भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा

हरिणरुपी मारीचाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचे पंचवटीत आगमन, तेथील विध्वंस पाहून त्याची बिकट अवस्था :

श्रीरामाश्रम पंचवटीं । रावण देखोनि आपुल्या दृष्टीं ।
मारिल्या राक्षसांच्या कोटी । तेणें पोटीं दचकला ॥ १ ॥
राक्षसांचीं दीर्घ मढीं । पडलीं देखोनि करवंडी ।
मारीच अत्यंत हडबडी । खाजवी शेंडी भयभीत ॥ २ ॥
आधींच श्रीरामभयें भीत । त्यावरी देखोनि राक्षसघात ।
मारीच चळचळां कांपत । जे राक्षसां अंतक श्रीराम ॥ ३ ॥

मारीचाचा अनुनय :

देखोनि राक्षसांचे कंदन । मारीचास स्वयें रावण ।
अत्यंत देऊन सन्मान । त्याचे चरण दृढ धरिलें ॥ ४ ॥
सीताहरण अति निर्वाण । खुंटलें स्वामिसेवकपण ।
कृपा करोनि आपण । जानकीहरण साधावें ॥ ५ ॥
ज्यालागीं आमुचें आगमन । तें कार्य तो साधावें आपण ।
दावोनियां मायामृगमोहन । सीताहरण मज साधीं ॥ ६ ॥

स रावणवचः श्रुत्वा मारीचो राक्षसाधिपः ।
मृगो भूत्वाश्रमपदे रामस्य विचचार ह ॥ १ ॥
रुक्मबिंदुशतैश्चित्रः प्रवालमणिभूषितः ।
मुक्ताजालपरिच्छन्नः स बभूव मनोहरः ॥ २ ॥

मारीचाची मनस्थिती :

ऐकोनि रावणाचें वचन । मारीच म्हणे आलें मरण ।
श्रीरामबाणें देतां प्राण । तैं आपण अति धन्य ॥ ७ ॥
अंती करी तो रामस्मरण । तो स्वयें होय ब्रह्म पूर्ण ।
त्याचा लागलिया निजबाण । कृतकल्याण होईन मी ॥ ८ ॥
श्रीरामाच्या बाणघातीं । दासी होती चारी मुक्ती ।
अनायासें ब्रह्मप्राप्ती । श्रीराममूर्ति देखिलिया ॥ ९ ॥
ऐसें विचारोनि चित्तीं । रावणा सुख द्यावया अंती ।
जाला विचित्रमृगाकृती । लंकापति विस्मित ॥ १० ॥

मारीचाचे हरिणस्वरुप, त्याचे वर्णन :

नाहीं सांडीमांडी गेली । नाहीं फेडीवेडी देखिली ।
घवकरी मृगशोभा शोभली । पडली भुली लंकानाथा ॥ ११ ॥
तनु मनोहर लोनसळी । रत्‍नबिंदु रोममूळीं ।
पृष्ठीं शोभे मुक्ताफळीं । नभोमंडळीं जेवी तारा ॥ १२ ॥
खुर आरक्त प्रवाळवर्णी । कळावया मरकतमणी ।
पाचुबिंदु उमटले श्रवणीं । कर्णाभरणीं अति शोभा ॥ १३ ॥
इंद्रनीळशृंगें रत्‍नमुरडी । आरक्त नेत्र जिव्हा तांबडी ।
ठाणठकारपरवडी । मृगशोभा गाढी शोभत ॥ १४ ॥
शृंगाग्रीं मणी लखलखती । पुच्छ तळपे सिंदूराकृती ।
शुभ्र उदर हंसस्थिती । विचित्राकृति मृगशोभा ॥ १५ ॥
अंगींच्या तेजाची प्रगल्भा । लोपती रविचंद्राची प्रभा ।
सोलींव लावण्याचा गाभा । मृगशोभा शोभत ॥ १६ ॥

मृगाचे अंगविक्षेप, सर्वांस आश्चर्य :

ऐसा चवकत बिचकत । च्कितदृष्टीं चपळ पाहत ।
कांही चरत कांही फडकत । आश्रमांत स्वयें आला ॥ १७ ॥
रिघोनियां पंचवटीं । सन्मुख सीतेचिया दृष्टी ।
श्रीराम देखे जगजेठी । ऐसा निकटीं विचरत ॥ १८ ॥
श्रीरामापासोनि फडके दुरी । निकट विचरे सीतासुंदरी ।
सर्वांगें दावोनि साजरीं । क्षणामाझारीं मोहिली ॥ १९ ॥
मृगासीं होता दृष्टिभेटी । हर्ष जानकीचे पोटीं ।
त्याचें लावण्य देखतां दृष्टीं । आल्हाद पोटीं सीतेसी ॥ २० ॥
देखोनि मृगाचे अवयव । सीतेसी सुख अभिनव ।
परम सुखें सुखावे जीव । जाडला भाव मृगस्वरुपीं ॥ २१ ॥
त्याचें पहावया स्वरुप । सीतेसी अतिशयें साक्षेप ।
तंव तो आला अति समीप । आपलें स्वरुप दावावया ॥ २२ ॥
सीता अंग प्रत्यंग न्याहाळी । जवळ येवोनि कुरवाळी ।
तंव मृदुरोमा तनु कोंवळी । दोहीं करतळीं निवारी ॥ २३ ॥
देखोनि मृगशोभा अत्यंत । स्वर्गी सुरवर जाले भ्रांत ।
कोण कोणाचा कैंचा येथ । महा अदभुत हा मृग ॥ २४ ॥
देखोनियां मृगाकृती । ऋषीश्वर पडले भ्रांतीं ।
तटस्थ ठेली चित्तवृत्ती । अवघे पाहती टकमकां ॥ २५ ॥

मृग पाहून सीतेला त्याचे आकर्षण :

होतां मृगाचें दर्शन । मृग आकर्षी सीतानयन ।
मृगसौंदर्या वेधलें मन । लागलें ध्यान मृगाचें ॥ २६ ॥
हर्षें सांगे श्रीरामासी । उल्हासें बोले लक्ष्मणासी ।
मृगसौदर्या शोभा कैसी । हेंआंगेंसीं रत्‍नावळी ॥ २७ ॥
वनें हिंडता कोट्यनुकोटी । ऐसिया मृगेंसीं नव्हे भेटी ।
मज पाहतां निजदृष्टीं । ऐसा मृग सृष्टीं नसेल ॥ २८ ॥
हा नाहीं स्रष्ट्यानें स्रजिला । नाहीं कर्मजन्य जन्मला ।
निखळ लावण्याचा ओतिला । दैवें धाडिला मजलागीं ॥ २९ ॥

सीतेची श्रीरामांना विनंती :

ऐसें सीता बोले आपण । श्रीरामा घाली लोटांगण ।
जें मज अपूर्व मागणें दान । तें आपण मज द्यावें ॥ ३० ॥
तूं तंव उदार चक्रवर्ती । मी मागतें अति प्रीतीं ।
कृपा करावी श्रीरघुपती । कृपामूर्ति कृपाळुवा ॥ ३१ ॥
म्हणोनि चरण धरिले लल्लाटीं । अश्रु भरले नेत्रवाटीं ।
सलज्ज पाहे गोरटी । श्रीरामदृष्टी लक्षोनी ॥ ३२ ॥
मृगत्वचा अति कोवळी । हेमरत्‍नें शोभे मुक्तावळी ।
अयोध्याप्रवेशनकाळीं । त्याची कांचोळी करीन मी ॥ ३३ ॥
येथोनि अयोध्या प्रवेशावयास । उरली अवधी षण्मास ।
तरी ते कंचुकीची बहुत आस । तुम्हीं उदास न व्हावें ॥ ३४ ॥
दिव्यालंकारभूषण । त्याहूनि त्वचा शोभायमान ।
तियेपुढें नवरत्‍न । खद्योत जाण श्रीरामा ॥ ३५ ॥

इति सीतावचः श्रूत्वा दृष्ट्वा च मृगमदभुतम् ।
उवाच राघवो हृष्टो भ्रातरं लक्ष्मणं वचः ॥३॥
पश्य लक्ष्मण वैदेह्याः स्पृहामुल्लसितामिमाम् ।
रुपश्रेष्ठतया ह्येप मृगोद्य न भविष्यति ॥४॥
न वने नंदनोद्देशे न चैत्ररथसंश्रये ।
कुतःपृथिव्यां सौमित्रे योऽस्य कश्चित्समो मृगः ॥ ५ ॥

राम-लक्ष्मण संवाद :

मृगाचे हृदयींचे हृद्‌गत । जाणोनि सीतेचें मनोगत ।
संतुष्टला श्रीरघुनाथ । कर्तव्यार्थ लक्षोनी ॥ ३६ ॥
श्रीराम म्हणे गा सौमित्र । पाहें पां कैसा मृग सुंदर ।
ठाणमाणें अति गंभीर । हेमशरीर रत्‍नांक ॥ ३७ ॥
ऐसा मृग नंदनवनीं । पूर्वी नाहीं देखिला नयनीं ।
नाहींच चित्ररथवनीं । ऐसा त्रिभुवनीं असेना ॥ ३८ ॥
वनें हिंडतां दिक्पुटीं । ऐशा मृगासी नाहीं भेटी ।
लावण्यमृगाची कसवटी । नाहीं दृष्टीं देखिली ॥ ३९ ॥
या मृगत्वचेची कांचोळी । सप्रेम मागे जनकबाळी ।
अयोध्याप्रवेशाचिचे काळीं । स्वयें वेल्हाळी लेऊं पाहे ॥ ४० ॥
जे अपूर्व मजकारणें | प्रथम सीतेचें मागणें ।
नेदीं म्हणता लागिरवाणें । मृग मारणें त्वचार्थ ॥ ४१ ॥
सीतेच्या मागण्यासाठी । मृगवधार्थ श्रीराम उठी ।
हेमाभरणी धनुष्य मुष्टीं । बाण पृष्ठीं सज्जुनी ॥ ४२ ॥
श्रीरामें मांडोनियां ठाण । धनुष्यीं वाहिलासे गुण ।
सितीं लाविलासे बाण । मृग लक्षोन निघाला ॥ ४३ ॥

यावत्पृषतमेकेन सायकेन निहन्म्यहम् ।
हत्वैतच्चर्म चादाय शीघ्रमेष्यामि लक्ष्मण ॥ ६ ॥

सीतेची हौस पुरविली पाहिजे :

लक्ष्मणा ऐकें सावधान । बाणें एकें मृग मारीन ।
मृगचर्म शोभायमान । सीतेसी देईन सुखार्थ ॥ ४४ ॥
मृगचर्म आलिया हाता । परम सुखें सुखावे सीता ।
ऐकें तिच्या मनोगता । उभयभागता विभागूं ॥ ४५ ॥
अर्धचर्माची कंचुकी पूर्ण । अर्धचर्माचें मज आसन ।
करितां अयोध्याप्रवेशन । शोभायमान आम्हां दोघां ॥ ४६ ॥
मृगचर्माचें भूषण । एक कंचुकी एक आसन ।
ऐसे सीतेचें भावीं मन । पतिवंचन करुं नये ॥ ४७ ॥
उत्तम अन्न आणि पक्वान्न । वस्त्रें अलंकार आणि भूषण ।
पतीवीण भागी आपण । ते स्त्री जाण समवेश्या ॥ ४८ ॥

अहमेतद्धनिष्यामि मृगरत्‍नं न संशयः ।
इह त्वं भव सन्नद्धः शस्त्रवान्रक्ष मैथिलीम् ॥७॥
यावद्रच्छामि सौमित्र मृगमानयितुं वनम् ।
न गंतव्यमितोऽन्यत्र यावन्नाहमिहागतः ॥८॥
राक्षसादृष्टभावत्वाद्वितर्काः संभवंति हि ।
तथा तु तुं समादिश्य भ्रातरं तु पुनः पुनः ॥९॥

आपण परत येईपर्यत आश्रमातून कुठेही जाऊ नये असा लक्ष्मणाला दंडक :

असो हे ऐसी सीतेची कथा । लक्ष्मणा सावध ऐक आतां ।
मृग मारोनि मज न येतां । तिळभर परता होऊं नको ॥ ४९ ॥
मृग मारीन मी निश्चित । जरी मिळाले त्रैलोक्यींचे दैत्य ।
तरी मी मागें न सरें श्रीरघुनाथ । संशय येथ न मानावा ॥ ५० ॥
राक्षसांसी पडिले हाडद्वंद्व । तुवां नसावें असावध ।
शस्त्रास्त्रीं असावें सन्नद्ध । सीता सावध रक्षावी ॥ ५१ ॥
गुझ सांगे सौमित्रकानीं । राक्षस मायावी ये वनीं ।
सीत नेतील छळोनी । सावधानीं रक्षावी ॥ ५२ ॥
मृग मारोनि मी यें जंववरी । तुवां न व्हावें येथोनि तिळभरी दूरी ।
संकट आलियाही जीवावरी । धीरें निर्धारीं सहावें ॥ ५३ ॥
मजविषयीं काहीं चिंता । तुवां न करावी गा सर्वथा ।
सावधानें राखावी सीता । मागुतमागुता सांगत ॥ ५४ ॥
अति संकट देखसी दृष्टीं । तरी न सांडावी पर्णकुटी ।
तुणे कानीं सांगेन गुह्य गोष्टी । सीता गोरटी रक्षावी ॥ ५५ ॥
सन्मुख आलिया राक्षसकोडी । अंगचिया निजप्रौढीं ।
युद्धा न निघावें तांतडीं । सीता रोकडी ते नेतील ॥ ५६ ॥
तुज गोंवोनि संग्रामासीं । राक्षस नेतील सीतेसी ।
झणीं सीतेसी विसंबसी । निश्चयेंसीं तुज सांगें ॥ ५७ ॥
तूं चढतां संग्रामपृष्ठीं । मुख्य जानकी नाठवे पोटीं ।
मग एकली देखोनि पर्णकुटीं । राक्षस कपटी हरतील ॥ ५८ ॥
म्यां सांगितल्या ज्या ज्या युक्ती। त्या सुद्दढ धराव्या चित्तीं ।
नाना परीच्या उपपत्तीं । सीता सती रक्षावी ॥ ५९ ॥
ऐसे सौमित्रा सांगोन । वेंगें निघे मृग लक्षून ।
सवेंचि परतोनि येऊन । सांगे पुन्हा सीता रक्षावी ॥ ६० ॥

मृगाने हूल दाखवून श्रीरामांना लांब नेले :

वारंवार करोनि नेम । मृगवधार्थी निघे राम ।
धनुष्यबाणाचा आक्रमें । अति संभ्रमें तद्वधीं ॥ ६१ ॥
श्रीराम देखोनी धनुष्यमुष्टी । मृग फडके चकितदृष्टी ।
सांडोनियां पचवटी । उठाउठीं पळतसे ॥ ६२ ॥
शूर्णणखेचें नासिकाच्छेदन । तेथें मृगाचें आगमन ।
येतां देखोनि श्रीरघुनंदन । सवेग गमन तेणें केलें ॥ ६३ ॥
राम देखोनियां दुरी । मृग चाटी पाठीवरी ।
तया स्थळा नांव चाटोरी । गंगातीरीं अद्यापि ॥ ६४ ॥
श्रीराममुखचंद्र न्याहारीं । तया स्थळा नाव चांदोरी ।
श्रीराम न्यावा बहुत दुरी । निघे झडकरी मृग वेगें ॥ ६५ ॥
काहाडोनि न्यावा रघुवीर । मृग फडकला मध्यमेश्वर ।
दावळे दावोनि श्रीरामचंद्रा । मृग पुढारां चालिला ॥ ६६ ॥
दुरी अंतरावया पंचवटी । मृग पळाला गंगातटीं ।
श्रीराम धांवे पाठोपाठीं । धनुष्य मुष्टीं सज्जोनि ॥ ६७ ॥
कोठें देतो दृष्टी भेटी । कोठें पाहतां न दिसे सृष्टीं ।
श्रीराम मृगाची न सांडी पाठी । दृढ बाणाटी सज्जोनि ॥ ६८ ॥
कोठे दिसे कोठें न दिसे । कोठे उडे मृगविन्यासें ।
श्रीराम धांवे अति आवेशें । बाण सपिच्छ विंधावया ॥ ६९ ॥

निरनिराळ्या ठिकाणच्या खुणा व त्यांची नावे :

देखोनि श्रीरामाचा बाण । मृग वेगें सोडी ठिकाण ।
त्या ठाया नांव ठाण । सावधान अवधारा ॥ ७० ॥
प्रथम कुंकुमठाण । मातुळठाण नागठाण ।
बादामठाण पांचवें तें भौमठाण । मृग ठिकाण सोडित ॥ ७१ ॥
मृगपाप छेदी श्रीरामरावो । तो छिन्नपाप देहगांवों ।
नेऊर विंधोनि पाडिला पहाहो । तो नेउरगांवो तेथे कीं ॥ ७२ ॥

श्रीरामांचा बाण लागताच मारीचाने श्रीरामांच्या आवाजात मारलेली हाक :

भाळ भेदलें जिव्हारीं । तो भाळगांव गंगातीरीं ।
लक्ष्मणा धांव झडकरी । गिरागजरीं मृग पडिला ॥ ७३ ॥

संप्राप्तकालमाज्ञाय चकार सुमहास्वनम् ।
सद्दशं राघवस्येव हा सीते लक्ष्मणेतिच ॥ १० ॥
हा लक्ष्मणेति चुक्रोश त्राहीति महता वने ।
स्वरमेनं तु संश्रुत्य लक्ष्मणस्तां प्रहास्यति ।
लक्ष्मणेन विहीनां तां मैथिलीं रावणो हरेत् ॥ ११ ॥

लागतां श्रीरामाचा बाण । करोनि सप्तपाळ उड्डाण ।
मारीच सांडी निजप्राण । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥ ७४ ॥
मारीच महामावकर । श्रीराम स्वरासारिखा स्वर ।
करोनि आक्रंदे दुस्तर । दीन उत्तर तें ऐका ॥ ७५ ॥
लक्ष्मणा वेगीं धांव पाव । मिळोनि राक्षससमुदाव ।
रणीं निरोधें निरोधिल पहा हो । महाबाहो धांव वेगीं ॥ ७६ ॥
तूं तंव माझा निजसखा । रणभूमीचा पाठिराखा ।
राक्षसीं मारिलें मारिलें देखा । रणमोचका पाव वेगीं ॥ ७७ ॥
ऐसिया युक्तीं आक्रंदोन । मृगपाचा त्याग करोन ।
मारीच राक्षस होतां जाण । घेतला प्राण श्रीरामबाणें ॥ ७८ ॥

मारीच राक्षसास उत्तम गती :

मृगदेह राक्षसदेहो । स्थूळलिंगकारणदेहो ।
श्रीरामें छेदोनि निःसंदेहो । मारिला पहाहो मारीच ॥ ७९ ॥
मरणें मारिले जन्मासहित । देही विदेही केला घात ।
माया मारोनियां समस्त । बाणें अत्यंत सुखी केला ॥ ८० ॥
श्रीरामाचा निजबाण । ज्यासी लागे तो सभाग्य पूर्ण ।
बाण नव्हे हा आनंदघन । सुखसंपन्न श्रीरामें ॥ ८१ ॥
स्थूळ देहातें छेदित । ते योद्धे देखिले बहूत ।
परी जीवीं जीवपणा करी घात । श्रीरघुनाथ निजयोद्धा ॥ ८२ ॥
छेदोनियां भयाभय शोक । छेदोनियां द्वंद्वदुःख ।
श्रीरामें दिधलें महासुख । सुखाचें सुख श्रीराम ॥ ८३ ॥
मारीचाने नेम केला देख । श्रीरामबाणें पावेन सुख ।
तें रामें दिधलें आवश्यक । शत्रु सेवक समपदीं ॥ ८४ ॥
जें सुख भोगिती सनकादिक । तेचि सुख मारीचास दे आवश्यक ।
बाप कृपाळु रघुकुळटिळक । सुखदायक संग्रामीं ॥ ८५ ॥

मारीचाने मारलेल्या हाकेमुळे श्रीराम साशंक :

यापरी श्रीरामें आपण । मारीच मरिला विंधोनि बाण ।
धांव पाव गा लक्ष्मण । रघुनंदन साशंके ॥ ८६ ॥
मारीच आक्रंदाची हाक । दुमदुमिले तिन्ही लोक ।
हे सौमित्र ऐकोनि देख । येईल आवश्यक धांवोन ॥ ८७ ॥
धांवण्या आलिया लक्ष्मण । अनर्थ होईल दारुण ।
मागें येवोनि रावन । सीताहरण करील ॥ ८८ ॥
जरी लक्ष्मण न येईल तत्वतां । तरी त्यासी राहूं न देईल सीता ।
बोल बोलेल उत्पातता । अति त्रासता धाडील ॥ ८९ ॥
हा तंव मायावी मृग पूर्ण । अलक्ष योजिलें विंदान ।
धांवण्या आणोनि लक्ष्मण । सीताहरण साधावें ॥ ९० ॥
ऐसें राक्षसीमायामत । आपण जाणोनि समस्त ।
विलंब करों नये येथ । त्वरित रघुनाथ रिघो पाहे ॥ ९१ ॥

त्यामुळे लक्ष्मण आश्रम सोडून येण्यापूर्वीच सत्वर परतणे :

जंव आला नाही लक्ष्मण । तंव तेथे जावें आपण ।
विलंब करितांचि जाण । सीता रावण हरील ॥ ९२ ॥
लक्ष्मण धांवण्या नये उठाउठीं । तंव ठाकावी पंचवटी ।
ऐसें विचारोनि पोटीं । मग जगजेठी निघों पाहे ॥ ९३ ॥
एका जनार्दना शरण । श्रीराम मारीच मरिला पूर्ण ।
धांवण्या धांवेल लक्ष्मण । कथाविंदान अवधारा ॥ ९४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडें एकाकारटीकायां
मारिचकपटमृगवधो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
॥ ओव्या ९४ ॥ श्लोक ११ ॥ एवं १०५ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय चौदावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *