सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर

सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर

सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर यांचा जन्म शके१७६७ अश्विन कृष्ण सप्तमी इ.स.१८४५ मध्ये झाला. सद्गुरु वीरनाथ महाराज आणि पूज्य रखुमादेवी यांच्या पोटी सद्गुरु मल्लनाथ महाराजांचा जन्म होताच सर्वत्र दिव्य असा प्रकाश पसरला. मल्लनाथांचा जन्म झाला तेव्हां ते खूप रडू लागले. बाळाचे रडणे काही केल्या थांबेना. तेव्हा विठ्ठल नामाचा गजर स.वीरनाथांनी सुरू केला. विठ्ठल नामाचा गजर केला की बाळ रडण्याचे थांबत असे.म्हणून पिता सद्गुरु वीरनाथांनी विठ्ठल नामाचा अखंड विणाच नाथ मंदिरात औसा येथे उभा केला. स.मल्लनाथ महाराजांच्या जन्मानंतर त्यांची माता पूज्य रखुमादेवी एक महिन्यातच निवर्तल्या.

मल्लनाथांचा सांभाळ पूज्य महादाबाई यांनी केला. सद्गुरु वीरनाथ महाराज म्हणजे आपल्या पित्याकडूनच सद्गुरु मल्लनाथ महाराजांना इ.स.१८५५ मध्ये गुरु उपदेश प्राप्त झाला. अवसेकर घराण्यातील चक्रीभजनाची व नाथषष्ठी उत्सवाची परंपरागत सेवा सद्गुरु वीरनाथ महाराजांनी सद्गुरु मल्लनाथ महाराजांकडे सोपविली. मल्लनाथांचे वय यावेळी अवघे दहा वर्षाचे होते. मल्लनाथांकडून सांप्रदायाची सेवा करून घेण्याची जबाबदारी त्यांच्या धाकट्या आई पूज्य महादेवी बाईंनी सांभाळली. मल्लनाथ महाराज पूज्य महादेवीआईंन सोबत पंढरपूरची पाई वारी करू लागले. सद्गुरु मल्लनाथ महाराज व रत्‍नाबाई यांच्या पोटी थोरले गुरुबाबा, गुंडानाथ आणि दासवीरनाथ यांचा जन्म झाला . सद्गुरु मल्लनाथ महाराज व त्रिवेणी बाईंच्या पोटी एकनाथ व मुक्ताबाई यांचा जन्म झाला.

सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी आई महादाबाई व शिष्य मंडळींसोबत पायी तीर्थयात्रा केली. यात्रेदरम्यान तुळजापूर, पंढरपूर, आळंदी, देहू ,नाशिक त्र्यंबकेश्वर ,गंगाखेड असा पायी प्रवास करत देवदर्शन व तीर्थांचे स्नान करत सर्व मंडळी औसा गावी आल्यानंतर सद्गुरु मल्लनाथांनी यात्रेनिमित्त मावंदे घातले. सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे औसेकर घराण्याचा कृपाप्रसादिक नाथषष्ठी उत्सव इ. स. १८८६ मध्ये केला. महादेवाच्या नगरीत विठ्ठल भक्तांनी जंगमवाडी मठात केलेला हा सोहळा म्हणजे शैव वैष्णव सांप्रदायाचा गंगामाई काठी झालेला संगमच होता. जंगमवाडी मठात सद्गुरु मल्लनाथांनी आदिनाथाचे आसन स्थापन केले .शिवपिंडीवर साळुंका जेथे स्थापन करतात त्या जागी पादुकांची स्थापना केलेले हे आदिनाथाचे विशेष आसन आजही जंगमवाडी मठ काशी येथे आहे. सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी प्रतिवर्षी विविध गावांमध्ये अवसेकर घराण्याचा फिरता नाथषष्ठी उत्सव केला.

तेथे विठ्ठल रुक्मिणी व आदिनाथाचे मंदिर त्यांनी स्थापन केले. आज या प्रत्येक ठिकाणी नाथषष्ठी उत्सव तेथील ग्रामस्थ मंडळी करत आहेत.सोलापूर व हैदराबाद शहरात त्यांनी भव्य स्वरूपात नाथषष्ठी उत्सव साजरा केला. हैद्राबाद येथील उत्सवासाठी निजाम सरकारने त्यांना आमंत्रण दिले होते. ते फर्मान आजही अवसेकरांच्या घराण्यातील वंशज्यांकडे आहे.इ.स. १८८९ व १८९३ मध्ये हैदराबाद येथे नाथषष्ठी उत्सव संपन्न झाले. वैष्णव मंडळी यज्ञोपवीत म्हणजेच जाणवे घालतात व माथ्यावर मध्यभागी शिखा म्हणजे शेंडी ठेवतात. वैष्णव मंडळी प्रमाणे सद्गुरु वीरनाथ महाराज व सद्गुरु मल्लनाथ महाराज हे यज्ञोपवित धारण करीत व शिखा ठेवीत असत. यावरून लिंगायत व वैष्णव सांप्रदाय मंडळीत जेव्हा वाद उत्पन्न झाला तेव्हा सद्गुरु मल्लनाथांनी त्यावर शास्त्रोक्त चर्चा घडवून आणली. यावरील चर्चा व निर्णयाचे कन्नड भाषेतील हस्तलिखित अवसा येथे कुमार स्वामी मठात आहे.

सद्गुरु मल्लनाथांचे चिरंजीव गुंडानाथ व एकनाथ यांचा विवाह राजेशाही वैभवात औसा येथे संपन्न झाला. शाहीर गोपीनाथ चव्हाण यांनी या दिमाखदार स्वयंवराचे वर्णन आपल्या पोवाड्यामधून केले आहे. उत्सवा दरम्यान घडलेले अनेक अद्भुत प्रसंग सद्गुरु मल्लनाथाच्या चरित्रातून वाचावयास मिळतात.सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी त्यांचे थोरले चिरंजीव ज्यांना “थोरले गुरुबाबा” असे म्हणतात. त्यांचा उत्सव निलंगा येथे सुरू केला. आजही हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होतो. हिंदू मुस्लिम धर्मियांचे ऐक्य या उत्सवामध्ये पहावयास मिळते.सद्गुरु मल्लनाथांनी कर्नाटक येथील मन्नाळी या गावापासून मन्नाळी ते पंढरपूर अशी कार्तिक एकादशी निमित्ताने पायी वारी सुरू केली. आजही ही पायीवारी सुरू आहे.सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी ३५८ अभंगांची रचना केली आहे.

गुरुभक्ती विठ्ठल भक्ती पर हे अभंग रसाळ भावपुर्ण शब्दातील आहेत. सद्गुरु वीरनाथ महाराज चरित्र ,राखाबांकावंका चरित्र, कान्होपात्रा चरित्र असे दीर्घ अभंग त्यांनी रचले आहेत. सद्गुरु मल्लनाथांनी कन्नड व हिंदी भाषेतही अभंग रचना केली आहे .सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी शके १८२९ श्रावण कृष्ण अष्टमी रोजी आपण केव्हा समाधी घेणार ते सहा वर्षे आधीच सांगून ठेवले होते. त्यानुसार त्यांनी शके १८३६ इ.स. १९१४ मध्ये ज्येष्ठ पौर्णिमेस समाधि घेतली .सद्गुरु मल्लनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर सद्गुरु वीरनाथ महाराज यांनी सद्गुरु मल्लनाथ महाराजांची समाधी नाथ मंदिर औसा येथे स्थापन केली. प्रतिवर्षी ज्येष्ठ महिन्यात नाथ मंदिर अवसा येथे सद्गुरु मल्लनाथ महाराजांचा समाधी उत्सव संपन्न होतो.

गुरुपर अभंग

वर्णवेना वीरा गुरुचा उपकार ।अदृश्य दृश्यसार दाखविले ॥१॥
ऐसा कोणी नाहीं तुजा हो समर्थ। सम सर्व पुरविता ॥२॥
मल्ला लीन झाला तयाच्या चरणी। खुंटलीसे वाणी बोलवेना ॥३॥

श्री गुरु दाता तो समर्थ। पूर्ण ब्रह्मवीरनाथ॥१॥
दासां देऊनी अभय वर।नेम वृद्धी करी पसर॥२॥
सत्ता ठेऊनि आपुले हातीं। निजपदी डोलविती ॥३॥
सदोदित चित्ता चिंतन। मल्ला गुरु चरण सेवन॥४॥

भावापासोनी तारक। वीरनाथ तूंचि एक॥१॥
सुख नको या संसारी ।अंतीं यम जाच करी ॥२॥
होत आयुष्याची भरती। मल्ला तारी गुरुमूर्ती॥३॥

वीरनाथाची करा यात्रा। सुफळ होईल तुमच्या गोत्रा॥१॥
गुरुनाम घ्या रे गुरुनाम घ्यारे ।ब्रम्हानंदी डुलारे॥२॥
प्रसाद घ्यावा अति हर्ष । विकल्प न धरावा मनास ॥३॥
त्रिकूटावरी गुरुनाथ। तेथें बैसे मल्लनाथ॥४॥

रोज गुरुवारी छबीना निघती। आनंदाने गाती भक्त जन॥१॥
भावासाठी जाण आलासे धांवून।सांडुनिया स्थान नीलावती॥२॥
भक्तीचा जिव्हाळा वर्णवेना वाचे। महा दोषी साचे उद्धरले॥३॥
आवसा श्रीक्षेत्र म्हणावें पवित्र। तेथें वीरनाथ नांदतसे॥४॥
वीराचे कर्तृत्व वीरची जाणावें। काय मी वाणावे मंद मती ॥५॥
मल्ला म्हणे ऐसें क्षेत्र न सोडावें।अखंड असावें तया स्थानीं॥६॥

वीरा ऐसा गुरु नाहीं हो त्रिभुवनीं। कैवल्याचा धनी मोक्ष दाता॥१॥
दया क्षमा शांती सहजची ओतीले। वैराग्य ते आलें भेटावया॥२॥
विवेके विचार जयासी पुसती।आलेति विश्रांति ब्रम्हादिक॥३॥
संसार करोनी राहिला वेगळा नेणवेचि लीळा मल्ला म्हणे॥४॥

वीरा गुरु परब्रम्ह। झाला जगाचा विश्राम॥१॥
सर्वाभूती समदृष्टी।केली आनंदाची वृष्टी॥२॥
मुक्तिवरील भक्ती। जेणे आणियेली व्यक्ती॥३॥
मल्ला म्हणे दयावंता।मज करी आर्तभूता॥४॥

सर्व सत्ता तुजपाशीं। मज चिन्मयीं रमविशी॥१॥
माझें नाहीं काही तेथें। धनी तूंचि वीरनाथ॥२॥
मल्लासी रक्षक गुरु तूंचि असे एक॥३॥

नसता माझा अधिकार। बळेंचि ठेवियला कर॥१॥
अभ्यास देऊनियां बळे।ब्रह्म सुख दाखविलें॥२॥
ऐसीवीराची करणी।मल्ला लोळे चिन्मय जीवनीं॥३॥

चुकी घ्यावी पदरांत ।याहो याहो वीरनाथ॥१॥
कृपावंत अनाथ सनाथ। बैसा बैसा वीरनाथ॥२॥
विण्यासाठीं शिक्षा मात।पसारा सांवरी वीरनाथ॥३॥
वीरा घालावा पोटांत। मल्ला न करी ऐसा हेत॥४॥

शरण शरण वीरनाथा। करी पावन अनाथा॥१॥
दास पडला पदरीं। गुण दोष न विचारी॥२॥
तुज वांचोनी कोण जनीं। उद्धरिता मजलागोनी॥३॥
मल्ला चरणीचा दास। दावी स्वरूप प्रकाश॥४॥

वेगी दाखवी तू पाय।वीरनाथ माझी माय॥१॥
तुज ऐसा जनीं कोणी। दाता नाहीं त्रिभुवनीं॥२॥
जळावीण मच्छ जैसा। तळमळ वाटे तैसा॥३॥
तीन्ही देव तुझे घरीं। पापी मल्लासी उद्धरी॥४॥

दिलें पराधीन।भक्ती पाहुनियां जाण ॥१॥
काय सांगू गुरुवर्या। सांगा सांगाजी सखया॥२॥
अर्थ द्वेष मनीं।होतसे निशीदिनीं॥३॥
स्वपदे देई मजला।वंश परंपरा चालविला॥४॥
मल्ला सूचेना अर्थ।क्षमा करी गुंडानाथ॥५॥

कांही तरी दया ।येऊं द्यावे गुरूराया॥१॥
सर्वश्रुत तुम्हासी ।आहे नाही मजपासी॥२॥
चिंता चित्ताची दूर करा ।अर्थी मायेचा पसारा॥३॥
जना जीवन अर्थ कामें। अर्थी चाले सर्व नेम॥४॥
मल्ला विदेह स्थिती पाही। सदा वर्ते तुझे गृहीं॥५॥

चैतन्यीं रमविती। गुरूवीण कोण दाता ॥१॥
जाय तयासी शरण। तेचि रूप होय जाण ॥२॥
नाही यातायाती ।सदा वर्ते सहज स्थिती॥३॥
गुरू नामीं रंगला ।सर्व रंगातीत मल्ला॥४॥

गुरूनाम जो उच्चारी। सुखी तोचि चराचरी॥१॥
गुरू वंद्य जयासी। तोचि प्रिय हृषिकेशी ॥२॥
गुरूकृपे जो तोषला। चिंता नाही गुरुपुत्राला ॥३॥
मल्ला गुरूकृपें विजय। जेथें जाय तेथें जय॥४॥

सद्गुरुसी सदा हृदयीं वहसी ।प्रपंच परमार्थासी साह्य गुरु॥१॥
सद्गुरुजीवनीं जीवा जीवविसी। प्रपंच परमार्थासी साह्य गुरु॥२॥
गुरुकृपें मल्ला लक्षुनि लक्षिसी। प्रपंच परमार्थासी साह्य गुरु॥३॥

गुरु चरणीं ज्याचे मन। तोचि पुण्यवंत जाण॥१॥
गुरुसेवेची आवडी। देह सार्थकाची जोडी॥२॥
गुरुनाम मंत्र जया वाचे ।धन्य माता पिता त्याचे॥३॥
मल्ला म्हणे गुरुराव। सद्यवंत करी जीव॥४॥

गुरुवीण ज्याचा जन्म। केला होय सर्व श्रम ॥१॥
गुरुवांचोनियां गति। होणे नाहीं तयाप्रती॥२॥
गुरुमार्ग आहे सोपा। चुकवी जन्ममरण खेपा॥३॥
मल्ला म्हणे गुरूनाम। तेचिं विश्रांतीचे धाम॥४॥

भेट देऊनी लपूं नये ।निरोप दे गुरुमाये॥१॥
तेणें सुखी राहीन ।गुण तुझे मी गाईन॥२॥
नाहीं चाड कोणाची। आहे चैतन्य रूपाची॥३॥
मल्ला म्हणे गुरु समर्थ।पुरवितो इच्छितार्थ॥४॥

निर्मत्सर गुरुमूर्ति। तीहींवरी ज्याची वस्ती॥१॥
तीन सांडोनियां जावें ।गुरुनाथासी पाहावें ॥२॥
छत्तीस पसारा। नको गुंतुं या संसारा ॥३॥
आवघा एक दिसे गुरु। मल्ला एक सेवाधारू॥४॥

गुरुनाम ब्रह्मरस ।सेवोनिंया श्वासोच्छवास ॥१॥
गुरुनामाची निशाणी। लावियली त्रिभुवनीं॥२॥
गुरुनामी प्रेम प्रीती। सर्वकाळ राहो चित्तीं॥३॥
गुरु सेवेची आवडी ।मल्ला म्हणे लागो गोडी॥४॥

गुरु बहुताची माया। केला अपराध साहे॥१॥
ऐसा जीवीचा कळवळा। निज सुखाचा सोहळा॥२॥
तान्हयाचे लागे झटे। अधिकचि पान्हा फुटे॥३॥
मल्ला म्हणे उपकारा। नाही त्याच्या पारावारा॥४॥

धन्य धन्य गुरुराजा। करा अंगिकार माझा॥१॥
राम कृष्ण ऐसे धेडे ।त्यांचे उगविलें कोडें ॥२॥
सर्वावरी तुमची सत्ता। होसी कैवल्याचा दाता॥३॥
मल्ला म्हणे तुझी कीर्ति। वर्णवेना वेद श्रुती॥४॥

गुरु सत्य करणी तुझी ।केले मनासी बा राजी ॥१॥
तेणे पावे ब्रम्हपद। झाला आनंदी आनंद ॥२॥
प्रकाश झाला मंदिरी ।मल्ला पाहतसे खेचरी॥३॥

धन्य गुरु राय। केली परब्रम्ही सोय ॥१॥
लक्ष्य लावूनी उन्मनी ।दावी प्रकाश नयनीं॥२॥
ऐसे आनंद ते झाले। जन्म मरण चुकविले॥३॥
मल्ला म्हणे ऐसी स्थिती। तुझे नामीं सहज होती॥४॥

देता भय हर्ता भय। सूत्रधारी गुरुराय॥१॥
स्वधर्म विक्षोपण ।नको गुरुराया तूं जाण ॥२॥
बद्ध ज्ञानी गुरु सोडविला। निरंजनी खेळे मल्ला॥३॥

निज चैतन्याची खाणी। गुरुनें दावीली नयनीं॥१॥
आपपर नेणे कांहीं ।अवघा चैतन्यचि पाही॥२॥
ऐसा जाणे तोच ब्रह्म। येरा म्हणे श्रुति धर्म ॥३॥
मल्ला तया ठायी लीन।त्याचे चरण सेवीन॥४॥

पाहुनिया समाधान। गुरु झालें माझे मन ॥१॥
आतां ऐसे ठेवी। द्वैत भाव येऊं नेदावी॥२॥
सूत्र तुझे हातीं दोरी। तैसे खेळे या संसारी ॥३॥
सर्वश्रुत आहे तुज।मल्ला विनवी गुरुराज॥४॥

द्वैताची साऊली। येई निरसी गुरु माऊली॥१॥
देहीं असोनी निर्विकार। शिष्या देई गुरुवर ॥२॥
सर्वां ठायी तूंचि आहे। द्वेष करूं कवणे ठाये॥३॥
तिन्ही एक कृपा करी। मल्ला घातला पदरीं॥४॥

घेता गुरुचें दर्शन। मन विसरे विषय ध्यान ॥१॥
गुरु नामाचा प्रताप । ब्रह्म होय आपेआप॥२॥
पडदा मायेचा तुटला।  मल्ला आत प्रवेशला॥३॥

संग नको कवणाचा। रज तम सत्वाचा ॥१॥
तेणें न चुके येरझार । शुद्ध सत्व दे गुरुवर॥२॥
अखंड पाहीन तुम्हासी। त्रिकुटावरी गुरुनाथासी॥३॥
गुरु बुडालो बुडाला । चिन्मय डोहांत मल्ला॥४॥

गुरु सांप्रदाय धर्म । सोडूं नये ते हें वर्म॥१॥
गुरु दुर्बळाचा दाता । गुरु मोक्ष हाता देता॥२॥
त्रिविध तापें जो पोळला। गुरु कृपें शीतळ झाला ॥३॥
मल्ला म्हणे गुरु श्रेष्ठ । तिही लोकीं वरिष्ठ॥४॥

पापासी बंधन तपासी मोचन। सद्गुरुसी शरण गेल्या होय॥१॥
देन्यासी दंडण दुःखासी मुंडण। सद्गुरुसी शरण गेल्या होय ॥२॥
कामासी खंडन क्रोधा विस्मरण । सद्गुरुसी शरण गेल्या होय ॥३॥
मल्ला म्हणे जड जिवासी तारण ।सद्गुरुसी शरण गेल्या होय॥४॥

गुरु जीवाचे माहेर। गुरु प्रेमाचे पाझर ॥१॥
गुरु शांतीचे सागर ।गुरु क्षमेचे आगर ॥२॥
गुरु दयेचा जिव्हाळा ।गुरु जगाचा कळवळा॥३॥
गुरु सर्वांसी आगळा ।मल्ला म्हणे धन्य लीला॥४॥

बहु जन्माचे शेवटीं। झाली सद्गुरूची भेटी॥१॥
कर ठेव नियां शिरीं ।नेले स्वरूप मंदिरीं॥२॥
तेथें जाणीव नेणीव ।काही उरो नेदी भाव॥३॥
ऐसी अनुपम्य लीळा । मल्ला म्हणे पूर्ण कळा॥४॥

सद्गुरु माऊली कृपेची साऊली । जेणें ज्ञानवल्ली प्रगट केली॥१॥
मुक्तीवरी भक्ती सुखाचा सोहळा। दिली प्रेमकळा शरणांगता॥२॥
प्रेमाचा पुतळा जगाचा जिव्हाळा। नेणवेची लीळा अनुपम्य॥३॥
मल्ला म्हणे गुरु देवाचा हा देव। योगीयांचा राव शिरोमणी॥४॥


(कन्नड भाषेतील अभंग)

वीरनाथ गुरु जगदल्ली बंदा। माडिदा आनंदा मुरु लोका॥१॥
मुरुलोकादल्ली घळसीदा कीर्ती। मुक्तीम्याले भक्ती भोगागळू॥२॥
भोगागळुयंबो निज शरणारा। मरिलिल्ला हरा शिवशिवा॥३॥
ईपरि नडि बेकु। हारनान्यानि बेकु मल्ला ना बगिबेकू प्रतिदल्लि॥४॥

जगासी ताराया वीराचा अवतार। अदृश्य दृश्य सार दाखविले॥१॥
वीराची करणी जाणे सदाशिव। नेणे ब्रह्मदेव पार त्याचा॥२॥
वेद मौनावले शास्त्र स्थिरावले। निर्गुण आणिले सगुणासी॥३॥
मल्ला म्हणे कीर्ति अपार अपार।काय मी पामर वर्णूं शके॥४॥

वीरनाथा यन्ना माडी बहुकृपा हेळदु। साक्षपा वचना वंदू॥१॥
जगदल्ली बंदु बागी नडी बेकु। भाग्य घळस बेकु नीज वस्तु ॥२॥
निज वस्तु अंबुवदु बहु अपरूपा।बहुजन्मा पापा आळी बेकु॥३॥
नाडी नुडिया यडुॅ वंदु आगुबेकु।मल्ला इर बेकु लोकदल्ली॥४॥

पापी नोव्हे पुण्यवंत।आलो वीरनाथ गर्भांत॥१॥
आतां पुरला मनोरथ। आलो वीरनाथ गर्भांत॥२॥
सर्व विश्व ब्रह्म भासत। आलो वीरनाथ गर्भांत॥३॥
मल्ला परंपरा चालवीत।आलो वीरनाथ गर्भांत॥४॥

पूर्ण ब्रह्म पूर्ण भरीत। न पाहतां होय पतीत॥१॥
ऐसीयासी कैचा ठाव।कोण देईल गुरुराव॥२॥
मल्ला विनवी वीरासी ।ठाव द्यावा पाया पाशीं॥३॥

पंचरंगी मंदिरी नेले ।चैतन्य पद दिधले॥१॥
शिखा दिधली नामाची। आवघा झालो माझा मीची॥२॥
मन पट फाटले। ब्रह्मखाणी उघडीले॥३॥
ऐसे केले वीरनाथ। ऐक्य झाला मल्लनाथ॥४॥

सर्व दुरीत हरूनी। ब्रह्म दावीलें नयनीं ॥१॥
ऐसा सखा स्वामी माझा। सकळ सिद्धांचा तो राजा॥२॥
दृश्य होता मन विरे ।मल्ला द्वैत न उरे॥३॥

धन्य धन्य गुरु राव ।माझे देहीं दाविला देव॥१॥
माझे देही देऊळ केलें।आत्म लिंग स्थापिलें॥२॥
सगुणाच्या ओळील्या वाती।निर्गुणाच्या लाविल्या ज्योती॥३॥
मल्ला म्हणे ऐशी स्थिती। तुझे नामीं सहज होती॥४॥

आसरा नाही कोणाचा। इष्ट मित्र सार्वभौमाचा॥१॥
गुरुछायेंत बैसून। सदा पाहे गुरु लागून॥२॥
हेचि पुष्टी तुष्टी आमुचे। अखंड नाम गाई वाचे॥३॥
मल्ला लागीं आणिकपणा। येऊं नेदि नारायणा॥४॥

दास दास्यत्व करावें। गुरुसन्निध राहावें॥१॥
दास तुझेचि पहावे। गुरु सन्निध राहावे॥२॥
दास गुण तुझेचि गावे। गुरु सन्निध राहावे॥३॥
दास मल्लासी रक्षावे। गुरु सन्निध राहावे॥४॥

धन्य माता पिता।पुत्र मिळे भगवंता॥१॥
तोचि विजयी जाणावें।सदा पांडुरंगा गावें॥२॥
सुफळ सुफळ। जो भेटला गोपाळ॥३॥
सर्व सत्ता तुझे हाती। ऐक्य व्हावे भगवंती॥४॥
आपे आप व्यापिला। गुरुनाथ रमवी मल्ला॥५॥

सर्वस्वी आपले शरणांगता दिलें। पदीं बैसविले निजानंदीं॥१॥
ऐसा कोण दाता द्यावा निवडुनी। सद्गुरु वांचोनी भुवनत्रयीं॥२॥
सद्गुरु कृपे बोध वाचे बोले वेद। माझें मजछंद दावी मल्ला॥३॥

गुरु सेवेची जोडी।सेवी ब्रम्हरस गोडी॥१॥
त्याचा जन्म सुफळ। झालें पूर्वजासी बळ॥२॥
मल्ला म्हणे सत्य करा। सत्य साधुनी सत्य धरा॥३॥

– प्रा. – अपर्णा गुरव


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या