संत नामदेव

संत नामदेव गाथा श्रीसोपानदेवांची-समाधी

संत नामदेव गाथा श्रीसोपानदेवांची-समाधी अभंग १ ते ३९


मग उड्डाण केलें गरुडें । गगन आक्रमिलें चंडें ।
वरी आरुढले प्रचंडें । भक्त देव सकळिक ॥१॥
पक्षाचेनि फडत्कार । ग्राम ठाकिला संवत्सर ।
गिरीकडे पठार । शिखरीं गरुड उतरला ॥२॥
ते दिनीं समारंभ केला । महा उत्सव तरिसी जाला ।
जयजयकार प्रवर्तला । विमानें दाटलीं आकाशीं ॥३॥
दृष्टी देखावया कौतुक । शिवगण आले सकळिक ।
कर्ता ब्रह्मांडनायक ते कौतुक अवलोकिती ॥४॥
मुनि पुंडलिक उतरला । संगतीं वैष्णवांचा मेळा ।
समाधि लक्षण डोळां । पाहती देव सकळिक ॥५॥
हातें खाणोनि भूमिका । अमृत शिंपुनी सुगंधिका ।
महामंगळिक सुखा । वेदघोष आरंभिले ॥६॥
नामा म्हणे सुखसंगतीं । वैष्णव हरिनाम जर्जती ।
लक्ष्मी नारायेण क्षितीं । उतरोनि समाधि देताती ॥७॥


भक्तां समागमें हरी । सत्वर आले संवत्सरीं ।
ब्रह्मानंद परोपरी । चरण धरी सोपानदेव ॥१॥
भागीरथी सवें सरिता । धावोनि आली गंगा माता ।
यमुना सरस्वती उभयतां । एकात्मता कर्‍हेमाजीं ॥२॥
इंद्र चेंद्र तेहतीस कोडी । नवनाथ सिद्ध सौंगडी ।
भक्त सनकादिक प्रौढी । वेद परवडी गर्जती ॥३॥
गगनामाजीं देवांगना । वर्षाव करिती दिव्यसुमना ।
म्हणे निवृत्तीनाथ सोपाना । चरणावारी ठेवी तूं ॥४॥
पुष्पकारुढ जाले देव । आणिक मागुती आले सर्व ।
पांडुरंग दैव सदैव । सोपानदेव बाळमूर्ति ॥५॥
इंद्रनीळ पर्वत आहे । तेथोनि ठाव जावया पाहें ।
सप्तपाताळीं शेष वाहे । दीर्घदेह फणी असे ॥६॥
जावोनी त्यासी श्रुत करावें । गरुडासि बोलिलें देवरावें ।
मार्गीं चालिला लवलाहें । क्रमित जावें सप्तपाताळीं ॥७॥
नामा म्हणे अमृतकरीं । मुख कुरवाळोनी श्रीहरी ।
सोपान समाधिभीतरीं । आपण पुढारीं बैसले ॥८॥


ऐसा सोपान संबोखिला । महा उत्सव आनंद जाला ।
अभय वर दिधला । गर्जिन्नला देवराणा ॥१॥
म्हणे तूतें न विसंबे । संवत्सरीं असेन स्वयंभें ।
या वटेश्व्वरीं सगुण सुलभे । समारंभ प्रतिवर्षी ॥२॥
सिद्धसाधकाचें स्थळ । तो हा वटेश्वर सानुकुळ ।
यासी म्हणती सोडविल नीळकंठ । शीतळ प्रथम नाम ॥३॥
पूर्वीं हें ब्रह्मयाचें स्थान । तेणें येथें तप साधिलें गहन ।
प्रत्यक्ष शंकरा सुप्रसन्न । आशीर्वाचन बोलिले ॥४॥
इंद्रनीळ पर्वत रूप । प्रत्यक्ष नारायण स्वरूप ।
असे कौंडिण्यपुर समीप । माता साक्षेपें ॥५॥
ऋषिगण गंधर्व । क्षेत्रपाळ मल्हारी देव ।
इंद्र चंद्र ब्रह्मदेव । शुद्ध ठाव नेमिला ॥६॥
नामा म्हणे जनार्दन । बहुत संतोषला सोपान ।
अंगें ब्राह्मण सनातन । शुद्ध अधिष्ठान दिधलें ॥७॥


सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा ।
आणि तुम्हीं सर्वोत्तमा । कोणे स्थळीं होतां देवा ॥१॥
देव म्हणे कथा परिस । कोटयानुकोटी युगांस ।
आम्हीं होतों पंढरीस । अनंत कल्पें गेलीं ॥२॥
अनंत भक्तांचिया मेळीं । अनंत वैष्णवें भूमंडळीं ।
माजीं गवसले सकळीं । केली आगळी पुंडलिकें ॥३॥
येणें प्रसन्न केलें शंकरा । शंकरें मज दाखविलें निर्धारा ।
आपण राहोनि पाठमोरा । विश्व तारिलें कीर्तनें ॥४॥
भक्ताचेनि आराधनें । साधियेलें बहुत पुण्यें ।
माझें जालेंसे येणें । एक कारण पुंडलिकाचें ॥५॥
पूर्वापार पंढरीसी । होती विष्णुमात ऐशी ।
निर्धार करोनि मानसीं । अहर्निश अनुष्ठान ॥६॥
येथोनि पूर्वभाग पंढरी । पश्चिमभागीं ब्रह्मा अवधारी ।
अवतार कर्‍हे पाठारीं । महादेव शिखरीं मानदेसी ॥७॥
तेहतीस कोटी देवस्थळी । पूर्वा पश्चिम वैश्य मंडळी ।
उग्र तप साधिलें चंद्रमौळी । या इंद्रनीळ पर्वतावरी ॥८॥
द्रोणाचळ इंद्राचळ । हनुमंतें आणिला विशाळ ।
त्याच्या शाखा अधोमूळ । तो हा इंद्रनीळ पर्वत ॥९॥
येथें वल्ली सुवर्णाकार । गुप्त असती त्या निर्धार ।
दिसे अस्तमानीं अंधार । दीप आकार जगाप्रती ॥१०॥
येवोनियां दक्षिणद्वार । गोकर्ण महाबळेश्वर ।
पाताळद्वारीं पूजा शंकर । बेलपत्र अद्यापि निघती ॥११॥
नामा म्हणे देवाधिदेव । सांगितला स्वानुभाव ।
अधिष्ठान गुढाव । सोपानदेव निवांत ॥१२॥


पूर्वकथा संवत्सरनगरीं । सांगितली असे अवधारी ।
मग शेषाद्रि पर्वतावरी । गरुड शिखरीं उभा असे ॥१॥
धन्य धन्य हा सोपान । धन्य समाधि संपूर्ण ।
प्रत्यक्ष येऊनि नारायण । अभयदान दिधलेंसे ॥२॥
अनंत वैष्णव प्रेमळ । दिंडी पताका टाळ घोळ ।
रामकृष्ण नाम सरळ । भक्त सर्वकाळ नाचती ॥३॥
दिव्य उतरलीं विमानें । देव वर्षती सुमनें ॥
इंद्र चंद्र देवगणें । लोटांगण घालती ॥४॥
समाधिसुखाचा आनंद । अंगें करीतसे गोविंद ।
कथा सांगितली अभेद । श्रोते सन्निध सकळीं ॥५॥
म्हणती धन्य धन्य सोपान । देव पुरुष चतुरानन ।
संत महंत वैष्णव प्रमाण । रामकृष्ण गाताती ॥६॥
नामा म्हणे देवराव । मनोरथ पूर्ण करोनि सर्व ।
अपार गुणकीर्ति लाघव । न कळे माव कोणाशीं ॥७॥


सोपान समाधी बैसला । सकळीं पुष्पवर्षाव केला ।
जयजयकारें भूगोल कोंदला । आनंद दाटला महीवरी ॥१॥
धन्य धन्य हा सोपान । वर्णितसे श्रीभगवान ।
क्षणोक्षणीं माझी आठवण । उद्विग्न मन होतसे ॥२॥
नारद तुंबर अक्रूर उद्धव । पुंडलिकादि करूनि सर्व ।
मुनिदेवगण गंधर्व । स्तुतिस्तव बोलती ॥३॥
म्हणती चौघेजण भाग्याचे । जें निदान ब्रह्मादिकांचें ।
तें निजध्यान शंकराचें । सकळ जीवांची जीवनकळा ॥४॥
तो प्रत्यक्ष येऊनि अनंत । याची परिचर्या करित ।
भक्ता साह्य होऊनि भगवंत । पूर्ण आर्त करावया ॥५॥
निजभक्तांचें कौतुक । करोनि ब्रह्मांडनायक ।
तया वर्णिती सनकादिक । वरकड मशक बापुडें ॥६॥
पुंडलिक विस्मयें बोलती । हे चौघे भाग्याच्या मूर्ती ।
यांच्या नामें जग उद्धरती । पावे विश्रांति जगासी ॥७॥
नामा म्हणे सकळ जगाचा । उदय जाहलासे दैवाचा ॥
सुकाळ केला स्वानंदाचा । ब्रह्मविद्येचा मृत्युलोकीं ॥८॥


तूं सद्‌गुरु आनंद भरित । तुझा आदि ना अंत ।
तूं प्रकाशा प्रकाशमंत । तुज नमो स्वामिया ॥१॥
बुद्धिपालका वैभवा । तूं देवाधिदेवा ।
तूं जाणसी अंतरींचा गोवा । उगवीं उगवीं स्वामिया ॥२॥
तूं सत्त्वरूपाची चौघडी । आणि परेची पैलथडी ।
बोधभावें करी उघडी । पार उतरी स्वामिया ॥३॥
तूं विश्रांतीचें स्थळ । तूं निर्गुणानिगुण निर्मळ ।
निवृत्तिमतीचा विशाळ । पुरवी आळ सोपानाची ॥४॥


स्पष्ट जोडोनियां कर । मी दासानुदास अपार ।
प्रार्थना करुनि नमस्कार । उतरी पार भवाब्धि ॥१॥
निवृत्ति मुक्ताई परियेसी । योगीराज जाला उदयासी ।
वद्य कार्तिक मासीं । आळंकापुरीं जावें लागे ॥२॥
ज्ञानदेवें मागितला मान । देव वैष्णवांचें आगमन ।
येऊनि गंधर्वाचें विमान । विधि नारायण संपादिला ॥३॥
इंद्रनीळ पर्वत पुरातन । पूर्वी येथें ब्रह्मयाचें स्थान ।
कौंडण्यपुरीं अंबिकाभुवन । महाब्रह्म योग माया ॥४॥
तिची भावें केली पूजा । परमार्थ साधिला स्वहित काजा ।
मुक्ताई आणि निवृत्तिराजा । सोपान सहजा सिद्ध जाले ॥५॥


धन्य कर्‍हेचे पाठारीं । इंद्रनीळ पर्वत महागिरी ।
जैसें आळंकापुरीं । तैसें पुण्यक्षेत्र हें ॥१॥
ऐसें अनुमानिलें स्थळ । पूर्दापार निर्मळ ।
सिद्धी पाववी आळ । माय बापा ॥२॥
मग सुमूहूर्त अमृतयोग । सिद्धा संकेत ज्ञानमार्ग ।
पहिला चंद्र स्वांग । गमन केलें योगिराजें ॥३॥
निवृत्ति सोपान मुक्ताई । आळंकापुरीहुनी आले पाही ।
मृदंग वाजती घाई । कीर्तन नवाई काय सांगू ॥४॥
सामाधि सावधान । सुखी ज्ञानेश्वर निधान ।
जाला पां स्थिर सोपान । भेटीलागीं ॥५॥
केलें समाधिस नमन । विज्ञापिले सर्वजन ।
करा आमुची बोळवण । शेवटींची ॥६॥

१०
देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावें सासवडा उत्सवासी ॥१॥
सोपानासी आम्हीं दिधलें वचन । चला अवघेजण समुदाय ॥२॥
आळंकापुरीची यात्रा केली सांग । मग पांडूरंग सिद्ध जाले ॥३॥
दुरोनि पताका दिसती मनोहर । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥
निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्‍हेतीरीं ॥५॥
नामा म्हणे देव गंधर्व सुरगण । चालिले सोपान समाधीसी ॥६॥

११
भक्तांचें तें साह्या करणें पांडुरंगा । म्हणोनि तीर्थगंगाअ उगविलें ॥१॥
जान्हवी मंदाकिनी भोगावती मिळुनी । दुजी हे त्रिवेणी या भूमीसी ॥२॥
निर्झर जीवन वाहती निरंतर । तेथें वटेश्वर उतरले ॥३॥
दुरोनि हें स्थळ दिसे मनोहर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे स्थळ आदि हें अनादि । येथेंची समाधी सोपानासी ॥५॥

१२
उतरिलीं विमानें स्वर्गीचें राऊळ । पताका रानोमाळ मिरविताती ॥१॥
सोपान मुक्ताई सद्‌‍गुरु निवृत्ति । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥२॥
टाळ मृदंग वाजताती विणे । नारद गायन करीतसे ॥३॥
नामा पुंडलिख चालती आवडीनें । संत साधूजन मिरवती ॥४॥
लहान थोर संत चालती मिळोन । करिती बोळवण नामा म्हणे ॥५॥

१३
भोगावती तीरीं दिधला मंडप । साधू आपरूप पांडूरंग ॥१॥
रखुमाई राही वैसल्या अनेक । सखा पांडुरंग उतरला ॥२॥
वद्य मार्गशीर्ष दशमी जागर । हरिदिनीं गजर कीर्तनाचा ॥३॥
क्षेत्रप्रदक्षिणा केली असे संतीं । आले भोगावती अवघेजन ॥४॥
निवृत्ति मुक्ताई दुश्चित्त अंतःकरण । साहित्य नारायण करीतसे ॥५॥
नामा म्हणे देवा आधीं नेमा स्थळ । मग हें सकळ साहित्य करूं ॥६॥

१४
वटेश्वरें वृत्तान्त सांगितला सकळ । पूर्वीं आमुचें स्थळ याच क्षेत्रीं ॥१॥
येथूनियां वाट जातसे पाताळा । उघडिली शिळा समाधीची ॥२॥
आसन मनोहर मृगछालावर । पहाती ऋषीश्वर आनंदानें ॥३॥
सोपान वटेश्वर करिती एकांत । कळलें मनोगत नामा म्हणे ॥४॥

१५
सोपान वटेश्वर पातले समोर । केला नमस्कार निवृत्तीसी ॥१॥
म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसें नारायणें बुझाविलें ॥२॥
गरुड हनुमंता परिसा भागवता । मग साधुसंता श्रुत केलें ॥३॥
गंधर्वा आणि देवा कळला वृत्तान्त । जाती उभयतां समाधीसी ॥४॥
नामा म्हणे यांनीं आरंभिलें हित । करितो स्वहित पांडुरंग ॥५॥

१६
सोपान वठेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता वाहियेल्या सहज । देव निवृत्तिराज पूजियेले ॥२॥
धूप आणि दीप आणिलें संपूर्ण । पूजिलें गगन सोपानानें ॥३॥
दाही दिशा द्दष्टि अवलोकिली सारी । गगन अंकुरीं डवरिलें ॥४॥
चक्र सर्पाकार विजा लखलखती । ज्योति प्रकाशति रानोमाळ ॥५॥
नामा म्हणे देवा उदय जाला सकळ । सोपानदेवें मूळ दाखविलें ॥६॥

१७
शेंदूर पारवे नीळवर्ण ठसे । जनीं वनीं दिसे परब्रह्म ॥१॥
मुक्ताफळ भरित सबाह्य कोंदलें । रूप हें चांगलें विठोबाचें ॥२॥
श्वेत पीतवर्ण आंत तारांगण । अंकुरलें गगन नानारूपें ॥३॥
ज्योतिर्मय ब्रह्म एकांतीचें पहाणें । समाधि नारायणें उदय केली ॥४॥
संत स्वरूप अवघें अवलोकिलें मनें । नमन नामा म्हणे आरंभिलें ॥५॥

१८
निवृत्ति म्हणे ऊर्मी तुटल्या श्रृंखळा । मार्ग हा मोकळा आम्हां जाला ॥१॥
पांडुरंग पाश आवरिला आपला । म्हणोनि फुटला मार्ग आम्हां ॥२॥
आवरिली माया पुरातन आपुली । म्हणोनि आम्हां जाली बुद्धि ऐसी ॥३॥
नामदेवें मस्तक ठेवियलें पायीं । आतां खेड कांहीं करूं नका ॥४॥

१९
जाती ब्रह्मादिक जाती चराचर । मायिक व्यवहार ऐशा परी ॥१॥
प्रकृति पुरुषाचा मांडियेला खेळ । जाईल सकळ नाशिवंत ॥२॥
चंद्र सूर्य जाईल जाईल मृगजळ । जाती तिन्ही ताळ शून्यापोटीं ॥३॥
होईल निरामय अवघे चराचर । ब्रह्मींचा विस्तार होईल ब्रह्मीं ॥४॥
नामा म्हणे स्वामी जाताती सकळ । ब्रह्मीं माया मूळ जाली कैसी ॥५॥

२०
धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें । साहित्य स्वआंगें करितसे ॥१॥
नाशिवंत देह जाईल कीं अंतीं । नीचाची संगति कोण काज ॥२॥
पाहिला गे माय ब्रह्मींचा आवर्तु । जीव आणि जंतु विस्तारिले ॥३॥
निवृत्ति मुक्ताई केलासे विवेक । आपपरा लोक दुजें नाहीं ॥४॥
नामा म्हणे चित्त केलें स्थिर । देव ऋषीश्वर उठावले ॥५॥

२१
पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥१॥
नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२॥
परिसा भागवत चांगदेव हातें । आणिलें साहित्य समाधींचें ॥३॥
तुळसी बुका बेल दर्भ आणि फुलें । उदक चांगलें भोगावतीचें ॥४॥
भस्म पितांबर भगवीं तीं वस्त्रें । योगी दिगंबर समागमें ॥५॥
नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वर । होईल उशीर समाधीसी ॥६॥

२२
उठिले वै
ष्णव घेऊनि नारायणा । चालिले ते स्नाना अवघे जन ॥१॥
गंधा आणि अक्षता विसोबाचे हातीं । पूजा ते करिती सोपानाची ॥२॥
सोपान वटेश्वर सोंवळे जाले सांग । निवृत्ति पांडुरंग पूजियेले ॥३॥
गंधर्व आणि सुरगण पूजिती सोपान । यथाविधी प्रमाण संपादिलें ॥४॥
नामा म्हणे पूजा केली ह्रषिकेशी । चला पारण्याशी अवघे जन ॥५॥

२३
राही रखुमाई ऋद्धिसिद्धि जेथें । पडलें पर्वत पक्वान्नांचे ॥१॥
बैसल्या त्या पंक्ति भोगावती तीरीं । पात्रें टाकी हरि वैष्णवाला ॥२॥
विसोबा खेचर पुंडलिक संगें । वाढी पांडुरंग वैष्णवाला ॥३॥
संत्तसभेमाजीं निवृत्ति सोपान । यथाविधी प्रमाण संपादिलें ॥४॥
रखुमाईला देवें सांगितली खूण । सोडितो पारणें
नामा म्हणे स्वामी जातो बोलावण । आणितो सोपान भोजनासी ॥६॥

२४
चांगा वतेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर । सावंत कुंभार ऐहिक ते ॥१॥
एके ठायीं मिळाले परब्रह्म गवसून । वटेश्वर सोपान मध्यभागीं ॥२॥
सोपान वटेश्वर घेतले वोसंगळा । माळा घाली गळां पुंडलिक ॥३॥
सोपान वटेश्वर पूजिती आवडीनें । संगतीं निधान पांडुरंग ॥४॥
आनंदानें सारे बैसले एकवट । विस्तारिलें ताट रखुमाईनें ॥५॥
नारा विठा गोंदा बोलाविला माहादा । नामा म्हणे पूजा अवघे जन ॥६॥

२५
उठिले विष्णव आटोपलें भोजन । केलेंअ आचमन भोगावतीं ॥१॥
अवघ्यांनीं घेतला सोपान वटेश्वर । गोंदा महादा साचार विडे देती ॥२॥
निशिदिनीं कीर्तन केलें द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥
भोगावतीं केलें अवघ्यांनीं स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥४॥
नामा म्हणे देवा स्थळ मनोहर । उठावले भार वैष्णवांदे ॥५॥

२६
कळवळी मन नाहीं देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे जाले ॥१॥
संत साधुजन होत कासाविसी । आले सामाधीपाशीं तांतडीनें ॥२॥
समाधीभोंवतें कुंकुमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी मृगछाला दिसताती लाल । दर्भ आणि फुलें समर्पिलीं ॥४॥
दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे । साहित्य सकळ समर्पिलें ॥५॥
निवृत्ति पांडुरंग बैसले येऊन । नमन सोपान करितसे ॥६॥

२७
नमो अगणित गुणा । नमो अगम्य ध्याना ।
नमो कलिविध्वंसगहना । कालरूपा ॥१॥
नमो शून्यादि क्षरा । अक्षरा तूं हरा ।
हरिहर सर्वेश्वरा । नमो तुज ॥२॥
वेदविदा विद्वदा । सहज बोधा परमानंदा ।
अनादि आनंदा । गोविंदा तुज नमो ॥३॥
नमो चित्त विभ्रमा । नमो वृत्ति ध्यानागमा ।
नमो आगमसमा । ऐशिया परमात्मा तुज नमो ॥४॥
नमो अनंता अशेषा । नमो सकळ महेशा ।
जीव शिवादि विश्वेशा । नमो तुज ॥५॥
देव देवोत्तमा सकळा । देवाधिदेवा वेगळा ।
नमो तुज गोपाळा । चक्रचाळका हरी ॥६॥
नमो विष्णु कृष्णरुपा । नमो शुद्धादिरूपा ।
नमो नमो भुवनदीपा । नारायणा आदिनाथा ॥७॥
नमो योगिया योगोत्तमा । नमो सर्वाचा तूं आत्मा ।
नमो नमो परब्रह्मा । सर्वारामाअ आत्मया ॥८॥
नमो नमो नमन । तूं जगादि जगजीवन ।
जगज्जनकु जनार्दन । आनंदघन महामूर्ति ॥९॥
नमो कौतुहलह्ळणा । नमो भक्त प्रेमपाळणा ।
परात्पर निधाना । परादि वाचा ॥१०॥
परेहि परतत्त्वा । नाहीं जेथें रजतमसत्त्व ।
वेदादिका देउनी महात्त्वा । पाळण करिसी धर्माचें ॥११॥
अनंत योगाधीशा । अनंत नामाधिवासा ।
अनंत तपें सहसा । न जोडसी तूं स्वामी ॥१२॥
ऐशिया विश्वेश्वरादि शिवा । नमो तुज महादेवा ।
होय जयावरी कृपाहेलावा । तरी सर्व सुख देशी ॥१३॥
भुक्ति मुक्ति विशेषा । दवडुनी मी माझी आशा ।
सांडुनी रजतम दुराशा । चरणीं चित्त रमलें ॥१४॥
नमो उद्धोध विशद । तया वरील जो बोध ।
वरी झळके प्रसिद्ध । तो शुद्धाशुद्ध रस देई ॥१५॥
निर्विकाराचा विकार । स्वस्वरूपाचा विर्धार ।
सर्वरूप होऊनि विर्निकार । ग्रास न करिशी माझा ॥१६॥
शमदमादि समश्रेष्ठा । आदि अनादि वरिष्ठा ।
सकळा होऊनि विशिष्टा । भुवनपदा दावी ॥१७॥
अनंत अनंतेश्वरा । अरुपाचाही आकारा ।
ग्रास न करुनी निर्धारा । सांठवी ह्रदयीं आपुला ॥१८॥
नाथ दीनानाथा दीनेशा । चित्ताचित्त समरसा ।
नमो शिवादि शिवेशा । आदि प्रभु ॥१९॥
नमो नमो रामा । नमो नमो भवादिश्रमा ।
नमो योगादि विश्रामा । आदिपती तुज नमो ॥२०॥
अवधूत महादत्ता । सकळ दृष्ट तूंचि हर्ता ।
नमो सकळ कर्ता । आदिसत्ता पैं तुझी ॥२१॥
नमो दशानंद परेशा । नमो तुज ऐशिया जगदिशा ।
तुजविण व्यर्थ भरंवसा । आणिकां देवांचा ॥२२॥
नमो नमो हरी मुकुंदा । नमो नमो पावविसी परमपदा ।
ऐशिया तुज सदा । पुढती नमो नमो ॥२३॥
वामदक्षिण परिपूर्णा । अधउर्ध्व शून्यपणा ।
नमो तुज सर्वभरणा । समाधि देशी तुज नमो ॥२४॥
वीर्य धैर्य संपन्नगुणा । निराशा आशा अवगुणा ।
तुज स्मरतां पूर्णनिधाना । पावविसी परमपदा ॥२५॥
चतुराचतुर शून्या । वेदशास्त्र श्रुतिमौन्याअ ।
सकळजन सौजन्या । नांदसी सभराभरित ॥२६॥
मंजुळ शब्दाचिया गुणा । मंजुळ नादाचिया ध्याना ।
विश्वरूप अनन्या । वैकुंठीं नांदसी सदा ॥२७॥
जगद्‌गुरु जगद्‌पालका । जगदादि जगन्नायका ।
वेदादि विवेका । कर्ता हर्ता जगदीशा ॥२८॥
नारायणा पूर्णचैतन्या । पूर्णापूर्ण सौजन्या ।
श्रुतितुजमाजिं मौन्या । मौन्यरूपी नांदसी सदा ॥२९॥
तूं परमेश्वर परेपरता । सकळ देहीं देहहर्ता ।
सकळ रूपें हे सत्य वार्ता । वेद बोलोनी गेले ॥३०॥
ऐशिया नमो हो देवा । महामूर्ति निरंजन ठेवा ।
तो तूं पुंडलिक अनुभवा । रूपरेखें आलासी ॥३१॥
विनट विठ्ठलमूर्ति । युगें अठ्ठावीस कीर्ति
वीटे नीट लक्ष्मीपती । भक्तालागीं तिष्ठसी ॥३२॥
भक्तालागीं दयाळू । दीनदयानिधि गोपाळु ।
तूं द्वारकेचा भूपाळु । बाळलीला अवतरलासी ॥३३॥
निराभिवरासंगम । चंद्रभागेचा उगम ।
माजीं सर्वात्माराम । वृंदावनीं खेळसी ॥३४॥
वैकुंठादि वैकुंठवासा । वैकुंठरूपा जगदीशा ।
सर्वज्ञा ह्रषिकेशा । त्राहे त्राहे स्वामिया ॥३५॥
समाधिधन देवा तूंचि । समाधी सेज तूंचि रची ।
समाधि हे जिवाची । शिवाशीं मेळवी ॥३६॥
अनंत जन्माचें संचित । अनंत दोष दुर्घटित ।
अनंत नामाचा संकेत । हारपे तुजमाजीं ॥३७॥
ऐसी सोपान स्तुति करीत । तेणें संतोषला पंढरीनाथ ।
त्वां जग तारिलें समस्त । कीर्तनें करूनी ॥३८॥
नामा म्हणें ऐसें स्तवन । सोपान देवें केलें संपूर्ण ।
मग बोले जगज्जीवन । तयाप्रती ॥३९॥

२८
आतां स्तुति पुरे पुरे सोपान । प्रेमळाचिया निधाना ।
संतुष्ट जालों रे वचना । एक एका तुझिया ॥१॥
तूं अवतार चतुरानन । ऐसें बोलिले जगज्जीवन ।
तंव स्तवन करितां सोपान । तो मौन्यचि राहिला ॥२॥
सर्वोत्तम म्हणे चतुरा । महा विचाराच्या सारा ।
पवित्ररूपा परिकरा । सकळ जनासी तूंची ॥३॥
मग पाचारिलीं तीर्थें । जे जे तिर्थरूप सामर्थें ।
म्हणे उदक द्यावें स्नानातें । सोपानदेवासी ॥४॥
गंगा जान्हवी मंदाकिनी । भोगावती भीमरथी तिन्ही ।
येती जालिया माध्यान्हीं । पंचारती घेऊनियां ॥५॥
योगी सिद्ध प्रसिद्ध । नाथादि नारायण नवविध ।
आणि सनकादिक अगाध । नारदा तुंबर पातले ॥६॥
देवीं आदरिलें स्तवन । ऋषीं वेदघोष आरंभिले पूर्ण ।
सनकादिकीं भाष्य जाण । हा हा हु हु गंधर्व ॥७॥
मंगळ तुरे वाजती । महावैष्णव हरिकथा करिती ।
नामा म्हणे पुढतो पुढतीं । चरणा लागे सोपान ॥८॥

२९
नमो ज्योतिर्मय ब्रह्मा । आनंद ईश्वर पुरातन ।
नमो नारायण कमळ-कोंदणा । नमो नमो स्वामिया ॥१॥
नमो सद्‌गुरु निवृत्ति । नमो रखुमाईच्या पति ।
नमो ज्ञानमूर्ती । अगम्य पुरुषा ॥२॥
नमो भक्ति मुक्ति चैतन्य माया । नमो कर्ता हर्ता काया ।
नमो आदि पुरातन पाया । परब्रह्मा ॥३॥
नमो विराट पुरुषा पुरातना । नमो जगज्जीवना करुणाघना ।
चराचरपालका आनंदघना । अंगिकारीं नमना माझिया ॥४॥
नमो ब्रह्मांडव्यापका । नमो गुणातीता मायांतका ।
चुकवी जन्ममरण एका । तारी विश्वकृपेनें ॥५॥
नमो जळस्थळ रक्षिता । आदी अवसानी तारिता ।
नमो रोमारोम अव्यक्ता । नमो नमो दीनबंधू ॥६॥
नमो विराट महद्‌ब्रह्मा । निष्कलंक परब्रह्मा ।
योगियांच्या सुखधामा । नमो नमो दयाळा ॥७॥
औट हातीं ध्वनी । नमो नमो अंतःकरणीं ।
नमो नमो सत्रावी त्रिवेणी । त्रिपुटी जेथें ॥८॥
नमो विटेवरी सदटा । नमो वैकुंठीचिये पीठा ।
आदी अंतीं एकटा । नमो आदिपुरुषा ॥९॥
आदी अंतीं शेवटीं । सहस्त्रदळीं गुह्य पिठीं ।
नमो उघडी दृष्टि । स्वरूपीं तुझ्या ॥१०॥
नमो पायीं पडली मिठी । नमो बांधिली ह्रदयीं गांठी ।
तुझें स्वरूप ह्रदयसंपुष्टीं । धरून ठेविलें स्वामिया ॥११॥
नमो गेलें आलें । नमो जालें तें जालें ।
नमो सांभाळुनी तुझें । ठेवी आम्हां ॥१२॥

३०
नमो नमो गणपति । नमो सरस्वती ।
नमो नमो रमापति । दीनबंधु ॥१॥
नमो योगी दिगंतर । नमो वैष्णवांचिया भारा ।
नमो गंधर्वा ऋषीश्वरा । लहान थोरां ॥२॥
नमो नमो अंतरीं । नमो नमो दिशा चारी ।
नमो अंतरबाहेरीं । एकत्व एक ॥३॥
नमो अनंता अनंत-नामा । जानकीश जगज्जीवना ।
जयजय रामारामा । तुज नमो ॥४॥
नमो मत्स्य कच्छ अवतार । नमो सिंह सुकर ।
नमो परशुराम फरशधर । वामना तुज नमो ॥५॥
नमो रामा वेदपाळका । नमो इंद्रियेंचालका ।
नमो बोधभाविका । श्रीविठ्ठला ॥६॥
नमो कलंकी विनटला । पटला विठ्ठला ।
सारासार नटला । तुज नमो ॥७॥
निरामय निर्णय तुज । नमो नमो चतुर्भुज ।
नमो सर्व जगदात्मज । अनाथनाथा ॥८॥
नमो बारा ज्योतिर्लिगा । नमो पंढरी पांडुरंगा ।
नमो भिवरा चंद्रभागा । नमो वैकुंठपीठा ॥९॥
मी काय जाणें नामस्थिती । नमन केलें भोळे भक्ती ।
नमन काय जाणें नामस्थिती । नमन केलें भोळे भक्ती ।
नमन श्रीपती । मान्य जालें ॥१०॥
नमन निवृत्ति ज्ञानेश्वरा । नमो सोपान वटेश्वरा ।
नमन मुक्ताबाई निर्झरा । सत्रावींच्या ॥११॥
नमो हंसा सुअक्षरा । नमो व्यापका चराचरा ।
नमो नमो अव्यक्त विषयावरा । पांडुरंगा ॥१२॥
नमन तुमचें तुम्ही केलें । नमन सहजासहज जालें ।
नेणें काय आलें गेलें । सद्‌गुरुनाथा ॥१३॥

३१
उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला ॥१॥
कळवळिले संत वैष्णवांचे भार । आणिक योगेश्वर स्फुंदताती ॥२॥
गरुडा हनुमंत विसोबा खेचर । लावितो पदर डोळियासी ॥३॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेवासहित । परसा भागवत शोक करी ॥४॥
नामा म्हणे देवा खेद सिंधू लोटा । उठा आतां भेटा सोपानासी ॥५॥

३२
सोपानदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥
सवें मुक्ताबाई सद्‌गुरु निवृत्ति । लक्ष्मीचा पति घेतलिया ॥२॥
जयजयकार ध्वनि होताती अपार । जाती योगेश्वर समाधीसी ॥३॥
राही रखुमाई निळकंठ जवळी । समाधिच्या पाळी अवघे जण ॥४॥
समाधि पायरीवरी वटेश्वर सोपान । मागितला मान पांडूरंगा ॥५॥
प्रतिवर्षी भेटी देऊं उभयतां । आळंकापुरीं जातां उत्सवासी ॥६॥
नामा म्हणे देवा कृपा केली फार । दिधला कीं वर भक्तराज ॥७॥

३३
निवृत्ति मुक्ताईनें धरियेलें मौन । वटेश्वर सोपान त्यागियेला ॥१॥
समाधि पताकांची पडली सावली । उतरले खालीं योगीराज ॥२॥
पांडुरंगासंगें गेले ऋषीश्वर । सोपान वटेश्वरीं बैसविले ॥३॥
शिवाचा अवतार सद्‌गुरु निवृत्ति । मुक्ताबाई सखी तुम्हांपाशीं ॥४॥
अंतरीचें जाणतां वा पंढरीनाथ । आले अश्रुपात सोपानासी ॥५॥
सोपानाची बोळवण करितसे हरी । दीर्घा ध्वनी करी नामदेव ॥६॥

३४
धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । तेव्हां ओसंडती अवघे जन ॥१॥
सोपान वटेश्वरें केला नमस्कार । उतरले पार भवसिंधू ॥२॥
घेतियेलें तीर्थ तंव झालें विकळ । झांकियेले डोळे ब्रह्मबोधें ॥३॥
निवृत्ति मुक्ताई राहिलिं बाहेरी । आतां तुम्ही हरि सांभाळावें ॥४॥
देव ऋषीश्वर निघाले बाहेर । केला नमस्कार नामदेवें ॥५॥

३५
जयजयकारें टाळी पिटली सकळां । घातियेली शिळा समाधिसी ॥१॥
निवृत्तिमुक्ताईनें घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग ॥२॥
सोपान वटेश्वर सुखधामीं शेजा । करिताती पूजा समाधीची ॥३॥
खेद दुःख जालें अवघ्या साधूजनाम । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥४॥
निवृत्तिमुक्ताईनें वंदिली समाधि । देहभान शुद्धि हारपली ॥५॥
नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करूं आचमन भोगावतीं ॥६॥

३६
वैष्णवांनीं केली समाधि प्रदक्षिणा । गेले आचमना भोगावतीं ॥१॥
सारी रात्र कीर्तन केलें त्रयोदशीं । चतुर्दशी दिवशीं भोजनें केलीं ॥२॥
अमावास्ये जागरण केलें परिपूर्ण । प्रतिपदे गमन वैष्णवांचें ॥३॥
निवृत्ति मुक्ताई जाली उदासी । आतां ह्रषिकेशी बोळवावें ॥४॥
चांगा म्हणे माझी करा बोळावण । घेऊनि नारायण समागमें ॥५॥
नामा म्हणे देवा माघ मास नेमा । चांगदेवा प्रेमा समाधि देऊं ॥६॥
३७
सव्य हातें नगर घेती ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीसी ॥१॥
परतले देव आणि सुरगण । चाललीं विमानें वैष्णवांचीं ॥२॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेव संगें । रुक्मिणी पांडुरंग समुदायेंसी ॥३॥
नामा म्हणे देव गंधर्व ऋषिमुनी । जाती उत्तरायणीं निवृत्तिराज ॥४॥

३८
निवृत्तिदेवासंगें देव ऋषीश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
प्रतिपदीं देव निघाले बाहेर । केला नमस्कार समाधीसी ॥२॥
अवघियांसहित वैष्णव मंडळी । सवें वनमाळी चालताती ॥३॥
गोदातीरा जाया निवृत्ति उद्देशी । सह समुदायेंशी उठावले ॥४॥
नामा म्हणे घेतला नारायण संगें । चालिले अनेगें भक्तराज ॥५॥
३९
सद्‌गुरु सागरा दीनबंधु । अनाथनाथा सुरैकसिंधु ।
चातकातें कृषाबिंदु । प्रसाद द्यावा ॥१॥
गुरु आणि गणपति पुरातन । सिद्धांत वेदांत जुनाट जुना ।
दयाळा पातकहरणा । रक्षीं रक्षीं स्वामिया ॥२॥
तूं अंतरीचें जाणतां । तूं इच्छेचा दाता ।
तूं ह्रदयीं प्रेरक होता । कमळालया ॥३॥
दृश्यादृश्य करितां पार । चौर्‍यांशीं लक्ष योनी दुर्धर ।
चुकवूनि उतरसी पार । संकटीं स्वामिया ॥४॥
निवृत्ति प्रवृत्ति दोन्ही थडी । मधीं माया नदी उघडी ।
बोधभावें घालिसी सांगडी । पार उतरिसी सवामिया ॥५॥
सोपाना आपला अंकित । पद्महस्तें करावें मुक्त ।
जो मनें इच्छिला अर्थ । सिद्धि न्यावा स्वामिया ॥६॥

“संत नामदेव गाथा” । श्रीसोपानदेवांची-समाधी अभंग १ ते ३९ समाप्त

“संत नामदेव गाथा श्रीसोपानदेवांची-समाधी”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव अभंग । संत नामदेव । संत नामदेव महाराज । संत नामदेव माहिती । संत नामदेव माहिती मराठी मध्ये ।

संत नामदेव फोटो । 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *