भावार्थरामायण अध्याय

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा

अहिरावण – महिरावण यांचा संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पर्वस्थानी पर्वत ठेवून हनुमंताचे आगमन :

स्वस्थानीं ठेवोनि पर्वत । विजयी झाला कपिनाथ ।
श्रीराम आनंदें डुल्लत । हरिखें नाचत कपिसैन्य ॥ १ ॥
शरणागत बिभीषण । राजा सुग्रीव आपण ।
सौ‍मित्रातें जीवदान । हनुमंतें जाण दीधलें ॥ २ ॥

वानरसैन्याची रामांना रावणावर चालून जाण्याची विनंती :

काळें तोंड लंकानाथा । ब्रह्मशक्ति झाली वृथा ।
पळोनि गेला न झुंजतां । तोंड मागुता न दाखवी ॥ ३ ॥
जरी येता झुंजासीं । क्षणें मारितो रावणासी ।
वानर उडती आवेशीं । लंकेशासी मारावया ॥ ४ ॥
आज्ञा पुसती रामासी । वेगें निरोपे दे आम्हांसी ।
अद्यापि याची भीड कायसी । लंकेशाशी मारावया ॥ ५ ॥
पांडू त्रिकूटाचे कडे । उचटूं दुर्गीचे धोंडे ।
नगर विध्वंसू रोकडें । श्रीरामापुढें बोलत ॥ ६ ॥
तुवां कां धरिलें मौन । कां न देसी आज्ञापन ।
वानर करिती उड्डाण । लंकाकंदन करावया ॥ ७ ॥

पराभूतावर शस्त्र न चालविण्याचा श्रीरामांचा संदेश :

ऐकोनि वानरांचें वचन । बोलता झाला रघुनंदन ।
रावण पळाला पाठ देऊन । पळल्या आपण नये मारुं ॥ ८ ॥
क्षात्रधर्म ऐसा आहे । जो संमुख रणी उभा राहे ।
उशिण्याधायीं युद्ध बा हें । शास्त्रीं पाहें बोलिलें ॥ ९ ॥
संमुख रावण न येतां । केवी मारुं लंकानाथा ।
लंका दिधली शरणागता । ते विध्वंसितां महादोष ॥ १० ॥
ऐसें बोलोनि रघुनाथ । केले वानर स्वस्थ ।
येरीकडे लंकानाथ । झाला सचिंत निजगृहीं ॥ ११ ॥

रावणाचे नवीन उपायाचे चिंतन :

सैन्य निमालें समस्त । प्रधानादि प्रहस्त ।
कुंभकर्णा केला घात । उभा बाणीं त्वरित फोडिला ॥ १२ ॥
खातां न पुरे त्रिभुवन । काळाचा घांस करी आपण ।
तो मारिला जाण । विंधोन बाण कुंभकर्ण ॥ १३ ॥
सुरवरां ज्याचा धाक । ज्यासी कांपती ब्रह्मादिक ।
चौदा वेळ सुरनायक । आणिला देख बांधोनी ॥ १४ ॥
जाणे शस्त्रास्त्र संपूर्ण । मंत्र तंत्र क्रियाविधान ।
अभिचाराचें जन्मस्थान । वीर दारुण इंद्रजित ॥ १५ ॥
ब्रह्मादिकां न कळे वहिला । ऐसा प्रयत्‍न दोनी वेळ केला ।
तो शरबंध वृथा गेला । वायां गेला खटाटोप ॥ १६ ॥
होम करोनि दारुण । केला शंकर प्रसन्न ।
अश्वसहित सशस्त्र स्यंदन । काढिला आपण अग्नीमाजी ॥ १७ ॥
भोंवतीं आवरणें अत्युग्र । तीं निवटोनियां समग्र ।
होम विध्वंसिती वानर । केला घाबरा इंद्रजित ॥ १८ ॥
अत्युग्र मंत्रावरण । नभीं गुप्त शस्त्रावरण ।
भूतगणांचें आवरण । अति दारुण सभोंवतें ॥ १९ ॥
शाकिनी डाकिनी महाशक्ती । कात्यायनी सैन्यासहिती ।
चामुंडा होम राखिती । अहोरातीं निजबळें ॥ २० ॥
भैरवक्षण दारुण । अति दारुण वेताळ जाण ।
झोटिंगांचे आवरण । सावधान राखत ॥ २१ ॥
ऐसा अतिबळें बळवंत । अति निगुतीं होम करित ।
अग्निकुंडीं रथ प्राप्त । होतां त्वरित धाडी आली ॥ २२ ॥
अदट वीर हनुमंत । कळिकाळा दृष्टीं नाणित ।
रामनामें सदा गर्जत । अवचित तेथ पावला ॥ २३ ॥
नामें मंत्राची क्षीण शक्ती । नामें शस्त्रांची उपहती ।
नामें आकळिल्या शक्ती । भूतें होती शरणागत ॥ २४ ॥
भूतें शक्ति वेताळ । हनुमंतासीं प्रसन्न सकळ ।
करोनियां रणकल्लोळ । होमज्वाळ विध्वंसिला ॥ २५ ॥
त्यासीं करुठा बिभीषण । चितावोन कपिनंदन ।
सवें आणिला लक्ष्मण । इंद्रजित आपण मारविला ॥ २६ ॥
पवनीं दहनीं गगनीं । अवनीं आणि जीवनीं ।
जेथ जेथ जाय पळोंनी । कपि धांवोनी पावे तेथ ॥ २७ ॥
पळून जातां मेघपृष्ठा आड । तंव तेथ पावे माकड ।
करोनियां खंडविखंड । रणीं प्रचंड पाडिला ॥ २८ ॥
सौ‍मित्रा लागली शक्ती । तरी न वचे विकळ गती ।
शिर कापोनी हातोहातीं । श्रीरामाप्रती पाठविलें ॥ २९ ॥
शक्तिविकळ लक्ष्मण । तेथें लवलाहें सुषेण ।
सांठा ओषधींचा काढोन । सुमित्रानंदन उठविला ॥ ३० ॥
एकेक वीर बळवंत । रणयोद्धे रणोन्मत्त ।
वानरदळ अत्यद्‍भुत । संग्रामांत नागविती ॥ ३१ ॥
रामसौ‍मित्र दोघे वीर । अतुळ बळाचे जुंझार ।
दमूं शकती काळचक्र । सुरासुरा कांपती ॥ ३२ ॥
तेथे माझी कोण शक्ती । अनावर हा रघुपती ।
अत्यद्‍भुत ब्रह्मशक्ती । नेली भस्मांतीं सौ‍मित्रें ॥ ३३ ॥
खड्ग लागे हृदयावरी । सौ‍मित्र पडिला धरेवरी ।
दिव्यौषधी कपिकेसरीं । आणोनि झडकरीं उठविला ॥ ३४ ॥
पर्वत नेतां स्वस्थाना । उठली राक्षससेना ।
तितुकी मारितां कपिनंदना । अर्ध क्षण न लागेचि ॥ ३५ ॥
हातीं असतां डोंगर । जुंझों आले राक्षसभार ।
पुच्छें निवटिले समग्र । क्षणमात्र न लागतां ॥ ३६ ॥
पुच्छाचिये संवसाटीं । मारिल्या राक्षसकोटी ।
दुजा वीर नाहीं सृष्टीं । बळ मर्कटीं अनिवार ॥ ३७ ॥
रणीं नाटोपे सहसा । सांडिला संग्रामाचा धिंवसा ।
माझा प्राण वांचेल कैसा । चिंता लंकेशा अनिवार ॥ ३८ ॥
चिंतेचा अग्नि दुर्धर । रावणा लागला अनिवार ।
नाठवती भोगोपचार । दशशिरा तळमळी ॥ ३९ ॥
भय सुटलें दुर्धर । विसरला कर्मतंत्र ।
कर्माकर्मी रघुवीर । सत्य साचार लागला ॥ ४० ॥

श्रीरामांच्या भीतीने रावणास सर्वत्र रामरुप भासू लागले :

बैसों जातां आसनी । राम प्रकटे सुखासनीं ।
उठूं जातां तत्क्षणीं । सायुध नयनीं देखिजे ॥ ४१ ॥
अभ्यंग मार्जन करितां । स्नेहीं देखे रघुनाथा ।
खुंटली स्नेहाची वार्ता । श्रीरघुनाथाचेनि भेणें ॥ ४२ ॥
रामभय लागलें जीवीं । स्नेह तुटला सर्वभावीं ।
स्नान मार्जन भोगपदवीं । राम भावी सर्वत्र ॥ ४३ ॥
बोणें वोगरिलें भोगना । षड्रस अन्न ताटीं जाणा ।
घांस घेतां रावणा । रघुनंदना देखिलें ॥ ४४ ॥
ताट भोक्तां परवडी देख । अवघा झाला रघुकुळटिळक ।
वेडावला दशमुख । रघुनायक ग्रासीं दिसे ॥ ४५ ॥
ग्रास घ्यावया पुरता । अवकाश नाहीं रिता ।
नभ मिनलें रघुनाथा । चिदाभासता कोंदली ॥ ४६ ॥
हातवणी आणिलें कलशीं । तेथें देखे राघवासी ।
हाडपी देतां विडियांसी । रघुनाथासी देखिलें ॥ ४७ ॥
नापित दावी दर्पण । भीतरीं दिसे रघुनंदन ।
माझेंचि रुप झालें आन । रावणपण न दिसे ॥ ४८ ॥
न पडतां पळो जाय । भूमिका तेही राम होय ।
सर्वथा न चालती पाय । गमन पाहें खुंटलें ॥ ४९ ॥
धाकें आला निद्रास्थाना । तेथें देख रघुनंदना ।
भयें विस्मित झाला मना । दशानना अति चिंता ॥ ५० ॥
जवळी देखतां मंदोदरी । राम म्हणोनि हाका मारी ।
येरी हांसली झडकरी । दशशिरीं आकांत ॥ ५१ ॥
घरें खांब उथाळें भिंती । अवघीं रामरुप भासती ।
रावण झालासे चकित चित्तीं । मूर्च्छागतीं पडियेला ॥ ५२ ॥

आसने शयने तिष्ठन्भुंजानः पर्यटन्महीम ।
चिंतयानो हषीकेशमपश्यत्तन्मयं जगत् ॥१॥

उठवें बैसणें निजणें । खाणें जेवणें अवघ्राणें ।
देखणें ऐकणें स्पर्शणें । सकळ देखणें श्रीराम ॥ ५३ ॥
वाचेची वचनोक्ती । इंद्रियांची क्रियाशक्ती ।
प्राणांची प्राणशक्ती । राम निश्चितीं होवोनि ठेला ॥ ५४ ॥
अहंकाराची अहंकृती । अंतःकरणाची आवरणशक्ती ।
सर्वभावें लंकापती । स्वयें रघुपती व्यापिला ॥ ५५ ॥
जवळी येवोनि मंदोदरी । सावध करी दशशिरी ।
भ्रांत झालासी कां शरीरीं । धीर निर्धारीं सांडिला ॥ ५६ ॥
दृष्टीं देखतां स्त्रीलिंग । योगिया होय योगभंग ।
तापसाचा तपोभंग । होय सांग स्त्रीवाक्यें ॥ ५७ ॥
व्रतधारियाचा व्रतभंग । याज्ञिकाचा निजयाग ।
स्त्रीवाक्यें गेला सांग । होय व्यंग स्त्रीवाक्यें ॥ ५८ ॥
कर्मठासीं कर्मभ्रम । धर्मिष्ठासीं क्षण धर्म ।
नेमिष्ठाचा भ्रमे नेम । करी भस्म स्त्रीवाक्य ॥ ५९ ॥
उपासकाची उपासना । ध्यानस्थाचें ध्यान जाणा ।
ज्ञानियाच्या निजज्ञाना । करी उगाणा स्त्रीवाक्य ॥ ६० ॥
ऐकतां स्त्रीवाक्यासी । शुक नागवला तपसी ।
चढला अभिमान मानसीं । हरिहरांसी गणेना ॥ ६१ ॥
शिव देखतां मोहिनी । ध्यान विसर्जिलें तत्क्षणीं ।
लंगोटीची दाणादाणी । शंकर मनीं वेडावला ॥ ६२ ॥
तेथें रावण बापुडें किती । क्षणें आणिला देहस्थिती ।
हडबडीत निजचित्तीं । लंकापति उठिला ॥ ६३ ॥
काय करुं मी निश्चितीं । कैसे माझे प्राण वांचती ।
सर्व कर्मीं रघुपती । लागला निश्चितीं मारावया ॥ ६४ ॥
काय विचारों मी मंत्र । तळमळी दशशिर ।
तंव आठवला विचार । हरिख थोर वाटला ॥ ६५ ॥
दूत धाडूं पाताळासी । महिकावती नगरीसीं ।
समाचार वेगेंसीं । अहिरावणासी जाणवूं ॥ ६६ ॥
अहिरावण महिरावण । सख्खे बंधु दोघे जण ।
रणयोद्धे अति दारुण । राकलक्ष्मण मारतील ॥ ६७ ॥
निश्चिय मानोनि चित्ती । हरिखला लंकापती ।
मारावया रघुपती । दूत निश्चितीं पाठवूं ॥ ६८ ॥
जीविताशा बलीयसी । दूत धाडी पाताळासीं ।
समाचार अहिरावणासी । महिरावणासी सांगत ॥ ६९ ॥

विचारांती रावण पाताळात अहिरावणाकडे दूत पाठवितो :

दूताप्रती रावण । सांगता झाला मधुरवचन ।
येथील वृत्तांत आपण । यथार्थ जाण सांगावा ॥ ७० ॥
युद्ध झालें श्रीरामासीं । रामें मारिलें सैन्यासी ।
प्रधानादि प्रहस्तांसी । राक्षसांसी मारिलें ॥ ७१ ॥
इंद्रजित आणि अखया कुमर । पुत्र मारिले समग्र ।
उरला असे रावण मात्र । त्यासीहि सत्वर मारिती ॥ ७२ ॥
म्हणवोनि तुम्हांपासी । मज धाडिलें वेगेंसीं ।
सांगविलें युद्धकथेसी । आतां जाणसी ते करीं ॥ ७३ ॥
म्हणवोनि आज्ञापिला दूत । गेला पाताळा त्वरित ।
समाचार समस्त रावणोक्त सांगितला ॥ ७४ ॥
अहिरावण आदरेंसीं । पुसता झाला दूतासी ।
युद्ध रामरावणांसीं । कोण हेतूसीं लागलें ॥ ७५ ॥
हा साद्यंत समाचार । मज सांग सविस्तर ।
मारितां रामसौ‍मित्र । निमेषमात्र मज नलगे ॥ ७६ ॥

दूत अहिरावणाला प्रथमपासून वृत्तांत सांगतात :

ऐकोनि अहिरावणमात । दूत आदरें सांगत ।
जनकराजा अत्यद्‍भुत । विदेहस्थ मिथुलेसीं ॥ ७७ ॥
जानकी त्याचें कन्यरत्‍न । लावण्यगुणनिधान ।
तिचें स्वयंवर आपण । जनकें जाण मांडिलें ॥ ७८ ॥
मूळें पाठविलीं सकळ । देशोदेशीचे भूपाळ ।
नगरीं मिनले सकळ । जनकबाळ साधावया ॥ ७९ ॥
यक्षगण गंधर्व । सिद्ध मिनले जी सर्व ।
पाहों आले स्वर्गीचे देव । विमानीं धांव घेवोनी ॥ ८० ॥
रावणही तेथें गेला । राक्षसगणीं परिवारिला ।
जानकी देखोनि वहिला । होवोनि ठेला मूर्च्छित ॥ ८१ ॥
तेथें आली ऋषिमंडळी । विश्वामित्रादि सकळी ।
राम सौ‍मित्र त्यांजवळी । शिष्यमेळीं बैसले ॥ ८२ ॥
जनकाचा दुर्धर पण । भार्गवदत्त चाप गहन ।
जो चढवील तयासीं गुण । जानकीं जाण तया वरी ॥ ८३ ॥
चाप दृष्टीं पाहतां । वीर मूर्च्छित तत्वतां ।
राजे चकित झाले चित्ता । जनकदुहिता लाभेना ॥ ८४ ॥
राजीं सांडिलें सामर्थ । देखोनियां जनक बोलत ।
निर्वीर उर्वीं समस्त । वीर निश्चित असेना ॥ ८५ ॥
जनकाचें वचन दारुण । ऐकोनि क्षोभला रावण ।
चापीं चढवावया गुण । स्वयें आपण सरसावला ॥ ८६ ॥
तंव विपरीत झालें तेथें । माथा राहिला भूमीतें ।
तळ धरिला हातें । गर्वोन्मत्तें रावणें ॥ ८७ ॥
गर्वाचिया उद्धतीं । सज्ज करितां चापाप्रती ।
झाली गर्वाची उपहती । गुण निश्चितीं चढेना ॥ ८८ ॥
फिरवितां त्या धनुष्यासी । घोळसिलें रावणासी ।
चंद्री लागली नेत्रांसी । तोंडा खरसी पैं आलीं ॥ ८९ ॥
उरावरी पडलें धनु । खुडुपे हातपाय रावणु ।
जनक आला जी धांवोनु । धनुष्य काढोन उठविला ॥ ९० ॥
बहुत अपमानला चित्तीं । पाहों लागला निश्चितीं ।
कोण चढवील गुण सीतीं । सभेप्रती धनुर्वाडा ॥ ९१ ॥
तंव उठिला रघुवीर । बाळ निमासुर सुंदर ।
ठाणमाण मनोहर । पीतांबर कांसेसी ॥ ९२ ॥
मदनमोहन सांवळा । टिळक रेखिला पिंवळा ।
कंठीं वैजयंती माळा । मुकुट बाणला रत्‍नांकित ॥ ९३ ॥
सज्ज धनुष्य तूणीर । पाठीसीं बंधु सौ‍मित्र ।
रंगामाजी रघुवीर । रावणें समोर देखिला ॥ ९४ ॥
बाळ दिसतसे धाकुला । माथ्याचा जार नाहीं वाळला ।
मरणा धरणें कां बैसला । शिकविल्या नायके ॥ ९५ ॥
ऐकोनि रावणवचन । श्रीराम झाला हास्यवदन ।
घेवोनि गुरुचें आज्ञापन । धनुष्या जाण उचलिलें ॥ ९६ ॥
धनुष्या चढवोनियां गुण । वोढी काढितां रघुनंदन ।
मध्यें कडाडिलें जाण । गेलें मोडून तीं ठायीं ॥ ९७ ॥
सबळ देखोनि रघुनाथा । लाज लागली लंकानाथा ।
सर्वथा नुधवीच माथा । निघे मागुता अधोवदन ॥ ९८ ॥
श्रीरामें पर्णिली सीता । तैंपासून लंकानाथा ।
लागली अनिवार अवस्था । म्हणे जनकदुहिता केंवी साधे ॥ ९९ ॥
पितृवचनें रघुनाथ । वना निघाला त्वरित ।
सीतासौ‍मित्रांसमवेत । वनें हिंडत दुर्गम ॥ १०० ॥
पुढें जनस्थाना पातले । खरदूषणांसी युद्ध झालें ।
त्रिशिरादि राक्षस मर्दिले । रामें निवटिले बाणाधारां ॥ १ ॥
चवदा सहस्र रक्षोगण । त्रिशिरादि खर दूषण ।
रामें विंधोनियां बाण । मारिले क्षण न लागतां ॥ २ ॥
शूर्पणखा नकटी केली । ती बोंब घेवोनि वहिली ।
रावणसभे सांगों आली । रामें गांजिली म्हणोनी ॥ ३ ॥
नकटें नाक घेवोनि पुढें । रावणा सांगे वाडेंकोडें ।
जानकीचें रुप गाढें । निजनिवाडें वानित ॥ ४ ॥
बंधू मारिल्याचें दुःख । अणुमात्र नाहीं देख ।
स्वयें झाली निर्नासिक । तरीही हरिख सीतेचा ॥ ५ ॥
शिकवोनियां नानायुक्ती । प्रबोधिला लंकापती ।
सीताहरणासीं युक्ती । केली निश्चितीं ते ऐका ॥ ६ ॥
मृगवेष मारीचासी । देखोनि धाडी रामापासीं ।
सीता देखोनि वेगेंसी । मागे कुंचकीसीं मृगत्वचा ॥ ७ ॥
श्रीराम निघाला बाहेरी । मृगें काढोनि नेला दुरी ।
सौ‍मित्रासी सीता सुंदरी । धाडी झडकरी रामामागें ॥ ८ ॥
गुंफेसीं एकली सीता । जाणोनियां तत्वतां ।
भिक्षुकवेषे रावण सीता । हरावया सर्वथा तेथें आला ॥ ९ ॥
नकटीच्या बोला भुलला । राज्यपदातें विसरला ।
रंक भिकारी झाला । नकटीनें केला उपकार ॥ ११० ॥
मज भिक्षा दे वो माते । म्हणोनि मागे जानकीतें ।
येरीं पूजिला अतिथ्यें । निजचित्तें कृपाळु ॥ ११ ॥
ते भगवद्‍बुद्धीं पुजित । हा कपटें हात घालित ।
उचलोनि खांदी घेत । येरी स्मरत श्रीरामनाम ॥ १२ ॥
आक्रंदतां सीता सुंदरी । रावणें आणोनि झडकरी ।
अशोकवनिकेमाझारीं । ठेविली निर्धारीं दुःखित ॥ १३ ॥
त्या दिवसापासून जाण । विघ्नें उठलीं दारुण ।
शोकाकुलित रावण । केलें कंदन लंकेचें ॥ १४ ॥
सीताशुद्धिसीं वानर । आला जैसा पर्वताकार ।
नगर विध्वंसिलें समग्र । घरोघरें जाळिलीं ॥ १५ ॥
चौदा सहस्र बनकर । ऐशीं सहस्र किंकर ।
जंबुमाळी प्रधानपुत्र । अखयाकुमार मारिला ॥ १६ ॥
इंद्रजितासीं करोनि रण । धुळी मेळविला जाण ।
सभेमध्यें येवोनि आपण । राजा रावण गांजिला ॥ १७ ॥
आगी लावितां पुच्छासीं । जाळिलें दाढ्या मिशांसी ।
सवेंचि उडोनि वेगेंसी । माड्या गोपुरांसी जाळिलें ॥ १८ ॥
परतोनि गेला वानर । घेवोनि आला रघुवीर ।
शिळीं बुजोनि सागर । दुर्ग चौफेर वेढिले ॥ १९ ॥
बिभीषण शिकवी रावणा । न मानोनि त्याच्या वचना ।
लाता हाणिल्या जाणा । तो गेला शरण श्रीरामा ॥ १२० ॥
पहिलें करितां रणकंदनं । असंख्य सैन्य मारिलें जाण ।
कळवळोनि रघुनंदन । शिष्टाई आपण मांडिली ॥ २१ ॥
ते न मानीच रावण । दूतें निर्भार्त्सिला आपण ।
मारूं धांवे दशानन । येरु गगनीं उसळा ॥ २२ ॥
गगनीं उसळला वानर । मंडप उचलिला समग्र ।
गेला श्रीरामासमोर । बळियाढा वीर अंगद ॥ २३ ॥
मग खवळला रघुवीर । सकळ वानरांचा भार ।
सैन्य मारिलें समग् । वानरवीर महाबळी ॥ २४ ॥
मारिले प्रधान समग्र । मारिले कुमरें कुमर ।
इंद्रजित जो महाजित जो महावीर । तोही सत्वर मारिला ॥ २५ ॥
कुंभकर्ण काळांतक । त्यासी मारी रघुकुळटिळक ।
शंख करी दशमुख । कांही विवेक स्फुरेना ॥ २६ ॥
समरांगणीं करितां रण । नागवेचि रघुनंदन ।
रावणें साधिलें विदान । पाठी देवोन पळाला ॥ २७ ॥
रावण् जरी न पळता । राम त्यासी जीवें मारिता ।
धर्मयुद्ध श्रीरघुनाथा । घावो पळतां न घालीच ॥ २८ ॥
शक्ति लागली लक्ष्मणा । त्यासी वांचवावया जाणा ।
करोनि हनुमंतें उड्डाणा । पर्वत् द्रोण आणिला ॥ २९ ॥
पर्वतीच्या दिव्यौषधी । घायीं पिळोनि त्रिशुद्धी ।
उठवी सुषेण सुबद्धीं । प्रखर बुद्धी वानरा ॥ १३० ॥
कांही न चलेचि मत । दाहीं मुखीं शंख करित ।
तळमळीत लंकानाथ । समाचार येथे पाठविला ॥ ३१ ॥
तुम्हीं करोनि धांवणें । रामसौ‍मित्र मारणें ।
अन्यथा मरिजे रावणें । राक्षसीं होणें देशोधडी ॥ ३२ ॥
मागुती तुम्ही येथें स्वस्थ । वांचोनि लाहा जीवें जीत ।
न जिंकितां रघुनाथ । ऐसा आकांत मांडेल ॥ ३३ ॥
म्हणवोनि तुम्ही जाण । कुढवावा रावण ।
अन्यथा होईल कंदन । राक्षसगण निमतील ॥ ३४ ॥

वृत्त ऐकून अहिरावणाचे आवेशयुक्त आश्वासन :

ऐसें सांगतां दूतासीं । अहिरावण मानसीं ।
क्षोभला अति आवेशीं । काय दूतासी बोलत ॥ ३५ ॥
आजवरी तुम्हां काय झालें । सैन्य अवघें मारविलें ।
पुत्र प्रधान जीवें गेले । कुंभकर्णाही वधियेलें बाणधारीं ॥ ३६ ॥
सकळ कुळा शांती केली । मग बोंब येथें पाठविली ।
मूर्खपणाची शीग झाली । काय बोलीं बोलावें ॥ ३७ ॥
दोघे माणूस ते किती । सवें वानरदळसंपत्ती ।
त्यासाठीं कुंथकुंथी । वीर किती मारविले ॥ ३८ ॥
आम्हां राक्षसांचे भक्ष । देखा उघड माणूस ।
वानरें कोशिंबिरीस । राक्षसास न पुरती ॥ ३९ ॥
अवघी घालितां मुखाप्रती । हाडही न लागे दांतीं ।
तिहीं मारिल्या राक्षसपंक्ती । आश्चर्य किती सांगावें ॥ १४० ॥
सकळ सैन्या केला घात । थोर शहाणा लंकानाथ ।
चिंता न करीं होई स्वस्थ । राघवांत मी करीन ॥ ४१ ॥
ऐसें बोलोनि वहिलें । दूता लंकेसी धादिलें ।
रावणातें आश्वासिलें । अहिरावणें महिरावणें ॥ ४२ ॥
सर्वथा न करीं चिंता । सुखें असावें लंकानाथा ।
रामसौ‍मित्रांच्या घाता । निश्चितार्था करुं आम्ही ॥ ४३ ॥

दुतांना परत पाठवून अहिरावण – महिरावण यांची अंबिकेची आराधना :

ऐसें गर्जोनि हरीखें । दूत बोळविला कौतुकें ।
स्वयें नवसिती अंबिके । माते आवश्यकें कृपा करीं ॥ ४४ ॥
रामसौ‍मित्र हाता । लागतांचि तत्वतां ।
दोघांचिया निजघाता । करूं सर्वथा तुजपुढें ॥ ४५ ॥
षोडशोपचारीं पूजा । करोनियां अति वोजा ।
प्राप्त व्हावा रघुराजा । प्रसाद वोजा मागती ॥ ४६ ॥
प्राप्त झालिया प्रसादासी । आम्ही न भिवों कळिकाळासी ।
सर्वथा न होऊं उदासी । द्यावें प्रसादासी झडकरी ॥ ४७ ॥
बहुतांपरी विनविती । करुणा अनिवार भाकिती ।
विचित्रा स्तुती पढती । मग प्रार्थिती ते जगदंबे ॥ ४८ ॥
जगदंबा जाणे आपण । विश्वात्मा रघुनंदन ।
त्याच्या वधालागून । इहीं प्रार्थन मांडिलें ॥ ४९ ॥
कपटी दुरात्मे राक्षस । करुन राहिले पाताळवास ।
भेटी न होतां श्रीरामास । हे कोणास नागवती ॥ १५० ॥
यांचा वध न होतां जाण । धराभार नुतरे पूर्ण ।
स्वामी कष्टेल रघुनंदन । मागुतेन मारावया ॥ ५१ ॥
श्रीरामाची दासी । साह्य होईन राघवासी ।
मारवीन या दुष्टांसी । श्रीरामासीं सुखार्थ ॥ ५२ ॥
विश्वास व्हावया राक्षसांसी । मोकली वामांगमाळेसी ।
प्रसाद येतां हातासीं । अति उल्लासी राक्षस ॥ ५३ ॥

अंबिका – प्रसाद प्राप्तीसंबंधी अहिरावण – महिरावण यांच्यामध्ये मतभेद :

महिरावण संकोचला । वामप्रसाद नव्हे भला ।
अहिरावणें निर्भर्त्सिला । प्रसादकळा तुज न कळे ॥ ५४ ॥
वामसव्यभाग पाहीं । देवा संकल्पविकल्प नये कांहीं ।
मुख्यत्वें देहचि नाही । अवयव कायी कल्पिसी ॥ ५५ ॥
नाबदेचे नारळ गोमटे । सबाह्य गोडीचे सांठे ।
त्यांसीं काढूं जाता कवठें । स्वयेंचि करंटें होइजे ॥ ५६ ॥
सुवर्णाची केली मूर्ती । नख केश अवयव निगुतीं ।
सर्वांगीं पाहता निश्चितीं । सुवर्णस्फूर्ती ढळेना ॥ ५७ ॥
गोडी सबाह्य साखरेसीं । कां घृत जेंवी घटासीं ।
थिजतां विघरतां तुपासीं । पालटीसीं अभावो ॥ ५८ ॥
तेंवी देवाची मूर्ति पाहीं । सगुण निर्गुण भेद नाहीं ।
अवयव कल्पूं नये कांही । वाम सव्य न पाहीं विभाग ॥ ५९ ॥
प्रसाद तैसाचि देख । जो आला तो आवश्यक ।
फळ देईल गा अचूक । जाण निष्टंक महीपति ॥ १६० ॥
प्रबोधोनि महिरावण । करिता जाला विवंचन ।
युक्ति सांगे महिरावण । रघुनंदन साधाव्या ॥ ६१ ॥
एका जनार्दना शरण । मात ऐकोनि अहिरावण् ।
विचार करिता झाला पूर्ण । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ १६२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अहिरावणमहिरावणसंवादो नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५१ ॥
ओंव्या ॥ १६२ ॥ श्लोक ॥ १ ॥ एवं १६३ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:satsangdhara

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *