भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा

शबरीचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पंपासरोवरावर विश्रांती :

कबंधरुपें दानव दनु । पावला होता राक्षसतनु ।
तो श्रीरामें उद्धरोनु । केला पावन तिहीं लोकीं ॥ १ ॥
दनूनें केलें उर्ध्वगमन । पुढे श्रीराम लक्ष्मण ।
पंपेसी निघाले आपण । धनुष्यबाण सज्जोनी ॥ २ ॥

पंपायाः पश्चिमे तीरे उपविष्टो च राघवौ ।
ददर्शतुस्ततस्तत्र शबर्या रम्यमाश्रमम् ॥ १ ॥
तौ तमाश्रममासाद्य द्रुमैर्बहुभिरावृतम् ।
सुरभ्यमभिवीक्षंतौ शबरीमभ्युपेयतुः ॥ २ ॥
तौ दृष्ट्वा तु तदा सिद्धा समुत्थाय कृताञ्जलिः ।
पादौ जग्राह रामस्य लक्ष्मणस्य च धीमतः ॥ ३ ॥

श्रीराम लक्ष्मण अति सत्वर । पावोनि पंपापश्चिमतीर ।
सेवोनियां पंपापवित्रनीर । विश्रांतीस वीर बैसले ॥ ३ ॥

शबरीच्या आश्रमास भेट, शबरीने केलेले स्वागत :

तेथें शबरीचा आश्रम । देखोनि अति मनोरम ।
स्वयें आले सौ‍मित्र राम । आल्हाद परम शबरीसी ॥ ४ ॥
श्रीरामचरणीं लोटांगण । भावें वंदिला लक्ष्मण ।
शबरीसी आल्हाद पूर्ण । श्रीरामदर्शन देखोनि ॥ ५ ॥
मातंगऋषीच्या सेवावृत्तीं । शबरीची शुद्धमती ।
भगवद्भाव सर्वा भूतीं । श्रीरामीं भक्ति अनन्य ॥ ६ ॥
मातंगऋषीचे शिष्य निर्मळ । पडला असता अति दुष्काळ ।
गुरुसी आणिती फळ मूळ । स्रवले केवळ श्रमबिंदु ॥ ७ ॥
श्रमबिंदु पडतां जाण । जालीं सरोवरें पावन ।
आटों नेणे तेथींचे जीवन । नित्य परिपूर्ण शुद्धजळें ॥ ८ ॥
श्रद्धेने सेवितां तेथींचे आप । तत्काळ शमे त्रिविध ताप ।
सांसारिक शमे संताप । सुखरुप स्वानंदें ॥ ९ ॥
एकाचे बिंदु पडतां क्षितीं । सुमनें झालीं नाना जाती ।
सुकों नेणती कल्पांतीं । नित्य टवटविती मघमघित ॥ १० ॥
त्या सुमनांचा घेतां वास । मनाचा निरसे त्रिगुणत्रास ।
मग भोगी प्रकट पेरश । अति उल्लास जीवशिवां ॥ ११ ॥
तिहीं पुष्पीं सुपुष्ति । वनश्री शोभासौभाग्ययुक्त ।
ते देखोनि श्रीराम संतोषत । अति भावार्थ शबरीचा ॥ १२ ॥
देखोनि शबरीचा भावार्थ । संतोषला श्रीरघुनाथ ।
मग तिचा वृत्तांत पुसत । समाधानार्थ द्यावया ॥ १३ ॥

कच्चित्ते निर्जिता विघ्नाः कच्चिते वर्धते तपः ।
कच्चिते नियतःकोपाअहारश्च तपोधने ॥ ४ ॥
कच्चिते नियमाःप्राप्ताःकच्चित्ते मनसःसुखम् ।
कच्चिते गुरुशुश्रूषा सफला चारुभाषिणि ॥ ५ ॥

रामाचा शबरीस उपदेश व प्रश्न :

श्रीराम पुसे आपण । शबरी तूं ऐकें सावधान ।
मी एक ज्ञाता जग अज्ञान । हें महाविघ्न जिंकिलें कीं ॥ १४ ॥
ज्ञानाचा ज्ञानाभिमान । हेंचि तापसां महाविघ्न ।
जेणें जिंतिला ज्ञानभिमान । तप वर्धमान तयाचें ॥ १५ ॥
तयाच्या तपाची थोरी । स्वयें भगवंत आज्ञाधारी ।
तोचि तपस्वी या संसारीं । सुरासुरीं वंदिजे ॥ १६ ॥
अद्वैत देकिलें स्वस्वरुप । तैचि जिंतिला जाय कोप ।
असतां द्वैतखटाटोप । सर्वथा कोप जिणवेना ॥ १७ ॥
जो पुढिलाचे ढक्यानें पडे । त्यावरी तो कोपें वावडे ।
स्वयें निसरोनि गडबडे । झाडितु मागें पुढे उगाचि निघे ॥ १८ ॥
स्वजिव्हा रगडितां दातांबुडीं । तया कोपाची कडाडी ।
दात पाडी कीं जिव्हा तोडी । तैसी अद्वैतीं सवडी कोपासी नाहीं ॥ १९ ॥
जंव द्वैताची सुदृढता । तंव जिंकवेना मोहममता ।
अद्वैतभावना भावितां । मोहममता निमाली ॥ २० ॥
वृति पावल्या चित्स्वरुप । तै मन होते सुखरुप ।
मनी असतीं दुःखसंताप । केल्याही तप अति मिथ्या ॥ २१ ॥
तरी सद्‍गुरुसेवा सफळ । संसार होय मृगजळ ।
ऐसें न पावती ते बरळ । गुरु केवळ अनोळख ॥ २२ ॥
जे गुरुसी मनुष्य मानिती । त्यांची मिथ्या गुरुभक्ती ।
त्यांसी कल्पांतीं नव्हे विश्रांती । उपदेशें भ्रांति मुख्यत्वें ॥ २३ ॥
मंत्र तंत्र जे सांगती । ते तोंडींचे तोंडीं उपदेशिती ।
नाहीं अंतरी निजप्रतीती । उपदेशभ्रांति मुख्यत्वें ॥ २४ ॥
सुवर्णाचा म्हणती नाग । नाग नव्हे तें सोनें चांग ।
तेंवी दृष्य द्रष्टा दिसे सांग । उपदेश अव्यंग या नांव ॥ २५ ॥
ऐसिये निजात्मप्रतीती । आहे सकळ गुरुभक्ती ।
सांडोनि ज्ञानगर्व‍उद्धती । विनीत सर्वांभूतीं अहेतुक ॥ २६ ॥
इंद्रियकर्माची प्रवृत्ती । तुज आहे कीं अकर्त्रात्मप्रतीती ।
तैं सकळ वासनां होय शांती । सुखस्थितिस्वानंद ॥ २७ ॥
ऐसी निजानंदप्रतीती । या नांव सार्थक तपःस्थिती ।
निजदेह मिथ्यात्वें देखती । मुख्य परमार्थी तो एक ॥ २८ ॥
ऐसें श्रीरामें पुसतां । शबरीस झाली पूर्णावस्था ।
श्रीरामचरणीं ठेवोनी माथा । समस्त तत्वत्तां वृत्तांतां सांगत ॥ २९ ॥

अद्य प्राप्ता तपःसिद्धिस्तव संदर्शनान्मया ।
अद्य मे सफलं जन्म गुरवश्च सुपूजिताः ॥ ६ ॥
चित्रकूटं त्वयि प्राप्ते विमानैरतुलप्रभैः ।
मुनयो दिवमारुढा ये मयाभ्यर्चिताः पुरा ॥ ७ ॥
तैश्चाहमुक्ता धर्मज्ञैर्मभागैर्महात्मभिः ।
आगमिष्यति काकुत्स्थः सुपुष्पामिदमाश्रमम् ॥ ८ ॥
मया तु संचितं वन्यं विविधं पुरुषर्षभ ।
तवार्थे पुरुषव्याघ्र पंपायास्तीर संभवात् ।
तत्ते परिगृहीतव्यं राम सौ‍मित्रिणा सह ॥ ९ ॥

शबरीचे उत्तर, श्रीरामास तेथे राहाण्याची विनंती :

तुझें होतांचि दर्शन । सफळ तप सफळ ज्ञान ।
सकळ ध्येय ध्याता ध्यान । सफळ अनुष्ठान आजि माजें ॥ ३० ॥
आजि माझी सफळ वृत्ती । आजि माझी सफळ स्थिती ।
आजि माजी सफळ भक्ती । जे कृपें रघुपति आलासी ॥ ३१ ॥
तुझें करितां नामस्मरण । सहित पूर्वजां उद्धरण ।
त्या तुझें जालिया दर्शन । सफळ जनन आजि माझें ॥ ३२ ॥
तुझे देखिलिया चरण । जन्ममरणांची बोळवण ।
बोळविलें मीतूंपण । सुखसंपन्न श्रीरामें ॥ ३३ ॥
तुज येतां चित्रकूटींहूनी । मार्गी उद्धरिलें मुनी ।
शरभंगु जातां विमानीं । म्यां प्रार्थोनि पूसिलें ॥ ३४ ॥
तेणें सांगितलें मजप्रती । तुझ्या आश्रमा येईल श्रीरघुपती ।
तैपासोनि अहोरात्रीं । चरण चित्तीं दृढ धरिले ॥ ३५ ॥
माझा जाणोनि भावार्थ । कृपेनें आलासी कृपावंत ।
तरी आजि राहोनियां येथ । पूजा यथोक्त अंगीकारीं ॥ ३६ ॥
सुक्ष्म सामग्री अति पुनीत । म्यां किंचित केली असे येथ ।
तें अंगीकारावी श्रीरघुनाथ । सखा समवेत सौ‍मित्र ॥ ३७ ॥
ऐसें ऐकोनि शबरीवचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
विधियुक्त पूजा अंगीकारोन । वनभोजन स्वयें केलें ॥ ३८ ॥

वचनात्तस्य सा रामं शबरी वाक्यमब्रवीत ।
कृत्स्नं वनमिदं दृष्टं श्रोतव्यं च श्रुतं त्वया ॥ १० ॥
तदिच्छाम्यभ्यनुज्ञाता त्यक्षाम्येतत्कलेवरम् ।
तेषामिच्छाम्यहं गंतुंसमीपं भावितात्मनाम्॥ ११ ॥

श्रीरामांनी शबरीची स्तुती केली :

संतोषोनी बोलिला श्रीरघुनाथ । जें दनुजमुखें तुझें सामर्थ्य ।
ऐकोनि आम्ही आलों येथ । तुझें आचरित पहावया ॥ ३९ ॥
दनुदानवें जें सांगितलें । त्याहूनि अधिक म्यां देखिलें ।
ऐसे श्रीरामें बोलिलें । मन आनंदले शबरीचें ॥ ४० ॥
सद्‍गुरुमंत्रसामर्थ्य पूर्ण । कदा कोमेजना हें वन ।
सुमनां न ये सुकलेपण । न आटे जीवन बहुकाळें ॥ ४१ ॥
सद्‍गुरुचें सामर्थ्य भले । जैसें ऐकिलें तैसें देखिलें ।
त्याचें वचन म्यां पाळिलें । तेणें देखिले हे पाय ॥ ४२ ॥
ऐसें बोलोनि उल्लासतां । श्रीरामचरणीं ठेविला माथा ।
कांहीएक मी मागेन आतां । दयवंता तें देईं ॥ ४३ ॥
तुझें घ्यावया दर्शन । धरिलें देहाचें धारण ।
तरी तुझें देखिलिया चरण । कार्य कोण देहाचें ॥ ४४ ॥

शबरीची प्रार्थना :

तरी तुज देखतां श्रीरघुनाथा । गेली देहाची मोहममता ।
तो मी त्यागीन जीव आतां । कृपावंता आज्ञापीं ॥ ४५ ॥
देहसंगतीं अमित दोष । देहसंगति तो श्वान ओक ।
देह तोचि महा नरक । परम दुःख देहसंगें ॥ ४६ ॥
देहाचिये संगतीं । ऐशीं दुखेः नेणों किती ।
देहसंगाची करिन निवृत्ती । कृपें रघुपति आज्ञापीं ॥ ४७ ॥

रामांची अनुमती व शबरीचा उद्धार :

ऐसें शबरियें स्वयें प्रार्थून । घातलें चरणीं लोटांगण ।
देखोनि तुष्टला रघुनंदन । आज्ञा संपूर्ण स्वये देत ॥ ४८ ॥

धर्मिष्ठं तु वचःश्रुत्वा राघवःसहलक्ष्मणः ।
अनुजानामि गच्छेति प्रहृष्टवदनोऽब्रवीत् ॥ १२ ॥
अनुज्ञाता तु रामेण हुत्वात्मानं हुताशने ।
ज्वलत्पावकसंकाशा स्वर्गमेव जगाम ह ॥ १३ ॥
यत्र ते सुकृतात्मानो विहरंति महर्षयः ।
तत्पुण्यं शबरी स्थानं जगामात्मसमाधिना ॥ १४ ॥

ऐकोनि शबरीच्या वचनासी । श्रीराम बोले अति उल्लासीं ।
सांडोनियां देहलोभासी । परलोकासी सुखें जाय ॥ ४९ ॥
ऐकोनियां श्रीरामवचन । शबरी घालोनियां आसन ।
निजतेजासी चेतवोन । केलें दहन देहाचें ॥ ५० ॥
श्रीरामपुण्याची निजशक्ती । जाळोनियां देहस्थिती ।
शबरीसी कोण लोकप्राप्ती । तेही गती अवधारा ॥ ५१ ॥
जैसें पुण्याचें सामर्थ्य । ऋषि तैसे लोक पावत ।
शबरी पापपुण्यातीत । अति समर्थ श्रीरामें ॥ ५२ ॥
श्रीरामदर्शनाचें पुण्य । दिव्य भोगें नव्हे क्षीण ।
शबरी पावली अक्षय स्थान । गमनागमन जेथ नाहीं ॥ ५३ ॥
ऋषीश्वरांच्या पुण्यसंपत्ती । भोगक्षयें क्षया जाती ।
ते पावती पुनरावृत्ती । शबरीस प्राप्ती ते नाहीं ॥ ५४ ॥
जेथें नित्य वस्ती श्रीशुका । जेथें वस्ती सनकादिकां ।
शबरी पावली तया लोका । शिवादिकां निजपूज्य ॥ ५५ ॥
श्रीरामदृष्टि पुण्य परिपूर्ण । देहदहने देदिप्यमान ।
तिसी न लागेचि विमान । केलें गमन निजगतीं ॥ ५६ ॥
जे जाती विमानगतीं । ते पावती पुनरावृत्ती ।
ते नाहीं शबरीप्रती । अगम्यगती ते गेली ॥ ५७ ॥
श्रीरामदर्शन पुण्यसंपत्ती । अक्षय सुखाची सुखवस्ती ।
क्षया न वचे कल्पांतीं । निजप्राप्ती शबरीसी ॥ ५८ ॥
श्रीराम देखतांची दृष्टीं । पापपुण्यां पडली तुटी ।
खुंटली जन्ममरणांची गोष्टी । अक्षय संतुष्टी शबरीसी ॥ ५९ ॥
स्वयें श्रीराम कृपामूर्ती । शबरी तरली सुखानुभूतीं ।
स्वर्गी जयजयकार करिती । सुमनें वर्षती सुरसिद्ध ॥ ६० ॥
यापरी शबरीद्धरण । श्रीरामें केलें आपण ।
एकाजनार्दना शरण । जगदुद्धरण श्रीराम ॥ ६१ ॥
शबरीआश्रम अतिविश्रांत । राम लक्ष्मण बैसोनि तेथ ।
वनशोभा स्वयें पहात । तंव अपूर्व तेथ वर्तलें ॥ ६२ ॥

वनशोभा पाहात असता श्रीरामांचा चित्तक्षोभ :

देखोनि मृगशावाक्षिवदनां । सीता आठवली मृगनयना ।
मदन क्षोभला श्रीरघुनंदना । मनमोहना श्रीरामा ॥ ६३ ॥
श्रीराम नित्य निष्काम । त्यासी क्षोभला अति काम ।
काम निष्काम आक्रम । कामसंभ्रम अवधारा ॥ ६४ ॥

मां हि शोकसमाक्रान्तं संतापयति मन्मथः ।
हृषटः प्रवदमानश्च मामाहृयति कोकिलः ॥ १५ ॥

वसते वन शोभायमान । कोकिलांचें पंचम आलपन ।
ऐकोनियां श्रीरघुनंदन । सकाम संपूर्ण सीतार्थी ॥ ६५ ॥

एष दात्यूहको हृष्टो रम्ये कानननिझरि ।
प्रणदन्मन्मथाविष्टं शोचयिष्यति लक्ष्मण ॥ १६ ॥

ज्यांच्या ज्यांच्या कूजन-क्रीडेमुळे श्रीरामांना
मनस्ताप झाला त्यांना त्यांना शाप व उःशाप कोकिळा :

नव्हें हें कोकिळाकूजन । हे मदनाचे दुर्धर बाण ।
हृदयीं विधिती दारुण । द्वंद्वं संपूर्ण हा करितो ॥ ६६ ॥
लक्ष्मणा करीं गां निवारण । कोकिळा न सांडिती कूजन ।
माझें नायके हा वचन । रघुनंदन कोपला ॥ ६७ ॥
याचें खुंटो वदते वचन । यासी पडो दृढ मौन ।
रागें क्षोभे रघुनंदन । शाप दारुण स्वयें वदला ॥ ६७ ॥
कोकिळा विनवी अति दीन । सवेंचि तुष्टला रघुनंदन ।
वसंतीं तुज मधुर वचन । येर्‍हवीं मौन सर्वदा ॥ ६९ ॥

मां दृष्टवैव मृगो याति तं मृगी परिधावति ।
वक्ष्यती वनभीः कामैः कामैरर्धा मृगीरयम् ॥ १७ ॥

हरिण :

लक्ष्मणा माझे सन्मुख दृष्टीं । मृग रमतो मृगीपाठीं ।
मज काम क्षोभोनि हठी । द्वंद्वदृष्टी हो माझा ॥ ७० ॥
माझ्या मूर्खत्वाच्या गोष्टी । सांगतो मृगीच्या कर्णपुटीं ।
सीता हारविली गोरटी । मूर्ख सृष्टीं श्रीराम ॥ ७१ ॥
पशु पक्षी काग कपोता । स्त्रीपासोनि नव्हे परता ।
वनीं सांडोनि गेला सीता । मुख्य मूर्खता श्रीरामीं ॥ ७२ ॥
हातींची हारवोनि सीता । वनीं रडत भोवतो आतां ।
श्रीरामऐसी मूर्खता । मज सर्वथा असेना ॥ ७३ ॥
मी सांडोनि निजकांता । श्रीरामाऐसा न वचें परता ।
ऐसिया माझ्या निद्य कथा । मृग सांगतो मृगीपासीं ॥ ७४ ॥
देखोनि मृगाचें मैथुन । श्रीरामें शापिला अति क्षोभून ।
तुज करितां दारगमन । घायें प्राण जातील ॥ ७५ ॥
ऐकोनि दुर्धर शापोक्ती । मृग श्रीरामा ये काकुळती ।
सवेंचि तुष्टला कृपामूर्ती । शापनिवृत्ति स्वयें वदे ॥ ७६ ॥
घंटापारधीचे रातीं । घायें तुमचे प्राण जाती ।
येरवीं विचरतां स्त्रियेप्रती । सुखसंभूति स्वानंदें ॥ ७७ ॥

हत्ती व हत्तीण :

उन्मत्त कामें कामगज । गझीसी क्रीडे देखोनि मज ।
मज सीतेची लावोनि लाज । नाचे भोजें स्त्रीसंगे ॥ ७८ ॥
जेंवी मी प्रेमें आश्वासीं सीता । तेंवी तो सोंड ठेवितो गजीचे माथां ।
मज उपहासितो रघुनाथा । स्त्रीकामता उन्मत्त ॥ ७९ ॥
सीता पुसतां गजासी । कांही न बोले श्रीरामासी ।
गज क्रीडतो निजगजीसीं । तेणें श्रीरामासी कोप आला ॥ ८० ॥
श्रीरामें क्षोभोनि आपण । शाप दिधला दारुण ।
गजीसीं करितां कामरमण । स्त्रीसंगे प्राण जाईल ॥ ८१ ॥
गजी गज दीनवदन । दोघें प्रार्थिती रघुनंदन ।
त्यांचेनि वचनें संतोषोन । शापमोचन स्वयें वदला ॥ ८२ ॥
गजीसीं करितां मैथुन । तूं पडसी अचेतन ।
गजीनें माथां घालितां जीवन । तुझा प्राण वाचेल ॥ ८३ ॥
गती तुज पुरवील तृण । त्याचे केलिया भक्षण ।
सातां दिवसां सावधान । वनविहरण तूं करिसी ॥ ८४ ॥
तया नांव गजोपशेज । ऐसें मिरविसील भोज ।
ऐकतां सुखी जाला गज । तेणें सहजें सुख जालें ॥ ८५ ॥
अद्यापि गजगजीमैथुन । तेथें हे चालतें विंदान ।
बाप विनोद श्रीरघुनंदन । विचित्र विंदान करितसे ॥ ८६ ॥

शिखिनीभिः परिवृतास्त एते मदमूर्च्छिताः ।
मन्मथाभिपरीतस्य मम मन्मथवर्धनाः॥ १८ ॥
पश्य लक्ष्मण नृत्यंतं मयूरमुपनृत्यति ।
शिखिनी मन्मथार्तैषा भर्तारं गिरिसानुषु ॥ १९ ॥

मोर व लाडोरी :

पाहें पां लक्ष्मणा येथ । मय़ूरी मयूरसंयुक्त ।
नृत्य करी मन्मथोन्मत्त । मजही करोनी ॥ ८७ ॥
मयूराची निजपत्‍नी । नाहीं राक्षसीं नेली हिरोनी ।
म्हणोनि नाचे गिरीकाननीं । वांकुल्या दरोनि मज दावी ॥ ८८ ॥
म्यां सीता हरविली वनीं । मज दुःखितातें देखोनी ।
हा नाचतो घेवोनि पत्‍नी । रामें कोपोनि शापिला ॥ ८९ ॥
मज दुखितातें देखतां । दोघें नाचती उन्मत्तता ।
तुज येईल नपुंसकता । अंगसंगता तुम्हां न घडे ॥ ९० ॥
ऐकोनियां शापवचन । मयूर विनवी अति दीन ।
मयूरीनें धरिले चरण । शापमोचन श्रीराम वदे ॥ ९१ ॥
सीतेचे वियोगें जाण । दुःखी होसी तूं रघुनंदन ।
आम्हां पक्षियांचा पाड कोण । दुःख दारुण पाहावयासी ॥ ९२ ॥
ऐसें ऐकोनि मयूरवचन । श्रीराम जाला सुप्रसन्न ।
दोघे नृत्यमानें सुखसंपन्न । चक्षुवीर्ये पूर्ण सुख तुम्हां ॥ ९३ ॥

कावळा :

पाहें पां लक्ष्मणा विपरीत । काळा कावळा पत्‍नीसमवेत ।
मज दूःखितां वांकुल्या दावित । स्वयें क्रीडत पत्‍नीसीं ॥ ९४ ॥
श्रीराम सीता पुसे कागासी । दोघें न बोलती श्रीरामासीं ।
श्रीरामें क्षोभोनि आवेशीं । त्या दोघांशी शापिलें ॥ १५ ॥
जन्मामध्यें एकदा जाण । तुम्हां दोघां होय मैथुन ।
पुढतीं न घडे स्त्रीगमन । होती संपूर्ण कागवंध्या ॥ ९६ ॥
अद्यापि कागाच्या कागदेहीं । दुसरा गर्भसंभव नाहीं ।
कागवंध्या म्हणती पाहीं । लोकीं तिहीं कागसी ॥ ९७ ॥

चक्रवाक – चक्रवाकी :

श्रीराम चक्रवाकें देखता नयनीं । एकत्र विचरती पैं दोनी ।
परती नव्हेती अर्धक्षणीं । गमनागमनीं एकत्र ॥ ९८ ॥

एक एव सुखी लोके चक्रवाको विहंगमः ।
पश्य दृष्ट्या मनोरम्या छाययानुगता प्रिया ॥ २० ॥

या लोकीं सुखे सुखिया । पाहतां दिसे चक्रवाकिया ।
रुपासवें जैसी छाया । तैसी भार्या अनुगत ॥ ९९ ॥
चक्रवाकीसी सांगे कथा । श्रीरामें हरविली सीता ।
मी पत्‍नीसीं नव्हें परता । श्रीराममूर्खता मज नाहीं ॥ १०० ॥
वनीं एकली सांडी कांता । मुख्य मूर्खत्व याचे माथां ।
हे ज्ञान नाहीं श्रीरघुनाथा । निजमूर्खता विलपत ॥ १ ॥
श्रीराम मूर्खशिरोमणी । कां गेला निजपत्‍नी सांडोनी ।
तिजलागीं अति दुःखी होवोनी । वनोवनीं हिंडत ॥ २ ॥
निजपत्‍नीसीं क्रीडतां । देखोनियां पुढिलाचिया एकांता ।
क्षोभ उपजे श्रीरघुनाथा । उपशांतता धरीना ॥ ३ ॥
श्रीराम सीता पुसे त्यांसी । ते न बोलती श्रीरामासीं ।
वियोग पावल अहर्निशीं । चक्रवाकांसी शापिलें ॥ ४ ॥
चक्रवाकें तळमळती । दीनें येती काकुळती ।
आमची अवधारीं विनंती । कृपामूर्ति श्रीरामा ॥ ५ ॥
सीतेची वियोगगती । तुज न साहवे श्रीरघुपती ।
तो वियोग आम्हांप्रती । कैसिया रीतीं कंठवे ॥ ६ ॥
याहूनि श्रीरघुनाथा । अवश्य करी आमच्या घाता ।
तुझेनि हातें मारतां । सुखरुपता आम्हांसी ॥ ७ ॥
सूखें सोसेल अंगभंग । परी न साहवे स्त्रीवियोग ।
विनंति ऐकतांचि चांग । श्रीराम अव्यंग तुष्टला ॥ ८ ॥
दिवसा दोघां अंगसंगती । वियोग पावाल पैं रातीं ।
परी वियोगीं योग शब्दसंगतीं । शापनिशर्मुक्ति श्रीरामें ॥ ९ ॥
श्रीराम पंपातीरीं । सीताविरहाचे अंतरीं ।
वदला विचित्र कुसरी । लीलावधारी श्रीराम ॥ ११० ॥
मिथ्या सीतावियोगप्राप्ती । मिथ्याचि ती विरहशक्ती ।
सत्यत्वें दावी श्रीरघुपती । शापोपहती अनुवादे ॥ ११ ॥
सर्वां भूती श्रीराम सद्रूप । मिथ्या वियोग मिथ्या शाप ।
मिथ्या विरहाचा प्रताप । चित्स्वरुप श्रीराम ॥ १२ ॥
श्रीराम ज्ञानविज्ञान अभिव्यक्ती । श्रीराम निर्विकल्प ब्रह्ममूर्ती ।
श्रीराम चिन्मात्र दाशरथी । सीतापत परब्रह्म ॥ १३ ॥
सीता ध्येय श्रीराम ध्यान । सीता ज्ञेय श्रीराम ज्ञान ।
सीता चेतना श्रीराम चैतन्य । दोनी अभिन्न एकत्वें ॥ १४ ॥
श्रीराम चित्स्वरुपस्थिती । वर्णितां शास्त्रें मौनावती ।
श्रुति परतल्या नेति नेती । माझी वचनोक्ति ते काय ॥ १५ ॥
पुढील कथानुसंधान । येथोनि ऋष्यमूकातें गमन ।
करावया सुग्रीवासीं सौजन्य । श्रीरघुनंदन उद्यत ॥ १६ ॥

ऋष्यमूको गिरिर्यत्र नातिदूरे प्रकाशते ।
यस्मिन्वसति धर्मात्मा सुग्रीवोंऽशुभमः सुतः ॥ २१ ॥

ऋष्यमूक पर्वताकडे :

लक्ष्मणा पाहें सावचित्त । हा ऋष्यमूक महापर्वत ।
येथोनि समीप दिसत । सुशोभित फळीं पुष्पीं ॥ १७ ॥

ऋष्यमूक असे का म्हणतात ? :

ऋषींनी यज्ञ याग केले येथ । यालागीं ऋष्यमूक यातें म्हणत ।
सुग्रीव वसताहे तेथ । प्रधानयुक्त भयभीत ॥ १८ ॥

वालीच्या भीतीने सुग्रीवाने या पर्वताचा आश्रय घेतला :

वाळिभयें भयभीत । सुग्रीव वसे ऋष्यमूकांत ।
वाळीस ऋषि शाप देत । नव्हे सामर्थ्य तेथ यावया ॥ १९ ॥
सुग्रीवाची घ्यावया भेटी । तेथोनि निघाला उठाउठीं ।
वाळिभयाची निवटोनि गोष्टी । देऊ सुखसंतुष्टी सुग्रीवा ॥ १२० ॥
भार्या हरोनि सुंदरी । वाळीनें सुग्रीव गांजिला भारी ।
श्रीराम गांजिल्याचा कैवारी । धनुर्धारी कृपाळु ॥ २१ ॥

अरण्यकांडाची सारांशरुप उजळणी :

संपले अरण्यकांडकोड । किष्किंधाकांड अति गोड ।
त्या कथेचे सुख सुरवाड । श्रोते वारंवार परिसती ॥ २२ ॥
पुरवोनि भरताचे कोड । पादुका देवोनि सुरवाड ।
त्याचें प्रेम वाढवोनि गोड । अरण्यकांड संपविलें ॥ २३ ॥
विराध राक्षस प्रचंड । ज्याचें रावणा भय उदंड ।
श्रीरामें त्यासी करोनि दुखंड । अरण्यकांड संपविलें ॥ २४ ॥
संघा ( सांबा ) करोनि दुखंड । शूर्पणखेचें नासिकाखंड ।
सकर्ण विंटबोनि तोंड । अरण्यकांड संपविलें ॥ २६ ॥
पंचवटीं रण वितंड । खरदूषणां छेदोनि मुंड ।
त्रिशिराचें ठेंचोनि तोंड । अरण्यकांड संपविलें ॥ २७ ॥
मायामृगें छळितां दृढ । कपटी मारीच मारिला सुदृढ ।
जाणोनि भविष्याचें वाड अरण्यकांड संपविलें ॥ २८ ॥
रावणें जटायु खंडवितंड । दुःखें पसरोनि पाडिला तोंड ।
श्रीरामे सुखी करोनि अखंड । अरण्यकांड सपविले ॥ २९ ॥
सीताशुद्धीचें कैवाड । विलासरुप श्रीराम गोड ।
पुरवोनि पार्वतीचें कोड । अरण्यकांड संपविले ॥ १३० ॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामें शबरीउद्धरण ।
केलें अरण्यकांड संपूर्ण । परिपूर्ण श्रीरामें ॥ ३१ ॥
कबंधाचे छेदोनि बंध । तोही मुक्त केला शुद्ध ।
एकाजनार्दनीं परमानंद । स्वानंदकंद श्रीराम ॥ ३२ ॥
संपले अरण्यकांड गोड । पुढें किष्किधाकांड अति प्रचंड ।
श्रोते परिसोत निवाड । सुखसुरवाड रामायणीं ॥ ३३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शबरीउद्धरणं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥ २३ ॥
॥ ओंव्या १३३ ॥ श्लोक २१ ॥ एवं १५४ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

*** अरण्यकांड समाप्तम् ***

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा भावार्थरामायण अरण्यकाण्ड अध्याय तेविसावा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *