एकनाथी भागवत अध्याय 26
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्कारण ।
कार्यकारणातीत चिद्घन । जय जनार्दन जगद्गुरू ॥ १ ॥
हे देवा जगन्मोहना ! हे मोहिनीच्या मोहकपणाला मूळ कारण होणाऱ्या देवा ! तुला नमस्कार असो. कार्यकारणातीत व ज्ञानस्वरूप अशा जगद्गुरू जनार्दनाचा जयजयकार असो १.
जगासी पडे मायामोहन । तें तूं निर्दळिसी ज्ञानघन ।
जगीं जगद्रूप जनार्दन । कृपाळू पूर्ण दीनांचा ॥ २ ॥
जगावर मायेचा जो मोह पडतो, तो अज्ञानस्वरूप असल्याकारणाने दूर करतोस. जगामध्ये सर्व जगद्रूपाने जनार्दनच आहे. तो दीनांचा पूर्ण कृपाळू आहे २.
दीनासी देवमाया स्त्रीरूपें । भुलवी हावभावखटाटोपें ।
तें स्त्रीमोहादि मोहक रूपें । जनार्दनकृपें निर्दळिती ॥ ३ ॥
देवाची माया स्त्रियेच्या रूपाने हावभाव व नेत्रकटाक्षांनी मोह घालून दीनदुबळ्यांना भुरळ घालते. पण स्त्रियेच्या मोहासारखी मोहक असणारी अशी जी सर्व स्वरूपें , ती जनार्दनाच्या कृपेनें नाश पावतात ३.
जेथ वैराग्य वाढे संपूर्ण । तेथ जनार्दनाची कृपा पूर्ण ।
वैराग्य तेथ ब्रह्मज्ञान । सहजें जाण ठसावे ॥ ४ ॥
जेथें परिपूर्ण वैराग्य वाढते, तेथें जनार्दनाची पूर्ण कृपा आहे म्हणून समजावे. जेथे वैराग्य असते तेथे ब्रह्मज्ञान हें सहज ठसते ४.
जीव सहजें ब्रह्मचि आहे । तो मायागुणें जीवत्व वाहे ।
जेवीं भद्रीं निजेलेनि रायें । तो स्वप्नींचें लाहे रंकत्व ॥ ५ ॥
जीव हा मूळचा ब्रह्मच आहे , पण तो मायेच्या गुणांनी जीवपणा बाळगतो. ज्याप्रमाणे पलंगावर निजलेल्या राजाने स्वप्नांत स्वतःला भिकारी झाल्याचे पहात असावें ५,
त्यासी राजपदा यावया जाण । सेवक करिती थापटण ।
तेवीं वैराग्य निर्दळी त्रिगुण । जीवा ब्रह्मपण स्वयंभचि ॥ ६ ॥
परंतु त्याचे सेवक त्याला राज्यपदावर बसण्याकरता थापटून जागे करितात, त्याप्रमाणे वैराग्य त्रिगुणांचा नाश करिते, तेव्हां जीवाला स्वयंसिद्धच ब्रह्मत्व आहे ६.
ऐसें स्वयंभ जोडल्या ब्रम्ह पूर्ण । तेव्हा स्त्री पुरुष हें मिथ्या ज्ञान ।
मृषा दृश्याचें दृश्यभान भोग्यभोक्तेपण असेना ॥ ७ ॥
असें स्वयंभूच असणारें परब्रह्म प्राप्त झालें म्हणजे स्त्री आणि पुरुष हें ज्ञानच मिथ्या होते, दृश्याचे दृश्यभानच मिथ्या होते, व भोग्य भाणि भोक्तपणच उरत नाही ७.
असो साधकासी देवमाया । स्त्रीरूपें ये भुलवावया ।
तेथ स्मरतां भावें गुरुराया । जाय विलया स्त्रीबाधू ॥ ८ ॥
असो. साधकाला देवाची माया हीच स्त्रियेच्या रूपाने भुलवावयाला येते. त्या वेळी भक्तीने गुरुराजाचे स्मरण केले असता त्या स्त्रीची पीडा विलयास जाते ८.
सद्गुरूचें निजनाम एक । निवारी बाधा महादोख ।
वैराग्य उपजवी अलोलिक । तेणें होय निजसुख साधकां ॥ ९ ॥
सद्गुरुंचे केवळ एक नाम मोठमोठ्या दोषांची बाधा दूर करते, आणि लौकिक वैराग्य उत्पन्न करते, तेणेकरून साधकांना मोठे सुख होते ९.
निर्विशेष निजसुखदाता । आम्हां सद्गुरूचि तत्त्वतां ।
त्याचे चरणीं ठेवितां माथा । सुखसंपन्नता साधकां ॥ १० ॥
खरे पाहिलं तर आम्हांला निर्वेध सुख देणारा एक सद्गुरुच आहे. त्याच्या चरणावर मस्तक ठेविलें असता साधकांना सुखाचा लाभ होतो १०.
संत साधकांची निजमाउली । शांति निजसुखाची साउली ।
जनार्दनकृपेच्या पाउलीं । कथा चालिली यथार्थ ॥ ११ ॥
संत ही साधकांची खरी माता आहे. आणि शांति ही आत्मसुखाची सावली आहे. जनार्दनाच्या कृपामय पायांच्या प्रसादानें ही कथा यथार्य रीतीने चालली आहे ” ११.
हाता आलिया निजनिर्गुण । साधक होती सुखसंपन्न ।
तदर्थ करावें माझें भजन । हें बोलिला श्रीकृष्ण पंचविसावां ॥ १२ ॥
निर्गुण हाती आलें म्हणजे साधक सुखसंपन्न होतात, म्हणून त्याकरिता माझें भजन करावे. असें पंचविसाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणाले १२.
भावें करितां भगवद्भजन । देव दारारूपें करिती विघ्न ।
तें निर्दळावया जाण । माझें नामस्मरण करावें ॥ १३ ॥
भक्तिभावाने भगवद्भजन करु लागले असता देव हे स्त्रीच्या रूपाने त्यांत विघ्न आणतात. तें विघ्न निवारण करण्याकरितां माझें नामस्मरण करीत जावें १३.
अच्युत हें स्मरतां नाम । प्रतापें निर्दळी कर्माकर्म ।
सकळ पातकें करी भस्म । दाटुगें नाम हरीचें ॥ १४ ॥
अच्युत ह्या नामाचे स्मरण केले असता ते आपल्या प्रभावानेच कर्माकर्माचा नाश करितें व सर्व पातकांचे भस्म करून टाकते. इतकें हरीचे नाम समर्थ आहे १४.
नामें होइजे विरक्त । नामें निर्मळ होय चित्त ।
नामें साधे गुणातीत । नामें निर्मुक्त भवपाश ॥ १५ ॥
नामानेच मनुष्य विरक्त होतो, नामानेच चित्त निर्मळ होते, नामानेच गुणातीतता प्राप्त होते, व नामानेच संसारपाश तुटतात १५.
नामीं लोलिंगत चित्त । भवभय रिघों न शके तेथ ।
नामीं विश्वास ऐसा जेथ । भगवंत तेथ तुष्टला ॥ १६ ॥
नामामध्ये चित्त लोलुप झाले असतां तेथें संसारभयाचा शिरकाव होत नाही. असा जेथें नामावर विश्वास असतो, तेथें भगवान् प्रसन्न आहे असे समजावें १६.
दुष्टसंगें विषयासक्त । जरी झाला लोलिंगत ।
अनुताप उपजलिया तेथ । होय विरक्त क्षणार्धें ॥ १७ ॥
दुष्टाच्या संगतीने जरी विषयासक्त मनुष्य विषयांतच पूर्णपणे रममाण झालेला असला, तरी त्याला पश्चात्ताप होतांच तोही अर्ध्या क्षणांत विरक्त होतो १७.
महादोषासी प्रायश्चित्त । केवळ अनुताप निश्चित ।
अनुतापेंवीण प्रायश्चित्त । जाण एथ विटंबू ॥ १८ ॥
मोठमोठ्या दोषांना खरा पश्चात्ताप हेच खरोखर मोठे प्रायश्चित्त आहे. अनुताप झाल्याशिवाय प्रायश्चित घेणे ती केवळ थट्टा होय १८.
अनुतापाएवढा सखा । जगीं आणिक नाहीं लोकां ।
धडाडिल्या अनुताप देखा । सकळ पातकां निर्दळी ॥ १९ ॥
लोकांना पश्चात्तापासारखा मित्र ह्या जगामध्ये दुसरा नाही. एकदा पश्चात्ताप झाला की तो सर्व पातकांचे भस्म करून सोडतो १९.
अनुतापा चढलिया हात । क्षणार्धें करी विरक्त ।
येचि अर्थीं ऐलगीत । हरि सांगत उद्धवा ॥ २० ॥
पश्चात्ताप हाती आला की तो क्षणार्धात विरक्त करून सोडतो. याच अर्थाचे ‘ऐलगीत’ श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहे २०.
सव्विसाव्या अध्यायीं येथ । विषयासक्त ज्याचें चित्त ।
त्यासी व्हावया विरक्त । ऐलगीतप्रस्तावो ॥ २१ ॥
येथे ह्या सव्वीसाव्या अध्यायांत, ज्याचे चित्त विषयासक्त असेल त्याला विरक्त होण्याकरिता ‘ऐलगीता’ची ही प्रस्तावना आहे २१.
श्रीभगवानुवाच –
मल्लक्षणमिमं कायं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः ।
आनन्दं परमात्मानमात्मस्थं समुपैति माम् ॥ १ ॥
[श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला आनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. (१)
ब्रह्म लक्षिजे परिपूर्ण । हेंचि कायेचें मुख्य लक्षण ।
तें हें मानवी शरीर जाण । परम पावन तिहीं लोकीं ॥ २२ ॥
ब्रह्म पूर्णपणे जाणावें हेच ह्या नरदेहाचे मुख्य कर्तव्य आहे. ते हें मानवी शरीर तिन्ही लोकांतही पवित्र आहे २२.
मनुष्यदेहीं अधर्म । करितां नातुडे परब्रह्म ।
तेथ करावे भागवतधर्म । जे कां परम पावन ॥ २३ ॥
ह्या मनुष्यदेहाला येऊन अधर्म केला असतां परब्रह्म हाती लागत नाही. ह्याकरितां जे परम पावन असे भागवतधर्म, तेच आचरण करावे २३.
भागवतधर्में करितां भक्ती । निर्मळ होय चित्तवृत्ती ।
जीव तोचि ब्रह्म निश्चितीं । ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावे ॥ २४ ॥
भागवतधर्माला अनुसरून भक्ति केली असतां चित्तवृत्ति निर्मळ होते. आणि जीव तोच ब्रह्म असें निश्चयाचे ज्ञान मनांत ठसते २४.
ठसावल्या ब्रह्मस्फूर्ती । होय स्वानंदाची अवाप्ती ।
तेणें परमानंदीं लीन होती । हे शुद्धप्राप्ती पैं माझी ॥ २५ ॥
ब्रह्मस्फूर्ति मनांत ठसली की त्या योगाने साधक परमानंदांत लीन होतात. हीच माझी खरी प्राप्ति होय २५.
माझिये प्राप्तीचें लक्षण । देहीं असतां वर्तमान ।
सर्वथा नाहीं विषयस्फुरण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ २६ ॥
माझी प्राप्ति झाल्याचे लक्षण हेच की, प्रत्यक्ष देहांत असूनही विषयाची मुळीच आठवण नसणे. तेच निरूपण श्रीकृष्ण सांगतात २६.
गुणमय्या जीवयोन्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया ।
गुणेषु मायामात्रेषु दृश्यमानेष्ववस्तुतः ।
वर्तमानोऽपि न पुमान् युज्यतेऽवस्तुभिर्गुणैः ॥ २ ॥
[श्लोक २] जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीवयोनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणार्या केवळ मायास्वरूप गुणांच्या पसार्यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाही. (२)
जे मूळ अज्ञानाची खाणी । जे संसारप्रवाहाची श्रेणी ।
जे तिहीं गुणांची जननी । माया राणी अनादि ॥ २७ ॥
जी मूळ अज्ञानाची खाण, जी संसारप्रवाहाची पंक्ति, जी तीन गुणांची माता, ती अनादि मायाराणी होय २७.
मायागुणयोगें पहा हो । सोळा कळांचा संभवो ।
तो वासनात्मक लिंगदेहो । जीवासी पहा हो दृढ झाला ॥ २८ ॥
अहो पहा ! ह्या मायागुणांच्या योगानें सोळा कळांचा (पांच ज्ञानेंद्रिये, पांच कर्मेंद्रिय, पांच विषय आणि मन मिळून सोळा) उत्पन्न झालेला जो वासनात्मक लिंगदेह, तोच जिवाला खिळून बसतो २८.
ज्या लिंगदेहाचिये प्राप्ती । भोगी नाना सुखदुःखसंपत्ती ।
पडे स्वर्गनरकआवर्तीं । मिथ्यामरणपंक्ती स्वयें सोशी ॥ २९॥
ज्या लिंगदेहामुळेच तो जीव नानाप्रकारच्या सुखदुःखसंपत्ति भोगतो, स्वर्गनरकाच्या भोवऱ्यांत पडतो, आणि मिथ्या असलेल्या जन्ममरणपंक्ति स्वतः सोसतो २९.
वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासी संसार ।
देहाभिमानें केला थोर । अपरंपार अनिवार्य ॥ ३० ॥
वांझेच्या मुलाचा जसा गृहस्थाश्रम, तसा हा संसार जीवाला आहे. आणि देहाभिमानाने त्याला अपरंपार व अनिवार असा वाढविला आहे ३०.
तेथ गुरुवाक्यें ज्ञानानुभावो । पाहतां मायेचा अभावो ।
लिंगदेह झाला वावो । जीवा जीवभावो तो मिथ्या ॥ ३१ ॥
परंतु त्या जीवाला गुरूपदेशाने ज्ञानाचा अनुभव आला असतां मायेचा अभाव होतो, लिंगदेहच खोटा वाटू लागतो व जीवाचा जीवपणाही मिथ्या होतो ३१.
जेवीं उगवलिया गभस्ती । अंधारेंसीं हारपे राती ।
तेवीं गुरुवाक्यें ज्ञानप्राप्ती । मायेची स्थिती मावळे ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे अंधारासह रात्र नाहीशी होते, त्याप्रमाणे गुरूपदेशाने ज्ञानप्राप्ति झाली की मायेचे स्वरूप मावळते ३२.
एवं नासल्या गुणविकार । जीवन्मुक्त होती नर ।
जेवीं कां कुलालचक्र । भंवे साचार पूर्वभ्रमणें ॥ ३३ ॥
अशा प्रकारे गुणांचे विकार नाहीसे झाल्यावर पुरुष जीवन्मुक्त होतात. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक पूर्वी प्राप्त झालेल्या गतीने खरोखर फिरतच रहातें ३३,
तेवीं प्रारब्धशेषवृत्तीं । ज्ञाते निजदेहीं वर्तती ।
वर्ततांही देहस्थिती । देहअहंकृती असेना ॥ ३४ ॥
त्याप्रमाणे पूर्वप्रारब्धाच्या उरलेल्या वृत्तीने ज्ञातेही आपल्या देहामध्ये वागत असतात. परंतु ते देहस्थितीने वागत असतांही त्यांना देहाचा अभिमान असत नाही ३४.
जेवीं कां छाया आपुली । कोणीं गांजिली ना पूजिली ।
परी कळवळ्याची न ये भुली । तेवीं देहींची चाली सज्ञाना ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे आपल्या छायेला कोणी त्रास दिला किंवा तिची पूजा केली तरी त्याबद्दल कोणाला कळवळा वाटत नाही, त्याप्रमाणेच सज्ञान्यालाही देहांतील चालनेचे काही वाटत नाही ३५.
तो देहाचेनि दैवमेळें । जरी विषयांमाजीं लोळे ।
परी विकाराचेनि विटाळें । वृत्ति न मैळे अणुमात्र ॥ ३६ ॥
तो देहाच्याच दैवयोगाने जरी विषयांत लोळत असला, तरी त्याची वृत्ति त्या विकाराबरोबर अणुमात्रही मलिन होत नाही ३६.
त्यासी विषयांचें दर्शन । समूळत्वें मिथ्या जाण ।
करितां मृगजळाचें पान । करा वोलेपण बाधीना ॥ ३७ ॥
त्याला विषयांचे दर्शन समूळ मिथ्या असते. मृगजळ प्यालें असता पिणाराचे हात काही ओले व्हावयाचे नाहीत ३७.
गगनकमळांचा आमोद । जैं भ्रमर सेवी सुगंध ।
तैं सज्ञाना विषयसंबंध । निजांगीं बाध लागतां ॥ ३८ ॥
आकाशकमलांचा मकरंद व सुवास जर भ्रमर सेवन करील, तरच ज्ञात्याला विषयाचा संबंध अंगी लागला असतां बाधेल ३८.
असो अतर्क्य मुक्तांची स्थिती । परी मुमुक्षांलागीं श्रीपती ।
नियमाची यथानिगुती । निजात्मप्राप्तीलागीं सांगे ॥ ३९ ॥
असो; मुक्तांची स्थिति अतर्क्य आहे. परंतु श्रीकृष्ण मुमुक्षूंना आत्मप्राप्तीसाठी त्याविषयींचे असलेले नियम सांगतात ३९.
सङ्ग न कुर्यादसतां शिश्नोदरतृपां क्वचित् ।
तस्यानुगस्तमस्यन्धे पतत्यन्धानुगान्धवत् ॥ ३ ॥
[श्लोक ३] जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात, अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणार्यांची अधोगतीच होते जसा एखादा आंधळा दुसर्या आंधळ्याच्या साहाय्याने वाटचाल करू लागला, तर त्याची जशी स्थिती होते, तशीच याचीही होते. (३)
शिश्नोदरार्थ आसक्त । स्वधर्मत्यागें अधर्मरत ।
ऐसे जे विषयासक्त । ते जाण निश्चित असाधू ॥ ४० ॥
कामविषयभोग व उदरभरण ह्यांतच केवळ आसक्त होउन स्वधर्माचा त्याग करून अधर्मातच मग्न असणारे असे जे विषयासक्त असतात, ते खरोखर असाधु होत असें समज ४०.
ऐसे जे असाधू जन । त्यांसीं सर्वथा आपण ।
संगती न करावी जाण । कायावाचामनःपूर्वक ॥ ४१ ॥
असे जे कोणी असाधु लोक असतील, त्यांची आपण कधीही कायावाचामनेंकरूनही मुळीच संगति करूं नये ४१.
वोढाळेचे संगतीं पाहें । क्षणभरीं गेलिया धर्मगाये ।
त्या क्षणसाठीं पाहें । लोढणें वाहे निरंतर ॥ ४२ ॥
ओढाळ गुरांच्या संगतींत एखादी चांगली गाय जरी क्षणभर गेली, तरी त्या क्षणाच्या संगतीसाठी तिला निरंतरचा लोढणा गळ्यांत वागवावा लागतो ४२.
यालागीं दुर्जनाची संगती । क्षणार्धें पाडी अनर्थीं ।
मुमुक्षीं ऐशियाप्रती । अणुमात्र वस्ती न वाचावें ॥ ४३ ॥
त्याप्रमाणे दुर्जनांची संगतही क्षणार्धामध्येसुद्धा अनर्थात घालते. मुमुक्षूंनी अशा ठिकाणी एक क्षणभरसुद्धा वस्तीला जाऊं नये ४३.
लोहाराची आगिठी जैसी । सहजें पोळी भलत्यासी ।
दुर्जनाची संगति तैशी । पाडीं अपभ्रंशीं भाविकां ॥ ४४ ॥
लोहाराची भट्टी जशी कोणालाही सहज पोळते, त्याप्रमाणे दुर्जनाची संगत भाविक लोकांना भ्रमात टाकते ४४.
अवचटें असाधुसंगती । जोडल्या वाढे विषयासक्ती ।
तेणें उठी अधर्मरती । विवेक-स्फूर्तिघातक ॥ ४५ ॥
चुकून जरी असाधूची संगत घडली तरी विषयासक्ति वाढते. आणि तेणेकरून विवेकस्फूर्तीचा घात करणारी अधर्माची प्रीति उत्पन्न होते ४५.
मावळल्या विवेकवृत्ती । अंध होय ज्ञानस्फूर्ती ।
आपण आपली न देखे गती । जेवीं आभाळीं राती अंवसेची ॥ ४६ ॥
विवेकवृत्ति मावळली की, ज्ञानस्फूर्ति अंध होउन, मेघांनी व्याप्त झालेल्या अमावास्येच्या रात्रीप्रमाणे आपली गति आपणास समजत नाही ४६.
जेवीं अंधें अंध धरिल्या हातीं । दोघां पतन महागर्ती ।
तेवीं अविवेकाचिया स्थितीं । अंधतमा जाती विषयांध ॥ ४७ ॥
आंधळ्याने आंधळ्याच्याच हाताला धरलें म्हणजे दोघेही खड्यांत पडतात, त्याप्रमाणे अविवेकाच्या स्थितीमुळे विषयांध लोक ‘अंधतम’ नांवाच्या नरकांत पडतात ४७.
कुसंगाचा जो सांगत । तेणें वोढवें नरकपात ।
अनुताप सोडविता तेथ । तें ‘ऐलगीत’ हरि सांगे ॥ ४८ ॥
दुःसंगतीच्या सहवासाने नरकवास प्राप्त होतो. त्यापासून सोडविणारा एक पश्चात्तापच. त्यासंबंधानें श्रीकृष्ण ‘ऐलगीत’ सांगतात ४८.
ऐलः सम्राडिमां गाथामगायत बृहच्छ्रवाः ।
उर्वशीविरहान्मुह्यन्निर्विण्णः शोकसंयमे ॥ ४ ॥
[श्लोक ४] परम यशस्वी सम्राट पुरूरवा प्रथम उर्वशीच्या विरहाने वेडापिसा झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले तेव्हा तो म्हणाला. (४)
समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती ।
पुरूरवा चक्रवर्ती । ज्याचे ख्याती पुराणीं ॥ ४९ ॥
समुद्रवलयांकित पृथ्वीचा पालन करणारा, सर्व राजांचा मुगुटमणि, पुरूरवा नांवाचा चक्रवर्ती राजा, त्याची कीर्ति पुराणांतून प्रसिद्ध आहे ४९.
तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य ।
महिमा महती अतिवीर्य । धर्मधैर्य पुरूरवा ॥ ५० ॥
तेज, प्रभाव, महाशौर्य, उचित दातृत्व, गांभीर्य, ख्याति, महती, पराक्रम आणि धार्मिक धैर्य इत्यादि गुणांनी पुरूरवा राजा युक्त होता ५०.
राजधर्माचिया नीतीं । स्वधर्में प्रतिपाळी क्षिती ।
ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चितीं रायाचा ॥ ५१ ॥
राजधर्माच्या नीतीनुसार स्वधर्मानें तो पृथ्वीचे पालन करीत असे. ब्राह्मण म्हणून जितका तितका ब्रह्माचीच मूर्ति होय, असा त्या राजाचा निश्चित भाव असे ५१.
प्राणान्तेंही आपण । न करी ब्राह्मणहेळण ।
गाईलागीं वेंची प्राण । करी संरक्षण दीनाचें ॥ ५२ ॥
प्राण गेला तरी तो ब्राह्मणाची निंदा कधी करीत नसे. गाईसाठी तर प्राणसुद्धा खर्ची घाली. दीनांचा तर केवळ पाठिराखा होता ५२.
ऐसा धार्मिक ऐल-चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्तीं ।
भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥ ५३ ॥
पुरूरव्याला दुसरें नांव ‘ऐल’ असे होते. असा तो धार्मिक ऐल चक्रवर्ती पुरुरवा राजा उर्वशीच्या नादी लागून तिला भुलून आपली स्थिति विसरून गेला ५३.
तेणें अनुतापें गाइली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।
परी त्याची पूर्वकथा । कामासक्तता ते ऐक ॥ ५४ ॥
त्या वेळी त्याने पश्चात्तापपूर्वक गीत गाइलें, तें मी आतां तुला सांगतो. पण त्याची पूर्वीची कथा व कामासक्तता आधी ऐक ५४.
विसरोनि निजमहत्त्वासी । अतिदीन झाला वेश्येसी ।
काम पिसें लावी मनुष्यासी । तें ऐल-इतिहासीं हरि सांगे ॥ ५५ ॥
तो आपला मोठेपणा विसरून जाऊन वेश्येला लंपट होऊन अगदी दीन झाला. काम हा मनुष्याला कसे वेड लावतो, तें श्रीकृष्ण ऐलाच्या इतिहासाने सांगतात ५५.
ऐल-उर्वशीकामासक्ती । सवेंचि अनुतापें विरक्ती ।
हे कथा बोलिली वेदोक्तीं । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥ ५६ ॥
ऐल (म्हणजे इलेपासून बुधाला झालेला मुलगा) पुरूरवा राजा उर्वशीशी किती लंपट झाला होता आणि त्याला पश्रात्ताप होऊन विरक्ति कशी उत्पन्न झाली, ही कथा वेदामध्येही सांगितलेली आहे. तीच श्रीकृष्ण स्वतः सांगतात ५६.
उर्वशीपुरूरव्याचा संबंध । नवम स्कंधीं असे विशद ।
तेणें जाणोनियां गोविंद । एथ कथाअनुवाद न करीच ॥ ५७ ॥
उर्वशीचा आणि पुरूरव्याचा संबंध नवच्या स्कंधामध्ये खुलासेवार आलेला आहे. ते लक्षात आणून श्रीकृष्णांनी ती कथा पुन्हा सविस्तर सांगितली नाही ५७.
पूर्वकथासंबंधः ॥
[पूर्वकथेचा संबंध]
उर्वशी स्वर्गभूषण । नारायणें धाडिली आपण ।
तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥ ५८ ॥
उर्वशी म्हणजे स्वर्गाला एक भूषण म्हणून नारायणांनी तिला स्वर्गात आपण होऊन पाठविली; पण तेथे आपणच काय ती श्रेष्ठ, असे मानून ती गर्वानें फुगली ५८.
तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगतीं ।
तेणें ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी भोगिती भूतळीं ॥ ५९ ॥
त्या गर्वाच्याच ऐटीमध्ये नृत्य करतांना तालाचे पाऊल चुकले, त्यामुळे तिला ब्रह्मदेवांनी शाप दिला की, तूं मृत्युलोकीं जाशील व मनुष्य तुझा उपभोग घेतील ५९.
उच्छाय मागतां तिसी । ब्रह्मा सांगे तियेपाशीं ।
नग्न देखिल्या पुरूरव्यासी । स्वर्गा येसी मेषप्रसंगें ॥ ६० ॥
तेव्हा तिने हात जोडून उशाप मागितला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की, तूं पुरूरव्याला मेषप्रसंगानें नग्न पाहिलेंस की स्वर्गाला येशील ६०.
ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी ।
देखोनि तिचिया स्वरूपासी । पुरूरवा तिसी भूलला ॥ ६१ ॥
असा शाप पावून उर्वशी मृत्युलोकी आली. तिच्या स्वरूपाला पाहतांच पुरूरवा राजा भुलून गेला ६१.
विसरोनि आपुली महती । वश्य झाला वेश्येप्रती ।
रूपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥ ६२ ॥
आणि आपला थोरपणा विसरून त्या वेश्येला वश झाला तो तिच्या रूपाने इतका वेडा झाला की, त्याला विचार करण्याचेही भान राहिले नाहीं ६२.
नग्न देखिल्या रायासी । सांडूनि जावें उर्वशीं ।
ऐशी भाक देऊनि तिसी । निजभोगासी आणीली ॥ ६३ ॥
राजाला नग्न स्थितीत पाहिले असतां उर्वशीने त्याला सोडून जावे, असा करार मान्य करून त्याने तिला आपल्या उपभोगार्थ आणली ६३.
तिणें आपुलिया उच्छापासी । आणिलें दोघां एडक्यांसी ।
पुत्रस्नेहें पाळावें त्यांसी । तेविखीं दिधलें रायें ॥ ६४ ॥
तिने आपल्या शापाच्या परिहाराकरितां म्हणून आपल्याबरोबर दोन मेंढे आणले होते. त्यांना केवळ पुत्रवत् पाळावेत असे तिने सांगितल्यावरून राजाने त्या विषयीही आणभाक दिली ६४.
ते उर्वशीच्या कामप्राप्ती । अतिशयें वाढली कामासक्ती ।
तो नेणे उदयास्त-दिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥ ६५ ॥
ह्याप्रमाणे उर्वशीची गांठ पडतांच राजाची कामेच्छाही प्रबळ झाली. तिच्या विलासांत उजाडलें केव्हां व रात्र झाली केव्हां, हेही त्यास कळेनासे झाले. असे किती तरी दिवस लोटले ६५.
भोगितां उर्वशीकाम । विसरला स्वधर्मकर्म ।
विसरला नित्यनेम । कामसंभ्रम वाढला ॥ ६६ ॥
ह्याप्रमाणे उर्वशीच्या संगतीने विलास करतांना तो स्वधर्मकर्म विसरून गेला. त्याचे नित्यनेम टळले व विलासभोगाचा अतिरेक होत चालला ६६.
तेथ मेषरूपें दोघे जण । झाले अश्विनीकुमार आपण ।
उर्वशीभोगक्षया कारण । इंद्रें जाण पाठविले ॥ ६७ ॥
त्यावेळी बोकडांच्या रूपाने उर्वशीबरोबर आलेले ते दोघे अश्विनीकुमार होते; ते उर्वशीचा भोगक्षय करण्याकरितां इंद्राने तिच्याबरोबर पाठविले होते ६७.
पुरूरव्याचा भोगप्राप्ती । उर्वशी न्यावया स्वर्गाप्रती ।
दोनी फडके चोर नेती । मध्यरातीं मेमात ॥ ६८ ॥
पुरूरव्याच्या भोगाच्या अखेरीस उर्वशीला स्वर्गास न्यावी म्हणून चोरांनी ते दोन्ही मेंढे मध्यान्ह रात्री चोरून नेले. तेव्हां ते ‘ ब्या ब्या ‘ करून ओरडूं लागले ६८.
ऐकोनि मेषांच्या शब्दासी । दुःखें हडबडली उर्वशी ।
रागें निर्भर्त्सी रायासी । नपुंसक होसी तूं एक ॥ ६९ ॥
तो बोकडांचा शब्द ऐकून उर्वशी दुःखाने खडबडून उठली आणि राजाची निर्भर्त्सना करून त्यास म्हणाली की, ‘तूं एक षंढ आहेस ६९,
वृथा वल्गसी पुरुषबळें । चोरें नेलीं माझीं बाळें ।
जळो तुझें तोंड काळें । म्हणोनि कपाळें ते पिटी ॥ ७० ॥
फुकट पुरुषार्थाच्या गोष्टी मात्र सांगतोस, माझी लेकरें चोरांनी नेली, तुझ्या त्या काळ्या तोंडाला आग लागो !’ असें म्हणून ती कपाळ पिटू लागली ७०.
ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरु । शस्त्र घेऊनि सत्वरु ।
धांवतां फिटला पीतांबरू । ते नृपवरू स्मरेना ॥ ७१ ॥
हा त्या उर्वशीचा भयंकर शोक पाहून त्याने लवकर लवकर हातांत शस्त्र घेतले, आणि धावत धावत चोरांमागे निघाला. तो धावतांना त्याचा पीतांबर फिटला, त्याचेही त्याला भान राहिले नाही ७१.
पराभवूनि ते चोर । मेष आणितां सत्त्वर ।
विद्युल्लता झळकली थोर । तंव नग्न शरीर रायाचें ॥ ७२ ॥
त्याने त्या चोरांचा पराभव करून त्या बोकडांना आणून उर्वशीपुढे उभे केले. इतक्यांत एकदम मोठी वीज चमकली, तो राजाचे शरीर सारे नागवे उघडे ! ७२.
नग्न देखोनि रायासी । सांडूनि निघाली उर्वशी ।
तिचेनि वियोगें मानसीं । अतिशोकासी पावला ॥ ७३ ॥
राजाला नग्न पहातांच उर्वशी आपल्या कबुलायतीप्रमाणे त्याला सोडून निघाली, तेव्हा तिच्या वियोगाने राजा अतिशय शोकाकुल झाला ७३.
त्यक्त्वाऽऽत्मानं व्रजन्तीं तां नग्न उन्मत्तवन्नृपः ।
विलपन्नन्वगाज्जाये घोरे तिष्ठेति विक्लवः ॥ ५ ॥
[श्लोक ५] आपल्याला सोडून निघून जाणार्या उर्वशीच्या मागे राजा पुरूरवा नग्न अवस्थेत वेड्यासारखा अतिशय विव्हळ, होऊन, जात जात म्हणू लागला “हे निष्ठुरहृदये प्रिये थांब, थांब”. (५)
पृथ्वीपरिपालानीं वरिष्ठ । स्वधर्मीं धार्मिक श्रेष्ठ ।
शत्रुदमनीं अतिसुभट । प्रतापें उद्भट महावीर ॥ ७४ ॥
पृथ्वीचे परिपालन करण्यात वरिष्ठ; स्वधर्मकमांत श्रेष्ठ धार्मिक, शत्रुचा संहार करण्यांत मोठा शूर व पराक्रमाने मोठा वीर ७४,
जाणे वेदशास्त्रविवेक । ज्यासी वंदिती सकळ लोक ।
तोही वेश्येचा केवळ रंक । झाला देख निजांगें ॥ ७५ ॥
वेदशास्त्रविवेक जाणणारा; ज्याला सारे लोक वंदन करतात; तो सुद्धा एका वेश्येचा केवळ दास बनून राहिला ! ७५,
सुरां असुरां न खालवी मान । जो अल्पही न साहे अपमान ।
तो वेश्येलागीं झाला दीन । निजसन्मान विसरोनी ॥ ७६ ॥
देवदानवांनाही जो कधी खाली मान करावयाचा नाहीं; ज्याला रेसभरही अपमान सहन होत नसे; तो आपला थोरपणा विसरून एका वेश्येपुढे दीन होऊन बसला ७६.
उर्वशी जातां देखोनि दिठीं । नग्न उन्मत्त उठाउठीं ।
रडत पडत लागे पाठीं । स्फुंदतां पोटीं श्वास न रिघे ॥ ७७ ॥
उर्वशी जाते असे डोळ्यांनी पहातांच तो तसाच नागवा उघडा व बेहोष होऊन रडत पडत तिच्या पाठीस लागला; हुंदके देतांना त्याच्या तोंडातून नीट शब्द फुटेना ७७.
डोळेभरी पाहूं दे दिठीं । सांगेन जीवींच्या गुह्य गोष्टी ।
प्राण रिघों पाहे उठाउठी । क्षणभर भेटी न देतां ॥ ७८ ॥
“अग ! एकदा मला डोळे भरून पाहू दे, हितगुजाच्या गोष्टी तरी एकदा बोलून घेऊ दे, एक क्षणभर तूं दृष्टीआड झालीस तर हा जीव अगदी जावयाच्या बेतांत येतो ७८.
आपुल्या पूर्वजांची आण । कदा नुल्लंघीं तुझें वचन ।
सत्य मानीं माझें प्रमाण । तुज काय कारण रुसावया ॥ ७९ ॥
माझ्या पूर्वजांची शपथ घेऊन सांगतों की, तुझें वचन मी कधीही उल्लंघन करणार नाही; हे माझे प्रमाण अगदी सत्य मान; तुला रुसावयाला कारण तरी काय ? ७९.
तुज चालतां लवलाहीं । झणीं खडे रुततील पायीं ।
तुज जाणें कोणे ठायीं । तरी सवें मीही येईन ॥ ८० ॥
चालतांना तुझ्या पायाला खडे रुततील ; तूं जात आहेस तरी कुठं ? मीही तुझ्याबरोबर येतों ८०.
जाऊं नको उभी राहें । परतोनी मजकडे पाहें ।
म्हणोनि धरूं धांवे पाये । तंव ते जाये उपेक्षुनी ॥ ८१ ॥
अग जाऊं नको, थोडी उभी रहा; एकदा मागे वळून माझ्याकडे पहा तरी.” असे म्हणून तो तिचे पाय धरावयास लागला. तो ती त्याच्याकडे न पहातां निघून गेली ८१.
ज्यासी राजे मुकुटमणी । सदा येती लोटांगणीं ।
तो लागे वेश्येचे चरणीं । बाप करणी कामाची ॥ ८२ ॥
ज्याला मोठमोठाले राजे नेहमी लोटांगण घालावयाचे, तो राजाधिराज वेश्येच्या पायाला लागला ! ह्यावरून ह्या कामाची करणी किती विलक्षण आहे ती पहा! ८२.
तुझी मज अति कळवळ । तुजलागीं मन माझें कोमळ ।
तूं कठिण झालीस केवळ । कोप प्रबळ कां धरिला ॥ ८३ ॥
तो म्हणाला, तुझा मला अतिशय कळवळा येतो, तुझ्यासाठी माझें चित्त अगदी तळमळते; तूं केवळ पाषाणहृदयी बनलीस ना ? इतका राग का बरे धरलास? ८३.
यापरी रायाचें चित्त । विरहातुर शोकाकुलित ।
अतिशयें ग्लानियुक्त । ते ग्लानि सांगत श्रीकृष्ण ॥ ८४ ॥
अशा प्रकारे राजाचे चित्त अत्यंत विरहातुर आणि शोकानें व्याप्त झाले. तो अतिशय ग्लानियुक्त झाला. ती त्याची ग्लानि श्रीकृष्ण सांगतात ८४.
कामानतृप्तोऽनुजुषन् क्षुल्लकान्वर्षयामिनीः ।
न वेद यान्तीर्नायान्तीरुर्वश्याकृष्टचेतनः ॥ ६ ॥
[श्लोक ६] उर्वशीने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते क्षुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की, कित्येक वर्षाच्या रात्री आल्या आणि गेल्या तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते. (६)
उर्वशीकामीं कामासक्त । एकाग्र झालें रायाचें चित्त ।
नेणे सूर्याचें गतागत । केला भ्रांत कंदर्पें ॥ ८५ ॥
उर्वशीच्या कामभोगांत राजाचे चित्त अगदी तल्लीन होऊन गेलें होतें. सूर्य उगवतो केव्हां व मावळतो केव्हां हेंही त्याला समजेना. इतके मदनाने त्याला वेडे करून सोडले ८५,
भोगिलीचि कामिनी । भोगितांही अनुदिनीं ।
अधिक प्रेम वाढलें मनीं । ऐसा तिजलागूनी आसक्त ॥ ८६ ॥
उपभोग घेतलेल्या स्त्रीचाच रोजच्यारोज उपभोग घेऊ लागलें असतां प्रेम अधिकाधिकच वाढते. त्याप्रमाणेच त्याची अवस्था होऊन तो तिच्यावर अतिशय आसक्त होऊन राहिला ८६.
भोगितां उर्वशीकामासी । नेणे दिवसमासवर्षांसी ।
व्ययो झाला आयुष्यासी । हेंही त्यासी स्मरेना ॥ ८७ ॥
उर्वशीचा भोग घेता घेतां दिवस, महिने किंवा वर्षेसुद्धा गेलेली त्याला समजली नाहीत. आयुष्याचा नाश झाला याचीसुद्धा त्याला आठवण राहिली नाही ८७.
जेवीं अग्निमाजीं घृत पडे । तंव तंव ज्वाळा अधिक वाढे ।
तेवीं कांता भोगितां वाडेंकोडें । काम पुढें थोरावे ॥ ८८ ॥
अग्नीमध्ये तूप पडले असता त्याच्या ज्वाळा अधिकाधिकच वाढतात, त्याप्रमाणेच स्त्रीचा वारंवार उपभोग घेतल्याने कामही वाढत जातो ८८.
विचारितां स्त्रीकामासी । अतितुच्छत्व दिसे त्यासी ।
तोही भोगितां अहर्निशीं । विरक्ती रायासी नुपजेचि ॥ ८९ ॥
स्त्रीविषयाचा विचार केला असता तो अत्यंत तुच्छ वाटतो. पण तो विषय रात्रंदिवस भोगीत असताही राजाला वैराग्य उत्पन्न झाले नाही ८९.
प्रीति गुंतली उर्वशीसीं । अतिग्लानी करितां तिसी ।
परतोनि न येचि रायापाशीं । निघे वेगेंसीं सांडूनि ॥ ९० ॥
उर्वशीवर त्याचा अगदी जीव जडून राहिला होता, म्हणून त्याने तिची अतिशय करुणा भाकली. तरी राजाकडे परतून न येता त्याला सोडून ती झपाट्याने निघून गेली ! ९०.
उर्वशी न देखूनि पुढें । राजा विरहें मूर्च्छित पडे ।
पाहों धांवे इकडेतिकडे । आक्रोशें रडे अतिदुःखी ॥ ९१ ॥
उर्वशी जेव्हा समोर दृष्टीस पडेना, तेव्हां राजा तिच्या विरहदुःखानें मूर्च्छित पडला. आणि पुन्हा उठून इकडे तिकडे पाहू लागला. मोठमोठ्याने रडून त्याने आकांत मांडला ९१.
अटण करितां दाही दिशीं । अवचटें आला कुरुक्षेत्रासी ।
तंव अंतरिक्षीं उर्वशी । देखे दृष्टीसी नृपनाथ ॥ ९२ ॥
याप्रमाणे दाही दिशांना हिंडत असतां तो अकस्मात् कुरुक्षेत्राला आला. तो अंतरिक्षांत असलेली उर्वशी राजाच्या दृष्टीस पडली ९२.
देखोनि म्हणे धांव पाव । मजलागीं दे कां वेगीं खेंव ।
येरी म्हणे मूढभाव । सांडीं सर्व विषयांधा ॥ ९३ ॥
तिला पाहतांच तो म्हणाला, ” अग उर्वशी, धाव ! मला पाव ! ये आणि मला लवकर आलिंगन दे.” तेव्हा ती म्हणाली, ” हे विषयांधा! हा सारा मूर्खपणा सोडून दे ९३;
आम्हां स्त्रियांची आसक्ती । कदा धड नव्हे गा भूपती ।
सदा स्त्रियांची दुष्ट जाती । जाण निश्चितीं महराजा ॥ ९४ ॥
भूपते, आमची स्त्रियांची आसक्ति कधीच बरी नव्हे. हे महाराजा ! स्त्रियांची जात नेहमी दुष्ट असते, हे पक्के लक्षात ठेव ९४,
विशेषें आम्ही स्वैरिणी । स्वेच्छा परपुरुषगामिनी ।
आमुचा विश्वास मनीं । झणीं न मानीं नृपनाथा ॥ ९५ ॥
विशेषेकरून आम्ही वेश्या स्वच्छंदी असतों, मनःपूत वागतों, व परपुरुषाशी स्वेच्छेने संग करतों; ह्याकरिता हे राजश्रेष्ठा ! तूं मनामध्ये आमचा विश्वास कधीही धरूं नको ९५.
आम्हां प्रमदांच्या संगतीं । राया ठकले नेणों किती ।
आतां सांडूनि आमची आसक्ती । होईं परमार्थीं विरक्त ॥ ९६ ॥
हे राजा ! आम्हां स्त्रियांच्या संगतीने आजपर्यंत किती लोक फसले आहेत त्यांचा पत्ता नाही; तूं आता आमची आसक्ति सोडून विरक्त होउन परमार्थ-मार्गाला लाग ९६;
बहु काळ भोगितां माझा भोग । अद्यापि नुपजे तुज विराग ।
कामासक्ति सांडूनि साङ्ग । साधीं चांग निजस्वार्थ ॥ ९७ ॥
किती तरी काल तूं माझा भोग घेतलास, पण अद्यापही तुला वैराग्य उत्पन्न होत नाही ! तरी असें न करता कामासक्ति समूळ सोडून देऊन आपला खरा स्वार्थ साधण्याच्या मार्गास लाग” ९७.
राजा ग्लानि करी अनेग । एकवेळ निजांगें अंग ।
मज देई अंगसंग । सुखसंभोग भामिनी ॥ ९८ ॥
परंतु तिचे हे भाषण राजाला रुचलें नाही. तो पुन्हा तिच्या पायधरण्या करूं लागला. तो म्हणाला, “तूं कसेंही करून मला एकदा अंगसंग दे. हे सुंदरी ! तूं मला एकवार सुखसंभोग दे” ९८.
निलाग देखोनि ग्लानीसी । कृपेनें द्रवली उर्वशी ।
मग ते आपुल्या पूर्व वृत्तांतासी । रायापाशीं निवेदी ॥ ९९ ॥
त्याची अत्यंत ग्लानि पाहून उर्वशीच्या मनाला पाझर फुटला. आणि ती आपला पूर्ववृत्तांत राजापाशी सांगू लागली ९९.
मी स्वर्गांगना अतिसुरूप । मज घडला ब्रह्मशाप ।
तूं महाराजा पुण्यरूप । संगें निःशाप मी झालें ॥ १०० ॥
मी अत्यंत सुस्वरूप अशी स्वर्गांगना आहे; मला ब्रह्मादेवाचा शाप झाला होता; परंतु तूं अत्यंत पुण्यवान् राजा असल्यामुळे तुझ्या संगतीने मी त्या शापापासून मुक्त झाले १००;
तुझेनि संगें मी निर्धूत । शाप निस्तरले समस्त ।
मज तुज संग न घडे एथ । मी असें जात स्वर्गासी ॥ १ ॥
तुझ्या संगामुळे मी निष्पाप झाले, माझ्या साऱ्या शापाचे निरसन झाले, याकरितां आतां तुझा माझा संग या लोकी घडणार नाही. मी आता स्वर्गाला जात आहे १.
ऐकोनि उर्वशीचें वचन । राजा विरहें करी रुदन ।
तेव्हां कळवळलें तिचें मन । त्या उपाय पूर्ण दाविला ॥ २ ॥
उर्वशीचे भाषण ऐकून राजा तिच्या विरहाने रडूं लागला. तेव्हा तिचे मन कळवळले आणि तिने त्याला एक चांगला उपाय सांगितला २.
प्रार्थूनियां गंधर्वांसी । अग्निस्थाली दिधली रायासी ।
यावरी करूनि यागासी । मज पावसी महाराजा ॥ ३ ॥
प्रथम तिने गंधर्वाची प्रार्थना करून एक अग्निस्थाली मिळविली व ती त्या राजास देऊन म्हणाली की, ह्या स्थालीवर यज्ञ कर, म्हणजे हे महाराजा ! तुला माझी प्राप्ति होईल ३.
उर्वशीवियोगें व्यथाभूत । अग्निस्थाली उपेक्षूनि तेथ ।
राजा निजमंदिरा येत । शोकाकुलित अतिदुःखी ॥ ४ ॥
उर्वशीच्या वियोगाने व्याकुळ झाल्यामुळे अग्निस्थाली तेथेच टाकून देऊन राजा आपल्या मंदिरांत आला. त्या वेळी तो शोकाने अत्यंत व्याप्त होऊन फारच दुःखी झाला होता ४.
उर्वाशीची व्यथा रायासी । स्वप्नीं देखिलें तियेसी ।
त्वरेनें पाहूं आला स्थालीसी । तंव देखे अश्वत्थासी शमीगर्भा ॥ ५ ॥
त्याच्या मनाला उर्वशीची अगदी खंतच लागून राहिल्यामुळे ती त्याला स्वप्नामध्ये दिसली. तेव्हां तो जागा होऊन मोठ्या लगबगीने ती स्थाली पहावयास आला. तो त्याला, अंगावर शमीचे झाड उगवलेले आहे असा अश्वत्थवृक्ष दृष्टीस पडला ५.
त्याच्या अरणी करूनि देख । यज्ञाग्नि पाडिला चोख ।
यजूनि पावला उर्वशीलोक । कामसुखभोगेच्छा ॥ ६ ॥
तेव्हा त्याने त्या अश्वत्थाच्याच अरणी करून यज्ञाकरितां पवित्र अग्नि तयार केला, व यथासांग यज्ञ करून कामसुखभोगेच्छेमुळे तो उर्वशीच्या लोकी गेला ६.
भोग भोगितां उर्वशीसीं । विरक्ति उपजली रायासी ।
तो जें बोलिला अनुतापेंसीं । तें ऐक तुजसी सांगेन ॥ ७ ॥
त्या उर्वशीशी विलास करता करता त्या राजाला विरक्ति उत्पन्न झाली. त्या वेळी पश्चात्तापाने तो जे जे काय बोलला तें तुला सांगतों ७.
अठरा श्लोकांचें निरूपण । राजा बोलिला आपण ।
आठे श्लोकीं अनुताप पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण स्वयें सांगें ॥ ८ ॥
ते निरूपण राजा अठरा श्लोकांनी बोलला आहे. त्यांतील आठ श्लोकांत त्याचा खरा पश्चात्ताप आहे. तोच श्रीकृष्ण स्वतः सांगतात ८.
ऐल उवाच-अहो मे मोहविस्तारः कामकश्मलचेतसः ।
देव्या गृहीतकण्ठस्य नायुःखण्डा इमे स्मृताः ॥ ७ ॥
[श्लोक ७] पुरूरवा म्हणाला – अरेरे ! माझा किती हा मूर्खपणा ! कामवासनेने चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशीने गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्षे फुकट गेली, कळलचे नाही. (७)
ऐलगीताचा अनुताप । नाशी अगम्यागमनपाप ।
करी श्रोत्यांसी निष्पाप । साधकां कंदर्प बाधीना ॥ ९ ॥
हें पुरूरव्याच्या पश्चात्तापाचे गीत ऐकलें असतां अगम्यागमनपातकाचा नाश होतो. त्याचे श्रवण करणारे निष्पाप होतात; आणि साधकांना मदनाची बाधा केव्हाही होत नाहीं ९.
जेवीं मदगज गजीसंगीं । नाना आपत्ति स्वयें भोगी ।
तेवीं उर्वशीच्या संभोगीं । झाला विरागी पुरूरवा ॥ ११० ॥
मत्त झालेला हत्ती ज्याप्रमाणे हस्तिणीच्या संगतीने नानाप्रकारच्या आपदा भोगतो, त्याप्रमाणे उर्वशीच्या संगतीने पुरूरवाही दुःख भोगून विरक्त झाला ११०.
जो उर्वशीलागीं अनुरक्त । तोचि तिसीं झाला विरक्त ।
तेणें वैराग्यें अनुतापयुक्त । स्वयें बोलत ऐलरावो ॥ ११ ॥
जो उर्वशीवर अगदी लुब्ध झाला होता, तोच तिला विटला; आणि वैराग्याने पश्चात्ताप पावून तो पुरूरवा राजा स्वतःच बोलू लागला ११.
माझ्या मोहाचा विषयविस्तार । कामासक्त कामातुर ।
कुश्चित कंदर्पाचें घर । म्यांचि साचार सेविलें ॥ १२ ॥
माझ्या मोहामुळे विषयवासना फारच वाढली, त्यामुळे त्या अमंगळ मदनाचें घर मीच सेवन केलें ! १२,
उर्वशीकामें अतिआसक्त । कामातुर झालें चित्त ।
तेणें म्यां जोडिला अनर्थ । थितें केलें व्यर्थ आयुष्य ॥ १३ ॥
उर्वशीच्या लालचीने मी अतिशय लंपट झालो. माझें चित्त कामाने अगदी व्याप्त होऊन गेलें व मी मोठा अनर्थ केला. माझे आयुष्य मी व्यर्थ घालविलें १३.
उर्वशी कंठसल्लग्न शस्त्र । आयुष्यच्छेदनीं सतेजधार ।
छेदिलें आयुष्य अपार । तें मी पामर स्मरेना ॥ १४ ॥
गळ्याला लागलेलें उर्वशीरूप शस्त्र, आयुष्य छेदण्याविषयी ज्याला तीक्ष्ण धार आहे, त्याने किती तरी आयुष्य छेदून टाकले. पण मला पामराला त्याची स्मृतिच राहिली नाही १४.
कांताआलिंगन विषवल्ली । म्यां कंठीं घातली सकाम भुलीं ।
तिणें आयुष्याची होळी केली । विवेक समूळी गिळिला ॥ १५ ॥
मी कामेच्छेच्या मुलीने कांता-आलिंगनरूप विषवल्ली गळ्यांत अडकवून घेतली. तिने साऱ्या आयुष्याची होळी करून विचार सारा गिळूनच टाकला १५.
कामिनीकामआलिंगनीं । कंठीं पेटविला दावाग्नी ।
तो धडाडिला आयुष्यवनीं । विवेकअवनी जाळित ॥ १६ ॥
स्त्रीचा आलिंगनरूपी दावाग्नि मी गळ्यांत पेटवून घेतला, तो आयुष्यरूप वनांत धडाधडा पेटून विवेकरूप जमीनही त्याने होरपळून टाकली १६.
नरदेहींचें उत्तमोत्तम । अमूल्य आयुष्य केलें भस्म ।
जळो जळो माझें कर्म । निंद्य अधर्म तो एक ॥ १७ ॥
नरदेहाचे उत्तमोत्तम अमूल्य आयुष्य मी भस्म करून सोडलें ! आग लागो त्या माझ्या कर्माला ! तो एक निंद्य अधर्मच मी केला १७.
नरदेहींच्या आयुष्यपुष्टी । साधक रिघाले वैकुंठीं ।
ज्ञाते ब्रह्म होती उठाउठीं । तें म्यां कामासाठीं नाशिलें ॥ १८ ॥
नरदेहाच्या आयुष्याच्या आश्रयाने साधक लोक वैकुंठास जातात; ज्ञाते तर हां हां म्हणतां ब्रह्मपदाला पोचतात. ते आयुष्य मी स्त्रीव्यसनांत नासून टाकलें ! १८.
नाहं वेदाभिनिर्मुक्तः सूर्यो वाभ्युदितोऽमुया ।
मुषितो वर्षपूगानां बताहानि गतान्युत ॥ ८ ॥
[श्लोक ८] हिच्या सहवासात सूर्य मावळला की उगवला हेही मला समजत नसे अरेरे ! कित्येक वर्षाचे दिवसच्या दिवस निघून गेले हिने मला पुरते लुटले ! (८)
नरदेहाचा आयुष्यक्षण । न मिळे देतां कोटी सुवर्ण ।
तें म्यां नाशिलें संपूर्ण । आपणया आपण नाडिलें ॥ १९ ॥
नरदेहांतील आयुष्याचा एक क्षण कोट्यवधि सुवर्णमोहरा देऊनही मिळणार नाही. तें सारेंच्या सारे आयुष्य नष्ट करून माझा मीच घात करून घेतला १९.
साधूंचिया निजस्वार्था । साधूनि द्यावया उगवे सविता ।
निमेषोन्मेषें परमार्था । साधक तत्त्वतां साधिती ॥ १२० ॥
साधूंचे हित साधण्याकरितांच रोज सूर्य उगवत असतो. म्हणूनच साधक निमिष निमिष करून परमार्थ साधीत असतात १२०.
तोचि सविता सकामासी । आयुष्य हरी अहर्निशी ।
हें न कळे ज्याचें त्यासी । नरकपातसी निजमूळ ॥ २१ ॥
तोच सूर्य स्त्रीलंपट पुरुषाचे आयुष्य रात्रंदिवस कमी करीत असतो. हे ज्याचे त्याला कळत नाही, हेच नरकपाताचे खरे मूळ आहे २१.
पुढिलांची गोठी ते कायसी । मीच नाडलों उर्वशीपासीं ।
ऱ्हास झाला आयुष्यासी । हे हानि कोणासी सांगावी ॥ २२ ॥
इतरांची गोष्ट कशाला? मीच उर्वशीच्या नादाने गोत्यांत पडलों, त्यामुळे माझ्या आयुष्याची हानि झाली. ही गोष्ट सांगावयाची कोणाला ? २२.
जनांचिया हितासी वहिला । सूर्यो अनुदिनीं उगवला ।
तें मी नेणेंचि दादुला । उर्वशीकामें भुलला उन्मत्त ॥ २३ ॥
लोकांचे हित करण्याकरितांच दररोज सूर्य उगवतो, हे मी पुरुष असूनही जाणले नाही. उर्वशीच्या नादाने भुलून मदोन्मत्त झालों २३.
सूर्याचा उदयो अस्तमान । वर्षेही लोटल्या नाहीं ज्ञान ।
करितां उर्वशी-अधरपान । तेणें मदें संपूर्ण मातलों ॥ २४ ॥
सूर्योदय आणि सूर्यास्त होता होतां वर्षेच्या वर्षे लोटली, तरी मला दाद नाही. उर्वशीच्या अधरामृताचें पान करता करतां त्याच धुंदीनें धुंद झालों २४.
मद्यमदु उतरे दिनांतीं । धनमदु जाय निधनस्थितीं ।
तारुण्यमदु जाय क्षीणशक्ती । स्त्रीमदप्राप्ती कदा नुतरे ॥ २५ ॥
दारूची धुंदी दुसऱ्या दिवशी उतरते; द्रव्याची धुंदी दरिद्र आले की उतरते; शक्ति क्षीण झाली की तारुण्याची धुंदी उतरते; परंतु स्त्रीपासून चढलेली धुंदी कधीच उतरत नाही २५,
नरदेहीची आयुष्यकथा । पुढती दुर्लभ न लभे हाता ।
जळो हे उर्वशी देवकांता । इणेंचि तत्त्वत्तां नागविलों । २६ ॥
नरदेहाचे आयुष्य अत्यंत दुर्लभ आहे. ते पुन्हा हाती लागावयाचे नाही. जळो ही देवांगना उर्वशी ! खरोखर हिनेच माझा सत्यानाश करून टाकला २६.
मी निर्भय रक्षिता सर्वांसी । त्या मज नागविलें उर्वशीं ।
हे लाज सांगों कोणापाशीं । उकसाबुकसीं स्पुंदत ॥ २७ ॥
मी निर्भय सर्वांचे रक्षण करणारा, त्या मला उर्वशीनें नागविलें ! ही लाज सांगावी ‘ तरी कोणापाशी? असें म्हणून तो हुंदके देऊन रडूं लागला ! २७.
माझ्या निजहिताचा चोरू । हे उर्वशी जीवें मारूं ।
सवेंचि उपजला विचारू । येथ मीचि पामरू अविवेकी ॥ २८ ॥
माझ्या निजहिताची चोरी करणारी ही उर्वशी आहे. हिला, परच केली पाहिजे असें तो म्हणाला, परंतु लगेच त्याला विचार उत्पन्न झाला की, यांत तिच्याकडे काय दोष आहे ? मीच अविचारी खरा २८.
मग म्हणे कटकटा । सृष्टीमाजीं मी करंटा ।
आयुष्य नाशिलें कामचेष्टा । अपाव मोठा मज झाला ॥ २९ ॥
पुन्हा म्हणाला, हाय हाय ! जगामध्ये मीच एक भद्रकपाळी होय. कामचेष्टेनें मींच माझ्या आयुष्याचा नाश करून घेतला, ही फारच मोठी हानी झाली ! २९.
मग आक्रंदे अतिगर्जोनी । कामें नागविलों आयुष्य हरोनी ।
याहीहोनि आधिक हानी । पाहतां ये जनीं असेना ॥ १३० ॥
नंतर मोठ्याने आक्रोश करून व ओरडून म्हणाला, ह्या मदनाने मला नागविलें. मी आपले आयुष्य गमावून बसलो. खरोखर पहाता ह्याच्याहून मोठी हानी ह्या जगांत दुसरी नाही १३०.
अहो मे आत्मसंमोहो येनात्मा योषितां कृतः ।
क्रीडामृगश्चक्रवर्ती नरदेवशिखामणिः ॥ ९ ॥
[श्लोक ९] अहो ! माझ्या मनातील मोह इतका वाढला की, ज्याने चक्रवर्ती महापुरूष असलेल्या मला स्त्रियांचे खेळणे केले. (९)
राजे मुकुटांचे प्रतापी पूर्ण । माझ्या चरणा येती शरण ।
तो मी वेश्येचे धरीं चरण । हें निर्लज्जपण म्यां केलें ॥ ३१ ॥
मोठमोठे पराक्रमी मुकुटमणि राजेसुद्धा माझ्या पायाला शरण येतात, तो मी एका क्षुद्र वेश्येचे पाय धरीत होतो, हा माझा केवढा निर्लज्जपणा बरें ! ३१.
मज पुरूरव्याचे आज्ञेंकरीं । राजे नाचती चराचरीं ।
तो मी वेश्येचे आज्ञेवरी । श्वानाचेपरी वर्तलों ॥ ३२ ॥
मज पुरूरव्याच्या आज्ञेबरोबर कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे सारे राजे नाचत असतात, तो मी वेश्येच्या आज्ञेनें कुत्र्याप्रमाणे लांगूलचालन करीत होतों ! ३२.
जैसें वानर गारुड्याचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचें ।
माझ्या चक्रवर्तीपणाचें । अतिनिंद्य साचें फळ झालें ॥ ३३ ॥
डोंबाऱ्याच्या माकडाप्रमाणे मी स्त्रीच्या छंदाने नाचलों. माझ्या चक्रवर्तीपणाचे मला असें निंद्य फळ आले ना! ३३.
सकळ राजे मज देती सन्मान । भूपति सदा वंदिती चरण ।
तो मी झालों स्त्रियेआधीन । हीनदीन अतिरंक ॥ ३४ ॥
सारे राजे मला मोठा मान देतात, भूपति माझ्या चरणाचे वंदन करतात, तो मी एका स्त्रीचा दास बनून हीन, दीन, व भिकारी होऊन बसलों ना! ३४.
राखतां स्त्रियेचा रसरंगप्रेम । पायां पडणें हें उचित कर्म ।
म्हणती ते जळो जन सकाम । हेचि धाडी परम कामाची ॥ ३५ ॥
स्त्रीला प्रसन्न राखण्याकरितां तिच्या पायां पडणे उचित आहे असे म्हणणाऱ्या कामी पुरुषांच्या तोंडाला आग लागो ! कारण ती मदनाची मोठी धाड होय ३५.
मी वलयांकित चक्रवर्ती । तोही योषिता घातलों आवर्तीं ।
त्याचि आवर्ताची स्थिती । स्वमुखें भूपति अनुवादे ॥ ३६ ॥
मी समुद्रवलयांकित पृथ्वीचा सार्वभौम. त्या मला एका वेश्येने भोवऱ्यात अडकविले. त्याच भोवऱ्याचे वर्णन राजा स्वतः सांगत आहे ३६.
सपरिच्छदमात्मानं हित्वा तृणमिवेश्वरम् ।
यान्तीं स्त्रियं चान्वगमं नग्न उन्मत्तवद्रुदन् ॥ १० ॥
[श्लोक १०] प्रजेवर सत्ता चालवणार्या मला आणि माझ्या राजसिंहासनाला गवताच्या काडीप्रमाणे सोडून उर्वशी निघून चालली असता मी वेडा होऊनउघडा रडतकढत तिच्या पाठीमागे निघालो. (१०)
केवळ साकार मायाभ्रम । यालागीं ‘प्रमदा’ स्त्रीचें नाम ।
संगें ठकिले उत्तमोत्तम । स्त्रीसंभ्रम वाढवितां ॥ ३७ ॥
स्त्री म्हणजे केवळ साकार माया-भ्रम होय. म्हणूनच स्त्रीला ‘प्रमदा’ असे म्हणतात. ह्या स्त्रियांचा छंद वाढवून मोठमोठाले लोक फशी पडले आहेत ३७.
प्रमदा अंबरें अलंकार । हें मायेचें सोलीव सार ।
एथ भुलले थोरथोर । मीही पामर स्त्रीसंगें ॥ ३८ ॥
स्त्रिया, वस्त्रे व अलंकार हे मायेचे मुख्य तत्त्व आहे; ह्याला मोठमोठाले लोक भुललेले आहेत. तसाच मीही स्त्रीच्या संगतीने पामर बनलों ३८.
माझीच मज करणी । दिसतसे दैन्यवाणी ।
उर्वशी वेश्या कामचारिणी । जे बहुजनीं भोगिली ॥ ३९ ॥
मलाच माझी करणी दीनवाणी वाटते. कारण उर्वशी ही बोलूनचालून वेश्या. तिला किती तरी लोकांनी भोगली असेल ३९.
ऐशियेच्या कामासक्तता । मी स्वर्वस्वें भुललों सर्वथा ।
ते भुललेपणाची कथा । अनुतापतां स्वयें बोले ॥ १४०॥
असलीला कामासक्तपणामुळे मी सर्वस्वी भुललों ना ! ती भुललेपणाची कथा पश्चात्तापपूर्वक राजा स्वत:च सांगत आहे १४०.
धर्मपत्नीसीं भोगितां काम । सहसा नासेना स्वधर्म ।
मज वोढवलें दुष्ट कर्म । वेश्येसी परम भुललों ॥ ४१ ॥
धर्मपत्नीशी कामोपभोग घेतला असतां स्वधर्माची सहसा हानी होत नाही; परंतु माझे दुष्कर्म ओढवले व मी वेश्येला भुलून पडलों ! ४१.
परदारा अभिलाषिती । ते अवश्य नरका जाती ।
मा स्वदारा-कामासक्ती । तेथही अधोगती सोडीना ॥ ४२ ॥
परस्त्रीचा अभिलाष करतात, ते तर हटकून नरकाला जातात; पण आपल्या पत्नीवरही जे आसक्त होतात त्यांनाही अधोगति सुटत नाहीं ४२.
स्त्रियां भुलविले हरिहर । स्त्रियां भुलविले ऋषीश्वर ।
स्त्रियां भुलविले थोरथोर । मीही किंकर स्त्रियां केलों ॥ ४३ ॥
स्त्रियांनी हरिहरांनासुद्धा भुरळ घातली आहे; स्त्रियांनी मोठमोठ्या ऋषींनाही भुलवून सोडलें आहे; स्त्रियांनी मोठमोठ्यांना पाशांत गुंतविले आहे; तसे मलाही स्त्रियांनी दास बनविलें ! ४३.
राज्य आणि राजवैभव । वेश्येअधीन केलें सर्व ।
याहीहूनि केलें अपूर्व । तीलागीं जीव अर्पिला ॥ ४४ ॥
राज्य आणि राजवैभव सारें मी वेश्येच्या हवाली केलें ! इतकेच नव्हे, तर ह्याहूनही एक विलक्षण केलें तें हें की, तिच्यासाठी मी जीवही अर्पण केला ! ४४.
मी राजवर्यां मुकुटमणे । तो दास झालों तिचे चरणीं ।
बाप कंदर्पाची करणी । केलों कामिनी अधीन ॥ ४५ ॥
सर्व राजांचा मुकुटमणि मी; तो मी तिच्या पायांचा केवळ दास बनलों. मदनाची करणी मोठी विलक्षण खरी ! तिने मला स्त्रीच्या अधीन करून सोडलें ! ४५.
ऐशिया मज राजेश्वरातें । वेश्येनें हाणोनि लातें ।
उपेक्षूनियां तृणवतें । निघाली निश्चितें सांडोनी ॥ ४६ ॥
अशा मला राजराजेश्वराला त्या वेश्येनें लाथ मारून कसपटाप्रमाणे माझी उपेक्षा करून ती मला सोडून चालती झाली ४६.
तीसी जातां देखोनियां पुढें । मी नागवा धांवें लवडसवडें ।
लाज सांडोनियां रडें । तरी ते मजकडे पाहेना ॥ ४७ ॥
तिला पुढे चाललेली पाहून मी नागवा उघडाच तिच्यामागे धावलों; सारी लाज सोडून देऊन रडलों; तरीसुद्धा ती माझ्याकडे पाहीना ! ४७.
जेवीं कां लागलें महद्भूत । नातरी पिशाच जैसें उन्मत्त ।
तेवीं नागवा धांवे रडत । तरी तिचे चित्त द्रवेना ॥ ४८ ॥
जसा एखादा ब्रह्मसमंध लागावा, नाही तर एखादें उन्मत्त पिशाच असावे, त्याप्रमाणे मी नागवाच रडत रडत तिच्यामागे धावत होतो, तरी तिच्या चित्ताला द्रव येईना ! ४८.
तरी रडत पडत अडखळत । मी निर्लज्ज तीमागें धांवत ।
माझे मोहाचा अतिअनर्थ । अपमानग्रस्त मज झाला ॥ ४९ ॥
तरीही मी रडत पडत, अडखळत निर्लज्जासारखा तिच्यामागे धावतच होतो; माझ्या मोहापासून झालेल्या अनर्थामुळे मी अपमानग्रस्त झालो ४९.
कुतस्तस्यानुभावः स्यात्तेज ईशत्वमेव वा ।
योऽन्वगच्छं स्त्रियं यान्तीं खरवत्पादताडितः ॥ ११ ॥
[ श्लोक ११] गाढवाप्रमाणे मारलेल्या लाथा सहन करूनही मी त्या स्त्रीच्या पाठीमागे निघालो ! अशा स्थितीत माझ्या ठिकाणी प्रभाव, तेज आणि स्वामित्व कसे राहू शकेल बरे ? (११)
मी महत्त्वें राजराजेश्वरु । ऐसा गर्व होता अति दुर्धरु ।
तो मी वेश्येचा अनुचरु । झालों किंकरु निजांगें ॥ १५० ॥
मी मोठा राजराजेश्वर आहे, असा मला अतिदुर्धर गर्व होता. तो मी आपण होऊनच वेश्येचा हुजऱ्या व दास बनलों ! १५०.
एवढाही मी राजेश्वरु । मांगे धांवें होऊनि किंकरु ।
तरी ते न करी अंगीकारु । जेवीं वोसंडी खरुखरी जैशी ॥ ५१ ॥
एवढा मी राजराजेश्वर असून तिच्यामागे हुजऱ्यासारखा धावत होतो, तरी तिने माझा अंगीकार केला नाही, इतकेच नव्हे, तर गाढवी जशी गाढवाला लाथा मारून हांकून लावते, त्याप्रमाणे तिने मला हांकून लावले ५१.
जेवीं खरी देखोनियां खरु । धांवोनि करी अत्यादरु ।
येरी उपेक्षूनि करी मारु । अतिनिष्ठुरु लातांचा ॥ ५२ ॥
गाढवी पाहिली म्हणजे गाढव जसा धावत जाऊन तिच्याशी अत्यंत लाडीगोडी करितो, पण ती त्याला झुगारून देऊन तडातड लाथा मारते ५२.
तिच्या लाता लागतां माथां । खरु निघेना मागुता ।
त्या खराऐशी मूर्खता । माझें अंगीं सर्वथा बाणली ॥ ५३ ॥
तिच्या त्या दुगाण्या टाळक्यांत बसत असतात, तरी गाढव माघारा फिरतच नाही, त्या गाढवाप्रमाणेच मूर्खपणा माझ्या अंगांत पूर्णपणे बिंबला होता ! ५३.
स्त्री उदास कामदृष्टीं । मीं आसक्त लागें पाठीं ।
माझ्या समर्थपणाची गोठी । सांगतां पोटीं मी लाजें ॥ ५४ ॥
कामदृष्टीने ती उदास; पण मीच आसक्त होऊन तिच्या पाठीस लागलों ! माझ्या पराक्रमाची गोष्ट सांगतांना माझी मलाच लाज वाटते ५४.
ऐसें स्त्रीकामीं ज्याचें मन । त्याचें योग याग अनुष्ठान ।
अवघेंचि वृथा जाण । तेंचि निरूपण निरूपी ॥ ५५ ॥
याप्रमाणे स्त्रीविषयांत ज्याचें मन लंपट झाले, त्याचे योग, याग, अनुष्ठान, सर्व काही व्यर्थ होते. तेच निरूपण निरूपितात ५५.
किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा ।
किं विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] स्त्रियांनी ज्याचे मन चोरले, त्याची विद्या, तपश्चर्या, त्याग, शास्त्राभ्यास, एकांतात राहाणे किंवा मौन, सारे सारे निष्फळच आहे. (१२)
स्त्रीकाममय ज्याचें मन । त्याची वृथा विद्या वृथा श्रवण ।
वृथा तप वृथा ध्यान । त्याग मुंडण तें वृथा ॥ ५६ ॥
ज्याचे मन स्त्रीकाममय बनले, त्याची विद्या, बहुश्रुतपणा, तप, धन, त्याग व संन्यास वगैरे सारे व्यर्थ होय ५६.
वृथा एकांतसेवन । वृथा जाण त्याचें मौन ।
राखेमाजीं केलें हवन । तैसें अनुष्ठान स्त्रीकामा ॥ ५७ ॥
त्याचा एकांतवास वृथा; त्याचे मौन वृथा; तसेंच राखेंत हवन केल्याप्रमाणे त्या स्त्रैणाचे अनुष्ठानही व्यर्थ होय ५७.
कामासक्त ज्याचें चित्त । त्याचे सकळही नेम व्यर्थ ।
आपुलें पूर्ववृत्त निंदित । अनुतापयुक्त नृप बोले ॥ ५८ ॥
ज्याचे चित्त कामासक्त झालेले असेल, त्याचे सारे नेमही व्यर्थ होत. याप्रमाणे आपल्या पूर्वीच्या वागणुकीची निंदा करून पश्चात्तापपूर्वक राजा बोलत आहे ५८.
स्वार्थस्याकोविदं धिङ्मां मूर्ख पण्डितमानिनम् ।
योऽहमीश्वरतां प्राप्य स्त्रीभिर्गोखरवज्जितः ॥ १३ ॥
[श्लोक १३] स्वार्थ न कळणार्या, तरीसुद्धा स्वतःला पंडित समजणार्या मज मूर्खाचा धिक्कार असो ! अरेरे ! मी सम्राट असूनही स्त्रियांनी मला गाढवबैलासारखे आपल्या अधीन केले. (१३)
चहूं पुरुषार्थाचें अधिष्ठान । नरदेह परम पावन ।
जेणें देहें करितां भजन । ब्रह्म सनातन पाविजे ॥ ५९ ॥
चारही पुरुषार्थाचे केवळ अधिष्ठान असा जो परम पावन नरदेह, त्या देहाच्या योगाने भजन केलें असतां सनातन ब्रह्माची प्राप्ति होते ५९.
नरदेहींचा क्षण क्षण । समूळ निर्दळी जन्ममरण ।
भावें करितां हरिस्मरण । महापापें जाण निर्दळती ॥ ६० ॥
नरदेहांतील एक एक क्षणसुद्धा जन्ममरणाचा नाश करतो; भक्तिभावानें हरीचे स्मरण केले असतां मोठमोठी पातकेंही नष्ट होतात १६०.
त्या नरदेहाची लाहोनि प्राप्ती । नरवर्य झालों चक्रवर्ती ।
त्या माझी जळो जळो स्थिती । जो वेश्येप्रती भुललों ॥ ६१ ॥
अशा नरदेहाचा लाभ होऊन नृपश्रेष्ठ असा चक्रवर्ती राजा झालों आणि वेश्येला भुलून पडलों ! आग लागो त्या माझ्या स्थितीला! ६१.
मानी श्रेष्ठ मी सज्ञान । परी अज्ञानांहूनि अज्ञान ।
नेणेंचि निजस्वार्थसाधन । वेश्येआधीन मी झालों ॥ ६२ ॥
मी मोठा श्रेष्ठ व ज्ञानी म्हणवीत होतो, पण अज्ञाहुनही अज्ञान होतो. कारण आपले खरे हित कशांत ते मला कळले नाही आणि मी वेश्येच्या आधीन झालों ! ६२.
लाभोनि नरदेहनिधान । म्यां देहीं धरिला ज्ञानाभिमान ।
न करींच निजस्वार्थसाधन । हें मूर्खपण पैं माझे ॥ ६३ ॥
नरदेहासारखा ठेवा सांपडला असतां मी ज्ञानाचा ताठा धरला आणि स्वहिताचे साधन कांहींच केले नाही. हे माझे मूर्खपण आहे ६३.
जैसा गायीमागें कामयुक्त । धांवतां बैल न मानी अनर्थ ।
कां खरीमागें खर धांवत । तैसा कामासक्त मी निर्लज्ज ॥ ६४ ॥
उल्लू होऊन गाईमागें बैल धावत सुटतो, पुढील अनर्थ त्याला कळत नाही, किंवा गाढवीच्या पाठीमागे गाढव धावतो, त्याप्रमाणेच मी कामासक्त व निर्लज्ज बनलो होतो ६४.
खरी खरास हाणी लाताडें । तरी तो धसे पुढें पुढें ।
तैसाचि मीही वेश्येकडे । कामकैवाडें भुललों ॥ ६५ ॥
गाढवी गाढवाला लाथा मारीतच असते, तरी तो पुढे पुढे घुसत असतो, त्याप्रमाणेच मीही विषयाच्या इच्छेनें वेश्येला भुलून गेलो ६५.
‘कामभोगांतीं विरक्ती’ । ऐसे मूर्ख विवेकी बोलती ।
ते अधःपातीं घालिती । हे मज प्रतीति स्वयें झाली ॥ ६६ ॥
‘कामभोगाच्या अंती विरक्ति उत्पन्न होते,’ असें विचारी लोक म्हणतात पण ते मूर्ख होत. ते अधःपातालाच नेऊन घालतात, हा मला स्वतःला अनुभव आला ! ६६.
सेवतो वर्षपूगान्मे उर्वश्या अधरासवम् ।
न तृप्यत्यात्मभूः कामो वह्निराहुतिभिर्यथा ॥ १४ ॥
[श्लोक १४] अनेक वर्ष उर्वशीचे अधरामृत सेवन करूनही माझी कामवासना तृप्त झाली नाही जसा आहुतीमागून आहुती दिल्या तरी अग्नी तृप्त होत नाही. (१४)
सत्ययुगींचें आयुष्य माझें । ऐश्वर्य सार्वभौमराज्यें ।
उर्वशी स्वर्गमंडनकाजें । सर्वभोगसमाजें भोगितां ॥ ६७ ॥
सत्ययुगाचे माझे आयुष्य; ऐश्वर्य तर सार्वभौमराजाचें. उर्वशी आपल्या स्वर्गातील स्वार्थासाठी अनेक प्रकारचे भोग मजकडून भोगवीत होती ६७.
भोगितां लोटल्या वर्षकोटी । परी विरक्तीची नाठवे गोठी ।
मा ‘वैराग्य भोगाचे शेवटीं’ । हे मिथ्या चावटी मूर्खांची ॥ ६८ ॥
असे सुखविलास भोगतांभोगतां कोट्यवधि वर्षे लोटली, परंतु विरक्तीची कल्पना मला आली नाही. ह्यावरून ‘भोगाच्या शेवटीं वैराग्य होत’ म्हणतात, ती व्यर्थ मूर्खांची बडबड होय ६८.
स्त्रियेचें म्हणती अधरामृत । तेही मूर्ख गा निश्चित ।
तें उन्मादमद्य यथार्थ । अधिकें चित्तभ्रामक ॥ ६९ ॥
स्त्रीच्या अधरपानाला ‘अमृत’ असें म्हणातत तेही खरोखर मूर्खच होत. तें अमृत तर नव्हेच, पण खरोखर अंमल आणणारी ती दारू आहे व ती विशेष चित्तभ्रामक आहे ६९.
वनिताअधरपानगोडी । त्यापुढें सकळ मद्यें बापुडीं ।
तत्काळ अनर्थीं पाडी । निजस्वार्थकोडीनाशक ॥ १७० ॥
स्त्रीच्या अधरपानाची जी गोडी आहे, तिच्यापुढे सारी मद्ये बिचारी कःपदार्थ होत. कारण, ती तत्काल अनर्थात पाडते, आणि निजस्वार्थाच्या राशी नष्ट करिते १७०.
घालितां कोटि घृताहुती । अग्नीसी कदा नव्हे तृप्ती ।
तेवीं वनिताकामासक्ती । कदा विरक्ती उपजेना ॥ ७१ ॥
कोट्यवधि तुपाच्या आहुती घातल्या, तरी अग्नीची जशी तृप्ति होत नाही, त्याप्रमाणे स्त्रीसंगापासूनही कधी विरक्ति उत्पन्न होत नाहीं ७१.
ऐसा आठ श्लोकीं अनुताप । स्वयें बोलोनियां नृप ।
हृदयीं उपजला विवेकदीप । जेणें झडे कंदर्प तें स्मरलें ॥ ७२ ॥
ह्याप्रमाणे राजाने आपला पश्चात्ताप आठ श्लोकांनी स्वतःच बोलून दाखविला. कारण हृदयामध्ये विवेकदीप पेटला, त्यामुळे मदनाचा ताप कशाने नष्ट होईल ह्याची त्याला आठवण झाली ७२.
सकामासी विषय त्यागितां । वासना न त्यागे सर्वथा ।
कां आदरें विषय भोगितां । विरक्ती सर्वथा उपजेना ॥ ७३ ॥
कामिक पुरुषाने विषय सोडले तरी त्याची वासना मुळीच सुटत नाही. मग आवडीने विषय सेवन करीत राहिला तर विरक्ति कोठून उत्पन्न होणार ? ७३.
ऐशिये अर्थींचा उपावो । विचारोनि बोले रावो ।
कामत्यागाचा अभिप्रावो । साचार पहा हो संबोधी ॥ ७४ ॥
तेव्हा त्याला उपाय काय, याचा विचार करून, स्त्रीविषयत्यागाचा खरा विचार कोणता तोच राजा आता सांगत आहे ७४.
पुंश्चल्यापहृतं चित्तं को न्वन्यो मोचितुं प्रभुः ।
आत्मारामेश्वरमृते भगवन्तमधोक्षजम् ॥ १५ ॥
[श्लोक १५] कुलटेने चोरलेल्या चित्ताला जीवन्मुक्तांचे स्वामी, इंद्रियातीत अशा भगवंताखेरीज कोण मुक्त करू शकेल ? (१५)
पुरुष सदा स्त्रीअनुराग । परी सहसा न करवे प्रसंग ।
त्यासी पुंश्चलीचा घडल्या संग । ते बाधी निलाग हावभावीं ॥ ७५ ॥
पुरुष हा सदोदित स्त्रीवर अनुरक्त असतोच; पण त्याला एकाएकी तिच्याशी अतिप्रसंग करवत नाही. त्यामुळे त्याला वेश्येची संगत घडली असता तिच्या हावभावांनी तो अत्यंत कामपीडित होतो ७५.
पुंश्चलीचे कटाक्ष गुण । तेंचि पुरुषासी दृढ बंधन ।
स्त्रीकामबंधन सोडवी कोण । एक नारायणावांचूनि ॥ ७६ ॥
वेश्येचे नेत्रकटाक्ष हेंच पुरुषाला मोठे बंधन आहे. हे स्त्रीविषयाचे बंधन एका नारायणावांचून दुसरा कोण सोडविणार आहे ? ७६.
कामिनीकामापासूनि निर्मुक्त । कर्ता ईश्वर समर्थ ।
जो कां आत्माराम भगवंत । तोचि निश्चित सोडविता ॥ ७७ ॥
स्त्रीविषयापासून मुक्त करणारा फक्त एक ईश्वरच समर्थ आहे. आत्माराम भगवंतच त्यातून निश्चयाने सोडविणारा आहे ७७.
मायागुणें कामसंचार । अविद्या वाढवी साचार ।
मायानियंता जो ईश्वर । तो कामकरकर निर्दळी ॥ ७८ ॥
कामाचा संचार मायेच्या गुणांनी होतो; अविद्या त्याला वाढवीत असते. ह्याकरितां मायेचा नियंता असा ईश्वरच त्या मदनाची पीडा दूर करूं शकतो ७८.
स्वस्वरूपीं रमण आराम । ऐसा जो कां आत्माराम ।
जो निवारी सकळ काम । करी निर्भ्रम निजात्मता ॥ ७९ ॥
आत्मस्वरूपामध्ये रममाण होऊन आनंदस्वरूप असणारा जो आत्माराम, तोच सर्व विषयांचे निवारण करून आत्मस्वरूपविषयक भ्रम दूर करितो ७९.
जो भोग भोगूनि अभोक्ता । त्या शरण रिघाल्या अनंता ।
बाधूं न शके विषयावस्था । स्त्रीसंगीं सोडविता तो एक ॥ १८० ॥
भोग भोगूनही जो अभोक्ता असतो, त्या अनंतालाच शरण गेले असता, विषयविकार बाधा करूं शकत नाहीत. स्त्रीसंगापासून सोडविणारा असा तोच एक आहे १८०.
जो निवारी अधोगती । तो अधोक्षज असतां भक्तपती ।
त्यासी शरण रिघाल्या निश्चितीं । कामासक्ती निवारी ॥ ८१ ॥
अधोगतीपासून सोडविणारा असा जो अधोक्षज तो भक्तांचे पालन करणारा असल्यामुळे त्याला शरण गेले असतां तोच कामासक्तीचे निवारण करितो ८१.
राजा कामासक्तीं अतित्रासला । सबाह्य विषयीं उदास झाला ।
त्याचा वासनाकाम जो उरला । तो न वचे त्यागिला त्याचेनीं ॥ ८२ ॥
राजा कामासक्तीने अतिशय त्रासला, विषयासंबंधाने अंतर्बाह्य उदासीन झाला, तथापि हृदयांतील वासना काही त्याच्याने त्यागवेना ८२.
सर्वभावेंसीं संपूर्ण । हरीसि रिघालिया शरण ।
सकळ कामाचें निर्दळण । सहजें जाण स्वयें होय ॥ ८३ ॥
सर्वोपरी हरीला शरण गेले तरच साऱ्या वासनांचे निवारण आपोआप होते ८३.
एकाचा मतवाद निश्चितीं । करितां श्रुतिवाक्य व्युत्पत्ती ।
यजितां इंद्रादि देवांप्रती । कामनिवृत्ति हृदयस्थ ॥ ८४ ॥
कोणी असेंही मत प्रतिपादन करतात की, वेदाध्ययन करून इंद्रादि देवांप्रीत्यर्थ यज्ञयाग केले असता हृदयांतील वासनांची निवृत्ति होते ८४.
ऐसें बोलती जे सज्ञान । ते सर्वथा गा अज्ञान ।
हरीसी न रिघतां शरण । कामसंचरण शमेना ॥ ८५ ॥
असें जे ज्ञाते सांगतात, ते निखालस अज्ञान होत. कारण, श्रीहरीला शरण गेल्याशिवाय कामबाधा शमन होत नाही ८५.
इंद्रादि देव कामासक्तीं । विटंबले नेणों किती ।
त्यांचेनि भजनें कामनिवृत्ति । जे म्हणती ते अतिमूर्ख ॥ ८६ ॥
इंद्रादि देव हे स्वतःच कामासक्तीमुळे किती फजिती झाले आहेत त्याचा पत्ता नाही. असे असता त्यांच्या भजनाने कामनिवृत्ति होते असें जे म्हणतात ते अतिमूर्ख होत ८६.
बोधितस्यापि देव्या मे सूक्तवाक्येन दुर्मतेः ।
मनोगतो महामोहो नापयात्यजितात्मनः ॥ १६ ॥
[ श्लोक १६] वैदिक सूक्तांनी उर्वशीने मला चांगल्या रीतीने उपदेश करूनसुद्धा मन ताब्यात नसलेल्या मज मूर्खाच्या मनातील तो भयंकर मोह नाहीसा झाला नाही ! (१६)
काम्य कर्मीं होईल सुख । हें बोलणें समूळ लटिक ।
काम्य कर्मीं अधिक दुःख । हें नेणती मूर्ख सकाम ॥ ८७ ॥
काम्य कर्मापासून सुख होईल असे म्हणणे हेच मुळी खोटें आहे. कारण काम्य कर्मामध्ये अधिकच दुःख असते. पण ते मूर्ख सकाम लोकांना कळत नाही ८७.
प्रत्यक्ष म्यां याग करून । इंद्रादि देवांतें यजून ।
उर्वशीसंभोगा लाधून । अतिदुःखी जाण मी झालों ॥ ८८ ॥
मी प्रत्यक्ष याग करून इंद्रादि देवांचे यजन करून उर्वशीचा उपभोग घेऊनही शेवटीं अत्यंत दुःखी झालों ८८.
नारायणऊरूसीं जन्मली । यालागीं ‘उर्वशी’ नांव पावली ।
त्या मज श्रुतिवाक्यें बोधिलीं । निष्काम बोली अतिशुद्ध ॥ ८९ ॥
नारायण ऋषीच्या उरूपासून म्हणजे मांडीपासून जन्मास आली म्हणून तिला ‘उर्वशी’ असें नांव पडले. तिने मला निष्कामपणे शुद्ध अशा वेदवाक्याने उपदेश केला ८९.
ऐकतां श्रुतिनिष्कामबोली । माझी न वचेच सकाम भुली ।
जंव गोविंदें कृपा नाहीं केली । तंव कामाची चाली खुंटेना ॥ १९० ॥
श्रुतीचे निष्कामवचन श्रवण करूनही माझी सकामपणाची भूल गेली नाही. जोपर्यंत श्रीहरीची कृपा होणार नाही, तोपर्यंत कामाची चाल खुंटणार नाही, १९०.
भावें हरीसी निघाल्या शरण । हृदयीं प्रकटे नारायण ।
तेव्हा सर्व काम सहजें जाण । जाती पळोन हृदयस्थ ॥ ९१ ॥
भक्तिभावाने श्रीहरीला शरण गेले असतां हृदयस्थ नारायण प्रगट होतो. तेव्हा हृदयांतील सारे काम आपोआप पळून जातात ९१.
उर्वशीकामसंगें जाण । थोर कष्टलों मी आपण ।
असो तिचा अपराध कोण । मीचि हरिस्मरण विसरलों ॥ ९२ ॥
उर्वशीच्या आसक्तीमुळे मी तर फारच कष्ट सोसले. पण त्यांत तिचा काय अपराध ? मीच मुळी श्रीहरीचे स्मरण विसरलो होतों ९२.
जरी मी करितों हरीचें स्मरण । तरी काम बापुडें बाधी कोण ।
मज माझी असती आठवण । तैं तुच्छ जाण उर्वशी ॥ ९३ ॥
मीच जर हरीचे स्मरण केले असते, तर बिचारा काम मला काय बाधणार होता ? माझीच आठवण जर मला असती, तर उर्वशी मला अगदी तुच्छ वाटली असती ९३.
किमेतया नोऽपकृतं रज्ज्वा वा सर्पचेतसः ।
रज्जुस्वरूपाविदुषो योऽहं यदजितेन्द्रियः ॥ १७ ॥
[श्लोक १७] दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्याजागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो, त्याला दोरी काय करणार ! मनच जर माझ्या ताब्यात नाही, तर मी तिला का दोष द्यावा ? (१७)
मूढमतिचा प्रबोध । मानी उर्वशीचा अपराध ।
विवेकें पाहतां शुद्ध । मीच मतिमंद सकाम ॥ ९४ ॥
मीसुद्धा इतका वेळ मूर्खपणाने उर्वशीचाच अपराध मानीत होतो. परंतु नीट विचार करून पाहिले तेव्हां मीच सकाम व मतिमंद आहे अशी खात्री झाली ९४.
उर्वशी देखतां दृष्टीं । मी कामासक्त झालों पोटीं ।
माझिये लंपटतेसाठीं । मज म्या शेवटीं नाडिलें ॥ ९५ ॥
उर्वशी डोळ्याला दिसतांच मीच कामासक्त झालों आणि त्या माझ्याच लंपटपणामुळे अखेरीस मीच नागवलों ९५.
जेवीं सांजवेळे पडिला दोरु । भेडा सर्प भासे थोरु ।
जंव नाही केला निर्धारु । तंव महाअजगरु भयानक ॥ ९६ ॥
संध्याकाळच्या वेळी दोर दृष्टीस पडला असता भित्र्याला तो मोठा थोरला सापच भासतो, नीट न्याहाळून पाहिले नाही तोपर्यंत तो एक भयंकर अजगरच वाटतो ९६.
तेणें सर्पभयें लवडसवडीं । पळों जातां पैं तांतडी ।
दुपावुलीं पडली आढी । त्याची कल्पना नाडी तयासी ॥ ९७ ॥
त्या सापाच्या भयाने घाईघाईने पळतांना त्याच्या दोन्ही पायांत त्या दोराची आढी पडते व सर्पानं वेटाळा घातला असें त्याला वाटते. त्यांत त्याचीच कल्पना त्याला बाधते ९७.
तेवीं माझिये कामभ्रांतीं उर्वशी सुंदर युवती ।
एथ माझिया कामासक्ती । सुरत-रतीं भुललों ॥ ९८ ॥
त्याप्रमाणे माझ्या कामभ्रांतीनें उर्वशी सुंदर स्त्री वाटली आणि माझ्याच कामासक्तीने मी रतिविलासांत मग्न झालों ९८.
यापरी मी अविवेकात्मा । भुललों उर्वशीच्या कामा ।
तीवरी कोपणें जें आम्हां । हेंचि अधर्माचें मूळ ॥ ९९ ॥
ह्याप्रमाणे मीच अविचारी प्राणी, त्या उर्वशीच्या कामाला लुब्ध झालों, असें असतां तिच्यावर रागावलों हें केवळ अधर्म्य होय ९९.
दृष्टीं देखतां कामिनी । कामासक्ता ते अतिरमणी ।
विवेकिया पोहणघाणी । नरकमाथणी ते कांता ॥ २०० ॥
स्त्री डोळ्याने पाहिली की विषयलंपट पुरुषाला ती अत्यंत रमणीय वाटते; परंतु विचारी पुरुषाला तीच घाणेरडी व नरकाची खाण वाटते २००.
जेवीं सूकरा विष्ठेची प्रीती । तेवीं सकामा कामिनीची रती ।
विवेकी देखोनि थुंकिती । तेंचि श्लोकार्थीं नृप बोले ॥ १ ॥
डुकराला ज्याप्रमाणे विष्ठेची प्रीति असते, त्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्रीचा संग रमणीय वाटतो, परंतु विचारी लोक त्याच्याकडे पाहून थुंकतात. तेंच राजा श्लोकरूपाने सांगत आहे १.
क्कायं मलीमसः कायो दौर्गन्ध्याद्यात्मकोऽशुचिः ।
क्क गुणाः सौमनस्याद्या ह्यध्यासोऽविद्यया कृतः ॥ १८ ॥
[श्लोक १८] कुठे ते मलिन, दुर्गंधीने भरलेले अपवित्र शरीर आणि कुठ ते सुकुमारता, इत्यादी फुलासारखे गुण ! परंतु मी अज्ञानाने वाइटाला चांगले मानले ! (१८)
स्त्री-पुरुष नामाभिधान । केवळ देहासीचि जाण ।
ते स्त्रीदेहीं पाहतां गुण । मलिनपणा अत्यंत ॥ २ ॥
स्त्री, पुरुष ही जी नावे आहेत, ती फक्त देहालाच आहेत. त्यांत स्त्रीदेहांतील गुणधर्म पाहिले असता त्यांत अत्यंत मलीनपणाच भरलेला आहे २.
जे नीच नव्या विटाळाची खाणी । जे रजस्वलेची प्रवाहन्हाणी ।
जे कां दुर्गंधाची पोहणी । जे उतली चिडाणी विष्ठेची ॥ ३ ॥
जी नित्य नव्या विटाळाची खाण; जी रजस्वलेच्या प्रवाहाची मोरी; जी दुर्गधीचा झरा व विष्ठेची भरलेली पोतडी ३,
जे कां दोषांचें जन्मस्थान । जे विकल्पाचें आयतन ।
जे महादुःखाचें भाजन । अधःपतन जिचेनी ॥ ४ ॥
जी दोषाचे जन्मस्थान; जी विकल्पाचा आश्रय; जी महादुःखाचे पात्र; आणि जिच्या योगानें अधःपतन घडते ४
जे वाढवी अतिउद्वेग । जिचेनी मनासी लागे क्षयरोग ।
जिचा बाधक अंगसंग । अतिनिलाग निंद्यत्वें ॥ ५ ॥
जी अतिशय उद्वेग वाढविणारी; जिच्या योगाने मनाला क्षयरोग जडतो; अत्यंत निर्लज्जपणामुळे जिचा अंगसंग त्रासदायक होतो ५.
जेवीं नीचाचा कांठपरा । गळां अडकल्या मांजरा ।
तें रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रां विटाळी ॥ ६ ॥
नीचाच्या घरच्या मडक्याचा फुटलेला कांठ मांजराच्या गळ्यात अडकला असता ते जसें शुचिर्भूताच्या घरांत जाऊन स्वयंपाकाची अनेक भांडी विटाळते ६.
तेवीं कामिनीची संगती । गळां पडली न निघे मागुती ।
कामिनीकामें कामासक्तीं । नेणों किती विटंबिले ॥ ७ ॥
त्याप्रमाणेच स्त्रियांची संगत आहे. ती एखाद्याच्या गळ्यांत पडली की फिरून निघत नाहीं; स्त्रीकामाने लंपट होऊन किती लोक फजित झाले आहेत त्याचा थांग नाहीं ७.
तें मांजर जेथें घाली मुख । तेथ कांठपरा रोधी देख ।
तेवीं स्त्रीसंगें अतिदुःख । मानिती सुख सकाम ॥ ८ ॥
ते मांजर ज्यांत ज्यात तोंड घालते, त्यांत त्यांत तो गळ्यात अडकलेला काठ त्याला आड येतो; त्याप्रमाणेच स्त्रीसंगतीने अत्यंत दुःख होते, तरी विषयी पुरुष त्यांत सुखच मानतात ! ८.
मृगजळीं कमळ मनोहर । तैसें अंगनावदन सुंदर ।
सुस्मित चारु सुकुमार । सकाम नर वानिती ॥ ९ ॥
मृगजळांतील कमळ मोठे मनोहर आहे म्हणावें, त्याप्रमाणे स्त्रीचे मुख किती सुंदर, सुहास्य, रमणीय व सुकुमार आहे असें विषयी पुरुष मोठे वर्णन करीत असतात ९.
अंगनावदनाची निजस्थिती । निखळ शेंबुडाची तेथ वस्ती ।
तें मुख चंद्रेसीं उपमिती । जेवीं अमृत म्हणती विखातें ॥ २१० ॥
परंतु स्त्रियांच्या तोंडाची खरी स्थिति पाहिली असता तेथे नेहमी शेंबडाची वस्ती असते. असे असतां विषाला अमृत म्हणावे त्याप्रमाणे त्या मुखाला चंद्राची उपमा देतात २१०.
वनिताअधरीं झरे लाळ । ते म्हणती अधरामृत केवळ ।
बाप अविद्येचें बळ । भुलले सकळ सुरासुर ॥ ११ ॥
स्त्रियांच्या ओठांतून लाळ झिरपत असते, तिला ‘अधरामृत’ असे म्हणतात. धन्य या अविद्येचे बळ. अशा स्त्रीला सारे देव-दानवही भुलून पडतात ११ .
स्त्रीपुरुषीं आत्मा एक । स्त्रीरूप तेथ आविद्यक ।
मिथ्या स्त्रीकामीं भुलले लोक । बाप कवतिक मायेचें ॥ १२ ॥
स्त्री आणि पुरुष यांच्यामधील आत्मा एकच आहे. पण स्त्रीचे रूप हे अविद्यात्मक आहे. विषयी पुरुष त्याला व्यर्थ भुलतात. तात्पर्य, मायेचा तडाखा मोठा जबर आहे १२.
आत्मा भोक्ता म्हणावा स्त्रीसंभोगीं । तंव तो नित्यमुक्त असंगी ।
देह भोक्ता म्हणावा स्त्रीसंयोगीं । तंव देहाचे अंगीं जडत्व ॥ १३ ॥
स्त्रीसंभोगसमयीं आत्मा भोक्ता म्हणावा, तर तो नित्यमुक्त असून अलिप्त आहे. बरें स्त्रीसंयोगांत देहाला भोक्ता म्हणावें, तर देहाच्या अंगी जडत्व आहे १३.
तेथ विषयभोगासी काःरण । मुख्यत्वें देहाभिमान ।
त्या देहाभिमानासी जाण । बहुत जण विभागी ॥ १४ ॥
तर तेथे विषयोपभोगाला कारण मुख्यत्वेकरून देहाभिमान, त्या देहाभिमानालासुद्धा पुष्कळजण वाटेकरी आहेत १४.
पित्रोः किं स्वं नु भार्यायाः स्वामिनोऽग्ने श्वगृध्रयोः ।
किमात्मनः किं सुहृदामिति यो नावसीयते ॥ १९ ॥
[श्लोक १९] हे शरीर मात्यापित्यांच्या मालकीचे की पत्नीच्या ? हे मालकाचे की अग्नीचे की कुत्रीगिधाडांचे ? हे आपले की बांधवांचे ? खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही. (१९)
गर्भधारण पोषण । स्वयें श्रमोनियां आपण ।
माता करी परिपालन । तो हा देह जाण ‘मातेचा’ ॥ १५ ॥
माता गर्भ धारण करून तो पोसून व स्वत: कष्ट सोसून त्याचे पालनपोषण करते, तेव्हां देह हा ‘मातेचा’ आहे १५.
एकलेपणें माता । स्वप्नीं न देखे पुत्रकथा ।
जो निजवीर्यनिक्षेपिता । तो हा देहो तत्त्वतां ‘पित्याचा’ ॥ १६ ॥
पण माता एकटीच असेल तर तिने पुत्राची गोष्ट स्वप्नातसुद्धा आणावयास नको; कारण तेथे वीर्याचा निक्षेप करणारा पिता असतो. तेव्हा खरोखर हा देह ‘पित्याचा’ होय १६.
जे अग्नि ब्राह्मण साक्षी करूनी । भार्या आणिली भाक देवोनी ।
जे जीवित्व समर्पोनी । सेवेलागोनी विनटली ॥ १७ ॥
परंतु अग्नि-ब्राह्मण साक्षी ठेवून आणभाक देऊन जी भार्या आणलेली असते, आणि जी आपला प्राण देऊनही सेवेला तत्पर असते १७.
जीसी याचेनि सुखशृंगार । जीसी याचेनि ऐहिक पर ।
ऐसा सूक्ष्म करितां विचार । देहो साचार ‘स्त्रियेचा’ ॥ १८ ॥
जिला याच्यामुळेच सुख आणि शोभा; जिला याच्यामुळेच इहलोक व परलोक; या सर्वांचा सूक्ष्म रीतीने विचार केला असतां देह हा खरोखर ‘ स्त्रियेचाच ‘ आहे १८.
या देहाचीं आवश्यकें । ‘सुहृद बंधू’ जे कां सखे ।
देहाचेनि सुखावती सुखें । देह एके पाखें त्यांचाही ॥ १९ ॥
‘सुहृद-बंधु-मित्र’ हेही या देहाला अवश्य लागणारेच आहेत. त्यांनाही या देहाच्या सौख्याने सौख्य होत असते, तेव्हां एकपक्षी हा देह त्यांचाही आहेच १९.
स्वयें घेऊनियां वेतन । देहो विकिला आपण ।
आज्ञेवीण न वचे क्षण । देहो जाण ‘स्वामीचा’ ॥ २२० ॥
तसाच स्वत: वेतन घेऊन आपण होऊन ज्याला देह विकलेला असतो, आशेशिवाय क्षणभरही इकडे तिकडे फिरकतां येत नाही, त्याअर्थी हा देह त्या स्वामीचा म्ह. ‘धन्याचा’ होय २२०,
‘श्वानशृंगालगिधांचें’ खाजें । तरी हा देहो त्यांचा म्हणिजे ।
जीवास्तव देहीं कर्म निफजे । यालागीं देह बोलिजे ‘जीवाचा’ ॥ २१ ॥
कुत्री कोल्ही-गिधाड यांचे हा देह खाद्यच आहे; तेव्हां देह हा त्यांचाही म्हटला पाहिजे. बरें, जीव असतो म्हणून देहाकडून कर्म होत असते, याकरितां देह हा ‘ जिवाचा’ असेही म्हणता येईल २१.
पिता-माता-स्त्री-पुत्र-स्वजन । देहाचें अवश्य करिती दहन ।
यालागीं देह ‘अग्नीचा’ पूर्ण । विचक्षण बोलती ॥ २२ ॥
आईबाप, बायकामुले व आप्त-इष्ट ही देहाचे अवश्य दहन करीत असतात; याकरिता हा देह खरोखर ‘अग्नीचा’ आहे असे विद्वान् म्हणतात २२.
यापरी देहाचे जाण । विभागी असती आठ जण ।
तेथ ‘मी भोक्ता’ हा अभिमान । तो केवळ जाण मूर्खत्वें ॥ २३ ॥
ह्याप्रमाणे ह्या देहाचे हे आठ जण वांटेकरी आहेत. असे असता त्यांत ‘मी भोक्ता’ हा अभिमान निखालस मूर्खपणाचा आहे २३.
एथ ‘मी’ विशिष्ट भोक्ता । ‘माझा’ देह ऐशी ममता ।
हेचि जाण तत्त्वतां । अधःपाता नेताती ॥ २४ ॥
येथे ‘मी’ एक विशिष्ट भोक्ता असे समजणे किंवा ‘माझा’ देह म्हणून ममता धरणे हेच खरोखर अधःपाताला नेणारे आहे २४,
तस्मिन्कलेवरेऽमेध्ये तुच्छनिष्ठे विषज्जते ।
अहो सुभद्रं सुनसं सुस्मितं च मुखं स्त्रियः ॥ २० ॥
[श्लोक २०] अशा अपवित्र, तुच्छ शरीराच्या ठिकाणी माणूस आसक्त होऊन म्हणतो की, अहाहा ! स्त्रीचे मुख, नाक आणि हास्य किती सुंदर आहे ! (२०)
देहो तितुका अशुचिकर । त्यांत स्त्रीदेह अतिअपवित्र ।
केवळ विटाळाचें पात्र । निरंतर द्रवरूपें ॥ २५ ॥
देह म्हणून जितका तितका अमंगळच आहे, त्यांत स्त्रीदेह हा तर अत्यंत अपवित्र, निरंतर पाझरत असलेल्या विटाळाचे पात्र होय २५.
स्वयें भोक्ता अतिकुश्चित । ऐसे अविवेकी कामासक्त ।
कामिनीकामीं लोलंगत । ते मूर्ख वानीत स्त्रियांतें ॥ २६ ॥
त्याचा भोक्ताही स्वतः अत्यंत अमंगळच. असे विषयलंपट अविचारी लोकच स्त्रीविषयावर लोलुप होतात व असे मूर्ख लोकच स्त्रियांचे वर्णन करीत सुटतात २६.
अहो हे सुंदर सुरेख । चंद्रवदना अतिसुमुख ।
सरळ शोभे नासिक । सुभग देख सुकुमार ॥ २७ ॥
‘अहो ! हें मुखकमल किती सुंदर आहे ! किती सुरेख ! थेट चंद्रासारखे दिसते; आणि नाक तर किती सरळ त्यामध्ये खुलतें आहे ! फारच सुंदर आणि सुकुमार २७;
ऐशिये सुंदर स्त्रियेतें । पावलों आम्ही सभाग्य एथें ।
ऐशीं कामासक्तचित्तें । भुललीं भ्रांतें प्रमदांसी ॥ २८ ॥
अशी सुंदर स्त्री आम्ही भाग्यवंत म्हणूनच आम्हाला मिळाली, अशी विषयलंपट मनेंच भ्रमिष्ट होऊन तरुण स्त्रियांना भुलून पडतात ! २८.
स्त्रीदेहाचे विवंचनें । विवंचितां ओकारा ये मनें ।
जळो स्त्रियेचें निंद्य जिणें । मूर्खीं रमणें ते ठायीं ॥ २९ ॥
ह्याप्रमाणे स्त्रीदेहाचा विचार करीत असता त्या विचारानेच मनाला ओकारी येते. स्त्रियांचे जिणे अत्यंत निंद्य आहे. आग लागो त्याला. त्याच्या ठिकाणी मूर्खानींच रममाण व्हावें २९.
त्वङ्मांसरुधिरस्नायुमेदोमज्जास्थिसंहतौ ।
विण्मूत्रपूये रमतां कृमीणां कियदन्तरम् ॥ २१ ॥
[श्लोक २१] हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा आणि हाडे यांचा समूह असून ते मलमूत्र व पुवाने भरलेले आहे यामध्ये रममाण होणार्या माणसांत आणि किड्यांत अंतर कुठे राहिले ? (२१)
स्त्रीदेहाचा उभारा । केवळ अस्थींचा पांजरा ।
त्याचें आवरण तें स्नायु शिरा । बांधोनि खरा दृढ केला ॥ २३० ॥
स्त्रीदेहाची रचना पाहिली तर एक हाडाचा शुद्ध सांपळा उभा केलेला दिसतो. त्याच्यावर स्नायू, शिरा वगैरे बांधून त्याला बळकट केला आहे २३०.
तेथ रुधिरमांसाचें कालवण । करूनि पांजरा लिंपिला पूर्ण ।
अस्थीवरील जें वेष्टण । ‘मज्जा’ म्हणती त्या नांव ॥ ३१ ॥
मांस आणि रक्त कालवून त्याने तो सांपळा लिंपला आहे. हाडावरचे वेष्टण आहे त्याला ‘ मज्जा ‘ म्हणतात ३१.
अस्थिमाजील रसबद्ध । त्या नांव बोलिजे ‘मेद’ ।
वरी चर्म मडिलें सुबद्ध । ‘त्वचा’ शुद्ध ती नांव ॥ ३२ ॥
हाडांच्या आंत जो मगज असतो, त्याला ‘मेद ‘ असे म्हणतात; आणि त्याच्यावर नीटनेटके चामड्याने मढविलेले असते, तिचें नांव ‘त्वचा’ होय ३२.
त्या देहामाजीं सांठवण । विष्ठा मूत्र परिपूर्ण ।
ते स्त्रीदेहीं ज्याचें रमण । ते ‘कृमि’ जाण नररूपें ॥ ३३ ॥
ह्या देहांत काय भरलेले आहे ? तर सारे मल आणि मूत्र ! अशा देहामध्ये जे रममाण होतात ते नररूपी किडेच होत ३३.
विष्ठेमाजीं कृमि चरती । तैशी स्त्रीदेहीं ज्यां आसक्ती ।
तेही कृमिप्राय निश्चितीं । संदेह ये अर्थीं असेना ॥ ३४ ॥
विष्ठेमध्ये जसे किडे चरतात, त्याप्रमाणे स्त्रीच्या देहावर ज्यांची आसक्ति तेही खरोखर किड्यासारखेच, यांत संशय नाहीं ३४.
वनितादेह यापरी एथ । विचारितां अतिकुश्चित ।
तो वस्त्रालंकारीं शोभित । करूनि आसक्त नर होती ॥ ३५ ॥
अशा प्रकारे विचार केला असतां स्त्रियांचा देह हा अत्यंत घाणेरडा आहे. तो वस्त्रालंकारांनी सुशोभित करून पुरुष त्यावर आसक्त होतात ३५.
घंटापारधी पाश पसरी । त्यावरी तो मृगांतें धरी ।
पुरुष स्त्रियेतें शृंगारी । त्या पाशाभीतरीं स्वयें अडके ॥ ३६ ॥
घंटापारधी पाश पसरून त्यांत मृगांना धरतो, पण पुरुष स्त्रियेला श्रृंगारून त्या पाशामध्ये स्वतःच अडकतो ! ३६.
यालागीं स्त्रियाची संगति । कदा न करावी विरक्तीं ।
गृहस्थीं सांडावी आसक्ती । येचि अर्थीं नृप बोले ॥ ३७ ॥
ह्याकरितां विरक्तांनी स्त्रियांची संगत कधीही करूं नये, गृहस्थाश्रमी ह्यांनीही आसक्ति सोडावी. ह्याविषयींच राजा सांगत आहे ३७.
अथापि नोपसज्जेत स्त्रीषु स्त्रैणेषु चार्थवित् ।
विषयेन्द्रियसंयोगान्मनः क्षुभ्यति नान्यथा ॥ २२ ॥
[श्लोक २२] म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे असेल अशा विवेकी मनुष्याने स्त्रिया आणि स्त्रीलंपट यांची संगत करू नये विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगानेच मनात विकार उत्पन्न होतात, एरव्ही नाही. (२२)
स्त्रीदेह शोभनीय असता । तरी वस्त्रालंकारेंवीण शोभता ।
तो अतिनिंद्य कुश्चितता । उघडा सर्वथा शोभेना ॥ ३८ ॥
स्त्रियांचा देह जर खरोखरच शोभिवंत असता, तर तो वस्त्रालंकाराशिवायच शोभला असता. पण तो अत्यंत निंद्य व घाणेरडा असल्यामुळे उघडा असा मुळीच शोभत नाही ३८.
यालागीं वस्त्राभरणीं । देह गुंडिती कामिनी ।
जेवीं मैंद ब्राह्मणपणीं । विश्वासूनी घात कीजे ॥ ३९ ॥
म्हणूनच स्त्रिया आपला देह वस्त्रालंकारांनी गुंडाळतात. जसे भामटे लोक ब्राह्मणाचे सोंग आणून विश्वास दाखवून घात करतात, तशी ही स्त्रियांची संगति आहे ३९.
तैशी स्त्रियांची संगती । सेवा लावी नाना युक्तीं ।
शेखीं संगें पाडी अधःपातीं । तेथ विरक्तीं न वचावें ॥ २४० ॥
स्त्रियांची संगत नानाप्रकारच्या युक्तीने दास्यत्व करावयास लावते, आणि शेवरी आपल्याबरोबर नरकांत पाडते; ह्याकरितां विरक्तांनी तिकडे जाऊं नये २४०.
जरी स्त्रियेची विरक्तस्थिती । तरी साधकीं न करावी संगती ।
अग्निसंगें घृतें द्रवती । तेवीं विकारे वृत्ति स्त्रीसंगें ॥ ४१ ॥
स्त्री जरी विरक्त असली तरीही साधकांनी तिची संगत करूं नये. अग्नीच्या संगाने तूप जसे पातळ होते, त्याप्रमाणे स्त्रीच्या संगतीनेही वृत्तीला विकार प्राप्त होतो ४१.
अमृत म्हणोनि खातां विख । आवश्य मरण आणी देख ।
स्त्री मानूनि सात्त्विक । सेवितां दुःख भोगवी ॥ ४२ ॥
अमृत म्हणून विष खाल्ले तर ते हटकून मरण आणावयाचेच; त्याप्रमाणे स्त्री सात्विक आहे म्हणून सेवन केली तरी ती दुःखच भोगविते ४२.
अग्नीमाजीं घृताची वस्ती । जरी बहुकाळ निर्वाहती ।
तरी स्त्रीसंगें परमार्थीं । निजात्मस्थिती पावते ॥ ४३ ॥
अग्नीमध्ये तूप पुष्कळ दिवस टिकून राहिले असते, तर स्त्रीच्या संगतीनेही पारमार्थिक लोक आत्मस्वरूपाला पोंचते ४३.
घृत वेंचल्या वर्षे झालीं साठी । तरी अग्निसंगें द्रव उपजे घटीं ।
तेवीं प्रमदासंगपरिपाठीं । वार्धकींही उठी अतिकामु ॥ ४४ ॥
तूप संपून साठ वर्षे झाली असली, तरी अग्नीच्या संगतीने त्या घागरीला पाझर फुटू लागतो; त्याप्रमाणे स्त्रियांच्या सहवासाने म्हातारपणांतसुद्धा कामविकार प्रबळ होतो ४४.
जरी कापूर अग्नीआंत । नांदो लाहता न पोळत ।
तरीच स्त्रीसंगें परमार्थ । पावते समस्त परब्रह्म ॥ ४५ ॥
कापूर अग्नीमध्ये जर न जळतां राहिला असता, तर स्त्रीच्या संगतीने सर्वांना परमार्थ साधून सारेच परब्रह्माला पोचले असते ४५.
अग्नी पोळी धरितां हातीं । तैशी स्त्रियांची संगती ।
संगे वाढवी आसक्ती । पाडी अनर्थीं पुरुषांतें ॥ ४६ ॥
अग्नि हातांत धरतांच पोळतो, त्याप्रमाणेच स्त्रियांची संगत आहे. तिच्या संगतीने आसक्ति वाढते आणि ती पुरुषाला अनर्थांत पाडते ४६.
स्त्रियेपरीसही स्त्रैण । संगती मीनलिया जाण ।
कोटि अनर्थांचें भाजन । अधःपतन तत्संगें ॥ ४७ ॥
स्त्रीपेक्षाही स्त्रैणाची संगत मिळाली, तर ते कोट्यवधि अनर्थांचे मूळ आहे. त्याच्या संगतीने अधःपातच प्राप्त व्हावयाचा ४७.
स्त्रैणेंसीं झाल्या भेटी । ब्रह्मानंद स्त्रीसुखाच्या पोटीं ।
ऐशा विरक्तां प्रबोधी गोठी । करी उठाउठी स्त्रीकाम ॥ ४८ ॥
स्त्रीलंपट पुरुषाची भेट झाली की ब्रह्मानंद आहे तो सारा स्त्रीसुखांतच आहे अशा प्रकारच्या गोष्टी तो विरक्ताला सांगत असतो. त्यामुळे तत्काळ स्त्रीकामना उत्पन्न होते ४८.
तेथ स्वदारा आणि परदारा । या करूं नेदी विचारा ।
प्रवर्तवी स्वेच्छाचारा । स्त्रैण खरा अतिघाती ॥ ४९ ॥
ती मग स्वदारा आणि परदारा ह्यांचा विचारच करू देत नाही आणि स्वेच्छाचाराकडेच वृत्ति वळते. म्हणून स्त्रैण हाच खरा घातकी होय ४९.
स्त्रैण जेथें प्रवेशला । तेथ अनाचार वेलीं गेला ।
अधर्म सर्वांगीं फुलला । बाधकत्वें फळला अनर्थफळीं ॥ २५० ॥
स्त्रैण जेथें शिरला तेथे अनाचाराचा वेल वाढलाच म्हणून समजावें. सर्वांगांनी अधर्म फुलतो आणि तो बाधक होऊन अनर्थाची फळे देतो २५०.
यालागीं जो परमार्थीं । तेणें स्त्री आणि स्त्रैणाची संगती ।
सर्वथा न धरावी हातीं । पाडी अनर्थीं तो संग ॥ ५१ ॥
ह्याकरिता ज्याला परमार्थ साधावयाचा आहे त्याने स्त्रीची व स्त्रैणाची संगत कधीही धरूं नये. कारण, त्यांची संगत नेहमी अनर्थात पाडते ५१.
मुख्य स्त्रैणचि वाळिला आहे । तेथें स्त्रीसंग कोठें राहे ।
हे संगतीचि पाहें । सेव्य नोहे परमार्थ ॥ ५२ ॥
मुख्य स्त्रैणच जर वर्ज्य केला आहे, तर मग स्त्रीसंग कोठे राहिला ? तात्पर्य, ही संगतच परमार्थाला सेव्य म्ह. उपयोगी नाही ५२.
यालागीं साधकीं आपण । स्त्रीनिरीक्षण संभाषण ।
सर्वथा न करावें जाण । एकांतशील न केव्हांही व्हावें ॥ ५३ ॥
ह्याकरितां साधकानें स्त्रियांकडे पहाणे किंवा त्यांच्याशी बोलणे कधीच करूं नये आणि एकांतांतही कधी बसू नये ५३.
म्हणशी विवेकी जो आहे । त्यासी स्त्रीसंग करील काये ।
स्त्रीसंगास्तव पाहें । सोशिले अपाये सुज्ञांनीं ॥ ५४ ॥
आता तुम्ही म्हणाल की, जो विचारी आहे, त्याला स्त्रीसंगति काय करणार ? तर बाबा ! ह्या स्त्रीच्या संगतीच्या पायीं मोठमोठ्या ज्ञात्यांनीही आघात सोसले आहेत ५४.
पराशरासी अर्ध घडी । नावेसी मीनली नावाडी ।
ते अर्ध घटिकेसाठीं रोकडी । अंगीं परवडी वाजली ॥ ५५ ॥
पराशर ऋषीला नावेमध्ये अर्धघटका नावाडीण भेटली, त्याच अर्धघटकेसाठी अंगावर अपकीर्तीची बाजू येऊन कोसळली! ५५.
ऋष्यशृंग अतितापसी । तोही वश झाला वेश्येसी ।
इतरांची गोठी कायसी । मुख्य महादेवासी भुलविलें ॥ ५६ ॥
ऋष्यशृंग मोठा तपस्वी ; पण तोसुद्धा वेश्येला वश झाला. इतरांची गोष्ट काय सांगावी? प्रत्यक्ष महादेवालाही मोहिनीने भुलविलें ! ५६.
विषयइंद्रियांचे संगती । अवश्य क्षोभे चित्तवृत्ती ।
तेथ सज्ञानही बाधिजती । मा कोण गती अज्ञाना ॥ ५७ ॥
विषय आणि इंद्रिये ह्यांच्या संगतीने चित्तवृत्ति हटकून क्षुब्ध होते. त्यांत सज्ञानही बांधले जातात, मग अज्ञानाची कथा काय? ५७.
हेही असो उपपत्ती । नसतां स्त्रियांची संगती ।
काम क्षोभे एकांतीं । तेंचि विशदार्थीं नृप बोले ॥ ५८ ॥
हेही बोलणे असो. पण स्त्रियांची प्रत्यक्ष संगति नसताही एकांत असतां (स्त्रीच्या स्मरणानेही) कामविकार उत्पन्न होतो. हेच स्पष्ट करून राजा सांगत आहे ५८.
अदृष्टादश्रुताद्भावान्न भाव उपजायते ।
असंप्रयुञ्जतः प्राणान् शाम्यति स्तिमितं मनः ॥ २३ ॥
[श्लोक २३] जी वस्तू कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही, तिच्याबद्दल विकार उत्पन्न होत नाही जे विषयांबरोबर इंद्रियांचा संयोग होऊ देत नाहीत, असे मन निश्चल होऊन शांत होते (२३)
जें देखिलें ऐकिलें नाहीं । ऐशिया विषयांचे ठायीं ।
पुरुषाचें मन पाहीं । सर्वथा कहीं क्षोभेना ॥ ५९ ॥
जो कधी पाहिलेला नाही व ऐकलेला नाही, अशा विषयाने पुरुषाचें मन कधीच क्षुब्ध होत नाही ५९.
जे पूर्वभुक्त विषय असती । तेचि स्मरण झालिया चित्तीं ।
कामउद्रेकें क्षोभे वृत्ती । नसतां संगती स्त्रियेची ॥ २६० ॥
पण पूर्वी भोगलेले जे विषय असतात, त्यांचे स्मरण मनाला होतांच स्त्रीची संगत नसली तरी कामोद्रेक होऊन वृत्तीचा क्षोभ होतो २६०.
एवं पूर्वापर विषयासक्ती । पुरुषासी बाधक निश्चितीं ।
तो बैसल्याही एकांतीं । वासनासंस्कारें वृत्ति सकाम क्षोभे ॥ ६१ ॥
ह्याप्रमाणे पूर्वापार चालत आलेली विषयासक्तीच पुरुषाला निश्चयाने बाधक होते. तो एकांतात एकटाही बसला असला तरी वासनेच्या संस्कारानें वृत्ति सकाम होऊन क्षुब्ध होते ६१.
पूर्वदिवशींचीं पक्वान्नें । जीं ठेविलीं अतियत्नें ।
तीं न करितांही रांधणें । पहांटे भक्षणें स्वयें जेवीं ॥ ६२ ॥
आदल्या दिवशींची पक्वान्ने नीट जपून ठेवलेली असतात; ती दुसऱ्या दिवशी स्वैपाक न करितांच सकाळी खातां येतात ६२.
तेवीं वासनासंस्थित काम पुरुषास करी सकाम ।
कामक्षोभें पाडी भ्रम । कर्माकर्म स्मरेना ॥ ६३ ॥
त्याप्रमाणे वासनेत स्थित असलेला कामच पुरुषाला सकाम करून सोडतो. त्या कामाचा क्षोभ झाला म्हणजे भ्रम उत्पन्न होऊन कर्म व अकर्म कोणतें हें स्मरत नाहीं ६३.
एवं वासना कामसंगती । बाधक होय परमार्थीं ।
यालागीं साधकीं समस्तीं । स्त्रीकामासक्ती त्यागावी ॥ ६४ ॥
तात्पर्य, वासना-कामसंगति हीच परमार्थात बाधक होतात. याकरितां सर्व साधकांनी स्त्रीविषयींची आसक्ति सोडून धावी ६४.
मनीं क्षोभल्या कामासक्ती । साधकीं तेथें करावी युक्ती ।
आवराव्या बाह्य इंद्रियवृत्ती । तैं मनासी शांति हळूहळू होय ॥ ६५ ॥
मनांतील कामसक्ति क्षोभली म्हणजे साधकांनी तेथें एक युक्ति करावी. ती ही की, बाह्य इंद्रियवृत्ति आवरून धराव्यात; म्हणजे हळुहळू मनाला शांति प्राप्त होईल ६५.
कर्मेंद्रियीं राखण । दृढ वैराग्य ठेविलिया जाण ।
मनीं क्षोभल्या काम पूर्ण । आपल्या आपण उपशमे ॥ ६६ ॥
कमैंद्रियांना कट्टे वैराग्य हें राखण ठेवले म्हणजे मनांत काम कितीही क्षुब्ध झाला तरी तो आपल्या आपणच शांत होतो ६६.
जेणें पडिजे अनर्थीं । ते त्यागावी संगती ।
संगत्यागाची निजस्थिती । दृढ श्लोकार्थीं नृप बोले ॥ ६७ ॥
ज्यामुळे अनर्थात पडावे लागते, ती संगतच सोडून दिली पाहिजे. तो संगत्याग कसा करावा ह्याचे स्पष्टीकरण श्लोकार्थानं राजा करीत आहे ६७.
तस्मात्सङ्गो न कर्तव्यः स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः ।
विदुषां चाप्यविश्रब्धः षड्वर्गः किमु मादृशाम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] म्हणून इंद्रियांचा स्त्रिया किंवा स्त्रीलंपट यांच्याशी संबंध येऊ देऊ नये माझ्यासारख्यांची गोष्ट कशाला, पण मोठमोठ्या विद्वानांच्या बाबतीत सुद्धा त्यांची इंद्रिये आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नसतात. (२४)
जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ ।
ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥ ६८ ॥
ज्यामुळे ज्ञातेही गोत्यांत पडतात, कामी पुरुषाला तर तत्काळ भुरळ घालतो, असा स्त्रीसंग हा अनर्थकारक आहे आणि स्त्रैण पुरुषाचा तर त्याहूनही अनर्थकारक आहे ६८.
यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्त्रैणाची संगती ।
घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥ ६९ ॥
म्हणून जे आपलें खरें हित साधू इच्छीत असतील, अशा परमार्थी लोकांनी कर्मेंद्रियांना स्त्री आणि स्त्रैण ह्यांची संगत घडू देऊ नये ६९.
जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण ।
तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥ २७० ॥
मन विषयांत क्षुब्ध झाले तरी आपण इंद्रिये आवरून धरावीत, म्हणजे मनांतला विषय मनातच आपोआप जिरून जातो २७०.
निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयासक्तीं ।
क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थीं सज्ञान ॥ ७१ ॥
विषय आणि स्त्रीसंगत ही जवळ असली म्हणजे विषयासक्तीने मन क्षुब्ध होते; क्षणार्धही स्त्रीसंगत झाल्याने सज्ञान लोक अनर्थात पडले आहेत ७१.
स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित ।
चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्न्या ॥ ७२ ॥
स्त्रीला पाहून देवेंद्र कामातुर झाला आणि त्याच्या अंगाला भगें पडली, आणि गुरुपत्नी जी तारा, तिनें चंद्राला कलंकित करून सोडले ७२.
सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ ।
करूनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥ ७३ ॥
सौभरी नांवाचा ऋषि महान् तपस्वी होता, त्याने मत्स्याचें मैथुन पाहिल्यामुळे तो कामासक्त होऊन गेला ; (ही कथा नवम स्कंधांत ६ व्या अध्यायांत आहे). असा हा स्त्रियांचा संग अनर्थकारक आहे ७३.
निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती ।
मा इतरांची कोण गती । संग अनर्थीं स्त्रियांचा ॥ ७४ ॥
ब्रह्मदेव तर आपल्याच कन्येला पाहून कामासक्त झाला मग इतरांची काय कथा ? असा हा स्त्रियांचा संग अनर्थकारक आहे ७४.
कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन ।
प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥ ७५ ॥
कामिनीचा संग महाभयंकर आहे. शिवाचे लिंगपतन त्यामुळेच झाले. या स्त्रियांच्या संगतीने मोठमोठे सज्ञान व योगीही फसले आहेत ७५.
नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्नी मागितल्यासाठीं ।
तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥ ७६ ॥
नारदानें केवळ विनोदानें कृष्णाची स्त्री मागितली, त्याला त्यासाठी गंगातीरी नारदी करून सोडली व तिच्या पोटीं साठ पुत्र जन्मास आले ७६.
कौतुकें स्त्रीयांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता ।
मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥ ७७ ॥
सहज मौजेने जरी स्त्रियांकडे गेले, तरी सज्ञानालासुद्धा ती संगति बाधते; मग माझ्यासारख्या मूर्खाची काय कथा? ७७.
क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं ।
जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥ ७८ ॥
स्त्रियांची संगत अर्धक्षण करून ज्ञातेही अशा रीतीने ठकले आहेत. म्हणून स्त्रीसंगावर विश्वास ठेवतील, ते माझ्यासारखेच दुःखी होतील ७८.
यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषड्वर्ग ठकी सर्वांसी ।
एथ आवरूनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥ ७९ ॥
याकरिता स्त्रीसंगावर विश्वास ठेवला असता सहा इंद्रियांचा वर्ग सर्वाना गोत्यांत घालतो. एवण्याकरिता इंद्रियांना आवरून स्त्रियांचा सर्वथा त्याग करावा ७९.
त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती ।
राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥ २८० ॥
याप्रमाणे स्त्रियांची संगत सोडून इंद्रियवृत्तीला आवरून तो राजा परम शांतीला पावला. तेच श्रीकृष्ण स्वतः सांगतात २८०.
श्रीभगवानुवाच –
एवं प्रगायन् नृपदेवदेवः
स उर्वशीलोकमथो विहाय ।
आत्मानमात्मन्यवगम्य मां वै
उपारमञ्ज्ञानविधूतमोहः ॥ २५ ॥
[श्लोक २५] भगवान श्रीकृष्ण म्हणतात – राजराजेश्वर पुरूरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तर्हेचे उद्गार उमटू लागले, तेव्हा त्याने उर्वशीलोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोह नाहीसा झाला नंतर त्याने आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला व तो शांत झाला. (२५)
जो उर्वशीस्वर्गभोग पावोनी । ज्यासी देव मानिती श्रेष्ठपणीं ।
जो सकळराजचूडामणी । ज्यासी येती लोटांगणीं भूपाळ ॥ ८१ ॥
ज्याने उर्वशीसह स्वर्गातील सारे भोग मिळविले, ज्याला देवही श्रेष्ठ असे समजत, जो सर्व राजांचा मुकुटमणि ज्याच्यापुढे राजे लोटांगण घालीत ८१,
ऐसा पुरूरवा चक्रवर्ती । लाहोनि उर्वशीभोगप्राप्ती ।
स्वर्गभोगीं पावला विरक्ती । सभाग्य नृपति तो एक ॥ ८२ ॥
असा चक्रवर्ती पुरूरवा राजा उर्वशीचा व स्वर्गाचा उपभोग घेऊन विरक्त झाला, म्हणून तो एक मोठा भाग्यशालीच राजा होय ८२.
अप्राप्तविषयें योगी । बहुत देखिले विरागी ।
परी प्राप्तस्वर्गांगनाभोगीं । धन्य विरागी पुरूरवा॥ ८३ ॥
ज्यांना विषय मिळालेच नाहीत असे विरक्त झालेले योगी पुष्कळ दृष्टीस पडतात. परंतु स्वर्गातील देवांगनेचा उपभोग घेऊन पुरूरवा राजा विरक्त झाला, त्याअर्थी तो मोठा धन्य होय ८३.
पुरूरव्याऐशी विरक्ती । नाहीं देखिली आणिकांप्रती ।
धन्य पुरूरवा त्रिजगतीं । स्वमुखें श्रीपति वाखाणी ॥ ८४ ॥
पुरूरव्यासारखी विरक्ति दुसऱ्या कोणाचीच पाहिली नाही, म्हणून पुरूरवा हा साऱ्या त्रिभुवनांत धन्य होय, असें श्रीकृष्ण आपल्या मुखानेच त्याचे वर्णन करितात ८४.
तेणें अनुतापाच्या अनुवृत्तीं । निंदोनियां निजात्मस्थिती ।
क्षाळिली कामिनीकामासक्ती । धुतला निश्चितीं महामोहो ॥ ८५ ॥
त्याने अनुतापाच्या भरात आपल्या स्थितीची निंदा करून स्त्रीविषयाची आसक्ति टाकून दिली व मोहाला खरोखर धुऊन काढले ८५.
अनुतापआगिठीं अभंग । वैराग्यपुट देऊनि चांग ।
विवेकें दमितां साङ्ग । काममोहाचे डाग क्षाळिले तेणें ॥ ८६ ॥
पश्चात्तापाची अखंड आगटी पेटवून, वैराग्याचे चांगलें पुट देऊन, विचारानें नीट इंद्रियदमन करून त्याने काममोहाचे डाग धुऊन टाकले ८६.
जेवीं सोनें पुटीं पडे । तुक तुटे वानीं चढे ।
तेवीं निजात्मप्राप्तीनिवाडें । वृत्ति वाडेंकोडें क्षाळिली ॥ ८७ ॥
ज्याप्रमाणे सोन्याला पुटे दिली असता त्याचे वजन कमी होते, पण कस वाढतो. त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या लाभाने वृत्तीला नीटनेटकी धुऊन काढली ८७.
ऐशिये अतिशुद्ध निजवृत्तीं । विवेकवैराग्यसंपत्ती ।
पूर्ण अनुतापाचे स्थितीं । माझी कृपाप्राप्ती पावला ॥ ८८ ॥
अशी अत्यंत शुद्ध वृत्ति झाल्यामुळे व विवेकवैराग्यरूप संपत्तीने व पूर्ण पश्चात्तापाने माझ्या कृपाप्रसादाला तो पात्र झाला ८८.
माझिया कृपेवीण कांहीं । कदा अनुताप नुपजे देहीं ।
शुद्ध अनुताप ज्याच्या ठायीं । ते माझी कृपा पाहीं परिपूर्ण ॥ ८९ ॥
माझ्या कृपेशिवाय देहांत कधी अनुतापही उत्पन्न होत नाही. ज्याच्या ठिकाणी पूर्ण अनुताप झालेला दिसेल, त्याच्या ठिकाणी माझी परिपूर्ण कृपा आहे म्हणून समजावें ८९.
माझी कृपा झलिया जाण । जीव होय ब्रह्म पूर्ण ।
निःशेष गळे देहाभिमान । मीतूंपण भासेना ॥ २९० ॥
माझी कृपा झाली असता जीव पूर्ण ब्रह्मरूप होतो आणि देहाभिमान समूळ गळून जाऊन मीतूंपणही त्याला भासत नाही २९०.
तेथ कार्य कर्म आणि कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता ।
दृश्य दर्शन द्रष्टता । हे त्रिपुटी सर्वथा असेना ॥ ९१ ॥
तेव्हां कार्य, कर्म आणि कर्ता; भोग्य, भोग आणि भोक्ता ; दृश्य, दर्शन आणि द्रष्टा ; ही त्रिपुटी मुळीच उरत नाही ९१.
त्रिगुणत्रिपुटीचें कारण । मूळभूत निजअज्ञान ।
तें सद्गुरुकृपेस्तव जाण । गेलें हरपोन मिथ्यात्वें ॥ ९२ ॥
तीन गुणांच्या त्रिपुटीचे कारण जे मूळभूत अज्ञान, ते सद्गुरुकृपेने मिथ्यापणाने हारपून जाते ९२.
जेवीं दोराचें सापपण । निर्धारितां हारपे पूर्ण ।
तेवीं गुणेंसी अविद्या जाण । जाय हारपोन गुरुबोधें ॥ ९३ ॥
दोराचा सापपणा, दोर ओळखला म्हणजे निखालस नाहीसा होतो; त्याप्रमाणे गुणांसहवर्तमान अविद्याही गुरूपदेशाने नाहींशी होऊन जाते ९३.
सद्गुरुबोधें पाहतां जाण । दिसेना द्वैताचें भान ।
तेथ उर्वशी भोगी कोण । राजा स्वानंदें पूर्ण निवाला ॥ ९४ ॥
सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे पाहिले असता द्वैताचे भानच दिसत नाही; मग उर्वशीला कोण भोगणार ? इतका राजा आत्मानंदाने तृप्त झाला ९४.
राजा निवाला ब्रह्मरसीं । मग सांडूनियां उर्वशी ।
त्यजोनियां स्वर्गलोकासी । निजबोधेंसीं निघाला ॥ ९५ ॥
राजा ब्रह्मरसाने तृप्त झाला, तेव्हां उर्वशीला सोडून व स्वर्गलोक टाकून देऊन आत्मानंदाने तृप्त होऊन तेथून निघाला ९५.
इतर ज्ञाते स्त्रिया त्यागिती । परी त्यागेना कामासक्ती ।
तैसी नव्हे रायाची स्थिती । परमार्थविरक्ती पावला ॥ ९६ ॥
इतर ज्ञाते स्त्रियांचा त्याग करतात; पण त्यांना कामासक्ति त्यागवत नाही. तशी काही राजाची स्थिति नव्हती. तो खऱ्या विरक्तीला पोचला होता ९६.
जे परम विरक्तीचे पोटीं । कामिनीकामवार्ता नुठी ।
ब्रह्मानंदें कोंदली सृष्टी । स्वानंदपुष्टीं निवाला ॥ ९७ ॥
ज्या विरक्तीच्या पोटीं स्त्रीविषयाची गोष्टच उठत नाही. ब्रह्मानंदानें सारी सृष्टि भरून जाते, अशा आत्मानंदाच्या पुष्टीनें तो तृप्त झाला ९७.
ऐसा सुखरूपें सहज । मी होऊनि पावला मज ।
जिणोनि कल्पनाकामकाज । नाचत भोज स्वानंदें ॥ ९८ ॥
अशा आनंदरूपानें तो सहज मत्स्वरूप होऊन मलाच पावला. कल्पनेनें उत्पन्न केलेल्या काम-विषयाला निश्चितपणे जिंकून तो आत्मानंदाने नाचूं लागला९८.
ऐसा निश्चयेंसीं निश्चित । माझें निजस्वरूप झाला प्राप्त ।
तेणें हा इतिहास एथ । निजसुखार्थ गायिला ॥ ९९ ॥
अशा दृढनिश्चयाने त्याला माझे निजस्वरूप प्राप्त झाले, आणि त्यानेच हा आपला इतिहास आपल्या सुखासमाधानाकरितां सांगितला ९९,
अनुतापआवडीं इतिहास । गातां प्रकटे पूर्ण परेश ।
तेथ सहजें अविद्येचा नाश । निजसुखें क्षितीश निवाला ॥ ३०० ॥
अनुतापाच्या भराने हा इतिहास गाइल्यामुळे तेथे परमेश्वर प्रगट झाला, आणि त्यामुळे सहजच अविद्येचा नाश होऊन आत्मसुखानें तो राजा तृप्त झाला ३००.
एवढी पावावया निजप्राप्ती । त्यागावी कामिनीकामासक्ती ।
मुख्यत्वें धरावी सत्संगती । हेंचि उद्धवाप्रती हरि बोले ॥ १ ॥
एवढा निजलाभ पाहिजे असेल तर स्त्रियांची विषयासक्ति सोडून द्यावी. आणि मुख्यत्वेकरून सत्संगति धरावी, हेच उद्धवाला श्रीकृष्ण सांगत आहेत १.
ततो दुःसङ्गमुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान् ।
सन्त एतस्य छिन्दन्ति मनोव्यासङ्गमुक्तिभिः ॥ २६ ॥
[श्लोक २६] म्हणून बुद्धिमान पुरूषाने दुःसंग सोडून देऊन सत्संग धरावा संतपुरूष सदुपदेशाने मनातील आसक्ती नष्ट करतात. (२६)
अवश्य त्यागावी दुःसंगता । तो दुःसंग कोण म्हणशी आतां ।
तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना ॥ २ ॥
दुःसंग असेल तो अवश्य सोडून द्यावा. आता तो दुःसंग कोणता? असें तूं म्हणशील, तर स्त्री आणि स्त्रैण यांच्यापेक्षा अधिक दुःसंग दुसरा कोणताच नाही २.
जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्था ।
ज्यामाजीं अतिविकल्पता । तोही तत्त्वतां दुःसंग ॥ ३ ॥
जो वेदशास्त्रार्थाला मानीत नाहीं; जो परमार्थावर विश्वास ठेवीत नाही आणि अंतरांत विकल्प भरलेला असतो तोही खरोखर दुःसंग होय ३.
जो बोल बोले अतिविरक्त । हृदयीं अधर्मकामरत ।
कामरोधें द्वेषा येत । तोही निश्चित दुःसंग ॥ ४ ॥
जो अत्यंत विरक्तीचे भाषण करतो; परंतु हृदयामध्ये अधर्म कामाची अत्यंत प्रीति असते; कामनेच्या आड आले की द्वेषाला चढतो; तोही खरोखर दुःसंग होय ४.
कां स्वधर्मकर्मविनीतता । बाह्य दावी सात्त्विकता ।
हृदयीं दोषदर्शी संतां । हे दुःसंगता अतिदुष्ट ॥ ५ ॥
तसेंच स्वधर्म, कर्म, विनय व सात्त्विक वृत्ति बाहेरून दाखवावयाची आणि अंत:करणांतून संतांचे दोष पहावयाचे. ही दुःसंगता अत्यंत दुष्ट होय ५.
जो मुखें न बोले आपण । परी देखे साधूंचे दोषगुण ।
तेंचि संवादिया दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुःसंग ॥ ६ ॥
जो तोंडाने मात्र बोलत नाही, परंतु मनाने साधूंचे गुणदोष पहातो; आणि संवादांत तें उपलक्षण दाखवितो; तो अत्यंत कठिण दुःसंग होय ६.
मुख्य आपली जे सकामता । तोचि द्ःसंग सर्वथा ।
तो काम समूळ त्यागितां । दुःसगता त्यागिली ॥ ७ ॥
मुख्य आपली सकामताच खरोखर दुःसंग होय. तो काम समूळ टाकून दिला की, दुःसंगाचा त्याग झाला ७.
कामकल्पनेचा जो मार । तोचि दुःसंग दुर्धर ।
ते कामकल्पना त्यागी जो नर । त्यासी संसार सुखरूप ॥ ८ ॥
कामकल्पनेचा मार हाच दुर्धर असा दुःसंग होय; जो पुरुष कामकल्पना टाकून देईल, त्याचाच संसार सुखाचा होईल ८.
कामकल्पना त्यागावया जाण । मुख्य सत्संगचि कारण ।
संतांचे वंदितां श्रीचरण । कल्पनाकाम जाण उपमर्दे ॥ ९ ॥
कामकल्पना सुटावयाला सत्संगच मुख्य कारण आहे. संतांच्या चरणी लीन झाले की, कल्पना आणि काम आपोआप लयास जातात ९.
संग सर्वथा बाधक । म्हणशी त्यजावा निःशेख ।
तरी सत्संग न धरितां देख । केवीं साधक सुटतील ॥ ३१० ॥
संग हा सर्वथैव बाधक आहे, ह्याकरितां साराच संग सोडून द्यावा असे म्हणशील, तर सत्संग न धरल्यास साधक कसे सुटतील? ३१०.
सत्संगेंवीण जें साधन । तेंचि साधकां दृढ बंधन ।
सत्संगेंवीण त्याग जाण । तेंचि संपूर्ण पाषांड ॥ ११ ॥
सत्संगाशिवाय जे साधन तेंच साधकाला दृढ बंधन होते. सत्संगाशिवाय केलेला त्याग पाखांडपणाचा होय ११.
चित्तविषयांचा संबंध । गांठीं बैसल्या सुबद्ध ।
त्यांचा करावया छेद । विवेकें विशद निजसाधु ॥ १२ ॥
चित्त आणि विषय ह्यांच्या गांठी घट्ट बसलेल्या आहेत; त्या विवेकाने सोडवावयाला एक साधूच समर्थ आहेत १२.
संताच्या सहज गोठी । त्याचि उपदेशांच्या कोटी ।
देहात्मता जीवगांठी । बोलासाठीं छेदिती ॥ १३ ॥
संतांच्या साहजिक गोष्टी असतात, त्या कोट्यवधि उपदेशांपेक्षा अधिक असतात; देहात्मभावाने उत्पन्न झालेल्या जीवगांठी ते शब्दाने छेदून टाकतात १३.
भावें धरिल्या सत्संगती । साधकां भवपाशनिर्मुक्ती ।
यालागीं अवश्य बुद्धिमंतीं । करावी संगती संतांची ॥ १४ ॥
सद्भावाने सत्संगति धरली असतां साधकांची संसारपाशातून मुक्तता होते. म्हणून बुद्धिमंतांनी संतांची संगति अवश्य करावी १४.
त्या संतलक्षणांची स्थिती । अतिसाक्षेपें श्रीपती ।
आदरें सांगे उद्धवाप्रती । यथानिगुती निजबोधें ॥ १५ ॥
त्या संतांची लक्षणे कशी असतात ती यथार्थ रीतीने व आपल्या प्रसादवाणीनें अतिसंक्षेपाने श्रीकृष्ण मोठ्या आवडीनें उद्धवाला सांगत आहेत १५.
सन्तोऽनपेक्षा मच्चित्ताः प्रशान्ताः समदर्शिनः ।
निर्ममा निरहङ्कारा निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥ २७ ॥
[श्लोक २७] संतांना कशाचीही अपेक्षा नसते त्यांचे चित्त माझे ठायी जडलेले असते ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात त्यांचे ठिकाणी मीमाझेपणा नसतो सुखदुःखादी द्वंद्वे त्यांना बाधत नाहीत तसेच ते कशाचाही संग्रह करीत नाहीत. (२७)
साधूंचे अमित गुण । त्यांत मुख्यत्वें अष्टलक्षण ।
निवडूनि सांगे श्रीकृष्ण । ते कोण कोण अवधारीं ॥ १६ ॥
साधूंचे गुण अनंत आहेत; पण त्यांतील आठ लक्षणे निवडून काढून श्रीकृष्ण सांगतात. ती कोणतीं कोणतीं हें ऐक १६.
प्राप्ताप्राप्त-लाभावस्था । बाधूं न शके साधूंच्या चित्ता ।
चित्त रातलें भगवंता । ‘निरपेक्षता’ या नांव ॥ १७ ॥
लाभ किंवा हानि साधूंच्या चित्ताला बाधा करूं शकत नाहीं; चित्त नेहमी भगवंताकडेच लागलेलें असते; याचे नांव ‘निरपेक्षता’ १७.
पैल विषयो मज व्हावा । ऐसा आठव नाठवे जीवा ।
हा साधूचा निरपेक्षा ठेवा । जाण उद्धवा गुण पहिला ॥ १८ ॥
हा अमुक एक विषय मला प्राप्त व्हावा अशी जिवाला आठवणसुद्धा होत नाही. उद्धवा ! हा साधूचा निरपेक्षपणाचा ठेवा, हा पहिला गुण होय १८.
चित्तें चिंतावें चैतन्य । याचि नांवे ‘मचित्त’ पण ।
याचि नांवें निरपेक्ष पूर्ण । इतर चिंतन भवबंधु ॥ १९ ॥
चित्ताने चैतन्याचेच चिंतन करणे याचंच नांव ‘ मच्चित्त ‘ होणे होय. ह्याचेच नांव पूर्ण ‘निरक्षेपता.’ इतर कोणताही विषय चिंतन करणे ते संसारबंधनास कारण होतें १९.
निरपेक्ष व्हावया एथ । जागृति स्वप्न सुषुप्तीआंत ।
चिन्मात्रीं जडलें चित्त । या नांव ‘मच्चित्त’ गुण दुजा ॥ ३२० ॥
याप्रमाणे निरक्षेप होण्याकरिता जागृतींत, स्वप्नांत व सुषुप्तींत चित्स्वरूपीं चित्त जडून राहणे ह्याचेच नांव ‘ मच्चित्त.’ हा दुसरा गुण होय ३२०.
देह झालिया लक्ष्मीयुक्त । अथवा हो कां आपद्भूत ।
चित्त परमानंदीं निश्चित । या नांव ‘मच्चित’ उद्धवा ॥ २१ ॥
देह लक्ष्मीने शृंगारला, किंवा आपत्तीने ग्रस्त झाला, तरी उद्धवा, चित्त परमानंदांतच निमग्न असणे ह्याचंच नांव ‘ मच्चित्त’ होय २१.
कामलोभादिदोषरहित । परमानंदीं जडलें चित्त ।
शांति सुखवासें वसे तेथ । यालागीं ‘प्रशांत’ बोलिजे त्यासी ॥ २२ ॥
चित्त कामलोभादि दोषरहित होऊन परमानंदांत जडून राहिले म्हणजे तेथें शांति सुखानें वास करिते, ह्यासाठी त्याला ‘प्रशांत’ असे म्हणतात २२.
जरी प्राणान्त केला अपकार । तरी न म्हणे हा ‘दुष्ट’ नर ।
अपकाऱ्या करी अतिउपकार । प्रशांतिप्रकार या नांव ॥ २३ ॥
कोणी प्राणान्त होईपर्यंत जरी अपराध केला, तरी त्याला जो कधी ‘दुष्ट’ असे म्हणत नाही, उलट त्या अपकार करणाऱ्यावरही अत्यंत उपकार करतो, त्यालाच उत्कृष्ट शांति असें नांव आहे २३.
जरी ठकूनि सर्वस्व नेलें । तरी क्षोभेना दोष बोले ।
तें जाण ब्रह्मार्पण झालें । येणें अंगा आलें प्रशांतत्व ॥ २४ ॥
सर्वस्व जरी ठकवून नेले, तरी ज्याला राग येत नाही, तो दोष म्हणत नाही, तर तें ब्रह्मार्पण झाले असेंच समजतो; त्यामुळेच तसा प्रशांतपणा अंगी बाणतो २४.
ब्रह्मभावेंचि तत्त्वता । विश्वासणें सर्व भूतां ।
कदा विकल्प नुपजे चित्ता । हे प्रशांतता गुण तिजा ॥ २५ ॥
खरोखर ब्रह्मभावनेनेच सर्व प्राणिमात्रांवर विश्वास ठेवणे व चित्तांत विकल्प कधी उपजूं न देणे हाच ‘प्रशांतता’ नामक तिसरा गुण होय २५.
ऐसा हा प्रशांत गुण । अंगीं बाणावया हेंचि कारण ।
जगीं देखे ‘समदर्शन’ । ब्रह्मपरिपूर्ण समसाम्यें ॥ २६ ॥
असा हा प्रशांतता गुण अंगी येण्याला कारण हेच की, जगामध्ये ब्रह्म परिपूर्ण भरलेले आहे अशा भावनेने त्याचा सर्वत्र ‘समभाव ‘ असतो २६.
जग पाहतां दिसे विषम । परी विषमीं देखे सम ब्रह्म ।
तोचि ‘समदर्शी’ परम । हा गुण निरुपम पैं चौथा ॥ २७ ॥
जग पाहूं गेलें असतां सर्वत्र वैषम्यच भरलेले, पण त्या वैषम्यांतच जो ‘सम ब्रह्म’ पाहतो, तोच खरा ‘समदर्शी’ होय. हाच निरुपम चौथा गुण समजावा २७.
हे समदृष्टी यावया हाता । भावें भजोनि भगवंता ।
निःशेष त्यजावी अहंममता । तेही कथा अवधारीं ॥ २८ ॥
ही समद्दष्टि हाती येण्याकरिता भक्तिभावाने भगवंताचें भजन करून अहंता व ममता निखालस सोडून दिली पाहिजे. तीही गोष्ट ऐक २८.
देहीं धरितां देहाभिमान । ते अहंता वाढवी ‘मीपण’ ।
मीपणें ‘ममता’ जाण । वाढे संपूर्ण देहसंबंधें ॥ २९ ॥
देहांत देहाभिमान धरला म्हणजे ती अहंता ‘मीपणा’ वाढविते. आणि त्या मीपणानें देहसंबंधी ह्यांची ‘ममता’ वाढते २९.
जे वाढली अहंअममता । ते वर्तवी महादुःखावर्ता ।
तेचि निवारावया निजव्यथा । सद्भावें गुरुनाथा शरण जावें ॥ ३३० ॥
ही जी वाढलेली अहंममता असते ती महहुःखाच्या भोंवांत पाडते. तें निज दुःख निवारण्यासाठी भक्तिभावानें गुरुचरणाला शरण गेले पाहिजे ३३०.
गुरुकृपा झालिया पूर्ण । माझ्या देहींचें जें मीपण ।
तें उकलोनि दावितां जाण । जग संपूर्ण मी एक ॥ ३१ ॥
गुरूची पूर्ण कृपा झाली आणि त्यांनी देहांतील मीपण उघड करून दाखविलें, म्हणजे सारे जग आपणच आहे असा अनुभव येतो ३१.
जें जें सान थोर दिसे दृष्टीं । तें तें अवघें मीचि सृष्टीं ।
माझ्या मीपणाची निजपुष्टी । घोंटीत उठी त्रैलोक्य ॥ ३२ ॥
लहान थोर जें जें दृष्टीला दिसते, तें तें सारें सृष्टीमध्ये माझेच स्वरूप आहे, माझ्या मीपणाची व्याप्ति एवढी मोठी आहे की, ती साऱ्या त्रैलोक्याला घोंटीत सुटते ३२.
ऐसा मीपणें परिपूर्ण । तेथ ‘मी’ म्हणावया म्हणतें कोण ।
निःशेष निमालें मीतूंपण । ‘निरभिमान’ या नांव ॥ ३३ ॥
अशा शुद्ध मीपणाने आपण परिपूर्ण असता तेथें देहाला मी म्हणावयाला म्हणणारे कोण आहे ? मीतूंपण सारेच आटोपलें. याचंच नांव ‘निरभिमान’ ३३.
ऐसें माझें मीपण पाहतां । समूळ हारपली ममता ।
हें ‘माझें’ म्हणावया पुरता । ठाव रिता नुरेचि ॥ ३४ ॥
असा माझ्या मीपणाचा विचार केला असता माझेपणा म्हणजे ‘ममता’ सारी नाहींशीच होते. ‘हे माझें ‘ असे म्हणण्यापुरती रिकामी जागाच शिल्लक राहात नाही ३४.
माझ्या मीपणाबाहिरें । जैं ममतास्पद दुजें उरे ।
तैं तेथ पूर्ण ममता स्फुरे । ते म्यां चिन्मात्रें घोंटिली ॥ ३५ ॥
माझ्या मीपणाबाहेर ‘माझे’ असे म्हणण्यासारखें जर दुसरे स्थान उरेल, तर तेथे ममता स्फुरण पावेल. तिला मी चिन्मात्रस्वरूपाने गिळूनच टाकिलें आहे ३५.
तेथ मीपणेंसीं मी माझें । नुरेचि तूंपणेंसीं तुझें ।
ऐसे परब्रह्माचेनि निजें । झाले सहजें ‘निर्मम’ ॥ ३६ ॥
तेव्हा मीपणाने ‘मी आणि माझे’, तसेंच ‘तूंपणाने तुझें’ म्हणणेच उरत नाही. असें परब्रह्माशी ऐक्य झाल्यामुळे सहजच ‘निर्मम’ होतें ३६.
निर्मम निरभिमान । तें हें उद्धवा गा संपूर्ण ।
पांचवें सहावें लक्षण । संताचें जाण निजगुह्य ॥ ३७ ॥
उद्धवा ! ‘निर्मम ‘ आणि ‘निरभिमान ‘ ते सारे हेच. संतांचे निजगुह्य आणि पांचवें व सहावें लक्षण तें हेंच ३७.
ऐसे निर्मम निरहंकार । जे होऊनि ठेले साचार ।
त्यांसी द्वंद्वदुःखडोंगर । अणुमात्र न बाधी ॥ ३८ ॥
असे जे खरोखरच निर्मम व निरहंकार होऊन राहतात, त्यांना द्वंद्वदुःखाचे डोंगर असले तरी ते अणुमात्र बाधत नाहीत ३८.
देह अदृष्टाच्या वांटा । लागतां सुखदुःखांच्या झटा ।
तो ब्रह्मसुखाचे चोहटा । देहाचा द्रष्टा होऊनि वसे ॥ ३९ ॥
देह प्रारब्धाच्या वाट्याला देऊन सोडल्यानंतर सुखदुःखांच्या झटा लागल्या तरी, तो ब्रह्मसुखाच्या चवाठ्यावर देहाचा द्रष्टा-साक्षी होऊन राहातो ३९.
देहासी पदवी आली थोरी । तो श्लाघेना जीवाभीतरीं ।
देह घोळसितां नरकद्वारीं । तो अणुभरी कुंथेना ॥ ३४० ॥
देहाला मोठी पदवी म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त झाली, तरी तो अंत:करणामध्ये हर्ष मानीत नाही; किंवा देह कोणी नरकामध्ये घोळसला तरी तो किंचितही खेद पावत नाही ३४०.
देह व्याघ्रमुखीं सांपडे । तेणें दुःखें तो न सांकडे ।
देह पालखीमाजीं चढे । तैं वाडेंकोडें श्लाघेना ॥ ४१ ॥
देह हा वाघाच्या तोंडांत सांपडला, तरी तो त्या दुःखाने विवळत नाही; अथवा देह पालखीपदस्थ झाला तरी त्याला आनंद होत नाही ४१.
छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे ।
तेणें पुरुषा सुखदुःख न जोडे । मुक्तासी तेणें पाडें देहभोग ॥ ४२ ॥
सावली विष्ठेवर पडली किंवा पालखीमध्ये चढली, तरी त्यामुळे त्या पुरुषाला सुख किंवा दुःख कांहींच होत नाही, त्याप्रमाणेच देहभोग मुक्ताला वाटत असतात ४२.
त्याचे दृष्टीखालीं एकाएक । दुःखपणा मुके दुःख ।
सुखपणा विसरे सुख । ‘निर्द्वंद्व’ देख या हेतू ॥ ४३ ॥
त्याच्या दृष्टीपुढे दुःख दुःखपणाला मुकतें आणि सुख सुखपणाला विसरतें; यामुळे तो ‘ निर्द्वंद्व ‘ बनतो ४३.
जो निर्मम निरभिमान । त्यासी नाहीं भेदभान ।
अभेदीं मिथ्या द्वंद्वबंधन । हा सातवा गुण निर्द्वंद्व ॥ ४४ ॥
तसेंच जो निर्मम व निरभिमान असतो, त्याला भेदाचे भान राहत नाही आणि अभेदामध्ये द्वंद्वबंधन हे मिथ्या होय. हा ‘ निर्द्वंद्व ‘ म्हणजे अभेदभाव हा मुक्ताचा सातवा गुण होय ४४.
जो निर्द्वंद्व निरभिमान पहा हो । त्यासी समूळ मिथ्या निजदेहो ।
तेथ देहसंबंधें परिग्रहो । उरावया ठावो मग कैंचा ॥ ४५ ॥
अहो ! पहा. जो निर्द्वंद्व व निरभिमान असतो, त्याला आपला देहच मुळी मिथ्या वाटतो; तेथे त्याला देहसंबंधी परिवार वाढविण्यास अवकाश कोठचा? ४५.
स्वजनधनस्त्रीपुत्रांसी । नांदोनि तो नातळें त्यांसी ।
स्वप्नींची घरवात जागृता जैशी । तैसा साधूसी संसारु ॥ ४६ ॥
आप्तइष्ट, धनसंपत्ति, बायकामुले यांच्याबरोबर राहून तो त्यांना शिवतसुद्धा नाही. स्वप्नांतला व्यवहार जसा जागृताला नसतो, त्याप्रमाणेच साधूंनाही संसार नसतो ४६.
एवं परिग्रही असोन । साधु ‘अपरिग्रही’ पूर्ण ।
हें आठवें मुख्य लक्षण । अतर्क्य जाण जगासी ॥ ४७ ॥
तात्पर्य, साधु हे परिग्रही असूनही पूर्णपणे ‘अपरिग्रही’ असतात. हे त्यांचे आठवें मुख्य लक्षण होय. हे जगाला अगदी अतर्क्य असते ४७.
साधु परिग्रही दिसती । परी ते परीग्रही नसती ।
हेचि संतांची पावावया स्थिती । त्यांची निजभक्ती करावी ॥ ४८ ॥
कारण, साधु हे परिग्रही दिसतात, पण ते परिग्रही नसतात. ही संतांची स्थिति प्राप्त होण्याकरिता त्यांचीच भक्ति करावी ४८.
हें साधूचें अष्टलक्षण । तें ब्रह्मींचें अष्टांग जाण ।
कीं अष्टमहासिद्धी निर्गुण । ते हे अष्टगुण साधूंचे ॥ ४९ ॥
ही साधूंची अष्ट लक्षणे म्हणजे ब्रह्माची अष्ट अंगेच होत. किंवा या निर्गुणाच्या अष्टमहासिद्धीच असे हे साधूचे आठ गुण समजावे ४९.
चैतन्यसरोवरींचें कमळ । विकासलें अष्टदळ ।
तें हें संतलक्षण केवळ । स्वानंदशीळ साधूंचें ॥ ३५०॥
चैतन्यसरोवरांतील आठ पाकळ्यांचे हे केवळ कमळच उमलले, असें हें संताचे-स्वानंदशील साधूचे लक्षण आहे ३५०.
ऐसे हे अष्ट महागुण । सकळ भूषणां भूषण ।
ज्यांचे अंगीं बाणले पूर्ण । ते साधु सज्जन अतिशुद्ध ॥ ५१ ॥
असे आठ श्रेष्ठ गुण सर्व भूषणांना-भूषण असे आहेत. ते पूर्णपणे ज्यांच्या अंगीं बिंबतील ते साधु-सज्जन अत्यंत पवित्र होत ५१.
इतर संगाचिये प्राप्ती । संग बाधक निश्चितीं ।
तैशी नव्हे सत्संगती । संगे छेदी आसक्ती देहसंगा ॥ ५२ ॥
इतर कोणाचाही संग प्राप्त झाला तर खरोखर बाधक होतो. तशी ही सत्संगति नव्हे. या संगाच्या योगाने देहसंगाची आसक्ति तुटते ५२.
तेथ उपदेश नलगे कांहीं । संगेंचि देही करी विदेही ।
तेचि साते श्लोकीं पाहीं । संतांची नवाई हरि सांगे ॥ ५३ ॥
त्यासाठी त्यांना उपदेश करावा लागत नाही. केवळ संगच देहीचा विदेही करितो. तीच अपूर्वता सात श्लोकांनी श्रीहरि सांगतात ५३.
तेषु नित्यं महाभाग महाभागेषु मत्कथाः ।
संभवन्ति हिता नृणां जुषतां प्रपुनन्त्यघम् ॥ २८ ॥
[श्लोक २८] हे भाग्यवान उद्धवा ! संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणार्या माझ्या कथा चालतात जे त्या ऐकतात, त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. (२८)
इंद्रपदादि ब्रह्मसदन । ये प्राप्ती नांव ‘भाग्य’ गहन ।
तेही सत्संगासमान । कोट्यंशें जाण तुके ना ॥ ५४ ॥
इंद्रपदापासून ब्रह्मलोकापर्यंत प्राप्ति होणे ह्याला मोठे ‘भाग्य’ म्हणतात. पण हेसुद्धा सत्संगाच्या कोठ्यांशाशी तुलणार नाही ५४.
ऐशी जे कां सत्संगती । सभाग्य भाग्याचे पावती ।
भगवद्भावें साधु वर्तती । माझे कथाकीर्ति-अनुवादें ॥ ५५ ॥
अशी जी सत्संगति ती महाभाग्यवंतांना प्राप्त होते. साधु हे माझ्या कथाकीर्ति गायन करीत भगवद्भावनेनेच वागत असतात ५५.
जे कथा अवचटें कानीं । पडतां कलिमलाची धुणी ।
करूनि सांडीत तत्क्षणीं । जे गंगेहूनी पवित्र ॥ ५६ ॥
ती कथा अकस्मात जरी कानावर पडली तरी तत्काल कलियुगासंबंधीं पातक सारे धुऊन काढते. कारण ती गंगेहूनही पवित्र आहे ५६.
जेथ माझी निजकथा गाती । तीर्थें तेथे पवित्र होती ।
ऐशिया भगवत्कथाकीर्ती । साधु गर्जती सर्वदा ॥ ५७ ॥
जेथे माझी निजकथा गायन करतात, तेथील तीर्थेसुद्धा पवित्र होऊन जातात. अशा त-हेच्या भगवंताच्या कथा-कीर्ति साधु सदासर्वदा गर्जत असतात ५७.
स्वयें आपण भागीरथी । सर्वदा ऐसें जीवीं चिंती ।
कोणी साधु ये जैं मजप्रती । तैं माझीं पापें जाती निःशेष ॥ ५८ ॥
स्वतः भागीरथी सुद्धा नेहमी मनांत चिंतन करीत असते की, कोणी साधु माझ्याकडे येईल तर माझी सारी पातकें नाहीशी होऊन जातील ५८.
पार्वतीचा द्वेष मनीं । तें बद्धपाप मजलागुनी ।
तेंही झडे संतचरणीं । सकळ पापा धुणी सत्संगें ॥ ५९ ॥
माझ्या मनांत पार्वतीचा द्वेष असल्यामुळे मीही पातकानें बद्ध झाल्ये आहे. तेंही पातक संतचरणाने झडून जाईल. कारण, सत्संगतीने सर्व पातकें धुऊन जातात ५९.
कां ज्याचें मुखीं हरिनामकीर्ती । त्याचे पाय जैं मजमाजीं येती ।
तैं सकळ पापें माझीं जाती । ऐसें भागीरथी स्वयें बोले ॥ ३६० ॥
किंवा ज्याच्या मुखांत हरिनामाची कीर्ति असते त्याचे पाय जर माझ्या पात्रांत येतील, तर माझी सारी पापें जातील, असें स्वत: भागीरथी म्हणत असते ३६०.
ऐसी संतांची संगती । सदा वांछी भागीरथी ।
अवचटें गेलिया संतांप्रती । पापें पळतीं प्राण्यांचीं ॥ ६१ ॥
याप्रमाणे भागीरथीसुद्धा संतांच्या संगतीची निरंतर इच्छा करते. याकरिता सहज जरी संतांकडे गेले तरी प्राण्यांची पातके पळून जातात ६१.
ते संतमुखींची माझी कथा । जैं अत्यादरें ऐके श्रोता ।
तैं त्याचें निजभाग्य तत्त्वतां । मजही सर्वथा न वर्णवे ॥ ६२ ॥
अशा त्या संतांच्या मुखांतील माझी कथा अत्यादराने श्रोता श्रवण करील, तर त्याचे भाग्य खरोखर मलासुद्धा वर्णन करता येणार नाहीं ६२.
माझे कथेची अतिआवडी । नित्य नूतन नवी गोडी ।
सादरें ऐकतां पापकोडी । जाळोनि राखोडी उरवीना ॥ ६३ ॥
माझ्या कथेची अत्यंत आवड धरली असतां तींत नित्य नवीन गोडी उत्पन्न होते. आणि आदरपूर्वक ऐकिली असतां कोट्यवधि पापे जाळून खाक करते. राखुंडीसुद्धा शिल्लक ठेवीत नाहीं ६३.
माझी कथा कां माझे नाम । सकळ पातकां करी भस्म ।
हेंचि चित्तशुद्धीचें वर्म । अतिसुगम उद्धवा ॥ ६४ ॥
माझी कथा किंवा माझे नाम हें साऱ्या पातकांचे भस्म करून टाकते. उद्धवा ! चित्तशुद्धीचे अत्यंत सुगम वर्म तें हेच आहे ६४.
योग याग वेदाध्ययन । करितां पवित्र नव्हे मन ।
तें करितां हरिकथाश्रवण । होय अंतःकरण पुनीत ॥ ६५ ॥
अनेक प्रकारचे योगायोग किंवा वेदाध्ययन केले तरी मन पवित्र होत नाही. तीच हरिकथा श्रवण केली असतां अंत:करण पवित्र होते ६५.
अबद्व पढतां वेद । दोष बाधिती सुबद्ध ।
नाम पढतां अबद्ध । श्रोते होती शुद्ध परमार्थतां ॥ ६६ ॥
अबद्ध रीतीनें वेद पठण केला तर अनेक प्रकारच्या दोषांची बाधा होते. परंतु नाम जरी अशुद्ध म्हटले तरी म्हणणारे परमार्थतः शुद्धच होतात ६६.
नाना योग याग वेदाध्ययन । तेथ अधिकारी द्वीज संपूर्ण ।
कथाश्रवणें चारी वर्ण । होती पावन उद्धवा ॥ ६७ ॥
अनेक प्रकारचे योग, याग किंवा वेदाध्ययन ह्याचे अधिकारी फक्त ब्राह्मणच असतात; परंतु उद्धवा ! कथेच्या श्रवणानें चारही वर्ण पावन होतात ६७.
ऐसा लाभ कथाश्रवणीं । तरी कां नाइकिजे सकळ जनीं ।
तें भाग्य भगवत्कृपेवांचूनी । सर्वथा कोणी लाहेना ॥ ६८ ॥
आतां कथाश्रवणापासून जर इतका लाभ आहे, तर ती सारे लोक कां ऐकत नाहीत असें कोणी म्हणतील, तर भगवत्कृपेशिवाय तेवढे भाग्य कोणालाच प्राप्त होत नाही ६८.
भगवत्कृपा पावले साङ्ग । त्यांसी कथाकीर्तनीं अनुराग ।
तेचि निजभाग्यें महाभाग । स्वमुखें श्रीरंग बोलिला ॥ ६९ ॥
ज्यांच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झालेली असते, त्यांचेच कथाकीर्तनावर प्रेम असते. तेच भाग्याने श्रेष्ठ होत. असें श्रीकृष्ण स्वमुखाने सांगतात ६९.
जगातें पवित्र करिती । माझी जाण नामकीर्ती ।
ऐसा कळवळोनि श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ३७० ॥
माझें नाम व कीर्ति जगाला पवित्र करून सोडते, असे कळवळून श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले ३७०,
ऐशी भगवत्कृपेची प्राप्ती । केवीं आतुडे आपुले हातीं ।
तेचि अर्थीं श्रीपती । विशद श्लोकार्थीं सांगत ॥ ७१ ॥
परंतु अशी भगवत्कृपाप्राप्ति आपल्या हाती कशी येणार ? त्याविषयींच श्रीकृष्ण पुढील श्लोकार्थाने स्पष्ट करून सांगताहेत ७१.
ता ये श्रृण्वन्ति गायन्ति ह्यनुमोदन्ति चादृताः ।
मत्पराः श्रद्दधानाश्च भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥
[ श्लोक २९] जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण, गायन आणि कौतुक करतात, तसेच जे माझेच चिंतन करतात, तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात. (२९)
आपुलिया गृहकार्यार्था विषयव्यापारीं जातां जातां ।
कानीं पडली हरिकथा । स्वभावतां प्रसंगें ॥ ७२ ॥
कोणी आपल्या घरच्या कामासाठी जात असतांना हरिकथा सहजासहजी व प्रसंगानुसार कानावर पडली ७२,
कृष्णकीर्तिकथनाक्षरें । रिघतांचि कर्णद्वारें ।
भीतरील पाप एकसरें । निघे बाहिरें गजबजोनि ॥ ७३ ॥
तरी त्या कृष्णकीर्तीच्या कथेची अक्षरें कर्णद्वारांत शिरतांच आंत असलेली झाडून सारी पातकें खडबडून बाहेर पडतात ७३.
जेवीं पंचाननाची आरोळी । करी मदगजां रांगोळी ।
तेवीं हरिकथेच्या मेळीं । होय रंवदळी महापापा ॥ ७४ ॥
सिंहाची गर्जना कानावर येतांच मदोन्मत्त हत्तीची जशी रेवडी उडते, त्याप्रमाणे हरिकथा कानी पडतांच महापातकांची राख होऊन जाते ७४.
ऐसा निघाल्या पापाचा केरु । कथेसी उपजे अत्यादरु ।
कथावधानीं धरितां धीरु । हर्षे निर्भरु नर होय ॥ ७५ ॥
असा पातकाचा केर निघून गेला की हरिकथेवर अत्यंत भक्ति जडते. आणि कथाश्रवणाकडे लक्ष दिले म्हणजे मनही हर्षाने परिप्लुत होते ७५.
जंव जंव कथारहस्य जोडे । तंव तंव अनुमोदनीं प्रीति वाढे ।
वाढले प्रीतीचेनि पाडें । ते कथा कैवाडें स्वयें गाय ॥ ७६ ॥
कथेतील रहस्य जों जों समजावयास लागते तों तो तिच्याविषयी प्रेम वाढत जाते आणि त्या प्रेमाच्या भरात आवडीने ती कथा तो स्वत:च गाऊं लागतो ७६.
फेडूनि लोकलाजेचें बिरडें । गातां हरिकीर्तिगुण पवाडे ।
न पाहे तो कर्माकडे । न सांकडें सुहृदासी ॥ ७७ ॥
लोकलज्जेचे बिरडे सोडून खुल्या मनानें हरीचे गुणानुवाद गाऊं लागले असतां तो आपल्या कर्मागाकडे पहातच नाही. आप्तइष्टांना भीत नाहीं ७७.
निजभावें भगवत्कथा गातां । स्वयंभ उपजे सादरता ।
तेणें अत्यादरें हरिकथा । होय सांगता अतिश्रद्धा ॥ ७८ ॥
भक्तिभावानें भगवत्कथा गाऊं लागले असतां आवड आपोआपच उत्पन्न होते. त्यामुळे तो अधिक आदराने व अधिकाधिक श्रद्धेनेंच कथा सांगू लागतो ७८.
जंव जंव कथा सांगे निवाडें । तंव तंव श्रद्धा अधिक वाढे ।
प्रेमाचा पूर चढे । त्यामाजीं बुडे निज श्रद्धा ॥ ७९ ॥
आणि जो जो आवडीनें कथा सांगतो, तों तों श्रद्धाही अधिक अधिक वाढत जाते; आणि अखेर प्रेमाला पूर चढून त्यांत ती श्रद्धाही बुडून जाते ७९.
कथाकीर्तन अनुकीर्ती । वाढत्या श्रद्धेचिये प्रीतीं ।
बाधूं न शके विषयासक्ती । तेणें मत्पर स्थिति साधकां ॥ ३८० ॥
कथाकीर्तनाचे वाढत्या श्रद्धेनें प्रतिपादन होऊ लागले म्हणजे विषयासक्ति बाधू शकत नाही. आणि तेणेकरून साधकांना मत्परायणस्थिति प्राप्त होते ३८०.
न करितां भगवद्भजन । वेदाध्ययन यज्ञ दान ।
येणेंचि आम्ही जाऊं तरोन । म्हणती ते जन महामूढ ॥ ८१ ॥
भगवद्भजन न करतां वेदाध्ययन किंवा यज्ञदान करूनच आम्ही तरून जाऊं असें म्हणणारे लोक महामूर्ख होत ८१.
एथ मुख्यत्वें भगवद्भक्ती । हा विश्व्वास धरितां चित्तीं ।
भगवत्पर झालिया वृत्ती । सर्व भूतीं मद्भाव ॥ ८२ ॥
यांत भगवद्भक्तीच मुख्य आहे, असा मनामध्ये विश्वास धरला असतां वृत्ति भगवत्परच होते; आणि तेणेकरून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मद्भाव उत्पन्न होतो ८२.
ऐसा भाव धरोनि हृदयीं । माझे भक्तीवेगळें कांहीं ।
सर्वथा स्वयें करणें नाहीं । ‘मत्पर’ पाहीं या रीतीं ॥ ८३ ॥
असा भाव अंत:करणांत धरून माझ्या भक्तीशिवाय ते दुसरे काहीच करीत नाहीत. अशा रीतीने ‘मत्पर’ होतात ८३.
ऐशिया मत्परा वृत्तीं । सावधान निजस्थिती ।
तेणें उपजे ‘चौथी भक्ती’ । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥ ८४ ॥
अशा मत्पर वृत्तीने ते निजस्थितीत सावधान राहतात. त्यायोगाने त्या भक्तांच्या ठिकाणी चौथी भक्ती उत्पन्न होते, हेंच श्रीकृष्ण स्वतः विशद करून सांगतात ८४.
तेथ न करितां आठवण । अखंड होय हरिचें स्मरण ।
क्रियामात्रें भगवद्भजन । सहजें जाण सर्वदा ॥ ८५ ॥
तेथे आठवण न करतांच अखंड हरीचे स्मरण होते; जी जी क्रिया घडते, त्या त्या क्रियेनें निरंतर भगवद्भजन सहजच घडत असते ८५.
जें जें ‘दृष्टीं’ देख आपण । थोर अथवा सूक्ष्म सान ।
तें तें होय हरीचें निजदर्शन । सहजें भजन अहेतुक ॥ ८६ ॥
तो दृष्टीने जें जें ‘दृश्य ‘ पाहतो, तें थोर असो की लहान असो, त्यांत त्याला हरीचेंच दर्शन होते. हेच अहेतुक व सहज भजन होय ८६,
जें जें ‘वाचा’ वदे वचन । तेंतें होय हरीचें स्तवन ।
स्तव्य स्तविता उणखूण । हेही आठवण विसरोनी ॥ ८७ ॥
त्याची वाणी जें जें भाषण बोलते, ते तें स्तव्य, स्तविता, इत्यादि लक्षणाची आठवण विसरून हरीचे स्तवनच होतें ८७.
शब्दीं शब्दातें शब्दवितां । ते शब्दरूपें हरीची सत्ता ।
शब्द द्योती ज्या शब्दार्था । ते अर्थग्राहकता हरीची ॥ ८८ ॥
शब्दाने शब्द शब्दवितांना शब्दरूपाने ती हरीची सत्ताच असते. तसेंच शब्द ज्या शब्दार्थाचा द्योतक असतो ती अर्थग्राहकताही हरीची म्हणजे हरिरूपच होय ८८.
यापरी ‘शब्दश्रवण’ । श्रवणीं श्रवण होतां जाण ।
तो शब्दार्थ संपूर्ण । होय ब्रह्मार्पण श्रवणेंसीं ॥ ८९ ॥
याप्रमाणे कानांनी शब्द श्रवण होत असतां तो सारा शब्दार्थ श्रवणासहवर्तमान ब्रह्मार्पण होत असतो ८९.
‘गंध’ घ्राणां होतां भेटी । भोक्तेपणें हरीचि उठी ।
तो घ्रेय घ्राता घ्राण त्रिपुटी । स्वयें घोंटी चिदत्वें ॥ ३९० ॥
नाकाची आणि सुवासाची गांठ पडली असतां भोक्तेपणाने हरिच उभा असतो. अर्थात् तो वास घेण्याचा पदार्थ, वास घेणारा, आणि नाक ही त्रिपुटी चिद्रुपाने गिळून टाकतो ३९०.
‘रस’ रसना रसत्वबोध । तेथ निजभोक्ता गोविंद ।
तो भोग्य भोक्ता भोजनसंबंध । करी परमानंद निजबोधें ॥ ९१ ॥
‘रस’, ‘रसना’ आणि ‘रसाभिरुचि’ यांतही श्रीहरिच भोक्ता असतो. त्यामुळे भोग्य, भोक्ता व भोजनसंबंध निजबोधाच्या योगानें तो परमानंदरूप करितो ९१.
‘शीत-उष्ण-मृदु-कठीण’ । निजांगीं लागतां जाण ।
तें अंगेंचि होय आपण । मृदु कठिण मिथ्यात्वें ॥ ९२ ॥
शीतउष्ण-मृदु-कठीण (हे ‘स्पर्श’ विषयांतील चार गुण) अंगास लागले असता ते स्वतःच तो होतो; कारण मृदु, कठीण इत्यादि भेद तो मिथ्या समजतो. त्याला या सर्वात चित्सत्ताच स्फुरते ९२.
‘करां’ ची जे कर्तव्यता । तीतें चालवी अकर्तता ।
यालागीं घेतां देतां । अकर्तात्मतां हरिभजन ॥ ९३ ॥
हाताची जी किया ती तो अकर्तेपणानेच चालवितो; म्हणून देतां घेतांनाही अकर्तात्मभावानें हरीचेंच भजन होतें ९३.
निश्चळ निजरूपावरी । चपळ पाउलांच्या हारी ।
चालवी जैशा लहरी । सूर्यकरीं मृगजळाच्या ॥ ९४ ॥
निजरूपावर निश्चळ झाला असल्याने, चपळ ‘पाऊलांच्या ‘ पंक्ति या सूर्यकिरणांनी उत्पन्न झालेल्या मृगजळाच्या लाटांप्रमाणे चालवितो ९४.
जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । चिन्मात्रीं जडली वृत्ती ।
चित्त चित्तत्वाची विसरे स्फूर्ति । या नांव ‘मद्भक्ति’ उद्धवा ॥ ९५ ॥
जागृतिस्वप्नसुषुप्तीमध्ये चितस्वरूपातच वृत्ति जडलेली असते, त्यामुळे उद्धवा ! ‘चित्त’ हे चित्तपणाची स्फूर्तिच विसरून जातें ; ह्याचंच नांव ‘ मद्भक्ति ‘ होय ९५.
हे माझी आवडती भक्ती । इचें नांव म्हणिजेत ‘चौथी’ ।
हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ती निजदासी ॥ ९६ ॥
ही माझी अगदी आवडती भक्ति. हिलाच ‘चौथी’ भक्ति असें म्हणतात. या भक्तीचे भाग्य ज्याच्या हाती येते. त्याच्या चारही मुक्ति दासी होऊन राहतात ९६.
भक्तिं लब्धवतः साधोः किमन्यदवशिष्यते ।
मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानन्दानुभवात्मनि ॥ ३० ॥
[लोक ३०] अनंत गुणांचा आश्रय, आनंदानुभवस्वरूप अशा ब्रह्मरूप माझी भक्ती ज्याला प्राप्त झाली, त्या सत्पुरूषाला दुसरे मिळवावयाचे काय शिल्लक राहाते ? (३०)
अत्यंत माझी पढियंती । ते हे जाण चौथी भक्ती ।
निजभाग्यें लाधल्या हातीं । चारी मुक्ती तृणप्राय ॥ ९७ ॥
ही माझी अत्यंत आवडती अशी चौथी भक्ति होय. ही जर भाग्याने प्राप्त झाली, तर चारही मुक्ति होऊन जातात ९७.
निरपेक्ष जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्तीं ।
त्यांतें भक्त न धरिती हातीं । एथवरी प्रीति मद्भजनीं ॥ ९८ ॥
जेथें निरपेक्ष माझी भक्ति असते, तेथें चारही मुक्ति पायांला लागतात; पण भक्त त्यांना हातसुद्धा लावीत नाहीत. इतकी माइया भजनावर त्यांची प्रीति असते ९८.
माझिया निजभजनप्रीतीं । स्वप्नींही बद्धता नेणिजे भक्तीं ।
बद्धतेवीण मिथ्या मुक्ती । जाणोनि न घेती निजभक्त ॥ ९९ ॥
माझ्या भजनाच्या प्रेमामुळे भक्तांना बद्धता म्हणजे काय तें स्वप्नांतसुद्धा जाणवत नाहीं; आणि बद्धतेशिवाय मुक्ति ही मिथ्या होय; म्हणून ती माझे भक्त घेत नाहीत ९९.
जेथ बद्धता समूळ कुडी । तेथ मुक्ति कायशी बापुडी ।
माझिया निजभजनआवडीं । स्वानंदकोडी मद्भक्तां ॥ ४०० ॥
समूळ बद्धताच जेथें खोटी, तेथें मुक्ति बिचारी काय? माझ्या भजनाच्या आवडीमध्येच माझ्या भक्तांना स्वानंदाच्या राशि मिळत असतात ४००.
निरपेक्षा निजप्रीतीं । भावें करितां अनन्य भक्ती ।
भक्तांसी स्वानंदाची प्राप्ती । भजनस्थितीमाझारीं ॥ १ ॥
निरपेक्ष आणि प्रेमपूर्वक भक्तीने माझे अनन्य भजन केले असता त्या भजनस्थितीमध्येच भक्तांना स्वानंदाची प्राप्ति होते १.
जेवीं गर्भेंसीं वर्ते गुर्विणी । कां तरुणपणेंसीं तरुणी ।
तेवी स्वानंदाच्या पूर्णपणें । माझे निजभजनीं मद्भक्त ॥ २ ॥
ज्याप्रमाणे गरोदर स्त्री गर्भासह वागते, किंवा तरुणी तारुण्यासह वागते, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या पूर्णपणानिशी माझे भक्त माझ्या भजनांत निमग्न असतात २.
तेथ सगुण अथवा निर्गुण । उभयरूपें मीचि ब्रह्म पूर्ण ।
तेथ भावें करितां भजन । ब्रह्मसंपन्न मद्भक्त ॥ ३ ॥
त्या वेळी सगुण अथवा निर्गुण ह्या दोन्ही रूपांनी परिपूर्ण ब्रह्म मीच असतो. त्यामुळे भक्तीनें भजन केले असता माझे भक्त ब्रह्मसंपन्न होतात ३.
भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती ।
विवेकवैराग्यज्ञानसंपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥ ४ ॥
एकनिष्ठपणे माझी भक्ति केली असता भाविकांना न मिळेल असें काय आहे ? विवेक, वैराग्य, ज्ञानसंपत्ति ही माझ्या भक्तांच्या पायीं लागतात ४.
माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध ।
तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ५ ॥
माझ्या भजनाने भेदभाव नाहीसा होतो, तेव्हां अभेदज्ञान तेथें आपोआपच प्रगट होते. त्यामुळे परमानंद भरून जाऊन तो स्वतःसिद्ध स्वानंदाचा गड्डाच बनून राहतो ५.
माझे स्वरूपा नाहीं अंत । यालागीं नांवें मी ‘अनंत’ ।
बाप भक्तभाव समर्थ । तिहीं मी अनंत आकळिलों ॥ ६ ॥
माझ्या ‘ स्वरूपाला अंत नाही, म्हणूनच मला ‘ अनंत ‘ असें नाव आहे. परंतु भक्ताचा भाव इतका समर्थ व श्रेष्ठ असतो की, तो मला अनंतालाही बांधून ठेवू शकतो ६.
ऐसें ज्यांचे प्रेम गोड । त्यांचे सेवेचें मज कोड ।
त्यांचें सोशीं मी सांकड । निचाडा चाड मज त्यांचि ॥ ७ ॥
असे ज्यांचे प्रेम गोड, त्यांच्या सेवेची मला आवड असते. त्यांचे संकट मी सोसतों, आणि मला निरिच्छालाही त्यांची इच्छा होते ७.
देव सप्रेमें भुलला । म्हणे मी त्यांचाचि अंकिला ।
जीवेंभावें त्यांसी विकिला । मी त्यांचा जाहला तिहीं लोकीं ॥ ८ ॥
देव प्रेमाला भुलला आणि म्हणाला की, मी त्यांचाच अंकित आहे. मी जीवाभावाने त्याला विकलों आहे. आणि साऱ्या त्रिभुवनांत मी त्यांचाच होऊन राहिलों आहे ८.
एथवरी भक्तां माझी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्संगती ।
मा सद्भावें जे साधु सेविती । त्यांची निजगती मज न बोलवे ॥ ९ ॥
अकस्मात सत्संगति घडली, तर भक्तांना माझी एवढी प्राप्ति होते, मग अनन्य भक्तीने जे साधूची सेवा करतात, त्यांची गति मला शब्दांनी वर्णनच करता येत नाही ९.
ऐसा संतमहिमा वानितां । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा ।
तोचि संतमहिमा मागुता । होय वानिता चौं श्लोकीं ॥ ४१० ॥
असा संतांचा महिमा वर्णन करतांना श्रीकृष्णाची तृप्ति होईना, म्हणून तोच संतमहिमा पुन्हा चार श्लोकांनी वर्णन करीत आहेत ४१०.
यथोपश्रयमाणस्य भगवन्तं विभावसुम ।
शीतं भयं तमोऽप्येति साधून् सम्सेवतस्तथा ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] ज्याने अग्नीचा आश्रय घेतला, त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते, त्याप्रमाणे जे संतांना शरण जातात, त्यांची जडता, संसारभय आणि अज्ञान नाहीसे होते. (३१)
जेवीं वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करूं जाणती ।
त्यांचें शीततमभयनिवृत्ती । तो करी निश्चितीं उद्धवा ॥ ११ ॥
उद्धवा ! तेजोमूर्ति अग्नीची सेवा जे करूं जाणतात, त्यांचे थंडी, अंधार व भय तो ( अग्नि) निवारण करतो ११.
शीत निवारी संनिधी । तम निवारी तेजोवृद्धी ।
भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसु ॥ १२ ॥
तो जवळ असला म्हणजे थंडी नाहीशी होते, त्याच्या तेजोवृद्धीने अंधार नाहीसा होतो, आणि त्याच्यावर ईश्वरभावना धरल्याने भय निवारण होते १२.
तैशीच जाण सत्संगती । संगें त्रिविध ताप निवारती ।
तेचि अर्थींची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥ १३ ॥
त्याप्रमाणेच सत्संगति आहे असें तूं समज. त्या संगतीने त्रिविध तापांचे निवारण होते, हीच गोष्ट उद्धवा ! तुला स्पष्ट करून सांगतो ऐक १३.
शीत म्हणिजे द्वंद्वबाधु । तो समूळ निवारिती साधु ।
तम म्हणिजे अज्ञानांधु । त्यासी करिती प्रबोधु निजज्ञानें ॥ १४ ॥
थंडी म्हणजे द्वंद्वापासून होणारी पीडा; ती साधु समूल नाहीशी करून टाकतात. तम म्हणजे अज्ञानांधकार ; याचाही आत्मज्ञानोपदेशाने नाश करतात १४.
भयांमाजीं श्रेष्ठ मरण । भय निवारी साधु विचक्षण ।
निवारिती जन्ममरण । कृपाळु पूर्ण दीनांचे ॥ १५ ॥
भयामध्ये मरणासारखं दुसरें भय नाहीं; तें ज्ञानी साधु निवारण करतात. इतकेच नव्हे, तर जन्ममरणही दूर करतात. कारण, ते दीनांचे पूर्ण दयाळू आहेत १५.
अग्नीसमान म्हणों साधु । हाही बोल अतिअबद्धु ।
अग्नीहूनि अधिक साधु । तोचि प्रबोधु हरि सांगे ॥ १६ ॥
आतां साधु हे अग्नीसारखे आहेत, असे म्हणणेही असंबद्ध आहे ; कारण साधु हे अग्नीहूनही श्रेष्ठ आहेत. ते कसे तें श्रीकृष्ण सांगतात १६.
अग्नीपाशीं प्रबळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम ।
अग्नि पोळी अधमोत्तम । साधु सर्वसम सुखदाते ॥ १७ ॥
अग्नीपाशी भयंकर धूर असतो आणि साधु क्रोधरहित व धूमरहित असतात. अग्नि हा अधम व उत्तम या दोघांनाही पोळतो; परंतु साधु हे सर्वांना सारखेच सुखदाते असतात १७.
साधूंची धन्य संगती । संगे जडजाड्य तोडिती ।
कर्माचें कर्मत्व मोडिती । बुडत्या तारिती निजसंगें ॥ १८ ॥
साधूची संगति धन्य धन्य होय. ते आपल्या संगतीने जडांचे जाड्य नाहींसें करतात. ते कर्माचे, कर्मत्व मोडतात आणि निजसंगतीने बुडत्याला तारतात १८.
निमज्ज्योन्मज्जतां घोरे भवाब्धौ परमायनम् ।
सन्तो ब्रह्मविदः शान्ता नौर्दृढेवाप्सु मज्जताम् ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] जशी पाण्यात बुडणार्या लोकांना बळकट नौकाच आश्रय असते, त्याप्रमाणे जे या घोर संसारसागरात गटांगळ्या खातात, त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ते शांत संतच आश्रय होत. (३२)
प्रतिक्षणीं अधिक वृद्धी । अमर्याद वाढे भवाब्धी ।
तेथ उबकल्या चुबकल्या त्रिशुद्धी । अधर्मबुद्धि जनांसी ॥ १९ ॥
संसारसागराला क्षणोक्षणी भरती येऊन तो अमर्याद वाढत असतो. त्यांत गटंगळ्या खाता खातां लोकांना अधर्मबुद्धीच उत्पन्न होते १९.
अधर्में निमज्जन नरकांत । स्वधर्में उन्मज्जन स्वर्गांत ।
ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकांत संसारी ॥ ४२० ॥
अधर्माने नरकांत बुडतात व स्वधर्माने स्वर्गात चढतात. ह्याप्रमाणे संसारी लोक स्वर्गात व नरकांत भोंवऱ्याप्रमाणे गिरक्या खात असतात ४२०.
यापरी संसारी जन । पावतां उन्मज्जन निमज्जन ।
त्यासी तरावया भवाब्धि जाण । साधु सज्जन दृढ नाव ॥ २१ ॥
अशा रीतीने संसारी लोक संसारसागरामध्ये खालवर गटंगळ्या खात असतां त्यांना तारण्यास साधुसज्जन हीच मजबूत नाव आहे २१.
पडल्या जळार्णवामाझारीं । जेवीं अच्छिद्र नाव तारी ।
तेवीं बुडतां भवसागरीं । सुखरूप तारी सज्जननाव ॥ २२ ॥
पाण्याच्या समुद्रात पडले असता त्यांतून छिद्ररहित नौकाच तारते, त्याप्रमाणे संसारसागरामध्ये बुडणाऱ्यांनाही सज्जनरूप नौकाच सुखाने तारून नेते २२.
कामक्रोधरहित शांती । हेचि नावेची अच्छिद्र स्थिती ।
ब्रह्मज्ञानें सपुरती । सुखरूप निश्चितीं या हेतु ॥ २३ ॥
कामक्रोधरहित शांति हाच नावेचा अछिद्रपणा होय. ती ब्रह्मज्ञानाने बळकट असल्यामुळे खरी सुखरूप आहे २३.
कामक्रोधादि सावजांसी । बळें घ्यावया आंविसासी ।
कदा न येववे नावेपाशीं । संगें सकळांसी तारक ॥ २४ ॥
कामक्रोधादि भयंकर जलचरांना आमिष खाण्याकरितां ह्या नावेजवळ कधीच येववत नाही. तात्पर्य, सत्संग हा सर्वांना तारक आहे २४,
नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं ।
बुडवूं नेणे धारावर्तीं । तारक निश्चितीं निजसंगें ॥ २५ ॥
या नावेची एक गोष्ट मोठी अपूर्व आहे. ती ही की, ती कल्पांतीही जुनी म्हणून होतच नाही. आणि मोठ्या धारेतल्या भोवऱ्यातही तिला बुडविता येत नाही. ती आपल्या संगतीने सर्वानाच तारते २५.
परी ये नावेची नवल गती । वरी चढले ते बुडती ।
तळीं राहिले ते तरती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥
पण उद्धवा ! या नावेचा आणखी एक चमत्कार आहे. तो हा की, जे ह्या नावेच्या ‘वर’ चढतात ते बुडतात, आणि ‘ तळाला’ राहतात ते तरतात, हे तूं लक्षात ठेव २६
दीनांचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वें तरणोपावो ।
त्या कळवळ्याचा अभिप्रावो । स्वयें देवो सांगत ॥ २७ ॥
येथे पहा ! दीनांचा कळवळा हाच मुख्यत्वे तरणोपाय आहे. त्या कळवळ्यांतील हेतु स्वतः श्रीकृष्ण सांगतात २७.
अन्नं हि प्राणिनां प्राण आर्तानां शरणं त्वहम् ।
धर्मो वित्तं नृणां प्रेत्य सन्तोऽर्वाग्बिभ्यतोऽरणम् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] जसे अन्नच प्राण्यांचे प्राण आहे, दीनांचा रक्षण करणारा मी आहे, माणसांचे परलोकामध्ये धर्म हेच धन आहे, त्याचप्रमाणे संसारामुळे भयभीत झालेल्यांसाठी संतजनच रक्षणकर्ते आहेत. (३३)
जेवीं अन्नेवीण प्राण । सर्वथा न वांचती जाण ।
प्राण्यांचें प्राणपोषण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नीं नांदे ॥ २८ ॥
अन्नाशिवाय प्राण कधीच वाचत नाहीत, कारण प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करण्याचे पूर्ण सामर्थ्य अन्नामध्येच असते २८.
जोडली धर्माची संपत्ती । ते इहलोकीं होय रक्षीती ।
तेचि धर्मधन देहांतीं । उत्तम गतिदायक ॥ २९ ॥
धर्माने मिळविलेली संपत्ति ह्या लोकामध्ये आपले संरक्षण करते. तेंच धर्मरूप धन देहांतीही उत्तम गतिदायक असते २९.
संसारीं पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले पूर्ण ।
ऐशिया शरणागता शरण्य । मी नारायण रक्षिता ॥ ४३० ॥
संसारामध्ये अतिशय गांजलेल्या आणि त्रिविध तापाने तापलेल्या अशा शरणागतांना आश्रयस्थान असा मीच एक नारायण असून त्यांचे संरक्षण करणारा होतो ४३०.
माझें करितां नामस्मरण । सहजें निवारे जन्ममरण ।
त्या मज रिघालिया शरण । बाधी दुःख कोण बापुडें ॥ ३१ ॥
माझें नामस्मरण केले असतां जन्ममरण सहज दूर होते; त्या मला शरण आल्यावर बिचारे कोणतें दुःख पीडा देणार ? ३१.
दुःखभय न पावतां आधीं । जिंहीं साधु सेविले सद्बुद्धीं ।
त्यांसी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी बाधिना ॥ ३२ ॥
दुःखाचे भय प्राप्त होण्यापूर्वीच जे सदबुद्धीने साधूची सेवा करतात, त्यांना संसारभयाची आधिव्याधि मुळीच बाधत नाही ३२.
प्राणियांसी होतां पतन । भाग्यें भेटल्या सज्जन ।
निवारूनि अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥ ३३ ॥
प्राण्याला पतन घडले आणि तेथे सुदैवाने सज्जनांची गांठ पडली, तर अधोगतीला निवारण करून जन्ममरणालाही ते छेदून टाकतात ३३.
संसार तरावया जाण । सत्संगतीचि प्रमाण ।
त्यांचे भावें धरितां चरण । दीनोद्धरण त्यांचेनी ॥ ३४ ॥
संसारांतून तरून जाण्याला सत्संगति हाच खरा आधार आहे. संतांचे भक्तिभावाने चरण धरले असता त्यांच्याकडून दीनांचा उद्धार होतो ३४.
सन्तो दिशन्ति चक्षूंषि बहिरर्कः समुत्थितः ।
देवता बान्धवाः सन्तः सन्त आत्माहमेव च ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहाण्याची शक्ती देतो, त्याप्रमाणे संतपुरूष स्वतःला आणि भगवंतांना पाहाण्याची दृष्टी देतात संत हे अनुग्रहशील देवता आहेत संत आपले हित इच्छिणारे सुहृद आहेत संत आपले प्रियतम आत्मा आहेत किंबहुना संत म्हणजे मीच आहे. (३४)
जेवीं आंधारेंसीं सगळी राती । निजतेजें निरसी गभस्ती ।
तेवीं सत्संगसूर्यप्राप्ती । अविद्येची निश्चितीं निरसी निशा ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे अंधारासहवर्तमान सगळी रात्र सूर्य आपल्या तेजाने नाहीशी करून टाकतो, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्य उगवला की, तो अविद्येची रात्र निश्चयाने नाहींशी करून टाकतो ३५.
बाह्य उगवल्या गभस्ती । चोरभयाची होत निवृत्तीं ।
तेवीं जोडल्या सत्संगती । भवभय कल्पांतीं असेना ॥ ३६ ॥
बाहेर सूर्योदय झाला की, चोराचे भय दूर होते, त्याप्रमाणे सत्संगति प्राप्त झाल्याने संसाराचे भय कल्पांतीही उरत नाही ३६.
बाह्य सूर्योदयकाळीं । पक्षी सांडिति आविसाळीं ।
सत्संगसूर्याचे मेळीं । देहाचीं आविसाळीं सांडिती जीव ॥ ३७ ॥
बाहेरचा सूर्योदय झाला म्हणजे पक्षी आपली घरटी सोडून देतात, त्याचप्रमाणे सत्संगाचा सूर्योदय झाला म्हणजे जीव आपली देहरूप घरटी सोडून देतात (देहाचा अभिमान सोडतात) ३७.
बाह्य सूर्याच्या किरणीं । हर्षें विकासे कमळिणी ।
सत्संगसूर्याचे मिळणीं । निर्विकल्प कमळणी विकासे ॥ ३८ ॥
बाहेरच्या सूर्यकिरणांनी कमलिनी हर्षानें विकसित होतात, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्याच्या प्रकाशाने निर्विकल्प कमलिनी प्रफुल्लित होते ३८.
सूर्य उगवलिया गगनीं । चक्रवाकें मिळती मिळणीं ।
तेवीं सत्संग पावोनि । जीव शिव दोनी एकवटती ॥ ३९ ॥
आकाशांत सूर्योदय झाला म्हणजे चक्रवाक पक्ष्यांच्या नरमादीची भेट होते, त्याप्रमाणे सत्संग प्राप्त झाला असतां जीव आणि शिव हे दोन्ही एक होतात ३९.
बाह्य सूर्याचे पहांटेसी । पांथिक चालती स्वग्रामासी ।
सत्संगसूर्याचे प्रकाशीं । मुमुक्षु निजधामासी पावती ॥ ४४० ॥
बाह्य सूर्याची पहाट झाली म्हणजे वाटसरू आपापल्या गांवचा मार्ग चालू लागतात, त्याप्रमाणे सत्संगसूर्याचा प्रकाश होतांच मुमुक्षु निजधामाला पावतात ४४०.
बाह्य सूर्याचे उदयस्थितीं । कर्माची चाले कर्मगती ।
सत्संगसूर्याचे संगतीं । निष्कर्मप्रवृत्ति प्रवर्ते ॥ ४१ ॥
बाह्य सूर्याचा उदय झाला म्हणजे कर्माची गति सुरू होते, त्याप्रमाणे सत्संगसूर्याच्या संगतीने निष्कर्मप्रवृत्ति सुरू होते ४१.
सूर्यबिंबाचे उदयसंधी । अर्घ्यदान दीजे वेदविदीं ।
सत्संगसूर्याचे संबंधीं । दीजे देहबुद्धी तिलांजळी ॥ ४२ ॥
सूर्यबिंबाच्या उदयाच्या संधीला वेदज्ञलोक अर्घ्यदान देतात, त्याप्रमाणे सत्संगसूर्याचा संबंध घडतांच मुमुक्षु देहबुद्धीला तिळांजळी देतात ४२.
सूर्यउदयचिया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती ।
तेवीं सत्संगसूर्यस्थिती । अहंता हविती ज्ञानाग्नीं ॥ ४३ ॥
सूर्योदय झाला म्हणजे याज्ञिक लोक होमात आहुति देतात, त्याप्रमाणे सत्संगरूप सूर्योदय झाला म्हणजे मुमुक्षु लोक ज्ञानाग्निमध्ये अहंतेची आहुति देतात ४३.
सूर्य उगवूनि आकाशीं । जगाची जड निद्रा निरसी ।
संत उगवूनि चिदाकाशीं । जीव चित्प्रकाशीं प्रबोधी ॥ ४४ ॥
सूर्य आकाशात उगवून जगाची जड झोंप दूर करतो; संत हे चिदाकाशामध्ये उदय पावून जीवांना चित्प्रकाशाने जागृत करतात ४४.
हो कां साधु सूर्यासमान । हें बोलणें निलाग हीन ।
सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥ ४५ ॥
याप्रमाणे साधु हे सूर्यासारखे आहेत म्हणावे, पण हे म्हणणेही निखालस गौण होय. कारण, सूर्य हा अस्ताला जात असतो, पण साधु हे सदासर्वदा प्रकाशमानच असतात ४५.
सूर्यासी आच्छादी आभाळ । साधु सदा निजनिर्मळ ।
सूर्यासी सदा भ्रमणकाळ । साधु अचंचळ भ्रमणरहित ॥ ४६ ॥
सूर्याला अभ्रे झांकू शकतात, पण साधु हे जगामध्ये सदासर्वदा निर्मळच असतात. सूर्याला सर्वकाळ फिरत रहावे लागते, पण साधु हे न फिरतां अढळ असेच असतात ४६.
ग्रहणकाळाचा लवलाहो । पावतां सूर्यातें ग्रासी राहो ।
साधु ग्रहांचा पुसोनि ठावो । स्वानंदें पहा हो नांदती ॥ ४७ ॥
ग्रहणाची वेळ आली असतां सूर्याला राहु ग्रासून टाकतो, पण साधु ग्रहांचा ठावठिकाण नाहींसा करून आत्मानंदांतच राहतात ४७.
दुई दाटतां प्रबळ । तेणें आच्छादे रविमंडळ ।
तम धूम मोहपडळ । साधूंसी अळुमाळ बाधीना ॥ ४८ ॥
दाट धुके पडले असतां रविमंडळ झांकून जाते; परंतु साधूंना अंधार, धुके किंवा मोहपटल यत्किंचितही बाधत नाही ४८.
सूर्य निजकिरणें सर्वांतें तावी । साधु निजांगें जग निववी ।
सूर्य सर्वांतें क्षयो दावी । साधु अक्षयी करी निजबोधें ॥ ४९ ॥
सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना ताप देतो पण साधु निजांगाने जगाला शांत करतात. सूर्य हा सर्वांना आयुष्यक्षय दाखवितो, पण साधु आत्मोपदेशाने सर्वाना अक्षय करून सोडतात ४९.
सूर्यो साह्य झालिया दृष्टीं । दृश्याकारें उघडे सृष्टी ।
सत्संग साह्य झालिया दृष्टीं । चिन्मात्रें सृष्टी ठसावे ॥ ४५० ॥
सूर्य दृष्टीला सहाय झाला असता दृश्याकाराने सृष्टि दिसू लागते; आणि सत्संग दृष्टीला सहाय झाला असतां चिन्मात्रस्वरूपाने सृष्टीची स्थिति ठसते ४५०.
विवेकें विचारितां देख । सूर्याहूनि साधु अधिक ।
साधु धरातळीं ज्ञानार्क । भवाब्धितारक निजसंगियां ॥ ५१ ॥
ह्याप्रमाणे विचार करून पाहिले असतां साधु हे सूर्याहून श्रेष्ठ आहेत. साधु हे पृथ्वीवरचे ज्ञानसूर्य असून आपल्या संगतीने संसारीजनांना संसारांतून तारणारे आहेत ५१.
पृथ्वीतळीं देवता साधु । साधु दीनांचे सखे बंधु ।
साधुरूपें मी परमानंदु । जाण प्रसिद्ध परमात्मा ॥ ५२॥
मृत्युलोकावर साधु हेच खरे देव आहेत; साधु हे दीनांचे मित्र व सखे बंधु आहेत. मी परमानंदस्वरूप प्रसिद्ध जो परमात्मा, तोच साधुरूपाने जगांत नांदत आहे ५२.
देवां दीजे बळिअवदान । तेव्हां देवा होती प्रसन्न ।
कृपातारक निजसज्जन । दयाळु पूर्ण दीनांचे ॥ ५३ ॥
देवांना बलिप्रदान द्यावे, तेव्हांच देव प्रसन्न होतात; परंतु सज्जन पूर्ण दीनदयाळू असल्यामुळे ते कृपेनेंच तारणारे आहेत ५३.
सुहृद सखे सगोत्र बंधु । द्रव्यलोभें भजनसंबंधु ।
निर्लोभें कृपाळू साधु । सखे बंधु दीनांचे ॥ ५४ ॥
इष्ट, मित्र, भाऊबंद, बंधु वगैरे केवळ द्रव्यलोभानेच आप्तांच्या भजनी लागणारे असतात; परंतु साधु हे निर्लोभी असून कृपाळू असल्याने दीनांचे खरे मित्र व बंधु आहेत ५४.
संत केवळ कृपेचे दीप । संत ते माझें निजस्वरूप ।
यालागीं सत्संगें फिटे पाप । होती निष्पाप साधक ॥ ५५ ॥
संत हे कृपेचे केवळ दीप आहेत; संत हे माझे निजस्वरूप आहे. म्हणूनच सत्संगाने पातक जाते आणि साधक निष्पाप होतात ५५.
निष्पाप करूनि साधकांसी । ब्रह्मस्वरूपता देती त्यांसी ।
ऐसें कृपाळुत्व साधूंपाशीं । जाण निश्चयेंसीं उद्धवा ॥ ५६ ॥
साधकांना निष्पाप करून त्यांना ब्रह्मस्वरूपाला ते पोंचवितात. उद्धवा ! साधूंपाशी खरोखरच इतका कृपाळूपणा असतो, हें तूं निश्चित जाण ५६.
मी निर्गुणत्वें ब्रह्म पूर्ण । साधु चालतेंबोलतें ब्रह्म जाण ।
साधूंसी रिघालिया शरण । तैं जन्ममरण असेना ॥ ५७ ॥
मी निर्गुणपणाने पूर्ण ब्रह्म आहे. आणि साधु हे चालते बोलते ब्रह्म आहेत. त्यांना शरण गेलें असतां जन्ममरण नाहीसे होते ५७.
साधूंसी सद्भावें शरण । रिघाल्या नुरे जन्ममरण ।
साधु शरणागतां शरण्य । सत्य जाण उद्धवा ॥ ५८ ॥
साधूंना भक्तिभावाने शरण गेले असतां जन्ममरणाचें नांवच रहात नाही. उद्धवा ! खरोखर साधु हे शरण जाणाराला आश्रयरूप आहेत ५८.
भावें धरिलिया सत्संगती । संसारिया होय निर्मुक्ती ।
हें प्रतिज्ञापूर्वक श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५९ ॥
भक्तिभावाने सत्संगति धरली, तर संसारी लोकांना मुक्ति मिळते, असें उद्ध्वाला श्रीकृष्णांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले ५९.
सद्भावेंसीं सत्संगती । धरितां घरा ये ब्रह्मस्थिती ।
हें निजवर्म उद्धवाप्रती । देवें अध्यायांतीं निरूपिलें ॥ ४६० ॥
सद्भावानें सत्संगति धरली असतां ब्रह्मस्थिति घरी चालत येते. हे निजवर्म देवांनी उद्धवाला अध्यायाच्या शेवटी सांगितले ४६०.
परम विरक्तीचें कारण । तें हें पुरूरवाप्रकरण ।
उपसंहार श्रीकृष्ण । अध्यायांतीं जाण संपवी ॥ ६१ ॥
परम विरक्तीचे कारण म्ह. साधन असे हे पुरूरव्याचे आख्यान सांगून श्रीकृष्ण अध्यायाचे शेवटी त्याचा उपसंहार करितात ६१.
वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनिःस्पृहः ।
मुक्तसङ्गो महीमेतामात्मारामश्चचार ह ॥ ३५ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमंहस्यां
संहितायामेकादशस्कन्धेषङ्विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
[श्लोक ३५] अशा रीतीने पुरूरव्याला आत्मसाक्षात्कार होताच त्याचे उर्वशीलोकाचे आकर्षण नाहीसे झाले त्याच्या सर्व आसक्ती नष्ट झाल्या आणि आत्म्यात रममाण होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला. (३५)
पूर्वीं सूर्यवंश प्रसिद्ध । तेथ सोमवंशाचा संबंध ।
‘वैतसेन’ श्लोकींचें पद । लावूनि गोविंद बोलिला ॥ ६२ ॥
पूर्वी सूर्यवंश प्रसिद्ध असून त्यांत आलेला सोमवंशाचा संबंध श्रीकृष्ण ‘वैतसेन’ असें पद श्लोकांत घालून सांगतात ६२.
उमावनीं अतिएकांत । तेथ उमा आणि उमाकांत ।
विगतवासेंसीं क्रीडत । स्वानंदयुक्त स्वलीला ॥ ६३ ॥
पार्वतीच्या क्रीडावनांत एकदा संपूर्णपणे एकांत असतां शंकर आणि पार्वती वस्त्ररहित होऊन आनंदयुक्त लीला करीत होती ६३.
तेथ शिवाचे दर्शनासी । अवचटें आले सप्तऋषी ।
लज्जा उपजली पार्वतीसी । तिणें त्या वनासी शापिलें ॥ ६४ ॥
तेथे शिवाच्या दर्शनासाठी अकस्मात् सप्तऋषि प्राप्त झाले. तेव्हां पार्वतीला फार लाज वाटली व तिने त्या वनाला शाप दिला ६४.
‘जो पुरुष या वनाआंत । येईल तो हो हो स्त्रीरूप एथ’ ।
ऐसा शाप क्रोधयुक्त । वदली निश्चित जगदंबा ॥ ६५ ॥
तो असा की, जो पुरुष ह्या वनाच्या आंत येईल तो येथे स्त्रीरूप होईल. असा जगदंबेनें रागारागाने त्या वनास शाप दिला ६५.
तेथ राजा ‘सुद्युम्न’ सूर्यवंशी । नेणॊनियां शापप्रभावासी ।
पारधी आला त्या वनासी । सकळ सेनेसीं सन्नद्ध ॥ ६६ ॥
तो एके दिवशी सूर्यवंशांतला राजा सुद्युम्न शापाचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे सर्व सेनेसहवर्तमान त्या वनांत शिकारीला आला ६६.
रिघतांचि त्या वनाआंत । पुरुषत्व पालटलें तेथ ।
बाप शापाचें सामर्थ्य । झाले समस्त स्त्रीरूप ॥ ६७ ॥
परंतु त्या वनांत जातांच त्याचे पुरुषत्व पालटले ! त्या शापाचे सामर्थ्य किती विलक्षण पहा ! ते सारेच स्त्रीरूप झाले ! ६७.
तेथ पुरुषत्वाची आठवण । निःशेष विसरलें मन ।
आपण पूर्वीं होतों कोण । हेंही संपूर्ण विसरले ॥ ६८ ॥
त्यांच्या मनाला पुरुषत्वाची आठवण मुळीच राहिली नाही. आपण पूर्वी कोण होतो हेही सारे विसरून गेले ६८.
अश्व झाले अश्विनी । हस्ती झाले हस्तिणी ।
पुरुषा झाले कामिनी । तत्क्षणीं त्या वनांव ॥ ६९ ॥
तत्क्षणी त्या वनांत घोडे होते त्यांच्या घोड्या झाल्या; हत्तींच्या हत्तिणी झाल्या; पुरुष होते ते स्त्रिया झाले ६९.
तेथ पुरुषकामें कामासक्ती । अनुकूल पुरुषांप्रती ।
स्त्रिया गेलिया त्या समस्ती । अतिकामरतीं संभोगा ॥ ४७० ॥
तेव्हां पुरुषाच्या इच्छेनें कामातुर होऊन त्या सर्व स्त्रिया (वनाबाहेर) पांगून गेल्या ४७०.
राजा सुद्युम्न झाला नारी । अतिसुकुमार सुंदरी ।
तो सोमपुत्र बुधातें वरी । अतिप्रीतीकरीं भाळोनि ॥ ७१ ॥
राजा सुद्युम्नही अत्यंत सुंदर सुकुमार अशी स्त्री झाला; आणि त्याने सोमाचा पुत्र जो वुध, त्याला भुलून मोठ्या प्रीतीनें माळ घातली ७१.
बुधें सुद्युम्न देखोनि नारी । तो भुलला स्त्रीकामेकरीं ।
एवं अतिप्रीतीं परस्परीं । येरयेरावरी भाळलीं ॥ ७२ ॥
बुधही सुद्युम्न स्त्री झालेला पाहून स्त्रीकामेच्छेने त्याला भुलला. अशा प्रकारे ती उभयतांही एकमेकांवर फारच लुब्ध झाली ७२.
बुध महाराजचूडामणी । तो सुद्युम्नातें स्त्रीत्वें पर्णी ।
केली पटाची निजराणी । बाप करणी कर्माची ॥ ७३ ॥
राजचूडामणि अशा बुधमहाराजाने सुद्युम्नरूपी स्त्रियेशी विवाह करून तिला आपली पट्टराणी केली ! कर्माची गति किती विचित्र आहे पहा ! ७३.
सुद्युम्नबुधवीर्येंकरीं । पुरूरवा जन्मे त्यांचे उदरीं ।
एवं सूर्यवंशामाझारीं । सोमवंश यापरी संचरला ॥ ७४ ॥
त्या सुद्युम्नरूपी स्त्रियेच्या पोटीं बुधाच्या वीर्यापासून पुरुरवा उत्पन्न झाला. अशा प्रकारें सूर्यवंशामध्ये सोमवंश घुसला ! ७४.
हे सोमवंशींची आद्यकथा । एथूनि सोमवंश वाढता ।
श्रीकृष्ण बोलिला ध्वनितार्था । तेचि म्यां कथा उपलविली ॥ ७५ ॥
ही सोमवंशांतील मूळची कथा आहे. येथूनच सोमवंश वाढला. तें श्रीकृष्णांनी फार थोडक्यात सांगितले होते, तीच कथा (नाथ म्हणतात ) मी थोडीशी विस्ताराने सांगितली ७५.
सुद्युम्न झाला बुधाची नारी । मागें सूर्यवंशामाझारीं ।
नाहीं राज्यासी अधिकारी । संकट भारी वोढवलें ॥ ७६ ॥
सुद्युम्म हा बुधाची स्त्री झाला, तेव्हां त्याच्या पश्चात राज्याला कोणी अधिकारी राहिला नाही, आणि मोठे संकट ओढवले ७६.
ते सूर्यवंशींचा कुळगुरु । वसिष्ठ महायोगीश्वरु ।
तेणें करूनि अत्यादरु । गौरी-हरु प्रार्थिलीं ॥ ७७ ॥
तेव्हां महायोगीश्वर वसिष्ठ हा सूर्यवंशाचा कुलगुरु. त्याने मोठ्या भक्तिभावाने गौरीहरांची प्रार्थना केली ७७.
प्रसन्न करूनि पार्वतीसी । मागे सुद्युम्नाच्या उच्छापासी ।
येरी सांगे महादेवासी । तुम्हीं वसिष्ठासीं बुझवावें ॥ ७८ ॥
पार्वतीला प्रसन्न करून घेऊन सुद्युम्नाला उःशाप मागितला. तेव्हा तिने शंकरांनाच सांगितले, की तुम्ही वसिष्ठाची समजूत करा ७८.
जें भवानीचें शापवचन । कदा अन्यथा नव्हे जाण ।
धरावया वसिष्ठाचें मन । नवलविंदान शिवें केलें ॥ ७९ ॥
त्यांना सांगा की, पार्वतीचें शापवचन कधीच खोटें होणार नाही. तेव्हां वसिष्ठाची समजूत करण्याकरितां शंकरांनी एक तिसराच चमत्कार केला ७९.
शुक्ल पक्षीं सुद्युम्नासी । पुरुषत्व प्राप्त होईल त्यासी ।
कृष्णपक्षीं बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं वर्तेल ॥ ४८० ॥
त्यांनी सांगितले की, शुक्लपक्षी सुद्युम्नाला पुरुषत्व प्राप्त होत जाईल, आणि कृष्णपक्षी तो स्त्री होऊन बुधापाशी विलास करील ४८०.
पक्षें पुरुष पक्षें नारी । ऐशिया उच्छापाची परी ।
शिवें करूनि कृपेकरीं । केला अधिकारी निजराज्या ॥ ८१ ॥
एक पंधरवडा पुरुष आणि एक पंधरवडा स्त्री, असा उःशापाचा पर्याय करून शिवांनी त्याच्यावर कृपा केली, आणि त्याच्या राज्याचा तो अधिकारी केला ८१.
पुरुषत्व पावल्या सुद्युम्नासी । तें पुरुषत्व नावडे त्यासी ।
स्त्रीसंभोगें बुधापाशीं । अतिप्रीतीसीं लोधला ॥ ८२ ॥
ह्याप्रमाणे सुद्युम्नाला पुरुषत्व प्राप्त झाले खरे; पण तें पुरुषत्व कांहीं त्याला आवडेना. त्याची स्त्रीसंभोगानें बुधापाशीच प्रीति जडून राहिली होती ८२.
स्वर्गअप्सरा आलिया पाशीं । त्याही नावडती सुद्युम्नासी ।
त्याहूनि प्रीति बुधापाशीं । स्त्रीभावेंसीं अनिवार ॥ ८३ ॥
स्वगातील अप्सरा जरी त्याच्यापाशी आल्या, तरी त्या सुद्युम्नाला आवडेनात; त्याच्यापेक्षा स्त्रीच्या नात्याने त्याची बुधावरच पराकाष्ठेची प्रीति जडली ८३.
बुधासीही स्वर्गांगना । संभोगीं न येती मना ।
ऐसी अतिप्रीति सुद्युम्न । स्त्रीभोगें जाण विगुंतली ॥ ८४ ॥
बुधालासुद्धा देवांगनाही उपभोगाला आवडत नाहीशा झाल्या; अशी त्याची सुषुम्नावर प्रीति जडली; इतके तिच्या स्त्रीत्वाने त्याला मोहित केले होते ८४.
पुरुषीं पुरुषत्वाची रती । भोगूं जाणें मी श्रीपती ।
इतर बापुडीं तीं किती । स्त्रीदेहासक्तीं भुललीं ॥ ८५ ॥
पुरुषाने पुरुषत्वाशींच रममाण होणेंचे वर्म, एक मला श्रीकृष्णालाच माहीत आहे. इतर पामरे बिचारी स्त्रीदेहावरच आसक्त होऊन भुलून पडतात ! ८५.
स्त्रीदेहीं जो आत्मा असे । तो भोगिजे म्यां हृषीकेशें ।
इतरांसी स्त्रीदेहींचें पिसें । विषयावेशें भुलोनी ॥ ८६ ॥
स्त्रीदेहांत जो आत्मा असतो, त्याचा भोग मी श्रीकृष्णच घेऊ शकतों; इतरांना विषयाच्या इच्छेने स्त्रीदेहाचेच वेड असते ! ८६.
असो हें सांगावें किती । कामीं निष्कामतेची रती ।
ते मी जाणें रमापती । कां जाणती निजानुभवी ॥ ८७ ॥
असो; हे किती सांगावें ? कामामध्येच निष्कामाने कसे रमावें तें एक मी रमापतिच जाणतों; किंवा जे निजानुभवी असतील ते जाणतील ८७.
पुरुत्वापरीस कामरती । स्त्रीदेहीं अतिआसक्तीं ।
त्या स्त्रीकामाची निवृत्ती । जाण निश्चितें सत्संगें ॥ ८८ ॥
पुरुषत्वापेक्षां कामरतिविषयांत स्त्रीदेहामध्येच अत्यंत आसक्ति असते. त्या स्त्रीविषयाची निवृत्ति एका सत्संगानेच होते. ८८.
वसिष्ठाचिये सत्संगतीं । झाली स्त्रीभावाची निवृत्ती ।
सुद्युम्न पावला पुरुषत्वप्राप्ती । धन्य त्रिजगतीं सत्संग ॥ ८९ ॥
वसिष्ठाच्या सत्संगतीने स्त्रीभावाची निवृत्ति झाली, आणि सुद्युम्नाला पुरुषत्व प्राप्त झाले. यावरून सत्संग हा त्रिभुवनांत धन्य होय ८९.
पुरुषत्व पावोनि सुद्युम्न । निजनगरा येतां जाण ।
स्त्रीभावें नष्टलें सैन्य । एकला आपण स्वयें आला ॥ ४९० ॥
सुद्युम्नाला पुरुषत्व येतांच तो आपल्या नगराला आला, परंतु सैन्य सारें स्त्रीरूप झाल्याने ते नष्ट होऊन गेले होते; म्हणून तो एकटाच नगरांत आला ४९०.
एवं निःशेष विगतसैन्य । यालागीं नांवें ‘वीतसेन’ ।
त्या वीतसेनाचा पुत्र जाण । ‘वैतसेन’ पुरूरवा ॥ ९१ ॥
अशा प्रकारे त्याचे सगळे सैन्य विगत झाल्यामुळे त्याला ‘वीतसेन’ असे नाव पडले. वीतसेनाचा जो पुत्र तो ‘वैतसेन’ म्हणजे पुरुरवा होय ९१.
तेणें निजात्मता अतिविरक्ती । सांडूनि स्वर्गभोगसंपत्ती ।
त्यजूनि उर्वशीकामासक्ती । आत्मारामस्थिती पावला ॥ ९२ ॥
त्याने आत्मस्वरूप ओळखून अत्यंत विरक्तीनें स्वर्गातील भोगसंपत्ति सारी सोडून देऊन, उर्वशीवरील कामासक्ति झुगारून तो आत्मस्वरूपामध्येच रममाण झाला ९२.
आत्माराम निजस्थिती । मिथ्या देहसंग सांगाती ।
निजात्मबोधें त्रिजगतीं स्वानंदें नृपति विचरत ॥ ९३ ॥
अशा प्रकारें आत्मस्वरूपात स्थिर राहून देहसंग व इतर संगति मिथ्या मानून तो राजा त्रिभुवनामध्ये स्वानंदाने संचार करीत होता ९३.
जेथें जेथें पाउल उठी । तेथें तेथें होती सुखाच्या कोटी ।
स्वानंदें कोंदली सृष्टी । ब्रह्मदृष्टीं विचरतु ॥ ९४ ॥
त्यामुळे जेथे जेथें तो पाऊल टाकी, तेथे तेथे सुखाच्या कोटीच उत्पन्न होत. कारण आत्मानंदानेच सारी सृष्टि त्याला भरून गेलेली दिसे. असा तो ब्रह्ममय दृष्टीनेंच फिरत असे ९४.
ब्रह्मीं विचरतां ब्रह्मपणें । ब्रह्मरूप झालें जिणें ।
विसरला जिणेंमरणें । पूर्णीं पूर्णपणें परिपूर्ण ॥ ९५ ॥
ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मामध्ये संचार करीत असता त्याचे जीवनच ब्रह्मरूप झाले. तो जन्ममरण विसरून जाऊन पूर्णपणाने पूर्णामध्ये पूर्णस्वरूपच होऊन राहिला ९५.
हें उर्वशी-पुरूरवोपाख्यान । जो स्वयें ऐके सावधान ।
तैं दोष जाती अगम्यागमन । विरक्ती संपूर्ण साधकां ॥ ९६ ॥
हें उर्वशीपुरूरव्याचे आख्यान जो लक्ष देऊन श्रवण करील, त्याचे अगम्यागमनादि दोष नाश पावतील आणि साधकांना पूर्ण विरक्ति प्राप्त होईल ९६.
यापरी वैराग्ययुक्तीं । राजा पावला ब्रह्म प्राप्ती ।
वैराग्य उपजे सत्संगतीं । सत्संगें विरक्ती मद्भजनें ॥ ९७ ॥
याप्रमाणे वैराग्ययुक्तीने तो राजा ब्रह्मपदाला पोचला. वैराग्य हे सत्संगतीने उत्पन्न होते ; आणि माझ्या भजनाने सत्संग व विरक्ति ही दोन्ही प्राप्त होतात ९७.
‘सद्भावें करितां माझी भक्ती । साधकां उपजे विरक्ती’ ।
ऐसें बोलिला श्रीपती । तें उद्धवें चित्तीं दृढ धरिलें ॥ ९८ ॥
सद्भावाने माझी भक्ति केली असतां साधकांना विरक्ति उत्पन्न होते, असें श्रीकृष्णांनी सांगितले, ते उद्धवाने नीट मनांत धरले ९८.
ते भजनक्रियेचा प्रश्न । पुढिले अध्यायीं जाण ।
उद्धव पुसेल आपण । जेणें श्रीकृष्ण संतोषे ॥ ९९ ॥
आता त्या भजनक्रियेसंबंधींचा प्रश्न पुढच्या अध्यायांत उद्धव विचारील आणि त्यापासून श्रीकृष्णाला संतोष होईल ९९.
उद्धव पुसेल गोड गोठी । जेणें श्रीकृष्ण सुखावें पोटीं ।
तेणें स्वानंदें निजपुष्टी । भजनहातवटी सांगेल ॥ ५०० ॥
उद्धव मोठ्या गोड गोष्टी विचारील, आणि त्यामुळे श्रीकृष्णाच्या मनाला आनंद होईल. त्याच आनंदाच्या भरांत भजनाचा मार्ग ते सांगतील ५००.
उपासनाकांडरहस्य पूर्ण । मुख्य क्रियायोगनिरूपण ।
समूळ आगमलक्षण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ १ ॥
उपासनाकांडाचे पूर्ण रहस्य, मुख्यत्वेकरून क्रियायोगाचे निरूपण व आगमाचे सारे लक्षण आपल्या मुखाने श्रीकृष्ण सांगतील १.
ते कथेसी अवधान । श्रोतां द्यावें सावधान ।
एका तुष्टला जनार्दन । स्वानंदघन निजबोधें ॥ ५०२ ॥
त्या कथेकडे श्रोत्यांनी नीट लक्ष द्यावे. आत्मानंदाचे केवळ मेघ असे जे गुरु जनार्दन त्यांनी ज्ञानबोधाने एकनाथाला तृप्त केलें २.
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
एकाकारटीकायां ऐलगीतोपाख्यानं नाम षड्विंशोध्यायः ॥ २६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ३५ ॥ ओव्या ॥ ५०२ ॥
याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांतील एकादशस्कंधामधील श्रीकृष्णउद्धवसंवादाचा एकनाथकृत टीकेचा ‘ऐलगीतोपाख्यान’ नावाचा सव्वीसावा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. सव्वीसावा अध्याय समाप्त.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: satsangdhara