संत नामदेव

संत नामदेव गाथा १ते२५

संत नामदेव गाथा १ते२५ एकूण १५९ अभंग

संत नामदेव गाथा १ – श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद अभंग १ ते ६

१.
पुंडलीकालागुनी ह्मणे पांडुरंग । सखा जीवलग तूंची माझा ॥१॥
न पाहासी वास बोलसी उदास । सांडोनियां आस सर्व-स्वाची ॥२॥
वैकुंठ सोडोनी आलों तुजपाशीं । कां गा न बोलसी भक्तराया ॥३॥
पितृभजनाचा झालासी अधिकारी । केली बा पायरी वैकुंठासी ॥४॥
भाग बापा कांहीं आवडे तें घेंई । मज वाटतें ह्लदयीं घालावाची ॥५॥
नामा म्हणे देवा स्वामि मुगुटमणी । उभा कर ठेवुनी कटीवरी ॥६॥

२.
सांडुनी वैकुंठ न धरत पातलों । तुज भेटावया आलों पुंडलिका ॥१॥
प्रीतीचा वोरसू ह्लदयीं दाटला । नुठेचि कां वहिला आलिंगना ॥२॥
भक्त शिरोमणी आमचा जीवलग । म्हणे पांडुरंग पुंडलिका ॥३॥
स्फुरती भुजादंड आणि वक्षस्थळ । हरुषें नयनक-मळ विकासलें ॥४॥
आनंदें रोमांच उद्भवले आंगीं । क्षेमा देई वेगीं भक्ताराया ॥५॥
मज नामरूप तुमचेनी संभ्रमें । केलीं जन्म कर्में असंख्यात ॥६॥
तुमचीया आवडी असे म्यां विकिला । सांग कोण्या बोला रुसलासी ॥७॥
ह्लदयींचें निजगुज सांगरे सकळीक । तेणें मज सुख होईल जीवा ॥८॥
परतोनियां दृश्टि पाहें आळूमाळ । तेणें हरेल सकळ श्रम माझा ॥९॥
ऐसा भक्तजनवत्सलू भक्तांचा विसावा । भक्तांचिया भावा भाळलासे ॥१०॥
कटावरी दोनी हात उभा पुंडलिका द्बारीं । नामया स्वामी हरि विनवीतसे ॥११॥

३.
एक वेळ भेटी आलों भक्तराया । स्फुरति माझ्या बाह्या क्षेमालागीं ॥१॥
ऊठ पुंडलिका परतोनियां पाहें । जीवींचें आर्त काय सांग मज ॥२॥
जीवाचीं पारणीं फेडीं डोळ्यांची । वास श्रीमुखाची पाहूं देंइ ॥३॥
हेंची आर्त धरोनी आलों असें जीवीं । तें तूं सर्व पुरवीं भक्ताराया ॥४॥
नामयाचा स्वामि कृपेचा कोंवळा । ह्मणऊनि उतावळा भक्तालागीं ॥५॥

४.
माझिया पितयाची होईल निद्राभंग । न घडे प्रसंग बोलायाचा ॥१॥
क्षण एक मौन धरूनियां रहा । शरणागत पहा कृपादृष्टी ॥२॥
करूनि निर्धार आलेली जेणें भावें । जतन करावें वचन देवा ॥३॥
नच जावें देवा माझे गांवेहूनी । मागतों प्रार्थुनी हेंचि तुम्हां ॥४॥
माझें सुख पहावें मागेन तें द्यावें । माझे गांवीं व्हावें अधिपती ॥५॥
नामयाचा स्वामी भक्तीसी भुलला । पुंडलीकें राहविला पंढरीये ॥६॥

५.
तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनियां वदला । म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया स्वरूपाचा ॥१॥
तो तूं प्रगट श्रीरंगा । येऊनि आमुच्या लोभा । स्थिर राहूनि चंद्रभागा । भक्तजनां तारीसी ॥२॥
नेणों कोण भक्तपण । नेणों तुमचें महीमान । कोणे जन्मीं साधन । कोण केलें हें नेणवे ॥३॥
नीरे भीवरे संगमीं । चंद्रभागेचे उगमीं । वेणुनाद परब्रह्मीं । गोपाळ गजरें गर्जती ॥४॥
तरी स्वामी दीनदयाळा । महाविष्णु गा गोपाळा । भक्तालागीं कृपाळा । तारावया तयासी ॥५॥
माझें करोनिया मीस । वास केला युगे अठ्ठावीस । करूनियां रहीवास । माझे भक्ति लाधलासी ॥६॥
तूं नीयंता ईश्वरमूर्ती । सकळा गोसांवी श्रीपती । तुजवांचूनि नेणें मती । दयामूर्ति परब्रह्म ॥७॥
नामा म्हणे पुंडलिकें । ऐसें स्तवन केलें निकें । तंव म्हणितलें पुण्य श्लोकें । पुरे पुरे करीं आतां ॥८॥

६.
ह्मणे पुंडलीक देवा शिरोमणी । परिसावी विनवणी एक माझी ॥१॥
संसारबंधन तोडींरे दारुण । हें एक मागणें तुजपाशीं ॥२॥
ऋद्धि सिद्धि मोक्ष संपत्ति विलास । सांडियेली आस त्यांची जीवें ॥३॥
पंच महापातकी विश्वासघातकी । त्यांसी यमादिकीं गांजियलें ॥४॥
ऐसिया पतीत करींरे सनाथ । पुरवीं माझें आर्त पंढरिराया ॥५॥
हेंचि माझें काज अंतरींचें गुज । उद्धरीं सहज सहज महादोषी ॥६॥
नामा ह्मणे वर दिला नारायणें । विठठलदर्शनें मोक्ष जीवा ॥७॥


संत नामदेव गाथा २ – शिवस्तुति अभंग १ ते ४

१.
अहो सदाशिवा । देसी भुक्ति मुक्ति भावा ॥१॥
क-रावी ते तुझी सेवा । ऐसें धरावें या जीवा ॥२॥
नामा ह्मणे महा-देवा । चुकवीं चौर्‍यांशींचा हेवा ॥३॥

२.
बरवें गा शंकरा नाम तुझें । हरहर बरवे गा देवा नाम तुझें ॥१॥
गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती । रामनामें तरले नेणों किती ॥२॥
ऐसा सदा आनंद राउळीं । विष्णुदास नामा पंढरपुरीं ॥३॥

३.
साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी ॥१॥
तो राजा देखेन । पर्वतु जेथें असे मल्लिकार्जुन ॥२॥
भक्तिभावाचें अंजन । साधावया निधान ॥३॥
मन मारूनि देईन बळी । साधा-वया चंद्रमौळी ॥४॥
भ्रांति पाटा फिटला । शिव मार्ग देखिला ॥५॥
विष्णुदास नामा पायाळ भला । तेणें मलयानिळ देखिला ॥६॥

४.
सदा सोमवारीं विभूति लावूनि शिरीं । तुमच्या मं-दिरीं आलाप करीं ॥१॥
शंकर त्रिपुरारी हरि उच्चारी । म्हणती षडाक्षरी पावें मज ॥२॥
ॐनम: शिवाय हरहर जय जय । नाहीं भवभय तुझेनि नामें ॥३॥
करिती शिवरात्री वाहाती बेलपत्री । प्रगत होऊनि गाती भक्तिभावें ॥४॥
बोलती सत्कीर्ति जिंतिलें पवित्रीं । हरहर नाम मंत्रीं तुज पूजिती ॥५॥
रुद्राक्षाच्या माळा घालूनियां गळां । तो तुह्मां जवळां सर्व मान्य ॥६॥
शिवशंभु भोळा बहुतां पुण्ये जोडला । पावे जाश्वनीळा ह्मणे नामा ॥७॥


संत नामदेव गाथा ३ – तुळसीमाहात्म्य अभंग १ ते ८

१.
तुळसीविण ज्याचें घर । तें तंव जाणावें अघोर । तेथें वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी ॥१॥
तुळसी वृंदावन ज्याचे धरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी । तें वर्जिलें यमर्किकरीं । आज्ञा आहे म्हणोनी ॥२॥
तुळसीवृंदावना । जे करिती प्रदक्षणा । अंत्त-काळां होतां स्मरण । जन्ममरण नाहीं नामा ह्मणे ॥३॥

२.
तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठीं गमन । लटिकें ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची ॥१॥
तुळसीमाळा घाली गळां । त्या भेटे घनसांवळा । चतुर्भुज सहित कमळा । केशिराज प्रत्यक्ष ॥२॥
तुळसीरोपा घाली उदक । त्याचे हरती महादोष । ब्रह्मादिकां न कळे नि:शेष । जन्ममरण त्या नाहीं ॥३॥
तुळसीची देवा बहु प्रीति । आणिक पुष्पें न लागती । नामा म्हणे जी श्रीपति । हेचि भक्ति द्यावी मज ॥४॥

३.
तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां ॥१॥
तुळसी वंदाची माउली । अरे हे संतांची साउली । तुळसीपासीं वनमाळी । सदा रहात असे ॥२॥
तुळसी दळ भूमीवरी पडिलें । तें जरी मस्तकीं वंदिलें । कोटी तीर्थस्नान केलें । एवढें फळ नामा म्हणे ॥३॥

४.
उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥
तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥
तुळसीचें काष्ठ जपमाळ करी । तयासि श्रीहरि प्रसन्न तो ॥३॥
तुळसीची कीर्ति अगाध पैं आहे । पंध-रीसि पाहे ह्मणे नामा ॥४॥

५.
तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालूं सडे ॥१॥
दूत्त न येती तयाकडे । हरिनामाची घरटी पडे ॥२॥
नामा ह्मणे हरि-एवढें । ब्रह्म वृंदावनीं सांपडे ॥३॥

६.
फुकाचिया तुळसी वहारे । ध्रुवासारिखें पद मागारे ॥१॥
एका विठ्ठला शरण जारे । जन्म वांयां कां दवडारे ॥२॥
नामा ह्मणे हा देवो पहा रे । विठ्ठ भक्तांचा ऋणियारे ॥३॥

७.
तुळसीचें हत्यार । वृंदावन दुर्ग थोर ॥१॥
तुळसीच्या दळीं । यम जिंकिला महाबळी ॥२॥
नामा ह्मणे बळिरे बळी । विठ्ठल आमचा भुजबळी ॥३॥

८.
उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें ॥१॥
तुळस असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं । येवोनी श्रीहरि । क्रिडा करी स्वानंदें ॥२॥
तुळसीसी मंजुरा येतां । पळ सुटे यमदूतां । अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां । नासे दुरित चित्ताचें ॥३॥
जे जे तुळसी घालिती उदक । ते नर पावती ब्रह्मसुख । नामा म्हणे पंढरीनायक । तुळसी जवळी उभा असे ॥४॥


संत नामदेव गाथा ४ – चोवीस नामांचा महिमा अभंग १ ते २४

१.
येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दीन माये ॥१॥
तूं माय जननी कांसवी कौसल्या । दिन बहुसाळ मज पावें ॥२॥
न मागें केवळ विषयाचें टवाळ । तूं माझी कृपाळ विठ्ठ-लमाय ॥३॥
वोळली गगनीम केशव कामधेनु । लवतां लोचनु स्फुरे बाह्या ॥४॥
वाजवील वाद्य गोपाळांची मांदी । आल्हाद गोविंदीं नित्य माझा ॥५॥
नामा ह्मणे केशव येई कामधेनु । तेणें माझी तनु तृप्त सदा ॥६॥

२.
येगे नारायणी अमृत संजीवनी । चिंतितं निर्वाणीम पावें वेगीं ॥१॥
तूं माझें जीवन नाम नारायण । नित्य अनुष्ठान तुझ्या नामें ॥२॥
बाह्य अभ्यंतरीं तूंचि सर्वांठायीं । तुजविण सृष्टि शून्य दिसे ॥३॥
चाल लवलाह्या कृपाळू तूं माये । मज हें न साहे मोह जंजाळ ॥४॥
तुटेल बिरडें सुटतील गांठी । जंव तूम जगजेठी नये माये ॥५॥
नामा म्हणे धन्य तुझेम नाम साचें । उच्चारितां वाचे निवती अंगें ॥६॥

३.
येईंगे माधवे पाजीं प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं ॥१॥
धांव तूं मधुकरे माधवे उदारे । येईं तूं सोइरे जन-निये ॥२॥
कष्टलों मी भारी शीण दूर करीं । येईं तूं झडकरी माधवे वो ॥३॥
अनंत वो नामें पुराणें पढती । पावसी आकांतीं विठ्ठले वो ॥४॥
नामा ह्मणे लाहो करावा माधवे । माझेनि वो जीवें लाहे चाड ॥५॥

४.
येईं तूं गोविदें नामामृतधारी । नित्य तें उच्चारीं गो-बिंदातें ॥१॥
गोविंद नित्य हाचि छंद । पावें तूं हद्नद आदिरूपें ॥२॥
गोविंद हो ध्यानें निवती अष्टांगे । गोविंदे गे बेगें वेष धरूं ॥३॥
गोविंद गोपाळ मुकुंद केशरी । येईं तूं लवकरी सांवळिये ॥४॥
गोविंद हें नाम जनीं वनीं दिसे । प्रत्यक्ष तें ठ ए पंढरीसी ॥५॥
वेणूनादीं काला गोविंदे पैं केला । धांवतचि आला पेंद्यापाशीं ॥६॥
ती हीच वो माय उभी बाळमूर्ती । नाम जे जपती पांडुरंग ॥७॥
नामा म्हणे सांग गोविंद हा दवडी । वेगें लवडसवडी करीं माये ॥८॥

५.
विष्णु विष्णु हरि पावे लवकरी । ब्रिद चराचरीं सांगे मुनी ॥१॥
वैकुंठवासिनी कृष्णविष्णुदेव । नामातें गौरव आ-म्हांलागीं ॥२॥
धन्य हाचि दीनु विष्णुमाय पावे । गगनीं उ-गवे सूर्य जैसा ॥३॥
आदि ब्रम्हा हरि विष्णुकृष्णगंगा । भा-गिरथी पैंगा पदीं पावे ॥४॥
गया तें प्रयाग काशी तें सर्वांग । विश्वेश्वर लिंग चराचर ॥५॥
विष्णुगंगाधर विष्णुनाम पाठ । उच्चारितां वाटे वैकुंठींची ॥६॥
नामा म्हणे विष्णु भागिरथीमाजी । पंढरीये माझी विठ्ठलमाय ॥७॥

६.
येईं तूं मधुकरे मदनसुंदरे । मज गे न धरे प्रेम पोटीं ॥१॥
तूं माझी जननी मधुसूदन गाय । कामधेनु होय कांसवीची ॥२॥
आ-नंद निजघने जुनाट मधुसूदने । शुकस्तनपान पाजीं पान्हा ॥३॥
क-शव कांसवी पद रानगाय । आत्माराम होय नि:संदेह ॥४॥
विठ्ठलमु-कुंदें स्वरूपें गोमटीं । आकांतली सृष्टी मधुसूदनें ॥५॥
शंखचक्रांकित आयुध्यें मंडीत । मुकुट शोभत तुझा शीरीं ॥६॥
भक्तवरदायनी मधुसूद-नगंगा । व्हावें तूं वो वेगा कामधेनु ॥७॥
नामा म्हणे माये मधुसूदन गाय । ते संजीवनी होय आम्हालागीं ॥८॥

७.
येईं वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देईं । कामधेनु होईं विठ्ठलराजे ॥१॥
त्रिविक्रम धरे येईं तूं सांवळे । मुकुंद गोपाळे के-शवे वेगीं ॥२॥
तूम माझे निजधन त्रिविक्रमधरे । गंगानाममात्रें भंगी पाप ॥३॥
त्रिपदागायत्री त्रिविक्रममुखें । जनाची वो दु:खें हरती नामें ॥४॥
त्रिजटा त्रिफणी भागीरथी वेणी । प्रयाग वो धूनी पाप जाळी ॥५॥
त्रिस्थळीं त्रिमाये त्रिविक्रम होय । विश्वेश्वर दोहे तारक ब्रह्म ॥६॥
काशीकांति माये अयोध्या द्वारका । मधुरा अवंतिका तूंचि माये ॥७॥
नामा ह्मणे माझी त्रिविक्रम गाय । मक्तिसी पान्हाये पंढरपुरीं ॥८॥

८.
येईं वो वामने खुजीयखुजटे । पंढरीचे पेठे उभी राहें ॥१॥
येईं वो डोळसे सांवळे तेजसे। वामने बहु बसे ब्रह्मचारी ॥२॥
अनंत विद्नदे अनंत अपार । कैवल्य वोसरे पदकमळें ॥३॥
तुझें नाम धन्य वामन साजिरें । रूप हें गोजिरे बळीच्या द्वारी ॥४॥
तुझ्या चरणी तीर्थें उद्धरती सर्व । येई तूं संत्वर वामनाई ॥५॥
नामा ह्मणे पावे वामन ब्रह्मांडे । स्वरूप वितंडे ब्रह्मचारें ॥६॥

९.
येईं वो श्रीधरे सर्व रूपसारे । कैवल्य उतरे अभिनव ॥१॥
श्रीधर श्रीरंगे नाम पांडुरंगे । प्रगट वो सांगे पूर्णधन ॥२॥
श्रीकरे श्रीधरे शोभा ते साचारे । चक्रांकित करे शंख तुझा ॥३॥
सुंदर श्यामळ नाम हें अधळ । मुखीं हो वेल्हाळ हस्त तुझे ॥४॥
प्रकाशे हा पूर्ण श्रीधरे पैं जाण । सांगितली खूण खेचरामें ॥५॥
नामा ह्मणे माता श्रीधर उच्चारू । तरेन साचारू तिन्ही लोकीं ॥६॥

१०.
येईं ह्लषिकेशी दिव्यरूप दिसे । मन हें उल्हासे भेटी-लागीं ॥१॥
ह्लषिकेशी नामें तरले संभ्रमें । नित्य रामनामें भवसिंधू ॥२॥
आराधनें धन ऋषीसीं संपूर्ण । नाम कोटी यज्ञ झाले तया ॥३॥
पावन ह्लषिकेशी हेंचि ध्यान मन । नाम सनातन ह्लषिकेशी ॥४॥
विश्वा करी कळा विश्वा जन लीळा । त्राहे वेळोवेळां ह्लषिकेशी ॥५॥
नामा म्हणे माय येईं ह्लषिकेश । झालों कासावीस तुजवीण ॥६॥

११.
येईं वो पद्मनामे पंकजलोचने । विश्व पूर्णघने देखे तुज ॥१॥
त्राहें पद्मनाभा वाचा सिद्ध पावे । मज हें बुगवे माया-जाळ ॥२॥
पद्मांकित रेखा पद्म हें सुरेख । पावे वो निंमिष्य एका-मय ॥३॥
विचरे हे पृथ्वी नाम पद्मनाभ । स्वयंभावो बिंब विठ्ठलेसी ॥४॥
रिकामा मी नसें दीननिशी निमिष्य । पद्मनाम साक्ष ह्लदयीं योगी ॥५॥
नामा म्हणे पद्मनाभ हें हो नाम । जप तुझें प्रेम देईं मज ॥६॥

१२.
येईं वो दामोदरे पवित्र हे करे । मना हो नावरे प्रेमलोट ॥१॥
पाहें कृपादृष्टी साहे जगजेठी । पूर्ण पान्हा घोठी ऐसें करीं ॥२॥
दामोदरे नाम मदन परिकरे । हाचि वो विचार मनें केला ॥३॥
येईं तूं निर्धारें पावें तूं झडकरी । येईं वो लवकरी दामोदरे ॥४॥
दामोदर माता पाहे वो समता । पावे वो निवांता पावे वेगीं ॥५॥
नामा म्हणे लोटूं प्रेमामृत निवटूं । नामेंच वैकुंठु दामोदर ॥६॥

१३.
येईं तूं कृपाळे संकर्षण माते । पवित्र पूर्णभरिते गुण-निधि ॥१॥
त्राहेत्राहे वेगीं पावें वो झडकरी । ब्रीद चराचरीं वर्णि-ताती ॥२॥
संकर्षण गंगा सर्वांगीं तूं असे । जनीं वनीं दिसे रूप तुझें ॥३॥
कटावरी कर सांवळी सुंदर । मना़चा विचार इच्या चरणीं ॥४॥
निर्धारु सांगतां न माये वो घेतां । संकर्षण माता पाव वेगीं ॥५॥
विष्णुसंकर्षण नाम हें गहन । पतितपावन चरण-रजें ॥६॥
नामा म्हणे माय संकर्षण गाय । हरिदासा पान्हावे पंढरीसी ॥७॥

१४.
येईं तूं शारंगे वासुदेवे त्वरें । वासुदेवो सारे गोपाळ वो ॥१॥
त्राहे वासुदेवा पावें झडकरी । त्वरें वेगू करीं आर्त भेटी ॥२॥
वासुदेवनामें साधन सुगम । योगिया विश्राम स्थान झालें ॥३॥
द्वादश अक्षर जपिन्नला धुरु । तयासी साचारू अढळपद ॥४॥
बळी भीष्मदेवीं वासुदेवीं भाव । रोहिणीची माव ऐसें झालें ॥५॥
नामा म्हणे भक्त वासुदेवीं रत । सायुज्य पावे तो एक्यानामें ॥६॥

१५.
येईं तूम प्रद्युन्ने ध्यान तूं धरणें । माझिये कल्पने निर्धा-रुसा ॥१॥
त्राहे झडकरी पावे वो लवकरी । प्रद्युम्ने फुपकारी वेळो-वेळां ॥२॥
सांवळे सुंदरे वेणु वाहे करे । ध्यान हें सुंदर यमुनातटीं ॥३॥
प्रवाह प्रद्युत्रे नामघोष दाट । जिंकिले जुनात पापराशी ॥४॥
नामा ह्मणे नाम धन्य हेम प्रद्यम्र । होईल संपन्न नाम घेतां ।\५॥

१६.
येईं वो अनिरुद्धे सांबळें प्रबुद्धे । बिराटे गोविंदे दाव वेगीं ॥१॥
त्राहे माउलीये मना तुझी सोय । चुकती अपाय नाम घेतां ॥२॥
अनिरुद्ध् पाठे जाईन वैकुंठे । पुंडलीक पेठे उभा असे ॥३॥
कटावरी कर सांवळी सुंदर । मनाचा विचार इच्या चरणीं ॥४॥
अनिरुद्धसार अनु नाहीं आधार । सर्वही विचार अनिरुद्धे ॥५॥
नामा म्हणे येईं अनिरुद्धे माये । आणिक उपाय न लगे मज ॥६॥

१७.
येईं तूं पुरुषोत्तमे संजीवनी रामे । योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा ॥१॥
त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम । साधन अगम ऐसी माये ॥२॥
येईं वो सांभाळीं लवलाहे मन । जुनाट हो जुने पुरुषोत्तमें ॥३॥
तुझें नाम धन्य पुरुष हें सौजन्य । द्वैत हें अभिन्न अद्वैत हें ॥४॥
काक्षरी नाम पुरुष शुचिसम । नाम आत्माराम पुरुषोत्तम ॥५॥
नामा म्हणे पावें पुरुषोत्तम माते । सर्वत्र अद्वैत एकरूप ॥६॥

१८.
येईंवो अधोक्षजे वैकुंठ विराजे । नाम गे सहजे अमृतरासी ॥१॥
अधोक्षज नामें घालीन गोंधळ । रिता एक पळ जाऊं नेदी ॥२॥
अधर रंगीव अर्धोर्ध सोशीन । सर्वत्र पाहीन अधोक्षज ॥३॥
अरिष्ट हें निरसी माये अधोक्षजे । ऐसी या पाविजे संकटीं त्वां ॥४॥
अरि हे मर्दन अधोक्षज जाणें । स्वीकारावें पूर्ण प्रगटतां ॥५॥
नामा म्हणे धांवे अधोक्षज पावे । दिशाक्ष्म भावें तुज मग ॥६॥

१९.
येईं वो केसरी नरसिंह उच्चारी । पवित्र साचारी तिहीं लोकीं ॥१॥
नरसिंह वामन प्रल्हाद रक्षण । आमुचें तें धन नाम तुझें ॥२॥
शंखचक्र करीं पावे वो लवकरी । येइम तूं केसरी लवलाहे ॥३॥
नरसिंह हे नाम नरसिंह हें प्रेम । उत्तमोत्तम तिन्ही लोकीं ॥४॥
त्रिपुररक्षक दानवमर्दन । विकटवदन पंचाक्षरी ॥५॥
नामा म्हणे हरि नाम नरकेसरी । नरसिमह उच्चारी तरती जीव ॥६॥

२०.
येईं वो अच्युते नामामृत रसे । सुंदर डोळसे जा-न्हवीये ॥१॥
अमृताची खोटी अच्युतनाम पेठीं । पावे वो जगजेठी अच्युतसार ॥२॥
अच्युत अच्युत नामेम हेंचि सत्य । हें पियूष त्वरित उच्चारितां ॥३॥
वैकुंठींची मूर्ति अच्युतनाम पाठे । प्रत्यक्ष वो भेटे विटेवरी ॥४॥
पुंडलीक दृष्टी नयनाची भेटी । निवारितां दृष्टी न्याहाळितां ॥५॥
नामा ह्मणे अच्युत नाम हेंचि आम्हां । दिननिशीं राम जपतसें ॥६॥

२१.
येईं जनार्दने जनवनसंपन्ने । माझे वो चिद्‍घने पांडुरंगे ॥१॥
त्राहे जनार्दने पूर्णानंदघने । येईं वो संपन्ने विश्वंभरे ॥२॥
नाम हें दुर्लक्ष जनकजननी । राम जनार्दनीं विनटली ॥३॥
सांवळी डोळस रवि एकासनी । तेज प्रकाशनी हिरियाची ॥४॥
जननी ते जननी निकट ते जीवनी । जग प्रगटिणी हरीयाची ॥५॥
नामा ह्मणे जन नाम जनार्दन । सनकादिक जाण सेवताती ॥६॥

२२.
येईं तूं उपेंद्रे विठ्ठ महिंद्रे । देवामाजी भद्रे सिंहासनीं ॥१॥
त्राहे वो जननी शिणलों गे माये । तुजविण आहे कवण मज ॥२॥
तूं माझें कारुण्य प्रत्यक्ष सौजन्य । विचारितां प्रवीण प्रबुद्ध हो ॥३॥
पावे वो तूं वेगीं उपेंद्रे गे माते । पुंडलिक सांगातें पंढरीसी ॥४॥
दीपकु लविला दीन उगवला । दीपकें फळला पांडुरंग ॥५॥
नामा ह्मणे नाम उपेंद्र ऐसें शम । पावेन विश्राम नाम घेतां ॥६॥

२३.
येईं तूं हरीरूपेम विठ्ठल स्वरूपे । कळिकाळ कांपे नाम घेतां ॥१॥
नामें हरिहरि त्राहे वो झडकरी । शिणलों मी भारी जननीये ॥२॥
हरिनामधन सर्व जनार्दन । हरी हेम आठवण जिव्हे सदा ॥३॥
हरीहरी म्हणतां हरीरूप स्मता । नाम हें अनंताक्षर विलसे ॥४॥
येईं तूं हरी गंगे सांवळे सुर्मगे । हरीहरी संगें रतलोंसे ॥५॥
नामा म्हणे हरी पांडुरंग माझा । चरण हो भोजा राज्य धरू ॥६॥

२४.
येईं वो तूं कृष्णे हरी माझिये तृष्णे । दिननिशीं प्रष्णे वाट पाहें ॥१॥
त्राहे कृष्णगंगे सावळे सारंगे । नामस्मरण वेगें पुरे आम्हां ॥२॥
रामकृष्ण टाहो नामें लवलाहो । फिटला संदेहो संसाराचा ॥३॥
उद्धव अक्रूर यादव सादर । कृष्णाते अपार तयालागीं ॥४॥
अर्जून द्रौपदी स्मरण गोविंदी । पावावें निजपदीं नामा म्हणे ॥५॥


संत नामदेव गाथा ५ – गंगामाहात्म्य अभंग १

१.
वाचे ह्मणतां गंगा गंगा । सकळ पापें जाति भंगा ॥१॥
दृष्टी पडतां ब्रह्मगिरि । त्यासि नाहीं यमपुरी ॥२॥
कुशावर्ती करितां स्नान । त्याचें वैकुंठीं राहणें ॥३॥
नामा ह्मणे प्रदक्षिणा । त्यासी जन्म नाहीं पुन्हा ॥४॥


संत नामदेव गाथा ६ – कलि प्रभाव अभंग १ ते ९

१.
ऐका कलियुगाचा धर्म । पुत्र सांगे पितयास काम । ब्राह्मन त्यजिती ब्रह्मकर्म । ऐसें वर्तमान मांडलें ॥१॥
माया बहिणी दवडिती । स्त्री आपुली आणविती । ऐका ऐका नवल गती । अगा श्रीपति परियसा ॥२॥
भार्या न करिती पतिची सेवा । नाहीं कवणा धर्माचा हेवा । वर्ततसे पापाचा ठेवा । अगा केशवा परीयेसी ॥३॥
अरे वैराग्याच्या घराचारू । आणि संन्यासा मोह थोरू । संता बहुत अहंकारू । रुसणें नलगे कोणासी ॥४॥
झाला कलीचा प्रवेशु । तुह्मा नामाचा विश्वासु । ह्लदयीं ह्लषिलेशु । विष्णु-दास नामा म्हणे ॥५॥

२.
ऐका कलियुगींचा आचार । अधर्मपर झाले नर ॥१॥
मंचकावरी बैसे राणी । माता वाहतसे पाणी ॥२॥
स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ॥३॥
स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडीं ॥४॥
सासुसासर्‍यां योग्य मान । मायबापा न घाली अन्न ॥५॥
साळी सासवा आवडती । बहीणभावां तोंडीं माती ॥६॥
स्त्रियेसी एकांतगोडी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥७॥
म्हणे विष्णुदाम नामा । ऐसा कलियुगींचा महिमा ॥८॥

३.
कांहीं सांगोनि गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडुनं-दना । येथें राहतां पाविजे बंधना । थोर वर्तमान कलियुगीं ॥१॥
ये कलिमाझारीं । पुत्र पित्याचे वैरी । घरची माता होय कामारी । पुरुषांतें नारी अव्हेरिती ॥२॥
न येती वृक्षाफळें आटती धेनु । न पिके मही न वर्षे घनु । यापरी आटेल सकळ जनु । ऐसें जगज्जी-वनु बोलिले ॥३॥
आणिक एक वर्तेल अपवित्र । ब्राह्मण सांडितील वेदमंत्र । आचार सांडूनि होती शूद्र । ऐसे अपवित्र कलियुगीं ॥४॥
थोर वर्तमान पडेल काळु । चहूं वर्णांचा होईल एकचि मेळु । कोणी कोणाचा न धरिती विटाळु । मग गोपाळु निघते झाले ॥५॥
आतां वेळोवेळां सांमों किती । मोडला धर्म झाली प्रवृत्ति । विष्णु-दास नामा येतो काकुळती । कैसेनि करूं भक्ति पंढरिराया ॥६॥

४.
गृहस्थ बैसला ओसरीवरी । गृहस्वाभिणी स्वयंपाक करी । तंव मार्गस्थ ब्राह्मण आला द्वारीं । अन्न द्यावें स्वामिया ॥१॥
पडली कुर्‍हाड कपाळी । रागें सूप चाटू आफळीं । जळत काष्टातें हातीं कवळी । जैसी आसाळी गर्जतसे ॥२॥
ब्राह्मणें घेतलें धरणें । तंव बाईलेसी गेला शरण । म्हणे माझ्या ग्रासांतून ग्रास देणें । लज्जा राखणें आजिची ॥३॥
मग ह्मणे वो बाईल । कैंचा आलासे बईल । तुजसारिखा असेल । वैलसि बैल सोइरे ॥४॥
गृहस्थें धरोनि वेणी । तिनें शेंडीत हात घालोनि । अंगजूठ होऊनि । बाईल हु-मण्या मारितसे ॥५॥
त्याचे मागें सुटली शेंडी । सवेंचि धरि-लासे अंडीं । पहिली असे मुर्कुंडी । तोंडिच्या तोडीं मारी-तसे ॥६॥
शेजारीं व्याही होता तो धांवला । येतांचि तोंडावरी मारिला । चौकीचा दांत पाडिला । केला बोचिरा व्याही तो ॥७॥
आधींच व्याही होते रोडके । आणि हाणी तल्प-ठाण वईच्या बुडखे । निथळत निथळत बोडकें । घेऊनि सुडकें पुसितसे ॥८॥
तिकडूनि धांवला मेहुणा । तोहि पाडिला उताणा । केला तिनें घोळाणा । तया मेहुण्याचा ॥९॥
ब्राह्मणाकडे दांत रगडी । तंव ब्राह्मण हळु हळु पाय काढी । ओल्या धोतराची घडी । पळतां वेंगडी वळतसे ॥१०॥
ऐसा ओलंडिला दारवंटा । तंव धाविन्नली पाठोवाटा । सीण घालून हाणिल्या बरोटा । कोठें थोटया पळसील ॥११॥
ऐसा कलियुगीं स्त्रियांचा विचार । एक बुडविती बेताळीसनर एक दाविती स्वर्गीचें द्वार । नामा निरंतर विनवीतसे ॥१२॥

५.
पाप्या नावडे संतसंगति । लोभिया नावडे उदारवृति । व्व्यभिचारिणी नावडे पति । नावडे ज्योति उजियेडा ॥१॥
चांदणें नाचडे तया चोरां । सावधान नावडे तया हेरां । सद्‍बुद्धि नावडे रांडपोरा । सत्य कुचरां आवडेना ॥२॥
तीर्थ नावडे तया दुष्टां । न्याय नावडे सत्य नष्टां । कवण नावडे तया पापिष्ठां । अभिमान नष्टां न सांडवे ॥३॥
भक्ति नावडे तया खळां । पुण्य नावडे तया चांडाळां । देखत देखत जन आंधळा । कांरे घननीळा विसरलेती ॥४॥
पारखी नावडे तया खोटयांला । स्नान नावडे तया विटाळां । सुसंग नावडे नाठाळां । न्याय तंटाळा नावडे ॥५॥
धर्म नावडे तया कृपणां । शुद्धि नावडे दुर्जनां । कर्म नावडे अब्राह्मणां । ऐसी दुष्त वासना पापियातें ॥६॥
नाम नावडे तया नष्ट भक्तां । वृत्त नावडे तयां सर्वथा । नावडे भजन कैची कथा । नाहीं पतिव्रता कलियुगीं ॥७॥
ऐसा झाला कलीचा प्रवेश । धरा नामाचा विश्वास । जीवीं धरा ह्लषीकेश । विष्णुदास नामा म्हणे ॥८॥

६.
देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्‍कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं ॥१॥
लटिक्याचा साच जिंकियेला कली । पाखांडी वेदातें न मानिती बळी । अधर्म प्रवर्तला महीतळीं । ऐसीं पापें कळीं थोर झालीं ॥२॥
ह्मणोनि करुणा भाकितु आहे । जैसी व्याघ्रें वेढिली गाय । तेंवि पंचानन प्रासूं पाहे । तैसा दिसतो नारायणा ॥३॥
भक्ति भावो नावडे पैं गा । जैसें कां अमृत मुखीं भुजंगा । डंख करूं आवडे जगां । ऐसें श्रीरंगा नवल चोज ॥४॥
भ्रतारभीक्त सोडियली नारीं । परपुरुषीं मन निर्धारीं । पितियासि पुत्र असों नेदी घरीं । नित्य निंदा करी रे अपमान ॥५॥
म्हणोनियां जिबें त्रासु घेतला । सत्य लोपलें धर्म बुडाला । अझूनि काय पाहतोसि उगला । धांवें विठ्ला म्हणे नामा ॥६॥

७.
वेदांवेगळें कर्म करी । मनीं पाखंड धरी । तो पचिजे अघोरीं । चिरकाळ वरी ॥१॥
तो न आणावा पैं दृष्टी । तोचि दोशी एक या सृष्टी । तो होईल महा कष्टी । हरीसिन भजतां ॥२॥
संध्या स्नान नेणे दान । नेणे हरिकथा श्रवण । तोहि पतीत जाण । महापातकी चांडाळ ॥३॥
सांडूनि ब्राह्मणपण । शूद्ररीती आच-रण । तो दृष्टी पडलिया जाण । पहादोष घडेल ॥४॥
निंदा करी जो संतांची । पूजा नेणे जो देवाची । तोचि राशि पापाची । प्र-त्यक्ष जाणावी ॥५॥
तीर्थ न करी हिंडतां । व्रत न करी बोलतां । पुराण नायके पाहतां । तो तंव राक्षस जाणावा ॥६॥
सदा अमं-गळ अशुची । गुरु आज्ञा भंगी साची । अखंद निंदा करी सं-तांची । तो स्वामिद्रोही जाणावा ॥७॥
कपट शिके नानाविध । गोत्रजांशीं करी विरोध । तो जाणावा हें प्रसिद्ध । महापातकी चां-डाळ ॥८॥
गृहदारावरी नाहीं चित्त । परस्त्रियेसीं करी स्तुत । तो प्रत्यक्ष महा दैत्य । त्याचें मुख पाहों नये ॥९॥
नाठवी जो उप-कार । स्वामीसी न करी जो नमस्कार । तो जन्मांतरचिं होय नर । पतीत चांडाळ बोलिजे ॥१०॥
पाखांड रची कवित्व । माता पितियाचें न करी महत्व । पंच पातकी जीवित्व । तो पूर्वीचा बोका होता ॥११॥
नामा म्हणे तैसे दोषी । न आणावे पंढरीसी । काय करावे ते पाषाण जन्मासी । जे विठ्ठलनामासी मिळतीना ॥१२॥

८.
कृष्णाचें कीर्तन नावडे ज्या नरा । जन्मोनि अघोर पडे नरकीं ॥१॥
कृष्णश्रवण नाइके जो कानीं । तयासि मेदिनीं ठाव कैंचा ॥२॥
कृष्णविष्णुकथा नावडे पैं नित्य । तयासी पैं सत्य ग्रहबाधी ॥३॥
रामकृष्ण हरी न ध्याय जो मूर्ति । तया यम नेती अंतीं जाणा ॥४॥
नामा ह्मणे हे नर कलियुगीं उदंड । घरो-घरीं पाखांड करिताती ॥५॥

९.
पलंगीं नारी वैसवूनि । माये हातीं वाहे पाणी ॥१॥
ऐसा कलियुगीं आचार । क्रिया भ्रष्ट झाले नर ॥२॥
स्त्रीसी पाटावाची चोळी । माता सिवती सोंवळीं ॥३॥
स्त्रियेचा कै-वार वोढी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥४॥
स्त्रीचें ऐकोनि उ-त्तर । सख्या बंधूसि पाडी वैर ॥५॥
म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगाचा महिमा ॥६॥


संत नामदेव गाथा ७ – प्रारब्धगती अभंग १ ते ५

१.
कृष्ण सहाय पांडवासी । ते भोगिती नष्टचर्यासी । ते भोगिती नष्टचर्यासी । साह्य केलें हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥१॥
ऐसी प्रार-ब्धाची ठेव । झाले भिक्षुक पांडव । राज्य घोडे भाग्य सर्व । सांडि-येला ठाव प्रारब्धें ॥२॥
शरीर संचिता आधीन । धर्मराज हिंडे वन । कर्में बुडाला रावण । आणि दुर्योधन प्रारब्धें ॥३॥
अभिमा-नें शिशुपाळ । कृष्ण हस्तें झाला काळ । यादव निमाले सकळ । केलें निर्मूळ प्रारब्धें ॥४॥
कर्मरेखा टळेना । बाण लागला जग-जीवना । कृष्णें सांडिल्या गोपांगना हें नारायणा प्रारब्ध ॥५॥
कामबुद्धीचें सुख । अति मानिती ते मूर्ख । चंद्रासी लागला कलंक । इंद्रासी दु:ख प्रारब्धें ॥६॥
हरिश्चंद तारामती । घोर जन्मांतर भो-गिती । नळराव पुरुषार्थीं । तयाच्या विपत्ति प्रारब्धें ॥७॥
पति-व्रता सुशीळ । दमयंती पायें पोळे । ऐसें अनिवार कपाळ । भोगी दुष्काळ प्रारब्धें ॥८॥
ऐसी अनिवार जन्मांतरें । राज्य सांडिलें रघुवीरें । सवें मेळवूनि वान्नरें । फिरवी दिगांतरें प्रारब्धें ॥९॥
फि-रत असतां काय झालें । पुढें प्रारब्ध ओढवलें । जानकीस राक्षसें नेलें । कष्ट भोगविले प्रारब्धें ॥१०॥
कर्मा आधीन शरीर । पूर्ण ब्रह्म रामचंद्र । रघुपति विष्णूचा अवतार । पाठीं जन्मांतर नामा ह्मणे ॥११॥

२.
सगुन समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥
पाहा कोळियांची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिपुढें ॥२॥
द्रोपदीचे घरीं होते उपवासी । देंटही लविती अकस्मात ॥३॥
नामा ह्मणे मुख्य प्रारब्ध कारण । पांडुरंगाविण गति नाहीं ॥४॥

३.
झाला कासावीस बाण लागलाची । प्रारब्धाची गति चुकवेना ॥१॥
चुकतां ते रेखा क्रियामाण जाण ॥२॥
बाणें पश्चा-त्ताप अर्जुनाचे मनीं । शस्त्र चक्रपाणी धरी न मी ॥३॥
नामा ह्मणे धरूं ऐसे याचे संगा । तारूं पांडुरंगा उभा असे ॥४॥

४.
काय सांगों कर्मभोग । पातलिंग शिवाचें ॥१॥
याच सुखें ब्रह्मामुख । उभा नख छेदिला ॥२॥
सुचिष्मत पंडुपुत्र । भिक्षा पात्र हिंडती ॥३॥
नामा ह्मणे कर्मरेखा । देवांदिकां चुकेना ॥४॥

५.
हरिश्चंद्रराजा होता सत्त्वगुणी । वाहातसे पाणी डोंबा-घरीं ॥१॥
सत्य पतिव्रता तारामति राणी । राहिली भोगोनी काया- क्लेश ॥२॥
भरत ऐकतां मातेचें वचन । श्रीराम दर्शन कैसें घडे ॥३॥
माता पिता सर्व अव्हेरी जनक । नामा ह्मणे भाक प्रारब्ध हे ॥४॥


संत नामदेव गाथा ८ – समाधियोगनिषेध अभंग १ ते १५

१.
मुख्य मातृकांची संख्या । सोळा अक्षरें नेटक्या ॥१॥
समचरणीं अभंग । नव्हे ताळ छंदो भंग ॥२॥
चौक पु-लिता बिसर्ग । गण यति लघु दीर्घ ॥३॥
जाणे एखादा निराळा । नामा ह्मणे तो विरळा ॥४॥

२.
सोळा त्या समाधि औट पीठा माझारी । तेथें नर- हरि देव नांदे ॥१॥
बारा गुंफे माजीं भ्रमर गुंफे मध्यें । तेथें आत्मा शुद्ध ज्ञान नांदे ॥२॥
गोल्हाटाचा भेद असेची आघवा । शुद्ध ज्ञानदिवा अलक्षतो ॥३॥
नामा म्हणे आम्हां तेजाच्या उजेडा । देव केला घोडा बैसावया ॥४॥

३.
समाधिस्थ सदा राहे समाधान । नि:शब्द म्हणणें याचिलागीं ॥१॥
राम ते समान नव्हती समाधान । समाधि बै-सणें एकचित्तें ॥२॥
उन्मनी उपासना प्रेमाची दाटणी । आत्मरूप जनीं दिसतसे ॥३॥
नामा म्हणे रूप डोळ्यांतील बाहुली । तीचि जगीं जाहली जगदाकार ॥४॥

४.
वामांगी बाहुली तूर्या दावी कळा । ते लक्षी पाउलां रामरूप ॥१॥
माया निजरूप दक्षिणांनीं वसे । तूर्येचा हा भास मावळला ॥२॥
मी माया म्हणतां पाहे आपणातें ।आत्मा-राम तेथें ज्ञानजळीं ॥३॥
नामा म्हणे ज्ञान माया ते आपण । दृष्टीचें देखणें आत्मरूप ॥४॥

५.
सत्य ज्ञानानंद गगनाचें प्रावर्ण । नाहीं रूप गुण गुणातीत ॥१॥
नाद ना भेद ना छंदे निरंतर । दोहींच्या विचारें ब्रह्म नांदे ॥२॥
येकवटी ब्रह्म आत्माराम रूप । तें पाहा स्वरूप लावण्याचें ॥३॥
नामा म्हणे केलें चैतन्य जवल । मांडियेला खेळ संतीं तेथें ॥४॥

६.
चैतन्याचा खेळ एकवट ब्रह्म । निर्गुणासी गुण रूप जाहलें ॥१॥
चैतन्य त्या कळा रूपा आले सत । निर्गुणाचा हेत रामकृष्ण ॥२॥
खेळ मांडियेला गोल्हाट शिखरीं । गोलांगुळांगुळीं समाधिस्थ ॥३॥
समाधी साधन अखंड उन्मनी । औटपीट ध्वनी नाद होय ॥४॥
नामा म्हणे तेथें चौक्या ज्या रंगल्या । अरंग मिरवल्या संतसंगें ॥५॥

७.
खेळ मांडियला गोल्हात शिखरीं । अर्थ चंद्रावरी शेखी याचा ॥१॥
चोवीस त्या गुंफा रुद्रलिंगीं नांदे । अभेद तो वेद बोले तेथें ॥२॥
तीही अक्षरांच्या वाटेच्या सेजारीं । सोळा चंद्र नारी भेदाभेद ॥३॥
सूर्य एकवीस शोभती चहूंकडे । खेळती उघडे संत तेथें ॥४॥

८.
दृष्टीचें देखणें तेचि रूपमाया । शब्द बोलावया ज्ञान झालें ॥१॥
ज्ञानांची जी जागा ह्लदयीं पाहावी । सत्रावीसी दावी खेळ तेथें ॥२॥
सत्रावी जीवन माया तिचे पोटीं । ज्ञान झाली दृष्टि देखावया ॥३॥
देखणें सिद्धांत बोलणें वेदांत । शब्द तोचि हेत सत्रावीचा ॥४॥
नाद आणि भेद देखणेम सिद्धांत । बोलणें वेदांत हेंचि दोनी ॥५॥
हेत तो अहंकार दोहीतें नाचवी । अविद्येसी दावी निजसुरा ॥६॥
नामा ह्मणे सिद्ध देखणें हा जन्म । डोळ्या माजीं वर्म बोलिलें तें ॥७॥

९.
अंत:करणीं विष्णु तोचि आत्मा असे । चंद्रमा भासे मन तेंची ॥१॥
बुद्धि ब्रह्मदेव चित्त नारायण । अहंकार जाण रुद्र-रूप ॥२॥
ज्ञान आ मे पांच ज्ञानीं ओळखावे । पांच ते पाहावे कर्म-स्थानीं ॥३॥
नामा ह्मणे कैसें दाखऊं उघडें । वाटतसे कोडें मज आतां ॥४॥

१०.
षड्‍चक्र भेदोनी जातां उर्ध्वपंथें । ध्वनि अनुहात उमटे तेथें ॥१॥
तये ध्वनीमाजी मग्न होय मन । योगसिद्धि जाण कैसी घडे ॥२॥
तेही बोलंडितां सिद्धि आडव्या येती । घेऊनियां जाती आपुल्या पंथें ॥३॥
तेथें गुंतोनियां विचरती योगीजन । योगासी साधून काय होतें ॥४॥
आधिं तो साधितां कष्टाचे संभार । होय चकनाचूर शरीराचा ॥५॥
साधितीय पुढें ऐसीं विघ्नें येती । ठेऊनि मागुती फिरती मागें ॥६॥
वारियाची मोत कैसी बांधवेल । भलत्यासी सांगतां वाटेल हें लटिकें ॥७॥
नामा ह्मणे तुम्ही सोडो-नियां भक्ति । करितां नाना युक्ति मूर्खजन ॥८॥

११.
साधनाच्या माजी एक गजरातू । साधी त्यासी उजू होय पहा ॥१॥
नासिकाचें वारें कोंडोनियां प्राणें । उपराटें जाणें ऊर्ध्वपंथें ॥२॥
गुदस्थानीं टांच देऊनियां जाण । कासावीस प्राण होती पहा ॥३॥
गोल्हाट भेदिसा कोल्हाटीच नाहीं । विठोबाची ग्वाही नामा ह्मणे ॥४॥

१२.
त्रिकूट शिखरावरी पाहे पां नवल । परी अखंडित धार वर्षे अमृताची ॥१॥
त्रिवेणीसंगमीं गगन निर्मळ वाहे । तेथें स्नान करूं जाय आनंदमय ॥२॥
गुरुमुखे स्नान करी परब्रह्मीं लक्ष धरी । अनुहात ध्वनि थोरी नाद गर्जे ॥३॥
उन्मनीं जागृति गोल्हाट मंडळा जाय । तेथुनी निराळें पाहे निजतत्त्व ॥४॥
विष्णु-दास नामा ह्मणे अनुभवी तोचि जाणे। आह्मी गुरुखुणें वर्ततसों ॥५॥

१३.
मायेसी रुसलें भावासी त्यागिलें । जाऊनि राहिलें काकापासीं ॥१॥
काकी मुख दावा काकी मुख दावा । काकी मुख दावा बाईयांनो ॥२॥
काकीचें श्रीमुख गोरक्षा लाधलें । काकीनें पुसिलें गोरक्षासी ॥३॥
नामा ह्मणे आह्मां काकी पैं वोळली । सत्रावी दिधली दोहावया ॥४॥

१४.
मुंगीस तो मार्गु सांपडे गोडीचा । योगीचा लक्षीचा ज्ञान ज्योती ॥१॥
तरीच ओळखीजे केशवचरण । त्या जन्ममरण मग कैंचें ॥२॥
मत्स्य नानापरी क्रीडा खेळे जळीं । आनंदकल्लोळीं योगीराय ॥३॥
नामा म्हणे तोचि केशव जाणता । तया नाहीम व्यथा गर्भवासु ॥४॥

१५.
पृथ्वी माजी पाहतां नाहीं म्यां देखिला । हस्तिसी उडवील ऐसा कोण्हीं ॥१॥
शोधितां शोधितां आलों पंढरीसी । तेथें ज्ञानोबासी देखियेलें ॥२॥
मोक्षमार्गीं देवें हा गजरात बांधला । तो ज्ञानी उडाला गोल्हाटासी ॥३॥
पृथ्वीमाजी पाहातां ज्ञानीच कोल्हाटी । ढिसाळ हे दृष्टि तृणप्राय ॥४॥
उडोनियां तेणें दर्शन घेतलें । हस्तीसी जिंकिलें ज्ञानदेवें ॥५॥
याचिया इशाळे करील जो मूर्ख । पाहूनियां दु:ख कष्टी होय ॥६॥
धन्य ज्ञानदेव योग साधू-नियां । भक्ति आचरोनियां दावी लोकां ॥७॥
नामा म्हणे सर्व खटपट सांडोनि । पांडुरंग मनीं भावें ध्यावा ॥८॥


संत नामदेव गाथा ९ – हरिश्चंद्रराजाचें चरित्र अभंग १

सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । स्वप्नीं हें समग्र दिलें राज्य ॥१॥
ब्राह्मणासी सुवर्ण औटभार । संकल्प हा त्वरें सोडियेला ॥२॥
जागृतीमाजी येऊनि ब्राह्मण । मागती सुवर्ण राजयासी ॥३॥
वंदूनि चरण राजा बोले त्यासी । चला आश्रमासि स्वामि आतां ॥४॥
समारंभें रूपें घेऊनि ब्राह्मण । अयोध्येकारणें आले तेव्हां ॥५॥
राजद्वारापाशीं येऊनि ब्राह्मण । मागत सुवर्ण राजयासी ॥६॥
भांडारियासी आज्ञा करी हरिश्चंद्र । आणा वेगीं त्वरें सुवर्ण हें ॥७॥
ऐकूनियां शब्द क्रोधें तो ब्राह्मण । करीत ताडण राजियासी ॥८॥
माझें मज देसी काय समजोनि । विचार हा मनीं कैसा केला ॥९॥
वंदूनि चरण बोले हरिश्चंद्र । कृपेचे सागर स्वामी तुम्ही ॥१०॥
कृपा करुनियां केले हें सावध । करा अपराध क्षमा माझे ॥११॥
तारामती त्यासी करी विनवणी । धरूनियां वेणी मारी तिसी ॥१२॥
रोहिदास बोले वंदूनि चरण । ऐकीं विज्ञापना एक माझी ॥१३॥
स्वामीपाशीं मी तों रहातों गहाण । देऊनि सुवर्ण जाऊं आम्ही ॥१४॥
राजा बोले स्वामी द्यावी जी अवधि । तुम्ही कृपानिधि महाराजा ॥१५॥
नवखंडा वेगळी असे वाराणसी । विकूनि देहासी देऊं आम्ही ॥१६॥
बोलावूनि मंत्री सांगे हरिश्चंद्र । करा कारभार स्वामीपाशीं ॥१७॥
स्वामी सांगतील तेंच करा मान्य । कार्य विचारूनि करीत जावें ॥१८॥
आह्मी जातों आलां कृपा असों द्यावी । सकळां सांगावी विनंति माझी ॥१९॥
ठेवूनियां सर्व अलंकार भूषण । झालीं तिघेजण मार्गस्थही ॥२०॥
राजा हरिश्चंद्र मागें तारामती । चिमणीही मूर्ति रोहिदास ॥२१॥
पाहूनियां लोक करिताती शोक । पशुपक्षादिक सर्व तेही ॥२२॥
कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । कां आम्हां सर्वत्रां मोकलीसी ॥२३॥
लेंकुराचेपरी केलासे सांभाळ । मातेविण बाळ राहे कैसें ॥२४॥
लागेल तें द्रव्य घेईं आह्मापाशीं । देईं या विप्रासी महाराजा ॥२५॥
येती काकुळती करिती नमस्कार । नको तूं अंतर देऊं आम्हां ॥२६॥
विप्रासी लोक येती काकुळती । देईं हा नृपति आम्हापासीं ॥२७॥
द्विगुणी सुवर्ण देतों तुज आतां । सोडीं कृपावंता हरिश्चंद्रा ॥२८॥
स्वामी तुम्ही करा राज्यकारभार । ठेवा हरिश्चंद्र आम्हापाशीं ॥२९॥
नका करूं गाईवत्सा ताडातोडी । येती घडोघडी काकुळती ॥३०॥
ऐकोनियां बोले क्रोधें तो ब्राम्हण । जा राजा त्वरेनें येथूनियां ॥३१॥
राजियानें केली सर्वां विनवणी । निघाला तेथूनि हरिश्चंद्र ॥३२॥
आदित्यासी तेव्हां सांगे विश्वामित्र । तपा तुम्ही तीव्र सोळा कळा ॥३३॥
वरूणासी सांगे आटवावें पाणी । जळशोष मेदिनी पाडियेला ॥३४॥
वायुलागीं सांगे नका येऊं येथें । जात तया पंथें हरिश्चंद्र ॥३५॥
वृक्ष हे जळाले पाषाण उलले । त्या पंथें चालिलीं तिघेजण ॥३६॥
शरीरें तिघांचीं करपोनियां गेलीं । तृषा ते लागली रोहिदासा ॥३७॥
रोहिदास बोले माते दे जीवन । कासावीस प्राण होतो माझा ॥३८॥
तशामध्यें वृद्ध ब्राम्हण होऊनि । आला तया वनीं विश्वामित्र ॥३९॥
येऊमि राजास आशिर्वाद केला । सत्त्वधीर मला राजया तूं ॥४०॥
आम्हीं तिघेजण पुत्न आणि दारा । जात हरिश्चंदा भिक्षेलागीं ॥४१॥
उष्णकाळदीन पायां आले फोड । देई चर्मजोडे तिघांजणा ॥४२॥
ऐकतांचि ऐसें केलें त्या अर्पण । झालीं तिघेजण मार्गस्थही ॥४३॥
पांया आले फोड वाहती रुधिर । राजा हरिश्चंद्र चालतांना ॥४४॥
रोहिदास बोले ताता पाजीं पाणी । बोलतां वदनीं शब्द नये ॥४५॥
कडे घेऊनियां रोहिदास बाळ । धुंडितसे जळ वनामाजी ॥४६॥
विश्वामित्रें वनीं लाविला वणवा । चुकली हे तेव्हां तारामती ॥४७॥
घाबरी ते झाली पाहे वेडयावाणी । न दिसे नयनीं हरिश्चंद्र ॥४८॥
कृपेच्या सागरा राजा हरिश्चंद्रा । कां मज उदारा मोकलीलें ॥४९॥
रोहिदास बाळ घेऊनि सांगातें । गेलां कोण्या पंथें महाराजा ॥५०॥
तृषाक्रांत झालें होतें माझें ताम्हें । पाजिलें जिवन कोठें त्यासी ॥५१॥
तारामती शोक करी त्या वनांत । आले अकस्मात्‌ । विश्वामित्र ॥५२॥
कोणीची तूं कांता फिरसी या वनीं । बोले त्यालागुनी तारामती ॥५३॥
भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । चुकले भूपाळ बनामाजी ॥५४॥
येरु बोले दोघे नेले आहाळोनी । प्रेतें तिसी दोन्ही दाखविलीं ॥५५॥
पाहूनियां प्रेते पिटीलें वदन । आक्रोशें रुदन करी तेव्ही ॥५६॥
कां हो स्वामी मज सांडियेलें येथें । धरीयला पंथ वैकुंठींचा ॥५७॥
रोहिदास बाळ सांगातें घेउनी । मजला कां वगीं सांडियेलें ॥५८॥
सकुमार शरीर पंथीं झाले क्लेश । ह्मणोनी उदास झालां तुम्ही ॥५९॥
तशामध्यें तुम्हां साह्य झजला अग्नि । माझें काम स्मरण विसरलां ॥६०॥
सवें असे बाळ हळू चाला पंथ । येतें मी धांवत मागें आतां ॥६१॥
रोहिदास बाळ घेतला ओसंगा । कांहो पांडुरंगा ऐसें केलें ॥६२॥
कांहो चुकविलें माझिया पाडसा । पाहूं राजहंसा कोठें आतां ॥६३॥
तृषाक्रांत झालें होतें माझें तान्हें । मिळालें जीवन नाहीं त्यासी ॥६४॥
पतिपुत्र दोघे गेले निजधामा । भेट मेघ:शामा करीं माझी ॥६५॥
वनीं ऐसा शोक करी तारामती । गेला तो गभस्ती अस्तमाना ॥६६॥
विश्वामित्न म्हणे ऐक आतां बाई । होणार तें कांहीं न चुकेची ॥६७॥
देईं यांसी अग्नी झालीसे यामिनी । भय या काननीं श्वापदाचें ॥६८॥
बोले तारामती ऐका तुम्ही ताता । पतिसवें आतां अग्नि द्यावा ॥६९॥
येरु म्हणे तुझा पति आहे ऋणी । ऐकिलें श्रवणीं आम्हीं ऐसें ॥७०॥
पतीचें जें ऋण फेडी प्रतिव्रता । गोष्ट हे अनंता मानता हे ॥७१॥
बोले तारामती ऋणी तिघेजण । मागुती हें येणें जन्मालागीं ॥७२॥
ताता तुम्ही आतां अग्नि द्यावा त्वरें । करुनी अव्हेर गेला तेव्हां ॥७३॥
दोन प्रहर रात्र झालीसे यामिनी । व्याघ्र हा होउनी आला तेथें ॥७४॥
ओढी रोहिदासा करुनी गर्जना । आली ते मूर्च्छना सतीलागी ॥७५॥
गेली ती यामिनी अरुणोदय झाला । अकस्मात्‌ आला हरिश्चंद्र ॥७६॥
सवें असे त्याच्या रोहिदास बाळ । भेटला वेल्हाळ मातेलागीं ॥७७॥
तिघांसही तेव्हां झालें समाधान । वसिष्ठ चरण आठविती ॥७८॥
एकामागें एक चालताती पंथ । देखियलें तेथें अन्नछत्न ॥७९॥
रम्य स्थळ जागा अपूर्व ते फार । सुंगध तरुवर डोलताती ॥८०॥
विश्वामित्नें तेथें केलेंसे निर्माण । होताती भोजन ब्राह्मणाचें ॥८१॥
त्याची पंथें जाण राजा हरिश्चंद्र । येऊनियां विप्र बोले त्यासी ॥८२॥
चला महाराजा माझ्या आश्रमासी । करी भोजनासी आवडीनें ॥८३॥
राजा म्हणे नव्हे आमुचा हा धर्म । नका करुं श्रम तुम्ही आतां ॥८४॥
वंदुनी चरण पुढें चाले पंथ । आली अकस्मात्‌ तारामती ॥८५॥
विश्वामित्रें तेथें केलेंसे विचित्र । मायेचा हरिश्चंद्र निर्मियेला ॥८६॥
आणिक प्रकारें विलास भोगीत । असे हर्षयुक्त आनंदानें ॥८७॥
येऊनियां विप्र बोले सतीलागीं । चला बाई वेगीं आश्रमासी ॥८८॥
अन्नोदक सेवीं रुचेल हें तूतें । असे तुझा कांत तेथें बाई ॥८९॥
बोलावितो तुज पाहे विलोकुनी । देखे त्या नयनीं तारामती ॥९०॥
स्मरूनियां तेव्हां वसिष्ठ चरणा । कां गा नारायणा ऐसें केलें ॥९१॥
पूर्वेचा हा सूर्य पश्चिमे उगवेल । समुद्र सांडील मर्यादेसी ॥९२॥
ऐसेंही घडेल कळे कोणकाळें । परी सत्वासी न ढळे हरिश्चंद्र ॥९३॥
दीपक हा कैसा अंधारीं पडला । वायुसुत भ्याला भुतालागीं ॥९४॥
ऐसें सांगा कोठें झालें विपरीत । तैसा नव्हे सुत शिबीचा हा ॥९५॥
तैसा हरिश्चंद्र नोहे हा निश्चित । चाले पुढें पंथ तारामती ॥९६॥
ताता तुम्ही आतां नका करूं श्रम । नोहे ऐसा धर्म आमुचा हा ॥९७॥
रोहिदास बाळ आला तयेवेळीं । ऋषि त्या जवळी पातलासे ॥९८॥
हातीं घेऊनियां उदकाची झारी । प्राशन तूं करीं बाळा आतां ॥९९॥
तुझी मातापिता असे अन्नछत्रीं । बोलाविती नेत्नीं पाहें आतां ॥१००॥
पाहूनियां त्यानें विस्मय तो केला । अगस्ती ग्रासिला समुद्रानें ॥१०१॥
ऐसें कोठें नाहीं झालें विपरीत । दोघेंहिनिश्चित नोहेती हे ॥१०२॥
आमुचा हा धर्म नोहे ऐसा स्वामी । कृपा आतां तुम्ही असों द्यावी ॥१०३॥
विस्मय तो ऋषि करितो मनांत । नाहीं सिद्धि जात पण माझा ॥१०४॥
मार्ग हा क्रमितां तिघां भेट झाली । वार्ता सांगितली एकमेकां ॥१०५॥
हरिश्चंद्र बोले नेणें मी हें कांहीं । लक्ष असे पायीं वसिष्ठाच्या ॥१०६॥
पुढें देखियलें वोस तें नगर । असे भयंकर पिशाच्य तें ॥१०७॥
तेथें स्मरूनियां वसिष्ठ चरण । ध्यानीं नारायण आठविती ॥१०८॥
पुढें देखियली नगर वाराणसी । वंद्य सर्वासी ते देवादिकां ॥१०९॥
भूमीवरी शिवें आणिलें कैलास । करिताती वास पूण्यप्राणी ॥११०॥
काळबहिरवाची तेथें कोतवाली । भय नाहीं बोली यमाची ते ॥१११॥
पवित्र हें वाहे भागिरथीचें जल । हरती सकळ दोष सर्व ॥११२॥
देखोनि हरिश्चंद्रें केला नमस्कार । पोहोंचलें तें तीर भागिरथीचें ॥११३॥
तिघांजणीं तेव्हां केलें तेथें स्नान । आला तो ब्राम्हाण तेचि वेळां ॥११४॥
धुंडितांना तुम्हां मोठा झाला श्रम । कासयासी धर्म केला ऐसा ॥११५॥
हरिश्चंद्रें केलें त्यासी दंडवत । असावें सांगात स्वामी आतां ॥११६॥
तिघांजणीं माथां बांधोनियां तृण । बैसलीं जाऊन हाटवलीं ॥११७॥
पाहती सकळ नगरीचे लोक । अयोध्येचा नृप हरिश्चंद्र ॥११८॥
सकुमार त्याची कांता तारामती । सगुणही मूर्ति रोहिदास ॥११९॥
ब्राम्हीणासी यानें राज्य दिलें दान । राहिलें सुवर्ण याचें याचें कांहीं ॥१२०॥
म्हणोनियां उभीं केलीं ही बाजारी । प्रारब्धाची दोरी पाहें कैसी ॥१२१॥
विकावया आणिली लावण्य वनिता । समजली वार्ता वेश्येलागीं ॥१२२॥
येऊनि ब्राम्हाणा पुसे तिचें मोल । सुवर्ण एक तुळ घेऊं इचें ॥१२३॥
मानली हे गोष्टी वेश्येचिया चित्ता । घेतली हे आतां तारामती ॥१२४॥
चाल बाई आतां माझिये सदनीं । होशील स्वामिनी सर्वस्वीं तूं ॥१२५॥
आवडे तितुके लेईं अलंकार । विलास समग्र भोगीं आतां ॥१२६॥
देखूनि लावण्य आतां तुझें रूप । वश्य होईल भूप नगरीचा ॥१२७॥
हरलें हें दैन्य आतां तुझें बाई । नाहीं तुज कांहीं भय चिंता ॥१२८॥
ऐकोनियां शब्द तेव्हां तारामती । येती काकुळती विप्रालागीं ॥१२९॥
नका इसी देऊं मज महाराजा ।  नोहे धर्म माझा ऐसा ताता ॥१३०॥
तथापिही तुम्ही दिलें इचे हातीं । प्राण हा निगुती देईन मी ॥१३१॥
करा उपकार विकावें आणिका । तुम्ही मायबापा कृपावंता ॥१३२॥
वेश्येचें हें द्रव्य दिलें तें माघारें । आला एक विप्र घ्यावयासी ॥१३३॥
दशग्रंथी निपुण षडशास्त्रीं प्रवीण । धर्म परायण महाराज ॥१३४॥
काळ हें कौशिक नाम तयाप्रती । त्यानें तारामती घेतली हे ॥१३५॥
पाकशाळेमाजी करावया अन्न । घेतली अन्नपूर्णा ब्राम्हाणानें ॥१३६॥
धर्माची तूं कन्या माझिये तूं बाई । सुखें आतां राहीं अन्नछत्रीं ॥१३७॥
तारामती करी दोघां नमस्कार । कृपा दिनावर असों द्यावी ॥१३८॥
विलोकिलें तेव्हां नृपाचें वदन । कधीं हे चरण पाहीन आतां ॥१३९॥
मुक्ताफळ झालें समुद्राचे पोटीं । परी झाली तुटी प्राक्तनानें ॥१४०॥
विचित्र हा असे प्रारब्धाचा खेळ । काय तळमळ करूनियां ॥१४१॥
येतें स्वामी आतां कृपा असों द्यावी । सांड न करावी पुन्हा माझी ॥१४२॥
दीपक प्रकाश नोहे हा वेगळा । तैसी मी दयाळा जडलें अंगीं ॥१४३॥
हेंचि जन्मोजन्मीं देगा चक्रपाणी । चालिली तेथूनि तारामती ॥१४४॥
रोहिदास बाळ धांवे तिचे मागें । आवरीत अंगें राजा त्यासी ॥१४५॥
घेऊनियां येतों मातेचें दरुशन । विलोकी वदन तारामती ॥१४६॥
प्रेमपान्हा तेव्हां आला तिचे स्तनीं । पाजी त्यालागुर्नी बैसूनियां ॥१४७॥
पाहुनी सर्वांचें सद्नद अंतर । बोलतां उत्तर नये वाचे ॥१४८॥
नको करूं देवा मायबाळा तुटी । पाहावेना द्दष्टी कोणासी हें ॥१४९॥
काळ कौशिकासी बोले तारामती । ऐकावी विनंति एक ताता ॥१०५॥
घ्यावा रोहिदस करील हा सेवा । तुम्ही कृपार्णवा महाराजा ॥१५१॥
ऐकोनियां ऐसें विप्रासी तो बोले । काय याचें मोल सांगा स्वामी ॥१५२॥
अर्ध तुक हें घेऊं येचि क्षणीं । दिलें त्यालागुनी कौशिकानें ॥१५३॥
तारामती आणि रोहिदास बाळा । घेउनी दयाळ गेला तेव्हां ॥१५४॥
हाटवतीं उभा असे हरिश्चंद्र । आला तो महार वीरबाहू ॥१५५॥
ब्राह्मणासी पुसे काय याचें मोल । हेम दोन मोल घेऊं याचें ॥१५६॥
मानली हे गोष्टी डोंबाचिया चित्ता । घेतला हा आतां हरिश्चंद्र ॥१५७॥
विप्राचे चरणीं नृप ठेवी माथा । कृपा दयावंता असों द्यावी ॥१५८॥
घेउनी हरिश्चंद्र गेला आश्रमासी । सांगतो कांतेसी वीरवाहू ॥१५९॥
सांगा यासी काम आणिला चाकर । पाहुनी उत्तर करी कांता ॥१६०॥
कृश सकुमार आणिला कासया । काय द्रव्य वायां जात होतें ॥१६१॥
सांगती त्या काम डोंबाच्या कामिनी । जाय आणीं पाणी हरिश्चंद्रा ॥१६२॥
त्वरें करूनियां भरीं हे रांजण । दिला उचलुनी कुंभ हातीं ॥१६३॥
जळ आणावया गेला हरिश्चंद्र । मागें विश्वामित्रें काय केलें ॥१६४॥
छिद्र पाडियेलें रांजणाचे तळीं । कुंभ तयेवेळीं फुटिन्नला ॥१६५॥
ताडण करिती डोंबाच्या कामिनी । दिला उचलोनी दुजा कुंभ ॥१६६॥
दोन प्रहर त्यानें वाहिलें उदका । नसे थेंब एक रांजणांत ॥१६७॥
वीरबाहुनें त्या केलेंसे ताडण । दिलें तेव्हां धान्य कोरडें तें ॥१६८॥
दळूं कांडूं लागे करी सर्व धंदा । ध्यानीं त्या गोविंदा आठवीत ॥१६९॥
भागिरथीचे तीरीं करीत स्वयंपाक । आला तेव्हां एक विप्र तेथें ॥१७०॥
घालीं महाराजा मजा आतां अन्न । बैसला येऊन त्याजपाशीं ॥१७१॥
हरोश्चंद्रें त्यासी केला नमस्कार । बैसा क्षणभर स्वामी येथें ॥१७२॥
हरिश्चंद्रें केले दोन भाग अन्न । ब्राह्मणाकारणें दिला एक ॥१७३॥
खाऊनियां अन्न पाहे दुजाकडे । ठेवी तयापुढें हरिश्चंद्र ॥१७४॥
नित्यानित्य तेथें जेवीतसे विप्र । घडे निराहार हरिश्चंद्रा ॥१७५॥
शरीर झालें कृश अंगीं नसे शक्ति । तयासि बोलती वीरबाहू ॥१७६॥
स्मशानीं रक्षण करीं तूं हें आतां । अवश्य म्हणे ताता हरिश्चंद्र ॥१७७॥
म्हणसणखांबा नाम ठेविलें तयासी । राहे दिवसनिशीं स्मशानीं तो ॥१७८॥
द्रव्यावांचोनियां जाळों न देईं प्रेत । अहोरात्र ध्यात देवाजीशी ॥१७९॥
काळकौशिकाचे घरीं तरामती । वाढीतसे पंक्ति ब्राम्हाणींच्या ॥१८०॥
उत्तम स्वादिष्ट पवित्र तें अन्न । जेविती ब्राम्हाण आवडी प्रेमें ॥१८१॥
रोहिदास करी कौशिकाची सेवा । तुळसी पुष्पें दुर्वा आणितसे ॥१८२॥
फुलें तोडितसे रोहिदास बाळ । दंश केला व्याळें त्याजलागीं ॥१८३॥
सांगातीयांस तेव्हां बोले रोहिदास । सांगावा मातेस नमस्कार ॥१८४॥
नाशिवंत देह गेलासे विलया । नको शोक वांयां करूं याचा ॥१८५॥
वारंवार तिच्या संबोखावें मना । तुम्हांसी प्रार्थना हेचि माझी ॥१८६॥
ऐकोनि सांगाती करिती रुदन । सोडियेला प्राण रोहिदासें ॥१८७॥
पाकशाळेमाजी होती त्याची माता । श्रुत केली वार्ता सांगात्यांनीं ॥१८८॥
ऐकोनियां ऐसें चिंतावली मनीं । कांहो चक्रपाणी ऐसें केलें ॥१८९॥
आटोपोनि सर्व तेथील हा धंदा । निघाली हे शोधा बाळकाच्या ॥१९०॥
झालीसे यामिनी कांहीं न दिसे वाट । मोडताती कांटे पायांलागीं ॥१९१॥
नाहीं त्याची शुद्ध चालली धांवतां । लागलें तें प्रेत पायां तिच्या ॥१९२॥
ओळखूनि तिनें पिटिलें कपाळ । आलंगिला बाळ ह्रदयीं तिनें ॥१९३॥
दर्दरुनी तिचे स्तनीं आला पान्हा पाजूं आतां कोणा रोहिदासा ॥१९४॥
सखया रोहिदासा कां बा रुसलासी । टाकूनि गेलासि मजलागीं ॥१९५॥
पाहात मी होतें नित्य तुझें मुख । विसरलें दु:ख भ्रताराचें ॥१९६॥
घडी घडी माझा हरिसी तूं श्रम । फुटकें हें कर्म माझें देवा ॥१९७॥
काय घडले दोष कीं दैवाची मी हीन । हरपलीं रत्नें दोन माझीं ॥१९८॥
कंठूं आतां काळ कवणाचिये बळें । जाहलें हें निर्मूळ वंशाचें कीं ॥१९९॥
आकोशें करून ह्रदय पिटित । आले अकस्मात्‌ विश्वामित्र ॥२००॥
सांगा बाई कैसें झालें वर्तमान । केलें हें श्रवण त्याजलागीं ॥२०१॥
नको करूं बाई शोक कांहीं आतां । ही समजेल वार्ता आतां डोंबा ॥२०२॥
द्रव्याविण तो हा जाळों नेदी प्रेत । नको करूं मात प्रगट ही ॥२०३॥
आणितों साहित्य अग्नि दे झडकरी । आली तेव्हां तिरीं भागिरथीच्या ॥२०४॥
पेटवूनि अग्नि करी ते रुदन । आला तो धांवून म्हाअणखांबा ॥२०५॥
न देतांना द्रव्य जाळिसी तूं प्रेत । मारीतसे हातें तिजलागीं ॥२०६॥
विखरूनि त्यानें दिला तेव्हां अग्नि । घालुनी जीवन विझविला ॥२०७॥
प्रेत घेऊनियां रडे तारामती । प्रारब्धाची गती कैसी देवा ॥२०८॥
सत्त्वाचा सागर राजा हरिश्चंद्र । त्याचा कीं हा पुत्र रोहिदास ॥२०९॥
अंतकाळीं यास ठाव अग्नि नेदी । स्पर्शला येऊन अनामिक ॥२१०॥
काय ऐसें कर्मीं लिहिलें विधीनें । झाल्या तिघां तीन वाटा देवा ॥२११॥
भ्रतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे । दु:ख कोणापुढें सांगूं आतां ॥२१२॥
ऐकोनी हरिश्चंद्र खोंचला तो मनीं । आला तो धांवुनी तिजपाशीं ॥२१३॥
सांगे वर्तमान बोले गहिंवरून । करी निवेदन तारामती ॥२१४॥
सांगितला त्यासी सकळ वृत्तांत । ह्रदय पिटीत हरिश्चंद्र ॥२१५॥
येरी म्हाणे कोण सांग तूं हें आतां । श्रुत केली वार्ता मुळींहुनी ॥२१६॥
तुम्हां दोघां दिल्हें कौशिकाचे घरीं । दास्यत्व मी करीं डोंबाचें हें ॥२१७॥
म्हासणखांबा नांव ठेविलें हें त्यानें । करितों रक्षण म्हासणामाजी ॥२१८॥
अद्याप सेविलें नाहीं म्यां हें अन्न । शरीर कृश तेणें झालें माझें ॥२१९॥
ऐकोनियां दु:ख पडली विकळ । घेतला तो बाळ हरिश्चंद्र ॥२२०॥
सख्या रोहिदसा कं बा रुसलासी । टाकूनि गेलासी मजलागीं ॥२२१॥
मजपाशीं तुझें गुंतलेंसे मन । म्हाणुनी धांवून आलासी तूं ॥२२२॥
अंतकाळीं केल्या तिघांसही भेटी । दैवाचीं करंटीं आम्ही दोघें ॥२२३॥
कैसें झालें माझें ह्रदय पाषाण । दिलें म्यां लोटून तुजलागीं ॥२२४॥
जळोत हे हात जावो माझा प्राण । व्यर्थ हा वांचून काय आंता ॥२२५॥
आक्रोशें करुनी ह्रदय पिटीत । त्यासी संबोखीत तारामती ॥२२६॥
नका स्वामी शोक करूं कांहीं आतां । होतें जें संचिता झालें माझें ॥२२७॥
धन्यापाशीं आतां आज्ञा घ्या मागून । द्यावयासी अग्नि महाराजा ॥२२८॥
आज्ञा मागावया गेला हरिश्चंद्र । मागें विश्वामित्न काय करी ॥२२९॥
एकली तूं येथें लावीचें हें भय । देउळांत राहें क्षणभरी ॥२३०॥
ऐकोनि देउळीं गेली तारामती । निद्रा तयेप्रती लागलीसे ॥२३१॥
विश्वामित्र तेव्हां आले देउळांत । काढोनियां आर्त बाळकाची ॥२३२॥
रक्त मांस तिच्या लाविलें मुखासी । सांगत लोकां सि लाव आली ॥२३३॥
बाळ भक्षितसे देउळाभीतरीं । देखोनियं दुरी पळालों मी ॥२३४॥
धीट धीट लोक आंत प्रवेशोनि । बांधिली ते क्षणीं तारामती ॥२३५॥
श्रुत केली वार्ता गांवींच्या राजाला । तो म्हणे लावेला जीवें मारा ॥२३६॥
बोलाविला त्यानेम वीरबाहू डोंब । सांगतसे अंगें राजा त्यासी ॥२३७॥
चालविली तेव्हां भागिरथीचे तीरीं । प्राहती नरनारी द्दष्टीं तेव्हां ॥२३८॥
काळकौशिकाचे घरीं हे देखियेली । नाहीं समजली तेव्हां कोणा ॥२३९॥
एकमेकां ऐसें करिती उत्तर । आला तो महार वीरबाहु ॥२४०॥
,म्हसणखांबा त्यानें बोलाविला त्वरें । छेदीं इचें शिर आज्ञा केली ॥२४१॥
ओळखिली त्यानें तेव्हां तारामती । प्रारब्धाची गति कैसी देवा ॥२४२॥
घालियेलें तिसी भागिरथीचें स्नान । करीं तुं स्मरण देवाजीचें ॥२४३॥
काय इच्छा असेल माग तुझे मनीं । पुरवील चक्रपाणी तुझी आशा ॥२४४॥
स्वर्गीं सुरव्र बैसोनी विमानीं । पाहती नयनीं कवतुक ॥२४५॥
भ्रतार हरिश्चंद्र रोहिदास बाळ । मागता स्नेहाळ विश्वामित्न ॥२४६॥
श्रीगुरु वसिष्ठ कृपेचा सागर । असो त्याचा कर मस्तकीं हा ॥२४७॥
होंचि जन्मोजन्मीं दे गा नारायणा । नाहीं हे वास्ना आणिकांची ॥२४८॥
तारामती ह्मणे एक्या घायें हाणीं । लक्ष हें चरणीं वसिष्ठांच्या ॥२४९॥
उचलितां कर आले नारायण । धरी आलिंगून हरिश्चंद्रा ॥२५०॥
पितांबरधारि सगुण मेघ:शाम । योग्याचा विश्राम तोचि बाप ॥२५१॥
त्यानें कृपाद्दष्ठि विलोकिलें तिघां । पुढें असे उभा रोहिदास ॥२५२॥
विश्वामित्न तेव्हां संतोपले चित्तीं । आलिंगिलें प्रीति तिघांजणां ॥२५३॥
पुष्पवृष्टी केली स्वर्गीं सुरवरांनीं । धन्य त्रिभुवनीं कीर्ति ज्याची ॥२५४॥
श्रीगुरु वसिष्ठ आले तयेवेळां । सवें असे मेळा ऋषींचा तो ॥२५५॥
त्यानें आइलंगिलें तिघां कृपाद्दष्टि । धेनुवत्सा भेटी झाली जैसी ॥२५६॥
तिघांजणीं केला तेव्हां नमस्कार । प्रेम अश्रु नीर वाहे डोळां ॥२५७॥
ह्रदयी धरुनी आलिंगिलीं त्यानें । मायबाळ तान्हें न विसंबे ॥२५८॥
काळ तो कौशिक वीरबाहु डोंब । विमानीं श्रीरंगें बैसविलें ॥२५९॥
कोटी वरुषें तप विश्वामित्रें केलें । तें समग्र अर्पिलें हरिश्चंद्रा ॥२६०॥
समारंभें नेली अयोध्येसी तिघें । बैसविलीं अंगें राज्यास्थानीं ॥२६१॥
साठसह्स्र वरुषें राज्य करा सुखें । दिला हा स्वमुखें आशिर्वाद ॥२६२॥
सत्त्वधीर राजा सत्त्वाच्या ह्या कीर्ति । ऐकतांचि जाती दोष भंगा ॥२६३॥
नामदेव यासी लागली ती गोडी । वर्णितो आवडी गुण त्यांचे ॥२६४॥


संत नामदेव गाथा १० – श्रीयाळ चरित्र अभंग १

सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी ॥१॥
पतिव्रता कांता नाम तें चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥
कैलासीं नारद वर्णी यांची कीर्ति । सत्व पाह्याप्रति आले शिव ॥३॥
जाहालासे अतित रूप तें कुश्चळ । रक्त पू हा गळे सर्वांगासा ॥४॥
आला तो अतित श्रीयाळाचे घरीं । नमस्कार करी राजा त्यासी ॥५॥
येऊनि चांगुणा वंदिती चरण । बहुत सन्मान केला त्याचा ॥६॥
उष्णोदकें त्यासी घातियलें स्नान । केलेंसे पूजन अतिताचें ॥७॥
म्हणे महाराजा करावें भोजन । पतीता पवन करा तुम्ही ॥८॥
येरु म्हणे माझें शरीर हें रोगी । नरमांस वेगीं देईं मज ॥९॥
चांगुणा ती म्हणे देतें माझें मांस । नये उपयोगास आमूचिया ॥१०॥
राज म्हणे माझें मांस मान्य करा । न लगे उदारा तुझें मज ॥११॥
पंच वरुषीं बाळ तुझा हा चिल्हाळ । मांस हें सकळ देईं त्याचें ॥१२॥
पाक हा करुनी घालीं मज आतां । खेद काय चिंता करूं नये ॥१३॥
करितां हा खेद जाईन उठोनी । सत्वाची हे हानी करूनियां ॥१४॥
तेव्हां ते चांगुणा म्हणे अतितातें । करितें पाकातें सिद्ध आतां ॥१५॥
बोलविला तेव्हां तिनें तो चिल्हाळ । वचन कोमळ बोले त्यासी ॥१६॥
तुज हा अतित आलासे पाहुन । मागतो भोजन तुजलागीं ॥१७॥
होईं बा उदार अर्पी हें शरीर । संतोषला वर पार्वतीचा ॥१८॥
ऐकोनी चिलया बोले मातेप्रती । संतोष हा चित्तीं माझे असे ॥१९॥
नाशवंत देह नाहीं राहणार । सार्थक समग्र करीं याचें ॥२०॥
सांडीं हे ममता होईं तूं उदार । कैलासी शंकर संतोषेल ॥२१॥
घेऊनि चिलिया गेली पाकशाळे । कापियेलें बाळ चांगुणेनें ॥२२॥
शीर त्याचें तेव्हां ठेविलें झांकोन । शरिराचा तिनें पाक केला ॥२३॥
तेव्हां तो अतित बोले चांगुणेसी । वस्तु हे कार्याची ठेवियेली ॥२४॥
मीही आतां जातों आपुल्या आश्रमा । कासयासी श्रम करितेसी ॥२५॥
तुज हे ममता झालीसे उत्पन्न । वाहतसे आण चांगुणा ते ॥२६॥
म्हणे महाराजा सांगाल तें मान्य । वंदित चरण चांगुणा ते ॥२७॥
पाकामाजी घालीं शीर हें कांडोनी । रसिक गाय गाणीं आवडीनें ॥२८॥
चांगुणेनें शीर घातिलें उखळीं । ओंव्या ते वेल्हाळी गात असे ॥२९॥
सत्वधीर राजा स्वामी हा श्रीयाळ । धन्य त्याचा बाळ चिलया तूं ॥३०॥
अतिताच्या वेशें आला असे शिव । देखोनियां भाव द्दढ तुझा ॥३१॥
आवडीनें तुज ठेवितो उदरीं । पुण्याची सामोग्री मोठी तुझी ॥३२॥
माझे पोटीं तुवां घेतला अवतार । दाविलें चरित्र जगामाजी ॥३३॥
येऊनि वंशाचा केला त्वां उद्धार । मित्र केला वर पार्वतीचा ॥३४॥
तुझी माता मज म्हणती हे जन । पूर्वींचें हें पुण्य फळा आलें ॥३५॥
तुज हा प्रसन्न जाहला सदाशिव । मागसी वैभव देईल तो ॥३६॥
मज बाळा तुवां सांडियेलें येथें । कैलासींचा पंथ धरीयेला ॥३७॥
अतित गेलीया सांडीन मी प्राण । येईन धांवोन तुजमागें ॥३८॥
तुझी माजी भेटी होईल कैलासीं । सांग शिवापाशीं नमस्कार ॥३९॥
धैर्याचा उखळ वैराग्य मुसळ । घेतलें सबळ चांगुणेनें ॥४०॥
कांडून्यां शीर केला पाक तिनें । अतिताकारणें भोजनासी ॥४१॥
म्हणे महाराजा करावें भोजन । वंदित चरण चांगुणा ते ॥४२॥
येरु म्हणे बाई पात्रें वाढी तीन । पंक्ति यजमान बैसा तुम्हीं ॥४३॥
ऐकोनी श्रीयाळ सद्नद अंतरीं । जाला असे भारी मोठा तेव्हां ॥४४॥
तेव्हां ते चांगुणा म्हणे श्रीयाळासी । बैसावें पंक्तीसी स्वामी आतां ॥४५॥
नवमास बाळ ठेविला उदरीं । एक दिन भारी काय झाला ॥४६॥
अतिता संतोष होय ऐसें करा । मान्य गिरिजावर होईल तो ॥४७॥
सिद्ध झालीं तेव्हां दोघें भोजनासी । अतित तयासी पुसतसे ॥४८॥
काय तुम्हां आतां असे हो संतान । केलें शिवार्पण म्हणती ते ॥४९॥
निपुत्रिकाचे घरीं न घे मी हें अन्न । चालिला उठोन अतित हा ॥५०॥
श्रीयाळ चांगुणा वंदिती चरण । फुटकें प्राक्तन आमुचेंचि ॥५१॥
चिलयासारिखा गेला तोही सुत । विन्मुख अतित जातो तोही ॥५२॥
आतां कासयासी ठेवावा हा प्राण । करावा अर्पण शंकरासी ॥५३॥
एकोनियां ऐसें अतित तो भ्याला । चांगुणे पुत्राला बाहे आतां ॥५४॥
येईंबा चिलया धांव तूं त्वरीत । न जेवी अतित तुजवीण ॥५५॥
राखीं आतां सत्त्व येईं तूं धांवोनी । तेव्हां शूळपाणि प्रगटले ॥५६॥
पंचमुख अंगीं विभूत चर्चित । अर्धांगीं शोभत पार्वती ते ॥५७॥
मुगुटीं जयाचे शोभतसे गंगा । कोण वर्णी शोभा स्वरूपासी ॥५८॥
धांवतचि आला तेव्हां तो चिल्हाळा । आलिंगी स्नेहाळ सांभ त्यासी ॥५९॥
श्रीयाळ चांगुणा बैसवी विमानीं । बाळ राजस्थानीं स्थापियेला ॥६०॥
अखंड कैलासीं असे त्यांचा वास । धन्य तेचि दास सांभवाचे ॥६१॥
नामदेव त्याचे आठवीत गुण । करीत करीत कीर्तन प्रेमभावें ॥६२॥


संत नामदेव गाथा ११ – उपमन्यूचें चरित्र अभंग १

ऐका श्रोते सावधानता । सांगेन उपमन्युची कथा । एक्या भावें परिसतां । सायुज्यता पाविजे ॥१॥
बाळ तो लडिवाळ तान्हा । वाढे मातेचिया स्तन पान्हा । परि ते असे दुर्बळपणा । उपमन्यु नांव तयेचें ॥२॥
उपमन्यें मागितलें । कृष्णें तयासी काय दिधलें । तें सांगेन वहिलें । चित्त देउनी परियेसा ॥३॥
ब्राम्हणासी एक पुत्र झाला । पितयानें संतोप मानिला । थोर कष्टें वाढविला । तयाचें पुत्रपण फिटलें ॥४॥
बाळ जाहला जाणता । पितयासी उपजली दूधाची चिंता । दूधच ऐकिलें बोलतां । तेंचि मातेसी मागत ॥५॥
मग कर्डी कांडोनी जनकजननी । त्याचें केलें शुभ्रपाणी । बाहेर दूध म्हणउनी । वाटींत भात कालविला ॥६॥
तंव शेजारी ब्राम्हणानें श्राद्ध केलें । त्यानें त्या वाळकास जेवावयास नेलें । षड्रस पक्कान्ना वाढिलें । दूध क्षीर नाना परीचे ॥७॥
तयासी वाढिली दूध क्षीरी । बाळक जेविलें पोटभरी । पुसोनियां तये घरीं । माते मागूं जेवावया ॥८॥
गेला आपुलिया घरा प्रती । बाळ तो निद्रा करी रातीं । प्रात:काळीं भूक लागे मागुती । मागे दूधभात जेवावया ॥९॥
पुढती कर्डी वाटूनि जननी । त्याचें काढिलें शुभ्र पाणी । येतें टाकिलें थुंकोनी । माते धूध कालचें नव्हे ॥१०॥
बारे त्या समर्थाचे घरीं । देवें दिधलें दूध क्षीरी । आम्हां दुर्बळाचे घरीं । तें दूध कोठूनि मिळेल ॥११॥
कोठें आहे तो श्रीहरी । तो मज दावीं वो झडकरी । दूध मागेन निर्धारी । क्षूधा अंतरीं बहु पीडी ॥१२॥
देव्हारां श्रीहरिची मूर्ती । नेउनी दाखविली बाळाप्रती । बारे हा लक्ष्मीपति । दूध या प्रती मागावें ॥१३॥
बाळ खळ घेउनी बैसला तेथें । देवा दूध पोटभर दे मातें । मी कोठें जाऊ जेदी तूतें । दूध घेतल्यावांचोनी ॥१४॥
ऐसे तिघां तीन उपवास पडती । माता पिता चिंता करिती । लोकीं मिळोनी बहुतीं । उठवूं पाहती बाळकातें ॥१५॥
बाळा तुजकारणें । एकगाय देतों आणुन । येरु न मानी त्यांचे वचन । म्हणे देईल लक्ष्मीरमण मजलागीं ॥१६॥
माता समजावी बहुता वचनीं । त्या ब्राम्हणाचें दूध देतें आणुनी । हें पाहें पांचाखोनी । दूध कालचें होय कीं नव्हे ॥१७॥
दूध आणिलें भीक मागुनी । संतोष न वाटे माझे मनीं । देव देईल मज लागुनी । तरी दूध सेवीन ॥१८॥
देवें धुरूसी अढळपद दिलें । तैसेंच दूध देईं मज संचलें । न देतां अव्हेरिलें । तरी प्राण देईन निर्धारी ॥१९॥
देवा दुधाची शिधोरी । कां मज न देसी श्रीहरी । आळ पुरवीं बा मुरारी । दूध पोटभरी मज देईं ॥२०॥
मज बहु लगलीसे क्षुधा । अझुनी कां न पावसी गोविंदा । तुज मागत नाहीं धनसंपदा । एका दूधा वांचोनी ॥२१॥
देवा नको पाहूं निर्वाण । देहकरवतीं घालीन । प्राण तुज समर्पीन । सत्य वचन पाहें माझें ॥२२॥
देखोनी बाळकाचें अंत:करण । कळवळिला नारायण । सांडोनी क्षीरसागर शेषशयन । येत धांवून बाळकाप्रती ॥२३॥
सुदर्शन घेऊनि हातीं । पावला उपमन्यु आकांतीं । प्रगट झाली विष्णूमूर्ती । निजरूप दाविलें ॥२४॥
बाळ येऊनि लागला चरणीं । देवें ह्रदयीं धरिला आलिंगुनी । वरदहस्तें कुरवाळुनी । कृपाद्दष्टी अवलोकी ॥२५॥
सांग बाळा प्रसन्न झालों तूंतें । काय संकल्प तो माग मातें । येरू म्हणे दूध द्यावें कृपावंतें । जें कल्पांतींही न सरेची ॥२६॥
हांसून बोले वैकुंठरमण । पहावो बाळ केवळ अज्ञान । म्हणे मी झालों आतां प्रसन्न । काय दूध तुवां मागावें ॥२७॥
देवा या दुधाचि कारणें । एवढें केलें म्यां निर्वाण । सहित मातापिता तिघेजण । क्षीर भोजन मज द्यावें ॥२८॥
माता पिता उपमन्य । निघे गरूड पृष्ठीं वाहवून । क्षीरसागरीं ठेवी नेऊन । दूध प्राशन सुखें करा ॥२९॥
राज्य देउनी क्षीरसागरीचें । अमर शरीर केलें त्यांचें । अखंड दर्शन श्रीहरीचें । सायुज्यपद त्या दीधलें ॥३०॥
यालागीं काया वाचा मनें । जावें विठोबासी शरण । आर्त मनोरथ पूर्ण । निजभक्ताचें करीतसे ॥३१॥
विष्णुदास नाम्याचा स्वामी । तो श्रीहरी वोळगा तुम्ही । जें जें इच्छिलें अंतर्यामीं । इच्छा दानीं पुरवील ॥३२॥


संत नामदेव गाथा १२ – भीष्मप्रतिज्ञा अभंग १ ते २

१.
मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगीं ॥१॥
पण केला होता न धरीं शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥
महामारी धरी अर्जुन वीरासी । नये सावरासी कांहीं केल्या ॥३॥
अश्व ते मारिले रथ ते सारिले । घाय वरी केले वीर पार्था ॥४॥
पार्थाचें शरीर पुष्प पळसाचा । ऐसा वर्ण त्याचा जाणोनियां ॥५॥
सावध तो नाहीं वीर रणांगणीं । विचारिलें मनीं जगन्नाथें ॥६॥
नाहीं पळ एक सावध हा वीर । बाणांचे ते भार भीष्म टाकी ॥७॥
देखोनि निदान प्रतोद ठेवून । प्रथित हो रथचक्र होतें ॥८॥
घेऊनियां करीं उठे लागवेगें । धांवतां निजांगें देखियेलें ॥९॥
कसे पितांबर सुटला तो करें । सांवरून वरें धांवतसें ॥१०॥
भीष्म म्हणे देवा माझी सत्य केली । प्रतिज्ञा हरली आपुली हो ॥११॥
जरी तुझे चित्तीं असे तें मारणें । कवण तो रक्षण करील माझें ॥१२॥
येऊनि लवकरी बैसे रथावरी । खड्‌ग तुझ्या करीं देत आहें ॥१३॥
ऐकतां हा बोल झाला लज्जामान । दिलें तें टाकून चक्र हातें ॥१४॥
जयजयकार झाला रणी तो भीष्माचा । पण केला साचा देवराया ॥१५॥
नामा म्हणे ऐसी भक्ताची हो चाड । आपण लबाड झालें देव ॥१६॥

२.
करितां तें युद्ध नव दिवस झालें । संकट पडलें पांडवांसी ॥१॥
एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥
संग्रामीं पांडव करितां विचार । चिंतातूर फार देखोनियां ॥३॥
तेव्हां कृष्ण म्हणे चला अवघे जन । भीष्मा लागोन विचारासी ॥४॥
कृष्ण परमात्मा धर्मराजासहित । भीष्म शिबिरांत जाते झाले ॥५॥
करूनि वंदन पितामहालागीं । बोलती ते वेगीं कैसी परी ॥६॥
नेम दिवस दाहा त्या माजी ते नव । झाले ते स्वभावें कांहीं नव्हे ॥७॥
जयाचिया कांक्षा धरूनि तें मनीं । आलों समरांगणीं हेचि ठावें ॥८॥
तुजसीं झुंजतां नये यश आम्हां । तुझी ते महिमा अगाध हो ॥९॥
भार्गव राम बळी युद्धीं जिंकवेना । तया तोषवेना युद्ध बळें ॥१०॥
ऐसी यासी कैसें मारावें तें रणीं । न करितां हो येक्षणीं जय कैसा ॥११॥
याचि हो विचारें आलों तुझ्या घरीं । सांगें जय नरा प्राप्ति घडे ॥१२॥
ऐकोनियां बोला मनीं आनंदला । भीष्म महा भला काय बोले ॥१३॥
जोंवरी जीवंत तोंवरी जयवंत । आहे हें निश्चित कळों आलें ॥१४॥
परंतु पुसतां विचार मजला । तरी ऐका बोला सांगिजतो ॥१५॥
तुमची हो दळीं शिखंडी नामक । राजा नपूंसक पुरुष आहे ॥१६॥
तया करा पुढें मागून अर्जुन । बाणांचें संधान करावें कीं ॥१७॥
माझी ते प्रतिज्ञा षंढावरी शस्त्र । न धरीं तें अस्त्र प्राण गेल्या ॥१८॥
ऐसी युक्ति करा रणीं मग मारा । यश येईल घरा आपेआप ॥१९॥
ऐकोनी विचार आले निजस्थाना । नामदेवीं जाणा विचार केला ॥२०॥


संत नामदेव गाथा १३ – रावण मंदोदरी संवाद अभंग १ ते ५

१.
मंदोदरी सांगे रावणाप्रती । स्वप्न देखिलें म्यां मध्यरातीं । नेणों वान्नर मिळाले किती । शिळा सागरू बांधिला ॥१॥
दोघे धनुर्धर वीर वान्नर । उतरोनी आले पैलसागर । एकापरीस एकगा वीर । ते बडीवार बोलताती ॥२॥
नेणों त्याचा वळीया आला । लंकेमोवता वेढा घातला । सभामंडप उडोनि नेला । जो केला त्रिकुटेसी ॥३॥
लंकेभोंवता रुधिराचा पूर । रणीं पडिला कुंभकर्ण वीर । तो तुमचा सखा सहोदर । निद्रा करी सामास ॥४॥
सत्य तुझीं छेदील दश शिरें । येणें रामें रणरंगधीरें । लंका जाळोनी केली जोहरें । अंबरीं तुरे गर्जताती ॥५॥
हें स्वप्न सत्य होईल जाणा । लंका दान बिभीषणा । शरण जाईं रघुनंदना । नामयाच्या स्वामीसी ॥६॥

२.
विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि ॥१॥
वांयां आणिली जानकी घरीं । लाज झाली तिहीं लोकीं ॥२॥
मज पाहातां हे विवसी । क्षय आणिला कुळासी ॥३॥
आभिलाषितां पर सती । हे तों नव्हे राजनीती ॥४॥
कोण आमुचा हितकरू । सांगे निर्मळ विचारू ॥५॥
नामया स्वामीसी शरण जावें । स्वहित आपुलें करावें ॥६॥

३.
ज्यातें ध्यानीं ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागीं ॥१॥
तया रामासी विन्मुख होणें । जळो जिणें लाजिरवाणें ॥२॥
व्रतें तपें ज्या साधिती । तो मज नित्य ध्यातो चित्तीं ॥३॥
जो अगम्य वेद पुराणां । तो मज येतो समरंगणा ॥४॥
नामया स्वामीच्या दर्शनें । मग कैंचि भवबंधनें ॥५॥

४.
मंदोदरी करी विनंती । परिसा स्वामी लंकापती ॥१॥
सोडा रामाची अंतुरी । जंव तो राम आहे दुरी ॥२॥
उदकीं तारिले पाषाण । हा तो प्रताप नव्हे सान ॥३॥
झाला बिभीषण शाहाणा । देखोनी तुमच्या दुश्चिंतपणा ॥४॥
जाउनी रामासी भेटला । मृत्युपासूनि सुटला ॥५॥
नामयास्वामी रघुनंदन । वेगीं करावा प्रसन्न ॥६॥

५.
म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला । अवघा रामचि नाहीं झाला ॥२॥
कोण हित केलें तेणें । राम नाकळीचि मनें ॥३॥
राम द्दष्टी देखतांची । पदवी न घेववे त्याची ॥४॥
म्हणशी झाला लंकापती । नाश पावेल कल्पांतीं ॥५॥
नामया स्वामीतें जिंकोन । आवघा रामचि मी होईन ॥६॥


संत नामदेव गाथा १४ – नक्र उद्धार अभंग १

१.
नक्र बोले ऐकें ह्रषिकेशी । नाममात्रे तारिलें गजेंद्रासी ।
काय कृपें झालें मजविशीं । आतां कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥
कळलें तुझें देवपण आतां । सोदीं ब्रीद आपुलें दीनानाथा ॥ध्रु०॥
दीनानाथ म्हणविसी कशासाठीं । द्वैतभाव त्वां धरियेला पोटीं ।
कैसें पाप लाविलें माझें पाठीं । तुझें रूप देखिलें आजि द्दष्टि ॥२॥
दिनानाथ बोलती वेद चारी । साधुसंत गाताती नानापरी ।
सत्य ब्रीद मिरवत चराचरीं । सोडीं ब्रीद आपुलें झडकरी ॥३॥
रज मात्रें तारिली अहिल्या शिळा । नामें करुनि उद्धरिलें अजामेळा ।
पापी कैसा मी घननीळा । तुझें रूप देखिलें म्यां आजि डोळां ॥४॥
न्याय ब्रीद घेईन तुझें आतां । पापी कैसा मी सांग दीनानाथा ।
कैसें पाप मारिलें माझ्या माथां । अझूनि लाज कां नये तुझ्या चित्ता ॥५॥
नक्र बोले देवासी हांसू आलें । निंदा नोहे स्तवन माझें केलें ।
दीनानाथें तात्काळ उद्धरिलें । विष्णुदास नामा कौतुक बोले ॥६॥


संत नामदेव गाथा १५ – चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण अभंग १

चोखोबाचीकांता असे ती गर्भिण । झाले तीस पूर्ण नव मास ॥१॥
करूनि विनंति पतिसी बोलत । असावें साहित्य घरामाजी ॥२॥
ऐकूनियां चोखा करीत विचार । कोणें ऐसा घोर वागवावा ॥३॥
न पुसतां गेला बहिणीच्या गांवा । आनंदें केशवा आळवीत ॥४॥
दोन प्रहर झाले न येती भोजना । कांता विचारणा करीतसे ॥५॥
शोध करितांना संध्याकाळ झाला ।  पति माझा गेला कोणीकडे ॥६॥
विरक्तासी मी तों सांगितलें काम । कैसा झाला भ्रम माझे बुद्धि ॥७॥
अहो पांडूरंगा आणा त्यासी आतां । न सांगें मी वार्ता संसाराची ॥८॥
झाली तेव्हां श्रमी प्रसूत वेळा आली । विठाई धांवली तेचिवेळां ॥९॥
चोखोबाची बहिण झाला सारंगधर । वहिनी उघडा द्वार हांका मारी ॥१०॥
दोघीही भेटल्या तेव्हां आनंदानें । आलें तें रुदन चोख्याकांते ॥११॥
बरें बाई तुम्हां देवानें धाडिलें । पती माझा गेला कोणीकडे ॥१२॥
चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार । अज्ञान भ्रतार तुमचे गांवीं ॥१३॥
म्हणोनियां तुम्ही सांगतां त्या काम । विरक्तासी श्रम वाटतसे ॥१४॥
दादा माझा सुज्ञ आधींच हें श्रुत । होयाचें तें होत आपणची ॥१५॥
केली त्वां सूचना आला माझ्या घरा । त्यानें केळी त्वरा मजलागीं ॥१६॥
सर्वहि साहित्य दिलें म्हणे आतां । नका करूं चिंता वहिनी कांहीं ॥१७॥
सर्वहि साहित्य होतें तिजपाशीं । रिद्धीसिद्धि दासी तयाचिया ॥१८॥
प्रसूत ते झाली पुत्र झाला तिला । आनंद वाटला पांडुरंगा ॥१९॥
वांटिली शर्करा सर्वत्र यातीसी । माझ्या चोखोबासी पुत्र झाला ॥२०॥
लावूनि उटणें न्हाणियेलें तिला । श्रम तिचा गेला सर्वांगाचा ॥२१॥
पांचवीही केली तिनें आनंदानें । घातलें भोजन यातीलागीं ॥२२॥
तेरावे दिवशीं वाळ ते पाळणां । घालितसे राणा वैकुंठींचा ॥२३॥
साडी आणि चोळी आंगडें टोपरें । आणियलें कोणें रखमाईनें ॥२४॥
वोलावूनि सुवासिनी पाळणां घातलें । नाम तें ठेविलें कर्मामेळा ॥२५॥
बारसेंहि केलें तिनें आनंदानें । घातलें भोजन सर्वयाती ॥२६॥
चोखोबासी मास झाला बहिणी घरीं । विचारी अंतरीं चोखा तेव्हां ॥२७॥
सोडोनियां आलों प्रपंचाचे भयें । अंतरले पाय देवाजीचे ॥२८॥
सद्नदित झालें तयाचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥२९॥
येतों बाई आतां कृता असों द्यावी । सांगोन पाठवीं आपल्या हातें ॥३०॥
आतां जातें वहिनी आपुल्या गांवाला । रागें भरतील मला धनी माझे ॥३१॥
ऐकूनियां बोले चोखोबाची कांता । नका जाऊं आतां बाई तुम्ही ॥३२॥
येऊंद्या घरधनी करतील बोळवण । काय मी उत्तीर्ण होऊं आतां ॥३३॥
काय काय आठवूं तुमचे उपकार । न पदे विसर जन्मोजन्मीं ॥३४॥
दादा माझा असे पांडुरंग भक्ता । सदा त्याचें चित्त देवावरी ॥३५॥
मान्य करीं वहिनी तयाचें वनच । तेणेंचि कल्याण असे तुमचें ॥३६॥
सद्रदित झालें दोघींचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥३७॥
सांभाळीं हा आतां माझा कर्ममेळा । येईल चोखामेळा घरीं आतां ॥३८॥
थांबा बाई आतां शिंवितें मी चोळी । नगे वनमाळी बोलतसे ॥३९॥
पुसोनि सर्वांसि गेला तो सांवळा । आला चोखामेळा घरालागीं ॥४०॥
येवोनियां कांता वंदीत चरण । दिलें उचलोन बाळ हातीं ॥४१॥
बाई आतां गेल्या भेटल्या वाटेसी । खंती या जिवासी वाटे त्याची ॥४२॥
सांगितल अत्यासी सकळ वृत्तांत । सद्नदित चित्त चोखा झाला ॥४३॥
कैंची बाई येथें आले पांडुरंग । धन्य तुझें भाग्य भेटी झाली ॥४४॥
सद्नदित झालें दोघांचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥४५॥
भक्तांसी संकट पडों नेदी देव । घालीतसे धांव त्यांच्या काजा ॥४६॥
विष्णुदास नामा वंदी त्याचे चरण । वर्णितसे गुण वारंवार ॥४७॥


संत नामदेव गाथा १६ – चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग १ ते ३

१.
मंगळवेढयाभोंवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥
महारासमागमें चोखा मेळा गेला । काम तें लागला करावया ॥२॥
सर्वकाळ वाचे विठ्ठलनाम छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥३॥
चार महिने याचि रीतीनें लोटिले । कुसूं कडाडिलें अकस्मात्‌ ॥४॥
तयाखालीं महार बहु चूर झाले । चोख्यानें अर्पिले प्राण देवा ॥५॥
देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें । त्याच्या अस्थि येथें घेऊनि याव्या ॥६॥
नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या । विठ्ठलनाम जयामध्यें निघे ॥७॥

२.
ऐकोनिया कानीं अचळीं भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापाशीं ॥१॥
शालिवाहन शके बाराशें साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥
वैशाख वद्य पंचमी सुदीन । गुरुवारीं प्रयाण करी चोखा ॥३॥
चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळ धर्म देव चोखा माझा ॥४॥
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मीहि आलों व्यक्ति तयासाठीं ॥५॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधीं विन्घ पडों नेदीं ॥६॥
नामदेवें अस्थि आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरीं ॥७॥

३.
देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥
संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारीं ॥३॥
ऐसी आनंदानें नामाच्या गजरीं । दिली महाद्वारीं समाधि त्या ॥४॥
अस्थि निक्षेपण आपुलीया हातें । करूनि अनंतें पाषाण ठेवी ॥५॥
राही रखुमाई कुर्वंडी करिती । सत्यभामा आरति ओंवाळीत ॥६॥
नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओंवाळून ॥७॥


संत नामदेव गाथा १७ – विरहिणी अभंग १ ते ५

१.
रूपें शाभसुंदर निलोल्पल गाभा । सखीये स्पप्नीं शोभा देखियेली ॥१॥
नेत्र विशाळ भाळ दंत हीरया ज्योती । बाइये मदनमूर्ती देखियेला ॥२॥
शंख चक्र गदा शोभती चहूं करीं । सखीये गरुडावरी देखियेला ॥३॥
शयन शेषापृष्ठीं नाभीं परमेष्ठी । गंगा वामांगुष्टीं देखियेला ॥४॥
पीतांबर कटीतटीं दिव्य चंदन उटी । सखीये जगजेठी देखियेला ॥५॥
विचारितां मानसीं नये जो व्यक्तीसी । नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥६॥

२.
अव्यक्त परब्रह्मा कैसें आलें वो व्यक्तीं । अकळु न कळेचि तो हा अमुर्त मूर्ती । पुंडलिकाचे भक्ती य़ेऊनियां वाळवंटीं । उभा राहे विटेवरी कर ठेऊनि कटीं ॥१॥
जिवाचा जिवनु वो मज भेटवा हरी । लागलें प्रेम पिसें होऊनि दासी कामारी ॥ध्रु०॥
कसे कसिला पितांबर तयावरी मेखळा । अंगीं उटी चंदनाची शोभती वनमाळा ।
बाहू बाहुवटे तें रूप खुंतलें डोळां । मन माझें मोहिलें द्दष्टि देखतां घननिळा ॥२॥
अधर जें पोंवळियाचे दंत हिर्‍याची जोती । विशाल नयन वो भोंवया व्यंकटा अति ।
टिळक जो रेखिला मृगनाभीं लल्लाटीं । उपमा नये व्यक्ती चंद्रा पडियली तुटी ॥३॥
माथां मुगुट जो रत्नें जडियली वरी । त्याखालीं मयूपरत्रीं वेटी साजे मुरारी ।
माथां त्या विरगुंठी पुष्पें तुरंबिलीं वरी । तेणें मी भाळलियें भेटवावो झडकरी ॥४॥
इंद्ननीळ कीळ उभा घना श्यामु हा दिसे । पाहा तूं एक द्दष्टीं चकित केलें वो हांसे ।
तेचि ते कामबाण जिवा लागलें पिसें । नामया विष्णुदासा व्यापिलें ह्रषीकेशें ॥५॥

३.
संसार परजनीं । दूर दिधलें मज साजणी । द्वारकापुर पाटणीं । माझें माहियेर ॥१॥
थोर उत्कंठा मनीं । वाट पाहें प्रतिदिनीं । मज नेत कां न कोणी । तया माहियेरा ॥२॥
चित्तीं न लगती व्यापार । मनीं होंचे वारंवार । आड ठाकले गिरी डोंगर । तया माहियेरा ॥३॥
माझिये सासुये निष्ठुरें । दुरळ बोलिलीं उत्तरें । तंव तंव मी तूतें स्मरें । विठू बापु माहियेर ॥४॥
येथें कोणी नाहीं माझें एक । जें त्यासि बोलूं सुख दु:ख । हें मन उतावेळ देख । तया माहियेरासाठीं ॥५॥
कामक्रोध भावे दीर । बोलती अति निष्ठुर । तेवेळीं त्यजिजे संसार । ऐसें वाटतसे मना ॥६॥
या वो संसारीं नसिजे । संगु अवघाची सांडिजे । नि:संग होऊनि राहिजे । तया माहियेरा ॥७॥
या वो प्राणाचे संकटीं । आत्मा ठेवूनियां कंठीं । मग चालवीं घरराहटी । म्हणिजे काम रात्रंदिवस ॥८॥
याचे कूर बोल न होती । तेणें मी असें निर्बुज चित्तीं । निरोप धाडूं कवणा हातीं । तया माहियेरा ॥९॥
तंवचि वो शिणिजे । जंव यातें न वोळंगीजे । याचें बीज पाविजे । नामें एकें विठ्ठलें ॥१०॥
आतां बहु काय बोलिये । यासि सुवेळा न पुसिजे । पुण्यमार्में जाईजे । तया माहियेरा ॥११॥
माझी सखी जे कां भक्ति । मज तेचि संबोखितो । तिये लाविले शुद्धमती । साह्य ते मज चुकों नेदी ॥१२॥
सत्य भावो मज सांगाती । येर लटकिया व्युत्पत्ति । मी वो जाईन हरखें जतीं । तया माहियेरा ॥१३॥
कृष्ण माउली भेटेल । शीण अवघाचि हरेल । सुख आनंदुन मायेल । या या त्रिभुवनीं ॥१४॥
या बहु जन्माचा शीण वो जाईल । विठोदर्शनें दु:ख हरेल । नामा सुखिया होईल । केशव चरणीं ॥१५॥

४.
कृष्ण अनुसंगें रंगली कामिनी । कामधामें गेलीं गुणां विरोनी ॥१॥
होती बहुत जन्में वियोगें शिणली । आप नाठवे पर सुखें मिनली ॥२॥
मनें करूनियां ये विषयांचे संकल्प । तंव ते अवघे होय कृष्णरूप ॥३॥
द्दष्टीं देखणें जें जें आवडे । वेणू बाहे तेथें उभे देहुडे ॥४॥
सुखशयनीं स्वप्नीं देखे सांवळा । कंठीं कौस्तुभ रुळे वरी वनमाळा ॥५॥
जीवें धांवूनि आलिंगीं प्रीति । तंव ते आर्ती होय कृष्णमूर्ती ॥६॥
देह परतोनी मागुते सांभाळी । तंव स्वयें सिद्ध आपण वनमाळी ॥७॥
नामया स्वामी जीविंचा जिवलगू । कृष्णसुखाचा सुखबाध अंतरंगू ॥८॥

५.
भिन्न रात्रीं माध्यान्ही वो । सेजे सुदली नारी । आपआपणा विसरूनियां । सुशोभित अंधारीं ॥१॥
त्यामाजी चारी भुजा । शंख चक्र वो करीं । पद्म गदा हातीं शोभती । दिसे सर्व शृंगारीं ॥२॥
येऊनि हंस तुळीके । कैसें धरियलें करीं । देऊनि आलिंगन । वोरसलें वो दुरी ॥३॥
पालवीं धरितां धरितां । निघाला बाहेरी । त्यालागीं प्राण जातो । भेटवा झडकरी ॥४॥
कवण ते प्राण सखी । भेट करील विठोसी । सांडूनि वीरगुंठी । चरण झाडीन केशीं ॥५॥
कवण मी कैंचा नेणें । जाती कुळ तयाचें । कवणा पासाव झाला । तें मी नेणें वो साचें ॥६॥
इंद्र चंद्र नीळ कीळ । घन नभ रूप तयाचें । चरणीं तोडर रुळे । वरी नेपूरें साचे ॥७॥
नख चंद्रमंडीत वो । जन्मस्थान गंगेचें । जानु जघन नीट । पीतांबर वो कासे ॥८॥
त्यावरी नाग मुरडी । रत्न मेखळा साजे । माजू जो मुष्टी माय । त्या मन वेधलें माझें ॥९॥
नाभीं सरोवरीं वो । दिसे ब्रम्हकमळ । अनुपम्य उदर ज्याचें । विशाळ वक्षस्थळ ॥१०॥
कौस्तुभ वरी शोभे । करितो झळफळ । कुंडलांचेनि रत्नें । कैसेनि फांकताती कीळ ॥११॥
वदनीं मी काय वानूं । प्रसिद्ध निर्मळ । भाळीं तो अर्ध चन्द्र । मृगनाभींचा टिळ ॥१२॥
सरळ ज्या अंगोळिका । नवरत्नें जडीत । कंकणें मनगटीं । बाहुवटी सुशीभित ॥१३॥
त्यावरी कीर्ति मुखें । भुजादंड मिरवत । वैजयंती पदक हिरे । मुगुटीं झळकत ॥१४॥
मयूरपत्रें शिरीं । शोभा दिसे अमित । चंद्र मंडळ लोपलीं वो । महातेज अद्‌भुत ॥१५॥
व्यापिलें वनमाळीय़े । लावण्य तेज अमित । तें रूप देखावया । माझा जीव उल्हासत ॥१६॥
ऐसी तापली विरहज्वरें । थोर होतो उवारा । चंदन पोळतसे । न घाला विंजण वारा ॥१७॥
चंद्रमा दाहतसे । उष्ण तो खडतरा । तंव येरी जाणितला । वेध नंदकुमरा ॥१८॥
होईल केशीराजा । पाहे द्वारकापुरा । भक्ति ही विरहा माता । तिणें आणिला घरा ॥१९॥
नामया विष्णुदासा । भेटी शारंगधरा । तनु मन जीवें त्याला । सुख झालें अंतरा ॥२०॥


संत नामदेव गाथा १८ – भूपाळ्या अभंग १ ते ७

१.
उठाउठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठ्ल माउली । दीन जनांची साउली । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥
पंढरपुरीं जे भिमातटीं । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेविनियां कटीं । भेटीसाठीं तिष्ठतसे ॥२॥
कीरीट कुंडलें मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत । गळां बैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळसीचा ॥३॥
सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठीं कौस्तुभ एकावळी । केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळीं विलसतसे ॥४॥
पीत पीतांबर कसला कटीं । अक्षयीं वीट चरण तळवटी । सकळ सौंदर्य सुखाची पेटी । इंद्रिय संपुष्टी आठवातें ॥५॥
अति प्रिय आवडे तुळसी बुका । तसीच प्रीति करी भोळ्या भाविका । नामा पदपंकज पादुका । शिरीं मस्तकीं वंदीतसे ॥६॥

२.
उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा । भावें चरणीं ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥
धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥
मायाविन्घें भ्रमलां खरे । म्हणतां मी मायेनि घरें । हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥३॥
आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा । खहिताचा घोर वहा । ध्यानीं रहा श्रीहरीच्या ॥४॥
संत चरणीं भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा । मुक्ति सायोज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥५॥
विष्णुदास विनबी नामा । भूलूं नका भवकामा । धरा अंतरीं निज प्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥

३.
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेचीवेळा ॥१॥
संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेजेसुख आतां पाहूंद्या मुखकमळा ॥२॥
रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावेळ रूप पहावया द्दष्टीं ॥३॥
राई रखुमाबाई तुम्हां येऊंद्या दया । शेजें हालउनी जागें करा देवराया ॥४॥
गरुड हनुमंत उभे पहाती वाट । स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥

४.
उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥ध्रु०॥
उठुनी वेगेशीं चला जाऊं राउळाशी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥१॥
उठोनियां पहांटे । बिठ्ठल पहा उभा विटे । चरण तयाचे गोमटे । अमृत द्दष्टि अक्लोका ॥२॥
जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगें लिंबलोण करा । द्दष्ट होईंल तयासी ॥३॥
पुढें वाजंत्रें वाजती । ढोल दमामे मर्जती । होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥४॥
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं । केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥५॥

५.
राम राजीवलोचना । करुणा निधी भक्तजना । यातायातीनिवारणा । तूं पावना स्वामिया ॥१॥
जगद्रुपा जळदगहना । जगद्‌गुरु सीतापती जगज्जीवना ।
काय वाणूं तुझीयारे गुणा । आवघ्या जनां आवडसी ॥२॥
रामा त्र्यंबकभजना । दशकंठ तूं छेदना ।
मधुकैठभ निर्दळणा । गरुडवाहना वासुदेवा ॥३॥
रामा दशरथनंदना । योगीजन-मनरंजना ।
अभयवरद वैष्णवजना । बिभिषणा स्थापियलें ॥४॥
जयजय श्रीवत्सलांछना । ब्रह्मपदाचिया भूषणा ।
अहिल्याकष्ट निर्दळना । नारायणा परियेसिं ॥५॥
म्हणउ नी तुझें मी पोसणें । हें ऐकें ऐकें रघुनंदनें ।
येणेंचि कारणें आलों शरण । विष्णुदास म्हणे नामा ॥६॥

६.
आजिचा दिवस आम्हां सोनियाचा । गोवळू भेटला कान्हो नंदाचा ॥१॥
कान्होबा पेंढारी येईल यमुने । तयावीण मज घडी न गमे ॥२॥
सोळासहस्र गोपी म्हणती अगा जगज्जीवना । एके वेळीं भेटी देईं नंदनंदना ॥३॥
उजळुनी आरती करूं कुरवंडिया । शेष भरूं नाम्या स्वामी वनमाळिया ॥४॥

७.
लाजलें गे माय आतां कोणा ओवाळूं । जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥
ओवाळूं मी गेलें माय गेले द्वारके । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज सारिखें ॥२॥
ओवाळूं मी गेलें माय सखिया माझारी । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज नरनारी ॥३॥
ओवाळूं मी गेलें माय सारंगधरा । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज परिवारा ॥४॥
वैजयंती गळां श्रीवत्सलांच्छन । विष्णुदास नामा येणें दाविली खूण ॥५॥


संत नामदेव गाथा १९ – संत नामदेवांचे अभंग – भेट अभंग १ ते ११

१.
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥
काय करुं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥४॥
जन्मा येऊनियां दु:ख । नाहीं पाहिलें श्रीमुख ॥३॥
लळे पुरविसी आमुचे । म्हणे जनी ब्रिद साचें ॥४॥

२.
वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला ॥१॥
तूं वो माझी निज जननी । मज कां टाकियेलें वनीं ॥२॥
धीर किती धरूं आतां । कव घालीं पंढरिनाथा ॥३॥
मला आवड भेटीची । धनी घेईन पायांची ॥४॥
सर्व जिवांचे स्वामिणी । म्हणे जनी माय बहिणी ॥५॥

३.
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥
माझा रंग तुझिया गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

४.
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥
येईं येईं पांडुरंगे । भेटी देईं मजसंगें ॥२॥
मी बा बुडतें बहु जळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥
राग न धरावा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

५.
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥
विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥
अगे क्षेत्र माये सखे पंढरिये । मोकलीते पाय जीव जातो ॥३॥
विश्वाचिये माते सुखाचे अमृत । सखा पंढरिनाथ विनवी तरी ॥४॥
तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥

६.
कां गे निष्ठुर झालीसी । मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥
तुज वांचोनिया माये । जीव माझा जावों पाहे ॥२॥
मी वत्स माझी माय । नये आतां करूं काय ॥३॥
प्राण धरियेला कंठीं । जनी म्हणे देईं भेटी ॥४॥

७.
माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं ॥१॥
मुकें तुझें मी पाडस । चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी । फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी । विनवितसे दासी जनी ॥४॥

८.
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥
धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव । त्याचे पाय देव आम्हां भेटी ॥३॥
नामयाची जनी पालट पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥

९.
चिंतनीं चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या सुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटीं । जनी म्हणे सांगूं गोष्टी ॥३॥

१०.
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥
धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥
रात्नंदिवस भाव विठठलाचे पायीं । चित्त ठायींचे ठायीं मावळलें ॥३॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥

११.
पुंडलिकें नवल केलें । गोपिगोपाळ आणिले ॥१॥
हेंचि देईं ह्रषिकेशी । तुझें नाम अहर्निशीं ॥२॥
नलगे आणिक प्रकार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
रूप न्याहाळिन डोळां । पुढें नाचेन वेळोवेळां ॥४॥
सर्वांठायीं तुज पाठें । ऐसें देऊनि करीं साह्य ॥५॥
धांवा करितां रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥


संत नामदेव गाथा २० – संत नामदेवांचे अभंग – मागणें अभंग १ ते ९

१.
ऐसा वर देई हरी । गाईं नाम निरंतरीं ॥१॥
पुरवीं आस माझी देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥२॥
हेंचि आहे माझे मनीं । कृपा करीं चक्रपाणी ॥३॥
रूप न्याहालूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥
उदाराच्या राया । दासी जनी लागे पायां ॥५॥

२.
साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥१॥
मागणें तें हेंचि देवा । कृपा करीं हो केशवा ॥२॥
संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥३॥
जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशीं तूं गोविंदू ॥४॥

३.
विटेवरी ब्रम्हा दिस । साधु संतांचा रहिवास ॥१॥
देव भावाचा अंकित । जाणे दासाचें तें चित्त ॥२॥
भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥

४.
देवा देईं गर्भंवास । तरीच पुरल माझी आस ॥१॥
परि हे देखारे पंडरीं । सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥
करी पक्षि कां शुकर । श्वान श्वापद मार्जार ॥३॥
ऐसी आशा हे मानसीं । म्हणे नामयाची दासी ॥४॥

५.
ऐसा पुत्र देईं संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥
गाता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥
संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥
ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधाना ॥५॥

६.
माझें दु:ख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥१॥
आम्हां सुख ऐसें देई । तुझी कृपा विठाबाई ॥२॥
चरणीं अनन्य शरण । त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥
जनी म्हणे हेंचि मागें । धण्या यर्व तुज सांगें ॥४॥

७.
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥
सख्या पुंडलिका आवडतें स्थळ । असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥
अहो संतजन घ्या आवडतें धन । असावें कल्याण चिरकाळ ॥३॥
जन्मोजन्मीं हेंचि मागें गोविंदासी । म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥

८.
परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हें वासना माया केली ॥१॥
तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देईं तुझ्या ॥२॥
निरपेक्ष वासना देगा मज देवा । आणि तुझी सेवा आवदीची ॥४॥
असो तो अकुळी असो भलते याती । माथां बंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥

९.
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥
मतिमंद तुझी दासी । ठाव देईं चरणांपासीं ॥२॥
तुझे पदरीं पडलें खरी । आतां सांभाळ करीं हरी ॥३॥
न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥


संत नामदेव गाथा २१ – संत नामदेवांचे अभंग – संतस्तुति अभंग १ ते १३

१.
संतांचा तो संग नव्हे मलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥१॥
चंदनाचे संगें पालटती झाडें । दुर्बळ लांकडें देवामायां ॥२॥
हें कां ऐसें व्हावें संगती स्वभावें । आणिकें न पालटावें देहालागीं ॥३॥
तैसा नि:संगाचा संग अग्रगणी । जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ॥४॥

२.
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे । पूजेविण आंधळे देवाचिये ॥१॥
कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे । यासाठीं आवडे संत करी ॥२॥
संत ऐसे करी देवाचे कान । सांडियेल्या ध्यान कोण ऐके ॥३॥
संत पुससी तरी देवाचे ते पाय । आगमा न गमे सोय मागाडीये ॥४॥
संत पुससी तरी देवाचें तें पोट । धरूनियां बोट दाविती हरी ॥५॥
संत म्हणसी तरी देवाचा हा गळा । जेणें रस आगळा वेदादिकां ॥६॥
संतसरी पुससी तरी देवाचें वदन । माझें तें वचन संत झाले ॥७॥
परादिया चारी सांडूनि मीपणीं । संत झाले अंतरीं पडजीभ देवा ॥९॥
क्षरजे नासिलें अक्षर तें काढिलें । नि:शब्दाचें झालें बोले संत ॥१०॥
शब्द तो उडाला नाद तो बुडाला । भेद तो आटला माया भावीं ॥११॥
विठो वटावरीं पारविया झाले । केश ते वाढले माय संत ॥१२॥
कुरळ होऊनियां देती ते सुढाळ । म्हणे जनी वोवाळ जीवेंभावें ॥१३॥

३.
या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां ॥१॥
तिहीं कर्म हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥
कानाचे हे कान । झालें धरूनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा डोळा । करुनी धाले प्रेम सोहाळा ॥४॥
तोही वश्य नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥

४.
भक्तामाजीं अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥१॥
त्याचे प्रसादें तरले । साधुसंत उद्धरिले ॥२॥
तोचि पसाद आम्हासीं । विटेवरी हृषिकेषि ॥३॥
पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥४॥

५.
अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ॥१॥
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं । धांवोनियां येई दुडदुडां ॥२॥
बहु कासाविस होतो माझा जीव । कनवाळ्याची कींव येऊं द्यावी ॥३॥
नामयाची जनी म्हणावी आपुली । पायीं सांभाळिली मायमापें ॥४॥

६.
आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥१॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजवीण काय करूं । प्राण किती कंठीं धरुं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे । धांव घालीं माझे आये ॥५॥
माझी भेटवा जननी । संतां विनवी दासी जनी ॥६॥

७.
पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥
पुरुषार्थें चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ॥२॥
धन संपत्तीचा दाता । होय पाहतां पंढरिनाथा ॥३॥
संताचे चरणीं । लोळे नाचे दासी जनी ॥४॥

८.
विष्णुमुद्रेचा अंकिला । तोचि वैष्णव एक भल ॥१॥
अहं जाळोनी अंगारा । सोहंभस्मी तीर्थ सारा ॥२॥
विष्णु माया द्वारावती । भक्तिमुद्रा त्या मिरवती ॥३॥
पंचायतन पुजी भावें । अहं सोहं भस्मीं नांवें ॥४॥
प्रेमतुळसी कानीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

९.
वैष्णव तो कबीर चोखामेला महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥
सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥
कमाल फुलार मुकुंद जोहरी । जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥
त्या वैष्णवाचरणीं करी ओंवाळणी । तेथें दाशी जनी शरीराची ॥५॥

१०.
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चित्तारिती ॥१॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥
नाइकोनी ब्रम्हाज्ञान जो का दुराचारी । अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥३॥
विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन । पाखांडी हें म्हणे करिती काई ॥४॥
पंचरस पात्रा कांता हे बडविती । उद्धरलों म्हणती आम्ही संत ॥५॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडांळ । तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार । जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥

११.
पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरीं ॥१॥
हो कां उत्तम चांडाळ । पायीं ठेवीन कपाळ ॥२॥
वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥३॥
मुखीं नाम गजें वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१२.
आले वैष्णवांचे भार । दिले हरिनाम नगार ॥१॥
अवघी दुमदुमली पंढरी । कडकडाट गरुडपारीं ॥२॥
टाळ मृदंग धुमाळी । रंगणीं नाचे वनमाळी ॥३॥
ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

१३.
स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥
संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥
विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकर त्याचाकेला देवें ॥३॥
न विचारितां कुळ गणिका उद्धरिली । नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥
ऋषींचीं कुळें उच्चारीलीं जेणें । स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥
नामयाची जनी भक्तीतें सादर । माझें तें साचार विटेवरी ॥६॥

१३.
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥
ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥


संत नामदेव गाथा २२ – संत नामदेवांचे अभंग – जनाबाईचा निश्चय अभंग १ ते २२

१.
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंवें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

२.
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ॥१॥
स्नान करूं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥
डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥
ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

३.
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ॥१॥
आला विषयाचा कंटाळा । जाऊं भेटूं त्या गोपाळा ॥२॥
आवडीनें जगजेठी । गळां घालूनियां मिठी ॥३॥
आवडीनें गुज कानीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

४.
जात्यावरील गीतासी । दळणमिशें गोवी दासी ॥१॥
देह बुद्धीचें वैरण । बरवा दाणा हो निसून ॥२॥
नामाचा हो कोळी । गुरुआज्ञेंत मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा । गजर दासी जनीचा ॥४॥

५.
तुझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येउनी काय करिशी । तुझें बळ आम्हांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥

६.
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे बैकुंठीं ॥१॥
सर्वभावें गाईन नाम । सखा तूंचि आत्माराम ॥२॥
नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रूप न्याहाळीन द्दष्टीन । सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥४॥
दीनानाथा चक्रपाणी । दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥

७.
आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥
झालें नामाचेनि बळकट । तेणें बैकुंठ पायवाट ॥२॥
ज्ञान वैराग्य विवेक बळें । तें तंव अम्हांसवें खेळे ॥३॥
दया क्षमा आम्हांपुढें । जनी म्हणे झाले वेडे ॥४॥

८.
माझे चित्त तुझें पायीं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा । कायामनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरूं । जनी म्हणे विठ्ठल स्मरूं ॥३॥

९.
आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
जनी म्हाणे सृष्टीवरी । एक अससी तूं बा हरी ॥३॥

१०.
मना लागीं हाचि धंदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
जिव्हे करूं नित्य नेम । सदा विठोबाचें नाम ॥२॥
नामामध्यें नामसार । जप करी निरंतर ॥३॥
म्हणे जनी नाम घेणें । नाममंत्रें शंकर होणें ॥४॥

११.
स्मरण तें हेंचि करूं । वाचे रामराम स्मरूं ॥१॥
आणिक न करूं तें काम । वाचे धरूं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ॥३॥

१२.
मनामागें मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥
मग आम्हां काय उणे । दया करी नारायण ॥२॥
जनी म्हणे ऐसें मन । करूं देवा हो आधिन ॥३॥

१३.
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर द्दढ झालें अहंकारें ॥१॥
सांडीं अहंकार धरीं द्दढभाव । ह्रदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥
नामयाची जनी भक्तीसी भुलली । ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥

१४.
नित्य सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां ॥१॥
वनवासी कां धाडिलें । कृपळें बा हो विठ्ठलें ॥२॥
आशा मनशा तृषा तिन्ही । ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥
काम क्रोध विषय झाले । हे तों मोहोनि राहिले ॥४॥
अवलोकूनि कृपा द्दष्टि । जनी म्हणे देईं भेटी ॥५॥

१५.
करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥
सदा धरूं संतसंग । मुखीं म्हणूं पांडुरंग ॥२॥
करूं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥
जनी म्हणे कीर्ति करूं । नाम बळकट धरूं ॥४॥

१६.
आनंदाचे डोहीं । जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥
कीतेनें जन्मला । हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
आळवितसे अंतवरी । वाचा नाम लोहा करीं ॥३॥
समूळ झाला नाहीं । देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥

१७.
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपाय़ीं ॥२॥
न लगे संतति धन आणि मान । एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥
सत्य कीं मायी आमुचें बोलणें । तुमची तुन्ही आण सांगा हरी ॥४॥
जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळूनि । म्हणे रासी जनी नामयाची ॥५॥

१८.
आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुम्ही ॥१॥
बहु दिवस सांभाळ केला । पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥
थोर सुकृताच्या राशी । तुमचे पाय मजपाशीं ॥३॥
ऐसा नामदेव बोले । ऐकोनी दासी जनी डोले ॥४॥

१९.
मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥
हाचि माझा द्दढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥
आम्हां दासीस हें काम । मुखीं विठ्ठल हरिनाम ॥३॥
सर्व सुख पायीं लोळे । जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥

२०.
नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी ॥१॥
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय । दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥५॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥

२१.
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥
धुंडितां ते पाय शिणला तो ब्रम्हा । बोल ठेवी कर्मा आपुलिल्या ॥२॥
शुक सनकादिक फिरती हरिजन । नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥
ते चरण आम्हांसी ग्रवसले अनायासी । धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥

२२.
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥
हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावर तेल घाला तुम्ही ॥३॥
जनी म्हणे देवा मी झालें येसवा । निघालें केशवा घर तुझें ॥४॥


संत नामदेव गाथा २३ – संत नामदेवांचे अभंग – भाट अभंग १ ते २

१.
गजानन गौरी सूत । लाल अंगपर बभूत । तेरे मुख बचनामृत । उसे जमदूत भागत है ॥१॥
विद्यामरी दुंदुल पेट । उसपर सापकी लपेट । विघन करत है चपेट । पकड फे कालकी ॥२॥
नामा दर्जी जालम । विठू राजाका गुलाम । हुवा दुनियामें बदलाम । उने नाम दुबाया ॥३॥
नामा प्यारा है मनत । उसे जानत है जगत । बम्मन आया धुंडत धुंडत । लगत लगत यांबमो ॥४॥
बम्मन कहे नामदेव । मुजे पूजना भूदेव । इति बात मुजे देव । वहा देव गंगामो ॥५॥
मानो बिनंती महाराज । चलो पतीतनके काज । नामा कहे बम्मनराज । न बाजे इत बातनसो ॥६॥
नामा नहीं माने बात । बम्मन बैठा दिनरात । हुकुम दिया दिनानाथ । तंब संग चलदिया ॥७॥
चले मजल दरमजल । आया बेदरके मिसल ह्य हुई सो नक्कल. । वो सकल तुम्‌ सुनो ॥८॥
कोस आदे कोसपर । नामदेव का लष्कर । बादशहा बैठा निकलकर । नजरकर देखते ॥९॥
कहे कासीपंडत । लाल झेंडे बहूत । पायदल जावे तहत । क्या सरयत खबर लाव ॥१०॥
करी कुरान सो सलाम । भेजो फौज ओतमाम । कोन क्या करेगा काम । तुम बेफाम मत रहो ॥११॥
आयी फौज किया कोट । जैसा खेतका सगोट । कहे कहांके तुम्‌ भट । थाट वाध जाहो ॥१२॥
नामा कहे सुनो भाई । येतो बम्मन गदाई । नामदेव कोन है । बेदरशाही जानते ॥१३॥
उसे कहे नामदेव । राहा छोडो जाने देव । कहे हुकुम आने देव । फेर देव जाने कू ॥१४॥
अजीं लीखी फौजदार । ले पोंचे जिलिबदार । जाके देव दरबार चेपदार के कहिने ॥१५॥
कासीपंडतके पास । आव पोहोंची इतल्लास । नजर गुजराई ख्यास । करे ख्यास पूछ के ॥१६॥
पंडत कर जिकीर । सुनो हिंदू फकीर । हम्‌ लोकन के पीर । पंढरपूर में रहते है ॥१७॥
बादशहा करे गल्लत । होते पीर आजमत । बुला लाव इसवख्त्‌ । करामत देखणें ॥१८॥
पंडत करे तसलीमात । हजरत भली नहीं बात । नामदेव कहे मात । किसननाथ कन्हैया ॥१९॥
उसका नाम मत लेव । उसकी रहा मत्‌ जाव । मेरा कहना सातर लाव । नहीं तो नांव डुबेगी ॥२०॥
उसे करो ये बदफैल । बुरी होयेगी नक्कल । अब्‌ जावेमी अक्कल । सकल राज डुबेगा ॥२१॥
हत्ती घोडे दौलत । दख्खन मुलूख बाछायत । बेदर सरीखा तखल । इस वक्त जायेगा ॥२२॥
बादशहा करे गल्लत । सरक चल मादर वरूत । पंडत करे आयी मोत । गई कुवत अक्कलकी ॥२३॥
कुटल सामने सेटल । जा दूर हो निकल । भेजो दसबीस मोंगल । बम्मन सकल फकड लाव ॥२४॥
नामा लाया दरबार । सात बम्मन दोसो चार । सारे दरबारमों पुकार । मारामार बम्मनकू ॥२५॥
अर्जी पोंचावे हुजूर । नामदेव लाया नजर । इसके बाबेक्या मजकूर । करी अर्जी अर्ज वेगें ॥२६॥
बादशहा कहे जलदी जाव । गाई कसाईकू बुलाव । नामदेवकू विठलाव । नियत पोंचावे गांगकू ॥२७॥
उसके आगे काटी गाय । बम्मन करे हाय हाय । नामा कहे प्रभुराय । ए बलाय तुम्‌ सुनो ॥२८॥
बादशहा कहे लाव जान । नहीं तो करूं मुसलमान । झुटा करता है तुफान । फिर फिकिर कहेलावते ॥२९॥
किदर रह्या पंढरपूर । मेरा बसील हय्‌ दूर । कोन कहेगा हुजूर । ये जरूर हकीकत ॥३०॥
ये तो पापी चंडाल । इन्ने बुरे किय अहाल । मेरे अब्रुका काल । तुम्‌ गोपाल लाल जलदी आव ॥३१॥
नामा रोवे झुरझूर । बहे अश्वनकी पूर । बिठू पसिनेमे चूर । पंढरपूरमें हुवे है ॥३२॥
रुक्मीण चुरती पद्मपाव । घबर गये बिठूराव । रुक्मिण कहे प्रभुराव । क्या बलाय मुजे कहो ॥३३॥
देव करे आटोप्रांत । करे घबरे घबरे बात । चाम देवकी कहल । हकीकत बुरी हय ॥३४॥
रुक्मिंनी कहे जलदी जाव । मानदेवकूं मनाव । उस पापीकू जलाव । जाव जाव सितावी ॥३५॥
नामा लडका अजान । बहूत हुवा हयरान । अबी छोडेगा जान । मुसलमान बेकदर ॥३६॥
अकस्मात्‌ हुयी बात । उठकर बैठे दिनानाथ । चलदीया उसी वख्त । मैं दिनानाथ आयांहू ॥३७॥
बिठू कहे नामदेव । उस गायकू हात लगाव । जान उसकी खुलाव । जलदी जाव गाय उठेगी ॥३८॥
उठकर खडी रहे गाय । हरहर बोले बम्मनराय । नामदेवकू लगाय । बिठूराय गलेसे ॥३९॥
नामा रोवे आलफला उसे समझावे माबाप । उसके हवेलींमें साप ।  हाका हाक पदी है ॥४०॥
हत्ती घोडेकू काट । लिया अदमीकी पाह । जिवर उधर न हाटा नाट । खट उपर खटारे ॥४१॥
बेदरशहा हुवा दग । काशी पंडत करे जंग । अबा कैसा हुवा रंग । बुरे ढंग क्या हुवे ॥४२॥
बादशहा कहे जलदी जाव । काशीपंडलकू बुलाव । मेरे नाजकू बचाव । सच्चा देव उनोका ॥४३॥
काशीपंडत प्यारे लाल । मेरे जानकू संबाल । पीर फकीर हक्‌लाल । बालोबाल गुन्हेगार हूं ॥४४॥
कासीपंडत धरो पाव । बहोत तर्‍हेसे मनाव । नामदेव मगतराव । ये बला दूर करो ॥४५॥
पंडत तुम बडा सुजान । तुम्‌ जानो उसका ग्यान । हमने किया हय्‌ तुफान । अब जान बचाव ॥४६॥
काशीपंडत बहु मला । कदमकदम जा मिला । नामदेव आन मिला । लागाया गला गलोसो ॥४७॥
बादशाहाके आडे । जिधर उधर खडे । उने हातपांव जोडे । पकडे पांव तुमारे ॥४८॥
मानो बिनंती महाराज । चलो पतीतनके काज । नामा कहे पंडतराज । मत्‌ बाजो इस बातसो ॥४९॥
नामदेव बडे दयाल । हांसे किया जबाब सवाल । पंडत जा रहो खुशाल । फिर व्हांसे चल दिया ॥५०॥
मेहेरबान नामदेव । बिठूराय जान देव । उसका राज्य उसकू देव । बुला लेव साबकू ॥५१॥
इतनी बात बोलकर । चला उनका उष्कर । पंडत आये  फिर कर । साप नजर न आवे ॥५२॥
उसकू करकर सनाथ । नामदेव दीनानाथ । ओ गाई लियी साथ । उस वख्त चल दिये ॥५३॥
बादशहा करे जीकीर । सच्चा हिंदु फकीर । ब्रम्हा ज्ञानोमे तार । रणधीर आये है ॥५४॥
गोंदा लडका अजान । करे रात दिन ध्यान । सरज होय मेहेरबान । दिया ग्यान बालककू ॥५५॥

२.
सेज सिद्ध झाली निजा धीधरा । आज्ञा द्यावी लोकां जाती आपुल्या घरा ॥१॥
रात्र बहुत जाहाली देवा चला मंदिरा । राईरखुमाबाई वाट पाहाती सुंदर ॥२॥
तुम्हासमोरा देवा झाली पंढरी । विनटला चरणीं गोंदा उभा राहिला द्वारीं ॥३॥


संत नामदेव गाथा २४ – संत नामदेवांचे अभंग – आऊबाईचे अभंग १ ते २

१.
शून्य साकारलें साध्यांत दिसे । आकार नासे तेथें शून्याकार दिसे ॥१॥
शून्य तें सार शून्य तें सार । शून्यिं चराचर सामावलें ॥२॥
नामयाची बहिण आउवाई शून्यीं सामावली । विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥३॥

२.
तारीं मज आतां रखुमाईच्या कांता । पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥
अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनि बोलताती ॥२॥
त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास । धरिली तुझी कास पांडुरंगा ॥३॥
नामयाची लेकीं आऊ म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें ॥४॥


संत नामदेव गाथा २५ – संत नामदेवांचे अभंग – लाडाईचा अभंग १

१.
पूर्व संबंधें मज दिधलें बापानें । शेखी काय जाणें कैसे झालें ॥१॥
प्रसुतालागीं मज आणिलें कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ॥२॥
मुकुंदें मजशीं थोर केला गोवा । लोटियलें भवानदी माजी ॥३॥
ऐकिला वृत्तांत सर्व झालें गुप्त । माझेंचि संचित खोटें कैसें ॥४॥
द्वादशबहात्तरीं कृष्ण त्रयोदशी । आषाढ हें मासी देवद्वारीं ॥५॥
सर्वांनीं हा देह अर्पिला विठ्ठलीं । मज कां ठेविलें पापिणीसी वेगळी ॥६॥
लाडाई म्हणे देह अर्पीन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥७॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *