संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय गाथा (कृष्णचरित्र)

संत निळोबाराय गाथा (कृष्णचरित्र)

३०

वसुदेव देवकीचिये उदरी । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारी । श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥

अयोनिसंभव चतुर्भज । शंक चक्र गदांबुज । चहूं करी आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥

कासे पींतांबर कसिला । कंठी कौस्तुभ तेजागळा । श्रीवत्सलांछन शोभला । माजी मेखळा जडिताची ॥३॥

मस्तकी मुगुट रत्नखेवणी । रत्नमय कुंडलें उभय कर्णी । देखोनियां देवकी नयनीं । म्हणे या कैसोनि आच्छादूं ॥४॥

देखतां वसुदेवहि विस्मित । म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ । सायुधें भूषणे घवघवित । तेज:पुंज निजात्मा ॥५॥

देवकी लागोनियां पायांशीं । म्हणे गोकुळां नेऊनि लपवा यासी । विदित झालिया रायासी । नेदी वांचो या बाळका ॥६॥

निळा म्हणे ऐसी चिंता । जाकळुनी ठेली तया उभयतां । हें देखोनियां श्रीकृष्णनाथा । कळों सरलें ह्रग्दत ॥७॥

३१

मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी । ठेवुनी नंदयशोदेच्या घरी । तुम्हीं यावे तेच क्षणी ॥१॥

ऐकोनी तयाचे उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातूर । म्हणे कैसा करावा विचार । बंधने गोविलें मजलागी ॥२॥

ऐशिया मोहें त्या कवळित । तंव तुटली बंधने झाला मुक्त । म्हणे आतां हा कृष्णनाथ । नेईन गोकुळांत ठेवीन ॥३॥

मग घेऊनियां निज बोधेशीं । आला वासुदेव गोकुळाशीं । देऊनिया त्या नंदापाशीं । म्हणे हें स्वीकारा बाळक ॥४॥

जन्मलें देवकीचिये उदरीं । परि हे ठेवितां नये घरीं । अहं कंसाचे भय भारी । यालागी तुम्हां हें कृष्णापर्ण ॥५॥

ऐशिया उत्तरी बोलिला । बाळक त्यापाशी दिधला । उघडोनि नंदे जो पाहिला । तंव तो देखिला चतुभुर्ज ॥६॥

निळा म्हणे वोळलें भाग्य । घरां आले पुसत चांग । उध्दरावया सात्विक जग । केला वास तया घरी ॥७॥

३२

कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप ।  भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥

मग याशोदेपाशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥

वसुदेव सदाचा भिकारी । बंदी कंसाचिये चिरकाळ वरी । बालक सुलक्षण हा निर्धारी । असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥

येरु म्हणे आहे पोंटीचा । आत्मा जिवलगु हा आमुचा । नाहीं वो आणिका लोकांचा । म्हणोनियां देतों तुम्हांप्रती ॥४॥

येरो म्हणे आमुचें कन्यारत्न । याच्या पालटा न्या करा यत्न । कंसा पुसतांचि तया दाउन । चुकवा अरिष्ट सकळांचे ॥५॥

यावरी कृष्णातें निरवून । वसुदेव निघाला माया घेउन । पुढती बंधने पावला बंदिखान । विचित्र विदांन शक्तींचे ।६॥

श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । होतांचि प्राप्त झाला मोहो । अविद्यायोगें चिंताप्रवाहो । महार्णर्वी पडियेला ॥७॥

निळा म्हणे हिताहित । नाठवेचि कांही झाला भ्रांत । मायादेवाची हा प्रघात । झाला आप्त वसुदेवा ॥८॥

३३

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी । वसुदेवातें दैन्‍य अवदसा वरी । मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥

ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत । सेवक धांवोनि रायते म्हणत । जन्मला सुत देवकिये ॥२॥

महाकाळ कृतांत ऐसा । गर्जे ब्रम्हांड कोंदल्या दिशा । राज म्हणे हा आमुच्या वंशा । निर्दाळील निश्चयें आठवा ॥३॥

घेऊनियां मग निशाचरभारा । आला बंदिशाळे सत्वरा । सावध करिताती येरयेरां । म्हणती विकळ जाऊं नका ॥४॥

भयभीत देवकींते हाकारी । म्हणे आठवा आणि वो बाहेरी । येरी करुणा भाकूनियां भारी । विनवि येवडे तरी वाचवा ॥५॥

ऐसे बोलोनियां सुंदरी । आणोनि दिधली कौसा करी । येरु पाहे तव तव कुमारी ।  म्हणे आठवा लपविला ॥६॥

तोहि आणेनियां देई । येरी म्हणे दुसरें नाही । झाडा घेऊनियां पाहीं । आण तुझीचि वाहतसें ॥७॥

येरु म्हणे ईतें सोडूं । मग तयाचाहि सूड काढू । निळा म्हणे गर्वारुढू । नेणे मदांध हरि महिमा ॥८॥

३५

येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी । विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी । नगर शृंगारी कौतुके ॥१॥

निजेलीचे असतां नारीकुमरें । शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें । वृध्द होताती ते निमासुरे । रुंपे मंडित योजिलीं ॥२॥

धन कनक घरोघरी । नाना धान्याचिया परी । सुख सोहळा वर्ते शरीरीं । पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥

नाना फळफळावळी । सुमने वरुषती वृक्षातळी । एकैक सुखाची नव्हाळी । वर्ते गोकुळी निजानंर्दे ॥४॥

कामधेनु ऐशीं गुरें । नंदिनीचिये परीचे वासुरे । प्राप्त:काळी देखती नारीनरें । परम विस्मयें दाटली ॥५॥

लक्ष्मी न समाय गोकुळांत । लेणीं लुगडीं अंळकारमंडित । धन संपत्ती नाही गणित । जेथे श्रीकांत वस्ती आला ॥६॥

निळा म्हणे सुखाची मरणी । गाई गोवळा आली गौळणी । सारस्वतें घोकिली तैशी वाणी । मधुर शब्दें अनुवादती ॥७॥

३६

कंसे बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैंजेसी । म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुळा ॥१॥

त्यासी देईन हें अर्धराज्य । न करीं अन्यथा आपुली पैज । जया सांधेल हें काज । तेणें विलंब न करावा ॥२॥

भगिनी पुतना प्रधानरासी । ऐकतांची उठियेली अति आवेशी । म्हणे जाऊनियां गोकुळाशी । निर्दाळीन कुमर नंदाचा ॥३॥

आज्ञा घेऊनियां ते त्वरित । विष स्तनामाजी भरित । म्हणे पाजूनियां कृष्णनाथ । करीन घात शस्त्रेंविण ॥४॥

घेऊनियां बाळलेणी । मनगटीं बांधिली खेळणी । जिवती वाघनखें माळा मणी । आंगडे टोपडें बाळंतविडा ॥५॥

मग सुखासनी विराजित ।  दासी परिचारिका वेष्टित । येऊिनियां गोकुळा आंत । यशोदेगृहीं प्रवेशली ॥६॥

निळा म्हणे नवल कथा । वर्तेल ते येथें आतां । पूतना पावेल सायोज्यता । श्रीकृष्णनाथदर्शने ॥७॥

३७

यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे थांबोनी । जाईल बाळका झडपोनी । कैसे करुं हे राक्षसी ॥१॥

बहुत उपचारेंसी पूजिली । पूतना सन्मानें बैसविली । मग ते म्हणे ये यशोदे भली । पुत्रवंती झालिसी ॥२॥

आणि नाही सांगोनियां धाडिलें । ऐंसें निष्ठुरपण त्वां धरीलें । श्रवणीं ऐकतांचि धावोनियां आलें । आनंदले ह्रदयांत ॥३॥

आणिली विचित्र बाळलेणी । बाळंतविडाही तुजलागुनी । आणीगें तान्हुलें पाहों दे नयनी । ऐकोनी यशोदा मनी गजबजिली ॥४॥

म्हणें कैसे तरी करुं ईसी । राजभगिनी हे राक्षसी । दिठाविल माझिया सुकुमारासी । दिठीचि कठीण इयेचि ॥५॥

मग म्हणे आतांचि न्हाणिलें । बाळक पालखीं निजविले । हे ऐकतांचि नवल केलें । बाळक उठलें न राहेंचि ॥६॥

निळा म्हणे पूतना तेथें । रोषें बोलें यशोदेतें । काय गे नष्टपण हें तूंते । मिथ्याचि झकविशी मजलागी ॥७॥

३८

आतां तरी बालका आणी ।  आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥

मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी । उगाचि असतासि जरि ये कळीं । तरि वांचतासी काय करुं ॥२॥

ऐसें बोलोनियां आणिला । पूतने वोसंगा बैसविला । देखतांचि पूतने वोसंडला । उभंड प्रेमाचा न सावरे ॥३॥

सुंदरपणाचि झाली सीमा । उपदेशी मदना अंगी काळीमा । अवलोकूनियां पुरुषोत्तमा । तनुमनप्राणें निवालीं ॥४॥

म्हणे गे यशोदे साजणी । परम सुखाची हे लाधलीसी धणी । जतन करी पुत्रमणी । दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥

पूतना राक्षसी अति क्रूर । तेही देखोनियां कृष्णचंद्र । नयनी अश्रु आणूनियां वारंवार । श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥

निळा म्हणे अगाध बुध्दी । होउनी परतली प्रालब्द सिध्दी । म्हणे कार्य साधूनियां त्रिशुदी । जावें सत्वर राजभुवना ॥७॥

३९

पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥

स्तनीं लागतांचि त्याचे वदन । विश तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस-जीवन । पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥

न सोसवे वेदना ते पूतने । म्हणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें । ऐसें बाळ हें ही काय जाणें । वेंचले प्राण धांव धांव ॥३॥

तंव तो न सुटेचि सर्वथा । शिणल्या दासी परिचारिकाही ओडितां । नाना शब्दें आक्रंदतां । बिहालीं तत्वतां पळती लोकें ॥४॥

रक्त मांस अस्थींचे उदक । करुनियां चर्महि शोषियलें । देऊनियां सायुज्यसुखनीं स्थापियली ॥५॥

हें देखोनी दासी परिचारिका । भेणेंचि पळती अधो मुखा । जाऊनियां मथुरा लोंका । सांगती वार्ता रायसी ॥६॥

निळा म्हणे ऐकतां कानी । राजा चिंतावला बहुत मनीं । पुसे वर्तमान तया लागुनी । कैसे वर्तलें ते सांगा ॥७॥

४०

तवं त्या करिती शंखस्फूरण । दीर्धवरें आक्रदन । तें ऐकांनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले ॥१॥

तयांते पुसता त्य म्हणती । दु:खर्णवी पडिलों हो भूपती । सांगता पुतनेची गती । मूच्छित पडती धरणीये ॥२॥

म्हणती जातांचिं गोकुळाभीतरी । प्रवेशतां नंद यशोदे घरी । उभयतां येऊनियां सामोरी । बहुत सन्माने गौरविले ॥३॥

विडे उपचार भोजन । पूतनाईतें तोषवून । मग आणिलें राजीवनयन । बाळ तान्हुले दाखविती ॥४॥

तंव तें घन:श्याम सांवळे । राजीवाक्ष राप रेखिलें । बाळलेणें विराजलें । नयनचि गोविलें देखतां ॥५॥

मग ते घेऊनियां जवळी । सतनीं लावितांचि तात्काळीं । सुरासुरा शोषुनियां वेल्हाळी । न सोडी जिवें प्राण जाता ॥६॥

निळा म्हणे त्या सोडविता । न सुटे पूतना आक्रंदतां । आम्हीही स्वशक्ती ओढितां । हरिलें तत्वतां प्राण तिचे ॥७॥

४१

स्नेह सरतां जैसा दीन । सूक्ष्म होतचि हारप । तयापरी बाईंचे स्वरुप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥

नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केलें निराकार । ऐसें देखोनियां सत्वर । आम्हीही निघालों तेथुनी ॥२॥

राया त्याची भेटी गोष्टी । न व्हावी तुम्हाही शेवटी । अकस्मात् झालिया राहाटी । करील पूतनाबाई सारिखी ॥३॥

ऐसें ऐकताचि श्रवणीं । राजा पडे मूच्छित धरणी । म्हणे गेली गेली रे मायबहिणीं । माझी पूतनेसारखी ॥४॥

महाबळें अति उत्कंठ मंत्रियांमाजी परमश्रेष्ठ । आता कायसी पाहों वाट । गेली नये त्या निजपंथें ॥५॥

मग रायातें संबोधून । प्रधान आणि नागरीक जन । म्हणती नव्हे भलें हे महा विघ्न । उदेलें देखत देखत ॥६॥

निळा म्हणे याहीवारी । श्रीहरिचरित्राची थोरी । अधिकें अधिक् ते कुसरी । परिसावी सज्जनीं सादर ॥७॥

४२

घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली‍ थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥

नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी । सांगती दासी त्या परिचारी । ऐका अपूर्व हे कथा ॥२॥

म्हणती स्तना लावितांची वदन । शोषियलें जीव प्राण । पूतना रडे आक्रंदोन । म्हणे धांव धांव ओढीं यशोदे ॥३॥

ओढितां न सुटचि शोषिली । मुकतपंथचि ते लाविली । अवघी देखानियां तेथ भ्यालीं । सेवकें आली पळोनियां ॥४॥

येउनी रायतें जाणवलें । पूतनाबाईतें बोळविलें । बाळे शोषूनियां घेतलें । परम आश्रचर्य हें वाटे ॥५॥

राया घरी दु­:ख थोर । वाढलें  झाला चिंतातूर । पुढे काय करील विचार । तें पाहावें नारीनर बोलती ॥६॥

निळा म्हणे यावरी आंता । अपूर्व आहे पुढील कथा । माभळभटासी गोकुळा जातां । होर्दल पूजा पिढीयांची ॥७॥

४३

न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥

न कळे कर्माकमाची संभूती । न कळे होणार तें बळीवंत । भोगणें भोगवील अकस्मात् । न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियलें निढळी ॥२॥

कंसराव चिंताग्रस्त । उठुनी बैसला सभेआंत । प्रधान सेनाधिप समस्त । ग्लान वदनें भासती ॥३॥

पुढील विचार सुचितां । न सुचे कांहीची त्या तत्वतां । कृष्ण धाकेंचि त्याचिया चित्ता । धरचि कोठें न सांपडे ॥४॥

मग बोले कंसासुर । सेना सिध्द करा भार । जाऊनियां अति सत्वर । वधा हो कुमर नंदाचा ॥५॥

तंव ते म्हणती रायाप्रती । बळाची तेथें न चलें युकती । पहा ते पूतनेची शक्‍ती । इंद्रादिकांसी अलोट ॥६॥

निमिषमात्रें तिची शांती । ठेला करुनियां श्रीपती । तंव त्या माभळभट बोलती । नव्हे हें कार्य स्त्रियांचे ॥७॥

आम्हां ब्राम्हणांचे हे कृत्य । जाणे सकळांचेही घटित । दयाल आज्ञा तरी मी तेथें । जाऊनियां साधीन कार्यार्थ ॥८॥

निळा म्हणे बोलतां ऐसें । अवघे उल्हासले मानसें । म्हणती यथार्थ हे ऐसें । ऋषी बोलिले माभळ ॥९॥

४४

मग वस्त्रें देउनी गौरविला । रायें बहूत सन्मानिला । चालतां मार्गी विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी ॥१॥

टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करी । धोकटी घेउुनीयां खादियावरी । शुध्द मुहूतें चालिला ॥२॥

आला गोकुळासन्निधीं । शुध्दाचमन केलें विधी । मनी कापटयाची बुध्दी । साक्षी तियेचा परमात्मा ॥३॥

नंदगृही प्रवेशला । येतां यशोदेनें देखिला । पाट बसावया दिधला । पाट बसावया दिधला । नमूनि पूजिला उपचारी ॥४॥

स्वस्थ स्वस्थानीं बैसले । पंचाग काढूनियां उकलिलें । वाचुनी चंद्रबळ दाविलें । आणि दिधले आशिर्वादा ॥५॥

मग पुसे यशोदेप्रती । प्रसूतिकाळ कोणती तिथी । तंव ते आणूनियां श्रीपती । व्दिजातें दाखवी उल्हासे ॥६॥

देखतांचि तो मदनमूर्तीं । ठकल्या ठेल्या इंद्रियवृत्ती । निळा म्हणे समाधिस्थिती । पावली प्रतीति ब्राम्हणां ॥७॥

४५

परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर । झोंबोनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥

मग म्हणे  वो सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ । परि याचा जन्मकाळ । कैसा असेल पाहों तों ॥२॥

कृष्णपक्ष श्रावण मास । रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस । मध्यरात्रीचा जन्म यास । दशा तों क्रूर दिसताहें ॥३॥

जन्मकाळीं सर बारावा गुरु । शनी भोग हानिस्थानी स्थिरु । राहो केतु आणि दिनकरु । देशत्यागातें सुचिती ॥४॥

याचेन सकल वंश हानि । करील कुळाची बुडवणी । नये अवलोकु यातें नयनीं । टाकावा नेऊनि अरण्यात ॥५॥

यशोदे न लावी यासी उशीर । बाळ नव्हे हा मायावी खेचर । कालचि पाहेपां केला संहार । पेतनेचा क्षणही न लागतां ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि ऐंसे । मोडलें विंदान परमपुरुषे । जयाचें कर्म देखिलें जैसे । दिल्हे तया तैसे दानफळ ॥७॥

४६

बैसला होता पाटावरी । तोचि थरारिला ते अवसरीं । निसटोनियां पृष्ठीवरी बैसला । अवचिता निघातें ॥१॥

वढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनी ॥२॥

मग म्हणे धावां धावां । याचिये हातींचे मज सोडवा । नडलों आपुल्या कापटयभावा । नाही स्मरलों चांडाळा ॥३॥

अचेतन हे धांवती काष्ठे । लक्षानुलक्ष कोटयानुकोटें । आतां कैंचे जिणें येथें अदृष्टें । मारावया आणिलें ॥४॥

लोक हांसताती भोंवताले । म्हणती कैसें हें नवल झालें । आमुचेही पाट येथें आले । मारुंचि बैसले माभळभटा ॥५॥

येथें न चले कोणाचेंचि कांहिं । ईश्वरइच्छेची हे नवाई । ब्राम्हण म्हणोनी सोडिला पाहिं । नागवा उघडा माभळभट ॥६॥

निळा म्हणे लवडसवडी । पळतां भूई त्या झाली थोडी । येऊनियां कंसाचिये देवडीं । शंखस्फूरणे उभा ठेला ॥७॥

४७

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥

नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगे बुडाली शंका । भोंवते देखताही विषयलोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥

पाटेचि पुरविली माझी पाटी । लक्षनुलक्ष आले कोटी । उठा उठा पळारे शेवटी । मारिले जाल व्यथेंची ॥३॥

दैत्य पाहाती चहूंकडे । शस्त्रपाणी वेधले हुडे । दुर्गा सांभाळिती चहूंकडे । म्हणती न दिसे विघ्न डोळियां ॥४॥

राजा म्हणे झांका त्यांसी । पुसा काय ते वार्तेसी । मग नसऊनियां वस्त्रासी । आणिला सभेवी पुसती ॥५॥

तो म्हणे राया बळिया बाळ । उपजला तो आमुचा काळ । विचित्र पाहतां त्याचा खेळ । लाविलीं पिढींची मज पाठीं ॥६॥

निळा म्हणे रुपाकृती । सुंदरपणाची ओतली मूर्ती । कोटी मदनाची अंगी दीप्ती । न ढळती पातीं अवलोकितां ॥७॥

४८

ऐसें सांगतां माभळभटा । राया दचक बैसला मोठा । मग पाचारुनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥

म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें । आजि माझिया उपेगा येणे । बाळ कृष्ण्‍ वधणें भलत्यापरी ॥२॥

नाना विदया तुमच्या अंगी । रुपे पालटुनी विचरतां जगी । मायारुपी म्हणऊनियां स्वर्गी । देवही भिती तुम्हांसी ॥३॥

ऐसें असोनि माझिये गांठी । कायसी बाळका जळुची गोठी । तुमचेनी बळें हे सकळही सुष्टी । आर्चित झाली मजलागीं ॥४॥

पूतना गेलीते तंव नारी । दुसरा भट तोहि भिकारी । काय जाणों कैशापरी । देखोनी कळली तयासी ॥५॥

तो तंव अंत्यंत सकुमार । सांगती अवघे लहान थोर । सुंदरपणाचीही बहार । रुपा आली कृष्णाकृती ॥६॥

तरी तुम्ही जाऊनियां तेथें । प्रेतरुपचि आणवा येथें । निळा म्हणे पाहोनियां त्यातें । करऊं अक्षवाणें अपणा ॥७॥

४९

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानी । म्हणोनि माभळभट पाठविला ॥१॥

तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें । येऊनि आम्हातें जाणविले । नव्हें बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥

मग म्हणे वो रिठासुरा । जाऊनि तुम्ही बाळकासी मारा । देईन अर्धराज्य भारा । कार्यसिध्दि झालिया ॥३॥

मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी । करी घेऊनियां सादावी । नंदचौबारा जाऊनि ॥४॥

म्हणे हे बाळका लेववितां । सर्वकाळ कंठी असतां । कोण्याहि भयाची तया वार्ता । स्पशोंचे नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥

कदापिही नव्हे भूतबाध । दिठीचें भय नाहीं त्या कदा । ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठी ॥६॥

निळा म्हणे पालखीं बाळ । निजऊनियां यशोदा वेल्हाळ । मेळऊनियां स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥७॥

५०

तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें । अति विक्राळ दाढां दशनें । श्रीकृष्ण्‍ा कंठीचे रुधिरपान । करावया उदितें ॥१॥

कृत्रिमें जाणेनियां ते श्रीहरी । कवळूनि धरिलीं दोहीं करी । आणि घालूनियां मुखाभीतरीं । चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥

त्याचें स्विष्टकृत केलियावरी । आक्रोशें पाळणियांत रुदन करी । तें ऐकानि यशोदा सुंदरी । धंवली झाडकरी काय झालें ॥३॥

तंव देखे शोणिताचे पूर । मांस मदाचे संभार । मग म्हणे गे मरमर । बाळ मासर्पे खादलें ॥४॥

धांविल्या नरनारी बाळ । घात केला म्हणती सकळ । ऐसी कैशी गे तू वेल्हाळ । यशोदे मारविलें बाळका ॥५॥

वाहाती शोणिताचे पुर । इतुकें कैंचे गे त्या रुधिर । काढूनियां पहा गे सत्वर । आहे प्राण कीं गेलास ॥६॥

निळा म्हणे जाउनी जवळी । काढूनि आणिला जों वनमाळी । तंव हास्यवदन नित्य काळीं नाही कोमाइला ना दचकला ॥७॥

५१

मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥

पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियलें अनंगे । नभापरी अलिप्त संगे । काय करिती अघात त्या ॥२॥

नानापरिंची अक्षवाणें । करी यशोदा वांदी दानें ।  यथाविधी व्दिजभोजनें । केलें जिताणें श्रीहरीचें ॥३॥

म्हणती नवीची रिठियाची माळा । घातली होती त्वां याचिया गळां । ते काय झाली गे याची वेळा । तेंचि अरिष्ट यासी होतें ॥४॥

ऐसा झाला घोषगजर । ऐकोनियां तो कंसासुर । म्हणे बोळविला महावीर । केला चकाचुर रिठाही ॥५॥

करितां उपाय न चले यासी । कंस भयाभीत मानसीं । म्हणे काळ हा जन्मला आम्हांसी । करील संहार काळाचा ॥६॥

निळा म्हणे न चले युक्ती । यापुढें कापटया समाप्ती । सर्वांतरवासी हा श्रीपती । कर्मफळदाता निजसत्तें ॥७॥

५२

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां । वधूनि येईल जो बाळका । त्यासी अर्ध राज्याची टीका । दूईन छत्र सिंहासन ॥१॥

मग तृणावर्त धेनुकासुर । मग केशिया शकटासुर । अघासुर सर्पविखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥

कृष्णें ते ते संहारिलें । नवल अदभुतचि वो केलें । निळा म्हणे आहे वर्णिलें । श्रीवेदव्यासें पुराणीं ॥३॥

५३

आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत ॥१॥

एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्राप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥

श्रीकृष्णाची हे बाळलीळा । अदभूत सुखाचा सोहळा । वेधूनियां नरनारी बाळा । गाई आणि गावळा ब्रम्हप्राप्ती ॥३॥

ब्रम्हदिक दर्शना येती । सकळही देव आणि सुरपती । गगनी विमानें वाटती । सुमने वरुषति सुरवर ॥४॥

श्रीकृष्णाचें नामकरण । विधिविधानें व्दिजभोजन । नंदयशोदे उल्हास पूर्ण । सुवासिनी ब्राम्हण सर्व जना ॥५॥

मंगळघोषाचिया गजरीं । निशाणें दुमदुमलिया भेरी । टाळ मृदंग झणत्कारी । नाचती वैष्णव पदें गाती ॥६॥

निळा म्हणे नगरवासी । प्रांतवासी देशवासी । आले व्दिपांतरनिवासी । कृष्ण सोहभ पहावया ॥७॥

५४

रन्तखचित पालख । सूर्या ऐसा निर्भियेला चोख । निरालंबी गोऊनि देख । मोहें उत्साह मांडियेला ॥१॥

महर्षि ऋषिहि सकळिक । आले पहावया कवतुक । अवलोकूनियां यदुनायक । करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥

आले गौळियांचे भार । नाना याति नारीनर । नानापरीचे शृंगार । लेणीं लुगडीं मिरविती ॥३॥

वाणें घेऊनियां नारी । रत्नजडितें तबकें करी । देवांगना तैसियापरी । कृष्णवैभवें मडिता ॥४॥

पालखीं घालितां चक्रपाणी । नाना आल्हादें गाती गाणी । नाना स्वरें उमटल्या ध्वनी । उठती गगनीं पडिसाद ते ॥५॥

नामें ठेवूनियां पाचारिती । गोविंदा गोपाला यदुपति । सच्चिदानंदा आनंदमूर्ती । जगपति श्रीपति अमरपिता ॥६॥

अच्युता अनंता अपारा । देवकिनंदना दगदोध्दारा । मुनिमनमाहना सर्वेश्रवरा । आत्मया श्रीवरा सर्वगता ॥७॥

सुंदरा राजीवलोचना । जगदादीशा पंकजवदना । योगीमानसमनोरंजना । सुखनिधाना सुखमूर्ती ॥८॥

मधुमाधवा मधुसूदना । त्रिविक्रमा वामना संकर्षणा । मुकुंदा मंदारा शेषश्यना । राजीवाक्षा जनार्दना श्रीकृष्णा ॥९॥

निळा म्हणे ऐशिया नामें । गर्जती गौळणी सप्रेमा प्रेमें । ऐकोनियां ते पुरुषोत्तमें । केलिया संभ्रमे अति वाड ॥१०॥

५५

पुढे ऋषिश्रवरांची मांदी । बैसली होती सभासंधी । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥

मंगळतु-यांचे घोषगजर । दुंदभी वाजविती सुरवर । नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥

निगम येउनि मूर्तिमंत । श्रीकृष्णाची स्तवनें करीत ।  कामधेनुही क्षीरे स्त्रवत । तुप्ति सकळांसी दयावया ॥३॥

देवगुरु जे बृहस्पती । तेहि़ अर्शिर्वादें कृष्णातें स्तविती । शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति । कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥

उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती । अक्षवाणें घेऊनिया हाती । आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥

अनसूर्या परम प्रतिव्रता । अत्रिदेवाची जे कांता । जिचिये उदरी श्रीअवधूता । दत्तात्रय जन्म महामूनी ॥६॥

निळा म्हणे तेहि येउनी । हरातें वोसंगा घेउनी । आशिर्वादें अमृतवचनीं । गौरविती यशोदें ॥७॥

५६

ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्ष होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥

न संपडे जो योगसाधने । नाना तपें वेदाध्ययने । तो हा सगुणरुपें नारायण । क्रिडा करी याच्या घरीं ॥२॥

यावरी गौळणीही अति सुंदरा । कडिये घेउनी शारंगधरा । नेती उल्हासें निजमंदिरा । चुंबने देऊनि खेळविती ॥३॥

म्हणति कृष्णा रामा मेघ:शामा । योगी मुनिजन मनोरमा । सुलभ झालासी आजि तूं आम्हां । आवडी ऐसा वर्तसी ॥४॥

पूर्वाजिंतें उत्तमें होती । सकृतें त्यांचिया फळनिष्पत्ती । मोडोनी आलिया तुझीं हू मूर्ती । डोळेभरी अवलोकूं ॥५॥

ऐशिया उत्साहे त्या प्रमदा । नेती खेळविती गोविंदा । मग पावोनियां परमानंदा । शयनीं पर्यंकीं निजविती ॥६॥

निळा म्हणे सुख विश्रांति । पावल्या ऐशिया सत्संगती । पुढील कथा अपूर्व ख्याती बाळपणींचीं हरिकीर्ती ॥७॥

५७

कंसा मली भय संचारू । झाला तेणें चिंतातूर । बैसोनियां करी विचारू । कृष्ण्‍वधार्थ् प्रयोग ॥१॥

तें ऐकोनी उत्पात वार्ता । गोकुळींचिया लोकों समस्ता । धैर्य नुपजेचि म्हणती आर्ता । जावें पळोनी दूरदेशा ॥२॥

तंव नंद म्हणे ऐका मात । जावोनी वसो दरकुटी आत । साडुनिया जाता आपुला प्रांण । घरे दारे नुरतील ॥३॥

विचार मानला सकळांसी । गेली पळोनी दरकुटीयेसी । गांवी नाही मुंगी माशी । ऐसे ओस पडियले ॥४॥

उष्णा वारियांचे आघात । साउली न मिळेचि त्या वनांत । तंव देखिल्या अकस्मात । माईक गाडा श्‍कटासूर ॥५॥

यशोदा देखेनियां ते वेळी बाळकृष्ण निजवी गाडियातळीं तंव हा लाघवी वनमाळी । पद घातेंचि उडविला ॥६॥

तेणें तो आक्रंदला । घोष्‍ दणणिला । जाउनी मथुरेमाजि पडिला । कंस म्हणेरे शकटहि गाढा । आजि लाविला मृत्यूपंथे ॥८॥

निळा म्हणे गौळिये म्हणती । गाडा उडाला कैसिया रीती । तळीं होता हा श्रीपती । थेर भाग्यें वांचला ॥९॥

५८

मग ओवाळूनियां मृतिका । घेतलें उचलुनि यदुनायका । यशोदा म्हणे हे बाळका । वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥

नव्हे शकटे तो मायावी दैत्य । आला होता करावया घात । कृष्ण ताडिला तो यथार्थ । पूतनेऐशी परी केली ॥२॥

तेणें दिधली आरोळी । न्या हा उठे तो अंतराळी । परी नाही भयाची काजळी । सावध वनमाळी सर्व गुणें ॥३॥

ऐसे क्रमिले कांही दिवस । तंव रायें पाठविलें लोकांस । मग येऊनि गोकुळास । पुनिरपि वस्ती राहिले ॥४॥

कृष्ण खेळतां आंगणी । गडी म्हणती सारंगपाणी । हाराळी नूतन हे कापुनी । चारू वत्सासि आपुलिया ॥५॥

तंव तो तृणावृत दैत्य । हाराळी रुपें होता तेथ । इच्छूनियां कृष्णघात । तंव तो हरीनें ओळखिला ॥६॥

म्हणे पळारे तुम्ही अवघे गडे । येथें दिसत असें हें कुडें । रहा अवघे मागलिकडे । आपण्‍ पुढें संचारला ॥७॥

तेणें देखतांचि श्रीहरी । वदनें काढिली तृणांकुरी । शते सहस्त्र लक्षवरी । रुपें धरुनिया ठाकला ॥८॥

भयानकें अति विक्राळें । दाढा दंत दीर्घ शिसाळे । आवाळुवे चाटीत आवेश बळें । कृष्णा अंगी झगटला ॥९॥

निळा म्हणे कवळूनिया मुष्टी । मुख्य तृणासुराची झोटी । उपटूनियां भूमी नेहटीं । शतचूर्ण करुनि सांडिला ॥१०॥

५९

ऐसे वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हां सारंगपाणी । कंसे ऐकानिया श्रवणी । परम खेद मानिजे ॥१॥

कृष्णजवळी होती मुलें । तिहीं तें आश्चर्य देखिलें । वडिलां सांगती नवल झालें । कृष्णासान्निध तंव ते । तेणें अति लाववें कवतुकें । भूमीसी आपटूनि मारिलें ॥३॥

त्यांची शरीरें पर्वतराशी । पडिल्या आहेत गांवापाशीं । चला दाखवितों तुम्हासीं । म्हणवूनि सकळिकांसी हाकारिलें ॥४॥

तिहीं ते देखोनियां दिठी । भयें कांपती आपुल्या पोटीं । म्हणती अतुर्बळी हा जगजेठी । लेंकरुं कैसा म्हणावा ॥५॥

नंदहि विस्मयापत्र चितीं । म्हणे हे कोठूनि असूर येती । याचिया हाते पावेनि शांती । जाताती मुक्तिपदातें ॥६॥

निळा म्हणे गांवींचे लोक । करिती अवघेंचि कौतुक । परी कंसा अधिकाधिक् । क्षतें उमळती दु:खाची ॥७॥

६०

यावरी कोणे ऐके दिवशी । कृष्णें घेउनी सौंगडियांशी । आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारें देखिलीं ॥१॥

तयामाजी अंति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे । त्याचि ऐसें धरुनी रुपडें ।  वत्सासुर तेथ उभा ॥२॥

कृष्ण म्हणेरे हो गडिही ऐका । एक एक वत्स धरा नेटका । माही धरितों म्हणवेनि तंव कां । थांबला वत्सासुरावरी ॥३॥

तंव तो मायावी असुर । शिंगे पसरुनि पातला समोर । मागें करित  लताप्रहार । आडवाचि उडे हाणवया ॥४॥

गौळी करीताती हाहाकार । मारिला नंदकुमर । अचपळ हा नव्हेचि स्थिर । कासया वत्स धरुं गेला ॥५॥

याचिये वदनीं निघती ज्वाळ । नासापुटींहुनी धूम्रकल्लोळ । बरें नव्हे हा पातला काळ । प्राण घ्यावया प्रगटला ॥६॥

निळा म्हणे धरिला कर्णी । मुरगाळूनि पाडिला धरणीं । मुष्टीघातेंचि चक्रपाणी । मोक्षपदातें पाठवी त्या ॥७॥

६१

महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासुर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥

मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा । विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥

जो तो जाउनी घातचि पावे । नये परतोनियां जीवें । यावरी आतां शरण जावें । कवणिया वीरा महीतळीं ॥३॥

तंव तो उठोनी अघासुर । करी रायासी जोहार । म्हणे न व्हावें चिंतातुर । विदया अपार मजपाशीं ॥४॥

राया तुझिया हितावरी । करीन गोकुळाची बोहरी । अवघेचि घालूनियां उदरीं । येईन कृष्णासमवेत ॥५॥

ऐसें तोषवूनियां राया । म्हणे गर्वारुढ । यावरी होऊनिया मूढ । काळासवें मांडूनियां होड । खेळों पाहे मश्यक ॥७॥

६२

येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥

दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हषिकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥

काल बहुत श्रमला कृष्ण । वात्सेसीं करितां संघाटण । बळें वांचला सांगती जन केलें मर्दन मग त्याचें ॥३॥

तेव्हा कळला तो असुर । होउली वत्स आला क्रूर । कृष्णें ताडितां निशाचर । एक योजन पडियला ॥४॥

ऐकोनि म्हणती गोरक्ष । सत्वर पाठवीं यदुनायक । आम्ही जातों अवश्यक । पश्चिम दिशेसी सांगावे ॥५॥

मग ते हाकूनियां खिल्लारें । सवेग चालिले एंकाचि भारें । चौताळती गोधनें थोरें । आवेशेंसी धांवती ॥६॥

निळा म्हणे नेधती पुढें । अवघें पसरिलें ते जाभडें । तळी महीवरी जेवढें । मेघमंडपापर्यंत ॥७॥

६३

ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प । गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥

पुढे चालतां मार्ग न दिसे । अंध:कारी पडिलें ऐसें । मागे फिरावें तंव तो श्वासें । ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥

मग म्हणती येर येरासी । प्रात:काळींचि झाली निशी । गडदे पडिले न दिसे शशी । ग्रह तारांगणे ना भानु ॥३॥

पडिलों दरकुटिमाझारी । किंवा धुई दाटली भारी । अथवा मेहुडे आले वरी । कांवांहिंचि न दिसे न तर्क ॥४॥

जाभाडीं मेळविंता आघासुर परि मागें राहिला सारंगधर । म्हणोनियां तो झाला स्थिर । तयाहि सगट गिळावया ॥५॥

तव दिवस घटिका चारी । आला चढोनियां वरी । गाई गोवळे भिन्न अंधारी । पडिलीं अघासुरा पोटीं ॥६॥

निळा म्हणें यावरी आतां । जागृत झालिया कृष्णनाथा । पुढें कैशी वर्तली कथा ते परिसावी सात्विकीं ॥७॥

६४

कृष्ण बळराम उठिले । मुखमार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठी ॥१॥

गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते । मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्नताटें ॥२॥

उभयतां जेऊनियां उठिले । गोपशृंगार आणविले । विचित्र चोळणे कसिले । काचे वेष्टिले सुरंग ॥३॥

शिरीं मोरविसा टोप । कर्णीं कुंडला तेज अमूप । केशर चंदनाचे विलेप । टिळे लल्ल:टी रेखियेले ॥४॥

गुंजाहार घातले कंठी । खांदी कांबळी हाती वेताटी । मोहरी पावा गांजिवा पावा गांजिवा पाठी । माजि दिव्यान्ने  भरियेलीं ॥५॥

दंडी रुमाल करीं कंकणे । पायी वाहाणा शोभलें लेणें । ऐसे चालतां अतिसत्राणें । पुढे अघयातें ओळखिलें ॥६॥

एक जाभाडें गगनावरी । दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी । गाई गोपाळ गेले भीतरीं । निळा म्हणे हें जाणवलें ॥७॥

६५

मग म्हणे गिळिले गोप । गाई खिल्लारांचे कळप । तारि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन सूड या सकळांचा ॥१॥

कृष्ण शिरतीं त्याच्या वदनी । अधासुरा हर्ष न समाय मेदिनी ।  म्हणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥

ऐसा आनंदला अघ । तंव लाघविया श्रीरंग । वाढला पाताळवरी स्वर्ग । नेदी जाभाडी मेळवूं त्या ॥३॥

नुगळवेचि तो उगळूं जातां । पुढेहि न चलेचि तत्वतां । फाडूनि वदन केल्या चळथा । व्दिभाग करुनि सांडियेले ॥४॥

तेणें उघडया पडल्या गाई । गोवळ म्हणती थोर नवाई । निमिषमात्रेंचि गेली धुई । पहारे स्मरणांचे खेवा । देखिला श्रीहरी दृष्टिपुढें ॥६॥

निळा म्हणे सांगती नवल । आजी अंधारिमाजी गाई गोवळ । पडिले होते आणि वायो प्रबळ । माघारेंही सरों नेदी ॥७॥

६६

मग होसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पे गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥

बरें झालें हातों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगे । पैल पहारे महाभुजंगे । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥

पहाती तंव भरोनियां दरा । पडिला वाहती शोणित धारा । म्हणती दाऊं वडिलांतें नवल हें ॥४॥

ऐंसा अघासुर मर्दिला । कृष्णें पवाडा हा केला । गोवळ नाचती विजयी झाला । श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥

कंसातेंहि विदित झालें । जाउनी वार्तिकीं सांगितलें । तेणें चपपक त्याचें गेंलें । म्हणे ओढवलें दुर्मरण ॥६॥

निळा म्हणे इकडे गाई । चरतां फांकल्या दिशा दाही । वळत्या करुनियां त्या लवलाही । आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥

६७

तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळां भुकेची झाली वेळ । मग पाहोनियां उत्तम स्थळ । सुरुतरु शीतळ छायातळीं ॥१॥

तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालूनियां खलती । कृष्ण म्हणे गाडियांपगती । शिदोया एकत्र कालवूं ॥२॥

गोवळ म्हणती बहुत बरें । कृष्णा तुझिया निजकरें । होईल अमृतचि तें दुसरें । जेवूं आदरें शेष तुझें ॥३॥

नारदें ते ऐकिलें कानीं । सांगे सत्यलोका जाउनी । ब्रम्हयातें म्हणें चक्रपाणी आजि ब्रम्हरस वांटितो ॥४॥

देवा जाऊनियां तेथें । शेष घ्यावेंजी कृष्णहातें । तरी हें पद राहेल निरुतें । नाही तरी अल्पायु ॥५॥

कृष्णशेषाचा हा महिमा । सांगतां अति निरुपमा । पावोनियां निष्काम कामा । पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥

निळा म्हणे नारदवचनीं । ब्रम्हदेव चािलिले तेथुनी । पाहाती तंव वृंदावनीं । गोवळ नाचती चौफेरीं ॥७॥

६८

मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्यांचियें मुखों भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥

हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मंने । मग म्हणे हें सध्यास्नानें । काहींची न करिती गोंवळ ॥२॥

आम्ही याचें शेष घेणें । तैं ब्रम्हत्वा मुकणें । यज्ञी अग्रपूजेचें आवंतणें । कैंचे येईल मग आम्हां ॥३॥

यातें नाही यज्ञाचार । दीक्षा अथवा शिखासूत्र । आम्ही सोवळे  निरंतर । करुं उच्चारु वेदाचा ॥४॥

सोंवळें ओेंवळे नाही यांसी । केलें अपोषण्‍ कर्मासी । सेवितां याचिया उच्छिष्टासी । होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥

प्रायश्चितेंही घेतां । न फिटे विटाळ तत्वतां । ऐसें विचारुनियां विधाता । पालटी तत्वतां ब्रम्हपण ॥६॥

निळा म्हणे ज्याचा तया । संदेह बाधी त्या नांव माया । मग तो रुप पालटूनियां । झाला गोंवळ वेषधारी ॥७॥

६९

यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरी । करुनियां मोहरी करीं । कांठी कांवळा गांजिवा ॥१॥

उफराटी पडदणीं खेविली टिरी । सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी । दृष्टी चोरुनियां माझारी । माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥

येऊनियां कृष्णाजवळा । मुख पसरी इच्छूनि कवळा । तंव हा दावूनियां आणिका गोवळां । मुखीं भरी स्वानंदे ॥३॥

सर्वांग देखणा श्रीहरी । व्यापक सकळांचे अंतरी । ब्रम्हा पाडियला फेरी । नेदी शितंबोटी आतळों ॥४॥

म्हणे ठकूनियां घेऊ आला । कैसेचि अधिकारी तो झाला । नव्हे सोंगादिन मी दादुला । भंल कोणचा सांगाती ॥५॥

मग म्हणे वांकुल्या दावा यासी । न पवे भाग कृत्रिमवेषी । तुम्ही सेवारे सावकाशी । आजिचिया सुखासी पार नाहीं ॥६॥

ऐसे जेविले समस्त । ब्रम्हा राहिला टोकत । निळा म्हणे हा हदगत । जाणे सकळां अंतरीचें ॥७॥

७०

ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥

एकांचे सीत उदंड याचें । पोट भरणें नाही साचें । वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥

तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण । आजिचिया जेवणा अंचवण । न घेई तो आम्हां सज्जन । जिवलग प्राण निजांचा ॥३॥

गोंवळ म्हणती भलाभला । मनींचाचि हेत जाणितला । आजीचिया धणी जो जो धला । तो तो पावला समाधीसुखा ॥४॥

ऐसें बोलानियां गोंवळ । बैसले आत्मस्थितीचि निश्रचळ । तंव ब्रम्हा डोहीं करी तळमळ । कां पां न येतिची आझुनी ॥५॥

मग डोकाउनी बाहेरी पाहें । मागुती जळी लीन होये । म्हणे मी ब्रम्हा आणि विचंबला ठाय । धिग महत्व ते माझें ॥६॥

चोरुनियां वत्सें गोंवळ । नेंऊ आडवूं हा गोपाळ । सत्ता बळें घेऊनि कवळ । मग ते देऊं याचें या ॥७॥ ऐसें विचारुनियां परमेष्टी । राहिला निश्रचळ कातरदृष्टी । निळा म्हणे हेंही जगजेठी । हदगत तयाचें ॥८॥

७१

यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी । मग सावकाशी बैसा सुखें ॥१॥

तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी । जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥

तुंझिया शेषाची हे नवलाई । देहभाव आम्हां नुरेचि देहिं । जाणें येणें कैंचे काई । राहिलों ठायी निश्रचळपणें ॥३॥

देव म्हणे हे पावले खुणे । गडी माझो झाले शहाणे । समाधी सर्वहि । काय चतुराननें कीजे यांचे ॥४॥

यांचिये संगतीं वत्सें धालीं । ब्रम्हसुखातें पावलीं । वियोगवार्ता नेणती भुली । निजस्थिति राहिली स्वरुपींची ॥५॥

ऐसें जाणोनियां श्रीपती । म्हणे मी जातों आजिचे वळती । तुम्ही निश्रचळ रहा वृत्ती । कोणी सांगाती फांकों नका ॥६॥

निळा म्हणे सांगोनि ऐसें । मोहरी पावा घेतला हर्षे । वादन करितांचि पूर्व दिशे । वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥

७२

दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिली ॥१॥

ते तों होती समाधिस्थ । ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात । मग ते नेऊनियां समस्त । सस्यलोकीं बैसविलर ॥२॥

यरवरी येऊनियां श्रीरंग । पाहे तंव न दिसे संग । भलें झालें म्हणतुसे मग । अवघे आपणचि  हो सरला ॥३॥

ब्रम्हा आडवूं पाहे मज । तरी मी सांडीन त्याची पैज । ऐसें म्हणोनियां श्रीराज । वैष्णवी  माया विस्तारिली ॥४॥

आपण वस्तें आपण गोवळ । मोह्या पावे घोंगडी सकळ । काठया पवे पाईतणें मेळ । झाला ते केवळ एकला एक ॥५॥

लुडे खुडे मुडके कान । गोरे सांवळे राजीवनयन । बोलिले तोतिरे म्लान वदन । दैदिप्यमान तोहि झाला ॥६॥

निळा म्हणे होतें तैसें । होऊनी ठेला तेवढेंचि जैसें । नव्हती पहिले कोणी ऐसें । ओळखेंचि नेणती अवलोकिंता ॥७॥

७३

तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥

बुजगीं मिसकिणें लातिरीं । ऐके खविरीं डिंबिरीं । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥

देखतां गांईसी फुटे पान्हा । घरींचिया लोभ उपजे मना । ऐशीं स्वरुपें होउनी नाना । खेळे वृंदावना चौपासीं ॥३॥

येदनी ब्रम्हा पाहे डोळां । तंव पहिलिया ऐसाचि सोहळा । ध्वजा कुंचे घागरमाळा । तोरणें पताका उभविलीया ऐसाचि सोहळा ॥४॥

शिंग काहाळा मोह्या पावे । गोवळ नाचतातीं सुहावे । वरी धरुनियां चांदिवे । भोवती खिलारें वत्सांची ॥५॥

ब्रम्हा म्हणे आणिलीं केव्हा । म्यां तों लपविलीं होती एकिसवा । जाऊनियां पाहे तंव तो मेळावा । जेधिल तेथें तैसाचि ॥६॥

निळा म्हणे लाविलें पिसें । ब्रम्हया येण्याजाण्याचाचिी वळसे । मग लज्जित होऊनियां मानसें । करीत स्तवनें श्रीहरीचीं ॥७॥

७४

तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोश कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें ॥१॥

ब्रम्हा म्हणे हें नवल झालें । ते तेथिल येथें हे कोठूनि आले । चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान श्रीहरिंचें ॥२॥

मग जोडूनियां पाणीतळ ॥३॥ चरणीं ॥ ठेवूं इच्छी निढळ । त्राहें त्राहें जी मी केवळ । दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥

ऐसा एक सुवत्सर । करीत होता नमस्कार । म्हणे वत्सें आणि कुमर । आणवाल तरी आणितों ॥४॥

इकडे कृष्ण गोवळमेळीं । आपणासवें आपण धुमाळी । खेळत आला पर्वतातळी । आणि वत्समुखें हुंबरला ॥५॥

चरतां पर्वत मस्तकीं गाई । ऐकोनी हुंकारिल्या ते ठायीं । मग उडया घालुनियां पाही । पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥

निळा म्हणे जगत्रयजीवन । वत्सें झाला असे आपण । यालागीं स्नेहाचें महिमान । अधिकाधिक् गाईपोटी ॥७॥

७५

गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला ॥१॥

मग ते आले पायवाटा । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचिया सुकाळा । केले वत्सां आणि गोळियां ॥३॥

ऐसा झाला संध्याकाळ । तंव पातले गौळणींचे मेळ । सांजवाणी दुडिया घेऊनी सकळ । करित गायनें सुस्वरें ॥४॥

गौळी म्हणती पिंजल्या गाई द गोंविद म्हणे दोहा त्याही । आजि दुधाची उणेंचि नाहीं । न पुरती पात्रें तैसिचि क्षीरें ॥५॥

गोवळ आपुलालिये घरी । रात्रीं वसती सुखशेजारीं । दिवसा जाती वनांतरी । वत्सापाठी हरिसंगें ॥६॥

निळा म्हणे चतुरानन । आला गोवत्सें घेऊन । म्हणे नेण्ता महिमान । चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥

७६

तंव ते आधिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ । हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती व्दिविध कैसेनि हे झालें ॥१॥

तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी । सुखें पिऊं देती स्तनीं । आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥२॥

तंव ते असमाई गोठी । होतीं अघासुराचे पोटीं । तेचि सांगती वडिला वोटीं म्हणती नवल वितलें ॥३॥

आणि आम्हां अवघिया वनीं । घातलें होतें सर्पे वदनीं । मागें होता सारंगपाणी । तेणें तो चिरुनी टाकिला ॥४॥

मग वत्सें आणि गोवळ । आम्ही बाहेरी पडिलों सकळ । त्याचे पहाहो करवाळ । रक्तें पूर वाहती ॥५॥

नवल तें ऐकोनि कानीं । लोक चालिले पहावया नयनीं । तंव ते पडिले वाळोनी । गंगाओघा सारिखें ॥६॥

ये गोष्टीसी झालें वर्ष । गोवळांवाटे एकचि निमिष । निळा म्हणे सेविलें शेष । तेणें सर्वदा समाधी ॥७॥

७७

ऐशी अगाध चरित्रें याची । वर्णिता मागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलोंची । कैसेनि पां वांचला ॥१॥

मग त्या सांगे नारायण । यासी गेलें वर्ष होऊन । गोवळ वत्सें बहमसदन । पावोनि होते बैसले ॥२॥

कालिचिं ते आले येथे । म्हणोनि सांगती नूतन वातें बहमसदन । व्दिगुणपणे हे कैसोनि तुमतें । प्राप्त झाले कां नेणां ॥३॥

ऐसें सांगता श्रीहरी । अवघ्यां जाण्वलें अंतरी । परम लाघविया मुरारी । खेळ खेळे विचित्र ॥४॥

अधासुरा वाधिल्यावरी । पुढें धेनुंका बोहरी । कैसी केली याची परी । तंहि सुजाण परिसंतु ॥५॥

एकैक याचें कथानक । श्रवण भवबंधा मोचक । म्हणोनियां सात्विक लोक । हेंचि ऐकती अनुदिनी ॥६॥

निळा म्हणें हे बाळक्रीडा परी परमार्थ साधनाचा हुंडा । श्रवण मनन होतांचि फुडा । ब्रम्हसाक्षात्कार पाविजे ॥७॥

७८

वत्सें वत्सप वनांतरी । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥

सांगतां अंगीची बारव । मृणालिके ऐसी लव । शृंगे सुवर्णाची ठेव । रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥

कर्णं जैसीं केतकी दळें । अती राजस पादतळें । खुर शोभति रातोत्पळें । जेवी जडूनि ठेविलीं ॥३॥

चारी चरण कर्दळीस्ताभ । हदयावकाशीं सूक्ष्म नभ । पाठीवरी त्रिवेणी भांव । पुच्छा स्वयंभ शेषफणी ॥४॥

कांबळी लोंबे कंठातळीं । विधुत्प्राय टिळकू भाळीं । वोसंड लवथवित्‍ मांस मोळीं । देखतां नव्हाळी डोळियां ॥५॥

गोंवळ म्हणती कृष्णा पोहें छ नवल वृष्थ आला आहे । चुकारिचाचि नवल नाहे । न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि हरी । दृष्टी घालोनियां सामोरी । म्हणे धेनुक हा निर्धारी आलासे मुक्ति मागावया ॥७॥

७९

ऐसें विचारुनियां मनीं म्हणे सौगडियां सारंगपाणी । बैल चांगला दिसतो नयनीं । परी धारुं कैसा देईल ॥१॥

तुम्ही व्हारे पैलीकडे । दुरी परते वेंघोनि हुडे । चौताळातां हा चहूंकडे । करील रगडा सकळांचा ॥२॥

ते म्हणती बरें कृश्णा । परी तूं सांभाळीं हो आपणा । ऐसें म्हणोनियां पळती राणा । गिरींशिखरीं बैसले ॥३॥

मग कास घालूनि गोपीनाथ । चालिला पुढें चुचकारित । तंव तो म्हणे आजी कार्यार्थ । बरा साधला एकांती ॥४॥

जवळी यावयाची वाट पाहे । उगाचि स्तब्ध उभा राहे । हें जाणोनियां यादवराव । अंग राखोनि चमकतु ॥५॥

ऐसा आटोपिला हरी । तंव ते मायावी आसुरी । धंविान्न्ला तयावरी । शिंगे पसरुनि विस्तीर्णें ॥६॥

निळा म्हणे फुंपात उठी । चौताळ लागे पाठीं । तंव हा परमात्मा जगजेठी । गांठी पडों नेदीचि ॥७॥

८०

शृंगें पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंध्रीं धूमकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥

मागें सरे पुढे धांवे । आडवाचि उडे उंच उंचावे । ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥

देव हाणे मुष्टी घातें । तेणें आर्डाय दुखवोनि तेथें । सवेंचि सरसावोनियां वरिते । उपसों धांवे गोंविंदा ॥३॥

दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रोढीगौरव । मग धेनुकें करुनियां । कृष्णातळीं संचारला ॥४॥

येरें रगडूनि तेथेंचि धरिला । दोन्ही शिंगी हात घातला । मग ते उपटुनी त्राहाटिला । निघात घातें खडकावरी ॥५॥

ऐसा करुनियां शतचूर्ण । रक्त मांस त्वचा भिन्न्‍ा । अस्थि तिळप्राय होऊन । गेल्या उडोनि दाहिदिशा ॥६॥

निळा म्हणे ऐशियापरी । धेनुका मुक्तीची शिदोरी । देऊनि पाठविला श्रीहरि । आपुलिया निजधामा सुखवस्ती ॥७॥

८१

हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥

आम्ही देखिलें दुरोनी । होतो डोंगरीं बसोनी । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥

येरु म्हणे तो असुर । तुम्हां भासला होता ढोर । कंसरायाचा तो हेर । जाता वधुनी सकळांते ॥३॥

ऐसा जाणोनियां निभ्रांता । शांति पावविला तो आतां । तुम्ही भयातें न धरितां । सुखे विचारा मत्संगें ॥४॥

माझिया भजनीं जे राहाती । त्यांचिया विघ्नाची शांती । करुनियां सुखविश्रांती । तया अर्पी सर्व सिध्दी ॥५॥

ऐसें ऐकोनियां हरिवचन । संतोषले सकळी जन । मग नमस्कारुनियां उभय चरण । गोकुळांप्रती चालिले ॥६॥

निळा म्हणे सांगती वडिलां । वनीं वर्तमान जो देखिला । धेनकासुर तो निपातिला । आजी कृष्णें युध्दसंधी ॥७॥

८२

पूर्वील कथा अनुसंधान । राहिलें होतें करितां कथन । मतिविस्ताराचे महिमान स्फुर्ती फांकोन वाहावली ॥१॥

माभळभट गेलीया वरी । कागासुर तो माव करी । येऊनियां गोकुळा भीतरी । बिंबवृक्षावरी बैसला ॥२॥

म्हणे फोडूनियां दोन्ही डोळे । बाळका करीन मी आंधळे । चुंचचिघातें कंठनाळें । फोडीन वृक्षस्थळीं बैसोनी ॥३॥

काय करील तें लेकरुं । मनुष्य मानवी ते इतरु । आम्हां दैत्यांचा आहारु । कैसेनि येती ते मजपुढें ॥४॥

कंसाचिये आज्ञे भेणें । करितो मनुष्यांची संरक्षणें । आतां तों प्रेरिलेंसे तेणें । आड आलिया निवटीन ॥५॥

आलिया त्याचिया कैवारा । आकळूं झकें मी इंद्रादिसुरां । मज कोपलिया कृतातवीरा । कोण सामोरा येऊं शके ॥६॥

निळा म्हणे ऐशिया मदें । मातला मनेशींचि अनुवादें । कंसा तोषवीन आनंदे । प्रतीक्षा करी कृष्णाची ॥७॥

८३

ऐसें जाणोनियां श्रीहरि । पालखी निजविल्या रुदन करी । न राहे   अंकीही क्षणभरी । निवितां शेजारी तैसाची ॥१॥

काय करुं गे यशोदा म्हणे । कां हे करितीहे रुदनें । दिठावलें माझें तान्हें । निंबलोण उतरी तया ॥२॥

तरी न राहे रुदतां । अधिक् अधिक् आक्रंदतां । यशोदा म्हणे बाहेरी आतां । नेऊं तरी कोणाकडे ॥३॥

मग घेऊनियां कडियेवरी । काग दाविला निंबाबरी । तया देखोनियां हास्य करी । मग ते सुंदरी हरिखली ॥४॥

म्हणे निजऊनियां येथें । करीन कामकाज ऐसें । विचारुनियां चित्तें । म्हणे कागातें अवलोकीं ॥५॥

ऐशापरी निजविला । क्षण एक काजकामीं गेला । तंव काग तेथूनियां उठविला । झडपूं आला गोविंदा ॥६॥

देखोनी यशोदा घाबरी । हाहाकार केला इतरीं । निळा म्हणे तो असूरी हरीचीवरी झेपावला ॥७॥

८४

रुप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक् । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥

क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं । उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । आपार वातें उसळलें ॥२॥

लोक मिळाले भोवतें । परीं भिताती देखोनियां त्यातें । मग धरुनियां चंचूतें दोन्ही फाळी करुं पाहे ॥३॥

अनंत हस्तांचा श्रीधर । काय ते काउळे किंकर । परी तो मायावी असूर । खग वोडणेंसी ठाकला ॥४॥

कृष्णें लत्ताप्रहारें त्यांसी । पाडियलें तोंडघसी । धरुनीयां निजकेशीं । आपणासीं ओढियेला ॥५॥

दक्षिणकरें मुष्ठीप्रहरीं । हाणितलें त्या शिरावर मस्तक फुटतां मेंदूवरी । शोणित वाहे भडभडां ॥६॥

निळा म्हणे दीर्घपापी । कागरुपिया अति विकल्पी । परी हा परमात्मा पुण्यप्रतापी । मोक्षपदासी पाठविलां ॥७॥

८५

मग धांवोनियां यशोदा । हदयी आळंगी गोविंदा । बारे तूंतें अरिष्टेंचि सदा । जैं पासुनि जन्मलासी ॥१॥

प्रथम पूतनेचा घात । दुजा भटाचा विपरीतार्थ । तिजा कागाचा हा अनर्थ । आम्हीं देखिला समस्ती ॥२॥

यावरी काय काय होईल । नकळे आम्हांते तें पुढील । मागें शकटाचेंहि नवल । मारिलेचि होतें तुज कृष्णा ॥३॥

कैसें रासचि पुसती । नानापरींचे उत्पात येती । काय करुं रे श्रीपती । कैसा वांचसील काय जाण ॥४॥

किती चिंता करुं खेद । मज हें न देखवती प्रमाद । तंव गगनवाणीचे शब्द । ऐकती झाली निज कर्णी ॥५॥

परमात्मा हा पूर्ण अवतार । उतरावया धराभार । तुझियें उदरींचा कुमर । निवटील असुर अपरिमित ॥६॥

जे जे पापी अतुर्बळी । आहेत हे भूमंडळी । तितुकियांसिहि मांडुनी कळी । पाठविल त्या यमपंथें ॥७॥

निळा म्हणे ऐकोनि कानीं । यशोदा संतोषली मनीं । टाळी पिटिली सकळही जनीं । थोर आश्चर्य वाटलें ॥८॥

८६

अवघे करुनि जयजयकार । हषें झाले सुखनिर्भर । म्हणती आतां वारंवार । भय संकोचि न धरावा ॥१॥

तंव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसें । गर्गाचायें कथिलें विन्यासें । राशिनक्षत्राचेनियां मिसे । उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥

पुढें वधील कंसासुरा । सोडवील हा मातापितरां । मथुरेसी उग्रसेना नृपवरा । भद्र सिंहासनी बैसवील ॥३॥

करील धर्मांचे पाळण । सकळ पांडवांचे संरक्षण । भीमकीचेंही पाणिग्रहण । करील अरिर्वारां मर्दुनी ॥४॥

वधूनियां भोमासुरा । सोळा सहस्त्र अंत:पुरा । प्रणूनियां हा एकसरा । पुत्रपौत्रीं नांदेल ॥५॥

कौरवां वधील पांडवाहातें । राज्यीं स्थापील हा धर्मातें । उतरुनी भूभारातें । अवनी उत्फुल्लित करील ॥६॥

गोकुळींचियां नगरनारी । रंजवील हा नानापरी । गोवळ गाईचा मनोहरी । क्रीडा करील हा कौतुकें ॥७॥

अतुर्बळिया नारायणु । याशोदे तुझा हा नंदनु । नाटकी कौसाल कान्हु । करील पवाडे अगणित ॥८॥

निळा म्हणे ते प्रसंगीं । स्मरलें अवघें यशोदेलागीं । मग नाना वस्तु पदार्थ चांगी । वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥९॥

८७

यावरी बगासुराची कथा । विचित्र आहे ते ऐकतां । कृष्णकरें पावोनि घाता । महामुक्तीतें वरील ॥१॥

मग तो बगरुपीया असुर । ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर । झांकूनियां उभय नेत्र ।  एकाचि पायावरी उभा ॥२॥

कृष्ण घातावरी चित्त मनीं चिुंतूनिया तिष्ठत । म्हणे केव्हां देखेन तो येथ । येतां खेळत जवळी कैं ॥३॥

बाळलीलें येतांचि जवळी । गटकाळीन जेवीं मांसळी । हे जाणोनियां वनामाळी । आला खेळींमेळीं गडियांसवें ॥४॥

तंव तो पक्षिया देखिला कैसा । राजहेस कां सरोवरीचा जैसा । शोभयमान निश्रचळ ऐसा । लेंकरें म्हणती चला धरुं ॥५॥

कृष्ण म्हणे रे पक्षी क्रूर । नका जाऊं त्या समोर । मत्स्याही महा निष्ठूर । पापकर्मा दुरात्मा ॥६॥

तुम्ही राहा एकीकडे । मागेंचि लपोनियां गडे । जाऊनि मी पाहतों पुढें । उघडितो नेत्र कीं नाही ॥७॥

पहा लपत लपतचि जातों । आणी देईल धरुं तरी आणितों । परी तुम्ही करा जें सांगतों । दुरीचि असा पैलाडी ॥८॥

तंव पालवथाचे अवघक लोक । पाहाती कृष्णाचें कौतुक । म्हणत नंदाचा हा बाळक । पहारे कैसा पिलंगतो ॥९॥

निळा म्हणे जैसा चित्ता हरणी देखोनियां तत्वता । सुरके भूमिची आतौता । तैसाचि हाही वेग करी ॥१०॥

८८

त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी  । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित ॥१॥

येतां देखोनियां कृष्णासी । दैत्य हारीखला मानसीं । म्हणे साधूनियां निजकार्यांसी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥

ऐसें विचारुनियां मानसीं ।  पक्ष झाडी अति अवेशीं । म्हणे कंसाचिया पुण्यराशी । झालिया सन्मुख या काळें ॥३॥

आतां गिळुनियां नंदकुमारा । खोवीन मस्तकी यशाचा तुरा । मात जाणवीन रोश्रवरा । मथुरेशर जाऊनि उल्हासें ॥४॥

म्हणोनी आतां राहें सुखी । माझिया बळें तूं इहलोकीं । तोषवीन नृपति पुण्यलोकीं । आम्हां पाळक दैत्याचा ॥५॥

परी हा मृत्यूचि आला हें नेणतु । वृथाचि मनोरथ वाढवितु । आपआपणासीची श्रलाघवितु । महा मूर्ख तो पापराशी ॥६॥

मग अति आवेशें धांविला । कृष्णा झगटावया पातला । तंव तो तेणें आसूडिला । तोंडघशीं पडिला चरणातळीं ॥७॥

पक्ष धरुनियां  दोन्ही हातें । उपटूनियां सांडिले परौतें । लोला करुनियां गोपीनाथें । चरणघातें तुडविला ॥८॥

ऐशियापरी घाबरा केला । चुंचीत धरुनियां घोळसिला । म्हणे मायाविया दाखवीं आला । मायाप्रतापु या काळें ॥९॥

बहुत दिवस मामाचें अन्न्‍ा । भक्षिलें झाडा तो घेईन । आजि मृत्युपंथे पाठवीन । गौरव करुन ताडनाचा ॥१०॥

ऐसें बोलोनियां श्रीहरि । सोडिला तंव तो दीर्घ स्वरीं । गर्जोनियां कृष्णावरी । अति तवकें उठिला ॥११॥

आधींच तंव तो निशाचर । रुप धरुनियां भयंकर । कृष्णा गिळावया सत्वर । मुख पसरुनी धंविला ॥१२॥

हें देखोलि लोक म्हणती । गिळिला गिळिला रे श्रीपती । वेगीं जाऊनियां नंदाप्रती । मात जाणवा दसवंतिये ॥१३॥

ऐसा झाला हाहाकार । कृष्णें तेचि क्षणीं अति सत्वर । ‍िफोडूनि जाभाडें दंतावळि चुर । करुनियां पाडिला ॥१४॥

मग रगडूनियां पादघातें । मुरगाळिली मुंडी होतें । दैत्य त्यागिता निज देहातें । शब्द केला आचाट ॥१५॥

म्हणे धांव धांव कंसासुरा । तुझिये काजीं वेंचलों पुरा । निळा म्हणे मग शारंगधरा । वरुनी प्राणा ओंवाळिलें ॥१६॥

८९

या परी करुनियां त्याची गती । निजधामा पाठविला श्रीपती । लोकही विस्मय पावोनि चित्तीं । न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥

हाचि ईशाचाही ईश । जगाचा आदी हा जगदीश । येथें दिसतो । मानुशवेश । परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥

याचिया चरित्राची नवाई । एकेक सांगावी किती काई । अगाधपणेंचि बाळत्वही । प्रथ्मचि पूतना शोषिली ॥३॥

पाठीं माभळभटासी पिढेदान । शकट पादघतेंचि उडवून । यावरी कागबग निर्दाळून । रिठासुरा चावून सांडियेला ॥४॥

अघासुरही वनीं चिरिला । वत्सासुर तो धोपटिला । धेनुक प्राणेंसी बिघडविला । तृणावर्त लाविला मृत्युपंथे ॥५॥

ऐशी दिव्य चरित्राचिया खाणी । उघडिलिया येणें बाळपणीं । पुढें जे करील तेंही नयनीं । पाहों आइकों निवाडे ॥६॥

निळा म्हणे ऐसे जन । गोकुळींचे विस्मयापत्र । पुढें केशियाचें आख्यान । तेंही सकळिक आइका ॥७॥

९०

अश्वरुपिया केसासूर । ठाणमाण अति सुंदर । जैसा उच्चैश्रवा रहंवर । देवलोकीं इंद्राचा ॥१॥

शोभिवंत तयाहुनी आगळा । असुई अवलोकितां डोळा । पाहावाचि ऐसा वेळोवेळां । आठवों नेदी आणि ॥२॥

शोधितांही सप्तव्दीपांतरु । नाढळेचि कोठें ऐसा वारु । सुंदराहुनी अति सुंदरु । रुपें नागरु भुलवणा ॥३॥

दांडिमान कळाव्या डोळे । कर्ण जैसे केतकिदळें । गुडघे सुंब मेजागळे । सर्वहि शृंगारमंडीत ॥४॥

खोगिर जीन लगाम तोंडी । इलाखे रिकेबियांची जोडी । गाशा वागदोर दुमाचिया दांडी ।  खुरुस नवरत्न खचितांचे ॥५॥

तंव संवगडियांसी खेळत । आले अकस्मात गोपिनाथ् । वारु देखोनि गडिया म्हणत । पैल पहारे विचित्र तेजी ॥६॥

आम्हा राये कंसासुरें । बैसावया अति आदरें । धडिलें हें वहान खरें । अनुवादिजे गडियासी ॥७॥

आतां यावरी घालुनि स्वारी । पाहो बैसोनियां दुरी । बैसोनि पहावें गोपुरावरी । ऐसें सांगोनियां श्रीहरी । मग सांवरी आपणिया ॥९॥

आइता साज आहे वरी । रुपाकृत ही साजिरी । मायावी हा जाणेनियां हरी । कास कसिली बळकट ॥१०॥

निळा म्हणे मनोगत । आर्त केशियाचे उत्कंठित । वरी बैसलिया कृष्णनाथ । नेईन दिगांता उडवुनी ॥११॥

९१

म्हणोनियां तेथें उगाचि उभा । यावया जवळी पहननाभा । तोहि सर्वसाक्षी ओथंबा । जाणे हदगत केशियाचें ॥१॥

मग चालत मंजुळ चाली । हळूहळूचि गेला जवळी । लगाम धरुनिया निज करतळी । हातें कुरवाळी मुखांतरी ॥२॥

मग रिकेबी देवोनि पावो । चढला वरी यादवरावो । हालों नंदितांचि नवलवो । घातला भार त्रिभुवनांचा ॥३॥

केशीया पाहे उडावया । तंव ओझें भारी नुचलवे पायां । म्हणे गेली व्यर्थचि माया । रचिलें येवढें लाघव तें ॥४॥

मग न चलवे ऐसें जाणेनि हरी । बारवा फोडिला चाबुकावरी । केशिया ह्रदयींचि रुदन करी । म्हणे घेतला प्राण निश्रचयेसी ॥५॥

हालों नेदीची हा गोंवळ । महाबलीया आमुचा काळ । कृष्ण म्हणे हें मुसळ । व्यर्थचि पोसिलें बेटियानें ॥६॥

चारुनियां दाणाचार । पुष्ट केला बहु थोर । नाही मिनला चाबुक स्वार । तोंचिवरी शोंभला ॥७॥

मग उतरला झडकरी । हातीं धरिली लगाम दोरी । तंव तो उपायीं येऊनियां वरी । हाणों धांवे टापेनें ॥८॥

मागे पेर वाळे झाडित । आडवाचि उडे मग कुकात । तोंड  पसरुनियां विचकी दांत । डसावया श्रीहरी ॥९॥

येरु आतळोंचि नेदी त्या अंगा । धरिलें आंवरुनियां तुरंगा । घायांतळी आणूनियां चांगा । ताडिला मुष्ठीप्रहरें करुनि ॥१०॥

तेणेंचि तया आली तव । म्हणे कंसा वेगी धांव धांव । वेंचलों जीवेम करी कणव । सोडवीं मज याच्या हाती ॥११॥

तुझिया काजा वधावा हरी । म्हणोनियां आलों येथवरी । तव हा लाघविया मुरारी । बैसला जिव्हारी काय करुं ॥१२॥

पायीं बांधोनियां टाकिलें माझियाचि भूषणी मज गोंविलें । नाही अंतरी हें मज कळलें । कैसे करुं हदयासी ॥१३॥

ऐसी या विलापें आक्रंदतां । प्राण सोडिले तत्वतां । म्हणे मी फिरांनियां मागुता । न येचि येथें श्रीकृष्णा ॥१४॥

निळा म्हणे ऐकोनि श्रीकृष्ण । म्हणे वाग्देवी तुझी तुज प्रसन्न । जारे मुक्ति पदीं बैसोन । वस्ती करी तेथे सुखें ॥१५॥

९२

ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती न कळे महिमान श्रीहरिचें ॥१॥

कृत्रिम वेषिया तुरंगम । आला इच्छूनियां सग्राम । कैसा जाणूनियां मेघ:शाम । तयावरी सरसावला ॥२॥

त्याची केलीचि कार्यसिध्द । तोडूनियां आधिव्याधि । बैसविला तो सभासंधी । मुक्तिस्थानीं मुक्ताचियें ॥३॥

वार्ता गेली कंसासुरा । मर्दिलें केशिया महावीरा । गोकुळी आनंद नारीनारां । हषें साखरा वांटिती ॥४॥

कंस म्हणे विपरीत भाग्य । झालें ओढवलें उपसर्ग । गेले माझे हे अंगलग । आतां विश्वास  कोणाचा ॥५॥

गगनवाणी ऐकियेली जेव्हां । सुत देवकीचा आठवा । तोचि वधील दैत्यां सर्वां । तों हें विपरीत वर्तलें ॥६॥

गोकुळामाजीं तुझा वैरी । नाहीं ऐकिलें भविष्यांतरी । एकचि वदली ते कुमारी । जें कां निष्ठिली हातींची ॥७॥

व्यर्थचि पिडियेली देवकी । आणि वसुदेवही पुण्यश्रलोकी । होणार न चुकेचि कीं सेखीं । विघ्न आणिकचि उदेलें ॥८॥

निळा म्हणे ऐसियापरी । कंस निमग्न दु:खसागरीं । गेली ऐश्रवर्याची धारी । पडिला शरीरीं निचेष्टित ॥९॥

९३

यावरी गौळणी सुंदरी । नूऊनियां निजमंदिरीं । खेळविती परमात्मया श्रीहरी । नाना उपचारी पूजिती ॥१॥

देऊनियां चंदनउटी । केशरी टिळक लाविती लल्लाटीं । नाना सुमनहार कंठी । घालिती वरवंटी श्रीकृष्णा ॥२॥

गुंफूनी सुमनटोप शिरीं विचित्र तुरे खोंविती वरी । लेवूनियां दिव्य अळंकारीं । वस्त्रें परिधानें गौरविती ॥३॥

एकी जाणविती विंजणवारा । एकी चवरी विंजती सुंदरा । म्हणती वो नंदकुमारा । दासी आम्ही तुमचिया ॥४॥

शर्करा घृत परिपक्व लाडू । नाना स्वाद फळांचे घडू । आणूनियां करिती सुरवाडु । कृष्ण वदनीं समर्पिती ॥५॥

एकी उचलूनियां कडिये घेती । एकीं खांदिये बैसविती । एकी ह्रदयींची आळंगिती । चुंबन देती पैं एकी ॥६॥

निळा म्हणे परब्रम्ह सेजे । आवडीं घेऊनि निजतीं निजें । ऐशिया सुखाचीं नाचती भोजें । परमात्मा आप्त झालिया ॥७॥

९४

आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥

नाना परीच्या विनोदवार्ता । सांगाती बोलती अनंता । तुझेनि भाग्यें भाग्यवंता । म्हणती आम्ही संसारी ॥२॥

कृष्णा आत्मया सुखानंदा । परात्परा जी आनंदकंदा । नित्या अचिंत्या अभेधा । देवत्रयां तूं वंदय ॥३॥

ऐसा असोनियां आम्हां आरजा । खेळणें झालासी आजिच्या काजा । धन्य आम्हीही गरुडध्वजा । तुझे पादपध देखतों ॥४॥

आणखीही एक नवल थोर । परमात्मया तूं परात्पर । आम्हालागीं रुप साकार । आवडी ऐसेंचि धरियेलें ॥५॥

कृष्णा म्हणोनियां पाचारितां । वो म्हणोनियां येसी धावंतां । येरवी वेदाचियांही संमता । उरविसी रुप निर्धारिं ॥६॥

निळा म्हणे ऐशिया प्रेमें । अनुसरल्या त्या भक्तिसंभ्रमे । तैसेंचि जाणोनियां त्या परब्रहमें । पुरविले त्यांचे सोहळे ॥७॥

९५

मग त्या मिळोनियां सकळ जनीं । मध्यें बैसवूनियां शारंगपाणी । भोंवत्या खेळविती खेळणीं । नाचती नाचणीं गीतस्वरें ॥१॥

कृष्णा म्हणोनियां आळविती । मधुर स्वरें गायनें गाती । तेणेंचि मिसें त्या कृष्णासि स्तविती । आणि रंजविती परमात्मया ॥२॥

म्हणती गे नंदयशोदेचें पुण्य । उरलें त्रैलोक्या पुरोन । आम्हां झालें तें सुप्रसन्न । कृष्णाकृती या काळें ॥३॥

म्हणोनियां जिवेंप्राणें । ओवाळिती तनुमनें । घालूनियां दिव्यासनें । वरी कृष्णातें बैसविती ॥ ४॥

करुनियां आनंद सोहळा । खेळती नानापरीच्या खेळा । लई लई लखोटें पिंगे सकळा । फुगडया घलिती निज वारें ॥५॥

हेटी मेटी । कपाळ झेटी । पक्कें  घालिती  नमन लल्लाटीं । टोकर खडेही झेलिती बेटी । नाचती टिपरी घेऊनियां ॥६॥

निळा म्हणे ऐशियापरी । रंजविती जगदात्मयाहरी । आणि घेऊनियां अंकावरी । क्रीडा विनोदें खेळविती ॥७॥

९६

म्हणती कृष्ण आवडे कैसा । जीवप्राण का पढिये जैसा । एकी म्हणती गे मानसा । भुलवाणाचि सुंदरपणें ॥१॥

यातें पाहों जातां दिठी । पहाते पहाणेंचि नुरें शेवटीं । संचरोनियां हा पाठीपोटीं । करी आपणासारिखें ॥२॥

वेधूचि लावियेला मना । येणें गोविलें वो लोचना । आमुच्या चित्ताचिया वासना । येणेंचि हिरोनियां घेतल्या ॥३॥

वाटे तयासीचि परिचार । करुनी असावें निरंतर । क्षणही एक न व्हावा दूर । माया माहेर आमुचा हा ॥४॥

विनोद चर्चा याशींच करणें । आवडे कृष्णासीं बोलणें । यावीण दुजें दृष्टी । नावडो याविण आणिकी गोष्टी । विश्रवा आधीं हा शेवटीं । पाहावा पोटीं हेंचि आवस्था ॥६॥

निळा म्हणे ऐशीं कृष्णें । हिरोनी घेतलि यांचि मनें । मग या राजीवलोचनें । मांडिली विंदानें आणिकही ॥७॥

९७

घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं ॥१॥

येरी म्हणे परिसे ताता । गगनींचा तो नये हाता । नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि मागों नको ॥२॥

येरुं म्हणे रे पैल दिसे । नाहीं त्यासी म्हणसी कैसें । येरे म्हणे असाध्य तें असें । नाहींपणाचि सारिखें ॥३॥

राया घरींची संपदा । दुर्बळा घरीं कैंची सदां । येरु हांसोनियां गदगदां । मुखचंद्रातें दाखवितु ॥४॥

म्हणे पाहे दसवंतिये । हा गे जवळींच चंद्र आहे । तारे तुटती लवलाहे । षोडशकळीं प्रकाशला ॥५॥

यशोदा म्हणे न कळे महिमा । तुझा आम्हां पुरुषोत्तमा । दिठावसील रे मेघ:शामा नको विंदाने करुं ऐशीं ॥६॥

निळा म्हणे ओंवाळून । सांडी वरुनी निंबलोण । मग त्या वोसंगा घेऊन । म्हणे भोजन करीं बापा ॥७॥

९८

मग बैसवूनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी । दूध दहीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियेली ॥१॥

कृष्ण म्हणे कालवी आतां । जेववीं मज तें वो जेवितां । येरी म्हणे परिसें ताता । रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥

येरु म्हणे रसनायक । भिन्न कैंचे वो आणिक । येरी  म्हणे तुझी एकैक । नवाईच शब्दाची ॥३॥

मग कालवूनि एके ठायीं । म्हणें कृष्णा आतां घेंई । येरु म्हणे वेगळें देंई । करुनियां हें ठायीचें ॥४॥

तंव ते म्हणे न चले युक्ती । नको छळुं रे श्रीपती । त्यांची एकत्र करविलें अंती । मज कां म्हणसीं निवडी हें ॥५॥

ऐसें कोणा आहे ज्ञान । मिश्रित झालें तें करी भिन्न । येरें पालवें झांकून । दाविले पदार्थ वेगळाले ॥६॥

निळा म्हणे देखोनिया माता । आश्रचर्य मानी ते तत्वतां । म्हणे याचिये हातीं सर्वहि सत्ता । आहे सकळ विश्रवाची ॥७॥

९९

यावरी गडियांसीं खेळत । आला यमुनेतीरा आंत । क्रीडा करितां करितां आर्त । देखिलें ऐसें यमुनेचें ॥१॥

जैशा येऊनियां गौळणी । कृष्णमुखीं घालिती लोणी । मीच अंतरलें गे पापिणी । होऊनियां पाणी वाहातुसे ॥२॥

कृष्ण म्हणे तुझिाया पोटीं । आहेती नवनिताचिया खोटी । काढूनी गाळ तो जगजेठी । सुखें भक्षितु बैसला ॥३॥

हें देखोनियां ते गडे । म्हणती बैसोनि एकीकडे । माती खातो हा निवाडें । सांगों धाविले यशोदे ॥४॥

म्हणती मृतिका आणूनि हरि । बैसला भक्षीत आवडीं करीं । ऐसें ऐकोनियां सुदरी । धांवली क्रोधें आवेशें ॥५॥

हातीं घेऊनिया सिपुटी । आली जवळीके नेहटीं । येरें देखोनियां ते दिठीं । मृत्तिका लपवुनी पळतसे ॥६॥

निळा म्हणे हाकारिते । माया धांवे आटोपित । नाटोपेचि मग ते म्हणत । घरां आलिया ताडीन ॥७॥

१००

येरें शब्द ते ऐकोन । उभा ठाकला जगज्जीवन । माता म्हणे हे अवगुण । कांरे ऐसे करितोसी ॥१॥

ठायीं वाडिलिया न जेविसी । आणि येथें माती खाशी । येरु म्हणे नाहीं ऐशी । प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥

तंव ते म्हणे दावीं मुख । येरु म्हणे तरी हें देख । पाहे तंव माजीं त्रैलोकय । चंद्रसूर्य तारांगणें ॥३॥

मेरुकुळाचाळ पर्वत । नदादि नदीयांचे ओघ वहात । सप्तहि सागर भरतें येत । ऐसें देखत वदनामाजीं ॥४॥

भोवंडी आली पहातां नयनां । मग म्हणे निमटी निमटी आतां वदना । माव तुझी जगज्जीवना । नकळेचि आम्हां प्राकृतां ॥५॥

मग धरुनियां तो करतळीं आलिंगिला हदयमेळीं । विस्मयें दाटोनियां वेल्हाळी । आली घेउनी मंदिरां ॥६॥

निळा म्हणे सांगे लोकां । अपूर्व देखिलें म्यां कौतुका । मृत्तिकामिसें माजी त्रैलोक्या । पाहिलें वदनीं हरिचिया ॥७॥

१०१

गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥१॥

दूध तूप साय लोणी । दहीं हुडकूनियां आणी । खाय लवंडी आणि पोरा लागुनी । देऊनियां धणी सुखी करी ॥२॥

देउनी समर्थ हा घेणार । सर्वी सर्वात्मा ईश्वर । म्हणोनियां हा हुडकूनियां घर आणी बाहेरी लपविले ॥३॥

कोठेंहि उरों नेदिचि संचित आणी बाहेरीं ते अकस्मात । वाढूनि सौगडिया देत । आपणहि स्वीकारित त्यांच्यासंगे ॥४॥

देखोनियां तें वृध्द नारी । बोभाट करिती यशोदे व्दारी । म्हणती गे कुमारा आवरीं । नव्हाडी केली गोरसाची ॥५॥

नित्य संवकलासे आमुचे घरीं । धांवोनि तो निशीच्या भरीं ।  निद्रिस्त असतां शिकींचि उतरी । आणि गोवळां चारी गोरस ॥६॥

निळा म्हणे न सोसवे आतां । नित्य उपद्रव याचा होतां । आणखीही गुह्य गोष्टी सांगतां । होईल लौकिक आमुचाचि ॥७॥

१०२

सुनाकुमरी आमुचे घरीं । त्यांतेही चाळवुनियां निर्धारी । लोळे सेजाबाजावरी । आणखीही करी काय नेणों ॥१॥

तया नावडतिचि भ्रतार । सासासासरे भावेदिर । करुनिया यासिची परिचार । रतल्या निरंतर याची संगें ॥२॥

खाता जेवितां स्मरति यातें । लेतां नेसतां यापेंचि चित्तें । कामकाजीं जैसि भ्रमितें । तैसिया उदास वर्तती ॥३॥

यशोदा याणेंचि लाविला चाळा । वेडयाचि केल्या सुनाबाळा । देखता याचिया श्रीमुखकमळा । मग त्या नव्हतचि कोणाच्या ॥४॥

ऐसा चोर हा शिनळ । यशोदे आवरी आपुला बाळ । येणें बुडविलें आमुचे कुळ । न कळे आकळ खेळयाच ॥५॥

सांगता हे ऐशी गोष्टी । क्रोधची उपजे तुझया पोटीं । परीहा भला नव्हेचि शेवटीं । उभ्यकुलां बुडवणा ॥६॥

निळा म्हणे त्यांचि वचनें । ऐकोनि यशोदा क्रोधें म्हणे । काय गे बोल त्या माझें तान्हें । बाळक हें नेणें चोया करुं ॥७॥

१०३

नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥

जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥

घरीं काय त्या उणें झालें । जे तुम्हां घरी दूध दहीं चारिलें । नेऊनियां कोठें सांठविलें । कृष्ण खणार तें किती ॥३॥

लेंकरुं माझें कोडिसवाणें । विकारमात्र कांहींची नेणे । तयासी शिनळ चोर हें म्हणणें । फजीत पावणें आहे तुम्हां  ॥४॥

जा गे आतां धरुनि आणा । खोटें शिनळिय येरी श्रीकृष्णा । नाहीं तरी फजीतपणा । व्यर्थचि पावाल या बोलीं ॥५॥

कृष्ण तो अंतर्बाह्य निर्मळ । जैसी कां शुध्द स्फटिक शीळ । तया चोरियेचा लावितां मळ । जिव्हा कांटतील तुमचिया ॥६॥

निळा म्हणे परिसोनी येरा । क्रोधेंचि चालिल्या आपुल्या घरा । म्हणती धरुनियां श्रीवरा । आणूं तैसाचि इयेपाशीं ॥७॥

१०४

मग लाउनी शिंकियाच्या हारी । बैसल्या जागत आपुल्या घरीं । कवडाआड आणि माजघरीं  । शिंकिया जवळी भोंवताल्या ॥१॥

पाटीये तळीं झांकोनी दीप । बैसल्या दवडोनियां झोंप । तंव हा सच्चिदानंदस्वरुप । आला चोरिये त्याचि घरां ॥२॥

गडी ठेवूनियां बाहेरी । चाहुली मारुनियां संचार करी । तंव या शिंकियाचिया हारी । चाचपडतां सांपडल्या॥३॥

तेणें हरिखेला अंतरीं । म्हणे आतां साधली चोरी । बरा निवाड फावला वरी । निजल्या नारी नेणती ॥४॥

गोड चाखोनियां तें पाहे । हातोहातीं लांबवीत जाय । दूध लोणी वरील साय । दहीं साजुक विरजलें ॥५॥

आपण खाये गडियां चारी । गोड आहे म्हणे हरी कुचकुचिती हळूचि करीं । म्हणतीं बाहेरी निघावें ॥६॥

तंव सांचल ऐकोनियां गौळणी । आवेशें धांविल्या अवघ्याजणी । दीप उघडिला तंव हा नयनीं । देखियला चोरिये भक्षितां ॥७॥

झडा घालुनियां वरी ॥ कवळिल्या अवघ्या नारीं । म्हणती कैसी करुनी चोरी । घरे आमुची बुडविली ॥८॥

निळा म्हणे बोलोनि ऐसें । चरणी बांधति आवेशे । तया किंव दावितसे । म्हणे मी आलों भुलोनिया ॥९॥

१०५

काली माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां । तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥

न यें सोडाल आजि तरी । तुमचे घरीं न करीं चोरी । मस्तक ठेवितों पायांवरी । करा उपकार आजि मज ॥२॥

एकी म्हणती विश्वास  नाहीं । याचिया शब्दाचा वो कांही । आजि सोडितां हा उदयांही । ऐसेंचि करील येउनी ॥३॥

अवघाचि चोरुनीया गोरस । नित्य खातो सावकाश । आमुचें घरीं नुरवी लेश । पहा माणसें रोडेलीं ॥४॥

आपुलिये हा सुटिकेसाठीं । उदंड सांगेल ऐशिया गोष्टी । परि निष्ठूर आणि कपटी । या ऐसा नाही भूमंडळीं ॥५॥

आतां यासि न्यावें तेथें । यशोदे दावावे निरुतें । तियेसि सत्य वाटत नव्हतं । फेडावा संदेह तियेचा ॥६॥

निळा म्हणे मग बांधोनी गळा । धुलकाविती अवघ्या बाळा ॥ गाळी वोपुनियां सकळां । आणिला धरुनी यशोदेपें ॥७॥

१०६

म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहे याचें मुख । लोणीं माखलें साजूक । आणि दहींही गिरबडलें ते वरी ॥१॥

पाहे यशोदा जंव निर्धारी । तंव माग देखे मुखावरी । मग झडपिती अवघ्या नारी । कैसें बोलत होतीसी ॥२॥

याचिपरी आमुच्या सुना । कुमारीही लाविल्या ध्याना । सांगता हें तुमच्या मना । सत्य नव्हतें वाटत ॥३॥

आतां शासन करिशील तरी । खोंडी सांडील हा वो निर्धारीं । नाहीं तरी नाकळे हरी । नित्य कलह तुम्हां आम्हां ॥४॥

लाडिका तरी बांध गळां  । परी नको सोडूं हा मोकळा । आम्ही उत्तीर्ण आपुल्या बोला । सांगोनियां या काळें ॥५॥

यावरी चोरिये देखतां । न सोडें जिवें या तत्त्वतां । नेऊंनियां निज एकांता । बांधू गांठी जिवाचिये ॥६॥

येणें गोरसाची धुणी । करुनि फोडियेली दुधाणीं । त्याचाहि हिशेब तुज लागुनी । न देववे यशोदे सर्वथा ॥७॥

ऐशिया निकुरेंसी या नारी । शिव्याहि देती तोंडचिवरी । म्हणती यशोदे तुझी ही थोरी । नुरेल यावरी जाण गे ॥८॥

निळा म्हणे खादलें वित्त । देणें लागेल तुज तें सत्य । ऐसेही दावूनियां संकेत । ताडिती कृष्णा निज करें ॥९॥

१०७

देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटीं । म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं । न राहेचि मी काय करुं ॥१॥

किती तरी हे अपवाद । सोसूं जनाचे वेवाद । उदंड सांगताहि हा गोविंद । न सांडीचि खोडी आपुली ॥२॥

मग म्हणे तूं गोपाळा । न संडिशीचि आपुला चाळा । शिक्षा लावीन याचि वेळां । मग तूं शहाणा होशील ॥३॥

यावरी नेदीं घरात येऊं । तुजला न घाली खाऊं जेऊं । तुझिया खोडी माझा जिऊ । बहुत तपिंनला या काळें ॥४॥

मग लाऊनियां दावें गळां । नेऊनि बांधला त्या उखळा ॥ म्हणे सांडिता ऐसा चाळा । तुज सर्वथा न सोडीं ॥५॥

हांसती भोवत्या अवघ्या नारी । म्हणती करिशील आतां चोरी । नासिंले खादलें तें आजिवरी । फावलें ऐसें म्हणों नकों ॥६॥

यावरी येशी आमुचा घरां । चोरीये जरी दधीक्षीरा । तरी नेऊनियां कौसासुरा । हातीं देऊं तुजलागीं ॥७॥

ऐसें बोलोनियां सुंदरा । गेल्या आपुलिया मंदिरा । यशोदा म्हणे रे चक्रधरा । घरीं काय उणें तुज ॥८॥

निळा म्हणे बोले हरी । गोड न लागेचि तें निर्धारीं । चोरियेचेंचि आवडे भारी । करील याहिवरी चोरीया ॥९॥

१०८

ऐसें एकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा । अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि ॥१॥

बोलोनियां तें ऐसें गेली । आपुल्या कामा वरीपडि झाली । पुढें कृष्णे युक्ति केली । अति विचित्र ते ऐका ॥२॥

मग त्या उपडुनियां उखळा । आला बाहेरीं तया वेळा । दावें तैसेंचि असतां गळा । उखळ आडकवी वृक्षेसी ॥३॥

विमलारर्जुन कुबेरनंदन । नारदवचनें शाप पावेन । होते राहिले वृक्ष होऊन । कृष्णचरणस्पशें उध्दरावया ॥४॥

त्याचें उदित झालें भाग्य । यालागीं येऊनियां श्रीरंग । करिते झाले तो प्रयोग । सावध मनें परियेसा ॥५॥

ते उभयतांहि शेजारीं । वाढले होते दिव्य सहस्त्रवर्षेंवरी । उंची पाहातां गगनोदरीं । शाखपल्लव डोलती ॥६॥

त्या उभयतां माजी उखळ । आडकवुनी कृष्ण् गोपाळ । तया नेटी देउनी चरणतळ । हेलावा देऊनि उपटिलें ॥७॥

तिहीं गर्जना केली कैसी । प्रळयकाळींची विदयुल्लता जैसी । उध्दार पावेनियां हरिचरणासी । वंदूनियां ते गेले ॥८॥

ऐकोनियां तो घोषगजर । यशोदा धंवली अति सत्वर । पाहे तंव तो सारंगधर । माजि वृक्षा पडियला ॥९॥

मग उचलूनियां करतळीं । आलंगिला हदयमेळीं । निढळ मेळउनी निढळीं । अवलोकीं वदन क्षणक्षणा ॥१०॥

म्हणे भ्यालिसी गे माझी माय । थोर केला म्यां अन्याय । उखळीं बांधलीसी हा अपाय । थोर वरुनि चूकला ॥११॥

मग सोडूनियां कंठीचें दावें । मुख पुसी निजपल्लवें । निळा म्हणे याचीं लाघवें । नेणवतीचि ब्रम्हादिकां ॥१२॥

१०९

तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥ धांविन्नले गौळी आणि गोवळ । म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥

तंव ते देखती अवघे नयनीं । वृक्ष पडिले ते उन्मळोनी । आश्रचर्य करिती आपुलाले मनीं । म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥

यशोदा सांगे तयांप्रती । बांधला होतां म्या श्रीपती । तेणें येऊनियां आचिती । उखळ वृक्षाबुडीं अडकविलें ॥३॥

गौळणी सांगतां गाहाणें । मीहि संतापलें मनें । तेणें गळां बाधोनियां तान्हें । उखळेंसी म्यां ॥४॥

गेलें आणिकियां कामासीं । कृष्णें उपडूनियां उखळासी । वृक्ष मोडियेलें आवेशीं । माजीं आपणही पडियेला ॥५॥

थोर चुकलें हें अरिष्ट । तळीं सांपडतां होतां पिठ । ऐसें बोलोनियां अदृष्ट । ताडी आपुलिया निज करें ॥६॥

निळा म्हणे घेउनी त्यासी । सफुंदे यशोदा उकसाबुकसी । म्हणें माझिया हषिकेशी । कोणीहि देखों न शकती ॥७॥

११०

म्हणे बा गौळणीचिया रागें । तुज म्यां बांधलें रे प्रसंगें । तंव त्वां उपटूनियां श्रीरंगें । उखळ येथें अडकविलें ॥१॥

परी तें नयेचि तुज उगवितां । म्हणोनियां बळें ओढिलें ताता । तंव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता । अदृष्टें आमुच्या वांचलासी ॥२॥

मग त्या म्हणती गौळणी नारी । खेद न करीं वों सुंदरी । त्वांचि हा परमात्मा श्रीहरि । मारिला होता निज हस्तें ॥३॥

गत गोष्टी काय ते आतां । न करीं यावरी जिवा परता । उदंड गाहाणींही सांगतां । तूं तें तत्वतां मानू नको ॥४॥

आजींचाचि पाहें पां अनर्थ । केवढा चुकला अवचिता घात । अदृष्टाचा हा कृष्णनाथ । म्हणोनियां वांचला निज भाग्यें ॥५॥

आतां तरी सांभाळुनी । पहा हा भ्याला असेल मनीं । हे केवढे वृक्ष पडिले अवनीं । घोर घोषें दणाणिले ॥६॥

निळा म्हणे यावरी यशोदा ॥ पुसे भ्यालासि बारे गोविंदा । तव तो हांसोनियां गदगदा । म्हणे मज भ्य कोणाचें ॥७॥

१११

देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांही मनें । मी तो ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥

तंव तो आला अकस्मात । नारदमुनी गात नाचत । वंदूनियां श्रीकृष्णनाथ । कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥

म्हणे उध्दरिलें विमलार्जुन । शापदग्ध हे कुबेरनंदन । भविष्य जाणोनियां दर्शन । घ्यावया तुझें पातलों ॥३॥

परात्पर तूं परत्पर तूं परमानंद । योगी हत्कमळींचा मकरंद । सगुणरुपियां सच्चिदानंद । यशोदेअंकी क्रीडसी ॥४॥

स्तवितां तूतें भागल्या श्रुती । मग त्या ठेलिया निवांती । त्या गापिकारुपें गोकुळा येती । तुजसी अंगसंग करावया ॥५॥

मग नमुनी यशोदेप्रती । म्हणे तूं वों भाग्यवंती । परमात्मा हा विश्रवतोमूर्ती । तुझिये अंकीं विराजला ॥६॥

निळा म्हणे वदोनी ऐसें । नारद गेला निज उददेशें । यशोदा ऐकोनियां निज मानसें । परम संतोष पावली ॥७॥

११२

पुढें गांईची खिल्लारें । मागें गोवळ आपण भारें । मुरलीवादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदे ॥१॥

पांवयाच्या तलालोरी । डफहुडूक त्या भीतरीं । शंख कहाळा वाजवित कुसरीं । गोवळ नाचती भोंवतें ॥२॥

गाइ| चरती पांगोनी वनीं । मुख संतोष चारा वदनीं । कृष्णा दृष्टीं अवलोकुनी । तृप्त जीवनीं यथाकाळें ॥३॥

शीतळ छाया देखती जेथें । विलासे नाचत ठाकती तेथें । टिपरी रुमाल घेउनी हातें । मोडिती अंगे नानापरी ॥४॥

हुतुतु हमामा विटी दांडू । सुरकठया लगोरिया घेउनी चेंडू । झोंबिया घेऊनि दावती वाडू । आपुलिया निजशक्ति ॥५॥

नाना उमाणीं उगवितीं कोडीं । सांगती काहाण्हीया कडोविकडीं । गाणी गाती अति आवडी । करिती उध्दार रागांचे ॥६॥

निळा म्हणे माध्यान्हकाळीं बैसोनी कळंबावे तळीं । काढिल्या शिदोया माजीं वनमाळी । करिती आरोहणा स्वानंदें ॥७॥

११३

गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥१॥

आवडीचें तेचि तें गोड । भाव देखे ज्याचा वाड । त्याचेचि घे येरा निचाड । दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥

ऐसा करिती गदारोळ । घालिती येरयेरा मुखीं कवळ । ब्रम्हानंदाचा सुकाळ । हास्यविनोदें जेविती ॥३॥

नाना लावणशाखांच्या परी । नाना पत्रशाखा वाढिल्या वरी । नाना अन्नाअन्नाच्या कुसरी । जेविती मुरारीसमवेंत ॥४॥

म्हणती आजच्या जेवणा । आम्हां श्रीहरी हा पाहुणा । न म्हणे उच्छिष्ट शिळें कोणा । अवघियांचे स्वीकारितु ॥५॥

ऐसें जूउनियां घाले । तंव गाईचे कळप देखिले । पाहती तंव नवल वर्तलें । बुजल्‍या पळती जीवधाकें ॥६॥

निळा म्हणे उठिला पाळा । अवलोकिती जो अवघे डोळां । तंव त्या देखिल्या ज्वाळा । वणवा जळत चौफेरीं ॥७॥

११४

पळवाया न दिसे मार्ग । पक्षी जळताती भुजंग । श्रवापदांचे कोंडले तुंग । मृग व्याघ्रें कालवती ॥१॥

वृकवराह पंचानन । ससे जंबुक सामर भेवन । रानम्हैसे रोही हरिण । जीव धाकें मिसळति ॥२॥

ज्वाळा लागती आकाशीं । धूम्रें कोंडिले रवि शशी । वृक्ष जळताती तेणें त्यांसी । तडक फुटती सर्वांगी ॥३॥

प्रचंड वाताचिया लोरी । तुटती तेणें गगनोदरी । शिखा आंदोळती अंबरी । तेणें फडत्कार वाजति ॥४॥

देखोनिया भ्याले सकळ । गवगविले अवघे गोंवळ । म्हणति आला अंतकाळ । गाईगोधनांसमवेत ॥५॥

ठिणगिया उडती असंख्यात । इंगळ येऊनी पडती आंत । आतां कैचा गोकुळप्रांत । मार्गचि नाही पळावया ॥६॥

निळा म्हणे घालिती कंठी । येर येरांचिया धांवोनि मिठी । हें देखोनियां तो जगजेठी । म्हणे रे कोणी भेऊं नका ॥७॥

११५

अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं । लावोनियां बैसा पातीं । डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥

उघडे ठेवितां चेतले वन्हीं । मग तो नाटोपे आम्हां लागुनी । सांडील अवघीयांसीच जाळुनी । झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥

गोवळ म्हणती कैसे डोळे । झांकउनी मारवितोसी रे सकळे । येरु म्हणे तुम्हां हें नकळे । तोटका या काळें ऐसाची ॥३॥

येथें न धरितांचि विश्वास  । जळाल  अवघेही नि:षेश । ऐसें सांगोनिया त्यांस । डोळे निज करें धरविले ॥४॥

मग आपण वाढोनियां श्रीहरी । जाहला विराटरुपिया गगनावरीं । मुख पसरोनियां श्वासेंची करी । वोढिल्या अग्निज्वाळा ॥५॥

पोटीं घालूनियां दावानळ । जाहला पहिल्याचि ऐसा गोपाळ । हें देखोनी अवघेची गोंवळ । बोटांसंघीं लक्षितां ॥६॥

तयां म्हणे उघडा नेत्र । ऐकोनी बोलती ते सर्वत्र । म्हणती देखिलें हें चरित्र । तूंचि गगनवरी वाढलासी ॥७॥

निजमुखें गिळिलें ज्वाळ । तूंचि तूं काळाचाहि काळ ॥ आजी देखिला तुझा खेळ । आम्हीं आपुल्या निजदृष्टीं ॥८॥

निळा म्हणे बोलोनी ऐसें । लोळतीं पायावरी उल्हासें । मनीं जाणोनियां विश्रवासें । हाचि परमात्मा ईश्वर ॥९॥

११६

नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरी । मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां ॥१॥

तंव तें भावार्थी चोखडे । त्याणीं देखिलें तें निवाडें । मग नाचती कृष्णापुढें । कीर्ति त्याची वर्णित ॥२॥

म्हणति मागेंही याचिपरी । केलीं चरित्रें तुवां हरी । शेषिली पूतना निशाचरी । अघाबकांतें चिरिलें तें ॥३॥

तुझिये अंगीं सर्व कळा । नेतां ब्रम्हायानें आम्हां सकळां । तैसेंचि होऊनियां गोपाळा । दोहीं ठाई रक्षिलें ॥४॥

आजीं कळला तुझा महिमा । नेणतिया गोवळां जी आम्हां । करीं अपराध आमुचें क्षमा । तुज उच्छिष्टें चारिलीं तें ॥५॥

बेटया म्हणोन बोभाइलें । शिव्या देउनी आळविलें । खेळतां डावहि मागितले । भांडण केलें नेणतां तुज ॥६॥

निळा म्हणे सहस्त्रवरी । नमस्कार केले ऐसे हरी । तेणेंचि तोषोनियां उत्तरीं । बोले तुम्ही सखे माझे ॥७॥

११७

म्हणती आजि वांचिलों जीवें । जवळी श्रीहरी होतां सवें । तंव ते गांईचे मेळावें । वाडियाकडें मोहरले ॥१॥

मग ते चालिले गोवर । वाजवीत वादयें खेळत खेळ । शिंगें कहाळा घागरघोळ । चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥

ऐशिया परमानंदकल्लोळीं । गाई आलिया वाडिया जवळी । तंव त्या गौळणी सकळी । आलिया दुडिया घेउनी ॥३॥

गौळी वत्सां पाचारिती । गोधना दुहावे ते करिती । गाई सुरवाडें दुभती । वत्सांही पाजिती तृप्तीवरी ॥४॥

संवगडे म्हणती चला घरां । जाऊं आतां शारंगधरा । मग मोहच्छायें मंदिरा । चालले गजरें मिरवत ॥५॥

तंव त्या तलगा गौळणी नारी । नानापरीच्या आरत्या करीं । घेऊनियां आत्मया श्रीहरी । ओवाळिती निजभावें ॥६॥

विचित्र पुष्पांचियां माळा । आवडी घालिती हरीच्या गळां । ऐसे मिरवित आले राउळा । येतां यशोदा देखिलें ॥७॥

तिणें करुनियां अंक्षवाणें । ओवाळिले जिवें मनें । तंव गोवळ बोलति बोलणें । जालें अपूर्व वनीं तें ॥८॥

निळा म्हणे तें ऐकवया । निवाडें बैसली यशोदा माया । गोवळ सांगती लगोनि पाया । थोर कौतुक देखिलें ॥९॥

११८

माते बळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विंदानी । आम्हां जळतजळतां वनीं । येणें रक्षिले निमिषाधें ॥१॥

आम्हां जाळित आला ओणवा । विराटरुपी हा झाला तेव्हां । मुखचि पसरुनीयां  अघवा । प्राशन केला दावानळ ॥२॥

आम्हीं देखिलें तें नयनीं । दिव्य रुप याचें अवघ्या जणीं । ऐसें ऐकोनियां ते जननी । परम आश्रचर्यातें पावलीं ॥३॥

घरोघरीं हेचि वार्ता । विस्तारली गोवळ सांगतां । एक म्हणती हो श्रीअनंता छ न म्हणावें मानव यावरी ॥४॥

जे जे याचे अचाट खेळ । देखिले ऐकिले तुम्हीं ते सकळ । कृष्ण हा परमात्मा केवळ । आम्हीं मानुं आपुलाचि  ॥५॥

सकळांतरी याचा वास । वसविले ते येणेंचि देश । याविण रिताचि अवकाश । न दिसे कोठेंही धुडितां ॥६॥

निळा म्हणे  प्रतीत ऐशी । बाणली गोवळां आदि सकळांसी । मग ते तयातेंचि मानसी । ध्याती पूजिती सर्वदा ॥७॥

११९

येरे दिवशीं घेउनी सवें । गोवळ खिल्लारांचे थवे यमुनातटाकीं नित्य नवे । खेळ खेळती विचित्र ॥१॥

म्हणे यारे चेंडूफळी । खेळों अवघे मिळोनी बळी । ऐसें बालोनियां वनमाळीं । कास घालित नेटकी ॥२॥ चें

डू घेऊनियां श्रीहरी । हाणे डाव मागें वरी । कानपिळा मग ते सारी । पाठीवरी बैसोनी ॥३॥

न सोडिचि पायातळीं येतां । मग तो हो कां कोणीहि भलता । म्हणे विचारुनियां तत्वत्तां । खेळा खेळ अवघेही ॥४॥

चिंतूनियां बरव्यापरी । चेंडू टाकिला कंळबावरी । अडकलासा देखोनी हरी । अभ्यंतरीं संतोषला ॥५॥

होतें आघींचि आर्त मनीं । काळया आणावा नाथुनी । मग म्हणे म्हणती गडे । डोहो तळीं वृक्षही अवघड । न धरीं कृष्णा याची चाड । करुं दुसरा नवा घरीं ॥७॥

१२०

तंव त्यां म्हणे रे गडिहो ऐका । उतरुनी हाचि आणूं निका । असेल चपळ गडी जो नेटका । तेणें चढावें वृक्षावरी ॥१॥

तंव ते म्हणती नहो बाहेरी । आम्ही बळकट चढावाया वरी । वृक्षही उंच गगनोदरीं । डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥२॥

म्हणे गडीहो तरी तळींचि रहा । आणितों जाऊनि चेंडु पहा । ते म्हणती रे अचपळा रहा । निमित्य आम्हावरी आणूं नको ॥३॥

एका दोन कामीं वांचलासी । तैसेचि येथेंही पाहतोसी । परी हे बुध्दि नव्हे ऐसी वेळा सारखिया नसताती ॥४॥

पाय निसरोनियां जाईल । अथवा खांची उपटी उपटे । हांसे इतरांचे होईल । आपणही जिवें घातावें ॥५॥

ऐसें न करिती शहाणे । विचारुनी पहाती सर्वगुणें । मग हितावह तोचि घरणें । दृढ निश्रचयें मानसीं ॥६॥

निळा म्हणे सांगतां ऐसें । न मानिजे कृष्ण मानसें । मनींचें कार्य जें अनारिसें । तें नेदीचि कळों कोणासी ॥७॥

१२१

यावरी आपण  वृक्षातळीं । जाऊनियां वरी न्याहाळि । तंव ते म्हणती अरे वनमाळी । आतुर बुध्दि करुं नको ॥१॥

येथे  हा आघाताचा ठावो । नेणसि तूं त्याचा भावो । अणुमात्र निसरतां पावो । होईल निर्वाहो जिवित्वाचा ॥२॥

आपुला घात दुर्जना हरीख । हें तों न करीतीं मूर्ख देख । तुज पुढें तों शाहणे आणिक । नाढळेंचि ये भुवनत्रयीं ॥३॥

नायकोनियां आमुच्या उत्तरा । व्यर्थचि वेचावें आत्मशरीरा । दु:खी करुनि मातापितरां । समागमिया देशवटा ॥४॥

ऐसा विचार होईल हरी । नको चढो या वृक्षावरी । ठेवितों तुझया पायांवरी । आम्ही सकळहि मस्तक ॥५॥

परीं तें नायकोनियां कृष्ण । चढला वरी बैस जाऊन । तया म्हणती अवघे जण । करीं हो सावधानपणें कार्य ॥६॥

तयांप्रति बहु बरें म्हणे । जाणता त्रैलोक्याचे खुणे । निळा म्हणे चरित्र करणें । आहे दाखवणें तेंचि करी ॥७॥

१२२

मग पाय ठेऊनि खांदियेवरी । चेंडा झेपावला हरी । ऐसें देखोनियां इतरीं । केला कल्लोळ खालुता ॥१॥

म्हणती रे नको नको हरी । जाऊं तिये खांदीयेवरी । आम्हां तुझी आई घरीं । गांजिल ऐसें करुं नकों ॥२॥

तयांप्रति म्हणोनि बरें । खांदि मोडियली भारें । ते आपण येकचि सरें । पाडियला डोहांत ॥३॥

देखानियां ते अवघे गडी । शंख करिती थडोथडीं । अंगे घालोनियां गडबडी । लोळती भुई आक्रंदत ॥४॥

म्हणति गेला रे महादाश्रय । तयाविण आम्हीं पोरटी काय । नाहीं दवावया ठाय । तोंड आतां कोणीकडें ॥५॥

काय म्हणेल ते दसवंती । लोकहि आम्हां फजीत करिति । म्हणती कां जाऊं दिला श्रीपती । तुम्हीं तया झाडावरी ॥६॥

हाणेनि घेती उरावरी । मस्तका ताडिती निजकरीं । गाई हांबरडे हाणीती वरी । दु:ख भारी न सोसवे ॥७॥

गांवांमाजी गेली वार्ता । लोकहि धांवले ऐकतां । नंदयशोदे प्राणांत अवस्था । हो सरली तेचि क्षणी ॥८॥

घरोघरीं हाहाकार । शोक करिती नारीनर । ठाकूनि आलीं तीर । तंव तो कहार गोवळांचा ॥९॥

यशोदा म्हणे दावा हरी । केउता गेलारे गे मुरारी । नंदही दीर्घ रुदन करी । म्हणे हरपला गोविंद ॥१०॥

दारिद्रीया हातीं रत्न । लागलें न धरे करितां यत्न । तैसि परी झाली म्हणोन । नंद लोळे गडबडा ॥११॥

असो तो दु:खार्णव सांगता । पाषाण फुटती तत्त्वतां । मग समोखुनीया उभयता । लोक घेऊनि घरा आले ॥१२॥

एका कृष्णविणं नगर । वोस दिसे भयंकर । दु:खार्णवीं नारीनर । पडले तैसेंचि मातापिता ॥१३॥

निळा म्हणे इकडे हरि । रिगोनियां सर्पविवरीं । विखार काडिला बाहेरी । काळया तो नाथुनि ॥१४॥

१२३

सप्त अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळाअतोंता । सांगतां युध्दाची ते वार्ता । सर्पी विखारीं वेष्टिला ॥१॥

बोलिला उदंड विरुध्द वचनें । युध्दहि केलें अति सत्राणें । परी या त्रैलोक्यजीवनें । लाविली दोरी तया नाकीं ॥२॥

मग धरुनियां तें करीं । केलें नृत्य पृष्ठीवरी । सवेंचि आणिला बाहेरी । आपण वरी बैसोनियां ॥३॥

देखोनियां अवघे गडी । हर्षें नाचती बागडी । घेऊनियां गोकुळां गुढी । जाणविली वार्ता सकळांसीं ॥४॥

ऐकतां हर्षले नागरिक । सामोरे आले ते सकळिक । देखोनियां यदुनायक । लोटांगणें घालिती ॥५॥

देऊनियां आंलिगणे । कृष्णें हरिला त्यांचा शीण । मग समागमें अवघे जण आले । कृष्णमंदिरां  ॥६॥

गाई वत्सां आणि गोवळां । आनंद नरनारी बाळां । झाला ब्रम्हानंद सकळां । म्हणे निळा म्हणे हरिभेटी ॥७॥

१२४

मग पाचारुनियां प्रांतवासी । व्दिज आणिले भोजनासी । जिताणें  करुनियां श्रीकृष्णासी । ओंवाळिती अक्षवाणें ॥१॥

काळया सर्प स्थपिला वरी । कळंबातळीं यमुने तिरीं । देखोनि सोहळा तो नरनारी । करितीं आश्चर्य मानसीं ॥२॥

पहा रे हें श्रीकृष्णचरित्र । एकाहुनि एक विचित्र । नवलचि देखती आमुचें नेत्र । नित्यानित्य नूतन ॥३॥

हेचि घरोघरीं वार्ता । कथिती कृष्णचरित्र कथा । गुढीया उभवूनीयां चित्ता । माजी हर्ष न समाय ॥४॥

गाती नित्य नामावळी । तुळसी वृंदावना बैसोनि पाळी । अवलोकूनियां मुर्ति सावळी । करिती जिवें कुरवंडिया ॥५॥

म्हणती आमुचें थोर भाग्य । भाग्यें जोडला हा श्रीरंग । याचा नित्य घडतां संग । काय करावें वैकुंठ ॥६॥

निळा म्हणे उत्साह ऐसा । मानूनियां निज मानसा । करिती पूजा स्तविती ईशा । जगत्रयाच्या श्रीकृष्णा ॥७॥

१२५

तंव आली वार्षिक यात्रा । करणें इंद्रपूजा सर्वत्रां । गोरसें काढुनी कावडी भरा । हाकारी तराळ नंदआज्ञा ॥१॥

जाऊनियां पर्वतासी । सुरपती पुजावा प्रतिवरुषीं । जागोनियां त्याची दिवसासी । निदसुरियां देती आठव ॥२॥

म्हणती उच्छिष्ट न करावें गोरस । दूध दहीं तूप सायास । लोणी भरुनियां कावडीस । रंग लावावा घागरमाळा ॥३॥

ध्वजा कुंचे सिध्द करा । विदया लावूनियां अपारा । जावें परिवारेंसी सत्वरा । प्रात:काळीं देवपूजे ॥४॥

गोवर्धनीं सुररावो । पूजा इच्छी देखोलि भावो । यालागीं सकळही समुदावो । जावें आपुल्या कल्याणा ॥५॥

मेघा तोषोनि यावरी । इच्छिल्या ऐसी वृष्टि करी । तेणें पिकती घुमरी । आणि गोधनेंही दुभती ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि श्रवणीं । विस्मय मानी चक्रपाणी । म्हणे मज प्रत्यक्षा सांडुनी । कैंचा इंद्र आणियला ॥७॥

१२६

मग सांगे गडियां सुजाणां । जातां कावडीं हिरोनि आणा । काय करितो देवराणा । पाहों चरित्र देवांचे ॥१॥

सें सांगोनियां गडियांसी । प्रात:काळींचि हषिकेशी । जाऊनियां मार्गप्रदेशीं । रोखूनियां बैसला ॥२॥

तंव ते लोक सकळही । स्नानें करुनियां लवलाहीं । वस्त्रें अळंकार घालुनी देहीं । वादयें वाजवित सुस्वरें ॥३॥

करुनि सकळिकां  आरोळी । चला चला म्हणती उतावेळीं । मग मिरवित कावडी कल्लोळीं । नाचविताचि चालिले ॥४॥

वाणी पढती इंद्रप्रतापें । ठांई ठांई नाचती पडपें । सोहळा देखोनियां तो गोप । म्हणती कृष्णा अवलोकीं ॥५॥

कैसा करीतुची हे गजर । आले अवघे नारीनर । तंव कृष्ण म्हणे रे निर्भर ।  होऊनि लुटा कावडी ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि ऐसें । गोपाळ चौताळले आवेशें । म्हणती आणारे कृष्ण परे ईशें । कवडी इकडोचि आणविल्या ॥७॥

१२७

ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची । उच्छिष्ट करुं नये हे कुळींची । आली पध्दति चालत ॥१॥

ऐंसे एकोनियां गोवळ । धांविले जैसे कृतांतकाळ । कावडी हिरोनियां सकळ । आणिल्या त्या हरिपाशीं ॥२॥

तेणें जाहला हाहाकार । जहाले घाबरे नारीनर । म्हणे केला केला विक्षेप थोर । पूजेमाजी इंद्राचिने ॥३॥

अविवेकी हे धांवोनी आले । बळेंचि इंद्रभाग हिरोनी नेले । यावरी आतां नव्हे भलें । क्षोभलिया सुरपति ॥४॥

कृष्णें उघडूनियां कावडी । गोवळ बैसविले परवडी । म्हणे रे गडिहो सेवा गोडी । अवघियाचीच निवाडे ॥५॥

आजी आम्हींच इंद्र जाहलों । पूजा घेऊनियां तोषलों । बरे उत्तम धणी धालों । तृप्तीवरी स्वीकारा ॥६॥

निळा म्हणे कृष्णचंद्रु । आदि इंद्राचाही इंद्रु । यावरी कृपेचा समुद्रु । करील कौतुक आसमाई ॥७॥

१२८

यात्रा फिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी । उव्देग करिती घरोघरीं । म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥

इंद्र कोपलियावरी । अणुमात्रही वृष्टी न करी । बरग पाडूनियां दारीं । उरों नेदील शेंपूट ॥२॥

अनावृष्टी नव्हतां पीक । मरती दुष्काळें पिडती लोक । अथवा अतिवृष्टी करुनी सकळिक । बुडवील निमिषार्धे ॥३॥

भयचि अणुमात्र न वाटे कृष्णा । परि हा कोपलिया देवराणा । करील नाश एक क्षणा । पळमात्रही न लगतां ॥४॥

हें असो भक्षिला गोरस । तुप्ती सांडी उदगारास । वांकुल्याही गोवर्धनास । कृष्ण म्हणे रे दाखवा ॥५॥

हें इंद्र देखोनियां दृष्टीं । क्रोधें संतप्त झाला पोटीं । मेघा पाचारुनियां म्हणे वृष्टी । करा निर्घारें  गोकुळावरी ॥६॥

पाचारुनि संवर्तका । म्हणे गोकुळीची नुरवीं मृत्तिका । मुसळधारीं वषोंनी उदका । मेळवीं नेउनी सागराच्या ॥७॥

येरु म्हणे बहुत बरें । आज्ञा केली ते सुरस्वरें । करीन परी एक दुसरें । पाहिजे मज साह्यार्थ ॥८॥

दयावा सवें प्रचंड वात । करावया गोकुळाचा घात । इंद्रे पाचारुनियां त्यातें त्वरित । म्हणे जावें याच्या संगे ॥९॥

निळा म्हणे स्वमुखें त्यासी । सांगे जाउनी गोकुळासी । मोडूनियां तेथचिया वृक्षांसी । घरां खोपटांसी उडवावें ॥१०॥

१२९

संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥

आज्ञा होतांचि चालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग । तेणें अभ्रें दाटली अनेक । पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥

विजुवा चमकती लक्षवरीं । कलपांत काळींच्या जैशा हारी । देखोनियां गजबज भारी । झाली गोकुलीं सर्व जनां ॥३॥

म्हणती कालिचि याची इंद्रपुजे । विश्रवंसिलें या नंदात्मजें । तेणेचिं क्षोभोलियां सहस्त्रांबुजे । मेघ धाडिले गर्जती ॥४॥

आतां जावें कोणीकडे । पळोनियां देवक्षोभापुढें । अकस्मात अरिष्ट हें एवढें । आणिलें कृष्णें आम्हांवरी ॥५॥

मागिल्या अरिष्टांत वांचला । तेणेंचि बहूत वेळ घेतला । घात आमुचा येणें केला । गाईगोवळा समवेत ॥६॥

तंव सुटला झुंजात वारा । मेघें घातल्या सरळ धारा । निळा म्हणे नंदकुमरा । करणें त्याचा अवमान ॥७॥

१३०

मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन । तयातळीं सकळही जन । घालुनियां संरक्षूं ॥१॥

मग ते उभे करुनि फेरी । धरविला त्यांचे हातें गिरी । आपणही तेथें निमित्यावरी । एकी आंगोळी लावियली ॥२॥

हाका देऊनि उचलीती । येकचि हिल्लारी करा म्हणति । उर मस्तक नेटीं लाविती । एक पाठी देती निजबळें ॥३॥

एक पडोनियां उचलिती पाय । एक म्हणती न धरा रें भय । एक उभे राहती ठायाठाय । कृष्ण बळिया आमुचा ॥४॥

तंव तो अनंतकोटीब्रम्हांडाधीश ।  परमात्मा हा कृष्ण परेश । विश्रवलाघवी परमपुरुष । न करी तें काय स्वलीला ॥५॥

आपोआप चालिला वरी । अंतरिक्षाची निज सत्ता गिरी । धरुनि सकळांते हाकारी । म्हणे वसा तळीं याचीये ॥६॥

आपभयेंचि धांवलीं सकळें गाई गौळणी आणि गोवळे । निळा म्हणे श्रवापदें पक्षीकूळें । मुंगीया आदीकरुनी ॥७॥

१३१

प्राणीमात्र पर्वतातळीं । राहिले ते निजानंद मेळीं । नित्य हरिकीर्तीची नव्हाळी । श्रवण मनन करिताती ॥१॥

सप्तअहोरात्रीवरि । पर्जन्यवृष्टी केली भारी । विजुवा कडाडिती गगनोदरीं । तेणे  ब्रम्हांड फुटों पाहे ॥२॥

मुसळधाराखळखळाटें । नदियां पूर वाहति नेटें । पवन वातें झडझडाटें । पाषाण जाति उडोनिया ॥३॥

परि तया पर्वतातळीं । पर्जन्य वात नपवेचि बळी । हिंपुटी होऊनियां जवळीं । गेलि इद्रां सांगती ॥४॥

सप्त अहोरात्रे पाडिलों वरी । खाणोनि सांडिली ते नगरी । खडका वांचूनियां दुसरी परी । नुरोचि मृत्तिका ऐसें केलें ॥५॥

ऐकोनियां हरिखले सुरपती । बहूत मानवाला त्याचे शक्ति । परी गोकुळींच्या लोकांप्रती । नाहींची आढळला पर्जन्य वात ॥६॥

निळा म्हणे हरी दादुला । सकळिकां म्हणे बाहेरीं चला । अवघा मेघ ओसरोनि गेला । उन्हें पडिली खडखडाट ॥७॥

१३२

लोक सकळहि बाहेरी येती । तंव निर्मळ गगन शुध्द गभस्ती । नवा चारा धेनुवा चरती । आणि दुभती यथेष्ट ॥१॥

तंव गडी अवघे मस्तकावरी । धरुनियां होते गिरी । गर्वारुढ ते अंतरीं । आम्ही पर्वत उचलिला ॥२॥

कृष्ण येथें टाळाटाळी । करुनियां म्हणावी आपणा बळी । ओझीं आमुचिया निढळीं । आपण मोकळा फुल झळका ॥३॥

कृष्णें जाणोनी मनोगत । म्हणे रे गडीहो काढा हात । येरु म्हणती तूंचि त्वरित । जांई येथूनी वेगळा ॥४॥

ओझें आमुचीया निढळीं । उगीचि टेकिली तुवं आंगोळी । यश घेऊनियां वनमाळी । वाउगाचि मिरविसी आम्हांत ॥५॥

मग त्यातें म्हणे श्रीहरी । मस्तक तुम्हीं काढा तरी । सोडुनी पाहतां नखाचि वरी । धरिला देखती सकळही ॥६॥

मग म्हणती उतरां आतां । एकल्या नुरवेचि तत्त्वतां । चौफेरी मस्तकीं धरितां । कृष्णें काढली आंगोळी ॥७॥

तंव ते दडपिली त्यांच्या भारें । मेलों मेलों म्हणती पोरें । कृष्ण म्हणे तुम्ही बळिये कीं रे । धरा उचलुनि निज शक्ती ॥८॥

निळा म्हणे पुरुषोत्तमा नेणवे म्हणती तुझा महिमा । धांव धांव रे मेघ:श्यामा । आम्हां वांचवी खचता हा ॥९॥

१३३

मग तो उतरुनियां गिरी । आले गोकुळा भीतरीं । तंव धावोनियां नरनारी । लोटांगणे घालिती ॥१॥

मेघीं सांगता सूरपती । आनंदला होता चित्तीं । तोचि आला गोकुळाप्रती । निज नयनीं पहावया ॥२॥

तंव तों गोंवळ पहिलियाची ऐसे । केळवती का नोवरे जैसे । गाई चौताळताती हर्षे । तैसेचि गोकुळींहिं स्वानंदें । गौळी गौळणी मिरवती ॥४॥

इंद्र देखोनियां ते  दृष्टी । विस्मयापन्न झाला पोटीं । म्हणे  संवर्तकाचिये वृष्टी । पुढें कैसी वांचली हीं ॥५॥

तस्मात परमात्मा हा श्रीहरी । कृष्णवेषें महीवरी । अवतरला जाणेनियां अंतरीं । स्तवन करी निज मूखें ॥६॥

निळा म्हणे शरणांगत । म्हणवी घाली दंडवत । त्राहें त्राहें म्यां महिमा नेणत । केला अपराध क्षमा कीजे ॥७॥

१३४

इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥

निर्मिला तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान । तुझिया सत्ता माही गगन । पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥

तूं या आदिचिही आदी । विश्रवीं विश्रवात्मा तूं त्रिशुध्दी । तुजवांचूनियां मना बुध्दी । कैचें बोधव्य मंतव्य ॥३॥

तुवां अंतरिक्षी धरिलें गगन । तुझिया आज्ञे विचरे पवन ॥ तु‍झिया तेजें प्रकाशे रवी । तुझिया आज्ञे विचरे पवन । तुझिया सत्ता देदीप्यमान । सर्वदा हुताशन नवेचि ॥४॥

तुझिया तेजें प्रकाशें रवी । तुझिया क्षमा अचळ पृथ्वी ॥ तुझिया द्रावें सदा टवटवी । आपांपती गंगोदकां ॥५॥

समर्थां समर्थ तूं ईश्रवर । होउनी नंदाचा कुमर । केला पवाडा हा थोर । गोवर्धन उचलिला ॥६॥

आम्हीं तुझीं म्हण्यागतें । महिमा नेणोनियां येथें । पाठविलें जे पर्जन्यातें । त्या अपराधा क्षमा कीजे ॥७॥

कोणा नेणवे तुझी लीला । देवत्रयां तूं आगळा ॥ निजानंदाचा पुतळा । सगुणरुपीया श्रीहरी ॥ निळा म्हणे ऐशी वाडमय पूजा । करुनियां कृष्णा विराटध्वजा । आज्ञा वेउनियां अमरराजा । गेला आपुलिया भुवनसी ॥९॥

१३५

यावरी कंस भयाभीत । कृष्णभयें उव्दिग्नचित्त । बैसला असतां निजमंदिरांत । तंव आला अकस्मात रजक बळिया ॥१॥

वस्त्रें आणिलीं घोवट । उंच धोऊनियां चोखट ॥ म्हणे राया राय तूं वरिष्ठ । शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥२॥

मग ते लेवूं जों बैसला । तंव तो झगा पोकळ झाला । म्हणे थोर हा बेतियला । व्यर्थचि नासिला ये शिवणारें ॥३॥

राजा हांसूनि बोले त्यांसी । शिवणारें काय करील यासी । ॥३॥

राजा हांसूनि बोले त्यांसी । शिवणारे काय करील यासी । चिंतें व्यापिलें शरीरासी । तेणें हें कृशत्वासीं पावलें ॥४॥

गोकुळीं नंदाचिये घरीं । बाळ वाडे आमुचा वैरी । पहा तो भाचाचि निर्धारी । परी मुळावरी आमुचिया ॥५॥

तया वधलियावांचून निश्रचळ नव्हे आमुचें मन । रजक बळिया तें ऐकोन । म्हणे न करी चिंता महाराजा ॥६॥

निळा म्हणे गर्वीरुढ । मंद बुध्दी जल्पवाड । म्हणे मी वारीन हें सांकड । एकदां डोळां मल दावीं ॥७॥

१३६

जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं । धोपटूनिया शिळेवरी । तेच क्षणी टाकीन ॥१॥

काळासम तुल्य माझें बळ । काय तें करील कृष्ण गोवळ । लागों नेदितां एकही पळ । निमिषाधेंचि उपटीन ॥२॥

गोकुळाचिये वाटेवरी । धुणें माझें निंरतरी । परि आलाचि पाहिजे वैरी । तुझा आणि माझाही ॥३॥

मागें पाठविले असुर । मायावी ते निशाचर । ते काय  बापुडे किंकर । माझिये बळ शक्तीपुढें ॥४॥

राया येथें एक वेळां । आणवीं पां तया गोवळा । मग तूं कौतुक पाहें डोळां । मृत्युपंथे लावीन ॥५॥

आम्ही तुझे अंगलग । सेवक आणि बळिये चांग । रोखूनियां असों मार्ग । माझे धुणें त्याचि पंथे ॥६॥

निळा म्हणे ऐशा वचनीं । राजा संतोषविला मनीं । मग तो उचितातें घेउनीं । आला आपुलिया मंदिरां ॥७॥

१३७

राजा म्हणे रजकहि गाठी । आहेत पांचशे आणिक जेठी । मातंगकुळवई ही उग्रदृष्टी । सोडितां वरी झगटेल ॥१॥

परी तो येथें येईल कैसा । आलिया कदाचित करील वळसा । ऐसें विचारी जंव मानसा । तंव प्रधानहि पातले ॥२॥

राजा तयातें विचारी आणवितां कैसे येथें हरी । तंव ते म्हणती युक्ती माझारीं । हेंचि उत्तम दिसतसे ॥३॥

येथें आपुले सैन्यक । अपार काळाहुनी अधिक् । कृष्ण्‍ा येईल एकला एक । चारी अर्भकें घेउनी ॥४॥

तयां मागें कैची सेना । गोवळ गाईचा राखणा । करिती घरींचि चार नाना । येथें काय बळ त्यांचें ॥५॥

येतांचि आपुले शिवेआंत । शस्त्रपाणी करिती घात । ऐसाचि साधावा कार्यार्थ । विचार हाचि मानिला ॥६॥

निळा म्हणे आणिती काळ । घरां प्रार्थूनियां ते सकळ । ओढवलिया निदान वेळ । अघटितचि सहज घडे ॥७॥

१३८

म्हणती पाठवावा अक्रूर । कृष्णीं त्याचा मित्राचार । त्याचें नुलंघी तो उत्तर । सहसा प्राण गेलिया ॥१॥

देऊनियां उत्तम रथ । मूळ पाठवावा तो त्वरित । सांगावें भेटीसी उदयत । मामा तुझे कंसरावो ॥२॥

अक्रूरा सांगावा हाचि अर्थ । जरी तूं नाणिसी कृष्ण येथ । तरी मम हस्तें तुझा घात । होईल जाण तेंच क्षणीं ॥३॥

रायें अक्रर पाचारिला । रथ देऊनियां गौरविला । म्हणे जाऊनियां आतां वहिला । भाचा आणीं भेटीसी ॥४॥

तयालागीं प्राण फुटे । घटिकां पळहि निमिष न लोटे । नणिता लावीन मृत्युवाटें । तुज हें निर्धारें जाण पां ॥५॥

आजींचि घेऊनियां तूं येसी । जरी कां आपुल्या निजमित्रासी । तरि देऊनियां निज भाग्यासी । गौरवीन तुज बहुमानें ॥६॥

निळा म्हणे अक्रूर मनीं । म्हणे हा पापी पापियाहुनी । आणवितो कृष्ण निदानीं । आपुलिया प्राणा घातावया ॥७॥

१३९

कृष्ण बळियामाजि बलिष्ट । कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ । तैसाचि बळिरामही उध्दट । भरील घोट देखतां ॥१॥

एक नवनागसहस्त्रबळीं । दुजा तंव ते कल्पांत शुळी । येतांचि येथें निमिष मेळीं । करितील संहार कंसाचा ॥२॥

कृष्ण परमात्मा ईश्वर । अनंतकोटीब्रम्हांडधर । मायानियंता परात्पर । तया हा पामर आणवितो ॥३॥

पतंगा वडवानळेसीं खेळणें । दर्दुर शेंषातें गिळूं म्हणे । उलुकें रवितें संघटणें । केंवि जीवे प्राणी वांचिजेल ॥४॥

तैसिचि परी झाली यातें । जेंवि खदयोत झगटूं पाहे रवितें । अरण्यमृगें शार्दूलातें । कैसेनि भेटीसी आणिजे ॥५॥

परी येथें प्रारब्धचि बळी । घडवील घडावें तें तत्काळीं । पहा त्या हिरण्यकश्यपें आपुलियेचि नळीं । बसविला नृसिंह पाचारुनी ॥६॥

निळा म्हणे होणार होईल । बुध्दीही तैसीच प्रवर्तवील । क्रियाहि शरीरीं उमटेल । भोगणें भोगवील प्राचीन ॥७॥

१४०

आठऊनियां श्रीकृष्णचरण । अक्ररें रायातें पुसोन । चालिला रथावरी बैसोन । मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥

गोकुळा पाठविला अक्रूर । परि कंसामनी दचक थोर । तेणें पाचारुनियां धनुर्धर । चौकिये बाहेर बसविले ॥२॥

म्हणे येतां देखोनियां कृष्णासी । युध्द करावें अति आवेशीं द उतरुनी त्याचिया मस्तकासी । मजपाशीं आणावें ॥३॥

रजका सांगे निजमुखें । कृष्णा येतांचि धोपटीं सुखें । तुझिये पाठिसि हे आसिकें । सावध ठेविले धनुर्धर ॥४॥

मग बोलाऊनियां मल्लजेठी । बैसविले ते दारवंटी । मातला हस्ती त्याचिये पुष्टीं । कुळवई ठेवियेला ॥५॥

तया भोंवते आणिक कुंजर । उभे केले ते दळभार । तंव इकडे जाऊनियां अक्रूर । भेटला नंद यशोदेसी ॥६॥

निळा म्हणे पुसे कृष्णा । तंव ते म्हणतीं गेला राना । मग रथ तेथेंचि ठेऊनी जाणा । चालिला दर्शना कृष्णाचिया ॥७॥

१४१

जांताचि गोकुळा बाहेरी । कृष्णपाउलांचिया हारी । उमटल्या देखोनि महीवरी । प्रेमा अंतरीं न संटे ॥१॥

चरणमुद्रांकित चिन्हें । देखोनि घाली लोटांगणें । अंतर्निष्ठेंचें हें लेणें । लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥

आनंदाश्रु गळती नेत्रीं । स्वेदरोमांच उठती गात्रीं । कंप स्फुंदनें विकळ गात्रीं । सद्रदितु मुरकुंडें ॥३॥

सर्व साक्षी नारायण । जाणेनियां त्याचें चिन्ह । आला अति त्वरें धांवोन । तया उमजवून आलिंगी ॥४॥

दोघां हो सरली भेटी । पडिली आनंदाची मिठी । मग अचळ पुसोनियां मुखवटीं । परम कृपेनें न्याहाळी ॥५॥

पुसे अंतरीचें गुज । तयापाशीं अधोक्षज । येरें वंदूनियां चरणरज । मंजुळा उत्तरीं बोलतु ॥६॥

निळा म्हणे स्तवन करी । मग नि:स्तब्ध्‍ा निमिषवरी । अवलोकुनियां चरणावरीं । ठेवीं मस्त्क क्षणाक्षणा ॥७॥

१४२

मग सांगें गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी । इतुकेंचि ऐकोनियां पोटीं । कृष्णा आनंद न समाय ॥१॥

मग म्हणे बळिरामासी । जाऊं मामाचिये भेटीसी  कृप करुनियां अक्रूरासी । मूळ आम्हांसी पाठविला ॥२॥

म्हणती बळिरामही चलावें । वोरसें मामासी भेटोनी यावें । आपणंसिही जिवें भावें । आर्त तयाचें अखंड ॥३॥

घेऊनि पांचशें गोवळ । समागमें आपुलें दळ । निघते झाले उतावेळ । आले घरासी पुसावया ॥४॥

मग नंदयशोदेप्रती । उभयतांहि नमस्कार करिती । मामासी भेटी जाऊं म्हणती । दयावी आज्ञा आशिर्वादें ॥५॥

तें म्हणती कंस व्देषी । महादृष्ट पापराशी । देखतांचि घेरतील रे दोघासीं । सर्वथा तेथें न जावें ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि हरि । म्हणे न चिंतावें हें अंतरीं । आम्हांसी आप्त या संसारीं । कोण मामाहुनी जिवलग ॥७॥

१४३

आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥

नाहीं तया पोटीं मैल । अत्यादरें धाडिलें असे मूळ । अक्रूर सांगताहे केवळ । भेटी आमुची इच्छितो ॥२॥

तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय । मामाभेटी जातां काय आमुची इच्छितो ॥२॥

तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय । मामा भेटी जातां काय । उव्देग घडती भाचिया ॥३॥

ते म्हणती रे नव्हे कृष्णा । तुम्ही त्याचा भावार्थ नेणां । कालिची पहा पां पूतना । आली होती घातावया ॥४॥

केवढी दाऊनियां माया । बसलीं तुंतें स्तन धावया । कृष्णा म्हणे मी धालों तिचिया । स्तनपानेंची आजिवरी ॥५॥

तिणें वेचोनियां कायाशक्ती । आम्हांसि तोषविलें प्राणांतीं । उपकार तिचेहि श्रीपती । म्हणे मुखें मी काय वानूं ॥६॥

निळा म्हणें बोलो‍नि ऐसें । न रहातीचि चालिले उददेशें । गोपिका गौळणीही ऐकोनि ऐसें । आल्या धांवत हरिपाशीं ॥७॥

१४४

म्हणती नको नको जाऊं हरी । सांडोनी आम्हां कोठें दुरी । तुजवांचोनिया संसारी । कोण आम्हां जिवलग ॥१॥

जातील प्राण तुतें जातां । वियोग न साहावे तें व्यथा । पळमात्रचि वेंगळे पडतां । जेविं कां मासोळी जळांतील ॥२॥

नव्हे अक्रूर झाढीवर । करुं आला येथें संहार । जीवन नेलिया यदुवीर । आम्हां सहजचि प्राणांतु ॥३॥

इतुक्यांचिही येईल हत्या । जरि तू कृष्णा नसील आतां । ऐसे बोलोनियां समस्ता । लोळती कृष्णचरणावरीं ॥४॥

वधुनी आम्हां आपुल्या हातें । जाई मग तूं जाणें तेथें । करुनियां दीर्घ् रुदनातें । उकसाबुकसी स्फुंदती ॥५॥

आमुचा जीव तूंचि प्राण । तुजविण न वाचों तुझीचि आण । नको आमुचें हें निर्वाण । पाहों आपुले निज नेत्रीं ॥६॥

निळा म्हणे यावरी हरी । शांतवी तया निज उत्तरीं । म्हणें आम्ही वरावरी । येऊं भेटोनी मामासी ॥७॥

१४५

नका होऊं खेदक्षीण । घ्या भाष माझें बंधन । तुम्हां वांचूनियां मजही कोण । आहे तें आप्त इहलोकीं ॥१॥

जैसा तुमचा मजवरी भाव । माझीही तैसाची तुम्हांवरी जीव । नाही येथें संदेहा ॥ ठाव । चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥

तुम्ही निरंतर मातेंचि ध्यातां । मीही न विसंबे तुम्हींची देखतां । ऐसें परस्परें बोलतां । लोटती उभयतां नेत्री पूर ॥३॥

वियोग न साहवें कृष्णासी । त्याही होती कासावीसी । परी धैर्याचिया अती आवेशीं । पुढील साधिती कार्यार्थू ॥४॥

भक्तकृपाळू श्रीहरी । अवघा प्रेमा भक्तांचि वरी । त्याचि कार्या अवतार धरी । न विसंबे क्षणभरी नव्हे परता ॥५॥

अनावरा आवरिलें जिहीं । जिव प्राण ठेवूनि पांई । हाही तयातें निज ह्रदयीं । सर्वकाळ आठवितु ॥६॥

निळा म्हणे संबोखिल्या । ऐसिया उत्तरीं स्थिराविल्या । मनोरथ करुनियां ठेविल्या । आपुलीये चिंतनीं सादर ॥७॥

१४६

मग लेइले दिव्य अळंकार । उभयतांहि बंधु अति नागर । मुगुट कुंडले एकावळी हार । झळकती पदकें जडितांची ॥१॥

बाहूभूषणें वीरकंकणें । मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें । वेष्टुनी पितांबराची परिधानें । घेतली निशाणें निजकरीं ॥२॥

आधींचि मदनाचे हे बाप । दिव्य तेज प्रभा अमून । सकळहीं लावण्य सांटोप । धरुनियां आली निज वस्ती ॥३॥

अवघें चि सुख मुसावलें । कृष्णाकृति तें वोतलें नयना पाहुणेर देऊं आलें । जे जे देखती तयाच्या ॥४॥

कृष्ण लावण्याची मूर्ती । बळिदेवही तैसीचि आकृती । ठाणे माणें समान दिप्ती । प्रतापकीर्ति यशवंत ॥५॥

दंडी मुडपी विराजमान । शोभले राजीवलोचन । पाहों येती नागरिकजन । निळा म्हणे तया रामकृष्णासी ॥६॥

१४७

ऐसे बैसला रथावरी । भोंवते गोवळ चालती फेरी । हें देखोनियां नगर नारी । अत्यंत प्राण विकल त्यांचे ॥१॥

आतां कृष्णा येसील केव्हां । भेटसील प्राण शितळ तेव्हां । आठव आमुचाहि धरावा । तेथें पाहुणेरी गुंततां ॥२॥

ऐकोनियां त्यांचीं वचनें संतोशीजे उभयतां मनें । मग त्या देउनी आश्वास नें । आज्ञा करिती ते अक्रूरा ॥३॥

आतां रथ चालवीं वेगीं विलंब नव्हे ऐसा मार्गी । माता पिता गौळणी लागीं । रहाविलें अत्यादरें ॥४॥

मार्गी चालतां परम संतोषी । करिती संवाद येरेयेरांसी । म्हणती धरिलिया अवतारासी । आजि झालें सार्थक ॥५॥

होतां मामासवें भेटी । पडेल जिवें जीवा गांठी । परमानंद होईल सृष्टी । दृष्ट कंटक निमालिया ॥६॥

निळा म्हणे ऐसिया लाभा । उभयतां‍हि अंगीं शौर्यशोभा । दाटली तेणें ऐश्रवर्य शोभा । जातासे हें अक्रूरा जाणवलें ॥७॥

१४८

करितांचि सीमा उल्लंगन । म्हणती अक्रूरा ऐकें वचन । तुवां जावें रथ घेऊन । सांगावें वर्तमान रायासी ॥१॥

तेणें आज्ञा वंदुनी शिरीं । चालिला पुढें वेगें करी । बळराम कृष्ण गोवळ भारी । आले बळिया रजकापें ॥२॥

तंव तो वस्त्रें वाळवीत । उभा असे बळप्रमत्त । गोवळांते असे पुसंत । तुम्ही आलेती कोठुनी ॥३॥

ते म्हणती गोकुळवासी । जातों रायाचे भेटीसी । आदरें बोलाविलें कृष्णासी । आणि बळीराम सुजाणा ॥४॥

येरु म्हणे कोणता कृष्ण । गोवळ तुम्ही अवघे जण । आंलेती घोंगडी पांघरोन । जाल कैसेन रायापुढें ॥५॥

तंव कृष्ण बळिराम म्हणे त्यासी । आम्हां देंई उत्तम वस्त्रांसी । भेटोनी आलीया रायासी । देऊं उचित आणी तुझी वस्त्रें ॥६॥

तंव तो म्हणे भाग्यासी याल । बोलतांचि ऐसें ताडण पावाल । राजवस्त्रें हीं तुम्ही ल्याल । तैंचि वेंचाल जीवें प्राणें ॥७॥

बळिरामें हें ऐकतांचि कानीं । म्हणे वस्त्रें आणा रे लुटुनी । शंका मात्र न धरितां मनीं । हरा आवडती ज्या जैसीं ॥८॥

निळा म्हणे धांवले सकळ । बळिये अतुर्बळी गोवळ । तेथें झाला हालकल्होळ । रजक बळिया धांविन्नला ॥९॥

१४९

येतां देखोनियां बळिरामें । आकळिला तो अति विक्रमें । म्हणे पापिया तुवां अधर्म । बहुत केली कृष्णनिंदा ॥१॥

तया दोषाचें प्रयश्रिचत । आजी घे पा यथोचित । होई देहापासूनि मुक्त । म्हणोनि टांगेसी धरियेला ॥२॥

तेणेंहि उदंड वेचिली शक्ती । परि तयापुढें न चालेचि युक्ती । मग बोभाइला अदृष्टाप्रति । म्हणे नाडलों रे अभिमानें ॥३॥

बळिया बलिष्ट शिरोमणी । बळिराम आणि चक्रपाणी । नेणतां महिमा वेंचिली वाणी । पावलों फळ तें साध्यांचि‍ ॥४॥

ऐसें बोलोनियां निश्रचळ । अवलोकिलें स्वरुप सकळ । झांकूनियां मग नेत्रकमळ । ध्यान हदय दृढाविलें ॥५॥

तंव बळरामें वेग केला । अंगाभोंवता ओवाळिला । आणि तेथेंचि पहा हो सोबकिला । प्रचंड खडकीं निघातें ॥६॥

निळा म्हणे दिधली मुक्ती । उत्तम कैवल्याही परती । कृपावंत हा श्रीपती । भक्तां वैरिया सारिखाचि ॥७॥

१५०

चिरें आणूनियां वेंष्टलें । गोवळ अवघेचि शृंगारले । येरेयेरां म्हणती भले । गौरव घ्या रे मामाचा ॥१॥

चिरें गुंडिती माजेसी । उंच पटके ते पायासी । झगे वेष्टूनियां शिरासी । विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥

ऐसे  शृंगारिले गोवळ । पुढें चालिले भार सकळ । तंव ते धनुरयागींचे वीर प्रबळ । घ्या घ्या म्हणोनी धांविले ॥३॥

कृष्णें बळरामें देखिलें । अवघ्यांपुढे मग ते झाले । धनुर्धारी वेग केले । परि तें न चले बळ त्यांचे ॥४॥

घ्या घ्या म्हणोनी हांका देती । शंकस्फुरणें ठाईंचि करिती । परी ते गोवळची समस्तीं । वेष्टूनियां घेतले ॥५॥

धनुष्या लाऊनि बाण । विंधावे तों माजि शिरोन । गोवळीं घेतली ते हिरोन । आणि मोडुनी सांडिली ॥६॥

निळा म्हणे एक एका । नपुरतीची युध्द तबका ॥ निपातिले फेडिली शंका । आणि पुढें संचरले ॥७॥

१५१

मोडियेला धनुर्याग । हाहाकार झाला मग । आला आला रे श्रीरंग । बंधू बिळिरामा समवेत ॥१॥

आले ग्रामव्दारापाशीं । धांविले सकळहि नगरवासी । कृष्णरामाच्या सौंदर्यासी । पहावया उतावेळ ॥२॥

उभयतांचेहि स्वरुप अति नागर । ऐकिलें होतें वारंवार । आणि बळियेहि महावीर । तेज प्रतापी आगळे ॥३॥

सदा निर्भय मानसीं । आले चौबारा हाटवटिसी । जेवीं कां सिंह गजशाळेसी । शिरतां शंका न धरिती ॥४॥

उभे रंगशिळेवरी । अवलोकिता नरनारी । चढोनी माडिया गोपुरीं । गवाक्षव्दारीं पैं एकी ॥५॥

एके चढली भिंतीवरी । एक सन्मुखची शेजारीं । कृष्णदर्शनी आवडी भारी । नर बाळा नारी सारिखीचि ॥६॥

निळा म्हणे हत्कमळवासी । पूर्णब्रम्ह तेजोराशी । सगुणरुपिया हशिकेषी । कोण मा तयासी नावलोकीं ॥७॥

१५२

आले संन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी । पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥

श्स्त्रपाणि रिक्तपाणी । पहाति कृष्णातें ते दुरुनी । अवलोकूनियां निज नयनीं । परम विस्मयातें पावती ॥२॥

घरें सांडूनियां नारी । आल्या कोणीचि नसतां घरी । म्हणती सवेंचि जाईल गे श्रीहरी । आम्ही त्या दृष्टीं न देखतां ॥३॥

मग जे उव्दिग्न व्हावें मनीं । तें आतांच कां न यावें पाहोनी । ऐशिया निश्रचयातें करुनी । आलिया एकांतवासीहि त्या ॥४॥

जिया बाहेरी येणेंचि नाहीं । आपुलिया सभाग्यपणें कदाही । आल्या धांवोनियां त्याहीं कृष्णा दृष्टी अवलोकूं ॥५॥

निळा म्हणे घरा भाग्य । आलिया अव्हेरी कोण त्या मग । अधिकाअधीक लाहो सवेग । करुनियां संग्रहिती ॥६॥

१५३

कृष्ण परमात्मा श्रीहरी । बळिराम शेषअवतार निर्धारी । कैसे शोभले अलंकारीं । निजांगाचियें निज प्रभे ॥१॥

मुगुट कुंडले विशाळ डोळे । जैसी विकासलीं सूर्यकमळें । अंगकांती रुप सांवळें । पीतांबराची परिधानें ॥२॥

कंठी पदकें सुमनकळा । कौस्तुभ एकावळी रुळती गळां । बाहुभूषणें मुद्रिका सकळां । कांडोवाडी सुशोभित ॥३॥

सुकुमार नागर अंगकांती । ज्याचिया तेजें रविशशी दीप्ती । हुताशनीं रत्नीं प्रकाशे फांकती । ज्याचेनियां झगमगती तारांगणे ॥४॥

सुवर्ण म्हणती जें उत्तम । तें याचिये अंगकांती सुमहिम । ऐसे सौंदर्य निरुपम । कृष्णाकृती वोसंडलें ॥५॥

जैसिया परी तैसा भासे । हेंहि अपूर्वचि एक असे । कृष्णरुपें लाविलें पिसें । न स्मरती पहातां देहगेहा ॥६॥

निळा म्हणे बैसली दृष्टी । कृष्णारुपीं ते सहसा नुठी नरनारी विस्मित पोटीं । अवलोकिती श्रीकृष्णा ॥७॥

१५४

निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणति हा परात्परु । योगी म्हणती योग साचारु । याचिपासुनी जन्मला ॥१॥

याज्ञिक म्हणती भासे कृष्ण । यज्ञरुपीं हा नारायण । वैदिकांही लागले ध्यान । म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥

मला भासे वस्ताद जेठी । शासन करीतया नृपवर श्रेष्ठीं । शस्त्रपाणिया उग्रदृष्टी । सहारकर्ताचि कृष्ण दिसे ॥३॥

वृध्दां भासे सकुमार बाळ । तरुणांगियां मदनमूर्तिचि केवळ । ऐसा सर्वी सर्व हा सकळ । भासे जैसिया तैसाचि ॥४॥

कृष्णाकृती भुललीं लोकें । जाऊंचि विसरली स्त्रिया बाळकें । तंव ते कुब्जा भरुनी तबकें । घेऊनि आलीं सुपरिमळें ॥५॥

उत्तम सुवास चंदनगंध । केशर कुंकम कस्तुरी शुध्द । सुमनहार गुंफिले विविध । सुमनतुरे नानापरी ॥६॥

जात होती राजमंदिरां । तंव त्या देखिलें नंदकुमरा । म्हणे आजींचि हे पूजा सुंदरा । चर्चूं श्रीकृष्णा निजहस्तें ॥७॥

१५५

कंसराया पूजितें नित्य । परि तो असुरचि उन्मत । काय पुरवील मनींचा हेत । दासी किंकर मी त्याची ॥१॥

परमात्मा हा सर्वेश्रवर । कृष्ण सुंदरा अतिसुंदर । चर्चनमिसें लावीन कर । अति मनोहर करीन पूजा ॥२॥

मग येऊनियां ते निकट जवळी । मस्तक ठेवी चरणकमळीं । म्हणे चर्चीन हा करतळीं । जरी तूं आज्ञा देशील ॥३॥

नित्य रायातें चर्चितां । चातुर्य आलें माझिया हातां । आतांही तेथेंहि जात जातां । तूंतें देखिले निज दृष्टी ॥४॥

मग तैसीची मी येथें आलें । तुझिया चरणातें पावलें । दासी विद्रूपचि परी मज ठेविलें । रायें याचि कार्यावरी ॥५॥

जणोनी तिचा अंतर्भावो । प्रसन्न झाले देवाधिदेवो । म्हणती तरी तूं अवश्यमेवो । चचीं चंदन निज हस्तें ॥६॥

निळा म्हणे आली पूजा । नाहींचि त्यागणे गरुडध्वजा । जैसिया तैसे मग हा वोजा । करी देणें यथोचित्त ॥७॥

१५६

रेखिले निढळीं केशरीं टिळक । तयावरी कस्तुरी परम सुरेख । उत्तम कुंकूं जाउळीं देख । लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥

मग तो चंदन मलयागर । चर्चिला सुवासित अति परिकर । यावरी काढुनी सुमनाहार । उभयतां कंठीं ओपिले ॥२॥

तुरे खोविले मस्तकावरी । तेणें शोभले बळरामहरी । मग ठेवूनियां चरणांवरी । मस्तक नमू उभी ठेली ॥३॥

कृष्ण बोलिले प्रसन्नोत्तर । कुब्जे तुझा केला अंगिकार । निळा म्हणे तदाकार । वृत्ति झाली कुब्जेची ॥४॥

१५७

राया जाणविती सेवक । अक्रूरें आणिला नंदबाळक । तेणं मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागही भंगिला ॥१॥

आतां येऊनियां चौबारी । उभा रंगशिळेवरी । अवघ्या पाहाती नगरनारी । लोकपरिवारीं मिळोली ॥२॥

उभयतां बंधू अति सुंदर । बळिराम आणि सारंगधर । आणखिही गौळियांचे कुमर । सवंगडे भार पांच शतें ॥३॥

कृष्ण लावण्य रुपाकृती । चंद्रसूर्या दवडी परती । अनंग तोहि उषभूपती । ऐसें सौदर्य हरिअंगी ॥४॥

लोक मिळाले भोंवते । पाहातां धणी नपुरे त्यातें । जाऊंचि विसरले मागुते । शोधलें चित्तें हरिरुपा ॥५॥

आणिक एक वितलें राया । कुब्जे चंदने चर्चिल तया । करुनियां ते दिव्य काया । ठेविली कृष्णें क्षणार्धे ॥६॥

निळा म्हणे सांगता ऐसें । चकित रावो निज मानसे । देहीं देहातें नुमसे । चित्रींचे लेप तयापरी ॥७॥

१५८

यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु । चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥

म्हणती कोठें रे करुनियां मेळ । चालिला ते अवघे गोवळ । नेणोनियां राजाज्ञा बळ । जैसे टोळ सैराट ॥२॥

पाठवा पुढें कृष्ण तोचि । आणील परवानगी तो रायाची । तंव गोवळ म्हणती रे हें वायाची । जल्पतां मराल येचि क्षणीं ॥३॥

परवानगीये एकचि ठावो । बळिराम अथवा कृष्णदेवो । सांडूनियां कंसरावो ।  रिघा रे शरण वांचाल ॥४॥

तंव तें म्हणती हीं कच्चीं पोरें । चणचणा बोलती न्यायनिष्ठुरें । भयचि हीं गव्हारें । आपटा एकदोनी धरुनियां ॥५॥

त्यांचियां कैवारा कृष्णनाथ । येईल आपोआप धांवत । मग करुनियां वरवळां समस्त । त्यासीहि वधूं निमिषार्धे ॥६॥

निळा म्हणे चिंतुनी ऐसें । घांविले गोवळांवरी अति आवेशें । तंव ते ओढिले नांगरपाशें । बळिरामें एकदांचि कवळिनें ॥७॥

१५९

तंव कृष्ण म्हणे बळिरामदेवा । आमुचाही वांटा कांही ठेवा । ते म्हणती यावरी अवघा । तुमचाचि भाग निश्रिचतार्थे ॥१॥

कुळवई आणि राजा कंस । अर्थार्थी हे दिधले तुम्हास । कृष्णजी म्हणती हें नये चित्तास । यांतहि वाटा पाहिजे ॥२॥

बरें म्हणोनियां बळिराम । यांतहि घ्या हो निमेनिम । मग मिसळले जेंवि निरसावया तम । चंद्रसूर्य पौर्णिमेचे ॥३॥

तेथें झाला हाहा:कार । घ्या घ्या शब्द उठिला थोर । कृष्ण नेटका झुंजार । आणि बळिरामहि महाबळी ॥४॥

करुनियां मल्लां महामारी । निर्दाळिले एका निमिषावरी । तंव तो कुळवई लोटिला निशाचरीं । कृष्णें सोंडेसीचि धरियला ॥५॥

आसडूनियां तो महीवरी । उपटूनि दांत घेतले करीं । ठोकिता तेणेंचि मस्तकावरी । ठिकरिया केली गंडस्थळें ॥६॥

निळा म्हणे बळियाबळि । माजी ब्रम्हांडा एक वनमाळी । यापरी करुनियां रवंदळी । निर्दाळिले असुर ॥७॥

१६०

कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥१॥

दोघेहि बंधु अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । हे देखोनियां महावीर । मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥

ते रायाचे परम आप्त । आतुर्बळी बळ प्रताप । जयां देखतांचि आहाकंप । देवां दैत्या मनवां ॥३॥

दंडी मुडपी उरीं शिरीं । अदभुत बळाची उजरी । काळासम तुल्य ते निशाचरीं । जेठिया वस्ताद मल्लाचे ॥४॥

तयाचिये दृष्टीपुढें । मेरुमांदार भासती खडे । मल्लविधेमाजी निधडे । वीर उन्नत शिघ्रकोपी ॥५॥

जयाचा सदा आडदरा । समुद्रवलयांकिता वीरा । धाकें त्याचिया कंसापुरा । देती करभार सर्वही नृप ॥६॥

निळा म्हणे ते आग्रगण । जेठियांमाजी शिरोरत्न । भुजा दंडांतें थोपटून । राहिले उठोन पुढें उभे ॥७॥

१६१

कृष्णबळिरामातें म्हणती । गोवळे तुम्हीं अर्भक जाती । मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका ॥१॥

बहुत दिवस खादलें लोंणी । चोरिये वोसिली दुधाणी । सिंतरुनियां भोगिल्या गौळणी । त्याचीही झाडती निघेल । ॥२॥

न विचारित पतंग जैसा । झडपूं धांवें दीपप्रकाशा । तैसे तुम्ही नेणंता कंसा । राया सन्निध पावलेती ॥३॥

पिपालिके फुटतां पक्ष । म्हणे गगन लंघीन मी अंतरिक्ष । परी मृत्यु पातला हें प्रत्यक्ष । न लक्षेचि परी ते झाली तुम्हां ॥४॥

रज क मर्दूनियां बलौता । निदसुरियां धनुर्धरा समस्तां । यश मानियेलें परि तें आतां । येचि क्षणीं जाणवेल ॥५॥

पूतना बाई माभळ भट । एक ते स्त्री एक ते भट । कागबगादिदैत्य आदट । नेणती मल्लसंग्राम ॥६॥

निळा म्हणे ठाकिलें त्यांसी । तेचि पाहों येथ आलेसी । ऐसे बोलोनियां अति आवेशी । भुजा थापटोनी उठिले ॥७॥

१६२

ऐसें बोलोनियां ते उन्मत । ठोक फोडिले सक्रोधयुक्त । आले सन्मुखचि धांवत । कृष्णबळिरामेंसी झगटावया ॥१॥

त्यां देखोनियां बळिराम । आणि हासोनी बोलती मेघ:श्याम । तुम्ही करुं आलेती संग्राम । तरी निरऊनियां स्त्रियां बाळां ॥२॥

आजिवरी भोगिलिया संपत्ती । त्याच्या संगे सुख विश्रांती । त्यांसी न पुसतां जाणें अंतीं । महापंथी हें उचित नव्हे ॥३॥

कंसारायाचें वैभव । भोगिलें चिरकाळवरी सर्व । त्याचिये काजीं वेचितां जीव । पावाल स्वयमेव उत्तम गती ॥४॥

परी एक सांगतों विचार । संग्रामीं न सांडावा धीर । जें जें वसउनियां शरीर । असेल विदया ते ते दावा ॥५॥

बहुत वल्गना आतां । वस्तादातें न पुसतां । यावरी तरी निश्रचळ चित्ता । करुनियां आठवा तयातें ॥६॥

निळा म्हणे बोलोनी ऐसें । युध्दीं उठावले सरिसे । मातंगा देखोनियां जैसे । सिंह पाडे भुकाळू ॥७॥

१६३

मेळवितांचि हातीं हात । आसुडिले ते अकस्मात । हें देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती ॥१॥

एक एका धरितीं करीं । दाविती चिकाटियाच्या परी । दंडिमुडपी उरीं शिरीं । मारिती धडका परस्‍परें ॥२॥

पायीं पाय आडवे तिडवे । गाउनी दाविती शक्तिवैभवें । वज्र मिठियाचीं लाघवें दाविती सुहावे येरयेरां ॥३॥

कोणिचि नाटोपती कोणा । चक्राकार भेदिती खुणा । रगा लाविती चाऊनि दर्शना । आक्रोशें माना मुरगाळिती ॥४॥

शेंडया उपटूनियां सांडिती । घे घें म्हणोनियां झोंबती । येरयेरां पृष्ठीवरी ताडिती । मिठिया घालिती येरयेरां ॥५॥

एक वरदी एक ईश्वर । उभया युध्दाचा परिचार । परी लाघविया हा सारंगधर । आणि बळिराम अवतारिया ॥६॥

निळा म्हणे वर्मभेदका । पुढें कवणाचा आवांका । पाहोनी मृत्युकाळ नेटका । उपटूनि भूमितें त्राहाटिलें ॥७॥

१६४

नाकीं तोंडी वाहे रुधिर । हातापायांचा झाला चूर । मस्तक मेंदु उसळे बाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥

तया देऊनि उतम गती । आनंदें बळरामश्रीकृष्ण्‍ नाचती । तांडव विसरे उमापति ॥ कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥

मोहित होऊनियां नारी नर । अवलोकिती बळिराम आणि श्रीधर । परम सुंदरा सुंदर । नागरा नागर भुलवणें ॥३॥

अवलोकिती कृष्णाकृती । लवोंचिं विसरलीं नेत्रपातीं । बळिराम देवाचीही मूर्ती । राजस सुकुमार त्याचिपरी ॥४॥

अंगी यशाचें गौरव । रुप लावण्याची ठेव । पहातां नयनां न पुरे हांव । मना स्वयमेव तेंचि होणें ॥५॥

यापरी तटस्थ् सकळां । लागले नरनारी बाळा । तेणें बहमानंद सुकाळा । झाली अधिकारी भोगिती ॥६॥

निळा म्हणे यावरी रावो । पावेल मुक्तीचा गौरवो । सोलीव सुखाचा स्वानुभवो । समर्पील कृष्णा तयासी ॥७॥

१६५

सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥

राव भयाचिये भक्ती । कृष्णाचि देखे सकळां भूतीं । आपआपणसीही अंतीं । कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥

जें जें देखे चाखे ऐके । तें तें कृष्णाचिया रुपें एके । ऐसा वेधोनियां निष्ठकें । ठेला निजसुखें निजकृष्णीं ॥३॥

सैन्य संपदा घरें दारें । स्त्रिया आदि करुनियां लेकुंरे । कृष्णवांचूनियां दुसरें । नाढळेचि जागृती निद्रे स्वप्रांत ॥४॥

कृष्णदेव आले जवळीं । हेंही नेणे तो ते काळीं । कृष्णावलोकनीं हें नव्हाळीं । लाधली भये आणि व्देषें ॥५॥

कृष्णचि त्या आसनीं शयनीं । कृष्ण भोजनी त्या प्राशनीं । कृष्णासी देखे जनीं वनीं । घेतला वेष्टुनी कृष्णरुपें ॥६॥

कृष्णावांचुनी नुरेचि कांहिं । जिवी मनीं बुध्दी देहीं । कृष्णचि होऊनियां लवलाही । कृष्णामाजीं मिसळला ॥७॥

कृष्णीमाजीं मिसळला ॥७ कृष्णीं कृष्ण तदाकार । होऊनियां राजा कंसासुर । पावला विश्रांतीचें घर । योगी साचार न लाहती जें ॥८॥

निळा म्हणे निजात्मत्योती । कंसाह्रदयीं जे बहु काळ होती । ते कृष्णें शोषूनियां निगुती । ठेविला आपुलिया निजह्रदयीं ॥९॥

१६६

अग्निसंस्कार देउनी त्यासी । संपादिलें उत्तर विधीसी । मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्य सिंहासनीं ॥१॥

नवाचि ध्वज नवें छत्र । व्दाहीं फिरविली सर्वत्र । साखरा वांटूनियां नगरांत । केले दानपात्र परमसुखी ॥२॥

रायाचे पूर्वील जे प्रधान । सन्मानिले ते गौरऊन । प्रजेसी सिरपाव देऊन । अधिकारी जन सुखी केले ॥३॥

यावरी मातापिता बंदिखानीं होतीं त्या बाहेरी काढुनी । वादयें लावूनी मंगलस्नानीं । बरव्या प्रकारीं पूजिलीं ॥४॥

वस्त्रे अलंकारें गौरविलीं । निजमंदिरातें अणियेलीं । सिबिका यानीं बैसविलीं । घोषगजरें मिरवित ॥५॥

तये काळींचा तो आनंद । सांगावया मी मतिमंद । जेथें परमात्मा गोविंद । संतोषवित मातांपिता ॥६॥

निळा म्हणे बोबडया बोली । हरिची कीर्ति हे वाखाणिली । संती पाहिजे उपसाहिली । नेणतें लडिवाळ म्हणोनियां ॥७॥

१६७

मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं । बोलीले कवी प्रासाद वाणी । तेही अर्थ मी नेणें ॥१॥

आपुलिये आवडीचिये भरीं । गौरविली म्यां हे वैखरी । श्रवण करावी हे चतुरीं । ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥

परी एक आहे विश्वास  थोरु । स्वामी तुकया हा सद्गुरु । न करील कदाही अव्हेरु । भाव माझा जाणोनी ॥३॥

कृष्णचरित्रीं हे वाग्बाणीं । वदविली तिहिंचि वर देउनी । पुरविली माझी हे आयणी । आर्त जाणोनि अंतरीचें ॥४॥

निळा म्हणे कृष्णार्पण । होतु कथिलें ते कृष्णगुण । ऐशी हे प्रार्थना करुन । ठेविला मस्तक चरणांवरी ॥५॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |

कृषी क्रांती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *