भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय पहिला

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय पहिला

श्रीरामलक्ष्मणांच्या शस्त्रास्त्र विद्यानैपुण्याचे प्रदर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

गजाननाय महते प्रत्युहतिमिरच्छिदे ।
अपारकरुणामूर्त्यै सर्वज्ञाशे नमः ॥ १ ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥

रामायणाचे रूपक :

श्रीरामकथेची नव्हाळी । शेष वंदी पाताळी ।
शिव वंदी प्रेमसमेळी । कथाभूतळी जगद्वंद्य ॥१॥
तरी ते शतकोटी रामायण । आळवूं शकेल कोण ।
तेथे मी अपुरते दीन । परी तो जनार्दन स्वयें वदवी ॥२॥
तरी श्रीरामस्वरूप चिद्रूपता । चैतन्यशोभांकित सीता ।
तरी देवक्तांच्या क्रूतकार्यार्था । मानुष्यजाड्यता अवतारू ॥३॥
अर्धनारीनटेश्वरी । जो पुरूष तोचि नारी ।
तेंवी ते सीता निर्धारी। एकात्मतेवरी स्त्रीपुरुष ॥४॥
जैसीं बहुरूपी रावराणी । परी स्त्रीपुरुषभाव नाहीं मनी।
तरी तेचि संपादणी। लोकसंरक्षणी सत्यत्वे दावी॥५॥
’एकाकी न रमते’ या श्रुती। सवतीमत्सरु स्वये म्हणती।
तरी हे ब्रुहदारण्यवेदोक्ति। द्वैती कल्पिती अद्वैतभावो॥६॥
परब्रह्म जे अतिरिक्त । ’सहैतावानास’ द्विधांग पावत।
तरी हा वेदांतींचा इत्यर्थ । द्वैत कल्पित अद्वैतत्वें॥७॥
यापरी सुखे श्रीरामसीता । दोनी नांदती एकात्मता।
ऎसिया स्थितीची व्यवस्था। जे अवतारता नटनाट्यें ॥८॥
तरी व्यवस्था पावे अधिकारविधी । आणि भक्तां नांदवावे निजपदी।
म्हणोनि याचिलागीं त्रिशुद्धी। अवतार सिद्धि श्रीरमा॥९॥
ऊंस गाळून काढिजे रस । मग तोही जाळुन आसोस ।
शर्करा कीजे अति सुरस । तिचाही निर्मळांश नाबद कीजे ॥१०॥
मग नाबदेची अति निगुतीं । फळे नारळे चतुर करिती।
आणि तेथेंही कवठें काढिती । ते करंटे निश्चिती निजस्वादा ॥११॥
तेंवी परब्रह्मतेचि रसें । देहाक्रुतीचिये मुसें।
ओतींव रामरूपाचे ठसे । आले आपैसे चित्स्वरुपा ॥१२॥
ऐसी रामाची शुद्ध मूर्ती । शोभा शोभावी त्रिजगती।
तरी तेथे स्थूलत्व भाविती । ते करंटे निश्चितीं अभागी ॥१३॥
जे मनुष्य मानिती श्रीरामा । ज्याचेनि नामें नाश भवभ्रम ।
त्यासि मानवी महिमा । बोलोचि नये ॥१४॥
श्रीरामाची निजस्थिती । शिवभवानी नाम जपती ।
आणि त्यसी लक्ष्मण अनुवर्ती । सखा सांगती सर्वस्वें ॥१५॥

व्यूहचतुष्ट्यांचे वर्णनः

तरी लक्ष्मण एकात्मता रामांकित । केवळ भावार्थ तो भरत ।
शत्रुघ्न तो धैर्यवंत । हा व्यूहव्रुत्तात चतुष्ट्याचा ॥१६॥
मुख्य मुळीं एक् मूर्ती । तेचि चतुर्धा अभिव्यक्ती ।
या नांव व्यूहचतुष्टय म्हणती । एक निश्चिंती विभाग ॥१७॥
आत्मप्रबोध तो लक्ष्मण । भावार्थ तो भरत जाण ।
निजनिर्धारी तो शत्रुघ्न । आनंदेविद्ग्रही पूर्ण श्रीराम ॥१८॥
अहमात्मा तोचि दशरथ । उत्पत्तीसी मुख्य हेत ।
दूर गेलिया श्रीरघुनाथ । निवर्तत अहमात्मा ॥१९॥
आता विवेक आणि निजविचारु । तैसे वसिष्ठ आणि विश्वामित्र गुरु ।
ज्यांपासोनी अति साचारु । शस्त्रास्त्रविद्या दॄढ केली॥२०॥
कौसल्या ते सुविद्या । सुमित्रा ते शुद्ध मेधा ।
कैकयी ते अति अविद्या । मंथरा कुविद्या तीपार्सी ॥२१॥
कुविद्या क्षोभवोनि अविद्येसीं । श्रीराम् केला वनवासी ।
तंव सीता अनन्य भावेसी । श्रीरामासरसी निघाली ॥२२॥
सूर्या संव जैसी प्रभा । वसंतासवें शोभे वनशोभा ।
तेंवी जानकी जगदंबा । प्राणवल्लभासवें निघे ॥२३॥
जेंवी साकारतें न सांडी गोडि । तेंवी सीता रामा न सोडी ।
केवळ सेवेची आवडी । वनीं रोकडी दासत्वाची ॥२४॥
राज्यीं असतां रघुनंदनासी । वांटिली सेवकांसी ।
तरी ते मी एकली वनवासीं । सर्व सेवेसी पात्र होईन ॥२५॥
श्रीरामसेवा जरी ये हाता । ऎसें भाग्य दुर्लभ सर्वथा ।
ते सेवावया तत्वतां । चरणचालीं सीता वना आली ॥२६॥
ऐसी हे सीतेची गती । तैसीच लक्ष्मणाची स्थिती ।
श्रीरामसेवे वनाप्रती । आला निश्चितीं सर्वभावें ॥२७॥
जैसा आत्म्यापादीं निजबोधु । तैसा श्रीरामासवे निजबंधु ।
दोघांचा एक संवादु । परम आल्हादु वनवासी ॥२८॥
जैसे बोध विरक्ती परमार्थासीं । तैसे सीता लक्ष्मण श्रीरामारसीं ।
ऎसे तिघे निघाले वनवासीं । कृतकार्यासी लक्षोनी ॥२९॥
लक्षोनि पुढील कार्यार्थ । वना निघाला श्रीरघुनाथ ।
येथोनि चालिला ग्रंथार्थ । तो श्रोतीं भावार्थ अवधारिजे ॥३०॥
रामायणींचा ग्रंथार्थ । त्यामाजी जो निजभावार्थ ।
श्रोतीं पाहावा सावधानार्थ । अर्थें परमार्थ सहज जोडे ॥३१॥
एकाजनार्दना शरण । हें भावार्थ रामायण ।
श्रीरामाचें निरूपण । दावी लक्षण व्यूहचुष्टयाचें ॥३२॥

श्रीरामकथा पठणश्रवणाचे फळ :

श्रीरामकथेचें अक्षर । तें क्षराक्षरातीत पर ।
सभाग्य भाग्याचे जे नर । ते कथा सादर परिसिती ॥३३॥
कथश्रवणें उपजे विरक्ती । कथश्रवणें वाढे शांती ।
कथश्रवणें परमानंदप्राप्ती । महापापी उद्धरती कथश्रवणें ॥३४॥
चोरटा वाल्मीक महापापी । तो रामानामें जाला निष्पापी ।
त्याची कथा नित्य जपी । कथा वाग्जल्पीं शिवाच्या ॥३५॥
तें हे शिवसेव्य रामायण । श्रवणें मरणासी ये मरण ।
सवेंचि जन्मा ये बोळवण । श्रवणें परिपूर्ण ब्रह्मप्राप्ती ॥३६॥
नित्य जपतां रामानाम । वक्ता होय पूर्ण ब्रह्म ।
त्याचिया कथेचा अनुक्रम । कर्माकर्मा छेदक ॥३७॥
कथा निर्दळी कर्माकर्म । श्रोते स्वयें होती परब्रह्म ।
वाल्मीकाचा उपकार परम । केला सुगम परमार्थ ॥३८॥
सुगम परमार्थ रामकथा । बाळकांड स्वयें संपता ।
विजयनगरें श्रीरघुनाथा ।अयोध्ये आंतौता आणिल रायें ॥३९॥
ते अयोध्येआंतौता । दशरथ सुखें स्वानंदें नांदत ।
नित्य सेवा करी रघुनाथ । हर्षयुक्त बंधूंसी ॥४०॥

भरताचे मामाच्या घरी जाणे :

मातुळकुळीं न्यावया भरत । मातुळ जो कां युधाजित ।
तो रायासी साक्षेपयुक्त । असे पुसत एकांतीं ॥४१॥
भरताचे मनोगत । मातुळगृहा जावया उद्यत ।
तें जाणोनियां दशरथ । स्वयें धाडित उल्हासें ॥४२॥
अश्व गज रथ पदाती । चतुरंग सेना सहज संपत्ती ।
भरतशत्रुघ्न मातुलाप्रती । धाडी नृपती निजगजरें ॥४३॥
दोघे जावुनि उल्लासीं । भेतले कैकेयीसुत मातामहासी ।
वेगीं नमोनि मातामहीसी । मातुळवासी स्वानंदे ॥४४॥
नित्य नवे नाना भोग । कौतुक सोहळे उपभोग ।
दोघे वसती अनुद्वेग । वैभवभाग्य-उल्लासें ॥४५॥

दशरथाच्या इच्छेनुसार कुलगुरुंनी शस्त्रास्त्रविद्येतील नैपुण्याचे केलेले प्रदर्शन :

येरीकडे अयोध्येसीं । वसिष्ठाचे निजसेवेसी ।
रामसौमित्र अति उल्लासीं । सर्वस्वेंसीं सादर ॥४६॥
तैसेंचि दशरथसेवेसी । निकटवर्ती अहर्निशीं ।
जें जे मनोगत रायासी । त्या त्या कर्यासी प्रवीण ॥४७॥
न सांगता मनोगत । हॄदयींचा निजकार्यार्थ ।
तो तो संपादी रघुनाथ । अति समर्थ मनोज्ञ ॥४८॥
रायाचा अति पढियंता । वसिष्ठाचा आवडता ।
राम आवडे समस्तां । भूतमहाभूतां वल्लभू ॥४९॥
जैंसे जीवन का जीवासी । तैसा श्रीराम सर्वांसी ।
अखंडता अहर्निशीं । जीवोल्हासी श्रीराम ॥५०॥
जैसा चंद्रकर चकोरां । तैसा श्रीराम चराचरां ।
आवडे सर्व नारीनरां । जीवां समग्रां अति प्रिय ॥५१॥
वसिष्ठ सांगे रायापासीं । राम शस्त्रास्त्रविद्याराशी ।
तेंचि पहावया रायासी । निजमानसीं उल्लास ॥५२॥
जाणोनि रायाचें मनोगत । वसिष्ठ आज्ञापी श्रीरघुनाथ ।
विद्या पाहूं इच्छी दशरथ ।आज्ञा समर्थ राम म्हणे ॥ ५३॥
गुरुवचन पितॄवचन । साधुसज्जन आज्ञापन ।
उल्लंघी तो अभागी पूर्ण । तो पाषाण नरदेही ॥५४॥
गुरुआज्ञेचें उत्तर । एकतां करावें सत्वर ।
मुहूर्त पाहे तो पामर । करी विचार तो मूर्ख ॥५५॥
मी तंव केवळ आज्ञाधार । ऎसे बोलला रघुवीर ।
कांस घतली सत्वर । आला सौमित्रासन्निध ॥५६॥
गुरुआज्ञेचें विंदान । दोहीं बाह्यांस आले स्फ़ुरण ।
अंगी न समाये सत्राण । प्रतापपूर्ण गुरुवाक्यें॥५७॥
गुरुवाक्याचा उल्लासु । ज्या नाहीं तो केवळ पशु ।
शिष्यांमाजी तो रासभवेषु । ज्यासीं आळस गुरुवाख्यां ॥५८॥
देखोनि साटोप रघुवीरू । वसिष्ठासी उल्लास थोरू ।
जेंवी देखोनि पूर्ण चंद्रू । क्षीरसमुद्र हेलावें॥५९॥
तैसें जालें वसिष्ठासी । थोर आल्हाद दशरथासी ।
देखोनि साटोप पुत्रासी । रंगभूमीसी शॄंगारी ॥६०॥
रायें रंग शॄगारीला । देखोनि विश्वकर्मा शंकला ।
स्वर्ग तेणें फ़िका केला । लाजविला कैलासु ॥६१॥
अलकावतीची सौभाग्यथोरी । रंगी नसरें लोणावरी ।
तसिया रंगामाझारी । रंगधारी श्रीराम ॥६२॥
धनुर्विद्या अलक्षविद्या । छत्तिस दंडायुविद्या ।
संमुखीविमुखीकरणविद्या । मल्लविद्या लघुविद्या लाघवी ॥६३॥
गजवाजिरथारोहण । निराधारीं युद्धकरण ।
आकाश खोंचोनि परतें जाण । मेरू अडवणें तॄणप्राय ॥६४॥
ऐसिया विद्या अलोकिका । गुरुआज्ञे दावी आवश्यक ।
पाहूं आले नागरिक । साधु लोक ठेंसलें ॥६५॥
रंगी उभा रघुवीर । विद्या दावी समग्र ।
पाहूं आले सुरवर । विमानीं अंबर दाटलें ॥६६॥
ते काळीं रामलक्ष्मण । धनुर्विद्येचे लक्षण ।
वीरश्रयेची आगवण । स्वयें संपूर्ण दाविती ॥६७॥
देखोनि श्रीरामाचे ठाण । सुरासुर कंपायमान ।
नरांचे झांकोळले नयन । देदीप्यमान तेजस्वी ॥६८॥
बाणतेजें छेदी गगन । गगनोदरींची अलक्ष खूण ।
स्वयें लक्षूं जाणे आपण । अचुक संधान श्रीरामाचें ॥६९॥
बाणपिसारियाचा वारा । शत्रूसहित ।
गगनीं भोवंडी गरगरां । जेंवी तॄणांकुरां वाहटुळी ॥७०॥
श्रीरामबाणाचा प्रताप । मेरूमांदारां चळकांप ।
भेणें सहस्त्रमुखा लागे धाप । कूर्म साटोप तडतडों लागे ॥७१॥
त्या सिंहनादाचा अति गजर । तेणें शत्रुचें भेदे जिव्हार ।
परदळीं हाहाकार । वीर् धीर मूर्च्छित ॥७२॥
परशु पट्टिश तोमर । गदा मुद्रर लहुडी चक्र ।
या शस्त्रांच महामार । दावी अनुकार शत्रुदमनीं ॥७३॥
असि पाश शूळ शक्तिधर । छत्तीस दंडायुधचमत्कार ।
दावी शस्त्रांचे महामार । शत्रुसंभाळनिर्दळणीं ॥७४॥
वोढणखर्गाच धारुक । दावी थरक सरकु ।
वोढण धडके लावोनि धाकु । पाडी एकैकु मूर्च्छित ॥७५॥
पुढिल वेगाचेनि उड्डाणे । शत्रुसमुदावो मर्दणें ।
तेचि पाठिमोरे किराणें । निर्दळणें अळिवीरा ॥७६॥
पुडिल्या घायीं मागिल्या पाडी । मागिल्य घायीं पुढिल तोडी ।
ऎसिया माराच्या परवदी । रणीं निर्वडीं दावितु ॥७७॥
निर्वाणयुद्धाचा निर्वाहो । मागीलपुढिल्या एकचि घावो ।
तो तो यावा दावित पहाहो । ऋषि आणि रावो विस्मित ॥७८॥
जाणे मल्लविद्याकुसरी । उरीं शिरीं हाणी कोंपरीं ।
तळील आणोनियां वरी । चक्राकारीं उपडितु ॥७९॥
अष्टांगीच्या कळा जाणे । कळा लावोनि प्राण घेणें ।
एकांगुष्ठाचेनि चेपणें । जीवें मारणे महावीर ॥८०॥
तडवा हाणोनि तांतडीं । गजेंसहित वीर पाडी ।
रथ मोडोनि कडाडीं । रण पगडी पायवटा ॥८१॥
जाणें रथीं आरोहणें । रणीं माराचे प्रेरणें ।
गति विगति परिभ्रमणे । चक्रावर्तन रथांचे ॥८२॥
रथाचिया सवेगता । शत्रुरथ अपसव्यता ।
घालोनि चालवी निजरथा । रथयोग्यता दावैतु ॥८३॥
निरालंबीचिया गमना । रथ चालवूं शके जाणा ।
दावितां रथगतिलक्षणा । विस्मयों मना सुरसिद्धां ॥८४॥
गज गर्जोनि आलियावरी । उडोन बैसे कुंभांतरीं ।
मग वागवी युद्धाचारी । महामारी गजयोद्धा ॥८५॥
गजें परसैन्य आकळी । गज रगडी गजातळीं ।
गजे गजदळ निर्दळी । रणरांगोळी गजयोद्धा ॥८६॥
बैसों जाणे अश्वावरी । वागवी युद्धाच्या महामारी ।
नाचवी चौ पायांवरी । रणांगणी विचरतु ॥८७॥
अश्वखुरांचे महारजें । वैरी पावती निर्बुजें ।
शस्त्रें विसरती गजबजें । वारु रघुराजें प्रेरितां ॥८८॥
लागतां अश्वांची महाझड । सैन्य होय जी दुखंड ।
तोडित वीरांचे रुंडमुंड । वैरी दुखंड रणरंगी ॥८९॥
ऐसे नाना अनुकार । अश्वगजरथांचे संचार ।
शस्त्रास्त्रांचे महामार । दावी चमत्कार रघुनाथ ॥९०॥
युद्धादियावा अनुकरण । श्रीरामाचा अतिदारुण ।
देखोनि एक मुर्च्छापन्न । एक ते प्राण सांडूं पाहती ॥९१॥
एकीं घेतलें परम धाका । एकासी लागला धुकधुका ।
एक करिती लघुशंका । एक देखा नागवे पडती ॥९२॥
देखोनि श्रीरामाचा प्रताप । सुरसिद्धां सुटे कंप ।
दैत्यदानवां अहा कंप । दुर्धररूप श्रीराम ॥९३॥
भूतभविष्य वर्तमान । जाणते ते सज्ञान ।
तेंही धाकें कंपायमान । यावा दारुण देखोनी ॥९४॥
श्रीरामयावा अति दुर्धर । देखोनि राजा सुखनिर्भर ।
विद्यानिपुण जाले कुमर । हा दॄढ निर्धार रासायी ॥९५॥
राजा अत्यंत हर्षनिर्भर । ओंवाळी वस्तुजात अपार ।
सुरवर करिती जयजयकार । सुमन संभार वर्षले ॥९६॥
देखोनियां दुर्धर यावा । हर्ष वसिष्ठाचिया जीवा ।
आनंदे आलिंगी राघवा । प्रेम सभ्दावे आल्हादे ॥९७॥
शस्त्रस्त्रविद्येचा साटोप । तुवां दाविला सद्रूप ।
धन्य धन्य विजयाचा प्रताप । कृपा सकृप तुष्टला ॥९८॥
माझ्या वरदाचे द्विपंच बाण । यत्नें राखा दोघे जण ।
युद्ध मांडिलिया निर्वाण । जय संपूर्ण इहीं बाणी ॥९९॥
याचिया बाणांच्या पैं पोटीं । शस्त्रास्त्रें कोट्यनुकोटी ।
सुटोनि शत्रुसमुद्र आटी । हे गुह्य गोष्टी सांगितली ॥१००॥
यापरी अपत्यत्वें सन्मान । दोघा देवोनि आश्वासन ।
निजगजरें अवघे जण । राजभवन प्रवेशले ॥१०१॥
श्रीराम सर्वगुणीं संपन्न । हे रायासी कळले लक्षण ।
तेंचि वसिष्ठासी आपण । गृह्य संपूर्ण पूसतु ॥१०२॥
राज्यीं अभिषेकाचा रघुनाथ । हा दृढ माझा मनोरथ ।
स्वामीने सांगावा इत्यर्थ । तोच कार्यार्थ मी करीन ॥१०३॥
वसिष्ठ सांगेल आपण । श्रीरामासी अभिषेचन ।
एका विनवी जनार्दन । कथा मनोज्ञ अवधारा ॥१०४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायण अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामलक्ष्मणशस्त्रास्त्रविद्यादर्शनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
॥ ओंव्यां १०४ ॥ श्लोक २ ॥ एवं १०६ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती 


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय पहिला भावार्थरामायण अयोध्याकाण्ड अध्याय पहिला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *