भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा

श्रीरामस्वरूपवर्णन –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

जयजयाजी श्रीजनार्दना । एकानेका परिपूर्णा ।
जनीं असोनि अभिन्ना । अलिप्त जगासी ॥ १ ॥
जनीं आहेसी तत्वतां । म्हणोनि तेथें भाव धरितां ।
ते तुझी माया गा अच्युता । तेथें सर्वथा तूं नससी ॥ २ ॥
जेंवी उदकाचा निखळ फेन । तो केन पितो नवचे तहान ।
तेंवी तुजपासून जहाले जन । ते जनां जाणी भेटसी ॥ ३ ॥
फेन निरसोनि उदक घेणें । जन निरसोनि तूतें देखणें ।
सोनटकाहूनि सोनें पहाणें । अन्यथा शिणणे वायांचि ॥ ४ ॥
हे अभेददर्शनहातवटी । तूंचि गुरूचे कृपादृष्टीं ।
अवलोकिसी संवसाटी । तै दिठी पैठी तुजमाजी ॥ ५ ॥
त्या तुझें स्वरूप चिद्धन । नामरूपे अवतारचिन्ह ।
धरिलें त्याचें निजवर्णन । कर्ता जाण तूं स्वामी ॥ ६ ॥
देव साक्षात् नारायण । ऐसा सांगताही वेदचि जाण ।
तैसें माझेनि वदनें जाण । कर्ता जाण तूंचि तूं ॥ ७ ॥
विनटोनि अहंरावण । राज्याभिषेकविराजमान ।
सिंहासनीं रघुनंदन । शोभायमान निजतेजें ॥ ८ ॥
सकळां श्रीरामीं प्रीति गहन । निजाधिकारें देखिला जाण ।
परिस तयाचें लक्षण । एका जनार्दन वदवित ॥ ९ ॥
सनकादिक मुनिवृंद । वसिष्ठादि मुनि प्रसिद्ध ।
नारदादि महासिद्ध । आत्मत्वें शुद्ध जाणितला ॥ १० ॥
सुष्टीपूर्वी जे सनातन । सृष्टिरूपे विराजमान ।
जेथें सृष्टीसीं लयो जाण । तेंही रघुसंदनस्वरूप ॥ ११ ॥
दुःख न रिघे अळुमाळ । जेथें सुखमयचि केवळ ।
उत्पत्तिस्थितिप्रळयकाळ । जेथें सकळ मृगजळत्वें ॥ १२ ॥
जेथें दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता आणि ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता निजज्ञान । अभाव पूर्ण त्रिपुटीचा ॥ १३ ॥
जें शुद्ध चैतन्य एकवट । जें अंतर्बाह्म निघोट ।
आदि मध्य आणि शेवट । न कळे स्पष्ट जयाचा ॥ १४ ॥
ते हे श्रीरामाचें रूपडें । सिद्धीं देखिलें वाडेंकोडें ।
दृष्टी पाहतां जयाकडे । सुखसुरवाडीं बुडाली ॥ १५ ॥
अवलोकितां रघुनंदन । देखणे झाले नयन ।
देखणे देखती देखणे होऊन । देखणे नयन श्रीरामीं ॥ १६ ॥
ब्रह्मादि इंद्रप्रमुख । तिहीं विराटमूर्ति अशेख ।
स्वयें देखिला रघुकुळटिळक । ऐका विवेक तयाचा ॥ १७ ॥
भूलोकादि सप्तपाताळ । ते रामाचे चरण कोमल ।
भूवर्लोक जघनयुगुल । सांग सकळ विराजे ॥ १८ ॥
स्वर्लोक ते रामजघन । तेथे विराजे स्वर्गभुवन ।
महर्लोक नाभिस्थान । जाण संपूर्ण रामाचें ॥ १९ ॥
जनलोक हृदय देख । कंठीं विराजे तपोलोक ।
श्रीरामाचा मुखमयंक । तेथें सत्यलोक विराजे ॥ २० ॥
असो किती सांगों भिन्न भिन्न । ॐतत्सत् ऐसें वचन ।
तें सर्वात्मक रघुनंदन । अनवच्छिन्न एकत्वें ॥ २१ ॥
जेंवी सूत्री मणिगण । ओतप्रोत संपूर्ण ।
तेंवी चराचरीं रघुनंदन । विबुधीं जाण देखिला ॥ २२ ॥
कौसल्यादि माता समस्तीं । जन्मकाळी चैतन्यमूर्ती ।
पूर्वी जैसी देखिली होती । त्याच स्थितीं देखिली ॥ २३ ॥
चैतन्यघन अतिलावण्य । पाहोनि मदनमोहन ।
जानकी झाली लजायमान । रघुनंदन देखती ॥ २४ ॥
भरत श्रीरामाचा भक्त । विरक्त आणि अनुरक्त ।
नित्यानुवर्त प्रेमयुक्त । कैसा रघुनाथ देखिला तेणें ॥ २५ ॥
भरत देखणा विचक्षण । श्रीरामाचे देखणेपण ।
सर्वस्वेंसीं आकळून । देखणेन देखणें श्रीराम ॥ २६ ॥
स्वप्रकाशें स्वलीला । दिव्य तेजाचा उमाळा ।
निजतेजीं अति सोज्ज्वळा । भरतें डोळा देखिला ॥ २७ ॥
तेणें निजतेजें विलासे । मीतूंपणाचा ठाव पुसे ।
जग आत्मत्वें प्रकाशे । अति उल्लासे निजानंदें ॥ २८ ॥
ज्या तेजानेचि निधरि । अहंसोहं समूळ विरे ।
ब्रह्मत्वें त्रैलोक्या अवतरे । सर्वांगीं भरे स्वानंदकंद ॥ २९ ॥
ज्या तेजाचेनि निजनिष्ठें । विषयांचे विषयत्व आटे ।
बंधमोक्षांचें बिरडे फिटे । स्वसुखे कोंदाटे आब्रह्म मुवन ॥ ३० ॥
ज्या तेजाचिये दीप्ती । रवि चंद्र स्वये हरपती ।
जेणें प्रकाशें ब्रह्मस्फूर्ती । निर्विषयस्थितीं सूख कोंदे ॥ ३१ ॥
ऐसें स्वाभाविक सहज । तेजाचे जे निजतेज ।
त्याची चिन्मूर्ति पै द्विभुज । भक्तराज देखे भरत ॥ ३२ ॥
श्रीरामाची निजस्थिती । चिन्मात्रैकचैतन्यमूर्ती ।
अव्यक्त आला व्यक्ती । भक्तभावाथीं साकार ॥ ३३ ॥
ऐसा श्रीराम स्वभावेंसीं । आला साकार दशेसी ।
सगुण मूर्ति भासे कैसी । चिद्विलासी श्रीराम ॥ ३४ ॥
जन्मला कौसल्येच्या उदरीं । ऐसी लोकवंदतीची परी ।
त्या श्रीरामाच्या उदरीं । भरत निर्धारीं विश्व देखे ॥ ३५ ॥
श्रीरामाचे पूर्णपण । भक्त जाणती अकिंचन ।
जे भावोर्थे परिपूर्ण । ते स्वरूप जाण जाणती ॥ ३६ ॥
श्रीरामाची निजमूर्ती । वर्णितां मौनावल्या श्रुती ।
शास्त्रें थोटावलीं थाती । राम शब्दार्थी अर्थवेना ॥ ३७ ॥
चाटु नाना रस मधुर वाढी । तो चाटू चाखतां न लभे गोडी ।
तेंवी सांडोनि शब्दार्थ ओढी । पहावी निर्वडी! श्रीराममूति ॥ ३८ ॥
आकाश बांधतां मोटेंसी । चौपालवी ये बांधे त्यासी ।
शब्दें वर्णिता श्रीरामासी । वैखरीसी दशा तैसी ॥ ३९ ॥
राम सगुण तोचि निर्गुण । राम परमात्मा परिपूर्ण ।
चिन्मात्रैक चैतन्यघन । विश्वविश्राम जाण श्रीराम ॥ ४० ॥
त्या श्रीरामाचें वर्णन । वर्णावया मी अति दीन ।
कृपाकु एका जनार्दन । अर्थवी कथन यथार्थ ॥४ १ ॥
धन्य भाग्य त्या भरताचें । स्वरूप देखत त्या रामाचें ।
श्रुतिशास्त्रांगुह्य ज्याचें । भरत त्याचें चिन्ह लक्षी ॥ ४२ ॥
राम सर्वांगी निर्मळ । ते निर्मळी बिंबले नभ सुनीळ ।
यालागीं श्यामता सुनीळ । भासे निर्मळ श्रीरामासीं ॥ ४३ ॥
राम श्यामता मेघश्याम । त्या श्यामता गर्जवी आब्रह्म ।
यालागीं राम मेघश्याम । बोलती परम श्रुतिशास्त्रें ॥ ४४ ॥
राम निर्मळ परात्पर परम । हेंचि श्रुतिशास्त्रां न कळे वर्म ।
अंगीं बिंबलें देखोनि व्योम । मेघश्याम राम म्हणती ॥ ४५ ॥
यापरी स्वयें श्रीराम । शोभा शोभवी मेघश्याम ।
त्याच्या पदीचा पदाक्रम । त्रिविक्रम आक्रमें ॥ १४६ ॥
सहस्त्र जिव्हा शेषासी । तेणें बळें निजावेशीं ।
प्रवर्तला चरणवर्णनासी । शीक त्यासी लागली ॥ ४७ ॥
वर्णितां अचिंत्याच्या रूपासी । जिव्हा चिरली क्षणार्धेर्सी ।
लाजां दडाला शेजेसीं । श्रीरामचरणासी न वर्णवे ॥ ४८ ॥
त्या श्रीरामाचे श्रीचरण । वर्णावया कैंचें वदन ।
साधु कृपाकु दीन जन । त्यांचें अवधान बोलवित ॥ ४६ ॥
चरणांतळीं शोभा आरक्त । बाळादित्यातें लाजवित ।
क्षणें जगातें भुलवित । ते चरणीं निश्चित भुलली रमा ॥ ५० ॥
सुरासुरां अतर्क्य माया । जे श्रुतिशास्त्रीं न ये आया ।
ते रमा माया लवलाह्मा । श्रीरामपायां भुलली ॥ ५१ ॥
लक्ष्मीचें चपळ लक्षण । नित्य चित्त भोगायतन ।
चरणीं सुख अत्यंत गहन । रमेसी मोहन नवल नव्हे ॥ ५२ ॥
सनकादिकां अति विरक्ती । देहसंग न धरिती हातीं ।
तेही भुलले अत्यंत प्रीतीं । क्षणही न विसंबती श्रीरामचरणां ॥ ५३ ॥
सनकादिक महासज्जन । भ्रमर होवानियां जाण ।
चरणकमलीं आमोदसेवन । अहर्निशी जाण करिताती ॥ ५४ ॥
चरणींचिया सामुद्रिका । न वर्णवे वेदा शेषा ।
ध्यजवजांकुश ऊर्ध्व रेखा । पद्य देखा यवांकित ॥ ५५ ॥
तया चिन्हांचे महिमान । श्रोते परिसोत सावधान ।
अलक्ष्य तयांचे लक्षण । कांहीं सांगेन संक्षेपें ॥ ५६ ॥
चहूं मुक्ती देवोनि लाज । चरणीं शोभे भक्तीचा ध्यज ।
वज्रें निर्दळी कर्मबीज । स्मरणाचा सहज नित्यांकुश ॥ ५७ ॥
शोधितसत्वाचेनि आक्रमें । युग्मचरणीं तळपती पद्यें ।
पादतळें अनुरागप्रेमें । त्या शोभा कुंकुमें लाजिजे ॥ ५८ ॥
तळीं आरक्त श्यामता देख । जेंवी नभीं इंद्रधनुष्य ।
शोभा शोभवी अलौकिक । रघकुळटिळकनिजचरणीं ॥ ५९ ॥
क्षयरोगें नित्य पीडिला । त्या श्रीरामचरणां शरण आला ।
नखचंद्रीं जडोनि ठेला । अक्षयी झाला चंद्रमा ॥ ६० ॥
नखचंद्रींचे जे चंद्रकर । सनक सनंदन सनक्तमार ।
भक्त होवोनि सत्वर । नित्य चरणामृतसार सेविती ॥ ६१ ॥
नखीं भेदलें आवरणजीवन । गंगेचे तें जन्मस्थान ।
त्रिपथगामी हें अभिधान । विश्व पावन जियेचेनि ॥ ६२ ॥
त्रिगुण जडजाड्या उबगले । श्रीरामचरणां शरण आलें ।
त्रिकोणघोटी होवोनि ठेले । चरणी मुकले जीवभावा ॥ ६३ ॥
जैसें शुद्ध उपासनायंत्र । तैसी घोटी त्रिकोणसुंदर ।
कळाविया अति मनोहर । चित्कळा सार भासती ॥ ६४ ॥
श्रुति आणि स्मृती । दोही बाही वांकी वाजती ।
अंदुवा जाण निश्चितीं । उपवेदस्थितिविभागें ॥ ६५ ॥
भक्ताची ते जीवनकळा । साधकाचा निजजिव्हाळा ।
तोडराचा नाद आगळा । प्रळयघंगाळ नाम ज्याचें ॥ ६६ ॥
वेदान्त शुद्ध शास्त्र । चरणीं गर्जती तोडर ।
धन्य धन्य दैत्यांचें शरीर । तोडर निरंतर रुळती चरणीं ॥ ६७ ॥
तोडरांची नादशैली । ऐकतां कळिकाळ कापे चळीं ।
पोटरियांची नव्हाळी । अति कोंवळी सुकुमार ॥ ६८ ॥
यंत्रपीठीं वर्ण प्रबळ । तेंवी पोटरिया सरळ ।
अक्षररसें त्या मांसळ । अति निर्मळ निजतेजें ॥ ६९ ॥
जानुचक्र अति वर्तुळ । जैसे आरिसे निजनिर्मळ ।
निजात्मतेजें स्वरूप तत्काळ । तेथें सकळ आभासे ॥ ७० ॥
अथवा आणिक एक भावो । मज गमताहे पहाहो ।
ऐका तेथींचा नवलावो । अभिप्रावो तो ऐसा ॥ ७१ ॥
चक्र शिणले कंदन करितां । ते शरण आलें रघुनाथा ।
जानुचक्रीं जडोनि जातां । वंद्य तत्वतां सुरसिद्धां ॥ ७२ ॥
श्रीरामजानुचक्र देखतां । काळचक्र वंदी हरिभक्तां ।
रामचरणांची सामर्थ्यता । श्रुतिशास्त्रां न वर्णवे ॥ ७३ ॥
लागतां श्रीरामचरणीं । शिळा उद्धरली तत्क्षणी ।
सद्‌भावें सेवितां अनुदिनी । लागती चरणी कळिकाळ ॥ ७४ ॥
श्रीरामाचा चरणमहिमा । शास्त्रां न करवे सीमा ।
श्रुति पावल्या उपरमा । त्या श्रीरामा केंवी वर्णवे ॥ ७५ ॥
ऊर मृदु सरळशोभा । तेणें लाजविले कर्दळीस्तंभा ।
तिच्या पोटी वक्रगाभा । अवक्र शोभा रामांकीं ॥ ७६ ॥
गगनाहूनि अति सुकुमार । श्रीराममांडिया अरुवार ।
लागलिया खुपती चंद्रकर । सुकुमारा सुकुमार श्रीरामचंद्र ॥ ७७ ॥
जगाचें गुह्य श्रीरघुनाथ । पावावया तयाचा गुह्यार्थ ।
इतरां कैचें सामर्थ्य । भावार्थे सेवीत जानकी ॥ ७८ ॥
त्यजोनि वासनावासासी । जे निर्बुजले लोकलाजेसी ।
ते पावती श्रीरामगुह्यासी । अहर्निशीं सुखरूप ॥ ७९ ॥
स्वयें अच्छिद्रत्वें मनोहर । आणि पुढिलाचे आच्छादी छिद्र ।
तोचि कांसे पीतांबर । तेज दुर्धर देदीष्य ॥ ८० ॥
उदयअर्स्ते विजु शिणली । ते श्रीरामा शरण आली ।
पीतांबरत्वें कांसे जडली । त्यजोनि वहिली उदयास्त ॥ ८१ ॥
कांस कसिली सुरेख । पालवीं२ मुक्तलग देख ।
लागतां कांसे एकाएक । भवभय देख होय वाव ॥ ८२ ॥
श्रीराम सांपडे सगळा । ते भक्तिभावार्थमेखळा ।
मध्यें शोभे घननीळा । अलोकिक कळा तेजाची ॥ ८३ ॥
किंकिणी आणि ज्वाळमाळा । भद्धि सिद्धि झाल्या सकळा ।
क्षुद्रघंटिकाचा मेळा । सद्विद्या तत्काळ पै होती ॥ ८४ ॥
अति सूक्ष्म मध्य साना । होता अभिमान पंचानना ।
देखोनी राममध्यरचना । लाजा राना तो गेला ॥ ८५ ॥
सावकाश श्रीरामासी । पाहावयां अवस्था पंचाननासी ।
येवोनि जडले रामकांसेसी । मित्रत्वेंसीं मेखळे ॥ ८६ ॥
लागतां श्रीरामकांसेसी । विसरले गमनागमनासी ।
श्रीरामाची ख्याति ऐसी । कांसे लागी त्यासी उद्वार ॥ ८७ ॥
निजभक्तांच्या आर्तीच्या ठायीं । अखंड रामासी रमणे पाही ।
आर्तीवेगळें सर्वथा कांहीं । जाणें नाहीं श्रीरामा ॥ ८८ ॥
आर्ती सर्वेद्रियांचा अर्थ । भक्त श्रीरामीं अर्पित ।
श्रीराम एकपत्‍नीव्रत । आर्ती रमत स्वधर्म ॥ ८९ ॥
म्हणोनि भक्तांसी निश्चित । प्राप्त श्रीरामगुह्यार्थ ।
आर्तीवेगळा रघुनाथ । नव्हे प्राप्त सुरसिद्धां ॥ ९० ॥
लेखणी चुकी पडली मोठी । सांडोनि श्रीरामगोष्टी ।
पीतांबरीं बैसली दृष्टी । संती कृपादृष्टीं सहावे ॥ ९१ ॥
सखोल श्रीरामाची नाभि जाण । ब्रह्मा सहस्राब्द बुडतां आपण ।
ठाव व लागे अणुप्रमाण । झाला खेदक्षीण निजमनीं ॥ ९२ ॥
तेणें कृपा आली रघुनाथा । देवोनि नाभिकारता ।
नाभिकमळीं राखिला धाता । लोककर्ता करोनियां ॥ ९३ ॥
उपदेशिलें गुह्यज्ञान । ऐका तयाचें लक्षण ।
सकळ लोक स्रजितां पूर्ण । न ये कर्माभिमान सर्वथा ॥ ९४ ॥
उदरीं त्रैलोक्य सांठोवा । विश्रांति या सकळ जीवां ।
जेंवी मातुकांचा सांठोवा । दिसे अवघा प्रणवोदरीं ॥ ९५ ॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञाननव्हाळी । हेचि उदरी त्रिवळी ।
सत्कर्म रेखिल्या रोमावळी । हृदयकमळीं शोभती ॥ ९६ ॥
श्रीरामाचे हृदयावकाशी । आकाश लोपलें स्वकार्येंसीं ।
घनानंद निरवकाशीं । सज्जनांसी विश्रांति ॥ ९७ ॥
निवांत समाधीचें सुख । तैसें श्रीरामहृदयीं पदक ।
संत माणकुळी सुरेख । अलौकिक झळकती ॥ ९८ ॥
सत्कोंदणें अलौकिकी । संत चिद्रत्‍नें जडलीं पदकीं ।
कौस्तुभाची शोभा निकी । लोकालोकीं दुर्लभ ॥ ९९ ॥
उदयअस्तें सूर्य शिणला । तो श्रीरामा शरण आला ।
कौस्तुभ होवोनि कंठी जडला । मुक्त झाला त्रिविध तापा ॥ १०० ॥
अनन्यगतीच्या सद्‌वृत्ती । तेचि रामीं वैजयंती ।
सुमनमनाच्या निजवृत्ती । माळा शोभती समिश्रतुळसी ॥ १०१ ॥
श्रीरामाचा कंबुकंठ । वेदाचें तें मूळ पीठ ।
स्वरवर्णांची ते वाहती वाट । तेथोनि प्रकट त्रिकांडी ॥ १०२ ॥
मुख्यत्वे श्रीराम अबाहु । तेथेंचि शोभती आजानुबाहू ।
बाईंचा पराक्रम बहु । द्वैताचा ठाऊ उरो नेदी ॥ १०३ ॥
अहंरावण महाबळी । त्याची केली रांगोळी ।
वैर नाहीं जगतीतळीं । आयुधें ठेविलीं यालागीं ॥ १०४ ॥
श्रीरामाचें शुद्ध ज्ञान । निहृदयीं असें संपूर्ण ।
तेथें न होवोनि निमग्र । वृथा अज्ञान भ्रममाती ॥ १०५ ॥
निरसोनि बाह्य साधन । हृदयीं घ्यावया समाधान ।
ज्ञानमुद्रा दावी आपण । दक्षिण हस्ते श्रीराम ॥ १०६ ॥
आपुली माया आपुल्यावरी । अलिप्तपणे धरी हरी ।
राम पाहतो निर्धारी । बाधा न करी हरिमाया ॥ १०७ ॥
ऐसें करावया निर्धारीं । निजमाया निजकरीं ।
वामांकी जानकी सुंदरी । दक्षिणकरीं धरियेली ॥ १०८ ॥
शुद्ध चैतन्याचे सुघटे । अहं सोहं निःशेष आटे ।
श्रीरामाचे बाहुवटे । कीर्तिमुख चोखटें उपनिषदें ॥ १०९ ॥
वीर्यधैर्या धैर्य जेणें । श्रीरामाचीं वीरकंकणें ।
करीं बाणलीं पूर्णपणे । लेणया लेणें श्रीराम ॥ ११० ॥
श्रीराममुद्रा बाणलिया हाती । तो वंद्य होय त्रिजगतीं ।
कळिकाळ पायां लागती । चारी मुक्ती आंदण्या ॥ १११ ॥
ऐशा दशांगुळी दशमुद्रा । करीं प्रतिपाळी दशावतारा ।
हस्तीं धरिली सीता सुंदरा । दशशिरा निर्दाळूनी ॥ ११२ ॥
गाळींव आनंदाची मूस देख । की सोलींव सुखाचेंही सुख ।
तें श्रीरामाचें श्रीमुख । नित्य निर्दोष देखिजे ॥ ११३ ॥
श्रीरामाचा मुखमयंक । पूर्णत्वें नित्य निष्कलंक ।
देखोनियां शशांक । लाजा अधोमुख तो झाला ॥ ११४ ॥
पक्षीं वाढे पक्षीं मोडे । हे चंद्रासी दुःख गाढे ।
तेणें दुःखें अंगुष्टीं जडे । जग पायी पडे नखचंद्रीं ॥ ११५ ॥
जडतो श्रीरामअंगुष्टीं । चंद्रासी झाली पुष्टितुष्टी ।
रामचरणीं सुखाच्या कोटी । देखतां दृष्टी आल्हाद ॥ ११६ ॥
करितां राममुखावलोकन । निःशेष द्वंद्वदुःखा बोळवण ।
परानंदहप्ति गहन । हरिखें पूर्ण कोंदाटे ॥ ११७ ॥
अकार उकार मकारस्थितीं । ॐकारीं कर्म निष्कर्मप्राप्तीं ।
तैशा मुखी दोभागी दंतपंक्ती । चतुर्वेदस्थिती चौक मिरवे ॥ ११८ ॥
जगाचा आधार ते अधर । श्रीरामअधरें ते सधर ।
परमामृतासी निजमाहेर । निजजिव्हार सीतेचे ॥ ११९ ॥
श्रीरामाची हनुवटी । देखतां सुख वोसंडे सृष्टीं ।
धन्य देखत्याची दृष्टी । ते जाणे हातवटी हनुमंत ॥ १२० ॥
देखोनि गंडस्थळांची प्रभा । लाजा सूर्य लोपला उभा ।
तेथें उदय अस्तांची वालभा । उदय स्वयंभ गंडस्थळी ॥ १२१ ॥
श्रवणीं कुंडले मकराकार । हा लौकिक बाह्यविचार ।
तीं आकारीं शुद्ध निर्विकार । श्रवणें विकार निर्दाळिती ॥ १२२ ॥
नवल शोभा त्या श्रवणासीं । नित्य मिळणी निजात्मअंशी ।
श्रवणें देखणें देखण्यासी । अंशाअंशीं समरसे ॥ १२३ ॥
निःशेष निरसोनि नास्तिक । अवक्र जें कां आस्तिक ।
निरपेक्ष शुद्ध चोख । तेंचि नासिक राममुखीं ॥ १२४ ॥
अल्प अपेक्षा धरितां देख । साधन तितुकें निर्नासिक ।
नकटा झाला तो साधक । राम सन्मुख भेटेना ॥ १२५ ॥
चळता जितुका वायु जाण । तो श्रीरामाचा मुख्य प्राण ।
श्रीरामाच्या प्राणें जाण । जगाचा प्राण जीतसे ॥ १२६ ॥
श्रीरामाचा निजप्राण । तेणें वसंता समाधान ।
सुवासासी निजजीवन । विश्वजीवन श्रीराम ॥ १२७ ॥
चैतन्याचें देखणेपण । श्रीरामनेत्रां आलें शरण ।
सबाह्य देखणें होवोनि पूर्ण । आपण आपणा देखत ॥ १२८ ॥
देखतां श्रीरामाची दृष्टी । अक्षयानंदे जीव उठी ।
दृश्य द्रष्टा न दिसे त्रिपुटी । हेलावे सृष्टी निजानंदें ॥ १२९ ॥
दीपामागे पडसाई । तैसी डोळ्यामागें भिंवई ।
व्यंकटी सांडोनियां पाहीं । श्रीरामदेहीं निवटल्या ॥ १३० ॥
श्रीरामाची भ्रुकुटी । रची ब्रह्मांडाच्या कोटी ।
भ्रूविक्षेप केलिया काळ घोंटी । छेदी गांठी चौदेहां ॥ १३१ ॥
जैसें अधिष्ठान निर्मळ । तैसें श्रीरामाचें विशाळ भाळ ।
सच्चिदानंदपद केवळ । त्रिवळी प्रबळ ललाटी ॥ १३२ ॥
उगाळोनि अहं कठिण । सोहं काढिलें शुद्ध चंदन ।
तेंही केलें रामार्पण । गंधार्चन रामभाळीं ॥ १३३ ॥
प्रेमकुशरसमेळा । टिळक रेखिला पिवळा ।
अनुरागद अक्षतारंग बहळा । श्रीरामनिढळा शोभत ॥ १३४ ॥
मुकुटवर्धनां मुकुटमणी । राम शिरोरत्‍न राजस्थानीं ।
श्रीरामाचा मुकुट वर्णी । ऐसा त्रिमुवनीं कोणी असेना ॥ १३५ ॥
श्रीराममस्तकावरते । कांही रितें उरले असतें ।
तरी मुकुट वानावया पुरते । अवकाश वाचेतें पै होता ॥ १३६ ॥
श्रीरामाचें स्वरूपवर्णन । करितां चौ वाचां पडिलें मौन ।
वेद परतले नेति म्हणोन । तेथें मशक मी कोण वर्णावया ॥ १३७ ॥
ऐसा साकार तोचि निराकार । निराकार तोचि साकार ।
रूपासी आला रघुवीर । भासे चराचर निजतेजें ॥ १३८ ॥
त्या रामाच्या स्वरूपीं देख । तद्‌रूपचि अलोलिक ।
चिद्‌रत्‍नमंडित विराजे सुरेख । श्रीरामअंका आरूढोनि ॥ १३९ ॥
जैसी नाथिलीचि व्योमा । भिन्न भासे नीळिमा ।
तेंवी रामांकी विराजे रमा । नहोनि श्रीरामावेगळी ॥ १४० ॥
जेंवी स्वाद आणि साकर । दृति आणि कापूर ।
रस आणि जैसे नीर । सीता सुंदर तेवी रामीं ॥ १४१ ॥
जेंवी कनक आणि कांती । की प्रभा आणि ज्योति ।
भानु आणि दीप्ती । सीता सती तेंवी रामीं ॥ १४२ ॥
राम आत्मा हे आत्यज्योति । राम चैतन्य हे चिच्छक्ती ।
राम पर हे प्रकृती । अभिन्नस्थिती पै दोघें ॥ १४३ ॥
राम सष्टा हे सृष्टिस्थिती । राम कर्ता हे कार्यवृत्ती ।
राम वक्ता हे वचनोक्ती । अर्थप्राप्तिसमवेत ॥ १४४ ॥
ऐसें विचारिता तत्वतां । विचार ठाके पै मागुता ।
परा वैखरीसीं वर्णितां । श्रीरामीं सर्वथा बुडाला ॥ १४५ ॥
सीता आणि रघुनंदन । स्वरूप एक नामें भिन्न ।
तैसाचि बंधु लक्ष्मण । तदात्मक पूर्ण श्रीरामें ॥ १४६ ॥
जैसा अभिषेक रामासी । राज्योपचार आनंदेंसी ।
तैसाचि केला सौमित्रासी । व्रतविसर्जनेंसीं आल्हादें ॥ १४७ ॥
श्रीरामाचें धनुष्यबाण । स्वयें घेवोनि आपण ।
पाठीसी उभा लक्ष्मण । सन्नद्ध जाण सर्वदा ॥ १४८ ॥
कनकदंड छत्रचामर । सहित जानकी सुंदर ।
भद्रीं विराजित रघुवीर । जोडोनि कर सन्मुख ॥ १४९ ॥
राज्याभिषेकीं अति मंडित । भद्रीं देखोनि रघुनाथ ।
आनंदभरित पै समस्त । त्रैलोक्यांत उत्साहो ॥ १५० ॥

ऋषिसंधैस्तदाकाशे देवैश्व समरुद्‌गणैः ।
स्तूयमानस्य रामस्य शुश्रुवे मधुरध्वनिः ॥ १ ॥
प्रजगुर्देवगंधर्वा ननृतुश्चाप्सरोगणाः ।
अभिषेकं तदर्हस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ॥ २ ॥

रामराज्याभिषेकामुळे आनंदित होऊन
गंधर्वांचे गायन व स्वर्गातील अप्सरांचे नृत्य :

वेदोक्त मंत्रघोषण । ऋषीश्वरीं मांडिलें स्तवन ।
श्रीरामराज्य सुखैकघन । करिती गर्जन जयशब्दीं ॥ १५१ ॥
स्वर्गी आनंदले सुरगण । मिळोनियां सहित मरुद्‌गण ।
सुरदुंदुभि त्राहाटिल्या पूर्ण । पुष्पवृष्टि जाण तिहीं केली ॥ १५२ ॥
गंधर्व मिळोनि समग्र । मृदु मंजुळ मधुर स्वर ।
गायन मांडिले परिकर । श्रीरधुवीरनिजराज्यें ॥ १५३ ॥
रंभा मेनका तिलोत्तमा जाण । उर्वशीसहित अप्सरागण ।
श्रीरामराज्ये आनंदमग्न । येवोनि नर्तन मांडिलें ॥ १५४ ॥
श्रीरामाचें अभिषिंचन । पहावया अति प्रीतीकरून ।
मंडळपति राजे जाण । आले त्वरेनें समकाळें ॥ १५५ ॥
नानाविध उपासन । आणोनि पूजिला रघुनंदन ।
घालोनियां लोटांगण । श्रीरामचरण वंदिले ॥ १५६ ॥
विजयकार जयजयकार । ऋषिवरांचे मंत्रस्वर ।
वैष्णवांचा नामोच्चार । झणत्कार दुंदभींचा ॥ १५७ ॥
वानरांचा भुभुःकार । गंधर्वांचा उच्च स्वर ।
अप्सरांचा आलापस्वर । नादें अंबर कोंदलें ॥ १५८ ॥
नभ झालें सुखैकघन । दिशा दुमदुमती संपूर्ण ।
नादें कोंदलें त्रिभुवन । सुख संपूर्ण सर्वांसी ॥ १५९ ॥
शून्यत्व सांडोनि गगन । झालें चिदानंदैकघन ।
परमामृताचे रजःकण । वृष्टी रधुनंदननिजसुखें ॥ १६० ॥
श्रीरामाच्या राज्यसुखें । आकाश वोळले चिदाकाशें ।
वसवूनि सकळांची मानसें । अलिप्त सर्वांसी सर्वदा ॥ १६१ ॥
घटकाश मठाकाश । प्राणिमात्राचें हृदयावकाश ।
वसवूनि सर्वत्र उदास । अलिप्त आकाश श्रीरामें ॥ १६२ ॥
श्रीरामीं सुखावला पवन । सर्वांतरीं प्रवेशोनि पूर्ण ।
प्राणवृत्ती करी चळण । आसक्त नव्हे जाण सर्वथा ॥ १६३ ॥

प्राणी परस्परांतील वैरभाव विसरले :

परस्परें प्राणिमात्र । जीवघातें करिती वैर ।
चाळोनि तयांचे अंतर । प्राणी निर्वैर सर्वदा ॥ १६४ ॥
गाईव्याघ्रां सदा वैर । गजसिंहा वैराकार ।
नकुळसर्पांसी खडतर । स्वाभाविक वैर सर्वदा ॥ १६५ ॥
मूषकबिडाळांसी वैर । श्येनबकांसीं वैराकार ।
ऐसे सांगतां अपार । सर्वत्र वैर प्राणिमात्रां ॥ १६६ ॥
जीवशिवांचा आहार । येणें सकळां बद्धवैर ।
तितुकीं चाळोनि सर्वत्र । प्राणी निवैर सर्वदा ॥ १६७ ॥
श्रीरामराज्यें वायूसी । निवैरता आली त्यासी ।
मंद शीतळ सुखस्पर्शाशी । बाह्य जगासी निववित ॥ १६८ ॥
श्रीरामराज्यतेजासीं । निर्विकारता बाणली कैसी ।
सांडोनि अहंममतेसी । स्वप्रकाशीं देदीष्य ॥ १६९ ॥
स्नेहसूत्रअधिष्ठान । गृहीं प्रयासें मेळवोन ।
जेणें दीप उजळिला आपण । अमर्याद जाण प्रकाश त्यासी ॥ १७० ॥
हे प्रयास कांही न करितां । चोर सुखें चोरी करितां ।
त्यासीही प्रकाश आइता । स्वभावता निजतेजें ॥ १७१ ॥
स्वामी यत्‍न करी निजवित्ता । चोर सिंतरोनि स्वयें नेता ।
दीपरूपें साक्षी पाहतो । न म्हणे तत्वतां माझें तुझें ॥ १७२ ॥
आणिक श्रीरामराज्यासीं । तेजासीं कळा बाणली कैसी ।
जे जे भेटों येती त्यासीं । करी आपणाऐसीं तत्काळ ॥ १७३ ॥
सव्य येवोनि भेटे चंदन । अपसव्यें घुरे आपण ।
दोहींचा वास निरसोनि पूर्ण । देदीध्यमान करी अग्नि ॥ १७४ ॥
श्रीरामराज्यें जीवन । स्वयें झालें सुखैकघन ।
सर्वां भूतीं रघुनंदन । निजभजन करितसे ॥ १७५ ॥
भूतां परस्परें वैर । वैर स्वभावतां निरंतर ।
असतां आपण निवैर । जीवन करी सर्वांतें ॥ १७६ ॥
श्रीरामराज्येकरोनि जाणा । अति संतोष झाला जीवना ।
विसरोनि अधोगमना । सुखस्वादना जग निववी ॥ १७७ ॥

भूमि: सत्यवती चैव फलवंतश्व पादपाः ।
गंधवंति व माल्यानि बुभूवु राघवोत्सवे ॥ ३ ॥

धरणीमाता प्रमुदित झाली :

श्रीरामाचें अभिषिंचन । देखतां धरा सुखैकघन ।
ऐका त्याचेंही लक्षण । निजलक्षण धरेचें ॥ १७८ ॥
येथोनि हे भोय माझी । तेथोनि ते मर्यादा तुझी ।
सीमाभेदें जुंझती जुंझी । निजपैजीं दिव्य करिती ॥ १७९ ॥
दिव्य उतरोनि सुखी होती । एक असत्य ते दिव्य धरिती ।
तितुकें करोनि अभेदस्थिती । धरा वर्तती अखंडर्त्वे ॥ १८० ॥
विषमत्व सांडोनि चित्ता । संपादी दोहींच्या अर्था ।
माझी माझी म्हणतां भूतां । न मोडे अखंडता धरेची ॥ १८१ ॥
हें श्रीरामराज्याचें सुख । धरेसी बाणलें आत्यंतिक ।
वनस्पती वोहल्या देख । अलोलिक रसभारें ॥ १८२ ॥
सुवासित पुष्पीं सुपक्व फळीं । वृक्ष लगडले तत्काळीं ।
जीवमात्री सुख सकळीं । रसकछोळीं वोळली मही ॥ १८३ ॥
श्रीरामराज्य ऐसे देख । सकळ सुख अलोलिक ।
भाट गर्जती असंख्य । रघुनायक निजराजा ॥ १८४ ॥
मंत्रस्वर जयजयकार । वानरांचा भुभुःकार ।
माजी नामाचा उच्चार । श्रीरघुवीर निजविजयी ॥ १८५ ॥
नामें प्रायश्चित्ता धाक । यमलोक ओस निःशेख ।
श्रीरामराज्येंकरोनि देख । यमप्रमुख कांपती चळीं ॥ १८६ ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामाचें अभिषिंचन ।
आणि स्वरूपाचें वर्णन । आपलें आपण संपविलें ॥ १८७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामस्वरूपवर्णनं नाम चतुरशीतितमोऽध्याय : ॥ ८४ ॥
॥ ओंव्या ॥ १८७ ॥ श्लोक ॥ ३ ॥ ॥एवं ॥ १९० ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौर्‍याऐंशींवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *