संत नामदेव

संत नामदेव गाथा भक्तवत्सलता

संत नामदेव गाथा भक्तवत्सलता – अभंग १ ते १०८


भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥
ब्रह्मयाचे वेद चोरी शंखासुर । मत्स्य अवतार तयालागीं ॥३॥
समुद्र मंथनीं मंदर बुडाला । कूर्मरूप झाला तयेवेळीं ॥४॥
हिर-ण्याक्ष धरा नेतां रसातळ । वराहरूपें त्याला वधियेलें ॥५॥
प्रल्हा-दासी पिता गांजी नानापरी । स्तंभीं नरहरी प्रगटला ॥६॥
देव-काजीं झाला वामन भूतळीं । बळीसी पाताळीं घातियेला ॥७॥
भूमिभार झाला क्षत्रियांचें कुळ । केलेंसे निर्भूळ परशुरामें ॥८॥
सीतेचिया काजा रावण मर्दिला । सूर्यवंशीं झाला रामचंद्र ॥९॥
गोकुळीं जन्मला श्रीकृष्ण आठवा । होऊनि पांडवां साह्यकारीं ॥१०॥
व्रतभंगासाठीं बौद्ध अवतार । झाला दिगंबर अवनिये ॥११॥
कलंकि अवतार होणार श्रीहरि । तेव्हां पृथ्वीवरी तृण न उरे ॥१२॥
नामा ह्मणे तुझे अनंत अवतार । तेथें मी पामर काय वर्णूं ॥१३॥


होसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥
अंबरुषिकारणें । दहा वेळ गर्भवासा येणें । अवतार धरिला नारायणें । गजापूर नगरीं ॥२॥
अंदुरायाच्या घरीं । बाळ जळसेनाच्या कुमरीं । मत्स्य रूप अवतार धरी । वेद हरणकैवारी नारायण ॥३॥
विद्यापुर नगरीं । अंधरुराजा राज्य करी । श्रियादेवी त्या सुंदरी । उदरीं कुमरु जन्माला ॥४॥
पृथ्वी रसातळवटीं । जातां थोर अंदोळली सृष्टी । धांवण्या धांवले जगजेठी । धर पृष्ठीं सांवरिली ॥५॥
मर्गजपुरीं पुरपती । हिर-ण्याक्ष चक्रवर्ती । अग्नि असे जनवंती । घरीं बाळ वराह ॥६॥
त्रिदश-देवश्रिया चाडा । हिरण्याक्ष वधिला गाढा । भूगोल धरूनियां दाढा । केला निवाडा स्वर्यीचा ॥७॥
कर्पूरपुरपाटण । हरिभक्तीचें हें स्थान । सदयादेवी प्रिया नंदन । उदरीं नृसिंह जन्मला ॥८॥
पित्या पुत्रा झाली कळी । स्तंभीं प्रगटला तयेवेळीं । असुर मारिला करकमळीं । भक्त प्रर्‍हाद रक्षिला ॥९॥
कश्यपनंदनवर्धन । कोवळादशाचा वामन । खुजट रूप धरून । महेंद्रपुरीसी आला ॥१०॥
दानें तपें व्रतें बळी । सोही घातला पाताळीं । अद्यापि राहिला जवळी । चरणातलीं पद देउनी ॥११॥
रेणापुरीं देवी रेणुका । लाधली जमदग्नीस देखा । तिचे उदरीं विश्वतारका । परशुराम जन्मला ॥१२॥
असुरीं वधि-येली माया । ह्मणे धांवें पुत्रराया । अवचित पातला धावया । सह-सार्जुन मारिला ॥१३॥
अयोध्या नाम नगरी । जन्म कौसल्ये उदरीं । देवभक्तांचा कैवारी । दशरथनंदन राघव ॥१४॥
राम त्रैलोक्यीं वीर दारुण । तेणें वधियेला रावण । अढळपद देऊन । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥१५॥
मथुरा नामें नगरीं । वसुदेव दे-वकी उदरीं । कृष्ण आठबा अवतारी । लीला विग्रहि जन्मले ॥१६॥
कंस चाणूर मर्दिले । विमळार्जुन उन्मळिले । सप्त गर्भाचे सूड घेतले । रक्षिलें गाई गोपाळां ॥१७॥
बौद्ध श्रीवत्साच्या घरीं । जन्म शांभवीच्या उदरीं । राजा कांतिये नगरीं । निरंतर रूपें राहिला ॥१८॥
ध्यान मुद्रा मांडूनियां । वस्त्रें शस्त्रें त्यजूनियां । राहिला पैं निरंजनिया । भक्तिभाव ओळखे तो ॥१९॥
कल्कि जसरा-याचा पुत्र । सावित्री देवीचा कूमर । शंभलापुरीं करील अवतार । दाही रूपें प्रगटला ॥२०॥
ऐसा अमूर्त मूर्ति विटेव र । उभा राहिला निरंतर । विष्णुदास नाम्याचा दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥२१॥

३.
देवा तूं प्रथम गर्भबास भोगिसी । सागरीं जळचरु मत्स्य झालासी । कमठ पाठी नसंडी कैसी । कूर्में कासाविसी केलें तुज ॥१॥
अपवित्र नाम आदि वराह । याहूनि थोर कुर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥
खुजेपणें बळिस पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्बार रक्षिलें । पितयाचे वचनें मातेसी वधिलें । तें कर्म जडलें परशुरामा ॥३॥
श्रीरामा झाल्या आपदा बहुता । कर्में भोगविलें अंतरली सीता । भाल्लुका तिर्थीं बधियलें अवचिता । नाम अच्युता तुज झालें ॥४॥
ऐसा कष्टि होऊनि बौद्ध राहिलासी । तूम कलंकिया लोकां मारिसी । आपुल्या दोषासाठीं आणिकं दंडिसी । निषकळंक होसी नारायणा ॥५॥
ऐसा तूं बहुत दोशी बांधिलासी । पुढिलचि जन्में अवगतोसी । विष्णु-दास नामा म्हणे ह्लषिकेशी । तुझी भीड कायेसी स्वामियाहो ॥६॥

४.
अंगाची सेज फणि छाया धरी । सहस्रमुखीं करी स्तुति शेष ॥१॥
परि तयातें तुझें चरित्र आकळीत । तेथें माझें गीत कोणीकडे ॥२॥
कैशापरी तुज ध्यावें देव देवा । हें वर्म केशवा सांग मज ॥३॥
मार्कंडेयो भृशुंडि लोमहर्ष अगस्ति । करितां तुझी स्तुति कल्प गेले ॥४॥
ध्यानीं पाहतां तुज न पवती योगी । तेथें मी तो रोगी कोणीकडे ॥५॥
ब्रह्मचर्यव्रत आचरती देव । ऋषिमुनि सर्व करिती सेवा ॥६॥
परि तुवां गर्व हरिला तयांचा । तेथें माझी वाचा कोणीकडे ॥७॥
इतुकें ऐकोनि बोले केशिराज खुणें । आरुता येंइ ह्मणे नामयासी ॥८॥
मुखीं माझें नाम ह्लदयीं धरूनि प्रेम । हेंचि तुज वर्म सांगितलें ॥९॥

५.
चारी वेद तुझ्या नांदती नगरीं । तेथें मी भिकारी काय वानूं ॥१॥
वर्णितां पार नेणे चतुरानन । तेथें मी अज्ञान काय जाणें ॥२॥
अंगलग सेवक शेषाच्या सारिखा । तेथें माझ्या लेखा कोणीकडे ॥३॥
कैलासींचा राणा करितसे ध्यान । तेथें भ्रांत मन कोठें रिघे ॥४॥
इंद्रासहित देव जेथें ओळंगणें । तेथें दास्य करणें घडे कांहीं ॥५॥
नामा ह्मणे केशवा काय म्यां । करावें । तुझे पायीं रहावें कैशापरी ॥६॥

६.
वेदां नकळे पार श्रुतीं अगोचर । उपनिषदां सार न-कळेचि ॥१॥
तो हरि गोकुळीं वसुदेवा कुळीं । यशोदेजवळी बाळ-कृष्ण ॥२॥
ब्रह्मादिक वंदिती शिवादिक ध्याती । शास्त्रांसी तों गति न कळेचि ॥३॥
योग्यांचें चिंतन मुनींचें अंजन । शेषादिकां ध्यान सदा ज्याचें ॥४॥
पुराणें भागलीं आचारें श्रमलीं । बोलतां राहिलीं साधुवृंदें ॥५॥
नामा ह्मणे तो हा विठठल पंढरी । नाम मात्रें तारी सकळांसी ॥६॥

७.
सहस्र तोंडांचा तोहि भागियेला । अंत नाहीं ज्याला गुणालागीम ॥१॥
तेथें मी पामर काय बोलूं वाणी । तुझी कीर्ति जनीं काय कैसी ॥२॥
यथामति कांहीं बोलियलों बोल । तोचि हा विठ्ठल नामा ह्मणे ॥३॥

८.
नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१॥
सिद्धि सिद्धि दासी अंगन झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ती चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनि गर्जती । सन-कादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥
नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू । करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥

९.
अगणित गुण वर्णिती पुराणें । पंढरीचे राणे ख्याती जयीं ॥१॥
अलक्ष भेटी लक्षिताची नाहीं । पुंडलिकें कांहीं तप केलें ॥२॥
युगें गेलीं अठ्ठावीस ते अझुनी । उभा चक्रपाणी रा-हिलासी ॥३॥
वेद ह्मणती नेति पुराणें तें किती । भांबावल्या मती ह्मणे नामा ॥४॥

१०.
खोल बुद्धिचा तो देवकीनंदन । उभा तो गे बाई ॥१॥
नंदनंदन संताचें जीवन । उभा तो गे बाई ॥२॥
कामिनी मनोहर नामया दातारा । उभा तो गे बाई ॥३॥

११.
फेडूनि पीतांबर उभा दिगंबर । कटीं ठेवूनि कर वा-ळवंटीं ॥१॥
मोतियांचे हार सांडूनि रत्नकीळा । तुळशीच्या माळा गळां घाली ॥२॥
पर्यंक शयन शेषाचें आसन । सांडूनि निधान उभा विटे ॥३॥
सांडूनियां भक्त सनकादिकीं प्रेमा । कलियुगीं नामा आवडला ॥४॥

१२.
पुंडलिकाचे भेटीं आणि भींवरेचे तटीं । परब्रह्म उभें वाळुवंटीं मायें ॥१॥
उभा वीटेवरी कर ठेवूनि कटावरी । उभा भीमातीरीं जगजेठी गे माय ॥२॥
विठ्ठल कान्हा चरणीं वांकी तोडर । कासे पीतांबार पदकलीळा मनोहर गे माय ॥३॥
कान्हा विठ्ठल कान्हा प्रसन्नवदन थोरा । जो आथी करुणाकरा हरि नामया दातारा ॥४॥

१३.
देहुडा चरण वाहातुसे वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥
देखिलागे माय यमुनेचे तीरीं । हात खांद्यावरी राधि-केच्या ॥२॥
गुंजावर्ण डोळे शिरीं बाबर झोटी । मयूर पिच्च वेष्टी शोभतसे ॥३॥
सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशवराज ॥४॥

१४.
हरि भोळा हरि भोळ । आह्मीं डोळां पाहिला ॥१॥
हरि श्रेष्ट हरि श्रेष्ट । आत्मां कष्ट नाहीं ते ॥२॥
हरि उदार हरि उदार । आह्मां धीर होईना ॥३॥
नामा ह्मणे हरि दाता । आह्मां दासां रक्षितो ॥४॥

१५.
अधरींचें अमृत सेविसी एकलारे । काय पुण्य केलें रे नेणों पावया ॥१॥
तुळशीच्या माळा शोभति गोपाळा । तयाहूनि आगळा पावया तूं ॥२॥
सोळासहस्र गोपी बोलतील प्रौढी । अधरींची गोडी नेली तुवां ॥३॥
विष्णुदास नामा केशवीं सौरस । उद्धरिला वंश पावया तुवां ॥४॥

१६.
वैकुंठ तें घर । सांडूनियां निरंतर ॥१॥
तो हा पुंडलिक द्वारीं । उभा कर कटावरी ॥२॥
क्षीर सांगरींची मूर्ती । तो हा रुक्मि-णीचा पती ॥३॥
नये योगियांचे ध्यानीं । छंदें नाचतो कीर्तनीं ॥४॥
नामा ह्मणे आला । सवें परिवार आणिला ॥५॥

१७.
अनंता श्रीधरा गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारायणा ॥१॥
देवकीतनया गोपिकारमणा । भक्तउद्धरणा त्रिविक्रमा ॥२॥
मकर कुंडलें श्रवणीं शोभती । एकावळी दीप्ति तेजें भारी ॥३॥
नामा ह्मणे तुझा न कळेचि पार भजा निरंतर सर्वकाळ ॥४॥

१८.
उभा विटेवरी भक्तांचा कैवारी । भेटावया उभारी दोन्हीं बाह्या ॥१॥
गुण दोष त्याचे न पाहेची डोळां । भेटे वेळो-वेळां केशिराज ॥२॥
ऐसा दयावंत घेतो समाचारु । लहान आणि थोर सांभाळितो ॥३॥
सर्वांलागीं देतो समान दर्शन । उभा तो आपण समपायीं ॥४॥
गना ह्मणे तया भक्तांची आवडी । भेटा-वया कडाडी उभा ठेला ॥५॥

१९.
सत्यसंकल्पाचा कर्ता जो विश्वाचा । अनाथ जीवांचा मायबाप ॥१॥
पुंडलिकें तया आणिलें रंगणीं । कटावरी पाणि ठेवूनियां ॥२॥
अणुरेणुमाजि व्यापूनि राहिला । आनत्व जाहला एकलचि ॥३॥
नामा ह्मणे वेद त्यालागीं बोभाय । जोडोनियां पाय उभा ठाके ॥४॥

२०.
तुझिया सत्तेनें वेदांसी बोलणें । सूर्यासीं चालणें तु-झिया बळें ॥१॥
ऐसा तूं समर्थ ब्रह्मांडाचा धनी । वर्म हें जाणूनि शरण आलों ॥२॥
मेघांनीं वर्षावें पर्वतीं बैसावें । वायूनेम विचरावें सत्ते तुझे ॥३॥
नामा ह्मणे कांहीं न हाले साचार । प्रभु तूं निर्धार पांडुरंगा ॥४॥

२१.
अच्युता अनंता श्रीधरा माधवा । देवा आदि देवा पांडुरंगा ॥१॥
कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना । तूंचि नारायणा नामधारी ॥२॥
मुकुंदा मुरारी प्रद्युम्रा केशवा । नाम सदाशिवा शांतरूपा ॥३॥
रूपातील हरी दाखवीं सगुण । निरंतर ध्यान करी नामा ॥४॥

२२.
पंढरीचा देव तत्सच्चित अद्वय । तूंचि बापमाय पांडु-रंगा ॥१॥
सगुण निर्गुण दाविसी प्रकर । दाही अवतार निमि-तासी ॥२॥
ऐसा माझा स्वामी समर्थ गोविंद । निरंतर छंद हरि-नामीं ॥३॥
नामा ह्मणे कांहीं न धरिसी लाज । भाविकांसी गुज कानीं सांगे ॥४॥

२३.
आशा तृष्णा माया नाहीं लिथाडिल्या । ह्मणावा तो भला कासयानें ॥१॥
अमृत सेवितां मृत्यु पळे दुरी । सुख होय तरीं तेंचि नाम ॥२॥
तेव्हां कोणी तरी धरावा सत्संग । होय पांडुरंग प्राप्ति सर्वां ॥३॥
अविश्वासी नर सर्वस्व पतीता । तारिसी अनंता ह्मणे नामा ॥४॥

२४.
दु:खाची निव्रुत्ति सुखाचे तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें ॥१॥
रंगणीं रांगत गुलगुला बोलत । असूर रुळत चर- णातळीं ॥२॥
नामा ह्मणे हातीं लेणियाचा उंडा । गौळणी त्याच्या तोंडा भुललिया ॥३॥

२५.
श्रीधरा अनंता गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारा -यणा ॥१॥
देवकी तनया गोपिकारमणा । भक्त उद्धारणा केशिराजा ॥२॥
मकरकुंडल श्रवणीं शोभती । येकावळी दिप्ती सृष्टि लोपे ॥३॥
नामा ह्मणे तुझा न कळेची पार । भजे निरंतर भक्तजन ॥४॥

२६.
केशिराजा आदि सकळा अनादी । तूंचि कृपानिधि नारायणा ॥१॥
अव्यक्ता अक्षरा सर्व अविनाशा । अगा पंढरीशा पांडुरंगा ॥२॥
तूंचि ब्रह्मचारी गोपिकांचे घरीं । सर्वस्वें उद्धरी सर्व जीवां ॥३॥
लटिकें दाविसी गोकुळाभीतरीं । नामा ह्मणे शिरीं भार वाही ॥४॥

२७.
अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती ॥१॥
तोचि पांडुरंग पंढरीचा राजा । धणी झाला वोजा भावबळें ॥२॥
अनंत जयाच्या सेवा वोजावणी । नामरूप गुणीं नामातीत ॥३॥
नामा ह्मणे अंत असेना जो कांहीं । सांपडतो पाहीं पंढरीये ॥४॥

२८.
देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥
देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥
देव देव करितां शिणलें माझें मन । जेथें जाय तेथें पूजा पाषाण ॥३॥
नांमा तोचि देव ह्लदयीम पाहे । नामा केशवाचे न सोडी पाय ॥४॥

२९.
वाळवंटीं उभा करें कुरवाळिल । जीवींचें पुसेल जड-भारी ॥१॥
हरुषें लोळणी घालूं महाद्वारीं । येईल समोरी केशिराज ॥२॥
शोभतसे पायीं भक्त ब्रिदावळी । जीवासी सांभाळी दीनानाथ ॥३॥
माझा अभिमान धरून मानसीं । नामा ह्मणे होसी भक्तां साह्य ॥४॥

३०.
करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व ॥१॥
वाळुवंटीं उभे पताकांचे भार । पाहोनि शंकर वेडावला ॥२॥
सूर्य चंद्रादिक घालिती लोटांगण । करी प्रदक्षिणा स्वयें गंगा ॥३॥
नामा ह्मणे ऐसें सांगतां बहुत । वेदशास्त्र ग्रंथ ठकावले ॥४॥

३१.
देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ ॥१॥
देव आपण संसारें । होसी भक्तांचा साहकारी ॥२॥
देव आपण निराळा । भक्तां दावितो सोहळा ॥३॥
नामा ह्मणे भक्तांसाठीं । हात जोडी जगजेठी ॥४॥

३२.
गोविंद गुणाचें निधान । गोविंद नयनींचें अंजन । गोविंद बाळकाचें स्थान । गो़विंद चिंतन योगियांचें ॥१॥
गोविंद पांघुरे कांबळा । गोविंद क्रुपे़चा कोंवळा । गोविंद भावालागीं भोळा । गोविदें अजामेळा उद्धरिलें ॥२॥
गोविंद बुद्धिची बुद्धि । गोविंद एकली मांदी । गोविंदें हरिली विघ्नव्याधि । गोविदें सिद्धि स्मर-लिया ॥३॥
गोविंद गोकुळपाळक । गोविंद अंगवणें एक । गोविंदें दैत्या लवियला धाक । गोविंद शेष शयनीं ॥४॥
गोविंद आडलि-या काजा कैवारी । गोविंद बुडतियातें तारी । गोविंदा सोळसहस्र नारी । गोविंद बाळ ब्रह्मचारी ॥५॥
गोविंद दान दीक्षा गुरु । गोविंदे अढळ धुरु । गोविंद नामया दातारु । रुक्मिणीवरु गोविंदु ॥६॥

३३.
विठ्ठल माउली कृपेचि सावली । आठवितां घाली प्रेम पान्हा ॥१॥
न सांगतां सर्व जाणे तान्ह भूक । जवळी व्यापक न विसंबे ॥२॥
माया मोह कैसा करावा सर्वथा । अंतरींची व्यथा तोचि जाणे ॥३॥
सुखशांति रूपें लेवविली अंगीं । लागों नेदी धगी संसाराची ॥४॥
देऊनि अभय करें कुरवाळी । करित सावली पितांबरें ॥५॥
मुखीं नाम माळा कीर्तन श्रवणीं । लेवविलीं लेणीं नवविध ॥६॥
नयनीं अंजन सूदलें सांवळें । समाधान झालें सर्व अंग ॥७॥
अच्युत अनंत सुवर्णाची पेटी । घातलिसे कंठीं निर्वि-कार ॥८॥
चतुर्भुज शोभा रूप मध्यें मणि । प्रभा त्रिभुवनीं विरा- जित ॥९॥
मुक्तलग शुद्ध बिंदुली गोजिरीं । पद्महस्त शिरीं स्थापि-तसे ॥१०॥
संत पायरज कपाळीं टिळका । नाहीं भय शंका कळिकाळा ॥११॥
सगुण साजिरा कटीं कडदोरा । अवर्ण दुर्भरा दृढबोधु ॥१२॥
काम क्रोधादिक करूनि पुतळे । पाय जे घातले पायवाट ॥१३॥
वासनेची दृष्टि लागएल त्या झणीं । उभा चक्रपाणि मागें पुढें ॥१४॥
संतपायीं नामा शृंगार मंडितु । अखंड क्रीडतु महाद्वारीं ॥१५॥

३४.
एक गोक्षीर धाम धवळा । एक तो सहज मेघ सां-वळा । एक कंठीं रुंडमाळा । एक गळां वैजयंती ॥१॥
एक तो वृषारुढ जाण । एका साजे गरुडवाहन । एक स्मशानीं भस्मोद्धु-ळण । एका शयन क्षीरसागरीं ॥२॥
एक तो भोळा कैलासीं चक्रवतीं । एक तो वैकुंठाधिपती । एका सुरवर मुगूटीं वंदीती । एका अंगुष्ठी गंगा वाहे ॥३॥
एकाचे चरणीं नेपुरें झणत्कारु । एका पायीं रुळे तोडरु । एका परिधान व्याघ्रांबरु । एका पीतांबरु कसियला ॥४॥
एका नरकपाला खट्वांग डमरु त्रिशूल । एका शंख चक्र गदा कमळ । एका अर्धांगीं हैमवती बाळ । एका कमळा वामभागीं ॥५॥
एक त्रिपुर संधानीं लक्ष न चुके । एकबाणें वाळि वधिला कैतुकें । विष्णुदास नामा एक रूप देखे । हरि-हर कौतुकें वर्णितसे ॥६॥

३५.
अपराधाविण बळी । घातला पाताळीं । सवें कणव उपजली । द्बार राखिसी तयाचें ॥१॥
गार्‍हाणें सांगवें कवणा । केशवा सुजाणा । कोणी आणिक तुजविणा । नाहीं दुसर आह्मातें ॥२॥
बाळमित्र सुदामा सवें जेवी । धान्य जो मागे गांवोगांवीं । विपत्ति त्याची दूर व्हावी । ह्मणून दिधली राणीव ॥३॥
तुझें नाम न तोंडीं । वसुदेव देवकी बांधोडी । कंसा केली धांडडी । ऐसी विपत्ति दाखवुनी ॥४॥
इंद्र वर्षे शिळा धारा । पर्वत केला सामोरा । इंद्रा लविला दरारा । एवढी विपत्ति दाखवुनी ॥५॥
जोहरीं सूदलें पांडवां । सवेंचि उपजली कणवा । त्यासी केला त्वां रिघावा । आंगीं पाहण्या धांवसी ॥६॥
सभा पिशुनाची दाटली । द्रौपदिकाया आंसुडली । तिये वस्रें पुरविलीं । येवढी आपदा दाखवुनी ॥७॥
दैत्ये गांजिला प्रर्‍हादु । तुझ्या नामाचा प्रसादु । ऐसा करूनि वि-नोदु । तया दैत्या वधियेला ॥८॥
बिभीशण हाणितला लाथां । लंका दिधली त्या उचिता । कृपा करें रघुनाथा । समर्थ केला तये वेळीं ॥९॥
गजेंद्र पानेडी । धरिला यमदूत सुसरीं । वैकुंठीहूनि घा – लिसी उडी । येवढी आपदा दाखवुनी ॥१०॥
आह्मां डिंगराचें बोलणें । अनाथनाथा परीसणें । विष्णुदास नामा ह्मणे । शाहणें व्हावें यापरतें ॥११॥

३६.
दुरोनि ओळंगिल्या अविनाश देताहे । तो जवळी जातां काय देईल नेणों ॥१॥
ऐसा तूं कृपाळु लक्षुमीचा कांत । सांडूनि होतात कष्टी झणीं ॥२॥
सेवा माझा स्वामि वैकुंठनायक । भुक्ति – मुक्तिनायक पांडुरंग ॥३॥
साधिलें नगर देऊनियां शिर । कष्ट दश-शिरें एवढे केले ॥४॥
तें दिलें बिभिषणा एका नमस्कारा । त्या माझ्या उदारा कां न भजा ॥५॥
मांडीवरी बैसों नेदी सापत्न माता । ह्मणे राजसुता नव्हसी तूं ॥६॥
हें ऐकोनी वना जाय तो तत्त्वता । स-कळ देवा माथां वरिष्ठ केला ॥७॥
दुर्योधनें भोजना बहु केले सायास । परि न घे ग्रास तया घरीं ॥८॥
विदुराचे घरीं न पुसतां जाय । भक्ति प्रीय होय स्वामि माझा ॥९॥
अर्जुनाचे काजीं सांडी निज पैजा । सु-दर्शना वोजा धरियेलें ॥१०॥
आपण लटिका झाला भीष्म साच केला । काळाचा अभुला स्वामि माझा ॥११॥
दीक्षित अवदान देती निज करीं । परि मुख न करी तयांकडे ॥१२॥
सुदाम्याचे पोहे देखे दृष्टिभरी । तयासी श्रीहरी पसरी हात ॥१३॥
ह्मणूनि हा गावा ह्मणूनियां ध्यावा । तोचि आराधाचा ह्लदयकमळीं ॥१४॥
हरिगुण नाम हेंचि प्रिय आह्मां । कीर्ति गाय नामा होऊनि भाट ॥१५॥

३७.
अज्ञानबाळकें तुझा हाकारा केला । तेणें तये वेळां स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे ॥१॥
स्तंभीं प्रगटलीसे हाक । कापिन्नले तिन्हिं लोक । भेणें पळती शंखा – दिक । आणि कैलास आंदोळले ॥२॥
आली त्रिभुवन देवता । नाभी नाभीरे म्हणतां । माझा प्रर्‍हाद केउता । तो कवणें रे गांजिला ॥३॥
वदन पसरूनि विकाळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसे वडवानळ । शोषूं पाहे जळनिधि ॥४॥
संहार झाला नागकुळ । भ्याले अष्टहि लोकपाळ । स्वर्गीं सुटली खलबळ । अमरावतीं इंद्रासी ॥५॥
मग दैत्यातें पाचारित । लोह खणखणा वाजत । हाकीं अंबर गर्जत । तेणें कांपे मेदिनी ॥६॥
कवटाळूनि चहूं हातीं । विदारिलें चपेट-घातीं । जैस रुद्र प्रळयांतीं । तैसा हरी दिसतसे ॥७॥
दैत्य न मरे कवणें परी । मग तो धरिला जान्हूवरी । देखें उदर फोडूनि सत्वरी । अस्थि चूर्ण केली या ॥८॥
मौजे नाचती । मुक्ति दिल्ही दैल्य-नाथा । नामया स्वामि वरदहस्ता । अभयदाता भक्तांसीं ॥९॥

३८.
अणिमादि सिद्धि जयाचिया दासी । उणें तयापासीं काय आहे ॥१॥
आणिकाचे द्वारीं सांडोवा पैं होसी । धिग्‍ धिग्‍ न लाजसी असे जना ॥२॥
सुलभ सोपारा सेवा माझा स्वामी । म्ह-णतां जोडे नामीं एक वाचे ॥३॥
अजामेळ वैकुंठा एक नेला नामें । मणिका विमानें स्वयें नेली ॥४॥
ऐसा हा कृपाळु आसनीं शयनीं । न विसंबावा मनीं भाग्यवंतीं ॥५॥
जटायु पक्षियाचें स्वयें झाला लेंकरूं । त्याचा क्रियापारु केला रामें ॥६॥
शबरीचीं फळें उच्छि ष्टेंही खाय । ना विसरती पाय कैसे प्राणी ॥७॥
शाहाणिया द्वार-पाळ ह्मणतां लाज थोरी । जरी झाला भिकारी न पाहे ॥८॥
तो बळीचा द्वारपाळु सारथी पार्थाचा । तो गोसावी आमुचा देवराणा ॥९॥
गर्भवास तया न होती रे जना । म्हणोनि लोक भजना प्रवर्तले ॥१०॥
अंबऋषिराया सांपडले सायास । साहिला गर्भवास सकळ देवें ॥११॥
उच्छिष्ट होंचि खातां प्रायश्चित्त असे । तो गोपाळाचे कैसें खाय हरी ॥१२॥
त्या सुखा सुरवर जन्म इच्छिताती । म्यां अ सा लक्ष्मीपति कां न सेवावा ॥१३॥
म्हणोनि सोइरा आन दुजा नाहीं । गुरुपिता पाहीं हाचि बंधु ॥१४॥
सज्जन सांगती अनेक नाही आह्मां । कीर्ति वर्णी नामा होऊनि भाट ॥१५॥

३९.
धना जाट घरीं नित्य उभा हरी । एकनाथा घरीं धो-तरें धूत ॥१॥
कबीराची पांजणी करी चक्रपाणी । जनीसवें शेणी वेचूं लागे ॥२॥
बोधल्याचें शेत पेरी श्रीअनंत । नामयासांगतें केशव हरी ॥३॥
गोर्‍या कुंभाराचीं मडकीं घडी अंगें । चोखामेळयासंगें ढोरें ओढी ॥४॥
रोहिदासाचें कुंड धुतो श्रीगोपाळ । सांवत्याचा ढोरें ओढी ॥५॥
नामा ह्मणे देव भक्तांचा वल्लभ । मागें पुढें उभा पांडुरंग ॥६॥

४०.
देवा तूं जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निकें म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती ॥१॥
तुझी दृष्टी कृपा-वंता । जयावरी पडे अनाथनाथा । तया न बाधी संसारव्यथा । सर्वस्व त्याचें हरीसी ॥२॥
माती धरिल्या होय कनक । भोग भोगिती परममूर्ख । नाढळती महादोष । मुखीं नाम गर्जतां ॥३॥
धन्य धन्य ते संसारीं । पुरुष अथवा हो नारी । दरिद्र नाहीं त्यांचे घरीं । तूं श्रीहरी सानुकुळ झालिया ॥४॥
ऋद्धि सिद्धि द्वारीं वोळं-गती । वैरी दास्यत्व करिती । विषें अमृतें होती । तूं श्रीपति सानु-कुल झालिया ॥५॥
येथूनि नेसील परतें । नामा ह्मणे वैकुंठातें । लक्षा नये चहूं वेदां तें । नाना मतें धुंडाळितां ॥६॥

४१.
पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे ॥१॥
पीतांबर कास घालूनि वनमाळी । काढी उष्टावळी आवडीनें ॥२॥
विधीचा जनक रमा ज्यची दासी । ध्यान अह-र्निशीं करी शिव ॥३॥
रोमीं जयाचे ब्रह्माडें अनंत । चारी बेदां अंत न कळे ज्याचा ॥४॥
नामा ह्मणे राबे भक्तांचिये घरीं । भाव देखोनि हरि भुलतसे ॥५॥

४२.
नेणे साही शास्त्रें तुज केशिराजा । स्वरूपें कुबजा काय होती ॥१॥
न मागें मी तैसा न मागें मी तैसा । न मागें मी तैसा कदा काळीं ॥२॥
कौरवांचे काजीं घेसी गाढेपण । धर्मा वरीं पूर्ण घोडे धुसी ॥३॥
नामा म्हणे आह्मी कीर्ति वाखाणावी । भक्तांसी गोसांवी होसी देवा ॥४॥

४३.
पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला ॥१॥
सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटां पाहे चहूंकडे ॥२॥
विदुराच्या कण्या खाय धणीवरी । झाला बळिचे द्वारीं द्वारपाळ ॥३॥
नामा ह्मणे हरिचे न कळती पवाडे । नेणों भक्तां-पुढें वेडा झाला ॥४॥

४४.
काय वाणूं आतां पायाचा महिमा । जेथें झाली सीमा बोलायाची ॥१॥
विठोबाचे पाय आठवितां मनीं । गेलें हरपोनी भवभय ॥२॥
पाय नारदानें ह्लदयीं धरितां । ब्रम्हांडीं मान्यता झाली त्याची ॥३॥
सनकादिकांलागीं पाय वज्र कवच । ब्रह्मादि-देवांस पद जेणें ॥४॥
लागतांचि पाय शिळा दिव्य झाली । पाषाण तारिले उदकावरी ॥५॥
पाय ते रमेचे सौभाग्य साजिरें । योगि ऋषीश्वर थोर जेणें ॥६॥
नामा म्हणे मनीं पाय सर्वकाळ । म्हणोनि सुकाळ आनंदाचा ॥७॥

४५.
उभा भीमातिरीं कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढें ॥१॥
भक्तभाग्य थोर नव्हे कधीं प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥
गणिका गजेंद्र उद्धव नारद । आपण गोविंद मिळोनियां ॥३॥
समुद्रमंथनीं उभा करोनियां । लागतसे पायां नामा ह्मणे ॥४॥

४६.
गगनीं ध्रुव तुवां अढळ पैं केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥
अजामेळाचें तुवां चुकविलें संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥
प्रर्‍हादाचा तुवां केला कैवारु । वैर्‍याचा कुमरु न म्हणसी ॥३॥
गजेमद्रपशू सोडविला पानडिये । मृगखोडी ऐसिये न ह्मणसी ॥४॥
रुक्मांगदाची तुवं उद्धरिली नगरी । विषयीं मुरारी न ह्मणसी तया ॥५॥
ऐसे अपराधी न ह्मणसी देवा । नामा तो केशवा विनवीतसे ॥६॥

४७.
खगावरी स्वारी करूनियां देवा । धांवसी केशवा भक्तांसाठीं ॥१॥
रामा परशुरामा कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥
बिभीषण तारी रावणासी मारी । दावी भाव हरी भक्तांसाठीं ॥३॥
नामा ह्मणे भक्तांकारणेम गोविंदा । घेवोनियां गदा उभा ठायी ॥४॥

४८.
कौस्तुभ सोज्वळ कंठीं शोभताहे । भक्तांसाठीं बाहे उभारिली ॥१॥
आन हितासाठीं करिसी धांवण्या । विदुराच्या कण्या गोड करी ॥२॥
ब्रह्मचारी साक्ष सत्यत्वें करिसी । पुढें तूं धांवसी आवडीनें ॥३॥
वचना अंतर पडो नेदी सत्य । नामा ह्मणे भृत्य होसी देवा ॥४॥

४९.
दर्दुराचें पिलूं ह्मणे रामकृष्ण । नाहीं उदक उष्ण झालें तेथें ॥१॥
कढईमध्यें बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावे वेगीं ॥२॥
तये काळीं आज्ञा केली पावकासी । झणीं तापविसी तयालगीं ॥३॥
ऐसा तो कृपाळु आपुलिया दासा । आमुचा कोंवसा नामा ह्मणे ॥४॥

५०.
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥
नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥
रावणारि होसी जानकी टाकुनी । हिंडसी अंगणीं अर्जुनाच्या ॥३॥
अर्जुनाच्या घरीं अंगें घोदे धुसी । लज्जा द्रोप-दीची राखियेली ॥४॥
राखशील द्वार भक्ति बळिवंता । नामा ह्मणे आतां काय सांगूं ॥५॥

५१.
भरतें त्यागिली जननी । ख्याति झाली त्रिभुवनी ॥१॥
ऐसी भक्ति तुझी हरी । जनीं करंटा न करी ॥२॥
बंधु अवज्ञा बिभिषणा । प्रगट झाला रामराणा ॥३॥
प्रर्‍हाद पितृआज्ञा न करी । स्तंभीं प्रगटला नरहरी ॥४॥
पति अवज्ञा ऋषिपत्न्यांसी । कृष्ण दर्शन पूर्ण त्यांसी ॥५॥
नाना ह्मणे भक्ता अवरोधीं पाही । त्यासी त्यजिल्या दोष नाहीं ॥६॥

५२.
पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा ॥१॥
सारथि सर्वांच्या साक्षिभूत असे । संकटीं सायासें गजेंद्रासी ॥२॥
गजें-द्रासी रक्षी गणिका उद्धरी । भिल्लीणीचे करीं फळें भक्षी ॥३॥
भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी । नामा ह्मणे हरि गोड मानी ॥४॥

५३.
पंढरीचा देव पाहतां सगुण । प्रर्‍हादाकारणें सिद्ध झाला ॥१॥
पंढरीचा देव पतित पावन । उभा नारायण विटेवरी ॥२॥
पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार । बाळ्या भोळ्या पार दावीतसे ॥३॥
नामा ह्मणे देवा कीर्ति वानूं काय । आह्यांसाठीं सोय लावीं बापा ॥४॥

५४.
सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी ॥१॥
देऊनियां क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठीं ॥२॥
भजन भक्तांचें मानिसी वचन । नाम नारायणा ह्मणे कांरे ॥३॥
उफराटी वदवी वाल्मिका नामाचा । शतकोटी संख्या प्रविस्तार ॥४॥
नामा ह्मणे देवा भक्तिचें पैं पिसें । त्यालागीं हव्यासें होसी जाण ॥५॥

५५.
शिशुपाळादिकां कोठें शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच ॥१॥
काय कामा पुत्रा कोण आले जाणा । सेखीं त्या रावणा कैवल्यदानीं ॥२॥
महादुष्ट शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविलें ॥३॥
पित्याचिये हातीं पुत्र वध करी । कृपाळु बा हरीं नामा ह्मणे ॥४॥

५६.
पांडुरंगा नमूं परात्परा नमूं । सगुणासी नमूं साक्षिभूता ॥१॥
समस्त संबंध साधियेले हरी । रावणादि वैरी उद्धरिले ॥२॥
नामरूपातीता नाहीं भेटाभेट । म्हटलें आहे नीट नामा ह्मणे ॥३॥

५७.
सगुण समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥
पहा कोळियाची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिं पुढें ॥२॥
द्रौपदीचे घरीं होते उपवासी । देंठहि लावीसी अक-स्मात ॥३॥
नामा ह्मणे जाण प्रारब्ध कारण । पांडुरंगाविण यतिं नाहीं ॥४॥

५८.
सहस्रनामाची घालितां लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो ॥१॥
पुराणप्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या । प्रत्यक्ष देखा-व्या कोणे ठायीं ॥२॥
अंगअनुभवा आपण आणाव्या । तरीच वाणाव्या संतांपुढें ॥३॥
नाहीं तरी मज वाटे कांनकोडें । सुधा ह्मणे तोंड चवी नेणें ॥४॥
नामा ह्मणे असे पोटामध्यें भूक । तृप्तीचें ते सुख बोलों कैसें ॥५॥

५९.
प्रर्‍हाद रक्षिलें पांडवां प्रतिपाळिलें । तया उभें केलें पुंडलिकें ॥१॥
बिभिषणा स्थापिलें ध्रुवासी अढळ केलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥२॥
चौद्यादि मर्दिले सुरवर तारीले । तया उभें केलें पुंडलीकें ॥३॥
अहिल्ये उद्धरिलें गजेंद्रा उद्धरिलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥४॥
गयासुरा वधिलें बळिस पाताळीं घातलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥५॥
नामा म्हणे केशवा भक्तांचें ठेवणें । घेऊनि केंवि जाणें घडे तुज ॥६॥

६०.
एक अंजनीं उत्पन्न । एका खांबीं अवतरण ॥१॥
ते पावले दोघे जण । नरसिंह हनुमंत आपण ॥२॥
एक सिंहनाद करी । एक भुभु:कार करी ॥३॥
एक सीताशुद्धी करी । एक प्रर्‍हादा कैवारी ॥४॥
एक बाळब्रह्मचारी । एक अर्धांगीं सुंदरी ॥५॥
एक रुद्रचा अवतारु । दुसरा नामया दातारू ॥६॥

६१.
निर्णुण सगुण नव्हे तें समान । तैसें तेंहि जाण यो-गाभ्यासीं ॥१॥
प्रर्‍हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥
अर्जुनासी देव उभा पाचारिसी । सखा उद्धवासी साक्ष दावी ॥३॥
नामा ह्मणे माझा केशिराज भोळा । दावितो गोपाळां बाळलीळा ॥४॥

६२.
उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोलें सर्वथा वर्गें तुझीं ॥१॥
बिभिषणा तुवां दिधली नगरी । कीर्ति चराचरीं वाखा णिती ॥२॥
ध्रुव प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र मुचकुंद करोनियां ॥३॥
नामा ह्मणे आतां जन्मजन्मांतरीं । करीन ऋणि हरी तुज आतां ॥४॥

६३.
काय कामा पुत्र कोणा आले जाणा । शेखीं त्या रावणा काय झालें ॥१॥
महादुष्टें शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविले ॥२॥
पितयाचे हातें पुत्र वध केला । केशव सांवळा नामा ह्मणे ॥३॥

६४.
निरंतर नाम जपे । पिता प्रर्‍हादास कोपे । उदरा आला वैरिरूपें । ह्मणवूनि धायीं त्रासिला ॥१॥
कोपें कोपला नर-हरी । कवण तयातें सांवरी । खटखटा वाजती दांतोरी । दैत्यावरी । उठावला ॥२॥
हांक देऊनि अवचितीं । आंदोळली त्रिजगती । समुद्रपाणी उसळती । उलथों पाहती गिरिवर ॥३॥
सिंहवदन प्रग-टला । मर्गजू अवचित उठला । भेणें वासुकी मोवाळला । गजब-जिला पाताळीं ॥४॥
जैसा प्रळयांतकाळिंचा मेघु । तैस गडब-डिला वेगु । अरे मर्गजाच्या खांबीं सवेगु । क्षणामाजीं प्रगटला ॥५॥
केला भक्तांचा कुडावा । शिक लविली दानवा । नामया -स्वामि वोळंगावा । नरहरि विसांवा भक्तांचा ॥६॥

६५.
वैकुंठाहूनि केलें पेणें । भक्त प्रर्‍हादाकारणें ॥१॥
नर-हरि पावला पावला । महापापा पळ सूटला ॥२॥
शंख चक्र पद्म गदा । महापापा पळ सूटला ॥३॥
पावला गरुडध्वज । नामया स्वामि केशवराज ॥४॥

६६.
तडक फुटला अंबरीं । आला प्रर्‍हाद कैवारी ॥१॥
आला आला हाक देतु । सिंहनादें रे गर्जतु ॥२॥
दैत्यां दचकु नर- हरी । नामया स्वामि नरकेसरी ॥३॥

६७.
कायरे गडगडित दुमदुमीत । ब्रह्मकटाह उलथूं पहात ॥१॥
तो देव आला रे नरहरी । आतां कवण सांवरी ॥२॥
प्रर्‍हा-दासी दिधलें जैत्य । हर्षें नामा गुढी उभारीत ॥३॥

६८.
पहाहो कडकडिलें गगनीं । भेणें कोपते मेदिनी ॥१॥
तो देव दैत्यां अंतकु । होय भक्तांसी नायकु ॥२॥
भोजें प्रर्‍हाद नाचतु । नामया स्वामि रे अनंतु ॥३॥

६९.
वैकुंठिहूनि धांवत आला । खांबा आड उभा ठेला ॥१॥
खांब गडगडिला गडगडिला । वीर नरसिंह पावला ॥२॥
पावला नामया स्वामि । जग उद्धरिलें याचे नामीं ॥३॥

७०.
अंबऋषि रुक्मांगद । नारद महामुनि प्रर्‍हाद ॥१॥
मिळोनि सनकादिका भारू । पांडुरंगीं हरि जागरु ॥२॥
शंख भेरी नादाकार । नादें गर्जत अंबर ॥३॥
योगनिद्रेसी पहुडला । आदिपुरुष उपवर झाला ॥४॥
देवी उतरोनी विमानीं । आदि क्षीरसागर भुवनीं ॥५॥
सुरवर वोळंगती जगन्निवास । गातो नामा विष्णुदास ॥६॥

७१.
पैल गरुडाचे वारिकें । गगनीं कृष्ण येतां देखे ॥१॥
दुडवा दुडवी हरि धांवतु । नाभीं नामयातें म्हणतु ॥२॥
वैकुंठा-हूनि आले वेगीं । नामयाच्या भक्तिलागीं ॥३॥

७२.
दिसंदिस कैसा झालासी शहणा । गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥
विश्वामाजी तुझे बोभाट मोठे । जन्ममरणाचे संकल्प तुटे ॥२॥
अकळ करणी नकळे लिहितां धरणी । सिंधुमणि करूनि नाम तुझें ॥३॥
नामा ह्मणे कीर्ति काय वानूं देवा । भक्तांचा कुडावा ब्रीद तुझें ॥४॥

७३.
वेदां जन्मस्थान शास्त्रां समाधान । काय बुझावण दाखविसी ॥१॥
जगादि अनंत अवतार घेसी । चरित्रें दाविसी भक्तांपुढें ॥२॥
पतीतपावन तूंचि नारायण । सत्वर धावणें दामो-दरा ॥३॥
नामा म्हणे भवबंधविमोचका । वैकुंठ नायका पांडुरंगा ॥४॥

७४.
चोरूनि खादलें दहीं दुध लोणी । जिहीं चक्रपाणि खेळविला ॥१॥
अखंड उन्मत्तें मतिमंद मूढें । गौळणीपाशीं रडे रूपें दावीं ॥२॥
शकुनीचा पुत्र शिवद्वेष करी । संकट मुरारी निवारिसी ॥३॥
उद्धरिल्या सर्व गोप गवळणी । लीला दाखवूनि नामा ह्मणे ॥४॥

७५.
तुझे कीर्तना कोण जाय आतां । सख्या भगवंता कृपा करीं ॥१॥
भीष्म पहुडला शरांचे पंजरी । तया प्रश्र करी युधिष्ठिर ॥२॥
महाभयेश्वरी विघ्नें निवारिता । सकळां देखतां दांत पाडी ॥३॥
नामा म्हणे तुझी भक्ति अघटित । पवाडे अनंत दाविना कां ॥४॥

७६.
अगम्य सामर्थ्य नयेचि गणना । तारूनि पाषाणा केलें सम ॥१॥
तारिसी वान्नर अवघेची सेना । तोडिसी बंधना पांडु-रंगा ॥२॥
काय वनचर जाणती प्रत्यक्ष । परिक्षिती साक्ष दिस सातां ॥३॥
कृतत्रेतद्वापारांचे आदि अंतीं । नामाचिते ख्याति म्हणे नामा ॥४॥

७७.
सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ट । बोलतसे स्पष्ट वेद- शास्त्रीं ॥१॥
अच्युता अनंता माधवा मुकुंदा । गोपाळा गोविंदा गोपवेषा ॥२॥
कृष्णा कमलाक्षा कस्तुरीचा टिळा । नेसला पाटोळा खोंचे शिरीं ॥३॥
नामा म्हणे रामकृष्ण नारायण । तारिसी पाषाणां सिंधूमाजी ॥४॥

७८.
षड्‍गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा ॥१॥
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंद सर्वातीता ॥२॥
गोविंदा गोपाळा गोप वेषधारी । गोव-र्धन धरी नखावरी ॥३॥
दुष्त दुर्जनाच्या दुखवीना चित्ता । पावन प्रतिता नामा म्हणे ॥४॥

७९.
संतोषाकारणें सज्जन जीवासी । साहाकारी होसी ना-रायणा ॥१॥
समान करिसी सर्वाभूतीं जाण । पतीत पावन भाक तुझी ॥२॥
भक्ति भाव ज्यांचा भाग्यें आगळिया । होसी देवराया सर्वविध ॥३॥
समर्थपणासी कोणा विचारावें । नामा म्हणे भावें कारण हा ॥४॥

८०.
अलक्ष्या अच्युता सख्या भक्तराया । तूंचि देवराया पांडुरंगा ॥१॥
परात्परतर पार नेणे ब्रह्मा । तूंचि निजधाम स्वयें देसी ॥२॥
विश्वामित्रासाठीं विलंब न करीं । बळिचिया द्वारीं भृत्य होती ॥३॥
नामा ह्मणे तुझी माव नेणे कोणी । धांवें चक्रपाणी त्वरें नेटें ॥४॥

८१.
योगि मुनि जन तपस्वी याज्ञिक । ते तव पादुका वंदिती शिरीं ॥१॥
हरिहर ब्रह्मा सूर्य चंद्रादिक । ओढवी मस्तक रजरेणु ॥२॥
गंगा भांगीरथी होती शुचिमंत । आणिकांची मात काय सांगों ॥३॥
नामा म्हणे नेणों पार तुझा देवा । कृपाळु केशबा केशिराजा ॥४॥

८२.
भक्ता पुंडलिका देखोनि निकटा । आलासी वैकुंठा-हूनि आजी ॥१॥
नारद वचन ऐकोनियां मनीं । सुखें चक्रपाणी सुखावला ॥२॥
सुखरूप सदा देव दुरी ठेला । मुनीश्वर काला स्वयें दावी ॥३॥
नामा ह्मणे तुज भक्ति पिसें फार । साधिलें नगर क्षणमात्रें ॥४॥

८३.
चातुर्यसागरा आमुची जननी । जाणते रुक्मिणी प्रेम-कळा ॥१॥
चरणींची प्रभा जाणे मणिग्रीव । नकुळ वैष्णव सखे माझे ॥२॥
कुबेर गौतम वधू अहिल्या । चक्रपाणी तया मुक्त केलें ॥३॥
नामा ह्मणे तुझे पायीं संजीवन । सदाशिव ध्यान तेंचि करी ॥४॥

८४.
चारी वेद गात जयासी अखंड । नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची ॥१॥
तोचि भीमातीरीं उभा दिगंबर । ठेवी कटीं कर भक्तांसाठी ॥२॥
युद्धीं अर्जुनातें सांगितली गीता । सहस्रशा कांता केल्या ज्यानें ॥३॥
नामा हाणे शिवा दिल्हें शिवपण । ब्रह्मया लागोन उपदेश ॥४॥

८५.
विश्वाच्या मोहना कपट नाटका । पंढरीनायका पांडु-रंगा ॥१॥
अवतार धरूनि होऊनि निमित्त । बुजविसी दैत्य सर्प खाणी ॥२॥
गोपिकांचे घरीं कामासी लंपट । करिसी धीट गवळि-यांसी ॥३॥
भाव अभावाचा न करी कंटाळा । दावि बाळलीला ह्मणे नामा ॥४॥

८६.
गोकुळीं गोपिका गोपाळ सकळ । मध्यें घननीळ क्रीडा करी ॥१॥
करी खेळ मोठा स्थापिलें निशाण । स्वयें नारा-यण हाका मारी ॥२॥
मारियेला कंस दुर्घट दुर्जन । पुरवी वासना पांडवांची ॥३॥
पांडवांचें ध्यान धरूनि अंतरीं । नामा ह्मणे हरि साह्य करीं ॥४॥

८७.
सर्वांभूतीं नांदे सर्व नारायण । सर्व संस्थापन पां-डुरंग ॥१॥
अगा देववंद्या अगा गोपवेशा । पावन परेशा पर-मार्थासी ॥२॥
मूर्त अमूर्ताचा मुक्त परांगता । सर्व मायातीता साक्षिरूपा ॥३॥
नामा म्हणे देवांदानवां जिंकिसी । ते भाके आम्हांसी सांभाळावें ॥४॥

८८.
प्रल्हादादिकांचें अंतरीचें ध्यान । तें पंढरीये निधान उभें असे ॥१॥
सर्व जन जया नेणते जाहले । सुख दाखविलें पुंडलीका ॥२॥
वेदांचें जें सार श्रुतींचें जिव्हार । तेंचि कटीं कर उभें असे ॥३॥
ज्ञानाचें जीवन वैराग्या भूषण । तें सुख नि-ध न विटेवरी ॥४॥
शुद्ध बुद्ध मुक्त समाधीचें सुख । तें उभें प्रत्यक्ष वाळंवटीं ॥५॥
ह्लदयीं धरूनि नामा निजबोधें निमाला । शिण हारपाला संसाराचा ॥६॥

८९.
एक वाहूं तुळसीपत्र । तें देवासी प्रीय होत ॥१॥
रखुमाईनें देव । सोडविला कृष्णराव ॥२॥
नामा म्हणे पूर्ण होती । प्राप्त राधिकेचा पती ॥३॥

९०.
संतांची विश्रांति ज्ञानियांचें गूज । मुक्तिचें हें बीज मोक्षदानीं ॥१॥
कृष्णा विष्णु हरी मुकुंद मुरारी । अच्युता नरहरी नारायण ॥२॥
गोवर्धनधर गोपी मनोहर । भक्त करुणाकर पांडु-रंगा ॥३॥
तूंचि हें सकळ आदि मध्य अंतीं । निज सुख संपत्ति सज्जनांची ॥४॥
सकळ नारायण पातक भंजन । हरि जगज्जीवन परमानंद ॥५॥
तूंचि माझा श्रोता तूंचि माझा वक्ता । तूंचि घेता देता प्रेमसुख ॥६॥
नामदेव ऐसेम नाम त्वां ठेविलें । येणें अनुभ-विलें प्रेम सुख ॥७॥
विष्णुदास नामा विनवि पुरुषोत्तमा । सोडवीं भवभ्रमा पासोनियां ॥८॥

९१.
देऊनि भातुकें गळां घाली मिठी । सखा जगजेठी भक्ती भावा ॥१॥
आधार करोनि राहिले पंढरीं । तेथें निरंतरीं प्रेम दावी ॥२॥
नामा ह्मणे सेवा करोनियां शुद्ध । संसार संबंध नाहीं तया ॥३॥

९२.
कोल्हीं कय कोल्हीं होती जड । तैसें तुझें मज मिळालें असे वाड ॥१॥
आंधळें मुकें कानीं नायके । त्यासी काय जननी पोसूं न शके ॥२॥
नामा म्हणे केशव क्रुपेचा सागरु । जयाचा जारु तयासींच भारु ॥३॥

९३.
योगी हे शिणती तुझिये प्राप्तिलागीं । नातुडसी जगीं कवणासी ॥१॥
एक जटा नखेम स्वयें वाढविती । दिगंबर होती एक देवा ॥२॥
त्यांसी तुझी भेटी नव्हेचि कल्पांतीं । अखंड शिणती साधनानें ॥३॥
आमचे सन्निध सर्वदा राहसी । आमच्या भाग्यासी पार नाहीं ॥४॥
धन्य झालों आम्ही तुझिया प्रसादें । नाचे तुझ्या छंदें नामदेव ॥५॥

९४.
मजसाठीं काय लाजतोसी देवा । तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥
ते काय पवाडे गमाविलों ब्रीदें । ब्रह्मादिकें वृंदें ध्याती कैसीं ॥२॥
जाणतां नेणतां सर्वांसी उद्धार भवसिंधु पार पावविसी ॥३॥
नामा ह्मणे तुःए उपकार ऐसे । दावीं जगदीशा हेळामात्रें ॥४॥

९५.
उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु । अनाथाचा बंधु नाराणा ॥१॥
तुझें नाम मुखीं जपे सर्वकाळ । दिधलें अढळपद त्यासी ॥२॥
अनेक वृत्तांत काय सांगों देवा । अन्याय केशवा कोण मानी ॥३॥
नामा ह्मणे तैसें मी नाहीं मागत । ऐकोनियां मात आलों जन्मा ॥४॥

९६.
हरि गातां बरवा ऐकतां बरवा । ह्लदयीं ध्यातां बरवा बाइयांनो ॥१॥
केशव पैं देणें केशव पैं घेणें । केंशव करणें धंदा आम्हीं ॥२॥
चंद्रबिंबाची कुरवंडी ओवाळूं श्रीमुखावरी । मदन हा जिव्हारीं लजिन्नला ॥३॥
नामा म्हणे निवविलें सकळ इंद्रियांतें । म्हणोन त्या केशवातें शरण जारे ॥४॥

९७.
केशव पैं मुक्ति केशव पैं भक्ति । केशव विश्रांति पंढरीये ॥१॥
केशव लैकिकीं केशव व्यवहारीं । केशव निर्धारीं नाम तुझें ॥२॥
नामा म्हणे अगा केशव वोळला । भावासि भुलला वाळवंटीं ॥३॥

९८.
वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये ॥१॥
नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडीयाचें ॥२॥
नामा म्हणे तुझें अवघेंचि बरवें । त्याहूनि बरवें प्रेम तुझें ॥३॥

९९.
देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दया-निधी ॥१॥
ब्रह्मा आणि इंद्र वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीन-बंधू ॥२॥
चवडा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधू ॥३॥
योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्नुरु ॥४॥
निर्गुण निराकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडीया ॥५॥
वेडा अविचारी करी मजवर दया । ऐकें कृष्ण-राया शहाणिया ॥६॥
करुणेचा पर्जन्य शिंपी मजवरता या । ऐकें कृष्णराया गोजीरिया ॥७॥
नामा ह्मणे जरी दाविसील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥८॥

१००.
तुटोनि आकाश पडेलहि शिरीं । न सोडीं मी हरी पाय तुझे ॥१॥
तुझे पाय गोड तुझे पाय गोड । तुझे पाय गोड सर्व-काळ ॥२॥
डोंगरासांगातें कोण करी वाद । वाउगी उपाद आहे आह्यां ॥३॥
नामा ह्मणे तुझें थोरपण काय । कायसे उपाय सांग आह्मां ॥४॥

१०१.
निर्धन धनातें कीं आंधळे लोचनातें । मयूर धनातें जेंवि भावी ॥१॥
पारधियें पाडस धरियलें वनीं । तें चिंती जननि रत्रंदिवस ॥२॥
तैसा तुझा छंद लागो कां गा देवा । माझिया वा जीवा केशिराजा ॥३॥
सर्पें डखिलें तें स्मरतो गारोडी । पुरीं जातां सांगडी मन चिंती ॥४॥
रोगी वैद्यातें बोलावूं धाडी । पडिले बांद-वडी सुटका इच्छी ॥५॥
बोळविली बाला ते मनीं वाहे कुवसा । कां रसज्ञु जैसा औषध गिवसी ॥६॥
धेनुकारणें व्याकुळ होय वत्स । तें दशदिशेस अवलोकितें ॥७॥
निचेतन देह प्राण असे अलक । धाय-वट उदक स्मरे वनीं ॥८॥
चकोरें मिळोनि चंद्रा जेंवि ध्याती । इंद्रिया निवृत्ति कैं होईल ॥९॥
पक्षिणीचें पिल येऊनि द्बाराजवळें । मुख पसरी कोंवळें आलोहित ॥१०॥
नामा ह्मणे म्यां आन नाहीं जाणितलें । मज पुरे इतुकलें केशिराजा ॥११॥

१०२.
नव जावें तेथें लागे जाणें । न करावें तेंचि लागे करणें । न बोलावें त्यासि लागे बोलणें । पडे मागणें नेदी तया ॥१॥
कृष्णें देवकीये उदरा येणें । कंसा त्यागोनि गोकुळासि जाणें । तेथें नंदा-च्या गाई राखणें । संगतीं असणें गोंवळ्यांच्या ॥२॥
राम वान्नरांची सेवा करी । पांडव कौरवांचे घरीं । हरिश्चंद डोंबाघरीं पायकी करी । हें अपूर्ण परियेसा ॥३॥
रुद्रें अंजनी उदरा येणें । रामाची सेवा वा-न्नरपणें । प्रसंग पडे तैसें वर्तणें । रुसणें नलगे कवणासी ॥४॥
स्वामी-नें सेवकाची सेवा करणें । नुपेक्षी कदन्न भक्षणें । ह्मणवूनि अहंकार न धरणें । विषम संसार अरे जना ॥५॥
अवचट घडविती तुझिया भावा । घोर विस्मय होतो माझिया जीवा । विष्णुदास नामा वि-नवी केशवा । देवा तूं करिसी तें बरवें ॥६॥

१०३.
सर्व पाप पुण्य हींचि दोन्ही भांडीं । विवेक न सांडीं येतां जातां ॥१॥
तुझें नाम तारूं तुझें नाम तारूं । तुझें नाम तारूं श्रीविठ्ठल ॥२॥
विष्णुदास नाम्यानें उभारिली शिडी । ठाकावया पेढी वैकुंठींची ॥३॥

१०४.
पंढरी ज्ञानिया ध्यातां लक्षा नये । आह्मां वाट पहे अनाथांची ॥१॥
जपकांचें जाप्य नानामंत्रमय । आम्हां भक्ति प्रिय भावें सारी ॥२॥
पुंडलिकासाठीं बोललां वोरसें । नेणों काय कैसें प्रेम त्याचें ॥३॥
नामा म्हणे जीवें करूं निंबलोण । झणीं नारायणा दिठावसी ॥४॥

१०५.
नित्य आह्मां सुख तुझ्या पायांपासीं । शरण कोणासी जाऊं आह्मीं ॥१॥
सकाळीं उठोनि ऐकतों कीर्तन । तेणें समाधान मज होय ॥२॥
उभा महाद्वारीं वैष्णव भेटती । सांखळ्या तुटती चौर्‍यांशीच्या ॥३॥
नामा ह्मणे सदा पंढरीं रहिवास । मागुता जन्मास येतो कोण ॥४॥

१०६.
सगुण संपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥
गोविंद गोपाळ गोपवेषधारी । गोवर्धन धरी नखावरी ॥३॥
दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां । पावन पतितां नामा ह्मणे ॥४॥

१०७.
जय विठ्ठल श्रीविठ्ठल । जय जय विठ्ठल विठ्ठल ॥१॥
परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल । निरंजन विठ्ठल ॥२॥
जोचि नाम । तोचि देवो । ऐसें म्हणों तरी नाहीं संदेहो ॥३॥
ह्मणे विष्णुदास नामा । तो नेईल परत गामा ॥४॥

१०८.
येंईवो विठ्ठले माते माउलीये । निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहें ॥१॥
येतियास पुसें जात्या निरोप । पंढरपुरीं माझा मायबाप ॥२॥
पितांबार शेला कैसा गगनीं झळकला । गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जिवेंभावें ओंवाळी ॥४॥


भक्तवत्सलता २ – अभंग १ ते ७७

१.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥

२.
पूर्वीं काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पै संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥
ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥

३.
एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशी ॥१॥
कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरीं आलें । जनी म्हणे धन्य झालें ॥४॥

४.
जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्नली ॥१॥
देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥
केश विंचरुनी मोकले केले । जनी म्हणे निर्मळ झालें ॥३॥

५.
जनी बैसली न्यायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥
घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥
घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥
ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥

६.
एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें विसणीं । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
माझ्या डोईच्या केसांस । न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणें मुरडी केसांस । कां म्हणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हातें वेणी घाली । जनी म्हणे माय झाली ॥६॥

७.
तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥२॥
मझे जनीला नाहीं कोणी । म्हणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥

८.
साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥
कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥
सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥
पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥
हाता आला असे फोड । जनी म्हणे मुसळ सोड ॥५॥

९.
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

१०.
पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासी ॥२॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आम्हासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥

११.
भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥
हें तों  नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥
वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥
धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी म्हणे भला ॥४॥

१२.
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो  वैकुंठ ॥१॥
पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥
हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥
उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥
सर्व सुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ॥५॥

१३.
दु:खासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥
दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥
आतां उपाय कृष्णा काय । धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥
निरी ओढितां दुर्जन । झालें आणिक निर्माण ॥४॥
ऐसीं असंख्य फेडिलीं । देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥
तया संतां राखिलें कैसें । जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥

१४.
ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥
माता म्हणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठीं ॥३॥

१५.
पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥
काय वर्णूं हरिच्या गोष्टी । अनंत ब्रम्हांडे याचे पोटीं ॥२॥
सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥
राम चिंता ध्यानीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१६.
भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी । सर्वांहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावें । राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥
बान्नर अवघे भुभु:कार । बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा कराची आम्हांसी । रावण आणितो तुम्हापासीं ॥५॥
तुझ्या नामाच्या प्रतापें । हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करूनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥७॥

१७.
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥
त्याचा झाला म्हणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥
देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥

१८.
चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥१॥
भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥२॥
चोख्यामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥३॥
लागा विठ्ठल चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१९.
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥
चांभार्‍यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥
तुरका घरीं विणी । म्हणे नामयाची जनी ॥३॥

२०.
माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं वा मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येऊनि काय करिसी । तुझें बळ आम्हांपासीं ॥३॥
नाहीं सामर्ध्य तुज हरी । जनी म्हणे धरिला चोरीं ॥४॥

२१.
द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥
गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
कविसच्या वैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्टी ॥३॥
चोखामेळ्यासाठीं । ढोरें ओढी जगजेठी ॥४॥
जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥

२२.
देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥
त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥
जनी म्हणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥

२३.
बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आम्हांपाशीं ॥१॥
गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥
आशा तृष्णा तुम्हांपाशीं । नाहीं म्हणें जनी दासी ॥३॥

२४.
जेवी जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥
कनकाचे ताटीं । रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥
आमुचें ब्रम्हा सारंगपाणी । हिंडतसे रानोरानीं ॥३॥
गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडू फळी ॥४॥
तुळसीचे वनीं । उभी राहे दासी जनी ॥५॥

२५.
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥
कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद । येउनी नारद कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा । येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

२६.
दुर्योधना मारी । पांडवासी रक्षी हरी ॥१॥
पांडवा वनवासीं जाये । तयापाठीं देव आहे ॥२॥
उणें न पडे तयांचें । काम पुरवी हो मनाचे ॥३॥
जनी म्हणे विदुराच्या । कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥४॥

२७.
वर स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
भक्ता आधीन होसी । त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥
त्याचे गर्भवास सोसी । कष्टी होता अंबऋषी ॥३॥
सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे बरणें केलें ॥४॥

२८.
भक्तीसाठीं याति नाहीं । नाहीं तयासी ते सोई ॥१॥
रोहिदास तो चांभार । त्याचा करी कारभार ॥२॥
जो कां भक्त यातिहीन । देव करी त्याचा मान ॥३॥
त्यासी भक्ताचा आधार । वाट पाहे निरंतर ॥४॥
जनी म्हणे भक्तासाठीं । विठो सदा गोण्या लोटी ॥५॥

२९.
चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥१॥
परब्रम्हा त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार । पाहे मोमिन कबीर ॥३॥
नेंई जबी बीच दासी । रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥

३०.
देव तारक तारक । देव दुष्टांक्षी मारक ॥१॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरीं ॥४॥

३१.
पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ॥१॥
तैंच सखा नामयाचा । एके ठायीं जेवायाचा ॥२॥
त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास । जनी हात उचली त्यास ॥३॥

३२.
भूत झालें ऋषि पोटीं । लावियेलें मृगापाठीं ॥१॥
विश्वामित्रा घाला घाली । पोटीं शकुंतला आली ॥२॥
भगांकित केला । इंद्र भूतानें झडपिला ॥३॥
तेंचि झालें हें भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥

३३.
दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥
गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रदयावरी ठेवित ॥३॥
जागा झाला योरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥

३४.
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥१॥
पांचाळीसी वस्त्रें देत । पुरवितो जगन्नाथ ॥२॥
जनी म्हणे भाग्यवंत । तिच्या भावाचा अंकित ॥३॥

३५.
खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥
कष्टी होतां अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥३॥
सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे दळण केलें ॥४॥

३६.
बाप श्रोतियाचा राजा । कैसी उभारिली ध्वजा ॥१॥
एक झाला परिक्षिती । ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥
भागवतीं रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥
ज्याची ऐकतां गर्जना । कंप काळाचिया मना ॥४॥
सात दिवस वृष्टि झाली । जनी म्हणे मात केली ॥५॥

३७.
मांडियेला डाव । कोरवांनीं दुष्ट भाव ॥१॥
टाकियेला फांसा । पांडव गेले वनवासा ॥२॥
वना गेले पांडवबळी । दिनकरें दिधली थाळी ॥३॥
पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥४॥

३८.
ऐशापरी पांडवांतें । रक्षियेलें दीनानाथें ॥१॥
शंखचक्र आयुधें करीं । छाया पितांबर करी ॥२॥
ह्स्त ठेऊनियां माथां । सुखी असा निर्भय चित्तां ॥३॥
आज्ञा घेउनी सर्वांची । देव गेले द्वारकेसी ॥४॥
सरला थालिपाक आतां । पुढें सावधान श्रोतां ॥५॥
कथा पुढील गहन । घोषयात्ना निरूपण ॥६॥
येथुनी अध्याय कळस । जनी म्हणे झाला रस ॥७॥

३९.
कोणे एके दिवशीं । विठो गेला जनीपाशीं ॥१॥
हळूच मागतो खायासी । काय देऊं बा मी तुसी ॥२॥
हातीं धरून नेला आंत । वाढी पंचामृत भात ॥३॥
प्रेमसुखाचा ढेंकर दिला । जनी म्हणे विठो धाला ॥४॥

४०.
एके दिवशीं वाडियांत । देव आले अवचित ॥१॥
अवघीं पायांस लागली । देवें त्यांवरी कृपा केली ॥२॥
बाहेर कामासी गुंतल्यें । देवें मजला विचारिलें ॥३॥
बाहेर आहेस वो बोलती । देव मजला हाटकिती ॥४॥
हात धुऊनि जवळ गेल्यें । कोण गे जनी हांसून बोले ॥५॥

४१.
दळण्याच्या मिषें । विठ्ठल सावकाशें ॥१॥
देहबुद्धीचें वैरण । द्वैत खंडारे निसून ॥२॥
एकलीच गातां । दुजा साद उम टतां ॥३॥
कोण तुझे बरोबरी । साद देतो निरंतरी ॥४॥
खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥

४२.
मग हांसोनि सकळी । पाहूं देव कैसा बळी ॥१॥
आले नामदेवा घरीं । प्रेमें भुललासे हरीं ॥२॥
घाली जातिया बैरण । गाय आवडीचें गाण ॥३॥
पुढें देखे ज्ञानेश्वर । देव झालसे घाब्र ॥४॥
जनी म्हणे पंढरिनाथा । जाय राउळासी आंतां ॥५॥

४३.
निवृत्ति पुसत । कोठें होते पंढरिनाथ ॥१॥
खूण कळली हषिकेशी । सांगोंनको निवृत्तीसी ॥२॥
उत्तर दिलें ज्ञानदेवें । नवल केवढें सांगावें ॥३॥
शिव वंदी पायवणी । नौये योगियांचे ध्यानीं ॥४॥
द्वारीं उभे उभे ब्रम्हादिक । गुण गाती सकळिक ॥५॥
जनीसवें दळी देव । तिचा देखोनियां भाव ॥६॥

४४.
काकड आरती । करावया कमळापती ॥१॥
भक्त मिळाले सकळ । रितें देखिलें देउळ ॥२॥
ज्ञानेश्वर बोले । आतां देव कोठें गेले ॥३॥
ठावें जाहलें अंतरीं । देव दळी जनी घरीं ॥४॥

४५.
जाय जाय राउळासी । नको येऊं आम्हांपाशीं ॥१॥
जाऊं आम्ही बरोबर । झाळा तिचा हो चाकर ॥२॥
तिजसंगें काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥३॥
चहू हातीं धुणें केलें । जनी म्हणें बरें झालें ॥४॥

४६.
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥
सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
नारिरूप होउनी हरी । माझें न्हणें धुणें करी ॥३॥
राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥
ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥

४७.
धुणें घेऊनि कांखेसी । जनी गेली उपवासी ॥१॥
मागें विठ्ठल धांवला । म्हणे कां टाकिलें मला ॥२॥
कां गा धांवोनि आलासी । जाय जाय राउळासी ॥३॥
चहूं हातें धुणें केलें । जनी म्हणे बरें झालें ॥४॥

४८.
जनी जाय शेणासाठीं । उभा आहे तिच्या पाठीं ॥१॥
पितांबराची कांस खोवी । मागें चाले जनाबाई ॥२॥
गौर्‍या वेंचूनि बांधिली मोट । जनी म्हणे द्यावी गांठ ॥३॥
मोट उचलून डोईवर घेई । मागें चाले जनाबाई ॥४॥

४९.
राना गेली शेणीसाठीं । वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥
पितांबर ओचे खोंवी । पायीं शोभा पारखावी ॥२॥
रिती बांधितांचि मोट । जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥

५०.
जनचिया बोले करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥
जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचें चरणीं ओढवी माथा ॥२॥
महेशादिदेव तेहि तया ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥

५१.
आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥
हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥
विठ्ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी । केंस विंचरून घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥६॥

५२.
एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं उभा कोण आहे ॥२॥
प्रभा घरांत दाटली । एक सराद सुटली ॥३॥
एकमेकां आलिंगन । नामा म्हणे जनी धन्य ॥४॥

५३.
जनी जाय पाणीयासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥
पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥
पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥
धुणें धुऊनियां आणी । म्हणे नाम याची जनी ॥४॥

५४.
शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥
बुद्धि सांगे राजाईसी । तुम्ही न छळावें नाम्यासी ॥२॥
अवघ्या वित्तासी वेंचावें । सरल्या मजपासीं मागावें ॥३॥
विठ्ठलशेट नाम माझें । नामयाला सांगावें ॥४॥
आतां उचित दासी । ऐसें बोले राजाईसी ॥५॥
ऐसे बोलोनियां गेला । म्हणे जनी नामा आला ॥६॥

५५.
नामदेवाचे घरीं । चोदाजण स्मरती हरी ॥१॥
चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायण ॥२॥
आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥

५६.
माझा नामा मज देईं । जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥
तें गा न चले मजपाशीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुझ्यासंगें जे जे गेले । ते त्वां जितेचि मारीले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाबाई । नामा तुझा घेवोनी जाईं ॥५॥
हातीं धरोनियां आली । दासी जनी आनंदली ॥६॥

५७.
धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रम्ही ब्रम्हारूपीचा हुडा ।
संत ऐकताती कोडां । प्रेमबळा आनंदें ॥२॥
नामदामा दोनी काळू । नामा विठा दमामे पैलू ।
चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥
गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी ।
आऊबाई तुतारी । मंजुळस्वर उमटती ॥४॥
गोणाबाई नोबतपल्ला । नाद अंबरीं कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटला ॥५॥
जनाबाई घडयाळ मोगरीं । घटका भरतां टोला मारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदें ॥६॥

५८.
विठोबा चला मंदिरात । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥
रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥
समया जळती अर्ध रात्नीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥
नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥
घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥

५९.
लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥१॥
आदि ठाणें पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥२॥
गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देईं मला ॥३॥
शुद्ध देखोनियां भाव ।  पोटीं आले नामदेव ॥४॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥५॥

६०.
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥१॥
आंगडें टोपडें पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥२॥
माझ्या जीवीच्या जीवना । नाम ठेवी नारायणा ॥३॥
जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवूं सांगा ॥४॥

६१.
हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥
म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवा चालली । मागें विठ्ठल माउली ॥३॥

६२.
पुंडलिकापाशीं । नामा उभा कीर्तनासी ॥१॥
येऊनियां पांडुरंगें । स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥
गाऊं लागे बरोबरी । नाहीं बोलायाची उरी ॥३॥
स्वर देवाचा उमटला । दासी जनीनें ओळखिला ॥४॥

६३.
ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥
आपण वैकुंठींच नसे । भक्तापासीं जाण वसे ॥२॥
जनी म्हणे कृपानिधी । भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥

६४.
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करी ॥१॥
राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥२॥
सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥

६५.
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥
हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥
जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥

६६.
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण । सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीव हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी । जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥

६७.
जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥
नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥
मज भरंवसा नामाचा । गजर नामाच्या दासीचा ॥३॥
विटेवरी ब्रम्हा दिसे । जनी त्याला पाहतसे ॥४॥

६८.
सोंग सोंगा जाय । नवल जाउनी हांसताहे ॥१॥
हांयोनियां बडवी टिरी । कोण नाठवी हे परी ॥२॥
हा नाठवी आपणा । म्हणे जनी भुललें जाणा ॥३॥

६९.
देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥
तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥
त्या एकीं एक होतां । दासी जनी कैंचि आतां ॥४॥

७०.
एके रात्रींचे समयीं । देव आले लवलहीं ॥१॥
सुखशेजे पहुडले । जनीसवें गुज बोले ॥२॥
गुज बोलतां बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥
उठा उठा चक्रपाणी । उजाडलें म्हणे जनी ॥४॥

७१.
पदक माळा सकलाद । तेथें टाकिली गोविंदें ॥१॥
देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥२॥
भक्त येती महाद्वारीं । चोर पडले देव्हारीं ॥३॥
नवल झालें पंढरपुरीं । देव राबे दासी घरीं ॥४॥
त्निभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥

७२.
पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राम्हाण म्हणती जनीनें नेलें ॥१॥
अगे शिंपियाचे जनी । नेलें पदक दे आणुनी ॥२॥
देवासमोर तुझें घर । तुझें येणें निरंतर ॥३॥
म्यां नेलें नाहीं जाण । सख्या विठोबाची आण ॥४॥
धोतर झाडूनि पाहती । पडलें पदक घेऊनि जाती ॥५॥
जनी वरी आली चोरी । ब्राम्हाण करिती मारा मारी ॥६॥
धाविन्नले चाळीस गडी । जनीवरी पडली उडी ॥७॥
दंडीं लाविल्या काढण्या । विठो धांवरे धावण्या ॥८॥
चंद्रभागे रोविला शूळ । जनाबाईस आलें मूळ ॥९॥
हातीं टाळीं वाजविती । मुखीं विठ्ठल बोलती ॥१०॥
विलंब लागला ते वेळीं । म्हणती जनिला द्यारे सुळीं ॥११॥
ऐसा येळकोट केला । जनी म्हणे विठो मेला ॥१२॥
तंव सुळांचें झालें पाणी । धन्य म्हणे दासी जनी ॥१३॥

७३.
प्रेमभावें तुम्ही नाचा । रामरंगें रंगो वाचा ॥१॥
हेंचि मागों देवाजीला । आवडी शांती खरें बोला ॥२॥
जैसी माय तान्हर्‍यातें । खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥
तेंवि तुम्ही संतजना । सर्वी धरावी भावना ॥४॥
हरि कोठवळा झाला । म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥

७४.
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥
भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥
पुंडलिकें धन जोडिलें असतां । प्रार्थोनियां देतां न घेती हे ॥३॥
मग गडी हो पाहे देवचि येथोनी । जवळी होती जनी फावलें तिये ॥४॥

७५.
ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद ध्यावा ॥१॥
पांडवपालक गोविंद । तिहीं लोकीं गाजे ब्रिद ॥२॥
भक्तिभावें केला वश्य । हरि सांभाळी तयास ॥३॥
रात्नंदिवस तुम्हांपासीं । दुजा ठाव नाहीं त्यासी ॥४॥
देव द्रौपदीतें सांभाळी । उंभा पाठीसी वनमाळी ॥५॥
वनीं सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥
हरिभक्तिं जाहला ऋणी । म्हणे नामयाची जनी ॥७॥

७६.
वेदांतीं हें बोलिले । सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥
लागा लागा भक्तिवाटा । धरा हेंचि नेमनिष्ठा ॥२॥
वेदबाम्हा तें कर्म । सांडीं न करीं अधर्म ॥३॥
तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्ठ म्हणे जनी ॥४॥

७७.
जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥
जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥
जनीचे आवडे जयासी वचन । तयासी नारायण कृपा करी ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *