रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा

श्रीगणेशाय नम: ॥ राय चलिले मुगुटांचे ॥ थोर बळ गवेषणाचें । सैन्य पातलें मागधाचें । युद्ध त्याचे दारुण ॥ १ ॥
वेगीं धनुष्या वाहिला गुण । शितीं लावूनियां बाण । शस्त्रें झळकती दारुण । रणकंदन करूं आले ॥ २ ॥
राजे चालिले प्रबळ । यादव उठवले सकळ । दुमदुमलीं दोन्ही दळे । एकमेळें मिसळले ॥ ३ ॥
गगन कोंदलें तिही बाणीं । तळीं खिळिली धरणी । मागें पाय न ठेविती कोणी । वीर रणीं खवळले ॥ ४ ॥
वीर वीरातें हणित ॥ लोहधुळोरा उसळत । वरिया वाट न चले तेथे । वीर अद्‍भुत मातले ॥ ५ ॥
शस्त्रेंसहित तोडिती कर । मुगुऎंसहित पाडिती शिर । गजांसहित मारिती वीर । सपिच्छ शर भेदिले ॥ ६ ॥
चरण तोडिले गजंचे । रजे पाडिले ब्रीदांचे । खुर छेदिले अश्वांचे । आंख रथांचे भेदिले ॥ ७ ॥
राजे विनटले अनेक । यांवरी उठावला श्वफल्क । बाणीं त्रासूनिया देख । एकें एक खिळियेले ॥ ८ ॥
वीर भिडिन्नले पडिपाडें । यादवांचे बळ गाढें । गवेषण चालिला पुढें । गुणीं कुर्‍हाडे लाविले ॥ ९ ॥
श्वफल्क विंधिला पांच बाणी । रथ छेदूनि पाडिला धरणीं । कंक सात्यकी हे दोन्ही । विसां बाणीं विंधिलें ॥ १० ॥
बण अनिवार निर्व्यंग । भेदिलें वीरांचे अष्टांग । गवेषण योद्धा चांग । न करी पांग दुजयाचा ॥ ११ ॥।
चक्रदेव चालिला रागें । एकें बाणें विंधिला वेगें । रथासहित घातला मागें । रणभूमि सांडविली ॥ १२ ॥
देखोनि चालिला अतिदंत । कोपें खवळला अद्‌भुत । दहा वीस पांच सात । बा सह्त वरुषला ॥ १३ ॥
बाणीं निवारिले बाण । हांसिन्नला गवेषण । येरु कोपला दारुण । आठ बाण सोडिले ॥ १४ ॥
दारुण बाण आले आठ । अनिवार अति उद्भट । रथसारथी केला पीठ । शिरींचा मुगुट पाडिला ॥ १५ ॥
एक खडतरला बाण । गगना गेला गवेषण । क्रमूनियं ग्रहगण । ध्रुवमंडळ उडविला ॥ १६ ॥
घयासरसी आली भवंडी । पडत पडत आवरली मुरकुंडी । रणांगणीं घातली उडी । मूर्च्छा गाढी सांवरिली ॥ १७ ॥
गवेषण आणिके रथा । चढोनि पातला अवचिता । पाचारूनि अतिदंता । होय विंधिता सा बाणीं ॥ १८ ॥
बाण सुटले कडाडी । पडली डोळियां झांपडी । काढों विसरला वोढी । थोर हडबडी अतिदंता ॥ १९ ॥
दोन भेदले भुंजावरी । एक उरीं एक शिरीं । दोनी रुतले दोहीं करीं । धरणीवरी पाडिला ॥ २० ॥
घायें लोळविला महाबळीं । अधोमुख महीतळीं । झोटीं सुटली मोकळीं । भाते तळीं रिचवले ॥ २१ ॥
हांक देऊनि गवेषण । रणांगणी उभा आपण । त्यावरी चालिला सारण । बाण दारुण घेउनी ॥ २२ ॥
बाण विंधित चपल । धनुष्य तोडिलें तत्काळ । दुजें धनुष्य घे भूपाळ ॥ तेंही सबळ तोडिलें ॥ २३ ॥
तिजे धनुष्य वाइला गुण । तेंही तोडिलें विंधोनी बाण । जें जें धनुष्य घे गवेषण । तें तें सारण तोडित ॥ २४ ॥
सारणें थोर केली ख्याती । धनुष्य घेऊं नेदी हातीं । देखोन कोपला भूपती । मेढा निगुती वाइला ॥ २५ ॥
सारणें विंधिला सारथी । ध्वजस्तंभ पाडिला क्षितीं । येरें विंधिला बाणें सातीं । दोहीं हातीं खोचला ॥ २६ ॥
सारण विकळ पाडिला रथीं । वीर मूर्च्छित पाडिले क्षितीं । गवेषणे लाविली ख्याती । भद्रजती खवळला ॥ २७ ॥
मग मिसळला जळभारीं । करीत असे महामारी । वीर खिळिले जिव्हारीं । शरधारीं वर्षत ॥ २८ ॥
येरीकडे केशिक वीर । वर्षत बाणांचा महापूर । बाणीं त्रासिला बळिभद्र । दळभार वेढिला ॥ २९ ॥
खड्‌ग तोमर गदा परिघ । वीर हाणिताती सैघ । राम साधक अति सांग । घाय आंगा लागों नेदी ॥ ३० ॥
हल भवंडी चहूंकडे । वीर पाडिले दडदडां । नांगरें केला जी उवेढा । केशिक गाढा हांकिला ॥ ३१ ॥
बाणीं विंधिला प्रबळें । तिखट सोडी शरजाळें । बाण तोडोनियां हळें । निजबळें लोटला ॥ ३२ ॥
नांगर उचलूनिया निवाडें । नेहटून पाय ठेविला पुढें । घायीं चूर केली हाडें । अशुद्ध उडे आकाशीं ॥ ३३ ॥
सैन्यावरी लोटला देख । ठायीं पाडिले सेनानायक । धरितां न धरवेचि तबक । वीर अनेक मारिले ॥ ३४ ॥
रथ भूमीसी आफळीं । गज शुंडादंडी पिळीं । शिरें खेळती चेंडूफळी । रणखंदोळीं मांडिली ॥ ३५ ॥
धाक घेतला झुंजारीं । केशिकसैन्य पळे दूरी । बळीभद्र पेटला महामारी । युद्ध वीरीं सांडिलें ॥ ३६ ॥
जरासंध देखिला दूरी । राम चढे रथावरी । रथ पेलिला झडकरी । उपराउपरी मारिला ॥ ३७ ॥
वेगीं धनुष्या चढविला गुण । रामें काढिला निर्वाणबाण । गदें घातली आपुली आण । रणविंदाण पाहें माझें ॥ ३८ ॥
धीर धरीं अर्ध घडी । पाहे युद्धाची निरवडी । जरासंधा बाणीं फोडी । गर्वझाडी करीन ॥ ३९ ॥
गदू निजगडा महावीर । योद्धा रणरंगचतुर । बळीभद्रासी केला स्थिर । रहंवर धांवविला ॥ ४० ॥
येरीकडे यादवभारा । गवेषण पेटला महामारा । बाणीं खिळिले महावीरां मुख्य धुरा खोंचल्या ॥ ४१ ॥
विकळ देखोनि दळभार । मागधवीरीं केला मार । आट भविन्नला थोर । हाहाकार ऊठिला ॥ ४२ ॥
निजसैन्यासी महामार । दुरोनि देखे बळीभद्र । कोपें खवळल दुर्धर । रहंवर पेलिला ॥ ४३ ॥
परसैन्य देखोनि दृष्टीं । वेगें चालिला जगजेठी । धडधडिल्या चक्रवाटी । उठाउठीं पातला ॥ ४४ ॥
देखोनि शत्रूचा खटाटोप । बळीभद्रासी न धरवे कोप । बाहुस्फुरणें आला कंप । वेगें साटोप ऊठिला ॥ ४५ ॥
रथाखालीं घातली उडी । शेष दडपला फडेबुडीं । वराहाची दाढ तडतडी । कूर्में गाढी पाठि केली ॥ ४६ ॥
वीर खिळूनियां बाणीं । गवेषण गर्जे रणीं । आल बळिभद्र धांवोनी । निर्वाणबाणीं विंधिला ॥ ४७ ॥
बाण विंधिला सबळ । येरें परजिलें मुसळ । साधक बळिभद्र प्रबळ । बाणजाळ तोडिलें ॥ ४८ ॥
नांगर उचलूनियां बळें । न धरत पातला तये वेळे । रथ सांडिला तत्काळें । वेगें पळे गवेषण ॥ ४९ ॥
सवेंचि परतावया पाहत ॥ पायीं घातला नांगरदांत । गवेषण पडिल तेथ । भूमी दांत आदळले ॥ ५० ॥
लाजा उठिला त्वरित । तंव बळिभद्रें दिधली लाथ । येरु अशुद्धातें विमित । पडिआ मूर्च्छित अचेतन ॥ ५१ ॥
सांडूनियां धनुष्यबाण । सैनिक धांविन्नला आपण । रथीं घालोनियां गवेषण । घेऊनि प्राण पळाला ॥ ५२ ॥
देखोनि बळिभद्राचें बळ । राजे चालिले प्रबळ । पुढें करूनियां गजदळ । एक वेळ लोटले ॥ ५३ ॥
आलें देखोनि परदळ । करीत हरुपाचा गोंधळ । झेलित नांगर मुसळ । वेगें सबळ उठिला ॥ ५४ ॥
गज हाणीत मुसळें । विदारीत कुंभस्थळें । घायीं किळकिळती एक वेळे । गजकलेवरें पाडिलीं ॥ ५५ ॥
नांगर घालूनि रथावरी । शतसहस्रांचूर करी । पळत गज पायीं धरी । तेणें किरकिरी करिताती ॥ ५६ ॥
चपळ चौताळती घोडीं । नांगर घालोनि त्यांतें वोढी । घायें मुसळाचेनि पाडी । वीरझोडी मांडिली ॥ ५७ ॥
वीर वरुषताती शस्त्रास्त्रां । जैसा मेरूसी पर्जन्यधारा । रणीं चालतां बळीभद्रा । वीर थरथरां कांपती ॥ ५८ ॥
पायींचे रगडिले पायीं । कारुप राजा पाडिला ठायीं । रथ रथ मोडिला पाहीं । सन्मुख घायीं कोण राहे ॥ ५९ ॥
पृथ्वी तेचि उखळ जाण । नांगरें वीर घाली वैरण । मुसळघायें करा चूर्ण । रणकंदन मांडिलें ॥ ६० ॥
सात्त्विका दंतवक्रा युद्ध । गदें गोंविला जरासंध । मोकळा पडला हलायुध । वर्‍हाडी सुबुद्ध कांडिले ॥ ६१ ॥
वीरीं घेतला रणकावो । देखोनि धांविन्नला शाल्वो । मिळोनि वीराचा समुदावो । महाबाही पडखळिला ॥ ६२ ॥
धांवतां देखोनि शाल्व वीर । आडवा आला अक्रूर । राहें साहें म्हणें स्थिर । धरीं धीर संग्रामीं ॥ ६३ ॥
तंव बळिभद्र पावला रागें । अक्रूरातें म्हणे उगे । मज पाचारिता अंगें । तू कां वेगें आलसी ॥ ६४ ॥
रणीं झुंजार विकळ जाय । तरी दुजयानें व्हावें साह्य । शाल्व बापुडें तें काय । कौतुक पाहें पैं माझें ॥ ६५ ॥
मग चालिला शाल्वावरी । बळीभद्र वेढिला वीरीं । बहुत उठिले महामारी । शरधरीं वर्षती ॥ ६६ ॥
बाप बळीराम जगजेठी । नांगरें बाण तरी पिटी । अंग लागों नेदी चिरटी । शाल्व दृष्टी सूदला ॥ ६७ ॥
बाणीं विंधिला अमित । राम बाणांतें न गणित । वेगें उसळला अद्‍भूत । आला न धरत आंगेंसीं ॥ ६८ ॥
रथ धरिला मकरतोंडी । शाल्वे वेगीं घातली उडी । सांपडला तो रथाबुडीं । वोढाकाढीं निष्टला ॥ ६९ ॥
रथ आपटिला भूमंडळीं । वीर सापडलें तयातळीं । घायें केली रांगोळी । निधा पाताळीं ऊठिला ॥ ७० ॥
ते वेळीं शाल्वें चुकविलें आंग । घायासरिसा उडाला सवेग । मागुता आवेश धरुनियां चांग । रणीं अव्यंग उभा असे ॥ ७१ ॥
शाल्व घेऊनियां गदा । ह्रदयीं हाणतां हलायुधा । गगना उसळला तो योद्धा । धावो नुसधा तळीं गेला ॥ ७२ ॥
शाल्व रथीं जंव चढे । तंव मुसळ वोपिलें रोकडें । करीत अशुद्धाचे सडे । मूर्च्छित पडे अवनीये ॥ ७३ ॥
मग मिसळला मागधांत । घायें शतसहस्र मारीत । अशुद्ध भडभडां वाहात । नांगरें अंत पुरविला ॥ ७४ ॥
बळीबद्रे केली महामारी । वीर झोडिले नंगरीं । तेथं वीर वीरंतें परस्परीं । एशियापरी वोलती ॥ ७५ ॥
हाती येरां दुकळ पडला । मग यासी नांगर साम्पडला । सैन्य नांगरावया आला । वीरकाशिया काढित ॥ ७६ ॥
नांगर घालूनियां बुडीं ।थोर उपडिलिया पेडी । रथगजकाटिया मोडी । पालव्या तोडी वीरांच्या ॥ ७७ ॥
अतिरथी जे उद्भट । समूळ फोडियेले खुंट । बळीभद्र हा कुणबट । केली चोखट रणभूनि ॥ ७८ ॥
महावीरां घालितां घावो । अशुद्धें डवरिला बलदेवो । तेणें शोभत महाबाहो । रणभैरवो डुल्लत ॥ ७९ ॥
रणमदें जाला मस्त । नांगर घेउनि नाचत । वीर देखोनि धांवत । पुरला अंत सैन्याचा ॥ ८० ॥
घायें मारीत महावीर । भडभडां वाहे रुधिर । लोटला अशुद्धाचा पूर । नदी दुस्तर उलथली ॥ ८१ ॥
नदी वाहतां दुथडी । झाल्या प्रेतांच्या दरडी । वोडणें कमठें पुष्टी गाढी । गज करवडी महाग्राह ॥ ८२ ॥
बाबरझोटिया केशजाळ । तेचि नदीमाजी शेवाळ । मगर सुसरी महाविशाळ । शिरें विक्राळ वीरांचीं ॥ ८३ ॥
बाण तरती सपिच्छेंसी । तेचि मस्त्य रणनदीसी । धनुष्यें वाहती शितेंसीं । वक्रगतीसीं तेचि सर्प ॥ ८४ ॥
पडिले गजांचे अलंकार । घंटा घागरिया नूपुर । तेचि नदीमाजी दर्दुर । लहान थोर किरकिरती ॥ ८५ ॥
रथ ध्वजेंसीं वाहात । तेंचि तारुं शिडेंसहित । वीरां मोक्ष भरिलें भरित । तारू तेथ श्रीकृष्ण ॥ ८६ ॥
एकेचि घायें शिर पडे । स्वर्गपर्यंत तें उडे । स्वर्गभोग त्या नावडे । कृष्णाकडे तें परतलें ॥ ८७ ॥
कृष्णदृष्टी देहत्याग । तुच्छ करूनि सांडिती स्वर्ग । जिंतिला जन्ममरणाचा पांग । सुख अव्यंग पावले ॥ ८८ ॥
घायें उडालें शिरकमळ । टाकूनि गेलें ध्रुवमंडळ । पदनमनेंचि अढळ । उतावेळ परतलें ॥ ८९ ॥
देह अर्पितां श्रीकृष्णासी । चारी मुक्ती होतीं दासी । म्हणोनि आलें कृष्णचरणासी । निजसुखासी पावलें ॥ ९० ॥
घायीं उडालें शिर एक । टाकून गेलें सत्यलोक । ब्रह्मसदन नावडे देख । कृष्णासन्मुख परतलें ॥ ९१ ॥
देखोनि कृष्णाचें श्रीमुख । धिक्कारिला सत्यलोक । ब्रह्मसदन वांच्छिती मूर्ख । परमसुख हरिचरणीं ॥ ९२ ॥
घायासरिसें शिर उडे । वैकुंठपर्यंत तें चढे । एकदेशी गति नावडे । हरीकडे मुरडलें ॥ ९३ ॥
सांडूनिया कृष्णनाथा । आम्ही नेघों सलोकता । हरिचरणीं ठेविला माथा । नेघो सर्वथा वैकुंठ ॥ ९४ ॥
शिर उडालें अंतराळीं । अहंकारमुगुट पडला तळीं । शिर न उतरेचि भूतळीं । हरीजवळी पावलें ॥ ९५ ॥
जेथें अभिमान तुटला । तेथेंचि त्यास हरि भेटला । युद्धमिसें लाभ झाला । वीरां फावळा निजमोक्ष ॥ ९६ ॥
अत्यंत प्रळयींचा चिद्‌घन । वर्षताहे संकर्षण । वीरांचा अभिमान मर्दून । लिंगदेह छेदिल ॥ ९७ ॥
अधिकारियां मोक्षभावो । द्यावयालागीं कृष्णदेवो । मिष भीमकीचा विवाहो । रणनिर्वाहो मोक्षाचा ॥ ९८ ॥
निधड्या वीरां जाली मुक्ती । देह लोभियां कवण गती । रण सांडोनियां जे पळती । ते विन्मुख होती कृष्णासी ॥ ९९ ॥
अश्व गज जे रणा आले । तेही श्रीकृष्णें उद्धरिलें । युद्ध सांडून जे पळाले । ते पावले अवगती ॥ १०० ॥
यापरी तो बळिभद्र । कृपेनें कोपला दुर्धर । ब्रह्मसायुज्येंकरून मार । वीरें वीर आटिलें ॥ १०१ ॥
एका जनार्दनी कौतुक । कथारहस्य सुखदायक । पुढील कथा अलोकिक । समाधिसुख संग्रामीं ॥ १०२ ॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे चैद्यमागधपराजयो नाम दशम: प्रसंग: ॥१०॥

॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
ref:transliteral 

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *