भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा

भरताचे समाधान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मणाने बांधलेल्या पर्णशाळेचे सर्वांनी केलेले कौतुक :

श्रीरामें उद्धरिले पितर । ते गगनीं करिती ।
वर्षती सुरवर । जगदुद्धार श्रीराम ॥१॥
मार्गीं चालतांदेखती डोळां । मनोहर पर्णशाळा ।
सौमित्रे रचिल्या विशाळा । जनकबाळा स्वयें सांगे ॥२॥
तें देखोनि म्हणती माता । धन्य जीवित्व सुमित्रासुता ।
वनीं सुखरूप श्रीरामसीता । जाणा तत्वतां याचेनि ॥३॥
याची सेवा अति निर्वाण । श्रीराम चरणी विकिला प्राण ।
मस्तकीं जळ वाहे आपण । काष्ठें संपूर्ण हा आणी ॥४॥
श्रीरामसीतेचें चरणक्षाळण । स्वादिष्ठ फळें पुरवी संपूर्ण ।
नित्य नेमेस्त करी आपण । आणि जागरण अहर्निशीं ॥५॥
वनी वसतां श्रीरघुनाथा । येणें विसरविली मातापिता ।
विसरविली राज्यभोगता । सुख रघुनाथा याचेनि ॥६॥
ऎकोनि लक्ष्मणाची स्थिती । आश्राम देखोनि समस्तीं ।
पर्णशाळा शोभा देती । विचित्रयुक्तीं मनोहर ॥७॥
सडे चौक रंगमाळा । वृंदावनें सुमनशाळा ।
आश्रम देखोनियां डोळां । सुख सकळां पैं जालें ॥८॥
वसिष्ठें सुखावोनियां चित्ती । आलिंगिला परम प्रीती ।
धन्य लक्ष्मणा तुझी भक्ती । श्रीरामप्रती सद्‌भावो ॥९॥
लक्ष्मणें स्वयें आपण । वंदिले वसिष्ठाचे चरण ।
तुझेनि तीर्थे परम पावन । अनन्य भजन श्रीरामीं ॥१०॥
तुझी कृपा अति समर्थ । कृपेनें जोडला श्रीरघुनाथ ।
ऎसेनि स्वानंदे डुल्लत । आश्रामाआंत बैसले ॥११॥

प्रधान व सर्व सैन्याची श्रीरामाची भेट :

ऎकोनिया जयजयकार । प्रधानसेनानीसंभार ।
भेटावया रामचंद्र । अवघे सत्वर चालिले ॥१२॥
अश्वगजांचे कडकडाट । रथ चालिले घडघडाट ।
सेना चालली घनदाट । श्रीराम वसिष्ठ वंदावया ॥१३॥
देखोनि श्रीरामाचें मुख । सुखी जाले एकएक ।
अयोध्येचे सकळ लोक । परम सुख पावले ॥१४॥
श्रीराम देखतांचि दृष्टी । हरिख न समाये पोटीं ।
आनंदें ओसंडली सृष्टी । डोळेभेटी होतांचि ॥१५॥
उठिनियां श्रीरघुनंदन । प्रधानादि सकळ जन ।
त्यांसी दिधले आलिंगन । आदिकरोन गोरक्षकां ॥१६॥
श्रीरामलागीं आर्तभूत । वना आले उत्कंठीत ।
त्यांसी आलिंगीना रघुनाथ । ऎसा ग्रंथार्थ न मानावा ॥१७॥
श्रीराम सर्वांचा हृदयस्थ । श्रीराम सर्वां हृदयी नित्य व्याप्त ।
तो दीनांसी न भेटे रघुनाथ । ऎसा ग्रंथार्थ न मानावा ॥१८॥
आश्रम देखोनि समस्त । अतिशयें जालें विश्रांत ।
वंदोनियां श्रीरघुनाथ । सभा तटस्थ बैसली ॥१९॥

श्रीरामांनी अयोध्येत यावे म्हणून भरताची प्रार्थना :

बोलावया कृतकार्यार्थ । कोणाही नव्हे सामर्थ्य ।
तेथें उठोनिया भरत । श्रीरघुनाथ वंदिला ॥२०॥
भरत म्हणे श्रीरघुनाथा । अयोध्येसी चालिजे आतां ।
राज्यभार घेवोनियां माथां । आम्हां समस्तां प्रतिपाळीं ॥२१॥
त्वरेनें मज यावया येथ । हेंचि माझें मनोगत ।
तूं सर्वज्ञ श्रीरघुनाथ । सत्य अनृत जाणसी ॥२२॥

पितृवचनाचा भंग होईल म्हणून श्रीरामांचा भरतास नकार :

ऎसें बोलतांचि भरत । हासिंनला श्रीरघुनाथ ।
म्हणे भाग नेमून गेला दशरथ । तो वचनार्थ पतिपाळीं ॥२३॥
तिज अयोध्येचें राज्याभिषिंचन । मज नेमिलें वनप्रयाण ।
पितृप्रयाण परम प्रमाण । अन्यथा कोण करूं शके ॥२४॥
पित्याचे निजवाक्यें जाण । म्यां केलें वनप्रयाण ।
तुवां करावें राज्यग्रहण । प्रतिपाळणें पितृवाक्य ॥२५॥
जितां पाळिली पित्राज्ञा । मेलिया करूं नये अवज्ञा ।
विचारीं भरता सर्वज्ञा । तूं पिताज्ञा प्रतिपाळीं ॥२६॥
वेदवचन पितृवचन । जो पाळिना गुरुवचन ।
त्यासी होय अधःपतन । तैसें आपण न कारावें ॥२७॥
पित्राज्ञा मानोनि माथां । राज्य अंगीकारीं गा भरता ।
तुज मी अभिषिंचितों आतां । आग्रह सर्वथा न करावा ॥२८॥
माझेनि हातें अभिषिंचना । करूं आवडे तुझिया मना ।
यालागीं आलासी तूं वना । सत्य सर्वज्ञा भरता तूं ॥२९॥

भरताचा श्रीरामांना कळकळीव्हा आग्रह :

ऎकोनि श्रीरामांचे वचन । भरत सांडूं पाहे प्राण ।
राज्य नव्हे हे महाविघ्न । मज संपूर्ण ओढवलें ॥३०॥
मज वनालागीं येतां । जो तो म्हणे मारूं जातो रघुनाथा ।
शेखीं श्रीरामही आतां । मजचि भोंवता लागला ॥३१॥
राज्य आलियाचें सुख जो मानी तो अति मूर्ख ।
राज्यलोभाचे महाविख । तें कैकेयीनें देख मज दिधलें ॥३२॥
श्रीरामसेवा सुखसंतुष्टी । सांडोनि राज्यलोभाची दृष्टी ।
ते अभाग्य जन्मलें सृष्टीं । दुःखकोटी भोगावया ॥३३॥
भरत मारूं जातो रघुनाथा । हे जगीं पावलों अति निंद्यता ।
वनवासीं आलों शरणार्था । अभिषेकार्था तूं म्हणसी ॥३४॥
तुझेनि हातें राज्यभिषेक । जो वांछी तो अनामिक ।
अंत्यजांमाजी अंत्यज एक । आत्मघातक महापापी ॥३५॥
तुजवांचोनी रघुनाथा । राज्याभिषेक ज्याचे माथां ।
तो महापापी तत्वतां । सत्य सर्वथा श्रीरामा ॥३६॥
वृद्धपरंपरा राज्यपट । राज्याभिषेक मुख्य वरिष्ठ ।
तो केंवी लाभे कनिष्ठ । विचारीं श्रेष्ठ श्रीरामा ॥३७॥
जो भार शोभें गजा । तो भार वाहतां मी अजा ।
तेंवी तुझे राज्यीं रघुराजा । अभिषेकतां माझा प्राणांत ॥३८॥
माझा करणें आहे घात । तरी आतांचि अभिषेकावा भरत ।
तुज देखतां जालिया प्राणांत । पर मुक्त मी होईन ॥३९॥
ऐसें जालिया अभिषेकार्थ । सहज भेटेल श्रीदशरथ ।
त्यासी हा सांगेन वृत्तांत । अभिषेकीं मृत्य मज आला ॥४०॥

भरताचा मायेबद्दल युक्तीवाद :

ऐसें तूं म्हणसी आपण । राज्याभिषेकीं पितृवचन ।
तें मी न मानीं गा प्रमाण । तेंही लक्षण अवधारीं ॥४१॥
तुज वनवास मज राज्यता । वांटे करितां श्रीदशरथा ।
तेव्हां मीही जवळी नव्हतां । श्रुत सर्वथा मज नाहीं ॥४२॥
जें म्या देखिला ना ऐकिलें । ते मज न वचे राज्य केलें ।
तूं म्हणसी मायेने दिधलें । तेंही नाथिलें अवधारी ॥४३॥
मज राज्य दिधलें म्हणसी माया । ते माया मिथ्या गा रघुराया ।
साच शिवतों तुझिया पायां । मायाकृतकार्या मी करीं ना ॥४४॥
ऐकें मायेचा कृतकार्यार्थ । वना दवडिला श्रीरघुनाथा ।
जीवें घेतला दशरथ । दुःखी भरत पैं केला ॥४५॥
मायेचें केलें ऐसेंचि घडे । एकपिंडी बंधूंसी वैर पडे ।
सुने पुत्रा करोनि उघडे । वना रोकडें दवडिलें ॥४६॥
मायेमाजी अति निष्ठुरता । दुःखी केलें श्रीरघुनाथा ।
चरणचालीं दवडिली सीता । केलें समस्तां अति दुःखी ॥४७॥
अति विपरीत माया मांगी । आपुलें सौभाग्य आपण भंगी ।
निंद्यत्व पावोनियां जगीं । तरी ते उगी न राहे ॥४८॥
अवघड मायेचें लक्षण । आपणासी आणिलें रांडपण ।
आपलें करोनि काळें वदन । सखे सज्जन दुःखी केले ॥४९॥
ऐसी माया बाधक भारी । तिच्या निजराज्याची थोरी ।
मी तरी सर्वथा न करीं । निजनिर्धारीं श्रीरामा ॥५०॥
ऐसें बोलोनि आपण । सवें घातलें लोटांगण ।
मस्तकीं धरिले श्रीरामचरण । अश्रु पूर्ण पैं आले ॥५१॥
देखोनि भरताचें लक्षण । श्रीराम बोलिला आपण ।
दशरथाचें अंतींचें वचन । अन्यथा आपण कदा न करावें ॥५२॥
राम राम करितां स्मरण । रायें मजलागीं दिधला प्राण ।
तेणें करविलें वनप्रयाण । तें अन्यथा आपण काही न करीं ॥५३॥
वनवासाचें दृढ व्रत । म्यां घेतलें दशरथादेखत ।
तें मी अन्यथा न करी यथार्थ । जाण निश्चित भरता तूं ॥५४॥

श्रीरामांच्या नकारामुळे भरत आमरणान्त अन्नत्यागासाठी निर्धाराने बसतो :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । भरते मांडिलें निर्वाण ।
देऊ पाहे आपुला प्राण । प्रायोपवेशन करोनियां ॥५५॥

इह तु स्थंडिले शीघ्रं कुशानास्तर सारथे ।
आर्यं प्रत्युपवेक्ष्यामि यावन्म संप्रसीदति ॥१॥
निराहारो निरालोको धनहीनो यथा द्विजः ।
यशे पुरस्ताच्छालायां यावन्मां प्रतियास्यति ॥२॥
स तु राममवक्षंतं सुमंत्रं प्रेक्ष्य दुर्मनाः ।
कुशोत्तरमुपस्थाप्य भूमोवेवास्थितः स्वयम् ॥३॥

अयोध्ये नये श्रीरघुनाथ ऐसा जालासे इत्यर्थ ।
तेणें दुःखी जाला भरत । प्राणत्यागार्त सिद्ध जाला ॥५६॥
सुमंतासी सांगे आपण । मंदाकिनीतीर पावन ।
तेथें करीं कुशास्तरण । मज निजप्राण त्यागावया ॥५७॥
श्रीरामवेगळें राहणे । तें सर्वथा निंद्य जिणें ।
देह त्यागून रामादेखता मरणें । तरी ब्रह्म पावणें परिपूर्ण ॥५८॥
राम न्यावया अयोध्येसी । येथे मी आलों प्रतिज्ञेसीं ।
राम न पाळी माझिया लाडासी । मी प्राणांसी त्यागीन ॥५९॥
सुमंताचे मनोगत । प्राण त्यागूं रिघतां भरत ।
अयोध्येसी येईल रघुनाथ । येणें लोभॆं पसरित कुशातें ॥६०॥
ते मी कुशास्तरणीं आपण । नेघें अन्न नेघें जीवन ।
एकाकी जैसा दीन ब्राह्मण । तैसा जाण पडेन मी ॥६१॥
जंववरी कृपा करी ना रघुनाथ । तंववरी मी पडलों असेन येथ ।
कृपा न करितां निश्चित । तोचि प्राणांत पैं माझा ॥६२॥
श्रीरामाचे लळेवाड । रामचि न पुरवी माझें कोड ।
तैं मज नाहीं देहाची चाड । त्यजून धड निधड होईन ॥६३॥
श्रीरामीं प्रेम ज्याचें येथ । रामध्यानें निमालिया नित्यमुक्त ।
कां परलोक पावलिया तेथ । कृपा दशरथ मज करी ॥६४॥
ऐसें श्रीरामदेखतां जाण । भरतें करोनियां शुद्धाचमन ।
कुशास्तरणीं घालोनि आसन । नेत्र लावोन बसला ॥६५॥
तें देखोनि समस्त । अवघे जाले हाहाभूत ।
असत्यवादी नव्हे भरत । प्राण निश्चित त्यागील ॥६६॥
श्रीरामाचें कृपेंवीण । भरत न वांचे अर्ध क्षण ।
श्रीरामध्यानीं होवोनि लीन । सांडील प्राण निमेषार्धै ॥६७॥
ऐसें देखोनि रघुनाथ । स्वये भरतासी बोलत ।
म्हणे तुज हे कर्म अनुचित । नव्हे निश्चित राजधर्म ॥६८॥
अंध पंगु कुष्ठशुभ्र । रोगी दुःखी सकामी दुर्धर ।
देह त्यागिती ऐसे नर । ज्ञानविचार हा नव्हे ॥६९॥
भरत म्हणे कृपा न होतां । कैंची आम्हांसी ज्ञानकथा ।
कोटी अधर्म बैसोंत माथां । परी सर्वथा वाचेना ॥७०॥

श्रीरामांचाही प्रतिज्ञापूर्तीचा वज्र कठोर निर्धार :

देखोनि भरताचें नर्वाण । श्रीरामेंही वाहिली आण ।
वसिष्ठचरणाचें प्रमाण । दंडकारण्य त्यजींना ॥७१॥

लक्ष्मीश्चंद्रादपेयाव्दा हिमवान्वा हिमं त्यजेत् ।
अतियात्सागांरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥४॥

पूर्ण चंद्राची जावो शोभा । मेरु पृथ्वीमाजी विरो उभा ।
सुवर्ण पावो काळिमा प्रभा । तरी व्रतारंभा त्यजींना मी ॥७२॥
पश्चिमे उगवो दिनकर । एक होवोत सप्तसागर ।
आतां प्रळय करो रुद्र । तरी राजोत्तर नुल्लंघीं ॥७३॥
दीपाचा पतंग घोट भरू । नभाची मोट बांधो लेंकरूं ।
रुद्रातें सुखें गिळो उंदिरू । तरी व्रतविचारू त्यागीना ॥७४॥
सूर्य अडखळोनि आडीं पडो । मृगजळामाजी मेरू बुडो ।
मक्षिका पाखीं आकाश उडो । तरी मागें मुरडों मी न शकें ॥७५॥
रामें वाहिली निर्वाण आण । भरत कुशास्तरणीं निर्वाण ।
हाहाकारें गर्जती जन । करिती रुदन अवघेही ॥७६॥

दोघांच्या निर्णयामुळे वंशक्षय होईल म्हणून सर्वांचा आक्रोश :-

बोंब सुटली एकसरी । आक्रदें रडती नरनारी ।
तेथें सावाधांवा कोण करी । वना तरीं आकांत ॥७७॥
अयोध्ये न्यावया रघुनाथ । वना उल्हासें आला भरत ।
प्रतिज्ञापणें दोहींचा अंत । महा अनर्थ ओढवला ॥७८॥
बुडाली सूर्यवंशाची कीर्ती । थोर ओढवली अपकीर्तीं ।
येवढी कैकेयीची ख्याती । केली शांती सर्वांची ॥७९॥
राजा निमाला रामस्मरणें । रामभरत निमती प्रतिज्ञापणें ।
प्राण सांडिजे लक्ष्मणें । सीताशत्रुघ्नें निमिजेल ॥८०॥
मग येथोनि मागुती । कोण जाईल अयोध्येप्रती ।
जाली अवघियांची शांती । कैकेयीयुक्ती निजराज्या ॥८१॥
भविष्य जाणोनि संपूर्ण । वसिष्ठ न बोले वचन ।
नजासी अति दुःख दारुण । कोणासी कोण संबोखी ॥८२॥
दोघे सत्यवादी संपूर्ण । दोघांचाही दुस्तर पण ।
त्या दोघां बुझाबी कोण । दुःख दारुण सर्वांसी ॥८३॥
उपाय न चले निःशंक । अवघियां पडिलें थोर अटक ।
तेथें जालें अलोकिक । आला वाल्मीक द्विजवरेंसीं ॥८४॥

अथ तत्र समागम्य वाल्मीकिः सहितद्विजः ।
भ्रातरौ तो महावीर्यौ काकुत्स्थौ प्रशशंसिरे ॥५॥
धन्यौ युवां राजपुत्रौ धर्मज्ञौ सत्यविक्रमौ ।
श्रुत्वा वयं हि संभाषामुभयोः स्पृहयामहे ॥६॥

अशा संघर्षाच्या प्रसंगी लाल्मिकींनी येऊन भरताला रहस्य निवेदन केलेः

श्रीरामभरतपासीं । वाल्मीकी येवोनि वेगेंसीं ।
बोलता जाला उल्हासेंसीं । म्हणे तुम्ही पुण्यराशी पुण्यपुरुष ॥८५॥
धन्य धन्य दशरथ पित । धन्य धन्य तुमच्या माता ।
धन्य धन्य तुमच्या कथा । लोकां समस्तां तारका ॥८६॥
तुमचेनि धैर्यासी धैर्यता । तुमचेनि वीर्यासी वीर्यता ।
तुमचेनि शौर्यासी शौर्यता । सत्यासी सत्यता तुमचेनि ॥८७॥
धन्य धन्य सूर्यवंशीं । कीर्ति जोडली वंशानुवंशीं ।
राज्यलोभ नाहीं दोघांसी । यालागीं भेटीसी मी आलों ॥८८॥
वाल्मीकाश्रम चित्रकूटीं । परी न घेचि श्रीरामभेटी ।
देखोनि दोघे बंधु संकटीं । आला उठाउठीं समाधाना ॥८९॥
दोघां द्यावया समाधान । वाल्मीक आलासे आपण ।
जाणोनि अनागतज्ञान । काय वचन बोलिला ॥९०॥
ऐक स्वामी रघुनाथा । अवधारीं धर्मज्ञा तूं भरतां ।
काही सांगेन तुमच्या हिता । श्रीरामचरित्रा अति गुह्य ॥९१॥

ततस्त्वृषिगणाः क्षिप्रं दशग्रीववधैषिणः ।
बरतं राजशार्दूनमित्यूचुः संगता वच ॥७॥
भो भो त्वं व्रतसिद्ध्यर्थ निवर्तस्व इतोःलघु ।
देवकार्यं हि कर्तव्यं राघवेण महात्मना ॥८॥
एतावदुक्त्वा वचनं गंधर्वाः समहर्षयः ।
राजर्षश्चैयव तथा सर्वे स्वां स्वां गति गताः ॥९॥

मजसांगातें ऋषिगण । यावया जाण हेंचि कारण ।
श्रीरामचरित्रगुह्यज्ञान । तुज संपूर्ण सांगावया ॥९२॥
भूत भविष्य वर्तमान जाणोनि अतिशयेंसी सज्ञान ।
तें सांगो आले तपोधन । श्रीरामगुह्य सांगावया ॥९३॥
देवऋषीं राजऋषीं । आणि आले तपोनिधि ऋषी ।
श्रीराम गुह्यज्ञानासी । तुजपासीं सांगावया ॥९४॥
तुम्ही दोघे महाहट्टी । बैसलेति प्राणसंकटीं ।
हें देखोनि ऋषी कृपादृष्टीं । आले गुह्य गोष्टी सांगावया ॥९५॥
ऐकें भरता सावधान । सीता श्रीराम लक्ष्मण ।
वनीं बसावया हेंचि कारण ।
तुं हें नेणसी गुह्यज्ञान । प्राणांत दारुण आग्रह करिसी ॥९८॥
अनागत गुह्यज्ञान । सत्य मानीं माझें वचन ।
आग्रह सांडूनियां आपण । करावें गमन अयोध्येसी ॥९९॥
देवकायार्थालागीं जाण । श्रीराम सीता लक्ष्मण ।
वनीं ठेवोनि आपण । करावें गमन अयोध्येसी ॥१००॥
ऐसें तूं म्हणसी आपण । कोठें राम कोठें रावण ।
त्यासी वधावया काय कारण । तेंही कथन अवधारीं ॥१॥
तुंवा केलिया अयोध्यागमन । मागें राम सेवील दंडकारण्य ।
गंगातीरीं अति पावन । निवासस्थान नासिक ॥२॥
गंगातटीं पंचवटी । वनवासीं पर्णकुटी ।
श्रीराम लक्ष्मण जगजेठी । सीता गोरटी समवेत ॥३॥
तेरा वर्षें सा मासांवरी । सुखें वनवास श्रीराम करी ।
अंतीच्या सहा मासांभीतरीं । करील बोहरी श्रीराम राक्षसां ॥४॥
लक्ष्मण देखोनियां दृष्टीं । पुत्रविरोधें छ्ळावयासाठीं ।
शूर्पणखा वधू गोमटी । कपटें पाटीं बसों येईल ॥५॥
तिसीं नाशिकीं निर्नासिक । सौमित्र करील आवश्यक ।
तिचे कैवारी त्रिशिरादिक । त्यांसी रघुकुळटिळक वधील ॥६॥
राम लागोनि मृगापाठीं । रावण येवोनि पंचवटीं ।
सीता चोरोनि गोमटी । लंकात्रिकूटीं ठेवील ॥७॥
सीताशुद्धिचे कार्यार्थ । पंपेसी येईल श्रीरघुनाथ ।
तेथें भेटेल हनुमंत । परम आप्त निजसखा ॥८॥
श्रीरामसुग्रीवां सौजन्य । करील हनुमंत आपण ।
अमित घेवोनि वानरसैन्य । लंकागमन श्रीरामा ॥९॥
वानर मिळतील महाबळी । समुद्र बांधोनिया शिळीं ।
लंकेपुढें रणखंदळी । आतर्बळी करील ॥११०॥
एक निजकरें सौमित्र । अनेक वीर मारील चतुर ।
छेदोनि रावणाचें शिर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥११॥
सोडवील देवांची बांधवडी । तोडील नवग्रहांची बेडी ।
उभवोनि श्रीरामाराज्याची गुढी । येईल तांतडी अयोध्येसी ॥१२॥
वनीं वसतां श्रीरामासी । त्रैलोक्यपावन कीर्ति त्यासी ।
यालागीं ठेवोनि वनासी । शीघ्र अयोध्येसी तूं जाय ॥१३॥

वाल्मीकींच्या भाषणाने भरताचे समाधान :

वाल्मीकाचें ऐकोनि वचन । भरतासी हर्षाचें स्फुरण ।
सांडोनुयां कुशाचें आस्तरण । केले नमन ऋषीसी ॥१४॥
भरत म्हणे वाल्मीकमुनी । सुखी जालों मी तुझ्या वचनीं ।
श्रीराम ठेवोनियां वनीं । शीघ्रगमनीं मी जातों ॥१५॥
उल्हास भरताचा देखोन । वाल्मीकें दिधलें आलिंगन ।
भरतें केलें साष्टांग नमन । सुखसंपन्न तेणें राम ॥१६॥

आह्यदिस्तदा तेन वाक्येन शुभदर्शनः ।
रामः संहृष्टवदनस्तानृषीनभ्यवाद्यत् ॥१०॥

वाल्मीके येवोनि आपण । भरतासी दिधलें समाधान ।
वनवासी रघुनंदन । भरते वचन मानिलें ॥१७॥
तें ऐकोनि रघुनंदन । अत्यंत झाला सुखसंपन्न ।
एकला आकळी त्रिभुवन । येवढें स्फुरण त्या आलें ॥१८॥

सर्वांना आनंद :

सुख दातलें संपूर्ण । बाहु थरकती उल्हासोन ।
हरिखे नाचें लक्ष्मण । वाल्मिक संवाद ऐकोनी ॥१९॥
परमानंदे रघुनंदन । केलें वाल्मीकासी नमन ।
येरें देवोनि आशीर्वचन । केले गमन स्वाश्रमा ॥१२०॥
एकाजनार्दना शरण । ऐकोनि वाल्मीकाचें वचन ।
भरत पावला समाधान । अयोध्यागमन अवधारा ॥२१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्या-कांडे एकाकारटीकायां
भरतसमाधानं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
॥ ओव्यां १२१ ॥ श्लोक १० ॥ एवं १३१ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय सतरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *