संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (सदगुरु तुकाराम महाराजांचें वर्णन)

संत निळोबाराय (सदगुरु तुकाराम महाराजांचें वर्णन)

१५७६

चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥

तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥

सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निस्थानपदातें ॥३॥

वाचाळ ज्ञानें ऐकतां गौष्टी । वाउग्याचि शेवटीं भरोवरी ॥४॥

निळा म्हणे सांप्रदाय शुध्द । उपजवी बोध गुरु शिष्या ॥५॥

१५७७

तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें ॥१॥

क्षिरापती वांटी हातें । कालाही सांगातें करुं धांवे ॥२॥

उदकामाजीं रक्षी वह्या आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥

निळा म्हणे ऐशा कीर्ति । वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥

१५७८

पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥

तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥

मी तों मुळींचाचि मतिमंद । जाणोनियां भेद अंतरींचा ॥३॥

निळा म्हणे अंगिकार । केला जी वर देऊनियां ॥४॥

१५७९

येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥

हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥

माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥३॥

निळा म्हणे मी बोलता । दिसे परी हे त्याची सत्ता ॥४॥

१५८०

वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण । बहमानंदे गर्जोनि पूर्ण । स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥१॥

निजात्मनगरीहुनी धडफुडा । वैदय आलों गा या तुमच्या चाडा ॥ तोडीन नाना व्याधींचा झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥२॥

जे औषधीचेनि सुवासमेळें । व्दैतरोग उठोनि पळे । अहं  कुपिताचें पेटाळें । उमळोनियां सगळें तात्कळ पडे ॥३॥

घेतां माझीं दिव्य औषधें । सनकादिकांसि निघालीं दोंदें । महर्षि मातले ब्रम्हानंदे । जाणिजे नारदें प्रतीत हे ॥४॥

अहंविषानळें घेरला । सदाशिवही झिजणीं पडिला । त्रिविध तापें होता आहाळला । तो म्या उपचारिला निजात्मवैधें ॥५॥

देऊनि स्मरणाचें रसायण । हरिलें बध्दतेचें कठीणपण । देहातीत करुनियां जाण । ठेविला करुन पूर्वी जैसा ॥६॥

क्षराक्षरातीत वृक्षाची मुळी । ते म्यां प्रल्हादचिये हदयकमळीं । घातली होती म्हणोनि विषकल्लोळीं । वांचला अग्निज्वाळी शस्त्रघाती ॥७॥

ऐसे एकैक स्वानुभव । सांगतां नवल त्याची ठेव । कैंचा उरेल अहंभाव । जाईल ठाव सांडोनियां ॥८॥

ऐशा नानाप्रकारच्या दिव्य औषधी । देऊनि उपचारिलीं लक्षावधी । भ्रमें भ्रमलीयांचिये शुध्दी । उपाव त्रिशुध्दी मज हातीं ॥९॥

म्हणोनियां आलों गा धांवत । विश्वास पहावया दया हो हात । नाहीं नाडीलेति केला घात । फुटली घात ईतकरें अहंकारें ॥१०॥

विषय कुपथ्याचेनी भरें । त्रिविधतापें तापलेती ज्वरें । अहंममतेचें लागलें स्यारें । बध्दता थोरे देहबुध्दी ॥११॥

ममाभिमानेंसी कुंथत । भेदबुध्दिचेनि विकारें बरळत । मी माझें लटिकेंचि बोलत । पडिलेति लाळत शुध्दि नाही ॥१२॥

विधीचा न साहेचि वारा । अविधि जातसां चाचरा । तेणेंचि सन्निपात विकारा । प्रबळ शरीरा वाढली तृष्णा ॥१३॥

न चलवे ऐक्याचिया भूमिके । विपरीत ज्ञानाचे खातसे झोंके । अंधारी पडिलेती देखोनि निकें । सत्यातेंचि लटिकें मानुनी ॥१४॥

तयासी एकचि विचार । क्षणमात्रेंचि होईल उतार । घ्या माझें वचन हे साचार । व्दैत कल्पना संचार न करावा ॥१५॥

एक चमत्कारिक औषध देईन । वैराग्यवल्लीचें रसायन । वरी माझिये अभेदमात्रेसी सेवन । चिदैक्यभावें करावें ॥१६॥

सांडुनी रसनें रसाची गोडी । नित्यानित्यविवके आवडी । प्रत्यगावृत्ति धारण फुडी । निरसेल गाढी भ्रमभावना ॥१७॥

पथ्येंसी असावें निरंतर । हो नेदावा विपरीत ज्ञानाचा संचार । माझीये वचनी विश्वास धर । धरितां साचार हरेल व्यथा ॥१८॥

मागें म्यां थोराथोरांकारणें । दिधलीं होती ही रसायनें । नांवे सांगों तरी शास्त्रें पुराणें । उदडं व्याख्यानें गर्जताती ॥१९॥

अर्जुन वांचविला नाना सांकडीं । उध्दव उपचारिला काढाकाढी । शुक वामदेवादिक परवडी । ऋषींची भवभयसांकडीं निवारिली ॥२०॥

ऐसे उपचारिले बहुत जन । संख्यारहित विवक्षण । आतांही हें रसायन । सेविती ते होउनी आरोग्य ठाती ॥२१॥

निळा म्हणे वस्ताद माझा । शिरीं असतां सद्गुरुराजा । निवारीन रोग घेउनी पैजा । धरितां वोजा विश्वास मनीं ॥२२॥

यापरि सादावूनियां सकळां । जातो आपुल्या निजात्मस्थळा । रामराम करुनियां म्हणे निळा । कृपा अखंडित असों दयावी ॥२३॥

१५८१

दळणीं कांडणीं गाइन मंगळीं । कान्हों वनमाळी प्राणसखा ॥१॥

हरीचिया नामें हरती महादोष । तुटती कर्मपाश निमिषमात्रें ॥२॥

सद्गुरुरायाचीं पाउलें गोमटीं । वंदितांची भेटे हदयस्थ ॥३॥

माझया सद्गुरुचें अवलोकितां मुख । समाधिचें सुख तुच्छ वाटें ॥४॥

सद्गुरुरायाचें स्वरुप पहातां । विश्वीं एकात्मता भासों लागे ॥५॥

नित्य सद्गुरुचीं आळवितां नामें । येती निजधामें भेटों सये ॥६॥

सद्गुरु स्वामीचा महिमा अगाध । वचनेंचि बोध करी शिष्यां ॥७॥

सद्गुरु सद्गुरु करितां उच्चार । येती हरीहर भेटों सये ॥८॥

सद्गुरुच्या नामें पोट माझें धाय । आनंदाचा होय पाहुणेरु ॥९॥

निळा म्हणे माझया सद्गुरुची मूर्ति । सकळांही विश्रांति विश्रातीसी ॥१०॥

१५८२

सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा ॥१॥

अहो स्वामी तुकयादेवा । यावरी न करावा अव्हेर ॥२॥

सहज लीळे उदकीं वह्या । तुम्ही रक्षिलीया निजसत्तें ॥३॥

निळा म्हणे धराल हातीं । तरी दयाल मति निरुपम ॥४॥

१५८३

मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फळ तथोनियां ॥१॥

हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥२॥

तें गुज विधाता सांगे नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥

राघव चैतन्य केलें अनुष्ठान । त्यासी व्दैपायनें कृपा केली ॥४॥

कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥

राघवा चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥

बाबाजीनें स्वप्नीं येऊनि तुक्याला । अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥

जगदगुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथुनियां ॥८॥

निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *