sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 15

एकनाथी भागवत अध्याय 15

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो श्रीजनार्दन । सकळ सिद्धींचें सिद्धस्थान ।
सकळ ऋद्धींचें परम निधान । तुझे श्रीचरण सर्वार्थी ॥१॥
ॐकाररूप श्रीजनार्दनाला नमस्कार असो. तुझे पवित्र चरण र्व सिद्धीचे मूलस्थान आहेत, सर्व निधीतील श्रेष्ठ निधान आहेत आणि चारही पुरुषार्थ देणारे आहेत १.

निधान साधावया अंजन । नयनीं काळिमा घालिती जन ।
तेणें काळवंडले नयन । थितें निधान दिसेना ॥२॥
जमिनींतला ठेवा सांपडण्याकरितां अंजन म्हणून लोक डोळ्यांत काजळ घालतात, पण त्यामुळे डोळेच काळवंडून जाऊन असलेला ठेवाही दिसत नाही २.

तैसे नव्हती तुझे चरण । करितां चरणरजवंदन ।
निःशेष काळिमा निरसे जाण । पूर्ण निधान दाविसी ॥३॥
तसे तुझे चरण नव्हत. तुझ्या चरणाच्या धुळीचे वंदन केले असतां सर्व काळिमा पूर्णपणे निघून जातो, आणि तूं परिपूर्ण ठेवा दाखवून देतोस ३.

अंजनें साधितां निधान । तेथ छळावया पावे विघ्न ।
बळी देऊनि साधिल्या जाण । नश्वरपण तयासी ॥४॥
अंजन घालून ठेवा काढावयास लागले असतां तेथें छळावयास ‘विघ्न येते. त्याला बळी देऊन तो ठेवा साध्य केला तरीही तो अशाश्वतच ! ४.

तैसे नव्हती तुझे चरणा । अवलीळा करितां स्मरण ।
नित्य सिद्ध अव्यय जाण । निजनिधान ठसावे ॥५॥
तसे काहीं तुझे चरण नव्हत. त्यांचे सहजगत्या जरी स्मरण केले, तरी नित्य, सिद्ध, अव्यय असा जो आत्मस्वरूपठेवा तोच हाती लागतो ५.

हें साधूनियां निधान । झाले सनकादिक संपन्न ।
नारदाचें उदारपण । येणेंचि जाण वाखाणे ॥६॥
हाच ठेवा साध्य करून सनकादिक भाग्यवान् झाले. नारदाचे औदार्यही ह्यामुळेच वाखाणले जातें ६.

वज्रकवच प्रल्हादासी । हेंचि भांडवल गांठी त्यासी ।
शुकादि वामदेवांसी । महिमा येणेंसीं पावले ते ॥७॥
प्रल्हादाला संरक्षण करणारें वज्रकवच लाभले, त्याचे कारण हेच भांडवल त्याच्या गांठीला होते. शुक-वामदेवादिक यामुळेच महत्व पावले आहेत ७.

व्यासवाल्मीकि महावेव्हारे । येणेंचि भांडवलें झाले खरे ।
त्यांचेनि भांडवलें लहान थोरें । छेदूनि दरिद्रें नांदती ॥८॥
व्यासवाल्मीकींनी जो एवढा मोठा हरिभक्तीचा व्यवहार केला, त्याचे कारण ते याच भांडवलावर बलिष्ट झाले होते आणि त्यामुळेच त्यांची पत वाढली. आणि त्यांनीच निर्माण केलेल्या पुराणादि भांडवलावर लहान थोर लोक दरिद्रे नाहीशी करून खुशाल नांदत आहेत ८.

त्या सद्‍गुरूचे श्रीचरण । परम निधींचें निधान ।
एका जनार्दना शरण । हें आम्हां परिपूर्ण भांडवल ॥९॥
त्या सद्गुरूचे पवित्र चरण म्हणजे श्रेष्ठ निधींचेही निधान होय. एका हा जनार्दनालाच शरण आहे, हेच आम्हाला परिपूर्ण भांडवल आहे ९.

येणेंचि भांडवलें प्रस्तुत । प्राप्त झालें श्रीभागवत ।
तेथ उद्धवासी श्रीअनंत । ज्ञानमथितार्थ सांगत ॥१०॥
त्याच भांडवलाने सांप्रत श्रीभागवत प्राप्त झाले. त्यांतच श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञानाचे रहस्य सांगत आहे १०

त्या दोघांची एकान्त मातु । प्रकट जाहली जगाआंतू ।
हा परीक्षितीचा विख्यातू । उपकार लोकांतू थोर झाला ॥११॥
त्या दोघांची ही गोष्ट खरोखर एकांतांतील होती; पण ती जगामध्ये प्रसिद्ध झाली. हा परीक्षिती राजाचा लोकांवर फारच मोठा उपकार होऊन राहिला आहे ११ .

ज्याचे श्रद्धेच्या आवडीं । शुक पावला लवडसवडी ।
तेणें गुह्य ज्ञानाची गोडी । प्रकट उघडी दाखविली ॥१२॥
त्याच्या श्रद्धेच्या आवडीने श्रीशुक त्वरेनें आला , आणि त्याने ही गुह्मज्ञानाची गोडी उघड करून दाखविली ! १२.

त्या शुकाचें नवल महिमान । कानीं न सांगतां गुह्य ज्ञान ।
श्रवणें तोडोनि भवबंधन । परीक्षिती जाण उद्धरिला ॥१३॥
त्या शुकाचा महिमा आश्चर्यकारक आहे. हे गुह्मज्ञान केवळ कानांत न सांगतां श्रवणानेच संसारबंधन तोड्न टाकून त्याने परीक्षितीचा उद्धार केला ! १३.

एथवरी श्रवणाची गोडी । प्रसिद्ध दाविली उघडी ।
तरी अभाग्यु दांतखिळी पाडी । कानाची नुघडी निमटली मिठी ॥१४॥
इतकी श्रवणाची गोडी अगदी उघड उघड दाखविली, तरी कपाळकरंट्याची दांतखिळी उघडत नाही, किंवा कानांत भरलेले गोळे काढीतच नाही १४.

श्रवणीं घालितां वाडेंकोडें । कथासारामृत बाहेरी सांडे ।
श्रवणाआंतौता थेंबही न पडे । यालागीं रडे विषयांसी ॥१५॥
बरें, मोठ्या आवडीनें भगवत्कथा त्याच्या कानांवर घातलीच, तर त्या कथेतील सारभूत भाग बाहेरच सांडतो, कानांत त्याचा एक थेंबही जात नाही. म्हणून विषयासाठी रडत बसतो १५.

असो हे श्रोत्यांची कथा । कथा सांगे जो वक्ता ।
तोही तैसाचि रिता । घोटु आंतौता पावों नेदी ॥१६॥
असो. ही तर श्रोत्याची गोष्ट झाली. परंतु कथा सांगणारा जो वक्ता असतो, तोही तसाच रिकामा असतो. तो आपल्या अंत:करणांत एक घुटकाही जाऊं देत नाही १६.

जैसा गुळ‍उंसाचा घाणा । रसु बाहेरी जाये मांदणा ।
फिकेपणें करकरी गहना । ते गती वदना वक्त्याचे ॥१७॥
ज्याप्रमाणे उसाचा घाणा असतो तो उसाचा रस काढीत असतो, पण तो सर्व रस बाहेर मांदणांत जात असतो. हा रिकामाच मोठमोठ्याने करकर करीत असतो. तीच गत त्या वक्त्याच्या तोंडाची होते १७.

जें कथामृताचें गोडपण । तें सद्‍गुरूवीण चाखवी कोण ।
यालागीं जनार्दना शरण । जेणें गोडपण चाखविलें ॥१८॥
कथामृताची जी खरी खरी गोडी आहे, ती सद्‌गुरूशिवाय कोण चाखविणार ? म्हणूनच ज्याने हे गोडपण चाखविले, त्या जनार्दनाला शरण आलो आहे १८.

परी चाखविली उणखूण । तेही अभिनव आहे जाण ।
स्वाद स्वादिता आपण । होऊनि गोडपण चाखवी ॥१९॥
परंतु ही जी गोडी चाखविली, तिचे स्वरूप मोठेच विचित्र आहे. कारण ती गोडी चाखतांना सद्‌गुरु स्वत:च गोडपण बनून मग ते चाखवितो ! १९.

बाळकाहातीं दिधल्या फळा । खावें हें न कळे त्या अबळा ।
त्याचे मुखीं घालूनि गळाळा । गोडीचा जिव्हाळा जनक दावी ॥२०॥
मुलाच्या हातांत फळ दिले असतां तें खावें कसें हे त्या अर्भकाला कळत नाही. म्हणून बाप तें फळ आपण खाऊन त्याचा रस त्याच्या तोंडात घालून त्याची गोडी त्याला दाखवून देतो २०.

गोडी लागल्या बाळकासी । तेंचि फळ खाय अहर्निशीं ।
तेवीं जनार्दनें आम्हांसी । गोडी श्रीभागवतासी लाविली ॥२१॥
ती गोडी एकदा त्या मुलाला लागली असतां तें तेंच फळ रात्रंदिवस चोखीत बसते. त्याप्रमाणे आम्हांलाही जनार्दनाने श्रीभागवताची गोडी लावून दिली २१.

ऐसी लाविली गोडी चढोवडी । तेणें झाली नवलपरवडी ।
मज सांडितांही ते गोडी । गोडी न सोडी मजलागीं ॥२२॥
ती गोडी एवढी अधिकाधिक लावून दिली आहे की, त्यामुळे एक विशेषच मौज होते. ती ही की, मी त्या गोडीला सोडले तरी ती गोडी मला सोडीत नाहीं ! २२.

ते गोडीनें गिळिलें मातें । मीपण गेलें गोडीआंतौतें ।
ते गोडीचें उथळलें भरितें । सबाह्य रितें उरों नेदी ॥२३॥
त्या गोडीने मला गिळूनच टाकलें आहे ! त्यामुळे माझें मीपण त्या गोडींतच समाविष्ट झालें ! त्या गोडीला इतकें भरते भरले आहे की, त्याने माझ्या आंत व बाहेर कोठेही रिकामी जागा म्हणून ठेवलीच नाही २३.

हें शुकमुखींचें श्रेष्ठ फळ । गोडपणें अतिरसाळ ।
त्वचाआंठोळीवीण केवळ । गोडीच सकळ फळरूपें ॥२४॥
हें शुकाच्या मुखांतील श्रेष्ठ फळ आहे. ते गोडपणाने अतिशय रसाळ झालेले आहे. वर असणारी साल आणि आंतील बी यांखेरीज फळरूपाने ती सर्व गोडीच एकत्र साठलेली आहे २४.

ते श्रीभागवतींची गोडी । श्रीकृष्णें निजआवडीं ।
उद्धवासी कडोविकडी । भक्ति चोखडी चाखविली ॥२५॥
त्या श्रीभागवताची गोडी म्हणजेच भक्ति, ही श्रीकृष्णांनी आपल्या आवडीने उद्धवाकडून लौकर लौकर चाखविली २५.

करितां माझें भजन । धरितां माझे मूर्तीचे ध्यान ।
समाधिपर्यंत साधन । उद्धवासी संपूर्ण सांगीतलें ॥२६॥
आपलें भजन करतांना, आपल्या मूर्तीचें ध्यान धरतांना, समाधीपर्यंत असलेले सर्व साधन कृष्णाने उद्धवाला सांगितले २६.

ते कृष्णामुखींची मातू । ऐकोनि चौदाव्या अध्यायांतू ।
उद्धव हरिखला अद्‍भुतू । माझा निजस्वार्थू फावला ॥२७॥
ते श्रीकृष्णाच्या मुखांतील शब्द चवदाव्या अध्यायांत श्रवण करून उद्धवाला काही विलक्षण आनंद झाला आणि माझा स्वार्थ माझ्या हाती आला असें त्याला वाटले २७.

मज कृष्णमूर्तीचें ध्यान । सहजें सदा असे जाण ।
तेणेंच होय समाधि समाधान । तरी कां प्रश्न करूं आतां ॥२८॥
मला सदासर्वकाल सहज श्रीकृष्णमूर्तीचे ध्यान लागून राहिले आहे. तेणेकरूनच समाधीचे समाधान होते. मग आतां पुढे प्रश्न कसला करूं ? २८.

ऐकोनि चौदावा अध्यायो । झाला उद्धवासी हा दृढ भावो ।
हें देखोनि स्वयें देवो । पुढील अभिप्रावो सूचितू ॥२९॥
चवदावा अध्याय ऐकून उद्धवाच्या मनाचा हाच ग्रह द्दढ झाला. हे पाहुन देवांनी स्वतः पुढील भावार्थ सुचविला २९.

दृढ विश्वसेंसीं जाण । करितां माझें भजन ध्यान ।
पुढां उपजे सिद्धींचें विघ्न । ते अर्थीं श्रीकृष्ण उपदेशी ॥३०॥
दृढतर विश्वासाने माझे भजन व ध्यान करूं लागले असतां पुढे सिद्धीचे विघ्न उत्पन्न होते. त्याविषयीं श्रीकृष्ण उपदेश करतात ३०.

पंधरावे अध्यायीं निरूपण । भक्तीं माझें करितां भजन ।
अवश्य सिद्धि उपजती जाण । त्या त्यागवी विघ्न म्हणोनी ॥३१॥
पंधराव्या अध्यायामध्ये असे निरूपण आहे की, भक्तांनी माझे भजन केले असतां सिद्धि या हटकून उत्पन्न होतात. पण त्या विघ्नकारक होतात म्हणून त्यांचा त्याग करावयाला सांगतात ३१.

श्रीभगवानुवाच –
जितेन्द्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः ।
मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः ॥ १ ॥
[श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणातात – योगी जेव्हा इंद्रिये, प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझे ठिकाणी एकाग्र करतो, तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहातात. (१)

प्राणापानजयो जयापासीं । इंद्रियजयो असे ज्यासी ।
यावरी उल्हास मद्‍भक्तीसी । चित्त अहर्निशीं मद्युक्त ॥३२॥
ज्याला प्राणापानजय साधला, ज्याला इंद्रियांचा निग्रह झाला, आणखी माझ्या भक्तीविषयीं उल्हास उत्पन्न होऊन रात्रंदिवस चित्त माझ्याच ठिकाणी लागले ३२,

उद्धवा गा त्याच्या ठायीं । अनिवार सिद्धि उपजती पाहीं ।
ये अर्थी संदेह नाहीं । जे जे समयीं जें इच्छी ॥३३॥
उद्धवा ! त्याच्या ठिकाणी अनिवार सिद्धि उत्पन्न होतात, आणि तो ज्या ज्या वेळी जी जी इच्छा करतो, ती ती त्याची इच्छा पूर्ण होते, यांत संशय नाहीं ३३.

ऐसें उद्धवें ऐकतां । चमत्कारू झाला चित्ता ।
समूळ सिद्धींची कथा । श्रीकृष्णनाथा पुसों पा ॥३४॥
हें उद्धवाने श्रवण करतांच त्याच्या मनाला मोठा चमत्कार वाटला आणि तो मनांत म्हणाला, त्या सिद्धींची सावंत कथाच श्रीकृष्णाला आतां विचारावी ३४.

श्रीउद्धव उवाच –
कया धारणया का स्वित् कथंस्वित् सिद्धिरच्युत ।
कति वा सिद्धयो ब्रूहि योगिनां सिद्धिदो भवान् ॥ २ ॥
[श्लोक २] उद्धव म्हणाला – हे अच्युता ! आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्यांची संख्या किती आहे, हे मला सांगा. (२)

कोण्या धारणा कोण सिद्धि । ते सांगावी विधानविधी ।
संख्या किती सकळ सिद्धि । तेंही कृपानिधी सांगिजे ॥३५॥
कोणती धारणा धरली असता कोणती सिद्धि प्राप्त होते ? ती सर्व विधानविधीसह सांगावी. है कृपानिधे ! त्या सिद्धींची संख्या किती तेही निवेदन करावें ३५.

या सकळ सिद्धींची कथा । तूं एक जाणता तत्त्वतां ।
ते मज सांगिजे जी अच्युता । तूं सिद्धिदाता योगियां ॥३६॥
कारण हे अच्युता ! या सर्व सिद्धींची कथा जाणणारा खरोखर एक तूंच आहेस, आणि योग्यांना सिद्धि देणारा आहेस. म्हणून ते मला सांगावें ३६.

श्रीभगवानुवाच –
सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः ।
तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥ ३ ॥
[श्लोक ३] श्रीकृष्ण म्हणाले – उद्धवा ! धारणा योगातील निष्णात योग्यांनी अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्यांपैकी आठ सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात उरलेल्या दहा सत्त्वगुणाचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात. (३)

सिद्धि अष्टादश जाण । त्यांची धारणा भिन्न भिन्न ।
ऐंसे बोलिले योगज्ञ । योगसंपन्न महासिद्ध ॥३७॥
तेव्हां योगवेत्ते, योगसंपन्न व महासिद्ध श्रीकृष्ण असे म्हणाले की-सिद्धि या अठरा असून त्यांच्या धारणाही भिन्न भिन्न आहेत ३७.

या नांव गा सिद्धि समस्ता । यांत अष्ट महासिद्धि विख्याता ।
त्या माझे स्वरूपीं स्वरूपस्थिता । आणिकासी तत्त्वतां त्या नाहीं ॥३८॥
या सर्वांना सिद्धि असेंच म्हणतात. त्यांत अत्यंत श्रेष्ठ अशा आठ असून त्या सुप्रसिद्ध आहेत. माझ्या स्वरूपामध्ये जो कोणी स्थिर होईल, त्यालाच त्या प्राप्त होतात. इतरांना कधीही खरोखर प्राप्त होत नाहींत ३८.

मनसा वाचा कर्मणा जाण । विसरोनि देहाचें देहपण ।
माझेनि स्वरूपें अतिसंपन्न । चैतन्यघन जो झाला ॥३९॥
मनाने, वाणीने किंवा कर्मानेही जो देहाचे देहपण विसरून आणि माझ्याच स्वरूपाने युक्त होऊन ज्ञानस्वरूप होतो ३९,

त्यापाशीं या सिद्धि जाण । उभ्या असती हात जोडून ।
परी तो न पाहे थुंकोन । निचाड जाण यापरी ॥४०॥
त्याच्याचपाशी या सिद्धि हात जोडून उभ्या असतात. पण तो त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पहात नाही. इतका तो निस्पृह असतो ४०.

इतर दहा सिद्धींची कथा । ज्या सत्त्वगुणें गुणभूता ।
साधक शुद्धसत्त्वात्मा होतां । त्यापाशीं सर्वथा प्रकटती ॥४१॥
आतां बाकीच्या दहा सिद्धींची गोष्ट विचारशील तर, त्या सत्वगुणाने युक्त असल्यामुळे साधक शुद्धसत्वगुणसंपन्न होतांच त्याच्यापाशी त्या अवश्य प्रकट होतात ४१.

अष्ट महासिद्धींची कथा । तुज मी सांगेन तत्त्वतां ।
ज्या माझे स्वरूपीं स्वभावतां । असती वर्तता अहर्निशीं ॥४२॥
ज्या साहजिकपणेच माझ्या स्वरूपामध्ये रात्रंदिवस वावरत असतात, त्या आठ महासिद्धींची कथा आतां मी तुला सांगेन ४२.

अणिमा महिमा मूर्तेर्लघिमा प्राप्तिरिन्द्रियैः ।
प्राकाम्यं श्रुतदृष्टेषु शक्तिप्रेरणमीशिता ॥ ४ ॥
गुणेष्वसङ्गो वशिता यत्कामस्तदवस्यति ।
एता मे सिद्धयः सौम्य अष्टावौत्पत्तिका मताः ॥ ५ ॥
[श्लोक ४/५] त्यांपैकी ‘अणिमा’ ‘महिमा, आणि ‘लघिमा’ या तीन सिद्धी शरीराशी संबंधित आहेत ‘प्राप्ती’ नावाची इंद्रियांची सिद्धी आहे लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी ‘प्राकाम्य’ नावाची सिद्धी आहे माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालविणे या सिद्धीला ‘ईशिता’ असे म्हणतात. विषयांमध्ये राहूनसुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला ‘वशिता’ म्हणतात आणि ज्याची ज्याची इच्छा करावी, ती पूर्णपणे मिळवणे, ती ‘कामावसायिता’ नावाची आठवी सिद्धी होय या आठ सिद्धी माझ्या ठायी स्वभावतःच आहेत. (४-५)

अणिमा महिमा लघिमास्थिती । या तिन्ही देहसिद्धीचे प्राप्ती ।
प्राप्तरिंद्रियैः जे वंदती । ते जाण चौथी महासिद्धी ॥४३॥
अणिमा, महिमा आणि लघिमा ह्या तिन्ही सिद्धि देहसिद्धीच्या योगानें प्राप्त होतात. इंद्रियांसह त्या त्या विषयाची ‘प्राप्ति’ म्हणून जिला म्हणतात, ती चौथी महासिद्धि होय ४३.

प्राकाम्य श्रुतद्दष्टता । ते पांचवी सिद्धि गा सर्वथा ।
शक्तिप्रेरण ईशिता । हे जाण तत्त्वतां सहावी सिद्धि ॥४४॥
परलोकांतील अदृश्य विषयांचेही ज्ञान होणे ती प्राकाश्य श्रुतदृष्टता नामक पांचवी महासिद्धि होय. आणि शक्तीची प्रेरणा करणारी जी असंग ईशिता तीच खरोखर सहावी महासिद्धि होय ४४.

माझे धर्म जेथ वश होती । ते वशिता बोलिजे सिद्धांतीं ।
ते सातवी सिद्धि वदंती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४५॥
जिच्यामध्ये माझेच धर्म प्राप्त होतात, तिला सिद्धांती लोकांनी ‘वशिता’ असे नाव दिले आहे. उद्धवा ! तिला खरोखर सातवी सिद्धि म्हणतात ४५.

त्रिलोकीं भोग जो निरुपम । तो न करितां परिश्रम ।
इच्छामात्रें उत्तमोत्तम । भोग सुगम हों लागे ॥४६॥
त्रैलोक्यामध्ये जो कांहीं अनुपमेय म्हणून भोग असतो, तो अत्यंत उत्तम भोग परिश्रम न करताही इच्छामात्रेकरून अगदी सुगम होतो ४६.

(‘यत्कामस्तदवस्यति’) इच्छील्या कामसुखाची प्राप्ति । त्रिभुवनींची भोगसंपत्ती ।
एकेच काळें अवचितीं । ते जाण पां ख्यातीं आठवी सिद्धि ॥४७॥
‘यत्कामस्तदवस्यति’ म्हणजे इच्छिलेल्या सुखाची प्राप्ति, किंवा त्रैलोक्यांतील भोगसंपत्ति अकस्मात् एकाच वेळेला प्राप्त होणे, हीच सुप्रसिद्ध आठवी सिद्धि होय ४७.

या अष्टमहासिद्धींची राशी । स्वभावें असे मजपाशीं ।
साधक शिणतां प्रयासीं । एकादी कोणासी उपतिष्ठे ॥४८॥
ह्या आठ महासिद्धींचा समुदाय स्वभावत:च माझ्याजवळ असतो. साधक प्रयत्न करता करता थकला म्हणजे त्याला ह्यांपैकी एकादी सिद्धि प्राप्त होते ४८.

हे महासिद्धींची व्युत्पत्ती । इतर दहा ज्या बोलिजेती ।
त्याही सांगेन तुजप्रती । यथानिगुती उद्धवा ॥४९॥
अशी महासिद्धींची स्वरूपं आहेत. आतां इतर ज्या दहा सिद्धि सांगितलेल्या आहेत, त्यासुद्धा उद्धवा ! तुला यथासांग रीतीने सांगतों ४९.

अनूर्मिमत्त्वं देहेऽस्मिन् दूरश्रवणदर्शनम् ।
मनोजवः कामरूपं परकायप्रवेशनम् ॥ ६ ॥
स्वच्छन्दमृत्युर्देवानां सहक्रीडानुदर्शनम् ।
यथासङ्कल्पसंसिद्धिराज्ञाप्रतिहता गतिः ॥ ७ ॥
[श्लोक ६/७] देहावर तहानभुकेचा परिणाम न होणे, पुष्कळ लांबची वस्तू दिसणे, पुष्कळ लांबचे ऐकू येणे, मनाच्या वेगाने शरीरानेही त्या ठिकाणी जाणे, पाहिजे ते रूप घेणे, दुसर्‍या शरीरात प्रवेश करणे, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे, अप्सरांबरोबर होणार्‍या देवक्रीडेचे दर्शन होणे, जो संकल्प कराल तो सिद्ध होणे, सगळ्या ठिकाणी, सगळ्यांकडून आपल्या आज्ञेचे पालन होणे, या दहा सिद्धी सत्त्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात. (६-७)

देहीं बाधिती ना ऊर्मि साही । ते अनूर्मिसिद्धि पहिली पाहीं ।
दूरली वाचा ऐके ठायीं । दूरश्रवण नवाई दुसरी सिद्धि ॥५०॥
क्षुधा, तृषा, शोक, मोह, जरा आणि मृत्यु या सहा ऊर्मि देहामध्ये मुळींच पीडा देत नाहीत, ती पहिली ‘अनूर्मि सिद्धि’ होय. कितीही दूर अंतरावर बोललेले भाषण एकाच ठिकाणी बसून ऐकावयास मिळणे, ही ‘दूरश्रवण’ नांवाची दुसरी अद्‌भुत सिद्धि होय ५०.

त्रिलोकींचा सोहळा । बैसले ठायीं देखे डोळां ।
हे तिसरे सिद्धीची लीला । दूरदर्शनकळा ती नांव ॥५१॥
त्रैलोक्यांतील हालचाल मनुष्य बसल्या ठिकाणींच डोळ्यांनी पाहू शकतो; हा तिसऱ्या सिद्धीचा चमत्कार होय. ‘दूरदर्शनकळा’ हें तिचे नाव आहे ५१.

मनोजवसिद्धि ऐशी आहे । कल्पिल्या ठायासी पाहें ।
मनोवेगें शरीर जाये । चौथी होये हे सिद्धि ॥५२॥
‘मनोजव’ सिद्धि म्हणतात ती अशी आहे की, कल्पना करील त्या ठिकाणी मनोवेगाने शरीर जाते. ही चौथी सिद्धि होय ५२.

कामरूप सिद्धिची परी । जैशिया रूपाची कामना करी ।
तैसें रूप तत्काळ धरी । हे पांचवी खरी कामनासिद्धी ॥५३॥
‘कामरूप’ सिद्धीचा प्रकार असा आहे की, मनुष्य ज्या स्वरूपाची इच्छा करतो, तसेंच रूप तत्काल तो धारण करूं शकतो. ही खरोखर पांचवी ‘कामनासिद्धि’ होय ५३.

आपुलें शरीर ठेवूनि दूरी । परशरीरीं प्रवेश करी ।
हे परकायप्रवेशपरी । सहावी साजिरी अतिसिद्धि ॥५४॥
आपले शरीर दूर ठेवून मनुष्य दुसऱ्याच्या शरीरांत प्रवेश करतो, ही ‘परकायाप्रवेश’ सिद्धि होय. ही सहावी श्रेष्ठ व उत्तम सिद्धि होय ५४.

काळासी वश्य नाहीं होणें । आपुलिये इच्छेनें मरणें ।
हे सातवी सिद्धि जाणणें । स्वच्छंदमरणें ती नांव ॥५५॥
काळाला कधीही वश न होणे, आपल्याच इच्छेने मरणे, ही सातवी सिद्धि समजावी. तिचें नांव ‘स्वच्छंद मरणे’ ५५.

स्वर्गीं देवांचें जें क्रीडन । त्यांचें हा देखे दर्शन ।
स्वयें क्रीडावया अंगवण । ते सिद्धि जाण आठवी ॥५६॥
स्वर्गातील देवांची जी क्रीडा, त्या क्रीडेचे दर्शन घेणे आणि तशी क्रीडा करण्याचे सामर्थ्यही आंगी असणे, ती आठवी सिद्धि होय असें समज ५६.

जैसा संकल्प तैसी सिद्धि । ते नववी जाण पां त्रिशुद्धी ।
राजाही आज्ञा शिरीं वंदी । ज्याची गमनसिद्धि सर्वत्र ॥५७॥
जो बेत करावा, तो सिद्धीस जाणे ती खरोखर नववी सिद्धि होय. ज्याची आज्ञा राजासुद्धा शिरसावंद्य करतो, आणि जो पाहिजे तिकडे जाऊं शकतो ५७,

ज्याची आज्ञा आणि गमन । कोठेंही अवरोधेना जाण ।
हें दहावे सिद्धीचें लक्षण । ज्ञानविचक्षण जाणती ॥५८॥
ज्याची आज्ञा आणि गमन ह्यांना कोठेच प्रतिबंध नाही, हे दहाव्या सिद्धीचे लक्षण विचक्षण ज्ञानी लोक जाणतात ५८.

या गुणहेतुसिद्धींची विधी । म्यां सांगीतली हे त्रिशुद्धी ।
यांहीहोनि क्षुद्रसिद्धी । त्याही निजबुद्धीं अवधारीं ॥५९॥
या गुणहेतुसिद्धींची माहिती मी तुला यथासांग सांगितली. आतां ह्याच्याहीपेक्षां क्षुद्र सिद्धि आहेत त्याही लक्ष देऊन ऐक ५९.

त्रिकालज्ञत्वमद्वन्द्वं परचित्ताद्यभिज्ञता ।
अग्न्यर्काम्बुविषादीनां प्रतिष्टम्भोऽपराजयः ॥ ८ ॥
[श्लोक ८] तिन्ही काळातील गोष्टी समजणे, शीतउष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणे, दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणे आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात. (८)

क्षुद्रसिद्धि पंचलक्षण । भूत भविष्य वर्तमान ।
या त्रिकाळांचें जें ज्ञान । तें पहिलें जाण ये ठायीं ॥६०॥
क्षुद्रसिद्धि पांच प्रकारच्या आहेत. भूत, भविष्य आणि वर्तमान ह्या तिन्ही काळांचे जे ज्ञान होते, ती या ठिकाणी पहिली सिद्धि असे समज ६०.

सुख दुःख शीत उष्ण । मृदु आणि अतिकठिण ।
या द्वंद्वांसी वश नव्हे जाण । तें दुसरें लक्षण सिद्धीचें ॥६१॥
सुख-दुःख, शीत-उष्ण, मृदु आणि अत्यंत कठीण या द्वंद्वांना मुळीच वश न होणे हे दुसऱ्या सिद्धीचे लक्षण होय ६१.

पराचें स्वप्न स्वयें सांगणें । पुढिलाचे चित्तींचें जाणणें ।
हे तिसरी सिद्धि म्हणणें । ऐक लक्षणें चौथीचीं ॥६२॥
दुसऱ्याचे स्वप्न आपण सांगणे, दुसऱ्याच्या मनातील हेतु जाणणे, हिला तिसरी सिद्धि असे म्हणतात. आतां चौथीचे लक्षण ऐक ६२.

अग्नि वायु आणि उदक । शस्त्र विष आणि अर्क ।
यांचें प्रतिस्तंभन देख । ते सिद्धि निष्टंक पैं चौथी ॥६३॥
अग्नि, वायु, उदक, शस्त्र, विष आणि अर्क ह्यांचा परिणाम होऊ न देणे ही खरोखर चौथी सिद्धि होय ६३.

कोणासी जिंकिला न वचे पाहें । जेथींचा तेथ विजयी होये ।
एकला सर्वत्र विजयो लाहे । हे पांचवी आहे विजयसिद्धि ॥६४॥
कोणालाच कधी हार जावयाचें नाहीं, कोठे केव्हाही विजयीच व्हावयाचे, कोठेही गेले तरी एकट्यानेच विजय मिळवावयाचा, ही पांचवी विजयसिद्धि होय ६४.

एताश्चोद्देशतः प्रोक्ता योगधारणसिद्धयः ।
यया धारणया या स्याद् यथा वा स्यान्निबोध मे ॥ ९ ॥
[श्लोक ९] योगधारणा केल्याने ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्यांचे मी नावांसह वर्णन केले आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी, कशी प्राप्त होते, ते सांगतो, ऐक. (९)

उद्देश्यमात्रें सिद्धींची गती । म्यां सांगीतली तुजप्रती ।
आतां कोण धारणा कोण स्थिती । सिद्धीची प्राप्ती होय ते ऐक ॥६५॥
– अशा प्रकारे सिद्धीचे स्वरूप मी तुला त्यांच्या उद्देशांनी सांगितले. आता कोणत्या धारणेनें आणि कोणत्या स्थितीने कोणती सिद्धि प्राप्त होते तेंही ऐक ६५.

अष्ट महासिद्धींची धारणा । गुणहेतु दहा सिद्धी जाणा ।
क्षुद्रसिद्धि पंचलक्षणा । त्यांचे साधित्या साधना हरि बोले ॥६६॥
अष्टमहासिद्धींची धारणा, दहा सिद्धींचे गुणहेतु आणि पांच क्षुद्र सिद्धींची लक्षणे ही साध्य करता येतील अशा प्रकारच्या साधनाचे वर्णन श्रीकृष्ण सांगतो ६६.

भूतसूक्ष्मात्मनि मयि तन्मात्रं धारयेन्मनः ।
अणिमानमवाप्नोति तन्मात्रोपासको मम ॥ १० ॥
[श्लोक १०] प्रिय उद्धवा ! तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म रूप, ते माझेच रूप आहे जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो, त्याला ‘अणिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते. (१०)

अष्ट महासिद्धि स्वाभाविका । माझ्या ठायीं असती देखा ।
या असाध्य साधावया आवांका । करित्या साधका साधन सांगे ॥६७॥
हे पहा ! अष्टमहासिद्धि या स्वाभाविकपणे माझ्यामध्येच असतात, तरी त्या साध्य करावयाला दुर्घट आहेत. पण त्या साध्य करूं पाहणाऱ्या साधकाला साधन सांगतात ६७.

मी अणुरेणूचाही अणुरेण । जीवाचाही हृदयस्थ जाण ।
तेथ अणुतन्मात्र करूनि मन । माझ्या ठायीं जाण जो राखे ॥६८॥
मी अणुरेणूंच्याही अणुरेणूइतका सूक्ष्म आहे. मी प्रत्येक जीवाच्या हृदयांत राहतो. तेथें जो कोणी त्याप्रमाणेच अणुमात्र सूक्ष्म मन करून तें माझ्यामध्ये स्थिर ठेवील ६८,

अणुतन्मात्र ध्यान सदा राहे । त्याचा अणुमात्रचि देह होये ।
कीटकीभृंगीच्या ऐसें पाहें । अणिमेची लाहे तो सिद्धी ॥६९॥
आणि त्या अणुरेणुमात्र माझ्याच स्वरूपाचे नेहमी ध्यान करील, त्याचा देहही अणुप्रमाणच होतो आणि ‘कीटक गी’ न्यायाने त्याला ‘अणिमा’ सिद्धि प्राप्त होते ६९.

तो अच्छिद्रीं निघोनि जाये । जगाच्या डोळ्यामाजीं समाये ।
कोठेंही खुपेना पाहें । हे अणिमेची लाहे महासिद्धी ॥७०॥
ज्या पदार्थाला छिद नसेल, त्या पदार्थातूनही तो निघून जातो. जगाच्या डोळ्यांत भरून राहतो पण कोठेच कशाला खुपत नाही असे झाले म्हणजे अणिमा सिद्धि प्राप्त होते म्हणून समजावें ७०.

महत्तत्त्वात्मनि मयि यथासंस्थं मनो दधत् ।
महिमानमवाप्नोति भूतानां च पृथक् पृथक् ॥ ११ ॥
[श्लोक ११] आपल्या मनाला महत्तत्त्वरूप माझ्यामध्ये जो धारण करतो, त्याला महत्तत्त्वाकार ‘महिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे एकेका महाभूतामध्ये त्याने मनाची धारणा केली, तरीसुद्धा त्याला त्या त्या महाभूताएवढी ‘महिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते. (११)

माझें स्वरूप अनंत अपार । महत्तत्त्वाहोनि अतिथोर ।
आणि महत्तत्त्वाचाहीं साचार । नियंता ईश्वर जो कां मी ॥७१॥
माझे स्वरूप अनंत आणि अपार आहे. महत्तत्त्वाहूनही अत्यंत मोठे आहे. आणि वस्तुतः पाहिले तर महत्तत्त्वाचाही खरा नियंता जो ईश्वर तो मीच आहे ७१.

हे सिद्धि साधावया जो नर । माझी धारणा धरी अपरंपार ।
तेवढेंच होय त्याचें शरीर । हे सिद्धि महाथोर महिमान ॥७२॥
ती सिद्धि साध्य करण्याकरितां जो पुरुष माझे ध्यानही तसेंच अपरंपार-विशाळ आहे असे मानून त्याची धारणा करील, त्याचे शरीरही तेवढेच मोठे होईल. म्हणून ह्या सिद्धीचे माहात्म्यही मोठे आहे ७२.

सूक्ष्म कापुसाचे तंतू पाहें । तो कल्पनेऐसा पटू होये ।
माझी महती धारणा वाहे । तो माझी सिद्धि लाहे महिमत्वें ॥७३॥
हे पहा ! कापसाचे तंतूही सूक्ष्म असतात; तरी त्यांचे आपल्याला पाहिजे तेवढे मोठे वस्त्र होते. त्याप्रमाणे माझें ध्यानही जो मोठे कल्पून धारणा धरतो, त्याला माझी मोठी सिद्धीच प्राप्त होते ७३.

तुकितां त्याच्या समान भारा । न पुरे सपर्वत सगळी धरा ।
एवढ्या महत्तत्त्वांचा उभारा । सिद्धिद्वारा तो पावे ॥७४॥
त्याच्याइतकें वजन होणारी दुसरी वस्तु पाहूं लागले असतां सर्व पर्वतांसह पृथ्वीही त्याची बरोबरी करूं शकणार नाही. सिद्धीच्या योगानें तो एवढ्या महत्तत्त्वाला चढतो ! ७४.

परमाणुमये चित्तं भूतानां मयि रञ्जयन् ।
कालसूक्ष्मार्थतां योगी लघिमानमवाप्नुयात् ॥ १२ ॥
[श्लोक १२] जो योगी आपले चित्त भूतांच्या परमाणुस्वरूप माझ्या ठिकाणी लावतो, त्याला ‘लघिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते व त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणूएवढे रूप घेता येते. (१२)

वाय्वादि प्राणप्रमाण । जेणें काळसूत्राचें गणन ।
तो परमाणुरूप भगवंत जाण । त्याचेंचि दृढ ध्यान सदा जो करी ॥७५॥
वायु आदिकरून प्राणासारखीं सूक्ष्म तत्त्वे आहेत; त्यांच्या योगानें कालसूत्राचे माप करता येते, तो परमाणुस्वरूप भगवंत होय. त्याचंच जो सदासर्वदा एकनिष्ठेने ध्यान करील ७५.

परमाणुधारणेचा महिमा । त्याचा देहासी ये अतिलघिमा ।
तो मशकीं चढोनि पाहे मा । उडे व्योमामाजीं सुखें ॥७६॥
त्या परमाणुस्वरूप ध्यानाचा महिमा असा आहे की, त्याच्या योगाने देहाला अत्यंत हलकेपणा प्राप्त होतो. हे पहा ! तो मशकावर चढ्न खुशाल आकाशामध्ये गमन करतो ७६.

अणिमादि तीनी धारणा । या देहींच्या सिद्धि जाणा ।
लहान थोर हळूपणा । देहलक्षणां उपजवी ॥७७॥
अणिमादिक ज्या तिन्ही धारणा आहेत, त्या ह्या देहाच्याच सिद्धि होत, हे लक्षात ठेवावे. त्याच देहामध्ये सूक्ष्मपणा, जडपणा व हलकेपणा इत्यादि लक्षणे उत्पन्न करतात ७७.

उरल्या ज्या पंचमहासिद्धि । त्यांच्या धारणेच्या विधी ।
तोही सांगेन त्रिशुद्धी । ऐक सुबुद्धी उद्धवा ॥७८॥
बुद्धिमंता उद्धवा ! आतां बाकी ज्या पांच महासिद्धि राहिल्या, त्यांच्या धारणेचा तो विधीही खरोखर सांगतो ऐक ७८.

धारयन् मय्यहंतत्त्वे मनो वैकारिकेऽखिलम् ।
सर्वेन्द्रियाणामात्मत्वं प्राप्तिं प्राप्नोति मन्मनाः ॥ १३ ॥
[श्लोक १३] योग्याने जर सात्त्विक अहंकाररूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले, तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त ‘प्राप्ती’ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. (१३)

मूळींचा शुद्ध अहंकारू । ज्यापासूनि इंद्रियविकारू ।
इंद्रिय‍अधिष्ठात्री सुरवरू । चेतविता ईश्वरू जो कां मी ॥७९॥
मूळचा जो शुद्ध अहंकार असतो, ज्याच्यापासून इंद्रियांचे विकार उत्पन्न होतात, आणि इंद्रियांचा आश्रयभूत, त्यांस चेतना देणारा, असा देवाधिदेव ईश्वर जो मी ७९,

त्या माझ्या ठायीं धारणा धरितां । इंद्रिय अधिष्ठात्री देवता ।
त्यासी पावोनि एकात्मता । इंद्रियप्रकाशता स्वयें लाहे ॥८०॥
त्या माझ्या ठिकाणी ध्यान धरले असतां, इंद्रियअधिष्ठानाच्या ज्या देवता असतात, त्यांच्याशी एकात्मता होऊन त्याच्या आंगी इंद्रियप्रकाशक धर्म येतो ८०.

जे कां इंद्रियव्यापार जगाचे । प्रकाशूनि हा देखे साचे ।
एवढिये इंद्रियप्राप्तीचें । साधी सिद्धीचें वैभव ॥८१॥
ह्यामुळे जगांतील इंद्रियांचे जे व्यापार चाललेले असतात, ते सर्व तो स्वत:च तेथें प्रगट होऊन खरोखर पहात असतो. एवढ्या इंद्रियप्राप्तीच्या सिद्धीचे वैभव तो साध्य करून घेतो ८१.

तेव्हां ज्याचा जो जेथ पाहे । इंद्रियांचा व्यापारू होये ।
तो येणेंचि केला आहे । ऐशी प्रतीति होये इंद्रियप्राप्ती ॥८२॥
त्यामुळे ज्याच्या ज्याच्या इंद्रियांचा व्यापार जेथे जेथे होतो, तो तो ह्यानेच केला आहे अशी प्रतीति होते. ती ‘ इंद्रियप्राप्ती’ नावाची सिद्धि होय. ८२.

महत्यात्मनि यः सूत्रे धारयेन्मयि मानसम् ।
प्राकाम्यं पारमेष्ठ्यं मे विन्दतेऽव्यक्तजन्मनः ॥ १४ ॥
[श्लोक १४] महत्तत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली, तर ‘प्राकाम्य’ नावाची सिद्धी प्राप्त होते तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेष्ठीचे श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो. (१४)

जें महत्तत्त्व गा जाण । तें मायेचें प्रथम स्फुरण ।
ज्यासी क्रिया सूत्रप्रधान । नामाभिधान बोलती ॥८३॥
जें महत्तत्त्व आहे, तेच मायेचे पहिले स्फुरण होय असे समज. ह्यालाच ‘सूत्रप्रधान क्रिया’ असें नांव दिलेले आहे ८३.

तेथ अजन्मा मी आपण । जाहलों सूत्राचा सूत्रात्मा जाण ।
त्या माझ्या स्वरूपाचें ध्यान । सावधान जो करी ॥८४॥
त्यांत मी स्वतः जन्मरहित असूनही त्या सूत्राचा सूत्रात्मा झालो आहे. त्या माझ्या स्वरूपाचें जो सावध चित्ताने ध्यान करतो ८४,

ज्या सूत्राचेनि प्रकाशप्रवाहें । ब्रह्मांड हिरण्यगर्भ प्रकाशला राहे ।
ते प्रकाशता त्यासी वश्य होये । येणें सूत्रात्मा पाहे निदिध्यासनें ॥८५॥
त्याला, ज्या सूत्राच्या प्रकाशाच्या प्रवाहाने ब्रह्मांड व हिरण्यगर्म हीही प्रकाशमान होतात, ती प्रकाशकताच वश होते. अशा प्रकारच्या निदिध्यासाने तो सूत्रात्म्याला पहात असतो ८५.

त्या निदिध्यासनापोटीं । करूं शके ब्रह्मांडकोटी ।
एवढी प्रकाशसिद्धि गोमटी । हे मजवीण नुठी साधकां ॥८६॥
त्या निदिध्यासांतच तो कोटि ब्रह्मांडें निर्माण करू शकतो. इतकी ही उत्तम प्रकाशसिद्धि साधकांना माझ्याशिवाय प्राप्त होत नाही ८६.

विष्णौ त्र्यधीश्वरे चित्तं धारयेत् कालविग्रहे ।
स ईशित्वमवाप्नोति क्षेत्रक्षेत्रज्ञचोदनाम् ॥ १५ ॥
[श्लोक १५] त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या कालशरीर विष्णुस्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील, त्याला ईशित्व’ सिद्धी प्राप्त होते त्यामुळे त्याला जीवांना व त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. (१५)

मायादित्रिगुणनियंता । जो कळिकाळातें आकळिता ।
उत्पत्तिस्थितिप्रळयकर्ता । जाण तत्त्वतां अंतर्यामी ॥८७॥
माया आदिकरून त्रिगुणांचा जो नियंता; जो कळिकाळाला आकलन करणारा; उत्पत्ति, स्थिति व लय करणारा; आणि जो खरोखर अंत:करणांत वास करणारा ८७;

त्या मज विष्णूचें ध्यान । निरंतर जो करी जाण ।
त्यासी अदृष्टद्रष्टेपण । शक्तिप्रेरण ईशित्वें ये ॥८८॥
अशा मज विष्णूचें जो निरंतर ध्यान करतो, त्याला ईशत्व प्राप्त झाल्याने अदृश्य वस्तु पाहाण्याचेही सामर्थ्य प्राप्त होते ८८,

मिथ्या बुद्धिबळाच्या खेळाप्रती । स्वारीची जाणे गति निगुती ।
तेवीं मिथ्या संसारप्रतीती । भूतांची आगती निर्गती स्वयें जाणे ॥८९॥
बुद्धिबळांच्या मिथ्या खेळामध्ये खेळणारा मनुष्य त्यांतील मोहऱ्यांच्या स्वारीची गति बरोबर समजून घेतो, त्याप्रमाणे संसाराचा अनुभव मिथ्या असला तरी जीवांचे जाणेयेणें तो स्वतः समजू शकतो ८९.

तो जीवादि शरीरप्रेरण । स्वयें करूं शके आपण ।
करितां अंतर्याम्याचे ध्यान । एवढी सिद्धि जाण उपतिष्ठे ॥९०॥
तो जीव इत्यादि शरीराच्या प्रेरणा आपण स्वतः करूं शकतो. याप्रमाणे अंतर्यामी नारायणाचे ध्यान केले असतां एवढी सिद्धि प्राप्त होते, हे लक्षांत ठेव ९०.

तो आपुलेनि प्रतापस्वभावीं । मशकाहातीं मेरू विभांडवी ।
नीचहस्तें सृष्टि विध्वंसूनि मांडवी । कां इंद्रातें मारवी उंदिराहातीं ॥९१॥
तो आपल्या प्रतापसामर्थ्याने मशकाकडून मेरुचेसुद्धा तुकडे करून टाकवितो; एखाद्या दुर्बळाच्या हातूनसुद्धा तो सृष्टीचा विध्वंस करवून पुनः तिची रचना करवितो; किंवा उंदराच्या हातानेसुद्धा इंद्राला ठार करवितो ! ९१.

यापरी एकातें मारवी । जीवें गेलिया जीववी ।
अचेतनातें पालेजवी । ये सिद्धिची पदवी ईशित्व ॥९२॥
अशा प्रकारे एकाद्याला ठार मारवितो, एकाद्याचा जीव गेला असला तरी त्याला पुन्हा जिवंत करतो व अचेतनालाही सचेतन करून सोडतो. असें ईशित्व (ईश्वरत्व ) प्राप्त होणे हे या सिद्धीचे माहात्म्य आहे ९२.

नारायणे तुरीयाख्ये भगवच्छब्दशब्दिते ।
मनो मय्यादधद् योगी मद्धर्मा वशितामियात् ॥ १६ ॥
[श्लोक १६] विराट, हिरण्यगर्भ व कारण या तीन उपाधींनी रहित म्हणून ‘तुरीय’ व सहा ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून ‘भगवान’ अशी ज्यांना नावे आहेत, त्या माझ्या नारायणस्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो, त्याचे ठिकाणी माझे गुण येतात असा योगी ‘वशिता’ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. (१६)

जीव शिव आणि प्रकृति । यांहूनि परती चौथी स्थिती ।
ज्यातें नारायण म्हणती । जाण निश्चितीं सज्ञान ॥९३॥
जीव, शिव आणि प्रकृति, ह्यांहून पलीकडची जी चौथी स्थिति आहे, जिला, ज्ञाते ‘नारायण’ असें म्हणतात ९३,

जागृति स्वप्न सुषुप्ती । यांवेगळी तुरीय स्थिती ।
त्यातें नारायण म्हणती । यथानिगुती सज्ञान ॥९४॥
त्याचप्रमाणे जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति ह्यांहून भिन्न जी तुरीयावस्था, तिलाही ज्ञाते लोक खरोखर ‘नारायण’ असे म्हणतात ९५.

दृश्य द्रष्टा दर्शन । यांअतीत चौथा जाण ।
त्यातें म्हणती नारायण । ज्ञानविचक्षण निजबोधें ॥९५॥
दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्यांहून पलीकडचा जो चौथा पुरुष त्यालाही ज्ञाते लोक स्वानुभवाने नारायण असे म्हणतात ९५.

त्रिपुटीवेगळी जे मातू । असोनियां त्रिपुटीआंतू ।
जो कां त्रिपुटीसी अलिप्तू । तो मी विख्यातू नारायण ॥९६॥
जी वस्तु त्रिपुटीच्या आंत असूनही त्रिपुटीहुन भिन्न ; आणि जो त्रिपुटीला अलिप्त असणारा ; तो मी सुप्रसिद्ध नारायण होय ९६.

यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे षड्गुण ।
नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत ॥९७॥
यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य आणि औदार्य हे सहा गुण ज्याच्यामध्ये परिपूर्णत्वेकरून निरंतर वास करतात, तो नारायण भगवान् मी ९७.

त्या मज नारायणातें ध्यातां । माझी वशिता सिद्धि ये हाता ।
सर्व कर्मीं अलिप्तता । भोगून अभोक्ता भोगातें ॥९८॥
त्या मज नारायणाचें ध्यान केले असतां माझी ‘वशिता’ नामक सिद्धि प्राप्त होते. सर्व कर्मात असून तो अलिप्त राहतो व सर्व भोग भोगून तो अभोक्ता असतो ९८.

निर्गुणे ब्रह्मणि मयि धारयन् विशदं मनः ।
परमानन्दमाप्नोति यत्र कामोऽवसीयते ॥ १७ ॥
[श्लोक १७] ज्या योग्याचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते हिला ‘कामावसायिता’ नावाची सिद्धी म्हणतात. (१७)

चित्तदेवता सत्त्वगुण । इंद्रियें तो रजोगुण ।
विषय केवळ तमोगुण । हेंचि आवरण परमानंदा ॥९९॥
सत्वगुण ही चित्ताची देवता आहे, इंद्रिये हा रजोगुण होय, आणि विषय हे केवळ तमोगुण होत आणि हीच परमानंदाला झाकून टाकतात ९९.

परमानंदासी आवरण । आडवे असती तिन्ही गुण ।
त्यांतें सांडूनि निर्गुण । ब्रह्म परिपूर्ण मज जो ध्याये ॥१००॥
हे तिन्ही गुण परमानंदावर आचरणरूपाने आडवे राहिले आहेत. त्यांना सोडून निर्गुण व परिपूर्ण ब्रह्म अशा माझें जो ध्यान करतो १००

त्यासी माझिये ध्यानस्थितीं । होय परमानंद‍अवाप्ती ।
ज्या आनंदामाजीं उपशांती । होय निश्चितीं सकळ कामा ॥१॥
त्याला, ज्या आनंदामध्ये निश्चितपणे सर्व इच्छाच लोपून जातात, अशा परमानंदाची प्राप्ती माझ्या ध्यानाच्या स्थितीमध्ये होते १.

झालिया परमानंदप्राप्ती । सकळ काम निमग्न होती ।
जेवीं सूर्योदयाप्रती । तारा हारपती सचंद्र ॥२॥
परमानंदाची प्राप्ति झाली असतां सर्व इच्छा लुप्त होऊन जातात. सूर्योदय होतांच ज्याप्रमाणे चंद्रासहवर्तमान सर्व नक्षत्रे लुप्त होतात २;

तेवीं परमानंदाच्या पोटीं । हारपती कामकोटी ।
तेथ इंद्रियसुखाच्या गोठी । लाजोनि उठाउठी विरताती ॥३॥
त्याप्रमाणे परमानंदाच्या पोटामध्येही इच्छेच्या राशीच्या राशी गडप होऊन जातात; आणि त्या वेळी इंद्रियसुखाच्या गोष्टी असतात त्याही तत्काळ लाजून जेथल्या तेथे थिजून जातात ३.

उद्धवा ऐक पां निश्चितीं । नव्हतां परमानंदप्राप्ती ।
कदा नव्हे कामनिवृत्ती । नाना युक्ती करितांही ॥४॥
उद्धवा ! ऐक. खरोखर परमानंदप्राप्ति झाल्याशिवाय अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्ति केल्या असतांही कामाची निवृत्ति कधीच व्हावयाची नाही ४.

या अष्ट महासिद्धीच्या धारणा । तुज म्यां सांगीतल्या जाणा ।
यांसी साधावया आंगवणा । सुरनरगणां पैं नाहीं ॥५॥
या अष्टमहासिद्धींच्या धारणा तुला मी सांगितल्या. ह्या सिद्धि साध्य करण्याचे सामर्थ्य देव, मनुष्य, इत्यादिकांना नाही ५.

यापरी अष्ट महासिद्धी । तुज म्यां सांगीतली धारणाविधी ।
आतां गुणहेतुकाचे प्रबोधीं । सावधबुद्धी अवधारीं ॥६॥
अशा प्रकारें ह्या आठ महासिद्धींचे धारणाविधि मी तुला सांगितले. आता गुणहेतूंच्या सिद्धींची साधने काय तें सावधान मनाने ऐक ६.

श्वेतद्वीपपतौ चित्तं शुद्धे धर्ममये मयि ।
धारयञ्छ्वेततां याति षडूर्मिरहितो नरः ॥ १८ ॥
[श्लोक १८] श्वेतद्वीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपले चित्त स्थिर करतो, तो तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह यांनी त्रासला जात नाही व माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. (१८)

सांडूनि कार्येंसीं रजतमें दूरी । जो मी सत्त्वाधिष्ठाता श्रीहरी ।
त्या माझी जो धारणा धरी । अखंडाकारी सर्वदा ॥७॥
कार्यासहवर्तमान रज-तम दूर लोटून, सत्वगुणाचा अभिमानी जो मी श्रीहरी, त्या माझी विश्वव्यापकतेनें सर्वदा धारणा धरील ७,

तो माझेनि सत्त्वे सत्त्ववंतू । होय षडूर्मींसीं रहितू ।
शोक मोह जरा मृत्यू । क्षुधा तृषा हातू लावूं न शके ॥८॥
तो माझ्याच सत्वाने सत्वसंपन्न होऊन षडूमिरहित होईल; व त्याला शोक, मोह, जरा, मृत्यु, क्षुधा, तृषा, ही स्पर्श करूं शकणार नाहीत ८.

मय्याकाशात्मनि प्राणे मनसा घोषमुद्वहन् ।
तत्रोपलब्धा भूतानां हंसो वाचः श्रृणोत्यसौ ॥ १९ ॥
[लोक १९] आकाशात्मा जो समष्टिप्राण त्या माझ्या स्वरूपात जो मनाने अनाहतनादाचे चिंतन करतो, तो ‘दूरश्रवण’ नावाच्या सिद्धीने युक्त होतो या सिद्धीमुळे त्या योग्याला आकाशातील निरनिराळ्या वाणी ऐकू येतात. (१९)

सघोष प्राणेंसीं शब्दमहिमा । अवश्य विश्रांतीस ये व्योमा ।
त्या आकाशाचाही मी आत्मा । मजमाजीं व्योमा रहिवासू ॥९॥
नादासहवर्तमान शब्दाचें सारें माहात्म्य विश्रांतीसाठी आकाशामध्ये अवश्य आलेच पाहिजे. त्या आकाशाचाही आत्मा मी आहे. आकाशाचे वास्तव्यही माझ्यामध्येच आहे ९.

तो मी सघोष प्राणांचाही प्राण । सकळ वाचांची वाचा जाण ।
वागीश्वरीचें जीवन । सत्य मी जाण उद्धवा ॥११०॥
उद्धवा ! खरोखर, तो मी नादासहवर्तमान प्राणांचाही प्राण, सर्व वाणींचीही वाणी, सरस्वतीचें जीवन आहे असे समज १०.

ऐसिया माझें दृढ ध्यान । निजहृदयीं जो करी जाण ।
तो विचित्रा वाचांचें श्रवण । जीवस्वरूपें जाण स्वयें ऐके ॥११॥
अशा माझे दृढ ध्यान जो आपल्या हृदयांत करील, तो जीवमान असतांच निरनिराळ्या वाणीचे श्रवण स्वतः करील ११.

सनाद माझी धारणा पोटीं । धरितां जगाच्या गुह्य गोष्टी ।
त्याचे पडती कर्णपुटीं । ते काळीं उठी दूरश्रवणसिद्धि ॥१२॥
अंत:करणांत माझी नादयुक्त धारणा धरिली असता, जगांतील गुप्त गोष्टी त्याच्या कानावर पडतात, त्या वेळी दूरश्रवणसिद्धि साध्य होते १२.

चक्षुस्त्वष्टरि संयोज्य त्वष्टारमपि चक्षुषि ।
मां तत्र मनसा ध्यायन् विश्वं पश्यति सूक्ष्मदृक् ॥ २० ॥
[श्लोक २०] जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यांमध्ये एकरूप करतो आणि त्या दोन्हींमध्ये मनाने माझे ध्यान करतो, त्याची दृष्टी सूक्ष्म होते, त्याला ‘दूरदर्शन’ नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळे विश्व पाहू शकतो. (२०)

सविता तो मी नारायण । ऐसें डोळ्यांमाजीं करी ध्यान ।
तेव्हां डोळाचि मद्‌रूप जाण । सविता आपण स्वयें होय ॥१३॥
सूर्य तोच मी नारायण असे समजून जो डोळ्यांमध्य माझेच ध्यान करतो, तेव्हां डोळाच मद्प होऊन स्वतः आपण सूर्यस्वरूपच होतो १३.

एवं डोळा सविता हें माझे ध्यान । तिहींस एकात्मता झाल्या जाण ।
तेव्हां सूक्ष्मद्रष्टा होय आपण । जग संपूर्ण तो देखे ॥१४॥
अशा प्रकारें डोळा, सूर्य आणि मी या तिघांची एकात्मता झाली की त्या वेळी तो स्वतः सूक्ष्म द्रष्टा होतो व तो सारे जग पाहू लागतो १४.

बैसलेचि ठायीं जाण । चतुर्दशभुवनांचे दर्शन ।
एके काळें देख आपण । दूरदर्शन हे सिद्धि ॥१५॥
बसल्या जागींच चौदा लोकांचे दर्शन तो स्वतः एकाच वेळी घेऊ शकतो. ही ‘दूरदर्शन’ सिद्धि होय १५

मनो मयि सुसंयोज्य देहं तदनु वायुना ।
मद्धारणानुभावेन तत्रात्मा यत्र वै मनः ॥ २१ ॥
[श्लोक २१] मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो, त्याला ‘मनोजव’ नावाची सिद्धी प्राप्त होते त्यामुळे तो योगी जेथे मन जाईल, तेथे शरीराने त्याच क्षणी जाऊ शकतो. (२१)

अत्यंत सवेग तें मन । त्या मनाचेंही मी मन जाण ।
त्या मनासी मजसीं अभिन्न । प्राणधारणयुक्त राखे ॥१६॥
मन हे अत्यंत वेगवान् आहे. त्या मनाचेही मन मी आहे हे लक्षात ठेव. त्या मनाला प्राणायामासह ध्यानधारणेमध्ये माझ्याशी एकरूप करावयाचे १६.

ऐसें प्राणधारणयुक्त मन । मजसीं राखतां अभिन्न ।
त्या धारणाप्रभावें जाण । मनोवेगें गमन देहासी होय ॥१७॥
असें प्राणायामासह ध्यानधारणेत मन माझ्या ठायीं एकरूप केले, तर त्या ध्यानधारणेच्या प्रभावाने देहाला मनोवेगाने इकडेतिकडे गमन करण्याचे सामर्थ्य येते १७.

जेथें संकल्पें जाय मन । तेथें होय देहाचेंही गमन ।
हे मनोजवसिद्धि जाण । धारणालक्षण या हेतू ॥१८॥
संकल्पानेच मन जेथे जाते, तेथे देहाचेही गमन घडते. हीच मनोजवसिद्धि होय असे समज. तिच्या ध्यानधारणेचा प्रकार असा आहे १८.

यदा मन उपादाय यद् यद् रूपं बुभूषति ।
तत्तद् भवेन्मनोरूपं मद्योगबलमाश्रयः ॥ २२ ॥
[श्लोक २२] ज्यावेळी योगी मनाला उपादानकारण बनवून ज्या कोणाचे रूप धारण करू इच्छितो, ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो कारण, त्याने आपले मन माझ्याशी जोडलेले असते. (२२)

पहिली मनोजवधारणा । त्याहीवरी माझी भावना ।
अचिंत्य सामर्थ्य माझें जाणा । अनुसंधाना जो आणी ॥१९॥
प्रथम मनोजवसिद्धीचें ध्यान करून नंतर आणखी माझी भावना धरावी. त्या भावनेमध्ये माझं अतर्क्य सामर्थ्य आहे. तेही आपल्या आंगी आहे अशी जो कल्पना करतो १९,

मी नाना रूपांतें धरिता । सवेंचि रूपांतरें विसर्जिता ।
ऐशी माझी संपूर्ण सत्ता । ते त्याच्या हाता पैं लाभे ॥१२०॥
त्याच्या हाती, मी अनेक प्रकारची स्वरूप धारण करणारा आहे व लागलीच ती निरनिराळी स्वरूपें विसर्जन करणारा आहे अशी जी माझी परिपूर्ण सत्ता, तीच प्राप्त होते १२०.

एवं माझिया दृढ धारणा । माझें सामर्थ्य ये त्याच्या मना ।
मग ज्या रूपाची करी भावना । तद्‌रूप जाणा स्वयें होय ॥२१॥
अशा प्रकारे माझ्या ध्यानधारणेने माझें सामर्थ्य त्याच्या मनाला प्राप्त होते. मग तो ज्या स्वरूपाची कल्पना करतो, त्या रूपाचा स्वतः बनतो २१.

सुरनरपन्नगांमाजीं जें जें रूप । धरावया करी जो संकल्प ।
तो तत्काळ गा मद्‌रूप । हे कामरूप सिद्धि माझी ॥२२॥
देव, मनुष्य किंवा नाग यांच्यापैकी जें जें स्वरूप धरावयाचा जो संकल्प धरितो, त्याला तें रूप तत्काळ प्राप्त होते. ही माझी कामरूपसद्धि होय २२.

परकायं विशन् सिद्ध आत्मानं तत्र भावयेत् ।
पिण्डं हित्वा विशेत् प्राणो वायुभूतः षडङ्‌घ्रिवत् ॥ २३ ॥
[लोक २३] जो योगी दुसर्‍या शरीरात प्रवेश करू इच्छितो, त्याने अशी भावना करावी की, आपण त्याच शरीरात आहोत असे केल्याने त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसर्‍या फुलावर सहज जातो, त्याप्रमाणे तो आपले शरीर सोडून दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो. (२३)

परकायप्रवेशू करितां जाणा । आवरूनि स्वदेहींच्या सर्व प्राणां ।
जेथ प्रवेश करितां आपणा । तेथ आपुली भावना करावी ॥२३॥
परकायाप्रवेश करतांना देहांतील सर्व प्राणांना आवरून आपल्याला ज्या देहांत प्रवेश करावयाचा असेल, त्या देहांत आपली भावना धरावी २३.

तेव्हां लिंगदेहाचे माथां । जीवप्राणांची एकात्मता ।
धरोनि देहांतर‍अहंता । बाह्य वायूच्या पंथा मिळोनि जाय ॥२४॥
त्या वेळी लिंगदेहामध्ये जीव आणि प्राण ह्यांची एकात्मता होऊन देहांतराची अहंता असते ती बाह्य वायूच्या मार्गाने मिळून जाते २४.

तेथ मिळातांचि मिळवणी । या देहाचा अभिमान सांडूनी ।
देहांतरीं प्रवेशोनी । मी म्हणती उठे तेथें ॥२५॥
ती या देहाचा अभिमान सोडून त्यांत जाऊन मिळाली की त्या देहांतच प्रवेश करून ‘मी’ म्हणूनच तेथे उठते २५.

जैसें कमळींहूनि कमळांतरा । वायुबळें प्रवेशणें भ्रमरा ।
तैसें सांडोनियां स्वशरीरा । देहांतरा जीवू जाये ॥२६॥
ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने या कमळांतून त्या कमळांत भ्रमराचे जाणे होते, त्याप्रमाणेच जीवही आपल्या शरीराला सोडून दुसऱ्या शरीरांत जातो २६.

हें परकायप्रवेशन । म्यां सांगीतलें संपूर्ण ।
माझिया स्वरूपाचें धारण । तें निजलक्षण अवधारीं ॥२७॥
हे परकायाप्रवेशाचे वर्णन मी तुला सविस्तर सांगितले. आता माझ्या स्वरूपाची ध्यानधारणा कशी असते त्याचेही लक्षण श्रवण कर २७.

दृढ ध्यातां माझे स्वरूपासी । तैं सर्व देहीं तूंचि आहेसी ।
न सांडितां निजदेहासी । हो परकायेंसीं प्रवेशू ॥२८॥
माझ्या स्वरूपाचे द्दढतर ध्यान केलें असतां सर्व देहांमध्ये तूंच आहेस असे होते. आपल्या पूर्वीच्या देहाला न सोडतांच दुसऱ्या देहांत अशा रीतीने प्रवेश होतो २८.

स्वसत्ता स्वदेह सांडणें । तेचि अर्थीचीं लक्षणें ।
पुढिले श्लोकीं नारायणें । विशद निरूपणें निरूपिलीं ॥२९॥
आतां आपल्याच इच्छेने देह कसा टाकावयाचा याविषयींची लक्षणे पुढच्या श्लोकांत नारायणाने स्पष्ट करून सांगितली आहेत २९.

पार्ष्ण्याऽऽपीड्य गुदं प्राणं हृदुरःकण्ठमूर्धसु ।
आरोप्य ब्रह्मरन्ध्रेण ब्रह्म नीत्वोत्सृजेत्तनुम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] योग्याला जर शरीराचा त्याग करावयाचा असेल तर त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय, छाती, कंठ आणि मस्तकात घेऊन जावे नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गाने त्याला ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. (२४)

देहत्यागाचें प्राणधारण । तेंच स्वच्छंदमृत्यूचें लक्षण ।
तदर्थी जें प्राणोत्क्रमण । तें योगधारण अवधारीं ॥१३०॥
देहत्यागाकरितां योगमार्गाने प्राण धारण करणे हेच स्वच्छंद मृत्यूचे लक्षण होय. त्याकरिता प्राणाचें जें ब्रह्मरंध्रापर्यंत मार्गक्रमण करावयाचे, ते योगधारण ऐक १३०.

मूळाधारीं वामचरण । टांचेचेनि नेटें जाण ।
अपानाचें अधोगमन । गुद पीडून राखावें ॥३१॥
गुदद्वाराच्या ठिकाणी डाव्या पायाची टांच जोराने नेटून बसवावी आणि गुदद्वार अशा रीतीने बंद करून अपानवायूचें खाली जाणे बंद करावें ३१.

हृदयीं विचरता जो प्राण । त्याचें सदा ऊर्ध्व गमन ।
तो प्राणायामें आवरून । अधोमुख जाण करावा ॥३२॥
हृदयामध्ये वावरणारा जो प्राण असतो, तो नेहमी वरवर जात असतो, त्याला प्राणायामाने आवरून धरून अधोमुख करावा ३२.

अपानाचें ऊर्ध्व गमन । स्वाधिष्ठानपर्यंत जाण ।
प्राणाचें अधःसंचरण । तेचि चक्रीं जाण जैं घडे ॥३३॥
अशा रीतीने अपानवायूचें खाली जाणे बंद झाल्यामुळे तो वर चढून जेव्हां स्वाधिष्ठानचक्रापर्यंत पोचेल व प्राणही अधोमुख होऊन खाली येत येत त्याच चक्रापर्यंत येईल ३३,

तेथ प्राणापानांची बुझावण । त्या चक्रामाजीं करी समान ।
ऐक्ये पडिलें आलिंगन । एकात्मता जाण चालिले ॥३४॥
तेव्हांच त्या चक्रामध्ये प्राणापानांचे ऐक्य होऊन समसमान होतात, आणि त्या दोहोंचा मिलाफ झाला म्हणजे ते दोन्ही एकरूप होऊनच पुढील मार्गाचे उल्लंघन करतात ३४.

सांडोनि अपानाची अधोवाट । प्राणें त्यजिला हृदयकंठ ।
फोडूनि सुषुम्नेचें कपाट । ऊर्ध्वमुखें नीट चालिले ॥३५॥
अपानाचा अधोमार्ग असतो तोही सुटतो, प्राण हृदयांतून गळ्याकडे जात असतो तोही जाईनासा होतो, आणि दोघेही सुषुम्नेचे द्वार खुले करून त्या तिच्या विवरांतूनच नीट सरळ वर जाऊं लागतात ३५.

जिणतां सुषुम्नेचें घर । भेदिले साही चक्रांचे पदर ।
उघडूनि काकीमुखाचें द्वार । ब्रह्मरंध्र ठाकिलें ॥३६॥
ह्याप्रमाणे सुषुम्नेचे स्थान सर झाले म्हणजे ते तसेच पुढे घुसून मार्गांत असणाऱ्या सहाही चक्रांचे पडदे दूर करून काकीमुखाचे द्वार खुले करून त्यांतून ब्रह्मरंध्रांत जाऊन पोचतात ३६.

तेथें पावल्या यथानिगुतीं । या देहाची सांडूनि स्थिती ।
जो कामभोग वाहे चित्तीं । त्या देहाची प्राप्ती तो पावे ॥३७॥
तेथे ते नीट रीतीने जाऊन पोचले की असलेल्या देहाची स्थिति सोडुन जो देह धारण करण्याची त्याच्या मनांत इच्छा असते, तो देह योग्याला प्राप्त होतो ३७.

वैकुंण्ठ कैलास अमरावती । सार्वभौम चक्रवर्ती ।
जे कामना कामी चित्तीं । ते पावे गती तत्काळ ॥३८॥
वैकुंठ, कैलास किंवा अमरावती येथे जावयाचे किंवा सार्वभौम चक्रवर्ती व्हावयाचे, अशा प्रकारची जी इच्छा तो मनांत आणितो, ती स्थिति तो तत्काळ पावतो ३८,

जरी तो ब्रह्मसायुज्यता वाहे । तरी सांडूनि देहाची सोये ।
शुद्ध ब्रह्मधारणा पाहे । तो ब्रह्मचि होये स्वतःसिद्ध ॥३९॥
जरी तो ब्रह्मस्वरूपाची इच्छा धरील, तरी पूर्वदेहाचे भान सोडून शुद्ध ब्रह्माच्याच ध्यानांत तो निमग्न होईल आणि तो स्वतःसिद्ध ब्रह्मच होईल ३९.

यापरी प्राणधारण । करूनि निवर्ते जो जाण ।
तें स्वच्छंदमृत्यूचें लक्षण । त्याआधीन कळिकाळ ॥१४०॥
झाप्रमाणे प्राणाचें धारण करून जो आपला देह ठेवतो, तेच त्याचे स्वच्छंद मृत्यूचे लक्षण होय. कळिकाळसुदा त्याच्या आधीन असतो १४०.

विहरिष्यन् सुराक्रीडे मत्स्थं सत्त्वं विभावयेत् ।
विमानेनोपतिष्ठन्ति सत्त्ववृत्तीः सुरस्त्रियः ॥ २५ ॥
[श्लोक २५] देवतांच्या विहारस्थलांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या ठिकाणच्या सत्त्वगुणाचे ध्यान करावे त्यामुळे सत्त्वगुणाच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात. (२५)

देवांचे दिव्यभोगीं आसक्त । योगियाचें झाल्या चित्त ।
ते प्राप्तिलागीं येथ । माझें सत्त्व निश्चित चिंतावें ॥४१॥
किंवा देवांच्या दिव्य उपभोगांमध्ये योग्याचे चित्त आसक्त झाले असेल, तर त्याने ते उपभोग मिळण्याकरितां खरोखर माझ्या सत्वाचीच धारणा करावी ४१.

जेणें सत्त्वें म्यां जाण । स्वर्गीं स्थापिले सुरगण ।
त्या सत्त्वगुणाचें धारण । निजहृदयीं जाण जो राखे ॥४२॥
ज्या सत्वाच्या योगाने मी स्वर्गामध्ये देवांची स्थापना केली आहे, त्या सत्वगुणाचीच धारणा जो आपल्या हृदयामध्ये ठेवतो ४२,

ध्यातां सुरस्त्रियांची कामनिष्ठा । तो पावे सुरस्वर्गींची प्रतिष्ठा ।
विमानीं चढोनि वरिष्ठा । करी कामचेष्टा अप्सरांसीं ॥४३॥
त्याने देवांगनांची इच्छा धरिली असता त्याला स्वर्गातील देवाचाही मान मिळतो. तो विमानात बसून अप्सरांशी यथेच्छ कामविलास भोगतो ४३.

यथा सङ्कल्पयेद् बुद्ध्या यदा वा मत्परः पुमान् ।
मयि सत्ये मनो युञ्जंस्तथा तत् समुपाश्नुते ॥ २६ ॥
[श्लोक २६] माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने, सत्यसंकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केले असेल त्याचा संकल्प सिद्ध होतो. मनाने ज्या वेळी जो संकल्प तो करतो, त्याचवेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो. (२६)

संकल्पमात्रें करी समस्त । जो मी सत्यसंकल्प भगवंत ।
त्या माझे ठायीं चित्त । विश्वासयुक्त जो राखे ॥४४॥
संकल्पमात्रानेच सर्व कार्ये करणारा असा जो मी सत्यसंकल्प भगवान्, त्या माझ्या ठिकाणी विश्वासपूर्वक जो आपलें चित्त ठेवतो ४४,

तो जे जे काळीं जे जे देशीं । जे जे कर्मीं जे जे अवस्थेसी ।
जें जें कांहीं वांछीं मानसीं । ते संकल्प त्यापाशीं सदा सफळ ॥४५॥
तो ज्या ज्या काळी, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या कामांत आणि ज्या ज्या स्थितीत ज्याची ज्याची मनांत इच्छा करील, ते ते मनोरथ त्याला नेहमी सफल होतात ४५.

मी सत्यसंकल्प भगवंत । हृदयीं धरिल्या ध्यानयुक्त ।
त्याचें जे जे काम कामी चित्त । ते संकल्प प्राप्त होती त्यासी ॥४६॥
सत्यसंकल्प भगवान् अशा मला ध्यानधारणेनें जो हृदयांत धरील, त्याचे मन ज्या ज्या काही इच्छा करील, त्या इच्छा त्याला प्राप्त होतात ४६.

यो वै मद्‍भावमापन्न ईशितुर्वशितुः पुमान् ।
कुतश्चिन्न विहन्येत तस्य चाज्ञा यथा मम ॥ २७ ॥
[श्लोक २७] ‘ईशित्व’ आणि ‘वशित्व’ अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावाने युक्त होतो, माझ्याप्रमाणेच त्याची आज्ञासुद्धा कोणी टाळू शकत नाही. (२७)

जो कां मी सर्वांचा नियंता । स्वयें स्वतंत्र तत्त्वतां ।
त्या माझें ध्यान करितां । मद्‍भावता उपतिष्ठे ॥४७॥
किंवा सर्वांचा नियंता व खरोखर स्वतः स्वतंत्र असा जो मी, त्या माझे ध्यान केले असता योग्याला मत्स्वरूपच प्राप्त होते ४७.

मीचि भगवंत सुनिश्चित । ऐसें बोधा आलें यथास्थित ।
त्याची आज्ञा सुरवर वंदित । पशुपक्षी नुल्लंघित ते आज्ञा ॥४८॥
खरोखर भगवंत तो मीच असें नीट रीतीने ज्याला पटले, त्याची आज्ञा श्रेष्ठ देवसुद्धा शिरसावंद्य करतात. अर्थात् पशुपक्षी देखील ती आज्ञा उल्लंघन करणार नाहीत ४८.

जैशी माझी आज्ञा सर्वांवरी । तैशी त्याची आज्ञा चराचरीं ।
कोणी नुल्लंघिती तिळभरी । ते आज्ञासिद्धि खरी तो लाहे ॥४९॥
सर्वांवर जशी माझी आज्ञा चालते, त्यापमाणे त्याची आज्ञाही सर्व चराचरावर चालते. त्या आज्ञेचे कोणी तिळभरसुद्धां उलंघन करीत नाही. अशी खरी ‘आज्ञासिद्धि’ त्याला प्राप्त होते ४९.

एवं या गुणहेतुसिद्धि दहाही । धारणायुक्त सांगीतल्या पाहीं ।
आतां क्षुद्र पंचसिद्धि ज्याही । तुज मी त्याही सांगेन ॥१५०॥
अशा प्रकारे या गुणहेतु असलेल्या दहाही सिद्धि धारणेसहवर्तमान तुला सांगितल्या. आतां क्षुद्र अशा ज्या पांच सिद्धि, त्याही तुला मी सांगतों १५०.

मद्‍भक्त्या शुद्धसत्त्वस्य योगिनो धारणाविदः ।
तस्य त्रैकालिकी बुद्धिर्जन्ममृत्यूपबृंहिता ॥ २८ ॥
[लोक २८] माझी धारण करीत करीत ज्या योग्याचे चित्त माझ्या भक्तीने शुद्ध झाले असेल, त्याला जन्ममृत्यूसह तिन्ही काळांतील सर्व गोष्टी समजतात. (२८)

जगाचें उत्पत्तिस्थितिनिदान । सत्य असे मज‍अधीन ।
त्या माझ्या ठायीं करितां भजन । अंतःकरण अतिशुद्ध ॥५१॥
जगाची उत्पत्ति, स्थिति आणि लय ही खरोखर माझ्याच आधीन आहेत. त्या माझ्या ठिकाणी भजन केलें असतां अंतःकरण अत्यंत शुद्ध होतें ५१.

ते शुद्ध‍अंतःकरणीं जाण । भूत भविष्य वर्तमान ।
जगाचें जन्म भोग मरण । हे त्रिकाळज्ञान सिद्धि प्रकटे ॥५२॥
त्या शुद्ध झालेल्या अंत:करणांत भूत, भविष्य व वर्तमान, भाणि जगाचे जन्मभोग व मरण यांचे त्रिकालज्ञान होण्याची सिद्धि प्राप्त होते ५२.

अग्न्यादिभिर्न हन्येत मुनेर्योगमयं वपुः ।
मद्योगशान्तचित्तस्य यादसामुदकं यथा ॥ २९ ॥
[श्लोक २९] पाण्यात राहणार्‍या प्राण्यांचा पाण्याकडून नाश होत नाही, त्याचप्रमाणे ज्या योग्याचे चित्त माझ्यामध्ये स्थिर झाले आहे, त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. (२९)

अतिप्रयास करितां चित्त । मजसी योगातें झालें प्राप्त ।
तेणें योगें शरीर योगयुक्त । अबाधित महाद्वंद्वीं ॥५३॥
चित्ताने अत्यंत कष्ट करावे, तेव्हा त्याचा माझ्याशी योग होतो. चित्ताचा माझ्याशी योग झाला म्हणजे शरीरही योगयुक्त होते, आणि त्या शरीराला मोठमोठ्या द्वंद्वांपासूनही बाधा होत नाही ५३.

त्यासी बाधीना शीत उष्ण । मृदु आणिक कठिण ।
अग्नि लागलियाही जाण । देह दहन नव्हे त्याचा ॥५४॥
त्याला थंडी किंवा उन्हाळा, मऊ किंवा कठीण, यांची बाधा होत नाही. त्याच्या देहाला अग्नि लागला तरीसुद्धा त्याचा देह जळत नाही ! ५४.

ते अग्निमाजीं विश्रांति त्यासी । जेवीं कां जळीं जळचरांसी ।
अद्वंद्वतासिद्धि ऐसी । साधकासी उपतिष्ठे ॥५५॥
जळांत जशी जलचरें खुशाल राहतात, त्याप्रमाणे तो अग्नीतही खुशाल विश्रांति घेत राहतो. अशी ‘अद्वंद्वता’ नामक सिद्धि साधकाला प्राप्त होते ५५.

येचि सिद्धिच्या धारणा । प्रतिष्टंभसिद्धी प्रकटे जाणा ।
ऐक तिच्याही लक्षणा । जिचे तोडरीं जाणा सकळ बाधा ॥५६॥
ह्याच सिद्धीच्या धारणेनें ‘प्रतिष्टंभ’ सिद्धि उत्पन्न होते. सर्व बाधांपासून मुक्त करण्याविषयींच्या ब्रीदाचे तोडर जिनं पायांत घातले आहेत, अशा त्या ‘प्रतिष्टंभ’ सिद्धीचें लक्षणही ऐक ५६.

त्यासी बाह्य वायूचेनि झडाडें । बाधकता कदा न घडे ।
प्राण जिंतोनि आंतुलीकडे । करी रोकडे दासी त्यासी ॥५७॥
त्याला बाहेरच्या वायूच्या सोसाट्याने पीडा होते असे कधी घडत नाही. तो प्राणालाही जिंकून त्याला आंत बटकीप्रमाणे करून ठेवतो ५७.

देंठ फेडूनि सुमनसेजे । जेवीं कां सुखें निद्रा कीजे ।
तेवीं इंगळावरी हा निजे । बाधा नुपजे अग्नीची ॥५८॥
देठे काढून टाकलेल्या फुलांच्या शय्येवर ज्याप्रमाणें सुखाने निजावें, त्याप्रमाणे तो जळजळीत निखाऱ्यावर निजतो. त्याला त्या अग्नीची पीडा होत नाही ५८.

शीतळ जळीं शीतकाळीं । सिद्ध बुडविल्या कौतुकें जळीं ।
तो बाहेरी निघावया न तळमळी । जळीं मासोळी जेवीं क्रीडे ॥५९॥
थंडीच्या दिवसांत मौजेने गार पाण्यांत नेऊन सिद्धाला बुडविलें असतांही तो बाहेर निघण्याकरितां कधींच तळमळत नाही. पाण्यांत मासा जसा खेळत असतो, त्याप्रमाणे तो खुशाल क्रीडा करीत असतो ५९.

ग्रीष्मकाळींचें निदाघ उष्ण । त्यामाजीं सिद्ध घातल्या जाण ।
रविकरीं पद्म उल्हासे गहन । तैंसे लागतां उष्ण तो टवटवी ॥६०॥
किंवा ग्रीष्मऋतूंतील रखरखीत ऊन असते त्यांत सिद्धाला ठेवलें असतांही सूर्यकिरणांनी कमल जसें प्रफुल्लित होते, त्याप्रमाणे त्याला ऊन लागले असता तो अधिकच टवटवीत होतो १६०.

यापरी अर्कबाधकता । त्यासी बाधीना सर्वथा ।
तैशींच सिद्धासी शस्त्रें लागतां । शस्त्रघाता नातुडे तो ॥६१॥
ह्याप्रमाणे सूर्याचा तापही त्याला मुळीच बाधत नाहीं. त्याचप्रमाणे सिद्धाला शस्त्राचे घाव लागले असताही तो शस्त्रापासून पीडा पावत नाही ६१.

आकाश खोचूं जातां पाहें । शस्त्रेंसीं घावो वायां जाये ।
तेवीं सिद्धासी न लागती घाये । शस्त्र ‍उपाये सुनाट ॥६२॥
शस्त्राने आकाशावर घाव घालू लागले असतां तो घावच फुकट जातो, त्याप्रमाण सिद्धालाही शस्त्राचे घाव लागत नाहीत. शास्त्राचे सारे उपाय निष्फळ होतात ६२.

सिद्धासी दिधलिया विख । विखही नव्हे त्या बाधक ।
जेवीं विखकिडे विखीं देख । यथासुख क्रीडती ॥६३॥
सिद्धाला विष दिले असतां ते विषसुद्धा त्याला बाधक होत नाही. ज्याप्रमाणे विषांतील किडे विषांत सुखाने नांदतात, त्याप्रमाणे तोही सुखाने राहातो ६३.

छाया पर्वतातळीं दडपितां । ते दाटेना जेवीं पर्वता ।
तेवीं अग्नि अर्क विष वाता । सिद्धासी सर्वथा बाधेना ॥६४॥
छाया पर्वताच्या खाली दडपली असतां ती जसी त्याला खुपत नाही, त्याप्रमाणेच अग्नी, सूर्य विष, पाणी किंवा वारा यांपैकी कांहींच सिद्धाला कधीं बाधत नाही ६४.

ऐकोनि सिद्धींची कथा । उल्हासू जरी माने चित्ता ।
तरी माझे प्राप्तीसी तत्त्वतां । सिद्धि सर्वथा बाधक ॥६५॥
ह्या सिद्धीच्या गोष्टी ऐकून मनाला जरी मोठा उल्हास वाटला, तरी माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धि या सर्वस्वी बाधक आहेत ६५.

माझें स्वरूप शुद्ध अद्वैत । तेथ सिद्धींचें जे मनोरथ ।
लोकरंजन समस्त । नाहीं परमार्थ सिद्धींमाजीं ॥६६॥
माझे स्वरूप शुद्ध असून अद्वैत आहे. त्यांत सिद्धीचे जे मनोरथ असतात, ते सर्व केवळ लोकरंजनाकरितां आहेत. सिद्धींमध्ये कांहीं परमार्थ नाहीं ६६.

मागिलेचि श्लोकसंधीं । परचित्ताभिज्ञतेचि सिद्धी ।
ध्वनित सुचविली त्रिशुद्धी । तिचाही विधी अवधारीं ॥६७॥
मागच्या श्लोकाच्या शेवटी ‘परचित्ताभिज्ञता’ या नावाची एक सिद्धि ध्वनितार्थाने सांगितली आहे, तिचेही लक्षण ऐक ६७.

तेच श्लोकीं व्याख्यान । करितां भगवंताचें ध्यान ।
प्रकृतिनियंता आपण । साक्षी जाणा सर्वांचा ॥६८॥
त्याच श्लोकांत असे सांगितले आहे की, भगवंताचें ध्यान करतांना प्रकृतीचे नियमन करणारा आणि सर्वांचा साक्षी आपणच होतो ६८.

ऐसें ईश्वरत्व दृढ ध्यातां । चित्तचालकता ये त्याच्या हाता ।
तेव्हां चित्ताची अभिज्ञता । स्वभावतां उपतिष्ठे ॥६९॥
अशा ईश्वराचे ध्यान केले असतां चित्ताची चालकताच त्याला प्राप्त होते. त्यामुळे चित्ताचे जाणतेपण असते ते त्याला सहजच साध्य होते ६९.

तेव्हां जीवाची स्वप्नावस्था । हा साक्षित्वें देखता ।
जो जो संकल्प त्याच्या चित्ता । तो स्वभावतां हा जाणे ॥७०॥
ज्या वेळी जिवाची स्वमावस्था हा साक्षित्वाने पहात असतो. जो जो संकल्प त्याच्या चित्तांत चालतो, तो तो ह्याला कळत असतो १७०.

जिव्हारींची जे आवडी मोटी । ते हा अवलीला सांगे गोष्टी ।
एवढी सिद्धीची कसवटी । उठाउठी तो लाभे ॥७१॥
त्याच्या अंत:करणांतील जी अगदी गुप्त आवड असेल, तिच्यासंबंधींच्या गोष्टी हा सहज सांगू शकतो. एवढी ह्या सिद्धीची महती त्याला तत्काळ साध्य होते ७१.

मद्‌विभूतीरभिध्यायन् श्रीवत्सास्त्रविभूषिताः ।
ध्वजातपत्रव्यजनैः स भवेदपराजितः ॥ ३० ॥
[श्लोक ३०] जो योगी श्रीवत्स इत्यादी चिह्ने आणि शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी आयुधांनी विभूषित, त्याचप्रमाणे ध्वज, छत्र, चामर इत्यादींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचे ध्यान करतो, तो अजिंक्य होतो. (३०)

अपराजय सिद्धीची प्राप्ती । ध्याना आणावी माझी मूर्ती ।
जिचेनि नांवे जयो पावती । जाण निश्चितीं सुरवर ॥ ७२॥
‘अपराज’ सिद्धीची प्राप्ति पाहिजे असेल तर माझी मूर्ति ध्यानात आणावी. जिच्या नामेंकरून मोठमोठे देवादिकही हटकून जय मिळवितात ७२.

चतुर्भुज घनश्याम । शंखचक्रगदापद्म ।
छत्रातपत्र चामरयुग्म । ध्वजीं उत्तम गरुडलांछन ॥७३॥
चतुर्भुज; मेघाप्रमाणे श्यामवर्ण; शंख, चक्र, गदा, पद्म, छत्र, चामरे, अबदागीर, ध्वजावर उत्तम गरुडलांछन ७३;

रत्‍नदंडें झणत्कार । व्यजन वीजिती सनागर ।
चरणीं गर्जती तोडर । तोडरीं अपार अरिवर्ग ॥७४॥
रत्नखचित्त दांड्याच्या झणकाराने उत्तम पंखा हालत आहे; पायांत पैंजण वाजत आहेत आणि असंख्य शत्रु पायांतील तोडराजवळ शरण आलेले आहेत ७४,

ऐशिये माझे मूर्तीचें ध्यान । जो सर्वदा करी सावधान ।
तो सर्वत्र विजयी जाण । अभंगपण माझेनी ॥७५॥
अशा माझ्या मूर्तीचे ध्यान जो सदासर्वदा दक्ष राहून करील, तो सर्वत्र विजयी होईल आणि माझ्या प्रतापाने त्याचा कोठेच पराभव होणार नाहीं ७५,

तो माझेनि ध्यानें पाहें । कोणी न मेळवितां साह्ये ।
एकला सर्वत्र विजयी होये । ऐशी सिद्धि लाहे या निष्ठा ॥७६॥
हे पहा ! तो केवळ माझ्याच ध्यानानें कोणाचेही साह्य न घेता एकटाच सर्वत्र विजयी होतो. एवढी ह्या निष्ठेने सिद्धि प्राप्त होते ७६.

जो मी हृदयीं धरी अजितू । तो सर्वत्र होय अपराजितू ।
ऐसें सांगोनि भगवंतू । उपसंहारितू सिद्धींतें ॥७७॥
अजित अशा मला जो हृदयांत धरतो, तो सर्वत्र अजिंक्य असतो. इतकें सांगून भगवंतांनी सिद्धीच्या वर्णनाचा उपसंहार केला ७७.

उपासकस्य मामेवं योगधारणया मुनेः ।
सिद्धयः पूर्वकथिता उपतिष्ठन्त्यशेषतः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] अशा प्रकारे जो माझे चिंतन करणारा पुरूष योगधारणेने माझी उपासना करतो, त्याला मी वर्णन केलेल्या सिद्धी पूर्णपणे प्राप्त होतात. (३१)

म्यां सांगीतल्या ज्या योगधारणा । मज भजतां त्या भावना ।
त्या त्या सिद्धी त्यासी जाणा । पूर्वोक्तलक्षणा उपजती ॥७८॥
मी ज्या ज्या योगधारणा सांगितल्या, त्या त्या भावनेने माझे जो भजन करील, त्याला त्या त्या सिद्धि पूर्वोक्त लक्षणांप्रमाणे साध्य होतील ७८.

अनेक भावना धरितां चित्तीं । त्या त्या धारणेच्या व्युत्पत्ती ।
अनेक सिद्धींची होय प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७९॥
किंवा चित्तामध्ये अनेक स्वरूपाचे ध्यान केल्यास त्या त्या धारणेच्या अनुरोधाने हे उद्धवा ! खरोखर त्यालाही अनेक सिद्धींची प्राप्ति होईल ७९,

नाना योगधारणाव्युत्पत्ती । न करितां सकळ सिद्धींची प्राप्ती ।
एके धारणेनें होय निश्चितीं । ते मी तुजप्रती सांगेन ॥१८०॥
अशा अनेक योगधारणांची यातायातही न करितां खरोखर ज्या एकाच धारणेने सर्व सिद्धींची प्राप्ती होते, ती धारणा मी तुला सांगतों ८०.

जितेन्द्रियस्य दान्तस्य जितश्वासात्मनो मुनेः ।
मद्धारणां धारयतः का सा सिद्धिः सुदुर्लभा ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] ज्याने आपले प्राण, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे, त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार ? (३२)

पांच पांच इंद्रियांची जोडी । जिणोनि शमदमपरवडी ।
उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥८१॥
पांच पांच इंद्रियांची जी जोडी आहे, ती शमदमांच्या बळाने जिंकून वैराग्याची गुढी उभारून प्राणापानांच्या ओढीही जिंकल्या ८१,

विवेकाचेनि बळें जाण । वृत्ति राखोनि सावधान ।
सदा करितां माझें मनन । मननें मन जिंकिलें ॥८२॥
आणि विवेकाच्या बळाने वृत्तीला सावध ठेवून सर्वकाळ माझेंच मनन केले की, त्या मननानेच मन जिंकलें जाते ८२.

यापरी गा साधकासी । धारणा धरोनि मानसीं ।
मी एक ध्यातां अहर्निशीं । सकळ सिद्धी दासी त्यासी होती ॥८३॥
ह्याप्रमाणे साधकाने आपल्या मनांत धारणा धरून रात्रंदिवस एक माझेच ध्यान केले असता, सर्व सिद्धि त्याच्या दासी होतात ८३.

सांडूनि सकळ उपाये । मी एक ध्यानीं धरिल्या पाहें ।
साधकासी काय उणें आहे । दुर्लभ काये सिद्धींचे ॥८४॥
सर्व उपाय सोडून देऊन एक माझेच ध्यान केले असता त्या साधकाला काय कमी आहे ? आणि सिद्धींची दुर्लभता ती कसली ? ८४.

माझे भजनें सावकाशीं । सिद्धी प्रकटती साधकासी ।
त्या सेव्य नव्हती त्यासी । तेंचि हृषीकेशी सांगतू ॥८५॥
माझें भजन केले असतां साधकाला अवश्य सिद्धि प्राप्त होतात, पण त्याने त्यांचा उपभोग घेणे योग्य नव्हे. हेच श्रीकृष्ण सांगत आहे ८५.

अन्तरायान् वदन्त्येता युञ्जतो योगमुत्तमम् ।
मया सम्पद्यमानस्य कालक्षपणहेतवः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] परंतु श्रेष्ठ पुरूष असे सांगतात की, जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत, त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे कारण यांच्यामुळे भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. (३३)

अहेतुक करितां माझें भजन । तेणें शीघ्र माझी प्राप्ती जाण ।
तेथें सिद्धींवरी घालिता मन । आली नागवण मत्प्राप्तीसी ॥८६॥
अहेतुकपणाने माझें भजन केले असता त्यामुळे फार लौकर माझी प्राप्ति होते. पण त्या वेळी जर सिद्धींवर मन ठेवले, तर माझ्या प्राप्तीला अडथळा आलाच ! ८६.

ज्यासी विषयभोग लागे गोड । तोचि सिद्धींची वाहे चाड ।
ज्यासी माझे प्राप्तीचें कोड । तो वांछीना बंड ऋद्धिसिद्धींचें ॥८७॥
ज्याला विषयभोग गोड वाटतो, तोच सिद्धींचा लोभ बाळगतो. परंतु ज्याला माझ्या प्राप्तीची आवड असते, तो ऋद्धिसिद्धींच्या थोतांडाची मुळीच इच्छा करीत नाही ८७.

ज्यासी लौकिकीं अतिप्रतिष्ठा । तो सिद्धींच्या सोशी खटपटा ।
ज्यासी मत्प्राप्तीची निष्ठा । तो वचेना वाटा सिद्धींच्या ॥८८॥
ज्याला लोकांमध्ये मानमान्यता मिळविण्यांतच मोठेपणा वाटतो, तोच सिद्धींची यातायात सोसतो. ज्याला माझ्याच प्राप्तीची आवड असते, तो सिद्धींच्या वाटेला जात नाही ८८.

पावतपावतां वाराणसी । जो वस्तीसी गेला वेश्यागृहासी ।
तेथें भुलोनि तिच्या भोगासी । सर्वस्व तियेसी समर्पी ॥८९॥
काशीला जातां जातां प्रवासांत एखादा मनुष्य वेश्येच्याच घरी मुक्कामास उतरला, आणि तेथे तिच्या भोगविलासाला लुब्ध होऊन आपल्याजवळील सर्व द्रव्य त्याने तिला अर्पण केले ८९;

इयेपासूनि जीवेंप्राणें । सर्वथा वेगळें नाहीं जाणें ।
ऐसा संकल्प करोनि तेणें । वश्य होणें वेश्येसी ॥१९०॥
आतां प्राण गेला तरी हिला सोडून मुळीच जावयाचे नाही असा त्याने निश्चय करून तो त्या वेश्येला लंपट होऊन राहिला १९०,

जंव असे गांठी गांठोडी । तंव ते त्यापाशीं लुडबुडी ।
निःशेष वेंचलिया कवडी । बाहेरी दवडी तत्काळ ॥९१॥
तरी पण त्याच्यापाशी जोपर्यंत गांठोडे असते, तोपर्यंतच ती वेश्या त्याच्याजवळ लुडबुडत असते आणि त्याचे सारे द्रव्य जाउन कवडीसुद्धा त्याच्यापाशी राहिली नाही की, ती त्याला लगेच बाहेर घालवून देते ९१.

तो दवडितांही न जाये । निर्लज्ज निःसंगु होऊनि राहे ।
तरी आपणचि सांडोनि जाये । तैशाचि पाहें महासिद्धी ॥९२॥
ती त्याला बाहेर घालवीत असतांही तो बाहेर गेला नाही, आणि निर्लज, कोडगा होऊन तेथेच लाळ घोटीत राहिला, तर ती आपणच त्याला सोडून निघून जाते. त्याप्रमाणेच महासिद्धींची गोष्ट आहे ९२.

सकळ पापांतें निर्दळणें । सकळ कुळांतें उद्धरणें ।
तें काशीचें खुंटलें पावणें । वेश्यानागवणें भोगलिप्सा ॥९३॥
सर्व पातकांचे क्षालन करावयाचे, सर्व कुलांचा उद्धार करावयाचा, ह्याकरितां तें काशीस जाणे आपोआपच राहिले आणि कामलोलुप झाल्यामुळे वेश्येकडून सर्वस्वी लुबाडून मात्र घ्यावे लागले ९३.

तैसीच सिद्धींचीही कथा । माझे प्राप्तीसी प्रतिबंधभूता ।
माझें ध्यान ज्ञान वैराग्यावस्था । नागवूनि रिता सांडिती ॥९४॥
सिद्धींची गोष्टही तशीच आहे. त्या माझ्या प्राप्तीला प्रतिबंधकारक होतात आणि माझे ध्यान, ज्ञान व वैराग्यस्थिति ह्यांपासून साधकाला पराङ्मुख करून निखालस कफल्लक करून सोडतात ९४.

माझे प्राप्तीनिकट जाण । उठे सिद्धींची नागवण ।
भोगें छळावया व्यामोहकपण । विलंबकारण मत्प्राप्ती ॥९५॥
माझ्या प्राप्तीजवळच सिद्धींची लुबाडणूक चालू असते. त्या सुखोपभोगाचे आमिष दाखवून छळण्याकरितां मनाला मोह उत्पन्न करतात. माझ्या प्राप्तीला विलंब लागण्यास तेच कारण होते ९५.

माझें स्वरूप अद्वैतता । तेथें सिद्धींच्या नानावस्था ।
ते मायेची व्यामोहकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥९६॥
उद्धवा ! माझें स्वरूप अद्वैत आहे. आणि त्यांत सिद्धींची जी अनेक स्वरूप दिसतात, ती खरोखर मायेची भूल होय हे लक्षात ठेव ९६.

माझे प्राप्तीआड सिद्धींचें विघ्न । हेंचि तुज कळावया जाण ।
म्यां सर्व सिद्धींचें निरूपण । समूळ संपूर्ण सांगीतलें ॥९७॥
माझ्या प्राप्तीच्या आड सिद्धींचं विघ्न येते, हेच तुला कळावे म्हणून मी सर्व सिद्धीचे सविस्तर स्वरूप पूर्णपणे तुला सांगितले ९७.

माझ्या ठायीं धरितां ध्यान । एकाग्रता होतां मन ।
तेथ भोगलिप्सा सिद्धी जाण । करिती नागवण साधका ॥९८॥
माझ्या ठिकाणी ध्यान धरले असतां आणि मनाची एकाग्रता झाली असतां तेथे साधक जर सुखोपभोगांच्या नादी लागला, तर सिद्धि त्या साधकाची लुबाडणूक करतात ९८.

जन्मौषधितपोमन्त्रैः यावतीरिह सिद्धयः ।
योगेनाप्नोति ताः सर्वा नान्यैर्योगगतिं व्रजेत् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४ ] जन्म, औषधी, तपश्चर्या आणि मंत्र इत्यादींमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्या सर्व योगाच्या द्वारे प्राप्त होतात परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत्प्राप्ती, ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. (३४)

सिद्धींचे प्राप्तीचें कारण । जन्मौषधि मंत्र तप जाण ।
कां साधल्या प्राणापान । सकळ सिद्धी जाण योगाभ्यासीं ॥९९॥
जन्म, औषधी, मंत्र, तप इत्यादिकांनीही सिद्धि प्राप्त होतात. किंवा योगाभ्यास करतांना प्राणापान साध्य झाले तरीही सर्व सिद्धि प्राप्त होतात ९९.

एकी जन्मास्तव सहज सिद्धी । एकी त्या साधिती औषधी ।
एकी त्या तपादि महाविधी । एकी त्या त्रिशुद्धि मंत्रद्वारा ॥२००॥
कित्येकांना जन्मत:च सहज सिद्धि प्राप्त झालेल्या असतात, कोणी दिव्य वनस्पतींच्या साहाय्यानेच सिद्धि प्राप्त करून घेतात. कोणी तपादिक महान् साधने करून सिद्धि मिळवितात. आणि कोणी त्या मंत्रद्वाराने खरोखर साध्य करतात २००.

सर्पासी वायुधारण । मीनासी जळतरण ।
पक्ष्यासी नभोगमन । हे जन्मसिद्धि जाण स्वाभाविक ॥१॥
सर्पाला वायुभक्षण, मत्स्याला पाण्यात पोहणे, पक्ष्याला आकाशात उडणे, ह्या सिद्धि त्यांना जन्मत:च आपोआप प्राप्त झालेल्या आहेत १.

हंस निवडी क्षीरनीर । कोकिळेसी मधुर स्वर ।
चंद्रामृत सेवी चकोर । हे सिद्धि साचार जन्मास्तव ॥२॥
हंस हा पाणी आणि दूध वेगळे वेगळे करतो, कोकिळा मधुर स्वराने गायन करते, चकोर चंद्रामृताचे सेवन करतो, ह्याही सिद्धि खरोखर त्यांना जन्मापासूनच प्राप्त झालेल्या असतात २.

जन्मास्तव सहज सिद्धी । त्या म्यां सांगीतल्या सुबुद्धी ।
आतां साधिलिया औषधी । लाभती सिद्धी त्या ऐक ॥३॥
ह्याप्रमाणे जन्मापासूनच ज्या नैसर्गिक सिद्धि प्राप्त होतात, त्या मी तुला चांगल्या रीतीने सांगितल्या. आतां काही दिव्यौषधींचे साधन केले असतांही सिद्धि प्राप्त होत असतात, त्याही सांगतो ऐक ३.

श्वेतमांदारीं गजानन । अंगारकचतुर्थी साधिल्या जाण ।
सकल विद्यांचें होय ज्ञान । धनधान्यसमृद्धी ॥४॥
पांढऱ्या मांदाराच्या झाडाखाली गजाननाची पूजा करून अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व विद्यांचे ज्ञान होते, व धनधान्याची समृद्धि होते ४.

अजानवृक्षाची वोळखण । त्याचीं फळें श्वानमुखें जाण ।
त्याचें घडल्या क्षीरपान । होय आपण अजरामर ॥५॥
अजानवृक्षाची ओळख हीच की, त्याची फळे कुत्र्याच्या तोंडासारखी असतात. त्या वृक्षाचे दूध प्यावयास मिळाले तर तो मनुष्य स्वतः अजरामर होतो ५.

पिचुमंद नित्य सेविल्या देख । त्यासी बाधीना कोणी विख ।
पाताळगरूडीचें प्राशिल्या मुख । त्यासी देहदुःख बाधीना ॥६॥
कडूलिंब नित्य सेवन केला असता त्याला कोणतेही विष बाधत नाही. पाताळगरुडीचे तोंड प्राशन केल्यास त्याला देहासंबंधी कोणतीच पीडा होत नाहीं ६.

पूतिकावृक्षाचे मूळीं । असे महाशक्तीची पुतळी ।
ते साधल्या अप्सरांचे मेळीं । क्रीडे तत्काळीं साधक ॥७॥
पूतिकावृक्षाच्या मुळामध्ये तर महच्छत्तीची पुतळीच असते. ही साध्य केली असतां साधक हा तत्काळ अप्सरांच्या घोळक्यांतच क्रीडा करूं लागतो ७

अनंत औषधी अनंत सिद्धी । त्यांची साधना कठिण त्रिशुद्धी ।
तपादि सिद्धींची विधि । ऐक सुबुद्धी उद्धवा ॥८॥
अशा औषधी अनंत आहेत, आणि सिद्धीही अनंत आहेत. त्यांचे साधन होणेही खरोखर कठीणच आहे. आता हे बुद्धिमान् उद्धवा ! तपादि सिद्धींचे विधि कसे असतात तेही ऐक ८.

कृच्छ्र पराक चांद्रायण । आसार जलाशय धूम्रपान ।
तप करी जें जे भावून । ते ते सिद्धि जाण तो पावे ॥९॥
कृच्छ, पराक, चांद्रायण, इत्यादि व्रतें करणें, पर्जन्याच्या धारांत बसणे, पाण्यांत उभे राहणे, धूम्रपानादि साधन करणे इत्यादि जी जी तपे आहेत; ती मनामध्ये जी जी भावना धरून आचरण करावीत, ती ती सिद्धि त्याला प्राप्त होते ९.

ऐक मंत्रसिद्धीचें लक्षण । प्रेतावरी बैसोनि आपण ।
एक रात्र केल्या अनुष्ठान । प्रेतदेवता संपूर्ण प्रसन्न होय ॥२१०॥
आतां मंत्रसिद्धीचे लक्षण ऐक. आपण प्रेतावर बसून एक रात्र अनुष्ठान केले असतां प्रेतदेवता पूर्णपणे प्रसन्न होते २१०.

तेणें भूत भविष्य वर्तमान । ते सिद्धि प्राप्त होय जाण ।
करितां सूर्यमंत्रविधान । दूरदर्शनसिद्धि उपजे ॥११॥
त्यामुळे भूत, भविष्य, वर्तमान अशा सर्व ज्ञानाची सिद्धि प्राप्त होते हे लक्षात ठेव, सूर्यमंत्राचे अनुष्ठान केले असतां दूरदर्शनसिद्धि प्राप्त होते ११.

जैसा मंत्र जैसी बुद्धी । तैसी त्यास प्रकटे सिद्धी ।
या सकळ सिद्धींची समृद्धी । योगधारणाविधीमाजीं असती ॥१२॥
जसा मंत्र आणि इच्छा असते, त्याप्रमाणेच त्याला सिद्धि प्राप्त होते. परंतु ह्या सर्व सिद्धींची समृद्धि एका योगधारणेमध्ये असते १२.

नेहटूनियां आसना । ऐक्य करोनि प्राणापानां ।
जो धरी योगधारणा । सकळ सिद्धी जाणा ते ठायीं ॥१३॥
दृढ आसन घालून प्राणापानांचे ऐक्य करून जो योगधारणा करील, त्याच्या ठिकाणी सर्व सिद्धि प्राप्त होतात १३.

म्यां सांगीतली सिद्धींची कथा । झालिया प्राणापानसमता ।
आलिया योगधारणा हाता । तैं सिद्धी समस्ता प्रकटती ॥१४॥
मी सिद्धींची गोष्ट तुला सांगितलीच की, प्राणापान सम झाले असतां व योगधारणा साध्य झाली असता सर्वच सिद्धि प्रगट होतात १४.

प्राणापान समान न करितां । योगधारणाही न धरितां ।
मज एकातें हृदयीं धरितां । सिद्धी समस्ता दासी होती ॥१५॥
किंवा प्राणापानही सम न करितां, योगधारणाही न धरितां, मला एकालाच हृदयांत ठेवलें असतांही सर्व सिद्धि दासी होतात १५.

मज पावावया तत्त्वतां । मज एकातें स्मरतां ध्यातां ।
पावो देऊन सिद्धींचे माथां । चारी मुक्ति स्वभावतां दासी होती ॥१६॥
खरोखर मला जर पावावयाचे असेल तर, माझें एकाचेच स्मरण केले, माझे एकाचंच ध्यान केले, तरी सर्व सिद्धींच्या माथ्यावर पाय देऊन चारही मुक्ति आपोआप दासी होऊन राहातात १६.

नाना सिद्धींची धारणा धरितां । माझी सलोकता समीपता ।
हाता न ये गा सरूपता । मग सायुज्यता ते कैंची ॥१७॥
नाना प्रकारच्या सिद्धींचा विचार करीत बसले, तर माझी सलोकता, समीपता किंवा सरूपता हाती लागत नाही. मग सायुज्यतेची गोष्ट कशाला ? १७.

माझे अतिशयें शुद्ध भक्त । ते मुक्तीसी दूर दवडित ।
माझेनि भावार्थें नित्यतृप्त । ते पूज्य होत मजलागीं ॥१८॥
माझे जे अत्यंत शुद्ध भक्त असतात, ते मुक्तीलाही दूर झुगारून देतात. ते माझ्या भक्तीमध्येच निरंतर तृप्त असतात. आणि तेच मला पूज्य होतात १८.

जो सकळ सिद्धींचा ईश्वरू । तो मी लागें त्यांची पूजा करूं ।
तेथिला जो सिद्धींचा संभारू । घेऊनि निजवेव्हारू पळताती ॥१९॥
सर्व सिद्धींचा ईश्वर जो मी, तो मीच त्यांची पूजा करूं लागतो. त्यामुळे तेथला जो सिद्धींचा मेळा असतो, तो आपला सर्व पसारा घेऊन पळत सुटतो १९,

सकळ सिद्धींच्या स्वामित्वेंसीं । मी भगवंत तिष्ठें भक्तांपाशीं ।
तेंचि श्लोकार्थें हृषीकेशी । उद्धवासी सांगत ॥२२०॥
सर्व सिद्धीच्या स्वामित्वासहवर्तमान मी भगवंत भक्तांपाशी राहात असतो. तेंच श्लोकरूपाने श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात २२०.

सर्वासामपि सिद्धीनां हेतुः पतिरहं प्रभुः ।
अहं योगस्य साङ्ख्यस्य धर्मस्य ब्रह्मवादिनाम् ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म इत्यादी पुष्कळ साधने सांगितली आहेत त्यांचा तसेच सर्व सिद्धींचे कारण, पालन करणारा आणि प्रभू मीच होय. (३५)

सकळ सिद्धींचें मी जन्मस्थान । माझेनि सिद्धींचें थोर महिमान ।
सिद्धींसी मजमाजीं निदान । यापरी मी जाण स्वामी त्यांचा ॥२१॥
मी सर्व सिद्धींचे जन्मस्थान आहे, माझ्यामुळेच सिद्धीचे मोठे माहात्म्य आहे, आणि माझ्यामध्येच सिद्धींचा शेवट होतो. अशा प्रकारे मीच त्यांचा धनी आहे २१.

जे जीवात्म्याची ऐक्यता । त्या योगाचा स्वामी मी तत्त्वतां ।
जेथ जीवत्वाची मिथ्या वार्ता । त्या ज्ञानाचाही सर्वथा स्वामी मीचि ॥२२॥
जीवात्म्याची जी ऐक्यता, त्या योगाचा खरोखर मी स्वामी आहे. आणखी ज्यांत जीवपणाची गोष्ट मिथ्या ठरते, त्या ज्ञानाचाही सर्वस्वी स्वामी मीच आहे २२.

ज्ञानोपदेष्टे जे साधू । त्यांचाही स्वामी मी प्रसिद्धू ।
माझेनि प्रसादें ज्ञानबोधू । होतसे विशदू सज्ञाना ॥२३॥
ज्ञानोपदेश करणारे जे साधु आहेत, त्यांचाही मी स्वामी असल्याचे प्रसिद्धच आहे. ज्ञानीजनांना माझ्याच उपदेशाने ज्ञानाचा स्पष्ट बोध होतो २३.

उपदेशी उपनिषद्‍भागें वेदू । त्या वेदाचाही स्वामी मी गोविंदू ।
मजवेगळा वेदवादू । उच्चारीं शब्दू नुच्चारे ॥२४॥
वेद उपनिषद्‌भागाने उपदेश करतो. मी गोविंद त्या वेदाचाही स्वामी आहे. माझ्याशिवाय त्या वेदाच्या उच्चारांतून एकही शब्द उच्चारला जाणार नाही २४.

धर्म म्हणिजे ज्ञानसाधन । त्याचाही स्वामी मीचि जाण ।
मी सबाह्य परिपूर्ण । चैतन्यघन सर्वात्मा ॥२५॥
धर्म म्हणजे ज्ञानाचे साधन, त्याचा स्वामीही मीच आहे हे लक्षात ठेव. आंतबाहेर परिपूर्ण वसणारा ज्ञानमया सर्वास्मा तो मीच २५.

मी सर्वात्मा सर्वव्याप्त । सबाह्य परिपूर्ण समस्त ।
हे माझ्या ठायीं सहज स्थित । ऐक सुनिश्चित उद्धवा ॥२६॥
मी सर्वात्मा असून सर्वत्र च्यापलेला आहे. उद्धवा ! आतबाहेर सर्वत्र परिपूर्णत्वाने भरलेला मीच. ही स्थिति खरोखर माझ्यामध्ये आपोआपच कशी राहिलेली आहे ते नीटपणे ऐक २६.

अहमात्माऽऽन्तरो बाह्योऽनावृतः सर्वदेहिनाम् ।
यथा भूतानि भूतेषु बहिरन्तः स्वयं तथा ॥ ३६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
[श्लोक ३६] ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आतबाहेर पंचमहाभूतेच आहेत, त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टारूपाने आणि बाहेर दृश्यरूपाने आहे कारण मी कोणतेही आवरण नसलेला, सर्व प्राण्यांचा आत्मा आहे. (३६)
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥ अध्याय पंधरावा समाप्त
जीवांच्या जीवामाजीं माझा वास । जीव मजमाजीं सावकाश ।
माझें स्वरूप गा असमसाहस । गुणमायेस अनावृत ॥२७॥
जीवांच्या जीवामध्ये माझेंच वास्तव्य आहे. आणि जीवही माझ्यामध्येच खुशाल राहिलेले आहेत. अरे ! माझें स्वरूप गुणांपासून आणि मायेपासून अगदी भिन्न असून ते अमर्याद आहे २७.

जेवीं घटाची वस्ती आकाशीं । आकाश सबाह्य त्या घटासी ।
तेवीं मी जीवमात्रांसी । सबाह्य हृषीकेशी परिपूर्ण ॥२८॥
ज्याप्रमाणे घट हा आकाशामध्येच राहतो व त्याच्या आतबाहेर आकाशच असते, त्याप्रमाणे प्रत्येक जीवाच्या आंतून व बाहेरून परिपूर्ण भरलेला असा मीच श्रीकृष्ण आहे २८.

जैशीं महाभूतें भौतिकांसी । सबाह्य असती सर्वांसी ।
तेवीं मी सकळ जगासी । सबाह्य हृषीकेशी पूर्णत्वें पूर्ण ॥२९॥
सर्व भौतिकांना जशी पंचमहाभूतें आंतून व बाहेरून व्यापून असतात, त्याप्रमाणे मी श्रीकृष्णही पूर्णत्वेकरून सर्व जगाला आंतून व बाहेरून पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे २९.

जीवन जैसें तरंगासी । कां गोडी जैसी गुळासी ।
तेवीं अनंतकोटि ब्रह्मांडांसी । मी पूर्णत्वेंसी परिपूर्ण ॥२३०॥
लाटांना जसे पाणी, किंवा गुळाला जशी गोडी, त्याप्रमाणे ह्या अनंत कोटी ब्रह्मांडांनाही मी परिपूर्णत्वाने परिपूर्ण व्यापून राहिलों आहे २३०.

मज पूर्णाची पूर्ण प्राप्ती । निकट येतयेतां हातीं ।
ते संधीं सिद्धी नागविती । भोगसंपत्तीउपचारें ॥३१॥
असा जो मी परिपूर्ण त्या माझ्या पूर्ण प्राप्तीची संधी जवळ जवळ येत असतां त्या संधीला भोगविलास व संपत्तीचे उपचार ह्यांच्या योगाने सिद्धि बहुत नागवून सोडतात ३१.

ज्याचें रायापाशीं पूर्ण चलन । त्याचे हाता ये लांचु संपूर्ण ।
तेणेंचि तो पावे मरण । तैशा सिद्धी जाण घातका ॥३२॥
राजापाशी ज्याचे चांगले दळणवळण असते, त्याला सहजासहजी पूर्णपणे लांच खाता येतो, पण बहुधा त्यांतच त्याला मृत्यु येतो. त्याप्रमाणेच साधकाला सिद्धि घातकच आहेत ३२.

ये अध्यायींचें निरूपण । सांगावया हेंचि गा कारण ।
माझे प्राप्तीस सिद्धी विघ्न । उद्धवा जाण निश्चितीं ॥३३॥
ह्या अध्यायांतील विषयाचे प्रतिपादन करण्याचे कारण हेच की, उद्धवा ! माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धि हेच मोठे विघ्न आहे ३३.

एकाग्र भजनें माझी प्राप्ती । होतां ते संधीसी सिद्धी येती ।
त्या भुलवोनियां भोगासक्तीं । नागविती साधकां ॥३४॥
एकाग्र भजनाने माझी प्राप्ति होण्याची वेळ आली असता त्या संधीला सिद्धि येतात, आणि त्या भोगांच्या आसक्तीने साधकांना भुरळ घालन नागवून सोडतात ३४.

जे नेणती माझें निजसुख । ऐसे जे कां केवळ मूर्ख ।
त्यांसीच सिद्धींचें कौतुक । अलोकिक भोगलिप्सा ॥३५॥
माझें आत्मसुखच जे जाणत नाहीत, असे जे केवळ मूर्ख असतात, त्यांना अत्यंत विषय वासनेमुळे ह्या सिद्धीचे मोठे कौतुक वाटते ३५.

जैसे वेश्येचे हावभाव । तैसें सिद्धींचें वैभव ।
हें त्यागावया गा सर्व । देवें हा अध्याव निरूपिला ॥३६॥
वेश्येचे जसे हावभाव असतात, तसेंच हें सिद्धीचे वैभव आहे. ते सर्व सोडून द्यावे असे सांगण्यासाठी देवांनी हा अध्याय सांगितला ३६.

ज्यासी प्राप्त माझें निजसुख । त्यासी सिद्धी तुच्छप्राय देख ।
न देखती जन्ममरणांचें मुख । माझा पूर्ण हरिख कोंदाटे ॥३७॥
ज्याला माझें आत्मसुख प्राप्त होते, त्याला ह्या सिद्धि केवळ कसपटासमान होत. ते जन्ममरणांचे तोंडसुद्धा पहात नाहीत. त्यांच्या अंत:करणांत माझ्याविषयी परिपूर्ण आनंद भरलेला असतो ३७.

सेवितां सद्‍गुरुचरण । कोंदाटे ब्रह्म परिपूर्ण ।
तेथ सिद्धींसी पुसे कोण । हे जाणती खूण हरिभक्त ॥३८॥
सद्गुरूच्या चरणांची सेवा केली असता सर्व परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहते. तेव्हां सिद्धींना विचारतो कोण ? ही खूण हरिभक्त जाणतात ३८.

हरिभक्तीसी विकीला भावो । भजनें फिटला अहंभावो ।
तेथ सिद्धींचा भोगसंदेहो । निपुजे पहा हो सर्वथा ॥३९॥
आपलेपणा हरिभक्तीला विकून टाकतात, भजनाने अहंभाव नाहीसा होतो, अशा वेळी सिद्धींच्या उपभोगाची कल्पनाही त्यांच्या मनात कधीच येत नाही ३९.

भुक्ति मुक्ति ऋद्धि सिद्धी । सद्‍गुरुचरणीं गा त्रिशुद्धी ।
हें नेणती जे मंदबुद्धी । ते नाना सिद्धी वांछिती ॥२४०॥
भुक्ति, मुक्ति, ऋद्धि, सिद्धि, ह्या खरोखर सद्गुरुचरणांच्याच ठिकाणी आहेत. जे मंदबुद्धि लोक हे जाणत नाहीत, ते अनेक प्रकारच्या सिद्धींची इच्छा करतात २४०.

सकळ सिद्धींचें साधन । निरपेक्षता सत्य जाण ।
निरपेक्षाचें अंगण । सिद्धी संपूर्ण ओळंगती ॥४१॥
निरपेक्षता हेच खरोखर सर्व सिद्धीचे साधन आहे हे पक्के लक्षात ठेव. निरपेक्ष असतो त्याच्या अंगणांत सर्व सिद्धि राबत असतात ४१.

सिद्धींची अपेक्षा ज्यांचे चित्तीं । सिद्धी त्यांकडे न थुंकिती ।
निरपेक्षाचे पायींची माती । सिद्धी वंदिती सर्वदा ॥४२॥
ज्यांच्या मनांत सिद्धींची इच्छा असते, त्यांच्याकडे सिद्धि ढुंकूनसुद्धा पहात नाहीत; आणि निरपेक्ष असतो त्याच्या पायांची मातीसुद्धा सिद्धि नेहमी शिरसावंद्य करतात ४२.

ज्ञानवैराग्यभक्तीचे माथां । सत्य जाण पां निरपेक्षता ।
ते निरपेक्षता आलिया हाता । मुक्ति सायुज्यता पायां लागे ॥४३॥
ज्ञान, वैराग्य आणि भक्ति ह्यांच्याहुनही निरपेक्षता हीच खरोखर अत्यंत श्रेष्ठ आहे. ती निरपेक्षता हाती आली असतां सायुज्यता मुक्तीसुद्धा पायीं लागते ४३.

निरपेक्षतेपाशीं सर्व सिद्धी । निरपेक्षतेपाशीं विधी ।
निरपेक्षतेपाशीं सुबुद्धी । चरण वंदी अहर्निशीं ॥४४॥
निरपेक्षतेपाशीच सर्व सिद्धि असतात, निरपेक्षतेपाशीच सर्व विधि असतात, आणि निरपेक्षतेपाशीच समृद्धि रात्रंदिवस चरण वंदीत असते ४४.

निरपेक्षता तेथ निर्वाहो । निरपेक्षता तेथ सद्‍भावो ।
निरपेक्षतेपाशीं भगवद्‍भावो । यथार्थ पहा वो तिष्ठतू ॥४५॥
निरपेक्षता असते तेथेच योगक्षेम असतो निरपेक्षता असते तेथेच सद्‌भाव असतो, आणि अहो ! निरपेक्षतेपाशीच भगवंताचे स्वरूप खरोखर उभे असते पहा ! ४५.

निरपेक्षतेपाशीं उपनिषद्‍भागू । निरपेक्षतेपाशीं साचार योगू ।
निरपेक्षता स्वानंदभोगू । सांपडे श्रीरंगू निरपेक्षा ॥४६॥
निरपेक्षतेपाशीच वेदान्त असतो, निरपेक्षतेपाशीच खराखरा योग असतो, निरपेक्षता हाच स्वानंदाचा उपभोग आहे, आणि निरपेक्षालाच श्रीकृष्ण सांपडतो ४६.

एका जनार्दना शरण । त्याचे वंदितां श्रीचरण ।
चढती निरपेक्षता जाण । सदा संपूर्ण स्वानंदें ॥४७॥
एका (एकनाथ ) जनार्दनाला शरण जाऊन त्याचे पवित्र चरण वंदन करतांच त्याला वाढती निरपेक्षता प्राप्त झाली, म्हणून तो आनंदाने सदा सर्वदा परिपूर्ण असतो ४७.

आम्हां स्वानंदाचा निजबोधू । हा सद्‍गुरुचरणींचा प्रसादू ।
महासुखाचा विनोदू । आनंदकंदू श्रीचरणीं ॥४८॥
आम्हांला स्वानंदाचा आत्मबोध झाला, हा केवळ सद्गुरुचरणांचा प्रसाद होय. श्रीगुरुचरणांच्या ठिकाणींच महासुखाचे लीलाविलास व आनंदाचें मूळ बीज असते ४८.

गुरुचरणीं करितां भक्ती । अनायासें प्राप्त चारी मुक्ती ।
निजशांतीसी विरक्ती । सेवों लागती गुरुभक्तां ॥४९॥
गुरुचरणांची भक्ति केली असतां अनायासेंच चारही मुक्ति प्राप्त होतात. म्हणूनच गुरुभक्त असतात त्यांची आत्मशांतीसह विरक्ति सेवा करूं लागते ४९.

एका जनार्दन शरण । त्याचे कृपेस्तव जाण ।
श्रीभागवताचें निरूपण । झाला संपूर्ण पंधरावा ॥२५०॥
एका जनार्दनाला शरण गेला म्हणून त्याच्या कृपेमुळेच श्रीमद्‌भागवताच्या निरूपणाचा पंधरावा अध्याय संपूर्ण झाला २५०.

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे
एकाकारटीकायां सिद्धिनिरूपणयोगो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
पंधरावा अध्याय समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥३६॥ ओंव्या ॥२५०॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *