संत कान्हो पाठक गीतासार

संत कान्हो पाठक गीतासार आरंभ एकूण १८ अध्याय

श्री कान्होपाठक महाराज ध्यान
शांतं ब्रह्मपरं जलधितकरं श्रीशंभूतेजोद्भवम् ।
कान्होपाठकं सर्वज्ञं तं द्विजवरं ध्यायेदहम् सर्वदा ।।
स्वर्गंगानयनाप्तकीर्तिमनसस्तलं नद्यासरे ।
श्रीबोधीद्र्मरूपीणं च शशिनोप्ततीर मायांकृता ।।१।।

॥ श्रीगणेशाय नमः ।।
॥ हरिः ॐ ।।
कृष्णं कमलपत्राक्षं । पुण्यश्रवणकीर्तनम् ।।
वासुदेवं जगद्योनीं । नौमि नारायणं हरिम् ।।१।।
सप्तशत तत्त्वपदार्था । पदभावना, भावटीका |
ज्ञानदेवी आत्मज्ञानार्था । प्रकृत पद वक्ता ||२||


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय १ ला

ॐ नमो जी भगवंता । पुराणपुरुषा अव्यक्ता ।
परियेसा भगवद्गीता । महापातके हरतील ।।१।।
धृतराष्ट्रे प्रश्न केला । तव संजयो अनुवादिला ।
कौरवभार देखिला । मग काय बोलिला अर्जुन ॥२॥
हे सकळही गोत्र बंधू । यांचा करू नये वधू ।
धर्मद्रोही महाबाधू । येणे राज्यचाड नाही ||३||
मोह पडला पांडवा । धनुष्य ठेविले गांडीवा ।
म्हणे अपराध माधवा । घडत घडत मज चुकला ||४||

इति प्रथमोध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय २ रा

तयाचे ऐकून बोलणे । मग काय म्हणितले नारायणें ।
मारिजे मरिजे कवणे । आत्मस्वरूप अविनाश ॥१॥
सांडी सांडी देहवासना । न धरी विषयाची कल्पना ।
निवारेल भवबंधना । कृष्ण म्हणे रे अर्जुना ||२||
न तुटे न बुडे न जळे । येता जाता कवणाही न कळे ।
इच्छे आपुलिया खेळे । ये वैष्णवीचेनि संगे ||३||
मी मारितो ऐसे न म्हण । अनादि सिद्ध ते कारण ।
मनसंकल्प क्रिया जाण । फळ उद्देश न धरी गा ।।४।।
न करी सुखदुःखाचा विचारू । अभंग भंगेना निर्धारू ।
ज्ञान दृष्टी पाहे विचारू । नाही पाप युद्धाचे ।।५।।

इति द्वितीयोध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय ३ रा

पंचभूतांचा एकवटा । ते हे शरीर गा सुभटा ।
कर्म करिते जे जया निष्ठा । तैसीच फळे गा पावती ॥१॥
यज्ञ करिती मन कामना । जे जे रूचे जया वासना ।
ती पावती निज भावना । हे विपरीत ऐक पां ||२||
अनाश्रयें कर्मे करिती । कर्म-कर्ते, ते नव्हेती ।
नाही कर्माची फळप्राप्ती । ये कल्पने वाचोनिया ||३||
सत्त्व रज तम त्रयोगुणी । प्रकृति अज्ञान गवसणी ।
ज्ञान लोपलें द्वैत घणी । कर्म इंद्रियाचेनि संगे ||४||

इति तृतीयोध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय ४ था

चक्रपाणी म्हणे वीरा । मज तुज संख्या नाही अवतारा ।
अमित्य केल्या येरझारा । अझुनि नाही निमणे ।।१।।
माझे ऐसिची अवतरणे । धर्म रक्षावया कारणे ।
साधुसंता प्रतिपाळणे । दुष्टा दुःख द्यावया ||२||
सहज देहीं निपजत । ते ब्रह्मार्पण करीत ।
आपुले म्हणून नाही ठेवित । यातायातिचेनि भेदे ||३||
त्याचे सर्वस्व जेतुले । ते मजचि अर्पिले ।
आपुले म्हणूनि नाही ठेविले | पुढती जन्मा यावया ॥४॥

इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय ५ वा

जे करूनि मज अर्पिती । ते सायुज्यता मीच होती ।
सम, सारिखे सकळ भूती । ते संन्यासी भगवंत ॥१॥
इच्छा दंभ काम क्रोध । नाही इच्छेचा अनुवाद ।
अनुभविता सोऽहंबोध । आत्मतत्त्वी राहिले ।।२।।
पहाणे, ऐकणे, स्पर्शणे । ग्रहणे अवग्रहणे, आश्वासणे ।
चालणे बोलणे श्वसणे । कहीच वृथा न धरिती ||३||
आचरता सांख्ययोगे । प्राणापान सम संयोगे ।
ते जीव जाताती सोहं संगे । स्वये बुध जाहलिया ॥४॥

इति पंचमोऽध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय ७ वा

मी सकळिकांसी दुर्गमू । एकासीच होय सुगमू ।
जे सांडिती द्वैत भ्रमू । आत्माराम म्हणोनिया ॥१॥
माझे साकार प्रकृती भजन । पृथ्वी आप तेज वायू गगन ।
मी सकळ जीवा जीवन । उत्पत्ती प्रळयो मजमाजी ॥२॥
दिव्य तेज प्रकाशत । तेणे चंद्रसूर्य उजळत ।
ध्वनी आकाशी उमटत । हेचि ओळख माझी ||३||
हेचि अनुस्यूतपद लक्षण । मज जाणावया कारण ।
माझे स्वरूप कां निर्वाण । परब्रह्म तूचि होसी ॥४॥

इति सप्तमोऽध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय ८ वा

अर्जुन म्हणे ऋषिकेशा । ब्रह्म निर्णयो कैसा ।
देह जातसे अपैसा । कैशापरी भेटशील ।।१।।
देव म्हणे सदाकाळीं । जे मज ध्याती हृदयकमळी ।
त्यांसी भेटेन अंतकाळी । म्हणोनि माते स्मर पां ||२||
माझेनि नामे मज भजती । त्यासी नाही पुनरावृत्ति ।
मज वेगळे सुख चिंतिती । ते पावती दुःखाते ||३||
दाने व्रते जपे तपे । जे काळी नाकळे, नव्हे सोपे ।
ते पाविजे येणे स्वरूपे । श्रीगुरुकृपा झालिया ॥४॥

इति अष्टमोऽध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय ९ वा

मी हे व्यापून अघवे । माझे स्वरूपे जगजीवे ।
न लिंपे सुखदुःखाचेनि भावे । स्वभावे वर्तत असे ।।१।।
मी अधिष्ठान ये प्रकृति । भूते आपोआप होती ।
साकार सांडूनी कल्पिती । ते होऊनिया नव्हेती ||२||
नाही मज वाचूंनिया दुजे । ऐसे कल्पूनि राहिजे ।
त्याचिया संसाराचे ओझे । मजचि जाण पडियेले ||३||
पत्रपुष्प फळ उदक । जे मज अर्पिती भाविक ।
आणिक निपजले साहजिक । गुणदोष मज अर्पी ॥४॥

इति नवमोऽध्यायः समाप्त: ।


संत कान्हो पाठक गीतासार – अध्याय १० वा

मी विश्वाधिकारी सृष्टी । तू अपेक्षिले गा किरिटी ।
तरी दैवाचिया गोष्टी । काय मजवाचूनि वेगळिया ।।१।।
कृष्ण म्हणे मी एकला । विश्व भरितसे भरिला ।
रिता ठाव नाही उरला । तेचि आता सांगेन ॥२॥
मी रवि शशी सामवेदू । व्यास कपिल मुनी नारदू ।
अर्जुन गरुड प्रल्हादू । विभूती विराट विश्वरूप ।।३।।
म्हणोनि हे जीवजाते । साकार विस्तारले भूते ।
न करी भिन्न भेद द्वैते । तरी तू सहजमुक्त ||४||

इति दशमोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय ११ वा

संतोषोनि म्हणे पार्थु । मज उत्कंठा मनोरथू ।
जे निजस्वरूप ते, तू मज । प्रत्यक्ष दाखवी पां ॥१॥
तव संजय म्हणे दाखविले । नेत्री, लव नाही, लक्षिले ।
देखोनि मन मावळले । अनुवाद खुंटला ||२||
आनंदे आसुवे सद्गदीले । अंग कांपत रोमांच उठिले ।
यानंतर जे वर्तले । ते अनुभवी जाणती ||३||

इति एकादशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १२ वा

तव घातले होते दंडवत । उठोनि आसवे पुसित ।
म्हणे धन्य धन्य विष्णुभक्त । जे सदासुख पावले ||१||
तव सावरी म्हणता हे कृष्णू । आणिक ऐक एक प्रश्न ।
भक्तियोगे पाविजे विष्णू । न करी चिंता कासयाची ||२||
न सोडोनी आपुला यातीधर्म । मजउद्देशे करिती कर्म ।
इच्छा न धरिती अनुश्रम । मन इंद्रिये दाहिली ||३||
कौतुके नाचरती पापपुण्य । जाणोनि नेणती ते धन्य |
सकळ देवा मज मान्य । ध्याती शून्य साकार ||४||

इति द्वादशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १३ वा

पुढती एक पां निवृत्ती । मुनी पावले परमशांती ।
सकळ भाव बीज उत्पत्ती । मी देह ते आत्मा ॥१॥
त्रिगुण प्रकृती निपजे । सत्त्वे उत्तम गती पाविजे ।
रजे मध्यम होईजे । तामसे जाईजे अधोगती ॥२॥
हे गुणत्रयी अनादिसिद्ध । तेणे शरीर हो बद्ध ।
संगदोष नव्हे शुद्ध । भवजाळी गुंतल्या ||३||
म्हणोनि निर्विकार हो पां । संग अवघाचि सांडी पां ।
तू तत्त्व विचार घे पां । सहज मुक्त आहेसी ।।४।।

इति त्रयोदशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १४ वा

वर्म सांगे मधुसूदना । जेणे न ये, न कळे माझिया मना ।
अनुभवाविण अनुमाना । आले काय करावे ॥१॥
आहे अनित्य हे शरीर । कैसे याते वागविता, हे कवण ।
ऐसा भ्रांतीचा शीण । हरी माझा केशवा ||२||
गोविंद म्हणे पंडुनंदना । हे शरीर पंचभूत भावना ।
देही आत्मा मी कारणा । जगत्रय गा माझेनि ||३||
यत्र जीव तत्र शीव । हा गुरुमुखे असे अनुभव ।
इतुकेन बुझावला पांडव । म्हणे हा देव हृदयीचा ।।४।।

इति चतुर्दशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १५ वा

सांगत परमार्थ गुज । सकळही भोगणे मज ।
माझिया आनंदाचे भोज्य । हे त्रैलोक्य पाहे पां ।।१।।
पुण्यपाप घडे देही । तेही मीच करितो पाही ।
मज वाचूनी दुजे नाही । बरवे वोखटे मजमाजी ||२||
मी दीप्त हुताशनू । इंद्रिये आणि मनू ।
सौंदर्य मूर्ती मदनू । अष्टभोग मीच भोगी ||३||
म्हणूनि साकार निराकार । हे समस्त माझे अंकुर ।
तू आपणियाते विसर । मीच होऊनि राहे ।।४।।

इति पंचदशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १६ वा

शंका न घरीजे जन्म मरणा । म्हणसी अधोगती कवणा ।
या तव प्रकृतीच्या गुणा । माझे असुनी अलिप्त ।।१।।
मन हेचि लिंगदेह जाण । कल्पना याची खूण |
मनावाचून न दुजेपण । गर्भवासा यावया ॥२।।
यालागी रचलासे वेद । चालावया विधीनिषेध |
आचार धर्म ज्ञान भेद । कुलधर्म न सांडावे ।।३।।
जव जाणितले नाही ब्रह्म । तव कासया त्यजील कर्म ।
तो ही अधम चुकला वर्म । पाषाण निर्णयी पडियेला ॥४॥

इति षोडषोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १७ वा

पार्थ म्हणे ते सांगावे । त्रिविध कर्म बोलिले देवे ।
जे जाणोनि भजती भावे । त्या काय फळ असे ? ॥१॥
ऐक सात्त्विके जे भजती । ते देवलोका जाती ।
दंभे प्रपंच भजती । ते होती कुरु राक्षस ||२||
सक्रोधे भजती तामसे। होती प्रेत पिशाच्च ते ।
काया वाचा आणि मानसे । यातायाती उद्देश ।।३।।
आधी देवाचे तोंड धरी । मग करू नये तेचि करी ।
बाह्य असोनि लोक व्यवहारी । अभ्यंतरी कळो नेदी ॥४॥

इति सप्तदशोऽध्यायः समाप्त: ।


अध्याय १८ वा

कर्म करावे सकळ । न कल्पावे कर्मफळ ।
करी भजन गा निर्मळ । हा उपदेश ऐक पा ॥१॥
भावे भक्ति माझी करी । दोन्ही चित्तें तू न धरी ।
सर्वाभूती नमस्कारी । अष्टांगे विनये ||२||
धाकुटपणाचिया संवादा । क्षमा कीजे स्वामिया ।।३।।
म्हणोनि घातले लोटांगण । आनंदे आसुवे स्फुंदन ।
अर्जुन म्हणे परमानंदा । मी विसरलो जी भिन्न भेदा ।
उचलोनि दिधले आलिंगन । म्हणे जे विसरलो जी सखया ।।४।।

इति अष्टादशोऽध्यायः समाप्त: ।


हे वेदशास्त्रांचे सार । उपनिषदांचे गौरव ।
साकारी निराकार । सगुण निर्गुण निवडिले ॥१॥
सर्व आगमीचे मथिले । ते कृष्णे अर्जुना कथिले ।
थोडेनि बहु विस्तारले । अध्यात्म निभ्रांति ||२||
मेरूमांदाराचेनि तुके । जे केली असतील महापातके ।
हरतील निमिषे एके । आत्मज्ञान झालिया ||३||
गुरु उपदेशी नागनाथु । पाठक कान्हु जीवनमुक्तु ।
तत्त्वमसि असे चिंतितु । आत्मज्ञान शिवयोगी ||४||
इति श्रीमद्भगवद्गीता । स्वाध्याय पाठक मान्होकृता ।
अध्याय अष्टादश समान्त । शुभं भवतु सकळांचे ।।५।।
|| संपूर्णमस्तु ।। शुभं भवतु ।।


हे पण वाचा: संत कान्हो पाठक यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *