संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (काला)

संत निळोबाराय (काला)

२१६

काला करिती संतजन । सवें त्यांच्या नारायण ॥१॥

वांटी आपुल्या निजहस्तें । भाग्याचा तो पावे तेथें ॥२॥

लाही सित लागे हातीं । दोष देखोनियां त्या पळती ॥३॥

निळा म्हणे क्षीराचा बुंद । लागतां पावे ब्रम्हानंद ॥४॥

२१७

कावडी भरुनि आणिलीं क्षीरें । दहीं घृत सारें नवनीतें ॥१॥

आदनाचेही पर्वत आले । माजि ते केले मिश्रित ॥२॥

भोंवते गोपाळ मध्यें हरी । दाविती कुसरी नृत्याची ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हानंदु । लोटला सिंधु क्षीराचा ॥४॥

२१८

कान्होबाचें चाटुनियां आंग । म्हणती मग पोट धालें ॥१॥

रोज ऐसिची देंई धणी । लागती चरणीं गोपाळ ॥२॥

म्हणती गोविंद मोठे व्हाल । मग तुम्हीं जाणें सांडाल सोंय माझी ॥३॥

निळा म्हणे ते वाहती आण । नेणों सुजाण तुजविण ॥४॥

२१९

क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें ॥१॥

वेणुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारें सकळांची ॥२॥

नृत्य करी नाना छंदें । नाचवी विनोदें संवगडियां ॥३॥

निळा म्हणे दधिओदन । काला कालावून जेवितु ॥४॥

२२०

गोधनें घेउनी गोपाळ आले । छायेसी बैसले कळंबाचिये ॥१॥

आतां म्हणे मांडा खेळ । गोमटी हे वेळ सांपडली ॥२॥

तंव कृष्ण म्हणती आधीं जेवा । रुचेल बरवा खेळ मग ॥३॥

पोटांत भुक सुकलें मुख । कोण ते सुख खेळायाचें ॥४॥

कोणा कैसा पाहोंदया दिठी । यारे सोडा गांठी शिदोरियाच्या ॥५॥

सोडितां सिदोया दाविती अवघे । तंव एका ऐशी नव्हे एकापरी ॥६॥

अरुष एक ते बोलताती बोल । परी अर्थ सखोल विचारतां ॥७॥

आधीं माझा घास भरी । मग मी श्रीहरी घेईन तुझा ॥८॥

कान्हा म्हणे ऐका रे वोजा । आधीं तुम्ही माझा घांस भरा ॥९॥

गोपाळ म्हणती शेवट गोड । पुरवीं आधीं कोड आमुचा घेई ॥१०॥

घाटा घुगया कोरडया भाकरी । एकाची शिदोरी शिळीपाकी ॥११॥

कढण काला कालविलें ताक । एकाचा साजूक दहींभात ॥१२॥

एक ते म्हणती आमुचें अंगिकारीं । मुखीं घांस भरी टाकूं नको ॥१३॥

चांगले कोणाचें आणावें गोपाळा । आमुचा हा दुबळा संसार ॥१४॥

तंव कान्हा म्हणे आईका रे गडे । तुमचेंचि आवडे घाला मुखीं ॥१५॥

तुमचीये हातींचें भाजीदेठपान । तें आम्हां समान पंचामृता ॥१६॥

आणखी अर्पिती उपाधी जाणिवा । विकृती त्यांचिया भावा देखोनि मज ॥१७॥

सर्व भावें आम्हां हेंचि गोड लागे । दांभिका न लगे भेदकांचे ॥१८॥

मिटक्या देऊनियां स्वीकारी श्रीरंग । मग म्हणे विभाग घ्यावा रे माझा ॥१९॥

ब्रम्हरस वरि नामाचें सिंचन । सेवा रे सज्जन सखें माझे ॥२०॥

जेऊनियां धाले गोविंदा पंगती । उध्दार ते देती स्वानुभवें ॥२१॥

धन्य तो सोहळा आनंदाचा खेळ । निळा म्हणे गोपाळ सांगती ज्यां ॥२२॥

२२१

जन्मोजन्मी तुमचे दास । न करुं आस आणिकांची ॥१॥

हें तों तुम्ही जाणां देवा । तरि कां ठेवा बोल आम्हां ॥२॥

कान्हो म्हणती पहिलें मन । सखे सज्जन तुम्ही माझे ॥३॥

निळा म्हणे देईन धणी । ऐसिच चक्रपाणी म्हणे तया ॥४॥

२२२

या रे गडिहो घेऊं धणी । काला वदनीं श्रीहरीचा ॥१॥

सांडूनियां अभिमान दुरी । नाचों फेरी गोविंदा ॥२॥

देखोनियां भाव अंतरींचा । देईल हातींचा विभाग ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हारस । उरलें शेष हरीचें तें ॥४॥

२२३

येऊनियां गडी वंदिती कान्हया । आळंगितो तया बहुता गानें ॥१॥

चला जाऊं घरां हरीसवें चालती । आनंदें  नाचती भोंवताले ॥२॥

इंद्रादिकां देवां नाहीं तैसें सुख । अवलोकिती मुख गोविंदाचें ॥३॥

निळा म्हणे जन्म नाहीं तयां मरण । अवलोकिती सगुणरुप डोळे ॥४॥

२२४

वाढी कवळ श्रीहरी हातें । आड वैष्णवातें करुनियां ॥१॥

म्हणोनियां अभिमान सांडा । घ्या हो तोंडा भरुनी ॥२॥

हिरोनियां त्रिविध ताप । व्हाल निष्पाप सकळार्थें ॥३॥

निळा म्हणे दैवें आजीं । पावलें तें माजी वैष्णवांच्या ॥४॥

२२५

प्रेमभातें तुम्हांहातीं । आम्ही नेणतिं भुकेलों ॥१॥

झडकरी आतां भोजन घाला । उशीर झाला मग काय ॥२॥

क्षुधा पीडीलों जातील प्राण । मग धांवोन काय फळ ॥३॥

निळा म्हणे कृपावुते । येवो मात विठठले ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | निळोबाराय काला । nilobaray kala ।

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *