संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा माहिती

सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्‍या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संतकवयित्री होत्या. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून संत कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.

विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या संत कान्होपात्रा विषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी,  पण ते लिहून ठेवणारं कुणी नव्हतं. त्यामुळे त्यांचं खूप थोडं काव्य उपलब्ध आहे. पण त्यांचं जे भक्तीरसपूर्ण अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठलभक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो.

इतर विठ्ठलभक्त स्त्रियांहून संत कान्होपात्रा चं जीवन पूर्णत: भिन्न होतं. शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या पोटी तिचा जन्म झाला. ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात ती वाढली. त्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा असणं शक्यच नव्हतं. वेश्याकुळातल्या स्त्रीला गुरू तरी कुठला लाभणार? पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वरस्वरूप पावली.
पंढरपूरपासून सात कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य शामा नायकिणीची कान्होपात्रा ही मुलगी. वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं. पण शामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा. लहाणपणीच तिच्या पायात बांधलेले गेलेले चाळ कोडकौतुकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते. रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं. आईचा आग्रह तसाच होता. पण भक्तीचा अंकूर तिच्या हृदयात फुटला होता.

हे पण वाचा: महती संताची

कान्होपात्रा रूपवती होती. तितकीच बुद्धीमानही होती. ती मेनका-अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलंय. गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं. हळूहळू तिचं कलानैपुण्य आणि सौंदर्याची कीतीर् दूरवर पसरली. तिची आई अत्यंत धनवान गणिका होती. महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता. अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या. शामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा. राजदरबारी रूजू व्हावं असं शामाला वाटत होतं. तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती. मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरूष कान्होपात्रेला मिळावा असं शामाला वाटत होतं. पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरूष असेल तर मी त्याच्याजवळ राहेन, विवाह करेन. ही अट अर्थात कठीण होती.

मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली. त्याने कान्होपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली. शामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसंबसं सदाशिवसमोर आणलं. त्याची विषारी नजर तिच्यावर पडली. याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन-नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं. भडकलेल्या नगराध्यक्षाने सूडसत्र सुरू केलं. ती त्याची मुलगी असल्याचं शामाने सांगून पाहिलं. पण तो इतका वासनांध झाला होता की हे खोटं असल्याचं त्याने म्हटलं. शामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला. वैभव ओसरलं. त्याच्याविरूद्ध न्याय कोण देणार? अखेर शामाने त्याची माफी मागितली. त्याने तीन दिवसांत कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकुम दिला. या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही. ती देवासमोर हात जोडून जप करू लागली. रात्रभर ती जप करतच होती. पहाटे डोळा लागला आणि भजन-टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली.

वारकऱ्यांचा एक जत्था आषाढीनिमित्त भजन गात पंढरपूरास चालला होता.

त्याक्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला. तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती. हौसाच्या संगनमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली. तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली. मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेषात तिने मंगळवेढे सोडलं. यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्याच्या चरणाशी एकाग्र झाली.

व्याकूळ भावाने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली –

मज अधिकार नाही । भेटी देई विठाबाई ।।

ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ।।

आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समपिर्त करून तिने त्याचं दास्यत्व पत्करलं. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वगीर्य आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला. वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वत:साठी एक झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी. लोकांना वाटे ती देवाचं वेड घेतलेली, गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठलभक्तीत खोल बुडत गेली. लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच. मुळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले. त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली.

जिवाचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई

सावळे डोळसे करूणा येथु देई काही

अशी आर्त विनवणी उमटू लागली. कालांतराने,

सर्व सुखाचे जे निजसुखाचे सारगे माय

तो हा पंढरीराय विटेवरी

असा समाधानाचा, शांतीचा भाव मनी उपजला. विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखासमान असल्याने सर्व इच्छा, वासना निमाल्या. इकडे नगरप्रमुखावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली. पण तो निसटून बादशहाकडे गेला. बादशहाच्या साहाय्याने त्याने लोकांवर सूड उगवला. त्यांच्या घरादारांवर नांगर फिरवला. त्यांना पकडून तुरुंगात टाकून हाल केले आणि सर्वत्र वचक बसवला. नंतर त्याने कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फर्मान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं. नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल. विठ्ठलमंदिराला सैनिकांचा गराडा पडला. आपल्यासाठी लाखोंचं भक्तिस्थान असलेलं सारसर्वस्व विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे तिला सहन होणं शक्यच नव्हतं. कान्होपात्रा सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली. तिने एकवार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली.

कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली. देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती. ती देवाला म्हणाली,

नको देवराया अंत आता पाहू ।

प्राण हा सर्वस्व फुटो पाहे ।।

हरिणीचे पाड व्याघ्रे धरियले

। मजलागी जाहले तैसे देवा ।।

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी

। धावे वो जननी विठाबाई ।।

मोकलूनी आस, झाले मी उदास ।

घेई कान्होपात्रेस हृदयास ।।

परमेश्वराची आर्त व्याकूळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. एक आख्यायिका अशी आहे की, त्यावेळी चंदभागेला प्रचंड महापूर आला. सारं यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिरही जलमय झालं. चंदभागेतल्या एका खडकाळ जागी आधी तिचं शरीर अडकलं. मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंदभागेने वाहून नेलं. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवल्याचं आढळलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठलभक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे.

संत कान्होपात्रा ने स्वत:ला देवाची वधू म्हणवलं तरी तिचा विठ्ठल तिच्यासाठी आई होता.

सखा होता. माय, बाप, बंधू, भगिनी होता. देहाच्या उपाधी सुटाव्या म्हणून देवाकडे प्रार्थना करते.

कान्होपात्रेला काय हवं होतं? ‘देगा प्रेमकळा-नाम तुझे’ विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू, मायमाऊली होता.

दासाची कळकळ वागवणारा दीनांचा नाथ, कृपावंत मालक होता.

भक्तांचा दास होता. ज्याच्या प्राप्तीसाठी चारी वेद सहाही शस्त्रं शिणली तो केवळ भक्तीने प्राप्त होतो.

‘अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया’ अशी आर्त हाक ती त्याला आपल्या संरक्षणासाठी मारत होती.

कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली.

विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं.

कुणी गुरू नाही. काही परंपरा नाही. भक्तीचं वातावरण नाही.

अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वरप्राप्ती करून घेतली.

म्हणून संत कान्होपात्रा अद्वितीय ठरते.

तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं.

संत कान्होपात्रा ।


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

संत कान्होपात्रा ।

wikipedia.org

संत कान्होपात्रा ।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *