रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा

श्रीगणेशाय नम: । येरीकडे वक्रदंत । सात्त्विकांतें पाचारित । कोपें खवळला अद्‌भुत । टाकोनि बोलत येरयेरां ॥ १ ॥
केवळ सात्त्विक तूं पैं गा । तापसियांमाजी होसी दाटुगा । न साहवे युद्धवेगा । पळोनि मागां जासील ॥ २ ॥
सात्त्विकांसी युद्ध घडे । हें तंव बोलणेंचि कुडे । केवळ सात्त्विक बापुडें । युद्धापुढें केविं राहे ॥ ३ ॥
अरे मी सात्त्विक न भेटतां । वक्रदंताची श्र्लाघ्यता । तुझी तोडीन रे वक्रता । सात्त्विकता पाहें माझी ॥ ४ ॥
सात्त्विका शरण न रिघतां साचें । तोंवरी तुम्हां सत्त्व कैंचे । लेइलेति अभिमानाचीं कवचें । लक्ष्य साचें भेदीन ॥ ५ ॥
लागतां सात्त्विकाचा घावो । परतोनि जावया नाहीं ठावो । आली वाट भुलवीन पाहा वो । महाबाहो खवळला ॥ ६ ॥
घायेंवीण घेईन प्राण । तुझी माया करील रुदन । तिचें देखो न शकसी वदन । देहबंधन छेदीन ॥ ७ ॥
वक्रदंत कोपला गाढा । वाइला रजतमाचा मेढा । ममताभालीं जी दडदडां । कोपें वेगाढा विंधित ॥ ८ ॥
बाप सात्त्विक निजगडा । बोधकवचें जाला गाढा । निजबळें चालिला पुढां । भाली तडतडां तोडित ॥ ९ ॥
लक्ष्य आतुल्या परवडी । गुणधनुष्याचें शीत तोडी । खुंटला विषमबाणाची वोढी । धनुष्य लडलडी नुसधेंचि ॥ १० ॥
धनुष्य तुटलियापाठीं । कामकोतेसीं सवेग उठी । सत्त्वें सात्त्विक जगजेठी । लक्ष्य दृष्टी साधिलें ॥ ११ ॥
काढिला कामांतक बाण । धगधगित अति दारुण । कामकोतें केले चूर्ण । बळ संपूर्ण सात्त्विकाचें ॥ १२ ॥
घेऊनि क्रोधाचा परिघ । अविचारीत टाकिला अव्यंग । शांतिबाणें विंधिला चांग । घायें परिघ उडविला ॥ १३ ॥
घेऊनि लोभाची पैं गदा । भुलवूनि करिता ह्रदयभेदा । वैराग्यबाणें विंधिला सांधा । तोडोनि गदा सांडिली ॥१४ ॥
गदा तुटलियावरी । मोहवोडण आदळे उरीं । गुप्तशस्त्र घेऊनि करीं । ह्रदयावरी हाणों आला ॥ १५ ॥
दृढ सात्त्विक- अनुसंधान । विवेकतेजें तिखट बाण । विंधोनि उडविलें वोडण । वक्रदंत मागें सारिला ॥ १६ ॥
घेऊनि वासनेचे वज्र । वेगें धाविन्नला थोर । भेदावया जिव्हार । साहंकार चालिला ॥ १७ ॥
सात्त्विकें थोर धरिला धीर । अत्यंत तेजें तिखट वीर । विंधोनि वज्र केलें चूर । घायें अंबर गर्जिन्नले ॥ १८ ॥
वज्र छेदिलें वीरनायकें । वक्रदंत चालिला रोखें । चहूं मुक्तीचीं वाघनखें । ह्रदयीं तिखें हाणों आला ॥ १९ ॥
सात्त्विक उठावला आंगें । शस्त्रसंधान सांडिलें वेगें । लाता हाणोनि घातला मागे । मोडिली रगें वाघनखे ॥ २० ॥
मग सात्विकें दिधली हांक । वक्रदंतें घेतला धाक । देहलोभाभेणें देख । अधोमुख पळाला ॥ २१ ॥
पळतां भुलला तो वाट । पडिला अभिमानाचा मुगुट । सात्त्विक झुंजार चोखट । पळत्यापाठीं न लागेचि ॥ २२ ॥
जरासंध आणि गद । दोघां चढला रणमद । क्रोधें झाले अति सक्रोध । वीर उन्नद्ध लोटले ॥ २३ ॥
मेरु मांदार झगटले । तैसे रथीं रथ तगटले । दोघे महामारीं पेटले । विरुद्धबोलें बोलती ॥ २४ ॥
सन्मुख देखोनियां गद । हांसिडला जरासंध । मजसीं भिडो न शके गोविंद । बुद्धिमंद तू कैंचा ॥ २५ ॥
विपायें कांहीं ऎसें घडे । जैं अंधारीं सूर्य बुडे । उंडणीं स्वयें भिंती चढे । तरी युद्ध न घडे तुज मजसीं ॥ २६ ॥
मशकाचेनि चरणप्रहारें । महामेरू उभाचि विरे । इंद्रासीं भिडिजें उंदिरें । तैं तुज मज सामोरेम संग्राम ॥ २७ ॥
घटामाजी सिंधु सांपडे । जांभईमाजी आकाश बुडे । वागुरेमाजी वारा अडे । तैं तुज घडे संग्राम ॥ २८ ॥
मुरकुट सगळा समुद्र शोखी । गज गिळिजे मुंगिया मुखीं । आकाश चडळें काढिजे टाकीं । तैं तुज मज घडे संग्राम ॥ २९ ॥
चित्रींचा देखोनिया सर्प । गरुडाअंगीं उठे महाकंप । तैसाच तुझा हा साटोप । कटाटोप घडे युद्धी ॥ ३० ॥
सूर्यासीं खद्योत रणांगणीं । भिडें शके झॊटधरणी । तरी तुज मजलागोनी । पडिपाड रणीं असेना ॥ ३१ ॥
नवग्रहांचें बळ घटांसी । परी न भिडवे पाषाणासीं । तेवीं तूं यादव योद्धा होसी । परी मजसीं न झुंजवे ॥ ३२ ॥
ससा चढोन सिंहाचे माथां । जरी नाचवील निजसत्ता । तरी तुज मज समता । युद्धीं सर्वथा न घडेचि ॥ ३३ ॥
वांझेचा पुत्र महारोगी । संध्याराग करूनि भुगी । कासवघृतेंसीं आरोगी । निरुजा रोगी व्हावया ॥ ३४ ॥
तैसा प्रकार आजि घडला । जे यादववीरीं दुष्काळ पडला । यालागीं गद येथें धाडिला । नावाजिला पुरुषार्थी ॥ ३५ ॥
गदू नांवाचा रे शब्दीं । तुझा संग्रह कीजे वैदीं । पोतडीं घालोनि कांखेसांदीं । दारोदारीं हिंडविती ॥ ३६ ॥
रोगियांमाजी तूं सबळ । तुज युद्धीं कैचें बळ । धर्मवाट दिधली पळ । सांडीं सळ युद्धाचें ॥ ३७ ॥
हांसूनि बोलिला वीर गदू । तुझा जरेनें सांधिला सांधू । सांधा न वैसेचि निबंधू । फाडूनि शुद्ध करूं आलों ॥ ३८ ॥
शस्त्र घालीन मी गदू । काढीन अभिमानाचा रेंदू । तोडीन जरामरणकंदू । ह्रदय शुद्ध करीन ॥ ३९ ॥
ऎकोनि खवळला मागध । झाला कवचेंसीं सन्नद्ध । किती करिशी रे अनुवाद । होई सावध चावटा ॥ ४० ॥
वोढी काढोनि सत्राणें । गद विंधिला आठ बाणें । येरू धनुर्विद्या जाणें । बाण तत्क्षणीं तोडिले ॥ ४१ ॥
गदें ओढोनियां कानाडी । धगधगित बाण सोडी । पाडिले जरासंधा झांपडी । निवारण परवडी न करवे ॥ ४२ ॥
जरेनें सांधिला जो सांधू । तो संधि पाहूनि विंधी गदू । वर्मी खोंचला जरासंधू । रणमदू उतरला ॥ ४३ ॥
बाण खोंचला अतिनिगुती । विकळ गेला दोहीं हातीं । गळोनि धनुष्य पडिलें क्षितीं । गदें ख्याती लाविली ॥ ४४ ॥
मागधासी पडिले टक । तटस्थ ठेला मुहूर्त एक । पोटीं रिघाला जी धाक । तुटलें तुक युद्धाचे ॥ ४५ ॥
जरासंध मागें पाहे । रणीं कोणी न देखे साहे । बळिभद्रं झोडिले रायें । हुबत घायें पडियेले ॥ ४६ ॥
मुळींच झाला अपशकुन । पडिले हातीचे धनुष्यबाण । सिद्ध नपवे आंगवण । रणांग्ण सांडिलें ॥ ४७ ॥
काल साह्य श्रीकृष्णास । यश आलें यादवासी । पाठी देऊनि गदासी । निघे वेगेंसी जरासंध ॥ ४८ ॥
जरासंध मोडल्यापाठीं । पळतां राजे देखती दृष्टी । तिंही सांडिल्य युद्धगोष्टी । उठाउठी पळाले ॥ ४९ ॥
यादवां यश आलें गाढें । पळतां न पाहती मागें पुढें । रथ गज सांडूनि घोडे । वीर वेगाढे पळाले ॥ ५० ॥
पळतां पडताती वेंगडी । योद्धे नव्हों आम्ही वर्‍हाडी । बळीभद्रें निजपरवडी । रणलुगडीं वोपिलीं ॥ ५१ ॥
नवरीचा वडील भावो । तेणें दिधला गौरवो । पाठी तांबड्या करूनि पाहा वो । रायें रावो बोळविले ॥ ५२ ॥
निजप्राप्तीसी विन्मुख । युद्धीं जाले पराङ्‌मुख । राजे नरवीर अनेक । पळतां दु:ख पावले ॥ ५३ ॥
अत्यंत प्रळय करितां देख । संकर्षणें दिधली हांक । पोटीं घेऊनियां धाक । एकेएक पळाले ॥ ५४ ॥
देहलोभियें बापुडीं । पायीं ममतेची वेंगडी । विस्मरणाची खरस तोंडी । जरें मुरकुंडी घालिती ॥ ५५ ॥
सांडिली पुरुषार्थलुगडीं । केवळ नागवीं उघडीं । विन्मुख पडती उबडी । मेलीं मढी होउनी ठेली ॥ ५६ ॥
चहू पुरुषार्थी नव्हे वाट । केवळ नरस्तुतीचे भाट । करिती युक्तीची वटवट । भिकें पोट भरूं आले ॥ ५७ ॥
एकें लटिकेंचि करूनि खत । धरणें करूं ऎसें बोलत । आम्हांसी विन्मुख जगन्नाथ । जीवघात करूं नका ॥ ५८ ॥
नवविध लुगडीं सांडुनि वेगीं । प्रंपचराख लाविती आंगीं । अलक्ष्य चुकोन झाले जोगी । भिकेलागीं हिंडावया ॥ ५९ ॥
एक मरणाचेनि धाकें । काखे लोभाचे चौंडके । प्रपंच गोंधळाचेनि हरिखे । उदो म्हणूनी नाचती ॥ ६० ॥
एकी धाक घेतला भारी । धनलोभें कापती टिरी । अधर्मटोले वाजती शिरीं । मुखी उचारू नकारू ॥ ६१ ॥
कामखंडेरायापुढे । एक कुतरें झालें गाढें । कोणी आलिया दारपुढें । वसवूनि ऊठती ॥ ६२ ॥
एक जाले जी कापडी । सलोभलोभें रंगलीं लुगडीं । धरूनि जीवित्वाची गोडी । तीर्थपरवडी सांगती ॥ ६३ ॥
पळतां न पळवे निश्चित । म्हणोनि बैसले ध्यानस्थ । पूजा लोकांची वांच्छित । भोगीं चित्त ठेवोनिया ॥ ६४ ॥
दांती तण तोडिती पाहीं । एक म्हणति आम्ही गाई । पशु जाहलों मनुष्यदेही । अभक्ष्य पाहीं भक्षिती ॥ ६५ ॥
केवळ देहलोभासाठी । मोक्षश्रियेसी पडिली तुटी । युद्धी पळालियापाठीं । आपदा मोठी वीरांसी ॥ ६६ ॥
यादववीर जगजेठी । न लागती पळतियापाठी । भेडें न पाहतीच दृष्टीं । उठाउठी पळालीं ॥ ६७ ॥
रणीं जिंकिले महाशूर । तुरें वाजती अपार । विजयी जाले यादववीर । जयजयकर प्रवर्तला ॥ ६८ ॥
वीर सांगती युद्धगोष्टी । सोडिल्या कवचांच्या गांठी । उल्हास भीमकीच्या पोटीं । हरिख सृष्टी न समाये ॥ ६९ ॥
आपुले न पडतीच रणीं । बंधू आले नाहींत कोणी । राजे गेले जी पळोनी । भीमकी मनीं हरिखलीं ॥ ७० ॥
आतां कृष्णरुक्मिया सन्नद्ध । दोघां होईल द्वंद्वयुद्ध । मेहुणेपणाचा विनोद । अतिविनोद निकराचा ॥ ७१ ॥
पुढील कथा अतिगहन । रसाळ आहे अनुसंधान । एक आविनवी जनार्दन । सावधान परिसावें ॥ ७२ ॥

इति श्रीमद्भागवत महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे यादवविजयो नाम एकादश: प्रसंग: ॥११॥

॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:transliteral 

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *