संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (मनास व जनांस उपदेश)

संत निळोबाराय (मनास व जनांस उपदेश)

८७५

अभिशापासी कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥१॥

सहज एकांती बोलूं जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥

मग तें अपघातासी मूळ । करी तात्काळ नावरत ॥३॥

निळा म्हणे प्रमादी ऐसी । प्रमदेपासीं अखंड ॥४॥

८७६

अभिमानाच्या भुली । ज्या त्या कर्मीं लिप्त झाली ॥१॥

नेणोनिया ज्ञानमूढें । भोगासक्त पुढें पुढें ॥२॥

म्हणती अंगें आम्हीं केलें । सहजें जें जें घडोनि आलें ॥३॥

निळा म्हणे मत्तें ऐसीं । गुंतली ते काळापाशीं ॥४॥

८७७

अवघियाचि ज्ञानें अवघींचि जाणें । परि एक नेणें आत्मज्ञान ॥१॥

बोल तितुके बोलचि वरी । परि न चडे पायरी प्राप्तीची ॥२॥

आपुलेंची हित आपण नेणें । वरी आणिकां शाहाणें करुं धांवें ॥३॥

निळा म्हणे ठकुनी लोकां । आपणहि नर्का जात सवें ॥४॥

८७८

अवघेंचि हें कर्मफळ । ओढवलें सकळ जगत्रया ॥१॥

स्वर्ग मृत्यु पाताळ लोक । कर्मबाधक म्हणोनियां ॥२॥

कर्मातीत झाले नर । तया लोकांतर मग कैंचें ॥३॥

निळा म्हणे पृथक होती । म्हणोनि भोगिती पृथकांतें ॥४॥

८७९

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा । म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥

तैसें नांवापासीं काये । करणी आहे विचित्र ॥२॥

केशविंचरिती फणी । तरी काय बहिणी शेषाची ॥३॥

निळा म्हणे सुगरणी । नांवें केरसुणी झाडिती ॥४॥

८८०

बाप बंधु वेगळा करुनी । इतरां लागुनी बाधक ॥१॥

म्हणोनि परांगनेसवें । सलगी नवजावें एकांतीं ॥२॥

जरी उदंड दंडक झाला । तरी तों त्याला नाडकचि ॥३॥

निळा म्हणे ते विकल्पखाणी । प्रमदा सज्जनीं वाळावी ॥४॥

८८१

बुध्दीसि निश्चय नाहीं साचा । तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥

तयाचि नांव म्हणिजे वेडें । असोनि पुढें न देखे हित ॥२॥

लज्जा मात्र हारपोनि जाये । नागवेंचि ठायें उभें मग ॥३॥

निळा म्हणे न धरीं धीर । न मानी उत्तर सांगितलें ॥४॥

८८२

ब्रम्हीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां ॥१॥

परि हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणऊनि निरया गांवां ॥२॥

जिहीं केला हा सायास । पावले पदास ते संत ॥३॥

निळा म्हणे अनुभवसिध्द । ऐसा प्रसिध्द कलियुगीं ॥४॥

८८३

विश्वासी ते ऐकतां कानीं । धरिती मनीं आदरें ॥१॥

पूर्वार्जितें उत्तमें होतीं । आली सत्संगती भेटो ते ॥२॥

सुखें सुखें वाढतें झालें । केलिया विठठलें कृपा मग ॥३॥

निळा म्हणे निजात्मसुखा । पावलें एका क्षणमात्रें ॥४॥

८८४

विठ्ठल  नाहीं ज्या ठाउका । परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥

करितो तें पोटासाठीं । बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥

दावील तें जाणा सोंग । धरुनि परमार्थाचें अंग ॥३॥

निळा म्हणे टिळें माळा । धरिला वृथा तो भोंपळा ॥४॥

८८५

विदयामानें गर्वताठा । धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥

नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हारविली ॥२॥

काम्यनिषिध्दीं आदर थोर । जप ते अघोर मंत्रांचे ॥३॥

निळा म्हणे यातना थोरी । नकीं अघोरी पडावया ॥४॥

८८६

विश्वास याचा न वाटे जया । विन्मुख तया नरदेहो ॥१॥

जाईल भोगावया योनी । दु:खदायिनी चौर्‍यांयशी ॥२॥

पुढती जन्म पुढती मरण । पुढती पतन अध:पात ॥३॥

निळा म्हणे पडती फेरा । यातना थोरा भोगावया ॥४॥

८८७

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं । क्षणहि सहवासीं न बैसती ॥१॥

येती जाती तरी ते दुरी । चौघाभीतरी त्याचिसवें ॥२॥

तेथें कैंचा विकल्प वाढे । शूर ते गाढे निवडले ॥३॥

निळा म्हणे काळासी धाक । इतरांचा लेख काय तेथें ॥४॥

८८८

शुध्द सात्विकी ब्राम्हण । सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥

रजतमें वैश्य निर्माण । शूद्रा तमो निर्मिता ॥२॥

नाना याति नाना भेद । यांपासुनी शाखा विविध ॥३॥

निळा म्हणे निषिध्द तमीं । अनामिकादि पापकर्मी विटाळ ॥४॥

हे तों याति स्वाभाव गुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥५॥

अवघे ठायीं पंचभौतिक । आत्मा सकळां व्यापक एक ॥६॥

निळा म्हणे गुणवांटणी । योगी विभाग चहूं वर्णी ॥७॥

८८९

जाईल तेथें तेंचि फळ । दु:खकल्लोळ यमजाच ॥१॥

हरिभक्तीसी विन्मुख होती । ते ते जाती अध:पता ॥२॥

दु:ख शोक व्याधी पीडा । अपघात रोकडा हाचि त्यासी ॥३॥

निळा म्हणे सुकृत नेणें । वेष्टिलें गुणें मायेचिया ॥४॥

८९०

जाणिवेचें ज्ञान । तर्कवादाचें जल्पन ॥१॥

काय करुं तो गोमटा । भरला अहंकाराचा फाटा ॥२॥

बोले तें तें ताये ताये । नेणे परमार्थाचि सोये ॥३॥

निळा म्हणे तैसींची गती । पावे आपुलिया मती ॥४॥

८९१

जारण मारण स्तंभन मोहन । वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥

येणेंचि मिरविती जगीं । अशुचि अनुरागीं निरंतर ॥२॥

जडयाबुटया हातीं शिरीं । ताईताभीतरीं वागविती ॥३॥

निळा म्हणे चिरकाळ नरकीं । वसावया कुंभपाकीं पूर्वजेंसी ॥४॥

८९२

जुनाट पारखी । पारखिलें सनकादिकीं ॥१॥

आतां कोण काढी खोडी । मोडूं जातां फाडोवाडी ॥२॥

दुरुनि देखतांचि कळे । निवती देखण्याचे डोळे ॥३॥

निळा म्हणे खया वित्ता । बोल कोण्‍ ठेवी आतां ॥४॥

८९३

जे जे येती वारकरी । भेटों हरि धांवे त्यां ॥१॥

म्हणे माझे अंतरंग । आले जिवलग भेटीसी ॥२॥

करुनी प्रीतीचा सोहळा । अवलोकीं डोळां क्षणक्षणां ॥३॥

निळा म्हणे आवडी ऐसा । होउनी सरिसा ठाके पुढें ॥४॥

८९४

जें जें बोले तें विकळ । नाहीं विठठलीं कळवळ ॥१॥

कोरडेंचि शब्दज्ञान । नाहीं प्रेमाचें जीवन ॥२॥

जाणे तर्क वितर्क मति । समर्पक समयीं स्फूर्ती ॥३॥

निळा म्हणे पडिली हातीं । जाणिवेच्या नुगवे गुंती ॥४॥

८९५

जेथें जेणें केला वास । तोचि वाटे त्यास निजग्राम ॥१॥

एरवीं सर्वहि भूमंडळ । आहें हें स्थळ याचेंचि ॥२॥

अवघेचि पाहोनि फिरोनि आला । परि त्या विसरला निजठायां ॥३॥

निळा म्हणे घेतलें सोंग । तेंचि त्यासी मग गोड वाटे ॥४॥

८९६

ज्यांचा विश्वास जडला पायीं । हरिवीण कांही नेणती ॥१॥

त्याचा करी अंगिकार । निरसी अंधार ममतेचा ॥२॥

सत्यासत्य दाखवी तया । लावी आपुलीया निजसोई ॥३॥

निळा म्हणे ऐसें वर्म । सांपडे सुगम एकनिष्ठा ॥४॥

८९७

ज्याचें अंतर तया ठावें । उमटेल बाहेरीं क्रियाभावें ॥१॥

म्हणोनियां धीर करा । माजिघरींचें येईल दारा ॥२॥

नव्हे आघातुरडा खेळ । सत्ता ज्याची त्याचें बळ ॥३॥

निळा म्हणे आहे धणी । शिरीं संपन्न सर्वो गुणीं ॥४॥

८९८

ज्याचें देणें त्याचें नाम । गावें प्रेम धरुनियां ॥१॥

नाहीं तरी घडती दोष । अंगी नि:शेष कृतघ्रता॥२॥

पिंड वाढें ज्याच्या अन्नें । त्याचेचि वानें वाढवावें ॥३॥

निळा म्हणे माझे दाते । सरते पुरते संतजनीं ॥४॥

८९९

झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥

म्हणोनियां न ये मोला । नाश पदरीं असे त्याला ॥२॥

दिसे पतंगाचा रंग । नाहीं धुतला तोंवरी चांग ॥३॥

निळा म्हणे परमहंस । झाला बहुरुपी परि तें फोस ॥४॥

९००

नष्टा सज्जना एकचि वाट । परि अनिष्ट इष्ट फळें ॥१॥

एका उत्तम वैकुंठवास । जाणें निरयास हें एका ॥२॥

जातां येतां सारिखेचि दिसती । परि ते पावती पद भिन्न ॥३॥

निळा म्हणे अर्जित फळ । भोगवी कपाळ ज्याचें त्या ॥४॥

९०१

न सांपडे ऐसी कधीं । वेळ लागली ते संधी ॥१॥

हरिचे गुण वाचे यावे । श्रवणीं श्रवण ते करावे ॥२॥

गेलीं जातील वर्षे काळ । आयुष्या वेंचूनियां निर्फळ ॥३॥

निळा म्हणे यालागीं करा । वेगें आतां चित्तीं धरा ॥४॥

९०२

नाना मतांतरें शब्दाच्या व्युत्पत्ती । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥

माझया विठोबाचे वर्म आहे दुरी । कैची तेथें उरी देहभावा ॥२॥

यज्ञ योग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान ऐलाडीं तें ॥३॥

निळा म्हणे विषयीं उपरती चित्ता । व्हावी सप्रेमता आवडीची ॥४॥

९०३

न वाटें हें सांगतां खरें । न येतां बरें स्वानुभवा ॥१॥

बुध्दि मलीन झाली कामें । संसारभ्रमें मन वेडें ॥२॥

कैसेन येईल हें प्रतीति । विश्वास चितीं नुपजतां ॥३॥

निळा म्हणे खरें कुडें । दृष्टी निवडें पारखिया ॥४॥

९०४

नाहीं वारी पळमात्र घडी । गेले कल्पकोडी यांचिपरि ॥१॥

आतां कधीं मोकळा होसी । मग या पावसी परमार्था ॥२॥

पावोनि उत्तम तनु नरदेहा ऐशी । बहु वेळां आयुष्यासी नासियलें ॥३॥

निळा म्हणे अधमा हिंडोनि नाना योगी । त्रास नुपजे मनीं अझून कैसा ॥४॥

९०५

नाही विठोबाचें प्रेम । गाणीव श्रम वृथाचि तो ॥१॥

काय करिती आपुल्या दैवा । भुली वैभवा जाणिवेच्या ॥२॥

भरावें पोट हेंचि जाणती । नरदेहा धाडिती व्यर्थ वांया ॥३॥

निळा म्हणे गिळिलें कर्मे । पुढें मरणजन्में अनिवारें ॥४॥

९०६

नीच यातीसीं संगती । आवडे ज्या अहोरातीं ॥१॥

तोचि ओळखावा दोषी । दुराचारी पापराशी ॥२॥

नेणें आपुला विधिधर्म । करी मना आलें कर्म ॥३॥

निळा म्हणे नर्कंवासीं । करी घालुनी पूर्वजांसीं ॥४॥

९०७

नेणोनिया आपपर । करी भलत्यासवें वैर ॥१॥

वावदूक ते काजेंविण । तोडूनी सांडी सविधान ॥२॥

सर्व काळ अविवेक । करुनी प्रस्तावे बाधक ॥३॥

निळा म्हणे भोगीं फळें । दु:खाचींच प्राचीनबळें ॥४॥

९०८

नेणोनि पारिखे । आत्मा आपणा न देखे ॥१॥

न देखोनि दुजें कांहीं । आपींआप असें पाहीं ॥२॥

नामा रुपा येणें । नाहीं होणें ना निमणें ॥३॥

निळा म्हणे नव्हे जागें । निजस्वप्न ना वाउगे ॥४॥

९०९

पदार्थ मात्र पाहों जातां । प्रगटे अवचिता त्यामाजीं ॥१॥

ऐसा वेध लाविला मना । विसरों आपणा नेदीचि ॥२॥

सुख विपत्ति भोगितां भोग । वोडवी अंग आपुलेंचि ॥३॥

निळा म्हणे ठावोचि रिता । नेदी हा सर्वथा राहों पुढें ॥४॥

९१०

परस्त्रीसंगें घडती दोष । बुडे वंश पापें त्या ॥१॥

यमधर्म घाली बंदी । नव्हे कधीं सुटिकाचि ॥२॥

पूर्वज अध:पतना जाती । मग ते शापिती अतिक्रोधें ॥३॥

निळा म्हणे पातित्य ऐसें । वरी संगदोषें परस्त्रीच्या ॥४॥

९११

पापासवें जिणें ज्याचें । वृथाचि त्याचें झालेपण ॥१॥

भोगितां भोग रडे मग । म्हणे मी जगनिंदय झालों ॥२॥

सांगतां हित नाहीं एकिलें । वडिलीं दाविलें विहित तें ॥३॥

निळा म्हणे आतां पडियेला खोळे । गिळियला काळें व्याधिसर्पे ॥४॥

९१२

ठायीं मीचि नाहीं म्हणें । हारपलों भ्रांतिगुणें ॥१॥

लोकां म्हणे धांवा धांवा । मज अपणा भेटवां ॥२॥

प्रभा सूर्यातें गिवसि । गोडी पुसे साखरेसी ॥३॥

निळा म्हणे लहरी सिंधु । भेटावया करी खेदू ॥४॥

९१३

तेचि माझे सर्वसाक्षी । आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥

काय केलें इतरां जनां । भरली भावना त्रिविधा ॥२॥

ठावें ज्याचें तया वर्म । आणिकां दुर्गंम जाणतियां ॥३॥

निळा म्हणे व्याली जाणे । वांझें वायाणें तिडकांचें ॥४॥

९१४

त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया ॥१॥

नवल याची लाघवी माया । यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥

जेथें तेथें उभीचि आड । होऊनियां कवाड भ्रांतीचें ॥३॥

निळा ब्रम्हादिकां । याचिपरी लोकां झकविलें ॥४॥

९१५

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही । वर्तती गुणीं आपुलाल्या ॥१॥

जैसी क्रिया तैसें फळ । हें तों सकळ जाणती ॥२॥

उत्तम मध्यम अधम भेद । जाणती विशद जाणते ॥३॥

निळा म्हणे आपुलाल्या परी । उमटती अंतरी भाव भिन्न ॥४॥

९१६

दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं ॥१॥

तापल्या तेलीं पडतांचि शीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥

पुढिलांचे उत्तम गुण । ऐकोनियां उत्थापन करुं धांवे ॥३॥

निळा म्हणे यातना त्यासी । केवीं नर्कावासीं नव्हती सांगा ॥४॥

९१७

नयेचि साचा हा प्रतीति । असोनियां भूतीं भगवंत ॥१॥

कर्माकर्में लागलीं पाठीं । बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥

सत्यचि परि तें असत्य वाटे । भोगिती उदृष्टें आपुलालीं ॥३॥

निळा म्हणे कर्मतंत्रीं । गुंतलीं यंत्रीं मायेच्या ॥४॥

९१८

ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ । वसे अनामिकीं विटाळ ॥१॥

हे तों यातिस्वभावगुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥

अवघे ठायीं पंचभौतिक । आत्मा सकळां व्यापक एक ॥३॥

निळा म्हणे गुणवांटणीं । योगी विभाग चहूं वर्णी ॥४॥

९१९

भलते वेळे भलतेंचि करी । निर्भीड सर्वदा अंतरीं ॥१॥

न म्हणे कर्म हें निषिध्द । आलें मना तेंचि शुध्द ॥२॥

लाजेचा पेंडोळा । खाणोनि सांडिला निराळा ॥३॥

निळा म्हणे अवाच्य बोले । छंदे आपुलियाचि डोले ॥४॥

९२०

भवाब्धीचें सखोल पाणी । बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥

येथें उतार न दिसे कोणा । थोरा लहाना नागवण ॥२॥

सत्व कर्मे स्वर्गा जाती । तमें पडती अध:पातीं ॥३॥

निळा म्हणे रजतमात्मक । पावती लोक नरदेहा ॥४॥

९२१

भाविकाचा मनोभाव । पाववी देव सिध्दी हा ॥१॥

तेंचि सत्य बोलिलों बोलें । माझिया आलें स्वानुभावा ॥२॥

जाणें अंतरींचें आर्त । साक्षभूत सकळांचा ॥३॥

निळा म्हणे संदेह नाहीं । अनुमान कांहीं यदर्थी ॥४॥

९२२

भाग्यहीन व्दाड । तया बुध्दि करी नाड ॥१॥

सुख तें सन्मुख । तया तेंचि भासे दु:ख ॥२॥

हित अनहितावरी । देखोनियां पळे दुरी ॥३॥

निळा म्हणे उफराटे । प्राक्तन होऊनियां भेटें ॥४॥

९२३

भीड भीड जाय उडोनि लौंकिक । शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥

दावितां तो तोंड लाजे भरले सभे । मग वाळे उभें सलचि जैसें ॥२॥

सुहदजन ते अवमान करिती । निष्ठुर बोलती त्रासवंचनें ॥३॥

निळा म्हणे मग होय दैन्यवाणें । हो काय तैसें जिणें भूमिभार ॥४॥

९२४

भुंकोनियां उठी । श्वान लागे भलत्या पाठीं ॥१॥

ऐसा देहस्वभावगुण । नेणे भला बुरा कोण ॥२॥

तैसाचि तो अतिवादी । अविवेकी सदा क्रोधी ॥३॥

निळा म्हणे ओळखी सांडी । आलें तैसें बरळें तोंडीं ॥४॥

९२५

माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास । नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगत ॥१॥

बहुतां सांभाळिलें देवा । केला बहुतांचा कुडावा । बहुतां दानें वाढल्या सेवा । बहुतां स्थपिलें निजपदीं ॥२॥

बहुतीं गाईलें तुम्हां गीतीं । बहुतीं स्तपिलें तुम्हां स्तुतीं । बहुतां ध्यानीं तुमची मूर्ती । आलिंगिली हदयांत ॥३॥

बहुतीं तुम्हां आराधिलें । बहुतीं पूजनीं तुम्हां पूजिलें । बहुतीं यज्ञावदानीं याजिलें । बहुती पाहिलें ज्ञानदृष्टीं ॥४॥

बहुतीं वेदस्तवनमिसें । तुमतें कवळिलें मानसें । बहुतीं योगादि सायासें । लाविलें पिसें आपणीया ॥५॥

तुम्ही पुरलेती त्यांचीया भावा । सर्वज्ञपणें जी व्यापक देवा । घेऊनिया सेवा आपुलिया गांवा । नेलें केशवा निजवस्ती ॥६॥

ऐशी ऐकोनियां संतवाणी । मिठी विश्वासें घातली चरणीं । निळा म्हणे माझी आरुषवाणी । लावावी गुणीं आपुलिये ॥७॥

९२६

याचे पायीं धरिल्या भाव । भेटेल देव निश्चयें ॥१॥

नव्हे अन्यथा भाषण । ठावी खूण संतांसी हे ॥२॥

निजकरें कुरवाळून । देईल आलिंगन अत्यादरें ॥३॥

निळा म्हणे येईल दारा । देव सामोरा धांवोनिया  ॥४॥

९२७

येथील लाभ घडे ज्यासी । तो त्या सुखासी अधिकारी ॥१॥

जेथें वसती नारायण । लक्ष्मी आपण वैकुंठी ॥२॥

तेथेंचि तोहि पावेल सत्य । भोगी अव्दैत निजसुखा ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हादिकां । न लभेचि एका अभिमानें ॥४॥

९२८

येथें येऊनि केलें कायी । विठ्ठल  नाहीं आठविला ॥१॥

आहा रे मूढा भाग्यहीना । नेलासी पतना मोहभ्रमें ॥२॥

नाहीं केली सुटिका कांहीं । येचि प्रवाही पडिलासी ॥३॥

निळा म्हणे लाहोनि हातीं । केली माती आयुष्या ॥४॥

९२९

येऊनियां नरदेहा । कांहीं स्वहित तें पहा ॥१॥

नाहीं तरी व्यर्थ जन्म । चिंतीतसे विषयकाम ॥२॥

पशु विषय सेविती । तयापरी तुझी स्थिति ॥३॥

निळा म्हणे व्यर्थ गेला । प्राणि भूमिभार झाला ॥४॥

९३०

लवेमाजीं उत्पन्न एक । रक्तशोक पशुदेहीं ॥१॥

मांसाहारी जळाहारी । तृणाहारी फलभक्षी ॥२॥

कोठें धान्य भक्षूनि अन्नें । कोठें प्राशनें पवनाच्या ॥३॥

निळा म्हणे जन्म जेथें । रुचे तेथेंचि तया ॥४॥

९३१

लोहा लागतां सुवर्ण । करावें हा स्वभावगुण ॥१॥

केंवि सांडवेल परिसा । जगदगुरु हा विठ्ठल  तैसा ॥२॥

रत्ना अंगी रत्नकीळ । नव्हती भिन्न अग्निज्वाळ ॥३॥

निळा म्हणे सांडुनि जळा । सागर न निवडे वेग्ळा ॥४॥

९३२

लुगडया नांव चंद्रकळा । परी तो काळा रंग वरी ॥१॥

नांवा ऐसें कर्तृत्व नाहीं । तरी तें कायी नपुसंक ॥२॥

घोळण्या नांव लक्षुमण । करितें भर्जन लाहयांचें ॥३॥

निळा म्हणे घुसळिती रवी । परी ते न दावी प्रकाश ॥४॥

९३३

वर्माचाचि स्पर्श करी । क्षुद्र धरुनियां अंतरीं ॥१॥

न धरि पातकाचें भय । नेणें पुढें होईल काय ॥२॥

इच्छी सदा अभ्यंतरीं । परधन पराचिया नारी ॥३॥

निळा म्हणे भेटी । होतां सुकृताची आटी ॥४॥

९३४

वदवी असत्याची वाणी । माजी निंदेची पुरवणी ॥१॥

जळो जळो त्याचें तोंड । पचतें पापाचेंचि कुंड ॥२॥

कुश्चळ सर्वदा अंतरीं । इतरांचिया घातावरी ॥३॥

निळा म्हणे भोगील पीडा । नर्कवासीं होउनी किडा ॥४॥

९३५

वचनींही नव्हे उणें । तुकुनी पाहतां सुजाणें ॥१॥

झिजलें ना कुहिजलें । नित्य नवेंचि चांगलें ॥२॥

नलगे घालावी निशाणी । वारंवार क्षणक्षणीं ॥३॥

निळा म्हणे कोठें तरी । नेतां देश देशांतरीं ॥४॥

९३६

समाधान तें दर्शनें । होय सद्गुरुकृपेनें ॥१॥

गुरुकृपा होण्यासाठीं । गुरुभक्ति हे गोमटी ॥२॥

साधन चतुष्टय । गुरुभेटीचा उपाय ॥३॥

निळा म्हणे कर्मे जाण । चित्तशुध्दि ते निर्माण ॥४॥

९३७

सर्पे मुखींच धरिलें विष । मानुनि पीयूष अत्यादरें ॥१॥

आणिका डंखुनी वधवी प्राणा । तैसी त्या दुर्जना चाहाडी गोड ॥२॥

नागवूनि भलियां संतोष मानी । कैसा तो पतनीं न पडेल सांगा ॥३॥

निळा म्हणे जें जोडिलें सायासें । तोचि तयाहि ऐसें भोगणें पुढें ॥४॥

९३८

सहजचि घरींहूनियां यावें । विठठला पहावें रुक्मिणी ॥१॥

न लभेचि जो कां ब्रम्हादिकां । तो या लोकां दाखविला ॥२॥

भेटीचि घेतां वरावरी । सन्मानें करी गौरव ॥३॥

निळा म्हणे भाग्यवंत । करी सनाथ अनाथां ॥४॥

९३९

संत आज्ञा सादवित । जातों सकळांचेंहि हित ॥१॥

नाईकोनी सोडाल । फळ कनिष्ठ तरी पाबाल ॥२॥

आम्ही उत्तीर्ण आपुलिया । उचिता ठेलों सांगोनियां ॥३॥

निळा म्हणे यावरी आतां । बोल न ठेवावा मागुता ॥४॥

९४०

सुख वांटे परी हें दु:ख । भोगविल नर्क परिपाकीं ॥१॥

म्हणोनियां सांडीं आशा । भजें सर्वेशा विठठला ॥२॥

जेणें कधींचि नये तुटी । लाभें कोटी कल्प जिणें ॥३॥

निळा म्हणे पावसी पदा । येथें आनंदा निजवस्ती ॥४॥

९४१

सुखानंदाची राणीव । भागा आली फावली सर्व ॥१॥

घ्याल ते घ्या रे धणीवरी । असाल जे जे या अधिकारी ॥२॥

फुकासाठीं वोळोनी आलें । घरासी दैव हें चांगलें ॥३॥

निळा म्हणे उबग नका । मानूं अवघेहि ऐका ॥४॥

९४२

सार्थकाचा ऐसा काळ । केला अमंगळ मूढ जनीं ॥१॥

येऊनियां नरदेहासी । नेणें स्वहितासी आपुलिया ॥२॥

धिक् त्याचें झालें जिणें । विना स्मरणें श्रीहरिचिया ॥३॥

निळा म्हणे त्याची जोडी । अवघी कुळवाडी पापत्मक ॥४॥

९४३

सांगितली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा ॥१॥

तया सन्मुख झाला हरी । संसार तमारी तिमाराचा ॥२॥

निरसूनियां भ्रांतिमळ । केलें निर्मळ सहवासी ॥३॥

निळा म्हणे झाला ऋणी । चक्रपाणी त्याचाची ॥४॥

९४४

सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥

बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥

पुढें सुख विश्रांती मागें राहे कीर्ति । ऐशिया पध्दति संतांचिया ॥३॥

निळा म्हणे देवें बोलविले बोल । ध्याल ते ते व्हाल सुखी तुम्ही ॥४॥

९४५

सांपडलीं संधी । त्यासी कर्मी दृढ बुध्दी ॥१॥

वेदविहित कर्म । हेंचि परमार्थाचें वर्म ॥२॥

कर्मालागीं जो तत्पर । तोचि पावे पैलपार ॥३॥

निळा म्हणे परब्रम्ह । प्राप्त होय विहित कर्म ॥४॥

९४६

उत्तम अधम जया जे संगती । तैसी त्याचि मति फांकों लागें ॥१॥

सज्जना संगतीं धर्मक्रिया वाढे । पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥

म्हणोनि जैसिया तैसा झाला हरी । भक्ता मित्र वैरी निंदक खळा ॥३॥

निळा म्हणे जाणे अंतरीचां भाव । तया तैसा देव फळदाता ॥४॥

९४७

एकलेंचि यावें एकलेचि जावे । जोडिलें नये सवें देखती सर्व ॥१॥

परि या मायाभ्रमें कैसा केला गुंता । न पुरती संचिता भोगितां भोगा ॥२॥

पुन्हा जन्म पुन्हा मरणाचि सांगती । यमदंड पावती गर्भवास ॥३॥

निळा म्हणे नये विकृति कंटाळा । टोके  जेविं कावळा वमनासाठीं ॥४॥

९४८

एकलाचि हरि । नेणोनियां चराचरीं ॥१॥

करिती निंदा आणि व्देष । घेऊनियां गुणदोष ॥२॥

क्षणीक पसारा । मायिक मानियेला खरा ॥३॥

निळा म्हणे गेलीं । ऐशींच कितेकें नाडलीं ॥४॥

९४९

ऐशा सोसूनियां यातना । कां रे मना वीट नये ॥१॥

बुध्दिहीना मतिमंदा । किती आपदा उसंतिसी ॥२॥

कधीं पावेल परिपाक । बुध्दि विवेका सपर्शेल ॥३॥

निळा म्हणे रित्या मापें । विषय संकल्पें मावितोसी ॥४॥

९५०

ऐशियाचे घरीं ऐसीचि मी सदा । न करुनी कांही धंदा सर्वहि करी ॥१॥

सदाचि निष्काम सदा मी मी सकाम । सद रुप नाम नूतन माझें ॥२॥

सदा नाहींपणें सदा माझें जिणें । सदा होणें निमणें माझा वांटा ॥३॥

निळा म्हणे ऐसें बोले मायादेवी । अबोलण्याची गांवीं वसोनियां ॥४॥

९५१

किंचीत सुख आगळें दु:ख । पावती अवश्यक व्यभिचारी ॥१॥

क्षयो व्याधी भगें पडतीं । जगनिंदय होती हे आधीं ॥२॥

पुढें राजा दंड करी । सर्वस्व हरी देखतां ॥३॥

निळा म्हणे हांसती लोक । थुंकिती थुंक तोंडावरी ॥४॥

९५२

कैसा होतो ब्रम्हानंद । भागयमंद न देखति ॥१॥

वाजतां वादयें नाईके कानीं । वीट मानी अभागी ॥२॥

म्हणे सेवूं या रे गडी । तोडूं बेडी संसार ॥३॥

निळा म्हणे ऐसी वेळ । न लभे काळ वेचलीया ॥४॥

९५३

कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥

वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥

ज्यांचिया वचनासाठीं उडी । घालुनी तांतडी उभें ठाकें ॥३॥

निळा म्हणे दिवस राती । जयांप्रती न विसंबा ॥४॥

९५४

समर्थी घरीं काम । करितां हातीं लागे दाम ॥१॥

काय देईल भिकारी । कोण सेवा त्याची करी ॥२॥

जाती तया घरा । जेथें लक्ष्मीचा वारा ॥३॥

निळा म्हणे हीना । आड ठाकिली कल्पना ॥४॥

९५५

विंचु नांगीं विष धरी । खोसडेवरी मृत्यु त्या ॥१॥

जैसें कर्म तैसें फळ । हें तों अढळ न चुकेचि ॥२॥

चोयाकरिता तुटती हात । पावति घात जीवितेसी ॥३॥

निळा म्हणे सिनळी करिता । झुरती उभयता नाककान ॥४॥

९५६

नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रमंत्रीं अनुभव तो ॥१॥

हर्षामर्ष आंगीं आंदोलती लाटा । कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥

न सरें ते भक्ती विठोबाचे पाई । उपरती नाहीं जेथें चित्तां ॥३॥

निळा म्हणे सुख देहनिरसनें । येर ते वचनें व्यर्थ वाया ॥४॥

९५७

योगाभ्यास साधताचि सांग । येति उपसर्ग सिध्दींचे ॥१॥

कैंचि तेथें हरीसी भेटी । विवंचना शेवटी काळाचि ॥२॥

विचारितां ज्ञान अभिमान वाढे । नसतेचि झगडे जाणिवेचे ॥३॥

निळा म्हणे जे हरिनाम जपती । मुक्तचि ते होति नि:संशये ॥४॥

९५८

तोचि जाणें अंतरीचें । लटिकें साचें सर्वदृष्टा ॥१॥

कैसें चाले तयापुढें । निवडे कुडे वरावरी ॥२॥

हें तों आहे सकळां ठावें । लटिक्या भावें नपवीजे ॥३॥

निळा म्हणे अभिमान होता । ठाकीला विधाता शेष नेदी ॥४॥

९५९

नाम सांडुनिया मुक्ति घेणें । हे तों लक्षणें अधमाची ॥१॥

आम्हा विष्णुदासा धर्म । नित्य नेम कथेचा ॥२॥

काय करुं त्या व्युत्पति । वडील हांसती पूर्वज ॥३॥

निळा म्हणे करावी सेवा । आवडी देवा हे माझी ॥४॥

९६०

माया म्हणजे नसतेंचि दिसें । गगनीं जैसें दोनी चांद ॥१॥

असें एक भासे आणीक । तया नांव मायीक पसारा ॥२॥

सत्यावरी न पडे दृष्टी । विकल्प परिपाठी घालितु ॥३॥

निळा म्हणे प्रत्यक्ष लपवी । लटिकेंचि रुढवी भ्रांतिजाळ ॥४॥

९६१

मागें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकांहि ठेवलें । भावें विश्वासिते पावले । अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥

चतुरा चतुरशिरोमणी । सकळां जाणतियांचा धणी । करुं जाणतो वांटणी । भाग जैसें त्यापरी ॥२॥

एका वर्णाश्रमधर्में । एका यज्ञादिका कर्में । एका वेदाध्ययननेमें । एक चतुर्थाश्रमें संन्यासें ॥३॥

एका नामस्मरणमात्रें । एका पढतां स्तवनें स्तोत्रें । एका गुणानुवादचरित्रें । वर्णिता हा तोषला ॥४॥

एका ध्यानें समजाविलें । एका पूजनेंचि वारिलें । एका जपें बुझाविलें । एका स्थापिलें योगावरी ॥५॥

एका तीथें यात्रागमनें । एका ब्रम्हचर्यादि अनुष्ठानें । एका व्रतें पुरश्चरणें । गृहस्थाश्रमें वानप्रस्थें ॥६॥

निळा म्हणे हा सर्व जाणे । सर्वसाक्षी सर्वज्ञपणें । जयापरि तैसें देणें । करी हा उणें नाहीं यासी ॥७॥

९६२

मुखीं पडतांचि तें शेष । करी नाश कल्मषा ॥१॥

पावूनियां ब्रम्हपदा । ओपी संपदा अनैश्वरा ॥२॥

शांति क्षमा दया सिध्दी । येती समृध्दि ओळंगण्या ॥३॥

निळा म्हणे सर्वहि सुखें । वरिती हरिखें शेष घेतां ॥४॥

९६३

मोलें विकें स्वाभावगुणीं । येरवी तीतें न पुसे कोणी ॥१॥

हिंगा दुर्गधीची मोल । तेणेंविण तो अवघा फोल ॥२॥

भांगीं न भुलवीं भक्षिल्या । येरचि तरी तो व्यर्थचि पाला ॥३॥

निळा म्हणे तैशिया परी । देवपणेंचि देवा थोरी ॥४॥

९६४

म्हणोनि याचिया श्रवणें पाठें । वचनें पालटे देहबुध्दी ॥१॥

वैराग्याची राणीव जोडें । ज्ञानाचें उघडें निजमंदिर ॥२॥

नवविधांचें नाना भोग । वसविती अंग येऊनियां ॥३॥

निळा म्हणे भक्ति मुक्ति । शांति विरक्ति वरती त्या ॥४॥

९६५

वाळिलें जे पंढरिनाथें । त्याचें कोण कार्य येथें ॥१॥

घाला आपणा बाहेरीं । नका सांगों त्याची थोरी ॥२॥

आगम पहिला वेदांत । चित्त विषयापें सतत ॥३॥

धनें मानें केलें वेडें । सुख नेणती ते बापुडे ॥४॥

मान इच्छा चाड जीवीं । काय करुं ते गोसावी ॥५॥

जाती म्हणोनी आनाठाया । निळा दुर पासुनी तयां ॥६॥

९६६

वाचे शब्द असत्याचे । हेंचि दुर्जनांचे भांडवल ॥१॥

पुढिलांते उपहासिती । आणि मानिती संतोष ॥२॥

निंदा व्देष अहंकार । मद मत्सर वाढते ॥३॥

निळा म्हणे नर्कां जाणें । आहे पुरश्चरणें त्यांचीं हें ॥४॥

९६७

हिंडवितां देश । नये तुटी ज्या लाभास ॥१॥

चाले सर्व घेणेंदेणें । कोठें कांहीं न पडे उणें ॥२॥

पारखितां भलें । कसींतांही उतरलें ॥३॥

निळा म्हणे निवडी नाहीं । एकसारिखेंचि अवघेंही ॥४॥

९६८

होईल अंगी बळ । तरी फजीत करावे ते खळ ॥१॥

जे कां करुनियां पाखांड । लटिकेंचि वाढविती बंड ॥२॥

भोंदिती भाविकां । कथुनी परमार्थ तो लटिका ॥३॥

निळा म्हणे तोंडें सांगें । तैसें नाचरोनियां अंगें ॥४॥

९६९

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती । फेरे खाती यातना ॥१॥

संकटापासूनि सोडविता । कोण हो होता देवावीण ॥२॥

निष्काम करुनी ठेवितां दासा । कोण हो होता ऐसा देवावीण ॥३॥

निळा म्हणे निर्लोभ शांती । कोण देतां हातीं भक्तांचिये ॥४॥

९७०

जरी झाला तपस्वी थोर । तरी असावें दूर परस्त्रिसी ॥१॥

गुरुनींही एकांतासी । न वजावें स्त्रीयांसी उपदेशा ॥२॥

वसतां एकत्र आनोविन । होईल जघन्या निमीषें ॥३॥

निळा म्हणे जतन करा । शाहाणे विचारां ऐसें आतां ॥४॥

९७१

पाप तया नांव परदारागमन । पाप तें परधन अपहार ॥१॥

पाप तेंचि निंदा परपीडा व्देष । पाप तेंचि उपहास पुढिलाचें ॥२॥

पाप तेंचि जीवीं विषयाची आसक्ति । पाप अभक्तीं कुळाचारीं ॥३॥

निळा म्हणे पाप मुख्य तेंचि साचें । नावडे देवाचें नाम मुखीं ॥४॥

९७२

पापें पूर्वज नरका जाती । पापेंचि बुडती धर्म सकळ ॥१॥

पापेंचि कुळ भंगा जाय । वंशासी होय अपघात ॥२॥

पापेंचि यश कीर्ति पळें । पापेंचि सोहळे दरिद्राचे ॥३॥

निळा म्हणे घडतां पापेंचि पतनीं । पडती यातनीं पूर्वजेंसी ॥४॥

९७३

पिसाळलें श्वान । डसें भलत्या वसवसून ॥१॥

नेणें आपुलें पारिखें । घारलें ते आपल्या दु:खें ॥२॥

सुरापानीं भुलोनि जैसा । भोगी आपणा आणिकासरिसा ॥३॥

निळा म्हणे तैसी परी । जीविता महा मुर्ख करी ॥४॥

९७४

पुढें जाणवेल हें पहातां । अंगा येतां क्षीणत्व ॥१॥

मग तो नलगे कांहीं हाती । होईल माती आयुष्या ॥२॥

म्हणोनियां करा वेग । धरा अनुराग हरिभजनीं ॥३॥

निळा म्हणे पुढिल वेळ । आहे अति काळ कठिण तो ॥४॥

९७५

पुण्यपावन त्यांची वाणी । जगदोध्दचरणीं प्रवर्तली ॥१॥

सव्दिवेक अमृतपूर । चालती उदगार वाचे ते ॥२॥

भगवदजन परमार्थवाणी । जे वेदीं पुराणीं बहु मान्य ॥३॥

निळा म्हणे अदभुत रस । गोड सारांश हितकर्ता ॥४॥

९७६

सांगती एक करिती एक । जोडिती पातक दुर्बुध्दी ॥१॥

हिताहित न विचारिती । दुर्भरा भरिती महापापें ॥२॥

यमप्रहार होती पुढें । नेणोनि मूढें वर्तती ॥३॥

निळा म्हणे अंगा येईल । तेव्हां जाणवेल भोगितां ॥४॥

९७७

सांगतां आतां न वाटे खरें । भोगितां बरें जाणवेल ॥१॥

तेव्हां कोणी न ये कामा । हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥

यमजाच होतां दंड । न चले खंड धन देता ॥३॥

निळा म्हणे ऐशी गती । होऊनि पुढती गर्भवास ॥४॥

९७८

सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥

शृंगारिक तें माधुर्य गाणें । हास्य तें विनोदकरणें । कारुण्‍य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥

वीर ते युध्दाच्या गांठीं । शब्दामागें शब्द उठी । भयानक रसा भय घाली पोटीं । बीभत्स त्याहुनी कुष्टी उच्छुंखल ॥३॥

अदभुत रस ते नवलवाणें । जे का अचाटचि बोलणें । श्रोतयातें विस्मय देणें । ऐकतां शहाणे निर्बुजती ॥४॥

शांतरस तो शुध्द सात्विक । विकारविवर्जित माजीं विवके । निळा म्हणे हे नवरस देख । जाणति गायक चतुर ते ॥५॥

९७९

हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा । चला म्हणती  पाहों डोळा ॥१॥

देखणेंचि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥

आंता डोळिया डोळा पाहों म्हणे । तंव आपआपणीया न चले पाहाणें ॥३॥

निळा म्हणे ऐशिया परी । जाणों जातां जाणणेंचि हरि ॥४॥

९८०

गुंतली ते आशा । पडिली मोहजाळ फांसा ॥१॥

न देखोनियां श्रीहरी । कर्ता भोक्ता संसारीं ॥२॥

अवघीचि त्याचि सत्ता । करवी करि तो तत्वतां ॥३॥

निळा म्हणे ऐसी । नेणोनि होती कासाविसी  ॥४॥

९८१

गेला फिरोनिया दिवस । न ये घटिका लव निमिष ॥१॥

आहे तोंचि भरा हातीं । महा लाभाची संपत्ती ॥२॥

मागें नागवली फारें । गेलीं वांयां नारीनरें ॥३॥

निळा म्हणे म्हणोनि जागा । सांडोनी वोरबार वाउगा ॥४॥

९८२

गोड लागें जें आपणां । तेंचि वांटीं सकळांजणां ॥१॥

पोट भरेतों पुरवी । उरलें बांधोनियां ठेवी ॥२॥

जतन आहे तुम्हासाठीं । नका धांवो बारावाटीं ॥३॥

निळा म्हणे सांगा । पाहिजे तें जीवीचें मागा ॥४॥

९८३

कृपावंत माये । तान्हयाचे झटे साहे ॥१॥

नेदीचि हें रागा हातीं । करी बुझाउनी प्रीती ॥२॥

पुरउनियां आळी । कृपादृष्टी त्या न्याहाळी ॥३॥

निळा म्हणे झणे । दिसेल हें केविलवाणें ॥४॥

९८४

याचे पायीं मनोरथ । पूर्ण काम सकळहि आर्त ॥१॥

म्हणोनियां धरिला जिवें । हाचि संतीं मनोभावें ॥२॥

इच्छिलिया पदा । नेतों देउनी सुख संपदा ॥३॥

निळा म्हणे खंडी मूळ । वासनात्मकाचें तात्काळ ॥४॥

९८५

आधींच अविश्वासी जन । म्हणती कैंचा नारायण ॥१॥

कोण तारिले या काळें । लटिकीं बोलती पाल्हाळें ॥२॥

लटिके संत लटिका देव । लटिकेंचि पापपुण्य सर्व ॥३॥

निळा म्हणे आमुच्या त्यागें । तुम्हांसी निंदिजेल जगें ॥४॥

९८६

आपणा नोळखें । झाले ठायींचि पारिखे ॥१॥

विस्मय हा वाटे मना । कैसी भ्रमाची भावना ॥२॥

निजविसराचिया हातें । हारविलें हो आपणीयातें ॥३॥

निळा म्हणें घरिंच्या घरीं । आपआपणीयासीचि चोरी ॥४॥

९८७

आपलीं धणी पुरेंतों घ्यावें । उरले ठेवावें तैसेचि ॥१॥

भरला आहे हा सागर । नलगे अंतपार कोणासी ॥२॥

उदंड मागें झाले सुखी । आतां ही आणखी पावतील ॥३॥

निळा म्हणे नित्य नवा । आहे हा ठेवा जुगादीचा ॥४॥

९८८

आर्त जीवींचे जाणती । तया भेटती नसवरीत ॥१॥

करितां नामाचे चिंतन । देती वोरसोन निज लाभ ॥२॥

भाव देखोनियां चित्तीं । प्रसन्न होती तात्काळ ॥३॥

निळा म्हणे सर्व जाण । हेंचि ओळखण संतांचे ॥४॥

९८९

आर्त सर्वदा वाहती । संत भेटावेसे चित्तीं ॥१॥

तयांपासीं त्यांचा भाव । संतभेटीचा उपाव ॥२॥

हीं तया धन वित । कांही वेंचावे लागत ॥३॥

निळा म्हणे निश्चयेंसी । संत भेटती तयांसी ॥४॥

९९०

अवघा टाकोनियां धंदा । यारे गोविंदा सांगातें ॥१॥

अवघेचि लाभ येती घरा । तुमच्या एक मोहरा वोळोनि ॥२॥

काय कांडोनियां तें भूस । न लभे लेश कणाचा ॥३॥

निळा म्हणे पुरे उरे । सवे धुरे चालतां ॥४॥

९९१

आशाबध्दा नाहीं मान । बहुत सन्मान नैराश्या ॥१॥

याचिलागीं विचार करा । हित तें धरा मानसीं ॥२॥

भजतां देवा देवचि होती । विस्मरणें जात अध:पाता ॥३॥

निळा म्हणे ममता बाधी । नित्य समाधी नि:संगा ॥४॥

९९२

आशाबध्दाचिया मुखें । निघे अक्षर तें तें फिकें ॥१॥

श्रवणीं बैसोनियां श्रोता । विटे ऐकुनी त्याची कथा ॥२॥

न करुनियां नमस्कार । अव्हेरिती नारीनर ॥३॥

निळा म्हणे जळो जिणें । सदा त्याचें लाजिरवाणें ॥४॥

९९३

आहा रे काया जोडी केली । नर्कासी धाडिलीं उभय कुळें ॥१॥

उपजतां तुज संतोषले सर्व । बुडविलें नांव त्यांचेही त्वां ॥२॥

असत्याची वाचे सदा राबणुक । चोरी शिनाळिक न संडसी ॥३॥

निळा म्हणे वृथा हाहाभूत जन्म । केला ऐसें अकर्म आचरोनी ॥४॥

९९४

आंतु बाहेरी सर्वांपासीं । परी हा कोणासी नाढळे ॥१॥

मोहियली मायाभ्रमें । संसारसंभ्रमें म्हणोनियां ॥२॥

विस्मरणेंचि हा पडे दिठी । स्वार्थ् पोटीं विषयाचा ॥३॥

निळा म्हणे गेलीं वांयां । ऐसा पावोनियां नरदेह ॥४॥

९९५

आजिवरी काळ वृथाचि गेला । जेथुनियां झाला सृष्टिक्रम ॥१॥

ऐसेचि नाना धरितां वेष । न तुटती पाश कर्माचे ॥२॥

केव्हां स्वर्ग केव्हां नर्क। केव्हां दु:खदायक संसार ॥३॥

निळा म्हणे न पुरे घडी । ओढाओढी कल्प जातां ॥४॥

९९६

आणिकांसी सांगे आशेचें बंधन । सदाचा बराडी असोनी आपण ॥१॥

काय म्हणावें यावरि आतां । नष्टाचा परम नष्ट हाचि हा पहातां ॥२॥

भक्ताच्या हाताची पाहातसे वास । कांही देतील म्हणउनी टोकतचि बैसे ॥३॥

जळ फळ पुष्प्‍ देतां कांहींचि न सोडी । देऊं जातांचि घाली हा तोंडीं ॥४॥

आशेचा बांधला देव हा कैसा । कायं निवारील आमुची आशा ॥५॥

भक्त्‍ नदिती तैं उपवासीचि बैसे । काय खाईल जवळी कांहींचि या नसे ॥६॥

निळा म्हणे हा अनाथ बापुडा । जाणती संत परि न बोलती भीडा ॥७॥

९९७

आणिकाची संपत्ती । देखोनि दु:ख मानी चित्तीं ॥१॥

ऐसा पातकी चांडाळ । अशुचि तो सर्वकाळ ॥२॥

करी सज्जनांची निंदा । आपण दरिद्री सर्वदा ॥३॥

निळा म्हणे सहज गांठीं । बांधे यातनेच्या कोटी ॥४॥

९९८

आतां निजप्रेमाची हे जाती । देहभावीं नुरे स्फूर्ति । अवघिया संसारे निवृत्ति । देवो चितीं सर्वदा ॥१॥

ओकिलें अन्न जैसें राहे । कोणी फिरोनियां न पाहे । विषय देखोनि तैसें होये । महा वैराग्य त्या नांवे ॥२॥

एक आत्मा न दिसे दुजें । ज्ञान त्या नांव बोलिजे । विरक्ति निर्लोभता ते सहजें । देहममता न बाधी ॥३॥

साहे सर्वीचे अपराध । क्षमा त्या नांव तें अति शुध्द । सोसी अंगी दु:खादि बाध । निर्व्दव्द निर्मत्सर व्देष न करी तो ॥४॥

निळा म्हणे तेचि शांति । सर्वदा आनंदमय चित्तवृत्ति । दया ते भजन सर्वांभूतीं । भक्ती ते देवा न विसंबें ॥५॥

९९९

आतां तरी विचार करी । ध्यायीं अंतरीं विठठला ॥१॥

नाहीं तरी व्यर्थचि जासी । पुढें चौर्‍यांयसीं भोगावया ॥२॥

जिणें मरणें यांहुनी दु:ख । कोणतें अधिक् सांग पा ॥३॥

निळा म्हणे जरा व्याधी । नाना उपाधी दरिद्रें ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | मनास व जनांस उपदेश ।

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *