भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अठरावा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अठरावा

श्रीरामपादुकांसह भरत अयोध्येत येतो

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरत श्रीरामांची क्षमायाचना करतोः

भरतें धांवोनि आपण । दृढ धरिले श्रीरामचरण ।
अश्रु चालिले संपूर्ण । तेणें चरणक्षाळण श्रीरामा ॥१॥

स्वस्थगात्रस्तु भरतो वाचा संसज्जमानया ।
कृताजलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत ॥१॥

स्वेद रोमांच रवरवित । तेणें सर्वांग डवडवीत ।
हरिखे उत्कंठित जालें चित्त । सद्रदित पैं वाचा ॥२॥
विकळ वाचा होवोनि ठायीं । विनटोनि श्रीरामाच्या पायीं ।
अंजळिपुट जोडोनि पाहीं । भरत लवलाहीं विनवित ॥३॥
करोनिया कुशास्तरण । तुजवरी देत होतों प्राण ।
हा माझा अपराध दारूण । क्षमा संपूर्ण करीं स्वामी ॥४॥
भूतीं पृथ्वी नांगरून । दाढी घालोनि करिती दहन ।
जीवनेंसहित लाताऊन ॥ कर्दमकंदन जन करिती ॥५॥
तो अपराध धरा न मनून । पाळित्या पोळिल्या देवोनि दिव्यान्न ।
जना सुखी करी संपूर्ण । तैसें आपण क्षमा कीजे ॥६॥
श्रीराम आमची जननी । आम्ही तुझीं लेकरें तान्ही ।
माझा अपराध न मानीं । म्हणोनि लोटांगणी तुज आलों ॥७॥
तुझे वंदोनि चरण । मी करितों अयोध्यागमन ।
ऐसे बोलोनि करी रुदन । मूर्च्छापन्न तो पडला ॥८॥

श्रीराम भरताचे सांत्वन करितात :

भरताचें प्रेम देखोन । कळवळिला श्रीरघुनंदन ।
धांवोनि उचलिला आपण । समाधान स्वयें वदे ॥९॥
आम्ही तुम्ही चवघे जण । एका पिंडाचे उत्पन्न ।
कोणाचा अपराध मानी कोण । वृथा उद्विग्न तूं कां होसी ॥१०॥
जीभ रगडलिया दांतांबुडी । कोप आलिया कडाडी ।
जीभ तोडी दांत पाडीं । तैसा परवडी आम्हां तुम्हां ॥११॥
टाळी पिटतां हातोहात । दुःख वाटे कां सुख होत ।
तैसें तुम्हां आम्हां येथ । एकात्मता अद्‌भुत आल्हाद ॥१२॥
ऐसें आश्वासून पूर्ण । श्रीरामें दिधलें आलिंगन ।
म्हणें भरता अयोध्यें करीं गमन । येरे वचन वंदिलें ॥१३॥

रामाज्ञेने अयोध्येला निघालेला भरत रामविरहामुळे पुढे जाऊ शकत नाही :

श्रीरामाज्ञा अतितांतडीं । भरत निघाला लवडसवडी ।
पायीं वळलीसे वेंगडी । पडे मुरकुंडी मूर्च्छित ॥१४॥
मन विगुंतलें रामापासीं । नयन विगुतलें रामरूपासीं ।
पाय ओढीती रामदर्शनासी । गति भरताशी खुंटली ॥१५॥
वाचा विगुंतली रामरूपासीं । श्रवण विगुंतलें रामकीर्तनासीं ।
क्रिया विगुंतलीरामभक्तीसीं । गति भरताची खुंटली ॥१६॥
प्राण पांगुळला रामापासीं । जीव विनटला श्रीरामासीं ।
इंद्रियें पारखी जालीं त्यासीं । गति भरताची खुंटली ॥१७॥
श्रीरामाची अनन्यप्रीती । भरताची अगा स्थिती ।
देखोनि श्रीराम सुखावे चित्तीं । काय त्याप्रती बोलत ॥१८॥
भरता ऐकें गुह्य गोष्टी । माझे प्रेम तुझ्या पोटीं ।
तेचि पोटीं कैकेयी खोटी । हृदयी गांठी न धरावी ॥१९॥
मज धाडिलें वनवासासी । सीता पायीं धाडीली वनासी ।
हें शल्य अहर्निशी । तुझ्या मानसीं सलताहे ॥२०॥
जे हृदयीं माझें पूर्ण प्रेम । तेथें नसावा द्वेष विशम ।
ऐसें बोलतां श्रीराम । भरत निभ्रम पडे पुढती ॥२१॥

एवं ब्रुवाणं रामं तु वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ।
प्रयच्छ पादुके पुत्र भरताय महात्मने ॥२॥
एवमुवत्वा वसिष्ठेन राघवः प्राड्मुखः स्थितः ।
पादुके हेमविकृते मम राज्याया ते ददौ ॥३॥
रामाज्ञां शिरसि स्थाप्य पादुके भरतस्तदा ।
अयोध्यामेव गच्छामि गृहित्वा पादुके शुभे ॥४॥

वसिष्ठांची युक्ती व रामपादुका भरतास अर्पण :

श्रीरामप्रेमें प्रेमळ । रामविरहें अति व्याकुळ ।
भरत देखोनियां विकळ । तंव वसिष्ठ कृपाळू बोलत ॥२२॥
सांडोनियां श्रीराममूर्ती । भरतासी गमनीं नाही शक्ती ।
देखोनि गुरु कृपायुक्ती । काय रामाप्रती बोलत ॥२३॥
अति आल्हादें अयोध्येप्रती । भरत जाय शीघ्रगती ।
ऐसी श्रीरामा आहे युक्ती । ते त्वां निश्चितीं करावी ॥२४॥
तुझ्या पादुका रघुनाथा । ठेवीं भरताचिये माथां ।
तेणें जाण आल्हादें तत्वतां ॥ अयोध्ये जाता उल्हास ॥२५॥
श्रीराम न घाली पायतन । करावया दीनोद्वारण ।
तारावया वृक्षवल्लीपाषाण । वनीं विहरण अनवाणी ॥२६॥
रामासी कांटे न रुपती पाहीं । कंटक उद्धरती रामपायीं ।
अडखळतां ठायींचे ठायीं । पाषाण तेही उद्धरती ॥२७॥
रामपादुका सुवर्णभूषण । आवडीं वागवीं लक्ष्मण ।
त्याही केल्या भरतार्पण । गुरुवचन वंदोनि ॥२८॥

कैकेयीला दोष न देण्याविषयी भरताचे आश्वासन :

रामपादुका आलिया हाता । उल्हास भरताच्या चित्ता ।
पादुका प्रतिष्ठूनि माथां । आल्हादता काय बोले ॥२९॥
श्रीरामपादुका ठेविता माथां । जगीं हारपली द्वेषविषमता ।
ते मी कैंची आणूं आतां । निजमाता द्वेषावया ॥३०॥
कैकेयीवरदें वनप्रयाण । दूषण नव्हे तें रामा भूषण ।
वाल्मीकवचनें कळली खूण । आता कोण द्वेषील ॥३१॥
भरत आणि स्वयें शत्रुघ्न । वंदोनि वसिष्ठाचे चरण ।
करोनि श्रीरामासी नमन । काय आपण बोलत ॥३२॥
तुझ्या पादुका ठेविल्या माथां । तुज भेटल्याविण रघुनाथा ।
नाहीं उतरणें सर्वथा । तिन्ही अवस्था त्रिकाळीं ॥३३॥
पादुका माझें निजजीवन । पादुका माझें देवतार्चन ।
पादुका माझें निजपूजन । नित्य ध्यान चरणांचे ॥३४॥
तुझ्या पादुका जी श्रीरामा । त्या तंव माझा परमात्मा ।
वर्णूनि पादुकांचा महिमा । वंदोनि श्रीराम निघाला ॥३५॥
जातां घालोनि लोटांगण । भरत काय बोले आपण ।
वसिष्ठादि रामलक्ष्मण । अवघे जण अवधारा ॥३६॥

नंदिग्रामं गमिष्यामि मातरं भ्रातरं विना ।
तत्र दुःखमिदं सर्वं सहिष्ये राघवं विना ॥५॥
गतश्चाहो दिवं राजा वनस्थः स गुरुर्मम ।
रामागमं प्रतीक्षेऽहं पालयिष्यन्वसुन्धराम् ॥६॥

भरत नंदिग्रामात राहून शत्रुघ्नाकडून राज्यकारभार करवितो :

श्रीरामाचे अनुज्ञेनें । मी करितों अयोध्ये गमन ।
परी तेथें श्रीरामावांचोन । मी अयोध्याभुवनीं वसेंना ॥३७॥
निजराज्यातें त्यागूनी । पिता प्रवेशे वैकुंठभुवनीं ।
श्रीरामा सांडोनियां वनीं । मी राजभवनीं राहेना ॥३८॥
विनंती करितों मी समस्तां । मीं नंदिग्रामीं राहीन आतां ।
अयोध्याराज्यभर तत्वत । होईन चालविता तेथोनी ॥३९॥
भद्रीं न देखतां रघुनाथा । मज नावरे दुःखावस्था ।
यालागीं अयोध्ये नवजातां । राज्यभार माथां शत्रुघ्न ॥४०॥
रामेवीण अयोध्या दृष्टीं । देखतां मज दुःखकोटी ।
यालागीं तिची न घें भेटी । ते वस्तीची गोष्ट रुचेना ॥४१॥
नंदिग्रामी करोनि वस्ती । अयोध्येसी नजराज्याची स्थिती ।
माझिया जाण अनुमतीं । शत्रुघ्नाहातीं करवीन ॥४२॥
श्रीराम पादुकांपुढे जाण । भरत शत्रुघ्न दोघे जण ।
अयोध्यानिराज्यलक्षण । करिती संपूर्ण पादुका ॥४३॥
पादुकांचा प्रताप पूर्ण । अयोध्येकडे पाहील कोण ।
कळिकाळ नोळंगती आंगवण । राज्यलक्षण पादुका ॥४४॥
रामपादुका ऐकतां कर्णी । यम काळ येती लोटांगणी ।
इंद्रादिक लागतई चरणीं । राज्यलक्षणी पादुका ॥४५॥
पादुकासामर्थ्ये सामर्थ्यता । त्या भाग्यें आलिया माझ्या हाता ।
त्या म्यां दृढ ओपिल्या माथां । कृपावंता श्रीरामा ॥४६॥
श्रीरामवियोगाचें दुःख । पादुका पावतां गेलें निःशेष ।
पादुका पाहतां स्वानंदसुख । आत्यंतिक श्रीरामा ॥४७॥
पुढती भेटे श्रीरघुनाथ । तंववरी माझें हेंचि व्रत ।
मस्तकीं पादुका सतत । स्वानंदयुक्त वाहीन ॥४८॥
राम राहिला वनवासीं । विसरलों त्या दुःखासी ।
पादुकारूपें मजपासीं । अहर्निशीं श्रीराम ॥४९॥
तुजसीं वियोग रघुनाथा । येथोनि मज नाहीं आतां ।
उल्हास भरताचिया चित्ता । स्वानंदता गर्जत ॥५०॥
ऐकोनि भरताचें वचन । श्रीराम झाला सुखसंपन्न ।
दोघाही दिधलें आलिंगन । भरतशत्रुघ्न सुखरूप ॥५१॥

चौदा वर्षे चौदा दिवसांनी आपण वनवासातून परत येऊ असे रामवचन :

चौदा वर्षीं चौदा दिवसीं । मी येईन नेमेंसी ।
संदेह न धरावा मानसीं । मी तुजपासीं निभ्रांत ॥५२॥
ऐसें बोले श्रीरघुनंदन । यथार्थ मानी भरत शत्रुघ्न ।
दोन्ही करसंतुष्ट जोडून । सांष्टांगी नमन त्याहीं केलें ॥५३॥
बंधुबंधूंस जाला ऐक्यभाव । बंधुबंधूंसीं प्रेम अपूर्व ।
यालागीं चित्रकूटासी बांधव । ठेविलें नाव श्रीरामें ॥५४॥
चवघां बंधूंसी एकात्मता । चित्रकूटीं आली हाता ।
यालागीं बांधव हें नाम तत्वतां । स्वभावतां चित्रकूटा ॥५५॥

निरोप व अयोध्येकडे भरत-शत्रुघ्नांचे प्रयाण :

लागोनि श्रीरामाच्या चरणा । वंदोनि जानकी लक्ष्मणां ।
तिघां करोनि प्रदक्षिणा । भरतशत्रुघ्नां उल्हासु ॥५६॥
रामपादुका ठेवोनि शिरीं । दोघे बैसले रथावरी ।
निषाणें त्राहाटिल्या भेरी । निजनागरीं निघाले ॥५७॥
श्रीरामे निजमाता । संबोधिल्या सुखरूपता ।
त्यांच्या चरणीं ठेवूनि माथा । त्याही समस्ता बोळविल्या ॥५८॥
सैन्य सेनानी प्रधान । तिहीं वंदोनि रघुनंदन ।
होवोनियां सुखसंपन्न । अयोध्यागमन तिहीं केलें ॥५९॥
निजनागरीं अति उल्हासीं । बरत आला प्रयागासी ।
भेटोनियां भरद्वाजासी । वृत्तांत त्यापासीं सांगितला ॥६०॥
श्रीरामाच्या निजपादुका । देखोनि बरताचे मस्तकां ।
भरद्वाज पावला हरिखा । म्हणे धन्य तिहीं लोकीं भरतां तूं ॥६१॥
परमानंदे परिपूर्ण । भरता दिधलें आलिंगन ।
देवोनियां आशीर्वचन । अयोध्ये गमन करविलें ॥६२॥
गंगा उतरोनि झडकरी । गुहकाचे निजनगरीं ।
भरतचरण वंदोनि शिरीं । हर्षे निर्भर नाचत ॥६४॥
रामपादुका आल्या हाता । त्या तुवां प्रेमें ठेविल्या माथां ।
धन्य भाग्य तुझे भरता । तूं पढियंता श्रीरामा ॥६५॥
भेटी देवोनि गुहकासी । परम सुख जाले त्यासी ।
भरत निघाला अयोध्येसी । निजसैन्येसीं सत्वर ॥६६॥
अयोध्या देखोनि भरता । सुख निपजे त्याच्या चित्ता ।
तेथे माता ठेवोनि समस्ता । होय निघतां नंदिग्रामा ॥६७॥

रथस्थः स तु धर्मात्मा भरतो भ्रातृवत्सलः ।
पादुके शिरसि स्थाप्य नंदिग्राममुपाविशत् ॥७॥

भरताची नंदिग्रामात राहून रामपादुकांची सेवा :

भ्रातृवत्सल भरतवीर । रथीं बैसोनियां शीघ्र ।
रामपादुकीं मंडीत शिर । आला सत्वर नंदिग्रामा ॥६८॥
नंदिग्रामी बाह्यप्रदेशीं । रामपादुका स्थापोनि शिशीं ।
भरतराजा राजऋषी । जाला तापसी अनुतापें ॥६९॥
नगरीं त्यजोनि समस्त माता । अनुकूल त्यजोनि निजकांता ।
राजभोगा नातळतां । श्रीरामव्रता अनुसरला ॥७०॥
वनवासीं श्रीरघुनाथ । जें जें व्रत आचरत ।
तें तें अंगीकारी भरत । तोही श्लोकार्थ अवधारा ॥७१॥

जटावल्कलधारी च मुनिवेषधरः प्रभुः ।
नंदिग्रामेंऽवसद्धीरः ससैन्यौ भरतस्तदा ॥८॥
सवालव्यजनं छत्रं धारयामास स स्वयम् ।
रामभक्तः सदा नित्यं रंजयान्विविधा प्रजाः ॥९॥

राज्यवैभव त्यजोनि दूरी । जटावल्कचीरधारी ।
रामपादुका स्थापोनि शिरीं । जळफळाहारी निर्वाहो ॥७२॥
जंव होय श्रीरामाचें आगमन । तंववरी करणें नाहीं भोजन ।
दृष्टीं पाहणें नाहीं अन्न । देहवर्तनें जळफळीं ॥७३॥
श्रीरामपादुकांचे भजन । श्रीरामपादुकांचें पूजन ।
श्रीरामपादुकांचें निजध्यान । स्मरण चिंतन श्रीरामाचें ॥७४॥
रामपादुकीं छत्रधरी । आतपत्र मुक्तझल्लरी ।
कनकदंड घेवोनि करीं । निरंतरीं ढाळीत ॥७५॥
श्रीरामनाम स्मरतां । अराणूक नाहीं भरतां ।
मेळवोनि साधुसंतां । श्रीरामकथा अनुवादें ॥७६॥
श्रीरामाज्ञा मानोनि माथां । भरत अयोध्ये आला मागुता ।
त्याच्या पादुका एकाग्रता । होय भजता अति प्रीतीं ॥७७॥
श्रीरामाचें निजवचन । त्यासी सर्वस्वें विकिला प्राण ।
अयोध्याराज्यसंरक्षण । करी शत्रुघ्न भरताज्ञे ॥७८॥
भरताज्ञे अति सादर । शत्रुघ्न आठही प्रहर ।
आज्ञाधारी निरंतर । अणुमात्र नुल्लघी ॥७९॥
बहू तापस अनुष्ठानी । त्यामाजी भरत महामुनी ।
विनटलासे श्रीरामभजनीं । अनुदिनीं तन्निष्ठ ॥८०॥

विविधजनसमूहैः सवृतो ग्राम आसीत् |
प्रतिदिननिशि पूजा पादुकानां च कुर्वन ।
विविधनृपतिकृत्यं रामपादानुरुपं ।
विधिवदतिवरेण्यो रामबंधुः कनीयान् ॥१०॥

नंदिग्रामी बाह्यप्रदेशीं । भरत राहिला मुनिवेषेंसीं ।
तेथें योगी दिगंबर संन्यासी । येती त्यापासीं सूरस्थ ॥८१॥
आले तपोराशी ऋषिगण । आगमी निमगी अति ज्ञान ।
जपी ध्यानी मुमुक्षुजन । साधु सज्जन तेथें आले ॥८२॥
देशोदेशींच्या प्रजा प्रधान । श्रवणीं श्रद्धाळु बहुत जन ।
अंजलिसंपुट जोडून । उभा शत्रुघ्न वचनार्थीं ॥८३॥
भरतमुखें रामायण । श्रवणें होतसे समाधान ।
देखोनि पादुकांचे भजन । विस्मित जन अवघेही ॥८४॥
भरताचे नित्ससंगतीं । श्रवण स्मरण अहोरातीं ।
देखोनि श्रीरामाची भक्ती । सुखी होटी समस्त ॥८५॥
श्रीरामपादुका ठेवोनि माथां । भरत अयोध्ये आला असतां ।
राज्यीं नाहीं अधर्मकथा । अकर्मर्वाता असेना ॥८६॥
कैसी राजाज्ञा समर्थ । प्रजा सत्यवादी समस्त ।
स्वधर्मकर्मी नित्य रत । श्रीरामभक्त श्रद्धाळु ॥८७॥
राज्यामाजील निजजन । स्वभावेसीं श्रीरामनामस्मरण ।
करितां जीविकावर्तन । रामचिंतन अहार्निशीं ॥८८॥
ऐकोनि भरताचें शीळ । देशादेशींचे भूपाळ ।
उपायनें घेवोनि प्रबळ । येती सकळ भेतीसी ॥८९॥
रत्‍नधनगजवाजींसीं । राजे आणिती भेटींसी ।
भरत नातळे पैं त्यासीं । निजमानसीं निरपेक्ष ॥९०॥
स्मरतां श्रीरामाचें नाम । मावळले क्रोध काम ।
निघोनि गेला लोभसंभ्रम । भरत निष्काम श्रीरामें ॥९१॥
भेटी परतोवोनि समस्त । राजे सन्मानें स्वयें गौरवीत ।
रामप्रतापें अति विख्यात । उदार भरत तिहीं लोकीं ॥९२॥
श्रीरामस्मरणें प्रज्ञाप्रबुद्धु । श्रीरामाचा कनिष्ठ बंधु ।
भरत भजनीं अगाधबोधु । वसे स्वानंदु नंदिग्रामीं ॥९३॥
ऐसिया अगाधस्थिती । भरता नंदिग्रामी वस्ती ।
वनवासीं श्रीरघुपती । करील ख्याती ते एका ॥९४॥
निजराज्याची लोभप्राप्ती । निःशेष त्यजूनि रघुपती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥९५॥
सापत्‍न मातेची वचनोक्ती । श्रीरामें पाळोनि अति प्रीतीं ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥९६॥
देह त्यागितां नृपती । भाक न सांडी श्रीरघुपती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥९७॥
कौसल्या मातेचिया काकुलती । श्रीरामें मौन धरोनि निश्चितीं ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥९८॥
सीता चरणीं चाले वनाप्रती । दुःख न मानूनि सीतापती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥९९॥
लक्ष्मणाच्या क्षोभोक्तीं । क्षोभ न मानूनि रघुपती ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥१००॥
भरत नेऊं आला अति प्रीतीसीं । त्यासी बोळवूनि सुखस्थितीं ।
अयोध्याकांडा केली समाप्ती । करोनि वस्ती वनवासीं ॥१०१॥
त्यजोनि निजराज्य प्रचंड । वैभवासी देवोनि दंड ।
नानाभोगांचे ठेवूनि तोंड । अयोध्याकांड संपविलें ॥२॥
दुःख ओढविले वितंड । तें स्वयें केलें खंडविखंड ।
मोहाचे करोनि काळे तोंड । अयोध्याकांड संपविलें ॥३॥
अभिमान अति अवघड । भरडिला जैसा मूग कांकड ।
परिपाकीं करोनि गोड । अयोध्याकांड संपविलें ॥४॥
दुस्तर वन भय दुर्घड । त्या भयांचे ठेचोनि तोंड ।
वनवास करोनियां गोड । अयोध्याकांड संपविलें ॥५॥
याउपरी रघुनंदन । सेवोनि दंडकारण्य ।
वधील त्रिशिरा खर दूषण । राक्षसदळण श्रीराम ॥६॥
एकाजनार्दना शरण । अगाध कथा रामायण ।
परमानंदे रसाळ पूर्ण । दंदकारण्यरहिवासु ॥७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
भरतअयोध्यागमननंदिग्रामवासो नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
॥ ओव्या १०७ ॥ श्लोक १० ॥ एवं ११७ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अठरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अठरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अठरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय अठरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *