sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 7

एकनाथी भागवत अध्याय 7- आरंभ 

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो द्‌गुरु चतुरक्षरा । चतुरचित्तप्रबोधचंद्रा ।
‘जनार्दना’ सुरेंद्रइंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥
हे ओंकारस्वरूपी चतुरक्षरी देवा ! हे चतुरांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या प्रबोधचंद्रा ! हे इंद्राच्याही इंद्रा, जनार्दना ! हे ज्ञाननरेंद्रा, निजबोधरूपा ! तुला नमस्कार असो १.

तुझी रितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं ।
सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥
तुझी गोष्ट काढली की, तूं आंतून व बाहेरूनही प्रगट होतोस. हृदयाची गांठ (चिदचिद्‌ग्रंथि) तोडून दृष्टीसमोर उभा राहतोस २.

छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना ।
भवअभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥
हे जनार्दना ! विषयवासनेचा उच्छेद करून तूं स्वतः प्रगट होतोस आणि संसार किंवा असंसार ह्यांची भावना मनाला शिवू देत नाहींस ३.

आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन ।
सहज देशी समाधान । आनंदघन अच्युता ॥४॥
तुझ्या चरणांचा स्पर्श झाला की, मन हें स्थिर होऊन राहते. आणि मग हे आनंदघना अच्युता ! तूं सहज समाधान देतोस ४.

ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्यें चरणीं माथा ।
पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥५॥
अशा हे गुरुनाथा ! तुमच्या चरणांवर एकात्मभावानें मस्तक ठेवतों; आणि विनंति करतों की, पुढील कथा जीत प्रत्यक्ष श्रीकृष्णाचेंच भाषण आहे ती श्रवण करावी ५.

उद्धवें विनविलियावरी । कृपा कळवळला श्रीहरी ।
निजज्ञान अतिविस्तारीं । बोधकुसरीं सांगतु ॥६॥
उद्धवानें विनंति केली तेव्हां श्रीकृष्णाच्या मनांत कृपा उत्पन्न होऊन त्यास गहिवर आला आणि त्यानें मोठ्या कौशल्यानें आत्मज्ञान विशद करून सांगण्यास आरंभ केला ६.

होतें कृष्णाचे मानसी । ‘मज गेलिया निजधामासी ।
माझें निजज्ञान कोणापासीं । अतियत्नेंसीं ठेवावें’॥७॥
कृष्णाच्या मनांतही हेच होते, की मी निजधामाला गेल्यावर माझें निजज्ञान म्हणून जे आहे, ते यत्नपुरःसर कोणापाशी ठेवावें ? ७.

तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहलें श्रीकृष्णनाथा ।
वैराग्ययुक्त उपदेशिता । होय सर्वथा निजज्ञान ॥८॥
इतक्यांत उद्धवाचीही कळकळ दृष्टी पडली व श्रीकृष्णाला फारच संतोष झाला, म्हणून त्यानें वैराग्ययुक्त संपूर्ण आत्मज्ञानाचा उपदेश करण्यास आरंभ केला ८.

एवं वांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ।
शाप न बाधी ब्रह्मवेत्यांसी । हें हृषीकेशी जाणतु ॥९॥
उद्धवाला ब्रह्मशापांतून वाचविण्यासाठी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे जरूर होते; कारण, ब्रह्मवेत्याला काही शापाची बाधा होत नाही, हे श्रीकृष्ण जाणत होता ९.

ब्रह्मउपदेशाची हातवटी । उपदेशूं जाणे जगजेठी ।
वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणें पडे मिठी निजतत्वीं ॥१०॥
ब्रह्मज्ञानाचा उपदेश मनांत कसा ठसवावा, ह्याची हातोटी पूर्णपणे माहीत होती. म्हणून ज्याच्या योगानें आत्मतत्त्वालाच मिठी पडेल, असें वैराग्य तो हां हां म्हणतां उत्पन्न करीत असे १०.

नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण ।
हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविंदान बोलतु ॥११॥
तत्त्व चांगल्या रीतीनें सांगितले, पण प्रखर वैराग्य उत्पन्न झाले नाही, तर केलेला उपदेश व्यर्थ होतो, ही खूण कृष्णाला माहीत होती, म्हणून त्यानें वैराग्याचे तत्त्व सुंदर रीतीनें सांगितले ११.

पहिलें उद्धवाच्या बोलासी । अनुमोदन दे हृषीकेशी ।
तेणें अन्वयें सावकाशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतु ॥१२॥
कृष्णांनी प्रथमतः उद्धवाच्या भाषणाला अनुमोदन दिले. आणि मग त्यावरूनच संदर्भासंदर्भानें हळूहळू ज्ञानवैराग्यासंबंधी तो बोलू लागला १२.

श्रीभगवानुवाच –
यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे ।
ब्रह्माभवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्‌क्षिणः ॥ १ ॥
[श्लोक १]-श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा ! तू मला जे म्हणालास, तेच मी करू इच्छितो ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी लोकपालांनासुद्धा मी त्यांच्या लोकात यावे, असे वाटते. (१)

जो वेदांचा वेदवक्ता । जो ज्ञानियांचा ज्ञानदाता ।
तो श्रीकृष्णु म्हणे भाग्यवंता । ऐकें निजभक्ता उद्धवा ॥१३॥
जो वेदांचा वेदवक्ता व ज्ञान्यांचा ज्ञानदाता, तो श्रीकृष्ण म्हणाला-भाग्यवान् भक्ता उद्धवा ऐक १३.

जें तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तुझें सत्य सत्य ।
तेचिं माझें मनोगत । जाण निश्चित निर्धारें ॥१४॥
तूं हें भावयुक्त भाषण केलेस तें तुझें भाषण एकवार नव्हे, त्रिवार सत्य आहे आणि खरोखर माझा मनोदयही तसाच आहे १४.

माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां ।
येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥१५॥
माझी अवस्था म्हणजे उत्कंठा शंकर ब्रह्मदेव इत्यादि सार्‍या देवांना कशी लागली आहे, लोकपाळांसहवर्तमान त्यांचा घोळकाच्या घोळका येथे येऊन गेला १५,

येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटी ।
पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणें तुज मोठी अवस्था ॥१६॥
त्यांनी माझी भेट घेतली, आणि माझ्या पोटांत जी इच्छा होती ती प्रयाणकालाची गोष्ट त्यांनी विचारली, म्हणून तुला अत्यंत वाईट वाटत आहे १६.

म्यां वेगीं यावें वैकुंठा । हे समस्तांसी उत्कंठा ।
आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां झालीसे ॥१७॥
शंकर आदिकरून सर्व देवांना मी लौकर वैकुंठास यावे अशी उत्कंठा लागून राहिली आहे १७.

मया निष्पादितं ह्यत्र देवकार्यमशेषतः ।
यदर्थमवतीर्णोऽहमंशेन ब्रह्मणार्थितः ॥ २ ॥
[श्लोक २ ]-पृथ्वीवर देवतांचे जे काम होते, ते मी पूर्ण केले आहे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी मी बलरामासह अवतीर्ण झालो होतो. (२)

ज्यालागीं ब्रह्मेनि प्रार्थिलें । तें देवकार्य म्यां संपादिलें ।
अवतार नटनाट्य धरिलें । ज्येष्ठत्व दिधलें बळिभद्रा ॥१८॥
पूर्वी ज्यासाठी ब्रह्मदेवानें प्रार्थना केली होती, ते देवांचे कार्य मी सिद्धीस नेले. मनुष्यरूप धारण करून बळरामाला मोठेपण दिले १८;

ज्येष्ठकनिष्ठभावना । दोघांमाजीं नाहीं जाणा ।
कृष्णा आणि संकर्षणा । एकात्मता निजांशें ॥१९॥
पण उभयतांमध्यें लहानमोठेपणाची मुळीसुद्धा भावना नाही. कृष्णामध्यें आणि बळरामामध्यें निजांशानें एकात्मताच होती १९.

कुलं वै शापनिर्दग्धं नङ्क्ष्यत्यन्योन्यविग्रहात् ।
समुद्रः सप्तमेऽहन्ये एतां पुरीं च प्लावयिष्यति ॥ ३ ॥
[ श्लोक ३ ]-ब्राह्मणांच्या शापाने जणू भस्म झालेला हा यदुवंश आता आपापसात युद्ध करून नष्ट होऊन जाईल आजपासून सातव्या दिवशी या पुरीला समुद्र बुडवून टाकील. (३)

उरलें असे आमुचें कुळ । शापनिर्दग्ध केवळ ।
अन्योन्यविग्रहें सकळ । कलहमूळ नासेल ॥२०॥
आतां शापाग्नीनें दग्ध झालेले आमचें कुल बाकी राहिलेले आहे, तेही परस्परांत कलह होऊन नाशाला जाईल २०.

भूमि मागोनि समुद्रापाशीं । म्यां रचिलें द्वारकेसी ।
मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसीं बुडवील ॥२१॥
मी समुद्रापासून जमीन मागून घेऊन द्वारका वसविली. मी निजधामास गेलों की, तो ती सातव्याच दिवशी बुडवून टाकील २१.

यर्ह्येवायं मया त्यक्तो लोकोऽयं नष्टमङ्गलः ।
भविष्यत्यचिरात्साधो कलिनापि निराकृतः ॥ ४ ॥
[श्लोक ४]-प्रिय उद्धवा ! ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन, त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल. (४)

ऐकें उद्धवा हितगोष्टी । म्यां सांडलिया हे सृष्टि ।
थोडियाचि काळापाठीं । नष्टदृष्टी जन होती ॥२२॥
हे उद्धवा ! तुला हिताची गोष्ट सांगतों ऐक, मी हे जग सोडून गेलों की, पाठीमागें थोड्याच दिवसांत लोक नष्टबुद्धि होतील २२.

अधर्म वाढेल प्रबळ । लोक होतील नष्ट अमंगळ ।
ते अमंगळतेचें मूळ । ऐक समूळ सांगेन ॥२३॥
अतिशय अधर्म माजून राहील, लोक नष्ट आणि अमंगल होतील. त्या अमंगलतेचे कारण समूळ सांगतो ऐक २३.

मज नांदतां ये सृष्टीं । कलि उघडूं न शके दृष्टी ।
मज गेलियापाठीं । तो उठाउठीं उठेल ॥२४॥
मी जोपर्यंत ह्या सृष्टीमध्यें वावरतों आहे, तोपर्यंत कलीची डोळा उघडून पाहण्याची प्राज्ञा नाही; पण मी गेलों की तो लागलाच चवताळून उठेल २४.

कलि वाढेल अतिविषम । ब्राह्मण सांडितील स्वधर्म ।
स्वभावें नावडे दानधर्म । क्रियाकर्म दंभार्थ ॥२५॥
कलीचें दुर्धर प्राबल्य झाले म्हणजे ब्राह्मण आपला स्वधर्म टाकून देतील; दानधर्म मुळीच नकोसा होऊन केवळ ढोंग दाखविण्याकरतां क्रियाकर्मे करतील २५.

न वस्तव्यं त्वयैवेह मया त्यक्ते महीतले ।
जनोऽभद्ररुचिर्भद्र भविष्यति कलौ युगे ॥ ५ ॥
[श्लोक ५]-मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू येथे राहू नकोस कारण बाबा रे ! कलियुगातील बहुतेक लोकांची रूची अधर्माकडेच राहील. (५)

म्यां सांडिलिया महीतळी । प्रबळ बळें वाढेल कळी ।
आजीच तुवां निघिजे तत्काळीं । जंव तो कळी नातळे ॥२६॥
मी पृथ्वीचा पृष्ठभाग सोडला की, कलि अतिशय माजेल. ह्याकरतां त्या कलीनें भूमीला जोपर्यंत स्पर्श केला नाही, तोपर्यंत आजच्या आज तूं निघण्याची तयारी कर २६.

कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्मु वाढेल तेव्हां ।
कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥
कलि जेव्हां संचार करील तेव्हां लोकांत अधर्म वाढेल, कुविद्येची बंडें उठतील, आणि निंदेच्या शर्यतीच सुरू होतील २७.

न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी ।
ऐसी कलियुगीं वस्ती कुडी । तुवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥
कवडीचासुद्धा स्वार्थ लाभणार नाही, पण निंदेचे डोंगर उभारतील, अशी कलियुगांतील वाईट वस्ती आहे, करतां तूं अर्ध घटका येथे राहूं नकोस २८.

त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबन्धुषु ।
मय्यावेश्य मनः संयक् समदृग्विचरस्व गाम् ॥ ६ ॥
[ श्लोक ६]-तू आपले आप्त, स्वजन आणि भाऊबंदांचा स्नेहसंबंध सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझ्याठायी आपले मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर. (६)

उद्धवा तूं यालागीं । येथोनि निघावें वेगीं ।
एकलाचि आंगोवांगीं । हितालागीं सर्वथा ॥२९॥
ह्यासाठी उद्धवा ! आपल्या कल्याणाकरतां तूंही येथून एकटाच लोकर निघून जा २९.

धनधान्यसमृद्धीसीं । सांडावें स्वजनगोत्रजांसी ।
भ्रातादुहितानिजभगिनींसी । स्त्री-पुत्रासी त्यजावें ॥३०॥
धन्यधान्यांची कोठारे असतील तरी ती टाकून दे; आप्त इष्ट असतील त्यांना सोड; आपल्या भाऊबहिणी, बायका, मुले ह्यांचीही आशा धरूं नको ३०.

स्नेहो ठेवूनि घरदारीं । अंगें तूं जरी निघालासि बाहेरी ।
तरी तो त्यागूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥
घरादारांत आशा ठेवून तूं नुसत्या शरीरानेंच बाहेर निघालास, तर तो त्यागच मोठा कठीण व अनर्थकारक होईल ३१.

आधीं समूळ स्नेहो सांडावा । पाठीं अभिमानुही दंडावा ।
वासनाजटाजूट मुंडावा । मग सांडावा आश्रमु ॥३२॥
पहिल्यांदा स्नेह समूळ सोडून द्यावा; पाठीमागून अभिमानालाही दंडण करावें; नंतर वासनारूप जटाजूटाचे मुंडण करावे आणि मग आश्रमांतून बाहेर पडावे ३२.

‘स्नेहो कैसेनि सांडे । अभिमानु कैसेनि दंडे’।
हें तुज वाटेल सांकडें । तरी रोकडें परियेसीं ॥३३॥
आतां स्नेह कसा तुटेल ? अभिमानाला, दंड कसा लागेल ? हे तुला संकट वाटत असेल तर तेही सांगतो ऐक ३३.

माझें स्वरूप जें सर्वगत । तेथ ठेवोनियां चित्त ।
सावधानें सुनिश्चित । राहावें सतत निजरूपीं ॥३४॥
सर्वव्यापी जे माझें स्वरूप आहे तेथे चित्त ठेवून, निश्चयानें आणि सावधपणानें त्या आत्मस्वरूपांतच निरंतर राहावें ३४.

तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेंसीं धारणा धरितां ।
निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥३५॥
त्या व्यापक स्वरूपामध्यें निश्चयानें धारणा ठेवली. म्हणजे त्या निजभावाच्या योगें चित्त तन्मय होऊन त्याला तद्‌रूपता प्राप्त होते ३५.

भृंगी जड कीटी मूढ । ध्यानें तद्रूप होय दृढ ।
अभ्यासीं कांहीं नाहीं अवघड । तो अभ्यास गूढ विशद केला ॥३६॥
भृंगी ही जड असते व आळी ही मूढच असते. तरी दृढ ध्यानानें ती तद्‌रूप होते. तात्पर्य, अभ्यास केला म्हणजे काहींच अवघड नाही. तो गूढ अभ्यास मी तुला स्पष्ट सांगितला ३६.

माझें स्वरूप ज्ञानघन । ध्याता जीवु स्वयें सज्ञान ।
या स्थितीं करितां ध्यान । सहजें जाण तद्रूप ॥३७॥
माझें स्वरूप तर ज्ञानघनच आहे आणि ध्यान करणारा जीवही सज्ञानच असतो. त्यामुळें अशा रीतीनें ध्यान केल्यानें तोही तद्‌रूपच होतो ३७.

तेथ समसाम्यें समस्त । समत्व पावेल चित्त ।
तेणें समभावें निश्चित । तेथींचा तेथ रहावें ॥३८॥
तेथें सारी समदृष्टीच होत असल्यानें चित्तही समत्वालाच प्राप्त होते; तो समभावच निश्चयानें वाढवून जेथल्या तेथे राहावें ३८.

आधीं गृहाश्रमातें त्यागावें । मग म्यां म्हणसी कोठें राहावें ।
ऐसें मानिसील स्वभावें । तेविखीं बरवें परियेसीं ॥३९॥
आधीं गृहस्थाश्रमाला सोडावें, आणि मग मी कोठे राहावें, असें तुझ्या मनांत येणे स्वाभाविक आहे. तर त्याविषयीही नीट ऐक ३९.

स्वरूपसाम्यें समदृष्टी । समभावें विचरें सृष्टीं ।
निवासस्थानांची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥४०॥
स्वरूपसाम्यानें समदृष्टि होते; त्या समदृष्टीनेंच तूं सृष्टीत फिरत राहा. राहण्याच्या स्थानासाठी तूं मनांत काळजी अथवा योजना करूं नकोस ४०.

जेथ अल्प काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।
वसतिस्थान ऐसें कुडें । वस्तीचें सांकडें सर्वथा न धरीं ॥४१॥
थोडा काळ जरी एके ठिकाणी वस्ती घडली, तरी त्या स्थानाचा अभिमान चढतो. ह्याप्रमाणें वसतिस्थान खोटें आहे, ह्याकरतां स्थानाची खटपट तूं मुळीच करूं नको ४१.

तूं सर्वीं सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी ।
ऐसा मी होऊन मज पावसी । न हालतां येसी निजधामा ॥४२॥
तूं सर्वी सर्वगत, सर्वाधार व सर्वदेशी झालास म्हणजे मी होऊन मला पावशील, आणि न हालतांचालतां निजधामाला येशील ४२.

‘मज निजधामा न्यावें’। होतें पुशिलें उद्धवें ।
तें निजबोधस्वभावें । स्वयें केशवें सांगितलें ॥४३॥
मला निजधामाला न्यावे असे उद्धवानें विचारले होते, तो उपाय आत्मबोधाच्या रूपानें स्वतः श्रीकृष्णानें सांगितला ४३.

न करितां हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती ।
मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ॥४४॥
असा उपाय जर केला नाही, तर माझी प्राप्ति कधीच व्हावयाची नाही. मग तूं निजधामाला कशा रीतीनें येणार ? ४४.

गरुडीं वाऊनि वेगेंसीं । न्यावें निजधामा म्हणसी ।
गति तेथ नाहीं पाखांसी । गम्य गरुडासी तें नव्हे ॥४५॥
गरुडावर बसवून मला लौकर निजधामाला न्यावे असें म्हणशील, पण पंखाची गति येथे नसल्यामुळें गरुडाला तेथे जातांच येत नाहीं ४५.

सांडूनि उभय पक्षांसी । साधक पावती मद्रूपासी ।
पक्षाभिमान असे गरुडासी । गमन त्यासी तेणें नव्हे ॥४६॥
म्हणून साधक आहेत ते उभय पक्ष सोडून देऊनच मद्‌रूपाला पावतात. पण गरुडाला पक्षाभिमान आहे, म्हणून त्याला तेथे जाता येत नाहीं ४६.

म्हणसी न्यावें घेवोनि खांदीं । मज खांदाचि नाहीं त्रिशुद्धी ।
तुज न सांडितां अहंबुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥४७॥
आतां तूं म्हणशील की, मला खांद्यावरून घेऊन जा, पण मला खरोखर खांदाच नाही. ह्याकरतां अहंबुद्धि सोडल्याशिवाय तुला तेथें जातां येणार नाहीं ४७.

न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती ।
तेणें निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ॥४८॥
अहंभाव न सोडतां कितीही उपाय आणि कितीही युक्तिप्रयुक्ति केल्या, तरी निजधामांत प्रवेश व्हावयाचा नाहीं ४८.

जें जें देखसी साकार । तें तें जाण पां नश्वर ।
तेचि विखींचा निर्धार । करीं साचार निजबोधें ॥४९॥
साकार म्हणून जेवढे जेवढें तूं पाहतोस, तेवढे सारें नाशवंत आहे. ह्या गोष्टीचा तूं निजबोधानें निश्चय कर ४९.

यदिदं मनसा वाचा चक्षुर्भ्यां श्रवणादिभिः ।
नश्वरं गृह्यमाणं च विद्धि मायामनोमयम् ॥ ७ ॥
[श्लोक ७]-या जगात मन, वाणी, डोळे, कान इत्यादी इंद्रियांनी जे अनुभवले जाते, ते सर्व नाशवान आहे मनाचा कल्पनाविलास आहे, म्हणून मायाच आहे, असे समज. (७)

जें जें ‘दृष्टीं’ देखिलें । तें तें दृष्यत्वें वाळिलें ।
जें जें ‘श्रवणा’ गोचर झालें । तेंही वाळिलें शब्दत्वें ॥५०॥
दृष्टीनें जें जें पाहावें तें तें दृश्यत्वामुळेच नाहीसे होते, कानाला जें जें कळते ते ते शब्दत्वानें लयास जातें ५०.

जें जें ‘वाचा’ वदे । तें तें वाळिजे जल्पवादें ।
वाचिक सांडविलें वेदें । ‘नेति’ शब्दें लाजिला ॥५१॥
वाणी जें जें बोलते, तें तें वितंडवादानें बुडते. म्हणून वेदानें बोलणेच सोडून देऊन ‘नेति’ शब्दानेंच तो लाजून गेला ५१.

जें जें ‘संकल्पें’ आकळिलें । तें तें कल्पित पैं झालें ।
जें जें ‘अहंकारा’ आलें । तें तें वाळिलें विजातीय ॥५२॥
मनाच्या संकल्पानें हें आकलन केले, तें कल्पितच होऊन बसलें ! आणि अहंकाराला जे विषय झाले, ते विजातीयत्वामुळें फुकट गेले ५२.

जें जें ‘इंद्रियां’ गोचरें । तें तें जाण पां नश्वरें ।
हें नित्यानित्यविचारें । केलें खरें निश्चित ॥५३॥
इंद्रियांना जेवढे गोचर होते, तेवढें सारें नश्वर असते. ह्याप्रमाणें नित्यानित्यविचारानें निश्चित केले आहे ५३.

तोही ‘नित्यानित्यविवेक’ । जाण पां निश्चित मायिक ।
एवं मायामय हा लोक । करी संकल्प सृष्टीतें ॥५४॥
पण तो नित्यानित्यविवेक सुद्धा मायिकच आहे हे लक्षात ठेव. मिळून हा सारा लोक मायामयच आहे. आणि माया संकल्प सृष्टीच उत्पन्न करते ५४.

जेव्हडा देखसी संसार । तेव्हडा मायिक व्यवहार ।
हा वोळख तूं साचार । धैर्यनिर्धार धरोनी ॥५५॥
संसार म्हणून जेवढा तुझ्या दृष्टीस पडतो, तेवढा सारा मायिक व्यवहार आहे, ह्याप्रमाणें तूं खरोखर धैर्याचा निर्धार धरून त्याला ओळख (मनांतून पक्के समज) ५५.

जैशी स्वप्नींची राणीव । केवळ भ्रमचि जाणीव ।
तैसेंचि जाण हें सर्व । भववैभवविलास ॥५६॥
स्वप्नांतील राज्य ज्याप्रमाणें केवळ भ्रमाचेच होते, असे प्रत्ययास येते; त्याप्रमाणेच हा सारा संसारांतील वैभवाचा विलास मायिक आहे, लक्षात ठेव ५६.

पुंसोऽयुक्तस्य नानार्थो भ्रमः स गुणदोषभाक् ।
कर्माकर्मविकर्मेति गुणदोषधियो भिदा ॥ ८ ॥
[श्लोक ८]-ज्या पुरूषाचे मन एकाग्र नसते, त्याला वस्तू पुष्कळ आहेत, असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यानेच गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोषयुक्त असते त्याच्यासाठीच कर्म, अकर्म आणि विकर्म असा भेद असतो. (८)

परमात्मेंसी जो विभक्त । तो पुरुष बोलिजे ‘अयुक्त’ ।
त्यासी नानात्वें भेदु भासत । निजीं निजत्व विसरोनी ॥५७॥
परमात्म्याशी जो विभक्त असतो, त्या पुरुषाला ‘अयुक्त’ असे म्हणतात. आपल्या एकमेवाद्वितीय अद्वैत आत्मस्वरूपाची ओळख विसरल्यामुळें त्याला अनेकत्वानें भेद भासू लागतो ५७.

त्या विसराचेनि उल्हासें । मिथ्या भेदु सत्यत्वें भासे ।
त्या भेदाचेनि आवेशें । अवश्य दिसे गुणदोषु ॥५८॥
त्या विस्मृतीच्या भरांत मिथ्या भेद सत्यत्वानें भासतो; आणि भेददृष्टीच्या आवेशांत गुणदोष हटकून दिसू लागतात ५८.

जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोष कैंचा पाहीं ।
दिसावया ठावोचि नाहीं । शुद्धाचे ठायीं सर्वथा ॥५९॥
मुळी जर भेदच नाही, तर शुद्ध वस्तूच्या ठिकाणी गुणदोष दिसावयाला जागाच राहात नाहीं ५९.

यालागीं भेदाच्या उद्‌भटीं । गुणदोषदृष्टी उठी ।
तेथें कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥६०॥
भेदाच्या जोरानेंच गुणदोषदृष्टी उत्पन्न होते, व कर्माकर्माची त्रिपुटी भेददृष्टीमुळेच दृढावते ६०.

भेदें थोर केलें विषम । कर्म अकर्म विकर्म ।
जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥६१॥
भेदानें मोठे वाईट केलेले आहे. तो कर्म, अकर्म, विकर्म, जन्ममरणादि धर्म आणि स्वकर्म प्रकाशित करतो ६१.

कर्में विकर्में नरकयातना । काम्यकर्में स्वर्गु जाणा ।
कर्मेंचि करूनि कर्ममोचना । समाधाना पाविजे ॥६२॥
कर्मानें आणि विकर्मानें नरकयातना भोगाव्या लागतात; आणि कामनिक कर्मानें स्वर्ग प्राप्त होतो; करतां कर्म करूनच कर्ममुक्त होऊन समाधान प्राप्त करून घ्यावे ६२.

येथ म्हणती ‘कर्म’ कोण । ‘अकर्माचें’ काय लक्षण ।
‘विकर्माचा’ कवण गुण । तेंही संपूर्ण परिस पां ॥६३॥
आतां तूं म्हणशील की, कर्म ते कोणते ? अकर्माचे लक्षण काय ? विकर्माचा गुण कोणता ? तर तेही सारें ऐक ६३.

काया वाचा अथवा मन । करिजे तितुकें ‘कर्म’ जाण ।
सूक्ष्म स्फूर्तीचें जें भान । तें मूळ जाण कर्माचें ॥६४॥
कायेने, वाचेनें आणि मनानें जें जें कांहीं करावें, तें तें कर्म होय; आणि सूक्ष्म स्फूर्तीचे हें भान, ते कर्माचे मूळ होय ६४.

मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मबीज नाहीं ।
‘अकर्म’ म्हणिजे तें पाहीं । न पडे ठायीं देहवंता ॥६५॥
मनांत, वाणीत किंवा देहांत कर्माचें बीज मुळीच उत्पन्न न होणे असें जें ‘अकर्म,’ ते देहाभिमानवंताला कधीच घडणार नाहीं ६५.

जें कर्मावेगळें सर्वांगें । जेथ कर्म लावितांही न लगे ।
जें नव्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें ‘अकर्म’ ॥६६॥
जे सर्वोपरी कर्माहून वेगळे, ज्याला कर्म लावू गेले तरी सुद्धा लागत नाही, जे कर्मठाजोगें नव्हे, तेच खरोखर ‘अकर्म’ होय असे समज ६६.

विधिनिषेधजोडपाडें । जेथ विशेष कर्म वाढे ।
‘विकर्म’ त्यातें म्हणणें घडें । थोर सांकडें पैं याचें ॥६७॥
विधिनिषेधाची पर्वा न करता जेथे विशेष कर्म वाढते, त्याला ‘विकर्म’ असे म्हणतात. हे मोठे संकटांत घालणारे आहे ६७.

कर्म सर्वसाधारण । तेंचि विकारातें पावलें जाण ।
उठिले विधिनिषेध दारुण । ‘विकर्म’ जाण तें म्हणिपें ॥६८॥
सर्वसाधारण कर्म असते तेच विकृत होऊन त्यांत मोठमोठाले विधिनिषेध उत्पन्न झाले, म्हणजे त्याला ‘विकर्म’ असे म्हणतात ६८.

जें विधीसी नातुडे । तें निषेधाचे अंग चढे ।
करितां चुके ठाके विकळ पडे । तेंही रोकडें ‘निषिद्धचि’ ॥६९॥
जे विधीला अनुसरून होत नाही, ते निषेधाकडे वळते हे उघड आहे.जे आचरीत असतां चूक होते किंवा त्यांत खंड पडतो, अथवा त्यांत विकलता उत्पन्न होते, तेही खरोखर ‘निषिद्ध’ च होय ६९.

ऐसें कर्म विकारलें । तें ‘विकर्म’ पदें वाखाणिलें ।
एवं कर्माकर्म दाविलें । विभाग केले तुजलागीं ॥७०॥
अशा विकारयुक्त कर्माचें ‘विकर्म’ ह्या पदानें स्वरूप दाखवून दिले. ह्याप्रमाणें कर्माकर्माचे विभाग तुला स्पष्ट दर्शविले ७०.

जीवासी आविद्यक उत्पत्ती । त्याचीं कर्में आविद्यकें होतीं ।
श्रीधरव्याख्यानाची युक्ती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७१॥
जीवाची उत्पत्तिच प्रथम अविद्येमुळें झालेली असल्यानें त्याची कर्मेंही अविद्यात्मकच होत असतात. आतां श्रीधरस्वामींनी केलेल्या व्याख्यानाची युक्तिही सांगतों ती, ऐकून ठेव. ७१

अविद्यायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेंचि ‘कर्म’ ।
नित्य न करणें तें ‘अकर्म’ । ‘विकर्म’ तें निषिद्ध ॥७२॥
जीव हा परम अविद्यायुक्त आहे. नित्यक्रिया हेच त्याचे ‘कर्म’; नित्यकर्म न करणे तेच ‘अकर्म’ आणि निषिद्ध कर्म तें ‘विकर्म’ होय ७२.

ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी । भेदानुरूपें वाढली सृष्टीं ।
तेथ गुण-दोषबुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ॥७३॥
अशी भेदानुरूप कर्माकर्मविकांची त्रिपुटी सृष्टीमध्यें वाढत असते, तेव्हां गुणदोषबुद्धीच्या पोटामध्यें भेददृष्टीही प्रबल होते ७३.

अभेदीं भेदु कैसा उठी । जेणें गुणदोषीं नांदे दृष्टी ।
विधिनिषेधीं पाडी गांठी । तेही गोठी परियेसीं ॥७४॥
ज्याच्या योगानें गुणदोषामध्येंच दृष्टि राहते व विधिनिषेधांच्या गांठी पडतात, तो भेद अभेदामध्यें उत्पन्न तरी कसा होतो ? असें म्हणशील तर तीही गोष्ट ऐक ७४.

पुरुष एकला एकु असे । तोचि मनोरथपूजे बैसे ।
ध्येय-ध्याता-ध्यानमिसें । वाढवी पिसें भेदाचें ॥७५॥
पुरुष हा एकीएक असतो, पण जेव्हां तो मनोरथाच्या पूजेला (मानसपूजेला) बसतो, तेव्हां ध्येय, ध्याता आणि ध्यान ह्यांच्या निमित्तानें भेदाचे वेड माजवितो ७५.

तेथे नानापरीचे उपचार । पूजासामाग्रीसंभार ।
ऐसा एकपणीं अपार । भेदु साचार वाढवी ॥७६॥
तेथे नाना प्रकारचे उपचार, पूजेच्या साहित्याचा संभार वगैरे कल्पीत असतो. याप्रमाणें एकपणामध्येंच तो मनस्वी भेद वाढवितो ७६.

तेथ ‘ध्येय’ उत्तम म्हणे जाण । ‘ध्याता’ नीच होये आपण ।
तदंगें ‘ध्यान’ गौण । गुणदोष जाण वाढवी ॥७७॥
तेथे ध्येय ते ‘उत्तम’ म्हणतो आणि ध्याता जो आपण त्याला ‘नीच’ मानतो, यामुळें ध्यान ‘गौण’ होऊन गुणदोषांना वाढविते ७७.

ध्यानीं गुणदोष विचित्र । ध्येय म्हणे परम पवित्र ।
ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोषत्वें ॥७८॥
ध्यानामध्यें विचित्र गुणदोष आहेत; ध्येय आहे ते ‘परमपवित्र’ म्हणतो. आणि आपले आचरण पवित्र नाहीं म्हणून ध्याता आपण अपवित्र असा होतो ७८.

एवं ध्यानाचिये दृष्टीं । आपणचि आपुल्या पोटीं ।
गुणदोषांची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥७९॥
अशा प्रकारें ध्यानाच्या दृष्टीनें आपणच आपल्या पोटामध्यें गुगदोषाची त्रिपुटी आणि भेदष्टि वाढवितो ७१.

ध्येय-ध्याता-ध्यान । आघवाची आहे आपण ।
तें सांडोनियां जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥८०॥
खरोखर ध्येय, ध्याता आणि ध्यान सारे आपणच असतां ते सोडून देऊन गुगदोषांचे स्वरूप मात्र वाढवीत बसतो ८०.

उद्धवा हे अवघी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं ।
तेणें भेदें उठाउठी । कर्मत्रिपुटी वाढविली ॥८१॥
उद्धवा ! ही सारी सृष्टि भेददृष्टीनें वाढलेली आहे; आणि त्या भेदामुळेच कर्माची त्रिपुटीही त्याच्या मागोमाग वाढली ८१.

जंव जंव भेदाचा जिव्हाळा । जंव जंव विषयांचा सोहळा ।
पाळिजे इंद्रियांचा लळा । तंव तंव आगळा संसारु ॥८२॥
भेदाचा जिव्हाळा जसा जसा वाढतो, किंवा विषयांचे प्रेम जसे जसे वाढते अथवा इंद्रियांचा लळा जसा जसा पुरविला जातो, तसा तसा संसार हा वाढतच असतो ८२.

सापा पाजिजे पीयूख । तेंचि परतोनि होय विख ।
तैसें इंद्रियां दीजे जंव जंव संतोख । तंव तंव दुःख भोगिजे ॥८३॥
सापाला अमृत पाजले तर फिरून विषच व्हावयाचे. त्याप्रमाणें इंद्रियांना जो जों संतोष द्यावयास जावें, तो तो दुःख मात्र भोगावे लागते ८३.

तस्माद् युक्तेन्द्रियग्रामो युक्तचित्त इदं जगत् ।
आत्मनीक्षस्व विततमात्मानं मय्यधीश्वरे ॥ ९ ॥
[श्लोक ९]- म्हणून तू अगोदर आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात ठेव मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून, तो आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत, असा अनुभव घे. (९)

यालागी इंद्रियांच्या द्वारीं । विषयो नेदावा चतुरीं ।
जेवीं विषें रांधिली क्षीरधारी । सांडिजे दुरी न चाखतां ॥८४॥
ह्याकरतां शहाण्यानें इंद्रियांच्या द्वारांत विषयाला जाऊंच देऊं नये. ज्याप्रमाणें विषांत शिजविलेली खीर, तोंडांतसुद्धा न घालतां फेकून द्यावयाची असते ८४.

घमघमित अमृतफळें । वरी सर्पें घातलिया गरळें ।
तें न सेविती काउळे । सेवनीं कळे निजघातु ॥८५॥
किंवा रसरसलेल्या अमृतफळांवर सर्पानें गरळ टाकले असता ती कावळे खात नाहीत; कारण तसे करण्यांत आपला घात आहे, हे त्यांस कळते. ८५.

तैसें सेवितां विषयांसी । कोण गोडी मुमुक्षासी ।
प्रतिपदीं । आत्मघातासी । अहर्निशीं देखती ॥८६॥
त्याचप्रमाणें विषयांचे सेवन करतांना मुमुक्षूंना गोडी कशी वाटणार ? रात्रंदिवस आणि पावलोपावली त्यांत आत्मघात असल्याचे त्यांना दिसत असते ८६.

आत्मघातु न देखती । ते विषयी विषयो सेविती ।
जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्हीं ॥८७॥
ज्यांना त्यांतील आत्मघात दिसत नाही, असे विषयी लोकच विषयांचे सेवन करतात. ज्याप्रमाणें सूर्य भर दोनप्रहरी मस्तकावर असतांही घुबडाला मध्याह्न रात्र वाटते ८७.

तैसेंचि विषयसेवन । मुमुक्षांसी घडे जाण ।
तेणें न चुके जन्ममरण । आत्मपतन तयांचें ॥८८॥
त्याचप्रमाणें विषयसेवनानें मुमुक्षूची स्थिति होते. कारण, त्याच्या योगानें जन्ममरण तर चुकत नाहीच, पण उलट त्यांचे आत्मपतन मात्र होते ८८.

म्हणसी ‘प्राणियांची स्थिती । विषयावरी निश्चितीं ।
विषयत्यागें केवीं राहती’ । ते सुगम स्थिती अवधारीं ॥८९॥
‘प्राण्यांचे जीवित्व खरोखर विषयांवरच अवलंबून असते, विषयांचा त्याग करून ते कसे जगतील ?’ असें म्हणशील तर त्याचाही सुगम मार्ग सांगतों ऐक ८९.

असतां इंद्रियांचा नेमु । करी चित्ताचा उपरमु ।
ऐसा दोंहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥९०॥
इंद्रियांचा विधिनियमानें निग्रह केला असतां, चित्त शांत होते. ह्याप्रमाणें इंद्रियांचा व मनाचा निग्रह, ह्या दोन्ही मार्गानें हा त्याग उत्तमोत्तम व सोपा होतो ९०.

इंद्रियें असोतु विषयांवरी । मन रिघों नेदी त्यांभीतरी ।
हाही त्यागु सर्वांपरी । योगेश्वरीं बोलिजे ॥९१॥
इंद्रियें विषयांवर असेनात का, परंतु मन मात्र त्यांत शिरूं देऊं नये, हाही सर्वतोपरी त्यागच आहे, असे मोठमोठे योगीही म्हणतात ९१.

मनासी विषयांचें बळ । विषयध्यासें तें चपळ ।
नव्हे म्हणती तें निश्चळ । ऐक समूळ तो उपावो ॥९२॥
‘मनाला विषयाचे बळ असल्यामुळें विषयाच्या ध्यासानें ते चंचल होते, ते निश्चळ कधी व्हावयाचे नाही,’ असें म्हणशील तर त्याचाही उपाय ऐक ९२.

माझें स्वरूप सर्वगत । मनाबाहेरी आणि आंत ।
जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ तें असे ॥९३॥
माझें स्वरूप सर्वव्यापी आहे. ते मनाच्या आंतही असते आणि बाहेरही असते. जेथे जेथें मन जाईल तेथे तेथें तें असतेच ९३.

मजवेगळें जावयासी । ठावो नाहीं पैं चित्तासी ।
स्वदेशीं हो परदेशीं । अहर्निशीं मज आंतु ॥९४॥
माझ्याशिवाय चित्ताला जावयाला दुसरी जागाच नाही. ते स्वदेशी असो, की परदेशांत जावो, रात्रंदिवस माझ्या आंतच असते ९४.

ऐसें निजरूप संतत । पाहतां थोरावेल चित्त ।
त्या चित्तामाजीं आद्यंत । पाहें समस्त हें जग ॥९५॥
असे निरंतर आत्मस्वरूपच पाहात राहिले म्हणजे तेंच चित्त सर्वव्यापक होईल. मग त्या चित्तामध्यें हे सारे जग आदीपासून अंतापर्यंत तुला दिसूं लागेल ९५.

अथवा जीवस्वरूप तुझें चांग । त्यामाजीं पाहतां हें जग ।
जगचि होईल तुझें अंग । अतिनिर्व्यंग निश्चित ॥९६॥
अथवा तुझें जीवस्वरूपही चांगलेच आहे, त्यांतच जर हें सारे जग पाहूं लागलास, तर जगच तुझें निर्व्यंग अंग होऊन राहील ९६.

चरें आणि अचरें । लहानें कां थोरें ।
जीवरूपीं सविस्तरें । पाहें निर्धारे हें जग ॥९७॥
चर आणि अचर, लहान आणि थोर असें जें म्हणून आहे ते सारे आपल्या जीवरूपांत पाहात जा ९७.

म्हणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजीं केवीं पहावें जगासी ।
त्यासी ऐक्यता करीं मजसीं । जेवीं कनकेंसीं अळंकार ॥९८॥
तूं म्हणशील की, जीव हा एकदेशी आहे त्यांत सारे जग कसे पाहावें ? तर सोनें आणि अलंकार हे जसे एकरूप आहेत, त्याप्रमाणें जीवाची माझ्याशी ऐक्यता कर म्हणजे झाले ९८.

चिंतितां कीटकी भिंगुरटी । तेचि ते होऊन उठी ।
तैसा तूं उठाउठीं । होईं निजदृष्टीं निजतत्व ॥९९॥
कीटकानें भिंगुरटीचा ध्यास घेतला, म्हणजे तो भिंगुरटीच होऊन बाहेर पडतो, त्याप्रमाणें तूंही तत्काल आत्मदृष्टीनें आत्मतत्त्वच होऊन जाशील ९९.

हो कां सैंधवाचा खडा । पडल्या सिंधूमाजिवडा ।
तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥१००॥
अरे ! मिठाचा खडा समुद्रांत पडला असतां तो समुद्राएवढाच होऊन राहतो, त्याप्रमाणें तूंही तत्काल मद्‌रूप होऊन राहशील १००.

जेथ मीतूंपणाचा भेद । फिटोनि जाईल विशद ।
परमानंदें शुद्धबुद्ध । मुक्त सिद्ध तूं होसी ॥१॥
ज्यावेळी मीतूंपणाचा भेद निखालस मोडून जाईल, त्यावेळी तूं परमानंदरूप शुद्ध, बुद्ध, मुक्त व सिद्ध होऊन जाशील १०१.

ज्ञानविज्ञानसंयुक्त आत्मभूतः शरीरिणाम् ।
अत्मानुभवतुष्टात्मा नान्तरायैर्विहन्यसे ॥ १० ॥
[श्लोक १०]-त्यानंतर शब्दज्ञान आणि अनुभव यांनी चांगल्या रीतीने संपन्न होऊन तू आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंदमग्न होशील तसेच सर्व शरीर धारण करणार्‍यांचा आत्मा होऊन राहाशील असे झाल्यानंतर कोणत्याही विघ्नाने तू दुःखी होणार नाहीस. (१०)

शास्त्रश्रवणें दृढ ‘ज्ञान’ । मननाभ्यासें होय ‘विज्ञान’ ।
या दोंहींची जाणोनि खूण । ब्रह्मसंपन्न तूं होसी ॥२॥
शास्त्रश्रवणानें दृढज्ञान होते, मननाभ्यासानें ज्ञानाचें विज्ञान होते, ह्या दोहोंचे स्वरूप लक्षात घेशील तेव्हां तूं ब्रह्मस्वरूप होशील २.

ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें । अविश्रम भजावे तुझे पाये ।
म्हणसी ‘वोढवतील अंतराये । त्यासी काये करावें’ ॥३॥
‘ह्याप्रमाणें स्वहिताकरतां तुझ्या पायांचे अखंड भजन करीत राहावें; पण त्यांत विघ्न येईल तेव्हां काय करावें ?’ असें म्हणशील तर (सांगतों ऐक) ३.

सांडोनि दांभिक लौकिक । त्यजोनियां फळाभिलाख ।
जो मज भजे भाविक । विघ्न देख त्या कैंचें ॥४॥
दांभिकपणा आणि लौकिक सोडून, फलाभिलाषाचा त्याग करून जो भक्त माझे भजन करतो, त्याला विघ्न कशाचें ? ४

त्याच्या विघ्ननाशासी देख । करीं चक्राची लखलख ।
घेऊनि पाठिसी अचुक । उभा सन्मुख मी असें ॥५॥
त्याच्या विघ्नाच्या नाशासाठी हे लखलखीत चक्र हातामध्यें धारण करून त्याच्या पाठीमागें व समोर मी उभा असतों ५.

यापरी गा उद्धवा । जो मज भजे निजभावा ।
त्यासी विघ्न करावया देवां । नव्हे उठावा मज असतां ॥६॥
उद्धवा ! ह्याप्रमाणें निजभावानें जो माझें भजन करतो, त्याला विघ्न करावयाला, मी असतांना देवांनासुद्धा प्राज्ञा नाहीं ६.

एवं ब्रह्मसंपन्न जाहलियावरी । आत्मा तूंचि चराचरीं ।
जंगमीं आणि स्थावरीं । सुरासुरीं तूंचि तूं ॥७॥
तात्पर्य तूं ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर चराचरांतील आत्मा तूंच होऊन राहशील. स्थावरांत काय, जंगमांत काय आणि देवदानवांत काय, सारा तूंच तूं ७.

तुजहूनि कांहीं । अणुभरी वेगळें नाहीं ।
तेथ विघ्न कैंचें कायी । तुझ्या ठायीं बाधील ॥८॥
तुझ्याशिवाय एक अणुभरसुद्धा वेगळे असे काही राहाणार नाही, तेव्हां तुझ्या ठिकाणी विघ्न येऊन कसें बाधा करील ? ८.

ब्रह्मादिकांसी जो ग्रासी । त्या काळाचा तूं आत्मा होसी ।
पाठी थापटून हृषीकेशी । उद्धवासी सांगतु ॥९॥
ब्रह्मादिकांनाहीं ग्रासून टाकणारा जो काळ, त्याचाही तूं आत्मा होऊन राहशील. ह्याप्रमाणें श्रीकृष्णांनी पाठ थोपटून उद्धवाला सांगितले ९.

ऐशी बाध्यबाधकता फिटली । संकल्पकल्पना तुटली ।
ब्रह्मानंदें पाहांट फुटली । वाट मोडली कर्माची ॥११०॥
ह्याप्रमाणें बाध्यबाधकताच नाहीशी होऊन जाते, संकल्पकल्पना बंद पडते, ब्रह्मानंदाची पहाट होते, आणि कर्माची वाट मोडून जाते ११०.

ऐसा ब्रह्मानुभवी जो देख । कर्म तेथ होय रंक ।
वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारी ॥११॥
असा जो ब्रह्मानुभवी होतो, त्याच्यासमोर कर्म हें रंक म्ह. निःसत्त्व होऊन जाते; वेद हे त्याचे सेवक होतात; आणि विधिविवेक कामाठी बनतात ११.

हेंचि किती सांगो कायी । मी त्याचा आज्ञाधारक पाहीं ।
प्रतिष्ठिती जे जे ठायीं । तेथ पाहीं प्रगटतु ॥१२॥
हें तुला किती आणि काय सांगावें ? मीही त्याचा आज्ञाधारक होऊन राहातो. असे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी प्रतिष्ठा करतात, त्या त्या ठिकाणी मला प्रगट व्हावे लागते १२.

वचनमात्रासाठीं । प्रगटलों कोरडे काष्ठीं ।
दुर्वासा वाइला पाठीं । त्वांही दिठीं देखिलें ॥१३॥
भक्तवचन खरे करण्यासाठी नरसिंहावतारामध्यें मला वाळलेल्या लांकडांत प्रगट व्हावे लागले, दुर्वासाला तर पाठीवर वाहून नेलेलें तूं आपल्या डोळ्यांनी पाहिलेच आहेस १३.

म्हणसी ‘देव ज्याचा आज्ञाधारु । कर्म त्याचें होय किंकरु ।
तरी ज्ञाते यथेष्टाचारु । विषयीं साचारु विचरती’ ॥१४॥
आतां तूं म्हणशील की, देव ज्याचा आज्ञाधारक झाला, त्याचे कर्म हे सहजच किंकर होणार; मग ज्ञाते हे विषयामध्यें पाहिजे तसा स्वेच्छाचार करीत राहातील ! १४.

ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण । सर्वथा न घडे गा जाण ।
तेही विषयींचें लक्षण । सावधान परियेसीं ॥१५॥
(त्याविषयी सांगतो ऐक) ज्ञात्यांना स्वेच्छ-विषयाचरण कधीही घडणार नाही. त्याचे कारणही सांगतो ते लक्ष देऊन ऐक १५.

ज्यासी दग्धपटअ भिमान । मिथ्या प्रपंचाचें भान ।
मृषा विषयांचें दर्शन । विषयाचरण त्या नाहीं ॥१६॥
ज्याचा अभिमान दग्ध झालेल्या वस्त्राप्रमाणें असतो, त्याला प्रपंचाचे भान मिथ्या असून विषयांचे दर्शनही मिथ्याच वाटते. म्हणून त्याला विषयाचरणही नसतेच १६.

जयासी प्रपंचाची आवडी । विषयाची अतिगोडी ।
यथेष्टाचरणाची वोढी । पडे सांकडी तयासी ॥१७॥
ज्याला प्रपंचाची आवड असते, विषयांची अतिशय गोडी असते, त्यालाच मनसोक्त आचरणाकडे ओढ असते, तोच संसारसंकटांत सांपडतो १७.

ज्ञातयाच्या ठायीं । सत्यत्वें विषयो नाहीं ।
मा भोगावया कायी । अभिलाषी पाहीं तो होईल ॥१८॥
परंतु ज्ञात्याला विषयाच्या ठिकाणी सत्यमति नसते, त्यामुळें तो विषयभोगांत कसा लुब्ध होईल ? १८.

आतां ज्ञातयाचें कर्म । ऐक सांगों त्याचें वर्म ।
नातळतां मनोधर्म । क्रियाकर्म आचरती ॥१९॥
आतां ज्ञात्याच्या कर्मांतील मर्म सांगतो ते ऐक. ज्ञाते हें मनोधर्माला न शिवतां साऱ्या क्रिया आणि सारे धर्म आचरण करीत असतात १९.

दोषबुद्ध्योभयातीतो निषेधान्न निवर्तते ।
गुणबुद्ध्या च विहितं न करोति यथार्भकः ॥ ११ ॥
[ श्लोक ११]-जो माणूस गुणदोषबुद्धीच्या पलीकडे जातो, तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही की गुणबुद्धीने विहित कर्मे करीत नाही. (११)

गुणदोषातीत ज्ञाता । तो निषेधीं न वर्ते सर्वथा ।
परी भ्यालेपण चित्ता । नाहीं तत्वतां तयासी ॥१२०॥
गुणदोषातीत झालेला ज्ञाता भलत्याच रीतीनें कधीही वागत नसतो; पण त्याच्या चित्ताला भित्रेपणाही कधी ठाऊक नसतो १२०.

तो विहितही कर्म करी । तेथ गुणत्वें बुद्धि न धरीं ।
कुलालचक्राचियेपरी । पूर्वसंस्कारीं वर्तत ॥२१॥
तो विहित कर्मही करतो; पण हे मी चांगले केले, अशी गुणबुद्धीही धरीत नाही. कुंभाराच्या चाकाप्रमाणें पूर्वप्रारब्धानुसार तो वागत असतो २१.

संकल्पु नाहीं वृत्तीं । हेतु स्फुरेना चित्तीं ।
ऐसीं कर्में ज्ञाते करिती । शरीरस्थितीं केवळ ॥२२॥
वृत्तींत संकल्प उठत नाही, चित्तांत हेतु स्फुरत नाही, अशी केवळ शरिरानेंच ज्ञाते कर्मे करीत असतात २२.

तेथ सत्कर्म सिद्धी गेलें । तेणें फुगेना म्यां हें केलें ।
अथवा माझारीं विकळ पडिलें । तेणें तगमगिलेंपण नाहीं ॥२३॥
म्हणून सत्कर्म केलेले सिद्धीला गेले तर ‘हे मी केले’ असे म्हणून तो फुगत नाही. किंवा मध्येंच तें बंद पडले, तरी त्याबद्दल त्याला तगमग वाटत नाही. २३.

निद्रितामागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्गभोगु ।
त्यासी नाहीं रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा ॥२४॥
झोपी गेलेल्याच्या पाठीमागें वाघ बसला किंवा समोर स्वर्गभोग येऊन राहिला, तर त्याची त्याला भीतीही वाटत नाहीं व प्रीतीही उपजत नाही, त्याप्रमाणेच ज्ञात्यांची स्थिति असते २४.

गुणदोषीं चित्तवृत्ती । सांडोनिया सहजस्थिती ।
बाळकें जेवीं क्रीडती । तैशी स्थिति ज्ञात्याची ॥२५॥
गुण किंवा दोष कांहीं एक मनांत न आणतां मुले जशी सहजगत्या खेळत असतात, त्याचप्रमाणें ज्ञात्यांची स्थिति असते २५.

‘अभिमानें कर्मप्राप्ती । त्या अभिमानातें त्यागिती ।
मग निरभिमानें केवीं वर्तती । कर्मस्थिती त्यां न घडे’ ॥२६॥
‘कर्मप्राप्ति अभिमानानें घडत असते, तो अभिमानच जर ते सोडून देतात, तर निरभिमानानें ते कसे वागतात ? कर्म म्हणून त्यांजकडून घडावयाचेंच नाही’ २६.

ऐसा विकल्पु जरी करिसी । ते स्थिति न कळे इतरांसी ।
निरभिमानता स्वानुभवेंसी । केवीं येरासी कळेल ॥२७॥
असा जर तूं विकल्प मनांत आणशील, तर सांगतों की, ही स्थिति इतरांना कळण्यासारखी नव्हे, निरभिमानपणा हा स्वतःचा अनुभव असतो, इतरांना तो कसा कळणार ? २७.

देह प्रारब्धाचेनि मेळें । स्वभावें सर्व कर्मीं चळे ।
तेथ अज्ञानाचेनि बळें । अभिमानु खवळे ‘मी कर्ता’ ॥२८॥
प्रारब्धानुसार देह सहजगत्या साऱ्या कर्माची हालचाल करीत असतो, पण अज्ञानाच्या जोरामुळें अभिमान बोकाळतो, आणि ‘मी कर्ता’ असे म्हणू लागतो २८.

तेथ गुरुवाक्य-अनुवृत्ती । अभ्यासूनि यथा निगुतीं ।
अज्ञानेंसहित निरसिती । अभिमानस्थिति निजबोधें ॥२९॥
त्या वेळी गुरुवचनाच्या अनुवृत्तीनें यथोचित अभ्यास करून ज्ञातेजन अज्ञानासहवर्तमान अभिमानाचे निरसन करतात २९.

शेष-प्रारब्धाचेनि मेळें । निरभिमानें देह चळे ।
ज्ञाते कर्में करिती सकळें । जाण केवळें शरीरें ॥१३०॥
तेव्हां शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार निरभिमानानें त्यांचा देह वागत असतो. अर्थात् ज्ञानसंपन्न लोकांची सारी कर्मे केवळ शरीरमात्रानेंच होत असतात १३०.

केवळ शरीरें कर्में होतीं । तींच ‘अहेतुक’ बोलिजेती ।
अर्भकदृष्टांतें उपपत्ती । हेचि स्थिति सांगितली ॥३१॥
आणि केवळ शरीरमात्रानेंच कर्में घडतात त्यांनाच ‘अहेतुक’ असे म्हणतात. बालकाची उपमा देऊन ह्या स्थितीचे लक्षण वर सांगितले ३१.

निरभिमानाचीं लक्षणें । कृष्ण उद्धवातें ऐक म्हणे ।
येरु आनंदला अंतःकरणें । सादरपणें परिसतु ॥३२॥
कृष्ण उद्धवाला म्हणाला, “आतां निरभिमानाची लक्षणे सांगतों ऐक.” तेव्हां उद्धवाला मनापासून आनंद झाला, आणि तो लक्ष देऊन ऐकू लागला ३२.

सर्वभूतसुहृच्छान्तो ज्ञानविज्ञाननिश्चयः ।
पश्यन्मदात्मकं विश्वं न विपद्येत वै पुनः ॥ १२ ॥
[श्लोक १२]-ज्याने श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभवही घेतला आहे, तो सर्व प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती नेहमीच शांत राहातात सर्व दृश्य विश्वाला तो माझेच स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्ममृत्यू असत नाहीत. (१२)

पहिलें शास्त्रश्रवणें ‘ज्ञान’ । तदनुभवें होय ‘विज्ञान’ ।
ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । निरभिमान तो होय ॥३३॥
प्रथम शास्त्रश्रवणानें ‘ज्ञान’ उत्पन्न होते; त्या ज्ञानाच्या अनुभवानें ‘विज्ञान’ प्राप्त होते. असा ज्ञानविज्ञानानें संपन्न झाला म्हणजे तो निरभिमान होतो ३३.

साचचि निरभिमानता । जरी आली होय हाता ।
तरी ‘शांति’ तेथ सर्वथा । उल्हासता पैं पावे ॥३४॥
ह्याप्रमाणें खरी खरी निरभिमानता हातास चढली म्हणजे त्याच्या ठिकाणी ‘शांति’ उल्हसित होत असते ३४.

दाटूनि निश्चळ होणें । कां दांत चावूनि साहणें ।
ते ‘शांति’ ऐसें कोण म्हणे । आक्रोशपणें साहातु ॥३५॥
जुलमानें चित्त निश्चल करण्याचा प्रयत्न करणे, किंवा दांतओंठ चावून परापकार सहन करणे, त्याला शांति असें कोण म्हणेल ? आक्रोशानें सहनशीलता आंगी आणणे ही कांही शांति नव्हे ३५.

‘शांति’ म्हणिजे ते ऐशी । सागरीं अक्षोभ्यता जैसी ।
चढ वोहट नाहीं तिसी । सर्वदेशी सर्वदा ॥३६॥
शांति म्हटली म्हणजे ती अशी असली पाहिजे की, जसा कांहीं क्षुब्ध न होणारा समुद्र ! त्याला केव्हांही आणि कोठेही वाढ व तूट नाहीं ३६.

नाना सरितांचे खळाळ । आणूनि घालिती समळ जळ ।
तो तिळभरी नव्हे डहुळ । अति निर्मळ निजांगें ॥३७॥
शेकडों नद्या गढूळ पाण्याचे लोंढेच्या लोंढे आणून समुद्रांत घालीत असतात, पण तो तिळभरसुद्धा गढूळ होत नाही. तो स्वतः अगदी निर्मळ असतो तसाच असतो ३७.

तैशी नानाभूतविषमता । स्वार्थविरोधें अंगीं आदळतां ।
पालटू नव्हे ज्याच्या चित्ता । ते जाण सर्वथा ‘निजशांति’ ॥३८॥
त्याप्रमाणें स्वार्थाला विरोध करणारी अशी नानाभूतविषमता अंगी आदळली, तरी ज्याच्या चित्तांत यत्किंचितही पालट होत नाही, तीच ‘खरी शांति’ होय ३८.

ऐसी शांति ज्यासी देखा । तोचि सर्वभूतांचा सखा ।
आवडता सर्व लोकां । ‘सुहृद’ तो कां सर्वांचा ॥३९॥
अशी शांति ज्याला प्राप्त होते, तोच सर्व प्राणिमात्रांचा खरा सखा होय; सर्व लोकांचा आवडता तोच; आणि सर्वांचा ‘सुहृद’ही तोच ३९.

नवल सख्यत्वाची परी । सर्वस्व दे निजमैत्रीं ।
स्वार्थीं वंचनार्थ न करी । कृपापात्रीं उपदेशु ॥१४०॥
त्याच्या सख्यत्वाचा प्रकारही मोठा नवलाचा आहे. तो आपल्या मैत्रीसाठी सर्वस्व अर्पण करतो; तो आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणाला फसवीत नाहीं; कृपापात्र असेल त्यालाच उपदेश करीत असतो १४०.

अतर्क्य त्याची पाहती दिठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी ।
जगासी मज अभिन्न गांठी । निजदृष्टीं बांधली ॥४१॥
त्याची पाहाण्याची दृष्टि मोठी अतर्क्य असते, त्याच्या दृष्टीला सारी सृष्टि मद्‌रूपच दिसते. त्यानें आपल्या दृष्टीनें जगाची व माझी अभिन्न गांठ बांधलेली असते ४१.

मग तो जेउतें पाहे । तेउता मीचि तया आहें ।
तो जरी मातें न पाहे । तें न पाहणेंही होये मीचि त्याचें ॥४२॥
मग तो जिकडे जिकडे पाहातो, तिकडे तिकडे त्याला मीच असतो. त्यानें जरी मला पाहिले नाही, तरी त्याचे ते न पाहाणेही मीच होतो ४२.

त्याची पाहती जे दिठी । ते मीचि होये जगजेठी ।
ऐशी तया मज एक गांठी । सकळ सृष्टीसमवेत ॥४३॥
त्याची पाहाणारी जी दृष्टि, ती मीच स्वतः होतो. अशी सर्व सृष्टीसहवर्तमान त्याची व माझी एक गट्टी जमून राहते ४३.

अवघें जगचि मी होये । तेव्हां ‘तो मी’ हे भाष जाये ।
ऐसा तो मजमाजीं समाये । समसाम्येंसमत्वें ॥४४॥
सारे जगच मी होऊन राहिलों म्हणजे ‘तो’ व ‘मी’ हे शब्दच नाहींसे होतात. असा तो सर्वत्र समदृष्टीच्या योगानें एकात्मतेनेंच माझ्यामध्यें राहतो ४४.

सांडोनियां मनोधर्म । ऐसा ज्यासी मी झालों सुगम ।
त्यासी पुढती कैंचें जन्म । दुःख दुर्गम ज्याचेनीं ॥४५॥
अशा प्रकारे मनोधर्मच सोडल्यामुळें ज्याला मी सुगम होतो, त्याला पुढे ज्याच्या योगानें दुर्धर दुःख भोगावे लागते, तो जन्म कसा येईल ? ४५.

मातेच्या उदरकुहरीं । रजस्वलेच्या रुधिरामाझारीं ।
पित्याचेनि रेतद्वारीं । गर्भसंचारी संसरण ॥४६॥
मातेच्या उदररूपी गुहेमध्यें रजस्वलेच्या रुधिरांत पित्याच्या रेतद्वारानें गर्भसंचार होऊन संसाराला आरंभ होतो ४६.

जे मातेच्या उदरीं । जंतु नाकीं तोंडीं उरीं शिरीं ।
विष्ठामूत्राचे दाथरीं । नवमासवरी उकडिजे ॥४७॥
आईच्या पोटांत असलेले जंतु त्याच्या नाकातोंडांत, छातींत व मस्तकांत शिरतात, असा तो प्राणी नऊ महिनें विष्ठामूत्रामध्यें उकडून निघत असतो ४७.

जठराग्नीच्या तोंडीं । घालूनि गर्भाची उंडी ।
उकडउगकडूनि पिंडीं । गर्भकांडीं घडिजेति ॥४८॥
जठराग्नीच्या तोंडामध्यें गर्भाचा गोळा द्यावयाचा, आणि मग तो उकडून उकडून एक एक अवयव बनावयाचा ! ४८.

ते गर्भींचे वेदना । नानापरींची यातना ।
नको नको रघुनंदना । चिळसी मना येतसे ॥४९॥
हे नारायणा ! ती गर्भातील वेदना, आणि तेथच्या नाना प्रकारच्या यातना, नकोत रे नकोत ! त्या ऐकूनच मनाला चिळस येते ४९.

अवघ्यांच्या शेवटीं । प्रसूतिवातु जो आटी ।
सर्वांगीं वेदना उठी । योनिसंकटीं देहजन्म ॥१५०॥
नंतर साऱ्यांच्या पाठीमागून प्रसूतिवायु म्हणून जो उठतो, त्यानें तर साऱ्या अंगाला विंचवाप्रमाणें वेदना उठतात, आणि मोठ्या संकटानें योनीतून देहाचा जन्म होतो १५०.

ऐसें अपवित्र जें जन्म । तें न पवतीच ते नरोत्तम ।
जींहीं ठाकिलें निजधाम । ते पुरुषोत्तम समसाम्यें ॥५१॥
असा जो अपवित्र जन्म तो त्या उत्तम पुरुषांना कधींच प्राप्त होत नाही. ज्यांनी निजधाम प्राप्त करून घेतलेले असते, ते समदृष्टीच्या योगानें स्वतः पुरुषोत्तमस्वरूपच होतात १५१.

मी असतां पाठीपोटीं । त्यांसी काइशा जन्मगोठी ।
कळिकाळातें नाणिती दिठी । आले उठाउठी मद्रूपा ॥५२॥
त्यांच्या मागे पुढे मीच असल्यावर त्यांना जन्माच्या गोष्टी कशाच्या ? ते कलिकाळाचीही पर्वा न करतां तत्काल मत्स्वरूपाला येऊन पोचतात ५२.

जेथ जन्म नाहीं जाहलें । तेथ मरण न लगतांचि गेलें ।
ऐसे भजोनि मातें पावले । भजनबळें मद्‌भक्त ॥५३॥
जेथे जन्मच नाहीसा झालेला असतो, तेथें मृत्युही रिकाम्या हातानें परत जातो. अशा प्रकारे माझे भक्त माझें भजन करून त्या भजनाच्या बळानेंच मला पावतात ५३.

कृष्ण उद्धवातें थापटी । म्हणे वेगें उठीं उठीं ।
हेचि हातवशी हातवटी । जन्मतुटी तेणें होय ॥५४॥
इतकें बोलून कृष्णानें उद्धवाची पाठ थोपटली आणि म्हटले, ‘चल ऊठ ऊठ लवकर, हीच युक्ति साध्य कर, म्हणजे हिनेंच जन्माची यातायात चुकेल ‘ ५४.

जैसें मेघमुखींचें उदक । वरिच्यावरी झेलिती चातक ।
तैसें कृष्णवचनांसी देख । उद्धवें मुख पसरिलें ॥५५॥
मेघाच्या तोंडांतून आलेलें उदक चातक ज्याप्रमाणें वरच्यावर झेलून घेतो, त्याप्रमाणेच कृष्णाच्या भाषणालाही उद्धवानें तोंड पसरले ५५.

कां चंद्राकिरणीं चकोर । जेवीं अत्यंत सादर ।
तेवीं उद्धवाचा आदर । दिसे थोर हरिवचनीं ॥५६॥
किंवा चंद्रकिरणासाठी चकोर ज्याप्रमाणें अगदी उतावळे होतात, त्याप्रमाणेच हरीच्या भाषणावर उद्धवाचीही अतिशय आवड दिसू लागली ५६.

हो कां पक्षिणी देखोनि पिलें । जाणोनि चार्यांचे वेळे ।
सांडोनियां आविसाळें । मुख कोंवळें जेवीं पसरी ॥५७॥
किंवा पिलें पक्षिणीला पाहातांच चार्‍याची वेळ झाली हे जाणून ज्याप्रमाणें घरट्यांतून पुढे सरून आपली कोवळी तोंडे पसरतात ५७,

तेवीं देखोनि कृष्णमुख । उद्धवासी अत्यंत हरिख ।
श्रवणाचे मुखें देख । कृष्णपीयूष सेवित ॥५८॥
त्याप्रमाणें कृष्णाचें मुख पाहून उद्धवाला अत्यंत आनंद झाला, आणि पाहा ! तो कानाच्याच मुखानें कृष्णामृत प्राशन करूं लागला ५८.

श्रीशुक उवाच –
इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप ।
उद्धवः प्रणिपत्याह तत्त्वं जिज्ञासुरच्युतम् ॥ १३ ॥
[श्लोक १३]- श्रीशुक म्हणतात – परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला, तेव्हा भगवद्‌भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले. (१३)

शुक म्हणे कौरवनाथा । कृपा उपजली भगवंता ।
उपदेशिलें महाभागवता । ज्ञानकथा निजबोधु ॥५९॥
शुकाचार्य म्हणतात हे परिक्षिति ! भगवंताला कृपाच उत्पन्न झाली, म्हणून त्यानें आपल्या महान् भक्ताला आत्मज्ञानाचा उपदेश केला ५९.

तें ऐकोनि उद्धव । श्रवणीं थोर उठी हांव ।
कैसें बोलिला ज्ञानगौरव । अतिअपूर्व श्रीकृष्ण ॥१६०॥
तो ऐकून उद्धवाची ऐकण्याची हांव वाढली. यावरून श्रीकृष्णाचें हें ज्ञानयुक्त किती अपूर्व होते ते पाहा ! ६०.

श्रीकृष्ण श्रीमुखें सांगे कोड । तें निरूपण अतिगोड ।
जीवीं उठली श्रवणचाड । नुल्लंघी भीड देवाची ॥६१॥
श्रीकृष्णानें स्वमुखानेंच आपले हृद्‌गत सांगितलेलें; ते निरूपण अत्यंत गोड; त्यामुळें ऐकण्याची इच्छा मनामध्यें वाढली; पण देवाची भीड मोडवली नाहीं ६१.

आवडीं कळवळे चित्त । घाली साष्टांग दंडवत ।
हात जोडोनि पुसत । प्रेमळ भक्त उद्धव ॥६२॥
प्रेमानें उद्धवाचें चित्त सद्‌गदित झाले, त्यानें त्यास साष्टांग दंडवत घातला आणि तो प्रेमळ भक्त त्याला विचारूं लागला ६२.

श्रीउद्धव उवाच –
योगेश योगविन्यास योगात्मन्योगसम्भव ।
निःश्रेयसाय मे प्रोक्तस्त्यागः सन्न्यासलक्षणः ॥ १४ ॥
[श्लोक १४]-उद्धव म्हणाला – आपण योगेश्वर, सर्व योगांचे आधार, त्यांचे कारण आणि योगस्वरूप आहात माझ्या परम कल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे. (१४)

ऐकें योगियांच्या योगपती । योग्यांचा ठेवा तूं श्रीपती ।
योगीं प्रगट तूं योगमूर्ती । योग उत्पत्ती तुजपासीं ॥६३॥
उद्धव म्हणाला, हे योग्यांच्या योगिराजा ! तूं श्रीपति योग्यांचा ठेवा आहेस. तूं योगाची साक्षात् मूर्ति असून योगानेंच तूं प्रगट होतोस. साऱ्या योगांची उत्पत्ति तुझ्याचपासून ६३.

मज मोक्षासी कारण । त्यागु संन्यासलक्षण ।
बोलिलासी तो अति कठिण । परम दारुण हा त्यागु ॥६४॥
आता मला मोक्ष लाभावा म्हणून तूं त्यागाचे व संन्यासाचे लक्षण सांगितलेस. पण हा त्याग अतिशय कठिण व परम दारुण आहे ६४.

त्यागोऽयं दुष्करो भूमन् कामानां विषयात्मभिः ।
सुतरां त्वयि सर्वात्मन्नभक्तैरिति मे मतिः ॥ १५ ॥
[श्लोक १५]-परंतु हे अनंता ! जे लोक विषयांतच गुरफटले गेले आहेत, त्यांना विषयभोगांचा त्याग करणे अतिशय कठीण आहे हे सर्वस्वरूपा ! त्यातसुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत, त्यांना तर हे सर्वथैव अशक्य आहे, असे माझे मत आहे. (१५)

पाहतां या त्यागाची रीती । मज तंव दुर्धरु गा श्रीपती ।
मग इतरांची येथ मती । कवण्या स्थितीं होईल ॥६५॥
ह्या त्यागाची रीत पाहिली तर ती श्रीकृष्णा, मलासुद्धा अत्यंत दुर्घट वाटते. मग इतरांची त्यांत गति कशी होईल ? ६५.

कामु जयाच्या चित्तीं । विषयीं आसक्त मती ।
त्यासी या त्यागाची गती । नव्हें श्रीपति सर्वथा ॥६६॥
हे श्रीकृष्णा ! ज्यांच्या चित्तामध्यें काम आहे, ज्यांची बुद्धि विषयांत आसक्त झालेली आहे; त्यांना हा त्याग कधीच घडावयाचा नाहीं ६६.

तुझी कृपा जंव नव्हे । तंव तो अभक्तां केवीं करवे ।
त्यागु बोलिला जो देवें । तो सर्वांसी नव्हे सर्वथा ॥६७॥
तुझी कृपा जोपर्यंत झालेली नाही, तोपर्यंत हा त्याग अभक्तांच्या हातून कसा घडणार ? देवानें जो त्याग सांगितला, तो सर्वांना होण्यासारखा नाहीं ६७.

तूं सर्वात्मा असतां हृदयीं । चित्त प्रवेशेना तुझे ठायीं ।
तें आवरिलें असे विषयीं । नवल कायी सांगावें ॥६८॥
अहो काय चमत्कार सांगावा ? तूं सर्वात्मा प्रत्यक्ष हृदयांत असतां त्या तुझ्यांत चित्त शिरत नाही, आणि ते विषयांत गुंतून पडते ! ६८.

ऐसे प्रपंची आसक्त । यालागीं विमुख झाले अभक्त ।
त्यांसी त्यागु नव्हे हा निश्चित । चित्त दुश्चित सर्वदा ॥६९॥
असे प्रपंचांत आसक्त झालेले असल्यामुळें अभक्त तुझ्याशी विन्मुख होतात, त्यांना खरोखर त्याग व्हावयाचाच नाही, कारण सदासर्वकाळ त्यांचे चित्त दूषित झालेले असते ६९.

त्यागु कां नव्हे म्हणसी । तें परिस गा हृषीकेशी ।
कठिणत्व जें त्यागासी । तें तुजपाशीं सांगेन ॥१७०॥
श्रीकृष्णा ! त्याग का होत नाहीं ? असें म्हणशील तर तेही सांगतों ऐक. त्याग करण्यामध्यें कठिण काय आहे, तेही तुझ्यापाशी कथन करतों १७०.

सोऽहं ममाहमिति मूढमतिर्विगाढः
त्वन्मायया विरचितात्मनि सानुबन्धे ।
तत्त्वञ्जसा निगदितं भवता यथाहं
संसाधयामि भगवन्ननुशाधि भृत्यम् ॥ १६ ॥
[श्लोक १६]-हे प्रभो ! मीही आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित ‘मीमाझे’ या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूंमध्ये बुडून गेलो आहे म्हणून हे भगवन ! आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला, त्याचे स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजावून सांगा की, मी सहजपणे ते आचरू शकेन. (१६)

तुझी माया विचित्र उपाधी । शरीरीं केली आत्मबुद्धी ।
आत्मीयें शरीरसंबंधीं । विपरीत सिद्धी वाढली ॥७१॥
तुझी माया ही विचित्र उपाधि आहे. ती शरीरामध्यें ‘आत्मबुद्धि’ उत्पन्न करते, आणि शरीरसंबंधी जेवढे काही आहे, तें सारें ‘आत्मीय’ म्ह. आपलें आहे असे भासविते ! याप्रमाणें विपरीत भावना वाढून गेली आहे ! ७१

‘मी-माझें’ वाढलें गाढ । तेणें मति झाली मूढ ।
गृहासक्ति लागली दृढ । त्यागु अवघड यालागीं ॥७२॥
‘मी’ आणि ‘माझे’ हेच माजून राहिल्यामुळें बुद्धि विचारशून्य होऊन घरादारावर अतिशय आसक्ति जडते; त्यामुळें त्याग हा अवघड होऊन बसतो ७२.

ऐशी ही बुद्धि विवळे । अप्रयासें तत्व आकळे ।
तैशी कृपा कीजे राउळें । दास गोपाळें तारावया ॥७३॥
ती बुद्धि निर्मळ होईल, अनायासानें आत्मस्वरूप आकलन होईल अशी देवानें कृपा केली पाहिजे, तरच दास तरून जातील ७३.

ऐकें गा पुरुषोत्तमा । निजदासां आपुल्या आम्हां ।
सोडवी गा संसारश्रमा । आत्मयारामा श्रीकृष्णा ॥७४॥
हे पुरुषोत्तमा ! हे श्रीकृष्णा ! हे आत्मारामा ! ह्या आमच्यासारख्या आपल्या दासांना संसाराच्या यातनेंतून मुक्त कर ७४.

तुज सांडोनि हृषीकेशी । पुसों जावें आणिकांपासीं ।
तें नये माझिया मनासी । विषयीं सर्वांसी व्यापिलें ॥७५॥
हे श्रीकृष्णा ! तुला सोडून हे दुसऱ्या कोणाला विचारावयास जाणे माझ्या मनाला आवडत नाही. कारण साऱ्यांना विषयांनी ग्रासून सोडलें आहे ७५.

सत्यस्य ते स्वदृश आत्मन आत्मनोऽन्यं
वक्तारमीश विबुधेष्वपि नानुचक्षे ।
सर्वे विमोहितधियस्तव माययेमे
ब्रह्मादयस्तनुभृतो बहिरर्थभावाः ॥ १७ ॥
[श्लोक १७]-हे प्रभो ! आपण त्रिकालाबाधित सत्यस्वरूप, स्वयंप्रकाश व सर्वांचे आत्मा आहात हे प्रभो ! आत्मतत्त्वाचा उपदेश करणारा आपल्याव्यतिरिक्त देवतांमध्येसुद्धा मला दुसरा कोणी दिसत नाही कारण ब्रह्मदेव इत्यादी शरीराभिमानी देव आपल्या मायेने मोहित झालेले आहेत त्यामुळेच ते बाह्य विषयांना सत्य मानतात. (१७)

पुसों जावें ब्रह्मयासी । तो गुंतला सृष्टिकर्मासी ।
प्रजाउत्पत्ति मानसी । अहर्निशीं चिंतितु ॥७६॥
ब्रह्मदेवाला विचारावयाला जावें, तर तो सृष्टि उत्पन्न करण्यामध्यें गुंतलेला. रात्रंदिवस प्रजा उत्पन्न कशी करावी हीच त्याला विवंचना ७६.

जो आपुल्या निजस्वभावीं । सदा संसारु वाढवी ।
तो केवीं संसारु तोडवी । केलें न बुडवी सर्वथा ॥७७॥
जो आपल्या अंगच्या स्वभावधर्माप्रमाणें सदासर्वदा संसार वाढवीत असतो, तो संसाराला तोडविणार कसा ? आपण केलेलें तो कधीच बुडविणार नाहीं ७७.

वाढों नेदी संसारासी । कोपु आला प्रजापतीसी ।
शापु दिधला नारदासी । ब्रह्म उपदेशी म्हणौनी ॥७८॥
नारद ब्रह्मोपदेश करून संसार वाढू देईनासा झाला, म्हणून ब्रह्मदेवाला राग येऊन त्यानें नारदाला शाप दिला ७८.

ऐसे संसारी आसक्त । नित्य संसारयुक्त ।
त्यांसी पुसों न मनी चित्त । जाण निश्चित श्रीकृष्णा ॥७९॥
श्रीकृष्णा ! असे संसाराच्या आसक्तीनें जे निरंतर त्यांत गढून गेलेले आहेत, त्यांना विचारावयाला मुळीच मन घेत नाहीं ७९.

पुसों जावें ऋषींप्रती । तंव ते सदा आपमती ।
आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥१८०॥
बरे, ऋषींना विचारावयास जावे, तर ते सदा सर्वकाल स्वमताभिमानी ! आपलेच मत स्थापन करूं पाहातात; आणि त्यांच्या विरुद्ध जरा कोणी बोलले की, त्याला शाप देतात ! १८०.

जीवीं धरोनि अर्थासक्ती । शिष्यांतें उपदेशिती ।
विषयो धरोनियां चित्तीं । जीविकावृत्तीं उपदेशु ॥८१॥
मनांत द्रव्याचा अभिलाष धरून जे शिष्यांना उपदेश देतात, त्यांच्या मनांतच विषय असल्यामुळे, तो उपदेश म्हणजे पोट भरण्याचे एक साधन होय ८१.

गुरूसीच विषयासक्ती । तेथ शिष्यासी कैंची विरक्ती ।
ऐशियासी जे पुसती । ते भ्रंशती स्वार्थातें ॥८२॥
गुरूलाच जर विषयासक्ति, तर शिष्याला विरक्ति येणार कोठून ? अशाला जे विचारावयाला जातात, ते स्वार्थाला मुकतात ८२.

सत्यस्वरूप स्वप्रकाश । आत्मा तूं अविनाश ।
युक्तिप्रयुक्तीं उपदेश । विकल्पनिरास जाणसी ॥८३॥
तूं सत्यस्वरूप, स्वयंप्रकाश, सर्वात्मा व अविनाशी असा असल्यामुळें युक्तिप्रयुक्तीनें उपदेश कसा करावा व विकल्पाचा निरास कसा करून टाकावा हें तूंच जाणतोस ८३.

ब्रह्मज्ञानाचा वक्ता । तुजवेगळा श्रीकृष्णनाथा ।
न दिसे गा सर्वथा । मज पाहतां त्रिलोकीं ॥८४॥
हे श्रीकृष्णनाथा ! ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यास समर्थ असा तुझ्याशिवाय मला त्रिभुवनांत कोणी दिसत नाहीं ८४.

एवं आत्मा तूं तत्वतां । तूंचि आत्मज्ञानदाता ।
आत्मबोधीं संस्थापिता । कृष्णनाथा तूं एकु ॥८५॥
अशा प्रकारे कृष्णा ! खरोखर आत्मा असा तूंच आहेस, आत्मज्ञान देणाराही तूंच, आत्मबोधामध्यें स्थिर करणाराही एक तूंच आहेस ८५.

तस्माद्‌भवन्तमनवद्यमनन्तपारं
सर्वज्ञमीश्वरमकुण्ठविकुण्ठधिष्ण्यम् ।
निर्विण्णधीरहमु हे वृजिनाभितप्तो
नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये ॥ १८ ॥
[श्लोक १८]-भगवन ! आपण निर्दोष, अनन्त, सर्वज्ञ, नियन्ते, शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठधामाचे निवासी, तसेच माणसाचे नित्य सखा नारायण आहात म्हणूनच त्रिविध तापांनी पोळल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. (१८)

यालागीं जी यादवपती । नित्य शुद्ध पवित्र मूर्ती ।
तुज मायामोहो नातळती । पवित्र ख्याती यालागीं ॥८६॥
हे यादवश्रेष्ठा ! तूं नित्य, शुद्ध आणि पवित्रमूर्ति आहेस, म्हणून तुला मायामोह शिवत नाही, आणि म्हणून ‘तूं पवित्र आहेस’ अशी तुझी लोक कीर्ति गातात ८६.

गोंवळांचे उच्छिष्टकवळें । ज्याची पवित्रता न मैळे ।
तेणेंचि उच्छिष्टबळें । गोंवळें सकळें तारिलीं ॥८७॥
गोपांच्या उच्छिष्ट घांसानें ज्याची पवित्रता भंग पावली नाही, उलट त्या उच्छिष्ट घांसानेंच गवळ्यांची पोरें तूं तारलींस ८७.

प्राणें शोषिलें पूतनेसी । तरी पवित्रता अधिक कैशी ।
तेणेंचि उद्धरिलें तिसी । दोषें दोषांसी तारकु ॥८८॥
पूतनेला प्राणांसहवर्तमान शोषून घेतलेंस, तरी तुझी पवित्रता कमी झाली नाही. कारण त्यामुळेच तिचा उद्धार झाला. अर्थात् दोषच दोषांना तारक झाले ! ८८.

करूनि कालीयमर्दन । मर्दिला त्याचा अभिमान ।
तरी मैळेना पवित्रपण । निर्विषें जाण तारिला ॥८९॥
कालियासर्पाचे मर्दन करून त्याचा अभिमान नाहीसा केलास; तरी पवित्रता मोडली नाहीच. त्याला निर्विष करून त्याचा उद्धार केलास ८९.

रजक अपवित्र अत्यंत । आतळे तया अधःपात ।
त्यासी मारूनियां निश्चित । केला पुनीत सायुज्या ॥१९०॥
रजक हा जातीनें अत्यंत हीन, तो अधःपातास जावयाचा; पण त्याला मारून पुनीत करून सायुज्यमुक्तीला पात्र केलेंस १९०.

करूनि गोपिकांसी निंद्य काम । तेणें त्या केल्या नित्य निष्काम ।
तेचि पवित्रता अनुत्तम । सायुज्यधाम पावल्या ॥९१॥
गोपीशी निंद्य भासणारे कर्म करूनच त्यांना निष्काम करून सोडलेंस. त्यामुळें त्या अत्यंत पवित्र होऊन सायुज्यसदनाला गेल्या ९१.

करितां सुकर्म कुकर्म । ज्याची पवित्रता अनुत्तम ।
यालागीं नामें ‘पुरुषोत्तम’ । अकर्तात्म निजबोधें ॥९२॥
सुकर्म असो की कुकर्म असो, करीत असतां पवित्रता निर्भेळ राहाते, म्हणूनच, म्हणजे अकर्तात्मबोधामुळेच तुला पुरुषोत्तम हे नाम पडले आहे ९२.

जो आकळे गुणांआंतु । त्यासी ते गुण करिती प्रांतु ।
त्या गुणांसी तुजमाजीं अंतु । यालागीं तूं ‘अनंतु’ सर्वथा ॥९३॥
त्रिगुणांमध्यें जो सांपडतो, त्याला ते गुण जखडून टाकतात. पण त्या गुणाचा तुझ्यामध्यें अंतच होऊन जातो, म्हणून तूं सर्वथा ‘अनंत’ आहेस ९३.

देशतः कालतः पार । तुज न करवेचि साचार ।
यालागीं अनंत तूं अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥९४॥
देशाच्यानें किंवा कालाच्यानें तुला कांही मर्यादा घालवत नाही, म्हणून तूं ‘अनंत’ व ‘अपार’ आहेस. श्रुतींना सुद्धा तुझा पार लागत नाहीं ९४.

तुज म्यां करावी विनंती । किती यावें काकुळती ।
तूं हृदयस्थ ज्ञानमूर्ती । जाणता त्रिजगतीं तूं एकु ॥९५॥
तुला मी काय विनंति करावी आणि किती म्हणून काकुळतीला यावें ? तूं हृदयस्थ ज्ञानमूर्ति आहेस, त्यामुळें सार्‍या त्रैलोक्यांत जाणता असा काय तो तूंच एक ९५.

ज्ञान अज्ञान मायाशक्ती । ईश्वराआधीन गा असती ।
त्या ईश्वराची तूं ईश्वरमूर्ती । सत्यकीर्ति तूं श्रीकृष्णा ॥९६॥
ज्ञान, अज्ञान ह्या मायाशक्ति, ह्या सार्‍या ईश्वराधीन आहेत. पण त्या ईश्वराचीही ईश्वरमूर्ति तूं आहेस. हे श्रीकृष्णा ! ही तुझी कीर्ति सत्य आहे ९६.

तूं सर्वांचा नियंता । सर्व करूनि अकर्ता ।
ऐसा ‘ईश्वरु’ तूं कृष्णनाथा । भोगूनि अभोक्ता तूं एकु ॥९७॥
हे कृष्णनाथा ! सर्वांचा नियंता, सर्व करून अकर्ता व सर्व भोगून अभोक्ता असा ईश्वर तूंच एक आहेस ९७.

देशतः कालतः स्वभावेंसीं । नाशु न पावे ज्या स्थानासी ।
तेथींचा तूं निवासवासी । पूर्ण पूर्णांशी अवतारु ॥९८॥
ज्या स्थानाचा देशानें किंवा कालानेही नाश होत नाही, तेथचा तूं रहिवाशी असून पूर्णाशाचा पूर्ण अवतार आहेस ९८

नराचें अविनाशस्थान । यालागी तूं ‘नारायण’ ।
तुझेनि जीवासी चळणवळण । चाळकपण तुजपाशीं ॥९९॥
नराचें तूं अविनाश स्थान आहेस, म्हणून तुला ‘नारायण’ असे म्हणतात. तुझ्यामुळेच जीवाचें चलनवलन होते. सर्वांचें चालकपण तुझ्यापाशी आहे ९९.

ऐसा ईश्वर तूं आपण । ‘नरसखा-नारायण’ ।
युद्धसमयीं अर्जुनासी जाण । ब्रह्मज्ञान त्वां दिधलें ॥२००॥
अशा प्रकारचा तूं स्वतः ईश्वर असून नराचा खास नारायण आहेस, तूंच युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलेंस २००.

दारुण होतां संग्रामासी । पावडा पावो युद्धासी ।
तेव्हां ब्रह्मज्ञान सांगसी । निज सख्यासी अर्जुना ॥१॥
भयंकर रणसंग्रामात एकमेकांचा जीव घेण्याकरतां पाऊल पुढे करून राहिलेल्या प्रसंगी आपला सखा जो अर्जुन त्याला ब्रह्मज्ञान सांगितलेस १.

ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तुज आलों शरण ।
त्रिविधतापें तापलों जाण । दुःख दारुण संसारु ॥२॥
नारायण असा कृपाळू असल्यामुळें मी तुला शरण आलो आहे. आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक ह्या विविध तापांनी मी तप्त झालों आहे. हा संसार भयंकर दुःखानें युक्त आहे २.

संसार म्हणजे अंधकूप । माजीं कामक्रोधादि दुष्ट सर्प ।
निंदा स्पर्धा कांटे अमूप । दुःखरूप मी पडिलों ॥३॥
संसार म्हणजे एक अंधारी विहीर आहे. तींत कामक्रोधादि महादुष्ट सर्प आहेत. निंदा व स्पर्धा हे कांटे तींत पसरले आहेत. अशा दुःखांत मी पडलो आहे ३.

तेथ पडीलियापाठीं । ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं ।
भरला जी उठाउठी । तेणें हिंपुटी होतुसें ॥४॥
तेथे पडल्यामुळें ब्रह्मद्वेषाचा पोटांत शूळ उठून त्यानें मी तळमळत आहे ४.

तेथून निघावया त्रिशुद्धी । उपावो न दिसे गा निजबुद्धी ।
कृपाळुवा कृपानिधी । आत्मबोधीं मज काढीं ॥५॥
त्यांतून बाहेर निघावयाला आपल्या बुद्धीला तर मुळीच उपाय सुचत नाही. ह्याकरतां हे कृपानिधे ! हे दयाळा ! मला आत्मज्ञानाचा बोध करून वर काढ ५.

श्रीभगवानुवाच –
प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः ।
समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात् ॥ १९ ॥
[श्लोक १९]-श्रीकृष्ण म्हणाले – हे उद्धवा ! जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत, ते चित्तातील अशुभ वासनांपासून बहुधा स्वतःच स्वतःचा उद्वार करून घेतात. (१९)

भूत संचरलियापाठीं । सुटती जल्पवादगोठी ।
त्यातें गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहाटी मंत्रोनी ॥६॥
अंगांत भुताचा संचार झाला म्हणजे तो मनुष्य अचावचा बडबडत सुटतो. त्याला पाहून पंचाक्षरी अक्षता मंत्रून त्याच्यावर टाकतो ६.

पाहतां पांचभौतिक संसारु । सहजें झाला असे थोरु ।
माजीं झोंबलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेंकरूं झडपिलें ॥७॥
त्याप्रमाणें पंचमहाभूतांचा संचार अगोदरच झाला होता, त्यांत कृष्णवियोगरूप समंध अंगांत शिरल्यामुळें उद्धव लेंकरूं अगदी झडपून गेलें ! ७.

मिसें उद्धवाची झडपणी । अहं-म्हैसासुर लागला जनीं ।
त्यासी करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ॥८॥
तेव्हां उद्धवाला झपाटा झाल्याचे निमित्त करून लोकांमध्यें जो ‘अहं’ नावाचा म्हसोबा शिरला होता, त्याला काढून टाकण्यासाठी कृष्णरूप पंचाक्षरी निघाला ८.

तेथ झाडणीलागीं आतां । यदुअवधूतसंवाद कथा ।
त्याचि मंत्रूनि मंत्राक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥९॥
त्या अहं – महषासुराला काढून टाकण्यासाठी यदुअवधूतसंवादकथेच्या मंत्राक्षता मंत्रून श्रीकृष्ण त्या भूताला झाडीत आहे. ९.

श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी । सावध होईं निजमानसीं ।
येऊनियां मनुष्यलोकासी । आपआीपणांसी उद्धरिती ॥२१०॥
श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, आतां तूं आपले मन सावध कर; ह्या मृत्युलोकाला येऊन आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे २१.

पाहतां यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता ।
पुत्र भ्राता दुहिता कांता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥११॥
खरे पाहूं गेलें असतां ह्या परमार्थाला माता पिता साहाय्य करूं शकत नाहीत. पुत्र, बंधु, कन्या किंवा कांता ही कधीच साह्य होत नाहींत ११.

साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखीं साह्य नव्हे जांवयी ।
आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेहीं विवेकी ॥१२॥
परमार्थाला व्याही साह्य होत नाहीं; शेवटीं जांवयीही साह्य करीत नाही; तर जो आपल्या देहांत राहून विवेक करीत असतो, तोच आपण आपल्याला साह्य होतो १२.

मुमुक्षुमार्गींचे सज्ञान । लोक तत्वविचक्षण ।
विचारूनि कार्याकारण । स्वबुद्धीं जाण उद्धरले ॥१३॥
मुमुक्षुमार्गांतील तत्त्वविचार करणारे सज्ञान लोक, कार्यकारणाचा विचार करून आपल्याच बुद्धीनें हा संसार तरून जात असतात १३.

नित्यानित्यविवेकें । अनित्य सांडिती त्यागमुखें ।
नित्य तें यथासुखें । हित संतोखें अंगीकारिती ॥१४॥
नित्य कोणतें व अनित्य कोणते याचा विचार करून त्यागाच्या द्वारें अनित्याला सोडून देतात आणि नित्य असते त्याचा स्वहितासाठी मोठ्या संतोषानें व स्वेच्छेनें अंगीकार करतात १४.

नित्यत्वें जें उरलें जाण । तें स्वरूप माझें चिद्‌घन ।
तेंचि साधकांचे साधन जाण । अनन्यपणें चिंतिती ॥१५॥
नित्यत्वानें हें शिल्लक राहते, तेच माझें चिद्घन स्वरूप होय हे लक्षात ठेव. साधकांचे साधनही तेच. म्हणून तेही अनन्यत्वानें म्ह. आपणच ते तत्त्व अशा भावनेनें त्याचे चिंतन करीत असतात १५.

भावितां माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा ।
कीटकी-भृंगीचिया खुणा । आपआणपणियां उद्धरिती ॥१६॥
ह्याप्रमाणें माझी दृढभावना भावीत गेल्याने, कीट-भृंगन्यायानें ते मीच होऊन जातात, व आपणच आपला उद्धार करतात १६.

आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः ।
यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयोऽसावनुविन्दते ॥ २० ॥
[श्लोक २०]- सर्व प्राण्यांचा, विशेषतः मुनष्याच्या बाबतील आपणच आपले गुरू असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या द्वारेच आपले कल्याण करून घेतो. (२०)

पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं ।
मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्‌रूप ॥१७॥
पशुपक्ष्यादि योनीमध्यें सुद्धां हित कशांत आहे व अनहित कशांत आहे, ह्याचे ज्ञान असते. मग मनुष्याच्या देहांत ते कसे असणार नाहीं ? ते सहज स्फुरद्‌रूप असते हे लक्षात ठेव १७.

जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं ।
हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्‌रूप पाहीं कळतसे ॥१८॥
मी देहानें हें कर्म करतो, त्यानें तरेन किंवा नाही, हे ज्याचे त्याला आपापल्या ठिकाणी स्फूर्तीच्या रूपानें कळतच असते १८.

सांडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना ।
तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥१९॥
अशुभ वासना सोडून देऊन जो विषयाची कल्पनाहीं मनांत आणीत नाहीं, तो आपला आपणच गुरु होऊन नरकाच्या यातना चुकवितो हे लक्षात ठेव १९.

जो कंटाळला जन्मगर्भासी । मरमरों उबगला मरणासी ।
आधि लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ॥२२०॥
जो गर्भावस्था व जन्म ह्यांना कंटाळतो, मरमर मरण्याचा ज्याला उबग येतो, जन्ममृत्यूच्या नाशाविषयीं ज्याच्या मनाला तळमळ लागून राहाते २२०,

आवडी नुपजे स्त्रीपुत्रांसी । निद्रा न लागे अहर्निशीं ।
काळें ग्रासिलें आयुष्यासी । निजहितासी न देखिजे ॥२१॥
स्त्रीपुत्राविषयीं ज्याच्या मनांत मोह वसत नाही, आयुष्य काळानें ग्रासलें तरी आपलें खरें हित अजून कशांतच दिसत नाही, अशा विचारानें त्याला रात्रंदिवस झोप नसते २१.

तुझीच तुजचि देखतां । काळें गिळिली बाल्यावस्था ।
तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभंवता लागला असे ॥२२॥
विचार कर की, तुझ्याच देखत तुझी बाल्यावस्था काळानें ग्रासून टाकली, तारुण्याचे शिखर त्यानें गिळून सोडले आणि आतां तो वार्धक्याभोवती घिरट्या घालीत आहे २२.

केवळ वार्धक्याचा जरंगा । त्यासीही काळु लागला पैं गा ।
आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥२३॥
वार्धक्य म्हणजे केवळ जाळे आहे, पण त्याच्याही मागे काळ लागलाच आहे. आयुष्य हे अशा प्रकारें झपाट्यानें व्यर्थ जात आहे, हा आपला घात जगाला कळत नाहीं २३.

क्षणक्षणा काळु जातसे व्यर्थ । कांही न साधे जी परमार्थ ।
जन्ममरणांचा आवर्त । पुढें अनर्थ रोकडा ॥२४॥
क्षणोक्षणी काळ व्यर्थ चाललेला आहे, परमार्थाचे साधन तर कांहींच होत नाही, त्यामुळें जन्ममरणाचा भोंवरा हा अनर्थ पुढे दिसत असतो २४.

स्वर्ग नरक कर्म ब्रह्म । चहूं प्राप्तींसी मनुष्यधर्म ।
यालागीं त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२५॥
स्वर्ग, नरक, कर्म व ब्रह्म ह्या चारीही गोष्टी मनुष्यत्वामुळेच प्राप्त होत असतात. ह्याकरतां पापकर्म सोडून देऊन मोक्षधर्माचाच स्वीकार केला पाहिजे २५,

नरदेह मोक्षाचा वांटा । वृथा जातसे कटकटा ।
हृदयीं आधी लागला मोठा । विषयचेष्टा विसरला ॥२६॥
अरेरे ! नरदेह हा मोक्षाचा वांटा असून तो व्यर्थ जात आहे ना ! ही गोष्ट त्याला शल्यासारखी हृदयांत सलते, म्हणून तो विषयव्यापार विसरून जातो २६.

‘प्रत्यक्ष’ लक्षणें अनित्य । संसारु दिसे नाशवंत ।
यालागीं तो नव्हे आसक्त । होय विरक्त इहभोगीं ॥२७॥
अनित्यपणाच्या प्रत्यक्ष लक्षणानेंच संसार हा नाशवंत असल्याचे दिसून येते, म्हणून तो त्यांत आसक्त होत नाहीं; ह्या मृत्युलोकाच्या भोगाविषयीं तो विरक्त होतो २७.

याचिपरी ‘अनुमाना’ । परलोकभोगभावना ।
आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ॥२८॥
ह्याचप्रमाणें परलोकच्या सुखाचेही अनुमान बांधून तेही नश्वरच आहे, त्यांतही पतनच आहे, हे लक्षात आणून त्याचाही मनाला स्पर्श होऊ देत नाहीं २८,

कैं कृपा करील गोविंद । कैं तुटेल भवबंध ।
कैं देखेन तो निजबोध । परमानंद जेणें होय ॥२९॥
भगवान् केव्हां कृपा करील ? संसाराचे बंधन केव्हां तुटेल ? ज्याच्या योगानें परमानंद प्राप्त होतो असा तो आत्मबोध केव्हां लाभेल ? २५.

धांव पाव गा श्रीहरी । कृपा करीं दीनावरी ।
मज उद्धरीं भवसागरीं । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३०॥
हे श्रीहरी ! लवकर धाव, ह्या दीनावर दया कर; हे भक्तकैवारी श्रीकृष्णा ! ह्या संसारसागरांतून माझा उद्धार कर २३०,

जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधालागीं तळमळी ।
प्रेमपडिभराच्या मेळीं । देह न सांभाळी सर्वथा ॥३१॥
ज्याप्रमाणे, पाण्याशिवाय जसा मासा तळमळतो, तसा आत्मज्ञानासाठी तो तळमळत असतो; भक्तिप्रेमाच्या उसळ्यांवर उसळ्या येत असल्यामुळें देहसंरक्षणाचीही त्याला मुळीच शुद्ध राहात नाहीं ३१.

एक नेणोनि नरदेहा मुकले । एकीं नव्हे म्हणोनि उपेक्षिले ।
एक ज्ञानगर्वे गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥३२॥
कोणी न कळल्यामुळें नरदेहाला मुकले, कोणी नास्तिकपणामुळें त्याची उपेक्षा केली, कोणाला ज्ञानाच्या गर्वानें ग्रासून टाकलें, आणि कोणी विषयालाच भुलून पडले ३२.

एक साधनाभिमानें ठाकिले । एक करूं करूं म्हणता गेले ।
एक करितां अव्हाटां भरले । करणें ठेलें तैसेंचि ॥३३॥
कोणी साधनाच्या अभिमानानें ठकले गेले, कोणी करूं करूं असें म्हणता म्हणतां मरण पावले, कोणी करतां करतां आडमार्गात घुसून भलतीकडेच वाहवले आणि करणे जेथल्या तेथेच राहिले ३३.

जरी विवेक कळला मना । तरी न तुटती विषयवासना ।
तेणें संतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितु ॥३४॥
मनाला विवेक कळला तरी विषयवासना सुटत नाहीत, त्यामुळें संताप उत्पन्न होऊन तो नारायणाचें चिंतन करतो ३४,

कृष्ण म्हणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी ।
तोचि आपुला गुरु आपणासी । विशेषेंसी जाणावा ॥३५॥
कृष्ण उद्धवाला म्हणतो-विवेकासह वैराग्य ज्याला उत्पन्न होते, तोच विशेषेकरून आपणाला आपण गुरु होतो असें जाण ३५.

त्याचिये निजबुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशीं ।
तो स्वयें जाणे निजबोधासी । निजमानसीं विवेकें ॥३६॥
त्याच्या बुद्धीला मीच विवेकाचा प्रकाश देतो, आणि त्या विवेकानें तो आपल्या मनामध्यें आत्मबोध जाणतो ३६.

ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तैसा देवो ।
ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धरावा ॥३७॥
ज्याचा जसा भाव असतो, त्याला मी देवही तसाच होतो. ह्यांत तिळमात्र संशय धरूं नकोस ३७.

उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ ।
तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा । ॥३८॥
हे पाहा उद्धवा ! ह्याला केवळ बुद्धीच निर्मळ पाहिजे, तरच आत्मबोध तत्काळ सफळ होतो ३८.

पुरुषत्वे च मां धीराः साङ्ख्ययोगविशारदाः ।
आविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्त्युपबृंहितम् ॥ २१ ॥
[ श्लोक २१] – सांख्ययोगपारंगत विद्वान या मनुष्ययोनीमध्ये इंद्रियशक्ती, मनःशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणार्‍या माझा आत्मतत्त्वाचा पूर्णतः प्रगटरूपाने साक्षात्कार करून घेतात. (२१)

एवं वैराग्यें पूर्ण भरित । धीर पुरुष विवेकयुक्त ।
सांख्ययोग विवंचित । निजीं निज प्राप्त तत्काळ ॥३९॥
अशा प्रकारे वैराग्यानें पूर्ण भरलेला व विवेकानें युक्त असा जो धैर्यवान् पुरुष असतो, तो सांख्याचा व योगाचा विचार करतो, त्याला अंतःकरणामध्यें आत्मज्ञानाची प्राप्ति तत्काळ होते ३९.

नरदेहीं विवेक वसे । निजरूप पावले कैसे ।
जें सर्वशक्तियुक्त असे । तें सावकाशें देखती ॥२४०॥
ज्या नरदेहांमध्यें विवेक राहतो, त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ति होते. जें सर्वशक्तिमान् तत्त्व आहे, तेच त्यांना हळुहळू दृष्टिगोचर होत असते २४०.

जें प्रसवे सर्वशक्तींतें । तें सर्वशक्ति-शक्तिदातें ।
जें नातळे सर्वशक्तीतें । त्या स्वरूपातें पाहताति ॥४१॥
ज्याच्यापासून सर्व शक्ति उत्पन्न होतात, ते सर्व शक्तीला शक्ति देणारे आहे; परंतु ते सर्व शक्तींनाहीं कळत नाही, अशा स्वरूपाला ते पाहातात ४१.

उद्धवा काय सांगों गोष्टी । बहुत शरीरें सृजिलीं सृष्टीं ।
मज नरदेहीं आवडी मोठी । उठाउठीं मी होती ॥४२॥
हे उद्धवा ! काय काय आणि किती किती गोष्टी म्हणून तुला सांगाव्यात ? ह्या सृष्टीमध्यें मी अनेक प्रकारची शरीरें निर्माण केली, परंतु मला नरदेहाचीच फार आवड; कारण तो देह धारण करणारे जीव तत्काळ मद्‌रूप होऊ शकतात ४२.

एकद्वित्रिचतुस्पादो बहुपादस्तथापदः ।
बह्व्यः सन्ति पुरः सृष्टास्तासां मे पौरुषी प्रिया ॥ २२ ॥
[श्लोक २२]-मी एक, दोन, तीन, चार आणि चारापेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे. (२२)

केलीं एकचरणी शरीरें । दोंपायांची अपारें ।
तींपायांचीं मनोहरें । अतिसुंदरें चतुष्पदें ॥४३॥
मी काही शरीरें एका पायाचीच केली, दोन पायांची शरीरें तर पुष्कळच केली, कांहीं तीन पायांची केली ती तर मौजेची दिसतात; चतुष्पाद प्राणी तर फारच सुंदर दिसतात ४३.

सर्पादि योनींच्या ठायीं । म्यां चरणचि केले नाहीं ।
एकें चालती बहु पायीं । केलीं पाहीं शरीरें ॥४४॥
सर्पादि प्राण्यांना मी पायच दिले नाहीत; कितीएक अनेक पायांनी चालणारे आहेत; अशी नानाप्रकारची शरीरे मी घडवलेली आहेत ४४.

ऐशीं शरीरें नेणो किती । म्यां निर्माण केलीं ये क्षितीं ।
मज कर्त्यातें नेणती । मूढमति यालागीं ॥४५॥
अशी पृथ्वीवर मी निर्माण केलेली शरीरे किती आहेत त्यांचा अंत नाही; पण ते प्राणी मला कर्त्याला ओळखीत नाहीत म्हणून मंतिमंद होत ४५.

मज कर्त्याची प्राप्ति । होआवयालागीं निश्चितीं ।
स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पौरुषी प्रकृति म्यां केली ॥४६॥
मज कर्त्यांची प्राप्ति होण्यासाठी म्हणून मी आपल्या अंशानें ज्ञानशक्ति प्रकाशित करून मनुष्यशरीर निर्माण केले ४६.

जेणें देहें मज पावती । त्या देहाची मज अतिप्रीति ।
यालागीं श्रुति नरदेह वर्णिती । देव वांछिती नरदेहा ॥४७॥
ज्या देहानें मला पावतात, त्या देहाची मला फार आवड; म्हणूनच वेद नरदेहाचे वर्णन करतात, आणि देवही नरदेहाची इच्छा करतात ४७.

ऐशी नरदेहाची प्रीती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती ।
येणें शरीरें मज पावती । नाना युक्तिविचारें ॥४८॥
अनेक युक्तींच्या विचारानें लोक ह्याच नरदेहानें मला पावतात. अशी नरदेहाची असलेली प्रीति श्रीकृष्णानें उद्धवाला सांगितली ४८.

अत्र मां मृगयन्त्यद्धा युक्ता हेतुभिरीश्वरम् ।
गृह्यमाणैर्गुणैर्लिङ्गैरग्राह्यमनुमानतः ॥ २३ ॥
[श्लोक २३ ]- कारण या मनुष्यशरीरात एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणार्‍या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही माझासर्वप्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेतात. (२३)

येऊनि नरदेहाप्रती । कर्त्याची गवेषणा जे करिती ।
जो मी ईश्वर त्रिजगतीं । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥४९॥
नरदेहाला येऊन ते कर्त्यांचा शोध करतात; जो मी त्रिभुवनाची उत्पत्ति, स्थिति व संहार करणारा परमेश्वर ४९,

बुद्धियुक्तीं विवेक करणें । ते जडें प्रकाशपणें ।
त्याचाही मी प्रकाशकु म्हणे । येणें लक्षणें लक्षिती ॥२५०॥
त्या माझा बुद्धीच्या अनुमानानें विचार करतात, पण ते अनुमान व त्यापासून निष्पन्न होणारे ज्ञानही जडच असते; कारण, त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा स्वयंप्रकाश मी त्याहून निराळा आहे. अशा लक्षणानें मला ते जाणतात २५०.

ऐशा नानापरींच्या अनुमानां । मी तंव वश नव्हें जाणा ।
जे लक्षिती सांडोनि अभिमाना । साक्षात्पणा ते येती ॥५१॥
पण अशा प्रकारची कितीही अनुमानें केली तरी मी काही त्यांना वश होणारा नव्हे; तर जे कोणी अभिमान सोडून माझें स्वरूप पाहूं लागतात, त्यांनाच माझ्या स्वरूपाचा साक्षात् अनुभव येत असतो हे लक्षात ठेव ५१.

ज्याची आशा होय निराश । तोचि ब्रह्म पावे सावकाश ।
तेणें कळीकाळावरी कांस । जाण अवश्य घातली ॥५२॥
ज्याची सर्व आशा नाहीशी होते, तोच सावकाशपणे ब्रह्मस्वरूपाला पोचतो; त्यानेंच कलिकाळाशी झगडण्याकरतां कास घातली म्हणून समजावें ५२.

मुख तंव स्वतःसिद्ध असे । तें निर्मळ आरिसां दिसे ।
तेवीं बुद्धीचेनि विवेकवशें । आत्मा भासे नरदेहीं ॥५३॥
तोंड हे तर स्वतःसिद्ध असतेच, पण निर्मळ आरसा असेल तरच ते त्यांत दिसेल; त्याचप्रमाणें बुद्धीला विवेक प्राप्त झाला म्हणजे नरदेहांत आत्मा भासू लागतो ५३.

येचिविखींचा इतिहास जाण । तुज मी सांगेन पुरातन ।
यदुअवधूतसंवादलक्षण । ज्ञानसाधन साधकां ॥५४॥
ह्याविषयींचा एक जुना इतिहास आहे, तो मी आतां तुला सांगतो. यदु आणि अवधूत ह्या दोघांचा हा संवाद साधकांना ज्ञानसाधनरूप आहे ५४.

अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् ।
अवधूतस्य संवादं यदोरमिततेजसः ॥ २४ ॥
[श्लोक २४ ]- या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे. (२४)

हरिखें म्हणतसे गोविंदु । उद्धवा आमुचा पूर्वज यदु ।
तेणें ब्रह्मज्ञानासी संवादु । केला विशदु अवधूतासीं ॥५५॥
श्रीकृष्ण आनंदानें म्हणाला, उद्धवा ! आमचा यदु म्हणून जो पूर्वज होऊन गेला, त्यानें अवधूताबरोबर ब्रह्मज्ञानासंबंधी सुंदर संवाद केला होता ५५.

राजा यदु म्हणसी कैसा । क्षात्रसृष्टीचा सूर्यो जैसा ।
राजा चंद्राच्या प्रकाशा । निजतेजवशा लोपितु ॥५६॥
तो यदुराजा कसा होता म्हणशील, तर क्षत्रिय ज्ञातीतील जणूं काय सूर्यच; इतर नृपतिरूप चंद्राच्या प्रकाशाला तो आपल्या तेजानें दिपवीत असे ५६.

तेणें गुरूचीं लक्षणें ऐकतां । सायुज्यमुक्ति आली हाता ।
ते हे पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥५७॥
त्यानें अवधूताकडून गुरूची लक्षणे श्रवण केल्यामुळे, सायुज्यता मुक्ति त्याच्या हाताला आली. तीच प्राचीन कथा आतां मी तुला सांगतों ५७.

अवधूतं द्विजं कञ्चिच्चरन्तमकुतोभयम् ।
कविं निरीक्ष्य तरुणं यदुः पप्रच्छ धर्मवित् ॥ २५ ॥
[श्लोक २५ ]-धर्माचे मर्म जाणणार्‍या यदूने एकदा एक त्रिकालदर्शी, तरूण, अवधूत, ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले. (२५)

कोणी एक अवधूतु । निजतेजें प्रकाशवंतु ।
ब्रह्मानंदें डुल्लतु । यदूनें येतु देखिला ॥५८॥
आत्मतेजानें प्रकाशणारा आणि ब्रह्मानंदानें डुलत असणारा कोणीएक अवधूत येत असलेला यदूनें पाहिला ५८.

त्या अवधूताचें लक्षण । यदु निरीक्षी आपण ।
देखिलें ब्रह्मसूत्रधारण । होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता ॥५९॥
यदूनें त्या अवधूताच्या स्वरूपाचे बारीक निरीक्षण केले. त्यानें यज्ञोपवीत धारण केलेले त्याच्या दृष्टीस पडले त्यावरून तो ब्राह्मण असून ब्रह्मवेत्ता असावा अशी त्याची खात्री झाली ५९.

ऐसा तो अवधूतु । निर्भय निःशंक वर्ततु ।
यदु व्याहाळिये होता जातु । देखिला वनांतु सन्मुख ॥२६०॥
यदु हा वनामध्यें क्रीडा करण्याकरतां गेला असतां, हा अवधूत निर्भय आणि निःशंकपणानें वागणरा त्याला समोरच येत असलेला दिसला २६०.

आंतुला प्राण तत्त्वतां । बाहेर रिघों नेदी सर्वथा ।
स्वभावें प्राणापानसमता । झाली न धरितां धारणा ॥६१॥
आंतला प्राण तो बाहेर निवू देत नव्हता अशी प्राणापानाची समता, धारणा न धरतांच, त्याची आपोआप झालेली होती ६१.

नवल तयाचें पाहणें । दृश्य दृश्यत्वें देखों नेणे ।
झाला सर्वांगें देखणें । देखणेंपणें पाहातसे ॥६२॥
त्याचे पाहणेही नवलाचेच होते. दृश्यपणानें दृश्य पाहाणे त्याला कळत नव्हते. तो सर्वांगानें देखणे झालेला असून द्रष्टेपणानेंच तो दृश्य पाहात असे ६२.

मी एकु वनीं वसता । हेंही नाठवे त्याचिया चित्ता ।
झाली सर्वत्र सर्वगतता । समसाम्यता समत्वें ॥६३॥
मी एक वनांत फिरणारा अशी त्याच्या मनाला जाणीवच नव्हती. समदृष्टीच्या योगानें त्याला सर्वत्र व्यापकपणाच आलेला होता ६३.

कर्म कार्य कर्ता जाण । अवघा जाहला तो आपण ।
क्रियेनें वाहूनियां आण । निंबलोण जीवें केलें ॥६४॥
कर्म, कार्य आणि कर्ता ही सारी तो आपण स्वतःच बनून राहिलेला होता. क्रियेनें शपथ घेऊन जिवाभावानें लिंबलोणच उतरलेले होते ६४.

देहाचिया माथां । ठेविली होती अहंता ।
तें देहमिथ्यात्व पावतां । समूळ अहंता पळाली ॥६५॥
देहावर अहंता ठेवली होती, तो देह मिथ्या ठरतांच ती अहंता पळून गेली ! ६५,

नित्यानित्य होमद्वारें । ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें ।
जाळूनि आश्रमांची चारी घरें । केलें खरें निराश्रमी ॥६६॥
नित्यानित्यविवेकरूपी होमामुळें एकदम ब्रह्माग्नीच प्रज्वळित झाला. त्यानें चारही आश्रमांची घरे जाळून त्याला निराश्रमीच करून टाकले ६६.

त्या आश्रमामाजीं होती । शास्त्रश्रवणविधिवादपोथी ।
ते जळाली जी निश्चितीं । भस्म हातीं न लगेचि ॥६७॥
त्या आश्रमामध्यें शास्त्रश्रवणविधीची पोथी होती ती जळून खाक झाली. तिची राखसुद्धा हाती लागली नाहीं ६७.

विधिनिषेध पैजा । जळाली पंचायतनदेवपूजा ।
होता संचितक्रियमाणपुंजा । तोही वोजा जळाला ॥६८॥
विधिनिषेधाच्या पैजा व पंचायतन देवपूजा ह्यांची राखरांगोळी झाली. संचित-क्रियमाणकर्माची पुंजी होती तीही जळून खाक झाली ६८.

यापरी तो अवधूतु । ब्रह्मानंदें जी डुल्लतु ।
निजसुखें वेल्हावतु । देखिला येतु यदुरायें ॥६९॥
ह्याप्रमाणें तो अवधूत ब्रह्मानंदानें डुलत असणारा व निजसुखानें झुलत राहणारा येत असलेला यदूनें पाहिला ६९.

संकल्प-विकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत ।
यालागीं बोलिजे ‘अवधूत’ । येर्हलवीं विख्यात ब्राह्मणु ॥२७०॥
सर्वसंकल्पविकल्परहितपणाची विभूति त्यानें सर्वांगाला लावलेली होती. म्हणूनच त्याला ‘ अवधूत’ असे म्हणावयाचें; एरव्हीं तो ब्राह्मणच होता २७०.

सभोंवता समस्तु । प्रपंच निजबोधें असे धूतु ।
यालागीं बोलिजे ‘अवधूतु’ । येर्हरवीं विख्यातु ब्राह्मणु ॥७१॥
सभोवती असलेला सारा प्रपंच त्यानें आत्मबोधानें धुऊन टाकला होता. म्हणूनही त्याला ‘अवधूत’ म्हणावें. एरव्हीं तो एक विख्यात ब्राह्मण होता ७१.

अहं धुई तो ‘अवधूतु’ । तोचि योगी तोचि पुनीतु ।
जो का अहंकारग्रस्तु । तोचि पतितु जन्मकर्मी ॥७२॥
‘अहं’ जो धुतो तोच अवधूत, तोच योगी, आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त असतो तोच जन्मकर्मामध्यें पतित होतो म्हणून समजावे ७२.

वार्धक्य यावें देहासी । तंव देहपण नाहीं देहापासीं ।
रिगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥७३॥
त्या अवधूताच्या देहाला वार्धक्य यावे, तर देहाला मुळी देहत्वच नाही, तेव्हां वार्धक्य येणार कोठून ? वार्धक्याला मुळी शिरकावच नाहीं; व हेच तारुण्य कायम राहाण्याचे मूळ कारण होय ७३.

आणिकही त्याचीं लक्षणें । नीच नवा बोधु मैळों नेणें ।
भोगिजे नित्य नूतनपणें । परम तारुण्यें टवटवला ॥७४॥
आणखीही त्याची लक्षणे आहेत. त्याचे नित्य नवें असणारे ज्ञान मळत नाहीं; तो तें नित्यनवेपणानेंच भोगीत असतो. म्हणून तो नेहमीं तारुण्यानें अगदी मुसमुसलेला होता ७४.

निजबोधाचिया सत्ता । द्वैत जिंतिलें तत्त्वतां ।
ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा त्या नाहीं ॥७५॥
आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानें त्यानें द्वैताला जिंकले असल्यामुळें तो असा निःशंकपणानें वावरत होता. त्याला भय म्हणून कोठेच कसलेही वाटत नव्हते ७५.

ऐशीं लक्षणें निर्धारितां । अवधूत निजबोधें पुरता ।
यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥७६॥
अशा प्रकारे अवधूताच्या लक्षणांचा निश्चय झाला व तो आत्मज्ञानानें पूर्ण आहे असे वाटले, त्यामुळें यदूच्या मनांत त्याच्याविषयीं पूज्यबुद्धि उत्पन्न होऊन त्याच्यावर अनिवार श्रद्धा बसली व नम्रपणा उत्पन्न झाला ७६.

करूनि साष्टांग दंडवत । अतिनम्र श्रद्धायुक्त ।
हात जोडूनि पुसत । प्रसन्न चित्त रायाचें ॥७७॥
राजाचे चित्त प्रसन्न झाले व त्यानें त्यास साष्टांग दंडवत घालून अत्यंत नम्रतेनें भक्तिपूर्वक हात जोडून प्रश्न केला ७७.

श्रीयदुरुवाच –
कुतो बुद्धिरियं ब्रह्मन्नकर्तुः सुविशारदा ।
यामासाद्य भवाल्लोकं विद्वांश्चरति बालवत् ॥ २६ ॥
[श्लोक २६ ] – यदूने विचारले ब्रह्मन ! आपण काही कर्म तर करीत नाही, तरीपण आपल्याला ही चतुर बुद्धी कोठून प्राप्त झाली ? जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात. (२६)

अपूर्व बुद्धि हे स्वामी । तुमचे ठायीं देखों आम्ही ।
जे न लभे यमनियमीं । कर्मधर्मीं आचरतां ॥७८॥
यदु म्हणाला, स्वामी ! धर्मकर्म आचरून किंवा यमनियम साधूनही जी बुद्धि प्राप्त व्हावयाची नाही, ती अपूर्व बुद्धि मला आपल्यामध्यें दिसून येत आहे ७८.

दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी कांही न करूनि निश्चळ ।
अकर्तात्मबोधें तूं केवळ । जैसें बाळ अहेतुक ॥७९॥
आपण सर्व कर्मामध्यें तर कुशल दिसतां, परंतु कांहीं एक न करतां निश्चल असतां; आत्मज्ञानामुळें अकर्तात्मबोध आपल्या ठिकाणी बाणला आहे आणि त्यामुळेच अहेतुक बालकाप्रमाणे आपली स्थिती दिसून येते. ७९.

तूं बालाऐसा वर्तसी । परी बालबुद्धि नाहीं तुजपासीं ।
सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसें आम्हांसी दिसतसे ॥२८०॥
आपण बालासारखे वागतां, पण बालबुद्धि मात्र आपणापाशीं नाहीं; आपण सर्वथा सर्वज्ञ आहां असें मला वाटते २८०.

येवोनियां या लोकासी । पावोनियां नरदेहासी ।
सार्थकता तुझ्याऐसी । आणिकापाशीं न देखों ॥८१॥
ह्या मृत्युलोकांत येऊन नरदेह मिळून आपल्यासारखी त्याची सार्थकता केलेली इतरांपाशी दिसत नाहीं ८१.

प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानवाः ।
हेतुनैव समीहन्ते आयुषो यशसः श्रियः ॥ २७ ॥
[श्लोक २७] – साधारणतः असे दिसते की, माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींच्या इच्छा मनात धरूनच धर्म, अर्थ, काम किंवा तत्त्वजिज्ञासामध्ये प्रवृत्त होतात. (२७)

प्रायशा ये लोकीं लोक । धर्मअर्थकामकामुक ।
येचिविखीं ज्ञान देख । आवश्यक करिताति ॥८२॥
ह्या लोकांतील लोक बहुतकरून धर्मार्थकामाचीच इच्छा करणारे आहेत, म्हणून त्या विषयांचेच ज्ञान ते अवश्य प्राप्त करून घेतात ८२.

आम्ही स्वधर्म करितों म्हणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती ।
शेवटीं गायत्रीचें फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥८३॥
आम्ही स्वधर्म पाळतो म्हणतात, स्नानसंध्येची कीर्ति मिरवतात आणि शेवटी द्रव्यासाठी गायत्रीचें फळ देऊन टाकतात ! ८३.

वेदोक्त आम्ही करितों याग । संस्थापितों वेदमार्ग ।
शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वांछिती ॥८४॥
आम्ही वेदोक्त यज्ञ करतो, वेदमार्गाची स्थापना करतो, असें म्हणून शेवटी इच्छा धरून ते एक उदरनिर्वाहाचेच साधन करून सोडतात ८४.

एक म्हणती आम्ही स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक ।
समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥८५॥
कोणी आम्ही स्वकर्मनिष्ठ आहोत असे म्हणून दर्भ, मृत्तिका व पाणी ह्यांचा नाश करतात; पण वेळेला एखादा याचक आला असता त्याला मूठभर भीकही घालीत नाहीत ! ८५.

दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंबिती ।
देवपूजा झळफळीत दाविती । शंख लाविती दों हातीं ॥८६॥
ढोंगी लोक आपला लौकिक वाढविण्यासाठी वैष्णवदीक्षा घेतात, आणि झकपक देवपूजा करून दोहों हातांनी शंख वाजवून दाखवितात ! ८६.

आयुष्यदानी पुण्यपुरुष । आम्ही चिकित्सक अहिंस ।
स्थावर जंगम जीव अशेष । मारूनियां यश मिरविती ॥८७॥
आयुष्य दान देणारे पुण्यपुरुष आपल्याला वैद्य व अहिंसक म्हणवितात; परंतु स्थावरजंगमादि सर्व जीवांच्या हत्या करून यशाचे स्तोम मिरवितात ८७.

यश वाढवावया कारण । तुळापुरुष करिती दान ।
देहो मूत्रविष्ठें परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥८८॥
आपली कीर्ति वाढवावी म्हणून कोणी कोणी तुळापुरुषदान करतात; ते लोक मळमूत्रानें भरलेला देह द्रव्याबरोबर तोलतात ! ८८.

परी परमार्थाचिया चाडा । कोणी वेंचीना कवडा ।
भूल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥८९॥
परंतु परमार्थाच्या इच्छेनें कोणी कवडीसुद्धा खर्चीत नाहीत. मूर्ख लोकांना ही कशी भुरळ पडते पाहा ! ते खरा स्वार्थ विसरून जातात ! ८९.

पूर्वीं अदृष्टीं नाहीं प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती ।
श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें न भजती अभाग्य ॥२९०॥
पूर्वी पेरून ठेवलेला द्रव्ययोग नशिबांत नसलेले लोक लक्ष्मीची उपासना करतात; पण लक्ष्मीचा पति जो श्रीहरि त्याचे ते अभागी भजन करीत नाहींत २९०.

लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्‍नी । तीतें जो तो राखे अभिलाषूनी ।
नेदिती हरीची हरिलागोनी । त्यातें पतनीं हरि पचवी ॥९१॥
विश्वाचा गुरु जो श्रीहरि, त्याची लक्ष्मी ही पत्नी होय. तिचा जो तो अभिलाष करून राखून ठेवतो. हरीची पत्नी हरीला देत नाहीत. त्यांना हरि नरकांत घालतो ९१.

रोगत्यागें आयुष्य मागती । यालागीं सविता उपासिती ।
देहो नश्वर हें नाठवे चित्तीं । पडली भ्रांती निजपदा ॥९२॥
रोगाचा नाश होऊन आयुष्य मिळावे म्हणून सूर्याची उपासना करतात; परंतु देह हा नश्वर आहे, ह्याची आठवणही नसते. त्यामुळें आत्मस्वरूपाची विस्मृति पडते ! ९२.

एवं आयुष्य-यश-श्रीकामीं । समस्त भजतां देखों आम्ही ।
परी नवल केलें तुवां स्वामी । परब्रह्मीं निजबोधु ॥९३॥
अशा प्रकारे आयुष्याकरतां, कीर्तीकरतां व द्रव्याकरतांच लोक भजनी लागलेले आम्ही पाहातों; परंतु स्वामी ! आपले मोठे नवल दिसते की, आपण परब्रह्मस्वरूपांत संलग्न होऊन राहिला आहां ९३.

विषयबळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक ।
ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वांछिती ॥९४॥
विषयाचा जोर विलक्षण असतो. त्यामुळें मिथ्या भ्रमानें लोक भ्रमले आहेत. ज्ञानाची साधनें साध्य करून विषयसुखाची इच्छा करतात ! ९४.

वेदांतवार्तिकवाक्स्फू र्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती ।
शेखीं पोटासाठीं विकिती । नवल किती सांगावें ॥९५॥
वेदांत-वार्तिकाच्या वाक्पटुत्वानें अद्वैतब्रह्माचें प्रतिपादन करतात, पण शेवटी पोटासाठी त्या ज्ञानाचा ते विक्रा करतात, त्याचे आश्चर्य किती वर्णावें बरें ? ९५.

एक म्हणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनीं ।
टाळी लावूनि बैसती ध्यानीं । जीविका मनीं विषयांची ॥९६॥
कोणी आपल्याला योगज्ञानी म्हणवून लोकांमध्यें वायु कोंडून दाखवितात व डोळे मिटून ध्यानस्थ बसतात; पण मनांत मात्र विषयाचे चिंतन ! ९६.

ऐसे विविदिषा लोक । साधनें साधूनि झाले मूर्ख ।
तुवां केलें जी अलोलिक । आत्मसुख साधिलें ॥९७॥
ह्याप्रमाणें ज्ञानेच्छु लोक अनेक प्रकारची साधनें साध्य करून मूर्ख बनतात; पण आपण मात्र आत्मसुखच संपादन केलें हें मात्र अलौकिक होय ९७.

ऐसें स्वामी अवधूता । तुवां तृणप्राय केलें जीविता ।
तुच्छ करोनि लोकां समस्तां । निजात्महिता मीनलासी ॥९८॥
ह्याप्रमाणें हे अवधूत स्वामी ! आपण जीविताला तृणप्राय करून सोडले असून व सर्व लोकांना तुच्छ करून अगदी आत्महितालाच गांठ घातली आहे ! ९८.

निजानंदें निवालासी । अंतरी शीतळ झालासी ।
ऐसें दिसताहे आम्हांसी । उपलक्षणेंसी परियेसीं ॥९९॥
आपण आत्मानंदानें तृप्त होऊन हृदयांत शांत झाला आहां, असें आम्हांला दिसते. त्याची लक्षणेही ऐकावीत ९९.

त्वं तु कल्पः कविर्दक्षः सुभगोऽमृतभाषणः ।
न कर्ता नेहसे किञ्चिज्जडोन्मत्तपिशाचवत् ॥ २८ ॥
[श्लोक २८] – परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, निपुण, सुंदर आणि अमृतमधुर बोलणारे आहात असे असूनही आपण वेडा, उन्मत्त किंवा पिशाच्च यांच्यासारखे राहाता काही करीत नाही की काही इच्छित नाही. (२८)

सर्वज्ञज्ञाता तूं होसी । तें ज्ञातपण दिसों न देसी ।
कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वें दाविसी निजशांती ॥३००॥
आपण सर्वज्ञ आहां; परंतु ते ज्ञातेपण आपण दिसू देत नाही. आपण काही करीतही नाहीं व कांहीं इच्छीतही नाही. आपली आत्मशांति जडत्वाची आहे असे लोकांस दाखवितां ३००.

सर्वथा उगा अससी । परी तूं अंगें विकळ नव्हसी ।
अंगीं अव्यंगु दिसतोसी । स्वरूपरूपेंसीं शोभितु ॥१॥
आपण सर्वथैव स्वस्थ असलेले दिसतां, परंतु तुमच्या अंगांत कसलीच विकलता नाही. आपण अंगानें अव्यंग असल्यामुळें स्वरूपानेंही फार शोभिवंत दिसतां १.

ज्ञान एकलेपणें ठेलें । दुजेनिवीण परदेशी झालें ।
तें तुजमाजीं सामावलें । यालागीं आलें ‘कवि’ पद ॥२॥
ज्ञान हे एकटेंच होते; त्याच्या बरोबर दुसरे कोणीच नसल्यामुळें ते परदेशी झालेले होते. ते तुमच्यामध्यें शिरून राहिले. म्हणूनच तुम्हांला ‘कवि’ म्ह. ज्ञानी हे पद आले. २.

करूनि झालासी अकर्ता । हेचि तुझी थोर ‘दक्षता’ ।
ब्रह्मरसें ‘रसाळ’ बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३॥
तुम्ही करून अकर्ते झाला आहांत, हीच तुमची ‘दक्षता’ आहे. तुम्ही ब्रह्मरसानें परिपूर्ण असें ‘ रसाळ’ भाषण करतां, तें माधुर्य अमृताला कसचे येणार ? ३.

ब्रह्मरस तू प्यालासी । ब्रह्मानंदें मातलासी ।
जगीं ‘उन्मत्त’ झालासी । दृष्टीं नाणिसी कोणातें ॥४॥
आपण ब्रह्मरस प्राशन करून ब्रह्मानंदानें मत्त झाला आहात. त्यायोगें ‘उन्मत्त’ होऊन तुम्ही कोणाला नजरेतच आणीत नाहीं ! ४,

सदा सावध निजरूपेंसी । यालागीं ‘माझें-तुझें’ न म्हणसी ।
तेंचि ‘पिसेंपण’ तुजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥५॥
आपण सदासर्वदा आत्मस्वरूपामध्यें जागृत असतां, म्हणून हे ‘माझें’ आणि ते ‘तुझें’ असें म्हणत नाही. हेच आपणापाशी असलेले ‘वेड’ मात्र जगाला नेहमी दिसत असते ५.

निजबोधें तृप्त झालासी । परमानंदें निवालासी ।
तीं हीं लक्षणें तुजपासीं । निर्धारेंसीं दिसताती ॥६॥
आपण आत्मज्ञानानें तृप्त झाला असून परमानंदानें निवाला आहां; ती लक्षणेही आपल्यापाशी स्पष्ट दिसून येत आहेत ६.

जनेषु दह्यमानेषु कामलोभदवाग्निना ।
न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥ २९ ॥
[श्लोक २९]-जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसन नाही. जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही. (२९)

कामलोभदावाग्नी- । माजीं जळतां लोक तीन्ही ।
देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥७॥
कामलोभरूपी दावाग्नीमध्यें जळत असलेले तिन्ही लोक आमच्या डोळ्यांना दिसत आहेत. त्यांतून सुटलेला कोणीच दिसत नाहीं ७.

ते दावाग्नीमाजीं असतां । तूं न पोळसी गा अवधूता ।
नवल तुझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥८॥
परंतु हे अवधूता ! आपण मात्र त्या दावाग्नीमध्यें असूनही पोळत नाही. ही तुमची अक्षोभ्यता मोठी आश्चर्यकारक आहे. ती आम्हांला कधीही कळणार नाहीं ८.

वणवा जळे दोंही थडीं । गजें गंगाजळीं दिधली बुडी ।
त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडीं तुज देखों ॥९॥
दोहों थडीला वणवा लागला असतां, हत्तीनें गंगाजळांत बुडी दिली म्हणजे त्याला जशा अग्नीच्या झळा लागत नाहीत, त्याप्रमाणेच आपणही दुःखमुक्त आहांत असें दिसून येते ९.

ऐशीं द्वंद्वें तुज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थितीं ।
कांही एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळुवा ॥३१०॥
शीतोष्णादि द्वंद्वे आपल्याला शिवत नाहीत; आपण ब्रह्मस्वरूपामध्यें निश्चळ राहिला आहांत. ह्याकरतां हे दयाळा ! हे कृपामूर्ति ! आपणास थोडीशी विनंती करतों ३१०.

त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन्नात्मन्यानन्दकारणम् ।
ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥ ३० ॥
[श्लोक ३०]- ब्रह्मन ! संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो ? आपण हे आम्हांला सांगावे. (३०)

तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण ।
त्या आनंदाचें कारण । विशद करून सांगावें ॥११॥
आपण ब्रह्मवेत्ते ब्राह्मण असून आत्मानंदानें परिपूर्ण आहां. त्या आनंदाचे कारण काय, ते मला स्पष्ट करून सांगावें ११.

तूं देहीं वर्तसी विदेहस्थिती । तुज विषय आतळूं न शकती ।
हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तुज झाली ॥१२॥
आपण देहांत असून विदेहस्थितीनें वागतां, आपल्याला विषय स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. इतका अलिप्तपणा आपल्याला कोणत्या रीतीनें प्राप्त झाला ? १२.

तुज नाहीं रायाची भीड । न करिसी धनवंताची चाड ।
दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधें ॥१३॥
आपल्याला राजाची भीड नाहीं, श्रीमंताची चाड नाहीं; दीनाचें भाषण मात्र गोड मानतां, आणि त्याचे मनोरथ आत्मज्ञान देऊन पूर्ण करतां १३.

ऐसा केवळ तूं कृपाळू । आर्तबंधु दीनदयाळु ।
निजात्मभावें तूं केवळु । भक्तवत्सलु भावार्थे ॥१४॥
असे आपण अगदी कृपाळू आहां. आपण दुःखार्ताचे बंधु असून दीनांचे दयाळू आहात. तसेंच निजात्मभावानें भावार्थी लोकांचे भक्तवत्सल आहांत १४.

ऐसा यदूचा संवादु । आवडीं सांगे गोविंदु ।
उद्धवासी म्हणे सावधु । हृदयीं बोधु धरावा ॥१५॥
ह्याप्रमाणें श्रीकृष्ण यदूचे भाषण मोठ्या आवडीनें सांगू लागला. तो उद्धवास म्हणाला, “सावधानचित्तानें हा बोध हृदयांत धारण कर” १५.

श्रीभगवानुवाच –
यदुनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा ।
पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१]- श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मणभक्त, शुद्धबुद्धी, यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लववून तो त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाले. (३१)

श्रीमुखें श्रीकांत । यदूचें भाग्य वर्णित ।
ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळु ॥१६॥
तो श्रीपति आपल्या मुखानें यदूच्या भाग्याचे वर्णन करूं लागला. यदुराजा ब्राह्मणांचा मोठा भक्त असून सत्त्वशील होता. तसाच तो अत्यंत बुद्विमान् व श्रद्धाळू होता १६.

भगवद्‌भाग्यें भाग्यवंतु । यदूसी भेटला तो अवधूतु ।
त्यासी होऊनि अतिविनीतु । असे विनवितु निजहिता ॥१७॥
भगवद्‌भाग्यानें भाग्यवंत असलेला तो अवधूत यदूला भेटला. तेव्हां आपल्या कल्याणाकरतां अत्यंत नम्र होऊन यदूनें त्यास विनंती केली १७.

मृदु मंजुळ वचनीं प्रार्थिला । मधुपर्कविधानें पूजिला ।
अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥१८॥
मधुपर्कविधीनें त्याची पूजा करून मृदु-मधुर वाणीनें त्यानें प्रार्थना केली. तेव्हां अवधूताला अत्यंत संतोष होऊन तो प्रेमानें बोलं लागला १८.

श्रीब्राह्मण उवाच –
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः ।
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह ताञ्छृणु ॥ ३२ ॥
[ श्लोक ३२]-ब्राह्मण म्हणाले राजन ! मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे, फिरत असतो तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक. (३२)

क्षीरसागर उचंबळला । कीं कृपेचा मेघ गर्जिन्नला ।
निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥
क्षीरसागर उचंबळावा किंवा कृपारूप मेघ गर्जू लागावा, अथवा आत्मसुखाची तुतारी वाजावी, त्याप्रमाणें तो ब्राह्मण बोलू लागला १९.

ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी ।
धन्य धन्य तुझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥
हे राजचूडामणी ! ऐक. तूं यदुकुलदीपांतील सूर्यच आहेस. तुझी वाणी मोठी धन्य आहे. तूं आपल्या गुणांनी मला तृप्त केलेंस ३२०.

राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणें लक्षकु ।
पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥
राजा असून सात्त्विक, सिद्ध लक्षणांनी युक्त अथवा सिद्धलक्षणे ओळखणारा असा पृथ्वीवर तूंच एक आहेस. दुसरा कोणी दिसत नाहीं २१.

सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न ।
पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥
तूं जो प्रश्न केलास, तो सुंदर गुणयुक्त आणि उत्तमांतला उत्तम असा आहे. तूं स्वानंदाचे कारण विचारलेंस, ते मी तुला यथार्थ सांगतो. ऐक २२.

गुरूविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती ।
ते गुरूही मी तुजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥
हे राजा ! गुरूशिवाय आत्मप्राप्ति कधीच घडत नसते. ते गुरुही मी तुला यथार्थ रीतीनें सांगतों २३.

निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती ।
जे जे सद्गुयण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥
आत्मबुद्धीच्या विचारांत गुंतलों असतांना मी अनेक गुरु केले. ज्या ज्या प्राण्यामध्यें जे जे सद्गुण दृष्टीस पडले, त्या त्या गुणापुरता तो तो गुरु मी केला २४.

बुद्धीनें अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा ।
तेणें मी मुक्त झालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥
बुद्धीनें त्या त्या गुणाचा स्वीकार केला; आणि निजधैर्यानें त्याची धारणा धरली. त्यामुळें मी मुक्त झालों आणि असा स्वेच्छेनें फिरत असतों २५.

संसारु तरावया । मुख्य ‘सद्बुेद्धि’ गा राया ।
रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥
हे राजा ! संसारांतून तरून जाण्याला मुख्य ‘सद्‌बुद्धि’ पाहिजे. दुसर्‍या उपायाचा तेथें रिघाव नाही. मग व्यर्थ कष्ट सोसण्यांत काय अर्थ ? २६.

सद्बु द्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी ।
उसंत नाहीं अहर्निशीं । दुःखभोगासी अनंत ॥२७॥
ज्याच्यापाशीं सद्बुद्धि नसते, तो संसाराला आंदण दिलेल्या दासीसारखाच होय. रात्रंदिवस हजारों दुःखें भोगीत असतां त्याला क्षणाचीही विश्रांति मिळत नाहीं २७.

सद्बुनद्धि नाहीं हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं ।
मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥
ज्याच्या हृदयमंदिरांत सद्बुद्धि नसते, त्याच्या मनांत वैराग्य कधींच उत्पन्न होत नाही. मग तरणार कशानें ? विवेक म्हणून कसला तो स्वप्नांत सुद्धा पाहात नाहीं २८.

वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्बु द्धि सांपडे ।
तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥
वैराग्याच्या बरोबर सद्बुद्धि मिळाली, म्हणजे तिच्यापुढे संसार बिचारा काय करणार ? ती त्याचे एका घावांत दोन तुकडे करून टाकील २९.

आधीं संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा ।
जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥
आधी संसार म्हणून काही एक असला पाहिजे, तरच त्याच्या नाशाकरतां खटाटोप केला तर चालेल; पण जो मनुष्य विवेकाच्या गांवांत शिरतो, त्याचा संसार नाहींसाच होतो ३३०.

संसारनाशासी मूळ । शिष्य-प्रज्ञाचि केवळ ।
तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥
संसारनाशाचे खरे कारण म्हणजे शिष्याची ‘प्रज्ञाच’ होय. तिचे बळ कायम असले की, संसार हा मृगजळवत् होऊन जातो ३१.

जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें ।
हेयादेयउरपायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥
मी जे गुरु सांगेन म्हणतो, ते मी आपल्या बुद्धीच्या निवडीप्रमाणें सांगणार आहे. त्याचा ग्राह्याग्राह्य विचार करून ग्राह्याचा स्वीकार करावा व त्याज्याचा त्याग करावा ३२.

हेचि मर्हा ठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका ।
जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥
तेच मी आतां मराठी भाषेनें सांगेन, ते नीट लक्ष देऊन ऐक. त्याच्या योगानें शिष्याची ग्राहकशक्ति स्पष्टपणे दृष्टोत्पत्तीस येईल ३३.

ऐक प्रज्ञेचीं लक्षणें । सांगेन दृष्टांतपणें ।
सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥
आतां त्या बुद्धीची लक्षणे दृष्टांताच्या रूपानें सांगतो. सूप, चाळण व रांधण म्ह. चूल * ह्याप्रमाणें बुद्धीचा उपयोग करावा ३४.

चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळीं सांडे ।
उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥
चाळणीमध्यें जें जें पडते, त्यांतील खरें सूक्ष्मतत्त्व खाली सांडते, आणि गुणदोषांचे खडे मात्र तिच्या पोटांत राहतात, व खडबड खडबड करीत असतात ३५.

ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा ।
भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥
अशा स्थितीचा त्याग करावा. तसे न केल्यास म्ह. गुणदोषांचे खडे पोटांत ठेवल्यास स्वार्थाची निश्चित हानी होईल ३६.

सुपाची दशा ते ऐशी । त्यजी रजःकण भुसासी ।
निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥
पण सुपाची स्थिति निराळी असते; भूस, कोंडा अथवा कचरा वगैरे ते टाकून देते. आणि अस्सल बीज आपल्या पोटांत धरून ठेवतें ३७.

स्वयें वैराग्यें तापणें । ते दशा ‘रांधणें’ म्हणें ।
अपक्कासी परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥
स्वतः वैराग्यानें तापणे व आपल्या गुणांनी अपक्वाला परिपक्क करणे हा स्वभाव चुलीचा होय ३८.

एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा ।
तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा हातींचा ॥३९॥
हे वीरवर्या ! अशा प्रकारे ह्या दोन्ही (तिन्ही) स्थिति निश्चयेंकरून धारण कराव्यात, म्हणजे हातच्या आरशाप्रमाणें परमार्थही आपोआप हाती येतो ३९.

यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितलें लक्षण ।
तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥
यदूला तो ब्राह्मण म्हणाला, मी जें लक्षण सांगितले, त्यावर लक्ष ठेवून नीट ऐकत रहा ३४०.

जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥
ज्याचा जो जो गुण मी घेतला, तो मीं गुरु केला; ह्यामुळें माझे गुरु अगणित झाले. ते इतके की, सारे जग गुरूंनीच भरलेले मला दिसत आहे ४१.

ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला ।
ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥
ज्याचा मी गुण घेतला, तो सहजच माझा गुरु झाला. पण ज्याच्यांतील दोष पाहून मी त्याग केला, तोही पण माझा गुरुच झाला ४२.

एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें ।
राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥
अशा रीतीनें गुणग्रहण आणि दोषत्याग ह्या दोन्हींतील समान भावानें दोघांकडेही गुरुपणाच आला. राजा ! आतां तूंसुद्धा विचार करून पाहा. म्हणजे तुलाही सारे जग गुरुमय दिसेल ४३.

ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आलें जगासी ।
हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥
अशा रीतीनें सावकाश पाहिले असतां सारे जगच गुरु दिसू लागते. हेच साधन ज्याच्यापाशी असते तोच परमार्थाला साधतो ४४.

ऐसें सांगतां अचाट । तुज वाटेल हें कचाट ।
तरी गुरु सांगो श्रेष्ठ श्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥
असें हें अचाट सांगितलेले ऐकून तुला मोठे कचाट (अवघड) वाटेल; ह्याकरतां श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून मी ज्यांना गुरु मानले, त्यांपैकी मुख्य मुख्य सांगतों ते ऐक ४५.

पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रविः ।
कपोतोऽजगरः सिन्धुः पतङ्गो मधुकृद्गजः ॥ ३३ ॥
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः ।
कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥ ३४ ॥
[श्लोक ३३-३४ ] – माझ्या गुरूंची नावे अशी आहेत पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबुतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरीण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी (कीटक) आणि कुंभारमाशी. (३३-३४)

गुरु सांगेन अशेष । संख्याप्रमाण ‘चोवीस’ ।
त्यांचीं नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥४६॥
माझे सारे गुरु सांगतो. त्यांच्या संख्येचे प्रमाण चोवीस आहे. त्यांची नांवें मी सावकाशपणे सांगतों ती तूं ऐक ४६.

पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सीतांश ।
सातवा तो चंडांष । कपोता परिस आठवा ॥४७॥
(१) पृथ्वी, (२) वायु, (३) आकाश, (४) अग्नि, (५) जल, (६) चंद्र, आणि सातवा तो सूर्य. आठवा कपोत, तोही ऐकून ठेव ४७.

अजगर सिंधु पतंग । मधुमक्षिका गज भृंग ।
हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग ‘पिंगला’ ॥४८॥
(९) अजगर, (१०) समुद्र, (११) पतंग, (१२) मधमाशी, (१३) हत्ती (१४) भुंग, (१५) हरिण, (१६) मासा, (१७) पिंगला नांवाची वेश्या, (१८) ४८.

टिटवी आणि लेंकरूं । कुमारी आणि शरकारु ।
सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥४९॥
टिटवी, आणि (१९) मूल. (२०) कुमारी (२१), बाण करणारा लोहार, (२२) सर्प, (२३) कांतणी, (२४) कुंभारीण माशी, इतके मिळून चोवीस गुरु होत ४९.

पावावया तत्त्व पंचविसावें । चोविसां गुरूंसी उपासावें ।
विवेकयुक्तिस्वभावें । गुरु भजावे निजबुद्धीं ॥३५०॥
पंचविसावें तत्त्व हें परब्रह्म तें प्राप्त होण्यासाठी ह्या चोवीस गुरूंची उपासना केली पाहिजे. विचाराच्या युक्तीनें व आत्मबुद्धीनें ह्या गुरूंचे भजन करावें ३५०.

ठाकावया निजबोधासी । निजविवेकें अहर्निशीं ।
गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥५१॥
आत्मज्ञान हृदयांत नीटपणे ठसावे म्हणून आत्मविचारानेंच रात्रंदिवस अनेकांना गुरुत्व देऊन आत्महिताकरतां त्यांस मी गुरु करून घेतले ५१,

कोण युक्ति कोण विचारु । कोणें लक्षणें कोण गुरु ।
केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥५२॥
कोणत्या युक्तीने, कोणत्या विचाराने, कोणत्या गुणासाठी कोणता गुरु केला ? तोही माझा निश्चय सविस्तर ऐक ५२.

एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिताः ।
शिक्षा वृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥ ३५ ॥
[ श्लोक ३५]-राजन ! मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली. (३५)

ऐकें राजवर्य नृपती । विवेकधवलचक्रवर्ती ।
गुरुसंख्या तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥५३॥
हे निर्मलविवेकचक्रवर्ती राजराजेश्वरा ! गुरूंची संख्या जेवढी होती ती मी तुला सांगितली ५३.

यांचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्तीं ।
मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥५४॥
त्यांच्यापाशी घेण्यासारखे जे जे गुण होते, ते ते मी आपल्याच युक्तीनें शिकलो. आणि मग विकल्पाची भ्रांति सोडून देऊन आत्मस्थितीला पोंचलों ५४.

यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुषात्मज ।
तत्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥ ३६ ॥
[श्लोक ३६]- हे वीरवर ययातिनंदन ! मी ज्याच्याकडून, ज्या प्रकारे, जे काही शिकलो आहे, ते सर्व तुला सांगतो ऐक. (३६)

नहुषाचा पुत्र ययाती । ययातीचा यदु निश्चितीं ।
‘नहुषनंदन’ यदुसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥५५॥
नहुषाचा पुत्र ययाति; ययातीचा पुत्र यदु; ह्या वंशपरंपरेनें यदूला ‘नाहुषनंदन’ असे म्हणतात ५५.

यालागीं म्हणे ‘नाहुषनंदना’ । पुरुषांमाजीं पंचानना ।
सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥५६॥
म्हणून अवधूत म्हणाला, हे नाहुषपुत्रा ! पुरुषसिंहा ! आतां गुरुची लक्षणे सांगतों, तर हे चतुरा ! ती तूं श्रवण कर ५६.

ज्या गुरूचें जें शिक्षित । मी शिकलों सुनिश्चित ।
तें ते सांगेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७॥
ज्या गुरूचा जो जो गुण होता, तो तोच मी निश्चितपणे शिकलों. ते कसे ते मी सारे सांगतो. हे राजा ! ते नीट लक्ष देऊन ऐक ५७.

ऐकावया गुरुलक्षण । यदूनें सर्वांग केलें श्रवण ।
अर्थीं बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥५८॥
ते गुरूंचे लक्षण ऐकण्यासाठी यदूनें साऱ्या अंगाचे कान केले आणि अर्थामध्ये मन घालून तो लक्ष देऊन ऐकू लागला ५८.

शब्द सांडोनियां मागें । शब्दार्थामाजीं रिगे ।
जें जें परिसतु तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥५९॥
शब्द मागे टाकून तो शब्दांच्या अर्थामध्येंच शिरत होता. सर्व विकल्प सोडू्न मन झालेला तो राजा, जो जो विषय ऐके तो तो अंगानें तद्‌रूपच होत असे ५९.

भूतैराक्रम्यमाणोऽपि धीरो दैववशानुगैः ।
तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥ ३७ ॥
[ श्लोक ३७ ]-पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला, तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते तिच्याकडून मी ‘क्षमा’ हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरूषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये. (३७)

परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चितीं ।
यालागीं प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥
परमार्थामध्यें शांति ही मुख्य आहे. याकरतां खरोखर साधकाच्या अंगी ती अवश्य असली पाहिजे. म्हणून प्रथमतः त्या शांतीकरतां मी पृथ्वी हा गुरु केला ३६०.

‘पृथ्वी’ गुरु त्रिविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मही ।
यांचीं लक्षणें धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥६१॥
पृथ्वी तीन प्रकारें गुरु आहे. पर्वत, पक्ष आणि भूमि; या तिन्हींचे गुण देहामध्यें धारण केल्यामुळें पृथ्वीकडे गुरुपणा आलेला आहे ६१.

अंतरनिग्रहो ते ‘शांती’ । बाह्येंद्रियनिग्रहो ते ‘दांती’ ।
उभयसहिष्णुता ते ‘क्षांती’ । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥६२॥
अंतर्निग्रह करणे ती ‘शांति’ आणि बाह्येंद्रियनिग्रह करणे ती ‘दांती’ होय; आणि द्वंद्वसहिष्णुता ती ‘क्षांति’ होय. म्हणून क्षांति हा गुण संपादण्यासाठी पृथ्वीला गुरु केले ६२.

पृथ्वीते नानाभूतीं । माझी माझी म्हणौनि झोंबती ।
नाना भेदीं भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥६३॥
अनेक प्रकारचे प्राणी ही ‘पृथ्वी माझी माझी’ म्हणून तिला झोंबत असतात. आणि आपापल्या वृत्तीप्रमाणे, व्यवहाराप्रमाणे, तिचे अनेक प्रकारांनी तुकडे तुकडे करीत असतात ६३.

त्या भूतांचे भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण ।
मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥६४॥
परंतु त्या जीवांचे निरनिराळे व्यापार पृथ्वी आपण होऊन चालवीत असते. पण आपली एकात्मता न मोडता ती सदासर्वदा अखंडच असते असे समज ६४.

तैसें योगियांचे लक्षण । करितां कर्म भिन्नभिन्न ।
वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥
तसेच योग्यांचे लक्षण असते. तो जरी भिन्न भिन्न कर्म करूं लागला तरी वृत्ति सदा सर्वदा अखंडदंडायमान म्ह. एकरूपच असते ६५,

देहासी अदृष्टयोगें गती । भूतें अदृष्टयोगें आक्रमिती ।
भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वें न बाधिती साधकां ॥६६॥
देह हा प्रारब्धयोगानेंच चालतो; आणि जीव हेही प्रारब्धाप्रमाणेच वागत असतात. हे लक्षात आणून प्रत्येक जीवांत आपलाच आत्मा भरलेला आहे, अशी जे भावना धरतात, त्या साधकांना द्वंद्वाची बाधा होत नाहीं ६६.

येथ भूतीं पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठामूत्रीं गांजिली ।
हर्षविषादा नाहीं आली । निश्चल ठेली निजक्षांती ॥६७॥
येथे जीवांनी पृथ्वीची पूजा केली, किंवा मलमूत्रोत्सर्ग करून गांजिली, तरी तिला हर्षही होत नाही, किंवा वाईटही वाटत नाहीं आपल्या क्षांतीमुळें ती अगदी निश्वळ असते ६७.

भूतें पार्थिवेंचि तंव झालीं । तिंहीं पृथ्वी पूजिली ना गांजिली ।
ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥६८॥
सर्व प्राणिमात्र पृथ्वीपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांनी आपल्या बर्‍याबाईट कृतीनें पृथ्वीची पूजाही केली नाही, किंवा तिला छळलेही नाही, तर ऐक्यभावामुळें द्वंद्वभावाला मुकून ती निजरूपानें निश्चळच होउन राहते ६८.

तैसाचि योगियाही जाणा । भूतवैषम्यें डंडळेना ।
सर्वभूती निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥६९॥
त्याचप्रमाणें योगीही प्राणिमात्रांच्या भिन्नभिन्न स्वभावामुळें भीत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी त्याची निजात्मभावना असल्यामुळे, विषमाच्या ठिकाणीही त्याचा समभाव असतो ६९.

आतां पृथ्वीची अभिनव शांति । ते सांगेन राया तुजप्रती ।
जे शांति धरोनि संती । भगवद्‌भक्ती पावले ॥३७०॥
हे राजा ! आतां तुला, पृथ्वीची अद्‌भुत शांति सांगतों ऐक. तीच शांति साधुसंतांनी धरल्यामुळें ते भगवद्‌भक्तीला पात्र झाले ३७०.

पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली ।
लातवरीं तुडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥
पृथ्वीवर अग्नि पेटवून तिला जाळली; किंवा नांगर घालून तिला फाळली; अथवा लाथा मारून तिला तुडविली; किंवा जीवांनी तिला तोडली व झोडली ७१,

तो अपराधु न मनूनि क्षिती । सवेंचि भूतांतें प्रसन्न होती ।
तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥७२॥
तरी पृथ्वी तो अपराध मनांत न आणतां त्या प्राण्यांवर तत्काळ प्रसन्नच होते आणि तेथेच नानाप्रकारची पिके पिकवून प्राणिमात्रांना तृप्त करून सोडते ७२.

ऐसऐेशिया निजशांती-। लागीं गुरु म्यां केली क्षिती ।
ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥७३॥
अशा प्रकारच्या निजात्मशांतीसाठी मी पृथ्वीला गुरु करून घेतले. हे भाग्यवंता राजा ! अशी शांतीची अभिनव स्थिति ऐकून घे ७३.

एकें अपराधु केला । दुजेनि उगाचि साहिला ।
इतुकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥७४॥
हे पाहा ! एकानें दुसऱ्याचा अपराध केला, आणि दुसऱ्यानें तो मुकाट्यानें सहन करून घेतला, म्हणजे त्यानें अपराध्याची उपेक्षा केली इतकेंच; पण तेवढ्यानेंच तो शांत कसा म्हणता येईल ७४.

ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी ।
पिळिलियाआळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकार्यां देतु ॥७५॥
ऊंस मोडतो त्याला गोड लागतो, त्याला छेदणारे शस्त्रही तो गोड करून सोडतो; आणि त्याला पिळलें, कढविलें, म्हणजे त्या अपकार करणाऱ्यांना तर तो उत्कृष्ट स्वादच देतो ७५,

अपराध साहोनु अंगी । त्याच्या प्रवर्ते हितालागीं ।
तेचि ‘शांति’ पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥७६॥
त्याप्रमाणें स्वतः दुसऱ्याचा अपराध सहन करून त्याचे हित करूं लागावयाचे, हीच जगांतील खरीखरी व निर्द्वंद्व ‘शांति ‘ होय ७६.

अपराध साहोनि अंगावरी । अपराध्या होईजे उपकारी ।
हें शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारीं पर्वत ॥७७॥
आपण अपराध सहन करून अपराध्यावर उपकार करणे, हे पृथ्वीवरील परोपकारी पर्वतापासून मी शिकलों ७७.

शश्वत्परार्थसर्वेहः परार्थैकान्तसम्भवः ।
साधुः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] – पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसर्‍यांच्या हितासाठीच असतात. किंबहुना दुसर्‍याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो साधु पुरूषाने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे. (पृथ्वी पासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावेत). (३८)

पृथ्वीपासोनि झाले । ते पर्वतही म्यां गुरु केले ।
त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिलें परियेसीं ॥७८॥
पृथ्वीपासून झालेल्या पर्वतांनाहीं मी गुरु केले, आणि त्यांच्यापासून जें जें शिकलों, तेही आतां ऐक ७८.

रत्नं-निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत ।
तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥७९॥
रत्नादि पदार्थांचा पर्वत जो संग्रह करून ठेवतो, तो केवळ परोपकाराकरतांच असतो. गवत, पाणी किंवा दुसरे अनेक पदार्थ तो केवळ परोपकाराकरतांच बाळगतो ७९.

कोणासी नेमी ना निवारी । उबगोनि न घाली बाहेरी ।
याचकाचे इच्छेवरी । परोपकारीं देतसे ॥३८०॥
तो कोणाला या म्हणत नाही, व नकोही म्हणत नाही; किंवा कोणाला उबगून बाहेर घालीत नाही. याचकाची जी इच्छा असेल, ती परोपकारबुद्धीनें तो पुरी करीत असतो ३८०.

ग्रीष्माअंतीं सर्व सरे । परी तो देतां मागें न सरे ।
सवेंचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥८१॥
ग्रीष्मऋतु संपला की, त्याच्यावरील तृण धान्य वगैरे सर्व संपून जाते; पण पर्वत देतांना काही मागें सरत नाही, म्हणून परमेश्वरही लागलीच मेघवृष्टि करून त्याला समृद्ध करून सोडतो ८१.

जंव जंव उल्हासें दाता देतु । तंव तंव पुरवी जगन्नाथु ।
विकल्प न धरितां मनाआंतु । देता अच्युतु अनिवार ॥८२॥
दाता जों जों उल्हासानें देऊ लागतो, तों तों जगन्नाथ त्याला पुरवठा करीतच असतो. मनांत विकल्प ठेवला नाहीं तर अच्युत भगवान् अनिवार देणारा आहे ८२.

सत्य अच्युत दाता । हें न मनेचि तत्त्वतां ।
यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥८३॥
परंतु संशयखोर लोकांना भगवान् खराखुरा दाता आहे हे खरे वाटत नाही. म्हणूनच त्यांना दारिद्य भोगावे लागते ८३.

एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोपकारार्थ एकांतीं ।
उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४॥
ह्याप्रमाणें पर्वताची उत्पत्ति फक्त परोपकाराकरतांच आहे. परोपकारावांचून दुसरी कल्पनाच त्याच्या मनाला माहीत नाहीं ८४.

त्या पर्वताऐशी तत्त्वतां । असावी साधकासी उदारता ।
काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥८५॥
साधकाला खरोखर त्या पर्वतासारखें औदार्य पाहिजे. कायेनें, वाचेनें आणि मनानें सर्वस्व देतांनाहीं उल्हासच वाटला पाहिजे ८५.

चेष्टामात्रें परोपकारता । सर्वदा करावी समस्तां ।
कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारीं तत्त्वतां उद्यतु ॥८६॥
नेहमी हरएक काम करतांना सर्वांवर उपकार करीत असावें. कोट्यवधि लाभांवर लाथ मारूनही उपकार करण्याविषयी नेहमी तयार असावें ८६.

परमार्थाचिया चाडा । स्वार्थ सांडोनि रोकडा ।
परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थें ॥८७॥
परमार्थाची खरी इच्छा असणारा साधक समोर आलेला प्रत्यक्ष स्वार्थ सोडून, परोपकाराकरतां अवघड संकटांतही उडी घालतो ८७.

उपकारुचि साकारला । कीं परोपकारु रूपा आला ।
तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥८८॥
मूर्तिमंत उपकार जन्मावा किंवा परोपकारच रूपाला यावा त्याप्रमाणें हा जन्मून उपकारी होऊन राहातो ८८.

ऊंसु जैसा अवधारीं । सर्वासी गोडपणें उपकारी ।
तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥८९॥
हे पाहा ! ऊस जसा अंगच्या गोडपणानें सर्वांवर उपकार करतो, त्याचप्रमाणें योगीही संसारामध्यें राहून गोड वर्तनानें परोपकार करीत असतो ८९.

जैसे पर्वतीं निर्झर । तैसे उपकाराचे पाझर ।
सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥
पर्वतांतून जसे झरे निघत असतात, त्याप्रमाणें त्याच्यापासून उपकाराचे पाझर फुटून ते निरंतर वाहातच असतात. त्यांना आटावयाचे कधी माहीतच नाही. इतके त्यानें जगाला उपकारबद्ध करून सोडलेले असते ३९०.

सांडोनि कृपणवृत्तीची संगती । उपकारी पर्वत एकांतीं ।
राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥९१॥
कृपणपणाची संगत सोडून देऊन पर्वत एकांतांत उपकार करीत राहतो किंवा धैर्यवृत्तीच्या निर्धारानें तो उपकाराची साक्षात् मूर्तिच बनून राहातो ९१.

परोपकारालागीं निश्चित । गुरु केला म्यां पर्वत ।
आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥९२॥
खरोखर परोपकारासाठीच मी पर्वताला गुरु केलें. आतां वृक्षापासून काय शिकण्यासारखे असते तेही ऐक ९२.

सर्वांगें सर्वभावेंसी । सर्वकाळ सर्वदेशीं ।
पराधीन होआवें सर्वांसी । हें वृक्षापाशीं शिकलों ॥९३॥
सर्वांगानें सर्वोपरी, सर्वकाळ आणि सर्वत्र सर्वांच्या पराधीनतेत असावें, हेच मी वृक्षापाशी शिकलों ९३.

वृक्ष जेणें प्रतिपाळिला । तो त्या आधीन जाहला ।
कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥९४॥
वृक्ष ज्यानें लावलेला असतो, त्याच्याच तो अधीन असतो असें नाही, तर त्याला तोडावयला जो तयार होतो, त्याच्याही तो अधीनच असतो ९४.

योगिया पालखीसी घातला । तेव्हां त्याचिया आधीन झाला ।
एकीं शूळीं द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥९५॥
त्याचप्रमाणें योग्याला पालखीत बसविले, तर तो त्यांच्या अधीन होतो. किंवा कोणी सुळावर द्यावयाला चालविले, तर तो त्यांच्याही आज्ञेत चालत असतो ९५.

सांडूनि देहींची अहंता । योगियासी झाली पराधीनता ।
विश्व माझा आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्तता बोलाआंतु ॥९६॥
देहाची अहंता सोडून दिल्यामुळें योग्याला पराधीनता प्राप्त झालेली असते. विश्व हें सर्वोपरी माझा आत्माच आहे, असे समजून सर्वांच्या बोलण्याप्रमाणें तो वागतो ९६.

सर्वं तें मीचि आहें । यालागीं साधक बाधक न पाहे ।
त्याच्या बोलामाजीं राहे । वर्तता होये संतोषें ॥९७॥
सारे आहे ते मीच आहे, असे समजून तो साधकाबाधकाकडे लक्ष न देतां त्याच्या आज्ञेंत राहून संतोषानें वागत असतो ९७.

प्राप्त जें जें सुखदुःख । तें तें अदृष्टाआधीन देख ।
आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥९८॥
सुख दुःख म्हणून जें जें प्राप्त होईल, तें तें प्राक्तनाच्या अधीन असते; सारे लोक हाच आपला आत्मा असे समजून तो पराधीन होऊन वागत असतो ९८.

सकळ लोकीं निजात्मता । देखता जाहली पराधीनता ।
हें वृक्षापासोनि तत्त्वतां । ‘परात्मता’ शिकलों ॥९९॥
सर्व लोकांमध्यें आपला आत्मा आहे, असे पाहूं लागल्याबरोबर पराधीनता सहज प्राप्त होते. हीच ‘परात्मता’ खरोखर मी वृक्षापासून शिकलों ९९.

आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण ।
अतिथीचें पूजाविधान । तें सावधान परियेसीं ॥४००॥
वृक्षापासून आणखी एक गुण शिकलो आहे. तो कोणता ? तर अतिथीचे पूजन करणे. तेही नीट लक्ष देऊन श्रवण कर ४००.

अतिथि आल्या वृक्षापासीं । वंचनार्थु न करी त्यासी ।
पत्रपुष्पफलमूळच्छायेसीं । त्वचाकाष्ठांसी देतसे ॥१॥
वृक्षापाशी अतिथि आला, तर तो त्याला कधीच विन्मुख दवडीत नाही. पान, फूल, फळ, मूळ, छाया, साल, लाकूड कांहीं ना काही तरी देतोच १.

जो वृक्षासी प्रतिपाळी । कां जो घावो घालूं ये मूळीं ।
दोंहीसीही सममेळीं । पुष्पीं फळीं संतुष्टी ॥२॥
वृक्षाचा जो प्रतिपाळ करतो त्याला, किंवा जो मुळांत धाव घालतो त्याला, त्या दोघांनाहीं सारख्याच रीतीनें पुष्पांनी आणि फळांनी तो संतुष्ट करतो २.

जैसा वृक्ष समूळ सगळा । अर्थियांलागीं सार्थक जाहला ।
तैसा चित्तें वित्तें देहें बोला । साधु संतुष्टला अर्थ्यांसी ॥३॥
वृक्ष ज्याप्रमाणें मूळासहवर्तमान सगळाच्या सगळा अतिथीप्रीत्यर्थच देह खर्ची घालून सार्थक्य करून घेतो, त्याचप्रमाणें साधुही चित्त, वित्त, देह आणि शब्द सारेच अतिथीला अर्पण करून संतुष्ट करतो, ३.

अतिथीसी नव्हे पराङ्मुदख । हा साधूसी गुण अलोलिक ।
अन्न धन उदक । यथासुखें देतुसे ॥४॥
अतिथीला पराङ्मुख होऊं द्यावयाचें नाहीं, हाच साधूमध्यें अलौलिक गुण असतो. तो त्याला अन्न, द्रव्य, पाणी इत्यादि मोठ्या आनंदानें देत असतो ४.

अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावें सर्वस्वेंसी ।
हें शिकलों वृक्षापासीं । विवेकेंसीं निजबुद्धीं ॥५॥
याचक मागावयास आला असतां सर्वस्व द्यावें लागले, तरी देऊन त्याला विन्मुख जाऊं द्यावयाचे नाही, हे विचारानें आणि आत्मबुद्धीनें मी वृक्षापाशी शिकलों ५.

एवं पृथ्वी गुरु झाली ऐसी । दुजें गुरुत्व तें वायूसी ।
आलें जें जें युक्तीसी । तें तें परियेसीं नरदेवा ॥६॥
अशा प्रकारें पृथ्वी ही माझी गुरु झाली. आतां दुसरा गुरुपणा वायूकडे आला. त्यापासून जें जें ग्रहण करावेसे वाटले, तेही राजा ! ऐक ६.

गुरुत्व जें वायूसी । तें दों प्रकारीं परियेसीं ।
एक तें प्राण वृत्तीसीं । बाह्य वायूसी दुसरें ॥७॥
वायूला जें गुरुत्व आले आहे, ते दोन प्रकारांनी असे समज. एक प्राणवायूच्या द्वारानें आणि दुसरें बाह्य वायूच्या द्वारानें ७.

प्राणवृत्त्यैव सन्तुष्येन्मुनिर्नैवेन्द्रियप्रियैः ।
ज्ञानं यथा न नश्येत नावकीर्येत वाङ्मनः ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] -प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे साधकानेसुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत. थोडक्यात, ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही, मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही, हे पाहावे. (३९)

प्राणाचियेपरी । जो विषयीं आसक्ती न धरी ।
विषय सेविलियाही वरी । नव्हे अहंकारी प्राणु जैसा ॥८॥
प्राणाप्रमाणें जो विषयाची आसक्ति धरीत नाही, किंवा विषयसेवन केल्यावरही प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणें त्याला अहंकार उत्पन्न होत नाहीं ८.

प्राणाभ्यासें क्षुधा अद्‌भुत । तेव्हां प्राणासीच क्षोभ येत ।
तेणें काया वाचा चित्त । विकळ पडत इंद्रियें ॥९॥
प्राणाच्या हालचालीमुळें क्षुधा उत्पन्न होते; तिच्यामुळें प्राण क्षुब्ध होतो; त्यामुळें काया, वाचा, मन व इंद्रियेंही विगलित होतात ९,

तया प्राणासी आधारु । भलतैसा मिळो आहारु ।
परी धडगोडांचा विचारु । न करी साचारु पैं प्राणु ॥४१०॥
त्या प्राणाच्या रक्षणापुरता कसलाही का आहार मिळेना ! तो गोड आहे किंवा नाहीं ह्याचा खरोखर प्राण काही विचार करीत नाहीं ४१०.

तैसाचि योगिया पाहीं । तो अभिमान न धरी देहीं ।
विषयो सेवी परी कांही । आसक्ति नाहीं तयासी ॥११॥
त्याप्रमाणें योगी असतो तोही देहाचा अभिमान बाळगीत नाही. तो विषयसेवन करतो, पण त्याला त्याची आसक्ति नसते ११.

क्षुधेचिया तोंडा । मिळे कोंडा अथवा मांडा ।
परी रसनेचा पांगडा । न करी धडफुडा तयासी ॥१२॥
भुकेच्या तोंडाला कोंडा मिळो की मांडा मिळो, पण तो त्याला जिभेचा अंकित होऊ देत नाहीं १२.

ज्ञानधारणा न ढळे । इंद्रियें नव्हती विकळें ।
तैसा आहार युक्तिबळें । सेविजे केवळें निजधैर्यें ॥१३॥
ज्ञानधारणा ढळू नये, इंद्रिये विकल होऊ नयेत, अशा बेताबातानें व धैर्यानें तो आहार सेवन करतो १३.

प्राणास्तव इंद्रियें सबळें । प्राणायोगें देह चळे ।
त्या देहकर्मा प्राणु नातळे । अलिप्त मेळें वर्ततु ॥१४॥
प्राणामुळेच इंद्रिये सशक्त राहतात; प्राणाच्या योगानेंच देह, चालतो; पण देहकर्माला प्राण लिप्त होत नाही. तो अलिप्तपणानेंच वागत असतो १४,

त्या प्राणाच्या ऐसी स्थिती । योगियाची वर्तती वृत्ती ।
सर्व करूनि न करी आसक्ती । देहस्थिति नातळे ॥१५॥
त्या प्राणाप्रमाणेच योग्याची स्थिति असते. सर्व करूनही त्याची कोठेच आसक्ति नसते. म्हणून देहस्थितीचा त्याला स्पर्श होत नाहीं १५.

ब्रह्मादिकांचा देह पाळूं । कां सूकरादिकांचा देह टाळूं ।
ऐसा न मानीच विटाळू । प्राणु कृपाळु समभावें ॥१६॥
ब्रह्मादिकांचे देह चांगले म्हणून त्यांचे पालन करावें, आणि डुकरासारख्यांचे देह नीच म्हणून त्यांत शिरूंच नये, असा विटाळ प्राण हा दयाळू आणि समदृष्टि असल्यामुळें मानीत नाही. १६.

तैसेंचि योगियाचें कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म ।
कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावें ॥१७॥
त्याचप्रमाणें योग्याचा मनोधर्म, हे कर्म उंच आहे किंवा नीच आहे ही भावनाच धरीत नाही. त्याची भावना सर्वत्र सम असल्यामुळें तो, हा उत्तम व हा अधम हें मनांतच आणीत नाहीं १७.

आवडीं प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो ।
ऐसा प्राणासी नाहीं भावो । शुद्ध समभावो सर्वत्र ॥१८॥
राजाचा देह आवडीनें प्रतिपाळ करावा आणि भिकाऱ्याचा देह सोडून द्यावा, असा कुढा भाव प्राणाचा कधीच असत नाही. त्याचा सर्वत्र शुद्ध समानभावच असतो १८.

प्राण अपान समान उदान । सर्व संधी वसे व्यान ।
इतुकीं नामें स्थानें पावोनि जाण । न सांडी प्राण एकपणा ॥१९॥
प्राण, अपान, समान, उदान, किंवा सर्व संधी-संधींत राहणारा व्यान इतकी नांवें व इतकी त्याची स्थानें असूनही प्राण हा आपला एकपणा सोडीत नाहीं १९,

तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण ।
देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडी ॥४२०॥
त्याप्रमाणेच उंच नीच वर्णावर्ण पाहून किंवा उत्तम अधम इत्यादि गुणावगुण पाहून योगी आपला सर्वत्र समभाव कधीच सोडीत नाहीं २०.

प्राणु असोनि देहाभीतरीं । बाह्य वायूसी भेद न धरी ।
तैशी योगिया भावना करी । बाह्यभ्यंतरीं ऐक्यता ॥२१॥
प्राण हा खरोखर देहाच्या आंत असूनही बाह्यवायूशीं भेदभाव धरीत नाही. त्याप्रमाणेच योग्याचीही अंतर्बाह्य एकच भावना असते २१.

विषयेष्वाविशन्योगी नानाधर्मेषु सर्वतः ।
गुणदोषव्यपेतात्मा न विषज्जेत वायुवत् ॥ ४० ॥
पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद्गुवणाश्रयः ।
गुणैर्न युज्यते योगी गन्धैर्वायुरिवात्मदृक् ॥ ४१ ॥
[श्लोक ४०-४१]-वायू अनेक गुणधर्माच्या पदार्थावर जातो, पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचाही गुणदोष घेत नाही त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्माच्या विषयांकडे जावे लागले, तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत. (४०)
पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला, तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याच्या आधिव्याधी, तहानभूक इत्यादी सहन करावे परंतु त्यांपासून सर्वथा अलिप्त असावे. (वायूपासून अल्पसंतुष्टता, इतरांचे गुणदोष न पाहाणे व न घेणे आणि अलिप्त असणे, हे गुण घ्यावेत). (४१)

ऐक्यता साधावी चतुरीं । ते वायूच्या ऐशी दोंहीपरी ।
बाह्य आणि अंतरीं । ऐक्यकरीं वर्तावें ॥२२॥
चतुरपुरुषानें या वायूप्रमाणें दुहेरी ऐक्यता साधली पाहिजे. अंतर्बाह्य नेहमी सारखें ऐक्यभावानें वागावें २२.

प्राणवृत्तीचीं लक्षणे । तुज सांगितलीं संपूर्णें ।
आतां बाह्य वायूचीं चिन्हें । सावधानें परियेसीं ॥२३॥
(आतापर्यंत) प्राणवृत्तीची सारी लक्षणे तुला सांगितली. आतां बाह्य वायूची लक्षणेही नीट लक्ष देऊन ऐक २३.

वायु सर्वांतें स्पर्शोनि जाये । परी अडकला कोठें न राहे ।
तैसें विषय सेवितां पाहे । आसक्तु नव्हे योगिया ॥२४॥
वायु हा सर्वांना स्पर्श करून जातो, पण कोठेच अडकून राहत नाही. त्याप्रमाणेच योगीही विषयसेवन करीत असतां कोठेच आसक्त होत नाहीं २४.

असोनि इंद्रियांचेनि मेळें । तो विषयांमाजी जरी खेळे ।
तरी गुणदोष आसक्ति मेळें । बोधु न मळे तयाचा ॥२५॥
तो इंद्रियांच्या संगतीत असून विषयांत जरी खेळत असला, तरी गुणदोषांच्या आसक्तीनें त्याच्या ज्ञानाचा कधीच बिघाड होत नाहीं २५.

वस्त्र चंदन वनिता माळा । सदा भोगितां विषयसोहळा ।
वायु नातळे जेवीं जाळा । तेवीं योगी वेगळा विषयांसी ॥२६॥
वस्त्र, चंदन, स्त्री किंवा सुगंधी पुष्पांच्या माळा इत्यादि विलासांचा उपभोग तो घेत असला तरी, वायु जसा जाळ्यांत अडकत नाही, त्याप्रमाणेच योगीही विषयांपासून अलिप्तच असतो २६.

जैसें वारेनीं जाळ उडे । परी जाळीं वारा नातुडे ।
तेवीं भोग भोगितां गाढे । भोगीं नातुडे योगिया ॥२७॥
ज्याप्रमाणें वाऱ्यानें जाळें उडत असते, परंतु वारा कांहीं जाळ्यांत सांपडत नाही, त्याप्रमाणें कितीही भोग भोगले तरी योगी त्या भोगांत अडकत नाहीं २७.

जातया वायूचे भेटी । सुगंध कोटी घालिती मिठी ।
त्यांची आसक्ती नाहीं पोटीं । उठाउठीं सांडितु ॥२८॥
वाहत असणाऱ्या वायूला कोट्यवधि सुगंध येऊन मिठी घालीत असतात, पण पोटांत त्यांची आसक्ति न धरितां तो तत्काल त्यांना सोडून पुढे चालता होतो २८.

तैसा आत्मत्वें योगिया पाहीं । प्रवेशलासे सर्वां देहीं ।
देह गुणाश्रयो पाहीं । ठायींच्या ठायीं तोचि तो ॥२९॥
त्याप्रमाणेच आत्मस्वरूपानें योगीही सर्व देहांमध्यें शिरलेला असतो. त्यामुळें त्या त्या देहाच्या गुणाचा आश्रय त्या त्या ठिकाणी घेत असतो २९.

निजात्मदृष्टीचेनि बळें । तो देहगुणांसी नातळे ।
जैसा गंधावरी वारा लोळे । परी नाकळे गंधासी ॥४३०॥
ज्याप्रमाणें सुगंधावर वारा लोळत असतो, तरी तो त्या सुगंधाला शिवत नाही, त्याप्रमाणें आत्मदृष्टीच्या सामर्थ्यानें तो देहाच्या गुणांना लिगटत नाहीं ४३०.

तेचि परिपूर्ण आत्मस्थिती । राया मी सांगेन तुजप्रती ।
जैसी आकाशाची प्रतीती । सर्व पदार्थीं अलिप्त ॥३१॥
ही परिपूर्ण आत्मस्थिति राजा ! तुला सांगतों ऐक, ज्याप्रमाणें आकाश हे सर्व पदार्थापासून अलिप्त असल्याची प्रचीति येते, त्याप्रमाणें ही स्थिति आहे ३१.

अन्तर्हितश्च स्थिरजङ्गमेषु
ब्रह्मात्मभावेन समन्वयेन ।
व्याप्त्याव्यवच्छेदमसङ्गमात्मनो
मुनिर्नभस्त्वं विततस्य भावयेत् ॥ ४२ ॥
[श्लोक ४२]-आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरांत आतबाहेर व्यापून असते, तरी त्या वस्तूंपासून अलिप्त असते त्याचप्रमाणे साधकाने, आपण ब्रह्मस्वरूपाने सर्वत्र अधिष्ठानरूपात व्यापून असलो, तरी सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत, ही भावना आकाशापासून शिकावी. (४२)

सर्व पदार्थी समत्व । यालागीं आकाशासी गुरुत्व ।
असंगत्व अभेदत्व । निर्मळत्व जाणोनी ॥३२॥
आकाश हें निर्मळ, अभेद्य, अलिप्त, आणि सर्व पदार्थांशी समान भाव धरणारे आहे, म्हणून आकाशाला मी गुरुत्व दिले ३२.

विषमीं असोनि समत्व । संगीं असोनि असंगत्व ।
भेदु करितां अभेदत्व । यालागीं गुरुत्व आकाशा ॥३३॥
ते विषमांत असून सम, संगांत असून असंग, आणि भेद केला तरी त्याचा अभेद मोडत नाही; म्हणून आकाशाला गुरु केले आहे ३३.

वैर सर्पामुंगुसांसी । आकाश दोंहीचे हृदयवासी ।
वैर निर्वैरता आकाशासी । ते स्थिती योगियासी पाहिजे ॥३४॥
सापाचे आणि मुंगसाचे वैर आहे, पण दोघांच्याही हृदयामध्यें आकाश हें आहेच; वैर आणि निर्वैर हे आकाशाला ठाऊक नाही. योग्याची स्थिति पण तशीच असली पाहिजे ३४.

तेणें आकाशदृष्टांतें । ब्रह्मभावें आपणियातें ।
योगी देखिजे पुरतें । व्यापकत्वें आपुल्या ॥३५॥
त्या आकाशाच्या दृष्टांतानेंच योगीही आपल्या परिपूर्ण व्यापकत्वानें ब्रह्म ह्या भावनेनेंच आपल्याला पाहात असतो ३५.

ब्रह्मसमन्वयें पाहतां पाहीं । स्थावरजंगमांच्या ठायीं ।
तिळभरी वाढी रिती नाहीं । आपण पैं पाहीं कोंदला ॥३६॥
ब्रह्मसमन्वयानें पाहूं लागले म्हणजे स्थावरजंगमांच्या ठिकाणी आपणच भरून राहिलो आहों, आपल्याशिवाय एक तिळभरही कमी जास्त जागा नाहीं असे त्यास दिसू लागते ३६.

आकाश सर्व पदार्थीं असे । परी असे हें सर्वासी न दिसे ।
तेवीं दृश्य-द्रष्टा-अतीतदशें । सर्वत्र असे योगिया ॥३७॥
आकाश साऱ्या पदार्थांत असतेच, पण ते सर्वांना काही दिसत नाही. त्याप्रमाणें योगीही दृश्य आणि द्रष्टा ह्याच्या पलीकडील स्थितीत सर्वत्र असतो ३७.

नभ न खोंचे सांबळें । जळेना वणव्याचेनि जाळें ।
नव्हतां ज्वाळांवेगळें । असे सगळें टवटवित ॥३८॥
बरची-भाल्यानें काही आकाशाला भोंक पडत नाही; किंवा वणव्याच्या जाळानें ते जळत नाही; ते ज्वाळांपासून वेगळे नसतांही जशाचे तसे टवटवीतच असते ३८.

तैसीं योगियासी द्वंद्वे सकळें । बाधूं न शकतीं कवणे काळें ।
नव्हतां द्वंद्वावेगळें । स्वरूप सगळें शोभत ॥३९॥
त्याप्रमाणें योग्यालाही सारी द्वंद्वे कोणत्याही काली बाधू शकत नाहीत. द्वंद्वावेगळे न होतांच त्याचे स्वरूप शोभत असते ३९.

योगिया छेदावया लवलाहें । सोडिले शस्त्रांचे समुदाये ।
तो शस्त्रांमाजीं अपणियातें पाहे । न रुपती घाये जेवीं गगना ॥४४०॥
योग्याला तोडावा म्हणून त्याच्यावर लौकर लौकर शस्त्रांचे भारे जरी टाकले, तरी त्या शस्त्रांमध्यें तो आपणालाच पाहतो. त्यामुळें आकाशाला जसे घाव लागत नाहीत, त्याप्रमाणें त्यालाही ते धाव लागत नाहीत ४४०.

जें जें द्वंद्व बाधूं आलें । तें तें स्वरूप देखे आपुलें ।
सहजें द्वंद्वभावा मुकलें । अबाधित उरलें निजरूप ॥४१॥
जें जें द्वंद्व त्याला बाधा करावयाला येतें, तें तें आपलेंच स्वरूप आहे असें त्याला वाटते. त्यामुळें सहजच द्वंद्वभावाला मुकून अबाधित असे निजरूपच शिल्लक राहते ४१.

गगन बुडालें दिसे डोहीं । परी तें उदकें भिजलेंचि नाहीं ।
तैसा असोनियां सर्व देहीं । अलिप्त पाहीं योगिया ॥४२॥
आकाश हे डोहांत बुडाल्यासारखे दिसते; पण ते काही पाण्यानें भिजत नाही, त्याप्रमाणें योगी हा सर्व देहांत असूनही अलिप्त असतो ४२.

आकाशा चिखल माखूं जातां । तें न माखे माखे लाविता ।
तैसा योगिया दोषी म्हणतां । दोषु सर्वथा म्हणत्यासी ॥४३॥
आकाशाला चिखल सारवावयाला गेले, तर तो आकाशाला न लागतां लावू जाणाराच चिखलानें माखतो. तद्वत् योग्याला दोषी असे म्हणतो, त्या म्हणणाराला मात्र दोष लागतो ४३.

गगन असोनियां जनीं । मैळेना जनघसणीं ।
तैसा योगिया सकळ कर्में करूनी । कर्मठपणीं न मैळे ॥४४॥
आकाश हें लोकांमध्येंच असून लोकांच्या घर्षणानें ते कधी मळत नाही; त्याप्रमाणें योगीहि सारी कर्में करून कर्मठपणानें कधी मलिन होत नाहीं ४४.

मोटे बांधितां आकाशातें । चारी पालव पडती रिते ।
तेवीं कर्मी बांधितां योगियातें । कर्म तेथें निष्कर्म ॥४५॥
मोटेमध्यें आकाश बांधावयास गेलें तर चारही पदर रिकामे मात्र पडतात; त्याप्रमाणें कर्मानें योग्याला बद्ध करूं लागले तर तें कर्म निष्कर्मच होऊन जाते ४५.

घटामाजीं आकाश असे । तें वाच्य कीजे घटाकाशें ।
पाहतां घटा सबाह्य समरसें । आकाश असे परिपूर्ण ॥४६॥
घटामध्यें आकाश असते, त्याला ‘घटाकाश’ असें म्हणतात; वास्तविक पाहूं गेलें असतां घटाच्या आंतून आणि बाहेरूनही आकाश परिपूर्ण भरलेलेच असते ४६.

तैसा आत्मा म्हणती देहीं । तंव तो देहा सबाह्य पाहीं ।
देह मिथ्यात्वें ठायींचे ठायीं । चिन्मात्र पाहीं परिपूर्ण ॥४७॥
त्याप्रमाणें आत्मा हा देहांत आहे असे म्हणतात, परंतु तो देहाच्या बाहेरही असतो. देह हा जागच्याजागी मिथ्या असून चैतन्यस्वरूप मात्र परिपूर्ण आहे ४७.

तेजोऽबन्नमयैर्भावैर्मेघाद्यैर्वायुनेरितैः ।
न स्पृश्यते नभस्तद्वत्कालसृष्टैर्गुणैः पुमान् ॥ ४३ ॥
[श्लोक ४३ ] तेज, पाणी, पृथ्वी इत्यादी पदार्थ किंवा वार्‍याने ढकललेले ढग, धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात, पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात उत्पन्न होणार्‍या देहादी पदार्थांचा आत्म्याशी संबंध असत नाही. (आकाशापासून अलिप्तपणा, अमर्यादपणा हे गुण घ्यावेत). (४३)

नभ पृथ्वीरजें न गदळे । उदकेंकरीं न पघळे ।
अग्नीचेनि ज्वाळें न जळे । वायुबळें उडेना ॥४८॥
पृथ्वीवरच्या धुळीनें आकाश कांहीं गढूळ होत नाही; पाण्याच्या योगानें तें पाघळत नाहीं; अग्नीच्या ज्वाळांनी ते जळत नाही; किंवा वायूच्या बळानें ते उडतही नाहीं ४८.

कडकडीत आभाळें । येऊनि आकाश झांकोळे ।
त्या समस्तां नभ नातळे । अलिप्त बळें संस्थित ॥४९॥
कडकडून अभ्रे आली, म्हणजे आकाश झांकून जाते; पण त्यांतील कोणालाही ते स्पर्श करीत नाही. ते अलिप्तपणाच्या सामर्थ्यानें जशाचे तसे असते ४९.

तैसेंचि योगियासी । असतां निजात्मसमरसीं ।
काळें सृजिलिया गुणांसी । वश्य त्यांसी तो नव्हे ॥४५०॥
त्याचप्रमाणें योगीही आत्मस्वरूपाच्या समरसतेंत असतांना काळानें निर्माण केलेल्या गुणांना वश होत नाहीं ४५०.

काळाचें थोर सामर्थ्य जाण । देहासी आणी जरामरण ।
योगी देहातीत आपण । जन्ममरण न देखे ॥५१॥
काळाचे सामर्थ्य फार थोर आहे; तो देहाला जरामरण आणतो; पण योगी हा स्वतः देहातीत असल्यामुळें तो जन्ममरण पाहात नाहीं ५१.

स्वप्नीं चिंतामणी जोडला । सवेंचि अंधकूपीं पडला ।
जागा जाहल्या न म्हणे नाडला । तैसा घडला देहसंगु ॥५२॥
स्वप्रांत चिंतामणी सांपडला, आणि तो लागलाच एखाद्या अंधेर्‍या विहिरीत पडला, तर जागा झाल्यावर मोठी हानी झाली असें तो म्हणत नाही. त्याप्रमाणेच योग्याला देहसंग घडत असतो ५२.

जो ब्रह्मादि देहांसी खाये । तो काळु वंदी योगियाचे पाये ।
जो काळाचाही आत्मा होये । निधडा पाहें महाकाळु ॥५३॥
ब्रहादेवादिकांच्या देहांनाहीं खाऊन टाकणारा जो काळ, तोसुद्धा योग्याच्या चरणाचें वंदन करतो. कारण, योगी हा काळाचाही आत्मा असल्याकारणानें तो स्वतःच काळाचा महाकाळ असतो ५३.

विजू कडकडूनि आकाशीं । तेजें प्रकाशी गगनासी ।
गगन नातळे ते विजूसी । असोनि तिशीं सबाह्य ॥५४॥
वीज आकाशामध्यें कडकडाट करून आपल्या तेजानें आकाशाला प्रकाशित करते; पण आकाश तिच्या आंत व बाहेर असूनही तिला लिप्त होत नाहीं ५४.

तैसा सत्त्वगुण प्रकाशी ज्ञान । त्यासी योगिया नातळे जाण ।
ज्ञानस्वरूप निखळ आपण । वृत्तिज्ञान मग नेघे ॥५५॥
त्याप्रमाणें सत्त्वगुण हा ज्ञानाचा प्रकाशक आहे, पण त्यालासुद्धा योगी शिवत नाहीं हे लक्षात ठेव. कारण तो स्वतः शुद्धज्ञानस्वरूपच असतो, म्हणून तो वृत्तिज्ञान घेत नाहीं ५५.

झालिया सूर्यउिदयासी । दीपप्रभा नये उपेगासी ।
तेवीं ‘सहज’ आलिया हातासी । वृत्तिज्ञानासी कोण पुसे ॥५६॥
सूर्याचा उदय झाला म्हणजे दिव्याच्या प्रकाशाचा काही उपयोग नाही, त्याप्रमाणें ‘सहजज्ञान’ हाती आल्यावर वृत्तिज्ञानाला कोण विचारतो ? ५६.

सत्त्वें प्रकाशिलें ज्ञान । तें आवडोनि नेघे जाण ।
अथवा खवळल्या रजोगुण । कर्मठपण त्या न ये ॥५७॥
सत्त्वानें ज्ञान उत्पन्न झालेले असते, तेही तो आवडीनें घेत नाही; किंवा रजोगुण खवळला तरी त्याला कर्मठपणा येत नाहीं ५७.

हो कां तमोगुणाचेनि मेळें । क्रोधमोहांसी नातळे ।
गुणातीत झाला बळें । बोधकल्लोळें स्वानंदें ॥५८॥
किंवा तमोगुणाच्यामुळें तो क्रोधमोहालाही वश होत नाही. तो ज्ञानाच्या कल्लोळानें व आत्मानंदानें आपोआप गुणातीतच झालेला असतो ५८.

उदकासी गुरुपण । आलें तें ऐक लक्षण ।
अवधूत म्हणे सावधान । नृपनंदन यदुवीरा ॥५९॥
अवधूत म्हणाला, “राजकुमारा ! यदुवीरा ! आतां उदकाकडे गुरुपण कसे आले, ती लक्षणे नीट लक्ष देऊन श्रवण कर” ५९.

स्वच्छः प्रकृतितः स्निग्धो माधुर्यस्तीर्थभूर्नृणाम् ।
मुनिः पुनात्यपां मित्रमीक्षोपस्पर्शकीर्तनैः ॥ ४४ ॥
[श्लोक ४४]- जसे पाणी स्वभावतःच स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे असते, तसेच तीर्थांचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनीसुद्धा लोक पवित्र होतात, त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावतःच शुद्ध, प्रेमळ, मधुरभाषी आणि लोकपावन असतो व त्याचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात. (पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य इत्यादी गुण घ्यावेत). (४४)

लक्षणें पाहतां जळ । स्वभावें अतिनिर्मळ ।
प्रकृतीस्तव कोमळ । मधुर केवळ सर्वांसी ॥४६०॥
उदकाची लक्षणे पाहिली तर ते स्वभावतःच अत्यंत निर्मळ असते. आणि त्याच्या अंगच्या धर्माप्रमाणेच ते सर्वांना केवळ मधुर आणि कोमल असेंच लागते ४६०.

पवित्र व्हावया प्राणियांसी । तीर्थीं तीर्थत्व उदकासी ।
इतुकीं लक्षणें योगीयासी । अहर्निशीं असावीं ॥६१॥
प्राण्यांनी पवित्र व्हावे, म्हणूनच तीर्थाच्या ठिकाणी पवित्रता असते. योग्याच्या अंगामध्येंही रात्रंदिवस इतकी लक्षणे असावीत ६१.

उदकीं रिघाले जे समैळ । ते स्वभावें करी निर्मळ ।
परी न धरी अहंबळ । जे म्यां हे मळ क्षाळिले ॥६२॥
मळलेल्या अंगानें जे जे कोणी उदकांत शिरतात, त्यांना त्यांना ते आपल्या स्वभावधर्मानेंच निर्मळ करून सोडते. परंतु ‘मी या सर्वांचे मळ धुऊन काढले’ … असा अहंभाव तें धरीत नाहीं ६२.

तैसें योगियासी भजनशीळ । भावें भाविक जे केवळ ।
त्यांचे निरसूनि कळिमळ । न धरी बळ गुरुत्वें ॥६३॥
त्याप्रमाणें योगीही केवळ भक्तीनें भजनी लागलेल्या भाविक लोकांचे, कलिकाळजन्य पातकांचा नाश करूनही गुरुत्वाची आढ्यता धरीत नाहीं ६३.

प्राणु गेला तरी प्राणियांसी । कठिणत्व उपजेना मानसीं ।
जें जें भेटे तयासी । मृदुता कैसी वर्तत ॥६४॥
त्याला जो जो कोण भेटतो, त्याच्याशी त्याची वागणूक इतकी कोमल असते की, त्याचा प्राण गेला तरी प्राणिमात्राविषयी त्याच्या मनांत कठोरता उत्पन्न होत नाहीं ६४.

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।
जीवन जैसें कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ॥६५॥
चकोराला ज्याप्रमाणें चंद्राचे किरण; किंवा पक्ष्याच्या पिलांना जसे त्यांच्या मातेचे पंख; किंवा जीवांना जसें जीवन; तशी त्याची सर्वांशी मृदुलता ६५.

जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ॥६६॥
उदक हे वरवरचा मळ धुऊन काढते; पण योगी हा आंतील व बाहेरीलही दोष धुऊन काढून अंतर्बाह्य शुद्ध करतो. उदक हे एक वेळच सुखी करते, पण योगी हा सर्वकाल सुख देणारा असतो ६६.

उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाहीं ॥६७॥
उदकाचें सुख ते कितीसें ? क्षणभरानंतर लगेच पुन्हा तहान लागते. परंतु योगी आत्मानंदानें असा काही तृप्त करून सोडतो की, पुन्हा त्या सुखांत व्यत्यय म्हणून नाहीं ६७.

उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचें गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ॥६८॥
उदकाची गोडी फक्त जिव्हेलाच असते; पण योग्याची गोडी पाहूं गेलें तर तो साऱ्याच इंद्रियांना तृप्त करून सोडतो ६८.

लागल्या योगियाची गोडी । अमृताची चवी थोडी ।
ब्रह्मेंद्रादि पदें बापुडीं । अर्धघडीमाजीं करीत ॥६९॥
योग्याची गोडी एकदां लागली, की त्याच्यापुढे अमृताची रुचीसुद्धा कमीच वाटू लागते. ती एका अर्ध्या घटकेंत ब्रह्मदेवाची किंवा इंद्राचीं पदेंसुद्धां कःपदार्थ करून सोडते ६९.

तापले आले उदकापाशीं । अंगस्पर्शे निववी त्यांसी ।
तैसीचि दशा योगियासी । स्पर्शें तापासी निवारी ॥४७०॥
उन्हानें तप्त झालेले लोक उदकापाशी आले असतां उदक आपल्या स्पर्शानेंच त्यांना गार करून सोडते. योग्याची स्थितिही तशीच आहे. तोही आपल्या स्पर्शानें सर्वांचा ताप दूर करतो ४७०.

उदकें निवविलें ज्यासी । परतोनि ताप होये त्यासी ।
योगी कृपेनें स्पर्शें ज्यासी । त्रिविध तापांसीं निर्मुक्त ॥७१॥
उदकानें ज्याला शांत केलेले असते, त्याला पुन्हा ताप हा होतोच; परंतु योगी कृपा करून ज्याला स्पर्श करतो, तो त्रिविध तापांतूनही मुक्त होतो ७१.

योगी ज्यासी निववी जिवेंभावें । त्यासी जीवु गेलियाही तापु नव्हे ।
निवालेपणें तो वोल्हावे । स्वानुभवें डुल्लत ॥७२॥
योगी ज्याला जिवाभावानें निववितो, त्याला जीव गेला तरी पुन्हा ताप म्हणून होत नाही. तो त्या निवालेपणानेंच भिजून जाऊन स्वानुभवानें डुलत राहतो ७२.

मेघमुखें अधःपतन । उदकाचें देखोनि जाण ।
अधःपाते निवती जन । अन्नदान सकळांसी ॥७३॥
मेघाच्या मुखांतून उदकाचे अधःपतन होते. आणि त्या त्याच्या खालती येण्यानेंच सारे लोक शांत होऊन, त्यांना अन्नदानही मिळतें ७३.

तैसें योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ॥७४॥
त्याप्रमाणें योग्याचे खालती येणे म्हणजे या लोकांत जन्म घेणे असते, ते एवढ्याचकरतां की, श्रवणकीर्तनानें लोक तृप्त करावेत, आणि आत्मज्ञानानें त्यांचा उद्धार करावा ७४.

पर्जन्योदक देखतां जाण । जेवीं निवती सकळही जन ।
कां गंगादिकांचें दर्शन । करी मोचन पापाचें ॥७५॥
पर्जन्याचे उदक पाहतांच, ज्याप्रमाणें सर्व लोक आनंदयुक्त होतात, किंवा गंगादिकांच्या दर्शनानें जसें पातकाचे क्षालन होते ७५,

तैसें योगियाचें दर्शन । भाग्येंवीण नव्हे जाण ।
ज्याने देखिले त्याचे चरण । करी मोचन भवरोगा ॥७६॥
त्याप्रमाणें योग्याचे दर्शनही भाग्याशिवाय होत नाही. त्याच्या चरणाचें जो दर्शन घेतो, तो भवरोगापासून मुक्त होतो ७६.

न घडे दर्शन स्पर्शन । तरी करावें त्याचें नामस्मरण ।
इतुकेनि भवमूळ जाण । करी छेदन तें नाम ॥७७॥
त्याचे दर्शन किंवा स्पर्शन न घडेल, तर त्याचे नामस्मरण करावें. म्हणजे तेवढ्यानेंही तें नाम संसाराचें मूळ छेदून टाकील ७७.

सांडूनि भगवंताचें कीर्तन । केल्या भक्ताचें नामस्मरण ।
केवीं तुटेल भवबंधन । ऐसें न म्हणा सर्वथा ॥७८॥
भगवंताचे कीर्तन करावयाचे सोडून देऊन भक्ताचे नामस्मरण केल्यानें संसारबंधन कसें तुटेल ? असें मात्र कधीच म्हणू नको ७७.

देवासी पूर्वी नामचि नाहीं । त्यासी भक्तीं प्रतिष्ठूनि पाहीं ।
नामरूपादि सर्वही । नानाविलासही अर्पिले ॥७९॥
खरें म्हटले तर देवाला मुळी नामच नाही. भक्तांनी त्याची प्रतिष्ठा करून नामरूपादि सारे विलास त्याला अर्पण केले आहेत ७९,

ऐसा भक्तीं देव थोर केला । आणूनि वैकुंठीं बैसविला ।
भक्तउकपकारें दाटला । मग त्याच्या बोलामाजीं वर्ते ॥४८०॥
अशी भक्तांनींच देवाची प्रतिष्ठा वाढविली, आणि वैकुंठांत आणून त्याला बसविले. असा भक्ताच्या उपकारानें तो वांकून गेल्यामुळेच त्याच्या आज्ञेत वागतो ४८०.

देवो भक्तवचनेंकरी । झाला नर ना केसरी ।
प्रगटला खांबामाझारीं । शब्द करी भक्ताचा ॥८१॥
देव भक्ताच्या वचनाप्रमाणें धड नर नव्हे व धड सिंहही नव्हे, असे स्वरूप धारण करून खांबामध्यें प्रगट झाला, आणि त्यानें भक्ताचा शब्द खरा केला ८१.

आतांही प्रत्यक्ष प्रमाण । दासांचेनि वचनें जाण ।
पाषाणप्रतिमे देवो आपण । आनंदघन प्रगटे पैं ॥८२॥
आतांसुद्धा प्रत्यक्ष प्रमाण आहेच, की तो ज्ञानानंदघन देव आपल्या दासांच्या वचनासाठी पाषाणाच्या प्रतिमेतही प्रगट होतो ८२.

भक्तभावें आभारला । देवो उपकारें दाटला ।
यालागीं नुलंघवे बोला । पांगें पांगला भक्तांच्या ॥८३॥
भक्तांच्या भावाचे देवावर ओझे होऊन त्या उपकारानें तो वांकून जातो. म्हणून भक्तांचे वचन त्याला मोडवत नाहीं; भक्ताच्या पांगेमुळें देव पांगला होतो ८३.

एवं जेथ भक्तांचें नाम घेणें । तेथ अवश्य देवें धांवणें ।
भक्तउेपकारा उत्तीर्ण होणें । वेगें पावणें यालागीं ॥८४॥
म्हणून भक्तांचें नांव जेथे घेतले जाते, तेथे देवाला अवश्य धावून जावे लागते. भक्ताच्या उपकाराचे उतराई होण्याकरतां त्याला त्वरित पावावें लागतें, ८४.

यालागीं भक्ताचें नाम घेतां । तुटती भवबंधनव्यथा ।
ऐसें सांगतां अवधूता । प्रेम सर्वथा न संडे ॥८५॥
म्हणून भक्तांचे नाम घेतले तरीसुद्धा संसारबंधनव्यथा नाहीशी होऊन जाते. असे सांगतांना अवधूताचेही प्रेम अनावर झाले ८५.

आतां अग्नि गुरु जो करणें । त्याचीं सांगेन लक्षणें ।
काना मना एक करणें । सावधपणें परियेसीं ॥८६॥
ह्यानंतरचा गुरु अग्नि आहे. त्याचीही लक्षणे सांगतो. ती कानाला आणि मनाला एक करून अगदी सावधपणानें ऐक (असें अवधूत म्हणाला) ८६.

तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धर्षोदरभाजनः ।
सर्वभक्ष्योऽपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत् ॥ ४५ ॥
[श्लोक ४५] दुसर्‍या तेजाने पराभूत न होणारा, सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काहीही खाऊनसुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा, तपश्चर्येने देदीप्यमान, मनइंद्रियांकडून पराभूत न होणारा, संग्रह न करणारा साधक सर्व विषयांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिये यांना त्यांचा दोष लागू देत नाही. (४५)

अग्नि निजतेजें देदीप्यमान । साक्षात हातीं न धरवे जाण ।
उदरमात्रीं सांठवण । सर्व भक्षण निजतेजें ॥८७॥
अग्नि आपल्या स्वयंभू तेजानेंच देदीप्यमान असतो. त्याला प्रत्यक्ष हातात धरवत नाही; पण तोच अग्नि प्रत्येकाच्या पोटांत साठलेला असून तो आपल्या तेजानें सारें भक्षण करून टाकतो ८७.

तैसाचि योगियाही जाण । भगवद्‌भावें देदीप्यमान ।
त्यासी धरावया आंगवण । नव्हे जाण सुरनरां ॥८८॥
त्याचप्रमाणें योगीही भगवद्‌भावानें देदीप्यमान असल्यामुळे, देवादिकांनासुद्धा त्याला धरण्याचे सामर्थ्य नसते ८८.

हातीं न धरवे खदिरांगारु । तैसा योगिया अतिदुर्धरु ।
तयासी न शके आवरूं । मायाव्यवहारु गुणेंसीं ॥८९॥
खैराचे निखारे जसे हातांत धरवत नाहीत, त्याप्रमाणें योगीही धरावयाला अतिशय कठिण आहे. गुणांसहवर्तमान मायेचा व्यवहारसुद्धा त्याला आवरण्याला समर्थ नाहीं ८९.

अग्नीसी जेवीं मुखचि पात्र । तैसें योगियासी उदर मात्र ।
ठेवा ठेवणें विचित्र । नाहीं पात्र गांठीसी ॥४९०॥
अग्नीला ज्याप्रमाणें मुख हेच एक पात्र असते, त्याप्रमाणें योग्याचे पात्र म्हणजे एक उदर मात्र असते. काही विशिष्ट ठेवा ठेवणे झाल्यास त्याच्या संग्रहीं दुसरे पात्रच नसते ४९०.

अग्नीनें जें जें सेवणें । तें जाळूनि आपुल्याऐसें करणें ।
यापरी सर्व भक्षणें । नाहीं स्पर्शणें मळासी ॥९१॥
अग्नि जें जें सेवन करतो, त्याला जाळून आपल्यासारखेच करून टाकतो. अशाच रीतीनें योगी सारें भक्षण करतो, पण मलिनतेला शिवतही नाहीं ९१.

चंदन सुवासे दुर्गंध धुरे । निंब कडू ऊंस गोडिरे ।
तें जाळूनि आकारविकारें । कीजे वैश्वानरें आपणाऐसीं ॥९२॥
सुगंधी चंदनकाष्ठ असो, की दुर्गंधयुक्त दुसरे लाकूड असो, कडूनिंबाचे लाकूड असो की गोड उसाचे चिपाड असो, त्यांचा आकार विकार सारा जाळून टाकून अग्नि हा त्यांना आपल्यासारखेच करून टाकतो ९२.

तैसा योगी जें अंगीकारी । तें आत्मदृष्टीं निर्धारी ।
दोष दवडूनियां दूरी । मग स्वीकारी निजबोधें ॥९३॥
त्याप्रमाणें योगी ज्या वस्तूचा स्वीकार करतो, तिच्याकडे तो प्रथम आत्मदृष्टीनें पाहतो; त्यांतील दोष बाहेर घालवून मग त्या पदार्थाचा आत्मभावानें स्वीकार करतो ९३.

भोग्य जें भोगूं जाये । तेथ आत्मप्रतीति पाहे ।
भोक्ता तद्रूपचि होये । हा भोगु पाहे योगिया ॥९४॥
जे भोग्य तो भोगावयाला जातो, तेथें तो आत्मप्रतीति पाहतो, त्यामुळें भोक्ताही तद्‌रूपच होऊन जातो. हाच योग्याचा भोग होय ९४.

अग्नींत पडिलें जें समळ । तें अग्निमुखें होय निर्मळ ।
योगिया जें सेवी अळुमाळ । परम मंगळ तें होय ॥९५॥
अग्नींत जी मळकी वस्तु पडते, ती अग्निमुखानें निर्मळच होऊन जाते. त्याप्रमाणें योगी जे काही अल्पस्वल्प सेवन करतो, तें परमपवित्रच होऊन जातें ९५.

अग्निमुखीं यागु घडे । तेणें अदृष्टें स्वर्ग जोडे ।
योगियाचे मुखीं जें पडे । तेणें जोडे निजपद ॥९६॥
अग्नीच्या मुखानें यज्ञ घडतो आणि त्या कर्मानें स्वर्ग प्राप्त होतो. पण योग्याच्या मुखांत जे पडते, त्यानें आत्मपदच प्राप्त होते ९६.

आणिक अग्नीचें चिन्ह । ऐक राया सावधान ।
तेंचि साधकासी साधन । सिद्ध लक्षण सिद्धाचें ॥९७॥
राजा ! अग्नीचे आणखीही एक लक्षण आहे. तेही लक्ष देऊन श्रवण कर. तेच साधकाचे साधन व सिद्धाचे लक्षण होय ९७.

क्वचिच्छन्नः क्वचित्स्पष्ट उपास्यः श्रेय इच्छताम् ।
भुङ्क्ते सर्वत्र दातृणां दहन्प्रागुत्तराशुभम् ॥ ४६ ॥
[श्लोक ४६] अग्नी लाकडात गुप्त असतो पण कल्याणेच्छू याजकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो सर्वांकडून हविर्द्रव्य घेऊन त्यांचे भूतभविष्यांतील पाप नाहीसे करतो त्याचप्रमाणे सिद्धपुरूष बहुधा एकांतात, अप्रगट असतो, पण मुमुक्षूंसाठी त्यांच्याजवळ राहातो शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर पाप धुऊन टाकतो. (४६)

भीतरीं तेजस्वी वरी झांकिला । होमकुंडीं अग्नि पुरिला ।
कां यज्ञशाळे प्रज्वळला । याज्ञिकीं केला महायागु ॥९८॥
होमकुंडामध्यें पुरलेला अग्नि आंत तेजस्वी असून वरून भस्मानें झांकलेला असतो. किंवा यज्ञशाळेमध्यें त्याला प्रज्वलित करून याज्ञिक लोक मोठा यज्ञही करतात ९८.

जो जो उपासका भावो जीवीं । त्या त्या श्रेयातें उपजवीं ।
पूर्वोत्तर अशुचित्वें आघवीं । जाळूनि हवी सेवितु ॥९९॥
उपासकाच्या मनांत जी जी भावना असते, ते ते श्रेय अग्नि त्याला उत्पन्न करून देतो; आणि पूर्वोत्तर सर्व पातकें जाळून टाकून हवि ग्रहण करतो ९९.

तैशीचि योगियाची लीळा । भाविकां प्रकट दिसे डोळां ।
एकां गुप्तचि होऊनि ठेला । न दिसे पाहिला सर्वथा ॥५००॥
तशीच योग्याची लीलाही भाविकांच्या नेत्रांना प्रकट दिसते. एकाद्यापासून तो अगदी गुप्तच होऊन असतो; पाहूं गेलें तर मुळीच दृष्टीस पडत नाहीं ५००.

ऐशियाच्याही ठायीं । भावबळ भाविक पाहीं ।
अर्पिती जें जें कांहीं । तेणें मोक्ष पाहीं मुमुक्षां ॥१॥
अशाच्या ठिकाणी भाविक लोक भक्तीच्या बळानें जें जें काही अर्पण करतात, त्यानें मुमुक्षूंना मोक्ष प्राप्त होतो १.

तें पडतांचि योगियांच्या मुखीं । संचित क्रियमाणें असकीं ।
जाळोनियां एकाएकीं । करी सुखी निजपदीं ॥२॥
ते योग्याच्या मुखी पडतांच सारी संचितक्रियमाणें एकदम जाळून टाकून त्याला आत्मपद देऊन सुखी करून सोडतो २.

आणीकही अग्नीचें लक्षण । राया तुज मी सांगेन जाण ।
जेणें सगुण आणि निर्गुण । दिसे समान समसाम्यें ॥३॥
हे राजा ! ज्याच्या योगानें सगुण आणि निर्गुण साम्यभावानें एकरूप दिसतात, असे अग्नीचे आणखी एक लक्षण तुला सांगतों ३.

स्वमायया सृष्टमिदं सदसल्लक्षणं विभुः ।
प्रविष्ट ईयते तत्तत् स्वरूपोऽग्निरिवैधसि ॥ ४७ ॥
[श्लोक ४७]- अग्नीला विशिष्ट आकार नसतो, पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसा तसा दिसतो त्याप्रमाणे सर्वव्यापक आत्मासुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारणरूप जगात प्रवेश केल्यामुळे त्या त्या वस्तूंचा नामरूपासारखा भासतो. (अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, इंदियसंयम, उपास्यता, उपाधीशी असंबद्धता इत्यादी गुण घ्यावेत). (४७)

अग्नि सहजें निराकार । त्यासी काष्ठानुरूपें आकार ।
दीर्घ चक्र वर्तुल थोर । नानाकार भासतु ॥४॥
स्वभावतः अग्नि हा निराकारच आहे. लाकडे जशी लांबट, वांकडी, वाटोळी, थोर किंवा लहान आकारांची असतील, त्या त्या आकाराचा तो भासतो ४.

तैसीचि भगवंताची भगवद्ग।ती । स्वमायाकल्पित कल्पनाकृती ।
तेथ प्रवेशला सहज स्थितीं । बहुधा व्यक्ती तो भासे ॥५॥
भगवत्स्वरूपाची गतिही तशीच आहे. स्वमायेच्या कल्पनेनेंच आकृति निर्माण करून तींत तो सहजस्थितीनें शिरलेला असल्यामुळे, अनेक स्वरूपांनी भासतो ५.

जैसें गंगेचें एक जळ । भासे भंवरे लहरी कल्लोळ ।
तैसा जगदाकारें अखिल । भासे सकळ जगदात्मा ॥६॥
ज्याप्रमाणें गंगेचे एकच उदक असले तरी भोवरे, लाटा, लोंढे इत्यादि निरनिराळ्या स्वरूपांनी भासमान होते, त्याप्रमाणें अखिल विश्वाच्या आकारानें सारा विश्वात्माच भासमान होतो ६.

कां छायामंडपींच्या चित्रासी । दीप प्रभा भासे जैसी ।
राम रावण या नांवेंसी । दावी जगासी नटनाट्य ॥७॥
किंवा छाया मंडपाची चित्रे दिव्याच्या प्रकाशाचीच बनलेली असतात. राम, रावण इत्यादि लोकांना पडद्यावर नाट्य करून दाखवितात ७.

तैशा नानाविधा व्यक्ती । नाना मतें नानाकृती ।
तेथ प्रवेशोनि श्रीपती । सहजस्थितीं नाचवी ॥८॥
त्याप्रमाणें नानाप्रकारचे प्राणी, नाना मते, नाना आकृति दृष्टीस पडतात, त्या सर्वांमध्यें श्रीहरिच प्रवेश करून सहजस्थितीनें त्यांना नाचवितो ८.

तैशी योगियाची स्थिती । पाहता नानाकार व्यक्ती ।
आपणियातें देखे समवृत्ती । भेदभ्रांति त्या नाहीं ॥९॥
योग्याची स्थिति अशीच असते. नानाप्रकारचे आकार व व्यक्ति दृष्टीस पडल्या तरी त्या सर्वांच्या ठिकाणी समदृष्टीनें तो आपणालाच पाहात असल्यामुळें त्याला भेदाची भ्रांति नसते ९.

तेथ जें जें कांहीं पाहे । तें तें आपणचि आहे ।
या उपपत्ती उभवूनि बाहे । सांगताहे अवधूतु ॥५१०॥
तिकडे तो जें जें कांहीं पाहतो, तें तें तो स्वतःच असतो. अशी मीमांसा अवधूतानें बाहु उभारून सांगितली १०.

या देहासी जन्म नाशु । आत्मा नित्य अविनाशु ।
हा दृढ केला विश्वासु । गुरु हिमांशु करूनि ॥११॥
जन्म आणि मृत्यु ह्या देहालाच आहे; आत्मा हा नित्य असून अविनाशी आहे. हा निश्चय मी चंद्राला गुरु करून दृढतर करून घेतला ११.

विसर्गाद्याः श्मशानान्ता भावा देहस्य नात्मनः ।
कलानामिव चन्द्रस्य कालेनाव्यक्तवर्त्मना ॥ ४८ ॥
[श्लोक ४८]- काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमीजास्त होतात तरीसुद्धा चंद्र हा चंद्रच असतो त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात, आत्म्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. (चंद्रापासून हा गुण घ्यावा – देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही). (४८)

शुक्लकृष्णपक्षपाडी । चंद्रकळांची वाढीमोडी ।
ते निजचंद्रीं नाहीं वोढी । तैशी रोकडी योगियां ॥१२॥
शुक्लपक्षाच्या आणि कृष्णपक्षाच्या योगानें चंद्राच्या कला वाढतात व कमी होतात पण मूळ चंद्राला कांहीं वृद्धि क्षय नसतो. तशीच स्थिति खरोखर योग्याची असते १२.

जन्मनाशादि षड्‌विकार । हे देहासीच साचार ।
आत्मा अविनाशी निर्विकार । अनंत अपार स्वरूपत्वें ॥१३॥
जन्म, मृत्यु इत्यादि जे सहा विकार आहेत, ते खरोखर देहालाच आहेत. आत्मा स्वरूपतः अविनाशी, निर्विकार, अनंत आणि अमर असाच आहे १३.

घटु स्वभावें नाशवंतु असे । त्यामाजीं चंद्रमा बिंबलासे ।
नश्वरीं अनश्वर दिसे । विकारदोषें लिंपेना ॥१४॥
घट हा स्वभावतःच नाशवंत असतो, पण त्यामध्यें चंद्राचे प्रतिबिंब पडते. त्याप्रमाणेच अशाश्वतामध्यें शाश्वत दिसते, पण त्याला नश्वराचे विकार कधींच लागत नाहींत १४.

घटासवें चंद्रासी उत्पत्ती । नाहीं नाशासवें नाशप्राप्ती ।
चंद्रमा आपुले सहजस्थितीं । नाशउ त्पत्तिरहितु ॥१५॥
घटाबरोबर काही चंद्र उत्पन्न होत नाही; किंवा घटाच्या नाशाबरोवर चंद्राचा नाश होत नाही. तर चंद्र हा आपल्या सहजस्थितीप्रमाणें नाश व उत्पत्तिरहितच असतो १५.

तैसा योगिया निजरूपपणें । देहासवें नाहीं होणें ।
देह निमाल्या नाहीं निमणें । अखंडपणें परिपूर्ण ॥१६॥
त्याप्रमाणें योगी हा आत्मस्वरूप असल्यानें देहाबरोबर जन्मास येत नाही, किंवा देहाच्या नाशाबरोबर त्याचा नाश होत नाही. तो अखंड स्वरूपानें परिपूर्णच असतो १६.

काळाची अलक्ष्य गती । दाखवी नाश आणि उत्पत्ति ।
ते काळसत्ता देहाप्रती । आत्मस्थिती नातळे ॥१७॥
काळाची गति मोठी गहन आहे. तिच्यामुळेच नाश आणि उत्पत्ति झालेली दृष्टीस पडते. पण ती काळाची सत्ता देहावर आहे. आत्मस्थितीला ती मुळीच लागू नाहीं १७.

एवं काळाचें बळ गाढें । म्हणती ते देहाचिपुढें ।
पाहतां आत्मस्थितीकडे । काळ बापुडें तेथ नाहीं ॥१८॥
तात्पर्य काळाचे सामर्थ्य मोठे अगाध आहे म्हणतात, पण ते देहाच्यापुढेच. आत्मस्थितीकडे पाहिले तर, बिचारा काळ तेथें नाहींच १८.

सूक्ष्म काळगती सांगतां । वेगें आठवलें अवधूता ।
सिंहावलोकनें मागुता । अग्निदृष्टांता सांगतु ॥१९॥
काळाची सूक्ष्म गति सांगतांना अवधूताला अकस्मात् आठवण झाली. आणि त्यानें सिंहावलोकन करून अग्नीचा दृष्टांत पुन्हा सांगितला १९.

कालेन ह्योघवेगेन भूतानां प्रभवाप्ययौ ।
नित्यावपि न दृश्येते आत्मनोऽग्नेर्यथार्चिषाम् ॥ ४९ ॥
[श्लोक ४९] – आगीच्या ज्वाळा किंवा दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला उत्पन्न आणि नष्ट होत राहाते, परंतु कळत नाही; तसेच वेगवान काळामुळे प्राण्यांच्या शरीराची क्षणाक्षणाला उत्पत्ती आणि विनाश होत असतो, परंतु तो लक्षात येत नाही. (अग्नीची ज्वाळा किंवा दिव्याच्या ज्योतीपासून प्रकृतीचे विनाशित्त्व जाणावे अग्नीसंबंधीचा हा आणखी एक गुण). (४९)

काळनदीचा महावेगु । सूक्ष्मगती वाहतां वोघू ।
तेथ भूततरंगा जन्मभंगु । देखतांचि जगु न देखे ॥५२०॥
त्या काळनदीचा वेग अत्यंत प्रचंड आहे. तिचा ओघ अत्यंत सूक्ष्म गतीनें वहात असतो; त्यांत प्राणिरूप तरंग उठतात व मोडतात, पण हे जगाला दिसून दिसत नाहीं ५२०.

जराजर्जरित जाण । वाहतां नदीमाजीं वोसण ।
षड्‌विकार तेचि परिपूर्ण । भंवरे दारुण भंवताति ॥२१॥
ह्या नदीमध्यें जरेनें जर्जर झालेला लोकरूपी कचरा तरंगत असतो आणि षड्विकाररूप महाभयंकर भोवरे गरगर फिरत असतात २१.

बाल्य-तारुण्यांचें खळाळ । वार्धक्याचें मंद जळ ।
जन्ममरणांचे उसाळ । अतिकल्लोळ उठती ॥२२॥
बाल्य तारुण्य यांचे खळाळ चालू असतात. वार्धक्याचे जळ मंदमंद वहात असते. आणि जन्ममरणांचे लोंढे उसळून कल्लोळ करीत असतात २२.

वोघवेगाच्या कडाडी । पडत आयुष्याची दरडी ।
स्वर्गादि देउळें मोडी । शिखरींचे पाडी सुरेंद्र ॥२३॥
प्रवाहाच्या धारेच्या तडाक्यानें आयुष्याच्या दरडी कोसळतात. स्वर्गादिक देवळे मोडून टाकून शिखरावर असलेल्या इंद्रांनाहीं तो प्रवाहवेग खाली पाडतो २३.

तळीं रिचावितां घोगें । पाताळादि विवरें वेगें ।
नाशूनियां पन्नगें । अंगभंगें अडिमोडी करी ॥२४॥
हाच प्रवाहाचा लोंढा घोघावत पाताळद्वारें खाली घुसला म्हणजे सर्पांचा फडशा उडवन त्यांची हाडे अगदी चूर करून सोडतो २४.

ऐशिया जी काळवोघासीं । घडामोडी भूततरंगांसी ।
होतसे अहर्निशीं । तें कोणासी लक्षेना ॥२५॥
अशा काळाच्या ओघामध्यें भूततरंगाची घडामोड रात्रंदिवस चालू असते. परंतु चमत्कार हा की, ती कोणाच्या लक्षात येत नाहीं २५,

जैं महाप्रळयीं मेघु गडाडी । तैं पूर चढे कडाडी ।
ब्रह्मादिक तरुवर उपडी । समूळ सशेंडी वाहविले ॥२६॥
जेव्हां महाप्रळयाच्या वेळी प्रळयमेघांचा गडगडाट होतो, तेव्हां अनिवार पूर येतो आणि त्यामध्यें ब्रह्मदेवादिक मोठमोठे वृक्ष उपटून पडून भरारा शेंड्याबुडख्यासकट वाहून जातात ! २६.

जैं आत्यंतिक पूरु चढे । तैं वैकुंठ कैलासही बुडे ।
तेथ काळा रिगू न घडे । हें अवचट घडे एकदां ॥२७॥
ह्या पुराचा अतिरेक झाला म्हणजे वैकुंठ आणि कैलाससुद्धा बुडून जातात. तेथे काळाचासुद्धा रिघाव होत नाही. असें एकदम एकाएकी घडतें २७.

अनिवार काळनदीची गती । सूक्ष्म लक्षेना निश्चितीं ।
ते सूक्ष्मगतीची स्थिती । अतिनिगुतीं परियेसीं ॥२८॥
ही काळरूप नदीची गति मोठी अनिवार आहे. ती अत्यंत सूक्ष्म असल्यामुळें तिचे निश्रित स्वरूप लक्षात येत नाही. त्या सूक्ष्म गतीची खरी खरी स्थिति आतां ऐकून घे २८.

दीपू तोचि तो हा म्हणती । परी शिखा क्षणक्षणा जाती ।
ते लक्षेना सूक्ष्मगती । अंतीं म्हणती विझाला ॥२९॥
मघांचा दिवा तोच हा असें म्हणतात. परंतु त्याची ज्योत क्षणोक्षणी एकएक लयास जाऊन दुसरी उत्पन्न होत असते. परंतु हा सूक्ष्म प्रकार लोकांच्या लक्षात येत नाही, आणि शेवटी तो दिवा विझला असे म्हणतात २९.

प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ । ते काळींचे म्हणती बरळ ।
तैशी काळगती अकळ । लोक सकळ नेणती ॥५३०॥
किंवा नदीचे पाणी प्रत्यक्ष वहात असते, तेही प्रतिक्षणी नवें नवेंच येत असते, परंतु अडाणी लोक तें वाहणारे पाणी पहिलेच म्हणजे मघांचेंच, कालचेंच म्हणून समजतात. त्याप्रमाणें काळाची गति अगम्य आहे, सर्व लोकांना ती कळत नाहीं ५३०.

प्रत्यक्ष पाहतां देहासी । काळ वयसेतें ग्रासी ।
बाल्य-कौमार-तारुण्यांसी । निकट काळासी न देखती ॥३१॥
प्रत्यक्ष देहालाच पाहिले तरी काळ हा वयाला ग्रासीतच असतो. बाल्य, कौमार्य, किंवा तारुण्य असतांना काळही जवळच असतो, पण त्याला कोणी पाहात नाहीं ३१.

अलक्ष्य काळाची काळगती । यालागीं गुरु केला गभस्ती ।
त्यापासोनि शिकलों स्थिति । तेही नृपति परियेसीं ॥३२॥
अशी ही काळाची गति अगम्य आहे. म्हणून मी सूर्याला गुरु केले. आता त्याच्यापासून जे मी शिकलों तेही राजा ! ऐकून घे ३२.

गुणैर्गुणानुपादत्ते यथाकालं विमुञ्चति ।
न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपतिः ॥ ५० ॥
[श्लोक ५०]- सूर्य जसा आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला देतो, त्याचप्रमाणे योगी पुरूष इंद्रियांच्याद्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दानसुद्धा करून टाकतो विषयांत तो आसक्त असत नाही. (५०)

सूर्य काळें निजकिरणीं । रसेंसहित शोषी पाणी ।
तोचि वर्षाकाळीं वर्षोनी । निववी जनीं सहस्त्रधा ॥३३॥
सूर्य हा हळुहळू आपल्या किरणांनी ओलाव्यासहित (रसांसहित) पृथ्वीवरील समुद्र वगैरेचे पाणी शोषण करून घेतो. आणि तोच पावसाळ्यांत त्या पाण्याची वृष्टि करून लोकांना अनेक प्रकारे तृप्त करून सोडतो ३३.

सर्व शोषूनि घे किरणीं । तें शोषितें लक्षण नेणे कोणी ।
देतां मेघमुखें वरुषोनी । निववी अवनी जनेंसीं ॥३४॥
परंतु सूर्य आपल्या किरणांनी पाणी शोषण करून घेतो, ह्या शोषकपणाचे लक्षण कोणाला कळत नाही. तरी मेघाच्या द्वारे वृष्टि करून जनासहवर्तमान सारी पृथ्वी गारीगार करून सोडतो ३४.

तैसीचि योगियाची परीं । अल्प ज्याचें अंगीकारी ।
त्याचे मनोरथ पूर्ण करी । सहस्र प्रकारी हितत्वें ॥३५॥
योग्याचा प्रकारही तसाच आहे. तो थोडेसें ज्याचें घेतो त्याचे कल्याण करावे म्हणून, हजार प्रकारांनी त्याचे मनोरथ पूर्ण करतो ३५.

ज्यांचें सेविती योगी आत्माराम । त्यांचे पुरती सकळ काम ।
अंतीं करोनियां निष्काम । विश्रामधाम आणिती ॥३६॥
आत्मानंदांत निमग्न झालेले योगी ज्या लोकांचे काही सेवन करतात, त्यांचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतात. आणि अंती त्यांना ते निष्काम करून विश्रांतिस्थानाला नेतात ३६.

एवं योगी आपुले योगबळें । विषयो सेविती इंद्रियमेळें ।
जे देती त्यांसी यथाकाळें । कृपाबळें निवविती ॥३७॥
अशा प्रकारे योगी आपल्या योगबळानें इंद्रियांच्या द्वारे विषयाचे सेवन करीत असतात. त्यांना जे कोणी काही देतात, त्यांना ते योग्य प्रसंगी कृपाबळानें तृप्त करून सोडतात ३७.

त्यांसी विषयो देतां कां घेतां । आसक्ति नाहीं सर्वथा ।
रसु चोखूनि घेतां देतां । अलिप्त सविता तैसे ते ॥३८॥
त्याला विषय देतांना किंवा घेतांना कधी आसक्ति म्हणून नसतेच. ओलावा शोषण करून घेतांना किंवा परत देतांना सूर्य जसा अलिप्त असतो, त्याप्रमाणेच तेही अलिप्त असतात ३८.

बुध्यते स्वे न भेदेन व्यक्तिस्थ इव तद्गतः ।
लक्ष्यते स्थूलमतिभिरात्मा चावस्थितोऽर्कवत् ॥ ५१ ॥
[श्लोक ५१]-पाण्याच्या निरनिराळ्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित झालेला एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळा झाल्याचे सामान्य बुद्धीच्या माणसाला दिसते, त्याचप्रमाणे उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे, असे वाटते. (सूर्यापासून अनासक्ती व उपाधीमुळे भेदप्रतीती हे गुण घ्यावेत). (५१)

सूर्यो थिल्लरामाजीं बिंबला । मूढ म्हणती थिल्लरीं बुडाला ।
त्याचेनि कंपें कंपु मानिला । डहुळें डहुळला म्हणती तो ॥३९॥
डबक्यामध्यें सूर्याचे प्रतिबिंब पडते. पण मूढ लोक सूर्यच डबक्यामध्यें बुडाला असे म्हणतात. त्यांत पाणी हालले तर सूर्यच हालला असें ते समजतात. आणि ते पाणी गढूळ झाले म्हणजे सूर्यच मळकट झाला असें महणतात ३९.

त्या थिल्लरातें नातळतां । गगनीं अलिप्त जेवीं सविता ।
तैसीच योगियांची योग्यता । देहातीतता देहकर्मीं ॥५४०॥
पण सूर्य त्या डबक्याला स्पर्शही न करतां आकाशामध्यें निर्बाध असतो, त्याप्रमाणेच योग्याची योग्यता देहकर्मांत राहूनही देहातीतच असते ५४०.

त्यासी देहबुद्धीचेनि छंदें । म्हणती योगिया देहीं नांदे ।
त्या देहाचेनि नाना बाधें । स्वबुद्धिभेदें बांधिला म्हणती ॥४१॥
लोक देह बुद्धीच्या छंदानें योगी देहांत नांदत असतो असे म्हणतात. तसेच देहाच्या अनेक प्रकारच्या उपाधींनी तो बांधलेला असतो असेंही ते स्वबुद्धीनुसार म्हणतात. ४१.

त्यासी देहाचें बाधितभान । हें न कळें त्याचें गुह्यज्ञान ।
दोराचेनि सापें जाण । डसोनि कोण मारिला ॥४२॥
त्याला देहाचे बाधित म्हणजे मिथ्याभान असते. (‘सुंभ जळतो पण पीळ जळत नाही’ ह्यांत पीळ कायम असल्याचा जो भास होतो त्याला ‘बाधितभान’ म्हणतात) हे त्या योग्याचें गुह्यज्ञान कोणाला कळत नसते. दोराच्या सापानें दंश करून कधी कोणाला मारले आहे काय ? ४२.

एवं आत्मा तो चिदाकाशीं । मिथ्या देहीं मिथ्यात्वेंसीं ।
बिंबोनि दावी देहकर्मासी । नव्हे तें त्यासी बाधक ॥४३॥
तसें आत्मा चिदाकाशांत असून मिथ्या देहामध्यें मिथ्या रूपानेंच प्रतिबिंबित होऊन देहकर्माला दाखवितो, म्हणून ते कर्म त्याला बाधक होत नाही. ४३.

देखे आपणातें जळीं बिंबला । परी न म्हणे मी जळीं बुडाला ।
तैसा देहातीतु बोधु झाला । नाहीं भ्याला देहकर्मा ॥४४॥
आपले प्रतिबिंब जळामध्यें पाहातो, पण मी जळांत बुडालों असे तो म्हणत नाही; त्याप्रमाणें आपण देहापासून भिन्न आहों, असें ज्याला पक्के ज्ञान झालें, तो देहकर्माला भीत नाही. ४४.

देखोनि मृगजळाचा पूरु । मूर्ख करूं धांवती तारूं ।
तैसा मिथ्या हा संसारु । भयंकरु मूर्खासी ॥४५॥
मृगजळाचा पूर पाहून जो तारूं बांधायला धांवाधांव करतो तो मूर्ख होय. त्याप्रमाणें संसार हा मुळी मिथ्याच आहे. तो मूर्खाला भयंकर वाटतो ४५.

यालागीं दारागृहपुत्रप्राप्ती । तेथ न करावी अतिप्रीती ।
येचिविषयीं रायाप्रती । कथा कपोती सांगतु ॥४६॥
म्हणून घरदार, बायकामुले, वतनवाडी ह्यांवर अत्यंत प्रेम असें करूच नये. याकरतांच राजाला अवधूत कपोतपक्ष्याची कथा सांगू लागले. ४६.

नातिस्नेहः प्रसङ्गो वा कर्तव्यः क्वापि केनचित् ।
कुर्वन्विन्देत सन्तापं कपोत इव दीनधीः ॥ ५२ ॥
[श्लोक ५२]-कधीही, कोणाशीही, अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये अन्यथा अशा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात. (५२)

संसारदुःखाचें मूळ । स्त्रीआसक्तीच जाण केवळ ।
स्त्रीलोभाचें जेथ प्रबळ बळ । दुःख सकळ त्यापासीं ॥४७॥
संसारदुःखाचें मूळ केवळ एक स्त्रीची आसक्ति. स्त्रीलंपटपणाचा जोर जेथें अधिक असतो, त्याच्याचपाशीं सारे दुःख असते ४७.

स्त्रीपासाव झाले पुत्र । त्याचे ठायीं स्नेह विचित्र ।
करितां दुःखासी पात्र । संसारी नर होताति ॥४८॥
स्त्रियेपासून पुत्र होतात व त्यांच्यावर विलक्षण ममता जडते. त्यामुळें प्रापंचिक लोक दुःखास पात्र होतात ४८.

आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव दुःख विचित्र ।
पदोपदीं भोगिती नर । अस्वतंत्र होऊनि ॥४९॥
आसक्ति आणि मोहजाळ ह्या दोहोंपासूनच मनुष्य पराधीन होऊन पदोपदी विलक्षण दुःख भोगीत असतात ४९.

यालागीं भलतेनि भलते ठायीं । आसक्ति स्नेहो न करावा पाहीं ।
अतिस्नेहो मांडिजे जिंहीं । दुःख तिंही भोगिजे ॥५५०॥
याकरतां कोणीही कोणाच्याच ठिकाणी आसक्ति किंवा स्नेह असा ठेवूच नये. ज्यांनी अतिस्नेह केला त्यांनी दुःख हे भोगलेंच पाहिजे ५५०.

स्नेहदुःखाची वार्ता । कपोता-कपोतीची कथा ।
तुज सांगेन नृपनाथा । स्वस्थचित्ता परियेसीं ॥५१॥
हे राजेश्वरा ! स्नेहाचा आणि दुःखाचा परिणाम कळावा म्हणून तुला एक कपोत-कपोतीची कथा सांगतों, ती स्वस्थचित्तानें श्रवण कर ५१.

कपोतः कश्चनारण्ये कृतनीडो वनस्पतौ ।
कपोत्या भार्यया सार्धमुवास कतिचित्समाः ॥ ५३ ॥
[श्लोक ५३] -एका जंगलात एक कपोत झाडावर आपले घरटे बांधून त्यात मादीसह काही वर्षेपर्यंत राहात होता. (५३)

कपोतीचें स्नेह गोड । धरोनी स्त्रीसुखाची चाड ।
वनीं वृक्ष पाहोनियां गूढ । करी नीड कपोता ॥५२॥
एका वनामध्यें एक कपोतपक्षी (पारवा अथवा कवडा) रहात होता. तो कपोतीच्या प्रेमाला अतिशय लुब्ध झाला. त्यानें स्त्रीसुखाच्या लालसेनें एक अवघडसें झाड पाहून त्याच्यावर घरटे बांधले ५२.

तेणें वनचरें वनस्थळीं । नीडामाजीं स्त्रीमेळीं ।
वासु केला बहुकाळीं । भार्ये जवळी भूलला ॥५३॥
वनांत विहार करणाऱ्या त्या कपोतानें स्त्रीला भुलून वनामध्यें त्या घरट्यांत आपल्या स्त्रीच्या संगतीत पुष्कळ काळ घालविला ५३.

कपोतौ स्नेहगुणित हृदयौ गृहधर्मिणौ ।
दृष्टिं दृष्ट्याङ्गमङ्गेन बुद्धिं बुद्ध्या बबन्धतुः ॥ ५४ ॥
[श्लोक ५४.] त्यांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमी स्नेह वाढत होता ते दांपत्यधर्मानुसार एकमेकांच्या दृष्टीने दृष्टीला, अंगाने अंगाला आणि बुद्धीने बुद्धीला जखडून टाकत होते. (५४)

कपोता आणि कपोती । परस्परें दोघां अतिप्रीती ।
स्नेहो वाढलासे चित्तीं । हृदयीं आसक्ती नीच नवी ॥५४॥
कपोता आणि कपोती ह्या परस्परांमध्यें अत्यंत प्रेम होते. त्यांच्या मनांतील ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले. हृदयामध्यें नित्य नवी आसक्ति उत्पन्न होऊ लागली ५४.

हावभाव विलासस्थिती । येरेयेरांकडे पाहती ।
परस्परें कुरवाळिती । वोठंगिती येरयेरां ॥५५॥
त्यांनी कामुक इच्छेनें एकमेकांकडे पाहावेंः नानाप्रकारचे विलास करावे; परस्परांस कुरवाळून एकमेकांच्या गळ्यांत गळा घालावा ५५.

येरयेरां वेगळें होणें । नाहीं जीवें अथवा मनें ।
दोघें वर्तती एकें प्राणें । खाणें जेवणें एकत्र ॥५६॥
जिवानें किंवा मनानेंहीं एकमेकांपासून कधी वेगळे होऊ नये; एकजीव होऊन दोघांनी वागावें; खाणेपिणे सारे एके ठिकाणी असें चालले ५६.

शय्यासनाटनस्थान वार्ताक्रीडाशनादिकम् ।
मिथुनीभूय विश्रब्धौ चेरतुर्वनराजिषु ॥ ५५ ॥
[श्लोक ५५]-त्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते की, ते निःशंकपणे त्या वनराईत बरोबरीने निजत, बसत, हिंडतफिरत, थांबत, गोष्टी करीत, खेळत आणि खातपीत होते. (५५)

सेवितां ज्याची अतिगोडी । तें घालिती येरयेरांच्या तोंडीं ।
जीवेंप्राणें शिणोनी जोडी । तें दे आवडीं स्त्रियेसी ॥५७॥
खातांना जे अतिशय गोड लागे, ते त्यांनी एकमेकांच्या तोंडात घालावें, कपोता मोठ्या कष्टानें दमून भागून जे मिळवून आणी, ते मोठ्या आवडीनें स्त्रीला देई ५७.

स्त्रियेसी सांडूनि दुरी । पाऊल न घाली बाहेरी ।
हात धरोनि परस्परीं । आंतबाहेरी हिंडती ॥५८॥
स्त्रीला सोडून तो पाउलही बाहेर टाकीत नसे. एकमेकांचा हात धरून ते आंत बाहेर हिंडत ५८.

सदा एकांतीं बसती । एके स्थानीं दोघें असती ।
दोघें क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदें ॥५९॥
ती सदा एकांतांत बसत; एके ठिकाणींच दोघे असत; दोघे नानाप्रकारच्या क्रीडा करीत; नानाप्रकारचे विहार करीत आणि आनंदानें परोपरीचे खेळ खेळत ५९.

एकांतीं गोड बोली । सासुसासर्यांेचा विकल्पु घाली ।
दिराभावांच्या मोडी चाली । बोलाच्या भुलीं भुलवित ॥५६०॥
बायका ह्या एकांतांत असल्या म्हणजे मोठ्या गोड बोलतात; नवऱ्याच्या मनामध्यें सासूसासऱ्याविषयी विकल्प भरवून देतात; दिरा-भावांच्या चाली मोडून टाकतात आणि गोड गोड भाषणानें नवऱ्याला भुरळ घालतात ५६०.

एके आसनीं बैसती । येरयेरांतें टेंकती ।
एके शय्ये निद्रा करिती । अहोरातीं एकत्र ॥६१॥
असो. ती एकाच आसनावर बसत; एकमेकांना टेंकत; आणि अहोरात्र एकाच शय्येवर निद्रा करीत ६१,

मैथुनसुखाचेनि वैभवें । विश्वासोनि जीवेंभावें ।
हिताहित कांही नाठवे । गृहिणीगौरवें नाचतु ॥६२॥
ह्याप्रमाणें स्त्रीसमागमसुखाच्या ऐश्वर्यावर जीवें-भावें विश्वासून राहिल्यामुळें त्याला हिताहित कांहीच आठवनासे झाले. गृहिणीच्या गौरवांतच तो नाचूं लागला ६२.

खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम ।
नाममात्रें गृहाश्रम । विषयसंभ्रम वनराजीं ॥६३॥
वनोपवनामध्यें दोघांचा समागम होत असे. घरटें हें केवळ नांवालाच होते. विषयविलास सारे वनराजीमध्येंच होत असत ६३.

यं यं वाञ्छति सा राजन् तर्पयन्त्यनुकम्पिता ।
तं तं समनयत्कामं कृच्छ्रेणाप्यजितेन्द्रियः ॥ ५६ ॥
[श्लोक ५६] – हे राजन ! मन ताब्यात नसलेला तो कबुतर त्या कबुतरीला जे काही हवे असेल, ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत असे. तीसुद्धा त्याच्या कामना पूर्ण करीत असे. (५६)

जीवितापरीस समर्थ । जे जे मागे ते ते अर्थ ।
जीवेंप्राणें शिणोनि देत । काममोहित होऊनि ॥६४॥
प्राणापेक्षाही मौल्यवान असे पदार्थ जे जे काही ती मागेल, ते ते तो काममोहित होऊन विवाअधिक कष्ट करून तिला आणून देत असे ६४.

जाणोनि जीवींचे खुणे । न मागतां अर्थ देणें ।
त्याहीवरी जरी त्या मागणें । तरी विकूनि देणें आपणियातें ॥६५॥
मनांतील हेतु ओळखून तिनें न मागतांच वस्तु आणून द्यावयाची; मग मागितल्यानंतर काय विचारावें ? आपल्याला विकूनसुद्धा तिला ते आणून द्यावयाचे ६५.

धर्माची वेळ नाठवणें । दीनावरी दया नेणे ।
कृपा स्त्रियेवरी करणें । जीवेंप्राणें सर्वस्वें ॥६६॥
धर्माची संधि आठवावयाची नाही; गरिबावर दया करावयाचे तर ठाऊकच नाहीं; अगदी जिवाभावानें सर्वतोपरि जी काय कृपा करावयाची, ती एका स्त्रीवर ६६.

बैसली साकरेवरी माशी । मारितांही नुडे जैशी ।
तैसा भोगितां विषयांसी । जरामरणासी नाठवी ॥६७॥
साखरेवर बसलेली माशी मारली तरी उडून जात नाही, त्याप्रमाणें विषयाचा उपभोग घेतांना वृद्धापकाळाची व मृत्यूचीही आठवण राहात नाहीं ६७.

जैशी पूर्वजांची भाक । पाळिती सत्यवादी लोक ।
तैसा स्त्रियेचेंचि सुख । पाळी देख सर्वस्वें ॥६८॥
सत्यवादी लोक ज्याप्रमाणें पूर्वजांनी दिलेले वचन पाळतात, त्याप्रमाणें सर्वोपरी स्त्रीच्या सुखांत (कामी जन) व्यत्यय येऊ देत नाहीत ६८.

जैसी आत्मउिपासकासी । एकात्मता होये त्यासी ।
तैसें स्त्रीवांचोनि दृष्टींसी । जगीं आणिकासी न देखे ॥६९॥
ज्याप्रमाणें आत्मोपासकाची सर्वत्र एकात्मता होते, त्याप्रमाणें जगामध्यें स्त्रीशिवाय त्याला दुसरे कोणी दिसतच नाही. ६९.

कपोती प्रथमं गर्भं गृह्णन्ती काल आगते ।
अण्डानि सुषुवे नीडे स्वपत्युः सन्निधौ सती ॥ ५७ ॥
[श्लोक ५७]- वेळ येताच कबुतरीला पहिल्यांदा गर्भ राहिला. तिने घरट्यात आपली पतीजवळच अंडी घातली. (५७)

आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती ।
जैशी लोभियाचे हातीं । सांपडे अवचितीं धनलोहे ॥५७०॥
आधीच स्त्री आवडती, त्यांत ती गरोदर झाली; मग काय विचारावें ? धनलोभ्याच्या हातांत ज्याप्रमाणें अकस्मात् द्रव्याची पेटी सांपडावी ५७०,

तैसें तिच्या गर्भाचें कोड । अधिकाधिक वाढवी गोड ।
जैसें मदिरा पिऊनि माकड । नाचे तडतड डुल्लतु ॥७१॥
त्याप्रमाणें तिच्या गर्भाचे कौतुक तो अधिकाधिकच करूं लागला. दारू पिऊन माकड जसे तडतडा नाचू लागते व डुलं लागते ७१,

तैसे गर्भाचे सोहळे । सर्वस्वें पुरवी डोहळे ।
तिचे लीळेमाजी खेळे । प्राप्तकाळें प्रसूती ॥७२॥
त्याप्रमाणें तोही गर्भाचे सोहाळे करूं लागला. सर्वोपरीनें तिचे डोहळे त्यानें पुरविले. आणि प्रसूतिकाल येईपर्यंत तिच्याच लीलेमध्यें तो खेळत बसला ७२.

स्वनीडा-आंतौती । जाहली अंडांतें प्रसवती ।
प्रसूतिवाधावा सांगति । ऐकोनि पति उल्हासे ॥७३॥
इतक्यांत आपल्या घरट्यांत प्रसूत होऊन तिनें अंडी घातली. ती प्रसूत झाल्याची वार्ता ऐकून पतीचा हर्ष त्रैलोक्यांत मावेना ७३.

तेषु काले व्यजायन्त रचितावयवा हरेः ।
शक्तिभिर्दुर्विभाव्याभिः कोमलाङ्गतनूरुहाः ॥ ५८ ॥
[ श्लोक ५८]-भगवंतांच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळी ती अंडी फुटली आणि त्यांतून अवयव असणारी पिल्ले बाहेर पडली त्यांचे अंग आणि त्यावरील लव अत्यंत कोमल होती. (५८)

अघटित घटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्मया ।
अवेव अंडामाजीं तया । देवमाया रचियेले ॥७४॥
हरीची माया अघटितघटना करणारी आहे. ती दुर्गम असल्यानें तिची लीला ब्रह्मदेवालासुखां कळत नाही. त्या देवमायेनें त्या अंड्यामध्यें अवयवांची रचना केली ७४.

रसें भरलीं होतीं अंडें । त्यांमाजीं नख पक्ष चांचुवडें ।
उघडिलीं डोळ्यांचीं कवाडें । करी कोडें हरिमाया ॥७५॥
त्या अंड्यांत प्रथम फक्त रस भरलेला होता. त्यांतच हरीच्या मायेनें नखें, पंख, चोंची आणि नेत्रांची द्वारे उघडून चमत्कार करून दाखविला ७५.

अंडे उलोनि आपण । कोंवळी पिलीं निघालीं जाण ।
पितरें दृष्टीं देखोन । जीवेंप्राणें भुललीं ॥७६॥
अंडी आपोआप फुटून कोवळी कोवळी पिलें बाहेर पडली. त्यांना पाहतांच आईबापांचा जीव अगदी भाळून गेला ७६.

प्रजाः पुपुषतुः प्रीतौ दम्पती पुत्रवत्सलौ ।
श्रृण्वन्तौ कूजितं तासां निर्वृतौ कलभाषितैः ॥ ५९ ॥
[श्लोक ५९]–पिलांवर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिल्लांचे पालन पोषण करीत आणि त्यांचे गोड ‘गुटुरगूं’ ऐकून आनंदमग्न होऊन जात. (५९)

अत्यंत कोंवळीं बाळें । दोघें जणें पुत्रवत्सलें ।
शांतविती मंजुळें । अतिस्नेहाळें प्रजांसी ॥७७॥
पिलें अत्यंत कोमल व गोजिरवाणी असल्यामुळें पुत्रवात्सल्यानें मातापिता मंजुळ वाणीनें व स्नेहाळपणे त्यांचे सांत्वन करीत असत ७७.

जे समयीं जैसें लक्षण । तैसें प्रजांचें पोषण ।
अंगें करिताति आपण । दोघें जण मिळोनि ॥७८॥
ज्या वेळी जे करणे योग्य असेल, त्याप्रमाणें ती उभयतां मिळून आपल्या त्या अर्भकांचे जातिनिशी पालन पोषण करीत ७८.

गोड गोजिरे बोल । ऐकोनि दोघां येती डोल ।
धांवोनियां वेळोवेळ । निंबलोण उतरिती ॥७९॥
त्यांचे मंजुळ शब्द ऐकून ती उभयताही आनंदानें डोलू लागत आणि वरचेवर धावत धावत जाऊन, त्यांचे अगदी निंबलोण उतरीत ७९.

तासां पतत्रैः सुस्पर्शैः कूजितैर्मुग्धचेष्टितैः ।
प्रत्युद्गरमैरदीनानां पितरौ मुदमापतुः ॥ ६० ॥
[श्लोक ६०]- ती उत्साही पिल्ले जेव्हा आपल्या सुकुमार पंखांनी आईवडीलांना खेटून बसत, कूजन करीत, सुंदर खोड्या करीत आणि लुटूलुटू करीत आईबाबांकडे चालत येत, तेव्हा मातापित्यांना आनंद होई. (६०)

त्यांचेनि आलिंगनचुंबनें । मृदु मंजुळ कलभाषणें ।
दों पक्षांचेनि स्पर्शनें । दोघे जणें निवताति ॥५८०॥
त्यांना आलिंगन दिल्यानें आणि चुंबन घेतल्याने, त्यांचे ते मधुर, मृदु आणि मंजुळ शब्द ऐकल्यानें त्यांच्या पंखाच्या स्पर्शाने, त्या दोघांना फार आनंद होत असे ५८०.

माता पिता दोघें बैसति । सन्मुख अपत्यें धांवती ।
लोल वक्र विलोकिती । वेगें दाविती येरयेरां ॥८१॥
आईबाप दोघं बसली म्हणजे ती पिले त्यांपुढे धावत आणि आपला लाडकेपणा, वांकडेतिकडे धावून व एकमेकांच्या चोंचीत चोंच घालून एकमेकांना दाखवीत असत ८१.

मग देवोनियां खेवे । दूरी जाती मुग्धभावें ।
तेथूनि घेऊनियां धांवे । वेगें यावें तयांपासीं ॥८२॥
आणि मग आलिंगन देऊन मुकाट्यानें लांब धावून जात, आणि तिकडून धावत धावत लुगुलुगु त्यांच्यापाशी येत ८२.

मायबापांच्या पाखोव्यापासीं । हीनदीनता नाहीं बाळांसी ।
जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी सभाग्यता ॥८३॥
आईबापांच्या पंखाखाली असले म्हणजे पिलांना हीनदीनपणा काही नसतो. असली पिले आपल्या पोटी जन्मास आली म्हणून त्या दोघांना मोठी धन्यता वाटत असे ८३.

लाडिकीं लळेवाडें बाळें । लाडें कोडें पुरविती लळे ।
देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळें येरयेरां ॥८४॥
त्यांची ती लाडकी आणि लळा लागलेली पिले असल्यामुळें त्यांचे लाड, कौतुक व लळे ती मोठ्या आनंदानें पुरवीत असत. त्यांना पाहून त्यांचे नेत्र अगदी तृप्त होत असत. परस्परांवर परस्परांचे मोठे प्रेम असे ! ८४.

ऐसी खेळतां देखोनि बाळें । दोघें धांवती एक वेळे ।
उचलूनियां स्नेहबळें । मुख कोवळें चुंबिती ॥८५॥
अशी ती पिलें खेळू लागली व दोघे एकदम धावू लागली म्हणजे त्या दोघांनीही त्यांना प्रेमानें उचलून त्यांच्या कोवळ्या कोवळ्या मुखांचे चुंबन घ्यावे ८५.

स्नेहानुबद्धहृदयावन्योन्यं विष्णुमायया ।
विमोहितौ दीनधियौ शिशून् पुपुषतुः प्रजाः ॥ ६१ ॥
[श्लोक ६१]-भगवंतांच्या मायेने मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनांत बांधलेली ती दोघे आपल्या लहान पिल्लांच्या पालनपोषणात गुंतून गेलेली असत. (६१)

अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी गा राया ।
अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया । पिलीं पोसावया उद्यत ॥८६॥
हे राजा ! अजन्म्याचीच ती ‘अजा’ (न जन्मणारी) माया; तिनें त्यांना कशी भुरळ घातली पाहा ! हृदयांतील परस्परांवरील प्रेमबंधनानें ती पिलें पोसावयाला अगदी तत्पर असत ८६.

स्त्रीपुत्रांचा मोह गहन । त्यांचें करावया पोषण ।
चिंतातुर अतिदीन । करी भ्रमण अन्नार्थ ॥८७॥
स्त्रीपुत्रांचा मोह फार कठीण आहे. त्यांचे पोषण करण्यासाठी चिंतातुर व अतिदीन होऊन अन्नाकरतां ती सदोदित भ्रमण करीत असत ८७.

एकदा जग्मतुस्तासामन्नार्थं तौ कुटुम्बिनौ ।
परितः कानने तस्मिन्नर्थिनौ चेरतुश्चिरम् ॥ ६२ ॥
[श्लोक ६२]- एके दिवशी ती दोघेही पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेली होती चारा गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली. (६२)

एवं टणकीं जालीं बाळें । कुटुंब थोर थोरावलें ।
अन्न बहुसाल पाहिजे झालें । दोघे विव्हळें गृहधर्मे ॥८८॥
अशा रीतीनें ती पिलें जरा थोर झाली. कुटुंब फार वाढले. भक्ष्य अधिक लागू लागले. तेव्हां प्रपंचाच्या विचारानें ती चिंतेत पडली ८८.

यापरी कुटुंबवत्सलें । पुत्रस्नेहें स्नेहाळें ।
दोघें जणें एके वेळे । अन्न बहुकाळें अर्थिती ॥८९॥
ह्याप्रमाणें कुटुंबवत्सल अशी ती कपोत व कपोती पुत्रप्रेमांत बद्ध झाल्यामुळें दोघंही एकदम बाहेर पडून पुष्कळ वेळ हिंडून भक्ष्य आणू लागली ८९.

सहसा मिळेना अन्न । यालागीं हिंडती वनोपवन ।
बहुसाल श्रमतांही जाण । पूर्ण पोषण मिळेना ॥५९०॥
एकदम एकाच ठिकाणी भक्ष्य मिळणार थोडेंच ? म्हणून ती रानोरान हिंडूं लागली. ती पाहिजे तितका श्रम करीत, परंतु पोटाला पुरेसे भक्ष्य मिळत नसे ५९०.

बहुसाल मेळवूनि चारा । दोघे जणें जाऊं घरा ।
मग आपुल्या लेंकुरां । नाना उपचारां प्रतिपाळूं ॥९१॥
पुष्कळसा चारा मिळवून आपल्या घरट्याकड़े जाऊं आणि मग आपल्या लेकरांना नानाप्रकारचे भक्ष्य देऊन त्यांचा प्रतिपाळ करूं ९१,

ऐसऐआशिया वासना । मेळवावया अन्ना ।
दोघेंजणें नाना स्थानां । वना उपवना हिंडती ॥९२॥
अशा इच्छेनें अन्न मिळविण्याकरतां ती उभयताही निरनिराळ्या जागी, अनेक वनांत व उपवनांत हिंडू लागली ९२.

दृष्ट्वा तान्लुब्धकः कश्चिद्यदृच्छातो वनेचरः ।
जगृहे जालमातत्य चरतः स्वालयान्तिके ॥ ६३ ॥
[श्लोक ६३]- इकडे एक पारधी सहज फिरतफिरत त्या घरट्याजवळ येऊन पोहोचला घरट्याच्या आसपास कबुतरीची पिल्ले दुडुदुडु धावत असल्याचे पाहून, त्याने जाळे टाकून, त्यांना पकडले. (६३)

माता पिता गेलीं दुरी । उडतीं पिलें नीडाभीतरीं ।
क्षुधेनें पीडिलीं भारी । निघालीं बाहेरी अदृष्टें ॥९३॥
अशा प्रकारे एके दिवशी ही आईबाबा दूर गेली असतां पिले घरट्यामध्यें उडत होती. ती क्षुधेनें अतिशय व्याकुळ झाली व दुर्दैवानें बाहेर पडली ९३.

ते वनीं कोणी एक लुब्धक । पक्षिबंधनीं अतिसाधक ।
तेणें ते कपोतबाळक । अदृष्टें देख देखिले ॥९४॥
त्याच अरण्यामध्यें कोणी एक फांसेपारधी पांखरे धरण्याच्या कामांत मोठा तरबेज होता. दैवयोगानें ही कपोताची पिलें त्याच्या दृष्टीस पडली ९४.

तेणें पसरोनियां काळजाळें । पाशीं बांधिलीं तीं बाळें ।
कपोत-कपोतींचे वेळे । राखत केवळें राहिला ॥९५॥
तेव्हां त्यानें आपले काळजाळे पसरून त्या पिलांना त्या जाळ्यात अडकविली. आणि आतां कपोत-कपोती केव्हां येतात म्हणून तो वाट पाहात बसला ९५.

कपोतश्च कपोती च प्रजापोषे सदोत्सुकौ ।
गतौ पोषणमादाय स्वनीडमुपजग्मतुः ॥ ६४ ॥
[श्लोक ६४ ] – पिल्लांचे पोषण करण्यात नेहमीच तत्पर असलेले ते जोडपे चारा घेऊन आपल्या घरट्याजवळ आहे. (६४)

बाळकांच्या अतिप्रीतीं । कपोता आणि कपोती ।
चारा घेऊनि येती । नीडाप्रति लवलाहें ॥९६॥
पिलांच्या अत्यंत मोहामुळें कपोत आणि कपोती चारा घेऊन लौकर लौकर घरट्याकडे आली ९६.

स्त्रीसुखाची आसक्ती । तेचि वाढत्या दुःखाची सूती ।
स्त्रीसंगें दुःखप्राप्ती । सांगों किती अनिवार ॥९७॥
स्त्रीसुखाची आसक्ति हीच वाढत्या दुःखाचे मूळ आहे. स्त्रीच्या संगतीनें केवढे अनिवार दुःख भोगावे लागते ते कोठवर सांगावें ? ९७.

पुरुषासी द्यावया दुःख । स्त्रीसंगूचि आवश्यक ।
पुत्रपौत्रद्वारा देख । नानादुःख भोगवी ॥९८॥
पुरुषाला दुःख द्यावयाला स्त्रीसंगच कारणीभूत आहे. तोच पुत्र, नातू इत्यादि द्वारानें नाहीं नाहीं ती दुःखें भोगावयास लावतो. असो ९८.

कपोती स्वात्मजान्वीक्ष्य बालकान् जालसंवृतान् ।
तानभ्यधावत्क्रोशन्ती क्रोशतो भृशदुःखिता ॥ ६५ ॥
[श्लोक ६५]-कबुतरीने पाहिले की, तिची पिल्ले जाळ्यात अडकून चीची करीत आहेत त्यांना अशा स्थितीत पाहून कबुतरीला अपार दुखः झाले ती रडतरडतच त्यांच्या जवळ धावली. (६५)

तंव काळजाळीं एके वेळें । कपोती बांधली देखे बाळें ।
तोंड घेऊनि पिटी कपाळें । आक्रोशें लोळें दुःखित ॥९९॥
कपोतीनें पाहिले तो तिला दिसले की, एकदम काळाच्या जाळ्यामध्यें आपली पिलें जखडली गेली आहेत. तेव्हां ती तोंडावर मारून घेऊन कपाळ पिटू लागली आणि मोठ्यानें आक्रोश करून दुःखानें गडबडा लोळू लागली ९९.

बाळें चरफडितां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी ।
बाळांसन्मुख धांवे वेळोवेळीं । दुखें तळमळी दुःखित ॥६००॥
जाळ्यामध्यें आपली पिलें तडफडत आहेत, हे पाहून ती मोठमोठ्यानें रडून हाका मारू लागली. ती पुन्हा पुन्हा धावून त्या पिलांसमोर जाई आणि दुःखानें विव्हल होऊन तळमळू लागे ६००

सासकृत्स्नेहगुणिता दीनचित्ताजमायया ।
स्वयं चाबध्यत शिचा बद्धान्पश्यन्त्यपस्मृतिः ॥ ६६ ॥
[श्लोक ६६] – भगवंतांच्या मायेने अत्यंत दुःखी झालेली ती उचंबळणार्‍या स्नेहरज्जूने घट्ट बांधली गेली होती आपली पिल्ले जाळ्यात अडकलेली पाहून भान हरपून ती स्वःतच जाळ्यात जाऊन अडकली. (६६)

दुःख द्यावया भ्रतारासी । आक्रंदें कपोती चालिली कैसी ।
शतगुणें स्नेहो वाढला तिसी । मृतपुत्रांसी देखोनि ॥१॥
आपल्या मृत पुत्रांना पाहून तिचे अंतःकरण शतपट प्रेमानें भरून आले. भ्रताराला दुःख देण्यासाठी ती कपोती कशी इतका विलाप करीत चालली पाहा १.

पुत्रस्नेहें केलें वेडें । गुण आठआतठवूनि रडे ।
हिताहित न देखे पुढें । बळेंचि पडे जाळांतु ॥२॥
पुत्रस्नेहानें तिला अगदी वेडेंच करून सोडले. त्यांचे गुण आठवून ती रडूं लागली, त्यांच्यापुढे तिला आपले हिताहितही दिसेनासे झाले आणि ती आपणहूनच त्या जाळ्यांत जाऊन पडली ! २.

मायामोहें भुलली कैशी । जेथ बांधलें देखे पुत्रासी ।
ते जाळीं घाली आपणासी । मोहें पिशी ते केली ॥३॥
मायामोहामुळें तिला कशी भूल पडली पाहा ! ज्यांत पिलांना बांधलेले दिसत होते, त्याच जाळ्यांत लतिनें आपणासही घालून घेतले ! इतकें मोहानें तिला वेडेपिसें करून सोडले ३.

कपोतः स्वात्मजान्बद्धानात्मनोऽप्यधिकान्प्रियान् ।
भार्यां चात्मसमां दीनो विललापातिदुःखितः ॥ ६७ ॥
[ श्लोक ६७]- कबुतराने प्राणाहूनही अधिक प्रिय असलेली आपली पिल्ले आणि प्राण प्रिय मादीसुद्धा जाळ्यात अडकलेली पाहून तो अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागला. (६७)

अंतरला स्त्रीबाळकीं । कपोता तो एकाएकीं ।
रुदन करी अधोमुखीं । अतिदुःखीं विलपतु ॥४॥
ह्याप्रमाणें बायको मुलांना अंतरून बिचारा कपोत एकटा राहिला. तेव्हां तो खाली तोंड करून रडूं लागला. अत्यंत दुःखानें विलाप करूं लागला ४.

जीवाहोनि प्रिय अधिक । ते निर्जीव देखिले बाळक ।
अनुकूल अनुरूपक । भार्या देख अंतरली ॥५॥
प्राणांहून अत्यंत प्रिय अशी ती आपली बालके निर्जीव झालेली त्यानें पाहिली. आणि अनुकूल व अनुरूप अशी स्त्रीही पण अंतरली ५.

अहो मे पश्यतापायमल्पपुण्यस्य दुर्मतेः ।
अतृप्तस्याकृतार्थस्य गृहस्त्रैवर्गिको हतः ॥ ६८ ॥
[श्लोक ६८]-काय मी कमनशिबी ! माझी बुद्धीच चालेनाशी झाली आहे अरेरे ! या संसारात मी अतृप्त असतानाच व सर्व गोष्टी पुर्‍याहोण्याआधीच माझा धर्म, अर्थ आणि काम याचे मुळ असणारा हा माझा गृहस्थाश्रम नष्ट झाला. (६८)

धर्म अर्थ आणि काम । या तिहींचा आश्रयो गृहाश्रम ।
तो भंगला मी अनाश्रम । अतृप्त काम सांडूनि ॥६॥
तो मनांत म्हणूं लागला की, गृहस्थाश्रम हा धर्म, अर्थ आणि काम ह्या तिहींना मोठा आधार असतो. तो मोडला आणि माझी इच्छा अपुरी असतांच मी अनाश्रमी बनलों ६.

पूर्वपापाचा आवर्तु । मज सांडूनि अकृतार्थु ।
माझा कामु नव्हतां तृप्तु । धर्मकामार्थु भंगला ॥७॥
पूर्वार्जित पापाच्या भोवऱ्याने, मजकडून कोणतेही सत्कार्य घडण्यापूर्वीच मला उघडे पाडले. आणि माझी इच्छा पुरी न होतांच धर्मकामार्थांचा विध्वंस केला ७.

गृहीं त्रैवर्गुचि भंगला । चौथा पुरुषार्थ असे उरला ।
तो साधूनि घेऊं वहिला । आश्रमु भंगल्या क्षिती काय ॥८॥
गृहामध्यें काम, अर्थ व धर्म ह्यांचा भंग झाला. पण चवथा पुरुषार्थ जो मोक्ष तो तर उरलेला आहे ना ? तोच अगोदर साध्य करून घेऊ या; आश्रम मोडल्याची क्षिती कशाला ? ८;

ऐसें म्हणसी जरी निगुतीं । ये अर्थीं मी दुर्मती ।
विषयवासना नोसंडिती । कैसेनि मुक्ति साधेल ॥९॥
असें जर म्हणाल तर मी मूढमति आहे; मला विषयवासना सोडीत नाही. मग मुक्ति कशी साधेल ? ९.

म्यां पूर्वी अल्प पुण्य होतें केलें । यालागीं अंतरायीं घर घेतलें ।
माझें परलोकसाधन ठेलें । विधुर केलें मजलागीं ॥६१०॥
मी पूर्वी फारच थोडे पुण्य केलेले होते, म्हणून काळानें माझें घर घेतले. मला विधुर करून टाकल्यामुळें माझें परलोकचे साधनही बुडाले ६१०.

हो कां गृहीं असतां गृहस्थां । काय परलोक साधे समस्तां ।
इतरांची असो कथा । मज साधनता तंव होती ॥११॥
असो. सर्वच गृहस्थाश्रमी लोकांना परलोकसाधन होत असते का ? पण इतरांची गोष्ट कशीही असो, मला मात्र तसे करण्याला साधन होते ११.

अनुरूपानुकूला च यस्य मे पतिदेवता ।
शून्ये गृहे मां सन्त्यज्य पुत्रैः स्वर्याति साधुभिः ॥ ६९ ॥
[श्लोक ६९]-मला शोभणारी व माझे सर्व ऐकणारी माझी पतिव्रता पत्‍नी उजाड घरात मला एकट्याला सोडून आमच्या साध्याभोळ्या पिल्लांसह स्वर्गात निघाली. (६९)

स्त्रीपुरुषांची चित्तवृत्ती । अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्तीं ।
तरीच परलोक साधिती । इतरां प्राप्ती ते नाहीं ॥१२॥
स्त्रीपुरुषांच्या मनोवृत्ति एकमेकांस अनुकूल असून त्यांची प्रवृत्ति धर्माकडे असेल, तरच परलोकसाधन घडेल. इतरांना त्याची प्राप्ति व्हावयाची नाहीं १२.

एकांच्या भार्या त्या तोंडाळा । एकांच्या त्या बहु वोढाळा ।
एकांच्या त्या अतिचांडाळा । एकी दुःशीला दुर्भगा ॥१३॥
कोणाच्या बायका अतिशय तोंडाळच असतात; कोणाच्या अतिशय उनाड असतात, भटक्या असतात, कोणाच्या बायका अतिशय दुष्ट, कजाग असून बाहेरख्यालीच असतात १३.

एकीचा तो क्रोध गाढा । एकी अत्यंत खादाडा ।
एकी सोलिती दांत दाढा । आरिसा पुढां मांडूनि ॥१४॥
एखाद्या बायकोचा राग विलक्षण असतो. कोणी अतिशय खादाडच असतात. कित्येक बायका आरसा पुढे ठेवून दांत आणि दाढाच सोलीत बसतात ! १४.

एकीं वोंगळा आळसिणी । एकी त्या महाडाकिनी ।
एकी सुकुमार विलासिनी । बरवेपणीं गर्वित ॥१५॥
कोणी अतिशय घाणेऱ्या व आळशीच असतात. कोणी मोठ्या कैदाशिणी असतात. कोणी नाजूक व विलासिनी असतात. त्या सौंदर्याच्या ताठ्यांतच वागतात १५.

तैशी नव्हे माझी पत्नी । सदा अनुकूळ मजलागुनी ।
मजसी वर्ते अनुरूपपणीं । धर्मपत्नी धार्मिक ॥१६॥
पण तशांपैकी मात्र माझी बायको नव्हती. ती नेहमी मला अनुकूल असे. ती खरी धर्मपत्नी असून अगदी मला अनुरूप अशी वागत असे १६.

मी जेव्हां धर्मीं तत्पर । तेव्हां धर्मासी ते अतिसादर ।
मज कामीं जेव्हां आदर । तेव्हां कामचतुर कामिनी ॥१७॥
मी धर्मकर्मास प्रवृत्त झालों म्हणजे तीही मला मोठ्या भक्तीनें साहाय्य करीत असे. आणि मी जेव्हां कामेच्छा धरावी, तेव्हां ती इच्छाही पूर्ण करण्यांत ती चतुर होती १७.

मजवांचोनि तत्त्वतां । न भजे आणिकां देवां देवतां ।
मज सांडूनि न वचे तीर्था । माझें वचन सर्वथा नुल्लंघी ॥१८॥
ती खरोखर माझ्याशिवाय इतर देवांना किंवा देवतांना कधीही भजत नसे. ती मला सोडून कोणत्याच तीर्थाला जात नसे. माझे वचन तर तिनें कधीच उल्लंघन केले नाहीं १८.

एवं रूपगुणकुलशील । मजसी सदा अनुकूल ।
पतिव्रता जे केवळ । पत्नी निर्मळ पैं माझी ॥१९॥
अशा प्रकारची रूपगुणकुलशीलसंपन्न स्त्री सदा सर्वदा मला अनुकूल व पतिव्रता आणि अत्यंत निर्मळ होती १९.

मज सांडूनि शून्यगृहीं । पुत्रेंसहित साध्वी पाहीं ।
जातसे स्वर्गाच्या ठायीं । मज अपायीं घालूनि ॥६२०॥
ती महासाध्वी मला ह्या ओसाड घरांत टाकून व संकटांत लोटून पुत्रांसहित स्वर्गाला चालली ना ? ६२०.

सोऽहं शून्ये गृहे दीनो मृतदारो मृतप्रजः ।
जिजीविषे किमर्थं वा विधुरो दुःखजीवितः ॥ ७० ॥
[श्लोक ७०]- पिल्ले गेली पत्‍नीही गेली आता दिनवाणा विधुर झालेला मी या उजाड घरात कोणासाठी जगू ? (७०)

नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा । येथ म्यां रहावें कवण्या काजा ।
दुःखें प्राण जाईल माझा । लोकलाजा निंदित ॥२१॥
स्त्री गेली; मुले गेली; आतां मी तरी कशाला रहावयाचें ? लोकलाजेच्या आणि निंदेच्या दुःखानें माझा प्राण जाईल २१.

एवढें अंगीं वाजलें दुःख । काय लौकिकीं दाखवूं मुख ।
भंगलें संसाराचें सुख । जितां मूर्ख म्हणतील ॥२२॥
इतकें दुःख अंगावर येऊन कोसळले. आतां लोकांत तोंड तरी कसे दाखवावें ? संसाराचे सुख सारे लयास गेले. आतां जगलों तर मला मूर्ख मात्र म्हणतील २२.

जळो विधुराचें जिणें । सदा निंद्य लाजिरवाणें ।
न ये श्राद्धींचें आवतणें । सदा वसणें एकाकी ॥२३॥
आग लागो त्या विधुराच्या जिण्याला ! तें निंद्य आणि लाजिरवाणे असते. श्राद्धाचे आमंत्रणसुद्धा कोणी सांगत नाही. सदासर्वदा एकटें एक पडून रहायचे २३.

ऐसेनीं वसतां ये लोकीं । शून्य गृहीं एकाकी ।
धडगोड न मिळे मुखीं । परम दुःखी मी होईन ॥२४॥
अशाच रीतीनें ह्या लोकांत मी राहिलों, तर त्या ओसाड घरांत एकट्यानेंच किणीकिणी करीत बसावें; नीटनेटके गोडधड कांहीं कधी तोंडांत पडण्याची आशा नको. अशानें मला अधिकच दुःख होईल २४.

तांस्तथैवावृतान्शिग्भिर्मृत्युग्रस्तान्विचेष्टतः ।
स्वयं च कृपणः शिक्षु पश्यन्नप्यबुधोऽपतत् ॥ ७१ ॥
[ श्लोक ७१]- पिल्ले व मादी जाळ्यात अडकून तडफडत असून ती आता मरणाच्या दारात आहेत, हे स्पष्ट दिसत असूनही बिचारा कबुतर स्वतःच जाळ्यात जाऊन पडला. (७१)

ऐसें बोलोनि केलें काये । मृतस्त्रीपुत्रांकडे पाहे ।
काळपाशीं बांधिली आहे । चेष्टा राहे निःषेष ॥२५॥
असे बोलून त्यानें केले काय ? तर मृत स्त्रीपुत्रांकडे पाहिले, तो ती काळपाशांत बांधलेली असून त्यांची हालचाल अगदीच बंद पडली आहे २५.

ऐसें देखतांही अबुद्धी । विवेकें न धरीचि बुद्धी ।
आपण जाऊनि त्रिशुद्धी । जाळामधीं पडियेला ॥२६॥
असें प्रत्यक्ष पाहूनही त्या मूर्खानें विचार केला नाही; आणि खरोखर आपणही जाऊन त्या जाळ्यामध्यें पडला ! २६.

मेल्या मागें मरणें । देखों हेंचि सर्वांसी करणें ।
परी जन्ममृत्यु निवारणें । हा स्वार्थु कवणें न धरिजे ॥२७॥
मेल्याच्या पाठीमागे मरावयाचे हे तर सर्वांच्याच मागे लागलेले आपण पाहातोंच आहों; परंतु जन्ममृत्यु टाळून आपले हित साधावें तें मात्र कोणीच करीत नाहीं ! २७.

पहा पां स्त्रीपुत्राकरणें । आपुलाही जीवु देणें ।
परी भगवत्पदवी साधणें । हें न मने मनें सर्वथा ॥२८॥
पाहा ! स्त्रीपुत्रांकरतां आपला जीवही देतात, पण भगवत्पदवी प्राप्त करून घ्यावी असें मनाला कधीच पटत नाहीं ? २८.

तं लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतं गृहमेधिनम् ।
कपोतकान्कपोतीं च सिद्धार्थः प्रययौ गृहम् ॥ ७२ ॥
[श्लोक ७२]- तो क्रूर पारधी, गृहस्थाश्रमी कबुतरजोडपे आणि त्याची पिल्ले मिळाल्याने ‘आपले काम झाले’ असे पाहून त्यांना घेऊन घरी गेला. (७२)

जाळीं पडला कपोता दुर्बुद्धी । झाली लुब्धकाची कार्यसिद्धी ।
सहकुटुंब घेऊनि खांदीं । निघे पारधी निजस्थाना ॥२९॥
अशा प्रकारे तो दुर्बुद्धि कपोता जाळ्यात सापडताच पारध्याचे आयतेच काम झाले. त्याला सहकुटुंब खांद्यावर घेऊन तो आपल्या घराकडे निघाला २९.

ऐसा जो कोणी गृहमेधी । त्यासी सर्वथा काळु साधी ।
जैशी कपोत्याची बुद्धी । तैसी बुद्धी गृहमेध्या ॥६३०॥
असा जो कोणी मोहग्रस्त गृहस्थाश्रमी असतो. त्याला काळ तत्काल हरण करून नेतो. कपोत्याची जशी बुद्धि होती, तशीच घरावर आसक्ति ठेवणाराची बुद्धि असते १३०.

बाळकांच्या काकुळतीं । मरण पावली कपोती ।
ऐसें देखत देखतां दुर्मती । तेथ निश्चितीं उडी घाली ॥३१॥
पिलांच्या काकुळतीनें कपोती मरण पावली, हें डोळ्यांसमोर प्रत्यक्ष पाहूनही त्या मूर्खबुद्धीनें पुन्हा त्यांतच उडी घातली ! ३१.

यापरी तो कपोता । कुटुंबाची मेधा वाहतां ।
मरण पावला सर्वथा । विवेकु चित्ता न धरीचि ॥३२॥
ह्याप्रमाणें तो कपोता कुटुंबाची काळजी वाहतां वाहतां आपणही मरण पावला. मनांत यत्किंचितही विचार केला नाहीं ३२.

एवं कुटुम्ब्यशान्तात्मा द्वन्द्वारामः पतत्त्रिवत् ।
पुष्णन्कुटुम्बं कृपणः सानुबन्धोऽवसीदति ॥ ७३ ॥
[ श्लोक ७३] – ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो आणि जो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यातच आपले स्वत्व गमावून बसतो, त्याला कधीच शांती मिळत नाही त्या कबुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबियांबरोबर नाश पावतो. (७३)

ऐसा कुटुंबी गृहस्थु । कुटुंबपोषणीं आसक्तु ।
विषयवासना अशांतु । पावे घातु सकुटुंब ॥३३॥
अशा प्रकारचा कुटुंबी गृहस्थ कुटुंबपोषणामध्येंच आसक्त झाल्यानें विषयवासनेनें सदासर्वदा अतृप्त असतो आणि त्यामुळेच त्याचा कुटुंबासह घात होतो ३३.

गृहासक्ती गृहाश्रमु । तो केवळ द्वंद्वाचा आरामु ।
कपोत्या ऐसा पडे भ्रमु । वृथा जन्मु दवडावा ॥३४॥
गृहाची आसक्ति आणि गृहस्थाश्रम, केवळ द्वंद्वाचे सुख आहे. त्यामुळें कपोत्यासारखा भ्रम पडतो. याकरता तसे करून आपला जन्म वृथा दवडू नये ३४.

यः प्राप्य मानुषं लोकं मुक्तिद्वारमपावृतम् ।
गृहेषु खगवत्सक्तस्तमारूढच्युतं विदुः ॥ ७४ ॥
[श्लोक ७४] – मुक्तीचे उघडलेले दारच असे मनुष्यशरीर मिळूनही जो कबुतराप्रमाणे आपल्या घरादारातच गुंतलेला असतो, तो उंचीवर जाऊन खाली पडू पाहाणारा म्हटला पाहिजे त्याला “आरूढच्युत” म्हणतात. (कबुतरापासून, कुटुंबविषयक अत्यासक्ती सर्वनाशाला कारण होते, हा बोध घ्यावा). (७४)

येवोनियां कर्मभूमीसी । जो पावला उत्तम देहासी ।
त्याहीमाजीं उत्तमता कैशी । अग्रवर्णासी पैं जन्म ॥३५॥
या मृत्युलोकावर येऊन ज्याला उत्तम देह प्राप्त झाला, आणि त्यांतही उत्तमपणा कोणता ? तर श्रेष्ठवर्ण जो ब्राह्मण त्यांत जन्म ३५.

आलिया मनुष्यदेहासी । मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी ।
लव निमिष येकु दिशीं । यावज्जन्मेंसीं मोकळा ॥३६॥
मनुष्यदेहाला जो येईल, त्याला मुक्तीचे द्वार अगदी खुले असते. एका दिवसांत, एका निमिषांत, एका क्षणांत तो यावजन्मांतून पार होतो ३६.

इतरां वर्णांची हे गती । मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती ।
ते सदा मुक्तचि असती । वृथा आसक्तीं गुंतले ॥३७॥
ही गोष्ट इतर वर्णांची. मग ब्राह्मण तर बोलून चालून पुण्यमूर्तिच आहेत. ते सदासर्वदा मुक्तच आहेत. पण फुकट आसक्तीमध्यें गुंततात ३७.

विद्वांस आणि वैराग्य । तें ब्रह्मादिकां न लभे भाग्य ।
वृथा आसक्तीं केले अभाग्य । शिश्नोदरा साङ्ग वेंचले ॥३८॥
विद्वत्ता असून वैराग्य असणे हे मोठे भाग्य आहे. तें ब्रह्मदेवादिकांनासुद्धा प्राप्त होत नाही. फुकाच्या आसक्तीनें त्यांना अभागी केल्यामुळे, शिस्नोदराच्या आधीन होऊन ते फुकट गेले ३८.

मनुष्यदेहीं गृहासक्तु । तो बोलिजे ‘आरूढच्युतु’।
कपोत्याचे परी दुःखितु । सिद्ध स्वार्थु नाशिला ॥३९॥
मनुष्यदेहाला येऊन जो गृहासक्त होतो, त्याला ‘आरूढच्युत’ अथवा पढतमूर्ख म्हणतात. तो आपल्या हातात आलेला स्वार्थ सोडून कपोत्याप्रमाणें दुःखी होतो ३९.

विषयीं सर्वथा नाहीं तृप्ति । ऐसें श्रुतिपुराणें बोलती ।
करितां विषयाची आसक्ती । थित्या मुकती नरदेहा ॥६४०॥
विषयांत तृप्ति केव्हांही होत नाही, असें वेद व पुराणें सांगतात. असें असतां विषयावर आसक्ति ठेवून, फुकटच्या नरदेहाला मुकतात ! ६४०.

नवल नरदेहाची ख्याती । रामनामाच्या आवृत्तीं ।
चारी मुक्ती दासी होती । तो देहो वेंचिती विषयासी ॥४१॥
नरदेहाची थोरवी कांही विलक्षण आहे. नुसत्या रामनामाच्या आवृत्ति केल्या तरी, चारीही मुक्ति दासी होऊन राहतात. असे असतां तोच देह विषयासाठी खर्ची घालतात ! ४१.

विषयसुखाचिये आसक्ती । कोणा नाहीं झाली तृप्ती ।
मृगजळाचिये प्राप्ती । केवीं निवती तृषार्त ॥४२॥
विषयसुखाच्या आसक्तीनें कोणाचीच कधी तृप्ति झालेली नाही. तान्हेलेले लोक मृगजळाच्या प्राप्तीनें शांत कसे होतील ! ४२.

यालागीं जाणतेनि मनुष्यें । नरदेहींचेनि आयुष्यें ।
विषयांचेनि सायासें । व्यर्थ कां पिसे कष्टती ॥४३॥
ह्याकरतां जाणत्या मनुष्यांनी, नरदेहाचे आयुष्य लाभले असून विषयाच्या प्रयासानें वेडेपीर बनून उगाच कां घामाघूम व्हावे ? ४३.

नरदेहाऐसें निधान । अनायासें लाधलें जाण ।
सांडीं सांडीं अभिमान । तेणें समाधान पावसी ॥४४॥
नरदेहासारखा ठेवा अनायासानें लाभला आहे. तेव्हां अभिमान अगदी सोडून दे. तरच तुला समाधान प्राप्त होईल ४४.

पुढती नरदेहाची प्राप्ती । होईल येथ नाहीं युक्ति ।
यालागीं सांडूनि विषयासक्ती । भावें श्रीपति भजावा ॥४५॥
ह्यानंतर पुन्हा नरदेह प्राप्त होईलच अशी कांही खात्री नाहीं; ह्याकरतां विषयासक्ति सोडून देऊन भक्तिभावानें श्रीहरीचेंच भजन करावें ४५.

कलियुगीं सुगम साधन । न लगे योग याग त्याग दान ।
करितां निर्लज्ज हरिकीर्तन । चारी मुक्ति चरण वंदिती ॥४६॥
कलियुगांतले साधन अगदी सोपे आहे. योग नको, याग नको, त्याग नको की दान नको. निर्लज्जपणानें हरिकीर्तन केले की, चारीही मुक्ति येऊन पायीं लागतात ४६.

इटेसाठीं परीस पालटे । येतां कां मानिती वोखटें ।
तैसा कीर्तनाचेनि नेटेंपाटें । देवो भेटे प्रत्यक्ष ॥४७॥
वीट देऊन त्याच्या मोबदल्यात जर परीस मिळाला, तर त्यांत वाईट कां वाटावें ? त्याप्रमाणें कीर्तनाच्या जोरावर प्रत्यक्ष देव भेटत असतो हे लक्षात ठेवावें ४७.

एका जनार्दनु म्हणे । नश्वर देहाचेनि साधनें ।
जनीं जनार्दनु होणें । हे मुद्रा तेणें लाविली ॥४८॥
एकाजनार्दन म्हणतो, नश्वर देहाच्या साधनानेंच जनांत जनार्दन व्हावे, ही मुद्रा त्यानें लावून दिली ४८.

एका जनार्दना शरण । तंव जनार्दनु झाला एक एकपण ।
जैसें सुवर्ण आणि कंकण । दों नांवीं जाण एक तें ॥४९॥
एका जनार्दनाला शरण गेला. तोच जनार्दन एकपणानें एका झाला, ज्याप्रमाणें सोनें आणि कंकण ह्या दोन्ही नांवांनी ते एकच असते ४९.

तोचि एका एकादशीं । श्रीकृष्ण सांगे उद्धवासी ।
अवधूत सांगे यदूसी । गुरूपदेशीं उपदेशु ॥६५०॥
एकादश स्कंधामध्यें श्रीकृष्णानें जो गुरूपदेश उद्धवाला सांगितला व अवधूतानें जो यदूला सांगितला, तोच गुरूपदेश जनार्दनरूप एकनाथ सांगत आहे ६५०.

इति श्रीमद्‌भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे यदुअवधूतेतिहासे एकाकारटीकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥
(ह्याप्रमाणें श्रीमद्‌भागवत महापुराणाच्या एकादशस्कंधांतील श्रीकृष्ण-उद्धवसंवादामधील यदु-अवधूत इतिहासावरील एकनाथकृत टीकेचा सातवा अध्याय संपूर्ण झाला.)

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥७४॥ ओव्या ॥६५०॥
ॐ तत्सत्- श्रीकृष्णार्पणमस्तु.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *