संत महिपती

संत महिपती माहिती

संत महिपती (मराठी लेखनभेद: महिपती ताहराबादकर) (अंदाजे शा.श. १६३७ / इ.स. १७१५ – श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ / इ.स. १७९०) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे होऊन गेलेले संतकवी होते. त्यांनी १३व्या ते १७व्या शतकादरम्यानच्या महाराष्ट्रातील प्रमुख वैष्णव संताबाबतचे चरित्रलेखन केले.


संत महिपती – बालपण

ताहराबाद हे गाव सतराव्या शतकात ताहीरखान नावाच्या सरदाराची जहागीर होते. त्याच्या पदरी असलेले श्री दादोपंत कांबळे हे देशस्थ ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राम्हण, गावचे कुलकर्णी व ग्रामजोशी या पदांचे वतन सांभाळीत होते. त्यांच्या घरात फारच उशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या साठाव्या वर्षी, शा.श. १६३७ (इ.स. १७१५) साली महिपतींचा जन्म झाला. श्री दादोपंत कांबळे हे मूळचे मंगळवेढ्याचे होते.

तुकाराम महाराजांच्या समकालीन महिपती बुवांना तुकाराम यानांच गुरू मानले होते. संस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वर भक्ती सर्व सामान्यांच्या बोली भाषेत गंगेच्या रुपाने आणण्याचे पवित्र कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. त्यांचेच कार्य पुढे तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या बरोबरीने महिपती बुवांनी चालविले. अठराव्या शतकात ग्रामीण भागातील जनतेत ईश्वर भक्ती जागृत करण्याकरीता संत चरित्र व्याख्यान व काव्य रुपाने साध्या सोप्या रसाळ मराठी भाषेत रचले गेले. संत कथा व्याख्यानात महाराष्ट्र रंगू लागला. दामाजी पंतांच्या मंगळवेढयाहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे स्थायीक झाले. दादोबाच्या याच मुलाने दुष्काळात आपले घर दामाजी पंता प्रमाणे गोर गरीबांकडून लुटवून घेतले. अल्प मिळकतीत आपल्याकडे जे आहे ते गरजुसांठी दान करणे या मागे समाजहिताची फार मोठी व्यापक दृष्टी लागते. संतांची वैशिष्टये हेच सांगतात की ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’

हाच उपक्रम त्यानी पुढील तीन दुष्काळात आरंभिला. वारकरी संप्रदायातील नम्र भाषा प्रभु उदारवादी व पांडुरंग भक्त महिपती महाराज पेशवाईत लोकप्रिय न झाले असते तरच नवल होते श्रीमंत बाजीराव पेशवे व त्या नंतर मल्हारराव होळकर यांनी महिपती महाराज यांच्या वंशाकरीता जमीन व मान पत्र केल्याची नोंद आहे.


गृहस्थाश्रम

वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महिपती हे वंशपरंपरेने चालत आलेले ताहराबादचे कुळकर्णीपद व जोसपण सांभाळू लागले. परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते. तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले.


मृत्यू व समाधिस्थळ

महिपतीबुवा श्रावण कृष्ण द्वादशी, शा.श. १७१२ (इ.स. १७९०) रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निवर्तले. ताहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे. तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे. तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे.


संत महिपती – कार्य व साहित्य संपदा

ते काही काळ अहमदनगर जिल्ह्याच्या ताहराबाद येथे वास्तव्यास होते.त्यांनी वारकरी संतांबाबतही चरित्रलेखन केले. त्याच्या भक्तविजय या सन १७६२या दरम्यान लिहिलेल्या ग्रंथाचे भाषांतर सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाले. महिपती यांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक संतांचा काव्यमय परिचय ‘भक्त विजय’ व `संतलीलामृत’ या ग्रंथांत शब्दबद्ध केला आहे. संत साहित्यातील अभ्यासकांच्या लेखी संत महिपती महाराजांच्या रचनेला विशेष स्थान आहे. महिपती महाराजांच्या चरित्राचा परिचय ह.भ.प. विनायक महाराज शाळिग्राम समशेरपूरकर (संगमनेर) यांनी त्यांच्या ‘नूतन संत चरित्र’ या ग्रंथात नऊ ते पंधरा अध्यायांत दिलेला आहे. महिपती महाराज वैकुंठवासी होऊन २१५ वर्षे झालेली आहेत.

ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक

साहित्यकृती अध्याय ओव्या रचनाकाळ
श्रीभक्तविजय ५७ ९९१६ १६८४
श्रीकथासरामृत १२ ७२०० १६८७
श्रीसंतलीलामृत ३५ ५२५९ १६८९
श्रीभक्तलीलामृत ५१ १०७९४ १६९६
श्रीसंतविजय २६ (अपूर्ण) ४६२८ १६९६
श्रीपंढरी माहात्म्य १२
श्रीअनंतव्रतकथा १८६
श्रीदत्तात्रेय जन्म ११२
श्रीतुलसी माहात्म्य ७६३
श्रीगणेशपुराण ४ (अपूर्ण) ३०४
श्रीपांडुरंग स्तोत्र १०८
श्रीमुक्ताभरण व्रत १०१
श्रीऋषीपंचमी व्रत १४२
अपराध निवेदन स्तोत्र १०१
स्फुट अभंग व पदे

या ग्रंथांची एकूण ओवीसंख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.


इ.स.च्या १८व्या शतकातील वारकरीपंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक विठ्ठलभक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली पंढरपूर येथून प्रसिद्ध होणार्‍या ‘पंढरी संदेश’ मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणार्‍या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.

पुणे येथून प्रकाशित मासिक साहित्य चपराक (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट, इ.स. २०११ हा अंक संत चरित्रकार महिपती विशेषांक या नावाने प्रसिद्ध केला आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *