भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पाचवा

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पाचवा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कौसल्येचे डोहाळे :

पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।
डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वयें जाला ॥ १ ॥
कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।
दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ॥ २ ॥
राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें ।
वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥
येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।
अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥
ऐकोनि शंकिजे रायें । म्हणे इसी जाहलें तरी काये ।
आप आपणियातें पाहें । सावधान होय प्रिये तूं ॥ ५ ॥
येरी म्हणे मी नव्हे स्त्री ना पुरुष । नर वानर ना राक्षस ।
ईशाचा ज्ओ निज ईश । परम पुरुष श्रीराम ॥ ६ ॥
राजा म्हण तन्वंगी । काय झालें तुजलागीं ।
कैंचा भ्रम भरला अंगीं । पाहें वेगीं मी कोण ॥ ७ ॥
येरी म्हणे माझ्या ठायीं । मी तूं ऐसे उरले नाही ।
अधिष्ठान जे विदेही । आत्मा पाहीं श्रीराम ॥ ८ ॥
दशरथ म्हणे कौसल्ये । माझें तुझें जैं लग्न झालें ।
तैं रावणें अति विघ्न केलें । ते विसरलीस कैसेनी ॥ ९ ॥

रावणाचे नाव ऐकतांच :

नांव ऐकोनि रावण । येरी म्हणे दे दे धनुष्यबाण ।
करूं लंकेचें निर्वाण । मारूं दारुण राक्षस ॥ १० ॥
पाचारा वनींचे वनचर । मुकुट कुंडलें द्या अलंकार ।
राज्या देवोनि धरा छत्र । वानभार चालवा ॥ ११ ॥
केउता गेला रे हनमंत । अंगद सुग्रीव जांबवंत ।
अखूनि रावणाची मात । जगाआंत उरलीसे ॥ १२ ॥
अहो वज्रदेही निजगडा । पुच्छें घालोनियां वेढा ।
लंका जाळा ते भडभडां । पाडा तुडतुडां राक्षस ॥ १३ ॥
अमित पाचारा वानर । शिळीं बुजा रे सागर ।
पाडा पाडा रे नगर । निशाचरवस्ती जे ॥ १४ ॥
केउते गेले रे जुत्पती । लंका उलथा रे हाताहातीं ।
पाडा पाडा चारी भिंती । दुर्ग किती आम्हांसी ॥ १५ ॥
आगड भेदा रे चोहटा । पांडू लंकेच्या त्रिकूटा ।
मारूं रावणा अति दुष्टा । स्वधर्मवाटा रुंधित ॥ १६ ॥
बाण घेवोनि स्वांगें । छेदूं कुंभकर्णाचे टांगे ।
भेदूं रावणाची सर्वांगे । भिडतां मागें मी न सरें ॥ १७ ॥
राक्षसांच्या शिरकमळीं । खेळूं लंकेपुढें चेंडूफळी ।
साजुक रुधिरांच्या कल्लोळीं । तृप्त कंकांईं करूं आजी ॥ १८ ॥
तोडा नवग्रहांची बेडी । सोडा देवांची बांधवडी ।
उभवा रामराज्याची गुढी । आज्ञा धडफुडी तिहीं लोकीं ॥ १९ ॥
पाचारा बिभीषण पवित्र । करा राज्याभिषेक धरा छत्र ।
लंका दिधली स्वतंत्र । यावचंद्रस्र्यपर्यंत ॥ २० ॥
नासा रे जगाचीं दुःखें । त्रैलोक्य भरारे हरिखें ।
दुमदुमित विश्व सुखें । परम परुरुषें श्रीरामें ॥ २१ ॥
नामें कळिकाळासी शिक । यम पराङ्‌मुख कांपती ॥ २२ ॥
जो वाचे उच्चारी रामनाम । त्याचे पुरवावे सकळ काम ।
हरावे जन्ममरणश्रम । सहज सम करावें ॥ २३ ॥
नित्य जपे जो रामनाम । तो जाणावा मजचि सम ।
पुरुषांमाजी पुरुषोत्तम । सकळ नेम तेणें केले ॥ २४ ॥
रायासी पडली आशंका । पोटीं विवसा आली देखा ।
कीं गर्भींच उठली ताटका । सिस्थिया सुखा अंतरलों ॥ २५ ॥
येरी म्हणे रे सुमित्र नेटका । अझूनि कैंची री ताटका ।
छेदूनियां बाणें एका । जनाच्या सुखा अवरोधी ॥ २६ ॥
राजा म्हणे न चले मंत्र । गुणिया पाचारा विश्वामित्र ।
येरी म्हणे केउता गेला सुमित्र । आला विप्र यागासी ॥ २७ ॥
वेगें बाणे दे कां बहुवस । विंधूनि मारूं मारीचबाहूंस ।
आणि राक्षसां करूं नाश । हाहाहूहू करिताती ॥ २८ ॥
राजा करिताहे स्मरण । परशुराम अवतार जाण ।
त्याचेनि नांवे हतो दारुण । महद्‌भूत जाण संचार ॥ २९ ॥
येरी म्हणे ऐकें गा जमदग्न्या । धनुष्य भंगिले म्यां प्राज्ञा ।
विचारीं ब्राह्मणा सर्वज्ञा । जाई तू अज्ञा तपासी ॥ ३० ॥
हिचिये देहीं संचाराचा ताठा । मुखीं सुटलासे फांटा ।
कायसे डोहळे कटकटां । नेणों पोटा काय आलें ॥ ३१ ॥
वेगीं पाचारा वसिष्ठा । पंचाक्षरी तो अदटा ।
परीक्षा करील तो श्रेष्ठा । सकळ वरिष्ठा तो गुरू ॥ ३२ ॥
येवोनि वसिष्ठ जंव पाहे । तंव ते राममय जाली आहे ।
म्हणे धन्य धन्य वो माये । वंदावे पाय इयेचे ॥ ३३ ॥
आदरें पाहूं गेला दृष्टी । चित्तचैतन्या पडली मिठी ।
हर्षे बाष्प दाटे कंठी । पडिला सृष्टीं मूर्छित ॥ ३४ ॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । रोमा फरकती स्वेदांकुरा ।
अंग कांपतसे थरथरां । अवस्था मुनीवरा अनिवार ॥ ३५ ॥
राजा म्हणे कांही न चाले येथें । गुणिया ग्रासिला भूतें ।
कोण सोडवील यातें । म्हणोनि चित्तें व्याकुळ ॥ ३६ ॥

दशरथाची कौसल्येविषयी चिंता :

म्हणे कौसल्ये आवरूं । कीं वसिष्ठां सावध करूं ।
ऐसा जाजावे नृपवरूं । धांवा थोर पोकारी ॥ ३७ ॥
श्रावणावधाचे क्लेश । सोसिले म्यां असोस ।
पुढां तेचि बहुवस । वसिष्ठदोहत्येचे ॥ ३८ ॥
अगा विधातिया श्रेष्ठा । काय लिहिले अदृष्टा ।
भूतें ग्रासिले वसिष्ठा । दोष मोठा मज घडला ॥ ३९ ॥
यज्ञ केला म्यां पवित्र । कुळीं पावेन सुपुत्र ।
तंव माझारी हे चरित्र । कैंचें विचित्र वोढवलें ॥ ४० ॥

कुलगुरूंचे आश्वासन :

ती अवस्था जिरवोनि पोटीं । वसिष्ठे उघडिली दृष्टी ।
राव झोंबला कंठीं । सृष्टी उफराटी पैं जाली ॥ ४१ ॥
स्वामी वसिष्ठा तुजही बाधा । हे तों गोष्टी न घडे कदा ।
पुत्रसुखाआड आपदा । भाग्यमंदा आम्हांसी ॥ ४२ ॥
वसिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठ । पोटीं आले वैकुंठपीठ ।
पुरुषोत्तम जाला रे प्रकट । दैवें उत्कट कौसल्या ॥ ४३ ॥
जे जे कांही हे वदली । ते जाण पां ब्रह्मबोली ।
ते ते ख्याती करील भली । सुदशा आली सूर्यवंशा ॥ ४४ ॥
मुनिजनांचे ध्येय ध्यान । कीं देवांचे देवतार्चन ।
जगाचा जगज्जीवन । राम निधान प्रत्यक्ष ॥ ४५ ॥
राया तुज नकळे सर्वथा वर्म । उदरा आलें परब्रह्म ।
धन्य धन्य आमचे कर्म । पुरोहितधर्म ये वंशी ॥ ४६ ॥
चरणीं उद्धरील शिळा । परणील जनकाची बाळा ।
आनंदवील लोकां सकळा । राम जिव्हाळा जीवाचा ॥ ४७ ॥
वाचेनि नामें मुक्ति फुकटा । नगरी नेईल वैकुंठा ।
राम म्हणता पापिष्ठा । गरि उत्कृष्टा देईल ॥ ४८ ॥
धन्य धन्य सूर्यवंश । धन्य धन्य अयोध्येचा देश ।
धन्य धन्य कौसल्यागर्भवास । जगन्निवास पै आला ॥ ४९ ॥
धन्य धन्य एथींचे जन । धन्य धन्य दशरथा तुझें मन ।
धन्य धन्य आमचे नयन । राम निधान देखती ॥ ५० ॥

दशरथाचा आनंद :

ऐसें वसिष्ठ सांगता । टक पडिले दशरथा ।
आठवू नाठवे चित्ता । पुत्रकथा ऐकोनि ॥ ५१ ॥
ऐकतां ज्याचेनि श्रवणें । पडले तनमना भुलवणें ।
काय होईल त्याचेनि दर्शनें । ते सुख जाणे तो एक ॥ ५२ ॥
रामनामेंवीण कथा । ज्याल्या होत्या अनाथा ।
त्या केलिया सनाथा । कौसल्यासुताचेनि नामें ॥ ५३ ॥
ऐकतां कौसल्येचे डोहळे । दसह्रथासी सुखसोहळे ।
तेणें परमानंद उचंबळे । वंदी तत्काळें वसिष्ठासी ॥ ५४ ॥
एका जनार्दन विनंती संतां । ऐसी डोहळियांची वार्ता ।
ऐकतां उल्लास होय चित्ता । त्याची जन्मकथा अवधारा ॥ ५५ ॥
एका जनार्दनीं परम । डोहळियांचा अति संभ्रम ।
अजन्मा जन्मेल श्रीराम । तो जन्मसंभ्रम अवधारा ॥ ५६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
कौसल्यादोहदनिरूपणं नाम पंचमोध्यायः ॥ ५ ॥
॥ ओंव्या ५६ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती 


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पाचवा भावार्थरामायण बालकाण्ड अध्याय पाचवा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *