संत नामदेव

संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी

संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी अभंग १ ते ५०


निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥
निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी । बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥
दाही दिशा चित्त जालें असें सैरा । आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥
आतां माझे श्रम नको घेऊं हरी । जावें त्र्यंबकेश्वरीं समाधीसी ॥४॥
पार माझा प्राण आला असे कंठीं । आतां जगजेठी सिद्ध व्हावें ॥५॥
नामा म्हणे देवा दिवस नाहीं आतां । त्वरें वेगीं संता सिद्ध करा ॥६॥


विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं ॥१॥
राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांचीं ॥२॥
गोपाळांचे भार उठले तातडीनें । चालिलीं विमानें सुरवरांचीं ॥३॥
आतां त्वरें चला तुम्ही सप्तश्रृंगा । कार्य हें गोविंदा सिद्धि न्यानें ॥४॥
आदि माया तेथें होईल दर्शन । संत साधुजन भेटतील ॥५॥
नामा म्हणे धन्य तुझ्या योगें हरी । तीर्थयात्रा सारी घडली आम्हां ॥६॥


टाळ हे मृदंग गायनें पुढतीं । रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥
गीतार्थ करिती योगी मुनिजन । रंजविती मन निवृत्तीचें ॥२॥
आत्मसुख एक बोलती बोलणीं । ज्ञानराज मनीं आठवतो ॥३॥
ज्ञानराजें आमुचे निवविले डोळे । आतां ऐसे खेळे नाहीं कोणी ॥४॥
ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखीं । आतां ऐसी सखी नाहीं कोणी ॥५॥
नामा म्हणे स्वामी सांगतां प्रमाण । ऐकतां श्रवण खेद वाटे ॥६॥


अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना ॥१॥
कीर्ति पैं वैराग्य केलें सामराज्य । गुरुत्वासी लाज नाहीं आली ॥२॥
नाशिवंत शरीर केलें अविनाश । घडविला विलास अध्यात्मींचा ॥३॥
अविट बोलणीं आठवती मनीं । आतां त्रिभुवनीं दिसेनात ॥४॥
तुझ्यामुळें हरि चालतो उगला । देहा आधीं गेला प्राण माझा ॥५॥
नामा म्हणे देवा करितां ऐसा घोर । सांडील शरीर निवृत्तिराज ॥६॥


जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो ॥१॥
ऐसें पदोपदीं निवृत्तिराज कष्टी । कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥२॥
ज्येष्ठाच्या आधीं कनिष्ठाचें जाणें । केलें नारायणें उफराटें ॥३॥
उफराटें फार कळलें माझें मनीं । वळचणीचें पाणी आढया गेलें ॥४॥
अवघ्यापरीस कष्टी केलें मुक्ताईनें । कांहींच बोलणें घडलें नाहीं ॥५॥
नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणें । अवघियांची मनें कळवळती ॥६॥


गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची ॥१॥
काढिला शोधून अनुभव मुक्ताईनें । ते ज्ञान सोपानें संपादिलें ॥२॥
अनुभवें निवविला चांगा वटेश्वर । विसोबा खेंचर सिद्ध जाला ॥३॥
त्या ज्ञानें जाला चांगदेव विकळ । त्यागियेली सकळ अविद्या माया ॥४॥
अज्ञानासी ज्ञान जालें तैं सहज । ऐसें निवृत्तिराज आठविती ॥५॥
सप्तश्रृंगीं आले देव सुरगण । उतरिलीं विमानें नामा म्हणे ॥६॥


देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥
अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥
वदताती देव आणि सुरगण । उतरिलीं विमानें ठायीं ठायीं ॥३॥
सकळांनी पूजा केली आनंदानें । करिती कीर्तनें अंबेपुढें ॥४॥
मंडपीं बैसले निवृत्ति नारायण । नारदकीर्तनें पुढें होत ॥५॥
नामा म्हणे देवी पहाती सकळ । पूजिती गोपाळ आनंदानें ॥६॥

वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत ॥१॥
गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णंबांअचे ॥२॥
म्हणती पांडुरंगें दावियेलें स्थळा । निवृत्तिराज विकळ पार जाले ॥३॥
पंचमीचे दिवशीं गेले पंचवटी । उतरले तटीं गौतमीचे ॥४॥
नामाअ म्हणे शेवट केला वनमाळी । रहाती ये स्थळीं निवृत्तिराज ॥५॥


सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥१॥
सुरस सर्व तीर्थें आदि पुरातन । केली नारायणें तीर्थयात्रा ॥२॥
विसोबा खेचर परिसा भागवत । अनेक ते संत बैसविले ॥३॥
मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक । पाहाती कौतुक गौतमीचें ॥४॥
दशमीचे दिवशीं केलें तें प्रस्थान । विधि नारायण सांगतसे ॥५॥
नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ । जालासे विकळ निवृत्तिराज ॥६॥

१०
सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ॥१॥
उठले विष्णव आणि ह्रषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥
एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासीं । उत्सव निवृत्तीसी देवें केला ॥३॥
द्वादशीं पारणें सोडिती वैष्णव । समारंभ देव करितसे ॥४॥
राहिली ते शक्ति गळालें शरीर । देह अहंकार त्यागियेला ॥५॥
कोणाची करावी पूजा कोणें कोणा । अवघेअ नारायणा करणें येथें ॥६॥
नामा म्हणे देवा मुक्ताईची गती । सांडिलें निवृत्ति शरीरासी ॥७॥

११
आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥
निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥
पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ । उघडिली शीळ समाधीची ॥३॥
म्हणती योगेश्वर अनादि या शेजा । चिद्रलें ती पूजा केली असे ॥४॥
नामा म्हणे देवा जागा निरंगनीं । युगादि हे धुणी धुपतीये ॥५॥

१२
तुळसी बेल पुष्पें समर्पिलीं वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविलाअ महादा । झाडावया शेजा पुढें जाले ॥२॥
सभोंवतीं जागा झाडिली निर्मळ । अनादि हें स्थळ निवृत्तिराजा ॥३॥
सभोंवते दीप लाविले समाधी । म्हणती पूजा आधीं केली असे ॥४॥
अनादि हे पूजा केली म्हणती संत । आतां कोणी आंत उतरूं नये ॥५॥
नामा म्हणे हरि काय स्थळ चांगलें । दुर्वा दर्भ फुलें वाहियेलीं ॥६॥

१३
पुष्करिणीकांठीं वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती ॥१॥
अवघिया पात्रें वाढलीं नारायणें । सोडिती पारणें निवृत्तिराज ॥२॥
विठोबा रखुमाईनें घेतला निवृत्ति । जेविताती पंक्ति गोपाळांच्या ॥३॥
जेवले वैष्णव आणि ह्रषिकेशी । गेले आचमनासी पुष्करिणीतें ॥४॥
अवघे संत तेथें बैसले निवाडे । पुंडलिक विडे वांटितसे ॥५॥
नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास । होतो कासाविस निवृत्तिराज ॥६॥

१४
निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं ॥१॥
गरुडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्तिराज समाधीसी ॥२॥
चालती विमानें वाजतसे घंटा । उठा आतां भेटा अवघेजण ॥३॥
समाधीभोंवते कुंकुमाचे सडे । पाहती निवाडे योगीराज ॥४॥
कीर्तन गजरीं गेलीसे मंडळी । बैसली ते पाळी समाधीच्या ॥५॥
नामा म्हणे पुढें उभे नारायण । आरंभिलें नमन निवृत्तिराजें ॥६॥

१५
नमो गणपति गजानना । नमो सरस्वति मंगलध्याना ।
नमो अगाध ब्रह्मपरायणा । नमो नमो स्बामी ॥१॥
नमो आदिमायादि सागरा । नमो चिदानंद दिगंबरा ।
एकत्व एक सारा । नमो नमो तुज ॥२॥
नमो मत्स्येंद्रनाथा अनादि । नमो सर्वव्यापका बुद्धि ।
नमो जुनाट युगादि । तुज नमो ॥३॥
नमो सत्यकाळनाथ त्रिजगतीं । नमो पुढत पुढती ।
योगेश्वरा आदि अंतीं । नमो नमो स्वामी ॥४॥
नमो गैहिनीनाथ अविनाशा । नमो सहजासहज प्रकाशा ।
नमो व्यापुनि दाही दिशा । आदि गुरु तुज नमो ॥५॥
गुप्तनाथ तुज नमन । नमो सद्‌‍गुरु परब्रह्म पूर्ण ।
सदा स्वरूपीं अनुसंधान । नमस्ते नमस्ते ॥६॥
नमो गैहिनीनाथ आदिगुरु । तूं संकटी आदि तारूं ।
नमो संसारहर्ता हरू । सद्‌गुरुनाथा तुज नमो ॥७॥
नमो कर्ता हर्ता नारायणा । नमो उदयाअस्तु गगनघना ।
नमो विराटपुरुषा जगज्जीवन । नमस्ते नमस्ते कुळस्वामी ॥८॥
नमो त्रिपुटी गुप्तधना । नीलवर्णा कलंकी कोंदणा ।
नमो ज्योतिर्मय दारुणा । नमो नमो जगद्‌गुरु ॥९॥
नमो पांडुरंग दयाळा । नमो गोविंदा गोपाळा ।
नमो वैष्णवां सकळां । योगिया ऋषीश्वरा नमो नमो ॥१०॥
नमो सर्व चराचर । नमो अंतरबाहेर ।
नमो दहाही अवतारा । जगद्‌‍भूषणा तुज नमो ॥११॥
नमन नेणो कैसें व्यापी । नमन रंगलें विश्वरूपीं ।
नमन चिन्मय गुह्य गौप्यीं । नमो सर्वभूतीं निजगुरु ॥१२॥

१६
धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं ॥१॥
प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥
निवृत्तिदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर विठोबाच्या ॥३॥
अवघ्या जनालागीं केला नमस्कार । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥
गोविंद गोपाळ आले ते सकळ । प्रेमें होती विकळ निवृत्तिराज ॥५॥
केलीं आचमनें पुष्कर्णीचे तटीं । आले उठाउठी समाधीपाशीं ॥६॥
नामा म्हणे देवा निवृत्तिसारखा योगी । नाहीं आतां जगीं दावावया ॥७॥

१७
समाधीच्या पाळी वैसलीं सकळीं । केला या गोपाळीं जयजयकार ॥१॥
निवृत्तीच्या संगें पुंडलिक पांडुरंग । सिद्ध जाले सांग समाधीसी ॥२॥
निवृत्तिदेवें वंदिलीं सकळांची पाउलें । तीर्थ तें घेतलें विठोबाचें ॥३॥
पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खालीं निवृत्तिदेव ॥४॥
पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी । बैसले आसनावरी निवृत्तिराज ॥५॥
नामा म्हणे देवा काय पाहावें आतां । गेला पंढरिनाथा चिद्‌भानु तो ॥६॥

१८
निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥
पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥
विठोबाचें ह्रदय आलेंसें भरून । झांकियेले नयन विवृत्तिराजें ॥३॥
पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥४॥
राही रखुमाई बैसल्या गहिंवरत । आणिक संत महंत वोसंडती ॥५॥
नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां । घाला आतां शिळा समाधीसी ॥६॥

१९
नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥
गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥
गोंदा आणि महादा सांडिती शरीर । विसोबा खेचर फार कष्टी ॥३॥
लोपलासे भानु पडला अंधार । गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥४॥
गेल्या त्या विभूति अनादि अवतार । आतां देवा फार आठवतें ॥५॥
नामा म्हणे हरि धरवेना धीर । येती गहिंवर वोसंडोनी ॥६॥

२०
परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख अति जालें ॥१॥
द्वादशी समाधि दिधली निवृत्तीसी । जाले उदासी अवघेजणा ॥२॥
देव म्हणे उठा करा आतां पूजा । घालूं पुष्णशेजा समाधीसी ॥३॥
उठले सकळ होताती विकळ । गेले ते गोपाळ समाधीसी ॥४॥
घेतली समाधि सव्य वैष्णवांनीं । पूजिताती सुमनीं समाधीसी ॥५॥
नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा । चला आचामना पुष्कर्णीसी ॥६॥

२१
पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरीं ॥१॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी । कीर्तन गजरी पुढें होत ॥२॥
कांहीं ऋषीश्वर राहियेले तेथें । गेले बहुत ते आळंकापुरीं ॥३॥
गरुडावरी सिद्ध जाले नारायण । चाललीं विमानें गंधर्वाचीं ॥४॥
नामा म्हणे देवा जावें आषाढीसी । आले एकादशी पंढरीये ॥५॥

२२
जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची ॥१॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरीं पुढें होत ॥२॥
विठोबा रखुमाई बैसलीं गरुडावर । केला नमस्कार विष्णवांनीं ॥३॥
म्हणती तीर्थयात्रा जाली यथासांग । पाहिले प्रसंग समाधीचे ॥४॥
गेले योगिराज अनादि जे आदि । राहिल्या समाधि जगामाजीं ॥५॥
नामा म्हणे देवा गेले मुनिजन । राहिलें तें ज्ञान जगामाजीं ॥६॥

२३
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचें ॥३॥
परब्रह्म डोळां दावूं ऐसें म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥५॥
नामा म्हणे देवा सांगूनियां कांहीं । नये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥६॥

२४
नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥१॥
समाधीसी केली आरति पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपीं तुझ्या ॥२॥
सुखाचें साधन जालीं चौघेजणें । केलीं नारायणें बोळवण ॥३॥
पंचक्रोशावरी उभे ठेले भार । केला नमस्कार समाधीसी ॥४॥
नामा म्हणे आतां जावें पंढरपुरा । समाधीचा सारा विधि जाला ॥५॥

२५
शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली ॥१॥
आपुल्या सत्ताबळें चालविलें हरि । विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥
नेणों कैसा होईल समाधीचा प्रसंग । बोलिलेति अंगें पांडुरंगा ॥३॥
मुकियाला वाचा दिधली श्रीरंगें । इच्छिला प्रसंग सिद्धी नेला ॥४॥
नामा म्हणे देव माय बाप विठ्ठल । म्हणोनि माझे बोल स्वीकारिले ॥९॥

२६
काय म्यां बोलावें किती माझी मति । तुम्ही रमापति गोड केलें ॥१॥
विश्वरूप घडी उघडिली धडफुडी । आतां काय थोडी कृपा म्हणूं ॥२॥
चिन्म्य लहरी येती उन्मळुनी । दया नारायणीं थोर केली ॥३॥
समाधि चरित्र केलें यथामति । रखूमाईचा पति आर्जविला ॥४॥
समाधि चरित्र जो करील श्रवण । तयालागीं पेणें वैकुंठीचें ॥५॥
नामा म्हणे देवगुरु धरील चित्तीं । उद्धरील पति रुक्माईचा ॥६॥

२७
समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी ॥१॥
समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा ॥२॥
समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील ॥३॥
जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे ॥४॥
स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला ॥५॥
नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें । वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं ॥६॥

२८
आळंकापुरीस पांडुरंग गेले । समाधिस्थ केलें ज्ञानदेवा ॥१॥
उरकोनी सोहळा संगें संतमेळा । विठोबा राहिला आळंदीस ॥२॥
पाहे चक्रपाणि नाम्या डोळ्यां पाणी । कंठ तो दाटुनि उगा आहे ॥३॥
पुसे रुक्मिणीकांत कां रे तूं निवांत । नाम्या शोकाक्रांत कोण्या दुःखें ॥४॥

२९
नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टीं । पडेल कां दृष्टी पुन्हां आतां ॥१॥
ज्ञानाचा वियोग जडला ह्रद्‌‍रोग । भेटीचा प्रयोग करा देवा ॥२॥
ज्ञानदेव माझा दाखवा या वेळीं । जीव तळमळी त्याच्याविण ॥३॥
संत अंतरला सखा जाला दूर । आतां पंढरपूर कैसें कंठूं ॥४॥
तुमचें दर्शन ज्ञान कृपादान । पंढरीस येणें ह्याचसाठीं ॥५॥

३०
तरीच येईन पंढरीस । दृष्टी देखेन ज्ञानेश ॥१॥
ज्ञानदेवा भेटी व्हावी । ऐशी सोय देवा लावी ॥२॥
ऐशियाच्या कृपादानें । तुम्हां संगतीं नाचणें ॥३॥
पंढरीचें जें सुख । जाणे तो एक भाविक ॥४॥

३१
ज्ञानदेव पहावा डोळां । ऐसें वाटतें विठ्ठला ॥१॥
जगजेठी जगत्पाळ । माझी पुरवावी आळ ॥२॥
तुम्हां काय अवघड । लीळें झेला गिरिगड ॥३॥
कल्पतरुतळीं वास । त्या घडे कां उपवास ॥४॥
माझ्या कृपाळुवा देवा । हांकेसरसा घेशी धांवा ॥५॥

३२
ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर । त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥१॥
दुर्दैव तापानें आटलें तें नीर । वर्षी रघुवीर कृपामेघ ॥२॥
ज्ञानदेवाविण व्याकुळ हे प्राण । तूं जगज्जीवन देव होसी ॥३॥
विठाबाई तूं गे जाणसी ना जाण । रक्षी मज कोण दुजे येथें ॥४॥

३३
नामा हें वदतां डोळयां आलें पाणी । पडिला धरणीं देवापुढें ॥१॥
नामदेव स्थिती पाहून श्रीपती । विस्मित ते चित्तीं स्तब्ध जाले ॥२॥
कैशा रीती नाम्य संबोखूं मी आतां । कठिण अवस्था देव म्हणे ॥३॥
प्रेम उचंबळे ऐकतां ही आळ । बुझावी गोपाळ नाम्यालागीं ॥४॥

३४
देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे ॥१॥
तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥
नाम्या उमय मानसीं । ऐसें म्हणे ह्रषिकेशी ॥४॥

३५
ज्ञानदेवापुढें कथा । करी वारील ह्या व्यथा ॥१॥
आत्मरूपीं ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥२॥
ज्ञानदेवीं धरी भाव । स्वयें होय तूंचि देव ॥३॥
राम कृष्ण रे गोविंद । जप म्हणे तो मुकुंद ॥४॥

३६
प्रेमळ तूं भक्ता माझ्या नामदेवा । जीवींचा विसावा भक्त तूंची ॥१॥
तुमचेनि माझें देवपण सत्य । चंद्रें पाझरत सोमकांत ॥२॥
तुमचे भक्तीनें आणिलें रूपासी । अवाच्या अविनाशी अरूप तें ॥३॥
पंढरिचा राणा सांगतो ह्या खुणा । भक्तांच्या कारणा येणें मज ॥४॥

३७
नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें । मुदी कंकण तैं नामें त्यांचीं ॥१॥
मुशीमाजीं जेव्हां गेलें तें मुरोन । जालेसें सुवर्ण अभिन्न तें ॥२॥
तैसा ज्ञानदेव भक्त तो मी देव । लौकिक लाघव दासांसाठीं ॥३॥
ज्ञानसमाधी हे नाशी रूप नांवा । अंतींचा मेळावा मजमाजीं ॥४॥

३८
तेज स्पर्शें ज्योती कर्पुरीं निघाली । दोन्ही तीं निमालीं एकदांची ॥१॥
आघातानें नाद घंटेतून उठे । शेवटीं तो मिटे घंटेमाजीं ॥२॥
ब्रह्मीं माया स्फुरे चैतन्यप्रकाशें । शेवटीं तें वसे ब्रह्मरूपीं ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान । वाटो समाधान तुझ्य जीवा ॥४॥

३९
नामदेव म्हणे देवा । ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा ॥१॥
तुम्ही मायेसंगें गूढ । ज्ञान जाणिवेचें आड ॥२॥
आम्हां नाहीं याची चाड । संतभेटी गोड ॥३॥
संटभेटी प्रेम फावे । प्रेमें देवाशीं भेटावें ॥४॥
प्रेम आहे पोटभरी । देव त्यासी पोटीं धरी ॥५॥
नामदेवा ठायीं प्रेम । मार्गीं आडविलें ब्रह्म ॥६॥

४०
देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हां जन्मां ॥१॥
प्रेम येई हातां जरी । जेथें नांदू ती पंढरी ॥२॥
ज्ञानदेवीं भेट व्हावी । ज्ञान गोष्ट कां सांगावी ॥३॥
नामा न बुझावा जनीं । कोण नाचेल कीर्तनीं ॥४॥
पुरवा नामयाच्या आर्ता । देवा सांगे जगन्माता ॥५॥

४१
देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती ॥१॥
मायबापांचा त्या लळा । नामा घेईना कां आळा ॥२॥
बाप जगताचा स्वामी । आई प्रत्यक्ष लक्षुमी ॥३॥
नामा थोराचें लेंकरूं । छंड त्याचा अनिवारु ॥४॥
छंद नाम्याचा पुरविण्या । देव वेंची प्रेमनाण्या ॥५॥
हाटीं उदमीं भाविक । विठुराजा त्या ग्राहिक ॥६॥

४२
गरुडासि मग म्हणे पांडुरंग । साकल्य हें सांग पुंडलिका ॥१॥
नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठीं । घेऊन या तो भेटी नामयाच्या ॥२॥
संतप्रेम भेटी देव गुज गोष्टी । जाणत्याच्या पोटीं सर्व वसे ॥३॥
करी पांडुरंग येई त्याच्या मना । निमित्ताकारणा भक्त शोधी ॥४॥

४३
ऐकतां निरोप पुंडलिक भक्त । जाला सद्‌‍गदित धन्य म्हणे ॥१॥
धन्य ती आळंदी धन्य विष्णुदास । धन्य हा दिवस देव भेटे ॥२॥
ज्ञानदेवा आलें वैकुंठीचें रूप । पोचतां निरोप पुंडलिका ॥३॥
पुंडलिकें तेव्हां गरुड पूजियेला । ज्ञाना बैसविला विमानांत ॥४॥
पुढें तो गरुड मागें ये विमान । तुक्मिणी दुरोन दावी देवा ॥५॥

४४
आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव ॥१॥
शुद्धभावें इच्छी ज्ञानदेव भेटी । येई उठाउठी भेटूं त्यासी ॥२॥
पहाती नवल भक्त ते प्रेमळ । विश्चय निश्चय निढळ आहे ज्यांचा ॥३॥
देव म्हणे नाम्या घेई भेटीसुखा । ज्ञानदेव सखा उभा येथें ॥४॥

४५
ज्ञानदेवा पहातां डोळां । नामदेवा हर्ष जाला ॥१॥
घट्ट धरियेले पाय । तूं तो जाला सद्‌गुरुराय ॥२॥
नको करुं रे अव्हेर । मज धरूं नको दूर ॥३॥
सदा आठवत मना । तुझ्या भक्तीच्या कल्पना ॥४॥

४६
नाथा नको रे अंतरूं । तुझ्या कांसेचें वासरूं ॥१॥
कळा दुभती तूं गाय । तुझा वियोग असह्य ॥२॥
देह भोगितां प्राक्तन । मना ठेवी तयाधीन ॥३॥
ज्ञानदेवीं ही समाधी । जडो मनोवृत्ति अवघी ॥४॥
नामा भेटे ज्ञानदेवा । जनां प्रसाद मिळावा ॥५॥

४७
हरीचिया दासा नामया उदासा । तुझी ह्रषिकेशा प्रीति बहू ॥१॥
हरिदासांमाजी होसी तूं आगळा । प्रेमाचा पुतळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तूं विठोचा लडिवाळ । नामया तूं कृपाळ आम्हांवरी ॥३॥
४८
अगा पांडुरंगा भक्तजन कैवारी । सेवकजन द्वारीं तिष्ठताती ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान हा पाही । आली मुक्ताबाई चांगदेव ॥२॥
खेचर विसोबा असंद सुदामा॥ चोखा पुरुषोत्तमा आला असे ॥३॥
मैराळ जनक वत्सरा तो नारा । विठा सारंगधरा आला असे ॥४॥
परसा भागवता सांवता नरहरी । चोख मेळा द्वारीं भानुदास ॥५॥
नटनाटयकुसरी कान्होपात्रा द्वारीं । चवरें विंजणें हरी जाणविती ॥६॥
माचंगा अनंता नरसीपुरीं होता । तो हा पंढरीनाथा आला असे ॥७॥
मच्छिंद्र गोरक्ष चरपटी चौरंगीं । गोपीचंद योगी आला असे ॥८॥
इडा ती पिंगळा सूक्ष्म ती आवळा । षड्रस गोपाळा घेऊनि आला ॥९॥
तेथें टाळ दिंडी घेऊनियां नामा । भेटी पुरुषोत्तमा आला असे ॥१०॥

४९
रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां ॥१॥
नित्य भक्तां हरि यालागीं विनट । पंढरीची पेठ वसविली ॥२॥
धन्य हा निवृत्ति धन्य हा सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥३॥
खेचर सांवता धनय जनमित्रा । यांसि सकळ देता हरि ब्रह्म ॥४॥
पांडुरंग पिसा यालागीं जाहला । मुक्ताई पाजिला प्रेम पान्हा ॥५॥
नामा म्हणे खूण जाणती सज्ञान । अखंड तें ध्यान निवृत्तिदेवीं ॥६॥

(५०
सप्तश्रृंगालागीं केली प्रदक्षिणा । आतां नारायणा सिद्ध व्हावें ॥१॥
मार्गीं आदिमाया पूजिली आनंदी । म्हणती धन्य मांदी वैष्णवांची ॥२॥
चालतां चालतां दिवस जाले फार । होईल उशीर समाधीसी ॥३॥
तीन रात्र तेथें राहिले गोपाळ । मग म्हणती सकळ चला आतां ॥४॥
नामा म्हणे देव बैसले गरुडावर । उठावले भार वैष्णवांचे ॥५॥

५०
धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्‍यांशीं सिद्धींचा सिद्धभेटी मेळा । तो सुखसोहळा काय सांगूं ॥२॥
विमानांची दाटी पाहती सुरवर । वर्षताती भार सुमनांचे ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांति घ्यावया कल्पवरी ॥४॥

“संत नामदेव गाथा” श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी अभंग १ ते ५० समाप्त

“संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी”

। संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी ।

।। संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी ।।

संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी । संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी

संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *