sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 17

एकनाथी भागवत अध्याय 17

श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥
ॐ नमो श्रीद्‍गुरु महामेरु । सुक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरु ।
चैतन्यस्वभावें अतिथोरु । तूं आधारु सर्वांचा ॥ १ ॥
हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं महामेरुस्वरूप आहेस. तूं सूक्ष्मस्वरूपाने पर्वत आहेस. असें जरी दिसले, तरी चैतन्यरूपानें तूं अत्यंत थोर असल्यामुळे तूं सर्वांचाच आधार आहेस १.

तुझ्या निजबोधाचीं शिखरें । वैकुंठकैलासादि अतिथोरें ।
तेथें ब्रह्माविष्णुमहारुद्रें । तुझेनि आधारें नांदिजे ॥ २ ॥
वैकुंठ, कैलास, इत्यादि तुझ्या आत्मज्ञानाची अत्यंत उच्च उंच शिखरे आहेत. तेथें ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर हे तुझ्याच आधाराने राहतात २.

तुझिया आधारस्थितीं । नांदती त्रैलोक्य-लोकपंक्ति ।
सकळ भूतांची उत्पत्ति स्थिती । निदान अंतीं तुजमाजीं ॥ ३ ॥
ही त्रैलोक्ये आणि सर्व लोक तुझ्याच आधाराने राहिले आहेत. सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ति, स्थिति, आणि शेवटीं लय ही तुझ्यामध्येच होतात ३.

सुरासुर लहानथोर । एक सौम्य एक क्रूर ।
इयें भूतें धरूनि निर्विकार । स्वरूप साचार पैं तुझें ॥ ४ ॥
देव, दैत्य, लहान, थोर, सौम्य, क्रूर, अशी नानाप्रकारची भूतें धारण करूनही खरोखर तुझे स्वरूप निर्विकारच आहे ४.

तेथ विवेकाचें आगर । सच्चिदानंदाचे रत्‍नाकर ।
तेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हारे होती ॥ ५ ॥
त्यांत विवेकाचे शेत असून चिद्रत्नाच्या खाणी आहेत. तेथचा एक खडा जरी हाती लागला, तरी हलके मनुष्यही मोठे व्यापारी बनतील ५.

ज्याच्या औषधींचा चमत्कार । सेवितां करिती अजरामर ।
जेथ चिद्‍गंगेचे निर्झर । निरंतर प्रवाहती ॥ ६ ॥
त्या पर्वतावरील औषधींचा तर मोठाच चमत्कार आहे. त्यांचे सेवन केले असता त्याला त्या अजरामरच करितात. त्यावर ज्ञानगंगेचे झरेही रात्रंदिवस वहात असतात ६.

जो सुरनरांचा विश्राम । जो सकळ आश्रमांचा आश्रम ।
जो क्रियाकर्मांचें नैष्कर्म्य । जो निजधाम जीवाचे ॥ ७ ॥
जो देवांचे आणि मनुष्यांचे विश्रांतिस्थान, जो ब्रह्मचर्यादि सर्व आश्रमांचाही आश्रम, जो क्रियाकर्माचें नैष्कर्म्य, आणि जो जीवांचें निजधाम होय ७;

जो भजनाची कुळवाडी । जो भक्तजीवनाची वाडी ।
जो आवडीची निजआवडी । जो गोडियेची गोडी निजात्मता ॥ ८ ॥
जो भजनाचे क्षेत्र, भक्तांच्या जीवनाची बागाईत जमीन; जो आवडीचीही आवड; आणि जो आत्मानुभवाने गोडीचीही गोडी ८,

ऐसा सद्‍गुरु महामेरु । जो कठिणत्वेंवीण आधारु ।
ज्याचेनि अंगें संसारु । होय सुखकरु साधकां ॥ ९ ॥
असा जो सद्गुरुरूप महामेरु, जो कठिणपणाशिवायच सर्वांना आधार, ज्याच्या योगानें साधकांचा संसारही सुखमय होऊन जातो ९,

त्या साधकांचें सामाधान । शिष्यांचा स्वानंदघन ।
आर्त-चातकां निजजीवन । स्वामी जनार्दन तुष्टला ॥ १० ॥
त्या साधकांचे समाधान, शिष्यांना तर आत्मानंदरूपमेघ, मुमुक्षुरूप चातकांचे केवळ जीवन, असा जो जनार्दनस्वामी, तो प्रसन्न झाला १०.

तयाचा जो चरणप्रसादु । श्रीभागवतीं एकादशस्कंधु ।
पूर्वार्धाचा विनोदु । भाषाप्रबंधु वाखाणिला ॥ ११ ॥
त्याच्या चरणांचा जो कृपाप्रसाद, त्याच्या योगाने श्रीमद्भागवतांतील एकादशस्कंधाचा पूर्वार्ध मोठ्या आनंदाने कवितारूपाने वर्णन केला ११.

तेथें उद्धवें पुशिल्या विभूती । त्या षोडशाध्यायीं श्रीपती ।
सांगितल्या यथानिगुतीं । भजनस्थितीलागोनी ॥ १२ ॥
त्यात उद्धवाने श्रीकृष्णाला विभूती विचारल्या. त्या सोळाव्या अध्यायामध्ये लक्ष्मीपतींनी भजनाप्रीत्यर्थं यथार्थ रीतीनें सांगितल्या १२.

त्या विभूतींमाजीं निजवर्म । `भक्तांचें जें भजनकर्म ।
तें मी केवळ आत्माराम’ । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ १३ ॥
त्या विभूतिवर्णनामध्यें गुह्य गोष्ट म्हणून श्रीकृष्ण असें म्हणाला की, भक्तांचे जे भजनकर्म म्हणून आहे , ते केवळ मीच आत्माराम होय १३.

तेथ आशंकेची व्युत्पत्ती । ‘करितां कर्माची कर्मगती ।
कर्मठ जाहले नेणों किती । तरी कर्में मुक्ती घडे केवीं’ ॥ १४ ॥
तेव्हा त्यात एक शंका उत्पन्न झाली की, सतत कर्में आचरीत असता किती तरी लोक केवळ कर्मठ झाले आहेत ; त्यांची गणतीच नाही . तेंव्हा कर्माने मुक्ति कशी मिळते ? १४.

कर्में करितां वाडेंकोडें । कर्मीं कर्मठता न चढे ।
कर्मांमाजीं मोक्ष आतुडे । हेंचि रोकडें पुसों पां ॥ १५ ॥
आवडीने कर्में करीत असतां, कर्मामध्ये कर्तव्यतेचा अभिमान चढावयाचा नाही, आणि कर्मापासून मोक्षप्राप्ति होईल असा उपाय प्रत्यक्ष विचारूं १५,

स्वयें बोलिला श्रीपती । `सात्त्विकांची जे कर्मस्थिती ।
ते कर्मचि माझी विभूती’ । हें सोळाव्याअंतीं निरूपिलें ॥ १६ ॥
कारण लक्ष्मीपतींनी स्वत:च सांगितले आहे की, सात्विकांचें जें कर्म चालत असते, तें कर्म हीच माझी विभूति आहे. असें सोळाव्या अध्यायाच्या अंती सांगितले आहे १६.

स्वयें आचरितां स्वकर्म । तें कर्मचि होय ब्रह्म ।
हेंचि कर्मक्रियेचें वर्म । देवासी सुगम पुसों पां ॥ १७ ॥
आपण होऊन स्वकर्माचे आचरण केले असतां तें कर्मच ब्रह्मस्वरूप होते, हे जें कर्मक्रियेतील वर्म आहे, तेंच सुलभ रीतीने सांगण्याविषयीं देवांना विचारूं १७.

ऐसा पोटिंचा आवांका । तेचि पुसावया आशंका ।
वर्णाश्रमांची स्वधर्मपीठिका । देवासी देखा पुसत ॥ १८ ॥
उद्धवाच्या मनांतील हाच हेतु होता, म्हणून तीच शंका विचारण्यासाठी देवाला वर्णाश्रमांची व स्वधर्माची मूळपीठिकाच तो विचारूं लागला १८.

उद्धव उवाच-
यस्त्वयाभिहितः पूर्वं धमस्त्वद्‍भक्तिलक्षणः ।
वर्णाश्रमाचारवतां सर्वेषां द्विपदामपि ॥ १ ॥
[श्लोक १] उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा ! आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणार्‍या माणसांसाठी तसेच सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होता, (१)

उद्धव म्हणे गा भक्तपती । ऐकतां तुझ्या निजविभूति ।
मज ऐसें गमलें चित्तीं । स्वधर्मेंसीं भक्ती घडे कैसी ॥ १९ ॥
उद्धव म्हणाला, हे भक्तांच्या ईश्वरा! ‘तुझ्या आत्मविभूति श्रवण करितांना माझ्या मनांत असें वाटलें की, स्वधर्मानें भक्ति कशी घडेल ? १९.

तुवां कल्पादि वाडेंकोडें । स्वधर्मकर्में भक्ति जोडे ।
हें वर्णाश्रमनिजनिवाडें । निरूपण चोखडें निरूपिलें ॥ २० ॥
तूं तर कल्पाच्या आदीपासूनच मोठ्या कळकळीने सांगत आला आहेस की, स्वधर्मकर्मानेंच भक्ति प्राप्त होते आणि त्याकरितांच वर्णाश्रम कसकसे आहेत ह्यांचे उत्कृष्ट प्रतिपादन तूं केलें आहेस २०.

सर्वां मानवां परम गति । स्वधर्में घडे भगवद्‍भक्ति ।
या निरूपणाची निगुती । तुवां निश्चितीं निरूपिली ॥ २१ ॥
सर्व मनुष्यांना उत्तम गति आणि भगवद्भक्ति ही स्वधर्मानेंच प्राप्त होतात, असें तूंच यथार्थ व निश्चित निरूपण केलें आहेस २१.

यथाऽनुष्ठीयमानेन त्वयि भक्तिर्नृणां भवेत् ।
स्वधर्मेणाऽरविन्दाक्ष तत्समाख्यातुमर्हसि ॥ २ ॥
[श्लोक २] त्या त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल, ते मला सांगावे. (२)

ऐके कमलनयना अच्युता । जो कां स्वधर्म अनुष्ठितां ।
तुझी निजभक्ती स्वभावतां । प्राण्याच्या हाता जेणें लाभे ॥ २२ ॥
हे कमलनयना अच्युता ! ऐक, जो स्वधर्म आचरण केला असतां तुझी भक्ति स्वभावतःच भक्तांच्या हाती लागते २२,

ते कर्मकुशलतेची स्थिती । मजलागीं सांगावी सुनिश्चितीं ।
कमलनयना कमलापती । कृपामूर्ती माधवा ॥ २३ ॥
त्या कर्मकौशल्याचे लक्षण, हे कमलनयना! माधवा! कृपामूर्ते! मला निश्चयेंकरून निवेदन करावें २३.

तूं ऐसें म्हणशील श्रीपती । `म्यां कल्पाचे आधीं कवणाप्रती ।
सांगितली स्वधर्मस्थिती’ । तरी ते विनंती अवधारीं ॥ २४ ॥
लक्ष्मीपते! तूं कदाचित् असें म्हणशील की, मी कल्पाच्या आरंभी ही स्वधर्माची स्थिति कोणाला सांगितली तर त्याबद्दलही माझी विनंति ऐक २४.

पुरा किल महाबाहो धर्मं परमकं प्रभो ।
यत्तेन हंसरूपेण ब्रह्मणेऽभ्यात्थ माधव ॥ ३ ॥
[श्लोक ३] हे प्रभो ! महाबाहो माधवा ! पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा उपदेश केला होता. (३)

ज्याच्या बाहूचा प्रताप अद्‍भुत । विश्वमर्यादा धर्मसेत ।
राखों जाणे यथास्थित । त्यालागीं म्हणिपत `महाबाहो’ ॥ २५ ॥
ज्याच्या बाहूंचा प्रताप अद्भुत असतो, जो विश्वमर्यादेतील धर्मरूपी सेतु व्यवस्थित ठेवण्याचे जाणतो, त्याला ‘महाबाहु’ असे म्हणतात २५.

स्वधर्मकर्माचा द्योतकु । अनादि वक्ता तूं एकु ।
वर्णाश्रमादि विवेकु । उपदेशकु तूं स्रष्ट्याचा ॥ २६ ॥
स्वधर्मकर्माचा प्रकाशक असा अनादि वक्ता एक तूंच आहेस आणि वर्णाश्रमधर्माचा विचार ब्रह्मदेवाला कथन करणारा उपदेशक तूच आहेस २६.

पूर्वीं हंसरूपें सविस्तर । बोलिलासी स्वधर्माचा निर्धार ।
त्यांतील तुवां अध्यात्मसार । निवडूनि साचार मज सांगितलें ॥ २७ ॥
पूर्वी (तेराव्या अध्यायांत) हंसरूपाने स्वधर्माचा निश्चित विचार तूं सविस्तर सांगितलास, आणि त्यांतलेच अध्यात्मज्ञानाचे रहस्य निवडून मला उत्तम प्रकारे सांगितलेंस २७.

तेथील स्वधर्माचें लक्षण । मज न कळेचि निरूपण ।
जें तूं हंसरूपे आपण । स्वधर्म जाण बोलिलासी ॥ २८ ॥
परंतु तू हंसरूपाने आपण होऊन जो स्वधर्मं सांगितलास, त्यांतील स्वधर्माचे लक्षण व त्याचे निरूपण मला समजले नाही २८.

तुझेनि मुखें यथोचितें । भक्तियुक्त आश्रमधर्मातें ।
सनत्कुमार जाहले श्रोते । तेंचि मातें सांगावें ॥ २९ ॥
याकरितां सन. सनत्कुमारांनी तुझ्या मुखातून यथोचित असा जो आश्रमधर्म भक्तिपूर्वक श्रवण केला, तोच मला सांगावा २९.

म्हणसी `सनत्कुमारद्वारा । धर्म विस्तारला परंपरा ।
तो विचारूनि करीं निर्धारा’ । हें सारंगधरा घडेना ॥ ३० ॥
आता कदाचित तू म्हणशील की, सनत्कुमारांच्या द्वारेंच परंपरेने धर्माचा प्रसार झालेला आहे, त्याचाच विचार करून त्यांतील रहस्य जाण म्हणजे झाले . परंतु श्रीकृष्णा ! तसे मजकडून व्हावयाचे नाही ३०.

स इदानीं सुमहता कालेनामित्रकर्शन ।
न प्रायो भविता मर्त्यलोके प्रागनुशासितः ॥ ४ ॥
[श्लोक ४] हे रिपुदमना ! पुष्कळ काळ निघून गेल्याकारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झाल्यासारखाच आहे. (४)

काम क्रोध लोभ अभिमान । हे भक्तांचे वैरी सहाजण ।
त्यांचें तूं करिशी निर्दळण । अरिमर्दन या हेतू ॥ ३१ ॥
काम, क्रोध, लोभ, अमिमान इत्यादि षडरिपू हेच भक्तांचे मोठे वैरी आहेत, त्यांचा संहार करतोस, म्हणूनच तुला’ अरिमर्दन’ असे म्हणतात ३१.

भक्तांचें अरिनिर्दळण । तुजवांचोनि कर्ता आन ।
तिहीं लोकीं नाहीं जाण । अनन्यशरण यालागीं ॥ ३२ ॥
भक्तांच्या शत्रूचा नाश करणारा तुझ्यावाचून त्रिभुवनांत दुसरा कोणीच नाही; म्हणूनच तुला मी अनन्य भावाने शरण आलों आहें ३२.

तुवां कल्पाचिये आदीसी । उपदेशिलें सनकादिकांसी ।
बहुकाळ जाहले त्या बोलासी । ते धर्म कोणापाशीं प्रायशां नाहीं ॥ ३३ ॥
कल्पाच्या प्रारंभी तू सनकादिकांना उपदेश केलास, त्या उपदेशाला फारच काळ लोटून गेल्यामुळे तो धर्म आतां बहुतकरून कोणापाशी राहिला नाहीं ३३.

प्रायशां ये कालीं नर । नाहीं स्वधर्मी तत्पर ।
शिश्नोदरीं अत्यादर । स्वधर्मविचार विसरोनी ॥ ३४ ॥
सध्यांच्या काळांत लोक बहुतकरून स्वधर्मामध्ये तत्पर नसतात. स्वधर्माचा विचार विसरून जाऊन कामासक्ति व उदरपूर्ति यांतच आदरपूर्वक लुब्ध झाले आहेत ३४.

याथातथ्यें धर्मप्रतिष्ठा । करी ऐसा नाहीं उपदेष्टा ।
यालागीं जी वैकुंठा । स्वधर्मनिजनिष्ठा मज सांग ॥ ३५ ॥
यामुळे यथार्य धर्म अंत:करणांत बिंबवील असा उपदेशकच कोणी उरलेला नाही. म्हणून हे वैकुंठाधिपते ! मला स्वधर्माची निष्ठा तूंच सांग ३५.

वक्ता कर्ताऽविता नान्यो धर्मास्याच्युत ते भुवि ।
सभायामपि वैरिञ्च्यां यत्र मूर्तिधराः कलाः ॥ ५ ॥
कर्ताऽवित्रा प्रवक्त्रा च भवता मधुसूधन ।
त्यक्ते महीतले देव विनष्टं कः प्रवक्ष्यति ॥ ६ ॥
[श्लोक ५-६] हे अच्युता ! ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तेथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही, आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा असेल ? (५)
हे मधुसूदना ! या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल ? (६)

अलुप्तज्ञानें स्वधर्मवक्ता । ये भूलोकीं गा तत्त्वतां ।
तुजवांचोनि अच्युता । आणिक सर्वथा असेना ॥ ३६ ॥
हे श्रीकृष्णा ! ह्या जगामध्ये ज्याचे ज्ञान मायेने आच्छादलेले नाही, असा धर्मोपदेशक खरोखर तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ३६.

एक शास्त्रमर्यादाव्युत्पत्ती । कर्मकलाप बोलों जाणती ।
परी कर्माची आचरती गती । तेही नेणती तत्त्वतां ॥ ३७ ॥
कोणाला शास्त्रवचनाच्या मीमांसेने कर्मसमूहाचे प्रतिपादन करावयाचे समजते; पण तेच कर्म आचरण कसे करावें तें मात्र त्यांनाही कळत नाही ३७.

यालागीं गा भगवंता । धर्माचा कर्ता वक्ता ।
धर्म विस्तारूनि रक्षिता । आणिक सर्वथा असेना ॥ ३८ ॥
म्हणूनच हे भगवंता ! धर्माचा कर्ता , धर्माचा वक्ता आणि धर्माचा विस्तार करून त्याचे संरक्षण करणारा तुझ्यावाचून दुसरा असणेच शक्य नाही ३८.

पहातां या लोकांच्या ठायीं । तुज‍ऐसा सर्वज्ञ नाहीं ।
ऐसें विचारितां लोकीं तिंही । तुजसमान नाहीं सांगता ॥ ३९ ॥
या लोकांतच केवळ पाहूं गेलें तर, तुझ्यासारखा सर्वज्ञ कोणी नाही इतकेच नव्हे, तर विचारपूर्वक पाहिले असतां तुझ्यासारखा उपदेशक त्रैलोक्यांतही दुसरा कोणी नाही ३९.

जरी सत्यलोक पाहणें । जेथें चारी वेद षड्दर्शनें ।
इतिहास स्मृति पुराणें । मूर्तिमंतपणें उभीं असतीं ॥ ४० ॥
सत्यलोकाकडे पाहिले तर तेथे चारही वेद, षड्दर्शन, इतिहास, स्मृति, पुराणें हीं मूर्तिमंत उभी राहिलेली असतात ४०.

तेथें सनकादिकांचा प्रश्न । ब्रह्मयासी न सांगावे जाण ।
तुवां हंसरूपें येऊन । समाधान दीधलें ॥ ४१ ॥
पण तेथेसुद्धा सनकादिकांच्या प्रश्नांचे उत्तर ब्रह्मदेवाला सांगवले नाही. तेव्हां तूं हंसरूपाने तेथे येऊन त्यांचे समाधान केलेंस ४१.

ते ब्रह्मसभेचा ठायीं । तुज‍ऐसा वक्ता नाहीं ।
तो तूं भक्तानुग्रहें पाहीं । या लोकांच्या ठायीं मूर्तिमंत ब्रह्म ॥ ४२ ॥
ब्रह्मदेवाच्या सभेमध्येही तुझ्यासारखा वक्ता नाही. तो तूं मूर्तिमंत ब्रह्म केवळ भक्तांवर अनुग्रह करण्याकरितांच या लोकाच्या ठिकाणी अवतरला आहेस ४२.

तेणें तुवां सर्व कर्मधर्मसंस्था । करूनि दाविली तत्त्वतां ।
तो तूं निजधामा गेलिया आतां । स्वधर्मवक्ता मग कैंचा ॥ ४३ ॥
अशा त्वां सर्व कर्मधर्माची स्थापना करून व आचरण करूनही दाखविलेंस. तो तूं आतां निजधामास गेल्यानंतर मग स्वधर्म सांगणारा कोण आहे ? ४३.

भक्तियुक्त स्वधर्मगती । सांगावया यथास्थिती ।
तुजवांचोनियां श्रीपती । आणिकासी शक्ति असेना ॥ ४४ ॥
तात्पर्य हे श्रीकृष्णा ! भक्तीने युक्त असें स्वधर्माचे रहस्य यथार्थ रीतीने प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य तुजवांचून इतरांना नाही ४४.

तूं भक्तसाह्य जगज्जीवन । भक्तमदगजभंजन ।
यालागीं नांवें तुं `मधुसूदन’ । ऐसें प्रार्थून बोलत ॥ ४५ ॥
तूं जगज्जीवन भक्तांचा साहाय्यकर्ता आहेस, भक्तांच्या अभिमानरूपी मत्त हत्तीचें निर्दाळण करणारा आहेस, म्हणूनच तुला ‘मधुसूदन’ असे म्हणतात. अशी प्रार्थना करून उद्धव बोलू लागला ४५.

तत्त्वं नः सर्वधर्मज्ञ धर्मस्त्वद्‍भक्तिलक्षणः ।
यथा यस्य विधीयेत तथा वर्णय मे प्रभो ॥ ७ ॥
[श्लोक ७] म्हणून सर्व धर्म जाणणार्‍या हे प्रभो ! आपली भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे, तसा सांगावा. (७)

तूं सर्वज्ञ ज्ञानमूर्ति । तरी मनुष्यांची कर्मगति ।
वर्णाश्रमांची धर्मस्थिती । यथानिगुतीं मज सांग ॥ ४६ ॥
तूं सर्वज्ञ असून ज्ञानाची केवळ मूर्ति आहेस. ह्यास्तव मनुष्यांच्या कर्माची गति आणि वर्णाश्रमांच्या धर्मातील रहस्य यथार्थ रीतीने मला सांगावें ४६.

वर्णबाह्याचें निजकर्म । तोही सांगावा विहित धर्म ।
उद्धवें प्रार्थिला पुरुषोत्तम । तेणें मेघश्याम तुष्टला ॥ ४७ ॥
तसेंच वर्णबाह्य लोकांचे कर्म व त्यांचा जो विहित धर्म, त्याचेही कथन करावे. ह्याप्रमाणे उद्धवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हां मेघश्याम श्रीकृष्ण संतुष्ट झाला ४७.

सकळ जनांचा हितकर । उद्धवें प्रश्न केला सधर ।
तो ऐकोनि शुकयोगींद्र । आनंदनिर्भर तेणें प्रश्नें ॥ ४८ ॥
साऱ्याच लोकांना हितावह असा उत्तम प्रश्न उद्धवाने केला, तो ऐकून महान् योगेश्वर शुकाचार्य देखील आनंदनिर्भर झाले ४८.

शुक म्हणे परीक्षितीसी । धन्य बुद्धी ते उद्धवासी ।
जेणें प्रार्थूनि हृषीकेशी । जाहला जगासी उपकारी ॥ ४९ ॥
शुकाचार्य परीक्षितीला म्हणाले, उद्धवाची बुद्धि धन्य होय ! कारण, स्याने श्रीकृष्णाची प्रार्थना करून साऱ्या जगावर उपकार करून ठेवला ४९.

श्रीशुक‍उवाच-
इत्थं स्वभृत्यमुख्येन पृष्टः स भगवान् हरिः ।
प्रीतः क्षेमाय मर्त्यानां धर्मानाह सनातनान् ॥ ८ ॥
[ श्लोक ८] श्रीशुक म्हणतात – आपल्या भक्तशिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांना सनातनधर्माचा उपदेश केला. (८)

शुक म्हणे गा परीक्षिती । सावधान होईं चित्तीं ।
धन्य उद्धवाची प्रश्नोक्ती । स्वधर्मे मुक्ती पुशिली ॥ ५० ॥
शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिती! सावधान चित्ताने ऐक. त्या उद्ध्वाचा प्रश्न खरोखरच धन्य होय. कारण त्याने स्वकर्मानेच मुक्ति विचारली ५०.

जो भृत्यांमाजीं पढियंता । अत्यंत आवडे कृष्णनाथा ।
त्या वेगळें श्रीअनंता । क्षणही सर्वथा करमेना ॥ ५१ ॥
जो सर्व सेवकांमध्ये अत्यंत प्रिय व श्रीकृष्णाला अतिशय आवडता, ज्याच्याशिवाय श्रीकृष्णाला क्षणभरही मुळींच करमत नसे ५१;

ज्यापाशीं गा निजगुज । सदा सांगे गरुडध्वज ।
ज्यावेगळें आप्तकाज । अधोक्षज बोलेना ॥ ५२ ॥
आपली गुप्त गोष्ट श्रीकृष्ण नेहमी ज्याच्यापाशीच सांगत असे, आपलें हितगुज श्रीकृष्ण ज्याच्यावांचून दुसऱ्या कोणापाशींच सांगत नसे ५२;

ज्याच्या वचनासी विलंबु । क्षण न करीच रमावल्लभु ।
जो ब्रह्मादिकां दुर्लभु । तो जाहला सुलभु उद्धवा ॥ ५३ ॥
त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याला त्या रमावल्लभाने एक क्षणाचाही विलंब केला नाही. ब्रह्मदेवादिकांनाही जो दुर्लभ, तो परमात्मा त्या उद्धवाला अगदी सुलभ झाला होता ५३.

यालागीं ‘भृत्यमुख्यता’ । आली उद्धवाचे हाता ।
तेणें प्रार्थूनियां भगवंता । ‘स्वकर्में मुक्तता’ पुशिली ॥ ५४ ॥
ह्याकरितां सेवकांतील प्रमुखत्व ह्या जगांत एका उद्धवाच्याच हाती आले होते म्हणून त्यानेच भगवंताची प्रार्थना करून स्वकर्मानेंच मुक्तता कशी होते, हा प्रश्न विचारला ५४.

हो कां ज्याचेनि प्रश्नधर्मे । जग उद्धरिलें यथानुक्रमें ।
ज्यालागीं गा पुरुषोत्तमें । मोक्ष स्वधर्मे प्रकटिजे ॥ ५५ ॥
अहो ! त्याच्या प्रश्नाच्या योगाने सर्व जगाचा क्रमाने उद्धार झाला, आणि त्या उद्धवाकरितांच श्रीकृष्णांनी स्वधर्मानेंच मोक्ष कसा प्राप्त होतो हे स्पष्ट सांगितले ५५.

स्वधर्म करितां स्वभावतां । निजमोक्ष लाभे आयिता ।
एवढ्या उपकाराची कथा । उद्धवें तत्त्वतां पुशिली ॥ ५६ ॥
खरोखर स्वाभाविक स्वधर्माचे आचरण केले असतां मोक्षाचा आयता लाम होतो. एवढ्या उपकाराची कथाच तत्त्वतः उद्धवाने विचारली ५६.

ऐकोनि चातकांचे वचन । गर्जोनि वर्षे जेवीं घन ।
कां वत्सहुंकारें जाण । ये हुंबरेन धेनु जैशी ॥ ५७ ॥
चातकाचा शब्द ऐकला की, मेघ ज्याप्रमाणे गर्जना करून जलाची वृष्टि करितो, किंवा वासराचा हुंकारा ऐकला की गाय जशी हंबरत येते ५७,

तेवीं ऐकोनि उद्धवाच्या बोला । श्रीकृष्ण निजबोधें गर्जिन्नला ।
अतिस्वानंदें संतोषला । काय बोलिला गोविंदु ॥ ५८ ॥
त्याप्रमाणे उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्णाने आत्मज्ञानाची गर्जना केली आणि आत्मानंदाने अगदी प्रसन्न होऊन श्रीकृष्ण काय म्हणाला ते आतां ऐका ५८.

श्रीभगवानुवाच-
धर्म्य एष तव प्रश्नो नैःश्रेयसकरो नृणाम् ।
वर्णाश्रमाचारवतां तमुद्धव निबोध मे ॥ ९ ॥
[श्लोक ९] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – हे उद्धवा ! तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या व आश्रमांच्या माणसांना परम कल्याणस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे म्हणून मी तुला त्या धर्मांविषयी सांगतो ऐक. (९)

जेवीं कां पुत्र एकुलता । त्यासी कांहीं वंचीना माता ।
तेवीं उद्धव श्रीकृष्णनाथा । त्याचें वचन वृथा हों नेदी ॥ ५९ ॥
ज्याप्रमाणे एकुलता एक पुत्र असला म्हणजे आई त्याचा कोणताही शब्द व्यर्थं जाऊ देत नाही त्याप्रमाणेच उद्धव श्रीकृष्णाचा लाडका होता. त्याचे भाषण तो व्यर्थ जाऊं देईना ५९.

हरिखें म्हणे सारंगपाणी । धन्य धन्य उद्धवा तुझी वाणी ।
मोक्षमार्गींची निशाणी । हे जनालागोनी त्वां केली ॥ ६० ॥
श्रीहरि आनंदाने म्हणाले, उद्धवा ! तुझी वाणी मोठी धन्य होय. तूं सर्व लोकांसाठी मोक्षमार्गाची ही शिडीच करून दिलीस ६०.

तुझ्या प्रश्नाचें प्रश्नोत्तर । वर्णाश्रमी जे कोणी नर ।
त्यांसी स्वधर्मचि मोक्षकर । ऐक साचार सांगेन ॥ ६१ ॥
तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की, जे कोणी वर्णाश्रमी पुरुष आहेत, त्यांना स्वधर्म हाच मोक्षकर होतो. तो कसा? तेही निश्चयेंकरून सांगतों ऐक ६१.

कल्पादिपासोनि स्वधर्मसंस्था । पुरातनयुगवर्ती कथा ।
तुज मी सांगेन तत्त्वतां । ऐक आतां उद्धवा ॥ ६२ ॥
उद्ध्वा ! कल्पाच्या आरंभापासून प्रवृत्त झालेल्या स्वधर्मसंस्थेची पुरातन युगापासूनची कथा आता तत्त्वत: तुला मी सांगतो. उद्धवा ! ती आतां ऐक ६२.

आदौ कृतयुगे वर्णो नृणा हंस इति श्रुतः ।
कृतकृत्याः प्रजा जात्या तस्मात्कृतयुगं विदुः ॥ १० ॥
वेदः प्रणव एवाग्रे धर्मोऽहं वृषरूपधृक् ।
उपासते तपोनिष्ठा हंसं मां मुक्तकिल्बिषाः ॥ ११ ॥
[श्लोक १०-११] या कल्पाच्या आरंभी, सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता त्यावेळी सर्वजण जन्मतःच कृतकृत्य होते म्हणूनच त्याचे नाव कृतयुग असेही आहे. (१०)
त्यावेळी फक्त प्रणवच. (ॐकार) वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया व सत्य अशा चार चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो त्यावेळचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते. (११)

पूर्वील कृतयुगींचें लक्षण । तैं नव्हते गा चारी वर्ण ।
बहुशाखा वेदपठण । कर्माचरण तैं नाहीं ॥ ६३ ॥
पूर्वी कृतयुगांतील स्थिति अशी होती की, त्या वेळी चार वर्ण मुळीच नव्हते, अनेक शाखांचे वेदाध्ययन, किंवा कर्माचरणही तेव्हां नव्हते ६३.

तैं सकळ मनुष्यांसी जाण । `सोहंहंसा’ चें अखंड ध्यान ।
यालागीं `हंस’ हा एकचि वर्ण । सर्वांसही जाण ते काळीं ॥ ६४ ॥
त्यावेळी सारे लोक ‘सोहं हंसा’चे म्हणजे मीच ब्रह्म असेंच निरंतर ध्यान करीत असत. म्हणून त्या वेळी सर्वांचा ‘हंस’ हा एकच वर्ण होता ६४.

तैं `प्रणवमात्रें’ वेदपठण । वृषरूपें मी आपण ।
धर्म चतुष्पाद संपूर्ण । अधर्माचें जाण नांवही नाहीं ॥ ६५ ॥
त्या वेळी ‘ओंकार ‘ रूपानेच वेदपठण होत असे; व तप, दया, सत्य व शुद्धता या चार पायांनी परिपूर्ण असा वृषभरूपी धर्म मीच होतो. त्यावेळी अधर्माचें नांवसुद्धा नव्हते, हे लक्षात ठेव ६५.

ते काळीं श्रेष्ठ सत्त्वगुण । यालागीं सत्यवादी जन ।
अवघे धर्मपरायण । कपट तैं जाण जन्मलें नाहीं ॥ ६६ ॥
त्या वेळी सत्त्वगुणच श्रेष्ठ होता. म्हणून सारे लोक सत्यानेच चालणारे असत. सारेच लोक धर्मपरायण लोक होते. कपट तेव्हां जन्मालाच आलेले नव्हतें ६६.

परद्रव्य आणि परदारा । यांच्या अभिलाषाचा थारा ।
स्पर्शला नाहीं जिव्हारा । ते काळींच्या नरां धर्मिष्ठां ॥ ६७ ॥
त्या काळच्या धर्मनिष्ठ लोकांच्या अंत:करणाला परद्रव्य आणि परदास यांचा अभिलाष शिवतही नसे ६७.

ते काळींच्या जना धर्मिष्ठां । `सोहंहंसा’ ची आत्मनिष्ठा ।
हेंचि भजन मज वरिष्ठा । `तपोनिष्ठा’ तया नांव ॥ ६८ ॥
त्यावेळच्या धर्मशील लोकांची ‘परब्रह्म ते मीच’ अशी आत्मस्वरूप निष्ठा असे. हेच माझे श्रेष्ठ भजन होय, आणि यालाच ‘तपोनिष्ठा’ म्हणतात ६८.

तैं स्वर्गा जावें हे नाहीं कथा । नेणती नरकाची वार्ता ।
अधर्माची अवस्था । स्वप्नीहीं चित्ता स्पर्शेना ॥ ६९ ॥
त्यावेळी स्वर्गास जाण्याची गोष्टच नाही व नरकाचीही वार्ता नाही. आणि अधर्म करण्याचे स्वप्नांत सुद्धा मनामध्ये येत नसे ६९.

यापरी प्रजा समस्त । स्वधर्मस्वभावें कृतकृत्य ।
यालागीं जाण निश्चित । त्यातें बोलिजेत `कृतयुग’ ॥ ७० ॥
अशा रीतीनें सारी प्रजा स्वधर्माचरणानेच कृतकृत्य झालेली असे. म्हणूनच खरोखर त्याला ‘कृतयुग’ असे म्हणतात ७०.

त्रेतामुखे महाभाग प्रणान्मे हृदयात्रयी ।
विद्या प्रादुरभुत्तस्या अहमासं त्रिवृन्मखः ॥ १२ ॥
[श्लोक १२] हे उद्धवा ! त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रगट झाले त्यांपासून होता, अध्वर्यू व उद्‌गाता हे कर्मरूप तीन भेद असणार्‍या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो. (१२)

उद्धवा या कलियुगाच्या ठायीं । तुझ्या भाग्याची परम नवायी ।
कृतयुगींच्या प्रजांपरीस पाहीं । तुज माझ्याठायीं विश्वास ॥ ७१ ॥
उद्धवा ! या कलियुगामध्ये तुझ्या भाग्याचे मोठे नवल वाटते. कारण कृतयुगांतील लोकांपेक्षाही तुझा माझ्या ठिकाणी अधिक विश्वास आहे ७१.

त्रेतायुगीं प्रकटलें कर्म । जो वैराज मी पुरुषोत्तम ।
त्या माझेनि निःश्वासें त्रयीधर्म । वेदसंभ्रम वाढला ॥ ७२ ॥
त्रेतायुगामध्ये कर्म प्रकट झाले. विराटस्वरूप जो मी पुरुषोत्तम, त्या माझ्या श्वासोच्या श्वासोच्छवासापासून तीन वेद उत्पन्न झाले आणि त्या वेदांचा विस्तार झाला ७२.

तेथ त्रैविद्या विविध भेद । नाना मंत्र नाना छंद ।
ऋग्वेदादि तिन्हीं वेद । प्रकटले प्रसिद्ध निजशाखीं ॥ ७३ ॥
तेव्हां तीन प्रकारच्या विद्या व त्यांचे नानाप्रकारचे भेद, अनेक मंत्र व अनेक छंद आणि ऋग्वेद आदिकरून तिन्ही वेद आपापल्या शाखेनें उदयास आले ७३.

त्या वेदांपासाव त्रिविध मख । त्रिमेखलायुक्त मीचि देख ।
जेथ होत आध्वर्यव हौत्रिक । कर्मविशेख जे ठायीं ॥ ७४ ॥
त्या वेदांपासून तीन मेखळांनी युक्त असे तीन यज्ञ उत्पन्न झाले. ते मद्रूपच आहेत. या यज्ञात अध्वयु उद्गाता यांचे विशिष्ट कर्म होऊ लागले ७४.

ऐसें मद्‌रूप यज्ञकर्म । तेथिल्या अधिकाराचें वर्म ।
दों श्लोकीं पुरुषोत्तम । वर्णाश्रम सांगत ॥ ७५ ॥
अशा प्रकारचे जे यज्ञकर्म तेही मद्रूपच होय. त्यांतील अधिकाराचे वर्म म्हणजे वर्णाश्रमाचे वर्णन पुढील दोन श्लोकांमध्ये श्रीकृष्ण सांगत आहेत ७५.

विप्रक्षत्रियविट्शूद्रा मुखबाहूरुपादजाः ।
वैराचात्पुरुषाज्जाता य आत्माचारलक्षणाः ॥ १३ ॥
[श्लोक १३] हविराट पुरूषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खूण होती. (१३)

वैराजपुरुषापासाव जाण । मुखीं उपजले `ब्राह्मण’ ।
बाहूपासूनि `राजन्य’ । ऊरु जन्मस्थान `वैश्यांचें’ ॥ ७६ ॥
विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण जन्मास आले; बाहूपासून क्षत्रिय; आणि मांड्या हे वैश्यांचे जन्मस्थान होय ७६.

`शूद्र’ चरणीं जन्मले जाण । यापरी जाहले चारी वर्ण ।
यांचें ऐक मुख्य लक्षण । स्वधर्माचरण सर्वांशीं ॥ ७७ ॥
शुद्र हे पायापासून उत्पन्न झाले, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे हे चारी वर्ण झाले आहेत. त्यांनी आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करावें हेंच त्यांचे एक मुख्य लक्षण होय ७७.

चतुर्वर्णांची उत्पत्ती । वैराज पुरुषापासूनि या रीतीं ।
आतां आश्रमांची स्थिती । ऐक निश्चितीं सांगेन ॥ ७८ ॥
अशा रीतीने विराट पुरुषापासून चारही वर्णांची उत्पत्ति झाली आहे. आता चार आश्रमांची स्थिति निश्चयपूर्वक सांगतो, ती ऐक ७८.

गृहाश्रमो जघनतो ब्रह्मचर्यं हृदो मम ।
वक्षःस्थानात् वने वासो न्यासः शीर्षणि संस्थित ॥ १४ ॥
[श्लोक १४] विराट पुरूषरूप माझ्या जघनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षःस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली. (१४)

‘गृहास्थाश्रमासी’ जघनस्थान । ‘ब्रह्मचर्य’ माझ्या हृदयीं जाण ।
‘वानप्रस्थासी’ मी आपण । वाढवीं महिमान वक्षः स्थळीं ॥ ७९ ॥
माझ्या कमरेखालचा भाग हा गृहस्थाश्रमाचा होय. ब्रह्मचर्य हे माझ्या हृदयस्थानी आहे. आणि वानप्रस्थाचा महिमा मी स्वतः वक्षःस्थळावर वाढवितों ७९.

चतुर्थाश्रम जो ‘संन्यास’ । त्याचा माझे शिरीं रहिवास ।
एवं वर्णाश्रमविलास । तुज सावकाश सांगितला ॥ ८० ॥
चतुर्थाश्रम, ज्याला ‘संन्यास’ असे म्हणतात, त्याचे वास्तव्य माझ्या मस्तकावर असते. अशा प्रकारे वर्णाश्रमाची व्यवस्था यथार्थ रीतीने तुला सांगितली ८०.

वर्णानामाश्रमाणां च जन्मभूम्यनुसारिणीः ।
आसन्प्रकृतयो नॄणां नीचैर्नीचोत्तमोत्तमैः ॥ १५ ॥
[श्लोक १५] या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणांनुसार उत्तम, मध्यम आणि अधम असे झाले. (१५)

जैसें जन्म जैसें स्थान । त्या वर्णाश्रमा तैसे गुण ।
उत्तमीं उत्तमत्व जाण । नीचीं नीचपण सहजेंचि ॥ ८१ ॥
जसें जन्म व जसें स्थान असते, त्याप्रमाणे त्या त्या वर्णाश्रमामध्येही गुण असतात. उत्तम स्थान असले तर गुणही उत्तमच असतात, व नीच स्थान असले म्हणजे गुणही साहजिकच नीच होतात ८१.

‘सत्त्वप्राधान्ये’ ब्राह्मण । ‘सत्त्वरजें’ क्षत्रिय जाण ।
‘रजतमें’ वैश्यवर्ण । शूद्र ते जाण ‘तमोनिष्ठ’ ॥ ८२ ॥
सत्त्वगुण प्रधान असला म्हणजे ब्राह्मण होतात; सत्त्व आणि रज यांच्या मिश्रणानें क्षत्रिय होतात; रज आणि तम यांच्या मिश्रणाने वैश्य उत्पन्न होतात. आणि शूद्र ते केवळ तमोगुणनिष्ठ असतात ८२.

तेचि ब्राह्मणादि चारी वर्ण । त्यांचें प्रकृतींचे लक्षण ।
वेगळें वेगळेंचि पैं जाण । स्वयें नारायण सांगत ॥ ८३ ॥
ब्राह्मण आदिकरून चारही वर्ण आणि त्यांच्या स्वभावाचे लक्षण वेगवेगळे स्वतः श्रीकृष्ण पुढील श्लोकांत सांगतात ८३.

शमो दमस्तपः शौचं सन्तोषः क्षान्तिरार्जवम् ।
मद्‍भक्तिश्च दया सत्यं ब्रह्मप्रकृतयस्त्विमाः ॥ १६ ॥
[श्लोक १६] शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मणवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१६)

उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ब्राह्मणप्रकृति दशलक्षण ।
तुज मी सांगेन निरूपण । तें सावधान अवधारीं ॥ ८४ ॥
श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, ब्राह्मणांच्या स्वभावांत दहा लक्षणे असतात. त्याचे वर्णन मी तुला सांगतों लक्ष देऊन श्रवण कर ८४.

मनादि ज्ञानेंद्रियवृत्ती । बाह्य दृष्टीं परिचारस्थिती ।
ते आवरूनि विवेकयुक्तीं । आत्मप्रतीति धरावी ॥ ८५ ॥
मन आदिकरून ज्ञानेंद्रियांच्या ज्या वृत्ति आहेत. त्या बाह्यदृष्टीनेच नेहमी वावरत असतात; त्यांना विवेकानें आवरून आत्मस्वरूपांत स्थिर व्हावे ८५.

तेचि वृत्तीचें धरणें ऐंसें । कृष्णसर्पाचें मुख धरणें जैसें ।
तो वेढे उकली जंव आपैसें । तव धारणासौरसें नेहटावा ॥ ८६ ॥
आतां तशी वृत्ति सावरून धरणे म्हणजे कृष्णसर्पांचे तोंड आवळून धरण्याप्रमाणेच आहे. तो घातलेले वेढे आपोआपच सोई लागेपर्यंत त्याचे तोंड आवळीत असावें ८६.

तेवीं वैराग्यप्रतापवशें । गुरुवचनाचेनि विश्वासें ।
अंतरवृत्तीतें नेहटावें ऐसें । जंव ये आत्मासमरसें निजात्मता ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे वैराग्याच्या सामर्थ्याने आणि गुरुवचनाच्या विश्वासाने आत्मस्वरूपात ऐक्य होईपर्यंत अंतवृत्तीला नेटीत असावें ८७.

मुख्य करूनि गुरुवचन । तदर्थी बुद्धि निमग्न ।
तत्प्रवण होय मन । ‘शम’ तो जाण या नांव ॥ ८८ ॥
गुरुवचन हेच मुख्य धरून त्यातच बुद्धीला निमग्न करून सोडणे आणि मनालाही तल्लीन करणे ह्याचेंच नांव ‘शम’ हे लक्षात ठेव ८८.

ब्राह्मणप्रकृतिमाजीं जाण । हें स्वाभाविक निजलक्षण ।
या नांव गा शमगुण । ऐक निरूपण दमाचें ॥ ८९ ॥
ब्राह्मणाच्या प्रकृतीमध्ये हा गुण स्वभावसिद्धच असतो. त्याच सणाला ‘शम’ असे नाव आहे. आतां दमाचे निरूपण ऐक ८९.

विषयप्रवृत्ति प्रचंड । कर्मेंद्रियांचें बळ बंड ।
विधीनें त्यांचें ठेंवूनि तोंड । सैरा वितंड विचरों नेदी ॥ ९० ॥
विषयप्रकृति बलवत्तर असते : आणि कर्मेंद्रियांचे बंड दांडगे असतें , ह्याकरितां शास्त्रविधीने त्यांचे तोंड ठेचून त्यांना सैरावैरा भडकूं देऊ नये ९०.

वेदविधीचेनि हातें । देहनिर्वाहापुरतें ।
खाणें जेवणें इंद्रियांतें । तो जाण येथें ‘दम’ गुण ॥ ९१ ॥
वेदविधीच्या द्वारे देहाच्या निर्वाहापुरतें मात्र इंद्रियांना जेवणखाण द्यावयाचे, हा ‘दमगुण’ होय ९१.

तेथ शम तो जाण मुख्य राजा । दमादि इतर त्याच्या प्रजा ।
ते दोनी सांगितले वोजा । ऐक तिजा तपोनेमु ॥ ९२ ॥
त्यांत ‘शम’ हा मुख्य राजा आहे व ‘दम’ वगैरे त्याच्या प्रजा आहेत असे समजावे. हे दोन्ही यथायोग्य रीतीने तुला सांगितले. आता तिसरा जो ‘तपोनियम’ तोही ऐक ९२.

शमें ज्ञानेंद्रियौपशमु । तेचि कर्मेंद्रियां मुख्य दमु ।
याहीवरी वेदोक्त कर्मु । तें ज्ञान परमु गौरवाचें ॥ ९३ ॥
शमाने ज्ञानेंद्रियांना शांति आणि दमाने कर्मेद्रियांना शांति प्राप्त होते. यानंतर म्ह. शमदमानंतर वेदोक्त कर्म करणे, ते ज्ञान फारच प्रशंसनीय होय ९३.

शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरूप ।
हृदयीं हरि चिंतणें सद्रूप । हें मुख्य तप तपांमाजीं ॥ ९४ ॥
व्रतादिकांच्या योगानें शरीरशोषण करणे ह्याचे नांव ‘तप’; पण तें प्रारब्धानुरूप घडत असते. वस्तुतः हृदयामध्ये श्रीहरीचें सत्स्वरूप चिंतन करणे हेच सर्व तपांमध्ये श्रेष्ठ तप होय ९४.

जो वर्ततां स्वधर्मस्थितीं । हरितें विसंबेना निजवृत्ती ।
जो निजात्मनिश्चयो चित्तीं । अहोराती विवंचित ॥ ९५ ॥
जो स्वधर्माने वागत असून हरीला अंत:करणांत विसरत नाहीं, जो अहोरात्र मनामध्ये आत्मस्वरूपनिश्चयाचीच विवंचना करीत असतो ९५.

जेवीं लोभिया वाहे धन । कां तरुणालागीं तरुणी जाण ।
तैसें निजात्मविवंचन । जयाचें मन सदा करी ॥ ९६ ॥
लोभी ज्याप्रमाणे नेहमी द्रव्याचेच चिंतन करतो, किंवा तरुण स्त्री ज्याप्रमाणे तरुणाचेच चिंतन करते, त्याप्रमाणे ज्याचे ‘मन’ सदासर्वदा आत्मस्वरूपाचाच विचार करीत राहतें ९६.

त्या नांव गा तपोनिष्ठ । हें तपांमाजी तप वरिष्ठ ।
ब्राह्मणप्रकृतीमाजीं श्रेष्ठ । ‘तप’ तें उद्‍भट या नांव ॥ ९७ ॥
त्यालाच ‘तपोनिष्ठ’ म्हणतात. हे तप सर्व तपांमध्ये श्रेष्ठ होय. ब्राह्मणस्वभावांतील ह्या श्रेष्ठ गुणालाच ‘उज्ज्वल तप’ असे म्हणतात ९७.

ऐक ‘शौचा’ चा निचार । तो आहे द्विप्रकार ।
अंतरि ज्ञाननिर्धार । बाह्य आचार वेदोक्त ॥ ९८ ॥
आतां शौचाचा म्हणजे पवित्रतेचा विचार ऐक. त्यामध्ये दोन प्रकार आहेत; अंत:करणामध्ये ज्ञानाचा निश्चय आणि बाहेर वेदोक्त आचार ९८.

बाह्य मळाचें क्षाळण । मृज्जलादि वेदविधान ।
आंतर मळाचें निर्दळण । आत्मज्ञान निजनिष्ठा ॥ ९९ ॥
शरीरावर बाह्य मळ असतात, त्यांचे क्षालन वेदविधानाप्रमाणे मृत्तिका व जल इत्यादिकांनी करावे आणि आत्मज्ञाननिष्ठेनें अंत:करणांतील मल धुऊन काढावेत ९९.

शुद्ध शौचाचें निर्मळपण । मुख्यत्वें उद्धवा हेंचि जाण ।
आतां संतोषाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १०० ॥
उद्धवा! ह्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मलपणा मिळवणे हेच शौचाचे मुख्य लक्षण होय. आतां संतोषाचेही संपूर्ण लक्षण सांगतों ऐक १००.

पुत्र जन्मल्या होय सुख । तो गेलिया सवेंचि दुःख ।
धन जोडलिया होय हरिख । सवेंचि शोक तन्नाशीं ॥ १ ॥
पुत्र जन्मास आला असतां आनंद वाटतो; व तो गेला की लगेच दुःख होते; द्रव्य मिळाले म्हणजे हर्ष होतो, आणि तें गेलें की तत्काळ दुःख होते १.

ज्या सुखाची होतां भेटी । निःशेष मावळे दुःखकोटी ।
या नांव ‘सत्यसुख’ सृष्टी । इतर चावटी ते मिथ्या ॥ २ ॥
पण ज्या सुखाची प्राप्ति होतांच कोटि दुःखें निखालस मावळून जातात, त्याचंच नांव खरें व शाश्वत सुख होय. ह्याशिवाय इतर जी बडबड ती व्यर्थ होय २.

निरुपचार अंतरगती । मद्‍भावें जे सुखप्राप्ती ।
जाहलिया संपत्ती विपत्ती । जे संतोषप्राप्ती समसाम्यें ॥ ३ ॥
माझ्या भक्तीनें अंत:करणांत जें स्वाभाविक सुख प्राप्त होते, ते संपत्ति किंवा विपत्ति आली तरी सर्वत्र समभाव झाल्याने संतोषच उत्पन्न करतें ३.

येचि पदीं पाठांतर । ‘तितिक्षा’ म्हणती थोरथोर ।
ऐक त्याचेंही अर्थांतर । पदार्थविचार तो ऐसा ॥ ४ ॥
ह्या शब्दांमध्ये कोठे पाठभेद आढळतो. मोठमोठे विद्वान् लोक संतोषाऐवजी ‘तितिक्षा’ म्हणतात. त्याचाही अर्थ ऐक ४.

शीत-उष्ण-मृदु-कठीण । अंगीं आदळातांही जाण ।
ज्याचें डंडळीना मन । भावना पूर्ण मद्‍भावें ॥ ५ ॥
त्यांतील रहस्य हें की, थंडी व उन्ह, मृदु व कठीण ह्यांपैकी काहीही येऊन अंगावर कोसळले तरी त्याचे मन डळमळत नाहीं ५.

संतोषतितिक्षा-व्याख्यान । हें पांचव्या पदाचें लक्षण ।
उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । ऐक निरूपण शांतीचें ॥ ६ ॥
ह्याचे कारण ह्या द्वंद्वांमध्ये त्याची मद्भावना असते. संतोष किंवा तितिक्षा ह्याचे निरूपण हें ह्या श्लोकांतील पांचव्या शब्दाचे लक्षण आहे. इतकें सांगून उद्धवाला श्रीकृष्ण म्हणाले, आतां शांतीचे निरूपण ऐक ६.

माझा निर्धारितां निजबोध । अंतरीं निमाले कामक्रोध ।
त्यांसी केलियाही अपराध । न मनीं विरुद्ध पुढिलांचें ॥ ७ ॥
माझा निजबोध हृदयांत ठसला म्हणजे अंतःकरणांतील कामक्रोध नाहीसे होतात. कोणी अपराध केला तरी त्याचे त्यांना काही विरुद्ध असें वाटतच नाही ७.

परी तेथींची नवलपरी । अपकार्‍या होय उपकारी ।
विकार नाहीं ज्याचे अंतरीं । जाण ते खरी ‘निजशांति’ ॥ ८ ॥
उलट आश्चर्य हें की, तो अपकाऱ्याला उपकारी होतो. त्याच्या अंत:करणांत विकार म्हणून उत्पन्नच होत नाही, तीच खरी ‘शांति’ होय ८.

ऐशी सदा शांति संपूर्ण । तें ब्राह्मणाचें षष्ठ लक्षण ।
ऐक आर्जवाचें निरूपण । जीवींची खूण सांगेन ॥ ९ ॥
अशा प्रकारची सदासर्वकाल परिपूर्ण शांति असणे हे ब्राह्मणाचे सहावें लक्षण होय. आतां आर्जवाचे लक्षण ऐक. त्यांत अगदी अंतःकरणांतील खूणच सांगून देतों ९.

कुरूप जरी जाहली माता । तरी स्नेहासीं नाहीं कुरूपता ।
कां सुवर्णाचे नाग करितां । सोनें सर्वथा नव्हे सर्पु ॥ ११० ॥
हे पहा, आई जरी कुरूप असली, तरी तिच्या ममतेत कांहीं कुरूपता नसते. किंवा सोन्याचा नाग केला, तर सोने कांही कधी साप होत नाही ११०.

तेवीं कुटिलांसी कुटिलता । करावी म्हणोनि शिकवितां ।
कुटिलत्व नुपजे चित्ता । जाण तत्त्वतां तें ‘आर्जव’ ॥ ११ ॥
त्याप्रमाणे कुटिलाशी कुटिलपणानेच वागले पाहिजे, असें शिकवू लागले तरीसुद्धा ज्याच्या मनामध्ये कुटिलपणा येत नाही, तेच खरोखर ‘आर्जव’ म्ह० ऋजुता (सरळपणा) होय ११.

गायीसी गोड व्याघ्रासी कडू । हा गंगाजळी नाहीं पवाडु ।
तेवीं आर्जवाचा पडिपाडु । विषमांही गोडु समसाम्यें ॥ १२ ॥
गाईला तेवढे गोड व्हावे आणि वाघाला कडू व्हावे असा भेद गंगोदकांत नाही. त्याप्रमाणेच आर्जवाची गोष्ट आहे. ते ऐक्यभावनेने कुटिलापाशी गोडच होऊन राहते १२.

या नांव जाण ‘आर्जव’ । सातवें लक्षण अपूर्व ।
आतां निजभक्तीचा स्वभाव । देवाधिदेव सांगत ॥ १३ ॥
ह्याचे नांव आर्जव आणि हेच ब्राह्मणाचें सातवें अद्भुत लक्षण होय. आता निजभक्तीचे लक्षण देवाधिदेव सांगतात १३.

वन उद्यान गंगादि जीवन । यांसी पृथ्वीचि जेवीं अधिष्ठान ।
तेवीं सकळ लक्षणां जन्मस्थान । माझी ‘भक्ति’ जाण उद्धवा ॥ १४ ॥
अरण्य, उद्यान आणि गंगेचे उदक ह्या सर्वांना पृथ्वीच जशी आधारभूत आहे, त्याप्रमाणे उद्ध्वा ! साऱ्या लक्षणांचे उत्पत्तिस्थान माझी भक्तीच आहे असे समज १४.

सकळ पिकांचिये प्राप्ती । आधारभूत जेवीं क्षिती ।
तेवीं सकळ लक्षणां उत्पत्ती । माझिये भक्तीमाझारीं ॥ १५ ॥
सारी पिकें उत्पन्न व्हावयाला आधारभूत जशी पृथ्वी, त्याप्रमाणे इतर सर्व लक्षणांची उत्पत्ति भक्तीमधूनच १५.

ऐक ते भक्तीचा इत्यर्थ । सांडोनियां विषयस्वार्थ ।
जीवींहूनि मजलागीं भावार्थ । तोचि निजभक्त पैं माझा ॥ १६ ॥
त्या भक्तीचे लक्षण ऐक. विषयाचा स्वार्थ सोडून देऊन जो जिवाभावापासून मजवर भाव ठेवतो, तोच माझा भक्त होय १६.

भक्त आणि करी धनार्जन । हेंचि भक्तिसी मुख्य विघ्न ।
धनलोभी तो अभक्त पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥ १७ ॥
भक्त म्हणावयाचे आणि धनार्जन करावयाचे, हेच भक्तीला मुख्य विघ्न आहे. उद्धवा ! धनलोभी म्हटला की तो निखालस अभक्त म्हणून समजावा १७.

माझा भाव नाहीं जिव्हारीं । आहाचवाहाच माझी भक्ति करी ।
तो आंधळ्या गरुडाचे परी । उडे परी निर्धारीं स्थान नेणे ॥ १८ ॥
अंत:करणांत माझी भक्ति नाही, आणि दांभिकतेनें जो माझी भक्ति करितो तो आंधळ्या गरुडपक्ष्याप्रमाणे आकाशांत भरारी मारतो, पण बसण्याचे ठिकाण त्याला समजत नाही १८.

माझा भावार्थ जेथ होये । तेथ मी जाती कुळ न पाहें ।
मी भावाचेनि लवलाहें । वश्य होयें निजभक्तां ॥ १९ ॥
जेथे माझी भक्ति असते. तेथे मी जाति किंवा कुळ पहात नाही. मी माझ्या भक्तांना भक्तीनेच त्वरित वश होतो १९.

जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी ।
जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्‍भक्तीची ॥ १२० ॥
जेथें भक्तिभावाने माझी आवड असते तेथें अवश्य माझी उडी पडते. भावार्थाची ज्याने गुढी उभारली तोच माझ्या भक्तीची गोडी जाणतो २०.

जें जें भेटे तोचि देवो । ऐसा भावार्थीं ज्याचा भावो ।
तो एक पढियंता मज पहा हो । त्याचेनि भावें जीवों आम्ही उद्धवा ॥ २१ ॥
जें जें दिसेल ते ते देवच आहे अशा भावनेने ज्यांचा भक्तिभाव आहे, तोच एक माझा आवडता होय. उद्धवा ! त्याच्याच भक्तीने आम्ही जगत असतो २१.

तोचि माझा जीवप्राण । त्यासी मी सर्वस्वें करीं निंबलोण ।
मी सर्वदा त्याआधीन । जेवीं व्याली धेनु वत्सासी ॥ २२ ॥
माझा जीव प्राण तोच. त्याच्यावरून मी सर्वस्व ओवाळून टाकतो. व्यालेली गाय जशी सर्वदा वासराच्या अधीन असते, त्याप्रमाणे मीही त्याच्या अधीन असतो २२.

एवं निःसीम भावार्थाची स्थिती । त्या नांव उद्धवा माझी ‘भक्ती’ ।
यापरी भक्तीची व्युत्पत्ती । ऐक पां ख्याती दयेची ॥ २३ ॥
तात्पर्य, उद्धवा ! निःसीम अशी भाविकपणाची अवस्था तिचंच नांव माझी भक्ति. ह्याप्रमाणे भक्तीचे लक्षण आहे. आतां दयेचे स्वरूप ऐक २३.

बाळक देखोनि संकटीं । जेवीं न सांवरत माय उठी ।
तेवीं दीन देखोनि दृष्टीं । ज्याचे पोटीं दया द्रवे ॥ २४ ॥
मूल संकटांत पडलेले पाहिले म्हणजे ज्याप्रमाणे आई ते दुःख असह्य होऊन तत्काळ साहाय्याकरितां उठते त्याप्रमाणे कोणी दीन दृष्टीस पडला की, ज्याच्या पोटांत दया उत्पन्न होते २४,

ऐशिया दयेच्या ठायीं जाण । आपुलें पारकें पुसे कोण ।
स्वजाति-विजातिलक्षण । पुसायाही पण धीर नाहीं ॥ २५ ॥
अशी दया उत्पन्न झाली म्हणजे मग आपलें आणि परके कोण विचारतो ? हा आपल्या जातीचा आहे की परक्या जातीचा आहे इतकी चौकशी करण्याइतकाही धीर त्याला नसतो २५.

महापूरीं बुडतयातें । कृपाळू जाती न पुसे तेथें ।
उडी घालूनि वांचवी त्यातें । ‘दया’ निश्चितें ती नांव ॥ २६ ॥
महापुरांत बुडत असणाऱ्याला दयाळू मनुष्य त्याची जात कोणती आहे हे विचारीत बसत नाही, आधी उडी टाकून त्याला वाचवितो. याचेच नाव खरी दया २६.

दीनाचिये दयेलागीं । जो रिघे जळत्या आगीं ।
त्याचे चरण मी वंदीं वेगीं । धन्य जगीं दयाळू ॥ २७ ॥
दीनावर ‘दया’ करण्यासाठी जो जळत्या आगीतसुद्धा उडी घालतो, त्याचे मी चरण वंदन करतो. जगामध्ये दयाळू मनुष्य धन्य होय २७.

ऐशिये दयेचेनि गुणें । मज अनंतालागीं तेणें ।
विकत घेतलें जीवें प्राणें । कीं जाहलों पोसणें मी त्याचें ॥ २८ ॥
अशा दयेच्या गुणाने मला अनंताला त्याने जीवाभावासह विकतच घेतलेले असते. किंवा मी त्याचा पोसणाच झालेला असतो २८.

यालागीं दयाळुवाचे घरीं । मी सदा नाटिका काम करीं ।
जे दयावंताचे अवसरीं । तें माझे शिरीं सर्वदा ॥ २९ ॥
म्हणून दयाशील मनुष्याच्या घरी मी पाहिजे तें काम करतो. दयाळू मनुष्यावर जो जो काही प्रसंग येतो, तो नेहमी माझ्याच माथ्यावर असतो २९.

जो जाणे दीनांचा विचार । दीनदयाळू जो साचार ।
उद्धवा तो माझें निजभांडार । सुखाचें सुखसार तो माझें ॥ १३० ॥
उद्धवा! जो दीनजनाचा विचार करतो, जो खरोखर दीनदयाळू असतो, तो माझे केवळ भांडार होय. तो माझे केवळ सुखाचे सार होय १३०.

या नांव गा ‘दया’ जाण । तें हें नववें लक्षण ।
आतां सत्याची उणखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ३१ ॥
ह्याचें नांव ‘दया’ हे लक्षात ठेव. हेच ते नववे लक्षण. आता सत्याचे संपूर्ण लक्षण तुला सांगतों ऐक. ३१

सत्याचें सत्यत्व तें ऐसे । जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें ।
ज्यासी असत्यता न स्पर्शे । निजसत्य ऐसें निडारिलें ॥ ३२ ॥
सत्याचा सत्यपणा असा आहे की, जागृती स्वप्नं किंवा सुषुप्तीमध्येसुद्धा ज्याला असत्यपणा शिवत नाही हेच परिपक्व झालेले ‘सत्य’ होय ३२.

ऐसें सत्य परिपक्वल्या पोटीं । सत्य वाचा सत्य दृष्टी ।
निजसत्यत्वें सत्य सृष्टी । पडिली तुटी असत्याची ॥ ३३ ॥
अशा प्रकारचे सत्य अंत:करणांत पूर्णतेस पोंचलें म्हणजे वाणीही सत्य होते व दृष्टीही सत्यच होते. अंत:करणांतील सत्यत्वाने सर्व सृष्टीच सत्यमय होऊन जाते, आणि असत्य राहात नाही ३३.

यापरी गा ‘सत्यत्व’ जाण । त्या नांव दहावें लक्षण ।
हें ब्राह्मणाचें संपूर्ण । कर्माचरण स्वभावें ॥ ३४ ॥
सत्य हे अशा प्रकारचे असते हे लक्षात ठेव. हे दहावे लक्षण होय. हेंच ब्राह्मणांचे स्वभावसिद्ध कर्माचरण असते ३४.

ब्राह्मणप्रकृतीचे स्थितीं । या दशलक्षणांची उत्पत्ती ।
स्वाभाविक सहजगती । अकृत्रिम स्थिति उद्धवा ॥ ३५ ॥
बाह्मणप्रकृतीच्या क्षेत्रामध्ये या दहा लक्षणांची उत्पत्ति होत असते. उद्धृवा! ब्राह्मणांची ही स्थिति स्वयंभू साहजिक व अकृत्रिम असते ३५.

येंहीं दश लक्षणीं संपूर्ण । वर्णवरिष्ठ वंद्य ब्राह्मण ।
आतां क्षात्रप्रकृतीचे गुण । ऐक निरूपण उद्धवा ॥ ३६ ॥
या दहा लक्षणांनी परिपूर्ण असल्यामुळे ब्राह्मण हे सर्व वर्णात श्रेष्ठ व वंद्य झाले आहेत. आतां उद्धवा ! क्षत्रियांच्या प्रकृतीचे जे गुण आहेत त्यांचे निरूपण ऐक ३६.

तेजो बलं धृतिः शौर्यं तितिक्षौदार्यमुद्यमः ।
स्थैर्यं ब्रह्मण्यतैश्वर्यं क्षत्रप्रकृतयस्त्विमाः ॥ १७ ॥
[श्लोक १७] तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मणभक्ती आणि ऐश्वर्य हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१७)

ब्राह्मणप्रकृति दश लक्षण । तुज म्यां सांगितली सुलक्षण ।
आतां क्षात्रवृत्तीचे दश गुण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ३६A ॥
उद्धवा ! ब्राह्मणप्रकृतीची उत्तमोत्तम दहा लक्षणे मी तुला सांगितली. आतां क्षात्रवृत्तीचे दहा गुण अथवा लक्षणे संपूर्णपणे तुला सांगतों ती ऐक ३६अ.

‘तेज’ म्हणजे प्रतापशक्ती । जैसा क्षितितळींचा गभस्ती ।
ज्याचिया प्रतापदीप्तीं । लोपले जाती महींद्र ॥ ३७ ॥
तेज म्हणजे प्रतापाचे सामर्थ्य ; जणू काय भूतलावरील सूर्यच. ज्याच्या प्रतापाच्या तेजाने सारे राजे लोपून जातात ३७

क्षात्रधर्मी प्रथम काज । तया नांव जाण ‘तेज’ ।
आतां क्षात्रबळाची वोज । ऐक चोज सांगेन ॥ ३८ ॥
क्षात्रधर्मातील जो पहिला गुण त्याचेच नाव ‘तेज.’ आतां क्षत्रियाच्या बळाचा चमत्कार सांगतों ऐक ३८.

ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षावरी दे झड ।
जरी तुटला दुधड । तरी वैरियांचे तोंड विभांडी ॥ ३९ ॥
त्याच्या शरीरसामर्थ्याचा इतका चमत्कार असतो की, तो एकटाही लाखों मनुष्यांवर तुटून पडतो, आणि मस्तक तुटले तरी धडाने शत्रुचे तोंड फोडतो ३९.

रिघतां रणामाझारीं । दुजयाचें साह्य न विचारी ।
जेवीं वनगजीं केसरी । तेवीं रिघोनि दळभारीं विभांडी वीर ॥ १४० ॥
तो समरांगणांत शिरला म्हणजे दुसऱ्याचे आपल्याला साहाय्य आहे किंवा नाही याचा विचार करीत नाही. रानहत्तींमध्ये सिंह घुसून जसा त्यांचा फडशा पाडतो, त्याप्रमाणे सैन्यांत मुसंडी देऊन तो मोठमोठ्या वीरांचा सप्पा उडवितो १४०.

आकाश दाटल्या निशाचरीं । भूमंडळ कोंदल्या असुरीं ।
ऐसे प्रबळ बळें आल्या वैरी । ज्याचे धृतीमाझारीं विस्मयो नुठी ॥ ४१ ॥
सारें आकाश जरी राक्षसांनी भरून गेले, दैत्यांनी सारी पृथ्वी जरी गजबजून गेली, अशा महान् बलाढ्य शत्रूंनी जरी घेरले, तरी त्याच्या धैर्य बुद्धीत विस्मयच उठत नाही ४१.

आकाश पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडबडी ।
तरी ज्याचे धृतीची रोकडी । नव्हे वांकुडी रोमावळी ॥ ४२ ॥
आकाशाने कोसळून पडण्यासाठी जरी गडगडाट केला, पृथ्वी उलथून पडण्यासाठी जरी हडबडली, तरी त्याच्या धैर्याचे एक रोमही वांकडे होत नाही ४२.

वोडवलियाही कल्पांता । धाक रिघों नेणे ज्याच्या चित्ता ।
ऐसें निजधैर्य स्वभावतां । ‘धृति’ तत्त्वतां ती नांव ॥ ४३ ॥
कल्पांतसमय जरी प्राप्त झाला, तरी त्याच्या चित्ताला धाक म्हणून वाटतच नाही. अशा प्रकारचे जें स्वभावसिद्ध अढळ धैर्य, त्यालाच धृति असे म्हणतात ४३.

चौर्‍याशीं दंडायुधें धरूं जाणती । शस्त्रास्त्र-धारणाशक्ती ।
स्वधर्में आवश्यकें करिती । या नांव ‘धृति’ क्षत्रियांची ॥ ४४ ॥
चौऱ्यांशी प्रकारचे दांडपट्टे परजण्यामध्ये वाकबगार असून, शस्त्रास्त्रधारणाशक्तीही ज्यांची उत्तम असते व जे धर्मास अनुसरून युद्ध करण्यांत प्रवीण असतात. याचेच नांव क्षत्रियांची ‘धृति’ होय ४४.

शूरांचें शौर्य तें कैसें । शत्रूंचें निःशेष नांवचि पुसे ।
वैरी कोणी कोठेंचि नसे । करणें ऐसें तें शौर्य ॥ ४५ ॥
आतां शूरांचे शौर्य कसे असते म्हणशील तर, तो शत्रूचे नांवसुद्धा उरूं देत नाही, त्याला कोणी कुठे शत्रूच असत नाही. असे करणे ह्याचें नांव ‘शौर्य’ होय ४५.

धर्मयुद्धाची शौर्यवृत्ती । जेणें विजयश्री चढे हातीं ।
दुश्चित्त निःशस्त्री न हाणिती । पळतया न मारिती महाशूर ॥ ४६ ॥
त्यांची शौयांची वृत्ति धर्मयुद्धाची असते. म्हणूनच त्याला विजयश्री प्राप्त होते. बेसावध किंवा निःशस्त्र असेल त्याला ते मारीत नाहीत; महाशूर असतात ते पळत्यालाही मारीत नाहीत ४६.

संमुख आलिया रणांगणीं । मागें पावो न ठेवीं रणीं ।
एकला विभांडी वीरक्षोणी । हे स्वधर्मकरणी निजशौर्यें ॥ ४७ ॥
रणांगणांत एकदा समोरासमोर आले की, पाऊल मागे घेत नाहीत; एकटाच हजारा वीरांचा फडशा उडवितो. हेंच स्वधर्माप्रमाणे खरें शौर्य होय ४७.

मृत्यूएवढा महावैरी । जो निःशेष नाहीं करी ।
त्याच्या शौर्याची थोरी । सुरासुरी वानिजे ॥ ४८ ॥
सर्वात मोठा शत्रु म्हणजे मृत्यु होय. त्याच्या एवढा शत्रु दुसरा कोणीच नाही. त्यालाच तो मुळीं नाहींसा करून टाकतो. त्याच्या शौर्याचे वर्णन देवदानवसुद्धा करीत असतात ४८.

एवं निजशौर्यनिर्धारा । निर्वैर करणें धरा ।
हा चौथा गुण खरा । जाण क्षात्रद्वारा क्षत्रियांचा ॥ ४९ ॥
याप्रमाणे आपल्या शौर्यानं सारी पृथ्वी निर्वैर करून टाकणे हेच खरें ‘शौर्य’ होय व हाच क्षत्रिधर्माप्रमाणे क्षत्रियांचा चौथा गुण होय ४९.

शस्त्रांचे घाय वाजतां माथां । कां सपिच्छ बाण खडतरतां ।
रणांगणीं न सरे मागुता । हे ‘सहिष्णुता’ क्षत्रियाची ॥ १५० ॥
शस्त्रांचे धाव घेऊन मस्तकावर आदळले , किंवा पिसाऱ्यासहवर्तमान बाण अंगांत घुसले, तरी रणांगणामध्ये जो मागें सरत नाही, हीच क्षत्रियांची ‘सहिष्णुता’ होय ५०.

आलिया गजदळाचे थाट । महावीरांचे घडघडाट ।
तो यावा साहे सुभट । ‘सहिष्णुता’ चोखट ती नांव ॥ ५१ ॥
हत्तींच्या झुंडीच्या झुंडी जरी येऊन भिडल्या, मोठमोठाले वीर जरी चवताळून आले, तरी तो आवेग वीरशिरोमणि सहन करतो. ह्याचंच नांव खरीखुरी सहिष्णुता ५१.

समुद्रलहरींच्या संपाता । कुलाचल न सरे परता ।
तेवीं परसैन्याच्या आघाता । न सरे मागुता रणांगणीं ॥ ५२ ॥
समुद्राच्या लाटांच्या तडाक्याने महापर्वत जसा मागे हटत नाही, त्याप्रमाणे जो शत्रुच्या सैन्याच्या आघाताने रणांगणांतून माघार घेत नाही ५२;

तेथ यश‍अपयशांची व्यथा । हर्षशोकविषमता ।
बाधीना क्षत्रियांच्या चित्ता । सर्वसहिष्णुता या नांव ॥ ५३ ॥
किंवा यशापयशाचें सुखदुःख किंवा हर्ष-विषाद ही क्षत्रियाच्या चित्ताला बाधत नाहीत, ह्यालाच संपूर्ण सहिष्णुता म्हणतात ५३.

या नांव ‘ तितिक्षा ‘ जाण । हें क्षत्रियांचें पांचवे लक्षण ।
ऐक औदार्याचा गुण । दातेपण क्षत्रियांचें ॥ ५४ ॥
हिलाच ‘तितिक्षा’ असेही म्हणतात. हे क्षत्रियांचे पांचवें लक्षण होय. आतां क्षत्रियांचा औदार्याचा गुण म्ह, दातृत्वशक्ति तीही ऐक ५४.

क्षत्रियांचे प्रकृतीस जाण । द्रव्य तें तृणसमान ।
याचकांचें निवे मन । तंव देणें दान सर्वस्व ॥ ५५ ॥
क्षत्रियांच्या स्वभावाला इव्य हे केवळ तृणासमान वाटते, म्हणून ते याचकांचे मन तप्त होईपर्यंत सर्वस्व दान देत असतात ५५.

देश काल सत्पात्र स्थान । तेथही देऊनि सन्मान ।
निर्विकल्पभावें गहन । देणें दान विध्युक्त ॥ ५६ ॥
देश, काल, सत्पात्र पहावयाचे व तेथेही सन्मानपूर्वक आणि मनांत कोणताही किंतु न आणतां विधियुक्त मोठे दान करावयाचे ५६.

चंद्र चकोरातें पाहीं । सदा देतां नुबगे कंहीं ।
तेवीं हा याचकाचे ठायीं । पराङ्‍मुखता नाहीं क्षत्रियासी ॥ ५७ ॥
चंद्रानें चकोराला पाहिले पुरे, की तो त्याला अमृत देतांना कधीं कंटाळत नाहीं; त्याप्रमाणेच ह्याची वृत्ति याचकाच्या ठिकाणी असते. क्षत्रिय कधी त्याला पराङ्मुख होत नाहीं ५७.

ऐसें स्वाभाविक जें दान । हा क्षत्रियांचा प्रकृतिगुण ।
या नांव गा ‘उदारपण’ । सहावें लक्षण क्षत्रियांचें ॥ ५८ ॥
असें स्वाभाविकपणे दान देणे हाच क्षत्रियांचा स्वाभाविक गुण आहे. ह्याचंच नांव ‘उदारपण.’ हैं क्षत्रियांचे सहावें लक्षण होय ५८.

परमार्थप्राप्तीउपायीं । स्वधर्मनिष्ठा क्षत्रियांठायीं ।
जो जो व्यवसावो करणें कांहीं । तो ‘उद्यम’ पाहीं बोलिजे ॥ ५९ ॥
क्षत्रियांचा परमार्थप्राप्तीचा उपाय म्हणजे स्वधर्मनिष्टा. तिला अनुसरून जो जो कांहीं उद्योग करावयाचा त्याला ‘उद्यम’ असे म्हणतात ५९.

वेंचूनियां निजप्राण । गोब्राह्मणांचे संरक्षण ।
स्वधर्में प्रजापालन । पृथ्वीरक्षण निरुपद्रव ॥ १६० ॥
आपले प्राणसुद्धा खर्ची घालून गोब्राह्मणांचे संरक्षण करणे, स्वधर्माने प्रजेचे पालन करणे, आणि कोणासही उपद्रव न देतां पृथ्वीचे रक्षण करणे १६०.

या नांव गा ‘उद्यम’ जाण । क्षत्रियांचे सातवें लक्षण ।
आतां स्वधर्मस्थैर्यगुण । तेहीं निरूपण अवधारीं ॥ ६१ ॥
ह्याचें नांव ‘उद्यम’ हें लक्ष्यात ठेव. हेच क्षत्रियांचें सातवें लक्षण होय. आतां त्यांच्या धर्मातील ‘स्थैर्य’ ह्या गुणाचेही लक्षण ऐक ६१.

गोब्राह्मणसंरक्षणता । स्वधर्मी प्रजापतिपाळकता ।
ये ठायीं उबगु न ये चित्ता । या नांव ‘स्थिरता’ क्षत्रियांची ॥ ६२ ॥
गोब्राह्मणांचे संरक्षण करतांना व स्वधर्मानें प्रजेचे पालन करतांना त्यांच्या मनाला कंटाळा येत नाही, हीच क्षत्रियांची स्थिरता होय ६२.

स्वधर्मीं जे स्थिरता । तें आठवें लक्षण तत्त्वतां ।
ब्राह्मणभक्तीची जे कथा । ऐक आतां सांगेन ॥ ६३ ॥
स्वधर्मातील जी ‘स्थिरता’ तेच खरोखर क्षत्रियांचे आठवें लक्षण होय, आतां त्यांचे ब्राह्मणभक्तीचे लक्षण सांगतों ऐक ६३.

परमार्थप्राप्तीचें कारण । क्षत्रियासी मुख्यत्वें गुरु ब्राह्मण ।
त्या ब्राह्मणाचें ब्रह्मभावें भजन । सर्वस्वें जाण करावें ॥ ६४ ॥
क्षत्रियांना परमार्थप्राप्तीसाठी ब्राह्मण हा गुरु होय. त्या ब्राह्मणांचे ब्रह्मभावाने भजन करावयाचे ६४.

ब्रह्मभावें ब्राह्मणभजन । विधियुक्त देवोनि सन्मान ।
अनुदिनीं ब्राह्मणपूजन । सद्‍भावें जाण जो करी ॥ ६५ ॥
ब्राह्मणाचे ठिकाणी ब्रह्मभावना धरून, यथाविधि त्यांचा सन्मान करून दररोज भक्तिभावाने जो ब्राह्मणाचे पूजन करील ६५,

जो मद्‍भावें ब्राह्मणपूजा । सन्मानें सुखी करी द्विजा ।
उद्धवा तो आत्मा माझा । तेणें मज अधोक्षजा पूजिलें ॥ ६६ ॥
जो माझीच भावना धरून ब्राह्मणाची पूजा करील, सन्मानाने ब्राह्मणांना संतोष देईल, उद्धवा, ! तो केवळ माझा आत्मा होय. त्याने माझी श्रीकृष्णाचीच पूजा केली म्हणून समजावें ६६.

क्षत्रिय सन्मानें द्विज पूजिती । तेणें त्यांसी ऐश्वर्यप्राप्ती ।
ब्राह्मण ब्राह्मणां द्वेषिती । तेणें ते पावती दरिद्रदुःख ॥ ६७ ॥
क्षत्रिय हे सन्मानाने ब्राह्मणांची पूजा करतात म्हणून त्यांना ऐश्वर्य प्राप्त होते. ब्राह्मण ब्राह्मणांचा द्वेष करतात म्हणून ते दारिद्रदुःख भोगतात ६७.

ऐसें करितां ब्राह्मणभजन । मी परब्रह्म होय त्या अधीन ।
त्याच्या ऐश्वर्याचें चिन्ह । दहावें लक्षण तें ऐक ॥ ६८ ॥
असें ब्राह्मणाचे भजन केले असतां मी परब्रह्म त्याच्या आधीन होतो. त्याच्या ऐश्वर्याचे चिन्ह हेच दहावें लक्षण होय ६८.

न करितां ब्राह्मणभजन । अंगीं ऐश्वर्य न ये जाण ।
मी जाहलों षडगुणैश्वर्यसंपन्न । सदा द्विजचरण हृदयीं दृढ वाहतां ॥ ६९ ॥
ब्राह्मणभजन न केले, तर अंगामध्ये ऐश्वर्य यावयाचें नाहीं; मी ब्राह्मणाचे पाय घट्ट पोटाशी धरल्यानेच षड्गुणैश्वर्यसंपन्न झालो आहे ६९.

ब्राह्मणभजनमार्गें । ब्रह्मसुख पायां लागे ।
ब्रह्मसायुज्य घर रिघे । तरी भक्त नेघे द्विजभजनें ॥ १७० ॥
ब्राह्मणभजनाच्या मार्गाला लागले असतां ब्रह्मसुख पायाला लागते, ब्रह्मसायुज्य घरांत शिरतें, तरी ब्राह्मणभजनासाठी भक्त ते घेत नाहीं १७०.

ब्राह्मणभजनें स्वभावतां । माझी सत्ता ये त्याच्या हाता ।
तेव्हां त्याची आज्ञा वंदिती माथां । जाण तत्त्वतां सुरासुर ॥ ७१ ॥
ब्राह्मणभजन केले, म्हणजे आपोआपच माझी सत्ता त्याच्या हाती येते. त्यामुळेच खरोखर त्याची आज्ञा देवदानवही शिरसावंद्य करतात ७१.

त्याचे आज्ञेभेण । पडों न शके अवर्षण ।
न्यायतां प्रजापालन । धर्मसंरक्षण त्याचेनी ॥ ७२ ॥
त्याच्या आज्ञेच्या भयाने अवर्षणसुद्धा पडत नाही. न्यायाने प्रजेचे पालन आणि धर्माचे संरक्षण ही त्याच्यामुळेच होत असतात ७२.

येणेंच स्वधर्में अतिचोख । भरत पुरूरवा जनकादिक ।
महाऐश्वर्य पावले देख । अलोकिक द्विजभजनें ॥ ७३ ॥
ह्याच अत्युत्कृष्ट स्वधर्माच्या योगकरून भरत, पुरूवा, जनक आदिकरून मोठ्या ऐश्वर्याला पोंचले. अशी ब्राह्मणाची सेवा मोठी अलौकिक आहे ७३.

एवं क्षत्रियांचें दशलक्षण । तुज म्यां केलें निरूपण ।
यांत मुख्यत्वें ब्राह्मणभजन श्रेयस्कर सर्वांसी ॥ ७४ ॥
अशा प्रकारें क्षत्रियांची दहा दहा लक्षणे मी तुला सांगितली. ह्यांत मुख्यत्वेकरून ब्राह्मणभजन हेच सर्वांना श्रेयस्कर होय ७४,

वैश्याचे प्रकृतीस जाण । स्वाभाविक पंचलक्षण ।
ऐक त्याचेंही निरूपण । आचरण यथार्थे ॥ ७५ ॥
वैश्यांच्या प्रकृतीची स्वाभाविक पांच लक्षणे आहेत, त्यांचे निरूपण व आचरण यथार्थ रीतीने श्रवण कर ७५.

आस्तिक्यं दाननिष्ठा च अदम्भो ब्रह्मसेवनम् ।
अतुष्टिरर्थोपचयैर्वैश्यप्रकृतयस्त्विमाः ॥ १८ ॥
[श्लोक १८] आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे, हे वैश्य वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१८)

वैश्याचे प्रकृतीसी जाण । अर्थतृष्णा अतिगहन ।
जाहलिया कोट्यानुकोटी धन । तृष्णा परिपूर्ण हों नेणे ॥ ७६ ॥
वैश्यांच्या स्वभावाला ‘द्रव्यलोभ’ फार मोठा असतो. कोट्यनुकोटीचा मालक झाला तरी त्याच्या इच्छेला तृप्त व्हावयाचें माहीतच नसते ७६.

‘आस्तिक्य’ अर्थसंचयासी । द्वीपींहूनि द्वीपांतरासी ।
नाना वस्तु ने विश्वासेंसी । साधावया अर्थासी भावार्थी ॥ ७७ ॥
‘आस्तिकपणा’ तो द्रव्यसंग्रहासंबंधींचा. ह्या द्वीपाहून त्या द्वीपाला, त्यांत खास पैसा मिळवीन असा विश्वास बाळगून, अनेक प्रकारचा माल भरून न्यावयाचा ७७.

कां वेदशास्त्रीं अतिविश्वासी । हें मुख्यत्वें ‘आस्तिक्य’ वैश्यासी ।
वेदें लिहिल्या स्वधर्मासी । नव्हे उदासी अणुमात्र ॥ ७८ ॥
किंवा वेदशास्त्रावर अत्यंत विश्वास, हेच मुख्यत्वेकरून वैश्याचे ‘आस्तिक्य’ होय. वेदाने सांगितलेला जो स्वधर्म त्याविषयीं ऐसभरही उदासीन नसावयाचे ७८.

वैश्याचें स्वधर्माचरण । नेमेंसीं द्यावें नित्यदान ।
प्राणान्त मांडल्या जाण । दानखंडण हों नेदी ॥ ७९ ॥
वैश्याचे स्वधर्माचरण म्हणजे नेमाने नित्य ‘दान’ देणे. प्राणांतसमय प्राप्त झाला तरी दान देण्यामध्ये खंड पडू द्यावयाचा नाही ७९.

परलोकप्राप्तीचें कारण । ‘ब्राह्मणाची सेवा’ जाण ।
ब्राह्मणआज्ञा परम प्रमाण । विशेष जाण गुरुसेवा ॥ १८० ॥
परलोकप्राप्तीचे मुख्य साधन म्हणजे ‘ब्राह्मणाची सेवा ‘ आहे असें तूं समज. ब्राह्मणाची आज्ञा ही परम प्रमाणभूत. त्यापेक्षा विशेष म्हणजे गुरूची सेवा १८०.

वेदशास्त्रार्थ प्रमाण । सद्‍गुरु परब्रह्म जाण ।
तद्‌रूपें देखावे ब्राह्मण । सेवेसी प्राण अर्पावा ॥ ८१ ॥
वेदशास्त्रांतसुद्धा ‘सद्गुरु हेच परब्रह्म,’ असल्याचे प्रमाण आहे. ब्राह्मणही तद्पच आहेत असें मानून त्यांचे सेवेसाठी प्राणसुद्धा खर्ची घालावा ८१.

मी मान्य होईन अतिश्रेष्ठां । कां लौकिकीं जोडावी प्रतिष्ठा ।
ऐशी जे दांभिक निष्ठा । वैश्या वरिष्ठा स्पर्शेना ॥ ८२ ॥
आपण मोठमोठ्या लोकांस मान्य व्हावे, किंवा लौकिकामध्ये प्रतिष्ठा वाढवावी, अशा प्रकारची दांभिक निष्ठा वैश्यांना स्पर्श करीत नाही ८२.

सांडूनियां धूर्तपण । निर्लोभ ‘निर्दंभ’ जाण ।
विप्रसेवेसी वोपिती प्राण । हें मुख्य लक्षण वैश्याचें ॥ ८३ ॥
कपट सोडून निर्लोभपणे व ‘निर्दभपणे’ ब्राम्हणाच्या सेवेला प्राणही खर्च करावयाचा, हेंच वैश्यांचे मुख्य लक्षण आहे ८३.

येणेंचि परमार्थप्राप्ती । सत्य जाण वैश्ययाती ।
हे स्वाभाविक गा प्रकृती । जाण निश्चितीं वैश्याची ॥ ८४ ॥
येणेकरूनच वैश्यजातीला परमार्थ प्राप्ती होते. सारांश, या प्रकारची वैश्याची स्वाभाविक प्रकृति असते ८४.

आतां शूद्राचिया प्रकृती । त्रिविध कर्मांची पैं प्राप्ती ।
तेही सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ८५ ॥
आता उद्धवा! शूद्राच्या प्रकृतींचीही तीन प्रकारची कर्मे असतात तीही निश्चयकरून तुला सांगतों श्रवण कर ८५.

शुश्रूषणं द्विजगवां देवानां चाप्यमायया ।
तत्र लब्धेन संतोषः शुद्रप्रकृतयस्त्विमाः ॥ १९ ॥
[श्लोक १९] ब्राह्मण, गायी आणि देवतांची निष्कपट भावनेने सेवा करणे आणि त्यातून जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असणे, हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१९)

स्वधर्म शूद्राचिये ज्ञाती । द्विजसेवा यथानिगुती ।
त्यांचेनि प्रसादें जीविकावृत्ती । निष्कपट स्थिति सेवेची ॥ ८६ ॥
शूद्राच्या जातीचा स्वधर्म म्हटला म्हणजे मनापासून ब्राह्मणांची सेवा करावी; त्यांची सेवा निष्कपटभावाने केली म्हणजे त्यांच्याच कृपेने त्यांची उपजीविका चालते ८६

करावें गृहस्थांचें गोरक्षण । चाराव्या जेथें तृणजीवन ।
श्वापदभय आलिया जाण । वेंचूनि प्राण रक्षाव्या ॥ ८७ ॥
ज्या ठिकाणी गवत व पाणी असेल त्या ठिकाणी नेऊन गृहस्थाच्या गाई राखाव्यात. हिंस्त्र पशुंनी त्यांच्यावर घाला घातल्यास प्राणसुद्धा खर्ची घालून रक्षण करावें ८७.

गोरक्षणीं वेंचिल्या प्राण । त्यासी उत्तम गति जाहली जाण ।
ज्यासी गायींचा कळवळा गहन । त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य ॥ ८८ ॥
गोरक्षणांत प्राण खर्ची पडला, तर त्याला उत्तम गति प्राप्त होते. ज्याला गाईचा अत्यंत कळवळा असतो, त्याला मी श्रीकृष्ण सदासर्वदा साहाय्य असतों ८८.

द्विजसेवा गोरक्षण । दोनही वृत्ति न मिळतां जाण ।
तरी देवालयीं संमार्जन । जीविकार्थ जाण करावें ॥ ८९ ॥
ब्राह्मणाची चाकरी आणि गुरांची राखण ही दोन्ही कामें न मिळतील, तर आपली उपजीविका चालण्यासाठी शुद्राने देवालयांतील सडा-संमार्जनाचें काम करावें ८९

निष्कपटभावें आपण । निर्मळ करावें हरिरंगण ।
तेथील प्राप्तीचेनि जाण । करावी पूर्ण जीविका ॥ १९० ॥
निष्कपटपणे श्रीहरीचे अंगण झाडून सारवण घालून स्वच्छ ठेवावे. आणि तेथे जी मिळकत होईल, तिच्यावर आपला निर्वाह करावा १९०.

तेथ जे जे काळीं जे जे प्राप्ती । तेणें सुखें असावें निजवृत्तीं ।
हे स्वधर्मकर्मस्थिती । शूद्रप्रकृतिस्वभावें ॥ ९१ ॥
तेथे ज्या ज्या वेळेला जें जें मिळेल तेवढ्यातच संतोष मानून आपला चरितार्थ चालवावा. हीच शूद्राच्या प्रकृतिस्वभावाची स्वधर्मकर्म स्थिति होय ९१.

विप्रासी अग्निहोत्रादिक कर्म । शूद्र नमी द्विजोत्तम ।
तेथ दोंहींचा स्वधर्म । सहजें सम होतसे ॥ ९२ ॥
ब्राह्मणाकडे अग्निहोत्रादिक कर्म असते आणि शूद्र हे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना नमस्कार करतात. त्यामुळे दोघांचाही धर्म सहजी सारखा होतो ९२.

‘गृहस्थाश्रमाचें’ वर्तन । तिन्हीं आश्रमां आश्रयो आपण ।
अन्न वस्त्र देऊनि जाण । संरक्षण करावें ॥ ९३ ॥
गृहस्थाश्रमाचा धर्म म्हणजे तिन्ही आश्रमाला आश्रय देणे; तसेंच इतर तिन्ही आश्रमातील लोकांना अन्नवस्त्र देऊन त्यांचे संरक्षण करणे ९३.

‘ब्रह्मचर्याश्रम’ वर्तन । गुरुसेवा वेदाध्ययन ।
त्यासी द्यावया दान । अधिकार जाण असेना ॥ ९४ ॥
ब्रह्मचर्याश्रमाचे वर्तन म्हणजे गुरूवी सेवा व वेदाध्ययन करून राहाणे, त्याला दान देण्याचा मात्र अधिकार नसतो ९४.

ब्रह्मचार्‍यासी जें जें योजिलें । तें पाहिजे गुरूसी समर्पिलें ।
गुरूसी वंचूनि दान दिधलें । ते तेणें केले अधर्म ॥ ९५ ॥
ब्रह्मचाऱ्याला जें जें काय प्राप्त होईल, ते ते त्याने गुरूला अर्पण केले पाहिजे. गुरूवाचून इतराला तो दानधर्म करील , तर तो अधर्म होईल ९५.

‘वानप्रस्थाश्रमी’ जाण । मुख्यत्वें तप प्रधान ।
करावें अग्निशुश्रूषण । वेदोक्तलक्षण प्रकारें ॥ ९६ ॥
वानप्रस्थाश्रमामध्ये विशेषकरून तप हेच मुख्य आहे. वेदोक्तविधीप्रमाणे त्याने अग्नीची सेवा करावी ९६

संन्यासी ब्रह्मचारी दीन । समयीं आश्रमा आल्या जाण ।
यथानुशक्त्या द्यावें अन्न । हें आश्रमरक्षण वानप्रस्था ॥ ९७ ॥
संन्यासी, ब्रह्मचारी किंवा दीन दुबळे प्रसंगानुसार आश्रमांत आल्यास त्यांना यथानुशक्ति अन्न द्यावे. हाच वानप्रस्थाचा आश्रमधर्म होय ९७.

‘संन्याशासी’ अहिंसा प्रधान । ज्ञानपरिपाकें शांति संपूर्ण ।
अनोळखीं भिक्षाटण । हा मुख्य धर्म जाण चतुर्थाश्रमीं ॥ ९८ ॥
संन्याशाला अहिंसा हीच मुख्य आहे. ज्ञानपरिपाकाने त्याला पूर्ण शांति लाभते. ओळख नसेल अशा ठिकाणी फिरून भिक्षा मागणे हाच चतुर्थाश्रमांतील मुख्य धर्म होय ९८.

वर्णाश्रमांहूनि बाह्य जाण । केवळ अंत्यजादि जे जन ।
त्यांचे प्रकृतीचें जें लक्षण । स्वयें नारायण सांगत ॥ ९९ ॥
आतां ह्या वर्णाश्रमाहून बाहेरचे जे केवळ अंत्यजादि लोक, त्यांच्या स्वभावाचे लक्षणही स्वतः श्रीकृष्ण सांगतात. ९९

अशौचमनृतं स्तेयं नास्तिक्यं शुष्कविग्रहः ।
कामः क्रोधश्च तर्षश्च स्वभावोऽन्तवसायिनाम् ॥ २० ॥
[श्लोक २०] अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे, खोटेनाटे भांडण करणे, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणे, हे अंत्यजाचे स्वभाव होत. (२०)

ये श्लोकींचे अष्ट गुण । त्यागावया न मनी ज्याचें मन ।
तोही अंत्यजासमान । हें प्रकृतिलक्षण अतिनिंद्य ॥ २०० ॥
प्रस्तुत श्लोकांतील आठ गुण टाकावयाचें ज्याच्या मनात येत नाही. तोसुद्धा अंत्यजासारखाच होय. हे स्वभावाचे लक्षण अत्यंत निंद्य आहे २००.

ज्यासी स्नानसंध्या शौचाचार । स्वकर्म नावडे साचार ।
अंतरीं विकल्प अपार । जैसा विखार काळिया ॥ १ ॥
ज्याला खरोखर स्नान, संध्या, शुचिर्भूतपणा व आपले कर्तव्यकर्म आवडत नाही, कृष्णसर्पाप्रमाणे त्याच्या अंतरांत अपरंपार विकल्प भरलेले असतात १.

‘कनकफळ’ हें नाम गोमटें । आंत माजिरें बाहेर कांटे ।
तैसें सबाह्य वोखटें । ‘अशौच’ मोठें त्या नांव ॥ २ ॥
‘कनकफल’ म्हणजे (धोतऱ्याचे फल); नांव मोठे गोड; पण आतून कैफ आणणारे आणि बाहेरून कांटे ! त्याप्रमाणे अंतर्बाह्य जो वाईट, त्याचेच नांव ‘अशौच’ म्हणजे अमंगलता २.

शरीरीं श्वेत कुष्ठ निर्नासिक । तोंडाळ वोढाळ पतिनिंदक ।
ते स्त्रियेच्या ऐसें देख । अशौचक सबाह्य ॥ ३ ॥
शरीर पांढऱ्या कोडाने भरलेलें ; नाकही नाहीच; तोंडाळ, ओढाळ व भ्रताराची निंदा करणारी स्त्री असावी, त्याप्रमाणे अंतर्बाह्य अमंगल ३.

यापरी गा ‘अशौचता’ । ज्याचे अंगीं स्वभावतां ।
तो जाण पां तत्त्वतां । गुण प्रथमता अंत्यजाचा ॥ ४ ॥
अशा प्रकारे स्वभावतःच ज्याच्या अंगी अशौचता’ म्हणजे अमंगलपणा असतो, तोच खरोखर अंत्यजाचा पहिला गुण होय ४.

‘असत्यता’ जे प्रकृतीपाशीं । अखंड बैसे अहर्निशीं ।
मातापितादि गुरूंसी । झकवणें त्यांसी मिथ्यात्वें ॥ ५ ॥
तसेंच ज्याच्या स्वभावामध्ये खोडसाळपणा रात्रंदिवस खेळत असतो, तो आपल्या खोटेपणाने आईबापाला व गुरुलासुद्धा ठकवितो ५.

जेवीं कां शिमग्याच्या सणीं । ‘रामकृष्ण’ न म्हणे कोणीं ।
उपस्थनामें गर्जे वाणी । संतोषोनी स्वानंदें ॥ ६ ॥
शिमग्याच्या सणांत ज्याप्रमाणे कोणी ‘रामकृष्ण’ म्हणत नाही, तर मोठ्या आनंदोल्हासाने जननेंद्रियदर्शक बीभत्स शब्दच उच्चारीत असतात ६;

तेवीं जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । ‘असत्य’ आवडे ज्याच्या चित्तीं ।
तो जाण पां निश्चितीं । अंत्यजप्रकृति स्वभावें ॥ ७ ॥
त्याप्रमाणे जागृतींत, स्वप्नांत किंवा सुषुप्तीत ज्याच्या मनाला असत्यच आवडते, तो प्रकृतिस्वभावाप्रमाणे खरोखर ‘अंत्यज’ म्हणूनच समजावें ७.

पडिलिया दृष्टी बुडीं । मायबापांचें ठेवणें काढी ।
नाना विश्वासपरवडी । बुडवी गांठोडी गुरूची ॥ ८ ॥
पुरून ठेवलेल्या आईबापाच्या ठेव्यावर दृष्टि पोंचली की ते सुद्धा काढावयाला जो चुकत नाही; परोपरीने विश्वास दाखवून तो गुरुचे गाठोडेसुद्धा लांबवितो ८.

सधन सांपडल्या हाता । नाना युक्तीं अतिक्षुद्रता ।
नातरी बलात्कारें तत्त्वता । घ्यावें सर्वथा सर्वस्व ॥ ९ ॥
एखादा श्रीमंत हातांत सांपडला, तर अगदीं नीचपणाच्याही नाना प्रकारच्या युक्ति लढवून, अथवा बलात्कारानेही त्याचे सर्वस्व हरण करून सोडतो ९.

यापरी गा अधर्मतां । परद्रव्य यावया हाता ।
आसक्ति ज्याचिया चित्ता । जाण तत्त्वतां ते ‘चोरी’ ॥ २१० ॥
अशा प्रकारे दुसऱ्याचे डबोलें हाती येण्यासाठी पाहिजे तो अधर्म करावयाचा, अशी ज्याच्या मनाला आसक्ति असते, तिला ‘चोरी’ असें म्हणतात २१०.

स्वधर्मकर्मी स्वभावतां । विश्वास नाहीं ज्याच्या चित्ता ।
वेदशास्त्रपुराणार्थ । मिथ्या सर्वथा जो मानी ॥ ११ ॥
स्वधर्मकर्मावर ज्याच्या मनामध्ये स्वभावतःच विश्वास नसतो; जो वेद, शास्त्रे, पुराणे व त्यांचा अर्थ हे सर्व थोतांड असें समजतो ११;

उद्धवा जाण तत्त्वतां । या नांव गा ‘नास्तिकता’ ।
आस्तिक्यभावो स्वभावतां । अणुमात्रतां जेथ नाहीं ॥ १२ ॥
उद्धवा ! ह्याचंच नांव खरोखर ‘नास्तिकपणा’. त्यांच्यांत स्वभावतः आस्तिक्यबुद्धि म्हणून कसली ती नसतेच! १२.

गांठीं असतां लक्षकोडी । सदा नास्तिकता ज्याचे तोंडीं ।
घरींच्यासी आपदा लावी गाढी । ते प्रकृति रोकडी अंत्यजाची ॥ १३ ॥
गांठीला लक्षावधि किंवा कोट्यवधि रुपये असूनही ज्याच्या तोंडामध्ये सदासर्वदा ‘नास्तिकता’ भरलेली असते; कुटुंबांतील मंडळीलाही जो विपत्ति भोगावयाला लावतो; हा अंत्यजाचा स्वभाव समजावा! १३.

कार्येवीण कोरडी कळी । संबंधेंवीण वृथा सळी ।
अखंड करी दांतकसाळी । ते अंत्यजाची बळी निजवृत्ती ॥ १४ ॥
कारणावांचून कोरडे भांडण ; काहीं एक संबंध नसतां दुसऱ्याचा छळ आणि सदासर्वदा दांतकिरकिटीला येणे, हा अंत्यजाचा जातिस्वभाव होय १४.

ज्यासी सदा विरोध पोटीं । वरीवरी गोड मैंद गोठी ।
भीतरीं द्वेषाचा भडका उठी । जो क्रूरदृष्टि सर्वदा ॥ १५ ॥
ज्याच्या पोटांत सर्वदा विरोध, वरकरणी मात्र दिखाऊपणाच्या गोड गोड गोष्टी, दृष्टि ज्याची नेहमीं क्रूर, आणि पोटांत द्वेषाचा भडका ! १५.

जन्मवरी केल्या उपकारकोटी । त्यासी एकाचि उत्तरासाठीं ।
अपकारु करावया पोटीं । छिद्रदृष्टी सदा ठेवी ॥ १६ ॥
जन्मभर जरी एखाद्याने त्याच्यावर उपकार केलेले असले, तरी एखाद्याच शब्दावरून त्याचा नाश करण्यासाठी गुप्त बुद्धि पोटांत धरावयाची! १६.

उपकार्‍या अपकारस्थिती । अंत्यजही न करी प्राणांतीं ।
ऐशिया विरोधातें जे वाहती । ‘शुष्कविग्रहगती’ त्या नांव ॥ १७ ॥
उपकार करणाऱ्यांवर अपकार अंत्यजही प्राणांती करीत नसतो, पण तशा प्रकारचा द्वेष मनांत वागविणे, त्याला ‘शुष्कविग्रह’ असें नांव आहे १७.

जो सुहृदांमाजीं पाडी वैर । अपायीं घाली थोर थोर ।
अशौच नास्तिक्य घोर । जाणावा नर ‘अतिविग्रही’ ॥ १८ ॥
जो आप्तइष्टांमध्ये वैर पाडतो, मोठ्या मोठ्यांना संकटांत घालतो, अमंगलपणा आणि नास्तिकपणा तर कळसास पोंचलेला, असा पुरुष असेल त्यास ‘अतिविग्रही’ असे म्हणावें १८.

स्वार्थेंवीण परकार्य नाशी । ‘शुष्कविग्रही’ म्हणिपे त्यासी ।
उद्धवा ऐशी प्रकृति ज्यासी । अंत्यजही त्यासी पैं भीती ॥ १९ ॥
आपला कवडीचा फायदा नसतां दुसऱ्याच्या कार्याचा नाश करावयाचा, त्याला ‘शुष्कविग्रही’ म्हणतात. उद्धवा! असा ज्याचा स्वभाव असेल त्याला अंत्यजसुद्धा भितात १९.

ऐक कामाची कथा । कनक आणि कांता ।
येविषयीं अतिलोभता । उपरमु चित्ता असेना ॥ २२० ॥
आतां त्याची हांव किती दांडगी असते ते ऐक. कनक आणि कांता यांचा पराकाष्ठेचा लोभ. मनाला क्षणभर स्वस्थता म्हणून नाहींच २२०.

स्त्रीकामाचेनि नांवें । लिंगमात्रचि असावें ।
मग सेव्यासेव्य भावें । विचारूं जीवें स्मरेना ॥ २१ ॥
स्त्रीभोगाची इच्छा तर काही विचारूच नये. जातीने स्त्री असली की पुरे, मग सेव्यासेव्य विचार अंत:करणाला आठवतच नाहीं ! २१.

तैसाचि जाण द्रव्यार्था । भलतैसें यावें हाता ।
न विचारी विहिता अविहिता । अतिकामता अर्थार्थीं ॥ २२ ॥
त्याचप्रमाणे द्रव्य ; मग ते भलत्या मार्गाने का येईना? त्यांत योग्य अयोग्य मार्गाचा विचार म्हणून नाही इतका पैशाचा लोभिष्टपणा! २२.

अविहित कामस्थिती । हा स्वभाव ज्याचे वृत्ती ।
ते अंत्यजादि प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २३ ॥
अनुचित मार्गाने इच्छा पुरी करणे अशीच ज्याच्या स्वभावाची वृत्ति. उद्धवा ! असे असतील ते अंत्यजाच्या स्वभावाचे होत २३.

पाहे पां कामिकांच्या पोटीं । सदा क्रोधाची आगटी ।
काम‍अप्राप्ती ऐकतां गोष्ठी । भडका उठी प्रळयान्त ॥ २४ ॥
हे पहा! असे जे कामुक किंवा लोभिष्ट लोक असतात, त्यांच्या अंत:करणांत सदा सर्वदा क्रोधाची आगटी पेटलेली असते. आपली इच्छा पुरी होत नाही असे कळले की प्रळयान्त भडका उडून जातो! २४.

ज्याचिये शरीरस्थिती । उसंतु नाही क्रोधाहातीं ।
सदा धुपधुपीत वृत्ती । ते जाण प्रकृती अतिनीच ॥ २५ ॥
ज्याचे शरीर क्रोधाच्याच स्वाधीन असल्यामुळे क्षणभर शांतपणा म्हणून नाहींच; वृत्ति सदानकदा जळफळलेली : अशा प्रकारचा स्वभाव अत्यंत नीच होय ! २५.

प्राप्तभोगें तृष्णा न बाणे । ऐकिल्याही भोगाकारणें ।
अखंड मनाचें बैसे धरणें । ते प्रकृति जाणे अतिनीच ॥ २६ ॥
मिळालेल्या सुखांत आशा तृप्त न होणे, जें जें ऐकेल त्या सुखाकरिताही निरंतर मनाचे धरणे धरून बसणे, हा स्वभावही अत्यंत नीच होय २६.

म्यां सांगितले जे आठही गुण । हे ज्याचे प्रकृतीस लक्षण ।
तो हो कां भलता वर्ण । परी अंत्यजपण त्यामाजीं ॥ २७ ॥
हे जे मी तुला आठ गुण सांगितले, हे ज्याच्या स्वभावाचे लक्षण असेल, तो कोणत्याही वर्णाचा असो. तरी त्याच्यांत अंत्यजपणा आहे असे समजावें २७.

अवगुण सांगितले समस्त । एक एक नरकदानीं विख्यात ।
मा आठही मिळाले जेथ । उगंड तेथ मग कैंचा ॥ २८ ॥
हे सारे दुर्गुण सांगितले, ह्यांपैकी एक एक गुणसुद्धा नरक देण्याविषयी प्रसिद्ध आहे. मग जेथें आठही एके ठिकाणी मिळाले असतील, तेथें सुटका कशाची? २८.

त्यगावया निजस्थिती । या आठ अवगुणांची व्युत्पत्ती ।
म्यां सांगितली तुजप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २९ ॥
उद्धवा! आपल्यामधून काढून टाकण्यासाठीच खरोखर ह्या आठ दुर्गुणांची लक्षणे मी तुला सांगितली २९०.

या गुणांतें अंगीकारिती । ते नरकगामी गा निश्चितीं ।
या गुणांतें जे त्यागिती । ते पावती पद माझें ॥ २३० ॥
अरे! ह्या गुणांचा जे स्वीकार करतात ते खरोखर नरकाला जातात. आणि ह्या गुणांचा जे त्याग करतात ते माझ्या पदाला पोचतात ३२०.

जेणें माझ्या पदाची प्राप्ती । सर्वां वर्णां उत्तम गती ।
ऐशिया गुणांची व्युत्पत्ती । सांगेन तुजप्रती उद्धवा ॥ ३१ ॥
आतां जेणेकरून माझ्या पदाची प्राप्ति होईल, आणि कोणत्याही वर्णाला उत्तम गति प्राप्त होईल, अशा गुणांचीही लक्षणे उद्धवा ! तुला मी सांगतो ३१.

सकल लक्षणांचें निजसार । जें गुह्यगुणांचें भांडार ।
जेणें पाविजे संसारपार । ऐक साचार उद्धवा ॥ ३२ ॥
उद्धवा! सर्व लक्षणांचे केवळ सार; गुह्य गुणांचे केवळ भांडार ; आणि ज्याच्या योगाने खरोखर संसारांतून पार होता येते, तें तूं नीट ऐकून घे ३२.

जो सर्व वर्णांचा सहज धर्म । जेणें पाविजे परब्रह्म ।
जे नाशिती चित्तभ्रम । ते गुण उत्तम अवधारीं ॥ ३३ ॥
साऱ्याच वर्णाचा जो सहजधर्म ; ज्याच्या योगाने परब्रह्माची प्राप्ति होते ; ज्यांच्या योगाने मनांतील भ्रम दूर होतो; ते उत्तम गुण ऐक ३३.

अहिंसा सत्यमस्तेयं अकामक्रोधलोभता ।
भूतप्रियहितेहा च धर्मोऽयं सार्ववर्णिकः ॥ २१ ॥
[श्लोक २१] सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत की, मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणे, सत्यावर अढळ राहाणे, चोरी न करणे, कामक्रोधलोभापासून दूर राहाणे आणि प्राणिमात्रांचे कल्याण होईल, तेच करणे. (२१)

हो कां उपायें जेणें तेणें । पुढिलासी जें सुख देणें ।
तें उपतिष्ठे मजकारणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥ ३४ ॥
ज्या उपायाने दुसऱ्याला सुख होईल तो उपाय करणे, हे मलाच पोंचते. त्याच गुणाला मी श्रीकृष्ण वंद्य मानितों ३४.

तैसेंच परपीडा असुख । पुढिलांसी न देणें दुःख ।
तेणेंही मज होय सुख । जाण निष्टंक उद्धवा ॥ ३५ ॥
त्याचप्रमाणे कोणाला त्रास न देणे, परपीडा न करणे, दुसऱ्याला दुःख न देणे, ह्या योगानेही उद्धवा! मला सुख होतें असें तूं निश्चयाने जाण ३५.

दुःख नेदूनि सुख देणें । या नांव ‘अहिंसा’ म्हणणें ।
हा पहिला गुण जाणणें । ऐक लक्षणें सत्याचीं ॥ ३६ ॥
दुःख न देतां सुख देणे ह्यालाच ‘अहिंसा’ असे म्हणतात, हा पहिला गुण समजावा. आता दुसरा गुण जो ‘सत्य’ त्याची लक्षणे ऐक ३६.

सत्य तें जाण पां ऐसें । ज्याचें मन वाचा असत्यदोषें ।
जागृतिस्वप्नसुषुप्तिवशें । स्पर्शलें नसे अणुमात्र ॥ ३७ ॥
सत्य तें असें:-ज्याचें मन आणि वाणि जागृतींत, स्वप्नांत किंवा सुषुप्तींतही असत्यदोषाला लवमात्र स्पर्श करीत नाहीत ३७;

निंदा आणि नरस्तवन । कदा मिथ्या न बोले वचन ।
वाचा अनसुट धरणें जाण । ‘सत्य’ संपूर्ण या नांव ॥ ३८ ॥
निंदा व नरस्तुति, तसेंच खोटे बोलणे हे ज्याला माहीत नाहीं, वाणीला जो अनसूट म्हणजे सोवळी राखतो, त्या साऱ्याला ‘सत्य’ म्हणतात ३८.

हो कां अधर्माचिये जोडी । कोडी धरोनियां कवडी ।
जो रिघों नेदी दृष्टीबुडीं । फुटकी कवडी स्पर्शेना ॥ ३९ ॥
अधर्माने एका कवडीपासून कोटीचाही लाभ जो दृष्टीपुढे आणीत नाही, दुसऱ्याच्या फुटक्या कवडीलाही जो शिवत नाही ३९,

तेथेंही चोरी करणें । कां दृष्टी चुकवूनि वस्तु घेणें ।
अथवा न पुसतां नेणें । हें जीवेंप्राणें न संभवे ॥ २४० ॥
तिकडे चोरी करणे किंवा एखाद्याचा डोळा चकवून वस्तु घेणे, अथवा न विचारतां नेणे हे जीव गेला तरी शक्य नाही २४०.

अन्यायोपार्जित धन । स्वप्नींही नातळे मन ।
हें ‘अचौर्याचें’ लक्षण । तिसरा गुण उद्धवा ॥ ४१ ॥
अन्यायाने मिळविलेल्या द्रव्याला मन स्वप्नांतसुद्धा शिवावयाचे नाही. उद्धवा ! हें ‘अचौर्याचे लक्षण. हाच तिसरा गुण होय ४१.

स्वधर्में धन यावें हाता । हेहि नसे धनकामता ।
कामिनीकामाची नेणे वार्ता । परस्त्री ते माता नेमस्त ॥ ४२ ॥
स्वधर्मानेसुद्धा द्रव्य हातात पडावे इतकाही ज्याला धनलोभ नसतो; कामिनी-कामाची वार्तासुद्धा ज्याला माहीत नसते; परस्त्रीला जो निश्चयाने मातेसमान मानतो ४२,

हो कां स्वदाराभिगमन । तेथेंही आसक्त नसे मन ।
आश्रमधर्मार्थ जाण । प्रतिपालन स्त्रियेचें ॥ ४३ ॥
फार तर काय ? पण स्वदारागमनांतसुद्धा ज्याचे मन आसक्त नसते. गृहस्थाश्रमांत राहावयाचे म्हणूनच केवळ स्त्रीचा प्रतिपाल करावयाचा ४३.

या नांव गा ‘अकामता’ । उद्धवा जाण तत्त्वतां ।
हे चौथी लक्षणता । ऐक आतां अक्रोधु ॥ ४४ ॥
उद्धवा! याचेच नाव खरोखर ‘अकामता’ म्हणजे निरिच्छपणा असें तूं समज. हेच चौथें लक्षण होय. आता ‘अक्रोधाचें’ लक्षण ऐक ४४.

जेथ कामाचा आदरु नाहीं । तेथ क्रोधाचें न चले कांहीं ।
जेवीं आकाशाचे ठायीं । न रुपती पाहीं निजशस्त्रें ॥ ४५ ॥
कामाचा जेथे पगडा नाही, तेथे क्रोधाचेही काही चालत नाही. आकाशाला ज्याप्रमाणे शस्त्र रुपत नाहीत ४५;

जरी बीज जाहलें गोमटें । तरी भूमीविण अंकुर न फुटे ।
तैसें कामावांचूनि कोठें । क्रोध उद्भट न वाढे ॥ ४६ ॥
किंवा बीं जरी कितीही चांगले असले, तरी त्याला जमिनीशिवाय जसा अंकुर फुटावयाचा नाहीं; त्याप्रमाणे कामाशिवाय क्रोध हा कधीच वाढावयाचा नाही ४६.

एवं कामाची जे बोळवण । तेचि क्रोधाचीही जाण ।
जैसें गरोदरीचें मरण । करी निर्दळपण गर्भाचें ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीचे मरण गर्भालाही मारून टाकतें, तद्वत् कामाची बोळवण झाली की त्याच्या बरोबर क्रोधाचीही बोळवण झालीच म्हणून समजावें ४७.

शिर तुटलिया पाठीं । हस्तपादादि क्रिया नुठी ।
काम निमालियापाठीं । निमाली गोष्टी क्रोधाची ॥ ४८ ॥
मस्तकच तुटून गेले म्हणजे हातापायांच्या क्रियाही चालत नाहीत, त्याप्रमाणे काम नाहीसा झाला की क्रोधाचीही गोष्ट संपलीच ४८.

जेथ काम क्रोध नाहीं । तेथ लोभ उठी कोणे ठायीं ।
तळवटीं नसतां भुयी । वृक्ष कंहीं वाढेना ॥ ४९ ॥
आणखी कामक्रोधच जेथे नाहीत, तेथें लोभ तरी उठणार कसा? बुडाला माती नसेल वृक्ष कधींच वाढायचा नाहीं ४९.

शीस बोडिलें सकेशीं । तेथ राहूं न शके ऊ जैसी ।
तेवीं गेलिया कामक्रोधांसी । वस्ती लोभासी असेना ॥ २५० ॥
डोक्यावरचे सारेच केस काढून मुंडन केलें म्हणजे तेथ ऊ जशी राहू शकत नाही, त्याप्रमाणे काम आणि क्रोध गेले, म्हणजे मग लोभाला राहायला ठिकाणच नाहीं २५०.

जेवीं कां भ्रताराचें मरण । घेऊनि जाय अहेवपण ।
तेवीं कामक्रोधेंवीण । लोभलक्षण असेना ॥ ५१ ॥
भ्रताराचा मृत्यु ज्याप्रमाणे सौभाग्य घेऊन जातो, त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय लोभालाही कोठें थारा नसतो ५१.

या नांव ‘निर्लोभता’ । सत्य जाण सर्वथा ।
क्रोधलोभांतें वाढविता । जाण तत्त्वतां कामचि ॥ ५२ ॥
ह्याचेच नांव ‘निर्लोभता’ हे तू सत्य जाण, खरोखर क्रोधाला आणि लोभाला वाढविणारा काय तो एक कामच ५२.

जेथ कामाचें अपूर्ण काज । तेथ क्रोधाचें खवळे तेज ।
जेव्हां कामाचें पूर्ण निज । तेव्हां नाचे भोज लोभाचें ॥ ५३ ॥
जेथें कामाचे कार्य अपुरे राहातें तेथेंच क्रोधाचे तेज चढते; आणि कामाचे मनोरथ पूर्ण होतात, तेव्हां लोभाचे बंड नाचू लागते ५३.

जेवीं दीपाची दीपकळा । ते सवें वागवी तेजकाजळां ।
तेवीं क्रोधलोभांचा सोहळा । कामाजवळा संतत ॥ ५४ ॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, तेजाळा व काजळीला बरोबर वागविते, त्याप्रमाणे क्रोधाचा आणि लोभाचा बडेजाव नेहमी कामाजवळच असतो ५४.

जेवीं कां शारियाचें शीत । घामज्वरासमवेत ।
तेवीं क्रोधलोभयुक्त । जाण निश्चित कामचि ॥ ५५ ॥
किंवा हिंवाच्या थंडीबरोबर ज्याप्रमाणे घाम व ज्वर असतात, त्याप्रमाणे कामही नेहमीं क्रोधाने आणि लोभाने युक्त असतो ५५.

जेथ कामाचा नाहीं पांगु । तेचि क्रोधलोभांचा त्यागु ।
हा समूळ उपावो चांगु । स्वयें श्रीरंगु बोलिला ॥ ५६ ॥
जेथे कामाचा पांग नाही, तेथे क्रोधाचा आणि लोभाचा सहजच त्याग होतो. स्वतः श्रीकृष्ण म्हणाले. हाच उपाय सर्वात चांगला आहे ५६.

एवं कामत्यागें सर्वथा । त्यागु पावे क्रोधलोभता ।
भूतांसी प्रियत्वें जे हितता । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ ५७ ॥
तात्पर्य, कामाचा त्याग केला की, क्रोध आणि लोभ ह्यांचाही त्याग होतो. आतां प्राणिमात्रांचे प्रियत्वाने असणारे हित कसे साधता येते तेंही सांगतों ऐक ५७.

जैशी शक्ति आपणासी । तैसें प्रिय करावें भूतांसी ।
अगत्य विचंबु ज्याचा ज्यासी । तें तें त्यासी अर्पावें ॥ ५८ ॥
जितके आपल्याला सामर्थ्य असेल, तितकें प्राणिमात्राचे हित करीत असावें. त्यांना ज्याची अगत्याने गरज असेल, ते ते त्यांना देत असावें ५८.

अन्न वस्त्रदान मान । पोटींच्या कळवळ्यानें जाण ।
करावें भूतीं प्रीयाचरण । हा स्वधर्म जाण सर्वांचा ॥ ५९ ॥
अंत:करणाच्या कळवळ्याने अन्न, वस्त्र, दान, मान वगैरे देऊन प्राणिमात्रांचे प्रिय असें आचरण करीत असावें: हा सर्वांचाच स्वधर्म होय हे लक्षात ठेव ५९.

छापील पुस्तकात २६० क्रमांकाची ओवी नाही.

ऐसें प्रिय करावें भूतां । जें परिपाकीं ये त्याच्या हिता ।
जेणें प्रियें उपजे बाधकता । तें सर्वथा न करावें ॥ ६१ ॥
प्राणिमात्राचें असें प्रिय करावें की, शेवटी ते त्यांच्या हितालाच कारण होईल. जे प्रिय त्यांच्या हिताला बाधक होईल ते कधीही करूं नये २६१.

जो भूतप्रिय हितकारी । ऐसा जो पुरुष संसारीं ।
मी भगवंत त्याच्या घरीं । सर्व हित करीं सर्वदा ॥ ६२ ॥
प्राणिमात्रांचे प्रिय व हित करणारा असा जो संसारांत पुरुष असेल, त्याच्या घरी मी भगवंत सर्वदा सर्व प्रकारे कल्याणच करीत असतों ६२.

त्याच्या अशुभांची होळी । भूतहितप्रियमेळीं ।
मी स्वयें करीं वनमाळी । तेचि काळीं तत्त्वतां ॥ ६३ ॥
प्राणिमात्राचे इष्ट आणि हित तो करीत असल्यावेळीच त्याच्या संकटाची मी स्वत:च श्रीकृष्ण होळी करून टाकतों ६३.

जो सद्‍भावें सत्य साचार । भूतांसी हितत्वें प्रियकर ।
त्यासी मी भूतात्मा श्रीधर । करीं संसार सुखरूप ॥ ६४ ॥
जो सद्भावाने खरोखर प्राण्यांचे हितच करीत असल्यामुळे सर्व प्राणिमात्राला प्रियकर असतो, त्याला मी सर्व प्राणिमात्रांच्या अंत:करणांत वास करणारा परमात्मा, सर्व संसार सुखरूप करून देतों ६४.

अहिंसादि सप्तलक्षण । हा सर्वांचा स्वधर्म जाण ।
सर्वाश्रम सर्व वर्ण । त्यांसी मुख्यत्वें जाण हा धर्म ॥ ६५ ॥
अहिंसा आदिकरून जे सात गुण या श्लोकांत सांगितले आहेत, तो सर्वांचाच स्वधर्म होय. सर्व आश्रमांना व सर्व वर्णाना मुख्यत्वे करून हाच धर्म आहे ६५.

चतुर्वर्णस्वभावप्रकृती । वर्णबाह्यांची लक्षणस्थिती ।
सर्व वर्णांची स्वधर्मगती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥ ६६ ॥
चारीही वर्णाचा प्रकृतिस्वभाव, वर्णबाह्य असणारांची स्थिति व लक्षणे, आणि साऱ्या वर्णांची स्वधर्मगतिही मी तुला सांगितली ६६.

यावरी आश्रमस्वधर्मता । तुज मी सांगेन आतां ।
उद्धवा ऐक गा तत्त्वतां । प्रथमतां ब्रह्मचर्य ॥ ६७ ॥
आतां उद्धवा ! ह्यापुढे मी तुला आश्रमांचे धर्म काय काय असतात ते सांगतो. त्यांत प्रथम ब्रह्मचर्य ऐक ६७.

ब्रह्मचर्य द्विविध जाण । एकाचें ‘नैष्ठिक्य’ संपूर्ण ।
एक तो ‘उपकुर्वाण’ । ऐक लक्षण दोहींचें ॥ ६८ ॥
ब्रह्मचर्य हे दोन प्रकारचे आहे, एकाचें नांव पूर्ण ‘नैष्टिक्य’ आणि दुसऱ्याचे नांव ‘ उपकुर्वाण’. आता त्या दोहींचीही लक्षणे ऐक ६८.

व्रतबंध वेदाध्ययन जाहल्यापाठीं । जो परमार्थीं ठेवूनि दृष्टी ।
गृहस्थाश्रमाची न करी गोठी । ‘नैष्टिक्य’ परिपाठी त्या नांव ॥ ६९ ॥
व्रतबंध होऊन वेदाध्ययन झाल्यानंतर जो परमार्थावर दृष्टि ठेवून गृहस्थाश्रमाच्या मुळी वाटेसच जात नाही, त्याचे नांव ‘नैष्टिक्य ‘ ब्रह्मचर्य ६९.

वेदशास्त्र संपूर्ण पठन । गुरुदक्षिणा व्रतविसर्जन ।
करूनि करी पाणिग्रहण । ‘उपकुर्वाण’ या नांव ॥ २७० ॥
दुसरें, वेदशास्त्र सर्व पठण करून गुरुदक्षिणा देऊन ब्रह्मचर्यव्रताची समाप्ति करून नंतर यथाविधीने स्त्रीचें पाणिग्रहण करणे झाला ‘उपकुर्वाण’ असे म्हणतात २७०.

द्वितीयं प्राप्यानुपूर्व्याज्जन्मोपनयनं द्विजः ।
वसन्गुरुकुले दान्तो ब्रह्माधीयीत चाहुतः ॥ २२ ॥
मेखलाऽजिनदण्डाक्ष ब्रह्मसूत्र कमण्डलून् ।
जटिलोऽधौतदद्वासोऽरक्तपीठः कुशान् द्‍धत् ॥ २३ ॥
स्नानभोजनहोमेषु जपोच्चारे च वाग्यतः ।
न च्छिंद्यान्नखरोमाणि कक्षोपस्थगतान्यपि ॥ २४ ॥
[श्लोक २२-२३-२४] ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी गर्भधान इत्यादी संस्कारांनी प्रारंभ करून क्रमाने यज्ञोपवीत संस्काररूप दुसरा जन्म प्राप्त करून गुरूकुलात राहावे तेथे इंद्रियांवर संयम ठेवून आचार्यांनी बोलावल्यावर वेदांचे अध्ययन करावे. (२२)
मेखला, मृगचर्म, दंड, रूद्राक्षमाळ, यज्ञोपवीत आणि कमंडलू धारण करावे डोक्यावर जटा ठेवाव्यात दंतधावन आणि वस्त्रे धुणे या गोष्टी हौस म्हणून करू नयेत रंगीत आसनावर बसू नये आसनासाठी वगैरे कुश घ्यावेत. (२३)
स्नान, भोजन, हवन, जप आणि मलमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावे काख आणि गुप्तेंद्रियाजवळील केस काढू नयेत तसेच नखेही कधी काढू नयेत. (२४)

गर्भाधान पुंसवन । जातकर्म अन्नप्राशन ।
हीं समस्त कर्में पूर्वीं जाण । केलीं संपूर्ण चौलान्त ॥ ७१ ॥
गर्भाधान, पुंसवन, जातकर्म, अन्नप्राशन, ही सारी कर्में चौलापर्यंत पूर्वीच होतात ७१.

याउपरी उपनयन । गुरुद्वारा गायत्रीग्रहण ।
सावित्रजन्म हें संपूर्ण । ‘व्रतबंध’ जाण या नांव ॥ ७२ ॥
त्यानंतर मौंजीबंधन व गुरूच्या द्वारें गायत्रीमंत्रोपदेश झाला म्हणजे त्याचा दुसरा ‘सावित्र’ जन्म होतो त्यालाच ‘व्रतबंध असे म्हणतात ७२.

एवं गायत्रीमंत्रें जाण । द्विजन्मे होती तीनी वर्ण ।
हा ब्रह्मचर्याश्रम संपूर्ण । व्रतधारण वेदार्थ ॥ ७३ ॥
अशा प्रकारे गायत्री मंत्राने तिन्ही वर्णाचे दोन दोन जन्म होतात. हा ब्रह्मचर्याश्रम होय. हे व्रतधारण केवळ वेदाध्ययनाकरितां असते ७३.

तेथ वेदाध्ययन निर्धारीं । गुरुगृहीं वसे ब्रह्मचारी ।
त्याच्या व्रतनेमाची कुसरी । ऐक ते परी सांगेन ॥ ७४ ॥
म्हणून वेदाध्ययन करण्याच्या निश्चयाने ब्रह्मचारी गुरूच्या घरी राहतो. तेथील त्याचा व्रताचा नेम पाळण्याचे काम कसे असते, त्याचा प्रकार सांगतों तो ऐक ७४.

मुंजी जानवें कृष्णाजिन । पळसाचें दंडग्रहण ।
कमंडलु वागवावा जाण । जळाचरण करावया ॥ ७५ ॥
मुंज [मोळाचा कडदोरा] , जानवे, कृष्णाजिन, पळसाचा दंड व पाणी नेण्याआणण्याकरितां कमंडलु बाळगावा ७५.

न करावें मस्तकवपन । न करावें तैलाभ्यंगस्नान ।
न करावें दंतधावन । केशविंचरण न करावें ॥ ७६ ॥
मस्तक वपन करवू नये, तैलाभ्यंगस्नान करूं नये, दंतधावन करूं नये, केशही कधी विंचरूं नयेत ७६.

न करावें नखनिकृंतन । न करावें रोमच्छेदन ।
बाहुमूलादिक जे जाण । गुह्य स्थान अतिव्याप्त ॥ ७७ ॥
नखें कधीं काढू नयेत, कधीं केस कापू नयेत, काखेत व गुप्त ठिकाणी असतात ते तसेच वाढलेले ठेवावेत ७७.

रजकक्षाळित वस्त्रें जाण । त्याचें न करावें परिधान ।
प्रवाहीं करावें स्नान । प्रातर्मध्यान्ह दोंही काळीं ॥ ७८ ॥
धोब्याने धुऊन आणलेली वस्त्रें कधीही धारण करूं नयेत. सकाळी व दुपारी दोन्ही वेळां वाहत्या पाण्यांत स्नान करावें ७८.

आसनीं श्वेत पीठासन । श्वेत वस्त्रांचें धारण ।
रुद्राक्ष अथवा पद्माक्ष जाण । मालाग्रहण जपार्थ ॥ ७९ ॥
पांढरें आसन करून त्याच्यावर पांढरे शुभ्र वस्त्र घालावे आणि जपाकरितां रुद्राक्षाची अथवा कमळांच्या बियांची माळा घ्यावी ७९.

कुशादि दर्भ पवित्र । तिहीं युक्त असावे कर ।
ऐक मौनाचा विचार । तुज मी साचार सांगेन ॥ २८० ॥
कुश आदिकरून पवित्र दर्भ हातांत असावेत. आतां मौनाचाही विचार तुला सांगतो. तोही ऐक २८०.

मळमूत्र कां करितां स्नान । जप होम आणि भोजन ।
उभय संध्याकाळीं जाण । निश्चित मौन धरावें ॥ ८१ ॥
मलमूत्रविसर्जन व स्नान करीत असतां, तसंच जप, होम, भोजन व दोन्ही वेळची संध्या करतांना नियमाने मौनव्रत धारण करावें ८१.

नाहीं अभ्यंग केशविंचरण । तेणें जटा वळल्या आपण ।
हें ब्रह्मचारियासी जाण । व्रतधारण नेमस्त ॥ ८२ ॥
अभ्यंगस्नान करावयाचे नाही व केशही विंचरावयाचे नाहीत, त्यामुळे केसांच्या आपोआपच जटा वळतात. हे नेमस्त व्रत ब्रह्मचाऱ्याला सांगितलेले आहे ८२.

इतुकेनि व्रतेंसीं जाण । सदा गुरुसेवेसी सावधान ।
गुरु कृपेनें सांगे अध्ययन । तेव्हां वेदपठन करावें ॥ ८३ ॥
इतकें व्रत सांभाळून गुरुसेवेविषयीं सदासर्वदा दक्ष असावें. आणि गुरु जेव्हां कृपा करून अध्ययन सांगेल, त्याच वेळी वेदपठण करावें ८३.

मज पढों सांगावें आतां । हा आग्रह न करावा गुरुनाथा ।
त्याची आज्ञा वंदूनि माथां । निष्कपटता गुरुसेवा ॥ ८४ ॥
मला आतांच पाठ द्यावा, असा गुरूला कधीही आग्रह करू नये. त्याची आज्ञा शिरसावंद्य करून निष्कपट भावाने गुरूची सेवा करावी ८४.

अध्ययन सांगेना लवलाह्या । तरी सांडूनि कुलाचार्या ।
पढों गेलिया आणिका ठाया । गुरु त्यागिलिया महादोष ॥ ८५ ॥
लवकर लवकर शिकवीत नाही म्हणून कुलगुरुला सोडून दुसऱ्या ठिकाणी शिकावयास जाऊन पहिला गुरु सोडल्यास महादोष आहे ८५.

सेवा करावी अहर्निशीं । जेणें कृपा उपजे स्वामीसी ।
ते कृपेस्तव अध्ययनासी । अहर्निशीं सांगेल ॥ ८६ ॥
गुरुला दया येईल अशी रात्रंदिवस गुरूची सेवा करावी. त्या दयेनें तोच रात्रंदिवस पढवू लागेल ८६.

ठेवूनि गुरुचरणीं भावार्था । पढावें गा वेदशास्त्रार्था ।
आकळावें वेदतत्त्वार्था । परमार्थतां निजबुद्धी ॥ ८७ ॥
गुरुचरणावर भक्ति ठेवून वेदशास्त्रार्थाचे पठण करावे आणि परमार्थबुद्धीने वेदाच्या तत्वार्थांचे संपादन करावें ८७.

रेतो नावकिरेज्जातु ब्रह्मव्रतधरः स्वयम् ।
अवकीर्णेऽवगाह्याप्सु यतासुस्त्रिपदीं जपेत् ॥ २५ ॥
[श्लोक २५] पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे स्वतः कधीही वीर्यपात करू नये जर कधी वीर्यस्खलन झालेच, तर पाण्याने स्नान करून, प्राणायाम करून गायत्री मंत्राचा जप करावा. (२५)

या रीतीं ब्रह्मचारीं देख । वीर्यत्याग बुद्धिपूर्वक ।
करूं नये आवश्यक । व्रतविशेष ब्रह्मचर्य ॥ ८८ ॥
अशा रीतीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. ब्रह्मचाऱ्याने मुद्दाम होऊन वीर्यत्याग कधीही करूं नये. हेच ब्रह्मचर्यामध्ये पाळण्याचे मुख्य व्रत आहे ८८.

स्वप्नीं जाहल्या वीर्यपतन । शास्त्रोक्तविधीं करावें स्नान ।
मग प्रायश्चित्तार्थ जाण । गायत्रीस्मरण करावें ॥ ८९ ॥
स्वप्नांत वीर्यपतन झालें असतां शास्त्रोक्त विधीप्रमाणे स्नान करावें, आणि मग प्रायश्चित्ताकरितां गायत्रीचे स्मरण करावें ८९.

ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासी । प्रयत्‍नें वीर्यत्यागु नाहीं त्यांसी ।
जो करी तो अतिदोषी । आश्रमधर्मासी बुडविलें ॥ २९० ॥
ब्रह्मचारी, वानप्रस्थ किंवा संन्यासी यांना मुद्दाम होऊन वीर्यत्याग करण्याचा अधिकार नाही. असे असतां जर कोणी तसें कीरील , तर त्याला अत्यंत दोष लागून त्याचा आश्रमधर्म बुडून जातो २९०..

स्वप्नीं जाहलिया वीर्यपतन । करावें मृत्तिका सचैल स्नान ।
मग प्रायश्चित्तार्थ जाण । विहिताचरण जप किजे ॥ ९१ ॥
स्वप्नांत वीर्यपतन झालें तर मृत्तिका लावून सचैल स्नान करावे आणि मग प्रायश्चित्ताकरितां विध्युक्त जप करावा ९१.

अग्न्यर्काचार्यगोविप्रगुरुवृद्धसुरान् शुचिः ।
समाहित उपासीत सन्ध्ये च यतवाग्जपन् ॥ २६ ॥
[श्लोक २६] ब्रह्मचर्याने पावित्र्य पाळून एकाग्रतेने अग्नी, सूर्य, आचार्य, गाय, ब्राह्मण, गुरू, वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी तसेच सायंकाळी आणि प्रातःकाळी मौन धारण करून संध्योपासना व गायत्री मंत्राचा जप करावा. (२६)

गायत्रीदात्या आचार्यपण । माता पिता तें गुरुस्थान ।
अग्निसूर्यादि सुरगण । गो ब्राह्मण आणि ज्येष्ठ ॥ ९२ ॥
गायत्रीमंत्र देतो तो ‘आचार्य’ होय. माता व पिता हेही गुरुच होत. अग्नि, सूर्य आदिकरून सारे देव, व गाय, ब्राह्मण आणि वडील मनुष्य ९२,

यांचें करावया उपासना । बाह्य शुचि अंतरीं समाधान ।
गुरुचरणीं अनन्य शरण । आज्ञापालन पितरांचें ॥ ९३ ॥
ह्या सर्वांची उपासना करण्यासाठी बाहेरची शुद्धि व अंतरांतील समाधान पाहिजे. गुरुचरणीं अनन्य शरण असून मातापितरांचीही आज्ञा पालन करावी ९३.

अग्नीचे ठायीं हवन । इंद्रादि देवांचें स्तवन ।
ब्राह्मण तें पूज्यस्थान । अर्घ्यदान सूर्यासी ॥ ९४ ॥
अग्नीचे ठायीं हवन करावें, इंद्रादि देवांचे स्तवन करावें, ब्राह्मण निरंतर पूज्य मानावेत व सूर्याला अर्घ्यप्रदान द्यावे ९४.

ज्येंष्ठांसी साष्टांग नमन । गायीसी अंगकुरवाळण ।
सायंप्रातःसंध्येसी मौन । मध्यान्हीं जाण मौन नाहीं ॥ ९५ ॥
वडिलांना साष्टांग नमस्कार घालावा, गाईचें आंग कुरवाळावें, सायंप्रातःसंध्येमध्ये मौन असावें. मध्यान्हसंध्येला मौन नको ९५.

सद्‍गुरूचा समर्थवादु । सर्वां वरिष्ठ सर्ववंद्यु ।
ज्याचा प्रताप प्रसिद्धु । स्वयें गोविंदु सांगत ॥ ९६ ॥
सद्गुरूची गोष्ट म्हणजे फार मोठी; गुरुतत्त्व सर्वात श्रेष्ठ असून सर्ववंद्य होय; त्याचा प्रताप प्रसिद्ध असल्याचे श्रीकृष्ण स्वतःच सांगतात ९६.

आचार्यं मां विजानीयान्नावमन्येत कर्हिचित् ।
न मर्त्यबुद्ध्यासूयेत सर्वदेवमयो गुरुः ॥ २७ ॥
[श्लोक २७] आचार्यांना माझेच स्वरूप मानावे त्यांचा कधीही अपमान करू नये त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दोषदृष्टीने पाहू नये कारण गुरू सर्वदेवमय आहेत. (२७)

जो अंतर्यामी ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु ।
जो अनंत अपरंपारु । तो मी श्रीगुरु शिष्याचा ॥ ९७ ॥
अंतर्यामी असा जो ईश्वर, विश्वात्मा, विश्वंभर, अनंत व अपरंपार असा जो मी, तोच शिष्याचा श्रीगुरु होय ९७.

गुरुनामाची जे मातु । तो मी साचार भगवंतु ।
देखोनि भजनभावार्थु । पुरवीं मनोरथु शिष्याचा ॥ ९८ ॥
गुरुनामाची म्हणून जी गोष्ट आहे, ती खरोखर भगवंतच होय. भजनाचा भक्तिभाव पाहून शिष्याचे मनोरथ मीच पूर्ण करतों ९८.

ज्या सद्‍गुरूच्या अंगुष्ठीं । ब्रह्मादि देवांचिया कोटी ।
ज्याच्या नांवाची गोठी । वंद्य वैकुंठीं कैलासीं ॥ ९९ ॥
ज्या सद्गुरूच्या अंगुष्ठामध्ये ब्रह्मादिक देवांच्या कोटीच्या कोटी असतात, ज्याच्या नावाच्या गोष्टी वैकुंठांत व कैलासांतही वंद्य होतात ९९,

ज्याचें नांव ऐकतां कानीं । यम काळ कांपती दोनी ।
ब्रह्मा विष्णु रुद्र तिन्ही । हात जोडुनी तिष्ठती ॥ ३०० ॥
ज्याचें नांव कानांनी ऐकताच यम व काळ थरथर कापतात, आणि ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे तिघेही हात जोडून पुढे उभे असतात ३००,

सकळ वेदांचें निजसार । तें सद्‍गुरुस्वरूप साचार ।
ऐसा शिष्यासी निर्धार । निरंतर असावा ॥ १ ॥
तसेंच जें साऱ्या वेदांचें गुप्त रहस्य, तेच खरोखर सद्गुरूचे स्वरूप होय, असाच शिष्याचा निरंतर निश्चय असला पाहिजे १.

त्यासी मनुष्यबुद्धीं आपण । कदा न करावें हेळण ।
गुरुनिंदा बोलतां जाण । आली नागवण सर्वार्थीं ॥ २ ॥
त्याला केवळ सामान्य मनुष्य आहे असे समजून त्याचा कधीं अनादर करूं नये. गुरूची निंदा तोंडांतून काढली तर सर्वस्वी नाश झालाच म्हणून समजावें २.

सद्‍गुरुनिंदेचा एकांतु । करूं आला परम आप्तु ।
तो त्यागावा जेवीं पतितु । हा नव्हे अर्थु तैं पळावें ॥ ३ ॥
एखादा कोणी अत्यंत आप्त असून एकांती सद्गुरूची निंदा करण्यासाठी आला, तर बाटलेल्या मनुष्याचा जसा धिक्कार करतात, त्याप्रमाणे त्याचा त्याग करावा. ते न साधेल तर तेथून आपण पळून जावें ३.

सद्‍गुरुनिंदेची वाणी । ऐकतां बोटें द्यावीं कानीं ।
सद्‍गुरूसी भावें स्मरोनी । तें स्थानही त्याजोनी पळावें ॥ ४ ॥
सदुरूच्या निंदेचे शब्द ऐकू आले तर कानांत बोटे घालावीत. भक्तिभावानें सद्गुरूचे स्मरण करून ती जागा सोडून निघून जावें ४.

त्या सद्‍गुरुनिंदेची स्वयें मातु । करिता बुडाला निजस्वार्थु ।
धुळीस मिळाला परमार्थु । आला अपघातु अंगासी ॥ ५ ॥
सद्गुरुनिंदेची गोष्ट आपण स्वतःच बोलली तर सर्वस्व बुडालें, परमार्थ सारा धुळीला मिळाला आणि सारीच बाजू आंगावर आली म्हणून समजावे ५.

ऐशिया गुरूच्या ठायीं जाण । पत्र पुष्प अन्न धन ।
शिष्यें करूं नये वंचन । तें स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६ ॥
अशा गुरूच्या ठिकाणी पत्र, पुष्प, अत्र, धन याविषयी कधीही प्रतारणा करूं नये, असें श्रीकृष्ण स्वतः (पुढील श्लोकात ) सांगत आहेत ६.

सायं प्रातरुपानीय भैक्ष्यं तस्मै निवेदयेत् ।
यच्चान्यदप्यनुज्ञातमुपयुञ्जीत संयतः ॥ २८ ॥
[श्लोक २८] सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर ठेवावी तसेच इतरही गुरूदेवांना अर्पण करावे त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा. (२८)

अन्नधनपुष्पी फळीं । सायंप्रातर्मध्यान्हकाळीं ।
भिक्षा मिळे ते गुरूजवळी । अर्पूनि कृतांजळी रहावें ॥ ७ ॥
सकाळी, दुपारी व संध्याकाळी अन्न, द्रव्य, पुष्पें, फळे जी काय भिक्षा मिळेल ती गुरूजवळ ठेवून हात जोडून त्यांच्यापुढे उभे रहावे ७.

तेथ गुरुआज्ञा जाहल्याही जाण । उदरापुरतें घ्यावें अन्न ।
अन्नावेगळें पदार्थभरण । घेवों न ये जाण ब्रह्मचार्‍या ॥ ८ ॥
त्या वेळी गुरूंनी आज्ञा दिली तरी पोट भरण्यापुरतेच अन्न त्यांतून ग्रहण करावें, ब्रह्मचाऱ्याने अन्नाशिवाय दुसरा कोणताच पदार्थ ग्रहण करू नये. ८.

सायं प्रातः काळीं जाण । ब्रह्मचार्‍या विहित भोजन ।
गुरुआज्ञा जें दिधलें अन्न । तेणें प्राणतर्पण करावें ॥ ९ ॥
सकाळी आणि संध्याकाळी भोजन करणे ब्रह्मचाऱ्याला विहित आहे. गुरुआज्ञेने जेवढे अन्न मिळेल तेवढ्यानेच क्षुधाशांति करावी ९.

तेथ न म्हणावें धडगोड । न करावें रसनाकोड ।
न वाढवावा विषय वाड । देहनिर्वाहीं चाड शिष्यासी ॥ ३१० ॥
त्यांत बरेवाईट काहीएक म्हणू नये; जिव्हेचे लाड कधी पुरवू नयेत; विषयविस्तार वाढवू नये. देहाचा निर्वाह झाला म्हणजे झाले, अशीच शिष्याची इच्छा असावी ३१०,

भोजनीं कांहीं न मागावें जाण । यालागीं दृढ धरावें मौन ।
अधिक खादलिया अन्न । तें प्रतिबंधन गुरुसेवे ॥ ११ ॥
भोजन करतांना काहीएक मागू नये; त्याकरितां मौन धरावें. अधिक अन्न खाल्ले तर ते गुरुसेवेला प्रतिबंधक होते ११.

आहारीं अधिक घेतलिया अन्न । निद्रा आलस्य दाटी गहन ।
अत्यंत अल्प जें भोजन । तेणें विकळचळण देहाचें ॥ १२ ॥
जेवतांना अधिक अन्न घेतले तर निद्रा व आळस अतिशय येतो, आणि. फारच थोडे जेवले तर देहाला विकळपणा येतो १२.

गुरुसेवेलागीं जाण । वृत्ती राखावी सावधान ।
यालागीं शिष्यासी भोजन । युक्ताहारपण सर्वदा ॥ १३ ॥
गुरुसेवेसाठी वृत्ति सावधान राखावी. ह्यासाठी शिष्याचे जेवण नेहमी बेताचे असावें १३.

गुरुसेवेलागीं जाण । शरीर राखावें सावधान ।
तें गुरुसेवेचें लक्षण । स्वयें जनार्दन सांगत ॥ १४ ॥
गुरूच्या सेवेसाठी शरीरही चांगलें सावधान राखावें. तें गुरुसेवेचे लक्षण स्वतः जनार्दन (श्रीकृष्ण) सांगत आहेत १४.

शुश्रूषमाण आचार्यं सदोपासीत नीचवत् ।
यानशय्यासनस्थानैर्नातिदूरे कृताञ्जलिः ॥ २९ ॥
[श्लोक २९] आचार्य कुठे जात असतील, तर त्यांच्या मागे मागे चालावे ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपास झोपावे. ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहात, हात जोडून, जवळच उभे राहावे. अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांची आज्ञा पालन करण्यात नेहमी तत्पर असावे. (२९)

सर्वदा अतिसादर । न पडतांही अंतर ।
गुरुसेवेसी निरंतर । अतितत्पर उल्हासें ॥ १५ ॥
गुरुसेवेमध्ये तिळभरही अंतर न पडूं देतां सदासर्वदा उल्हासानें अत्यंत तत्पर असावें १५.

गुरु यानारूढ असतां । पुढें चालावें साटोपतां ।
पाठीसी यावें चरणीं चालतां । उपचारतासमवेत ॥ १६ ॥
गुरु एखाद्या वाहनारूढ झाले असतां आपण त्यांच्यापुढे मोठ्या उत्साहाने चालावें : आणि ते पायाने चालू लागले असता त्यांचे सामान घेऊन त्यांचे पाठीमागून चालावें १६.

समयोचित जाणोन । द्यावें तांबुल जीवन ।
करावें चरणसंवाहन । घालावें आसन बैसती तेथें ॥ १७ ॥
त्यांचा कल व प्रसंग पाहून त्यांना पाणी, विडा वगैरे द्यावा; ते बसतील तेथे त्यांचे आसन घालावे व त्यांचे पाय रगडावेत १७.

सद्‍गुरु बैसल्या आसनीं । शिष्यें न बसावें नेहटूनी ।
दूरी नवजावें तेथूनी । नयनोन्मीलनीं रहावें ॥ १८ ॥
सद्गुरु आसनावर बसलेले असतां शिष्याने त्यांच्या अगदी जवळ बसूं नये व फार लांबही जाऊं नये. त्यांच्या नजरेखाली असावें १८.

अंजळीसंपुट जोडुनी । संमुख राहावें सावधानीं ।
गुरूची संज्ञा ज्यालागूनी । तें अविलंबनीं करावें ॥ १९ ॥
हात जोडून समोर सिद्ध असावें. गुरूंनी खूण केली की ते तत्काल करावें १९.

गुरु शेजेवरी निजले असतां । जवळी नसावें तत्त्वतां ।
जेथूनि ऐकूं ये वचनार्था । तेथें निशीं अवस्था क्रमावी ॥ ३२० ॥
गुरु बिछान्यावर निजले असता, त्यांच्याजवळ राहू नये. त्यांनी हाक मारलेली ऐकावयास येईल इतक्या अंतरावर रात्र घालवावी ३२०.

मी एक सेवेनें संपन्न । ऐसा धरिलिया अभिमान ।
केले सेवेसी आंचवण । सवेंचि जाण होईल ॥ २१ ॥
सेवा करणारा काय तो एक मीच, असा मनांत अभिमान बाळगला तर सारीच सेवा व्यर्थ होईल २१.

सेवकांमाजीं मी एक । केवळ रंकाचाही रंक ।
ऐसा भावो निष्टंक । सेवेसी देख धरावा ॥ २२ ॥
सेवा करतांना साऱ्या सेवकांमध्ये मी केवळ रंकाचाही रंक म्हणजे सेवकाचा सेवक आहे, असाच निश्चयाने भाव धरावा २२.

तैसेंचि नीच काम करितां । लाज न धरावी सर्वथा ।
उबग न मानूनी चित्ता । उल्हासता गुरुभजनीं ॥ २३ ॥
त्याचप्रमाणे सेवेचे एखादें नीच काम करतांना लाज अशी मुळीच धरूं नये, मनांत कोणत्याही प्रकारचा कंटाळा न धरतां गुरुभजनामध्ये नेहमी उल्हासच बाळगीत जावा २३.

एवंवृत्तो गुरुकुले वसेद्‍भोगविवर्जितः ।
विद्या सामाप्यते यावद्‌बिभ्रद्‌व्रतमखण्डितम् ॥ ३० ॥
[श्लोक ३०] विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरूकुलात या प्रकारे वागत राहावे आणि ब्रह्मचर्यव्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. (३०)

सांडोनि सकळ भोगांतें । गुरुकुळीं राहोनि तेथें ।
गुरुसेवेचेनि व्रतें । प्रिय सर्वांतें तो जाहला ॥ २४ ॥
सर्व सुखोपभोग सोडून गुरूच्या घरी राहून तेथें गुरूच्या सेवेच्या व्रतानेच तो सर्वांना प्रिय होतो २४.

एवं गुरुसेवायुक्त । धरोनियां अखंड व्रत ।
पावला वेदशास्त्र समस्त । पढणें समाप्त पैं जाहलें ॥ २५ ॥
अशा प्रकारें गुरुसेवा करून अखंड ब्रह्मचर्यव्रत पाळून वेदशास्त्रांत प्रवीण होऊन सारें शिकणे संपलें २५,

एवं विद्या जाहलिया समाप्त । उपकुर्वाण नैष्ठिक व्रत ।
स्वयें सांगावया अनंत । पुढील श्लोकार्थ सांगतु ॥ २६ ॥
व सारी विद्या संपूर्ण झाली, म्हणजे नष्ठिक व उपकुर्वाण व्रत कसे पाळावे हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण पुढील श्लोकार्थ सांगत आहेत २६.

यद्यसौ छन्दसां लोकमारोक्ष्यन् ब्रह्मविष्टपम् ।
गुरवे विन्यसद्देहं स्वाध्यायार्थं बृहद्‌व्रतः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] ब्रह्मचार्‍याची वेदांच्या निवासस्थानीब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्याने जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्येच समर्पित करावे. (३१)

जरी ब्रह्मचारी व्रतस्थ । येणेंचि आश्रमें निश्चित ।
सत्यलोक वैकुंठपर्यंत । वांछी वेदोक्त मत्प्राप्ती ॥ २७ ॥
ब्रह्मचर्यव्रत पाळीत असतां तोच आश्रम निरंतर चालविण्याचा जो निश्चय करितो व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्यलोकापासून वैकुंठापर्यंतची माझी प्राप्ति इच्छितो २७,

तेणें यावज्जन्म आपण । दृढ करावें गुरुभजन ।
निजदेहाचेंही जाण । करी समर्पण गुरुचरणीं ॥ २८ ॥
त्याने स्वतः यावज्जन्म गुरुभजनच यथास्थित घडण्याकरिता आपला सारा देहच गुरुचरणाला अर्पण करावा २८.

सद्‍गुरुभजनाची परवडी । नित्य नूतन आवडी ।
निजात्मभावें चोखडी । लागली गोडी गुरुचरणीं ॥ २९ ॥
रोज नव्या आवडीनें गुरूचे भजन करावे. गुरुचरणीं आत्मभावनाच ठेवली म्हणजे त्याचीच गोडी लागून रहाते २९.

पूर्वील व्रतें व्रत धरी । तेंचि व्रत दृढ करी ।
होय नैष्ठिक ब्रह्मचारी । गुरुभजनावरी निर्धारु ॥ ३३० ॥
असा पुरुष पूर्वी धरलेलें ब्रह्मचर्यव्रतच पुढे चालवितो आणि तेच दृढ करितो. तोच ‘नैष्ठिक’ ब्रह्मचारी होतो व गुरुभजनावरच निश्चय ठेवतो ३३०.

न मनी सन्मानाचें कोड । न म्हणे विषय गोड ।
न धरी संसाराची चाड । व्रतीं दृढ व्रतस्थ ॥ ३१ ॥
तो सन्मानाची इच्छा करीत नाहीं; विषयाची गोडी धरीत नाहीं; संसाराची चाड बाळगीत नाही; आपल्या व्रतांत दृढ व्रतस्थ राहतो ३१.

ऐसा थोर व्रतें व्रतधर । तैसाचि गुरुभजनीं सादर ।
करी सद्‍गुरूशीं विचार । वेदांतसार स्वाध्यायें ॥ ३२ ॥
असें व्रत पाळून तो थोर व्रतधारी होतो, गुरुभजनावर त्याची तशीच निष्ठा जडते , आणि तो सद्गुरूंशी स्वाध्यायपूर्वक वेदांतरहस्याचाच विचार करीत राहतो ३२.

‘स्व’ म्हणिजे आत्मा जाण । ते ठायीं नित्य अनुसंधान ।
तो ‘स्वाध्याय’ म्हणती सज्ञान । ज्ञानविचक्षण निजद्रष्टे ॥ ३३ ॥
‘स्व’ म्हणजे आत्मा हें लक्षात ठेव. त्याचेच नित्य अनुसंधान ठेवणे, यालाच सुज्ञ ज्ञानविचक्षण व निजद्रष्टे लोक ‘स्वाध्याय’ असे म्हणतात ३३.

ऐशिया साधकासी जाण । सर्वत्र ब्रह्मभावन ।
हेंचि स्वमुखें मधुसूदन । स्वयें आपण सांगता ॥ ३४ ॥
अशा प्रकारच्या साधकाला सर्वत्र ब्रह्माचीच भावना करणे योग्य असते. हेच श्रीकृष्ण आपल्या मुखाने (पुढील श्लोकांत) सांगत आहेत ३४.

अग्नौ गुरावात्मनि च सर्वभूतेषु मां परम् ।
अपृथग्धीरुपासीत ब्रह्मवर्चस्व्यकल्मषः ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याने अग्नी, गुरू, आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठायी मज परमात्म्याची उपासना करावी सर्वत्र एकच परमात्मा आहे, असा भाव ठेवावा. (३२)

ब्रह्मचर्यव्रत धरणें । ब्रह्मवर्चस्व चढे तेणें ।
आणि सद्‍गुरूचेनि भजनें । निष्पाप होणें निजवृत्तीं ॥ ३५ ॥
अशा प्रकारें ब्रह्मचर्यव्रत धारण केले असतां आंगीं ब्रह्मतेज चढते. सगुरूच्या भजनानें व आत्मवृत्तीने तो निष्पाप होतो ३५.

तेथें अग्निगुरु आपण । सर्व भूतांच्या ठायीं जाण ।
अभिन्न ब्रह्मभावन । अनुसंधान सर्वदा ॥ ३६ ॥
त्याने अग्नीमध्ये, गुरूमध्ये, आपणामध्ये आणि सर्व प्राणिमात्रामध्ये अभिन्नपणे ब्रह्मभावना करून निरंतर तेंच अनुसंधान धरावें ३६.

तेव्हां जें जें देखे दृश्यजात । तेथ ब्रह्मभावो अचुंबित ।
यापरी मातें उपासित । ब्रह्मयुक्त सद्‍भावें ॥ ३७ ॥
असें करितो तेव्हां जो जो म्हणून दृश्य पदार्थ त्याच्या नजरेसमोर येतो, तो तो शुद्ध ब्रह्मरूप आहे असे त्याला वाटते. ह्याप्रमाणे ब्रह्मत्वरूप होऊन सद्भावाने तो माझी उपासना करीत असतो ३७.

नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम । वानप्रस्थसंन्यासिया सम ।
तेथील आवश्यक जो धर्म । मुख्य वर्म त्यागाचें ॥ ३८ ॥
तात्पर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्याचा नेम म्हटला म्हणजे तो वानप्रस्थ आणि संन्यासी ह्यांच्यासारखाच असतो. त्यांनी अवश्य आचरण करण्याचा धर्म असतो, त्यांत सर्वसंगपरित्याग हेंच मुख्य वर्म असते ३८.

स्त्रीणां निरीक्षणस्पर्शसंलापक्ष्वेलनादिकम् ।
प्राणिनो मिथुनीभूता न गृहस्थोऽग्रतस्त्यजेत ॥ ३३ ॥
[ श्लोक ३३] ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांनी स्त्रीकडे पाहाणे, तिला स्पर्श करणे, तिच्याशी बोलणे किंवा थट्टामस्करी करणे इत्यादींपासून लांब राहावे मैथुन करणार्‍या प्राण्यांकडे पाहू नये. (३३)

नैष्ठिक ब्रह्मचारी संन्यासी । वानप्रस्थ वनवासी ।
तिहीं न पहावें स्त्रियांसी । हा मुख्यत्वें त्यांसी स्वधर्म ॥ ३९ ॥
नैष्ठिक ब्रह्मचारी, संन्यासी व वनांत राहणारे वानप्रस्थ यांनी मुख्यत्वेकरून स्त्रियांकडे पाहतां कामा नये, हाच त्यांचा मुख्य धर्म होय ३९.

स्त्री देखतांचि दिठीं । सांडूनियां पर्णकुटी ।
पळावें गा उठाउठी । मा कराव्या गोठी घडे केवीं ॥ ३४० ॥
स्त्री दृष्टीस पडली की आपली झोपडी सोडून तात्काल उठून पळून जावें. मग तिच्याकडे गोष्टी करणे कसे घडेल ? ३४०.

स्वप्नींही स्त्रियेच्या स्पर्शासी । करूं नये या तिघांशीं ।
करितांचि मदनु त्यांसी । वीर्यपातासी उपजवी ॥ ४१ ॥
या तिघांनी स्वप्नांतसुद्धा स्त्रीला स्पर्श करू नये. केल्यास मदन त्यांचे रेतस्खलन करवील ४१.

त्या स्त्रियांसी क्रीडाविनोद । करितां विध्वंसे स्वधर्मकंद ।
यालागीं स्त्रीगुणानुवाद । न करिती शुद्ध सज्ञान ॥ ४२ ॥
त्या स्त्रियांबरोबर हास्यविनोदादि क्रीडा केली, तर धर्माचें मूलबीजच नष्ट होऊन जाईल, म्हणून शुद्ध ज्ञानी लोक स्त्रीगुणांचे वर्णन करीत नाहीत ४२.

स्त्रियांचे हावभावदर्शन । एकांत गुह्य संभाषण ।
नाना विनोद अंगस्पर्शन । परिहासन मदनोक्ती ॥ ४३ ॥
स्त्रियांचे हावभाव पाहणे, त्यांशी एकांत करणे, गुह्य भाषण बोलणे, अनेक प्रकारचा विनोद करणे, अंगास अंग लावणे, थट्टामस्करी किंवा अंगारिक भाषण करणे ४३,

इतुकेंही जेथ घडे । तेथ कामाचा घाला पडे ।
स्वधर्म समूळ बुडे । धैर्याचें उडे निजसत्त्व ॥ ४४ ॥
इतकेंही जेथे घडेल, तेथे कामाचा घाला पडेल आणि स्वधर्म सारा बुडून जाईल व धैर्याचे मूलतत्त्व नाश पावेल ४४.

गृहस्थाचिये प्रवृत्ती । परस्त्रियेसी ऐसी गती ।
जाहलिया जाण निश्चितीं । अपावो अंतीं पावेल ॥ ४५ ॥
गृहस्थाची सुद्धा परस्त्रियेशी वागण्याची अशीच प्रवृत्ति असेल, तर तोसुद्धा शेवटी अपायांत पडेल ४५.

स्त्री ते अग्निकुंडासमान । पुरुष तो घृतकुंभ जाण ।
तेथ द्रवतां अंतःकरण । अर्ध क्षण लागेना ॥ ४६ ॥
स्त्री ही अग्नीच्या कुंडासारखी आहे; आणि पुरुष हा तुपाच्या घटासारखा आहे. करितां अंत:करणाला द्रव फुटायला अर्धक्षणही नको ! ४६.

घृत वेंचलियापाठीं । घटासी झालीं वर्षें साठी ।
तरी अग्नीशीं जाहल्या भेटी । द्रवता पोटीं तोही धरी ॥ ४७ ॥
आंतील तूप सरून त्या घटाला साठ वर्षे जरी झाली असली, तरी त्याला अग्नीचा संपर्क होतांच त्याच्या पोटात पाझर फुटतोच ४७.

तेवीं वार्धक्यावयसेंसीं । एकांत जाहलिया स्त्रियेंशीं ।
गोष्टीमात विनोदेसीं । कामाचा त्यासी घाला पडे ॥ ४८ ॥
त्याप्रमाणे म्हातारपणीसुद्धा स्त्रियेशी एकांत केल्यास, व त्यांत थट्टामस्करीच्या गोष्टी सांगत बसल्यास, त्याच्यावरही कामाचा घाला पडल्याशिवाय राहणार नाही ४८.

त्यागावी कामिनीसंगती । हा मुख्य त्याग परमार्थीं ।
हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ४९ ॥
याकरितां स्त्रियांची संगत टाळावी, हाच परमार्थामध्ये मुख्य त्याग आहे; हेच श्रीकृष्णांनी आपल्या मुखाने उद्धवाला सांगितले ४९.

पराशर‍ऐसा महंत । मत्स्योदरीशीं जाहला रत ।
यालागीं स्त्रियेचा एकांत । अनर्थभूत पुरुषासी ॥ ३५० ॥
पराशरासारखा महंतसुद्धा मत्स्योदरीशीं रममाण झाला .’यावरून स्त्रियेचा एकान्त हा पुरुषाला अनर्थावहच आहे (असें निश्चयाने समजावे.) ३५०,

मैथुनभूत जे प्राणी । पशुपक्षी आदिकरूनी ।
सादरें न पहावे नयनीं । पाहतां कडकडूनि काम खवळे ॥ ५१ ॥
पशुपक्षी आदिकरून मैथुन करीत असलेले प्राणी मुद्दाम होऊन डोळ्यांनी कधीही पाहूं नयेत; पाहिले तर काम कडकडून खवळतो ५१.

मत्स्यमैथुन देखिल्यासाठीं । खवळल्या कामाच्या परिपाठी ।
सौभर ऋषीश्वरें तपकोटी । मैथुनासाठीं नाशिल्या ॥ ५२ ॥
मत्स्याचें मैथुन डोळ्यांनी पाहिल्यामुळे कामाच्या लहरी क्षुब्ध झाल्या आणि ऋषिश्रेष्ठ सौभराने मैथुनासाठींच कोट्यवधि तपें नष्ट करून टाकली ५२.

यालागीं कामाचें दर्शन । कां कामाची आठवण ।
पुरुषासी बाधक जाण । कामस्मरण न करावें ॥ ५३ ॥
ह्याकरिता कामाचे दर्शन किंवा कामाची आठवण हीसुद्धा पुरुषांना बाधक आहे. याकरिता कामाचे स्मरणसुद्धा करूं नये ५३.

हृदयीं नव्हे कामसंचार । तैसा करावा सदाचार ।
भूतें पहावीं मदाकार । हा मुख्य प्रकार हरी बोले ॥ ५४ ॥
हृदयांत कामाचा संचारच होणार नाही अशा प्रकारचा सदाचार असावा. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व प्राणिमात्र मत्स्वरूप आहेत असे मानावे हीच मुख्य गोष्ट आहे ५४.

शौचमाचमनं स्नानं संध्योपासनमार्जवम् ।
तीर्थसेवा जपोऽस्पृश्याभक्ष्यासंभाष्यवर्जनम् ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] प्रिय उद्धवा ! शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठायी मलाच पाहाणे, मन, वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्व आश्रमांनाच लागू आहेत (३४)

शौच आचमन स्नान । संध्या तर्पण उपासना ।
जपादिक अनुष्ठान । तीर्थसेवन विश्वासें ॥ ५५ ॥
शुचिर्भूतपणा, आचमन, स्नान, संध्या, तर्पण, पूजा, अर्चा, जपादि अनुष्ठान, भक्तिपूर्वक तीर्थसेवन इत्यादि करावें ५५.

अधर्म-अकर्मांचा विटाळु । हों न द्यावा अळुमाळु ।
आलियाही संकटकाळु । अभक्षणशीळु नव्हे भावो ॥ ५६ ॥
अधर्माचा किंवा अकर्माचा यत्किंचितही विटाळ होऊ देऊ नये, संकटकाल प्राप्त झाला तरीसुद्धा अभक्ष्य भक्षण करूं नये ५६.

ज्यासी असे व्रतधारण । तेणें रजस्वलादि निंद्य जन ।
त्यांसी न करावें संभाषण । धरावें मौन निंदास्तवनीं ॥ ५७ ॥
जो व्रतस्थ असेल त्याने रजस्वला व निंद्य लोक यांच्याशी भाषण करूं नये. निंदा किंवा स्तुति याविषयी मौन धरून असावें ५७.

सर्वांही आश्रमांसी जाण । स्वधर्मनियमाचें लक्षण ।
सांगेन म्हणे श्रीकृष्ण । ऐक सावधान उद्धवा ॥ ५८ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ! आता साऱ्याच आश्रमांतील स्वधर्मनियमांचे लक्षण कसे असते ते सांगतों, नीट लक्ष देऊन श्रवण कर ५८.

सर्वाश्रमप्रयुक्तोऽयं नियमः कुलनंदन ।
मद्‍भावः सर्वभूतेषु मनोवाक्कायसंयमः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] अस्पृशांना न शिवणे, अभक्ष्य वस्तू न खाणे आणि ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे, हे नियमसुद्धा या सर्वांसाठी आहेत. (३५)

यदुवंशकुलनंदना । ऐक उद्धवा सज्ञाना ।
वर्णाश्रमस्वधर्मलक्षणा । सर्वांस जाणा हे एकी निष्ठा ॥ ५९ ॥
हे यदुकुलदीपका सुज्ञ उद्धवा ! ऐक. सर्व वर्णाश्रमस्वधर्मलक्षणाची निष्ठा ही एकच आहे ५९.

मनसा वाचा कर्मणा । नेमूनि आपआपणा ।
सर्वांभूतीं ब्रह्मभावना । अखंड धारणा राखावी ॥ ३६० ॥
(ती अशी की)-कायावाचामनाने आपले आपण संयमन करून, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मत्स्वरूपाची भावना अखंड धरावी ३६०.

ऐसा मद्‍भाव सार्वांभूतीं । दृढ ठसावल्या चित्तवृत्ती ।
ऐशा नैष्ठिक ब्रह्मचार्‍याप्रती । मोक्षफलप्राप्ती हरि बोले ॥ ६१ ॥
श्रीहरि म्हणतात, अशी सर्व प्राणिमात्रांवर मत्स्वरूपाचीच दृढतर भावना मनात विंबून राहिली, म्हणजे अशा प्रकारच्या नैष्ठिक ब्रह्मचाऱ्याला मोक्षफलप्राप्ति होते ६१,

एवं बृहद्व्रतधरो ब्राह्मणोऽग्निरिव ज्वलन् ।
मद्‍भक्तस्तीव्रतपसा दग्धकर्माशयोऽमलः ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] नेष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्नीसारखा तेजस्वी होतो तीव्र तपश्चर्येमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात अंतःकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो. (३६)

यापरी जो ब्रह्मचारी । महाव्रतें व्रत धरी ।
मद्‍भावना भूताकारीं । धारण धरी अविश्रम ॥ ६२ ॥
याप्रमाणे जो ब्रह्मचारी हे कडकडीत व्रत पाळतो, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी माझीच भावना करतो, आणि ती भावना अंत:करणांत निरंतर धरितो ६२,

यापरी करितां मद्‍भजना । जळाल्या कर्मबीजेंसीं वासना ।
तेव्हां पूर्ण भक्ति माझी जाणा । वरी अंतःकरणा भक्तांच्या ॥ ६३ ॥
तो अशा प्रकारे माझ्या भजनीं लागल्यामुळे कर्मबीजासहवर्तमान त्याच्या वासना जळून जातात. त्याच वेळी माझी पूर्ण भक्ति भक्ताच्या अंत:करणास वरते ६३.

तेव्हां निरुपचार निजस्थिती । सहजचि घडे माझी भक्ति ।
तेथ ज्या ज्या देखे दृष्य व्यक्ती । मद्‍भावप्रतीती चिद्‌रूपें ॥ ६४ ॥
तेव्हा कोणत्याही उपचाराशिवाय सहज स्थितीने त्याला माझी भक्ति घडते. तेव्हां तो ज्या ज्या दृश्य व्यक्ति पाहतो, त्यांच्यांत चिद्रूपाने मीच आहे अशी त्याला प्रतीति येते ६४.

ऐशी घडतां माझी भक्ती । आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।
यांची उठवूनिया पंक्ती । चिन्मात्रैक चौथी भक्ती तो लाभे ॥ ६५ ॥
अशी माझी भक्ति घडली, म्हणजे तो आतं, जिज्ञासु व अर्थार्थी ह्यांच्या पंक्ति उठवून, चिन्मात्रैकस्थिति अशी चौथी भक्ति त्याला प्राप्त होते ६५.

साचचि जे भक्तिच्या ठायीं । चारी मुक्ती लोळती पायीं ।
जो स्वानंद मद्‍भक्तांच्या देहीं । संपूर्ण पाहीं उल्हासे ॥ ६६ ॥
खरोखर ज्या भक्तीमुळे चारी मुक्ति पायांशी लोळतात, तो स्वानंद माझ्या भक्तांच्या देहांत पूर्णपणे उल्हसून राहतो ६६.

तेव्हां मज व्हावी मुक्तता । हेंही नाठवे त्याच्या चित्ता ।
हो कां ‘गेली माझी बद्धता’ । हेंही सर्वथा स्मरेना ॥ ६७ ॥
त्या वेळी मला मुक्तता प्राप्त व्हावी, असेंही त्यांना आठवत नाही. किंवा ‘माझें बंधन नाहीसे झाले,’ असें त्याला स्मरत नाही ६७.

एवं माझेनि भजनसुखें । विसरला सकळ सुखदुःखें ।
माझे भक्तिचेनि हरिखें । स्वानंदतोखें संतुष्ट ॥ ६८ ॥
तात्पर्य, माझ्या भजनसुखामध्येच तो सारी सुखे आणि दुःखें विसरून जातो. आणि माझ्या भक्तीच्या हर्षाने स्वानंदसुखांत तृप्त राहतो ६८.

ऐसा नैष्ठिक ब्रह्मचारी । मज पावला स्वधर्मेंकरीं ।
आतां उपकुर्वाणाची परी । ऐक दुसरी अवस्था ॥ ६९ ॥
अशा प्रकारचा नैष्ठिक’ ब्रह्मचारी आपल्या स्वधर्मानं मत्स्वरूपाला पोचतो. असो. आतां दुसरी स्थिति — उपकुर्वाण’ ब्रह्मचाऱ्याची, तीही तुला सांगतों, ऐक ६९.

अथानंतरमावेक्ष्यन्यथा जिज्ञासितागमः ।
गुरवे दक्षिणां दत्वा स्नायाद्‍गुर्वनुमोदितः ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] प्रिय उद्धवा ! ब्रह्मचारी जर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल, तर त्याने विधिपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा. (३७)

संपूर्ण केलिया अध्ययन । जाहलिया वेदशास्त्रसंपन्न ।
तेणें गुरूसी आज्ञा पुसोन । व्रतविसर्जन सकामा ॥ ३७० ॥
सारे अध्ययन पूर्ण झालें, वेदशास्त्रांत निपुण झाला, म्हणजे त्याने विषयोपभोगाची इच्छा असल्यास – गुरूची आज्ञा घेऊन व्रताचे विसर्जन करावे ३७०.

सकामनिष्कामतेचा भरु । देखोनि विवेकविचारु ।
तैशीच आज्ञा देती गुरु । जैसा अधिकारु शिष्याचा ॥ ७१ ॥
विषययोपभोगाची इच्छा किंवा अनिच्छा – जशी ज्याची प्रवृत्ति असेल, त्याचा नीट विचार करून, शिष्याचा जसा अधिकार असेल, तशीच गुरुही आज्ञा देतात ७१.

ज्यासी गृहाश्रमाची आसक्ती । तेणें आपुल्या यथाशक्ती ।
दक्षिणा देऊनि गुरुप्रती । व्रतसमाप्ती करावी ॥ ७२ ॥
ज्याला गृहस्थाश्रम करण्याची आवड असेल, त्याने यथाशक्ति गुरूला दक्षिणा देऊन ब्रह्मचर्यव्रताची समाप्ति करावी ७२.

करावया समावर्तन । घेऊनि गुरूचें अनुमोदन ।
करावें मंगलस्नान । विसर्जन व्रतबंधा ॥ ७३ ॥
सोडमुंज करण्याकरितां गुरूचे अनुमोदन घेऊन मंगल स्नान करावे, आणि मग व्रतबंधाचे विसर्जन करावें ७३.

येथ अधिकाराचा भेदु । स्वयें सांगतो गोविंदु ।
तोचि श्लोकार्थे विशदु । वैराग्यसंबंधु अधिकारा ॥ ७४ ॥
येथे श्रीकृष्ण अधिकारभेदाचे वर्णन करीत आहेत. तोच वैराग्याच्या संबंधानें प्राप्त होणारा अधिकार पुढील श्लोकाच्या अर्थाने व्यक्त करतों ७४.

गृहं वनं वोपविशेत्प्रव्रजेद्वा द्विजोत्तमः ।
आश्रमादाश्रमं गच्छेत् नान्यथा मत्परश्चरेत् ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] त्यानंतर ब्रह्मचार्‍याने गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा तो ब्राह्मण असेल तर संन्याससुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात प्रवेश करावा मत्परायण भक्ताने याहून वेगळ्या प्रकारे वागू नये. (३८)

ज्यासी वैराग्य नाहीं सर्वथा । हृदयीं स्त्रीकामाची आस्था ।
तेणें द्वितीयाश्रमसंस्था । गार्हस्थ्या करावें ॥ ७५ ॥
ज्याला मुळीच वैराग्य नाही, अंत:करणामध्ये स्त्रीच्या उपभोगाची आवड, त्याने दुसरा म्हणजे गृहस्थाश्रम पतकरावा ७५,

स्त्रीकामु तरी नावडे । विवेक वैराग्य ज्यासी थोडें ।
तेणें वानप्रस्थाश्रमाकडे । निघावें रोकडें तत्काळ ॥ ७६ ॥
अथवा स्त्रीकाम तर आवडत नाही, परंतु विवेक वैराग्य ज्याला थोडे असते स्त्रीसुखाची फारशी आवड नाही, पण विवेक-वैराग्य पूर्ण नाही, असे असेल त्याने तत्काल वानप्रस्थाश्रमाकडे निघावे ७६.

जो विवेकतेजें दीप्तिमंत । ज्यासी सदा वैराग्य धडधडित ।
जो सर्वार्थी दिसे विरक्त । त्यासीच निश्चित चतुर्थाश्रम ॥ ७७ ॥
जो विवेकाच्या तेजाने देदीप्यमान असेल, ज्याच्यापाशी सर्वकाळ वैराग्य जागृत असेल, जो कोणत्याही विषयांत अगदी विरक्त असेल, त्यालाच संन्यासाश्रम खरोखर योग्य होय ७७.

मुख्यत्वें ज्यासी ब्राह्मणजन्म । तोचि बोलिजे द्विजोत्तम ।
त्यासीच बोलिला चतुर्थाश्रम । वैश्यक्षत्रियां नेम संन्यासी नाहीं ॥ ७८ ॥
जो जन्मत: ब्राह्मण असेल तोच द्विजोत्तम म्हणावा. त्यालाच चतुर्थाश्रम सांगितला आहे. वैश्यांना व क्षत्रियांना चतुर्थाश्रमाचा नियम सांगितलेला नाही ७८.

क्षत्रीय संन्यास अंगीकारिती । तिंही रिघावें महापंथीं ।
दंड-कमंडलादिप्रवृत्ती । व्यवहारस्थिती त्यां नाहीं ॥ ७९ ॥
क्षत्रियांनी संन्यास घेतला तर त्यांनी महापंथांत शिरावें. दंड-कमंडलु इत्यादिकांचे व्यवहार त्याला सांगितलेले नाहीत ७९.

ब्राह्मणासी ब्रह्मचर्याच्या पोटीं । धडधडीत जैं वैराग्य उठी ।
तै संन्यासपरिपाठीं । उठाउठीं अंगीकारु ॥ ३८० ॥
ब्राह्मणाला ब्रह्मचर्याश्रमांतच कडकडीत वैराग्य उत्पन्न झाले, तर त्याने तत्काळ संन्यास स्वीकारावा ३८०.

बैसतां भार्येच्या पाटीं । बहुल्यावरी वैराग्य उठी ।
त्यासी संन्यासग्रहणीं गोठी । अधिकारु श्रेष्ठीं बोलिला ॥ ८१ ॥
लग्नाच्या वेळी भार्येच्या समोर पाटावर बसतांच म्ह. बहुल्यावरच ज्याला वैराग्य उत्पन्न होईल त्याने लगेच संन्यास घ्यावा, असें श्रेष्ठांनी सांगितले आहे ८१.

संन्यासग्रहणीं ज्याचें । वैराग्य दिसे अर्धकाचें ।
त्यासी संन्यासग्रहणाचें । योग्यत्व साचें असेना ॥ ८२ ॥
संन्यासग्रहणाविषयीं ज्याचें वैराग्य अर्धेकच्चे दिसून येईल, त्याला संन्यासग्रहणाची खरोखर योग्यताच नाही असे समजावे ८२.

जैसा कां वोकिला वोक । ज्याचा त्यास नावडे देख ।
तैसें विषयभोगसुख । ज्यासी निःशेष नावडे ॥ ८३ ॥
ओकून टाकलेली ओक ज्याची त्याला आवडत नाही, त्याप्रमाणे विषयोपभोगाचे सुख ज्याला निखालस आवडत नाही ८३,

त्यासी संन्यासीं अधिकारु । तोचि संन्यासी साचारु ।
ज्यासी विषयांचा विकारु । अणुमात्रु बाधेना ॥ ८४ ॥
त्यालाच संन्यासाचा अधिकार आहे. ज्याला विषयाच्या विकाराने अणुमात्र बाधा होत नाही, तोच खराखुरा संन्यासी होय ८४.

प्रथम ब्रह्मचर्ययुक्त । वैराग्य न चढेचि हात ।
तरी हो‍ऊनि गृहस्थ । स्वधर्मयुक्त वर्तावें ॥ ८५ ॥
प्रथम ब्रह्मचर्यवत पाळीत असतां वैराग्य हाताला चढत नसेल, तर त्याने गृहस्थ होऊन स्वधर्माचरणाने वागावें ८५.

तेथें स्वधर्में विषय सेवितां । दृढ साधावी विरक्तता ।
तेथेंही वैराग्य न ये हाता । तरी वानप्रस्थाश्रमी व्हावें ॥ ८६ ॥
त्यांत स्वधर्मानुरूप विषयसेवन करून खरीखरी विरक्तता साधावी. तेथेही वैराग्य उत्पन्न न होईल तर वानप्रस्थाश्रमी व्हावें ८६.

यापरी आश्रमादाश्रमा जातां । वैराग्यें संन्यासग्रहणता ।
परी अनाश्रमीं तत्त्वतां । नाहीं सर्वथा अधिकारु ॥ ८७ ॥
याप्रमाणे एका आश्रमांतून दुसऱ्या आश्रमात जात जातच वैराग्य संपादन करून मग संन्यासाचे ग्रहण करावें. परंतु कोणत्याच आश्रमाशिवाय राहण्याला कोणालाच अधिकार नाही ८७.

सांडूनि पूर्वाश्रमासी । जो गेला आश्रमांतरासी ।
तेथूनि पुढारां मार्ग त्यासी । परी मागें यावसायी विधि नाहीं ॥ ८८ ॥
पूर्वाश्रम सोडून जो कोणी दुसऱ्या आश्रमात जातो, त्याला त्याच्या पुढच्या आश्रमात जाण्याला अधिकार आहे. पण पुन्हा मागच्या आश्रमात येण्याचा विधि शास्त्रांत नाहीं ८८.

कां मत्पर जो माझा भक्त । त्यासी आश्रमनेम नाहीं येथ ।
तो माझेनि भजनें कृतकृत्य । जाण निश्चित उद्धवा ॥ ८९ ॥
आतां जो माझा भक्त माझ्या भजनीं तत्परतेने लागतो, त्याला मात्र ह्या आश्रमांचा नियम लागू नाही. उद्धवा ! तो माझ्या भजनानेच कृतकृत्य होतो, हे निश्चित समज ८९.

सद्‍भावें माझी भक्ति करितां । विवेकवैराग्य-योग्यता ।
पावोनि माझी पूर्ण सत्ता । सायुज्यता नेघती ॥ ३९० ॥
सद्भावाने माझी भक्ति करूं लागले म्हणजे विवेकयुक्त वैराग्याची योग्यता प्राप्त होते; माझी पूर्ण सत्ताच त्यांच्या हाती लागते. त्यामुळे ते सायुज्यतामुक्ति दिली तरी घेत नाहीत ३९०.

ऐसे जे माझे भक्तोत्तम । त्यांसी न लगे आश्रमनेम ।
त्यांचा सर्वही मी स्वधर्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ ९१ ॥
असे जे माझे श्रेष्ठ भक्त असतात, त्यांना आश्रमाचा नियम लागू नाही. त्यांचा सारा स्वधर्मम्हणजे मीच. असें श्रीकृष्णाने सांगितले ९१.

उद्धवा ऐक पां निश्चितीं । गृहस्थाची स्वधर्मस्थिती ।
समूळ सांगेन तुजप्रती । ऐसें श्रीपति बोलिला ॥ ९२ ॥
पुन्हा तो श्रीपति म्हणाला की, हे उद्धवा ! आता तुला गृहस्थाच्या स्वधर्माचेही साद्यन्त श्रवण करवितों, तेही तूं लक्षपूर्वक ऐक ९२.

गृहार्थी सदृशीं भार्यां उद्वहेदजुगुप्सिताम् ।
यवीयसीं तु वयसा यां सवर्णामनुक्रमात् ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणार्‍याने आपल्याला अनुरूप व उत्तम लक्षणांनी संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा ती वयाने लहान आणि आपल्याच वर्णाची असावी अन्य वर्णाची कन्या वरावयाची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची वरावी. (३९)

करोनियां समावर्तन । व्रतबंधाचें विसर्जन ।
गुरुआज्ञा घेऊनि जाण । पाणिग्रहण करावें ॥ ९३ ॥
सोडमुंज करून व्रतबंधाचेही विसर्जन करावे व गुरूची आज्ञा घेऊन लग्न करून घ्यावें ९३.

भार्या पर्णावी सवर्ण । इतर वर्जिले तिन्ही वर्ण ।
स्ववेद-स्वशाखेचे वर्ण । सगोत्रपण चुकवूनि ॥ ९४ ॥
भार्या करावयाची ती आपल्याच वर्णाची करावी, इतर तीन वर्णातील करूं नये; आपलेच गोत्र असेल तर तें वर्ज्य करून आपल्याच वेदशाखेतील जातीची करावी ९४.

जे उभय कुळीं विशुद्ध । जे दशलक्षणीं अनिंद्य ।
देतां मातापित्यांसी आल्हाद । तो श्लाघ्य संबंध पर्णावा ॥ ९५ ॥
माता व पिता अशी उभयतां कुठे पवित्र असलेली शास्त्रोक्त दश लक्षणांनी अनिंद्य व कन्यादान करतांना माता-पित्यांना आनंद होत असतो तोच योग्य संबंध जाणावा ९५.

जिची जन्मोत्तरी पाहतां । स्वयें वरापरीस अधिकता ।
कां समान वयें समता । या दोनी सर्वथा त्यागाव्या ॥ ९६ ॥
जन्मपत्रिकेवरून जी नवऱ्यापेक्षा वयाने अधिक आहे, किंवा वयाने बरोबरीची असेल, तर त्या दोन्ही कन्या त्याज्य समजाव्या ९६.

जन्मपत्र पाहतां दिठीं । वरुषें सातें पांचें धाकुटी ।
ते पर्णावी स्वधर्मदृष्टीं । भार्या गोमटी ती नांव ॥ ९७ ॥
जी मुलगी नवऱ्यापेक्षा पांच सात वर्षांनी लहान असेल, तिच्याशीच स्वधर्माप्रमाणे विवाह करावा. तीच भार्या उत्तम होय ९७.

नोवरी पाणिग्रहणयुक्त । आठांपासूनि दशवर्षांत ।
अधिक ते वृषली निश्चित । शास्त्रार्थप्रयोगें ॥ ९८ ॥
नवरी आठ पासून दहा वर्षापर्यंतची असेल तिचेच पाणिग्रहण करावे. ह्याहून अधिक वर्षांची ती ‘वृषली’ म्ह. शूद्र असें शास्त्राने निश्चित केलेले आहे ९८.

गर्भाष्टमाहूनि खालती । जिची वयसा असे निश्चितीं ।
तो नोवरी वराधिकारीं अप्राप्ती । ऐसें शास्त्रार्थीं बोलिलें ॥ ९९ ॥
तसेंच गर्भधारणापासून आठ वर्षांच्या खाली वय असलेली नवरी लग्न करण्यास अयोग्य, असे शास्त्रांत सांगितले आहे ९९.

ऐशा लक्षणांचा नाहीं बाधू । तैशी पर्णावी शुद्ध वधू ।
मग आश्रमधर्म अतिशुद्धू । शास्त्राविरुद्धु तो ऐक ॥ ४०० ॥
अशा लक्षणांचा जिला बाध नाही, अशी पवित्र नवरी पाहून तिच्याशी विवाह करावा. यानंतर शास्त्राला अविरुद्ध असा शुद्ध आश्रमधर्म कसा असतो ते सांगतों ऐक ४००.

इज्याध्ययनदानानि सर्वेषां च द्विजन्मनाम् ।
प्रतिग्रहोऽध्यापनं च ब्राह्मणस्यैव याजनम् ॥ ४० ॥
[श्लोक ४०] यज्ञयाग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे परंतु दान घेणे, अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. (४०)

ब्राह्मणाचें षट्कर्म जाण । यजन आणि याजन ।
अध्ययन आणि अध्यापन । प्रतिग्रहो दान हें साही ॥ १ ॥
ब्राह्मणाने करणेची षट्कर्म म्हणजे यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, प्रतिग्रह, आणि दान अशी सहा आहेत १.

हो कां द्विजन्मे तिन्ही वर्ण । त्यांत क्षत्रिय वैश्य दोघे जण ।
त्यांस तीं कर्मीं अधिकारपण । यजन-दान-अध्ययन ॥ २ ॥
तीन वर्ण हे द्विजन्मेच असले तरी वैश्य व क्षत्रिय यांना यजन, दान आणि अध्ययन, या तीन कर्माचाच अधिकार आहे २.

जे उत्तमजन्मे ब्राह्मण । त्यांसी षट्कर्मीं अधिकार जाण ।
तीनी परमार्थासी पूर्ण । जीविकावर्तन तीं कर्मीं ॥ ३ ॥
परंतु जे उत्तम जन्माचे म्ह. ब्राह्मण असतात, त्यांनाच षट्कर्माचा. अधिकार आहे. त्यांपैकी तीन म्ह. यजन, अध्यापन व दान करणे या कर्मानी त्यांना परमार्थांची प्राप्ति होते. आणि बाकीच्या तीन कर्मानी उपजीविका चालते ३.

कोणें कर्में जीविकेसी । कोणें पाविजे परमार्थासी ।
त्या ब्राह्मणकर्मविभागासी । ऐक तुजपाशीं सांगेन ॥ ४ ॥
कोणती कर्मे उपजीविकेला उपयोगी पडतात, आणि कोणत्या कर्मानी परमार्थांची प्राप्ति होते, त्या ब्राह्मणांच्या कर्माचे भेद तुझ्याजवळ सांगतों ऐक ४.

‘यजन’ तें यज्ञाचरण । ‘अध्ययन’ तें वेदपठण ।
‘दान’ जें देणें आपण । हें त्रिकर्म जाण परमार्था ॥ ५ ॥
‘यजन’ म्हणजे यज्ञ करणे ; ‘अध्ययन’ म्हणजे वेद पठण करणे, आणि ‘दान’ म्ह. दुसऱ्यास धनधान्य वस्त्रं ई. देणे, ही तीन कमैं परमार्थाचा लाभ करून देणारी आहेत ५.

गुरुत्व घेऊनि आपणें । ‘याजन’ तें याग करविणें ।
‘अध्यापन’ वेद पढवणें । स्वयें दान घेणें तो ‘प्रतिग्रहो’ ॥ ६ ॥
आणि आपणाकडे गुरुत्व म्ह. पुरोहितपणा घेऊन दुसऱ्याकडून यज्ञ करविणें तें ‘याजन’, दुसऱ्याला वेद पढविणें तें ‘अध्यापन: ‘ आणि स्वतः दान घेणे तो ‘प्रतिग्रह’ होय ६.

जाहलिया सच्छिष्यसंपत्ती । इये तिहीं कर्मीं जीविकावृत्ती ।
गुरुत्वें गुरुपूजाप्राप्ती । तेणें जीविकास्थिति ब्राह्मणां ॥ ७ ॥
चांगले चांगले शिष्य मिळाले, म्हणजे ह्या तीन कर्माच्या योगाने उपजीविका चालते. आणि गुरुपणा आला म्हणजे गुरुपूजेचा मान मिळून त्याच्या योगानेही ब्राह्मणाचा चरितार्थ चालतो ७.

क्षत्रियवैश्यद्विजन्म्यांसी । गुरुत्व बोलिलें नाहीं यांसी ।
हीं तिन्हीं कर्में त्यांसी । निषेधतेसी यालागीं ॥ ८ ॥
क्षत्रिय आणि वैश्य हेही द्विजन्मे आहेत खरे, पण त्यांच्याकडे गुरुपणाचा अधिकार सांगितलेला नाही. म्हणून या तिन्ही कर्माचा त्यांना निषेधच सांगितलेला आहे ८.

आतां ब्राह्मणाचें लक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।
‘मुख्य’ ‘मुख्यतम’ ‘साधारण’ । त्रिविध जाण उद्धवा ॥ ९ ॥
आतां ब्राह्मणाचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगतात की, हे उद्धवा ! त्यांत साधारण, श्रेष्ठ आणि अत्यंत श्रेष्ठ असे तीन भेद आहेत ९.

प्रतिग्रहं मन्यमानस्तपस्तेजोयशोनुदम् ।
अन्याभ्यामेव जीवेत शीलैर्वा दोषदृक् तयोः ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] दान घेण्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ह्रास होतो असे वाटले, तर ब्राह्मणाने अध्यापन आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा किंवा या दोन वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कणसे तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्यांवर उदरनिर्वाह करावा. (४१)

स्वधर्मनिष्ठ ब्राह्मणापाशीं । तप-तेज-धैर्य-यशोराशी ।
प्रतिग्रहो इतुकियांसी । मूळ नाशासी कारण ॥ ४१० ॥
स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण असतो, त्याच्यापाशीं तप, तेज, धैर्य आणि यश ह्यांचा सांठा असतो; पण प्रतिग्रह हा तितक्यांच्याही नाशाला कारणीभूत होतो ४१०.

जो स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण । करी प्रतिग्रहो अंगीकरण ।
तो जाण पां ‘साधारण’ । हें एक लक्षण द्विजाचें ॥ ११ ॥
स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण असून जो प्रतिग्रहाचा स्वीकार करितो. तो ‘साधारण ‘ ब्राह्मण समजावा. हे एक ब्राह्मणाचे लक्षण होय ११.

जो प्रतिग्रह पराङ्‍मुख ब्राह्मण । तेणें याजन अध्यापन जाण ।
स्वधर्मेकरूनि द्रव्यार्जन । जीविकावर्तन करावें ॥ १२ ॥
जो ब्राह्मण प्रतिग्रहाचा स्वीकार करीत नाही, त्याने याजन आणि अध्यापन करून स्वधर्मानेंच द्रव्य संपादन करावे आणि आपली उपजीविका चालवावी १२.

धरोनि द्रव्याशा मानसीं । न करावें यागान्त कर्मासी ।
कां सांगोनि वेदाक्षरासी । द्रव्य त्यापाशीं इच्छूं नये ॥ १३ ॥
द्रव्याची आशा मनांत धरून यज्ञाचे कर्म कोणाकडूनही करवू नये; किंवा वेदाध्ययन सांगूनही शिकणाऱ्यापासून द्रव्याची इच्छा धरूं नये १३.

करूनि वेदाक्षरदान । जो शिष्याचेंही न घे धन ।
ऐसा वैराग्यें परिपूर्ण । तो ‘शुद्ध ब्राह्मण’ सर्वथा ॥ १४ ॥
जो वेदाध्ययन सांगून शिष्याकडून मुळींच द्रव्य घेत नाही, असा वैराग्याने परिपूर्ण असेल तोच ‘शुद्ध ब्राह्मण’ होय १४.

ऐक त्याचें जीविकावर्तन । ‘शिल’ कां ‘उंछवृत्ती’ जाण ।
ऐक त्याचेंही लक्षण । सकारण सांगेन ॥ १५ ॥
त्याचे जीविकावर्तनही सांगतों ऐक. त्याने ‘शिल’ वृत्तीने किंवा ‘उंछ’ वृत्तीने आपला उदरनिर्वाह करावा. याचेही यथार्थ लक्षण मी सांगतों १५.

शेत संवगूनि नेल्या जाण । ते शेतीं प्राप्त कणिसें कां कण ।
ते शिलवृत्ति संपूर्ण । ऐक लक्षण उंछवृत्तीचें ॥ १६ ॥
शेत कापून नेल्यानंतर त्या शेतामध्ये जी कणसें किंवा दाणा सांपडतो, त्याच्यावर चरितार्थ चालविणे, त्याला ‘शिलवृत्ति’ असे म्हणतात. आता उंछवृत्तीचे लक्षण ऐक १६.

स्वामी नसतां सांडले जाण । ऐसे हाटवाटीं पडिले कण ।
ते वेंचूनि घेणें आपण । जीविकावर्तन तयांवरी ॥ १७ ॥
बाजारांत कोणी मालक नसलेले धान्याचे दाणे सांपडतात, ते वेंचून घेऊन त्यांवर निर्वाह करावयाचा १७,

या नांव उंछवृत्ती । ब्राह्मणाची ‘अतिशुद्ध’ स्थिती ।
तोही प्रकार उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ १८ ॥
याचे नांव ‘उंछवृत्ति’ हीच ब्राह्मणाची अत्यंत पवित्र स्थिति होच. म्हणून हा प्रकारही श्रीकृष्णाने स्वतः उद्धवाला सांगितला १८.

ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानंतसुखाय च ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषयभोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंदस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. (४२)

वर्णांमाजीं उत्तम वर्ण । त्या ब्राह्मणाचा देहो जाण ।
क्षुद्रकामार्थ निर्माण । देवें आपण नाहीं केला ॥ १९ ॥
सर्व वर्णांमध्ये उत्तम वर्ण ब्राह्मण. त्या ब्राह्मणाचा देह देवाने काही क्षुद्रकामाकरितां निर्माण केलेला नाही १९.

पशुपक्ष्यादि योनींच्या ठायीं । कामावांचूनि आन नाहीं ।
तेंचि जरी ब्राह्मणाचे देहीं । तैं विशेष कायी उत्तमत्वें ॥ ४२० ॥
पशुपक्ष्यादि योनीमध्ये कामाशिवाय दुसरे काही नसते. तेच जर ब्राह्मणाच्याही देहामध्ये असेल, तर त्याच्या उत्तमत्वाचे विशेष ते काय ? ४२०.

ब्राह्मणांचे देहीं जाण । करावें स्वधर्में अनुष्ठान ।
माझेनि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिकें ॥ २१ ॥
स्वधर्माचे अनुष्ठान करणे हेच ब्राह्मणाच्या देहाचे कर्तव्य होय. कृच्छ्रचांद्रायणादि तपसाधनें त्याने माझ्या प्रीत्यर्थच केली पाहिजेत २१.

मी हृदयीं धरोनि अनंत । जो पूर्णवैराग्ययुक्त ।
तपादि साधनीं सतत । सदा शिणत ब्राह्मण जे ॥ २२ ॥
मज अनंताला अंत:करणांत धरून व पूर्ण वैराग्ययुक्त होऊन जे ब्राह्मण तपादि साधनांत निरंतर देह कष्टवितात २२,

त्यांसी देहपाताच्या अंतीं । माझ्या अनंत सुखाची प्राप्ती ।
तेथ स्वर्गसुखादि संपत्ती । मावळती तत्काळ ॥ २३ ॥
त्यांना देहपातानंतर माझ्या अनंत सुखाची प्राप्ति होते. त्या वेळी स्वर्गसौख्यादि ऐश्वर्य तत्काळ लुप्त होऊन जातें २३.

ज्या सुखाचे सुखस्थितीं । स्फुरेना संसारस्फूर्ती ।
जेथूनि नाहीं पुनरावृत्ती । ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणां ॥ २४ ॥
ज्या सुखाच्या आनंदमय स्थितीत संसाराची स्फूर्तिही स्फुरत नाही, जेथून पुन्हा जन्म होण्याची भीति नाहीशी होते, अशा सुखाची प्राप्ति त्या ब्राह्मणांना होते २४.

कृच्छ्रादि साधनयुक्तीं । ब्राह्मणां ब्रह्मसुखप्राप्ती ।
त्याचि सुखाची सुखसंपत्ती । शिलोंछवृत्ती साधकां ॥ २५ ॥
कृच्छ्रादि साधनांच्या आश्रयाने ब्राह्मणांला ज्या ब्रह्मसुखाची प्राप्ति होत असते, शिलोंछवृत्ति साधणाऱ्यांना त्याच सुखाचे वैभव प्राप्त होतें २५.

शिलोञ्छवृत्त्या परितुष्टचित्तो धर्मं महान्तं विरजं जुषाणः ।
मय्यर्पितात्मा गृह एव तिष्ठन्नातिप्रसक्तः समुपैति शान्तिम् ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] जो ब्राह्मण आपल्या महान धर्मांचे निष्कामभावाने पालन करतो आणि शेतात तसेच बाजारात पडलेलेसांडलेले धान्याचे दाणे वेचून त्यांवर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कोठेही आसक्ती ठेवीत नाही, तो घरात राहूनही शांतिरूप असे परमपद प्राप्त करून घेतो. (४३)

शिल अथवा उंछवृत्ती । करूनि संतुष्ट चित्तवृत्ती ।
विषयवैराग्यें मत्प्राप्ती । पूजिती अतिथी मद्‍भावें ॥ २६ ॥
जे ब्राह्मण शिल अथवा उंछवृत्ति धारण करून आपली चित्तवृत्ति संतुष्ट ठेवतात, व विषयवैराग्याने माझी प्राप्ति करून घेतात, तसेच अतिथींचें मद्भावानें पूजन करतात २६.

अतिथि आलिया देख । प्राणांतींही नव्हे पराङ्‍मुख ।
नाठवे निज तहानभूक । समयीं आवश्यक दे अन्न ॥ २७ ॥
अतिथि आला असतां प्राणांतीसुद्धा पराक्रम जाऊ देत नाहीत ; वेळेला आपली तहानभूकसुद्धा न आठवतां अतिथीला आवश्यक अन्न देतात २७.

तेथ अत्यादरेंसीं जाण । देऊनि अत्यंत सन्मान ।
यथानुशक्त्या देतां अन्न । मी जनार्दन संतुष्टें ॥ २८ ॥
अशा प्रकारे अत्यंत आदरपूर्वक व सन्मानाने यथानुशक्त्या अन्नदान करितात, त्यांच्यावर मी जनार्दन संतुष्ट होतों २८.

सांडूनियां अभिमान । सर्व जीवांसी सर्वदा लीन ।
या नांव ‘महद्धर्म’ जाण । शुद्ध लक्षण हें धर्माचें ॥ २९ ॥
अभिमान सोड़न देऊन सर्व प्राणिमात्रांना सदासर्वदा लीन असणे, ह्याचेच नांव ‘ महद्धर्म’ आणि हेच धर्माचे शुद्ध लक्षण होय २९.

ऐसें जें स्वधर्माचरण । तें कर्त्यासी अतिभूषण ।
ये धर्मीं न रिघे दूषण । ‘अतिशुद्धाचरण’ या नांव ॥ ४३० ॥
अशा प्रकारचे जें स्वधर्माचरण असते, तें कर्त्याला अत्यंत भूषणास्पद होते. या धर्मामध्ये दूषण देण्याला यत्किंचितही वाव राहत नाही. ह्याचंच नांव ‘अति शुद्धाचरण’ ४३०.

मजमाजीं रंगली चित्तवृत्ती । यालागीं विसरला गृहासक्ती ।
त्यासी गृहाश्रमीं माझी प्राप्ती । सुखसंपत्ती निजबोधु ॥ ३१ ॥
माझ्यामध्ये चित्तवृत्ति अगदी रंगून गेल्यामुळे घरादारावरील आसक्ति तो विसरूनच जातो, त्याला गृहस्थाश्रमामध्येच माझी प्राप्ति होते; आत्मज्ञान हीच त्याची सुखसंपत्ति होऊन राहते ३१.

निर्धनासी ऐशिया रीतीं । गृहश्रमीं माझी प्राप्ती ।
आतां सधनाचे प्राप्तीची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥
निर्धन असतात त्यांना अशा रीतीने गृहस्थाश्रमांतच माझी प्राप्ति होते. आता जे सधन असतात त्यांना माझी प्राप्ति कशी होते. ते तुला सांगतों ऐक ३२.

सधन होय जैं सज्ञान । तैं न करितां अतिसाधन ।
माझी प्राप्ती अतिसुगम जाण । ऐक लक्षण तयाचें ॥ ३३ ॥
सधन असून जर सज्ञान असेल, तर त्याला फारसें साधन न करतांच माझी प्राप्ति करून घेणे अतिशय सुलभ असते, तेही लक्षण ऐक ३३.

समुद्धरन्ति ये विप्रं सीदन्तं मत्परायणम् ।
तानुद्धरिष्ये नचिरादापद्‍भयो नौरिवार्णवात् ॥ ४४ ॥
[श्लोक ४४] संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवितात, त्यांची मी ताबडतोब, समुद्रात बुडणार्‍यांची नाव जशी सुटका करते, तशी सर्व आपत्तींमधून सुटका करतो. (४४)

आधींच पूज्य ब्राह्मण । त्याहीवरी माझा भक्त जाण ।
माझे निजभजनें अतिसंपन्न । मद्‍भावें पूर्ण परिपक्व ॥ ३४ ॥
आधी ब्राह्मण म्हटला की तो पूज्यच आहे. त्यांत आणखी तो माझा भक्त असला व माझ्या भजनाने अतिसंपन्न आणि मद्भावनेनें पूर्ण व पक्वदशेला पोचलेला असला ३४;

मागणें नाहीं सर्वथां । हा नेम माझिया निजभक्ता ।
त्यासी पीडिजे क्षुधादि व्याथा । ते निवारिता जो होय ॥ ३५ ॥
तसेंच कोणापाशीं कधीच काही मागावयाचे नाही, असा माझ्या भक्ताचा नेम असतो; त्याला पीडणाऱ्या क्षुधादि व्यथेचें जो निवारण करतो ३५;

देऊनि अन्न जीवन । वस्त्र आदिकरूनि लवण ।
ऐसें वेंचूनियां निजधन । भक्तसंरक्षण जो करी ॥ ३६ ॥
त्याला अन्न , धन, वस्त्र , पात्र, मीठ वगैरे देतो व अशा प्रकारे आपलें द्रव्य खर्ची घालून जो माझ्या भक्ताचे संरक्षण करतो ३६;

नाहीं देणें निर्भर्त्सितां । देऊनि आभार न ठेवी माथां ।
सन्मानें अतिनम्रता । जो मद्‍भक्तां संरक्षी ॥ ३७ ॥
ते देतांना जो त्याचा तिरस्कार करीत नाही, किंवा दिले हे मी मोठे उपकार केले असेंही मानीत नाही, तर अत्यंत सन्मानानें व नम्रतेनेच माझ्या भक्ताचे रक्षण करतो ३७;

जेवीं पोटांतले कळवळेंसी । माता गोड तें दे बाळकासी ।
तेवीं सांडोनि निजस्वार्थासी । माझ्या भक्तांसी जो रक्षी ॥ ३८ ॥
तें असें की, पोटांतील कळवळ्याने आई जसें गोड असेल तेंच मुलाला देते, त्याप्रपाणे जो आपला स्वार्थ सोडून माझ्या भक्ताचे रक्षण करतो ३८,

तैं मागें सांडूनि निजभक्ता । त्यासी मी वाहीं आपुले माथां ।
मग वैकुंठाही वरुता । त्याहीपरता पाववीं ॥ ३९ ॥
त्याला मी माझ्या भक्तालाही मागे टाकून आपल्या मस्तकावर घेतों; व नंतर त्याला वैकुंठालाच काय पण त्याच्याही वरती नेऊन ठेवतों ३९.

ज्यासी म्यां वाहिलें निजमाथां । त्यासी कोण्या अर्थाची दुर्लभता ।
जो संरक्षी माझ्या निजभक्तां । त्यासी उद्धरिता मी उद्धवा ॥ ४४० ॥
ज्याला मी आपल्या मस्तकावर घेतले, त्याला दुर्लभ असे काय असणार? उद्धवा ! माझ्या भक्तांचें जो संरक्षण करतो, त्याचा उद्धार करणारा मी आहे ४४०.

माझे भक्तांचीं सांकडीं । जो कोणी निजांगें दवडी ।
त्यासी भवार्णवपरथडी । तत्काळ रोकडी मी पाववीं ॥ ४१ ॥
माझ्या भक्तांची संकटें आपण होऊन जो दूर करील, त्याला तत्काल संसारसागराच्या पैलथडीला मी पोचवितों ४१.

जेवीं कां जळसागरीं । नाव धनवंतातें तारी ।
तेवीं भक्तरक्षका संसारीं । मी उद्धरीं उद्धवा ॥ ४२ ॥
उद्धवा! नौका जशी धनवान् मनुष्याला समुद्रामधून तारून नेते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांचे रक्षण करणाऱ्यांचा मी संसारांतून उद्धार करतों ४२.

यापरी धनवंत जन । जो करी भक्तसंरक्षण ।
देवकीवसुदेवांची आण । त्याचें उद्धरण मी करीं ॥ ४३ ॥
ह्याप्रमाणे जो धनवान् मनुष्य माझ्या भक्ताचे संरक्षण करतो, देवकीवसुदेवाशपथ मी त्याचा उद्धार करतों ४३.

सर्वांचे आपत्तीचें निवारण । राजेनि करावें आपण ।
त्या राजधर्माचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥
सर्वाच्या आपत्तीचे निवारण राजाने आपण होऊन करावे, त्या राजधर्माचे लक्षण स्वतः श्रीकृष्ण सांगत आहे ४४.

सर्वाः समुद्धरेद्‍राजा पितेव व्यसनात्प्रजाः ।
आत्मानमात्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥ ४५ ॥
[ श्लोक ४५] जसा एक गजराज दुसर्‍या हत्तींचे रक्षण करतो, त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे, त्यांचा उद्वार करावा, आणि धीरगंभीर राहून स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा. (४५)

सर्वांचें आपत्तींत रक्षण । रायें करावें आपण ।
दीन दुर्बळ ब्राह्मण । अयाचित जन शोधूनी ॥ ४५ ॥
दीन दुबळे ब्राह्मण व अयाचित भक्त असतील, त्यांचा मुद्दाम शोध करून राजाने आपत्तींमध्ये त्या सर्वाचे संरक्षण करावें ४५.

व्यसनप्राप्त निजात्मजा । पिता संरक्षणीं निघे पैजा ।
तेवीं आपत्तीपासोनि प्रजा । संरक्षणीं राजा सादर ॥ ४६ ॥
आपल्या मुलावर संकट येऊन गुदरले असतां बाप जसा त्याच्या संरक्षणासाठी कंबर बांधून निघतो, त्याप्रमाणे राजानेंही अगत्यपूर्वक प्रजेचे आपत्तीपासून संरक्षण करण्याविषयीं तत्पर असावें ४६.

करूनि प्रजांचें संरक्षण । आपुल्या आपत्तीसी आपण ।
स्वयें करावें निवारण । हा स्वधर्म जाण रायाचा ॥ ४७ ॥
प्रजेचे संरक्षण करून आपल्यावर आलेल्या आपत्तीचे निवारणही आपणच करणे हा राजाचा स्वधर्म होय ४७.

चिखलीं रुतल्या भद्रजाती । स्वयें निघे आत्मशक्तीं ।
गजी गजशावे नेणों किती । काढी रुतीबाहेरी ॥ ४८ ॥
हत्ती चिखलात रुतला तरी तो आपल्या बळाने बाहेर निघतो, आणि चिखलात रुतलेल्या हत्तिणी व छावे किती बाहेर काढतो त्याचा तर ठिकाणच नाही ४८.

तेवीं राजा जो भूपती । तेणें प्रजा रक्षाव्या आपत्तीं ।
आपुलेही आपत्तीची निवृत्ती । निजात्मशक्तीं जो करी ॥ ४९ ॥
त्याप्रमाणे पृथ्वीपति राजाने आपत्तीमध्ये प्रजांचे रक्षण करावे, तसेच आपल्याही आपत्तीचे म्ह. संकटाचे स्वत:च्या शक्तीने निवारण करावें ४९.

ऐशिया स्वधर्मस्थिती । सादरें वर्ते जो भूपती ।
त्याच्या स्वधर्माची फलप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ४५० ॥
अशा स्वधर्माचरणानें जो राजा सादरपणाने वागतो, त्याला त्याच्या स्वधर्मापासून कशी फलप्राप्ति होते ते श्रीपति स्वतः सांगत आहे ४५०.

एवंविधो नरपतिर्विमानेनार्कवर्चसा ।
विधूयेहाशुभं कृत्स्नं इंद्रेण सह मोदते ॥ ४६ ॥
[श्लोक ४६] अशा प्रकारचा राजा सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग घेतो. (४६)

यापरी जो कां नृपती । इहलोकींच्या राज्यप्राप्ती ।
अधर्म नाशोनि स्वधर्मस्थितीं । स्वर्ग प्राप्ती तो पावे ॥ ५१ ॥
अशा प्रकारे जो राजा इहलोकी राज्य प्राप्त झाले असतां अधर्माचा नाश करून स्वधर्मस्थितीनें वागतो, त्याला स्वर्ग प्राप्त होतो ५१.

‘राज्याचे अंतीं नरक’ । ऐसें बोलती ज्ञाते लोक ।
ते निरयगती नाशोनि देख । स्वधर्में परलोक पावले ॥ ५२ ॥
ज्ञाते लोक ‘राज्याचे अंती नरक’ असे म्हणतात, पण ती नरकप्राप्ति चुकवून पुष्कळ राजे स्वर्गाला गेलेले आहेत ५२.

ते स्वर्गलोकीं गा जाण । अर्कप्रकाशासम विमान ।
तेथ आरूढोनि आपण । इंद्रसमान सुख भोगिती ॥ ५३ ॥
ते स्वर्गलोकामध्ये सूर्यप्रभेसारख्या देदीप्यमान विमानांत बसून इंद्रासारखें सुख भोगतात ५३.

गृहस्थाश्रम अतिविषम । तेथें आचरतां स्वधर्म ।
वोडवे जैं कां दुर्गम । ते आपद्धर्म अवधारीं ॥ ५४ ॥
गृहस्थाश्रम फार कठीण आहे. त्यांत स्वधर्माचरण करीत असतां कित्येक वेळा मोठे बिकट प्रसंग येतात. त्या वेळचे आपद्धर्म सांगतो ते ऐक ५४.

सीदन् वीप्रो वणिग्वृत्त्या पण्यैरेवापदं तरेत् ।
खड्‍गेन वाऽऽपदाक्रान्तो न श्ववृत्त्या कथंचन ॥ ४७ ॥
[श्लोक ४७] एखादा ब्राह्मण दारिद्य्राने गांजला असेत तर त्याने वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले, तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय वृत्तीनेही आपला उदर निर्वाह चालवावा, परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. (४७)

स्वधर्में पीडितां ब्राह्मणासी । तेणें करावें वणिग्वृत्तीसी ।
कां दुरावले क्षात्रधर्मासी । तेही सदोषी अतिदुष्ट ॥ ५५ ॥
ब्राह्मणांला स्वधर्मामध्ये पीडा होऊ लागली, तर त्यांनी वैश्यवृत्ति स्वीकारावी. क्षात्रधर्म स्वीकारून हिंसादि दोष करूं नयेत; कारण ते अत्यंत दुष्ट म्ह. वाईट होत ५५.

ब्राह्मणासी हिंसाकर्म । तो जाण पां परम अधर्म ।
लागल्या अनुपपत्ती दुर्गम । तैं क्षात्रधर्म करावा ॥ ५६ ॥
ब्राह्मणाने हिंसाकर्म करणे हा मोठा अधर्म होय; परंतु गत्यंतरच नाहीसे झाले तर मात्र त्याने क्षत्रियधर्माचा स्वीकार करावा ५६.

करितां वाणिज्यकर्मास । तिळ सर्षप कार्पास ।
कां लवणादि रस तैजस । यांच्या महादोष विक्रयीं ॥ ५७ ॥
वैश्याचा धंदा स्वीकारला असता, त्याने तीळ, मोहऱ्या, कापूस किंवा मीठ, तेल, तूप इत्यादि पदार्थ विकू नयेत. ते विकले असतां महादोष आहे ५७.

त्या सोडोनि सदोषां समस्तां । लागावें वाणिज्यपंथा ।
तांबूलपर्णें श्वेतवस्त्रता । हें विकितां निर्दुष्ट ॥ ५८ ॥
हे सारे दोष सोडून देऊन वाणीपणाचा धंदा करावा. विड्याची पाने आणि पांढरे वस्त्र ही निर्दोष होत ५८.

ऐशिया वाणिज्यस्थितीं । ज्याची ढळेना अनुपपत्ती ।
तेणें खड्‍ग घेऊनि हातीं । क्षात्रवृत्ती करावी ॥ ५९ ॥
अशा रीतीनें वाणीपणाचा धंदा करूनही ज्याचा निर्वाह होत नसेल, त्याने हातात शस्त्र घेऊन क्षात्रवृत्ति पतकरावी ५९.

तेथें चोरावीं ना अंगें । रणीं न सरावें मागें ।
स्वामिकार्याचेनि योगें । देहत्यागें उठावें ॥ ४६० ॥
त्यांत मग अंगचोरपणा करूं नये. रणांगणांतून माघारें फिरू नये. स्वामिकार्याकरितां देहत्याग करण्याला सिद्ध असावें ४६०.

ऐशिया शुद्ध क्षात्रवृत्तीं । ब्राह्मणें कंठावी अनुपपत्ती ।
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६१ ॥
अशा शुद्ध क्षत्रियवृत्तीने ब्राह्मणाने आपली आपत्ति दूर करावी. परंतु प्राणांतीही ‘श्ववृत्ति’ म्ह. कुत्र्यासारखी वृत्ति धरून नीचाची सेवा करू नये ६१.

क्षत्रियांसी स्वधर्में अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थिती ।
तें विशद करूनि श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥ ६२ ॥
आतां स्वधर्मानें वागून क्षत्रियावरही जर आपत्ति येईल तर त्याने कोणत्या रीतीनें राहावे, तेही श्रीकृष्ण उद्धवाला विशद करून सांगतात ६२.

वैश्यवृत्त्या तु राजन्यो जीवेन्मृगययाऽऽपदि ।
चरेद्वा विप्ररूपेण न श्ववृत्त्या कथंचन ॥ ४८ ॥
[श्लोक ४८] याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल, तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा अतिशय घोर आपत्तीत सापडला असेल तर त्याने शिकार करून किंवा ब्राह्मणांचा व्यवसाय अध्यापन करून निर्वाह करावा परंतु नीचांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. (४८)

क्षत्रियासी लागल्या अनुपपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग्वृत्ती ।
कां पारधी करावी वनांतीं ॥ तेणें अनुपपत्ती कंठावीं ॥ ६३ ॥
क्षत्रियावरही आपत्ति येऊन गुदरल्यास त्यानेही पूर्वी सांगितल्याप्रमाणे वाणीपणाचा धंदा करावा; किंवा अरण्यांत जाऊन शिकार करून आपली आपत्ति दूर करावी ६३.

येणेंही न कंठे अनुपपत्ती । तरी भीक मागावी विप्रगतीं ।
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६४ ॥
इतके करूनही दारिद्रदशा न जाईल तर ब्राह्मणाप्रमाणे भिक्षा मागावी; पण जीव गेला तरी कुत्र्याप्रमाणे नीचाची सेवा करूं नये ६४.

स्वधर्में वैश्यासी अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थितीं ।
ते विवंचना उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ति सांगत ॥ ६५ ॥
आतां वैश्याला स्वधर्माने वागत असतां दारिद्रदशा प्राप्त झाली, तर त्याने कोणत्या रीतीने वागावें ह्याचा विचार कृपेची केवल मूर्ति असे जे श्रीकृष्ण ते उद्धवाला सांगतात ६५.

शूद्रवृत्तिं भजेद्वैश्यः शूद्रः कारुकटक्रियाम् ।
कृच्छ्रान्मुक्तो न गर्ह्येण वृत्तिं लिप्सेत कर्मणा ॥ ४९ ॥
[श्लोक ४९] प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्तीसेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्रानेसुद्धा चटया विणणे इत्यादी कामे करून आपले जीवन चालवावे परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने उदरनिर्वाह करण्याचा लोभ करू नये. (४९)

वैश्यासी लागल्या अनुपपत्ती । तेणें धरावी शूद्रवृत्ती ।
निष्कपट सेवा यथास्थिती । तीं वर्णाप्रती करावी ॥ ६६ ॥
वैश्यावर आपत्ति येऊन गुदरली तर त्याने शूद्रवृत्ति पतकरावी ; अर्थात त्याने तीन वर्णाची निष्कपटपणे योग्य रीतीनें सेवा करावी ६६.

वैश्य पीडिल्याही अनुपपत्तीं । ब्राह्मण-क्षत्रियांची वृत्ती ।
सर्वथा धरूं नये हातीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६७ ॥
उद्धवा ! वैश्यावर आपत्ति येऊन कोसळली तरी त्याने ब्राह्मणाचा किंवा क्षत्रियाचा धंदा कधीही करूं नये, हे निश्चित समज ६७.

वैश्यासी अतिअनुपपत्ती । मांडल्याही प्राणांतगती ।
तरी नीचसेवेची स्थिती । कोणेही अर्थीं न करावी ॥ ६८ ॥
वैश्यावर अत्यंत अनुपपत्ति येऊन गुदरली असता त्याने जीव गेला तरी कोणत्याही सबबीवर नीचसेवा ही करूंच नये ६८.

शूद्रासी लागलिया अनुपपत्ती । तेणेंही न करावी श्ववृत्ती ।
धरूनि बुरुडक्रिया हातीं । जीविकावृत्ती करावी ॥ ६९ ॥
शूद्रावर आपत्तीचा काल आला असता त्यानेही कुत्र्यासारखी नीचसेवा करू नये. तर त्याने बुरुडाचा धंदा करून आपलें उपजीवन करावें ६९.

विकावीं दोर दावीं शिंकीं । पाटे वरवंटे टवळीं निकीं ।
कां काष्ठें वाहावीं मस्तकीं । जीवीकेविखीं उदरार्थ ॥ ४७० ॥
दोर, दावीं व शिंकी विकावीत. किंवा पाटे, वरवंटे, चाटू यांचा विकरा करावा. नाही तर पोट भरण्यासाठी डोक्यावरून लाकडांच्या मोळ्या वहाव्यात ४७०.

आपत्काळाचिये गती । चतुर्वर्णांची जीविकास्थिती ।
म्यां सांगीतली तुजप्रती । परी सर्वथा श्ववृत्ती सांडावी ॥ ७१ ॥
आपत्कालाच्या प्रसंगी चारही वर्णानी आपआपला निर्वाह कसा करावा हे मी तुला सांगितले; तरी पण होतां होईल तो श्ववृत्ति कोणी कधीही करूं नये ७१.

एवं क्रमलिया अनुपपत्ती । म्यां सांगितल्या ज्या जीविकावृत्ती ।
तेथें देखिलियाही लाभप्राप्ती । सर्वथा हातीं न धराव्या ॥ ७२ ॥
तात्पर्य, आपत्ति प्राप्त झाली असतां जीविका चालविण्याचे जे मार्ग मी सांगितले. त्या रीतीने आपली जीविका चालवावी; परंतु त्यांतच चांगला लाभ होतो असें दृष्टीस पडले तरी तीच वृत्ति आपत्काल संपल्यावर चालवू नये ७२.

आपत्काळींच्या आपद्‍वृत्ती । अनुतापें क्रमिल्याअंतीं ।
सांडूनियां स्वधर्मस्थितीं । यथानिगुतीं रहावें ॥ ७३ ॥
आपत्कालामध्ये निरुपाय म्हणून अनुतापाने केलेले दुसऱ्याचे धंदे, तो आपत्काल संपतांच टाकून देऊन पुन्हा पहिल्याप्रमाणे स्वधर्मानेंच चालावें ७३.

गृहस्थाचें विहित कर्म । त्यांतीलही आवश्यक धर्म ।
तेथील ब्रह्मार्पणवर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥ ७४ ॥
आतां गृहस्थाचें जें विहित कर्म आहे, त्यांतील आवश्यक धर्म व त्यांतील ब्रह्मार्पण करण्याचे वर्मही श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे ७४.

वेदाध्यायस्वधास्वाहाबल्यन्नाद्येर्यथोदयम् ।
देवर्षिपितृभूतानि मद्‌रूपाण्यन्वहं यजेत् ॥ ५० ॥
[श्लोक ५०] गृहस्थाने ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथियज्ञ इत्यादींच्या द्वारे माझेच स्वरूप असणारे ऋषी, देवता, पितर, मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे. (५०)

स्वाध्याय ‘वेदाध्ययन’ । वेदप्रोक्त ब्रह्मयज्ञ ।
‘स्वधा’ म्हणिजे पितृतर्पण । ‘स्वाहा’ जाण देवतादिकां ॥ ७५ ॥
स्वाध्याय म्हणजे वेदाध्ययन करणे, वेदांत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मयज्ञ करणे, स्वधा म्हणजे पितृतर्पण करणे व स्वाहा म्हणजे देवादिकांना हवि देणे ७५.

बळिदानादिकीं जाण । तृप्त होय ‘भूतगण’ ।
‘मनुष्यांसी’ अन्नोदकदान । हे पंचयज्ञ जाण नित्यकर्म ॥ ७६ ॥
बलिदानासारखी दाने करावीत, त्या योगे भूतगण तृप्त होतात. मनुष्यांना अन्नोदकाचें दान करावें. हे पंचमहायज्ञ हेंच ब्राह्मणांचे नित्यकर्म आहे ७६.

हेंचि ब्रह्मकर्म जाण । जेणें होय ब्रह्मार्पण ।
त्या अर्पणाची निजखूण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ७७ ॥
ह्याचंच नांव ‘ब्रह्मकर्म.’ आतां ज्याच्या योगाने ब्रह्मार्पण होत असते, त्या अर्पणाची निजखूण तुला मी संपूर्ण सांगतों ७७.

मी एक कर्मकर्ता येथें । हें सांडोनियां निजचित्तें ।
भगवद्‌रूप भावितां भूतें । ब्रह्मार्पण तेथें होय कर्म ॥ ७८ ॥
ह्यांत मी एक कर्म करणारा अशी आपल्या चित्तांतील भावना सोडून देऊन प्रत्येक प्राणिमात्र भगवत्स्वरूप आहे, अशी भावना धरली म्हणजे तें कर्म ब्रह्मार्पण सहज होते ७८.

सांडितां कर्माभिमान । कर्म होय ब्रह्मार्पण ।
हें संकल्पेंवीण जाण । अर्पिती खूण उद्धवा ॥ ७९ ॥
कर्माचा अभिमान सोडला की तें कर्म ब्रह्मार्पणच होते. उद्धवा! संकल्पाशिवायच कर्म ब्रह्मार्पण होण्याची ही खूण होय ७९.

माझेनि हें कर्म जाहलें । तें म्यां कृष्णार्पण केलें ।
येणें संकल्पाचेनि बोलें । अंगा आलें कर्तृत्व ॥ ४८० ॥
माझ्यामुळे हे कर्म झाले आणि तें मी कृष्णार्पण केले, असा संकल्प मनाने व वाणीने केला, की त्याचें’ कर्तृत्व आपल्या अंगी येते ४८०.

जो म्हणे मी कर्मकर्ता । तो होय कर्मफळभोक्ता ।
मुख्य बाधक ते अहंता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ८१ ॥
आणि जो कर्माचा ‘कर्ता’ मी असें म्हणतो, तो त्या कर्माचा ‘भोक्ता’ही होतो. म्हणून उद्धवा ! अहंता हीच काय ती मुख्यत्वें बाधक आहे ८१.

ज्याच्या ठायीं अहंममता । त्याचे अंगीं नित्यबद्धता ।
जो निरभिमानी निर्ममता । नित्यमुक्तता त्यापाशीं ॥ ८२ ॥
ज्याच्या ठिकाणी अहंममता असते, त्याच्या अंगीं नित्यबद्धताही लागतेच; आणि जो निरभिमानी व निर्मम असतो, त्याच्यापाशी नित्यमुक्तताच नांदते ८२.

यालागीं सांडूनि अभिमान । पंचमहायज्ञाचरण ।
गृहस्थें प्रत्यहीं करितां जाण । कर्म ब्रह्मार्पण सहजेंचि ॥ ८३ ॥
ह्याकरितां अभिमान सोडून देऊन पंचमहायज्ञ करीत जावे. गृहस्थाने ते प्रत्यहीं केले असता त्याचे कर्म सहजच ब्रह्मार्पण होतें ८३.

जैसेनि अर्पे भगवंता । ते गृहस्थाची नित्यकर्मता ।
तुज म्यां सांगितली तत्त्वतां । यज्ञादि कथा ते ऐक ॥ ८४ ॥
ज्या रीतीनें गृहस्थाचें नित्यकर्म भगवंताला अर्पण होतें तें मी तुला यथार्थ रीतीने सांगितले. आतां यज्ञादिकांची कथा सांगतों ऐक ८४.

यज्ञ करावया अधिकारवंत । गांठी शुद्ध बारा सहस्र अर्थ ।
ज्यासी वेदीं ज्ञान यज्ञान्त । तेचि येथ अधिकारी ॥ ८५ ॥
ज्याच्या संग्रहीं निदान बारा हजार तरी रुपये असतील, आणि ज्याला संपूर्ण यज्ञांगांचे वेदामधील ज्ञान आहे, तोच यज्ञ करण्याचा अधिकारी होतो ८५.

यदृच्छयोपपन्नेन शुक्लेनोपार्जितेन वा ।
धनेनापीडयन् भृत्यान् न्यायेनैवाऽहरेत् क्रतून् ॥ ५१ ॥
[श्लोक ५१] गृहस्थाने दैवाने प्राप्त झालेल्या किंवा न्यायमार्गाने मिळविलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रमाला असलेले नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे. (५१)

उदीमव्यापारे जोडिलें । का जें असत्प्रतिग्रहें आलें ।
नातरी परपीडा प्राप्त जाहलें । कां आडवूनि घेतलें जें द्रव्य ॥ ८६ ॥
व्यापारउदीम करून मिळवलेले किंवा निषिद्ध दानाने मिळालेले, अथवा दुसऱ्याला छळून आणलेले, तसेंच दुसऱ्याला अडवून घेतलेले ८६,

द्रव्य देतां चरफडी । ते शिष्या घालून सांकडीं ।
ऐसा अर्थ जोडिला जोडी । ते अपरवडी द्रव्याची ॥ ८७ ॥
अथवा मनांत जळफळून दिलेले, किंवा शिष्यावर संकट घालून मिळविलेले असें द्रव्य असेल, तर तें यज्ञाला अयोग्य होय ८७.

जें यदृच्छा सहज आलें । कां जें शुक्लवृत्तीं जोडिलें ।
जें सुखोपायें हाता आलें । तें द्रव्य विहिलें यज्ञार्थ ॥ ८८ ॥
ईश्वरी इच्छेनें जें सहज मिळालेले असेल, किंवा जें शुक्लवृत्तीने म्ह. ब्राह्मणाकडेच पौरोहित्य करून, सदाचरणाने मिळालेले असेल, किंवा जें सुखोपायाने हाती आलेले असेल, तेच द्रव्य यज्ञाला खर्च करणे उचित होय ८८.

पाडूनि कुटुंबासी लंघन । सर्व द्रव्य वेंचूनि जाण ।
करूं नये यज्ञाचरण । अधर्मपण तेणेंही ॥ ८९ ॥
कुटुंबांतील मनुष्यांची उपासमार करून सारे द्रव्य खर्ची घालून यज्ञ करु नये. कारण त्यानेही अधर्मच होतो ८९.

कां जीविका जीवनवृत्ती । याग करूं नये निश्चितीं ।
लौकिकीं मिरवावया स्फीती । याग करिती ते मंद ॥ ४९० ॥
किंवा ज्याच्यावर आपला नेहमी चरितार्थ चालावयाचा अशी वृत्ति म्ह. शेत वगैरे विकून टाकून त्या द्रव्यानेही खरोखर यज्ञ करूं नये. लोकांत कीर्ति मिरविण्यासाठी यज्ञ करतात, तेही मंदवद्धि होत ९०.

न धरितां कर्माभिमान । शुद्ध द्रव्य जोडिल्या जाण ।
करावें यज्ञाचरण । हें स्वधर्मलक्षण गृहस्थाचें ॥ ९१ ॥
कर्माचा अभिमान न बाळगतां पवित्र मार्गाने द्रव्य संपादन करून त्याने यज्ञ करावा, हेंच गृहस्थाच्या स्वधर्माचे लक्षण होय ९१.

सांडूनिया विषयलिप्सा चित्तीं । त्यजूनि गृहाची गृहासक्ती ।
गृहस्थें धरावी निवृत्ती । हें स्वयें श्रीपति सांगत ॥ ९२ ॥
मनांतील विषयेच्छा सोडून देऊन घरदाराची आसक्ति टाकून गृहस्थाने निवृत्तिमार्ग धरावा हेंच श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ९२.

कुटुंबेषु न सज्जेत न प्रमाद्येत्कुटुंब्यपि ।
विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥ ५२ ॥
[ श्लोक ५२] गृहस्थाने कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये स्वधर्माचरण व भगवद्‌भजन करण्याची टाळाटाळ करू नये बुद्धिमान पुरूषाने या जगातील वस्तूंप्रमाणे परलोकांतील भोगसुद्धा नाशवानच आहेत, असे समजावे. (५२)

जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती । परी न धरावी त्यांची आसक्ती ।
सावध राखावी चित्तवृत्ती । परमात्मयुक्तिसाधनें ॥ ९३ ॥
गृहस्थिति जरी घरदार, बायकामुले यांनी संपन्न झाली, तरी त्यांची आसक्ति धरूं नये: परमात्मयुक्तीच्या साधनाने चित्तवृत्ति नेहमी सावध ठेवावी ९३.

सांडूनि कल्पना प्रमाद संग । चुकवूनि प्रमदांचें अंग ।
ईश्वरनिष्ठा अतिचांग । वृत्ति अभंग राखावी ॥ ९४ ॥
कल्पना, प्रमाद व संगासक्ति सोडून देऊन त्याचप्रमाणे स्त्रियांचा अंगसंग चुकवून व अत्यंत उत्कृष्ट ईश्वरनिष्ठा ठेवून वृत्ति अभंग राखावी ९४.

गृह-कुटुंब-विषयासक्ती । पाहतां विवेकाचिये स्थितीं ।
परिपाकें नश्वरप्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९५ ॥
उद्धवा! गृहस्थाच्या कुटुंबांतील विषयाच्या स्थितीचा विचार केला असता ती परिणामी खरोखर अशाश्वत आहे असें जाण ९५.

जैसा इहलोकींचा परिपाक । तैसाचि जाण स्वर्गलोक ।
उभयतां नश्वर देख । केवळ मायिक मिथ्यात्वें ॥ ९६ ॥
ह्याचप्रमाणे इहलोकचा जो परिणाम, तोच स्वर्गलोकचा. दोन्ही नश्वरच आणि मायिक असल्यामुळे केवळ मिथ्या होत ९६.

स्त्री पुत्र आणि धन । हें नश्वर जैसे कां स्वप्न ।
येचिविषयीं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ९७ ॥
बायकामुले आणि संपत्ति ही सारीच स्वप्नाप्रमाणे क्षणभंगुर होत. याविषयींच श्रीकृष्ण स्वतः निरूपण करतात ९७.

पुत्रदाराप्तबन्धूनां सङ्गमः पान्थसङ्गमः ।
अनुदेहं वियन्त्येते स्वप्नो निद्रानुगो यथा ॥ ५३ ॥
[श्लोक ५३] स्त्रीपुत्र, आप्तेष्ट इत्यादींचा संबंध पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूंसारखा समजावा प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो जसे झोप असेपर्यंतच स्वप्न असते, तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात. (५३)

जैसे वृक्षातळीं पांथिक । एकत्र मीनले क्षण एक ।
तैसे पुत्रदाराप्तलोक । सर्वही क्षणिक संगम ॥ ९८ ॥
झाडाखाली ज्याप्रमाणे पांथस्थ लोक क्षणभर एकत्र जमतात. त्याप्रमाणे बायकामुले व आप्तइष्ट या सर्वांचा समागमही क्षणिकच आहे ९८.

उभय नदीप्रवाहेंसीं । काष्ठें मीनलीं संगमीं जैसीं ।
सोयरीं सर्व जाण तैसीं । हेलाव्यासरसीं फांकती ॥ ९९ ॥
दोहींकडून दोन नद्यांचे प्रवाह आले म्हणजे त्यातून वहात आलेली लाकडे त्यांच्या संगमावर एकत्र होतात, त्याप्रमाणेच सारी सोयरींधायरीही एके ठिकाणी जमतात व एक लोंढा आला म्हणजे ती लाकडे जशी दाही दिशांला फांकतात, त्याप्रमाणेच सोयऱ्याधायऱ्यांचीही दशा होते ९९.

जे योनीं जो जीव देहधारी । तेथें तेचि योनींचीं सोयरीं ।
ऐशीं अनंत जन्में संसारीं । तैं अमित सोयरीं जीवाचीं ॥ ५०० ॥
जीव ज्या योनीत देह धारण करतो, त्या योनीत त्याच योनीची सोयरींधायरीही मिळतात. असे संसारामध्ये अनंत जन्म झालेले असतात, तेव्हां त्या साऱ्या जन्मांतील जीवाची सोयरी असंख्य आहेत ५००.

परी ये योनीचीं ते योन्यंतरीं । येरयेरां नोळखती सोयरीं ।
जैसी ये स्वप्नींची पदार्थपरी । त्या स्वप्नांतरीं रिघेना ॥ १ ॥
परंतु ज्याप्रमाणे या स्वप्नांतील पदार्थ काही दुसऱ्या स्वप्नांत येत नाहीत, त्याचप्रमाणे या जन्मांतील सोयरीं दुसऱ्या जन्मांत एकमेकांला ओळखीत नाहीत १.

यापरी हे समस्त । स्त्री पुत्र बंधु आप्त ।
मायामय कल्पित । जाणें निश्चित तो धन्य ॥ २ ॥
याप्रकारे बायका, मुलें, भाऊबंद व सोयरींधायरी ही सारी मायामय असून केवळ काल्पनिक आहेत असें जो निश्चयेंकरून जाणतो, तोच खरोखर धन्य होय २.

इत्थं परिमृशन्मुक्तो गृहेष्वतिथिवद्वसन् ।
न गृहैरनुबध्येत निर्ममो निरहङ्‍कृतः ॥ ५४ ॥
[श्लोक ५४] असा विचार करून गृहस्थाने गृहस्थाश्रमात अडकू नये एखादा पाहुणा तात्पुरता राहातो, त्याप्रमाणे राहावे. जो शरीराबद्दल मीपण आणि घर इत्यादींमध्ये ममता ठेवीत नाही, त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही. (५४)

ऐसेनि विवेकें विवेकवंता । कदा न बाधी मोहममता ।
अतिथीच्या परी सर्वथा । अनासक्तता गृहवासीं ॥ ३ ॥
वरीलप्रमाणे विवेक जो मनांत आणतो, त्याला मोह आणि ममता कधींच बाधीत नाही, अतिथीप्रमाणे तो घरांत राहूनही अलिप्त असतो ३.

एवं निर्मानमोहममता । जो उदासीन गृहावस्था ।
ज्यांसी निष्काम निर्लोभता । त्यासी अहंता बाधीना ॥ ४ ॥
अशा प्रकारे मान, मोह व ममता ज्याने सोडून दिली, जो घरादारांत राहूनही उदासीन, निःस्पृह व निर्लोभ असतो, त्याला महंताही बाधत नाही ४.

निर्ममता निरभिमान । व्हावया मुख्य गुरुभजन ।
तेणें वैराग्य-विवेक-ज्ञान । सहजचि जाण गुरुभक्तां ॥ ५ ॥
निर्मोह आणि निरभिमान होण्याला मुख्य कारण गुरूचे भजन आहे. त्यायोगें गुरुभक्तांना वैराग्य, विवेक व ज्ञान सहजगत्या प्राप्त होते ५.

ऐशिया वैराग्यविवेकस्थितीं । गृहीं वसतां गृहस्थाप्रती ।
प्राप्त होय निजमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ६ ॥
उद्धवा ! अशा वैराग्यविवेकानें राहिले असतां गृहस्थाला घरांत राहूनच निजमुक्ति प्राप्त होते ६.

आतां आश्रमांतराची गती । स्वयें सांगताहे लक्ष्मीपति ।
भक्ति विरक्ति निजशांती । आश्रमस्थितिविभाग ॥ ७ ॥
आता इतर आश्रमांतील आचारविचार, भक्ति, विरक्ति व शांति इत्यादि आश्रम विभागपूर्वक स्वतः श्रीपति सांगत आहेत ७.

कर्मभिगृहमेधीयैरिष्ट्वा मामेव भक्तिमान् ।
तिष्ठेद्वनं वोपविशेत् प्रजावान् वा परिव्रजेत् ॥ ५५ ॥
[श्लोक ५५] भक्ताने गृहस्थोचित शास्त्रोक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात किंवा संन्यास स्वीकारावा. (५५)

गृहीं असोनि आश्रमस्थितीं । ज्यासी मुख्यत्वें भगवद्‍भक्ती ।
त्यासी आश्रमांतरप्राप्ती । न लगे निश्चितीं मद्‍भक्तां ॥ ८ ॥
जो गृहस्थ घरांत राहून आश्रमधर्म पाळीत असतां मुख्यत्वेकरून माझी भक्ति करितो, त्या माझ्या भक्ताला खरोखर इतर आश्रमांचे काही कारणच उरत नाही ८.

तेंचि माझें कैसें भजन । स्वाहा स्वधा यज्ञदान ।
जें जें येथें अर्पे जाण । तें तें मदर्पण निश्चित ॥ ९ ॥
तें माझें भजन कसें असें म्हणशील तर, स्वाहा, स्वधा, किंवा यज्ञ, दान, इत्यादि जें जें तो करितो, तें तें खरोखर मदर्पणच होतें ९,

काळीं अकाळीं सर्वथा । भजनीं पालट नाहीं चित्ता ।
ऐशी ज्या गृहस्थाची अवस्था । तेणें असावें सर्वथा गृहाश्रमीं ॥ ५१० ॥
काळ असो अकाळ असो, त्याच्या मनांत भजनाचा पालट म्हणून नाहींच. अशी ज्या गृहस्थाची स्थिति असेल, त्याने निरंतर गृहस्थाश्रमांतच असावें ५१०.

ज्या कर्माची अतिआसक्ती । आणि विषयांची अनासक्ती ।
नाहीं ज्ञानयुक्त निजशांती । त्यासी वानप्रस्थीं । अधिकारु ॥ ११ ॥
ज्याला कर्माची अत्यंत आसक्ति आहे पण विषयावर आसक्ति नाही, तशीच चित्तांत ज्ञानयुक्त शांति नहीं, तो वानप्रस्थ आश्रमाचा अधिकारी समजावा ११.

ज्यासी विरक्ति शांति ज्ञानस्थिती । करतळामळक हस्तप्राप्ती ।
त्यासी संन्यासग्रहणस्थिती । जाण निश्चितीं अधिकार ॥ १२ ॥
आणि ज्याला विरक्ति, शांति आणि ज्ञान हीं करतलामलकवत् हस्तगत आहेत, तोच खरोखर संन्यासग्रहणाला अधिकारी होय १२.

जाहलिया पुत्रसंतती । भार्या देऊनि पुत्राच्या हातीं ।
संन्यास करावा निश्चितीं । श्रुति ये अर्थीं संमत ॥ १३ ॥
पुत्रसंतति झाल्यावर भार्येला पुत्राच्या स्वाधीन करून आपण संन्यास ग्रहण करावा. या अर्थी श्रुतीचेही प्रमाण आहे १३.

ज्यासी गृहस्थाश्रमीं नावडे भक्ती । अपार पोरांची संतती ।
जाहल्याही न धरी विरक्ती । जो वानप्रस्थीं रिघेना ॥ १४ ॥
गृहस्थाश्रमांत ज्याला भक्ति आवडत नाही, अपरंपार पोरांची संतति झाली असताही जो विरक्ति धरीत नाही, आणि जो वानप्रस्थ आश्रमांतही शिरत नाही १४;

ज्याचा न फिटे विषयभ्रम । जो संन्यासी नव्हे निष्कर्म ।
त्याचें जाण निंद्य कर्म । स्वयें पुरुषोत्तम सांगत ॥ १५ ॥
ज्याचा विषयाचा भ्रम फिटत नाही व जो निष्कर्म संन्यासी होत नाही, त्याचे नित्यकर्म स्वतः पुरुषोत्तम सांगत आहेत १५.

यस्त्वासक्तमतिर्गेहे पुत्रवित्तैषणातुरः ।
स्त्रैणः कृपणधीर्मूढो ममाहमिति बध्यते ॥ ५६ ॥
[श्लोक ५६] जे लोक गृहस्थाश्रमात आसक्त असतात, पुत्र, धन इत्यादींच्या इच्छेतच अडकून व्याकूळ होतात, तसेच मूर्खपणाने स्त्रीलंपट आणि कंजूष बनून ‘मीमाझे’ या भावनेमुळे कर्मबंधनाने बांधले जातात. (५६)

जो गृहासक्तीं सुभटु । तो ईषणात्रयीं वरीष्ठु ।
जो विषयांलागी लंपटु । अतिलोभिष्ठु धनेच्छा ॥ १६ ॥
ज्याला गृहाची अत्यंत आसक्ति आहे; ज्याची पुत्रेषणा, अर्थेषणा व दारेषणा प्रबळ भाहे ; जो, विषयामध्ये अत्यंत लंपट, आणि द्रव्याचा अतिशय लोभिष्ट १६:

जो विकारांचा अंकिला । जो अहंममतेचा पोसणा जाहला ।
जो स्त्रियेसी जीवें विकिला । तो मूढतेच्या पडिला महादुर्गी ॥ १७ ॥
तसेंच विकाराचा जो अंकित : जो अहंममतेचा पोसणा : जो बायकोला जिवाभावाने विकलेला ; तो अज्ञानाच्या खोल खड्यांत पडतो १७.

जो आशेचिया वणवणा । सर्वांगांचा वोळगणा ।
यालागीं बद्धतेचा जाणा । जाहला आंदणा जीवेंभावें ॥ १८ ॥
जो आशेच्या भ्रमाने इंद्रियाच्या अंकित होतो, तो जीवेंभावे बद्धतेचा आंदण दिलेला दास बनतो १८.

तेचि बद्धतेची गती । त्याच्या मूर्खत्वाची वदंती ।
स्वयें सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती उद्देशें ॥ १९ ॥
त्या बद्धतेचे स्वरूप आणि त्या मूर्खाची बडबड स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला थोडक्यात सांगतात १९.

अहो मे पितरौ वृद्धौ भार्या बालात्मजाऽत्मजाः ।
अनाथा मामृते दीनाः कथं जीवन्ति दुःखिताः ॥ ५७ ॥
[श्लोक ५७] ते असा विचार करतात, “अरेरे ! माझे आईवडील वृद्ध झाले आहेत, माझ्या पत्‍नीची मुले अजून लहान आहेत माझ्याशिवाय अनाथ, दीन आणि दुःखी झालेले हे कसे जगतील बरे ?” (५७)

माता पिता वृद्धें केवळें । भार्या धाकुटी तान्हीं बाळें ।
मज होतां यांवेगळें । तेणेंची काळें मरतील ॥ ५२० ॥
तो (म्हणतो) माझे आईबाप तर केवळ वृद्ध; बायको लहान व मुलें लेंकरें तान्हीं. ह्यांना जर मी दुरावलो, तर ती तत्काल मरण पावतील ५२०.

ऐशिया नानावस्था । आपुल्याही मरणापरता ।
वाहे कुटुंबाची चिंता । ऐक आतां सांगेन ॥ २१ ॥
अशा प्रकारे आपल्या मरणापेक्षाही भयंकर नाना प्रकारच्या कल्पना करून कुटुंबाची चिंता तो वाहतो, ती कशी तें सांगतों ऐक २१.

एखादेनि अकाळकाळें । मजचि जैं मरण आलें ।
तैं काय करितील स्त्रिया बाळें । आंसुवें डोळे लोटती ॥ २२ ॥
एखाद्या वेळी मलाच जर अकाली मरण आले, तर ही बायकामुले काय बरे करतील ? असें म्हणून तो डोळ्यांतून टिपें गाळतो २२.

मात्यापित्यांची पडो वाट । स्त्रियेसी होईल हृदयस्फोट ।
बाळांचा शोषेल कंठ । पिटी ललाट तेणें दुःखें ॥ २३ ॥
आईबापाचे एक राहूं द्या , परंतु बायको तर छातीच फोडून घेईल ; मुलें रडून रडून घसा कोरडा करतील ; अशा कल्पनिक दुःखानें तो कपाळ बडवून घेतो २३.

मज निमालियाअंतीं । हीं अतिदुःखी कैशीं जीती ।
ऐशी जीतांची करी खंती । मूढमति यालागीं ॥ २४ ॥
मी मेल्यावर यांना अतिशय दुःख होऊन ती जिवंत कशी राहतील? अशा प्रकारे ती जिवंत असतांनाच त्यांची खंती करीत बसतो. म्हणूनच तो मूढबुद्धि होय २४.

गाढ मूढतेचें भरितें । अपार उथळलें जेथें ।
विवेकाचें तारूं तेथें । विपरीतार्थे बुडालें ॥ २५ ॥
ह्याप्रमाणे मूर्खत्वाचे जेथें अपार भरतें उसळते, तेथे विपरीतार्थाने [ उलट्या वाऱ्यानें] विवेकाचे तारूं खात्रीने बुडून जाते २५.

एवं गृहाशयाक्षिप्त हृदयो मूढधीरयम् ।
अतृप्तस्ताननुध्यायन् मृतोऽन्धं विशते तमः ॥ ५८ ॥
इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
एकादशस्कन्धे सप्तदशोऽऽध्यायः ॥ १७ ॥
[श्लोक ५८] अशा प्रकारे घरदारासंबंधीच्या वासनांनी ज्याचे चित्त विचलित झालेले असते, तो मूर्ख मनुष्य विषयभोग घेऊन कधी तृप्त होत नाही आणि त्यांचेच मरणसमयी चिंतन करीत मेल्यानंतर घोर नरकात जाऊन पडतो. (५८)

यापरी गृहासक्तीं आसक्त । सदा विषयीं अतृप्तचित्त ।
अखंड स्त्रीपुत्रांतें ध्यात । हृदयाआंत मोहित ॥ २६ ॥
ह्याप्रमाणे गृहासक्तीनें लुब्ध झालेला; विषयाविषयीं सदा अतृप्तचित्त बायकामुलांचा अखंड ध्यास घेणारा व अंत:करणांत मोहाने ग्रस्त झालेला २६.

त्या मोहाचे मोहविधीं । मूढ जाहली हृदयबुद्धी ।
ऐसा निमाला जो त्रिशुद्धी । तो प्रवेशे अंधीं महातमीं ॥ २७ ॥
त्याची बुद्धि मोहाच्या मोहकत्वामुळे मूढ होऊन जाते, आणि अशा स्थितींत जो मृत्यु पावतो, तो ‘अंधतम’ नांवाच्या नरकामध्ये पडतो २७.

ज्या तमाचेनि महाबळें । ज्ञान हो‍ऊनि ठाके आंधळें ।
तेथ सूर्याचे फुटती डोळे । ते तमीं लोळे तो तामसु ॥ २८ ॥
त्या अज्ञानतमाच्या शक्तीने ज्ञान हे आंधळें होऊन जाते. जेथें सूर्याचे डोळेही फुटून जातील अशा गाढ अंधतम नरकांत तो तामस लोळत पडतो २८.

ज्या तमापासूनि उपरती । हों नेणें गा कल्पांतीं ।
त्या अंध-तमातें पावती । मूढमति अतिमंद ॥ २९ ॥
अरेरे! असे जे मूढमति व अति मंदबुद्धीचे जीव असतात ते कल्पांतीसुद्धा ज्यातून मुक्तता व्हावयाची नाही, अशा ‘अंधतम’ नामक नरकाला जातात २९.

महामोहाचे परिपाटीं । नश्वर विषयासाठीं ।
चुकोनि अनंतसुखाची पुष्टी । दुःखकोटी भोगिती ॥ ५३० ॥
आणि महामोहाचे पायीं क्षणभंगुर विषयाच्या नादानें ‘अनंत सुखाची पुष्टी’ चुकवून कोटिशः दुःखें भोगीत राहतात ५३०.

यालागीं मनुष्यदेहीं जाण । करोनियां भगवद्‍भजन ।
चुकवावें जन्ममरण । आपण आपण उद्धरावें ॥ ३१ ॥
याकरितां मनुष्यदेहाला आले असतां भगवद्भजन करून जन्ममरण चुकवावें. आणि आपला आपणच उद्धार करावा ३१.

जीवा जे जे योनीं जन्मगती । तेथ तेथ विषयासक्ति ।
तेचि मनुष्यदेहीं विषयस्थिती । तैं परमार्थप्राप्ती कोणे देहीं ॥ ३२ ॥
जीवाला ज्या ज्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात, त्या त्या योनीमध्ये विषयाची आसक्ति ही आहेच. तीच विषयासक्ति जर मनुष्यदेहामध्येही ठेवली, तर मग परमार्थप्राप्ति कोणत्या देहांत करून घ्यावयाची ? ३२.

विशेषें उत्तमोत्तम । प्राप्त जाहल्या ब्राह्मणजन्म ।
ज्याचे नित्यकर्मीं परब्रह्म । अतिसुगम सहजचि ॥ ३३ ॥
ज्याच्या नित्यकर्मामध्येच परब्रह्माची प्राप्ति अत्यंत सुगम आणि सहज होते, तो ब्राह्मणजन्मच प्राप्त झाला, तर मग काय कमी ? ३३.

ज्यासी वर्ततां अहोराती । संध्यावंदनविधानस्थिती ।
त्रिकाळ पापाची निवृत्ती । जाण निश्चितीं ब्राह्मणा ॥ ३४ ॥
त्यांनी दररोज विधिपूर्वक संध्यावंदन केले असता त्यांच्या पातकांची तीन त्रिकाळ निवृत्ति होते ३४.

सकळ साराची सारमूर्ति । तो गायत्रीमंत्र ज्याचे हातीं ।
वेद मुखाची वास पाहती । एवढी प्राप्ती ब्राह्मणा ॥ ३५ ॥
सर्व साराचेही मूर्तिमंत सार, असा जो गायत्री मंत्र तो त्यांच्या हातात असतो; वेदही त्यांच्या मुखाची वाट पहात असतो. एवढी त्यांची थोरवी! ३५.

ब्राह्मणाचे हृदयीं जाण । वेदरूपें नारायण ।
स्वयें राहिला आपण । धन्य ब्राह्मण त्रिलोकीं ॥ ३६ ॥
ब्राह्मणांच्या हृदयामध्ये वेदरूपाने स्वत: नारायणच वस्तीला राहिलेला असतो. म्हणून ब्राह्मण हे त्रैलोक्यांत धन्य होत ३६.

ज्या ब्राह्मणासी सदा जाण । शिरीं वंदिती सुरगण ।
ज्या ब्राह्मणाचा श्रीचरण । स्वयें नारायण हृदयीं वाहे ॥ ३७ ॥
ज्या ब्राह्मणांना मोठेमोठे देवसुद्धा शिरसा वंदन करतात, आणि ज्या ब्राह्मणाचा चरण साक्षात् नारायणही आपल्या हृदयावर वागवितो, त्यांची योग्यता किती वर्णावी? ३७.

ज्याअंगीं एक रती । पाप न राहे संध्येहातीं ।
यालागीं ब्राह्मण पुण्यमूर्ती । स्वयें रमापती बोलिला ॥ ३८ ॥
संध्या करीत असल्यामुळे त्यांच्या अंगात एक रतिमात्रही पातक राहत नाही. म्हणून ब्राह्मण हे पुण्यमूर्तिच आहेत, असें स्वत: रमापतींनी सांगितले ३८.

ज्याची भगवंत करी वर्णना । ‘किंपुनर्ब्राह्मणाः पुण्याः’ ।
त्या भगवद्‍गीतावचना । सत्यत्व जाणा या हेतू ॥ ३९ ॥
‘किं पुनर्लाह्मणाः पुण्याः’ या वचनाने भगवानही ब्राह्मणाचेच वर्णन करतात. या गीतावचनाला वरील हेतूनेंच सत्यत्व येते ३९.

ब्राह्मण आणि भगवद्‍भक्त । तैं सकळ भाग्य आलें तेथ ।
त्यासी कोण अर्थ अप्राप्त । ज्याचे बोलांत हरि तिष्ठे ॥ ५४० ॥
ब्राह्मण असून भगवद्भक्तही असेल, तर तेथें सारें भाग्य आले म्हणून समजावें. त्याला अप्राप्त असे काय असणार ? कारण, त्याचा शब्द झेलावयाला भगवान् नेहमी उभा असतो ५४०.

ते काष्ठपाषाणप्रतिमे पहा हो । प्रतिष्ठिती तेथ प्रकटे देवो ।
एवढा ब्राह्मणीं सद्‍भावो । सहजान्वयो सामर्थ्य ॥ ४१ ॥
अहो ! ते ब्राह्मण, लाकडाच्या किंवा दगडाच्या प्रतिमेत प्रतिष्ठा करतील तेथे देव प्रगट होतो. एवढी ब्राह्मणांच्या ठिकाणी सद्भावना व सहजसामर्थ्य असते ४१.

तो पावोनियां ब्राह्मणजन्म । जो करी क्षुद्र विषयकर्म ।
त्याचे हातींचा गेला पुरुषोत्तम । अंधतम तो पावे ॥ ४२ ॥
असे असतां ब्राह्मणजन्म प्राप्त होऊन जो क्षुद्र विषयाचे कर्म करीत राहील, त्याच्या हातचा पुरुषोत्तम गेला म्हणून समजावें. तो ब्राह्मण ‘अंधतम’ नरकालाच जातो. ४२.

एका-जनार्दनाची विनंती । येऊनि मनुष्यदेहाप्रती ।
करोनियां भगवद्‍भक्ती । निजात्मप्राप्ती साधावी ॥ ५४३ ॥
म्हणून एका जनार्दनाची सर्वास अशी विनंति आहे की, मनुष्यदेहाला येऊन भगवत्भक्ती करून निजात्मस्वरूपाची प्राप्ति करून घ्यावी ४३.

इति श्रीमद्‌भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे
ब्रह्मचर्यगृहस्थकर्मधर्मनिरूपणे एकाकारटीकायां सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
(याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणांतर्गत एकादशस्कंधामधील ब्रह्मचर्य-गार्हस्थ्यधर्मकर्मनिरूपण नामक एकनाथकृत टीकेचा १७ वा अध्याय संपूर्ण झाला.)

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *