मिथ्या पाहून स्वप्न व जागृति दोन्ही हारपली. मरण धरण्याला भ्यालेला जो मी त्या मला रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी तेजोमय परमात्मा दाखविला असे माऊली सांगतात


३०६
मन मारुनियां मुक्त पैं केलें ॥
मीपण माझें नेलें हिरोनियां ॥१॥
मज लाविले चाळा लाविले चाळा ।
विठ्ठलुचि डोळां बैसलासे ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु लाघवी भला ।
आपरुपीं मज केला सौरसु ॥३॥

अर्थ:-

त्या परमात्म्याने माझ्या मनाचा निश्चय करून मला मुक्त केले. माझी देहादि पदार्थाच्या ठिकाणी असलेली मी व माझे अशी सत्यबुद्धी हिसकावून घेतली. व आपण माझ्या चित्तांत व डोळ्यांत बसून आपल्या स्वरुपाचा चाळा लावला. आणि आपल्या स्वरुपामध्ये एकरुप करुन मला सुखी केले असा हे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल लाघवी आहेत असे माऊली सांगतात.


३०७
अगाधपण माझें अंगी बाणलें वरपडें
देखिलें मृत्तिका लिंग ॥१॥
त्यासि चैतन्य नाहीं गुण नाहीं ।
चळण नाहीं गुण रुप नाहीं ॥२॥
माझ्या शरीरीं ज्योतिर्लिंग उगवलें ।
अगाध कळविलें हस्तेंविण ॥३॥
बापरखुमादेविवरु ज्योतिर्लिंग विश्वनाथ ।
तेणें माझा मनोरथ पुरविलागे माये ॥४॥

अर्थ:-

माझ्या ठिकाणचा परिछिन्न देहात्मभाव होता तो नाहीसा होऊन मृतिकालिंग म्हणजे परमात्मस्वरुप मला प्राप्त झाले.त्या परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी ज्ञान, गुण, चलन, रुप हे काही नाही. अशा तहेचे ते ज्योतिर्लिंग माझ्या शरीरांत म्हणजे हृदयांतच प्रगट झाले. असे ते अगाध ज्योतिर्लिंग त्यास मी हातावाचून स्वाधीन करुन घेतले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जोतिर्लिंग म्हणजे विश्वनाथ होय व त्यांनी माझे सर्व मनोरथ पूर्ण केले. असे माऊली सांगतात.


३०८
अकरावरी सातवें होतें ।
सातवें कोठें मावळलेंगे माये ॥१॥
सहस्त्राची भरोवरी जालीगे माये ।
लय लक्षीं पाहे तंव चोजवेना ॥२॥
रखुमादेविवरु दोन्ही घेतलीं ।
विरुनि टाकिलीं ब्रह्मडोहीं ॥३॥

अर्थ:-

दहा इंद्रिये आणि अकरावे मन याच्याही पलीकडे असलेले तसेच सहा शास्त्रांच्या पलीकडे असलेले जे सातवे आत्मतत्त्व त्या आत्मतत्त्वाच्या ठिकाणी हजारो नावे असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी सर्वाचा लय होऊन गेला. शेवटी आत्मतत्त्व असे म्हणण्याचाही लय होऊन गेला. याचे चिंतन करुन पाहिले असता काही कळून येत नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी ब्रह्मरुपी डोहांत जीव शिवादि कल्पना विरुन गेल्या. असे माऊली सांगतात.


३०९
नेत्र लाउनि मनासीं जंव पुसों जाय ।
तंव देवें नवल केलेंगे बाईये ॥१॥
देवें नवल केलें देवें नवल केलें ।
शेखी सांगतां लाजिरवाणें ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
माझें बाह्यअभ्यंतर व्यापिलें ॥३॥

अर्थ:-

डोळे लाऊन म्हणजे विचार करून मनाला जर विचारले तर देवाने काय चमत्कार केला. देवाने मोठे नवल केले. काय नवल केले म्हणून विचारशील तर सांगणे कठीण. पण इतके सांगता येईल की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी मला अंतर्बाह्य व्यापून टाकले. असे माऊली सांगतात.


३१०
चैतन्य चोरुनि नेलें चित्त माझें सवें गेलें ।
पाहे तंव तंव तन्मय जालें गे माय ॥१॥
देवें नवल केलें मन माझें मोहिलें ।
विसरु तो आठऊ जालागे माये ॥२॥
यासी जाणावयालागी अनुउते पाहे ।
तंव त्रिभुवन तन्मय जालेंगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलरायें ।
माझें सबाह्यभ्यंतर व्यापिलेंगे माय ॥४॥

अर्थ:-

परबह्म श्रीकृष्णाने माझे जीवचैतन्य चोरून नेले त्यामुळे चित्त सहज त्याच्याबरोबर जाऊन. त्याच्याकडे पाहाते तोच माझे चित्त तद्रुप होत गेले.काय देवाने नवल केले? माझे मन अगदी मोहून टाकले. आजपर्यंत परमात्म स्वरूपाविषयी विसर होता. तोच ज्ञान झाले. मला दुसरेपणाने जाणावयास गेले तो याने त्रिभुवन आत्मरूप करून टाकले त्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठलानी माझे सबाह्यअंतर व्यापून टाकले. असे माऊली सांगतात.


३११
हस्ती घोडे हरण सिंहाडे ।
तैसे हें गुजराति लुगडें गे माये ॥१॥
पालव मिरवित जाईन ।
शेला पदरीं धरुनि राहीन ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु सांवळा ।
तेणें मन माजिठा दिल्हा साउला ॥३॥


३१२
एकतत्त्व साधि तंव हारपलों तेथें ।
मज पाहतां येथें मी नाहीं ॥१॥
काय करुं सांगा कैसा हा आकळे ।
एकतत्त्वीं मिळे ह्रदयींगे बाईये ॥२॥
संपादनी नट नटोनियां हरि ।
एकरुपें करि आपण्या ऐसें ॥३॥
ज्ञानदेवींच तत्त्वसार हरी ।
चित्तानु लहरी झेपावली ॥४॥

अर्थ:-

मी एकतत्त्व सिद्ध करू गेले तो तेथे माझा मीपणाच हरपून गेले याला काय करू सांगा? हा परमात्मा कसा आकलन होईल? मला वाटते माझे हृदयांतच एकत्वाने तो आहे. हा नटधारी श्रीहरि अनंतरूपाने नटून त्या रूपाने संपादनी करतो, आणि पहाणायास आपल्याप्रमाणेच एकरूप करतो. अनात्म तत्वातील सत्य सार जो परमात्मा श्रीहरि तो चित्तांत व्यापल्यानंतर चित्ताच्या अनंत लहरीप्रमाणे तो नटतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३१३
आपुलेनि भारें श्रीरंग डोलत गेलें ।
तंव अवचितें पाचारिलें पाठिमोरें ॥१॥
माझें चैतन्य चोरिलें चैतन्य चोरिलें ।
अवघे पारुषलें दीन देहे ॥२॥
बापरखुमादेविवरु दिनानाथ भेटला ।
विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ॥३॥

अर्थ:-

मी आपल्या स्वरूप सौंदर्याच्या संपत्तीने श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्ती करता मोठ्या आनंदाने डोलत चालले असता त्याने अवचित मला पाठीमागे बोलाविले. आणि माझे अंतःकरण त्याने चोरले. त्यामुळे हा दैन्यस्थितित असणारा देहच परका झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल दिनानाथ ते भेटले. त्या योगाने माझा देहच विठ्ठलरूप झाला असे माऊली सांगतात.


३१४
उन्मनि अवस्था लागली निशाणी ।
तन्मयता ध्यानीं मुनीजनां ॥१॥
मन तेथें नाहीं पहासी तें काई ।
सर्व हरि डोहीं बुडी दे कां ॥२॥
मनाची कल्पना देहाची भावना ।
शून्य ते वासना हरिमाजी ॥३॥
निवृत्ति म्हणे सर्व हरिपीक फ़ळलें ।
ज्ञानासी लाधलें हरि कृपा ॥४॥

अर्थ:-

मुनि लोकांना योगाभ्यास करते वेळी ध्येय ब्रह्माशी तन्मयता होत असल्यामुळे जसी उन्मनी अवस्था प्राप्त होते.त्याप्रमाणे मी ब्रह्मरूप आहे. असे ज्ञान मला झाल्यामुळे माझी ही तसीच स्थिति झाली आहे. त्या स्थितित विचार करावयास मनही मनपणाने न उरल्यामुळे विचार तरी कसा करणार? मी देह आहे. अशी समजूत व मन ही दोन्ही हरिस्वरूपांत नाहीसी झाली. मी देहरूप आहे ही मनाची कल्पना नाहीशी होऊन सर्व हरिरूप झाले. निवृत्तिनाथ म्हणतात. हरिच्या कृपेने हरिच्या यथार्थस्वरूपाचे ज्ञान होऊन सर्व जगतरुपानेही तोच नटला आहे. असे ज्ञान मला त्यांच्या कृपेनेच प्राप्त झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात


३१५
तुजमाजी विरावें तुज गिळूनि राहावें ।
तुझें रुप पाहावें रुपेंविण ॥१॥
तूंतें अवघें गुज म्यां सांगावें ।
वाचेविण बोलावें नि:शब्दाकारें ॥२॥
रखुमादेविवरु वाचे विनविला ।
प्रसन्न जाला ब्रह्म दाउनी ॥३॥

अर्थ:-

तुझ्या स्वरुपांत मी विरुन तुलाच गिळून टाकलें, दिसणाऱ्या रुपावांचून जे तुझे यथार्थ अरुपरुप आहे ते पाहावें.आणि असे तुझ्या स्वरुपाच गुह्य मी वाचेवांचून सांगावे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझ्या वाणीने आळविले त्यामुळे ते प्रसन्न झाले व त्यानी ब्रह्म दाखविले.असे माऊली सांगतात.


३१६
कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे ।
कमळीं कमळ उफ़राटेंगे माय ॥१॥
वासना निरसिलिये ।
ब्रह्मकमळीं उगवलीयेगे बाईये ॥२॥
कारण कामातें करुनि आपैते ।
महाकारण तें गगना परौतें गे बाईये ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तेजसु ।
ब्रह्मकमळीं दाविता प्रकाशुगे बाईये ॥४॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण आपले चरणकमळ, दुसऱ्या चरणकमलावर ठेवून दिडक्या पायावर उभेआहेत.त्याकडे पाहून अंतःकरणातील वैषयिक वासना नाहीसी होऊन हृदय ब्रह्मकमळी तें श्रीकृष्णाचे चरण उगवले.त्यामुळे कारण शरीर म्हणजे व्यष्टी अज्ञान त्यांत वैषयिक कामना त्याचे संस्कार सहजच असतात. त्याचा निरास केला असता महाकारणदेह म्हणजे परमात्मस्वरुप प्रगट होते. ही स्थिती गगनाच्याही पलीकडची आहे म्हणजे त्या स्वरुपांत सर्व अनात्मपदार्थाचा अभाव असतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते हृदयकमळामध्ये स्वरुपज्ञान दाखविणारे आहते असे माऊली सांगतात.


३१७
निरखित निरखित गेलिये ।
पाहे तंव तन्मय जालिये ॥१॥
उन्मनीं मन निवालें ।
सावळें परब्रह्म भासलें ॥२॥
रुप येवोनियां डोळां बैसलें ।
पाहें तंव परब्रह्म आतलें ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें ।
मुस ओतुनि मेण सांडिलें ॥४॥

अर्थ:-

निरखित निरखित म्हणजे श्रवण, मनन, निजिध्यासन करीत, करित वा पंचकोशाचा निरास करीत करीत किंवा नामस्मरणादि भक्ति करीत करीत श्रीकृष्ण परमात्म्याला पहावयाला म्हणून गेले. तो त्याला पाहाताक्षणीच मी तद्रूप झाले. उन्मन जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन शांत होऊन तो सांवळा श्रीकृष्ण परब्रह्म भासला. त्याचे रुप माझ्या डोळ्यांत येऊन बसले. विचार करुन पाहिले तर परब्रह्मच माझ्या शरीरांत अवतीर्ण झाले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यानी माझ्या शरीरुपी मुसीत परमात्मस्वरुप ओतल्याबरोबर अनात्मभावाचे मेण सर्व नाहीसे होऊन गेले असे माऊली सांगतात.


३१८
सदैवपण आलें गोपाळातें देखिलें ।
लक्षा एका जोडलें अमित्य गुणीं वो माय ॥१॥
दैन्याचे सांकडीपासूनि वेगळालें ।
पैं जवळी बैसविलें आनंदपदीं वो माय ॥२॥
जागृतिशेवटीं निद्राभुली नुठी ।
म्यां प्रपंचासी मिठी दिधली वो माय ॥३॥
मागुती नको परतणी या शरीरीं उरवणी ।
प्रपंचाची काहाणी निमाली वो माय ॥४॥
सदोदीत भरलें त्या तिहीं गुणां वेगळें ।
तें अगणित वर्षलें प्रेमधारीं वो माय ॥५॥
सबराभरित भरला या देहाभावा वेगळा ।
रखुमादेविवरु जवळी जोडला वो माय ॥६॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्णाचे नित्य असणारे ऐश्वर्य पाहून अगणित गुणसंपन्न परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी माझे लक्ष गढून गेले.आणि त्यामुळे मी संसारीकदुःखाचे संकटातून वेगळी झाल्यामुळे त्याने आपल्या सहजानंद पदावर बसवून घेतले. जागृति स्थूळदेहसंबंधी असून निद्रा ही त्याचेच आश्रयावर आहे. परमात्मस्वरूपज्ञानाने स्थूळदेहाचा निरास झाला. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणची जागृति केली. तशी निद्रा म्हणजे मायाही गेली. आणि सर्व प्रपंच्याला आत्मरूपानेच मिठी दिली व सर्व प्रपंच परमात्मरूप केला. आतां पुन्हा या शरीराच्या ठिकाणी आत्मत्वबुद्धीचा उदय होऊच नये अशा रितीने प्रपंचाची रडकथा संपली. त्रैलोक्यांत व्याप्त असून वस्तुतः त्रिगुणात्मक विश्वाहून निराळ्या असणाऱ्या परब्रह्माने माझ्यावर प्रेमधारीने अनंत सुखाचा वर्षाव केला.तो सर्वात भरला असून जो देहभावाहून वेगळा असणारे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना आत्मत्वाने प्राप्त करून घेतला असे असे माऊली सांगतात.


३१९
निरालंब स्तंब घातला निजयोगु ।
साहि वेगळेसि वो माय ॥१॥
आणिकां न कळे तें त्रिगुणां वेगळें ।
तें मज गोवळें दावियलें वो माय ॥२॥
दुर्घट घडतां न वर्णवे योग्यता ।
मज पुढारी वो माय ॥३॥
खुणा जरी बोलों तरी मौन्य पडलें ।
तें परब्रह्मीं उघडलें दिव्यचक्षु वो माय ॥४॥
तो चिदानंदु पुतळा रखुमाई जवळा ।
सोईरा सकळांसहित वो माय ॥५॥

अर्थ:-

जो दुसऱ्याच्या आश्रयावर नाही स्वतःच्या वर आहे. साही शास्त्रांना ज्याचे विधिमुखाने प्रतिपादन करता येत नाही. जो दुसऱ्यास ज्ञेयत्वाने कळणे शक्य नाही. कारण तो त्रिगुणातीत आहे. परंतु श्रीगुरूनिवृत्तिरायांनी ते श्रीकृष्ण रूप मला प्रत्यक्ष दाखविले. त्याचे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. कारण तो शब्दाला विषय नाही. तरी पण तो आज माझ्या डोळ्यापुढे उभा आहे. कांही खुणेने बोलावयाचा प्रयत्न करावा.तर वाणी मुकी होते. त्या परब्रह्माच्या दर्शनास योग्य होतील असे डोळे श्रीगुरूनी उघडले..त्यामुळे सच्चिदानंदरूप असलेला व सर्वांचा जिवलग असलेला असा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मी पाहिले. असे माऊली सांगतात.


३२०
दिप दिगांतरीं दिपीं पाहातां ।
परेहुनि परता तो देखिला वो माय ॥१॥
पाहीन मी आतां निरंजन स्वरुपता ।
त्यानें मज तत्त्वतां चोजविलें वो माय ॥२॥
देहाचा दिवा उजळुनि ज्ञानज्योति ।
परपुरुषीं निवृत्ति झाली वो माय ॥३॥
कवळुनि भेटी प्राणेंसि देईन मिठी ।
मी नि:शब्देंसी गोष्टी सांगेन वो माय ॥४॥
निजभावें निरोपिला सच्चिदानंदपदीं ।
मग मज परमानंदी गोष्टी
जोडली वो माय ॥५॥
ऐसें मीं अनुसरलें यानें आपंगिलें ।
रखुमादेविवरु विठ्ठलें वो माय ॥६॥

अर्थ:-

ज्याच्या योगाने हे सर्व जगत भासते व जो ज्ञानरूप परावाणीच्या पलीकडे आहे तो परमात्मा आज मी पाहीला. तो सर्व भेदशून्य आहे. त्यानेच आपल्या स्वरूपाविषयी मला जागे केल्यामुळे आता मी त्यास पाहीन. देहामध्ये असणारी ज्या ज्ञानाची ज्योती त्या ज्योतीने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी माझी आत्मस्वरूपाविषयी निवृत्ति झाली. सगुण रूपाने त्याला कवळून मिठी मारीन आणि स्वरूपता जो निःशब्द त्याच्याशी गोष्टी बोलत बसेन. स्वतःच्या शुद्ध भावाने मला श्रीगुरूनी सच्चिदानंद पदाच्या ठिकाणी त्या स्वरूपाचा बोध केला. त्यामुळे त्याविषयी गोष्ट बोलण्याची योग्यता प्राप्त झाली. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना मी अनन्य भक्तिभावाने शरण गेले. त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला असे माऊली सांगतात.


३२१
दीनपण दवडूनि दिनानाथें मेळविलें ।
ते येणें गोपाळें केलें रुप नवल वो माये ॥१॥
पाहातां पारणीं फ़िटली चक्षूंची ।
सर्व आवडीची कोथळी लाधली वो माये ॥२॥
आतां असो हे भरोवरी सांगणें या शरीरीं ।
उगवलें अंतरी दृष्टीचिया वो माय ॥३॥
गुण गिर्‍हाईक जोडला अमोल मोलें घेतला ।
रखुमादेविवर विठ्ठल वो माय ॥४॥

अर्थ:-

देहात्मबुद्धी हाच कोणी एक दीनपणा असून त्यामुळे अनेक प्रकारचे दुखे भोगावी लागतात. तो माझा दीनपणा फेडून दीनानाथ जो परमात्मा त्याच्या स्वरूपाशी या श्रीकृष्णानी ऐक्य करून दिले गे माय. श्रीकृष्णाचे दर्शन झाले. आणि डोळ्यांचे पारणे फिटून सर्व आवडीचा सर्व सुखाचा ठेवाच मला प्राप्त झाला. आता या शरीराचा संबंध असल्यामुळे अनेक खटपट होत असली तरी त्या सर्व व्यवहारांत आत्मज्ञानाच्या दृष्टीचा उदय झाला असल्यामुळे तो ज्ञानाचा निश्चय इतका अंगवळणी पडला आहे की सर्व व्यवहारांत निजात्म निर्गुण स्वरूपाचा आनंदच पहात राहावे, तो निजानंद माझ्या डोळ्यांत बसून राहिल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे परमात्मरूपच दिसते. ते सुख शब्दाने सांगता येणार नाही. अशी स्थिती फक्त या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाने झाली. तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्या दर्शनाने गि-हाईक कोणी मिळते का असे पाहातच होता. एवढ्यांत त्याला माझी गाठ पडली. तेंव्हा मी माझ्याजवळची शमदमादि सर्व सामुग्री हेच कोणी द्रव्य ते मी त्यास देऊन त्या परमात्म्याला विकत घेतला. जे अमोल रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच होय असे माऊली सांगतात.


३२२
देहधर्मी काज गुरुराज चित्तीं ।
तरीच या संपत्ती फ़ळद होती ॥१॥
तैसें तुझें ध्यान करितां उध्दट ।
सांपडली वाट वैकुंठीची ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता हरी ।
समरसें श्रीहरि तत्त्व जाले ॥३॥
पृथ्वी आप तेज गगनाकृति वायो ।
फ़िटला संदेहो ये जन्मींचा ॥४॥
उपदेश द्रष्टा जरि असे श्रेष्ठ ।
तरीच भाग्य विनट विष्णुरुपी ॥५॥
ज्ञानदेवीं सिध्दि साउली श्रीहरी ।
गुरुकृपा करीं कुरवाळिलें ॥६॥

अर्थ:-

देहधर्म प्रारब्धाप्रमाणे कसाही असो. परंतु मनुष्य देहाचे फळ जी परमार्थ सिद्धी तो खरोखरी फलप्रद व्हावयाची असेल तर चित्तांत श्रीगुरूचे रात्रंदिवस ध्यान पाहिजे. तर ही विवेक वैराग्यादि शमदमादि संपत्ति फलप्रद होतील ज्ञानोबाराय तुझे ध्यान उद्भट म्हणजे तीव्रअसल्यामुळे तुला परमात्मप्राप्तीची वाट सापडली, त्यामुळे तुझी स्थिती अशी झाली की ज्ञेय ज्ञाता, ज्ञान ध्येय ध्याता, ध्यान ही त्रिपुटी सर्व परमात्मरूपच झाली. पंचमहाभूते देहाचे जन्ममरण याविषयीचा तुझा संदेश फिटला पण ही गोष्ट केव्हा घडते ? उपदेशकरणारा श्रेष्ठ यथार्थ शास्त्रद्रष्टा असेल तरच भाग्यवान विष्णु स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतो, मला ही स्थिती श्रीहरिच्या कृपेने लाभली असली तरी याला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी माझ्यावर कृपा करून मला पोटाशी धरले. हे मुख्य कारण आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३२३
जन्माचें व्याज आपणचि गिळिलें ।
मुदलाचा ठावो नाहीं ऐसें केलें ॥१॥
रिणाईत नव्हे हा निर्गुणासि समंधु ।
येणें परमबोधु बोधविला ॥२॥
ऐसी आपुली साक्षी कवणें पै द्यावी ।
निवृत्ति म्हणे कांहीं ठायीं न ठेवीची ॥३॥
बापरखुमादेविवरें केला घातासि घातु ।
आपुला लक्षाचा लाभु वरी दिधला ॥४॥

अर्थ:-

पुन्हां जन्माला येण्याचे निमित्त जें पूर्विचे कर्म ते निवृत्तिरायांनी गिळून मुद्दलाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला. या निर्गुणासी संबंध झाला असता जन्ममरणाचे ऋण राहात नाही. त्या निर्गुणाचा परमबोध श्रीगुरू निवृत्तिनाथानी मला ठसवून दिला. आतां ही साक्ष स्वतःच्या अंतःकरणाशिवाय कोणी द्यावी. श्रीगुरू निवृत्तिनाध म्हणतात. हे ज्ञानदेवा तूं आतां आपल्याठिकाणी काही एक पापपुण्य ठेवू नकोस. याप्रमाणे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी जीवाचा घात करणारा जो संसार त्याचाच घात करून टाकला. आणि आपले जे लक्ष्यार्थस्वरूप त्याचा लाभ करून दिला असे माऊली सांगतात.


३२४
दुरुनि येक ऋण मागावया आलें ॥
माझें मीं पाहिलें तंव कांही नाहीं ॥१॥
भीतरील माझीं पंचरत्नें नेलीं ।
स्वस्वरुप वाहवलीं मध्य गिळियेलें ॥२॥
निवृत्ति बोधें मी बोधलें ॥
सांगतें वाहवलें सर्वस्वेंसी ॥३॥
ऐसा रखुमादेविवरुविठ्ठलु आपण पुढारला ।
माझा निर्वाळा केला संसारींचा ॥४॥

अर्थ:-

अनेक जन्मामध्ये केलेली पुण्याई हेच कोणी ऋण परमात्म्याशी मागण्याकरिता आले आणि मी कोण आहे हे माझे मी पाहू लागले. तो माझा मीपणाच नाहीसा झाला.माझ्या तील पंचरत्ने म्हणजे पंचप्राण स्वस्वरूपा बोधामध्ये वाहून गेले म्हणून त्या परमात्म्याने मलाच गिळून टाकले. श्रीगुरुनिवृत्तिरायांच्या बोधाने मला हा बोध झाला. त्या मुळे मांझे देहात्मभाव सर्वस्वी वाहून गेले. असे मी आपला अनुभव सांगतो. हा सर्व व्यवहार रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी पुढाकार घेऊन केला आणि संसारापासून वेगळेपणाचा माझे ठिकाणी निश्चय केला असे माऊली सांगतात.


३२५
सत्राविये कोठडि माजी निक्षेपिलें ।
एकीं केलें धन ते बाविसें नेलें पातेजोनि ॥१॥
आपण नेणतां ऋण घ्यावयासी गेलों ।
तंव तंव सर्वस्वेसी बुडालों परोपरी देखा ॥२॥
मंत्र सांगितला माझ्या कानीं ।
जाणोनि ज्ञानविज्ञानीं वेडावलों ॥३॥
ऐसें रखुमादेविवरा विठ्ठलाच्या बोला ।
पातेजलों सर्वस्वासी ठेलों प्राड.मुख ॥४॥

अर्थ:-

सत्रावी जीवनकला हीच कोणी एक कोठडी तिच्यामध्ये माझे आत्मस्वरूपी धन ठेवले होते. ते माझे धन पंचमहाभूते पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेद्रिये, मन, आणि बुद्धि या बावीस जणांनी मिळून विश्वासाने चोरून नेले. ते आज पुन्हा माझ्या मुख्यधनासी एक केले. वस्तुतः आपण जाणून नेणतेपणाने ऋण देण्याकरिता परमात्म्याकडे गेलो तोच सर्वप्रकाराने सर्वस्वी बुडालो. म्हणजे परमात्मरूप झालो. याचे कारण श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझ्या कानांत परमात्म ऐक्याचा मंत्र सांगितला. तो यथार्थ जाणून विज्ञान रूप जो परमात्मा त्याच्या स्वरूपात मी वेडावून गेलो.म्हणजे मी परमात्मरूप झालो. अशा प्रकारे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवला इतक्यांत सर्वस्वाशी म्हणजे देहात्म भावावादी प्रपंचाशी पराङ्मुख झालो असे माऊली सांगतात.


३२६
चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिले ।
तें एका ऋणाईतें घेतलें वोळखीविण ॥१॥
आपुलें अकरावें एक सोईरें जाणा ।
तेंहीं पैं तयासि मिळोनि ठेलें ॥२॥
आतां मी चौघांपाशीं जाईन तिहींचि नागविले पाहीं ।
तेथें कांहीं नाहीं ऐसें म्हणितलें ॥३॥
ऐसा देहाचा दिवाळखोर दुसर्‍यासी घेऊनी गेला ।
तेणें मज दाखविला अद्वैत पारु ॥४॥
सहस्त्रापरि कांही धरियेली जरी ।
ज्ञानमूढें तरी कायि जाणती ॥५॥
ऐसा बापरखुमादेविवरु विठ्ठलु मध्यावर्ती भला ।
तेणें उगाणा केला परावृत्त होऊनियां ॥६॥

अर्थ:-

चार आणि तेरा मिळून सतरा संख्या होते. या सतरा तत्त्वाचे लिंग शरीर आहे. त्या लिंग शरीराच्या ठिकाणीच चौसष्ठ कला असतात. त्या लिंग शरीराने चौसष्ट कलांच्या सहाय्याने जे देहात्मभावाचे धन साचविले त्याला परमात्म्याची बिलकुल ओळख नव्हती परंतु त्याच्या प्राप्तीची इच्छा होती. त्या ऋणाईताने आमचे ते सर्व धन घेतले. व देहात्मभावामध्ये आमचे सगे सोयरे असलेले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय व एक मन हे अकरा आहेत. हेही त्यालाच मिळून गेले. म्हणजे त्यांनाही त्याचाच वेध लागून गेला. आतां मी चार वेदापाशी जाईन आणि असे का झाले म्हणून विचारेन. म्हणावे तर त्यानीच मला कसे नागवून टाकले आहे पाहा. ते केला परावृत्त म्हणतात त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी देहादिअनात्मपदार्थ काही एक नाहीत. याप्रमाणे देहाचा दिवाळखोर म्हणजे देहसंबंध ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही (असा परमात्मा) इतकेच नाही तर दुसऱ्याच्या देहसंबंधालाही तो घेऊन गेला. अशा रितीने अद्वैत स्वरूपरुपी पलीकडचा तीर मला दाखविला. ज्ञानशून्य पुरूषानी असल्या परमात्म्याला जाणण्याचे हजारो प्रकार केले तरी त्यांना तो कळेल काय. त्या परमात्म्याची आणि जीवाची गाठ घालून देण्याला म्हणजे जीवाला परमात्म्याचे ज्ञान करून देण्याला माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मध्यस्थ पाहिजे. त्याच्याच कृपेने मी संसारापासून परावृत्त होऊन परमात्मस्वरूपाचा लाभ करून घेतला असे माऊली सांगतात.


३२७
चतुर्देहाची भरणी पुरली ।
एकाएकी देखिली निजतनु ॥१॥
त्याचे नांव गोवळु फ़िटला काळ वेळु ।
जाला सकळु सकळांसहित ॥२॥
ऐसा बापरखुमादेविवरु सुंदरु ।
तेणें माझा वेव्हारु खंडियेला ॥३॥

अर्थ:-

स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण या चार देहांची मजजवळ असलेली सामुग्री संपली. ती संपल्याबरोबर एकाएकी आत्मस्वरूपपाहीले. त्याचे नांव परमात्मा भगवान श्रीकृष्ण असे आहे. त्याच्या दर्शनाने सर्वत्र परमात्मरूप झाल्यामुळे आता काळवेळाची भीती राहिली नाही. त्याच्यामुळे सर्वत्रत्याचेच दर्शन होत आहे. अशा प्रकारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे सुंदर श्रीविठ्ठल त्यानी माझा हा जन्ममरणाचा व्यवहार सांडून टाकलाअसे माऊली सांगतात.


३२८
अकल्पित द्रुम आजि संयोगे घडलें ।
अपार आपणातें विसरलेंगे माय ॥१॥
महुरलें मन माझें मोहरलें ।
भक्तिफ़ळासि कैसें आलेंगे माय ॥२॥
देठींहुनि सुटलें पुढति कैसें जीवनासि आलें ।
बापरखुमादेविवरविठ्ठलें ऐसें केलेंगे माय ॥३॥

अर्थ:-

कल्पनातीत वृक्ष जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी आत्मस्वरूपाचा ऐक्यरूप संयोग आज घडल्यामुळे आत्मस्वरूपाचे अपारपण मी विसरून गेले. अशा आत्मस्वरूपाविषयी माझे मन त्रिवार खचित आनंदी झाले हेच भक्तीचे फल माझे पदरांत कसे पडले. देवाहून म्हणजे परमात्मस्वरूपापासून ज्ञानाने भ्रमिष्ठ होऊन संसारात पडलेला जीव, पुन्हां माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त यानी परमात्मस्वरूप कस केले. असे माऊली सांगतात.


३२९
पांचासहित लयातीत जालिये वो ।
प्रेम भक्ती अनुसरलें वो काळ्या रुपासी ॥१॥
ठायींचाची काळा अनादि बहु काळा ।
म्हणोनि वेदा चाळा लाविलागे माये ॥२॥
बापरखुमादेविवरें जन्मावेगळें पै केलें ।
म्हणोनि भाज जाले बाईयेवो ॥३॥

अर्थ:-

माझ्या शरीराला उपादानभूत असलेली पंचभूते किंवा माझ्या स्वरूपाला आच्छादन करणारे पंचकोश यांचा विचारदृष्टीने सर्व भूतांचे उपादान कारण जे अज्ञान त्यात लय होतो. त्या अज्ञानाच्या पलिकडे असलेला जो श्रीकृष्ण परमात्मा तद्रुप मी झाले. पूर्वसंस्काराने त्या काळ्याच्या ठिकाणी असलेली प्रेम भक्ति त्या प्रेमभक्तिने पुन्हा त्या काळ्यारूपास मी अनुसरले. हा ठायीचाचि अनादि कालाचा व स्वरूपेकरून काळा म्हणजे नामरूपातीत शुद्ध असल्यामुळे समजण्यास फार कठीण आहे. फार काय सांगावे सर्वज्ञ वेदालाही त्याने आपले स्वरूप समजावून घेण्याचा चाळा लाविला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या भुलीमुळे त्याने मला जन्मविरहित केले मी त्यांची बायको झाले. असे माऊली सांगतात.


३३०
संसारा तुकलिये वेव्हार मुकलिये ।
घराचारा पारुषलिये काय सांगों ॥१॥
माझें जिणेंचि बुडालें माझें जिणेंचि बुडालें ।
विठ्ठलें कुडें केलें काय सांगों ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
सहज मोलेविणें विकत घेतलें ॥३॥

अर्थ:-

संसारा तुकलिये,’ म्हणजे संसारांत माझी स्थिती कशी झाली आहे म्हणून काय सांगू मी सर्वस्वी व्यवहाराला मुकले आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीपुढे गृह व्यापारापासून मी अगदी निराळी झाली आहे. पारमार्थिक दृष्ट्या माझे व्यवहारिक जिणेच बुडाले आहे. असे या विठ्ठलाने माझे संसारांत वाटोळे केले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला माझ्या जीवीत्वाचे कांही एक मोल न देता मला आपलेसे करून टाकले असे माऊली सांगतात.


३३१
तुज जाणावया जाय देवा ।
तंव आठवे इंद्रियांचा हेवा ।
मनें करुनियां ठेवा ।
स्थान एक निर्मिलें ॥१॥
मग इंद्रियें भजती मना ।
अल्प जाली पै वासना ।
स्वरुप देखावया मना ।
मन नयन एकरुपें ॥२॥
तुझें ध्यान आवडे कान्हा ।
रुप न्याहाळी नयना ।
निजीं निरंतर वासना ।
कृष्ण ध्यानीं तत्पर ॥३॥
ऐसें तुझें रुप चोखडें ।
मनें निवडिलें पै कोडें ।
जें योगियां नसंपडे ।
ध्यानरुपीं रया ॥४॥
या रुपाचा सोहळा देई ।
हेंचि मागतुसे पाही ।
आणिक न मागे गा कांहीं ।
तुजवांचोनि स्वामिया ॥५॥
जरी स्वार्थ करुं कल्पनेचा ।
हरि हाचि विस्तारु प्रपंचाचा ।
काय यासि वर्णु वाचा ।
तूं दीनाचा स्वामी होसी ॥६॥
नको हा संसार व्यर्थ ।
भक्ति ज्ञान वैराग्य परमार्थ ।
हाचि देई मानीं स्वार्थ ।
नलगे अर्थ मायेचा ॥७॥
माझ्या मनें ध्यान केलें ।
रुपीं रुप हिरोनि घेतलें ।
थितें मीपणहि नेलें ।
मज आपुलें म्हणवें ॥८॥
गोंवी ज्ञान पदविये ।
ज्ञानाग्नि दावी मांडवीये ।
दृश्य द्रष्टा सर्वज्ञ सोये ।
अवघा होये दातारा ॥९॥
विश्व हें तूंचि क्षरलासि ।
आत्मा जगदाकारें होसी ।
सवेंचि क्षरलें मोडिसी ।
तदां शेखी एकत्त्व ॥१०॥
बापरखुमादेवीवरध्यान ।
वृत्तिसी साधलें पूर्ण ।
ज्ञानदेव म्हणे निधान ।
विठ्ठलीं मन स्थिरावलें ॥११॥

अर्थ:-

हे देवा तुला जाणावयाला जावे तर इंद्रिये प्रतिबंध करतात. विषयाकडे ओढून नेतात. म्हणून मनाला आवरुन एकांतात एक स्थान निश्चित केले, असे केल्यावर इंद्रिय आणि वासना ही मनांच्या स्वाधीन झाली. त्यामुळे परमात्म स्वरुप पाहण्याला एक मनच डोळा झाले हे कान्होबा तुझे रुप पाहिल्या बरोबर तुझे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झाली. त्यामुळे मनाची वासना निरंतर कृष्णध्यानपर झाली. योग्यालाही जे ध्यानात सापडत नाही असे ते तुझे सुंदर रूप मनाने, कौतुकाने निवडले.आता एवढेच म्हणणे आहे की, या रुपाच्या सुखाचा सोहळा नित्य दे. याशिवाय दुसरे कांही मागत नाही.या सुखाचा परित्याग करुन काल्पनिक स्वार्थ करु म्हटले तर. तोच प्रपंचाचा विस्तार होय. त्याचे वर्णन वाचेने काय करावयाचे हे कृष्णा तू दीनावर दया करणारा आहेस. म्हणून प्रार्थना एवढीच की. हा मिथ्या संसार मला नको. मला जर काही हवे असेल तर परमात्म्याची भक्ति, परमात्मस्वरुपाचे यथार्थज्ञान, त्याचे साधन तीव्र वैराग्य त्याने प्राप्त होणारा परमार्थ ह्यातच स्वार्थ आहे. असे माझे मनी नित्य असावेत हा मायेचा व्यर्थ क्षुद्र अर्थ मला नको. माझ्या मनाने ध्यान केले माझे रुप परमात्मरुपांत ऐक्य पावले व्यर्थ असलेला मीपणा गेला. असे करुन हे कृष्णा, तू मला हा माझा आहे असे म्हण दृढअपरोक्ष ज्ञानाचे पदवीत माझे चित्ताचे ऐक्य कर, ज्ञानरुप अग्नीच्या प्रकाशांचा मांडव मला दाखव. दृश्य, द्रष्टा. सर्वज्ञत्वादि सर्व मी होईल अशी सोय कर. हे विश्व तूंच बनला आहेस. व स्वेच्छेने वाटेल तेव्हां तूंच मोडून टाकून शेवटी एकत्वाने राहतोस. त्याचे ठिकाणी माझे मन म्हणजे. श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी वृत्तीला पूर्ण ध्यान साधले. म्हणूनच रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल स्वरुपाच्या ठिकाणी ते स्थिरावले असे माऊली सांगतात.


३३२
तुज पासाव जन्मलों हरी पुढती सामावलों तुझ्या उदरीं ।
तुझिया व्यापकपणें चाले सत्कर्माची दोरी ।
सायीखडियाचें बाहुलें कैसें हावभाव धरी ।
सूर्यकांत वेधें अग्नीच प्रसवे सहजे समंधु ऐसा धरी रया ॥१॥
तुझें तुज देवा सांगता निकें । समर्थेसि केवी बोलावें रंकें ॥ध्रु०॥
अहंकार महदादि भूतें गुणेंसि आलीं ।
तें चैतन्यनयनीं अधिष्ठिलीं ।
सर्व शरिरीं वायो व्यापिला कीं पृथ्वींसि मिळोनि आकाशा भरोवरी जाली ।
ते हे स्थूळ लिंग कारण तिहीं तत्त्वेंसी प्रकृति अथिली रया ॥२॥
सर्व होणें तुज एकाचें ।
दुजेपण तेथें आणावें कैचे ॥ध्रु०॥
चंद्रमा मन चक्षुसूर्योदिशा श्रोत्र आकार उकार मकार प्रणव मन बुध्दि चित्त अहंकार ।
ब्रह्मा विष्णु महेश राजस तामस सात्विक माया ब्रह्मीचा दावि
पाड पावो तुज वेगळे काय आहे तें सांग पां तरि मज कां म्हणवितासि जिऊ रया ॥३॥
जेथें पाहें तेथें तूंचि दिससी ।
लपोनिया अबोला कासया धरिसी ॥ध्रु०॥
रसना रस सेवावें हे तो जीव आत्म्याची स्थिति ।
श्रवणीं ऐकणें की नेत्री देखणें हे तो तुझीच नाद श्रुती ।
घ्राणासि परिमळ घेणें कीं हस्तपादाचि कां चरगती ।
हे तो तुझींच पांचै तत्त्वें तरीं तूं मज कां भोगावितांसि यातायाती रया ॥४॥
लाजेसि ना तूं देवा माझें ह्मणतां । संन्यासावें कैंचीरे कांता ॥ध्रु०॥
इंद्रियें दारुणे जीव आत्मयासी कैंचीरे कांता ॥ध्रु०॥
इंद्रिकें दारुणे जीव आत्मयासी हे तो सुखदु:ख प्राप्ती ।
तेणें हें कारण कीं आत्मा पाव यातायाती ।
इंद्रियें दंडून तप जें करावें ऐसें बोलती वेद श्रुती ।
साहीजणासि तो वेवाद लाविला हे तो तुझीच करणी सांगती रया ॥५॥
दुजेविंण एकला खेळतो स्वारी ।
कवणातें जय कवणा आली हरी ॥ध्रु०॥
अंगे ब्रह्मा जालासि उप्तत्ती करावया सृष्टी ।
ते समयीं तो रचिली विषयाची कसवटी ।
ऐसें तुझें वालभ मिरऊं जाय सृष्टि ।
तंव सुखदु:ख लागतसे पाठीं ।
येथें काय माझा अपराध जाणसी तरि शस्त्रेंसि
मान निवटीं रया ॥६॥
सगुण रचना वोजा विस्तारली ।
भुजंगी व्याली तिची काय झालीं पिलीं ॥ध्रु०॥
वेद प्रमाण करावया कारण
कीं कृष्णमूर्तिची बुंथी घेणें ।
अनंतब्रह्मादिकांसि आदिवंद्य तो तूं
राखसी गौळियाची गोधनें ।
अंबऋषीकारणें गर्भवास साहिले कीं
अजामिळादिकांसि उध्दारणें ।
वैरियां भक्तां येकिचि मुक्ती मा
सम्रर्थु नाहीं येणें माने रया ॥७॥
अनंत ब्रह्मांडे घडिसी मोडिसी ।
अकर्तेपणें जैसा तैसा अससी ॥ध्रु०॥
एक विरा माया मारावी कीं
गणिका उध्दारावी हे कवण प्रकृती ।
दशरथापिता रौरवीं कीं वैरिया
सायुज्यता मुक्ती ।
कर्मभ्रष्ट पांडव सरते केले की
अज्ञानासी मोक्षप्राप्ती ।
शास्त्रें पुराणें वारुं जाय तंव अधिकचि गुंती रया ॥८॥
सुताचें गुंडाळें उगवीं पा वहिलें ।
खंडूनियां सांडी देवा एकाचि बोले ॥ध्रु०॥
मिथ्या हा प्रपंच कीं दर्पणीचें दुजे
जळीं बिंब प्रकाशे ।
एक साचें दुजें दिसें तैसेंचि ।
दुसरे का प्रतिभासे ।
लटिकें म्हणों जाय तंव तेथें
मन का विश्वासे ।
सगुण निर्गुण हे तों तुझीच माया तुझी
तुजमाजी दिसे रया ॥९॥
अर्धनारी सोंग पाहतां निकें ।
साच लपऊनि दावितो लटिकें ॥ध्रु०॥
सिध्दासी साधन हे तों कष्टचि वायांविण ।
अनंत प्रत्यक्ष जाणोन कायसें परिमाण ।
स्वयंभासि प्रतिष्ठा करणें हे तों
देखतचि अज्ञानपण ।
निजबिंबामाजी प्रतिबिंब बिंबलें तैसें
सगुण निर्गुण तुजमाजी रया ॥१०॥
सहजसिध्द तें तूं आपणपें पाहीं ।
बाहिजु भीतरी ये दोन्हीं नाहीं ॥ध्रु०॥
विश्वरुप अळंकारलें कीं मुसें आटली भांगारे ।
अथवा घटमटादिकीं अभावीं परिपूर्ण असिजे अंबरें ।
उदकी पडिला काश्मिरा तो नागवे निरा न सरे ।
दुसरेपणें तैसा आदि मध्य अंतीं ह्रदयींचा
जाणोनि पूर्णबोधेंविण द्वैत न सरे रया ॥११॥
सच्चिदानंदरुप तत्त्वता ।
लटिकेंचि बंधन बंधना मुक्ता ॥ध्रु०॥
म्हणसी माझा संकल्प फळला तरि
म्या दु:ख नाहीं इच्छिलें ।
अवघा तुझा खेळ बहुरुप असें विस्तारलें ।
जाणसीं तें करी देवातें तुझें तुज पुढां सांगितलें ।
तेथ काय माझा अपराध देखसी
तरी देह कां खंडिले रया ॥१२॥
पुरे पुरे आतां जड जालें जिणें ।
उरी नाहीं देवा लाजिरवाणें ॥ध्रु०॥
ऐसीं इंद्रियें वासनेसी आणीजती ते
तुझी तुजमाजीं सामावती ।
समस्त जीव हे तों तुझे
आकारलें येरी ते लटकीच भ्रांती ।
जाणसी तें करी देवा तेचि
तें सागों किती ।
दग्धबीज तरु बीजीं सामावला तैसा
तुजमाजी श्रीगुरुनिवृत्ति रया ॥१३॥
ऐक्य जालें तेथें नित्य दिवाळी ।
सहज समाधि तेथें कायसिरे टाळि ॥ध्रु०॥

अर्थ:-

हे श्रीहरि, तुझ्यापासून माझा जन्म होऊन पुन्हा तुझ्या स्वरूपात सामावलो. तुझ्या व्यापकपणाच्या आधारावर जीवाच्या कर्माकर्माची दोरी हालवण्याने सायिखड्याच्या बाहुल्याप्रमाणे जीव, कर्माचरण करतात. सूर्यकांतांच्या संबंधाने अग्नी उत्पन्न होतो. तसा तुझ्या स्वरूपाशी जीवाचा सहज संबंध आहे. हे तुझे तुझ्यापुढे खरे सांगून समर्थापुढे काय बोलावे.कारण तूं सर्वज्ञ आहेस अहंकार, गुणासह वर्तमान पंचमहाभूते ज्याच्यापासून झाली ते अधिष्ठान चैतन्य डोळ्यांतही व्यापलेले आहे. सर्व शरीरामध्ये वायु व्यापला, किंवा पृथ्वीसी ऐक्य पावून आकाशाची पूर्तता केली. त्याच्यापासून स्थूळ, सूक्ष्म व कारण या तीन तत्त्वाशी मिळून प्रकृतिच विकाराला पावली आहे. त्या प्रकृतिद्वारा हे सर्व विश्व तुंच बनला आहेस. त्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुसरेपणा कोठून आणावा. चंद्रमा तुमचेच मन, सूर्य तुमचे डोळे, दिशा हे कान, अकार उकार, मकार मात्रात्मक प्रणव मन, बुद्धि, चित्त, अहंकार, ब्रह्मा, विष्णु, महेश, राजस, तामस सात्त्विकादि भाव, धारण करणारी माया, ब्रह्मप्राप्तीचा उपाय दाखवून, वास्तविक विचार करता ती माया तुमचे स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुमचेहून भिन्न असे काय आहे.जर तुझ्याहून यत्किंचितही काही भिन्न नाही तर मला जीव काय म्हणून म्हणतोस. जिकडे पहावे तिकडे तूंच दिसत असता आपले स्वरूप लपवून माझ्याशी अबोला काय म्हणून धरतोस. रसनेने रस सेवावा, कानांनी ऐकावे, नेत्राने पाहावे.नाकांने सुगंध घ्यावा, हातापायाचे चलन व्हावे हा सर्व समुदाय ज्या पंचमहाभूताचा आहे. ती पंचमहाभूते तुमचे स्वरूप असता मी जीव तुमच्याहून वेगळा असे समजून माझ्याकडून यातायाती का भोगविता.अशा यातायाती भोगून पुन्हा जीव मद्रूप आहेत असे म्हणतांना तुम्हास कांही संकोच वाटत नाही का?संन्याशाची ही बायको आहे. असे म्हणण्यासारखे अयुक्त नाही काय. जीवात्म्याला ही बलवान विषयाभिमुख इंद्रिये, असल्यामुळे सुखदुःखप्राप्ती होते. याच कारणामुळे जीवात्म्याला यातायाती भोगावे लागते.म्हणून इंद्रियांचे दमन करून तप करावे, असे श्रुती सांगते.सहा शास्त्रांचा परस्पर वाद लावला ही तुमचीच करणी आहे. असे सांगतात. द्वैतसंबंधावांचून हा द्वैताचा विलास तुम्ही करता. यांत कोण चांगले, कोण वाईट असे कसे म्हणता येईल. सृष्टि उत्पन्न करण्याकरिता तुम्ही स्वतःच ब्रह्मदेव झालात त्यावेळी तुम्ही जीवाच्या परिक्षेकरिता विषयाची रचना करून ठेवली. असे तुमचे कौतूक जगांत वर्णन करावे तर जीवाच्या पाठीस सुखदुःखे लागली आहेत. त्यांत तुम्ही जीवाचा काय अपराध पाहिला बरे? अशी सुखदुःखे जीवाला विनाकारण भोगविण्यापेक्षा शस्त्राने त्यांची मान तोडून टाकणे हे चांगले. गुणांचा आधार घेऊन जगताची रचना केली आणि विनाकारण जीवांच्या पाठीमागे दुःखे लाविली. ज्याप्रमाणे सर्पिण आपली पिले वियून तीच खाऊन टाकते. त्याप्रमाणे ही स्थिती झाली. वेदाला प्रमाण करण्याकरिता तुम्ही हे कृष्णमूर्तिचे सोंग घेऊन ब्रह्मादि अनंत देवांना वंद्य असणारे जे तुम्ही ते येथे गोकुळांत गोधने राखिता. अंबऋषी करिता तुम्ही गर्भवास सोशिलेत आणि पापी अजामेळाचा उद्धार केला. वैरी किंवा भक्त याला तुम्ही एकच मुक्तिदान करता या करिता तुम्ही समर्थ नाही. असे कोणी म्हणावे. अनंत ब्रह्मांडे एका क्षणांत घडवून मोडित असताही तुमचा अकर्तेपणा जसाचा तसाच असतो. परशुराम होऊन आपल्या आईस मारावे आणि त्या गणिका वेशेला मुक्ति द्यावी, ही कोणती विलक्षण प्रवृत्ति ? साक्षात् आपला पिता जो दशरथ त्याला रौरव नरकवास आणि वैरी जो रावण त्यास सायुज्यमुक्ति, कर्मभ्रष्ट पांडवांना पुज्य केले, आणि अज्ञानी पूतनादिकांना मोक्षप्राप्ती. शास्त्रपुराणाचा विरोध नाहीसा करू जावे तर जीव अधिकच गुरफटून जातो. हा तुमचा काय गोंधळ आहे? तो प्रथम उलगडा करून काढून टाका. आणि एक काय ते खरे सांगा. दर्पणांत ज्याप्रमाणे बिंबाच्या सत्तेने दुसरे खोटे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी हा मिथ्या प्रपंच दिसतो. एक सत्य असता तेथे दुसरे कां दिसावे याचाच उलगडा होत नाही. बरे ते खोटे म्हणावे तर तेथे मन सत्य समजून विश्वास धरते. सगुण निर्गुण ही सर्व तुमची माया असून ती सर्व तुमच्याच मध्ये दिसते. अर्धनारी नटेश्वराचे सोंग आणणारा पाहिला तर तो आपले खरे स्वरूप लपवून खोटा आभास दाखवितो. प्रत्यक्ष दिसणारे अनंत परिच्छिन्न पदार्थ पाहून तुमचे मर्यादा करणे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे जीव स्वतः ब्रह्मरूप सिद्ध असता पुन्हा ब्रह्मप्राप्ती करिता साधन करणे फुकट श्रम आहे. तुमचे हे अनंत तत्त्वाचे रूप पाहता मोजमाप करणे व्यर्थ आहे. अशा स्वतःसिद्ध परमात्म्याची अंतःकरणांत प्रतिष्ठा करणे हा तर धडधडीत वेडेपणा आहे. कारण परमात्मस्वरूपामध्ये जीव प्रतिबिंबित झाला आहे. त्याप्रमाणे तुझ्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण हा विलास आहे. सहज सिद्ध जे तुझे रूप ते तूं पहा ते सहजसिद्धरूप तूं झालास म्हणजे मग अंतर्बाह्य असा भेद राहणार नाही. विश्वरूपाने परमात्मस्वरूपच अलंकृत झाले आहे. विश्व असा पदार्थच नाही. जसे अलंकार सर्व मुसीत आटतात. व नंतर एक सुवर्ण शिल्लक राहते. किंवा घटमठा नाश झाला असता जसे परिपूर्ण एक आकाशच राहते. वास्तविक विचार केला तर घट, मठ असतानासुद्धा आकाश परिपूर्ण नित्य आहेच. आकाशाला घटमठाचा संबंध कधीच लागत नाही. जसा उदकांमध्ये पडलेला स्फटिक उदकापासून नाश पावत नाही, किंवा विकार पावत नाही. त्याप्रमाणे जगताच्या आदि, मध्य, अंती नित्य असणारा परमात्मा तोच आपल्या हृदयांत आहे असे पूर्णबोधाने जाणले असता तेथे परमार्थतः द्वैत राहात नाही.सच्चिदानंदरूप वास्तविक त्याच्याठिकाणी खोटेच बंधन असल्यामुळे बंध किंवा मुक्तता नाहीत. तुम्ही असे म्हणाल की माझा संकल्पच जगतरूपाने फलद्रूप झाला तर मी दुःख भोगावे अशी मी इच्छा केली नाही. हा सर्व जगत् विस्तार तुझा खेळ असून बहुरुपाने वाढला आहे. असे तुम्ही म्हणता आणि आम्हाला तर दुःख होते अशी तुमच्या स्वरूपाची वास्तविक स्थिति तुमच्या पुढे सांगितली याउपर तुम्ही वाटेल ते करा असल्या जगत् व्यवहारात मला दुःख व्हावे असा तुम्ही माझा काय अपराध पाहिलात ? तुझा कांहीं अपराध नाही असे म्हणाल तर तुम्ही माझा देहसंबंध का निवृत्त करीत नाही. आतां हे माझे जगणेच फार जड झाले आहे. या देहापासून फार लाजिरवाणी स्थिति झाली आहे. वासनेसह वर्तमान ही इंद्रिये तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुझ्या ठिकाणीच ऐक्य पावतील कारण हे सर्व जीव तुझेच स्वरूप आहेत. त्यांना आपण भिन्न आहोत अशी भ्रांतिमात्र आहे. अशी वास्तविक स्थिति तुमच्यापुढे सांगितली. आतां जसे वाटेल तसे करा. तेच ते किती सांगत बसावे. दग्ध झालेल्या बीजांत जसा वृक्ष ऐक्यभावाला प्राप्त होतो.त्याप्रमाणे हे श्रीगुरूनिवृत्तिराया तुमच्यास्वरूपामध्ये माझी स्थिति आहे.असा ऐक्य भाव ज्याच्या अनुभवास आला असेल त्यांना नित्य दिवाळी आहे. अशा भक्तांची सहज समाधी केव्हाही भग्न होणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३३३
देवा तुज नेणतांना कांहीं न सांभाळितां नाना याति धरुनि धांविन्नलों ।
धांवतां धांवतां पुढेण सुनाट देखिलें त्याचि पाउलीं मागुतां मुरुडलोंजी सुंदरा ॥१॥
आलों भक्तिशाळें अतौता तेथें काहींएक गौरव गमलें ।
जेणें वेषें आहे तेणें तुजजोगें नव्हे मग ऐसें कांहीं एक गुंथावें केलेंजी सुंदरा ॥२॥
असो येणें औटहातें काई होईल म्हणौनि एकचि वेळा उगविलें ।
आब्रह्म सकळैक जग आपणापें तुज एकालागीं आणियेलें हो सुंदरा ॥३॥
आतां अवघा तुज डोळां पाहेन दातारा तुज आलिंगीन अवघांचि बाहीं ।
अवघा मुखीं तुजसी बोलत आहे न ध्याईजे मा चालिली अवघाचि पायींजी सुंदरा ॥४॥
आतां अवघा वेळु अवघेपणें तुज अवघीयातें गिळूनि ठेलों ।
तुझिये भक्तीची चवी जों लागली तंव अवघेपणा उबगलोंजी सुंदरा ॥५॥
पाहतां दर्पण परता नेलिया दुजेपण रिघे पाहाते भागीं ।
ऐसे आदि मध्य अवसान जाणोनि अवचितां जडिनलों तुमच्या अंगीं हो सुंदरा ॥६॥
आतां तुज पावेन कवणे दशे नातळसी दुजेपण केलाहो तूंपण नाहीं ।
तेथें मीपण कैचें होतेंनि मिळणें ते गेलें ठाईच्या ठाईजीं सुंदरा ॥७॥
ऐसा न जेविलाचि जेविला कीं जेविलाचि भुकेला तृप्तातृप्त दोन्ही नाहीं ।
बापरखुमादेविवरविठ्ठला वरपडा जालों ऐसियासी कीजे काईजी सुंदरा ॥८॥

अर्थ:-

अहो देवादिदेवा तुमच्या स्वरूपाचा काही विचार न करता तसेच आपल्या रक्षणाची काळजी न घेता मी अनेक जातीमध्ये धावपळ केली.अशी धावपळ करून पुढे जातो तो पुढे ओसाड आहे असे मला दिसले. तसेच त्यांतून कांही सुख मिळेल असे वाटेनासे झाले मग त्याच पावली माघारी फिरलो. आणि माघारी फिरून तुझ्या भक्तिसाठी शाळेत आलो.तेथे काही बरे वाटले.आतां ज्या मनुष्यवेषांत आम्ही आहोत त्या नुसत्या मनुष्य शरीरप्राप्तीनेच तुझी प्राप्ती होईल असे नाही. मग अशी कांही एक कल्पना मनांत आली की या साडेतीन हाताच्या मनुष्य शरीरांत काही उपयोग होईल म्हणून एकदम मनांत विचार उत्पन्न झाला. ब्रह्मदेवापासून सर्वजण हे तुझ्या स्वरूपामध्ये असता एका भक्तिप्रेमाच्या सौख्याकरिता हे जग तुम्ही स्पष्ट दशेला आणलेत. याकरिता आतां मी डोळ्यांने तुलाच पाहीन. मी आपल्या सर्व बाहुने तुलाच आलिंगन देईन. मुखाने बोलण्याचा सर्व व्यवहार तुझ्याशीच करीन. मनाने दुसऱ्याचे ध्यान करणार नाही. तुझ्या दर्शनाकरिता पायाचे चालणे करीन. असा सर्ववेळ सर्व रितीने सर्वरूप जो तूं त्या तुझ्या करिताच खर्च करीन. तुझ्या भक्तिची चव(गोडी) जी मला लागली आहे. त्यामुळे या अनंततत्त्वाचा ही कंटाळा आला आहे. आपले मुखदर्पणांत पाहिल्यानंतर दर्पण काढून टाकला तर आरशातील प्रतिबिंबाचे जसे पहाणाऱ्याशी ऐक्य होते. त्याप्रमाणे आदि, मध्य, शेवटी असलेल्या तुझ्या स्वरूपाला मी अवचित जडुन गेलो. असे ऐक्य झाल्यानंतर तुझ्याशिवाय दुसरेपणाला ठिकाण नसल्यामुळे दुसरेपणाने तूं दिसत नाहीस. जेथे तूपणा नाहीसा होतो. तेथे मीपणा कोठे राहणार? आणि मग ऐक्य झाले असे म्हणणे कोठे संभवते. कारण ऐक्य मुळचेच होते. यारितीने परमात्मस्वरूपाला जरी जीव प्राप्त झाला नाही. असे जीवाने आपले ठिकाणी जरी मानले तरी तो परमात्मस्वरूपाला नित्य प्राप्त आहेच. असा नित्यप्राप्त असला तरी जोपर्यंत जीवाला तसे ज्ञान झाले नाही. तोपर्यंत तो परमात्मस्वरूपाविषयी तृप्त नसून भुकेला असणारच वास्तविक परमात्मस्वरुपाच्या प्राप्तीने किंवा अप्राप्तीने अतृप्त असे तृप्तातृप्त हे दोन्ही भाव परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत. माझे मात्र माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याच्याशी ऐक्य होऊन गेले. आता याला काय करावे? असे माऊली सांगतात.


३३४
आदि पुरुषा जय विश्वंभरिता
नानापरि तुझा खेळू ।
जया ब्रह्मगोळु कल्पकोडी घडी
मोडिता नलगे वेळु ।
वेदपुराणें मत्सरें भांडती बहुतें
करित होती कोल्हाळु ।
होय नव्हे ऐसी भ्रांतिसी गुंतली
तयासि तूं आकळु गा ॥१॥
तुझें नाम बरवें तुझें नाम बरवें ।
हरि वोळगों आपुल्या साच भावें ॥ध्रु०॥
गायत्री पासाव वोळलें क्षीर करणी
पासाव विस्तारु ।
दूध दही ताक नवनीत
आगळे चहूंचा वेगळा परिभरु ।
जो ज्याविषयें पढिये तोचि
मानिती थोरु ।
सांठवण करिंता एकवट नव्हे
तैसा नव्हे भक्तिआचारु ॥३॥
कवणा एका राया बहुत पैं सेवक
त्यासि दिधला वेगळा व्यापार ।
आपलाले म्हणिये सुचित राहटतां
मान करील अपार ।
समर्थाचा मोहो जाणुनि वेगळा
करुं नये तयासि मत्सर ।
साभिलाषपणें वर्ततां देखेल शिक
लाविल हा निर्धार ॥४॥
कव्हणा एका राया बहुत पै लेंकुरें
आळविती नाना परी ।
ऐकें पाठीचीं एकें पोटीचीं एकें
वडिलें एकें धारि सेखीं
सारिखाचि मोहो करी ।
द्वैतभेदु जया नव्हे संवादु सेखीं
तयासि तो निर्धारु गा ॥५॥
सागरींचे तरंग आनेआन उमटती
तेतुले अवतार होती ।
शिव केशव उंच नीच आगळे
कासियानें मानावी भक्ति ।
परमात्मया सौरसें तेचि हे
मानली विश्वमूर्ति ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला परियेसी
ज्ञानदेवो करिताहे विनंति गा ॥६॥

अर्थ:-

विश्वाचे पोषण करणाऱ्या हे आदिपुरुषा नारायणा तुझा या जगांत अनंत प्रकारचा खेळ आहे. या कल्पावधीपर्यंत राहाणाऱ्या ब्रह्मगोलासारखे कोट्यवधी ब्रह्मगोल(ब्रह्मांडे) उत्पन्न करण्यांस व त्याचा नाश करण्यास तुला मुळीच वेळ लागत नाही. तुमच्या स्वरुपांचा विचार करण्यांकरता सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे यांनी एकमेकामध्ये भाडूंन कोल्हाळ करुन टाकला. त्यांत कांही जण परमात्मा आहे. म्हणतात तर काही जण परमात्मा नाही म्हणतात असे ते भ्रमात गुंतून पडले आहते. त्यांना तूं कसा आकलन होशील एवढ्याकरितां भोळ्या भाविकांनी या शास्त्रमतांच्या भानगडीत न पडता तुझ्या नामाचा उच्चार करावा. हेच चांगले. त्यांच्या त्या खऱ्या भोळ्याभावाने त्यांना हरि प्राप्त होईल.गायीपासून प्रथम दूध प्राप्त होते. व त्याच्यापुढे पुष्कळ विस्तारही होतो. प्रथम दूध, नंतर त्याचे दही, नंतर त्या दह्यापासून ताक, व ताकापासून लोणी. असा एकापेक्षा एक गुणामध्ये श्रेष्टपणा येत जातो. भोक्त्याला ज्याविषयी आवड असेल तो त्याविषयी त्याचा थोरपणा मानतो त्या दूधाच्या चार प्रकाराची एके ठिकाणी साठवण केली तर त्याचे पुन्हा दूध होत नाही. पण तसा प्रकार मात्र तुमच्या भक्तिचा नाही. कोणत्याही भावनेने जरी तुमची भक्ति केली तरी त्या भक्ति करणाऱ्याला तुमच्या स्वरुपाची प्राप्ती होते. राजाचे पुष्कळ सेवक असतात. व तो राजा आपल्या सेवकांना निरनिराळी कामगिरी देतो. ज्याला जी कामगिरी दिली असेल ती त्याने मनपूर्वक जर केली तर राजा त्याचा मोठा सन्मान करतो. याचाच अर्थ त्या सेवकांच्या कामगिरीमुळे राजा फार संतुष्ट होतो. सेवकाने आपापले काम मनपूर्वक करावे अशी राजाची उत्कट इच्छा असल्यामुळे सेवकाने आपआपली कामगिरी करण्यांत मुळीच आळस करु नये. जर मनांत अभिलाषा धरुन नेमून दिलेली कामगिरी करण्यांत सेवक चुकला तर त्याला राजा शासन करतो. दुसरा दृष्टांत असा आहे की एखांद्या राजाला पुष्कळ मुले आहेत ती मुले राजाच्या म्हणजे पित्याच्या मनोगताप्रमाणे वागून आपल्या पित्याला संतुष्ट करतात. त्या मुलामध्ये कांही ज्ञानी, कांही अज्ञानी, काही वडील, कांही धाकटी अशी जरी असली तरी राजा त्या सर्वावर सारखेच प्रेम करतो. कारण ती सर्व मुले आपलीच असल्यामुळे त्यांच्यांत भेदभाव करीत नाही. कारण त्यांच्या विषयी ऐक्यभावाचाच निर्धार असतो. समुद्रांवर जशा अनंत लाटा उमटतात त्याप्रमाणे तुमचे अनंत अवतार आहेत. त्या अवतारामध्ये शंकर लहान, विष्णु मोठा असा उंचनीचपणा न मानता भक्ति करावी. कारण ते सर्व अवतार तुमचेच आहेत. अशा त-हेचे तुमचे व्यापकत्व लक्षात घेऊन तुमची भक्ति करणे हीच खरी थोर भक्ति आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे वर्णन केल्याप्रमाणे माझ्या हातून भक्ति घडावी अशी माझी त्याला विनंती आहे. असे माऊली सांगतात.


३३५
आल्हादपण काय सांगशी देवा ।
मन बैसें भावा तैसें करी ॥१॥
हा घोडा हा राऊत करुनि दाखवा ।
मग पदीं बैसवा ब्रह्माचिये ॥२॥
मी डोलेन आनंदे तुमचेनि प्रसादें ।
रत्न जेंवि अंधें देखियेले ॥३॥
करा तत्त्वीं सौरसु म्हणे निवृत्तिदासु ।
जेथें रात्री दिवसु अथिचिना ॥४॥

अर्थ:-

नसत्या ब्रह्मानंदाच्या गोष्टी देवाला काय सांगतोस अनन्यभावाने मन ठिकाणी वसेल असे कर. नुसत्या शौर्याच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा हा वा आणि त्याच्यावर बसणारा हा घोडा व बसणारा स्वार असे करुन दाखव. म्हणजे मी मायेला जिंकले आहे असे नुसते तोंडाने बोलू नको तर ही माया मिथ्या आहे आणि तिचे अधिष्ठान सत्य आहे असे समजून घे. आणि मग मनाला ब्रह्मपदी बसव. अशी स्थिती झालेली मी तुमच्या प्रसादाने पाहिली. म्हणजे आनंदाने डोलेन. ही स्थिती मला लाभली म्हणजे आंधळ्याने रत्न पाहिलेवअसे होईल. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान व अज्ञान दोन्ही धर्म नाहीत अशा ज्ञानस्वरुप परमात्म्याच्या ठिकाणी माझे प्रेम वसेल असे कर. असे माऊली सांगतात.


३३६
तुझे पवाडे सांगतां तुजपुढें ।
मुक्तीची कवाडे उघडती ॥१॥
नाहीं जातिकुळ म्यां तुज पुसिलें ।
पन मावळलें देखिनिया ॥२॥
तुझें तुज पुसतां लाजिरवाणें ।
तरि हांसति पिसुणें प्रपंचाचीं ॥३॥
उगवितां भलें कीं नुगवितां सांपडलें ।
ज्ञानदेवो बोले निवृत्तीसी ॥४॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा, तुझ्यापुढे तुझी कीर्ति गाऊ लागलो म्हणजे मुक्तिची द्वारे मोकळी होतात. तुला पाहिल्याबरोबर तुझ्या ठिकाणच्या यातीकुळाचा विचार न करता तुझ्याठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले. तुझ्या स्वरूपाचा विचार, तुला विचारू लागले असतां हा आतां देवाच्या नादी लागला असे म्हणून बहिर्मुख प्रापंचिक लोक माझ्याकडे बघून हसतात.अशी ह्या तुझ्या स्वरूप ज्ञानाकरिता खूप खटपट करावी लागते. पण मला मात्र ते ज्ञान श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने सहजासहजी लाभले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३३७
फळाचें बीज कीं फळ ।
म्हणौनि पत्र पुष्प मूळ चोजवेना ॥१॥
ऐसि हे रचना नकळे गा देवा ।
सिध्दांतु अनुभव साक्ष देतो ॥२॥
मृत्तिकेची पृथ्वी कीं पृथ्वीची मृत्तिका ।
या गति अनेका चोजवेना ॥३॥
बापरखुमादेविवरु निरंतरी ।
बाह्यअभ्यंतरी नांदतुसे ॥४॥

अर्थ:-

या अभंगांत मांडुक्य उपनिषदातील वृक्षबीजन्यायाने जगताचे अनादित्व सिद्ध केलेले आहे. व त्याच अभिप्रायाने या अभंगाची रचना केलेली आहे. जग आहे असे म्हणणाऱ्याला ते अनादि आहे. असे उत्तर दिलेले आहे. वास्तविक जग नाहीच हाच खरा सिद्धांत आहे. फळा पासून बीज कां बीजापासून फळ हा निर्णय केव्हाही लागणे शक्य नाही. कारण बीज असल्याशिवाय झाड होणार नाही. व झाड असल्याशिवाय फळ येणार नाही. म्हणून झाड अगोदर कां फळ अगोदर याचा निर्णय देता येणार नाही. मग मधले पत्र पुष्प मूळ यांचा निर्णय कसा करता येणार त्याप्रमाणे जगाची रचना कशी झाली आहे. हे काही समजत नाही. कोणत्याही बाजूने दिसते त्यारुपांत जगत उत्पन्न होणे शक्य नाही. असा सिद्धांत अनुभवाला येतो. माती पासून पृथ्वी झाली कां पृथ्वीपासून माती झाली यांचा निर्णय जसा कांहीही लागत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या स्वरुपाचा निर्णय लागत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे मी सतत ध्यान केल्यामुळे ते माझ्यांत अंतर बाह्य नांदत आहे. असे अनुभवाला आले. असे माऊली सांगतात.


३३८
सर्वगत निर्धारितां आत्मा एक
चराचरीं तेथें तंव नाहीं दुजेयाची परी ।
चारी खाणी चारी वाणी चौर्‍यांयशीं
लक्ष योनी मी अपत्य तुमचें अवधारी ॥
तुझिया भेटीलागी रोडेलों दातारा हे
तनु होतसे संकीर्ण भारी ।
जवळीच असतां भेटि कां नेदिसी
थोर सिणविलो वोरबारी रया ॥१॥
तुजविण मी कष्टलों दातारा
कष्टोनि खेदक्षीण जालों ।
संसारश्रम त्रिविधतमें मार्ग
सिध्दचि चुकलों ॥
उपजोनियां बुध्दी येऊं पाहे तुझे
शुध्दी तंव द्वैतसंगें भांबवलों रय ॥ध्रु०॥
मागील कष्ट सांगतां दुर्घट नको
नको ते आठवण ।
सुखदु:खें प्राण पिडला गा बापा
गुणत्रयें ओझें जडपण ।
भव विभव निरय आपदा ऐसें
ऐकिलें आनेआन ।
तूं हे जीव तरी भोगितां हे कवण
हें आकळीतां वाटे विंदान रया ॥२॥
वेळोवेळ भावाभाव बोलतां अवचिता
चोरटा काम उठी ।
तुज देखतां अनादि वाटपाडे वधापरि
धैर्य धांवणे न करिसी गोष्ठी ॥
तुझियें दृष्टी शरीर काळ फाडफाडूं खातो
कवण काकुलती तया ना तुज नुठी
ऐसें विपरीत नवल वाटे ये सृष्टी रया ॥३॥
ऐसें न कळतां भरंवसा मी हिंडे दिशा
हें तंव मन जालेंसें पिसें ।
असोयी जातां अपायी पडिजे श्वास
उश्वास पाळती सरिसे ॥
वय वित्ताचा अंत घेउनि नाडळेपण
परत्र पंथ नकळे भरवसें ।
कर्म वाटे आड गर्वे रिगतां तंव
विघ्नचि उदैलें अपैसें रया ॥४॥
ऐसी माया मोहाची भुलवाणी घालुनि
कीं बापा लाविलें अविचार कामा ।
उपाधि वळसा नथिला धिंवसा
जड केला शुध्द आत्मा ॥
मी तूं कवणाचें विंदान न कळेचि
ऐसी नित निगुति सीमा ।
तर्कबीज कैसें सांपडले वर्म मा
हाचि भावो कल्पिला आम्हा रया ॥५॥
ऐसा वाउगाचि सोसु पुरला गा
बापा परि तूं न पडसी ठाउका ।
साही दर्शनां अठारा पुराणां वेवादु
नाहीं खुंटला ॥
आपुलाला स्वमार्गु संपादिता केउतां
जासी गांवींचा गांवी ।
विश्वास नाहीं चित्ता ये देहीं
ऐसियासी कीजे कायि रया ॥६॥
ऐसा जन्मोनि का उबगलासी मायबापा
कवण कां सांडिली ऐसी ।
रंका काळाचेनि धाकें सत्कर्मे
अनेकें विश्रांति नाहीं या जीवासी ॥
समर्थपणें वेगळें घातलें तरि दैन्य
दारिद्र्य कां भोगवितासी ।
आपुलें म्हणतां न लाजसी देवा
तरि सांगपां माव आहे ते कैसी रया ॥७॥
समुद्रीचें जळ घेऊनि मेघ वरुषती मेदिनी
तें कां मागुतें मिळे सागरीं ।
आकाशा पासाव उत्पत्ति वायु
हिंडे दशदिशीं ।
परि तें ठायींच्या ठायीं राहणें जालें ।
जळींहुनि तरंग अनेक उमटती
परि ते जळींचे जळीं निमाले ॥
स्वप्नसंगें परदेशा गेले तरी
जागृति ठायीं संचले रया ॥८॥
ऐसा तुज पासाव सगुण स्वरुप
जन्मलो गा देवा आतां
कैसोनि वेगळा निवडे ।
लवण पडिलें जळीं कीं कर्पूरासि
नुरे काजळीं तैसे भावार्थ प्रेम चोखडें ॥
ज्ञानदेव म्हणे रुक्मिणीरमणा देई
क्षेम वर्म न बोले फुडें ।
निवृत्तिप्रसादें खुंटला अनुवाद फिटलें
सकळही सांकडें रया ॥९॥

अर्थ:-

परमात्मस्वरुपाविषयी विचार केला तर सर्व चराचर विश्वामध्ये आत्मा एकच आहे. परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी दुसरेपणाचा प्रकार नाही उद्भिजादि चारी खाणी व ब्रह्मचर्यादि चारी आश्रम, चौऱ्यांसी लक्ष योनी, जीव हे तुमच्या पासून झाले असल्यामुळे मी तुमचे अपत्य आहे. त्या तुझ्या भेटी करता मी अगदी कृश होऊन शरीरनाशाची वेळ आली आहे. अरे माझ्या जवळच तूं असता मला भेट न देता प्रपंचाच्या दगदगीत का शिणवितोस. तुझ्या प्राप्तीवाचून मला फार कष्ट होतात. त्यामुळे मी अगदी क्षीण होऊन गेलो आहे. त्रिगुणात्मक संसाराच्या श्रमामुळे स्वतःसिद्ध आत्मस्वरुपाचा मार्ग चुकलो आहे. जन्माला येऊन तुझ्या स्वरुपसिद्धीच्या प्राप्तीकरिता बुद्धि प्रयत्न करित असता या द्वैताच्या संगतीने भांबावून गेलो. अनंत जन्मी मी दुर्घट कष्ट भोगले. त्याची आठवण सुद्धा करवत नाही. या सुखदुःखाने माझा प्राण अगदी पिडून गेला. गुणत्रयाचे फार ओझें झाले त्यांत भवस्वर्गादि अनेक संकटे आहेत. असे ऐकले परंतु हे जीव तूंच असता हे सर्व संसार कष्ट कोण भोगतो. याचा निश्चय होत नाही. सर्व वेळ सर्वभावाने तुजविषयी विचार करित असता वाटमाऱ्याप्रमाणे हा चोरटा काम अंतःकरणांत लगेच उत्पन्न होऊन अनादि तुझ्या वाटेला लागलेल्याला पाहून त्वाचे वधाकरता प्रवृत्त होणाऱ्या या कामचोरापासून जीवाला सोडवावे म्हणून धावून येण्याची गोष्ट सुद्धा तूं करित नाहीस. तुझ्या स्वरुपाविषयी विचार करणाऱ्या जीवांचे शरीर काळ फाडफांडून खात असता त्याच्या रक्षणाविषयी तुला दया कां उत्पन्न होत नाही? असा काही चमत्कार या सृष्टिमध्ये दिसून येतो. या मायेचा चमत्कार न कळाल्यामुळे जीवाला तुझ्याविषयी भरंवसा नाही. म्हणून हे मन वेडे होऊन गेले. आणि त्याला कोठेही सोय न लागता त्याने धापा टाकीत कोणत्यातरी संकटात पडावे. वयाचा किंवा वित्त प्राप्तीचा कळस झाला तरी. त्यांना मोक्षमार्गाची वाट कळत नाही. उलट भलताच अभिमान घेऊन कर्माच्या वाटेला जावे तर तेथे आपोआप अनेक विघे उत्पन्न होतात. अशा रितीने. मायेच्या मोहाची भूल घालून अविचारी जीवांना तूं कर्मामध्ये प्रवृत्त केलेस. या नासक्याउपाधीच्या भोवऱ्यात धैर्य जाऊन त्या शुद्ध आत्म्याला जड करुन टाकले. आणि मी व तूं हे कोणाच्या उद्देशाने आहे. याविषयी निश्चित प्रकार काय आहे हे समजत नाही. तुझ्या स्वरुपाविषयी तर्काच्या सहाय्याने l विचार केला असता तुझी प्राप्ती कशी होईल. आणि हे तुझ्या प्राप्तीचे वर्म आहे. आणि हाच भाव आम्हांला उत्पन्न झाला. अशा अनंत प्रकाराने तुझ्या प्राप्तीचा उपाय केला तरी तो फुकट आहे. कारण त्याने तुझी प्राप्ती होत नाही. सहा शास्त्रे, व अठरा पुराणें ही अजून परस्परांत विचार करितात. परंतु त्याची समाप्ती झाली नाही. तूं आपल्या बुद्धीने ठरविलेल्या मार्गाने गेलास तर परमात्मा संपादन करुन स्वकीय आत्मस्वरुपाच्या गांवी कसा जाशील? ज्याचे चित्तामध्ये विश्वास नाही. अशा पुरुषाला कोणी कोणता उपाय सांगावा मनुष्य देहांत जन्माला येऊन कां कष्टी झालास? मायबाप जो श्रीहरि त्याची करुणा भाकावयाची कां सोडलीस? परमात्म स्वरुपापुढे दीन असलेला असा जो काळ त्याच्या धाकाने अनेक सत्कर्माचे आचरण करण्यांस या जीवाला विश्रांती नाही. आपल्या स्वकीय आत्मपणाचे सामर्थ्य वेगळे करुन संसाराचे दैन्य दारिद्रय जीव कां भोगीत आहे. हे देवा, या जीवाला आपले म्हणून त्याच्याकडून असे दुःख भोगवण्यांत तुला काही संकोच वाटत नाही काय? तेव्हां असे करण्यांत तुझा काय भाव आहे सांग पाहू. समुद्राचे जळ शोषण करुन मेघ पृथ्वीवर वर्षाव करितात. परत तें समुद्रांत मिळते. आकाशा पासून उत्पन्न झालेला वायु दशदिशेला हिडून पुन्हा आकाशांत लीन होतो जळावर अनेक तरंग उत्पन्न होऊन पुन्हा ते त्या जळांतच लय पावतात. स्वप्नामध्ये परदेशाला गेले असता पाठीमागून त्याची जागृत्तितच स्थिति असते. याच न्यायाने हे देवा ! तुझ्यापासून सगुणरुपाने उत्पन्न झालेला जो मी तो आतां तुझ्या स्वरुपाहून वेगळा कसा निवडेन? मीठ पाण्यांत पडले असता. ते जसे निराळे राहात नाही. किंवा कापूर अग्नीत पडला असता तो जसा अग्नीरुप होऊन जातो. त्याची काजळीही शिल्लक राहात नाही. तसा माझा निर्मळ स्वच्छ प्रेमभाव आहे. म्हणून हे रुक्मिणीरमणा पाडुंरगा मला आता एकदम आलिंगन दे. बाकीच्या तुझ्या गोष्टी मला काही नकोत. श्रीगुरु निवृत्तिरायांच्या प्रसादाने हा परमात्म स्वरुपाविषयीचा केलेला अनुवाद संपवून माझे सर्व संकट निवारण झाले असे माऊली सांगतात.


३३९
तो आपुलिया चाडा कोटिगर्भवासां येतां
श्लोघिजे तुझिया गोमटेपणा पकडलो दातारा ।
हें बोलणें बोलतां लाजिजेजी सुंदरा ॥१॥
तुमतें देखिलिया हें मन
मागुतें मोहरेना ।
वज्र द्रवे परि मन न द्रवे
हाचि विस्मो पुढतु पुढती सुंदरा ॥२॥
ऐसें स्थावर जंगम व्यापिलें कीं आपुलें
वालभ केलें तूंत देखिल्या त्रिगुणुपरे ऐसें
कोणे निष्ठुरें घडविलेजी सुंदरा म्हणौनि तुज
माजी विरावें कीं देवा
तूंचि होऊनि राहावें ।
बापरखुमादेविवरा न बोलावे परि
बोले हें स्वभावेंजी सुंदरा ॥४॥

अर्थ:-

भक्ताकरिता तो परमात्मा अनेक गर्भवास सोसतो अशा त्या भक्तवत्सल भगवंताच्या प्रेमामध्ये मी गुंतून गेलो आहे. हे तुझे कवतुक तुझ्यापुढे बोलावयाचे म्हणजे लाज वाटते.काय तुझ्या स्वरूपाचा सुंदरपणा आहे म्हणून सांगावे.तुला पाहिल्याबरोबर मन मागे तोंड करीत नाही. एखादे वेळी इंद्राचे हातातील वज्रसुद्धा द्रवेल. परंतु या मनाला तुझ्या स्वरूपाविषयी जे प्रेम उत्पन्न झाले आहे ते केव्हाही नाश पावत नाही. वास्तविक स्थावर जंगम सर्व तुमच्या स्वरूपाने व्यापले आहे. असे असून तुम्ही काय सुंदर रूप प्रेमाने धारण केले आहे. तुला वास्तविक स्वरूपाने बघितले असता तूं त्रिगुणापलीकडे आहेस. असे असता कोणी निष्ठुराने हे तुझे सुंदर स्वरूप बनविले आहे कोणाला ठाऊक. याकरिता तुझ्या निर्गुण स्वरूपामध्ये आम्ही विरून जावे म्हणजे ऐक्य पावावे किंवा तुझ्या सगुण स्वरूपाप्रमाणे सगुण होऊनच राहावे. याचा उलगडा होत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती सुंदर श्रीविठ्ठला हे मी बोलु नये. परंतु सहज बोललो. त्याची क्षमा करा असे माऊली सांगतात.


३४०
चंद्रा पूर्णिमे पूर्ण शोभा ।
कळा तुटलिया कैची तेथें प्रभा ॥१॥
तैसा कां गा निकुर वृत्ती करिसी ।
सर्वाठायीं विभांडिसी गा देवा ॥२॥
कापुरें दुतीसी रुसणें केलें ती ।
तरि सांगपा कवणाचें काय गेलें ॥३॥
तरंगु निमालिया जळासागरु सागरसि
नाही दुसरा उपचारु ॥४॥
शिरा शरीरीं एक वंकीं जैसी ।
आतां तुझ्या पायीं आम्हा
पाइकी तैसी गा देवा ॥५॥
रखुमादेविवरा विठ्ठला राणे राया ।
मी न बोलें तरि बोलें
काजा तुझिया गा देवा ॥६॥

अर्थ:-

चंद्राला पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण शोभा असते. पण सर्व कळा तुटल्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी तिथे प्रकाश कोठला. त्याप्रमाणे सर्व अनात्मपदार्थाला तुमच्या सत्तेने शोभा असतां सर्व अनात्मपदार्थ नाशिवंत म्हणून त्यांचा त्याग करविण्या इतकी निष्ठूरवृत्ति का करता? सर्व अनात्मपदार्थ तुमच्याहून भिन्न केले तर त्यांचा नाशच होऊन जाईल. ज्याप्रमाणे कापूराने आपल्या सुगंधाचा त्याग केला तर त्याचा कापूरपणाच नष्ट होऊन जाईल. कारण सुंगंधाहून कापूरपणा भिन्न नाही. म्हणून त्याग करणे संभवनीयही नाही. त्याप्रमाणे तुम्ही त्या अनात्मपदार्थाचा त्याग केला तर सगळे अनात्म पदार्थ परमात्मस्वरूपच होतील. यांत कोणाचे काही बिघडणार आहे काय? तरंग आपला आश्रय जो समुद्र त्यांत जर लीन झाला तर समुद्राशिवाय दुसरी गोष्ट बोलताच येणार नाही. शिरा म्हणजे अवयव आणि शरीर ही जरी एकच आहेत त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सेवकत्व करणे म्हणजे ऐक्य पावणे होय. रखुमादेवीचे पती राजांचे राजे श्रीविठ्ठला मला बोलून कांही कर्तव्य नाही. तरीपण तुमच्या भक्तिसुखाचा महिमा वाढावा म्हणून बोललो असे माऊली सांगतात.


३४१
शहाणियाची दासी होईन कामारी ।
तो अनुसरु तेथें नव्हेरी ॥
चित्तासारिखा मिळो गोंवळु रानींचा ।
तो मज मेरु कनकाचांगे बाईये ॥१॥
लक्ष असो त्या मूर्खाचे गोठीं ।
परि तो नाणावा माझिये दृष्टी ॥
कर्पूराची राशी कुल्लाळ नासी ।
कवण साहित्याची तुटी गे माये ॥२॥
अविंधे मोतिये तेजें सुढाळें ।
सोहरुं जाणे ते शहाणे ॥
टाकियाच्या घायीं पाषाण विंधती ।
तैसें त्या मूर्खाचें जिणेंगे बाईये ॥३॥
चंदनाच्या दुतीं वेधल्या वनीच्या वनस्पती ।
परि तो वेळु न वेधें चित्तीं ॥
उदकामाजीं तैसी पाषाणाची वस्ती ।
तैसी त्या मूर्खाचि संगतीगे बाईये ॥३॥
भ्रमरु काळा भोगी पुष्ययाती सकळा ।
तेथें म्हैसा येवो नेदावा जवळा ॥
परिसु पाषाणाचा परि तो
गुणें आगळा ।
तैसा वैष्णव मिळो मज दुबळागे माये ॥४॥
ऐशा सकळ कळा भोगिसी ।
नंदरायाचा गोंवळु म्हणविसी ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला तुज न
विसंबे अहिर्निशी रया ॥५॥

अर्थ:-

मी संतांच्या घरची दासी होईन कारण ते वेळ नाही म्हणुन परमात्म विषयक ज्ञान देण्यास कुचराई करणार नाहीत. ते गुराखी कृष्ण मला मिळाला तर माझ्या साठी ते सोन्याचा पर्वत मिळाल्यासारखे आहे. अधमाचे धन मला नको कारुराची रास कुंभाराच्या काय उपयोगाची. तो ती जाळुच टाकेल. त्याचे कितीही साहित्य असले तरी तो कापुर जाळुच टाकेल. छिद्रांकित मोत्याला ओळखुन त्याचा उपयोग करणारे तज्ञ असतात. टाकीच्यी घावाने जसे दगड फुटतात तसे मुर्खाचे जगणे असते. चंदनाच्या संगतीने वन सगळे जरी सुगंधित झाले तरी पण वेळूला त्याचा सुगंध होत नाही. पाण्यात दगडाची वस्ती असते. पण तो थोडा सुद्धा मऊ होत नाही. तशी मुर्ख संगतीती स्थिती आहे. भ्रमर काळा असला तरी सगळ्या फुलांचा सुगंध घेण्यास अधिकारी आहे. त्याठिकाणी रेडा आणून त्याचा काय उपयोग? परिस हा दगड खरा पण इतर दगडापेक्षा लोखंडाला सोने करण्याचा त्याचा केवढा मोठा गुण आहे पहा त्याचप्रमाणे सगळीच मनुष्ये असतात. पण आपल्या संगतीतल्या लोकांना भगवतप्राप्ती करुन देण्याचा अधिकार वैष्णवांचे ठिकाणी असतो. असा वैष्णव गरीब का असेना त्याची संगती मला प्राप्त होऊन तेच मला भगवान श्रीकृष्णाला मिळवुन देतील. हे श्रीकृष्णा तू सर्व कलांचा उपयोग घेणारा असून स्वतःला नंदराजाचा गुरे राख्या म्हणून घेतोस रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल त्यांना मी केव्हाही विसरणार नाही असे माऊली सांगतात.


३४२
नामरुपीं प्रीति कीं ध्यानीं सगुण मूर्ति ।
हेचि तुझी यश कीर्ति जाणोनियां ॥
ह्रदयीं तुझें रुप मुखीं नाम घोष ।
नैवेद्य प्रसाद जठरीं आम्हा ॥
निर्माल्य मस्तकीं वंदूं तुमचे चरण
हाचि अच्युता तुमचा महिमा रया ॥१॥
अखंड नाम वाचे हेंचि तप साचें ।
तेंचि स्वरुप दिसें ह्रदयीं तुझें ॥२॥
तुझें नाम निर्धारितां हेंचि गा तप आतां ।
काया वाचा मनें न विसंबे तत्त्वतां ।
म्हणौनि आसनीं पंथी शयनीं जड
पडो भलतैंसे परि नाम न संडी अनंता ।
जीवाचिया जीवना सगुणगुणनिधाना
हेंचि प्रेम देई निज भक्ता रया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला
आनंद सुखाचिया वोवरा ।
पाहे तंव भरला दशदिशा दुसरा
न दिसे सोयरा ।
तेविं गुण नामकीर्ति तेचि आम्हा
मूर्ति ह्रदयीं न विसंबे दातारा ।
येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनि
सकळ आतां जोडलासी
माहेरा रया ॥४॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा तुझ्या नामरुपाच्या ठिकाणी प्रेम, ध्यानात तुझी सगुण मूर्ति, व स्मरणांत तुझे यश, गुण किर्ती असे करण्यातच मला तुझी निश्चित प्राप्ति होईल. असे जाणुन हदयांत तुझे रुप, मुखांत तुझे नाम पोटात तुझ्या नैवद्याचा प्रसाद मस्तकांवर तुझ्या चरणकमलावर वाहिलेल्या पुष्पांचे निर्माल्य आणि तुझ्या चरणाचे ठिकाणी वंदन करणे हे सगळे योग आम्हां भक्तांना प्राप्त व्हावेत. हे अच्चुता एवढा तुमचा महिमा आहे. माझ्या वाणीने अखंड नामस्मरण होणे हेच माझे तप, आणि त्या तपाच्या योगाने माझ्या हृदयांत तुझे स्वरुप दर्शन होईल. हे भगवंता भावभक्तिपूर्वक निश्चयाने तुमचे नाम घेणे हेच आमचे तप ते करण्याला आम्ही काया, वाचा, मनाने केव्हाही विसंबणार नाही. म्हणून आसनांवर, अंथरुणावर, रस्त्यांत अगर संकटांत कोठेही असो. पण हे श्री अनंता मी तुझे नाम कधीही सोडणार नाही. हे जीवाच्या जीवा, हे सगळ्या गुणांचा ठेवा असलेल्या सगुणा, हे श्रीकृष्णा आपल्या भक्तांना हे नामाविषयीचे प्रेम अखंड देत जा. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठला, आनंदाच्या वोवरीत पाहू जावे तो. सर्व दिशेला भक्तांचे कल्याण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. तुझे गुण, नाम, किर्ती हीच तुझी मूर्ति असून तिला आम्ही आमच्या हृदयातून केव्हाही विसबंणार नाही. अशा तऱ्हेची आमच्या निवृत्तीरायांनी तुझ्या प्राप्तीची खूण दाखविल्यामुळे हे बापाश्री विठ्ठला तू आम्हांस लाभला आहेस असे माऊली सांगतात.


३४३
भुक्ति मुक्ति कारणें न घाली तुज
सांकडीं हे तों ठायींचीचि जोडी ।
कांहीं जोडिली असे तूज नेणता हें
तुझेचि दळवाडें ऐसें जाणोनि
फुडें न बोले दातारा ॥१॥
सलिलीं रंग तरंगीं सलिल ।
निवडूनिया कोण वेगळें करील ॥२॥
उपाधिभेदें भूमि झाली भिंती ऐसें
विचारिता चित्तीं अनु न देखे ।
इतुलालें जीवपण तूज मज दातारा
वेगळेंचि नाहीरे गोवळ्या ॥३॥
दर्पणाचें दुजेपण दर्पण जंववरी तें
काय वेगळाल्या व्यापारी ठेवूं येईल ।
नाम घेऊनि ठेले हेम अळंकार ।
इतुलाले अंतर तुज मज रया ॥४॥
वाहाटुळीची धांव केव्हडा वेळु आकाशीं ।
सहज स्वभावें निमे अपैसी ।
गगनावरि जाता नलगे पाल्हाळ ।
तैसें तुज मज सकळ ऐक्य रया ॥५॥
गगना वेगळा घटु केवि निपजे दातार
यापरी सर्वेश्वरा तूं मी एक ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु भोगिया ।
येरी असतु वाउगिया गोठी रया ॥६॥

अर्थ:-

मला भुक्ति मुक्ति प्राप्त करुन द्या अशा तऱ्हेचे संकट मी तुम्हाला घालीत नाही. कारण मुक्ति हे माझे स्वरुप आहे. व भुक्ति म्हणजे भोग हा प्रारब्धाधीन आहे. म्हणून हे भगवंता तुला भुक्ति मुक्तिचे संकट घालून काय करावयाचे आहे.? अज्ञानामुळे अनेक जन्माच्या ठिकाणी माझ्या हातून जी काही बरी वाईट कर्मे झाले असतील त्यांचा भोग देण्याकरिता ‘तुझेंचि दळवाडे’ म्हणजे देहादि विचित्र जगताची रचना तूंच केली आहेस. म्हणून त्याबद्दल मी तुझ्यापुढे काही बोलत नाही. ज्याप्रमाणे उदकावर तरंग किंवा तरंगांत उदक हे एकरुपच असते. त्याचे उदक व तरंग कसे दोन शब्दमात्र वेगळे उच्चारले जातात. ते दोन सत्यत्वाने वेगळे कोण करून दाखविणार? आकाराच्या उपाधिमुळे मृत्तिकाच भिंत झाली. अशा दृष्टीने चित्तांत विचार केला असता परमात्मस्वरुपाव्यतिरिक्त दुसरे काही दिसतच नाही. अशा त-हेने परमात्मा एक व जीव एक असा भेद तुझ्या माझ्यामध्ये उपाधिकृत आहे. त्यांत वास्तविक वेगळेपणा मुळीच नाही दर्पणांत दिसणारा दुसरेपणा दर्पणाची उपाधि असेपर्यंत त्या दोन व्यक्ति वेगळाल्या आहेत. असे समजून त्यांना भिन्न, भिन्न व्यवहारामध्ये घालता येईल काय? भिन्न भिन्न नांवे घेऊन जसे अलंकार निराळे असतात, पण सोने एकच असते त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरुपांत ऐक्य असून जीव शीव नांवे मात्र निराळी आहेत रे बाबा. वाऱ्याची वाहुटळ किती वेळ आकाशांत वाहातं असली तरी आपोआप जशी आकाशरुप होते. तिला आकाशरुप होण्यास वेळ किंवा त्रास पडत नाही. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरुपात सहज ऐक्य आहे. व्यापक आकाशाचा आश्रय घेतल्याशिवाय जसा घट केव्हाही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे हे सर्वेश्वरा कृष्णा तूं आणि मी आत्मरुपाने एकच आहोत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तेच एक सर्व जगताचा भोक्ता आहे. जगताच्या भेदाच्या गोष्टी औपाधिक म्हणजे पोकळ आहेत. असे माऊली सांगतात.


३४४
भेटि जाली धुरेसी ।
पालटु जाला या जीवासी ।
लोहो लागलें परिसेसीं ।
तें सुवर्ण जालें । ऐसा गुणागुणाचा दाता ।
तो विश्व व्यापिलेरे अनंता ।
काय पाहतोसि आतां ।
विमानीं वाट पाहातुसें ॥१॥
तरि मी गुंतलों दातारा ।
येऊनियां संसारा ॥ध्रु०॥
नट घेऊनियां अंगवणीं ।
वरुं नेणे संपादणी ।
एकत्र जालें लवण पाणी ।
तें मिळोनी गेलें ।
ऐसा बहुतां गुणांचा दाता ।
तो विश्व व्यापिलें रे अनंता ।
काय बा पाहातोसि आतां
आपुल्या सारिखें करी बापा ॥२॥
चंद्र वेंचितासि खडे ।
परिस म्हणोनि ठेविसी ।
आतां असो हा गाडोरा ।
शरण रिघे रखुमादेविवरा ।
अरे अरे विठोजी दातारा ।
नवजे घरा आणिकांच्या ॥३॥

अर्थ:-

ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला असता त्याचे सोने होते त्याप्रमाणे परमात्मस्वरुपाची भेट झाली असता जीवाच्या स्वरुपांचा परमात्म स्वरुपांत पालट होतो. म्हणजे जीव परमात्मरुप होतो. गुणागुणाचा दाता जो परमात्मा तो तू सर्व व्यापून राहिला आहेस आणि मी तर या संसारात येऊन गुंतून पडलो आहे. मला यातून बाहेर काढण्यास उशीर का करतोस? विमानातून येऊन तू मला काढशील अशी मी तुझी सारखी वाट पाहात आहे. एखाद्याने नटाचा वेष घ्यावा. परंतु त्याला सोंगाची संपादणी करता येऊ नये अशी माझी स्थिती झाली आहे. तथापि तुं जीवावर अनंत उपकार करणारा आणि विश्वव्यापक असल्यामुळे, पाणी मीठ जसे एक होऊन जातात. त्याप्रमाणे तू मला एकरूप करण्यांत कशाची वाट पाहात आहेस. आपल्या सारखे मला लवकर करुन टाक.चकोराला चंद्र काय आवडत नाही. पण चंद्रोदय होई पावेतो तो काय करणार? केव्हां तरी चंद्रोदय होऊन त्याला आनंद होणारच. त्याप्रमाणे भक्तांना तुझी प्राप्ती होणारच पण भेटी देण्याला वेळ लावून त्या भक्तांना तुझ्या भेटीचे वेड विनाकारण लावित आहेस म्हणजे परीस म्हणून त्यांच्यापुढे खडे ठेवीत आहेस. तेंव्हा या सर्व भानगडी बाजूला राहू द्या. रखुमादेवीपती,तुला आम्ही शरण आलो आहोत. हे दातारा, आम्हां भक्तांवर दया कर आणि आमची चित्तवृत्ति दुसरीकडे जाऊ देऊ नकोस अशी तुला आमची प्रार्थना आहे. असे माऊली सांगतात


३४५
यम नियम पाप पुण्य आम्हासी ।
आपण भलतेंचि करिसी ।
तुझिया थोरपण बिहुनी असावें
कवणें शंकावें रायासी ।
प्रत्यक्ष जगी बाटली नारी
तिचें स्मरण लोकांसी ।
पुराणी डांगोरा पिटिताति
हें पतिव्रतापण तयेसी रया ॥१॥
आवडे तें करिसी देवा कवण
करी तुझा हेवारे ॥ध्रु०॥
बहुता परी उणें ऐकिजे पांडवा
सांगो या गोष्ठी ।
पांचांपासुनि जन्मले पांचैजण
येक पत्नीच्या पोटीं ।
गोत्रवधु करुनि राज्य करिती
विश्वास वंद्य शेवटीं ।
जन्मेजया ऐसें बोलिला सत्य तो
पापिया जाला कुष्टी ॥२॥
प्राण जाई तंव बोलिल तुज ।
पतन तया दशरथा ।
गणिका एक पाखिरु पोखिलें होतें
पाचारिलें प्राण जातां ।
कीं तयेसी ऊर्ध्वगति ऐसीं
बोलती पुराणें कासया न मिळे पाहतां ।
बोलणें खुंटलें तुजपासी देवा
वेव्हारु नाहीं सर्वथा ॥३॥
तपाचा जो राशी पुण्यपणें थोर ।
तीर्थरुप सर्वां तीर्थमंत्राचा अवतार ।
देव आणि शक्ती सूर्य तैसा विचारितां ।
तो मांडव्य ऋषि वाहिला सुळीं
येक ऊजाला वधिता ।
पुत्रा पाचारिलें पापिये दुर्जनें
तो वैकुंठी आजामेळु सरतारे रे ॥४॥
यज्ञमुखीं अवदानें देति त्या
करिसी वांकडें तोंड ।
लोणी चोरावया जासी घरोघरीं
उघडिसी त्यांची कवाडें ।
छप्पन कोटि यादव संगती हे तुझे
ते त्वां केले शापावरपडे ।
कोळियानें तुज विंधिलें पायीं ।
त्यासी सायुज्यता कोडें रया ॥५॥
अष्टांगयोगे शरीर दंडिले तुजलागीं
जालीं पिसी ।
पुत्रदारा धन सांडूनियां जन
हिंडताती वनवासी ।
गाती वाती पूजिती तूतें
त्यांसि निजपद सायासीं ।
विष पाजूं आली पूतना राक्षसी
सायुज्यता देणें तियेसी रया ॥६॥
वारया मोट बांधेल कोण
आकाशासी कुंप कायसा ।
सूर्यापुढें दिवा लाऊनिया
चालणें वाऊगाची शिण जैसा ।
विचित्र तुझें रुप अव्हेरुन जासी ।
सर्वेशा ज्ञानदेव म्हणे देवादिदेवा ।
जन भांबांविला ऐशा मावा रया ॥७॥

अर्थ:-

हे,भगवंता, आमच्यामागे यम, नियम, पापपुण्य इत्यादि लावून देऊन तूं मात्र तुझ्या मनाला येईल तसे वाटेल ते करित आहेस. हे सर्व आम्हाला कळत असूनही तुझ्या मोठेपणाला भिऊन आम्ही गप्प बसतो.राजा वाटेल तसा वागू लागला तर त्याच्या वागण्याबद्दल शंका कोण घेणार? हे भगवंता तुम्ही मनाला येईल तशा काय काय गोष्टी केल्या आहेत त्या पहा आहिल्या प्रत्यक्ष बाटली असतां पतिव्रता म्हणून ‘अहिल्या द्रौपदी तारा’ असे तिचे लोकांनी स्मरण करावे. म्हणून पुराणांत नगारा वाजतो. हे तिचे पतिव्रतापण. आपण देव आहा, वाटेल तसे करता म्हणून तुमचा हेवा कोणी करावा. पांडवाच्या उण्यागोष्टी आम्ही शेकडो ऐकतो. असे पाहा की इंद्रादि पांच देवतांपासून एका पत्नीच्या(कुंतिच्या पोटीे) पाच पांडव जन्माला आले.त्यानी आपल्या सर्व गोत्रजांचा वध करून राज्य करू लागले. तरी ते सगळ्या विश्वाला वंद्यच झाले. अशा खऱ्या गोष्टी जनमेजय नुसत्या तोडाने बोलला तो पापी होऊन त्याचे अंगावर कुष्ठ फुटले. असा उलटा न्याय तुमच्या घरचा आहे. तसेच तुझ्या (रामाच्या) वियोगाने दशरथ तुझ्या नावाने प्राण जाईपर्यंत बोंबलला तरी तूं त्याला दर्शन दिले नाहीस आणि एका वेश्येने राघु पाळला होता व मरते समयी त्याला नुसते राघोबा म्हणून हाक मारली की तेवढ्याकरिता तिला तुम्ही उत्तम गति दिली असे पुराणे सांगतात. विचाराच्या दृष्टीने पाहिले तर या तुमच्या करण्याला कांही मेळ नाही. काय तुमच्याशी बोलावे तुमच्यापाशी काही व्यवहार म्हणून पदार्थच नाही. दुसरे असे पाहा सूर्यासारखा तपोराशी जो मांडव्यऋषि तो आपल्या पुण्याच्या योगाने सर्व जगाला पवित्र करणारा तीर्थरूप झाला. साक्षात् तो मंत्राचा अवतार, त्या मांडव्य ऋषिच्या पवित्रपणा पुढे साक्षात सूर्यादि देवसुद्धा आपल्या पवित्रपणाबद्दल साशंक होतात. असा पवित्र मांडव्यऋषि शौचास बसला असता त्याने एक ऊ मारली होती तेवढ्या अपराधाबद्दल त्याला तुम्ही सुळावर दिले. अजामेळ जन्माचा पापी त्याचा एक पुत्र नारायण म्हणून होता त्या मुलाला त्या पापी दुर्जनाने नारायण म्हणून हाका मारली तो आपलेच नामस्मरण केले असे समजून तुम्ही त्यास वैकुंठास पाठविलें हा काय न्याय. दुसरा चमत्कार असा की मोठ्या कष्टाने यज्ञ करून वैदिक मंत्राने तुला अवदाने देतात. ती पवित्र अवदाने तोंड वाकडे करून बघत देखील नाहीस याचे उलट त्या गवळ्याच्या घरी लोण्याच्या चोऱ्या करण्याकरिता त्यांची दारे उघडून घरोघरी शिरतोस हे काय योग्य आहे? अरे छप्पन्न कोटि यादव तुझ्यावर प्रेम ठेवणारे तुझ्या संगतीला होते. त्या सर्वांना तूं ब्राह्मणशापाने मारून टाकलेस हे तुझ्यावर भक्ति ठेवण्याचे त्या यादवाना फळ आहे काय? आणि ज्या कोळ्याने तुझ्या पायाला बाण मारून तुझा वेध केला त्याला मोठ्या आनंदाने सायुज्यता मुक्ति दिलीस हा कोणता न्याय. अष्टांग योगाच्या परिश्रमाने तुझ्या प्राप्तिकरिता ही योगी मंडळी वेडी झाली. तसेच पोरे बाळे व ऐश्वर्य सोडून तुझ्या प्राप्तिकरता काही लोक वनामध्ये फिरतात. कोणी लोक तुझे ध्यान करतात. वर्णन करतात, तुझे पूजन करितात त्यांना तुझी प्राप्ति मात्र मोठ्या सायासाने होते. व स्वतः तुलाच विष पाजण्याकरिता आलेली पूतना राक्षसीण तिला सायुज्यता मुक्ति देतोस याला काय म्हणावे? या तुझ्या वागणुकीचा मेळ घालणे म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यापैकी किंवा आकाशाला कुंपण करण्यापैकी किंवा सूर्यापुढे दिवटी धरून चालण्या सारखे फुकट श्रम करणे आहेत. हे सर्वेशा, नारायणा एकंदरीत तुझे स्वरूप विचित्र आहे. शेवटी त्याचाही तूं अव्हेर करून जातोस.हे देवा या तुझ्या मायिक लीलेला जग भांबावून गेले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३४६
म्हणोनि तुझें रुप देखिलिया दिठी ।
जयसच्चिदानंदपदेंसी मिठी ।
ओंकारेंसी त्रिपुटी ।
न साहे तो तूं सगुण जगजेठी ॥
या दृष्टीचेनि सुखें माये ह्रदयीं भासलें रुप ।
शेखीं पाहतां कां आम्हा
चाळविसी रया ॥१॥
आतां सेवेलागीं सेवा करणें
कोणाच्या अंगें ।
स्वामीपणें जगीं होउनि ठेले ॥२॥
ते सांवळिये प्रमाण न दिसे अनुआन ।
शेखीं ध्यानीं विरालें ते मन गे माये ॥
रुप खुंतलें पण हाचि हा संपूर्ण ।
तेथें द्वैताद्वैतापण हारपलें रया ॥३॥
आतां बुध्दियोग इंद्रियांचा तो तूं
गोपवेषे साचा ।
भक्तियोगाचा सौरसु दाविसी आतां ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठलाच्या पायी सुख ।
तेंच दरुशन येक जालें रया ॥४॥

अर्थ:-

तुझा साक्षात्कार झाल्यामुळे तुझे वर्णन करणारी सत्, चित्, आनंद ही पदे मावळून गेली.तसेच आकार, उकार व मकार ही तीन पदेही ओंकारासहवर्तमान मावळून गेली असा जो निरुपाधिक स्वयंप्रकाश जगदीश तो तूं भाविक भक्ताकरिता शामसुंदर झाला आहेस. सगुणाची ही दृष्टी असल्यामुळे आनंदाने तुझे सगुणरूप हृदयामध्ये भासते. शेवटी पाहतां व विचार करताना आम्हाला तूं आपले निर्गुण रूप लपवून सगुणरूपाने फुकट चाळवितोस. आतां तुझ्या सगुणरूपाची सेवा करण्याकरिता तूं कोणच्या अंगाने म्हणजे पूज्य रूपाने जगांत आहे सांग बरे. त्या सांवळ्यां सगुण मूर्तिविषयी सत्यत्व ठरविण्याला अजून प्रमाण दिसत नाही. कारण निर्गुणाचा विचार करू लागले असता सगुणाचे ध्यान करणारे मनही नाहीसे होते. एवढ्यावरून शून्यवादमत येत नाही. सर्वांचे लयस्थान द्वैताद्वैताचा ग्रास करून सच्चिदानंद परमात्मा पूर्ण राहातो. असा अबाधित निश्चय झाल्यानंतर बुद्धिचा व इंद्रियांचा ज्याच्याशी संयोग होत आहे. तो तूं खरोखर गोपवेष घेतलेला असल्यामुळे भक्तीयोगाचे प्रेमसुख दाखवित आहेस रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याचे पायी म्हणजे स्वरूपाचे ठिकाणी असणारे जे अद्वितीयसुख तेच ज्ञान एकरूप होऊन गेले असे माऊली सांगतात.


३४७
आठवीं तंव तूंचि जवळिके
नाठविसि तरी निजमुखें ।
आठव न विसरु पाहे तंव
सगुणचि ह्रदयीं एक रया ॥१॥
तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा
आठऊ ध्यानाचा आठऊ असो मना ॥२॥
विसरु पडे संसाराचा आठव
होता तुझ्या रुपाचा ।
येथें नाम रुप ठसा ह्रदयीं राहो ॥
जिवाचिया जिवलगा माझिया श्रीरंगा ।
गोडि घेऊनिया द्वैत पाहे रया ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला
सगुणी सुमनीं गुंफिले ।
प्रीति आवडे तों कोंदाटलें
सुमनीं हें विरालें ॥४॥
जाली नामरुपीं ऐक्यभेटीं ।
नामरुप सार जाणोनि जीवन
संसारा जाली तुटी रया ॥५॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा तू स्वरुपाने अंतर्यामी असला तरी ज्या कोणी एखाद्याने तुझे स्मरण केले तर तू त्याच्या जवळच उभा आहेस आणि दुस-या एखाद्याने तुझे स्मरण न केले तरी तू आपल्या स्वरुपाने असतोच, तुझ्या स्वरुपदृष्टीने पाहिले तर स्वरुपाच्या ठिकाणी आठव आणि विसर हे दोन्ही नाहीत. व तुझे चिंतन करु पाहिले तर तुझी सगुण मूर्ति मात्र हृदयामध्ये येते.म्हणून तुझ्या नामाचा, स्वरुपाचा आणि ध्यानाचा नित्य आठव मनामध्ये असावा.आणि संसाराचा मात्र विसर व्हावा, माझ्या जीवाच्या जीवा श्रीरंगा या जन्मामध्ये तुझ्या रुपाचा आठव राहून मनामध्ये तुझे रुप नित्यराहो आणि त्या तुझ्या सगुण रुपाची गोडी घेऊन दुःखरुपी द्वैत, डोळे पाहोत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठला तुझी सगुण मूर्ति जर मनामध्ये राहीली तर ते मनच मनपणा विसरुन जाऊन तुझे रुपच होईल भाविक लोक तुझ्या नामाचा उच्चार करतात. परंतु तुझे व तुझे नामाचे ऐक्य आहे हे त्यांना माहित नसते. परंतु ज्या भक्तांना नाम रुपाच्या एकत्वाचे ज्ञान होऊन तुझी भेट होते. त्या भक्तांना तुझे नाम व रुप हेच जीवनाचे सार आहे असे जाणले असता त्यांच्या संसाराची निवृत्ती होते असे माऊली सांगतात.


३४८
कितिये स्तुति स्तवने स्तविती
स्तोत्रें विधिगुणें ॥
विधि तूं तें कर्म करणें परि
नेणती मार्ग ॥
अकर्मी विकर्मी जगीं शब्द म्हणती ।
हा ब्रह्म कर्माचा भागु ।
शेखीं ब्रह्मकर्म तो योग चुकलें
पंथ शेखीं ब्रह्म तें तूंचि आतां ॥
सगुण ह्रदयीं धरुनि ।
अनु नातळे वाणी रया ॥१॥
तुझा गोपवेष सौरसु मज
सुखाचें सुख निजप्रेम देई रया ॥२॥
म्हणोनि यज्ञ यज्ञादिकें तपें व्रतें अटणें ।
बहुविधि अनेकें पंचाग्नि गोरांजनें ।
सुखें करिती विधि द्वादश
अग्नि जळवास ।
ऐसा धरुनि हव्यास परि
ते चुकले कार्यसिध्दि ॥
तुझें भजन सगुण मज
प्रिय गा दातारा ।
अनु न लगती मजलागीं
आधि रया ॥३॥
बापरखुमादेवीवरा उदारा सोईरा ।
सगुणागुणाचिया निर्धारागुंतल्या येसी ।
मना पुरली हांव विश्वीं अळंकारला
देव कीं दिठी न विकारें अनुध्यासीं ॥
येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळ
सुखीं सुखावोनि ठेलें निजध्यासें रया ॥४॥

अर्थ:-

निर्गुण परमात्म्याचे ज्ञान नसता कित्येक लोंक विधीयुक्त स्तुति, स्तोत्रे स्तवनादिकांने स्तुति करतात. कित्येक विधियुक्त कर्म करितात. परंतु त्यांना तुझ्या प्राप्तीचा यथार्थ मार्ग समजत नाही. हा कर्म करणारा आहे, हा कर्म करणारा नाही, कर्म करणे हा एक ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे. असे जगातील लोक म्हणतात, पण तेही ब्रह्मप्राप्तीचा मार्ग चुकलेले असतात. शेवटी विचार केला तर सर्व जगदाकार ब्रह्म ते तू आहेस, असा निश्चय होण्याकरिता सगुण परमात्मा हृदयामध्ये धारण करुन वाणीने नामोच्चाराशिवाय कोणत्याही शब्दाचा उच्चार न केला तर सर्व सुखाचे अधिष्ठान असलेला जो परमानंद त्याने तुला आत्मत्वाने प्रेम देईल हा मुख्य सिद्धांत आहे. तो चुकल्यामुळे यज्ञादिक व्रते, तपे करून अनेक प्रकारे शरीराची आटणी करुन घेणे त्याचप्रमाणे अनेक लोक विधिमार्गने पंचाग्नी, गोरांजने आनंदाने करतात. त्याच प्रमाणे बारा वर्षे अग्निवास किवा जलवास करण्याचा हव्यास धरुन श्रम करतात खरे, परंतु मुख्य कार्यसिद्धी प्राप्त करून घेण्यात ते चुकतात. हे दातारा मला तुइया सगुण रूपाचे भजन करण्यात अतिशय आनंद वाटतो. दुसरे मला काहीही आवडत नाही. माझा बाप, व रखुमाईचे पती जे उदार, सखा, जो सगुण श्रीविठ्ठल त्याच्या अनंत गुणांच्या विचारात मन गुंतल्यामुळे त्याची हाव परिपूर्ण झाली. आणि सर्व विश्व देव अलंकारला आहे म्हणजे बनला आहे. या निजध्यासांनी दृष्टीत बदल होत नाही. ही खुण मला निवृत्तिरायांनी दाखवून त्या सुखरूप परमात्म्याचे ध्यानामध्ये मला सुखी करुन ठेवले आहे.असे माऊली सांगतात.


३४९
आपुलिये खुणें आपणपे दावी ।
कीं सगुणबुंथी चोख मदवी ।
ऐसा सुंदर गोपवेष ।
कीं तत्त्वमस्यादि सौरसु जेथें
श्रुति नेति नेति ठेल्या पायीं ।
तो तूं सगुण निर्गुणी निजानंदें
सहजचि कळे विदेहीं रया ॥१॥
एक म्हणतां दुजे नाहीरे तेथें
शून्य तूं सांगसी काई ।
निरशून्य तें आतां सगुण ते
निराळलें तेथें हे कल्पना काई रया ॥२॥
नामरुपछंद गोडी ऐसी इंद्रियांची आवडी ।
परतोनि पाहे घडिघडी तोचि तूं ॥
तेथें आठऊ ना विसरु ।
परी तोचि गा तूं थोरु
ऐसा निर्धाराचा धीरु धरी ॥
ऐसें जाणोनिया जरी सांडी मांडी करिसी ।
तरी पावसी कोण येरझारी रया ॥३॥
तोचि तूं जगदात्मा विसावा घडि
क्षण न विसंबावा ।
हाचि होऊनि रहावा प्राण माझा ॥
म्हणोनि धीरु धीरु
बापरखुमादेविवरा विठ्ठला आतां ।
प्रपंचीं न गुंते साचे आम्हा
जितांचि मरणें कां मेलिया
कल्पकोडी जिणें धरि
या निवृत्तिची आंत रया ॥४॥

अर्थ:-

हे भगवंता, तूं आपल्या स्वरूपबोधाचे वर्म जे तुझे निर्गुण स्वरूप ते तूं दाखवितोस व लागलीच सगुण स्वरूपाचे मादवी म्हणजे उत्तम वस्त्र पांघरून तूं गोपवेषाने दिसतोस तुझ्या पायी तत्त्वमस्यादि श्रुति न इति, न इति म्हणजे जगत्कार्यही परमात्मा नव्हे व त्या जगताचे कारण जी माया तीही परमात्मा नव्हे असे म्हणून तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी लय पावल्या, तोच तूं सगुण निर्गुणरूप सहजानंद एकच विदेही आहेस असे कळून येते. ज्या तुझ्याठिकाणी दुसरेपणाचा संबंध नाही. तिथे एक म्हणणे तरी काय शोभणार? कांहीच म्हणणे शोभत नसेल तर शून्यवाद म्हणजे निरात्मवाद तरी कसा सांगता येईल? निरशून्य म्हणजे निर्गुण चिदाकाशस्वरूप परमात्मा तोच तूं सगुण झाला आहेस तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण ह्या कल्पना व्यर्थ आहेत. इंद्रियांना तुझ्या सगुण नामरूपाच्या आवडीमुळे छंद लागला आहे. पुन्हा वारंवार परतून पाहिले तर जो निर्गुण तोच तूं सगुण तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आठव किंवा विसरही तूंच अशा थोर निर्धाराचा धीर करून जाणले असतां संसारांत वाटेल तितकी सांडी मांडी उलाढाली केली तरी जन्ममरणाच्या येरझारीत कोण सापडणार ?जीवांना समाधानाचे ठिकाण तूं एक जगदात्मा आहेस.म्हणून तुला एक क्षणभरही विसंबणार नाही व तुझ्या चिंतनांत अंतर पडू देणार नाही.कारण तूं आमचा प्राण आत्माच आहेस असे समजून हळू हळू चिंतनाने, माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याच्याशी ऐक्य निश्चय केला तर आता प्रपंचात तूं खात्रीने गुंतणार नाहीस उलट तुला असे वाटेल की आम्हाला लोकदृष्ट्या जीवंतपणा हेच पारमार्थिक दृष्ट्या मरण आहे. किंवा लोकदृष्ट्या मेलो तरी कोट्यवधी कल्पपर्यंत आमचे जगणेच आहे. याचा अर्थ आपण अमर आहोत असा तुझा निश्चय होईल व असाच निश्चय श्रीगुरू निवृत्तीरायांचे मनांत निश्चित आहे. असे माऊली सांगतात.


३५०
अगुणाचिया पा समंधा गुणसंबंध करु ।
नकळे हा वेव्हारु लोकांमाजी ।
हा नाटकु विंदाणी न कळे
याची करणी ।
दाटोनि अंत:करणीं रिघों पाहे ॥१॥
सरसर परता गुणाचिया गुणा ।
निजसुखानिधानां तूंचि एकु ॥२॥
तुझ्या गुणागुणीं वेधलीं मुनिवृंदें ।
मानसाचिया छंदें वर्तसी तूंचि ॥
आपुलें निज सोंग भुलविलें जयासी ।
अखंड मानसीं जवळी आहे ॥३॥
ऐसा हा नवलावो विस्मो हा वाटला ।
भाव हा गळाला काय सांगों ।
रखुमादेविवरु विठ्ठलु ह्रदयीं वसे ।
बाह्यअभ्यंतरी केव्हां वेगळा
नव्हे रया ॥४॥

अर्थ:-

परमात्मा मूळचा निर्गुण असून गुणांच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी लीला दिसतात. पण हे त्याचे करणे सामान्य लोकाच्या नजरेला दिसत नाही. हा परमात्मा मोठा नाटकी आहे. हा आपले मूळचे स्वरुप कळू न देता लोकांना कौतुक करून दाखवित आहे. आपल्या भक्तांना आपला छंद लावण्याचे हे त्याचे नाटक आहे. हा शुद्ध अंतःकरणाच्या भक्तांच्या हृदयांत घुसायला पाहातो. त्यासर्व गुणांचे गुणनिधान अशा श्रीकृष्णाला ज्ञानवान भक्त विनोदाने पलीकडे सर पलीकडे सर असे म्हणतात. पण व्यापक असल्यामुळे पलीकडे सर असे जरी भक्ताने म्हटले तरी तो पलीकडे सरकणार कसा? कारण स्वकीय निर्गुण आत्मसुखाचे निधान तूंच एक आहेस हे सर्व तुझे सगुणरुप मायावी आहे. हे आम्हास पक्के ठाऊक आहे.तुझ्या अंगातील गुणा मुळे मुनिजन वेधुन गेले आहेत. त्यांच्या मनातील छंदाप्रमाणे त्यांना तूं भुलवून नित्य मनांत त्यांच्या अगदी जवळ आहेस. अशा विलक्षण सगुण स्वरुपाचा त्यांना चमत्कार वाटला काय आश्चर्य सांगावे त्यांचा अहंभाव गळून गेला.रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे त्या भक्तांच्या हृदयांत वास करुन त्यांच्या कडून वेगळे कधीही होत नाही.असे माऊली सांगतात.


३५१
तुझिया गुणासाठीं लागलों भजनापाठीं ।
तुझी सगुणगोठी ह्रदयीं वसे ॥
मी म्हणें तें जीवन कीं
निर्गुण चैतन्यघन ।
व्याप्य व्यापक स्थान दुजें नाहीं ॥
विश्वाकारें जगडंबरला जो श्रुति
नेति नेति म्हणोनि ठेला ।
हेंची भावें विचारी भलें ॥
परि दृष्टी सगुण ह्रदयींचि हेचि
खुण परी न विसंबे तुझीया पाया रया ॥१॥
तूं एकुची एकला बाहिजु भीतरी ।
कोणा द्वैतपरी सांगो बापा ॥२॥
म्हणोनि परापर स्थूळसूक्ष्मादि विचार ।
तो तुझा सगुणची आधार मज वाटे ॥
म्हणोनी ते तुझी बुंथी हेचि
उरो आम्हां स्थिती ।
कीं द्वैताद्वैत भ्रांती न लगे मना ॥३॥
ते तुझेनि सुखें पडिपाडे आणि हें
मनची स्वयें उजाळें ।
तेथें थोडें बहु न निवडे ऐसें जालें ॥
तेथें आपुलेंची अंग विसर पडो ठेलें ।
शेखी सोंगची दुणावले रया ॥४॥
या मनाची भ्रांती फेडावया तो तुझा
सगुणभाव मज गोड लागे ।
पाहाते पाहाणियामाजि स्वयेंची
विस्तारलासी कीं देखणेंची होऊनी अंगें ।
त्रिपुटीसहित शून्याशून्य निमाले
ॐकार मार्गही न चले ।
रखुमादेविवरु विठ्ठले उदारे ।
सुख भोगिजे येणें अंगे रया ॥५॥

अर्थ:-

तुझ्या सगुणगुणाला भुलून तुझ्या प्राप्तीकरता भजनाच्या पाठीसी लागलो. त्यामुळे तुझ्या सगुण स्वरुपाच्या कथा सारख्या अंतःकरणांत राहतात. मी म्हणतो, निर्गुण चैतन्य हेच सगुण बनून सर्व जीवांचे जीवन आहे. त्या निर्गुण चैतन्याला व्याप्यव्यापकभाव उत्पन्न होण्याला दुसरे स्थानच नाही. ज्या श्रुति नेति नेति म्हणून थकल्या तोच विश्वाच्या आकाराने विस्तारला आहे. त्याचा मुख्यभक्तिने विचार करणे चांगले असले तरी अंतःकरणांत जी सगुण मूर्ति आहे. त्या सगुण मूर्तिच्या पायाचे चिंतन करण्यांत कधीही विसर पडू देणार नाही. एक अद्वितीय स्वरुप आंत बाहेर तूंच एक आहेस द्वैताचा प्रकार कोणाला सांगावा म्हणून तो त्या निर्गुण स्वरुपाविषयी पर अपर स्थूल सूक्ष्म इत्यादि विचार असला तरी मला मात्र सगुण स्वरुपाविषयीच आदर वाटतो. म्हणून ते तुझें सगुणरूप आमच्या समाधान स्थितीला शिल्लक उरो म्हणजे झाले. याशिवाय द्वैताद्वैत विचारांची भ्रांति माझ्या मनाला नको. त्या तुझ्या सगुण स्वरुपासारखे मोठे सुख मला दुसरे आवडत नाही. त्या निर्गुणस्वरुपाच्या ठिकाणी हे स्वतः मनच उदासीन होते. ज्याठिकाणी थोडे फार असे काही निवडता येईनासे होते. असा विचार केला म्हणजे हे तुझे सगुण सोंगच मनाला फार आवडले. या मनाची भ्रांती फेडण्याकरिता तुझ्या सगुण स्वरुपाच्या ठिकाणी भाव ठेवणे मला बरे वाटते. ह्या दृश्यदृष्ट्यादि भावामध्ये स्वतः तूं आपल्या स्वरुपाने विस्तार पावून सर्व जग आपल्या अंगाने तूंच झाला आहेस. ज्ञाता ज्ञान ज्ञेयादि त्रिपुटीसहवर्तमान शून्याशून्य ओंकार इत्यादि मार्ग त्यास्वरुपाच्या ठिकाणी करू शकत नाही.रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे उदारसुख याच विचाराच्या अंगाने भोगीत राहणे बरे असे माऊली सांगतात.


३५२
डोळ्याची निशी कोणें काढिली ।
की रविबिंबा हारीं कोणे आणिली ॥
कीं काळिमा पाठी प्रकाशु तरि
चंद्र हा नव्हे चकोरा पारणें ।
फिटलें विकासित कुमोदिनी चंद्र
हा न दिसे सेखीं नवलावो हे
तुझी बोली रया ॥१॥
तूं चंद्रमा आर्त चकोरें आम्हीं ।
तृप्त झालों तुझ्या नामीं रया ॥२॥
जाणाचिया राया सुजाणा ।
कीं जीवाचिया जिवना ।
जिवलगा सोईरिया निधाना गा ऐसा ॥
तो तूं प्रकृतिपरु न कळे तुझा विचारु ।
साचारी वेवादती दाहीदिशा ॥
ऐसोंचि लाघव कोणा दाविसी दातारा ।
बोलु ठेविसी कोणा कैसा रया ॥३॥
आवडी माजी लागे हे गोडी ।
नाम रसनेसी सुखनिज कीर्ति हे गाढी ॥
तुझा स्वरुपतंतु लागो या मना ।
अंतरीच्या जीवना अगा तूंचि ॥४॥
लक्षालक्ष संभार नातुडे हा विचार
म्हणोनि श्रुति नेति नेति तो तूं
येकलाचि नट ना देखलासि दातारा न
कळे तुझी हेचि स्थिती ।
म्हणौनि सांडिमांडी करुं नको मना
सगुण जोडे ते करी प्रीति रया ॥५॥
यालागीं मनेंसि बोध चाळावा कीं
जोडलेपणें पाहावा ।
कीं कोणाहि या मावा इंद्रियांचिया ॥
सकळ इंद्रियेंसी नगर कोंदलें दशदिशीं विस्तार ।
म्हणौनि तुझे रुप अनावर कोणें धरिजे
दातार बापरखुमादेविवरा विठ्ठला धिरा उघडा ।
डोळा देखिजे निधान तंव मार्ग सोपा रया ॥६॥

अर्थ:-

माझ्या अंतःकरणातील अज्ञान काढून ज्ञानाच्या योग्यतेला मला कोणी आणिले. तसेच सूर्याप्रमाणे तेजस्वी ज्ञानाच्या पंक्तिस कोणी बसविले. असा विचार करू लागलो तर हे मनमोहना श्रीकृष्णा हे सर्व तूंच केलेस अंधाऱ्यारात्रीत चकोराचे पारणे फेडण्याकरता व कमळांना विकसीत करण्याकरिता जसा चंद्र उगवतो त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा तूं अज्ञानाच्या रात्रीमध्ये आम्हाला सुख देण्याकरिता जणू चंद्रच उदयाला आला आहेस. तुझ्या स्वरूपाविषयी हे बोलणे मोठे चमत्कारिक आहे. आम्ही चकोरासमान आर्तभक्त आहोत व आम्हाला तृप्त करणारा तूं चंद्र आहेस. म्हणून तुझ्या नामाच्या ठिकाणीच आमचे फार प्रेम आहे. सर्व जाणणाऱ्या मध्ये अत्यंत सुजाण सर्व जीवांचे जीवन आपल्या भक्तांना प्रेम देणारा असा जो प्रकृतिच्या पलीकडे असणारा आनंदाचा ठेवा असा जो तूं त्या तुझ्या स्वरूपाचा विचार चार वेद, सहा शास्त्रे, सर्व प्रकारे सतत विवाद करितात.पण त्यांच्यात एकविचार होत नाही. असे तुझे विचित्र लाघव असलेल्या हे दातारा श्रीविठ्ठला आम्ही कोणावर कसा बोल ठेवावा? पण एक आहे की आम्हा तुझ्या ठिकाणी प्रेम ठेवण्यामध्ये तसेच तुझ्या नामाचा उच्चार करण्यामध्ये व तुझी अगाध कीर्ति वर्णन करण्यामध्ये गोडी वाटते. म्हणून हा तुझा स्वरूप प्रेमतंतू माझ्या मनाला लागावा कारण सर्वाच्या अंतरी वास करणारा असा तूंच आहेस. लक्षअलक्ष असा जो शास्त्रीय गंभीर विचार त्या विचाराला तूं आकलन होत नाहीस.म्हणूनच तुझ्या ठिकाणीं श्रुति ‘नेति नेति’ म्हणून थांबल्या. असा निर्गुण स्वरूप असलेला जो तूं तोच तूं सगुणरूपाने नटलेला आहेस. असे मी पाहिले अशी ही तुझी स्थिति कशी काय आहे. हे काही समजत नाही. म्हणून हा खटाटोप करणे चांगले नाही. फक्त सगुण स्वरूपाची प्राप्ती कशी होईल असे प्रेम माझ्या अंतःकरणांत दे. याकरिता मी निर्गुण स्वरूपाचा चाळा टाकून देऊन हा प्रत्यक्ष सगुण रूपाने जो तूं प्राप्त झाला आहेस तोच पहावा असे वाटते. या निर्गुणस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही इंद्रियांनी भानगडीत कशाला पडावे ? शरीररूपी नगराच्या दाही इंद्रियांत कोदून भरलेले इतकेच काय दशदिशेला व्यापून राहिलेले असे जे तुझे स्वरूप त्याच्या प्राप्तीच्या भानगडीत आमच्या सारख्यांनी कशाला पडावें. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना धैर्य धरून उघड्या डोळ्यांनी पाहावे हा मार्ग सोपा आहे. असे माऊली सांगतात.


३५३
काळां पैं गोवळु काळासि आलोट ।
नामामृतें पाठ भक्ता देहीं ॥
नित्य सुखा आह्मां तपांचिया कोडीं ।
न लागती परवडी व्रतें तीर्थे ॥१॥
सुलभ सोपारा सर्वाघटीं अससी ।
साधुसंगें दिससी आम्हा रया ॥२॥
चैतन्याशेजारीं मन पैं मुरालें ।
सावळें सानुलें ह्रदयघटीं ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलराज ।
निवृत्तीनें बीज सांगितलें ॥३॥

अर्थ:-

जो भगवान श्रीकृष्ण तो स्वरुपाने काळा असून जगाचे भक्षण करणारा जो काळ त्या काळाचाही काळ आहे. अशा श्रीकृष्णाच्या नामामृताचा पाठ भक्तांच्या हृदयांमध्ये असल्यामुळे ते नेहमी सुखी आहेत. त्या सुखाकरिता कोट्यवधी तपे अगर व्रते अथवा तीर्थे भक्तांना करावे लागत नाही. सर्व जीवमात्रामध्ये सहज रितीने भरलेला तूं साधुसंगतीने आम्हाला स्पष्ट दिसतोस.तुझ्या चैतन्यरुप बिछान्याच्या ठिकाणी आम्हा भक्ताचे मन मुराले. त्यामुळे अंतःकरणरुपी घटांत तुझे सांवळे व सकुमार लहानरुप स्पष्ट दिसत आहे. अशा त-हेचा परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हाच सर्व जगाचे बीज आहे. असे श्रीगुरु निवृत्तिरायांनी आम्हास सांगितले असे माऊली सांगतात.


३५४
मंगळमूर्ति तूं किं मनाचिया लावण्यवाणा ।
वेधी वेधक तूं सहजगुणा ।
सगुण निर्गुण न कळे तुझें विंदान ।
कैसें आपचि पर दाटुन रिगसि ॥
तेथें नवलाव वर्णु काय कोण रया ॥१॥
वर्णितां तुझे गुण मना मौन्य पडे ।
कळिकाळ बापुडें काय करिल आह्मां ॥२॥
ध्यानमूर्ति तुझी मनें अळंकारली मनामाजी
संचरली ।
संचरता इंद्रियें समानपदीं तुजविण
न दिसे आन बोली ।
तेथें भिन्नाभिन्नपणीं कोणा पाहों दातारा
दिठी सुखाचेनि सुखें स्थिरावली रया ॥३॥
बापरखुमादेविवराविठ्ठले वोतप्रोत सधन
नावेक नुरे कांहींएक केलें ।
तुझें तुज गर्‍हाणें किती देऊं
दातारा बोलवितां नव्हे भले रया ॥४॥

अर्थ:-

हे श्रीहरि कृष्णा तुझी मूर्ति मंगलरूप आहे. तुझ्या मुखावरील लावण्यरूप बाणाने माझ्या मनाचा वेध केला आहे. म्हणजे मला तुझा वेध लागला आहे. सहज स्वरूपस्थितिने त्यारूपाचा बोधकही तूंच आहेस. तुझ्या स्वरूपाचा निर्धार करू गेले तर तूं सगुण आहेस की निर्गुण आहेस याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून तूं असा आहेस किंवा तसा आहेस असा काहीच निश्चय करता येत नाही. तुम्ही स्वतः सृष्टिनिर्माण करून त्यामध्ये प्रवेश करता या तुमच्या कृतिचे कोणी वर्णन करावे. तुझे गुण वर्णन करू गेले असता मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तटस्थ होते. त्याठिकाणी बिचारा गरीब काळ आम्हाला काय करणार आहे? अशी तुझी मूर्ति मनांत ध्यान केले असता त्या मनांत तुझा आपोआप प्रवेश होतो. तसा प्रवेश झाला म्हणजे मन तर भगवंतरूप होतेच पण इंद्रियांची स्थिति तशीच होते. मग त्या इंद्रियांना व मनाला तुझ्यावांचून दुसरे काही दिसत नाही. म्हणून बोलताही येत नाही. अशा ऐक्यस्थितित मनाचा उपरम झाला असता त्याठिकाणी भिन्नभावाने कोणास पाहात बसू? कारण तुझ्या स्वरूपसुखामध्ये मनाची दृष्टि स्थिर झालेली असते. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल हे आनंदरूपाने मनांत येऊन राहिल्यामुळे ओतप्रोत घनानंद मूर्तिशिवाय यत्किंचित सुद्धा करण्याला काही शिल्लक राहात नाही, हे तुझ्या स्वरूपाचे वर्णन हे च श्रीहरि तुझ्यापुढे किती करू? तेंव्हा तुझ्या स्वरूपाविषयी काही एक न बोलता मौन धरून राहावे हेच चांगले असे माऊली सांगतात.


३५५
तुझी सेवा करीन मी मनोभावें वो ।
माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥१॥
नवसिये नवसिये माझे नवसीयेवो ॥
पंढरिचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥
बापरखुमादेवीवरे विठ्ठले वो ।
चित्तीं चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥

अर्थ:-

हे पंढरीराया तुझी सेवा मी मनोभावाने करीन त्याचे कारण माझे मन तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी रंगून गेले आहे. भक्तांचे नवस पूर्ण करणाऱ्या हे देवा, पंढरीनाथा तूं धांवत येऊन मला भेट दे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी माझे चित्तातील चैतन्य चोरून नेल्यामुळे आत्मस्वरूपाशी ऐक्य केले असे माऊली सांगतात.


३५६
तुझी गुण कीर्ति ऐकोनि आर्ते मन उचललें ।
आलिंगना धाविन्नले उताविळ ॥१॥
तनु मनु विगुंतले मन वाचा गुंतलें ।
मी माझें विसरले दर्शन गे माये ॥२॥
उतावेळपणें भुजदंड उचललें ।
नेणोनि ठकलें ठेले रुप पाहतांचि बाईये ॥३॥
पातिया पातें नलगे पाहणें तेंचि ठेलें ।
तैसें बापरखुमादेवीवर विठ्ठलें
केलेगे माये ॥४॥

अर्थ:-

हे श्रीकृष्णा संताच्या मुखाने तुझे गुण व कीर्ति ऐकल्यामुळे तुझ्या भेटीविषयी माझ्या मनांत एवढी उत्कंठा लागली आहे की धांवत येऊन तुला केव्हा आलिंगन देईन असे मला वाटते. अशा उत्कट इच्छेमुळे माझे मन व वाणी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी निमग्न होऊन माझ्या ठिकाणचा देहभाव नाहीसा झाला. मनाने तुला आलिंगन देण्याच्या उतावीळपणाने बाहु उचलले पण तुझ्या यथार्थ स्वरूपाचा विचार करता तुझे तसे स्वरूप नसल्यामुळे माझे ते उचललेले बाहु ठकले. डोळ्यांची टक लावून तुझ्या स्वरूपास पाहाणे हेही थांबले कारण तुझे स्वरूप डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी माझी अशी स्थिति केली असे माऊली सांगतात.


३५७
व्योमाचा पालऊ शिरेंविण पांगुरलें ।
मस्तकेंविण तुरंबिलें सुमन वो ॥१॥
सुखांचें सुख निजसुख नव्हें ।
नव्हें तें हो म्यां गिळिलेंगे माये ॥२॥
नेणेनि शाहाणे झाले चौघेजण ।
अठारांसी खूण बाणले माये ॥३॥
रखुमादेविवरु जीवनीं जीवनु ।
त्याहुनि माझें मनु परतें देवा ॥४॥

अर्थ:-

आपल्याला ब्रह्मानुभव आला तो प्रकार असा झाला की डोक्यावांचून आकाशाचा पदर पांघरला. घ्राणावांचून फुलांचा वास घेतला. ज्या सुखाच्या ठिकाणी सुख म्हणणेपणाही नाही. असे सुख मी गिळून टाकले. त्या परमात्म तत्त्वाला चारी वेदांनी विषय करून न जाणता वेद शहाणे झाले याची खुण अठरा पुराणांना उत्तम समजली आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे जीवन असलेला तो सोपाधिक असल्यामुळे त्याचे जे निरूपाधिक स्वरूप त्याठिकाणी माझे मन स्थिर झाले. असे माऊली सांगतात.


३५८
अवघां डोळां तुज म्यां पाहावें ।
अवघां श्रवणीं तुजचि ऐकावें ॥१॥
अवघी मूर्ति तुजपें ध्यावें ।
अवघां चरणीं तुझ्या पंथी चालावें ॥२॥
रखुमादेविवरु अदट दाविला ।
माझ्या देहीं वाढला ब्रह्माकारें ॥३॥

अर्थ:-

मला असे वाटते की डोळ्यांनी तुलाच पाहावे. कानांनी तुझेच गुणानुवाद ऐकावे. तूं सर्व व्यापक आहेस अशी कल्पना करुन तुझेच ध्यान करावे. पायांनी तुझ्या दर्शना करिता वाट चालावी. याप्रमाणे काया, वाचा, मने करुन रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचा ध्यास लागल्यामुळे ते सर्वत्र कोंदून भरले आहेत. असे ज्ञान मला श्रीगुरु निवृत्तिरायांनी करून दिले. व ते ज्ञान ब्रह्मरुपाने माझ्या शरीरामध्ये कायमपणाने प्रगट झाले.असे माऊली सांगतात.


३५९
मन हें लोंधलें प्रपंचा विसरलें ।
मीपण गेलें तुजमाजी ॥
तूं आम्हां गोसावी सुखादि क्षेम न ठेवी ।
आपली सुखपदवी देई भोगूं ॥
तेथूनि वेगळें होतां प्राण जाईल आतां ।
नामाचा न व्हावा वियोगु रया ॥१॥
तुझें नाम ध्यान कीर्तन आतां ।
न विसंबे सर्वथा तुझिया पायां ॥
पायापासूनि वृत्ति माथां चढे ।
ह्रदयीं धरिलासि सबाह्य रया ॥२॥
ऐसिया वृत्ति ध्यान ध्यावों
कां माझें मन ।
होय तुज समान मीपण नाहीं ॥
अनंत गोवळु अलगटु दावितासी
नेटपाटु काय वानूं तुझी सुरपदवी ।
ठाण त्रिभंगी देखोनी देवढें सुंदर
आठवू विसरु हा नाहीं रया ॥३॥
तोचि तूं आतां वेगळेपणें पाहतां ।
इंद्रियाची सत्ता वर्तविता ॥
कीं परतोनि पाहातां प्रपंच निमाला ।
तुजमाजी तेथें नातळे द्वैतभावो ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलु पाहतां ।
पाहणें निमोनियां उरे रया ॥४॥

अर्थ:-

हे कृष्णा तुझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी मन लुब्ध होऊन प्रपंचाचे भान नष्ट झाले. आणि माझे मीपण तुझ्यामध्ये एकरूप झाले. तू सर्वांचा आत्मा असून स्वामी आहेस तुझ्या सुखाची भेट देण्यास अंतर करू नकोस तुझ्या देवपणाच्या पदवीचे सौख्य मला भोगू दे. तुझ्या स्वरुपाहून जर मी वेगळा झालो तर माझा प्राणच जाईल याकरिता तुझ्या नामाचा वियोग मला होऊ नये. तुझ्या नांवाचे ध्यान व गुणाचे कीर्तन चुकू देणार नाही, व तुझ्या पायाचा विसर केव्हाही होऊ देणार नाही या तुझ्या पायापासूनच निवृत्तिरुप मोक्षाच्या माथ्यांवर मी चढेन. म्हणून सबाह्य तुला हृदयांत धरला आहे. अशा निवृत्तिच्या ध्यानामध्ये माझे मन निमग्न होऊन राहिले तर तुझ्यासारखाच परमात्मरूप मी होईन, अनंत गवळ्यांच्या मुलामध्ये तूंच भिन्न भिन्नरुपाने दिसतोस त्याचा थाट माट काय वर्णन करावा, अशी तुझी शक्ति विलक्षण आहे. ‘देहुडे’ म्हणजे तीन ठिकाणी वाकडे झालेले तुझे सुंदर रूप आहे. त्या तुझ्या सुंदर रुपाच्या ठिकाणी आठव किंवा विसर हे दोन्ही धर्मही नाहीत. सगुण किंवा निर्गुण रुपाने तूच एक असून सर्व इंद्रियांचा चालक आहेस. तुझ्या स्वरुपाचा विचार केला तर सर्वांचा लय तुझ्या ठिकाणी आहे. असा निश्चय होऊन द्वैतभाव उरत नाही. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल, त्याचे यथार्थ ज्ञान झाले असता, पाहाणाऱ्यांच्या ठिकाणचा पाहाणेपणा नाहीसा होऊन केवळ सत्तामात्र एक परमात्माच अवशेष असतो. असे माऊली म्हणतात.


३६०
कांहीं न करिजे ते तुझी सेवा ।
कांहीं नव्हेसि तें तूं देवा ॥१॥
नेणिजे तें तुझें रुप ।
जाणिजे तितुकें पाप गा देवा ॥२॥
स्तुति करणें ते तुझी निंदा ।
स्तुति जोगा नव्हेसि गोविंदा ॥३॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
येवढा साभिलाषु कां दाविला ॥४॥

अर्थ:-

कांही एक न करणे हीच तुझी सेवा कारण कर्तृत्वभाव पत्करणे हाच जीवपणा होय. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वैताचा अत्यंतीक भाव असल्यामुळे दुसरेपणाचा संबंधच जेथे नाही. तेथे सेव्यसेवकभावाने द्वैत पत्करून कर्तव्यबुद्धीने सेवा केली. तर ती तुम्हाला आवडेल कशी ? ज्याला जे आवडेल ते करणे हीच त्याची सेवा तुम्हाला द्वैतभाव नाही. तो द्वैैतभाव पत्करून केली जाणारी सेवा ती सेवाच नव्हे. अद्वैतभाव स्विकारून कर्तव्यशून्य होणे हीच तुमची खरी सेवा. कारण कोणत्याही अनात्मधर्माने युक्त न होता सच्चिदानंदरूपाने असणारा तोच तूं देव आहेस. ज्ञानाने जाणता येत नाही. तेच तुझे खरे स्वरूप आहे. असे असता द्वैत भाव पत्करून जेवढे जाणणे तेवढे सर्व पाप आहे. म्हणूनच शब्दाच्या सहाय्याने तुझी स्तुति करणे ही खरोखर निंदा आहे. कारण शब्दाला विषय होणारा असा तूं नाहीस. अशी वास्तविक स्थिति असता माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला ही येवढे सेव्यसेवकभावाचा अभिलाषा कां धरलीस हे काही समजत नाही असे माऊली सांगतात.


३६१
आकार स्थूळ नाशिवंत ।
हे तरी जाईल भूमि आंत ।
तयावरि हरि चालत ।
तेणें होईल कृतकृत्य ॥१॥
देहो जावो अथवा राहो पांडुरंगीं दृढ भावो ॥२॥
दुजा गुण आपीं मिळें ।
तरि मी होईन गंगाजळ ।
हरि अभिषेक अनुदिनीं ।
सुखें सर्वांगावरि खेळे ॥३॥
तिजा गुण तेजरुप ।
तरि मी होईन महादीप हरि
रंगणी दीपमाळा ।
दीप उजळीन समीप ॥४॥
वायु व्यापक चौथा गुण ।
तरि मी विंजणा होईन ।
हरि अष्टांगे विनवी मना ।
ऐशा दृढ धरिन खुणा ॥५॥
आकाश पांचवा गुण ।
तरि मी प्रसादीं राहेन ।
बापरखुमादेविवरा अखंड
तुझे अनुसंधान ॥६॥
निमीष नलगे मन वेधितां ।
येवढी तुझी स्वरुपता ॥१॥
विठोबा नेणों कैसी भेटी ॥
उरणें नाहीं जिवेसाठीं ॥२॥
उरणें उपाधि कारणें ।
तें तों नेमिलें दर्शनें ॥३॥
निवृत्तिदासा वेगळें ।
सांगावया नाहीं उरलें ॥४॥

अर्थ:-

आकाश पांचवा गुण । तरी मी प्रासादी राहेन । बापरखुमादेविवरा । अखंड तुझें अनुसंधान ॥६॥ उपासकाची देहत्यागानंतरही भगवत्व उपासनेविषयी किती निष्ठा असते तें या अभंगांत सांगतात. स्थूल शरीराचा आकार नाशिवंत असल्यामुळे तो केव्हा तरी भूमीत जाणार तो अशा भूमीत मी घालीन की त्यावरुन भगवान श्रीहरि चालतील. त्यामुळे मी कृतकृत्य होईन. हा माझा देह जावो किंवा राहो पांडुरंगाच्या ठिकाणी माझा अत्यंत दृढभाव आहे. शरीरांतील दुसरा गुण जो पाण्याचा भाग आहे. तो मी गंगेमध्ये नेऊन मिळवीन, म्हणजे श्रीहरिला अभिषेक चालला असता त्या गंगाजळाच्या निमित्ताने श्रीहरिच्या सर्वांगावर मी खेळेन. शरीरातील जो तेजोरुप भाग तो मी श्रीहरिच्या पुढे लावलेल्या निरांजनांमध्ये नेऊन मेळवीन. किंवा श्रीहरिच्या अंगणांत ज्या दीपमाळा लावल्या जातील. त्यामध्येही माझ्या शरीरातील तेजोभाग नेऊन मेळवीन. शरीरातील चवथा गुण जो वायु तो श्रीहरिच्या अंगावर पंख्याने घातला जाणारा जो वारा त्या वाऱ्यामध्ये नेऊन मेळवीन. व त्यामध्ये श्रीहरिच्या आठही अंगांना शीतलता देऊन श्रीहरिला संतोषीत करीन. असा हा माझा दृढ निश्चय आहे. त्याप्रमाणे माझ्या शरीरातील पाचवा जो आकाश गुण तो श्रीहरिच्या मंदिरांत आकाश होऊन राहिन.माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला यांचे अखंड अनुसंधान लागावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. असे माऊली सांगतात.


३६३
पाहेंपा ध्वजेचें चिरगुट ।
राया जतन करितां कष्ट ॥१॥
तैसा मी एक पतीत ।
परि तुझा मुद्रांकित ॥२॥
मसीपत्र तें केवढें ।
रावो चालवी आपुल्या पाडें ॥३॥
बापरखुमादेविवरदा ।
सांभाळावें आपुल्या ब्रिदा ॥४॥

अर्थ:-

हे भगवता भक्तांचे रक्षण करणे हे तुझे ब्रीद आहे. राजध्वज म्हणजे एक लहानसे फडकेच असते. पण त्याच्यावर राजाचे चिन्ह असल्यामुळे राजास त्या फडक्याचे परिश्रम करून रक्षण करण्याकरिता किती कष्ट करावे लागतात? त्या मागे माझा अधिकार पाहीला तर मी अगदी पवित्र आहे खरा पण तुझा दास असल्याचे चिन्ह मी आपल्यावर धारण केले आहे. राजाने एखाद्यास इनामपत्र दिले तर त्या कागदाची किंमत ती काय? पण आपल्या ऐश्वर्याने राजा ते इनामपत्र चालवतो. त्याप्रमाणे वर देणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आपल्या ब्रीदाला जागुन माझ्या सारख्या गरीब भक्तांचा सांभाळ करतात. असे माऊली सांगतात.


३६४
पावलोंजी म्हणे देखिलें जें देखणें ।
गेली आधीं तेणें दृष्टि माझी ॥१॥
उचललिया बाह्या क्षेम देईन तया ॥
गेली माझी माया देहत्यागें ॥२॥
आनंदे स्फुंदत येती अश्रुपात ।
अगा गुरुनाथा देवराया ॥३॥
निवृत्तिदास म्हणें तूंतें जिवें वोंवाळिलें ।
शिर निरोपिलें तुझ्या चरणीं ॥४॥

अर्थ:-

परमात्मस्वरूप पाहिले. आणि मी कृतकृत्य झालो.त्या योगाने पूर्वीचा संसार सत्य आहे. अशी दृष्टि नाहीसी झाली. आतां मी उचललेल्या बाहूने माझे शरीर अर्पण करीन. शरीर माझे नाही. असे ठरल्याबरोबर त्या शरीरावरील माया म्हणजे मोह आपोआप गेलाच. हे देवादिदेवा श्रीगुरूराया त्या आनंदाने डोळ्यांत अश्रुपात व कंठात स्कुंदन येते. हे श्रीगुरुनिवृत्तिराया, तुम्हालाजीवाभावाने ओवाळले. आणि मस्तक तुमच्या पायावर ठेविले. असे निवृतिदास माऊली ज्ञानदेव सांगतात.


३६५
तुझेनि बळें मांडली फळी ।
तुवां जवळी असिलें पाहिजे ॥१॥
ऐसिये जुंझी घालिसी मज ।
काकुलती तुज नाहीं आतां ॥२॥
रणभूमीं आला रणवट घातला ।
पाहो जों लागला न देखे कांहीं ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे उफराटें पाहाणें ।
खुंटलें येणेजाणें येचि भेटी ॥४॥

अर्थ:-

तुझ्या स्वरूपाच्या आश्रयावर ही संसाराची फळी म्हणजे द्वैताचा बाजार मांडला आहे. त्या गर्दीत तूं माझ्याजवळ असले पाहिजे. अशा संसाररुपी बाजाराच्या युद्धांत ढकलून देऊन माझ्याविषयी तुला दया येत नाही. धैर्य धरून ह्या संसाररूपी रणभूमीवर मी आलो. आणि संसार म्हणजे काय ते पाहू लागलो.तो संसार दिसेनासा झाला. बहिर्मुख वृत्तिला परत फिरवून परमात्मस्वरूप पाहू गेले असता पाहणेही थांबते व जन्ममरणही नाहीसे होते. याचेच नांव परमात्म्याची भेट होय असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३६६
सर्वजीव तूं जालासी आपण तरी
निरय आपदा भोगिताहे कवण ।
परमात्मया तुमचें अविनाश स्वरुप
तरी येवढें कां कष्ट साधन ।
तूं अंतरीं परब्रह्म सांवळें म्हणोनि
जगत्रय व्यापिलें या ध्यानें ।
म्हणोनी तुमचा पुत्र जालों स्वामिया
जगाअधीन कां केलें माझें जिणें रया ॥१॥
तूं बाप म्हणतां मी लाजिलों
माघारा ठेलों ।
एकीकडे काळ एकीकडे संसार
मध्येंची वाटे ठेलों ।
ऐसिया संनिधी तुज जवळा येवों
पाहें तंव तुझीया देवपणा भ्यालों ॥२॥
नांदबिंदापासाव शरीर जन्मलें असाध्य
करुनी वरी साक्ष देऊनी मदामांसामाजी वाढविलें ।
कर्मदेह वेचुनी सत्य सुकृतालागी उपजविलें ।
तरी हें दैन्य दारिद्र कां भोगविलें ।
तुझीया बापपणा बोलु लागला तरी
मज पुत्रसें वायां म्हणितलें रया ॥३॥
आयुष्याची गणना करुनिया प्रमाण वरी
मनुष्यदेह ऐसें नाम ठेविलें ।
तें आयुष्य कां स्वामी तुम्हीं दोंठायी वाटिलें ।
अर्ध रात्रीचे अर्ध दिवसाचे निरय सत्त्व वेचिलें ।
पैल समर्थाचे बाळक रंके गांजिलें ।
त्याचें थोरपण तें काय जालें रया ॥४॥
बांधोनी जन्म आम्हांकडे भोगविसी आपणया
मायबाप म्हणविसी ।
विश्व प्रसवला या जागासी तरी आधारु
आहे ऐसे अनुवादसी ।
जगत्रजीव तव शिव हे तो
नये माझिया मनासी ।
पैल कीटकिये भृंगिये तैसी जाले
तैसें कां न करिसी आह्मासीरे ॥५॥
अल्प दोषासाठीं आह्मांतें दंडिसी
येवढें कैचे मंत्रसाधन जे भक्ति
करुनि निरसूं तयासी ।
तुज देखतां काळ शरीर फाडफाडुं
भक्षिताहे कवण कां सांडिली ऐसी ।
जठर सीणसीण फुटतील देवा
वायां कष्टविसिल आम्हांसिरे ॥६॥
दर्पणीं पाहातां येकचि दिसे तेथें
अनुसारिखें कांहीं न दिसे ।
रविबिंब उगवलिया किरणीं प्रकाश
आस्तु जालियावरी कांहीं न दिसे
तैसे गुरुशिष्य संवाद सोहं बोध
ऐक्य जालें अभ्यासें ।
याहूनि जाणसी तें करि वेळोवेळां आतां
सांगो मी तें कैसें रया ॥७॥
यमें जाचितां कांहीं नुरे यालागीं
मुनि सेविती वनवास ।
खवणीक फणीक लुंचनीक वसैत
भटभराडे धाकें करिती आरामसंन्यास ।
योग साधावया वनवास सेविती
करिती पवनअभ्यास ।
इंद्रियें दंडून परतोनि गृहस्थान न पवतीच
खडु पान रसु रया ॥८॥
जळींचा तरंगु जळीं निमाला
तो अनुठाया वेगळा नाहीं गेला ।
तैसा तुजमाजी दातारा मध्यें
कां हा प्रपंच वाढविला ।
तूं देव आम्हीं प्राकृत मनुष्यें हा
आगमु कां गमला ।
मज पाहतां हें अवघेंचि लटिकें जैसें
असेल तैसें सांग पां उगला ॥९॥
लवण पाणीयांसी कीं पाणी लवणासीं
ऐक्य जालियाविण निवडेना गुणास ।
लोहो लागलें परिसीं तें उठिलें
कनकेंसी बापरखुमादेविवरा
विठठला परियेसी ।
आजिपासून ये तरी तुझीच आण
पुढती न घाली न निघे
गर्भवासीं रया ॥१०॥

अर्थ:-

हे श्रीहरि जर सर्व जीव तुम्हीच झाला आहात तर नरकादि दुःखे कोण भोगतो? हे श्रीहरि, जीवरूप बनलेले तुमचे स्वरूप जर अविनाश आहे तर जीवाला तुमचे प्राप्ती करता येवढे साधनाचे कष्ट कां ? हे परब्रहा सांवळ्या श्रीकृष्णा तू सर्वांच्या अंतरात राहून जगत्रय व्यापले आहेस. म्हणून तुमच्या रूपाने मी तुमचा अंश म्हणजे पुत्र झालो असे असतां माझे जीवित पराधीन का केले ? यामुळे तू माझा बाप आहेस असे म्हणतांना लाज वाटून मी आपल्या स्वरूपाहून भित्र झालो, त्यामुळे एकीकडे काळ आणि दुसरीकडे संसार या दोन्हीच्या कचाट्यात अटकून पडलो. अशा स्थितीत तुमच्याकडे येण्याची इच्छा करितो.तो तुमचा मोठा देवपणा म्हणजे ऐश्वर्य पाहून भ्यालो. नादबिंदुपासून शरीर जन्मले. त्या शरीरा कडून भगवत्प्राप्ती वेदशास्त्राच्या साक्षीने असाध्य करून मद मांसामध्ये वाढविले. कमनि प्राप्त झालेले शरीर कष्ट सोसून सत्य सुकृत करण्यांकरिता उत्पन्न केले हे खरे पण दैन्य द्रारिद्र त्यांचे कडून कां भोगविलें? या कारणाने तुमच्या बापपणाला व माझ्या पुत्रपणालाही दोष लागला नाही काय? आयुष्याची शंभर वर्षाची निश्चित गणना करून हा शंभर वर्षे जगणारा मनुष्य देह आहे असे नांव ठेवले असे असूनही त्या आयुष्यात अर्धरात्र आणि अर्धदिवस अशी वाटणी का केली? व शुद्धसत्त्वरूपी जीवाचा नाश का केलास? दुसरे असे की आपल्या सारख्या समर्थाचे बालक यत्किंचित दीन देहाने गांजून टाकावे. मग तुमचे थोरपण कुणीकडे गेले? आम्हाला देहामध्ये बांधून कष्ट भोगवितोस आणि आमचा मायबाप तूं म्हणवितोस. आमचाच काय तर सगळ्यां जगाला प्रसवून त्यास सर्व जगाचा आधार आपणच आहो असे सांगतोस ज्या ज्या ठिकाणी जीवत्व आहे. त्या त्या ठिकाणी शिव आहे. म्हणजे परमात्मा आहे. हे माझ्या मनाला पटत नाही. ज्याप्रमाणे किटकी ध्यानाने भुंगरूप होते. त्याप्रमाणे आम्हां जीवाला परमात्मरूप कां करून टाकीत नाहीस? एक स्वरूपानुसंधान चुकले तर या दोषाकरिता आम्हास एवढी मोठी शिक्षा करतोस बरे यातून सुटण्याला असे काय मंत्र तंत्र भक्ति हे साधन आहे की त्याचे आराधन करून त्या दोषांचा नाश करून टाकतील. तुझ्या स्वरूपाचा विचार केला तर काय तुझे अविनाश स्वरूप, तुझे आम्ही पुत्र असतांना काळांनी आमची शरीरे तुझ्या समक्ष फाडून खावी तरी तुला आमची दया कां येत नाही. वारंवार मातेच्या उदरांत जन्म घेऊन जीवाने दुःख भोगावे असा व्यर्थ शीण आम्हालां कां देतोस?ववास्तविक विचार केला तर दर्पणांत आपुले रूप पाहता ते एकच दिसते त्याचे सारखे तेथे दुसरे कोणी नाही म्हणजे दुसरे दिसले तरी त्याला स्वतंत्र सत्ता नाही. सूर्य उगवला म्हणजे त्याची किरणे प्रकाशतात, आणि अस्त झाला म्हणजे ती दिसत नाहीत. त्याप्रमाणे गुरूशिष्याच्या संवादापासून सोहंबोधाच्या अभ्यासाने जीव ब्रह्मैक्य होते अशी स्थिती आहे. याहून काय निराळे तुला ठाऊक असेल ते तूं कर वारंवार मी किती सांगावे. यमाच्या तडाक्यांत कांही उरत नाही. याकरिता मुनी वनवास सेवन करितात. कोणी फिरतात. कोणी कफनी घालतात. कोणी हाताने केस उपटतात. कोणी भटकत फिरतात कोणी यमाच्या भयाने शास्त्रोक्त संन्यास करितात. योगसिद्धी करिता कोणी वनांत जाऊन प्राणायामाचा अभ्यास करितात.कोणी इंद्रियाचे दंडन करून त्यांना विषयापासून परतवितात. इतके करूनही भृगस्थान म्हणजे परमात्मपद प्राप्त होत नाही.व परमानंदाच्या रसांतही त्याला खंड पडतो म्हणजे त्यांना परमानंद प्राप्त होत नाही. (वास्तविक विचार केला तर अविद्येकडून परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव उत्पन्न होतो व विद्येचा उदय झाला परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीच लय पावतो) जसा जळावर उत्पन्न झालेला तरंग जलाच्याच ठिकाणी लय पावतो. त्याप्रमाणे हे नारायणा, तुझ्या स्वरूपामध्ये तरंगाप्रमाणे आम्ही असून मध्ये हा प्रपंचाचा विस्तार का वाढविलास? म्हणजे तूं देव आम्ही मनुष्य असा भेद का विस्तारिलास. मला तर असे वाटते की हे सर्व खोटे आहे. यातील खरा प्रकार काय आहे. ते सांग पाहू. मीठ पाण्यात किंवा पाणी मिठांत पडून ऐक्य झाल्यानंतर त्याचे वेगळे गुण उरत नाहीत. लोखंडाला परिस लागल्याबरोबर त्याचे सुवर्ण होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला, आजपासून मला पुन्हा गर्भवासात घालू नका. व मीही गर्भवास घेणार नाही अशी तुझी शपथ वाहून सांगतो असे माऊली सांगतात.


३६७
देखोनि हांव बांधे तें तंव नाहीं होयें ।
आहें ते केही न जाये बापा ।
असें तें दिसों नये नाहीं तें घेवों
थोर काजेविण विटंबिलें कैसें रया ॥१॥
शिव शिव लटिकेचि शिणले ।
येणें लटिकेंनि बहु श्रमविलें ।
साच तें लटिकें लटिकें तें सांच
लिंगा हे खूण जाण रया ॥२॥
आपुली प्रतिष्ठा पूज्य जे होती ।
ईही गुणीं आम्हा उपहति बापा ।
मनाचा फाळका फाटुनि केला बाउला ।
तोचि तो खेळवूं किती रया ॥३॥
आपुलें युक्तीचे वाति वेर्‍ही गिवसीतां
त्या पदार्थाचे पोटीं लपती रया ।
तें सांडूनियां अभिप्रायाचे बळ
निजतत्त्वीं तें केवीं निवती रया ॥४॥
निज लाळा लिंपोनि जुन्या अस्थि
श्वान चघळूनि करितसे कोड रया ॥५॥
हाता पायांचा निखळ स्त्रीपुरुषांचा येक मेळ ।
देह ऐसा यातें म्हणती बापा आपणपै जगा
प्रतीति मानव हें तंव चिळसवाणें रया ॥६॥
मायबापें आडनावें त्यांचिया वोसंगा ।
निघों म्हणों तरि आपुलिये
साउलिये कां न बैसावें रया ॥७॥
प्रजाचे पोसिलें पुढें पाइकाचें रक्षिलें ।
इंद्रियांचें वोळगणें तें काळाचे खेळणें ।
जगीं राय बोलिजति आतां गोसावी
कवणातें म्हणावें रया ॥८॥
मृगजळ तंव मृगजळींच भरतें देखोनि
धांवणें तंव सीणणें ।
या परि झणी करिसि सदाशिवा
जगा प्रतीति पावउनि झकणें रया ॥९॥
आतां असो हा बोलु तूं एक गोसावी
साच येतुलेनि आम्हां उजरी कोटि
स्वप्न ऐक चेईलिया कैचें
ज्ञानदेव म्हणे ऐसें करी रया ॥१०॥.

अर्थ:-

अरे जीवा, हे क्षणिक विषयसुख पाहून ते प्राप्त करून घेण्याकरिता तूं विनाकारण हांव धरून खटपट करित आहेस. आणि त्या संसारसुखाचा विचार केला तर ते क्षणामध्ये नाहीसे होतात. नित्यआत्मसुख कधीही जात नाही. पण मायेचा असा विलक्षण स्वभाव आहे की जें सुख नित्य आहे. ते तूं पहातच नाहीस. आणि जे मुळीच नाही असे संसारसुख घेण्याकरीता पाहातोस, अरे काही एक फल नसता विषयसुखाच्या प्राप्तीकरता तूं आपली थोर विटंबना मात्र करून घेतलीस या जीवांचे कष्ट वर्णन करतांना अंगावर शहारे येऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शिव !शिव ! जीव फुकट भ्रमात पडले ! या लटक्या संसारसुखाने यांना फार कष्टी केले आहे. तुला जे विषयसुख सत्य वाटते. ते खोटे आहे. आणि ज्याचे तुला ज्ञान नाही. व जे खोटे आहे असे वाटते. ते परमात्मलिंगच म्हणजे परमात्म स्वरूपच सत्य आहे. ही खूण तूं पक्की लक्षात ठेव. आपल्या प्रतिष्ठेने जे आपणाला श्रेष्ठ समजतात. त्या श्रेष्ठ समजण्यातच त्यांचा खरोखर नाश आहे. मनाचा एक मनरुपी तुकडा फाडून एक बाहुला केला. त्याला कितीवदिवस खेळवित बसावयाचे म्हणजे त्या मनाच्या मागे किती दिवस फिरत बसावे. आपल्या युक्तीचातुर्याने त्या परमात्मपदाला शोधू गेले असता पत्ता न लागता त्याच्या पोटांत जीव लपले जातात. म्हणजे केवळ आपल्या युक्तीने त्या पदाची प्राप्ती होत नाही. श्रुति प्रतिपादित अभिप्रायाचे सहाय्य टाकून ते स्वबुद्धीने आत्मतत्त्वाच्या ठिकाणी कसे समाधान पावतील? (वैषयीक सुखोपभोगांत जीव आत्मानंदच भोगीत असतो. पण मी आत्मानंद भोगीत आहे. हे त्यास माहीत नसल्यामुळे तो विषयाचा आनंद आहे असे समजतो.) जुनी हाडे चघळीत असतां आपल्या तोंडातील लाळेची गोडी घेऊन ती गोडी हाडांत आहे. असे ज्याप्रमाणे कुत्री समजतात. त्याप्रमाणे अज्ञानी जीव स्वात्मसुख भोगीत असतां सुखशून्य असलेल्या निरनिराळ्या विषयामध्ये सुख आहे असे समजतात व तेच विषयाचे कोड़ पुरवित असतात. अरे फक्त स्त्री पुरूषांच्या हातापायांचा एक मेळ म्हणजे ऐक्य झाले असता त्यापासून उत्पन्न होणाऱ्याला देह असे म्हणतात आणि त्यावर आपलेपणाची असलेली प्रतीति जगांत दाखवितात ही गोष्ट अत्यंत किळस आणणारी आहे. असे पाहा की जीव आपल्या कर्मानि उत्पन्न होतो. आईबाप ही त्याला कुंभाराप्रमाणे निमित्त कारण आहेत. म्हणून त्यांना आईबाप हे नांव फुकट आहे. भ्रमाने त्यांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करावा तर आपली जी खोटी सावली तिच्या आश्रयावर कां बसू नये. तसेच आई बापांनी त्यांची प्रजा म्हणून त्यांनी आपणास पोसिले. पुढे आपण आपले स्त्रीयाबाळांचे रक्षण केले त्याच प्रमाणे शरीर इंद्रियांचेही कोड केले. तरी हे सर्व काळाचे खेळणे आहे. अशी जगांत सगळ्याचा अभिप्राय आहे. आता स्वामी कोणाला म्हणावे मृगजळ जरी धांवत जात आहे असे दिसले तरी त्यांची धांव मृगजळांतच जाऊन भरणार ती मृगजळाची धांव बघून पाणी पिण्याकरिता धांवणे म्हणजे श्रम करून घेणे होय. याप्रमाणे जगाची रीत पाहून तूं कदाचित फसशील. आतां या स्वस्वरूपी प्रपंचाच्या बाबी तुला किती सांगाव्या? या प्रपंचांत एक खरा स्वामी तूं आहेस. जगाची उत्पत्ति व नाश आहे. असा तुझा बोध झाला म्हणजे आम्हास फार संतोष आहे. या तुझ्या बोधाने कोट्यवधी जन्ममरणरूपी स्वप्ने प्राप्त करून देणारे संचित तुझ्याबोधाने शिल्लक कसे राहील? माऊली ज्ञानदेव म्हणतात मला असे कर.


३६८
तूं विष्णु म्हणोन हें जगचि केवळ ।
येर सकळीक मजशीं सहोदर ।
तेणें कारणें गोत्रेंसि सेकोपजिवीं
आम्हां न संडवे कोडें रया ॥
माहेरा वाचूनि आन कांही नेंणें ।
माहेर तें उपजवी तरंगाचें जीवन ।
तोय वरी सामावे वेगळालें
असिजेल केविं रया ॥१॥
उदरीं सिनार घरदारीं सिनार ।
सिनार दृश्य द्रष्टा ॥
करी त्या मायबापाचेनि उद्वेगें ॥
मी तो सांगोनियां आलों तुझिया पोटा रया ॥२॥
अंगे ब्रह्म झाला तें तुवां वो जाणितलें ।
परि तो अविद्ये घायतळीं सुदला ॥
ते तूं मजलागीं नेणसीच माउलिये
आपुठे पान्हाये वाढविलें रया ॥३॥
तंवचि मी जालों परि उदर
न भेदित जननी ।
जोडलेना वाटी चक्षु पक्ष निघाले
मज तुझाचि वाहाणीं ।
म्हणोनि सामावलों तुझ्या पोटीं रया ॥४॥
ऐशापरि तुम्हा सम सरिसा जालों ।
परि तो नामें वोळखिजे ॥
मी तो बाळ कीं मी तो
वृध्द ऐसें ।
अनत्रअन्यपणें लोक कीजे रया ॥५॥
चेवो तरि स्वप्न स्वप्न तरि चेवो माय
पुता नेणें ऐसें माझें तुझें ।
आपलें आपण म्हणतां लाजिजे
नमो नमो तुज व्याली वांझ रया ॥६॥
आयुवित भव विभव जगीं
जिवांनिडळीं लिहिलें ।
अलग्न तें मज नेणतया अजंगमा
लागुनि पुसोनि घातलें मूळ सानु रया ॥७॥
दृष्टिभेणें रुपा नये काळा भेणें नामाची
सोय सांडियेली ।
तुझ्या रुपीं सर्व रुप रुपस होउनिया
दिठी उतरलीया परि रया ॥८॥
आपुलें वित्त आपणा देखतांचि शंकिजे
त्याविभागाची केउती परि ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठला तूं
येक सचराचरीं रया ॥९॥

अर्थ:-

विष्णु या शब्दाचा अर्थ व्यापनशील असा आहे. म्हणून सगळे जग विणु आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ या अभिप्रायाने माऊली म्हणतात. हे भगवान तू विष्णु आहे. सर्वजग तुझ्या पासुन उत्पन्न झाले आहे. जगातील सर्व जीवमात्र माझे बंधु आहेत. या करीता एका गोत्रात असणे हे आमचे केव्हाही स्वाभाविकच आहे. यांच्याशी द्वैत बुद्धी करुन त्यांना टाकणेणे शक्य नाही. याकरता हे प्रभो आमचे माहेर जे तूं त्या तुझ्यावांचून आम्ही दुसरे काहीच ओळखत नाही माहेर हेच आनंद उत्पत्र होण्याचे स्थान आहे. तेच जीवाचे जीवन आहे. जरी लोकदृष्ट्या पाण्यावरील तरंगाप्रमाणे आम्ही भित्र भिन्न दिसलो तरी पाणीरूपाने वेगळे कसे असू. अशा बोधाने पुन्हा मातेच्या उदरांत, घरात दारात दृश्य दृश्टया ह्या भेदस्थितीपासून मी वेगळा झालो. अनंत जन्माच्या पुण्यसंस्काराने असा निक्षय करून मी तुझ्या पोटी आलो. या बोधाने मी अंगाने ब्रह्मरूप झालो. ते फाक्त तुला ठाऊक आहे. परंतु बाकीच्या जीवाकडे पाहिले तर त्यांना तूं अविद्येच्या वैषयीक सुखाखालीच दडपून टाकले आहेस. मला मात्र तसे केले नाहीस. उलट आपल्या ‘आपुठे’ म्हणजे अखंड प्रेमपान्हाने वाढविलेस. तेव्हाच मी अशा स्थितीला आलो. आणि ज्या प्रेमभक्तिने अशा स्थितीला आलो.त्या प्रेमभक्ति माऊलीचा मी उदर न भेदी म्हणजे तिचा नाश करीत नाही. पक्षी आपण जे अन्न संपादन करतो ते आपल्या पिलांना वाटीत नाही काय ! पुढे त्या पक्षाला डोळे येऊन पंख फुटले म्हणजे स्वाभाविकच ते स्वतंत्र होतात अशा तुझ्या ह्या कृपेच्या प्रवाहांत मला लाभ झाला आहे. म्हणूनच तुझ्या पोटी म्हणजे तुझ्या स्वरूपांत मी सामावलो आहे. याप्रमाणे तुझ्या स्वरूपाशी माझे ऐक्य झाले खरे तरी पण शरीरपातापर्यंत व्यवहारांत मी बाळ, तरूण, वृद्ध अशा नावाने ओळखिला जाईन परंतु ऐक्यपणाचा बोध असल्यामुळे त्या व्यवहाराचे सुद्धा कौतुकच वाटते. लोकदृष्ट्या जागृति असली तरी विचारदृष्ट्या ते स्वप्नच आहे. आणि स्वप्न म्हटले तरी स्वप्नात जो ज्ञानाचा व्यवहार असतो ते ज्ञान म्हणजे जागृति म्हणजे स्वप्नांत ज्या पदार्थाचा व्यवहार होतो. ते पदार्थ व तो व्यवहार मिथ्या असला तरी त्यांचे ज्ञान म्हणून जे असते (प्रकाशक) ते सत्यच असते. अशा बोधाने मातृपुत्रभाव किंवा माझा तुझा असा द्वैतभाव मी जाणत नाही एवढेच काय तर मी आत्मस्वरूप आहे असे म्हणतांना सुद्धा अद्वैतस्थितीत लाज वाटते नमस्कार असो तुझ्या मायेला, अरे ती स्वरूपाने वांझ असता ती तुलाच व्याली तसेच जगत आयुष्य, वित्त, जन्म, ऐश्वर्य हे सर्व जगातील जीवाच्या कपाळी लिहुन ठेवले आहे. परंतु जड, मूर्ख जो मी त्या माझ्या कपाळीचे ते पुसून टाकल्यामुळे मी त्याच्यापासून वेगळा आहे. मुळापासूनच अशी स्थिती आहे. व या स्थितीमुळे काळाच्या दृष्टीभयाने नामरूपाला येण्याची सोय टाकून देऊन सर्वरूप जो तूं त्या तुझ्या रूपाप्रमाणे होऊन या प्रपंचापासून दृष्टी उतरली. असे आपले रूप ऐश्वर्य आपण पाहात असता त्याविषयी जीवांचा निश्चय होत नाही. त्यांना शंका येते. मग त्या आत्मसुखाचा सुखोपभोग घेण्याचा प्रकार जीवाला कसा समजावा? माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला चराचर जगतामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य असा तूम्ही एक आहात असे माऊली सांगतात.


डौर – अभंग ३६९

३६९
सभा समस्त साधु संतांची ।
महामुनी विरक्ताची ।
पंडितपाठकज्ञानियांची ।
समस्तासी विनवणी ॥१॥
या पहिलिया पाहार्‍यांत ।
डौरकार सांगेल मात ।
समस्त रिझाल तुम्हीं संत ।
ऐका निवांत तुम्ही सर्व ॥२॥
आतां परिसा पांच नाच ।
पांच नादाचे पांच भेद ।
पहिला नाद चटपट चटपट ।
दुसरा नाद खटपट खटपट ।
पांचवा तळमळ तळमळ ॥३॥
पहिला नाद चटपट चटपट ।
शिखासूत्र त्यजुनी सपाट ।
विरजा होमिला दृष्ट ।
परि अपुट तैसाची ॥४॥
वाया केली तडातोडी ।
वृथा त्यजिली सूत्रूशेंडी ।
परि विषय वासना न सोडी ।
उपाधि गाढी श्रीपादा ॥५॥
संन्यास घेऊनी कांचा ।
जिव्हांशिश्न वेधलें लांचा ।
विटंबु केला बापुडे कायेचा ।
चटपट मनींचें मनीं वसे
गा दादेनो ॥६॥
खटपट खटपट । शास्त्रप्रज्ञा अलोट ।
बांधोनी व्युत्पत्तीची मोट ।
सैरा सुनाट धांवती ॥७॥
वादतर्का लागी धावे ।
भरला विषयाचे नांवे ।
वरिवरि वृंदावन दिसे बरवें ।
परी अंतरीं कडुवट गा दादेनो ॥८॥
लटपट लटपट ।
मेळवूनि शिष्यांचा थाट ।
अद्वैत ज्ञानाचा बोभाट ।
भरला हाट जिविकेसी ॥९॥
गुरु लोभी धनमानें ।
शिष्य लोभी अति दीन ।
दोघांसी लटपट लागली पुर्ण ।
कोणी कोणासी आवरेना ॥१०॥
ब्रह्मज्ञान जाहलें वोस ।
पाहिले दु:खाचे दिवस ।
अंतीं जाले कासावीस ।
कामपाश समंध गा दादेनो ॥११॥
आतां फटफट फटफट ।
या नादाची गोठ नीट ।
वोळागोनी ओटपीठ ।
उर्ध्व पाठ भेदिती ॥१२॥
मन पवन समरसोनी ॥
ब्रह्मरंध्रीं लीन होउनी ॥
हा अभिमान वाहोनी ।
जालेपणी फूंजती ॥१३॥
तें वोखटें गा डौरकारा ।
करोनि देहाचा मातेरा ।
भरुं पाहाती सुषुम्ना द्वारा ।
परि असाध्य खरा तो मार्गु ॥१४॥
ऐसी जालिया ब्रह्मप्राप्ती ।
शिणतोच अहोरात्रीं ।
अति विरोध भगवद्वक्ति ।
यालागीं बोलती फटफट हा दादेनो ॥१५॥
आतां तळमळ तळमळ ।
धरणीं पारणी हळहळ ।
तीर्थयात्रे लागीं चळपळ ।
घेतलें बळ तपाचें ॥१६॥
जपध्यान मंत्रावळी ।
नाना दैवतें आराधिलीं ।
शेखीं काळें नरडी चेंपिलि ।
दु:खें तळमळी या हेतु ॥१७॥
ऐसे भेद नादाचे ।
मनीं धरा विवेकाचे ।
ज्ञानदेव बोले निवृत्तिचें ।
बोला वाचें हरिनाम गा दादेनो ॥१८॥

अर्थ:-

पहाटेच्या वेळी डौरी लोक हातांत डौर नावांचे वाद्य घेऊन, मुखाने उपदेशाचे शब्द म्हणत येतात. या दृष्टांताप्रमाणे साधुसंत, महानुभाव, विरक्त, पंडित, पाठक ज्ञानी वगैरे मंडळी ज्या सभेत बसली आहेत. अशा सभेत येऊन डौरी सर्व मंडळींना विनंतीकरून म्हणतो. महाराज दिवसाच्या या पहिल्या प्रहरांत म्हणजे पहाटे मी अशी एक गोष्ट सांगतो की ज्या योगांने तुम्हाला संतोष होईल ती तुम्ही सर्वजण निवांत पणे ऐका. जगांतील लोक निरनिराळ्या नादांत गुंग आहेत. त्यापैकी पाच मुख्य नाद आहेत. ते येणेप्रमाणेः- पहिला चटपट, दुसरा खटपट, तिसरा लटपट, चौथा फटफट व पांचवा तळमळ तळमळ. या नादाचे स्पष्टीकरण पुढील चरणांतून करतात चटपट या नांदाने वैराग्य नसलेल्या माणसाने संन्यास घेतल्यास होणाऱ्या स्थितीचे वर्णन केले आहे. एखाद्याने ईश्वर प्राप्तीकरिता संन्यास घेतला, शिखा व यज्ञोपवित टाकून विरजा होम करून संन्यासी झाला. पण संन्याशाला आवश्यक ती अंतःकरणशुद्धी झाली नाही आणि हा पूर्विप्रमाणेच आहे. निष्कारण शिखा सूत्राची तोडातोडी मात्र केली. विषयवासनांचा त्याग करावयास पाहिजे होता तो तर केला नाही व विषय वासना तर परमेश्वरप्राप्तीतील मोठी अडचण होय. जिव्हा व शिश्न यांच्या भोग्य पदार्थाचा लोभ तर कायमच आहे. मग संन्यास कशाला केला? केवळ आपल्या शरीराची ही विटंबना केलीस. अंतःकरणांत विषय प्राप्त न झाल्याची चटपट आहे. ती आहेच. आता दुसरा नाद खटपट खटपट आहे. यानें केवळ शास्त्रीय शब्दज्ञान्याची स्थिती कशी असते. याचे वर्णन करतात. ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास करून ‘अयं घटः अयंपटः वगैरे पुष्कळ खटपट केली व त्या योगाने पैसा मिळवून दारिद्र्य ही दूर करून कुत्र्यासारखा स्वैर धांवतो. वादांत तर्कशुद्ध बोलून प्रतीपक्ष मत खंडणास नेहमी तयार आहे. पण अंतःकरणातील विषयाची आवडमात्र कायम आहे. मग त्या शास्त्र शिकण्याचा काय उपयोग? कडू वृंदावन वरून कितीही जरी चांगले दिसले तरी आंत ते जसे कडु असतेच त्याप्रमाणे या शब्दज्ञान्याची स्थिती असते. डौरकाराचा तिसरा नाद लटपट असा आहे. या शब्दाने भोंदू गुरूंचे वर्णन केले आहे. काही लोक लटपट करून आपल्या भोवती शिष्य जमवून आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारे गुरू आहोत असा बोभाटा करून आपल्या भोवताली जमविलेल्या बाजाराच्या योगाने उपजीविकेची सोय मात्र करतात. गुरू धनप्राप्तीचा लोभ धरून शिष्यांपासून धन काढण्याची व शिष्य गुरूला काही न देता दीनत्व दाखवून त्यांच्या घरी राहण्याची अशी दोघांची ही आपआपल्या परीने लटपट सुरू असते.व अशा रितीने त्यांच्यात चढाओढ होऊन ते एकमेकांना आवरेनासे होतात. शेवटी त्यांचे ते उसने आणलेले ब्रह्मज्ञान नाहीसे होते त्या दोघांनाही दुःखाचे दिवस येतात व शेवटी कामपाशरुप संबंध लागून त्यांचा जीव कासावीस होतो. आतां डौरकाराच्या चवथ्या फटफट नादानें योगाभ्यासी लोकांची हकिकत सांगतात. योगाभ्यासी लोक प्राणायामाच्या योगाने मनावर ताबा चालवून औटपीठ नावांच्या महाकारण स्थानाचा आश्रय करून प्राणाला मस्तकांत नेऊन ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थीर करतांत आणि आपण पूर्ण योगी झालो अशा गर्वाने फुगून जातात. हे मला डौरकारालाही बरे वाटत नाही. अशा रितीने देह कष्ट सोसून सुषुम्नेच्या मार्गाने ब्रह्मरंध्री प्राणवायु स्थीर करून परमात्मप्राप्ती करून घेणे हा खरोखर असाध्य मार्ग आहे. अशारितीने भगवत्प्राप्तीला विरोधी व अहोरात्र खटपट करून तरी या मार्गाने भगवत्प्राप्ती कोणाला झाली आहे ? व ती न झाल्यामुळे तिला फटफजिती दर्शक फटफट हा नाद डौरकाराने वापरला आहे. आतां पाचवां नाद तळमळ तळमळ” याने तिर्थयात्रा व्रते वैकल्ये करूनही चित्ताला शांती नाही. अशा लोकांच्या स्थितीचे वर्णन करतात. एक दिवस उपवास व दुसरे दिवशी पारणे या व्रताला धरणे पारणे म्हणतात. असे धरणे पारणे जीवाला हळ हळ लावूनहि केले. घाईने तिर्थयात्रा केल्या तपाचें बलही संपादन केले. जप केला, तप केले, ध्यान केले मंत्रबलाची पारायणे झाली. निरनिराळ्या देवतांचे आराधन केले पण शेवटी काळाने नरडी दाबावयाची ती दाबलीच व इतके उपाय करणाऱ्या जीवांना दुःखाने तळमळावयास लाविले. अशा रीतीने आत्यंतिक सुखप्राप्ती करिता नाना तहेचे उपाय नादांच्या रूपकाने तुम्हाला सांगितले. त्याचा नीट विचार करून मनांत धरा व तोंडाने हरिनामाचा उच्चार करा असे निवृत्तीनाथांचे शिष्य माऊली ज्ञानदेव सांगतात.


गळति – अभंग ३७० ते ३७१

३७०
विदेह आत्मलिंगा गुरुकृपेचा तुषारु ।
पूर्णे पूर्ण भरिला घटु हळुहळु बिंदु उदारु ।
वरुषला लिंगावरि तेणें तुष्टला श्रीगुरु ।
प्रसन्न निवृत्तिराजा ज्ञान देउनि उदारु ॥१॥
यालागिं ज्ञानदेवो नाम गुरुकृपेनें पावलों ।
असतां इये देहीं संसारा हारपलों ।
ज्ञानविज्ञान कळो आलें अद्वैतरुप बुझालों ।
विठ्ठल नाम माझे वाचे तेणें वागपुष्प पावलों ॥२॥
नित्य गळति नामें जालीं गेला प्रपंच अनिवार ।
उपरती देहीं जाली निमाली वासना संसार ।
तपन जालें ब्रह्ममूर्ति दिननिशीं साचार ।
आठवितां मागिल भावो अवघा पारुषला उदारु ॥३॥
विज्ञानेंसि ज्ञान गेलें एकरुप परिचार ।
ज्योतिमाजि कळिका गेली एकदीप जाला आकार ।
वृत्ति ते निवृत्ति जाली माया मारुनि केलें घर ।
निवृत्ति गुरु माझा घट स्थापिला त्या समोर ॥४॥
ज्ञानदेवें घटमठ निरोपिली हरिभक्ति ।
उडाली पक्षपाती इंद्रिया तेथें नाहीं गती ।
विराले अभिमान ममता जाली समाप्ती ।
खुंटलिया उर्मी दाहि स्त्रपन जालें लिंगाप्रती ॥५॥

अर्थ:-

शंकराच्या पिंडीवर सतत पाण्याची धार रहावी म्हणून एका कळसीला लहानसे भोक पाडून त्यांत पाणी भरून ते शंकराच्या पिंडीवर अडकवून ठेवतात. त्यास गळती असे म्हणतात.माऊली या अभंगामध्ये गळतीच्या रूपकाने वर्णन करीत आहेत. शरीरभावरहित जो आत्मा तेच कोणी एक शंकराचे लिंग अशी कल्पना करून त्या लिंगावर परमात्मरूप जो श्रीगुरू त्याची कृपा हेच कोणी एक उदक घटांत परिपूर्ण भरून हळुहळु या आत्मलिंगा वर गळती सुरू केली. त्याने भगवान श्रीगुरू संतुष्ट झाले व श्रीगुरूनिवृत्तीराय प्रसन्न झाले. ते ज्ञान देण्यांत उदार आहेत. श्रीगुरूंनी कृपा करून मला पूर्ण ज्ञान दिले म्हणूनच मला ज्ञानदेव हे नांव प्राप्त झाले आहे. शास्त्रीय ज्ञान आणि अपरोक्षानुभवरूपी विज्ञान प्राप्त झाले म्हणून अद्वैतरूप जो परमात्मा त्याचे स्वरूप माझे अनुभवास आले आणि म्हणूनच संसार नष्ट झाला. आता फक्त जीवन्मुक्तिच्या सुखार्थ श्रीविठ्ठल नामांची पुष्पे वाणीस प्राप्त झाली. त्या नामाच्या गळतीने नष्ट करण्यास फार कठीण असा जो जन्ममरणरूपी संसार तो नाहीसा होऊन गेला. उपरती होऊन वासनात्मक. संसारही नष्ट झाला. आणि रात्रंदिवस ब्रह्मरूपी श्रीगुरूचा प्रकाश लाभला असता पूर्वीचा महान संसारभाव आठवू गेले तरी तो दूर झाला पुढे येतच नाही. विज्ञान है अविद्याकार्यच आहे. ते ज्ञानासह वर्तमान नष्ट होऊन एक परमात्मरूपच शिल्लक राहिले. परमात्मज्योतीमध्ये उपाधिच्या योगांने आत्म्याला लहान कलीकेचे रूप आले होते ती दोन्ही एक झाली. परमात्मा व आत्मा ही दोन्ही एकच दीप झाला. मायेचा नाश झाल्यामुळे वृत्तीची निवृत्ती झाली. माझा श्रीगुरू जो निवृत्ती त्याचे समोर अशा प्रकारचा घट स्थापन केला. ज्ञानदेवांनी घटमठ ही दोन्ही हरिभक्तिस अर्पण केली. यामुळे अनंतपक्ष नाहीसे होऊन त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियाची गती, अभिमान किंवा देहादिकांच्या ठिकाणी ममता आणि दहा इंद्रियद्वारा उत्पन्न होणाऱ्या उर्मी या सर्व नाहीशा होऊन गेल्या ह्यामुळे परमात्मरूपी जे आत्मलिंग ह्याला स्नपन म्हणजे शुद्धता प्राप्त झाली.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३७१
आदि आत्मा जोतिलिंगा लांबियेला घटु ।
स्थाविरिले मायावस्त्र ।
लिंगावरी प्रविष्ट ॥
तपन नाम ध्वनी ।
इंद्रिया केलें सपाटु ॥१॥
हळुहळु गळती गळे ।
गळों लागली सकळें ॥
उच्चारितां कृष्णनाम ।
भेणें पळिजे कळिकाळें ॥
त्रिगुण सुटल्या गांठी घटु विराला सघन ।
पंचतत्त्वें एके ठाई आत्मा नांदे परिपूर्ण ॥
जिवशिव हारपले एक दिसे चैतन्य ।
आत्माराम विदेहिया ॥
श्रीगुरुनें सांगीतली खुण ॥२॥
नरदेह अवचितें । जो साधकु होय नारायण ।
परमानंदें गळति गळे ।
पांचहि तत्त्वें हरपोन ॥३॥
निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु ।
आळंकापुरीं स्थापियेलें ॥
दिधला विठ्ठल उच्चारु ।
समाधि जीवन माझें वरी अजानवृक्षतरु ॥
जोंवरी चंद्रसूर्य तोंवरी कीर्तिघट स्थिरु ॥४॥
गाति वाति साधु मुनी छंद घट मठीं चित्त ।
विरेल देह बुध्दि ज्ञानदाता देईल उचित ॥
विज्ञानेंसी गोष्टी सांगे ऐसें पद पावत ।
बापरखुमादेविवरीं लांबविला घटु ज्ञानदेव सांगत ॥५॥

अर्थ:-

सर्व जगताचा आदि असलेला जो आत्मा हेच कोणी एक शंकराचे लिंग आहे. अशी कल्पना करुन त्यावर अभिषेकार्थ घट लाविला.आणि त्या लिंगावर मायारुपी वस्त्र घालून आच्छादन केले. नामध्वनीच्या योगाने सर्व इन्द्रिये मावळून गेली. हलके हलके गळती लागल्यामुळे कृष्णनामोच्चाराच्या योगाने इंद्रियासहित वर्तमान देहभाव हळूहळू गलित होऊ लागला. त्याचप्रमाणे नामोच्चारणाच्या भयाने कळिकाळहि पळू लागला. अंतःकरणाच्या ठिकाणी सत्त्व रज तम या गुणापासून उत्पन्न होणाऱ्या विकारांच्या गाठी सुटून देहरुपी घट पंचतत्त्वासह वर्तमान त्या आत्मतत्त्वात मिळून जाऊन तसेच जीव शिवादि भेद नाहीसे होऊन सर्वत्र चैतन्य आत्मानंद परिपूर्ण देहामध्येच विदेहरुपाने पाहाण्याची खूण श्रीगुरूंनी सांगितली. अशारितीने आत्मस्वरुपाच्या ठिकाणी देहाची गळती लागल्यास अनात्मविषयक संस्काराचा मोह प्रतिबंध असतो. म्हणून त्या प्रतिबंधाला दूर करुन देहदृष्टयादि भाव परमात्मरुप होण्याची खूण साहजिकच नरदेह प्राप्त झाला असता. जो साधक जाणून नारायणरुप होतो. आणि परमानंदरुपामध्ये गळती लागल्यामुळे पांचही तत्त्वे हारपून जातात असा श्रीगुरु कृपापात्र अधिकारी विरळा. दीनाविषयी अत्यंत कळकळ बाळगणारे माझे श्रीगुरु निवृत्तिरायांनी माझी अलंकापूरीत स्थापना करुन अजानवृक्षाखाली समाधीचे जीवन देवून यावत् चंद्र सूर्यापर्यंत माझा किर्तिरुप घटांत स्थीर केला. अशा या ज्योतिर्लिंगाचे, जे साधु मुनी देहरुपी घटांत, चित्ताने छंद घेऊन गायन करतील. वर्णन करतील ते देहरुपी घटांत अशारितीने देहबुद्धी विरुन ज्ञानदाता श्रीगुरु त्यांना योग्य अशा अपरोक्षज्ञानाचा विचार सांगेल त्यायोगे आत्मपद पावून जीव कृतार्थ होतील.माझे पिता व रखुमादेचे पती जे श्री विठ्ठल यांनी माझ्या देहरुपी घटाला चिरंजीव केले असे माऊली सांगतात.


सौरी – अभंग ३७२

३७२
कर्मास्तव जालों सौरा ।
गेलों पंढरपुरा ।
मा मी गेलों पंढरपुरा ।
संतसनकादिकां मेळीं डौर वाईला पुरा ॥१॥
चाल रामा घरा करुं प्रपंचेसि वैरा ॥ध्रु०॥
द्वैतभाव कल्पना खोडी सांडी याची आशा ।
विठ्ठलनाम हेंचि सार जिव्हें प्रेमठसा ॥२॥
अद्वैत भरिन मन भारीना तोडिन भवपाश ।
क्षमा दया धरिन चित्तीं सर्वभूतीं महेश ॥३॥
ज्ञान ज्ञेय हाचि विचार सर्वमय हरि मा
मी सर्वमय हरि ।
दुजेपण न पंडे दृष्टी एकपण घरोघरीं ॥४॥
वासना खोडि वेगीं टाहो करीन रामनामें मा
मी टाहो करीन रामनामें ।
पुंडलिक पेठ संताचे माहेर
तेथें नाचेन मनोधर्मे ॥५॥
विज्ञान हरि आपणचि क्षरला दुजेपणें छंदु थोरु ।
मा मी दुजेपणें छंदु थोरु ।
निष्काम स्वरुप सूत्रधारी खरा एकरुपें हरिहरु ॥६॥
त्रिकाळध्यान त्रिकाळ मन हारपलें जेथ ।
पुरली मनकामना मा मी पुरली मनकामना ।
वैकुंठ प्रकट आपणचि नाथ ॥७॥
देहुडा पाउलीं वेणु वाहे विटेवरी निट ।
वोळली कामधेनु युगें अठ्ठाविस वाट ॥८॥
एक वृक्ष क्षरला आपणचि जग सर्वघटीं आत्मारामु ।
ज्ञानदेवो म्हणे आम्हा पंढरपुरी जाला विश्रामु ॥९॥

अर्थ:-

मी प्रारब्धाधीन पुण्यकर्माने संसार परित्याग करुन स्वच्छंदाने पंढरपुरास गेलो. तेथे जाऊन सनकादिकांप्रमाणे संताच्या मेळ्यांत मिसळून भगवन्नामाचा परिपूर्ण गोंगाट केला. मी म्हटले चला, परमात्म्याला आपल्या घरांत बसवू किंवा परब्रह्माच्या घरांत आपण जाऊ आणि प्रपंचासी वैर करू. द्वैताची खोटी कल्पना टाकून त्याचप्रमाणे प्रपंचाची आशा सोडून प्रपंचात सार जे विठ्ठलनाम ते जीभेवर प्रेमाने ठसवू. अद्वैतज्ञानाचा मनांत उदय झाला म्हणजे त्या जोराने, संसाररुपी भवपाश तोडून टाकून, क्षमा, दया, सर्व भूतांच्या ठिकाणी, परमात्मभाव चित्तात धरु. ज्ञान ज्ञेयाच्या विचाराने सर्व हरिमय होऊन दुजेपण दृष्टिसही पडणार नाही. मग सर्व घरोघरी एक परमात्मस्वरुपच होते. विषयवासना हीच खोडी तिला जोरांने परत वळवून मी रामनामाचा टाहो फोडीत आणि पुंडलिकाच्या पेठेत असणाऱ्या संतांच्या माहेर घरांत म्हणजे पंढरीत मनःपूर्वक मोठ्या प्रेमाने नाचेन. विज्ञानरुप हरि आपणच भाविक विकार पावल्यामुळे त्याचा मी दुजेपणाने भक्तिचा मोठा छंद घेतला आहे. निष्काम स्वरुप हरि खरा, सूत्रधार असूनही हरिहरादिरुपांनी एकरुपच आहे.. त्रिकालस्नान गमनादि क्रिया माझ्या ठिकाणच्या जाऊन माझी मनकामना पूर्ण झाली. वैकुंठरुप परमात्मा जो श्रीहरि तो प्रगट होऊन.आपणच वाकड्या पावलांने विटेवर नीट उभा राहून वेणु वाजवीत असता अठ्ठावीस युगे कामधेनुप्रमाणे वळली म्हणजे अठ्ठावीस युगे होऊन गेली.. तोच परमात्मा जगत् वृक्षरुपाने क्षरण पाऊन म्हणजे विकार होऊन आपण सर्व जीवमात्रांमध्ये त्याचा आत्मा बनला आहे. याप्रमाणे त्या श्रीकृष्णाची पंढरपूरात वस्ती असल्यामुळे आम्हांला तेथेच विश्रांति झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात


फुगडी – अभंग ३७३

३७३
फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू ।
निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥
एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥
हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥
सकळ पाहे हरी । तोचि चित्तीं धरी ॥५॥
नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥
वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥
ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥८॥

अर्थ:-

माऊली या अभंगामध्ये फूगडी या खेळाचे च रुपक सांगत आहेत. फुगडी म्हणजे फुगडी. खेळ खेळत असता खेळणारी मुले, एकमेकांचे भांडण झाले म्हणजे ‘फुगडी’ म्हणून त्यांचे मित्रत्व टाकून देतात. याच दृष्टांताप्रमाणे संसारामध्ये आसक्त असलेल्या एका स्त्रीस दुसरी ब्रह्मरुप झालेली स्त्री सांगते की तुझी गडी फु, कारण तूं संसाराच्या नादी लागून आपल्या जन्माचे नुकसान केले आहेस. खरे पाहिले तर तूं ब्रह्मरुप होतीस. पण या प्रपंचाच्या नादाने तूं विषयासक्त झालीस. याकरिता तूं आपले मन स्वच्छ कर. विषयांवर थूंक. एक भगवन्नामाच्या ठिकाणी विश्वास ठेव. व इतर सर्व साधनें टांकून दे. माझ्याकडे पहा संतांच्या संगतीमुळे माझ्या हृदयांत हरि रंगला आहे. तुही सर्वत्र व्यापक असलेला हरीच चित्तात धर. संसार आपल्या प्रारब्धाने चालत असतो, म्हणून त्यांच्यात मन न घालता परमात्म्याच्या ठिकाणी ते मन लाव. म्हणजे त्या चर्तुभुज श्रीहरिला तुझ्याकडे पाहून फार आनंद होईल. व त्याआनंदाने तो तुला आपल्या चारी भुजांनी आलिंगन देईल मला त्या हरिनामाची गोडी लागल्यामुळे मी संसारासी फु, गडी’ करुन टाकली म्हणजे संसाराचे मित्रत्व टांकले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


पांगूळ – अभंग ३७४

३७४
मृत्युलोका माझारी गा एक सदगुरु साचार ।
त्याचेनि दर्शनें तुटला हा संसार ।
पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार ।
यालागीं नांव त्याचें वेदा
न कळे पार ॥१॥
धर्माचें वस्ति घर ठाकियलें वा आम्हीं ।
दान मागों ब्रह्म साचें नेघो द्वैत या उर्मी ॥२॥
विश्रांति विजन आम्हां एक सदगुरु दाता ।
सेवितां चरण त्याचे फ़िटली इंद्रियांची व्यथा ।
निमाली कल्पना आशा इळा परिसीं झगटतां ।
कैवल्य देह जालें उपरति देह अवस्था ॥३॥
मन हें निमग्न जालें चरणस्पर्शे तत्त्वतां ।
ब्रह्माहंस्फ़ूर्ति आधीं भावो उमटला उलथा ।
पांगुळलें गुह्य ज्ञान ब्रह्मरुपें तेथें कथा ।
अंध मग दृढ जालों निमाल्या विषयाच्या वार्ता ॥४॥
ऋध्दिसिध्दि दास्य आपेंआप वोंळलीं ।
दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपीं लीन झाली ।
वोळली कामधेनु पंगु तनु वाळली ।
पांगुळा जिवन मार्गु सतरावी हे वोळली ॥५॥
पांगुळा मी कल्पनेचा पंगु जालों पैं मनें ।
वृत्ति हे हारपली एका सदगुरु रुप ध्यानें ।
निवृत्तीसी कृपा आली शरण गेलों ध्येयध्यानें ॥६॥

अर्थ:-

या मृत्युलोकामध्ये एक सद्गुरूच सत्य आहे. त्याच्या दर्शनाने माझा संसारबंध तुटून गेला असा तो सद्गुरू उदार दयाळू दाता आहे. तो पांगळ्यांना म्हणजे कोणतेही परमार्थसाधन करण्याला असमर्थ असलेल्यांना हात पाय देतो म्हणजेच परमार्थ साधनाला साह्य करतो, असा सद्गुरूंचा महिमा आहे. त्याचा महिमा वेदांनाही कळत नाही.धर्माच्या वस्तीचे घर असा जो श्रीगुरू त्याची आम्ही प्राप्ती करून घेऊन ब्रह्मरसाचे दान मागतो. द्वैत विचाराच्या वासना मुळीच स्वीकारीत नाही.यामुळे आम्हाला आकाशात श्रीगुरूचरणाची उपासना करण्यांतच होणारी इंद्रियांची पिडा कल्पनेसह वर्तमानात नष्ट झाली. ज्याप्रमाणे परिसाला लोखंडी विळ्याचा स्पर्श झाला असतांना त्या लोखंडाचे स्वरूप पालटून तो सुवर्णरूप होतो. त्याप्रमाणे अत्यंत अमंगळ असा आमचा देह असतांना सद्गुरूंच्या चरणस्पर्शाने संसारापासून उपरति होऊन देह कैवल्यरूप झाला. सद्गुरू चरणाचा स्पर्श झाल्याबरोबर देहाभिमान धरणारे मन त्या श्रीगुरूचरणांत म्हणजे ब्रह्मस्वरूपांत निमग्न होऊन गेले. देहभावाचा उलथा म्हणजे विरूद्ध ब्रह्मभावाची स्फुरती उमटली ह्या गुह्य अशा ब्रह्मज्ञानाच्या कथा सुरु होऊन विषयाच्या वार्ताही मावळून गेल्या याप्रमाणे मी पांगळ्याचा धड धाकट झालो. यांत काय नवल आहे? रिद्धिसिद्धि आमच्या दासी होऊन राहिल्या, दास्य सख्यांदिक भक्ति आमच्या कडे घर चालत आली. यत्किचित् दातृत्वाचा अभिमान किवां शरीराविषयी अहंभाव असणारी जी क्षुद्रबुद्धी होती ती ब्रह्मस्वरुपांत विलीन झाली. श्रीगुरु कामधेनू प्राप्त झाल्यामुळे आमचा पांगुळपणा वाळून गेला. आणि जीवनाचा मार्ग जी सतरावी आत्मकला ती प्राप्त झाली. वस्तुतः व्यवहारदृष्टया मी हातापायांनी धड असतांना केवळ मनाच्या कल्पनेने मी पांगळा झालो होतो. परंतु सद्गुरुच्या ध्यानाने ती वृत्ति मावळून गेली.श्रीगुरु निवृत्तिरायांना माझेविषयी दया आली ध्येय ध्यानादि सर्व प्रकार श्रीगुरुच आहेत. अशाबुद्धिने शरण गेलो म्हणून माझे पांगळेपणा नाहीसा होऊन श्रीगुरुच्या कृपेने मी कृत्यकृत्य झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३७५
पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें ।
विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदलें ।
चौर्‍यांशी लक्ष योनी फ़िरतां दु:ख भोगिलें ।
ज्ञान दृष्टि हारपली दोन्ही नेत्र आंधळे ॥१॥
धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी ।
आंधळ्या दृष्टि देतो त्यांचे नाम मी उच्चारीं ॥२॥
संसार दु:खमूळ चहुंकडे इंगळ ।
विश्रांति नाहीं कोठें रात्रंदिवस तळमळ ।
कामक्रोधलोभशुनीं पाठीं लागलीं वोढाळ ।
कवणा शरण जाऊं आतां दृष्टि देईल निर्मळ ॥३॥
मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणीं ।
इष्टमित्रसज्जनसखें हे तों सुखाची मांडणी ।
एकला मी दु:ख भोगीं कुंभपाक जाचणी ।
तेथें कोणी सोडविना एका सदगुरुवाचुनी ॥४॥
साधुसंत मायबाप तिहीं दिलें कृपादान ।
पंढरीये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्नान ।
पुंडलिकें वैद्यराजें पूर्वी साधिलें साधन ।
वैकुंठीचें मूळपीठ डोळां घातले तें अंजन ॥५॥
कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ ।
तिमिरदु:ख गेलें तुटलें भ्रांतिपडळ ।
श्रीगुरु निवृत्तिराजें मार्ग दाविला सोज्वळ ।
बापरखुमा-देविवरुविठ्ठल
दिनाचा दयाळ ॥६॥

अर्थ:-

मी मागच्या जन्मामध्ये पापाचरण केले, त्यामुळे हा जन्ममरणाचा विस्तार झाला जन्माला आल्यानंतर नाशिवंत विषय सुख भोगण्यामुळे ते पाप अधिकच वाढत गेले. त्यामुळे अंधकाराने डोळे कोंदुन गेले. व चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरता फिरता दुःख भोगावे लागले. आणि आत्मज्ञानाची दृष्टि नसल्यामुळे दोन्ही नेत्र आंधळ्या सारखे झाले. परमभाग्यवान जे निवृत्तिराय ते अत्यंत परोपकारी असून आत्मज्ञानशून्य पुरुषाला आत्मज्ञान दृष्टि देणारे आहे. म्हणून मी त्यांच्या नावांचा वारंवार जप करतो. त्यांच्या ठिकाणी सहज असलेला आत्मज्ञानाचा धर्म माझे ठिकाणी जागृत होवो. संसार हा दुःखमूळ असून त्रिविध तापाचे इंगळ त्यांच्या भोवती पसरले आहे. त्यामुळे जीवांना क्षणमात्र कोठेही विश्रांती नसल्यामुळे रात्रंदिवस तळमळ लागलेली असते काम क्रोध लोभरुपी ओढाळ कुत्री पाठीस लागलेली असल्यामुळे अशा स्थितीतून सुटण्यांकरिता मी कुणाला शरण जाऊ? कि ज्यामुळे ते मला आत्मस्वरुपाविषयी निर्मळ दृष्टि देतील. वास्तविक विचार केला तर आई बाप बहिणी हे अंतःकाळाच्या वेळेला उपयोगी पडत नाही. इष्ट मित्र सोयरे धायरे हे आपले येथे जोपर्यंतच आपला सुखाचा व्यवहार चाललेला आहे. तोपर्यंतच जमतात मी मात्र संसारिक दुःख( जन्ममरणाचे दुःख) एकटाच भोगीत असून कुंभपाकादि नरकाच्या जाचणीत मला एकट्याला दुःख भोगावे लागते. त्या दुःखातून सोडवणारा जर कोणी असेल तर ते एक श्रीगुरुच आहेत. माझे भाग्य धन्य आहे. कारण मायबाप जे साधुसंत त्यांनी मला कृपादान करुन पंढरीच्या यात्रेला नेले त्याठिकाणी चंद्रभागेचे स्नान घडले. पुंडलिक वैद्याने अज्ञानरुपी अंधत्व जाण्याकरिता पूर्वीचे औषध तयार करुन ठेवले होते. ते वैकुंठीचे मूळपीठ भगवान पांडुरंगरुपी अंजन मी डोळ्यांत घातले. ते कृष्णांजनरुपी अंजन मी डोळ्यांत घातल्याबरोबर अज्ञानरुपी दुःखबीज जाऊन संसारभ्रांतीच्या पडळातून मुक्त झालो. दीनजनांचा दयाळू असलेले माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांच्या प्राप्तीचा सोज्वळ मार्गश्रीगुरुनिवृत्तिरांयांनी मला दाखविला. असे माऊली सांगतात.


३७६
अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती ।
कर चरण विव्हळ गेले तंव भेटलें निवृत्ती ।
ज्ञान मज उपदेशिलें नेलें अज्ञानक्षिती ।
वृक्ष एक तेथें होता त्या तळीं बैसविलें रीती ॥१॥
धर्म जागो निवृत्तीचा हरिनामें उत्सावो ।
कर्म धर्म लोपले माझें फ़िटला संदेहो ।
धर्म अर्थ काम पूर्ण दान मान समूह ।
नेघे मी इंद्रियवृत्ति रामकृष्णनामीं टाहो ॥२॥
कल्पना मावळली कल्पवृक्षाचे तळवटीं ।
चिंता हें हरपली माझी नित्य अमृताची वाटी ।
मन हें निमग्न झालें नित्य वसे वैकुंठी ।
तापत्रयें ताप गेलें नाना दोषाचे थाटी ॥३॥
अनंत हें मायामय लोपल्या जिवाचिया साठी ।
हरपल्या योनीमाळा चिंतामणीकसवटी ।
सिध्दि बुध्दि समरसल्या जीवशिव एकदाटी ।
आत्माराम मन जालें एकतत्त्व शेवटीं ॥४॥
आत्माराम निर्गमलें वेदशास्त्रगुह्य ज्ञानें ।
वासनेचि मोहजाळी ते विराली नाना स्थाने ।
फुटलें नाना घट तुटलीं नाना बंधनें ।
सुटल्या जीवग्रंथी ऐसें केलें त्या गुरुज्ञानें ॥५॥
मा मोक्ष हे ठेले मागें मुक्तिमार्ग निमला ।
वृत्ति हे बुडाली माझी निवृत्ति गळाळा पाजीला ।
सत्रावी वोळली बाळा आत्माराम दाता जाला ॥६॥
बुध्दि बोध संवगडे साजीव करचरण ।
नयनीं नयन जाले चक्षु मी समाधान ।
दिव्य देह अमृत कळा दशदिशा परिधान ।
सर्व हें ब्रह्म फ़ळद फ़ळलें विज्ञान ॥७॥
निवृत्ति गुरु माझा अंधपण फ़ेडिलें ॥
सर्वत्र दृष्टी जाली परतत्त्वीं राहिलों ।
निरसली माया मोहो श्रीराम अंजन लेईलों ।
ज्ञानदेवो ज्ञानगंगे निवृत्तिनें बुडविलों ॥८॥

अर्थ:-

माझ्या बुद्धिरूपी डोळ्यावर मायेचा पडळ आल्यामुळे मी आंधळा म्हणजे आत्मज्ञानशून्य झालो. परमार्थप्राप्तीचा मार्ग चालण्यास मी पांगळा झालो. हातापायाची शक्ति गेली अशा स्थितीत दयाळू श्रीगुरूनिवृत्तीराय भेटले.त्यांनीआत्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानाचा नाश करून परमात्मरूपी वृक्षा खाली बसविले.अशा श्रीगुरूंचा जयजयकार असो हरिनामाच्या गजरांत माझा सर्व कर्म धर्माचा लोप होऊन आत्मस्वरूपाविषयी संदेह नाहीसा झाला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे पुरूषार्थरूपी दान मला प्राप्त झाले. ह्यामुळे मी इंद्रिय विषयांच्या नादी न लागता फक्त हरिच्या नामाचा टाहो फोडीत राहीन.कल्पवृक्षाप्रमाणे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा जो परमात्मा त्याने माझ्या सर्व कल्पना नाहीशा केल्या. तसेच चिंता नाहीशी झाली. कारण हरिनामरूपी अमृताची वाटी तोंडास लावली आहे. मन हरिनामांत रंगून गेले. त्यामुळे नित्य वैकुंठ जो परमात्मा तेथे वास झाला आणि अनंत दोषांचे समुदाय व अध्यात्मादि तीन तापही नाहीसे झाले.माझ्या अध्यात्मदृष्टीने मायामय जगतांच्या राशी नाहीशा झाल्या.अनेक योनींचा फेरा चुकला. चिंतामणी जो आत्मा तो माहित झाला व त्यात रिद्धिसिद्धि लय पावल्या जीवशिवाचे ऐक्य झाले. आणि अद्वितीय तत्त्व जो आत्माराम तद्रुपच मन झाले. वेदशास्त्रांच्या गुह्यज्ञानाने शुद्ध आत्मस्वरूप अनुभवास आले. त्यामुळे अनेक विषय वासना, अनेक जन्माची बंधने शुद्ध सच्चिदानंद आत्मा आणि अनात्मा अंतःकरण यांचे ऐक्य समजून अनेक जन्म मारलेली जी गाठ, श्रीगुरूपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने सुटली. कल्पित बंधासंबंधी आत्मस्वरूपावर आरोपित मोक्ष किंवा मुक्ति हा व्यवहारही संपला प्रवृत्ति नष्ट झाली. सतरावी आत्मानंदाची कळा प्राप्त करून देण्यास श्रीगुरू दाता भेटला बुद्धि आणि आत्मबोध यांची मैत्री जमली. हातपाय सजीव झाले. आत्मस्वरूपाविषयी आंधळा होतो. त्या मला डोळे आले. सर्व दश दिशा आनंदरूप झाल्या श्रीगुरूंनी फलद्रुप ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यामुळे हे सर्व ब्रह्म झाले. माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझे आंधळेपणा नाहीसा केल्यामुळे एक परमतत्त्वांच्या ठिकाणी दृष्टि राहिली.डोळ्यांत श्रीरामरूपी अंजन घातल्यामुळे माझा मायामोह नष्ट झाला. श्रीगुरूनिवृत्तिरायांनी मला ज्ञानगंगेतच बुडवून टाकिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


कीर्तनपर – अभंग ३७७ ते ४०४

३७७
दसविये द्वारीं वोहट पडिला ।
नेणता पैं गेला पाहावया ॥१॥
अवचिती वाट सांपडली पंथें ।
ब्रह्मनाम तेथें आलें हातां ॥२॥
ज्ञानदेवा गीती निशाणी नाम ।
समाधि संजिवनीं तारक हरि ॥३॥

अर्थ:-

दहा इंद्रियांची दहा द्वारे ओस पडली व त्याला पहायला मन धावले. ते ब्रह्मनाम अवचित कळले व निजपंथाची वाट सापडली.ते नामच संजिवन समाधी पर्यंत पोहचवते तेच नाम मी गात आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


३७८
भावाचेनि बळें घेतलें वैकुंठ ।
हरिनाम नीट वैकुंठ मार्ग ॥१॥
सोपें हो साधन साधावया लागी ।
नलगे उपाधि नाना मते ॥२॥
ज्ञानें सहित ज्ञान विज्ञानेसि धन ।
वृत्तीचें समाधान निवृत्ति करी ॥३॥
शांति दया क्षमा करुणानिधी प्रेमा ।
नेऊनि परब्रह्म भावें मिळती ॥४॥
ज्ञानदेवो सांगे भावो मिनला गंगे ।
सुस्त्रात सर्वांगें हरी गंगा ॥५॥

अर्थ:-

हरिनामाचा सरळ वैकुंठमार्ग आहे. भावाच्या बळावर नामाने वैकुंठ साधता येते. सोपे असलेले नामसाधन असुन त्यासाठी वेगळा उपाधी व मते असणे गरजेचे नाही. त्यामुळे ज्ञानाचे ज्ञान व संसाराचे विज्ञान समजते असे सांगुन निवृत्तिनाथ वृत्तीचे समाधान करतात. दया क्षमा शांती करुणा व प्रेम ह्या सर्व भावांचे एकत्रित करुन नाम घेतले तर परब्रह्म प्राप्त होते. असा भाव एकत्रित मनावर बिंबवल्यामुळे त्या नामगंगेत मी सर्वांग स्नान करुन घेतले असे माऊली सांगतात.


३७९
आलिया जवळा भक्तिसुख देखे ।
पालव पोखे वाणिव भोगी ॥१॥
तें सुख आम्हां विठ्ठलचरणीं ।
निवृत्ति करणी व्यासाचिये ॥२॥
जप तप ध्यान क्रिया कर्म धर्म ।
रामकृष्ण नेम गुरुभजनें ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे संसार निरसी ।
अखंड मानसीं विठ्ठल हरी ॥४॥

अर्थ:-

भक्तिचा आनंद काय असतो व तो कसा भोगायचा तर संतांच्या जवळच जावे लागते. निवृत्तिनाथ व व्यांस ह्यांच्या कृपेमुळे हे सुख मला विठ्ठल चरणाजवळ सापडते. जप तप हा ज्ञान व कर्म मार्ग आहे व त्यामुळे रामकृष्णांचे भजन गुरुकृपेने करता येते. सतत विठ्ठलाला मनात स्मरल्यास संसाराचा निरास होतो असे माऊली सांगतात.


३८०
अभाव संगती नाना भूत व्यक्ती ।
संसार पंगती मेळवी त्यासी ॥१॥
हरिनाम शोक करी अभाव कामारी ।
यातें दुरी करी हरिपाठें ॥२॥
संतांची संगती वेदश्रुतीची मती ।
घेउनियां हाती ब्रह्मशास्त्र ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नारायण नाणें ।
घेउनि पारखणें भक्तीपेठे ॥४॥

अर्थ:-

त्याच्या नामाबद्दल उदासिन असणारा जीव ज्याला श्रध्दा नाही त्याला क्षुद्र योनीत जन्म घ्यावा लागतो. हरिनाम घेत नाही त्याला दुःख प्राप्त होते व ते दुःख त्याच नामाने नाहिसे होते. संतांची केलेली संगत व श्रुतींचे महावाक्य पाहिले तर हे ब्रह्मनामशस्त्र होऊन जीवाचे रक्षण करते. त्याच नारायण नामाचे नाणे करुन भक्तीच्या पेठेत तपासुन घेत आहे असे माऊली सांगतात.


३८१
यश कीर्ति वानु नेणें मीं वाखाणू ।
रामकृष्ण आम्हां सणू नित्य दिवाळी ॥१॥
नरहरि रामा नरहरि रामा ।
पुराणपुरुषोत्तमा हरि गोपाळा ॥२॥
या नेमीं अक्रुर जाला साहाकारी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नामेंविण जो नरु ।
तो होय भूमिभारु ये संसारीं ॥४॥

अर्थ:-

भगवंताचे यश कीर्ती सारखे षडगुण आहेत त्याची वाखणी मी करु शकत नाही. रामकृष्ण नामाचा उच्चारच आम्हाला नित्य दिवाळीचे सुख प्रतिदिन देतो. नरहरि, राम, पुराणपुरष, हरि, गोपाळ या सारख्या त्याच्या नांवामुळे परिक्षितीला उपदेश व अक्रुराला बोध झाला.व तेच नाम जपल्याने तो अर्जुनाचा साह्यकर्ता झाला. जो नर ह्या नामाचा अंगिकार करत नाही तो भूमीला भार आहे असे प्रतिपादन माऊली करतात.


३८२
प्रीतीवींण फ़ळ केंविं लाहे प्राणी ।
जैसा चातक धरणीं उपवासु ॥१॥
वोळलिया मेघ सावधु बोभाये ।
बिंदुमात्र घेई जीवन देखा ॥२॥
तैसें केंवि घडे संसारिया चित्तें ।
प्राप्तीच्या अर्थातें साहे संत ॥३॥
सगुण निर्गुण समस्त आहे ।
विरुळा येथें साहे समता बुध्दी ॥४॥
जंववरी समान शांति बुध्दि हे ठेली ।
तंववरी हे भूली बोली कैसी घडे ॥५॥
दिन काळ पळ स्मरण नामाचें ।
विरुळा या मंत्राचें करी पठण ॥
ज्ञानदेव म्हणे नामया हें तूं
गा जाणसी ।
भजन केशवासी तूंचि तुझा ॥६॥

अर्थ:-

पावसाचे पाणी वरच्यावर चोचीत घेऊन चातक आपली तहान भागवतो. तदवत नामाची प्राप्ती करुन घेतल्या शिवाय फळ कसे मिळेल. जेंव्हा तो मेघ वृष्टी करण्यासाठी परततो तेंव्हा तो चातक सावध होऊन त्याची वाट पाहात बसतो. त्या प्रमाणे संसाराच्या तापातुन वाचण्यासाठी संतांकडुन नाममहावाक्य मिळावे ह्या साठी जीव कसा व कधी सावध होणार? सगुण व निर्गुण रुपाने तो परमात्मा सर्वत्र आहे पण त्याला पाहायला ही समता बुध्दीनेच पाहता येते. जो पर्यंत ही समता बुध्दी मिळत नाही. तो पर्यंत त्याची संसारावरची बुध्दी व भुल कशी उतरेल. नित्यनेमाने रांत्रंदिवस नामाचे चिंतन करणारा जीव विरळ आहे. असे नामभजन करण्याचे नामदेवराय जाणतात म्हणुन तुम्ही सतत भजन करत असता असे ज्ञान माऊली सांगतात.


३८३
निज तेज बीज नाठवें हे देहे ।
हरपला मोहो संदेसीं ॥१॥
काय करुं सये कोठें गेला हरी ।
देहीं देह मापारी हरी जाला ॥२॥
विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं ।
चिद्रुपीं हे वृत्ति बुडीयेले ॥३॥
गुरुलिंगी भेटीं निवृत्ति तटाक ।
देखिलें सम्यक समरसें ॥४॥
दत्तचित्तवृत्ति ज्ञेयज्ञानकळा ।
समाधि सोहळा विष्णुरुपीं ॥५॥
ज्ञानदेव गाय हरि नामामृत ।
निवृत्ति त्त्वरित घरभरी ॥६॥

अर्थ:-

सर्व जगताला अधिष्ठान जे हे तुझे तेजबीज ब्रह्मस्वरूप त्याचे ठिकाणी संशयासह वर्तमान देहसंबंधी मोह हारपून गेल्यामुळे त्याचा आठवही होत नाही. काय करू रे बाळा ! आतां तुझ्या देहाच्या जन्ममरणाचा मापारी. हरिच झाला आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी जन्ममरण नाहीच. विदेहरूप गंगासुद्धा तुझ्या देहांत परकी झाली. म्हणजे ती विदेहवृत्ति चिद्रूपातच बुडूनी गेली. तुला उपदेश कर्ता जो मी त्याच्या तटाकावर उभे राहन म्हणजे त्याची सहायता घेऊन सम्यक् प्रकारे गुरूलिंगाचे तुला दर्शन झाले. माझ्या उपदेशाकडे तूं चित्तवृत्ती दिलीस म्हणून ज्ञेय, ज्ञान, समाधी, इत्यादिकांचा सोहळा विष्णुरुप झाला. हरिनामामृताचे मी गायन केल्यामुळे माझे निवृत्तीनाथ फार संतुष्ट झाले असे माऊली सांगतात.


३८४
कापुरें परिमळु दिसे वो अळुमाळु ।
हळु हळु सुढाळू पवनपंथें ॥१॥
पवनीं न माये पवनही धाये ।
परतला खाय आपणासी ॥२॥
मुखवात नाहीं तरसते बाहीं ।
नावें दिशा दाही आप घोष ॥३॥
ज्ञानदेवा मौन्य नामाचें तारण ।
तारक हरिविण दुजा नाहीं ॥४॥

अर्थ:-

कापुराचा सुवास जसा हळुवार अनुभवता येतो.तसेच प्राणायाम मार्गाने हळु हळु मार्गावर जाता येते. पवनामध्ये जसा प्राण पवन असतो तसा आत्मज्ञानामुळे तो त्या प्राणालाच आपणच आपण होऊन खाऊन टाकतो. तो आत्मज्ञानामुळे सर्वत्र तोच आहे हा भाव मुखाद्वारे घेऊन त्यासाठी तरसत बसत नाही. व त्याचा भाव त्याला सांगत असतो दाही दिशाना तोच भरुन उरला आहे. मौन होऊन त्या नामात रत झाले की तेच तारक होते व त्या हरिनामाशिवाय तारणारे काहीच नाही असे माऊली सांगतात.


३८५
श्रवण त्त्वचा चक्षु जिव्हा घ्राण ।
दशहि इंद्रिये जाण हरीच्या ठायीं ॥१॥
अवघा हा गोविंदु अवघा हा मुकुंदु ।
अवघा हा विद्वदु भरला दिसे ॥२॥
पतीतपावन नामे दिनोध्दारण ।
स्मरलिया आपण वैकुंठ देतु ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हें पुंडलिक जाणे ।
अंतकाळी पेणें साधीयेलें ॥४॥

अर्थ:-

पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये याची जीवाला प्राप्ती त्याच्यामुळेच होते व त्यांच्या आधारे त्याला प्राप्त करुन घेता येते.तोच अवघा गोविंद, मुकुंद होऊन जगाच्या भार सांभाळत विदगद म्हणजे तापला आहे. तोच पतीताला पावन करणारा दिनांचा उध्दार करणारा असुन भक्ताला तो उदारपणे वैकुंठ ही देतो. पुंडलिकरायांनी हाच शेवटचा मार्ग आहे हे जाणुन त्याची प्राप्ती करुन घेतली असे माऊली सांगतात.


३८६
अनंत नामाचें पाठांतर ।
रामकृष्णनाम निरंतर ।
सर्व सुखांचें भांडार ।
हरि श्रीधर नाम वाचे ॥१॥
हरिनाम गजर करा ।
येणें तूं तरसील सैरा ।
जन्म जुगाच्या येरझारा ।
खंडती एक्या हरिनामें ॥२॥
अनंत तीर्थाचे मेळ ।
साधलिया हरी नाम कल्लोळ ।
पूर्वजांसहित अजामेळ ।
उध्दरिला सहपरिवारें ॥३॥
कोटिजन्मांचे दोष ।
हरतील पातकें जातील नि:शेष ।
अंतीं होईल वैकुंठ वास ।
कोटि कुळांसी उध्दार ॥४॥
हें योगियांचें निजजीवन ।
राककृष्ण नारायण ।
येणें जगत्रय होय पावन ।
हरिस्मरण जिवासी ॥५॥
ज्ञानदेवी घर केलें ।
हरी ऐसें रत्न सांठविलें ।
शेखीं कोटिकुळां उध्दरिलें ।
हरी हरि स्मरिलें निशीदिनीं ॥६॥

अर्थ:-

परमात्म्याची अनंत नामे आहेत पण निरंतर रामकृष्ण हेच सुखाचे भांडार असुन मुखात श्रीधराचे नाम सतत यावे.ह्या हरिनामाचा गजर करुन तु सैराट राहणारा तरशील तुझ्या जन्मोजन्मीच्या येरझारा एका हरिनामामुळे संपतील.एका हरिनामात अनंत तीर्थे एकत्रीत आहेत व त्याच नामामुळे पुर्वजांसहित परिवारासह पापी अजामेळा तरला. कोटी जन्माचे पाप जाईल व अनंत पातकांचे हरण निशेष होईल व त्याच योगे कोटी कुळांचे उध्दारण होऊन वैकुंठ प्राप्त करु शकतील.ह्या हरिस्मरणामुळे त्रिभुवन पावन होईल. रामकृष्ण नारायण ह्या नामामुळे तो योग्यांचे जीवन झाला आहे. घर करुन त्यात हरिनामरत्ने साठवली व दररोज हरिनामाचे स्मरण करुन कोटी कुळांचे उध्दरण करुन घेतले असे माऊली सांगतात.


३८७
पदपदार्थ संपन्नता ।
व्यर्थ टवाळी कां सांगता ।
हरिनामीं नित्य अनुसरतां ।
हें सार सर्वार्थी ॥१॥
हरिनाम सर्व पंथीं ।
पाहावें नलगे ये अर्थी ।
जें अनुसरलें ते कृतार्थी ।
भवपंथा मुकले ॥
कुळ तरलें तयाचें ।
जींही स्मरण केलें नामाचें ।
भय नाहीं त्या यमाचे ।
सर्व ग्रंथीं बोलियेलें ॥३॥
नलगे धन नलगे मोल ।
न लगति कष्ट बहुसाल ।
कीर्तन करितां काळ वेळ ।
नाहीं नाहीं सर्वथा ॥४॥
हरि सर्व काळ अविकळ ।
स्मरे तो योगिया धन्य केवळ ।
त्याचेनि दर्शनें सर्वकाळ ।
सफ़ळ संसार होतसे ॥५॥
ज्ञानदेवी जप केला ।
मन मुरडुनी हरि ध्याइला ।
तेणें सर्वागीं निवाला ।
हरिच जाला निजांगें ॥६॥

अर्थ:-

वेदांची पद संपन्न आहेत पण व्यर्थ त्यांची टवाळी का सांगायची हरिनामाला नित्य अनुसरले तर त्याचे हे सार सर्वार्थाने आहे. वैदिक धर्माच्या अनेक पंथात हरिनामाचे महत्व सांगतात व त्यामुळे एकच शास्त्रविचार आहे तो म्हणजे हरिनाम व ज्यांनी तो विचार अनुसरला ते कृतार्थ झाले व भवपंथात अडकले नाहीत.ज्यांनी हरिनामाचे स्मरण केले त्यांना यमाचे भय राहिले नाही त्यांची कोटीकुळे तरली असे ग्रंथ उच्चारवाने सांगतात.हरिकीर्तनाला ना धन लागते ना मोल द्यावे लागते व कष्ट ही करावे लागत नाहीत. त्या हरिनामात कोणतेही व्यंग नाही व जे योगी ते घेतात ते धन्य होतात. त्यांचा संसार सुफळ होऊन त्यांना नित्यदर्शन प्राप्त होते.ज्याने मनाला मुरड घालुन हा जप केला तो सर्वांगाने निवाला नव्हे नव्हे हरिरुप झाला असे माऊली सांगतात.


३८८
त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण ।
त्याचे विस्मरण हरिप्रेमें ॥१॥
निवृत्ति सांगे हरीनामगंगें ।
जालासि सर्वागें गंगोदक ॥२॥
पाणिपाद चित्तवृत्ति हे बुडाली ।
देहीं गेहा गेली प्रीति सदा ॥३॥
चक्षुद्वयतेज हरिरुपीं बिंबे ।
पृथ्वीतळ अंभ हरि दिसे ॥४॥
सुलज्ज निर्लज्ज मेघवर्णशाम ।
सांवळा सप्रेम गुणग्राह्य ॥५॥
थोडेनि आतुडें सडेनि पदार्थें ।
येतु असे अर्थे ह्रदयामाजी ॥६॥
नाम मंत्र रुप इतुकेन संकेत ।
देतुसे अर्थ दीनाचा दाता ॥७॥
बापरखुमादेवीवरुविनत सोपारा ।
मरणाच्या येरझारा दुर केल्या ॥८॥

अर्थ:-

विकल्पाने त्रिपदा किंवा चतुष्पदा गायत्रीमंत्राची उपासना श्रीहरिचे ज्ञान करून देते. त्याश्रीहरिच्या प्रेमामध्ये मी रंगून गेल्यामुळे मला गायत्री मंत्राच्या उपासनेचे विस्मरण होऊन गेले. कारण असा सिद्धांत आहे की साध्य सिद्ध झाल्यावर साधनाची आवश्यकताच राहात नाही. निवृत्तीरायांनी मला हरिनाम गंगेचे महत्व सांगितले मात्र तो मी सर्वांगाने गंगोदकच झालो. त्यामुळे इंद्रिये किंवा देंह या सर्वांचा लय देंही जो परमात्मा त्यांत झाल्यामुळे त्याचे ठिकाणी नित्य प्रीति राहिली. चक्षुद्वयांत दिसणारे तेज, पृथ्वीचा आश्रय जे उदक ते सर्व हरिरूपच दिसू लागले. सुलज्ज म्हणजे सगुण, निर्लज्ज म्हणजे निर्गुण सर्व गुणांचा ग्रहण कर्ता जो श्रीकृष्ण परमात्मा तो सर्व पदार्थाचा त्याग करून अगदी मोकळा झाला असता थोडक्यातच स्वस्वरूपाने हृदयांत प्रगट होतो. या सर्वांचे मुख्य वर्म नाममंत्र हे आहे. एवढ्या संकेताने दीनांचा दाता जो श्रीगुरूनिवृत्तिराय तो सर्वाना नाममंत्राचे दान देत आहे. त्यांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी नम्र होण्याचा सोपा मार्ग दाखवून देऊन सर्वांच्या जन्ममरणाच्या येरझारा नाहीशा केल्या.


३८९
सर्वव्यापक सर्वदेहीं आहे ।
परि प्राणियासि सोय नकळे त्याची ॥१॥
परमार्थ तो कडु विषय तो गोडु ।
तया अवघडु संसार ॥२॥
नामाचें साधन जिव्हे लावी बाण ।
तया अनुदिनीं जवळी वसे ॥३॥
धारणा धीट जरि होय विनट ।
तया प्रेमें वैकुंठ जवळी असे ॥४॥
सुलभ आणि सोपारें केलेंसे दातारें ।
आम्ही एकसरें उच्चारिलें ॥५॥
ज्ञानियासि ज्ञान ज्ञानदेवि ध्यान ।
कलिमळ छेदन नाम एक ॥६॥

अर्थ:-

तो सर्व देहांत व सर्व देहांना व्यापणारा आहे पण प्राणी हे जाणत नाहीत. ज्याला परमार्थ कडु व विषय गोड वाटतात त्याला संसार अवघड आहे. जिव्हारुपी धनुष्याला नामरुपी बाण लावला की तो सतत जवळ राहतो. धारणाकरुन धिटाईने नामस्मरण करायला लागला की त्याच्या जवळ प्रेमवैकुंठ येते.आम्ही सतत त्याचा नामघोष केल्याने त्या दाताराने सर्व काही सुलभ व सोपे करुन टाकले आहे. ज्ञान्यांचे ज्ञान जे ज्ञानेश्वरांचे ध्यान आहे त्याच्या उच्चारणामुळे कलीच्या मळदोषाचे छेदन होते असे माऊली सांगतात.


३९०
अळुमाळु सोयरा तळीचि धाय ।
सत्त्वतेजें माय एकतत्त्वीं ॥१॥
तें तत्त्वसाधन मुक्तामुक्त घन ।
कृष्णनाम पूर्ण तेजीं माये ॥२॥
सोकरी पापपुण्या ठायीं आपा ।
आयुष्य मापा हरि धावें ॥३॥
ज्ञानदेव गीत सांगतसे नित्य ।
कृष्णकृष्ण सत्य इतुकें सार ॥४॥

अर्थ:-

सत्वतेजाची प्राप्ती एकतत्व हरिनामाने हळुवारपणे मनात भक्ती उत्पन्न केल्यावर होते. ते कृष्णनाम हे पुर्ण तेजरुप असुन तत्वसाधन आहे त्यामुळे मुक्त होता येते. ह्या हरिनामाने पापपुण्यांचे पाणी होऊन जाते व भक्ताच्या उरलेल्या आयुष्याचे रक्षण करण्यासाठी तो हरि स्वतः धावत येतो. तेच कृष्णनाम सत्य व सार असुन त्याचे नित्य गायन केले असे माऊली सांगतात.


३९१
तिहीं त्रिगुणीं वोतिलें त्रिपुटिसि गोंविलें ।
आणुनी बांधिलें चर्मदेहीं ॥१॥
न सुटतां शिणताहे भवति वास पाहे ।
प्रपंच मोहताहे काय करुं ॥ध्रु०॥
कृष्णनाम मंत्रु सुटे ।
विषय पप्रंचु तुटे ।
मोहनमुद्रा निघोटे वैकुंठ रया ॥२॥
सावधपणे विरुळा जाणें तेथिंचि कळा ।
विज्ञानपणें सोहळा निमथा गातुं ॥३॥
ज्ञानदेव सांगतु हरि पंथें मुक्तिमातु ।
एकतत्त्व सांगातु जनींवनीं ॥४॥

अर्थ:-

सत्वरजतम ह्या गुणांनी, ज्ञानज्ञाताज्ञेय ह्या त्रिपुटीना एकत्र बांधुन चर्मरुपी शरिरात गोवले.ह्यातुन सुटण्यासाठी फुकटचा शिणतो, इकडेतिकडे पाहत वाट पाहतो तसातसा तो त्या मोहरुप संसारात गुंतत जातो त्याला मी काय करु.कृष्णनाम मंत्राच्या जपाने प्रपंच सुटतो विषय दुर जातात व वैकुंठ प्राप्त होते. हे करणारे सावध होऊन नामजपाची कला आत्मसात करतात असे विरळच आहेत त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त होऊन मोक्षाचे सोहळे भोगता येतात. सर्व जनांत वनांत मी ह्या एकतत्वाने घेतलेल्या नाममंत्राने मुक्ती प्राप्त होते असे माऊली सांगतात.


३९२
जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री ।
तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥
धन्य कुळ तयाचें रामनाम हेंची वाचे ।
दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणतांची ॥२॥
कोटीकुळाचें उध्दरण मुखीं राम नारायण ।
रामकृष्ण स्मरण धन्य जन्म तयाचें ॥३॥
नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी ।
तप केलें असेल कोडी तरिच नाम येईल ॥४॥
ज्ञानदेवीं अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा ।
कुळ गेलें वैकुंठा हरि हरि स्मरतां ॥५॥

अर्थ:-

जन्मजन्मातंरीची पुण्याई असेल तरच श्रीरामाचे नांम जिव्हाग्री येते. श्रीराम असे म्हणताच त्याचे जन्माचे दोषांचे हरण होते. रामनाम वाचेने घेतले की त्याचे कुळ धन्य होते. मुखात राम नारायण ही नामे घेतली तर कोटी कुळे उध्दरतात व रामकृष्ण नामाच्या स्मरणाने त्याचा जन्म धन्य होतो. त्या नामाची सांगड बांधली, अर्धक्षण ही नामाशिवाय न राहता तप केले तरच नाम मुखात येते. हरिस्मरण करता करता पुर्वज वैकुंठाला गेले. माझा मोठा अभ्यास नामस्मरण करताना होतो असे माऊली सांगतात.


३९३
अढळ सप्रेम उपरति पावो ।
हरि हरि घेवो तारक नाम ॥१॥
संवगडे वागणें हरिपंथीं चालों ।
हरि हरि बोलों दिननिशीं ॥ध्रु०॥
पाहाते निमते सरे हंसि गति ।
हरिची पंगति जेऊं बैसों ॥२॥
ज्ञानदेवो सांगे रामकृष्ण आशा ।
संसार पिपासा दुरी करी ॥३॥

अर्थ:-

जीवाचे सर्वात जास्त प्रेम संसारात असते त्या पासुन जीव परावृत्त होवो व तारक असणारे हरिनाम घेवो.हरिनाम घेणारे संवगडी बरोबर असतील तर तो सुध्दा हरिनाम दिवसरात्र घेईल. हंसचाली प्रमाणे हरिनाम घेतले तर त्या हरिच्या पंगतीचा लाभ होतो. संसाराच्या इच्छेचा शेवट रामकृष्णनामाच्या आशेने होतो असे माऊली सांगतात.


३९४
कापुराचें कलेवर घातलें करंडा ।
शेखीं नुरेंचि उंडा पाहावया ॥१॥
मा ज्योतिम मेळे कैसा उरेल कोळिसा ।
भावें ह्रषीकेशा भजतां ऐसें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी ।
नाम यज्ञें मिठी दिधलीया विरे ॥३॥

अर्थ:-

हवेत विरणाऱ्या कापुराचे अलंकार बनवुन हजरी करंड्यात जपुन ठेवले तरी ते विरुन जातात. तसेच कोळश्यानी अग्नी जवळ केला की कोळसेपणा राहात नाही तद्वत जीवाने हृषीकेशाचे भजन केले की जीवपणा राहात नाही. जीवपणात सर्वात खोटी वासना आहे परंतु नामयज्ञाची मीठी जीवाला पडली की ती वासना जीवपणा सकट नष्ट होते.


३९५
सुकुमार वेल्हाळ रुपें पै सुंदर ।
तो़चि पै आगर नंदाघरीं ॥१॥
अवघ्या सुख देतु अवघ्या विदटे ।
अवघेंची पेठे हरिनाम ॥२॥
यापरि आगरु कृष्णनाम ठसा ।
वोतला सरिसा भाग्ययोगें ॥३॥
बापनिवृत्तिराज उपदेशिती आम्हां ।
ज्ञानदेवा महिमा नामें आली ॥४॥

अर्थ:-

सुकुमार, वेल्हाळ असा सुंदर परमात्मा हाच त्या नंदाच्या घराचे आगर आहे. तो दिवटा बनुन सुखपथाचा हरिनामीमार्ग भक्तीच्या बाजारापर्यंत दाखवतो. हाच हरिनामाचा ठसा भाग्ययोगाने आमच्या वर ओतला गेला आहे. निवृत्तिनाथांनी पित्याप्रमाणे केलेल्या उपदेशामुळे तो नाम महिमी मला माहिती झाला असे माऊली सांगतात.


३९६
ज्याचेनि तेजें तेजस रविग्रह ।
त्याचेनि मोह निरसती ॥१॥
तें नाम परिकर कृष्णचि सुंदर ।
वैकुंठींचे घर आम्हीं केलें ॥ध्रु०॥
जपतां नाम स्मरतां पैं हरि हरि ।
प्रपंच बाहेरी कृष्णनामें ॥२॥
निवृत्ति सांगे ज्ञाना कृष्णचि नयना ।
सर्वां सर्वत्र पान्हा कृष्णरुपें ॥३॥

अर्थ:-

ज्याच्या तेजाने सुर्य चंद्र प्रकाशित होतात त्याच्या नामस्मरणांने मोहाचा निरास होतो.तेच पावन नाम घेत घेत आम्ही त्या वैकुंठालाच आमचे घर बनवले.त्या कृष्णनामाचा जप करत आम्ही प्रपंचाचा निरास केला. निवृत्तिनाथ सांगतात ज्ञाना त्या कृष्णाची नजर पडली की त्या कृष्णनामाचा प्रेमपान्हा सर्वत्र जाणवतो. असे माऊली सांगतात.


३९७
समरसें घटु विराला विनटु ।
एक्या रुपें पाटु गेला सांगसी ॥१॥
कृष्ण कृष्ण वाट सांपडली नीट ।
जिव्हेसी घडघडाट इंद्रियें सहित ॥ध्रु०॥
चिंतिला पद्मासनीं आत्मराजु ॥२॥
ज्ञानदेवा चित्त कृष्णध्यानीं रत ।
जन्मजरामृत्यु हारपले ॥३॥

अर्थ:-

जीवरुपी घट ज्ञानामध्ये विरुन जातो.तसेच आडव्या उभ्या धाग्यांचा पट कापड रुप प्राप्त झाले की धाग्यांचे एकत्वच दिसते. त्या कृष्ण नामाचे सतत पठण जिभेने केल्यांने सर्व इंद्रियांना ही ती सवय लागली. आत्मराज जीव पद्मासन घालुन त्या नामाचे चिंतन करु लागला की मनाला मोहिनी पडुन समाधीच्याअवस्थेत ध्यान पोहचते.चित्त कृष्ण नामात रत झाले की जन्म मृत्यूचे भय उरत नाही असे माऊली सांगतात.


३९८
सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण ।
धृति धारणा घन वर्ते जया ॥१॥
सामान्यत्त्व हरी समसेज करी ।
चित्त वित्त घरीं हरिपाठें ॥२॥
आकारीं निराकारीं त्रिपंथ शेजारी ।
हरि भरोवरी घेतु विरुळा ॥३॥
ज्ञानदेवा जिणें अवघें ज्ञान होणें ।
विज्ञानीं राहणें गुरुकृपा ॥४॥

अर्थ:-

सर्वत्र समान व भावयुक्त राहुन जर नाम घेतले तर धर्माचे धारण होते व नामधनाचा वर्षाव होतो. ह्या हरिपाठामुळे हरि सामान्य होऊन त्याच्या बरोबर सम सेज करतो म्हणजे जागृत अवस्थेत तसेच झोपेतही बरोबर राहतो व त्याचे चित्त व वित्त सगळेच हरिरुपाला प्राप्त होते. निराकारातील त्रिगुण व मायेतील जगताचा आकार ह्यांना बाजुला सारुन हरिनामात रतणारा विरळाच असतो. असे हे ज्ञान प्राप्त झाले की सहज संसाररुपी विज्ञानात राहण्याची बाधा गुरुकृपेने दुर होते असे माऊली सांगतात.


३९९
सावळिये तेजीं भक्ति पसु बोल ।
इंद्रिया शरण रजीं ॥१॥
निवालों वो माये अमृतरसनें
रामनामपेणें वैकुंठींचें ॥२॥
आळवितां सगुण निर्गुणरुपडें ।
वचनें फ़ाडोवाडें हातां येत ॥३॥
ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज ।
निवृत्तीनें गुज सांगितलें ॥४॥

अर्थ:-

सावळ्या तेजामुळे मनाला भक्तीची ओल येते. तसेच इंद्रिये त्याच्या चरणावर अर्पण होतात. मी त्याच नामाच्या अमृत वाणीने शांत झालो व त्याच नामाने वैकुंठ प्राप्त केले.त्याच्या सगुण व निर्गुण रुपाला भक्तीने आळविले तेव्हा तो उघड रितीने प्राप्त झाला. निवृत्तिनाथानी मला नामज्ञानांजन घातले व गुह्य ज्ञान दिले असे माऊली सांगतात.


४००
समाधिसाधनसंजीवन नाम ।
शांति दया सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पै शांति निवृत्तिदातारु ।
हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥२॥
शम दम कळा विज्ञान सज्ञान ।
परतोनि अज्ञान नये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट ।
भक्तिमार्ग नीट हरिपंथी ॥४॥

अर्थ:-

ज्ञानेश्वर माऊली नाम हेच संजीवन समाधीचे साधन आहे व जो हे नाम घेतो त्याला शांती,दया व सर्वाभूती समता प्राप्त होते. निवृत्तिनाथांनी उदार होऊन मला शांतीची शांती,परमोच्च शांती दिली व ती प्राप्त करण्याचा हरिनाम मंत्र दिला. शम-दमादी सर्व कला,विज्ञान व ज्ञानाचे समत्व करणारे ब्रह्मैक्य मला प्राप्त झाले.समाधीची सिध्दी प्राप्त करणारा हा हरिनामाचा भक्तीपंथ मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.


४०१
परेंसि परतें स्वरुप या हरिचे ।
भक्तिमार्ग साचे विरुढे रुप ॥१॥
चला जाऊं पाहूं आत्मराज घटीं ।
नामें नेतु तटीं वैकुंठीचिया ॥२॥
समाधि विधान हरिपाठगुण ।
उगीयाचि मौन असिजे रया ॥३॥
ज्ञानदेव निवृत्ति पुसों जाये भाव ।
तंव तेणें स्वयमेंव दाविले डोळा ॥४॥

अर्थ:-

भक्ती मार्गाने गेले की परे हुन परते असणारे हरिस्वरुप निश्चयांने स्पष्ट दिसते. त्या जीवरुप घटात पाहिले की ते नाम पैलतीराचे वैकुंठच देते. त्या समाधी सौख्याची प्राप्ती करण्यासाठी निवांत मौन ठेऊन हरिस्मरण करत बसा. मी श्री गुरु निवृत्तिनाथांना हरिप्रातीचे उपाय विचारला तेंव्हा त्यांना हा नामाचा मार्ग माझ्या डोळ्यांना दाखवला असे माऊली सांगतात.


४०२
त्रिभुवनीचें सुख एकतत्त्व विठ्ठल ।
नलगे आम्हां मोल उच्चारिता ॥१॥
विठ्ठल उघडा मंत्र कळिकाळा त्रास ।
घालुनियां कांस जपों आधीं ॥२॥
सत्त्वर सत्त्वाचे जपती नामावळी ।
नित्यता आंघोळी घडे रया ॥३॥
बापरखुमादेविवरु जिव्हाळा ह्रदयीं ।
जीवाचा जीव ठायीं एकेपाती ॥४॥

अर्थ:-

त्रिभुवनाचे सुख असणारा श्री विठ्ठल असुन त्याचे नाम उच्चारायला कोणतेच मोल द्यावे लागत नाही. कंबर बांधुन म्हणजे निर्धार करुन हा नाममंत्र उच्चारला तर त्याचा धाक कळीकाळाला असतो. ह्या सत्वनामाची नामावळी जपली की सुखाचे सचैल स्नान सहज घडते. सर्व जीवांच्या ठायी असणारे तेच माझे पिता व रखुमाईचे पती आहेत असे माऊली सांगतात.


४०३
कांरे स्फुंदतोसी कारे स्फुंदतोसी ।
न भजतां विठ्ठलासी नरकीं पडसी ॥१॥
पुण्यापापें बाधा न पवसी गोविंदा ।
पावशील आपदा स्मरे परमानंदा ॥ध्रु०॥
पुण्य करितां स्वर्ग पापें करितां भोग ।
नाम जपतां सर्वांग होईल पांडुरंग ॥२॥
देहीं आत्मा जंव आहे ।
तंव करुनियां पाहे ।
अंती कोणी नोव्हे धरी वैष्णवाची सोय ॥३॥
जाईल हें आयुष्य न सेवीं विषयविष ।
पडतील यमपाश वेगीं करी सौरस ॥४॥
बापरखुमदेविवरुविठ्ठलीं मनचरणी गोंवी ।
हारपला देहभावीं जालासे
गोसावी एकरुपें ॥५॥

अर्थ:-

अरे कोणत्या गर्वाने फुललेला आहेस,तो गर्व सोड विठ्ठलाचे नाव घे नाहीतर नरकात पडशील. याच गर्वामुळे पापपुण्याची बाधा होऊन गोविंद स्वरूपास प्राप्त होणार नाहीस म्हणून त्या परमानंदाचे स्मरण कर.पुण्य केलेस तर स्वर्ग मिळेल तर पाप केलेस तर जन्म भोग व नाम जपलेस तर पांडुरंग प्राप्त होईल. देहात चैतन्य आहे तोपर्यतच हे करुन पाहा. शेवटी वाचवणारे कुणी नसून संतसंगती उपयोगी पडेल.या विषयाच्या विषाचे सेवन करीत राहिलास तर यमपाश पडेल व आयुष्य संपून जाईल तेव्हा त्वरीत नाममार्ग आपलासा कर.तसे केल्याने मनास गोसावीपण मिळून तू एकरूप होशील देहभान हरपेल व माझे पिता व रखमा देवीचे पती असणारे श्रीविठ्ठल चरणावर मन गुंतव असे माऊली सांगतात.


४०४
सहज कर्मभक्ति घडावया कोठें ।
ज्ञानधन निवाडेम नाम जपों ॥१॥
नाम मात्र नमन ज्ञानघन पूर्ण ।
रामनामें कर्ण भरुं रया ॥२॥
सत्त्वाचें सागरीं उतरों पैलथडीं ।
रिति अर्धघडी जावों नेदों ॥३॥
ज्ञानदेवा चित्त अवघें धन गोत ।
रामनामें तृप्त सकळ जीव ॥४॥

अर्थ:-

परमात्म्याची सहज भक्ती करण्यासाठी व ज्ञानधन मिळवण्यासाठी नाममंत्र जप हा उत्तम कर्म मार्ग आहे. रामनामाच्या घोषाने कान भरुन गेले की त्या नामामुळे ज्ञानधन मिळते. रिकामा वेळ न घालवता नामस्मरणात रत झाले तर सत्व समुद्र पार होतो म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळतो. रामनामामुळे मी तृप्त झालो माझे चित्त त्या नामाने व्यापले व ज्ञानधन मिळाले असे माऊली सांगतात.


संत ज्ञानेश्वर गाथा २९८ ते ४०४ समाप्तशेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *