भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा

धूम्राक्षाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सर्पशरबंधातून सावध झाल्यावर श्रीरामाचे सैनिकांना आलिंगन :

सर्पशरबंधापासून । सुटले राम लक्ष्मण ।
दोघीं सज्जिलें धनुष्यबाण । ठाणमाणसाटोपें ॥ १ ॥
सावध होवोनि रघुनाथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।
बिभीषण हनुमंत । कपि समस्त आलिंगी ॥ २ ॥
एक एक वानरवीर । स्वयें आलिंगी रामचंद्र ।
वानरीं केला भुभुःकार । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥

वानरसैन्याच्या रामनामाच्या गजराने रावाण भयभीत, दूतांकरवी शोध आणतो :

रामनामाचा गजर । वानरीं केला अति सधर ।
नामें दुमदुमिलें अंबर । दशशिर दचकला ॥ ४ ॥

तेषां तु तुमुलं शब्दं वानराणां तरस्विनाम् ।
नर्दतां राक्षसैः सार्द्धं तदा शुश्राव रावणः ॥१॥
उवाच रक्षसां श्रेष्ठः समीपपरिवर्तिनः ।
ज्ञायतां तूणमितेषां सर्वेषां वनचारिणाम् ॥२॥
तौ च बद्धौ शरैस्तीक्ष्णैर्भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
शोककाले समुत्पन्ने हर्षकारणमुत्तमम् ॥३॥
ते तथोक्तास्तु संभ्रांताः प्राकारमधिरुहुय च ।
विषण्णवदनाः सर्वे राक्षसेंद्रमुपस्थिताः ॥४॥

वानरांचा गिरागजर । ऐकोनियां दशशिर ।
आप्त पाचारोनि निशाचर । सांगे विचार भयचकित ॥ ५ ॥
शरबंधीं राम लक्ष्मण । बांधोन टाकले अचेतन ।
वानरां शोककाल दारुण । हर्ष संपूर्ण कैसेनि ॥ ६ ॥
तरी तुम्ही सौ‍मित्रासमवेत । पहावा शरबंधीं रघुनाथ ।
वानरां हर्ष किमर्थ । समूळ वृत्तांत आणावा ॥ ७ ॥
देखोनि वानरांचे स्फुरण । बाहेर येतां राक्षसगण ।
धाकें जाऊं पाहे प्राण । कंपायमान भयभीत ॥ ८ ॥

रावणदूतांनी गोपुरावरुन रामलक्ष्मण शरबंधातून मुक्त झाल्याचे कळविले व त्याचा घबराट :

पहावया वानरवृत्तांत । गोपुरा चढले रावणदूत ।
तेथोनि टकमकां पाहत । अत्यद्‍भुत देखिलें ॥ ९ ॥
तोडोनियां शरबंधन । श्रीराम आणि लक्ष्मण ।
वाहोनियां धनुष्यबाण । आले दारुण संग्रामा ॥ १० ॥
दोहीं बाहीं कपिकुजर । नामें गर्जती वानर ।
शिळाशिखरद्रुमपाणि वीर । आलें सत्वर युद्धार्थीं ॥ ११ ॥
उठिला देखोनि रघुनंदन । दूतांचा जाऊं पाहें प्राण ।
अतिशयें म्लानवदन । आले परतोन सभेसीं ॥ १२ ॥
धाकें दूतांचें पळालें पाणी । तोंड कोरडें विकळ वाणी ।
राम सुटोनि शरबंधनी । आला कोपोनी रणमारा ॥ १३ ॥

तदप्रियं दीनमुखा रावणस्य निशाचराः ।
न्यवेदयन्यथावृत्तं सर्वे वाक्यविशारदाः॥५॥

दूतांचा वृत्तांत ऐकून रावण व इंद्रजित भयभीत :

शरबंधी सुटला रघुनाथ । ऐकोनि दूतांचा वृत्तांत ।
रावण जिव्हारीं कांपत । इंद्रजित स्वयें धाके ॥ १४ ॥
इंद्रजित धाके जीवाआंत । जरी उठिला रघुनाथ ।
तरी राक्षसां आला अंत । कुळघात समूळीं ॥ १५ ॥
वानरभार अति दुर्धर । साह्य झाल्या श्रीरामचंद्र ।
रणीं मारिती निशाचर । लहान थोर निवटोनी ॥ १६ ॥

तच्छुत्वा वचनं तेषां राक्षसेंद्रोऽथ रावणः ।
चिंतारोषपरीतांतो विवर्णवदनोऽभवत् ॥६॥
अब्रवीद्रक्षसां मध्ये धूम्राक्षं नाम राक्षसम् ।
बलेन महता युक्तो राक्षसां भीमविक्रमाः ॥७॥
निष्क्रमस्व वधायाशु राघवस्य वनौकसाम् ।
एवमुक्तस्तु धूम्राक्षो राक्षसेंद्रेण धीमता ॥८॥
कृत्वा प्रणांमं संहृष्टो निर्जगाम नृपाज्ञया ॥९॥

रावण सचिंत, ससैन्य धूम्राक्षास रणांगणावर पाठवितोः

शरबंधीं मुक्त राम लक्ष्मण । ऐकोनि हेरांचे वचन ।
चिंतातुर दशानन । म्लानवदन होंसरला ॥ १७ ॥
कोप आला रावणासी । पाचारोनि धूम्राक्षासी ।
रणीं मारावया वानरांसी । धाडी युद्धासी साक्षेपें ॥ १८ ॥
तुझा जो कां सैन्यभार । निधडें वीर निशाचर ।
ध्वज रथ अश्व कुंजर । संग्रामा शीघ्र निघावें ॥ १९ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । धूम्राक्षें करोनियां नमन ।
अति उल्लासें गर्जोन । निघे आपण संग्रामा ॥ २० ॥
युद्धा निघाले निशाचर । करोनियां वीरशृंगार ।
चालिले पायांचे मोगर । गर्जत वीर आल्हादें ॥ २१ ॥
फरश पट्टिश तोमर । शूळ परिघ गदा मुद्‌गर ।
लहुडी भिंडिमाळा खड्ग चक्र । धनुर्धर पायांचे ॥ २२ ॥
अश्वीं बाणली मोहाळी । आरसे झळकती पाखरांतळीं ।
वीर वळंघले आतुर्बळी । घोडी रणमूळीं नाचविती ॥ २३ ॥
मद गाळिती कुंजर । पालणिले अति अपार ।
घंटा घागारिया अलंकार । ध्वजा विचित्र शोभती ॥ २४ ॥
दांती लोहशेंब्या तिखट । वरी वळंघले वीरवाट ।
रथ चालिले घडघडाट । वीर उद्‌भट युद्धार्थी ॥ २५ ॥

वृकसिंहमुखैर्युक्तं खरैः कनकभूषणैः ।
आरुरोह रथं दिव्यं धूम्राक्षः खरनिस्वनः ॥१०॥
स निर्ययौ महातेजा धूम्राक्षो राक्षसेर्वृतः ।
पश्चिमेन तु द्वारेण हनुमान्यत्र तिष्ठति ॥११॥
रथशीर्षे महाभीमो गृधो विनिपपात ह ।
ध्वजाग्रे पक्षिणस्तस्य निपेतुर्मांसभोजनाः ॥१२॥
रुधिरार्द्रं महच्छवेतं छत्रमस्य पपात ह ।
स उत्पातांश्च तान्दृष्ट्वा राक्षसानां भयावहान् ॥१३॥
प्रादुर्भूतान्महाघोरान्धूम्राक्षो व्ययितोऽभवत् ॥१४॥

धूम्राक्षाला अपशकून होतातः

सिंहमुख वृक जंबुक खर । तिहीं जुंपिला रहंवर ।
सुवर्णपाखरा सालंकार । रथावर शोभती ॥ २६ ॥
रथीं ध्वज अति विचित्र । झळके माथां श्वेत छत्र ।
रथीं बैसतां धूम्राक्ष । जालें विचित्र तें ऐका ॥ २७ ॥
गृध्र योवोनि त्वरेकरीं । बैसला रथाच्या ध्वजावरी ।
मांस भक्षितां गलितरुधिरीं । श्वेत छत्रें करी आरक्त ॥ २८ ॥
ध्वजीं गृध उडवितां । धूम्राक्ष झडपिला माथां ।
करुन त्याच्या छत्रपाता । होय उडता आकांशीं ॥ २९ ॥
अनेक उठिले उत्पात । भस्फोट राजद्वारीं होत ।
सवेंचि जाला अशनिपात । वाजला आघात आकाशीं ॥ ३० ॥
वायु प्रतिकूळ दुर्धर । रजें झांकोळले नेत्र ।
गगनींहूनि वर्षे रुधिर । दुश्चिन्हें थोर उठलीं ॥ ३१ ॥
दुश्चिन्हें अत्यद्‍भुत । देखोनियां अति उत्पात ।
धूम्राक्ष जाला भयभीत । चिंताग्रस्त पैं जाला ॥ ३२ ॥
ऐशा अपशकुनाभेण । मागें परततां आपण ।
विटंबे दंडिल रावण । नाक कान छेदोनी ॥ ३३ ॥
मागें पळतां विटंबण । रणीं भिडतां मुक्तपण ।
येणे उल्लासें तो जाण । निघे आपण युद्धासी ॥ ३४ ॥
नरकपात मागें पळतां । रणीं पडल्या सायुज्यता ।
श्रीरामचरणीं प्राण देतां । ब्रह्मस्वरुपता सुलभ ॥ ३५ ॥
येणें विचारें संपूर्ण । धूम्राक्ष स्वयें आपण ।
न मानून अपशकुन । करावया रण स्वयें आला ॥ ३६ ॥
पश्चिमद्वारें जंव निघत । ते द्वारीं यूथप हनुमंत ।
वानरभारें संयुक्त । काळकृतांत बैसला ॥ ३७ ॥

निर्यातं प्रेक्ष्य धूम्राक्षं राक्षसं भीमदर्शनम् ।
विनेदुर्वानराः सर्वे प्रहष्टा युद्धकांक्षिणः ॥१५॥
तेषां सुतुमुलं युद्धे संजज्ञे हरिरक्षसाम् ।
अन्योन्यं पादपैर्घोरैर्जघ्नुस्ते शूलशक्तिभिः ॥१६॥
वानर राक्षसैघौरैर्व्यथिताश्च विदारिताः ।
वानरै राक्षसाश्चापि दुमैर्भूमिः समीकृता ॥१७॥
विदार्यमाणा रक्षोभिर्वानरास्ते महाबलाः ।
जगृहुः पादपांश्चैव शिलाश्च हरियूथपाः ॥१८॥
ते भीमवेगा हरयो नर्दमानाः सहस्त्रशः ।
ममंथू राक्षसान्घोरानामानि च बभषिरे ॥१९॥

अपशकुनांची पर्वा न मानता धूम्राक्षाचे प्रयाण :

धूम्राक्ष महानिशाचर । गज वाजी रथ सहपरिवार ।
येतां देखोनि वीरसंभार । हरिखें वानर नर्तती ॥ ३८ ॥
येतां देखोनि राक्षसभार । शिळा वृक्ष पर्वत शिखर ।
वानर उठिले करिता मार । तेणें निशाचर खवळले ॥ ३९ ॥

राक्षस व वानर यांचे युद्ध :

वानर आणि निशाचर । युद्धास मिसळले सत्वर ।
येरयेरां करिती मार । घाय निष्ठुर हाणोनी ॥ ४० ॥
शूळ शक्ती गदा मुद्‌गर । मुसळें मारितां वानर ।
करीत गोफण गुंडामार । निशाचर खवळले ॥ ४१ ॥
घाय चुकवोनि वानर । पुच्छें निवारुन शस्त्रसंभार ।
नखीं विदरिले निशाचर । वाहे रुधिर महावीरां ॥ ४२ ॥
वानर हाणोनि मुष्टिघात । राक्षसां पाडिती मूर्च्छित ।
राक्षस जंव मारुं जात । तंव ते उडत आकाशीं ॥ ४३ ॥
गगना उसळतां वानर । राक्षसीं विंधोनियां तीर ।
बाणें खिळोनि केला मार । नाचती कपींद्र रणोन्मत्त ॥ ४४ ॥
करावया राक्षसांसी घात । वानर होवोनि एकीभूत ।
गगना उसळोनि समस्त । शिळा पर्वत वर्षती ॥ ४५ ॥
होतां शिळापर्वतपात । वोडण खड्ग बाण समस्त ।
शिळातळीं चूर्ण होत । वीर निमत असंख्य ॥ ४६ ॥
वानर हरिनामें गर्जत । राक्षस क्षितितळीं कुंथत ।
घायवट आक्रंदत । आला अंत राक्षसां ॥ ४७ ॥
मणिमुक्तसुवर्णकवचें । वीर लेइले ब्रीदाचे ।
हृदय पर्वतीं छेदोनि त्यांचे । पाडिले मणिमुकुट ॥ ४८ ॥
होतां पर्वतमहामार । अश्व सारथी रहंवर ।
करटभिन्न कुंजर । केले चकचूर रणरंगीं ॥ ४९ ॥
आम्ही श्रीरामाचे भद्रजाती । वानरवीर निजनांवाची ख्याती ।
रणीं गर्जगर्जोनि युद्ध करिती । आली समाप्ती राक्षसां ॥ ५० ॥
अश्व मारिले अपरिमित । रणीं मोडले रथेंरथ ।
वीर मारिले असंख्यात । नेली भस्मांत गजसेना ॥ ५१ ॥
छत्र भंगूनि पडिलें धरणीं । शस्त्रें लोळती रणांगणीं ।
रणीं मारिले वीरश्रेणी । रुधिर अवनीं प्रवाहे ॥ ५२ ॥
वानर गगनीं राक्षस अवनीं । मारिले पर्वतपाषाणीं ।
वीरीं रणकावा घेवोनि । रणांगणीं वोसरले ॥ ५३ ॥
वानरीं करितां महामार । मारिला राक्षसांचा भार ।
रणीं पळती निशाचर । घायीं दुर्धर गांजिले ॥ ५४ ॥
रणीं मोडला राक्षसपक्ष । तेणें कोपला धूम्राक्ष ।
धनुष्यीं साधोनियां लक्ष । मारावया विपक्ष चालिला ॥ ५५ ॥

धूम्राक्षोऽथ धनुष्पाणिर्वानरान्रणमूर्धनि ।
हसन्विद्रावयामास विश्वस्ताञ्शरवृष्टिभिः ॥२०॥
नाराचैराहताः केचित्केचिच्च शकलीकृताः ।
केचिद्विमथिता भूमौ रुधिरार्द्रा वनौकसः ॥२१॥
केचिद्विद्राविता नष्टाः संक्रुद्धै राक्षसैर्युद्धै ।
विभिन्नहृदयाः केचिदेके आर्श्वेन शायिताः ॥२२॥

धुम्राक्ष आणि हनुमान यांचे युद्ध :

स्वयें धूम्राक्ष आपण । वाहोनियां धनुष्यबाण ।
वानरां करुं लागला कंदन । तीक्ष्णबाण विंधोनी ॥ ५६ ॥
जेंवी पर्वतीं पर्जन्यधारा । तेंवी बाणीं विंधिलें वानरां ।
एकां लागल्या रुधिरधारा । एक अंबरा उडाले ॥ ५७ ॥
एक सर्वांगां क्षतविक्षत । एक पाडिले मूर्च्छित ।
सवेंचि उठोनि युद्ध करित । एक विवळत शरघातें ॥ ५८ ॥
एक रुधिरें थबथबित । तैसेचि वानर युद्ध करित ।
एकां बाण भेदले हृदयाआंत । श्रीरामा स्मरत महाबळी ॥ ५९ ॥
करितां रामनामस्मरण । स्वयें विरोनो जाती बाण ।
एकाचे वामपार्श्व विंधोन । वानरगण त्रासिले ॥ ६० ॥
होतां देखोनि वानर त्रस्त । तेणें कोपला हनुमंत ।
रणीं खवळला कृतांत । करावया घात धूम्राक्षा ॥ ६१ ॥

धुम्राक्षेणर्दितं सैन्यं व्यथितं प्रेक्ष्यतं प्रेक्ष्य मारुतिः।
अभ्यवर्तत संक्रुद्धः प्रगृह्य महतीं शिलाम् ॥२३॥
क्रोधाद्‍ द्विगुणरक्ताक्षः पितुस्तुल्यपराक्रमः।
शिलां तां पातयामास धूम्राक्षस्य रथंप्रति ॥२४॥
आपतंतीं शिलां दृष्ट्वा गदामुद्यम्य संभ्रमात्।
रथादाप्लुत्य वेगेन वसुधायां व्यतिष्ठत ॥२५॥
सा प्रमथ्य रथं तस्यनिपपात शिला भुवि।
सचक्रं कुबरमुखं सध्वजं सशरासनम् ॥२६॥
भित्वा तु सरथं तस्य हनूमान्पवनात्मजः॥२७॥

हनुमंत कोपेंकरीं । सप्तयोजन शिळा थोरी ।
घाली धूम्राक्षरथावरी । गिरागजरीं गर्जोनी ॥ ६२ ॥
जीवें मारावया धूम्राक्ष । क्रोधें जाला तो रक्ताक्ष ।
दृढ साधोनि अनुलक्ष । शत्रुपक्ष छेदावया ॥ ६३ ॥
हनुमंतें हाणीतली शिळा । न ढळे विंधितां बाणजाळा ।
न तुटे न फुटे शस्त्रमेळां । अस्त्रां सकळां अनिवार्य ॥ ६४ ॥
ऐसें जाणोनि निर्धारीं । धूम्राक्ष ते अवसरीं ।
गदा घेवोनियां करीं । पळाला दरी लघुवेगें ॥ ६५ ॥
अश्व सारथी रथ कुंगर । ध्वजा पताका रथ चक्र ।
चाप शर छत्र चामर । केलें चकचूर शिळाघातें ॥ ६६ ॥
गदा घेवोनि करतळीं । धूम्राक्ष पळाला महाबळीं ।
तेणें हनुमंत कोपानळीं । राक्षसदळीं मिसळला ॥ ६७ ॥
पित्या वायूचा आक्रम । तैसाचि हनुमंती पराक्रम ।
करावया राक्षसांचे भस्म । स्वयें संग्राम मांडिला ॥ ६८ ॥
पुच्छें कवळोनि सैन्य समेळीं । शिर छेदित करतळीं ।
कपीची न तुटे रोमावळी । शस्त्रानुमेळीं राक्षसां ॥ ६९ ॥
द्रुमपाणी आतुर्बळी । राक्षसां करीत रणरांगोळी ।
बोंब उठली नादावळी । राक्षसदळीं आकांत ॥ ७० ॥
ऐकतां हनुमंताचें नाव । भेणें सांडूं पाहती जीव ।
तोचि संग्रामीं आला स्वयमेव । कल्पांतभय राक्षसां ॥ ७१ ॥
हनुमंतेंसीं रणरवंदळी । निशाचर कांपती चळचळीं ।
रागें देतां पैं आरोळी । दांतखिळी राक्षसां ॥ ७२ ॥
फोडोनी राक्षसांची फळी । आला धूम्राक्षाजवळी ।
तोही राक्षस आतुर्बळी । युद्धानुमेळीं खवळला ॥ ७३ ॥

विद्राव्य राक्षसानीकं हनूमान्पवनात्मजः ।
गिरिशृंगं तु संगृह्य धूम्राक्षं व्यद्रवद्वली ॥२८॥
तमापतंत धूम्राक्षो गदामुद्यम्य वीर्यवान् ।
विनर्दंतं हनुमंतं गदां तां बहुकंटकाम् ॥२९॥
पातयामास धूम्राक्षः स्तनदेशे हनूमतः ।
स कपिर्मारुतवलस्तं प्रहारमचिंतयन् ॥३०॥
धुम्राक्षस्य शिरोमध्ये गिरिशृंगमपातय्रत् ।
स विह्वलितसर्वांगो गिरिशृंगेण पोथितः ॥३१॥
पपात सहसा भूमौ विशिर्ण इव पर्वतः ।
निहतं राक्षसं दृष्ट्वा हतशेषा निशाचराः ॥३२॥
त्रस्ताः प्रविविशुर्लंकां वध्यमाना वनौकसैः ॥३३॥

करोनि सैन्यासी रवंदळी । धूम्राक्ष मारावया महाबळी ।
शिखर घेवोनि करतळीं । आला तत्काळी हनुमंत ॥ ७४ ॥
हनुमान आला देखोनि जवळीं । धूम्राक्ष झाला क्रोधनळीं ।
गदाघातें हृदयकमळीं । मरणानुमेळीं हाणितला ॥ ७५ ॥
घावो लागला हृदयकमळीं । गदा होवोनि गेली रांगोळी ।
धूम्राक्ष तये काळीं । स्वयें न्याहाळी विस्मित ॥ ७६ ॥
शक्तीवरदाचे उद्रेक । तेचि गदेसी कंटक ।
वरदगदा सकंटक । तिसी अंतक धाकत ॥ ७७ ॥
वरदगदा अति वरिष्ठ । घायें मारावया मर्कट ।
शेखीं गदाच केली पीठ । बळें उद्‌भट वानर ॥ ७८ ॥
ऐसें धूम्राक्ष जंव विचारी । तंव हनुमंते शिळा शिखरी ।
दृढ टाकिली मस्तकावरी । जातां चाचरी लवंडला ॥ ७९ ॥

धूम्राक्षाचा वध व राक्षसांचे पलायन :

धूम्राक्ष पडतांचि धरणीं । पिवों न मागतां पाणी ।
प्राण गेला तत्क्षणीं । रणभंगाणी राक्षसां ॥ ८० ॥
रणीं पडलियां मुख्य धुरी । सैन्यसंभार निशाचर ।
मारितां उरले जे वीर । अति सत्वर पळाले ॥ ८१ ॥
एक हुंबत हुंगत । एक कण्हत कुंथत ।
एक अतिशयेंसीं थिकत । लंकेआंत पैं आले ॥ ८२ ॥
रणीं गौरविलें वीरां । ओढिती अंत्रमाळा शिरा ।
एक वाहती रुधिरधारा । एकांचे उदरा नखघात ॥ ८३ ॥
वानरवीर जगजेठी । न लागती पळत्यापाठी ।
घायाळ गेले लंकात्रिकूटीं । बोंब उठी राक्षसा ॥ ८४ ॥
वानरवीर रणप्रवीण । केलें राक्षसा रणकंदन ।
हनुमंतें पैं आपण । घेतला प्राण धूम्राक्षाचा ॥ ८५ ॥

धूम्राक्ष वधाने रावणाचा संताप व अकंपनाची योजना :

धूम्राक्षगदावरदपात । तो हनुमंतें केला व्यर्थ ।
हनुमंतें केला शिखरघात । तेणें प्राणांत राक्षसां ॥ ८६ ॥
ऐसें ऐकोनि दशानन । स्वयें जाला क्रोधायमान ।
पाचारोनि अकंपन । धाडिला आपण संग्रामा ॥ ८७ ॥

वानरसैन्यात रामनाम – गर्जना :

येरीकडे राम कतकांत । वानर रामनामें गर्जत ।
आम्ही श्रीरामाचे दूत । विजयान्वित सर्वदा ॥ ८८ ॥
रामनामाच्या स्मरणीं । वानरां विजय अनुदिनीं ।
धाकें अपेश गेलें निमोनी । जागृतीं स्वप्नीं दिसेना ॥ ८९ ॥
स्मरणापासीं विजयवृत्ती । स्मरणापासीं यश कीर्तीं ।
स्मरणापासीं ब्रह्मप्राप्ती । हे विख्याती स्मरणाची ॥ ९० ॥
विस्मरणें अपेशप्राप्ती । विस्मरणीं नित्य अपकीर्ती ।
विस्मरण स्वयें पापमूर्ती । नरकप्राप्ती विस्मरणें ॥ ९१ ॥
एका जनार्दना शरण । कथा रम्य रामायण ।
हनुमंतें स्वयें आपण । केलें निर्वाण धूम्राक्षा ॥ ९२ ॥
लागला हनुमंताचा घात । कोटी जन्मांचा मरणावर्त ।
चुकोनि जाला नित्यमुक्त । भाग्यवंत धूम्राक्ष ॥ ९३ ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामदृष्टीपुढें मरण ।
बाण भेदितां ब्रह्म पूर्ण । समाधिचिद्धन संग्राम ॥ ९४ ॥
येथें मूर्च्छनेचा जो बोध । तो तंव केवळ आनंदकंद ।
एका जनार्दनीं उघ्दोध । परमानंद संग्रामीं ॥ ९५ ॥
जो अहंममतेसीं करी संग्राम । तो निधडा योद्धा परम ।
त्यासीं साह्य सदा श्रीराम । स्वयमेव ब्रह्म तो होय ॥ ९६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
धूम्राक्षवधो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
ओंव्या ॥ ९६ ॥ श्लोक ॥ ३३ ॥ एवं ॥ १२९ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौदावा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *