स.वीरनाथ महाराज औसेकर

स.वीरनाथ महाराज औसेकर

स.वीरनाथ महाराज औसेकर

 

स. विरनाथ महाराजांचा जन्म

निलावती नगरी(निलंगा) मध्ये मल्लप्पा सावकार व त्यांची पत्नी शिवम्मा राहात होते .दोघेही पती-पत्नी अत्यंत सात्विक आणि साधू वृत्तीचे होते. निलावती नगरीत यावेळेस पीर पाच्छा नावाचे एक सुफी संत राहत होते. ते रोज अन्नदान करीत असत. मल्लाप्पा सावकारांचे वाण साहित्याचे दुकान होते. मल्लप्पा पिरच्छनां अन्नदानासाठी नित्य विनामूल्य वाण साहित्य पूरवित असत. मल्लाप्पानां संतान नव्हते .पीर पिच्छा यांच्या आशिर्वादाने मल्लाप्पा आणि शिवम्मा यांना पुत्र प्राप्ती झाली. श्रावण कृ.अष्टमी गुरुवार शके 1692 म्हणजे गोकुळाष्टमी दिवशी वीरनाथांचा जन्म झाला. पीर पाच्छानीं बाळास आशिर्वाद रूपात आपला हिरवा रुमाल दिला आणि मल्लाप्पानां सांगितले की हा मुलगा भगवत भक्त होईल .प्रपंचात याचे फारसे लक्ष असणार नाही .मल्लपा हे जन्माने वीरशैव होते. शिवभक्ती हा त्यांच्या कुळाचा नेम होता. परंतु विरनाथ मात्र वयाच्या आठव्या वर्षीपासून विठ्ठल भक्ती करू लागले. शैव आणि वैष्णव यांच्यातील मतभेदाचा तो काळ होता. यामुळे वीरनाथांना त्यांच्या विठ्ठल भक्ती साठी विरोध होऊ लागला. घरून आणि इतर समाजातूनही त्यांच्या या विठ्ठल भक्तीला प्रखर असा विरोध होऊ लागला. परंतु तरीही विरनाथ महाराजांचे विठ्ठल भक्ती करणे सुरूच होते. वयाच्या आठव्या वर्षीपासून बाराव्या वर्षापर्यंत त्यांचा हा विठ्ठल भक्तीचा नेम कितीही प्रयत्न केला तरी कोणी मोडून काढू शकले नाही .यामुळे मल्लप्पांनी वीरनाथांना घराबाहेर काढले. सात दिवस अन्न पाण्यावाचून विरनाथ महाराज घराबाहेर होते.

परंतु त्यांची विठ्ठल भक्ती मात्र सुरूच होती. मल्लप्पा सावकारांना एके दिवशी स्वप्नात दृष्टांत झाला की विरनाथांना भोजन द्यावे . याप्रमाणे मल्लाप्पा सावकारांनी शिवम्मा यांना सांगितले की रोज दुसऱ्या प्रहरी एक भाकरी तू वीरनाथांना देत जा. याप्रमाणे जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आणि विरनाथ महाराज घराच्या बाहेरच राहून त्यांची विठ्ठल भक्ती करत होते. गावकऱ्यांच्या मतानुसार मल्लाप्पा सावकारांनी पुन्हा वीरनाथांना घरी बोलावले. दिवसभर घरचे कार्य करावे आणि रात्री दोन प्रहर पर्यंत विठ्ठलाचे स्मरण करावे .असा त्यांचा नित्यनेम सुरू होता .

स.वीरनाथ महाराजांची विठ्ठल भक्ती

वीरनाथ महाराज विठ्ठल भक्तीमध्ये संपुर्णतहः रममान झालेले होते. त्यांचा विवाह करावा आणि त्यांना आपल्या वाण साहित्याच्या दुकानाची जबाबदारी द्यावी असा विचार मल्लप्पा सावकार यांनी केला. यानुसार इ.स. 1785 दरम्यान मल्लप्पांनी वीरनाथांचा विवाह केला. पण वीरनाथांच मन काही प्रपंच आणि व्यापार यात रमल नाही . त्यांनी दुकानातील सर्व साहित्य वाटुन दिल . मल्लप्पांना याच अत्यंत राग येऊन त्यांनी वीरनाथांकडुन व्यापाराची जबाबदारी काढुन घेतली. वीरनाथ आता पुन्हां अधिकाधिक विठ्ठल भक्ती करू लागले . फक्त 1 प्रहर निद्रा आणि 7 प्रहर भजन करू लागले. प्रत्येक एकादशीस ते आपल्या सवंगड्यासोबत निलावती नगरीस प्रदक्षिणा करत .एकदा असा प्रसंग घडला की वीरनाथ आणि त्यांचे सोबती नगर प्रदक्षिणा करण्यास नगराबाहेर गेले असता नगराचा यवन अधिकारी याने जनतेच्या सांगण्यावरून नगरद्वारास कुलुप लावले.

वीरनाथांच्या विठ्ठल भक्तीस विरोध करणारी मंडळी हर प्रकारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असत . नगर प्रदक्षिणा करून सर्व जण नगराच्या प्रवेश द्वाराजवळ आले असता कुलुप पाहुन वीरनाथांचे सोबती घाबरले. वीरनाथांच्या हाताचा स्पर्श होताच कुलुप गळून पडले. हा प्रकार यवन अधिकार्यास समजला . त्याला वीरनाथांच्या विठ्ठल भक्तीची कल्पना आली होती. त्यांने नगरातील जनतेस सक्त ताकीद दिली की वीरनाथांचा कोणी छळ करू नये.

वीरनाथांची विठ्ठल भक्ती पाहुन मल्लप्पा सावकार यांनीही आता वीरनाथांना पंढरपूरला जाण्यास परवानगी दिली. वीरनाथ एके वर्षी कार्तिक वारीसाठी पंढरपूरला आले असता त्यांची आणि स.गुरुगुंडा महाराज देगलुरकर यांची भेट झाली. स.गुरुगुंडा महाराज यांच्या कडुन वीरनाथांना गुरुउपदेश प्राप्त झाला .

पुंडलिक नावाडी…

आषाढी वारीसाठी स.वीरनाथ आणि काही वारकरी मंडळी पंढरीस पायी प्रवास करित आले असता चंद्रभागा तीरी मंडळी पोहचली. पण चंद्रभागा दुथडी भरून वाहत होती. पात्र ओलांडून पंढरीत जायला “नाव”(होडी)हवी. रात्रीचा समय होता. जवळपास कोणी नावाडी नव्हता. दरवेळी चंद्रभागा पार करून देणारा नावाडी तेथे नव्हता. सर्वांनी पुंडलिक
नावाड्यास आवाज दिला. वीरनाथांनी नावड्यास आवाज देताच तो आला आणि सर्वांना पैलतीरी नेऊन सोडले. पाहटेस वीरनाथांची आणि पुंडलिक नावाड्याची भेट झाली. वीरनाथांना पाहुन तो म्हणाला मी तुम्हाला चंद्रभागा पार करून द्यायला काल यऊ शकलो नाही. पाणी खुप होत त्यामुळे सरकारचा आदेश होता कोणीही नाव चालवु नये. म्हणून मी विठ्ठलाच्या राऊळात रात्री भजनास गेलो. सकाळी पुजार्यानी राऊळाचे द्वार उघडले तर विठूरायाची वस्त्रे ओलीचिंब झाली होती.
चंद्रभागा तीरीचा पुंडलिक नावाडी…
विठूरायाच …. !

नाथषष्ठी उत्सव…..

श्री. जळोजी आणि श्री. मळोजी यांच्या प्रेरणेतुन स.गुरु गुंडा महाराज देगलुरकर यांच्याकडुन स.वीरनाथ महाराज औसेकर यांना नाथषष्ठी उत्सवाचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. इ.स.1797 मध्ये स.वीरनाथ महाराज यांनी पहिला नाथषष्ठी उत्सव केला. तेव्हा पासुन ही नाथषष्ठी उत्सवाची परंपरा नाथ संस्थांन औसा ( लातुर ) येथे सुरू आहे. हा उत्सव प्रती वर्षी एका गावाची उत्सवासाठी निवड करून तेथे उत्सव साजरा केला जातो. आजवर 226 उत्सव साजरे झाले आहेत.संस्थान आणि लोकसहभागातुन उत्सव साजरा केला जातो. जेथे उत्सव साजरा करण्यात येतो तेथे आदिनाथाचे मंदिर स्थापन करण्यात येते. समाधी प्रमाणे मंदिरात स्थापना केली जाते याला एकनाथ मंदिर असे ही म्हटले जाते.

आदिनाथाची कोठी ….धान्य भांडार

सद्गुरु वीरनाथ महाराज आषाढी वारी करून पंढरपुराहून निलंगा येथे जाण्यास निघाले .मार्गात वैराग येथे काही दिवस त्यांचा मुक्कामी राहिले .त्यांच्यासोबत सर्व वर्णातील ३०० जणांचा समुदाय होता. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवस दुष्काळाचे होते. अशा परिस्थितीत सद्गुरु वीरनाथांकडे शेकडो मंडळी मदत मागण्यास आली. अन्नधान्य देण्याची विनंती त्यांनी वीरनाथांकडे केली. वीरनाथांनी त्यांच्या सोबत असलेल्या पिरा नावाच्या सेवकास सांगितले की या सर्व मंडळींना अन्नधान्य द्यावे. दुष्काळाच्या या काळात एक रुपया मध्ये आठ कोळवे धान्य मिळत होते .जमलेल्या समुदायाचा विचार करता या सर्वांना जर धान्य द्यायचे असेल तर 12 मन 14 शेर धान्य आवश्यक होते. योगीराज साखरे यांनी 3 मन धान्य , घोंगडे कुटुंबीयांनी 3 मन धान्य आणि वैराग परिसरातील ग्रामस्थांनी 3 मन धान्य विरनाथांकडे आणून दिले. 9 मन धान्याची भरती झाली.

परंतु आवश्यकता होती 12 मन 14 शेर धान्याची. ही बाब जेव्हा वीरनाथांना पिरा यांनी सांगितली. त्यावेळेस वीरनाथ महाराज म्हणाले आदिनाथच्या कोठीमध्ये जमा केलेले हे धान्य समर्पित करा आणि मग वाटपास सुरुवात करा. त्याप्रमाणे पिरा यांनी ते धान्य आदिनाथाच्या कोठीत समर्पित करून वाटपास सुरुवात केली.12 मन 14 शेर धान्याची गरज 9 मन धान्यातून भागली होती .अशा प्रकारे धान्य वाटपाची सेवा कित्येक दिवस शेकडो लोकांसाठी सुरू होती. दुष्काळ जेव्हा संपुष्टात आला तेव्हा वीरनाथांनी त्यांच्या आश्रयास आलेल्या मंडळींना वस्त्र आणि मिष्ठांन देऊन अगदी वाजत गाजत निरोप दऊन आपापल्या गावी पाठविले. स्वतः स.वीरनाथ महाराजही निलंग्यास मार्गस्थ झाले.

आदिनाथाची पालखी
स.वीरनाथ महाराज औसेकरांनी गुरुकृपेने आणि विठ्ठल कृपेने प्राप्त झालेला आदिनाथ षष्ठी उत्सव लोहारा येथे करण्याचे ठरविले. उत्सव संपन्न झाला. या उत्सवाची सांगता काल्याच्या दिंडीने करत असता आदिनाथाची पालखी मधून दिंडी काढून नगरप्रदक्षिणा करावी असे वीरनाथांच्या मनात आले. गावातील मंडळींकडून समजले की गावामध्ये कोठेही पालखी उपलब्ध होऊ शकत नाही. त्याच वेळेस एक श्रीपाद स्वामी त्या गावांमध्ये येऊन थांबले.गामस्थ वीरनाथ महाराजांना म्हणाले की या स्वामींकडे एक पालखी आहे. वीरनाथांनी ग्रामस्थांना स्वामींनकडुन नाथाच्या दिंडीसाठी पालखी आणावी असे सांगितले. ग्रामस्थ स्वामींकडे आले असता स्वामी म्हणाले ” आमच्या पालखीचे भोई श्रमले आहेत. म्हणून आम्ही काही काळ येथे विश्रांती घेणार आहोत.

आपण दिंडीसाठी पालखी नेऊन परत आणुन द्या.” नाथाच्या उत्सव स्थळी पालखी आणून आदिनाथास पालखीमध्ये स्थापन करून काल्याची दिंडी संपूर्ण गावास नगर प्रदक्षिणा करून आली. नगर प्रदक्षिणा होईपर्यंत स्वामी तेथेच बाजारपेठे मध्ये मुक्काम स्थळी होते. परंतु आदिनाथाची दिंडी पुन्हा मुख्य स्थळी येऊन काला होऊन पालखी जेव्हा स्वामींना परत देण्यासाठी गामस्थ गेले तेव्हा तेथे ते स्वामी नव्हते. वीरनाथांच्या नेत्रातुन प्रेमाश्रू आले.प्रत्यक्ष दत्तात्रेय भगवंत येऊन त्यांनीच पालखी दिली. पण आपल्याला मात्र त्यांचे दर्शन झाले नाही. या विचारने त्यांचे मन भरून आले.

विठुरायाने दिलेले अठरा पैसे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वीरनाथ महाराज व काही मंडळी त्र्यंबकेश्वरास निघाली . प्रथम सर्वजण पंढरीस गेले. तेथून पुढे आळंदी, देहू असे करत त्र्यंबकेश्वरी जाण्यासाठी पायी प्रवास सुरू होता. त्र्यंबकेश्वराच्या दिशेने वाटचाल सुरू होती .वाटचाली दरम्यान भिक्षा मागुन तो प्रसाद सेवन करून प्रवास सुरू होता. मार्गात त्यांना एक ब्राह्मण भेटला. त्याचा वेश अत्यंत साधा असा होता .तसेच त्याचे शरीर रोगग्रस्त झालेले होते .त्याला पाहून सर्वांच्या मनात किंतु उत्पन्न झाला. परंतु वीरनाथांनी मात्र त्याला आपल्या सोबत घेतले. तो म्हणाला ” विठ्ठल माझे नाव आहे आणि मी पंढरीत राहतो. मला भजन आवडते “.हा ब्राह्मण साधारणतः बारा वर्षे वयाचा होता. या ब्राह्मणाने प्रवासादरम्यान वीरनाथांसोबत असलेल्या पिरा नावाच्या एका सोबत्याकडे 18 पैसे दिले आणि यातून रोज गहू, तूप यासारखे वाण साहित्य आणून सर्वांना त्याचा प्रसाद द्यावा असे सांगितले. पिराजवळ 18 पैसे ठेवलेली पिशवी असे. या पिशवीतून कितीही वेळा पैसे काढले तरी ते कधी संपतच नव्हते. अद्यापही हे 18 पैसे अवसेकरांच्या पूजेमध्ये आहेत.

गंगामैया प्रगट झाली …..
इ.स.1802 चा काळातील प्रसंग असेल. श्री क्षेत्र वैराग जेथे संतनाथाचा निवास आहे. जेथे मल्लिकार्जुनाचे भव्य असे पुरातन मंदिर आहे. या वैराग नगरीत सद्गुरु श्री वीरनाथ महाराजांनी नाथषष्ठीचा उत्सव करण्याचे नियोजिले. परंतु येथे उत्सवासाठी आवश्यक असणारी पाण्याची गरज मात्र पूर्ण होऊ शकणार नाही . असे ग्रामस्थांकडून विरनाथांना समजले. विरनाथ महाराज म्हणाले “मल्लिरायाच्या वामभागी मस्तकी गंगा आहे.” त्यांनी मल्लीकार्जुन मंदिराच्या समोरील वहिरीचे पुजन केले आणि ते विहीरीच्या 6 पायरी उतरून खाली आले. तोच विहीर जलाने तुडुंब भरून आली . हिंदु व यवन धर्मीयांनी एकत्र येऊन नाथषष्ठी उत्सव साजरा केला. आजही या विहीरीस भरपूर पाणी आहे.

 

– प्रा. – अपर्णा गुरव


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *