भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चव्वेचाळिसावा
श्रीरामांची बंधूंशी भेट
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भरत,शत्रुघ्न व लक्ष्मणांना बोलावून आणण्याची रामांची आज्ञा :
विसर्जून सभेचे जन । बुद्धिनिश्चित श्रीरघुनंदन ।
समीप द्वारपाळासी जाण । आज्ञा करिता पैं झाला ॥१॥
अगा द्वारपाळा सज्ञाना । लक्ष्मणभरतशत्रुघ्नां ।
वेगीं पाचारीं मम दर्शना । कार्याकारण पैं असे ॥२॥
येरे प्राणिपात करोनि स्वामीसी । निघाला सौमित्रभवनासी ।
मार्गीं न करोनि वलंबासी । अति त्वरेंसीं चालिला ॥३॥
दूताच्या सांगण्यावरुन तिघेही रामभेटीसाठी निघाले :
वेगीं प्रवेशला सौमित्रमंदिरी । तंव संमुख लक्ष्मण ते अवसरीं ।
देखोनियां जोडले करीं । नमस्कार पैं केला ॥४॥
तुमचिया भेटीकारणें । बोलावूं पाठविलें रघुनंदनें ।
ऐसें ऐकतां लक्ष्मणें । रथारुढ पैं झाला ॥५॥
रत्नजडित स्यंदनावरी । आरुढोनि सौमित्र ते अवसरीं ।
चालिला जेथें कनकमृगारी । बैसलासे तिष्ठत ॥६॥
लक्ष्मण चालिला देखोन । दूत प्रवेशला भरतभवन ।
संमुख देखोनि कैकेयीनंदन । दोनी कर जोडोन नमन केलें ॥७॥
विनंती अवधारीं राजेंद्रा । तुमचे भेटीची उत्कंठा श्रीरामचंद्रा ।
बोलावूं पाठविलें गुणसमुद्रा । तुम्हांकारणें मजलागीं ॥८॥
दूतमुखींचे ऐकोनि वचन । वेगीं उठिला कैकेयीनंदन ।
महापराक्रमी चरणचालीं गमन । अग्रजभेटी निघाला ॥९॥
भरत निघाल्याउपरी । दूत प्रवेशला शत्रुघ्नमंदिरीं ।
विनीत होवोनी जोडिल्या करीं । शत्रुघ्नासी नमस्कारिलें ॥१०॥
दूत म्हणे जी शत्रुघ्ना । तुमचे भेटीचें आर्त श्रीरघुनंदना ।
भरत लक्ष्मण अग्रजभवना । भेटावया पैं गेले ॥११॥
तुम्हांसि बोलवावयालागून । मज पाठवी श्रीरघुनंदन ।
तरी आतां शीघ्रगमन । श्रीरामाभेटी निघावें ॥१२॥
दूतमुखींची ऐकोनि गोष्टी । शत्रुघ्न तेव्हां उठाउठीं ।
निघाला श्रीरामाचे भेटी । चरणचालीं सत्वर ॥१३॥
सवेंचि दूत पुढें येवोन । श्रीरामासी करोनि नमन ।
म्हणे स्वामी आलेती भरत शत्रुघ्न । लक्ष्मण द्वारीं उभे असती ॥१४॥
श्रीराम चिंतातुर मानसीं । दूतासि म्हणे तिघां बंधूंसी ।
पाचारीं मज समीपेंसीं । त्वरेंकरोनि येथवरी ॥१५॥
सवेंचि दूत द्वारा पैं आला । म्हणे राजपुत्र हो भीतरीं चला ।
तुमचे भेटीस उताविळा । श्रीराम बैसलासे ॥१६॥
तिघांचे रामांना अभिवादन :
तिघे बंधु समीप येवोन । तिघीं वंदिला रघुनंदन ।
मुख कोमाइलें कळाहीन । जैसा शशी ग्रहणाचा ॥१७॥
तिहीं राम देखिला कैसा । संध्याकाळींचा सूर्य जैसा ।
अति दीनमुख चंद्र कळाषोडशा । उतरोनि जैसा द्वितीयेचा ॥१८॥
हतशोभा मुखकमळीं । जैसी कमळिणी सुके जळीं ।
हृदयीं चिंतेची काजळी । तयातें जाणों सरली पैं ॥१९॥
ऐसा श्रीराम कळाहीन । देखोनी तिघे बंधु जाण ।
श्रीरामचरणीं मस्तक ठेवोन । दीर्घ नमस्कार तिहीं केला ॥२०॥
तयांचा देखोनि अति आदर । वेगीं उठवी धरणिजावर ।
दोहीं बाहीं आलिंगूनि सत्वर । तिघे बंधु सुखी केले ॥२१॥
बैसोवोनी तिघे बंधु । तयांसी बोलिला कृपासिंधु ।
तुम्ही माझे सखे सुहृदु । प्राणाहुनि पढियंते ॥२२॥
तुमचे आज्ञेकरुन । मी राज्य करितों श्रीरघुनंदन ।
तुम्ही कुशल ज्ञाते शास्त्रज्ञ । स्वधर्मी निपुण पैं तुम्ही ॥२३॥
तुम्ही मजलागीं करितां स्वकर्म । तुम्ही मजलागीं करितां स्वधर्म ।
तुम्ही मजलागीं करितां व्रतनेम । धर्मपरायण पैं तुम्ही ॥२४॥
ऐसें श्रीरामाचें वचन । ऐकोनि तिघे बंधु जाण ।
हृदयीं निवाले परी मुख देखोन । झाले आपण चिंतातुर ॥२५॥
एका जनार्दना शरण । पुढें बंधूंसीं संवाद होईल जाण ।
मग सीतावनप्रयाण । लक्ष्मण जाऊन करील ॥२६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामबंधुदर्शनं नाम चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४४॥ ओंव्या ॥२६॥
हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref:satsangdhara
भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चव्वेचाळिसावा
अति गोड रामायण
अतिशय गोड रामायण