sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 12

एकनाथी भागवत अध्याय 12

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो द्‍गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू ।
तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥१॥
ॐकाररूपी सद्गुरु वसंताला नमस्कार असो. भेदभाव मोडून ऐक्यतेचा काल येतो, तेव्हांच तुझा ऋतु प्राप्त होतो; आणि त्या ऋतुकाली वाहणारा वायु जेव्हां ज्ञानवनांत शिरतो, १.

तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें ।
नवपल्लवीं विराजमानें । विरक्तपणें आरक्त ॥२॥
तेव्हां अविद्येची जुनी पानें तत्काल गळून पडतात व विरक्तपणाने आरक्त झालेली नवी पालवी शोभू लागते २.

अत्यंत वैराग्याची हांव । खांकर झाले वृक्ष सर्व ।
त्यांसी निघाले नवपल्लव । अतिलवलव कोंवळिक ॥३॥
वैराग्याचा ताप अत्यंत प्रखर, त्याने सारे वृक्ष शुष्क झाले असतांही वसंतऋतूच्या योगाने त्यांना कोंवळे लुसलुशीत असे नवे पल्लव फुटले ३.

जाहल्या वसंताचें रिगवणें । वृक्ष आडवे फुटले तेणें ।
सोहंभावाचीं सुमनें । तेणें गुणें विकासलीं ॥४॥
वसंत ऋतु प्राप्त झाला असतां त्याच्यामुळें त्या वृक्षांना आडव्या फांद्या फुटल्या व त्या ऋतूमुळेंच सोहंभावाची (ब्रह्म तें मीच या भावनेची) पुष्पें त्या वृक्षांवर विकसित झाली ४.

कृष्णसारूप्यें कृष्णभ्रमर । तेथें झेपावले अतिसत्वर ।
आमोद सेविती अरुवार । कैसेनि केसर कुचंबे ॥५॥
कृष्णस्वरूपाशीं तादात्म्य पावल्यामुळें काळे झालेले भ्रमर झेंप घालून मोठ्या जलदीनें तेथे आले, आणि अत्यंत मृदुपणाने मकरंद सेवन करू लागले. तेव्हां त्यांतील परागाला धक्का कसा बसणार ? ५.

सद्‍भावाच्या आमोदधारा । सेवितां सुख झालें भ्रमरां ।
हृदयकमळीं केला थारा । मध्यमद्वारा चालिले ॥६॥
सद्‌भक्तिरूप मकरंदाच्या धारा प्राशन करतां करता त्या भ्रमरांना अत्यंत आनंद झाला, तेव्हां ते हृदयकमलामध्यें शिरून स्थिर झाले, आणि सुषुम्नेच्या द्वारांतून पुढे निघाले ६.

भेदोनियां साही कमळें । द्विदळादि षोडशदळें ।
झेपावले मळयानिळें । सहस्रदळीं मिसळले ॥७॥
ते सहाही कमळें व द्विदळें आदिकरून षोडश दळें भेदून आणखी पुढे झुकले, आणि मलयवायूच्या जोराने पुढें झेंपा घेत घेत सहस्रदळांत जाऊन मिसळले ७.

तेथ सेवूनि पराग धवळ । उन्मत्त मातलें अळिकुळ ।
करिती आनंदाचा गोंधळ । सुखकल्लोळ स्वानंदें ॥८॥
तेथे पांढरे शुभ्र पराग सेवून ते भ्रमरांचे संघ उन्मत्त झाले, आणि त्यांनी आनंदाने गोंधळ मांडला. आत्मानंदानें त्यांनी सुखाचा कल्लोळ माजविला. ८.

लागला अनुहताचा ध्वनी । रुणझुणिती दशलक्षणीं ।
त्याही नादातें प्राशुनी । निःशब्दपणीं निवांत ॥९॥
इतक्यांत अनुहताचा शब्द त्यांच्या कानावर आला. तो दहा प्रकारांनी रुणझुण रुणझुण करीत होता. त्या नादाचेंही प्राशन करून निःशब्दपणानें ते स्वस्थ बसले ९.

तेथें मोक्षसुखाचे घड । डोलतां दिसे अतिगोड ।
तेणें जीवाचें पुरत कोड । करिती धुमाड सोहंशब्दें ॥१०॥
तेथे मोक्षसुखाचे घड डोलत असतांना तो देखावा अत्यंत सुंदर दिसत होता. त्यामुळें जीवांची वासना पूर्ण होऊन ते ‘सोहं’ शब्दानें मोठी गर्जना करूं लागले १०.

मुमुक्षुमयुर अतिप्रीतीं । पिच्छें पसरूनि नाचती ।
येऊन वसंतवनाप्रती । टाहो फोडिती गुरुनामें ॥११॥
इतक्यांत मुमुक्षुरूपी मोर अत्यंत प्रेमाने आपला पिसारा उभारून नाचूं लागले, आणि वसंताने बहरलेल्या वनामध्यें येऊन त्यांनी गुरुनामाचा टाहो फोडला ११.

नेमस्त कोकिळां होतें मौन । वसंतऋतुराज देखोन ।
तिंहीं करोनि विसर्जन । मधुरस्तवनें गर्जती ॥१२॥
यम-नियमरूपी कोकिळा मौन धरून बसल्या होत्या, त्यांनी वसंतऋतुराजाला पाहून मौनव्रताचे विसर्जन केले, आणि मधुर स्तवनाने गर्जूं लागल्या १२.

भक्तिसरोवरीं निर्मळ पाणी । विकासल्या नवविध कमळिणी ।
भक्त सुस्त्नात तिये स्थानीं । निमज्जनीं निश्चळ ॥१३॥
भक्तीच्या सरोवरांत निर्मल पाणी असते, म्हणून तेथे नवविधा भक्तिरूप कमलिनी प्रफुल्लित झाल्या. त्या ठिकाणीं भक्त उत्तम प्रकारे सान करून न थांबता त्यांत डुंबत राहिले १३.

ते सरोवरींचे सेवितां पाणी । जीवशिव चक्रवाकें दोनी ।
सद्‍गुरु चिद्‍भानु वसंतवनीं । देखोनि मिळणीं मिळालीं ॥१४॥
जीव आणि शिव ही दोन चक्रवाकें त्या सरोवरांतील पाणी सेवन करीत असतां सद्‌गुरुरूपी ज्ञानसूर्य वसंताने शोभिवंत केलेल्या वनामध्यें उगवलेला पाहून एकत्र मिळाली १४.

वसंतें उल्हास तरुवरां । उलोनि लागल्या स्वानंदधारा ।
पारंब्या भेदूनियां धरा । धराधरा विगुंतल्या ॥१५॥
वसंत ऋतूच्या योगानें मोठमोठ्या वृक्षांना उल्हास प्राप्त होऊन त्यांना पालवी फुटली, व त्यांतून स्वानंदाच्या धारा गळूं लागल्या. त्यांच्या पारंब्या तर पृथ्वीला फोडून शेषापर्यंत जाऊन पोंचल्या १५.

बोधमलयानिळ झळकत । तेणें वनश्री मघमघित ।
मोक्षमार्गीचे पांथिक तेथ । निजीं निजत निजरूपें ॥१६॥
तेथे ज्ञानरूप मलयपर्वतावरील वारा वाहूं लागला. तेव्हां त्यामुळें जिकडे तिकडे वनश्री प्रफुल्ल होऊन राहिली, आणि मोक्षमार्गांतील पांथस्थांनी तेथें आत्मस्वरूपात सुखानें निद्रा केली १६.

ऐसा सद्‍गुरु वसंतरावो । निजभक्तवना दे उत्सवो ।
तो भागवतभजन‍अध्यावो । उद्धवासी देवो सांगत ॥१७॥
असा सद्‌गुरुरूप वसंतराज आपल्या भक्तरूप वनाला आनंद देतो. तो भगवद्‌भक्तांच्या भजनाचा अध्याय देव उद्धवाला सांगत आहे १७.

बारावे अध्यायीं निरूपण । सत्संगाचा महिमा गहन ।
कर्माचा कर्ता तेथ कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥१८॥
बाराव्या अध्यायामध्यें सत्संगाचा महिमा अगाध असल्याचे निरूपण आहे. तेथे कर्माचा कर्ता कोण आणि कर्मत्यागाचे स्वरूप काय, ह्यांचे निरूपण आहे १८.

संपतां अकरावा अध्यावो । गुह्य सांगेन म्हणे देवो ।
तें परिसावया उद्धवो । न्याहाळी पहा हो हरिवदन ॥१९॥
अकरावा अध्याय संपवितांना ‘गुह्य सांगेन’ असें देवांनी म्हटले होते, तें ऐकण्या करितां उद्धव हा श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहूं लागला १९.

काय सांगेल गुह्य गोष्टी । कोण अक्षरें निघती ओंठीं ।
त्या वचनार्था घालावया मिठी । उल्हास पोटीं उद्धवा ॥२०॥
तेव्हां आतां गुह्य गोष्टी काय काय सांगेल ? ह्याच्या ओठांतून कोणती अक्षरें आतां बाहेर पडतील ? त्या भाषणाच्या अर्थाला मिठी मारण्यासाठीं उद्धवाच्या अंत:करणांत अत्यंत उत्कंठा लागली होती २०.

जैसें मेघमुखींचें उदक । वरच्यावरी झेली चातक ।
तैसें कृष्णवचनालागीं देख । पसरिलें मुख उद्धवें ॥२१॥
ज्याप्रमाणें मेघाच्या मुखांतील पाणी चातक वरच्यावरच झेलून घेतो, त्याप्रमाणें कृष्णाच्या भाषणासाठी उद्धवानेही आपले तोंड पसरलें २१.

स्नान संध्या भोजन । आवडे या एकें काळें जाण ।
तैसें ज्ञेय ज्ञाता ज्ञान । घ्यावया सावधान उद्धव ॥२२॥
स्नान, संध्या आणि भोजन हें या एकाच वेळी साधावें असे वाटलें; त्याचप्रमाणें ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान घेण्यासाठीं उद्धव लक्ष देऊन राहिला २२.

ऐसा उद्धवाचा आदरू । देखोनि हरि झाला सादरू ।
भक्तकृपाळू अतिउदारू । निजगुह्यसारू सांगत ॥२३॥
अशी उद्धवाची उत्कंठा पाहून श्रीकृष्णही त्या गोष्टीला तयार झाला. भक्ताविषयी कृपाळू व अत्यंत उदार असा श्रीकृष्ण आपल्या गुह्य गोष्टींतील तात्पर्य सांगू लागला २३.

श्रीभगवानुवाच –
न रोधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म एव च ।
न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्तं न दक्षिणा ॥ १ ॥
व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमाः ।
यथावरुन्धे सत्सङ्गः सर्वसङ्गापहो हि माम् ॥ २ ॥
[श्लोक १-२] श्रीभगवान म्हणतात सर्व आसक्ती नष्ट करणार्‍या सत्संगामुळे भक्त मला जसा प्राप्त करू शकतो, तसा योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त दक्षिणा, व्रते, यज्ञ, तीर्थ, नियम, यम इत्यादी साधनांनी मला मिळवू शकत नाही. (१-२)

मज वश करावयालागीं । सामर्थ्य नाहीं अष्टांगयोगीं ।
नित्यानित्यविवेक जगीं । आंगोवांगी मज न पवे ॥२४॥
अष्टांगयोगामध्यें मला वश करून घेण्याचे सामर्थ्य नाही. जगांतील नित्यानित्यविचारसुद्धा आपण होऊन माझ्यापर्यंत येऊ शकत नाही २४.

प्रकृतिपुरुषविवंचना । अखंड आलोडितां मना ।
पावावया माझिया स्थाना । सामर्थ्य जाणा त्या नाहीं ॥२५॥
किंवा निरंतर मनामध्यें प्रकृतिपुरुषांचा विचार करीत राहिले असताम्ही माझ्या स्थानापर्यंत पोचण्याचे सामर्थ्य त्या माणसाला प्राप्त होत नाही, हे लक्षांत ठेव २५.

धर्म अहिंसादिसहित । सत्य त्यांचेनि मी नव्हें प्राप्त ।
मुख्य वेदाध्ययनेंही मी अप्राप्त । साङ्ग समस्त जरी पढिले ॥२६॥
अहिंसासहित जे सर्व धर्म, तसेंच जें सत्य, त्यांच्या योगानेंही मी प्राप्त होत नाही. वेदाध्ययन हें मुख्य समजतात, पण ते सर्व वेद सांगोपांग पठण केले, तरीही माझी प्राप्ति होत नाहीं २६.

तेथ तपें कायसीं बापुडीं । पंचाग्नि असार परवडी ।
कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं । त्यांचे जोडी मी न जोडें ॥२७॥
मग त्यांच्यापुढे बिचाऱ्या तपांचा काय पाड पंचाग्निसाधनाचा प्रकार तर निरर्थक आहे. कृच्छ्रचांद्रायणे तर वेडी ठरली. कारण ती करूनही मी प्राप्त होत नाही २७.

देहगेह सांडूनि उदास । विरजाहोमीं हवी सर्वस्व ।
साधनीं अतिश्रेष्ठ संन्यास । त्यासी मी परेश नातुडें ॥२८॥
जो घरदार सोडून विरक्त होतो, किंवा ‘विरजा’ (संन्यास घेण्यापूर्वी करावयाचा होम) होम करून त्यांत आपल्या सर्वस्वाचे हवन करतो, किंवा सर्व साधनांत अत्यंत श्रेष्ठ असा संन्यास जो घेतो, त्यालाही मी परमेश्वर वश होत नाही २८.

करितां श्रौतस्मार्तकर्मांसी । कर्मठें झालीं पानपिसीं ।
तरी मी नाकळें त्यांसी । क्लेश होमेंसीं कष्टतां ॥२९॥
श्रौतस्मात कर्में करितां करितां कर्मठ लोक वेडे बनून राहिले. तरीही मी त्यांना सांपडत नाही. होम करतांना बिचाऱ्यांना कष्ट मात्र भोगावे लागतात २९.

गोदान भूदान तिलदान । दान देतां धनधान्य ।
त्यांसीं मी नाटोपें जाण । दानाभिमान न वचतां ॥३०॥
गाई दान दिल्या, भूमि दान दिली, तिल दान दिले, किंवा सर्व धनधान्याचें दान दिले, तरीही त्यांचा दानाभिमान सुटल्याशिवाय मी त्यांना वश होत नाही ३०.

संकटचतुर्थी ऋषिपंचमी । विष्णुपंचक बुधाष्टमी ।
अनेक व्रतें करितां नेमीं । ते मी कर्मीं नातुडें ॥३१॥
किंवा संकष्टचतुर्थी, ऋषिपंचमी, विष्णुपंचक, बुधाष्टमी; इत्यादि अनेक व्रतें नित्य नेमाने केली, तरी त्या कर्मांमध्यें मी सांपडत नाही ३१.

अश्वमेध राजसूययाग । सर्वस्व वेंचूनि करितां साङ्ग ।
माझे प्राप्तीसी नव्हतीचि चांग । तेणें मी श्रीरंग नाटोपें ॥३२॥
किंवा सर्वस्व खर्च करून अश्वमेध व राजसूय यज्ञ यथासांग केले, तरी ते कांही माझ्या प्राप्तीला योग्य होत नाहीत. त्यांच्या योगानें मी श्रीकृष्ण कांहीं वश होत नाहीं ३२.

हो कां वापी कूप आराम । वृक्षारोपण वनविश्राम ।
आचरतां स्मार्तकर्म । मी आत्माराम न भेटें ॥३३॥
किंवा तलाव, विहिरी, बागा, तयार केल्या; मार्गांवर झाडें लावली; वनामध्यें पांथस्थांच्या विश्रांतीकरितां अनेक विश्रांतिस्थानें तयार केली; किंवा हवीं तितकी स्मार्त कर्में आचरण केली; तरीही मी आत्माराम कांहीं भेटत नाही ३३.

नाना छंद रहस्यमंत्र । विधिविधान अतिविचित्र ।
सामर्थ्यें अतिविशेष पवित्र । नव्हती स्वतंत्र मत्प्राप्ती ॥३४॥
अनेक प्रकारचे वेदमंत्र असोत, अनेक प्रकारचे गुप्तमंत्र असोत, किंवा अत्यंत विचित्र अशी विधिविधानें असोत व त्यांचे सामर्थ्य केवढेही मोठे व कितीही पवित्र असो, तरी तीं माझी प्राप्ति करून देण्यास स्वतंत्र रीतीनें समर्थ होत नाहींत ३४.

पुष्करादि नाना तीर्थें । पापनिर्दळणीं अतिसमर्थें ।
शीघ्र पावावया मातें । सामर्थ्य त्यांतें असेना ॥३५॥
पुष्कर इत्यादि नानाप्रकारची तीर्थें आहेत, आणि पातके नाश करण्याविषयी ती अत्यंत समर्थ आहेत, तरी तत्काल माझ्यापर्यंत पोचण्याजोगें सामर्थ्य त्यांच्या ठिकाणीं असत नाही ३५.

यमनियम अहर्निशीं । जे सदा शिणती साधनेंसीं ।
ते यावया माझ्या द्वारासी । सामर्थ्य त्यांसी असेना ॥३६॥
किंवा जे कोणी रात्रंदिवस यमनियम करतात, किंवा नानाप्रकारची साधनें करतां करतां थकून जातात, ते माझ्या दारापर्यंत येण्याचें सामर्थ्य त्या यमनियमादिकांत नाही ३६.

उद्धवा यमनियमनिर्धार । एकुणिसावे अध्यायीं सविस्तर ।
तुज मी सांगेन साचार । संक्षेपाकार बारावा ॥३७॥
उद्धवा ! त्या यमनियमांचा निर्णय एकुणिसाव्या अध्यायांत तुला मी खरोखर सविस्तर सांगेन. कारण हा बारावा अध्याय संक्षिप्त स्वरूपाचा आहे ३७.

ते यमनियम बारा बारा । आणि सकळ साधनसंभारा ।
यावया माझिया नगरा । मार्गु पुढारा चालेना ॥३८॥
ते बारा बारा असलेले यमनियम, किंवा इतर सर्व साधनांचा समुदाय ह्यांना माझ्या नगराला (वैकुंठाला ) येण्याला पुढें मार्गच सांपडत नाही ३८.

ते गेलिया संतांच्या दारा । धरूनि साधूच्या आधारा ।
अवघी आलीं माझ्या घरां । एवं परंपरा मत्प्राप्ती ॥३९॥
पण ते जर साधूचा आश्रय धरून संतांच्या दाराशी गेले, तर तीं सर्व माझ्या घरी आली असें होईल. अशा परंपरेनें माझी प्राप्ति होते ३९.

तैशी नव्हे सत्संगती । संगें सकळ संगांतें छेदिती ।
ठाकठोक माझी प्राप्ती । पंगिस्त नव्हती आणिकांचे ॥४०॥
परंतु सत्संगति ही तशी नव्हे. ती आपल्या संगानें इतर सर्व संगांचा नाश करते, व रोखठोक माझी प्राप्ति होते. सत्संग धरणारे भक्त माझ्या प्राप्तीसाठीं आणखी कोणावर अवलंबून राहणारे नसतात ४०.

किडी भिंगुरटीच्या संगतीं । पालटली स्वदेहस्थिती ।
तेवीं धरिलिया संतांची संगती । भक्त पालटती मद्‌रूपें ॥४१॥
आळी असते ती कुंभारणीच्या संगतींत गेली, की तिच्या देहाची स्थिति पालटली असें होते. त्याप्रमाणें संतांची संगति धरली असतां भक्त असतात तेंही पालटून मद्‌रूपच होतात ४१.

केवळ पाहें पां जडमूढें । चंदनासभोंवतीं झाडें ।
तीं सुगंध होऊनि लांकडें । मोल गाढें पावलीं ॥४२॥
हे पहा ! चंदनाच्या सभोवार जी निर्गंध व निरुपयोगी झाडें असतात त्यांची लांकडेंही चंदनाच्या संगतीनें सुगंधी होऊन मोठ्या किंमतीला चढतात ४२.

तीं अचेतन काष्ठें सर्वथा । चढलीं देवब्राह्मणांचे माथां ।
त्यांचा पांग पडे श्रीमंता । राजे तत्त्वतां वंदिती ॥४३॥
तीं अचेतन काष्ठेंसुद्धा सर्वस्वी देवांच्या आणि ब्राह्मणांच्या मस्तकावर चंदनाच्या रूपानें राहात असतात. त्यांची श्रीमंतालाही गरज लागते. आणि खरोखर राजेसुद्धा त्यांना वंद्य समजतात ४३.

तैशी धरिल्या सत्संगती । भक्त माझी पदवी पावती ।
शेखीं मजही पूज्य होती । सांगों किती महिमान ॥४४॥
त्याप्रमाणें सत्संगति धरिली असतां भक्त माझी योग्यता पावतात, आणि शेवटी मलासुद्धा ते पूज्य होतात, त्यांचा महिमा किती सांगावा ? ४५.

संतसंगतीवेगळें जाण । तत्काळ पावावया माझें स्थान ।
आणिक नाहींच साधन । सत्य जाण उद्धवा ॥४५॥
उद्धवा ! माझे स्थान तत्काल प्राप्त व्हावयाला खरोखर संतांच्या संगतीशिवाय दुसरें साधनच नाही, हे पक्कें लक्षांत ठेव १५.

मागां बोलिलीं जीं साधनें । तीं अवघींही मलिन अभिमानें ।
ऐक तयांचीं लक्षणें । तुजकारणें सांगेन ॥४६॥
मागें जी साधनें सांगितली आहेत. , ती सर्वही अमिमानानें मलिनच झालेली आहेत. त्यांची लक्षणे तुळा सांगेन ऐक ४६.

अष्टांगयोगीं दुर्जयो पवन । सर्वथा साधेना जाण ।
साधला तरी नागवण । अनिवार जाण सिद्धींची ॥४७॥
अष्टांगयोगामध्यें वायु जिंकण्यास अत्यंत कठीण आहे. तो पूर्णपणे कधीच साधत नाही असे समज बरें, इतकेंही करून साधलाच तरी सिद्धींची बुडवणूक असते ती तर अनिवारच होय ४७.

नित्यानित्यविवेकज्ञान । तेथ बाधी पांडित्य‍अभिमान ।
प्रबळ वांछी धनमान । ज्ञानचि विघ्न ज्ञान्यासी ॥४८॥
नित्यानित्यविचाराचे ज्ञान असतें तेथें पांडित्याचा अभिमान बाधक होतो, आणि मन हे द्रव्याची आणि मानाची प्रबळ इच्छा करते. तेथे ज्ञान हेच ज्ञानी पंडिताला विघ्नरूप होतें ४८.

अहिंसाधर्म करितां जनीं । धर्मिष्ठपणीं गाळिती पाणी ।
गाळितां निमाल्या जीवश्रेणी । अधर्मपणीं तो धर्म ॥४९॥
लोकांत अहिंसाधर्म आचरतांना धार्मिकपणानें पाणी गाळून घेतात पण ते गाळीत असतांनाच हजारों जीव प्राणास मुकतात. तेव्हां अशा अधर्मपणानें तो धर्म व्यापलेला असतो ४९.

करितां वेदाध्ययन । मुख्य वेदें धरिलें मौन ।
पठणमात्रें मी नातुडें जाण । याजनदान वांछिती ॥५०॥
बरे वेदाध्ययन केले तर मुख्य गोष्टीविषयीं वेदानें मौनच धरलेले आहे. तेव्हा त्या पठणानेही मी प्राप्त होत नाही. यज्ञ व दानधर्म यांची आवड बाळगली असताही मी प्राप्त होत नाही ५०.

तप करूं जातां देहीं । क्रोध तापसांच्या ठायीं ।
परता जावों नेदी कंहीं । वाढला पाहीं नीच नवा ॥५१॥
देहानें तप करूं लागले तर, तप करणाराच्या अंगी क्रोध उत्पन्न होतो. तो तापसी त्या क्रोधाला कधी मागे जाऊ देत नाही. त्यामुळें तो क्रोध नित्य नवा वाढतच असतो पहा ५१.

सर्वस्वत्यागें संन्यासग्रहण । तेथही न जळे देहाभिमान ।
व्यर्थ विरजाहोम गेला जाण । मानाभिमान बाधिती ॥५२॥
सर्वस्वाचा त्याग करून संन्यास ग्रहण केला तर तेथेही देहाभिमान नष्ट होत नाही. विरजा होम केला तरी तो व्यर्थ गेला असें समज. कारण मानाभिमान बाधतातच ५२.

श्रौत स्मार्त कर्म साङ्ग । इष्टापूर्त जे कां याग ।
तेथ आडवा ठाके स्वर्गभोग । कर्म क्षयरोग साधकां ॥५३॥
श्रौतस्मात कर्म यथासांग केलें, किंवा जे इष्टापूर्त याग तेही केले, तर तेथें स्वर्गांतील नानाप्रकारचे दिव्य भोग आडवे येऊन पडतात. म्हणून कर्म हे साधकांना क्षयरोगाप्रमाणें विनाशकारी होते ५३.

नाना दानें देतां सकळ । वासना वांछी दानफळ ।
कां दातेपणें गर्व प्रबळ । लागला अढळ ढळेना ॥५४॥
नानाप्रकारची सर्व दानें दिली असतां वासना त्या दानाच्या फळाची इच्छा धरते. किंवा दातेपणानें अनिवार गर्व चढतो, तो कांही केले तरी कमी होत नाही ५४.

अनंतव्रतें व्रती झाला । चौदा गांठीं देवो बांधला ।
शेखीं अनंतातें विसरला । देवो हरविला हातींचा ॥५५॥
एकादा साधक अनंतव्रत करून व्रती झाला आणि त्यानें चौदा गांठींनी देव बांधला, तरीपण शेवटीं अनंतालाच तो विसरून गेला आणि त्यानें हातचा देव मात्र घालविला असें होतें ५५.

नाना यज्ञ करितां विधी । मंत्र तंत्र पात्रशुद्धी ।
सहसा पावों न शके सिद्धी । पावल्या बाधी फळभोगू ॥५६॥
अनेक प्रकारचे यज्ञ करूं लागले असतां त्या प्रत्येक यज्ञांतील विधि, मंत्र, तंत्र, पात्रशुद्धि इत्यादि पसाऱ्यामुळें तो याग बहुधा सिद्धीस जात नाही. आणि यदाकदाचित् सिद्धीला गेलाच, तर त्यापासून होणाऱ्या फलभोगाची पीडा पाठीस लागते ५६.

नाना छंदें रहस्यमंत्र । विकळ हों नये उच्चार ।
मंत्रीं मंत्र रचिले साचार । चळले अपार मंत्रवादी ॥५७॥
अनेक प्रकारचे वेदमंत्र व गुप्त मंत्र म्हणतांना त्यांचा उच्चार अव्यवस्थित होता कामा नये. कारण ते मंत्र मंत्रवाद्यांनीच खरोखर रचलेले असतात. त्यांत चूक झाल्यानें कित्येक मंत्रवादी वेडे झाले आहेत ५७.

भगवीं करूनि तांबडीं । तीर्थाभिमानें जाले कापडी ।
भिके लागलीं बापुडीं । नाहीं अर्धघडीं विश्रांती ॥५८॥
तांबडीं वस्त्रें भगवी करून तीर्थांच्या अभिमानानें तीर्थाटन करणारे प्रवासी होतात. पण ते विचारे भिकेला मात्र लागतात, आणि अर्धघटकाही त्यांना विश्रांति म्हणून मिळत नाही ५८.

यमनियम बारा बारा । करितां अखंड वोरबारा ।
चोविसांमाजीं यांचा उभारा । नेणती सोयरा पंचविसावा ॥५९॥
बारा बारा यमनियमांची अखंड यातायात करतांना चोवीस तत्वांमध्येंच काय तो ह्यांचाचा पसारा कल्पिलेला असतो. पंचविसावें तत्त्व, म्हणजे सर्वांचा सोयरा जो परमात्मा, तो कोणालाच कळत नाही ५९.

एवं सांगीतल्या साधनांसी । आपमतीं करितां त्यांसी ।
बाधकता आहे सर्वांसी । म्यां तुजपासीं सांगीतली ॥६०॥
अशा प्रकारे जीं जीं साधनें सांगितलेली आहेत, ती जर आपल्याच मनानें करूं गेलें, तर त्या सर्वांमध्यें बाधा आहे, तीं मी तुला सांगितली. ६०.

करितां साधनें आपमतीसी । तेणें विघ्नें उपजती ऐशीं ।
तींच साधनें साधूपदेशीं । सर्वही सिद्धीसी पावती ॥६१॥
आपल्याच मतानें साधनें केली, तर त्यांत अशी विघ्नें उत्पन्न होतात. पण तीच साधनें साधूनें सांगितलेली असतील, तर ती सर्वही सिद्धीस जातात ६१.

साधु न सांगतां निर्धारीं । नाना साधनें हा काय करी ।
कोण विधान कैशी परी । निजनिर्धारीं कळेना ॥६२॥
साधूनें निश्चयानें कांही सांगितले नसतां साधक नाना प्रकारची साधनें काय करणार ? प्रत्येक साधनाचे विधान कोणते, त्याचा प्रकार कसा, हे आपल्याच विचारानें कधीं कळत नसते ६२.

न करितां साधनव्युत्पत्ती । केवळ जाण सत्संगती ।
मज पावले नेणों किती । तें मी तुजप्रती सांगेन ॥६३॥
पण कोणतीही साधनव्युत्पत्ति न करतां केवळ सत्संगतीनेच मला पावलेले लोक किती आहेत त्याची मोजदादसुद्धा करता येत नाही. ते मी तुला सांगेन ६३.

सत्सङ्गेन हि दैतेया यातुधाना मृगाः खगाः ।
गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धाश्चारणगुह्यकाः ॥ ३ ॥
विद्याधरा मनुष्येषु वैश्याः शूद्राः स्त्रियोऽन्त्यजाः ।
रजस्तमःप्रकृतयः तस्मिंस्तस्मिन् युगेऽनघ ॥ ४ ॥
[श्लोक ३-४] हे पुण्यशील उद्ववा ! प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगानेच दैत्यराक्षस, पशुपक्षी, गंधर्वअप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे मनुष्यांमध्ये वैश्य, शूद्र, स्त्री, अंत्यज इत्यादी रजोगुणीतमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतले आहे

पाहतां केवळ जडमूढ । रजतमयोनीं जन्मले गूढ ।
सत्संगती लागोनि दृढ । मातें सुदृढ पावले ॥६४॥
पाहूं गेलें तर केवळ जड, मूढ व शुद्ध रजतमयोनीमध्यें जन्मास आलेले असे असतांना तेसुद्धा दृढ सत्संगतीला लागून माझ्या ठिकाणीं स्थिर होऊन राहिले ६४.

दैत्य दानव निशाचर । खग मृग गंधर्व अप्सर ।
सिद्ध चारण विद्याधर । नाग विखार गुह्यक ॥६५॥
दैत्य, दानव, निशाचर, पक्षी, पशु, गंधर्व, अप्सरा, सिद्ध, चारण, विद्याधर, नाग, विषारी सर्प, गुह्यक, हे सर्व माझ्या पदाला पोचले ६५.

खग मृग सर्प पावले मातें । मानव तंव सहजें सरते ।
वैश्य शूद्र स्त्रियादि समस्तें । पावलीं मातें सत्संगें ॥६६॥
अशा प्रकारें पक्षी, पशु, सर्प हे सर्व जर मला पावले आहेत, मग मनुष्य त्यांच्याहून सहजच श्रेष्ठ आहेत. सत्संगानें वैश्य, शुद्र, स्त्रिया इत्यादि सर्व मला पावली आहेत ६६.

जे सकळवर्णधर्मांवेगळे । ज्यांच्या नामास कोणी नातळे ।
छाया देखूनि जग पळे । अत्यंत मैळे अंत्यज ॥६७॥
फार तर काय ? पण जे सर्व वर्णधर्मांतून बाहेर टाकलेले, ज्यांचे नावसुद्धा कोणी उच्चारीत नाही, ज्यांची छाया पाहूनच सारे जग लांब पळते, असे जे अत्यंत मलिन अंत्यज लोक ६७,

तिंहीं धरोनि सत्संगती । आले माझिया पदाप्रती ।
देव द्विज तयांतें वंदिती । अभिनव कीर्ति संतांची ॥६८॥
त्यांनीसुद्धा सत्संगति धरून ते माझ्या पदाला आलेले आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांना देव व ब्राह्मणसुद्धा वंदन करतात. अशी संतांची कीर्ति मोठी अपूर्व आहे ६८.

धरिलिया सत्संगती । निंद्य तेही वंद्य होती ।
उद्धवा तूं निष्पाप निश्चितीं । तरी सत्संगती करावी ॥६९॥
सत्संगति धरली तर, निंद्य असतात तेसुद्धा वंद्य होतात. उद्धवा ! तूं खरोखर निष्पाप आहेस, याकरितां तूं सत्संगति कर. ६९.

सोनें साडेपंधरें चोखडें । त्यासी रत्‍नाची संगती जोडे ।
तैं अधिकाधिक मोल चढे । मुकुटीं चढे महेशा ॥७०॥
सोनें आधींच शुद्ध साडेपंधराच्या दराचे सर्वोत्कृष्ट असलें, आणि त्याला रत्नाची संगति घडली (त्याच्या कोंदणांत रत्न बसविलें), तर ते अधिकाधिकच मोलाला चढते व राजाच्या मुगुटावर जाऊन बसते ७०.

तैंषीं पुण्य पुरुषा सत्संगती । जाहल्या अनंत सुख पावती ।
सुरवर त्यांतें वंदिती । शिवादि येती भेटीसी ॥७१॥
त्याप्रमाणें पुण्याच्या बळानें पुरुषाला सत्संगति प्राप्त झाली असतां असे पुरुष अनंत सुखें भोगतात, देवाधिदेव त्यांना वंदन करतात, आणि शंकर इत्यादिकही त्यांच्या भेटीला येतात ७१.

यमधर्म पायां लागती । तीर्थें पायवणी मागती ।
भावें धरिल्या सत्संगती । एवढी प्राप्ती पुरुषासी ॥७२॥
यमधर्म त्यांच्या चरणीं लागतात, व तीर्थें त्यांचे चरणतीर्थ मागतात. भक्तिभावानें सत्संगति धरली असतां पुरुषाला एवढा लाभ होतो ७२.

दैत्य राक्षस स्त्री शूद्र पाहीं । अंत्यज तरले म्हणसी कायी ।
त्या त्या युगाच्या ते ते ठायीं । बहुसाल पाहीं उद्धरिले ॥७३॥
दैत्य, राक्षस, स्त्रिया, शूद्र व अंत्यज तरले एवढेंच काय म्हणतोस ? अरे, त्या त्या युगांत त्या त्या ठिकाणीं आणखीही कित्येकांचा उद्धार झालेला आहे ७३.

बहवो मत्पदं प्राप्तास्त्वाष्ट्रकायाधवादयः ।
वृषपर्वा बलिर्बाणो मयश्चाथ विभीषणः ॥ ५ ॥
सुग्रीवो हनुमानृक्षो गजो गृध्रो वणिक्पथः ।
व्याधः कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्‍न्यस्तथापरे ॥ ६ ॥
[श्लोक ५-६] वृत्रासुर, प्रह्लाद, वृषपर्वा, बली, बाणासूर, मयदानव, बिभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, धर्मव्याध, कुब्जा, व्रजातील गोपी, यज्ञपत्‍न्या आणि इतर अनेकजणसुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करू शकले. (५-६)

वृत्रासुर गाइजे वेदीं । जो इंद्रासी मिसळला युद्धीं ।
युद्धींही अविरुद्ध बुद्धी । माझे निजपदीं पावला ॥७४॥
जो वृत्रासुर इंद्राशी युद्ध करीत होता, त्याचे वर्णन वेदांनीसुद्धा केलेले आहे. युद्धांत देखील त्याची बुद्धि विषमभावरहित होती म्हणून तो माझ्या पदाला येऊन पोचला ७४.

ऐकतां नारदाच्या गोठी । गर्भींच मजसी घातली मिठी ।
जो जन्मला कयाधूच्या पोटीं । भक्तजगजेठी प्रह्‍लादु ॥७५॥
नारदाच्या गोष्टी ऐकतांच ज्यानें गर्भातच मला मिठी घातली, तो भक्तराजशिरोमणि प्रल्हाद कयाधूच्या पोटी जन्मास आला होता ७५.

वृषपर्वा दैत्य उद्‍भटू । माझे पदीं झाला प्रविष्टू ।
बळीच्या द्वारी मी खुजटू । झालों बटू भिकेसी ॥७६॥
महापराक्रमी वृषपर्वा दैत्य माझ्या पदामध्यें लीन झाला. बळीच्या दारांत भिक्षा मागण्याकरितां मी बटु वामन झालों ७६.

छळें करितां बळिबंधन । छळितां मी छळिलों जाण ।
अंगा आलें द्वारपाळपण । बळीआधीन मी झालों ॥७७॥
कपटानें बळीला बद्ध केले असतां माझा छळणाराचाच उलट छळ झाला. माझ्याकडेच द्वारपाळाचे काम आले, आणि मीच बळीचा ताबेदार झालों ७७.

त्या बळीचा पुत्र बाणासुर । शिववरें मातला थोर ।
माझे पुत्राचा चोरिला पुत्र । दोहींचा हेर नारदू ॥७८॥
त्या बळीचा पुत्र बाणासुर, तो शिवाच्या वरप्रसादानें फार मत्त झाला होता. त्यानें माझ्या मुलाचाच मुलगा (प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध ) चोरून नेला ! आणि त्यांत दोघांचा हेर नारद ! ७८.

तो म्यां साधूनि धरिला चोरू । बाणीं केला अतिजर्जरू ।
छेदिला सहस्र भुजांचा भारू । शिव जीवें मारूं नेदीच ॥७९॥
तो चोर बाणासुर मी युक्तीनें धरला आणि बाणानें अत्यंत जर्जर केला. त्याच्या सहस्रभुजांचा भार तोडून टाकला. शंकरानें मध्यें येऊन त्याला जिवानिशी मात्र मारू दिले नाहीं ७९.

तो म्हणे हा भक्तपुत्र झणीं मारीं । मजही बळीची भीड भारी ।
अखंड मी असें त्याच्या द्वारी । यालागीं उद्धरीं बाणातें ॥८०॥
तो म्हणाला, “आपल्या भक्ताचा पुत्र मारशील हो !” मलाही बळीची मोठी भीड पडली म्हणून मी अखंड त्याच्या द्वारांत असतो, ह्यासाठी बाणालाही मी उद्धरिलें ८०.

मग संबोखावया शिवातें । बाण आपुले निजहस्तें ।
ऐक्यें शिवपदीं स्थापिलें त्यातें । कल्याणातें पावला ॥८१॥
मग शंकराला संतुष्ट करण्यासाठी मी आपल्या हातानें बाणाला स्वस्वरूपाला पोचवून शिवपदावर स्थापन केलें; तेव्हां तो सुख पावला ८१.

खांडववन अग्नीसी । अर्जुनें दीधलें खावयासी ।
तेथें जळतां मयासुरासी । म्यांचि तयासी उद्धरिलें ॥८२॥
अर्जुनानें खांडववन अग्नीला खावयास दिले, त्यांत मयासुर जळूं लागला असतां त्याला मीच उद्धरले ८२.

राक्षसकुळीं जन्मला जाण । शत्रूचा बंधू बिभीषण ।
माझ्या ठायीं अनन्यशरण । जीवप्राण तो माझा ॥८३॥
केवळ शत्रूचा भाऊ बिभीषण हा राक्षसांच्या कुळांत जन्मला होता. तो मला अनन्यभावानें शरण आल्यामुळें तो माझा केवळ जीवप्राण झाला ८३.

सुग्रीव हनुमंत जांबवंतू । यांचा पवाडा विख्यातू ।
जटायू उद्धरिला वनांतू । जो रावणें खस्तू केला होता ॥८४॥
सुग्रीव, मारुति व जांबुवंत ह्यांचे थोर पराक्रम प्रसिद्धच आहेत. रावणानें वनामध्यें जटायूला छिन्नभिन्न करून टाकला होता, तो मी उद्धरिला ८४.

गज सरोवरीं ग्रहग्रस्त । स्त्रियांपुत्रीं सांडिलाजीत ।
तो अंतकाळीं मातें स्मरत । आर्तभूत अतिस्तवनें ॥८५॥
गजेंद्र सरोवरामध्यें नक्रानें ग्रासला होता, त्याच्या बायकांमुलांनीही त्याला तसाच सोडून दिला, तेव्हां अंतकाळी दीनवाणीनें स्तवन करून तो माझें स्मरण करूं लागला ८५.

सांडूनि समस्तांची आस । पाहोनि वैकुंठाची वास ।
राजीव उचलूनि राजस । पाव परेश म्हणे वेगीं ॥८६॥
त्यानें सर्वांची आशा सोडून देऊन वैकुंठाच्या मार्गाकडे पाहून एक सुंदर कमल उचलून ‘हे परमेश्वरा ! अत्यंत त्वरेनें ये’ असें म्हणाला ८६.

त्या गजेंद्राचे तांतडी । वैकुंठींहूनि लवडसवडी ।
म्यां गरुडापुढें घालोनि उडी । बंधन तोडीं गजाचे ॥८७॥
त्या गजेंद्राची ती उत्कंठा पाहून वैकुंठाहून लगबगीनें मी गरुडाच्याही पुढे उडी टाकून त्या हत्तीचे बंधन तोडले ८७.

त्यासी पशुयोनीं जन्म होतें । परी तो अंतीं स्मरला मातें ।
पावला माझ्या निजधामातें । गाइजे त्यातें पुराणीं ॥८८॥
खरोखर त्याचा जन्म पशुयोनींत झालेला होता, पण अंतकाली त्यानें माझें स्मरण केले, म्हणून तो माझ्या निजधामाला आला. याकरितांच पुराणांनी त्याचे गुणगायन केले आहे ८८.

वैश्य तुळाधार वाणी । सत्य वाचा सत्य जोखणी ।
सत्यें पावला मजलागुनी । सत्यतोलणी त्याचें नांव ॥८९॥
तराजूत वजन करून जिन्नस विकणारा एक वैश्य वाणी होता. तो सत्य बोले, आणि विकावयाचे जिन्नस खरेपणानें वजन करी. तो सत्यव्रतानेच मला पावला, म्हणून त्याचे नांव ‘सत्यतोलणी’ असें पडले होते ८९.

अंत्यजांमाजीं धर्मव्याध । माझें पावला निजपद ।
जराव्याध गा प्रसिद्ध । करोनि अपराध उद्धरिला ॥९०॥
अंत्यजांमध्यें धर्मव्याध हाही माझ्या निजपदाला आला. जराव्याध तर प्रसिद्धच आहे. त्यानें अपराध केला असूनही मी त्याचा उद्धार केला ९०.

चरणीं विंधोनियां बाण । घायें घेतला कृष्णाचा प्राण ।
तो परीक्षिति जराव्याध जाण । कृष्णें आपण तारिला ॥९१॥
पायावर बाण मारून त्या आघातानेच कृष्णाचा प्राण घेतला; हे परीक्षिती ! तोच जराव्याध होय. त्याला कृष्णानें आपण होऊन उद्धरिलें ९१.

कौलिकांमाजीं गुहक देख । आला श्रीरामासंमुख ।
कर्म निरसलें निःशेख । निजधाम देख पावला ॥९२॥
कोळ्यांमध्यें गुहक पहा ! तो रामाच्या समोर आला तोंच त्याचे संपूर्ण कर्म नाश पावले व तो निजधामाला गेला ९२.

कुब्जा तीं ठायीं वांकुडी । नीट निजभावें चोखडी ।
तिच्या चंदनाची शुद्ध गोडी । अति आवडी मजलागीं ॥९३॥
कुब्जा तर तीन ठिकाणीं वांकडी होती. पण भक्तिभावानें मात्र ती सरळ व शुद्ध होती. तिच्या चंदनाची पवित्र गोडी काय सांगावी ? त्याची मला फारच आवड असे ९३.

तिणें चर्चूनियां चंदन । मन केलें मदर्पण ।
मी झालों तिजआधीन । निजधाम ते जाण पावली ॥९४॥
तिनें मला चंदनाचें विलेपन केले व मन मला अर्पण केले म्हणून मी तिच्या आधीन झालो. ती निजधामाला गेली ९४.

गोकुळींचिया गोपिका । संसारासी होऊनि विमुखा ।
तनमनप्राणें मजलागीं देखा । भाळोनि निजसुखा पावल्या ॥९५॥
हे पहा ! गोकुळांतील गोपिका संसारापासून परावृत्त होऊन शरीर, मन व प्राण यांनी मला भाळल्यामुळें त्याही आत्मसुख पावल्या ९५.

माझी गोपिकांसी परम आवडी । कीं मजचि गोपिकांची गोडी ।
पाहतां यांचे समान पाडीं । जाहलीं बापुडीं साधनें ॥९६॥
गोपिकांना माझी फार आवड होती, किंवा मलाच गोपिकांची आवड होती असें म्हण. पण आम्हां उभयतांच्या त्या आवडीच्या बरोबरीची योग्यता प्राप्त करून घेतांघेतां सर्व साधनें दुर्बळ झाली ९६.

सांडूनि संसाराची चाड । न धरूनि पतिपुत्रांची भीड ।
यज्ञपत्‍न्यांसी माझें कोड । भावार्थें दृढ भाविकां ॥९७॥
संसाराची गोडी सोडून देऊन पतीची किंवा पुत्रांचीही भीड न धरितां यज्ञप‍त्‍न्यांना माझीच फार आवड उत्पन्न झाली. भाविकांना भावार्थामुळें परमेश्वरावर अशीच दृढ श्रद्धा असते ९७

तिंहीं मज अर्पोनियां अन्न । माझें निजधाम पावल्या जाण ।
मज न पावतीच ते ब्राह्मण । जयांसी कर्माभिमान कर्माचा ॥९८॥
त्यांनी मला अन्न समर्पण करून त्या माझें निजधाम पावल्या. परंतु ज्यांना कर्माचा अभिमान होता, ते ब्राह्मण मात्र मला पोंचले नाहीत ९८.

एक ब्राह्मण अतिशास्त्रबळें । पत्‍नीसी येवूं नेदी मजजवळें ।
तुम्ही वेदशास्त्रांसी वेगळे । गोरक्ष गोंवळे केवीं पूजा ॥९९॥
एक ब्राह्मण आपल्या मोठ्या शास्त्राभिमानाच्या बळानें आपल्या स्त्रीला माझ्याजवळ येऊ देईना. तो लोकांना म्हणे की, तुम्ही वेदशास्त्रापासून भ्रष्ट झाला आहां. गुराख्याची आणि गवळ्यांची पूजा काय म्हणून करतां ? ९९.

येरी समस्तां जातां देखोन । तिचें मजलागीं तळमळी मन ।
अतिकर्मठ तो ब्राह्मण कठिण । अवरोधूनि राखिली ॥१००॥
ती स्त्री बाकीच्या सर्व स्त्रिया जात असलेल्या पाहून तिचें मन माझ्यासाठी तळमळू लागले, पण तो ब्राह्मण मोठा कर्मठ असून कठोर अंत:करणाचा होता. त्यानें तिला अडवून धरले १००.

पित्यानें लाविलीसी माझ्या हातीं । तेव्हांच मी तुझ्या देहाचा पती ।
मज सांडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी ॥१॥
तो म्हणाला, ” तुझ्या पित्यानें तुला माझ्या हातांत दिली, तेव्हांच मी तुझ्या देहाचा पति झाला आहे. मला सोडून तूं गवळ्याकडे कशी जातेस ?” १.

येरी म्हणे तूं या देहाचा पती । तो देह ठेवूनियां तयाप्रती ।
जीवित्वे मीनलिया मजप्रती । सायुज्य मुक्ति पावली ॥२॥
तेव्हा ती त्याला म्हणाली, “तू ह्या देहाचा पति आहेस.” असें म्हणून तो देह त्याच्यापुढे ठेवून ती प्राणानें येऊन मला मिळाल्यामुळें सायुज्यमुक्तीला गेली २.

ज्या माझिया प्राप्तीसी । साधक शिणती नाना सायासीं ।
तीं साधनें न करितां त्यांसी । अनायासीं मज पावल्या ॥३॥
ज्या माझ्या प्राप्तीसाठी साधक नानाप्रकारच्या कष्टांनी थकून जातात, ती साधनें न करितांही त्या स्त्रिया अनायासानें मला पावल्या ३.

ते नाधीतश्रुतिगणा नोपासितमहत्तमाः ।
अव्रतातप्ततपसः मत्सङ्गान्मामुपागताः ॥ ७ ॥
[श्लोक ७] त्यांनी वेदाध्ययन केले नव्हते की महापुरूषांची उपासना केली नव्हती त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रते किंवा तपश्चर्यासुद्धा केली नव्हती केवळ सत्संगानेच ते मला येऊन मिळले. (७)

तिंहीं नाहीं केलें वेदपठण । नाहीं गुरु केले केवळ शास्त्रज्ञ ।
व्रततपादि नाना साधन । नाहीं जाण तिंहीं केलें ॥४॥
त्यांनी वेदपठण केलें नाहीं, किंवा केवळ शास्त्रवेत्ते असे गुरु केले नाहीत, अथवा व्रते, तपें, इत्यादि अनेक प्रकारची साधनेंही त्यांनी केली नाहीत ४.

केवळ गा सत्संगतीं । मज पावल्या नेणों किती ।
एकभावें जे भावार्थी । त्यांसी श्रीपती सुलभू ॥५॥
अरे ! केवळ सत्संगतीनेच किती स्त्रिया माझ्या स्वरूपाला पावल्या त्यांची संख्या समजत नाही. एकनिष्ठेनें जे माझ्या भक्तीला लागतात, त्यांना मी श्रीकृष्ण सुलभच आहे ५.

केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः ।
येऽन्ये मूढधियो नागाः सिद्धा मामीयुरञ्जसा ॥ ८ ॥
[श्लोक ८] गोपी, गाई, यमलार्जुन इत्यादी वृक्ष व्रजातील हरीण इत्यादी पशू,या सर्वांनी भक्तीनेच मला प्राप्त करून घेतले याखेरीज कालियानागासारखे अज्ञानी केवळ प्रेमभावनेने सहजपणे मला मिळून कृतकृत्य झाले. (८)

केवळस्वरूप जे संत । त्यां माझी संगती झाली प्राप्त ।
काय करिसी तप व्रत । भावार्थें प्राप्त मज जाहलिया ॥६॥
जे संत केवळ आत्मस्वरूपीच होते, त्यांना माझी संगति प्राप्त झाली. भावार्थानेंच मला येऊन मिळाल्यावर तप, व्रत, ही काय करतोस ? ६.

होआवया माझें पद प्राप्त । त्यांसी भांडवल गा भावार्थ ।
भावबळें गा समस्त । पद निश्चित पावल्या ॥७॥
माझें पद प्राप्त होण्याला त्यांच्याजवळ भावार्थ हेच भांडवल आहे. सर्व गोपी भक्तिबळानेंच खरोखर माझ्या पदाला पोंचल्या ७.

ऐकोनि माझें वेणुगीत । गोपिका सांडूनि समस्त ।
निजदेहातें न सांभाळित । मज गिवसीत पातल्या ॥८॥
माझ्या मुरलीचा ध्वनि ऐकतांच गोपिका सर्व कामें सोडून देऊन आपल्या देहाचा सांभाळ करण्याचेंही भान न धरतां मला शोधीत माझ्याजवळ आल्या ८.

सांडूनि पतिपित्यांची चाड । न धरोनि वेदशास्त्रांची भीड ।
माझे ठायीं निजभाव दृढ । प्रेम अतिगोड गोपिकां ॥९॥
पतीची व पित्याची आवड सोडून आणि वेदाची किंवा शास्त्राची भीड न धरून त्यांनी माझ्या ठिकाणींच अढळ भक्ति ठेवली. गोपिकांना माझे प्रेम अत्यंत प्रिय वाटत होते ९.

पुत्रस्नेह तोडूनि घायें । विधीतें रगडूनि पायें ।
माझे आवडीचेनि लवलाहें । गोपिका मज पाहें पावल्या ॥१०॥
एकाच घावासरशी पुत्रस्नेह तोडून विधीला पायांखाली रगडून माझ्या आवडीसाठी त्वरेनें गोपिका मला पावल्या पहा ! १०.

त्याचपरी जाण गायी । वेणुध्वनीं वेधल्या पाहीं ।
व्याघ्रभय विसरल्या देहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥११॥
त्याचप्रमाणें गाईही मुरलीच्या नादानें वेडावून गेल्या. त्यांच्या देहाला असणारे वाघाचे भय देखील त्या विसरल्या व माझ्या ठिकाणीं लुब्ध झाल्या ११.

माझ्या वेणुध्वनीं वेधलें मन । वत्सें विसरलीं स्तनपान ।
मुखींचा कवळ मुखीं जाण । माझें ध्यान लागलें ॥१२॥
माझ्या मुस्लीच्या ध्वनीनें मन तल्लीन झाल्यामुळें वासरें स्तनपान करण्यासही विसरली. त्यांचा तोंडांतला घांस तोंडांत राहिला, इतके त्यांना माझे ध्यान लागलें होतें १२.

माझ्या वेणुश्रवणास्तव जिंहीं । निजवैर सांडूनि देहीं ।
येरयेरांवरी माना पाहीं । व्याघ्रहरिणें तींही विनटलीं ॥१३॥
माझ्या मुरलीचा नाद ऐकल्यामुळें ज्यांनी आपापसांतील वैर हृदयांतून काढून टाकलें, ते वाघ व ती हरिण देखील एकमेकांच्या शरीरावर माना ठेवून मुरलीच्या नादात तल्लीन झाली १३.

म्यां उपडिले यमलार्जुन । ते तरले हें नवल कोण ।
वृंदावनींचे वृक्ष तृण । माझ्या सांनिध्यें जाण उद्धरले ॥१४॥
मीं जे यमलार्जुन वृक्ष उपटले, ते तरले ह्यांत आश्चर्य काय ! पण वृंदावनांतील वृक्ष, तृण, ही देखील माझ्या साहचर्यानें उद्धरली हे लक्षांत ठेव १४.

मयूर तरले मोरपिसीं । गुल्मलतातृणपाषाणांसी ।
जड मूढ वृंदावनवासी । मत्सांनिध्यें त्यांसी उद्धारू ॥१५॥
मी मोराची पिसें धारण केल्यामुळें त्या मोरपिसांच्या योगानें मोरही तरले. वृंदावनांत असणारे लहान वृक्ष, वेली, गवत, पाषाण, इत्यादि जड व मूढ यांचाही माझ्या सन्निध्यानें उद्धार झाला १५.

माझे संगतीं अनन्य प्रीती । तेचि त्यांस शुद्ध भक्ती ।
तेणें कृतकृत्य होऊनि निश्चितीं । माझी निजप्राप्ती पावले ॥१६॥
माझ्या संगतींत अनन्य प्रीति असणें, तीच त्यांची शुद्ध भक्ति होय. त्यामुळेंच खरोखर कृतकृत्य होऊन ते माझ्या स्वरूपाला पोंचले १६.

माझेनि चरणघातें साचार । कालिया तरला दुराचार ।
नागनागिणी सपरिवार । माझेनि विखार उद्धरले ॥१७॥
अत्यंत दुराचारी असा कालिया सर्प माझ्या पायांच्या प्रहारानेंच खरोखर उद्धरला. त्याचे इतर नाग व नागिणी वगैरे सर्व सर्प परिवारासह माझ्यामुळें उद्धरले १७.

आपुली जे निजपदप्राप्ती । ते सत्संगेंवीण निश्चितीं ।
दुर्लभ हें उद्धवाप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥१८॥
आपल्या स्वस्वरूपाची जी प्राप्ति आहे, ती खरोखर सत्संगाशिवाय दुर्लभ आहे. हे उद्धवाला श्रीकृष्ण स्वतः सांगतात १८.

यं न योगेन साङ्ख्येन दानव्रततपोऽध्वरैः ।
व्याख्यास्वाध्यायसन्न्यासैः प्राप्नुयाद् यत्‍नवानपि ॥ ९ ॥
[श्लोक ९] उद्ववा ! प्रयत्‍नशील साधक, योग, सांख्य, दान, व्रत, तपश्चर्या, यज्ञ, वेदाध्ययन, स्वाध्याय, संन्यास इत्यादी साधनांच्याद्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत, ते सत्संगाने माझी प्राप्ती करून घेतात. (९)

योग याग व्रत दान । वेदाध्ययन व्याख्यान ।
तप तीर्थ ज्ञान ध्यान । संन्यासग्रहण सादरें ॥१९॥
योग, याग, व्रत, दान, वेदाध्ययन, वेदव्याख्यान, तप, तीर्थ, ज्ञान, ध्यान, भक्तिभावानें संन्यास घेणे १९,

इत्यादि नाना साधनें । निष्ठा करितां निर्बंघनें ।
माझी प्राप्ति दुरासतेनें । जीवेंप्राणें न पविजे ॥१२०॥
इत्यादि जी अनेक साधनें आहेत, ती निष्ठेनें त्यांच्या नियमांसह केली असतांही, जर मनांत दुराशा असली, तर कितीही जीव तोडला तरी माझी प्राप्ति होत नाही १२०.

यापरी शिणतां साधनेंसीं । माझी प्राप्ति नव्हे अतिप्रयासीं ।
ते गोपी पावल्या अप्रयासीं । सत्संगासी लाहोनी ॥२१॥
अशा प्रकारे साधनें करून थकले असतां अत्यंत प्रयासानेंही माझी प्राप्ति होत नाही. पण ती माझी प्राप्ति गोपी सत्संगाला प्राप्त करून घेऊन अनायासानें पावल्या २१.

त्या गोपिकांसी माझी प्रीती । मीचि त्यांची सत्संगती ।
सत्संगें निजपदप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२२॥
त्या गोपिकांच्या मनांत माझ्याविषयी फार प्रीति होती, आणि माझी संगति हीच त्यांची सत्संगति होती. उद्धवा ! सत्संगतीनेंच खरोखर आत्मपदाची प्राप्ति होते असे समज २२.

गोपिकांची सप्रेम स्थिती । ते तुज गोकुळीं झाली प्रतीती ।
तुजही न तर्केच त्यांची प्रीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥२३॥
गोपिकांची प्रेमळ अवस्था कशी होती, त्याचा अनुभव तुला गोकुळांत आलेलाच आहे. पण त्यांची प्रीति कशी होती ह्याविषयी तुला तर्कच करता येणार नाही. तें मी तुला सांगेन २३.

गोपिकांचें अत्यंत प्रेम । स्वमुखें सांगे पुरुषोत्तम ।
उद्धवाचें भाग्य उत्तम । आवडीचें वर्म देवो सांगे ॥२४॥
गोपिकांचे निस्सीम प्रेम श्रीकृष्ण आपल्याच मुखानें सांगू लागला. उद्धवाचे भाग्य फारच मोठे ! कारण, देव आवडीचेच वर्म सांगू लागला २४.

रामेण सार्धं मथुरां प्रणीते श्वाफल्किना मय्यनुरक्तचित्ताः ।
विगाढभावेन न मे वियोग तीव्राधयोऽन्यं ददृशुः सुखाय ॥ १० ॥
[श्लोक १० ] उद्ववा ! ज्यावेळी अक्रूर बलरामदादासह मला वज्रातून मथुरेला घेऊन निघाला, त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणीच चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखाने इतक्या व्याकूळ झाल्या होत्या की, माझ्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती. (१०)

बळिभद्रासमवेत तत्त्वतां । अक्रूरें मज मथुरे नेतां ।
तैं गोपिकांसी जे झाली व्यथा । ते सांगतां मज न ये ॥२५॥
अक्रूरानें खरोखरच मला बळरामासह मथुरेला नेले असतां त्या वेळी गोपिकांना जें दुःख झाले, ते मला सांगताही येत नाही २५.

ते त्यांची अवस्था सांगतां । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता ।
ऐसें देवो सांगतसांगतां । कंठीं बाष्पता दाटली ॥२६॥
त्यांची ती अवस्था सांगू लागलें असतां अद्यापीही माझ्या मनाला धीर धरवत नाही. असें देव सांगू लागले असतांच त्यांच्या गळ्यांत गहिवर दाटून आला २६.

सांगतां भक्तांचें निजप्रेम । प्रेमें द्रवला पुरुषोत्तम ।
जो भक्तकामकल्पद्रुम । कृपा निरुपम भक्तांची ॥२७॥
भक्तांचे खरे प्रेम सांगतां सांगतां श्रीकृष्ण प्रेमानें पाझरू लागला. कारण, जो भक्तकामनेंचा कल्पतरूच, अशा त्या श्रीकृष्णाला भक्तांची करुणा निरुपम होती २७.

मज मथुरे जातां देखोनी । आंसुवांचा पूर नयनीं ।
हृदय फुटे मजलागुनी । प्रेम लोळणी घालिती ॥२८॥
मला मथुरेला जातांना पाहून त्यांच्या नेत्रांतून अश्रुधारांचे पूर वाहू लागले. माझ्याकरितां त्यांचे हृदय तडतडां तुटू लागले. प्रेमानें त्या भूमीवर लोळणच घेऊ लागल्या २८.

पोटांतील परम प्रीती । सारितां मागें न सरती ।
धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागीं ॥२९॥
त्यांच्या अंत:करणातील प्रीति अत्यंत उत्कट होती. त्यामुळें त्यांनी मागें परत जावे असा मी प्रयत्न केला असतांही त्या मागे सरल्या नाहीत. पाय धरलेले सोटीचनात. माझ्यासाठी काकुळतीला येत होत्या ! २९.

नवल भावार्थ त्यांच्या पोटीं । माझ्या रूपीं घातली मिठी ।
सोडवितां न सुटे गांठी । श्वास पोटीं परतेना ॥१३०॥
त्यांच्या हृदयांतील भक्ति केवळ अपूर्व होती. त्यांनी माझ्या स्वरूपाला मिठी घातली, ती सोडवूं लागलें असतां त्यांच्या हातांची गांठ सुटेचना, व त्यांनी सोडलेला वास त्यांच्या देहांत परत जाईचना १३०.

लाज विसरल्या सर्वथा । सासुरां पतिपित्यां देखतां ।
माझे चरणीं ठेवूनि माथा । रडती दीर्घता आक्रंदें ॥३१॥
त्या सर्वस्वी लाज विसरूनच गेल्या. सासर्‍याच्या, पतीच्या व बापाच्या देखत माझ्या चरणांवर मस्तक ठेवून मोठमोठ्यानें आक्रोश करून रडूं लागल्या ३१.

मजवीण अवघें देखती वोस । माझीच पुनःपुन्हा पाहती वास ।
थोर घालोनि निश्वास । उकसाबुकसीं स्फुंदत ॥३२॥
माझ्याशिवाय त्यांना सर्वत्र ओस दिसू लागलें. माझीच वाट त्या पुनः पुन्हा आशेनें पाहूं लागल्या; आणि मोठे मोठे सुस्कारे सोडून ओक्साबोक्शी हुंदके देऊन म्हणाल्या ३२,

आमुचा जिवलग सांगती । घेऊनि जातो हा दुष्टमूर्ती ।
अक्रूरा संमुख क्रूर म्हणती । येती काकुळती मजलागीं ॥३३॥
“हा दुष्टमूर्ति आमचा जिवलग मित्र घेऊन जातो हो !” अक्रूराला त्याच्या तोंडासमोर “क्रूर” म्हणूं लागल्या आणि माझ्याजवळ अत्यंत काकुळतीला आल्या ३३.

उभ्या ठाकोनि संमुख । माझें पाहती श्रीमुख ।
आठवे वियोगाचें दुःख । तेणें अधोमुख विलपती ॥३४॥
माझ्यासमोर उभ्या राहून माझे शोभिवंत मुख त्यांनी पाहिलें, तोच त्यांना माझ्या वियोगाचे दु:ख आठवलें त्यामुळें खाली तोंड करून विलाप करूं लागल्या ३४.

ऐशिया मजलागीं आसक्त । माझ्या ठायीं अनन्यचित्त ।
विसरल्या देहसुखें समस्त । अतिअनुरक्त मजलागीं ॥३५॥
अशा त्या माझ्यावर आसक्त झालेल्या होत्या. त्यांनी आपलें चित्त अनन्यभावानें माझ्या ठिकाणींच ठेवलें होते. त्या आपली सर्व देहसुखें विसरून गेल्या. अशा त्या माझ्यावर अत्यंत प्रेम करीत होत्या ३५.

माझेनि वियोगें तत्त्वतां । त्यांसी माझी तीव्र व्यथा ।
ते व्यथेची अवस्था । बोलीं सांगतां मज न ये ॥३६॥
खरोखर माझ्या वियोगानें त्यांना माझ्याविषयी अत्यंत दुःख होत होते. त्या त्यांच्या दुःखाची अवस्था शब्दांनी मला सांगता येत नाही ३६

मजवेगळें जें जें सुख । तें गोपिकांसी केवळ दुःख ।
कैशी आवडी अलोलिक । मज हृदयीं देख न विसंबती ॥३७॥
माझ्याशिवाय जें जें म्हणून कांही सुख होते, तें तें त्या गोपिकांना केवळ दुःखच वाटू लागले. किती अलौकिक माझी आवड ही ! अंत:करणांतून मला त्या कांही सोडीचनात ३७.

मज गोकुळी असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता ।
ते आसक्तीची समूळ कथा । ऐक आतां सांगेन ॥३८॥
मला गोकुळांत राहणें घडलें असतांना त्या माझ्यावर आसक्तचित्त झाल्या होत्या. त्या आसक्तीची साद्यंत हकीकत ऐक. आतां सांगतों ३८.

तास्ताः क्षपाः प्रेष्ठतमेन नीता मयैव वृन्दावनगोचरेण ।
क्षणार्धवत्ताः पुनरङ्ग तासां हीना मया कल्पसमा बभूवुः ॥ ११ ॥
[श्लोक ११] अत्यंत प्रियतम असा मी वृंदावनामध्ये होतो, तेव्हा त्यांनी रासक्रीडेच्या रात्री, माझ्यासमवेत अर्ध्या क्षणाप्रमाणे घालविल्या होत्या परंतु प्रिय उद्ववा ! त्याच रात्री मी नसल्यामुळे त्यांना त्याच रात्री एकेका कल्पाप्रमाणे वाटू लागल्या. (११)

नवल गोपिकांचा हरिख । मज वृंदावना जातां देख ।
माझें पाहोनि श्रीमुख । प्रातःकाळीं सुख भोगिती ॥३९॥
त्या गोपिकांचा हर्ष किती आश्चर्यकारक होता ! असें पहा की, मला वृंदावनांत जातांना पाहतांच माझे मुख पाहून त्या प्रातःकाळी आनंदाचा उपभोग घेत ३९.

गायी पाजोनियां पाणी । गोठणीं बैसवीं मध्यान्हीं ।
तेथें उदकमिषें गौळणी । पाहावयालागूनी मज येती ॥१४०॥
दोन प्रहरच्या वेळी मी गाईंना पाणी पाजून आणून गोठणींत बसवीत असे. तेथें मला पाहण्यासाठी त्या गौळणी पाण्याच्या निमित्तानें येत असत १४०.

तेथें नाना कौतुकें नाना लीला । नाना परींच्या खेळतां खेळां ।
तो तो देखोनि सोहळा । सुखें वेल्हाळा सुखावती ॥४१॥
तेथे नानाप्रकारचे विनोद, अनेक प्रकारच्या लीला, व अनेक प्रकारचे खेळ खेळतांना ती प्रत्येक प्रकारची मौज पाहून त्या प्रेमळ गोपिका आनंदानें सुखी होत असत ४१.

मज सायंकाळीं येतां देखोनी । आरत्या निंबलोण घेऊनी ।
सामोर्‍या येती धांवोनी । लागती चरणीं स्वानंदें ॥४२॥
मला सायंकाळी गांवांत येतांना पाहून आरत्या व निंबलोण घेऊन त्या माझ्यासमोर धांवत येत, आणि मोठ्या आनंदानें चरणांवर मस्तक ठेवीत ४२.

ऐशीं त्रिकाळ दर्शनें घेतां । धणी न पुरे त्यांचे चित्ता ।
त्याहीवरी वर्तली कथा । एकांतता अतिगुह्य ॥४३॥
अशा रीतीनें सकाळी, दुपारी व संध्याकाळी अशी तिन्ही काळीं माझी दर्शनें घेत असतांही त्यांच्या चित्ताची तृप्तता होत नसे. त्याच्याही पलीकडची एक अत्यंत गुह्य व एकांतांत घडलेली गोष्ट आहे ४३.

त्या गुह्याचें निजगुज । उद्धवा मी सांगेन तुज ।
महासुखाचें सुखभोज । मी अधोक्षजा नाचिन्नलों ॥४४॥
उद्धवा ! त्या गुह्य गोष्टींतील महत्त्व मी तुला सांगेन. ते महान् सुखाचेंही सुखस्थान आहे. मी प्रत्यक्ष श्रीकृष्ण असतांही, त्या सुखांत नाचत राहिलों ४४.

तें सुख गोपिका जाणती । कीं माझें मी जाणें श्रीपती ।
जे रासक्रीडेच्या रातीं । झाली सुखप्राप्ती सकळिकांसी ॥४५॥
रासक्रीडेच्या रात्री आम्हां सर्वांना जी सुखप्राप्ति झाली, तें सुख गोपिकाच जाणतात, किंवा माझे मी श्रीकृष्णच जाणतों ४५.

त्या सुखाची सुखगोडी । रमा काय जाणे बापुडी ।
ब्रह्मादिकें केवळ वेडीं । त्या सुखाची गोडी नेणती ॥४६॥
त्या सुखांतील सुखगोडी, बिचारी लक्ष्मी तरी काय जाणणार ? ब्रह्मदेवादिकसुद्धा केवळ वेडे होऊन गेले. ते त्या सुखाची गोडी जाणूं शकले नाहींत ४६.

पावावया त्या सुखासी । सदाशिव झाला योगाभ्यासी ।
तरी प्राप्ती नव्हे तयासी । भुलला मोहिनीसी देखतां ॥४७॥
तें सुख मिळविण्याकरितां शंकर योगाभ्यासी झाला, तरीसुद्धा त्याला त्या सुखाची प्राप्ति झाली नाही. तो मोहिनीला पाहतांच भुलून गेला ४७.

उमा होऊनि भिल्लटी । तिणें भुलविला धूर्जटी ।
त्या सुखाची सुखगोष्टी । नेणती हटी तापसी ॥४८॥
पार्वती भिल्लीण होऊन तिनें शंकर भुलविला. त्या सुखाची सुखकारक गोष्ट हटयोगी व तपस्वी लोक जाणत नाहीत. १८.

जवळी असोनि निश्चितीं । संकर्षण महामूर्ती ।
त्यासी त्या सुखाची प्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥४९॥
उद्ध्वा ! महामूर्ति संकर्षण हा खरोखर जवळ असून त्याला त्या सुखाची प्राप्ति मुळींच झाली नाहीं १९.

रासक्रिडा गोपिकांप्रती । कोणी म्हणेल कामासक्ती ।
तेथ कामाची कैंची प्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥१५०॥
गोपिकांजवळ ही जी रासक्रीडा झाली, त्यावर कोणी असें म्हणेल की, ती केवळ कामासक्ति होती. पण तेथें कामाची प्राप्ति कोठली ? उद्धवा ! नीट ऐकून घे १५०.

शिवातें जिणोनि फुडा । काम म्हणे मी सबळ गाढा ।
माझी भेदावया रासक्रिडा । वाऊनि मेढा चालिला ॥५१॥
कामानें शंकराला पूर्णपणे जिंकल्यामुळें तो काम म्हणू लागला की, “मी मोठा पराक्रमी आहे !” तो आपलें धनुष्यबाण सज्ज करून माझ्या रासक्रीडेचा भेद करण्यासाठीं निघाला ५१.

जेथ माझ्या स्वरूपाचें वोडण । तेथ न चले कामाचें कामपण ।
मोडले मदनाचे बाण । दृढ वोडण स्मरणाचें ॥५२॥
परंतु जेथे माझ्या स्वरूपाची ढाल संरक्षणासाठी असेल, तेथे कामाचा कामपणा कांही चालत नाही. मदनाच्या बाणांचे अगदी तुकडे तुकडे उडून गेले, इतकी माझ्या स्मरणाची डाल बळकट आहे ५२.

काम कामिकां चपळदृष्टी । निजक्षोभाची तीक्ष्ण बाणाटी ।
संधि साधूनि विंधे हटी । ते नव्हेचि पैठी हरिरंगीं ॥५३॥
मदनाची दृष्टि मोठी चपल असते. तो पराक्रमी मदन संधि साधून कामुकांना आपल्या तीक्ष्ण बाणानें विद्ध करतो, पण ती कामबाणवृष्टि श्रीहरीच्या रंगामध्यें मुळींच टिकाव धरीत नाही ५३.

जेथ मी क्रीडें आत्मारामू । तेथ केवीं रिघे बापुडा कामू ।
माझे कामें गोपिका निष्कामू । कामसंभ्रमू त्यां नाहीं ॥५४॥
ज्या ठिकाणीं मी प्रत्यक्ष आत्मारामच क्रीडा करीत असतो, तेथें बिचारा काम घुसणार कसा ? माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेंच गोपिका कामरहित झाल्या. त्यांना कामवासना उरली नाहीं ५४.

जो कोणी स्मरे माझें नामू । तिकडे पाहूं न शके कामू ।
जेथ मी रमें पुरुषोत्तमू । तेथ कामकर्मू रिघेना ॥५५॥
जो जो कोणी माझ्या नामाचे स्मरण करतो, त्याच्याकडे काम पाहूंच शकत नाही. ज्या ठिकाणीं मी पुण्योत्तम रममाण होतो. त्या ठिकाणीं कामकर्माचा रिघाव होत नाहीं ५५.

कामू म्हणे कटकटा । अभाग्य भाग्यें झालों मोटा ।
रासक्रीडेचिया शेवटील गोटा । आज मी करंटा न पवेंचि ॥५६॥
काम म्हणतो, “हाय हाय ! मी भाग्याला चढूनही मोठा अभागी झालों ! रासक्रीडेंतील शेवटच्या गोष्टीपर्यंत आज मी करंटा पोंचूं शकत नाही !”५६.

देखोनि रासक्रीडा गोमटी । काम घटघटां लाळ घोटी ।
लाज सांडूनि जन्मला पोटीं । त्या सुखाचे भेटीलागोनि ॥५७॥
ती मौजेची रासक्रीडा पाहून काम घटांघटां लाळ घोंटीत बसला, तरी त्याला त्यांतील लेशही प्राप्त झाला नाही. म्हणून ते सुख मिळण्यासाठीं अभिमानाची लाज सोडून देऊन तो माझ्याच पोटीं जन्मास आला ५७.

तो काम म्यां आपुले अंकीं । केला निजभावें निजसुखी ।
तें माझें निजसुख गोपिकीं । रासमिषें कीं भोगिलें ॥५८॥
तो मदन मग मी आपल्या मांडीवर घेतला व लाडिकपणानें त्याला आनंदित केलें. असें तें माझें आत्मसुख गोपींनी रासक्रीडेच्या निमित्तानें भोगले ५८.

ते रासक्रीडेची राती । म्यां ब्रह्मषण्मास केली होती ।
गोपिका अर्धक्षण मानिती । वेगीं कां गभस्ती उगवला ॥५९॥
ती रासक्रीडेची रात्र मी ब्रह्मदेवाच्या सहा महिन्यांएवढी (मनुष्यांच्या ३६०००० महायुगांएवढी) केली होती. पण गोपिका ती रात्र अर्ध्या क्षणासारखी मानून सकाळी “इतक्या लौकर सूर्य कां उगवला ?” असें त्या म्हणाल्या ५९.

जेथ माझा क्रीडासुखकल्लोळ । तेथ कोण स्मरे काळवेळ ।
गोपिकांचें भाग्य प्रबळ । माझें सुख केवळ पावल्या ॥१६०॥
जेथें माझ्याच क्रीडासुखाच्या लाटा उसळत होत्या, तेथें काळ आणि वेळ कोण स्मरणार ? गोपींचे भाग्य मोठे बलवत्तर, म्हणूनच माझें शुद्ध सुख त्यांना मिळालें १६०.

ऐशा माझिया संगतीं । भोगिल्या राती नेणों किती ।
तरी त्यांसी नव्हे तृप्ती । चढती प्रीती मजलागीं ॥६१॥
अशा माझ्या संगतीत त्यांनी किती रात्री उपभोगिल्या त्याची गणतीच समजत नाही. तरी त्यांची तृप्ति म्हणून झाली नाही. माझ्यावर त्यांचे प्रेम वाढतच गेलें ६१.

गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती ।
रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥
गोपिकांनी माझी भक्ति करून मला श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेतलें, आणि माझी सुखप्राप्ति होण्याकरितां एकांतांत रासक्रीडा मागितली ६२.

त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती ।
तैं परतल्या म्हणोनि ‘नेति नेति’ । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥
त्या गोपिका म्हणजे वेदोदरांतील श्रुति होत असें समज. श्रुतीच्या रूपानेंसुद्धा त्यांना माझी प्राप्ति झाली नाहीं, म्हणून त्या “नेति नेति” “येथे कांही परमेश्वरप्राप्ति नाहीं, येथें कांहीं परमेश्वरप्राप्ति नाही,” असें म्हणून तेथून माघाऱ्या फिरल्या. माझ्या सुखाची संगति त्यांना तेथें मिळाली नाहीं ६३.

विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण ।
असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥
विषयबुद्धि हें मुख्य अज्ञान होय. ते असलें की मी कधीही भेटत नाही हे लक्षांत ठेव. किंवा वेदोक्तविधीचे ज्ञातेपण असले, तरी त्यामुळेंही मी पूर्णत्वानें भेटावयाचा नाही ६४.

जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख ।
श्रुति जाणोनि हें निष्टंक । गोकुळीं त्या देख सुखार्थ आल्या ॥६५॥
जाणीव आणि नेणीव निखालस नाहींशी झाल्यावर माझे आत्मसुख प्राप्त होते, श्रुतींनी हे निश्चितपणे जाणिलें, म्हणून त्या सुखासाठींच त्या गोकुळांत आल्या ६५.

त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती ।
रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥
त्याच सर्व श्रुति गोपींच्या रूपानें गोकुळांत आल्या असे समज. आणि रासक्रीडेच्या निमित्तानें एकांतामध्यें त्या माझ्या सुखप्राप्तीचा उपभोग घेऊं लागल्या ६६.

हाही असो अभिप्रावो । उद्धवा ज्यासी जैसा भावो ।
त्यालागीं मी तैसा देवो । यदर्थीं संदेहो असेना ॥६७॥
उद्धवा ! हे बोलणेंही एका बाजूस राहू द्या. ज्याचा जसा भाव असतो, त्यासाठीं मी तसाच देव होतो. ह्यांत संशय नाहीं ६७.

उद्धवा मी भक्तांसी देख । कोणे काळीं नव्हें विमुख ।
जो तैसा भावी भाविक । तैसा मी देख तयासी ॥६८॥
हे पहा उद्धवा ! मी भक्तांना कोणत्याही वेळी विन्मुख होत नाही. जो भक्त जशी भावना धरतो, त्याला मी तसाच फलद्रूप होतो पहा ! ६८.

मी जनांसी सदा सन्मुख । जनचि मजसी होती विन्मुख ।
यासी कांहीं न चले देख । दाटूनि दुःख भोगिती ॥६९॥
मी लोकांना नेहमी सन्मुख आहे. पण लोकच मला विन्मुख होतात. त्याला कांही इलाज चालत नाही. ते मुद्दाम होऊन दुःख भोगतात ६९.

मी सकाम सकामाच्या ठायीं । निष्कामासी निष्काम पाहीं ।
नास्तिका मी लोकीं तिहीं । असतूचि नाहीं नास्तिक्यें ॥१७०॥
मी सकामाच्या ठिकाणीं सकाम असतों व निष्कामाच्या ठिकाणीं निष्काम असतो पहा ! नास्तिकाला तर मी तिन्ही लोकांत असतांही नास्तिकपणामुळें नाहीसा होतो १७०.

असो हे किती उपपत्ती । ऐक गोपिकांसी माझी प्रीती ।
माझे सुखसंगें भोगिल्या राती । त्या मानिती निमेषार्ध ॥७१॥
असो, ही उपपत्ति किती सांगावी ? ऐक. गोपींना माझी प्रीति होती म्हणून माझ्या सुखाच्या संगतींत त्यांनी ज्या रात्री भोगिल्या, त्या त्यांनी निमिषार्धासारख्या मानल्या ७१

माझ्या वियोगें त्या त्या राती । ज्या आलिया यथास्थिती ।
त्या गोपिका कल्पप्राय मानिती । सन्निध स्वपती असतांही ॥७२॥
पण त्यांना निसर्गतःच ज्या ज्या रात्री प्राप्त झाल्या होत्या, त्या त्या रात्री माझ्या वियोगानें त्या गोपिका-त्यांचे पति जवळ असतांही-कल्पाप्रमाणें मोठ्या अशा मानूं लागल्या ७२.

त्यांच्या दुःखाची अवस्था । बोलें न बोलवे सर्वथा ।
माझेनि वियोगें मातें स्मरतां । समाधिअवस्था पावल्या ॥७३॥
त्यांच्या या दुःखाची स्थिति शब्दानें मुळीच सांगवत नाही. माझ्या वियोगामध्यें माझे स्मरण करीत असतां त्या समाधिअवस्था पावल्या ! ७३.

ता नाविदन् मय्यनुषङ्गबद्ध धियः स्वमात्मानमदस्तथेदम् ।
यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्यः प्रविष्टा इव नामरूपे ॥ १२ ॥
[श्लोक १२] माझ्याठायी मनबुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले आप्तेष्ट, स्वतःचे शरीर, इहलोक, परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नव्हती जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपले नामरूप विसरून जातात, तसे त्यांचे झाले होते. (१२)

मज गोकुळीं असतां । माहे ठायीं आसक्तचित्ता ।
हे अवघी समूळ कथा । तुज म्यां तत्त्वतां सांगीतली ॥७४॥
मला गोकुळांत राहणे घडले असतांना त्या गोपी माझ्या ठिकाणीं आसक्तचित्त झालेल्या होत्या. ही सर्व साद्यंत हकीकत मी तुला यथातथ्य रीतीनें सांगितली ७४.

ऐशियांसी म्यां अतिनिचाडतां । कृतघ्नाचे परी सांडूनि जातां ।
माझ्या वियोगकाळींची व्यथा । पाषाण पाहतां उतटती ॥७५॥
अशा त्या गोपींना मी अत्यंत निष्ठुरपणानें कृतघ्नासारखा सोडून जात असतां त्या माझ्या वियोगकाळींच्या असह्य दुःखानें पाषाणसुद्धा उकलले ! ७५.

यापरी मजवेगळ्या असतां । मागें माझी कथा वार्ता ।
सदा माझें स्मरण करितां । मदाकारता पावल्या ॥७६॥
अशा रीतीनें त्या माझ्यापासून दूर झाल्या असतांही मागाहून माझीच कथा, माझेच गुणानुवाद व सदोदित माझेंच स्मरण करतां करतां त्या मत्स्वरूपाला पोंचल्या ७६.

करितां दळण कांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण ।
कीं आदरिल्या दधिमंथन । माझें चरित्रगायन त्या करिती ॥७७॥
त्या दळणकांडण करतांना माझे गुण मोठमोठ्यानें गात असत. किंवा दही घुसळण्याचें कार्य त्यांनी चालविले असतांही त्या माझेच चरित्रगायन करीत ७७.

करितां सडासंमार्जन । गोपिकांसी माझें ध्यान ।
माझेनि स्मरणें जाण । परिये देणें बालकां ॥७८॥
सडाससंमार्जन करतांना त्या गोपिकांना माझेंच ध्यान लागलेले असे. फार तर काय, पण माझे स्मरण करूनच त्यांचे बालकांना झोके देणें चालत असे ७८.

गायीचें दोहन करितां । माझे स्मरणीं आसक्तता ।
एवं सर्व कर्मीं वर्तता । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥७९॥
गाईची धार काढतांना माझ्याच स्मरणावर त्यांची आसक्ति असे. तात्पर्य, सर्व कामें करतांना माझ्या विस्मरणाची गोष्टच त्या विसरून गेल्या होत्या ७९.

करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन ।
आसन भोजन प्राशन । करितां मद्ध्यान तयांसी ॥१८०॥
कोठेंही जाणें येणें करीत असतांना त्यांचे मन माझ्या ठिकाणीं अखंडपणे लागलेले होते. बसतांना, जेवतांना, पितांना त्यांना माझेच ध्यान लागलेले असे १८०.

एवं मज गेलियापाठीं । ऐशी माझी आवडी मोठी ।
अखंड माझ्या ठायीं दृष्टीं । माझ्याचि गोष्टी सर्वदा ॥८१॥
सारांश, मी गेल्यावर त्यांना माझी अशी अतिशय आवड लागली होती. त्यांचे डोळे अखंड मजकडेच लागून राहिले होते. त्या सदासर्वदा माझ्याच गोष्टी बोलत असत ८१.

ऐसी अनन्य ठायींच्या ठायीं । गोपिकांसी माझी प्रीती पाहीं ।
त्या वर्ततांही देहगेहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥८२॥
अशी अनन्य आणि सर्व ठिकाणीं गोपींची आणि माझी प्रीति होती. त्या घरादारांत वागत असूनही माझ्यामध्यें रंगून गेल्या होत्या ८२.

यापरी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार ।
विसरल्या पुत्रभ्रतार । निजव्यापार विसरल्या ॥८३॥
अशा प्रकारे त्यांची बुद्धीच मत्स्वरूप झाली होती, म्हणून त्या घरदारही विसरून गेल्या. त्या पुत्र व पति विसरून गेल्या आणि आपला कामधंदाही त्या विसरल्या ८३.

विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्वदुःख ।
विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासें ॥८४॥
माझा एक निदिध्यास लागल्यामुळें त्या विषयसुख विसरल्या. त्या शीत-उष्ण इत्यादि द्वंद्वदुःखें विसरल्या. त्या तहान-भूक विसरल्या ८४.

जेणें देहें पतिपुत्रांतें । आप्त मानिलें होतें चित्तें ।
तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनी ॥८५॥
ज्या देहामुळें पतीला व पुत्राला त्यांच्या मनानें आप्त असे मानलेलें होते, त्या देहाला विसरून तें मनच माझ्यामध्यें रममाण झाले. ८५.

विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख ।
विसरल्या नामरूप देख । माझें ध्यानसुख भोगितां ॥८६॥
त्या इहलोक व परलोक विसरल्या. त्या संपूर्ण कार्य कारण विसरल्या. हे पहा ! माझें ध्यान करीत राहिल्यामुळें होणाऱ्या आनंदसुखाचा उपभोग घेतां घेतां त्या आपले नाम व रूप देखील विसरल्या ८६.

निरसोनि तत्त्वांचे विकार । समाधि पावे मुनीश्वर ।
तो विसरे जेवीं संसार । तेवीं मदाकार गोपिका ॥८७॥
चोवीस तत्वांचे सर्व विकार निरसून टाकून मुनिश्रेष्ठ समाधि लावतो. तो त्या समाधींत ज्याप्रमाणें सर्व संसार विसरतो, त्याप्रमाणें गोपीही सर्व संसार विसरून मत्स्वरूपच झाल्या ८७.

जेवीं कां नाना सरिता । आलिया सिंधूतें ठाकितां ।
तेथें पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥८८॥
किंवा भनेक प्रकारच्या नद्या आपल्या समुद्राला मिळाल्या असतां त्या जशा समुद्राशी एकरूपता पावून आपली नांवे व रूपें विसरून जातात ८८,

तेवीं गोपिका अनन्यप्रीतीं । माझी लाहोनियां प्राप्ती ।
नामरूपाची व्युत्पत्ती । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥८९॥
त्याप्रमाणें गोपिकाही अनन्यप्रीतीनें मत्स्वरूपाला मिळाल्यामुळें नामरूपाचे बोलणेंच विसरून गेल्या. त्यांना ह्यांपैकी कशाचीच स्फूर्ति होईना ८९.

सच्चिदानंदस्वरूपप्रभावो । नेणतां माझा निजस्वभावो ।
गोपिकांचा अनन्यभावो । परब्रह्म पहा हो पावल्या ॥१९०॥
सच्चिदानंदाच्या स्वरूपाचा प्रभाव काय सांगावा ? खरोखर माझा स्वभाव त्यांना माहीत नसतांही त्या गोपिकांचा अनन्यभाव माझ्याच ठिकाणीं होता. त्यामुळेंच त्या परब्रह्मस्वरूपाला पोंचल्या पहा ! १९०.

मत्कामा रमणं जारमस्वरूपविदोऽबलाः ।
ब्रह्म मां परमं प्रापुः सङ्गाच्छतसहस्रशः ॥ १३ ॥
[श्लोक १३] त्या माझे खरे रूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जारभावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या असे असूनही त्या शेकडो, हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानेच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतले. (१३)

त्या केवळ अबला निश्चितीं । मत्संगाची अतिप्रीती ।
तेही संगती कामासक्ती । शास्त्रप्रवृत्तीविरुद्ध ॥९१॥
त्या गोपी केवळ अबला होत्या तर खरेंच; पण माझ्या संगतीचे त्यांना अत्यंत प्रेम होते. आणि ती संगतिसुद्धा कामासक्तीची म्हणजे शास्त्रप्रवृत्तीच्या विरुद्ध अशी होती ९१.

मी भ्रतारू नव्हें शास्त्रविधी । रूपें मदनमोहन त्रिशुद्धी ।
मज रतल्या ज्या अविधी । जारबुद्धीं व्यभिचारें ॥९२॥
मी शास्त्राप्रमाणें त्यांचा पति नव्हतो. पण खरोखर स्वरूपानें मात्र मदनालाही मोह पाडणारा असा सुंदर होतो. ज्या स्त्रिया शास्त्रप्रवृत्तीविरुद्ध जारबुद्धीनें व व्यभिचाराच्या हेतूनें माझ्याशी रममाण झाल्या ९२,

चौं प्रकारींच्या कामिनी । हस्तिनी इत्यादि पद्मिनी ।
चौघींसी चौं मुक्तिस्थानीं । काममोहनीं मी रमवीं ॥९३॥
त्या चार प्रकारच्या स्त्रिया होत्या. हस्तिणी, श्ंखिणी, चित्रिणी व पद्मिनी. त्या चौघींना चार मुक्तींच्या ठिकाणीं कामाच्या मोहांत मी रमवीत होतों ९३.

इतर पुरुषांचे संगतीं । क्षणभंगुर सुख भोगिती ।
अविनाश निजसुखप्राप्ती । कामासक्ती माझेनि ॥९४॥
इतर कोणत्याही पुरुषाच्या संगतींत स्त्रिया क्षणभंगुर सुख भोगतात. पण माझ्या कामासक्तीनें कधींही नाश न पावणारी अशी निजसुखाची प्राप्ति होते ९४.

स्वपतिसंगें क्षणिक आनंदू । माझ्या सुखाचा निजबोधू ।
नित्य भोगिती परमानंदू । स्वानंदकंदू सर्वदा ॥९५॥
आपल्या पतीच्या संगतीनें क्षणभर आनंद होत असे, पण माझ्या सुखाचा आत्मानंद प्राप्त झाल्यामुळें स्वानंदाचा कंद असा जो परमानंद त्याचाच त्या सर्वकाल उपभोग घेत असत ९५.

यालागीं गा अबळा चपळा । सांडूनि स्वपतीचा सोहळा ।
मजचि रातल्या सकळा । माझी कामकळा अभिनव ॥९६॥
म्हणूनच त्या चंचल स्त्रिया आपल्या पतीचा सुखसोहाळा सोडून देऊन सर्वस्वी माझ्याच ठिकाणीं रममाण झाल्या. अशी माझी कामकला अपूर्व आहे ! ५६.

नव रसांचा रसिक । नवरंगडा मीच एक ।
यालागीं माझ्या कामीं कामुक । भावो निष्टंक गोपिकांचा ॥९७॥
नऊ रसांचा रस जाणणारा, नित्य नवे नवे रंग उत्पन्न करणारा असा एक मीच आहे. म्हणूनच गोपी माझ्या कामावर लुब्ध झाल्या होत्या. त्या गोपिकांची भक्तीही तशीच अखंड होती ९७.

जीवाआंतुलिये खुणे । मीचि एक निववूं जाणें ।
ऐसें जाणोनि मजकारणें । जीवेंप्राणें विनटल्या ॥९८॥
जिवाच्या आंतील गोष्टीचें समाधान करावयाचे फक्त एक मीच जाणतों. हेंच मनांत आणून त्या जीवाभावानें मलाच प्राप्त झाल्या. ९८.

अंगीं प्रत्यंगीं मीचि भोक्ता । सबाह्य सर्वांगे मीचि निवविता ।
ऐसें जाणोनि तत्त्वतां । कामासक्तता मजलागीं ॥९९॥
अंगांचा व प्रत्यंगांचा उपभोक्ता मीच, अंतर्बाह्य सर्वांग निवविणारा मीच, हाच सर्व खरा प्रकार जाणून त्या माझ्याजवळ कामासक्तता बाळगीत. ९९.

हावभावकटाक्षगुण । मीचि जाणें उणखूण ।
कोण वेळ कोण लक्षण । कोण स्थान मिळणीचें ॥२००॥
हावभाव, कटाक्ष इत्यादि गुण व त्यांतील गुप्त मीच जाणतो. कोणत्या वेळीं कोणते लक्षण समजावयाचे, कोणत्या वेळीं कसे व कोठे एकत्र व्हावयाचें, हेही मलाच ठाऊक आहे २००.

जे निजोनियां निजशेजारीं । जे काळीं माझी इच्छा करी ।
तेचि काळीं तेचि अवसरीं । सुखशेजारीं मी निववीं ॥१॥
जी आपल्या बिछान्यावर निजून ज्या वेळी माझी इच्छा करीत असे, त्याच वेळीं आणि अगदी त्याच क्षणाला मी तिला आनंददायक सहवासानें तृप्त करीत असें १.

मज कुडकुडें नाहीं येणें । नाहीं कवाड टणत्कारणें ।
नित्य निजशेजें निववणें । जे जीवेंप्राणें अनुसरली ॥२॥
मला कधीं लपून छपून यावे लागत नसे, किंवा दारावर खुणेचा आवाजही करावा लागत नसे. जी जीवाभावानें मला वश झाली, तिला मी नेहमीं तिच्या शय्येवरच तृप्त करीत असें २.

ऐसा सर्वकामदायक । पुरुषांमाजीं मीचि एक ।
हा गोपिकीं जाणोनि विवेक । भाव निष्टंक धरियेला ॥३॥
असा सर्व मनोरथ पूर्ण करणारा पुरुषांमध्यें एक मीच आहे, हा विचार जाणून गोपींनी सर्वस्वीं माझीच शुद्ध भक्ति धरिली होती ३.

ज्यासी भाळले निष्काम तापसी । ज्यासी भाळले योगी संन्यासी ।
गोपी भाळल्या त्यासी । देहगेहांसी विसरोनी ॥४॥
ज्याच्यावर निष्काम तपस्वीही भुलून गेले आहेत, ज्याच्यावर योगी आणि संन्यासीही मोहित झाले आहेत, त्याच्यावरच देह व घरदार ही विसरून गोपी भाळल्या होत्या ४.

अंधारीं गूळ खातां । कडू न लगे तो सर्वथा ।
तेवीं नेणोनि माझी सच्चिदानंदता । मातें सेवितां मी जाहल्या ॥५॥
अंधारांत गूळ खाल्ला असतां तो मुळींच कडू लागत नाही. त्याप्रमाणें माझें सच्चिदानंद स्वरूप न जाणतांही माझी सेवा करतां करतां त्या मत्स्वरूप झाल्या ५.

परिस मानोनि पाषाण । फोडूं जातां लोहाचा घण ।
लागतांचि होय सुवर्ण । तैशा जाण गोपिकां ॥६॥
परीस हा दगडच आहे असे समजून लोखंडाच्या घणानें त्याला फोडूं लागले असतां तो लोखंडाचा घण त्याला लागतांच घणाचे सोनें होते. त्याप्रमाणेंच गोपींची अवस्था झाली, हें लक्षांत ठेव ६.

विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता ।
तेवीं जारबुद्धीं मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥७॥
विष असे समजून अमृत घेतले असतां मृत्यु टळून अमरत्व प्राप्त होते. त्याप्रमाणें जारबुद्धीनें माझ्या भजनीं लागल्या असतां त्या माझ्या सायुज्यपदाला पोंचल्या ७.

म्यां गोपिकांसी कामू केला । कीं त्यांचा सर्व कामू हरिला ।
विचारितां अर्थ एथिला । मोक्ष फावला मत्कामें ॥८॥
मी गोपींशी कामविलास केला, की त्यांचा सर्व काम नष्ट केला, या प्रकरणांतील अर्थाचा विचार केला असतां असेंच दिसून येते की, त्यांना माझ्याविषयींच्या कामानें मोक्षच प्राप्त झाला ८.

ज्यांसी झाली माझी संगती । त्या एक दोन सांगों किती ।
शत सहस्र अमिती । निजपदाप्रती पावल्या ॥९॥
ज्यांना माझी संगति घडली, अशा त्या एक, दोन, किती सांगू ? शंभर-हजार-नव्हे, असंख्य गोपिका आत्मपदाला गेल्या ९.

वैरागराच्या मणीप्रती । खडे लागले हिरे होती ।
तैशी गोपिका माझ्या संगतीं । नेणों किती उद्धरल्या ॥२१०॥
वैरागर नांवाच्या रत्नाला खडे लागले तर ते हिरेच होतात. त्याप्रमाणें माझ्या संगतीनें किती गोपिका उद्धरल्या त्यांची संख्याच मी जाणूं शकत नाही २१०.

मी परब्रह्ममूर्ति चोखडी । माझिया व्यभिचारपरवडी ।
धुतल्या अविद्यापापकोडी । मुक्ती रोकडी पावल्या ॥११॥
मी परब्रह्माची सुंदर मूर्ति. माझ्याशी व्यभिचार करण्याच्या योगानें गोपिकांची अविद्या आणि पातकांच्या राशी धुतल्या जाऊन त्या गोपिका प्रत्यक्ष मुक्ति पावल्या. ११

मी अथवा माझे संत । संगती होईल ज्यांसी प्राप्त ।
ते मज पावले निश्चित । संदेह येथ न धरावा ॥१२॥
मी अथवा माझे संत यांची संगति ज्यांना प्राप्त होईल, ते निश्चितपणे मला पोंचले. ह्याविषयी संशय करूं नये १२.

माझे स्वरूपावरी लोक । विकल्पें ठेविती नाना दोख ।
संत माझे निर्दोख । तत्संगें सुख निर्दुष्ट ॥१३॥
कित्येक लोक विकल्पाच्या योगानें माझ्या स्वरूपावर अनेक प्रकारची दूषणे ठेवतात. परंतु माझे संत निर्दोष असल्यामुळें, त्यांच्या संगतीनें निर्मल सुख प्राप्त होते १३.

उद्धवा त्वांही येचि अर्थीं । बहुत न करावी व्युत्पत्ती ।
धरोनियां सत्संगती । संसारगुंती उगवावी ॥१४॥
उद्धवा ! तूंही त्याबद्दल विशेष वायवाट करूं नये, व सत्संगति धरून संसाराची गुंतागुंत सोडवून टाकावी १४.

तस्मात्त्वमुद्धवोत्सृज्य चोदनां प्रतिचोदनाम् ।
प्रवृत्तिं च निवृत्तिं च श्रोतव्यं श्रुतमेव च ॥ १४ ॥
[श्लोक १४] म्हणून हे उद्ववा ! तू विधिनिषेध, प्रवृत्ती किंवा निवृत्ती तसेच इहपरलोकासंबंधी सर्व कर्मांचा त्याग करून,

माझें स्वरूप शुद्ध निर्गुण । वेद तितुका गा त्रिगुण ।
त्या वेदाचें जें प्रेरण । तें गौण जाण मत्प्राप्तीं ॥१५॥
उद्धवा ! माझे स्वरूप शुद्ध निर्गुण आहे. वेद आहेत तितके त्रिगुणात्मक मदाहेत, म्हणून त्या वेदांची जी प्रेरणा आहे, ती माझ्या प्राप्तीला असमर्थ होय असे समज १५.

त्या वेदार्थें श्रुतिस्मृती । नाना कर्में करविती ।
त्या कर्मांची कर्मगती । न कळे निश्चितीं कोणासी ॥१६॥
त्या वेदार्थानें श्रुति-स्मृति अनेक प्रकारची कर्में लोकांकडून करवितात. त्या कर्मांची कर्मगति निश्चयानें कोणालाच कळत नाही १६.

कर्म स्वरूपें परम गूढ । विधिनिषेधें अतिअवघड ।
सज्ञानासी नव्हे निवाड । शास्त्रें दृढ विचारितां ॥१७॥
कर्म हें स्वरूपानें फार गहन गाहे. विधि आणि निषेध यांनी ते फारच कठीण झाले आहे. थोर ज्ञानी माणसालाही शास्त्राधारानें सूक्ष्म विचार करताना कर्मांचा निर्णय होत नाही १७.

केवळ कर्मचि कर्माआंत । एक प्रवृत्त एक निवृत्त ।
सकाम निष्काम अद्‍भुत । अंगीं आदळत साधकां ॥१८॥
कर्मांमध्येंच एखादे कर्म केवळ प्रवृत्तीचे असते, तर एखादे केवळ निवृत्तीचें असते. तसेंच एखादे सकाम असते, तर दुसरे निष्काम असते. असे कर्माचे स्वरूप अद्‌भुत आहे. ते साधकाच्या आंगावर येऊन आदळते १८.

कर्म तितुकें आविद्यक । वेद तों त्रिगुणात्मक ।
तत्संबंधीं श्रवण देख । साधनरूप वेदांत ॥१९॥
कर्म म्हणून जितके आहे, तितकें सर्व अविद्यात्मकच आहे; आणि वेद त्रिगुणात्मक आहेत. तत्संबंधी साधनरूप वेदांत हाच श्रवण करण्यासारखा आहे १९.

तमोगुणें कर्मकांड । रजोगुणें उपासनाकांड ।
सत्त्वगुणें ज्ञानकांड । वेद त्रिकांड त्रिगुणात्मक ॥२२०॥
तमोगुणानें कर्मकांड उत्पन्न झाले आहे; रजोगुणानें उपासनाकांड उत्पन्न झाले आहे, आणि सत्त्वगुणानें ज्ञानकांड उत्पन्न झाले आहे. ह्याप्रमाणें वेद हे निकांडात्मक व त्रिगुणात्मक आहेत २२०.

वेदशास्त्र विधानविधी । यांचें मूळ अविद्या आधीं ।
जे अविद्येस्तव देहबुद्धी । विधिनिषेधीं गोंवित ॥२१॥
वेद, शास्त्रें, विधान व विधि यांचे मूळ आधी अविद्याच आहे. ज्या अविद्येमुळें देहबुद्धि उत्पन्न होऊन ती विधिनिषेधांमध्यें गुंतवून टाकते २१.

यालागीं उद्धवा तूं आधीं । सांडीं अविद्या पां त्रिशुद्धी ।
अविद्या सांडिल्या संबंधीं । सहजें वेदविधी सांडिला ॥२२॥
ह्याकरितां उद्धवा ! तूं आधी खरोखरच ही अविद्या सोडून दे, आणि अविद्येचा संबंध सोडला असतां सहजच वेदविधि सोडल्यासारखे होतें २२.

आधीं अविद्या ते कोण । हेंच आम्हां न कळे जाण ।
मग तिचें निराकरण । केवीं आपण करावें ॥२३॥
“पण आधी अविद्या म्हणजे कोण ? हेंच आम्हांला कळत नाही. मग तिचे निराकरण आपण कसे करावे ?” २३.

निजकल्पनेचा जो बोध । तेचि अविद्या स्वतःसिद्ध ।
तेणेंचि बाधे विधिनिषेध । ते त्यागिल्या शुद्ध ब्रह्मचि तो ॥२४॥
असें म्हणशील तर ऐक. आपल्या कल्पनेंचाच जो बोध, तीच स्वतःसिद्ध अविद्या होय. तिच्यामुळेंच विधिनिषेध बाधतो. ती टाकून दिली की तो शुद्ध ब्रह्मच होतो २४.

धूर पडिलिया रणीं । सहज कटक जाय पळोनी ।
तेवीं अविद्या सांडितां सांडणीं । विधिविधान दोनी सहजेंचि ॥२५॥
सेनापति समरांगणांत पतन पावला, की सर्व सैन्य आपोआपच पळून जातें, त्याप्रमाणें अविद्या सोडून दिली असतां विधि आणि विधान दोन्ही सहजच सोडलीं जातात २५.

आंखु छेदिलिया पडिपाडें । रथ न चाले असतांही घोडे ।
तेवीं अविद्या छेदिलिया निवाडें । विधिनिषेध पुढें न चलती ॥२६॥
रथाचा कणाच पूर्णपणे कापून टाकला असतां घोडे जोडलेले असले तरी रथ चालत नाही. त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाचा निर्णय करून अविद्याच छेदून टाकली असतां विधिनिषेधही पुढे चालत नाहींत २६.

मूळ छेदिलिया एके घायीं । शाखा पल्लव छेदिले पाहीं ।
तेवीं अविद्या छेदिलिया लवलाहीं । विधिनिषेध राही सहजचि ॥२७॥
, एकाच घावानें मूळ तोडून टाकलें असतां शाखा व पल्लव तोडल्यासारखेंच होते. त्याप्रमाणें अविद्या सपाट्यासरशी तोडली असतां विधिनिषेध सहजर जागच्या जागीं नष्ट होतो २७.

ऐकें वेदींचा तात्पर्यार्थ । मुख्य भजावा मी भगवंत ।
तोचि शास्त्रीं विशदार्थ । करी वेदांतश्रवणार्थें ॥२८॥
ऐक, वेदांतील तात्पर्यार्थ असा आहे की, मुख्यत्वेंकरून मला भगवंताला भजावें. शास्त्रामध्यें वेदान्तश्रवणार्थानें तोच स्पष्टार्थ सांगितला आहे २८.

श्रवण केलियाचें फळ जाण । करावें अविद्यानिरसन ।
अविद्या निरसिलिया श्रवण । पुढारें जाण लागेना ॥२९॥
तो वेदान्त श्रवण केल्याचे फळ असें समज कीं, अविद्येचे निरसन करावे. त्या अविद्येचे निरसन केले असतां मग पुढे श्रवण करावे लागत नाही २९.

जेवीं ठाकिलिया स्वस्थान । पुढारें न लगे गमनागमन ।
तेवीं झालिया अविद्या निरसन । श्रवण मनन लागेना ॥२३०॥
आपल्या ठिकाणावर पोंचले असतां जसे पुढे जाणें येणें उरत नाही, त्याप्रमाणें अविद्येचे निरसन झाले असतां श्रवण व मनन ह्यांची गरज लागत नाही २३०.

म्हणसी अविद्या केवीं सांडे । हेंचि अवघड थोर मांडे ।
हें अवघें उगवे सांकडें । तें मी तुज पुढें सांगेन ॥३१॥
आता तूं म्हणशील की, अविद्या नष्ट होणार कशी ? हेंच मोठे कठीण वाटते. पण संकटही कसे दूर होतें तें मी तुला पुढे सांगेन ३१.

वेदशास्त्रकर्मविधान । हें अविद्यायुक्त साधन ।
ते अविद्या जावया जाण । मजलागीं शरण रिघावें ॥३२॥
वेद, शास्त्र, किंवा कर्माचें विधान हें साधन अविद्यात्मकच आहे. ती अविद्या जाण्यासाठी मलाच शरण यावें हे लक्षांत ठेव ३२.

मामेकमेव शरणं आत्मानं सर्वदेहिनाम् ।
याहि सर्वात्मभावेन मया स्या ह्यकुतोभयः ॥ १५ ॥
[श्लोक १५] सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरण ये मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहाणार नाही. (१५)

सांडूनि स्त्रीपुत्रविषयध्यान । सांडूनि योग योग्यता शहाणपण ।
सांडूनि कर्मठता कर्माभिमान । मजलागीं शरण रिघावें ॥३३॥
स्त्रीपुत्रादि विषयांचा ध्यास सोडून आणि योग, योग्यता, शहाणपणा, कर्मठपणा व कर्मांचा अभिमान दूर सारून मला शरण यावें ३३.

सांडूनियां वेदाध्ययन । सांडूनियां शास्त्रश्रवण ।
सांडूनि प्रवृत्ति निवृत्ति जाण । मजलागीं शरण रिघावें ॥३४॥
वेदाध्ययन सोडून, शास्त्रश्रवण सोडून, प्रवृत्ति व निवृत्ति सोडून मला शरण यावें ३४.

सांडूनि धनमानचेष्टा । सांडूनि सज्ञान प्रतिष्ठा ।
सांडूनियां नाना निष्ठा । शरण वरिष्ठा मज यावें ॥३५॥
द्रव्य आणि मान यांच्या चेष्टा सोडून, ज्ञानीपणा व प्रतिष्ठा ह्यांना सोडून अनेक प्रकारच्या निंद्य सोडून मला श्रेष्ठ ईश्वराला शरण यावें ३५.

सांडूनियां वैदिक लौकिक । सांडूनि आगम तांत्रिक ।
मज शरण रिघालिया देख । माझें निजसुख पावसी ॥३६॥
वैदिक व लौकिक आचार सोडून, पुराणोक्त व तांत्रिक आचार सोडून मला शरण आले असतां माझें आत्मसुख मिळवशील ३६.

सांडूनि कुळाचें उंचपण । सांडूनि जातीचा अभिमान ।
सांडूनि आश्रमाचें श्रेष्ठपण । मजलागीं शरण रिघावें ॥३७॥
कुलाचा उच्चपणा सोडून, जातीचा अभिमान सोडून, आश्रमाचा थोरपणा सोडून मला शरण यावें ३७.

सांडूनियां ज्ञान ध्यान । सांडूनियां विधिविधान ।
सांडूनियां देहाभिमान । मजलागीं शरण रिघावें ॥३८॥
ज्ञान व ध्यान सोडून, विधि व विधान यांना सोडून, देहाचा अभिमान सोडून मला शरण यावे ३८.

माझें नांव अंतर्यामी । हृदयींचें जाणता मुख्यत्वें मी ।
तो मी चाळवेना शब्दधर्मीं । श्रद्धा परब्रह्मीं निर्ममत्वें ॥३९॥
‘अंतर्यामी’ हे माझे नाव आहे. कारण मी मुख्यत्वेंकरून हृदयांतील भाव जाणणारा आहे. तो मी शब्दांच्या योगानें कधींही निरनिराळा होत नाही. मात्र ममत्व सोडून परब्रह्माच्या ठिकाणीं श्रद्धा ठेविली पाहिजे ३९.

सर्व त्यागाचें त्यागितेपण । उद्धवा तुज मी सांगेन खूण ।
सर्व सांडावा अभिमान । हें मुख्य लक्षण त्यागाचें ॥२४०॥
उद्धवा ! सर्व त्यागांतील त्यागीपणा कसा असतो त्याचे लक्षण मी तुला सांगतो. सर्व अभिमान सोडावा हेंच त्यागाचे मुख्य लक्षण आहे २४०.

सर्वही सांडोनि अभिमान । मज रिघालिया शरण ।
तुज कैंचें जन्ममरण । माझे प्रतापें जाण तरशील ॥४१॥
सर्व अभिमान सोडून मला शरण आले असतां मग तुला जन्ममरण कोठले ? माझ्या प्रतापानेंच तूं तरशील हे लक्षांत ठेव ४१.

शरण रिघावयासाठीं । काय रिघावें गिरिकपाटीं ।
किंवा सेवावी दरकुटी । अथवा दिक्पटीं भंवावें ॥४२॥
“तुला शरण येण्याकरितां काय गिरिकंदरांत जाउन बसावें, की एखाद्या झोपडींत रहावें, की दाही दिशांना धुंडीत फिरावें ? ४२.

तुज वस्तीसी नाहीं गांवो । नित्य नेमस्त कोण ठावो ।
शरण रिघावया कोठें धांवों । ऐसा भावो कल्पिसी ॥४३॥
तुला राहावयाला कोठें एखादा गांव नाही. तुझी नेहमींची एखादी ठरीव जागा कोणती ? तुला शरण येण्यासाठी धावावें तरी कोणीकडे ?” अशी मनांत तूं कल्पना करशील ४३.

म्हणसी शरण रिघावें कवणे ठायीं । तरी मी असें तुझ्या हृदयीं ।
त्या हृदयस्थासी लवलाहीं । शरण पाहीं रिघावें ॥४४॥
आणि म्हणशील की, “तुला कोणत्या ठिकाणीं शरण यावें ?” तर बाबा ! मी तुझ्या हृदयांतच आहे. त्या हृदयांत राहणाऱ्यालाच त्वरित शरण जावें ४४.

सर्वभावें सर्वस्वेंसीं । मज हृदयस्था शरण येसी ।
तैं माझी सर्वगतता पावसी । सर्वभूतनिवासी हृदयस्थू ॥४५॥
सर्वभावानें व सर्वस्वासह मला हृदयस्थाला शरण येशील, तेव्हांच सर्व प्राणिमात्रांत व हृदयांत राहणारा जो मी, त्या माझी सर्वव्यापकता तुलाही प्राप्त होईल ४५.

तिळभरी राखोनि अभिमान । जरी मज रिघशी शरण ।
तरी माझी प्राप्ती नव्हे जाण । अभिमान विघ्न प्राप्तीसी ॥४६॥
तिळमात्रही अभिमान शिल्लक ठेऊन जर मला शरण येशील, तर माझी प्राप्ति व्हावयाची नाही. कारण अभिमान हेंच माझ्या प्राप्तीला विघ्न आहे ४६.

श्वानें स्पर्शिलें पक्कान्न । तें जेवीं नातळती ब्राह्मण ।
तेवीं जीवीं असतां अभिमान । साधकासी मी जाण नातळें ॥४७॥
कुत्र्यानें पक्वान्नाला स्पर्श केला असतां, ज्याप्रमाणें ब्राह्मण त्या पक्वान्नाला स्पर्श करीत नाहीत, त्याप्रमाणें मनांत अभिमान राहिला असतां, मीही साधकाला स्पर्श करीत नाही ४७.

रजस्वलेची ऐकोनि वाणी । दूर पळिजे पुरश्चरणीं ।
तेवीं अहंकाराच्या साधनीं । थिता जवळुनी मी जायें ॥४८॥
रजस्वला स्त्रीचे बोलणे ऐकून पुरश्चण करणारा जसा लांब पळून जातो, त्याप्रमाणें अहंकाराचे साधन जवळ असल्यास मी जवळ असलेलाही दूर जातो १८.

रजकविटाळाचें जीवन । जेवीं नातळती सज्जन ।
तेवीं हृदयीं असतां अभिमान । उद्धवा मी जाण न भेटें ॥४९॥
परटानें विटाळले पाणी ज्याप्रमाणें सज्जन स्वीकारीत नाहीत, त्याप्रमाणें उद्धवा ! हृदयात अभिमान असतां मी भेटत नाही असे समज ४९.

डोळां हरळू न विरे । घायीं कोत न जिरे ।
टांकी मुक्तापळीं न शिरे । खिरीमाजीं न सरे सरांटा ॥२५०॥
डोळ्यामध्यें गेलेला खडा विरघळत नाही, जखमेत शिरलेले भाल्याचे टोक त्यांतच जिरत नाही, मोत्यामध्यें टांकी शिरत नाही, किंवा खिरींत सराटा चालत नाही २५०,

तेवीं मजमाजीं अभिमान । उद्धवा न रिघे गा जाण ।
हे त्यागतात्पर्याची खूण । तुज म्या संपूर्ण सांगीतली ॥५१॥
त्याप्रमाणें उद्धवा ! माझ्यामध्येही अमिमान शिरत नाही, हे लक्षांत ठेव. ही त्यागांतील तात्पर्याची खूण मी तुला पूर्णपणे सांगितली ५१.

पत्‍नी विचरतां परपुरुषीं । देखोनि निजपती त्यागी तिसी ।
तेवीं अभिमानरत भक्तांसी । मी हृषीकेशी नातळें ॥५२॥
आपली पत्नी परपुरुषाशी सहवास करतांना दिसली असतां तिचा पति तिला सोडून देतो, त्याप्रमाणें भभिमानांत गुंतून राहणाऱ्या भक्तांना मी श्रीकृष्ण स्वीकारीत नाही ५२.

यालागीं सांडूनि अभिमान । मज हृदयस्था रिघालिया शरण ।
तुज मी उद्धरीन जाण । देवकीची आण उद्धवा ॥५३॥
याकरितां अभिमान सोडून मला हृदयस्थाला तूं शरण आलास, तर उद्धवा ! देवकीची शपथ, तुझा मी उद्धार करीन ५३.

म्हणसी तुज दोघी माता । कोणतीची आण मानूं आतां ।
मज तुझीच आण तत्त्वतां । तुज निर्भयता माझेनि ॥५४॥
पण तूं म्हणशील की, “तुला तर दोन आया आहेत, तेव्हा कोणत्या आईची शपथ खरी मानावी ?” तर मला खरोखर मीच शपथ आहे. तुला माझ्यामुळेंच निर्भयता प्राप्त होईल ५४.

तूं बोलीं नातुडसी कांहीं । तुज सर्वथा क्रिया नाहीं ।
तुझी आणभाक मानावी कायी । ऐसें जरी कांहीं कल्पिसी ॥५५॥
“पण तूं शब्दांत कांही सापडत नाहीस आणि क्रिया म्हणून तुला कांहीच नाही. तेव्हां तुझी आणभाक तरी खरी मानावी काय ?” अशी जर काहीं मनामध्यें कल्पना आणशील ५५,

पातेजूनि तुझिया बोलासी । थितें सांडावें स्वधर्मासी ।
लटकें जाहलिया आणेसी । कोणें समर्थासीं भांडावें ॥५६॥
आणि “तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून असलेला स्वधर्म सोडून द्यावा, व तुझी शपथ खोटी ठरली तर मग तुझ्यासारख्या समर्थाशी कोणी भांडत बसावें ?” असें म्हणशील तर ५६,

उद्धवा ऐसें न म्हण । म्या जे वाहिली तुझी आण ।
तें परमात्म्यावरी प्रमाण । सत्य जाण सर्वथा ॥५७॥
उद्धवा ! असें मात्र म्हणू नको. मी जी तुझी शपय वाहिली, ती परमात्म्याचीच शपथ होय. ती सर्वथैव खरी आहे असे समज ५७.

उद्धवा तूं आत्मा परिपूर्ण । मज तुज नाहीं मीतूंपण ।
त्या तुझी म्यां वाहिली आण । परम प्रमाण परमात्मता ॥५८॥
उद्धवा ! तूं माझा परिपूर्ण आत्मा आहेस. माझ्यामध्यें आणि तुझ्यामध्यें मीतूंपणाचा भेद नाही. त्या तुझी शपथ मी वाहिली, तिला परमात्मतत्त्व हेच थोर साक्षीदार आहे ५८.

असतां प्रत्यक्ष प्रमाण । कां लागे भाक आण ।
सर्वभावें मज आलिया शरण । आतांचि जाण तरशील ॥५९॥
पण मी सांगितलेल्या सिद्धांताला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे प्रमाणच असतांना आणभाक तरी कशाला पाहिजे ? सर्वभावानें तूं मला शरण आलास, तर आतांच्या आतांच तरशील असें समज ५९.

मज शरण रिघाल्या वाडेंकोडें । कळिकाळ तुझिया पायां पडे ।
कायसे भवभय बापुडें । कोण तुजकडे पाहेल ॥२६०॥
मला प्रेमानें शरण आलास तर कळिकाळसुद्धां तुझ्या पायां पडेल. मग बिचारे संसाराचे भय ते किती ? तुझ्याकडे वक्रदृष्टीनें पाहण्याची छाती कोणाची आहे ? २६.

शरण रिघतांचि तत्काळ । तूं लाहासी माझें बळ ।
तेव्हां भवभय पळे सकळ । तुज कळिकाळ कांपती ॥६१॥
तूं शरण आलास की तत्काळ तुला माझेंच सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हां संसाराचे सर्व भय नाहींसें होईल, आणि कळिकाळ तुला कांपावयाला लागतील ६१.

तृणीं पेटलिया अग्निस्फुलिंग । तो जाळी नाना वनांचे दांग ।
तैसें शरण आलिया अव्यंग । संसारदांग तूं जाळिसी ॥६२॥
गवतामध्यें विस्तवाची ठिणगी पडून पेटली असतां तो अग्नि अनेक अरण्यांतील झाडेंच्या झाडें जाळून टाकतो, त्याप्रमाणें शुद्ध अंतःकरणानें तूं मला शरण आलास तर संसाराचे अरण्य तूं जाळून टाकशील. ६२.

शरण यावें हृदयस्थासी । तो हृदयस्थ न कळे आम्हांसी ।
उद्धवा तूं ऐसें म्हणसी । तरी ऐक त्या स्वरूपासी सांगेन ॥६३॥
“हृदयस्थाला शरण यावें हे खरे, पण तो हृदयस्थ आम्हांला कळत नाही” असें तूं म्हणशील, तर उद्धवा ! त्याचेही स्वरूप सांगतों ऐक. ६३.

सांडूनि रूपनाम‍अभिमान । स्फुरे जें कां उद्धवपण ।
तें मज हृदयस्थाचें रूप जाण । त्यासी तुवां शरण रिघावें ॥६४॥
नाम, रूप, इत्यादिकांचा अभिमान सोडून उद्धवपण म्हणून जें काय स्फुरण राहते, तेंच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय असे समज. त्यालाच तूं शरण जा ६४.

नाम-रूप-गुणवार्ता । हे माया जाण तत्त्वतां ।
ते सांडूनि जे स्फुरे सत्ता । तें मज हृदयस्थाचें रूप ॥६५॥
नाम, रूप किंवा गुण यांचा जो संबंध, तीच खरोखर माया होय. ती सोडून जी शक्ति स्फुरणरूप होत असते, तेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय ६५.

ऐसेनि हृदयस्थ जोडल्या पहा हो । तेव्हां सर्व भूतीं पाहतां देवो ।
तेथ वेगळा उरावया उद्धवो । रिता ठावो न दिसेचि ॥६६॥
अशा रीतीनें हृदयस्थाची प्राति झाली की त्या वेळी सर्व प्राणिमात्रांमध्यें पहातांना देवच दिसूं लागतो. तेथे उद्धव म्हणून कोणी वेगळा राहावयाला रिकामी जागाच दिसत नाही. ६६.

तेव्हां सर्व भूतीं मी एकू । निश्चयें जाण निष्टंकू ।
देखतांही अनेक लोकू । त्यांसी मी एकू एकला ॥६७॥
त्या वेळी सर्व प्राणिमात्रांमध्यें एक मींच भरलेला दिसतो. हे निश्चयानें खात्रीपूर्वक लक्षांत ठेव. डोळ्यांनी अनेक लोक पाहिले असतांही त्या सर्वांत मीच एकीएक दिसत असतो ६७.

ऐसा तूं मिळोनि हृदयस्थासी । मी होऊनि मज पावसी ।
माझी प्राप्ती उद्धवा ऐसी । निर्भयेंसी निश्चळ ॥६८॥
अशा प्रकारें तूं हृदयस्थाशीं ऐक्यता पावलास, म्हणजे मग मद्रूप होऊन मला पावशील. उद्धवा ! अशी माझी प्राप्ति अगदी निर्भयपणाची आणि अढळ आहे. १८.

ऐशी सांगोनि गुह्य गोष्टी । देवो उद्धवाची पाठी थापटी ।
येरें चरणीं घातली मिठी । उठवितां नुठी सर्वथा ॥६९॥
अशी गुह्य गोष्ट सांगून देव उद्धवाची पाठ थोपटूं लागला, तेव्हा त्यानेही देवाच्या पायांना मिठी घातली. कृष्ण त्याला वर उठवूं लागला तरी तो उठेना ६९.

तुवां जें सांगितलें निजगुज । तें मज मानलें गा सहज ।
बोला एकाचा संशय मज । तो मी तुज पुसेन ॥२७०॥
तो म्हणाला, “तूं जी आपली गुप्त गोष्ट सांगितलीस, ती सहजच मला मान्य झाली. आता एका गोष्टीबद्दल मात्र मला संशय वाटतो, ह्याकरितां तेवढे मी तुला विचारीन.” २७०.

श्रीउद्धव उवाच –
संशयः श्रृण्वतो वाचं तव योगेश्वरेश्वर ।
न निवर्तत आत्मस्थो येन भ्राम्यति मे मनः ॥ १६ ॥
[श्लोक १६] उद्वव म्हणाला हे योगेश्वरांचे ईश्वर ! आपला उपदेश ऐकून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे तो असा “स्वधर्मानुसार मी कर्म करावे की, सर्व सोडून आपल्याला शरण यावे” यामुळे माझे मन गोंधळून गेले आहे. (१६)

वेदशास्त्राचें मथित सार । योगदुर्गींचे भांडार ।
पिकल्या सुखाचा सुखसागर । मज साचार उपदेशिला ॥७१॥
श्रीकृष्णा ! वेदांचे आणि शास्त्रांचे मंथन करून काढलेलें सार, किंवा योगरूप किल्यांतील भांडार, किंवा रसाळ सुखाचा भरलेला सुखसमुद्रच खरोखर मला उपदेश करून सांगितलास २७१.

तूं योगियांचा योगेश्वर । सकळ जगाचा ईश्वर ।
तुझें सत्य गा उत्तर । संशयकर मज वाटे ॥७२॥
तूं योग्यांश योगीश्वर आहेस. तूं सर्व जगाचा ईश्वर आहेस. तुझे भाषण सत्यच असावयाचे, पण मला तें संशयास्पद वाटतें ७२.

तुवांच सांगितलें साक्षेपें जाण । करावें गा स्वधर्माचरण ।
तें सत्य मानूनि वचन । सर्वस्वें जाण विश्वासलों ॥७३॥
तूंच मोठ्या कळकळीनें प्रथम सांगितलेंस की, स्वधर्माचरण करावे. आणि तेंच तुझे भाषण खरे मानून मी त्याच्यावरच सर्वस्वी विश्वास ठेवला ७३.

करावें जें स्वधर्माचरण । तेंच म्हणशी माझें भजन ।
शेखीं तेंही आतां सांडून । रिघावें शरण म्हणतोसी ॥७४॥
जें स्वधर्माचरण करावयाचे तेंच माझे भजन होय असें सांगितलेंस, आणि आतां अखेरीला तेही सोडून देऊन शरण यावें म्हणतोस ! ७४.

तरी आत्मा कर्ता कीं अकर्ता । हेंचि न कळे तत्त्वतां ।
कर्म करावें कीं सर्वथा । आम्हीं आतां सांडावें ॥७५॥
तेव्हां आत्मा हा कर्ता आहे की अकर्ता आहे. हेंच खरोखर कळत नाही. आम्ही आतां सर्व प्रकारे कर्म करावें की सोडून द्यावें ? ७५.

तुझी विषम उपदेशव्युत्पत्ती । सांगतां आम्हां अबळांप्रती ।
थोर संदेह वाढत चित्तीं । काय श्रीपती करावें ॥७६॥
श्रीकृष्णा, तुझ्या उपदेशाची तर्‍हाच कांही अव्यवस्थित आहे. ती तूं सांगत असतांना आम्हां दुबळ्यांच्या मनामध्यें मोठा संशय मात्र वाढत जातो. श्रीकृष्णा ! आतां करावें तरी काय ? ७६.

जरी आत्मा झाला अकर्ता । तरी कर्माचा कोण कर्ता ।
जैं आत्म्यासी आली अकर्तव्यता । तैं त्याग सर्वथा घडेना ॥७७॥
आत्मा जर अकर्ता होईल, तर कर्माचा कर्ता तरी कोण ? आणि आत्म्याकडेच जर अकर्तव्यता येईल, तर त्याग घडणे मुळीं संभवतच नाहीं ७७.

ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । सांवळा राजीवलोचन ।
काय बोलिला हांसोन । सावधान परिसावें ॥७८॥
हा उद्ध्वाचा प्रश्न ऐकून कमलनयन घनश्याम श्रीकृष्ण हासून काय म्हणाला तें नीट श्रवण करावें ७८.

श्रीभगवानुवाच –
स एष जीवो विवरप्रसूतिः प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः ।
मनोमयं सूक्ष्ममुपेत्य रूपं मात्रा स्वरो वर्ण इति स्थविष्ठः ॥ १७ ॥
[श्लोक १७] श्रीभगवान म्हणाले तो हा परमेश्वरच प्रथम अनाहत नादस्वरूप परावाणी नावाच्या प्राणासह मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करतो नंतर तोच मनोमय सूक्ष्म रूप ग्रहण करून मणिपूर चक्रामध्ये पश्यंती नावाची वाणी होतो. नंतर तोच कंठस्थानी असलेल्या विशुद्ध नावाच्या चक्रात येऊन मध्यमा नावाने वाणीचे किंचित स्थूल रूप धारण करतो त्यानंतर तोच मुखामध्ये येऊन र्‍हस्वदिर्घ इत्यादी मात्रा, उदात्तादी स्वर आणि ककारादी वर्ण इत्यादी रूपांनी वैखरी नावाची स्थूल वाणी होतो. (१७)

ऐक बापा उद्धवा । मी मायेच्या निजस्वभावा ।
अनुसरोनि जीवभावा । कर्तृत्व जीवा जीवत्वें ॥७९॥
बाबा उद्धवा ! ऐक. मी मायेच्या स्वभावाला अनुसरून जीवदशेला आलेलों आहे, म्हणून जीवाला जीवधर्मानेंच कर्तृत्व घडत असते ७९.

जळीं प्रतिबिंबला सविता । तो जळकंपें दिसे कांपता ।
तेवीं अकर्ताचि मी दिसें कर्ता । जीव‍अहंतास्वभावें ॥२८०॥
पाण्यामध्यें सूर्य प्रतिबिंबित झाला, आणि ते पाणी हालूं लागले, म्हणजे त्यामुळें त्यांतील सूर्यच हालतो असे दिसते. त्याप्रमाणें मी अकर्ताच असतांही जीवाच्या अहंताधर्मानें मी कर्ता असल्याप्रमाणें दिसतों २८०.

राजा झालिया निद्रेआधीन । तो स्वप्नीं रंक होय आपण ।
तेवीं प्रकृतीस्तव मज जाण । जीवपण आभासे ॥८१॥
राजा निला वश झाला असतां तो एखादेवेळी स्वप्नामध्यें स्वतः भिकारी बनतो, त्याचप्रमाणें प्रकृतीमुळेंच मला जीवपणा असल्याचा भास होतो हे लक्षांत ठेव ८१.

स्वयें राजा आहे आपण । तो स्वप्नीं रंकत्वें करी कोरान्न ।
तेथें जो दे पसाभर कण । त्यासी वानी आपण राजा रे तूं ॥८२॥
वस्तुतः स्वतः आपणच राजा आहे. पण स्वनामध्यें तोच भिकारी होऊन कोरड्या अन्नाची भीक मागतो. त्या वेळी जो कोणी मूठभर दाणे देतो, त्याची तो राजा आपण होऊन स्तुति करतो की, ‘अरे, तूं राजा आहेस बरें !’ ८२.

आपणचि राजा आहे । हें त्याचें त्यास ठाउकें नव्हे ।
तैसेंच जीवासही होये । पूर्णत्व स्वयें स्मरेना ॥८३॥
वास्तविक तो आपणच राजा आहे, पण त्या वेळीं हे त्याचे त्यालाच ठाऊक नसतें. त्याप्रमाणेंच जीवालाही होते. त्याचे स्वतांचे पूर्णत्व त्यालाच कळत नाही ८३.

जेवीं स्वप्नाचिया अवस्था । राजा रंकक्रिया करी समस्ता ।
तेवीं अविद्येस्तव तत्त्वतां । कर्मकर्ता मी झालों ॥८४॥
ज्याप्रमाणें स्वप्नांतील अवस्थेमध्यें राजा हा भिकाऱ्याप्रमाणें सर्व कृति करतो, त्याप्रमाणेंच खरोखर अविद्येमुळें मी कर्मकर्ता झालों आहे ८४.

तेथें वेदोक्त विधिविधान । जीवाअंगीं आदळे जाण ।
जंव नव्हे ब्रह्मज्ञान । तंव स्वधर्माचरण करावें ॥८५॥
अशाच अवस्थेमध्यें वेदोक्त विधिविधान जीवावर कोसळतें ( करणें भाग पडते ). ह्याकरिता जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलें नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावें ८५.

राजा राजपदीं जागा नव्हे । तंव रंकक्रिया त्यासी संभवे ।
तेवीं जंव ब्रह्मज्ञान नव्हे । तंव सर्व करावे स्वधर्म ॥८६॥
राजा जागा होऊन राजवैभवावर आला नाहीं, तोपर्यंत भिकाऱ्याप्रमाणें सर्व काम त्याच्या कडून घडते. त्याप्रमाणें जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेलें नाही, तोपर्यंत स्वधर्माचरण करावें ८६.

राजा राजपदीं जागा झाला । तो भीक म्हणतांचि लाजला ।
तेवीं ब्रह्मज्ञान जो पावला । तो ‘मी कर्ता’ या बोला न बोले कदा ॥८७॥
कारण, राजा जागा होऊन राजपदावर आला की, ‘भीक’ असा शब्द म्हणतांच तो लाजू लागतो. त्याप्रमाणें जो ब्रह्मज्ञान पावला, तो ‘मी कर्ता’ हे शब्द कधीच बोलत नाहीं ८७.

जैसें रायास मिथ्या रंकपण । तेवीं परमात्म्यासी जीवत्व जाण ।
त्या जीवास शरीरीं संसरण । तें उपलक्षण अवधारीं ॥८८॥
राजाला जसा खोटाच भिकारीपणा आलेला होता, त्याप्रमाणें परमात्म्यालाही जीवपणा हा मिथ्या होय हे लक्षांत ठेव. आता त्या जीवाला शरीरामध्यें संचार करावा लागतो, त्याचेही थोडेसें लक्षण ऐक ८८.

जैसा जीव जडातें जीवविता । यालागीं जीवू ऐशी वार्ता ।
सहजें तरी स्वभावतां । चैतन्यरूपता जीवाची ॥८९॥
जीव हा जडाला सजीव करणारा आहे, म्हणून त्याला ‘जीव’ असें म्हणतात, तेव्हां सहजच त्याच्या स्वभावधर्माप्रमाणें जीवाला चैतन्यरूपता प्राप्त होते ८९.

घटामाजीं दीपू घातला । तैं घटभरी प्रकाशू झाला ।
तोचि घरामाजीं ठेविला । घरभरी झाला प्रकाश ॥२९०॥
घागरीमध्यें दिवा ठेवला, तेव्हां घागरभर प्रकाश झाला. तोच दिवा घरांत ठेवला, तेव्हां घरभर प्रकाश झाला २९०.

तेवीं शरीरमाजीं तरी जीवू । सहजें तरी हा सदाशिवू ।
येथ बोलणें न लगे बहू । जीवशिव‍अनुभवू तो ऐसा ॥९१॥
त्याप्रमाणें शरीरांत आहे तोपर्यंतच हा ‘जीव’ आहे, एरवीं विचार केला तर हा साक्षात् सदाशिवच आहे, आतां याविषयीं अधिक बोलण्याचे कांही कारणच नाही. जीवाचा आणि शिवाचा जो अनुभव, तो असा आहे ९१.

आरिशाचा सूर्य दिसे हातीं । तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती ।
प्रकर्षेंसीं राहती स्थिती । यालागीं ‘प्रसूती’ बोलिजे ॥९२॥
आरशांतील सूर्य हातांत असल्यासारखा दिसतो, त्याप्रमाणें शरीरामध्येंही जीवाची प्रसूति (जन्म) झालेली आहे. त्या जीवाची स्थिति प्रकर्षेंकरून राहते म्हणून तिला ‘प्रसूति’ असें म्हणतात ९२.

आरसा अत्यंत लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण ।
तेवीं विदेहा देहधारण । ‘विवरप्रवेशन’ त्या नांव ॥९३॥
आरसा अगदी लहान असतो, तरी त्यांत सगळा सूर्य प्रतिबिंबरूपानें राहतो. त्याप्रमाणें विदेहाला देह धारण करावा लागतो. त्याला ‘विवरप्रवेशन’ म्हणजे बिळांत शिरणें असें म्हणतात ९३.

थिल्लरीं चंद्रासी अभिव्यक्ती । तो गगनींचा दिसे अधोगती ।
तेवीं शरीरीं जीवाची प्रसूती । अव्यक्त व्यक्तीं प्रवेशे ॥९४॥
डबक्यामध्यें चंद्राचे प्रतिबिंब पडले म्हणजे तो आकाशांतील चंद्रच खाली गेलेला दिसतो. त्याप्रमाणेंच शरीरामध्यें जीवाची प्रसूति होते. म्हणजेच अव्यक्त हें व्यक्तामध्यें प्रवेश करते ९५.

जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो जळें नाहीं ओला झाला ।
तेवीं कर्में करोनि संचला । अलिप्त ठेला निजआत्मा ॥९५॥
पाण्यांत सूर्य प्रतिबिंबित झाला, तरी तो कांही पाण्यानें ओला होत नाही. त्याप्रमाणें देहामध्यें कर्में करीत राहिला तरी आपला आत्मा अलिप्तच राहिलेला असतो ९५.

जळीं प्रतिबिंब आंदोलायमान । तेवीं जीवासी जन्ममरण ।
थिल्लरीं चंद्र अडकला संपूर्ण । तेवीं कर्मबंधन जीवासी ॥९६॥
पाण्यांतील प्रतिबिंब पाण्याच्या हेलकाव्यानें जसें हालते, त्याप्रमाणेंच जीवाला जन्ममरण प्राप्त होते. डबक्यांत जसा पूर्णचंद्र प्रतिबिंबरूपानें अडकला जातो, त्याप्रमाणेंच जीवालाही कर्माचें बंधन प्राप्त होते ९६.

थिल्लरजळ आटलें । तेथें काय चंद्रबिंब निमालें ।
तें चंद्रबिंब होवोनि ठेलें । जाहलें निमालें दोनी मिथ्या ॥९७॥
डबक्यांतील पाणी आटून गेलें व प्रतिबिंब दिसेनासे झाले, म्हणून त्यामुळें चंद्रबिंब नाहीसे झाले काय ? तें चंद्राचे बिंब होते तसेंच राहिले. डबक्यांतील पाण्यामुळें तें उत्पन्न झालें, व पाणी आटतांच नाहींसे झाले ही दोन्ही खोटींच ९७.

थिल्लरींचा चंद्र काढूं जातां । तो मिथ्यात्वें न ये हाता ।
तेवीं देहीं मिथ्या जीवता । ते सत्य मानितां अतिदुःखी ॥९८॥
डबक्यांतला चंद्र बाहेर काढावयास गेले तर तो मुळींच खोटा असल्यामुळें हातांत येत नाही. त्याप्रमाणें देहामध्यें जीवपणा खोटाच असतो. तो खरा मानला असतां अतिशय दुःखी व्हावे लागतें ९८.

आरसा थोर अथवा लहान । तेथें सूर्य बिंबे संपूर्ण ।
तेवीं मी अंतर्यामी जाण । सर्वांभूतीं समान समग्र असें ॥९९॥
आरसा थोर असो की लहान असो, त्यांत संपूर्ण सूर्याचे प्रतिबिंब असतेंच. त्याप्रमाणें अंत:करणांत असणारा मी सर्व प्राणिमात्रांमध्यें समान आणि संपूर्ण भरलेला असतों ९९,

सूर्य थिल्लराआंतौता । अडकला दिसे समस्तां ।
तेवीं जीवासी कर्मबद्धता । मूर्ख तत्त्वतां मानिती ॥३००॥
सूर्य हा सर्वांना डबक्याच्या आंत अडकलेला दिसतो, त्याप्रमाणें जीवाला कर्माचें बंधन आहे ते खरेंच आहे असें मूर्ख लोक मानतात ३००.

गगनींचा सूर्यो न देखती । थिल्लरीं अडकला मानिती ।
तेवीं निर्गुणीं जया नाहीं प्रतीती । ते बद्ध म्हणती जीवातें ॥१॥
आकाशांतील सूर्य पहात नाहीत, आणि तो डबक्यांतच अडकलेला आहे असे मानतात. त्याप्रमाणें निर्गुणांचा ज्यांना अनुभवच नाहीं, तेच जीवाला बद्ध असे म्हणतात ३०१.

अग्निज्वाळा जाळीं आकळितां । जाळें जळे आकळूं जातां ।
तेवीं आत्मया कर्मीं बांधतां । कर्मीं कर्मता निष्कर्म ॥२॥
आगीच्या ज्वाळा जाळ्यांत अडकवावयाचा प्रयत्न केला असतां त्या जाळ्यांत धरितां धरितांच जाळे जळून जाते. त्याप्रमाणें आत्म्याला कर्मामध्यें बद्ध करतांना कर्मांतलाच कर्मपणा निसत्त्व होऊन जातो २.

नाद‍उत्पत्तीसी ठावो । मुख्य वावो कां दुसरा घावो ।
या दोहींवेगळा नित्य निर्वाहो । तो नादू पहा हो अनुहत ॥३॥
आवाज उत्पन्न होण्याला स्थानें म्हणजे एक वायु व दुसरा प्रत्याघात. पण या दोहोंशिवायच निरंतर जो आवाज घुमत असतो, त्या नादाला ‘अनाहतध्वनि’ असे म्हणतात ३.

अनुहताचा सोलींव शब्दू । परापरतीरीं पराख्य नादू ।
ज्याचा योगियां सदा छंदू- । बोलिला अनुवादू नव्हे त्याचा ॥४॥
त्या अनाहतध्वनीचा जो मूळ शब्द, ज्याला परा व अपरा वाणींमध्यें परेचा नाद असें म्हणतात, आणि योगी लोकांना ज्याची नेहमी आवड लागलेली असते, त्याचा अनुवाद बोलण्यांत व्यक्त होणारा नव्हे ४.

ज्या नादाची सुखगोडी । सदाशिवूच जाणे फुडी ।
कां सनकादिकीं चोखडी । चाखिली गाढी ते चवी ॥५॥
ज्या ध्वनीची आनंदकारक गोडी एक शंकरच पूर्णपणें जाणतो, किंवा ज्याची ती सुंदर गोडी सनकांदिकांनीच यथेच्छ चाखिली आहे ५.

वायूचें शोधितां सत्त्व । त्यासी एकवटलें तें शब्दतत्त्व ।
उभयचेतनें जीवित्व । मनोमयत्व धरूं पाहे ॥६॥
वायूचे सत्व शोधलें असतां व शब्दतत्त्व त्याच्याशी मिळाले असतां दोघांच्या चैतन्यानें जो सजीवपणा उत्पन्न होतो, त्यालाच मनाचे स्वरूप प्राप्त होते ६.

चेतनेचें चेतनत्व । तें वायूचें शोधित सत्त्व ।
तेंचि शब्दाचें निजतत्त्व । तेणे जीवित्व मनोरूप होय ॥७॥
चेतनेचें जें चैतन्य, तेच वायूचे शुद्ध सत्त्व होय. शब्दाचे मूलतत्त्व तेंच होय आणि त्याच्याच योगानें जीव मनोरूप होतो ७.

जीवाचा शरीरसंयोग । स्वयें सांगे तो श्रीरंग ।
आधारादिचक्रप्रयोग । क्रमेंचि साङ्ग सांगत ॥८॥
जीवाचा शरीराशी संयोग कसा होतो ते स्वत:च श्रीकृष्ण सांगू लागला, तेव्हां आधारादि चक्रापासून घडणारे सारेच संस्कार क्रमानेंच सांगितले ८.

अहमिति प्रथमाध्यासें । जीवासी जीवत्व आभासे ।
तो जे जे तत्त्वीं प्रवेशे । तें मी ऐसें म्हणतचि ॥९॥
‘मी’ ह्या पहिल्याच अध्यासानें जीवाला जीवपणाचा आभास होऊं लागतो; आणि तो ज्या ज्या तत्त्वामध्यें प्रवेश करतो, तें तें तत्त्व आपणच असें तो म्हणूं लागतो ९.

तेथ मी देहो म्हणतां । तत्काळ जाय पूर्णता ।
तेव्हां एकदेशी परिच्छिन्नता । देहात्मता लागली ॥३१०॥
तेव्हां ‘मी देह’ असें त्यानें म्हटले असतां तत्काळ त्याची पूर्णता होऊन त्याच वेळी एकदेशीय व अंशभूत अशी देहात्मबुद्धि प्राप्त होते ३१०.

निर्विशेष नाद अतिसूक्ष्म प्राण । त्यासहित आधारीं प्रवेशोन ।
अतिसूक्ष्म प्रथम स्फुरण । पावोनि जाण परा झाली ॥११॥
तो सूक्ष्म नाद आणि अतिसूक्ष्म प्राण मिळून प्रथमतः आधारचक्रांत प्रवेश करून आरंभासच अत्यंत सूक्ष्म असें स्फुरण पावून परा नामक वाचा उत्पन्न होते ११.

आधारचक्रीं सूक्ष्म प्राण । परा वाचा तेथींची जाण ।
मनाचें कोंवळें स्फुरण । अतिसपूरपण सूक्ष्मत्वें ॥१२॥
आधारचक्रामध्यें सूक्ष्म प्राण असतो, आणि परा नांवाची वाणी तेथलीच असते. म्हणून मनाचें अत्यंत सूक्ष्म असें कोमल स्फुरण उत्पन्न होतें १२,

स्वाधिष्ठानचक्राच्या ठायीं । मनाचें वाढतें बाळसें पाहीं ।
पश्यंती वाचा तये ठायीं । बोलूं देखे परी कांहीं बोलेना ॥१३॥
आणि स्वाधिष्ठानचक्राच्या ठिकाणीं मनाचे बाळसें अधिक वाढू लागते. त्या ठिकाणीं पश्यंती वाचा बोलावयाचा प्रयत्न करीत असते, परंतु ती बोलूच शकत नाही १३.

तिये चक्रीं एकवटला प्राण । पुढारां न चलेचि गा जाण ।
प्राणापानां झालें भांडण । दोघेजण रूसले ॥१४॥
त्या चक्रांत प्राणवायूही एकवटलेला असतो, म्हणून तो त्यापुढे चालून जात नाही. तेव्हां तेथें प्राणाचें आणि अपानाचें भांडण होऊन ते दोघेही रुसतात १४.

घरकलहो लागला भारी । मग निघाले वेगळेचारी ।
पांचही राहिले पांचापरी । ऐक निर्धारीं विचारू ॥१५॥
तेथेच मोठा गृहकलह माजतो आणि ते वेगळेपणा करूं लागतात. त्यामुळें प्राण, अपान, व्यान, उदान व समान असे ते पांचही प्राण पांच ठिकाणीं राहूं लागतात. त्याचाही निश्चयात्मक विचार ऐक १५.

मागें रुसोनि गेला जाण । त्या नांव म्हणती अपान ।
रागें पुढारां आला जाण । त्या नांव प्राण म्हणताती ॥१६॥
पूर्वी रुसून गेला होता म्हणून सांगितले होते, त्याला ‘अपान’ असे म्हणतात. रागारागानें जो पुढे येतो, त्याला ‘प्राण’ असे म्हणतात १६.

दोहींमाजीं समत्वें जाण । नाभीं राहिला तो समान ।
कंठीं राहिला तो उदान । व्यानासी रहावया स्थान असेना ॥१७॥
दोहोंमध्यें समानपणानें नाभीमध्यें जो राहतो, तो ‘समान’ होय. कंठांत राहतो तो उदान होय. पण व्यानाला राहावयाला जागाच नाही १७.

अद्यापि शरीरीं जाण । व्यानासी नाहीं एक स्थान ।
तो सर्वांगीं सर्वदा जाण । परिभ्रमण करीतसे ॥१८॥
अद्यापि शरीरामध्यें व्यानाला एक नियमित ठिकाण नाही, म्हणून तो नेहमी सर्व अंगांमध्यें परिभ्रमण करीत असतो १८.

याहून धाकटे पांच प्राण । तेही वेगळे राहिले जाण ।
तिंहीं वेगळालें आपण । वस्तीसी स्थान योजिलें ॥१९॥
ह्याहूनही आणखी सूक्ष्म असे पंचप्राण असतात, तेही भिन्नभिन्न ठिकाणीं राहतात. त्यांनी आपल्याला रहावयाला आपणच वेगळें वेगळें ठिकाण ठरवून ठेविलें आहे १९.

नाग कूर्म कृकल देवदत्तू । पांचवां धनंजय जाण तेथू ।
यांची वस्ती जे शरीरांतू । ऐक निश्चितू सांगेन ॥३२०॥
नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि पांचवा धनंजय हे ते सूक्ष्म पंचप्राण होत. यांची शरीरांत जेथे वस्ती असते, ती स्थानें निश्चितपणे सांगतों ऐक ३२०.

शिंक जांभई आणि ढेंकर । नाग कूर्म कृकलांचें घर ।
उचकी देवदत्ताचें बिढार । धनंजयासी थार मिळेचिना ॥२१॥
शिंक हें नागाचें घर, जांभई हें कूर्माचें घर, आणि टेंकर हे कृकलाचें घर होय, उचकी हें देवदत्ताचे बिर्‍हाड होय. मण धनंजयाला मात्र कोठेच थारा मिळत नाही २१.

जीवदेहांचे आप्तवादापासीं । धनंजयो राहिला वस्तीसी ।
जीवें सांडिल्या शरीरासी । मुहूर्तार्ध देहासी तो वांचवी ॥२२॥
म्हणून जीव आणि देह ह्यांचा संगम होण्याच्या ठिकाणीं (म्हणजेच चिज्जडग्रंथींत) धनंजय वस्तील राहतो. त्यामुळें जीवानें शरीराला सोडलें असतांही तो घटकाभर तरी ह्या शरीराला वांचवून धरतो २२.

स्वाधिष्ठानाहोनि जाण । अनुक्रमें दशधा होती प्राण ।
त्यांचें स्थान मान उपलक्षण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥२३॥
स्वाधिष्ठान नामक चक्रापासून अनुक्रमानेंच प्राणाचे दहा विभाग होतात. त्यांचे स्थान, मान व उपलक्षण हे सर्व मी तुला सांगितले २३.

मागें म्यां सांगितली गोष्टी । प्राणापान रुसल्यापाठीं ।
दोघां अद्यापि नाहीं भेटी । महाहटी छांदस ॥२४॥
मी मागें तुला एक गोष्ट सांगितलीच आहे की, प्राण आणि अपान हे दोघे रुसले आहेत. त्यानंतर त्या दोघांची भेट अद्यापि झालेली नाही. कारण ते मोठे हट्टी व छांदिष्ट असे आहेत २४.

त्या दोघांसी करी बुझावण । तो माझा पढियंता तूं जाण ।
त्या सर्वस्व दें मी आपण । योगसाधन या नांव ॥२५॥
त्या दोघांची जो समजूत करील तोच माझा आवडता होय असें तूं समज. त्याला मी आपण होऊन आपले सर्वस्व अर्पण करतो. ह्याचेंच नांव योगसाधन होय २५.

उद्धवा प्राणलक्षणें सांगतां । अवचटें प्राणापानसमता ।
प्रसंगीं आली कथा । त्वांही स्वभावतां ऐकावी ॥२६॥
उद्धवा ! प्राणाची लक्षणे सांगतां सांगतां एकाएकी प्राण आणि अपान यांची साम्यस्थिति सांगण्याची कथा प्रसंगोपात्त आली. तेव्हां तूंही ती सहज ऐकून ठेव २६.

स्वाधिष्ठानाहूनि मणिपुरा येता । जीवामनांसी एकात्मता ।
सूक्ष्मप्राण तेथ वसतां । परेच्या ऐक्यता पश्यंती ॥२७॥
स्वाधिष्ठानचक्रापासून मणिपूरचक्रांत येतांना जीव आणि मन ह्यांची ऐक्यता होते. तेथे सूक्ष्मप्राण राहात असल्यामुळें पश्यंती ही परावाणीच्या ऐक्यतेला प्राप्त होते २७.

तेथ मनाचें खेळुगेपण । कुमार अवस्था बाणली जाण ।
तंव डोलत पुढें चाले प्राण । अनाहतस्थान ठाकिलें ॥२८॥
तेव्हां मनाला खेळाडूपणा उत्पन्न होऊन बाल्यदशा प्राप्त होते असे समज. त्यानंतर प्राण डुलत डुलत पुढें चालूं लागतो व अनाहतस्थान गांठतो २८.

धरोनि पश्यंतीचें अनुसंधान । मध्यमा वाचा उपजे जाण ।
मौनाची मिठी न सोडून । करी गुणगुण आपणांत ॥२९॥
तेव्हां पश्यंती वाणीच्याच अनुरोधानें मध्यमा नांवाची वाचा उत्पन्न होते. ती मौनाची मिठी न सोडतां आपल्याशीच गुणगुण करूं लागते २९.

तेथ मनाची पौगंड अवस्था । मागें पुढें सांभाळितां ।
वांछी नाना भोग अवस्था । लाजा सर्वथा बोलेना ॥३३०॥
तेथे मनाला मुग्धावस्था (सोळा वर्षे वयाच्या आंतील अवस्था ) प्राप्त होऊन ती मागेपुढे सांभाळतांना अनेक प्रकारचे उपभोग व सुखस्थिति ह्यांची इच्छा करते. पण लज्जेनें मुळींच बोलत नाही ३३०.

मग वेगें ठाकिलें विशुद्धिस्थान । तेथ उसळत उदान झाला प्राण ।
तंव मनासी तारुण्यपण । पुरतें जाण बाणलें ॥३१॥
मग प्राण मोठ्या त्वरेनें विशुद्धिस्थानाला प्राप्त होतो व तेथे उच्छृंखल अशा उदानाचे स्वरूप तो प्राण धारण करतो. तेव्हां मनालाही परिपूर्ण तारुण्यपण प्राप्त होते ३१.

त्या विशुद्धचक्राप्रती । परा मिळोनि आंतौती ।
पश्यंती मध्यमा एक होती । वाचा घुमघुमती झणत्कारें ॥३२॥
त्या विशुद्धिचक्रामध्यें आंतून परावाणीही येऊन मिळते आणि पश्यंती व मध्यमा ह्याही एक होतात, अशा प्रकारे त्या सर्व वाचा तेथे मोठ्या दिमाखानें घुमावयास लागतात ३२.

त्या झणत्कारापरिपाठीं । वक्त्रीं वाचा तत्काळ उठी ।
तारुण्यें उन्मत्त झाली मोठी । त्या स्वरवर्ण चावटी मांडिली ॥३३॥
त्यांच्या त्या झणकार्‍याच्या मागोमाग लागलीच तोंडांतून वाणी प्रगट होते. ती तारुण्यानें मोठी उन्मत्त झालेली असते व त्यामुळें ती स्वरांची आणि वर्णांची भलभलती बडबड सुरू करते ३३.

आज्ञाचक्र भ्रूस्थान । तें याहूनि वेगळें जाण ।
तेथें वाचेसी नाहीं गमन । हंसलक्षण योग्यांचें ॥३४॥
आज्ञाचक्र हें भुंवयांमध्यें असून ते ह्यांच्याहून निराळे आहे. तेथें वाणीला जातां येत नाही. योग्यांचे हंसलक्षण ते तेंच ३४.

हीं साही चक्रें अनुक्रमें जाण । चार मातृका अठ्ठावीस वर्ण ।
सोळाही स्वर संपूर्ण । हंसलक्षण योगियांचें ॥३५॥
ही अनुक्रमानेंच सहा चर्के आहेत हे लक्षांत ठेव. चार मातृका, अठ्ठावीस वर्ण व सोळाही संपूर्ण स्वर हे सर्व प्राप्त झाले म्हणजे तेंच योग्यांचे हंसप्राप्तीचे लक्षण होय ३५.

कोण चक्रीं कोण वर्ण । मातृकांचें कोणतें स्थान ।
कोठें उठती स्वर संपूर्ण । तेंही लक्षण अवधारीं ॥३६॥
आता कोणत्या चक्रांत कोणते वर्ण उत्पन्न होतात ? मातृकांचे स्थान कोणतें ? सर्व स्वर कोठे उत्पन्न होतात ? तेंही लक्षण ऐक ३६.

आधारचक्रीं चतुर्दळ उभारा । तेथ न्यसिल्या चारी मात्रा ।
व श ष स या अक्षरां । बोलिजे मात्रा शास्त्रज्ञीं ॥३७॥
आधारचक्रामध्यें चार पाकळ्यांची आकृति असते, आणि त्या आकृतीमध्यें चार मात्रा राहिलेल्या असतात. व, श, ष आणि स या अक्षरांना शास्त्रज्ञ लोकांनी मात्रा असें म्हटले आहे ३७.

स्वाधिष्ठान षड्दळ जेथ । साही वर्ण स्थापिले तेथ ।
बकरादि लकारान्त । जाण निश्चित ते स्थानीं ॥३८॥
जेथें स्वाधिष्ठान हें सहा पाकळ्यांचे चक्र आहे, तेथे सहा वर्ण स्थापन केलेले आहेत. ‘ब’ कारापासून तो ‘ल’ कारापर्यंत (ब, भ, म, य, र, ल,) हे जे सहा वर्ण आहेत ते त्या ठिकाणीं असतात असें निश्चित समज ३८.

मणिपूर दशदळ निश्चित । दहा वर्ण स्थापिले तेथ ।
डकारादि फकारान्त । वर्ण नांदत ते चक्रीं ॥३९॥
मणिपूरचक्राला दहा पाकळ्या आहेत, तेथे दहा वर्ण स्थापन केलेले आहेत. ‘ड’ कारापासून ‘फ’ कारापर्यंत (ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ) जे दहा वर्ण, ते त्या चक्रांत राहात असतात ३९.

अनाहतचक्र द्वादशदळयुक्त । बारा वर्ण न्यसिले तेथ ।
ककारादि ठकारान्त । वर्ण विराजत ते चक्रीं ॥३४०॥
अनाहतचक्र बारा पाकळ्यांचे आहे. तेथे ‘क’ कारापासून ‘ठ’ कारापर्यंत (क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ज, झ, ञ, ट, ठ) बारा वर्ण ठेवलेले आहेत. ते त्या चक्रामध्यें शोभत असतात ३४०.

विशुद्धिचक्रींच्या सोळा दळां । अ इ उ ऋ लृ हे वर्ण सोळा ।
कंठस्थानीं मीनला मेळा । यांचा वेदीं आगळा प्रताप ॥४१॥
विशुद्धचक्र सोळा पाकळ्यांचे असून त्यांत अ, इ, उ, ऋ, ऌ, वगैरे एकंदर सोळा स्वर आहेत. कंठस्थानामध्यें या सर्व स्वरांचा समुदाय जमलेला असतो. वेदांमध्यें त्यांचे अगाध सामर्थ्य दिसून येते ४१.

आज्ञाचक्र अति अवघड । नुघडे काकीमुखाचें कवाड ।
न चले प्राणांची चडफड । मार्ग अतिगूढ लक्षेना ॥४२॥
आज्ञाचक्र मात्र अतिशय अवघड आहे. तेथे काकीमुख ह्या नांवाचे असलेले दार उघडतच नाही. तेथे प्राणांची लटपट कांहीं चालत नाही. तेथील मार्ग अतिशय बिकट असल्यामुळें तो त्यांना सांपडत नाही ४२.

तें आज्ञाचक्र गा द्विदळ । केवळ हंसाचें राउळ ।
तेथ पावावया योगबळ । अतिप्रबळ पाहिजे ॥४३॥
ते आज्ञाचक्र दोन पाकळ्यांचे असून शुद्ध हंसाचे मंदिर होय. तेथें पोंचावयाला अत्यंत थोर असें योगसामर्थ्य लागते ४३.

हें स्थान पावावयासाठीं । योगी झाले महाहटी ।
अभ्यास करितां अतिसंकटीं । तेही शेवटीं न पावती ॥४४॥
या स्थानी पोचण्यासाठी योगी नानाप्रकारचे हठयोग आचरण करतात, पण त्यांनी कितीही संकटें सोसून योगाभ्यास केला असतां अखेरीला तेही तेथे पोचत नाहींत ४४.

हें पावावया माझें स्थान । अतिगुह्य आहे अनुष्ठान ।
सोहंहंसाचें साधन । सावधान जो साधी ॥४५॥
माझे हें स्थान प्राप्त होण्याला अत्यंत गुढ असें एक अनुष्ठान आहे. ‘सोहं हंसा’चे साधन जो सावधानपणे साध्य करील, तोच या स्थळीं पोचेल ४५.

प्राणाचेनि गमनागमनें । सोहंहंसाचेनि स्मरणें ।
सावधानें जो साधूं जाणे । तेणें पावणें हें स्थान ॥४६॥
प्राणायामाचा निरोध व त्याग करून ‘सोहं हंसा’चे स्मरण करून सावधगिरीनें जो हें अनुष्ठान साध्य करील तोच हें स्थान प्राप्त करून घेईल ४६.

त्यासीचि पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजीं चढे ।
तेथूनिही मार्ग काढी पुढें । अतिनिवाडें अचूक ॥४७॥
त्यालाच वायूचा निरोध होतो आणि तोच आज्ञाचक्रांत प्रवेश करतो इतकेंच नव्हे, तर तो तेथूनही पुढे अचूक निर्णयात्मक मार्ग शोधून काढतो ४७.

तेथ नानाभोगसमृद्धिफळें । आणिती ऋद्धिसिद्धींचें पाळें ।
तें डावलूनियां सकळें । निघे निर्मळें निजपंथें ॥४८॥
तेथें ऋद्धिसिद्धींचे समुदाय अनेक सुखसमृद्धींची फळें त्याला प्राप्त करून देतात, पण तो त्या सर्वांना बाजूला ढकलून आपल्याच पवित्र मार्गानें पुढे चालू लागतो ४८.

जो कां ऋद्धिसिद्धींसी भुलला । मी सिद्ध ये श्लाघे आला ।
तो आज्ञाचक्रावरोनि चेवला । केल्या मुकला कष्टासी ॥४९॥
ऋद्धिसिद्धींना जो भुलला, किंवा ‘मी सिद्ध’ असा ज्याला अभिमान उत्पन्न झाला, तो त्या आज्ञाचक्रापासून च्युत झाला व तो केलेल्या सर्व श्रमांना मुकला असे समजावें ४९.

ज्यासी वैराग्य असे सपुरतें । तो कदा भुलेना सिद्धीतें ।
लाता हाणोनि भोगमान्यतेतें । निघे निजपंथें मजलागीं ॥३५०॥
परंतु ज्याच्या आंगी परिपूर्ण वैराग्य असते, तो सिद्धींना कधीही भुलत नाही. सुखोपभोग व मानमान्यता ह्यांच्यावर लाथा मारून माझ्या प्राप्तीसाठी आपल्या मार्गानें पुढे चालू लागतो ३५०.

तैं औटपीठ गोल्हाट । सांडूनि भ्रमरगुंफा कचाट ।
शोखूनि सहस्त्रदळाचे पाट । मजमाजीं सुभट मिसळले ॥५१॥
त्यानंतर औटपीठ (आज्ञाचक्रापुढील स्थान) व गोल्हाट (औटपीठाच्या पुढील स्थान ) ओलांडून भ्रमरगुंफेच्या (गोल्हाटाच्या पुढील स्थान ) कचाटांतून पार पडून सहस्रदलकमलाचे प्रवाह शोषण करून ते धैर्यशाली पुरुष मत्स्वरूप होतात ५१.

सांगतां आज्ञाचक्राची संस्था । पुढें गोडी लागली योगपंथा ।
मागील विसरलों जी कथा । क्षमा श्रोतां करावी ॥५२॥
आज्ञाचक्राची स्थिति सांगत असतां पुढे योगमार्ग सांगण्याची गोडी लागली, म्हणून मागची कथा सांगावयाची विसरलों. ह्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी ५२.

म्हणाल वाहवटीं पडला मासा । तो परतेना जेवीं सहसा ।
ग्रंथनिरूपणीं तूं तैसा । जल्पू वायसा कां करिसी ॥५३॥
आपण म्हणाल कीं, मासा प्रवाहाबरोबर वाहूं लागला म्हणजे तो जसा सहसा मागें फिरत नाही, त्याप्रमाणें ग्रंथनिरूपण करण्यामध्यें तूंही पुढेच चल. व्यर्थ बडबड कां करतोस ? ५३,

जेवीं चुकलिया बाळकातें । माता शिकवण दे त्यातें ।
तेवीं तुमचें वचन मातें । निजहितातें द्योतक ॥५४॥
मूल चुकले म्हणजे त्याला आई ज्याप्रमाणें शिकवण देते, त्याप्रमाणें आपले हे भाषण मला माझ्या कल्याणाचेच द्योतक झाले आहे ५४.

करितां चक्रांचें निरूपण । योगारूढ झालें मन ।
विसरोनि मागील निरूपण । गेलें निघून शेवटां ॥५५॥
चक्रांचे निरूपण करतांना मनही योगाकडे वळलें, आणि त्यामुळें मागचे निरूपण विसरून शेवटी दूर निघून गेले ५५.

हें ऐकोनि हांसिले श्रोते । तूं कर्ता नव्हसी येथें ।
हें कळोनि गेले आमुतें । नको परिहारातें उपपादूं ॥५६॥
हें ऐकून श्रोते हासले आणि म्हणाले, तूं कांही ह्या ग्रंथाचा कर्ता नव्हेस, हे आम्हांला कळून चुकले आहे. म्हणून त्याचे निराकरण करण्याकरितां विशेष प्रतिपादन करूं नको ५६.

आलोडितां ग्रंथकोडी । न कळे योगज्ञानाची गोडी ।
ते तुवां विशद केली फुडी । निजपरवडीविभागें ॥५७॥
कोट्यवधि ग्रंथ चाळले, तरी योगज्ञानाची गोडी कळत नाही. ती तूं आपल्याच आवडीनें स्पष्ट उघड करून दाखविलीस ५७.

तुझेनि मुखें कृष्णनाथें । श्रीभागवत जें कठिण होतें ।
तें अर्थविले यथार्थें । सत्य आमुतें मानलें ॥५८॥
जें श्रीमद्‌भागवत समजावयास कठीण होते, तें श्रीकृष्णानें तुझ्याच मुखानें यथार्थ रीतीनें अर्थ स्पष्ट करून सांगितले. ते खरोखर आम्हांला पसंत पडलें आहे ५८.

हा बारावा अध्यावो । अतिगूढ बोलिला देवाधिदेवो ।
तेथींचाही त्वां अभिप्रावो । विशद पहा हो विवरिला ॥५९॥
हा बारावा अध्याय अतिशय गहन आहे, हें देवाधिदेवच बोलला आहे. पण त्यांतील अर्थही तू स्पष्ट करून सांगितलास पहा ! ५९.

ऐसा संतीं करोनि आदरू । निर्भय दिधला नाभिकारू ।
एका जनार्दनीं हर्षनिर्भरू । केला नमस्कारू संतांसी ॥३६०॥
अशा प्रकारे संतांनी आदरभाव दाखवून अभय दिले. ते पाहून एकाजनार्दनालाही अत्यंत हर्ष होऊन त्यानें संतांना नमस्कार घातला ३६०.

‘वैखरी मात्रा स्वर वर्ण’ । या पदांचें झालें व्याख्यान ।
तेंचि दृष्टांतें श्रीकृष्ण । उद्धवासी जाण सांगतू ॥६१॥
वैखरी, मात्रा, स्वर आणि वर्ण या पदांचे व्याख्यान झाले. तेच श्रीकृष्ण दृष्टांत देऊन उद्ध्वाला सांगतो ६१.

सूक्ष्म जीवशिवांचे मूळ । तोचि वाग्द्वारा झाला स्थूल ।
येचि अर्थीं अतिविवळ । करूनि प्रांजळ सांगत ॥६२॥
जीवाचे आणि शिवाचे जें सूक्ष्म मूळ असते, तोच आदिपुरुष वाणीच्या द्वारानें स्थूलाकारास येतो. ह्याच अर्थानें अत्यंत सरळ विवेचन करून स्पष्टपणे सांगतो ६२.

यथानलः खेऽनिलबन्धुरुष्मा बलेन दारुण्यधिमथ्यमानः ।
अणुः प्रजातो हविषा समेधते तथैव मे व्यक्तिरियं हि वाणी ॥ १८ ॥
[श्लोक १८] जसा आकाशात वार्‍याचा मित्र अग्नी हा उष्णतेच्या रूपात असतो तोच जोराने लाकडावर लाकूड घासले असता ठिणगीच्या रूपात प्रगट होतो नंतर तोच हविर्द्रव्य मिळाल्यानंतर प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे या वाणीच्या रूपाने मीच प्रगट होतो. (१८)

अव्यक्तरूपें ऊष्मा गगनीं । व्यापकपणें असे वन्ही ।
तो अरणीमाजीं मथितां मंथनीं । अतिसूक्ष्मपणीं प्रकटला ॥६३॥
आकाशामध्यें उष्णता ही अदृश्यरूपानें असते. कारण अग्नि हा सर्वत्र व्यापकपणानें असतो. तोच अरणीचें मंथन केले असतां त्या मंथनांत अत्यत सूक्ष्मरूपानें प्रकट होतो ६३.

अनळा अनिळ निजसखा । कोमळ तूळें फुंकितां देखा ।
दिसे लखलखीत नेटका । ज्वाळा साजुका कोंवळिया ॥६४॥
अशीचा वायु हा जिवलग मित्रच आहे. म्हणूनच अग्नीवर बारीक कापूस घालून फुंकले असतां तो चांगला लखलखीत दिसूं लागतो, आणि त्याच्या नाजुक व कोमल ज्वाळा पसरूं लागतात ६४.

तेथ पावला दशा मध्यम । मग हवनद्रव्यें करितां होम ।
तेणें थोरावला निरुपम । वाढला व्योमचुंबित ॥६५॥
अशा प्रकारें अग्नीला मध्यम स्थिति प्राप्त झाली की नंतर हवनद्रव्यानें होम करूं लागले असतां त्या हवनानें तो भयंकर भडकतो व त्याच्या ज्वाळा आकाशाला जाऊन भिडतील एवढा मोठा वाढतो ६५.

तैसा सूक्ष्म नाद शिवसंयोगें । प्राणसंगमें लागवेगें ।
षटचक्रादिप्रयोगें । वैखरीयोगें अभिव्यक्त ॥६६॥
त्याप्रमाणें सूक्ष्म नाद शिवाच्या संसर्गानें, प्राणाच्या संगतीनें आणि षट्चक्रादि संस्कारांच्या योगानें वाणीच्या रूपानें बाहेर पडतो ६६.

मरा हे ऐकतां गोठी । ते वाचा सर्वांशें वाटे खोटी ।
तेंचि अक्षरें केल्या उफराटीं । रामनामें गोमटी निववी वाचा ॥६७॥
‘मरा’ हा शब्द ऐकला असतां ती वाणी सर्वस्वी अमंगल अशी वाटते. पण तीच अक्षरें उलटी केली असतां ‘राम’ या नावानें पवित्र झालेली वाचा समाधान करते ६७.

करितां सुष्ठु दुष्टु उच्चार । वर्ण नव्हती क्षर अक्षर ।
यालागीं नांव तें अक्षर । यापरी पवित्र ते वाणी ॥६८॥
चांगला किंवा वाईट कसाही उच्चार केला असतां वर्ण कांहीं नाहींसे होत नाहीत. ते कायमच असतात. म्हणूनच वर्णाना ‘अक्षर’ (अविनाशी) असे म्हणतात. ह्याप्रमाणें ती वाणी पवित्र होत असते ६८.

जैशी वाचेची अभिव्यक्ती । तैशीच इतर इंद्रियप्रवृत्ती ।
संक्षेपें तेही स्थिती । उद्धवाप्रती सांगतू ॥६९॥
जशी वाणी वर्णोच्चारांनी स्पष्टपणे प्रगट होते, त्याचप्रमाणें इतर इंद्रियांचीही प्रवृत्ति आहे. ती त्या इंद्रियांची स्थिति देखील श्रीकृष्ण उद्धवाला संक्षेपानें सांगतो ६९.

एवं गदिः कर्म गतिर्विसर्गो घ्राणो रसो दृक् स्पर्शः श्रुतिश्च ।
सङ्कल्पविज्ञानमथाभिमानः सूत्रं रजःसत्त्वतमोविकारः ॥ १९ ॥
[श्लोक १९] याचप्रमाणे बोलणे, कर्म करणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, वास घेणे, चव घेणे, पाहाणे, स्पर्श करणे, ऐकणे, मनाने संकल्पविकल्प करणे, बुद्धीने निश्चय करणे, अभिमान धरणे इत्यादी सर्व क्रिया, महत्तत्त्व, तसेच सत्त्व, रज, तम इत्यादी तिन्ही गुणांची कार्ये, हे सर्व मीच आहे, असे समज. (१९)

जैशी वाचेची व्युत्पत्ती । तैशीच कर्मेंद्रियांची प्रवृत्ती ।
चरणांच्या ठायीं गती । ग्रहणशक्ती हस्तांची ॥३७०॥
वाणी प्रगट होण्याचा जसा हा प्रकार आहे, त्याचप्रमाणें कर्में हा इंद्रियांची प्रवृत्ति प्रकट होण्याचा प्रकार आहे. चरणांमध्यें गति आणि हातांची ग्रहणशक्ति (कोणतीही वस्तु धरण्याचे सामर्थ्य ) ही प्रगटपणे दिसतात. ३७०.

विसर्ग जाण पायूचा । सुखोद्रेक तो लिंगाचा ।
कर्मेंद्रियीं पांचवी वाचा । विस्तारू तिचा सांगीतला ॥७१॥
विसर्ग हा गुदद्वाराचा गुण आणि आत्यंतिक सुखोपभोग हा लिंगाचा गुण हे प्रगट होतात. कर्मेंद्रियांत पांचवी जी वाणी आहे, तिचें विस्तारपूर्वक वर्णन मागे सांगितले आहे ७१.

तैशींच जाण ज्ञानकरणें । दृष्टी उठी देखणेपणें ।
रसना रसातें चाखों जाणे । श्रवणा श्रवणें अधिकारू ॥७२॥
त्याचप्रमाणें ज्ञानेंद्रिये होत असे समज. दृष्टि ही देखणेपणानें व्यक्त होते, जिव्हा ही रस कसे चाखावयाचे हे जाणते, आणि कानाला ऐकण्याच्या गुणामुळें अधिकार मिळाला आहे ७२.

शीत उष्ण मृदु कठिण । हें त्वगिंद्रियाचें लक्षण ।
सुगंध दुर्गंध जाणतेपण । घ्राण विचक्षण ते कर्मीं ॥७३॥
शीत, उष्ण, मऊ, कठीण हे ज्ञान त्वचा ह्या इंद्रियामुळें व्यक्त होते. सुगंध किंवा दुर्गध यांचे ज्ञान होण्याच्या कामी नाक हेच चतुर असतें ७३.

संकल्प विकल्प मनाचे । निश्चयो कर्म बुद्धीचें ।
चिंतन जाण चित्ताचें । अहंकाराचें मीपण ॥७४॥
मनाचे संकल्प किंवा विकल्प, तसेंच निश्चय हे बुद्धीचे कर्म होय, चिंतन हें चित्ताचे कर्म होय आणि मीपण हें अहंकाराचे कर्म होय ७४.

सूत्र तंव प्रधानाचें । विकार रजतमसत्त्वांचे ।
संक्षेपें विवरण तिहींचे । ऐक साचें सांगेन ॥७५॥
रजतमसत्त्वांचे विकार हे तर मूळमायेचे विकार आहेत. त्या तिहींचेंही विवरण मी आता खरोखर संक्षेपानें सांगेन ऐक ७५.

आधिदैव आधिभौत । ज्यासी अध्यात्म म्हणत ।
वाढला जो प्रपंचू येथ । ईश्वराचें अभिव्यक्त स्वरूप जाण ॥७६॥
आधिदैव, आधिभौत आणि ज्याला अध्यात्म असे म्हणतात, त्या ठिकाणीं जो प्रपंच वाढला, तें ईश्वराचें दृश्य स्वरूप होय, हे लक्षांत ठेव ७६.

जगाचें मूळकारण । अंगें ईश्वरचि आपण ।
त्या कारणाहूनि कार्य भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥७७॥
ईश्वर हा आपण स्वत:च जगाचे मूळ कारण आहे. त्या कारणाहून भिन्न असें कार्य मुळींच होत नाहीं ७७.

हो कां घृताची एके काळीं । थिजोनि झालिया पुतळी ।
ते घृताहोनि वेगळी । नाहीं देखिली प्रत्यक्ष ॥७८॥
समजा की एकादे वेळी तूप थिजून त्याची पुतळी झाली, तर ती तुपाहुन निराळी अशी प्रत्यक्ष कधींच दृष्टीस पडत नाही ७८.

काष्ठाचा घोडा केला । अंगें ठाणें अति मिरविला ।
तो काष्ठपणा नाहीं मुकला । सर्वांगें शोभला काष्ठत्वें ॥७९॥
किंवा लाकडाचा घोडा केला, आणि त्याची आंगलट, उभे राहण्याची ऐट, वगैरे प्रकारांनी तो अत्यंत शोभिवंत दिसला, तरी त्यानें लाकूडपणा सोडलेला नसतो, तो सर्वांगांनी लाकडामुळेंच शोभत असतो ७९.

त्याचे पाहतां वेगळाले अवयव । खूर खांद काष्ठचि सर्व ।
तेवीं महाभूतें गुणप्रभव । स्वरूप सावेव शिवाचें ॥३८०॥
त्याचे अवयव निरनिराळे पाहिले असतां खूर, खांदे हे सर्व लाकडाचेच. त्याप्रमाणें तीन गुणांपासून झालेली पंचमहाभूते ही शिवाचेंच मूर्तिमंत स्वरूप आहेत ३८०.

सुवर्णाचें झालें लेणें । तें जेवीं मिरवे सोनेपणें ।
तेवीं महाभूतें विषयकरणें । अभिन्नपणें शिवरूप ॥८१॥
सोन्याचा दागिना झाला, तरी तो ज्याप्रमाणें सोन्याच्याच रूपानें शोभत असतो, त्याप्रमाणें महाभूते व विषयेंद्रियें ही देखील अभिन्नपणानें शिवस्वरूपच आहेत ८१.

फडा पुच्छ वांकुडा बाग । येणें आकारें म्हणती नाग ।
तो नाग नव्हे सोनेंचि चांग । तेवीं हें जग मद्‌रूप ॥८२॥
सोन्याचा नाग तयार केला असतां त्याची फडा, शेपूट, आणि वांकडा बांक अशा आकारामुळें त्याला ‘नाग’ असे म्हणतात. पण तो खरोखर नाग नसतो, ते उत्तम प्रतीचे सोनेंच असते. त्याप्रमाणेंच हें जगही मद्रूपच आहे ८२.

प्रपंच ईश्वरासी अभिन्न । येचि अर्थीं नारायण ।
उद्धवासी सांगें आपण । अभिन्नपण जीवशिवां ॥८३॥
प्रपंच हा ईश्वराहून निराळा नाही. याच अर्थी जीव-शिवांचे अभिन्नपण श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला सांगत आहे ८३.

अयं हि जीवस्त्रिवृदब्जयोनिः अव्यक्त एको वयसा स आद्यः ।
विश्लिष्टशक्तिर्बहुधेव भाति बीजानि योनिं प्रतिपद्य यद्वत् ॥ २० ॥
[श्लोक २०] त्रिगुणमय ब्रह्मांडरूपी कमळाचे कारण हा परमात्माच आहे प्रथम तो एकच अव्यक्त होता नंतर काल व माया यांच्या साह्याने तोच अनेक रूपांमध्ये प्रगट झाल्यामुळे अनेक असल्यासारखा वाटू लागला जमिनीत बी पेरल्यानंतर ते जसे अनेक रूपांमध्ये विस्तार पावून प्रगट होते, तसे हे आहे (२०)

जीवाचा जीवू आपण । यालागीं बोलिजे शिवपण ।
जीवशिवरूपें हा भिन्न । जीवत्व जाण या हेतू ॥८४॥
शिव हा स्वत: जीवाचा जीव आहे, म्हणून त्याचे शिवपण स्वतंत्र आहे असे म्हणतात. जीव आणि शिव या रूपांनी हा भिन्न भासतो, म्हणून जीवपण निराळे दिसते ८४.

सागरु आपुल्या अंगावरी । वर्तुळ आवर्त करी धरी ।
तेवीं लोकपद्मातें श्रीहरी । करी धरी निजनाभीं ॥८५॥
समुद्र हा आपल्या आंगावर खोलगे, भोंवरे तयार करतो व धरतो, त्याप्रमाणेंच श्रीहरीनें ब्रह्मांडक मल उत्पन्न करून ते आपल्या नाभीमध्यें धारण केलें आहे ८५.

‘त्रिवृदब्ज’ म्हणिजे यापरी । त्या नाभिकमळामाझारीं ।
स्वलीला त्रैलोक्यातें धरी । पद्मनाभ श्रीहरी या हेतू ॥८६॥
म्हणूनच त्याला ‘त्रिवृदब्ज’ (तीन लोकांना धारण करणारा) असे म्हणतात. त्या नाभिकमलामध्येंच आपल्या लीलेनें त्रैलोक्य धारण करतो, यामुळें श्रीहरीला ‘पद्मनाभ’ असे म्हणतात ८६.

सुवर्णाच्या सिंहासनीं । सुवर्णमूर्ती बैसवूनी ।
पूजिजे सुवर्णसुमनीं । एकपणें तीन्ही भासती ॥८७॥
सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचीच मूर्ति बसवून सोन्याच्याच फुलांनी तिची पूजा करावी, म्हणजे ती तिन्ही एकरूपच भासतात ८७.

तेवीं नाभिपद्मीं त्रैलोक्य धरितां । तिहींतें भासवी अभिन्नता ।
यालागीं पद्मनाभ तत्त्वतां । आलें वाक्पथा श्रुतीचिया ॥८८॥
त्याप्रमाणें नाभिकमलामध्यें त्रैलोक्य धारण केले असतां त्या तिन्ही लोकांमध्यें ऐक्यताच भासवितो. म्हणून खरोखर श्रुतीच्या मुखांतून ‘पद्मनाभ’ असाच शब्द बाहेर पडला ८८.

दृति मार्दवें पिंवळी । एकली भासे चांपेकळी ।
तेचि विकासे जेवीं नाना दळीं । तेवीं मी वनमाळी लोकत्वें ॥८९॥
सुगंध आणि मृलत्व ह्यांमुळें पिवळी झालेली चांफ्याची कळी एकटी दिसते, पण तीच ज्याप्रमाणें अनेक पाकळ्यांनी प्रफुल्लित होते, त्याप्रमाणें मी श्रीकृष्ण अनेक लोकांच्या रूपानें विकसित झालों आहे ८९.

हें नसतां कार्यकारण । यापूर्वी मी अव्यक्त जाण ।
जो मी प्रमाणांचाही प्रमाण । भेदें जेथ आण वाहिली ॥३९०॥
हें कार्य-कारण नव्हते त्याच्यापूर्वी मी अव्यक्तच होतो असे समज. जो मी सत्यांतील सत्य आहे, आणि मला स्पर्शही करावयाचा नाही अशी भेदानें शपथ घेतली आहे (माझ्या ठिकाणीं भेद मुळीच नाही) ३९०,

हेतु मातु दृष्टांत । रिघों न शके ज्याच्या गांवांत ।
अपार अनादि अनंत । आद्य अव्यक्त मी ऐसा ॥९१॥
कारण, शब्द व दृष्टांत त्यांपैकी कोणीच ज्याच्या गांवांत शिरूं शकत नाही, असा मी अपार, अनादि, अनंत, आद्य आणि अव्यक्त आहे. ९१.

एवं केवळ जें अभेद । तेथें कैंचे त्रिविध भेद ।
जेथ लाजोनि परतले वेद । स्वरूप शुद्ध तें माझें ॥९२॥
असे केवळ जे अभेदस्वरूप, त्यांत तीन प्रकारचे भेद कुठले असणार ? ज्या स्वरूपाचा विचार करतां करतां लज्जित होऊन वेदसुद्धा परत फिरले, तेच माझें शुद्ध स्वरूप होय ९२.

तो न मेळवितां साह्यमेळू । स्वलीलाक्षोभें क्षोभक काळू ।
स्वशक्तीनें झालों सबळू । शक्तिबंबाळू चेतविला ॥९३॥
तो मी साहाय्यकर्त्या साधनांचा समुदाय न जमविता स्वत:च्या लीलाक्षोभानेंच क्षुब्ध असा काळ होतो. मी आपल्याच सामर्थ्यानें प्रबळ झालों आहे, आणि माझ्याच शक्तीचा भयंकर विस्तार सर्वत्र चेतवून ठेवला आहे ९३.

ते निजशक्तीचे विभाग । म्यांचि विभागिले चांग ।
त्या विभागांचे भाग । ऐक साङ्ग सांगेन ॥९४॥
त्या माझ्या शक्तीचे विभागही मींच नीटनेटके विभागून ठेविले आहेत. त्या विभागांचे विभाग मी सविस्तर सांगेन ऐक ९४.

गुणशक्ति देवताशक्ती । मनःशक्ती इंद्रियशक्ती ।
महाभूतांची भूतशक्ती । एथ क्रियाशक्ती मुख्यत्वें ॥९५॥
गुणांची शक्ति, देवतांची शक्ति, मनाची शक्ति, इंद्रियांची शक्ति, महाभूतांची भूतशक्ति, ह्या सर्वांमध्यें क्रियाशक्ति हीच मुख्यतः असते ९५.

जीवापासाव अदृष्टशक्ती । झाली अनिवार त्रिजगतीं ।
हरिहरां नावरे निश्चितीं । अदृष्टशक्ती अनिवार ॥९६॥
जीवापासून जी अदृष्टशक्ति उत्पन्न झाली, ती त्रैलोक्यांत अनिवार आहे. हरिहरालासुद्धा खरोखर आटपत नाही अशी अदृष्टशक्ति अनिवार आहे ९६.

जें अदृष्टशक्तीनें जिवातें । बांधोनि केलें आपैतें ।
तिसी आवरावया मातें । सामर्थ्य येथें आथीना ॥९७॥
अदृष्टशक्तीनें जीवाला बद्ध करून जें अगदी आपलेसे करून टाकले आहे, तिला आवरावयाला मला येथे सामर्थ्य नाहीं ९७.

जेवीं कां राजाज्ञा जाण । राजा प्रतिपाळी आपण ।
तेवीं अदृष्टशक्तिउल्लंघन । मी सर्वथा जाण करींना ॥९८॥
ज्याप्रमाणें राजाज्ञा असेल ती खुद्द राजासुद्धा पाळतो, त्याप्रमाणें अदृष्टशक्तीचें उल्लंघन मी मुळीच करीत नाहीं हें लक्षांत ठेव ९८.

जीभ कापूनि देवासी वाहती । तैसें नासिक न छेदिती ।
तेवीं मी छेदी कर्मस्थिती । परी अदृष्टगती छेदींना ॥९९॥
जीभ कापून देवाला वाहतात, तसे नाक मात्र कापीत नाहीत. त्याप्रमाणें मी कर्माची स्थिति नाहींशी करतो, पण अदृष्टाची गति मी तोडीत नाहीं ९९.

अथवा विशेषेंसीं निश्चितीं । मीं माया आलिंगिली निजशक्ती ।
तो मी एकूचि त्रिजगतीं । बहुधाव्यक्तीं आभासे ॥४००॥
अथवा विशेषेंकरून निश्चितपणे असे समज की, माझीच शक्ति जी माया, तिला आलिंगन देऊन बसलेला असा तो मी एकटाच त्रैलोक्यामध्यें अनेक व्यक्तरूपांनी भासमान होतो ४००.

माझिया साक्षात्कारा आला । जो जीवन्मुक्तत्व पावला ।
तोही अदृष्टें बांधला । वर्ते उगला देहगेहीं ॥१॥
जो जीवन्मुक्त झाला, तोच मत्स्वरूपाला येऊन पोचला. परंतु तोही अदृष्टानेंच बांधला गेला असल्यामुळें देहरूपी गृहामध्यें आपोआप नाना प्रकारे वागत असतो १,

जनकू राजपदीं नांदे । शुक नागवा प्रारब्धें ।
कळी लाविजे नारदें । अदृष्ट छंदें विनोदी ॥२॥
जनक राजा हा राज्यपदावर शोभत होता. शुकाचार्य आपल्या प्रारब्धाप्रमाणें नग्नस्थितीतच राहात असे. नारदानें तर नेहमी लोकांमध्यें कलहच लावीत असावे, असा तर प्रारब्धगतीनें विनोदी बनला होता २.

वसिष्ठ पुरोहितत्व करी । भीष्म पहुडे शरपंजरीं ।
याज्ञवल्क्या दोनी नारी । अदृष्टाकारीं वर्तत ॥३॥
वसिष्ठाला उपाध्येपणा करावा लागला. भीष्म शरपंजरी निजला. याज्ञवल्क्याला दोन बायका असून प्रारब्धाच्या तवडीत सांपडून तो त्यांतच वागत असे ३.

यापरी गा अदृष्टशक्ती । अनिवार वाढली त्रिजगतीं ।
त्या जीव बांधले अदृष्टगतीं । जेवीं गारोडियाहातीं वानर ॥४॥
उद्धवा ह्याप्रमाणे प्रारब्धाची शक्ति त्रैलोक्यांत अनिवार वाढलेली आहे. ज्याप्रमाणें गारुड्याच्या हातांतील वानर असतो, त्याप्रमाणें त्या अदृष्टातीनें जीव बांधलेले असतात ४.

त्या जीवादृष्टें बहुधा व्यक्ती । मी एक भासें त्रिजगतीं ।
‘विष्वतश्चक्षु’ या श्रुतीं । बहुधामूर्तीं मी एक ॥५॥
ह्या त्रैलोक्यांत मी एक असून त्या जीवांच्या प्रारब्धगतीनें अनेक व्यक्तिरूपानें भासमान होतो. ‘विश्वतश्चक्षु’ असें श्रुतीत म्हटले आहे, यावरून या सर्व निरनिराळ्या व्यक्तींत मीच एक असल्याचे स्पष्ट होतें ५.

मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नाना नामाकारें पूजिलीं ।
परी ते मृत्तिकाचि संचली । तेवीं सृष्टि झाली मद्‌रूपें ॥६॥
मातीचीं गोकुळें केली आणि त्यांना निरनिराळीं नांवें व निरनिराळे आकार कल्पून ती पूजिली, परंतु ती सारी मातीच सांठलेली असते. त्याप्रमाणें सृष्टि ही माझ्याच रूपानें व्यक्त झाली आहे ६.

जेवीं एकला एकु आपण । निद्रेसी देतां आलिंगन ।
स्वप्नीं देखे बहुविध आपण । तेवीं मी जाण विश्वात्मा ॥७॥
ज्याप्रमाणें आपण एकटा एकच असून निद्रेला वश झाला म्हणजे स्वप्नामध्यें आपण अनेक रूप धारण केल्याचे पाहतो, त्याप्रमाणेंच मीही विश्वात्मा आहे असे समज ७.

जेवीं सूक्ष्म वटबीज केवळ । त्यासी मीनल्या भूमिजळ ।
वाढोनियां अतिप्रबळ । वृक्ष विशाळ आभासे ॥८॥
ज्याप्रमाणें वडाचे बीं केवळ अगदी लहान असते व त्याला जमीन व पाणी मिळाले म्हणजे त्याचा अंकुर वाढून अत्यंत बळकट व अफाट विस्ताराचा असा वृक्ष दिसूं लागतो ८,

तेथ नाम रूप पुष्प फळ । तें बीजचि आभासे समूळ ।
तेवीं जगदाकारें सकळ । भासे केवळ चिदात्मा ॥९॥
त्या वेळी त्याचे नाम, रूप, पुष्प, ह्या सर्व रूपांत तें मूळचें बीजच वास्तविक भासूं लागतें, त्याप्रमाणें विश्वाच्या आकारानें केवळ चिदात्माच सर्वत्र भासमान असतो ९.

जे कां मूळ बीजाची गोडी । तोचि स्वाद वाढला वाढी ।
कांडोकांडीं स्वादुपरवडी । अविकार गोडी उंसाची ॥४१०॥
मूळ बीजाची जी गोडी असते, तीच गोडी वाढत वाढत मोठ्या आकारांत वाढली. उंसाच्या प्रत्येक कांडांत ज्या प्रकारची गोडी असते, तीच उंसाची मूळ अधिकृत गोडी होय ४१०.

तेवीं मूळीं चिदात्माचि कारण । तेथूनि जें जें तत्त्व झालें जाण ।
तें तें निखळ चैतन्यघन । जग संपूर्ण चिद्‌रूप ॥११॥
त्याप्रमाणें मूळ कारण चिदात्माच आहे. त्याच्यापासून जें जें तत्त्व झालेले आहे, तें तें शुद्ध चैतन्यानेंच भरलेले आहे. सर्व जग चित्स्वरूपच होय ११.

ऊंस सर्वांगें बीज सकळ । बीजरूपें ऊंस सफळ ।
तेवीं जगाचें चिन्मात्र मूळ । जाण सकळ तें चिद्‌रूप ॥१२॥
ऊंस हा सर्वांगानें सर्वच बीजरूप असतो. बीजरूपानेंच ऊंस सफल होतो. त्याप्रमाणें चिन्मात्र हेंच जगाचें मूळ होय, आणि ते सर्व जग चित्स्वरूप होय १२.

बीज ऊंस दोनी एकरूप । तैसा प्रपंच जाण चित्स्वरूप ।
येचि अर्थीं अतिसाक्षेप । कृपापूर्वक सांगत ॥१३॥
बीज आणि ऊंस ही दोन्ही एकरूप असतात, त्याप्रमाणें प्रपंच हा चित्स्वरूपच आहे. याच अर्थानें श्रीकृष्ण अत्यंत अगत्यानें कृपापूर्वक सांगत आहे १३.

यस्मिन्निदं प्रोतमशेषमोतं पटो यथा तन्तुवितानसंस्थः ।
य एष संसारतरुः पुराणः कर्मात्मकः पुष्पफले प्रसूते ॥ २१ ॥
[श्लोक २१] कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत असतात, त्याचप्रमाणे या परमात्म्यामध्येच सारे विश्व ओतप्रोत भरले आहे हा पुरातन संसाररूपी वृक्ष कर्ममय आहे ते कर्मच भोगरूप फुले आणि मोक्षरूप फळ उत्पन्न करते. (२१)

यालागीं संसार जो समस्त । माझ्या ठायीं असे ओतप्रोत ।
मजवेगळें कांहीं येथ । नाहीं निश्चित अणुमात्र ॥१४॥
ह्याकरितां संसार म्हणून जो सर्व आहे, तो माझ्यामध्येंच ओतप्रोत भरलेला आहे. माझ्याहून निराळे असें खरोखर अणुमात्रसुद्धा येथे कांही नाही १४.

येचि अर्थींचा दृष्टांतू । देवो उद्धवासी सांगतू ।
जेवीं कापुसाचे सूक्ष्मतंतू । कांतोनि निश्चितू पटु केला ॥१५॥
ह्याच अर्थींचा दृष्टांत देव उद्धवाला सांगतात. ज्याप्रमाणें खरोखर कापसाचे बारीक बारीक धागे कांतून त्यांचे निश्चित असें एक वस्त्र केले १५;

आडवेतिडवे विणले तंतू । त्यांसी वस्त्र नाम हे मृषा मातू ।
तेवीं संसारशब्द हा व्यर्थू । स्फुरें भगवंतू मी तद्‌रूप ॥१६॥
म्हणजे त्यांत वस्तुतः आडवे तिडवे विणलेले तंतूच असतात, त्यांना वस्त्र हें नावही व्यर्थच होय; त्याप्रमाणें संसार हें नावही व्यर्थच होय. वास्तविक संसाराच्या रूपानें मी भगवंतच स्फुरद्‌रूप होत असतों १६.

पाहतां सूतचि दिसे उघडें । त्यांचें नाम म्हणती लुगडें ।
प्रत्यक्ष चैतन्य स्फुरतां पुढें । त्यासी संसारु वेडे म्हणताती ॥१७॥
वास्तविक पाहूं गेलें तर सूत हे स्पष्टच दिसत असते, असे असतां त्याचे नांव ‘लुगडे’ असे म्हणतात. त्याप्रमाणें आपणापुढे प्रत्यक्ष चैतन्य खेळत असतांही वेडे लोक त्याला संसार असें म्हणतात १७.

सुतावेगळें वस्त्र न दिसे । मजवेगळा प्रपंचु नसे ।
उद्धवा अप्राप्ताचें भाग्य कैसें । मीचि नसें म्हणताती ॥१८॥
सुताशिवाय ज्याप्रमाणें वस्त्र दिसत नाही, त्याप्रमाणें माझ्याशिवाय प्रपंच दिसत नाही. असें असतां उद्धवा ! ज्यांना मी प्राप्त झालों नाही, त्या लोकांचे नशीब कसें तें पाहा ! मीच नाही असे ते म्हणतात १८.

यापरी मी सर्वगत । विश्वात्मा विश्वभरित ।
वृक्षदृष्टांतें प्रस्तुत । तुज म्यां येथ सांगीतलें ॥१९॥
ज्याप्रमाणें मी सर्वव्यापी विश्वात्मा आणि विश्वांत भरलेला असल्याबद्दल आतां वृक्षाच्या दृष्टांतानें येथे मी तुला सांगतलें १९.

मज देखणा ज्याचा निर्धारू । त्यासी मी केवळ सर्वेश्वरू ।
मज अप्राप्त जो नरू । त्यासी संसारू आभासे ॥४२०॥
मला पाहण्याचा ज्याचा निधार झाला आहे. त्याला केवळ सर्वेश्वरच आहे. मला न पावलेला जो मनुष्य असतो, त्याला संसाराचाच भास होतो ४२०.

जो सर्वात्मा सर्वेश्वरू । भ्रांतासी भासे भवतरुवरू ।
त्या भवतरूचा विस्तारू । स्वयें श्रीधरू सांगत ॥२१॥
मी जो सर्वात्मा व सर्वेश्वर आहे, तोच भ्रांतिष्ट माणसाला संसाराचा मोठा वृक्ष असा वाटतों. त्याच संसारवृक्षाचा विस्तार श्रीकृष्ण स्वतः सांगतात २१.

भ्रांतीस्तव भवतरुवरू । कर्माकर्मजळें वाढला थोरू ।
जीर्ण जुनाट अपरंपारू । ओतंबरू फळपुष्पीं ॥२२॥
भ्रांतीमुळेंच हा संसारवृक्ष उत्ब्न्न होखून कर्माकर्मरूप जळानें थोर फोंफावला आहे. तो जीर्ण, जुनाट व अत्यंत विस्तीर्ण असा असून फळापुष्पांनी ओथंबलेला आहे २२.

त्याचें कोण बीज कोण मूळ । कोण रसू कोण फळ ।
जेणें भ्रमले जीव सकळ । तें मी समूळ सांगेन ॥२३॥
त्याचे बीज कोणते ? मूळ कोणते ? रस कोणता ? फळ कोणतें ? इत्यादि ज्या प्रश्नांच्या योगेंकरून सर्व जीव भ्रमांत पडले आहेत, ते मी सविस्तर सांगेन २३.

द्वे अस्य बीजे शतमूलस्त्रिनालः पञ्चस्कन्धः पञ्चरसप्रसूतिः ।
दशैकशाखो द्विसुपर्णनीडः त्रिवल्कलो द्विफलोऽर्कं प्रविष्टः ॥ २२ ॥
[श्लोक २२] पाप आणि पुण्य ही या संसाररूपी वृक्षाची दोन बीजे आहेत शेकडो वासना या याच्या मुळ्या तीन गुण ही त्याची तीन खोडे पंचमहाभूते या याच्या पाच फांद्या आहेत यांमधून पाच प्रकारचे रस. (शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध) बाहेर पडतात दहा इंद्रिये आणि एक मन ह्याही याच्या फांद्याच होत एक जीव आणि एक ईश्वर या झाडावर घरटे बांधून राहातात (२२)

भ्रमभूमीमाजिवडें । पापपुण्यजोडपाडें ।
बीज पडतांचि वृक्ष विरूढे । अग्रीं वाढे कल्पना ॥२४॥
भ्रमरूप भूमीमध्यें पापपुण्य या जोडीचे जोडबीज पडतांच हा वृक्ष उत्पन्न होतो, आणि त्याच्या शेंड्यावर कल्पना वाढते २४.

पान फूल न दिसे फळ । वेलाअंगीं दोरवा सकळ ।
तेणेंचि वेला वाढ प्रबळ । तेवीं संसार सबळ कल्पनाग्रें ॥२५॥
ज्याप्रमाणें पान, फूल किंवा फळ दिसत नसून वेलाच्या अंगांत दोर्‍यासारखे तंतूच सर्व भरलेले असतात व त्याच तंतूंनी वेलांची प्रबळ वाढ होते, त्याप्रमाणें कल्पनांच्या शेंड्यानें संसार हा बळकट झाला आहे २५.

कर्माकर्मप्रवाहजळें । भरिलें अविद्येचें आळें ।
अनंत वासना तेचि मूळें । वृक्ष तेणें बळें ढळेना ॥२६॥
कर्माकर्मरूपी पाटाच्या पाण्यानें अविद्यारूप आळे भरलें, आणि ज्या अनंत वासना तींच मुळें खोल जाऊन त्यांच्या बळकट आधारामुळें हा वृक्ष मुळीच हालेनासा झाला २६.

सूक्ष्म वासना कल्पकोडी । अधोगती रुतल्या बुडी ।
संकल्पविकल्पें चहूंकडीं । पसरल्या बुडीं बुचबुचित ॥२७॥
सूक्ष्म वासनारूप कोट्यवधि मुळ्या खाली जाऊन रुतून बसलेल्या असतात. त्या संकल्पविकल्पांच्या रूपानें चहूंकडे पसरून त्याच्याखाली जाळें माजलेलें असतें २७.

संचितक्रियमाण वाफे भारी । सुबद्ध भरले जळेंकरीं ।
भरिलेच मागुते भरी । प्रवाहो त्यावरी पडलासे ॥२८॥
संचितक्रियमाणांचे असंख्य वाफे पाण्यानें आधींच तुडुंब भरलेले असतात, आणखी त्यांवर दुसराही प्रवाह येऊन ते पूर्वी भरलेले वाफे पुनः पुन्हा तो भरीतच असतो २८.

तेणें वृक्ष सबळ भारी । नित्य नूतन वाढी धरी ।
सगुण गुणाचे वाढीवरी । त्रिगुण अहंकारीं त्रिनाळ ॥२९॥
त्यामुळें हा संसारवृक्ष अतिशयच बळकट होऊन नित्य नवी वाढ धरतो. सगुण गुणाच्या वाढीवर त्रिगुणात्मक अहंकाराचे त्रिदळ फुटते २९.

त्रिगुणगुणांची परवडी । येरांची येरांमाजीं मुरडी ।
येरायेरांवरी बुडी । मिसळे वाढीं वाढती ॥४३०॥
त्रिगुणांच्या गुणांचा प्रकार तर काय ! ते एकमेकांत आदी गुंतून राहतात. ते परस्परांच्या अंगावर पडून मिसळून जातात व एकत्र वाढीनें मोठे वाढतात १३०.

पंचभूतांच्या खांद्या थोरी । प्रपंच वाढल्या बाहेरी ।
पसरल्या येरयेरांवरी । मीनल्या परस्परीं वाढती ॥३१॥
पंचमहाभूतांच्या मोठमोठाल्या खांद्या तर प्रपंचाच्याही बाहेर जातात आणि त्या एकमेकांवर पसरतात व एकमेकांत मिसळून वाढीस लागतात ३१.

समूळ गर्भ साधूनि रुखा । मनोमय वाढलिया शाखा ।
अग्नीं दशेंद्रियफांटे देखा । तिच्या झुळका डोलती ॥३२॥
या वृक्षाला मुळापासून गाभ्यांतून मनोमय खांद्या वाढलेल्या आहेत. त्या खांद्यांच्या खोडाला दशेंद्रियांचे फाटे फुटलेले आहेत. ते त्या खांदीच्या मंद मंद खुळकेनें डोलत असतात ३२.

त्या त्या शाखांमाजीं देखा । दैवतें आलीं वस्तीसुखा ।
करूनि कर्माचा आवांका । आपुलाली शाखा ते धरिती ॥३३॥
त्या प्रत्येक शाखांमध्यें सुखानें राहण्याकरितां दैवतेंही आलेलीं असतात. तीं कर्मांचा आधार धरून आपापल्या शाखेवर बसतात ३३.

दशधा वायूची झडाड । तेणें तें डोलत दिसे झाड ।
त्यामाजीं दों पक्ष्यांचें नीड । अतिगूढ अतर्क्य ॥३४॥
दहा प्रकारच्या वायूचा सोसाटा उद्‌भवतो, त्यामुळें ते झाड डोलते आहे असे दिसते. त्यामध्यें दोन पक्ष्यांचे अत्यंत गूढ व अतयं असें एक घरटें आहे ३४.

जेथूनि उपजे निजज्ञान । तेंचि नीड हृदयभुवन ।
जीवू परमात्मा दोघेजण । अतर्क्य पूर्ण वसताती ॥३५॥
जेथून आत्मज्ञान उत्पन्न होतें तेंच ते घरटें होय. तेंच हृदयमंदिर. त्यांत जीव आणि परमात्मा हे दोघेजण पूर्णपणे अतर्क्य अशा रीतीनें राहतात ३५,

जीवू जो देहाभिमानी । परमात्मा जो निरभिमानी ।
इंहीं दोघींजणीं मिळोनी । हृदयभुवनीं नीड केलें ॥३६॥
जो देहाभिमानी जीव आहे, आणि जो निरभिमानी परमात्मा आहे, अशा दोघांजणांनी मिळून हृदयमंदिराचेंच घरटें केलें आहे ३६.

जीव संकल्पविकल्पप्राप्ती । परमात्मा निर्विकल्पस्थिती ।
दोहींची हृदयामाजीं वस्ती । नीड निश्चितीं या हेतू ॥३७॥
जीव हा संकल्प-विकल्प प्राप्त करून देणारा आहे, आणि परमात्मा निर्विकल्पस्थिति देणारा आहे. या दोघांचीही वस्ती हृदयामध्येंच असते, यामुळें खरोखर ते त्यांचे घर होय ३७.

पाहें पां वात पित्त श्लेष्मा । या आंतरत्वचा भवद्रुमा ।
वल्कलें म्हणावयाचा महिमा । भक्तोत्तमा या हेतू ॥३८॥
आणखी पहा ! वात, पित्त व कफ या त्या संसाररूप वृक्षाच्या अंतर्साली होत. हे भक्तोत्तमा उद्धवा ! याच कारणानें त्यांना वल्कलें म्हणण्याजोगें महत्त्व आले आहे ३८.

गगनाहूनि वाढला वरुता । शून्यासहित लांबला आरुता ।
सैंघ पसरला सभोंवता । दिशांच्या प्रांता सांडूनी ॥३९॥
हा वृक्ष आकाशाहून उंच वाढला आहे; आणि शून्याच्याही खाली लांबपर्यंत गेला आहे. तसेंच विस्तारानें तो सभोंवतीं दिशांच्या मर्यादा फोडून कितीवरी पसरलेला आहे ३९.

एवं विस्तारलेनि विस्तारा । वृक्ष उन्मळोनि मदभरा ।
पंचरसांच्या विषयधारा । अतिमधुरा वर्षतू ॥४४०॥
अशा प्रकारे विस्तारानें फोफावलेला तो वृक्ष आपल्या मदाच्या भरतीनें उमळून पंचरसात्मक विषयांच्या अत्यंत मधुर धारांचा वर्षाव करूं लागतो ४४०.

श्रुति-स्मृति हींच पानें । त्यामाजीं उगवलीं स्वर्गसुमनें ।
दीक्षितभ्रमर ज्यांकारणें । अतिसत्राणें उडताती ॥४१॥
श्रुति आणि स्मृति हींच त्या वृक्षाची पानें आहेत, आणि त्यांत स्वर्गरूप फुलें फुललेली आहेत, ज्यांसाठी याज्ञिकरूपी भ्रमर मोठ्या वेगानें झेंपा घालीत असतात . ४१.

त्या वृक्षाचीं जावळीं फळें । सुखदुःख दोनी एके मेळें ।
शेंडा धरोनि समूळें । दोनीचि फळें पैं त्यासी ॥४२॥
त्या वृक्षाची सुख व दुःख हीं दोन जावळी फळें असून ती नेहमी एकत्र मिळालेली असतात, आणि त्याच्या शेंड्यापासून बुडख्यापर्यंत तींच दोन फळे त्याला येतात ४२.

जितुकीं सूर्यमंडळें भासती । तितुकी जाण याची स्थिती ।
सुखदुःखफळें तितुक्यांप्रती । कर्मप्राप्ती देतुसे ॥४३॥
जितकी दूरपर्यंत सूर्यमंडळे दिसतात, तितका या वृक्षाचा विस्तार आहे; आणि तितक्यांनाही कर्मप्राप्ति ही सुखदुःखांची फळे देतच असते ४३.

सूर्यमंडळाआरुतें । सांगीतलें भववृक्षातें ।
चंद्रमंडळादि समस्तें । भवभय तेथें नाहीं न म्हण ॥४४॥
सूर्यमंडळापर्यंत हा वृक्ष आहे असे म्हटले म्हणून चंद्रमंडळादि जी सर्व आहेत तेथें संसाराचे भय नाही असे समजू नकोस ४४.

मी सूर्यमंडळमध्यवर्ती । त्या मजवेगळी जे स्फुरे स्फूर्ती ।
तेथवरी भवभयाची प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४५॥
उद्धवा ! मी सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती आहे. त्या माझ्याशिवाय जेवढी म्हणून स्फूर्ति स्फुरण पावते, तेथपर्यंत संसारभय खरोखर आहेच असें खात्रीनें समज ४५,

सूर्याचें जें सूर्यमंडळ । तेंही संसारामाजीं केवळ ।
जो न खाय या वृक्षाचें फळ । तोचि रविमंडळभेदक ॥४६॥
सूर्याचे जे मंडळ आहे, तेंही केवळ संसारामध्येंच आहे. म्हणून या वृक्षाचे फळ जो खात नाही, तोच रविमंडळाला भेदून जातो ४६.

वृक्षाचीं दोनी फळें येथें । दोहों फळांचे दोघे भोक्ते ।
दोघे संसाराआंतौते । ऐक तूतें सांगेन ॥४७॥
या वृक्षाची येथे दोनच फळें आहेत, आणि त्या दोन फळांचे भोक्तेही दोनच आहेत. ते दोघेही संसारांतच असतात. तें तुला सांगेन, ऐक ४७.

अदंति चैकं फलमस्य गृध्रा ग्रामेचरा एकमरण्यवासाः ।
हंसा य एकं बहुरूपमिज्यैः मायामयं वेद स वेद वेदम् ॥ २३ ॥
[श्लोक २३] वात, पित्त, कफ या याच्या तीन साली आहेत सुखदुःख ही दोन फळे होत असा हा संसारवृक्ष सूर्यमंडलापर्यंत पसरलेला आहे विषयलोलुप गृहस्थ या झाडाची दुःखरूप फळे खातात परंतु वनवासी संन्यासी याची सुखरूप फळे खातात एक असणारा मीच मायेमुळे अनेकरूप झालो आहे, हे श्रीगुरूंकडून जे लोक जाणून घेतात, तेच वेदांचे रहस्य जाणणारे होत. (२३)

दुःखफळाचे भोक्ते । अत्यंत विषयासक्त चित्तें ।
गीध गृहस्थ कां जे येथें । अविधीं विषयांतें सेविती ॥४८॥
दुःखरूप फळाचे जे भोक्ते असतात, ते मनानें अत्यंत विषयासक्त असतात. जणूं काय ते गिधाडरूपी गृहस्थ असून येथे विधिबाह्य रीतीनें विषयांचे सेवन करतात ४८.

ग्राम्य विषयीं अतितत्पर । यालागीं बोलिजे ग्रामचर ।
ग्रामगीध जैसे घार । तैसे सादर विषयांसी ॥४९॥
ते ग्राम्य विषयांत अत्यंत तत्पर असतात, म्हणून त्यांना ‘ग्रामचर’ असे म्हणतात. गांवातले गिधाड म्हणजे घारी जशा असतात, तसे हे विषयांना तत्पर असतात ४९.

जेवीं कां घार गगना चढे । तेथूनि आविसा उडी पडे ।
तेवीं नरदेह पावोनि चोखडे । विषयीं झडपडे झोंबती ॥४५०॥
ज्याप्रमाणें घार आकाशात उंच जाते आणि तेथून एकदम आमिषावर तिची उडी पडते, त्याप्रमाणें उत्तम नरदेह प्राप्त झाला असतांही ते विषयाशीं झटापट करीत झोंबत असतात ४५०.

एवं विषयासक्त जे चित्तें । जे अधोगतीतें पावते ।
ते दुःखफळाचे भोक्ते । जाण येथें निश्चित ॥५१॥
असे जे मनानें विषयासक असतात, व जे अधोगतीलाच जाण्यास योग्य असतात, ते दु:खफळाचेच खरोखर भोक्ते असतात, हें निश्चित समज ५१.

सांडोनियां गार्हस्थ्य । वनवासी वानप्रस्थ ।
त्यांसचि सुखफल प्राप्त । जाण निश्चित उद्धवा ॥५२॥
उद्धवा ! जे कोणी गृहस्थाश्रमाचा त्याग करून वनवासी वानप्रस्थाश्रमी झालेले असतात, त्यांनाच सुखफल प्राप्त होते, हे निश्चित समज ५२.

त्या सुखफळाचे विभाग । ब्रह्मसदनान्त इतर स्वर्ग ।
कर्में करूनियां साङ्ग । जेथींचा मार्ग चालिजे ॥५३॥
त्या सुखाच्या फळाचे जे विभागी, यथाशास्त्र संपूर्ण कर्में केल्यामुळेंच ज्यांचा मार्ग चालतां येतो, असे ब्रह्मस्थानाच्या शेवटापर्यंत इर्तर सारे स्वर्गही आहेत. ५३.

ब्रह्मचर्यें वेदाध्ययन । गार्हस्थ्यें पूजिते अग्निब्राह्मण ।
वानप्रस्थाश्रमीं जाण । वन्यफळभोजन वनवासी ॥५४॥
ब्रह्मचर्याश्रमानें वेदाध्ययन करावें, गृहस्थाश्रमानें अग्नीची आणि ब्राह्मणाची पूजा करावी, आणि वानप्रस्थाश्रमांत वनांत राहून वनांतील फलें भक्षण करून असावें ५४.

येणें क्रमेंचि क्रममुक्तिस्थान । जिंहीं ठाकिलें ब्रह्मसदन ।
सुखफळाचे भोक्ते ते जाण । ब्रह्मभुवननिवासी ॥५५॥
अशा अनुक्रमानेंच वागले असतां क्रमानें मुक्तिस्थान म्हणजे ब्रह्मस्थान ज्यांनी प्राप्त करून घेतले, ते ब्रह्मस्थानांत राहणारे लोक सुखाच्या फलाचे भोक्ते होत असें समज. ५५.

इतर स्वर्गीं सुखप्राप्ती । जेथें आहे पुनरावृत्ती ।
ब्रह्मसदनीं पावल्या वस्ती । त्यांसी क्रमें मुक्ती होईल ॥५६॥
इतर स्वर्गांत सुखप्राप्ति होते, पण जेथून पुन्हाः जन्माला यावे लागतें असे ते मार्ग आहेत. ब्रह्मस्थानांत एकदा वस्ती झाली की, त्यांना क्रमानें मुक्तीच प्राप्त होईल ५६.

मूळींचें पद ‘अरण्यवासी’ । तेणें द्योतिलें वानप्रस्थासी ।
तेथ नाहीं घेतला संन्यासी । त्यासी वनवासी म्हणों न ये ॥५७॥
मुळात ‘अरण्यवासी’ असेंच पद आहे. त्या पदानें ‘वानप्रस्थ’ असाच बोध स्पष्ट केला. तेथे संन्यासी हा अर्थ घेतलेला नाही. कारण संन्याशाला वनवासी असें म्हणतां येत नाही ५७.

संन्याशांसी निवासस्थान । वेदीं बोलिलें नाहीं जाण ।
तिंहीं स्वदेहाचें केलें दहन । नेमिलें स्थान त्यां नाहीं ॥५८॥
संन्याशांना राहावयाची जागा वेदामध्यें मुळींच सांगितलेली नाही, त्यांनी स्वदेहाचें हवन केलें असल्यामुळें त्यांना राहावयास नेमलेले स्थान नाहींच ५८.

जे अविद्यादिकर्मप्रवृत्ती । विरजाहोमीं स्वयें जाळिती ।
ते भववृक्षाचीं फळें खाती । हेही युक्ती घडेना ॥५९॥
जे विरजाहोमामध्यें अविद्यादिक कर्मप्रवृत्तीच जाळून टाकतात, ते संसाररूप वृक्षाची फळें खातील हेही म्हणणे संभवत नाही ५९.

जागृतीच्या पाहुण्यासी । जेवूं धाडावें स्वप्नगृहासी ।
तेवीं न्यस्तसंकल्प संन्यासी । संसारसुखासी केवीं भोक्ते ॥४६०॥
जागृतींतील पाहुण्याला स्वप्नांतील घरी जेवावयास पाठवावें, त्याप्रमाणें मनोवासनाशून्य संन्यासी संसारसुखाचे भोक्ते कसे होतील ? ४६०.

स्वकर्म जाळोनि विरजाहोमीं । जिंहीं साध्य केलें ब्रह्माहमस्मि ।
त्यांसी निवासस्थान कोण नेमी । वनीं ग्रामीं नेमस्त ॥६१॥
ज्यांनी विरजाहोमांत आपले कर्म जाळून टाकून ‘ब्रह्म तेच मी आहे’ हें सूत्र साध्य केले, त्यांना अरण्यांत किंवा गांवांत नियमित निवासस्थान कोण नेमून देणार ? ६१.

बिढार द्यावया आकाशासी । कोण घर नेमावें त्यासी ।
तेवीं न्यस्तसंकल्प संन्यासी । त्यांच्या निवासासी कोण नेमी ॥६२॥
आकाशाला बिर्‍हाडाला जागा द्यावयाला कोणतें घर ठरवावें ? त्याप्रमाणें जे संकल्पत्याग केलेले संन्यासी असतात, त्यांना राहण्याची जागा कोण नेमून देणार ? ६२.

जे न्यस्तसंकल्प संन्यासी । त्यांसी कोण म्हणे अरण्यवासी ।
मायिक भववृक्षींच्या फळासी । भोक्ते त्यांसी म्हणों नये ॥६३॥
जे संकल्पत्याग केलेले संन्यासी असतात, त्यांना अरण्यवासी असे कोण म्हणेल ? याकरितां मायात्मक अशा संसारवृक्षाच्या फळाचे भोक्ते असे त्यांना म्हणतां येत नाही ६३.

मूळींचें पद ‘अरण्यवासी’ । तें भागा आलें वानप्रस्थासी ।
वानप्रस्थ सदा वनवासी । दुसर्‍या फळासी तो भोक्ता ॥६४॥
मूळांतील पद अरण्यवासी असें आहे. ते वानप्रस्थाच्याच वांट्याला आले आहे. कारण वानप्रस्थाश्रमी हा नेहमी वनांत राहणारा असतो. म्हणून दुसर्‍या फळाचा (सुखफळाचा) तोच भोक्ता होय ६४.

ऐक संन्याशांची सुखप्राप्ती । दोनी फळें मिथ्या जाणती ।
मीचि एक त्रिजगतीं । हे प्रतीति निश्चितीं त्यां झाली ॥६५॥
आतां संन्याशाची सुखप्राप्ति ऐक. ते ही दोन्ही फळे मिथ्या आहेत असे समजतात. त्रिभुवनामध्यें सर्वत्र मीच एक आहे असा अनुभव निश्चयपूर्वक त्यांना झालेला असतो ६५,

जो हा बहुरूपें विस्तारू । तो मी चिदात्मा साचारू ।
जाणोनि गुरुमुखें निर्धारू । माझें सुख साचारू पावले ॥६६॥
हा जो अनेक रूपांनी पसरलेला विस्तार दिसतो, तो खरोखर मी चिदात्माच आहे, असा निश्चय गुरुमुखानें जाणून घेऊन ते माझें खरें सुख पावले आहेत ६६.

ते मद्‌रूपें मज पावले । माझेनि सुखें सुखरूप झाले ।
सुखदुःखफळांतें मुकले । येवों चुकले संसारा ॥६७॥
ते मत्स्वरूप होऊन मला पावले, माझ्याच सुखानें सुखरूप झाले, सुखदुःखफळांना मुकले, आणि संसारांत येण्यापासूनही सुटले ६७.

संसार मायामय मिथ्याभास । जाणे तोचि वेदज्ञ विद्वांस ।
त्यासीच बोलिजे परमहंस । विश्वनिवासनिवासी ॥६८॥
संसार हा मायामय असल्यामुळें मिथ्या भासरूप आहे असें जो जाणतो, तोच वेदवेत्ता व विद्वान् होय. त्यालाच परमहंस म्हणतात. तो विश्व हेंच आपलें घर समजून राहाणारा असतो ६८.

ऐशी होआवया पदप्राप्ती । सुदृढ करावी गुरुभक्ती ।
तेणें होय संसारनिवृत्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥६९॥
अशा पदाची प्राप्ति होण्याला अनन्यभावानें गुरुभक्ति करावी. त्यानेंच संसाराची निवृत्ति होईल. तेंच श्रीकृष्ण सांगत आहे ६९.

पहिली सांगितली संतसंगती । तेणें जाहली मत्पदप्राप्ती ।
तेचि अध्यायाच्या अंतीं । करावी गुरुभक्ती सांगतू ॥४७०॥
प्रथम सत्संगति सांगितली. तिनें माझ्या पदाची प्राप्ति होते. त्याच अध्यायाच्या शेवटीं गुरुभक्ति करावी असे सांगतो ४७०.

एवं गुरूपासनयैकभक्त्या विद्याकुठारेण शितेन धीरः ।
विवृश्च्य जीवाशयमप्रमत्तः संपद्य चात्मानमथ त्यजास्त्रम् ॥ २४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कन्धे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
[श्लोक २४] हे उद्ववा ! अशा प्रकारे, गुरूंची सेवा आणि अनन्य भक्तीने तू ज्ञानाची कुर्‍हाड धारदार कर आणि तिने सावधपणे आपला जीवभाव तोडून टाक अशा रीतीने आत्मस्वरूप होऊन नंतर ती कुर्‍हाड टाकून दे. येथे बरावा अध्याय समाप्त झाला.(२४)

न करितां सद्‍गुरुभजन । नव्हे भववृक्षाचें छेदन ।
जरी कोटिकोटी साधन । आनेआन केलिया ॥७१॥
भिन्न भिन्न प्रकारची कोट्यवधि साधनें केली, तरी सद्गुरूचे भजन केले नाही तर संसावृक्षाचे छेदन व्हावयाचें नाहीं ७१.

भववृक्षातें छेदिती । केवळ जाण गुरुभक्ती ।
अरिनिर्दळणी निश्चितीं । जेवीं निजशक्ति शूरांची ॥७२॥
ज्याप्रमाणें शूरांची स्वत:चीच शक्ति खरोखर शत्रूचा नाश करणारी असते, त्याप्रमाणें संसारवृक्षाला छेदणारी केवळ एक गुरुभक्तीच आहे असे समज ७२.

दूरी करावया दुरित । जेवीं गंगाजळ समर्थ ।
तेवीं भवभया भस्म करीत । जाण निश्चित गुरुभक्ति ॥७३॥
पातक नष्ट करण्यास ज्याप्रमाणें गंगाजळ समर्थ आहे, त्याप्रमाणें गुरुभक्ति हीच संसारभयाचे भस्म करते हें निश्चयपूर्वक लक्षांत ठेव ७३.

करितां सत्यव्रतग्रहण । पाप स्वयें जाय पळोन ।
तेवीं करितां गुरुभजन । भवनिर्दळण स्वयें होय ॥७४॥
सत्यव्रताचे ग्रहण केलें म्हणजे पातक आपोआप पळून जाते, त्याप्रमाणें गुरूचे भजन केलें असतां संसाराचा क्षय आपोआपच होतो ७४.

हनुमंत देखतां दिठीं । भूतें पळती बारा वाटीं ।
तेवीं गुरुभजनपरिपाटीं । पळे उठाउठी भवभय ॥७५॥
मारुती दृष्टीस पडला असतां भुते बारा वाटांनी पळतात; त्याप्रमाणें गुरुभजनाचा तडाखा सुरू झाला की संसाराचे भय हां हां म्हणतां पळून जाते ७५,

मरतां घडे अमृतपान । तैं मरणासचि आलें मरण ।
तेवीं करितां गुरुभजन । जन्ममरण निमालें ॥७६॥
मरतांना अमृतपान घडले तर मरणालाच मरण येतें, त्याप्रमाणें गुरुभजन केले असतां जन्ममरण मरून जाते ७६.

अंतीं अवचटें हरि म्हणतां । पांपरा हाणे यमदूतां ।
तेवीं सद्‍गुरूतें भजतां । हाणे लाता भवभया ॥७७॥
अंतकाळी अकस्मात् ‘हरि’ असे म्हटलें असतां यमदूतांनाही लाथ बसते, त्याप्रमाणें सद्गुरूचे भजन केले असतां भवभयाला लाथाच बसतात ७७.

करावया भवनिर्दळण । मुख्य करावें गुरुभजन ।
हेंचि श्रेष्ठ गा साधन । सभाग्य जाण गुरुभक्त ॥७८॥
संसाराचे निर्दाळण करण्यासाठी मुख्यतः गुरूचे भजन करावे, हेच साधन श्रेष्ठ आहे. गुरुभक्त असतो तो मोठा भाग्यवान् होय ७८.

कोण सद्‍गुरु कैशी भक्ती । ऐसें कांहीं कल्पिसी चित्तीं ।
तेही मी यथानिगुतीं । मागां तुजप्रती सांगीतली ॥७९॥
सदर कोण ? भक्ति कशी करावी ? अशी कांही कल्पना मनांत आणशील, तर तेही मी तुला यथार्थ रीतीनें पूर्वी सांगितलेंच आहे ७९.

जो शब्दपरनिष्णात । शिष्यप्रबोधनीं समर्थ ।
तोचिसद्‍गुरु येथ । जाण निश्चित उद्धवा ॥४८०॥
उद्धवा ! तर जो वेद व ब्रह्मज्ञान यांत निष्णात असून शिष्याला ज्ञान देण्याविषयीं समर्थ असतो, तोच सद्गुरु होय, असे येथे निश्चयपूर्वक समज ४८०.

जो स्वरूपीं करी समाधान । तोचि सद्‍गुरु सत्य जाण ।
त्यावेगळें सद्‍गुरुपण । होआवया कारण असेना ॥८१॥
जो स्वरूपामध्येंच समाधान करतो, तोच खरोखर सद्‌गुरु होय. त्याच्याशिवाय सद्गुरुपण येण्याला दुसरें कारणच असत नाही ८१.

त्या सद्‍गुरुभजनाची परी । तुज मी सांगेन निर्धारीं ।
सर्व कर्मधर्मांचिया शिरीं । जो कां करी गुरुभजन ॥८२॥
त्या सद्गुरुभजनाचा प्रकार तुला मी निश्चयेंकरून सांगतो. जो गुरुभजन करतो, तो सर्व कर्म व धर्म यांपेक्षाही थोर होय ८२.

गुरु म्हणों पित्यासमान । तंव तो एकजन्मींचा जाण ।
हा मायबापू सनातन । जनक पूर्ण जगाचा ॥८३॥
गुरु पित्यासमान म्हणावा, तर पिता एकाच जन्माचा असतो, परंतु सद्गुरु हा सनातन मायबाप आहे. तो सर्व जगाचा पिता आहे ८३.

गुरु मातेसमान पाहों । तंव गर्भजन्में तिचा स्नेहो ।
गर्भवास निवारी गुरुरावो । अधिक स्नेहो पुत्रापरिस ॥८४॥
गुरु मातेसमान समजावा, तर गर्भ जन्मल्यामुळेंच तिचे प्रेम जडते, परंतु गुरुराज हा गर्भवासाचे निवारण करतो व पुत्राहूनही अधिक प्रेम करतो ८४.

उदराबाहेर पडल्यापाठीं । पुत्रस्नेहें माता उठी ।
तें बाहेरील घालूनि पोटीं । स्नेहें गोमटी गुरुमाता ॥८५॥
पोटांतून बाहेर पडल्यानंतर पुत्रस्नेहानें आई त्याच्यावर प्रेम करावयास लागते, पण गुरुमाता ही बाहेरचें सर्व पोटांत घालून स्नेहानें जास्त प्रेमळ असते ८५.

गुरु मानूं स्वामीसमान । स्वामी निवारूं न शके मरण ।
सद्‍गुरु चुकवी जन्ममरण । स्वामी संपूर्ण गुरुरावो ॥८६॥
गुरु धन्याप्रमाणें मानावा, तर धन्याला कांही मरण चुकवितां येत नाही, परंतु सद्‌गुरु तर जन्ममरणच चुकवितो, म्हणून गुरुराज हाच सर्वस्वी खरा धनी आहे ८६.

गुरु मानूं कुलदेवता । तंव तिसी कुलधर्मी पूज्यता ।
हा कुलदेवतेची देवता । नित्य पूज्यता निजकर्मीं ॥८७॥
गुरु कुलदेवता मानावी, तर कुलदेवतेला कुलधर्मांत मात्र पूज्यता असते, परंतु गुरु हा कुलदेवतेचीही देवता आहे. आपल्या प्रत्येक कर्मांत त्याला पूज्यत्व आहे ८७.

गुरु मानूं कल्पतरूसमान । तंव कल्पतरु दे कल्पिलें दान ।
सद्‍गुरु दे निर्विकल्पता पूर्ण । अगाध दान निर्लोंभें ॥८८॥
गुरु कल्पतरूसमान मानला तर कल्पतरु हा कल्पना करावी तेवढेंच दान देतो, परंतु सद्गुरु हा पूर्ण निर्विकल्पताच देतो. ती निर्लोभता दिल्यानें फार मोठे दान दिल्याप्रमाणें होते ८८.

चिंतामणी दे चिंतिल्या अर्था । सद्‍गुरु करी चिंतेच्या घाता ।
चित्ता मारूनि दे चैतन्यता । अक्षयता निजदान ॥८९॥
चिंतामणि हा ज्या गोष्टीचे चिंतन करावे तेवढीच वस्तु देतो. परंतु सद्गुरु हा मुळीं चिंतेचाच नाश करतो, व चित्ताला मारून चैतन्याचें शाश्वत निजदान देतो ८९.

कामधेनूचें दुभतें । तें कामनेच पुरतें ।
सद्‍गुरु दुभे स्वानंदार्थें । कामनेतें निर्दळी ॥४९०॥
कामधेनूचे दुभते असतें तें इच्छेपुरतेच असते. पण सद्गुरु हा स्वानंदाचाच रस देत असल्यामुळें इच्छेलाच नाहींशी करतो ४९०.

गुरुसमान म्हणों सागरू । तो गंभीर परी सदा क्षारू ।
हा स्वानंदें नित्य निर्भरू । अतिमधुरू निजबोधें ॥९१॥
. समुद्र हा गुरूसारखा म्हणावा, तर तो गंभीर आहे खरा, पण सदोदित खारट. परंतु गुरु हा सर्वदा स्वानंदानें भरलेला असून आत्मबोधामुळें अत्यंत मधुर असतो ९१.

गुरु परब्रह्मसमान । हेंही बोलणें किंचित न्यून ।
गुरुवाक्यें ब्रह्म सप्रमाण । येरवीं ब्रह्मपण शब्दमात्र ॥९२॥
गुरु हा ब्रह्मासारखा मणावा, तर ती उपमाही थोडीशी कमीच पडते. कारण, गुरुच्या उपदेशानेंच ब्रह्माका सत्यत्व येते. नाही तर ब्रह्म हे केवळ शाब्दिकच होय ९२.

शब्दीं लोपूनि शब्दार्था । गुरु प्रबोधी संविदर्था ।
त्याहूनि पूज्य परता । नाहीं सर्वथा त्रिलोकीं ॥९३॥
शब्दार्थ शब्दामध्येंच नाहीसा करून गुरु हा ज्ञानमय अर्थाचा बोध करून देतो, म्हणून त्याच्याहून अधिक पूज्य असा त्रैलोक्यांतही कोणीच नाहीं ९३.

गुरु माता गुरु पिता । गुरु स्वामी कुळदेवता ।
गुरूवांचोनि सर्वथा । आणिक देवता स्मरेना ॥९४॥
म्हणून गुरु हीच माता, गुरु हाच पिता, गुरु हाच स्वामी व गुरु हीच कुलदेवता होय. गुरूशिवाय अन्य देवतेचे स्मरणच मुळीं होत नाही ९४.

थोर मांडलिया सांकडें । जैं गगन गडगडूनि पडे ।
तैं न पाहे आणिकाकडे । नाम पढे गुरूचें ॥९५॥
मोठे दुर्धर संकट आले असतां, किंवा ज्या वेळी आकाश कडकडून अंगावर पडते तेव्हांही जो दुसऱ्याकडे ढुंकूनसुद्धा पहात नाहीं; गुरूचेच नामस्मरण करीत राहातो ९५;

काया वाचा मनें प्राणें । जो गुरूवांचोनि आन नेणे ।
तैसाचि भजे अनन्यपणें । गुरुभक्ति म्हणणें त्या नांव ॥९६॥
शरीर, वाणी, मन व प्राण ह्यांनी जो गुरूशिवाय इतराला जाणत नाही; आणि तसाच जो अनन्यभावानें गुरूचे भजन करतो; त्याच्या त्या भक्तीचें नांव ‘गुरुभक्ति’ होय ९६.

पक्षिणीचीं अपक्ष पिलें । तीं तिसीच स्मरती सर्वकाळें ।
तेवीं जागृति-स्वप्न-सुषुप्तिमेळें । जो गुरुवेगळें स्मरेना ॥९७॥
पक्षिणीची पंख न फुटलेली पिलें असतात ती सर्वदा तिचाच ध्यास करीत असतात. त्याप्रमाणें जो जागृतींत, स्वप्नांत किंवा सुषुप्तींतही गुरूशिवाय दुसरें स्मरतच नाहीं ९७.

मागां सांगीतलें भगवद्‍भजन । आतां सांगसी गुरुसेवन ।
नाहीं एकविध निरूपण । ऐसा विकल्प जाण न धरावा ॥९८॥
“मागें भगवद्‌भजन सांगितलेंस, आणि आतां गुरूची सेवा सांगतोस. तेव्हां तुझे हे निरूपण एकसूत्रीपणाचें नाहीं” असा विकल्प मात्र मनांत आणूं नकोस ९८.

सद्‍गुरु तोचि माझी मूर्ती । निश्चयेंसी जाण निश्चितीं ।
विकल्प न धरावा ये अर्थीं । अनन्यभक्ति या नांव ॥९९॥
खरोखर सद्गुरु असतो तोच माझी मूर्ति आहे हे निश्चयपूर्वक लक्षांत ठेव. ह्याविषयी संशय धरूं नये. ह्याचंच नाव अनन्यभक्ति ९९.

एकाग्रता जें गुरुभजन । तेंचि माझें परमपूजन ।
गुरूसी मज वेगळेपण । कल्पांतीं जाण असेना ॥५००॥
एकाग्रतेनें में गुरूचे भजन करणें, तेंच माझे मोठे पूजन होय. गुरु आणि मी अशा दोघांमध्यें कल्पांतीसुद्धां कधीं वेगळेपणा असत नाहीं ५००.

गुरु भगवंत दोन्ही एक । येणें भावें निजनिष्टंक ।
भजे तोचि गुरुसेवक । येरू तो देख अनुमानी ॥१॥
गुरु आणि भगवंत हे दोन्ही एकच आहेत, अशा भावनेनें जो निश्चयपूर्वक भजन करतो, तोच गुरूचा सेवक होय. त्याशिवाय इतर असेल तो संशयी होय असें समज १.

माझिया ऐक्यता अतिप्रीतीं । जेणें आदरिली गुरुभक्ती ।
तोचि धन्यधन्य त्रिजगतीं । भजती स्थिती तें ऐक ॥२॥
माझ्याशी ऐक्य व्हावे म्हणून ज्यानें अत्यंत प्रेमानें गुरुभक्ति स्वीकारली, तोच त्रैलोक्यामध्यें धन्य धन्य होय. आतां भजनाचें जें स्वरूप आहे ते ऐक २.

करावया गुरुसेवे । मनापुढें देह धांवे ।
एकला करीन सर्व सेवे । येवढे हांवे उद्यतू ॥३॥
गुरूची सेवा करण्यासाठी त्याचा देह मनाच्याही पुढे धांवत असतो व सर्व सेवा मी एकटाच करीन एवढ्या महत्त्वाकांक्षेनें तो तयार झालेला असतो ३.

सेवेच्या दाटणी जाण । अधिकचि होय ठाणमाण ।
अंग अंगऊनि अंगवण । सेवेमाजी जाण विसांवा त्यासी ॥४॥
सेवा जों जों अधिक पडेल तों तों हा अधिक उत्साहानें सेवेला तयार होऊन राहातो. सर्व देह केवळ सेवेप्रीत्यर्थच वाहिलेला. गुरुसेवेमध्येंच त्याला विश्रांति वाटते ४.

सेवेचिया आवडीं । आरायेना अर्धघडी ।
आवडीचे चढोवढी । चढती गोडी गुरुभजनीं ॥५॥
सेवेच्या आवडीमुळें अर्धघटका देखील विश्रांति घेतच नाही. आवडीच्या अधिकाधिक भरानें गुरुभजनामध्यें वाढतीच गोडी वाटत असते ५.

नित्य करितां गुरुसेवा । प्रेमपडिभरू नीच नवा ।
सद्‍भावाचिया हांवा । गुरुचरणीं जीवा विकिलें ॥६॥
नित्य गुरूची सेवा करतांना नित्य नवाच प्रेमाचा भर उत्पन्न होतो. सद्‌भक्तीच्या इच्छेनें गुरूच्या चरणांपाशी त्यानें जीवाला विकूनच टाकलेलें असते ६.

आळसु येवोंचि विसरला । आराणुकेचा ठावो गेला ।
गुरुसेवासंभ्रमें भुलला । घेवों विसरला विषयांतें ॥७॥
आळस त्याच्यापाशी येण्याचेंच विसरतो. विश्रांतीला स्थानच नाहींसें होतें. गुरुसेवेच्या संभ्रमानेंच तो भुलून गेलेला असल्यामुळें इतर विषय सेवन करण्याचेंच विसरून जातो ७.

तहान विसरली जीवन । क्षुधा विसरली मिष्टान्न ।
करितां गुरुचरणसंवाहन । निद्रा जाण विसरला ॥८॥
तहान पाण्याची आठवण विसरली, क्षुधा पक्वान्नालाच विसरली, आणि गुरूचे पादसेवन करतांना तो झोंपेलाच विसरला ८.

जांभयी यावयापुरती । सवडी उरेना रिती ।
तेथें निद्रेलागीं केउती । राहावया वस्ती मिळेल ॥९॥
जांभई येण्यापुरतीसुद्धा रिकामी सवड सापडत नाही, तेथें निद्रेला राहावयाला कोठे स्थळ मिळणार ? ९.

मुखीं सद्‍गुरूचें नाम । हृदयीं सद्‍गुरूचें प्रेम ।
देहीं सद्‍गुरूचें कर्म । अविश्रम अहर्निशीं ॥५१०॥
मुखामध्यें सद्गुरूचें नाम, हृदयामध्यें सद्गुरूचे प्रेम, आणि देहाला सद्‌गुरूचे कर्म, हेंच रात्रंदिवस न थांबतां चालावयाचे ५१०.

गुरुसेवेसी गुंतलें मन । विसरला स्त्री पुत्र धन ।
विसरला मनाची आठवण । मी कोण हें स्फुरेना ॥११॥
मन हे गुरुसेवेंत गुंतलेले असल्यामुळें बायको, मुले व धन ह्यांचाही विसर पडतो. मनाचीही आठवण विसरतो व मी कोण ह्याचेही स्फुरण राहात नाही ११.

नवल भजनाचा उत्सावो । भजतां नाठवे निजदेहो ।
थोर सेवेचा नवलावो । निजात्मभावो गुरुचरणीं ॥१२॥
त्याचा भजनाचा उत्साह आश्चर्यकारक असतो. भजन करतांना स्वत:च्या देहाचीसुद्धा आठवण राहात नाही. अशा थोर गुरुसेवेचा महिमा विलक्षण आहे. कारण सर्व आत्मभाव गुरुचरणींच लागून राहतो १२.

ऐसाही प्रारब्धमेळा । अवचटें झालिया वेगळा ।
न तुटे प्रेमाचा जिव्हाळा । भजनीं आगळा सद्‍भावो ॥१३॥
असे असतांही प्रारब्धानुसार एकाद्या प्रसंगी गुरूची ताटातूट झाली, तरी प्रेमाचा जिव्हाळा तुटत नाही, आणि उलट भजनामध्यें अधिक भक्ति जडते १३.

गुरूचा वसता जो ग्राम । तेथेंचि वसे मनोधर्म ।
गुरुध्यान तें स्वधर्मकर्म । सेवासंभ्रम सांडीना ॥१४॥
गुरूचे राहाण्याचे जें गांव असते, तेथेच सर्व मनोधर्म राहातो. गुरूचे ध्यान तेंच आपले धर्मकर्म असें समजून तो सेवेची खटपट सोडीत नाही १४.

गुरुमूर्तीची सवे त्यासी । ते मूर्ति बैसवी हृदयावकाशीं ।
मग नानाभजनविलासीं । आवडी कैशी भजनाची ॥१५॥
गुरूच्या मूर्तीचीच त्याला संवय झालेली असल्यामुळें ती गुरुमूर्ति तो हृदयाकाशामध्येंच स्थापित करतो. आणि मग अनेक प्रकारच्या भजनरंगांत त्याची भजनाची आवड काय सांगावी ? १५.

चिन्मात्र पूर्णिमा गुरु पूर्णचंद्र । तळीं आपण होय आर्त चकोर ।
मग स्वानंदबोधाचे चंद्रकर । निरंतर स्वयें सेवी ॥१६॥
चित्स्वरूप हीच त्याची पौर्णिमा व गुरु हा त्यांतील पूर्णचंद्र होय. आणि त्याच्याखाली स्वतः तृषित चकोरपक्षी होऊन बसतो. मग स्वानंदबोधरूपी चंद्रकिरण तो निरंतर स्वत: सेवीत असतो १६.

सद्‍गुरु सूर्य करी चिद्‍गगनीं । आपण होय सूर्यकांतमणी ।
त्याचेनि तेजें प्रज्वळोनी । स्वभावें मायावनीं होळी करी ॥१७॥
किंवा चिदाकाशामध्यें सद्गुरूला सूर्य करून आपण सूर्यकांत मणि होतो, आणि त्याच्या दिव्य तेजानें देदीप्यमान होउन आपल्या प्रभावानें मायारूप वनाची होळी करतो १७.

सद्‍गुरुकृपामृताच्या डोहीं । स्वयें तरंगू होय तये ठायीं ।
सबाह्य तद्‌रूपें पाहीं । भावना हृदयीं भावितु ॥१८॥
किंवा सद्गुरूच्या कृपामृतडोहांत आपण त्या ठिकाणीं तरंग होतो आणि अंतर्बाह्य सारे गुरूचेंच स्वरूप आहे असे समजून हृदयामध्यें तीच भावना धरतो १८.

आपुला निजस्वामी जो सद्‍गुरु । भावी निर्विकल्प कल्पतरू ।
त्याचे छाये बैसोनि साचारू । मागे वरू गुरुभक्ति ॥१९॥
आपला खरा खरा धनी जो सद्गुरु, तो एक खरोखर निर्विकल्प कल्पतरूच आहे असे मानतो व त्याच्या छायेखाली बसून खरोखर गुरुभक्तीचाच वर मागतो १९.

सद्‍गुरु कामधेनु करी जाणा । वत्सरूपें भावी आपणा ।
आवडीं चाटवी बोधरसना । स्वानंदपान्हा सेवितू ॥५२०॥
किंवा सद्गुरूला कामधेनु करून आपण तिचे वासरूं आहों अशीच कल्पना करतो, आणि तिच्याकडून ज्ञानरूप जिव्हेनें प्रेमानें चाटवितो व स्वानंदाचा पान्हा सेवन करतो ५२०.

तुझ्या सकळ वृत्तींची सेवा । म्यांचि करावी गा गुरुदेवा ।
ऐसें प्रार्थूनि सद्‍भावा । हा वरू मज द्यावा कृपानिधी ॥२१॥
हे गुरुदेवा ! तुझ्या सर्व वृत्तींची सेवा मीच करावी अशी सद्‌भक्तीनें त्याची प्रार्थना करून म्हणतो, “हे कृपानिधे ! हाच मला वर द्यावा” २१.

तेथ संतोषोनि गुरुनाथें । वरू दीधला वरदहस्तें ।
हर्षें वोसंडत चित्तें । धन्य मी वरातें लाधलों ॥२२॥
तेव्हां गुरुनाथानें प्रसन्न होऊन वरदहस्त मस्तकी ठेवून तसा वर दिला असतां आनंदानें त्याचे मन उसळूं लागते व “मला वर मिळाला, मी धन्य झालों,” असें म्हणतो २२.

ऐसी लाहोनि वरदस्थिती । तेचि सेवा आदरी प्रीतीं ।
अतिधन्य भावार्थ गुरुभक्ति । नाना उपपत्ती गुरुभजना ॥२३॥
असा वर मिळवून तीच सेवा तो प्रेमानें आदरपूर्वक करूं लागतो. गुरुभक्तीचा भावार्थ अत्यंत धन्य होय. गुरुभजनाचे असंख्य प्रकार आहेत २३.

सद्‍गुरूचीं दहाही करणें । मनबुद्ध्यादि अंतःकरणें ।
क्रियामात्र मीचि होणें । ऐसें जीवेंप्राणें भावितु ॥२४॥
सद्‌गुरुची जी मन, बुद्धि, अंत:करण इत्यादि दशेंद्रिये असतात, त्यांच्या सर्व हालचाली मींच व्हावें असें तो मनोभावानें इच्छीत असतो २४.

सद्‍गुरु जे जे भोग भोगिती । ते मीचि होईन निश्चितीं ।
एवं मीचि एक गुरुभक्ती । दुजी स्थिती हों नेदीं ॥२५॥
सद्‌गुरु जे जे भोग भोगतात, ते खरोखर मीच होईन. अशा प्रकारे मीच एक गुरुभक्तिस्वरूप होऊन राहीन. दुसरी स्थितीच होऊं देणार नाही २५.

सद्‍गुरु जेथें उभे ठाकती । तैं पायांतळीं मीचि क्षिती ।
सद्‍गुरु जेथें जेथें चालती । ते मार्गींची माती मी होईन ॥२६॥
सद्‌गुरु जेथे उभे राहतील, तेथील त्यांच्या पायांखालची जमीन मीच होईन. सद्गुरु जिकडे जिकडे चालत जातील, त्या मार्गांतील माती मीच होईन २६.

चरणक्षालनासी समस्त । मीचि उदक मीचि तस्त ।
मीचि चरण प्रक्षालित । चरणतीर्थ मी सेवीं ॥२७॥
त्यांचे पाय धुण्याला सर्व पाणी मीच होईन व तस्तही मीच होईन, चरण धुणारा मीच, आणि त्यांच्या पायांचे तीर्थ मीच सेवन करणार २७.

सद्‍गुरुचरणींचे रजःकण । मीचि होईन आपण ।
सद्‍गुरु करिती आरोहण । तें सिंहासन होईन मी ॥२८॥
सद्गुरूंच्या चरणांची धूळ मीच स्वत: होईन. सद्गुरु ज्याच्यावर बसतात, ते सिंहासनही मीच होईन २८.

सद्‍गुरुचें सिंहासन । तें मीचि होईन आपण ।
त्यावरी बैसतें आसन । तेंही जाण होईन मी ॥२९॥
सद्गुरूंचे जे सिंहासन ते मीच स्वतः होईन. त्यावर बसावयाचें जें आसन तेंही मीच होईन हे लक्षांत ठेव २९.

सद्‍गुरूसी स्नेह लागे । तें मी होईन सर्वांगे ।
गुरूसी वोठंगावया पुढें मागें । मृदुळी सर्वांगें मी होईन ॥५३०॥
सद्गुरूला जें तेल लागतें तें सर्वांगानें मीच होईन. गुरूला पुढे मागे टेंकावयाला मऊ लोडे तक्या मीच सर्वांगानें होईन ५३०.

मनींचा ऐसा आवांका । सद्‍गुरूच्या सिद्ध पादुका ।
त्या मी होईन देखा । नेदीं आणिकां आतळों ॥३१॥
मनांतली हांव एवढी की, सद्गुरूंच्या सिद्ध असलेल्या ज्या पादुका त्या मीच होईन पाहा ! त्यांना दुसऱ्याला हातसुद्धा लावूं देणार नाही ३१.

मी होईन गुरूच्या श्वासोच्छ्वासा । वेगीं बाहेर निघेन नासा ।
गुरु घेतील ज्या सुवासा । त्या त्या विलासा मी होईन ॥३२॥
गुरूचे श्वासोच्छासही मीच होऊन त्यांच्या नाकांतून वेगानें मीच बाहेर पडेन, गुरु जो जो सुगंध घेतील, तो तो सुगंध मीच होईन ३२.

गुरु अवलोकिती कृपादृष्टी । त्या दृश्याची मी होईन सृष्टी ।
गुरूसी देखती देखणी पुष्टी । ते मी उठाउठीं होईन ॥३३॥
गुरु कृपादृष्टीनें जिकडे पाहतील, ते ते दृश्य पदार्थ मीच होईन. किंवा गुरूंची दृष्टि जें जें पाहील, ते मी तत्काळ बनेन ३३.

गुरूसी आवडतें निरूपण । तें मी श्रवणीं होईन श्रवण ।
अथवा रुचेल जें कीर्तन । तें गाता गायन मी होईन ॥३४॥
गुरूंना जे व्याख्यान आवडेल ते श्रवण करण्याकरितां मी गुरूंचे कान होईन. अथवा जे कीर्तन गुरूंना गोड लागेल, ते गाणारा गायक मी होईन ३४.

सद्‍गुरुमुखींची जे कथा । ते मी आदरें होईन तत्त्वतां ।
अक्षरीं अक्षर अक्षरार्था । मीचि सर्वथा होईन ॥३५॥
सद्गुरूंच्या मुखांतील जी कथा असेल, ती खरोखर मीच आदरपूर्वक होईन आणि त्या अक्षरांतील अक्षर व त्या अक्षरांतील अर्थही सर्वस्वी मीच होईन ३५.

सद्‍गुरु जेथ करिती स्नान । तें मी अंगस्पर्शनाचें जीवन ।
गुरु करिती जें आचमन । तेंही जाण होईन मी ॥३६॥
सद्गुरु जेथें स्नान करतील तेथील त्यांच्या आंगावर पडणारे पाणी मी होईन. गुरु जें आचमन करतील तेही मीच होईन असे समज ३६.

गुरु परिधान करिती वास । तें मी होईन सुवास ।
गुरुचरण पुसावयास । तेंही धूतवास मी होईन ॥३७॥
गुरु जें वस्त्र परिधान करतील, ते उत्तम वस्त्र मीच होईन. गुरूचे पाय पुसावयाला जें धूतवस्त्र असते ते मीच होईन ३७.

गुरूसी करिती विलेपन । तें मी होईन शुद्ध चंदन ।
चरणीं अर्पितें सुमन । मीचि जाण होईन ॥३८॥
गुरूच्या आंगाला उटी लावतात ते पवित्र चंदन मीच होईन. गुरुच्या पायांवर अर्पण करावयाचें फूलही मीच होईन ३८.

सद्‍गुरु करिती भोजन । तेथ मीचि ताट मीचि अन्न ।
रसस्वाद पक्वान्न । पंक्तिकारु जाण मी होईन ॥३९॥
सद्गुरु भोजन करतील तेथें मीच ताट व मीच अन्नही होईन, त्यांतील रसाची गोडी, पक्वान्न, पंक्तीला बसणारा, सर्व मीच होईन ३९.

मथोनियां दहीं मथित । सारांश तें नवनीत ।
वैराग्य‍अग्निसंतप्त । भोजनीं मुख्य घृत मी होईन ॥५४०॥
घुसळावयाला घातलेलें दही घुसळून त्यांतील जे सार निघते, तें लोणी वैराग्यरूप अग्नीवर कढवून जेवणांतील मुख्य तूप मीच होईन ५४०.

परिपाकीं स्वादिष्टपण । सर्वां चवींचें कारण ।
मी होईन वरी लवण । न्यून तें पूर्ण गुरु करिती ॥४१॥
स्वैपाकामध्यें स्वादिष्टपणा आणणारे व सर्व प्रकारच्या चवींचे मूळ कारण असें मी त्यांच्या भोजनपात्रावरचे मीठ होईन आणि ह्याहून कांही कमी असेल तें गुरु पूर्ण करितील ४१.

गुरु करिती प्राशन । तें मी होईन जीवन ।
सद्‍गुरूचें धालेपण । ते उद्‍गार जाण मी होईन ॥४२॥
गुरु प्राशन करतील तें पाणी मी होईन, आणि सद्‌गुरुचा तृप्तपणा प्रगट करणाऱ्या त्या ठेकराही मीच होईन ४२.

गुरूसी जें जें गोड लागे । ते ते पदार्थ मी होईन अंगें ।
सद्‍गुरूसी ज्याची रुचि लागे । तें मी सर्वांगें होईन ॥४३॥
गुरुला जें जें गोड लागेल, ते ते पदार्थ मीच स्वतः होईन. सद्गुरूला जें जें आवडेल तें तें मी सर्वांगानें होऊन राहीन ४३.

सद्‍गुरु आंचवती जेथ । मी उष्णोदक मी तस्त ।
शिंतोडे लागती जेथ जेथ । तेही समस्त होईन मी ॥४४॥
सद्गुरु जेथे आंचवतील तेथे गरम पाणी मी होईन व तस्त मी होईन. त्या पाण्याचे शिंतोडे जेथें जेथें लागतील, तेही सर्व मीच होईन ४४.

गुरूसी अर्पिती जें फळ । तें मी होईन तत्काळ ।
गुरुअर्पणें सफळ । फळाचें फळ मी होईन ॥४५॥
गुरूला जे फळ अर्पण करतात, तें मी तत्काळ होईन. गुरूला अर्पण केल्यामुळें सफळ झालेलें जें फळाचे फळपण तेही मीच होईन ४५.

सद्‍गुरूचें घ्यावया उच्छिष्ट । मजचि मोठा लवलवाट ।
मांजर होऊनियां ताट । चरचराट चाटीन मी ॥४६॥
गुरूचे उष्टें घेण्याचा मला मोठाच नाद लागलेला आहे, त्याकरिता मी मांजर होऊन त्यांचे ताट चकाचका चाटीत बसेन ४६.

गुरु करिती करोद्वर्तन । तो मी होईन सुगंधचंदन ।
मुखवासा सुवासपण । मीचि जाण होईन ॥४७॥
गुरु जेव्हां सुगधी चूर्णानें हस्तशुद्धि करतील तेव्हा मी सुगधी चंदन होईन, आणि मुखाला सुवास आणण्याकरिता सुवासपणाही मीच होईन ४७.

फळाशा फोडूनि फोडी । वासनाशिरा काढूनियां विडी ।
रिघोनियां सद्‍गुरूच्या तोंडीं । तांबूलगोडी मी होईन ॥४८॥
फलाशा फोडून तिची खांडे व वासनेंच्या शिरा काढलेले पान त्यांचा विडा सद्गुरूंच्या मुखांत शिरून येणारी तांबुलाची रुचि मी होईन ४८.

जाळूनियां अहंकठिणपणा । मी होईन सोहं शुद्ध चुना ।
शांतिपरिपक्क लागोनि पाना । सद्‍गुरुवदना पावेन ॥४९॥
मीपणाचा ताठा जाळून मी ‘सोहं’रूप शुद्ध चुना होईन व शांतिरूप पक्क्या पानाला लागून सद्गुरूच्या तोंडांत शिरेन ४९.

सर्व सारांचें शुद्ध सार । तो होईन खदिरसार ।
सद्‍गुरुमुखी रंगाकार । मीचि साचार शोभेन ॥५५०॥
सर्व सारांतील शुद्ध तत्त्व असा खैराचा कात मी होईन. सद्गुरूच्या मुखामध्यें रंगाच्या रूपानें मीच खरोखर शोभत राहीन ५५०.

सद्‍गुरुमुखींचें पवित्र पीक । वरच्यावरी मी घेईन देख ।
पिकदाणीचे मुखाचें मुख । आवश्यक मीच होईन ॥५१॥
सद्गुरुच्या मुखांतील पवित्र पीक वरच्यावर मीच झेलून घेईन, आणि पिकदाणीच्या तोंडाचे तोंड मी अवश्य होईन ५१.

गुरूचा उगाळू मी होईन । पीक पिकदाणी धरोनि जाण ।
चवरी जी मक्षिकानिवारण । ती मी होईन निजांगें ॥५२॥
गुरूंनी चावलेला विडा व त्यांनी थुंकलेली पीक पिकदाणीसह मी होईन. माशा हांकविण्याकरितां जी चवरी तीही मी स्वतःच होईन ५२.

गुरूचा उगाळू घ्यावया देख । मी होईन आगळा सेवक ।
नातरी लडिवाळ बाळक । गुरुअंकीं देख मी होईन ॥५३॥
गुरूच्या तोंडांतील विडा घ्यावयासाठी मी मोठ्या आस्थेनें सेवक होईन. नाहीतर गुरूच्या मांडीवर मी लाडकें मूलच होऊन बसेन ५३.

माझिया गुणांची सुमनमाळा । आवडीं घालीन गुरूच्या गळां ।
गुरु झेलिती लीलाकमळा । त्या करकमळा मी होईन ॥५४॥
माझी गुणरूपी पुष्पांची माळा मी आवडीनें गुरूच्या गळ्यात घालीन, गुरु लीलेनें कमळ झेलूं लागले म्हणजे त्यांचे करकमलही मीच होईन ५४.

गुरूसी नीरांजन करिती । ते मी निजतेजें उजळीन ज्योती ।
गुरु जेणें प्रकाशें चालती । ते दीपिकादीप्ति मी होईन ॥५५॥
गुरूला नीरांजन ओवाळू लागले म्हणजे त्या नीरांजनांतील ज्योत मी आपल्याच तेजानें प्रकाशित करीन, आणि गुरु ज्या प्रकाशानें चालतील त्या दिव्याची प्रभा मीच होईन ५५.

जीवभावाचें निंबलोण । गुरूसी मी करीन आपण ।
इडापीडा मी घेईन जाण । तें लोणलक्षण मज लागो ॥५६॥
मी श्रीगुरूवरून आपल्या जीवाभावाचें निंबलोण स्वतः करून टाकीन. त्यांची सर्व इडापिडा मी घेईन. त्या निंबलोणाचे लक्षण माझ्या ठिकाणीं असू दे ५६.

मी छत्र मी छत्राकारू । मी चवर मीचि चवरधरू ।
मीचि विंजणा मीचि विंजणवारू । गुरूचा परिवारू मी होईन ॥५७॥
छत्र मीच आणि छत्र धरणाराही मीच. चवरी मीच आणि चवरी धरणाराही मीच. विंजणा मीच आणि विंजणा वारणाराही मीच. याप्रमाणें गुरूचा सारा परिवार मीच होईन ५७.

गुरु करिती आरोहण । तो मी होईन श्यामकर्ण ।
गुरूचा भरभार साहावया जाण । वाजीवाहन होईन मी ॥५८॥
गुरु ज्यावर बसतील तो घोडा मीच होईन. गुरुचा सर्व भार वाहण्यासाठी मी घोड्याच्या रूपानें वाहन होईन ५८.

गुरूपुढें मी वाटसुभटू । गुणवर्णनीं मी गर्जता भाटू ।
गुरुगृहीं शांतिपाठू । पढता भटू मी होईन ॥५९॥
गुरूपुढे मी त्यांचा मार्गरक्षक योद्धा होईन, गुरूच्या गुणांचे वर्णन करण्यासाठीं गर्जना करणारा त्यांचा भाट होईन, आणि गुरूच्या घरीं शांतिपाठ म्हणणारा मी भट होईन ५९.

मीचि बारी मी कर्‍हेरी । मी हडपी मी फुलारी ।
मी झाडणा मी खिल्लारी । मी द्वारपाळ द्वारीं होईन ॥५६०॥
गुरुवर छत्र धरणारा मी, गुरुवर चवरी वारणारा मी, विडा देणारा मी, फुलें देणारा मी, झाडणारा मी, गवळी मी, आणि दारांतील पहारेकरीही मीच होईन ५६०.

गुरु जेथें देती अवधान । ते ते कळा मी होईन जाण ।
गुरूवेगळा अर्धक्षण । गेला प्राण तरी न वचें ॥६१॥
गुरु जेथें जेथें लक्ष देतील, तेथील तेथील अवधान मीच होईन, प्राण गेला तरी गुरूला सोडून अर्घक्षण देखील दुसरीकडे जाणार नाही ६१.

गुरु सांगती जे कथा । तेथ मी होईन सादर श्रोता ।
गुरुकृपा मी होईन वक्ता । निजात्मता बोलका ॥६२॥
गुरु जी कथा सांगतील ती अगत्यपूर्वक ऐकणारा मी श्रोता होईन. गुरुकृपेनें अध्यात्मज्ञान सांगणारा मी वक्ता होईन ६२.

गुरु गंभीर दान देत । दीन मागतें मी होईन तेथ ।
गुरूचें निजगुज समस्त । करितां एकांत मी होईन ॥६३॥
गुरु उदारपणानें दान देऊं लागतील तेथे मी गरीब याचक होईन. गुरु आपले सर्व हितगुज सांगूं लागले म्हणजे मीच एकान्तस्वरूप होईन ६३.

गुरु बैसती सावकाश । तैं मी होईन अवकाश ।
गुरुहृदयींचें चिदाकाश । निरवकाश मी होईन ॥६४॥
गुरु सावकाश बसतील तेथें मी अवकाश होईन, आणि गुरूच्या हृदयांतील अवकाशरहित जें चिदाकाश तेंही मी होईन ६४.

गुरु बैसती आपण । तें मी होईन सुखासन ।
तें मीचि वाहेन आपण । भोई होईन चालणा ॥६५॥
गुरु आपण ज्यावर बसतील, तें सुखकारक आसन मीच होईन, आणि चालणारा भोई होऊन ते मीच वाहून नेईन ६५.

स्वामी सूनियां दिठी । चपळ पाउलांच्या नेटीं ।
चालेन मी उठाउठी । धुरेसी गोठी सांगत ॥६६॥
धन्याकडे लक्ष ठेवून, मोठ्या नेटानें भराभर पावलें उचलून आणि गुरूंच्या पालखीचा पुढचा दांडा खांद्यावर घेऊन धन्याबरोबर गोष्टी सांगत झपाझप चालेन ६६.

आंतुले दृष्टीं पुढीले चालीं । गोवींचें पाऊल उगवोनि घालीं ।
उंच नीच भूमीची खोली । चुकवूनि चालीं चालेन ॥६७॥
वाहनांत बसलेल्या गुरूकडे नजर लावून पुढे चालत असतांना पायांत पाय अडखळू नये म्हणून पाऊल उचलून टाकीन. जमिनीचा लहान मोठा उंचवटा किंवा खळगा चुकवून नीट चालीनें चालेन ६७.

संकल्पविकल्पांचे झोंक । जाते वाम सव्य अनेक ।
ते आवरूनियां देख । पाहत श्रीमुख चालेन मी ॥६८॥
संकल्प आणि विकल्प ह्यांचे डाव्या अंगाला व उजच्या अंगाला अनेक झोंक जातील ते सारे सांवरून श्रीगुरूच्या मुखाकडे पहात पहातच मी चालेन पहा ! ६८.

न चुकतां निजमार्ग । न हालतां धुरेचें आंग ।
न करितां आणिकांचा पांग । भोई चांग मी होईन ॥६९॥
आपला मार्ग न चुकतां, खांद्यावरील पालखीचा पुढचा दांडा न हालूं देतां, दुसऱ्यांची गरज न ठेवतां चालणारा उत्तम भोई होईन ६९.

सुखासनाचेनि पडिपाडें । चालतां सुख अधिक वाढे ।
मागीस सूड काढूनि पुढें । सुखसुरवाडें चालेन ॥५७०॥
त्या सुखकारक वाहनाच्या आश्रयानें चालतांना सुख अधिक अधिक वाढतच जाईल. मागचा अजमास पाहून मोठ्या आनंदानें पुढे चालेन ५७०.

चढणें पडणें अडखळणें । दडकणें फडकणें अडकणें ।
सांभाळूनियां निष्ठेनें । टणकपणें चालेन ॥७१॥
चढणे, पडणे, अडखळणे, भिणे, पळणे, अडकणे, इत्यादि सर्व सांभाळून नीट लक्ष देऊन मोठ्या उमेदीनें चालेन ७१.

उरीं शिरीं खांदीं कोंपरीं । मागील सूड पुढें धरीं ।
दृष्टी ठेऊनि पायांवरी । निर्विकारी चालेन ॥७२॥
मागें चढण-उतरण लागली असतां, पालखींत बसावयाला गुरुजींना त्रास होऊं नये म्हणून मी पालखीचा दांडा उरावर, मस्तकावर, खांद्यावर, कोंपरावर, अशा रीतीनें पुढे धरून पायांवर दृष्टि ठेवून मुकाव्यानें गलेन ७२.

आटी मुरडी उलट लोट । धापकांप पडे मेट ।
आधार धरूनि सुभट । चढती वाट चालेन ॥७३॥
पुढे टेंकाड आले, वळण आले, चढण-उतरण आली, दम लागून किंवा अंगाला कंप सुटून जीव दमला, तरी ताठर मनुष्याप्रमाणें धैर्य धरून चढणीवरील वाट चालेन ७३.

उल्लंघूनि कामाचा पाट । आंवरूनि क्रोधाचा लोट ।
चुकवूनि खोलव्याची वाट । धुरेसकट मी चालेन ॥७४॥
कामाचा पाट ओलांडून, क्रोधाचा लोट आंवरून धरून व खड्ड्याची वाट चुकवून, पालखीचा पुढील दांडा खांद्यावर घेऊन त्यासह मी चालेन ७४.

ममतेची ओल प्रबळ । ते ठायीं रुती गुंती सबळ ।
तेथ न माखतां पाउल । लंघूनि तत्काळ जाईन ॥७५॥
ममतेची ओल मोठी दांडगी. त्या दलदलीत पूर्णपणे रुतून अडकून राहावें लागते, पण मी त्या चिखलांत एक पाऊलसुद्धा न माखतां तत्काळ ओलांडून जाईन ७५.

मोहनदीची थोर कराडी । माजीं सबळ जळें प्रबळ वोढी ।
शिंतोडा न लागतां धूर मी काढीं । परापर थडी तत्काळ ॥७६॥
मोहरूप नदीची दरड महाभयंकर आहे. तिच्यांत मोठ्या वेगानें वाहणाऱ्या पाण्यामुळें तिची ओढही मोठी जबरदस्त असते ! परंतु मी स्वामींना एक शिंतोडाही न लागू देतां तत्काळ एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोंचवीन ७६.

दृष्टी ठेवूनि स्वामीकडे । सवेग चालतां मागेंपुढें ।
भोई होईन दोहींकडे । सूड सुडें काढीन ॥७७॥
स्वामीकडे दृष्टि ठेवून झपाट्यानें मागे व पुढे चालतांना दोहींकडचाही भोई होईन व मागामागून माग काढीत जाईन ७७.

एवं मीचि मी मागें पुढें । सुखासनाचेनि सुरवाडें ।
स्वामीची निजनिद्रा न मोडे । तेणें पडिपाडें वाहेन ॥७८॥
अशा प्रकारे मागें आणि पुढें मीच होऊन सुखासनाच्या आनंदानें स्वामीची झोंप न मोडेल अशा तर्‍हेनें तें वाहन वाहून नेईन ७८.

उच्छिष्ट अन्नाचा पोसणा । आठां प्रहरांचा जागणा ।
सदा गुरुगुरु करीत जाणा । गुरुद्वारीं सुणा मी होईन ॥७९॥
उष्ट्या अन्नावर पोसून राहणारा, अष्टौप्रहर जागणारा, असा गुरूच्या दारांत नेहमी ‘गुरु गुरु’ करीत राहणारा मी कुत्रा होऊन राहीन ७९.

विजाती देखोनि नयना । सोहं भावें भुंकेन जाणा ।
भजनथारोळा बैसणा । गुरुदारीं सुणा मी होईन ॥५८०॥
डोळ्यांना कोणी परकी दृष्टीस पडले तर — ‘सोहं’ भावनेनें मी भुंकू लागेन, आणि भजनरूप खळग्यांत बैठक मारून बसणारा गुरूच्या दारांतला कुत्रा होईन ५८०.

ऐस‍ऐशिया भावना । गुरुसेवेलागीं जाणा ।
अतिशयें आवडी मना । नाना विवंचना विवंची ॥८१॥
अशा अनेक कल्पना करून गुरूच्या सेवेसाठी मनाला अत्यंत आवड असल्यामुळें शिष्य नानाप्रकारचे विचार घोळीत असतो ८१.

जरी दैववशें दूर गेला । परी तो भावबळें जवळी आला ।
गुरुसेवे जो जीवें विकला । तो शास्त्र पावला सद्विद्या ॥८२॥
दैवयोगानें तो जरी दूर गेला तरी भक्तिबळानें तो जवळच असतो. गुरुसेवेकरितांच असा जो स्वतः विकला गेला, त्याला सद्विद्याशास्त्रही सहज अवगत होतें ८२.

असो जवळी अथवा दूरी । परी गुरुभक्तीची आवडी भारी ।
जीवित्व ठेविलें सेवेवरी । गुरूच्या द्वारीं भजनासी ॥८३॥
तो गुरूच्या जवळ असो अथवा दूर असो; तरी त्याला गुरुभक्तीची अत्यंत आवडच असते. त्यानें आपला प्राण गुरूच्या सेवेसाठी आणि भजनासाठी गुरूच्या द्वारावरच ठेवलेला असतो ८३.

ऐसा गुरुभक्तीसी सादर । चढत्या आवडीं एकाग्र ।
तेंचि सद्विद्यालक्षण शस्त्र । गुरुकृपाकुठार पैं पावे ॥८४॥
असा गुरुभक्तीला तत्पर असल्यामुळें, आणि अधिकाधिक आवडीनें एकाग्रपणा साधीत असल्यामुळें, तेच गुरुकृपाकुठाररूप सद्विद्यालक्षणशस्त्र त्याच्या हातीं येते ८४.

लावोनि वैराग्याचे साहाणे । प्रत्यावृत्तिबोधकपणें ।
शस्त्र केलें जी सणाणें । तीक्ष्णपणें अतिसज्ज ॥८५॥
ते शस्त्र वैराग्याच्या सहाणेवर लावून स्वस्वरूपाकार वृत्तीनें पाजळून लखलखीत केले, की ते अतिशय तीक्ष्ण धार चढून तयार होते ८५.

शस्त्र सजिलें निज दृष्टीं । दृढ धरिलें ऐक्याचे मुष्टीं ।
शस्त्र आणि शस्त्रधरा एकी गांठी । करूनि उठी भवच्छेदा ॥८६॥
आपल्या दृष्टीनें शस्त्र तयार केले आणि ते ऐक्यभावाच्या मुठीत धरले, तें असें की, त्या शस्त्राचा आणि शस्त्र धरणाराचा अगदी एकजीव होऊन गेला; म्हणजे मग तो संसारावर घाव घालावयाला तयार होतो ८६.

दृढ साधोनियां आवो । निजबळें घालितां घावो ।
झाला भववृक्षाचा अभावो । घायेंवीण पहा हो छेदिला ॥८७॥
नीट नेम साधून मोठ्या जोरानें घाव घालावयाला तयार होतांच संसारवृक्षाचा नाश होतो आणि प्रत्यक्ष घाव घातल्याशिवायच तुटून पडतो ! ८७.

जीवाशयाची वासना । ते छेदावी निजकल्पना ।
तोचि भववृक्षाचा छेदू जाणा । सावधाना धृतिबळें ॥८८॥
लिंगदेहाची वासना जी आपली कल्पना ती छेदून टाकावी, आणि धैर्यानें नेहमी सावध असावे, हाच संसाररूप वृक्षाचा छेद होय ८८.

झालिया चैतन्यपदप्राप्ती । सकळ साधनें सहजें जाती ।
भोजनीं झालिया पूर्ण तृप्ती । ठायींच राहती पक्वान्नें ॥८९॥
आत्मसाक्षात्कार झाल्यावर सर्व साधनें आपोआपच नाहीशी होतात. भोजनानें परिपूर्ण तृप्ति झाली असतां बाकीची पक्वान्नें जागच्या जागींच राहतात ८९.

परमतृप्ती उथळल्या पोटीं । अमृतही न लावी ओंठीं ।
तेवीं ब्रह्मपद पावल्यापाठीं । साधनआटाटी सांडाव्या ॥५९०॥
पोटामध्यें अतिशय तृप्ति उत्पन्न झाली असतां अमृतसुद्धा कोणी ओंठाला लावीत नाही, त्याप्रमाणें ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर या साधनाच्या यातायातीही सोडून द्याव्या ५९०.

हाचि भावो धरोनि चित्तीं । मागां सांगीतलें तुजप्रती ।
सांडीं साधनव्युत्पत्ती । प्रवृत्तिनिवृत्तीसमवेत ॥९१॥
हाच भावार्थ मनांत धरून मी तुला पूर्वी सांगितलेच आहे की, या साधनांच्या खटपटी प्रवृत्तिनिवृत्तींसह सोडून दे ९१.

पावलिया परब्रह्म । मिथ्या वेदोक्त सकळ कर्म ।
मिथ्या आश्रमादि वर्णधर्म । हें त्यागितें वर्म कर्माचें ॥९२॥
परब्रह्माला पोंचलें असतां सर्व वेदोक्त कर्मही मिथ्याच होते, आणि आश्रमादि वर्णधर्मही मिथ्या होतात. हें कर्मत्यागाचे वर्म आहे ९२.

स्वप्नीं चालतां लवडसवडीं । जो अडखळूनि पडला आडीं ।
तो जागा होऊनि आपणातें काढी । तैशी वृथा वोढी साधनीं ॥९३॥
स्वप्नामध्यें गडबडीनें चालत असतां अडखळून जो विहिरीत पडला, तो जागा होऊन आपल्याला त्यांतून काढतो. त्याप्रमाणें साधनामधील अट्टाहास व्यर्थ आहे ९३.

पीक आलिया घुमरी । ते शेतीं कोण नांगर धरी ।
गजान्तलक्ष्मी आलिया घरीं । भीक दारोदारीं कोण मागे ॥९४॥
शेतांत पीक भरून आले म्हणजे मग त्या शेतांत नांगर धरणार कोण ? गजान्तलक्ष्मीच घरांत आली असतां दारोदार भीक कोण मागणार ? ९४.

हातीं लागलिया निधान । नयनीं कोण घाली अंजन ।
साधलिया निजात्मज्ञान । वृथा साधन कोण सोशी ॥९५॥
ठेवाच हातीं लागला असतां डोळ्यांत अंजन कोण घालील ? त्याप्रमाणें आत्मज्ञान प्राप्त झाले असतां व्यर्थ साधन कोण सोशीत बसणार ? ९५.

अंगीकारोनि ज्ञानशक्ती । कलीं संसारनिवृत्ति ।
ते हे त्यागावी निजवृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९६॥
उद्धवा ! ज्ञानसामर्थ्याचा स्वीकार करून संसाराची निवृत्ति सांगितली ती हीच कीं, खरोखर आपली वृत्तीच सोडून द्यावी ९६.

अग्निस्तव निपजे अन्न । तें वाफ न जिरतां परमान्न ।
पोळी अवशेष तापलेपण । रांथितेंहीं जाण चवी नेणे ॥९७॥
अनीपासून अन्न शिजून तयार होते, पण तें श्रेष्ठ प्रकारचे अन्न तयार होऊन देखील त्याची वाफ जिरली नाहीं, तर त्याचा जो गरमपणा शिल्लक राहतो, तो खाणाराचे तोंड भाजतो व स्वयंपाक करणारालासुद्धा त्याची चव कळत नाही, हे लक्षांत ठेव ९७.

आंबया पाडु लागला जाण । तरी अंगीं असे आम्लपण ।
सेजेसि मुरालिया मघमघोन । न चाखतां घ्राण चवी सांगे ॥९८॥
आंब्याला पाड लागला तरी त्याच्या आंगी आंबटपणा हा असतोच. तोच आंबा आदींत घालून मुरून रसरसला म्हणजे न खातांच नाक त्याची गोडी सांगते ९८.

सेजे मुरावयाची गोठी । तेथ न व्हावी द्वैताची दिठी ।
येरयेरां जाहलिया भेटी । दोनी शेवटीं ठिकाळती ॥९९॥
पण आंबे आढींत मुरण्यामध्यें एक खुबी आहे. ती ही की, तेथें एकाला दुसऱ्याचा संपर्क लागतां कामा नये. कारण दोन आंबे एकत्र भेटले असतां दोघेही ठिगळतात ९९.

ठिकाळलीं सेजे घालिती । तत्संगें आणिकें नासती ।
निश्चळ राहिल्या एकांतीं । परिपाकपूर्ती घ्राण सांगे ॥६००॥
आणि ते ठिगळलेले तसेच जवळजवळ आढीला घातले तर त्यांच्या संसर्गानें दुसरेही नासून जातात. पण तेच निश्चळ असे एकएकटे राहिले असतां ते पूर्णपणें पिकल्याचे नाकच सांगेल ६००.

शत्रु जिणोनियां कडाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ।
शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥
धडाक्यानें शत्रूला जिंकलें, आणि रणांगणांत विजयध्वज उभारला, तरी शस्त्रासहवर्तमान अंगांतलें चिलखत जोपर्यंत काढलें नाही, तोपर्यंत खरी विश्रांति मिळत नाही १.

गरोदरेसी प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये ।
तेही बारावळी जैं पाहे । तैं भोगूं लाहे पुत्रसुख ॥२॥
गरोदर असलेल्या स्त्रीला प्रसूति झाली, आणि पुत्र होऊन लगेच जरी ती आनंदित झाली, तरी ती जेव्हा त्याचे बारसें पाहील, तेव्हांच पुत्राचे खरे सुख भोगू शकेल २.

पुरुष निमोनियां जाये । त्या देहाचें दहन होये ।
तरी अवशेष सुतक राहे । तें गेलिया होये निजशुद्धी ॥३॥
एखादा पुरुष मरून गेला असतां त्याच्या देहाचे दहन होते, तरी सुतक हें बाकी राहतेंच. ते जाईल तेव्हांच आपली शुद्धि होते ३.

तेवीं जावोनियां अज्ञान । उरला जो ज्ञानाभिमान ।
तोही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वानंदें ॥४॥
त्याप्रमाणें अज्ञान जाऊन जो ज्ञानाभिमान शिल्लक राहतो, तोही त्यागिला असतां स्वानंदानें आत्मसमाधान होते ४.

खैराचा शूळ तत्त्वतां मारी । मा चंदनाचा काय आन करी ।
तेवीं अभिमान दोहींपरी । बाधकता धरी ज्ञानाज्ञानें ॥५॥
खैराचा शूल असला म्हणजे तो खरोखर मारतो, आणि तो चंदनाचा असला म्हणून कांही निराळें करील की काय ? त्याप्रमाणेंच ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा असा दोन्ही प्रकारचा अभिमान बाधकच होतो ५.

लोखंडाची बेडी तोडी । मा आवडीं सोनियाची जडी ।
चालतां तेही तैशीच आडी । बाधा रोकडी जैशी तैशी ॥६॥
लोखंडाची बेडी तोडली आणि मग मोठ्या हौसेनें सोन्याची घातली तरी चालतांना तीही तशीच अडथळा करूं लागते आणि पीडा जशीच्या तशीच राहते ६.

‘ब्रह्महमस्मि’ हा अभिमान । शुद्ध ब्रह्म नव्हे जाण ।
अहंपणें तेंही कठिण । तेंही लक्षण अवधारीं ॥७॥
‘ब्रह्माहमस्मि’-‘ब्रह्म तेच मी’-हा अभिमान कांहीं शुद्ध ब्रह्म नव्हे, हे लक्षांत ठेव. अहंपणामुळें तेही कठीणच आहे. त्याचे लक्षणही ऐक ७.

जळापासोनि लवण होये । तें जळींचें जळीं विरोनि जाये ।
मोतीं झालें तें कठिण पाहें । उदकीं न जाये विरोनी ॥८॥
पाण्यापासून मीठ होते, आणि ते पाण्यातल्या पाण्यात विरून जाते; पण मोती पाण्यापासूनच होते तरी तें कठीण असते, म्हणून ते पाण्यांत विरून जात नाही ८.

मुक्तपणें मोला चढलें । तें वनिताअधरीं फांसा पडिलें ।
मुक्तचि परी नासा आलें । कठिण केलें अभिमानें ॥९॥
ते मुक्तपणामुळें जरी मोलाला चढले, तरी स्त्रीच्या ओठांजवळ सोन्याच्या तारेत अडकून पडते. ते मुक्त असूनही नाकाजवळ आलें, एवढा अभिमानानें कठीणपणाचा प्रसंग आणला ! ९.

तेवीं अज्ञान‍अभिमान आहे । तो सर्वथा तत्काळ जाये ।
ज्ञानाभिमान कठिण पाहें । गोंविताहे मुक्तत्वें ॥६१०॥
त्याप्रमाणें अज्ञानाचा अभिमान असतो तो तत्काळ नाहीसा होतो, पण ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे. तो मुक्तपणानेंसुद्धा गुंतवून पाडतो ६१०.

अपक्व घटू तत्काळ गळे । तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे ।
भाजिलें खापर अतिकाळें । पृथ्वीस न मिळे कठिणत्वें ॥११॥
मातीची घागर कच्ची असते ती तत्काळ गळूं लागते व ती मातीस माती मिळून जाते. पण तेंच भाजलेलें खापर असूं द्या, की ते कठीण असल्यामुळें कितीही दिवस गेले तरी मातीला मिळत नाही ११.

प्रपंच अज्ञानें झाला लाठा । ज्ञान‍अज्ञानांचा सत्ववांटा ।
फेडूनि कांटेन कांटा । दोनी आव्हांटा सांडावे ॥१२॥
त्याप्रमाणें प्रपंच हा अज्ञानानेंच बळावलेला आहे. ह्याकरितां ज्ञान व अज्ञान ह्यांचा अभिमान सोडून काट्यानें काटा काढल्याप्रमाणें दोन्ही आडवाटेवर फेंकून द्यावी १२.

जरी सांडिले वाटेवरी । तरी अवचटें आपणासीचि बाधु करी ।
यालागीं सांडावे दूरी । निजनिर्धारीं हा त्यागू ॥१३॥
कारण, ज्ञान व अज्ञान ही दोन्ही जर वाटेवरच टाकली, तर एखाद्या वेळी ती आपल्यालाच बाधक होतील. म्हणून त्यांना दूरच फेंकून द्यावे, हाच खरा त्याग होय ११.

जेथवर अहंपण । तितुकेंही बाधक जाण ।
शुद्धाशुद्ध अभिमान । निःशेष सज्ञान सांडिती ॥१४॥
अहंपण म्हणून जितके आहे. तितकें बाधकच आहे. ह्याकरितां चांगला किंवा वाईट अभिमान असला तरी ज्ञाते लोक ते दोन्ही अभिमान पूर्णपणे सोडून देतात १४.

उद्धवा तुज करितां माझी भक्ती । झाली माझ्या निजपदाची प्राप्ती ।
आतां नाना साधन‍उपपत्ती । शास्त्रव्युत्पत्ती कां करिसी ॥१५॥
उद्धवा ! तुला माझी भक्ति करूनच माझ्या पदाची प्राप्ति झालेली आहे. आतां अनेक प्रकारच्या साधनांचे उपद्व्याप व शास्त्राची वाटाघाट कशाला करतोस ? १५.

सद्‍भावें करितां माझें भजन । तूं झालासी ब्रह्मसंपन्न ।
आतां सद्विद्यादि सर्व साधन । शास्त्रश्रवणेंसीं सांडीं पां ॥१६॥
सद्‌भक्तीनें माझें भजन केल्यामुळें महास्वरूप झाला आहेस. ह्याकरितां आतां सद्‌विद्यादिक सर्व साधनें शास्त्रश्रवणासह सोडून दे १६.

‘तस्मादुद्धव उत्सृज्य’ । ये श्लोकींचें हें त्यागबीज ।
विशद सांगीतलें म्यां तुज । निजगुज हृदयस्थ ॥१७॥
‘तस्मादुद्धव उत्सृज्य’ ह्या श्लोकांतील त्यागाचे बीज हेंच आहे, तें माझें अंत:करणांतील गुह्य मी तुला स्पष्ट करून सांगितलें १७.

सकळां साधनां श्रेष्ठ साधन । शिष्यासी सद्‍गुरूचें भजन ।
तेणे पाविजे ब्रह्मसमाधान । सत्य जाण उद्धवा ॥१८॥
शिष्याला गुरूचे भजन हेंच सर्व साधनांतील श्रेष्ठ साधन आहे. उद्धवा ! त्यानेंच खरोखर ब्रह्मसमाधान प्राप्त होते. हे सत्य आहे असे समज १८.

जो भावें भजे गुरुचरणीं । तो नांदे सच्चिदानंदभुवनीं ।
हे सत्य सत्य माझी वाणी । विकल्प कोणीं न धरावा ॥१९॥
जो गुरुचरणाचे भक्तिभावानें भजन करतो, तो सच्चिदानंदमंदिरांत राहातो. हे माझे भाषण पूर्णपणे सत्य आहे. त्याबद्दल कोणीही विकल्प धरूं नये १९.

ऐसें बोलोनि श्रीहरी । आवडीं चारी बाह्या पसरी ।
उद्धवातें प्रीतिकरीं । हृदयीं धरी स्वानंदें ॥६२०॥
असे बोलून श्रीकृष्णांनी प्रेमानें चारीही हात पसरले, आणि त्या प्रेमळ हातांनी मोठ्या आनंदानें उद्धवा पोटाशी धरलें १२०.

देवें सद्‍भक्ता क्षेम दीधलें । निजहृदयीं हृदय एक झालें ।
सांगणें पुसणें सहज ठेलें । बोलणें बोलें प्राशिलें ॥२१॥
देवानें सद्‌भक्ताला आलिंगन दिल्यामुळें हृदयाशी त्याचें हृदय मिळाले, तेव्हा अर्थातच सांगणे माणि विचारणे ही दोन्ही बंद पडलीं; आणि शब्दांनीच शब्द खाऊन टाकले २१.

चहूं वाचां पडलें मौन । जीवू विसरला जीवपण ।
एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन सद्‍भक्तां ॥२२॥
चारीही वाणींना मौन पडले; जीव जीवपणाही विसरला; आणि सद्‌भक्तांना केवळ स्वानंदघन असा जो एकनाथरूपी जनार्दन तोही संतुष्ट झाला २२.

तेचि सद्‍भक्तीचा भावार्थ । विशद बोलिला बाराव्यांत ।
निजभावें श्रीकृष्णनाथ । नित्य प्राप्त भाविकां ॥२३॥
त्याच सद्‌भक्तीचा भावार्थ बाराव्या अध्यायांत स्पष्टपणे सांगितला. तो असा की, भक्तांना त्यांच्या भक्तीनें श्रीकृष्णनाथ नेहमी प्राप्त होतो २३.

निजात्मप्राप्तीचें कारण । केवळ भावार्थचि जाण ।
भावार्थावेगळें साधन । वृथा जाण परिश्रमू ॥२४॥
आत्मप्राप्ति होण्याला कारण केवळ मुख्य भावार्थच आहे. भावार्थाशिवाय इतर साधनें हे वृथा श्रम होत असे समज २४.

जप तप यज्ञ दानें । भावार्थालागीं करणें ।
तो भावार्थ लाहिजे जेणें । धन्य जिणें तयाचें ॥२५॥
जप, तप, यज्ञ किंवा दानें भावार्थासाठींच करावयाची असतात. तो भावार्थ ज्यानें साध्य केला, त्याचा जन्म धन्य होय २५.

धन्य नरदेहाची प्राप्ती । धन्य साधूची संगती ।
धन्य धन्य ते भावार्थी । जे भगवद्‍भक्तीं रंगले ॥२६॥
नरदेहाची प्राप्ति धन्य आहे ! साधूंची संगति धन्य आहे ! आणि जे भगवद्‌भक्तींत रंगले, ते भावार्थी अत्यंत धन्य होत ! २६.

जे रंगले भगवत्पथा । त्यांचें चित्त विसरलें विषयावस्था ।
ते हंसगीताची कथा । उद्धव कृष्णनाथा पुसेल ॥२७॥
भगवन्मार्गात जे रंगून जातात त्यांचे चित्त विषयसुखाला विसरून जाते. ती हंसगीताची कथा उद्धव आतां श्रीकृष्णाला विचारील २७.

तें अतिरसाळ निरूपण । केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान ।
श्रोतां व्हावें सावधान । एका जनार्दन विनवितू ॥६२८॥
तें निरूपण अत्यंत रसभरित असून केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, याकरितां श्रोत्यांनीही त्याच्याकडे लक्ष द्यावें अशी एकनाथरुपी जनार्दन विनंति करीत आहे ६२८.

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे
एकाकाराटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक २४ ॥ ओंव्या ६२८ ॥
बारावा अध्याय समाप्त

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *