भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अडतिसावा

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अडतिसावा

बिभीषणाला लंकाप्रदान व राज्याभिषेक

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मारूतीच्या वचनाने श्रीरामांचा संतोष :

बिभीषणाचा वृत्तांत । समूळ सांगे हनुमंत ।
तेणें तुष्टला श्रीरघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥ १ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला रघुनंदन ।
सुग्रीवादि वानरगण । त्यांप्रति आपण धर्म सांगे ॥ २ ॥
सद्भावेंसीं संपूर्ण । अथवा कपटें आलिया शरण ।
त्यासीं नाहीं सर्वथा मरण । सत्य भाषण हें माझें ॥ ३ ॥

शरणागताला केव्हांही अभयच, रावण जरी आला तरीही त्याला अभय मिळेल :

माझा करावया घात । शरण आलिया लंकानाथ ।
त्यासीही माझा अभयहस्त । जाणा निश्चित कपि सर्व ॥ ४ ॥
शरणागतापासाव मरण । आम्हांसी सर्वथा नाहीं जाण ।
हेंही माझें सत्य भाषण । वानरगण तुम्ही जाणा ॥ ५ ॥
शरणागतासीं क्रोधानळीं । जो कोणी उचलील आंगोळी ।
त्याची करीन मी होळी । शरजाळीं वर्षोनी ॥ ६ ॥
जो कोणी माझा शरणागत । त्यासी जेणें लाविला हात ।
त्याचा मी करीन घात । निश्चितार्थ हा माझा ॥ ७ ॥
श्रीराम कृपेचा कल्लोळ । श्रीराम शरणागतवत्सल ।
श्रीराम तो दीनदयाळ । प्रेमाप्रांजळ श्रीराम ॥ ८ ॥
श्रीराम स्वानंदें गर्जत । बिभीषण तो शरणागत ।
त्यासी माझा अभयहस्त । आणा त्वरित भेटीसीं ॥ ९ ॥
ऐसें बोलता रघुनाथ । सुग्रीवासहित हनुमंत ।
उडालें पैं आकाशात । जुत्पतियुक्त स्वानंदें ॥ १० ॥
देखोनियां वानरजात । पुढती बोले रघुनाथ ।
शरण आलिया लंकानाथ । अभयहस्त त्या माझा ॥ ११ ॥
शरण आलिया सर्वथा । बिभीषणाहून अधिकता ।
सुखी करीन लंकानाथा । जाण तत्वतां वानरेशा ॥ १२ ॥
रावण अथवा बिभीषण । दुष्ट नष्ट हो दुर्जन ।
मज आलिया शरण । अभयदान त्या माझें ॥ १३ ॥
जो भीतसे शरणागता । मरणभय ज्याचें चित्ता ।
जय न पावे तो सर्वथा । जाण तत्वतां कपिराजा ॥ १४ ॥
ज्याचें पोटीं सभयता । कैसें निर्भय शरणागता ।
तसें नाहीं श्रीरघुनाथा । निःशंकता निर्भय ॥ १५ ॥

बिभीशणाला आणवून त्यास अभय व त्याचे स्वागत :

ऐकोनि श्रीरामाचें वचन । अवघे विस्मित वानरगण ।
गाढी श्रीरामाची आंगवण । निधडा पूर्ण निःशंक ॥ १६ ॥
श्रीरामचित्तीं नाहीं चिंता । मरणभय नाहीं रघुनाथा ।
हाचि शरण्य शरणागता । ऐसें समस्तां मानलें ॥ १७ ॥
ऐसा श्रीराम समर्थ । अवघे अति प्रीतीं बोलत ।
जेथें बिभीषण शरणागत । तेथें समस्त पातलें ॥ १८ ॥
देखतांचि बिभीषण । सुग्रीवें दिधलें आलिंगन ।
बिभीषण भाग्या संपूर्ण । वानरगण वानिती ॥ १९ ॥
नलनीळादि समस्त । अंगद आणि जांबवंत ।
अवघे आलिंगन देत । भाग्यवंत बिभीषण ॥ २० ॥
देखतांचि हनुमंता । उल्लास बिभीषणाच्या चित्ता ।
त्याच्या चरणीं ठेवोनि माथा । सप्रेमता सद्‍गदित ॥ २१ ॥
माता पिता बंधु भगिनी । तूंचि सखा मजलागूनी ।
तुजवांचोनि त्रिभुवनीं । आन कोणी असेना ॥ २२ ॥
रावणाची संपूर्ण कथा । सांगितली त्या हनुमंता ।
स्वराज्य सुह्रद त्यजोनि माता । शरण रघुनाथा मी आलों ॥ २३ ॥
ऐसें सांगतांचि गोष्टी । हरिखें बाष्प दाटें कंठीं ।
सुखस्वानंदें जडोनि मिठी । पडिला सृष्टीं मूर्च्छित ॥ २४ ॥
त्यासी मूर्च्छित पडतां । उल्लास हनुमंताचे चित्ता ।
उचलोनियां स्वानंदता । उल्लासता आलिंगी ॥ २५ ॥
अंगा अंगस्पर्शन । हनुमंतासी आलिंगन ।
तेणें पावला समाधान । सुखसंपन्न बिभीषणा ॥ २६ ॥
कृपेने बोले हनुमंत । बिभीषणा तूं भाग्यवंत ।
तुज तुष्टला श्रीरघुनाथ । कृपावंत कृपाळु ॥ २७ ॥

चार प्रधानांसह बिभीषणाची शरणागती :

श्रीरामें बोलाविलें भेटी । वेगें चाला उठाउठीं ।
म्हणोनि धरिला बाहुवटीं । वानरां पोटीं आल्हाद ॥ २८ ॥
भेटवावया श्रीरघुपती । बिभीषणासी धरोनि हातीं ।
वेगें उठिला मारूती । वानरपंक्तीसमवेत ॥ २९ ॥
श्रीरामनामाचा गजर । करित चालिले वानर ।
नामें उचंबळिला सागर । नामें अंबर दुमदुमलें ॥ ३० ॥
भेटावया शरणागता । बाहु स्फुरती श्रीरघुनाथा ।
आलिंगावया अति शीघ्रता । श्रीरामचित्ता आल्हाद ॥ ३१ ॥
शुभ चिन्हें डोळे लवती । हरिखें अष्टांगें थरकती ।
शरणागता श्रीरामप्राप्ती । आल्हाद चित्तीं भेटीचा ॥ ३२ ॥
अवलोकावया शरणागता । नेत्रपल्लव न हालतां ।
येणें उल्लांसें श्रीरघुनाथा । उत्कंठता भेटावया ॥ ३३ ॥
येरीकडे हनुमंत । धरोनि बिभीषणाचा हात ।
सुग्रीवादि कपि समस्त । आले गर्जत हरिनामें ॥ ३४ ॥
देखता श्रीरामदर्शन । बिभीषण घाली लोटांगण ।
देखता श्रीरामदर्शन । बिभीषण घाली लोटांगण ।
मस्तकीं धरितां त्यांचे चरण । आपणा आपण विसरला ॥ ३५ ॥
विसरला यौवराज्य संपत्ती । विसरला स्त्रीपुत्रसंतती ।
विसरला राक्षसजाती । श्रीराममूर्ती देखतां ॥ ३६ ॥
विसरला जीवित्व जीव । विसरला देह अहंभाव ।
विसरला शिवत्व शिव । श्रीराघव देखतां ॥ ३७ ॥

साधकांच्या ब्रह्मापर्णासारखीच ही शरणागती :

राम देखतांचि दृष्टीं । विसरला व्दंव्ददुःख त्रिपुटी ।
विसरला स्वदेहेंसी सृष्टी । आनंदकोटी श्रीरामा ॥ ३८ ॥
ऐसियापरी बिभीषण । श्रीरामासीं अनन्य शरण ।
स्वयें घालितां लोटांगण । समाधान पावला ॥ ३९ ॥
मन बुद्धि चित्त अभिमान । साधु राखे सावधान ।
तैसेचि चौघेही प्रधान । आणिले शरण श्रीरामा ॥ ४० ॥
धर्मार्थ काम मोक्ष पूर्ण । साधक करी ब्रह्मार्पण ।
तैसे चवघेही प्रधान । आणिले शरण श्रीरामा ॥ ४१ ॥
साधनचतुष्ट्यसंपत्ती । साधून ब्रह्मार्पण करितीं ।
तैशाच सजीव चारी मुक्ती । केले शरणार्थीं श्रीरामा ॥ ४२ ॥
ऐसियापरीं बिभीषण । अनन्यभावें लोटांगण ।
श्रीरामें उचलोनि आपण । आलिंगन दिधले ॥ ४३ ॥
लवणजळा होय भेटी । तैसी दोघां पडली मिठी ।
विराले येरयेरांचे पोटीं । आनंद सृष्टी न समाये ॥ ४४ ॥
दोनी दीप मेळविल्या ज्योती । दोनी मिळोनि एक होती ।
तैसें आलिंगिता रघुपती । अव्दैतस्थिति बिभीषणा ॥ ४५ ॥
जेंवी अलंकारें आपण । सुवर्णा दिधलें आलिंगन ।
ऐसिया स्थिती रघुनंदन । भेटला आपण बिभीषणा ॥ ४६ ॥
ऐसें देवोनि आलिंगन । श्रीराम बोलिला गर्जोन ।
सखा माझा तूं पूर्ण । जीव प्राण तूं माझा ॥ ४७ ॥
जेंवी जळीं मिळाली साखर । स्वयें विरोनि होय नीर ।
साखरें उदक केलें मधुर । तेंवी श्रीरामचंद्रबिभीषण ॥ ४८ ॥
श्रीरामाचें पूर्णपण । भक्तीं बिंबलें संपूर्ण ।
भक्तिभावाचें गोडपण । बिंबलें पूर्ण श्रीरामीं ॥ ४९ ॥
ऐसियापरी दोघे जण । पूर्ण पावोनि समाधान ।
हरिखेजोनि बिभीषण । काय आपण बोलत ॥ ५० ॥

बिभीषणाचे अभिवचन :

राक्षस मारावयाची निजख्याती । मुख्य मुख्य धुरा रणीं पडती ।
तैसी सांगेन मी युक्ती । रणसमाप्ती राक्षसां ॥ ५१ ॥
दुर्गी रिघावया झडझडां । युक्ति जाणे मी गाढा ।
परी तें न चले वानरांपुढां । उडोनि कडा चढतील ॥ ५२ ॥
सवेग करोनियां उड्डाण । दुर्गीं रिघतील वानरगण ।
तेथें माझी युक्ति कोण । मूर्खपण पैं माझें ॥ ५३ ॥
सुटल्या श्रीरामाचे बाण । समेरूसिंधूंसीं मरे रावण ।
तेथें माझी युक्ती कोण । मूर्ख पूर्ण मी एक ॥ ५४ ॥
ऐसें बिभीषणें सांगतां । कृपा उपजली रघुनाथा ।
अभयहस्त ठेवोनि माथां । होय बोलता तें ऐका ॥ ५५ ॥
ऐसें बोलतां बिभीषण । संतोषला श्रीरघुनंदन ।
पुढती दिधलें आलिंगन । तुष्टमान स्वयें जाला ॥ ५६ ॥
बिभीषणासी लंकापती । अभिषेकावया श्रीरघुपती ।
सिंधुजळ सिंचनार्थीं । लक्ष्मणाप्रतीं स्वयें सांगे ॥ ५७ ॥

त्याला लंकेचे राज्य देऊन राज्याभिषेक केला :

तीर्थोदक प्रयागोदक । चतुःसमुद्रींचें उदक ।
वानरीं आणिलें आवश्यक । श्रीरघुकुळटिळकनिजाज्ञा ॥ ५८ ॥
व्याघ्रचर्म पैं आसन । सप्तमृत्तिका कुशोदक ।
औंदुबरी पीठ अति सुटंक । लंकाभिषेक बिभीषणा ॥ ५९ ॥
घडासहित सोनकेळीं । घडीं घडघडित नारळी ।
वानर हाणिती सुखसमेळीं । पुष्पें फळीं अभिषेका ॥ ६० ॥
दशाननासी न वधितां । बिभीषणासी अभिषेकितां ।
अवघे वानर म्हणती मिथ्या । युक्ती रघुनाथा आठवली ॥ ६१ ॥

श्रीरामांच्या आज्ञेने हनुमंताने प्रतिलंका निर्माण केली :

श्रीरामा म्हणे हनुमंता । लंका देखिली तुवां तत्वतां ।
समुद्रतीरीं करीं आतां । यथार्थता मज दावीं ॥ ६२ ॥
एकोनि श्रीरामाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
समुद्रतीरीं आपण । करी निर्माण लंकेचें ॥ ६३ ॥
भोंवता समुद्रपरिघ देखा । सव्य निकुंबळा मागें पडलंका ।
मध्यें निर्माण केली लंका । ध्वजपताका शोभती ॥ ६४ ॥
गडप्रवेश अति अवघड । चोरव्दारें मारे गूढ ।
विकट यंत्रें मारक दृढ । भरले अगड बहुजळें ॥ ६५ ॥
महाव्दारासंमुख । गुप्तत्वें मारक घातक ।
हुडे अग्नियंत्रांचे भडक । पारिखें कटक मारावया ॥ ६६ ॥
उलट लोटा अतर्क्य घात । पारखे वीर ठायीं पडत ।
ऐसा मार दुर्गाआंत । दावी हनुमंत गडभागें ॥ ६७ ॥
फांजी पौळी निघोड कडे । दुर्धर मार दोहींकडे ।
ढळों नये मागेंपुढें । दावी निवाडें हनुमंत ॥ ६८ ॥
रचिली लंकेची आकृती । तीपुढे तुच्छ अमरावती ।
राजमंदिरें शोभती । टके झळकीत पताका ॥ ६९ ॥
माडिया गोपुरें सातखणी । उपर्‍यां उपरीं नवखणीं ।
घरोघरीं पैं दुखणीं । लंकाभुवनीं अपार ॥ ७० ॥
राणिवसा शोभायमान । त्याहीमाजी अशोकवन ।
तेथें सीतेसी निर्बंधन । संरक्षण राक्षसी ॥ ७१ ॥
एकवस्त्रें अति दीन । मळिन केश कंपायमान ।
ऐसियें सीतेतें देखोन । रघुनंदन मूर्च्छित ॥ ७२ ॥
बिभीषण चवके चिंत्तें । उपडोनियां हनुमंतें ।
तेचि लंका आणिली येथें । अति विस्मयें विस्मित ॥ ७३ ॥
लंका देखतांचि पुढें । तवकें उडालीं माकडें ।
दुर्धर दुर्गाचें पैं हुडे । उड्डाण पडे माघारे ॥ ७४ ॥
अवघे करा आंगवण । शोधोनि काढा रे रावण ।
ऐसे भुलले वानरगण । केलें विंदाण हनुमंतें ॥ ७५ ॥
सावध पाहे रघुनंदन । तंव वाळूचें केलें लंकाभुवन ।
हनुमंतें शोभायमान । समसमान लंकेसीं ॥ ७६ ॥
ऐसे स्वयें दुर्ग देखोन । विस्मयो पावला लक्ष्मण ।
अंगद सुग्रीव आपण । विस्मयापन्न होऊन ठेले ॥ ७७ ॥
देखोनि हनुमंताची लंका । टक पडिलें ब्रह्मादिकां ।
ब्रह्मांड करितां ब्रह्मा देखा । पाहे टकमकां विस्मित ॥ ७८ ॥
हनुमंताचें मिथ्या रचन । ब्रह्मादिकां दिसे प्रमाण ।
ऐसें देखोनि विंदाण । सुखसंपन्न श्रीराम ॥ ७९ ॥
यापरी लंका देखोनि दृष्टीं । उल्लास श्रीरामाचें पोटीं ।
हनुमंताची पाठी थापटी । हरिख सृष्टीं न समाये ॥ ८० ॥

रावणाचा वध होईंपर्यंत ही प्रतिकृती राहील. ती लंका बिभीषणाजवळ गहाण :

श्रीराम बोलिला आपण । मारोनि रावण कुंभकर्ण ।
मुख्य लंका देईन दान । सत्य जाण बिभीषणा ॥ ८१ ॥
मुख्य लंका देईन जंव दान । तंव हे हनुमत्कृत लंका जाण ।
तुजपासीं म्यां दिधली गहाण । सोडवण रावणांतीं ॥ ८२ ॥
बहुत दिन न ठेवी गहाण । आम्हां तुम्हां वाइणी हेचि जाण ।
निर्दळोनियां रावण । सोडावण पैं इची ॥ ८३ ॥
लंकेहूनिही देखा । कोटि गुणें या मोल अधिका ।
माझ्या हनुमंताची लंका । ते तुजदेखतां डुलों नेदीं ॥ ८४ ॥
प्रीति प्रेम ज्ञान धन । तुज यथेच्छ देईन जाण ।
हनुमंतलंका सोडवीन । सत्य जाण बिभीषणा ॥ ८५ ॥
ऐकोनि श्रीरामाचें उत्तर । संतोषोनियां वानर ।
अवघे करिती जयजयकार । सुखनिर्भर सौमित्र ॥ ८६ ॥
हनुमंतलंका अद्दापवरी । आहे समुद्राचें तीरीं ।
काळ धाकें जतन करी । भया भारी हनुम्याचें ॥ ८७ ॥
राज्याभिषेकाची सामग्री । सिद्ध केलीं वानरीं ।
सौमित्रें घेवोनि करीं । अभिषेक करी बिभीषणा ॥ ८८ ॥
श्रीरामाज्ञा लाहोन । बिभीषणा राज्याभिषिंचन ।
करिता झाला लक्ष्मण । वानरगणसमवेत ॥ ८९ ॥
राज्यपट अभिषिंचन । अंगदासुग्रीवासमान ।
बिभीषणासी सिंहासन । रामवरदानप्रयोगें ॥ ९० ॥
बिभीषणासी लंकादान । श्रीरामें दिधलें संतोषोन ।
तें देखोनि वानरगण । आल्हांदें पूर्ण हरिखलें ॥ ९१ ॥
जयजयकाराचा गजर । करितें जाले वानरवीर ।
श्रीरामनामाचा उच्चार । तेणें अंबर गर्जलें ॥ ९२ ॥
श्रीराम निजभक्तकृपाळु । श्रीराम शरणागतवत्सळु ।
श्रीराम प्रेमळ प्रांजळु । दीनदयाळ श्रीराम ॥ ९३ ॥
साधु स्वामी श्रीरघुनाथ । साधु बिभीषण शरणागत ।
साधु साधु तो हनुमंत । स्वामिकार्यार्थसाधक ॥ ९४ ॥
जैसा राजा श्रीरघुपती । तैसा सुग्रीव वानरपती ।
तैसाचि बिभीषण लंकापती । केला निश्चितीं श्रीरामें ॥ ९५ ॥
विकल्प न धरोनि चित्तीं । शत्रुबंधु तो शरणार्थी ।
आपणासमान पदप्राप्ती । दिधली निश्चितीं श्रीरामें ॥ ९६ ॥
शरणागता संरक्षणें । शेखीं आपणासमान करणें ।
हें कर्तव्य श्रीराम जाणे । अनन्याकारणें कृपाळु ॥ ९७ ॥
न जिंकितां दशानन । बिभीषणासी लंकादान ।
श्रीरामकीर्ति अति पावन । दीनोद्धारणा श्रीराम ॥ ९८ ॥
कीर्ति वानिजे सुरगणीं । कीर्ति वानिजे ऋषिजनीं ।
कीर्ति वानिजे वानरगणीं । कीर्ति पावन तिहीलोकीं ॥ ९९ ॥
सत्य बंधु बिभीषण । कर्ता एक रघुनंदन ।
त्यासी जालिया अनन्यशरण । जन्ममरण त्या कैंचें ॥ १०० ॥
एकाजनार्दना शरण । पुढें गोड अति निरूपण ।
सागरीं तरतील पाषाण । सेतुबंधन अवधारा ॥ १०१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
बिभीषणलंकाराज्याभिषेको नाम अष्टत्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३८ ॥
॥ ओव्यां १०१ ॥ श्लोक १५ ॥ एवं संख्या ११६ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी कृषी क्रांती ला नक्की भेट द्या 
ref:satsangdhara 

भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अडतिसावा भावार्थरामायण सुंदरकांड अध्याय अडतिसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *