sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 25

एकनाथी भागवत अध्याय 25

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण ।
गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥ १ ॥ 
हे ओंकारस्वरूप निर्गुण देवा ! तुला नमस्कार असो असें म्हणावयास जावें, तो गुणच कोठे दृष्टीस पडत नाहीत, आणि गुणांशिवाय निर्गुणपणा तर कधीच यावयाचा नाही १.

र्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण ।
नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥ २ ॥
यावरून निर्गुणपणा तर मुळीच घडत नाही. पण सगुणपणाही तूं अंगी लावून घेत नाहीस. अशा प्रकारे तूं गुण किंवा अगुण ह्यांना शिवत नाहींस, म्हणून गुरुराया! तूं पूर्ण अगुणी आहेस २.

अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी ।
पंचभूतांपासूनी । सोडवितां जनीं जनार्दनू ॥ ३ ॥
तसाच तूं अगुणाच्या विरुद्ध गुणी आहेस, पण तूं त्रिगुणांतील गुणांचा नाश करून टाकतोस. जगामध्ये पंचमहाभूतांपासून सोडविणारा एक जनार्दनच होय ३.

ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन ।
जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥ ४ ॥
ज्याच्या योगाने दुष्ट जनांचा संहार होतो, ज्याच्या योगाने लिंगदेहाचा नाश होतो, जो जीवाला जीवानेच ठार मारतो, तो जनार्दन कृपाळू होणार कसा? ४.

जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन ।
नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥ ५ ॥
परंतु जनार्दनाचे कृपाळूपण लोक मुळीच जाणत नाहीत. तो न समजावयाला कारण हेच की, ते देहाभिमान सोडीत नाहींत ५.

जननीजठरीं जन्म जाण । त्या जन्मास्तव म्हणती जन ।
त्या जनजन्मा करी मर्दन । यालागीं जनार्दन नाम त्यासी ॥ ६ ॥
जननीच्या जठरामध्ये जन्मास येतो म्हणून मनुष्याला त्या जन्मावरून ‘जन’ असे म्हणतात. त्या जनाच्या जन्माचाच संहार करतो म्हणून त्याला जनार्दन असे नाव आहे ६.

मरण मारूनि वाढवी जिणें । जीव मारूनि जीवपणें ।
देहीं नांदवी विदेहपणें । ऐशी जनार्दनें कृपा कीजे ॥ ७ ॥
मरणालाच मारून आयुष्य वाढवितो, जीव मारून जगवितो, आणि देहांतच विदेहीपणाने नांदवितो अशी जनार्दनाने कृपा केली आहे ७.

निजभावार्थें परिपूर्ण । एकाकी देखूनियां दीन ।
कृपा करी जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥ ८ ॥
भक्तीने परिपूर्ण आणि एकटा एक असल्यामुळे दीन झालेला असा भक्त पाहिला की दीनांवर पूर्ण कृपा करणारा जनार्दन कृपा करितो ८.

जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन ।
जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥ ९ ॥
जन जी जी इच्छा करतात, ती ती जनार्दन पुरी करितो. जो कोणी पूर्ण समाधान मागतो, त्याचा देहाभिमान नाहींसा करून टाकतो ९.

हो कां जनार्दनासमोर । कैं आला होता अहंकार ।
मा तेणें घेऊनियां शस्त्र । करी शतचूर निजांगें ॥ १० ॥
पण जनार्दनासमोर अहंकार आला होता कधीं ? तर मग तो हातांत शस्त्र घेऊन स्वतः त्याचे तुकडे तुकडे करणार ! १०.

जेवीं सूर्याचेनि उजियेडें । अंधारेंसी रात्री उडे ।
तेवीं जनार्दननामापुढें । अहंकार बापुडें उरे केवी ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधारासह रात्र निघून जाते, त्याप्रमाणे जनार्दनाच्या नावापुढे बिचारा अहंकार उरणार कसा? ११.

ऐकतां गुरुनामाचा गजरू । समूळ विरे अहंकारू ।
येथ दुःखदायक संसारू । कैसेनि धीरू धरील ॥ १२ ॥
गुरुनामाचा गजर ऐकला की, अहंकार पूर्णपणे विरून जातो. मग अशा गुरुनामापुढे दुःखदायक संसार टिकाव कसा धरील’ १२.

ज्याचें नाम स्मरतां आवडीं । संसारबांदवडी फोडी ।
जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥ १३ ॥
आवडीने ज्याच्या नामाचे स्मरण केले तर ते संसाराचा बांध फोडून टाकतें, आणि जीवाचे जीवबंधन तोडून टाकते, त्याच्या त्या नामाची गोडी मोक्षाला सुद्धा लाजविते १३.

निजमोक्षाही-वरतें । ज्याचें नाम करी सरतें ।
त्याच्या कृपाळूपणातें । केवीं म्यां येथें सांगावे ॥ १४ ॥
ज्याचें नाम मोक्षाहूनही श्रेष्ठ पदास चढवितें, त्याच्या कृपाळूपणाविषयी मी येथे काय सांगणार? १४.

नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरूचा निजमहिमा ।
कैशापरी आकळे आम्हां । काय निरुपमा उपमावें ॥ १५ ॥
पण त्या नामप्रतापालासुद्धा ज्याची बरोबरी करता येत नाही, त्या सद्गुरूचा महिमा आम्हाला कोणत्या रीतीने कळेल ? निरूपमाला उपमा कोणती द्यावी? १५.

अगाध कीर्ति गुरूची गहन । गुण गणितां अनंतगुण ।
काय घ्यावें त्याचें आपण । नित्य निर्गुण निजांगें ॥ १६ ॥
गुरूची कीर्ति अगाध आणि गहन आहे. त्याच्या गुणांची मोजदाद करूं गेलें तर ते गुण अनंत आहेत. जो स्वतः नित्य निर्गुण आहे, त्याचे आपण काय घ्यावें? १६.

धाव घेऊनि त्यापें जावों । तंव त्या नाहीं गांवठावो ।
त्याचे प्राप्तीसी न चले उपावो । एक सद्भावोवांचूनी ॥ १७ ॥
धाव घेऊन त्याच्याजवळ जाऊं म्हटले, तर त्याला गांव नाही आणि स्थान नाही. एका सद्भावाशिवाय त्याचा लाभ होण्याला दुसरा उपाय नाही १७.

सद्भावें स्मरतां नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं ।
जेवीं सागरू सैंधवासी । ये भेटीसी निजांगें ॥ १८ ॥
सद्भावाने जर त्याचे नामस्मरण केले, तर त्या स्मरणाबरोबरच गुरु प्रगट होतो, आणि ज्याप्रमाणे समुद्र आपण होऊनच मिठाला भेटावयाला आला १८.

सागरा देतां आलिंगन । जेवीं सैंधव होय जीवन ।
तेवीं वंदितां सद्गुरुचरण । मीतूंपण हारपे ॥ १९ ॥
आणि म्हणून त्या सागराला आलिंगन देण्याबरोबर ज्याप्रमाणे त्या मिठाचे पाणी होते, त्याप्रमाणे सद्गुरूंचे पाय वंदन केले असता मीपणच विरून जाते १९.

सद्गुरुकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन ।
तेव्हां जन वन विजन । भिन्नाभिन्न भासेना ॥ २० ॥
सद्गुरूची पूर्ण कृपा झाली म्हणजे जनच जनार्दनस्वरूप होतो. त्या वेळी जन, वन, किंवा विजन यांत भिन्नाभिन्नपणा भासतच नाहीं २०.

जन तेंचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन ।
हेंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनीं ॥ २१ ॥
म्हणून जन तोच जनार्दन होय, आणि जनार्दन तोच सारे जन होत. हेच उपनिषदांतील सर्व तात्पर्य आहे आणि हेच जनार्दनाचे खरे स्वरूप आहे २१.

येणेंचि अभिन्नार्थें येथ । सांख्य बोलिला भगवंत ।
उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । वस्तु सदोदित संपूर्ण ॥ २२ ॥
ह्याच अभेदभावाने येथे भगवंतांनी सांख्यशास्त्र सांगितले. ते हेच की, परब्रह्म हें उत्पत्ति, स्थिति आणि लय यांच्यामध्ये निरंतर परिपूर्णच असते २२.

सांख्या ऐकोनियां उद्धवो । विचरी आपुला अभिप्रावो ।
संसार वाढवी जो अहंभावो । तो अवश्य पहा हो सांडावा ॥ २३ ॥
हें सांख्यमत ऐकून उद्धव आपल्याच मनाशी विचार करूं लागला की, अहंभाव हाच संसाराला वाढवितो, तर तोच मुळी सोडून द्यावा २३.

अहंकार जडला चित्ता । तो सांडितां न वचे सर्वथा ।
हें पुसों जरी श्रीकृष्णनाथा । तेणें सांख्य या अर्था निरूपिलें ॥ २४ ॥
पण अहंकार जो चित्ताला जडलेला आहे, तो सोडावयाला लागले असतां मुळीच सुटत नाही. हे जर श्रीकृष्णाला विचारावें, तर त्याने याचसाठी सांख्य सांगितले आहे २४.

सकळ प्राप्तीचा अभिप्रावो । सांख्य अनुवादला देवो ।
अवश्य सांडावा अहंभावो । हेंचि पहा हो दृढ केलें ॥ २५ ॥
सर्व प्राप्तीचे रहस्य जे सांख्य तेंच देवाने सांगितले. आणि अहो ! त्यांतच अहंभाव हा अवश्य सोडून द्यावा हेच निश्चित केलें २५.

माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा ।
लाजिरवाणें कृष्णनाथा । किती आतां पुसावें ॥ २६ ॥
खरोखर माझ्याच सामर्थ्यानें माझें मीपण मुळीच जाणार नाही. आणि कोडग्यासारखें श्रीकृष्णाला आता किती वेळां विचारावें ? २६.

ऐशी उद्धवाची चिंता । कळूं सरली श्रीकृष्णनाथा ।
बाप कृपाळु निजभक्तां । जेणें निवारे अहंता तें निजवर्म सांगे ॥ २७ ॥
ही उद्धवाला पडलेली चिंता श्रीकृष्णाला कळून आली. श्रीकृष्ण आपल्या भक्तांचा अत्यंत कनवाळू असल्यामुळे ज्याच्या योगानें अहंता नाहीशी होते अशी युक्ति तो सांगू लागला २७.

आजि उद्धवाचें भाग्य पूर्ण । जगीं उद्धवचि धन्य धन्य ।
ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश्न निजगुह्य सांगे ॥ २८ ॥
आज उद्धवाचें भाग्य पूर्णपणे प्रगट झाले. जगामध्ये उद्धवच अत्यंत धन्य होय. ज्याच्यावर श्रीकृष्ण प्रसन्न झाला व प्रश्न न करितांच आपलें रहस्य सांगू लागला ! २८.

बाळक काय भूक सांगे । मग माता स्तन देऊं लागे ।
ते कळवळ्याचे पांगें धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥ २९ ॥
मूल काय आपल्याला भूक लागली असें सांगते ? आणि मग आई त्याला स्तनपान देऊं लागते ? असें नाही. तर ती आपल्या अंत:करणांतील कळवळ्यानेच आपण होऊन धावत जाऊन स्वतः त्याला पाजू लागते २९.

त्याहूनि अतिआगळा । कृष्णीं उद्धवकळवळा ।
तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखित ॥ ३० ॥
पण श्रीकृष्णाच्या अंत:करणांत उद्धवाविषयींचा कळवळा त्याहूनही कितीतरी अधिक होता. कारण, आपल्या भक्तांच्या भक्तीची थोरवी मनांत आणून त्याचे अंतःकरण अत्यंत कळवळत असे ३०.

बाळक नेणे आपुली चिंता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता ।
तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥ ३१ ॥
मूल आपली चिंता जाणत नाही, पण आईच त्याचे हित करावयास प्रवृत्त होते. त्याप्रमाणे उद्धवाचा हेतु पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाला कळवळा होता ३१.

त्या उद्धवाचें जें जें न्यून । तें तें करावया परिपूर्ण ।
प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥ ३२ ॥
त्या उद्धवाचे जें जें कांहीं न्यून असेल, तें तें परिपूर्ण करावयाला श्रीकृष्ण तयारच होता. त्याने त्याला आपल्या निर्गुणपणाचा उपदेश केला ३२.

पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण ।
लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरूपण निजनिष्ठा ॥ ३३ ॥
पंचविसाव्या अध्यायामध्ये गुणांचा जय कसा करावा त्याचे लक्षण सांगून आपला निर्गुणपणाही दाखवून देईल. हेच एकनिष्ठेचे निरूपण आहे ३३.

प्रकृति-पुरुषविवेक । झालियाही बुद्धिपूर्वक ।
जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःख अहंभावो ॥ ३४ ॥
प्रकृतिपुरुषांचा विचार बुद्धिपूर्वक झाला, तरी जोपर्यंत गुणांवर पूर्णपणे जय मिळाला नाही, तोपर्यंत सुखदुःख व अहंभाव ही वाढावयाचींच ३४.

तिहीं गुणांस्तव देह झाला । देही गुणजयो न वचे केला ।
मूल‍उच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥ ३५ ॥
तिन्ही गुणांपासून देह झाला आहे. म्हणून देहामध्ये गुणांचा जय केला जात नाही. कारण, आपल्याच मुळाचा उच्छेद कोणालाही मुळींच करवत नाही. ३५.

दांडा जन्मला वृक्षजातीसीं । तो मिळोनियां कुऱ्हाडीसीं ।
समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासीं सत्त्वगुण ॥ ३६ ॥
दांडा वृक्षांच्या जातींतच जन्मास येतो, पण तो कुऱ्हाडीला मिळून तिच्याकडून साऱ्या वृक्षांचे छेदन करवितो. त्याप्रमाणे विवेकाला सत्त्वगुण मिळतो ३६,

विवेका मीनल्या सत्त्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण ।
सहजें प्रकटे निजनिर्गुण । तेव्हां गुणच्छेदन तें मिथ्या ॥ ३७ ॥
आणि विवेकाला सत्त्वगुण मिळाला म्हणजे तो तिन्ही गुणांचा समूळ उच्छेद करून टाकतो. त्यामुळे मूळचे निर्गुणत्व आपोआप प्रगट होते. तेव्हां गुणांचे छेदन करणे हेही मिथ्याच होय ३७.

समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण ।
येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥ ३८ ॥
तिन्ही गुण हेच मुळी मिथ्या आहेत; आणि आपलें निर्गुणत्व हेच काय ते नित्य व सत्य आहे. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वत:च्या मुखाने सांगत आहे ३८.

श्रीभगवानुवाच-
गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् ।
तन्मे पुरुषवर्येदमुपधारयः शंसतः ॥ १ ॥
[श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पुरूषश्रेष्ठा कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक. (१)

ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती ।
ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महपापें ॥ ३९ ॥
ज्याच्या चरणाच्या स्पर्शाने सर्व पृथ्वी पवित्र होते; ज्याच्या नामाने त्रैलोक्य उद्धरतें ; ज्याच्या गुणांची कीर्ति श्रवण केली असता महापातकेंही लयास जातात ३९;

ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चरितां निववी परम ।
तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥ ४० ॥
ज्यांचे मृदु, मधुर, व अवीट असें नाम उच्चारले असतां परमसंतोष देते; तो पुरुषोत्तम परम प्रीतीनें उध्दवाशी बोलू लागला ४०.

सत्त्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न ।
पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥ ४१ ॥
सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकमेकांत न मिसळतां भिन्न भिन्न असतात, तेव्हां पुरुषापाशी जो भिन्न भिन्न एकेक गुण असतो, त्या प्रत्येकापासून कोणकोणते चिन्ह दृष्टीस पडते तें ऐका ४१.

निःसंदेह सावधान । निर्विकल्प करूनि मन ।
ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥ ४२ ॥
हे माझें भाषण निःसंदेह, सावधान व निर्विकल्प मन करून ऐकलें असतां ऐकणारा स्वत:च परिपूर्ण पुरुषोत्तम होईल ४२.

माझे स्वरूपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था ।
माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता घर रिघे ॥ ४३ ॥
माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सद्भावना धरणे तीच पुरुषाची उत्तमावस्था होईल. माझ्या भाषणावर विश्वास ठेवला असतां पुरुषोत्तमपणा स्वतः घरी चालून येतो ४३.

ऐशी उत्तमा अतिउत्तम । निर्गुण पदवी निरुपम ।
तुज मी अर्पितसें पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥ ४४ ॥
असे हे उत्तमांतील उत्तम, निरुपम व निर्गुण स्थान, माझ्या वचनावर तूं पूर्ण विश्वास ठेवशील तर तुला मी अर्पण करीत आहे ४४.

भक्तिभावार्थें परम श्रेष्ठ । वचनविश्वासीं अतिवरिष्ठ ।
यालागीं उद्धवासी पुरुषश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ संबोधी ॥ ४५ ॥
उद्धव हा भक्तिभावार्थानं अत्यंत श्रेष्ठ, वचनावर विश्वास ठेवण्याबद्दल तर अत्यंत अग्रगण्य, म्हणून श्रीकृष्ण आपल्या मुखाने उद्धवाला ‘हे पुरुषश्रेष्ठा !’ असें म्हणून हाक मारूं लागला ४५.

संसारीं योनि अनेग । त्यामाजीं मनुष्यत्व अतिचांग ।
तेंहि अविकळ अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥ ४६ ॥
या जगामध्ये अनेक योनी आहेत. त्यांत मनुष्यपणा हा अत्यंत उत्तम होय. आणि त्यांतही शुद्ध, अव्यंग, संपूर्ण अवयवांनी युक्त आणि कोणत्याही प्रकारे उणीव नाही असा देह असावा ४६.

सकळ देहांमाजीं जाण । असे पुरुषदेहप्राधान्य ।
त्याहीमाजीं विवेकसंपन्न । वेदशास्त्रज्ञ मुमुक्षू ॥ ४७ ॥
अशाही सर्व देहांमध्ये पुरुषदेहाचेंच श्रेष्ठत्व आहे. त्यांतही विचारशील, वेदशास्त्रं जाणणारा आणि मुमुक्षु असा पुरुष असावा ४७.

वेदशास्त्रविवेकसंपन्न । त्याहीमाजीं ज्या माझें भजन ।
भजत्यांमाजीं अनन्य शरण । सर्वस्वें जाण मजलागीं ॥ ४८ ॥
आणि असा पुरुष वेद, शास्त्र, विवेक ह्यांनी संपन्न असून त्यांत आणखी ज्याला माझें भजन घडत असेल, आणि अशा भक्तांमध्येही मला जर अनन्यभावाने सर्वस्वीं शरण येणारा असेल ४८,

सर्वस्वें जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा परिपूर्ण ।
माझें कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मद्भजनीं ॥ ४९ ॥
तर असे जे सर्वस्वेकरून मला शरण येतात, त्यांच्यावर माझी परिपूर्ण कृपा असते. माझ्या कृपेनेच तो माझें ज्ञान पावून माझ्या भजनांत रममाण होतो ४९.

येंहीं गुणीं विचारितां लोक । आथिला दिसे उद्धव एक ।
त्यालागीं यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचनें करी ॥ ५० ॥
अशा गुणांनी विचार केला असतां असा सर्वगुणसंपन्न एक उद्धवच दिसतो. यासाठीच यदुकुलश्रेष्ठ श्रीकृष्णाने ‘पुरुषश्रेष्ठा’ अशा संबोधनाने पुरुषत्वाचा अभिषेक उद्धवावर केला ५०.

ऐसें संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावांसी ।
सांगतां प्रथम सत्त्वासी । हृषीकेशी उपपादी ॥ ५१ ॥
ह्याप्रमाणे उद्धवाला संबोधून तीन गुणांचे स्वभाव सांगतांना प्रथम श्रीकृष्ण सत्त्वगुणाचे प्रतिपादन करूं लागला ५१.

उदंड सत्त्वाचीं लक्षणें । त्यांत पंधरा बोलिलीं श्रीकृष्णें ।
तेंचि ऐका कोणकोणें । निजनिरूपणें हरि सांगे ॥ ५२ ॥
सत्वगुणाची लक्षणे अनेक आहेत, परंतु त्यांतील पंधराच श्रीकृष्णांनी सांगितली. ती श्रीकृष्णांनी आपल्या निरूपणांत सांगितलेली लक्षणे कोणतीं तें ऐका ५२.

शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः ।
तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा हीर्दयादिः स्वनिर्वृतिः ॥ २ ॥
[श्लोक २] मनः संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयउपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. (२)

आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि बाह्यस्फूर्ती ।
अखंड राखणें आत्मस्थिती । शम निश्चितीं या नांव ॥ ५३ ॥
बाह्यस्फूर्तीला सोडून देऊन आपली जी चित्तवृत्ति, ती अखंड आत्म्यामध्ये एकाग्र करणे यालाच ‘शम’ असें नांव आहे ५३.

बाह्य इंद्रियांची चडफड । शमेंसीं करावा गलजोड ।
निग्रहणें विषयचाड । दमाचें कोड या नांव ॥ ५४ ॥
बाह्य इंद्रियांची जी चरफड असते, तिचे शांतीशी ऐक्य करून विषयाची इच्छा आवरून धरणे, याचें नांव दमाचे खरे स्वरूप होय ५४.

जेणें हरिखें साहणें सुख । त्याचि वृत्तीं साहणें दुःख ।
तितिक्षा या नांव देख । शुद्धसत्त्वात्मक उद्धवा ॥ ५५ ॥
उद्धवा ! जितक्या आनंदाने आपण सुख भोगतों, तितक्याच संतोषवृत्तीने दुःखही सहन करणे, याचे नांव शुद्धसत्त्वात्मक तितिक्षा होय ५५.

मी कोण कैंचा किमात्मक । निष्कर्म कीं कर्मबद्धक ।
करणें निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नांव ॥ ५६ ॥
मी कोण? कोठचा? माझे स्वरूप काय ? मी निष्कर्म आहे की कर्मबद्ध आहे ? अशा प्रकारें आत्मविचार करणे ह्याचें नांव ईक्षापरिपाक होय ५६.

जागृतिस्वप्रसुषुप्तीआंत । भगवत्प्राप्तीलागीं चित्त ।
झुरणीमाजीं पडे नित्य । तप निश्चित या नांव ॥ ५७ ॥
जागृति, स्वप्नं व सुषुप्ति या तिन्ही स्थितींमध्ये भगवत्प्राप्तीसाठी चित्त निरंतर झुरणीला लागणे याचंच नांव खरोखर ‘तप’ होय ५७.

आवडीं जेवीं नेघवे विख । तेवी प्राणांतें न बोले लटिक ।
साचचि बोलणें निष्टंक । हें सत्य देख सात्त्विका ॥ ५८ ॥
आवडीनें विष पिववत नाही, त्याप्रमाणे प्राणांतीही जो खोटे बोलत नाही, निरंतर सत्यच बोलणे असते, हेच सात्विकाचे सत्य होय ५८.

भूतांवरी कठिणपण । जो स्वप्नीं न देखे आपण ।
भूतदया ते संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ ५९ ॥
उद्धवा ! जो आपण होऊन स्वप्नातसुद्धा प्राणिमात्रावर निष्ठुरपणा कधीं धरीत नाही, त्याची तीच खरोखर परिपूर्ण भूतदया होय असे समज ५९.

माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितों कर्माचरण ।
ऐसें जें पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नांव ॥ ६० ॥
माझें मुख्य हित कशांत आहे? मी कोणतें कर्माचरण करतो ? असें जें पूर्वीचे स्मरण, त्याचे नांव स्मृति हे लक्षात ठेव ६०.

न करितां अतिआटाटी । यथालाभें सुखी पोटीं ।
या नांव गा निजसंतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥ ६१ ॥
हे जगांतील श्रेष्ठ भक्ता उद्धवा! अतिशय यातायात न करता जे काय मिळेल तेवढ्यानेंच अंत:करणांत सुखी राहावयाचे ह्याचेंच नांव आत्मतुष्टि होय असे समज ६१.

जे मिळाले जीविकाभाग । त्यांतही सत्पात्रीं दानयोग ।
विषयममता सांडणें सांग । त्या नांव त्याग उद्धवा ॥ ६२ ॥
जे काय उपजीविकेसाठी अन्नादिक प्राप्त झाले असेल, त्यांतलेच काही सत्पात्री दान करावयाचे, आणखी उद्धवा ! सर्व विषयममता सोडावयाची, त्याचे नांव त्याग होय ६२.

अर्थस्वार्थीं इच्छा चढे । अर्थ जोडतां अधिक वाढे ।
ते इच्छा सांडणे निजनिवाडें । निस्पृहता घडे ते ठायीं ॥ ६३ ॥
अर्थ आणि स्वार्थ ह्यांचे ठिकाणी इच्छा वाढतच असते, पैसा मिळाला म्हणजे तर ती अधिक वाढते, अशी ती इच्छा आपल्या मनानेच सोडून दिली, म्हणजे तेथे निस्पृहता घडते ६३.

जेथ निस्पृहता समूळ सांग । त्याचि नांव दृढ वैराग्य ।
हें परमार्थाचें निजभाग्य । येणें श्रीरंग सांपडे ॥ ६४ ॥
जेथें पूर्णपणे सर्वलक्षणयुक्त निस्पृहता असते, त्याचंच नांव दृढ वैराग्य, हेच परमार्थाचं खरें भाग्य असून याच्याच योगाने श्रीहरि प्राप्त होतो ६४.

जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं
तोचि भावार्थ द्विजदेवांसी । श्रद्धा त्यापाशीं समूळ नांदे ॥ ६५ ॥
जो गुरूच्या वाक्यावर विश्वास ठेवणरा असतो, जो त्यालाच सर्वस्वी अंतर्बाह्य विकलेला असतो, त्याचीच देवब्राह्मणांच्या ठिकाणी भक्ति जडते, आणि त्याच्यापाशी पूर्ण श्रद्धा नांदत असते ६५.

नरदेहीं लाभे परब्रह्म । तदर्थ न करूनि सत्कर्म ।
विषयार्थ करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिंद्य ॥ ६६ ॥
नरदेहामध्येच परब्रह्माची प्राप्ति होते. असे असतां त्याकरितां जो सत्कर्म करीत नाही, विषयाकरितांच धर्म-अधर्म काय पाहिजे ते आचरण करतो, ती त्याची कृति अत्यंत निंद्य व लाजिरवाणी होय ६६.

जेणें दुःखी होईजे आपणें । तें पुढिलासी नाहीं करणें ।
दुःख नेदूनि सुख देणें । हे दया म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥ ६७ ॥
जेणेकरून आपण दुःखी होतों ते दुसऱ्यास न करणे, दुःख न देतां सुखच देणे, हीच दया मी श्रीकृष्णाने वंद्य मानिली आहे ६७.

पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्रीं देणें सुख ।
हेचि दया पारमार्थिक । दुसरेनि देख यालागीं सांगे ॥ ६८ ॥
दुसऱ्याला दुःख न देऊन स्वतः सर्व प्राण्यांना सुख द्यावयाचे, ही पारमार्थिक दया होय. म्हणूनच ही दुसऱ्यांदा सांगितली ६८.

खातां नाबदेपुढें पेंड जैसी । तैसें गौण देखोनि विषयांसी ।
जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी बोलिजे ॥ ६९ ।
ज्याप्रमाणे साखर खात असतां त्यापुढे पेंड खाल्ली तर वाईट लागते, त्याप्रमाणे विषयांना गौण समजून जो ब्रह्मानंदात निमग्न झाला, त्याच्या त्या वृत्तीलाच आत्मनिवृति असे म्हणतात ६९.

रंक बैसल्या पालखीसी । उपेक्षी पूर्वील सुडक्यासी ।
तेवीं उपेक्षूनि विषयांसी । जो ब्रह्मसुखासी पकडला ॥ ७० ॥
एखादा भिकारी पालखीत बसला असतां तो पूर्वीची आपली फाटकी वस्त्रे उपेक्षेनें फेकून देतो, त्याप्रमाणे विषयांची उपेक्षा करून जो ब्रह्मसुखालाच लांचावतो ७०;

कणाची वाढी भुसापाशीं । कण निडारे भुसेंसीं ।
तो कण यावया हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥ ७१ ॥
दाण्याची वाढ भुसापाशी असते, आणि भुसासहवर्तमानच कण पुष्ट होत असतो, पण तोच दाणा हाती येण्यासाठी भुसाला पाखडून टाकतात ७१,

तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा पांगडा पडे ।
तें ब्रह्मसुख जैं हाता चढे । तैं देहींचें नावडे विषयभूस ॥ ७२ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मसुखासारखाच देहाचाही मोह पडतो, पण तेंच ब्रह्मसुख जेव्हां हाती येते, तेव्हां देहाचे विषयरूपी भूस आवडत नाहींसें होते ७२.

तेवीं सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखीं सुखप्राप्ती ।
याचि नांव स्वनिवृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७३ ॥
त्याप्रमाणे विषयाची प्रीति सोडून देऊन ज्याला ब्रह्मसुखांत सुखप्राप्ति होते, त्यालाच उद्धवा ! खरोखर ‘आत्मनिवृति’ असें नांव आहे ७३.

या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्त्वमूर्ती ।
शोधितसत्त्वाची सत्त्ववृत्ती । ‘आदि’ शब्दें श्रीपती सांगत ॥ ७४ ॥
या पंधरा लक्षणांची स्थिति ज्याच्या ठिकाणी असते, तोच शुद्ध सत्वाची मूर्ति होय. आता ‘ आदि’ शब्दानें शोधितसत्त्वाची सत्त्ववृत्तीही श्रीकृष्ण सांगतो ७४.

सर्व भूतीं अकृत्रिमता । देखे भगवद्भावें तत्त्वतां ।
या नांव शोधितसत्त्वता । गुणावस्थाछेदक ॥ ७५ ॥
सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताची भावना धरून निष्कपटबुद्धि ठेवणे ह्याचेच नांव सर्व गुणांची अवस्था छेदन करणारा शुद्ध सात्त्विकपणा होय ७५.

ऐशियापरी सत्त्वगुण । सात्त्विकापासीं वर्ते पूर्ण ।
आतां रजाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ७६ ॥
अशा रीतीने सात्विकापाशी सत्वगुण पूर्णपणाने राहात असतो. आता रजाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहे ७६.

काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीर्भिदा सुखम् ।
मदोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥ ३ ॥
[श्लोक ३] इच्छा, प्रयत्‍न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषययोग, युद्ध इत्यादीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणे इत्यादी रजोगुणाच्या वृत्ती होत. (३)

काम म्हणीजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू ।
तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामासोसू पैं वाढे ॥ ७७ ॥
काम म्हणजे विषयांचा हव्यास. ज्याप्रमाणे काष्ठादिकांनी अग्नि वाढतो. त्याप्रमाणे कामाची इच्छा पुरवितां पुरवितां कामाचा हव्यासही वाढतच जातो ७७.

या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण ।
झाले विद्योचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥ ७८ ॥
ह्याचें नांव काम होय. कामाची जी क्रिया, तीच पूर्ण ईहा होय. संपादिलेल्या विद्येचा अतिशय गर्व वाटणे याचंच नांव मदाचे लक्षण होय ७८.

झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती ।
चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥ ७९ ॥
अर्थप्राप्ति झाली असतांही वासनेची तृप्ति होत नाही. अशी जी नेहमी वाढत वाढत जाणारी आसक्ति, ह्याचेच नांव खरोखर तृष्णा होय ७९.

अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा ।
या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८० ॥
उद्धवा ! अत्यंत गर्वाने जो ताठा प्राप्त होतो, कोणी डोळ्यांसमोर दिसू देत नाही, याचंच नांव खरोखर ‘स्तंभावस्था’ होय ८०.

अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें ।
प्रापंचिक सुख मागणें । आशा म्हणणें य नांव ॥ ८१ ॥
पैसा मिळविण्याकरिता इष्ट देवतेची प्रार्थना करणे, आणि तिच्याजवळ प्रापंचिक सुख मागणे, ह्याचें नांव आशा असे म्हणावे ८१.

भिदा म्हणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान ।
माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नांव ॥ ८२ ॥
भिदा म्हणजे भेद. प्रपंचाचे भान स्फुरणे, व ‘हे माझे व हे तुझे’ इत्यादि जें प्रापंचिक भाषण त्याचे नांव भिदा होय ८२.

राजससुखाचा नवलभाग । विषयसुखभोग जो साङ्ग ।
तेंचि सुख मानिंती चांग । सुखप्रयोग या नांव ॥ ८३ ॥
राजस सुखाचा एक मोठा चमत्कार आहे. तो हा की, विषयसुखाचे जे सर्व भोग, तेच उत्तम सुख असे मानतात. ह्याचे नांव सुखप्रयोग ८३.

रणीं उत्साह शूरासी । कां पुत्रोत्साह नरासी ।
विवाहोत्साह सुहृदांसी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥ ८४ ॥
शूराला युद्धामध्ये वीरश्री चढणें, किंवा सामान्य पुरुषाला पुत्रप्राप्तीमुळे उत्साह येणे, किंवा नातेवाइकांतील विवाहसमारंभामुळे आप्तइष्टांना उत्साह वाटणे, त्याला ‘महोत्साह’ असे म्हणतात ८४.

शास्त्रविवादीं जयो घेणें । कां युद्धीं शूर पराभवणें ।
तेणें ख्याति वाढविणें । यश मिरवणें या नांव ॥ ८५ ॥
शास्त्रवादात जय मिळविणे, किंवा युद्धात शूराचा पराभव करणे, आणि त्यामुळे नावलौकिक पसरणे, ह्यालाच यश असें नांव द्यावे ८५.

बंदिजनांहातीं कीर्ती । स्वयें वाखाणवी दिगंतीं ।
या नांव यशःप्रीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥
उद्धवा ! भाटाकडून आपली कीर्ती आपण स्वतःच दिगंती वाखाणवून घ्यावयाची, ह्याचें नांव खरोखर यशःप्रीति होय ८६.

ऐकोनि वचनोक्ति छंदोबद्ध । उपहासीं अतिविनोद ।
तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥ ८७ ॥
उद्धवा ! कविताबद्ध भाषण ऐकून, किंवा उपहासाने अत्यंत विनोद चाललेला पाहुन राजसाला मोठे हसू येते,हें ‘हास्य’ प्रसिद्धच आहे ८७.

वीर्य म्हणीजे केवळ । बळाढ्यता अतिप्रबळ ।
दाखवणें शारीरबळ । या नांव शीळ वीर्याचें ॥ ८८ ॥
वीर्य म्हणजे अत्यंत प्रबळ सामर्थ्य-शारीरबळ दाखविणे ह्याचे नांव वीर्यशालीपणा होय ८८.

राजबळें उद्यमव्यवहार । आंगदटा जो व्यापार ।
न्याय सांडूनि स्वार्थ फार । बलोद्यमप्रकार या नांव ॥ ८९ ॥
राजाच्या बळावर उदीम-व्यापार करणें , शिरजोरपणाचा जो व्यवहार तो करणे, न्याय सोडून फार स्वार्थ साधणे, ह्याचे नांव ‘बलोद्यम’ म्हणजे शिरजोरपणा होय ८९.

हीं पंधराही लक्षणें । ज्यापें नांदती संपूर्णें ।
तो राजस वोळखणें जीवेंप्राणें निश्चित ॥ ९० ॥
ही पंधराही लक्षणें ज्याच्यापाशी पूर्णपणाने वास करतात, तो खरोखर जीवाभावाने राजस म्हणून ओळखावें ९०.

केवळ अविवेकसंपत्ती । तामसाची तमोवृत्ती ।
सोळा लक्षणें त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ९१ ॥
केवळ अविचाराचीच संपत्ति अशी तामसाची तमोवृत्ति होय. सोळा लक्षणांनी त्याची स्थिति तुला सांगतो, ऐक ९१.

क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याञ्चा दम्भः क्लमः कलिः ।
शोकमोहौ विषादार्ती । निद्राऽऽशाभीरनुद्यमः ॥ ४ ॥
[श्लोक ४] क्रोध, लोभ, मिथ्या भाषण, हिंसा, याचना, पाखंड, श्रम, भांडण, शोक, मोह, विषाद, दीनता, निद्रा, आशा, भय आळस इत्यादी तमोगुणीच्या वृत्ती होत. (४)

क्रोध कामाची पूर्णावस्था । लोभ म्हणीजे अतिकृपणता ।
अनृत म्हणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ॥ ९२ ॥
क्रोध म्हणजे कामाची परिपूर्ण वाढ झालेली स्थिति. लोभ म्हणजे अत्यंत कृपणपणा. अनृत म्हणजे खोटें भाषण. हिंसा म्हणजे खरोखर दुसऱ्याला पीडा देणे ९२.

याञ्चा म्हणीजे लोलंगता । दंभ म्हणिजे अतिमान्यता ।
क्लमनामें अतिआयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥ ९३ ॥
याच्चा म्हणजे हांजी हांजी करणे. दंभ म्हणजे अतिमान्यता मिळविण्यासाठी केलेले ढोंग, क्लम म्हणजे अत्यंत परिश्रमांनी आलेला थकवा. आणि विनाकारण तंटा बखेडा करणे याचे नांव कलि ९३.

शोक म्हणिजे हाहाकारू । मोह म्हणिजे भ्रमाचा पूरू ।
विषाद म्हणीजे दुःखसंचारू । अभ्यंतरू जेणें पोळे ॥ ९४ ॥
शोक म्हणजे हाहा:कार. मोह म्हणजे भ्रमाचा पूर. विषाद म्हणजे जेणेकरून अंत:करणाला चटका बसेल असा दुःखाचा संचार ९४.

आर्ति म्हणिजे अतिसंताप । निंदा म्हणिजे असदारोप ।
आशा म्हणिजे अतिलोलुप्य । महाभयकंप भीशब्दीं ॥ ९५ ॥
आर्ति म्हणजे अत्यंत संताप. निंदा म्हणजे खोटे आरोप करणे. आशा म्हणजे अतिशय लोभिष्टपणा. भी म्हणजे भयाने अंगाचा अत्यंत थरकाप होणे ९५.

ऐक निद्रेचें निजवर्म । जें आळसाचें निजधाम ।
जाड्यता सोलींव परम । ते निद्रा निःसीम तामसी ॥ ९६ ॥
आतां निद्रेतील वर्म ऐक . जे आळसाचे माहेरघर, आणि जी अत्यंत मोठी अस्सल सुस्ती, तीच अमर्याद तामसी निद्रा होय ९६.

सांडूनियां सर्व कर्म । स्तब्धता राहे परम ।
या नांव अनुद्यम । सुखावलें तम ठायीं वसे ॥ ९७ ॥
सर्व उद्योग सोडून अत्यंत सुस्ती असणे ह्याचे नांव ‘अनुद्यम’ (निरुद्योगीपणा) होय. यामध्येच तम सुखाने राहाते ९७.

या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अंगीं बाणती सकळा ।
तो तमोरात्रींची चंद्रकळा । अविवेक आंधळा तामसू ॥ ९८ ॥
या तमोगुणाच्या सोळा कळा आहेत. त्या ज्याच्या अंगांत बाणलेल्या असतात, तोच तमोगुणरूप रात्रीतला (अमावास्येचा) चंद्र होय. तो तामस मनुष्य अविचाराने आंधळा झालेला असतो ९८.

सत्त्वरजतमोगुण । यांचे ओळखीलागीं जाण ।
केलें भिन्नभिन्न निरूपण । अतां मिश्रलक्षण तें ऐक ॥ ९९ ॥
सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांची ओळख होण्यासाठी त्यांचे निरनिराळे वर्णन केले. आता त्यांचे जें मिश्र लक्षण तें ऐक ९९.

सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वशः ।
वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो शृणु ॥ ५ ॥
[श्लोक ५] अशाप्रकारे मी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या बहुतेक वृत्तींचे वर्णन केले आता त्यांच्या मिश्रणाने ज्या वृत्ती निर्माण होतात, त्यांचे वर्णन ऐक. (५)

सांगीतली त्रिगुणस्थिती । त्या एकएकाच्या अनंत वृत्ती ।
त्याही अनंतप्राय होती । जीवासी गुणगुंती येथेंचि पडे ॥ १०० ॥
तीन गुणांची स्थिति तुला सांगितली. त्या एकाएकाच्या अनंत वृत्ति आहेत. त्याही अनंत प्रकारच्या होतात. त्यामुळेच येथ जीवाला गुणाच्या गुंत्यांत पडावे लागते १००.

मस्तकीं केश चिकटले होती । ते ज्याचे त्या नुगवती ।
तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहातीं उगवेना ॥ १ ॥
स्त्रियांच्या मस्तकावर केस एकमेकांत मिसळून गेलेले असले, तर ते काही जिचे तिलाच सोडवावयाला येत नाहीत, त्याप्रमाणेच ही त्रिगुणांची गुंतागुंतही जीवाच्या हाताने सुटत नाही १.

मिळोनि सख्या मायबहिणी । हातीं घेऊनि तेल फणी ।
उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥ २ ॥
मैत्रिणी, आई, बहिणी, या एकत्र जमून हातांत तेल व फणी घेऊन त्या चिकटून गुंतलेल्या केसांची गुंतागुंती सोडवितात, त्याप्रमाणेच जीवाला ही त्रिगुणांची वेणी आहे २.

त्रिगुणांची विभागवृत्ती । जीवसामर्थ्यें जरी होती ।
तरी शुद्धसत्त्वी करूनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशता ॥ ३ ॥
त्रिगुणांचे विभाग जीवाच्याच सामर्थ्याने जर झाले असते, तर तो जीव शुद्ध सत्त्वांत राहून नंतर गुणातीत अवस्थेत शिरला असता ३.

ऐसा निजगुणांचा उगवो । जीवाचेनि नोहे निर्वाहो ।
यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥ ४ ॥
असा हा आपल्याच गुणांचा उलगडा जीवाला करता येणे शक्य नाही. म्हणूनच अहो ! असे पहा की, जे भाग्यवान् आहेत ते गुरुचरणांवरच एकनिष्ठ भाव ठेवितात ४.

जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यांसी सद्गुरु सखी जननी ।
विवेक-वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥ ५ ॥
जे जगामध्ये भाग्याने भाग्यवान झालेले असतात, ज्यांना सद्गुरु हीच सख्खी आई असते, ते सद्गुरु विवेक वैराग्याची फणी घेऊन त्यांची त्रिगुणांची वेणी सोडवितात ५.

ज्यांची उगविली गुणगुंती । पुढती गुंती पडे मागुती ।
यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासीं ॥ ६ ॥
ज्यांची गुणांची गुंतागुंत एकदा सोडविली गेली, ती तशी पुन्हा पुढे कदाचित होईल, म्हणूनच ते महामति मुळासह गुण मुंडून त्यांना संन्यासी बनवितात ६.

एकाची नवलगती । उद्धट वैराग्याची स्थिती ।
गुंती उगवाया न रिघते । मुळींचि मुंडिती समूळ ॥ ७ ॥
कित्येकांचा आणखी चमत्कार असतो. त्यांच्या वैराग्याची स्थिति फारच कडक असते. ते गुंतागुंत सोडवावयाच्या भरीसच पडत नाहीत. तें मूळासकटच पूर्णपणे मुंडण करतात ७.

विवेकफणीचेनि मेळें । ओढितां वैराग्य बळें ।
जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥ ८ ॥
विवेकरूपी फणी वैराग्यबळाने ओढू लागले असतां जे भावबळाने अशक्त असतात, ते मध्येच उठून पळून जातात ८.

अशक्तें पळतां देखोनि दूरी । एकें पळालीं मोह‍अंधारीं ।
एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥ ९ ॥
अशा प्रकारचे दुर्बळ असलेले लोक दूर पळून जाताना पाहिले, म्हणजे दुसरे कितीएकजण मोहरूप अंधारांतच धाव घेतात. कोणी केसांची ही गुंतागुंत मस्तकावर तशीच ठेवून त्या गुंतीमध्येच अडकून राहातात ९.

एकें अत्यंत करंटीं । नव्हेचि गुरुमाउलीसी भेटी ।
ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥ ११० ॥
कोणी अगदीच कपाळकरंटे असतात, त्यांना गुरुमाउलीची कधी भेटच होत नाही. अशी संसारामध्ये पोरटी पोरें त्रिगुणांपासून उद्भवणारी कोटीच्या कोटी दुःखें भोगीत असतात ११०.

द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता ।
मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥ ११ ॥
दोन परार्ध वर्षे आयुष्य असणारा जो ब्रह्मदेव, त्याच्यानेसुद्धा गुणांचे विभाग होत नाहीत. मग गुणांची खरोखर निवड करावयाला इतरांना सामर्थ्य कसे असणार? ११.

ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती ।
यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्लोकार्थीं बोलिला ॥ १२ ॥
अशा ज्या त्रिगुणांच्या वृत्ति आहेत, त्या मलासुद्धा पूर्णपणे वर्णन करता येत नाहीत, म्हणून तसा ध्वनितार्थ निघण्यासारखे शब्द असलेल्या श्लोकार्थानं देवाने सांगितले १२.

मागिल्या तीं श्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती ।
त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥ १३ ॥
मागच्या तीन श्लोकांच्या अर्थामध्ये तीन गुणांच्या अवस्था सांगितल्या. आता त्याच त्रिगुणांची मिश्रित स्थिति, जिला सन्निपातवृत्ति असे म्हणतात, ती ऐका १३.

सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः ।
व्यवहार संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥ ६ ॥
[श्लोक ६] उद्धवा ! तीन गुणांच्या मिश्रणानेच “मी” आणि “माझे” या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते मन, शब्दादी विषय, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने वृत्तींचा वव्यहार होतो. (६)

गुणसन्निपातप्रकारू । एकचि जो कां अहंकारू ।
तो गुणसंगे त्रिप्रकारू । ऐक विचारू तयाचा ॥ १४ ॥
गुणसन्निपाताचा प्रकार असा की, एकच असणारा जो अहंकार, तो गुणांच्या संगतीने तीन प्रकारचा होतो. त्याचाही विचार ऐक १४.

वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य ।
मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्त्विक ॥ १५ ॥
वर्णाश्रमाला विहित असाच व्यवहार करणे, वेदाज्ञा अवश्य पालन करणे, आणि मीच ज्ञानस्वरूप आत्मा आहे असे मानणे, हा अहंकार सात्त्विक होय १५.

मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता ।
मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥ १६ ॥
मी स्वधर्मकर्मे करणारा, मी स्वर्गादि सुखं भोगणारा, मलाच नानाप्रकारचे सुखविलास प्राप्त होतात, असे समजणे ह्याचे नांव राजस अहंता होय १६.

मी देहधारी सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसंहार ।
मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥ १७ ॥
मी देहधारी मोठा योद्धा, मीच शत्रूचा संहार करणारा, मी सर्वात अजिंक्य, असे समजणे हा तामस अहंकार होय १७.

गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरूपें स्फुरण ।
तेचि अर्थींचें निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ १८ ॥
(एकच अहंकार गुणानुसार जसा तीन प्रकारचा झाला, त्याप्रमाणे) ममता ही गुणानुरूप तीन प्रकारच्या स्वरूपांनी सुरत असते. त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात १८.

माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूतीं हृदयस्थ ।
भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्त्वाची ॥ १९ ॥
‘माझ्या हृदयामध्ये जो भगवान् आहे, तोच सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये आहे. सर्व प्राणिमात्र माझेच आहेत’ असे समजणे हीच शुद्ध सात्विक गुणाची ममता होय १९.

भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहृज्जन ।
ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥ १२० ॥
उद्धवा ! जे भक्त, संत, साधु, सज्जन आहेत, तेच माझे आप्त इष्ट, अशी जी पूर्ण ममता, ती सात्विक ममता होय असे समज १२०.

जीवाहून परती । सद्गुरुचरणीं अतिप्रीती ।
ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्त्विक ॥ २१ ॥
जिवाहून अधिक प्रेम सद्गुरुचरणांवर ठेवणे असा जो ममतेचा प्रकार आहे, तोही खरोखर सात्त्विकच होय २१.

ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता ।
देवीं धर्मीं पूर्ण ममता । ते जाण सात्त्विकता सत्त्वस्थ ॥ २२ ॥
ज्या देवाची उपासना असेल त्याप्रमाणे शैवी किंवा वैष्णवी दीक्षा घेणे, किंवा देवधर्मावर परिपूर्ण ममता ठेवणे, हीही सात्त्विक ममताच होय २२.

शैवी वैष्णवी धर्मममता । दंभरहित निष्कामता ।
ते ते सात्त्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥ २३ ॥
शैवी किंवा वैष्णवी धर्मावर ढोंग न करतां निरिच्छ ममता ठेवणे, ती सात्त्विक ममता होय. आतां राजसाची स्थिति ऐक २३.

निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक ।
लौकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥ २४ ॥
निवृत्तिमार्ग हा खोटा असे समजावयाचें, लौकिक भाग असेल तेवढाच खरा मानावयाचा, लौकिकांत मानसन्मानाची इच्छा धरावयाची, अशी जी ममता ती खरोखर राजसी होय २४.

प्रवृत्तिशास्त्रीं आवडी । लौकिकाची अतिगोडी ।
नामरूपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥ २५ ॥
प्रपंचामध्ये आवड असणे, लौकिकाची अत्यंत गोडी असणे, नामरूपांची ध्वजा फडकाविणे, ही खरी राजस ममता होय २५.

स्त्रीपुत्रें माझीं आवश्यक । शरीरसंबंधी आप्त लोक ।
द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥ २६ ॥
बायकामुले ही अवश्य माझीच आहेत, शरीरसंबंधी आप्तइष्ट सोयरेधायरे सर्व माझे आहेत, असे समजणें, द्रव्याचा मोठा लोभ धरणे, अशी बुद्धि राजस म्हणून ओळखावी २६.

ज्या देवाची करितां भक्ती । नाम रूप जोडे संपत्ती ।
तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥ २७ ॥
ज्या दैवतांची भक्ति करतांना नावलौकिक होईल, संपत्ति मिळेळ, ती ती दैवते आवडतात अशी ममता खरोखर राजस होय २७.

काम्य कर्मीं आवडी देख । आप्त मानी सकामकर्मक ।
सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥ २८ ॥
काम्यकामध्ये आवड धरणे, सकाम कमैं करणारे असतील ते आप्त असे समजणे, स्वर्गादि विषयसुख हेंच खरे असें मानणे, ही ममता खरोखर राजस होय २८.

हे रजोगुणाची ममता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां ।
तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥ २९ ॥
ही रजोगुणाची ममता तुला मी यथातथ्य रीतीने सांगितली. आतां तमोगुणाचे जे स्वरूप, त्याची व्यवस्थाही सांगतों ऐक २९.

आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी ।
त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥ १३० ॥
जो आपल्या देहाचा अपमान करितो, किंवा जो पूर्वीच्या वाडवडिलांचा द्वेष करतो, त्यांच्या मुलाबाळांशी वैर परतो, ती त्याची निष्ठुर बुद्धि तामस होय १३०.

पुढे लेंकुरांचे लेंकुरीं । वृत्तिभूमि जीविकेवरी ।
आडवा ये‍ईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥ ३१ ॥
पुढे नातवंडे पणतवंडे आपली वतनवाडी सांभाळून उपजीविका चालवतील त्यांना जो भाऊबंद आड येणे शक्य आहे त्याच्याबरोबर तामस वैर घरतो ३१,

ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दळीन संसारी ।
यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥ ३२ ॥
असे पूर्वापर आपले शत्रु मी संसारामध्ये ठार मारीन म्हणून जारणमारणादि अभिचारकर्मामध्ये शिरतो, ती त्याची ममता खरोखर तामसी होय ३२.

अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन ।
शाकिनीडाकिनीउपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥ ३३ ॥
जे अभिचारकर्माचे मैत्र जाणणारे असतात, तेच आपले आप्त व मोठे जिवलग समजतो, आणि शाकिनी, डाकिनी, ह्यांची उपासना करतो, ही पूर्णपणे तामसी ममता होय ३३.

असो बहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणीं अनंत शक्ती ।
हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥ ३४ ॥
हे वर्णन फार झालें . एकेक गुणामध्ये अनंत शक्ति आहेत. तिन्ही गुण जेथे मित्र होतात, त्याला ‘ सन्निपातवृत्ति’ असें नांव आहे ३४.

कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेथ होत ।
तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥ ३५ ॥
कफ, वात आणि पित्त तिन्ही जेथें एकत्र होतात, तेथें सन्निपात उत्पन होतो. त्याप्रमाणेच येथेही तीन गुणांचा सान्निपात होतो ३५.

संकल्पविकल्पात्मक मन । पंच विषय पंच प्राण ।
दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥ ३६ ॥
संकल्पविकल्पात्मक मन, पंचविषय, पंचप्राण, आणि दशद्रियांचा संपूर्ण व्यवहार यांत तीन गुणांचा सन्निपात होतो ३६.

तेंचि सन्निपातनिरूपण । त्रिगुणांचे मिश्रलक्षण ।
स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥ ३७ ॥
तेच सन्निपाताचे निरूपण म्हणजे तीन गुणांचे मिश्र लक्षण-ज्याला मिश्रगुणसन्निपात म्हणतात तें-श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ३७.

धर्मे चार्थे च कामे च यदासौ परिनिष्ठितः ।
गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥ ७ ॥
[श्लोक ७] जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरूषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, तेव्हा त्याला सत्त्वगुणापासून श्रद्धा, तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होते. हेही गुणांचेच मिश्रण होय. (७)

पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणें स्वधर्म क्षणें काम ।
क्षणें वाढतीं अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥ ३८ ॥
पुरुषाच्या ठिकाणी क्षणांत क्रिया, क्षणांत कर्म, क्षणांत स्वधर्म, क्षणांत काम, क्षणांत द्रव्य मिळविण्याचा उद्योग, अशा भिन्नभिन्न वृत्ति उद्भवणे हाच त्रिगुणांचा सन्निपात होय ३८.

गुणसंक्रमण करी काय । त्रिगुणीं धर्म त्रिविध होय ।
कामही त्रिविध हो‍ऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मकः ॥ ३९ ॥
गुणांचे हे मिश्रण काय करितें तर या तीन गुणांनी धर्म तीन प्रकारचा होतो, काम तीन प्रकारचा होऊन राहतो, आणि अर्थ, स्वार्थ व निर्वाह ही सर्व तीन प्रकारची होतात ३९.

येथ कर्मासी दोष नाहीं । दोष कर्त्याचे बुद्धीच्या ठायीं ।
तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥ १४० ॥
शांत कर्माला दोष नाही. दोष हा कर्त्यांच्या बुद्धीमध्ये असतो. तो जी काही कल्पना करतो, तिचे फळ तो स्वतः भोगितो १४०.

सोनें वंद्य सोनेपणें । त्याचें स्वयें घडविल्या सुणें ।
वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥ ४१ ॥
सोने हे आपल्या सोनेंपणाने सन्माननीय आहे. त्याचेच जर आपण एखादें कुत्रे बनविले, तर त्या वंदनीय सोन्याची विटंबना केल्याप्रमाणे होते. त्याप्रमाणेच स्वकर्म हें गुणबुद्धीने दूषित होते ४१.

भूमि सहजें शुद्ध आहे । जें पेरिजे तें पीक होये ।
तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥ ४२ ॥
भूमि ही मूळचीच शुद्ध आहे. तिच्यात जें पेरावे त्याचे पीक येते. त्याप्रमाणे स्वकर्म हें स्वतः मूळचे शुद्धच आहे, परंतु गुणांच्या वृत्तीप्रमाणे त्याचे फल भोगावे लागते ४२.

वाचा सहज सरळ गोमटी । रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी ।
वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥ ४३ ॥
वाणी स्वभावतः सरळ आणि शुद्ध आहे. तिला रामनामाने ब्रह्मस्वरूप प्राप्त होते. परंतु तिने भलतीच बडबड केली असता ती व्यर्थ जाते. आणि तिने निंदा केली तर त्यामुळे मागाहून महापाप भोगावे लागते ४३.

तेवीं स्वधर्म श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त ।
तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥ ४४ ॥
त्याप्रमाणे श्रद्धायुक्त बुद्धीने स्वधर्माचरण केले, तर ते स्वधर्माचरण मनुष्याला विरक्त करिते, पण त्यांत त्रिगुणांचा सन्निपात झाला तर तीच श्रद्धा छळ करूं लागते. तोही प्रकार ऐक ४४.

स्वधर्मकर्मीं श्रद्धा जोडे । क्षणैकें लागे विरक्तीकडे ।
क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥ ४५ ॥
स्वधर्मकर्मामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, आणि त्यामुळे मनुष्य क्षणैक विरक्तीकडे वळतो. क्षणांत त्याला भोगफळाची आशाही वाढत वाढत जाते, किंवा तो क्षणैक ममतेच्या संधींत सांपडतो ४५.

तैशीच कामाचीही रती । क्षणैक निष्कामीं अतिप्रीती ।
क्षणें स्त्रीभोग‍आसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥ ४६ ॥
कामाचाही प्रकार तसाच आहे. क्षणैक निष्कामतेमध्ये अत्यंत प्रेम असते, क्षणांत स्त्रीभोगाविषयीं आसक्ति उत्पन्न होते, किंवा क्षणांत परस्त्रीच्या ठिकाणीच कामवासना उत्पन्न होते ४६.

याचिपरी धनाची जोडी । क्षणैक द्रव्याशा सोडी ।
क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥ ४७ ॥
याचप्रमाणे द्रव्याचीही गोष्ट आहे. क्षणांत द्रव्याची आशा सोडून देतो, क्षणांत द्रव्याविषयी अत्यंत आवड उत्पन्न होते, किंवा क्षणामध्ये दुसऱ्याचे द्रव्य लुबाडून घेतो ४७.

त्रिविध धर्म त्रिविध कर्म । त्रिविध रूपें धनागम ।
या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥ ४८ ॥
धर्म तीन प्रकारचे, कर्म तीन प्रकारचे, आणि द्रव्यं मिळविण्यामध्ये तीन भेद आहेत. या गुणवृत्तीच्या भेदांमुळे लोक स्वधर्म सोडून अकर्म करीत असतात (धर्म सात्त्विक, अर्थ तामस, आणि काम राजस होय. श्रद्धा, रति व द्रव्य ही त्यांची अनुक्रमाने फळे आहेत. मनुष्य धर्म-अर्थ-काम या तिहींमध्ये आसक्त होतो हें सन्निपाताचे कार्य समजावें ) ४८.

एवं धर्म‍अर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत ।
फोडूनि सांगतां येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥ ४९ ॥
मशा प्रकारें धर्म, भयं व काम झांमध्ये अनंत गुणांचे संनिपात आहेत. ते सर्वच जर येथे फोडून सांगू लागलों, तर ग्रंथाचा विस्तार अतिशय वाढेल ४९.

यालागीं गुणसन्निपात । सांगीतला संकलित ।
तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥ १५० ॥
म्हणून हा त्रिगुणांचा सन्निपात संक्षेपाने सांगितला. श्रीकृष्णही पुन्हा त्याच अर्थाचें निरूपण संक्षेपानेच सांगत आहेत १५०.

प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहाश्रमे ।
स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥ ८ ॥
[श्लोक ८] जेव्हा माणूस सकाम कामात किंवा गृहस्थाश्रमात किंवा स्वधर्मापालनात निष्ठा ठेवून ती ती कामे करतो, त्यावेळी सुद्धा त्याचे ठिकाणी तिन्ही गुणांचे मिश्रण आहे, असे समजावे. (८)

पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम ।
तेथ नित्यनैमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥ ५१ ॥
पुरुषाला जो गृहस्थाश्रम आहे, तो केवळ कामच आहे असे समजावें. त्यांत चित्तशुद्धीसाठी नित्यनैमित्तिक कर्मे करणे हाच स्वधर्म होय ५१.

गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान ।
गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण हा हेतू ॥ ५२ ॥
गृहस्थाच्या घरांत दळणे, कांडणे, चूल पेटविणे, पाणी भरणे व झाडणे ह्या क्रिया करतांना जाणतेपणाने किंवा अजाणतेपणानें जीवहिंसा घडतात, तेच पंचसूना दोष होत. गृहस्थाश्रमाने हे पंचसूना दोष घडतात, म्हणून त्यांत तमोगुणच मुख्य असतो. आणि घरामध्ये गृहस्थ स्त्रीसुखाचा उपभोग घेतो, म्हणून त्यांत रजोगुण आहे ५२.

नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म ।
हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्त्व सुगम या हेतू ॥ ५३ ॥
नित्य नैमित्तिक कर्म करणे आणि स्वधर्म पाळणे, हेच गृहस्थाचे मुख्य कर्तव्य होय. हेंच चित्तशुद्धीचे रहस्य आहे, म्हणून गृहस्थाश्रमामध्ये सत्त्वगुणही सुलभ आहे ५३.

गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण ।
गुणीं गुणवंत करून । कर्माचरण करविती ॥ ५४ ॥
गृहस्थाश्रमाची जी प्रवृत्ति आहे, ती नेहमी या तीन गुणांनी मिश्रित आहे. त्या गुणांनींच त्याला गुणयुक्त केले असून ते त्याच्याकडून कर्माचरण करवितात ५४.

न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे ।
तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मीं ॥ ५५ ॥
कोणत्याच रंगानें न रंगतांही स्फटिक त्या रंगासारखा भासू लागतो, त्याप्रमाणेच गुणांच्या संगतीने गुणात्मक आत्माही गुणकर्मामध्ये वागू लागतो ५५.

जेवीं कां कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण ।
तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे कसोटी आपण होऊन सोन्याचा वर्ण स्पष्टपणे दाखविते, त्याप्रमाणे पुण्याची क्रियाही गुणलक्षणाचे विभाग दाखविते ५६.

पुरुषं सत्त्वसंयुक्तमनुमीयाच्छमादिभिः ।
कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥ ९ ॥
[श्लोक ९] माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्त्वगुण, कामादी प्रवृत्तींवरून रजोगुण आणि कामक्रोध इत्यादींवरून तमोगुण प्रबल आहे, असे समजावे. (९)

इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमीं सदा क्रीडत ।
शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्त्विक ॥ ५७ ॥
जो योग्य प्रकारे इंद्रियनिग्रह करतो, जो शमदमांत निरंतर खेळत असतो, ज्याच्या अंत:करणांत शांति राहते, तोच खरोखर सात्त्विक आहे असे समज ५७.

जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख ।
द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥ ५८ ॥
जो सदोदित फलेच्छेने लोभी बनलेला असतो, संसारभोगांतील सुखाची इच्छा करतो, द्रव्यासाठी पाहिजे ते ढोंग करितो, तो मनुष्य रजोगुणी होय, हे लक्षात ठेव ५८.

ज्यासी स्वधर्मीं नाहीं रती । आवडे अधर्मप्रवृत्ती ।
क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितें तामसू ॥ ५९ ॥
स्वधर्मामध्ये ज्याला प्रेम वाटत नाही, अधर्मप्रवृत्तीच आवडते, क्रोधाने आणि लोभाने ज्याची स्फूर्ति गिळूनच टाकलेली असते, तो खरोखर तामस होय असे समज ५९.

एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुषलक्षण ।
या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥ १६० ॥
अशा प्रकारे पुरुषाचे कर्माचरण पाहून त्याचे लक्षण ओळखावें. ह्याचे नांव अनुमान. विचारशील पुरुष हे जाणतात १६०.

सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतलें निरूपण ।
हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥ ६१ ॥
सामान्यतः या तिन्ही गुणांचे निरूपण सांगितले. पण हेही कळत नाही असें मनाला वाटत असेल, तर त्याच गुणांच्या भिन्नभिन्न वृत्तीही श्रवण कर ६१.

यदा भजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः ।
तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥ १० ॥
[श्लोक १० ] पुरूष असो की स्त्री, जेव्हा निष्काम भावनेने आपल्या नित्यनैमित्तिक कर्मांनी माझी आराधना करते, तेव्हा ती व्यक्ती सत्त्वगुणी समजावी. (१०)

स्वकर्मीं वांछित फळ । तेचि मायेचें दृढ पडळ ।
ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥ ६२ ॥
आपण स्वकर्म आचरीत असतां त्यांत फळाची इच्छा धरणे हेच मायेचे मोठे पटल होय. पण ती फळाची आशा निखालस सोडून देऊन जे मत्स्वरूप होऊन माझ्याच भजनांत निमग्न असतात ६२,

करूनि फळाशेचें शून्य । स्वधर्में करिती माझें भजन ।
पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्त्वसंपन्न निश्चित ॥ ६३ ॥
फळाच्या आशेचे शून्य करून स्वधर्मानेच माझे भजन करतात, मग ते पुरुष असोत किंवा स्त्रिया असोत-ते खरोखर सत्त्वगुणसंपन्न जाणावे ६३.

देहावयवलिंगदर्शन । तेणें स्त्रीपुरुषनामाभिधान ।
परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्व समान स्त्रीपुरुषीं ॥ ६४ ॥
देहाच्या अवयवांचे जे स्वरूप दिसतें त्यावरून स्त्री किंवा पुरुष हे नाव प्राप्त होत असते. परंतु त्या स्त्रीपुरुषांमध्ये आत्मी व आत्मा असा भेद असत नाही. त्यांच्यात जीवभाव सारखाच असतो ६४.

चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण ।
तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥ ६५ ॥
एकाग्र चित्तवृत्ति ठेवून जे क्रियेचे आचरण होते, त्याचे नांव कर्म. त्यांत निरपेक्ष रीतीनें जें माझें भजन करणे, तोच संपूर्ण स्वधर्म होय ६५.

ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रगटे माझी भक्ती ।
ते ते सात्त्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६६ ॥ आशंका ॥
उद्धवा! अशा स्वधर्मवृत्तीनें जेथे माझी भक्ति प्रगट होते, ती ती खरोखर सात्त्विक वृत्ति होय हे लक्षात ठेव ६६.

कर्म करितां फळाशा वाढे । तो फळभोग भोगणें पडे ।
स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥ ६७ ॥
येथे अशी आशंका येते की, कर्म करतांना फलाची आशाच जर वाढत गेली, तर त्या फलाचा भोग भोगावा लागतो. मग अशा स्वकर्मानें भक्ति कशी घडणार ? अर्थात् ते कर्म अत्यंत वाईट होय ६७.

कर्म करितां फळ बाधक । न करितां प्रत्यवाय नरक ।
कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥ ६८ ॥
कर्म केले असता त्याचे फळ बाधक होते, आणि तें न केले तर प्रत्यवायप्राप्तीने नरक भोगावा लागतो. अशा रीतीने ह्या संसारामध्ये कर्मानेच लोक बद्ध केले आहेत ६८.

जीव होता जो स्वतंत्र । तो कर्में केला परतंत्र ।
एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥ ६९ ॥
जो जीव स्वतंत्र होता, तो कर्मानेंच परतंत्र केला. इतकें ह्या कर्माचे चरित्र अत्यंत विचित्र असून बाधक आहे ६९.

स्वकर्में भगवद्भक्ती । म्हणशी घडे कैशा रीतीं ।
तेचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १७० ॥
तेव्हां स्वकर्मानेंच भगवद्भक्ति कशी घडेल ?-असें कदाचित् तूं म्हणशील, तर ह्या शंकेला उत्तर म्हणून श्रीकृष्ण त्याचाच प्रकार स्वतः सांगतात १७०.

सर्प धांवोनि धरिल्या तोंडीं । तो सर्वांगीं घाली आढी ।
तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥ ७१ ॥
जर धावून जाऊन सर्पाचे तोंड धरले तर तो साऱ्या अंगाला विळखे घालतो. आणि त्या विळख्यांच्या भीतीने जर त्याचे तोंड सोडिले, तर तो दंश करून तीव्र विषाने प्राणनाश करितो ७१.

ते सर्पबाधेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी ।
तेवीं कर्मीं कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥ ७२ ॥
असें सर्पदंशाचे संकट ज्याप्रमाणे मंत्रवादी किंवा गारुडी निवारण करतो, त्याप्रमाणे कर्मामध्येच उत्पन्न झालेली कर्माची बाधा गुरुराज तत्काळ नष्ट करतो ७२.

रिघतां सद्गुरूसी शरण । कर्म करावी ब्रह्मार्पण ।
हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ७३ ॥
सद्गुरूला शरण गेले असतां तो सर्व कर्म ब्रह्मार्पण करवितो, आणखी उद्धवा ! निष्काम बुद्धीने भगवत्सेवा करणाऱ्याचे खरे लक्षण हेच आहे असे समज ७३.

ब्रह्म कर्माचें प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक ।
हेंचि मदर्पण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥ ७४ ॥
ब्रह्म हेच कर्माचे प्रकाशक आहे, म्हणून कर्म तितकें सर्व ब्रह्मात्मकच होय. अशी भावना असणे हेच खरोखर मला कर्म अर्पण करणे होय. अशा रीतीने माझें भजन करावें ७४.

सर्वेंद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मींची ब्रह्मशक्ती ।
ऐसोनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥ ७५ ॥
सर्व इंद्रियांमध्ये ज्ञानाची स्फूर्ति होणे ही ब्रह्माची ब्रह्मशक्ति होय. अशा निश्चयाने कर्माचे आचरण करणे ह्याचंच नांव स्वकर्मभक्ति होय ७५.

ऐसेनि स्वकर्में स्वाभाविक । जे मज भजती भाविक ।
ते ते शुद्ध सात्त्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ७६ ॥
अशा प्रकारच्या स्वकर्माने स्वाभाविकपणेच जे जे भाविक मला भजतात. ते ते सर्व लोक, उद्धवा ! शुद्ध सात्त्विक होत असें निःसंशय समज ७६.

स्वधर्म सर्वथा निष्फळ । म्हणती ते मूर्ख केवळ ।
स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥ ७७ ॥
स्वधर्म हा सर्वस्वीं निष्फळ आहे असे जे म्हणतात, ते केवळ मूर्ख लोक होत. स्वधर्म हाच चित्तांतील मळ नाहींसे करितो, आणि सर्व कर्म समूळ नष्ट करतो ७७.

एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी ।
तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥ ७८ ॥
स्वधर्माचा एवढा लाभ होत असतां तो सोडून जी माणसें विषयाच्या गोडीची इच्छा धरतात, ती ती बिचारी राजस होत. ती विषयसुखामध्येच केवळ वेडी झालेली असतात ७८.

विषयफळ वांछितां देख । देह धरणें आवश्यक ।
देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥ ७९ ॥
विषयाच्या फळाची इच्छा ठेवली असतां त्यासाठी देह धारण करणे भाग पडते. आणि देहधारणा हे दुःखदायक असल्यामुळे त्याच्या योगाने स्वर्ग, नरक इत्यादि फळे भोगावी लागतात ७९.

यापरी जनीं दुःखदाती । राजसतमसप्रकृती ।
ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥ १८० ॥
अशा प्रकारे जगामध्ये राजस आणि तामस प्रकृति ह्या दुःखदायकच आहेत. त्यांच्या त्या दोन्ही प्रकारच्या गुणवृत्ति ऐक. तुला स्पष्ट करून सांगतों १८०.

यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः ।
तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम् ॥ ११ ॥
[श्लोक ११] सकाम भावनेने आपल्या कर्मांनी माझे भजनपूजन करणारा रजोगुणी होय आणि जो शत्रुनाश इत्यादीसाठी माझे पूजन करतो, तो तमोगुणी समजावा. (११)

जो कां आचरोनि स्वधर्म । वांछी नाना फळकाम ।
तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥ ८१ ॥
स्वधमाचे आचरण करून जो नाना प्रकारच्या फळांची इच्छा करितो, ते त्याचे कर्म काम्य होय असें समज. त्याला राजस धर्म असें नांव आहे ८१.

जो अभ्यंतरीं अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म ।
ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥ ८२ ॥
अंत:करणामध्ये जो अत्यंत लोभिष्ट असतो, तो जे जे काही कर्मधर्म आचरण करतो, ते ते सर्व लोभिष्टपणाचेच असतात. कारण, त्यांत कर्माचे फळ मिळावे असाच त्याचा हेतु असतो. ८२.

स्वरूपीं काम्य कर्म नाहीं । कामना काम्य करी पाहीं ।
सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥ ८३ ॥
कर्माच्या मूळ स्वरूपांत काम्यत्व मुळीच नसते. कामना ही त्या कर्माला काम्य बनविते. सोनें हें वस्तुतः आपल्या मूळ स्वरूपामध्येच स्थिर असते, पण आपण प्रयत्न करून त्याचे दागिने बनवितो ८३;

स्वकर्म स्वभावें पवित्र जाण । स्वधर्में माझें शुद्ध भजन ।
तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४ ॥
त्याप्रमाणे स्वकर्म हे स्वभावत: पवित्रच आहे. स्वधर्मानं माझें शुद्ध भजन घडते, पण असे असता त्यांत इष्ट फळाची इच्छा धरून आपण स्वतःच त्या स्वकर्मधर्माला काम्य बनवितों ८४.

फळकामें जें माझें यजन । तें केवळ फळाचेंचि भजन ।
सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥ ८५ ॥
फळाच्या इच्छेनें जी माझी उपासना करावयाची, तें माझें भजन नव्हे, तर ते केवळ त्या फळाचेंच भजन होय. अशा प्रकारें जें सकाम स्वधर्माचरण करणे, ती प्रकृति राजस होय असें समज ८५.

ऐस‍ऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो कां पुरुष ।
तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥ ८६ ॥
अशा प्रकारच्या प्रकृतीचा खेळ जेथे जेथे दृष्टीस पडेल, मग ती स्त्री असो की पुरुष असो, ते ते सारे लोक राजस म्हणून समजावे. आतां तामसाची गुणवृत्ति ऐक ८६.

क्रोधयुक्त अंतःकरण । तेणेंसीं ज्याचें स्वधर्माचरण ।
फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥ ८७ ॥
अंतःकरण शोधयुक्त असून त्यानेच त्याचे स्वधर्माचरण होत असते, म्हणून तो आपल्या शत्रूला मरण येण्याच्याच फलाची इच्छा धरतो. ती प्रकृति तामस होय ८७.

जेथें द्वेषें बांधलें घर । जे ठायीं क्रोध अनिवार ।
जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥ ८८ ॥
ज्याच्या ठिकाणी द्वेषाने घर बांधलेले असते, ज्याच्या ठिकाणी अनिवार क्रोध असतो, जो प्राणिमात्राच्या ठिकाणी निष्ठुर असतो, ज्याची प्रकृति सदासर्वदा क्रूर असते ८८,

ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी ।
ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥ ८९ ॥
अशा स्वभावाचा पुरुष असो अथवा स्त्री असो; उद्धवा ! ते ते लोक संसारामध्ये तामस होत हें निश्चयाने ध्यानात ठेव ८९.

जीव स्वरूपें चैतन्य पहा हो । त्यासी ‘मां भज’ कां म्हणे देवो ।
जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥ १९० ॥
अहो ! पहा, ” जीव हा स्वरूपतः ब्रह्मच असतो, तर मग देव त्याला ‘माझी (देवाची) भक्ति कर ‘ असें कां म्हणतो ? जीवालाच सेवकपणा कां आला ? आणि देव हाच सेव्य (ज्याची सेवा करावयाची तो) कसा झाला?” १९०

येच अर्थींचें निरूपण । कृष्ण सांगताहे आपण ।
सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥ ९१ ॥
अशी शंका नष्ट व्हावी म्हणून श्रीकृष्ण त्याच अर्थाचें निरूपण असे करीत आहेत की, असा हा सेव्य-सेवकपणा मायेच्या गुणसंबंधानें उत्पन्न झाला आहे ९१.

सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे ।
चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥ १२ ॥
[श्लोक १२] सत्त्व, रज, तम हे तीन गुण जीवाचे आहेत, माझे परमात्म्याचे नव्हेत. हे प्राण्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात त्यांमध्ये आसक्त झाल्याने जीव संसारबंधनात बांधला जातो. (१२)

बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया ।
तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥ ९२ ॥
छाया ही देहाबरोबर बांधून वश केलेली नसतांही ज्याप्रमाणे देहाच्या आधीन राहाते, त्याप्रमाणे माया ही भगवंताच्या आधीन असून तो तिला स्पर्श न करतांच आपल्याबरोबर वागवीत असतो ९२.

माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां ।
यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥ ९३ ॥
खरोखर मायेला वागविणारा व तिला नाहीशी करणारा प्रभु भगवानच होय. म्हणून वेद त्यालाच सर्वस्वी मायेचा नियंता असे म्हणतो ९३.

सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं ।
तेवीं मायानियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥ ९४ ॥
सूर्य हा अंधाराचा नाश करतो, पण तो अंधार त्याच्यासमोर ज्याप्रमाणे कधीच येत नाही, त्याप्रमाणे मायेचा नियंता जरी श्रीहरि आहे, तरीपण माया ही कांहीं देवाला दिसत नाही ९४.

माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण ।
मजपाशीं माय जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥ ९५ ॥
माझा देखणेपणा तेंच मायेचे मुख्य लक्षण होय. माझ्यापाशीं माया ही गुणाभिमानासह असत नाहीं ९५.

मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण ।
त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥ ९६ ॥
मायेमध्ये प्रतिबिंबित झालेलें जें चैतन्य असते, त्यालाच जीवपणा असे म्हणतात, तीन गुणांनी त्या जीवाला बद्ध करून देहाभिमान दृढ केला आहे ९६.

जीवासी लागतां देहाभिमान । तो झाला मायाधीन ।
मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥ ९७ ॥
जीवाला देहाभिमान चिकटला असता तो मायेच्या आधीन होतो. म्हणून मायेचा नियंता जो मी नारायण, तोच जीवाचाही स्वामी झालों असें समज ९७.

जीव गुणाभिमानें बद्धक । यालागीं झाला तो सेवक ।
आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक जीवाचा ॥ ९८ ॥
जीव हा गुणांच्या अभिमानाने बद्ध झालेला असतो, म्हणून तो सेवक झाला आणि आत्मा हा गुणांपासून अलिप्त अर्थात निर्मळ असल्यामुळे तोच जीवाला जन्ममरणांच्या बंधनांपासून सोडविणारा झाला ९८.

यापरी सेव्यसेवकभावो । विभाग दावोनियां पहा हो ।
त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥ ९९ ॥
अहो ! पहा, ह्याप्रमाणे सेव्यसेवकभावाचे विभाग दाखवून तीन गुणांचा संबंध देव स्वतः स्पष्ट करून सांगत आहे ९९.

गुण तिन्ही समसमान । त्यांमाजीं क्षोभोनियां जाण ।
जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥ २०० ॥
तीन गुण सारखेसारखेच आहेत, परंतु त्यांमध्ये ज्या ज्या गुणांचा क्षोभ होऊन तो अधिक वाढतो, त्याचे स्वरूप श्रीहरि सांगतो २००.

ब्रह्म निर्मळत्वें प्रसिद्ध । कर्म शोधकत्वें अतिशुद्ध ।
येथ कर्मीं उपजे कर्मबाध । तो चित्तसंबंध गुणक्षोभें ॥ १ ॥
ब्रह्म हें पवित्रपणात प्रसिद्धच आहे. कर्मही निर्मळपणाने अत्यंत शुद्धच आहे. असे असतांही कर्मामध्ये जो कर्मबंध उत्पन्न होतो, तो गुणक्षोभाच्या योगाने विकृत झालेल्या चित्ताचा संबंध होय १.

कर्मब्रह्मीं दोष नाहीं । दोष चित्तवृत्तीच्या ठायीं ।
तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥ २ ॥
कर्म आणि ब्रह्म यांत काही दोष नाही. दोष चित्तवृत्तीमध्ये आहे. आणि तोही गुणक्षोभाच्या योगानेंच असतो. तोच पुरुषाला अनर्थात पाडतो २.

येचि अर्थींचें निरूपण । सांगितलें मिश्रलक्षण ।
आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥ ३ ॥
या अर्थाचे निरूपण करून मी गुणांचे मिश्र लक्षण सांगितले. आतां एकेक गुण वाढल्यास त्या गुणाचे स्वरूप कसे असते ते ऐक ३.

जो गुण वाढे अतिउन्नतीं । इतर त्यातळीं वर्तती ।
ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥ ४ ॥
जो गुण अतिशय वाढतो, त्याच्या आज्ञेखाली इतर गुण वागत असतात. त्या काळी पुरुषाची स्थिति कशी असते, ती श्रीहरि उद्धवाला सांगतो ४.

यदेतरौ जयेत्सत्त्वं भास्वरं विशदं शिवम् ।
तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥ १३ ॥
[श्लोक १३] सत्त्वगुण हा प्रकाशदायी, निर्मल आणि शांत आहे. तो जेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरूष सुख, धर्म, ज्ञान इत्यादींनी युक्त होतो. (१३)

समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निराभिमानी ।
जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्त्व ॥ ५ ॥
जो पुरुष फलाची आशा समूळ सोडून निर्विकल्प अशा निरभिमानपणाने स्वधर्माचरण करावयास लागतो, त्याचे ठिकाणी सत्वगुण हा रज व तम या दोहोंनाही जिंकतो ५.

जैं भाग्याचें भरण उघडे । तैं हरिकथाश्रवण घडे ।
मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्त्व वाढे अतिशुद्ध ॥ ६ ॥
जेव्हां भाग्याचे भांडार उघडते, त्या वेळी हरिकथेचे श्रवण घडते, मुखाने हरिनामाची कीर्ति वर्णन करणे आवडते, आणि तेणेंकरून अत्यंत शुद्ध अशा सत्त्वाची वृद्धि होते ६.

कां दैवें जोडिल्या सत्संगती । श्रवणीं श्रवण लांचावती ।
वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥ ७ ॥
किंवा दैवयोगानें सत्संगतीचा लाभ घडला असतां भगवंताचे गुणानुवाद ऐकण्याविषयी कान लोलुप होतात, आणि वाणी अत्यंत प्रेमाने रात्रंदिवस भगवंताची नामकीर्ति वर्णन करण्यांत गढून जाते ७.

ऐस‍ऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षीण होती ।
सत्त्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्यां सत्त्वाची स्थिति समूळ ऐक ॥ ८ ॥
अशा प्रकारच्या आचरणाने रज आणि तम हे दोन्ही गुण क्षीण होतात, व मोठ्या उत्साहाने सत्त्वगुण वाढतो. त्या सत्वाची साद्यन्त स्थिति ऐक ८.

भास्करत्वें प्रकाश बहुळ । विशदत्वें अतिनिर्मळ ।
शिव म्हणीजे शांत सरळ । हें सत्त्वाचें केवळ स्वरूप मुख्य ॥ ९ ॥
तेजोरूपाने पुष्कळ प्रकाशयुक्त, स्वच्छपणाने अत्यंत निर्मळ, शिव म्हणजे शांत आणि सरळ हे सत्त्वाचे केवळ मुख्य स्वरूप होय ९.

हे सत्त्वाची सत्त्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहातीं ।
ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ २१० ॥
ही सत्त्वाची सत्त्ववृत्ति ज्या साधकाच्या हाती लागते, त्या साधक पुरुषाची स्थिति त्या वेळी कशी होते ते सांगतों, ऐक २१०.

तैं विवेकाचें तारूं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे ।
सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥ ११ ॥
त्याला त्या वेळी विवेकाची नौका सांपडते. वैराग्याचे आत्मरहस्य त्याला प्राप्त होते. सर्व इंद्रियांमध्ये प्रकाश पडतो आणि स्वधर्म तर शिखरास पोचतो ११.

ते काळीं जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता ।
बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥ १२ ॥
त्या वेळी लोक त्याला अधर्म, गर्व, अभिमान, खोटपणा इत्यादि बळजबरीने शिकवीत असले, तरी ती अधर्माची कृत्ये तो मुळीच करीत नाही १२.

निकट असतां दुःखसाधन । सात्त्विक सदा सुखसंपन्न ।
बलात्कारें क्षोभवितां मन । सात्त्विक जाण क्षोभेना ॥ १३ ॥
दुःखाचे साधन अगदी जवळ आले असतांनासुद्धा सात्विक वृत्तीचा मनुष्य सदोदित सुखसंपन्नच असतो. सात्विकाचे मन बलात्कारानें क्षोभविलें असताही तो क्षुब्ध होत नाही १३.

ऐशिया निजसत्त्व दृष्टी । सुख सुख येतां भेटी ।
त्यासी स्वानंदें कोंदे सृष्टीं । शुद्ध सत्त्वपुष्टी या नांव ॥ १४ ॥
अशा आत्मतत्त्वाच्या दृष्टीने सुखच सुखाला भेटावयास आले असता त्याला आत्मानंदानेच सर्व सृष्टि भरून गेली आहे असे वाटते. ह्यालाच शुद्ध सत्त्वाची वाढ असें नांव आहे १४.

ऐसें विशद सत्त्व जयांपाशीं । शमदम सेविती तयांसी ।
वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्त्वराशी ते उद्धवा ॥ १५ ॥
असें शुद्ध सत्व ज्याच्यापाशी असते, त्याची सेवा शम आणि दम करितात. वैराग्य त्याच्या पायांशी लागते. उद्धवा! असा सात्त्विक मनुष्य म्हणजे ती शुद्ध सत्वाची रासच होय १५.

तैसेंचि सत्त्व तम जिणोन । जैं वाढे गा रजोगुण ।
तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥ १६ ॥
त्याचप्रमाणे सत्त्व आणि तम ह्यांना जिंकून जेव्हां रजोगुण वाढतो, त्या वेळचें तें राजसाचे लक्षण ऐक. असें म्हणून श्रीहरि सांगू लागला १६.

यदा जयेत्तमः सत्त्वं रज सङ्गं भिदा बलम् ।
तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥ १४ ॥
[श्लोक १४] रजोगुण भेदबुद्धीला कारणीभूत आहे आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा स्वभाव आहे जेव्हा तमोगुण आणि सत्त्वगुण यांच्यावर मात करून रजोगुण वाढतो, तेव्हा मनुष्य दुःख, कर्म, यश आणि आर्थिक संपन्नता यांनी युक्त होतो. (१४)

रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजे ज्ञानाभिमान ।
पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥ १७ ॥
रजोवृद्धीचे कारण हें की, देहामध्ये ज्ञानाभिमान उत्पन्न होतो. असा मनुष्य पावलोपावली दुसऱ्याचे दोष आणि गुण पहात बसतो आणि सन्मानाची व प्रतिष्ठेची इच्छा करितो १७.

नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ती ।
नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥ १८ ॥
रजोगुणाची कीर्ति आश्चर्यकारक आहे. अशा मनुष्याला ज्ञातेपणा असूनही कामासक्ति असते. तो मनामध्ये अनेक प्रकारच्या भोगांची इच्छा धरतो. त्यामुळे रजाची वाढ अनिवार होते १८.

ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्त्वतमांतें तळीं पाडी ।
त्या रजाची स्वरूपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥ १९ ॥
अशा प्रकारें रजोगुणाची वाढ बळावून तो सत्त्व आणि तम यांना जमीनदोस्त करतो. आतां त्या रजाचेही स्वरूप नष्ट करील असा प्रकार तुला सांगतों, ऐक १९.

श्लोकीं त्रैपदीं प्रबळ । रज संगभिदाबळ ।
बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥ २२० ॥
मूळ श्लोकांत रजोगुण हा ‘सई-भिदा-बलम्’ अशा तीन शब्दांत सांगितलेल्या तीन प्रकारांनी प्रबळ होतो, असें केवळ रजोगुणाचे वर्णन केलेले आहे. तेच श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतो २२०.

संग म्हणिजे देहाभिमान । भेद म्हणिजे मीमाझेपण ।
बळ म्हणिजे काम गहन । आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥ २१ ॥
संग म्हणजे देहाभिमान, भेद म्हणजे ‘मी व माझे’ असा भेदभाव. बळ म्हणजे बलवत्तर इच्छा व प्रवृत्तीचा पूर्ण आग्रह २१.

देहाभिमानें दुःख उठी । भेदें भय लागे पाठी ।
त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥ २२ ॥
देहाभिमानाने दुःख उत्पन होते. भेदानें भय पाठीस लागते, आणि असा मनुष्य त्या नश्वर देहाच्या बळाने काम्य कर्माचे आचरण सुरू करितो २२.

ज्या कर्माचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे ।
तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥ २३ ॥
ज्या कर्माच्या योगाने प्रत्यक्ष यश व अलोट संपत्ति मिळेल तें तें कर्म तो पुढे वाढवीतच असतो. रजोगुणाने असे आचरण घडतें २३.

मी एक पवित्र त्रिजगतीं । माझीच उत्तम कर्मस्थिती ।
प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणावी स्थिती राजस ॥ २४ ॥
त्रिभुवनामध्ये मीच काय तो एकटा पवित्र, माझेच कर्माचरण श्रेष्ठ, अशा प्रकारची प्रवृत्ति, मान्यता आणि आसक्ति असणे, तीच राजस स्थिति समजावी २४.

रजाचें बळ उद्भट । कर्म आदरी अचाट ।
वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥ २५ ॥
रजाचे बळ मोठे विलक्षण असते. त्यामुळे रजोगुणी मनुष्य अचाट काम अंगिकारतो, आणि उद्योगाचा पसारा वाढवितो. तो श्रेष्ठ राजस गुण समजावा २५.

बाहेर दिसे सात्त्विकस्थिती । अंतरीं कर्मवासना द्रव्यासक्ती ।
ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥ २६ ॥
बाहेरून पाहिले तर ज्याची वृत्ति सात्त्विक दिसते, परंतु अंत:करणांत कर्माची वासना आणि द्रव्यलोभ ही असतात आणि ज्याच्या मनात स्त्रीचीच आवड असते, तो खरोखर राजस होय २६.

जेव्हां सत्त्व रज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण ।
ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगता ॥ २७ ॥
आतां सत्त्व आणि रज हे दोन्ही गुण जिंकून तमोगुणच जेव्हां पूर्णपणे वाढतो, त्या वेळची त्या पुरुषाची लक्षणे स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत २७.

यदा जयेद्रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम् ।
युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥ १५ ॥
[श्लोक १५] अज्ञान हे तमोगुणाचे स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचे स्वभाव हाेेत जेव्हा तो वाढून सत्त्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकतो, तेव्हा माणूस आकांक्षा शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. (१५)

रज सत्त्व करूनि गूढ । जैं तमोगुण होय रूढ ।
तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिस्तब्ध ॥ २८ ॥
सत्त्व आणि रज यांचा लोप करून तमोगुण जेव्हा प्रबळ होतो, तेव्हां तो त्या पुरुषाला पक्का जड, मूढ व अत्यंत स्तब्ध करून सोडतो २८.

विश्वासूनि वाडेंकोडें । जैं परद्रव्य बुडवणें पडे ।
कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥ २९ ॥
मोठ्या मानभावीपणाने विश्वास दाखवून जेव्हां परद्रव्य बुडविण्याचे कार्य घडते, किंवा परस्त्रीगमन घडते, तेव्हां त्या योगाने तमोगुण वाढला असे समजावें २९.

स्वमुखें परापवाद बोलणें । स्वयें साधुनिंदा करणें ।
संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥ २३० ॥
स्वमुखाने दुसऱ्याचे दोष उच्चारणे, स्वतः साधूची निंदा करणे, संतसज्जनांचा द्वेष करणे, ही लक्षणे जेथे दिसतील तेथें तमोगुणाचे ठाणे अनिवार्य होऊन बसलेंच असे समजावें २३०.

धुईचेनि आलेपणें । पडे सूर्यासी झांकणे ।
तेवीं विवेकाचें जिणें । तमोगुणें ग्रासिजे ॥ ३१ ॥
धुकें आलें म्हणजे त्याच्या योगाने सूर्यावर झाकण पडते, त्याप्रमाणे विवेकाच्या अस्तित्वालाही तमोगुण झांकून टाकतो ३१.

सत्त्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्तिप्रवर्तक ।
दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥ ३२ ॥
सत्त्वगुण हा प्रकाश देणारा आहे, रजोगुण प्रवृत्ति वाढविणारा आहे, आणि ह्या दोघांना गिळून तमोगुणाची वाढ अधर्माच्या योगाने वाढतच आहे पहा! ३२.

करितां पूज्याचें हेळण । साधूचे देखतां दोषगुण ।
तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरूप पूर्ण तें ऐक ॥ ३३ ॥
श्रेष्ठांचा अपमान केला असता किंवा साधूचे गुणदोष पाहूं लागले असता तेणेकरून जो तमोगुण खवळतो, त्याचे सारे स्वरूप ऐक ३३.

तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फूर्तिमात्र होय मूढ ।
लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥ ३४ ॥
तमोगुण भरपूर वाढला म्हणजे स्फूर्ति मंद होते आणि तो तमोगुण बुद्धिनाश उत्पन्न करून जिवाला जड करून सोडतो ३४.

कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अंध होय पूर्ण ।
या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥ ३५ ॥
कार्य कोणते व अकार्य कोणते या विचाराचे जे ज्ञान, त्याची स्फूर्ति पूर्णपणे आंधळी होऊन जाते. ह्याचे नांव मूढपणा. आतां लयाचे लक्षण ऐक ३५.

जागृतीमाजीं असतां चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ ।
कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥ ३६ ॥
चित्त जागृतींत असूनही अर्थ, स्वार्थ, परमार्थ, किंवा कृत्याकृत्य काही एक स्फुरत नाही, ह्याचेच नांव खरोखर लय ३६.

समस्ताही इंद्रियवृत्ती । अनुद्यमें स्तब्धगती ।
निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥ ३७ ॥
सर्व इंद्रियांचे व्यापार उद्योग न केल्यामुळे खुंटून जातात, आणि ज्ञानशक्ति पूर्णपणे लोपून जाते, ह्याचें नांव जडत्वप्राप्ति ३७.

मूढत्वें पावे शोक दुःख । जडत्वें मिथ्या मोह देख ।
मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मीं ॥ ३८ ॥
मूढत्वाच्या योगानें शोक व दुःख प्राप्त होते. जडत्वाने मिथ्या मोह उत्पन्न होतो. आणि मोहामुळे अधर्मामध्ये अत्यंत अविचारीपणा होऊन पाप घडते ३८.

ऐक लयाचें कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक ।
निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥ ३९ ॥
आता लयाचा चमत्कार ऐक. अहोरात्र अतिशय निद्रा येते. तामसाला निद्रेशिवाय दुसरे ब्रह्मानंदाचे सुखही आवडत नाही ३९.

पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसें होय पुरुषलक्षण ।
वाढल्या सत्त्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥ २४० ॥
तमोगुण पूर्ण वाढला असतां पुरुषाची अशी स्थिति होते. आतां सत्त्वादि गुण वाढले म्हणजे कोणते फळ प्राप्त होतें तें श्रीकृष्ण सांगतो २४०.

यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः ।
देहेऽभयं मनोऽसङ्गं तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥ १६ ॥
[श्लोक १६] जेव्हा चित्त प्रसन्न असते, इंद्रिये शांत असतात, देह निर्भय असतो आणि मनामध्ये आसक्ती नसते, तेव्हा सत्त्वगुण वाढलेला आहे असे समजावे माझ्या प्राप्तीचे सत्त्वगुण हे साधन आहे. (१६)

वाढलिया सत्त्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न ।
कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥ ४१ ॥
सत्त्वगुण वाढला असतां चित्त सदासर्वकाल सुप्रसन्न असते; आणि काम, क्रोध व लोभ यांचे स्फुरण मुळीच स्फुरत नाही ४१.

जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं ।
विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥ ४२ ॥
विषयासाठींच जें चित्त वणवण करीत असावयाचे, तेच विषयोपभोगांत उदास होते. विषय जरी आंगावर आदळले, तरी तो विषयसंगामध्ये गुंतत नाही ४२.

जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त ।
तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥ ४३ ॥
ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाण्यांतच राहाणाऱ्या कमळिणीचे पान पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानामुळे चित्तही विषयांत असून त्या विषयांपासून अलिप्त असते ४३.

सदा मरणभय देहासी । तें मरणाआलिया देहापाशीं ।
भय नुपजे सात्त्विकासी । भावें मत्पदासी विनटले ॥ ४४ ॥
देहाला मरणाचे भय हे नेहमीचेच आहे. ते मरण देहाजवळ येऊन ठेपलें तरी सात्त्विकाच्या मनात भय उत्पन्न होत नाही. कारण असे सात्त्विक लोक माझ्या पायांशी भक्तिपूर्वक रंगलेले असतात ४४.

जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण ।
सात्त्विक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥ ४५ ॥
जोपर्यंत ‘ मी तू ‘ पणा भासतो, तोपर्यंत मरण अवश्य बाधक होते. पण सात्त्विक भक्त माझ्या अधिकाराहून निराळा नसतो, म्हणून त्याला मरणाचे भय नाही ४५.

सात्त्विक मत्पदीं अनन्य शरण । यालागीं बाधीना जन्ममरण ।
या स्थितीं वर्तवी सत्त्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥ ४६ ॥
सात्विक असतो तो माझ्या चरणी अनन्यभावानें शरण आलेला असतो. म्हणून त्याला जन्ममरण बाधक होत नाही. सत्त्वगुण माणसाला अशा रीतीने वागवीत असतो. आतां रजाचे लक्षण ऐक ४६.

विकुर्वन् क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम् ।
गात्रास्वास्थ्यं मनो भ्रांतं रज एतैर्निशामय ॥ १७ ॥
[श्लोक १७] जेव्हा कर्म करीत असताना जीवाची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट, कम]द्रिये अस्वस्थ आणि मन भ्रांत होते, तेव्हा रजोगुणाचा जोर वाढला आहे, असे समजावे. (१७)

खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण ।
कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥ ४७ ॥
रजोगुण खवळला असता अत्यंत भयंकर अशी विषयाची चिंता उत्पन्न होते. त्यामुळे कर्मेंद्रियांनी नाना प्रकारचे थाटमाट आरंभितो ४७.

शरीर असतांही स्वस्थ । मन चिंतातुर अतिभ्रांत ।
वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥ ४८ ॥
शरीर स्वस्थ असले तरीसुद्धा मन चिंतातुर आणि अत्यंत भ्रांत असते. आणि विषयांचा स्वार्थ वाढवून नेहमी दुःखी होते ४८.

असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं ।
राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥ ४९ ॥
मुलेबाळे, धन, संपत्ति वगैरे असताही तो रजोगुण मनामध्ये अधिक स्वार्थ वाढवितो. राजसाची चित्तवृत्ति अर्धक्षण देखील निवृत्ति मानीत नाही ४९.

नसतां विकाराचें कारण । चित्तीं विकार चिंती आपण ।
हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥ २५० ॥
उद्धवा ! विकाराचे कारण नसतां आपणच मनामध्ये विकाराचे चिंतन करतों, हेच राजसाचे मुख्यत्वेकरून लक्षण होय २५०.

रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ ।
जैसी झांबवली सांजवेळ तैसा केवळ रजोगुण ॥ ५१ ॥
गाढ अंधाराची रात्रही नव्हे, किंवा चांगला स्वच्छ प्रकाशयुक्त दिवसही नव्हे, अशा या दोहोंच्या मधली जशी अंधुक संध्याकाळ असते, त्याप्रमाणेच हुबेहुब रजोगुण होय ५१.

सत्त्वरजांची उणखूण । तुज दाविली ओळखण ।
आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥ ५२ ॥
सत्त्व आणि रज यांच्या लक्षणांची ओळख मी तुला सांगितली. आतां तमोगुण ऐक. त्याचे लक्षण जडत्व हे आहे ५२.

सीदच्चित्तं विलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम् ।
मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥ १८ ॥
[श्लोक १८] चित्त जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा शब्द इत्यादी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरेल आणि खिन्न होऊन निराश होईल, मन सुन्न होईल, तसेच अज्ञान आणि खेद यांची वाढ होईल, तेव्हा तमोगुण वाढला आहे, असे समजावे. (१८)

चित्तीं चिंता अतिगहन । ते महामोहीं होय निमग्न ।
कोणेही अर्थींचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥ ५३ ॥
चित्तामध्ये अत्यंत गहन चिंता उत्पन्न होऊन त्या चिंतेच्या दुर्धर मोहामध्ये चित्त गढून जाते, आणि कोणत्याही तऱ्हेचे ज्ञान त्याच्या हृदयामध्ये स्फुरत नाही ५३.

सुषुप्तीवेगळें अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान ।
तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥ ५४ ॥
गाढ झोपेशिवाय अज्ञान म्हणून जेवढे असते, तेवढे सर्व ज्ञानाला पाहून पळत सुटते, पण त्यांत एक चमत्कार कसा होतो तो पहा ! तो हा की, ते अज्ञान त्या ज्ञानाला गिळून टाकतें ५४.

जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे ।
जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥ ५५ ॥
तामस मनुष्य जागा असला तरी निजल्यासारखा दिसतो. ज्याप्रमाणे एखादा आंधळा अमावास्येच्या रात्री आकाश ढगांनी व्यापलें असतां कसातरी अडखळत चालत असतो. त्याप्रमाणे तो कर्में करतो, पण योग्य स्फुरण होत नाही ५५.

सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा ।
हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥ ५६ ॥
सर्व शरीराचा गोळा म्हणजे आळसाची केवळ गठडीच बनून राहतो. तमोगुणाच्या ग्लानीची लीला अशी असते. तिच्यामुळे चित्तवृत्तीच्या डोळ्यांवर पडदा येतो ५६.

संकल्प विकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती ।
त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥ ५७ ॥
मनोवृत्ति सदासर्वदा संकल्पांची आणि विकल्पांची मोठमोठी कल्पना उत्पन्न करीत असावयाची, पण तमोगुणामुळे त्या मनाची स्थिति जड होते व संकल्पाची स्फूर्तीही उत्पन्न होत नाही ५७.

आणिकही नवलस्थिती । चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती ।
एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥ ५८ ॥
त्यांत आणखीही एक चमत्कार आहे. तो हा की, चित्ताला आपली चित्तस्फूर्तीच आठवत नाही. एवढी मनोवृत्तीलाही लयास नेणारी अशी तमोवृत्तीची वाढ होते ५८.

यापरी तमाचें बळ होय । तैं मनातें अज्ञान खाय ।
ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥ ५९ ॥
अशा प्रकारे तमाचे बल वाढले, म्हणजे त्या वेळी अज्ञानच मनाला खाऊन टाकते. त्या वेळी मन केवळ नष्टप्राय होऊन मूढपणाने मूर्च्छित होऊन राहतें ५९.

मन निःशेष जैं नासतें । तैं महादुःख कोण भोगितें ।
यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥ २६० ॥
मन जर निखालस नाहींसेंच झाले असते, तर महादुःख कोणी भोगलें असतें ? म्हणून तमाशींच एकरूप होऊन मन जडमूढरूपाने तेथें शिल्लक उरतें २६०.

यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती ।
या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६१ ॥
उद्धवा ! अशा रीतीने जी वागणूक होते, तीच अत्यंत दुःखदायक असते. यालाच खरोखर तमाची स्थिति असें नांव आहे असे समज ६१.

वाढवितां गुणवृत्ती । कोणे गुणें कोण वाढती ।
येचि अर्थींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६२ ॥
गुणांच्या वृत्ति वाढवीत असतां कोणत्या गुणाने कोणत्या वृत्ति वाढतात, याच अर्थाचे सर्व निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ६२.

एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते ।
असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥ १९ ॥
[ श्लोक १९] उद्धवा ! सत्त्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचे बळ वाढते. (वृत्तींमध्ये सुद्धा अनुक्रमे सत्त्व इत्यादी गुण वाढल्यावर देवत्व, असुरत्व आणि राक्षसत्वप्रधान, निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह यांचे प्राबल्य दिसून येते). (१९)

दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची संपत्ती ।
जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥ ६३ ॥
दैवी, आसुरी आणि राक्षसी स्थिति हीच तीन प्रकारच्या गुणांची संपत्ति आहे. जी जी इंद्रियांची वृत्ति ब्रह्मांडांत असते. तीच स्थिति पिंड (देहां )तही असते ६३.

ब्रह्मांडीं सकळ देव । महापुरुषाचे अवयव ।
पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निज‍ऐक्यें ॥ ६४ ॥
ब्रह्मांडामध्ये सर्व देव हे महापुरुषाचे अवयव आहेत. पिंडामध्येही तेच स्वतः सर्वजण परस्परांत एकोप्याने वागत असतात ६४.

उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मीं जे प्रवृत्ती ।
ऐशी जेथ इंद्रियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्त्वस्थ ॥ ६५ ॥
स्वधर्मशास्त्राप्रमाणे उचित अशी निष्कर्माकडेच जी प्रवृत्ति असते, अशी इंद्रियप्रवृत्ति जेथे असेल, तोच दैवी किंवा सत्त्वस्थ संपत्ति होय ६५.

कामाभिलाष दृढ चित्तीं । आणि स्वधर्मीं तरी वर्तती ।
ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसुरी संपत्ती राजसी ॥ ६६ ॥
मनामध्ये उतर कामासक्ति आणि स्वधर्माप्रमाणे तर वागावयाचे, अशी जी इंद्रियप्रवृत्ति असते, ती राजस अशी आसुरी संपत्ति होय ६६.

सलोभमोहें क्रोध चित्तीं । सदा अधर्मीं प्रवृत्ती ।
ऐशी जे इंद्रियस्तिथी । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥ ६७ ॥
लोभ आणि मोह ह्यांना वश झाल्यामुळे मनांत क्रोध असणे, आणि अधर्माकडेच प्रवृत्ति असणे, अशी जी इंद्रियांची स्थिति असेल, ती तामसी अशी राक्षसी संपत्ति होय ६७.

क्षणें सकाम क्षणें निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म ।
तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥ ६८ ॥
क्षणांत कामासक्ति, क्षणांत निरिच्छपणा, असा स्वधर्म जेथे वाढतो, तेथें दैवी व आसुरी वृत्तींचा दांडगा संग्राम माजतो ६८.

चित्तीं वाढवूनि मोहभ्रम । अधर्मचि मानी स्वधर्म ।
तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥ ६९ ॥
चित्तामध्ये मोह व भ्रम वाढवून अधर्मालाच स्वधर्म मानतो, तेव्हा ती राक्षसी वृत्ति समजावी. ती दैवी व आसुरी ह्या वृत्तींचा नाश करिते ६९.

सकामनिष्काममोहभ्रमेंसी । वृत्ती वर्ते गा जयापाशीं ।
तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कलहो अहर्निशीं अनिवार ॥ २७० ॥
सकाम-निष्कामांच्या मोहभ्रमांशी संयुक्त होऊन ज्याच्यापाशी वृत्ति वागत असते, तेथें देव, असुर आणि राक्षस ह्यांच्यामध्ये रात्रंदिवस भयंकर झगडा माजतो २७०.

क्षणैक रति परमार्थीं । क्षणैक रति अर्थस्वार्थीं ।
क्षणैक होय अनर्थीं । परदारारती परद्रव्यें ॥ ७१ ॥
क्षणभर परमार्थात गोडी, क्षणभर द्रव्यलोभांत गोडी, क्षणभर अनर्थापात करण्यांत गोडी, क्षणांत परद्रव्य व परदारा ह्यांतच गोडी ७१,

ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशांती ।
मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥ ७२ ॥
अशा चित्तवृत्तीमध्ये खरी शांति कधीच प्राप्त व्हावयाची नाही. मग परमार्थांची प्राप्ति कोणत्या रीतीने होणार? ७२.

साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती ।
ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥ ७३ ॥
साधक लोक नेहमी विचारीत असतात की, चित्तवृत्तीमध्ये कोणती पीडा असते ? त्याच पीडेची स्थिति तुला स्पष्ट करून सांगितली ७३.

एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविध वृत्ती वाढे ।
हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमर्दें ॥ ७४ ॥
एकच गुण जर पूर्णपणे जडून राहिला, तर एकाच प्रकारची वृत्ति वाढावी, पण तसे मुळीच घडत नाही. गुण हे इतर गुणांचा उपमर्द करूनच झगडत असतात ७४.

एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नव्हे एकविधता ।
तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥ ७५ ॥
एकच गुणावस्था प्राप्त होत नाही म्हणून एकविधता होत नाही. आणि त्यामुळे अनिवार भवपीडा गुणक्षोभाने बाधत असते ७५.

तम अधर्माकडे वाढे । रजोगुण देहकर्माकडे ।
सत्त्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥ ७६ ॥
तमोगुण अधर्माकडे वाढत असतो, रजोगुण देहकर्माकडे लागतो, आणि सत्त्वगुणाची वाढच होत नाही. तेव्हां जीवाची मुक्तता व्हावी कशी? ७६.

रजतमौभयसंधीं । सत्त्व अडकलें दोहींमधीं ।
तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्त्वगुणा ॥ ७७ ॥
रज आणि तम ह्या दोहोंच्या कचाटींत सत्त्व हे दोघांच्यामध्ये अडकलेले असते. ते खरोखर वाढूच शकत नाही. त्या सत्त्वगुणाची वाढ फक्त आशा समूळ खणून टाकल्याने होते ७७.

त्रिगुण गुणांची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं ।
तेंचि भवभय हो‍ऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥ ७८ ॥
तीन गुणांची त्रिपुटी आपणच आपल्या अंत:करणांत कल्पनेने उभी केलेली असते, आणि अखेर तीच संसारभयाच्या रूपाने उठून बाधकत्वाने पाठीस लागते ७८.

सत्त्वें देवांसी प्रबळ बळ । रजोगुणें दैत्य प्रबळ ।
तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥ ७९ ॥
सत्त्वाच्या योगाने देवांना अत्यंत बळ चढते, रजोगुणाने दैत्य प्रबळ होतात, तमोगुणाने केवळ राक्षसांनाच जोर चढतो ७९.

हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूळ सांगीतली कथा ।
आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ २८० ॥
ही गुणांच्या वृत्तींची व्यवस्था कशी असते, त्याची कथा तुला सविस्तर सांगितली. आतां तीन अवस्था आहेत त्याही स्पष्टपणाने सांगेन २८०.

सत्त्वाज्जागरणं विद्याद्रजसा स्वप्नमादिशेत् ।
प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम् ॥ २० ॥
[श्लोक २०] सत्त्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते, असे समजावे तुरीय अवस्था आत्मरूप असल्याने या तिहींमध्ये साक्षित्वाने एकरूप होऊन व्याप्त असते. (२०)

सत्त्वगुणाचिये स्थिति । नातळे स्वप्न आणि सुषुप्ती ।
जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥ ८१ ॥
सत्त्वगुण अंगांत असला म्हणजे जीवाला स्वप्न आणि सुषुप्ति ही स्पर्शही करीत नाहीत, आणि जीवामध्ये सदोदित जी जागृति नांदत असते, त्यामुळे इंद्रियप्रवृत्ति सावध असते ८१.

रजोगुणाचेनि आधिक्यें । चित्तवृत्तीतें स्वप्न जिंके ।
जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥ ८२ ॥
रजोगुणाचे प्राबल्य झालें म्हणजे स्वप्नं चित्तवृत्तीला जिंकतें. जागृति आणि सुषुप्ति या लांब जातात आणि तो राजस मनुष्य बसल्या बसल्याच स्वप्न पाहूं लागतो ८२.

तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वप्न दूरी दवडी ।
मग सुशुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवाअंगीं ॥ ८३ ॥
तमोगुण जास्त वाढला म्हणजे तो जागृति आणि स्वप्न ह्या दोहोंनाही दूर घालवितो, आणि मग जीवाच्या अंगावर अत्यंत गाढ अशी निद्रा येऊन आदळते ८३.

त्यासी सभे बैसविल्या पाहे । बोलतां-बोलतां डुलकी जाये ।
जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥ ८४ ॥
त्याला सभेत नेऊन बसविला असतां बोलतांबोलतांच त्याची डुलकी लागते. जेवतांजेवतांसुद्धा पहा ! तो खुशाल कडकडून झोप घेतो ८४.

क्षणां जागृति क्षणां सुषुप्ती । क्षणैक स्वप्नाची प्रतीती ।
हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८५ ॥
उद्धवा ! क्षणामध्ये जागृति, क्षणामध्ये सुषुप्ति म्हणजे निद्रा, क्षणामध्ये स्वप्नाचा अनुभव; ही तीन गुणांची खरोखर मिश्रित वृत्ति होय, हे लक्षात ठेव ८५.

जागृति स्वप्न सुषुप्ती । तिहीं अवस्थांतें प्रकाशिती ।
यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥ ८६ ॥
आतां जागृति, स्वप्नं आणि सुषुप्ति, या तिन्ही अवस्थांना प्रकट करणारे जे आत्मतत्त्व, त्या चौथ्या अवस्थेला ज्ञाते लोक तुर्यावस्था असे म्हणतात ८६.

जे जागृतीतें जागवित । जे स्वप्नीं स्वप्नातें नांदवित ।
जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥ ८७ ॥
उद्धवा ! जी जागृतीला जागविते, जी स्वप्नांमध्ये स्वप्नांला नांदविते, आणि जी निद्रेलाही निजविते, त्या अवस्थेला तुरीय अवस्था असे म्हणतात ८७.

जे तिहीं अवस्थांआंत । असोनि नव्हे अवस्थाभूत ।
जे निर्गुण निजनित्य त्यातेंचि म्हणत तुरीय ॥ ८८ ॥
जी तिन्ही अवस्थांमध्ये असूनही त्यांत असल्यासारखी भासत नाही, जी निर्गुण असून नित्य असते, त्या अवस्थेलाच तुरीय असें म्हणतात ८८.

जेवीं पुत्राचेनि जाहलेपणें । पुरुषें पिता नांव पावणें ।
तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥ ८९ ॥
ज्याप्रमाणे पुत्राच्या जन्मामुळेच पुरुषाला ‘पिता’ हें नाम प्राप्त होते, त्याप्रमाणे तिन्ही अवस्थांचे गुण तिच्यामध्ये असल्यामुळेच त्या परमात्मवस्तूला तुरीय असे म्हणतात ८९.

वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सवेंचि नासे ।
त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥ २९० ॥
परब्रह्मावर ह्या सर्व अवस्था भासतात. आणि अशा रीतीने भासमान झालेली अवस्था लगेच नाहींशीही होते. परंतु त्या भासाच्या नाशामध्ये परब्रह्म काही नाश पावत नाही. तें तुरीय नाश न पावतां शिल्लक राहतें २९०.

तुरीय त्रिकाळीं संतत । यापरी जाणावें एथ ।
आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥ ९१ ॥
तुरीय ही अवस्था त्रिकाळी सतत असणारी आहे असे येथे समजावे, आतां गुणवृद्धीच्या योगाने जी जी कर्मांची गति प्राप्त होते, त्याचाही वृत्तांत श्रीकृष्ण सांगतात ९१.

उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः ।
तमसाधोऽध आमुख्याद्रजसान्तरचारिणः ॥ २१ ॥
[श्लोक २१] वेदाभ्यासामध्ये तत्पर असणारे ब्राह्मण सत्त्वगुणाच्याद्वारे उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात तमोगुणामुळे जीवांना वृक्ष इत्यादींपर्यंतची अधोगती प्राप्त होते आणि रजोगुणामुळे मनुष्यशरीर प्राप्त होते. (२१)

सत्त्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन ।
ते न करूनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥ ९२ ॥
ब्राह्मण लोक हेच मुख्यत्वेकरून सत्त्वगुणाचे आश्रयस्थान आहेत. असे जे ब्राह्मण ब्रह्मार्पण न करूनही स्वधर्माचरण करतात ९२.

त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती ।
लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥ ९३ ॥
त्यांना स्वधर्माच्या कर्मशक्तीनेच अर्ध्वलोकी जावयास मिळते. आता त्या ब्राह्मणांना निरनिराळे लोक कसे प्राप्त होतात, तोही प्रकार ऐक ९३.

स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक ।
उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्त्विक सत्यलोक पैं ॥ ९४ ॥
सात्विक ब्राह्मण असतात ते स्वर्गलोक व महलोंक यांचे आक्रमण करून जनलोकाला जातात. आणि पुढे तपोलोकही उल्लंघन करून सत्यलोकाला जातात ९४.

वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण ।
पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥ ९५ ॥
रजोगुण वाढला म्हणजे जीवाला शूद्रादिक चांडाळ जाति प्राप्त होते, आणि पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यु हे सारखे भोगवीतच असतो ९५.

वाढलिया तमोगुण । पश्वादि योनि पावोन ।
दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥ ९६ ॥
तमोगुण वाढला म्हणजे पश्वादि योनीमध्ये जन्म घेउन डांस, माशी, झाडे, दगड इत्यादि सर्व योनी भोगाव्या लागतात ९६.

प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण ।
त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥ ९७ ॥
प्राण्याच्या अंतकाळी देहांत जो गुण वाढतो; त्या मरणाचे फळ काय, तेही श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९७.

अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं कोण गती ।
तेहीविखींची उपपत्ती । श्लोकार्थीं हरि सांगे ॥ ९८ ॥
एकनिष्ठपणे माझी भक्ति केली असता, त्या भक्तांना अखेर कोणती गति प्राप्त होते, त्याविषयींचे वर्णन श्रीकृष्ण लोकार्थाने सांगतात ९८.

सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः ।
तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥ २२ ॥
[श्लोक २२] सत्त्वगुणांच्या वृद्धीत मृत्यू आला असता स्वर्गाची प्राप्ती होते, रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आलेल्याला मनुष्यलोक मिळतो आणि तमोगुणाची वृद्धी असताना ज्याला मृत्यू येतो, त्याला नरकाची प्राप्ती होते परंतु जे त्रिगुणातीत असतात, त्यांना माझीच प्राप्ती होते. (२२)

संसारीं मुख्यत्वें त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्त्वगुण ।
ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥ ९९ ॥
संसारांत तीन गुण मुख्य आहेत. त्यांत ज्याला सत्त्वगुण वाढून मरण प्राप्त होते. तो स्वर्गातील सौख्य भोगण्यासाठी दिव्य देह पावतो ९९.

सत्त्वे निमाल्या सात्त्विक । ते पावती स्वर्गलोक ।
रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥ ३०० ॥
अशा प्रकारे सात्त्विक पुरुष सत्त्वगुणांच्याच प्राबल्यांत मृत्यु पावल्यास ते स्वर्गलोक पावतात. रजोगुणामध्येच मरण आले असता त्यांना मनुष्यलोक प्राप्त होतो ३००.

अंतीं वाढोनियां तमाधिक्य । तमोगुणें निमाल्या देख ।
ते भोगिती महानरक । दुःखदायक दारुण ॥ १ ॥
आणि अंतकालीं तमोगुणाचे आधिक्य होऊन त्या तमोगुणाने मरण आले असतां ते अत्यंत दुःखदायक व महाभयंकर असा नरकवास भोगितात १.

सप्रेम करितां माझी भक्ती । माझिया भक्तांसी देहांतीं ।
हृदयीं प्रकटे माझी मूर्ती । घवघविती निजतेजें ॥ २ ॥
प्रेमाने माझी भक्ति केल्यास माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये अंतकाळी आत्मतेजानें देदीप्यमान अशी माझी मूर्ति प्रगट होते २.

शंखचक्रगदादि संपूर्ण । पीतांबरधारी श्रीकृष्ण ।
ध्यानीं धरूनि पावे मरण । तो वैकुंठीं जाण मी होयें ॥ ३ ॥
शंख, चक्र, गदा इत्यादि संपूर्ण आयुधे धारण केलेला पीतांबरधारी श्रीकृष्ण ध्यानात आणून जो मरण पावतो, तो वैकुंठामध्ये मत्स्वरूपच होतो ३.

सर्वभूतीं मी आत्मा पूर्ण । ऐसें ज्याचें अखंड भजन ।
ते जितांचि तिन्ही गुण । जिणोनि निर्गुण पावती ॥ ४ ॥
सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मीच आत्मा परिपूर्ण रूपाने भरलेला आहे. असें ज्याचे भजन अखंड चालू असते, ते जीवंतपणीच तिन्ही गुणांना जिंकून निर्गुणपदाला पोचतात ४.

त्यांचें देहासी दैवें आल्या मरण । मजवेगळें नाहीं स्थान ।
ते निजानंदें परिपूर्ण । निजनिर्गुण स्वयें होती ॥ ५ ॥
त्यांच्या देहाला जर दैवयोगाने मरण आले, तर त्यांना माझ्याशिवाय दुसरे स्थानच नाही, ते निजानंदाने परिपूर्ण असल्यामुळे स्वतःच निर्गुणस्वरूप होतात ५.

माझें स्वरूप निजनिर्गुण । अथवा वैकुंठींचें सगुण ।
दोन्ही एकचि निश्चयें जाण । सगुण निर्गुण समसाम्य ॥ ६ ॥
माझे निर्गुणस्वरूप, किंवा वैकुंठांतील सगुण स्वरूप, ही दोन्ही खरोखर एकच आहेत. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकसारखींच ६.

स्वर्ग नरक मनुष्यलोक । प्राप्ती पावले निर्गुण चोख ।
त्यांच्या साधनांचें कौतुक । स्वयें यदुनायक सांगत ॥ ७ ॥
जे कोणी स्वर्ग, नरक, मृत्युलोक किंवा शुद्ध निर्गुण स्वरूप पावतात, त्यांच्या साधनांचा चमत्कार श्रीकृष्ण स्वतः सांगतात ७.

मदर्पणं निष्फलं वा सात्त्विकं निजकर्म तत् ।
राजसं फलसंकल्पं हिंसाप्रायादि तामसम् ॥ २३ ॥
[श्लोक २३] जेव्हा आपल्या धर्मानुसार केलेले कर्म निष्काम किंवा मला समर्पित केले जाते, तेव्हा ते सात्त्विक होते ज्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये एखाद्या फळाची अपेक्षा असते, तेव्हा ते राजस होते आणि कर्म करण्यात एखाद्याला त्रास देणे इत्यादी भाव असतो, तेव्हा ते तामसिक होते. (२३)

सकळ कर्मक्रियाचरण । संकल्पेंवीण आपण ।
सहजें होय ब्रह्मार्पण । हें निर्गुण साधन शोधितसत्त्वे ॥ ८ ॥
सर्व कर्मे व क्रिया इत्यादिकांचे आचरण संकल्पावांचूनही केलें असतां हें आपणच स्वतः सहज ब्रह्मार्पण होते. हेंच शुद्धसत्त्वाने निर्गुणस्वरूपाचे साधन आहे ८.

वर्णाश्रमधर्म सकळ । आचरे परी न वांछी फळ ।
माझे भक्तीचें प्रेम प्रबळ । हें कर्म केवळ सात्त्विक ॥ ९ ॥
तो सर्व वर्णाश्रमधर्म आचरण करितो. पण त्याच्या फळाची इच्छा करीत नाही, त्यात माझ्या भक्तीचे अत्यंत प्रेमच असते. हे कर्म केवळ सात्त्विक होय ९.

माझें भजन हाचि स्वधर्म । याचि नांव गा निजकर्म ।
ऐसें ज्यासे कळे वर्म । सात्त्विक कर्म या नांव ॥ ३१० ॥
माझे भजन करणे हाच स्वधर्म होय. याचंच नांव आपले कर्तव्य. हें रहस्य ज्याला कळते, त्याच्याच कर्माला ‘सात्त्विक कर्म’ असें म्हणतात ३१०.

स्वधर्म आचरोनि सकळ । इंद्रादि देवां यजनशीळ ।
जो वांछी इहामुत्र फळ । हें कर्म केवळ राजस ॥ ११ ॥
जो आपला धर्म असेल तोच सर्व आचरण करून, इंद्रादि देवांना यज्ञयाग करून तृप्त करितो, आणि त्याद्वारे ऐहिक व पारलौकिक फळाची इच्छा धरितो, त्याचें तें कर्म केवळ राजस होय ११.

जे कर्मीं प्रकट हिंसा घडे । कां आभिचारिक करणें पडे ।
स्वरूपें जें कर्म कुडें । तें जाण धडपुडें तामस ॥ १२ ॥
ज्या कर्मामध्ये प्रत्यक्ष हिंसा घडते, किंवा जारणमारणादि प्रयोग करणे भाग पडते, ज्या कर्माचे स्वरूपच ओंगळ दिसते, तें कर्म स्पष्टपणे तामस आहे १२.

जेथ दांभिक कर्माचारू । जेथ साधूंसी अतिमत्सरू ।
जेथ निंदेचा प्रबळ भरू । तो कर्मादरू तामस ॥ १३ ॥
जें कर्म करण्यामध्ये केवळ ढोंग दृष्टीस पडते, ज्यामध्ये साधूंचा अतिशय मत्सर केला जातो, ज्यांत इतरांची निंदा भरपूर असते, तें कर्म तामस होय १३.

आतां त्रिगुण आणि निर्गुण । यांचें चतुर्विध लक्षण ।
या श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ १४ ॥
आता तीन गुण आणि निर्गुण या चार प्रकारचे लक्षण पुढील श्लोकामध्ये श्रीकृष्ण स्वतः सांगतात १४.

कैवल्यं सात्त्विकं ज्ञानं रजो वैकल्पिकं च यत् ।
प्राकृतं तामसं ज्ञानं मन्निष्ठं निर्गुणं स्मृतम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] एकमेवाद्वितीय आत्म्याचे ज्ञान हे सात्त्विक ज्ञान होय देहयुक्त आत्मा कर्ता, भोक्ता आहे असे समजणे, हे राजस ज्ञान आहे आणि केवळ शरीरालाच आत्मा मानणे, हे तामस ज्ञान आहे आणि गुणातीत ज्ञान हे माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होय. (२४)

देहीं असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत ।
भूतां सबाह्य सभराभरित । हें ज्ञान निश्चित सात्त्विक ॥ १५ ॥
देहांत असून आपण देहापासून भिन्न आहोत, सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवान् हा परमात्म्याच्या रूपाने अंतर्बाह्य व्यापलेला आहे, हे ज्ञान खरोखर सात्त्विक होय १५.

भिन्न खाणी भिन्नाकार । भिन्न नांवें भिन्न व्यापार ।
तेथ वस्तु देखे अभिन्नाकार । हें ज्ञान साचार सात्त्विक ॥ १६ ॥
भिन्न जाति, भिन्न आकार, भिन्न नावें, भिन्न क्रिया, या सर्वांमध्ये ब्रह्म हे अभिनस्वरूपच आहे असे समजणे हे ज्ञान खरोखर सात्विक होय १६.

करूनि वेदशास्त्रपठन । निर्धारितां निजज्ञान ।
सवेंचि विकल्पी आपण । विकल्प पूर्ण रजाचे ॥ १७ ॥
वेदशास्त्र पठण करून आत्मज्ञानाचा विचार करतांना त्यांत आपण विकल्पाने शंका घेतो, त्याचे ते विकल्प पूर्ण राजस होत १७.

करून वार्तिकान्त व्युत्पत्ती । अद्वैत-निश्चयो नाहीं चित्तीं ।
आपण विकल्पी आपुल्या युक्ती । तें ज्ञान निश्चितीं राजस ॥ १८ ॥
कार्तिकापर्यंत अध्ययन करूनही चित्तामध्ये अद्वैताचा निश्चय होत नाही. आपल्याच तर्काने त्यांत विकल्प काढीत बसतो, ते त्याचे ज्ञान खरोखर राजस होय १८.

करूनि वेदशास्त्रश्रवण । होय शिश्नोदरपरायण ।
इंद्रियार्थीं श्रद्धा पूर्ण । तो केवळ जाण राजस ॥ १९ ॥
वेदशास्त्र श्रवण करून जो शिश्नोदरपरायण होतो, इंद्रियांच्या तृप्तीकडेच नेहमी आवड धरितो, तो निखालस राजस होय १९,

एक निश्चयो नाहीं चित्तीं । विकल्प उपजती नेणो किती ।
हे रजोगुणाची ज्ञानवृत्ती । ऐक निश्चितीं तमोगुण ॥ ३२० ॥
मनांत एक निश्चय नाही; आणि अनेक विकल्प उत्पन्न होतात, ही रजोगुणाची ज्ञानवृत्ति होय. आतां खरा तमोगुण कसा असतो तो ऐक ३२०.

महामोहो गिळी ज्ञानस्फूर्ती । मी जड अंध मानी निश्चितीं ।
नश्वर पदार्थीं आसक्ती । तें ज्ञान निश्चितीं तामस ॥ २१ ॥
ज्ञानाची जेवढी स्फूर्ति असेल तेवढी महामोह ग्रासून टाकतो. मी जड -अंध आहे हेच खरें असें मानतो. क्षणभंगुर पदार्थावर आसक्ति धरतो, तें त्याचे ज्ञान खरोखर तामस होय २१.

आहार निद्रा भय मैथुन । केवळ पशुप्राय जें ज्ञान ।
तें निश्चयें तामस जाण । ऐक निर्गुणविभाग ॥ २२ ॥
आहार, निद्रा, भय आणि मैथुन एवढ्याचेच केवळ पशुतुल्य जें ज्ञान, ते खरोखर तामस होय, हे लक्षात ठेव. आतां निर्गुणाचे विभाग ऐक २२.

कार्य कर्ता आणि कारण । त्रिपुटी त्रिगुणेंसी करूनि शून्य ।
केवळ जें चैतन्यघन । तें निर्गुण ज्ञान उद्धवा ॥ २३ ॥
उद्धवा ! कार्य, कर्ता आणि कारण ही त्रिपुटी तीन गुणांसहवर्तमान शून्य करून केवळ जे चैतन्यरूप राहते, ते निर्गुण ज्ञान होय २३.

सत्त्वाचेनि निज‍उल्हासें । सर्वेंद्रियीं ज्ञान प्रकाशे ।
तें ज्ञानचि मानी वायवसें । मी ज्ञानरूपें असें अनादि ॥ २४ ॥
सत्त्वाच्या उल्हासाने सर्वेद्रियांमध्ये जें ज्ञान प्रगट होते, ते ज्ञानच वायफळ आहे असे समजतो, कारण तो म्हणतो की, मी ज्ञानरूपाने अनादि आहे २४.

सिंधुजळें सरिता वाहती । त्या आलिया सिंधूप्रती ।
तेणें उल्हासेना अपांपती । तेवीं ज्ञानस्फूर्ती श्लाघेना ॥ २५ ॥
समुद्राच्याच पाण्यामुळे नद्या वाहत असतात. त्या समुद्रास येऊन मिळाल्या, म्हणून तो समुद्र त्याबद्दल काही मोठी प्रौढी मिरवीत नाही. त्याप्रमाणेच त्याला ज्ञानाची स्फूर्ति झाली म्हणून काही मोठेपणा वाटत नाही २५,

रजोगुणें आलिया सकाम । त्यासी क्षोभूं न शके काम ।
म्हणे माझेनि चाले काम्य कर्म । शेखीं मी निष्काम निजांगें ॥ २६ ॥
रजोगुणाने त्याला एखादी इच्छा उत्पन्न झाली, तरी ती इच्छा त्याला काही क्षुब्ध करू शकत नाही. तो म्हणतो की, माझ्यामुळेच काम्य कर्म चालते, परंतु मी शेवटी स्वतः निष्कामच आहे २६.

होतां काम्य कर्माचा सोहळा । जेवीं सूर्या न बाधी उन्हाळा ।
तेवीं काम्य कर्मीं मी जिव्हाळा । माझेनि सोज्ज्वळा काम सवेग ॥ २७ ॥
ज्याप्रमाणे सूर्याला उन्हाळा बाधत नाही, त्याप्रमाणे काम्य कर्माचा विधि होत असतां त्या काम्य कर्मामध्ये माझा संबंध नसतो. पण माझ्यामुळेच काम सवेग व सोज्ज्वळ होतो २७.

तमोगुणाच्या झडाडा । पडिला महामोहाचा वेढा ।
न करितां मोहाचा निझाडा । मोहनिर्णय गाढा आपण पैं जाणे ॥ २८ ॥
तमोगुण वाढला म्हणजे महामोहाचा वेढा येऊन पडतो. परंतु त्या मोहाचा झाडा न करिता मोहाचे खरे स्वरूप तो पक्के जाणून असतो २८.

सूर्यो न दिसे जिकडे । अंधारू व्यापी तिकडे ।
तेवीं स्वरूपनिष्ठेपुढें । न बाधी सांकडें मोहाचें ॥ २९ ॥
सूर्य जिकडे दिसत नाही तिकडे अंधार व्यापून टाकतो; त्याप्रमाणे स्वरूपनिष्ठेपुढे मोहाचे संकट कधीं बाधत नाही २९.

अंगीं आदळतां तिन्ही गुण । जो गजबजीना आपण ।
ते निजनिष्ठा निजनिर्गुण । उद्धवा जाण निश्चित ॥ ३३० ॥
अंगावर तिन्ही गुण येऊन कोसळले तरी, जो आपण होऊन कधीं गडबडत नाहीं, उद्धवा ! तीच खरोखर निर्गुणाची आत्मनिष्ठा होय हें लक्षात ठेव ३३०.

अज्ञानाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी ।
प्रवर्ततां कामाचारीं । निष्कामाचा न करी पांगडा ॥ ३१ ॥
अज्ञानाच्या प्रसंगी जो ज्ञानाची इच्छा धरीत नाही, किंवा विषयांमध्ये प्रवृत्त असतां निष्कामतेची इच्छा करीत नाही ३१,

आदळतां मोहाचीं झटें । ज्याचा बोध कदा न पालटे ।
त्रिगुणीं निर्गुणत्वें राहाटे । माझिया निष्ठें मद्भक्त ॥ ३२ ॥
किंवा मोहाची झड येऊन पडली तरी त्याच्या ज्ञानामध्ये कधी पालट होत नाहीं; असा माझा भक्त असतो तो माझ्या श्रद्धेनें त्रिगुणामध्येच निर्गुणत्वानें राहतो ३२.

त्रिगुणांचा त्रिविध वास । निर्गुण निजरहिवास ।
येचि अर्थीं हृषिकेश । विशद विलास सांगत ॥ ३३ ॥
तीन गुणांचे तीन प्रकारचे राहणे, आणि निर्गुणपणाचे राहणे यांचाही प्रकार श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात ३३.

वनं तु सात्त्विको वासो ग्रामो राजस उच्यते ।
तामसं द्यूतसदनं मन्निकेतं तु निर्गुणम् ॥ २५ ॥
[श्लोक २५] वनात राहणे हा सात्त्विक निवास आहे, गावामध्ये राहाणे राजस आहे आणि जुगार इत्यादी चालणार्‍या घरात राहाणे हा तामस आहे आणि माझ्या मंदिरात राहाणे हा निर्गुण निवास आहे. (२५)

पवित्र आणि तीर्थभूत । विजन वन एकान्त ।
ऐशिये वस्तीं सुखावे चित्त । तो वास निश्चित सात्त्विक ॥ ३४ ॥
पवित्र तीर्थाची जागा, एकान्त निर्जन वन, अशा ठिकाणी रहाण्यांत ज्याचे मन आनंदित होते, त्याचें तें रहाणे खरोखर सात्त्विक होय ३४.

वस्ती व्यवहारीं व्यापारीं । कां सद सन्मानें राजद्वारीं ।
विवाहामंडपामाझारीं । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥ ३५ ॥
व्यवहाराच्या किंवा व्यापाराच्या ठिकाणी वास्तव्य असणे, किंवा मोठ्या सन्मानाने राजदरबारांत राहणे, किंवा लग्नमंडपांत मिरविणे, अशा रीतीने असण्यांत ज्याला मनापासून प्रीति वाटते ३५,

ज्यासी आवडे धनसंपदा । निकटवासें वसती प्रमदा ।
जो नगरीं ग्रामीं वसे सदा । हे वस्ती संपदा राजस ॥ ३६ ॥
ज्याला धन, संपत्ति, सभोंवार तरुण स्त्रियांचा घोळका नेहमी असणे हें आवडते, जो नेहमी मोठमोठ्या शहरांत व गांवांत राहतो, ते त्याचे राहाणे राजस होय ३६.

जेथ सन्मान वांछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त ।
ऐसाइसी वस्ती जेथ । ते जाण निश्चित राजस ॥ ३७ ॥
जेथें मन सन्मानाची इच्छा करते, जे विषयासक्त होऊन नेहमी क्षुब्ध असते; अशा लोकांची वस्ती जेव्हां दृष्टीस पडेल, तेव्हां ती राजस म्हणून निश्चित समजावी ३७.

जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषीं दृष्टि वाढे ।
ऐशिया ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचें गाढें निवासस्थान ॥ ३८ ॥
जेथे साधूची निंदा होत असते, जेथे नेहमी दुसऱ्याचे गुणदोष पहाण्याकडेच दृष्टि वाढत असते, अशा ठिकाणी रहाणे ज्याला आवडते. ते स्थान पक्कें तामसाचे म्हणून समजावें ३८.

जेथ कलहाचें कारण । जेथ अविवेकी होय मन ।
वेश्या द्यूत मद्यसदन । हें निवासस्थान तामस ॥ ३९ ॥
जेथें कलहाचें मूळ असेल; जेथें मन अविचार करील; जेथे वेश्या, घृत व दारूचा अड्डा असेल; ते तामसाचे रहाण्याचे ठिकाण होय ३९.

देवालयीं घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती ।
साचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥ ३४० ॥
आणखी उद्धवा ! देवालयांतील रमणीय अशी माझी मूर्ति पाहुन ज्याच्या चित्तवृत्तीला आनंद होतो, तीच निर्गुणाची वस्ती होय ३४०.

अभेदभक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें निजघर ।
तेथ सुखत्वें ज्याची वृत्ति स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥ ४१ ॥
अभेदभावाच्या भक्ताचे जे घर, तेच माझे निर्गुणाचे वसतिस्थान होय. तेथें सुखाने ज्याची चित्तवृत्ति स्थिर होते, तीच खरोखर निर्गुणाची वस्ती होय ४१.

निर्गुणासी घरठावो । हें बोलणें म्हणसी वावो ।
जेथ उपजे ब्रह्मसद्भावो । ते वस्ती पहा हो निर्गुण ॥ ४२ ॥
परंतु निर्गुणाला घरदार आहे. हे बोलणेच मुळी व्यर्थ आहे, असें तूं म्हणशील, तर जेथें ब्रह्मभावना उत्पन्न होते, तीच निर्गुणाची वस्ती आहे. पहा ! ४२.

विषयातीत निजस्थिती । सुखें सुखरूप राहे वृत्ती ।
ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४३ ॥
उद्धवा! विषयापासून अलग व केवळ आनंदांत संतुष्ट राहणारी जी वृत्ति, तीच खरोखर निर्गुणाची वस्ती होय, हे लक्षात ठेव ४३.

सांडूनि आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न ।
वृत्ति स्थिरावे परिपूर्ण । ते वस्ती निर्गुण जनीं विजनीं ॥ ४४ ॥
आकाराचे ज्ञान सोडून देऊन निराकारामध्येच जो सुखी असतो, तेथेच ज्याची वृत्ति पूर्ण स्थिर होते, मग तेथे लोक असोत की नसोत, ती निर्गुणाची वस्ती म्हणून समजावें ४४.

त्रिगुणसंगें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणीं लक्षिजे चौथा ।
चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आतां सांगेन ॥ ४५ ॥
तीन गुणांच्या संबंधाने कर्तेही तीन प्रकारचे होतात. आणि निर्गुण लक्षणाचा कर्ता चौथा होय. त्या चारही कर्त्याची व्यवस्था आतां सांगतों ऐक ४५.

सात्त्विकः कारकोऽसङ्गी रागान्धो राजसः स्मृतः ।
तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः २६ ॥
[श्लोक २६] अनासक्त भावाने कर्म करणारा सात्त्विक होय अत्यंत आसक्त होऊन कर्म करणारा राजस होय कोणताही विचार न करता कर्म करणारा तामस होय आणि फक्त मलाच शरण येऊन कर्म करणारा निर्गुण समजावा. (२६)

कांटेनि कांटा फेडितां । जेवीं निवारे निजव्यथा ।
तेवीं संगें संगातें छेदितां । सात्त्विक कर्ता असंगी ॥ ४६ ॥
कांट्यानेच काटा काढून टाकला म्हणजे ज्याप्रमाणे आपले दुःख कमी होते, त्याप्रमाणे संगानेच संगाचा नाश करून टाकला असता सात्त्विक कर्ता असतो तो अलिप्त होतो ४६.

सद्गुरुचरणसत्संगें । सकळ संग छेदी विरागें ।
सात्त्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥ ४७ ॥
जो सात्त्विक कर्ता असतो, तो सद्गुरुचरणांच्या संगतीने विरक्तीच्या योगेंकरून सर्व संग नाहीसे करून टाकतो, आणि विषयाच्या संगतीत असूनही निसंग असतो ४७.

फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी ।
राजस कर्ता फळशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥ ४८ ॥
मनामध्ये फलाभिलाषाच्या गांठी असल्यामुळे विवेकाची दृष्टि अंध होऊन जाते. आणि अशा प्रकारे राजस कर्ता हा फळाच्या आशेला गुंतून अत्यंत भयंकर अशी कोट्यवधि दुःखें स्वतः सोशीत असतो ४८.

निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान ।
नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥ ४९ ॥
विचारज्ञान निखालस लयास जातें; स्मृति रानामध्ये स्वैर भटकत असते; कार्य काय व कारण काय याची आठवणच होत नाही; असा तामस कर्ता असतो हे लक्षात ठेव ४९.

अनन्य भावें हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण ।
कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥ ३५० ॥
अनन्यभावाने श्रीहरीला शरण जातो आणि कर्माचा चालक एक नारायण आहे असे समजून जो कधीही कर्माचा अभिमान धरीत नाही, तो खरोखर निर्गुण कर्ता होय ३५०.

त्रिगुणांची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध ।
येच अर्थींचें विशद । स्वयें गोविंद सांगत ॥ ५१ ॥
या तीन गुणांची श्रद्धाही तीन प्रकारची असते. आणि निर्गुणाची श्रद्धा शुद्ध असते. हीच गोष्ट स्पष्ट करून स्वतः श्रीकृष्ण सांगतात ५१.

सात्त्विकयाध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी ।
तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥ २७ ॥
[श्लोक २७] आत्मज्ञानविषयक श्रद्धा सात्त्विक, कर्मविषयक श्रद्धा राजस, अधर्माच्या ठिकाणी श्रद्धा तामस आणि माझी सेवा करण्यामध्ये श्रद्धा ही निर्गुण होय. (२७)

देह इंद्रिय चेतना प्राण । येणेंसीं स्फुरे जें मीपण ।
तेथ विवेक करूनियां पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥ ५२ ॥
देह, इंद्रिये, चेतना आणि प्राण येणेकरून मीपणाचा जो भास होतो, त्याचा पूर्ण विचार करून आपलें मीपण कसें आहे ते आपणच पाहतो ५२.

देह नव्हें मी जडमूढत्वें । इंद्रियें नव्हें मे एकदेशित्वें ।
प्राण नव्हें मी चपळत्वें । मन चंचळत्वें कदा मी नव्हे ॥ ५३ ॥
तो म्हणतो की, देह जड-मूढ असल्यामुळे तो देह तर मी नव्हें; इंद्रिये एकदेशीय असल्यामुळे तीही काही मी नव्हें, प्राण हा चपळ असल्यामुळे तोही मी नव्हे, आणि मन हे चंचळ असल्यामुळे तें तर मी खास नव्हें ५३.

चित्त नव्हें मी चिंतकत्वें । बुद्धि नव्हे मी बोधकत्वें ।
‘अहं’ नव्हें मी बाधकत्वें । मी तों येथे अनादिसिद्ध ॥ ५४ ॥
चित्त हे चिंता करीत असल्यामुळे तेही मी नव्हें. बोध होण्याचा धर्म असणारी बुद्धीही मी नव्हें. अहं हे बाधक असल्यामुळे तेही मी नव्हे, तर मी म्हणून जो आहे तो अनादिसिद्धच आहे ५४.

एवं मीपणाचें निजसार । विवंचूं जाणे बुद्धिचतुर ।
ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्त्विक नर सदा वाहती ॥ ५५ ॥
अशा प्रकारें बुद्धीनें जो चतुर असतो, तो मीपणामधील सार काय आहे त्याचा विचार करू शकतो. हीच श्रेष्ठ अध्यात्मश्रद्वा होय. आणि सात्विक पुरुष तीच नेहमी बाळगीत असतात ५५.

जें जें मी नव्हें म्हणत जाये । तें मी देखल्या मीचि आहें ।
माझ्या मीपणाचे वंदिल्या पाये । मीचि मी ठायें कोंदोनी ॥ ५६ ॥
आणखी जें जें मी नव्हें असें म्हणत असतो, ते ते पाहूं गेलें तर मीच असतों; म्हणून माझ्या मीपणाचे पाय धरले की, जिकडे तिकडे मीच भरून राहतों ५६.

हे आध्यात्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्त्विकापाशीं वसे सदा ।
आतां राजसाची श्रद्धा । ऐक प्रबुद्धा सांगेन ॥ ५७ ॥
हीच शुद्ध अध्यात्मश्रद्धा होय. ती नेहमी सात्त्विकापाशी असते. आता हे बुद्धिमंता ! राजसाची श्रद्धा कशी असते तीही ऐक ५७.

मी एक येथें वर्णाश्रमी । मी एक येथें आश्रमधर्मीं ।
मी एक येथें कर्ता कर्मीं । हें मनोधर्मीं दॄढ मानी ॥ ५८ ॥
येथे वर्णाश्रमाने राहणारा काय तो एक मी, आश्रमधर्माने वागणारा काय तो एक मी, येथे कर्म करणारा काय तो एक मी, हेच मनामध्ये स्तर धरून बसावयाचे ५८;

येणें भावार्थें कर्मतत्परू । कुशमृत्तिकेचा अत्यादरू ।
अतिशयें वाढवी शौचाचारू । विधिनिषेधां थोरू आवर्त भोंवे ॥ ५९ ॥
आणि ह्याच हेतूनें कर्माचे अवडंबर माजवावयाचें; दर्भ मृत्तिका, इत्यादि साहित्य मोठ्या अगत्याने जमा करावयाचें; शुचिर्भूतपणा तर इतका वाढवावयाचा की, त्याच्याभोंवतीं विधिनिषेधांचा भोवरा सारखे गिरके घेत असतो ५९.

दोषदृष्टीच्या रंगणीं । मिरवती गुणदोषांच्या श्रेणी ।
पवित्रपणाच्या अभिमानीं । ब्रह्मयासी न मनी शुचित्वें ॥ ३६० ॥
दोषदृष्टीच्या पटांगणाध्ये गुणदोषांच्या तर राशीच्या राशी पडून राहतात. पवित्रपणाच्या अभिमानाने तर काय, शुचिर्भूतपणामध्ये ब्रह्मदेवालाही तुच्छ मानतो ३६०.

देहाभिमान घेऊनि खांदा । सत्य मानणें कर्मबाधा ।
ते हे राजसाची कर्मश्रद्धा । जाण प्रबुद्धा उद्धवा ॥ ६१ ॥
उद्धवा ! देहाभिमान खांद्यावर घेऊन कर्मबाधा हीच सत्य मानावयाची. हे बुद्धिमता उद्धवा ! राजस श्रद्धा ती हीच होय ६१.

अधिक अविवेक वाढे । जेणें अकर्म अंगीं घडे ।
अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ॥ ६२ ॥
अधिक अविचार वाढत जातो, जेणेकरून हातून अकर्म घडते, आणि अधर्माचा लाभ होतो, ती श्रद्धा तामसाला आवडते ६२.

जेथ अपेयाचें पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण ।
अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥ ६३ ॥
ज्यांत स्वैरपणे अपेयाचे पान व पाहिजे तसें अभक्ष्यभक्षण जें होते, किंवा अगम्यागमनादि घडते, ती सारी श्रद्धा तामसी होय ६३.

अधर्म तोचि मानी धर्म । हें तामसी श्रद्धेचें वर्म ।
आतां निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ॥ ६४ ॥
अधर्म तोच धर्म मानावयाचा, हेच तामसी श्रद्धेतील मुख्य रहस्य आहे. आतां अति उत्तम अशी जी निर्गुण श्रद्धा, ती ऐक ६४.

सर्व भूतीं भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावंत ।
अनन्य भावें भूतां भजत । तो भजनभावार्थ निर्गुण ॥ ६५ ॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये परमेश्वरच भरलेला आहे अशीच श्रद्धा धरून जो एकनिष्ठेनें प्राणिमात्रांचेच भजन करतो, भजन व ती भक्ति निर्गुण होय ६५.

स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागीं कुरवंडी करित ।
अनन्य भावें जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥ ६६ ॥
बायकामुले , धनदौलत व प्राणसुद्धा जे माझ्यावरून ओवाळून टाकतात व एकनिष्ठेनं जे माझे भजन करतात, ती श्रद्धा खरोखर निर्गुण होय ६६.

चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षूनि चारी मुक्ती ।
ऐक्यभावें मज भजती । ते श्रद्धासंपत्ती निर्गुण ॥ ६७ ॥
चारही पुरुषार्थ टाकून, चारही मुक्ति दूर लोटतात आणि, ऐक्यभावनेने माझें भजन करतात, ती श्रद्धासंपत्ति निर्गुण होय ६७.

निष्काम नामस्मरण । निर्लोभ हरिकीर्तन ।
भावार्थें जें जें भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥ ६८ ॥
उद्धवा ! निष्काम होऊन नामस्मरण करणे, निर्लोभवृत्तीनें हरिकीर्तन करणे, अशा भक्तिभावनेनें जें माझें भजन करणे, तीच निर्गुण श्रद्धा होय ६८.

त्रिगुणांचा त्रिविध आहारू । स्वयें सांगे शार्ङ्गधरू ।
निर्गुण आहाराचा प्रकारू । सखोल विचारू हरि सांगे ॥ ६९ ॥
तीन गुणांचा आहारही तीन प्रकारचा आहे. तोही श्रीकृष्ण सांगतात, आणि निर्गुण आहाराचा विचार खोल असल्यामुळे तोही श्रीहरि सांगतात ६९.

पथ्यं पूतमनायस्तमाहार्यं सात्त्विकं स्मृतम् ।
राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥ २८ ॥
[श्लोक २८] आरोग्यदायी, पवित्र आणि अनायासे मिळालेले भोजन सात्त्विक होय जिभेला रूचकर वाटणारे अन्न राजस होय आणि दुःखदायी व अपवित्र आहार तामस जाणावा. (२८)

पवित्र आणि हळुवार । सत्त्ववृद्धीसी हितकर ।
अप्रयासीं प्राप्ति साचार । सात्त्विक आहार या नांव ॥ ३७० ॥
पवित्र असून हलके, सत्त्ववृद्धीला उपयुक्त आणि खरोखर फार प्रयास न पडता प्राप्त होणारे जें अन्न तोच सात्त्विक आहार होय ३७०.

अल्पाहार या नांव पथ्य । पवित्र म्हणिजे धर्मार्जित ।
तेंही अप्रयासानें प्राप्त । तो जाण निश्चित सात्त्विकाहार ॥ ७१ ॥
अल्पाहार याचेच नाव पथ्य, पवित्र म्हणजे धर्माने संपादन केलेले, आणि तेही विशेष प्रयत्नाशिवाय मिळालेलें असें अन्न असेल, तोच खरोखर सात्त्विक आहार होय ७१.

गोड खरपूस आंबट । तळींव घोळींव तिखट ।
चिरींव चोळींव तुरट । वळींव वळिवट आळिलें ॥ ७२ ॥
गोड, खरपूस, आंबट, तळलेले, घोळलेले, तिखट, चिरलेले, चोळलेलें, तुरट, वळलेले, वळीव, आळविलेले ७२,

रसीं रसांतरमिळणी । पन्हीं कालवणीं शिखरिणी ।
कुडकुडीं निर्पूस सणाणी । आहारभरणी राजस ॥ ७३ ॥
एका रसांत दुसरा रस मिसळलेला, पन्हीं, कालवणे, शिखरण, कुरकुरीत, खरपूस, झणझणीत असा आहार असेल तो राजस होय ७३.

नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी ।
रसनासुखाची अतिगोडी । तो आहार निरवडी राजस ॥ ७४ ॥
नानाप्रकारची आवड, चांगले सोललेलें सडीक अशा अन्नाची भक्ति, मिष्ट पदार्थांची मोठी गोडी, असा आहार असेल तो खरोखर राजस होय ७४ .

नाना परींचे आयास । करूनि अतिप्रयास ।
आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥ ७५ ॥
नानाप्रकारचे यत्न करून जीवापाड कष्ट सोसून राजस असतात ते जेवण जेवीत असतात. आतां तामसांचे भोजन ऐक ७५.

सेवितां दुर्गंधि उन्मादक । परिपाकें करे मूर्ख ।
अशुचि आणि सुःखदायक । हा आहार देख तामस ॥ ७६ ॥
जेवण जेवीत असता त्याला दुर्गध येईल, त्यापासून माद चढेल, असें तो मूर्ख करीत असतो. अमंगळ आणि दुःखदायक असा आहार असेल तो तामसाचा म्हणून समजावा ७६.

भगवंताचा भुक्तप्रमाद । साधुसज्जनांचें शेष शुद्ध ।
हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ‘च’ कारें गोविंद बोलिला ॥ ७७ ॥
भगवंताचा उच्छिष्ट प्रसाद, साधुसज्जनाचे उरलेलें पवित्र अन्न , हा निर्गुणाचा आहार प्रसिद्धच आहे. असें श्लोकांत ‘च’ या अक्षरानेच भगवंतांनी बोलून दाखविले ७७.

ग्रासोग्रासीं गोविंद । येणें स्मरणें अन्न शुद्ध ।
हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ‘च’ कारें गोविंद बोलिला ॥ ७८ ॥
ग्रासोग्रासीं ‘गोविंद’ ‘गोविंद’ असें स्मरण केल्याने अन्न शुद्ध होते. हाच प्रसिद्ध निर्गुणाचा आहार होय. असें ‘च’ या अक्षराने श्रीकृष्णांनी सांगितले ७८.

‘अन्नं ब्रह्म अहं च ब्रह्म’ । पंक्तीकर तोही ब्रह्म ।
ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वें ॥ ७९ ॥
अन्न हें ब्रह्म, मीही ब्रह्म, आणि पंक्तीस असणाराही ब्रह्मस्वरूपच होय. असा ज्याचा भोजनाचा परिपाठ असतो, त्याचा तोही निर्गुणाचाच श्रेष्ठ आहार होय ७९.

त्रिगुणांचें त्रिविध सुख । निर्गुण सुख अलोलिक ।
त्याही सुखाचा परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥ ३८० ॥
तीन गुणांचे सुखही तीन प्रकारचे असते, आणि निर्गुणाचे सुख तर अलौकिक आहे. त्या सुखाचा प्रकारही यदुनायक जे श्रीकृष्ण ते स्वतः सांगतात ३८०.

सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् ।
तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम् ॥ २९ ॥
[श्लोक २९] आत्मचिंतनाने प्राप्त होणारे सुख सात्त्विक, विषयांपासून प्राप्त होणारे राजस, मोह आणि दीनतेने प्राप्त होणारे सुख तामस आणि जे सुख माझ्या आश्रयाने मिळणारे ते गुणातीत समजावे. (२९)

सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती ।
ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्त्विक ॥ ८१ ॥
विषयसुखाची स्फूर्ति सोडून देऊन आत्मसुखानेच चित्तवृत्ति आनंदित होणे, अशी जी आत्मसुख प्राप्ति ते सुख खरोखर सात्विक होय ८१.

गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती ।
तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥ ८२ ॥
गंगेच्या पुराला भरती आली असता त्यामुळे ओढे नाले जसे भरून जातात, त्याप्रमाणे आत्मसुखाचा लाभ झाला की, त्या आनंदाने इंद्रियांचीही तृप्ति होऊन जाते ८२.

नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड ।
विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥ ८३ ॥
नानाप्रकारच्या विषयांची आवड, इंद्रियांचा अतिशय धुमाकूळ, विषयसुखच गोड लागणे, तें खरें राजस सुख होय ८३.

अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी ।
तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ८४ ॥
आणखी उद्धवा ! अत्यंत निंद्य आणि माद चढणारें जें सुख असते, तेंच बुद्धीला आवडणे हीच खरोखर तामससुखाची सिद्धि होय ८४.

हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती ।
त्यावरी जे होय सुखप्राप्ती । तें सुख निश्चितीं निर्गुण ॥ ८५ ॥
हृदयामध्ये माझी मूर्ति प्रगट झाली की, संसाराची इच्छा विसरून जाते आणि त्यानंतर जो सुखाचा लाभ होतो, तें सुख खरोखर निर्गुण सुख होय ८५.

सर्व भूतीं वसे भगवंत । तोचि मी हा तात्त्विकार्थ ।
ऐसेनि मदैक्यें सुखप्राप्त । तो निजसुखार्थ निर्गुण ॥ ८६ ॥
सर्व प्राणिमात्रांमध्ये परमेश्वर राहतो तोच मी, हे तत्त्व ओळखून तशा माझ्या ऐक्यानेच जे सुख प्राप्त होते तेच निर्गुणाचे खरे आत्मसौख्य होय ८६.

देखिल्या निजात्मसुखस्वरूप । स्वयें होइजे सुखरूप ।
हे निर्गुणसुखाचे निजदीप । झडल्या पुण्यपाप पाविजे ॥ ८७ ॥
आत्मस्वरूपाच्या सुखाचे स्वरूप दृष्टीस पडले म्हणजे आपण स्वतःही सुखस्वरूप होतो. पापाचा आणि पुण्याचा झाडा झाला म्हणजेच हे निर्गुणसुखाचे दीप हाती लागतात ८७.

आपण सुखस्वरूप सर्वांगीं । सुखस्वरूप स्वयें भोगी ।
हे निर्गुण सुखाची मागी । भक्तीं अंतरंगीं भोगिजे ॥ ८८ ॥
आपण सर्वांगाने सुखस्वरूप झालों म्हणजे स्वतःच त्या आनंदाचा उपभोग घ्यावयास मिळतो. हा निर्गुण सुखाचा मार्ग भक्तांनीच आपल्या अंत:करणांत भोगावा ८८.

कल्पांताचें पूर्ण भरितें । उरों नेदी नदीनदांतें ।
तेवीं निर्गुण सुख येथें । देहेंद्रियांतें उरो नेदी ॥ ८९ ॥
कल्पांतजलप्रलयाचे पूर्ण भरते आले म्हणजे ते नदीनाले काहीएक उरूं देत नाही. त्याप्रमाणे निर्गुण सुखही देहेंद्रियांना उरूं देत नाही ८९.

जेवीं मृगजळीं जळ नाहीं । तेवीं परब्रह्माच्या ठायीं ।
प्रपंच स्पर्शिलाचि नाहीं । तें सुख निर्वाहीं निर्गुण ॥ ३९० ॥
मृगजळांत ज्याप्रमाणे पाणी असत नाही, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा स्पर्शसुद्धा नाही. तें जें सुख भोगणें तेंच निर्गुण होय ३९०.

ज्या सुखासी मर्यादा । करितां न करवे कदा ।
सुखें सुखस्वरूप होइजे सदा । हे सुखसंपदा निर्गुण ॥ ९१ ॥
ज्या सुखाला मर्यादा म्हणून कधी घालतांच येत नाही, सदासर्वकाल सुखाने सुखस्वरूप होऊन रहाता येते, ती सुखसंपदा निर्गुणाची होय ९१.

त्रिगुण आणि निर्गुण । यांचें दाविलें भेदलक्षण ।
आतां त्याचें उपसंहरण । ग्रंथांती जाण हरि करि ॥ ९२ ॥
त्रिगुण आणि निर्गुण ह्यांतील भेदाचे लक्षण याप्रमाणे श्रीहरींनी दाखवून दिले. आतां ग्रंथाच्या शेवटी त्याचा उपसंहार करतात ९२.

द्रव्यं देश फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः ।
श्रद्धावस्थाऽऽकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥ ३० ॥
[श्लोक ३०] वस्तू, स्थान, फल, काल, ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा अवस्था, निरनिराळी शरीरे आणि निष्ठा हे सर्व त्रिगुणात्मकच आहे. (३०)

द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्दें वनग्रामभेद ।
फळशब्दें सुख‍उद्‌बोध । सत्त्वसंबंध विभागें ॥ ९३ ॥
‘द्रव्य’ शब्दानें तीन प्रकारचा आहार, ‘देश’ शब्दानें वन व ग्राम यांतील भेद. ‘फळ’ शब्दानें सुखाचा बोध, येणेप्रमाणे सत्त्वसंबंधाचे विभाग आहेत ९३.

काळशब्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नांव ज्ञान ।
कर्म म्हणिजे मदर्पण । कर्ता तो जाण असंगीं ॥ ९४ ॥
‘काळ’ शब्दानें भगवद्गजन समजावें. ‘कैवल्यनिष्ठा’ ह्याचें नांव ज्ञान. कर्म म्हणजे मला अर्पण करणे आणि कर्ता तो अलिप्त हें लक्षात ठेव ९४.

श्रद्धाशब्दें आध्यात्मिकी । अवस्थाशब्दें जागरणादिकी ।
आकृतिशब्दें उपरिलोकीं । देवतादिकीं क्रीडन ॥ ९५ ॥
‘श्रद्धा’ शब्दानें आध्यात्मिकी श्रद्धा असे समजावे. ‘अवस्था’ शब्दाने जागरणादिक असे समजावें. ‘आकृति ‘ शब्दाने ऊर्ध्व लोकांतील देवतादिकांचे विलास म्हणून समजावे ९५.

जो गुण वाढे देहांतीं । जेणें गुणें होय अंतःस्थिती ।
त्या नांव निष्ठा म्हणती । जाण निश्चतीं उद्धवा ॥ ९६ ॥
देहांती जो गुण वाढतो, किंवा उद्धवा ! ज्या गुणाने अंतःस्थिति होते, त्याला खरोखर निष्ठा असे म्हणतात ९६.

भिन्न भिन्न भाग अनेक । किती सांगूं एकेक ।
अवघें जगचि त्रिगुणात्मक । जाण निष्टंक निजभक्ता ॥ ९७ ॥
असे ह्याचे भिन्न भिन्न अनेक भाग आहेत. ते एकेक किती म्हणून सांगू? माझ्या भक्ताला सारे जग हेच खरोखर त्रिगुणात्मक आहे ९७.

संसार समस्त त्रिगुण । यांमाजीं मी अवघा निर्गुण ।
हे तुज कळावया निजखूण । गुणानिरूपण म्यां केलें ॥ ९८ ॥
सर्व संसार तीन गुणांनीच भरलेला आहे. ह्यांत निर्गुण असा एक मीच . हें रहस्य तुला कळण्याकरिता मी गुणांचे निरूपण केलें ९८.

सर्वे गुणमया भावाः पुरुषाव्यक्तधिष्ठिताः ।
दृष्टं श्रुतमनुध्यातं बुद्धया व पुरुषर्षभ ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] हे पुरूषश्रेष्ठा ! पुरूष आणि प्रकृती यांच्या आश्रयाने असणारे सर्व पदार्थ गुणमय आहेत मग ते इंद्रियाच्या अनुभवाचे असोत, शास्त्रांनी सांगितलेले असोत अथवा बुद्धीने विचार केलेले असोत. (३१)

देखिजे अथवा ऐकिजे । कां मनें जें जें चिंतिजे ।
तें तें अवघेंचि जाणीजे । मायागुणकाजें त्रिगुणात्मक ॥ ९९ ॥
आपण जें जें पहातों किंवा ऐकतों, किंवा ज्याचें ज्याचे चिंतन करतो , तें तें सारेच मायेच्या गुणांच्या कार्याने त्रिगुणात्मकच झालेले आहे असे समजावें ९९.

करावया त्रिगुणांचें मर्दन । प्रकृतिनियंता पुरुष भिन्न ।
तो सर्वदा सर्वांगें निर्गुण । वर्तवी गुण निजसत्ता ॥ ४०० ॥
ह्या तीन गुणांचे निरसन करण्यासाठी प्रकृतीचा नियंता जो पुरुष आहे, तो प्रकृतीपासून भिन्न आहे. तो सदासर्वदा सर्वांगाने निर्गुण असून आपल्या सत्तेनेच गुणांना वागवीत असतो ४००.

पुरुषावेगळें समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत ।
त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥ १ ॥
उद्धवा ! पुरुषाशिवाय प्रकृतीचे म्हणून जेवढे सर्व कार्य आहे, तें मिथ्याभूत समजावें. त्याला खरोखर त्रिगुणात्मक असें म्हणतात, हे लक्षात ठेव १.

नरदेह पावोनियां येथ । जे न साधिती गुणातीत ।
ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥ २ ॥
येथे नरदेह प्राप्त झाला असूनही जे गुणातीतता साधीत नाहीत, ते स्पष्ट नाडले व त्यांचा स्वार्थ बुडाला म्हणून समजावें २.

तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती ।
तेव्हांचि तूं गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥ ३ ॥
पण तुझी बुद्धि काही तशी नाही. तूं भगवद्भक्तीचा अंगीकार केलास, त्याच वेळेस तूं खरोखर गुणातीतपणा पावलास ३.

हरिभक्तांमध्यें वरिष्ठ । यालागीं निजमुखॆं वैकुंठ ।
उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥ ४ ॥
उद्धव हा हरिभक्तांमध्ये श्रेष्ठ होता, म्हणून श्रीकृष्ण आपल्या मुखाने उद्धवाला म्हणाला, हे पुरुषश्रेष्ठा ! भाग्याने तूंच एक श्रेष्ठ आहेस ४.

त्रिगुणगुणीं सविस्तारू । दृढ वाढला संसारतरू ।
त्याचे छेदाचा कवण प्रकारू । तो शार्ङ्गधरू सांगत ॥ ५ ॥
या तीन गुणांच्याच विस्ताराने संसारस्वरूप वृक्ष खूप फोफावला आहे. तो छेदण्याचा प्रकार कसा आहे, तें श्रीकृष्ण सांगतात ५.

एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः ।
येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः ।
॥ ३२ ॥
[श्लोक ३२] जीवाला योनी किंवा गती त्या त्या गुणकर्मानुसार मिळतात हे सौम्य ! जो जीव चित्तात उत्पन्न होणार्‍या विकारांवर विजय मिळवतो, तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो आणि त्यामुळे माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. (३२)

सत्त्वादि तिन्ही गुण एथ । केवळ आणी मिश्रित ।
पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मीं निश्चित बांधोनी ॥ ६ ॥
ह्यांत सत्वादी तिन्ही गुण, शुद्ध असोत, की मिश्रित असोत, ते पुरुषाला गुणांनी खरोखर बद्ध करून संसारी बनवितात ६.

त्रिगुणकर्मांस्तव जाण । जीवासी झालें दृढ बंधन ।
जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥ ७ ॥
घड्यांतील पाणी ज्याप्रमाणे त्यांत सूर्य प्रतिबिंबरूपाने अडकला आहे असे दाखवितें, त्याप्रमाणे ह्या तीन गुणकांमुळेच जीवाला दृढतर बंधन प्राप्त झाले आहे ७.

घटीं भरल्या समळ जळ । त्यामाजीं रवि दिसे समळ ।
घटींचें डोलतांचि जळ । कापें चळचळ रविबिंब ॥ ८ ॥
घागरीत गढूळ पाणी भरले असले तर, त्यामध्ये पडलेलें सूर्याचे प्रतिबिंबही मळकेंच आहे असे दिसते, किंवा घागरीतले पाणी हालत राहिले तर त्यांतील, सूर्यबिंबही चळचळा कापू लागते ८.

तेवीं त्रिगुणांचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण ।
तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥ ९ ॥
त्याप्रमाणे तीन गुणांचे जे कर्माचरण आहे, तेंच शुद्ध ब्रह्माला जीवपणा आणते, तें जीवाचे बंधन तोडण्याकरितां भगवद्भजन साधावें ९.

जितावया गुणबंधन । रिघावें सद्गुरूसी शरण ।
तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्त्वगुण अतिशुद्ध ॥ ४१० ॥
गुणांचे बंधन जिंकण्यासाठी सद्गुरूला शरण जावें. माझ्याच भावनेने सद्गुरूचे ठिकाणी भजन कलें असतां अत्यंत शुद्ध असा सत्त्वगुण वाढतो ४१०.

पायीं जडली लोहाची बेडी । ते लोहेंचि लोहार तोडी ।
तेवीं सत्त्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥ ११ ॥
पायांत लोखंडाची बेडी पडली, तर ती लोहार लोखडानंच तोडून काढतो, त्याप्रमाणे सत्त्वगुणाची वाढ झाली म्हणजे गुरुराजच तिन्ही गुणांना तोडून टाकतो ११.

तेथ प्रवेशावया गुणातीतीं । अवश्य करावी गुरुभक्ती ।
जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥ १२ ॥
याकरितां गुणातीत व्हावयाचे असेल तर गुरुभक्ति अवश्य करावी. गुरुभजनावर जे विश्वास ठेवतात, त्यांच्या चारही मुक्ति दासी होतात १२.

ज्यासी गुरुचरणीं भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो ।
तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥ १३ ॥
गुरूच्या चरणाच्या ठायीं ज्याची भगवद्भावना असते, त्याच्या सेवेला ब्रह्मभावनाही येत असते. आणखी अहो ! पहा की, तेथें ब्रह्मभावनेबरोबरच मी देवाधिदेव अंतर्बाह्य तिष्ठत उभा असतों १३.

जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसंपन्न ।
गुरुरूपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥ १४ ॥
जो अनन्यभावाने गुरुचरणाला शरण जातो, तो सहज ब्रह्मस्वरूप होतो. गुरूरूपाने माझं भजन केलें असतां माझ्या भक्ताला ब्रह्मसुख प्राप्त होतें १४.

उद्धवा ऐसें माझें भजन । समूळ जाणशी तूं संपूर्ण ।
यालागीं ‘सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ॥ १५ ॥
उद्धवा ! असें माझें भजन तूं पूर्णपणे जाणतोसच असें म्हणून श्रीकृष्णांनी त्याला ‘सौम्य’ असे स्वमुखाने संबोधिलें १५.

भाग्यें नरदेह पावल्या जाण । अवश्य करावें माझें भजन ।
येचि अर्थींचें निरूपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥ १६ ॥
मोठ्या भाग्याने मनुष्यदेह प्राप्त झाला असतां अगत्यपूर्वक माझं भजन करावे. ह्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगतात १६.

भक्तियोगेन मन्निष्ठो मद्भावाय प्रपद्यते ।
तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] म्हणून शहाण्या माणसांनी तत्त्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्ती करून देणारे हे मनुष्यशरीर मिळाल्यावर गुणांची आसक्ती दूर करून माझेच भजन करावे. (३३)

ज्या नरदेहाकारणें । अमर उत्कंठित मने ।
त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥ १७ ॥
ज्या मनुष्यदेहाच्या प्राप्तीसाठी देवादिकही मनापासून उत्कंठित असतात, तो देह आपल्याला प्राप्त झाला असतां आपण अखंड ज्ञान संपादन करावं १७.

नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान ।
तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनि ॥ १८ ॥
नरदेह प्राप्त झाला म्हणून ब्रह्मज्ञान हे काही आपोआपच प्राप्त होत नाही. याकरितां देहाभिमान सोडून माझेच भजन करावें १८.

करितां माझें अनन्य भजन । सहजें वाढे सत्त्वगुण ।
सत्त्वगुणास्तव जाण । उपजेज्ञान सविवेक ॥ १९ ॥
माझें अनन्यभावाने भजन केले असता सत्त्वगुण सहजच वाढतो. आणि त्या सत्त्वगुणापासूनच विवेकयुक्त ज्ञान उत्पन्न होते १९.

विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती ।
शोधितसत्त्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥ ४२० ॥
विवेकज्ञानाने युक्त अशी वृत्ति झाली म्हणजे रज आणि तम हे दोन्ही झडून जातात. आणि शुद्धसत्त्वाच्या स्थितीमध्ये अभेदभक्ति मोठ्या उल्हासाने वाढते ४२०.

करितां माझें अभेद भजन । होय स्वानंदाचे स्वादन ।
त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥ २१ ॥
माझे अभेदभजन केले असतां आत्मानंदाचा आस्वाद प्राप्त होतो. आणि त्यालाच विज्ञान असे म्हणतात. तेथें तीनही गुण मिथ्या आहेत असा निश्चय होतो २१.

नरदेह जोडलिया हातीं । प्राण्यासी एवढी प्राप्ती ।
यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥ २२ ॥
नरदेह प्राप्त झाला असता प्राण्याला एवढा लाभ होतो. याकरिता मनुष्यदेहामध्ये सर्वानी भक्ति अवश्य करावी २२.

हें भागवतींचें अतिगुह्य ज्ञान । मुख्यत्वेंसी भक्तिप्राधान्य ।
भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥ २३ ॥
भागवतांतील हेंच अत्यंत गुह्य ज्ञान होय. तें मुख्यतः भक्तिप्रधान आहे. भक्तिभावाने माझे भजन केले असतां स्त्रिया व शूद्रसुद्धा उद्धरून जातात २३.

नरदेह जोडल्या जाण । माझी भक्ति करिती विचक्षण ।
भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ २४ ॥
म्हणून नरदेह प्राप्त झाला असता ज्ञाते लोक माझीच भक्ति करतात, आणि माझ्या भजनानेंच गुणागुण जिंकून स्वतः परिपूर्ण ब्रह्मस्वरूप होतात २४.

पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती ।
तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥ २५ ॥
पूर्ण ब्रह्माच्या प्राप्तीसाठी माझी निरपेक्ष भक्ति करावी. तोच भजनाचा प्रकार श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा श्लोकार्थाने दृढ करून दाखवितात २५.

गुणसङ्ग विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः
निःसङ्गो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रियः ॥ ३४ ॥
रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः ।
सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥ ३५ ॥
[श्लोक ३४-३५] विचारवंताने सावध राहून सत्त्वगुण अंगीकारून रजोगुण आणि तमोगुण यांवर विजय मिळवावा इंद्रियांवर ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावे. (३४)
चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्त्वगुणावरसुद्धा विजय मिळवावा, अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. (३५)

करूनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती ।
ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥ २६ ॥
विषयांची विरक्ति धरावी आणि अंत:करणांत मुक्तीची इच्छा मुळीच करूं नये. अशा रीतीनें माझी निरपेक्ष भक्ति अधिकाधिक प्रेमाने करावी २६.

तेणें अनिवार सत्त्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी ।
दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥ २७ ॥
तेणेंकरून अपरंपार सत्त्वशुद्धि होते, आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी खरोखर भगवदबुद्धि वाढत असते. साधकांना हीच भजनसिद्धि आहे. २७.

ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण ।
सर्वेंन्द्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥ २८ ॥
अशा रीतीने माझें भजन केलें असतां विस्मरणालाच मरण येते, आणि सर्वेद्रियांमध्ये सावधपणा सहजच ठसून राहातो २८.

तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन ।
शुद्धसत्त्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥ २९ ॥
त्या वेळी रज आणि तम हे दोन्ही गुण निखालस नष्ट होऊन जातात, आणि त्या योगाने शुद्ध सत्त्वाच्या स्फूर्तीनें साधकांना पूर्ण आत्मानंद लाभतो २९.

केवळ उरल्या सत्त्वगुण । साधकां ऐसें स्फुरे स्फुरण ।
जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥ ४३० ॥
केवळ शुद्ध सत्वगुण शिल्लक राहिला म्हणजे साधकाला असें स्फुरण होऊ लागते की, जगामध्ये मीच काय तो पावन व अत्यंत धन्य आहे ४३०.

मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद ।
ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्त्वबोध साधकां ॥ ३१ ॥
मला शुद्ध आत्मज्ञान प्राप्त झाले, माझ्यामध्ये परमानंद प्रकट झाला, असा जो काय सुखाचा अनुभव तोच सत्त्वाचा बोध झालेल्या सात्त्विकांना असतो ३१.

ऐसा उरला जो सत्त्वगुण । तो निवारावया साधन कोण ।
मी स्वयें सुखस्वरूप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥ ३२ ॥
पण असा जो सत्त्वगुण शिल्लक राहतो, तो निवारण व्हावयाला साधन कोणते ? मी स्वतः तर सुखस्वरूपच आहे, आणि मला सुखाचा अनुभव होणे हीच माया होय ३२.

गूळ गुळा गोडपणें पांगे । कीं दुधा दूध गोड लागे ।
तैसा सुखरूप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥ ३३ ॥
गूळ हा गुळालाच गोडपणाने श्रेष्ठ करतो काय ? किंवा दुधालाच दूध गोड लागते काय ? ह्याप्रमाणे मीच सर्वांगाने सुखस्वरूप असा सुखोपभोगानें व्यर्थ का फुगावे ? ३३.

ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्त्वगुण स्वरूपीं विरे ।
तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥ ३४ ॥
अशी साधकामध्ये स्फूर्ति स्फुरत असते तोच सत्त्वगुण आत्मरूपामध्ये लयास जातो. तेव्हां सुखाचाही अनुभव संपतो, आणि आत्मसुख व आत्मशांतीच काय ती बाकी राहते ३४.

ऐसे निवारल्य तिनी गुण । केवळ उरे निर्गुण ।
तेचि अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ३५ ॥
अशा प्रकारे तीन गुण नाहीसे झाले म्हणजे केवळ निर्गुणच बाकी राहते. त्याच अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात ३५.

संपद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् ।
जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ।
मयैव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥ ३६ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादास्कन्धे पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
[श्लोक ३६] जीवभावातून मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणार्‍या विकारांपासूनही मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो मग त्याचे कोठेही येणेजाणे होत नाही. (३६)

वाढल्या सत्त्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्त्वविवेक ।
पाठीं विवेकेंसीं सत्त्व देख । हारपे निःशेख निजात्मरूपीं ॥ ३६ ॥
सत्त्वगुणाचा हर्ष वाढला असतां शुद्ध सत्त्वविवेक त्या हर्षाला नष्ट करितो, आणि नंतर विवेकासह सत्त्व आत्मस्वरूपामध्ये निखालस लीन होऊन जातें ३६.

ऐसे निमाल्या तिनी गुण । निमे कार्य कर्म कारण ।
लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥ ३७ ॥
अशा प्रकारे तीन गुणांचा नाश झाला असतां कार्य, कर्म आणि कारण ही नाहीसे होते; सर्व लिंगदेहच नाश पावतो; आणि जीवाचे जीवपणच मिथ्या होते ३७.

तेव्हा कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता ।
ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥ ३८ ॥
तेव्हां कार्य, कर्म, कर्ता; किंवा भोग्य, भोग आणि भोक्ता; ज्ञान, ज्ञेय, किंवा मीच काय तो एक ज्ञाता ह्या त्रिपुटींची गोष्टच रहात नाहीं ३८.

ऐसें हारपल्या जीवपण । स्वयें सहजें निजनिर्गुण ।
हो‍ऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनि ॥ ३९ ॥
ह्याप्रमाणे जीवपण लयास गेले असता तो स्वतः सहज निर्गुण होऊन व अहंसोहंपणा सोडून परिपूर्ण ब्रह्मच होऊन राहतो ३९.

यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण ।
तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४० ॥
ह्याप्रमाणे माझे भक्त असतात ते परिपूर्ण ब्रह्म होतात. तेच पूर्ण ब्रह्म होण्याचे लक्षण अर्ध्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात ४४०.

प्रपंच एक पूर्वीं होता । हे समूळ मिथ्या वार्ता ।
पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥ ४१ ॥
पूर्वी प्रपंच म्हणून एक होता, ही गोष्टच मुळी सर्वस्वी खोटी होय. अर्थात् पुन्हा तो होईल असेंही मुळीच घडावयाचें नाहीं ४१.

जैसे आंत बाहेरी भाग । नेणे साखरेचें अंग ।
तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥ ४२ ॥
ज्याप्रमाणे साखरेचे अंग आंतला व बाहेरचा भाग निरनिराळा समजत नाहीं (ती सर्वांगाने सारखीच गोड असते ), त्याप्रमाणे ब्रह्म हे अंतर्बाह्य दोषरहित आणि निजानंदाने परिपूर्ण असते ४२.

ऐसें पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण ।
प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥ ४३ ॥
असे परिपूर्ण ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले असतां साधकाला मरण येतच नाही. इतक्याउपर प्रारब्धाने आयुष्य शिल्लक असले, तरी त्याला देहाभिमानाची बाधा नसते ४३.

बाह्य न देखे दृश्यदर्शन । अंतरीं नाहीं विषयस्फुरण ।
देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥ ४४ ॥
तो बाहेरचे दृश्य पदार्थ पहात नाही. त्याच्या अंत:करणांत विषयाचे स्फुरण नसते व देहाचे देहपणही तो पाहात नाही. ह्याचंच नांव जीवन्मुक्तीचे लक्षण ४४,

बाह्य देखे दृश्यप्रतीती । अंतरीं विषयांची आसक्ती ।
या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥ ४५ ॥
बाहेर दृश्य सुखाचा अनुभव घ्यावयाचा, आणि हृदयांत विषयांची आसक्ति धरावयाची, ह्याचेच नाव अज्ञानाची स्थिति. ही अविद्येची शक्ति असून बाधक आहे ४५.

तें निरसावया अविद्याबंधन । अवश्य करावें माझें भजन ।
हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥ ४६ ॥
हें अविद्येचे बंधन तोडण्याकरितां अगत्यपूर्वक माझें भजन करावे. हेच मनांत आणून साधुसंतांनी भक्तीला प्राण विकलेला असतो ४६.

माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती ।
तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामाऱ्या ॥ ४७ ॥
माझ्या भक्तीहून उत्तम अशी दुसरी गति नाही. आणि तें भजन अभेदभावाने केले असतां चारी मुक्ति दासी होतात ४७.

हृदयीं विषयाची विरक्ती । वरी अभेदभावें माझी भक्ती ।
तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥ ४८ ॥
हृदयांत विषयाची विरक्ति असून वर अभेदभावाने माझी भक्ति असेल, आणि तें भजन अनन्यभावनेचं असेल, तर मी श्रीकृष्ण त्याचा आज्ञाधारक आहे ४८.

भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरूपीं निजभावार्थ ।
येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥ ४९ ॥
भक्ति या शब्दाचा अर्थ इतकाच की, माझ्या स्वरूपावर अभेदपणाने भाव धरणे. ह्या योगानेंच परमार्थाचा लाभ होतो. शास्त्राची सफलता ती हीच होय ४९.

माझिये भक्तीचेनि नांवें । पशु पक्षी उद्धरावे ।
मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥ ४५० ॥
माझ्या भक्तीच्या नांवाने मी जर पशुपक्ष्यांचा उद्धार करितों, तर मनुष्यांनी भक्तिभावाने माझं भजन केल्यास मला त्यांना निजधामाला नेणे भागच आहे ४५०.

यालागीं सांडोनि व्युत्पत्ती । जाणतीं नेणतीं गा समस्तीं ।
भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥ ५१ ॥
ह्याकरितां विद्वत्ता एका बाजूस ठेवून जाणत्यांनी व नेणत्यांनी सर्वांनीच भाव धरून भगवद्भक्ति करावी, म्हणजे अनायासेंच आत्मस्वरूपाचा लाभ होतो ५१.

भावें करितां माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण ।
सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥ ५२ ॥
भाव धरून माझें भजन केले असतां आपोआपच तिन्ही गुणांचा नाश होतो, आणि आपले निर्गुणत्व आपोआप प्रकट होते. हे सत्य समजावें असें श्रीकृष्णांनीच सांगितले ५२.

जेथ उगवली गुणगुंती । तेथ प्रकटे निजशांती ।
हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५३ ॥
गुणांची गुंतागुंत जेथे संपते, तेथें आत्मशांति प्रकट होते. हेच या अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला ५३.

यालागीं जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वृत्ती ।
सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥ ५४ ॥
म्हणून जेथें भगवद्भक्ति असते, तेथे वृत्तीला गुणांवर जय लाभतो आणि सहज आत्मशांति प्राप्त होऊन स्वतःसिद्धच आत्मस्वरूप प्राप्त होते ५४.

ते निजभक्ती माझी जननी । ज्या पैठा केलों जनार्दनचरणीं ।
एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥ ५५ ॥
तीच आत्मभक्ति माझी माता आहे. ज्या जनार्दनाने मला त्या भक्तीजवळ पोचविलें, त्या जनार्दनाच्या चरणांशी हा एकनाथ तल्लीन होऊन भजन करितो ५५.

पुढिले अध्यायीं कथा गहन । ऐल‍उर्वशीउपाख्यान ।
ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥ ५६ ॥
पुढच्या अध्यायांतील ऐल-उर्वशी उपाख्यानाची कथा मोठ्या बहारीची आहे. ज्या अध्यायाचे पठण केले असता अगम्यागमनाचेही दोष नाश पावतात ५६,

ज्या पुरूरव्याची विरक्ती । स्वमुखें वर्णील श्रीपती ।
वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥ ५७ ॥
त्यांत पुरूरव्याच्या ज्या विरक्तीचे वर्णन श्रीकृष्ण आपल्या मुखाने करतील. त्या वैराग्याच्या योगाने निजात्मप्राप्ति होते. भाग्यवान् लोकच तें वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतात ५७.

त्या वैराग्याचें निरूपण । अतिगोड निरूपी श्रीकृष्ण ।
श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी ॥ ५८ ॥
त्या वैराग्याचे निरूपण श्रीकृष्णांनी फारच रसभरित केले आहे. तेव्हां श्रोत्यांनी कृपा करून कथेकडे नीट लक्ष द्यावें ५८.

जे कथेचेनि अवधानें । दुरितदोष होती दहनें ।
ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणें । हो‍ऊनि ठाकणें चिन्मात्र ॥ ५९ ॥
ज्या कथेला अवधान दिले असतां महापातकादि दोष जळून जातात, ब्रह्मामध्येच ब्रह्मस्वरूप पावता येते, आणि ज्ञानस्वरूपाने राहतां येते ५९,

एवढ्या निरूपणाची गोडी । पुढिले अध्यायीं आहे फुडी ।
एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीप्रापक ॥ ४६० ॥
त्या निरूपणाची गोडी पुढल्या अध्यायांत उत्कृष्ट आहे. एकनाथावर जनार्दनाची थोर कृपा आहे, ती त्याला त्यांतून पैलथडीला पोचविणारी आहे ४६०.

भावें धरितां जनार्दनचरण । बांधू न शके बाधकपण ।
एका जनार्दना शरण । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ४६१ ॥
भक्तिभावाने जनार्दनाचे चरण धरले असता दुःखाची बाधा होऊ शकत नाही. एकनाथ जनार्दनाला शरण आहे. पुढे रसाळ निरूपण आहे ४६१.

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
गुणनिर्गुणनिरूपणं नाम पंचविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
पंचविसावा अध्याय समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्लोक ॥ ३६ ॥ ओव्या ॥ ४६१ ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: satsangdhara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *