संत नामदेव

संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी

संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी अभंग १ ते २६


निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥
तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥
मार्गीं चालताती भक्त आणि हरी । आले भुलेश्वरीं अवघेजण ॥३॥
भुलेश्वरालागीं पूजा केली सांग । भक्त पांडुरंगें तीन रात्रीं ॥४॥
तेथून वैष्णव चालियेले हरी । आले सिद्धेशरीं देवभक्त ॥५॥
पाराशर ऋषींचें स्थळ पुरातन । राहिले नारायण पंचरात्र ॥६॥
नामा म्हणे देवा जावें कपिलेश्वरा । आनंद ऋषीश्वरा जाला फार ॥७॥


कौतुकानें तेथें आले सावकाश । उभे हरिदास कीर्तनासी ॥१॥
दहा दिवस तेथें राहियेले स्वस्थ । अवघ्यांचा मनोरथ पूर्ण जाला ॥२॥
क्षेत्रींचा महिमा पुसिती देवासी । जना आगळी काशी सांगियेली ॥३॥
येथोनियां वाट जाते वाराणसी । मुनि आणि ऋषि आनंदले ॥४॥
नामा म्हणे देवा दिवस जाले फार । लागेल उशीर समधीसी ॥५॥


चालिले घेऊनि देव ऋषीश्वरा । आवघियां पुढारां गरुडदेव ॥१॥
दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावें गोदातीर म्हणोनियां ॥२॥
धन्य गोदातीर धन्य कचेश्वर । जाती ऋषीवर स्नानालागीं ॥३॥
सारा पौष मास गेला कचेश्वरीं । नित्य गंगातीरीं स्नानसंध्या ॥४॥
पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा । आली प्रतिपदा माघमास ॥५॥
नामा म्हणे देवा जावें पुण्यस्तंभा । मनोहर जागा सिद्धेश्वर ॥६॥


उठले वैष्णव कीर्तन गजरीं । आले सिद्धेश्वरी आश्रमासी ॥१॥
पौर्णिमेपावेतों राहिले निश्चल । नेमा आतां स्थळ समाधीसी ॥२॥
निवृत्ती मुक्ताई संगें आला चांगा । म्हणती पांडुरंगा उठा आतां ॥३॥
ज्ञानदेवासाठीं उत्सव आळंकापुरीं । तैसा कर्‍हेतीरीं सोपानासी ॥४॥
तैसी चांगयाची पुरवावी आळी । नामा वनमाळी उठावले ॥५॥


दशमीचे दिवशीं ठेविलें प्रस्थान । साधियेला येणें देव गुरु ॥१॥
दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर । उठावले भार वैष्णवांचे ॥२॥
सर्व स्वस्थ तेथेंज बैसले मिळून । नारदा कीर्तन पुढें होत ॥३॥
धन्य पुण्यस्तंभ धन्य गंगातीर । धन्य दिसती भार पाताकांचे ॥४॥
नामा म्हणे देवा निजभक्तीसाठींज । अंगें होसी कष्टी पांडुरंगा ॥५॥


गोदातीरीं उत्सव करिती जगजेठी । चांगदेवासाठीं समारंभ ॥१॥
निवृत्ति मुक्ताबाई संगें पंढरिनाथ । आले मंडपांत समुदायेंसी ॥२॥
निवृत्ति पांडुरंग बैसले निवाडे । चांगदेव पुढें उभे ठेले ॥३॥
जोडियेले कर चांगदेवें पुढतीं । करिती विनंति वोसंडोनी ॥४॥
नामा म्हणे देवा उठिलें अंतःकरण । नाहीं देहभान चांगयासी ॥५॥


चवदाशें वर्षें शरीर केलें जतन । नाहीं अज्ञानपण गेलें माझें ॥१॥
अहंकारें माझें बुडविलें घर । जालों सेवा थोर स्वामीसंगें ॥२॥
तापत्रयीं तापलों महाअग्नीं जळालों । अविवेकीं जालों मंदामती ॥३॥
काय माझा देह वायांविण व्यर्थ । आलों शरणागत पांडुरंगा ॥४॥
अभिमानें आलों श्रीआळंकापुरीं । अज्ञान केलें दुरी मुक्ताईनें ॥५॥
नामाअ म्हणे योग दुःखाचें शरीर । काय याचा घोर करूनियां ॥६॥


नाना दुःख माया आठवती मना । आतां नारायणा कृपा करी ॥१॥
माझ्या पातकांचा लागूं नेदी अंत । ऐसें माझें चित्त साक्ष असे ॥२॥
ज्ञानाग्नि माझी करा तृणवत । होऊनि कृपावंअत श्रीहरी ॥३॥
योगिराज यासी नाहीं पापदोष । केला उपदेश मुक्ताईनें ॥४॥
नामा म्हणे देवाअ पेटलें अंतर । करा आतां स्थिर योगिराज ॥५॥


अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास । पावलों मी क्लेश देवराया ॥१॥
मुक्ताबाई योगें उतरलों भवसिंधु । तैशी दीनबंधु कृपा करी ॥२॥
पतितपावन नाम तुझें थोर । करीं अंगिकार अनाथाचा ॥३॥
धन्य आमुचें भाग्य जाहलें दर्शन । अंगें नारायण साहित्य करी ॥४॥
चांगदेवें ऐसें आठविलें फार । केला नमस्कार नामा म्हणे ॥५॥

१०
कृपावंत जाली जेव्हां मुक्ताबाई । स्वरूप दिशा दाही दाखविलें ॥१॥
पाठीं पोटीं स्वरूप केलें सद्‌‍गुरुनें । तंव अभिमान गेला माझा ॥२॥
याच्या उपकाराची काय वर्णू थोरी । ज्यांच्यासंगें हरि जोडियेला ॥३॥
पुरे पुरे आतां आठविसी फार । होईल उशीर समाधीसी ॥४॥
नामा म्हणे देवा उठा संतजन । करूं आतां स्नान गौतमींसी ॥५॥

११
हरिपाठ गजरें केला जयजयकार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
टाळ मृदंग वाजती अपार । मिरविती भार वैष्णवांचे ॥२॥
दोहीं बाहीं उभे पताकांचे भार । मध्यें मनोहर गौतमी ते ॥३॥
विसोबा खेचरें पुंडलिका हातें । आणिलेंज साहित्य समाधीचें ॥४॥
नामा म्हणे हरि चांगदेवा स्नान । घाली आवडीनें प्रेमयुक्त ॥५॥

१२
निवृत्ति मुक्ताई गोविंद गोपाळ । उठले सकळ स्नानालागीं ॥१॥
राही रखमाई सहसमुदायेंसी । मुनि आणि ऋषि उठावले ॥२॥
करूनियां स्नान निघाले सकळ । नाचती गोपाळ गोदातीरीं ॥३॥
चांगदेवें सोवळें होऊनियां त्वरें । देव ऋषीश्वर पूजियेले ॥४॥
धन्य गोदातीर आदि हे अनादि । उरकिली समाधि यथासांग ॥५॥
नामयाचे पुत्र नारा विठा गोंदा । जागा झाडी महादा समाधीची ॥६॥

१३
चांगदेव योगी निष्काम चांगला । स्वरूपीं रंगला केशवाच्याअ ॥१॥
सुगंध अक्षता पुष्पें परिमल । पूजिले सकळ साधुसंत ॥२॥
राही रखमाई आणि पांडुरंग । पूजियले सांग चांगदेवें ॥३॥
पूजिली मुक्ताई सद्‌गुरु निवृत्ति । आणिक विभूति गौरविले ॥४॥
नामा म्हणे आतां नका राहूं स्थिर । होईल उशीर समाधीसी ॥५॥

१४
उठियेलें देव गोपाळ मंडळी । बैसले ते पाळी समाधीचे ॥१॥
निशीं सर्व कीर्तन वद्य माघमासीं । व्रत एकादशी गोदातीरीं ॥२॥
द्वादशी पारणें वैष्णवा सोडिती । बैसल्या त्या पंक्ती सिद्धेश्वरीं ॥३॥
सिद्धेश्वरीं पूजा केली चांगयानें । पात्रें नारायण टाकूं लागे ॥४॥
राही रखुमाई करिती पक्वानें । सोडितो पारणें चांगदेव ॥५॥
चांगदेवासंगें निवृत्ति मुक्ताई । बैसले ते पाही वैष्णवांत ॥६॥
नामा म्हणे आतां करावीं भोजनें । ताटें रखुमाईनें विस्तारिलीं ॥७॥

१५
एकमेळीं जेविती वैष्णव सकळ । वाढिती गोपाळ सकळांसी ॥१॥
पांडुरंगें केला चांगोबाचा सोहळा । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥
गंध आणि अक्षता विसोबाचे हातीं । महापूजा होती चांगोबाला ॥३॥
आरत्या पंचारत्या करिती आनंदानें । नामा म्हणे प्रेमें वोसंडलें ॥४॥

१६
निवृत्ति मुक्ताईचे वोसंडले नयन । करितो समाधान पांडुरंग ॥१॥
विसोबा खेचराचे भरोनि येती डोळे । परिसा तळमळे पुंडलिक ॥२॥
नाना खेद करूनि सारिलें भोजना । जाती आचमना गंगेलागीं ॥३॥
आंचवले देव वैष्णव ते ऋषी । जाती समाधीसी चांगदेवा ॥४॥
जेवूनियां संत बैसले निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥५॥
नामा म्हणे सवें उठे नारायण । आले अवघेजण समाधीपाशीं ॥६॥

१७
मुक्ताईनें चांगा घेतलासे पोटा । उठा आतां भेटा लहान थोर ॥१॥
भेटले ऋषीश्वरा वैष्णव सकळीं । बैसले ते पाळी समाधीच्या ॥२॥
निवृत्ति मुक्ताईसी केला नमस्कार । उतरिले पार भवसिंधू ॥३॥
विठ्ठल रखुमाईसी केली प्रदक्षिणा । मग शुद्ध नमना आरंभिलें ॥४॥
नामा म्हणे देवा निवृत्ति मुक्ताई । चांगा लागे पायीं जाऊनियां ॥५॥

१८
नमो अनादि चक्रपाणि । नमो निवृत्ति ज्ञानस्वामी ।
नमो सोपान संजीवनी । मुक्ताबाई ॥१॥
नमो सद्‌गुरु मुक्ताई । नमो स्वस्वरूप ठायीं ठायीं ।
नमो वंदितसे पायीं । नमो नमो परम पद ॥२॥
नमो सूर्येन्धशनी । नमो भ्रूमध्य आटणी ।
नमो माय कुंडलिणी । योगियांची ॥३॥
नमो त्रिविधताप हरण । नमो विषय निवारण ।
नमो स्वामि निष्काम । कर्ता हर्ता नमो ॥४॥
नमो अर्ध नासिक धसनी । नमो पाठीपोटीं दाटणी ।
नमो अर्ध नासिक धननी । नमो पाठीपोटीं दाटणी ।
नमो जनीं वनीं । चिन्मयछत्र ॥५॥
नमो योगमाया दिगंबर । नमो व्यापक चराचर ।
नमो दाही अवतार । परब्रह्मा नमो ॥६॥
कंद कळीकाळ हरणा नमो । तुझेनि परब्रह्म गमो ।
शांति अव्यक्त क्षमो । श्रीहरी ॥७॥
नमो संसार निरसिता ॥ नमो माया हर्ता ।
नमो अद्वय अनंता । पांडुरंगाअ ॥८॥
नमो पातकसंहारी । नमो परब्रह्मा खेचरी ।
नमो योग अगोचरीं परमात्मा आत्मा ॥९॥
नमो शिवशिवेशा । नमो आदिगुरु जगदीशा ।
नमो प्रकाश प्रकाशा । परब्रह्मा ॥१०॥
पुरे पुरे येरझारा । नमो वेव्हार सारा ।
नमो शारंगधरा । अंतःअकरण पाहासी ॥११॥
नमो मुक्त्ताईच्या उपदेशा । नमो आदि अनंता जगदीशा ।
स्वरूपादि परेशा । जगद्‌‍गुरु नमो नमो ॥१२॥
नमस्ते नमस्ते निवृत्ति । नमस्ते नमस्ते ज्ञानमूर्ती ।
नमस्ते नमस्ते सोपान ज्योती । परेशा नमो ॥१३॥

१९
लाविली कौपीन पितांबरी एक । त्यागिली अनेक मह्त‌ माया ॥१॥
सव्या हातें घेतलें संतसाधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
समाधीचे पाळी निवृत्ती वनमाळी । अतरीं कळवळी मुक्ताबाई ॥३॥
आणिकांच्या डोळां अश्रुपात येत । होईल कीं गुप्त योगिराज ॥४॥
चांगदेवा दिधलीं विठोबाचीं पाऊलें । तीर्थ तें घेतलें देवगुरूचें ॥५॥
नामा म्हणे हरि जाली आळवण । करा बोळवण चांगोबाची ॥६॥

२०
पुंडलिकें धरिला चांगोबाच हात । तंवा सकळ संता कळवळती ॥१॥
पताकांचे भार समाधि भोंवते । तेव्हां साधुसंत उठावले ॥२॥
यांच्या या ज्ञानाचा अंतपार नाहीं । भली मुक्ताई ओसंडली ॥३॥
संतसमागम फळला तुजला । एकांत फवला मुक्त्ताई ॥४॥
मसुरेप्रमाणें दावियेली खूण । तेंचि पूर्ण ब्रह्म योगियाचें ॥५॥
फार दिवस तुम्हीं रक्षिलें शरीर । मुक्ताईनें पार उतरिलें ॥६॥
नामा म्हणे देवा सद्‌गुरुचा महिमा । बाप पूर्ण आम्हां पांडुरंग ॥७॥

२१
कुंकुम केशराचे समाधीसी सडे । पहाती निवाडे जनलोक ॥१॥
गोदातीरीं महोत्सव चांगदेवा । पूर्ण तुं विसावा पांडुरंगा ॥२॥
समाधीभोंवते उभे साधुसंत । उतरले आंत चांगदेव ॥३॥
निवृत्ति पांडुरंग गेले समागमें । वैष्णव रामराम बोलताती ॥४॥
राहि रखुमाबाई उभ्या दोहीं बाहीं । मध्यें मुक्ताबाई संबोखिती ॥५॥
नामा पुंडलिक करिती समाधान । स्थिर करा मन बोधभावें ॥६॥

२२
समाधीशी शेज घातली मनोहर । बैसविले वर चांगदेव ॥१॥
आनंदानें टाळया पिटिति वैष्णवाभार । लाविती पदर डोळियासी ॥२॥
टाळ मृदंगाचा जाला झणत्कार । गेले योगेश्वर समाधीसी ॥३॥
सांडिलीं भूषणें भस्म आभरणें । जाले निमग्न परब्रह्मीं ॥४॥
झांकियेले नेत्र उन्मनीच्या संगें । निवृत्ति पांडुरंग ओसंडले ॥५॥
नामा म्हणे जाला समाधिस्थ योगेश्वर । निघाले बाहेर देवभक्त्त ॥६॥

२३
भूचरी खेचरी चांचरी निश्चळा । अगोचरी डोळा स्थिरावली ॥१॥
झांकिली समाधी संतसज्जनांनीं । तुलसी पुष्पें वरूनि वर्षताती ॥२॥
निवृत्तीची मिठी विठोबाच्या गळां । आणिकांच्या डोळां अश्रू येती ॥३॥
केलें समाधान विठ्ठल रखुमाईनें । निवृत्ति म्हणे राहणें काय आतां ॥४॥
गेले योगिराज राहिले ठायीं ठायीं आतां मुक्ताई जाईल कीं ॥५॥
स्वरूपींचे ओघ जातील स्वरूपीं । नामा म्हणे निरोपी पांडुरंग ॥६॥

२४
देवें समाधान केलें अवघेजण । चला आचमना गौतमीसी ॥१॥
वद्य त्रयोदशी दिधली समाधी । महोत्सव गोविंदीं समर्पिला ॥२॥
गर्जती वैष्ण विठोबाच्या नामा । थोर तुझा महिमा दिनबंधु ॥३॥
समाधि प्रदक्षिणा केली अवघींजणीं । जाली बोळवणी चांगयाची ॥४॥
कीर्तन करीत आले गौतमीसी । देव मुनि ऋषि आंचवले ॥५॥
अवघ्यांनीं आचमनें केलीं गोदातीरीं । नामा म्हणे हरी आतां उठा ॥६॥

२५
आचमन करुनि आले सिद्धेश्वरा । हरि ऋषीश्वरा आर्जविती ॥१॥
निवृत्ति मुक्ताईला त्यागूं नये कोणी । आतां उत्तरायणीं गमन करूं ॥२॥
पांच दिवस उत्सव केला चांगदेवा । विश्वाचा विसावाअ श्रीहरी ॥३॥
वैष्णवांनीं समाधि बांधली साजिरी । सुवर्णाचा वरी पिंपळ तो ॥४॥
केला नमस्कार वैष्णवांनी जेव्हां । मुक्ताई तेव्हां वोसंडली ॥५॥
नामा म्हणे देवा तीर्थक्षेत्र चांगलें । चित्त मन रंगलें चांगयाचे ॥६॥

२६
शुद्ध फाल्गुन मासीं वैष्णव ह्रषिकेशी । पंचमीचे दिवशीं सिद्ध जाले ॥१॥
निवृत्तिराज म्हणे जावें म्हाळसापुरीं । जेथें ज्ञानेश्वरई पूर्ण जाली ॥२॥
उठावले भार देवऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी ॥३॥
सव्यहातें क्षेत्र घेतलें वैष्णवांनीं । चाललीं विमानें नेवाशासी ॥४॥
नामा म्हणे देव निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होती ॥५॥

संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी समाप्त


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी समाप्त एकूण २६ अभंग । संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *