संत नामदेव

संत नामदेव गाथा सुदामचरित्र

संत नामदेव गाथा सुदामचरित्र अभंग १ ते २८

१.
सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला ॥१॥
तयाचें चरित्र ऐका सावधान । तेणें जन्ममरण दूर होती ॥२॥
सत्वाचा सागर धैर्याच मांदार । भक्तीचा निर्धार तयापाशीं ॥३॥
हालेना चालेना चळेना ढळेना । आणिक कल्पीना इच्छा कांहीं ॥४॥
सदा सर्वकाळ समाधी लागला । प्रपंच सांडिला छेदूनियां ॥५॥
नामा म्हणे तोचि योगियांचा राजा । ज्ञान्याचीया पूजा पुजतसे ॥६॥

२.
प्रारब्धाच्या बळे देहाचें वर्तनें । काळचक्र भोवने जैसें कांहीं ॥१॥
तैसाची तो साधु जाणावा प्रसिद्धु । देहाचा संबंधु नेणे कांहीं ॥२॥
वारे वाजूनियां जातां वृक्ष डोले । मर्यादेवेगळें होत जाय ॥३॥
नामा म्हणे होणें जाणें नाहीं तयां । संचिता साराया लागोनियां ॥४॥

३.
ऐसा तो ब्राह्मण दरिद्रें पीडिला । सदा स्वरूपीं झाला अखंडीत ॥१॥
न करीच खंती कांहीं तो अंतरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥२॥
नाहीं धड घर केवळ जर्जर । चंद्र प्रभाकर उगवती ॥३॥
बाळें पांच सात बाहाती झोंबती । भुकें तळमळिती सर्वकाळ ॥४॥
उष्णें पोळे वारा येतसे भरारा । मेघाचिया धारा घरामाजी ॥५॥
नामा म्हणे त्यानें प्रपंच सांडिला । परमार्थ मांडिला अखंडीत ॥६॥

४.
तयाची सुंदरा शांतीची बाहुली । आणिक जीभली बोलों नेणे ॥१॥
सेवेसी सादर होऊनियां राहे । भुकची ते खाये भुकेलिया ॥२॥
नित्य नैमित्तिक कांहीं न म्हणे । अंतरींची खूण जाणोनियां ॥३॥
नामा म्हणे न्य़ून पूर्ण सर्व हरि । आणिका विचारीं गुंतेचिना ॥४॥

५.
एके दिनीं भार्या भावें तें मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेनें ॥१॥
तुमचा सोइरा आहे नारायण । अखंडित ध्यान करितां त्याचें ॥२॥
तयाचिये भेटी जावें लवकरी । तो आहे कैबारी दीनालागीं ॥३॥
भेटतांचि नासे अज्ञान दरिद्र । सुखाच समुद्र पांडुरंग ॥४॥
नामा म्हणे देव भक्ता साहाकारी । सर्व सिद्धि घरीं वोळगती ॥५॥

६.
ऐकतां वचन मानेलें तयासी । पुढें कल्पनेसी ठाव नाहीं ॥१॥
तेथें म्यां मागावें हें कांहीं न कळे । निवतील डोळे दर्शनानें ॥२॥
परी तया भेटी न्यावें कांहींबाहीं । परंतु तें नाहीं लेश घरीं ॥३॥
नामा म्हणे द्विज वांच्छी दरुषण । रिकाम्या हातानें जातां लाजे ॥४॥

७.
जाणबला भाव तया सुंदरीसी । म्हणते पतीसी नम्रतेनें ॥१॥
जावें आतां तुम्हीं देवाचे भेटीसी । उठली वेगेंसी सन्मानानें ॥२॥
आणितें मागुनी भक्तीचें भातुकें । जेणें यदुनायक तोष पावे ॥३॥
नामा म्हणे घरीं पदार्थ तो नाहीं । प्रेमच तो पाहीं उगवला ॥४॥

८.
पाहे चहूंकडे धुंडोनि सुंदरी । देखे मुष्टी चारी तंदुळिका ॥१॥
तोचि शुद्धभाव उगवला पुढें । सर्वही तें कोडें देवालागीं ॥२॥
अहं सोहं वृत्ति तेथें एक झाली । द्दष्टीनें देखिली पोह्यांकडे ॥३॥
नामा म्हणे सर्वरूपीं नारायण । बोलाया कारण नाहीं तेथें ॥४॥

९.
तेचि भक्तिभावें पतीपुढें ठेवी । पाहोनी गौरवी ब्रम्हनिष्ठा ॥१॥
तया योग्य नव्हेचि गे हा पदार्थ । आमुचिया आर्त तुळसीदळ ॥२॥
द्रौपदीच्यासाठीं भाजीपान खाये । तेणें त्याची काय भूक गेली ॥३॥
नामा म्हणे हें तो कोड कौतुक । थोडेंहि अधिक देव करी ॥४॥

१०.
शुद्ध भावार्थचे पाहोनियां पाहे । आनंदला भाव योगियाचा ॥१॥
म्हणे आतां भेटूं बाळमित्न हरि । भक्ताचा कैवारी । कृष्णनाथ ॥२॥
बांधावया वस्त्र केवळ जर्जर । त्यामाजी न थरे गुंडळितां ॥३॥
नामा म्हणे द्विज आनंद पावला । मुहूर्त नेमियेला प्रयाणासी ॥४॥

११.
वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचें तें चोज शुद्ध भावें ॥१॥
जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाहीं कांहीं चित्तीं शमदम ॥२॥
हात पाय नळ्या वळती फेंगडया । भावार्थाच्या गुडया उभारीत ॥३॥
नामा म्हणे वाट चालतां समाधि । सोहं स्वरूपीं बुद्धि ठसावली ॥४॥

१२.
शुभसूचचिन्हें होताती शकुन । तेणें तों ब्राह्मण आनंदला ॥१॥
म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥
उडती उजवे काग ते जोडयानें । भरल्या कुंभानें नारी देखें ॥३॥
तास भारद्वाज वामभागीं जाती । मयूर नाचती उत्साहानें ॥४॥
नामा म्हणे सर्व प्रश्नांचाही प्रश्न । वाचे नारायण नाम गातो ॥५॥

१३.
द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥
काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयीं  कळवळे ॥२॥
येवढा ज्याचा राज्यभार । मी तो केवळ फकीर ॥३॥
कोठें तयाला आठव । बाळपणींचें माझें नांव ॥४॥
तैं तो होता गौळ्याघरीं । आतां त्रैलो. क्याधिकारी ॥५॥
नामा म्हणे ऐसें । करितचि निजध्यास ॥६॥

१४.
दुरोनि देखिलें द्वारकानगर । अवघॆं कनकाकार वितिवेले ॥१॥
येथें देवराणा नांदतो तो ठाव । काय म्यां वर्णावें मंदमति ॥२॥
हिरे चिरे रत्न झगमग दिसती । घोंस ते लोंबती मोतियांचे ॥३॥
वैकुंठींचें सर्व वैभव आणिलें । शोभेसी शोभले आपोआप ॥४॥
गुडीया गोपुरें झळकती पताका । वाजतहि डंका चौवेदांचा ॥५॥
साहाजण भाट उभे महाद्वारीं । अठरा वारकरी मोकाशांचे ॥६॥
नामा म्हणे रिद्धिसिद्धीचें भांडार । देखिलें नगर ब्राम्हणानें ॥७॥

१५.
झांकावले डोळे शंका करी मनीं । दिवस कीं यामिनी हें न कळें ॥१॥
महा तेज:पुंज फांकती सकळ । सिंधूचा झळाळ भोंवताला ॥२॥
गोमती ते नदी निर्मळ वाहात । बहु घुमघुमीत सुमनें भार ॥३॥
जाईजुई आणि कमळ कल्हारी । भ्रमर झुंकारी गुंजारव ॥४॥
नामा म्हणे मुनि पातला पूर्वद्वारा । पुढिल्या विचारा चित्त द्यावें ॥५॥

१६.
चहूंकडे स्वर गाताती गायनें । आणिक पुराणें ठाईठाईं ॥१॥
गीतनृत्य नाना करिती तनाना । होतसे झणाणा टाळघोळ ॥२॥
श्रवणाचें सुख घेतसे ब्राम्हण । नामाही गर्जना करीतसे ॥३॥

१७.
नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें ॥१॥
कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसें नाम जाण पातकासी ॥२॥
अंतरीं ते क्षुधा लागली द्विजासी । पाहीन नगरीसी सावचीत ॥३॥
नामा म्हणे द्विज उभा महाद्वारीं । केवळ भिकारी राजयोगी ॥४॥

१८.
नाहीं देवाचिये द्वारीं आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची ॥१॥
भावाविरहित मार्गची न फुटे । फुटल्या न सुटे मागुता तो ॥२॥
नामा म्हणे ऐसा लौकिक वेव्हार । तेथें तों निर्धार कांहीं नाहीं ॥३॥

१९.
चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये ॥१॥
पाहातां लोचनीं राजीवलोचन । भावाचे मोचन तेचि काळीं ॥२॥
सभा ते साजिरी रत्न सिंहासनीं । देव चुडामणी शोभतसे ॥३॥
राईरखुमाई चामरें ढाळिती । राधा उभी हातीं घेउनी छत्र ॥४॥
समारंभें पुढें गरुड तो उभा । शोभतसे शोभा दिव्य कांहीं ॥५॥
यादवांची सभा दाटलीसे भारी । नाना उपचारी रिद्धी सिद्धी ॥६॥
उद्धव अक्रूर उभे पायांपासीं । देवादिदेवासी विडे देत ॥७॥
नामदेव तेथें उभा होता निका । घेऊनि पादुका दोन्ही हातीं ॥८॥

२०.
पुढें तो भिकारी जाता झाला वेगें । आपुलिया रंगें रंगूनियां ॥१॥
येकाकार करी चित्त आणि वृत्ति । पाहे लक्ष्मीपति दुरोनियां ॥२॥
तटस्थ जाहाला चालला त्वरित । मुखीं नाम गात गोविंदाचें ॥३॥
नामा म्हणें नीर पाझरे लोचनीं । समाधी लागुनी मुनी ठेला ॥४॥

२१.
देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे ॥१॥
माथां तो मुगुट कुंडलें श्रवणीं । प्रभा दिनमणी तुच्छ जेथें ॥२॥
कोटी मन्मथांची झाडणी करावी । ऐसी ते बरवी अंगकांती ॥३॥
श्रीमुख शोभलें पूर्णचंद्रा ऐसें । देखतांचि दोष सर्व जाती ॥४॥
केशराची उटी कस्तुरी मळवटी । माळ रुळे कंठीं वैजयंती ॥५॥
श्रीवच्छलांछन मुद्रिका भूषण । झळकती आन भुजादंड ॥६॥
नामा म्हणे ऐसा देखियेला देव । तयाचा अनुभव काय वानूं ॥७॥

२२.
देखिला सुदामा आपुल्या नयनीं । मग चक्रपाणी उठे त्वरें ॥१॥
सिंहासना खालीं टाकोनियां उडी । कर द्वय जोडी नमनालागीं ॥२॥
भेटूनियां तेव्हां धरिला हस्तकीं । बैसवी  मंचकीं वैडुर्याच्या ॥३॥
म्हणे रुक्मिणीसी आणीं उदकाला । पुजूं या द्विजाला सन्मानेंसी ॥४॥
नामा म्हणे देवें चरण प्रक्षाळिले । आंचळीं पुसीले आपुलिया ॥५॥

२३.
स्नानालागीं उठा म्हणे नारायण । आणविलें उष्ण पाणी तेव्हां ॥१॥
सोळा सहस्र स्त्रिया उटणीं लाविती । अक्षवाण आरती करिताती ॥२॥
करविलें स्नान पतिबंर परिधान । अलंकार भूषणें दिल्हीं त्यासीं ॥३॥
स्वइच्छा भोजन वाढिलें तयासी । नामाही पंक्तिसी बैसविला ॥४॥

२४.
सोळा सहस्र ताटें द्विजालागीं आलीं । अमृताची गेली चवी तेव्हां ॥१॥
पक्कान्नाचा तरी वाढवूं विस्तार । होईल उशीर कथेलागीं ॥२॥
हरिरुचि जेवण सुदामा जेविला । वेगीं आंचवला संसारासी ॥३॥
नामा म्हणे त्यासी देवें दिल्या विडा । रंगला तो जोडा वैराग्याचा ॥४॥

२५.
काय वहिनीनें दिधलें आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे ॥१॥
सोडियेली तेव्हां मुष्टी तंदुळिका । रुक्मीणीनाइका पुढें ठेवी ॥२॥
घेऊनि ते पोहे मुखामाजी टाकी । मागे ते भीमकी धरोनी हात ॥३॥
ब्रम्हदिक देव उभे पोह्यांसाठीं । नाहीं त्या लल्लाटीं नामा म्हणे ॥४॥

२६.
भक्षूनियां पोहे संतुष्ट जाहला । मग आनंदला नारायण ॥१॥
विश्वकर्म्यालागीं तेव्हां आज्ञा केली । क्षणांत रचिली सुदामपुरी ॥२॥
सर्व सुवर्णाची द्वारकेप्रमाणें । ब्राम्हणासी दान गुप्त दिल्हें ॥३॥
नामा म्हणे दुजा नाहीं देवावीण । देतांघेतां जाण पांडुरंग ॥४॥

२७.
सुदामा म्हणे अनंता । आम्हा आज्ञा द्यावी आतां ॥१॥
जाऊं घरासीं सत्वर । येऊनि दीवस झाले चार ॥२॥
सर्व ठेउनी जातां बरें । वाटे मारिती तस्कर ॥३॥
ऐसी ऐकोणी वचनें । सर्व काढिलीं भूषणें ॥४॥
आज्ञा घेउनी चालिला । देव बोळवीत आला ॥५॥
नामा म्हणे चोर । याचा उफराटा व्यापार ॥६॥

२८.
नाहीं आमुचे दैवीं त्याणें कोठोनी द्यावें । व्यर्थ कां रुसावें देवावरी ॥१॥
न करितां खेद पुढें वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागीं ॥२॥
पुसतसे त्यासी कोणाचें नगर । ते म्हणती घर सुदाम्याचें ॥३॥
सुदाम्याची तुम्ही हेळणा करितां । तयाच्या संचीता प्राप्त कैचें ॥४॥
मानुनी असार नगरद्वारा गेला । प्रचीती तयाला नयेचि ते ॥५॥
जेव्हां वेत्नधारी मजुरा करिती । चरणासी लागती सुदाम्याच्या ॥६॥
सुदामदेव तेव्हां मंदिरासी गेला । मग ओंवाळिला सुंदरीनें ॥७॥
समाधानी झाला सुदामा ब्राम्हण । करारे कीर्तन नामा म्हणे ॥८॥

“संत नामदेव गाथा” सुदामचरित्र अभंग १ ते २८ समाप्त

“संत नामदेव गाथा सुदामचरित्र”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव अभंग । संत नामदेव । संत नामदेव महाराज । संत नामदेव माहिती । संत नामदेव माहिती मराठी मध्ये ।
संत नामदेव फोटो ।

संत नामदेव गाथा । संत नामदेव गाथा सुदामचरित्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *