संत एकनाथ अभंग

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५० – संत एकनाथ गाथा

नामपाठ – अभंग १५३१ ते १७५०

१५३१

मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥
आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥
लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥
काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥
शरण एका जनार्दनीं । तारिले जनीं मूढ सर्व ॥५॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती

१५३२

कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी ॥१॥
न पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥
तारिती भवसिंधूचा पार । एक उच्चार स्मरणें ॥३॥
एका जनार्दनीं धन्य संत । अनाथ पतीत तारिती ॥४॥

१५३३

भाविक हें संत कृपेचें सागर । उतरती पार भवनदी ॥१॥
तयांचियां नामें तरताती दोषी । नासती त्या राशी पातकांच्यां ॥२॥
दयेचें भांडार शांतीचें घर । एका जनार्दनीं माहेर भाविकांचें ॥३॥

१५३४

संतसंगे तरला वाल्हा । पशु तरला गजेंद्र ॥१॥
ऐसा संतसमागम । धरतां उत्तम सुखलाभ ॥२॥
तुटती जन्मजरा व्याधी । आणिक उपाधी नातळती ॥३॥
संसाराचा तुटे कंद । नरसे भेद अंतरीचा ॥४॥
परमार्थाचे फळ ये हातां । हा जोडता संतसंग ॥५॥
घडती तीर्थादिक सर्व । सकळ पर्व साधतीं ॥६॥
एका जनार्दनीं संत । धन्य समर्थ तिहीं लोकीं ॥७॥

१५३५

तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥
ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥
वेदशास्त्रें देती ग्वाही । पुराणें हीं सांगती ठायीं । संत्संगा वांचुनि नाहीं । प्राणियांसी उद्धार ॥३॥
श्रुति हेंचि पैं बोलती । धरावी संतांची संगती । एका जनार्दनीं प्रचीती । संतसंगाची सर्वदा ॥४॥

१५३६

संतमहिमा न वदतां वाचा । नोहे साचा उपरम ॥१॥
वेदशास्त्रें देती ग्वाही । संतमहिमा न कळे कांहीं ॥२॥
पुराणासी वाड । श्रुति म्हणती न कळे कोड ॥३॥
योग याग वोवाळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥

१५३७

अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती ॥१॥
हा तो आहे अनुभव । स्वयमेव संत होती ॥२॥
पापतापां माहामारी । कामक्रोधाची नुरे उरी ॥३॥
एका जनार्दनीं लीन । संत पावन तिहीं लोकीं ॥४॥

१५३८

यातिहीन असो भला । जो या गेला शरण संतां ॥१॥
त्यांचें जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिहीं लोकीं ॥२॥
उत्तम अधम न म्हणती । समचि देती सर्वांसी ॥३॥
शरण एका जनार्दनीं । केलें पावन दीनालागुनी ॥४॥

१५३९

जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥
उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥
खंडे फेरा चौर्‍यांशी । धरितां जीवेंशीं पाऊलें ॥३॥
शरण एका जनार्दनीं । ते दिनमणी प्रत्यक्ष ॥४॥

१५४०

सुखदुःखांचिया कोडी । संतदरुशनें तोडी बेडी ॥१॥
थोर मायेचा खटाटोप । संतदरुशनें नुरे ताप ॥२॥
चार देहांची पैं वार्ता । संतदरुशनें तुटे तत्त्वतां ॥३॥
एका जनार्दनीं संत । सबाह्म अभ्यंतर देहातीत ॥४॥

१५४१

संत मायबाप म्हणतां । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥
मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्तीं ॥२॥
मायबापापरीस थोर । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥३॥
शरण एका जनार्दनीं । संत शोभती मुगुटमणी ॥४॥

१५४२

वैकुंठीचें वैभव । संतांपांयीं वसे सर्व ॥१॥
संत उदार उदार । देतो मोक्षांचे भांडार ॥२॥
अनन्य भावें धरा चाड । मग सुरवाड सुख पुढे ॥३॥
एका जनार्दनीं ठाव । नोहे भाव पालट ॥४॥

१५४३

मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणें संत ते ॥१॥
नाहीं सायासांचे कोड । नलगे अवघड साधन ॥२॥
नको वनवनांतरी जाणें । संतदरुशनें लाभ हातां ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतसमान देवाच्या ॥४॥

१५४४

संतांचे चरणतीर्थ घेतां । अनुदिनीं पातकांची धुणी सहज होय ॥१॥
संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हातां सहज होय ॥२॥
संतांच्या दरुशनें साधतीं साधनें । तुटतीं बंधनें सहज तेथें ॥३॥
एका जनार्दनीं संत कृपादृष्टीं । पाहतां सुलभ सृष्टी सहज होय ॥४॥

१५४५

भुक्तीमुक्तीचें माहेर । संत उदार असती ॥१॥
देव ज्यांचें करी काम । देतो धाम आपुलें ॥२॥
तया वचनाची पाहे वास । पुरवी सौसर मनींची ॥३॥
एका जनार्दनीं विनित । संतचरणरज वंदीत ॥४॥

१५४६

जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥१॥
उदारपणें सम देणें । नाहीं उणें कोणासी ॥२॥
भलतिया भावें संतसेवा । करिता देवा माने तें ॥३॥
एका जनार्दनीं त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ॥४॥

१५४७

देवतांचे अंगीं असतां विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगीं ॥१॥
जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥
वादक निंदक भेदक न पाहाती । एकरुप चिंतीं मन ज्यांचें ॥३॥
भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करितां खळ म्हणवी येर ॥४॥
संतांचे तों ठायीं ही भावना नाहीं । एका जनार्दनीं पायीं विनटला ॥५॥

१५४८

भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥१॥
तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥२॥
उपसना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥
निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥४॥
शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य संतजनीं ॥५॥

१५४९

धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥
धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥
धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥३॥
एका जनार्दनीं धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥४॥

१५५०

धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥
वाचे सदा नारायण । तेंवदन मंगळ ॥२॥
सांदोनी घरदारा । जाती पंढरपुरा आवडी ॥३॥
एका जनार्दनीं नेम । पुरुषोत्तम न विसंबे त्या ॥४॥

१५५१

परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥
तोडिती दरुशनें बंधन । करिती खंडन कर्मांचें ॥२॥
उत्तम जें नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजीं ॥३॥
एका जनार्दनीं संतपाय । निरंतर हृदयीं ध्याय ॥४॥

१५५२

ब्रह्मांडांचा धनी । तो संतीं केला ऋणी ॥१॥
म्हणोनि नाचे मागें मागें । वाहें अंगें भार त्याचा ॥२॥
सांकडें पडुं नेदी कांहीं व्यथा । आपणचि माथां वोढवी ॥३॥
एका जनार्दनीं संत । त्रैलोक्यांत मुकुटमणी ॥४॥

१५५३

आदि अंत नाहीं जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे ॥१॥
गातां गीतीं साबडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥२॥
योगियांची ध्यानें कुंठीत राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥३॥
एका जनार्दनीं संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रें ॥४॥

१५५४

ज्यांचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी जन्मांची ॥१॥
काया वाचा आणि मनें । धरितां चरण लाभ बहु ॥२॥
चौर्‍यांशीचें नाहीं कोडें । निवारें सांकडें पैं जाण ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतपूजनें लाभ बहु ॥४॥

१५५५

संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥
संतपूजेचें महिमान । वेदां न कळें प्रमाण ॥२॥
संतचरणतीर्थ माथा । वंदिती तीर्थें पैं सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं करी पूजा । पूज्यापूजक नाहीं दुजा ॥४॥

१५५६

असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें ॥१॥
काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥
सदा सर्वकाळ्फ़ संतांची करी निंदा । पापांची आपदा भोगी नरक ॥३॥
स्वमुखें आपण सांगे जनार्दन । एका जनार्दन पूजन करी सुखें ॥४॥

१५५७

संतां निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥१॥
त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥
तयांसी येऊं न द्यावें घरां । आपण जाऊं नये द्वारां ॥३॥
एका जनार्दनीं शरण । त्यांचें न पहावें वदन ॥४॥

१५५८

संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥
तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥
तयाचें वचन नायकावें कानीं । हो कां ब्रह्माज्ञानीं पूर्ण ज्ञाता ॥३॥
एका जनार्दनीं ऐसे जे पामर । भोगिती अघोर रवरव नरक ॥४॥

१५५९

संताचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन ॥१॥
जन्मोनियां पापराशी । जातो पतना नरकासी ॥२॥
सोडवावया नाहीं कोणी । पडती चौर्‍यांशी पतनीं ॥३॥
एका जनार्दनीं शरण । ऐसा अभागी खळ जाण ॥४॥

१५६०

जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥
संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥
घाला लोटांगण वण्दू पा चरण । तेणें समाधान होईल मना ॥३॥
एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥४॥

१५६१

नांदतसें नाम आकाश पाताळीं ।सर्व भुमंडळीं व्याप्त असे ॥१॥
पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें । नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥२॥
चौर्‍याशीं भोगिती दुर्मती पामर । संतांसी साचार शरण न जाती ॥३॥
एका जनार्दनीं नाम अविनाश । संतसंगें दोष सर्व जाती ॥४॥

१५६२

नरदेह श्रेष्ठ परमपावन । पावोन न करी संतसेवन ॥१॥
ऐसिया नराप्रती जाण । यम यातना करितसे ॥२॥
अपरोक्ष ज्ञान करसवटी । संतावीण नये पोटीं ॥३॥
जैसा अंधारीं खद्योत । तैसा संताविण नरदेह प्राप्त ॥४॥
मनीं विषयाचा अभिलाष । कोण सोडवी तयास ॥५॥
जनार्दनाचा एका म्हणे । संतापायीं देह ठेवणें ॥६॥

१५६३

संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥
देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥
कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनीं पदवी पावे ॥३॥
एका जनार्दनीं गूज सांगे कानीं । रहा अनुदिनीं संतसंगे ॥४॥

१५६४

संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥
संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥
दुर्जनाचे संगें दुःख प्राप्त होय । तेथें कैंचि सोय तरावया ॥३॥
एका जनर्दनीं हेंचि सत्य साचा । नको अभक्तांचा संग देवा ॥४॥

१५६५

कर्म उपासना न कळें जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥१॥
सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवेनेणिवेचें हावें पडुं नये ॥२॥
अभिमान झटा वेदांचा पसारा । शास्त्रांचा तो थारा वहातां अंगीं ॥३॥
एका जनार्दनीं सर्व कर्म पाही । विठ्ठल म्हणतां देहीं घडतसे ॥४॥

१५६६

शरण गेलियां संतांसी । तेणें चुकती चौर्‍यांशीं ॥१॥
द्यावें संतां आलिंगन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
वंदितांचरणरज । पावन देह होती सहज ॥३॥
घालितां चरणीं मिठी । लाभ होय उठाउठी ॥४॥
प्रेमें दर्शन घेतां । मोक्ष सायुज्य ये हातां ॥५॥
म्हणे जनार्दन । एका लाधलीसे खुण ॥६॥

१५६७

हरिप्राप्तीसी उपाय । धरावें संतांचें ते पाय ॥१॥
तेणें साधती साधनें । तुटतीं भवांचीं बंधनें ॥२॥
संताविण प्राप्ति नाहीं । ऐशीं वेद देत ग्वाही ॥३॥
एका जनार्दनीं संत । पूर्ण करिती मनोरथ ॥४॥

१५६८

दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥
आणिक कांहीं नाहीं चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥
नाना मंता करिती खंड । छेदिती पाखांड अंतरीचें ॥३॥
एका जनार्दनीं तेचि संत । उदार कृपावंत दयाळू ॥४॥

१५६९

संत उपाधिरहित । नाहीं तया दुसरा हेत ॥१॥
सदा मुखीं नाम वाचे । तेणें जन्माचें सार्थक ॥२॥
संग नावडे तयां कांहीं । सदा कीर्तनप्रवाहीं ॥३॥
एका जनार्दनीं चित्त । ध्यानीं मनीं संत आठवीत ॥४॥

१५७०

काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप ॥१॥
नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥
आणिकांची स्तुति नायकती कानीं । न बोलती वचनीं वायां बोला ॥३॥
एका जनार्दनीं तेचि संत तारू । भवाचा सागरु उतरिती ॥४॥

१५७१

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥
संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥
संतांची थोरीव वैभव गौरव । न कळे अभिप्राय देवासी तो ॥३॥
एका जनार्दनीं करी संतसेवा । परब्रह्मा ठेवा प्राप्त जाला ॥४॥

१५७२

दरुशनें तरती प्राणी । ऐशी आयणी जयाची ॥१॥
ठेवितांचि मस्तकी हात । देवाचि करीत तयासी ॥२॥
देउनी नाममात्रा रस । भवरोगास छेदिती ॥३॥
एका जनार्दनीं ते संत । कृपावंत दीनालागीं ॥४॥

१५७३

सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥
पापपुण्य मावळलें । द्वैत सव दुरावलें ॥२॥
हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावे विदेही ॥३॥
एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥

१५७४

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥
राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥
घेणे देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥
एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥४॥

१५७५

मान देखोनि सहसा । संतां असंतोष होय जैसा ॥१॥
नाम ऐकुनि बागुलातें । बाळ सांडु पाहें प्राणातें ॥२॥
चंडवातें ते कर्दळी । समूळ कांपे चळचळीं ॥३॥
सन्मानें नामरुप जाय । एका जनार्दनीं सत्य पाहे ॥४॥

१५७६

पवित्र तो देह सदा ज्याचा नेम । वाचे गाय राम सर्वभावें ॥१॥
धन्य ते भाग्याचा तरला संसार । परमार्थाचें घर नाम मुखीं ॥२॥
करितसे कथा कीर्तनीं आवडी । ब्रह्माज्ञान जोडी तया लाभे ॥३॥
एका जनार्दनीं धन्य तें शरीर । परमार्थ संसार एकरुप ॥४॥

१५७७

छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली ॥१॥
आपपर नाहीं जेथें । भेद तेथें नसेची ॥२॥
याती असो भलते परी । एकसरी जयासी ॥३॥
एका जनार्दनीं भाव । अवघियां ठाव एकची ॥४॥

१५७८

देहींची वासना अद्वैत निमालें । साधन साधिलें तोचि धन्य ॥१॥
द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणें कांहीं ॥२॥
एका जनार्दनीं अद्वैता वेगळा । राहिला निराळा सुखरुप ॥३॥

१५७९

सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें ॥१॥
सहजाच्या आवडी विद्या अविद्या तोडी । जाणीव नेणीवेची राहुं नेदी बेडी ॥२॥
जाणीव जाणपण नेणिवां नेणपण । दोहींच्या विंदाने सहजाचें दर्शन ॥३॥
एका जनार्दनीं जाणीव नेणीव । सहज चैतन्यासी देउनी ठेला खेव ॥४॥

१५८०

कार्य कर्ता आणि कारण । त्रिगुणेशीं त्रिपुटी शुन्य ॥१॥
अंगीं गुण आदळतां तिन्हीं गुण । जया चित्तवृत्ति नोहे भिन्न ॥२॥
ऐसा त्रिगुणावेगळां । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥३॥

१५८१

जागा परी निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ॥१॥
सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ॥२॥
संकल्पविकल्पाची ख्याती । उपजेचिना सदा चित्तीं ॥३॥
यापरी जनीं असोनि वेगळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥

१५८२

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥
आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयांचें मन उद्विग्र नव्हे ॥२॥
आपुलाची पुत्र वधोनि जाय शत्रु । परी मोहाचा पाझरु नेत्रीं नये ॥३॥
आपुलें शरीर गांजितां परनरें । परी शंतींचें घर चळो नेदी ॥४॥
एका जनार्दनीं जया पूर्ण बोधू । तोचि एक साधु जगामाजीं ॥५॥

१५८३

असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥
नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥
असोनियां अंकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें थोडे । लक्षामध्येंअ एक निवडे ॥४॥

१५८४

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥
परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥
वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥
एका जनार्दनीं ऐसें विरळे प्राणी । कोटी माजीं जनें एक देखो ॥४॥

१५८५

न मानी सन्मानाचें कोडें । नाहीं चाड विषयाची ॥१॥
ऐसें मज शरण येती । तयांचे उणें न पडे कल्पांती ॥२॥
नाहीं संसाराची चाड । नाहीं भीड कवणाची ॥३॥
एका त्याचा म्हणवी दास । धरुनी आस जनार्दनीं ॥४॥

१५८६

देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं ॥१॥
कैसेनी हरिदास भासती । देही असे तंव दोष दिसती ॥२॥
देह दिसतां न दिसे भावो । वृत्ती दिसे तंव समाधान पहा हो ॥३॥
एका जनार्दनाच्या पाही । वृत्ती दिसे तैं दोष नाहीं ॥४॥

१५८७

सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी ॥१॥
तोचि सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥
कामक्रोधाची वार्ता । अंगीं नाहीं पैं सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं निष्काम । सदा परिपूर्ण मंगळधाम ॥४॥

१५८८

मुक्तिची तो नाही चाड । ऐसे वाड हरि दास ॥१॥
मोक्षमुक्तिसी कोण पुसे । हें तों सरसें भांडवल ॥२॥
लक्ष्मीसहित देव नांदे । येरा विनोदें काय चाड ॥३॥
एका जनार्दनीं दास्य करी । मुक्ति तेथें फुका वरी ॥४॥

१५८९

संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥
त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥
तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥३॥
एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्मे अकर्मा दोंदें निघताती ॥४॥

१५९०

जयाचेचि चरणीं तीर्था तीर्थपण । तों हृदयीं केला सांठवण ॥१॥
नवल महिमा हरिदासाची । तीर्थें उपजती त्याचे कुशीं ॥२॥
काशीं मरणें होय मुक्ति । तेथें वचनें न मरतां होय मुक्ति ॥३॥
एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगतीं दिठी ॥४॥

१५९१

धन जयासीं मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥
ज्यासी नाहीं लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥
निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥
एका जनार्दन पाय धरी । भुक्ति मुक्ति नांदे घरीं ॥४॥

१५९२

साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥
जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥
ऋद्धिसिद्धि त्यांच्या दासी । भुक्ति मुक्ति पायांपाशी ॥३॥
एका जनार्दनीं साधु । जयापाशी आत्मबोधु ॥४॥

१५९३

सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया ॥१॥
जग ब्रह्मरुप जाण । हेंचि सांधुचें लक्षण ॥२॥
सर्वाभुतीं समदृष्टी । तोचि साधु इये सृष्टी ॥३॥
एका जनार्दनीं संत । नित्य साधी आत्महित ॥४॥

१५९४

ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध ॥१॥
लोभ मोह नाहीं ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥
गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥
एका जनार्दन साधु । त्याचे चरण नित्य वंदूं ॥४॥

१५९५

वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥
प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं एकरुप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥३॥

१५९६

देहीं असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥
असे अखंड समाधी । नसे कांहीं आधिव्याधी ॥२॥
उपाधीचे तोडोनी लाग । देहीं देहपणें भरिलें जग ॥३॥
एका जनार्दनीं संग । सदा समाधान सर्वाग ॥४॥

१५९७

काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥१॥
तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बधन ॥२॥
अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥
एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥

१५९८

जें जें बोले तैसा चाले । तोचि वहिलें निवांत ॥१॥
अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥
निंदा अथवा वंदा । नाहीं विषय ती बाधा ॥३॥
शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ॥४॥
एका जनार्दनीं धन्य । त्याचें दरुशन जगमान्य ॥५॥

१५९९

मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥
मान देखोनियां दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥
मी एक लौकिकी आहे । ऐसें कवणा ठावें नोहे ॥३॥
सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥
त्याचे पोटीं दृढ अभिमान । तो सदा इच्छि सन्मान ॥५॥
सन्मान घ्यावया सर्वथा । ज्ञातेपण मिरवी वृथा ॥६॥
ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥७॥

१६००

ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरीं देव राहे ॥१॥
हा अनुभव मनीं । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥
धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥३॥
अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥४॥

१६०१

आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥
वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥
अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर । वर्मी खोचले तें वीर । क्रोधादि असुर ॥३॥
सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण । एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥

१६०२

भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥
धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥
वर्णितां त्यांचें उत्तम गुण । होय जन्मांचेंखंडन ॥३॥
शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य तुमची वाणी ॥४॥

१६०३

विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां ॥१॥
धन्य धन्य हरिभक्त जगीं । वाहाताती टाळी नाचताती रंगीं ॥२॥
पेमभरित सदा करिती कीर्तन । एका जनार्दनीं वंदूं तयाचे चरण ॥३॥

१६०४

हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥
धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥
हरुषे नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥
एका जनार्दनीं शरण । वंदीन तयाचे चरण ॥४॥

१६०५

सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें ॥१॥
धन्य जन्मोनी संसारीं । सदा मनीं धरी हरी ॥२॥
रात्रंदिवस ध्यानीं मनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

१६०६

आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रुप मनीं ॥१॥
जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रुप चित्तीं ॥२॥
नसे आणिके ठायीं मन । एका शरण जनार्दन ॥३॥

१६०७

न्याय मीमांसा सांख्य पातंजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥१॥
ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचे संतजन ॥२॥
एका जनार्दनीं मन तया ठायीं । होऊनिया पायीं उतराई ॥३॥

१६०८

ऐसें जाणोनि वेदमत । संतसेवा सदोदित ॥१॥
पुराणे शास्त्रें अनुवादिती । संतसेवन दिनरातीं ॥२॥
संतचरणीं ज्यांचें मन । तयां सुखा काय उणें ॥३॥
एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥

१६०९

भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥
पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥
तुटली बंधनाची गांठी । पाय पोटीं आठवितां ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ॥४॥

१६१०

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥
ऐसें कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥
पवना घालवेल पालाण । पायीं चढवेल गगन । भुत भविष्य कळों येईल वर्तमान । परी त्य साधूचें न कळे महिमान ॥३॥
चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्ता जातां धरवेल । बाह्मा हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥
जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान । ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मुळ हे साधुजन ॥५॥
निजवृत्तीचा करवेल विरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनीं निजसाधु । त्याच्या दर्शनें तुटे भवबंधु ॥६॥

१६११

जन्म कोट्यांनीं हरिसेवा जोडे । नवविद्या भजन सांग घडे । तंव वैराग्य तें पाहें पुढें । पूर्व प्राचीन फळ रोकडें ॥१॥
ऐसें तैंच मिळती ते साधु । ज्यांचा संग करी उद्धोधु । ज्यांचा स्पर्श करी आल्हादु । ज्यांचा महिमा न कळे आनंदु ॥२॥
घडे काम कर्म परित्याग । झडे समुळ विषयांचा संग । सर्व कामना नुरे मुसमार्ग । तैं आतुडे मानवा संतसंग ॥३॥
शुद्ध सत्वगुण देहीं पाहें । दंभ अहंकार मानापमान जाये । कामक्रोध लोभ सांदी सोये । तैं भूतभाव नाहीं होय ॥४॥
जैं जनार्दनीं शुद्धभाव । स्वकर्मासी विश्रांती ठाव । ऐक्य दुजे दोन्हीं होती वाव । देहबुद्धीच भासे देव ॥५॥
जैं संतदया होय बापा । तैंचि विश्रांती त्रिविध तापा । तैंचि मिळणी होय स्वरुपा । पूर्ण एका जनार्दनीं कृपा ॥६॥

१६१२

हृदयीं नांदें संदेह मूळ । तेथें फळ विरुढें केंवी ॥१॥
जैसें बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥
योगयाग शास्त्रपाठें । वाउगी खटपटे तर्काची ॥३॥
करितां कर्म धर्म नेहटी । नोहे भेटी संतांची ॥४॥
एका जनार्दनीं त्याचा दास । सहज आस पुरतसे ॥५॥

१६१३

पुर्वपुण्य असतां गांठीं । संतभेटी होय ॥१॥
धन्य धन्य संतसंग । फिटे तग जन्माचा ॥२॥
चार सहा वंदिती पाय पैं । आणिकां ठाव कोठें नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं संत । कृपावंत सुखासिंधु ॥४॥

१६१४

बहुत जन्मांचे सुकृत । तयांसी घडत संतसंग ॥१॥
धन्य वैष्णव भुमंडळी । दरुशन मेळीं जीव तरती ॥२॥
एका जनार्दनीं विश्वास । निजदास संताचा ॥३॥

१६१५

बहु पुण्य होय गांठीं । तरीच भेटी संतांची ॥१॥
पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥
मोक्ष मुक्ति साधे फुका । ऐशी देखा संतकृपा ॥३॥
नाहीं आणिकांचें भेव । संत सदैव भेटतां ॥४॥
एका जनार्दनीं संत । पुरविती हेत सर्वही ॥५॥

१६१६

संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥
कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरीं । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति । सदा तिष्ठे अहोरातीं । कैवल्यपद येती । सामोरी तयासी ॥३॥
नाम गाती जे आनंद । हृदयीं नहीं दुजा भेद । एका जनार्दनीं छंद । तयांच मज ॥४॥

१६१७

वाट पिकली संतांची । अवघें स्वरुप मुद्दलची ॥१॥
उकल करा लवडसवडीं । मुद्दल देव घडोघडीं ॥२॥
द्वैतांची दाटणी सोडी । वासनेची वासना फेडी ॥३॥
आळ करितां सरळ सात । मन पडेल विचारांत ॥४॥
अखिल गुरुनामाचे । स्थापिले सुरंग भक्तीचे ॥५॥
अंगळू मंगळु नंद भाषा । द्वैत दळणीं वटील घसा ॥६॥
आंत बाहेर एकचि सुत । मुद्दल देतां सुखी होत ॥७॥
एका जनार्दनीं एकचि भेटी । सरिसी साठी संसारा ॥८॥

१६१८

समुद्रवलयांकित तीर्थ । स्नानें करती जे पवित्र । परी तेथें नसतां भाव । निर्फळ वाव होतसे ॥१॥
ऐसा निर्णय शास्त्री । पुराणीं सांगतसे व्यक्ति । तेचि उघड सर्वाप्रती । सांगतसें परियेसा ॥२॥
जे शुचिर्भूत शुद्धमती । ईश्वर मानिती सर्वाभूतीं । ते सर्वदा वसती तीर्थीं । तीर्थे वसती त्यांच्या संगें ॥३॥
तीर्थीं नसतां तीर्थवास । सत्य निष्ठा नित्य निर्दोष । तीर्थो वसतां पुण्यलेश । न पावे तीर्थ निंदितां ॥४॥
मत्सर निष्ठुर भूतद्वेष । भजनमार्गीचा उपहार । तीर्थें घेती त्यांचा त्रास । कीटक द्वेष त्या करिती ॥५॥
काम क्रोध लोभ माया । स्पर्श न करी जयाची काया । तो तीर्थवासी जाणे राया । तीर्थे पायां वंदितीं ॥६॥
विष्णुस्मरण शिवस्मरण । नित्य वसवी ज्यांचे वदन । तोचि तीर्थ जाण । तीर्थें चरण वंदिती ॥७॥
इंद्रिय नियमाचे आसनीं । नित्य माधुर्य बोलली वाणी । अहंकार ज्याचिये ज्ञानीं । संतचरणा सर्वथा ॥८॥
तो सकळ शिष्टांचा धात्रा । तीर्थे करिती त्याची यात्रा । पादोदकालागीं पवित्रा । तीर्थे माथा वोढविती ॥९॥
तीर्थीं असोनि इच्छारहित । प्रतिग्रहा न वोढवी हात । यथालाभें संतोषत । तो तीर्थरुप जाणावा ॥१०॥
परधनीं अंधत्व जयाचे नयना । परस्त्री पाहतां क्लीबत्व
जयाचे मना । परापवादी मूकत्व जयाचे वदना । तो जनक जाण तीर्थाचा ॥११॥
मनें इंद्रिया निग्रह करी । तो गृहीं असतां जान्हवीतीरीं । तीर्थी असो अनाचारी । तो कीटकवासी जाणावा ॥१२॥
सत्यशील दृढव्रती । आत्मभावना सर्वाभुती । क्रोधकंटका नातळे चित्तीं । तो सर्व तीर्थीं सेविजे ॥१३॥
शुद्धशीळ विद्यातीर्थीं । साधु सुस्नात सत्यतीर्थी । कुलांगना लज्जातीर्थीं । पवित्र होती जाण पां ॥१४॥
धनाढ्य निर्दोष दानतीर्थीं । पापी निष्पाप गंगातीर्थीं । क्षत्रिय राजे धारातीर्थीं । प्रक्षाळिती अघातें ॥१५॥
योगी आत्मध्यान तीर्थीं । आत्मस्वरुप स्वयें होती । श्रवणादिक नवही तीर्थी । भक्त होती हरिरुप ॥१६॥
असो या निरोपणाच्या युक्ती । जाणते अथवा हो नेणती । शरीर प्रक्षाळितां तीर्थीं । मोक्षप्राप्ति निर्धारें ॥१७॥
ऋषीश्वरीं वेदवचनीं । महा फलें कल्पीं यज्ञीं । ती यज्ञफळीं तीर्थस्त्रानीं । सकळ तीर्थें नामस्मरणीं ॥१८॥
शरण एका जनार्दनीं । सकळ तीर्थे नामस्मरणीं । घडती संतसंघटनीं । येथें संशय नाहीं ॥१९॥

१६१९

ऐसे म्हणशील कोण । ज्याचें गातां नामभिधान । देवाधि देव आपण । स्वमुखें सांगे उद्धवा ॥१॥
नारद पराशर पुंडलीक । व्यास शुक वाल्मिकादिक । ध्रुव उपमन्यु भीष्मादिक । वंद्य जाण उद्धवा ॥२॥
वासिष्ठ वामदेव विश्वामित्र । आत्रि दत्तात्रेय पवित्र । ऐसे पुण्यश्लोक सर्वत्र । ते तुज वंद्य उद्धवा ॥३॥
रघु दिलीप हरिश्चंद्र । शीभ्रीराज बली थोर । जयाचा अंकित मी निर्धार । हें तूं जाणें उद्धवा ॥४॥
पांडव माझे पंचप्राण । कायावाचा वेचिलें मन । मज निर्धारितां पूर्ण । जीव वेंचिला उद्धवा ॥५॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञाबकळा आपण । इहीं अवतार धरुन । जग तारिलें उद्धवा ॥६॥
गोरा सांवता जगमित्र । चोखा रोहिदास कबीर । हे माझे प्राणमित्र । आहेस जाण उद्धवा ॥७॥
दामा नामा जनाबाई । राजाई आणि गोणाई । येशि आणि साकाराई । जिवलग माझे उद्धवा ॥८॥
कान्हुअपात्रा जन जसवंत । हनुमंतादि समस्त । पाठक कान्हा आनंदभरित । तयाचेनि उद्धवा ॥९॥
परसा भागवत सुरदास । वत्सरा आणि कुर्मदास । एका जनार्दनीं निजदास । संतांचा मी उद्धवा ॥१०॥

१६२०

स्मरता निवृत्ति पावलो विश्रांती । संसाराची शांती जाली माझ्या ॥१॥
नमितां ज्ञानदेवा पावलो विसावां । अंतरींचा हेवा विसरलों ॥२॥
सुखाचा निधान तो माझा सोपान । विश्रांतीचें स्थान मुक्ताबाई ॥३॥
चांगदेव माझा आनदाचा तारु । सुखाचा सागरु वटेश्वर ॥४॥
सुखाचा सागर विसोबा खेचर । नरहरी सोनार प्राण माझा ॥५॥
आठवितां नामा पावलों विश्राम । मोक्षमार्गीं आम्हां वाट जालीं ॥६॥
परिसा भागवत जीवा आवडता । गोरा आणि सांवता सखे माझे ॥७॥
जनजसवंत सुरदास संत । नित्य प्राणिपात वैष्णवांसी ॥८॥
वंदूं भानुदास वैष्णवांचे कुळीं । ज्यासी वनमाळी मागें पुढें ॥९॥
बाळपणीं जेणें भानु आराधिला । वंश निरविला देवराया ॥१०॥
धन्य त्यांचा वंश धन्य त्यांचे कुळ । परब्रह्मा केवळ त्यांचे वंशीं ॥११॥
एका जनर्दनीं संताचें स्तवन । जनीं जनार्दन नमीयेला ॥१२॥

१६२१

निवृत्ति शोभे मुगुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ॥१॥
विठु पंढरीचे राणे । ल्याले भक्तांचीं भुषणें ॥२॥
खेचर विसा जगमित्र नागा । कुंडलें जोडा विठोबा जोगा ॥३॥
बहु शोभे बाहुवट । गोरा सांवता दिग्पाट ॥४॥
कंठीं जाणा एकविंद । तो हा जोगा परमानंद ॥५॥
गळां शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती ॥६॥
अखंड शोभे माझ्या बापा । पदकीं शोभें नामा शिंपा ॥७॥
कटीं सुत्र कटावरीं । तो हा सोनार नरहरी ॥८॥
कासें कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ॥९॥
जानु जघन सरळ । तेंही कान्हुपात्रा विशाळ ॥१०॥
दंतपंक्तीचा झळाळ । तो हा कान्हया रसाळ ॥११॥
चरणींच्या क्षुद्र घटा । नामयाचा नारा विठा ॥१२॥
वाम चरणीं तोडर । परसा रुळतो किंकर ॥१३॥
चरणीं वीट निर्मळ । तो हा जाला चोखामेळ ॥१४॥
चरणातळील ऊर्ध्वरेखा । जाला जनार्दन एका ॥१५॥

१६२२

आला आषाढी पर्वकाळ । भक्तमिळाले सकळ ॥१॥
निवृत्तिनाथ ज्ञानदेव । मुक्ताबाई सोपानदेव ॥२॥
चांगदेव विसोबा खेचर । सांवता माळी गोरा कुंभार ॥३॥
रोहिदास कबीर सूरदास । नरहरी आणि भानुदास ॥४॥
नामदेव नाचे कीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥

१६२३

वारंवार जन्म घेऊं । परी पाहूं पंढरपूर ॥१॥
दुजें मागणें देवा । करुं सेवा वैष्णवांची ॥२॥
न मागों भुक्ति आणि मुक्ति ती फजिती कोण सोसी ॥३॥
एका जनार्दनीं मागे । कीर्तनरंगी रंगला वेगें ॥४॥

१६२४

दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं ॥१॥
गाईन तुमचएं नाम संतांचा सांगात । यापरती मात दुजी नाहीं ॥२॥
निर्लज्ज कीर्तनीं नाचेन मी देवा । एकाजनार्दनीं भावा पालट नको ॥३॥

१६२५

कोणता उपाय । जोडे जेणें संतपाय ॥१॥
हाचि आठव दिवस रात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥
न करुं जप तप ध्यान । संतापायी ठेवुं मन ॥३॥
न जाऊं तीर्थप्रदक्षिणा । आठवुं संतांचे चरणा ॥४॥
होता ऐसा निजध्यास । एका जनार्दनीं दास ॥५॥

१६२६

आधीं घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथां ॥१॥
निरपेक्ष जेथेम घडें । यमकाळ पायी जोडे ॥२॥
निरपेक्षाची आवडी । ब्रह्माज्ञान घाली उडी ॥३॥
निरपेक्षेवांचुन । नाहीं नाहीं रें साधन ॥४॥
एका जनार्दनीं शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ॥५॥

१६२७

सकळ संकल्पांचा त्याग । करितां संतसंग जोडला ॥१॥
मुळ पाहिजे हेंचि शुद्ध । भेदाभेद न यावे ॥२॥
संकल्पाचें दृढ बळ विकल्पाचे छेदी मुळ ॥३॥
संकल्प दृढ धरितां पोटी । एका जनार्दनीं होय भेटी ॥४॥

१६२८

न होता शुद्ध अंतःकरण । संतसेवा न घडे जाण ॥१॥
शुद्ध संकल्पावांचुन । संतसेवा न घडेचि जाण ॥२॥
कामक्रोध दुराचार । यांचा करुं नये अंगिकार ॥३॥
आशा मनींशांचें जाळें । छेदुनीं टाकी विवेकबळें ॥४॥
एका जनार्दनीं ध्यान । सहज तेणें संतपण ॥५॥

१६२९

संतां द्यावें आलिंगन । सांडुनियां थोरपण ॥१॥
अंगे देव करी सेवा । इतराचा कोण केवा ॥२॥
ब्रह्माज्ञानी वंदिती माथां । मुक्ताची सहज मुक्तता ॥३॥
शरण एका जनार्दनीं । यमकाळ वंदिती दोन्हीं ॥४॥

१६३०

जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका ॥१॥
संतां शरण जा रे आधीं । तुटे उपाधी तत्काळ ॥२॥
तेणें तुटें भवबंधन । आत्मज्ञान प्रगटे ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संत परिपूर्ण उदार ॥४॥

१६३१

विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी ॥१॥
तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौर्‍यांशींचा फेरा ॥२॥
संतचरण अनुदिन । द्रुढ राखावें तेथें मन ॥३॥
एका जनार्दनीं शरण । सहज निवारे जन्ममरण ॥४॥

१६३२

बहु मार्ग बहु प्रकार । तेथें निर्धार न बैसे ॥१॥
उलट सुलट कासया करणें । जप तप अव्हान दैवतें ॥२॥
योग याग तप तीर्थे । साधन कष्ट ते पसारा ॥३॥
शरण एका जनार्दनीं । घडे निशिदिनीं संतसेवा ॥४॥

१६३३

धर्म अर्थ काम मोक्ष । संतचरणीं ठेवी लक्ष ॥१॥
परा पश्यंती मध्यमा वैखरी । चरणीं निर्धारीं संतांच्या ॥२॥
योगयागादि साधनें संतचरणीं असो ध्यानें ॥३॥
आणिक नको त्या उपाधी । तोडा देहीं आधिव्याधी ॥४॥
एका जनार्दनीं मन । एकपणें जनार्दन ॥५॥

१६३४

गोल्हाट उल्हाट कासया आटाआटी । घेतां संतभेटीं पुरे हेंची ॥१॥
गुद ते पीडन नागिणी दमन । संतदरुशन घडतां जोडे ॥२॥
ओहं सोहं यातायाती कोहं जाण । टाकुनि संतचरण धरां आधीं ॥३॥
एका जनार्दनीं मानावा विश्वास । होय देवदास आपोआप ॥४॥

१६३५

बकाचिये परि ध्यान नको धरुं । जीवेभावें धरुं संतचरण ॥१॥
मग ते तात्काळ करिती पावन । ऐसें अनुमोदन आहे शास्त्रीं ॥२॥
ध्यानाचें ध्यान संतांचे चरण । काया वाचा मन दृढ ठेवी ॥३॥
वाच्य ते वाचक संत ते व्यापक । एका जनार्दनीं देख अंतर्बाही ॥४॥

१६३६

समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसें उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥
काया वाचा मनें भावें । संतांशीं शरण जावें । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥
पूर्ण बुद्धिचाची रावो । पापपुण्य नाहीं ठावो । साधु संतांसी भजावो । मुख्य ही गोष्टी ॥३॥
ऐसिया संतांसी जाण । शरण एका जनार्दन । घालीतसे लोटांगण । मुख्य ही गोष्टी ॥४॥

१६३७

जयांचें चित्त संताच्या चरणा । तेणें नारायणा जिंकियलें ॥१॥
भावें देव मिळे भावें देव मिळे । संतचरणीं लोळे सर्व काळ ॥२॥
संतांची आवडी म्हणोनि अवतार धरी । योगक्षेम भारी चालवी त्यांचा ॥३॥
संतचरणी सेवा आदर उपचार । एका जनार्दनीं साचार करीतसे ॥४॥

१६३८

संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥
आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥
ऐसें ज्यांचे प्रेम ऐशी ज्याची भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तेथें राबें ॥३॥

१६३९

संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं ॥१॥
संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥
एका जनार्दनीं संतांचा अनुभव । धाला माझा जीव परमानंदें ॥३॥

१६४०

संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन ॥१॥
तया नाहीं जन्ममरण । मुक्तीअ उभ्या कर जोडोन ॥२॥
ब्रह्माज्ञान हात जोडी । संताघरी घाली उडी ॥३॥
शरण एक जनार्दनीं । वंदितसे अनुदिनी ॥४॥

१६४१

सांडोनिया संतसेवा । कोण हेवा मग जोडी ॥१॥
नानापरीचे साधन । अष्टांगयोग धूर्मपान ॥२॥
यज्ञ योग तीर्थकोटी । संताचिया चरणागुष्ठीं ॥३॥
एका जनार्दनीं मग । संतचरणीं समाधान ॥४॥

१६४२

संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥
तेथें कैंचें कर्माकर्म । अवघा देव परब्रह्मा ॥२॥
कैंचे ध्येय ध्याता ध्यान । एक संतचरणी मन ॥३॥
कैंचा भेद कैंचे भान । एक जनार्दनीं ध्यान ॥४॥

१६४३

भय नाही हरीच्या दासा । शुभ काळ सर्व दिशा ॥१॥
नाहीं तयां गोंवागुंतीं । न लगे पुराण व्युत्पत्ती ॥२॥
नाहीं शास्त्रांचे कारण । वेदाभ्यासाचें नको मनन ॥३॥
एका जनार्दनीं शरण । परंपरा हेचि पूर्ण ॥४॥

१६४४

पायांवरी ठेवितां भाळ । कर्म सकळ सुफळ ॥१॥
ऐसा छंद जया मनीं । धन्य जननी तयाची ॥२॥
लोटांगण संतापुढा । घाली उघडा होउनी ॥३॥
एका जनार्दनीजं भेंटीं । जन्ममरणा होय तुटीं ॥४॥

१६४५

देवाचे ते आप्त जाणावे ते संत । त्यांचे चरणीं रत व्हावें सर्वदा ॥१॥
श्रीहरीची भेटी सहजची होय । श्रमलीया जाय क्षणमात्रें ॥२॥
पापाचे पर्वत भस्म नामाग्रीतं । अभक्ता न कळें हित नाम न घेती ॥३॥
एका जनार्दनीं संताचिया कृपें । नाम होय सोपें त्याच्या ॥४॥

१६४६

संतावाचोनियां नाम नये हातां । साधनें सांधितां कोटी जाणा ॥१॥
जैसें कातेंविण कारणें संसार । साधन विचार व्यर्थ ठेला ॥२॥
संतसमागम धरलिया वांचुनी । संसार सांडणी नोहे बापा ॥३॥
एका जनार्दनीं संतांसी शरण । रिघलिया जाण देव जोडे ॥४॥

१६४७

संतचरणी सेवा घडे । भाग्य पहा हो केव्हढें ॥१॥
व्यर्थ शिणती बापुडे । योग याग करुनी गाडे ॥२॥
संतचरणी जे विन्मुख । स्वप्नी न देखती सुख ॥३॥
संतचरणी नाही थारा । भरले तपांच्या डोंगरा ॥४॥
नाम न म्हणती कोंडें । धूम्रपान करिती तोंडे ॥५॥
एका जनार्दनीं साचें । मन नाहीं सुख कैचें ॥६॥

१६४८

ज्ञान ध्यान जप तप तें साधन । तें हे संतनिधान सखे माझे ॥१॥
संतापायीं आधीं जावें वो शरण । संसार बोळवण होय तणें ॥२॥
तयाचे हें मुळ संतांचे पाय । आणीक उपाय नाही नाहीं ॥३॥
द्वैत अद्वैताचा न सरेचि कोंभ । तो हाचि स्वयंभ संतसंग ॥४॥
एका जनार्दनीं परब्रह्मा जाम । द्वैत क्रियाकर्म तेथे नाहीं ॥५॥

१६४९

तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥
करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालुं लोटांगणी मस्तक हें ॥२॥
उपासनामार्ग सांगती ते खुण । देती मंत्र निर्वाण विठ्ठल हरि ॥३॥
एका जनार्दनीं संतासी शरण । रात्र आणि दिन चिंतूं त्यासीं ॥४॥

१६५०

मनुष्यखेपे हित होय । शरण तूं जाय श्रीसंतां ॥१॥
काय महिमा कीर्ति जगीं । नाहीं सामर्थ्य दुजिया अंगीं ॥२॥
एका जनार्दनीं संत । उदार पतीत तारिती ॥३॥

१६५१

वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावें ॥१॥
जाणोनि नेणतां कां होसीं रे मुर्ख । सुखांचे निजमुख विटेवरी ॥२॥
एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होई कां रे दास संतचरणीं ॥३॥

१६५२

सहस्त्र मुखांचा वर्णितां भागला । तें सुख तुजला प्राप्त कैचें ॥१॥
संतांचे संगती सुख तें अपार । नाहीं पारावार सुखा भंग ॥२॥
एका जनार्दनीं सुखाचीच राशी । उभा हृषिकेशी विटेवरी ॥३॥

१६५३

सुख अनुपम्य संतसमागमें । अखंड दुणावतें नामें । दहन होती सकळ कर्में । आणिक वर्म दुजें नाहीं ॥१॥
वाचे म्हणे कृष्णहरी । तेणें पापा होय बोहरी । संसारासी नुरे उरी । हा महिमा सत्संगाचा ॥२॥
काशी प्रयागादि तीर्थे बरी । बहुत असती महीवरी । परी संतसमागमाची थोरी । तीर्थे न पावती सर्वदा ॥३॥
असती दैवतें अनंत कोटी । परी संतसमागमक भेटी । दैवती सामर्थ्य हिंपुटी । हा महिमा संतांचा ॥४॥
एका जनार्दनीं मन । संतचरणीं दृढ ध्यान । तेणें प्राप्त सच्चिदानंदघन । विठ्ठल देव विसंबे ॥५॥

१६५४

सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥
जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामें ॥२॥
एका जनार्दनीं ध्यानीं मनीं । श्रीरामावांचुनीं आन नेणें ॥३॥

१६५५

सुखरुप धन्य जाणावा संसारी । सदा वाचे हरि उच्चारी जो ॥१॥
रामकृष्णानाम वदे वेळोवेळां । हृदयीं कळवळां संतभेटी ॥२॥
एका जनार्दनीं प्रेमाचा कल्लोळ । भुक्ति मुक्ति सकळ वसे देव ॥३॥

१६५६

आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥
तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयीं कळवळा वैष्णवांचा ॥२॥
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । साधन निर्धारी आन नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा ज्याचा नेम । तो देवा परमपूज्य जगीं ॥४॥

१६५७

तीर्थाटन गुहावास । शरीरा नाश न करणें ॥१॥
समागम संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥
करितां रामनाम लाहो । घडती पाहाहो धर्म त्या ॥३॥
सकळ कर्में जाती वायां । संतपायां देखतां ॥४॥
एका जनार्दनीं होतां दास । पुरे आस सर्वही ॥५॥

१६५८

सकळ तीर्थे । घडती करितां नामस्मरण । देवाधि देव उत्तम । तोही धांवे समोरा ॥१॥
पहाहो वैषणवांचे घरीं । सकळ तीर्थे कामारी । ऋद्धिसिद्धि मोक्ष चारी । दास्यत्व करिती सर्वदा ॥२॥
शरण एक जनार्दनीं । तीर्थांचा तो अधिष्ठानी नामस्मरणक आनुदिनीं । तया तीर्थे वंदितीं ॥३॥

१६५९

भुक्तिमुक्तीचें सांकडें नाहीं विष्णुदासां । प्रपंचाची आशा मा तेथें कैची ॥१॥
वैकुंठ कैलास अमरपदें तिन्हीं । तुच्छवत मनी मानिताती ॥२॥
राज्य भोग संतती संपत्ति धन मान । विष्ठेंअ तें समान श्वान सुकर ॥३॥
मा ब्रह्माज्ञाना तेथें कोण पुसे तत्त्वतां । घर रिघोनि सायुज्यता येत असे ॥४॥
एका जनार्दनीं नामाची प्रौढी । ऋद्धिसिद्धि दडी घरीं देती ॥५॥

१६६०

कलिकाळाचे न चले बळ । ऐसे सबळ हरिदास ॥१॥
सेवेचें तो कवच अंगीं । धीर प्रसंगीं कामक्रोध ॥२॥
रामनाम हाचि बाण । शस्त्र निर्वाण सांगातीं ॥३॥
एका जनार्दनीं यमाचे भार । देखतां समोर पळती ते ॥४॥

१६६१

जाईल तरी जावो प्राण । परी न सोडा चरण संतांचे ॥१॥
होणार तें हो कां सुखे । परी मुखें रामनाम न सोडा ॥२॥
कर्म धर्म होतु कं होनी । परी प्रेम कीर्तनीं न सोडा ॥३॥
एका जनार्दनीं वर्म । सोपा धर्म सर्वांसी ॥४॥

१६६२

परमार्थाचा हाचि भाव । वाचे देव स्मरावा ॥१॥
नाहीं दुजा छंद मनीं । संतचरणीं विश्वास ॥२॥
न धांवे वायां कोठें मन । संतचरणांवाचुनी ॥३॥
एका जनार्दनीं नेम । सर्वोत्तम हृदयीं वसे ॥४॥

१६६३

जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥
वायांची पसारा नासिलासी सारा । कां रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥
एकविध भाव भक्ति करी मोळी । तेणें कुळींची मुळी हाती लागे ॥३॥
एका जनार्दनीं संतांचा सेवक । तयाचा मग धाक ब्रह्मादिकां ॥४॥

१६६४

संकल्प विकल्प नका वायां । धरा पायां विठोबाच्या ॥१॥
सर्व तीर्था हेचि मुळ । आणीकक केवळ दुजे नाहीं ॥२॥
संतसमागमेम उपाधी । तुटती आधिव्याधी घडतांची ॥३॥
एका जनार्दनीं वर्म सोपें । हरती पापे कलियुगीं ॥४॥

१६६५

गव्हंची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्नें तै होतीं ॥१॥
ऐसा नरदेह उत्तम जाण । वाचे वदे नारायण ॥२॥
द्रव्य जोडितां आपुलें हाती । सकळ पदार्थ घरा येती ॥३॥
भावें करी संतसेवा । एका जनार्दनीं प्रिय देवा ॥४॥

१६६६

वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी ॥१॥
सोपें ते साधन संतांसी शरण । तेणें चुके बंधन जडजीवां ॥२॥
अभ्यासाचा सोस वाउगाची द्वेष । न करी सायास नाम जपे ॥३॥
एका जनार्दनीं सायासाचे भरी । नको पडुं फेरी चौर्‍याशींच्या ॥४॥

१६६७

पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥
ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥
तारितीं आणिकां देऊनि विठ्ठलमंत्र । एका जनार्दनीं पवित्र नाम गाती ॥३॥

१६६८

संत केवळ घातकी पाही । परी त्यासि पातक नाहीं ॥१॥
निजबोधाचे करुनी फांसे । दोघे गोसावी मारिले कैसे ॥२॥
अती खाणोरिया कर्म करी । दिवसां जाळिले गांव चारी ॥३॥
एका जनार्दनीं घातकी मोठे । त्यासी अंतक केवी भेटे ॥४॥

१६६९

छळणे करुनी बोलतां । तात्काळ जाली समाधी अवस्था । सद्भावें विनटतां संतां । न कळे तत्त्वता काय देती ॥१॥
जाणा जाणते सकळ । ज्यासी निजप्राप्तीची कळवळ । तिहीं सांडोनि स्थळ । संतजन वंदावे ॥२॥
एका जनार्दनीं तान्हें । भुकाळू पै मागूं नेणे । कुर्वाळूनियां स्तनें । जनार्दनें लाविले ॥३॥

१६७०

नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ॥१॥
आणिक नाहीं पां साधन । मुखीं हरि हरि स्मरण ॥२॥
सोडी द्रव्य दारा आशा संतसंगे दशा पावावी ॥३॥
जरी पोखालें शरीर । तरी तें केव्हाहीं जाणार ॥४॥
जनार्दनाचा एका म्हणे । संतापायी ठाव देणें ॥५॥

१६७१

हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष । श्रवण स्मरण भक्ति तेणें पडली वोस ॥१॥
हरिनामाचेनि बळे करिसी अदर्ध । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहें कर्म ॥२॥
दुर्वासाचेनि कोपे अंबऋषीस शाप । देवाचे चक्रें त्या दिधलें संताप ॥३॥
सत्यवती धर्म सदयज्ञनिष्ठ । असत्य वचनी त्याचा झाला अंगुष्ठ ॥४॥
निष्पाप मांडव्य शुळीं वाइला । इतुकियास्तव यम दासीपुत्र केला ॥५॥
एका जनार्दनीं संत सोयीनें चाले । सदगुरुवचनें सबाह्म शुद्ध जालें ॥६॥

१६७२

नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा । पंढरीचा राणा । आपोआपा हृदयीं ॥१॥
हाचि धरी रे विश्वास । सांडी वाउगा हव्यास । नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ ॥२॥
भवावदभक्तीचें लक्षण । सर्वांभुतीं समाधान । पाहता दोष आणि गुण । वाउगा शीण मना होय ॥३॥
सर्वांभुतीं देव आहें । सर्व भरुनी उरला पाहे । रिता नाहीं कोठें ठाव । देवाविण सर्वथा ॥४॥
म्हणोनि नको भेदभाव । एक वचनीं एक ठाव । एका जनार्दनीं स्वयमेव । देव उभा पंढरी ॥५॥

१६७३

संतवचनें देव जोडे । सायुज्य मुक्ति पायां पडे । संतवचनें सांकडें । नुरेचि कांहीं ॥१॥
धन्य धन्य संतसंग । उभा तेथें श्रीरंग । लक्ष्मीसहित अभंग । तिष्ठे सदा ॥२॥
संतवचनें कर्म झडे । संतवचनें मोक्ष जोडे । संतवचनीं तीर्थ झडे । धन्य संग संताचा ॥३॥
संतवचने तुटे उपाधी । संतवचनें सरे आधिव्याधी । संतवचनेंक भवनदी । प्राणी तरती ॥४॥
संतवचनीं धरा भाव । तेणें सर्व निरसे भेव । एका जनार्दनीं देव । प्रत्यक्ष भेटे ॥५॥

१६७४

संतवचने साधे मुक्ति । संतवचनें बह्मस्थिती । कर्माकर्माची शांती । संतवचनें ॥१॥
संतवचनें याग । संतवचनें सांग योग । संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥
संतवचनें ब्रह्माप्राप्ती । संतवचनें सायुज्य मुक्ती । ब्रह्मादि पदें येती । संतवचनें समोर ॥३॥
संतवचनें सर्व सिद्धि । संतवचनें समाधी । संतवचनें उपाधि । एका जनार्दनें तुटतसे ॥४॥

१६७५

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधीं वंदावीं ॥१॥
संतसंगे अंतरंगे नाम बोलावें । कीर्तनरंगें देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरां न कराव्या । प्रमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥
जेणे करुनी मुर्ति ठसावी अंतरीं श्रीहरीची । ऐशी कीर्तनमार्यादा आहे संतांच्या घरची ॥४॥
अद्वय भजने अखंड स्मरणें वाजवीं करटाळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥

१६७६

सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोंवतें तरुवर चंदन करिताचि जाये ॥१॥
धणी धाय परी परी त्याची भुक्ति न धाये । सागर भरिता परी त्या सरिता समाये ॥२॥
वैरागर मणी पुर्ण तेजाचा होय । सभोंवतेम हारळ हिरे करिताचि जाय ॥३॥
एका जनार्दनीं पुर्ण जालासे निज । आपणासारिखें परीं तें करितसे दुजें ॥४॥

१६७७

आली आषाढी जाये पंढरीसी । चित्त पायापाशी विठोबाच्या ॥१॥
वैष्णव गर्जती नामामृत सार । फुटतसे पाझर कामक्रोधा ॥२॥
एका जनार्दनीं धरुनी विश्वास । जाये पंढरीस होय संतांचा दास ॥३॥

१६७८

धन्य हरिहर भवभयाहर । आठव सत्वर करीं मना ॥१॥
तयांच्या चिंतनीं हरतील दोष । नित्य होय वास वैकुंठासी ॥२॥
नारदादि संता करावें नमन । धरावे चरण हृदयकमळीं ॥३॥
एका जनार्दनीं संतचरण ध्यातां । मुक्ति सायुज्यता हातं येते ॥४॥

१६७९

पंढरीची वारी आहे ज्याचे घरीं । तोचि अधिकारीं धन्य जगीं ॥१॥
आपण तरुनी तारितसे लोकां । भुक्ति मुक्ति देखा तिष्ठताती ॥२॥
धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनीं मात धन्य त्याची ॥३॥

१६८०

धन्य पंढरीची वारी । सदा वसे जया घरीं ॥१॥
तोचि देवाचा आवडता । कळिकाळा मारी लाथा ॥२॥
आलिया आघात । निवारी स्वयें दिनानाथ ॥३॥
कळिकाळाची बाधा । नोहे तयासी आपदा ॥४॥
लक्ष्मी घरीं वसे । देव तेथें फिरतसे ॥५॥
ऐशी भाविकासी आवडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥६॥

१६८१

भाळे भोळे वारकरी । हरिनामागजरीं नाचती ॥१॥
त्यांचा संग देई देवा । नको हेवा दुजा कांहीं ॥२॥
त्यांचें चरणीं राहो मन । आणिक साधन दुजें नको ॥३॥
म्हणती हरि करिती वारी । याहुनी थोरी कोण आहे ॥४॥
तयांजवळी मज ठेवा । एका जनार्दनीं जीवा माझिया ॥५॥

१६८२

आवाडी जाती पंढरीसी । अहर्निशी ते वारकरी ॥१॥
तयांचे पायीं माझे भाळ । सर्वकाळ असो देवा ॥२॥
हातीं टाळ मुखीं नाम । नेणती सकाम दुसरें ॥३॥
एकविध तयांचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥

१६८३

पायांवरी ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी ॥१॥
जन्मोजन्मीं त्यांचा संग । द्या अभंग सर्वदा ॥२॥
सर्वकाळ वाचे । दुजें साचें नाठविती ॥३॥
एका जनार्दनीं त्यांचा संग । घडावा सर्वांगें मजसी ॥४॥

१६८४

आषाढी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करिती गदारोळ । विठ्ठलकीर्तनीं ॥१॥
धन्य धन्य त्यांचें कुळ । पावन ते सकळ । येवोनि उतावीळ । विठ्ठल भेटती ॥२॥
करती चंद्रभागे स्त्रान । पुंडलिकाचें अभिवंदन । तीर्थ प्रदक्षिणा दरुशन । विठ्ठलाचें ॥३॥
एकादशी करती व्रत । नमें जागरण करीत । आनंदे भरीत नाचत । विठ्ठलासमोर ॥४॥
ऐसें भाळे भोळें सकळ । विठ्ठलाचे लडिवाळ । एका जनार्दनीं कृपाळ । विठ्ठल माझा ॥५॥

१६८५

धर्म अर्थ काम । जिहीं अर्पिला संपुर्ण ॥१॥
तेचि जाती जा वाटा । पंढरी चोहटा नाचती ॥२॥
आणिकांसी नोहे प्राप्ती । संत गाती तो स्वादु ॥३॥
शीण आअदि अवसानीं । पंढरपूर न देखतां नयनीं ॥४॥
उभा विटे समचरणीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥

१६८६

नको तुझेम आम्हा कांहीं । वास पंढरीचा देई ॥१॥
दुजें कांहीं नको आम्हां । द्यावा चरणाचा महिमा ॥२॥
संतांची संगत । दुजा नाहीं कांहीं हेत ॥३॥
काकुलती येतो हरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥

१६८७

ऐसीं प्राप्ति कै लाहीन । संतसंगती राहीन ।
त्यांचे संगती मी ध्याईन । नाम गाईन अहर्निशीं ॥१॥
भावें धरलिया संतसंग । सकळ संगा होय भंग ।
अभयसितां आगळे योग । पळे भवरोग आपभयें ॥२॥
सेविलिया संतचरणतीर्था । तीर्थ पायवणी वोढविती माथां ।
सुरनर असुर वंदिती तत्त्वतां । ब्रह्मा सायुज्यता घर रिघे ॥३॥
संतचरणरज मस्तकी पडे । देह संदेह समुळ उडे ।
उघडिलीं मुक्तीची कवाडें । कोदाटें पुढें परब्रह्मा ॥४॥
दृढ धरलिया सत्संगती । अलभ्य लाभ आतुडे हातीं ।
चारी पुरुषार्थ चारी मुक्ती । पायां लागती निज्दास्य ॥५॥
जैं कृपा करिती संतजन । जन विजन होय जनार्दन ।
एका जनार्दनीं शरण । ब्रह्मा परिपुर्ण तो लाहे ॥६॥

१६८८

देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ॥१॥
सांडोनि उपाधी करावें भजन । तेणें जनार्दन कृपा करी ॥२॥
एका जनार्दनीं निराशी तो धन्य । तयाचें चरण वंदु आम्हीं ॥३॥

१६८९

संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन वोजे ॥१॥
त्यांचे संगे सुख मना होय । आनंद आनंदी पाहतां होय ॥२॥
त्यांचे पिसे मजलागीं मोठें । ऐसें भाविक केवी भेटे ॥३॥
त्यांचे नामाची घेऊं धणीं । तया जाऊं लोटांगणीं ॥४॥
तया शेजार करितां बरा । चुके जन्ममरण फेरा ॥५॥
तया जीव करुं कुर्वंडी पाही । एका जनार्दनीं लागतसे पायीं ॥६॥

१६९०

होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥
घालीन लोटांगण करीन पुजन । भावें वोवाळीन प्राण माझा ॥२॥
आणिक सायास न करीं कांहीं आस । होईल निजदास संतचरणीं ॥३॥
एका जनार्दनीं हेंचि वाटे बरें । आणिक दुसरें नको कांहीं ॥४॥

१६९१

संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥
तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥
शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥३॥
एका जनार्दनीं हेंचि पैं मागत । नाहीं दुजा हेत सेवेविण ॥४॥

१६९२

संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥
तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥
आशा पाश सर्व जातील तुटोनी । जीव हा बंधनीं मुक्त होय ॥३॥
एका जनार्दनीं भाकीन करुणा । श्रीसंतचरणा वारंवार ॥४॥

१६९३

संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ॥१॥
जीवा होईल महालाभ । ऐसा घडतां उद्योग ॥२॥
सांडोनियां थोरपण । शिव घालीं लोटांगण ॥३॥
आपुलें महत्त्व । तेथें मिरवुं नये सत्य ॥४॥
शरण एका जनार्दनीं । वोवाळावा जीव चरणीं ॥५॥

१६९४

संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी ॥१॥
करीन नीचवृत्ति काम । मना होईल विश्राम ॥२॥
बंधनाची बेडी । तुटेल तयाचीये जोडी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । वासना जाईन करपोन ॥४॥

१६९५

अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित ॥१॥
अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिकां जोडी ऐशीं नाहीं ॥२॥
सर्व पर्वकाळ आले तयां ठायां । विश्रांती घ्यावया इच्छिताती ॥३॥
एका जनार्दनीं सुखाचें माहेर । भवसिंधुपार तारक हें ॥४॥

१६९६

एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवाणी धणीवरी ॥१॥
आनंदें चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाणा ॥२॥
उतराई तयांच्या नोहे उपकारा । धाडिती माहेरा निजाचिया ॥३॥
एका जनार्दनीं घडतां त्यांचा संग । जन्ममरण पांग तुटे मग ॥४॥

१६९७

संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥
हेंचि भवसिंधुचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥
जन्मोजन्मींचे भेषज । तें हें संतचरणरज ॥३॥
संतचरणींच्या पादुका । जाहला जनार्दन एका ॥४॥

१६९८

एक आहे मज आस । संत दासाचा मी दास ॥१॥
कै पुराती मनोरथ । संत सनाथ करतील ॥२॥
मनींचें साच होईल कोई । क्षेम मी देई संतांची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । माझा मनीं नवस पुरे ॥४॥

१६९९

आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं ॥१॥
सर्वभावे त्याचें करितां सेवन । आमुचें हितकल्याण जन्मोजन्मीं ॥२॥
एका जनार्दनीं संतांचे चरणीं । जाईन लोटांगणीं जीवेभावें ॥३॥

१७००

संत भलते याती असो । परी विठ्ठल मनीं वसो ॥१॥
तया घालीन लोळणीं । घेईन मी पायवणी ॥२॥
ज्ञाती कुळासी संबंध । मज नाहीं भेदाभेद ॥३॥
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥
तेथें पावन देह चारी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥५॥

१७०१

पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठीं सदगद ॥१॥
वाहेन टाळी नाचेन रंगीं । दुजें संगीं नका कांहीं ॥२॥
पायवणीं वंदीन माथा । निवारेल चिंता मग सर्व ॥३॥
एका जनार्दनीं दान । द्यावे दोष गुण न पाहा ॥४॥

१७०२

तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥
आतां नका धरूं दुजें । मीतूंपणाचें उतरा ओझें ॥२॥
एका जनार्दनीं शरण । जीवींची निजखूण त्या द्यावी ॥३॥

१७०३

सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥
तेणें फिटलें अवघें कोडें । झालें परब्रह्मा उघडें ॥२॥
एका जनार्दनीं सेवा । करीन मी त्याची भावां ॥३॥

१७०४

माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं ॥१॥
मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥
कळिकाळ वंदी माथां । नाहीं चिंता संसार ॥३॥
एका जनार्दनीं दास । हेंचि आस पुरवावी ॥४॥

१७०५

मनाची नखी न लगे जयां ठाया । तेणें उणी पायां भेटवी संत ॥१॥
संत उदार उदार । नामामृतें भरलें सागर ॥२॥
एका जनार्दनीं संत । कोण जाणेंत्यांचा अंत ॥३॥

१७०६

करी कांहीं मनाएका विचरणा । संतांच्या चरणा न विसंबे ॥१॥
तयाचा मी दास कामारी दुर्बळ । तेंचि माझे सकळ हित करती ॥२॥
देउनि प्रेमपान्हा लाडिवाळपणें । कृपेचें पोसणें तुमचे मी ॥३॥
जनार्दनीं एका तुमचा तो दास । तयासी उदस धरुं नये ॥४॥

१७०७

मनाचेनि मनें जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप ॥१॥
धरुनियां आस घातली लोळणीं । मस्तक चरणीं माझा तुमच्या ॥२॥
तुमचा मी दास कामारी त्रिवाचा । आणिक मनाचा संकल्प नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं तुम्हीं तों पावन । काय हा मी दीन वानुं महिमा ॥४॥

१७०८

पाहुनियां मनोगत । पुरवा हेत तुम्ही माझा ॥१॥
मग मी न सोडी चरणां । संत सुजाणा तुमचीया ॥२॥
दंडवत घालीन पायां । करा छाया कृपेची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । मुगुटमणीं तुम्हीं संत ॥४॥

१७०९

जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥
हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥
मागणें तें नाहीं आणिक तयासी । संत हे सेवेसी झिजवी अंग ॥३॥
एका जर्नादनीं सेवेसी मन । रात्रंदिवस ध्यान लागो त्याचें ॥४॥

१७१०

जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी ॥१॥
समाधी साधन संतजन । विश्रांतीचें स्थान संतापायीं ॥२॥
योगयाग धारण पंचाग्र्नि साधन । तें हें ध्यान संतापायीं ॥३॥
एका जनार्दनीं तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ॥४॥

१७११

तुमच्या चरणींक मिठी । आतां तुटी न करावी ॥१॥
थोराचे जें थोरपण । तुम्हां करणें सहजची ॥२॥
मी पतीत दीन हीन । म्हणोनि शरण तुम्हांसी ॥३॥
पतीत पावन तुम्ही संत । एवढें आर्त पुरवा ॥४॥
एका जनार्दनीं शरण । त्याचे चुकवा जन्ममरण ॥५॥

१७१२

ऐकोनी कीर्ति उदार संत । आला धांवत शरण ॥१॥
सांभाळावे सांभाळावें । सांभाळावें अनाथा ॥२॥
धरुनियां हाती हात । ठेवा मस्तकीं निवांत ॥३॥
एका जनार्दनीं एकपण । एका भावें आलों शरण ॥४॥

१७१३

संतचरणीं जीवभाव । ठेविला देह विसर ॥१॥
आतां तुम्हीं उपेक्षिल्यावरी । कोण वानील तुमची थोरी ॥२॥
बहु जाहलों कासावीस धरली कास आदरें ॥३॥
एका जनार्दनीं परता । करितां लाज येई माथां ॥४॥

१७१४

संतचरणीं विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस ॥१॥
मज दीना सांभाळावें । हेंचि मागें जीवेंभिव ॥२॥
धनवित्ता चाड नाहीं । सेवा सुखें माज द्यावी ॥३॥
एका जनार्दनीं अपुला । एका एकपणें अंकिला ॥४॥

१७१५

पुरवा माझी एवढी आस । करा निजदास संतांचा ॥१॥
इच्छा पुरवा मनीचा हेत । सभाग्य संत दाखवा ॥२॥
आणिक मागणें तें नाहीं । दुजा नाहीं आठव नको ॥३॥
घालीन लोळणीं । संतचरणा निशिदिणीं ॥४॥
परलोकीचे तारुं । एका निर्धारु जनार्दनीं ॥५॥

१७१६

देहतापें तापलों भारीं । संताघईं मागतसें ॥१॥
मज द्या कांहो जीवन । जेणें जीवाचें समाधान ॥२॥
एक जनार्दनीं सवें । सुखसागराची घातली पोहे ॥३॥

१७१७

मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी ॥१॥
करा माझें समाधान । अभय वचन देउनी ॥२॥
मागें तारिलें सकळ । उत्तम अधम चांडाळ ॥३॥
तोचि आहे अनुभव । म्हणोनि कींव भाकितसे ॥४॥
एका जनार्दनीं शरण । मज पावन करावें ॥५॥

१७१८

संताचिये पायीं । भावे ठेविलीआं म्यां डोई ॥१॥
करा माझे समाधान । आलों पतीत शरण ॥२॥
आपुलिया सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । पुरवा आस माझी ॥४॥

१७१९

तुम्हीं तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं ॥१॥
ठेवा माथां हात वंदुं पायवाणी । आणिक दुजें मनीं नाहें कांहीं ॥२॥
गुण दोष याती न पहा कारण । करितो भजन निशिदिनीं ॥३॥
एका जनार्दनीं तयाचा मी दास । एवढीची आस पायी मिठी ॥४॥

१७२०

फार बोलूं काय वांया । जाणवेल पाया चित्त माझें ॥१॥
धन्य धन्य तुम्ही संत । कॄपावंत संसारीं ॥२॥
उत्तीर्णपणें मज दासा । पुरवा इच्छा कृपाळुवा ॥३॥
शरण एका जनार्दनीं । कृपा करुना तुम्हीं संत ॥४॥

१७२१

रवि न लपेचि अंधारीं । तैशी तुमची जगीं थोरी ॥१॥
कृपावंत तुम्ही संत । यावरी हेत दुजा नाहीं ॥२॥
एका जनार्दनीं शरण । संत परिपुर्ण दयाळू ॥३॥

१७२२

धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥२॥
त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्दनीं घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥

१७२३

संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥
परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥
एका जनार्दनीं सर्वामाजी श्रेष्ठ । संत ते वरिष्ठ वंदू आम्हीं ॥३॥

१७२४

संत आमुचे देव संत आमुचें भाव । आमुचें गौरव संत सर्व ॥१॥
वेदशास्त्रा पुराण मंत्रादि साधन । संतसेवा ध्यान आम्हां धन्य ॥२॥
योगयाग व्रत साधन पसर । संतांठायीं आदर हेंचि बरें ॥३॥
जनीं जनार्दन संतसेवा जाण । एका जनार्दन तोचि धन्य ॥४॥

१७२५

संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली ॥१॥
वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान संत देती ॥२॥
पंचमहापातकी विश्वास घातकी । ऐशींयासी निकी संतसेवा ॥३॥
एक जनार्दनीं संतांचा मी दास । अनन्य पायांस न विसंबें ॥४॥

१७२६

सायासाचा न करी सोस । एक आंस संतचरणी ॥१॥
नावडे वैभव विलास मनीं । अनुदिनीं संतसेवा ॥२॥
पेमें प्रेम दुणावलें । सुख जाहलें सुखासी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । संतचरण वंदी माथां ॥४॥

१७२७

संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी । भव दुःख हरी । संतनामें ॥१॥
ऐसा संताचा महिमा । नाहीं द्यावय उपमा । ब्रह्मासुखधामा । पुढें नाचे ॥२॥
बोलती तें वचन साचें । नाहीं बोलणें असत्याचें । नामीं पेम जायाचें । जडोनि ठेलें ॥३॥
कृपावंत संत । दीन तारिले त्वरित । एका जनार्दनीं मात । श्रवण मज झालीं ॥४॥

१७२८

तुम्हीं संतजन । माझें ऐका हो वचन ॥१॥
करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरी ॥२॥
आहे तुमचे हातीं । म्हणोनि येतो काकुळती ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे थारा । संतीं द्यावा मज पामरा ॥४॥

१७२९

जाहली भाग्याची उजरी । संतसेवा निरंतरी ॥१॥
हेंचि मज वाटे गोमटें । येणें भवभ्रम फिटे ॥२॥
करिता सावकाश ध्यान । होय मनाचें उन्मन ॥३॥
एका जनार्दनीं संत । सदा शांत अंतरीं ॥४॥

१७३०

आजी सुदिन आम्हांसी । संतसंग कैवल्यराशी ॥१॥
हेंचि आमुचें साधन । आणिक नको आम्हां पठण ॥२॥
वेदश्रुति पुराण मत । संतसेवा तें सांगत ॥३॥
जाणोनि विश्वासलों मनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

१७३१

कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें ॥१॥
हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥
करा माझें समाधान । देउनी वचन अभयांचें ॥३॥
यावई फार बोलुं नेणें । उचित करणें तुम्हासी ॥४॥
एका जनार्दनें शरण । आहे मी दीन पामर ॥५॥

१७३२

मस्तक माझें संतापायीं । ठेउनी होऊं उतराई ॥१॥
वारंवार क्षणक्षणा । नामघोष करिती जाणा ॥२॥
देउनी अभयदान । करिती पतीतपावन ॥३॥
एका जनार्दनीं पाही । संतापायीं ठेवी डोई ॥४॥

१७३३

संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं ॥१॥
सांगतों तें मनीं धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥
संत तुष्टलिया देवा आनंद होय । मागें मागें धांवे तया पाठीं ॥३॥
एका जनार्दनीं माहेर सुखाचें । घेतलीया वाचे संतनाम ॥४॥

१७३४

ब्रह्माडभरीं कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया आम्हां मति थोडी ॥१॥
एक मुखें वानुं चतुरानन शीणु । सहस्त्र मुखेंगुणु वानितां नयें ॥२॥
एका जनार्दनीं वर्नीन पवाडे । उभा वाडेकोडें पंढरीये ॥३॥

१७३५

संतांचा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥१॥
मज तारिले तारिले । भवजळां उद्धरिलें ॥२॥
पावन केलें संतीं । अवघी निरसली गुंतीं ॥३॥
संतचरण वंदीन माथां । एका जनार्दनीं तत्त्वता ॥४॥

१७३६

गर्भवासा भीती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां ॥१॥
गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ॥२॥
आम्ही सुखें गर्भवास घेऊं देखा । मुक्तिचिया मस्तकां पाय देऊं ॥३॥
एका जनार्दनीं गर्भवास सोसुं । संतांचा सोरसु हातीं लागे ॥४॥

१७३७

बालका देखोनि संकटीं । माता कार्य टाकुनि उठी ॥१॥
ऐसें दयेचे ठायीं जाण । आपुलें जाणावें पारिखेपण ॥२॥
महापुरी बुडे तयातें । उडीं घाली कृपाळु तेथें ॥३॥
दीनाचिये लाभी । जो निघे जळतीये अंगीं ॥४॥
ऐसे दयेचे पाळी लळे । एका जनार्दनीं चरणीं लोले ॥५॥

१७३८

देह गेह चिंता । बाळासी नाठवे सर्वथा ॥१॥
न देखे तो दुजें स्थान । बाळका आपुले अंगीं जाण ॥२॥
माझें तुझें न म्हणे । उंच नीच कांहीं नेणें ॥३॥
एका जनार्दनीं अखंड । नाहीं तया वायां खंड ॥४॥

१७३९

संकल्पाचा आन ठाव । नाहीं भाव दुसरा ॥१॥
तुम्च्या चरणांसी शरण । काया वाचा आणि मन ॥२॥
आलों दीन हो उनी हीन । तुम्हीं तंव पतीतपावन ॥३॥
एका जनादनीं शरण । करा खंडन जन्ममुत्यु ॥४॥

१७४०

तुमचें कृपेंचे पोसणें । त्याचें धांवणें करा तुम्हीं ॥१॥
गुंतलोंसे मायाजळीं । बुडतों जळीं भवाच्या ॥२॥
कामक्रोध हे मगर । वे ढिताती निरंतर ॥३॥
आशा तृष्णा या सुसरी । वेढिताती या संसारीं ॥४॥
म्हणोनि येतों काकुळती । एका जनार्दनीं विनंती ॥५॥

१७४१

संत ते सोईरे सांगाती आमुचे । तेणें कळिकाळाचें भय नाहीं ॥१॥
जयाची आवडी धरी नारायण । म्हणोनि चरण धरूं त्याचें ॥२॥
परलोकीचे सखे सोइरे सांगाती । मज ते आदीअंती सांभाळिती ॥३॥
एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥

१७४२

अखंडित संतसंग । तेथें काय सुखा उणें मग ॥१॥
माझे आलें अनुभवा । संतसेवा घडावी ॥२॥
हेंचि मागें आणिक नाहीं । संतसंग देई सर्वकाळ ॥३॥
एका जनार्दनीं धरुनि विश्वास । होईन त्यांचा दास जन्मोजन्मीं ॥४॥

१७४३

मनासी निर्धार केलासे देखा । संतसंग सुखा आतुडलों ॥१॥
इच्छिलें पावलों इच्छिलें पावलों । इच्छिलें पावलों संतसंग ॥२॥
एका जनार्दनीं सांगात तयाचा । अनुभवें अनुभवाचा बोध लाहे ॥३॥

१७४४

बहुत मारग बहुत प्रकार । नागवले थोर थोर मागें ॥१॥
म्हणोनियां जीवें मानिला विश्वास । नाहीं दुजीं आस संताविण ॥२॥
मार्गाची आशा सांडिला बोभाट । धरली एक वाट संतसंग ॥३॥
एका जनार्दनीं जातां तयांमागें । हित लागवेगें जाहले माझें ॥४॥

१७४५

चालतां मारगीं फुटतसे वाट । मागतो वो भाट सहजीं होय ॥१॥
तैसें नोहे संतमार्गाचें लक्षण । चालत मागुन आले सर्व ॥२॥
नोहे गुंतागुंती चुकीचा बोभाट । मार्ग आहे नीट संतसंग ॥३॥
एका जनार्दनीं सांपडलें सहज । तेणे जाहलें काज सरतें माझें ॥४॥

१७४६

बहुतांच्या मता । आम्हीं न लागुं सर्वथा ॥१॥
धरुं संतांचा सांगात । तेणें होय आमुचें हित ॥२॥
जाऊं पढरीसी । नाम गाऊं अहर्निशी ॥३॥
करुं हाचि नित्य नेम । आणिक नको निजधाम ॥४॥
एका जनार्दनीं नाम । गाऊं आवडीनें राम ॥५॥

१७४७

ज्यासी नाहीं संतसंग । ते अभंग दुःख भोगिती ॥१॥
तैसा नको विचार देवा । देई सेवा संतसंग ॥२॥
अखंड नाम वाचे कीर्ति । संतसंग विश्रांती मज देई ॥३॥
मागणें ते द्यावें । आणिक मागणें जीवीं नाहीं ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । सुलभ सोपा उपाय ॥५॥

१७४८

अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥१॥
संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाही घालुं नको ॥२॥
संसार मज न करणें सर्वथा । परमार्थ पुरता हाती देई ॥३॥
जनार्दनाचा एका करुणावचनीं । करी विनवणी पायांपाशीं ॥४॥

१७४९

सोईरे धाईरे आम्हीं संतजन । तयाविण चिंतन आन नाहीं ॥१॥
हाचि माझा बहव हीच माझी भक्ति । आणिक विश्रांती दुजी नाहीं ॥२॥
हेंचि माझे कर्म हाचि माझा धर्म । वाउगाचि श्रम न करी दुजा ॥३॥
हेंचि माझे ज्ञान हेंचि माझे विज्ञान । संताविन शरण न जाय कोणा ॥४॥
एका जनार्दनीं हा माझा निश्चय । वंदिन मी पाय सर्वभावें ॥५॥

१७५०

संतजनाची मिळाली मिळणी । रामनामाची भरली भरणी ॥१॥
रामनाम सेवा हा राम सांठवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥२॥
कीर्तनाचे तारुं लाधलं । रामनाम केणें सवंगले ॥३॥
एका जनार्दनीं रामनामसेवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥४॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref: transliteral

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०

संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *