पाशांकुशा एकादशी

असे’ करावे पाशांकुशा एकादशी व्रत,जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व:-

अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा वा पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन, व्रतकथा जाणून घेऊया…

एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते. कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. पुराणांनुसार, पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते. पाशांकुशा एकादशीला श्रीविष्णुंच्या पद्मनाथ स्वरुपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जुन करावे, असे सांगितले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो. पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून, याच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फलप्राप्त होते, असे सांगितले जाते.


श्रीराम आणि भरत यांची भेट
संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकदाशींची नावे आणि त्यांचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. पुराणांनुसार, पापरुपी हत्तीवर पुण्य रुपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. एखाद्या माणसाकडून अनावधानाने जरी पाप घडले, तरी पाशांकुशा एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीत होतो, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचे म्हटले जाते. पाशांकुशा व्रताचरणात मौन बाळगून आराधना करावी, असे सांगितले जाते. विजयादशमीनंतर याच एकादशीदिनी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती, अशी मान्यता आहे.

वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशी दिनी केलेल्या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापांतून मुक्ती मिळू शकते, अशी मान्यता आहे.


पाशांकुशा एकादशी  मुहूर्त :-

पाशांकुशा एकादशी : शनिवार, १६ ऑक्टोबर २०२१

एकादशी प्रारंभ : शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०६ वाजून ०३ मिनिटे.

एकादशी समाप्ती : शनिवार, १६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ०५ वाजून ३७ मिनिटे.

व्रत सांगता मुहूर्त : रविवार, १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ०६ वाजून २८ मिनिटे ते ०८ वाजून ४५ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण मंगळवार, शनिवार, १६ ऑक्टोबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते.


एकदशीचे व्रताचरण
पाशांकुशा एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यावेळी घटस्थापन करावे. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. या एकादशीची व्रतकथा ऐकवी. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.


पाशांकुशा एकादशी  माहिती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *