संत निळोबाराय महाराज

संत निळोबाराय महाराज

संत निळोबाराय महाराज

पिंपळनेर : प्रति पंढरपूर श्रीसंत निळोबाराय हे घोडनदीच्या काठी प्रभु रामचंदाने स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते. रामलिंगाचीते मनोभावे पूजा अर्चा करीत असे. कुलकर्ण वतनही त्यांच्याकडे होते पण त्यांच्या देवपूजेत कुलकर्ण वतनामूळे व्यत्यय आल्यामुळे त्यांनी वतन सोडून दिले व पुजा अर्चा, पंढरीची वारी, व नामस्मरणात ते तल्लीन होऊ लागले. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू अशी नियमित वारी सुरु केली. त्यांची पत्नी सौ.मैनाबाई हिने सुदधा पती बरोबर पायी वारी सुरु केली. शिरुरहून निळोबा पायी पिंपरनेर,पारनेर मार्गे पंढरपूर आळंदी,देहू अशी वारी करीत असताना संत तुकाराम महाराजांचे चिंरजीव नारायण महाराज यांच्या व निळोबांचा परिचय झाला. नारायण बुवांकडून तुकाराम महाराजांचे चरित्र ऐकावयास मिळाले. त्यामूळे निळोबा खुप प्रभावित झाले

पारनेरला असतानाच निळोबांरायांच्या मुलीचे लग्न झाले. लग्नातस्वतः पांडुरंगाने विठू गडयाच्या रुपाने पाणी भरण्यापासून सर्वकाम केले. लग्नानंतर निळोबारायांनी विठू गडयाला हाक मारली. त्यांच्या कामाचा मोबदला त्याला दयावा म्हणून बोलावले देवघरातील काम उरकून येतो असे म्हणून विठू गडी देवघराकडे गेले तेथे फक्त तुळशी फुले व बुक्का होता. निळोबांनी सर्व जाणले, त्यांचे अतंकरण भरुन आले. मुलीच्या लग्नाचा सर्व भार पांडुरंगानेच उचलला खूप श्रम पडले. त्यामुळे निळोबारायांचे अंतःकरण कळवळले.

पिंपळनेरचे भुलोजी पाटील गाजरे यांनी निळोबारायांना विनंती केली की, तुम्ही आमच्या गावी पिंपळनेरीच येऊन रहावे, शिरुर ऐवजी तुम्ही पारनेरला रहात आहातच मग पारनेर ऐवजी पिंपळनेरलाच आपण रहावे असा खूप आग्रह धरला त्यामुळे निळोबाराय पिंपळनेरलाच स्थायिक झाले. व पिंपळनेरहून ते आळंदी पंढरीची वारी करु लागले. प्रत्येक वेळी त्यांना तुकाराम महाराज सदेह वैकुठाला गेल्याचेवर्णन ऐकावयास मिळत होते. त्यामुळे तुकाराम आपले गुरुअसावेत असे त्यांना सारखे वाटू लागले. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचा ध्यासच घेतला त्यांच्या तोंडी, ध्यानी, मनी फक्त तुकाराम महाराज होते.

तुका ध्यानी, तुका मनी । तुका दिसे जनी वनी ।।

तुका तुका म्हणोनी । निशिदिनी बोलावे ।।

अशी निळोबारायांची तुकाराममय अवस्था झाली सर्वानी खूप समजाऊन सांगितले की, तुकाराम महाराज आता येऊ शकणार नाहीत ते वैकुंठाला गेले आहेत. पण निळोबारांयानी अन्नपानी वर्ज्य केले. व कडकडीत उपवास करुन तपश्चर्येस सुरुवात केली ते अन्न पाण्यावासून ४२ दिवस एकाच अंगावर पडून तुकाराम महाराजांचा अखंड जप करत होते. शेवटी पांडूरंगाला न रहावून त्यांनी निळोबांना दर्शन दिले. पांडुरंगाने म्हणाले,निळोबा ! उठ, मी आलोय काय मागायचे ते माग. निळोबांनी डोळे उघडून पाहिलेतर प्रत्यक्ष पांडुरंगच उभे पण निळोबारायांनी परखडपणे त्यांना सांगितले, देवा मी तुला बोलविले नाही मग तु का आलास? मी तुला ओळखतच नाही. मी तुकाराम महाराजांच्या भेटीस आसुसलो आहे.

तेव्हा तु परत जा, येथे तुजलागी बोलविले ।

प्रार्थिल्याबाचोनी आलासी का ? ।।

प्रल्हादाकैवारी दैत्याची दंवाया । स्तंभी देवराया प्रकटोनी ।।

तैशापरी मज नाही बा संकट । तरी का फुकट श्रम केला ? ।।

निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा ।।

तुक्याचा धावा करीतसे ।।

असे परखड उदगार ऐकून देवही स्तंभित झाले. निळोबारायांनी प्रखर गुरुनिष्ठा पाहून देवालाही परत जावे लागले व देवांनी तुकाराम महाराजांना सांगितले की, तुम्हाला परत मृत्यूलोकात जाऊन निळेाबाला अनुग्रह दिला पाहिजे. अशा रितीने पुन्हा मृत्यूलोकी येऊन तुकाराम महाराजांनी निळोबारायानां उठविले व मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला.

येऊनिया कृपावंते । तुकया स्वामी सदगुनाथे ।।

हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी ।।

माझी वाढविली मती । गुणवर्यायसा स्फूर्ती ।।

निळा म्हणे मी बोलता ।।

दिसे परी हे त्याची सत्ता ।।

अशा रितीने तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर निळोबांनी अनेक अभंग, गवळणी, विरहीणी चांगदेव चरित्र वगैरे काव्यलेखन केले. निळोबांची वारी नियमित चालूच होती पण परात्वे आपण पंढरीस जावू शकणार नाही म्हणून निळोबांनी पांडुरंगाला साकडे घातले व सांगितले. देवा पांडूरंगा मला तुझ्या चरणी विलीनकर नाही तर माझ्या गावी पिंपळनेरी तु ये. निळोबांच्या भक्तीस्तव प्रत्यक्ष पंढरीनाथ पांडुरंग भिमानदीच्या काठी तळेगाव जवळ विठठलवाडीच्या डोहात आलो आहे. तेथून मला घेऊन जा. त्याप्रमाणे निळोबांनी मोकळी पालखी घेऊन भूलोजी पाटील गाजरे व भवतगणांसाह तेथे जाऊन पांडूरंगाला रुक्मिणीसह डोहातून बाहेर काढले व पालखीतून वाजत गाजत पिंपळनेरला आणले.

अशा पिंपळनेरच्या या रुक्मिणी पांडूरंगाच्या मूर्ती स्वयंभू मूर्तीआहेत. भुलोजी पाटलांनी निळेाबारायांना राहाण्यासाठी जागा व उदरनिर्वाहासाठी जमीनही दिली पुढे राहत्या घरात व निळोबांनी पांडूरंग – रुक्मिणीसाठी मंदिर उभारले तेव्हापासून पिंपळनेर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. संत निळोबा यांची समाधी असल्याने शासनाने तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हा परिषद माजी सदस्य निळोबाराय मंडळाचे विश्वस्त भास्करराव रासकर यांनी युती शासनाच्या काळात प्रयत्न करुन तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या विश्वस्त मंडळात जेष्ठ समाजसेवक आण्णाहजारे, ज्ञानदेव पठारे पाटील, रामदास रासकर, निळोबाचे वंशंज विठठलबुवा मकाशिर, गोपालबुवा मकाशिर, भागवतबुवा मकाशिर हे आहेत.


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

2 thoughts on “संत निळोबाराय महाराज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *